Monday, September 2, 2024

महाबलिपुरम, चिदंबरम

 https://www.maayboli.com/node/45028

महाबलिपुरम म्हणजेच मामल्लापुर हे चेन्नईपासून ६० किमी अंतरावर असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. पल्लव राजघराण्यामधे हे शहर एक विकसित बंदर होते आणि इथून बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडच्या देशाशी व्यापार केला जात होता. तमिळमधे याच शहराला कौतुकाने "कडल मल्लै" म्हटले जाते (समुद्र टेकडी).

इथे असलेली बरीचशी शिल्पे ही खोदकाम करून बनवण्यात आली आहेत. (रॉक कट). यापैकी अर्जुनाची तपश्चर्या हे एकाच दगडात खोदलेले भव्य बास रीलीफ (मराठी शब्द सांगा) हे इथले एक प्रमुख आकर्षण आहे. ही बहुतेक शिल्पे सातव्या ते नवव्या शतकामधे खोदलेली आहेत. संपूर्ण शिल्पांवर महाभारताचा प्रभाव जाणवत राहतो.

या ऐतिहासिक शहरामधील ही काही प्रकाशचित्रे:

१. ब्रह्मा-विष्णु-महेश मंदिर: शंकराची पिंड नंतर विजयनगर साम्राज्याचा काळामधे बसवण्यात आली. त्याआधी शंकराचीदेखील मूर्तीपूजा होत असावी. ब्रह्मादेखील इथे चार तोंडाचा नाही, त्याचे कारण गाईडला विचारले तर त्याला ते नीट सांगता आले नाही.

===================================================

गजलक्ष्मी:

वराह अवतार:

==========================================

देवीपुढे बळी देणारा भक्त (मला हा पौराणिक संदर्भ लक्षात येत नाहीये. कुणी सांगेल का??)


=========================================

वामनावतार:

या मंदिरामधे छताला वापरलेले नैसर्गिक रंग अजून टिकून आहेत: ( हे रंग सातव्या वगैरे शतकातील आहेत की नाही ते मात्र नक्की माहित नाही)

=====================

याला कृष्णाच्या लोण्याचा गोळा म्हणतात: Happy

आता हे प्रमुख आकर्षण
अर्जुनाची तपश्चर्या किंवा गंगेचे आगमन.

माझ्या कॅमेरामधे याचा पूर्ण पॅनोरमा शॉट घेता आला नाही, लांब जाऊन शॉट घेणे शक्य नव्हतं कारण इथे प्रचंड ट्राफिक होतं. पूर्वी हे अर्धं शिल्प वाळूमधे गाडलेले होते. काही दशकांपूर्वी पूर्ण उत्खनन करून काढलेले आहे. पूर्ण शिल्प विकीपीडीया पेजवरती आहे. हे शिल्पदेखील अर्धवट स्थितीमधेच आहे, मात्र जेवढे खोदलेले आहे तेवढे मात्र अप्रतिम आहे:

हा हिमालयाचा देखावा असून मधल्या खोबणीमधे गंगा अवतीर्ण होताना दिसत आहे. आजूबाजूला यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा वगैरे दिसत आहेत.

गाईडच्या मते, हा तपश्चर्या करणारा अर्जुन. शोअर टेम्पल (किनार्‍यावरचे देऊळ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या शंकराच्या देवळाच्या बरोबर सरळ रेषेत हा अर्जुन उभा आहे आणि तपश्चर्या करत आहे. पण जर हा प्रसंग गंगावतरणाचा आहे असे मानले तर हा तपश्चर्या करणारा भगीरथ आहे. नुकत्याच समजलेल्या माहितीनुसार हा प्रसंग गंगावतरणाचाच आहे, असे अभ्यासकांचे सर्वमान्य मत आहे.

या मनीमाऊ देखील तपश्चर्याच करत आहेत, पण वरच्या अर्जुनाचं खपाटीला गेलेलं पोट बघा आणि यांचं तुडुंब पोट. मनीमाऊना इतक्या भक्तीभावाने तप करताना पाहून उंदीरमामा देखील त्यांची पूजा करत आहेत. मांजरीचं लक्ष कुठे आहे ते सांगायला नकोच.

===========================================
हिमालयातील विष्णुचे मंदिर आणि तिथे शिकवणारे गुरूजी व त्यांचे तीन शिष्य (शिष्यांची मुंडकी उडाली आहेत)

=================================================

यक्ष, किन्नर, अप्सरा वगैरे:

=====================================================

या अर्जुनाची तपश्चर्या/गंगावतरण शिल्पाला लागूनच असलेले हे अजून एक मंदिर:

या मंदिरामधे कृष्णलीला कोरल्या आहेत:

हा कृष्ण बौद्धशैलीतला वाटतो का? जाणकारांनी सांगा प्लीज.

================================================

हे पांडवांचे पाच रथ:
यांची नावे रथ असली तरी प्रत्यक्षामधे ही मंदिरेच आहेत. यापैकी केवळ द्रौपदीचा रथ पूर्ण झालेला असून इतर कामे अर्धवट स्थितीमधेच आहेत. भीमाचा रथ सर्वात भव्य असून युधिष्ठीर आणि नकुल शेअरिंग रथामधे आहेत. बाकीचे चार रथ एकाच रांगेत असून अर्जुनाचा एकट्याचा रथ वेगळा कोरलेला आहे.

आधी लिहिलं तसं हे बांधकाम केलेलं नाही, तर अख्खा दगड खोदून त्यामधे केलेले काम आहे.

द्रौपदी:


सहदेव (तमिळी गाईड म्हणे सखदेवाचारी)

आतला भिंतीवर अर्धवट झालेले काम दिसत आहे:

युधिष्ठीर आणी नकुल:

भीम:

अर्धनारीनटेश्वर:

तमिळ भाषा नक्कीच नाही आहे ही: पाली???

याच मंदिराच्या सरळ रेषेत इतर तीन रथ आहेत.

हत्तीच्या बाजूला जे एक छोटे मंदिर आहे तो अर्जुनाचा रथ:

अर्जुन कुठाय? गेला तपश्चर्येला.

हत्ती:

नंदी:

सिंह

 
सहाव्या शतकानंतरची शिल्पकला यांत्रिक झाली .कलात्मकता ,जिवंतपणा ,भाव इत्यादि लुप्त झाले .कलाकारांना पूर्ण स्वातंत्र्य होते ते गेले .कोरिवकाम आणि भव्यपणा वाढला .महाबलीपूरमची कला खरी कला आहे .जसे आहे तसे वस्तु आणि भाव आहेत .स्त्रियांचे शरीरे उगाचच उत्तान कोरलेली नाहित आणि ढोंगी मांजरही आहे ,गायीचे दुध काढणारा गवळी नी वासराला चाटणारी माय .देवलोक त्यांच्या कामात आणि सामान्य आपल्या दैनंदीन कष्टांत .नंतरच्या काळात ढीगभर शिल्पांची गोपुरे आली पण गंमत गेली .जुन्या तमिळमध्ये ख ग घ त श ह वगैरे बरीच व्यंजने नाहित .शिवा आहे चिवा ,लक्ष्मण होतो लटचिमण ,खाना गाना होते काना ,सीता होते सिदा .

नंदिनी, त्या शिल्पाविषयी दोन मतं अभ्यासकांनी मांडली होती. १. ते शिल्प गंगावतरणाचा देखावा आहे. २. किरातार्जुन कथा/ त्यातला अर्जुनाचा तपःश्चर्येचा भाग तिथे चित्रित केली गेली आहे.
आता यातलं पहिलं मत सर्वमान्य ठरलं आहे तरीही बरेच ठिकाणी त्याला अर्जुनाचं तप असं नाव देतात.

तुम्ही जे मत मानाल त्यावर तो तपःश्चर्या करणारा भगीरथ आहे का अर्जुन हे ठरणार. पण गंगावतरणात अर्जुन कधीच येणार नाही


दोन्ही कथांची सरमिसळ करू नकोस - कुठलंही एक नाव दिलंस तरी हरकत नाहीये>> होय, आता आलं लक्षात. फारच पौराणिक घोळ घातला जातोय माझ्याकडून. लॉजिकली विचार करता गंगावतरण हे एवढ्या मोठ्या शिल्पासाठी परफेक्ट वाटतंय. अर्जुनाच्या तपासाठी एवढे दोन्ही बाजूला ढीगबह्र यक्ष किन्नर अप्सरा प्राणी हत्ती वगैरे कशाला?  गंगावतरण ही मात्र तेवढी मोठी घटना आहेच- त्याकाळी त्याचा काही मोठा सण वगैरे साजरा होत असेल का? दक्षिणेसाठी देखील गंगा तितकीच "इम्पोर्टंट" होती का? आणि गंगावतरण कथादेखील महाभारतामधेच येते ना?

महाभारतातदेखील गंगा आहे पण ती पितामह भीष्मांची माता म्हणून. अर्जुनाने शेवटी शरशय्येवर पडलेल्या भीष्मांना बाण मारुन गंगाजल पाजले होते.
बहुतेक इथेच घोळ होत असावा.
गंगावतरणाची कथा शिवपुराणात येत असावी. इथे शंकरांच्या मी तरी ती शिवलीलामृतात वाचल्याचे स्मरते.

मलातरी महाबलिपूरमची शिल्पे एक काही थीम ठेऊन घडवल्यासारखी नाही वाटत. मुख्य म्हणजे ती दगडात कोरलेली आहेत. दगडाचा आकार, त्याचे स्थान पाहून त्यात काय कोरता येईल याचा विचार करुन घडवलेली असावीत.
एवढा मोठा प्रस्तरात जर महाभारत थीम ठेवली असती तर राजसुय यज्ञ, द्रौपदी स्वयंवर, द्रौपदी वस्त्रहरण, महाभारत युद्ध किंवा गीता उपदेशाचा सीन असे काहीतरी घडवता आले असते. पण त्या शिलेच्या मधोमध असलेली नैसर्गिक घळ शिल्पकाराला आकाशातून पडणार्‍या जलप्रपातासारखी भासली असावी आणि त्याने गंगावतरण कोरले असावे असे वाटते.

गंगावतरण म्हणजे भगीरथाने तप करुन स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली, जी शंकरांनी आपल्या जटांमध्ये झेलली. ही गंगा मग नदी म्हणून वाहू लागली. हे झाले भगीरथवाले गंगावतरण

महाभारताच्या आधीपासुनच गंगा वाहत होती. हस्तिनापूरचा राजा शंतनूने गंगेशी लग्न केले आणि तिने भीष्माला जन्म दिला.
जेव्हा भीष्म शरशय्येवर पडले होते तेव्हा त्यांनी पाणी मागितले (देह सोडण्याआधी). तेव्हा अर्जुनाने जमिनीत बाण मारला आणि तिथून गंगेची एक धार भीष्माच्या मुखात पडली. गंगेनेदेखील मग आपल्या पुत्राला म्हणजे भीष्माला शेवटच्या क्षणी दर्शन दिले. इथे अर्जुनाने बाण मारुन गंगेचा प्रवाह युद्धभुमीवर निर्माण (अवतरित) केला म्हणून अर्जुनाने गंगा अवतरीत केली की काय असा घोळ झाला असावा.

महाबलिपुरमचे अजून एक वैशीष्ट्य असलेले हे शोअर टेम्पल. असे म्हणतात की पूर्वी ही अशी एकसारखी सात देवळे होती म्हणून महाबलिपुरमला "सेव्हन पॅगोडा" असे म्हटले जायचे. सध्या त्यापैकी ही दोनच मंदिरे शिल्लक आहे.
ही मंदिरे पल्लव राजा नरसीम्हराय याच्या काळात बांधली गेली.

हिंदीमधे बोर्ड लिहायलाच हवा का? घ्या एकदाचा!!!!! Proud

२००४ मधे चेन्नईला जी त्सुनामी आली होती, ती या देवळांवरून आली होती, या त्सुनामीनंतर देवळाच्या आसपास अजूनही काही बांधकाम सापडले आहे. फोटोत दिसत असलेली पुष्करणी तेव्हाच मिळाली असे गाईड म्हणे.

समुद्राच्या खार्या वार्‍याने बहुतेक शिल्पांची अशी अवस्था झालेली आहे.

गाईडच्या मते, ही भारतातील सर्वात जुनी शेषशायी विष्णुची मूर्ती आहे. ही मूर्ती बघताना मला "दशावतार" सिनेमा आठवला होता.

गाईड म्हणे या शिल्पामुळे या गावाला महाबलिपुरम नाव मिळाले: अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी हे पूर्वीच्या ठिकाणी बळी द्यायचे ठिकाण असावे हे मात्र निश्चित.

आतमधे जो चौकोन कोरला आहे त्यात दुर्गामाता आहे. त्याच्या बाजूला बळी दिलेल्या जनावरचे चित्र कोरलेले आहे.

==============================

महिषासुर मर्दिनी मंदिर आणि दीपगृह:

शेषशायी विष्णु

हे नवीन दीपगृह (लाईट हाऊस)

दीपगृहावरून दिसणारे दृष्य:

================================================
महाबलिपुरम इथे शिल्पकला तसेच, मंदिर वास्तु कला शिकवणारे एक कॉलेज आहे. तसेच, इथे पिढ्यानपिढ्या हेच काम करणारे काही लोक आहेत. पूर्ण गावामधे शिल्पकलेची तसेच मूर्तीकलेची काही दुकाने बघायला मिळतात. इथेच गावामधे एक म्युझियम आहे जिथे या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या काही प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. टिपिकल पर्यटन स्थळ असल्याने शोभेच्या वस्तू वगैरे देखील प्रचंड महाग किमतीत इथे मिळू शकतात.

म्युझियमच्या मागे छ्इन्नीने काम करतानाचे दोन विद्यार्थी.

कार्तिकेय

बप्पा सर्फिंग करताहेत

आमी जे तोमार वाजायला लागलं डोक्यामधे:

===========================================

मंदिरांच्य पलिकडे असलेले हे महाबलिपुरम गाव. इथली प्रमुख वस्ती ही मासेमार लोकांची आहे.

==================================

महाबलिपुरमला जाण्यासाठी चेन्नईवरून बस, टॅक्सी वगैरे मिळू शकतात. सकाळी लवकर उठून चेन्नई-महाबलिपुरम गेल्यास दुपारपर्यंत संपूर्ण महाबलिपुरम बघून होऊ शकते. ईस्ट कोस्ट रोड अत्यंत सुस्थितीमधे आहे. परत येताना ईस्ट कोस्ट रोडवरील क्रोकोडाईल बॅंक अथवा दक्षिणक्षेत्र वगैरे पोईन्ट्स करता येतात. संध्याकाळी याच रोडवर चेन्नईच्या जवळ असलेल्या बोटक्लबमधे बोटिंग तसेच वॉटर स्पोर्ट्स करता येऊ शकतात. अथवा तसेच पुढे जाऊन पॉन्डिचेरीला देखील जाता येऊ शकते.

महाबलिपुरम येथे दुपारी गावामधे असलेल्या अनेक हॉटेल्समधून उत्तम मत्स्याहार मिळतो. महाबलिपुरम इथे राहण्यासाठी अनेक रीझॉर्ट्स तसेच लॉजेस उपलब्ध आहेत. युनिस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा दिलेला असल्याने सर्व पर्यटनस्थळे स्वच्छ आणि सुस्थितीमधे आहेत. गेल्यावर् शासकीय कार्ड असलेला एखादा गाईड ठरवल्याच त्याच्याकडून सर्व माहिती तसेच, फिरणे सोयीचे पडते. गाईड तोडकंमोडकं हिंदी आणि उत्तम इंग्रजी बोलू शकतात.


श्री थिलई नटराज मंदिर चिदंबरम

तत्व -आकाश

नटेश्वराला अर्पित चिदंबरम मंदिर म्हणजे चोला राजांच्या कारकीर्दीतील आणखी एक सुंदर स्थापत्य कलाकृती. चोला राजे युद्धात तरबेज होते, प्रशासनात कठोर होते, तसेच कलासक्तही होते. त्यांचे कलाप्रेम आणि भक्तिभावातूनच तमिळनाडूत अनेक भव्य मंदिरे उभी राहिली. त्यात भारतीय संस्कृती, स्थापत्य, कला यांचा संगम दिसून येतो. मंदिरांची नगरी म्हणून ओळखले जाणारे चिदंबरम हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील ठिकाण पूर्वी कलेचे माहेरघरच होते.
चिदंबरम येथील नटराज मंदिर म्हणजे उत्तम कलेचा, स्थापत्य शास्त्राचा नमुना आहे.
चिदंबरम मंदिर पाच पवित्र शिवमंदिरापैकी (पंचमहाभुते) एक असून, ते आकाशाचे प्रतिनिधित्व करते.
 इतर चार मंदिरे अशी - थिरुवनाईकवलचे जम्बुकेश्वर (जल), कांचीचे एकांबरेश्वर (पृथ्वी), तिरुवन्नमलईचे अरुणाचलेश्वर (अग्नी) आणि तिरुपतीजवळील श्रीकालहस्ती (वायू).
चिदंबरमचा अर्थ पाहू या. चित म्हणजे चेतना, अंबर म्हणजे आकाश. दुसऱ्या सिद्धान्ताप्रमाणे हे नाव चित्राम्बलमपासून बनले आहे. चित्रा/चिथु म्हणजे ‘देवाचे नृत्य किंवा क्रीडा’ आणि अम्बलमचा अर्थ आहे मंच.
चिदंबरमची कथा भगवान शिवाच्या थिलाईवनामध्ये भ्रमण करण्याच्या कथेपासून सुरू होते.
 थिलाई हे वृक्षाचे नाव आहे. मंदिरातील काही चित्रांमध्ये थिलाईची झाडे चित्रित केलेली दिसतात. ही चित्रे दुसऱ्या शतकातील असावीत. या जंगलात साधूंचा एक समूह राहत होता. या साधूंचा तंत्र-मंत्र व जादूटोण्यावर विश्वास होता. भगवान भिक्षुकाच्या रूपात या जंगलात फिरत होते. मोहिनी रूपातील विष्णू त्यांच्याबरोबर सावलीसारखी जात होते. ऋषिगण व त्यांच्या बायका त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे पाहून ऋषी क्रोधित होतात. ते जादूने नाग उत्पन्न करतात. भिक्षुक रूपातील भगवान सर्प उचलतात व अलंकाराप्रमाणे गळ्यात घालतात. ते पाहून चिडलेले ऋषी वाघ उत्पन्न करतात. भगवान त्याची कातडी काढून कमरेला गुंडाळतात. ते पूर्ण हतबल झाल्यावर शक्तिशाली राक्षस मुयालकनाची प्रार्थना करतात. तो दैत्य अज्ञान व गर्वाचे प्रतीक होता. शिव हसत त्याच्या पाठीवर चढतात आणि त्याला हलणे मुश्कील करतात आणि पाठीवरच आनंद तांडव करत मूळ रूपात प्रकट होतात. सर्व साधूंना देव व दैत्य यातील फरक लक्षात येतो आणि ते आपला जादूटोणा सोडून देतात.
मंदिराची वैशिष्ट्ये :
येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रुपात असुन सोबत शिवकामी अर्थात पार्वती ची प्रतिमा ही आहे. मात्र नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिला ‘चिदंबरा रहस्यम’ असे म्हटले जाते. या मोकळ्या जागेला सोन्याच्या चकत्यांच्या हारांनी सजवले जाते. येथील मान्यतेनुसार ही मोकळी जागा, मोकळी नसून ते (आकारहीन) आकाशतत्व आहे. पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी ही मोकळी जागा लाल पडद्याने आच्छादित असते. पूजेच्या वेळेला हा लाल पडदा बाजूला करून त्या (आकारहीन) शिव तत्वाची अर्थात आकाश तत्वाची पूजा केली जाते.
अशी मान्यता आहे की येथे शिव आणि कालीमातेच्या स्वरुपात पार्वती, ह्यांनी नृत्य केले होते.
चिदंबर असे स्थान आहे जिथे शिव आकाश तत्व प्रतीत करतो.
 या देवळाच्या गाभाऱ्याला एक पडदा आहे आणि पडद्यापलीकडे काहीच नाही, निव्वळ पोकळी आहे. ते तत्व जाणले तरच आपण शिव तत्वाचे रहस्य जाणू शकतो. जेंव्हा आपण भ्रम, मोह, इच्छा आणि आकांक्षांचा पडदा दूर सारतो तेंव्हाच आपण चिरस्थायी शांती अनुभवू शकतो. जेंव्हा काही काळासाठी आपले मन निर्विचार होऊन जाते तेंव्हाच आपल्याला त्या रहस्यमय तत्वाची काही क्षण अनुभूती होते आणि हेच क्षण जीवनात परिवर्तन घडवून आणतात.
आकाश तत्व तीन प्रकारे वर्णिले जाते. भूताकाश-नश्वर देह. चित्ताकाश-विचार आणि भावना आणि चिदाकाश-अफाट आणि अगाध चेतनाशक्ती. प्राणऊर्जा चीदाकाशामध्ये जागृत होत असते. चिदंबर रहस्याचा अनुभव निव्वळ अध्यात्मिक मार्गावर स्व प्रयत्नाने प्रगती करत असू तरच अनुभवू शकतो.
पंचभूतस्थलम् मधील हे एकमेव मंदिर असे आहे जेथे भगवान शिव यांना लिंगाऐवजी मानवी रुपामध्ये दर्शवले आहे. तसेच स्फटिक लिंग म्हणजे मोकळ्या गाभाऱ्याची म्हणजे शिवाच्या निराकार रुपाची पूजा केली जाते.
मंदिराच्या गोपुराचे छत चोल राजा पारंतक यांनी सोन्याने मढवलेले आहे.
‘वीरथ्रीदयापद्मस्थलम’ म्हणजे हे मंदिर विश्वाच्या हृदयकमळाच्या जागी आहे, अशी आख्यायिका आहे.
 पेरुमटक्कनच्या पारंपरिक खानदानातील वास्तुनिर्मितीकाराकडून या मंदिराची उभारणी झाली. पल्लव, चोल राजांनी या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केला. ४० एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर गेली एक हजार वर्षे हे मंदिर संकुल दिमाखात उभे आहे. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही पंथांचे, अर्थात भगवान शिव (नटराज) व भगवान विष्णू (गोविंदराज पेरुमल) यांना समर्पित असलेले हे मंदिर आहे. भारतातील हे एकमेव असे शिवमंदिर आहे, की जेथे गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी महादेव भरतनाट्यम् नृत्यातील मुद्रेमध्ये दिसतात. नटराजाचे ब्रह्मांडीय नृत्य विश्वाच्या गतीचे प्रतीक आहे.
भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रा
मंदिराला एकूण नऊ दरवाजे आहेत. त्यात चार दिशांना सात मजली उंच गोपुरे आहेत. पूर्व गोपुरावर भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रा आहेत. हे गोपुर पल्लव राजा कोपेरुन्सिंगन याने १२४३ ते १२७९ या काळात पूर्ण केले. पश्चिम गोपुर जादववर्मन सुंदर पांड्यन याने १२५१ ते १२६८ या काळात पूर्ण केले. उत्तर गोपुर विजयनगरसम्राट राजा कृष्णदेवराय याने १५०९ ते १५२९ दरम्यान पूर्ण केले. दक्षिण गोपुर प्रथम राजा पंड्या याने बनविले. त्यावर पंड्या राजवंशाचे ‘मत्स्य’ हे प्रतीक दिसून येते. पल्लव राजा कोपेरुन्सिंगन याने इ. स. १२००मध्ये त्याची पुनर्निर्मिती केली.
*मंदिरात पाच मुख्य मंडप आहेत. पवित्र गाभाऱ्यात भगवान नटराज व त्याची सहचरी शिवाग्मासुंदरी विराजमान आहे. कनकसभा मंडप गाभाऱ्याच्या समोर असून, तेथे दैनिक संस्कार होतात. नृत्य मंडप मंदिर ध्वजखांबाच्या दक्षिणेला असून, असे मानले जाते, की शिवाने येथे देवी कालीबरोबर नृत्य केले होते. सभामंडप हा एक हजार स्तंभ असलेला मंडप कमळ अथवा सहस्रराम नावाच्या योगिक चक्राचे प्रतीक समजला जातो. देवसभा मंडपात भगवान गणेश (विघ्नहर्ता), भगवान सोमास्कंद, देवाची सहचरी शिवनंदा नायकी, भगवान मुरुगा, भगवान चंडिकेश्वर या पाच मूर्ती विराजमान आहेत.
आनंद तांडव मुद्रा : शिवाची आनंद तांडव मुद्रा ही एक प्रसिद्ध मुद्रा असून, त्यातून पुढील अर्थ ध्वनित होतात.
- नटराजाच्या पायाखालील राक्षस हा अज्ञानाचे प्रतीक आहे.
- हातातील अग्नी वाईट गोष्टींचे निर्दालन करण्याचे प्रतीक आहे.
- त्यांचा उचललेला हात सर्व जिवांचे उद्धरण करण्यासाठी आहे.
- हातातील डमरू जीवन उत्पत्तीचे प्रतीक आहे.
मंदिरामध्ये पाच परिक्रमा पथ आहेत. मंदिराचे छत २१ हजार ६०० सुवर्ण कौलांनी शाकारलेले आहे. चितसभेच्या वरील शिखरावर तांब्याचे नऊ कलश आहेत. गर्भागृह मानवी शरीरातील हृदयाप्रमाणे थोडेसे डावीकडे आहे. अर्धमंडपातील सहा खांब सहा शास्त्रांचे प्रतीक आहेत. अर्ध मंडपाच्या बाजूकडील मंडपात १८ खांब असून, ते १८ पुराणांचे प्रतीक आहेत. कनक सभेतून चितसभेत जाताना पाच पायऱ्या आहेत. त्या पंचाक्षरी मंत्रांचे प्रतीक आहेत. चित सभेतील छत चार खांबांवर आधारलेले असून, ते चार वेदांचे प्रतीक आहेत.
चिदंबरमच्या आसपास : समुद्रकिनाऱ्याला लागून कुय्या तीर्थ आहे. चिदंबरमच्या दक्षिणेला एक मैलावर पुलिमादु हे ठिकाण आहे. चिदंबरमच्या पश्चिमेला व्याघ्रपादतीर्थ आहे. चिदंबरम मंदिराच्या पश्चिमेला अनंथारेश्वर मंदिराच्या समोर अनंततीर्थम आहे. अनंततीर्थमच्या पश्चिमेला नागसेरी नावाचे एक सरोवर आहे. चिदंबरमच्या उत्तरेला शिवपिरियाई नावाचे एक सरोवर आहे.
------------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी @

https://2g3svp.blogspot.com/2020/04/blog-post_861.html













No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...