Saturday, May 30, 2020

नर्मदेच्या तीरावरचे 'महेश्वर'

महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे येण्याचे आकर्षण बिंदू आहेत.
महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते.
fort
महेश्वर हे गाव भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये असून, इंदूर शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.महेश्वर हे नर्मदेच्या काठी वसलेलं शहर प्राचीन काळी ‘महिष्मति’ म्हणून प्रसिद्ध होतं. होळकरांच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठा साम्राज्याची, महेश्वर राजधानी होती. अठराव्या शतकाच्या शेवटी महेश्वर अहिल्याबाई होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपाला आले. अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासामध्ये अतिशय कुशल शासनकर्त्या म्हणून घेतले जाते. अगदी लहान वयामध्ये वैधव्याचा आघात सहन केलेल्या अहिल्याबाई, मल्हारराव होळकर यांच्या स्नुषा होत्या. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या नजरेखाली महेश्वरच्या राज्यकारभाराची धुरा सांभाळली. अहिल्याबाईंचे निवासस्थान असलेला वाडा साधाच पण प्रशस्त होता. येथूनच सर्व राज्याची व्यवस्था त्या पाहत असत. महेश्वरमधल्या राणी अहिल्यादेवींच्या राजवाड्यात शिरताना आपल्याला भावतो तो त्याचा साधेपणा. कुठेही भपका नाही, डामडौल नाही. तिथली माहिती वाचताना अहिल्यादेवींच्या महान कार्याची कल्पना येते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचा उत्तम संगम इथे दिसून येतो.अहिल्याबाईंच्या वाड्यातील यांचे खासगी मंदिर ही होळकर वाड्याची खासियत. या मंदिरामध्ये अनेक सोन्या-चांदीच्या देवदेवतांच्या प्रतिमा असत. आताच्या काळामध्ये या भव्य वाड्याचे रूपांतर हेरीटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.
fort1
अहिल्या बाईंच्या शासनाखाली महेश्वर संस्कृती आणि कलेचे केंद्र म्हणून नावारूपाला आले. या ठिकाणी त्यांनी अनेक सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे निर्माण करविले. त्याचबरोबर वाराणसी येथील काशी विश्वेश्वराचे मंदिरचेही निर्माण अहिल्याबाईनी करविले होते. दक्षिण आणि उत्तर भारताशी चांगल्या प्रकारे जोडले गेले असल्याने महेश्वर त्या काळी मोठी बाजरपेठ म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंवर मुघल, राजपूत आणि मराठा वास्तुशैलीचे प्रभाव पाहण्यास मिळतात. त्यावरूनच येथे किती प्रकारच्या संस्कृती एकत्र नांदत असतील, याचा अंदाज आपल्याला येतो.
    महेश्वरच्या किल्ल्याच्या पायऱ्या उतरल्यावर अहिल्येश्वरमंदिर लागतं. इथे अहिल्याबाईंची समाधी आहे. या आवारात अतिशय सुंदर, नाजूक नक्षीकाम केलेलं प्रवेशद्वार, खांब, कोनाडे बघायला मिळतात. त्यांचं कोरीव काम थक्क करणारं आहे. मंदिराच्या पायऱ्या उतरून घाटावर येताना ज्या दरवाजातून आपण येतो त्याला ‘पाणी दरवाजा’ म्हणतात. इथले मुख्य घाट म्हणजे अहिल्याघाट, पेशवाघाट आणि फणसेघाट. राजराजेश्वर हे इथलं प्राचीन मंदिर आहे. असं म्हणतात, की इथले अकरा नंदादीप अनेक दशकं अखंड तेवत असतात. काशीविश्वनाथ हे प्रसिद्ध मंदिर अहिल्यादेवीनीं बांधलं.
 देवदर्शन घेऊन आम्ही घाटावर यावे. ईथे अतिशय छान दृष्य असते. काहीजण पायऱ्यांवर निवांत बसले दिसतात, काहीजण माश्यांना चणे घालत असतात. काही पाण्यात डुबकी मारतात. बोटी या तीरावरून पलीकडे माणसांची ने-आण करत असतात. शांतपणे नर्मदेचं अथांग पात्र डोळ्यांत साठवून घ्यावे. पायऱ्या उतरून नर्मदामाईचं दर्शन घेउन, तिच्या थंडगार पाण्याचा झाला कि स्पर्शानं दिवसभराचा थकवा कुठच्या कुठं पळून जातो.
   संध्याकाळच्या नर्मदामाईची आरती असते. बरोबर आठ वाजता गुरुजी येतात. आधी नर्मदामाईची साग्रसंगीत पूजा होते आणि आरतीला सुरुवात होते. उपस्थित भाविक अतिशय तन्मयतेनं, एका सुरात, संथ गतीनं आरती म्हणतात. धूप, कापूर आणि उदबत्त्यांचा दरवळणारा गंध, तबकात तेवणाऱ्या निरांजनाच्या वाती आणि लयीत घुमणारा घंटानाद आसमंत भारून टाकणारा असतो. साक्षात नर्मदामाई आपल्यासमोर उभी आहे, असा भास होत होतो. त्याच भारावलेल्या अवस्थेत आपण परतीची वाट धरतो.
fort2
नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर ठाकतो. या किल्ल्यावरूनच संथ वाहत जाणार्‍या नर्मदेचे धीरगंभीर पात्र दिसते. याच किल्ल्यात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.
raj rajeshwar mandir
मंदिरे
महेश्वरातील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्येश्वर ही मंदिरे खासकरून पाहण्यासारखी आहेत. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच देखण्या आहेत. अहिल्याबाई या जनतेप्रती कनवाळू व गुन्हेगारांप्रती कठोर शासक म्हणून प्रसिद्ध होता. आपल्या मुलालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांनी हत्तीच्या पायी देऊन मारले होते, अशी कथा आहे. त्याचे मंदिरही येथे उभारण्यात आले आहे.
     अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वरची मुख्य आणि अतिशय प्रसिद्ध खासियत म्हणजे येथील महेश्वरी साड्या. या साड्यांना आजच्या काळामध्ये केवळ भारतामध्ये नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील मोठी मागणी आहे. अहिल्याबाईंनी महाराष्ट्रातून खास कारागिर ( साड्या विणणारे विणकर) महेश्वर येथे बोलावून घेतले आणि त्या काळी मराठी स्त्रिया परिधान करीत असलेल्या नऊवारी साड्या विणण्यासाठी त्यांना हातमाग उपलब्ध करवून दिले. कालांतराने या महेश्वरी साड्यांची ख्याती भारतभर पसरली. आजही या साड्या येथील खासियत असून, आताच्या काळामध्ये या साड्या विणण्याचे काम मुख्यत्वे महिलांच्या द्वारे केले जात असते. हातमागावर साडी विणताना बघताना लक्षात येतं, एका वस्त्रामागे किती कष्ट आहेत. नजर खिळवून ठेवणाऱ्या सहजतेनं आणि सफाईनं विणकर वेगवेगळ्या रंगाचे धागे बदलत होते. त्यांच्या कौशल्याचं कौतुक केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून जाणारा आनंद पाहताना झालेला आनंद सुंदर साडी घेतल्याच्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होता.

 कुतूहल – महेश्वरी साडी



      इंदूर येथे होळकरांचे राज्य होते आणि त्या घराण्यातील अहिल्याबाई होळकर या प्रजेची खास काळजी वाहणाऱ्या म्हणून सर्वाना ज्ञात आहेत. संस्थानातील स्त्रियांना साडय़ांसाठी दूरवरच्या गावांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे त्यांची अडचण होते. हे लक्षात घेऊन इंदूर परिसरात साडीनिर्मितीला उत्तेजन द्यायचे अहिल्याबाईंनी ठरवले. त्यासाठी पठणपासून सुरतपर्यंत राहणाऱ्या विणकरांना सवलती देऊन महेश्वरला बोलावले. त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा महेश्वरला उपलब्ध करून दिल्या. तिथे महेश्वरला साडी उत्पादन सरू झाले ती साडी म्हणजे महेश्वरी साडी.
      महेश्वरी साडी संपूर्ण सुती साडी असते किंवा सुती ताणा (उभे धागे) आणि रेशमी बाणा (आडवे धागे) अशा पद्धतीने ही विणली जाते. महेश्वरी साडीचे काठपदर रंगीत पण इतर साडय़ांपेक्षा अरुंद असतात. त्यावर जरीकाम करून चौकडी किंवा उभे/आडवे पट्टे यांचे डिझाइन विणले जाते. पदर नेहमी गडद रंगांचा असतो. पूर्वी राजघराण्यापुरती वापरली जाणारी साडी आता देशात-परदेशात दूरवर वापरली जाते. पूर्ण रेशमी धाग्यांनी विणलेल्या महेश्वरी साडीला एक देखणी झळाळी असते आणि ती टिकायलापण मजबूत असते. आता कृत्रिम रेशमाचा वापर करूनही महेश्वरी साडय़ा विणल्या जातात, त्याची किंमत कमी व्हावी या उद्देशाने.
महेश्वरी साडी एकरंगी असते तशीच चौकडी किंवा पट्टे यांचे डिझाइन वापरून विणलेली पण असते. रंगसंगती मात्र एकमेकांना साजेल अशीच ठेवतात. ‘बुगडी महेश्वरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साडीची किनार
उलट-सुलट अशी कशीही वापरता येते. किनारीला पाना-फुलांची नक्षी असते. महेश्वरी साडय़ात चटई, हिरा, चमेलीचे फूल या डिझाइनना सध्या जास्त मागणी आहे.
      किनारीसाठी खऱ्या जरीचा वापर हे महेश्वरी साडीचे आणखी एक वैशिष्टय़ होय. त्यामुळे महेश्वरीला वेगळा तजेलदारपणा येतो.
     पूर्वी नैसर्गिक रंगांचाच वापर होत होता तोपर्यंत लाल, हिरवा, तपकिरी, पिवळसर असे ठरावीक रंग असत. आता रसायनयुक्त रंगांमुळे रंगांमध्ये बरीच विविधता आली आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे.
कसे पोहोचाल?
हवाई मार्ग- महेश्वरला यायला जवळचे विमानतळ इंदूर आहे.
रस्ता मार्ग- इंदूरहून येथे दोन मार्गांनी येता येते. त्यामुळे दोन मार्गांनी हे ७७ व ९९ किलोमीटर आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धामणोदपासूनही येथे येण्यासाठी फाटा आहे. याशिवाय इंदूर खांडवा मार्गावर असलेल्या बडवाह येथूनही महेश्वरसाठी फाटा आहे.
रेल्वे मार्ग- महेश्वरसाठी बडवाह हे जवळचे रेल्वे ठिकाण आहे. इंदूर खांडवा या छोट्या लाईनवर बडवाह आहे.
जुलै ते मार्चपर्यंतचा काळ येथे येण्यासाठी उपयुक्त आहे.
रहाण्याची व्यवस्था- येथे गेस्ट हाऊस, रेस्ट हाऊस, धर्मशाळा आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...