Saturday, May 30, 2020

नर्मदा परिक्रमा भाग २

परिक्रमेमागील तत्त्वे

जगन्नाथ कुंटे यांनी परिक्रमेचे जे नियम नमूद केले आहेत ते मानून चालाव्या लागणार्‍या आध्‍यात्मिक पठडीतील आहेत. उदा. गुरुंची आज्ञा, परिक्रमेला जाण्याची प्रचंड अंतस्फूर्ती, प्राणायामाचे प्रकार, नर्मदा न ओलांडणे इत्यादी मोघमपणे पाळायचे ते नियम आहेत. त्यांनी त्यांच्या विविध पुस्तकांत सांगितलेल्या अनुभवांची संगती आपण तसा विचार करण्‍याकडे झुकत असू तर गुरुकृपा आणि नर्मदामाईची कृपा एवढाच किंवा निव्वळ योगायोग असा लाऊ शकतो.
वास्तविक नर्मदेचीच परिक्रमा कशासाठी करायची? पौराणिक किंवा आध्‍यात्मिक कारणं जी मानली जात असतील ती असोत - पण त्या 10-12 कि.मी. मध्‍ये त्या जीवनाची मला जी झलक मिळाली त्यातून आणि आठवडाभरातील चिंतनातून परिक्रमा हा प्रकार मला आवडला. तो कशामुळे हे थोडक्यात आटोपतो. हे मूळ कथनाला सोडून अवांतर आहे पण हेच परिक्रमेचं सार आहे.
1. परिक्रमा ही एक एकदा का होईना करुन पहावी अशी मूलभूत रुपातील आगळी जीवनपद्धती आहे. सर्वसामान्यपणे लोकांच्या संगतीत राहून सगळंच करुनही विशेष असे काही साधत नाही. कशामुळे तरी कुठल्याही वयात असणार्‍या कुणाचाही श्‍वास थांबतो आणि तोंडाचे बोळके उघडे राहून त्याची निष्‍प्राण हाडं-आतडी शिल्लक रहातात. त्यापुढे कुठलाही शोध, संवाद, प्रयत्न अगदी सगळ्यालाच पूर्णविराम लागतो. पण सगळे काही व्यवस्‍थित चालू असताना एकटे राहून ज्ञाताच्या सीमेवरुन जो पुढे पाऊल टाकू इच्छितो त्याला परिक्रमेचा मार्ग मोकळा आहे. असं काही न मानता 'फॉर ए चेंज' वाल्यांनाही तो मोकळा आहे.
2. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या गावांमध्‍ये किंवा आश्रमांमध्‍ये ते लोक परिक्रमावासियांच्या जेवणाची सोय करतात. धपाट्यापेक्षा थोडा जाड आणि चवीला अगदी धपाट्यासारखाच 'टिक्कड' नावाचा पदार्थ आणि वरण हे दोन साधे पदार्थ आश्रमांमधून परिक्रमावासियांना दिले जातात - तोच त्यांचा सर्वसामान्य आहार. कुठंतरी निघुन जायचं आहे, पण तिथं गेल्यावर खायचं काय अशी चिंता कोणाही त्याच त्या रुटीनला विटलेल्या, कुठेतरी निघुन जाऊ इच्छिणार्‍या माणसाला सतावते. ही चिंता अशी आपोआप मिटली की परिक्रमावासी 'त्याचा त्याला' ध्‍यान करण्‍यासाठी स्वतंत्र असतो - हे एक.
याचीच दुसरी बाजू म्हणून ध्‍यान वगैरे काहीही न करता फक्त पोटभरीच्या माफक आशेनं परिक्रमेत फिरणारे लोकही आहेत. कारण नर्मदेच्या तीरावरील गावातील आणि आश्रमांतील लोक जेवणाची वेळ असेल आणि परिक्रमावासी नजरेस पडला तर कोणत्या का रुपात होईना, त्याला खाऊ घालतातच. तीरावर गावे जास्तीत जास्त 20-25 कि.मी. च्या टप्प्‍यांत असली तरी दर 3-5 कि.मी. वर एखादा तरी आश्रम हा प्रकार नर्मदेच्या तीरावर अद्याप टिकून आहे. आश्रमांची ही संख्‍या वाढतही आहे.
3. परिक्रमेदरम्यान आयुष्‍य सूर्योदय ते सूर्यास्त या दोन दररोज घडणार्‍या अत्यंत महत्त्वाच्या घटीकांमध्‍ये बांधले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्‍या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही. या दोन अपरिहार्यतांमुळे चालणं आणि एका ठिकाणी थांबणं या दोन क्रियांवर नैसर्गिक बंधनं येतात. चालण्‍यामुळं श्रम होतात, शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होतो.. आणि रात्री नैसर्गिकपणे येणार्‍या थकव्यानं प्रचंड नैसर्गिकपणे आलेली झोप लागते आणि 'ब्राह्ममुहूर्त' नावाचं जे काही आहे त्यावेळी आपोआप जागही येते. नैसर्गिक ठरलेल्या क्रमाने ध्‍यानाला बसता येतं. काही दिवसांचे अपवाद सोडले तर हा दिनक्रमच होतो - हा परिक्रमेचा गाभा.
4. परिक्रमेत चालताना रोज पुढे काय येईल हे माहित नसते. कित्येक पायवाटा, प्रस्तर, जंगल या असंख्‍य ठिकाणाहून प्रवास होतो. त्या-त्या भागाच्या बोलण्‍या-चालण्‍याच्या पद्धती दिसतात. त्यामुळं येणारा प्रत्येक क्षण, अनुभव नवा असतो. ओळख-पाळख नसलेले लोक मान देतात - काही अपमानही करतात. संकेतस्‍थळावर मी कोण व तो कोण हे पुरेसं स्पष्‍ट नसताना झालेला मान किंवा अपमान वेगळा आणि प्रत्यक्ष समोरासमोर झालेला मान किंवा अपमान वेगळा. मान मिळाला तरी मनात त्याबद्दल गंड निर्माण न होऊ देता त्याला योग्य असेल तसं सामोरं जायचं - आणि अपमान झाला तरी तो समजून घेऊन मौन रहायचं, किंवा पुढं चालायचं - हा सुद्धा एक क्रमच होऊन बसतो. हे नव्याने आलटुन पालटुन रोजच. शूलपाणीसारख्‍या ठिकाणी तर परिक्रमीजवळ असलेली प्रत्येक गोष्‍ट लुटण्‍याचेही प्रकार होतात. जरुर तेवढेच कपडे अंगावर असताना सर्वहारा अवस्‍थेत काही किलोमीटर चालणे आणि त्यादरम्यान मनात सुरु असलेली प्रक्रिया यातून जो अनुभव येतो तो विरळा आहे.
5. माणसात नैसर्गिकपणे असलेल्या, पण इतर रुटिनमध्‍ये अनुभवता न येणार्‍या जीव-ऊर्जेला नर्मदेच्या किनार्‍यावर उत्थापन मिळते. इनक्रीस्‍ड लेव्हल ऑफ एनर्जी. हे उत्थापन अर्थातच अवधानाचे विषय मर्यादित झाल्याने, तरीही त्यात नवेपणा, ताजेपणा असल्याने मिळते. आणखी सखोल सांगायचं तर, परिक्रमावासी एकाच दिशेने जाणार्‍या नर्मदेचे पाणी पितो - आणि नर्मदेचा प्रवाह ज्या दिशेने जात रहातो त्याच दिशेने शरीरातील पाण्‍यासगट माणूसही पुढे जात रहातो - हे गुजरातेतील भडोचजवळ नर्मदा सागरात जाईपर्यंत एका दिशेने चालू रहाते. नर्मदा सागराला जाऊन मिळाली तरी तिथून पुन्हा नर्मदेच्या उगमापर्यंत उलट परिक्रमा करीत यायचे असते. प्रवाही नर्मदा सागरात मिसळली तरी परिक्रमीच्या शरीरातील नर्मदा त्याच्यासोबतच उगमापर्यंत परत येते. उगमापर्यंतचा हा परिक्रमेतील प्रवास नर्मदेभोवती केलेले हिंडणे न ठरता स्वत:च्याच अंतरात सर्व स्तरांवर केलेले परिक्रमण ठरते. याचे सुपरिणाम कुठल्याही विश्लेषणाच्या पार असतात असे अनेक अनुभव आहेत - होणारी प्रक्रिया गहन व बहुपेडी आहे.
       परिक्रमा पूर्ण व्हायला लागणारा वेळ ती कोणत्या प्रकारे केली जाते यावर अवलंबून आहे. मध्‍ये पावसाळा लागणार नाही अशा बेताने, रोज किमान 20 कि.मी. अंतर कापण्‍याचा क्रम ठेऊन चालत केली तर 6 ते साडेसहा महिन्यांत परिक्रमा पूर्ण होते अशी माहिती साधुसंत, परिक्रमी आणि पुजार्‍यांकडून मिळाली. परिक्रमा 1. ओंकारेश्वर किंवा 2. अमरकंटक (नर्मदेचे उगमस्‍थान) येथून सुरु केली जाते. गुजरात आणि मध्‍य प्रदेशातील काही लोक हल्ली नारेश्वर, गरुडेश्वर, ग्वारी घाट किंवा कोणत्याही तीर्थस्‍थानाहून परिक्रमा सुरु करतात.
वाटेतील तीर्थक्षेत्री 8-8/ 15-15 दिवस राहिले, पावसाळ्याचे चार महिने एका स्‍थानावर राहायचे ठरवले (चातुर्मास) तर 3 वर्ष 3 ‍महिने 13 दिवस (किंवा 3.. प्रत्येकाने हा काळ वेगवेगळा सांगितला, अर्थातच तो चालण्‍याच्या वेगावर अवलंबून आहे) लागतात.
     ओंकारेश्वरहून निघाल्यानंतर नर्मदा तीरापासून 5 कि.मी. च्या आवाक्यात आणि अमरकंटकहून येताना 7.5 कि.मी.च्या आवाक्यात राहून तीरावरुन चालण्‍याचा नियम आहे. अगदी तीरच धरुन चालायचे तर फक्त जंगले पायवाटा, काटेकुटे, दगडधोंडे, नर्मदेच्या प्रवाहाने क्षरण झालेले संगमरवरी खडक, ओढे-नाले अशा नाना अडचणी (अगदी साप, मगरीही) पार कराव्या लागतात. नर्मदा मोजकी ठिकाणे सोडली तर नेहमी दृष्‍टीपथात असते.
     परिक्रमेदरम्यान सरदार सरोवर लागते. प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या तेथील जीवनशाळाही लागतात.
सरदार सरोवर आणि नर्मदेवर झालेल्या आणखी 3-4 धरणांमुळे परिक्रमेच्या मार्गात 200 कि. मी. ची अतिरिक्त भर पडली आहे. धरणाच्या पाण्‍याचा फुगवटा जिथपपर्यंत पसरला असेल तेवढा क्रमावा लागतो - अर्थात तीरावरुन चालणार्‍या परिक्रमीला. बसमध्‍ये बसून जाणार्‍यांना अशी अडचण नाही.
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...