Monday, September 2, 2024

कोस्टल कर्नाटका (मँगलोर्-उडुपी)

 

वर्षा अखेरीला कोस्टल कर्नाटकाची सफर केली. बँगलोर-मँगलोर-उडुपी-मुरुडेश्वर करून पुढे गोकर्ण ला न जाता जोग फॉल्स मार्गे शिमोग्याहून पुन्हा बँगलोर गाठले. गोकर्ण उगाच राहुन गेल्याची चुट्पुट मनात आहेच पण ही ट्रिप खूप एन्जॉय केली. इतक्या दूरचा प्रवास कारने करायचा ह्या विचाराने सुरूवातीला थोडे टेंन्शन होते. पण एकेक ठिकाण बघत बघत एक एक हॉल्ट घेत फिरताना खूप मज्जा आली.

बँगलोर वरून NH4 वरून नेलमंगला जवळून मग नंतर NH48 रस्त्याने कुनिगल, येडियुर, हस्सन, मनी मार्गे मँगलोर गाठायचं होतं. मँगलोरच्या आधी साकलेश्वर पासून धर्मस्थळकडे व पुढे जाताना खड्ड्यांत किंचितसा रस्ता चांगला आहे.  उगाच कशाला कुणाला नावे ठेवा? रस्ता घाटाचा त्यात भरमसाठ खड्डे, धुळच धुळ  १०० किमी अंतर आम्ही फक्त साडेपाच तासात कापले. तुम्हाला सांगते एकदाही रस्त्याला, सरकार ला कुणालाच नावं ठेवली नाहित की पतीदेवांनी रस्त्याला शिव्याही हासडल्या नाहीत. फक्त पंतप्रधानांनी इकडे एकदा दौरा करायला पाहिजे अशी तिव्र इच्छा पतिदेवांनी व्यक्त केली. (ख.खो.दे.जा. मी आपली एस्सल वल्ड्च्या कुठल्याश्या राईड मधे बसल्यासारखी जीव मुठीत घेउन बसले होते.) जोक्स अपार्ट हा एक अनुभव सोडला तर कर्नाटकातले रस्ते खर्र खर्र चांगलेच चांगले आहेत बरं का.  ह्या रस्त्यामुळे झालेल्या ह्या दमणूकीला वैतागुन आम्ही धर्मस्थळला जाणार्‍या फाट्याला काट देउन काहिही बघायचे नाही, अन मिनिटभरही थांबायचे नाही असे ठरवून सरळ मँगलोर गाठले. बँगलोर -मँगलोर हे ३५० किमी. अंतर कापण्यात दमछाक झाली आणि दिवसही संपला. मग हंपनकट्टे नामक भागात रहाण्यासाठी एक सुंदरसं हॉटेल शोधलं आणि दुसर्‍या दिवशी बिचवर जायचं ठरवलं.

मँगलोर

सकाळी सकाळी आधी मंगलादेवीच्या दर्शनाला गेलो. ह्या देवीच्या नावावरूनच ह्या शहराचं नाव मॅंगलोर पडलंय. राजा कुंदनवर्मा याने हे मंदिर नवव्या शतकात बांधले होते. बाहेरच वडाचा मोठ्ठा आणि उंच पाहिर्‍या बांधलेला पार आहे आणि तिथे नागदेवता आहेत. बर्‍यापैकी प्रशस्त आवार आणि मध्यभागी मंदिर आहे. चांदिच्या मखरात देवी उठून दिसत होती. प्रदक्षिणा मार्गात गणपतीला नमस्कार करून पुढे निघाले. दाक्षिणात्य मंदिरात असणार्‍या विहीरी आणि त्याच्याजवळ असणारी पुजेची मोठमोठी लख्ख घासून ठेवलेली तांब्या पितळेची उपकरणे बघायला मला नेहमी आवडते. जवळच्या ओट्यावर कुणितरी पुजारी चंदन उगाळत होते तर कुणी कुंकवाच्या राशीतले कुंकू प्रसाद म्हणून वाटत होते. मग आणखी कुणि तो अष्टगंध कापूर वेलची आणी धूपाचा मिश्र सुगंध असणारा प्रसाद.  खूप प्रसन्न आणि शांत वाटलं. मंजुनाथ, मंगलादेवी आणि शरवु गणेश ही मंगलोरी लोकांची तिन प्रमूख दैवतं.

मंदिरातून बाहेर पडून झक्कास पैकी नाश्ता केला. वेगळ्या प्रकारची इडली. हातभर लांब रोल केळीच्या पानात गुंडाळलेली इडली, वडा सांबार :). मग बिच-बिच इंग्लिश मध्ये विचारत..... झालंच तर आमचं कडमडं कानडी बोलत..... बिच एल्लीदे ? यावद बिच होग बेकु ? रस्ता शोधत शोधत मॅंगलोर फिरताना इथे ३ बिच आहेत सोमेश्वर उल्लाल, पेरांबुर आणि सुरथ्कल असे समजले.

पेरांबुर बिचला गेलो. सकाळी अकरा आडेअकरा झाले होते. थोडीशी गर्दीही होती. हा बिच सेफ होता पाण्यात बरेच लोक डुंबत होते. आई मी पण जातो .. जाउ का ? हो म्हणे पर्यंत माझं पिल्लू पाण्यात कधी पळून गेलं समजलंच नाही. मागच्या वर्षी कुणकेश्वरला तर हा अजिबात पाण्यात येत नव्ह्ता आणि आज अफाट मस्तीत सुटला होता. त्याला सांभाळत मजा बघत. वेळ सर्रकन गेला. तेवढ्यात कुणितरी हे स्टारफिश... म्हणून ओरडलं. मी घेतला मग तो.  आकाशातला तारा न मिळो..पण आता ओंजळीत मिळाल्यासारखा आनंद झाला.

ओंजळीतला तारा

थोडे फोटूगिरी केली. माशांच्या खमंग वासाने भूक खूप चाळवली. तिथेच किनार्‍यावर तिन चार फासिफु (फास्ट सि फूड) दिसले. खास मंगलोरी मसाल्यात तळलेले बिचवरच ताजे फ्राय केलेले सुरमई, पापलेट आणि बांगडे यथेच्छ खाल्ले. परमेश्वराचा प्रथमावतार.... धन्य झालो. जेवण झाले.

अश्शी मोठ्ठी सुरमई मिळाली तर तुमचंही असंच होईल  हो कि नै ?

मॅंगलोर-उडुपी जवळ जवळ आहे. आणि जाताना वाटेत खुप बिच लागतात... रस्ता खुप सुंदर आहे अशी ऐकिव माहीती होती. मग काय पूर्ण सफर समुद्रकिनार्‍याचीच आहे. मग अजून इथे थांबण्यापेक्षा क्यु ना आगे कुच कि जाये? म्हणून NH17 पकडून सुरथकाल बिच न थांबता मागे टाकत पुढे कुप बिच(Kaup beach) जवळ आलो. इथुन उडुपी १४ किमी आहे. बिचवर पोहोचताच समोर नजर गेली आणि पिल्लू ओरडलाच "ओ वॉव सि देअर... लाईटहाउस !. "

मोठ्ठ्या खडकावर उभारलेले लाईटहाउस

उडुपीला पोहोचण्या आधी साधारण १४ किमी हा बीच आहे. लांबच लांब सोनेरी वाळूचा पट्टा.. स्वच्छ समुद्र किनारा ... किनार्‍यावरची नारळाची अन पोफळीची झाडे, समुद्रात घुसणारे मोठ्मोठे खडक आणि सर्वात सुंदर म्हणजे इथे उभारलेला हा १३० फुटी दिपस्तंभ. हा बिच म्हणजे फोटोग्राफर्स ना पर्वणीच आहे. उडूपीच्या बिच चे नाव kaup beach, पण खरे कापू असा उच्चार करतात कापू म्हणजे इथल्या तुळू भाषेत छोटेसे खेडे.

पाचमजली दुरंगी लाईटहाउस आणि तिथपर्यंत जायला जिन्याच्या पायर्‍या

ह्या किनार्‍यावरच्या मोठ्या खडकांमुळे जहाजांना धोका आहे हे सांगण्यासाठीच कदाचित हा दिपस्तंभ ब्रिटीशांनी १९०१ साली बांधला असावा. ह्याची उंची १३० फुट ( साधारण २७.१२ मिटर्स) अवढी असून २६ किमी पर्यंत दूरवरच्या समुद्रातिल खलाश्यांना ह्याचा लाईट दिसतो.

इथे ह्या लाईटहाउस मध्ये आपल्याला प्रवेश आहे. सनसेट व्ह्यायला आलाच होता ..अशि संधी म्हणजे दुग्ध शर्करा योग ... पुन्हा केव्हा मिळाणार ? मग दाराजवळ तिकिट घेतले. आणि आम्हीही लाईटहाउस मध्ये गेलो. सेक्युरिटी गेट्मन मराठीच.. काका म्हणाले बाळाला घट्ट धरा.

गोल गोल अरुंद जिन्याच्या पायर्‍या चढताना थोडं धडधडत होतं. पाच मजले वर गेल्यावर शेवटी एक प्लॅटफॉर्म होता तिथेच तो लाईट हाउस चा मोठ्ठा लाईट गोल गोल फिरत होता. अजुन आठ पाहिर्‍या चढुन मग बाहेर गॅलरीत जायला दरवाजा होता. बाहेर अगदी अरूंद गॅलरी १-दिड फुटाची जेमतेम एक माणूस उभा राहिल अशी. सर्वत्र एक नजर फिरवली सगळा नजारा डोळ्यात आणि मनात साठवून घेतला. पण मग फोटो न काढता कसं चालेल. नवशिकी असले तरीही मग जवळच्याच मोबाईल कॅमेर्‍याने मीही थोडी फोटूगिरी केली.

खाली बिचवरून सूर्याचे थोडे फोटो काढले होतेच.

खाली बिचवरून सनसेट पूर्वी

अजुन एक
पाण्यात घुसणारे कासव Happy

लाईट हाउसच्या खिडकीमधून बिच

वर गॅलरीतून सूर्य

हा अजून एक

दोन दिवे

त्या गोलाकार गॅलरीतून हळूच एक प्रदक्षिणा मारली. एका बाजूला समुद्र आणि सूर्यास्त दिसत होता तर मागच्या बाजूला हा सुंदर बॅकवॉटर्स आणि ही हिरवाईचा देखावा.

समुद्रकिनरा आणि बॅक वॉटर्स

सनसेट होत होता तशी जोडप्यांची फोटो काढुन घ्यायची लगबग वाढली. मग आम्ही तिथुन काढता पाय घेतला. आता थोडा अंधार व्ह्यायला लागल्यामुळे तो फिरणारा लाईट छान वाटत होता. लेकाने बाबांसोबत थोडं इंजिनियरींग केलं. कुठली दोरी कुठली वायर कसा लाईट फिरतो वगैरे. Happy मग हळूहळू पुन्हा तो अरूंद गोलाकार जिना उतरून हाली आलो. संध्याकाळ छान गेल्याचं मनोमन समाधान घेउन बिच वरून बाहेर पडता पडता.. वडापाव, भेळ अशी खादाडी केली. आणि पुढे उडुपीकडे निघालो.

उडुपी

उडुपी हे नाव ह्या छोट्या शहराला मिळालं ते उदुपती ह्या नावावरून भाळी चंद्र धारण करणारा जटाधारी शंकर म्हणजे उदुपती. किंवा अजुन एक अर्थ सांगितला जातो तो म्हणजे सगळिकडे भात शेती असणारा प्रदेश म्हणजे उदुपती. दोन गोष्टींसाठी उडुपी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे इथली मणिपाल युनिव्हर्सिटी आणि दुसरे उडुपीकृष्ण मंदिर. ह्यालाच कॄष्णमठ असेही म्हणतात.

उडुपीकृष्ण मंदीर
कर्नाटकातल्या अनेक प्रसिद्ध धर्मशळांपैकी एक म्हणजे उडुपीचे हे कृष्णमंदिर. अनंतेश्वर, चंद्रमौलीश्वर कृष्ण मंदीर आणि अष्ठमठी हे सगळे एकाच आवारात आहेत. तेराव्या शतकात माधवाचार्य नावाच्या एका संस्कृत तत्त्ववेत्त्याला स्वप्नात दृष्टांत झाला होता. तेव्हा सापडलेली ही कृष्ण मुर्ती म्हणजे खरं तर द्वारकेतल्या रुख्मीणिने पूजलेल्या बालकृष्णाची. आताचे हे मंदिर सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे आहे.

त्यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की...कित्येक वर्षांपूर्वी वादळात एक जहाज हेलकावे खात होते. वादळ, घोंघावणारा वारा, उसळलेल्या समुद्राच्या लाटांवर मात करून जहाज किनार्‍याला लागले तो किनारा होता उडुपी मालपे बिच. आणि जेव्हा जहाज किनार्‍याला लागले तेव्हा त्याच किनार्‍यावर माधवाचार्य समाधीत लीन होते आणि वार्‍यावर उडणार्‍या त्यांच्या उत्तरीयामुळे जहाजाला दिशा मिळाली. व माधवाचार्यांच्या योग शक्तीच्या जोरापुढे वादळ जोर धरु शकले नाही. म्हणून माधवाचार्यांना नमस्कार करत त्या जहाजाच्या खलाश्यांनी, व्यापार्‍यांनी जहाजात आणलेली सगळी संपत्ती त्यांना अर्पण केली. परंतू माधवाचार्यांनी त्यातले काही एक न घेता स्वतःला स्वप्नांत झालेल्या दृष्टांतानुसार फक्त ही कृष्णमूर्ती घेतली.

पुढे कालोघात ह्या मंदिराचे व्यवस्थापन सुरळित रित्या पार पडावे म्हणून त्यांनी आठ उप मठांची निर्मीती केली तेच हे अष्ठ्मठी. ह्या मंदिराचे पौरोहित्य करण्याचा मान प्रत्येक मठाला दोन वर्षे मिळतो. दर दोन वर्षांनी जानेवारी महिन्यात पर्याय नामक विधीवत उत्सव साजरा करून मठाचे व्यवस्थापन बदलले जाते.

आम्ही ह्या मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. दर्शन मिळेल की नाही ? मंदिराच्या वेळा ई. काहीच माहित नव्ह्ते. गर्दीही भरपूर दिसत होती. पण तिथे पोहोचल्यावर समजले. मंदीर दिवसरात्र सुरुच असते. आणि आम्ही रांगेत उभे असतानाच एका मोठ्या रथाची मिरवणूक मुख्य दारा पाशी आली. तो ब्रह्मरथ. ह्या रथातून गोपालकॄष्णाला वाजत गाजत घेउन आले. मग आम्हालाही त्यांच्या सोबतच त्यांच्या मागोमाग मंदिरात प्रवेश मिळाला. गोपालकृष्णाला पालखीतून मिरवत वाजत गाजत गाणि म्हणत तिन प्रदक्षिणा करवून आणतात मग पाळाण्यात जोजावून जो जो रे जो रे जो ... लाली लाली.. कृष्णा लाली अशी गाणि म्हणून झोपवतात. Happy मंदिरातला हा दिवसाचा शेवटचा सोहोळा. लकीली मला ह्यापूर्वीही हे असं कृष्णाची अंगाई बंगळूरच्या इस्कॉन टेंपल मध्येसुद्धा बघायला मिळाले होते.
पण तरीही हे मला मिस करायचे नव्ह्ते. म्हणून इथे अजिबात फोटूगिरी केली नाही.

हे फोटो तुमच्या माहितीसाठी....

कृष्ण मठ (फोटो अंतरजालावरून साभार)

ब्रह्मरथ (फोटो अंतरजालावरून साभार)

कृष्ण (फोटो अंतरजालावरून साभार)

गाणी संपली. पाळण्यातल्या कृष्णाला नंतर गाभार्‍यात उचरून घेउन गेले. प्रमुख दरवाजा बंद झाला. तरीही बाहेरून कुठुनश्या खिडकीतून लोक आवाज देउन सांगत होते अरे बाजुला व्ह्या आम्हीही इथुन दर्शन घेत आहोत. नंतर गर्दी जरा ओसरली.. मग एका गुरुजींनी आम्हाला अधिक माहिती दिली. ही खिडकी म्हणजे डायरेक्ट बाहेरून आत इथे गाभार्‍यात दर्शन घेता येते ती ही कनकदासाची खिडकी. त्यांनी मंदिरातल्या इतर लहान लहान गाभार्‍यातल्या देवताही दाखवल्या. त्यात एक दोन फुटी अंजनेयाची हिरेजडित मुर्ती होती. बारिकश्या झरोक्यातून गाभार्‍यातल्या अंधारात फक्त दिव्याच्या तेजात ति रत्नजडीत मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती. त्या गुरुजींनीच खुप माहिती दिली. मग खूप आग्रहाने आम्हाला आता तुम्ही प्रसादाचे जेवण करूनच जा म्हणत घेउन गेले. मठाधिपतींचे दर्शन सुद्धा झाले. रस्सम भाथ प्रसाद घेउन तृप्त झालो. Happy बाहेर आलो तर आवारात कथकली मध्ये कुठल्याश्या पारंपारीक नाटकाचा प्रयोग चालला होता.

पुन्हा बाहेर येउन मणिपाल ला येउन हॉटेल शोधले. उद्या मुरुडेश्वर गाठायचे होते.

नाश्ता करावा तर उडप्याकडे ! खराखरा उडपी नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. NH17 पकडून मालपे, कुंदापूर, बैंदुरु, भटकल,मारवन्ठे मार्गे मुरुडेश्वर कडे निघालो. हा NH17 रस्ता अतिव सुंदर आहे. एका बाजूला विशाल समुद्र आणि एका बाजूला सौपर्णीका नदी आणि मधून हा सुंदर डांबरी रस्ता.

रस्त्याच्या एका बाजूला समुद्र आहे आणि एका बाजूला खाडी

अश्या समुद्राच्या बाजुने जाणार्‍या रस्त्यावरून जातानाचा आनंद अवर्णनिय.वाटलं हा रस्ता संपूच नये. कित्येक किलोमिटर सोबत करणारा हा समुद्र मध्येच झाडा झुडपांत गायब होउन जायचा... कधी खाडी तर कधी कधी सुबक एकसारख्या बांधलेल्या दगडी पूलांवरून गाडी गेली कि पुन्हा समुद्र किनार्‍याचा रस्ता लागत होता.

खाडी आणि होडी

पुन्हा एकदा होडी

क्रमशः

गोकर्ण महाबळेश्वर आणि मुरुडेश्वरची कथा

कोस्टल कर्नाटका - मुरुडेश्वर

वेचीत वाळूत शंख शिंपले......

गोकर्ण महाबळेश्वर-मुरूडेश्वर

Submitted by डॅफोडिल्स on 29 January, 2011 - 16:11

मुरुडेश्वरची भव्य दिव्य शंकराची मूर्ती

प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काहिनाकाही इतीहास असतो त्या मागे काहीतरी कथा दंतकथा असते. मुरूडेश्वरच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघुनच ह्या मुरुडेश्वर विषयी, गोकर्ण विषयी कुतुहल होते. ही मोठ्ठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रीम मानवनिर्मीत गुहेत ही कथा चित्ररुपात साकारलीये.

अमरत्व मिळवण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली होती. ते आत्मलिंग शंकरांकडे होते. लंकाधीश रावण हा निस्सिम शिवभक्त होता. नेहमी तो कैलासावर जाउन तप:श्चर्या करीत असे. आपल्याला हवे ते मिळावण्यासाठी त्याने कित्येकदा घनघोर तपस्या करुन शिवशंभूंना प्रसन्न करुन घेतले होते. एकदा रावणाने अमरत्व मिळविण्याकरीता शंकरांचे आत्मलिंग मिळाअवे म्हणून खूप खूप कठोर तपःश्चर्या केली. "ओम नमः शिवाय !" चा अहोरात्र जप केला. एका पायावर उभे राहून त्याची तपःश्चर्या सुरु होती.

रावण एका पायावर तपःश्चर्या करताना

लंकाधिश रावण हा महाबली होता. त्याने कैलासालाच उचलून धरले. शिवशंभूंच्या नावाचा जप चालूच होता.

रावण कैलास उचलताना

वर्षोनुवर्षे लोटली. शिवशंभू काही प्रसन्न झाले नाहीत. मग त्या दशाननाने आपले एकेक मस्तक शिवचरणी अर्पण करावयास सुरुवात केली.

रावण मस्तक अर्पण करताना

शिवशंभू भोळे सांब त्याच्या ह्या मायावी आहूतीला भुलले आणि रावणाला प्रसन्न झाले.
म्हणाले, "सांग रावणा काय हवे आहे ? कशासाठी एवढी धनघोर तपःश्चर्या ?"

त्यावर रावणाने त्यांना सांगितले, "हे प्रभु तुम्ही मला तुमचे आत्मलिंग द्या ! मी ते आत्मलिंग माझ्या लंकेत स्थापित करुन मंदिर बांधेन, आणि असा वर द्या की जेव्हा केव्हा महाप्रलय येईल, सर्व जग पाण्यात बुडून जगाचा अंत होईल, तेव्हा हे लिंग माझे आणि माझ्या राज्ज्याचे रक्षण करेल. जिथे ह्याचे वास्तव्य असेल ती धरा जलमय होणार नाही. "

शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले. म्हणाले, "तथास्तु ! पण सांभाळून जा, हे महाबली आत्मलिंग आहे तु जिथे हे आत्मलिंग ठेवशिल तिथेच हे घट्ट चिकटून राहील. दोन्ही हातांनी निट धर.. लंकेशिवाय कुठेही मध्ये ठेउ नकोस ! जर ठेवलेस तर मी काहीही करू शकणार नाही."

शंकर आत्मलिंग देताना

रावण आत्मलिंग घेउन लंकेला जायला निघाला. आधीच रावणाने आपल्या शक्तिने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. रावणाने आत्मलिंग मिळवले, हे जेव्हा सर्व देवांना समजले तेव्हा सगळ्या देवांनी त्राही त्राही म्हणत जगत्पित्या ब्रह्मदेवांकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रह्मदेवाने सांगितले,"निश्चींत रहा ! विघ्नहर्ता गणेशच तुम्हाला मदत करेल."

रावण पश्चीमी समुद्रावरून लंकेकडे मार्गस्थ होत असताना. मध्यान्हपूर्वच ब्रह्मदेवांनी ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला. रावणाला वाटले संध्याकाळ झाली. आता संध्येची वेळ झाली. पूजा करायला हवी. आत्मलिंग कुठे ठेवायचे नाही. मग आता काय करु ? ह्या विचारात रावण असताना अचानक गणपती एक गुराख्याचा पोराच्या रुपात तिथे प्रकटले.

गुराख्याच्या रुपातल्या गणेशाला आत्मलिंग धरायला सांगताना

त्या बाल गुराख्याला रावण म्हणाला, "ए मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे, मी माझी संध्या आटोपून लवकरच येतो, तो पर्यंत तू ही शंकरांची पिंड हातात घट्ट धर. अजिबात खाली ठेउ नकोस. "
गणेशाने ती पिंड हात धरत म्हटले, "ही शंकराची पिंड तर फारच जड आहे, मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मी हातात धरेन. तुम्हाला मी तीन हाका मारेन तो पर्यंत तुम्ही या, नाहीच शक्य झाले तर मी खाली ठेवेन." रावणाला हे मान्य झाले. तो संध्येसाठी गेला.

पुढे ठरल्या प्रमाणे ब्रह्माने ब्रह्मास्त्र काढून घेतले. तिन्हीसांज झालीच नव्ह्ती. गणेशाने पटापट रावणाला तीन हाका मारल्या, रावण गुराख्याच्या रुपातल्या गणेशापर्यंत पोहोचायच्या आत गणपतींनी आत्मलिंग जमिनिवर ठेउन दिले.

रावण गुराख्याच्या रुपातल्या गणेशाला मारताना

गुराख्याच्या पोराला शंकराची पिंड खाली ठेवताना बघुन रावणाला शिवशंकरांचे बोल आठवले, आता ते आत्मलिंग इथेच चिकटून रहाणार म्हणून त्याचा क्रोधाग्नी भडकला. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होउन गणपती तिथे मूर्तीरूपात प्रकट झाले.

रावण आत्मलिंग उचलताना गोकर्ण

रावण भयानक क्रोधीत झाला होता. शंकरांचे आत्मलिंग जरी बलशाली होते तरी रावणही महाबलवान होता. रावणाने ते जमिनिवर चिकटलेले आत्मलिंग उचलण्याचे महत्प्रयास केले. पण ते त्याच्या शक्तीपुढे फोल ठरले. परंतू त्याने केलेल्या ओढाओढीत त्या पिंडीचा.. आत्मलिंगाचा आकार बदलून ते लिंग गाईच्या कानाच्या आकारासारखे दिसू लागले. पुढे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले. तेच सध्याचे गोकर्ण महाबळेश्वराचे मंदीर.

असंही सांगीतलं जातं की रावणाने खूप जोर लाउन ते आत्मलिंग ओढायचा प्रयत्न केला त्यात त्याचे काही तुकडे काही अंश त्याच्या हाती आले. ते काही ठिकाणी विखुरले व तिथेही कालांतराने शिवमंदिरे स्थापन झाली. पैकी त्या लिंगाचा शिरोभाग उडूपी जवळच्या सुरथकल भागात पडला तिथे सदाशिव मंदीर बनले. मग रावणाने ते लिंग ज्या पेटीतून आणले ती जिथे टाकली तो भाग.. म्हणजे सज्जेश्वर, त्या पेटीचे झाकण टाकले तिथे आहे .. गुणेश्वर आणखी दहा बारा मैलांवरचा धारेश्वर. आणि सर्वात शेवटी त्याने ज्या वस्त्रातून झाकून ते आत्मलिंग आणले ते वस्त्र ते कापड त्याने कंडुकागिरी टेकडिवर टाकले.. तिथला हा मुरुडेश्वर.

कोस्टल कर्नाटका - मुरुडेश्वर

Submitted by डॅफोडिल्स on 3 February, 2011 - 14:52

मुरुडेश्वराच्या मंदिराची गोष्ट इथे आहे

मुरुडेश्वराचे हे मंदीर कंडुकागिरी नावाच्या टेकडीवर आहे. ह्या टेकडीच्या तिन्ही बाजूंना अरबीसमुद्र आहे. ह्या मंदिराच्या प्रवेशद्वाराची ही २० मजली गोपुरं अडिचशे फुट उंच असून त्याला राज गोपुरा असे म्हणतात. जगातल्या सर्वात उंच अश्या ह्या गोपुरात वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. श्री. आर. एन. शेट्टी नामक उद्यजकांनी हे बांधकाम करवून घेतले आहे. तसेच ह्या मुरुडेश्वर मंदिराचा विकास आणि कंडुका हिल वरील मोठ्ठ्या शंकराचेही काम करवून घेतले आहे.

गोपुराच्या प्रमुख द्वाराजवळ खर्‍या हत्तींच्या उंचीचे खरे वाटतील असे दोन मोठ्ठे हत्ती आहेत.

राज गोपुराचा फोटो

अजून एक

मुरुडेश्वराच्या मंदिरात गणपती, कार्तिकेय यांची छोटी मंदिरे आहेत आणि मुख्य म्रिदेश लिंग (मुरुडेश्वर) आहे.

मुरुडेश्वर मंदीर सुर्योदयाच्या वेळी

मंदिराच्या मागिल बाजुस टेकडीवर जगातील सर्वात उंच (१२३ फुट/ ३७ मिटर्स) अशी शिवशंकराची मूर्ती आहे. ही अतिशय देखणी सुबक, प्रमाणबद्ध मूर्ती बनवण्याचे काम दोन वर्षे सुरु होते.

अतीभव्य शिवशंकर

शंकरा समोर उभा असलेला रावण आणि गुराख्याचा मुलगा

टेकडी वरून

अजुन एक

टेकडीवर इतर ठिकाणीही अश्या मूर्ती आहेत.

अर्जूनाचा रथ

नुकतिच मासेमारी करून आलेली छोटी होडी

फ्रेश कॅच चमचमणारे बांगडे Happy

खेकड्याचे घर

खूप जवळून

खेकड्याचा फोटो काढायला त्याच्या मागे धावत होते. तर त्या बोटवाल्या काकांच्या मुलाने पटकन खेकडा पकडला.. नको नको म्हणत असताना त्याच्या नांग्याही तोडून टाकल्या. Sad म्हणे हा आता काढा फोटो.

आर एन एस रोसॉर्ट जवळ सनसेट

संपूर्ण बिच, मुरुडेश्वर मंदीर, दोड्डा इश्वरा आणि आर एन एस.

ह्या मोठ्ठ्या ईश्वराला बघून मी वाळूत काढलेले शिवशंकराचे चित्र.
दोन्हीचा एकत्र फोटो घेण्याचा प्रयन्त केला पण अतिशय उन असल्याने काय होतंय ते समजतच नव्हतं

इथे अजून फोटो आहेत. ओम नमः शिवाय !

माझ्या लेकाने बनवलेला किल्ला Happy

मडिकेरी-कुर्ग

Submitted by डॅफोडिल्स on 13 October, 2009 - 18:59

एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला भारताचं स्कॉट्लंड समजलं जातं तर कुणी कुणी दक्षिणेतला कश्मिर म्हणतात. अरे वा!, भर मार्च मध्ये गारवा कुणाला आवडणार नाही. कसं जायचं काय पहायचं अशी जुजबी माहिती गोळा करून आम्ही निघालो.

मडिकेरी म्हणजे कूर्ग चे जिल्हा हेडक्वार्टर्स. समुद्रसपाटीपासून ५००० फूट ( साधारण १५२५ मिटर्स) उंचीवर असलेला हा प्रदेश. उतरणीच्या टेकड्यांवर वसलेलं एक छोट्टसं गाव. बुटक्या बैठ्या लाल कौलारु बंगल्यांची शोभा काही निराळीच. इथे रहाणारे कोडवू लोक हिंदू क्षत्रिय व खूप शूर. हे मडिकेरी किंवा मर्केरी १६८१ मध्ये हलेरी चा राजा मुद्दु ह्याने वसवलं. म्हणूनच त्याला मुद्दुराजकेरी आणि नंतर अपभ्रंशित मर्केरी किंवा आत्ताचं प्रचलित नाव मडिकेरी मिळालं असावं.

इथल्या संस्कृती बद्दल समजावून घेताना कळलं की, कोडवू हा शब्द मुळच्या कुडू ह्या शब्दापासून आला आहे. कोडाईमालेनाडू म्हणजे टेकड्यांचा प्रदेश -"dense forest on steep hills". दक्षिण भारतातल्या नयनरम्य निसर्ग सौन्दर्य लाभलेल्या हिलस्टेशन्स पैकी एक असलेले कोडवू म्हणजे कावेरी नदीचे उगमस्थान आहे. कोडवू लोक कावेरीची पूजा करून स्वतः ला तिची लेकरे मानतात. आदरातिथ्य करण्यात कोडवू लोक सर्वश्रुत आहेत. कोडवू रेसिपिज सुद्धा तेवढ्याच छान आहेत.

पूर्वापार चालत आलेल्या इतीहासापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या शीलालेखांवरून असे समजते की कूर्ग वर कुण्या एकाच राजघराण्याची सत्ता नव्हती. तर अनेक राजांनी वेगवेगळ्या काळात इथे राज्य केले होते. इथे असणार्‍या शीलालेख आणि ताम्रपटांवर इथे गंगा, कदंब, छोला, कोंगवा, होयसाला आणि नायक ई. वेगवेगळ्या लोकांनी राज्य केल्याच्या नोंदी आहेत. हा झाला मडिकेरीचा इतीहास.

कूर्ग कर्नाटकाच्या पश्चीमी घाटावर सुमारे ४१०२ स्के. मी ईतकं वसलेलं दर्‍या खोर्‍यांचं गाव आहे. बंगळूर ते मडिकेरी अंतर २५२ किलोमिटर आहे. चहा कॉफीच्या बागा मळे पहायच्या तर कूर्गला जावे. मऊ धुक्याने भरलेली दरी पहायला, नगमोड्या वळणावळणाच्या रस्त्यांचा आनंद घ्यायला कूर्गला जावे. खरं तर ऑक्ट्बर ते मे हा इथला मेन सिझन. पण पावसा आधी पावसा नंतर केव्हाही जाण्यात आनंदाची पर्वणीच आहे.

आम्ही सकाळी सहा ला मडिकेरिला जाण्यासाठी बंगळूर हून निघालो. SH-17 वरून श्रीरंगपट्टना, व्हाया मड्डूर बायपास, रंगनथिट्टु, हुंसूर असे करत मग SH-88 मार्गे कुशलनगर वरून मडिकेरीला जावे लागते. साधारण अकरा बारा वाजेपर्यंत कुशलनगर पार करून सुन्तिकोप्पल सोडलं पुढे मडिकेरीकडे जवळच आहे असं समजलं. रस्ता फारच छान होता. जसजशी वळणे वाढत गेली त्याचबरोबर हिरवाईही. रस्त्यात भरपूर बांबूची वनं आहेत. सर्वत्र पसरलेल्या हिरव्यागार बागांमध्ये कसलीशी टप्पोरी फुलं फांदीभर लगडलेली दिसू लागली. त्या फुलांचा वास आसमंतात भरून राहिला होता. गाडी पुढे जाउ लागली तशी ह्या झाडांची शेतीच आहे.. मळे फुललेले दिसले आणि आम्ही खात्री केली हेच ते कॉफीचे मळे. उतरणीच्या रत्यांवर लाल कौलारू घरं दिसू लागली. अमुक तमुक कॉफी इस्टेट.. होम स्टे असे बोर्ड दिसू लागले. इथले लोकल लोक खास घरं ट्युरिस्ट लोकांना होम स्टे देतात. तिथल्या रहाण्याबद्द्ल आणि जेवणाबद्द्ल एक दोन स्नेह्यांकडून बरेच ऐकले होते. आम्ही क्लब महिन्द्रा रिसॉर्ट ला जाणार असल्याने ते शोधत खुद्द मडिकेरीमध्ये पोहोचलो. एका चौका सारख्या ठिकाणी ट्युरिस्ट इन्फॉर्मेशन साठी मोठठा बोर्ड दिसला. काही लोकल साईट सिईंग पॉईंट्स आहेत. सगळे जवळ जवळ होते. रिसॉर्ट् वर जाउन फ्रेश होउन, जेउन निघालो साईट सिईंग ला.

मडिकेरी किल्ला : (Madikeri Fort)

आधी मातिच्या असलेल्या ह्या किल्यांची टिपू सुलतानाने सध्या असलेल्या दगडी किल्ल्यात पुनःबांधणी केली. अठराव्या शतकात टिपू सुलतानाने इथे राज्य केले होते. किल्ल्याच्या आत साधे बांधकाम असलेला लिंगायत राज्यकर्त्यांचा राजवाडा आहे. ह्या किल्ल्यावरून पूर्ण मडिकेरी भागाचे उत्तम दर्शन होते.

गदिग्गे : (Raja's Tomb)

ह्या ठिकाणी राजा लिंगराजेन्द्र ह्यांची सन १८२० मध्ये बांधलेली समाधी आहे. तसेच त्या बरोबर राजाचे धर्मगुरु आणि मोट्ठा विरराजेंद्र आणि राज्याच्या दोन सैनिकांच्याही समाधी आहेत इथे. मडिकेरी शहरातल्या महादेव पेठेच्या उत्तरेकडे ही गद्दिगे आहे.

ओंकारेश्वर मंदीर : (Omkareshwara Temple)

omkareshwar.jpg

कोडवू राजा लिंगराज याने सन. १८२० मध्ये बांधलेले थोडेसे मुघलाई धाटणीचे हे शंकराचे मंदीर आहे. मध्यभागी मोठा मशिदीसारखा घुमट आणि त्या बाजुला चार छोटे मिनार आहेत.
मुख्य मंदिराच्या गाभार्‍याभोवती प्रदक्षिणा करायला मोठ्ठा परिसर आहे. काही खोल्यांची तटबंदी आहे. त्याच्या भंतींवर देवदेवतांची सुंदर चित्रे पहायला मिळतात. मंदिर परिसरात एक अतिप्राचिन विहीर आहे.

om2.jpg

मंदिरासमोरच एक छोटासा तलाव आहे.

ह्या मंदिराविषयी एक गोष्ट सांगण्यात येते. लिंगराजेन्द्राने स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी एका प्रामाणिक सद्भक्त ब्राह्मणाला मारले. तो ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाला आणि राजाला छळू लागला. मग राजाने काशीहून एक शिवलिंग आणले व मंदिरात स्थापन केले आणि त्याची ह्या तथाकथीत ब्रह्मराक्षसाच्या त्रासापासून मुक्तता झाली. असेही सांगितले जाते की ह्या मंदिराच्या खिडक्यांचे गज पंचधातूचे आहेत आणि त्यावर लिम असे लिहिलेले आहे.

अ‍ॅबी फॉल्स : (Abbey Falls)

बोली भाषेत अ‍ॅबी म्हणजे धबधबा. मडिकेरीपासून साधारण १-२ किमी आत एका खाजगी कॉफी ईस्टेटीत हा नयनरम्य धबधबा आहे. ह्या भागात पर्यटकांची बरीच गर्दी असते. इथे आल्यावर बाहेर बर्‍याच खाउच्या कणसं नारळपाणी उसाचा रस विकणार्‍या गाड्या दिसल्या. गाडी पार्क करून आत खाली बरंच चालत गेल्यावर हा धबधबा आहे. कावेरीचे पाणी उंच खडकांवरून पडताना फारच सुंदर दिसते. धबधब्याचा चांगला व्ह्यु मिळावा म्हणून एक झुलता पूल बांधलेला आहे.

abbey.jpg

अ‍ॅबे फॉल्सहुन परत येइ तोपर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती. राजाज सिट ला जाउन सनसेट बघायचा होता.

राजाज सिट :

rajas.jpg

फोर्ट पासून एक किलोमिटर अंतरावर हा पॉईंट आहे. कोडवु राजे इथे बसून सुर्यास्त बघत. एक छोटीशी बाग आहे. आणि बच्चेकंपनीला खेळवायला फिरून आणायला छोटीशी ट्रेन आहे इथे. बागेच्याच पश्चीमेकडे एका उतरत्या टेकडीच्या पाहिर्‍यांवरून मडिकेरी भोवतालच्या निसर्गाचे एकाच ठिकाणाहून दर्शन होते. न मावळणारा सूर्य, हिरवे हिरवे गालिचे पसरलेले चहा कॉफीचे मळे, आणि हिरवाईवर पांघरलेले चंदेरी ढगांच्या दुलईसारखे भासणारे आकाश. मावळतिच्या त्या लालभडक मोठ्या सुर्यबिंबाचे दर्शन घेउन मन अगदी तृप्त झाले.

खुद्द मडिकेरीमध्ये पहाण्यासारखे इतकेच होते. मग दुसर्‍यादिवशी जवळपास फिरून यायचे ठरले.
सकाळी नाष्ता करून भगमंडला नावाचा नदिचा संगम आणि तलकावेरी म्हणजे कावेरीचे उगमस्थान पहाण्यासाठी निघालो.

भगमंडला : (Bhagamandala)

मडिकेरी पासून ३३ किलोमिटर वर हे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी कावेरी आणि कनिका ह्या दोन नद्यांचा संगम आहे. तिसरी सुज्योती नावाची नदीही ह्या संगमाला जमिनीअंतर्गत मिळते. १७ किंवा १८ ऑक्टोबर ला जेव्हा तुला संक्रमण असते तेव्हा अनेक यात्रेकरू ह्या संगमात स्नान करून पुण्य मिळवतात. ह्या संगमाजवळच भगंडेश्वराचं मंदिर आहे. केरळी पद्धतीने बांधलेल्या ह्या मंदिरात शंकर, सुब्रमण्या, महाविष्णू आणि गणपतीची छोटी छोटी मंदिरं आहेत.

हा भगमंडला नावाचा भाग सन १७८५ ते सन १७९० या काळात टिपू सुलतानाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा ह्या भागाला अफिसालाबाद असे म्हणले जायचे. मग १७९० ला राजा विरराजेन्द्राने तो पुन्हा कोडागू म्हणून स्वतंत्र मिळवला.

तलाकावेरी : (Talakaveri) कावेरी नदीचे उगमस्थान

talakaveri.jpg

ब्रह्मगिरी पर्वताच्या पुर्वेकडील उतारावर, भगमंडलापासून सुमारे ८ किलोमिटर अंतरावर कावेरी नदिचे उगमस्थान आहे.

ज्या ठिकाणी नदिचा प्रवाह उगम पावतो त्याला गुंदिगे असं म्हणतात. त्याला लागूनच एक छोटसं पाण्याचं कुंड (तलाव) आहे. ह्या कुंडाचे पाणी पुढे जमिनीत अंतर्धान पावतं ते दूरवर साधारण एक दिड किलोमिटर खोल टेकडीवर पुन्हा आढळतं. दर वर्षी तुलासंक्रांतिला ह्या गुंदिगे ठिकाणच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढ्तो त्याला तिर्थोद्धवा असं म्हणतात. हे तिर्थ म्हणजे साक्षात पार्वती इथे अवतरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक हे पवित्र तिर्थ भरुन आपल्या घरी घेउन जातात.

ह्या गुंदिके जवळच दोन छोटीशी मंडिरं आहेत. एक गणेशाचं आणि दुसरं शिवाचं. असं सांगण्यात येतं की इथे असलेल्या अश्वत्थ वृक्षाजवळ अगस्त्य ऋषींना त्रिमुर्ती-ब्रह्मा विष्णू महेषाचा साक्षात्कार झाला होता. तसेच ह्या ठिकाणी सप्तमहाऋषींनी मोठे यज्ञ केल्याचंही सांगितलं जातं.

brahmagiri.jpg

ह्या तलाकावेरीपासूनच वर ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी पाहिर्‍या आहेत.

आम्हीही थोड्या पाहिर्‍या चढून उतरून आलो. दमून संध्याकाळी उशिरा रिसॉर्टवर पोहोचलो. क्लब महिन्द्राच्या कॉटेजेस मस्त आहेत. सगळी व्यवस्थाही चोख आहे. जेवणासाठीही बरेच ऑप्शन्स उपलब्ध होते. तरिही आम्ही मडिकेरी मधे अजुन दोन तिन हॉटेल्स खादाडीसाठी शोधून ठेवली होती.

पुन्हा बंगळूर ला परताना परतीच्या वाटेवर कुशलनगर जवळ बरीच ठिकाणे आहेत. पिकनिक स्पॉट्स आहेत. ट्रेकिंग करणार्‍या हौशी लोकांसाठी छोटे छोटे अ‍ॅडव्हेंचर कॅंप्स आहेत.

वीरभूमी :

कर्नाटकातलं एकमेव थीम रेसॉर्ट आणि अ‍ॅडव्हेंचर कॅंप.

निसर्गधाम :

मडिकेरीपासून ३० किमी. आणि कुशलनगरपासून फक्त २ किमी अंतरावर हे रेसॉर्ट आहे. नावाप्रमाणेच निसर्गधाम आहे. इथे हरीणं, हत्ती, मोर आणि इतर बरेच प्राणि बघायला मिळतात. इथे इलेफंट सफारी असते. एक मस्त अविस्मरणीय सफर.

गोल्डन टेंपल : (GoldenTemple- Buddhist Monastery)

कुशलनगर पासून ४ किमी वर बायलाकुप्पे नावाच्या ठिकाणी तिबेटीयन लोकांचा रिफ्युजी कँप आहे. चिन ने तिबेटचा ताबा मिळवल्यावर, बरेचसे रेफ्युजी ह्या कुशलनगरजवळच्या बायलाकुप्पे ला स्थाईक झाले.
१९७२ ला ही बुद्धीस्ट मोनस्ट्री पुनःप्रस्थापीत केली.

goldentemple2.jpg

बायलाकुप्पेला आल्यावर सर्वत्र पिवळे झेंडे फडकताना दिसतात. स्तूप दिसतात. मग आपण गोल्डन टेंपल जवळ येउन पोहोचतो. गोल्डन टेंपल फारच प्रेक्षणिय आहे. मुख्य गेट पासूनच रांगोळ्यांसारखी रस्त्यावर सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत.

goldentemple.jpg

मुख्य मंदिराच्या दालनात आतमध्ये ४० फुटी मोठ्या पद्मसंभव, बुद्ध आणि अमितयुस यांच्या मूर्ती आहेत.

buddha.jpgदुबेर : (Dubare)

elephant.jpg

कुशलनगर जवळच मडिकेरी सिद्धपूर रोडवर कावेरी नदीतीरावर कूर्ग वनविभागाचा दुबेर एलिफंट ट्रेनिंग कँप आहे. इथे जंगली हत्तींना पकडून त्याना इतर प्रशिक्षीत हत्ती आणि स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांकडून प्रशिक्षण दिलं जातं. ह्या प्रशिक्षण शिबिरात जाण्यासाठी कावेरीचा प्रवाह छोट्या बोटीतून पार करावा लागतो.

आणखी पुढे परतीच्या वाटेवर हुंसूर वरून नागरहोल अभयारण्याकडे एक फाटा आहे. पण वेळे अभावी आम्ही तिथे जाउ शकलो नाही. मग नागरहोल आणि बंदिपूर ही अभयारण्ये पुन्हा एखाद्या मोठ्ठ्या विकेंड ला येउन बघायचे ठरवून आम्ही घरी परतलो.







No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...