Tuesday, April 18, 2023

पटाया

 कालच थाईलँडच्या (थायलंडच्या नव्हे) पाच दिवसांच्या भेटीवरून परत आलो. पट्टायाला तीन दिवस आणि बँकॉकमध्ये दोन दिवस होतो. तिथे जाऊन आल्यानंतर काही गोष्टी लिहित आहे:

१. भारतीय पासपोर्टधारकांना तिथे विमानतळावरच व्हिसा मिळू शकतो. पण आम्ही थाई कॉन्स्युलेटकडे आधी अर्ज करून पर्यटक व्हिसा घेतला होता. त्याचे कारण विमानतळावर व्हिसा मिळवायला वेळ लागू शकतो. काही जणांना दीडेक तास रांगेत थांबावे लागले असेही ऐकले आहे. मुळात ५ दिवस तिथे जाणार असू तर त्यात दीड तास असा घालवणे जीवावर येईल. विमानतळावर व्हिसा घेताना दोघांसाठी किमान २० हजार बाथ (साधारण ५० हजार रूपये) आपल्याकडे आहेत आणि हॉटेल बुकिंग झाली आहेत आणि परतीचे विमानाचे तिकिटही बुक झाले आहे याचे प्रिंट दाखवावे लागतात. तसेच एक फॉर्मही भरावा लागतो. एकाच वेळेस भारतातून बरीच विमाने तिथे गेली तर थांबायला लागू शकते. व्हिसासाठी आधी अर्ज केला होता तेव्हा या सगळ्या गोष्टींचे प्रिंट बरोबर जोडले होते त्यामुळे तो प्रश्न आला नाही. व्ही.एफ.एस ग्लोबलकडून व्हिसासाठी अर्ज करता येतो. तसेच विमानतळावर व्हिसा घ्यायचा असल्यास त्यांची व्हिसा फी थोडी जास्त असते. भारतात अर्ज केल्यास ती कमी पडते.

२. शक्यतो केसरी किंवा वीणाज वर्ल्ड किंवा तत्सम यात्राकंपनीबरोबर न जाता आपणच टूर डिझाईन केलेली चांगली. यात्राकंपनीवाले त्यांची ठराविक ठिकाणेच दाखवतात. पट्टायाजवळ कॉरल आयलंडला ते नेतातच. गोव्याला कित्येकदा गेल्याने कॉरल आयलंडचे विशेष कौतुक नव्हते. पट्टायामधील महत्वाची आकर्षणे ते दाखवतच नाहीत. त्यातील सगळ्यात महत्वाचे आकर्षण आहे टायगर पार्क. तिथे अगदी छोट्या पिल्लापासून मोठ्या वाघापर्यंत आपण अगदी जवळ जाऊन वाघाला हात लाऊ शकतो. ते ठिकाण यात्राकंपनीवाले दाखवत नाहीत.

Tiger park

३. आम्ही मेकमायट्रीपकडून टूर बुक केली होती. टूर म्हणजे हॉटेल्स आणि बँकॉक विमानतळापासून पट्टायामधील हॉटेल, पट्टायातील हॉटेलपासून बँकॉकमधील हॉटेल आणि तिथपासून विमानतळावर परत एवढेच त्यांच्याकडून घेतले होते. नव्या देशात जाताना गाड्या कुठून मिळवायच्या वगैरे शंका आल्याने मेकमायट्रीपकडून ते घेतले. पण तसे न करता तिथे जाऊन गाड्या घेतल्या असत्या तर स्वस्तात पडले असते असे जाणवले.

४. पट्टायामध्ये शंभरेक भारतीय रेस्टॉरंट असावीत. आपल्या हॉटेलमध्ये ते खाद्यपदार्थ आणूनही देतात आणि तिकडे हॉटेलमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ आणलेले चालतात. ते आहे म्हणून ठीक आहे. अन्यथा शाकाहारी लोकांचे वाईट हाल होऊ शकतात. भारतातले मांसाहारी लोकही कोंबडी, बोकड, मासे वगैरे गोष्टीच खातात. भारतातील कोणी मगर खात असेल असे वाटत नाही. पण तिथे खातात. बाहेर ठिकठिकाणी खाण्याचे स्टॉल असतात. तिथे किमान दोन ठिकाणी मगर टांगलेली बघितली.

५. थाईलँडमध्ये सगळ्या गोष्टी प्रचंड महाग आहेत. बायकोचा एक ड्रेस धुऊन इस्त्री करायचे हॉटेलमधील लाँड्रीवाल्यांनी भारतीय रूपयात ४०० सांगितले. एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आलू पकोडे ६५० रूपये प्लेट सांगितले. आम्हाला त्यातल्या त्यात स्वस्त रेस्टॉरंट मिळाले तिथे असे अवाच्या सवा दर नव्हते. पट्टायामध्ये अगदी पावलापावलावर ७-११ ची स्टोअर्स दिसतात. तिथून ब्रेड, चीप्स वगैरे गोष्टी उचलता येतात. बँकॉकमध्ये तितकी ७-११ दिसली नाहीत.

६. पट्टायामधील लोक बोलायला कुचकट आणि उध्दट वाटले. ज्या शहराचे मुख्य पोटभरीचे साधन पर्यटन आहे अशा ठिकाणी उध्दट लोकं बघायला मिळतील असे वाटले नव्हते पण मिळाले. उदाहरणार्थ बायकोने एक छत्री कव्हरमधून काढून कशी आहे ते उघडून बघितले तर त्या ठिकाणची दुकानातील बाई ती छत्री परत कव्हरमध्ये भरायला सांगत होती. तसेच कपडे ट्राय करणे तर दूरच राहिले कापड कसे आहे हे बघायला पिशवीतूनही बाहेर काढायचे नाही असे सांगण्यात आले. असे अनुभव पुण्यातही यायचे नाहीत. बँकॉकमध्ये मात्र अनुभव चांगला आला.

७. आम्ही पट्टायात गेलो त्या दिवशी अलकझार हा कॅबरे शो बघितला. दुसर्‍या दिवशी आमच्या हॉटेलच्या उत्तरेकडील ठिकाणे आणि तिसर्‍या दिवशी दक्षिणेकडील ठिकाणे बघितली. दक्षिणेकडे नाँग नुच गार्डन म्हणून एक अप्रतिम ठिकाण आहे. तिथे हत्तींचा शो अगदी जरूर बघावा असा असतो. टायगर पार्कजवळच फ्लोटिंग गार्डन आहे ते ठिकाणही बघण्यासारखे आहे. बँकॉकमध्ये ICONSIAM हा जगातील दहावा (आणि थाईलँडमधील दुसरा) सगळ्यात मोठा मॉल आहे तो पण जरूर बघावा. तो ९ मजल्यांचा मॉल आहे. मी तरी इतका मोठा मॉल पूर्वी कधीच बघितला नव्हता. त्या मॉलच्या जवळच नदीतून क्रूझ जाते. ती क्रूझही घेतली होती.

८. तिथल्या लोकांची इंग्लिशच्या नावाने बर्‍यापैकी बोंब असते. अशावेळेस गुगल ट्रान्सलेट वापरून आपल्याला काय म्हणायचे आहे ते त्यांच्या भाषेत त्यांना ऐकवणे हा एक उपाय वापरता येतो.

९. बँकॉक एकदम 'हॅपनिंग' शहर वाटले. कित्येक पर्यटनस्थळे तिथे आहेत. शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर खूपच चांगले आहे. पण ट्रॅफिक मात्र वाईट आहे. लोकंही त्यामानाने खा प्या मजा करा अशा मनोवृत्तीचे वाटले. थोडेफार फसवाफसवीचे प्रकार चालतात. उदाहरणार्थ तिथला ग्रॅन्ड पॅलेस बघायला आम्ही दुपारी अडीच वाजता गेलो होतो तेव्हा आम्हाला सांगितले गेले की पॅलेस साडेतीनपर्यंत उघडा असला तरी तिकीटविक्री दोनलाच बंद होते. मग टुकटुकवाल्याने (रीक्षासारखे वाहन) त्यामानाने स्वस्तात दोन तीन बुध्दमंदिरांमध्ये नेले. मध्ये एका जेम स्टोअरमध्ये नेले होते. किमान १५ हजारापासून पाच लाखांपर्यंतच्या अंगठ्या, गळ्यातली, कानातली अशा कित्येक गोष्टी तिथे होत्या. पर्यटकाने तसले काही महागडे घेतले तर त्याचे कमिशन त्या टुकटुकवाल्याला मिळते म्हणून ते तिथे घेऊन जातात. तिथेच एक souvenir shop होते. तिथून माझ्या टेबलवर ठेवायला एक छोटा लाकडी हत्ती घेतला. दाखवताना हत्तीचे दात वेगळे दाखवले आणि तो हत्ती पॅक करून दिला. घरी येऊन बघतो तर हत्तीचे दात गायब होते.

१०. पट्टायामध्ये थाई मसाजची संस्कृती खूप म्हणजे खूपच आहे. काही भागांमध्ये एकूण दुकानांपैकी ५-७% दुकाने मसाजचीच असावीत. त्या आड वेश्याव्यवसायही चालतो. पर्यटक वेश्यांना आपल्या हॉटेल रूमवरही घेऊन जातात. पण उगीच कोणाला तरी खाणाखुणा करणे, कोणाच्या तरी गळ्यात पडणे असले प्रकार सुदैवाने तिथे होत नाहीत त्यामुळे त्या प्रकाराचा उपद्रव आपल्याला होत नाही.

थायलंडमधील स्कुबा डायव्हिंग वगैरे केलेत का ?

नाही. ते कॉरल आयलंडमध्ये होते. स्कुबा डायव्हिंग सोडून तिथे उपलब्ध असलेले इतर सगळे प्रकार- पॅराग्लायडींग, बनाना राईड वगैरे गोव्यात केले आहेत. तेव्हा एका स्कुबा डायव्हिंगसाठी कॉरल आयलंडपर्यंत जाऊन येऊन अर्धा दिवस घालविणे जीवावर आले होते. आणि तसेही स्कुबा डायव्हिंग केले असतेच असेही नाही.

रस्त्यावर फिरताना वेश्याव्यवसायातील लोकांचा त्रास होतो का ??

बँकॉकमध्ये पॅटपॉन्ग म्हणून रात्रीचे मार्केट आहे. ते बघायला गेलो होतो. तिथे बाजूला तसली दुकाने आहेत. दोन वेगवेगळे दलाल 'मेन्यू कार्ड' घेऊन आले होते. तिकडे रेस्टॉरंटच्या बाहेरही असे मेन्यु कार्ड घेऊन लोकं असतात आणि जाणार्‍या येणार्‍यांना आपल्या रेस्टॉरंटमध्ये बोलावतात. पहिल्यांदा वाटले तसलाच प्रकार आहे. पण तो मेन्यु वेगळाच होता. मग दुकानाच्या आत काही कन्यका दिसल्या तेव्हा नक्की काय प्रकार आहे ते समजले. वेश्या स्वतः खाणाखुणा करून बोलावत आहेत असले प्रकार एकदाही बघायला लागले नाहीत. हे दलाल लोकही फार गळ्यात पडत नव्हते. तेव्हा आपल्यासारख्यांना त्या प्रकाराचा विशेष उपद्रव होत नाही.

आता पूर्वी झाले नसल्यास एकदा पूर्ण स्वतः प्लॅन करून फक्त फुकेट करा. बँकॉक आणि पटायापेक्षा असंख्य पट सुंदर.

बाकी ते वाघ (मोठे वाघ) कायम गुंगीच्या डोसाखाली शांत ठेवलेले असतात आणि बाटलीने वाघाच्या पिलांना दूध पाजताना पर्यटक फोटो काढतात त्यामुळे त्या पिलांना पोटभर पिऊ न देता कायम भुकेले ठेवतात. फोटोच्या काही क्षणांत ते आसुसून मिळेल तितके पिऊ पाहतात. दोन चार घोटातच पुन्हा दुधाची बाटली दूर केली जाते. पोट भरले की ते बराच काळ फोटोसाठी दूध पिण्याची पोज देणारच नाहीत म्हणून.

एकूण वाघांचे चित्र तिकडे करूण आहे.

आता पूर्वी झाले नसल्यास एकदा पूर्ण स्वतः प्लॅन करून फक्त फुकेट करा. बँकॉक आणि पटायापेक्षा असंख्य पट सुंदर.

हो फुकेटला पण कधीतरी जायची इच्छा आहे. काहींनी सांगितले की ते गोव्यासारखेच आहे. त्यामुळे यावेळेस तिथे न जाता बँकॉक-पट्टाया केले. तसेही फुकेट बँकॉकहून लांब आहे- विमानाने दीडेक तास त्यामुळे एकाच ट्रीपमध्ये ते पण करायचे असते तर आणखी ३-४ दिवस वाढले असते. ते यावेळी शक्य नव्हते. पट्टायातील समुद्रकिनारे विशेष आवडले नाहीत. मुंबईत मरीन ड्राईव्हला समुद्राशेजारी वाहता रस्ता आहे तसे समुद्रकिनारे तिथे आहेत. दक्षिण गोव्यात शांत आणि गावापासून दूर समुद्रकिनारे बघितल्यापासून तसेच किनारे चांगले वाटतात. फुकेट गोव्यासारखेच आहे का? गोव्याहून चांगले किंवा वेगळे असेल तर नक्कीच जायचे आहे. बरेच लोक फुकेट आणि मलेशियातील लांगावी एकाच ट्रीपमध्ये करतात. तसे करता येईल.

एकूण वाघांचे चित्र तिकडे करूण आहे.

बापरे. हे माहित नव्हते. आम्ही गेलो होतो तिथे वाघांना दूध पाजायला ठेवले नव्हते आणि वाघही चांगले धष्टपुष्ट वाटले. भुकेले नसतील अशी अपेक्षा. आम्ही दोन वाघांना हात लावला. दोघेही जागे होते. तिथल्या गार्डनी सांगितले की या वाघांना ते अगदी लहान असल्यापासून माणसांमध्ये वावरायची सवय करतात त्यामुळे माणसे जवळ आली तरी त्यांना काही वाटत नाही. काही लोक वाघाची शेपूटही हातात पकडून फोटो काढत होते. मला तो प्रकार आवडत नाही. कोणत्याही प्राण्याला त्याची शेपूट प्रिय असते त्यामुळे शेपटीला हात लावायला मला तरी आवडत नाही. त्या वाघांच्या दोन मावशांचे नवरे आम्ही पाळले आहेत. त्यांच्याही शेपटीला कधी हात लावत नाही.

वर्णन आवडल्याबद्दल आणि तसे लिहिल्याबद्दल कपिलमुनी, कंजूसकाका, गवि आणि भक्तीताई यांचे आभार.

फुकेत उत्कृष्ट आहे. गोव्याशी तुलना योग्य नव्हे.

तिथे आठ दहा दिवस वेळ ठेवून जा. बेस्ट ऑफ थायलंड = फुकेत

बाकी मोठ्या वाघांना उपाशी ठेवत नाहीत. त्यांना गुंगीत ठेवतात. अन्यथा ते कधीही अचानक हिंस्त्र होऊ शकतात, अनोळखी व्यक्तीसोबत. ते बहुतांश वेळा झोपलेले असतात. अनेकदा फोटोसाठी ढोसकलून जागे केले जाते, डोके वर करावे म्हणून. इतके शांत आणि dull वाघ निसर्गत: नसतात. अगदी माणसांत राहिले नाही तरी ते dull नसतात.

उपाशी ठेवणे हे पिल्लांबाबत. त्यांचे पोट भरू दिले की ती बाटली चोखणारच नाहीत. त्यामुळे फोटोला हुकमी पोझ मिळणारच नाही. दोन घोट जेमतेम पिताच काढून घेतात. म्हणून ते बछडे फोटोच्या वेळी अत्यंत आसुसून जितके घाईने जमेल तितके दूध पीत असतात.

पताया केव्हाच फारच 'चीप' टूरीस्ट स्थळ झाले आहे. पुकेत अद्यापिही खूप चांगले आहे. अगदी सुन्डर अनुभव मात्र को समुई येथे मिळेल. तसेच चिंग मई येथे. ('को' म्हणजे बेट).

माझ्या अनुभावांत थाई लोक वागायला अतिशय छान (वॉर्म म्हणता येईल असे) आहेत. थायलंडला जाणे मला नेहमीच आवडत आलेले आहे, व ह्यापुढेही वेळ आल्यास मी तेथीच कुठेतरी (पतायासारखी चीप स्थळे सोडून) जाईन.

 

बँकॉकमध्ये दोन बुध्दमंदिरांमध्ये गेलो होतो. तिथे एके ठिकाणी मंदिराच्या देखभालीचे काम दुसर्‍या दिवशीपासून सुरू होणार होते त्यामुळे ते मंदिर महिनाभर बंद असणार होते. त्या देखभालीसाठी पर्यवेक्षक म्हणून सरकारी विभागातून निवृत्त झालेला एक सिव्हिल इंजिनिअर तिथे आला होता. तो आम्हाला भेटला. एकंदरीत बर्‍यापैकी धार्मिक माणूस वाटत होता.बुध्दमंदिराचे काम आपल्याला करायला मिळणार याचा आनंद त्याला होता आणि निवृत्त झाल्यावरही भगवान बुद्धाच्या मंदिराचे काम म्हणून तो कोणताही मोबदला न घेता तिथे आला होता. आम्ही भारतातून आलो म्हटल्यावर 'गौतम बुध्दाची भूमी' म्हणून त्याला आमच्याविषयी लगेच आपलेपणा वाटला. किती दिवस राहणार, कुठे जाऊन आलात वगैरे प्रश्न त्याने विचारले. तेव्हा पटायाचे नाव ऐकताच नापसंती त्याच्या चेहर्‍यावर लगेच दिसली. दारू पिऊन आणि वेश्याव्यवसायाने तिथे सगळी वाट लावली आहे असे त्याने लगेच म्हटले.

को सामुईला काही मेडिटेशन रिट्रीट्स असतात. तिथे कधीतरी जायचे आहे. चिअँग मै ला पण कधीतरी जायचे आहे.

खरे तर पुकेत वा को समुई असल्या ठिकाणी 'पहाण्यासारखे' विशेष काही नसतेच- सुंदर स्वछ समुद्रकिनारा सोडून. प्राणिसंङ्रहालय, पाळलेले वाघ वगैरे खास, थोडे (माफ करा), स्वस्त टूरीस्ट आकर्षित करून घेण्याच्या व्यवस्था असतात. ह्या ठिकाणी माणसांनी जावे ते तेथील समुद्र किनार्‍यालगतच्या रीसॉर्ट्मधे राहून, शांत अनुभव घेण्यासाठी. समुद्रकिनारी डुंबावे, खावे, प्यावे, एकादे पुस्त़क घेऊन तेथेच लाउंजिंग करावे, वाचावे, अधूनमधून डुलक्या काढाव्यात.. असा सर्वससधारण उपक्रम असतो.

 पटायाचे नाव ऐकताच नापसंती त्याच्या चेहर्‍यावर लगेच दिसली. दारू पिऊन आणि वेश्याव्यवसायाने तिथे सगळी वाट लावली आहे असे त्याने लगेच म्हटले.

हे लिहील्याबद्दल माफ करावे. पताया अनेक वर्षांपासून, चीप टूरीस्टांसाठीच आहे. चीप म्हणजे, स्वस्त 'रीसॉर्टां'त राहणे, तेथील बार्समधे वेळ घालवणे, तेथील स्त्रीयांशी लगट करणे (बहुधा भारतीय टूरीस्टांची झेप तेव्हढीच; त्यापलिकडे तेथे जाणार्‍या भारतीय टूरीस्टांची क्रयशक्तीच नसते) असल्या गोष्टींसाठी. हीच वस्तुस्थिती,, थोडीफार फिलीपीन्समधील सेबूचीही आहे.

हो असे समुद्रकिनार्‍यावर शांतपणाचा अनुभव घ्यायला आवडते. दक्षिण गोव्यात आतापर्यंत अनेकदा तोच अनुभव घ्यायला गेलो आहोत. आता झाले असे आहे की गोव्यातील समुद्रकिनार्‍यांपुढे इतर कुठचेच समुद्रकिनारे विशेष आवडेनासे झाले आहेत. बालीतलेही किनारे गोव्याइतके आवडले नाहीत. पटायात तर नाहीच आवडले. अमेरिकेत फ्लॉरीडात पनामा सिटी आणि डेटोनाचे किनारे बघितले होते त्यांनाही आपल्या बाणावली किंवा कावेळोशी (कॅवेलोसिम) ची सर आहे असे वाटत नाही.

भारतात कुठेही असले तरी शाकाहारी काहीतरी मिळतेच. फार तर अगदी चमचमीत असे काही मिळायचे नाही आणि गोव्यात मांसाहारी पर्यटक जी खाण्याची मजा करू शकतात ती मला करता येत नसेल पण भुकेले राहायची वेळ येत नाही. फुकेत किंवा परदेशात कुठेही तो प्रश्न येईल का हा प्रश्न नेहमी पडत असतो.

 पतायाचे हे रूप तिथे गेल्यावरच कळले. पर्यटनस्थळांच्या बाबतीत ते शहर वाईट नाही. आपल्यासारख्या दारू आणि लगट करणे वगैरे प्रकाराच्या वाट्याला न जाणार्‍या पर्यटकांना थेट उपद्रव होईल असा अनुभव नशीबाने आम्हाला तरी आला नाही. बरेच पर्यटक नक्की कशासाठी तिथे जातात हे तिथे गेल्यावर कळले. कुठेतरी भेटलेली वेश्या आपल्या हॉटेलच्या रूमवर घेऊन जायची हे प्रकार करणारे पर्यटकही असतात. आणि हॉटेलमध्येही तसे करायला कसलीही आडकाठी नाही.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...