काही महीन्यांपूर्वी मी इथे मायबोलीवर इस्ट कोस्टच्या ट्रिपच्या प्लॅनिंगबद्दल विचारले होते. मस्त पार पडली ती ट्रिप! त्याचा हा क्रमशः वृत्तांत..
या लेखात ,पहील्याच दिवशी आमची कशी आणि किती प्रकारची गडबड झाली हे लिखाणातून दाखवायचा थोडा वेगळा प्रयत्न केलाय..
------------------------------------------------------------------------------------
दिनांक ४ सप्टेंबर २००९ ..
मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व
एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती ..
थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय
घरात.. पण काम काही उरकत नाहीये..
शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो अध्याय संपवला..
आता फुल्टू बॅगा भरणे वगैरे काम करूया म्हणून लिस्ट करायला घेतली… हसू नका! मी अहोरात्र लिस्टा करत असते..
ग्रोसरी काय आणायची, अभ्यास कसला करायचा, शॉपिंगसाठी कुठ्ल्या दुकानात
जायचे, घर कसं आणि कुठून आवरायचे याचबरोबर मी नेहेमी प्रवासाला जायच्या आधी
लिस्ट करते.. बॅगेत भरायच्या सामानाची लिस्ट. यात सबलिस्ट येते. बाहेर
भटकायचे कपडे, घरात घालायचे कपडे त्यांची लिस्ट.. त्यानंतर येतात कॅमेरे,
हॅंडीकॅम्स, त्यांचे व सेलफोन्सचे चार्जर्स .. अर्थातच सेलफोन्स सुद्धा!
शिवाय टोप्या व गॉगल्स, सनस्क्रीन लोशन्स पाहीजेतच! त्यांना मोठा गोल – न
विसरण्यासाठी.. आवरण्यासाठी लागणारे सामानाची वेगळी लिस्ट.. त्यातही
सबलिस्ट करता येते.. माझे कॉस्मेटीक्स आणि नवर्याचे दाढीसामान,पर्फ्युम्स
वगैरे वेगळंच..
असो.. मी इथेही बॅगच भरायला लागले की…
तर हे सगळं करताना एकीकडे कागदपत्रांची लिस्टही करणे जरूरी होते.. टोटल सहा दिवसांच्या मुक्कामात लागणारी हॉटेल बुकींग्स, रेंटल कार्स, उडणारी विमानं, पळणार्या बसेस सर्वांची कन्फर्मेशन्स..
आणि धडाम धूम! ४ तारखेला संध्याकाळी ४वाजता माझ्या लक्षात आले की अजुन
न्युयॉर्क मधले हॉटेल, तिथे घ्यायच्या टूर्स शिवाय रेंटल कारचे काम बाकी
आहे !! मग काय नुसती पळापळ.. एका साईडला फ्रिजमधे पेरिशेबल वस्तू नाहीयेत
ना हे पाहायचे, तर दुसरीकडे हॉटेल कुठले हे शोधायचे.. हॉटेलं सगळीच महाग!
मग निदान टूरला जवळ पडेल असं तरी शोधावं.. अरे देवा, टूर कुठे बुक केलीय
अजुन! ओह तो आवडता टॉप बॅगेत टाकायचा राहीला.. नायगराला थंडी असेल,
स्वेटरही टाकला पाहीजे.. टुर कुठली घ्यावी? महीन्याभरापूर्वी एक चांगले
टूरचे पॅकेज सापडले होते.. आता कुठून शोधू मी? साईटचे नावही आठवत नाहीये..
हिस्टरीचे रेकॉर्ड्स पाहावेत.. अजुन डिलीट केली नसेल तर बरंय.. हा, हे
हिस्टरीचे पान .. नेक्स्ट .. नेक्स्ट .. नेक्स्ट.. टॉप आणला… नेक्स्ट
..नेक्स्ट .. स्वेटर, टुथब्रश ठेवले.. नेक्स्ट .. नेक्स्ट.. ( आईगं किती
ब्राउझिंग करते मी!! ) नेक्स्ट.. थोडा लाडू चिवडा आणि प्रिंगल्स ठेवावेत..
लागतात प्रवासात.. नेक्स्ट.. नेक्स्ट .. निनादचीही बॅग भरून ठेवावी, त्याला
काय २ जीन्स ५ शर्ट्स.. बास होतात! मुली का नटतात इतक्या! .. नेक्स्ट..
नेक्स्ट.. हुश्श.. सापडली एकदाची! ह्म्म.. टूर करून टाकते बुक.. आता टूर
कुठून निघतीय त्या रस्त्याच्या आसपासचे हॉटेल.. आईगं.. न्युयॉर्क पाहीले पण
नाही आणि हे असले पत्ते शोधायचे! बर शोध.. किती वाजले.. ४.३० ? मायगॉड! ..
ओके हा रस्ता , इथून नाईट टूर निघतीय.. गुगल मॅप्स वर ब्रॉडवे आणि
ऍव्हेन्युज टाकले तर मिळेल का जागा? होप सो! अर्रे रेस्टॉरंट मिळाले हे,
खूण सांगितलीय टूरवाल्यंनी.. म्म म्हणजे हाच पत्ता.. आता हॉटेल्स.कॉम .. हा
पत्ता टाकला, हॉटेलं कैच्याकै महाग देऊ नका! ११०-१२०$/पर नाईट पुष्कळ
बख्खळ झालेत.. ह्म्म बरी दिसतायत की हॉटेल्स! अरे वा.. हॉलिडे इन.. चांगलेच
असणार हे.. हरकत नाही.. ओह वेट.. रेंटल कार कुठे परत करायचीय ? ला गार्डीआ
एअरपोर्ट.. तो कुठे आला आता? ४.५ माईल्स? सुपर्ब!! करून टाका बुक!
निनादला विचारून कन्फर्म केले सगळे , सर्व बुकींग्स झाली..
आता मिशन बॅग्स .. अर्ध्या तासात संपलंच पाहीजे.. पण किती अवघड आहे हे..
फार फिराफिरी करावी लागणार तीही सामान बरोबर ठेऊन म्हणून सोयीच्या बॅगपॅक्स
आणल्या.. भल्या मोठ्या आहेत, पण तरी बॅगपॅक्सच ना त्या.. कितीसं सामान
बसणार.. मला सगळे पातळ, कॉटन्चे वगैरे टॉप्स घ्यावे लागणार म्हणजे.. स्वेटर
हातातच ठेवावा.. नशीब बॅगपॅक्सना रोलर व्हील्स आहेत.. हवे तेव्हा फरफटत
न्यायची! … ह्म्म ही झाली माझी बॅग .. आता निनादची.. पटकन होते.. महत्वाची
कागदपत्रं टाकली की झालं…
ओके फ्रीज व्यवस्थित आहे .. डिशवॉशरला काहिही लोड केले नाहीये. गॅस बंद .. घर पण जरा आवरून ठेवलंय.. जाताना पॅकींगचा पसारा होतो खरं, पण परत घरी येताना ते छान नीटनेटकंच बरं वाटतं.. मग तेही करून झाले.. हॅंडीकॅम चार्जिंगला लावून ठेवलाय तो ठेवला पाहीजे बॅगेत.. कॅमेर्याच्या बॅटर्या .. अरे किती वाजले… ६.४० ?? अजुन निनाद आला नाही! काय हे… ७ ला निघायचे होते.. तो LAX चा एअर्पोर्ट म्हणजे दिव्य आहे! ४ तास आधी निघालंच पाहीजे.. नशीब आला निनाद.. आता मी फ्रेश झाले की निघूयातच..
४ सप्टेंबर २००९ : ७.३५ मिनिटे .. अरे काय हे.. कधीपासून आवरतीय.. तरी
साडेसात वाजले.. अजुन काही खाल्लं नही.. आय होप एअरपोर्टवर वेळ मिळेल
खायला.. ह्म्म.. अरे वा आज गर्दी नाहीये नाही रस्त्याला! चक्क चक्क !! डॉट
नऊला एअरपोर्ट पार्कींगमध्ये ? गुड!
गाडी लावून जायचंय ना.. परत येताना बरं,आपलीच गाडी असली की.. मध्यरात्रीचे
शटल कुठून करून जायचे… आता हे एअरपोर्ट पार्कींग का सापडत नाहीये ? किती
गोल फिरायचे! हेच असेल अरे निनाद.. ऐक.. त्या बाईला विचारते.. हेच आहे..
परत जाताना क्न्फर्मेशन कोड दाखवायचाय.. ओके .. चला.. दुसर्या मजल्यावर
मिळालं पार्कींग.. लिफ्टने आलो खाली.. निनाद विचारायला गेलाय बरोबरे ना ते?
पण चुकलंच शेवटी.. लॉंग टाईम पार्कींग करायचे ३ ते ७ मजल्यावर! लिफ्ट
यायला तयार नाही!! १० मिनिटं उभे आहोत जड बॅगा पाठीवर टाकून!! जाऊदे पळतच
चढूया… बसलो गाडीत निनाद निघाला ७व्या वरच! नंतर टेन्शन नको.. लिफ्ट परत
ढपली! ७ मजले उतरून खाली !! घड्याळ : ९:४५ रात्रीचे.. ठीके.. एक तास आधी
आलो आहोत.. १०:५५ ची फ्लाईट ! आता शटलची वाट पाहू.. येईलच, मगाशी ४-५ आल्या
डोळ्यादेखत…
पण आत्ता का येत नाहीयेत? आम्हाला एक मिनिटसुद्धा इतका महत्वाचा आहे आणि तुम्ही १५ मिन्टं झाली येत नाही म्हणजे काय ?? चालत जाऊया का? छे.. कुठाय एअरपोर्ट माहीत्तीय़ का? खात्रीनी विमान चुकवू आपण! थांबूया.. १०:१७ मिनिटं … आलं एकदांचं शटल.. पण नेमका आपला स्टॉप शेवटचा का? अरे लवकर चल की सभ्य गृहस्था!! विमान चुकवू नकोस… पुढचे सगळे प्लॅनिंग कोसळेल!! डेल्टा.. नाही… साउथवेस्ट.. नाही रे बाबा!! कधी येणार.. हा.. आलं.. सुटा पळत !!!!!
१०:२४ मिनिटं .. बोर्डींग पाशी .. समोरचा माणूस : " huh talk about the timing ! if it was one minute later my system would not have allowed you!! goo run ! you will still make it! "
परत पळा … सिक्युरिटीला लाईन दिसतीय.. देवा .. काय हा सस्पेन्स.. प्लीज प्लीज जमूदे …
ती बाई आली विचारत आमचे नाव. .. आहोत गं आम्ही.. आलोच एव्हढं सिक्युरीटी चेक करून.. विमानाला म्हणावं थांब!!
टींग.. अर्र.. माझा बेल्ट राहीला.. परत टिंग ?ह्म्म किल्ली राहीली खिशात
.. तिकडे निनादच्या बॅगेत टिंग.. ओह.. शेव्हींग क्रीम कसं चालेल कॅरीऑन
लगेजला! घ्या काढून.. काय खुष झाला होता तो समोरचा! फुकटात मिळालं ना!
अरे हे काय…
निनाद थांब!! मी अजुन शूज घालतीय.. ओह गॉड हा पळायला पण लागला.. कसा पळू
शकतोय एव्हढी बॅग पाठीवर टाकून ?? अरे माझे शूज का जात नाहीयेत… तसंच
पळते.. केहढी जड आहे सॅक.. किती कपडे घेतले मी नेमके? धड पळता पण येत
नाहीये शूज अर्धवट घातल्याने.. टाचा बाहेर आणि बोटं शूज मधे! काय फनी दिसत
असेन मी.. )
हा असा का पळतोय!! कुठे आहे गेट नक्कि?? अगदी जिना चढून झाला.. उजवीकडे
वळलो..(शूज गेले पायात नीट, पळतापळताच!! हुश्श.. आता पळता येईल.. ) मग सरळ
जऊन परत डावीकडे !! मग एक चौक लागला! आय मिन तिथे चारी बाजूला गेट्स होते…
आमचं कुठलं? परत पळत जाऊन उजवीकडे!! अरे वा… विमान आहे अजुन !! धॅन्टॅन्डॅन
!!!!
शेवटचे पॅसेंजर आम्ही .. ! हाफ हुफ करत बसावं तर बॅगांना जागा नाही..
अरे बसवा ना कसं तरी, चेक इन कशाला तेव्हढ्यासाठी.. बर चेक इनच करायचे असते
तर निनादचे शेव्हींग जेल नसते का आले !!
हुश्श… सर्वात शेवटी आमच्या बॅग्स बसल्या एकदाच्या .. आणि आम्हीही बसलो !!
किती पळापळ ?? काही सुमार ? पाणी नाही अन्न नाही! ही लोकं काय दाणे देणार.. बर पाणी द्या आधी प्लीज..
आय होप मला विमान लागणार नाही! हा निनाद मुद्दाम घाबरवतो.. हं ठीके झालं नीट टेक ऑफ.. पाणी प्यायले, दाणे खाल्ले.. आता झोपा.. पाय आखडून का होईना ! ५ तासांनी बाल्टीमोर !!
हुश्श!!
श्री वेंकटेश्वरा स्वामी देऊळ - मालिबू
मालिबूला जाताना लागणारा समुद्र.
मालिबू टेंपल - बाहेरून
देवळामधील कलाकुसर..
राधा कृष्णाच्या मंदिरावरील शिल्पं..
माझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )
"माझी भटकंती" या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस
काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे..
अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले
तरी चालेल खरं..
त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात..
बर्याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी फिरणे..
) जागाही शोधून ठेवली.. मात्र जाणं होईना! एकदाचे काल ठरले.. सोल्वॅंग .. ( Solvang - Danish word meaning ' sunny field')
ठिकाण ठरलं.. भल्या पहाटे उठल्यामुळे दुपारचे १२च वाजले होते!
आवरून, ब्रेकफास्ट(!) करून निघायला २ वाजलेच असते... पटकन खाणं आटोपले आणि
आवरून २.१५ ला घराबाहेर पडलो.. तसा उशीरच म्हणायचा! पण उन्हाळ्याची हीच तर
मजा ना?
पण जसे वाटले तसे घडले तर ट्रीप कसली?? अंहं, काहीही अनुचित प्रकार नाही झाला! फक्त अस्मादिकांच्या अहोंनी सर्प्राईज द्यायचे ठरवले! गाडी सॅन्ता बार्बराच्या रस्त्याला, इथली लाईफलाईन असलेल्या १०१ फ्रीवेला लागल्यावर त्याने सांगितले की आपण आधी एका लेक - तळ्यापाशी जाणार आहोत ! मग काय, अजुनच खुष ! रणरणत्या उन्हात , जंगलाच्या सावलीत आणि नितळ शांत पाण्याच्या शेजारी बसायला कोणाला नाही आवडणार??
त्या लेकचे नाव, कशुमा लेक.. ( Cachuma Lake ) सॅन्ता बार्बरा स्टेट पार्क मधे वसलेले.. अर्थात इतक्या सुंदर जागी जायला तितकाच सुंदर रस्ता पाहीजेच! होता देखिल...



नुसत्या रस्त्याचेच इतके फोटो काढण्याची वेळ कधी आली नव्हती.. भरपूर इन्क्लाईन असलेला प्रचंड वळणावळणाचा, खाली त्याहून प्रचंड दरी असलेला आणि तितकाच गर्दीचा हा रस्ता! त्याचं देखणेपण वर्णायला शब्दच नाहीत..
असंच फोटो खेचत, व्हीस्टा पॉईंट्सना थांबत अधून मधून ड्राईव्हींग डिरेक्शन्सकडे लक्ष देत प्रवास अगदी मजेत चालला होता! इतकं म्हणजे इतकं फ्रेश वाटत होतं! ऊन जरी असले तरी घनदाट जंगलामुळे ते कधी फारसा जाणवलेच नाही .. उंचावर ते पण पाण्याजवळ असल्याने गार वारा सुटलेला, बरोबर अखंड गप्पा आणि गाणी !! एकंदरीत धमालच!
पण अमेरिकेत कधी होत नाही ते घडले! डिरेक्शन्स सांगत आहेत की ४.५
माईल्सवर लेकचा एक्झिट येईल, तो १४ माईल्स झाले तरी येईना! आजुबाजुला अतीव
निसर्गसौंदर्य असले तरी हवे ते ठिकाण नाही मिळाले की चुटपुट लागते ना.. धड
इकडे तिकडे पाहताही येईना.. कुठे गेले तळे? श्या, सापडायलाच पाहीजे.. पण
तसं म्हटलं तर जंगलात आपण! जीपीएस नसताना शोधू म्हटले तरी कसं शोधणार?
वगैरे विचार चालू असताना एकदाचं कडेला निळं निळं चमकलं !!
वळु मधल्या डुरक्या सारखे नुसतेच आधी शिंग दाखव, डोळे दाखव असं तळ्याचे
निसटते दर्शन होत होते.. आणि असा सस्पेन्स असला तरी खात्री होती की इथे
’अपेक्षाभंग’ होणार नाही !
केवळ ८$ चे तिकीट काढून आत गेलो.. भरपूर झाडी, ठिकठिकाणी पाट्या.. भरपूर
अमेरिकन्स होतेच!! ते कुठे आणी कधी नसतात? ( खरंच बुआ, एन्जॉय कसं करायचे
हे यांच्याकडून शिकावे! )
’फन प्लेस’ लिहीलेल्या दिशेने आम्ही जाऊ लागलो.. अधून मधून छत्र्या लावून
बाकडी ठेवली होती, तिथे काही लोकं जेवत होते, खेळत होते..तर काही जण RVs
घेऊन निवांत क्षणाची मजा लुटत होते, तर काहींची स्वयपाकाची तयारी चालू
होती.. ह्म्म, फील यायला लागला पिकनिकचा!!
तसेच रस्त्याने जात राहीलो आणि ’फिशिंग पीयर’ लागला.. तिथून थोडं पुढे गेलो फिरत फिरत.. आणि असा व्ह्यु दिसला !

त्याचे कितीही फोटो काढले असते तरी कमीच झाले असते.. शेवटी परत फिशिंग पियरला फिरलो.. गाडी पार्क करून छोटुस्सं टेकडुलं उतरलो..
(हा शब्द मी शोधलाय.. इतक्या गोड प्रकाराला उतार किंवा चढ काय?? काहीतरीच! )
आणि, हा आला फिशिंग पियर ! जोर्रात गेलो खरं, पण तो प्रकार बोटीसारखाच
होता ! इतका डुगडुगत आणि पाण्याच्या लहरींवर डुचमळत होता की अगदी बोटीत
बसल्यासारखे वाटावे !
तिथे जरा (म्हणजे बरीच) फोटोग्राफी केली!


पाण्यात हात घातला.. Santa Ynez नदीचे ते लेकमधले पाणी छान वॉर्म होते.. ( नाहीतर तो प्रशांत महासागर? नुसता बर्फ ओतलेला असतो त्यात! पाय जरी घातला तरी बधीर होऊन जाईल! )
शेवटी अतिशय नाखुषीने तिथून निघालो..पण पुढे दिसला मस्त वॉकींग ट्रेल ! लुप ट्रेल होता.. त्यामुळे लेकच्या बाजूबाजूने भरपूर फिरवून आपण त्याच भागात येतो परत.. चालायला लागलो..
छोटी पायवाट, डावीकडे चढ, उजवीकडे उतार आणि खाली पाणी! लांबवर दिसणारे ते पाणी, ती शांतता सगळं भारून टाकणारे वातावरण !

तिथेच मला वैशिष्ट्यपूर्ण फोटो मिळाले.. लाल पान, हिरवी पानं वगैरे..


एक गोड खारुटली पण सापडली! धीट होती बरीच !

वॉकींग ट्रेल मधून निघून बोटींग एरिआ मधे आलो.. ऍक्चुअली इथे खूप मस्त
ऍक्टीविटीज करता येतात. पण आम्ही दोघंच आणि तेही आयत्यावेळेस गेल्याने काही
विशेष नाही करता आले.. पण हायकींग, ट्रेकींग, कॅम्पिंग, बोटींग, फिशिंग हे
तर करता येतंच.. शिवाय तिथे स्विमिंग पूल व राहण्यासाठी यूर्ट्स, केबिन्स
उपलब्ध आहेत.. ज्याची किंमत ६०-७० डॉलर्स / नाईट पासून २००-३०० $ पर नाईट
आहे.. बुकींग अर्थात ६-६ महीने आधी होते!! त्यामुळे करायचे झाले तर खूप
काही करता येते, पण ते नसलं तरी काहीच बिघडत नाही!
बोटींग एरीआ मधली वेळ संपत आल्याने गर्दी तुरळकच होती.. तिथे असलेली माणसं
आपापल्या बोटी परत नेण्याच्या कामात गढल्यामुळे आम्हाला ते कसं करतात हे
कळले ! गाडी अगदी पाण्यात पार उतरवून त्यावर बोट आणतात.. किती हौशी लोकं ही
, खरंच !


तिथे जरा वेळ खादाडी केली... आणि प्रयाण केले पुढच्या ठिकाणी अर्थात - सोल्वॅंग !!
माझी भटकंती - ओहाय (Ojai)
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही!
तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही.. खरं म्हणजे हे जास्त करून माझ्या आठवणींचा शोध, स्मरण आणि त्या त्या ठीकाणाबाबत मला जी काही माहीती मिळेल ती मी संकलित करून ठेवत आहे.. (काही माहीती ही विकीच्या माहीतीवरून भाषांतरीत केलेलीही असेल..) वाचकांना कितपत आवडेल कल्पना नाही पण माझा स्वतःचा आनंद नक्कीच असेल त्यात...
मी इथे लॉस एंजिलीस मधे राहते. म्हणजे अर्थातच माझ्या भ्रमंती मधे डिस्नेलॅंड आलं, युनिव्हर्सल स्टुडीओज आलं, सॅन दिएगो मधलं सीवर्ल्ड आलं.. अजुन हजार ठीकाणं.. पण मी सुरवात तरी करतीय त्यामानाने माहीत नसलेल्या ठीकाणापासून. तिथे मी रिसेंटलीच जाऊन आले त्यामुळे थोड्या आठवणी ताज्या! आणि कितीही छान असल्या तरी त्याच त्याच फेमस जागांबद्दल मला आत्तातरी नाही लिहायचेय.. ते परत कधीतरी!
ओके तर ही जागा म्हणजे ओहाय.. ( Ojai -> Valley of Moon ) . हे गाव पुर्वी म्हणजे साधारण १८७४ नॉर्डहॉफ नावाने स्थापन झाले.. परंतू पहील्या महायुद्धाच्या सुमारास जर्मन वाटणारी नावं बदलायचा ट्रेंड आला, त्यात या ही गावाचे नाव चेंज झाले.. व ते ओहाय म्हणून प्रसिद्ध झाले..

या व्हॅलीचा शोध माझ्या नवर्याला असंच फिरताना लागला.. संध्याकाळी लॉंग ड्राईव्हला बाहेर पडला तो सांता बार्बराच्याही पुढे गेला.. आणि काय रस्ता आहे पाहू म्हणत डोंगरदर्यांतून , जंगलातून, या सुंदर व्हॅलीतून जात राहीला.. आणि हे रत्न सापडले.. मी आल्यावर आम्ही मागच्या वर्षी खूप वेळा जाऊन आलो.. दर वेळेला तिथली फ्रेश हवा वेड लावते..
खरं म्हणजे मला काय लिहावं कळत नाहीये आता.. काही गोष्टी किती शब्दातीत
असतात? मला नेहेमी तिथे जाताना असं वाटतं काय सुंदर निसर्ग आहे हा.. यावर
भरभरून लिहीले पाहीजे.. प्रत्यक्ष लिहायला बसले तर काही सुचेना झालेय राव..
काही फोटोज टाकते अधुन मधुन.. म्हणजे तुम्हीही निशब्द व्हाल! 

पुर्णपणे घाटातली वाट.. वळणा वळणाची! दोन्ही बाजुंना पानांच्या ओझ्याने वाकलेली आणि कोण येतंय बरं घाटातून अशा उत्सुकतेने बघणारी झाडं.. अगदी कोणीतरी येऊन लावली आहेत सिस्टीमॅटीकली असं वाटतं.. अर्थात इतकी झाडं त्यामुळे भरपूर फ्रेश आणि गारेगार हवा.. गाडीतल्या एसीच्या तोंडात मारेल अशी! तो ऑक्सिजन छातीत भरून ठेवायची आम्हा दोघांना खोडच लागलीय..

भरपुर मनासारखे घाटात हिंडून , वर खाली चढ उतार करून झाले की चाहुल लागते पाण्याची!
अशा सुंदर ठीकाणी त्याहुन अत्युत्तम तलाव/लेक पाहीजेच! तिथे गाडी लावून
त्या शांत पाण्यावर कधी उठल्याच तर लहरी आणि वार्याचा झाडा-जंगलातून
जाणारा आवाज ऐकत थांबून राहायचे.. (हा लेक कॅसितास)

एखादीच नाव पाणी कापत संथपणे चाललेली...


अशा काही जागा असतात तिथे तुम्ही निशब्द होता.. लास व्हेगासला मानवाने
निर्माण केलेले ते कर्तृत्व पाहून आपण अचंबित होतो.. तर इथे.. कोण निर्माता
कोण जाणे.. त्या अनाम निर्मात्याची ही कलाकुसर.. निसर्ग!
आनंदाने वेड नाही लागलं तर तुम्ही एक नंबरचे अरसिक! 



( तटी: यातले काही फोटोज मागच्या वर्षी मी ब्लॉगवर टाकले आहेत. लेख लिहायचा म्हणून
ते व नवीन काही फोटोज इथे डकवले आहेत.. )
अजुन एक माहीती विकीवर मिळाली ती अशी की, इथे पुर्व-पश्चिम अशा पर्वतरांगा असल्याने सूर्योदयाच्यावेळी जगात काहीच गावांमधे दिसणारी "पिंक मोमेंट" दिसते.. विकीमधे म्हणतात..
"The fading sunlight creates a brilliant shade of pink on the Topatopa Bluffs that stand at the east end of the Ojai Valley, reaching over 6,000 feet (1,800 m) above sea level. Nordhoff Ridge, the western extension of the Topatopa Mountains, towers over the north side of the town and valley at more than 5,000 feet (1,500 m). Sulphur Mountain creates the southern ranges bounding the Ojai Valley, a little under 3,000 feet (910 m) in elevation."
( फोटो आंतरजालावरून साभार.. हा फोटो फ्लीकरवरचाच आहे, आनि तो दुसर्या कोणाचा असल्याने इथे खाजगी जागेत लावावा हे मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे फ्लीकर बॅन केलेल्यांनी पिंक मोमेंट गुगल करावे..) http://www.flickr.com/photos/gamma-infinity/540215547/
शिवाय एक इंटरेस्टींग माहीती ओहायच्या संदर्भात.. लॅरी हॅगमॅन(आय ड्रीम ऑफ जिनी मधला नेल्सन) , जॉनी डेप आणि जे. कृष्णमूर्ती ( फिलॉसॉफर ) हे ओहायचे रहिवासी आहेत/होते.. विशेषत: जे कृष्णमूर्तींचे बरेच वास्तव्य इथे होते, आणि त्यांनी इथे बरेच काम केले आहे...
मीही अश्या ठिकाणांच्या नेहमी शोधात असतो.. अमेरिकेतला बराच भाग ड्रायव्हिंग करुन पिंजुन काढला आहे. आम्हीही अश्या बर्याच हिडन जेम्सचा अनुभव घेतला आहे. तु म्हणतेस ते खरे आहे.. इथे ठिकाण कितीही छोटे व आडवळणाचे असो.. रस्ते,पाट्या मात्र व्यवस्थित असतात. तुम्हाला जर वेळ मिळाला तर कॉलोराडो रॉकिज मधे जाउन या. अगदी सगळीकडे जमले नाही तरी रॉकि माउंटन नॅशनल पार्कला एकदा तरी जाउन या... त्या नॅशनल पार्कमधे वळणावळणावर तुम्हाला मंत्रमुग्ध करणारे व्हिस्टाज दिसतिल. तिथे एस्टिस पार्क पासुन वर अगदी १२,१५० फुटापर्यंत तुम्ही पेव्ह्ड रोडवरुन जाउ शकता.. त्या रोडला ट्रेल रिज रोड असे म्हणतात. पण वर जायला अजुन एक आडवळणाचा रस्ता आहे... फॉल रिव्हर रोड म्हणुन... नेचर अॅट इट्स बेस्ट पाहायचे असेल तर जरा धोकादायक वळणे असलेला हा फॉल रिव्हरच्या काठाकाठाने जाणारा कच्चा रस्ता तुम्ही घेतलाच पाहीजे... अगदी वर जायचे नसेल तर पार्कच्या प्रवेशद्वाराजळुनच एक रस्ता बेअर लेकच्या दिशेने जातो.. त्या बेअर लेक ट्रेलहेडवरुन जवळजवळ १० अजुन हाइकिंग ट्रेल्स आहेत... त्यातला अल्बर्टा फॉल्स ट्रेल हा ट्रेक माझा अत्यंत आवडीचा आहे. अजुन डेअरिंग ट्रेक पाहीजे असेल तर मिकर्स पार्कपासुन लाँग्स पिकला जाणारा ८ तासाचा एक ट्रेक आहे.. तोही भन्नाट आहे. खर म्हणजे सबंध इंटरस्टेट ७० चा कॉलोराडो राज्यातला ३५० मैलाचा स्ट्रेच हा हाय वे बांधकामाचा एक अप्रतिम नमुना आहे. डेनव्हरपासुन ग्रँड जंक्शन हा २५० मैलांचा आय-७० चा स्ट्रेच कॉलोराडो नदिच्या कधी डावीकडुन तर कधी उजवीकडुन शिवाशिवीचा खेळ खेळत जातो.. तिथलि झाडे व डोंगराला कमीत कमी धक्का लावता हा हायवे बांधायचे आव्हान सरकारने १९५० मधे सिव्हिल अभियंत्यांना दिले होते.. ते त्यांनी यशस्विरित्या कसे पेलवले ते पाहायला आय ७० चा तो स्ट्रेच ड्रायव्हिंग करुन बघाच!
अजुन काही तुम्हाला सुचवण्याजोगी ठिकाणे म्हणजे वायोमिंगमधले ग्रँड टिटॉन नॅशनल पार्क.. तिथे लेक जेनी बोटीने पार केल्यावर अगदी टिटॉन माउंट्नन्समधे.. त्याच्या पायथ्यापासुन हिडन लेकला जाणारा.. हिडन फॉल्स ट्रेल हा एक २ तासाचा अप्रतिम ट्रेक आहे.. तोही अनुभवुन बघा... आणि अजुन एक नॅशनल पार्क मस्ट बघण्यापै़की आहे.. ते म्हणजे माँटॅना मधले ग्लेशिअर नॅशनल पार्क.. त्यात लेक मॅकडॉनल्ड व गोइंग टु द सन हायवे... व त्याच्या आजुबाजुचे असंख्य हायकिंग ट्रेल्स जरुर अनुभवा... आणि त्या ट्रिपमधे अजुन ३-४ दिवस असतील तर अजुन ७-८ तास वर जाउन कॅनडामधले बॅन्फ नॅशनल पार्कही बघायला जा... पृथ्विवरचा स्वर्ग आहे तो!
जाउ दे.. ही लिस्ट न संपणारी आहे.. माझ्या ऑलिंपिक्स गोष्टींसारखीच.. अमेरिकेतल्या या नॅशनल पार्क्स बद्दलही एक लेख-मालिका लिहावी असे खुप मनात आहे.. वेळ जमेल तसे या सर्व पार्कबद्दल जरुर लिहीणार आहे.. तु म्हणालीस ते बरोबर आहे... डिस्ने लँड, सि वर्ल्ड, लास व्हेगास हे सगळेच बघतात.. पण अमेरिकेची खरी सुंदरता ही अश्या नॅशनल पार्कमधे व तु वर गेलेल्या जागेंमधेच आहे असे माझे ठाम मत आहे..
माझी भटकंती - सोल्वँग - California's Little Denmark !
कशुमा लेक
नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स.. जाताना
रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा
अर्थ कळला! Sunny Fields ! From Cachuma Lake, Solvang 1
लगेचच कोपेनहेगन ड्राईव्ह आला. आणि एक वेगळीच सिटी सामोरी आली ! From Cachuma Lake, Solvang 1
From Cachuma Lake, Solvang 1
१९११ साली काही डॅनिश शिक्षक मंडळी या गावात आली व त्यांनी शिक्षणसंस्था
स्थापन केली. (ती काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू होती.. तिथे १९१४ साली
Atterdag College सुरू झाले, जे आता अस्तित्वात नाही.. ) या डॅनिश
मंडळींबरोबर त्यांची संस्कृतीही आलीच.. ती त्यांनी जोपासली.. १९३६ साली ,
सोल्वॅंगच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, डॅनिश डेज या त्यांच्या सणा
दरम्यान भावी डॅनिश राजा-राणी भेट देऊन गेले.. पण त्याला खरे व्यावसायिक
रूप आले जेव्हा Saturday Evening Postने त्याच्यावर एक पोस्ट लिहीले..
त्यानंतर प्रवासी आले, तो भाग अजुन जास्त डॅनिश बनवला गेला, इमारतींना
डॅनिश मुलामा दिला.. डॅनिश व्यापारी येऊन आपले चीझ, वाईन्स, कॉफी विकू
लागले.. अप्रतिम बेकरीज सुरू झाल्या... व सोल्वॅंग प्रसिद्ध झाले !
आम्ही मुख्य रस्त्याला आलो आणि समोरच ती प्रसिद्ध विंड-मिल (पवनचक्की) दिसली!From Cachuma Lake, Solvang 1
नंतर कारवास करून (म्हणजे कार पार्क करून) गावातल्या वेगवेगळ्या
दुकानांमधून फिरू लागलो.. डॉल हाऊस, चॉकलेट फॅक्टरी(त्यात मिळणारे फुकट आणि
स्वर्गीय चॉकलेट अर्थातच आम्ही खाल्ले!) तसेच वेगवेगळी Souvenir Shops
म्हणजे आठवण म्हणून घ्यायच्या गोष्टींच्या दुकानात भटकलो.. एकंदरीत इथे
कपबश्यांचे फारच महत्व दिसते.. पवनचक्की आहेच.. त्याशिवाय वाईनशी संबंधित
गोष्टी - म्हणजे वाईन ठेवण्याचे स्टॅंड्स - फार मस्त आणि क्युट स्टॅंड्स
दिसले.. लोळणारा हत्ती सोंडेने वाईनची बाटली धरतोय, किंवा एखादे (आधीच
मर्कट त्यात दारू प्यायला फेम) माकड!From Cachuma Lake, Solvang 1
मूळ युरोपिअन प्रांतातून जन्मलेला क्लॉगींग (Clogging) हा नृत्यप्रकार
म्हणजे सद्ध्याच्या टॅप डान्सिंगचा मूळ नृत्याविष्कार.. यात लाकडी क्लॉग्स
घालून ,ते जमिनीवर आपटत - तालबद्ध आवाज करत नाचतात.. त्यामुळे हे असे
वेगवेगळे रंगाचे - आकाराचे क्लॉग्स इथे खूप बघायला मिळतात! त्यातीलच एक
जायंट रेड क्लॉग.. हा इथे दिवसभर एका दुकानासमोर ठेवलेला असतो.. त्यात बसून
वगैरे लोकं फोटो काढतात!(फोटो : आंतरजालावरून )
आपले आप्पे असतात तसा यांचा डॅनिश अवतारही इथे मिळतो.. AEbleskiver..
अजुन खायचा योग आला नाही, मात्र हे चवीला अगदी वॅफल्ससारखे लागते असे
नेटवर कळ्ले.. बनवण्याचे पात्र अगदी आपल्या आप्पे पात्रा सारखे. चांगले
बीडाचे आप्पेपात्र इथे २०एक डॉलर्सला मिळू शकेल..
इथे परिकथा लिहीणार्या हॅन्स ऍंडरसनचे म्युझिअम आहे, एक कला व इतिहासावरचे म्युझिअम आहे तसेच Copenhagen
इथे असणार्या लिटल मर्मेड या पुतळ्याची प्रतिकृती, पवनचक्की तसेच डॅनिश
लोकं ज्याला लकी, भाग्यदायी समजतात ते Storks बर्याच इमारतींवर दिसून
येतात..From Cachuma Lake, Solvang 1
बर्याच कलाकारांच्या चित्रांच्या गॅलरीज, ऑथेंटीक युरोप मधून आलेल्या काही गोष्टी इत्यादी दुकानांतून फिरताना दिसतात..
तिथे हे पण दिसले !
From Cachuma Lake, Solvang 1
१०१ $ ला ठेवली होती ही मूर्ती!
आणि ही पवनचक्की!From Cachuma Lake, Solvang 1
मस्त फोटो आणि वर्णन! हो येथे एकदम यूरोप मधे आल्यासारखे वाटते. तू बरेच सूक्ष्मनिरीक्षण केलेले दिसते, मला ते स्टॉर्क्स, क्लॉग्स वगैरे असल्याचे जाणवले नाही :). त्या गावात शिरताना एक चर्च का काहीतरी आहे ते पण चांगले आहे बहुधा. आता लक्षात नाही. या गावातील इमारतींचे रंग, आकार वगैरे एकदम वेगळे दिसतात.
याच्या वाटेवरच एक Ostrich farm आहे म्हणून ते ही बघायला गेलो होतो, पण ते काही खास वाटले नाही एवढे. पण सोल्वांग आवर्जून जाण्यासारखे आहे.
भाग्यश्री, तेथे जाण्याबद्दल ची माहिती थोडी देतो येथे: बे एरियातून लॉस एंजेलिस च्या बाजूला जाताना I-5 या हायवेने न जाता गावागावातून जाणार्या Highway 101 ने गेलात तर त्या रस्त्यावरून हे जवळ आहे. थोडा वेळ असेल तर हाच रस्ता जास्त चांगला आहे जायला. San Luis Obispo, Santa Barbara वगैरे इतर चांगली ठिकाणे ही लागतात वाटेत. बर्याच वेळा रस्ता समुद्र किनार्याजवळून जातो, तो ही एक फायदा आहे.
अमेरिका पूर्वरंग - बाल्टीमोर ..
सकाळी ७ वाजता बाल्टीमोर एअरपोर्टवर आमचे विमान उतरले. विमान उतरायच्या आधी वरून दिसणारी हिरवळ पाहून नाही म्हटले तरी डोळे जरा विस्फारलेच गेले! कॅलिफॉर्निया म्हणजे तसा दुष्काळीच भाग! उजाड पिवळे डोंगर, पामची झाडं आणि सतत समुद्र.. त्यामुळे पिवळा व नीळ्या रंगांचेच अधिपत्य! इथे दूरवर पसरलेला हिरवागार रंग फार फार सुरेख वाटला त्यामुळे !
मामा घ्यायला आला होताच. त्याच्याशी गप्पा मारत निघालो घरी जायला. आणि लिटरली आपण एखाद्या जंगलातून जातोय असा मला भास झाला. गच्च झाडी! गेली दोन वर्षं हे असलं काही पाहायची सवयच गेली होती.. मला सर्वात जास्त इस्टकोस्टची ही झाडंच आवडली! एकही कोपरा, साधा चौकोन सुद्धा मोकळा नाही! रस्ता, त्याच्या कडेला ही भरगच्च झाडं .. जोडीला सकाळचा सुखद गारवा! वाह !
घरी आलो.. ते भलं मोठं घर.. सॉरी महालच की तो! तो पाहून परत डोळे
विस्फारले! कॅलिफॉर्निया फार महाग. त्यामुळे घरं = खुराडं! अर्थात
भारतातल्या घरांची तुलना केली तर कॅलिफॉर्नियातली घरं सुद्धा मोठीच, पण इथे
काहीतरी वेगळंच होतं! बेसमेंट जे बहुतेक वेस्ट कोस्टात नसते. बेसमेंट
म्हणजे आपला ४-५ खोल्यांचा फ्लॅटच की..
आणि मग त्यावर अजुन दोन मजले! .. त्यामुळे घर तर आवडून गेलंच.. पण सगळ्यात
जास्त आवडला तो म्हणजे डेक.. समोर दूरवर पसरलेली हिरवं लॉन, झाडं आहेतच!
सुंदर लाकडी डेक, त्यावर कडेला बसायला लाकडीच नक्षीदार बाकं, एका कोपर्यात
झोपाळा, आणि डाव्या कोपर्यात मोठं कॉफी टेबल.. आम्ही तिथेच विसावलो..
मामीने लगेचच अफलातून अशी निनादची आवडीची साबुदाणा खिचडी आणि माझ्या आवडीचा
गरम गरम शिरा आणून ठेवला!From East Coast Tour ..
आदल्या दुपारपासून पोटात काही नसल्यामुळे आम्ही तुटूनच पडलो! आधीच आयता
ब्रेकफास्ट त्यातून इतका चविष्ट, इतक्या सुंदर हिरव्या आणि गार वातावरणात
.. दिल खुष हुआ! त्यानंतर आला स्पेश्शल केशर घातलेला चहा! मी पहील्यांदाच
प्यायला.. आणि तो खरंच स्पेशल होता! जोडीला अखंड गप्पा आहेतच! ..
लहानपणापासून मामाचे घर याबद्दल मला इतके आकर्षण होते! कारण तेव्हा ,
२६-२७ वर्षांपूर्वी काही लोकं फारशी अमेरिकेला जात नसत. निदान आमच्या
घरातला तो पहिलाच. त्यातून मामा भारतात आल्यावर मिळणार्या मस्त मस्त
गिफ्ट्स!, त्याची ती भलीमोठ्ठी बॅग उघडल्यावर येणारा टिपिकल अमेरिकेचा वास!
तो बहुतेक मलाच यायचा.. कारण कोणाच्याही तो लक्षात नाहीये! तो कसा आहे हे
सुद्धा मी सांगू नाही शकत, पण यायचा खरं! त्या सर्वांमुळे इतकी म्हणजे इतकी
उत्सुकता होती ना मामाकडे जायची, ती एकदाची २५ वर्षांनी पुरी झाली! 
खाणं
झाल्यावर फ्रेश होऊन आम्ही निघालो मॉर्निंगवॉकला.. जस्ट ऊन पडायला सुरवात
झाली होती. शेजारीच तळे आहे एक तिथे चालायला गेलो.. वॉव, मॉर्निंगवॉकला
गप्पा मारत जाणं, ते ही तळ्याकाठी!! मी जाम खुष! ती जागाच इतकी सुंदर होती
की क्या कहने!
भरपूर
गप्पा झाल्यावर आणि घामेघूम झाल्यावर आम्ही निघालो परत. इकडचे तिकडचे
पाहात घरी जाईपर्यंत जेवणाची वेळ झालीच. परत एकदा आयतं + चविष्ट जेवण हजर!
स्पेशल चिकन, कांदा बटाटा रस्सा, कोशिंबिर, पोळ्या, पुलाव आणि रसमलाई!
जबरदस्त जेवण झाले .. आणि आम्ही झोपेच्या अधीन झालो. रात्रभर प्रवासात पाय
आखडून बसावे लागल्याने झोप अशी झालीच नव्हती. त्यामुळे दुपारी मस्त ३एक तास
झोपलो. आता दमल्यामुळे इतके झोपलो की ३ तासाच्या फरकामुळे जेट लॅग आला
माहीत नाही पण झोपलो खरं खूप.. एकदम छान फ्रेश वाटले.
संध्याकाळी उठून बाल्टीमोर हार्बर, डाउनटाऊन पाहायला गेलो.
मामाच्या टीमने, कंपनीने जवळपास ते सर्व हार्बर बांधले आहे. त्यामुळे अजुनच
छान वाटले ते. एकदम हॅपनिंग जागा होती ती! भर्र्पूर्र लोकं! लाईव्ह
म्युझिक, एकीकडे पाण्यात बोटींग आणि क्रुझेस, भरपूर खाण्याची हॉटेल्स, छान
नितळ पाणी, त्यातले ते सनसेटच्या वेळेस पडणारे प्रतिबिंब! काय काय सांगू
आणि कशाकशाचे वर्णन करू! इतकी सुंदर जागा होती ती...
From East Coast Tour ..
From East Coast Tour ..
From East Coast Tour ..
भरपूर फोटोगिरी केली तिथे. आणि आलो परत ..
परत येताना आम्हा सर्वांचा आवडता पापा जॉन्सचा पिझ्झा घेतला , आणि मस्त
पिझ्झा पार्टी केली!! पिझ्झानंतर खाल्लेले आईसक्रीम बिस्कीट तर महान होते!!

आमची
दुपारी भलतीच झोप झाल्यामुळे आम्ही टक्क जागे होतो ! मग आम्ही दोघं ’ताल’
पाहात बसलो.. खूपच दिवसांनी पाहील्यामुळे काय धमाल आली! मला आवडतो तो
मुव्ही.. गाणी विशेषत: फार सही आहेत! तो पाहीला आणि कधीतरी १-१.३०ला
झोपलो..
दुसर्या दिवशी खूप पाहायचे - फिरायचे होते! वॉशिंग्टन डीसी!!
वॉशिंग्टन मॉन्युमेंट
अमेरिकेच्या पहिल्या President - अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. शिवाय वॉशिंग्टन डीसी मधील ही सर्वांत उंच इमारत.. नको.. स्ट्रक्चरच म्हणूया आपण. या स्ट्रकचरमागे किती इतिहास आहे पाहा :
- मूळात या बांधकामाच्या प्रकाराला Obelisk म्हणतात, जे इजिप्त (Luxor temple , Heliopolis(city of sun) - Cairo) , रोम , USA ( Central Park - New York , Washington Monument - Washington DC) , इथिओपिया,अर्जेंटीना अशा बर्याच ठिकाणी आढळते.
- ओबेलिस्कचे बांधकाम म्हणजे एक सरळसोट उंच चौकोनी खांब, व वर छोटा, उंच पिरॅमिड. बर्याचदा म्हणजे पूर्वीच्या काळी obelisk हे monolith असायचे. मोनो(एक), लिथ(दगड). थोडक्यात एकाच दगडातून उभा राहीलेला चौकोनी उंच खांब. त्यावर पूर्वीच्या काळी असायचा सोन्याचा पिरॅमिड. [ सोने या धातूला इजिप्शिअयन लोकं 'flesh of god' समजत.] अर्थातच आता तसे नाही. वर सोन्याचा पिरॅमिडही नसतो तसेच एकाच दगडातूनही ते बांधकाम होत नाही. वेगवेगळ्या दगडांनी , संगमरवरांनी बनवलेला असतो. [ वॉशिंग्टन मॉन्युमेंट हे असे आहे. दगड + संगमरवर ]
- इजिप्शियन एन्शन्ट भाषेमध्ये याला शब्द आहे TEJEN. ज्याचा अर्थ : Protection or Defense. काही संकट येणार असेल तर ते या obelisk मुळे, त्याच्यावरच्या उंच तोकदार नीडलमुळे दूर होते अशी त्यांची धारणा.
- इजिप्शियन देव Ra [rah] - Sun God, याच्या देवळात मोकळ्या भागात कायम हे उभारले जातात, संरक्षणार्थ. [ रा या देवाच्या नावाबद्दल बरेच संभ्रम आहेत. त्याला ’रे’ असे सुद्धा संबोधले जाते
- जसे ख्रिश्चन लोकांमध्ये थडगी असतात, तसेच हे Obelisk. इजिप्शियन संस्कृतीत आणि इजिप्शियन भूमीवर असे बरेच ओबेलिस्क्स उभे आहेत. त्या राजांची आठवण म्हणून बांधलेले. [ Ramses, Hatshepsut इत्यादी ]
- त्यामुळेच obelisk च्या पाठोपाठ येतो इजिप्शियन देव Osiris. God of death, afterlife. असेही काही समज आहेत, की obelisk वरच्या टोकावर असणारा पिरॅमिड ( जो बर्याचदा enlightenmentशी संबंधित असतो ) हा सूर्याची किरणं या ओबेलिस्कवर पोहोचवेल. व सूर्यदेवाच्या किरणात इतकी शक्ती आहे की त्यामुळे obelisk मधील आत्मा पुनर्जन्म घेऊ शकेल. [ Resurrection ]
- या सगळ्यात
थोडेसे वेगळे पण डीसीशी संबंधित असल्याने लिहीलेच पाहीजे. ज्याच्या
स्मरणार्थ हे मॉन्युमेंट बांधले - वॉशिंग्टन- तो फ्रिमेझन होता. मेझनरी
माहीत नसणार्यांनी either गुगल करावे किंवा Dan Brown's ’The lost
Symbol’ वाचावे. थोडक्यात सांगायचे तर ख्रिश्चन धर्माला (निदान पूर्वीतरी)
सायन्सचा प्रचंड राग होता. [ आठवा : गॅलेलिओने प्रसृत केलेली सूर्याच्या
भोवती पृथ्वी फिरते ही थिअरी न पटल्यामुळे, व बायबल/ख्रिष्चनिटीच्या
विरोधात असल्याने गॅलेलिओला झालेला त्रास. अशी उदाहरणे बरीच असतील. ]
यासर्वांमुळे एक सिक्रेट सोसायटी स्थापन झाली ज्यात खूप नामवंत शास्त्रज्ञ, कलावंत, राजकारणी होते. उदा: न्यूटन,
गॅलेलिओ, वॉशिंग्टन, रुझवेल्ट, हेन्री फोर्ड, नेपोलिअन बोनापार्ट,
आपल्याकडचे स्वामी विवेकानंद, डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाक्रिष्णन,
मोतीलाल नेहेरू, परिक्षित साहानी.. ... संपणार नाही ही
लिस्ट ! आख्ख्या वॉशिंग्टन डीसी मध्ये मेझनिक सिम्बॉल्स आहेत असं म्हणतात.
ओह बायदवे, ओम, स्वस्तिक हे मेझनिक सिम्बॉल्स आहेत म्हणे!
[ प्रचंड इंटरेस्टींग आहे ते सर्व. पण लिहीत बसले तर सगळे पान भरून जाईल. ]
असो. विषय भरकटायला लागला!
तर..
अशा वेग्वेगळ्या इतिहासाने भरून गेलेल्या ठिकाणी आम्ही होतो. मला हे सगळे
अंधुक तुकडे तिकडे आठवत होते. त्या भल्या मोठ्या 555 ft 5⅛ inches इतक्या
उंचीच्या मॉन्युमेंटवर नेमकं आम्हाला जाता नाही आले. त्यासाठी भल्या पहाटे
वगैरे जावे लागत असावे. आम्हाला तितका वेळही नव्हता. पण तिथेच टेकलो जरा
वेळ. मॉन्युमेंट तर संगमरवरात आहेच, पण तेथील व्हीजिटर्स लोकांना बसायचे
बाक देखील संगमरवरात आहेत. त्या गार गार मार्बलवर बसून वरचा तो मॉन्युमेंट,
समोर दिसणारे कॅपिटॉल हिल बिल्डींग, पाठीमागचे लिंकन मेमोरियल तर डावीकडे
झुडुपात लपलेले व्हाईट हाऊस असा दूरवर पसरलेला तो परिसर पाहायला खूप मजा
आली !! गंमत म्हणजे कॅपिटॉल हिल, मॉन्युमेंट्स ( लिंकन, वॉशिंग्टन) यांना
दिलेल्या परिसराचे क्षेत्रफळ पाहता व्हाईट हाऊस अगदीच छोटूसे आहे !
निदान झुडुपात लपल्यामुळे तरी तसेच वाटते!
थोड्यावेळ फोटोसेशन केले व आम्ही निघालो व्हाईट हाऊसकडे. ते सर्व पुढच्या भागात !
काही फोटोज :
वॉशिंग्टन डीसी १
रविवार सकाळ, दिनांक ६ सप्टेंबर .. सकाळी तसे आरामातच उठलो. खरंतर आमचा सकाळी ८लाच निघायचा प्लॅन होता. पण आम्ही आपले उठून आरामात गप्पा, चहा, कॉफी, ब्रेड ऑम्लेटचा नाश्ता असे करत बसलो होतो. शेवटी निघू निघू म्हणत १०-१०.३० ला घराबाहेर पडलो. मामा आम्हाला मेट्रो स्टेशनवर सोडणार होता, आणि मग तिथून पुढे आम्ही जाणार होतो.
अमेरिकेत इतके वर्षं राहून मेट्रोचा प्रवास घडलाच नाही, कारण कायम हाताशी कार असतेच ना? त्यामुळे खूप उत्सुकता होती त्या प्रवासाची. नवखेपणा होताच, त्याचबरोबर नवलाई होती.. आजवर नुसतेच पाहीले किंवा ऐकले होते मेट्रोबद्दल.. ती आपोआप उघड-बंद होणारी दारं तर मी लहान मुलीच्या उत्साहाने पाहात होते.. ५-७ मिनिटातच आमची मेट्रो आली, आणि आम्ही धावतपळत एकदाचे जाऊन बसलो.. लोकांना विचारूनही घेतले.. हो, उगीच घोळ नको... हातात मेट्रोचा मॅप होता.. त्यात प्रत्येक स्टेशनचे नाव होते. अगदी पटापट येत होती ती सर्व स्टेशन्स.. खूप मजा आली! वॉशिंग्टनचे मेट्रोचे जाळे सुद्धा चांगले आहे. त्यामुळे कारची अजिबात आवश्यकता वाटली नाही!
२० मिनिटात वगैरे स्मिथ्सॉनियन स्टेशन आले. भुयारातून बाहेर आलो तर काय ?
सगळ्या भल्या थोरल्या, रोमन कल्चरच्या दिसणार्या बिल्डींग्सची रांग
लांबवर पसरलीय ! माझी नजर नुसती भिरभिरत होती.. मला बहुतेक फक्त कॅपिटॉल
हिल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंटच ओळखू आले असेल.. असो.. तर मॅप सांभाळत आम्ही
सज्ज होऊन निघालो .. हे असं ठिकाण होतं, जिथे (कितीही नकोसं वाटलं तरी
सत्य तेच आहे.. ) संपूर्ण जगावर राज्य करणार्या राज्यकर्ते होते, त्यांची
पांढरी घरं होती (
), फार जुन्या ऐतिहासिक इमारती होत्या, भरपूर म्हणजे खचाखच भरलेली
म्युझिअम्स होती, असंख्य पुतळे होते, सर्व ठिकाणांच्या मधे मैलोनमैल
पसरलेले रस्ते होते, वर तळपता सूर्य होता व आमच्याकडे होते प्रत्येकी
दोन(च) पाय व ४जीबी(च) कार्ड असलेला कॅमेरा , हँडीकॅम.. 
सुरवातीला अडखळलोच आम्ही. कसे पाहायचे हे सर्व? तेही कमी वेळात ? कुठून
सुरवात करावी ? ती सगळीकडे नेणारी टूर घ्यावी का ?? हजार प्रश्न! मग आम्ही
घुसलो प्रथम स्मिथसॉनियन इन्फॉर्मेशन सेंटर मधे. मोठा कॅसल होता तो ! मला
काय पाहू हेच कळत नव्हतं! नजर नुसती भिरभिरतीय. कुठल्यातरी इमारतीचा सुळका
दिसायचा तर कुठे खांबावरचे नक्षीदार डिझाईन दिसायचे, तर कधी सुंदर पुतळा,
कधी विटकरी रंगाच्या त्या दगडी तर कधी पांढर्याशुभ्र गुळगुळीत इमारती..
अगदी टिप्पिकल टुरिस्ट आहोत असे वाटण्याचे क्षण आमच्या ह्याच ट्रिपमधे आले.
कारण हे सगळं परत पाहू की नाही याची गॅरंटी नाही. कोण इतक्या लांब येणार
परत? भारतात जायचे निम्मे डिस्टंस कव्हर होते त्यात. त्यामुळे जे जे दिसेल,
ते ते आम्ही ६ डोळ्यांनी टिपत होतो. २ माझे, २ निनादचे, आणि २
कॅमेर्यांचे ! 
स्मिथसॉनियन कॅसल मधे गेलो तर समोरच दिसला एक मोठठा ढीग! वर एक खूर्ची.. खाली काय वाट्टेल ते!
अरे हे ओळखीचे वाटतेय.. ह्म्म.. तो होता "नाईट ऍट द म्युझियम - बॅटल ऑफ स्मिथसॉनियन " मधला ढिग. तो मुव्ही (दुसरा भाग) मला रटाळ वाटल्याने मी एकच फोटो काढला, माहीतीपत्रक घेतले आणि निघालो !
टोप्या, गॉगल्स, कॉटनचे कपडे कशानेही ते वरचे ऊन कमी वाटत नव्हते. भाजणारं ऊन म्हणजे काय ते इथे कळले. आत्ताच ही दशा तर पुढे कसं होईल ? अजुन ५-६ तास तरी इथेच आहोत आपण ! :|
आता उजवीकडे एअर अँड स्पेस म्युझियम होते, तर डावीकडे म्युझियम ऑफ नॅचरल
हिस्टरी! एअर अँड स्पेस जास्त नावाजलेले आहे, परंतू आम्हाला विमानांपेक्षा
इंटरेस्ट प्राणीमात्रात वाटल्याने आम्ही तिथे निघालो. त्या म्युझियमला
परपेंडीक्युलर , दोन टोकाला होते, वॉशिंग्टन मॉन्युमेंट व कॅपिटॉल हिल. ते
प्रचंड अंतर पाहून जीव दडपला. पण ते विचार बाजूला ठेऊन म्युझियम मधे गेलो.
नाईट ऍट द म्युझियम पार्ट वन मधले प्राणी थे भेटायची शक्यता असल्याने फार
खुष होतो! त्यातून कळले ही सर्व म्युझियम्स फुकटच असतात! तो आनंद जास्त
अवर्णनिय होता! 
आत शिरलो तर सर्व प्रकारचे प्राणी.. निर्जीव चतुष्पाद व सजीव .. दोन पायाचे प्राणी.. ( काय म्हणतात त्यांना ? द्वीपाद?? :O ) असो.. हाय फंडू शब्द वापरायला गेले की असं तोंडावर आपटतो आपण! आम्हाला सर्व प्राणी पाहण्यात इन्टरेस्टही नव्हता व वेळही ! त्यामुळे आम्ही सरळ आपले रेक्सी दिसतोय का पाहायला निघालो ! तो आणि डमडम आमचे एकदम आवडते कॅरॅक्टर्स! ( Ref : Night at the museum, again!)
हा पाहा रेक्सी : क्युट आहे ना !!
जनरल फिरलो.. खूप प्राणी पाहीले. प्रत्येक खंडानुसार विभाग केले होते. त्यामुळे मला काहीएक लक्षात नाही आता.. पण मजा आली होती! नंतर भारतातून आलेला 45.52 कॅरटचा "होप डायमंड" बघितला..
ते झाल्यावर पटकन निघून एअर ऍंड पेस मध्ये गेलो..
वेळ फार कमी पडत होता! तरीही पटकन जे दिसेल ते पाहीले, आयमॅक्सचा एक ४०
मिन्टांचा मुव्ही चालू होता.. त्याला जाऊन बसलो. आणि मी गाढ झोपले !!
घोरायचीच कमी होते!! :)) लोल.. असं का झाले ते अजुन समजत नाहीये मला! पण
झोपले खरी... मस्त फ्रेशही झाले ! 
क्रमशः
एअर अँड स्पेस म्युझियममधून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन थांबलो. या भागातून एक हॉप ऑन हॉप ऑफ बस टूर फिरत असते. म्हणजे कुठेही बसा, कुठेही उतरा. तिच्या स्टॉपला आम्ही थांबलो. कारण आता वेळ कमी पडत चालला होता! टूरचे ५६ डॉलर्स जास्त वाटले खरं, पण पायांवर तेव्हढा विश्वास बसत नव्हता! त्यामुळे थांब थांब थांबलो.. एकदाची बस आली.. सरळ आत जाऊन बसायच्या ऐवजी आम्ही त्या गाईडला विचारले की भाऊ कशी जातीय ही बस? तर नेमकं त्यांचे व्हाईट हाऊस पाहून झाले होते.. आम्हाला तर ते पाहायचेच होते! मग आम्ही त्यालाच विचारले, बाबारे कसे जाऊ आम्ही? आजचेच ३-४ तास आहेत आमच्याकडे.. सगळं शक्यतो बघायचे आहेच. त्यानेच सांगितले, मेट्रोने फिरा. जास्त स्वस्त जाईल. या टूरमधे पैसे खूप जातील व व्हाईट हाऊस नाहीच!
उतरलो, आणि कॅपिटॉल हिलला चालत निघालो. कारण त्याच्या स्टेशनवर मेट्रोने जायला जवळपास तेव्हढीच पायपीट करावी लागली असती. मग निघालो चालतच. पायांवर विश्वास ठेवावाच लागला...
चालतोय, चालतोय... यायलाच तयार नाही! मग आम्ही वाटेत येतील ती
म्युझियम्स बघायचा(?) सपाटा लावला! तेव्हढीच सावली मिळायची, रेस्टरूम्सला
जाऊन फ्रेश होता यायचे, पाणी बिणी पिऊन - येता जाता जितके दिसेल तितके
म्युझियम पाहायचे व प्रवास चालू!
अशा प्रकारे आम्ही अमेरिकन-इंडीयन म्युझियम पाहीले, म्युझियम ऑफ स्टॅच्युज पाहीले, अजुन बरंच काही! मजाच होती ती !! 
अमेरिकन इंडियन्सचे शूज !
म्युझियम ऑफ स्टॅच्यूज !
शेवटी एकदाचे आले ते... कॅपिटॉल हिल !! (काश... द लॉस्ट सिम्बॉल
महीनाभर आधी येते.. काय काय हिस्टरी जॉग्रॉफी कळ्लीय ना आता त्याला तोडच
नाही! ती नंतर कधीतरी! ) मला आता असं वाटतंय मला काही धड माहीती होती का
तरी तेव्हा?? या ट्रिपला जायच्या आधी मी खूप खूप ठरवलं होतं, सगळं नीट
वाचायचे आणि मग जायचे फिरायला. पण वेळ मिळाला नाही आणि तेव्हढा इंटरेस्टही
वाटला नाही, आणि तशीच आले तिथे.
गंमत म्हणजे तिथे जायचे व बाहेरून, कॅपिटॉल हिलच्या पार्श्वभूमीवर फोटो
घ्यायचा आणि निघायचे!! एव्ढाच कार्यक्रम.. त्यासाठी इतके अंतर (अक्षरश:)
तुडवत गेलो..
त्याच्याचसमोर जनरल Ulysses S. Grant याचा पुतळा झळकतो! अतिशय
रूबाबदार पुतळा आहे हा..चौथर्यावर हा घोड्यावर बसलाय, आणि चारी बाजूला
(स्थितप्रज्ञ !) सिंह !
काय
ना .. एकेका वास्तूच्या नशिबी ग्लॅमर असते. तसेच ते इथेही होते! आत कसे
असेल? तो वरचा टोकाचा पुतळा कोणाचा आहे? असे बरेच प्रश्न आले खरे..पण
निरूत्तरीतच राहीले.. त्या हिलच्या समोरच्या लॉनवर लांबवर ऑर्केस्ट्रा
अर्र .. आमच्या तोंडी शब्द सुद्धा मध्यमवर्गीय येणार! ऑर्केस्ट्रा नाही, "
म्युझिक कॉन्सर्ट " चालू होती... व्हायोलिन वाल्यांचा जथ्था,
गिटारवाल्यांचा वेगळा वगैरे... म्युझिक तर मजाच झाली.. आम्ही तिथे गेलो तर ,
"ये चांद खिला , ये रात हसीन .....लालालालललालाला.... ना समझे वो अनाडी
है" या गाण्यासारखी सेम ट्युन वाजत होती!! हेहे... आम्ही आपलं हेच गाणं
म्हणत बसलो मग.. 
आता पुढ्यात फार मोठी कामगिरी होती!
- कॅपिटॉल हिलचे मेट्रो स्टेशन शोधायचे,
- त्या मेट्रोने जाऊन स्मिथसॉनियनला उतरायचे,
- तिथून पुढे वॉशिंग्टन मॉन्युमेंटला .. परत चालत !

मॅप सरसावला आणि निघालो. सकाळीच मामाला जीपीएस आणि गुगल
मॅपच्या जगात कागदी मॅप्स काय वापरतोस म्हटले होते! पण शेवटी इथे कागदी
मॅप्सच उपयोगी पडले. मेट्रो स्टेशन ’कागदावर’ शोधणे फार्फार सोप्पे होते!
पण चालत, डिरेक्षन्स पाहात, माझ्या शंकांनी भरलेल्या दृष्टीकोनाला बरोबर
घेऊन, गोळे आलेले पाय फरपटत ओढत ते स्टेशन सापडणे फार अवघड होते! मी एकटी
असते तर मी परत घरी निघून गेले असते एव्हढं नक्की! जाम वैतागले उन्हाला आणि
चालण्याला.. पण निनादने शोधलं देवदयेने ते.. आणि स्टेशनवर - जमिनीखाली
गुडूप होऊन बसलो..
एकतर भूयार असल्याने इतके गार्गार वाटले,सावली मिळाली, बसायला बाकडं
मिळालं.. हे म्हणजे छप्पर फाडकेच झाले अगदी! तापलेला जीव निमाला एकदाचा..
५-७ मिनिटातच मेट्रो आली. बसलो बसलो म्हणेस्तोवर उतरलो देखील..
जमीनी’वर’ आल्यावर दिसले "चालायचे अंतर" ! नक्को वाटत होते ! तरी चालू केली
परत घोडदौड.. पाणी पीत , पीत एकदाचे मॉन्युमेंटच्या एरियामधे आलो ! पण
इतके... दमलो की समोरच्या लॉनवर अंग आदळून बसकणच मारली ! लॉनच्या समोर होते
स्टेज.. आणि तिथे एक माणूस मनोरंजन करायला उभा होता.. गिटार घेऊन गाणी
म्हणत होता.. लोकं समोर आराम करायला बसली आहेत व एकाचेही आपल्या गाण्याकडे
लक्ष नाहीये हे माहीत असूनही त्याची गाण्याची विजिगिषू वृत्ती
वाखाणण्याजोगी होती!!
आमच्या समोर दोन बायका कमरेला फिरवायची रिंग घेऊन सो कॉल्ड डान्स करत
बसल्या होत्या त्या म्युझिकवर! नाही म्हाणायला दोन कुत्री त्या सिंगरकडे
पाहात होती! 
आता खरेतर मॉन्युमेंट अगदी आमच्या पाठीमागे होते. पण तेव्हढेही फोटो काढायचे त्राण नाही राहीले.. शेवटी आम्ही तिथेच बसलो ५मिनिटे.. आराम केला.. पाणी पिऊन घेतले .. गार हवा घेतली जेव्हढी येइल तेव्हढी आणि मग उठलो... आता जवळ जवळ ४.३० वाजत आले होते .. आधीच्या प्लॅननुसार आमचं आत्तापर्यंत बघून आटोपायला हवे होते. पण अगदी मेन-मेन गोष्टी म्हटलं तरी मॉन्युमेंट आणि व्हाईट हाऊस बाकी होते. मामाला फोन करून सांगितले उशीर होईल. आणि निघालो मॉन्युमेंटकडे.
पुढच्या भागात बघुया मॉन्युमेंट, व्हाईट हाऊस आणि तिथला एक सुखद धक्का !
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.