Tuesday, February 11, 2025

मिशन काश्मीर - डॉ अभिजीत अंभईकर नागपूर

 *मिशन काश्मीर* 
डॉ अभिजीत अंभईकर, नागपूर

काश्मीर साठी डिसेंबर जानेवारी हे महिने तसे आत्यंतिक थंडीचे! एकंदर पर्यटकांचा ओढा या दिवसात कमीच. पण चार वेगवेगळ्या ऋतुंमध्ये काश्मीरचे सौंदर्य तितक्याच वेगवेगळ्या रीतीने फुलून येते. त्यामुळे ' बापरे, काश्मीर?? एवढ्या थंडीत??" अशा प्रश्नांना बगल देत काश्मीर टूर करायचाच असे ठरवले. त्यातून श्रीनगरच्या लाल चौकात आम्ही नेमके २६ जानेवारीला उपस्थित राहणार होतो झेंडावंदनाला! मग सगळा कार्यक्रम निश्चित केला आणि श्रीनगरकडे प्रस्थान केले..व्हाया दिल्ली.
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या इच्छाशक्तीने काश्मीर आता बदललं आहे, बदलतं आहे.चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच पूल आपल्या इंजिनियर्सनी बांधून तयार केल्याने लवकरंच श्रीनगर ते कन्याकुमारी ट्रेन सुरू होते आहे.
आमच्या टूर ऑपरेटरने जो कार्यक्रम आखला होता त्यात काही ठिकाणे सुटणार असे वाटत होते. शंकराचार्य मंदीर शेवटल्या दिवशी वेळ मिळाला तर करू असं त्या planning प्रमाणे ठरलं होतं. पण श्री शंकरांच्या ( आणि आमच्या टॅक्सी ड्रायव्हर आरीफच्या) मनात काही वेगळेच होते. त्यामुळे श्रीनगर विमानतळावर आमचं विमान अर्धा तास आधी उतरलं आणि ठरलेला कार्यक्रम नं करता आम्ही सगळ्यात आधी कूच केलं ते एका सुंदर टेकडीवरच्या या अतीसुंदर, शांत आध्यात्मिक जागेकडे! शहरातील रस्त्यांवर दोन्ही बाजूला जे सौंदर्य खुलून दिसते त्यामुळे आपण भूनंदनवनातल्या वाटांवरून प्रवास करतो आहोत ही जाणीव होत होती. श्री शंकराचार्य मंदिर १००० फूट उंच टेकडीवर आहे आणि २५० दगडी steps चढून जाताना थोडी दमछाक होते.



इथे शंकराची पिंड आणि देऊळ आहे. एका शांत, पवित्र, मंगलमय स्थानाचा हा अनुभव हवाहवासा आहेच, पण त्यासोबतच इथून घडणारे श्रीनगर व आजूबाजूच्या परिसराचे दर्शन नयनरम्य आहे.





श्रीनगर शहर इथल्या मुघल गार्डन्स साठी प्रसिद्ध आहे. आम्ही आलो आहे तो ऋतु इधे 'चिल्ले कला' म्हणून प्रसिद्ध आहे. याचा अर्थ आत्यंतिक थंडीचे चाळीस दिवस. निशात गार्डनमध्ये प्रवेश केल्यावर समजले की या ऋतूत जीवसृष्टी एक वेगळे रुप धारण करते. खरं तर सृष्टीचे हे रुप खूप मनमोहक आहे  

विमानातून उतरल्याबरोबर आपल्या मुक्कामी नं जाता आम्ही थेट साईट सिइंगला निघालो होतो. आणि आमचा मुक्काम नेहमीसारखा ह़ॉटेलवर नं करता थेट हाऊसबोटीत राहणार होता. एव्हाना अंधार झाला होता् निशात बागेच्या बाहेर हमरस्त्यावर गरम चहा, कावा, भुट्टा , शेंगदाणे विकणारे जे फेरीवाले होते ते चांगले वाटले. या खाद्य आणि पेयपदार्थांचा आस्वाद घेता घेता पोट भरून गेले तरी आरीफ ड्रायव्हरच्य आग्रहासाठी 'पंजाबी हवेली' या दल झीलच्या जवळंच असलेल्या 'प्युअर व्हेज' रेस्टॉरेंटमध्ये हलके जेवण घेतले. चविष्ट आणि स्वस्त होते.
दल सरोवराच्या घाट क्र १७ ए इथे आरीफच्या इनोव्हातून उतरलो. शिकारावाल्याने आमचे सामाश शिकार्यावर चढवले. आम्ही बसलो आणि शिकारा आमच्या मुक्कामाच्या हाऊसबोटीकडे निघाला.

 दल सरोवरात अंधार पडल्यावर आपम शिकारा राईड करतो आहे ही गोष्ट स्वप्नवत वाटत होती. मी तर स्वतःला चिमटा घेऊन बघितला सुद्धा! हळूहळू हाऊसबोटीवर पोचलो आणि गारठलेल्या अवस्थेत आपल्या खोलीचा ताबा घेऊन लवकरंच निद्रादेवीच्या अधीन झालो.
 ( *क्रमशः)*


















मिशन काश्मीर भाग २, 
पहलगाम एकस्प्लोरेशन** 
डॉ अभिजीत अंभईकर, नागपूर 
रात्री थंडी असूनही हाऊसबोटीत चांगली व्यवस्था असल्याने छान झोप लागली आणि दुसरा दिवस उजाडला तेव्हा फ्रेश होऊन उठलो. हाऊसबोटीत डायनिंग रूम नवाबी थाटात डेकोरेट केलेली होती आणि ब्रेकफास्ट पण चविष्ट होता. पुन्हा एकदा शिकारा राईड करत दल सरोवर क्ऱॉस केले आणि हमरस्त्यावर आलो.

आज पहलगामला जायचे होते. पहलगाम ला यापूर्वी पायी अमरनाथ यात्रा केली होती तेव्हा गेलो होतो. पण तेव्हा फक्त चंदनवाडी व आजूबाजूच्या परिसराचे दर्शन झाले होते. या खेपेला मात्र पहलगाम छान एक्स्प्लोअर करायचे होते. एबीसी म्हणजे अरु व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदनवाडी अशा तीन जागा सामान्यतः पर्यटक मंडळी पाहतात. पहलगामला आरीफ ड्रायव्हर आम्हाला सोडणार होता त्या जागेपासून पुढे जायला लोकल युनियन ची गाडी करणे बंधनकारक आहे. श्रीनगर ते पहलगाम रस्ता अनंतनाग,पुलवामा वगैरे जिल्हयामधून जातो. इथे सफरचंदाच्या बागा, केशराची शेती आणि क्रिकेटचै बॅट बनवतात त्या फॅक्टरीज आहेत. लहानपणी एकेकाळी हट्टाने वडलांना ही बॅट विकत घ्यायला लावली होती ते आठवले. काश्मीर समृद्ध होण्यासाठी खरं तर या तीन वस्तूंचा व्यापार पुरेसा आहे. पण....असो.
पहलगाम जवळ येऊ लागले तसे सृष्टीचे सौंदर्य अधिकाधिक फुलू लागले.सर्वप्रथम दिसला तो लिद्दर नदीचा खळाळता प्रवाह.हिवाळ्यात नदी उथळ दिसत असली तरी तिचं सौंदर्य कुठेच कमी पडत नव्हतं.











डावीकडे लिद्दर नदी आणि उजवीकडे भरपूर बर्फवृष्टी झाल्यामुळे गारठलेले रस्ते आणि जीवसृष्टी याचा आनंद घेत पहलगामला केव्हा पोचलो ते कळलेही नाही. पहलगामला आता लोकल युनियनची गाडी करायची होती. पण आरीफ ड्रायव्हरने म्हंटले, 'साहाब, असली पहलगाम देखना चाहते हो? थोडी हिंमत करोगे? तो घोडेपर जाइये. ये आपको सात पॉइंट दिखाएगा.' घोडेस्वारीशी माझै काहीच वावगे नव्हते. शिवाय पहलगाम मधल्या गुरेज, बंगश वगैरे जागांबद्दल मी बरेच काही वाचले होते. म्हणून मी लगेच तयार झालो. ( अर्थात गुरेज, बंगश वगैरेला जाऊ शकणार नव्हतो, पण पहलगामच्या पहाडी भागात अगदी अंतरंग उलगडणारे निसर्गाचे देखावे पाहण्यासाठी घोड्यावर स्वार झालो.) जवळजवळ दिवसभर घोडेस्वारी करायची होती. पण बायसरण या सातव्या आणि शेवटल्या पॉईंट पर्यंत जी निसर्गाची अद्भुत कलाकारी बघायला मिळाली ती शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य आहे. कितनी खुबसुरत ये तस्वीर है, मौसम बेमिसाल, बेनझीर है! हे शब्द लिहिताना त्या कवीला आपली प्रतिभा या सृष्टीच्या काव्यमय चित्रापुढे फिकी पडणार असे वाटले असेल हे नि:संशय! दैवी देणगी लाभलेला एखादा असामान्य चित्रकार देखील इतके सुंदर चित्र तयार करू शकणार नाही एव्हढे पहलगाम सुंदर आहे. त्यामुळे पहलगामचे वर्णन मी देखील शब्दात नं करता मी काढलेल्या फोटोतून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जो बात तुझमे है तेरी तस्वीर मे नहीं 'हे मात्र सांगणे नं लगे.
(क्रमशः)

1 नऊ  हजार फुटांवर घेऊन जातो ते ठिकाण आहे कोंगडोरी. इथून पुढे इच्छाशक्ती असेल तर फेज २ म्हणजे १४००० फुटांवर आफरवाट येथे जाता येते. इथल्या कल्पनातीत अनुभवाचे केवळ छायाचित्रमय वर्णन करतो. पण पर्यटकांना उपयोगी दोन महत्त्वाच्या सूचना या कि गंडोला रोपवेचे advance booking कराच आणि ते बुकिंग झाले असेल तरी गंडोला राईड च्या entry point ला पोहचा. शक्यतो सकाळी नऊच्या आत.
[

 : **मिशन काश्मीर ( भाग ३)* 
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर** 

गर फिरदौस बर रुए जमी अस्त
हमी अस्त हमी अस्त हमी अस्त
अर्थात पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असलाच तर तो इथेच आहे इथेच आहे इथेच आहे 

काश्मीर लोककथा मध्ये हब्बा खातून ही कवयित्री आणि राजा युसुफजाई चक हा तिचा पती यांची कथा प्रसिद्ध आहे. मुघल बादशाहने कपटाने युसुफजाईचे अपहरण करून त्याला दिल्ली ला नेले . त्यानंतर तो कधीच परतला नाही. त्याच्या विरहात वेडिपिसी झालेली हब्बा खातून इतस्ततः फिरत राहिली आणि त्यातच तिचा अंत झाला. या हब्बा खातून च्या नावाचे बरेच व्ह्यू पॉइंट्स बघायला मिळतात.
आज गुलमर्ग ला निघालो होतो. गुलमर्ग म्हंटल्यावर अनेक पर्यटक मित्रांना स्नो फॉल, बर्फाळ प्रदेश आठवतो. काही अंशी ते खरेही आहे. गुलमर्गला पाहण्यासारखी ठिकाणे हब्बा खातून व्ह्यू, महाराजा पॅलेस, ड्रंग धबधबा, world's highest 18 point golf course, army museum वगैरे. हे सगळेच खूप प्रेक्षणीय आहेत. पण वर्षभर गर्दी होते ती गंडोला राईड साठी. जवळजवळ अडीच किलोमीटर उंचीवर रोपवे आहे

   गंडोला रोपवेबद्दल फार काही सांगण्यापेक्षा चित्तथरारक अनुभव असेच वर्णन करता येईल. कोंगडोरी या फेज १ च्या endpoint वर स्की, स्लेज, स्नो बाईकिंग वगैरे करता येते. फेज २ चा endpoint आफरवाटला फारसे पर्यटक जात नाहीत. कारण १४००० फुटांवर प्रचंड थंडी आणि अगदी नजर जाईल तिथपर्यंत बर्फच बर्फ आहे. आम्ही दोन्ही फेजेस ला जाऊन आलो.
इथे पर्यटकांना आकर्षित करणारा अजून एक पॉईंट आहे ड्रंग धबधबा. हा धबधबा हिवाळ्यात पूर्ण थिजतो आणि खूप सुंदर दिसतो.
    काश्मीर पूर्वीपासूनच सिनेमावाल्यांच्या आवडीचे ठिकाण राहिले आहे. अगदी काश्मीर की कलीपासून ते बजरंगी भाईजान पर्यंत कितीतरी सिनेमे इथे तयार झाले. यातल्या एका ठिकाणी हिंदी सिनेमातले आपल्या सगळ्यांच्या आवडीचे गाण्याचे शूटिंग झाले होते त्या मंदिरात आम्ही पोचलो तेव्हा अंधार झाला होता. त्या मंदिराचा फोटो शेअर‌ करतो अंधार पडल्यावर काढलेला. हे गाणं ओळखून दाखवा असा सगळ्या वाचकांना प्रश्न टाकतो आणि काश्मीर मिशनचा आजचा तिसरा भाग इथेच थांबतो. उत्तर उद्याच्या भागात.
( क्रमशः)

*मिशन काश्मीर ( भाग ४)* 
 *दूधपथरी* 
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 

दूधपथरी हे ठिकाण अगदी अलिकडे पर्यंत पर्यटकांना फारसे माहित नव्हतं. पण आलीया भट च्या राजी या सिनेमामुळे प्रकाशात आले. फारसे पर्यटक इकडे भटकत नसल्याने इतर ठिकाणच्या मानाने या परिसराची अजून हवी तशी development झालेली नाही. या परिसराचे वेगळेपण असे की इथे मैदानी भागातच बर्फवृष्टी दिसते. इतर ठिकाणी जसे उंच पहाड आहेत तसे नसूनही रस्त्याच्या दुतर्फा दूरपर्यंत बर्फाने आच्छादलेली मैदाने दिसतात.पण या परिसराला दूधपथरी नाव मिळाले ते मात्र शालीगंगा नदीमुळे! या नदीत खूप दगडं ( पत्थर) आहेत. शिवाय या नदीचे पाणी खळाळत वाहते तेंव्हा दुधाळ दिसते. त्यावरून हे नाव पडले असावे. या नदीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की हिचा प्रवाह तीन वेळा भारतात आणि तीन वेळा पाकिस्तान मध्ये जातो आणि प्रत्येक वेळी तिचं नाव बदलतं.

 दूधपथरी नदीपर्यंत जाताना घोडे अथवा ATB ( All Terrain Bike) ने जावे लागते. यातली गंमत अशी की कुठल्या मोडनी जाताय यावर तुम्हाला कुठले points बघायला मिळणार हे अवलंबून असतं. तर हे कोडं आपलं आपणच सोडवायचं. 😊😊 आम्ही घोड्यावर जायचा निर्णय घेतला. कारण घोडे स्वस्तात उपलब्ध होते आणि शालीगंगा नदीपर्यंत घोडेच जातात, ATB जात नाही. 
घोड्यावरून जाताना इथले निसर्गसौंदर्य तर जाणवलेच, पण त्यापेक्षाही जास्त जाणवलं ते इथल्या लोकांचं अठरा विश्वे दारिद्र्य! आमचा घोडा सांभाळणारा वसीम फक्त १५ वर्षाचा होता. त्याच्या मोठ्या बहिणीने नदीकाठी चहा, कहावा, मॅगी चा स्टॉल लावला होता. प्रचंड थंडीत त्याचा लहान भाऊ , वय वर्षे १० इकडेतिकडे फिरत काश्मीरी कुल्छा विकत होता. दहा रुपयाला एक या भावाने. काश्मीरी कुल्छा ही एक खोबरं, किसमिस, केशर, सुका मेवा घालून तयार केलेली गोड वस्तू आहे. साधारण मोठ्या पेढ्याच्या आकाराची. मी त्याच्या कडून पाच कुल्छे घेतलें तर तो म्हणाला अजून दहा घ्या. म्हणजे मला लगेच घरी जाता येईल.
 दूधपथरी नदीच्या गोठलेल्या पात्रातुन बर्फाची एक लादी फोडून आणणारा वसीम!

 शालीगंगा पर्यंत जाताना वसीमने आमचे घोडे एका झोपडीनुमा घरांच्या ( आता इथे कोणी राहातं नाही) रांगेपाशी उभे केले. बर्फाळ प्रदेशातली ती लाकडी घरे खूप सुंदर पण शापित वाटत होती. हीच असतील का इथून परिस्थितीवश परागंदा झालेल्या काश्मीरी पंडितांची घरे? वसीमने एका घराच्या पोर्च मध्ये घोडा उभा करून फोटो काढले. खरं तर ती विराण घरे पाहून फोटो काढावेसे वाटत नव्हते पण वसीमच्या आग्रहाखातर काढले.
दूधपथरी हा मैदानी प्रदेश वाटला. त्यामुळे प्रवास थोडा सोपा होता. पण निसर्गाने इथेही भरभरून दिले होते. किती फोटो काढू आणि किती नको असे होत होते. या निसर्गचित्राचा आपण स्वतः भाग होतो आहोत ही भावनाच मन उचंबळवणारी होती.


दूधपथरीच्या सौंदर्यात गुंग होऊन गेलो असतानाच घड्याळाकडे लक्ष गेलं तर दोन वाजून गेले होते. ती वेळ बघितली आणि तहान भूकेची जाणीव झाली. नदीच्या पात्रातच वसीमच्या बहिणीच्या स्टॉलवर जाऊन सरसोका साग मक्केदी  रोटी आणि स्पेशल काश्मिरी मिक्स लोणचे खाल्ले. चहा, कॉफी, पाणी आणि गरमागरम चविष्ट जेवणाचे तिघांचे मिळून बिल झाले रुपये तिनशे साठ! मला उगाचच स्टारबक्स ची कॉफी आठवली आणि एक शिवी हासडाविशी वाटली....असो.
*मिशन काश्मीर* *( ** भाग ५ वा )*
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 

पोटभर जेऊन पुन्हा घोड्यावर स्वार झालो. कारण आता आजच्या दूधपथरी चा शेवटला पॉईंट म्हणजे राजी सिनेमाचं शूटिंग झालं ती जागा बघायची होती. थोडा उंचसखल प्रदेश पार करून एका मैदानी भागात पोचलो. पलीकडे मैदानाला लागून असलेला रस्ता होता. ही म्हणे भारत पाकिस्तानची सीमारेषा म्हणून दाखवली होती. आम्ही फोटो काढले.  खात्री करून घेण्यासाठी पुन्हा एकदा राजी सिनेमा बघू या कधीतरी असा विचार केला. समोर जो रस्ता दिसत होता तिथूनच आमची परतीची वाट होती.


    वसीम घोडेवाला व त्याच्या इतर साथीदारांनी आम्हाला कार पार्किंग पर्यंत पोचवले. काश्मीर मधली एक गंमत म्हणजे हे लोक पैसे मागायला कधीच लाजत नाहीत आणि तोंडाला येईल ती किंमत मागतात. पहलगामला जो घोडा ठरवला होता तो नऊ हजार प्रती व्यक्ती असा सांगितलेला! मी एक हजार पासून बार्गेनिंग सुरू केले आणि चक्क दोन हजार प्रती व्यक्ती वर फायनल केले. एक गोष्ट मात्र खरी की एकदा तुमचं डील फायनल झालं की ही मंडळी अगदी प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात. म्हणजे निदान मला तरी तसा अनुभव आला.
आरीफ ड्रायव्हरने गाडी पुन्हा श्रीनगरच्या दिशेने वळवली. आमचं जेवण झालं आहे हे त्याला माहित नव्हतं. शिवाय त्याचं स्वतःचं जेवण झालं नव्हतं . परतीच्या वाटेवर रस्त्याच्या कडेला पुन्हा काही गावकरी दुकानं लावून बसले होते. याच स्पॉटला सरसों का साग खायला म्हणे मंडळी लांबून येतात. आरीफ ड्रायव्हरला भूक लागली असेल हे लक्षात आले. माझं जेवण झालं असतानाही गाडी थांबवायला लावली. गाडीतून उतरलो. खूप थंडी होती. पण सगळ्या दुकानदारांनी दुकानासमोर छान शेकोटी पेटवली होती. बसायला लाकडी पाट्या टाकून बेंचेस बनवले होते. इथे मक्केदी रोटी सोबत गूळ पण मिळाला. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी हीच शिदोरी पार्सल करून घेतली.

 अजून फारसं अंधारून आलं नव्हतं. पूर्ण संध्याकाळ पुढच्या activity साठी रिकामी होती. आमच्या सोबतीला असलेल्या स्त्री वर्गाची शॉपिंग ची इच्छा होतीच. शिवाय लाल चौकातला माहौल पण अनुभवायचा होता. याच विचाराने लाल चौकात उतरलो आणि तिथल्या मार्केट मध्ये भटकंती सुरू केली. खरेदीसाठी अगदी उत्तम जागा आहे. अर्थात इथेही प्रचंड बार्गेनिंग करणे. मला पुलंचा शाल खरेदीचा काश्मीर मधला अनुभव असलेली गोष्ट आठवली आणि खूप हसू आले. बरेच मराठी प्रवासी इथे खरेदीला आल्याचे लक्षात आले. त्यातले काही दुकानदारांशी भांडत देखील होते. भांडण तात्विक स्वरूपाचे होते. त्यामुळे मंडळी पुण्याची असावित असा मी निष्कर्ष काढला. असो. प्रवासात मजा करायची सोडून वादावादी वगैरे मनाला लागतील अशा गोष्टी करण्यात काय मजा?
       खरेदी करत करत मुक्त भटकंती सुरू होती. तेव्हढ्यात कन्येला बेल्जियन वाफल्स पाटी असलेले दुकान दिसले. डॉमिनोज, पिझ्झा हट सोबत स्विगी, झोमॅटोवालेही पोचलेत इथे. रस्त्यावर गर्दी होती. पण अगदी बर्डी मेन रोड इतकी नव्हती. छान मोकळेपणाने खरेदी करता येत होती. 
       संध्याकाळी थंडीमुळे इथे मार्केट लवकर बंद होते मात्र! शिवाय आम्हाला हाऊसबोटवर परतायची घाई होती. त्याचे एक गंमतीदार कारण होते. हाऊसबोटीवरच मुक्काम केल्यामुळे तिथपर्यंत पोचायला दररोज शिकारा राईड करणे हाच मार्ग होता. घाट क्र 17 A इथून आम्ही रोजच शिकारा करून जाणे येणे करत होतो दल लेक मधून. शिकारावाले सलाम काका आमची रोज ने आण करतं. पण संध्याकाळी सहानंतर दर तासाला शंभर रुपये प्रमाणे अतिरिक्त पैसे मोजावे लागत. आमच्या पाच दिवसांच्या मुक्कामात निदान हजारभर रुपये तरी सलामकाकानी अतिरिक्त वसूल केले असतील.तरी शेवटल्या दिवशी बक्षीष मागायला लाजले नाहीत.

मिशन काश्मीर ( भाग ६ वा)* 
 *दल सरोवरातली सुंदर पहाट* 
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 

प्रचंड थंडीमुळे सकाळी लवकर उठणे वगैरे कठीणच होते. तरी एका सकाळी हिंमत केलीच आणि पहाटेच उठलो. थंडीचा सगळा जामानिमा करून हाऊसबोटच्या व्हरांड्यात येऊन बसलो. पूर्वेकडे नुकतीच पहाट फुटू लागली होती. मी मोबाईलमध्ये व्हेदर रिपोर्ट बघितला. तो असा होता.
     आमची लाईट हाऊस ही हाऊसबोट तिच्या मालकाने खूप कलात्मकपणे सजवली होती. आधी व्हरांडा, नंतर sitting area, नंतर डायनिंग रूम, त्यानंतर प्रवाशांना राहण्यासाठी खोल्या अशी साधीसुधी रचना असली, तरी सुंदर सजावटीमुळे आकर्षक वाटायची. तिथे ठेवलेल्या अनेक कलात्मक वस्तू लक्ष वेधून घेत होत्या.




  शिकारावाले सलाम काका आणि दूर मागे दिसणारी हाऊस बोट!


   व्हरांड्यात बसून समोरचं चित्र enjoy करत होतो.उन्हाळ्यात इथलं floating market पहाटेच सुरु होतं आणि तेव्हा अगदी ताज्या खास दल सरोवरात उगवलेल्या भाज्या घेऊन विक्रेते त्यांच्या नावा वल्हवत दल सरोवरात इकडेतिकडे फिरत असतात. हे floating market कपडे, दागिने, हस्तकलेच्या वस्तू यासाठी देखील प्रसिद्ध आहे. याशिवाय कॉफी, कहावा, हॉट चॉकलेट वगैरेचे विक्रेतेही आपापल्या होड्या वल्हवत फिरत असतात. 
आम्ही बसलो होतो ती हिवाळ्यातली पहाट तशी शांतच होती. तरी एखाद दुसरा विक्रेता येऊन चहा, कॉफी घेता का म्हणून विचारून गेला. कहावा हे खूप मस्त पेय आहे. पण सकाळी उठल्यावर आपल्याला लागतो तो गरमगरम कडक चहाच. हाऊसबोट किचनमध्ये मी आधीच तशी order दिली होती. चहाचा आस्वाद घेत समोरच्या आरस्पानी सौंदर्याचेही रसपान करत होतो. तोच पूर्व दिशेला डोंगरमाथ्यावर सूर्यनारायण उगवले. आरस्पानी सौंदर्याला मिळालेली आस्मानी सौंदर्याची जोड मंत्रमुग्ध करून टाकत होती. कितीतरी वेळ त्या दृष्याकडे मी पाहातच राहिलो. सूर्यनारायणाचा रथ जसा पुढे सरकला तसा भानावर आलो आणि आरीफ ड्रायव्हरने आज नऊच्या आत तयार राहा म्हणून सांगितले होते त्याची आठवण झाली.
 *( क्रमशः)*











मिशन काश्मीर (भाग ७ वा )*
 *मुघल गार्डन्स*
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 

टॅक्सी चालकांचे काश्मीर मधले नियम फारसे टुरिझम फ्रेंडली नाहीत. आता वन डे वन इटिनररी हाच नियम घ्या. हे म्हणजे एका दिवसाला एकाच दिशेने जाणार.आणि त्या दिशेने जाताना थोडी वाट वाकडी करून एखादं additional प्रेक्षणीय स्थळ असेल तरी ते नेणार नाहीत. मात्र आरीफ ड्रायव्हरशी आमचं सूत चांगलं जुळलं होतं. खरं तर आजची इटिनररी सोनमर्ग ला जाण्याची होती. पण थोडं लवकर निघालो तर सकाळच्या वेळी मुघल गार्डन्स चा आनंद घेता येईल असे लक्षात आले. शिवाय सकाळी या बागेत गर्दी अजिबात नसते. त्यामुळे खरंच पटकन तयार होऊन गाडीत बसलो आणि निघालो. 
पहिल्यांदा गेलो ते आकाराने मोठ्या बोटॅनिकल गार्डनमध्ये! आत गेल्याबरोबर नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे ही बाग खूप मेहनतीने मेंटेन केल्या जाते. सुबकपणे झाडांना कटिंग करून दिलेले आकार, मोठया, लहान झाडांची केलेली सिमेट्रिक रचना, बसण्यासाठी आरामदायक बेंचेस, एक मोठे तळे... खरं तर दिवसभर सहलीला यावं अशी जागा! पण आम्हाला तितका वेळ नव्हता. त्यामुळे जमेल तितकं हिरवंगार नक्षीकाम नजरेत साठवून आणि काही कॅमेराबद्ध करून या सुंदर बागेचा निरोप घेतला.



पुढं गार्डन होतं परीमहल आणि चष्मे शाही. हे दोन्ही तसे लागूनच आहेत. पण आम्ही आधी entry घेतली ती परीमहल ला! परीमहल म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेले चार मजली दगडी बांधकाम आहे. अर्थात मध्ये मध्ये सुंदर वनश्री आहेच. परीमहल च्या बुरुजांवर उभे राहिल्यावर खाली खूप सुरेख दृष्य दिसते पण त्या दगडी बांधकाम केलेल्या कितीतरी शतके जुन्या इमारतीच्या विविध कक्षात फिरताना एकदम रोमँटिक वाटत होतं. मी तर स्वतःला control करूच शकलो नाही. फारसे गायन येत नसतानाही माझ्या तोंडातून सहज हे गाणे बाहेर पडले.


 चष्मे शाही, परीमहल वगैरे हे खरं तर फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत येतात. म्हणजे इथे जाण्यासाठी जंगलातील रस्त्यावरून जावे लागते. काही वेळा वन्य प्राणी व पक्षी यांचे दर्शन होते. आम्हाला फ्लायकॅचर आणि ईगल दिसले. फोटो मात्र खूप अस्पष्ट आले. चष्मे शाहीचे एक वैशिष्ट्य हे की इथे एक गोड पाण्याचा झरा आहे. पं नेहरू इथले पाणी पित असंत.



या तिन्ही बाग़ांची visit अशा रीतीने सुफळ संपूर्ण झाली. याव्यतिरिक्त शालीमार बाग आणि इतर काही बागा आहेत. पण तोचतोचपणा टाळण्यासाठी तिथे गेलो नाही. तसंही आज मुख्य आकर्षण सोनमर्ग चं होतं. सोनमर्गच्या रस्त्यावर एका लांबलचक टनेलचे नुकतेच मा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. भारतीय इंजिनियर्स च्या कौशल्याची साक्ष देणारा हा बोगदा पार करणारे आम्ही अगदी सुरुवातीचे प्रवासी असणार होतो. त्या उत्कंठेने पुढील प्रवास सुरु केला.
 *( क्रमशः)*

मिशन काश्मीर (भाग ८वा)*
 *सोनमर्ग*
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 

कुठेही प्रवासाला निघालो की 'आम्ही जाऊन आलोय तिथे, काय विशेष मजा नाही बॉ! तुम्ही गुलमर्ग बघितलं ना! मग सोनमर्ग कशाला?' अशा तऱ्हेचे सल्ले देणारी माणसं भेटतातच. त्यांना फक्त म्हणावे 'हाय जालीम! तुने पीही नही!' आणि दुर्लक्ष करावे.
तर नकारात्मक सल्ल्याकडे पाठ फिरवून आम्ही निघालो सोनमर्ग कडे! सकाळी लवकर निघाल्यामुळे नाश्ता केला नव्हता. मधे कुठेतरी चांगल्या धाब्यावर थांबव असे मी आरीफला सांगितले. त्याने मान डोलावली आणि १५ मिनिटातच एका नदीकाठच्या धाब्यावर गाडी थांबवली. ही होती सिंधू नदी. बरेच मोठे पात्र असलेल्या या नद्या उन्हाळ्यात दुथडी भरून वाहतात आणि हिवाळ्यात कोरड्या असतात. या धाब्यावर खूप चविष्ट पण अजिबात तेलकट नसलेले छोले भटुरे खाल्ले. चहापण छान होता. सिंधू नदीवरील एक मोठा पूल क्रॉस करून गाडी पुढे निघाली.
 थोडेसेच अंतर पार केल्यावर हा बोर्ड दिसला
हाच तो बोगदा ज्यामुळे भारताच्या सीमेपर्यंत शस्त्रास्त्रे, तोफा वगैरे नेणे सुलभ झाले आहे. श्रीनगर सोनमर्ग प्रवास सुकर झाला आहे. मा. गडकरी साहेबांच्या प्रयत्नाने हे काम पूर्ण झाले असे आरीफनेच आम्हाला सांगितले.या टनेल साठी आपल्या काही मजुरांनी प्राण गमावले, तरी इंजिनियर्स नी प्राणाची बाजी लावून हे देशकार्य पूर्णत्वास नेले.
Z mode टनेलचे ५ किमी पेक्षा अधिक अंतर पार करताना अभिमान वाटत होता. इतक्यात आरीफ ने आम्हाला उजवीकडे उंच पहाडात जाणारी एक वाट दाखवली. मार्च एप्रिलनंतर professional trekking करणारे expert treekkers त्या वाटेने सात दिवसाचं गिर्यारोहण करत थजिवास ग्लेशियरला पोचतात. बोलत बोलत आम्ही सोनमर्ग ला पोचलो आणि समोरचा नजारा पाहून थक्क झालो.
सोनमर्गला थजिवास आणि लिद्दरवास असे दोन ग्लेशियर आहेत. हिवाळ्यात फक्त थजिवासपर्यंत जाणे शक्य होते. हा प्रवास फार लांबचा नसला
तरी अगदी steep चढाव आहे. इथे अर्धं अंतर snowbike आणि पुढील अर्धं अंतर स्लेज नी जावं लागतं. हा प्रवास खूपच साहसी आहे आणि स्नोबाईकर्स, लाकडी स्लेज ओढणारे, शिवाय स्लेजला मागून सपोर्ट देणारे मदतनीस यांच्याशिवाय अशक्य आहे.


इथे घोडेवाले पण आहेत. पण घोड्यावर जाणे अतिशय धोकादायक आहे. एकतर तीव्र चढावावऱुन घोडाच घसरू शकतो आणि त्यातून दुसरे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे हे ग्लेशियर आहे. इथे बर्फ किंवा त्याखाली पाणी असेल तर ते किती खोल आहे याचा अंदाजच येत नाही. मी स्वतः अती उत्साहात अशा एका जागी चालत गेलो आणि गुडघ्यापर्यंत खोल बर्फात फसलो. बाजूला जमिनीचा आधार घ्यावा तर हात बर्फात खोल गेले. प्रचंड थंडी, त्यात बुटाच्या आत बर्फ गेलेला आणि हातमोजे ओले अशा कठीण परिस्थितीत इतरांनी सहाय्य केल्यामुळे बाहेर आलो. अगदी बाका प्रसंग आला होता असे म्हणायला हरकत नाही. असो..सावध राहणे उत्तम!

*मिशन काश्मीर ( भाग ९ वा )* 
 *माता खीर भवानीचा आशीर्वाद!* 
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 
सकाळी सोनमर्गला यायला निघालो असताना एका फाट्यावर माता खीर भवानी मंदिर ची दिशा दाखवणारा एक बोर्ड दिसला होता. आता परतीच्या वाटेत मंदिरात जाता येईल का? प्रश्न खरं तर कठीण होता. कारण वन डे वन इटिनररी चा नियम आम्ही आधीच तोडला होता. आता आणखी तिसरीकडे गाडी वळवायला सांगणे म्हणजे आरीफ ड्रायव्हर सरळ नकार देईल असेच वाटत होते. शिवाय मी जिथे बोर्ड बघितला होता, तिथून मंदिर १० किमी लांब होते. गंदरबल या पूर्वी अतिरेकी कारवायांमुळे कुप्रसिद्ध झालेल्या जिल्ह्यातील लहान लहान गावातून संध्याकाळी प्रवास करणे तसे भीतीदायक होते. आम्ही चहा घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. आरीफ ड्रायव्हर थोडा दूर उभा होता. मी चहावाल्याकडे थोडी चौकशी केली. तर तो म्हणाला की तो स्वतः मंदिराजवळच राहतो. मंदिर संध्याकाळी ४.३० ला बंद होतं. मी घड्याळात बघितलं. चार वाजले होते. काय वाटलं कुणास ठाऊक, पण आरीफला आवाज दिला आणि म्हणालो चलो जल्दी, खीर भवानी माता मंदिर जाना है. त्याला आधी काहीच कळलं नाही. पण मी इतक्य आत्मविश्वासाने बोललो की त्याने खरंच गाडी तिकडे वळवली. जाताजाता एवढेच म्हणाला, साहेब वो extra diesel का थोडा देख लेना! मी लगेच होकार भरला.
माता खीर भवानी मंदिराशी काही जुन्या आठवणी खरं तर जुळलेल्या आहेत. आम्ही दशकभरापूर्वी अमरनाथ यात्रेला गेलो असताना यात्रा सुरु करण्याआधी इथले दर्शन घेतले होते. तेव्हा या मंदिराभोवती प्रचंड सुरक्षाव्यवस्था होती. तेव्हापासून माझा जवळचा मित्र सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ अभिजीत देशपांडे दरवर्षी या मंदिराला काही ठराविक रक्कम मनीऑर्डर करतो. या मंदिराच्या बाहेरील बाजूने अतिरेक्यांनी India go back वगैरे काळ्या अक्षरात लिहून ठेवले होते. प्रचंड राग येत असूनही फार काही करू शकत नव्हतो.
यावेळी परिस्थिती पार बदलली आहे. आम्ही मंदिरात पोचलो तेव्हा खरं तर ५.३० वाजले होते. आपल्या महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांइतकेच महत्त्व या देवीचे काश्मीरी लोकांना आहे. उशीर झाला होता. मी मनातल्या मनात देवीचा धावा करू लागलो. अथक प्रयत्नानी इथपर्यंत पोचलोय ,आई! आता दर्शन दे!!


कार मंदिरासमोर थांबताच मी उतरलो आणि थोडा दबकतच मंदिराच्या आवारात शिरलो. BSF च्या एका जवानाने मला थांबवलं. मी सांगितलं त्याला की देवीच्या दर्शनासाठी आलोय. त्याने माझे आधार कार्ड मागितले आणि एका रजिस्टर मध्ये काही नोंद केली. आणि म्हणाला की वैसे तो दर्शन का समय खत्म हुआ है. लेकिन अभी शाम कि आरती का समय हो रहा है.‌आप जाकर आरती अटेंड करो. मला खूपच हायसे वाटले. देवी आईने माझी प्रार्थना ऐकली. खरंच, आपल्या श्रद्धावान मनाला 'चलो बुलावा आया है...' असेच वाटले. नेमकं सकाळी तो बोर्ड दिसणे, ड्रायव्हरने आढेवेढे नं घेता तयार होणे, वेळ संपल्यावर प्रवेश मिळणे....असो.🙏
माता खीर भवानी मंदिराचा परिसर बराच मोठा आहे. मुख्य मंदिर एका छोट्या जलाशयात आहे. त्यामुळे मातेच्या मूर्तीजवळ पुजारी महाराजांशिवाय कोणी जाऊ शकत नाही. मंदिराच्या आवारात अनेक मोठे वृक्ष आहेत. त्यातिल एका वृक्षाचा आकार अगदी भारताच्या नकाशासारखा आहे. 
आरती करून प्रसाद घेऊन प्रसन्न मनाने श्रीनगर कडे निघालो.
श्रीनगरला 'कृष्णा धाबा' व्हेज फुडसाठी प्रसिद्ध आहे. पण आम्ही असताना हा धाबा काही कारणाने बंद होता. म्हणून त्याच्याच शेजारच्या गुलाब रेस्टॉरंट मध्ये रात्रीचे जेवण घेतले आणि सलाम काकाच्या कृपेनें हाऊसबोटीपर्यंत पोचलो. आता उद्या परतीच्या प्रवासाला निघायचे. आज रात्री पॅकिंग करून ठेऊ. म्हणजे सकाळचा उपलब्ध वेळ सत्कारणी लावता येईल.
 *(क्रमशः)*

*मिशन काश्मीर (भाग १० वा )* 
 *प्रजासत्ताक दिन** 
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 

काश्मीर सहलीचा आमचा शेवटचा दिवस उजाडला. परतीच्या विमानाची वेळ दुपारी ३.३० ची असली तरी श्रीनगर विमानतळावरच्या अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेमुळे ३ तास आधी पोचायला हवे. अर्थात वातावरण आता खूप निवळले आहे. सामान्य काश्मीरी माणूस स्वतःला भारतीयच समजतो. अतिरेक्यांचा विरोध करतो. भारतीय सैन्याविषयी प्रचंड आदर बाळगतो. अनेकांनी तर इच्छा बोलून दाखवली की भारताने लवकरात लवकर पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावे. पाकव्याप्त काश्मीरची जनता पाकिस्तानात खूप हालअपेष्टा भोगते आहे. गेल्या काही वर्षांत आपले काश्मीर मात्र खूप सुधारले आहे. त्यात निवडणुका सुव्यवस्थितपणे पार पडल्या आणि एक लोकप्रिय सरकार तिथे स्थापन झाले आहे. अनेक वर्षे अस्थिरता, हिंसा या घटनांनी कश्यप ऋषींच्या या स्वर्गीय भूमीला जी दृष्ट लागली होती ती दूर होते आहे. 
रोजच्याप्रमाणे आम्ही आजही तयार झालो. आरीफ ड्रायव्हर आज आम्हाला सकाळी ' हरी पर्वत' म्हणजेच अकबर फोर्टला घेऊन जाणार होता. तिथून लाल चौक आणि मग थेट श्रीनगर विमानतळ!
हरीपर्वत पुण्याच्या पर्वतीसारखा वाटला. इथली सुरक्षाव्यवस्था BSF कडे आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे खूप आनंदी वातावरण होते. काही सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. काही तरुण तरुणी तर काही कुटुंबे आपल्या लहान मुलांना घेऊन इथे निर्धोकपणे फिरत होती. काश्मीरमधले भीतीचे काळे ढग आता निघून जातायत याचेच हे चिन्ह आहे. 
हरी पर्वतावर आठ हजार वर्षे जुने देवीचे देऊळ आहे.

: हरीपर्वतावरुन श्रीनगर जुने व नवीन अशा दोन्ही भागांचे निरिक्षण करता येते. एक प्रकारे हा पर्वत शहराला दोन भागात विभाजीत करतो असे म्हणायला हरकत नाही. जुन्या भागाकडे बघितल्यास हजरतबल दर्गा स्पष्ट दिसतो आणि विरुद्ध दिशेला संपूर्ण दल सरोवर आजुबाजुच्या परिसरासहित दिसतो.

: हरीपर्वतचा छोटा पण interesting trek आटोपून आम्ही खाली उतरलो. आता लाल चौकात झेंडावंदनाला जायचे होते. खूप आनंद होत होता. कै श्यामाप्रसाद मुखर्जी पासून अनेक जणांनी दिलेले बलिदान आठवून ऊर भरुन येत होता. खरं तर प्रजासत्ताक दिनाचा सरकारी कार्यक्रम बक्षी स्टेडियमवर होता. पण तिरंगा फडकवण्याचे खरे महत्त्व लाल चौकात होते. याच लाल चौकात पूर्वी भारत देशाच्या शत्रूंनी तिरंग्याचा अपमान केला होता. म्हणून मला तिथेच झेंडावंदनाला जायचे होते. ठरल्याप्रमाणे लाल चौकात पोचलो. माझ्या विचारांची बरीच मंडळी तिथे आधीच जमली होती. देशभक्तीची गीते गायली जात होती. पत्रकार होते. त्या गर्दीत शिरलो.


कोणीतरी हातात तिरंगा झेंडा दिला. तो उंच धरून जोरात ओरडलो..' भारत माता की जय'!! जयहिंद!!' प्रत्यक्ष लाल चौकात तिरंगा फडकवण्याची इच्छा पूर्ण झाली.
: काश्मीर दौरा अशा रीतीने खूप आनंददायी ठरला. जयहिंद! जय भारत! इतके दिवस माझे हे काश्मीर मिशन पुराण आपण वाचलेत याबद्दल खूप खूप धन्यवाद!!
 *समाप्त!*
 *डॉ अभिजीत अंभईकर नागपूर* 
 *मोबाईल क्र 8412925477*









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...