Monday, September 2, 2024

कोळिसरे-गणपतीपुळे-प्राचीन कोकण

 https://www.maayboli.com/node/30962

रत्नागिरीच्या ट्रिपला गेलं की एकदा तरी गणपतीपुळे वगैरे फिरायची ट्रिप होतेच होते. पूर्वी कॉलेजचा अख्खा ग्रूप असे मिळून जायचो. आता एक गावात असेल तेव्हा दुसरा जगाच्या दुसर्‍या टोकाला. त्यामुळे गेल्या तीनचार वर्षात कुटुंबासोबतच फिरावं लागतय. त्यात कुटुंबसदस्य वाढत असल्याने बाईकऐवजी कारनेच फिरावे लागणे 

मी, सतिश, सुनिधी आणि माझे आईवडिल असे सर्व़जण एका दिवसाच्या या ट्रिपसाठी निघालो. सोबत अर्थात वाहनचालक होताच. कोळिसरेपासून पुढे गणपतीपुळे करायचे आणि मग तिथून एक तर जयगड किल्ला-कर्‍हाटेश्वर असे जाणे अथवा गुहागर्-हेदवी वगैरे असे जायचे ठरवले होते. मात्र आम्हाला सुनिधीकृपेने घरातून निघतानाच उशीर झाला. म्हणजे तिने काही केले नाही, ती सर्वाच्या आधी उठून स्वतःचे सर्व आवरून घेऊन निवांत खेळत होती. पण त्या दिवशी रविवार असल्याने पप्पाच्या ऑफिसातले काही लोक बाळाला बघायला म्हणून सकुसप आले. आम्ही सकाळी आठला निघायचे ठरवले होते, थोडासा उशीर झालाच होता. साडेआठला मंडळ हजर. मग काय? नाश्ता गप्पाटप्पा वगैरे करून निघायला चांगले साडेदहा वाजले.

लग्नानंतर कोळिसरे हे एक ठिकाण जाण्यासाठी मस्ट झालेले आहे. काणे घराण्याचे कुलदैवत तर आहेच शिवाय अत्यंत शांत आणि गंभीर परिसर. जिथे गेल्यावर स्वतःलाच काही प्रश्न पडावेत आणि त्यांची उत्तरं पण स्वतःच्याच मनाच्या गाभार्‍यात शोधावीत अशा ठिकाणांपैकी हे एक.

या मंदिरावरती मंदार जोशी यानी आधीच एक लेख लिहिलेला आहे. त्यामुळे इथे फक्त काही फोटोच देत आहे.

रस्त्यावरून दिसणारे झाडामधे लपलेले मंदिर.

हे इथले मिनरल वॉटर. या पाण्याची चव अत्यंत वेगळी लागते आणि हे पाणी महिनोन्महिने तसेच ठेवून देखील याला वास वगैरे येत नाही.

हे जवळच असलेलं रत्नेश्वराचं मंदिर. हे मंदिर जास्त करून बंदच असलेलं पाहिलं आहे. आतमधे शंकराची एक पिंड वगळता काहीही नाही.

From Kolisare

रविवार असूनपण जास्त गर्दी नव्हती. तरी इथे आम्हाला पोचायला खूपच उशीर झाल्याने अभिषेक वगैरे करणे शक्य नव्हते. त्यामुळे दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघणार इतक्यात दोन तीन मंडळी देवीची एक सुंदर मूर्ती घेऊन आले.

हे लोक पुण्यावरून आले होते व या मूर्तीला सिद्ध करण्यासाठी येथे आणले होते, असे सांगितले. यामधे एक सदाशिव पेठेत राहणारा तरूण आणि एक भोरचा मध्यमवयीन माणूस होते. आईने इथे लगेच देवीची ओटी वगैरे भरून घेतली. मंदिरातल्या पु़जार्‍यानी मला पण एक ओटीचे ताट आणून दिलं. मग मीदेखील ओटी भरली. तरीदेखील अशा प्रकारे मूर्ती आणून सिद्ध करण्यासाठी लक्ष्मीकेशव हे देवीचे अथवा इतर तंत्रविद्येचे ठिकाण नसल्याने मला उत्सुकता लागली होती.

मग मी मात्र जरा पत्रकारिता दाखवून या व्यक्तीच्या वाहनचालकाकडून आणि त्यांच्या इतर संभाषणातून खरी माहिती समजून घेतली. Happy एक किस्सा म्हणून इथे देत आहे.

जी तरूण व्यक्ती ही मूर्ती घेऊन आली होती, त्यांच्या घराण्यामधील कुणीतरी काही शतकांपूर्वी कोकणातल्या याच भागामधे एका ब्राह्मणाचा खून केलेला होता, म्हणे. (हे लोक पण ब्राह्मणच आहेत. पण द्रव्यलाभाने हा खून झाला असे सांगण्यात आले आहे.) आता त्या व्यक्तीला काही नुकसानीचे अथवा हानीचे झटके मिळाल्यानंतर कुणीतरी या कृत्याबद्दल माहिती काढून (कशी काढली ते मला माहित नाही.) पश्चाताप (की प्रायश्च्चित्त) घ्यावा लागेल असे सांगितले. म्हणून आता ही मूर्ती घेऊन कोकणातल्या बर्‍याच मंदिरामधे जाऊन हे लोक इथे आसपास असा खून झालेला अथवा अशी समाधी किंवा अशी काही लोककथा वगैरे आहे का? याची चौकशी करत होते. कोळिसरेमधे त्याना अपेक्षित ती माहिती मिळाली नाही. हे बोलणं चालू असतानाच सोबत आलेल्या व्यक्तीला खूप जोरात घाम आला व तो सारखा मानेला झटके देऊ लागला. त्याबरोबर आईने मला "याच्या अंगात येतय" असे सांगितले. मी याआधी हा प्रकार कधीच पाहिलेला नसल्याने तिथेच बसून पाहिलं, तर त्या व्यक्तीने मिनिटभर मानेला झटके दिले व नंतर लगेच सतिशला बोलावून "जे काय मनात धरून आला आहेस ते पूर्ण होइल" असे सांगितले. माझ्या पप्पांच्या डोक्यावर हात ठेवून "चिंता करू नकोस. सगळं पाण्यात जाईल" असे सांगितले. Uhoh

हे ऐकून पप्पा भंजाळलेच. नंतर बहुतेक देवीने ऑइल रिग पाण्यात नीट उतरेल असा आशिर्वाद दिला असे समजून घेतले Proud सतिशला तर मनात इच्छा वगैरे काहीच नव्हते त्यामुळे काय पूर्ण होइल असा प्रश्न पडलाच आहे. Happy तर असो. जी काही श्रद्धा, अंधश्रद्धा असेल ती असो, मात्र या देवीची मूर्ती "भयंकर सुंदर" होती. ज्याने घडवली असेल त्याला सलाम.

नंतर ज्याने मूर्ती आणली होती त्याचे आडनाव समजल्यावर सतिशने त्यांचे मूळ गाव कुठे आहे वगैरे माहिती त्याना दिली. तिथेच जाऊन चौकशी करा असा सल्ला दिला.

हे सर्व झाल्यावर आम्ही बसून फराळ केला. तिथेच आम्हाला कंपनी म्हणून माकडे!!!सुनिधीने त्याना "च्याऊ" असे नामकरण दिले. Happy सतिशने सोबत आणलेले उप्पीट लगेच जाऊन याना खायला दिले.

मी भरपूर फोटो काढत असल्याने "कशाचे पण काय फोटो काढतेस" असं ऐकून घ्यावं लागलं. त्यावर झब्बूच्या वेळेला लागतात असे फोटो असे उत्तर दिलं. नंतर झब्बू म्हणजे काय? याचं स्पष्टीकरण देत देत आम्ही गणपतीपुळ्याच्या वाटेला लागलो.

Proud

आकाश आणि समुद्र यामधे एक अंधुकशी सीमारेषा. बघा दिसतेय का?

कोळिसरेहून गणपतीपुळ्याला दोन तीन रस्त्याने जाता येतं, यापैकी आम्ही चाफामार्गे आलो.

गणपतीपुळ्याला पोचायच्या आधीच रस्त्यावर समुद्राबरोबर लपाछपी चालू होते. मधेच दिसतो, गाडी वळली की पुन्हा गायब.

गणपतीपुळे हे हल्ली एक पर्यटन स्थळ म्हणून फारच नावारूपाला आलय. पण त्या आधी हे एक शांत छोटंसं खेडं होतं. पूर्वीचं मंदिर म्हणजे एक कौलारू घरच होतं. पश्चिमेला मावळणार्‍या सूर्याचे किरण या मूर्तीवर पडत असत. आता मात्र इथे भव्य मंदिर उभारले आहे.

ही मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीची कमान.

या फोटोमधे डावीकडे जी पाखाडी दिसतेय ती गणपतीप्रदक्षिणेचा मार्ग आहे.

इथला गणपती जरी स्वयंभू असला तरी जिथे मंदिर बांधलेले आहे तिथे फक्त पूजा केली जाते. आणि या सर्व टेकडीलाच गणेश समजले जाते. त्यामूळे या संपूर्ण टेकडीलाच प्रदक्षिणा घातली जाते. साधारणपणे दीड किमीचा हा मार्ग आहे. पहिल्यान्दा गणपतीपुळ्याला जाणार्‍यानी अवश्य प्रदक्षिणा घालावी. Happy नंतर मनातल्या मनात घातली तरी चालेल.

यानंतर पुन्हा एकदा पेटपूजा केली. इथे सुनिधीने ड्रॅगनसवारी केली.

गणपतीपुळे म्हटलं की डोळ्यासमोर गणपतीच्या आधी बीच उभा राहतो. अर्थात आम्हाला कुणालाच पाण्यात खेळायचं नसल्याने आम्ही बीचवर गेलोच नाही. बीच सुरक्षा केबिनच्या बाजूला उभे राहून फोटो काढले.

एक अत्यंत फुकटचा सल्ला देत आहे: जो बर्‍याचदा बाहेरून आलेल्या पर्यटकानी दुर्लक्षित केलेला असतो. गणपतीपुळ्याचा समुद्र हा अत्यंत धोकादायक आहे. आतापर्यंत कितीतरी पर्यटकाना त्याने गिळंकृत केलेले आहे. कृपया या बीचवर गेल्यास खोल पाण्यात उतरू नका. ज्याना पोहता येत नाही, त्यानी विशेष काळजी घ्या, आणि ज्याना पोहता येते त्यानी देखील. कारण समुद्रात पोहणे हे पूर्णपणे वेगळे असते. मंदिर प्रशासनाने अशा घटना घडू नयेत म्हणून ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. शासनाने लाईफ गार्ड नेमलेले आहेत तरीदेखील आपण स्वतःच आपली काळजी घ्यावी.

एवढं सर्व फिरून होइस्तोवर दुपारचे तीन वाजले होते. आता जयगड अथवा हेदवी कुठेही गेलो असतो तरी परत यायला उशीर झाला असता. त्यामुळे मालगुंडला जाऊन घरी परत जाऊ या, असे सर्वानुमते ठरले.

तितक्यात सतिशला एक बोर्ड दिसला, मला म्हणे रिझॉर्ट्सचे नाव बघ काय ठेवलय? प्राचीन कोकण.

म्हटलं, ते रीझॉर्ट नाहिये संग्रहालय आहे. तू नाही का गेलास कधी? यावर अर्थातच नकारार्थी उत्तर आले. आश्चर्य म्हणजे पप्पा पण इथे कधी गेले नव्हते. मग इथेच जायचे असे ठरले.

गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमीवर हे संग्रहालय वसवलेले आहे. ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देणात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलीना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे. याबद्दलची अधिक माहिती व प्रकाशचित्रे पुढील भागात.

 

गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमीवर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलीना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे.

या संग्रहालयाच्या सुरूवातीलाच आपले स्वागत या मामाकडून केले जाते.

सुमारे तीन एकर फिरायचे म्हटले की आईला "कसंतरी व्हायला लागलं" Happy मग तिने मी सुनिधीला घेऊन गाडीत बसून राहते तुम्ही फिरून या असे सांगितले. हे ऐकेस्तोवर सुनिधी गाढ झोपलेली होती. पण लगेच उठून तिने "मलापण फिरायचेच आहे" असे जाहीर केले. मग आईकडे नाईलाज होता. मात्र पूर्ण संग्रहालय बघून झाल्यावर मात्र अजिबात तिला फिरल्यासारखे वाटले नाही.

निवांत काय बसून राहिलाय ? चला फिरूया. कोकण बघायचा आहे ना?

या परिसरामधे मुद्दाम काही दुर्मिळ औषधी वनस्पतीची व झाडाची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच, प्रत्येक जन्मनक्षत्राचे असा एक आराध्य वृक्ष असतो, त्यानुसार ही नक्षत्र बाग लावण्यात आलेली आहे. भेट देणार्‍यानी आपापल्या जन्मनक्षत्रानुसार कुठला आराध्य वृक्ष आहे ते शोधावे. प्रत्येक वृक्षाचे औषधी गुणधर्म इथे लिहिलेले आहेत. ते जरूर वाचावेत. Happy

आता गावात जायचे म्हटले की पिंपळ पार आलाच. हा पिंपळ दोनशे वर्ष जुना आहे असं गाईड म्हणाली.

तिथेच उभी असलेली ही कडकलक्ष्मी.

काय भिती वाटली? घाबरता काय? चला पुढे. नाहीतर छडी वाजे छम छम... इतका क्युट पंतोजी कधी पाहिलाय का?

हे कोकणगीत. शिलालेखामधे कोरलेले आहे. कवि माधव यानी रचलेले हे गीत सुंदर आहेच. शिलालेख म्हटल्यावर मला एकदम माबोवरच्या इतिहास विषयक चर्चा आठवायला लागल्या. कोण जाणे, पाचशे सहाशे वर्षानी तेव्हाची वरदा या शिलालेखावर एखादा संशोधनात्मक लेख लिहत असेल. Happy

कोकण ही परशुराम भूमी. समुद्रामधे बाण मारून त्यानी ही भूमी तयार केलेली आहे. त्यामुळे त्याना इथे प्रणाम करायलाच हवा.

हा आदिवासी. कोकणातलाच आदिवासी आहे का मला माहित नाही. कुणाला ठाऊक असेल तर कृपया सांगा.

वाघोबा वाघोबा जंगलचे आजोबा
रात्रीच्या अंधारात झाडामागे लपता
लुकुलुकु डोळ्यांनी टुकूटुकू बघत
अंगावर पट्टे गालिचा छान
येवो कोणी जावो कोणी ताठ तुमची मान.(*)

अर्थात हा वाघ खरा नाही आहे. पण कोकणात वाघ नाही तर किमान बिबळ्या तरी मुक्तपणे फिरताना पाहिलेला आहे. माझी एक मैत्रीण रत्नागिरीजवळच्या आडी नावाच्या एका गावात रहायची. एकदा बिबळ्या मध्यरात्री त्यांच्या घरात पडवीवर आला होता. Happy माझे पप्पा दाभोळमधे ज्या गेस्ट हाऊस्मधे रहायचे तिथला रक्षक एक वाघ होता म्हणे. वावरात रहाणार्‍याकडून काही चुका झाल्यातर हे वाघोबा येऊन दर्शन द्यायचे म्हणे. पप्पाच्या काही ज्युनिअर्सनी वाघाचे फोटो/व्हीडीओ काढलेले आहेत. कधी मिळाले तर इथे अवश्य शेअर करेन.

ही इथे स्थापन केलेली वाघजाई देवी. याच देवीच्या बाजूला पालखी व इतर छत्र चामरे वगैरे ठेवलेली आहेत. तसेच, काही शतकांपूर्वीची वाद्ये इथे बघायला मि़ळतात. उनापावसापासून संरक्षण व्हावे म्हणून ती काचेच्या पेटीत ठेवलेली आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो नीट आला नाही. (म्हणजे त्या वाद्यांसोबत माझाच फोटो काढतानाच प्रतिबिंब पण फोटोत आलय त्यामुळे सतिश त्याला भुताटकी म्हणतो. Sad )

गावशिकार

हा दरवेशी. अस्वलाचे खेळ करणारा. आता बहुतेक कायद्याने अशा खेळांवर बंदी आणलेली आहे.

इथून पुढे बलुतेदाराची माहिती दिलेली आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक बलुत्याचं स्वतःचं असं एक महत्त्व होतं. गाव स्वयंपूर्ण असल्याने त्यांची सामाजिक व्यवस्था भरभक्कम होती.

न्हावी.

गावामधील सर्व लोकाच्या घरामधे प्रवेश असणारा व सर्वाचीच हजामत करणारा. Happy गावातील प्रत्येक भानगडीची माहिती याला असणारच. याचा अजून एक साईड बिझनेस म्हणजे लग्ने जुळवणे. अजूनही कित्येक घरामधे लग्न ठरल्यानंतर न्हाव्याचा मानपान करायची रीत आहे.

हे खोताचे घर. खोत म्हणजे गावचा राजा. कोकणामधे खोत हे प्रामुख्याने ब्राह्मण व मराठा जातीचे असतात. इथे दाखवलेले घर ब्राह्मणाचे आहे. खोताची मुले सारीपाट खेळताना दिसत आहेत. या प्रचिमधे दिसत नाहीये पण खोतीणीच्या साडी व दागिने अगदी अस्सल ब्राह्मणी पद्धतीचे वाटावेत असे ठेवले आहेत. पुढे येणार्‍या सर्व बलुतेदारांचे व इतर स्त्रियांची वेशभूषा त्या त्या बलुत्याला व जातीनुरूप ठेवली आहे, असे गाईड म्हणाली. पण खोतीणीच्या नऊवारीला ओचा नाही, असे वाटते.

हा हसरा कुणबी. सुपामधे धान्य पाखडणारी त्याची बायको. इथे शेतकर्‍याला आवश्यक असणारी सर्व अवजारे वगैरे देखील ठेवली आहेत.

हे मासे पकडण्याचे एक जुने साधन. (मी नाव विसरले) एकदा का मासा यामधे घुसला की त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही म्हणे.

आता माश्यांचा विषय निघालाच आहे तर "घेता का ही ताजी म्हावरं?"

इथून पुढे कुंभार, सुतार, लोहार, वाणी, तेली अशा बलुतेदारांची प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत. विस्तारभयास्तव त्या इथे देत नाही.

आता इतकं फिरल्यावर भूक लागणारच ना? त्यासाठी हे बघा स्वयंपाकघर. घंगाळं, चहाची किटली आणी टिफिनचा पितळी डबा या वस्तू बघून मला एकदम जुन्या मराठी चित्रपटांचीच आठवण झाली. आई म्हणे, किती छान, मला अशा कधीतरी पुन्हा चुलीसमोर स्वयंपाक करायचा आहे. Happy पप्पानी लगेच "घरातल्या किचनचा रस्ता माहित नाही आणी चुलीसमोर स्वैपाक?" अशी कमेंट टाकलीच.

सतिशला मात्र या पितळी डब्याचे फारच आकर्षण वाटले. त्याने दोन तीन क्लोजप घेतलेत. डब्याच्या वर असणारा गडू किती छान आहे ना?

इथे तांदळाच्या शेवया करायचं यंत्रदेखील ठेवलेले होते. कोकणात हल्ली मी ते फारसं वापरताना पाहिलेलं नाही. मात्र ईकडे मंगळूरकडे अगदी आठवड्यातून एकदा तरी या शेवया केल्या जातात. पूर्वीच्या काळचं हे पुरण यंत्र. यातून पुरण काढणे आपल्या स्टीलच्या यंत्रापेक्षा सोपे असते. पुरणाचे प्रमाण जास्त असेल तेव्हा तर काम भराभर होते. शिवाय यामधले पुरण अगदी बारीक व चांगले होते. -- इति गाईड. Happy

इथून पुढे भजनी मंडळाचे सोंगे आहेत. त्याचा फोटो मुद्दामून देणार नाही. प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे. Happy

ही मचाण. मचाणीवर उभे राहून पाहिल्यास जयगडपर्यंतचा परिसर दिसतो. पण मचाण चढणार आहात ना? Happy

मचाणीवर पोचल्यावर समोरचा नजारा असा दिसतो.

गाव सर्व फिरून झालं Happy आता वेळ देवदर्शनाची. हा इथे बसलेला चर्मकार. इथे जवळच मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे. संगमेश्वर जवळच्या मार्लेश्वर या शंकराच्या ठिकाणी चांभार लोक मानकरी आहेत. त्याची कथा इथे पाठीमागे चित्राच्या स्वरूपात बघायला मिळेल.

आणि ही मार्लेश्वराची प्रतिकृती .

लगोरी Happy

याच्याच जवळ अजून एक गुहा आहे, हे खरंतर एक भुयार असून ते कितीतरी किलोमीटर दूर असलेल्या एका जुन्या किल्ल्याकडे अवघ्या दोन्-तीन मिनिटात घेऊन जातं. जे कुणी या संग्रहालयाला भेट देतील त्यानी अवश्य या भुयारामधून फिरायला जावं. Happy

आता गाव फिरून झाल्यावर एक उपाहार गृह आहे. तिथे अप्रतिम उकडीचे मोदक मिळतात. अस्मादिकासकट सर्वजण ते मोदक खाण्ञामधे व्यस्त असल्याने फोटो काढायचे सुचले नाही. Proud

शॉपिंगसाठी हे दुकान. इथे कोकण मेवा तसेच लाकडी वस्तू मिळतात.

ही गावाची सीमा. आणि गावचा राखणदार. त्याला नमस्कार करून मग ही अद्भुत सफर संपवूया.

==========================================

मी या संग्रहालयातील काही निवडक प्रचि इथे टाकलेले आहेत. जे कुणी कोकण फिरण्यासाठी जातील त्यानी अवश्य भेट द्या. (आणी ज्याच्याकडे माझ्यापेक्षा चांगला कॅमेरा आणि फोटोग्राफी स्किल्स आहेत त्यानी फोटो टाका.)

इथून बाहेर पडायला आम्हाला साडेपाच वाजले म्हणजे सुमारे दोन अडीच तास आम्ही हे संग्रहालय बघत होतो.

पुन्हा रत्नागिरीला जाण्यासाठी आम्ही आरेवारे पुलावरून गेलो. मुंबई गोवा सागरी महामार्ग (नियोजित) वाटेत परत समुद्र सोबत होताच. तेव्हादेखील भरपूर फोटो काढले. (झब्बू!!!!)

(समाप्त)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...