Saturday, April 5, 2025

तीर्थक्षेत्र तीथवाल

 

भाग १ : तीर्थक्षेत्र तीथवाल

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 15:15
तीथवाल

निवांत ट्रॅव्हल ब्लॉग्ज वाचत राहणे आणि आवडलेल्या ठिकाणांसाठी ट्रीप प्लॅन करणे हा छान पासटाईम आहे आमच्याकडे. भले ती ट्रीप घडो व ना घडो. असाच एक ब्लॉग वाचत असताना शोध लागला तो कर्णाह व्हॅलीचा आणि कृष्णगंगा नदीचा. कर्णाह व्हॅलीत नेमकं कुठं जायचं तर तीथवाल. उत्साहाने नवऱ्याला तो ब्लॉग दाखवल्यावर त्याचेही डोळे चमकले. कधी तरी इथे जायचे याची
खूणगाठ त्याच क्षणी मनाशी बांधली गेली. मुलगी तेव्हा लहान होती. त्यामुळे कधी तरी हे लांब असणार आहे याची जाणीव होतीच.

तेवढ्यात कोविड आला. सगळ्यांचीच सगळी गणितं उलटी पालटी झाली.

कोविड संपला, ३७० गेलं आणि कुठून तरी न्यूज आली की तीथवालला म्हणे काश्मीरी पंडितांच्या आग्रहाने शारदा मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे. हे काहीतरी नवीनच होतं. शारदा पीठ तर पाकव्याप्त काश्मिरात आहे ना? शारदा कॉरिडॉरची वाट न बघता आहे त्यात समाधान मानून घ्यायचे ठरवले काय लोकांनी? तसं तर तसं. ती शारदेची मूर्ती म्हणे शृंगेरी मठात घडवलीय आणि वाजत गाजत तीथवालला जाणार आहे. मला परत प्रश्न पडला की काश्मिरी पंडित शारदेची मूर्ती कर्नाटकातून का नेत असावेत?? तोपर्यंत मूर्ती पुण्यात पोहोचली होती. नवरा अनायासे पुण्यातच होता. तीथवालला जाऊ तेव्हा जाऊ, सध्या विश्रांतवाडीला जाऊन ये म्हटलं. नवरा गेला. तिथे त्याला सेव्ह शारदा समितीचे लोक भेटले. प्रसाद आणि पॅम्प्लेट घेऊन परत आला तेव्हा समजले की शारदापीठाशी संबंधित एक मंदीर भारतातच होते.

सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.

भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप

भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 16:14

काशीला जाऊन पंडित पदवी प्राप्त केली की चार पावले उत्तरेच्या दिशेने चालायची प्रथा होती. आता पुढे ज्ञान प्राप्ती करायची ती काश्मिरात. विद्येची देवता सरस्वती वास करते ती काश्मिरात ही पूर्वापार मान्यता. काश्मिरातच का? कारण सतीचा उजवा हात तिथे पडला आहे. त्यामुळे शारदा पीठ हे १८ महाशक्तिपीठांपैकी एक समजले जाते. साक्षात देवीचा वरदहस्त असणाऱ्यांना पंडित म्हणवले गेले तर काय विशेष!
काश्मिरी लोकांच्या लेखी शारदा ही ज्ञानग्रहणाची, सरस्वती ही ज्ञानाची आणि वाग्देवी ही अर्थात वाचेची देवी आणि शारदेचे हे देऊळ हे या तिन्ही देवींचे एकत्र स्वरूप ही त्यांची धारणा आहे.

शारदा पीठाचा पहिला उल्लेख येतो तो शांडिल्य यांच्या संदर्भात. मातंग ऋषींचा पुत्र शांडिल्य याचे उपनयन करण्यास पंडितांनी नकार दिल्यावर शांडिल्याने शारदेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शारदापीठापर्यंत प्रवास केला. वाटेत कृष्णगंगेत स्नान केल्यावर त्याचे अर्धे अंग सोन्याचे झाले. म्हणून त्या परिसराला सूनद्रांग (सुवर्णनरअर्धांग) नाव मिळाले. आजही त्या जागेला द्रांग म्हणतात. तेजोवनामार्गे(आजचे तेहिजीन) शारदावनात पोहोचलेल्या शांडिल्याला देवीने दर्शन व वरदान दिले. शांडिल्याच्या पितरांना त्याला तिथे श्राद्ध करण्यास सुचवले. तर्पण करताना त्याने महासिंधूचे जल हातात घेतल्यावर त्याचे मधात रूपांतर झाले व त्यापासून मधुमती नदीची निर्मिती झाली. देवीच्या आशीर्वादाने उच्चविद्याविभूषित होऊन शांडिल्य हे ऋषी म्हणून समाजमान्यता पावले अशी पुराणकथा आहे.

शारदापीठाच्या मंदिराला ४ दरवाजे होते. असं म्हणतात की प्रत्येक दिशेकडून येणाऱ्या विद्वानांची तिथे परीक्षा घेतली जायची. एखादा हुशार माणूस तिथल्या विद्वानांशी शास्त्रार्थात जिंकला तर मंदिराचा त्या दिशेचा दरवाजा कायमस्वरूपी उघडला जायचा. शारदापीठाला सर्वज्ञानपीठ असेही एक नाव होते आणि तिथे चार दिशांसाठी ४ सर्वज्ञानबैठकी होत्या. जिंकलेला विद्वान त्या दिशेच्या बैठकीवर विराजमान व्हायचा.

कालडीचा शंकर काशी, प्रयाग, गया करत शारदापीठात पोहोचला तेव्हा दक्षिणेचा दरवाजा बंदच होता. तिथल्या शैव, जैन, बौद्ध, तिबेटी विद्वानांशी वादविवाद करून तो जिंकला आणि मंदिराचा दक्षिण दरवाजा कायमस्वरूपी खुला झाला. हेच आपले आदि शंकराचार्य. याच रम्य परिसरात शंकराचार्यांनी देवीची स्तुती करणारे 'सौन्दर्यलहरी' स्तोत्र रचले.

परतीचा प्रवास सुरु करण्यापूर्वी शंकराचार्यांनी देवीला आपल्यासोबत दक्षिणेत चलण्याची विनंती केली. देवीने होकार दिला आणि सांगितले की वळून पाहू नकोस. देवीच्या नुपूरांच्या आवाजाने शंकराचार्यांना देवी आपल्यासोबत येते आहे याची खात्री होत होती. परंतु तुंगभद्रेच्या किनारी आल्यानंतर अचानक नुपूरांचा आवाज बंद झाला. शंकराचार्यांनी मागे वळून पाहिले आणि देवीने विग्रहाचे रूप धारण केले. याच ठिकाणी शृंगेरी मठाची स्थापना झाली. आज तिथूनच देवीची मूर्ती तिच्या मूळ स्थानी परत आली.

शारदापीठाकडे जाण्यासाठी ४ मार्ग होते. त्यातला एक मार्ग कुपवाड्यावरून डोंगरातून ४० किमी चालत जायचा होता. कुपवाड्यातील टिक्करपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शारदापीठासाठी यात्रा सुरु व्हायची. तर दुसऱ्या मार्गाने पाकिस्तानस्थित ल्यालपूरवरुन (आजचे फैसलाबाद) - मुझफ्फराबाद व्यापारी मार्गावरून तीथवाल येथे कृष्णगंगेत स्नान करून यात्रा पुढे शारदावनात जायची. पूर्वापार तीथवालमधले खत्री हिंदू व पंजाबी शीख यात्रेकरूंची बडदास्त ठेवायचे. दोन्ही यात्रा गंगाष्टमीला शारदा पीठात संपन्न व्हायच्या. तिथे मधुमती नदीच्या किनाऱ्यावर तर्पण केले जायचे.

मार्ग १ - हा डोंगरातून चालत जाणारा मार्ग आज अस्तित्वात नाही. त्याची थोडी बहुत कल्पना जुन्या काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीतून मिळते. १९४७ पूर्वी काही साधू संत याच खडतर मार्गाने शारदापीठात जायचे.
sharada route 1.png

मार्ग २ - हा मात्र जास्त सुकर असा वाहतुकीचा मार्ग होता. आजच्या पाकिस्तानातले काही लोक हत्ती घोडे घोडागाड्या वगैरे घेऊन या मार्गाने प्रवास करायचे. सामान्य जनही याच मार्गाचा वापर करायचे.
sharada route 2.png

१९४७-४८ मधल्या पाकिस्तानी रेडर्सच्या हल्ल्यात तीथवालमधल्या या मंदिराला व गुरुद्वाराला आग लावण्यात आली.
यात्रा अर्थातच बंद झाली.
काश्मिरी पंडितांच्या सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्वाच्या अश्या या शारदापीठाला त्यांना भेट देत यावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘सेव्ह शारदा समिती’ काम करत आहे. शारदापीठाचे महत्व ओळखून त्याचे पावित्र्य जपले जावे, महत्व अधोरेखित व्हावे व काश्मिरी पंडितांना (कालांतराने सर्व भारतीयांना) कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या धर्तीवर शारदा पीठाला भेट देता यावी ही त्यांची मागणी आहे.

वाजपेयी - मुशर्रफ भेटीत ही बाब तत्वतः मान्य झाली होती. आत्ताही पाकव्याप्त काश्मीरमधल्या स्थानिक सरकारने या मागणीला होकार दिला आहे. शारदी परिसरातील ग्रामस्थ शारदा पीठ यात्रेसाठी उत्सुक आहेत व ‘सेव्ह शारदा समिती’च्या प्रयत्नांना साथ देत आहेत. या यात्रेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून समितीने तीथवालमधील ग्रामस्थांच्या साहाय्याने मंदिराचे व गुरुद्वाराचे पुनर्निर्माण केले आहे.

भाग ३ : शारदापीठ

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 22:43

(दुरावस्थेतले शारदापीठ १८९३. wikipedia वरून साभार)

तीथवालचे हे मंदिर शारदा यात्रेचा एक बेस कॅम्प असले तरी काश्मीरच्या सांस्कृतिक इतिहासातील ही एक छोटीशी तळटीप होती.

एका वेळी साधारण ५००० विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे विद्यापीठ ही या विस्तीर्ण परिसराची खरी ओळख होती.

शारदा पीठ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात अशोकाच्या काळात निर्माण झाले की पहिल्या शतकात कुशाण काळात की सहाव्या
शतकात याबद्दल वाद असतील, पण साधारण आठव्या शतकापर्यंत ते भरभराटीला आले याबद्दल कुणाचेच दुमत नाही. सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या शारदी तालुक्यातील कृष्णगंगा व मधुमती नदीच्या संगमावर स्थापन झालेले हे विद्यापीठ दूरदूरच्या
प्रदेशांतील अभ्यासूंना आकृष्ट करत होते. फक्त भारतच नव्हे तर मध्य आशिया, तिबेट, चीन, सुदूर पश्चिमेकडच्या ग्रीसमधले विद्यार्थी या विद्यापीठात शिकत होते.

कित्येक संस्कृत ग्रंथ, वेद, पुराणे, शास्त्रे व त्यावरचे भाष्य यांचा मोठा संग्रह इथे होता. गुर्जर राजा जयशर्मा याने हेमचंद्र नामक जैन विद्वानाला व्याकरण शुद्ध करायच्या कामी शारदापीठात पाठवले होते. तिथे त्याने व्याकरणाचे ८ संदर्भग्रंथ (पाणिनीकृत
'अष्टाध्यायी'?) अभ्यासले असा उल्लेख आहे. स्वतः पाणिनी गांधार देशाचा. आजच्या अटकेजवळ त्याचे जन्मस्थान असावे असा
अंदाज आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य लिहिणारा पतंजलीही इथलाच. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर अभिनवभारती ही टीका लिहिणारा अभिनवगुप्त हाही काश्मीरचाच. ब्रह्मसूत्रावर श्रीहास्य ही टीका लिहिण्यापूर्वी ब्रह्मसूत्राचा सखोल अभ्यास
करण्यासाठी वैष्णव उपासक श्री रामानुज, श्रीरंगमवरून शारदापीठात गेले. दृढबलाने इथेच चरक संहितेचे संपादन केले.

८ व्या ते १२ व्या शतकाच्या दरम्यान अफगाणिस्तान ते हिमाचल प्रदेशापर्यंत पसरलेल्या शारदा लिपीचा उगमही इथलाच.
काश्मीरमध्ये संस्कृत आणि काश्मिरी भाषेसाठी वापरली जाणारी ही लिपी आज लोप पावली असली तरी तिच्यातून उद्गम पावलेली गुरुमुखी व तिबेटी मात्र चांगलीच वापरात आहे. सिंधी व्यापारी चोपडी लिहिण्यासाठी वापरायचे ती हटवणकी/ हटवणकाई लिपी हेही शारदा लिपीचे एक रूप.

बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कनिष्काने चौथी धम्म परिषद भरवली ती इथेच. चीनला बुद्धधर्माची शिकवण देणारा कुमारजीव आणि चीनमध्ये जाऊन बौद्ध धर्माची पुस्तके तिथल्या भाषेत अनुवाद करणारा बुद्धभद्रही इथलाच.

संगीतरत्नाकर लिहिणाऱ्या शारंग देवचा जन्म काश्मीरचा. इस्लामिक आक्रमणामुळे त्रस्त होऊन त्याचे कुटुंब दक्षिणेत देवगिरीला यादवांच्या आश्रयाला आले.

ह्यू-एन-संगने त्याच्या प्रवासातली २ वर्षे या विद्यापीठात काढली व त्याच्या मते भारतातल्या विविध दर्शनांवर अधिकाराने भाष्य करू शकतील असे विद्वान इथे होते. अल् बरूनीच्या मते प्रभासपाटणच्या सोमनाथाएवढे, स्थानेश्वरच्या विष्णू मंदिराएवढे किंवा
मूलतानच्या सूर्यमंदिराएवढेच याचे महात्म्य होते.
परिणामस्वरूप या मंदिरांसारखीच दुर्गती शारदापीठाच्या नशिबी आली. बाह्य आक्रमणे आणि बुतशिकन हे बिरुद मिरवणारे
राज्यकर्ते असा दुर्दैव योग इथेही कारणीभूत ठरला.

२००५ साली पाकिस्तान-अफगाणिस्तान केंद्रबिंदू असलेल्या भूकंपात शारदापीठाचे अजून नुकसान झाले.
sharda peeth.jpg
(इंटरनेटवरून साभार)

भाग ४ : ही वाट दूर जाते

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 22:58

कोव्हिडनंतर आयुष्य हळू हळू ताळ्यावर येत होते. एक काश्मीर ट्रीप पेंडिंग होतीच. तिचं प्लॅनिंग पुन्हा सुरु झाले. तीथवालविषयी एवढे सगळे ऐकल्यामुळे तिथे जायची इच्छा होतीच. हे सहज ‘वाड्या’वर लिहिले तर अश्विनीने त्या देवळात ओटी पाठवली होती त्याची माहिती दिली. अजून काही डीटेल्स टाकले. आता उत्सुकता अगदी चरम सीमेला पोहोचली होती. पण मुलीला घेऊन LOC पर्यंत प्रवास करावा की नाही याविषयी चलबिचल होती.

LOC असल्यामुळे सरकारी परवानगीशिवाय इथे जाता येत नाही. शेवटी निर्धार करून E-PASS साठी अप्लाय केलं. पुढच्या अर्ध्या तासात फोन वाजला. पलीकडून कुपवाडा जिल्ह्याचे डीएसपी बोलत होते. त्यांनी प्रवासाची तारीख विचारून सांगितले की
आत्तापासून परमिशन देता येत नाही. तुम्ही जायच्या आठवडाभर आधी अप्लाय करा. शिवाय हे ही सांगितलं की तुम्ही अप्लाय
केलंत की मला फोन करा. सरकारी ऑफिसातून स्वतः फोन करून कुणीतरी एवढ्या सौजन्याने आपल्याशी बोलतंय म्हणताना मला भरूनच आलं. परमिशनचा विषय बाजूला ठेवून बाकी तयारी करायला घेतली.

पण प्रवास सोपा नव्हता. श्रीनगर - सोपोर - हंडवारा - कुपवाडा - चौकीबल- द्रंगयारी ओलांडत आपण तीथवालकडे जाणार असतो. यातली बरीचशी नावं एकेकाळी ‘आतंकवादियों से मुठभेड़ में…..' किंवा ‘आतंकवादी हमले में..‘ याच सदराखाली ऐकली होती.

श्रीनगर मध्ये पहिला प्रश्न यायचा तो ‘तीथवाल? वो किधर है? किंवा 'अरे, वहां का रास्ता बंद है'. गुलमर्ग, पहलगाम सारख्या
मळलेल्या वाटा ऐन सीझनमध्ये सोडून LOC वर जायची तसदी कोण घेतंय? मग ठरवलं की सेल्फ ड्राईव्ह करुया. कार बुक
केलीही. तर सकाळी कंपनीचा मेसेज की तुम्ही सिलेक्ट केलेल्या कारचं काम निघालंय तर तुम्हांला स्कॉर्पिओ देतो.
हिमालयातल्या अनोळखी आणि कठीण घाटरस्त्यांवर स्कॉर्पिओ सारखी मोठी गाडी चालवायची नव्हती. त्यामुळे ती कॅन्सल केली. आता काय?

हॉटेलवाल्याकडे चौकशी सुरु केली. ऐन टुरिस्ट सीझनमध्ये आत्ताच्या आत्ता गाडी मिळवणे हे काय दिव्य असते सांगायला नकोच. सुदैवाने सेव्ह शारदा कमिटीची वेबसाईट, त्यावर दिलेल्या लोकांचे नंबर सोबत होते. सहज म्हणून नवऱ्याने त्यातल्या एजाजभाईंना फोन लावला. त्यांनी सांगितले की तुम्ही कुपवाड्यापर्यंत या. मी तिथे तुम्हाला पीक अप करायला गाडी पाठवतो. ग्रेट!

आता कुपवाड्यापर्यंत जायच्या गाडीचा शोध सुरु झाला. मग हॉटेलवाला म्हणाला आता तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी कशाला शोधता? टॅक्सी स्टॅण्डवर जा. तुम्हांला शेअर टॅक्सी नक्की मिळेल. अडीच तीन तासाचा तर रस्ता आहे. ठीक आहे. टॅक्सी स्टॅन्ड कुठाय
म्हणता? 'वो लाल चौक में, सामनेही हैं' आमची वरात सामानासकट लाल चौकात!

कुपवाड्याकडे जाणाऱ्या शेअर टॅक्सीचा शोध सुरु झाला. मुलीला सकाळपासून थोडं बरं वाटत नव्हतं आणि नेमकं हवं ते औषध सोबत नव्हतं. मग नवऱ्याने टॅक्सीवर लक्ष कॉन्सट्रेट केलं आणि मी फार्मसीवर. थोडी शोधाशोध केल्यावर फार्मसी, औषध सापडलं. साधारण १० वर्षांपूर्वी, आमच्या जम्मूवासी ड्रायव्हरने जमेल तितक्या लांबूनच 'वो लाल चौक' दाखवला होता. त्या वेळी तू लहान
मुलीला घेऊन लाल चौकात फिरशील असं जर कुणी सांगितलं असते तर ड्रायव्हरनेच काय, मी सुद्धा सांगणाऱ्याला वेड्यात
काढलं असतं. आता मात्र तिथे सीआरपीएफची एकच आर्मर्ड गाडी “Peace is a delicate balance” हे दाखवत उभी होती.

टॅक्सी स्टॅण्डवर परत आले तोवर कुपवाड्याकडे जाणारी टॅक्सी मिळाली नव्हती, पण नवऱ्याने कुपवाड्याकडे जाणारी काश्मिरी
सुंदरी शोधली होती. ती तिच्या भाषेत टॅक्सीची चौकशी करत होती आणि तुम्ही हिच्याबरोबर रहा असे सांगून तो हिंदीत एक बाजू लावून धरत होता. शेवटी आम्हांला हव्या त्या सीट अव्हेलेबल असणारी एक टॅक्सी मिळाली, अर्ध्या एक तासांनी वाट पाहून इतर शीटाही भरल्या आणि आम्ही श्रीनगर स्पेशल वडापचा अनुभव घेत कुपवाड्याकडे मार्गस्थ झालो.

येणाऱ्या ईदसाठी लोक आपापल्या गावी चालले होते. ‘हिन्द देश के निवासी सभी जन एक है’ याचा जिता जागता प्रत्यय लॉन्ग
वीकेंडला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, गणपतीला सायन-पनवेल रोड किंवा ईदच्या दरम्यान श्रीनगर हायवे असा कुठेही येत राहतो.
बुलेवार्ड रोड किंवा एयरपोर्ट रोडपलीकडे श्रीनगरचे दर्शन न घेतलेल्या लोकांनी जालना, सांगली, चिपळूण, अमृतसर वगैरे
कोणतेही शहर डोळ्यापुढे आणावे. भारतातल्या विविधतेतील एकता दाखवणारी महत्वाची खूण म्हणजे शहराच्या बाहेर पडणारे खड्डेयुक्त दुहेरी रस्ते. श्रीनगर तरी त्याला अपवाद कसे ठरेल? पेट्रोल पम्प किंवा महत्वाच्या एस्टॅब्लिशमेंटपुढे असणारे शस्त्रसज्ज जवान हेच काय ते वेगळेपण!

परिम्पोरा, सिंगपोरा, पट्टण (प्रतिहासपोरा), पल्हालन पार करेपर्यंत अस्ताव्यस्त पसरलेली कळकट गावं पाहून आपण
काश्मीरमध्येच आहोत का हा प्रश्न पडला होता. पण गार होत जाणारी हवा त्याचं उत्तरही देत होती.

गाडीने सोपोर परिसरात प्रवेश केला आणि डोळेच निवले. दुतर्फ़ा मैलोन मैल पसरलेल्या सफरचंदाच्या बागेतून जाणारा रस्ता,
नुकतेच धुमारे फुटत असलेली सफरचंदांची झाडं, क्वचित एखाद्या बागेत चरणारी मेंढरं, मध्येच फुललेली चेरी नाही तर जर्दाळू. नितांत सुंदर दृष्य होतं. गाडीने सोपोर शहरात प्रवेश करताना हलका पाऊस सुरु झाला. थंड, काळोख्या वातावरणातलं सोपोर शहर मात्र एखाद्या डल इंग्लिश शहरासारखं वाटलं. त्यात सखल जमिनीवर पाणी साचून निर्माण झालेली डबकी, रस्त्याच्या कडेला वाहणारे काळे पाणी - सोपोर शहराने निराशाच केली.
sopore apple orchards tripxl.jpg
(tripxl.com वरून साभार)

एजाज भाईंनी सांगितलं होतंच की कुपवाड्यात पाऊस आहे. हन्डवाड्याकडे जाताना पावसाने जोर धरला होता. पण तेच पाणी आता शेतात साचत होते. त्यात पडणारे विलोंचे प्रतिबिंब, उतरत्या छताची दूर दूर पसरलेली घरं - जुन्या चित्रपटात दाखवलं जाणारं काश्मीर हेच असावं. कुपवाडा जवळ आल्यावर त्यात खळाळून वाहणाऱ्या ओढ्यांची भर पडली. हंडवाडा, कुपवाडा हे सखल प्रदेश अप्रतिम सौन्दर्याने नटलेले आहेत. इथे पर्यटन, वेलनेस रिट्रीट, पशुपालन वगैरे उद्योग प्रदेशाच्या अर्थकारणात भर घालू शकतात.
हंडवाड्यातले दूध, पनीर उत्तम क्वालिटीसाठी फेमस आहे पण इथून पुढच्या प्रदेशात श्रीनगरवरून पॅक्ड मिल्क येते हे किती दुर्दैव.

Kupwara.jpg
(cliffhangersindia.com वरून साभार)

एजाजभाईनी इस्माईल नामक ड्रायव्हरचा नंबर पाठवला होता. शिवाय वेळोवेळी फोन करून ते आम्ही कुठवर पोहोचलो आहोत याची खबरही घेत होते. ड्रायव्हरचाही फोन येऊन गेला. त्याने वडाप ड्रायव्हरशी बोलून आम्हाला अमुक ठिकाणी उतरवण्याविषयी ठरवले आणि शेवटी एकदाचे आम्ही कुपवाड्याला ठरलेल्या ठिकाणी उतरलो. कुपवाडा सुंदरीला आगामी ईदीच्या शुभेच्छा देऊन सामानसुमानासकट आमचा भार इस्माईलवर सोपवला आणि चौकीबलकडे निघालो.

भाग ५: साधना पास

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 23:19

चौकीबल ही पहिली चौकी.

इथेच तंगधार, तीथवाल कडे जाणाऱ्या बाहेरच्या लोकांचा E-PASS चेक केला जातो. शिवाय या चौकीवर रस्त्याचे स्टेटस
दाखवलेले असते. ब्लॅक/ रेड असेल तर रस्ता बंद. अतिशय बर्फ वृष्टीमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे किंवा दरड कोसळल्याने रस्ता बंद होणे आणि आर्मीने जाहीर केलेली मौसम की जानकारी उर्फ़ ऍडव्हायजरी पाहून प्रवास करणे ही बऱ्याच भारतीयांसाठी नवलाई असलेली गोष्ट इथे कॉमन आहे.

प्रवास सुरु करण्यापूर्वी आठवडाभर आधी E-PASS घेतला होता. कुपवाड्याच्या डीएसपीनी E-PASS इश्यू करून वर “Welcome to Kashmir” म्हटल्याने शासकीय पातळीवरही LOC पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न होत आहेत याची खात्री पटली.

प्रत्येक चौकीवर देता यावेत म्हणून E-PASS च्या ढिगाने प्रिंट आऊट्सही घेतल्या होत्या. तीथवालमध्ये सेल्यूलर नेटवर्क मिळणार नाही असं बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं. इथे मात्र सुखद धक्का बसला. साधना पासचा रिस्ट्रिक्टेड भाग सोडल्यास सर्वत्र उत्तम
नेटवर्क मिळालं. इथे एअरटेल, जीओ आणि बीएसएनएलचे टॉवर्स आहेत.

हातात E-PASS असला तरी कोण, कुठून आलात, कुठे चाललात, कधी परतणार वगैरे प्रश्नोत्तरे होतात. E-PASS साठी अप्लाय करताना जी डॉक्युमेंट्स सबमिट केली होती तीच दाखवावी लागतात. किमान four eyes चेक होतो. सरकारी कागदपत्रांवरल्या फोटोवरून चेहरा ताडून पाहणाऱ्या सुरक्षाकर्मींबद्दल मला भयंकर आदर आहे. त्यांना खरं तर फेस रेकग्निशनसाठी खास भत्ता दिला पाहिजे. पण पोरंबाळं घेऊन फिरणारे आणि बॅगांचं ओझं ओढून आत्ताच दमलेले आणि गारठलेले हे टुरिष्ट आपल्यासाठी डोकेदुखी कॅटेगरीतले नाहीत हे ओळखून त्यांनी आम्हांला पुढे हाकलले.

मार्चचा शेवट हा काश्मीरमधला वसंत ऋतू. पण १०००० फुटावर थंडीमुळे नाक जागेवर आहे की नाही अशी शंका निर्माण करणारी ‘नाश्ताचून’ पास ओलांडून जायचे होते. त्यात काश्मीरमध्ये बर्फ पडणार हे सगळ्या वेदर चॅनेल्सनी एकमुखाने सांगितले होते. १९६५च्या युद्धानंतर जवानांच्या मनोरंजनासाठी अभिनेत्री साधना इथे येऊन गेली होती म्हणून नाश्ताचून पासला आता साधना पास म्हणतात.
sadhana pass.jpg
या कमनीय आणि विलोभनीय रस्त्याला इतकं सुटेबल नाव शोधून सापडलं नसतं. सूचिपर्णी वृक्षांनी आच्छादलेली जमीन, रस्त्याच्या कडेला साचलेलं शुभ्र बर्फ, त्यातून वाहणारे छोटे छोटे ओहोळ, झाडांतून पसरलेलं धुकं आणि निरव शांतता. एखाद्या गूढ
चित्रपटाची कथा हलकेच उलगडत आपल्याला गुंतवून ठेवत पुढे जावी तसा हा परिसर नजर खिळवून ठेवत होता. आमच्या
आयुष्यातला आत्तापर्यंतचा सर्वात रम्य प्रवास हे आम्ही तिथेच मान्य केलं. जसजसं शिखराच्या दिशेने प्रवास सुरु झाला तसं
झाडांचे प्रमाण कमी होत बर्फ़ाचे प्रमाण वाढत गेले पण प्रवासाची रंगत बदलली नाही.

वाटेत टीपी आणि बांगुस व्हॅलीच्या प्रवेशद्वारापाशी छोटे चहा पाण्याचे स्टॉल्स आहेत. तुरळक प्रवासी व रोजे चालू असल्याने तेही बंद होते. काश्मिरी समरमध्ये इथे निवांत बसून आसमंत न्याहाळत चहा-कॉफी घेण्यासारखं सुख नसेल. मात्र हे पॉईंट सोडल्यास या रस्त्यावर सुतळीचा तोडा देखील मिळणे मुश्किल आहे. पार कॅम्पापर्यंत सायकल हाणत जावं लागेल.

अर्थात हा सुंदर रस्ता जवळ जवळ ४ महिने बर्फामुळे बंद असतो, उरलेल्यापैकी निम्मा वेळ चाकांना चेन्स लावल्याशिवाय गाडी चालू शकत नाही, पाण्यामुळे रस्ता वाहून खडबडीत होतो, दरड कोसळणे वगैरे प्रकारांमुळे या भागाचा श्रीनगरशी आणि पर्यायाने भारताशी संपर्क तुटतो. पलीकडल्या नागरिकांसाठी हे त्रासदायकच आहे. काही काळानंतर या प्रश्नांवर उत्तर मिळेल अशी आशा आहे. कारण नितिनभौंनी इथे बोगद्यासाठी सर्वेक्षण केले आहे. या भागात राहणाऱ्या लोकांनी याचे सहर्ष स्वागत केले आहे.

sadhana top.jpg

साधना पासमध्ये परत एकदा चौकशी होते. तिथल्या जवानांनी सांगितले तर चाकांना चेन लावावी लागते. चेन नसेल तर परत फिरावे लागते.

हा डोंगर उतरल्यावर पहिले गाव लागले ते तंगधार. तंगधार सोडताना परत एकदा E-PASS चेकिंग, प्रश्नोत्तरे झाली. मग ‘मुंबईसे आये है’ म्हटल्यावर एका जवानाने ‘मराठी आती है क्या’ विचारले. तुम्ही कुठले विचारल्यावर तो बीडचा निघाला. या भागात पुढे बरेच मराठी जवान भेटले आणि घरापासून दूर मायबोली किती ओढ लावते याचा प्रत्यय जागोजागी येत गेला.
इथल्या एका चेकपोस्टवर शस्त्रसज्ज स्री सैनिक होत्या. या विषम हवामानात काम करणाऱ्या या स्री सैनिकांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच.

Tangdhar.jpg

तंगधार सोडल्यावर आपण तीथवालजवळ आलो म्हणून निश्वास सोडला. पण कसचं काय? ४० मिनिटं रस्ता नुसता उतरतच होता. आता काय थेट बळीच्या राज्यातच पोचतो का काय असेही विचार मनात येऊ लागले आणि गूगल मॅपमध्ये अंतर बघताना
एलिव्हेशन पण नीट चेक करायचं हा धडा मिळाला.

इथून जवळच पाकव्याप्त काश्मीर सुरु होते म्हणताना आम्ही उत्सुकतेने ड्रायव्हरला दिसेल तो डोंगर PoK आहे का विचारत होतो. तोही तत्परतेने 'नहीं साब, यह हमारा हिन्दोस्तां है, इसके आगेवाला पहाड़ भी हमारा हिंदोस्तां है' सांगत होता. एके काळी
अनंतनागमधल्या लहान मुलांकडुन 'तुम इंडियासे आये हो क्या' ऐकलं होतं. त्यामुळे सीमावर्ती भागात ‘हमारा हिंदोस्तां’ ऐकणं
आनंददायी होतंच. शिवाय आत्तापर्यंत काश्मीरी लोकांची इच्छा म्हणताना एका विशिष्ट भागातल्या राजकारणी व लोकांची इच्छा
इतरांवर लादली गेली होती का असाही प्रश्न पडत होता.

या भागातले रहिवासी स्वतःला पहाडी/पठाण समजतात. इथल्या मोजक्या लोकसंख्येतही बसक्या गालांचे मंगोलॉइड, तरतरीत किंवा पोपट नाकाचे काश्मिरी, लख्ख गोरे, निळसर डोळ्यांचे, पण मध्यम उंचीचे पठाण असे वैविध्य दिसून येते. त्यांची भाषा पहाडी + डोगरी थोडीशी पंजाबीला जवळ जाणारी आहे. ते एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यातल्या पंजाबी अण्डरटोनमुळे (आणि
हिन्दी सिनेमाच्या कृपेने) आपल्याला गोषवारा समजतो. या सगळ्यांना काश्मिरी येतेच असं नाही. ज्यांचा काश्मीर खोऱ्याशी रेग्युलर संवाद आहे त्यांना काश्मिरी समजते.

पुढे तीथवालमध्ये आम्हाला गाईड करणाऱ्या म्हाताऱ्या चाचानेही बोलताना 'हमारे दादाजी के ज़माने में ८० % रिलेटिव उधर थे|
लेकिन अभी उनके और हमारे भी बच्चे, बच्चों के बच्चे हो गए| अभी हमारा क्या ताल्लुक?' अशी मॅटर ऑफ फॅक्ट भूमिका घेतली होती.

दक्षिण काश्मीरपेक्षा या भागात जास्त विषम तापमान, रोजगाराच्या कमी संधी आणि खडतर आयुष्य आहे. या लोकांचा एकेकाळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये थेट आर्थिक किंवा सामाजिक संबंध होता.

पण तीथवालचं शारदा मंदिर उभं आहे ते याच लोकांच्या सहकार्यामुळे.

भाग ६ : तीर्थबल शारदा मंदीर

Submitted by माझेमन on 4 April, 2025 - 01:13

सेव्ह शारदा समिती पाकव्याप्त काश्मिरातील मूळ मंदिरात पूजेसाठी आग्रही आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी २०१६ मध्ये पाकव्याप्त
काश्मिरातल्या शारदापीठात देवी शारदेचा फोटो ठेवला गेला. पाकिस्तानी न्यायालयाची परमिशन मिळवून पाकिस्तानी हिंदूंना तिथे पूजा करण्याची परमिशन दिली गेली. सध्या हॉंगकॉंग स्थित असलेल्या श्री वेंकटरमण व सौ सुजाता यांनी २०१९ साली ७०
वर्षांपासून दिवाबत्ती न झालेल्या मूळ शारदापीठात पूजा केली.

शारदा मातेच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेनंत भारतीय लोकांची ही इच्छा पूर्ण करतं आहे तीर्थबल. बल म्हणजे काश्मिरीत क्षेत्र.
तीर्थबलचा अपभ्रंश तीथवाल.

Sharada Mandir.jpg

१९४७-४८ च्या पाकिस्तानी अटॅकमध्ये नष्ट झालेल्या या मंदिराची व गुरुद्वाराची जागा तीथवालच्या ग्रामस्थांनी राखून ठेवली व २०२१ मध्ये मंदीर निर्माणासाठी दिली. सीमेवरच्या या भागात बाहेरून मजूर आणून काम करवणे आर्थिक किंवा इतर बाबींनी शक्य नसताना या लोकांनी श्रमदानाने हे मंदिर निर्माण केले. मंदिराचे लोकल को-ऑर्डीनेटवर एजाज अहमद खान साहेब आहेत. 'सेव्ह शारदा' आणि मंदिराच्या विश्वस्त समितीचे ते सदस्य आहेत. ते जातीने भाविकांची सोय पाहतात.

मूळ मंदिराच्या धर्तीवर तीथवाल येथील मंदिराला ४ दरवाजे असले तरी आदि शंकराचार्यांच्या कार्याच्या व मंदिर निर्माणातील
शृंगेरी मठाच्या मदतीच्या सन्मानार्थ सध्या मंदिराचे दक्षिण द्वारच उघडले गेले आहे. प्रत्येक दरवाजावर सनातन धर्मातील ४
महत्वाची तत्वं देवनागरी व शारदा लिपीत लिहिली आहेत. मंदिरात कमरेएवढ्या उंचीच्या संगमरवरी स्तंभावर सरस्वतीची पंचधातूची, सोनेरी मुलामा दिलेली मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. देवीच्या डाव्या पायाशी जमिनीवर आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे.
शारदापीठाविषयी आस्था असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांनी मूळ शारदापीठातून पाठवलेला शिलाखंड देवीच्या
उजव्या पायाशी आहे.

गृहमंत्री श्री अमित शाह यांनी २०२३ च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला मंदिराचे उदघाटन केले तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शृंगेरी मठाचे श्री
विदुशेखर भारती स्वामी यांच्या हस्ते झाली.

देवळाच्या परिसरात ध्यान, भजन वगैरे करण्यासाठी वेगळी जागा आहे.

मंदिर निर्माण जरी नागरी सहकार्याने झाले असले तरी इथे तैनात असलेल्या रेजिमेंटने भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. आर्मी कॅम्पवरील पुजारी सकाळी ७ वाजता व सूर्यास्तसमयी देवीची पूजा करतात. सूर्यास्तानंतर मंदिर बंद केले जाते. एखादी वेगळी पूजा, हवन इत्यादी करायचे असल्यास पूजा सामग्री व पुजाऱ्यांची सोय स्वतः करावी लागते.
आर्मीचे ४ जवान मंदिराबाहेरील धर्मशाळेत २४ तास तैनात असतात. सीमेवरील प्रदेश असल्याने रात्री वास्तव्य करणाऱ्या
भाविकांना राहण्याच्या ठिकाणाची नोंद सैनिकांकडे करावी लागते.

मंदिराच्या आसपास होम स्टेमध्ये आजमितीला साधारण १००० रुपये प्रतिदिन प्रमाणे निवास, आंघोळीसाठी गरम पाणी, १ वेळचा नाश्ता व २ वेळच्या जेवणाची सोय होते. अर्थात एजाझभाईंशी बोलून तिथे जाण्यापूर्वी या गोष्टींची खात्री करून तिथे जाणे उत्तम. कारण तीथवाल व तंगधार ही छोटी गावे आहेत व तिथे हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाहीत.

सेव्ह शारदा समितीच्या श्री रवींद्र रैना (पंडिता) यांनी स्वखर्चाने इथे दोन खोल्यांचा यात्री निवास व किचनची सोय विनामूल्य केली आहे. तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल, मिश्राहारी घरात स्वयंपाक रांधणे/ भोजन करणे तुम्हाला मान्य नसेल किंवा परान्नग्रहणाबाबत काही नेम नियम पाळत असाल, तर या यात्री निवासमध्ये स्वतःचा शिधा नेऊन स्वयंपाक करता येऊ शकतो. एका वेळी ५०
माणसांचा स्वयंपाक व भोजन करता येईल एवढी भांडी तिथे उपलब्ध आहेत.

किशनगंगा नदीवर छोटा घाट बांधलेला आहे व तिथे स्नान, तर्पण इत्यादी करता येऊ शकते. पण हा घाट पाकिस्तानी चौकीच्या थेट लाईन ऑफ फायरमध्ये येत असल्यामुळे घाटावर जाण्यापूर्वी तैनात सैनिकांशी बोलून परवानगी घेणे उत्तम. एकंदरीत तिथल्या आर्मी कॅम्पमध्ये स्वतःच्या ऍक्टिव्हिटीजची माहिती देणे, त्यांनी दिलेल्या सूचना न चुकता अमलांत आणणे हे आपल्या सुरक्षेच्या
दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. कारण किशनगंगा नदीच तीथवालची व या भागात देशाची LOC आहे. 

भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...

Submitted by माझेमन on 4 April, 2025 - 03:18

संध्याकाळी तीथवालला पोहोचल्यावर आमचे देवीदर्शन, पूजा होईपर्यंत अंधार पडला. आम्ही बुकिंग असलेल्या फॉरेस्ट हटकडे वळलो. वीज गायब होती. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार, विजांचा कडकडाट होऊन बारीक पाऊस सुरु
झालेला आणि फॉरेस्ट हट बंद होती. आम्ही थक्क होऊन मेन गेटच्या कुलूपाकडे बघत होतो. सरकारी काम असल्याने आमच्या
बुकिंग स्लिपवर कोणाचेही नाव, नंबर वगैरे नव्हते.

इथे इस्माईल रोजा खोलायचा सोडून आमच्यासाठी लोकांना फोन करत होता. शेवटी त्याला हट मॅनेज करणाऱ्या जावेदभाईचा फोन नंबर मिळाला. ऍडव्हान्स बुकिंग असले तरी वनविभागाने त्याला आमच्या आगमनाची खबर दिली नव्हती. त्यामुळे तो रोजा सोडायला मित्राकडे गेला होता. त्याला व्हाट्सऍपवर बुकिंग स्लिप पाठवून आमचं बुकिंग आहे याची खात्री पटवल्यावर तो यायला निघाला तरी १५-२० मिनिटे लागली असती. सुदैवाने त्याचे घर शेजारीच होते आणि हटची किल्ली घरातच होती. इस्माईलने काय सांगितलं माहिती नाही पण ५ मिनिटात त्याची बायको मुलींसकट चावी घेऊन आली. गेट, बंगला उघडला, इन्व्हर्टर सुरु केला आणि केव्हापासून भेदरलेल्या माझ्या लेकीचा जीव भांड्यात पडला.

जावेद येईपर्यंत त्याची बायको आणि इस्माईल आमच्या सोबत थांबले होते. दिवसभराचा प्रवास करून थकलो होतो. सोबत
खिचडीचं सामान नेलं होतं ती करायला घेतली. जावेद आणि त्याच्या बायकोच काही बोलणं झालं आणि तो राजमा, पोळ्या आणि
दुधीची भाजी घेऊन आला. जेवतोय तोवर छतावर गारा पडू लागल्या होत्या. तपमान -6 सेंटीग्रेड आणि फील्स लाईक -14
दाखवत होतं, फोनवर nearby ciry Mirpur बघितल्यावर अजून काहीही बघायची ताकद आणि इच्छा उरली नव्हती. त्यामुळे गप ब्लँकेट्स मध्ये घुसून झोपून गेलो. मधून मधून कुठला तरी प्रखर प्रकाश डोळ्यावर येत होता म्हणून पडदेही नीट झाकून घेतले.

सकाळी तयारी करून अंगणात आलो तर समोर साधारण २० फुटांचं अंगण आणि लगेच खाली चाळीसेक फुटांवर किशनगंगेचा खळाळता प्रवाह. बिचारा ऋषी कपूर. हीना पिक्चरमध्ये बारामुल्लात झेलममध्ये पडून पाकिस्तानात पोहोचला. किमान २ तास तरी वाहत जायला लागले असतील. या फॉरेस्ट हटच्या अंगणातून पडला असता तर २ मिनिटांच्या आत पाकिस्तानात पोहोचला असता. कदाचित पुढे मागे एखाद्या चित्रपटात अशी काही कथेची मागणी असेल तर वेळ फुकट जाऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम
खात्याने फॉरेस्ट हटला ३ बाजूनी कठडा घालून नदीच्या दिशेने मोकळी ठेवली असेल.

एवढं पुरेसं नाही म्हणून अंगणाच्या एका कोपऱ्यात गझीबो स्टाईल व्ह्यू पॉईंट. त्यातनं वरच्या साईडच्या पाकिस्तानी चौक्या दिसत होत्या. तिथे लागून असलेले रस्ते, त्यावरची वाहनं सगळं दिसलं. फक्त बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे भारतात असलेले डोंगर आणि त्यावरचं जंगल तेव्हढं दिसलं नाही. दर वेळी काय तीच तीच झाडं? फॉरेश्टवाली काय माणसं नाहीत की काय?

रात्री दिसलेले ते लाईट्स चौक्यांवरचे सर्च लाईट्स किंवा वाहनांचे हेडलाईट्स असावेत.

पलीकडेही जाग आली होती. शांत वातावरणात त्या रस्त्यावरल्या वाहनांचे हॉर्न्स ऐकू येत होते. आणि नदीच्या पूर्व किनाऱ्यावरून आम्ही एके काळी आपल्या असलेल्या, युद्धात रीतसर जिंकूनही तहात हरलेल्या भूमीवरचे पाकव्याप्त काश्मीर व पाकचे झेंडे बघत होतो.

crossing bridge start.jpg

एक झुलता पूल ओलांडून हे अंतर मिटू शकतं. हा पूल १९३५ साली राजा हरिसिंग यांनी नदीच्या दोन्ही तीरांवरल्या आपल्या
नागरिकांसाठी बांधून घेतला होता. १९४७ साली हा पूल डॅमेज झाला होता. त्याची दुरुस्ती केली गेली. २००५ सालच्या
पाकिस्तानमध्ये आलेल्या भूकंपात या पुलाचे नुकसान झाले. परत त्याची दुरुस्ती करून तो वापरात आणला गेला. दोन्ही बाजूच्या काश्मीरमधल्या लोकांना १५ ते २८ दिवसाच्या व्हिजावर नातेवाईकांना भेटायला जाऊ देण्यासाठी हा पूल वापरला जायचा. दोन्ही बाजूला इमिग्रेशन काऊंटर आहेत. परंतु २०२० मध्ये कोव्हिडमुळे व नंतर या परिसरात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्यामुळे हा पूल सध्या बंदच असतो.

आम्हांला नदीच्या घाटावर नेण्यासाठी आमच्यापेक्षा गाईड चाचा जास्त उत्सुक होते. नदीच्या पाण्यात सवयीप्रमाणे हात घालणे वगैरे आम्ही केलेच. अर्थात नदीपात्रात उतरणे किंवा दगड फेकणे वगैरे भारतातले उत्साही पर्यटन प्रकार इथे करू नयेत हे वेगळं सांगायला नको. घाटावर गर्दी केली की कधी कधी पाकिस्तानी रेंजर्स आक्षेप घेतात असं गाईड चाचांनी सांगितलं.

सोनमर्गजवळ किशनसार सरोवरातून उगम पावलेली ही नदी दर्दिस्तानातून वाहत काही काळ भारतात येते. परत जदरा गल्लीतून ही नदी पश्चिमेकडे वळते व पाकव्याप्त काश्मीर परिसरात प्रवेश करते. पाकव्याप्त काश्मीरात याच नदीला नीलम नदी म्हणून ओळखले जाते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कृष्णगंगा (किशनगंगा) झेलमला, झेलम चिनाबला आणि चिनाब शेवटी सिंधूला मिळते. परवाच सिंधू नदीत सोन्याचे साठे सापडल्याची बातमी कुठेशी वाचली. दर्दिस्तानातून वाहताना कृष्णगंगा auriferous भूमी
खरवडून काढत वाहते. सूनद्रांगची कहाणी कदाचित फक्त दंतकथा नसावी.

शारदा पीठ आणि तीथवाल ज्या व्हॅलीत वसलेले आहे त्या व्हॅलीत महाभारतकालीन कर्णाचे काही काळ वास्तव्य होते असं
मानतात. त्यामुळे या व्हॅलीचे नाव कर्णाह = कर्ण + नाह = कर्णाशी संबंधित. पांडवांनी वनवासातील काही काळ इथे व्यतीत केला. त्यांना कृष्ण भेटायला आला त्या परिसरातील नदी म्हणून हिचे नाव कृष्णगंगा. जवळच्याच जंगलात जुने दगडी स्ट्रक्चर्स आहेत ज्याला पांडव पूल म्हटले जाते.

एके काळी कर्णाह व्हॅली सुका मेवा (जर्दाळू-अक्रोड), तांब्याची कोरीव काम केलेली भांडी, लोकरीचे कपडे, राजमा, मध मीठ या गोष्टींच्या व्यापाराचे मोठे केंद्र होते. इथले व्यापारी प्रामुख्याने हिंदू खत्री होते. तसेच बाल्टीस्तानातले व दर्दिस्तानातले लोक
तीथवालमार्गे मीरपूर, मुझफ्फराबाद असा प्रवास करत सिंधूच्या खोऱ्यात व्यापार करायचे. इथे मिळणारा उत्तम प्रतीचा माल विकत घेण्यासाठी कुपवाड्यातले व्यापारी गर्दी करायचे. त्याच तीथवालला आज बारीक सारीक गोष्टींसाठी कुपवाड्यावर अवलंबून राहावे लागते आहे.

भाग ८: जरा याद करो कुर्बानी

Submitted by माझेमन on 4 April, 2025 - 16:44
Madras Hill

तीथवाल आता केवळ जुने व्यापारी, सांस्कृतिक किंवा धार्मिक केंद्र उरलेले नाही. १९४७-४८ आणि नंतरच्या प्रत्येक पाकिस्तानी आक्रमणात भारतीय जवानांच्या विजिगिषु वृत्तीची कसून परीक्षा घेणारे रणमैदान ही नवीन ओळख याला प्राप्त झाली आहे.
काश्मीरच्या हाडं गोठवणाऱ्या हिवाळ्यात व पावसाळ्यात उत्तुंग डोंगररांगांनी व्यापलेल्या या प्रदेशाचे जीवाची बाजी लावून, प्रसंगी पाठीवर ओझे लादून पायी चालत जात भारतीय सैनिकांनी रक्षण केले आहे. या भूमीवर किती बांगड्या फुटल्या आणि किती मोहरा हरवल्या याची गणनाही करणे कठीण.

१९४८ साली पाकिस्तानी रेडर्सनी तीथवाल गाव ताब्यात घेतले होते. ६ राजपुताना रायफल्सवर गावातली एक महत्वाची शत्रूची
पोस्ट काबीज करण्याची जबाबदारी सोपवली होती. खोल दरीत असलेली ही पोस्ट पाकिस्तानच्या नजरेत आणि त्यांच्या ३ मिडीयम मशीनगनच्या टप्प्यात होती.

१८ जुलैला पहाटे १.३० वाजता C कंपनी पिरू सिंग यांच्या नेतृत्वात पोस्टवर चालून गेली. पुढच्या अर्ध्या तासात त्यांच्या तुकडीतील ५१ जवान पाकिस्तानी गोळीबारात शहीद झाले होते. पिरू सिंग यांनी उरलेल्या जवानांसकट एका मशीन गन पोस्टवर हल्ला केला व ती उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात उरलेली तुकडी नष्ट झाली व एका ग्रेनेडच्या स्फोटात ते जबर जखमी झाले. तरीही एकट्याने दुसऱ्या मशीनगन पोस्टवर हल्ला करून तिथल्या सैनिकांना बायोनेट करून त्यांनी ती मशिनगन ताब्यात घेतली आणि तिसऱ्या मशीनगन पोस्टवर ग्रेनेड फेकून ती नष्ट केली. त्याच दरम्यान शत्रूच्या एका गोळीने त्यांचा वेध घेतला. पिरू सिंग यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळे तीथवाल गाव आणि किशनगंगेवरील पूल भारताच्या ताब्यात येण्यास मदत झाली.

१३ ऑक्टोबरला Richmar Gali परिसरात १ शीखच्या एका फॉरवर्ड पोस्टचे नेतृत्व करम सिंग करत होते. या तुकडीकडे शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. अचानक या पोस्टवर सर्व बाजूंनी पाकिस्तानने हल्ला केला. केला. करम सिंग
यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी शत्रूचे ८ हल्ले फेटाळून लावले. अखेर आणि सर्व बाजूंनी शत्रूकडून वेढले गेल्यावर आणि
तुकडीतजवळचा दारुगोळा संपुष्टात आल्यावर त्यांना पोस्ट सोडून देण्याचा आदेश मिळाला. पोस्ट सोडून जात असताना स्वतः जखमी असून त्यांनी व त्यांच्या एका सहकाऱ्याने २ जखमी जवानांना सोबत घेऊन मूळ पोस्ट गाठली.

करम सिंग यांच्या पोस्टवर किमान ३००० गोळ्या झाडल्या गेल्या. या दरम्यान मूळ पोस्टला शत्रूच्या हल्ल्याची दिशा व संख्या लक्षात घेऊन Richmar Gali वाचवता आली.

१ शीख ज्या ब्रिगेडचा भाग आहे त्या १६३ इन्फ्रंट्री ब्रिगेडला शत्रूला माघारी धाडून ६ महिने सहा महिने तीथवाल झुंजत ठेवल्याबद्दल बॅटल ऑनर्स दिले गेले.

तीथवालच्या क्रॉसिंग ब्रिजपाशी तिरंग्यासोबत परमवीर चक्र विजेते लान्स नायक करम सिंग व कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग यांचे पुतळे
Paramveer chakras.jpg

१९६५च्या लढाईत 4 Kumaon च्या B कंपनीने कॅप्टन सुरेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अडीच तासाच्या हातघाईच्या लढाईत पॉईंट २७४७ जिंकून घेतला. त्याचे नामकरण Kumaon Hill करण्यात आले.
3/8 Gorakha Rifles नी sanjoi टॉप व lower sanjoi जिंकून घेतले. पुढच्या ३ दिवसात पाकिस्तानने ४ वेळा शर्थीचे हल्ले चढवूनही हे पॉईंट्स आपण राखून धरले होते.
1 SIKH ने पीर साहिबा पॉईंट जिंकून घेतला.
याव्यतिरिक्त पॅनोरमामध्ये सरळ समोर दिसणारा डोंगर Madras Rifles नी जिंकला व त्याचे नामकरण Madras Hill करण्यात आले.

युद्धात जिंकून ताश्कन्द करारात मात्र आपण हरलो. हे सगळे पॉईंट्स आपण तहाच्या टेबलवर गमावले. जय जवान घोषणा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रींची त्यावेळी काय मनस्थिती झाली असेल? कधीतरी तहामागची कारणं उलगडतील एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. व या सर्व वीर जवानांबद्दल फक्त कृतज्ञता बाळगू शकतो.

brave warriors.jpgPiru Singh.jpgKaram Singh PVC.jpgPir Sahiba Spur.jpg

भाग ९: समारोप

Submitted by माझेमन on 5 April, 2025 - 01:15

काश्मीरविषयक चर्चेचा अवकाश आजमितीला पर्यटन आणि भूराजकीय परिस्थिती या दोनच विषयांनी पूर्णपणे व्यापलेला दिसतो. एक तर “हमीं अस्तो” नाही तर दहशतवाद. हौशी प्रवासी लेह, लडाख आणि कारगिल युद्धानंतर द्रासलाही जातात. पण काश्मीर आणि लडाखची जातकुळी एवढी वेगळी की आपण एकाच राज्याविषयी बोलतोय असं वाटत नसेल कुणाला.

अगदी श्रीनगरला शंकराचार्यांच्या मंदिरात गेल्यावरही तिथे जाताना कसं कडक चेकिंग आहे आणि तिथून अख्खं शहर कसं दिसतं यापलीकडचा विचार मी तरी केला नव्हता. सांगायला खरं तर लाज वाटते पण शंकराचार्यांचे मंदिर श्रीनगरमध्ये का आहे असा
प्रश्नही मला पडला नव्हता.

त्यामुळे शारदामंदिराविषयी माहिती करून घेताना 'अरे, हे तर आपल्याला माहीतच नव्हतं' हेच सतत मनात येत होतं. त्यामुळे
काश्मीरविषयी मिळेल ते पुस्तक आणि आर्टिकल हावऱ्यासारखं वाचण्याचा सपाटा लावला.

त्यातून मग पुराणकथांना (वराह मूल - बारामुल्लाची निर्मिती) भूगर्भीय हालचालीच्या पुराव्यांची मिळणारी जोड, जैन, बौद्ध, शैव, तिबेटी बॉन धर्मीय, पुढं रेषी (ऋषी) म्हणवून घेणारे सुफी संत या सर्वांची इथली सरमिसळ, सिल्क रूटमुळे मध्य पूर्व, मध्य आशिया, तिबेट, चीन, यूरोप पर्यंत निर्माण झालेले संबंध, तिबेटला मांडलिक करणारा, वायव्येला चित्रलपासून पश्चिमेला गुजरातपर्यंत व
पूर्वेला बंगालपर्यंत राज्य करणारा सम्राट असा अलिबाबाच्या गुहेतला खजिना समोर यायला लागला.

शेवटी एवढंच म्हणेन की भारताच्या नकाशातल्या काश्मीरच्या भौगोलिक स्थानापेक्षा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातलं
काश्मीरचं स्थान जास्त मोलाचं आहे. त्याची ही छोटीशी झलक आणि अर्थातच इदं न मम्|

महत्वाच्या लिंक्स:

सेव्ह शारदा समितीची वेबसाईट
E-PASS ऍप्लिकेशन साईट
शारदा लिपी कन्व्हर्टर

@अनिंद्य >>> सेव्ह शरद समितीच्या रवींद्र पंडितांनी सांगितले की या मंदिराची संकल्पना शृंगेरी मठाची आहे आणि ग्रॅनाईटचा वापर करण्याबद्दलही त्यांनीच सुचवले. बाकी मला स्थापत्य शास्त्रातली किंवा इन जनरल काश्मिरी वास्तुकलेतील काही समज नाही.

अफगाणीस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, उज़्बेकिस्तान इथे विखुरलेल्या एकूण ५० शक्तिपीठांना प्रत्यक्ष भेट दिल्याचे थरारक वर्णन वाचले होते.>>>
हे फारच इंटरेस्टिंग आहे. आठवलं तर जरूर शेअर करा. उज़्बेकिस्तानामध्ये शक्तीपीठ आहे हे ही मला माहिती नव्हते. अझरबैजानमध्ये fire temple आहे. ते एका बॉण्डपटात दाखवले होते. तिथे संस्कृत श्लोक का लेख आहे हे नंतर कळले.
पाकिस्तानातल्या हिंगलाज मातेचे देऊळ (शक्तीपीठ) एका पाकिस्तानी वलॉंगरच्या व्हिडिओत पाहिले होते. ते बलोचिस्तानात आहे.

ते अजरबैजान असावे, उझबेकचा उल्लेख माझ्या स्मृतीचा दोष असू शकेल,.

लिखित स्त्रोतांमधे शक्तिपीठांचा आकडा ५० ते १०८ असा बदलता दिसतो. सतीच्या शवाचे तुकडे विखरून पडले ते ते स्थान शक्तिपीठ.

एक संस्कृत भाषेतील १६ वर्ण व ३४ व्यंजने अशा ५० मातृकांचा काही संबंध आहे बहुतेक.

त्या ५० जागांची नावे असलेले अन्नदा मंगल नामक बंगाली काव्य प्रसिद्ध आहे. असो






















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...