Tuesday, September 10, 2024

नर्मदे हर १०

 

 लेखांक ११२ : मिठीतलाई ची मिठाई आणि परिक्रमेचा उत्तर तट आरंभ

 रत्नसागर ! समुद्रदेवता ! त्याचे वर्णन काय करावे ! 
अथांग जलधी ! अमूर्त रत्नाकर! असीम उदधी  ! अमित अब्धी ! प्रशांत सिंधु !  विराट अर्णव ! विशाल सरित्पती ! दुर्लंघ्य सरस्वान ! अचाट अकूपार ! प्रचंड पारावार ! रत्नांचा सागर ! रत्नसागर !  अरबी समुद्र ? छे छे ! असले गलिच्छ नाव उच्चारताना , शुद्ध रक्ताचे असू तर आपली जीभ कचरलीच पाहिजे ! कोण अरब ? कुठले अरब ? त्यांचा रत्न सागराशी काय संबंध ? युगानुयुगे , कल्पानुकल्पे , शतकानुशतके हा आमचा रत्नसागर ! हा आमचा सिंधूसागर ! हा आमचा रेवा सागर ! उद्या कोणीही आले आणि माझ्या बापाचे नाव बदलले तर मी ते स्वीकारावे काय ? बापच आहे तो आपला ! १००% बाप ! मी ज्या मातेच्या कुशीत खेळतो , बागडतो ,विश्रांती घेतो ती माझी आई अनन्यपणे ज्याच्या कुशीत विसावते तो बाप नाहीतर कोण ? बापच ! पिताच ! आणि त्याचे नाव बदलण्याचा मला अधिकार नाही ! देवाने त्याला दिलेले नाव आहे ! करोडो तपस्वींनी त्याला दिलेले नाव आहे ! थोर ऋषीमुनींनी त्याला दिलेले नाव आहे ! कार्तिक स्वामींनी , मार्कंडेय महामुनींनी त्याला दिलेले नाव आहे . रामाने देखील  याच नावाने त्याला संबोधित केले . रामाने सेतू याच्यावरच बांधला . कृष्णाने देखील त्याला याच नावाने संबोधित केले . कृष्णाची द्वारका देखील याच सागरात लुप्त झाली . त्या नावाला विटाळ करण्याचे महापातक आपण करायचं नाही . मरेपर्यंत त्या समुद्राचा उल्लेख रत्नसागर म्हणूनच करायचा . 
जगात कुठेही न मिळणाऱ्या रत्नांची अद्भुत खाणी म्हणून तो रत्नसागर . . . 
भारताची परमपवित्र सिंधू नदी त्याला जाऊन मिळते म्हणून तो सिंधूसागर . . . 
माझी आई रेवामाई त्याच्या कुशीत विसवते म्हणून तो रेवासागर . . . तिसरे नाव आम्हाला ठाऊक नाही . सदैव लक्षात ठेवावे .
आज त्या सागराला देखील साष्टांग नमस्कार घातला . तो सागर किती भाग्यवान ! करोडो तीर्थांचे जल नर्मदा मैया त्याच्याच चरणी अर्पण करते ! त्याच्यामध्ये कायमची विसावते ! गुगलचा नकाशा उघडून पहा . खंबातच्या आखातातील पाणीच वेगळे आहे ! जगभरातील समुद्राचा रंग वेगळा आहे आणि या भागातील पाण्याचा रंग वेगळा आहे ! कारण या परिसरातले पाणीच वेगळे आहे ! ते आहे रेवाजल ! ते आहे नर्मदा जल ! ते आहे मेकलसुता जीवन ! आपल्या पूर्वजांनी किती सुंदर नावे ठेवलेली आहेत पहा ना !  प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ आहे ! प्रत्येक नावातून काहीतरी बोध आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी उभारणी आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी मांडणी आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी स्तुती आहे . प्रत्येक नावातून कशाची तरी भक्ती आहे . अशी उदात्त परंपरा सोडून जेव्हा आपलेच लोक आपल्याच लेकरांना बंटी ,पिंकी ,पप्पू , स्वीटी ,हनी ,बबली , विक्की वगैरे नावांनी बोलवतात तेव्हा त्यांची दया येते . अशा चुका आपण करू नयेत . कोणी करत असेल तर त्याला सावरावे . सांगावे . की आपली परंपरा उदात्त आहे . आपल्या परंपरेला अर्थ आहे . निरर्थक गोष्टींमध्ये रमणारी आपली परंपरा नाही. जी आपण जपतो तीच खरी परंपरा . जी लोप पावते ती परंपरा राहत नाही . आपण नव्याचा ध्यास जरूर घ्यावा . परंतु त्यासाठी जुन्या परंपरांना फाटा देण्याची गरज नाही . कारण या परंपरा लाखो वर्षांच्या अनुभवातून आणि मंथनातून उत्पन्न झालेल्या आहेत . आपण त्यांचा अर्थ पुन्हा नव्याने शोधायला जाणे म्हणजे वेळेचा आणि कष्टाचा अपव्यय आहे . मी पूर्वी चळवळीमध्ये काम करत असताना तिथले लोक मला विचारायचे की हे असे का ? असा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत जा . परंतु मला अनेक वर्षे असे केल्यावर लक्षात आले की हे असे का ? कारण मला माझ्या आई-बाबांनी तसेच सांगितले आहे , या कारण परंपरेमध्ये पुरेसा दम आहे ! कुठलेही आईबाप आपल्या मुलाला चुकीचे ज्ञान , चुकीची माहिती , चुकीच्या परंपरा कधीच देणार नाहीत .  जे लाखो वर्षांच्या काळाच्या कसोटीवर तावून-सुलाखून टिकलेले आहे उजळलेले आहे बहरलेले आहे ते त्याज्य किंवा चुकीचे कसे काय असू शकेल ! तेच सनातन आहे ! तेच पारंपारिक ज्ञान आहे ! तीच आपली महान संस्कृती आहे ! तीच आपली खरी ओळख आहे ! आमचे एक गुरुजी होते . म्हणजे अजूनही आहेत . परंतु आता त्यांच्या पत्नी राहिलेल्या नाहीत . त्यांचे नाव उत्तम जोशी . हे मुंबईचा क्रिकेटपटू आगरकरच्या घरी पूजा सांगायचे .  आगरकरने त्यांना एकदा दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या विश्वचषकाची तिकिटे दिली . गुरुजींनी आयुष्यात कधीच परदेशात प्रवास केलेला नव्हता . आणि धोतर उपरणे सोडून काही घातले नव्हते . अशा मध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात जाऊन राहायचे म्हटल्यावर कपडे काय घालावे असा प्रश्न त्यांना पडला . परंतु त्यांनी असा निश्चय केला की आपल्याला जे माहिती नाही ते आपण काही करायला जायचं नाही . जी आपली संस्कृती आहे जी आपली परंपरा आहे जो आपला पेहराव आहे तोच कायम ठेवायचा ! आणि दोघेही मस्तपैकी धोतर उपरणे पुणेरी पगडी आणि काकू नऊवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटची मॅच बघायला गेले ! तिथे हजारो भारतीय होते ज्यांनी पाश्चात्य पेहराव केलेला होता . परंतु या दोघांचे तिथे विशेष स्वागत झाले ! टीव्हीवर देखील त्यांना सतत दाखवले गेले . हे कशामुळे शक्य झाले ? तर त्यांनी जपलेल्या परंपरेमुळे ! नर्मदा परिक्रमेची देखील एक परंपरा आहे . आपण परिक्रमा वासी असताना आपल्या वर्तनामुळे तिच्यामध्ये काही नकारात्मक बदल घडू नयेत एवढी काळजी प्रत्येकाने घ्यायची , इतके सोपे गणित आहे . असो . 
विमलेश्वर च्या बाजूचा समुद्रकिनारा जितका साधा आहे तितकाच जागेश्वर किंवा दहेज बंदराच्या बाजूचा किनारा भव्य दिव्य आणि महाकाय आहे ! रिलायन्स  अदानी अंबानी बिर्ला मित्तल वगैरे लोकांच्या मालकीची खाजगी बंदरे इकडे आपल्याला दिसतात . त्यावरून मालवाहतूक करणाऱ्या प्रचंड नौका किंवा जहाजे खंबातच्या या आखातामध्ये नांगरलेली आपल्याला आढळतात . मोठमोठे मालधक्के दिसतात . फक्त हे मुंबईसारखे खोल बंदर नसून उथळ किनाऱ्याचे बंदर आहे . त्यामुळे काठावर दलदल असलेला प्रचंड मोठा किनारा आहे . आम्हाला आश्चर्यकारक रित्या अतिशय शांत समुद्र लागल्यामुळे आमच्या नावे मध्ये शांतता होती . परंतु समुद्रातील वातावरण बिघडलेले असेल तर मात्र नावेतील परिक्रमा वासी मोठ्या मोठ्याने नर्मदा मातेचा धावा आणि जयजयकार करतात असे मला नावाड्याने सांगितले ! आणि ते स्वाभाविकच आहे . आमची नाव माल धक्क्याला लागली आणि मी उतरलो . एका इंग्रजी एल आकाराच्या धक्क्याला आतल्या बाजूने नाव लावण्यात आली होती . एक तिरका जिना वर जात होता . पुस्तकामध्ये असे लिहिले होते की चढताना आणि उतरताना समुद्रस्नान करावे . इथे तर सर्वत्र गाळ भरलेला होता . त्यामुळे आपल्याला समुद्र स्नान करण्याची एकमेव जागा शिल्लक आहे आणि ती म्हणजे हा जिना जो पाण्याच्या आत मध्ये देखील उतरलेला आहे हे माझ्या लक्षात आले . परंतु हे मला पटकन करायचे होते . नाहीतर माझे पाहून सर्वचजण पाण्यात उतरले असते आणि ते अत्यंत धोकादायक होते . त्यामुळे कुणाला काही कळायच्या आत मी झोळी खाली ठेवली आणि पाच पायऱ्या खाली उतरून तीन डुबक्या मारल्या आणि तसाच ओलेत्याने वर आलो . समुद्र स्नानाचा मंत्र म्हणून घेतला . वरती साधारण दोनशे तीनशे मीटर चालल्यावर डाव्या हाताला एक गोलाकार पत्र्याची शेड बांधलेली होती . तिथे जयेंद्रभाई नावाचे एक सेवाधारी आपल्या मित्रांसह आधीच येऊन थांबलेले होते . उत्तम असा चहा आणि भडंग परिक्रमा वासींना ते मोठ्या प्रेमाने देत होते . परंतु एवढ्यावरच न थांबत
 प्रत्येकाला एक धोतर आणि एक बसण्याचे आसन ते देत होते . सोबतचे ओझे वाढवायचे नव्हते परंतु त्यांचे प्रेम पाहून मी एक आसन आणि एक धोतर घेतले . त्या आसनाने पुढे मला खूप चांगली साथ दिली . भडंग आणि चहाचा आस्वाद घेत पुढील मार्गक्रमणेचा अंदाज मी घेऊ लागलो . इथून जवळच मिठीतलाई चा आश्रम होता . खरे म्हणजे नर्मदा मातेची पंचक्रोशी परिक्रमा करण्याची जी परंपरा आहे त्यातील सर्वात अखेरची समुद्र पंचक्रोशी नावाची परिक्रमा आहे ती इथून आरंभ होते . याच तटावरील काही मंदिरे वर्तुळाकार मार्गाने फिरली की समुद्र पंचक्रोशी होते . परंतु मुख्य नर्मदा परिक्रमामध्ये ती मंदिरे घ्यावीतच असा कुठे उल्लेख नाही . परंतु काही लोक ही परिक्रमा करतात हे मात्र नक्की . उत्तर वाहिनी परिक्रमेप्रमाणे किंवा मंडला पंचक्रोशी प्रमाणे केवळ समुद्र पंचकोशी करणारे लोक देखील आहेत . 

समुद्र पंचकोशी किंवा पंचक्रोशी परिक्रमेचा इंटरनेटवर मिळालेला नकाशा जिज्ञासूंच्या संदर्भासाठी देत आहे


मी चालत मिठी तलाईच्या दिशेने निघालो .  अप्रतिम दर्जाचे रस्ते आणि प्रचंड औद्योगिक आस्थापने पाहून डोळे दीपत होते ! इतका प्रचंड विकास पाहून हा आपला भारत देश आहे की आपण परदेशात आलो आहोत असे वाटत होते ! महाराष्ट्रामध्ये इतके मोठे बंदर कुठेच नाही ! मुंबईची गोदी किंवा नेव्हल डॉकयार्ड मी आतून पाहिलेले आहेत . माझा सख्खा मामा लष्करामध्ये मोठा अधिकारी असल्यामुळे त्याने मला हा सर्व परिसर आतून फिरवून दाखवलेला होता . त्याच्यापेक्षा या भागाचा विस्तार खूप अधिक होता . कारण मुंबईमध्ये विस्ताराला मर्यादा आहेत . इथे तसे काही नव्हते . ऐसपैस पसरलेला तो परिसर होता . मोठ्या मोठ्या सीमा भिंती होत्या . इतके दिवस कुंपणावरून उड्या मारून जाणारा मी त्या मोठ्या भिंती पाहून हबकलोच ! आता बहुतेक मला रोडही रोड चालावे लागणार की काय असे मला वाटू लागले ! थोडे अंतर चालल्यावर मिठी तलाई चा आश्रम लागलाच .
अतिशय विस्तीर्ण औरससौरस परिसर ! आत मध्ये एक भव्य झाडाचा पार ! त्याच्यामागे परिक्रमा वासींच्या  खोल्या . समोर मोठी विहीर . त्यावेळीला जमिनीच्या पातळीपर्यंत पाणी ! इतकी तुडुंब भरलेली गोड्या पाण्याची विहीर तीही समुद्रकिनारी ! किती मोठा चमत्कार ! हीच ती गोड्या पाण्याची मिठीतलाई !  काही लोक समजतात की उत्तर तट सुरू होणार म्हणून गोड गोड तळणाचे पदार्थ परिक्रमावासीयांना खायला येथे मिळतात म्हणून ही मिठी तलाई आहे . संपूर्ण मैदान वजा परिसराच्या मधोमध दोन मोठी मंदिरे . एक नर्मदा मातेचे मंदिर आहे . आणि एक आखाड्याचा आश्रम आहे . आश्रमाच्या शेजारी मोठी पत्र्याची शेड . जिथे भोजन प्रसाद बनविणे आणि वाढणे अशा सेवा चालतात .रघु बरी नावाचा जळगाव येथील एक वारकरी सांप्रदायिक युवक हा आश्रम अतिशय उत्तम रीतीने सांभाळत होता ! त्यांच्या मदतीसाठी जळगाव परिसरातूनच फक्त मराठी भाषा बोलता येणाऱ्या काही माताराम सेवेसाठी येऊन राहिलेल्या होत्या ! त्यांना मराठी बोलणारे परिक्रमावासी भेटले की खूप आनंद व्हायचा ! इथे दिवसभर विश्रांती घ्यावी आणि उद्या निघावे असे ठरवले . परिसर खूपच सुंदर आणि भव्य दिव्य होता . मंदिरांची दर्शने केली . या भागात प्रचंड डास होते . परंतु माझ्याकडे एका माणसाची मच्छरदाणी असल्यामुळे माझे काम सोपे झाले होते . इथे आखाड्याचा जो आश्रम आहे तिथले महाराज परिक्रमावासींसाठी फक्त निधी गोळा करून देण्याचे काम करतात . बाकी प्रत्यक्ष दिवसभराच्या कामकाजामध्ये त्यांचा फारसा सहभाग नसतो . नर्मदा मातेच्या मंदिराची आरती पूजा वगैरे फक्त ते सांभाळतात . मी त्यांना भेटून त्यांचे दर्शन घेऊन आलो . रघू च्या मदतीला आजूबाजूला असणाऱ्या विविध कंपन्यातील काही कामगार मदतीला म्हणून यायचे . स्वयंपाकाला वाढायला वगैरे मदत करून नंतर तिथेच भोजन करून ते परत कामाला निघून जायचे . इथे असलेल्या विहिरीवर स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे . त्यामुळे मी स्नान करायला सुरुवात केली . अक्षरशः हाताने पाणी उपसता येते अशी विहीर पहिल्यांदाच पाहिली ! माझ्या मामाच्या विहिरीमध्ये इतके पाणी कधी कधी लागते ! परंतु ते क्वचित प्रसंगी असते . इथे वर्षाचे बाराही महिने असे पाणी असते ! त्यामुळे ते आश्चर्यकारक मानले पाहिजे . मी इथे स्नान करताना तोतया नागा बाबाने माझे डोके खाल्ले . कारण नसताना भांडण उकरून काढत त्याने मला तीन वेळा " मै नागा हूँ "  हे वाक्य ऐकवलेच ! अखेरीस तो गेल्यावर मी पुन्हा एकदा निवांत बसून स्नान केले . परिसर अगदी स्वच्छ आणि निवांत होता . एखादे फार मोठे बस स्थानक असावे असा आश्रमाचा विस्तार होता . बस ने परिक्रमा करणाऱ्या लोकांच्या बस गाड्या इथेच आणून लावल्या जातात . आश्रमामध्ये भोजनासाठी दररोज गोडधोड असते !आणि त्यातही मुख्य म्हणजे गुलाबजाम असतात ! कालच मला दक्षिण तटावर असताना सजोद गावामध्ये गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली होती . आज मैयाने ती पूर्ण केली ! किती गुलाबजाम खावेत ? मला सांगताना सुद्धा थोडासा संकोच होत आहे ! मी मुळात कितीही गोड खाऊ शकणारा मनुष्य आहे ! आणि त्यात चालून कष्ट केलेले असले की मग तर विचारूच नका ! त्यादिवशी मी अक्षरशः किलोच्या मापात गुलाबजाम खाल्ले ! रघु महाराज सुद्धा अतिशय प्रेमाने वाढत होते ! मला गुलाबजाम आवडत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी अक्षरशः ताट भरून गुलाबजाम मला वाढले !  आणि ते मी प्रेमपूर्वक संपवतो आहे हे पाहिल्यावर मदतीला आलेल्या नोकरदार युवकांनी सुद्धा तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करून दाखवली ! अखेरीस पोट भरले परंतु मन काही भरले नाही ! मी माझ्या उभ्या आयुष्यात इतके गुलाबजाम एकाच वेळी कधीच खाल्ले नाहीत ! आणि पुन्हा खाऊ शकेन असे वाटतही नाही ! मला असे वाटले की आज गुलाबजाम केलेले आहेत . परंतु रघु महाराजांनी सांगितले की त्यांनी सतत गुलाबजाम करण्याचे व्रत घेतलेले आहे ! त्यामुळे पाकाचे भांडे कधी धुवायला जातच नाही ! त्यात सतत नवीन गुलाबजामांची भर पडत राहते ! त्यामुळे तुम्हाला मिळालेला गुलाबजाम जर प्रचंड मुरलेला असेल तर तो आधीच्या घाण्यातला असू शकतो ! खव्याचा आणि तेला तुपाचा मुक्त वापर महाराज करतात ! इतके सुंदर गुलाबजाम आयुष्यात कधीच कुठे खाल्लेले नाहीत . नर्मदा मैयाचा पुरेपूर आशीर्वाद असल्यामुळे गुलाबजामांना ती चव प्राप्त होते . दिवसभर थोडीशी विश्रांती घेतली . साधू महाराजांशी थोडा सत्संग केला . जळगावच्या मराठी मातारामां सोबत गप्पा मारल्या आणि त्यांना आवरा वरील मदत केली . रघु महाराज स्वयंपाकाचे सामान खरेदी करण्याकरता निघून गेले . त्यामुळे त्यांचा सत्संग लाभला नाही . परिक्रमावासींची सेवा करणारे केंद्र चालवणे हे सोपे काम नाही मित्रांनो ! आणि त्यात काही ठराविक आश्रम आहेत की जिथे प्रत्येक माणूस येतोच येतो . कुठल्याही मार्गाने चालणारा परिक्रमा वासी समुद्र पार करण्यासाठी एकाच जागी येतो . आणि एकाच बंदरावर उतरतो . त्यामुळे प्रत्येकाला या आश्रमात यावेच लागते . त्यामुळे सेवेचा प्रचंड ताण या आश्रमावर पडतो तरी देखील अत्यंत हसतमुख राहून रघु महाराज कशी काय सेवा करत होते हे पाहून मला फार आश्चर्य वाटले ! आणि त्यांचे खूप कौतुक आणि आदर वाटला ! 
रघु महाराजांचा फोन पे किंवा जी पे नंबर खालील प्रमाणे आहे . ९७ ३०४ ६२ १५६
 97304 62156 . फक्त त्यांना मदत पाठवण्यापूर्वी एकदा फोन करून कशाची गरज आहे ते विचारून घ्यावे . कारण इथे एकाच वेळी २००० परिक्रमावासी ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे मदत देखील एकदम १०० डबे तेल ,एक ट्रक धान्य अशा प्रकारची येत असते . हे इतके निस्पृह आहेत की ज्या आश्रमात एखाद्या गोष्टीची गरज असेल तिकडे मदत पाठवा असे आपल्याला कळवतात .उदाहरणार्थ घोंगसा आश्रमात त्यांनी चार लाखाची शेड बांधून दिली . मंडला जवळच्या हनुमान घाटाचे नूतनीकरण सध्या ते करत आहेत . दर वर्षी न चुकता वारीला देखील जातात . आपल्या वाचकांना एक विनंती आहे की कुठल्याही आश्रमात मदत पाठवली तर कृपया कळवावे ज्यामुळे आपल्या ब्लॉग वरील यादीमध्ये ते अपडेट करता येते व त्याचा फायदा इतरांना होतो .
असो . थोडेसे परिसराचे दर्शन घेऊयात .
मिठीतलाई आश्रमातील नर्मदा माता मंदिर
या परिसरामध्ये मध्यम आकाराची जहाजे ये जा करताना दिसतात
सीगल या पक्ष्याच्या धिटाईचे मला नेहमीच कौतुक वाटते
आश्रमा मध्ये असलेला आखाड्याचा भाग
भरती आणि ओहोटीच्या खुणा तुम्हाला खांबावर दिसतील
मिठीतलाई आश्रमातील हीच ती तुडुंब पाण्याने भरलेली गोड्या पाण्याची विहीर . मागे परिक्रमावासींची निवासव्यवस्था दिसते आहे .
आश्रमाचा विस्तीर्ण परिसर आणि परिक्रमा वासी
भोजनाच्या अखंडपंक्ती सुरू असणारे भांडारगृह ! 
आश्रमाच्या दारातच निंबनाथ महादेवाचे हे मंदिर आहे
आश्रमातील नर्मदा मैया
आखाड्याच्या भिंतीवर असे सुंदर चित्र रेखाटलेले आहे .

रात्री डासांनी सर्व परिक्रमावासींना अक्षरशः फोडून काढले . मी शांतचित्ताने झाडाच्या पाराखाली माझे आसन लावले . आणि मच्छरदाणी उघडून शांत झोपून गेलो . समुद्राचा थंडगार वारा सुखावत होता . इथे देखील अनेक नवीन परिक्रमावासीयांशी ओळख झाली .
चित्रकूट मधील एक बुटकासा परंतु अतिशय सज्जन सात्विक आणि मवाळ मौनी साधू होता .त्याची माझी चांगली गट्टी जमली. गडी मौना मध्ये सुद्धा गप्पा मारायचा ! आणि त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजायचे हे विशेष ! त्याच्याशी बोलताना माझ्या असे लक्षात आले की भाषा ही केवळ वर ऐकू येणारी प्रणाली आहे . प्रत्यक्षात हृदयातल्या हृदयात सुद्धा संवाद साधता येतो . ज्याप्रमाणे नदी ही केवळ एका मोठ्या व्यवस्थेचा वरवर दिसणारा भाग असते त्याप्रमाणे वाचा ही त्या नदीच्या प्रवाहासारखी आहे . शब्द किंवा स्फुरण हे आतूनच स्फुरत असते .  सकाळी लवकर उठून विहिरीवर स्नान केले . आणि पुढचा मार्ग पकडला . तुकाराम बुवा सुरवसे येथे थांबलेले होतेच . ते देखील माझ्या मागेपुढेच निघाले . इथे काठावर जाण्यासाठी रस्ताच नव्हता . सर्वत्र कंपन्याच कंपन्या होत्या . 
मिठीतलाई आश्रम आणि जागेश्वराचे मंदिर इथून मैयाच्या काठाने चालण्यासाठी रस्ता नसून संपूर्ण दल दल कशी आहे हे दाखवणारे उपग्रह छायाचित्र
या भागात किती कंपन्या आहेत आणि या भागाचे औद्योगीकरण कसे जोमाने झालेले आहे हे आपल्याला कळावे म्हणून काही नकाशा चित्रे सोबत जोडत आहे .
या भागात मोठ मोठ्या पेट्रोल रिफायनरीज असून इथून पेट्रोल जहाजाने थेट बाहेर पाठवले जाते .
मोठमोठ्या कंपन्या आणि
त्यांच्या मोठमोठ्या इमारती ,यंत्रणा आणि चिमण्या वगैरे पहात चालू लागलो . कंपन्यांची एक गंमत असते . भिंतीच्या आत मध्ये स्वर्ग उभा करतात . आणि सीमा भिंतीच्या बाहेर नर्क तयार होईल तरी त्यांना काही फरक पडत नाही ! असेच काहीसे वातावरण इकडे जाणवले . इथे एका टपरीवर स्लीपर वाटणारा एक माणूस होता . परंतु मला स्लीपर नको होती . ती पायाला फारशी सुखावह असतेच असे नाही . जवळजवळ चालायला ठीक आहे . परंतु मोठा टप्पा चालताना पायात बुटा सारखेच काहीतरी हवे असे मला वाटायचं . त्यामुळे मी अनवाणीच निघालो .तुकाराम बुवांनी मात्र एक जोडी स्लीपर घेतली . मला एकट्याला चालायची फार इच्छा होती . त्यामुळे थोडेसे पुढे गेल्यावर मला एका ओढ्याच्या मार्गाने काठावर जाण्याचा मार्ग सापडला ! तिथून सुंदर असा वाळूचा किनारा चालत मी पुढे जाऊ लागलो . हा भाग फारच विस्तीर्ण होता . ही नर्मदा माताच माझ्या उजव्या हाताला होती परंतु त्यात ९०% समुद्र होता ! आणि गाळ वाळू मिश्रित किनारा होता . चालण्यासाठी अतिशय कठीण असा हा परिसर होता . परंतु आता डावीकडे कंपन्यांच्या सीमा भिंती असल्यामुळे आणि उजवीकडे रेवासागर असल्यामुळे चालत राहणे मला भाग होते . असे बरेच अंतर चाललो . सुंदर अशी ती चाल होती . अमेठा अथवा अंभेठा , सुवा अशी गावे ओलांडत कोलीयाद नावाच्या गावामध्ये पोहोचलो . गाव आले की लोक भेटायचे . एरव्ही किनारा एके किनारा ! वाटेमध्ये गावात आले की अनेक लोक चपला देऊ करत होते . परंतु मी त्या नाकारत होतो . कोलीयात गावाच्या आसपास मात्र पायाला प्रचंड काटे टोचू लागले . सर्वत्र काटेच काटे आहेत असे लक्षात आले . मग मात्र एकांनी देऊ केलेल्या चप्पल मी शांतपणे स्वीकारल्या . काही काळ रस्त्याने चालावे लागले . इथे उजव्या हाताला एक मोठे धरण असावे असा पाणीसाठा लागला . प्रत्यक्षात हा आर ओ पाण्याचा प्रकल्प होता . अर्थात एका अतिप्रचंड तलावामध्ये पाणी घेऊन त्याचा रिव्हर्स ऑसमॉसिस करून ते पाणी विकले जात होते . इथे आत मध्ये एक हनुमान मंदिर आहे असे कोणीतरी सांगितले . तोपर्यंत तुकाराम बुवा सुद्धा मला भेटले होते . दोघे त्या मंदिरामध्ये गेलो .  एक महिला साध्वी हा आश्रम चालवीत होत्या . श्री दास जी महाराज असे त्यांचे नाव होते . त्यांचे गुरु सुरतला राहायचे . आणि नुकताच त्यांनी हा हनुमान मंदिर असलेला आश्रम चालवायला घेतला होता . त्या इतक्या नवीन होत्या की हे कुठले हनुमान मंदिर आहे पण त्यांना सांगता आले नाही ! एक-दोन दिवसच झालेले असावेत ! मी माझ्या मावशीकडे राहून शिक्षण घेतले . ह्या साध्वी कडे पाहिल्यावर मला माझ्या मावशीची आठवण यायची ! दोघींचे दिसणे च
चालणे बोलणे हसणे चिडणे सर्व काही एकसारखे होते ! तशा या साध्वी थोड्याशा तापट स्वभावाच्या होत्या . आणि साधारण पन्नाशीच्या असल्यामुळे सर्वांशी अंमळ फटकूनच वागायच्या . परंतु मला माझ्या मावशीला हाताळण्याचा खूप चांगला अनुभव असल्यामुळे मी जणू काही माझी मावशीच आहे असे डोक्यात ठेवून यांच्याशी वागलो . आणि त्यामुळे त्यांची माझी चांगली गट्टी जमली ! माझी मावशी पुढे काय करणार ते मला माहिती असायचे ! या साध्वी देखील बरोबर तसेच काहीतरी करायच्या ! परमेश्वराची लीला किती अगाध आहे पहा ! अगदी एकसारखी दोन माणसे पृथ्वीवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला घालतो ! हा आश्रम नवीनच असल्यामुळे त्याची व्यवस्था लावण्याचे काम सुरू होते . इथे दुपारचे भोजन घेऊन पुढे निघून जावे असा आमचा बेत होता . परंतु सुरत वरून या साध्वींचे गुरुबंधू हा आश्रम कसा चालवीत आहेत ते पाहण्यासाठी आज येणार होते असे मला साध्वीने सांगितले . हे सर्व या साध्वीला 'सीनियर ' असणारे साधू होते . परंतु गुरुदेवांची लाडकी शिष्या असल्यामुळे हिच्यावर सर्वजण थोडेसे जळत असत . म्हणूनच त्यांनी काहीतरी कुटाणे करून सुरत आश्रमातून हिला बाहेर काढले होते !साध्वी मनाची खंबीर होती ! तिनेही मोठे हिकमतीने हा आश्रम एकटीने चालवायला घेतला होता ! परंतु आज अचानक ते येणार आणि काहीतरी गैरव्यवस्था झाली की जाऊन गुरुदेवांना सांगणार म्हणून तिला थोडेसे टेन्शन आले होते ! माझा स्वभाव साध्वी मावशीला आवडला आणि तिने मला विनंती केली की कृपा करून आजचा दिवस मी तिथे राहून तिला मदत करावी . मी अनुमोदन दिले आणि कामाला लागलो ! आपला हातखंडा असलेला स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम राबवून परिसर चमकवला . या आश्रमाचे अस्तित्व दाखवणारी पाटी कुठे नव्हती . आणि इथे एक रंगाची डबी सापडली . त्यामुळे मी एका पांढऱ्या उपरण्यावर आकडीया हनुमान मंदिर अशी पाटी तयार केली . ही पाटी रंगवताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली . आश्रमाच्या दारात एक मोठा सिमेंटचा नळा किंवा पाईप पडलेला होता . त्यावर उपरणे ठेवून अक्षरे रंगवायची होती. मी ते उपरणे तुकाराम बुवांना आणि चित्रकूटच्या साधूला अशा रीतीने पकडायला लावले की अक्षरे उपरण्यावर सुद्धा उठली आणि मागे नळ्यावर सुद्धा उठली ! त्यामुळे एका फटकार्‍यात दोन पाट्या तयार झाल्या ! तरी देखील रंग उरल्यावर मी आजूबाजूला असलेल्या मंदिरावर अक्षरे रंगवली ! दरवाजावर सर्व भारतीय भाषांमध्ये राम राम लिहिले ! गुजराती मराठी तमिळ इत्यादी भाषांमध्ये राम हा शब्द रंगवला ! या आश्रमात आधीच काही लोक येऊन राहिलेले होते . एक हिरो सारखी केशरचना असलेले गुजराती साधू होते . ते बहुतेक शिकलेले असावेत . परंतु स्वभावाने खूप चांगले होते . एक मंडला भागातील आदिवासी साधू होता . इथे सेवा देण्यासाठी म्हणून आसपासच्या गावातील काही लोक यायचे . त्यातील एकांनी आमचे सर्वांचे भरपूर फोटो काढले . आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले .त्यातील काही चित्रं आपण पाहूयात .
डावीकडून गुजराती साधू , मंडलाचे साधू ,तुकाराम बुवा सुरवसे , प्रस्तुत लेखक ,नर्मदा मैया , श्री दासजी महाराज साध्वी , सेवाधारी आणि चित्रकूटचे मौनी साधू .
हनुमंताच्या मंदिरावर प्रस्तुत लेखकाने रंगवलेली पाटी आणि सोबत साध्वी माताजी आणि तुकाराम बुवा पैलवान ! समुद्र पार केल्यावर मिळालेली नवीन वस्त्रे परिधान केलेली आहेत !
हे छायाचित्र मी काढलेले आहे . माझ्या जागी उभा असलेला सेवाधारी चित्रात यावा म्हणून मी फोटो काढले .
गुरुबंधू तपासणीसाठी येणार असल्याचा किंचित तणाव साध्वी माताजींच्या चेहऱ्यावर जाणवत आहे 
आश्रमाच्या दारावर मी विविध लिपींमध्ये लिहिलेला राम शब्द  .
श्री दासजी साध्वी मावशी ,प्रस्तुत लेखक , चित्रकूट वाले तिवारी बाबा आणि तुकाराम बुवा ! साध्वीने स्वतःच्या हाताने सर्वांना सुंदर असे गंध लावले होते .
रंगवलेल्या पाटीसोबत प्रस्तुत लेखक . शेजारी मला मिळालेले नवे सॅंडल आणि माझा गमछा वाळतो आहे !
तुकाराम बुवा सुरवसे यांच्यासोबत प्रस्तुत लेखक
आम्ही तिघांनी फार धमाल केली ! बरेचदा मुक्कामावर आम्ही भेटलो की मजा मजा करायचो !
सर्व आश्रम परिसर मी झाडून पुसून घेतलेला होता . त्यामुळे फरशी स्वच्छ दिसते आहे पहा .
आपल्या गुरूंच्या नावाने अन्नक्षेत्राचे नाव असावे असे साध्वी मावशीने सांगितल्यामुळे त्यांच्या नावाची हीच ती पाटी मी रंगवली . पाटी अशी रंगवली की एक पाठी उपरण्यावर तयार झाली आणि दुसरी पाटी या नळ्यावर उमटली !
महंत संतदासजी महाराज हे साध्वीचे गुरु !
मागे दिसणारी झाडी ओलांडली की लगेच नर्मदा मैया आहे . 


श्री आंकडिया अनुमान
आश्रमाचा हा संपूर्ण परिसर मी चकाचक केला होता
मी रंगवलेले हेच ते दार . आता सर्व पाट्या वगैरे लावलेल्या दिसत आहेत .
आतूनही आश्रम स्वच्छ धुऊन पुसून घेतला होता
सुरत इथून जवळ आहे . नर्मदा माता रत्नसागराला जाऊन मिळाली तरी तिचा वेगळा रंग बराच काळ राखून आहे हे आपल्या लक्षात येते . समुद्राच्या जलामध्ये तिचे जल लवकर मिसळत नाही . असो .

खरे म्हणजे दुपारचे भोजन करून पुढे जायचे असा आग्रह तुकाराम महाराजांनी धरला होता . परंतु कुठल्याही क्षणी आश्रमाची तपासणी करणारे पथक येणार होते . आणि आम्ही थांबलो ते एका दृष्टीने बरेच झाले . नाहीतर या आश्रमात कोणीच नाही त्यामुळे हिला कशाला निधी द्यायचा असे काहीतरी निरोप पुढे गेले असते ! परंतु आम्ही सहा जण थांबलेलो होतो . आणि रात्री अचानक आठ गुरुबंधूंचे पथक दोन जीप मधून दाखल झाले ! त्याने वाटेत लावलेल्या पाट्या वगैरे पाहिल्या आणि आत वळले . मी साध्वीला स्वयंपाकाला सुद्धा मदत केली होती . मी एकट्याने ३५ पोळ्या लाटल्या . तिने भाजी भात वगैरे केला . तिच्या जवळपास सुद्धा ती कोणाला फिरकू देत नसे . परंतु मला खरोखरच माझी मावशीच तिच्या जागी दिसत होती त्यामुळे तिचे 'मूड स्विंग्स ' कसे सांभाळायचे हे मला बरोबर कळले होते ! आजही या साध्वीचा फोटो माझ्या कुठल्याही मित्राला दाखवला की सगळे म्हणतात अरे ही तर आपली मीना मावशी आहे ! मी मदत केल्यामुळे तिचे काम थोडेसे हलके झाले . आलेल्या पथकाला काय काय सांगायचे हे मी परिक्रमावासी मित्रांना आधीच सांगून ठेवले होते . आम्ही सहा जण ,ती साध्वी आणि दोन सेवक असे आठ जण विरुद्ध त्या पथकातील आठ साधू असे दोन गट तयार झाले होते ! जसे पथक दाखल झाले तसे आम्ही सर्वांनी साध्वी माताजी ने आमची किती सुंदर बडदास्त ठेवली आहे हे सांगायला सुरुवात केली ! आमच्या वतीने सर्वात जास्त चित्रकूटचे मौनी बाबा बोलले ! त्यांचे हातवारे पाहून साधू लोकांचे छान मनोरंजन झाले ! मी देखील पथकातील साधूंशी भरपूर गप्पा मारल्या . कार्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा अन्य खाजगी क्षेत्रामध्ये सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जशी एक सूप्त चढाओढ आढळते तशी याही क्षेत्रात आहे हे पाहून मला मौज वाटली . भरलेला आश्रम पाहून आणि आश्रमातील चोख व्यवस्था पाहून पथकातील सर्व साधू अतिशय संतुष्ट झाले ! सर्वांना मुक्काम करण्याची प्रार्थना मी केली परंतु ते सुरतला निघून गेले . मध्यरात्री सर्व पथक गेले आणि साध्वीने सुटकेचा निश्वास सोडला !
साध्वी मला म्हणाली की तू देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास ! मी तिला सांगितले की माझी कुठलीच कृती सध्या माझ्या हातात नाही . माझ्या नियंत्रणात काहीच नाही . जे जे समोर घडते आहे ते ते फक्त मी पाहतो आहे . त्यामुळे हे सर्व नर्मदा मातेचे कौतुक आहे .
आणि तुझ्या अपार गुरुनिष्ठेचे फळ आहे !  रात्री आम्ही सर्वजण अंगणातच झोपलो . मच्छरदाणीने मला तारले , बाकीच्यांनी किमान हजार हजार मच्छर तरी मारले ! अपरात्री अचानक दहेज पोलिसांची गस्त घालणारी गाडी तिथे आली . मी जागाच होतो त्यामुळे पोलिसांना भेटायला गेलो . आणि सुमारे दोन तास पोलिसांशी गप्पा मारल्या ! त्यांच्याकडून या भागातले अर्थकारण समाजकारण राजकारण अशा बऱ्याच गोष्टी कळाल्या . पोलिसांना मस्त चहा करून पाजला . त्यामुळे ते खुश झाले ! साध्वीच्या स्वयंपाक घरामध्ये तिच्या परवानगीशिवाय असा प्रवेश ती कोणाला करू देईल असा तिचा स्वभावच नव्हता ! परंतु तिने अगदी मनापासून मला मुक्तहस्त दिला होता . त्यामुळे मला पोलिसांना चहा करून पाजता आला . सकाळी सर्वजण उठल्यावर बाल भोग काय करायचा असा प्रश्न होता . रात्रीच्या बऱ्याच पोळ्या उरल्या आहेत असे माझ्या लक्षात आले . मग मी सर्वांना सुंदर असा कुस्करा करून खायला घातला . हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडला ! साध्वीला हा पदार्थ माहिती नव्हता ! तिने इथून पुढे असाच बालभोग करून सर्वांना खायला घालेन असे मला सांगितले .  सर्व आटोपून साध्वी मातेचा निरोप घेतला . अतिशय खंबीर पुरुषासाठी वावरणारी ती कठोर अंत:करणाची स्त्री आम्ही सर्वजण निघताना मात्र अचानक भावुक झाली . आणि डोळ्या वाटे तिने आम्हाला आर्द्र निरोप दिला . सर्वांचेच डोळे पाणवले . काल आम्ही आलो तेव्हा अतिशय अपरिचित वाटणारा हा आश्रम आता मात्र आपलाच आहे असा भाव मनामध्ये होता . एखादी गोष्ट आपलीच आहे असा भाव आपण जेव्हा मनामध्ये उत्पन्न करतो ना तेव्हा आपण केलेल्या कामाची गतीच काही न्यारी होऊन जाते ! ते काम एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते . सर्वांनी सडक मार्ग पकडला . मी गुपचूप किनारा गाठला ! मला एकट्याने नर्मदा माते सोबत चालायचे होते . त्यामुळे प्रचंड चिखल असलेला किनारा पकडून चालत राहिलो . 
नर्मदा मातेचे स्मरण ,दर्शन आणि स्पर्शन पुन्हा एकदा सुरू झाले !

 लेखांक ११३ : नवेठ्याचा सदानंद अवधूत आश्रम आणि शतवर्षीय भूरीभाई

नर्मदे हर सज्जन हो !
(सर्व वाचकांची सर्वप्रथम मनापासून क्षमा मागतो . परंतु पावसाळा सुरू होत असल्यामुळे आणि वृक्षारोपणासाठी हाच काळ सुयोग्य असल्यामुळे आपल्या सर्वांच्या मदतीने भाबरी या गावात आणि शूल पाणी झाडीच्या परिसरात ७०० देशी रोपे आणि १०० किलो बियांपासून बनविलेल्या दहा हजार बीज गोळ्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी काही काळ प्रत्यक्ष जाऊन राहावे लागले . या गावात मोबाईलची रेंज सोडा वीज देखील पोहोचलेली नाही . त्यामुळे लिखाण करता आले नाही त्याबद्दल मनापासून क्षमा मागतो . आपण आता आपली परिक्रमा पुन्हा एकदा सुरू करूयात ! नर्मदे हर ! )

कोलीयाद गाव सोडले आणि मैया च्या काठाने चालू लागलो . इथे एरंडी नावाची नदी आणि भादरी नावाची एक नदी जिला भुखी खाडी असं सुद्धा म्हणतात या दोन मुख्य जलदेवता आडव्या येतात .
इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे . आपण इतके दिवस नर्मदा मातेच्या दक्षिण ताटावरून चालत होतो . तेव्हा मैयाचे पाणी आपल्या मागून आपल्यापुढे वाहात होते . किंवा नर्मदा मातेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या उजव्या हाताकडून आपल्या डाव्या हाताकडे तिचा प्रवाह होता . आता मात्र आपण उत्तर तटावर आलेलो आहोत . इथे तिचे पाणी आपल्यासमोरून आपल्या मागे जाताना दिसते . किंवा तिच्याकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या हाताने आपल्या उजव्या हाताला तिचे पाणी वाहते . नकाशा भक्तांना सुद्धा मैया चा बदललेला प्रवाह आपण लक्षात घेणे आवश्यक आहे ! तसेच आपली चालण्याची उलटी झालेली गती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे . 
वरील नकाशामध्ये भगव्या रंगांमध्ये मैया चा प्रवाह कुठल्या दिशेला वाहतो आहे ते दाखवले आहे आणि निळ्या रंगाने आपण कुठल्या दिशेला जात आहोत ते दाखवले आहे . 
हाच नकाशा उभा जरी लावला तरी देखील याचा प्रवाह भगव्या रंगाच्या बाणाच्या दिशेला जात आहे आणि आपण मात्र निळ्या रंगाच्या बाणाच्या दिशेने जात आहोत हे पक्के डोक्यात ठेवावे म्हणजे दिशांच्या बाबतीत गडबड गोंधळ उडणार नाही .
मैया च्या काठाने असलेला गाळ आपल्या लक्षात येईल . 
इथे मैया च्या काठाने जरी आपण चालत असतो तरी मैयाच्या ज्याला पर्यंत जाता येत नसे . कारण मध्ये प्रचंड चिखल असायचा . कधी कधी हा चिखल पाच फूट तर कधी कधी १०० ते २०० मीटर असायचा . म्हणजे मैयाचे पाणी आपल्यापासून २०० मीटर लांब असायचे ! इथे नर्मदा जलाची चव ओहोटीमध्ये ८० टक्के गोड आणि २० टक्के खारट लागायची . भरतीच्या काळात हेच गणित उलटे व्हायचे ! मी प्रथमच एखाद्या नदीचा समुद्रसंगम इतक्या जवळून अनुभवत असल्यामुळे मला हे खूप मजेशीर वाटले ! अखेरीस काठाने चालता येणे अशक्य होऊ लागल्यावर आणि पुढे अतिशय कठीण अशी भुखी खाडी आडवी येणार आहे हे कळल्यामुळे किनारा सोडावा लागला . तुकाराम बुवा सुरवसे आधीच पुढे निघून गेले होते . मी वेगळी कलादरा भैसाली अशी गावे रानावनातून तुडवत कसा बसा भरूच महामार्ग गाठला . आज माझे पोट अतिशय गडबडलेले होते . गेले काही दिवस महिन्याचे स्वच्छ जल प्यायला मिळाले नव्हते . ज्या आश्रमात जाऊ तिथे आर ओ पाणी प्यायला मिळायचे .  आपण पाण्याला जीवन म्हणतो .परंतु रिव्हर्स ऑसमॉसिस नावाची प्रक्रिया करून या पाण्यातील सर्व जीवन संपवले जाते त्यामुळे हे मूर्तिमंत मृत पाणी असते ! आणि असे पाणी पिल्यामुळे पोट न बिघडले तरच नवल ! आहे की नाही गंमत ! लोकांचे पोट साधे पाणी पिल्यावर बिघडते ! परंतु परिक्रमावासींचे पोट आर ओ पाणी पिल्यामुळे बिघडायचे ! हाच अनुभव सोबतच्या अनेकांनी घेतला होता म्हणून सांगतो आहे ! आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेले क्षार आणि सूक्ष्म मूलद्रव्ये नदी आणि ओढ़े नाले यांच्या पाण्यातून आपल्याला मिळत असतात . आकडी हनुमान मंदिरासमोर एल अँड टी कंपनीचा जो आर ओ पाण्याचा प्रकल्प होता तो देखील एक छोटा समुद्र बांधल्यासारखाच जणूकाही होता . २१ मीटर खोल पाण्याची ती भव्य दिव्य टाकी होती .आणि त्यातून जलशुद्धीकरण करून ते पाणी विकले जायचे . आश्रमाला त्यांच्यातर्फे मोफत पाणी दिले जायचे . परंतु या पाण्यामुळे पोटाची सर्व गडबड उडाली . 
सुवा नावाच्या गावामध्ये शिंगणाथ महादेवाचे भव्य मंदिर होते .इथे काही काळ थांबलो आणि बालभोग घेतला .वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मिळाला .
शिंगनाथ महादेव सदाव्रत आश्रम सुवा .
 सुवा तालुका घागरा जिल्हा भरूच 
उत्तर तट गुजरात 
दुपारी बालभोग
(घोड्यावरून पडून झालेला अस्थिभंग आणि तो भरून यायच्या आत सतत हातात धरलेला दंड यामुळे एरव्ही बरे किंवा सुवाच्य असलेल्या माझ्या अक्षराची किती वाट लागली आहे ते आपल्याला इथे लक्षात येईल ! )
शिंगनाथ महादेवाच्या मंदिराचा परिसर फारच भव्य होता . इथे पक्षांना खायला घातले जायचे . पोपट मोठ्या प्रमाणात दिसायचे .
मंदिराचा कळस लक्षात राहील असा मोठा होता
मंदिर स्वच्छ पवित्र व सुंदर होते
श्री शिंगनाथ महादेव सुवा
श्री शिंगनाथ महादेव सुवा येथील शिवपिंडी
इथे शेजारीच एक अतिशय भव्य आणि सुंदर अशी गोशाळा होती . 
गुजरात मधील गीर साहिवाल वगैरे जनावरे फार प्रेमळ असतात
अगदी निर्धोकपणे लहान मुलांना आपण त्यांच्यासोबत सोडू शकतो ! सुवा गावातील मंदिराच्या या गो शाळेतील काही चित्रे आपण पाहतो आहे . 
इथून पुढे काठाने चालत रहियाद , कोलीयाद , वेगणी अशी गावे पार करत कलादरा गावात आलो .
वेगणी गावामध्ये वैजनाथाचे सुंदर मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले .
श्री वैजनाथ मंदिर वेगणी
श्री वैजनाथ महादेव वेगणी
कलादरा नावाच्या या गावामध्ये माझी आवडती कला दाखवत चांगला चार तास झोपलो . पोट बिघडते आहे असे वाटल्याबरोबर मी त्यामध्ये वरून अधिकचा भार भरणे बंद करून टाकायचो .त्यामुळे आज जेवणाचा प्रश्न नव्हताच.
एकंदरीत या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले असल्यामुळे परिसराचे पावित्र्य हरवल्यासारखे वाटत असे . कलादरा गावामध्ये कपालेश्वर महादेवाचे मंदिर आहे . 
श्री कपालेश्वर महादेव कलादरा
कलादरा गावामध्ये शॉफ्ट शिपयार्ड नावाची कंपनी असून इथून मध्यम ते मोठ्या आकाराची जहाजे जलावतरण करतात .ती कंपनीमध्ये आडवी आल्यामुळे किनारा सोडावा लागला . 
 शॉफ्ट शिपयार्ड कंपनीचे मुख्य द्वार
अशा पद्धतीच्या रुळावरून नका जलावतरीत केल्या जातात . ही प्रचंड मोठी कंपनी आहे .
त्याचबरोबर या भागामध्ये छोट्या व मध्यम आकाराच्या अनेक नौका आपल्याला दिसतात . ही नर्मदा मैया असली तरी देखील समुद्र असल्याप्रमाणेच तिचा वापर लोक करतात .कारण पात्रच तेवढे भव्य आहे . 
समुद्रासारखे भासणारे नर्मदा मातेचे पात्र
या भागामध्ये किनाऱ्याने चालताना असा प्रचंड गाळ तुडवावा लागला . वरचा पृष्ठभाग बऱ्यापैकी वाळलेला असायचा . परंतु पात्राच्या जवळ जाईल तसे चिखलात पाय रुतायचे . इथे एक गवताची काडी सुद्धा कुठे उगवलेली दिसत नाही . 
भरती ओहोटीमुळे तयार झालेल्या अशा प्रकारच्या गाळातून कित्येक किलोमीटर चाललो . चप्पल हातात घेऊन चालल्यामुळे पायाला खूप गारवा मिळायचा . हा एक अतिशय सुखद अनुभव होता .
मध्ये एक ओढा आडवा आला . इथे इतक्या छोट्या नौका होत्या की विचारू नका ! प्रत्येक नौकेने आजवर मारलेल्या माशांची संख्या मोजली तर किती मोठ्या प्रमाणात जीव हत्या झाली असेल याची कल्पनाच करवत नाही !
यातील प्रत्येक नौकेवर अनेक कुटुंबांचे जीवन अवलंबून होते . प्रत्येक नौकेला नाव व सरकारी नोंदणी क्रमांक देण्याची पद्धत इथे आहे . कलादरा गाव संपले की भूखी खाडी आडवी यायची . त्यापूर्वी नर्मदा सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एक मोठे मिठागार तिथे होते . समुद्राला भरती आली की त्याचे पाणी साठवून त्यापासून मीठ काढण्याची प्रक्रिया येथे केली जायची . मिठाचे भले मोठे ढीग लागलेले लांबून दिसत होते . अक्षरशः ट्रॅक्टरने मीठ गोळा केले जायचे . या संपूर्ण भागात खूप मिठागरे आहेत . फक्त हे नर्मदा मातेच्या नावाने काढलेले असल्यामुळे लक्षात राहिले . 
नर्मदा मातेच्या पात्रातून मिठाचे संकलन करताना ट्रॅक्टर
मिठाचे हे ढीग इतके प्रचंड होते की खूप दूरवरून दिसायचे
याही भागातील घरे अतिशय सुंदर होती ! छोटेसे घर असले तरी लाकडावर प्रचंड कलाकुसर केलेली असायची .
यानंतर आधी थोडेसे जंगल आणि मग उत्तम शेती पार करत चालत राहिलो . इथले लोक रस्ता खूप चांगला सांगतात . मला काहीही करून भरूच दहेज हा गुजरात राज्याचा राज्य महामार्ग क्रमांक सहा गाठायचा होता . इथे वन्य जीवन बरे होते . भरपूर अंतर तोडल्यावर अचानक शांततेचा भंग करणारा हा अजस्त्र महामार्ग आडवा आला ! मालवाहतूक तर इतकी चालू होती की विचारू नका ! इथे फक्त मालवाहतूक करणारे मालट्रक ,विविध कंपन्यांच्या मालकांच्या आलिशान गाड्या , कर्मचाऱ्यांच्या दुचाकी आणि कर्मचाऱ्यांची ने आण करणाऱ्या अक्षरशः शेकडो बसेस यांची अखंड ये जा सुरू होती .  भूखी खाडी आडवी आली . तिच्यावर एक पूल बांधलेला होता . खाडी पाहिल्यावर लक्षात आले की हिला भूखी का म्हणतात ! प्रचंड चिखलगाळ असलेली ही खाडी तिच्या उदरात शिरणाऱ्या प्रत्येक जीवाला खाऊन टाकायची ! इतका गाळ पार करता येणे अशक्य होते ! बरे झाले मी भूखी खाडी उतरून पार करण्याचा निर्णय घेतला नाही ! म्हणजे तसा मानस मी व्यक्त केला होता परंतु वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने मला तसे न करण्याचा सल्ला दिला होता .  ही खाडी किती भयानक आहे हे खालील चित्र पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही .
भरूच दहेज राज्य महामार्गावरून दिसणारी भूखी खाडी किंवा भादरी नदी
 खाडी अतिशय विस्तीर्ण आहे आणि ८० टक्के चिखलाने भरलेली असते .
या भादरी नदीच्या अगम्य पात्रामुळे सुमारे २० - २२ किलोमीटरचा फेरा पडला . भविष्यामध्ये सरकारने परिक्रमावासींसाठी प्रत्येक नदी ओढे नाले यांच्यावर चांगल्या दर्जाचे पादचारी पुल बांधले तर फार मोठे काम होणार आहे . आणि परिक्रमावासींचे चालण्याचे अंतर वाचून मुख्य म्हणजे नर्मदा मैया पासून त्यांना दूर जावे लागणार नाही . महामार्गावर तिवारी हा मौनी बाबा भेटला . यालाच चित्रकूट वाले बाबा असं सुद्धा म्हणायचे . हा अतिशय सज्जन सात्विक आणि सरळ माणूस होता . निष्कपट आणि निष्पाप होता . सतत चेहऱ्यावर हास्य असायचे . मनामध्ये गप्पा मारणारा तो हाच ! याच्यासोबत महामार्गावरून सुमारे १२ किलोमीटर आंतर चाललो . महामार्गाचा दर्जा अतिशय उत्तम होता . मी भारतामध्ये बऱ्यापैकी सर्व राज्य फिरलेलो आहे . एक महाराष्ट्र वगळता सर्वच राज्यांमध्ये खूप चांगले रस्ते आहेत . महाराष्ट्र मधलेच महामार्ग इतके भंगार का आहेत याचा खरे म्हणजे आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे . प्रचंड प्रमाणात टोल वसूल करूनही महामार्ग मात्र अतिशय टुकार दर्जाचे बांधण्याची स्पर्धा महाराष्ट्रातील कंत्राटदारांमध्ये लागलेली असते . रस्ते बनविण्याची कंत्राट घेणारे माझे काही मित्र आहेत . त्यांनी असे सांगितले की जितके पैसे महामार्गासाठी सरकारकडून दिले जातात त्यातील बहुतांश पैसा स्थानिक लोकप्रतिनिधींना  द्यावाच लागतो . त्यामुळे उरल्या सुरल्या रकमेत जमेल त्या दर्जाचे कार्य करावे लागते . मग कधी रस्त्याची रुंदी कमी करून माल वाचविला जातो तर कधी रस्त्याची जाडी कमी करून माल वाचविला जातो तर कधी मालाचा दर्जा निकृष्ट वापरून पैसा वाचविला जातो . नुकताच म्हणजे जून २०२४ मध्ये मी शुलपाणीच्या झाडीमध्ये जाऊन दिनेश फोदला पावरा याला वृक्षारोपणासाठी मदत करीत असताना तिथे रस्त्याचे काम सुरू होते हे आपल्याला सांगितलेच . इथे मी निघताना रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते . आणि काही भाग तयार झाला होता . पहिल्याच पावसामध्ये यातील बहुतांश रस्ता संपूर्ण वाहून गेला ! आता बोला ! 
शुलपाणीच्या झाडीमध्ये भाबरी या गावामध्ये जून २०२४ रोजी सुरू असलेले रस्त्याचे काम
रस्त्याचे काम कसे काय सुरू आहे हे उत्कंठेने पहात बसलेला दिनेश फोदला पावरा आणि ग्रामस्थ
दुसऱ्याच दिवशी पावसामुळे रस्त्यावर वाहून आलेली माती आणि मातीमध्ये वाहून गेलेला रस्ता .
याच ठिकाणी केलेला एक व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चैनल वर टाकला आहे पहा . तिथे मी असे म्हटले होते की पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाऊ शकतो आणि तसेच झाले आहे . परंतु हे एकाच दिवसात होईल असे वाटले नव्हते . किती दुर्दैव आहे .
तिवारी बाबा मौनामध्ये असला तरी त्याला हवे ते सर्व तो सांगू शकायचा . त्याची देहबोली खूपच बोलकी होती ! त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि हसू असे दोन भाव कायम दिसायचे ! त्यामुळे तो लहान बाळासारखा दिसायचा ! तो अजूनही परिक्रमेमध्येच आहे . नुकत्याच एका व्हिडिओमध्ये मला तो दिसला . याला हॉटेलमध्ये चहा प्यायला आवडायचे . मध्ये एक-दोन चहा वाल्यांनी बोलावल्यावर लगेच गेला ! आपण एका वाहत्या महामार्गावर आहोत हे तो विसरून जायचा ! शहरात फारसे राहिलेले नसतात त्या लोकांना रस्त्याचे गंभीर्य कळत नाही हे खरे आहे . आपण शहरी लोक मात्र अति चिकित्सा करत रस्ता ओलांडतो .आणि ते एकादृष्टीने योग्यही आहे . हा महामार्ग कंटाळवाणा होत होता . कारण मैयाचे दर्शन होत नव्हते . अखेरीस बरेच अंतर चालल्यावर नवेठा नामक गाव आले .इथे महामार्गावरच उजव्या हाताला श्री सदानंद अवधूत आश्रम नावाचा घरगुती आश्रम होता . म्हणजे खरे तर घरच ते . परंतु परिक्रमावासींची सेवा करत असल्यामुळे धन्य असा गृहस्थाश्रम तो ठरला होता . सुंदर जुन्या पद्धतीचे कौलारू बांधकाम होते . वरती श्री सदानंद अवधूत आश्रम अशी गुजराती भाषेतील पाटी लाकडाच्या पट्टीला ठोकण्यात आली होती व ती खूप छान दिसत होती .बाहेर थोडासा वरंडा होता व त्यात झोपाळा बांधला होता . घर व परिसर अतिशय स्वच्छ होता . इथे मागच्या बाजूला परिक्रमावासींसाठी एक बंगले वजा खोली बांधून त्यावर गच्ची केलेली होती . सध्या या वास्तूचे नूतनीकरण झाले आहे असे गुगल नकाशा वरील चित्रे पाहिल्यावर दिसते . 
हा आश्रम संत श्री मांगीराम शर्मा आपल्या पत्नीसह चालवत होते त्यांना एक मुलगा व दोन नाती होत्या त्यातील हंसिका शर्मा नावाची छोटुकली भलतीच शिष्ट होती ! आश्रमामध्ये मी गेल्याबरोबर त्याचे मागच्या बाजूला असलेल्या बंगले वजा खोलीकडे जाण्याचा इशारा मला केला . इथे केरळी संन्यासी आणि मी नागा आहे सांगणारा नागा बाबा हे आधीच येऊन बसले होते . नागा बाबा ,केरळी संन्यासी आणि धुळेकर या तिघांचे भलतेच फाटलेले दिसत होते . दक्षिण तटावर बहुतांश काळ हे तिघे एकत्र चालत होते .परिक्रमेमध्ये मी ही गंमत फार पाहिली ! गटाने जे परिक्रमा करतात त्यांच्यामध्ये बरेचदा फार मोठ्या प्रमाणात भांडणे होतात ! ती लगेच मिटतात सुद्धा . परंतु भांडण होतात हे मात्र खरे आहे . मग रुसवे फुगवे अबोले धरणे हे सर्व प्रकार चालतात ! मला इतकेच वाटायचे की जर हेच सर्व करायचे आहे तर मग परिक्रमेला यायची काय गरज आहे ? हे तर आपण घरी बसून सुद्धा करू शकतो की ! केरळी साधू माझ्यावरती अजून चिडलेला होताच . नावे मध्ये बसून समुद्र पार करताना तो बस म्हणाला हे मी ऐकले नाही याचा त्याला राग आलेला होता . म्हणजे तसा तो माझ्यावर चिडत वगैरे नव्हता परंतु विचारलेल्या प्रश्नांची उडवा उडवीची उत्तरे देणे किंवा उत्तरच न देणे असे करत होता . याचा स्वभाव अतिशय शीघ्र कोपी होता . परंतु माझ्या दृष्टीने तो मनुष्य अतिशय परमपूज्य होता याचे एकमेव कारण म्हणजे केरळ या धर्माचा सर्वाधिक ऱ्हास झालेल्या राज्यातून येऊन देखील तो हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च संन्यास आश्रमाचा स्वीकार केलेला एक मल्याळी मनुष्य होता ! त्यामुळे मी कधीही त्याच्याशी भांडलो नाही किंवा मर्यादा ओलांडून बोललो नाही . त्यालाही मी त्याला आदर देतो आहे हे लक्षात आल्यावर त्याचा राग शांत झाला आणि नंतर त्याची माझी खूप चांगली मैत्री झाली . केरळ मध्ये झालेली धर्महानी या विषयावर बोलताना त्याचा कंठ दाटून यायचा . कधी कधी वाटते की संन्यास घेऊन चूक केली असे त्याला वाटायचे . कारण संन्यास घेतला असला तरी केरळमध्ये संन्यासी करू शकत नाहीत हे धगधगीत वास्तव त्याने मला सांगितले . त्याला हिंदी शिकावेच लागले कारण संपूर्ण भारतात संन्याशाला फिरावे लागते . केरळमध्ये आणि काश्मीरमध्ये संन्यासी उजळ माथ्याने फिरू शकत नाहीत हे जळजळीत कटू वास्तव आहे . या आश्रमामध्ये भुरी भाई नावाचा एक सेवेकरी होता . त्याला वय विचारले तर तो अंदाज पंचे ८० असावे असे सांगायचा . मालकांना विचारले तर ते शंभर वय असेल असे सांगायचे . परंतु माझ्या अंदाजानुसार त्याचे वय ८५ ते ९० असावे . गेली पन्नास वर्षे सलग तो या घरामध्ये राहून परिक्रमावासींची सेवा करत होता !पाठीमध्ये हा पूर्णपणे वाकलेला होता . गुडघ्यामध्ये डोके घालून सर्व काम चालायचे .परंतु तरीदेखील अखंड काही ना काही काम करताना भुरी भाई दिसायचे .यांनी माझ्याशी खूप गप्पा मारल्या ! यांच्याकडून अनेक परिक्रमावासीं बद्दल मी ऐकले .असा एखादा अनुभवाचा खजिना दिसला तर तो लुटल्याशिवाय पुढे जाईल तो मी कसला ! भुरी भाई चे गुडघे उघडत नव्हते . सतत एका स्थितीमध्ये बसून गुडघ्यांना तोच आकार प्राप्त झाला होता . मला परिक्रमेच्या अगदी सुरुवातीला मणेरी नावाच्या गावामध्ये डॉक्टर प्रल्हाद पटेल यांच्या दवाखान्यात शेजारी असलेल्या नामदेव यांनी हाताला लावण्यासाठी एक औषधी तेल दिले होते ते माझ्याकडे पडून होते .मला अचानक त्या तेलाची आठवण झाली आणि मी भुरी भाई यांना पाय चांगले दाबून दिले आणि तेलाने चांगला मसाज गुडघ्याला करून दिला . त्यांना खूप बरे वाटू लागले ! आता हे तेल नित्य लावत जावे असे मी त्यांना सांगितले . त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून मला गहिवरून आले . इतकी शारीरिक झीज झालेली असताना सुद्धा स्वतःचा विचार न करता ते केवळ परिक्रमा वासींना काय हवे काय नको इतकेच ते पाहत असत . किती पुण्य त्यांनी कमावले असेल याचा हिशोब लावता येणे अवघड आहे ! शर्मा दाम्पत्य देखील त्यांची खूप काळजी घ्यायचे . ते जोपर्यंत कार्यरत आहेत तोपर्यंत त्यांना त्रास होणार नाही असा योग्य विचार त्यांनी केलेला होता . 
हाच तो नवेथा गावातील सदानंद अवधूत आश्रम
मांगीलाल शर्मा यांचे घर खूप सुंदर आहे !कमी संख्या असेल तर घराच्या दारातच परिक्रमावासी उतरतात .
ही शर्मा यांची शिष्ट नात ! परंतु अतिशय गोड होती ! साक्षात छोटी नर्मदा मैयाच !
घराच्या मागे बाणाने दाखवलेल्या वास्तूमध्ये मी आसन लावले होते आणि वरती गच्चीकडे जाणारा जो जीना आहे त्यातून गच्चीत जाऊन विश्रांती घेतली होती .
हेच ते भुरी भाई सेवेकरी ! हे असे बसलेल्या अवस्थेत चालायचे ! तशीच सर्व कामे करायचे .मांगीराम शर्मा यांच्या चिरंजीवांनी हा फोटो काढून माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
सदानंद अवधूत आश्रमाचा भुरी भाई यांनी प्रस्तुत लेखकाच्या वहीमध्ये मारून दिलेला शिक्का
इकडे प्रस्तुत लेखकाच्या पायामध्ये आपल्याला आठवे पादत्राण दिसेल जे वाटते एका दुकानदाराने मला दिले होते .ते फॅन्सी सॅंडल होते त्यामुळे त्यात फारसा दम नव्हता . परंतु काही दिवस त्याने मला साथ दिली .
मी पादत्रांच्या माहितीवर इतका भर का देतो आहे असा प्रश्न कदाचित वाचकांना पडू शकेल . परंतु बहुतांश परिक्रमावासी एक दोन किंवा फार फार तर तीन पादत्राणे वापरून परिक्रमा पूर्ण करतात . काही परिक्रमा वासी तर मला असे देखील भेटले ज्यांनी एका पादत्राणावर दोन वेळा परिक्रमा केली आहे . परंतु मला मात्र भरपूर पादत्राणे लागत होती .  कदाचित मैय्या काठावरील मार्गाची काठिण्य पातळी हे त्याचे कारण असावे .ही माहिती सुद्धा जिज्ञासू आणि तज्ञ लोकांसाठी लिखित स्वरूपात उपलब्ध रहावी इतकाच हेतू आहे. असो .
रात्री शर्मा का कोणी अतिशय सुंदर असे भोजन करून आणून दिले . त्यांनी माझी थाळी पाहिली . ती अतिशय जड होती . त्यांनी मला विचारले की एखादी कमी वजनाची थाळी त्यांनी मला दिली तर चालेल का ? मी हो म्हटल्याबरोबर त्यांनी अतिशय पातळ व माझ्या थाळीच्या आकाराची थाळी मला आणून दिली . मी माझी जड थाळी आश्रमात ठेवून दिली . अशा रीतीने ग्वारीघाट येथील झुलेलाल आश्रमापासून इथपर्यंत त्या जड थाळीने मला चांगली साथ दिली ! जड थाळीचा जड अंत:करणाने निरोप घेतला ! हलकी थाळी फारच सुंदर हलकीफुलकी होती ! परिक्रमेमध्ये पाठीवरील वजन कमी होण्याचा आनंद काय असतो हे केवळ परिक्रमा वासीचच  जाणोत ! सुंदर असे सुग्रास भोजन त्या थाळीमध्ये खाल्ल्यावर झोपण्यासाठी मी गच्चीत गेलो . कारण मी क्वचित प्रसंगी घोरायचो . त्याचा त्रास केरळी बाबाला होऊ नये अशी इच्छा होती . गच्ची मध्ये देखील शांतता नव्हती कारण सतत वाहतूक रस्त्यावरून सुरू च होती . रात्रपाळीच्या कामगारांना घरी सोडणाऱ्या आणि कामावर घेऊन जाणाऱ्या बसेसची अक्षरशः गर्दी त्या रस्त्यावर होती ! दहेज हा नवीनच विकसित होत असलेला 'इंडस्ट्रियल कॉरिडॉर ' आहे . आणि हा औद्योगिक परिसर निश्चित अर्थाने खूप वाढेल या शंकाच नाही . आकाशातील चांदण्या बघत कधी डोळा लागला कळाले नाही . पहाटे लवकर जाग आली .डोलडालची चांगली व्यवस्था येथे होती . म्हणजे तसे सर्व परिक्रमावासी शेतात वगैरे जायचे . परंतु शर्मा काकूंनी मला रात्री सांगून ठेवले होते की त्यांच्या घराच्या मागे असलेले त्यांचे खाजगी शौचालय मी वापरू शकतो .शौचालयाच्या किल्ल्यांची जागा सुद्धा त्यांनी मला दाखवून ठेवली .हे फारच मोठे उपकार झाले त्यांचे ! शक्यतो स्वच्छता प्रिय मनुष्य कोण आहे हे पाहता क्षणीच अनुभवाने या लोकांच्या लक्षात येत असावे .
किती दुर्दैव आहे पहा ना ! पिण्याचे पाण्याचा नळ शौचालय अशा ठिकाणी कुलूप लावायची पाळी आपल्या देशात येते ! अगदी रेल्वेतील टमरेलला सुद्धा साखळी लावून कुलूप लावलेले असते ! पाणपोई वरील पेल्याला सुद्धा साखळबंद कुलूप लावलेले असते ! आपल्याला अजून या सर्वातून बाहेर पडायला किती वर्ष लागतील काय माहिती ! असो .अन्य परिक्रमावासी जागृत होण्याच्या आधीच मी तिथून चहा प्रसादी घेतल्यावर शांतपणे काढता पाय घेतला .हा मुक्कामाचा दिनांक होता ७ एप्रिल २०२२ . आणि हा परिक्रमेतील माझा ९६ वा मुक्काम होता . आता लवकरच मैयाचे दर्शन मला घडणार होते ! त्यामुळे अतिशय वेगाने पावले टाकत मैयाच्या दिशेने निघालो !

 लेखांक ११४ : भारभूतेश्वर , टिंबी दशानचा महाकाल व त्रिगुणातीत ध्यान आश्रम

नवेठ्याचा सदानंद अवधूत आश्रम सोडल्यावर कधी एकदा नर्मदा मातेचे दर्शन घेतो असे मला झाले होते .त्यामुळे अतिशय वेगाने पावले टाकत सकाळच्या थंड वातावरणामध्ये नर्मदा मातेच्या दिशेने निघालो . जे लोक कायम समुद्रापासून लांब राहिले आहेत त्यांना नदीचा त्रिभुज प्रदेश हा किती विचित्र प्रकार असू शकतो याची कल्पना करता येणे अवघड आहे . परंतु कित्येक मैल जागा पाय ठेवण्याच्याच काय साधी नाव नांगरण्याच्या योग्यतेची सुद्धा राहिलेली नसते इतका गाळ करोडो वर्षे त्या नदीने तिथे आणून गोळा केलेला असतो . त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा किनारा सोडावा लागला होता .परंतु आता मात्र भारभूतेश्वर किंवा भाडभूत या स्थानापासून मैया चा सहवास पुन्हा लाभणार होता .
रस्ता सरळ होता . दुतर्फा शेती होती . इथे समुद्र जवळ असल्यामुळे थंडी अशी नव्हतीच . हवेत विचित्र दमटपणा होता . परंतु सूर्याचा दाह नसेपर्यंत अधिकाधिक चालून घेतलेले बरे असते . परंतु पोटाचे तंत्र अजून काही दुरुस्त झालेले नव्हते . आणि हमरस्त्यावर असल्यामुळे डोलडालची अडचण झाली होती . चालताना अचानक तीव्र कळ पोटात आली . आणि काय करावे तेच मला कळेना . मी पोट धरून खाली वाकलो , इतक्यात दुचाकीवरून जाणारा एक मनुष्य माझ्या शेजारी थांबला आणि म्हणाला बाबा इस खेत मे जाओ और डोलडल बैठो . मी त्याच्याकडे पाहू लागलो की याला कसे कळाले ? तो म्हणाला चिंता मत करना मेरा ही खेत है । माझी देहबोली पाहून त्याने माझी समस्या ओळखली होती ! आणि तत्काळ उपायोजना देखील सांगितली होती ! सुदैवाने शेतात जाण्याची पाळी माझ्यावर आली नाही . याच्या शेताच्या अलीकडेच  एक जंगल वजा भाग शिल्लक राहिला होता . तिथे कार्यभाग साधला . त्याने हुशारी करून शेताला पाणी सोडून दिले . त्यामुळे थोड्याच वेळात माझ्या आजूबाजूने पाणीच पाणी वाहू लागले . त्याच क्षणी मी निश्चय केला . की आता काहीही होऊ दे , आरो पाणी प्यायचे नाही . कितीही खारट असले तरी मैयाचेच पाणी प्यायचे . एरव्ही सुद्धा बाहेर कुठल्याही गावी गेल्यावर मी विकतचे पाणी कधीच पीत नाही . किमान पेलाभर का होईना त्या गावचे पाणी प्यावे . आधुनिक वैद्यक शास्त्राने सुद्धा आता हे मान्य केले आहे की त्यामुळे पोटातील उदरस्थ जीवाणू किंवा सोप्या मराठीमध्ये गट बॅक्टेरिया सुधारण्यास मदत होते .त्याने कदाचित पहिल्यांदा पोट बिघडते परंतु पुढच्या वेळेला मात्र आपले शरीर त्या पाण्यासाठी प्रतिकारक बनते . मी भाडभुत गावामध्ये पोचलो तेव्हा नुकताच सूर्य दिसू लागला होता . गावात एक मोठा तलाव आहे . त्याला वळसा मारून गेल्यावर नर्मदा मातेचा सुंदर किनारा लागतो . इथे केवट समाजाने एक सुंदर आश्रम बांधलेला आहे . समोरच भारेश्वर महादेवाचे मंदिर आहे .सोमेश्वराचे मंदिर देखील आहे . मी केवट आश्रमामध्ये सामान ठेवून मंदिरात दर्शनासाठी गेलो . एक पुजारी बाबा स्टायलिश पद्धतीने बसून प्रसाद वाटत होते . मला त्यांच्या त्या शैलीची खूप मौज वाटली ! बाहेर येऊन बघतो तर तुकाराम बुवा सुरवसे इथेच मुक्कामाला राहिलेले होते ! मला पाहिल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला ! दोघांनी प्रेमाने एकमेकांना नर्मदेहर केले ! मी तुकाराम महाराजांना त्या पुजारी बुवांबद्दल सांगितले . तुकोबारायांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मला त्यांचे अनुभव सांगितले ! हा मंदिर परिसर खूप भव्य होता परंतु तरीदेखील इथून नर्मदा मातेचे इतके भव्य दिव्य दर्शन होत होते की मंदिराचा परिसर त्यापुढे छोटासा वाटत होता ! बाहेर नजर जाईल तिथवर नावाच नावा दिसत होत्या ! नर्मदा मातेच्या कृपेने या भागातील केवट समाज कोट्याधीश नव्हे अब्जाधीश आहे ! प्रत्येक घरामध्ये अनेक नावा आहेत ! जन्माला आल्यासारखी एक तरी नाव स्वतःची निर्माण करायचीच असा संकल्प प्रत्येक केवट बालक करत असते !  या भागात मोटरसायकलवर आलेले एक परिक्रमा वासी भेटले . त्यांनी तुकोबारायांच्या सोबत माझा फोटो काढला . आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . आमच्या गप्पांमध्ये ते देखील सामील झाले होते त्यामुळे त्यांनी गुपचूप जाऊन पूजाऱ्याचा फोटो देखील मारून आणला ! बाईक परिक्रमेतील अनुभव कसे असतात हे समजून घेत काही काळ तिथे मैयाचे दर्शन घेत बसलो आणि अखेरीस न रहावून थेट स्नानासाठी उतरलो ! चालत जाऊन उतरता येणे शक्य नव्हते , त्यामुळे एका नावेतून गेलो आणि टोकावरून उतरून स्नान केले . पाणी दिसायला गडूळ होते . परंतु सणावाराला हळदी कुंकवाला नटून थटून जाणारी सवाष्ण आई काय किंवा धुणे भांडी केर फरशी करून थकून आलेली आई काय , मुलाला आई ती आईच ! नर्मदा मातेचे निवळ शंख पाणी असो , किंवा असे डहुळलेले रेवा जल असो तिचा केवळ स्पर्शच परमपवित्र करणारा आहे ! आपणही या घाटावरील रेवा मातेचे दर्शन घ्यावे ! तिचे पावित्र्य अनुभवावे ! मन किती शांत होते पहा ! आनंदाच्या लहरी सर्वांगामध्ये उमटतात ! म्हणतात ना गंगेच्या स्नानाने पापे जातात , तर नर्मदेच्या केवळ दर्शनाने पापे जळतात !
याबाबतीतला एक पौराणिक श्लोक प्रसिद्ध आहे .
स्कंद पुराणाच्या रेवाखंडामध्ये हा श्लोक येतो .राजा युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींना विचारतो की नर्मदा नदी सर्व नद्यांमध्ये उत्तम का आहे ते कृपया मला सांगावे .
कथमेषा नदी पुण्या सर्वनदीषु चोत्तमा ।
नर्मदा नाम विख्याता भूयो मे कथयानघ ॥ २१.२ ॥
त्यावर मार्कंडेय महामुनी फार सुंदर उत्तर देतात .ते म्हणतात , 
नर्मदा सरितां श्रेष्ठा सर्वपापप्रणाशिनी ।
तारयेत्सर्वभूतानि स्थावराणि चराणि च ॥ २१.३ ॥
हे राजा सर्व पापांचा नाश करणारी नर्मदा नदी ही सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे . ती केवळ जीव जंतूंना नव्हे तर स्थावर जंगम सर्वांनाच मोक्ष देणारी आहे .
नर्मदायास्तु माहात्म्यं यत्पूर्वेण मया श्रुतम् ।
तत्तेऽहं सम्प्रवक्ष्यामि शृणुष्वैकमना नृप ॥ २१.४ ॥
मी नर्मदा मातेचे जे काही महात्म्य ऐकलेले आहे ते तुला सांगतो .
गङ्गा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ।
ग्रामे वा यदि वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा ॥ २१.५ ॥
गंगा नदी कनखलक्षेत्रामध्ये पुण्य दात्री आहे तर सरस्वती कुरुक्षेत्रामध्ये विशेष पुण्य प्रदान करणारी आहे परंतु खेड्यापाड्यात वाहत असो किंवा अरण्य क्षेत्रामध्ये वाहत असो नर्मदा मात्र सर्वत्र समान पुण्य देणारी आहे .
त्रिभिः सारस्वतं तोयं सप्ताहेन तु यामुनम् ।
सद्यः पुनाति गाङ्गेयं दर्शनादेव नार्मदम् ॥ २१.६ ॥
सरस्वतीच्या जलाने तीन दिवस स्नान केल्यावर जे पुण्य मिळते किंवा यमुना मातेच्या सात दिवसाच्या पुण्य मिळते किंवा गंगा नदी मध्ये स्नान केल्यावर जे पुण्य मिळते ते नर्मदेच्या केवळ दर्शनाने प्राप्त होते ! 
हे माझे बोल नाहीत बरं ! ज्यांनी नर्मदा परिक्रमा ही परंपरा सुरू केली त्या मार्कंडेय महामुनींचे हे बोल आहेत ! ते फोल कसे ठरतील ! आपण स्वतःच अनुभव घेऊन पहा !
नर्मदा मैया च्या केवळ दर्शनाने प्रस्तुत लेखकाला झालेला आनंद ! आणि तो आनंद आपल्यासोबत वाटताना अजूनच आनंद वाटतो आहे ! आनंदाचे डोही आनंद तरंग ! आनंदची अंग आनंदाचे !
तुकाराम बुवा सुरवसे आणि प्रस्तुत लेखक भाडभूतेश्वराच्या घाटावर
 भारभूतेश्वर चे गुरुजी ( द्विचक्री वरून परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासी ने काढलेला भांकालेख किंवा फोटो )
प्रस्तुत लेखकाचे वरील फोटो याच जिन्यावर उभे राहून काढलेले आहेत .
श्री भारेश्वर अथवा श्री भारभूतेश्वर महादेव
मंदिर परिसर मोठा असून येथे अनेक लहान मोठी मंदिर आहेत .
अनेक मुखी शिवलिंग
भरपूर शिवलिंगे पाहिल्याशिवाय आपल्या शिवभक्तांचे समाधानच होत नाही ! घ्या दर्शन !
विषय निघालाच आहे म्हणून इथेच चालू असलेल्या एका मोठ्या प्रकल्पाविषयी थोडीशी तोंड ओळख करून देतो . हा प्रकल्प इतका अवाढव्य आहे की तो भूखी खाडीच्या अलीकडे मी होतो तिथूनही मला दिसत होता व इथून देखील त्याचे अस्तित्व जाणवत होते . या प्रकल्पाचे नाव आहे भाडभुत बॅरेज प्रकल्प . 
भारभूत रेवा प्रवाह परिवर्तन प्रकल्प
बॅरेज ला मराठी मध्ये काय म्हणतात मला माहिती नाही परंतु याचे कार्य धरणापेक्षा वेगळे असते . त्याला जल उपसा प्रकल्प देखील म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये पाणी उपसले जात नाही तर फक्त पाण्याची दिशा बदलली जाते आणि प्रवाह परिवर्तित केला जातो . त्यामुळे आपण याला भारभूत रेवाप्रवाहपरिवर्तन प्रकल्प असं म्हणू शकतो . धरणामध्ये पाणी अडविले जाते आणि मुख्यत्वे कडून साठवले जाते . इथे पाणी न अडविता छोट्या छोट्या भिंतींच्या साह्याने त्याचा मार्ग बदलला जातो आणि शेतीसाठी किंवा अन्य कामासाठी ते वापरले जाते . त्यामुळे पाण्याची पातळी फारशी वाढत नाही . इथून समुद्र सुरू होत असल्यामुळे समुद्राला जाऊन मिळणारे गोडे पाणी वाचवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे . सरदार सरोवर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून नर्मदा पात्रामध्ये होणाऱ्या गोड्या पाण्याचा विसर्ग फारच कमी झाला आहे . या प्रकल्पाचे अभियंते राहिलेल्या एका सज्जनांनी नुकतीच मला अशी माहिती दिली की यातील केवळ क्रमांक एकचा कालवा चार हजार क्युसेक या गतीने पाणी उपसतो आहे ! त्यांनी नर्मदा परिक्रमा देखील केलेली आहे . गोड्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे समुद्राचे पाणी उलटे आत शिरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे भरून परिसरातील जमिनी खारफुटी झाल्या आहेत . तसेच कुपनलिका आणि विहिरी यांचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही . यावर उपाय म्हणून गुजरात शासनाने गल्फ ऑफ खंबात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अर्थात खंबातच्या आखाताचा विकास करणारा एक प्रकल्प कल्पसार या नावाने चालू केलेला आहे . नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता . त्याच्या अंतर्गत या बंधाऱ्याचे बांधकाम दोन्ही बाजूने सुरू आहे . यावरून सहा पदरी महामार्ग जाणार असल्यामुळे तो देखील एक लाभ स्थानिक जनतेला होणार आहे . एकूणच या प्रकल्पाचे उद्दिष्ट चांगले दिसते आहे . परंतु सरदार सरोवर प्रकल्पाच्या वेळी झालेल्या चुकांमुळे करावे लागलेले हे पापक्षालन आहे . 
भारभूत प्रकल्पाची भव्यता
उभ्या भिंती अथवा बॅरेजेस च्या साह्याने प्रवाहाचे केलेले परिवर्तन
प्रकल्पासाठी सुमारे ४१०० कोटी रुपयांचे बजेट देण्यात आलेले आहे
या एका चित्रावरून प्रकल्पाची भव्यता लक्षात यावी .प्रकल्पाची भव्यता सांगणे हा हेतु नसून इतका भव्य प्रकल्प जिच्यावर होतो आहे ती आमची नर्मदा माता किती भव्य असेल हे मनात ठसविणे हा उद्देश आहे !

या प्रकल्पने ६० कोटी घनफूट गोडे पाणी साठणार आहे जे शेती व्यावसायिक कारणे आणि पिण्यासाठी वापरता येणार आहे . शुक्ल तीर्थापर्यंत गेलेले खारे पाणी यामुळे कमी होणार आहे . पुरांचे प्रमाण कमी होणार असून त्यामुळे होणारी सुपीक जमिनीची धूप थांबणार आहे . या पूर प्रतिबंधक भिंतीची लांबीच वीस किलोमीटर आहे ! कारण पूर आला की नर्मदा मातेचे या भागातील पात्र आरामात तेवढे फुगते ! यावर बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे दहेज आणि सुरत या दोन महत्त्वाच्या बंदरांमधील अंतर ३७ किलोमीटरने कमी होणार आहे . प्रथेप्रमाणे याही प्रकल्पाला काही डाव्या संघटनांचा विरोध सुरू आहे . मनात विचार आला की भविष्यामध्ये भुईला भार करणारा एखादा प्रकल्प इथे होणार आहे हे महादेवांना आधीच कळले की काय म्हणून भारभूतेश्वर बनून येथे राहिले ! सरकार त्याचे काम करत आहे . राष्ट्र विघातक शक्ती त्यांची कामे करत आहेत . परिक्रमावासी ने त्याचे काम केले पाहिजे ! ते म्हणजे तटस्थपणे सर्व गोष्टींची नोंद करून पुढे चालू पडणे ! चला तर मग जाऊयात पुढे ! अरे हो जाण्यापूर्वी आश्रमाचा शिक्का वहीमध्ये घेणे आवश्यक आहे ना !हा पहा घेतला शिक्का ! 



श्री अंबिका धाम सेवा सत्संग ट्रस्ट प्रभुज
त्याच आश्रमाचा दुसरा शिक्का आहे .
केवट आश्रम
श्री अंबिका धाम सेवा सत्संग ट्रस्ट 
ट्रस्ट रजिस्ट्रेशन क्रमांक १७९९ भरूच 
मुक्काम भाडभूत तालुका भरुच
पोटाची गडबड उडालेली असल्यामुळे इथे भोजन प्रसाद न घेता मी तसाच उपाशीपोटी पुढे निघालो . आता मैया शेजारी आल्यामुळे सर्व पीडा दुःख वेदना जाणीवा नष्ट झाल्या होत्या . फक्त तिचे ते भव्य स्वरूप पाहायचे ! आतापर्यंत तिच्या काठावरून चालताना प्रचंड झाडी शेती तुडवावी लागायची परंतु इथे तिचे रूप असे आगळे होते की पायाखाली मऊशार वाळूचा कित्येक किलोमीटर लांबीचा किनारा चालायला मिळाला ! असा सलग पाच-सहा किलोमीटर चा पट्टा अख्ख्या नर्मदा खंडात कुठे नाही ! वाळू रंगाने काळसर होती . किंबहुना ती वाळू नव्हतीच . तो होता रेतीमिश्रित गाळ . त्यामुळे मी सॅंडल हातात घेऊन त्या सुंदर थंडगार गाळाचा स्पर्श अनुभवत कित्येक किलोमीटर चाललो ! एका वेगळ्याच भावावस्थेमध्ये हे चालणे घडत होते . आश्चर्य म्हणजे इथे एकही मनुष्य नव्हता . हजारो नावा लावलेल्या होत्या परंतु नावाडी एकही दिसायचा नाही ! बहुतेक अक्षय तृतीया झाल्यावर नावा समुद्रामध्ये काढतच नाहीत त्याचा हा परिणाम असावा ! परंतु त्यामुळे जो काही एकांत चालताना मिळाला तो आवर्णनीय होता , अतुलनीय होता ! 

केवट आश्रमा समोरच्या नावा जिथे मी स्नान केले होते .

सर्वत्र नौकांचे साम्राज्य होते .


परंतु किनारा निर्मनुष्य असल्यामुळे फार आनंददायी होता .

नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये तयार झालेले आलिया बेट . चहू बाजूने नर्मदा मातेच्या पाण्याने वेढलेले हे एक वेगळेच जग आहे .

भाडभूतच्या केवट आश्रमापासून वाढवा दशान पर्यंत मैयाच्या काठाने चालण्याचा आनंद आवर्जून घ्या !


मध्ये वडवा गावामध्ये ऋणमुक्तेश्वराचे मंदिर लागले .


मंदिरातील देवतांची अवस्था दयनीय होती . 
प्रत्येक मोठ्या शहराच्या पूर्वी जी एक सामाईक गोष्ट मला आढळली होती ती इथे देखील आढळली .ती म्हणजे धनिकांचे नर्मदे काठी असलेले मोठे मोठे प्रासाद . फक्त इथले असे प्रासाद हे अधिकांश अरबी व्यापाऱ्यांचे होते . अरबस्थानातील बहुतांश व्यापार हा पूर्वीपासून भरूच बंदराद्वारेच होतो आहे . त्यामुळे या एकूणच परिसरामध्ये अरब धार्जिणी वस्ती जास्त आहे .

 नर्मदा मैया च्या काठावर परिक्रमा मार्गातच जमीन घेऊन अशा प्रकारचे ऐशोआराम करणारे प्रासाद बांधण्याचे प्रमाण सध्याच्या पिढीमध्ये अधिक दिसते आहे . नर्मदा माता ही अन्य नद्यांप्रमाणे नसून तिच्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा असल्यामुळे अशा लोकांवर स्थानिकांचा प्रचंड रोष राहतो हे नेहमी लक्षात ठेवावे . त्यामुळे महापूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीमध्ये अशा संपत्तीधारकांना स्थानिक जरा सुद्धा सहकार्य करत नाहीत . असो .
आपण दक्षिण तटावर असताना पाहिले होते की नर्मदा मातेच्या मधोमध इथे एक फार मोठे बेट निर्माण झालेले आहे . ते आलिया बेट नावाचे बेट आता माझ्यासमोर होते . आणि पायाखाली साधारण दोनशे फूट रुंदीचा काळपट तपकिरी माऊशार किनारा ज्यावर गवताची काडी सुद्धा उगवलेली नाही ! चालण्याचा आनंद नव्हे अक्षरशः परमानंद त्या दिवशी घेतला ! असे वाटत होते की मरेपर्यंत याच रस्त्यावरून चालत राहावे ! अशीच नर्मदा मैया कायम आपल्या उजव्या हाताने वाहत राहावी ! आणि तिच्या काठावरून चालता चालताच कधीतरी शेवटचा प्राण निघून जावा ! किती भाग्य ठरेल ते ! परंतु आपल्याला मृत्यू कधी यावा हे आपल्या हातात थोडीच आहे । ते तर कालों के काल महाकाल यांचे काम आहे ! असा विचार मी करत होतो इतक्यात समोर एक आश्रम दिसू लागला . वरून एक तरुण साधू हात करून बोलवत होता . आत जाऊन पाहतो तो साक्षात महाकालेश्वराचे मंदिर होते ते ! जाऊन साष्टांग नमस्कारच घातला ! आणि जे काय सांगायचे ते सांगून टाकले ! एखाद्या मुख्य संस्थेचे स्थानिक कार्यालय मिळावे तसे मला झाले ! उज्जैन येथील महाकालेश्वराचे हे एक उपपीठ मानले जाते ! आणि हे पौराणिक स्थान होते ! गंमत म्हणजे इथे चालत पोहोचायला मला जितका वेळ लागला तितक्याच वेळाने मोटरसायकलवर परिक्रमा करणारा तो बिचारा परिक्रमा वासी देखील तिथे पोहोचला ! बरेचदा लोक विचारतात की सायकलवर किंवा गाडीवर परिक्रमा केलेली चालते का त्यांच्यासाठी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे ! चालत तुम्ही लवकर पोहोचता आणि गाडी किंवा सायकलवर अंतर मात्र विनाकारण वाढत असते . असो . 
इथे जे साधू होते त्यांच्याकडे पाहिल्यावर मला जरा शंका आली . कारण ते साधू वेषामध्ये जरी असले तरी त्यांच्या चालण्या बोलण्या वागण्यात आधुनिकतेचा स्पर्श आहे असे मला जाणवत होते . मी आल्या आल्या त्यांना सांगितले की मला भोजन प्रसादी नको आहे . ते आत मध्ये गेले आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने एक कलिंगड आणि अजून काही फळे चिरून ती अप्रतिम पद्धतीने एका प्लेटमध्ये मांडून आणली ! हा प्रकार पाहिल्यावर मात्र मला खात्रीच पटली की हा विरक्त साधू वेश धारण केलेला मनुष्य इतका सौंदर्यदृष्टी असलेला कसा काय असू शकतो ? हा नक्कीच पूर्वाश्रमीचा कोणीतरी रसिक शहरी मनुष्य असणार आहे म्हणून मी मुद्दाम खोदून विचारल्यावर त्या तरुण साधूने मला त्याचे वास्तव सांगितले . चक्क दिल्लीमध्ये आयुष्य गेलेला तो एक टिपिकल शहरी तरुण होता ! म्हणजे तसे ते मूळचे वाराणसीचे होते आणि त्यानी दिल्लीमध्ये राहून हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स डिग्री घेतलेली होती ! त्याने ज्या पद्धतीने फळे चिरून आणली होती ते पाहिल्यावरच कोणालाही ते खाण्याची इच्छा झाली असती ! आता समोरच्या क्षेत्रातला तज्ञच बसला आहे म्हटल्यावर मी त्याला माझ्या पोटाचा झालेला गडबड गुंडा सांगितला ! त्याने आतून जिरेपूड आणि काळे मीठ आणून माझ्या बाजूच्या अर्ध्या फळांवर ते शिंपडले . मोटरसायकल परिक्रमा वासीला उरलेला अर्धा भाग खायला सांगितला . परंतु तो त्याच्या नशिबात नसावा कारण दोन तुकडे उचलल्यावर त्याला पुढे जायची घाई असल्यामुळे तो पुढे निघून गेला . साधू हा दिल्लीचा तरुण असल्यामुळे मी मनामध्ये थोडासा निवांत झालो होतो आणि त्यामुळे त्याला सहज म्हणून गेलो की तो नाही तर तुम्हीच खा उरलेला अर्धा भाग ! आणि त्यानेही कुठलाही आढावेढा न घेता ती अंडाकृती प्लेट स्वतःकडे वळवून घेतली आणि आम्ही दोघे मस्तपैकी फळे खात मैयाच्या काठावर मैय्याकडेच पहात अप्रतिम गप्पा मारत बसलो ! अतिशय सुंदर असा सत्संग त्या तरुण साधू सोबत घडला . साधू अतिशय तरुण तेजस्वी आणि निस्पृह होता . मी कल्पना करून पाहिली की याचे दाढी मिशा वगैरे जर उडवले तर तो एखादा चित्रपटातला नट शोभावा इतका रूपवान देखील होता ! परंतु असे सर्व असून देखील त्याने साधू जीवन का पत्करले या विषयावर आमची बराच काळ चर्चा झाली . साधू जीवनामध्ये तो अत्यंत सुखी होता ! हॉटेल मॅनेजमेंट चा विद्यार्थी असल्यामुळे तो या कामानिमित्त जगभर फिरून आलेला होता . इंग्लंड मध्ये आईल ऑफ मॅन नावाचे एक बेट आहे जे केवळ हॉटेल इंडस्ट्री साठी प्रसिद्ध असून इथे वेटरची सुद्धा नोकरी ज्याला करायला मिळते तो पुढे आपल्या देशात गेल्यावर मोठे हॉटेल टाकतो इतका समृद्ध अनुभव तिथे तुम्हाला मिळतो ! तिथे देखील काही वर्ष साधु महाराज राहून आले होते ! माणसांचे घरातले वर्तन वेगळे असते आणि हॉटेलमध्ये गेल्यावर चार भिंतींच्या पलीकडचे त्याचे ते वर्तन अतिशय वेगळे असते अशी एक नवीन प्रथा आजकाल रूढ झालेली आहे . पूर्वी माणसाच्या वर्तनामध्ये असा काही भेद नसायचा परंतु अलीकडे तो भेद असला पाहिजे अशा प्रकारचे प्रशिक्षण विविध पातळ्यांवर आणि विविध संस्थात्मक तसेच व्यक्तिगत संबंधांमधून सुद्धा पदोपदी त्याला दिले जाते . त्यामुळे पाहू नये ते सर्व त्या तरुणाने पाहिले होते आणि करू नये ते सर्व त्याचे करून झाले होते . त्यामुळे आता पुढे काय असा वाजवी प्रश्न त्याला आयुष्यात पडला आणि त्याचे उत्तर त्याला नर्मदा मातेने दिलेले होते ! कधी कधी मला प्रश्न पडतो की आयुष्याचे चटके बसल्यावर मगच आपण योग्य मार्ग धरला पाहिजे असा काही नियम आहे का ? पुढच्याच ठेच मागचा शहाणा या नियमाने कधीच काही होऊ शकत नाही का ? की आपण देखील त्या संकटात उडी घातल्यावर मगच आपल्याला योग्य काय होते त्याची जाणीव व्हावी ? या साधूला जगातील कुठलीही डिश उत्तम पद्धतीने बनवता येत होती ! कारण त्याने आश्रमाचा त्याग केलेला असला तरी ज्ञानाचा आणि संस्कारांचा त्याग इतक्या सहजासहजी होत नाही ! मी देखील शहरातला वाढलेला तरुण असल्यामुळे त्याची माझी नाळ पटकन जुळली . अर्थात खेड्यातल्या लोकांशी देखील माझी नाळ तशीच जुळते हा भाग निराळा ! परंतु साधुने मला आग्रह केला की आता मी याच आश्रमात रहावे ! तो रोज काहीतरी सुंदर बनवून मला खायला घालेल ! कडक ऊन पडलेले असल्यामुळे क्षणभर महाकालेश्वराच्या मंदिरातच पाठ टेकली . साधूने आतून एक पंखा आणून माझ्या शेजारी लावून दिला ! पडल्या पडल्या मी विचार करू लागलो ! बास ! सुख सुख म्हणजे अजून काय असते ! थंडगार वारा ! आश्रमाच्या परिसरातील झाडीतून येणारा फुलांचा सुगंध ! शेजारी वाहणारी नर्मदा माई ! आणि म्हणाल तो पदार्थ आता खायला मिळणार ! आज काय दक्षिण भारतीय ! उद्या काय कॉन्टिनेन्टल ! परवा काय चायनीज ! त्यानंतर मग ... . ? त्यानंतर ? मी उठलो ,दंड उचलला ,झोळी पाठीला लावली आणि किनारा पकडला ! अरे सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही तरी इतके सुचते होय तुला ! परिक्रमेला आला आहेस का सुखासीन आयुष्य जगायला ! चल निघ ! असा स्वतःवरच मनोमन खेकसलो आणि तीव्र चटके देणाऱ्या उन्हामध्ये भरा भरा भरा चालू लागलो . परिक्रमेमध्ये असे मोहात टाकणारे प्रसंग अनेक वेळा येतात . नर्मदा माता क्षणोक्षणी तुमची परीक्षा बघते . त्यात तुम्ही उत्तीर्ण व्हावे अशी तिची अट अजिबात नसते . किंबहुना पास नापास अशा स्वरूपाच्या निकालांवर तिच्या परीक्षा नसतातच . ती फक्त बघत असते की गडी किती पाण्यात आहे ? आणि एक नेहमी लक्षात ठेवायचे की नर्मदे काठी आपण नेहमी काठावर पास व्हायचे ! याचा अर्थ काहीही होऊ दे परंतु तिचा काठ , तिचा किनारा ,तिचा ध्यास सोडायचा नाही !
दशान गावात  दशकन्येश्वर अथवा दसकन्येश्वर महादेवाचे मंदिर होते . मंदिर छोटेखानीच होते . आत मध्ये मोठा ,लहान ,अजून लहान , आणि अतिसूक्ष्म अशी महादेवाची शिवलिंगे होती ! यातील छोटे शिवलिंग तर फार छोटे होते . पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये लिमये वाडी या भागात असे एक भव्य शिवमंदिर बांधलेले दिसते . मंदिराचा आकार बघून मनुष्य आत मध्ये जातो तर आपल्या घरातल्या देवाऱ्यात पूजेमध्ये असते त्याहून छोटी शिवपिंडी तिथे ठेवलेली दिसते ! त्याची मला आठवण झाली ! मंदिराला लागूनच एक भव्य मशीद आणि मदरसा बांधलेला होता . या भृगु क्षेत्रामध्ये व्यापार उद्योग करून अनेक हिंदू व्यापारी सधन झाले .परंतु कोणालाही एखादी वेदपाठ शाळा , गोशाळा किंवा साधी शाळा तरी काढावी असे वाटले नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे . प्रश्न शिक्षण संस्थेचा नसून त्या शिक्षण संस्थेमधून तुम्हाला काय शिक्षण मिळते आहे आणि त्याचा परिसराला काय लाभ किंवा हानी होते आहे हा विषय आहे . या दृष्टीने भारतातील सर्व संस्थांचे एकदा कठोर परीक्षण झालेच पाहिजे . असो . .



श्री दसकन्येश्वर महादेव मंदिर दशान


श्री दशकन्येश्वर महादेव



चित्रामध्ये केशरी रंगाचा कळस दिसतो आहे ते महादेव मंदिर असून बाकी सर्व मदरसा आहे . 

पुढे वरवाडा नावाचे गाव होते . हे देखील मुस्लिम बहुल होते . कुकर वाडा गावाच्या अलीकडे जटेश्वर महादेवाचे अतिशय सुंदर मंदिर होते . एक दोन शेते पार केल्यावर एका छोट्या टेकाडावर मंदिर बांधले होते . स्थान अत्यंत रमणीय होते . वडपिंपळाची मोठी झाडे परिसरावर सावली धरून बसली होती .



नर्मदा मैया चे पात्र मी पार केलेले शेत परिक्रमेचा गावातला मार्ग आणि जटेश्वर महादेवाकडे येणारा जिना

कुटी वजा दिसणारे जटेश्वर महादेव मंदिर

श्री तुलसीदासजी नामक एका संतांची ही तपस्थळी आहे

श्री नंदिकेश्वर  ,कासव , श्री जटेश्वर महादेव ,नागदेवता आणि तुलसीदासजी बापू यांचा कोणीतरी काढलेला सुंदर असा फोटो


ओम श्री जटेश्वर महादेवाय नम:|
पुढे कुकरवाडा नावाचे गाव लागले . इथे नर्मदा मातेच्या अगदी काठावरच सुंदर पद्धतीने अष्टकोनाकृती बांधलेले पंचमुखी ऋणमोचन हनुमंताचे मंदिर होते . मंदिर फारच सुंदर होते . इथून भरूच चा नवा पूल दिसायला सुरुवात झाली होती . रात्री हा पूल खूप आकर्षक दिसतो असे मला लोकांनी सांगितले . 

पंचमुखी हनुमान मंदिर कुकरवाडा
मंदिराची सुंदर अष्टकोनी रचना
मंदिराचा आकर्षक कळस
ऋणमोचक पंचमुखी हनुमानजी कुकरवाडा
मंदिरातून रात्री होणारे भरूच च्या नव्या पुलाचे सुंदर दर्शन (सर्व चित्रे गूगल नकाशाच्या सौजन्याने )
पुढे चालत निघालो आणि लक्षात आले की आता अंधारू लागले आहे . भरूच शहरामध्ये खूप जास्ती तीर्थक्षेत्रे पाहण्यासारखी आहेत . चुकून वेगाने चालत पुढे गेल्यामुळे त्यातील एखादे पहायचे राहिले असे व्हायला नको म्हणून आता जो कुठला आश्रम येईल तिथे मुक्कामाविषयी विचारणा करायची असा विचार मनामध्ये करून चालत राहिलो . मध्ये आडव्या आलेल्या एका महत्त्वाकांक्षी अभियांत्रिकी प्रकल्पाने माझे लक्ष वेधले . मी मुंबई पुणे दृतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन्ही महामार्गांची कामे सुरू असताना पाहिलेली आहेत त्यामुळे इथे चालू असलेले काम हे त्याच्याही पेक्षा कैकपटीने मोठ्या प्रकल्पाचे सुरू आहे हे पाहता क्षणी माझ्या लक्षात आले आणि त्यामुळे मी अभियंत्यांची भेट घेतली . हा दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प सुरू होता . देशाची आर्थिक राजधानी आणि राजकीय राजधानी यांना जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोदी सरकारने सुरू केला आहे . आणि तो खुबीने गुजरातच्या सर्व महत्त्वाच्या शहरांजवळून नेला आहे . त्यामुळे गुजरातची सर्व महत्त्वाची शहरे आता केवळ काही तासात दिल्लीला किंवा मुंबईला संपर्क करू शकतात ! हा दहा पदरी अति दृतगती महामार्ग आहे . याच्या पुलाचे बांधकाम बांधून पूर्ण झाले होते व रस्त्याचे काम फार मोठ्या प्रमाणात चालू होते . सुरतला वळसा मारून हा मार्ग थेट मुंबईला जातो . याच्या लगेचच पुढे अजून एक महामार्ग बनवण्याचे काम सुरू आहे जो बडोदा मुंबई जोडणारा आहे . हे दोन्ही महामार्ग अक्षरशः हाकेच्या अंतरावर समांतर आहेत .परंतु दिल्लीला जाणारा अति द्रुतगती महामार्ग बडोदा , सुरत किंवा अन्य कुठल्याही शहरात जात नसल्यामुळे शहरांना जोडत जाणारा दुसरा एक महामार्ग बनण्याचे काम सरकारने हाती घेतलेले असून हा मात्र सहा पदरी आहे . त्याच्या थोडेसेच पुढे गेल्यावर बुलेट ट्रेनसाठी पूल बनवण्याचे काम सुरू होते ! पायी चालताना केवळ काही किलोमीटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी भव्य दिव्य कामे चाललेली पाहून अभिमान देखील वाटला परंतु त्याचबरोबर नर्मदा मातेचा केवळ एक पाण्याचा स्त्रोत म्हणून विचार न करता तिचे पारंपारिक मूल्य लक्षात घेऊन तिच्या सौंदर्यामध्ये आणि पावित्र्यामध्ये कुठलीही बाधा येणार नाही अशा पद्धतीचा शाश्वत विकास किंबहुना शाश्वत भारतीय पद्धतीचा विकास जर करता आला तर ते अधिक चांगले ठरेल असे राहून राहून वाटते . या सर्व प्रकल्पातील कामगारांचे लेबर कॅम्प मैयाच्या काठावरच होते आणि त्यांच्याकडून मैया चा वापर सर्रासपणे पाण्याचा स्त्रोत म्हणून केला जात होता . 
दिल्ली मुंबई आर्थिक पट्टा अर्थात दिल्ली मुंबई इकॉनोमिकल कॉरिडॉर चा दहा पदरी अति द्रुतगती महामार्ग
कुकर वाडा गावातूनच जाणारा दिल्ली मुंबई अतिदृतगति महामार्ग व लगेच त्यानंतर दिसणारा पूल म्हणजे बडोदा मुंबई महामार्ग आहे . वरती कुकर वाडा गावात सुंदर असा चौक बनविण्यात आला आहे .
चौकातून कुठे कुठे जाता येते ते दाखवणारी पाटी . फक्त बडोद्याकडे असे न वाचता दिल्लीकडे असे वाचावे . खाली ऋणमोचन हनुमानजी दिसत आहे .
विकास जोपर्यंत होत असतो तोपर्यंत तो खूप भकास दिसत असतो . चालता चालता माझे विकास या विषयावर गंभीर चिंतन नेहमीप्रमाणे सुरू झाले . विकास ही संकल्पना किती सापेक्ष आहे विचार करून पहा ना ! एखाद्या जागेवरील झाडी साफ करून तिथे मस्तपैकी समतोल जमीन करून त्यावर एखादी टोलेजंग इमारत उभी करणे हा मनुष्य प्राण्याला विकास वाटत असेल . तर एखाद्या वाळवंटाचे घनदाट अरण्या मध्ये रूपांतर होऊन तिथे मोठ्या प्रमाणात गवत खाणारे प्राणी गोळा होऊन त्यांची संख्या वाढणे हा वाघाच्या दृष्टीने विकास असतो . आपण अधिक विकसित झालो असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तुलना करण्यासाठी कोणाशी तुलना करत आहोत हे पाहणे फार महत्त्वाचे असते . विशेषतः भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये अक्षरशः एक एक खेडे पूर्वीच्या काळात स्वयंपूर्ण होते . मात्र सध्याच्या काळामध्ये विकासाची अशी मोठी केंद्रे किंवा कॉरिडॉर उभे करून तिथेच सर्व विकास घडवून आणणे व बाकीच्या लोकांना तिथे विकासासाठी यायला लावणे , भाग पाडणे याला खरोखरीच विकास म्हणता येईल का याचा गांभीर्याने विचार प्रत्येकाने करून पहावा . अनेक पाश्चिमात्य देशांनी या प्रकारे विकासाचे प्रारूप विकसित केलेले असेल देखील. परंतु ते अजून पूर्णपणे यशस्वी मानले गेले आहे का ? किंवा त्यांच्यापुढे असलेल्या समस्या कुठल्या आहेत ?त्यांच्या देशातील लोकसंख्या किती  ? त्यांच्या देशातील सांस्कृतिक वातावरण कसे आहे आणि त्यांच्या देशातील कौटुंबिक वातावरण कसे आहे ? या सर्व गोष्टींचा विचार आपण या आधुनिक विकास संकल्पनेचे अंधानूकरण करताना केलेला आहे काय ?असा प्रश्न निश्चितपणे विचारावयास वाव शिल्लक राहतो इतके कच्चे दुवे सहजपणे आपल्याला या विकासाच्या प्रारूपामध्ये आढळतात .

विकास! शब्द ऐकायला खूप छान वाटतो. एखादी मिटलेली कळी असेल, ती उमलणे याला विकास म्हणतात.

एखादे लहान मुल असेल, ज्याला काहीच येत नाही आणि काही वर्षे कठोर मेहनत केल्यावर त्याला आता बऱ्याच गोष्टी येऊ लागल्या तर त्याला विकास म्हणता येते. थोडक्यात आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया  अशी आपण विकासाची व्याख्या करू शकतो.

 आता आपण विकासाच्या नावाखाली केलेल्या काही गंभीर चुका पाहुयात.

 हरितक्रांतीच्या नावाखाली आपण देशी सकस बियाणे नष्ट केले आणि संकरित बियाण्याचा मार्ग पत्करला .साधे गणित आपल्या लक्षात आले नाही की जे बियाणे दरवर्षी विकत घेऊन लावावे लागते ते सर्वोत्तम कसे असू शकेल? जे बीज आपल्यासारखे दुसरे बीज निर्माण करू शकत नाही त्या बीजामध्ये तुम्हाला देण्यासाठी विकासतत्वे असतील काय? तेच उदाहरण दुधाचे देखील आहे .धवलक्रांती नावाचा एक निव्वळ बाष्कळपणा आपल्या देशाने मध्यंतरी पत्करला.तमिळनाडूमध्ये तर ही समस्या मी जवळून पाहिली. तिथे देशी प्रजातीची एकही  गाय आता शिल्लक राहिलेली नाही. सर्व गाईंमध्ये संकर करण्यात आलेला आहे. उशिरा आपल्या लक्षात आले की या संकरित गाई दूध जरी जास्त देत असल्या तरी त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता कमी आहे. तसेच त्या दुधाचा कस देखील कमी आहे .शिवाय या गाईंचे बैल शेतीच्या कामाला उपयोगाचे नाहीत. आत्तासुद्धा आपण विकासाच्या नावाखाली 5g नेटवर्क जगात सर्वप्रथम कसे विस्तारता येईल हे पाहत आहोत. परंतु खरोखरीच मला सांगा, की शाळेत शिकणारा विद्यार्थी किंवा महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 5g गतीने चालणाऱ्या डेटा ची गरज आहे का? केवळ महत्त्वाची शासकीय आस्थापने किंवा संशोधन संस्था किंवा लष्कराला 5g गतीने इंटरनेट आपण देऊ शकतो. परंतु सरसकट सर्व देशाला 5g चे प्रचंड हानिकारक मायक्रोवेव्हस दिवस रात्र सोडणारे अँटीने देऊन आपण पक्षी जीवन, कीटक जीवन, तसेच मनुष्याच्या शांततामय जीवनातील स्वास्थ्य हरवून टाकत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण या प्रकाराला विकास म्हणून स्वीकारलेले आहे.असे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आपण विकासाचे पाश्चात्य धारजेने प्रारूप स्वीकारलेले आहे परंतु आज ते देश देखील छातीठोकपणे सांगू शकत नाहीत की आमचे हे विकासाचे मॉडेल यशस्वी आहे. उलट बहुतांश देशांमध्ये लोक भारतीय वैदिक परंपरेप्रमाणे छोटी छोटी नगरे निर्माण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातील आनंद उपभोगत आहेत. अर्थात या क्षेत्रात काहीच काम सुरू नाही असे नाही. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या परिक्रमावासी स्मिता कुलकर्णी यांच्याकडून मला डॉक्टर डांगे या नंदुरबार जिल्ह्यातील एका व्यक्तीबद्दल कळाले जे योजक नावाची संस्था चालवून शाश्वत भारतीय पद्धतीचा विकास कसा असावा याचा प्रचार प्रसार आणि विस्तार करत आहेत. अशाच पद्धतीने कार्य करणारे अनेक लोक संपूर्ण देशामध्ये पसरलेले आहेत परंतु दुर्दैवाने त्यांची संख्या कमी आहे आणि ते एकमेकांच्या फारसे संपर्कात नाहीत कारण त्यांनी विकासाचे नवीन प्रारूप नाकारलेले आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचा झालेला दिनेश पावरा याचे देखील उत्तम उदाहरण इथे तुम्हाला मी सांगू शकतो.आपल्या कुटुंबाचा विकास व्हावा अशी प्रामाणिक इच्छा मनामध्ये धरून जेव्हा तो मातृवियोगानंतर नोकरीच्या शोधासाठी पुण्यामध्ये आला तेव्हा पुण्याचे भयानक दृश्य पाहून तो नखशिखांत हादरला होता. त्याने मला जे प्रश्न विचारले त्यामुळे मी खरोखरच अंतर्मुख झालो. इतकी गर्दी ,इतके ट्राफिक जाम ,इतके प्रदूषण ,इतके जलप्रदूषण, इतका गोंगाट, इतके अनारोग्य ह्या सर्वांना एकत्रितपणे विकास कसे काय म्हणता येईल?त्यावर आम्ही बसून जी व्यापक चर्चा केली त्यातूनच त्याने पुन्हा आपल्या गावी जाऊन काहीतरी व्यापक,सर्व समावेशक,व भारतीय संस्कृतीला सुसंगत असे शाश्वत विकासाचे कार्य उभे करावे असे आमचे ठरले. पुनर्वनीकरण प्रकल्प ही त्याचीच फलनिष्पत्ती होय. असो एकंदरीत आताच्या काळामध्ये ज्या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख गडकरी साहेबांसारखे लोक वेळोवेळी करतात त्या आकड्यांच्या खेळाचा मला फारसा आनंद होत नाही याचे कारण हेच आहे की मला एवढे मोठे काम करणाऱ्या गडकरी साहेबांबद्दल आदर व प्रेम आहेच परंतु जेव्हा ते भोवळ येऊन पडतात तेव्हा अधिक काळजी वाटते कारण त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे विकासाचे लक्षण खचितच नाही. विकास हा कमळाच्या फुलासारखा असावा. त्याची एकच पाकळी कधी उमलत नाही .तर सर्व पाकळ्या हळूहळू, एकाच गतीने ,एकाच वेळी आणि एकमेकांशी सुसंगत अशा उमलतात.

हे सर्व महामार्ग पाहिल्यावर आणि त्यावरून वेगाने जाणाऱ्या गाड्या पाहिल्यावर मनात एकच प्रश्न निर्माण होतो की हे सर्व लोक कुठे चालले आहेत? आणि कशासाठी चालले आहेत ?सतत कुठेतरी जावे लागणे आणि त्यासाठी गाड्या, इंधन व रस्ते उपलब्ध असणे हा विकास आहे ?का कुठेही जायची गरजच न उरणे हा विकास आहे? काल माझ्यावरती शंभर लोक अवलंबून होते आणि आज माझ्यावरती एक कोटी लोक अवलंबून आहेत हा विकास आहे? का काल माझ्यावरती शंभर लोक अवलंबून होते आणि आज पासून माझी गरज कोणालाही लागणार नाही हा विकास म्हणावा?

आपण करत असलेल्या तथाकथित विकासाचे मूल्य कोणी ना कोणी फेडत असते .बहुतांश वेळा हे मूल्य निसर्गाला फेडावे लागते. कारण तो या सर्व भकास विकासाचा मूक साक्षीदार असतो .परंतु निसर्गाचे खाते मोठे विचित्र आहे. तो जेव्हा परतफेड करतो तेव्हा व्याजासकट करतो .केदारनाथ चा प्रलय झाल्या झाल्या तिथे पहिले हेलिपॅड झाले होते तेव्हा मी जाऊन आलेलो आहे. तेव्हा तिथे अक्षरशः तंबूंचे बांधकाम सुद्धा पूर्ण झालेले नव्हते अशा वेळी मी गेलेलो असल्यामुळे केदारनाथच्या प्रलयाचा अतिशय भयानक नजारा मला पाहायला मिळाला होता. सुदैवाने या घटनेतून वाचलेला एक चहावाला मला भेटला ज्याने संपूर्ण प्रसंग जसा घडला तसा मला सांगितला आणि माझी विकासदृष्टीच त्या घटनेने बदलून टाकली.निसर्गाने ठरवले तर तो तुमच्या तथाकथित विकासाचा क्षणात कसा चुराडा करू शकतो याचे ते उत्कृष्ट उदाहरण होते. या संपूर्ण प्रलयातून वाचलेली एकमेव वास्तू म्हणजे केदारनाथाचे मंदिर होते कारण त्या मंदिरामध्ये वैदिक परंपरेनुसार आजही सर्व विधी चालू आहेत. त्यामुळे आश्चर्यकारकरीत्या निसर्गानेच त्या मंदिराला वाचविले. भीम शिळे ने तिथे येऊन पडणे ही काही सर्वसामान्य घटना नाही.

निसर्गाच्या प्रकोपाचा दुसरा जवळून घेतलेला अनुभव म्हणजे माळीण या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील घडलेल्या प्रसिद्ध भूस्खलनाची घटना होय.ही घटना घडल्या बरोबर मदत कार्यासाठी जी काही मोजकी मंडळी तिथे उपस्थित होती त्यामध्ये उपस्थित राहण्याचे विचित्र प्राक्तन  मला प्राप्त झाले होते.जेसीबीचा अनैसर्गिक व अनिर्बंध वापर करून शेतांची रुंदी वाढविण्याचा प्रयोग या संपूर्ण गावाच्या अंगाशी आला. रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या पाणी साठवण्याची जी क्षमता असते तिचा कडेलोट झाला आणि अक्षरशः एका कडाच गावावरती वाहून आला. गोड साखर झोपेमध्ये असलेले अख्खे गावच या भूस्खलनामध्ये भूमी मग्न झाले. मी स्वतः या दुर्दैवी हातांनी असंख्य प्रेतांना मंत्राग्नी दिलेला आहे. 





२०१४ च्या माळीण भूस्खलन दुर्घटनेनंतर प्रेतांना मंत्राग्नी देताना. प्रस्तुत लेखक लाल बाणाने दाखवला आहे. इतक्या जवळून विकासाची “फळे” पाहिलेली असल्यामुळे पोटतिडकीने सर्वांना हा विषय सांगावासा वाटतो.


कुठल्याही अंत्येष्टीच्या प्रसंगी उपस्थित राहणे हे जरी मी एक व्रत म्हणून पाळत आलो असलो तरी त्या दिवशी एकाच वेळी नऊ प्रेतांना आणि एका दिवसात बहात्तर प्रेतांना स्व हस्ते दिलेला अग्नी, हा विकास या विषयावरील माझ्या चिंतनाला खूपच दाहक बनवून गेला. कदाचित बंद खोलीमध्ये बसून तुम्हाला त्या अनिर्बंध  अंध विकासाचा कुबट वास येणार नाही.

चिखलाप्रमाणे सडलेली मानवी प्रेते ढिगाऱ्यातून बाहेर काढताना त्यांचा तो सडलेला भयानक उग्र वास अजूनही नाकातून गेलेला नाही. कोरडी लाकडेच उपलब्ध नसल्यामुळे अक्षरशः गाड्यांचे टायर सारणासाठी वापरून,एका एका चितेमध्ये नऊ दहा देह ठेवून त्यांना अग्नी द्यावा लागला होता. या सर्व ग्रामस्थांना विकास म्हणजे काय ते माहितीच नव्हते. कोणीतरी त्या आदिवासी ग्रामस्थांना अजस्त्र यंत्राच्या रूपाने विकासाचे स्वप्न दाखवले होते. परंतु तो विकास किती जीव घेणा ठरेल याची कल्पना कोणालाच नव्हती. हे सर्व मी सांगतो आहे कारण विकास या विषयावरचे माझे चिंतन इतके तळमळीचे का आहे हे आपल्याला कळावे,व तितक्याच तळमळीने आपणही या विषयाचे गांभीर्याने अनुशीलन करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. बहुत काय लिहिणे , आपण सूज्ञ असा .मध्ये एकाने मला अतिशय थंडगार असे पाणी पाजले . त्याने थोडासा शांत झालो .
विचार करता करता मी कधी त्रिगुणातीत ध्यान आश्रमात पोहोचलो मलाच कळले नाही .आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर होता . सर्वत्र झाडी होती . आज प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला महादेवाचे मंदिर होते . त्याच्या पलीकडे शेड होती ज्यात एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी लावलेली होती . समोर भोजन शाळा होती . स्वामी लोकेशानंद एक अध्यात्मिक गुरु हा आश्रम चालवितात . आश्रमाचे वातावरण मला खूप आवडले . कुठे जा किंवा जाऊ नको असे कोणी सांगत नव्हते . मुक्त प्रवेश होता . इथे एक ऋषी नावाचा तीन वर्षांचा अतिशय हुशार ,चुणचुणित व गोड मुलगा होता . त्याची माझी चांगली गट्टी जमली ! मी आजही भोजन घ्यायचे नाही असे ठरवले . आश्रमात आलेल्या भक्तांना मी भोजन प्रसाद वाढला .
त्रिगुणातीत ध्यान आश्रम
आश्रमाचा सुंदर परिसर
आश्रमातील यज्ञकुंड व भोजन शाळा
आश्रमातील महादेव
आश्रमाचे अध्वर्यू लोकेशानंद महाराज
सुंदर परिसर
भक्तांसोबत कर्मकांडामध्ये रममाण झालेले महाराज
असा हा श्री त्रिगुणातीत ध्यान सेवा आश्रम कुकडवाडा !
 रात्री खूप जास्त मच्छर असल्यामुळे दोन-तीन जागा बदलत अखेरीस मंदिराच्या शेजारी असलेल्या पार्किंग वजा सभागृहात मोठ्या पंख्याखाली मच्छरदाणी लावून झोपलो .  उद्याचा दिवस देवदर्शनांचा होता ! परंतु ज्याला देव दिसतात त्यालाच दानव देखील दिसतात ! जो देव मानतो त्याने दानव मानलेच पाहिजेत ! भृृगुक्षेत्राचे भरूच कसे झाले ते पुढच्या लेखात पाहूयात . नर्मदे हर !

 लेखांक ११५ : भृगु ऋषींचे तपाचरण ते बुलेट ट्रेनचे अवतरण पाहिलेले परमपवित्र भृगुक्षेत्र भरूच

त्रिगुणातीत ध्यान आश्रमातून बाहेर पडल्या पडल्या लगेचच बुलेट ट्रेन चे काम चालू आहे ते दिसले . संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प हा एका उन्नत काँक्रीट पुलावरून नेण्यात येणार आहे असे मला कामगारांनी सांगितले . या पुलांचे खांब उभे करण्याचे काम सर्वत्र सुरू होते . अतिशय गतिमान असे हे वाहन असल्यामुळे एका सरळ रेषेमध्ये सर्व पूल बांधण्यात आला होता . मुंबईवरून थेट कर्णावतीला ही बुलेट ट्रेन जाणार होती . (अहमदाबाद चा शब्दशः अर्थ अहमदशहा अब्दाली अमर राहो . असे मला काही वाटत नसल्यामुळे त्या गावाचे मूळ नाव कर्णावती हेच लिहीत आहे )
या प्रकल्पाची काही छायाचित्रे आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे . 


बुलेट ट्रेनसाठी नर्मदा मातेच्या पात्रामध्ये बांधण्यात येणारे खांब



या प्रकल्पासाठी आधुनिक दर्जाचे जपानी तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे



प्रकल्पाचे काम अहोरात्र सुरू आहे . लवकरच भारतातील पहिली बुलेट ट्रेन नर्मदा मातेच्या अंगा खांद्यावरून पुढे जाणार आहे ! 
भरूच शहर आता सुरू झाले . पूर्वीपासून अरबस्थानातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे बंदर असल्यामुळे इथे अरबी लोकांची खूप मोठी वस्ती आहे . पावला पावला तुम्हाला त्याच्याकडून जाणवतात . मोठमोठ्या मशिदी ,दर्गे आणि मदरसे जागोजागी दिसतात . काळे बुरखे घालून फिरणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते . मैयाच्या काठाने चालण्यासाठी विस्तृत रस्ता आहे . परंतु भरूच शहराच्या बाहेरील वस्त्यांचे घाणेरडे पाणी घेऊन येणारे ओढेनाले मोठ्या प्रमाणात आडवे येतात . ते पार करत करत दाट मनुष्यवस्तीमध्ये असलेल्या कामनाथ महादेवांचे दर्शन घेतले . मंदिर अतिशय सुंदर होते . व भाविकांची मोठी गर्दी तिथे होती .


श्री कामनाथ महादेव मंदिर भरूच
श्री कामनाथ महादेव
मंदिरामध्ये स्थानिकांकडून महादेवाच्या खूप सुंदर पूजा बांधल्या जातात
इथे गुजरात मध्ये देवाला सुद्धा दादा म्हणायची पद्धत आहे ! हे आहेत सिद्धिविनायक गणपती दादा ! 
मंदिरातून दिसणारा नर्मदा काठ . याच रस्त्याने चालत वर मंदिराकडे आलो . वाटेतील नाले आपल्याला दिसतील .
आश्रमामध्ये अंबामातेचे देखील मंदिर होते . नर्मदा मातेचे मंदिर होते .मारुतीचे मंदिर होते. एक मोठे पिंपळाचे झाड होते . त्याची देखील पूजा लोक करत होते . हे प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे . आणि भरूच मध्ये एकूण ४८ अशी पौराणिक मंदिरे आहेत ज्यांचा नर्मदा पुराणा मध्ये उल्लेख आहे ! त्यातील बहुतांश मंदिरांचे दर्शन घ्यावे अशी मनापासून इच्छा होती . त्यामुळे वाटेत दिसेल त्या माणसाला इथे कुठले प्रसिद्ध पौराणिक मंदिर आहे का असे विचारत विचारत पुढे निघालो होतो . या मंदिरामध्ये तुकाराम बुवा सुरवसे सुद्धा मला भेटले . तेही माझ्यासोबत मंदिरांची दर्शने करत निघाले . दुर्दैवाने या गावांमध्ये मंदिरे कमी आणि मशिदी जास्ती दिसत होत्या . मैयाच्या काठाकाठाने फुरजा मार्ग नामक रस्ता चालत थोड्या अंतरावर गेल्यावर एक छोटासा ओढ्या वरचा पूल लागला . तो ओलांडल्यावर जगन्नाथाचे मंदिर होते आणि प्रसिद्ध पुरातन किल्ले वजा दत्त मंदिर होते . जगन्नाथाच्या मूर्ती अगदी मूळ मूर्तीची आठवण करून देणाऱ्या होत्या . दत्त मंदिर म्हणजे तर किल्लाच होता ! इथली दत्ताची मूर्ती लाकडाची आहे ! आणि अतिशय सुंदर आहे . या मंदिरामध्ये गाईंचा मुक्त संचार होता . 
भरूच येथील जगन्नाथ मंदिर
श्री जगन्नाथ आणि बलराम आदी मूर्ती
 भरूच किल्ल्याची भिंत
तटबंदी युक्त दत्त मंदिर
मंदिर दरवर्षी जलमग्न होत असल्यामुळे दरवर्षी रंगवावे लागते .
अंबा माता
श्री दत्तप्रभूंची लाकडी मूर्ती
सुंदर अशा गोमातांचा मंदिरामध्ये मुक्त संचार असतो
त्या कुठेही जाऊ शकतात .अगदी देवाजवळ सुद्धा!
छोटेसेच मंदिर आहे परंतु कडे कोट किल्ल्यासारखे बांधलेले असल्यामुळे छान वाटते .याला बुरुज वगैरे आहे . आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे की इथून पुढे भरूच शहराला नर्मदा मातेपासून  अर्थात तिच्या महापुरापासून वाचवणारी एक जबरदस्त तटबंदी सुरू होते ! ती थेट शहर संपेपर्यंत आहे ! जशी ग्रेट वॉल ऑफ चायना प्रसिद्ध आहे तशी ही ग्रेट वॉल ऑफ भरूच आपल्या कोणालाच माहिती नाही ! इतकी मोठी आहे की तिच्यावर काही लोकांनी जनावरे बांधली आहेत . काही लोकांनी मंदिरे बांधली आहेत .काही लोकांनी घरे बांधली आहेत . तर काही लोकांनी चक्क संडास बांधले आहेत ! इतकी ही भिंत रुंद आणि मोठी आहे ! या भिंतीला काही ठराविक अंतरावर बुरुज आहेत . असे सुमारे १२ ते १५ बुरुज मी पाहिले . या भिंतीची लांबी किमान दोन किलोमीटर असावी . रुंदी बारा ते पंधरा फूट आहे . उंची काही ठिकाणी तर चांगली चाळीस-पन्नास फूट आहे . परंतु सरासरी ३० फूट आहेच . कामनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये येण्यापूर्वी एकाने नाष्टा खाऊ घातला होता . त्यामुळे अजून चालण्याची शक्ती शरीरामध्ये होती . परंतु एखाद्या ठिकाणी आसन लावावे आणि मग शांतपणे संपूर्ण परिसरातील सर्व देवांचे दर्शन घ्यावे असे मी ठरविले . आणि त्यानुसार चौकशी केली असता शंकराचार्य मठामध्ये परिक्रमा वाशींची चांगली सोय होते असे मला कळाले . तुकाराम बुवा सोबत होतेच . दोघेजण आश्रम शोधत गल्लीबोळातून गेलो . डाव्या हाताला आश्रम होता . आश्रमामध्ये कसली तरी पूजा चालू होती . त्यामुळे आम्ही समोर झाडाखाली आसन लावले .एक दोन साधू आणि परिक्रमा वासी तिथे आधीच आसन लावून गेलेले होते . 
डाव्या हाताला शंकराचार्य आश्रम आहे उजव्या हाताला वडाचे झाड दिसत आहे .
याच झाडाखाली माकडांपासून समान वाचवत आसन लावले . समोर दिसणारा कळस व भगवा ध्वज म्हणजे शंकराचार्य आश्रम आहे . 
 भरुचची भव्य भिंत अर्थात 'ग्रेट वॉल ऑफ भरूच '
आश्रमातून आम्हाला सांगण्यात आले की भोजनासाठी इथेच परत यावे . आज कन्या भोजनाचा प्रसाद आहे . त्यांना होकार देऊन आम्ही मंदिरांची दर्शना घेण्यासाठी बाहेर पडलो . तुकाराम महाराजांना माझ्यासारखी मच्छरदाणी घ्यायची होती . ती देखील पहावी असा एक हेतू होता . भृगु भास्करेश्वर , रेवाशंकर , भृग्वेश्वर ,कोटेश्वर ,प्रेमनाथ , सोमनाथ ,स्वामीनारायण , नर्मदा मंदिर , सुप्त शेषशायी नारायण , शनीदेव , दत्तगुरु , साईबाबा अशी खूप मंदिरे पाहिली.
आधी बाजारपेठेतून चालत गेलो . तिथे माझ्यासारखी घडीची मच्छरदाणी काही मिळाली नाही . मग वर टांगायची आणि खाली गोलाकार होणारी एक मच्छरदाणी मिळाली ती त्यांनी घेतली .  इथे बाजार पेठेतच एक दत्त मंदिर होते . दत्तप्रभूंची मूर्ती अतिशय सुंदर होती . आणि या मूर्तीला खूप सुंदर प्रकारची सजावट करण्याची पद्धत इकडे आहे असे मला सांगण्यात आले . खूपच स्वच्छ आणि छान मंदीर होते .






गावांतील दत्त मंदिर



 
सगुण पूजा किती सुंदर करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे दत्त मंदिर आहे .

इथून थोडेसे पुढे गेले की स्वामीनारायण मंदिर आहे . आपण मागेच पाहिले त्याप्रमाणे स्वामीनारायण यांच्या शिष्यांच्या अनेक शाखा आता झालेल्या आहेत . त्यातील एका शाखेचे हे मंदिर आहे . मंदिर साधेच आहे परंतु सुंदर आहे . मंदिरावर एक मोठा घड्याळाचा मनोर आहे . गुजराती भाविकांची गर्दी इथे असते . संपूर्ण मंदिर परिसर पाहून दर्शन घेऊन पुढे निघालो .
भर बाजार पेठेमध्ये असलेले भव्य स्वामीनारायण मंदिर भरूच
मंदिराचे खांब रंगरंगोटी आणि फरशी पाहण्यासारखी आहे
रंगीबेरंगी चित्रे काढलेले घुमट हे स्वामीनारायण संप्रदायाचे वैशिष्ट्य असते
भगवान श्री स्वामीनारायण
स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर पडल्यावर शेजारीच महर्षी भृगु यांचे मंदिर आहे . त्यांची सुंदर मूर्ती या मंदिरामध्ये असून त्याचबरोबर श्री ज्वालेश्वर महादेव तसेच अन्यही महादेवाच्या अनेक शिवपिंडी इथे आहेत . दशावतार भिंतीमध्ये चितारलेले आहेत . मागच्या बाजूला भव्य शनी मंदिर आहे . एकंदरीत हा परिसर अतिशय पवित्र आणि रमणीय आहे .
भरूच शहराचे भाग्यविधाते महर्षी भृगु
श्री ज्वालेश्वर महादेव
मंदिरातील अन्य शिवलिंगे
चौकोनी जलहरी
भिंतीमध्ये चितारलेले दशावतार
श्री शनिदेव भगवान
आमचा आजचा दिवस निव्वळ देवदर्शनाचाच होता .एरवी नर्मदा परिक्रमा करताना ह्यावेळी आपण एका गावातून दुसऱ्या गावात चालत जात असतो . परंतु आज मात्र भरूच मधली ४८ तीर्थक्षेत्र पाहणे हे ध्येय ठेवलेले होते . पाहणे म्हणजे त्या मंदिरात जाऊन त्या देवतेचे दर्शन घेणे ,तिथली स्पंदने अनुभवणे आणि त्या देवतेच्या कृपेला प्राप्त होणे ! काही मंदिरे भव्य दिव्य होती तर काही मंदिर अगदी छोटीशी होती . स्थानिक लोकांना या मंदिराचे फारसे काही पडलेले नाही असे वाटत होते . अर्थात महाराष्ट्रापेक्षा या भागातले लोक निश्चितपणे अधिक भाविक आहेत . कारण पुरोगामीत्वाचा वारा अजून इथल्या लोकांना लागलेला नाही . परंतु मंदिरांची अवस्था बघता कधी कधी वाईट वाटत होते . परंतु तरीदेखील आपापल्या परीने प्रत्येकाने मंदिर जागृत ठेवायचा प्रयत्न केला होता .
भरूच गावचे स्मशानभूमी जवळ नर्मदा मातेचे एक सुंदर मंदिर आहे . यातील नर्मदा मातेची मूर्ती फारच सुंदर होती . या परिसरातील मंदिरांची देखील दर्शने घेतली .तुकाराम बुवांना माझ्या इतके सखोल दर्शन घ्यायला आवडत नसे . परंतु त्यामुळे ते सोबत असल्याच्या निमित्ताने दर्शन कमी वेळ घेऊन मी बाहेर येत नव्हतो . तर मला जितका वेळ त्या त्या स्थानाला द्यायचा आहे तितका मी देतच होतो . म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावे की परिक्रमा एकट्याने करावी . दुसऱ्या कोणाचे तरी दबाव तंत्र सतत तुमच्यावर काम करते आहे हे देवदर्शनासाठी योग्य चित्र नाही . एकटा जीव सदाशिव ! या म्हणी वरून आठवले ! पुण्यामध्ये माझे बहुतांश काळ वास्तव्य नवी पेठ या भागात होते . यालाच नवा सदाशिव असं सुद्धा म्हणतात . पानशेतच्या पुरामध्ये सदाशिव पेठे चा जो भाग वाहून गेला आणि पुन्हा नव्याने वसवला ती ही पेठ , म्हणून नवी पेठ किंवा नवा सदाशिव . कोणी मला कुठे राहतोस असे विचारले की माझे ठरलेले उत्तर असायचे . एकटा जीव , नवा सदाशिव ! तात्पर्य एकटे राहण्याचे महत्त्व हे लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये बिंबलेले आहे ! अगदी गर्भवासापासून सुद्धा माझ्यासोबत कोणी ना कोणी परमेश्वराने ठेवलेले असले (जुळ्या बहिणीच्या रूपाने ) तरीदेखील मी मात्र सतत एकटे राहण्यास प्राधान्य दिलेले आहे ! याचे कारणच ते आहे ! तुम्हाला जे हवे ते करता यावे यासाठी एकट्याने यात्रा करणे कधीही श्रेयस्कर असते . माझी देवदर्शनं होईपर्यंत तुकाराम बुवा बाहेर बसून राहायचे . देवदर्शन म्हणजे नुसते देवाचे दर्शन थोडीच आहे ? आत मध्ये गेल्यापासून प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण घडत असते . अगदी मंदिराची स्वच्छता किती आहे ,फरशीची अवस्था कशी आहे , भिंतीची रंगरंगोटी कशी आहे ,इथ पासून ते देवतेची मूर्ती कशी आहे ,तिची पूजा कशी केली आहे ,मूर्तीची शैली कुठली आहे ,मूर्तीचे कोरीव काम कसे केलेले आहे ,मूर्ती कशापासून बनवली आहे ,आजूबाजूला काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत , अलंकार किती आहेत , प्रकाशयोजना कशी केलेली आहे ,वस्त्रे कशी आहेत ,काही शिलालेख वगैरे लिहिलेले आहेत का ,व्यवस्थापक पुजारी कोण आहे , त्याची अवस्था कशी आहे , भक्तमंडळी किती आहेत व कसे आहेत , त्यांचा भाव कसा आहे , मंदिरात काय काय फलक लावले आहेत , मंदिराचे व्यवस्थापन कसे आहे , मंदिराची बांधकाम शैली कशी आहे , मंदिराचे खांब कसे आहेत , मंदिराचे कळस कसे आहेत , मंदिरामध्ये अन्य काय काय सेवा सुरू आहेत , मंदिरामध्ये गोशाळा असतील तर तिथल्या गाई कुठल्या आहेत , त्यांची व्यवस्था कशी ठेवलेली आहे , मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग कसा आहे , मंदिराच्या आवारात वृक्ष लागवड केलेली आहे का , असल्यास कुठले कुठले वृक्ष लावलेले आहेत , मंदिर परिसरामध्ये अन्य कुठली मंदिरे आहेत , मंदिराचा इतिहास काय आहे , मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे , मंदिरामध्ये गुप्तद्वारे विवरे भुयारे आहेत का ,मंदिर पुरातन आहे की जीर्णोद्धार केलेले आहे ,की जीर्णोद्धार व्हावा अशा अवस्थेमध्ये आलेले आहे , मंदिरामध्ये पाण्याची काय व्यवस्था आहे , मंदिरामध्ये नैवेद्य कोण दाखवीत आहे , मंदिराची आरती कशी होते , मंदिरामध्ये वाद्ये कुठली आहेत ,मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन पारायण यासारखे काय कार्यक्रम होतात , मंदिर परिसरामध्ये कुठले पक्षी आहेत , मंदिरच परिसरामध्ये कुठले अन्य प्राणी आहेत , मंदिरातील सात्विकता कशी आहे व किती आहे , मंदिरामध्ये येणारी अन्य कुठली अनुभूती कितपत येते आहे , मंदिरामध्ये सजावटीसाठी कारंजी तलाव तीर्थ वगैरे निर्माण केलेली आहेत का , मंदिर परिसरामध्ये दुकाने कुठली आहेत , मंदिराचे अर्थकारण कसे काय चालते आहे , मंदिराचा सामाजिक उपक्रमांमध्ये किती सहभाग असतो , मंदिराकडे जाणारा 'अप्रोच रोड ' कसा बनवला आहे , मंदिरावर भविष्यात कुठलं सामाजिक किंवा नैसर्गिक संकट येणार आहे का , मंदिर पूर- प्रवण क्षेत्रात आहे का ,  अशा बऱ्याच गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण चालू असायचे .हे सर्व करून बाहेर येईपर्यंत तुकाराम महाराज वैतागून जायचे ! परंतु त्याला माझा पर्याय नव्हता . कारण मी काही रोज या सगळ्या मंदिरामध्ये येणार नव्हतो . त्यामुळे माझ्या पद्धतीने संपूर्ण स्कॅनिंग झाल्याशिवाय मी मंदिराच्या बाहेरच पडायचो नाही !
दशाश्वमेघ घाटावरील नर्मदा माताजी मंदिर
नर्मदा मातेची अतिशय सुंदर मूर्ती
हे प्रेमनाथ महादेवाचे जिर्णोद्धार केलेले नवीन मंदिर आहे . मी गेलो तेव्हा या महादेवावर कोणाचे प्रेम आहे किंवा नाही असे वाटावे अशी परिस्थिती होती !
परंतु आता खूपच सुंदर मंदिर झालेले दिसत आहे !
इथे शांतीवन स्मशानभूमी आहे . स्मशानाशी देवता म्हणून मसाण मेलडी माता प्रसिद्ध आहे . तिचेही एक छोटेसे मंदिर स्मशानात होते . नर्मदा परिक्रमेदरम्यान अनेक स्मशाने पार करावी लागतात . त्यामुळे त्याचे फारसे काही वाटत नाही . स्मशान मेलडी मातेचा google नकाशावर मिळालेला फोटो खालील प्रमाणे .
श्री मसाण मेलडी माता मंदिर
ही तांत्रिक देवता असून तिची उपासना करणारे अनेक तंत्र साधक मला परिक्रमेमध्ये भेटले .
इथून जवळच श्री कोटेश्वर महादेवांचे मंदिर होते .
इथून जवळच गणपती पंचायतन मंदिर होते
श्री अंबाजी माता मंदिर नावाचे एक भव्य शक्तिपीठ देखील भरूच मध्ये आहे .
हे एक मंदिर संकुल असून येथे अनेक देवता आहेत .
श्री अंबाजी माता ही अर्थातच इथली प्रमुख देवता आहे .
श्री मोढेश्वरी माता मंदिर
महामार्गा  नजिक असलेले श्री साईबाबा मंदिर देखील भव्य आणि सुंदर होते .
मंदिरामध्ये आबाला वृद्धांची गर्दी होती
साईबाबा मंदिरासमोर एका होजीअरी दुकानदाराने मला बोलवून आत नेले . आणि जे हवे ते उचला असे मला सांगितले. मला काहीच नको होते . एक वस्त्र अंगावर आणि एक वस्त्र डोक्यावर हा फार्मूला चांगला चालत होता . शिवाय मी लंगोट देखील स्वतःच फाडून बनवायचो आणि बनियन घालण्याचा प्रश्नच नव्हता . थंडीचे दिवसही संपले होते त्यामुळे हात मोजे पायमोजे किंवा थर्मल वेयर या कशाची मला गरज नव्हती . मी तसे सांगितल्यावर दुकानदाराचे तोंड बारीक झाले . मला काहीतरी द्यायचेच असा त्याचा संकल्प होता . त्याने एक पांढरीशुभ्र जॉकीची अंडर पॅन्ट काढली आणि मला प्रेमाने दिली . हिचे फारसे काही वजन नसल्यामुळे मी देखील ती घेतली . मैया मध्येच स्नानाला जाताना तिचा वापर करावा असे मी ठरवले . त्यामुळे अजून एक काम झाले ! आता मैया मध्ये माझ्या वापरलेल्या वस्त्राचा देखील स्पर्श होणार नाही अशी सोय मैय्यानेच लावून दिली ! स्नानाला जाण्यापूर्वी मी वस्त्र बदलून जात असे . आणि स्नान आटोपल्यावर पिळून तिला माझ्या बिछान्याच्या गुंडाळी वर अडकवून ठेवत असे .चालता चालता ती बिचारी वाळून जायची .असो .
सर्व दर्शने घेत आम्ही शंकराचार्य मठात पुन्हा आलो . तोपर्यंत कन्याभोजन आटोपले होते . परंतु प्रसादाचे आमरस पुरी चे भोजन शिल्लक होते ! खाणारे आम्ही दोघेच उरले होतो ! त्यामुळे भरपेट आमरस पुरी खाल्ली ! आधीच झालेले देवदर्शन ! आणि त्यावर आमरस पुरीचा प्रसाद ! त्यामुळे एकंदरीतच सगळा आनंद द्विगुणित झाला !  
उन्हाळा हळूहळू वाढत होता ! पायाला चटके बसतील अशी भूमि तापत होती . मी सध्या पायात घातलेले पादत्राण म्हणजे एक पातळ सॅंडल होती . हे परिक्रमातले माझे नववे पादत्राण होते . दुकानदार माझ्याकडून पैसे घेत नव्हता परंतु मी त्याला बळजबरीने १४० रुपये देऊ केले होते . परिक्रमेच्या ९३ व्या दिवशी नववी सॅंडल घेतली होती . याचा अर्थ सरासरी दहा दिवसाला एक चप्पल लागत होती . उन्हामुळे अजून एक मोठी समस्या निर्माण झाली होती . ती म्हणजे अशी की कमण्डलूतील पाणी प्रचंड तापून जायचे . इतके गरम व्हायचे की प्यायला नको वाटायचे . डोक्यावरून उष्मा आणि कमण्डलूतील पाणी सुद्धा तापलेले . अशा अवस्थेमध्ये काय करावे याचे मार्गदर्शन एका साधूने मला केले होते . हे साधू संपूर्ण भारतभ्रमण करायचे . सर्वार्थाने सर्वत्र उपयुक्त ठरेल असा कमण्डलूचा एक प्रकार त्यांनी मला सांगितला होता . अगदी रामेश्वरम च्या उन्हाळ्यापासून ते हिमालयातल्या थंडीपर्यंत चालणारा असा हा प्रकार होता . हा कमण्डलू म्हणजे सेलो किंवा मिल्टन आदि कंपन्यांचा व्हॅक्युम थर्मास फ्लास्क . एकतर हा पूर्णपणे धातूचा असतो . त्यामुळे कमंडलू या प्रकारामध्ये बसतो . दुसरी गोष्ट म्हणजे तो लटकविण्याचा असल्यामुळे हातात धरता येतो किंवा झोळी मध्ये पण टाकता येतो . तिसरी गोष्ट याला पाणी पिण्यासाठी वेगळा पेला असतो . चौथी गोष्ट याची क्षमता एक लिटर पेक्षा जास्त असते .पाचवी गोष्ट म्हणजे यात एकदा भरलेल्या पाण्याचे तापमान आहे तसेच राहते . गार पाणी गारच राहते आणि गरम पाणी गरमच राहते . भरुच हे परिक्रमा मार्गामध्ये लागणारे एक फार मोठे शहर होते . त्यामुळे इथेच हा मिळाला असता . सहज बाजारातून जाताना एका दुकानामध्ये मला तो दिसला .  गंमत म्हणजे तो घेण्यासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे नव्हते . परंतु त्याच बाजारपेठेतून जाताना काही लोकांनी माझ्या हातावर दक्षिणा टेकवली होती . तो सेलो कंपनीचा एक लिटरचा थर्मास फ्लास्क होता ज्याची किंमत ११५० रुपये होती . परंतु दुकानदार म्हणाला की मी तुमच्याकडून जास्ती पैसे घेणार नाही . माझे जेवढे खरेदी आहे तेवढेच पैसे मला द्या . आणि त्याने मला ८५० रुपये मागितले . सुदैवाने माझ्याकडे बरोबर तेवढेच पैसे शिल्लक होते ! बाजारामध्ये मला चांगले पाचशे सहाशे रुपये मिळाले होते ते इथे कामाला आले ! त्या फ्लास्क सोबत एक चंदेरी आवरण असलेली पिशवी होती . तिच्यामुळे उन्हाचा परिणाम त्याच्यावर काहीच व्हायचा नाही ! दप्तराच्या एका कप्प्यामध्ये हा बसत असे ! जुना कमण्डलू मी दुकानदाराला देऊ केला . त्याने देखील मोठ्या आनंदाने तो स्वीकारला परंतु नंतर तो म्हणाला की वाटेत एखादा परिक्रमा वासी भेटला तर त्याला द्या किंवा अन्य कुठल्यातरी कामाला हा वापरा!
हा थर्मास फ्लास्क घेण्याचा माझा निर्णय हा अतिशय म्हणजे अतिशय योग्य ठरला हे पुढे माझ्या लक्षात आले ! कारण त्या एका कमण्डलूमुळे मला परिक्रमा संपेपर्यंत अखंड मैयाचे थंडगार पाणी पिता आले . शिवाय अनेक वर्ष साधू जीवनामध्ये राहिलेल्या साधूने मला हा कमण्डलू सुचवलेला असल्यामुळे तो शास्त्रानुसार योग्य देखील होता .
माझा नवीन कमंडलू
पुढे माझ्या हातून हा बरेच वेळा खाली देखील पडला . डोंगरावरून गडगडत गेला . दगडांवर आपटला धोपटला .परंतु त्याला काहीही झाले नाही . असो . 
भरूच शहराची तटबंदी ही अतिशय भक्कम आणि प्रेक्षणीय आहे . गावातील घरी देखील सुबक , कोरीव ,  रेखीव आणि टुमदार आहेत . तटबंदीचा शेवटचा भाग विदीर्ण अवस्थेमध्ये आहे .
भरूच च्या तटबंदीचा शेवटचा भाग
भरूच शहरामध्ये फिरताना एक विचित्र वातावरण जाणवत होते . नर्मदा पुराणातील सर्वाधिक तीर्थक्षेत्रे असलेल्या या शहराची आजची स्थिती मिनी पाकिस्तान अशी झालेली आहे . मी मिनी पाकिस्तान हा शब्द अतिशय जबाबदारीने वापरत आहे . पाकिस्तान या देशाने आजपर्यंत आपल्यावरती अनेक वेळा उघडपणे हल्ला केलेला आहे . आणि त्याच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याला सतत फौज फाटा तैनात करावा लागतो . अगदी तसाच फौज फाटा आज संपूर्ण भरूच मध्ये तैनात केलेला दिसत होता . कारण उद्या रामनवमी होती . रामनवमीच्या पूर्वसंध्येला भरूच शहराला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आले होते . जिकडे जावे तिकडे पोलीस दिसत होते . एवढे पोलीस भरूच शहरामध्ये असणे शक्यच नव्हते . त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की गुजरातच्या विविध भागांमधील पोलिसांना इथे गाड्या भरभरून आणले होते . भरूच रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा गुरुद्वारा आहे . त्याचेही दर्शन घ्यावे अशी इच्छा झाली म्हणून मी आत जाऊन दर्शन घेऊन आलो . 
भरूच मधील गुरुद्वारा
हा गुरुद्वारा अगदी नर्मदा मैयाच्या काठावर आहे .
तत्पूर्वी भरूच येथील प्रसिद्ध नर्मदा मैया चा पूल देखील मी ओलांडला . याच पुलावरून तिचे खूप वेळा दर्शन घेतलेले होते ! त्यामुळे ठरवून त्या पुलाखालून चाललो ! गुरुद्वारा यामध्ये जाऊन दर्शन घेण्याचा अजून एक अंतस्थ हेतू होता . सध्या विभाजनवादी प्रवृत्तींनी शीख समुदायाला भारतीय संस्कृती पासून वेगळे तोडण्याचा घाट घातलेला दिसतो . त्यामुळेच शीख हा एक वेगळा धर्म आहे असे लहानपणापासून लहान मुलांच्या मनावर बिंबवले जाते . जसे जैन , लिंगायत ,बौद्ध हे वेगळे धर्म आहेत असे आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले त्यात आता शिख धर्माची देखील भर पडली आहे . प्रत्यक्षामध्ये हे वेगळे धर्म नसून आपल्या भारतीय संस्कृतीशी अनुरूपता दर्शवणारे केवळ काही संप्रदाय आहेत . त्यांनी काही विशिष्ट आचार पद्धती स्वीकारलेली असल्यामुळे त्याला पंथ किंवा संप्रदाय असे नाव देणे संयुक्तिक आहे . परंतु वेगळा धर्म म्हणून त्याचा उल्लेख करणे अतिशय चुकीचे आहे . हे माझे मत नसून खालसा पंथाची संस्थापना करणारे गुरुगोविंदसिंह देव यांचेच हे मत आहे . त्यांचे वडील श्री तेग बहादूर सिंह यांचे सोळाशे पंचाहत्तर मध्ये मुसलमानी मुफ्तीच्या आदेशावरून शिरकाण करण्यात आले होते .त्यावेळी त्यांचे वय दहा वर्षाचे होते . या घटनेचा खोल परिणाम त्यांच्या जीवनावर झाला होता .  त्यानंतर  आपल्या वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली . हिंदू धर्माचे इस्लामिक आक्रमणापासून रक्षण करणारा एखादा सशस्त्र संप्रदाय उभा करावा असा स्पष्ट हेतू त्यांच्या या कृती मागे होता . त्यामुळेच आपल्या उग्रदंती या रचनेमध्ये ते म्हणतात
सकल जगत में खालसा पंथ गाजे
जगे धर्म हिन्दू तुरक धुंध भाजे
अर्थात हिंदू धर्माचा पंथ असलेला खालसा पंथ या जगामध्ये गाजतो आहे . हिंदूधर्म जागृत होत आहे आणि तुर्क धर्माचा अर्थात इस्लामचा नाश होत आहे . 
यांनी केवळ आपले वडीलच गमावले नाहीत तर आपल्या पोटचे गोळे असलेले चार मुलगे धर्मासाठी बलिदान होताना पाहिले . साहेब जादा अजित सिंह आणि झुंजार सिंह हे त्यांचे अनुक्रमे १७ व १३ वर्षाचे मुलगे चमकौरच्या लढाईमध्ये मुसलमानांविरुद्ध लढताना हुतात्मा झाले . साहेब जादा जोरावर सिंह आणि फतेसिंह हे त्यांचे अनुक्रमे आठ आणि पाच वर्षाचे दोन मुलगे इस्लाम धर्म स्वीकारत नाहीत म्हणून भिंतीमध्ये चिणून मारले गेले . एका चुकीने हिंदू धर्मासाठी एका सप्ताहाच्या आत चार मुलगे गमावले असल्याचे उदाहरण इतिहासामध्ये कदाचित एकमेव आहे . आणि ही चार मुले गमावल्यावर त्या तेजस्वी पित्याचे विचार खालसा पंथाची खरी ओळख आपल्याला करून देतात .
गुरु गोविंद सिंह म्हणतात
इन पुत्रान के कारने, वार दिए सुत चार
चार मुए तो क्या हुआ, जीवें कई हज़ार
माझ्या धर्म बांधवांना वाचवण्यासाठी ही चार मुले कामी आली . चौघे गेले परंतु त्यांनी हजारोंचे प्राण वाचवले . 
अशा तेजस्वी शिखपरंपरेचा मला जाज्वल्य अभिमान लहानपणापासून वाटत आलेला आहे . त्यामुळे मी वाटेतील सर्व गुरुद्वाऱ्यांचे दर्शन घेत पुढे गेलो . हिंदू समाजाने आपलेच मंदिर आहे हे समजून गुरुद्वाऱ्यामध्ये जायला सुरुवात केली पाहिजे . कारण ते आपले मंदिरच आहे ! परिक्रमावासी फारसे दर्शनाला येत नाहीत असे चौकशी अंती मला गुरुद्वाऱ्यातून कळाले . आपल्याला पंथापंथामध्ये पाडण्यात आलेली ही दरी मिटवण्याचे खूप महान कार्य सहज जाता येता करणे शक्य आहे तर ते आवर्जून करावे . शिख संप्रदायाला भडकावून त्यांना भारतापासून वेगळा खलिस्तान नावाचा प्रांत तोडून देण्याचे षडयंत्र सध्या फार जोरामध्ये शिजते आहे . त्यावर मात करावयाची असेल तर सरदारजी लोकांसमवेत आपली उठ बस वाढविणे हा एकमेव उपाय आहे . दुसरा कुठलाही उपाय इथे चालणार नाही . असो . गुरुद्वाऱ्यामध्ये राहायचे असेल तर राहता येईल असे मला सांगण्यात आले होते परंतु अजून दिवस शिल्लक असल्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय मी घेतला . आता भरूच शहराचेच एक उपनगर असलेले झाडेश्वर नावाचे नगर सुरू झाले . पूर्वी ही दोन शहरे वेगळी होती . परंतु आता विस्तारामुळे एकच होऊन गेली आहेत . पुणे आणि पिंपरी चिंचवड सारखी त्याची अवस्था आहे .
तत्पूर्वी मक्तमपुर नावाचे छोटेसे नगर लागते . रेल्वे स्थानक आणि गुरुद्वारा या मक्तमपूर च्या हद्दीमध्येच येतो . इथे ओंकारेश्वर महादेवाचे मंदिर आणि महारुद्र तीर्थ आहे . 
वाटेमध्ये चालताना एका गरीब मातेने मला उसाचा रस पाजला . तिच्या मुलीला भरपूर खाऊ देऊन पुढे निघालो . मध्ये एकाने दुकानामध्ये बोलावून हॅव मोर आईस्क्रीम खायला दिले !मँगो फ्लेवरचे हे आईस्क्रीम खाताना मौज वाटली !पुढे एकाने चहा आणि नाश्ता दिला . वाटेमध्ये एक साईबाबांचे मोठे मंदिर लागते ते देखील पाहिले .
झाडेश्वर नगरामध्ये घोडेश्वर वैद्यनाथ महादेव ही तीर्थक्षेत्र असून दुधेश्वर कामनाथेश्वर तसेच राधाकृष्ण मंदिर अशी अनेक मंदिर आहेत . इथे शितळा मातेचे एक मंदिर असून स्वामीनारायण मंदिर सुद्धा आहे . परंतु बहुतांश परिक्रमावासी हे निळकंठेश्वर या तीर्थक्षेत्रावर निवास करतात त्यामुळे मी सुद्धा तिथेच गेलो . मैयाच्या अगदी काठावर असलेले हे एक भव्य दिव्य मंदिर आहे . परंतु तिथे गेल्यावर जे दृश्य पाहिले ते पाहून आश्चर्याने अचंबित झालो ! कारण जिकडे पहावे तिकडे पोलीसच पोलीस फिरताना दिसले ! भरूच शहरामध्ये बंदोबस्तासाठी जे पोलीस आणले होते त्यांची निवासाची व्यवस्था या निळकंठ आश्रमामध्ये करण्यात आलेली होती ! त्यामुळे कितीही परिक्रमावासी आले तरी त्यांची राहण्याची सोय करू शकणारा हा आश्रम शेकडो पोलिसांच्या संख्येमुळे हतबल झालेला होता ! सुमारे पाचशे पोलीस तिथे मुक्कामाला होते . सांगताना ३०० पोलीस आहेत असे सांगण्यात येत होते . परंतु साध्या नजरेने देखील किती पोलीस आहेत ते मोजता येत होते . या सर्व व्यवस्थेचा प्रचंड ताण आश्रम व्यवस्थापनावर पडलेला होता .आता पुढे जावे तर काही सोय होणे शक्य नव्हते . त्यामुळे मी शांतपणे एका झाडाच्या पाराखाली आसन लावले . स्नानाची आणि डोलडाल ची चांगली व्यवस्था आश्रमामध्ये होती . मस्तपैकी स्नान करून पूजा वगैरे आटोपून पोलिसांशी गप्पा मारत बसलो . त्यांच्याकडून गुजरात राज्यातील सामाजिक परिस्थिती समजावून घेतली . महाराष्ट्र असो वा मँचेस्टर , लातूर असो वा लंडन सर्वत्र विशिष्ट समाजाच्या लोकांमुळे एकसारखेच प्रश्न आ वासून उभे राहिलेले आहेत . राजकीय अपरिहार्यतेमुळे कोणी या विषयाला हात घालत नाही किंवा उघडपणे बोलत देखील नाही . परंतु याच्या परिणाम स्वरूप येणाऱ्या काही वर्षातच आपल्याला हवा तो पंतप्रधान बसवण्याचे सामर्थ्य या समाजाला निश्चितपणे प्राप्त झालेले आहे . पोलिसांना या प्रकाराचा किती अतिरिक्त ताण येतो हे ते मला सांगत होते . माझ्याबरोबर गप्पा मारणारे हवालदार वगैरे होते . माझ्यावर खुश होऊन ते त्यांच्या वरिष्ठांकडे मला घेऊन गेले . आणि मग त्यांचे जे प्रमुख कमिशनर साहेब होते त्यांच्याशी देखील मी तासभर चर्चा केली . परिक्रमेच्या माध्यमातून आलेले अनुभव त्यांनी मला विचारले . मी वाटेत काय काय पाहिले ते जसे आहे  तसे त्यांना सांगितले . त्यांनी मला आत मध्ये मुक्कामाला येण्याची विनंती केली . परंतु मी ती नम्रपणे नाकारत उघड्यावरती झोपावे लागणे वगैरे हा परिक्रमेचा च एक अविभाज्य भाग असल्याचे त्यांना सांगितले . साहेबांना साधारण माझ्या आवडीच्या विषयाचा अंदाज आला आणि त्यांनी काही हुशार शिपायांना माझ्याकडे गप्पा मारायला पाठवून दिले . त्यांनी देखील मोकळ्या मनाने माझ्याकडून काही विषय समजावून घेतले . भरपूर शंका त्यांनी मला विचारल्या . आणि मी माझ्या परीने त्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे त्यांना दिली . रात्री शहरातील पोलीस परत आले आणि इथे विश्रांती घेणारे पोलीस गस्तीला गेले . जाता जाता जाणाऱ्या पोलिसांनी येणाऱ्या पोलिसांचा माझा परिचय करून दिला . त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पुन्हा एकदा पारावर गप्पांचा फड रंगला . 
हेच ते भव्य दिव्य नीलकंठेश्वर महादेवाचे मंदिर
असे अनेक पार परिसरामध्ये आहेत अशाच एका पारावर मी आसन लावले होते
श्री नीलकंठेश्वर महादेव
हे मंदिर फार भव्य दिव्य असून प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे दिवसभर पर्यटकांची प्रचंड गर्दी इथे राहते .
माझी आजी नेहमी म्हणायची की "सत्य संकल्पा चा दाता ईश्वर " नेमके तेच वाक्य इथे लिहिलेले असल्यामुळे हे सर्व वाचून काढले आणि मला आवडले म्हणून सर्वांसाठी देत आहे .
रात्री बराच वेळ त्या पारावरती मच्छरदाणी मध्ये पडून राहिलो . मी पाहत होतो की अतिशय किरकोळ भासणारे ते डास मोठ्या मोठ्या पोलिसांना नको नको करून सोडत होते . या डासांचा उपद्रव फारच मोठा होता . डासांना कितीही मारले तरी त्यांची संख्या कमी होत नाही . कारण त्यांची उत्पत्ती लाखांच्या संख्येने होत असते . मारून मारून तुम्ही किती डास माराल ? यावर एकमेव उपाय आहे . अहिंसा हे तत्व बाजूला ठेवून डास हा मुळात हिंसक प्राणी आहे हे सर्वांच्या मनावर बिंबवावे लागते . सर्वप्रथम हे मान्य करावे लागते की डासाचा आपल्याला उपद्रव होणार आहे . आणि मग त्याच्या उत्पती स्थानावर घाला घालावा लागतो . त्याची मुळात पैदासच कमी कशी होईल यावर काम करावे लागते . तरच डासांसारखे उपद्रवी जीव आटोक्यामध्ये येतात . त्यांना एक एक करून टिपून तुम्ही कधीच संपवू शकत नाही . तर त्यांचे उपद्रवमूल्य मान्य करणे हा एकमेव उपाय आपल्याला तारू शकतो ! पोलिसांची हतबलता आणि असहायता पाहून मला वाईट वाटले . दिवसभर शहरामध्ये असलेल्या तणावाचा त्रास . आणि रात्री या भारंभार पैदास झालेल्या डासांचा त्रास . जीव हत्या होऊ नये म्हणून इथले साधू डासांना धूर वगैरे करून मारत नाहीत . परंतु त्यामुळेच त्यांचे उपद्रव मूल्य वाढत जाते हे आपल्या लक्षात येत नाही . झोपता झोपता एकच सूत्र नर्मदा मातेने माझ्या लक्षात आणून दिले ते म्हणजे "मूळावर घाव हाच एकमेव उपाव !" नर्मदे हर !

 लेखांक ११६ : शुक्लतीर्थ राम मंदिरी रामनवमी साजरी व मंगलेश्वरी शशीबेन,ज्योतीबेन सेवाधारी

पहाटे लवकर उठून झाडेश्वरचे निळकंठ मंदिर सोडले . आणि पुन्हा एकदा मैया चा किनारा पकडला . माझ्यासोबत कोणी येऊ नये म्हणून मी गुपचूप निघालो होतो . एकटाच चालू लागलो . पहाटेच्या अंधुक उजेडात पायाखालचे तेवढे दिसत होते . मैयाचा किनारा गाळाने भरलेला होता परंतु गाळाचा वरचा थर वाळलेला होता . त्यामुळे मी मैयाच्या अजून जवळ जवळ जाऊ लागलो .
या भागात मैयाच्या किनाऱ्यावर असा गाळ आहे . कमी वजनाची माणसे त्यावरून चालून जातात . थोडेसे अधिक वजन असले की मनुष्य गाळात जातो .
 समोर एक झुडुप आडवे आले . झुडपाच्या डावीकडून जावे तर मैया लांब जाणार म्हणून मी झुडपाच्या उजवीकडून जायचं ठरवलं . आणि झुडपाला वळसा मारू लागलो इतक्यात पायाखाली काहीतरी हालचाल होते आहे असे मला जाणवले . आणि कडक लागणारा चिखलाचा पृष्ठभाग अचानक तुटला आणि मी भसकन गुडघाभर चिखलात रुतलो ! तो चिखल इतका घट्ट होता की जणू काही पाच-सहा लोकांनी माझे पाय खाली पकडले आहेत असे पाय घट्ट रुतून बसले ! मी जसजशी बाहेर पडण्याची धडपड करू लागलो तसतसा पाय अजून खोलात जाऊ लागला . मला लक्षात आले की मी एका चांगल्याच दलदलीमध्ये पुरता फसलेलो आहे ! काठी घुसवून पाहिली असता ती खोल खोल खाली जात राहिली . याचा अर्थ इथे खाली एखादा जलप्रवाह मैय्याला येऊन मिळत असावा . मला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले . आणि मी आजूबाजूला कोणी मदतीसाठी दिसतो आहे का ते पाहू लागलो . इतक्या सकाळी तिकडे कोण येणार ! माझा आगाऊपणा मला नडला की काय असे मला वाटू लागले . परंतु माझा हेतू शुद्ध होता . मला नर्मदा माईच्या अधिक अधिक जवळ जायचे होते . त्यामुळे जेव्हा केव्हा समोर दोन रस्ते यायचे तेव्हा त्यातील मैयाच्या जवळ जाणारा रस्ता मी निवडायचो मग तो कठीण असो किंवा लांबचा असो . आताही समोर झुडूप आडवे आल्यावर मी तेच केले होते . मैया च्या बाजूने निघालो होतो . 
हेच ते झुडूप ज्याच्यामुळे मी गाळात रुतलो .
अशा प्रसंगात काय करायचे हे आता मला पक्के ठाऊक होते ! त्याप्रमाणे मी नर्मदेहर असा पुकारा केला ! दूरवरून मला पुन्हा नर्मदे हर असा ओळखीचा आवाज ऐकू आला ! हा आवाज तर तुकाराम बुवांचा होता ! मला हात करत ते पुढे निघून जाऊ लागले . त्यांना माहिती होते की मला सोबत चाललेले आवडत नसे . मी जोर जोरात ओरडून त्यांना जवळ बोलवू लागलो परंतु त्यांनी मला नर्मदे हर नर्मदे हर असे हात करत पुढे पुढे जाणे चालूच ठेवले ! आता मात्र पंचायत आली . मी रुतत रुतत त्या पक्क्या गाळात मांडीपर्यंत आत घुसलो होतो . जीवाच्या आकांताने एकदाच मी त्यांना हाक मारली . आणि मग त्यांच्या लक्षात आले की मी नेहमीपेक्षा थोडा बुटका दिसतो आहे ! आणि ते धावतच माझ्या दिशेने आले . मी त्यांना सांगितले की जवळ येऊ नका . दुरूनच मला वाचवायचा प्रयत्न करा .ते पण माझ्यासारखे रुतले तर पंचाईत ! त्यांनी त्यांच्या जवळची काठी माझ्या दिशेला पुढे केली आणि ती पकडायला सांगितली . तुकाराम बुवा हे गवंडी काम करणारे असल्यामुळे त्यांच्या अंगात खूप शक्ती होती . त्यांची संपूर्ण शक्ती पणाला लावत त्यांनी मला त्या काठीसकट बाहेर खेचून काढले ! मी ती काठी इतकी घट्ट धरून ठेवली होती की विचारता सोय नाही ! मांडीपर्यंत माझे पाय चिखलाने काळे झाले होते ! पुढे सर्वत्र असाच चिखल असल्यामुळे पाय धुणे शक्य नव्हते . मग चालत चालत पाय वाळवायचा निर्णय मी घेतला . तुकाराम महाराज योगायोगाने काठाने आल्यामुळे माझा प्राण वाचला ! नाहीतर हळू हळू हळू आत मध्ये घुसत मी त्या चिखलामध्ये कायमचा रुतून बसलो असतो .
अगदी कुत्र्यासारखा हलका प्राणी देखील रुतून बसेल असा गाळ येथे आहे . हे चित्र याच भागातले आहे .
प्रचंड गाळामुळे नावे पर्यंत जाताना सुद्धा केवट लोकांना खूप कसरत करावी लागते .
 मला एकटे चालावयास आवडते या विषयावर तुकाराम महाराजांनी माझी यथेच्छ खेचली ! "का ? आता चाल की यकटा !  व्हय रं सायबा ! " आणि माझ्याकडे बोलायला काहीच उत्तर नसायचे ! दोघांनी हसत खेळत पुढचा मार्ग एकत्र काटला . एके ठिकाणी मैयाच्या काठावर खडक लागला . तिथे मैय्यामध्ये स्नान करून मी तो सर्व चिखल पुन्हा मैयार्पण केला . यापूर्वी सुद्धा मी चिखलामध्ये अडकलो होतो . परंतु त्यावेळी जी मरणाची भीती वाटली होती ती का कुणास ठाऊक यावेळी अजिबात वाटली नाही ! कदाचित परिक्रमा तुम्हाला जे काही देते ते हेच धैर्य आहे ! जे तुम्हाला सांगते की काळजी करू नकोस ! योग्य तो मार्ग नक्की निघेल ! आणि मी देखील स्थितप्रज्ञा सारखा यावेळी गाळामध्ये रुतत चाललो होतो . आता मात्र मी गाळाच्या दिशेला जाऊ लागलो की तुकोबा जोरात खेकसायचे . "व्हय डाव्या अंगाला ! पुन्हा चिखलात ह्येंगायचं का तुले?"  हे असे काही शब्द फक्त विदर्भ मराठवाड्यातल्या बोलीमध्ये सापडतात ! ह्येंगणे म्हणजे चढणे ! खरंतर चिखलात मी उतरत होतो . पण त्याला सुद्धा हे चढण्याची उपमा देत होते ! तुकोबाराया खेकसले की मी शांतपणे पुन्हा डावीकडे यायचो .त्यांनी नुकतेच माझे प्राण वाचवल्यामुळे त्यांना उलटून बोलणे शक्यच नव्हते ! त्यांनी देखील या घटनेचा पुरेपूर लाभ पुढील काळात उठवला ! कुठल्या मुक्कामी काठाने चालण्याबद्दल मी बोललो की तुकाराम बुवा हा प्रसंग सांगायचे ! आणि म्हणायचे याच्यामुळे मला काठाने चालायची सवय लागली . आणि मला सवय लागल्यामुळे हा वाचला ! आणि ते खरेच होते ! त्या प्रसंगासाठी तुकोबारायांचे उपकार मी कायम मान्य करतो . त्या दिवशी त्यांच्या जागी अन्य कोणीही परिक्रमा वासी असता तरी कदाचित मला बाहेर काढू शकला नसता . प्रचंड शक्ती अंगात असलेले आणि शंभर शंभर किलो ची खडी वाळू उचलणारे  हात माझ्या मदतीला आल्यामुळे मला खेचून बाहेर काढू शकले ! किरकोळ माणसाला हे जमले नसते . आणि पुढे येण्याची हिंमत देखील कोणी दाखवली नसती . तुकाराम सुरवसे हे आजही माझ्या संपर्कात आहेत ! त्याला या अशा घटनांची माझं पार्श्वभूमी आहे ! ज्या माणसाने आपले प्राण वाचवले तो कसा का असेना आणि कुठेही का असेना , आपल्याला त्याच्याबद्दल आदर वाटतोच ना ! तुकाराम बुवा स्वभावाने थोडेसे तुसडे  भासत असले तरी प्रत्यक्षात ते तसे नव्हते . ते स्पष्ट वक्ते होते आणि त्यांना खोट्याचा राग होता . फसवणूक न करणे आणि सत्य वचन बोलणे या दोन गोष्टी जो पाळत असे त्याच्यासाठी ते उत्तम मित्र होते !त्यामुळे आमची घनिष्ठ मैत्री झाली ! त्यांच्यासोबत राहिलेले अनेक जण मला मुक्कामी तुकोबारायांसोबत बसलेले पाहिल्यावर सांगायचे की तू या माणसासोबत कसा काय राहतो आहेस ! परंतु मला कधी त्यांच्या स्वभावाचा त्रास झाला नाही ! कदाचित तुकोबाराय माझ्याशी वेगळे वागत होते ! त्यांनी नवीनच परिक्रमा चालू केलेली असताना त्यांना मी भेटलेलो असल्यामुळे आणि मी त्यांना न विचारता बऱ्याच सूचना मोहन साधू प्रमाणे केलेल्या असल्यामुळे कदाचित त्यांना माझे वागणे आवडले असावे . काहीही असो . तुकाराम सुरवसे हा मनुष्य मला तरी फार आवडला . आता सुद्धा ते बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा सायकलने करत आहेत . तेव्हा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी मला फोन करतात . मी त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फोन पे जी पे काहीतरी चालू करा . पण अजिबात चालू करत नाहीत ! आपल्यापैकी कोणाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर मला सांगा ! मी तुमचा क्रमांक देईन . तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लगेच येईल ! त्यांची भारत यात्रा संपल्यावर त्यांना पुण्यामध्ये येण्याचे आमंत्रण मी दिलेले आहे . तेव्हा कदाचित सर्वजण त्यांची भेट घेऊ शकतो ! बघूया मैयाचे काय काय नियोजन आहे !
आम्ही काठाकाठाने पुढे जात असताना एक ग्रामस्थ भेटला . त्याने सांगितले की डावीकडे जंगलामध्ये कोटेश्वराचे मंदिर आहे त्याचे दर्शन अवश्य घ्या . त्याप्रमाणे आम्ही मोर्चा बाहेरच्या दिशेला वळवला . या प्रसंगामुळे दोघांच्या कपड्याला बऱ्यापैकी चिखल लागला होता . आणि वस्त्रे मैया मध्ये धूत नाहीत त्यामुळे तशीच पिळून घातली होती . जाता जाता मी तुकाराम महाराजांना म्हणालो , " तुकोबाराया मैयाने चांगलाच चिखल फासला आपल्याला ! चांगले चुंगले कपडे द्यायचे राहिले बाजूला आणि हिने तर आहे ते पण रंगवून टाकले ! " आणि दोघेही हसायला लागलो . तुकाराम बुवा म्हणाले . "तुझे तरी ठीक आहे . तू तुझ्या गुणाने गाळात गेलास . माझा तर काही संबंध नसताना माझे कपडे रंगवले मैय्याने . खरं तर मला नवीन कपडे मिळायला हवेत ! " दोघे अशा पद्धतीने बोलत जात असताना समोरून एक रिक्षा आली . आणि आम्हाला बघून रिक्षावाल्याने थांबण्याची सूचना केली . आम्ही रिक्षा जवळ गेलो . मागे एक सत्तरीचे आजोबा बसले होते . त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या ! त्यांनी आम्हाला नर्मदे हर केले . आणि गाडीत बसल्या बसल्याच दोन कोरे करकरीत उत्तम दर्जाचे सुती सदरे आम्हाला दिले ! ते म्हणाले की व्यापारासाठी ते भरूच मध्ये निघाले होते . आणि मैयाने त्यांना दोन सदरे घेण्याची प्रेरणा दिली . ते संपूर्ण रस्त्याने पाहत आले परंतु कोणीही परिक्रमावासी दिसले नाहीत . पहिले आम्हीच दिसलो . त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रेमपूर्वक त्यांनी सदरे दिले आणि घालून दाखवा असे सांगितले ! आम्ही दोघांनी आहे त्याच वस्त्रांवर ते सदरे घातले आणि दोघांनाही ते बरोबर मापात झाले ! खरे पाहायला गेले तर आम्ही दोघेही अन्य साधू आणि परिक्रमावासी यांच्याशी तुलना करता धष्टपुष्ट प्रवर्गामध्ये मोडणारे होतो . परंतु तरीदेखील आम्हाला ते सदरे चोख बसले . त्या काकांना खूप आनंद झाला ! आमच्या हातावर वर थोडी दक्षिणा टेकवून ते पुढे निघून गेले . मी आणि तुकाराम बुवा स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहत राहिलो . दोघांनाही बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते . इच्छा करायचा अवकाश की मैयाने आम्हाला नवे कोरे कपडे दिले होते ! दोघेही मौनामध्ये चालत राहिलो . मैय्याच्या पुढे कुठलीही इच्छा व्यक्त करणे हे पाप आहे . क्षणात ती इच्छा पूर्ण करते . 
बहुतेक याचसाठी मैयाने आम्हाला किनारा सोडून रस्त्यावरती आणले होते . थोडे अंतर चालल्यावर दाट झाडीमध्ये असलेले कोटेश्वराचे मंदिर दिसले . मंदिर अतिशय स्वच्छ सुंदर व नीटनेटके होते . राज्य महामार्गाच्या कडेला असून देखील धुळीचा कण देखील फरशीवर कुठे दिसत नव्हता . आधुनिक पद्धतीची फरशी घालण्यात आली होती . परंतु देवस्थान पुरातन होते . इथे कोणीच नव्हते . अतिशय शांत व रम्य वातावरण होते . इथे काही काळ शांतपणे बसून महादेवाचे स्तवन केले . मंदिराच्या परिसराची काही चित्रं आपल्यासाठी सोबत जोडत आहे . 
श्री कोटेश्वर मंदिर कडोद
श्री कोटीश्वर महादेव
शक्यतो कोटी लिंग अर्चन पूजा संपन्न झालेल्या ठिकाणी कोटेश्वर महादेव किंवा कोटीश्वर महादेव स्थापन केले जातात . नर्मदे काठी असे अनेक कोटेश्वर आहेत .
मंदिराचे बाहेर कोटेश्वर महादेव असेच लिहिलेले आहे
श्री कोटेश्वर महादेव शिवलिंगाचा आकार षटकोनाकृती आहे
मंदिराच्या बाहेर सुंदर सुविचार लावलेले आहेत
भाषा गुजराती असली तरी आपल्याला वाचता येते आणि अर्थ देखील कळतो .
आम्ही गेलो तेव्हा सुद्धा शिवलिंगावर असेच सुंदर पैकी ऊन पडलेले होते !
साक्षात कोटीभास्कर कोटेश्वराच्या दर्शनासाठी जणु आलेले होते !
इथून हलावेसे वाटतच नव्हते इतके सुंदर वातावरण होते . परंतु तुकाराम बुवा चला चला म्हणून मागे लागल्यामुळे पुढे निघालो . वाटेमध्ये एका साधून छोटीशी कुटी उभी केलेली आहे . आणि तो परिक्रमावासींना बालभोग सेवा देतो . तिथे बसून थोडासा बालभोग घेतला . गुजरात मध्ये फरसाण शेव वगैरे असाच बाल भोग जास्ती करून मिळतो . तो साठवायला सोपा असतो आणि टिकणारा माल असतो . 
वाटेत आम्ही बालभोग घेतला ती बापा सिताराम मढुली . मोठी असते ती मढी . छोटुकली असते ती मढुली ! इथे समोरच झगडिया मढी होती . समोरच्या किनाऱ्यावर .
इथून थोडे अंतर चालल्यावर शुक्ल तीर्थ गावात जाणारा फाटा लागला . इथे जलाराम बाप्पांचे मंदिर होते .मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे वळलो . 
श्री जलाराम बापा मंदिर शुक्लतीर्थ
श्री जलाराम महाराजांची मूर्ती
बापा किंवा बाप्पा म्हणजे देव . गणपती बाप्पा हा शब्द मराठी भाषेमध्ये गुजराती मधूनच आला असावा . 
शुक्ल तीर्थाकडे वळणारा रस्ता . इथूनच आम्ही आत मध्ये गेलो .
शुक्ल तीर्थ हे एक अतिशय पवित्र असे पौराणिक गाव आहे . इथे अक्षरशः पावला पावलावर ऐतिहासिक मंदिरे आहेत . परंतु आज रामनवमी असल्यामुळे आपण राम मंदिरामध्ये जावे असा संकल्प केला . जाताना गावाच्या रस्त्यामध्ये एक छोटीशी मिरवणूक लागली . मिरवणुकीत खूप गर्दी असल्यामुळे पुढे जाता येईना . अखेरीस मिरवणुकी सोबत चालतच आम्ही निघालो कारण मिरवणूक देखील नर्मदा मैया च्या काठाकडेच निघाली होती . मिरवणूक कसली आहे लक्षात येत नव्हते .आधी मला असे वाटले की रामनवमीच्या निमित्ताने ही शोभायात्रा निघाली आहे . परंतु नंतर असे लक्षात आले की दोन छोट्या मुलींचे जावळ काढण्यासाठी त्यांना वाजत गाजत राम मंदिराकडे मिरवणुकीने घेऊन जाण्यात येत होते ! या मुलींना आधुनिक वेषांमध्ये सजविण्यात आले होते ! म्हणजे चक्क टाय कोट घातला होता ! ती मिरवणूक पाहून मला खूप मौज वाटली ! अखेरीस मिरवणुकी सोबतच मी आणि तुकाराम बुवा राम मंदिरामध्ये पोहोचलो . राम मंदिरामध्ये मोठाच उत्सव सुरू होता ! जेवढी गर्दी बाहेर होती त्याहून अधिक गर्दी आधीपासूनच राम मंदिरामध्ये जमलेली होती . मी जाऊन रामरायाचे दर्शन घेतले .
शुक्लतीर्थ राममंदिरातील राममूर्ती
शुक्ल तीर्थ मंदिर परिसर . डावीकडे नर्मदा माता मंदिर आहे . समोर राम राया आहे . बाकी अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .
 रामराया शेजारी एक झोपाळा होता . पुजाऱ्याने मला झोपाळ्यावर बसण्याची आज्ञा केली . माझ्या आजूबाजूला गावातील सर्व माताराम बसलेल्या होत्या . मी बसल्या बसल्या रामरक्षा म्हणायला सुरुवात केली . त्यांची सुद्धा भजने वगैरे सुरू होती . असा सुमारे तास दीड तास मी झोपाळ्यावर बसून राहिलो . मग रामजन्माचा सोहळा सुरू झाला . रामाचा पाळणा देखील मी म्हटला . आणि मग रामरायाची आरती झाली . परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे होते . नर्मदा मातेचे आणि गंगा मातेचे एकत्रित मंदिर होते . त्याच्या पलीकडे परिक्रमावासींच्या राहण्यासाठी दोन खोल्या होत्या .आता मी खोलीकडे जाणार इतक्या मध्ये त्या दोन मुलींचे आई-वडील माझ्याकडे आले आणि त्यांनी त्या मुलींना आशीर्वाद द्या असे मला सांगितले . मी त्यांना म्हणालो की या दोघी साक्षात गंगा आणि नर्मदा आहेत त्यामुळे मीच त्यांच्या पाया पडतो आणि मी चक्क पायावर डोके ठेवून दोघींना नमस्कार केला ! त्या दोघींनी देखील नर्मदा खंडातील परंपरेप्रमाणे डोक्यावर हा ठेवून मला छान आशीर्वाद दिला ! मग मुलीच्या वडिलांनी आमच्या तिघांचा एक सुंदर असा फोटो काढला !आणि मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
शुक्ल तीर्थ राम मंदिरामध्ये प्रस्तुत लेखकाने कडेवर घेतलेल्या आधुनिक वेशातील गंगामैया आणि नर्मदा मैया ! दोन्ही मुली फार गोड होत्या आणि त्यांचे केस खूप लांब होते ! एवढे लांब केस कापणार याचे मला थोडेसे दुःख च झाले !
शेजारीच असलेल्या मंदिरामध्ये नर्मदा मैया आणि गंगामैया होत्या हे विशेष !
 मंदिराच्या पुजाऱ्यांनी मला सांगितले की तुमच्याच पुणे गावातील तीन महिला मंदिरामध्ये येऊन राहिलेल्या आहेत . मला आश्चर्य वाटले . पुण्यावरून एवढ्या लांब कसे काय कोणी येईल ? तेही इतक्या छोट्या गावात ? परंतु कोण आहे बघूया तरी असा विचार करत मी खोलीकडे निघालो . खोलीकडे जायचे कारण असे की पुजारी महाराजांनी गावातून जेवण मागवले होते आणि खोली मध्ये बसून जेवण करा असे मला सांगितले होते .
इतक्यात त्या तिघीजणींना देखील पुजारीबुवाने सांगितले की तुमच्या पुण्याचा परिक्रमा वासी आलेला आहे . त्यामुळे तुकाराम बुवा आणि मला भेटायला त्या तिघीजणी आल्या .बहिणी बहिणी वाटणाऱ्या ह्या तिघी प्रत्यक्षामध्ये मायलेकी होत्या . 
पुणे येथील धनकवडी गावामध्ये राहणाऱ्या योगाचार्य सुनीता वसंत देवन नावाच्या एक तेजस्वी माताराम होत्या . यांच्या निकेता आणि अंकिता नावाच्या दोन मुली त्यांच्यासोबत आल्या होत्या . ह्या तिघीजणी चैत्र महिन्यातली उत्तर वाहिनी परिक्रमा करून इथे आल्या होत्या . तिघींपैकी निकेताने २०२१ सालामध्ये नर्मदा परिक्रमा केली होती . तिने अतिशय मनापासून , भक्ती भावाने आणि उत्तम रीतीने जी काही परिक्रमा जमली तेवढी केली होती . नर्मदा मैया प्रती तिच्या मनामध्ये अपार श्रद्धा होती .ती नर्मदा पुराण वाचण्यासाठी इथे आली होती . तिची धाकटी बहीण अंकिता गुरुचरित्राचे पारायण करत होती . आणि माताजींचा दुर्गा सप्तशतीचा पाठ चालला होता ! परिक्रमेदरम्यान मंदिराचे पुजारी धर्मेंद्र परमार यांच्याशी तिचा परिचय झालेला होता . त्यावेळी तिला हे स्थान आवडले होते त्यामुळे तिने आत्ता पारायणासाठी हेच स्थान निवडले असे ती म्हणाली . आम्ही सर्वजण एकाच गावातले अर्थात पुण्यातले असल्यामुळे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आमची मूळ गावे अर्थात सांगली आणि कोल्हापूर ही देखील शेजारी शेजारी असल्यामुळे आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या ! निकिता ही पुण्यातील एका शाळेमध्ये शिकविते . देवनकाकूंचे धनकवडी भागामध्ये योगासना चे वर्ग आहेत . मी त्या तिघींकडे एक विचित्र मागणी केली ! मी त्यांना म्हणालो की तुम्ही आता इथून थेट पुण्यालाच जात आहात तर माझ्याजवळ आतापर्यंत साठलेली शिवलिंगे व अन्य वजन तुमच्याकडे देऊन टाकू का ! आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी देखील आनंदाने अनुमोदन दिले ! मग काय विचारता ! माझ्या जुन्या कमण्डलू मध्ये भरून सर्व जड जड शिवलिंगे मी पुण्याला पाठवून दिली ! दतवाडा येथील स्वामीजींनी मला दिलेली वस्त्रे देखील मी पुण्याला पाठवून दिली . कारण आता मला समुद्र पार केल्यावर नवीन वस्त्र मिळालेले होतेच . तसेच मला पिपरहा गावामध्ये मिळालेले वस्त्र देखील अजूनही मी चांगले टिकवून वापरत होतो . वजन कमी करता करता माझ्या लक्षात आले की शिवलेले कपडे शक्यतो घालायचे नाहीत असा माझा संकल्प होता . त्यामुळे अंगात घातलेला सदरा देखील मी घरी पाठविणार होतो परंतु माझ्या लक्षात आले की हा सदरा मी तुकाराम महाराजांना सुद्धा देऊ शकतो . निकेता म्हणाली की तो सदरा काढण्यापूर्वी तुमचा दोघांचा एक फोटो काढते . मी तिला म्हणालो की माझ्या मैया ला सुद्धा फोटोमध्ये घे ! आणि मी मैय्याला बाहेर काढल्याबरोबर तिघींनी अक्षरशः एखाद्या लहान बाळाला अंगा खांद्यावर घेऊन नाचवावे तशी माझी मैया नाचवायला सुरुवात केली ! त्यांना ती इतकी आवडली की काही विचारूच नका ! तिला काय करू आणि काय नको असे तिघींना झाले ! सुदैवाने त्यांच्याकडे काही नवीन अलंकार नुकतेच विकत घेतलेले होते ! ते काढून त्यांनी माझ्या मैय्याला अतिशय सुंदर पद्धतीने सजवून दिली ! एक छान वस्त्र सुद्धा मला दिले . आणि रंगीबिरंगी टिकल्या लावून तिला सजवली !काही अलंकार जास्तीचे म्हणून माझ्यासोबत दिले . मग हा सर्व लवाजमा पसरून आमच्या तिघांचा फोटो तिने काढला ! नुकतीच पुण्यामध्ये भेट झाल्यावर हे सर्व फोटो तिने मला पाठवले . आपणही या नवीन सजवलेल्या मैयाचे दर्शन घेऊयात !
धनकवडीच्या देवन मायलेकींनी सजविलेली माझी नर्मदा मैया ! सकाळीच मिळालेले कोरेकरकरीत सदरे घातलेले जुनाट परिक्रमावासी ! प्रस्तुत लेखक आणि तुकाराम बुवा सुरवसे . हा फोटो निकेताने बहुतेक तिच्या instagram वर टाकलेला होता त्यामुळे तिने पुण्याचा परिक्रमावासी असे खाली लिहिलेले आहे . 
या चित्रात डावीकडे दिसणाऱ्या दरवाजाच्या बाहेर बसून हे वरील चित्र काढलेले आहे .



शुक्ल तीर्थ राममंदिरात उभ्या डावीकडून अनुक्रमे
सौ सुनीता वसंत देवन ,कु . निकेता आणि कु . अंकिता
 निकेता व अंकिता सोबत प्रस्तुत लेखक . 
निकेताने काढलेला माझ्या मैया चा जगात भारी फोटो !
शुक्ल तीर्थ राम मंदिराची व्यवस्था पाहणारे श्री धर्मेंद्र परमार . यांनीच आम्हाला घरून डबा आणून जेवण दिले . जास्त संख्येने परिक्रमा वासी असतील तर इथेच जेवण बनवले जाते . एक दोन जण असतील तर घरचेच जेवण ते आणून देतात . हे व यांचा बंधू उपेंद्र व त्याची पत्नी हेमांगी परिक्रमावासीयांची सेवा करतात . यांचा क्रमांक येणे प्रमाणे . 
९६३८८२८४४८ ।  96388 28448
यांचे काकाजी नावाचे एक नातेवाईक आहेत . हे ब्रह्मचारी असून अनवाणी राहतात . अतिशय व्रत्तस्थपणे ते परिक्रमा वासियांची सेवा करतात . मंदिराच्या मागेच पिंपळाच्या वनामध्ये एका पडक्या खोलीमध्ये आपल्या आईची सेवा करत हे राहतात . परंतु नेमके आम्ही तिथे गेलो तेव्हा ते नव्हते . परंतु देवन माता-भगिनी त्यांच्याबद्दल भरभरून सांगतात .


राम मंदिरामध्ये भोजन घेणाऱ्या परिक्रमावासींचे संग्रहित छायाचित्र



रामनवमीच्या दिवशी सजविलेले प्रभू श्री रामचंद्र !
समोर भगवा केक वगैरे ठेवलेला दिसतोय पहा !


गावातील महादेव मंदिरामध्ये देवन मायलेकी


शुक्ल तीर्थ राम मंदिराच्या आवारातील पिंपळाच्या झाडाखाली नर्मदा पुराणाचे पारायण करायला बसलेली रेवाभक्त कु. निकेता वसंत देवन धनकवडी
परिक्रमेमध्ये कु. निकेताला मिळालेला बाण  आणि नर्मदा पुरणाची पारायण प्रत .समोर स्वर्गीय नर्मदा मैया ! 
हे सर्व फोटो निकेताने पाठवल्यामुळे आपल्या माहितीकरता सोबत जोडले आहेत  .
योगा योगा चा भाग असा की मी हे सर्व लिखाण करत असतानाच देवन मायलेकी मैय्या च्या दर्शनासाठी घरी येऊन गेल्या ! ती त्यांची फार लाडकी आहे .
हे लिखाण चालू असतानाच घरी आलेल्या देवन काकू आणि निकेता . सोबत मैया ! किती अद्भुत योगायोग आहे पहा ! पूर्वी फोन नसायचे तेव्हा असाच संपर्क व्हायचा . ज्या व्यक्तीची आठवण होईल ती व्यक्ती समोर येऊन उभी राहायची .
एक फार महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते .
नर्मदा परिक्रमा किंवा आता देवन माता भगिनी करत असलेल्या सर्व गोष्टी या तरुण पणी करावयाच्याच गोष्टी आहेत. म्हणजे उतारवयात त्या करूच नयेत असे काही आहे का तर असे अजिबात नाही . परंतु उतार वयात तुम्हाला त्याचा पुरेसा लाभ मिळेलच याची खात्री देता येत नाही . उदाहरणार्थ एकच पदार्थ घ्या . पुरणाची पोळी समजा . ती एका लहान मुलाला खाऊ घातली , तरुणाला खाऊ घातली , वयस्कर माणसाला खाऊ घातली आणि जख्खड म्हाताऱ्याला खाऊ घातली . तर लहान मुलांच्या ती अंगी लागेल , तरुणाला ती शक्ती देईल , वयस्कर माणसाला ती जाणार नाही आणि जख्खड म्हाताऱ्याला तर अपचनच होईल ! तसेच नर्मदा परिक्रमेचा विविध वयामध्ये होणारा लाभ हा वेगळा वेगळा आहे असे मला वाटते . तरुणपणी ती केल्यावर शारीरिक क्लेशाकडे लक्ष कमी जाऊन आजूबाजूच्या आनंदाकडे लक्ष अधिक लागण्याची शक्यता वाढते . तसेच योग्य वयामध्ये नर्मदा परिक्रमा संपूर्ण झाल्यावर पुढील आयुष्यभर तो मनुष्य अधिक संयमित जीवन जगण्याची शक्यता देखील वाढते . उतार वयात परिक्रमा केल्याचे देखील लाभ आहेत परंतु ते या जन्मापेक्षा पुढच्या जन्मी अधिक कामाला येणारे आहेत . कारण उमेदीचा काळ निघून गेलेला असल्यामुळे अशी व्यक्ती खरोखरीच धडाडीने कार्य करणारी असेल तरच तिच्या परिक्रमेचा लाभ त्या व्यक्तीला आणि तिच्याशी संबंधित लोकांना अधिक होऊ शकतो . परंतु सरासरी तसे नसल्याचे आपल्याला सहजच जाणवते . इथे सुद्धा आपल्या तरुण मुलींना हे सर्व कार्य करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आणि त्यासाठी स्वतः त्यांच्यासोबत राहून पारायण करणाऱ्या देवान काकूंचे कौतुक करावेसे वाटते . आपल्या तरुण मुलीला एकटीला नर्मदा परिक्रमेसाठी पाठवण्याचा देवन काका काकूंचा निर्णय देखील अभिनंदनीयच आहे . आपल्या तरुण मुलाला किंवा मुलीला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा झाली तर त्यांना कृपा करून अडवू नका . त्यांची काळजी घ्यायला नर्मदा मैया समर्थ आहे .आपले तेवढे सामर्थ्य अजिबातच नाही . बऱ्याच प्रसंगी असे देखील पाहायला मिळते की नवरा बायको तरुण असताना दोघांपैकी एका कोणाला परिक्रमा करण्याची इच्छा झाली तर दुसरी व्यक्ती आडवीत असल्यामुळे परिक्रमा करण्याचे अर्धवट राहून जाते . हे पातक देखील आपण न केलेले उत्तम आहे . येथे लक्षात घेण्याचा भाग इतकाच आहे की आपल्यावर अवलंबून असलेली एखादी व्यक्ती जर नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला अडवू नका .कारण तुमच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहेत त्यातील कुठलीही अडचण नर्मदा परिक्रमेदरम्यान येत नाही . कारण नर्मदा परिक्रमा करणारा परिक्रमावासी हा नर्मदा मातेचा बालक बनून गेलेला असतो . त्यामुळे त्याची संपूर्ण काळजी नर्मदा मैया अहोरात्र घेते .घेतेच घेते .याची निश्चिन्ती बाळगावी . आपल्या मनाच्या खेळामुळे एखाद्या व्यक्तीची महापुण्यप्रद श्री नर्मदा परिक्रमा बुडली हे पाप आपल्या माथ्यावर कधीच लागायला नको ! नाहीतर त्याचे क्षालन करण्यासाठी देव तुमच्याकडून एखादी परिक्रमा करून घ्यायचा ! असो .
भोजन प्रसाद घेतल्यावर सर्वांचा निरोप घेतला . मी पुण्यात गेल्यावर माझे सामान देवन कुटुंबीयांकडून स्वीकारणार होतो . त्यामुळे त्यांचा पत्ता वहीमध्ये लिहून घेतला . माझाही पत्ता त्यांना लिहून दिला आणि पुढे निघालो .  पाठीवरचा भार असा काही हलका झाला होता म्हणता ! मला तर वाटले की रामनवमीच्या दिवशी साक्षात रामरायाच आपल्याला पावला ! इतके दिवस न पावणारा देव , देवन रूपाने पावला व मी माझा भार देवन यांना देवून टाकला व आभार मानले ! शुक्ल तीर्थ गावामध्ये अनेक मंदिरे होती त्यांचे दर्शन घेत घेत पुढे जावे असे ठरविले . दुपारचे कडकडीत ऊन पडलेले होते . रस्ता आग ओकीत होता . ओळीने एका एका मंदिरामध्ये जाऊन यथेच्छ दर्शन घेतले ! ही सर्व मंदिरे पौराणिक आहेत . विशेषतः एखाद्या गावाचे नावच शुक्ल तीर्थ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्व सिद्ध करणारे आहे ! 
पाठीवरचा भार हलका झालेला मी आता देवदर्शनांसाठी सिद्ध झालो ! राम मंदिरातून बाहेर पडल्यावर मी थेट सोमेश्वर महादेवाचे मंदिर गाठले . इथेच शुक्लेश्वर महादेव देखील आहेत . मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेले होते . गुजरात मध्ये मंदिरांची स्वच्छता खूप ठेवतात असे मला जाणवले . कुठे धुळीचा कण सुद्धा नव्हता .

श्री शुक्लेश्वर सोमेश्वर महादेवाचे भव्य मंदिर
मंदिरातील वाखाणण्याजोगी स्वच्छता

श्री सोमेश्वर महादेव शुक्लतीर्थ

श्री शुक्लेश्वर महादेव शुक्लतीर्थ

मंदिरातील धनुष्य त्रिशूल तलवार कमण्डलू धारी हरसिद्धी देवता .
खरी वस्त्रे नेसविलेले मंदिरातील रंग अवधूत महाराजांचे अप्रतिम चित्र .
 दुपारची वेळ असल्यामुळे मंदिरात कोणीही नव्हते . छानपैकी दर्शन घेतले . इतक्यात एक-दोन परिक्रमावासी तिथे आले . त्यांच्याशी बोलून पुढील मंदिरात निघालो . वाटेमध्ये एका माताजींनी थंडगार पाणी पाजले आणि माझ्याकडे थर्मास आहे असे पाहून फ्रीजमधले थंडगार पाणी त्यात भरून दिले ! तुमच्या सामानात काय काय ठेवलेले आहे याकडे माताराम लोकांचे किती बारीक लक्ष असते पहा ! माझ्याही डोक्यात नव्हते की मी मागे थर्मास खोचला आहे .पण यांनी पाहिले ! प्रथमच त्यात थंड पाणी ठेवल्यामुळे आता यात पाणी किती काळ थंड राहते याची परीक्षा होणार होती . त्यात तो कमण्डलू चांगलाच पास झाला . सुमारे १६ तास पाणी थंड राहिले . असो . 
इथून पुढे कनकाई किंवा कनकेश्वरी मातेचे दर्शन घेतले . शेंदूर फासलेली जुनी मूर्ती होती . जागृत देवीचे स्थान होते . 
कनकेश्वरी मातेचे मंदिर . ध्वजावर बसलेला दयाळ पक्षी पहा !
श्री कनकाई माता अथवा कनकेश्वरी माता

शुक्ल तीर्थ गावातील वैशिष्ट्य म्हणजे इथे ओंकारानाथ विष्णू भगवानाचे मंदिर आहे . पांढऱ्या रंगाच्या वालुकाश्म सदृश्य पाषाणापासून तयार केलेली विष्णूची एक अतिशय सुंदर मूर्ती इथे आहे . ही मूर्ती अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणारी मूर्ती आहे . या एकाच मूर्तीमध्ये अन्य अनेक देवता कोरलेल्या आहेत . विष्णू भगवंता सोबतच सूर्यनारायण ,लक्ष्मी अशा मूर्तींची देखील स्थापना मंदिरात केलेली आहे . विशेषतः विष्णुच्या या एकाच मूर्तीमध्ये आपल्याला अनेक देवता पाहायला मिळतात . विष्णूच्या उजव्या हातामध्ये शंकर भगवान , गदा असून हृदयावर श्री लांछन , भृगु लांछन   धारण केलेले आहे .याची कथा मोठी रंजक आहे . भगवान विष्णू किती क्षमाशील आहेत हे तपासण्यासाठी एकदा भृगु ऋषींनी लक्ष्मी सोबत ते बसलेले असताना अचानक येऊन त्यांच्या छातीवर लाथ मारली होती. यानंतर ताबडतोब विष्णू भगवंत उठले आणि भृगु ऋषींचा पाय हातात घेऊन कुरवाळू लागले . आणि म्हणाले तुमचा पाय कमळासारखा नाजूक आहे . माझी छाती वज्राप्रमाणे कठोर आहे . आपल्याला लागले तर नाही ना ? त्यानंतर भृगु ऋषींना पश्चात्ताप झाला . व त्या घटनेची खूण म्हणून विष्णू ने भृगु लांछन हृदयावर धारण केले .  तीच ही जागा असे सांगतात . विष्णू भगवंताने डाव्या हातामध्ये ब्रह्मदेव , शेषनाग ,आणि चक्र धारण केलेले आहे . उजव्या हाताला वेदव्यास , पद्म किंवा कमळ , लक्ष्मी जी आणि जय अशा मूर्ती असून डाव्या हाताला राधिका , शंख ,सुखदेवजी किंवा शुकदेवजी आणि विजय अशा मूर्ती आहेत . मूर्तीच्या भोवती सुंदर दगडी महिरप केलेली आहे . समोर अर्थातच गरुडाचे मंदिर आहे . सूर्यनारायणाची सात घोड्यांच्या रथावर बसलेली मूर्ती देखील सुंदर आहे . लक्ष्मीची मूर्ती देखील सुबक ठेंगणी आहे . एकंदरीत आवर्जून पहावे असे हे मंदिर आहे . 
ओंकार नाथ विष्णू मंदिराची अगदी अलीकडे टिपलेली छबी
श्री ओंकारनाथ विष्णु भगवान यांची अप्रतिम मूर्ती
विष्णू भगवंताच्या मूर्तीभोवतीची महीरप पण सुंदर आहे
मंदिर किती भव्य आहे हे आपल्याला कळसावर चढलेल्या माणसाच्या आकारावरून लक्षात येईल .
मंदिरातील लक्ष्मीची सुबक ठेंगणी सुंदर मूर्ती

सात घोड्यांच्या रथावर बसलेले सूर्यनारायण भगवान

इथून थोडेसे पुढे गेल्यावर शेजारीच अंबाजी मातेचे मंदिर होते त्याचे देखील दर्शन घेतले . आंबे चा तांदळा शेंदुराने फासलेला आपल्याला पाहायला मिळतो . इथेच टेंबे स्वामींची मूर्ती आणि दत्ताच्या पादुका देखील पाहायला मिळतात . रंगावधूत महाराज यांच्यामुळे या परिसरामध्ये दत्तभक्तीचा प्रचार प्रसार झाला . 
दारात दत्तप्रभूंची प्रतिमा लावलेले अंबाजी माता मंदिर
अन्नकोट रचणे हे गुजरात मधील मंदिरांचे वैशिष्ट्य आहे . अंबाजी मातेपुढे रचलेल्या अन्नकोटाचे संग्रहित छायाचित्र . 
अंबाजी मातेचा मूळविग्रह
मंदिरामध्ये असलेली परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज उपाख्य श्री टेंब्ये स्वामी महाराजांची मूर्ती

श्री दत्तप्रभूंच्या पादुका
या भागातील मंदिरांमध्ये एक चित्र नेहमी पाहायला मिळते ते म्हणजे लहान मुले मंदिरामध्ये आवर्जून आणली जातात . तुला मंदिरात जायचे आहे का ? असा पर्याय त्यांच्या पुढे ठेवलाच जात नाही .तर आई वडील किंवा आजी आजोबा किंवा ताई दादा कोणाच्याही सोबत लहान मुले मंदिरामध्ये येतातच येतात . लहान वयातच संस्कार झाला की तो आयुष्यभर टिकण्याची शक्यता वाढते त्यामुळे इथले लोक महाराष्ट्रातील लोकांपेक्षा अधिक भाविक आहेत असे सहज जाणवते . योगायोगाने माझ्या या अनुभवाची पुष्टी करणारे एक चित्र मला अंबाजी माता मंदिराच्या गुगल फोटोमध्ये सापडले . ते आवर्जून तुमच्यासाठी सोबत जोडत आहे .
अंबाजी माता मंदिर परिसरातीलच एका छोट्या मंदिराचे हे चित्र आहे . चित्रात काही वेगळे आढळले का ?
पुन्हा एकदा ही छोटीशी देवळी पहा ! त्याच्या अगदी आत मध्ये बसून एक छोटेसे पिल्लू किती मनोभावे देवाशी हितगुज करते आहे पहा ! हे अतिशय सकारात्मक चित्र आहे ! या बालकाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक रोग होण्याची किंवा मानसिक धक्का वगैरे बसण्याची शक्यता अतिशय दुरापास्त आहे . सगुण पूजेमध्ये ते सामर्थ्य आहे .

या गावांमध्ये अन्य अनेक मंदिरे आहेत . एक जैन मंदिर आहे . भाथीजी महाराजांचे मंदिर आहे . खप्पर मातेचे मंदिर आहे . रेवत मातेचे मंदिर आहे . राम पीर किंवा रामदेव बाबा यांचे मंदिर आहे .वैरही मातेचे मंदिर आहे. परंतु माझ्यासोबत मंदिर दर्शनाविषयी कमालीचे औदासिन्य असलेले तुकाराम बुवा असल्यामुळे आम्ही वैरही मातेचे दर्शन घेऊन त्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय घेतला .
 वाटेमध्ये प्रत्येक आश्रमामध्ये मला सांगण्यात आले होते की उत्तर तटावर ज्योतिबेन आणि शशी बेन यांची सेवा अवश्य घ्या . त्यामुळे याच्यापुढे असलेल्या मंगलेश्वर गावामध्ये जाऊन या कुटुंबाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनामध्ये होती . त्यामुळे वेगाने मार्गक्रमणा करत मंगलेश्वर गाव गाठले . या गावामध्ये गेल्यावर सर्वच लोक तुम्हाला ज्योतिबेन यांच्या घराकडे जाण्याचा रस्ता दाखवायला सुरुवात करतात ! परिक्रमावासींची सेवा कशी असावी याचा एक आदर्श वस्तू पाठ या कुटुंबाने घालून दिलेला आहे ! आणि ही सेवा आजची नसून गेल्या सहा पिढ्या सतत परिक्रमावासींची सेवा हे कुटुंब करत आहे ! सध्या ज्योतीबेन ही सेवा पाहतात . या अविवाहित असून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य परिक्रमावासींच्या सेवेला समर्पित केलेले आहे . पंड्या असे आडनाव लावणारे हे एक ब्राह्मण कुटुंब आहे . घरची परिस्थिती काही फार श्रीमंतीची आहे असे नसून थोडीफार शेती आहे त्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो . शशी बेन ,शांतीबेनआणि कमलबेन या बहिणी अविवाहित राहून परिक्रमावासींची सेवा यापूर्वीच्या पिढीमध्ये करत होत्या . त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सध्या ज्योतीबेन आणि बॉनीबेन या दोघी बहिणी  ब्रह्मचारी राहून ही सर्व धुरा समर्थपणे  सांभाळत आहेत . शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या ज्योती बेन यांना थोडीफार पेन्शन मिळते ती देखील त्या याच सेवेमध्ये लावतात . मी गेलो तेव्हा कमल बेन खूप थकलेल्या आणि अंध असल्यामुळे एका जागी बसलेल्या मला आढळल्या . परंतु आता या कुटुंबातील पुढची पिढी देखील यांच्या मदतीसाठी आलेली आहे . ज्योती बेन यांना दोन मामा आहेत त्यांची मुले देखील आता सेवेसाठी अधून मधून इथे येऊन राहतात . किशोर आणि गड्डूभैय्या अशी त्यांची नावे आहेत . गड्डू भैय्या २००५ साली कौन बनेगा करोडपती मध्ये ६ लाख जिंकून आलेला आहे असे मला ज्योतीबेन ने सांगितले !    पूर्वी सहकार्य करण्यासाठी कचरणारे ग्रामस्थ आता मात्र अतिशय प्रेमाने ज्योतिबेन यांना सहकार्य करतात आणि परिक्रमा वाशींची संख्या वाढल्यावर गावातील काही लोक परिक्रमा वासींना आपल्या घरासमोर झोपण्यासाठी जागा वगैरे देतात . किंवा परिक्रमेच्या हंगामामध्ये तर इथे चक्क मोठा मांडव घातला जातो त्यामध्ये सर्व परिक्रमावासी सार्वजनिक पद्धतीने उतरतात . परिक्रमावासींची आदर्श पद्धतीने सेवा कशी करावी हे आपल्याला इथे गेल्यावर लक्षात येते . ज्योतिबेन यांचा चेहरा सतत हसतमुख असतो . त्या स्वतः देखील गेल्या काही वर्षांपासून खंडित परिक्रमा करत आहेत . अतिशय प्रेमाने आणि आधाराने आलेल्या प्रत्येक परिक्रमावासींची त्या वैयक्तिकपणे विचारपूस करतात हे मी स्वतः अनुभवले . शशी बेन या ज्योती बेन च्या मावशीने घालून दिलेली परंपरा त्या अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत . गेल्या काही दशकात ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना शशी बेन ठाऊक आहेत परंतु दुर्दैवाने त्या आता आपल्यामध्ये राहिलेल्या नाहीत . त्यांची जागा आता ज्योतीबेन यांनी घेतलेली दिसते . कित्येक आश्रमामध्ये तुम्ही आलात काय किंवा गेलात काय याचा काहीही फरक न पडणारे सेवादार पाहिलेले असल्यामुळे आवर्जून तुमच्याशी व्यक्तिगतपणे बोलणारी सेवाधारी व्यक्ती पाहिल्यावर तुम्हाला खरोखरच मनापासून खूप बरे वाटल्याशिवाय राहत नाही . मी देखील या घरामध्ये गेल्याबरोबर स्वतः ज्योतिबेन मला सामोऱ्या आल्या आणि त्यांनी मला कुठून आला आहे ,परिक्रमा कधी उचलली आहे ,किती दिवसांची परिक्रमा आहे ,अन्य काय नियम मी पाळतो आहे , वगैरे सर्व मला विचारून घेतले . यांचे घर एका खोल खड्डा असलेल्या तलावाच्या शेजारी होते . बैठा बंगला होता . समोर थोडी मोकळी जागा होती . परंतु या जागेमध्ये प्रचंड अडगळ आणि अडचण आहे असे मला दिसले . या भागात डास प्रचंड आहेत कारण तलावात साठलेले पाणी . मला असेही लक्षात आले की यांच्या भूमिगत पाईपलाईन मधून अखंड गळती होत आहे . हे सर्व पाहिल्यावर मी नेहमीप्रमाणे माझे आसन ज्योतीताईंनी सांगितलेल्या ठिकाणी अंगणामध्ये लावले आणि झाडू हातात घेतला . इथे सुमारे १३ १४ परिक्रमावासी उतरलेले होते . केरळी साधू , चित्रकूटचा तिवारी बाबा , तुकाराम बुवा , मुंबईकर नागा साधू असे माझ्या ओळखीचे काही लोक त्यात होते . मी त्या संपूर्ण अंगणातील फरशा ,टाइल्स चे तुकडे ,विटा , दगड हे गोळा करून एका बाजूला छान रचून ठेवले . नको असलेली लाकडे पालापाचोळा कचरा सर्व गोळा करून त्याचा बंबापाशी ढीग लावून ठेवला . तिथे अन्य अशा बऱ्याच गोष्टी पडलेल्या होत्या ज्या अनेक वर्ष काहीच कामात आलेल्या नव्हत्या परंतु केवळ पडून राहिल्या होत्या . मी काम करतो आहे पाहिल्यावर ज्योती बेन जातीने स्वतः तिथे आल्या .सुरुवातीला त्या मला म्हणत होत्या की तुम्ही चालून थकलेले आहात तरी कृपया कुठल्याही कामाला हात लावू नका . आम्ही सर्व करून घेतो . परंतु मी त्यांना सांगितले की मी अजिबात थकलेला नसून आपल्या आश्रमामध्ये काहीतरी श्रमदान सेवा करण्याची माझी इच्छा आहे तरी कृपया मला काम सांगावे . मग मात्र त्यांनी मला त्यांच्यासमोर असलेल्या सर्व समस्यांचा पाढा वाचून दाखविला . हळूहळू अन्य काही परिक्रमा वासी देखील माझ्या मदतीला आले आणि मग आम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर पद्धतीने तो सर्व परिसर चकाचक करून टाकला ! जिथे जाण्यासाठी मांजर सुद्धा चार वेळा विचार करेल अशा अडगळीच्या ठिकाणी आता ३० परिक्रमावासी उतरतील अशी स्वच्छ जागा तयार झाली ! पाण्याच्या टाकीजवळ होणारी जी गळती आहे तिथे तिवारी बाबाने खडू ने श्री ज्योती धारा अशी अक्षरे लिहिली . आणि कौतुकाने त्यांना दाखवायला गेला . पहिल्यांदाच मी त्या माऊलीला चिडलेले पाहिले ! त्या तिवारी बाबाला रागावल्या आणि ती अक्षरे पुसायला लावली ! त्या म्हणाल्या ही आपली एवढी योग्यता नाही की आपण आपल्या नावापुढे धारा सारखा पवित्र शब्द लावावा . धारा फक्त नर्मदा मातेचीच असू शकते ! मला ते पाणी कुठून येत आहे याचा शोध घ्यायचा होता म्हणून मी ज्योती बेन यांची परवानगी घेऊन तिथली जमीन उकरून काढली . आणि मग माझ्या लक्षात आले की जमिनीखाली पीव्हीसी पाईपलाईन चे फिटिंग नीट झालेले नाही . प्लास्टिकचा वापर करून मी उत्तम दर्जाचे फिटिंग केले आणि पुन्हा जमीन समतल केली त्यामुळे ज्योती धारा लोप पावली !
माझ्या कामगिरीमुळे ज्योती बेन खूप खुश झाल्या . त्यांचा एक भाचा देखील तिथे येऊन मदतीसाठी राहिला होता . नंतर आम्ही आत मध्ये जाऊन कमलाबेन यांच्याशी गप्पा मारल्या . अत्यंत खेळीमेळीचे आणि आनंदाचे वातावरण राहील याची दक्षता सर्वच कुटुंबीय घेत असत . कल्पना करून पहा . आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे आले की काही काळापुरते अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे , उल्हासाचे वातावरण निर्माण होते . आणि ते गेल्यावर शांतता पसरते . परंतु असे पाहुणे जर तुमच्याकडे सतत येत राहिले तर तुम्ही काय कराल ? किती दिवस उत्साह दाखवाल ? इथे परिक्रमावासी सहा पिढ्या अखंडपणे येत आहेत तरी देखील हे कुटुंबीय तितकाच उत्साह प्रत्येक वेळी दाखवते यावरून त्यांचे श्रेष्ठत्व आपल्याला सहज लक्षात यावे ! सोपी गोष्ट नाही मित्रांनो ! मी गोळा केलेला कचरा पेटवून देतो आहे हे पाहिल्यावर शेजारच्या माणसाने देखील त्याचे अंगण झाडून साफ केले व तोही कचरा मला जाळायला आणून दिला . एकंदरीत संध्याकाळपर्यंत तो संपूर्ण परिसर अतिशय चकाचक झाला . चालून कितीही थकले असले तरी असे काम केल्यावर एक वेगळा उत्साह ,एक वेगळी ऊर्जा माझ्या अंगामध्ये संचारायची हे मान्य केलेच पाहिजे . 
परिक्रमावासींची सेवा कशी करावी याचा आदर्श वस्तू पाठ घालून देणाऱ्या पुण्यवान पुण्यात्मा डावीकडून श्रीमती ज्योती बेन मध्ये श्रीमती कमलबेन आणि उजवीकडे श्रीमती बोणिबेन . यांना भेटायला सतत कोणी ना कोणी येत असते . यांना स्वतःचे खाजगी जीवन उरलेलेच नसून सर्व आयुष्यच सार्वजनिक झालेले आहे .
आयुष्यभर परिक्रमा वासियांची सेवा केलेल्या कमला बेन . यांना दृष्टी नाही .परंतु स्मृती तल्लख आहे .

श्रीमती ज्योती बेन

समोर लाल रंगाची खोली दिसते तिथे यांचे निवासस्थान असून डावीकडे पंखा लावला आहे त्याच्या खाली मी आसन लावले होते .
परिक्रमावासींची संख्या वाढली की अंगणातच अशा प्रकारचा मांडव घालून त्यांची व्यवस्था केली जाते .
 मैय्याने आमच्याकडून स्वच्छता करून घेऊन वापरण्यायोग्य केलेली हीच ती जागा !
यांच्या घरातील लहानातला लहान सदस्य सुद्धा परिक्रमावासींची मनोभावे सेवा करताना दिसे . ज्योती बेनदेखील लहान असल्यापासून परिक्रमावासींची सेवा पाहत असल्यामुळे आपणही तेच करावे असे त्यांनी ठरविले . लहान वयात होणारे संस्कार हे फार म्हणजे फार महत्त्वाचे असतात हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे .

ज्योती बेन यांनी मला सांगितले की आता जाऊन मंगलेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन यावे आणि त्या महादेवाच्या पिंडी मध्ये काय काय पहावे हे देखील त्यांनी मला सांगितले . आम्ही पाच-सहा परिक्रमावासी एकत्रितपणे मंगलेश्वर महादेवाच्या दर्शनाला गेलो . मंगळ देवाने स्थापन केलेले हे शिवलिंग आहे . शिवलिंगावरती एक खड्डा आहे . इथेच श्वेत वराहाची देखील मूर्ती आहे . कालगणना बघता सध्या श्वेतवाराहकल्प चालू आहे .
नर्मदा मातेचे मंदिर देखील छान आहे . इथून नर्मदा मातेचे खूप छान आणि रमणीय दर्शन होते . मंदिर छोटेसेच असले तरी प्रचंड ऊर्जा असल्याचे जाणवते .
या गावाला ज्यावरून नाव पडले त्या श्री मंगळनाथ महादेवांचे मंदीर . नर्मदा खंडातील बहुतेक गावांची नावे त्या गावातील मुख्य देवतेवरून पडलेली दिसतात . 
मंदिर परिसर साधा सोपा व सुटसुटीत आहे
श्री मंगलनाथ महादेवांचे दर्शन घ्या !
श्री श्वेतवराहाची अतिशय दुर्मिळ आणि सुंदर मूर्ती . यावर खाली शिलालेख देखील लिहिलेला आहे .वराहरूपातील विष्णूच्या हातात शंख चक्र गदा पद्म माला असलेली आपल्याला दिसते . मूर्ती अप्रतिम असून सुस्थितीत आहे .
मंदिरातील मगरवाहन नर्मदा मैयाची सुंदर मूर्ती
मंगळनाथाचे मंदिर हरिहर ऐक्य प्रतिपादित करणारे आहे . कारण मंगळनाथ महादेवांच्या सोबतच इथे विष्णू आणि लक्ष्मी चे विग्रह देखील प्रतिष्ठापित केलेले आहेत .
नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन या मंदिर परिसरातून होते . 
या भागातील नर्मदा मातेची काही सुंदर चित्रे पाहूयात . हळूहळू पाणी गोड होत चालल्यामुळे काठावर गवताचे प्रमाण वाढू लागते .
गवताच्या पार्श्वभूमीवर काढलेला मैयाचा अपोज्योती दर्शवणारा सुंदर फोटो . किती स्वर्गीय रूप आहे पहा मैयाचे !
या भागातली भूमी थोडीशी खडकाळ आहे . रेती व खडक मिश्रित किनारे आहेत .
इथे शिवलिंगे सापडायला सुरुवात होते .
 रेती मिश्रित किनारे असल्यामुळे सलग प्रवाह नसून अशा अनेक खंडित धारा दिसतात
या परिसरातील नावा साधारण अशा आहेत . पाणी खोल असल्यामुळे मोठ्या नावा असतात . 
नावे वरतीच केवट लोकांचा अर्धा संसार असतो .
सर्व दर्शने घेऊन आम्ही पाच-सहा जण पुन्हा एकदा आश्रमामध्ये दाखल झालो . आश्रमामध्ये सेवेसाठी गावातील काही तरुण येत जात असतात . यातील रामकृष्ण , मोनील आणि हेमंत नावाच्या तीन मुलांशी बऱ्याच गप्पा मी मारल्या . हेमंत वेडा आहे असे मला सांगण्यात आले होते . परंतु आपल्याकडे अतिशय सार्वत्रिकपणे दिसणारा परंतु सोयीस्करपणे दुर्लक्षित केला जाणारा आत्ममग्नता नावाचा एक आजार आहे . त्याचा तो रुग्ण होता . ज्याला इंग्रजीमध्ये ऑटिझम असे म्हणतात . आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहायला गेले तर या प्रकारच्या विकाराच्या अनेक छटा आढळतात . एकच एक रोग किंवा एकच एक लक्षणे अशी तुम्हाला आढळणार नाहीत . हेमंत तसा असला तरीदेखील परिक्रमा वासीयांची उत्तम सेवा करत होता . याचा अर्थ ही मुले सुद्धा खूप काही करू शकतात . फक्त त्यांना योग्य पद्धतीने वाढवावे लागते आणि त्यासाठी थोडेसे अधिक कष्ट घ्यावे लागतात इतकेच . या विषयावर पुरेसे किंवा म्हणावे तसे प्रबोधन आपल्याकडे होताना दिसत नाही . मुळात आत्ममग्नता नावाचा एक विकार अस्तित्वात आहे हे आपण स्वीकारणे ही त्याची पहिली पायरी आहे . या क्षेत्रात पूर्णवेळ काम करणारे एक डॉक्टर माझे खूप चांगले परिचित आहेत त्यांनी मला असे सांगितले की कोविड मध्ये दोन वर्ष लो लॉक डाऊन झाले होते त्या काळात जन्माला आलेली किंवा गर्भधारणा झालेली मुले या विकाराने अधिक ग्रस्त आहेत असे त्यांचे साधार निरीक्षण आहे . ज्या वयामध्ये लहान बालकांना सामाजिक जीवनाचा स्पर्श व्हावा लागतो त्या काळात सतत घरातील एकच एक प्रकारचे वातावरण पाहण्याचा परिणाम त्यांच्या बौद्धिक जडणघडणीवर झालेला दिसतो असे त्यांचे मत आहे . परंतु त्याचबरोबर बदललेली जीवनशैली , नियमित व्यायामाचा अभाव किंवा उशिरा विवाह करणे किंवा गर्भधारणा होत असताना आई-वडिलांची मन:स्थिती या सर्वांचा देखील परिणाम या विकाराच्या बालकांवर निश्चितपणे झालेला दिसतो असे देखील वैद्यकीय तज्ञांचे मत आहे . सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले मूल जन्माला आल्यावर त्याच्यामध्ये अशी काही लक्षणे आपल्याला आढळली तर विना विलंब वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी कुठलीही दिरंगाई करू नये . कुठली लक्षणे आढळतात ? अशी बालके उशिरा बोलतात किंवा बोलतच नाहीत . सतत पालथे पडून एखाद्या वस्तूकडे पाहत बसतात . विशेषतः हलणाऱ्या वस्तू किंवा गोल फिरणाऱ्या वस्तूंचे यांना आकर्षण असते .खेळण्यातल्या गाडीची चाके हे फिरवत बसतात किंवा सिलिंग फॅन कडे पाहत बसतात . यांना सतत दिव्यांच्या बटणांशी खेळायला आवडते . हाक मारल्यावर आपल्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती ते दर्शवितात .अशी बालके अति चंचलता देखील दाखवतात . किंवा विनाकारण रडत बसणे , काही केल्यावर रडू थांबवणे , रडत रडत झोपेतून जागे होणे व पुन्हा न झोपणे असे अनेक प्रकार असू शकतात . अशी लक्षणे एक दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये आढळली तर लवकरात लवकर आत्ममग्नता या विषयातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा . कमी वयामध्ये हे विकार बरे होण्याची शक्यता खूप जास्त असते . त्यासाठी काही ठराविक व्यायाम आणि औषधे असतात . परंतु एकदा एक ठराविक वय उलटून गेले म्हणजेच मेंदूची जडणघडण एका ठराविक टप्प्याच्या पुढे गेली की हा विकार बरे करणे अतिशय कठीण होऊन जाते . म्हणून माझा मुलगा तसला नाही किंवा माझी मुलगी तशी नाही असा आत्मघातकी विचार न करता केवळ शंका तरी आली तरी तज्ञ वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्यावा . फार फार तर तुम्हाला डॉक्टर सांगतील की तुमचे मुल सर्वसामान्य आहे . चिंता नसावी ! या क्षेत्राचे गांभीर्य ओळखून सरकारने देखील आता अशा काही स्वयंसेविका नेमलेल्या आहेत ज्या पालकांचे प्रबोधन करून त्यांना या विषयाची तोंड ओळख करून देतात . पुण्यामध्ये असे काम करणाऱ्या एक स्वयंसेविका मला माहिती आहेत . त्यांनी देखील मला हेच सांगितले की पालकांनी आपले मूल आत्ममग्न आहे हे स्वीकारणे हीच सर्वात कठीण पायरी आहे . जेव्हा उपचार सुरू करायचे त्या काळात पालक आमचे मूल तसे नाही असे म्हणून दुर्लक्ष करतात आणि मग जेव्हा हा विकार भयंकर स्वरूप धारण करतो तेव्हा प्रचंड पैसा खर्च करतात परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण हा विकार ठराविक वेळी बरा होणारा आहे .  सुशिक्षित लोकांची वस्ती असलेल्या शहरातील आणि महानगरातील ही अवस्था आहे तिथे खेड्यातील अवस्था काय विचारायची ! या भागात सरसकट तो वेडा आहे किंवा ती वेडसर आहे असे जाहीर करून टाकले जाते आणि अशा मुलांना मोकळे सोडले जाते कारण त्यांच्यामध्ये चंचलता खूप असल्यामुळे एका जागी बसण्यापेक्षा गावभर फिरून ती शांत होतात . सर्वच पालकांनी केला पाहिजे असा एक आयुर्वेदिक उपाय मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो . अर्थातच हा योग्य आहे का नाही याची खातरजमा मी एका अतिशय प्रसिद्ध आणि प्रथितयश आयुर्वेदाचार्यांकडून करून घेतलेली आहे . शुद्ध देशी गाईचे तूप घ्यावे . जर्सी गाईचे किंवा बाजारातील तूप चालणार नाही . आपल्याला खात्रीशीरपणे माहिती असलेल्या देशी गाईच्या दुधापासून घरी विरजण लावून घरीच कढवून केलेले तूप जर काही काळ ठेवले तर त्यातील रवाळ भाग खाली जाऊन वरती पातळ पाणी तरंगते .आयुर्वेदाच्या भाषेमध्ये याला घृतमंड असे म्हणतात . हे घृतमंड आपल्या घरातील बालकांच्या नाकामध्ये दोन दोन थेंब झोपताना सोडावे .सोडताना डोक्याखाली उशी न देता मान सरळ किंवा गादीच्या कडेवर डोके खाली सोडलेले अशा परिस्थितीत ठेवावी . यामुळे मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो व मुले शांत होण्यास मदत होते . आपल्याला लहानपणी आपले आजी आजोबा हे उपाय आपल्यावर करत असल्याचे आपल्याला नक्की आठवेल पहा . कानात तेल सोडणे , नाकात तूप सोडणे , दंतमंजनाने दात घासणे हे प्रकार आता बंदच झाले आहेत . अधिक विषयांतर नको .असो . तर हेमंत च्या या अवस्थेबद्दल मी गावातील मुलांना सांगितले आणि त्यानंतर मुलांशी त्याचे वागणे निश्चितपणे बदलल्याचे मला तत्काळ जाणवले .
मुळात ही समस्याच येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या घरातील मुलांची लग्नं सरकारने नेमून दिलेल्या योग्य वयात वेळच्यावेळी लावावीत हे सर्वोत्तम ! असो .
इथे रात्री मुक्कामासाठी एक बस आली . बस मधल्या परिक्रमावासींनी आम्हा सर्वांसाठी देखील स्वयंपाक केला आणि त्यांनी दिलेला सुंदर असा गक्कड ,डाळ , खीर असा महाप्रसाद आम्ही खाल्ला . पूर्वी ज्योतिबेन घरी स्वयंपाक करायच्या परंतु परिक्रमावासींची संख्या प्रचंड वाढल्यामुळे आता त्यांनी स्वयंपाक करण्यासाठी एक कुटुंब पगारावर ठेवलेले आहे . मला सर्वांना असे सुचवावेसे वाटते की आपण परिक्रमे मध्ये असताना शक्य झाले तर आश्रमाला मदत कराच .परंतु तेव्हा करता नाही आली तर वहीमध्ये नोंद करून ठेवून घरी आल्यावर अशा आश्रमांना आवर्जून अन्नदानासाठी मदत करावी . अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते . कारण हे एकमेव दान असे आहे ज्याच्या मध्ये दान घेणारा दात्याला , आता पुरे !आता मला बास ! असे म्हणतो ! ज्योती बेन यांचे वैशिष्ट्य असे की त्यांना हवे ते परिक्रमा वाशींना खायला न घालता त्या आलेल्या परिक्रमावासींना विचारतात की आज आपण काय करूया आणि तो पदार्थ बनवून खायला घालतात ! ही सुविधा सर्वच आश्रमात मिळेल याची खात्री देता येत नाही ! आणि सर्वात महत्वाचे  म्हणजे त्या कोणाकडूनही एक रुपया सुद्धा देणगी घेत नाहीत! धान्य ही घेत नाहीत! सर्व कुटुंबीय आपल्या स्व खर्चातून  ही  सेवा चालवीत आहेत!  म्हणून ती अधिक श्रेष्ठ मानली पाहिजे! 
 रात्री छान झोप लागली . सकाळी उठल्यावर आन्हीके आटोपून चहा पिऊन निघताना ज्योति बेन यांनी माझे सॅंडल पाहिले . आणि मला त्या घराच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी घेऊन गेल्या . त्या मला म्हणाल्या की तू काठाकाठाने चालतो आहेस तर हे सॅंडल तुझ्या कामाचे नाहीत त्यापेक्षा पाय पूर्ण झाकणारे बूट तू सोबत घे . असे म्हणत परिक्रमावासींनी सोडून दिलेल्या पादत्राणांचा मोठा ढीग त्यांनी मला दाखवला ! कोणी परिक्रमा अर्धवट सोडून जाणार असेल किंवा अन्य काही कारणामुळे पादत्राणे त्याला होत नसतील तर ती इथे सोडून नवीन पदत्राणे घेऊन लोक इथून पुढे जातात . त्या ढीगामध्ये किमान २०० जोड्या चप्पल बूट असावेत ! त्यातील आदिदास कंपनीचा असावा असा दिसणारा एक बूट मला दिसला जो माझ्या पायाला चोख बसत होता  . ज्योतिबेन यांनीदेखील तो ओळखला आणि म्हणाल्या की मुंबईच्या एका परिक्रमावासीने हा बूट भरूच मध्ये घेतला परंतु त्याच्या पायाला होत नव्हता म्हणून त्याने इथेच ठेवून दिला . माझ्या पायाला तो नवा कोरा बूट चोख बसत असल्यामुळे मी तो घेतला आणि माझे सॅंडल तिथेच सोडून दिले . अशा रीतीने परिक्रमेच्या ९९ व्या दिवशी मला दहावा बूट मिळाला ! हा बूट पायाला अतिशय आरामदायक होता आणि त्याच्यामुळे माझी गती देखील थोडीफार वाढली ! ज्योती बेन यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि त्यांची रजा घेतली .
ज्योतीबेन यांनी माझ्या वहीमध्ये मारून दिलेला आश्रमाचा शिक्का
 नर्मदा मातेचा किनारा गाठला . तिला साष्टांग नमस्कार करून किनाऱ्यावरचा मार्ग पकडला ! पायाखाली हळूहळू गवत सुरू झाले होते . आणि सोबत थंडगार पाण्याचा थर्मास असल्यामुळे एक घोट पाणी पिले तरी एक वेगळीच ऊर्जा मिळत होती ! नर्मदा मातेचे दर्शन करत पुढे पावले टाकायला सुरुवात केली ! 


































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...