Thursday, April 24, 2025

उत्सव पुरवणी बॅक अप

 https://www.saamana.com/article-by-aashutosh-bapat-on-shree-anjaneshwar-shivalay/
 
saamana.com

फिरस्ती- वागीनगेरा औरंजेबाची शेवटची लढाई!

सामना ऑनलाईन

>> प्रांजल वाघ

सुरपूर संस्थानाची एकेकाळची राजधानी वागीनगेरा! हिंदुस्थानच्या इतिहासात एका फार मोठय़ा घटनेचे साक्षीदार असणारे हे गाव. जिथली लढाई औरंगजेबाची शेवटची लढाई ठरली.

2017 सालच्या मार्च महिन्यात कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसमधून आम्ही एका छोटय़ाशा खेडय़ात उतरलो. घडय़ाळाचे काटे तीनच्या पुढे सरकू लागताच दुपारची उन्हं थोडी नरम पडू लागली. गावाबाहेरील चहाच्या टपरीजवळील चावडीवर पाठपिशव्या उतरवल्या आणि गावामागे असलेल्या तटबंदीयुक्त डोंगराकडे गेलो. वागीनगेरा! सुरपूर संस्थानाची एकेकाळची राजधानी. हे गाव कर्नाटकातील यादगिरी शहराच्या नैऋत्येस असून बसने यादगिरी-शहापूर-सुरपूर करत वागीनगेऱयाला पोहोचता येते. मराठय़ांच्या इतिहासात या गावाचा ‘वाकीनखेडा’ असाही उल्लेख आला आहे.

त्या गावात पोहोचलो, तेव्हा आमचे लक्ष्य होते फक्त इथला किल्ला पाहणे, पण हिंदुस्थानच्या इतिहासात हे गाव एका फार मोठय़ा घटनेचे साक्षीदार आहे याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. सन 1705 मध्ये बेडर नायक संस्थानाचा राजा पितांबर बहारी पिड नायक व मुघल यांच्यामध्ये इथे घमासान युद्ध झाले आणि या युद्धात मुघलांच्या बाजूने रणांगणात प्रत्यक्ष उतरला होता त्यांचा आलमगीर औरंगजेब. इतकंच नव्हे, तर ही लढाई औरंगजेबाची शेवटची लढाई ठरली!

पण ही सगळी माहिती आम्हाला फार नंतर कळली. त्या दिवशी किल्ल्याच्या पायऱया चढता चढता असे लक्षात आले की, उजवीकडे एक सरोवर आहे आणि त्या सरोवरापलीकडे एका छोटय़ा टेकडीवर आणखी एक किल्ला उभा आहे. या छोटय़ा किल्ल्याचे नाव आहे ‘होसकिल्ला’ म्हणजे ‘नवा किल्ला’ आणि वागीनगेऱयाच्या मुख्य किल्ल्याचे नाव ‘पदुकोट!’ पदुकोट किल्ल्याच्या पायऱया काटकोनात वळल्या आणि आम्ही महाद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला.

विजयनगर साम्राज्यातर्फे लढणारे बेडर नायक हे पुढे आदिलशाहीचे मांडलिक झाले. भीमा-कृष्णा नद्यांच्या दोआबातील प्रदेश जहागीर म्हणून आदिलशहाने त्यांना दिली. पहिल्या पिड नायक राजाने करशीहळ्ळी येथील डोंगरावर एक किल्ला बांधला आणि त्याला नाव दिलं वागीनगेरा – म्हणजे ब्रह्माचा डोंगर. इथून पुढे 1705 पर्यंत वागीनगेरा किल्ला सुरपूर संस्थानाची राजधानी राहिला.

किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक सुंदर सभामंडप आमच्या नजरेस पडला. तिथून थोडं पुढे गेल्यावर एक नैसर्गिक दगडी ‘बुरूज’ समोर उभा ठाकतो. या बुरुजावर तटबंदीचे अवशेष आहेत आणि पायथ्याला छोटय़ा भुयारात वेणुगोपाल मंदिर! थोडं आणखी पुढे चालत आलो आणि नजरेस पडलं ते एक अर्धवट बांधलेलं मंदिर जे औरंगजेबाच्या सैन्याने उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आहे.

किल्ल्यात शिरल्यावर उजवीकडे पायऱया असलेली एक मोठी बारव आहे. किल्ल्याच्या वरच्या भागात ही बारव आणि गावाकडच्या खालच्या किल्ल्यात दुसरी एक मोठी विहीर आहे. किल्ल्यातील हे दोन मोठे पाण्याचे स्रोत. इथून तटबंदी वरुन आम्ही पुढे चालत गेलो आणि वरच्या किल्ल्याला खालच्या किल्ल्याशी जोडणारा आणखी एक मोठा दरवाजा लागतो. या दरवाजावर एक फार्सा शिलालेख आहे. 1705 मध्ये किल्ला जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने हा शिलालेख इथे कोरून ठेवलाय!

1686 मध्ये आदिलशाही खालसा केल्यावर सुरपूर संस्थानाचे राजे असलेल्या नायकांवर वाईट दिवस आले. त्यांचं छोटेखानी संस्थान मुघल सरकारात जमा करावे लागले आणि एक साधा पंचहजारी मनसबदार म्हणून राहावे लागले. या असंतोषाचा स्फोट 1688 मध्ये नायकाच्या मृत्यूनंतर झाला. हातातून गेलेले किल्ले मुघलांकडून हिसकावून घेतले आणि वागीनगेरा किल्ल्यावर नायकांची राजधानी पुन्हा वसवली.

आता औरंगजेबाची पादृष्टी वागीनगेऱयावर पडली! नऊ हजार नायकांच्या सैन्यावर 40 हजार मुघल सैन्याने हल्ले सुरू केले आणि किल्ल्याला वेढा दिला. छोटेखानी होसकिल्ला जिंकून घेतला आणि मग अंतिम संघर्षाची सुरुवात झाली. 87 वर्षांचा खासा आलमगीर आपल्या घोडय़ावर बसून तोफखान्याजवळ रणांगणावर उभा राहिला. मुघली तोफा किल्ल्यावर आग ओकू लागल्या. एक दंतकथा सांगितली जाते की, मुघलांच्या एका हल्ल्यास नायकांनी इतका जोरदार विरोध केला की, किल्ल्याची भिंत आणि तिथली जमीन मुघलांच्या रक्ताने लाल झाली आणि त्या भागास ‘लालगढ’ म्हटले जाऊ लागले, पण औरंगजेबाने पदुकोटाचा खालचा भाग जिंकून घेतल्यावर पो उलटी फिरू लागली. जवळच असलेल्या मराठय़ांचे सरसेनापती धनाजी जाधव यांनी पिड नायकाला संदेश पाठवला – ‘मुघलांना किल्ला देऊन टाका आणि आमच्या सैन्यास येऊन मिळा! किल्ला परत घेता येईल!’ पिड नायकाने मराठय़ांचा सल्ला मानला. रातोरात किल्ला रिकामा करून नायक निसटले.

औरंगजेब मरण पावल्यावर पिड नायकाने मराठय़ांची रणनीती अवलंबून गुपचूप पुन्हा वागीनगेरा किल्ला जिंकून घेतला आणि आलमगीरचा शेवटचा विजय फोल ठरवला. पुढे त्याने सुरपूरला नवीन राजधानी वसवून 1858 पर्यंत नायकांचे राज्य तिथे राहिले.

वागीनगेरा, सुरपूर आणि तिथे असलेल्या अनेक वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकदा वेळ काढून नक्की भेट द्या!

 

सृजन संवाद – सीतेने सांगितलेली गोष्ट

सामना ऑनलाईन

>> डॉ. समिरा गुजर-जोशी

वाल्मीकी रामायणातील सीता नेमकी कशी आहे असे कुतूहल अनेकांना वाटते. आज या पूर्ण प्रश्नाचा वेध घ्यायचा नसला तरी श्रीराम आणि सीता यांच्यामधील असा एक संवाद आपण पाहणार आहोत, ज्यामुळे वाल्मीकी रामायणातील सीता समजून घेणे आपल्याला सोपे जावे. सीता ही अतिशय हुशार, स्वतची प्रज्ञा असणारी विदुषी आहे. कोणत्याही परिस्थितीत ती विवेकाने विचार करणे सोडत नाही. ती फार मुद्देसूद बोलू शकते. किंबहुना ती उत्तम वक्ता आहे. तिचे म्हणणे सौम्य शब्दात पण ठामपणे मांडणे तिला अवगत आहे. हे खरे तर फार दुर्मिळ कौशल्य आहे. सहसा आपले म्हणणे पटवून देताना लोक आरडाओरडा करतात, समोरच्याला दोष देतात, माझे तेच खरे असे ठासून सांगतात. सीता मात्र आपले संतुलन ढळू देत नाही. अरण्यकांडातील या प्रसंगातही तिला रामाच्या वागण्यावर बोट ठेवायचे आहे. त्याचा एक निर्णय तिला पटलेला नाही. त्याने त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे तिला मनापासून वाटते आहे. अशावेळी पती-पत्नीच्या नात्यात सहज तणाव निर्माण होऊ शकतो. पण अशी नाजुक परिस्थिती ज्या प्रगल्भतेने सीतेने हाताळली आहे यातून खूप शिकण्यासारखे आहे. आधी हा संवाद का घडला हे समजून घेऊ.

श्रीरामांनी त्यांना वनवासात भेटलेल्या ऋषींना असे वचन दिले की, तपस्वी ऋषींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा मी युद्धात निपात करेन. रामांनी ही प्रतिज्ञा केल्यानंतर सीतेला राहावले नाही. ती अतिशय नम्रपणे पण ठामपणे त्यांच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तिचे म्हणणे आहे की, सूक्ष्मदृष्टय़ा पाहिले तर आपल्या हातून हा राक्षसांचा बंदोबस्त करण्याचा जो निर्णय आहे तो वस्तुत अधर्म घडविणारा आहे. कोणीही सुज्ञाने ‘कामज’ अर्थात काम म्हणजेच मोहातून उद्भवणाऱ्या संकटांपासून दूर राहावयास हवे. (संस्कृतमध्ये संकटाला समानार्थी शब्द व्यसन असा आहे. एखाद्याला एखादे व्यसन असणे हे संकटच आहे. म्हणजे मराठीत तो काहीसा संकुचित अर्थाने रूढ झाला आहे असे म्हणूया.) तर, अशी कामातून संभवणारी व्यसने किंवा संकटे कोणती? सीतेने ती नेमकी सांगितली आहेत की, जेव्हा एखादी व्यक्ती मोहवश असते तेव्हा ती एक तर खोटे बोलते, दुसरे म्हणजे परस्त्राrचा मोह ठेवते किंवा तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अकारण कोणाशी वैर स्वीकारते. यापैकी काहीही घडले तरी त्या व्यक्तीची अधोगती होणार हे निश्चित!

मोह म्हणजे एकप्रकारची धुंदीच म्हणा ना. अशा धुंदीत राहून वरील तीनही चुका करणाऱ्यांची उदाहरणे आपल्या अवतीभवती किती तरी पाहावयास मिळतील. सीता म्हणते, रामा तू सत्यवचनी आणि एकपत्नी व्रत पाळणारा असल्यामुळे पहिल्या दोन गोष्टी तुझ्या हातून घडणार नाहीत हे मला खात्रीशीररीत्या ठाऊक आहे. तू खोटे बोलणार नाहीस किंवा तुला परस्त्राrचा मोह होणार नाही. मला भीती आहे ती तिसऱ्या कामज संकटाची. एखाद्याशी कारण नसताना वैर घेण्यात शहाणपणा तरी कोणता? ज्याने आपले वैयक्तिक नुकसान केले आहे त्याच्याशी आपण स्वाभाविकपणे शत्रुत्व पत्करतो, पण ऋषीमुनींच्या सांगण्यावरून तुम्ही राक्षसांशी युद्ध करावे हे कितपत योग्य आहे? राक्षसांनी आपले नुकसान केलेले नसताना आपण त्यांच्याशी का लढायचे? ‘विना वैरं च रुद्रता’ – ही संयुक्तिक नाही असे तिचे मत आहे. राक्षसांना ठार मारायला तिचा विरोध का हे कदाचित चटकन आपल्या लक्षात येत नाही. याचे स्पष्टीकरण माधवराव चितळे यांनी आजच्या काळातील उदाहरण देऊन दिले आहे. ते म्हणतात, आजच्या काळातही आतंकवादाने आपल्याला वेढलेले असताना सैनिकाशेजारी उभी असणारी व्यक्तीदेखील आतंकवादी आहे की नाही हे ओळखणे इतके सोपे नाही. मग राम तरी राक्षस ओळखणार कसा? कारण ते बहुधा सर्वसामान्य रूपात फिरतात. (शूर्पणखा ही राम-लक्ष्मणांना सुंदर वेषात भेटली होती.) तिचा विरोध सरसकट सगळे राक्षस मारेन या प्रतिज्ञेला आहे.

तिच्या आक्षेपाचा हा प्रसंग वरवर पाहता फारसा महत्त्वाचा वाटत नाही, पण तो नीट समजून घेतला तर रामायणात अरण्यकांडाचे महत्त्व काय आहे हेही ध्यानात येते. वाल्मीकींनी किती सहजपणे हा संवाद सीतेकरवी घडवून आणला आहे. हा संवाद ते लक्ष्मणाकरवी पण घडवू शकले असते, पण ते तसे करत नाहीत. राक्षसकुळाचा कारण नसताना संहार करू नका असे ज्या सीतेचे म्हणणे आहे त्याच सीतेचे अपहरण होते आणि हा संहार घडण्याचे कारण निर्माण होते. यासाठी अरण्यकांड अतिशय महत्त्वाचे कांड ठरते. सीतेचा विरोध केवळ स्त्राrसुलभ काळजीतून आलेला नाही, तर ती काही महत्त्वाचे मुद्दे मांडते. तुम्ही जरी शस्त्रधारी योद्धा आहात आणि अडचणीत असणाऱ्यांचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य असले तरी आज आपण वनवासी आहोत. अशा वेळी आपण वनात तापस वृत्तीने राहावे की शस्त्र धारण करावे हाच मुळात तिला पडलेला प्रश्न आहे. वनात प्रवेश करताना राजाने शस्त्र खाली ठेवावे असा संकेत होता. त्यामुळे तिला हा प्रश्न पडला आहे. शस्त्र धारण करणे हे आग जवळ बाळगण्यासारखे आहे.

याचसंदर्भात तिने एका ऋषींची गोष्ट सांगितली आहे. आज अमेरिकेत नागरिकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार आहे. त्याचे  अनेकदा गंभीर दुष्परिणाम बघायला मिळतात. त्यादृष्टीने सीतेने सांगितलेली गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. ती गोष्ट कोणती आणि सीतेच्या प्रश्नाला रामाने काय उत्तर दिले ते पुढील लेखात पाहू.

samira.gujar@yahoo.com

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)

 

पाऊलखुणा : बारा गावांचा देव श्रीअंजनेश्वर मीठगवाणे

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

कोकणच्या अगदी आत खोलवर वसलेले एक सुंदर शिवालय म्हणजे मीठगवाणे इथले श्रीअंजनेश्वर शिवालय. राजापूर परिसरात भटकताना अंजनेश्वराचे दर्शन घेणे ाढमप्राप्त आहे. इथली कमालीची शांतता अनुभवावी. इथला निसर्ग डोळे भरून बघून घ्यावा. आपली भटकंती समृद्ध व्हावी.

निसर्गरम्य कोकणात जितके अंतर्गत भागात हिंडायला लागू तेवढा निसर्गात दडलेला एकेक खजिना उघड होत जातो. धाऊलवल्ली, तुरवडे अशा निवांत सुंदर ठिकाणांसारखे अजून एक सुंदर शिवालय कोकणच्या अगदी आत खोलवर वसले आहे ते म्हणजे मीठगवाणे इथले श्रीअंजनेश्वर शिवालय. पूर्वी या ठिकाणी मिठागरे होती म्हणून याचे नाव झाले ‘मीठगवाणे!’ इथला निसर्ग बघून अक्षरश वेड लागायचं बाकी असतं. इतक्या सुंदर ठिकाणाशी एखादी छान दंतकथा जोडलेली असली तर त्या स्थानाचा गोडवा अजून वाढतो. इथे असंच आहे. फार पूर्वी या ठिकाणी अंजनाची किंवा अंजणीची झाडे होती. या अंजणीच्या वनात वसला आहे तो ‘अंजनेश्वर’. सुमारे सातशे-आठशे वर्षांपूर्वीची ही कथा. आज शंकराची पिंडी असलेल्या जागेभोवती ‘आंजणी’ नावाच्या वृक्षांचे रान होते. त्या रानात दररोज एक गाय येऊन पिंडी असलेल्या जागी दुधाची धार सोडत असे. हे स्थानिक लोकांच्या ध्यानात येऊन तेथे पाहता एक शंकराची पिंडी आढळली.

त्याच सुमारास जवळच असलेल्या साखर नावाच्या गावातील गोखले कुटुंबात चार सख्खे भाऊ नांदत होते. काही गुंडांच्या हल्ल्यात चारही भाऊ मारले गेले. तीन भावांच्या बायका सती गेल्या. चौथ्या भावाची बायको गर्भवती होती. तिला मीठगवाणे इथल्या गावकऱयांनी थारा दिला. उत्पन्नासाठी थोडी जमीन दिली व देवस्थानची व्यवस्था सांगितली. त्या स्त्राrला पुढे मुलगा झाला. त्याने वरील जागेवर एक लहान घुमटीवजा देऊळ बांधले. गावकरी त्या शंकराच्या पिंडीची पूजाअर्चा करू लागले आणि देवाला ‘श्रीदेव अंजनेश्वर’ म्हणू लागले.

या ठिकाणाशी अजून एक कथा निगडित आहे. मीठगवाणेजवळ समुद्राचा भाग आतमध्ये आला आहे. या ठिकाणी पूर्वीपासून गलबतातून व्यापार चाले. एका मलबारी व्यापाऱयाचे गलबत वादळात सापडले ते नेमके याच ठिकाणी. त्या गलबतावरील व्यापाऱयाने किनाऱयावरील अज्ञात देवाची करूणा भाकली. वादळातून माझे जहाज सुखरूप बाहेर पडू दे. मी इथल्या देवाचे सुंदर मंदिर बांधेन. वादळ शमले आणि मलबारी व्यापाऱयाचे जहाज सुखरूप बाहेर निघाले. मग त्या व्यापाऱयाने त्या लहान घुमटीचे देवालयात रूपांतर केले. या देवळाच्या बांधकामासाठी लागलेले लाकूड सामान व कारागीर खास मलबारहून आणले होते, असे सांगितले जाते.
उत्तरेला जैतापूरची खाडी आणि दक्षिणेला विजयदुर्गाची खाडी याच्यामध्ये मीठगवाणे गाव वसले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराचा प्राकार विस्तीर्ण आहे. आपण इथे आल्यावर आपले स्वागत या देवळाच्या सुंदर अशा नगारखाना असलेल्या प्रवेशद्वाराने होते. हे देऊळ पश्चिमाभिमुख आहे. गाभारा, अंतराळ, सभागृह अशी रचना आहे. मंदिराचे बांधकाम जांभ्या दगडात केलेलं असून प्राकारात एक विहीर आहे. प्राकार दगडी भिंतीने बंदिस्त आहे. खाली उतरल्यावर आवारात पाच दीपमाळा दिसतात. या दीपमाळा सगळ्या मंदिर परिसराची शोभा वाढवतात.

मंदिरात प्रवेश केल्यावर इथली लक्षवेधक गोष्ट म्हणजे सभामंडपातील खांबांवर केलेले अप्रतिम कोरीवकाम. निरनिराळी काष्ठशिल्पे इथल्या खांबांवर कोरलेली आहेत. ज्यात कृष्ण, ब्रह्मदेव अशा शिल्पांची नजाकत अफलातून आहे, पण यापेक्षा इथल्या काष्ठशिल्पात महत्त्वाचं काय असेल तर ‘सदाशिवाचे’ शिल्प. देवाला पाच मुखे असून समोरच्या मुखाच्या डोक्यावर तिसरा डोळा दाखवला आहे. डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. शिवाचे सदाशिव हे रूप सहसा कुठे दिसत नाही. मुंबईजवळच्या घारापुरी लेणीत सदाशिवाची भव्यदिव्य मूर्ती आहे, पण कोकणातल्या या आडगावात सदाशिवाची मूर्ती असणं ही कमालीची आश्चर्यकारक बाब आहे. अशी शिवमूर्ती पाशुपत संप्रदायाशी निगडीत असते, असा अभ्यास आहे. या संप्रदायीची उपासनस्थळे आणि त्याचे महत्त्व याबाबत आपण पुढच्या भागात जाणून घेऊया.

(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)

 

अनवट काही- तंजावर संस्थान आणि मराठी सहसंबंध

सामना ऑनलाईन

>> अशोक बेंडखळे

दक्षिणेकडील तमिळनाडूमधील तंजावर प्रांतात मराठय़ांनी राज्य केले आणि तिथे राजवाडय़ात सरस्वती महाल ग्रंथालय असून त्यात अनेक ग्रंथ-हस्तलिखिते आहेत. एवढे आपल्याला माहीत असते, पण तिथल्या राजांविषयी वा एकूण राज्यकारभाराविषयी खूप कमी माहिती असते. विनायक सदाशिव वाकसकर लिखित आणि दामोदर सावळाराम आणि कंपनीने प्रकाशित केलेले (सन 1933) ‘तंजावरचे मराठे राजे’ या पुस्तकाने ही उणीव काही प्रमाणात भरून काढलेली आहे. बडोद्याचे महाराज विद्याभिलाषी सयाजीराव गायकवाड यांच्या देणगीतून हे पुस्तक प्रकाशित झाले हे नमूद करायला हवे.

शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशहाच्या पदरी सरदार होते. शहाजीराजांना दोन पुत्र शिवाजी जिजाबाईंच्या पोटी तर व्यंकोजी दुसरी पत्नी उमाबाईंच्या उदरी जन्मास आले. या व्यंकोजीने तंजावरला मराठी राज्य स्थापन केले (1676). त्यापूर्वी तंजावरला चौल आणि नायक राजांनी अनेक वर्षे राज्य केले होते. शहाजींचा हा मुलगा व्यंकोजी भोसले बंगलोरचा जहागीरदार होता. तंजावरच्या अलगिरी नायकांची हकालपट्टी करण्याची जबाबदारी आदिलशहाने व्यंकोजीवर सोपवली. व्यंकोजीने युद्ध करून नायकाच्या ताब्यातून तंजावरची मुक्तता केली. त्याच वेळी तंजावरच्या लोकांमध्ये यादवी झाली आणि त्यांनी व्यंकोजीला (म्हणजे मराठय़ांना) राज्य हस्तगत करण्यास सांगितले. अशा प्रकारे व्यंकोजीकडे तंजावरचे राज्य आले. खरे म्हणजे निराळी भाषा जाणणारे लोक राज्यावर अधिष्ठीत झाले होते. मात्र या नवीन राजांनी तंजावर हे आपलेच घर आहे असे समजून तिथे राज्यकारभार हाकला आणि प्रजासंरक्षणाची परंपरा चालविणे, धर्मासंबंधी कार्याचा पुरस्कार करणे, कला व शिक्षणाला उत्तेजन देणे ही सत्कृत्ये त्यांनी सतत व अखंड चालवली म्हणून मराठी राज्ये तिथे पुढील काही काळ बस्तान बसवू शकले.

व्यंकोजीच्या कारकिर्दीतील रोमांचकारी धामधुमीचा प्रसंग म्हणजे शिवाजीराजांनी व्यंकोजीवर व कर्नाटकवर केलेली स्वारी होय (1676-77). राजांच्या सैन्याने जिंजी व काही प्रांत काबीज केला. राजांची व व्यंकोजीची भेटही झाली; पण ती निष्फळ ठरली. पुढे मोगलांची स्वारी आपल्या राज्यावर होईल अशी शंका येऊन शिवाजी राजे रायगडावर परत आले. त्यांच्यात एक तह झाला आणि वार्षिक खंडणी देण्याचे व्यंकोजीने मान्य केले. शिवाजी राजांच्या मृत्यूपर्यंत (1680) ही खंडणी तंजावरहून येत होती. पुढे बंद झाली आणि सातारकर भोसले व तंजावरचे भोसले यांचा संबंध राहिला नाही.

व्यंकोजी राजा 1683मध्ये निवर्तला आणि त्याचा वडीलपुत्र राजा शहाजी तंजावरचा दुसरा राजा गादीवर आला (1684-1712). शहाजीच्या मृत्यूनंतर सरभोजी व तुकोजी राज्यव्यवस्था पाहत. सरभोजीनंतर तुकोजी हा राज्याचा एकटा धनी झाला. त्याने (1728-1736) असे राज्य केले. तुकोजीला प्रताप नावाचा पुत्र होता. तंजावरच्या लोकप्रिय व प्रसिद्ध राजाच्या नामावलीत हा शेवटचा राजा ठरतो (1739-1763). त्यानंतर तुळजाजी (1763-1787), अमर सिंग (1787-1798), दुसरा सरभोजी (1798-1833) आणि शिवाजी (1833-1855) यांनी राज्य केले. पण प्रभावी ठरले नाहीत. शेवटी ब्रिटिशांनी हे राज्य खालसा केले आणि तंजावर संस्थानावर राज्य करीत असलेली मराठी सत्ता नष्ट झाली.

खरे म्हणजे शिवाजी राजांनी कर्नाटकवर स्वारी केली ती व्यंकोजीला मदत करून कर्नाटकात भगवा झेंडा फडकवावा या हेतूने. मात्र व्यंकोजीने बंधू शिवाजीचे सामर्थ्य ओळखले नसावे आणि त्यांनी राजांची मदत नाकारली असे दिसते. एकूणच तंजावरच्या बाहेर जाणे, ते वाढवणे, लष्करी सामर्थ्याची वृद्धी करणे हे प्रकार व्यंकोजीने वा नंतरच्या मराठी राजांनी केले नाहीत. व्यंकोजीने शिवाजी राजांना हात दिला असता तर कदाचित दक्षिणेकडे मराठी राज्य विस्तारले असते. व्यंकोजीनंतर तंजावरचे राजे इतके निक्रिय व सामर्थ्यहीन होते की, इंग्रजांना तंजावर संस्थान बिनखर्चाने मिळाले असे म्हटले जाते.

आता तंजावरच्या काही चांगल्या बाबी – संस्थानात न्यायदान व्यवस्थित होते. सरकारी पुस्तकालयाशिवाय खाजगी पुस्तकालये होती. येथील राजे विनोद, वाङ्मय, वाद्य, नृत्य, रंगकाम, धातू व लाकूड यावरील नक्षीकाम, रेशीम विणण्याची कला आदींना आश्रय देत असत.  यावरून आर्थिक स्थिती ठीक असावी. चोल राजापासून ते मराठे राजापर्यंत हे संस्थान हिंदू राज्याखाली होते. या राजांनी प्राचीन संस्कृती व त्या संस्कृतीची ओळख अशी मंदिरे ही यवन अथवा ख्रिस्ती यांच्या आक्रमणापासून वेगळी ठेवून त्यांचे संरक्षण केले. प्रतापसिंह या मराठय़ांच्या राजाची उपपत्नी मुद्दुपल्लानी ही प्रसिद्ध नायकीण होती. तिने ‘राधिकासन्तवनम्’ नावाचे काव्य रचले आहे.

एकूण राजे अल्पसंतुष्ट असतील, त्यांच्याकडे दूरदृष्टी नसेल तर ते राज्य लयास जाण्यास वेळ लागत नाही. तंजावर त्याचे उदाहरण आहे. काही काळ तंजावरला मराठे राजे राज्य करीत होते असे म्हणून आपण समाधान करू शकतो.

ashok.bendkhale@gmail.com

 

वारसावैभव – महेश्वरच्या अहिल्याबाई!

सामना ऑनलाईन

>> सर्वेश फडणवीस

महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला. आजही महेश्वरच्या कणाकणात अहिल्याबाईंचा वास आहे हे सतत जाणवतं.

होळकर घरातल्या तिन्ही पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे अहिल्याबाईंना आता इंदूरला होळकर वाडय़ात राहणे नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी नवीन राजधानीचा शोध सुरू केला. नेमाडमध्ये नर्मदेच्या काठी पुराणात ज्याचे वर्णन मर्दाना या नावाने आले आहे. ते स्थान त्यांच्या पसंतीस उतरले. परंतु ज्योतिषी मंडळीचे म्हणणे पडले की, हे स्थान राजधानीसाठी योग्य नाही. त्या पुढे निघाल्या. नर्मदेकाठचे महेश्वर हे गाव पाहताच त्या हरखून गेल्या. नर्मदा नदीचे केवढे रुंद पात्र, दाट झाडी, भुईकोट किल्ला आणि मल्हारराव होळकरांनीच काही वर्षांपूर्वी महेश्वर वसविले होते. ज्योतिषी, ब्राह्मण इत्यादींना विचारणा करून त्यांनी तेच स्थान राजधानीसाठी सुनिश्चित केले.

प्राचीन साहित्यात महेश्वरचा उल्लेख माहिष्मती म्हणून आहे. रामायण, महाभारत, पुराणे, बौद्ध धर्मग्रंथ आणि सुप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनात सर्वत्र या नगरीचा उल्लेख होता. हरिवंशात म्हटले होते, महिष्मान नावाच्या राजाने या नगरीची उभारणी केली. पुराणातील प्रसिद्ध राजा सहस्रार्जुन याने ज्या अनुप देशावर राज्य केले, त्या अनुप देशाची राजधानी हीच होती. या नगरीस ‘सहस्रबाहू की वस्ती’ असेही संबोधले जात असे. वाल्मीकी रामायणात म्हटले होते की, लंकापती रावण सहस्रबाहुच्या राजधानीत आला असता त्याने आपल्या बाहुबळाने नर्मदेचा प्रवाह कोंडून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या बाहूतून निसटून नर्मदेचा प्रवाह सहस्रधारांनी बाहेर पडला आणि वाहू लागला. कालिदासाने रघुवंशात माहिष्मती व नर्मदा यांचा उल्लेख केला आहे. जगद्गुरू शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा विख्यात शास्त्रार्थ याच नगरीत झाला होता. मंडनमिश्रांची पत्नी या वादात न्यायाधीश होती. पौराणिक काळाप्रमाणे ऐतिहासिक काळात हे नगर महत्त्वाचे होते. सुप्रसिद्ध हैहय वंशी राजांचे राज्य येथेच होते. चालुक्य परंपरांच्या काळातही महेश्वर ही एक प्रसिद्ध नगरी होती. नंतर मांडूच्या सुलतानांनी ती जिंकून घेतली. इ.स. 1422 मध्ये ती गुजरातच्या सुलतान अहमदशहाने तत्कालीन हुशंगाबादकडून अर्थात आताचे नर्मदापुरम जिंकली. अकबराच्या काळातही महेश्वर हे एक प्रसिद्ध स्थान होते. यातील बराचसा इतिहास अहिल्याबाईंना माहिती होता.

इ.स. 1730 च्या सुमारास मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर आपल्या अधिपत्याखाली आणले. या नगरीचे महत्त्व जाणून मल्हाररावांनी 1745 मध्ये एक राजाज्ञा काढून महेश्वर नगरी उत्तम प्रकारे वसविण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करण्याची द्वाही फिरवली. महेश्वरची परंपरा अहिल्याबाईंच्या प्रकृतीला भावणारी होती. किंबहुना त्यांच्या अंतःप्रेरणेला या नगरीने साद घातली होती. शिवाय त्यांची राज्य कारभार करणारी व्यवहारी वस्तुनिष्ठ नजर त्यांना सांगत होती, येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. राज्य कारभारासाठी सुरक्षित. होळकरांच्या वारसाचा प्रश्न अजून निकालात निघालेला नव्हता. परंतु अहिल्याबाईंनी महेश्वर हे गाव स्वतःला राहण्यासाठी म्हणून निश्चित केले. किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्ल्याच्या आत एक साधाच वाडा बांधला गेला. मालेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वर किल्ल्याच्या आत राहू लागल्या. तेथून नर्मदेचे दर्शन स्पष्टपणे घडत होते. घरात राजदरबाराचीही जागा होती. येथेच प्रमुख कारभाऱयांसमवेत अहिल्याबाईंचा दरबार भरू लागला. त्या पांढऱया घोंगडीवर बसत असत. या घराच्या एका भागात एक मंदिर होते. त्यात शिवलिंगे होती. इतर देवदेवतांच्या मूर्तीही होत्या. याच ठिकाणी अहिल्याबाई नेहमी पूजा करत असत. अहिल्याबाई कायमच्या महेश्वर-निवासिनी झाल्या. मग मंदिरांच्या अंगणांतून होमहवनांचा पवित्र धूर भोवताली पसरू लागला. ग्रंथपठणाचे, मंत्रजागराचे गंभीर स्वर वातावरणात घुमू लागले. भजन-कीर्तनाचा आणि टाळ-मृदंगाचा घोष नर्मदेच्या तटावर सतत निनादत होता.

महेश्वरहून अहिल्याबाई राज्य कारभार पाहू लागल्या. होळकर म्हणजे शिंदे आणि पेशव्यांचे दोन नेत्रच असे म्हटले जात होते. अहिल्याबाई सत्तेवर आल्या तेव्हा, घरातील कुटुंबात जवळची रक्ताच्या नात्याची माणसे बोटांवर मोजण्याइतकीच होती. अहिल्याबाईंनी ज्या क्षणी महेश्वर दरबारात कार्य हाती घेतले त्यावेळी देवा-ब्राह्मणांसमक्ष पत्र ठेवले आणि मनोमनी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा महेश्वरच्या वाडय़ावर आजही लिहिलेली आहे.

“माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत जबाबदार आहे.
सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
परमेश्वराने ज्या जबाबदाऱया माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.”

महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला. आजही महेश्वरच्या कणाकणात अहिल्याबाईंचा वास आहे हे सतत जाणवतं. कितीदा अनुभवले महेश्वर, पण ही भावना मनात आजही कायम आहे. स्त्राr पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले आणि म्हणून समृद्ध अशी महेश्वरची नर्मदा आजही पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या अस्तित्वाची जाणीव करून देते आहे. एकदा तरी या स्थानाची ऊर्जा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासारखी आहे.

fadnavis.sarvesh@gmail.com

 

सीतास्वरुपा – सर्वगुणसंपन्न सीता

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

सीतामाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना अनेक प्रश्नांची उत्तरे या कथेमार्फत आपल्याला मिळताना दिसतात. गुणवर्णन ऐकताना आपण त्या गुणांना स्वतमध्ये आकर्षित करतो. सीतामाईचे हे विविध पैलू मीनाक्षी म्हणजेच लेखिका डेना मॅरिअम, ज्या पूर्वजन्मी सीतामाईच्या दासी होत्या, त्यांच्याकडून जाणून घेत आहोत.

आपण पाहिलं की, सीतामाईचा जन्म संपूर्ण पृथ्वीसाठी झाला. जनकबाबा आणि सुनयना मातेची ती लाडकी लेक होतीच. पण सर्व मिथिलावासीही तिच्यावर खूप प्रेम करत होते. कारणही तसेच होते. सीतामाईचा पायगुणच चांगला होता. मिथिलेतील दुष्काळ संपला होता. अन्नधान्याची कमतरता नव्हती. सर्वत्र सुखसमृद्धी भरून वाहत होती. राजवाडय़ात तर सगळे सतत सीतामाईच्या अवतीभवती राहण्याचा प्रयत्न करायचे. एक गंमत होती की, या लहान बाळाची प्रभाव इतका विलक्षण होता की सर्वजण तिला सीतामाई म्हणूनच हाक मारायचे. बाळ इतके अद्भुत होते की जे जनकबाबा जंगलात ऋषी मुनींच्या सहवासात त्यांचा वेळ जास्त घालवायचे ते आता बाळ घरी आल्यापासून एक वर्ष कुठे बाहेरच गेले नाहीत. अर्थात जगन्माता नारायणीच्या बाळलीला बघण्याचे सौख्य कोणी का सोडेल?

पण जेव्हा सीतामाई एक वर्षाची झाली, तेव्हा मात्र एक दिवस जनकबाबा जंगलात ऋषींच्या आश्रमात जायला निघाले. सीतामाईने त्यांच्या पायाला मिठी मारली व नंतर आपले दोन्ही हात उंचावून मला पण घेऊन चला असे म्हणू लागली.

सुनयना मातेला इतक्या लहान मुलीला जंगलात जाऊ द्यावे हे काही बरोबर वाटेना. सीतामाईचे मन दुखवायला नको असे बाबांनी समजावले. जेव्हापासून सीतामाई राजवाडय़ात आल्या तेव्हापासून बाबांनी मीनाक्षीला सीतामाईची देखभाल करण्याचे काम दिले. त्यामुळे जनकबाबा आणि सीतामाईसोबत मीनाक्षीदेखील जंगलात गेली.

जनक महाराज ऋषींबरोबर विचारविनियम करत एका कुटीमध्ये होते. तर एक वर्षाच्या सीतामाईंना सांभाळत मीनाक्षी दुसऱया कुटीमध्ये होती. मीनाक्षीला मध्येच डोळा लागला. उठल्यावर बघते तर सीतामाई तिथे नव्हत्या. ती धावत हे जनकबाबांना सांगायला गेली तर तिथे तिने पाहिले की जनकबाबांच्या शेजारी जमिनीवर सीतामाई झोपून गेली आहे. जनकबाबा म्हणाले की, ती स्वत चालत इथे आली आणि माझ्या व ऋषींच्या चर्चा ऐकत झोपून गेली. एक वर्षाचे बाळ पण किती शांतपणे चर्चा ऐकत होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते, कारण ती प्रत्यक्ष नारायणी होती. केवळ पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी तिने मानवी जन्म घेतला होता.

जेव्हा जेव्हा जनकबाबा जंगलात जायचे तेव्हा तेव्हा सीतामाई त्यांच्याबरोबर जायच्या. एकदा अशाच सीतामाई 2-3 वर्षांच्या असताना जंगलात गेल्या असताना त्या एका झाडाकडे बोट दाखवून जनकबाबांना काही सांगू पाहात होत्या. जनकबाबांना समजेना, पण जवळ जाऊन बघितले तर एक पिल्लू जखमी अवस्थेत पडले होते. सीतामाईने त्याला उचलून घेतले. सीतामाईला प्रकृतीमधील प्रत्येकाचे दुःख जाणवायचे व ते दुःख दूर करायला त्या धडपड करायच्या.

आजकाल आपण आत्मकेंद्री बनत चाललो आहोत. ही अशी संवेदनशीलता आपल्यात नाही तर आपण लहान मुलांना काय शिकवणार? लहानपणापासून सीतामाई ध्यान करायच्या. खूप आनंद झाला असेल तरी ध्यान. दुःख झाले तरी ध्यान. ध्यान करून त्या प्रकृतीशी सतत कनेक्ट करायच्या. ही गोष्ट आज खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने रोज सुरुवातीला किमान 10 मिनिटे जरी मेडिटेशन करायला हवे. मानसिक शक्तीचा विकास केवळ ध्यानाने होतो.

एकदा अशीच सीतामाई मीनाक्षीबरोबर जंगलात गेली होती. पण आश्रमात न जाता ती जंगलाकडे पळत गेली. पाठोपाठ मीनाक्षी तर होतीच. ती एका पक्ष्यांच्या थव्याजवळ गेली. त्यांच्याशी बोलू लागली. बोलून झाल्यावर पुन्हा जंगलात गेली. तिथून तिने औषधी वनस्पती आणली. जनकबाबांनी त्याबद्दल विचारताच ती म्हणाली की, आश्रमातल्या एका ऋषींचे पोट खूप दुखत होते. म्हणून ती औषधी वनस्पती आणायला जंगलात गेली. त्याची माहिती पक्ष्यांनी तिला दिली. ज्या ऋषीचे पोट दुखत होते त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. कारण त्यांचे पोट दोन दिवसांपासून दुखत होते आणि त्यांनी कोणीलाही ते सांगितले नव्हते.

जनकबाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते समजून गेले की ही नारायणी या जगातील दुःख दूर करायला आली आहे. हे माझे परम भाग्य की मी हिचा पिता आहे. यातून आपल्याला सीतामाईचे व्यक्तित्व उलगडत जाते. कशा प्रकारे त्या प्रकृतीशी कनेक्टेड होत्या. कोणी न सांगताही त्यांना दुसऱयांचे भाव समजत होते. त्यांना फक्त माणसांशीच नाही, प्राणी, पक्षी, झाडे, निसर्गाशीसुध्दा संवाद साधता यायचा.

अजून एक प्रसंग मीनाक्षी सांगते. एकदा सीतामाईला जंगलात जाऊन खूप वेळ झाला. ती परत आली नाही म्हणून जनकबाबा आणि मीनाक्षी शोधायला गेले. तर जंगलात एका झाडाखाली एका मोठय़ा माकडिणीच्या मांडीवर सीतामाई डोके ठेवून झोपली होती. त्या दोघांना बघताच माकडीण पळून गेली. सीतामाईना विचारले तर तिने सांगितले की, या माकडिणीचे पिल्लू काल झाडावरून पडून मेले. ती खूप दुःखी होती. म्हणून सीतामाई तिला सांत्वना देत होती. ते बघून जनकबाबांच्या डोळ्यातून पाणी आले. बघा सीतामाई दुसऱयाचे दुःख बघू शकत नाही.

आज आपण हे प्रकृती (निसर्ग) बरोबरचे कनेक्शन हरवून बसलो आहोत. `अन्टोल्ड स्टोरी आाफ सीता’ या पुस्तकाच्या निमित्ताने आपण मनाने प्रकृतीच्या जवळ गेलो तर सीतामाईला ते खूप आवडेल. सीतामाई एकदा आठ-नऊ वर्षांची असताना तिला आणि जनकबाबांना एका आश्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवले होते. सीतामाई आश्रमात यायला तयारच होईनात. सगळे ऋषी-मुनी विचारायला लागले की तुम्ही आत का येत नाही? त्यावर सीतामाई म्हणाल्या की, हा आश्रम बांधताना तुम्ही किती झाडे तोडलीत? प्रकृतीचा नियम आहे, तुम्ही जेवढे प्रकृतीकडून घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला प्रकृतीला द्यावे लागेल. म्हणजे जेवढी झाडे तोडाल, त्याच्या दुप्पट झाडे तुम्हाला लावावी लागतील. बघा आजच्या काळात आपण एवढा विचार तरी करतो का? आपल्याला फक्त घ्यायचे माहीत आहे. सीतामाई त्या काळात शिकवत होती की, प्रकृतीकडून कधीही काहीही फुकट घेऊ नये.

यानंतर या कहाणीत एका महत्त्वाच्या पात्राचा प्रवेश होतो, आणि तो म्हणजे सोमा. सोमा सीतामाईपेक्षा एक-दोन वर्षांनी मोठी असेल. ती जेव्हा काम मागण्यासाठी राजवाडय़ात आली तेव्हा जनक बाबांनी तिला सीतामाईची सखी म्हणून काम करायला सांगितले. सोमा आणि सीतामाई यांच्यातला संबंध अद्वितीय होते. दोघींनाही एकमेकांच्या मनातले काही न सांगता कळायचे. सीतामाईंना गोड खावेसे वाटले तर सोमा गोड बनवायची. सीतामाईंना एखादे फळ खावेसे वाटले की सोमा ते फळ त्यांच्यासमोर आणून ठेवत असे. त्या दोघींचा संबंध अद्वितीय होता. आजकाल आपण ज्याला मेंटल टेलिपथी म्हणतो, अगदी तसेच. जशी कथा पुढे जाते तेव्हा सोमा हे पात्र किती महत्त्वाचे आहे हे कळत जाते.

जशी जशी सीतामाई मोठी होत गेली, तसे ती ध्यानाला जास्त महत्त्व द्यायला लागली. तिला जंगलात जाऊन ध्यान करायला फार आवडायचे. आज आपण लोकतंत्र, प्रजातंत्र हे शब्द वापरतो पण 7000 वर्षांपूर्वी सीतामाई आणि जनकबाबांनी मिथिलेत स्वशासनाचा पाया रचला. प्रत्येक गावात पंचायत असली पाहिजे. तिथली लोकंच आपला प्रतिनिधी निवडून समितीमार्फत गावात सुव्यवस्था व शासन उत्कृष्टपणे करण्याची संकल्पना सीतामाई आणि जनकबाबांनी आणली. आपल्याला रामायणात सीतामाईबद्दल एवढे माहीत नव्हते. सीतामाईची निर्णयक्षमता व प्रत्येक जिवाबद्दल असलेला कळवळा यासारख्या गोष्टी सीतामाईची नवीन ओळख करून देतात.

ज्याप्रमाणे सीतामाईंना ध्यान आवडायचे, त्याप्रमाणे जेवण बनवून प्रेमाने दुसऱयाला खाऊ घालणे ही गोष्ट त्यांना खूप आवडायची. वेगवेगळय़ा भाज्या, कंदमुळे, वनस्पती यांचा वापर करून त्या उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या. अन्नापासून मन बनते. त्यामुळे सात्त्विक जेवणावर त्यांचा भर असायचा. सर्व शास्त्र व शस्त्रविद्या त्यांना गुरुकुलात जात असल्याने येत होत्या. त्या सर्व वडीलधाऱया मंडळीची सेवा करायच्या आणि लहान बहिणींची काळजी घ्यायच्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याप्रमाणे पाचवा पुरुषार्थ प्रेम हा आहे. आणि हे प्रेम काय असते हेच आपण सीतामाईकडून शिकतो.

 

ग्राम्यसंस्कृती – ग्रामदेवतेचा उत्सव

सामना ऑनलाईन

>> जे. डी. पराडकर

कोकणातील शिमगोत्सव म्हणजे नितांत श्रद्धेवर आरुढ झालेल्या भक्तिमय वातावरणाचा एक अनोखा संगम. या उत्सवातील अशाच काही प्रथा, परंपरा…

कोकणात साजऱया करण्यात येणाऱया विविध सणांमध्ये ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला जेवढं महत्त्व आहे, तेवढे खचितच अन्य सणांना असेल. शिमगोत्सव म्हणजे ग्रामदेवतेचा उत्सव! ग्रामदेवतेचा जयजयकार करताना शिमगोत्सवात प्रत्येक गावच्या प्रथा जरी वेगळ्या असल्या, तरी सर्वांचा उद्देश आपल्या ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे एवढाच असतो. शिमगा आणि मानपान यांचे खूप जुने आणि भावनिक नाते आहे. पूर्वापार चालत आलेल्या मानपानात बदल होत नाहीत. यामध्ये काही मागेपुढे झाले तर या उत्सवात गालबोट लागण्याचीही शक्यता असते. नेमून दिलेल्या जबाबदाऱया सुरळीत पार पाडल्या की, हा उत्सव उत्तरोत्तर रंगत जातो. कोकणच्या ग्रामीण भागात शिमगोत्सवाच्या आधी लग्न विधींचे मुहूर्त घेण्याची प्रथा असल्याने फाक पंचमीपासून गावागावातून उत्साहाचे वातावरण असते. नव्याने लग्न झालेले जोडपे होळीभोवती फिरून होमात श्रीफळ अर्पण करतात. असे श्रीफळ अर्पण केल्याशिवाय जणू लग्नविधी पूर्णत्वास जात नाही, अशी नितांत श्रद्धा यामागे असते. फाक पंचमीला सुरू झालेला ग्रामदेवतेचा हा उत्सव पुढे गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत अखंडपणे सुरू असतो.

गावाची वेस बदलली की, शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा बदलते. रत्नागिरी जिह्याच्या विविध भागांतील शिमगोत्सवाच्या आगळ्यावेगळ्या प्रथा अक्षरश अचंबित करणाऱया आहेत. भक्तगणांनी अज्ञातस्थळी जमिनीखाली पुरून ठेवलेल्या खुणा पालखी शोधून दाखवते. हा सोहळा म्हणजे नितांत श्रद्धेवर आरुढ झालेल्या भक्तिमय वातावरणाचा एक अनोखा संगम असतो. जमिनीत पुरून ठेवलेल्या खुणेजवळ पालखी आली की, ती एवढी जड होते की खुणेजवळ पालखीचा खूर आपोआप आपटतो. त्या ठिकाणी खणल्यावर लपविलेली खूण सापडली की, उपस्थित हजारो भक्तगणांकडून ग्रामदेवतेच्या नावाचा एकच जयजयकार केला जातो. चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात साजरा होणारा होल्टे होम हा एक असाच चकित करणारा शिमगोत्सवातील प्रकार आहे. होम पेटविण्याच्या दरम्यान एकमेकांवर पेटती लाकडे फेकून मारली जातात. विशेष म्हणजे या प्रकारात कोणाला काही इजा होत नाही. संगमेश्वर तालुक्यातील कडवई घोसाळकर कोंड येथे होळीचा माड उभा करताना त्याला हात न लावण्याची प्रथा आहे. जमिनीवर आडवा असणारा हा माड शेकडो भक्तगण काठीच्या सहाय्याने उचलतात आणि मोठय़ा कल्पकतेने काठय़ांचा आधार देतच उभा करतात.

गावच्या ग्रामदेवता मंदिराजवळ गावची सहाण असते. याच ठिकाणी रूप लागलेल्या ग्रामदेवतेच्या मूर्ती पालखीत विराजमान झालेल्या असतात. कोकणात दोन प्रकारचे शिमगोत्सव साजरे होतात. त्रयोदशीच्या शिमग्यांना तेरसे, तर पौर्णिमेच्या शिमग्यांना भद्रेचे शिमगे असे म्हटले जाते. बहुसंख्य गावातून सहाणेजवळ उभा करायचा माड म्हणून आंब्याचे मध्यम आकाराचे झाड निवडले जाते, तर काही गावांतून सुरमाड किंवा पोफळ उभी करण्याची परंपरा आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द गावात पौर्णिमेच्या रात्री स्वच्छ चांदण्यात संपन्न होणारा शिमगोत्सव सोहळा दृष्ट लागण्यासारखा असतो. हा संपूर्ण सोहळा अन्य कोणत्याही प्रकाशाविना केवळ चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशात संपन्न होतो. संगमेश्वरनजीकच्या करंबेळे गावात संपन्न होणारा शिमगोत्सव म्हणजे शिवने आणि करंबेळे येथील दोन पालख्यांची गळाभेट असते. संगमेश्वरजवळील वांद्री गावात पालख्यांची भेट नदीपात्राच्या मध्यभागी होते. हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.

ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे, पालखी आपल्या घरामध्ये घेऊन देवीची ओटी भरणे आणि सालाबादच्या रखवालीचा नारळ अर्पण करणे हा एकमेव भक्तिमय उद्देश यामागे प्रत्येकाचा असतो. शिमगोत्सवात नमनखेळे, गोमू, संकासूर अशा विविध नृत्य प्रकारांचीही रेलचेल असते. पालखी आधी किंवा नंतर खेळे, संकासुर घरोघरी फिरून पोस्त घेतात. शिमगोत्सवाच्या दिवशी प्रत्येक जण मनसोक्त पालखी नाचवतो आणि ढोलवादनाचा आनंदही लुटतो. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पालखी प्रत्येक भक्तगणाच्या घरी नेली जाते. वर्षभरात एक दिवस प्रत्यक्ष ग्रामदेवता घरी येण्याचा दिवस भक्तासाठी आनंददायी असतो. अखेरच्या दिवशी रंगांची उधळण करीत रात्रभर पालखी नाचवून रूपे उतरवली जातात. ग्रामदेवतेसमोर नमन या सांस्कृतिक कलेचे सादरीकरण झाल्यावर शिमगोत्सवाची सांगता होते. मोठय़ा आर्थिक उलाढालीसह सर्वांना एकत्र आणणारा तसेच भक्तिमय वातावरणात साजरा होणारा ग्रामदेवतेचा उत्सव महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.

ग्रामदेवतेला चांदीचे मुखवटे चढविल्यानंतर ही रूपे उतरवेपर्यंत 15 दिवस ते एक महिन्याचा कालावधी जातो. पालखीचा सर्व प्रवास पूर्ण होईपर्यंत रोजचा मुक्काम, मानाचे खेळ आदी कार्पाम दरवर्षी ठरल्याप्रमाणे पार पडतात. घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या ग्रामदैवतांचे दर्शन व्हावे यासाठी कोकणात शिमगोत्सवात घरोघरी फिरवल्या जाणाऱया पालखीची प्रथा अन्यत्र क्वचितच आढळेल. बदलत्या काळात आता कोकणच्या विविध भागांत पालखी नृत्य स्पर्धांचे आयोजन केले जाऊ लागल्याने पालखी या विषयाचे महत्त्व वाढू लागले असून पुरातन काळापासून सुरू असलेली ही प्रथा-परंपरा काही स्वागतार्ह बदल करून नवीन पिढीही अंगीकारते आहे. शिमगोत्सवादरम्यान सर्वाधिक ताण मानकरी, गावकरी आणि पोलीस यंत्रणेवर असतो. गावातील सर्व घरांमधून पालखी येऊन गेली की, अखेरच्या दिवशी रात्रभर ती सहाणेवर नाचवली जाते. यालाच शिंपणे असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी रूपे उतरवली गेली की, शिमगोत्सवाची सांगता होते आणि चर्चा सुरू होते ती ग्रामदेवतेचा कौल घेऊन करावयाच्या पारधीची. कोकणातील सर्व गावांतून गुढीपाडव्याच्या दिवशी होळी पौर्णिमेला उभारलेल्या माडाची विधिवत पूजा करून तो तोडण्याची प्रथा आहे.

 

पाऊलखुणा – शिल्पसमृद्ध जांजगीर

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

छत्तीसगड जांजगीर आणि चंपा ही दोन्ही ठिकाणं सुंदर व देखणी आहेत. त्यातील जांजगीर येथील शिल्पसमृद्ध मंदिरं पाहायलाच हवीत.

जांजगीर-चंपा हा भाग छत्तीसगडच्या मध्यवर्ती भागात वसलेला असल्यामुळे त्याला छत्तीसगडचे हृदय असे म्हटले जाते. जांजगीर आणि चंपा ही दोन वेगवेगळी ठिकाणे पण एकमेकांना लागून असलेली. जांजगीर-चंपा प्रदेशाचे मुख्यालय जांजगीर इथेच आहे. छत्तीसगड म्हटले की भोरमदेवाचे मंदिर डोळ्यासमोर येते. मात्र जांजगीर इथे असलेले विष्णू मंदिरसुद्धा तितकेच सुंदर, देखणे आणि भोरमदेवपेक्षा जास्त शिल्पसमृद्ध आहे. जांजगीर हे विलासपूरपासून 65 कि.मी. आणि रायपूरपासून 175 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. इथे असलेले विष्णू मंदिर जवळ जवळ 12 फूट उंच जोत्यावर बांधलेले. तिथे चढून जायला पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराचा सभामंडप आता शिल्लक नाही. फक्त गर्भगृह दिसते. त्यावर असलेल्या अनेक मूर्ती आणि त्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार इतके अप्रतिम आहे की वर्णन अपुरे पडेल. द्वारशाखेवरील शिल्पकला फारच देखणी आणि विविधतेने नटलेली आहे.

गाभाऱ्यात 4 पायऱ्या चढून जावे लागते. त्यातल्या दोन पायऱ्या हत्ती आणि व्याल शिल्पांनी मढवल्या आहेत. उंबरठासुद्धा खूप सुरेख सजवला आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखा फारच सुंदर दिसतात. गंगा आणि यमुनेच्या मूर्ती दोन बाजूंना आणि त्यांच्या बाजूला द्वारपाल. ललाटबिंबावर विष्णूची प्रतिमा असून त्याच्या खाली असलेल्या तीन कोनाड्यात ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या प्रतिमा. मंडोवरावर म्हणजे गाभाऱ्याच्या बाह्यभिंतींवर अगदी खच्चून शिल्पकला केलेली आहे. विष्णूच्या विविध मूर्ती, नरसिंह, वराह वगैरे अवतार आणि महत्त्वाचे म्हणजे विष्णूच्या 24 विभवांच्या मूर्ती इथे ठरावीक जागी एकेक अशा कोरलेल्या दिसतात.

निरनिराळ्या व्यालप्रतिमा, साधक, वादक, नागपुरुष अशा एक ना अनेक प्रतिमा इथे या मंदिरावर आहेत. तसेच अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनांसमवेत त्यांच्या त्यांच्या दिशांना कोरलेले आहेत. मंदिराची पार्श्वदेवता सूर्य आहे. फार सुंदर अशी ही सूर्याची मूर्ती. हातात दोन कमळे, पायाशी सेविका अशी देखणी मूर्ती इथे दिसते. तसेच विविध सुरसुंदरींनी हे मंदिर मढलेले आहे. देखणे स्थापत्य आणि सुंदर मूर्तीकला यांनी बहरलेले आहे. सर्वांगसुंदर असे हे मंदिर बघून डोळे दिपून जातात. एकाच जोत्यावर उभे असलेले हे स्थापत्य आपल्याला खिळवून ठेवते. या जोत्यावरून मंदिराला प्रदक्षिणा घालता येते. त्यावेळी विविध शिल्पे बघून इथून पाय निघत नाही. कितीही वेळा प्रदक्षिणा घातली तरी ती शिल्पे बघून समाधान होत नाही इतकी सुंदर इथली शिल्पकला आहे.

मंदिराचा निव्वळ गाभारा आज शिल्लक आहे. याचा सभामंडप, मुखमंडप जेव्हा इथे अस्तित्वात असतील तेव्हा त्याच्यावर केलेली सुबक शिल्पकला किती सुंदर असेल याची नुसती कल्पनाच करावी लागते. पण गाभाऱ्यावर असलेल्या शिल्पांवरून आपण त्या शिल्पकलेचा किमान अंदाज बांधू शकतो. अतिशय देखणे आणि डौलदार असे हे मंदिर छत्तीसगडच्या अनेक सुंदर मंदिरांपैकी एक आहे. अशा एकाहून एक देखण्या मंदिरांमुळे हा प्रदेश रमणीय झालेला आहे. धार्मिकतेबरोबर कलाकारांची बहरलेली सौंदर्यदृष्टी ही या प्रदेशाची खासियत होती.

या विष्णू मंदिराशेजारीच रस्त्याच्या पलीकडे एक शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर सध्या पूजेत नाही. त्याच्या गाभाऱ्यात काही मूर्तींचे अवशेष ठेवलेले दिसतात. पण या छोटेखानी मंदिराचा परिसर छान ठेवला आहे. याला अगदी लागून देवीचे एक मंदिर आहे. त्या मंदिरात भक्तांचा खूप राबता असतो. त्यामुळे तिथे बसायला बाके वगैरे ठेवलेली आहेत. पण तिथल्याच या शिव मंदिराकडे कुणाचे फारसे लक्ष जात नाही. या शिव मंदिराच्या द्वारशाखा फार आकर्षक असून याच्या ललाटबिंबावर शिवप्रतिमा कोरलेली आहे. उत्तरांगावर म्हणजे या ललाटबिंबाच्या वरच्या बाजूला नृत्यशिवाचे फार देखणे शिल्प दिसते. या मंदिरालासुद्धा सभामंडप वगैरे काहीच नाही. नुसता गाभारा शिल्लक आहे. आणि मंदिराचे शिखर चांगल्या स्थितीत आहे. गाभाऱ्याच्या बाह्यभिंतीवर अंधकासुरवध, नृत्य गणेश तसेच योगीशिवाचे शिल्प कोरलेले दिसते.

या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य याच्या गाभाऱ्याच्या पाठीकडील भिंतीवर आहे. इथे मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवर जिथे पार्श्वदेवतेचे शिल्प असते तिथे एकावर एक दोन देवकोष्ठे असून त्यात असलेल्या मूर्ती केवळ अफलातून आणि अवश्य बघण्यासारख्या आहेत. त्या दोनपैकी खालच्या देवकोष्ठात उभ्या स्थितीतील सूर्याची मूर्ती आहे. तिच्या हातात कमळे असून पायाशी 7 घोडे दिसतात. तर त्याच्यावर असलेल्या देवकोष्ठात `शिव-सूर्या’ची अत्यंत दुर्मीळ अशी मूर्ती आहे. ही मूर्ती बसलेली असून तिला चार हात आहेत. मागच्या दोन हातात त्रिशूळ आणि नाग अशी शिवाची आयुधे तर नैसर्गिक दोन हातात कमळे दिसतात. डोक्यावर मुकुट असून अंगावर दागिने कोरलेले आहेत. अशी मूर्ती फारशी कुठेच दिसत नाही. अत्यंत दुर्मीळ प्रकारातली ही मूर्ती आहे. डॉ. किरीट मनकोडी यांनी अशा प्रकारच्या मूर्तीवर सविस्तर लिखाण केलेले आहे. जांजगिर इथले विष्णू मंदिर बघितल्यावर शेजारचे हे मंदिर अवश्य बघायलाच हवे. द्वारशाखेपासून ते अगदी सगळ्या मंदिरावर शिवप्रतिमा कोरलेल्या दिसतात यावरून हे शिव मंदिर आहे हे स्पष्टच आहे. मात्र पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकावर हे विष्णू मंदिर असल्याचे लिहिले आहे. ते असे का लिहिले ते त्यांनाच माहीत.

(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)

 

संस्कृती सोहळा – जोतिबाचे खेटे : एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

सामना ऑनलाईन

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

तमाम कृषिवलांचे कुलदैवत व मराठी मुलखातील लोकदैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या डोंगरावर माघ महिन्यातील पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या पाच रविवारी चालत जाऊन दर्शन घेऊन गुलाल-खोबरे उधळण्याची परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यंदा माघ शुद्ध 15, बुधवार दिनांक 12 फेब्रुवारीला पौर्णिमा झाल्यानंतर रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जोतिबाच्या खेटय़ांना प्रारंभ झाला आहे. 16 व 23 फेब्रुवारी, तसेच 2, 9 व 16 मार्च रोजी हजारोंच्या संख्येने जोतिबाचे भक्त पायी डोंगरावर येतात, `जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर दुमदुमतो. पाचव्या खेटय़ानंतर शेतकरी आपल्या कुटुंबासह येऊन देवाला पुरणपोळीचा नैवेद्य करतात. इथल्या गुरवांचे आदरातिथ्य वाखाणण्याजोगे आहे. ते निरपेक्षपणे भक्तांची सेवा करतात हे या जोतिबाच्या डोंगरावरचे वैशिष्टय़ आहे!

`दवणा’ ही वनस्पती जोतिबाला, तसेच काळभैरव व यमाईदेवीला प्रिय असून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिरे, पुशिरे या गावातील शेतकरी दवणा पिकवतात. त्याला एक प्रकारचा मनमोहक असा सुगंध येतो. इतरत्र कुठेही न पिकणाऱया दवणा वनस्पतीबद्दल इथल्या शेतकऱयांना खूप आदर आहे. जोतिबाच्या भक्तांना दवणा माफक दरात उपलब्ध करून इथला शेतकरी वर्ग एक प्रकारे देवाप्रति भक्तांसाठी सेवाभाव जपतो आहे.

प्रतिवर्षी माघ महिन्यात पाच रविवारी दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनाला जाण्याची अनेक बहुजन शेतकरी घराण्याची परंपरा आहे. या वेळी जोतिबा डोंगरावर (वाडी रत्नागिरी) प्रचंड गर्दी होते. जोतिबाला गुलाल, खोबरे, दवणा वाहायचा व मंदिराच्या ओटय़ावर कापूर लावून दर्शन घेण्याची परंपरा आहे, यालाच `जोतिबाचे खेटे’ म्हणतात. या खेटय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे काही घराण्यांतील कुलाचार म्हणून पायी चालत जाऊन हे खेटे पूर्ण केले जातात. याबाबत अधिक माहिती घेताना एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे, पूर्वीच्या काळी श्री केदारनाथ (जोतिबा) आपली दख्खनची मोहीम संपवून हिमालयाच्या दिशेने परत निघाले हे अंबामातेला कळताच ती करवीरातून अनवाणी पळत वाडी रत्नागिरीच्या या डोंगरावर आली व केदारनाथला तिने विनंती करून इथेच वास्तव्य करण्यास सांगितले. श्री केदारनाथांनी अंबामातेच्या विनंतीला मान देऊन इथेच कायमचे वास्तव्य केले. तेव्हापासून करवीरनगरीतून जोतिबा डोंगरावर पायी चालत जाऊन खेटे घालण्याची प्रथा चालत आली आहे. ती आजतागायत सुरू आहे. माघ महिन्यात सलग पाच रविवारी कोल्हापूरसह आजूबाजूच्या पंपोशीतील असंख्य भक्त कुशिरे (ता. करवीर) मार्गे पायी गायमुखमार्गे दक्षिण दरवाजातून जोतिबाच्या दर्शनाला मंदिरात जातात. डोंगराच्या पायथ्याशी पुष्करणी तीर्थ तलाव म्हणजेच गायमुख तलावाच्या काठावर थोडा विसावा घेऊन चालत डोंगरावर जाण्यासाठी रीघ लागलेली असते. कोल्हापुरातील `सहजसेवा ट्रस्ट’ व `मेहता चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने या तलावाच्या काठावर मोफत अन्नछत्र चालविले जाते. दररोज हजारो भाविक या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतात. पूर्वी हा गायमुख परिसर ओसाड होता. सहजसेवा ट्रस्ट व इतर सेवाभावी संस्थांनी या परिसरात वृक्षारोपणाचा उपाम राबविला. भाविक पाण्याची बाटली भरून आणून या वृक्षाच्या संगोपनासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे हा परिसर वनराईने सुशोभित झाला आहे. पूर्वी चालत खेटय़ाला जाताना सर्वप्रथम कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत आंघोळ करून शुचिर्भूत होऊन चालत जोतिबा डोंगरावर जाण्याची प्रथा होती. मात्र अलीकडे धावत्या काळात सर्वांना ते शक्य होईलच असे नाही. कर्नाटकातील बेळगाव, पंढरपूर, लातूर, बार्शी या भागांतूनही जोतिबाच्या दर्शनासाठी पायी चालत येणारे भाविक आहेत. ते भाविक पंचगंगा नदी काठावर येऊन विसावा घेतात व पंचगंगेत स्नान करून मगच जोतिबाच्या खेटय़ाला सुरुवात करतात. हे भाविक वडणगेमार्गे निगवे (दुमाला) या गावात असणाऱया हिंमत बहादूर चव्हाण (सरकार) यांच्या वाडय़ाच्या प्रांगणात असणाऱया जोतिबाच्या पादुकांचे दर्शन घेतात आणि मगच कुशिरेमार्गे डोंगर चढतात. कोल्हापूर परिसरात आजही या जोतिबाच्या पाच खेटय़ांना जोतिबाभक्तांच्या दृष्टीने फारच महत्त्व आहे.

या माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबाचे भक्त पायी अथवा वाहनाने प्रवास करत जोतिबा डोंगरावर येतात. देवाला गुलाल, खोबरे, दवणा वाहतात व प्रदक्षिणा घेताना काळभैरवाच्या मंदिरासमोर जोतिबाच्या गुरव मंडळींकडून नारळ फोडून घेतात. तो फोडलेला नारळ प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. पाचव्या रविवारी म्हणजेच शेवटच्या खेटय़ाला जोतिबाला नैवेद्य करण्याची प्रथा आहे. या वेळी गुरवाच्या घरात तांदूळ, तुरडाळ, हरभरा डाळ, गूळ असा `शिधा’ दिला जातो. जोतिबाच्या गुरव समाजातील महिला पुरणपोळी, भात, आमटी, भाजीचा नैवेद्य करतात व प्रत्येकाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. तो नैवेद्य भाविक आपल्या परिवारासह गुरवाच्या घरात बसून ग्रहण करतात. या पाचव्या रविवारी म्हणजेच शेवटच्या खेटय़ाला नैवेद्य दिल्यानंतरच पाच खेटय़ाची यात्रा पूर्ण होते. काही भक्त पाच खेटे न घालता पहिला व शेवटचा पाचवा खेटा घालतात. मात्र घराण्याचा कुलाचार म्हणून कमी-अधिक प्रमाणात जोतिबाला नैवेद्य करून खेटय़ाची समाप्ती करतात. हे खेटे पूर्ण झाले की, जोतिबाच्या भक्तांना वेध लागतात ते जोतिबाच्या भव्यदिव्य चैत्री यात्रेचे.

`जोतिबाच्या नावानं चांगभलं’, `काळभैरवाच्या नावानं चांगभलं’ या चांगभलंच्या गजरात जोतिबाच्या डोंगरावर चालत जाणारे भाविक आणि जोतिबाच्या खेटय़ाचे अप्रूप आजही करवीरवासीयांच्या जनजीवनात एक आगळेवेगळे वैशिष्टय़पूर्ण स्थान टिकवून आहे.

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)

 

प्लेलिस्ट – ये शहर बडा पुराना है

सामना ऑनलाईन

<<< हर्षवर्धन दातार >>>

हिंदी चित्रपटगीतांमध्ये अनेकदा शहरांचा, गावांचा उल्लेख दिसून येतो. कधी ती मजेशीर असतात तर कधी त्या शहराच्या भावना, संस्कृती दर्शवणारी असतात. अशा गाण्यांतून फेरफटका मारत त्या-त्या शहराची गाण्यांमधून केलेली ही सैर.

भारत देश हा अनेक प्रांत, राज्य, शहर आणि खेड्यांचा देश आहे. त्यात अनेक मिजाज, जायके यांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटातील आपले प्रदेश, शहर आणि गावांचा उल्लेख असणारी गाणी. त्या अनुषंगाने तेथील जीभ चाळवणारे पदार्थही तितकेच लोकप्रिय. काही गावातून फेरफटका मारून एक आढावा घेऊया अशा गाण्यांचा.

या विषयाचा विचार करताना सर्वप्रथम आठवतं ते ‘आशीर्वाद’ (1968) मधील सुप्रसिद्ध ‘रेलगाडी’ हे अभिनेता अशोक कुमार यांनी गायलेले आगगाडी गीत. हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या शब्दांना रेल्वेगाडीच्या ठेक्याची चाल लावली आहे वसंत देसाई यांनी. आगगाडी लहान मुलांना अनेक शहरांची सहल घडविते. हुप्कल-दिंडीगुल ही मजेशीर नावांची शहरं गाण्यात हजेरी लावतात. अशोक कुमारचा अभिनयही लाजवाब. गाणं ऐकताना कोळशाची वाफेवर चालणारी इंजिन आपल्या डोळ्यासमोर येतात. दुश्मन (1972) मधील ‘देखो देखो बायोस्कोप’ या गाण्यात भारतातील दिल्ली, कोलकाता, आग्रा, लखनौ, मुंबईचा उल्लेख येतो.

भौगोलिक भारताचा मुकुटमणी अर्थातच निसर्गसौंदर्याने नटलेलं कश्मीर. अनेक शतकांपूर्वी अमीर खुसरोनी म्हटलंच आहे, ‘गर फिरदोस बर रहे झमीन अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो.’ अर्थात, या पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे. बेमिसाल (1982) मध्ये बक्षी साहेबांनी कश्मीरचं अतिशय सुरेख वर्णन केलं आहे. ‘कितनी खूबसूरत ये तसवीर है, ये कश्मीर है.’ राहुल देव बर्मनच्या संगीतामध्ये संतूर या कश्मिरी वाद्याचा सुरेल उपयोग आपल्याला ऐकू येतो. चित्रीकरणही डोळ्यांना अतिशय सुखावह. पडद्यावर अमिताभ, राखी आणि विनोद मेहरा हे त्रिकुट.

ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली ब्रिटिशांनी भारतावर आपली हुकूमत ज्या ठिकाणाहून प्रारंभ केली ते कोलकाता! व्यापार, राजकारण आणि सांस्कृतिक धरोहर याकरिता प्रसिद्ध असलेलं कोलकाता हे साहित्य आणि संगीत याचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं. हावडा ब्रिज (1958) चित्रपटात ओ. पी. नय्यर यांच्या टांगा ठेक्यावर रफी साहेबानी गायलेले टांगेवाला ओमप्रकाशवर चित्रित ‘ईट की दुक्की पान का इक्का, सुनो ये कलकत्ता है’ हे तालेवार गाणं. यात आपल्याला हुगळी नदीवरचा विख्यात हावडा ब्रिज, तेथील ट्राम यांचं दर्शन घडतं.

नजाकत, तहजीब आणि नवाबी वातावरणाकरिता प्रसिद्ध बहुसांस्कृतिक केंद्र लखनऊ. अवध प्रांताचा नवाब वाजिद अली शाहने लखनऊला उत्तरेतील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रांचं एक महत्त्वाचं केंद्र बनवण्यात मोठा हातभार लावला. शहर प्रसिद्ध आहे ‘टुंडे कबाब, इमरती आणि मक्खन मलाई’ या नवाबी खानपान खाद्यपदार्थांकरिता. चौदवी का चांद (1960) या चित्रपटात शायर शकील बदायुनीनी संपूर्ण लखनऊ शहर आपल्या शब्दात रेखाटलं आहे ‘ये लखनऊ की सरजमीन’ या गीतात. पालकी (1967) या दुसऱ्या चित्रपटात ‘ए शहरे लखनऊ’ या गाण्यातून या नवाबी शहराची तुलना स्वर्गाशी केली आहे. ‘मेरे लिये बहार भी तू, गुलबदन भी तू, परवाना और शमा भी तू और अंजुमन भी तू’ या शब्दातून लखनऊचे सौंदर्य झळकते. दोन्ही गाण्यांचे शब्दकार शकील बदायुनी आहेत. तसंच गायलंसुद्धा रफीनी. गंमत म्हणजे दोन्ही गाणी चित्रपटाच्या सुरुवातीला नामावलीच्या वेळी आहेत.

देशाची आर्थिक राजधानी आणि भारताचा समुद्री प्रवेशद्वार ‘गेटवे ऑफ इंडिया’ मुंबई. प्रयत्न करणाऱ्याला, कुठलंही काम करण्याची तयारी असणाऱ्या सामावून घेणारी मुंबई पूर्वीची बॉम्बे. चित्रपटातून मुंबई सर्वांना दिसली ती ‘ए दिल है मुश्किल जीना यहाँ’ या CID (1956)मधल्या जॉनी वॉकरवर चित्रित सुप्रसिद्ध गाण्यातून. पुढे डॉन (1978) मध्ये किशोर-अमिताभ द्वयीनी ‘ये है बम्बई नगरिया तू देख बबुआ’ या मजेशीर गाण्यातून पुन्हा एकदा मुंबई दर्शन घडवलं. अफाट गर्दी आणि धावपळ यामुळे होणाऱ्या विचित्र दुर्घटना यावर एक चपखल बसणारं गाणं अनेक वर्षांपूर्वी आलेल्या हादसा (1983) चित्रपटातल्या ‘ये बम्बई शहर हादसों का शहर है’ अनिश्चितता दर्शवतं. ‘मुंबईचा जावई’ या मराठी चित्रपटावरून घेतलेल्या ‘पिया का घर’ (1972) या हिंदी चित्रपटात ‘बम्बई शहर की तुझे सैर करा दू’ गाण्यातून अनिल धवन, जया भादुरीला मुंबई दाखवतो. सत्तरच्या दशकातील मोकळी ढाकळी मुंबई आणि तिचे रस्ते बघून मन सुखावतं.

आपली राजधानी दिल्लीचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणारी चांदणी चौक, लाल किल्ला जामा मशीद, कुतुब मिनार, मुगल बादशाह हुमायूचा मकबरा… अशी अनेक स्थळं जी सांगतात कहाण्या, विराण्या. चांदणी चौक (1954) चित्रपटात ‘कुतुब मिनार पे चढ़ कर’ या विनोदी गाण्यातून या महत्त्वपूर्ण शहराची एक झलक मिळते. पंजाब हा सरळ मनाच्या, पण रांगड्या लोकांचा प्रांत. सपने सुहाने (1961) मध्ये सलील चौधरीनी ‘नाम मेरा निम्मो, मुकाम लुधिआना’ हे लोकगीतावर लताजीकडून एक ठसकेदार नृत्यगीत गाऊन घेतलं.

कुठलंही नाव नसलेल्या भारतातील गावाचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं आहे. रवींद्र जैननी चित्तचोर (1976) यातील येसूदासनी गायलेल्या सुरेल आणि कर्णप्रिय ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’ गाण्यात. तसंच काहीसं गाणं आहे CID (1956) चित्रपटातील शमशाद बेगम यांचं ‘बुझ मेरा क्या नाम रे, नदी किनारे गांव रे.’

अशा या सगळ्या ऐतिहासिक शहरांनी, गावांनी आणि नागरिकांनी सार्थक केलेला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भारताचा गौरव होतो ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा’ या राजेंद्र कृष्ण-हंसराज बहल-रफी व कोरस जोडीच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणाऱ्या सिकंदरे आझम (1965) गाण्याने. राजेंद्र कृष्ण यांनी अर्थपूर्ण शब्दातून वैभवशाली, गौरवशाली आणि बलशाली भारत आपल्यापुढे उभा केला आहे.

harsh@rewind.co.in
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)

 

पाऊलखुणा – शिवरीनारायण आणि खारोद

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य बराच काळ प्राचीन काळातील दंडकारण्य म्हणजेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात होते अशी इथल्या लोकांची ठाम समजूत आहे. त्यामुळेच येथील मंदिर रचना, स्थापत्यामध्ये रामायणाचे संदर्भ प्रामुख्याने आढळतात. जांजगिर चंपा जिल्ह्यातील शिवरीनारायण संगम, नर नारायण मंदिर, खारोद येथील लक्ष्मेश्वर मंदिर, मठमंदिरे प्राचीन संस्कृतीची साक्ष देतात.

छत्तीसगडचा दक्षिण भाग हा प्राचीन काळापासून दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य बराच काळ याच भागात होते अशी इथल्या लोकांची ठाम समजूत आहे. श्रीराम ज्या मार्गाने चालत जाऊन पुढे दक्षिणेला किष्किंधा नगरीला गेले त्या मार्गाला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्तीसगड सरकारने ‘श्रीराम-वन-गमन-मार्ग’ अशा नावाने हा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करायचे ठरवले आहे. या भागात हिंडताना आपल्याला अगदी हमरस्त्यावरसुद्धा असे लिहिलेल्या पाटय़ा बघायला मिळतात. रामायणातील प्रभू श्रीराम आणि शबरी यांची कथा सर्वांनाच माहिती असते. ती शबरीसुद्धा इथलीच असल्याचे इथे सांगतात. शबरीचे एक लहान मंदिरसुद्धा इथे आहे. आज जे आपण शिवरीनारायण ठिकाण बघणार आहोत त्याचे मूळ नाव ‘शबरी नारायण’ असल्याचे सांगितले जाते.

जांजगिर चंपा जिह्यात शिवरीनारायण हे एक विष्णूक्षेत्र आहे. तिथे महानदी आणि शिवनाथ या नद्यांचा संगम होतो व पुढे काही अंतर गेल्यावर त्यांना जोंक नावाची नदी येऊन मिळते. या जोंक नदीच्या संगमावर शबरीचे एक मंदिर आहे. शबरी याच ठिकाणी राहायची अशीही लोकांची दृढ समजूत. इतिहास आणि लोककथा यांचा संगम असलेले शिवरीनारायण हे विष्णू संप्रदायाचे महत्त्वाचे ठिकाण. साहजिकच इथे असलेली सगळी मंदिरे एक अपवाद वगळता विष्णूची आहेत. त्यातले प्राचीन आणि शिल्पसमृद्ध मंदिर म्हणजे ‘नरनारायण मंदिर.’ हे मंदिर जवळ जवळ पाचशे वर्षे जुने आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडपात डावीकडे गरुडारूढ विष्णू-लक्ष्मीचे नितांत सुंदर शिल्प आपले लक्ष वेधून घेते. शिल्पाच्या बाजूने विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. गाभाऱयात एकाशेजारी एक अशा दोन मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या वस्त्रांनी झाकलेल्या असतात. त्यातली एक नराची आणि दुसरी नारायणाची आहे. नारायणाची मूर्ती इथे झालेल्या उत्खननात सापडली. इथले पुजारी या मूर्तींना राम आणि लक्ष्मणाची मूर्ती असे संबोधतात. तसेच गाभाऱयाची द्वारशाखा खूप सुंदर आहे. नरनारायण मंदिराच्या शेजारी ‘केशव नारायण मंदिर’ आहे. याच्या दरवाज्याच्या ललाटबिंबावर विश्वकर्म्याची मूर्ती कोरली आहे. देवांचा स्थपती असलेला हा महत्त्वाचा देव. इथल्या द्वारशाखेवर विष्णूच्या विविध विभवांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या हातातल्या आयुधांचा क्रम बदललेला लक्षात येतो. विष्णूच्या मुख्य मूर्तीच्या पायाशी एक लहान स्त्राr प्रतिमा आहे. ती अर्थातच लक्ष्मी असते. मात्र स्थानिक लोक तिला शबरी असे म्हणतात.

खारोद ः शिवरीनारायणपासून फक्त 3 किमीवर खारोद आहे. या गावाचे संदर्भ थेट रामायणाशी जोडलेले आहेत. रामायणात रावणाचे दोन राक्षस होते त्यांची नावे ‘खर’ आणि ‘दूषण.’ त्या खर आणि दूषणांनी या ठिकाणी रामाशी युद्ध केले म्हणून या गावाचे नाव खारोद असे पडले. ते नेमके युद्ध कुठे झाले त्याची खूण म्हणून एक झाडसुद्धा दाखवतात. शिवरीनारायण हे विष्णूक्षेत्र आहे, तर खारोद हे शिवक्षेत्र. शिवाशी संबंधित इथे विविध मंदिरे आहेत. एके ठिकाणी शिवाला ‘दुल्हादेव’ असे संबोधून त्याचे मंदिर बांधले आहे. या ठिकाणी तरुण मुलींनी येऊन शिवाची उपासना केली की, त्यांना उत्तम वर प्राप्त होतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.

इथले सर्वात प्राचीन मंदिर आहे लक्ष्मेश्वराचे. इ.स.च्या 7 व्या शतकात हे मंदिर बांधले. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे इ.स.च्या 12 व्या शतकातला कलचुरींचा एक शिलालेख या मंदिरावर आहे. या शिलालेखात कलचुरींची वंशावळ दिलेली आहे. गाभाऱयात असलेल्या शिवलिंगाला एक लाख पंचवीस हजार छिद्र असल्याचे सांगितले जाते. याचा संबंध रामायणाशी जोडलेला आहे. रामायणात लक्ष्मणाला शाप मिळाल्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला. त्याने एक लक्ष पंचवीस हजार शिवलिंगे तयार करून ती शिवाला अर्पण केल्यावर त्याची या शापातून मुक्तता झाली. हाच धागा पकडून इथे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला तेवढय़ा संख्येचे भाताचे दाणे अर्पण केले जातात. त्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा.

इथे शबरीच्या नावाचे एक मंदिर आहे. या मंदिराचे शिखरसुद्धा अस्तित्वात आहे. मंदिराच्या गाभाऱयाच्या दारावर गंगा, यमुना नसून शालभंजिका कोरलेल्या आहेत. खरं तर शालभंजिका या मंदिराच्या बाह्यांगावर सजावटीसाठी कोरलेल्या असतात. मात्र या ठिकाणी त्यांना द्वारशाखेवर स्थान दिलेले दिसते.

खारोद इथे 126 तलाव असल्याच्या नोंदी आहेत. सगळे छत्तीसगड राज्यच मुळी तळ्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. खारोद हे त्यातलेच एक ठिकाण. खारोदला तिवारीपारा नावाचा एक भाग आहे तिथे बोरांचा बगीचा आहे. आजही तिथली बोरे खूप गोड असतात. रामायण-शबरी-तिची बोरे आणि खारोद यांचा हा परस्पर संबंध, अशा काही गोष्टी बघितल्या की प्रकर्षाने जाणवतो. खरं तर सगळा छत्तीसगड प्रदेश या अशा विविध सुंदर कथांनी भरलेला आहे. इथली मंदिरे, इथली ठिकाणे आणि त्यांचा प्रभू श्रीरामचंद्रांशी असलेला संबंध बघितला की, आपल्या प्रवासाला साहजिकच एक धार्मिक किनार प्राप्त झाल्याचे वाटते. आपण अक्षरश मंत्रमुग्ध होऊन जातो. हजारो वर्षे मागे जातो. इथली भोळी माणसे, त्यांची श्रीरामावर असलेली अपार श्रद्धा आणि त्यांनी आजही विविध कथांमधून जपलेली आपली संस्कृती बघितली की अतीव समाधान वाटते. हा प्रदेश अशा अनेक रमणीय कथांनी आणि ठिकाणांनी भरलेला आहे. याचे मनमुराद दर्शन घेणे आणि त्या कथेत आपणही रमून जाणे यामुळे आपली भटकंती अजून समृद्ध होते.

 ashutosh.treks@gmail.com
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)

 

फिरस्ती – शीवचा दुर्ग! मुंबईचा 350 वर्षीय पुराणपुरुष

सामना ऑनलाईन

>> प्रांजल वाघ

1665 साली पोर्तुगीजांनी हुंडय़ात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील ‘परळ’ या बेटाचं उत्तर टोक म्हणजे ‘शीवचा दुर्ग’ – मुंबईच्या उत्तरी सीमेचा रक्षणकर्ता आणि एकमेव असा ‘गिरिदुर्ग’! ‘शीव’ म्हणजे सीमा किवा वेस! ‘सायन’ हा शीवचा पोर्तुगीज अपभ्रंश! पुढे 1733-39 असे दीर्घकालीन युद्ध करून चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचं नामोनिशाण उत्तर फिरांगाणातून मिटवून टाकलं. दीव-दमण ते आजचं वांद्रे-ठाणे-उरण इथपर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडल्या! इंग्रजांनी मराठय़ांच्या भीतीने मुंबईतील सर्व कोटांची डागडुजी करून ते मजबूत करून घेतले. त्यात शीवच्या दुर्गावर 32 सैनिक व त्यांचा एक म्होरक्या असे कायम केले.

सोळाव्या शतकात बिंबस्थान म्हणजे मुंबई आणि साष्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. थेट दीव-दमण ते चौलपर्यंत पोर्तुगीजांची क्रूर सत्ता या परिसरात थैमान घालू लागली. पुढे 1665 साली पोर्तुगीजांनी हुंडय़ात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील ‘परळ’ या बेटाचं उत्तर टोक म्हणजे ‘शीवचा दुर्ग’ – मुंबईच्या उत्तरी सीमेचा रक्षणकर्ता आणि एकमेव असा ‘गिरिदुर्ग’!

‘शीव’ म्हणजे सीमा किवा वेस! ‘सायन’ हा शीवचा पोर्तुगीज अपभ्रंश! पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीत ही टेकडी तटा-बुरुजांनी मजबूत करून घेतली होती, पण मुंबईचे पहिले गव्हर्नर – जेराल्ड ऑन्जियर यांनी खऱया अर्थाने हा किल्ला साधारण 1665-1671च्या आसपास बांधून काढला. जवळच एका टेकडीवर ‘रिवा’ नामक एकांडा बुरूज बांधून काढला गेला.

पुढे 1733-39 असे दीर्घकालीन युद्ध करून चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचं नामोनिशाण उत्तर फिरांगाणातून मिटवून टाकलं. दीव-दमण ते आजचं वांद्रे-ठाणे-उरण इथपर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडल्या! इंग्रजांनी मराठय़ांच्या भीतीने मुंबईतील सर्व कोटांची डागडुजी करून ते मजबूत करून घेतले. त्यात शीवच्या दुर्गावर 32 सैनिक व त्यांचा एक म्होरक्या असे कायम केले. किल्ला तोफांनी सज्ज केला गेला. किल्ल्यावर या सैनिकांची राहण्याची सोय, शौचालय, दारू कोथर इत्यादी वास्तू होत्या. त्यांचे अवशेष आजही दिसतात. किल्ल्यावर पाण्याची दोन बांधून काढलेली टाकीदेखील आढळतात. इथे आजही एक तोफ आहे.

पुढे पुढे जशी मराठी ताकद कमी होत गेली तसं इंग्रज हळूहळू खाडी ओलांडून मराठय़ांचा प्रदेश जिंकू लागले. 1818 मध्ये मराठेशाही खालसा झाल्यावर इंग्रजांना भारतात कोणी शत्रू उरलाच नाही आणि या किल्ल्याचं महत्त्व अस्तास जाऊ लागलं. भराव टाकून खाडी भरली, मुंबईच्या सीमा विस्तारल्या. मग विमाने आली, क्षेपणास्त्रs आली आणि किल्ले कालबाह्य होऊ लागले. मुंबईच्या झपाटय़ाने होणाऱया शहरीकरणात, भयंकर वेगवान जीवनात पैसा आणि प्रगतीच्या मागे हात धुऊन लागलेल्या माणसाने आपल्या फायद्यासाठी निसर्गाच्या आणि मानवतेच्या ऱहासाच्या साऱया सीमा पार केल्या तिथे या लहानग्या ‘शीव’च्या किल्ल्याची काय बात करता?

2025 सालचा पहिला सूर्योदय या किल्ल्यावरून पाहताना सहज म्हणून उत्तरेकडे नजर फेकली. प्रदूषणयुक्त धुके अर्धवट झोपेत असलेल्या मुंबईवर गोधडीसारखे पसरले होते. राहून राहून वाटत होते, जर 1739 मध्ये मराठय़ांनी खाडी ओलांडून इंग्रजांपासून मुंबई मुक्त केली असती तर आज देशाचा इतिहास वेगळा असता! पण इतिहासात ‘जर-तर’ला जागा नसते.

‘आय लव्ह यू’ खरडलेल्या भिंती, कोपऱयात एकमेकांच्या मिठीत हरवलेली प्रेमी युगुले, रील्स बनवण्यात खर्ची पडणारी पिढी माझे लक्ष वेधून घेत होती. इतिहासाबद्दल असलेली आस्था पाहून मन खिन्न झाले. गगनचुंबी इमारतींच्या वेढय़ात अडकलेल्या, कालबाह्य म्हणून निरुपयोगी ठरवून अडगळीत टाकलेल्या या 350 वर्षीय पुराणपुरुषाचा निरोप घेऊन मी नवीन वर्षात घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱया असंख्य मुंबईकरांच्या गर्दीत सामील झालो!

 pranjalwagh@gmail.com

 

पाऊलखुणा – कदंबांचं रायपट्टण आणि मराठी पशुपालक

सामना ऑनलाईन

>> प्रणव पाटील

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून आलेल्या धनगरांनी रायपट्टण परत वसवलं आहे. इतिहासकाळात या प्रदेशावर बनवासीच्या कदंब राजाची सत्ता होती. या कदंब राजाची राहायची जागा दांडेलीत जिथे होती तिथे एक नगर उभं राहिलं. त्या नगराला रायपट्टण म्हणजे राजाची नगरी असं नाव पडलं. इतिहासात कदंब हरवलं तसं काळाबरोबर रायपट्टणही लुप्त झालं.

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिह्यात दांडेलीचं घनदाट अरण्य आहे. या प्रदेशाला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. हळियाळ या तालुक्याच्या ठिकाणावरून आम्हाला दांडेलीतल्या सिद्दी आदिवासींच्या पाडय़ावर जायचं होतं. हळियाळ शहरात आपल्याला बाजारात, बसमध्ये बहुतांश लोक मराठीत बोलताना दिसतात. परंतु सगळे फलक मात्र कानडीत दिसतात. दांडेलीतही कन्नड बरोबरीनेच मराठी आणि कोकणी भाषा बोलली जाते असं वाचलं होतं. दांडेलीच्या जंगलात शिरताच रस्त्यावर कोह्याचं दर्शन झालं. रस्त्यात आम्हाला मिन्गेल सिद्दी हा तरुण कार्यकर्ता भेटला. गप्पांच्या ओघात मिन्गेल म्हणाला, काही वर्षांपूर्वी तुमच्या महाराष्ट्रातून आलेल्या धनगरांनी इथे रायपट्टण परत वसवलं आहे. इतिहासकाळात या प्रदेशावर बनवासीच्या कदंब राजाची सत्ता होती. या कदंब राजाची राहायची जागा दांडेलीत जिथे होती तिथे एक नगर उभं राहिलं. त्या नगराला रायपट्टण म्हणजे राजाची नगरी असं नाव पडलं. इतिहासात कदंब हरवलं तसं काळाबरोबर रायपट्टणही लुप्त झालं.

भूतकाळाच्या पटलावरून रायपट्टण या गावाला पुन्हा भेट द्यायचं ठरवलं. गर्द जंगलातून मध्येच उघडय़ावर असलेलं रायपट्टण गाव लागलं. अतिशय आखीव-रेखीव असणारं ते गाव डंगे धनगरांनी काही दशकांपूर्वीच वसवलेलं होतं. हे डंगे धनगर म्हणजे सह्याद्रीच्या खोऱयात दुर्गम जागी डोंगरात राहणारे पशुपालक. डोंगरी धनगरांच्या घरांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या घरांना कुंपण घातलेलं नसतं. परंतु रायपट्टणमध्ये जागोजागी बांबूच्या तट्टय़ांनी सुरेख कुंपण घातलेलं होतं. रानटी प्राण्यांचा वावर आजूबाजूलाच असल्यामुळे ही योजना केली होती. थंडीच्या दिवसांत हत्ती स्थलांतरित होताना या प्रदेशात धूमाकूळ घालतात. इथल्या पट्टेरी वाघाचा संचार दांडेली ते साताऱ्यातल्या चांदोलीच्या जंगलापर्यंत असतो.

या धनगरांच्या घरांचं वैशिष्टय़ म्हणजे स्थानिक गावांमध्ये दिसतात त्याप्रमाणे न भाजलेल्या विटांची घरं. त्या पिवळसर राखाडी विटांची सुरेख बांधणी जागोजागी दिसत होती. दुसरं वैशिष्टय़ म्हणजे या धनगरांच्या घराच्या पडवीत गुरांचा गोठा नसून तो घराशेजारी स्वतंत्रपणे दगडमातीत बांधलेला दिसतो. या भल्यामोठय़ा गोठय़ांची रचना रानटी प्राण्यांमुळे बंदिस्त असते. या प्रदेशात पाऊस असतो. त्यामुळे साधारण तीन फुटी उंचीच्या चौथऱ्यावर घर बांधलं जातं. या घरांना स्थानिक नक्षीच्या रेखीव चौकटी, दरवाजे आणि खिडक्या असतात. या धनगरांचा गायी आणि म्हशी पाळणे हा मुख्य व्यवसाय असला तरी भात शेती या भागात होते.

रायपट्टणमध्ये बहुतेक साताऱयाच्या पाटण खोऱयातून आलेल्या धनगरांची वस्ती आहे, ज्यात शिंदे, येडगे, फोंडे, झोरे, लांबोटे, गावडे इत्यादी आडनावांच्या पंचाहत्तर कुटुंबांची घरं आहेत. त्याशिवाय दहा-बारा सिद्दी आदिवासी राहतात. गावाच्या प्रमुखाला गावडे म्हणतात. रायपट्टणमध्ये पंढरमिसे आडनावाच्या कुटुंबाकडे ही गावडकी अर्थात पाटीलकी होती. गावात दसऱ्याला हे धनगर त्यांचा वैशिष्टय़पूर्ण पांढरा पोशाख, पागोटं, पायात चाळ आणि तलवार घेऊन नृत्य करतात. पंढरपूरचा विठोबाला ते आपला पूर्वज आणि कुलदेव मानतात.

गावातील लोकांनी कदंब राजवटीविषयी सांगितलं की, जंगलात जागोजागी पडलेली मंदिरं आहेत, अनेक ठिकाणी खंडित मूर्ती दिसतात, काही ठिकाणी दगडाचे ढीग आहेत तिथे राजचा राजवाडा होता असं म्हणतात. या परिसरात मृत सैनिकांची स्मारक शिल्पं असणारे वीरगळ जंगलात आहेत. अनेक ठिकाणी माणसाच्या उंचीची शिल्पं पडून आहेत. गावातच एक फेरफटका मारून संध्याकाळी गुरांना घेऊन घरी चाललेल्या धनगरांना भेटून आम्ही निघालो. शेकडो वर्षे लुप्त झालेलं रायपट्टण पुन्हा गजबजलं होतं आणि इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.

pranavpatil26495@gmail.com

 

पाऊलखुणा – बस्तरचे अद्भुत

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

कोटमसर, कैलाश आणि मांदरकोंटा या छत्तीसगडमधील लवणगुंफा पाहणं म्हणजे थरारक आणि देखणा अनुभव असतो. बस्तरच्या गुहांमधले हे थक्क करणारे निसर्गनवल अद्भुत असेच आहे.

विपुल निसर्गसंपदा लाभलेला छत्तीसगड प्रदेश आणि तिथे असलेली विविध ठिकाणे केवळ अवर्णनीय आहेत. या प्रदेशाबद्दल बोलण्यासारखे बरेच काही आहे. खरंतर बोलण्यापेक्षा इथे जाऊन इथले सगळे वैभव अनुभवायला हवे. जशी इथे प्राचीन देवळे आहेत तशीच मोठी निसर्गसंपदाही आहे. निसर्गात निर्माण झालेले नवलविशेषसुद्धा इथे बघायला मिळतात. लवणस्तंभांच्या गुहा हे त्याचेच उदाहरण. खरंतर हे जमिनीखालचे अद्भुत आहे. अशा गुहांची निर्मिती हे निसर्गाचे मोठे नवल आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर भागात या गुहा विशेषत्वाने आढळतात. जगदलपूरपासून 35 किलोमीटरवर वसले आहे ‘कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान’. कांगेर नदीच्या काठावर वसलेले हे नैसर्गिक आणि अत्यंत रमणीय स्थळ. जवळजवळ 200 वर्ग किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले हे ठिकाण. या राष्ट्रीय उद्यानात लवणगुंफा वसल्या आहेत. त्यातल्या कुटुमसर, कैलाश, मांदरकोंटा आणि दंडक या गुंफा केवळ अफलातून आहेत. कांगेर धबधबा आणि तीरथगड धबधबा हे दोन जलप्रपात याच राष्ट्रीय उद्यानात वसले आहेत. हा सगळा प्रदेश घनदाट जंगलाचा. वर उल्लेखलेल्या चारही गुहा प्रसिद्ध आहेत त्या इथे असलेल्या लवणस्तंभांसाठी. इंग्रजीत याला स्टॅलेक्टाईटच असे म्हणतात. इथला खडक कॅल्शियम कार्बोनेटयुक्त म्हणजे चुनखडीचा आहे. यातले क्षार पाण्यात विरघळतात आणि पाण्याच्या थेंबांबरोबर ते खाली झिरपतात. इथल्या उष्ण हवेने त्यातले पाणी उडून जाते आणि क्षार तसेच शिल्लक राहतात. पुढे त्याच्या अधोमुखी कांडय़ा, किंवा स्तंभ तयार होतात. हे सगळे व्हायला लाखो वर्षे जावी लागतात. कोटमसर इथल्या गुहेत स्टॅलेक्टाईटच्या नुसत्या कांडय़ा नव्हे, तर स्तंभ, भिंती तयार झाल्या आहेत, तर कैलाश गुहेत छतावर या कांडय़ांची झुंबरे तयार झाली आहेत.

जगदलपूरपासून नैऋत्य दिशेला 30 किलोमीटरवर हे ठिकाण वसले आहे ऐन जंगलात. तसाही हा सगळा प्रदेश डोंगर आणि झाडी यांनी वेढलेला. इथे येईपर्यंतचा रस्ता खूपच रमणीय आहे. एक छोटासा घाट उतरून आपण एकदम येऊन पोहोचतो ते कांगेर राष्ट्रीय अभयारण्याच्या प्रवेशद्वाराशी. इथून उजवीकडचा रस्ता जातो सुप्रसिद्ध तीरथगड धबधब्याकडे. तिकडे न जाता आपण या अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत जायचे. इथे तुम्हाला कुटुमसर किंवा कैलाश कुठेही जायचे असले तरी नोंदणी करावी लागते. नोंदणी करून गाडी, गाईड, अभयारण्याचे प्रवेश शुल्क, गुहेमधली प्रकाशव्यवस्था या सगळ्याचे एकत्रित पैसे भरावे लागतात. प्रत्येकी 6 प्रवाशांसाठी एक गाडी दिली जाते. इथून पुढचे अंतर वनखात्याच्या उघडय़ा जिप्सी गाडीतून जावे लागते. हा रस्ता जंगलातून जातो. वाटेत बरेच जुने वृक्ष आणि त्यांच्याभोवती वाढलेली असंख्य वारुळे दिसून येतात. जंगलात वारुळे असणे म्हणजे अशा जंगलात मानवाचा पायरव अगदी कमी असल्याचे द्योतक असते. गाडीत आपल्यासोबत गाईड असतो. त्याच्या मदतीशिवाय या गुहा आणि त्यातले निसर्ग नवल समजणे केवळ अशक्य गोष्ट आहे. आपल्याला गाडी गुहेच्या जवळ आणून सोडते. इथे खडकांचे काही विशिष्ट आकार तयार झालेले आहेत. खडकांच्या दोन रांगांच्या मध्येच या गुहेचे पहिले प्रवेशद्वार केलेले आहे. दोन्ही बाजूंनी उंच खडक आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाशी आपण उभे असतो. इथून पुढे अगदी चिंचोळय़ा मार्गाने चालत जावे लागते. नक्की गुहा कशी असेल, तिथे जायचा मार्ग कसा असेल याचा इथून अंदाजच येत नाही.

तसेच पुढे गेल्यावर आपण एका खडकाच्या पायथ्याशी येतो. इथे गुहेचे दुसरे प्रवेशद्वार आहे. कोटमसर गुहेचा थरार इथून सुरू होतो. या दरवाजातून आतमध्ये वाकून जावे लागते. आत गेल्यावर एका बाजूला उंच खडक आणि त्याला लागून असलेल्या जिन्यावरून आपण काही अंतर खाली उतरतो. इथून पुढे आपल्याला काही पायऱया उतरून जायचे असते. इथून पुढचा मार्ग अजून चिंचोळा होतो. एक माणूस जेमतेम जाईल अशी ती वाट आहे. इथून पुढे लोखंडी गोल गोल उतरणाऱया जिन्यावरून अजून खाली उतरून जावे लागते. आपण आता जमिनीखाली जवळजवळ 70 फूट उतरलेलो असतो. आपल्या सोबत विजेरी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे नसली तरी सोबतच्या मार्गदर्शकाकडे मोठय़ा उजेडाची विजेरी असते. या विजेरीच्या प्रकाशात पुढची वाटचाल करायची असते. इथून पुढे खडकाचे काही टप्पे आहेत. त्यावर पायऱया केलेल्या आहेत. त्या पायऱयांवरून अजून थोडे उतरून खाली गेल्यावर आपण सपाटीला येतो. आता इथे मात्र आपल्यासमोर एक मोठा खजिना उघडून ठेवलेला असतो. अंदाजे 20 फूट उंचीच्या एका मोठय़ा गुहेत आपण उभे असतो. आणि आपल्या समोर स्टालेक्टाईटचे भलेमोठे स्तंभ गुहेच्या छतापासून खालीपर्यंत आलेले दिसतात. या गुहेची लांबी जवळजवळ 200 मीटर इतकी आहे. गुहेच्या आतल्या भागात चालण्यासाठी सिमेंटचे रस्ते तयार केलेले आहेत. हातातल्या विजेरीच्या उजेडात आपण हे एकेक स्तंभ, भिंती, तर काही ठिकाणी आपल्या डोक्यावर लोंबणारे झुंबर असे बघताना आश्चर्याने थक्क होऊन जातो. काही काही ठिकाणी छतावर जी झुंबरासारखी नक्षी तयार झाली आहे ती जणू काही माणसानेच तयार केल्यासारखी वाटते.

या लवणस्तंभांमध्ये निरनिराळे आकार तयार झालेले दिसतात. काही प्राण्यांचे तर काही मानवी चेहऱयासारखे. आपल्यासोबतचा मार्गदर्शक विजेरीच्या प्रकाशात हे निरनिराळे आकार दाखवतो. विजेरीच्या प्रकाशात काही स्तंभ चमकतात. जणू काही एखादे स्फटिकाचे झुंबर असल्यासारखे इथे दिसते. हा सगळा नजरा अद्भुत आहे. अजून एक निसर्गनवल म्हणजे, या गुंफांमध्ये अंध बेडूक आढळतो. बेडकाची एक विशिष्ट जात, ज्याला दिसत नाही असे सांगतात. तो या गुंफामध्ये आढळणे हा कमालीचा योग म्हणावा लागेल.

असाच सगळा नजारा कैलाश किंवा दंडक या गुहांमध्ये दिसतो. स्टॅलेक्टाईटचे स्तंभ तयार व्हायला अक्षरश लाखो वर्षे जावी लागतात. आपण लाखो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या गुहेत आलेलो आहोत ही भावना फार वेगळी असते. काही ठिकाणी या गुहेच्या भिंतींवर निरनिराळय़ा रेषांनी काही आकृत्या तयार झालेल्या आहेत. आतमध्ये गुहेत तुलनेने ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. आतमध्ये आपण अचंबित होऊन अनेक गोष्टी बघत असतो तेव्हा तिथे जाणवत नाही. याबद्दल कितीही सांगितले-ऐकले तरीही मुळात हे सगळे अद्भुत तिथे जाऊन अनुभवायला हवे. नुसते वाचून ती जादू कशी काय समजणार. हा सगळा थरारक आणि देखणा अनुभव तिथे जाऊन प्रत्यक्ष घ्यायला हवा. कोटमसर, कैलाश आणि मांदरकोंटा या गुहा छत्तीसगडला जाऊन आवर्जून बघायला हव्यात. या तीनमध्ये सगळय़ात मोठी गुहा जरी कुटुमसर असली तरी इतर गुहांची प्रत्येकीची एक निराळी खासियत आहे, पण तरीही हे अद्भुत सगळीकडे अबाधित आहे. हे निसर्गनवल मात्र थक्क करणारे आहे. बस्तरच्या गुहांमधले हे अद्भुत प्रत्यक्ष अनुभवायला हवे.

 ashutosh.treks@gmail.com
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)

 

अभिव्यक्ती – वादाचा नको, संवादाचा इतिहास हवा!

सामना ऑनलाईन

>> डॉ. मुकुंद कुळे

इतिहास म्हणजे उपलब्ध पुराव्यांनुसार भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी. ही मांडणी करताना जिथे पुरावे सापडत नाहीत, तिथे इतिहासकार आपल्या इतिहासविषयक ज्ञानाच्या आधारे काही कल्पनाबंध तयार करतो आणि इतिहासाच्या गाळलेल्या जागा भरण्याचा प्रयत्न करतो. जो खरा इतिहासकार असतो. त्याचा प्रयत्न फक्त भूतकाळात काय घडलं हेच सांगण्याचा असतो. जे घडलं त्याचा आधार घेऊन समाजात दुही माजवण्याचा नसतो. ही दुही माजवण्याचं काम कोणत्याही काळात त्या-त्या धर्माचे ठेकेदारच करत असतात, मग तो कोणताही धर्म असो.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. जेजुरीहून नगरला जात होतो. वाटेत अष्टविनायकांतील एक असलेलं मोरगावच्या गणपतीचं देवस्थान लागलं. दगडी आणि रेखीव बांधकाम असलेल्या या मोरगावच्या मंदिराविषयी खूप ऐकलं होतं. साहजिकच मुद्दाम थांबून मंदिरात गेलो. मंदिराचा परिसर खरोखरच प्रशस्त आणि सुंदर होता. एखादी भव्य गढी असावी असंच मंदिराचं बांधकाम होतं. मध्यभागी मुख्य मंदिर आणि बाजूला गढीच्या भिंतीलगत ओवऱया अशी रचना. मी मंदिरात गेलो आणि मयुरेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर आलो. माझं मन कायमच प्रत्यक्ष मंदिरापेक्षा मंदिराच्या आवारात अधिक रमतं. कारण देव प्रत्यक्ष गाभाऱयात असला तरी त्याचे समाजात रुजलेले सामाजिक-सांस्कृतिक अवशेष खऱया अर्थाने मंदिराच्या आवारातच पाहायला मिळतात.

मंदिराच्या आवारात असलेल्या विविध छोटय़ा-मोठय़ा देवदेवतांच्या घुमटी पाहणं हा माझ्या अधिकच कुतूहलाचा विषय असतो. मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतल्यावरही मी तेच केलं. मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घातल्यासारखा फिरू लागलो. कुठल्या कोनाडय़ात कुठल्या देवाची मूर्ती आहे किंवा कुठे कुणाचा तांदळा आहे ते पाहत होतो. फिरता फिरता मी जमिनीवर उभ्या केलेल्या एक शिळेसमोर आलो. ती शिळा चारेक फुटांची असावी. दगडी पाटा असतो तशीच सपाट. त्या शिळेच्या वरच्या अंगाला मध्यभागी एक मुखवटेवजा शिल्प (उत्थित शिल्प) कोरलेलं होतं. शेंदूर थापल्यामुळे तो कोणत्या देवाचा मुखवटा आहे ते कळत नव्हतं. मी कुतूहलाने त्याकडे पाहत उभा होतो. येणारे-जाणारे मुद्दाम थांबून नमस्कार करत होते. त्यातल्याच एक-दोघांना विचारलं, पण कोणालाही तो मुखवटा कुणाचा आहे ते सांगता आलं नाही. शेवटी तिथून पुढे जाणार एवढय़ात मंदिराचे पुजारी येताना दिसले. (जे या मंदिराचे संस्थापक असलेल्या प्रसिद्ध गणेशभक्त मोरया गोसावी यांचे वंशज होते.) मग त्यांनाच थांबवलं आणि विचारलं, ‘हा मुखवटा कोणत्या देवाचा आहे?’ त्यावर ते हसले आणि अतिशय शांत स्वरात म्हणाले- ‘हा कोणत्याही देवाचा मुखवटा नाही, तर हा विजापूरच्या आदिलशहाचा मुखवटा आहे.’ त्यांनी हे सांगितलं मात्र… माझा माझ्याच कानांवर विश्वास बसला नाही. मी डोळे विस्फारून त्यांना ‘क्काय’ असं विचारलं. तेव्हाही त्यांनी पहिल्यासारखंच अतिशय शांतपणे उत्तर दिलं… होय, हा विजापूरच्या आदिलशहाचा मुखवटा आहे! आणि मग माझ्या डोळय़ांतील कुतूहल पाहून ते म्हणाले, ‘या मोरगावच्या गणपतीची दिवाबत्ती आणि पूजाअर्चेच्या खर्चाची सोय विजापूरच्या आदिलशहाने केलेली आहे. आदिलशहाने तेव्हा दिलेल्या सनदा आजही आमच्याकडे आहेत. मंदिरासाठी त्याने दिलेल्या या दानाबद्दल कृतज्ञता म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याचा मुखवटा असलेली शिळा मंदिराच्या आवारात उभारली आहे…’

हा बहुधा इब्राहिम आदिलशहा दुसरा असावा. परंतु तो दुसरा असो वा पहिला, तो एक मुस्लिम राजा होता आणि त्याने मोरगावच्या गणपती देवस्थानाला खर्चासाठी सनदा द्याव्यात हीच माझ्यासाठी गमतीची आणि महत्त्वाची बाब होती. कारण मुस्लिम म्हणजे आक्रमक, मुस्लिम म्हणजे मूर्तिभंजक, मुस्लिम म्हणजे हिंदूंचे कट्टर शत्रू हेच शिकवलं गेलेलं. अगदी आजही तेच सातत्याने सांगितलं जात आहे. जे शिकवलं गेलं, सातत्याने सांगितलं गेलं ते सगळंच खोटं होतं वा खोटं असेल असं नाही. किंबहुना मुस्लिम आक्रमकांनी मंदिरं उद्ध्वस्त करून त्या जागी मशिदी उभारल्याची उदाहरणं आपण पाहतोच आहोत… पण संधी मिळाली तर रोजच कुठल्या ना कुठल्या मशिदीच्या-दर्ग्याच्या पायाशी असलेलं शिवलिंग उघड केलं जाईल. नाही तरी ‘अयोध्या तो बस झांकी है, काशी-मथुरा बाकी है’ असं म्हणत असतानाच, आता काही दिवसांपूर्वी अजमेरच्या सुप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याबाबतही सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहेच की… काय तर म्हणे या दर्ग्याच्या मुळाशीही शिवमंदिर आहे! पण प्रश्न असा आहे की, केवळ तोच इतिहास आहे? केवळ तेच सत्य आहे? तर याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. ऊर बडवून सातत्याने सांगितल्या जाणाऱया या एकांगी इतिहासाच्या पल्याडही वेगळा ‘इतिहास’ दडलेला आहे. वेगळं सत्य दडलेलं आहे. फक्त ते शोधण्यासाठी प्रत्येकानेच आपापल्या धर्माचे चष्मे आधी काढून ठेवले पाहिजेत. निखळ दृष्टीने इतिहासाला सामोरं गेलं पाहिजे.

इतिहास म्हणजे उपलब्ध पुराव्यांनुसार भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी. ही मांडणी करताना जिथे पुरावे सापडत नाहीत, तिथे इतिहासकार आपल्या इतिहासविषयक ज्ञानाच्या आधारे काही कल्पनाबंध तयार करतो आणि इतिहासाच्या गाळलेल्या जागा भरण्याचा प्रयत्न करतो. जो खरा इतिहासकार असतो, त्याचा प्रयत्न फक्त भूतकाळात काय घडलं हेच सांगण्याचा असतो, जे घडलं त्याचा आधार घेऊन समाजात दुही माजवण्याचा नसतो. ही दुही माजवण्याचं काम कोणत्याही काळात त्या-त्या धर्माचे ठेकेदारच करत असतात, मग तो कोणताही धर्म असो. एवढंच कशाला, आज भारतात केवळ हिंदू आणि मुस्लिम या दोनच धर्मांना एकमेकांसमोर शत्रू म्हणून उभं केलं जातं; परंतु भारताचा इतिहास पाहिला तर, वैदिक (जे आज स्वतला हिंदू म्हणवतात) विरुद्ध बौद्ध विरुद्ध जैन अशा लढाया सातत्याने होत आल्या आहेत. भारताच्या प्राचीन इतिहासातील वेगवेगळय़ा कालखंडात वेगवेगळय़ा वंशाचे राजे वेगवेगळय़ा धर्माचं पालन करीत आले आहेत आणि प्रसंगी एकमेकांशी घनघोर युद्ध करीत आले आहेत. एवढंच नाही तर, जेत्यांनी कायमच आपली संस्कृती जितांवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ही संस्कृतीच जिवट आणि चिवट असते. ती जोपर्यंत मोडत नाही, तोपर्यंत ताब्यात आलेल्या नव्या प्रदेशावर राज्य करणं सोपं नसतं. केवळ मुस्लिम आक्रमकांनीच हे केलं असं नाही, तर ब्रिटिशांनीही तेच केलं. ब्रिटिशांनी भारतीयांना इंग्रजी शिकवायला सुरुवात करून आणि त्याआधारे व्हिक्टोरियन नीतिमत्तेचे (मोरालिटी) धडे देऊन भारतातील कला-संस्कृती नासवलीच की! … आणि ती नासवण्यात इंग्रजी शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तत्कालीन उच्च वर्गच आघाडीवर होता. ब्रिटिशांना पक्कं ठाऊक होतं, जोपर्यंत आपण भारतीयांचा कला-संस्कृतीचा अभिमान मोडून काढत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर राज्य करता येणं कठीण आहे. अगदी वैदिक संस्कृतीचे पाईक म्हणवणाऱया राजांनीदेखील हेच केलं. भारतातून बौद्ध धर्माची पिछेहाट होण्यामागचं तेच तर कारण होतं आणि आहे. फक्त वैदिक म्हणजेच हिंदू काय? बौद्ध काय किंवा जैन काय हे धर्म भारतातच जन्माला आलेले असल्यामुळे त्या वेळच्या आक्रमणांत-युद्धांत झालेल्या नृशंस हत्यांची-अत्याचारांची चर्चा होत नाही. अन्यथा परकीय आक्रमकांनी मंदिरं उद्ध्वस्त करण्याआधी बौद्ध मठ-गुंफा कुणी उद्ध्वस्त केल्या, बौद्ध भिक्खुंची कुणी हत्या केली याचाही एकदा शोध घेणं गरजेचं आहे. पण काही झालं तरी ते स्वकीय असतात. स्वकीयांनी आपल्या भूमीत केलेले अत्याचार चालतात, नव्हे ते सोयिस्करपणे विसरले जातात आणि परकीयांनी केलेले अत्याचार किंवा त्यांनी आपली संस्कृती लादण्याचा केलेला प्रयत्न पुन्हा पुन्हा देशासमोर मांडला जातो. कारण यात सोयीचं राजकारण असतं.

पण इथे एक लक्षात घ्यायला हवं, की मुस्लिम आक्रमक होते तरी ते इथेच राहिले. इथल्याच मातीत मिसळले आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी तेही हिंदूंच्या बरोबरीने लढले. काही कडव्या धर्मनिष्ठांनी प्राचीन मंदिरं-वास्तू पाडल्या असतील. तरी त्याचं भूत वर्तमानाच्या मानगुटीवर बसवणं योग्य नाही… आणि भारतीय मुस्लिमांचा इतिहास काय केवळ विध्वंसाचाच आहे? भारताच्या मध्ययुगीन सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाकडे डोळसपणे नजर टाकली तर मुस्लिम प्रशासकांनी कितीतरी समाजोपयोगी कामं केलेली दिसतील. आपली प्रजा केवळ मुस्लिम नाही, तर मोठय़ा प्रमाणावर हिंदू आहे हे उमगून केवळ सामाजिक नाही, तर धार्मिक-सांस्कृतिक अंगानेदेखील मुस्लिम शासकांनी बहुमोल कामगिरी बजावलेली आहे. फक्त ती लोकांसमोर आणण्याचं काम आजवर कुणी केलेलं नाही. मोरगावचं देवस्थान हे तर एक उदाहरण झालं, महाराष्ट्रातील कित्येक देवस्थानांना मुस्लिम शासकांनी मदत केलेली आहे. अगदी पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिराच्या खर्चासाठीही आदिलशहानेच उत्पातांच्या नावे सनदपत्रं लिहून दिलेली आहेत.
… तेव्हा, जर संवाद साधता येत नसेल, तर तो विसंवादाचा इतिहास हवा कशाला?

z mukundkule@gmail.com

फिरस्ती – आसनवाडीची राणी

सामना ऑनलाईन

>> प्रांजल वाघ

ट्रेकर्स आणि डोंगरातील श्वान मंडळी यांच्यातील नातं काही वेगळंच असतं. मग तो सह्याद्री असो वा हिमालय! मारठाण्याच्या आणि जांभळ्या डोंगराच्या करड्या पहाऱ्यातून सह्याद्रीच्या पठारावरील पायवाट तुडवताना आसनवाडीच्या राणीने वाटाड्या म्हणून सोबत केली. ही तल्लख डोळ्यांची कुत्री ‘राणी’ 12-15 कि.मी. चालत सोबत करीत आम्हाला चिकटली. सह्याद्रीने पदरात टाकलेला हा अनुभव खरोखर श्रीमंत करणारा होता.

ट्रेकर्स आणि डोंगरातील श्वान मंडळी यांच्यातील नातं काही वेगळंच असतं. मग तो सह्याद्री असो वा हिमालय! गेल्या 18 वर्षांत मला अनेक अनुभव आले. अनेक वेळा तर या डोंगरातील कुत्र्यांनी आम्हाला घनदाट जंगलात योग्य वाटेला लावून दिलं आहे, पण या वर्षी 20 आाक्टोबर रोजी आम्ही जेव्हा पालीजवळील डेऱ्या घाट – गाढवलोट घाटाने चढाई-उतराई करत होतो तेव्हा एक वेगळाच अनुभव आम्हाला आला. आम्ही भर उन्हात, आाक्टोबरच्या उष्म्यात हा घाट चढत होतो, पण भयंकर चिकाटीने स्वतला पुढे रेटत आम्ही पठारावर 10-12 घरटय़ांच्या एका वाडीत पोहोचलो. या वाडीचं नाव होतं ‘आसनवाडी’.

आसनवाडीत प्रवेश करताच एका मावशींकडे पाणी मागितलं. त्यांनी लगेच तांब्या भरून थंडगार पाणी दिलं. पाण्याचे घोट घशाखाली उतरताच तरतरी आली, झालेली दमछाक जवळ जवळ नाहीशी झाली. तिथून पुढे असलेल्या विहिरीजवळ विश्रांती घेऊन दुपारचं जेवण करायचं आणि मग तिथून पुढे उजवीकडे वळून मारठाण्याच्या आणि जांभळ्या डोंगराच्या करड्या पहाऱ्यातून सह्याद्रीच्या पठारावरील पायवाट तुडवायची आणि हिर्डे गावातून ‘गाढवलोट’ घाट उतरून पुन्हा पाली गाठायचं, असं ठरवलं.

मावशींचे आभार मानून आम्ही चालायला सुरुवात केली न केली तोच आमच्या मागे एक काटक, पण तल्लख डोळ्यांची एक कुत्री शेपूट हलवत आली. तिचे नाव राणी! जवळ आल्यावर हळूच तिच्या डोक्यावर खाजवलं आणि मग ती आम्हालाच चिकटली.

दूरवर घनगडावर ढग गडगडायला लागले होते. थंड वारे वाहायला लागताच आम्ही वेग वाढवला आणि विहीर गाठली खरी, पण तिथे पोहोचताच असं लक्षात आलं की, विहिरीतून पाणी काढणं अशक्य होतं. पण आजूबाजूला काही झरे आणि स्वच्छ डबकी होती. पाणी भरायला डबक्याकडे जायला बाटली काढली. तितक्यात ही राणी त्याच डबक्यात जाऊन बसली. आमच्या चौकडीने तिला सडकून शिव्यांची लाखोली वाहिली, पण त्याचं तिला काहीच नव्हतं. तिने आमच्याकडे तिच्या त्या गोड, निष्पाप डोळ्यांनी असा काही कटाक्ष टाकला की, आम्ही लगेच विरघळून गेलो. या संपूर्ण प्रवासात राणी आमच्या पावलांवर पंजे टाकत चालली होती. घनदाट जंगलातील पायवाट तुडवत, सह्याद्रीतील फुललेल्या रानफुलांचा आस्वाद घेत, घाटमाथ्यावरून सह्याद्रीचं आणि कोकणचं सौंदर्य न्याहाळीत आम्ही हिर्डी गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यावर आम्ही गाढवलोट घाटाने उतरण्यासाठी वाटाड्या शोधू लागलो. हिर्डी गाव तसं अंधारबनच्या जवळचं असल्यामुळे आम्हाला वाटाड्या लगेच मिळाला आणि त्यांनी लगेच त्यांची कुत्री बरोबर घेतली. तिने राणीला पाहताच गुरुगुरायला सुरुवात केली. आसनवाडी ते हिर्डे हा टप्पा साधारण 7-8 किमीचा असावा. ही राणी आमच्या सोबत तितका पल्ला चालत आली. आता वेळ होती गाढवलोट घाटाने उतरून पुन्हा खाली कोंडजाई गाठायची. साहजिकच आम्हाला वाटले की, राणी आता इथून परत आपल्या गावी जाईल, पण काय आश्चर्य! ही बया आमची साथ काही सोडायला तयार होईना. प्रेमाने समजावले, दरडावले, पण ती काही हटेना. घड्याळाचे काटे मावळतीकडे सरकताच आमचा नाईलाज झाला आणि आम्ही राणीसकट उतरंडीवर पाऊल ठेवलं.

सह्याद्रीचा उभा चढ उतरताना आम्हाला काही गावकरी मंडळी भेटली. ती आसनवाडीची निघाली. त्यांनी राणीला ओळखलं. समीरने त्यांना विनंती केली, “हिला परत गावी घेऊन जा. आम्ही खालून मुंबईला निघणार. मग हे अख्खं जंगल ही एकटी पार करून कशी येणार?” मग त्या जमलेल्या काकूंनी तिला बोलवायचा प्रयत्न केला, पण ही काही ऐकेना. एखाद्या जळूप्रमाणे आम्हालाच चिकटून बसली. अंधाराअगोदर खाली पोहोचणं आणि आमच्या वाटाड्याला परत हिर्डी गावात येणं महत्त्वाचे होते. मग आम्ही पुन्हा काढता पाय घेत अख्खा गाढवलोट घाट न थांबता उतरलो. सपाटी लागताच वाटाड्या मामांना त्यांची बिदागी दिली. ते निघाले तरी राणी आमची संगत सोडेना. प्राणिप्रेमी समीर हवालदिल झाला. आपली काळजी बोलवून दाखवत तो म्हणाला, “अरे, ही एकटी कशी जाईल आता गावी?” कुत्रे मलासुद्धा प्रचंड आवडतात, पण मी थोडा पाषाणहृदयी होत म्हणालो, “अरे, कुत्र्यांना कळतं सगळं. जाईल ती. काळजी नको करूस.” मी हे म्हटलं खरं, पण मलादेखील चिंता लागून राहिलेली.

कोंडजाईमध्ये लावलेल्या आमच्या गाडीकडे येईस्तोवर अंधार होऊ लागला होता. आम्ही पटापट कपडे बदलले, सामान गाडीत भरलं. एक साधा अंदाज बांधला तर ही आसनवाडीची राणी आमच्या सोबत कमीत कमीत 12-15 कि.मी. चालत आली होती. आम्ही थक्क झालो. मग आमच्या जवळ असलेलं दूध तिला आम्ही प्रेमाने दिलं. माझ्या जवळ असलेलं उकडलेलं अंडे तिला खाऊ घातलं आणि तिचे शेवटचे लाड करून गाडीत बसलो.

गाडीच्या मागील खिडकीतून आम्ही नजर टाकली तर राणी आमच्याकडे नजर लावून, शेपूट हलवीत आशेने पाहत होती, पण निघणं अनिवार्य होतं. कुणालने गाडी सुरू केली तसा समीर म्हणाला, “अरे, ती बघ आपल्या मागे पळत येतेय!” ते दृश्य पाहायचं धाडस माझ्यात नव्हतं. ती आसनवाडीला परत जाईल का? कोंडजाई ते आसनवाडीमध्ये असलेल्या घनदाट जंगलात फिरणाऱ्या हिंस्र श्वापदांच्या नजरा चुकवून ती तो पल्ला पार करेल का? अशा अनेक विचारांनी मनात गर्दी केली. इतक्यात गाडीने वळण घेतले आणि धावणारी राणी वळणाआड नाहीशी झाली. हा एक वेगळाच हृदय हेलावून टाकणारा अनुभव या वेळी सह्याद्रीने आमच्या पदरी टाकला होता.

 pranjalwagh@gmail.com

वेधक – काष्ठशिल्प संग्रहालय

सामना ऑनलाईन

>> मेघना साने

माध्यम कोणतंही असो सृष्टी आणि दृष्टी एकत्र आल्या की कलाकाराकडून वेगळं काहीतरी घडतं आणि रसिकांपर्यंत आपसूक पोहोचतं. कोलाड येथील रमेश घोणे यांचं नैसर्गिक काष्ठशिल्प संग्रहालय पाहताना असाच अद्वितीय अनुभव येतो. लाकडाच्या या कलाकृती मूर्त शैलीतलं सौंदर्यच दर्शवतात.

गणपतीपुळ्याहून रस्तामार्गे मुंबईला जाताना माणगावच्या पुकोलाड गाव लागतं. पर्यटकांनी या मार्गावर थांबून जरूर पाहावं असं रमेश घोणे यांचं नैसर्गिक काष्ठशिल्प संग्रहालय तेथे उभे आहे. एका दुमजली बंगलीत थाटलेले हे काष्ठशिल्पांचे प्रदर्शन म्हणजे झाडांच्या खोडातून नैसर्गिकपणे साकारलेल्या वस्तू आहेत. झाडे तोडली जातात, कोसळतात, पावसाळ्यात वादळांमुळे पडतात, वखारीत साठवलेली असतात. त्यातली काही टाकाऊ ठरतात. पण अशा टाकाऊतून केवळ टिकाऊच नव्हे, तर अत्यंत सुंदर अशी शिल्पं रमेश घोणे यांनी साकारली आहेत. एकाच माणसाने तयार केलेल्या या अनेक कलाकृती आपल्याला केवळ स्तिमित करून टाकतात. झाडाच्या खोडांमधून कलाकृती निर्माण करण्याचा हा छंद घोणे यांनी पन्नास वर्षं जोपासला होता. सत्तरीच्या जवळपास असताना त्यांना हृदयविकाराने गाठले आणि काळाने हिरावून नेले. पण त्यांच्या या सर्व कलाकृती आठवणी म्हणून कायमस्वरूपी जपण्याचा संकल्प त्यांचे पुत्र अमित यांनी केला आहे.

संग्रहालय पाहण्यापूर्वी आम्ही घोणे यांच्या घरी पोहोचलो. माझ्याबरोबर काही कवी मंडळीही होती. घोणे यांच्या सुनेने मानसीने आमचे स्वागत केले. खोडापासून तयार केलेल्या गुळगुळीत बैठकीवर आम्ही बसलो. आम्ही अनोळखी असूनही घरातील मंडळी आमच्याशी छान संवाद साधत होती. रमेश यांच्या पत्नी शशिकला यांचीही भेट झाली. रमेश यांच्या कलोपासनेला त्यांचा मनापासून पाठिंबा होता. रमेश यांचे नुकतेच निधन झाल्याने (सप्टेंबर 2024) घरातील मंडळी तशी दुःखात होती. आम्हाला त्यांच्या आठवणीही सांगत होती. रमेश यांच्या वडिलांची लाकडाची वखार होती. त्यासाठी झाडांची खोडं आणली जायची. त्यात रमेश यांना निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे आकार दिसू लागले व त्यातून त्यांनी कलाकृती निर्माण करायला सुरुवात केली. यासाठी फारशा अवजारांची आवश्यकता भासली नाही. कारण मूळ आकारातच त्यांना चित्र दिसत होते. थोडे फेरफार करून टीकवूड पॉलिशने पेंट केले. रमेश यांच्या ऑफिसमध्ये घोणे यांनी तयार केलेल्या विशिष्ट प्रकारच्या लाकडी खुर्च्या होत्या. त्यावर बसल्यावर पाठीला एकदम आराम मिळतो. खुर्च्या, टीपॉय, प्लांट्स ठेवण्याचे शोभेचे स्टॅन्ड अशा अनेक वस्तूंची दाटी तेथे होती. त्यातील काही वस्तू वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या घरासाठी खरेदी केल्या होत्या, असं मानसी यांनी सांगितले.

काष्ठशिल्प संग्रहालय म्हणजे वेगळी अनुभूती आहे. अनेक प्राणी, पक्ष्यांच्या हुबेहूब लाकडी कलाकृती तिथे दिसत होत्या. सृष्टी आणि दृष्टी एकत्र आली तर अशी कलाकृती घडून येते…अमित सांगत होते. गरूड, मुंगूस, घोडे यांच्या बरोबरच काही संकल्पना मांडणारी शिल्पेही होती. उदाहरणार्थ, गणपती खांद्यावर घेऊन चाललेला माणूस, हसत खेळत पावले टाकणारा मुलगा, चिंतन करणारा मुलगा इत्यादी. ही सर्व शिल्पे अखंड लाकडाची होती. काही शिल्पे संदेश देणारीही होती. आठ बाय चारच्या एका मोठय़ा लाकडाच्या पाटीवर खालच्या भागात मदत मागणारे दोन हात आणि वरच्या बाजूला बेड्या घातलेले दोन हात यातून संदेश दिला होता की, बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. तसंच एका मोठय़ा खोडावर दोन स्त्रियांची शिल्पे होती. त्यांची केशभूषा व वेशभूषा पारंपरिक दिसत होती. त्यांच्या भोवती दोरी गुंडाळलेली होती. हे सर्व लाकडाचंच बरं का! या बंधनात असलेल्या स्त्रिया होत्या. याशिवाय दीपमाळ, ड्रेसिंग टेबल अशा वस्तूही लाकडातून बनवलेल्या होत्या. हे सर्व बनविण्यासाठी साग, आंबा, फणस, खैर, चिंच अशा झाडांची खोडे किंवा फांद्या वापरण्यात आल्या होत्या. एका झाडाला तर गाठ आली होती. त्यातून गरूड साकारला होता. मुंग्यांनी पोखरलेलं झाडसुद्धा उपयोगात आणलेलं होतं. एक आश्चर्यकारक कलाकृती मला दिसली. तेथे भिंतीवर एक पोस्टाची पेटी होती. पोस्टाची पेटी घरात कशी काय? असं आश्चर्य व्यक्त केल्यावर अमितने सांगितलं की, हीसुद्धा लाकडाची कलाकृती आहे.

या सर्व कलाकृतींवर वडिलांचा जीव होता. त्यामुळे या कितीही किमती असल्या तरी मला त्या विकायच्या नाहीत, अमित सांगत होते…फक्त खुर्च्या, टीपॉय अशा उपयोगी वस्तू आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करू. बाकी सर्व कलाकृती एक संग्रहालय म्हणून जपून ठेवू. या काष्ठशिल्प संग्रहालयाचं उद्घाटन 1997 साली झालं होतं. आता नूतनीकरणानंतर नव्या स्वरूपात ते लवकरच रसिकांसाठी खुलं होणार आहे. कोकणातील हे संग्रहालय आंतरराष्ट्रीय कीर्तीचंही होऊ शकतं इतकं देखणं आहे.

भटकंती – सांस्कृतिक खिचडी

सामना ऑनलाईन

>> निमिष पाटगावकर

उत्तम समुद्रकिनारे, नैसर्गिक विविधता, त्याचबरोबर मानवनिर्मित सागरी सफरी आणि साहसी खेळ हे सर्व मॉरिशसला बघताना सारखी आठवण येते ती आपल्या कोकणाची. मॉरिशस हे जास्त जवळचे वाटते ते तिथल्या हिंदू संस्कृतीमुळे आणि प्रयत्नांनी टिकवून ठेवलेल्या मराठी भाषेमुळे. आपल्या मायभूमीपासून दूर एक चिमुकले बेट आपली संस्कृती, भाषा कशी टिकवून ठेवायची याचे जणू काही धडेच आपल्याला देत आहे.

मी जेव्हा परदेशात थोडय़ा दिवसांसाठी भटकंती करतो तेव्हा शक्यतो तिथली संस्कृती, खाद्यपदार्थ, चालीरीती आणि जमले तर तिथली भाषा यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी मनात कायम आपल्या मराठी संस्कृतीशी या बाहेरच्या जगाचा ताळमेळ चालू राहतो. कारण जे रक्तात भिनले आहे ते वेगळे करू शकत नाही. एखादा मोमो मोदकाची आठवण करून देतो, तर कधी दक्षिणपूर्व आशियात आपले देव दिसले की, आपोआप हात जोडले जातात. या सर्व ठिकाणी मराठी संस्कृतीशी जवळीक साधणारे सर्व दिसते, पण अभिजात दर्जा असलेली मराठी भाषा अर्थातच दिसत नाही. याला अपवाद एक देश आहे तो म्हणजे मॉरिशस!

मी जेव्हा मॉरिशसच्या सर सिवूसागर रामगुलाम विमानतळावर उतरलो तेव्हा सर्वात प्रथम जाणवले ते म्हणजे हिंदुस्थानीयांसाठी इथे व्हिसामुक्त प्रवेश असल्याने इमिग्रेशन अधिकाऱ्यांपासून सर्वांचे हिंदुस्थानीयांसाठी असलेले अगत्य. विमानतळावर आम्हाला न्यायला गाडी आली होती त्याचा ड्रायव्हर होता राजीव. त्याला मोडके तोडके हिंदी येत होते. आमची गाडी जेव्हा विमानतळ सोडून मुख्य रस्त्याला लागली तेव्हा मला क्षणभर मी कोल्हापूर-सांगली रस्त्यावर असल्यासारखे वाटत होते. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला उढसाचे मळे वाऱ्यावर डोलत आमच्या स्वागताला उभे होते. या उढसाशीच मराठी कनेक्शन आहे. मॉरिशस जेव्हा जगाने संपूर्ण दुर्लक्षिलेले बेट होते तेव्हा वसाहतवादाच्या काळात 1598 मध्ये डच इथे प्रथम पोहोचले आणि मानवाचा पाय या बेटाला लागला. त्याच्या राजा मॉरिसवरून याचे नाव मॉरिशस पडले. असे म्हणतात की आपल्या पुराणाशी नाते सांगणारी वेगळी कथा आहे. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा आपल्या बाणाने मारीच राक्षसाला बाण मारून शत योजने दूर उडवले तेव्हा तो एका अज्ञात बेटावर येऊन पडला. हेच ते बेट म्हणून मारीचवरून मॉरिशस नाव झाले.

डच लोकांना इथे बस्तान बसवायला जमले नाही आणि फ्रेंचांनी हे बेट काबीज केले. पुढे ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पाडाव करून हे बेट आपल्या ताब्यात घेतल्यावर इथे शेतीचे मळे फुलवायला मजूर कमी पडायला लागले. आफ्रिकेतील गुलामीचा कायदा नष्ट झाल्याने तिथूनही मजूर आणता येईनात. मॉरिशसच्या शेतमळ्यांच्या मालकांना ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून मजूर आणायला परवानगी दिली. 15 जून 1842 ला मुंबई बंदरातून 173 मजुरांना घेऊन एक जहाज निघाले. यात शंभरहून अधिक रत्नागिरी, मालवण असे कोकणातले तर कोल्हापूर, सांगलीसारखे देशावरचे मराठी मजूर होते. हिंदुस्थानातील रोगराई, दुष्काळ वगैरेना कंटाळून आपले नशीब अजमावायला हे आपल्या कुटुंबासह मॉरिशसला गेले आणि मराठी माणसांचा ओघ मॉरिशसला चालू झाला. आज इथे जवळपास 18 टक्के लोक मराठी वंशाचे असून मराठी भाषा टिकवायचे मनापासून इथे प्रयत्न केले जातात. हिंदू धर्मीयांची संख्या 53 टक्के असल्याने इथे गणपती, दिवाळी धूमधडाक्यात साजरे होतात.

इतक्या लोकांनी राज्य केल्यामुळे आणि स्थलांतरित लोकांमुळे हा देश म्हणजे एक सांस्कृतिक खिचडी झाली आहे. हॉटेलवर जाताना गाडीत जो रेडिओ चालू होता त्यात फ्रेंच भाषेतून बॉलीवूड गाण्यांची फर्माईश चालली होती, तर हॉटेलवर पोहोचल्यावर तिथल्या टीव्हीवर चॅनल बदलताना त्यांच्या सरकारी वाहिनीवर चक्क मराठी चित्रपट ‘सरकारनामा’ चालू होता. आमचे हॉटेल म्हणजे अथांग निळ्याशार समुद्राच्या काठावरचे एक सुंदर रिसॉर्ट होते. रेस्टॉरंटच्या बाहेरच्या व्हरांड्यात ब्रेकफास्टला बसले तरी समोर समुद्र दिसायचा. आम्ही ब्रेकफास्ट करत असताना तिथला एक ग्रुप येऊन आमच्या टेबलाच्या बाजूला जुनी हिंदी गाणी अतिशय सुंदर वाजवत होते. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याच्या संस्काराची मुळे त्याच्या आत्म्यात खोलवर रुजलेली असतात.

मॉरिशसमध्ये भटकंती करायची अनेक ठिकाणे आहेत आणि आपापल्या आवडीनुसार करायच्या अनेक गोष्टी आहेत. मॉरिशसचे पंपलमुसेस गार्डन हे बोटॅनिकल गार्डन आहे, पण जसजसे तुम्ही आत जाता तसे झाडांच्या विविध प्रजातींबरोबर इथे नांदणाऱया काही विशिष्ट प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते. निसर्गाचे अजून दोन अवतार बघायचे असतील तर प्रथम चॅमरेल या ठिकाणी जायला हवे. सात रंगांच्या वाळूचे मिश्रण असलेले हे नॅशनल पार्क आहे. वास्तविक ही वाळू नसून बेसॉल्ट दगडाचे वेगवेगळय़ा वाळूत रूपांतर झालेले खडक आहेत. त्याचप्रमाणे इथे एकेकाळच्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेले एक ठिकाण आहे. या टेकडीवर उभे राहिले की, एखाद्या दरीसारखा झालेला तो भाग बघायला मिळतो. निसर्गाचा अजून एक चमत्कार बघायचा असेल तर इथे सात वेगवेगळ्या रंगांच्या वाळू एखाद्या भव्य रांगोळीसारख्या नांदताना दिसतात. पोर्ट ल्युईस हे राजधानीचे शहर असून आधुनिक आहे. इथून जवळच एक किल्ला आहे, ज्यावरून पोर्ट ल्युईसचे दर्शन घडते. वसाहतवादाच्या काळात या किल्ल्याला महत्त्व होते. शहराच्या एका बाजूला कॅसिनो आहे.

हिंदू संस्कृतीचा सहवास तर अनेकदा इथे वेगवेगळ्या तऱहेने दिसतो, पण गंगा तालाब ही जागा म्हणजे एक तीर्थक्षेत्रच आहे. इथे गणपती, लक्ष्मी, सरस्वती, दत्तगुरू ते अगदी साईबाबांपर्यंत अनेक मोठमोठय़ा मूर्ती आहेत. पण हे स्थान आहे भगवान शंकरांचे. इथे शंकराची भव्य मूर्ती आहे. महाशिवरात्रीला इथे सार्वत्रिक सुट्टी असते आणि मोठा महोत्सव या गंगा तालाबवर असतो. अनेक लोक आपली कावड घेऊन इथे दूर दूर अंतराहून चालत येतात आणि शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. या परिसरात तुम्ही आलात तर एखाद्या तीर्थक्षेत्रास आल्यासारखे वाटते.

उत्तम समुद्रकिनारे, नैसर्गिक विविधता, त्याचबरोबर मानवनिर्मित सागरी सफरी आणि साहसी खेळ हे सर्व मॉरिशसला बघताना सारखी आठवण येते ती आपल्या कोकणाची. मॉरिशस हे जास्त जवळचे वाटते ते तिथल्या हिंदू संस्कृतीमुळे आणि दुरून का होईना, प्रयत्नांनी टिकवून ठेवलेल्या मराठी भाषेमुळे. अनेक भाषांच्या खिचडीतही मराठीपण इथे टिकवून ठेवले आहे. आपल्या मायभूमीपासून दूर एक चिमुकले बेट आपली संस्कृती, भाषा कशी टिकवून ठेवायची याचे जणू काही धडेच आपल्याला देत आहे.

npatgaonkar@yahoo.com

आगळंवेगळं – ओडिशाचे पहिले हेरिटेज गाव

सामना ऑनलाईन

>> वर्षा चोपडे

रघुराजपूर हे पुरी जिह्यातील एक हेरिटेज क्राफ्ट व्हिलेज. 2000 मध्ये संशोधन आणि दस्तऐवजीकरण प्रकल्पानंतर, ओडिशाचे पहिले हेरिटेज गाव म्हणून या गावाचा विकास करण्यात आला. पट्टचित्र कलेचे उगमस्थान मानले जाणाऱया गावात पारंपरिक हस्तकलेशी निगडित अनेक गोष्टी बघायला मिळतात.

हिंदुस्थान विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशातल्या ओडिशा राज्यावर कलिंगाचे प्राचीन राज्य होते, ज्यावर मौर्य सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 261 मध्ये आक्रमण केले होते, ज्याचा परिणाम कलिंग युद्धात झाला होता. ओडिशाच्या आधुनिक सीमांचे सीमांकन ब्रिटिश भारतीय सरकारने केले होते, ओरिसा प्रांताची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी करण्यात आली होती. असे हे ऐतिहासिक प्राचीन ओडिशा राज्य कला आणि संस्कृतीचे माहेरघर आहे.

जगन्नाथ पुरी, भुवनेश्वर, चिलिका लेक, कोणार्क सूर्यमंदिर, गोपालपूर, हिराकूड डॅम, भीतर्कनिक नॅशनल पार्क आणि इतर अनेक पर्यटनस्थळे ओडिशाच्या सौंदर्यात भर घालतात. ओडिशा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, पण जगन्नाथपुरी आणि सूर्यमंदिरासाठी ओडिशा जगभर प्रसिद्ध आहे. जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील विष्णूचे रूप असलेल्या जगन्नाथ देवाला समर्पित मंदिर आहे. स्थानिक दंतकथा या मूर्तींचा संबंध आदिवासी जमातींशी जोडतात आणि दैतपती (सेवक) आदिवासींचे वंशज असल्याचा दावा करतात. पौराणिक कथांनुसार, पहिल्या जगन्नाथ मंदिराचे बांधकाम महाभारत आणि पुराणांमध्ये उल्लेखित मालव राजा इंद्रद्युम्न याने केले होते. हे मंदिर वार्षिक रथयात्रा किंवा रथोत्सवासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तीन प्रमुख देवता भगवान जगन्नाथ, बलराम, सुभद्रा मोठय़ा आणि विस्तृतपणे सजवलेल्या रथांवर ओढल्या जातात. ही पूजा भिल, साबर आदिवासी पुजारी, तसेच मंदिरातील इतर समाजाचे पुजारी करतात.असे म्हणतात की, भगवान कृष्णाचे हृदय येथील कडुनिंबाच्या लाकडाच्या मूर्तीत आहे आणि लाकडाने बनवलेल्या सामग्रीमुळे हृदयाला नुकसान होऊ नये, म्हणून दर सात वर्षांनी ते बदलावे लागते. त्याचे इतरही काही कारण असावे, पण मूर्ती बदलली जाते. हे मंदिर सर्व हिंदूंसाठी आणि विशेषत वैष्णव परंपरेतील लोकांसाठी पवित्र आहे. चैतन्य महाप्रभू पुरीमध्ये अनेक वर्षे वास्तव्य करत होते.

याच मंदिरापासून चौदा किलोमीटर अंतरावर रघुराजपूर हे गाव आहे. रघुराजपूर हे पुरी जिह्यातील एक हेरिटेज क्राफ्ट व्हिलेज आहे. 2000 मध्ये, INTACH द्वारे दोन वर्षांच्या संशोधन आणि दस्तऐवजीकरण प्रकल्पानंतर ओडिशाचे पहिले हेरिटेज गाव म्हणून विकसित करण्यासाठी आणि हेरिटेज क्राफ्ट व्हिलेज म्हणून विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली. हस्तकला गुरू डॉ. जगन्नाथ महापात्रा एक प्रमुख पट्टचित्र कलाकार यांचे जन्मस्थान आहे आणि त्यांनी पट्टचित्र कला आणि रघुराजपूर गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.

तीर्थक्षेत्र पुरी येथे भरणाऱया वार्षिक रथयात्रा उत्सवा दरम्यान भगवान जगन्नाथाच्या सिंहासनाखाली आणि तीन रथांवर वापरल्या जाणाऱया पाटस नावाच्या पारंपरिक सजावटीचे एकमेव ठिकाण असण्याचाही या गावाला मान आहे. याव्यतिरिक्त, गावात तुसार पेंटिंग, पाम लीफ कोरीविंग, दगडी कोरीव काम, लाकूड कोरीव काम, गोबर खेळणी, पेपियर-मॅश खेळणी आणि मुखवटे यांसारख्या हस्तकलेचे कामही घरोघरी चालते.

नारळ, ताड, आंबा आणि फणसाच्या झाडांमध्ये वसलेल्या या मुख्य गावात दोन रस्त्यांचा समावेश आहे. 120 हून अधिक घरे आहेत. त्यापैकी बहुतेक भित्तीचित्रांनी सजलेली आहेत. येथे चित्रकार राहतात आणि त्यांच्या पट्टचित्राचा सराव करतात. याशिवाय इतरही अनेक गोष्टी सर्वत्र प्रचलित आहेत. पारंपरिक मुखवटे, दगडी शिल्पे, पेपियर माश, शिल्पे आणि लाकडी खेळणी, देवता भुसुनी, राधामोहन, गोपीनाथ, रघुनाथ, लक्ष्मीनारायण आणि गौरांगासह विविध हिंदू देवतांना समर्पित चित्रेही फार प्रसिद्ध आहेत. पट्टचित्रे पट्टा किंवा वाळलेल्या खजुराच्या पानावर ओळखल्या जाणाऱया कापडाच्या तुकडय़ावर बनवल्या जातात. ज्याला प्रथम खडू आणि डिंकाच्या मिश्रणाने रंगवले जाते. तयार केलेल्या पृष्ठभागावर विविध देवी, देवता आणि पौराणिक देखावे यांची रंगीत आणि गुंतागुंतीची रेखाचित्रे फुले, झाडे आणि प्राणी यांच्या सजावटीने रंगवली आहेत. टसर साडय़ांवरील चित्रे, विशेषतः मथुरा विजय, रासलीला आणि अयोध्या विजय यांचे चित्रण करणाऱया संबळपुरी साडय़ा, ‘रघुराजापूर पट्टचित्र पेंटिंग’मधून चित्रित केल्या जातात. या चित्रकला डोळ्याचे पारणे फेडतात. जगन्नाथ पुरीला गेलात तर या कलेचे माहेर असलेल्या गावाला नक्की भेट द्या.

varshakisanc@gmail.com
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

निसर्गभान- पठारावरची रानफुलं

सामना ऑनलाईन

>> जे. डी. पराडकर

कास पठारावरील सौंदर्याच्या तुलनेत कोकणची पठारंदेखील आपलं महत्त्व अधोरेखित करतात. सध्या कोकणातील पठारं विविध रंगांच्या रानफुलांनी बहरलेली असल्याचे पाहायला मिळतात. वाऱ्याच्या मंद झुळकांवर आनंदाने डोलणारी रानफुले पाहिली की, निसर्गाच्या सौंदर्याची खरी अनुभूती येते.

उन्हाळ्यात आपले भेसूर रूप दाखवणारे उंच आणि भलेमोठे कातळ रात्रीच्या वेळी भीतीदायकच वाटतात. माणसाच्या मनात उमटणाऱ्या विविध आकृत्या या विशाल कातळांकडे पाहताच त्यावरदेखील उमटत असल्याचा भास होऊ लागतो. कातळ उभा असो अथवा विस्तीर्ण पसरलेला, त्याचा कठीणपणा नजरेलाही जाणवतो. रखरखीत उन्हात कुरूप दिसणाऱया या कातळांनाही कधीतरी सजावसं वाटतं. अशी संधी या कातळांना वर्षातून एकदाच मिळते. पाऊस कमी होऊन ऊन पडू लागताच हिरवेगार असणारे कातळ सडे आनंदित होतात. त्यांना होणारा आनंद म्हणजेच विविध आकारांची आणि रंगांची लहानमोठी रानफुले.

निसर्गामध्ये असणारी कमालीची ताकद यानिमित्ताने दिसून येते आणि सृष्टी या भूतलावरील खरा जादूगार असल्याची अनुभूती येऊ लागते. श्रावण महिन्यापासून सुरू झालेला हा रानफुलांचा हंगाम पुढे आश्विन महिन्यापर्यंत कायम असतो. हे तीन मराठी महिने हिंदू संस्कृतीत व्रतवैकल्ये आणि विविध सणांचे असल्याने सृष्टी मानवाला असंख्य फुले उपलब्ध करून मानवापुढे कृतज्ञता व्यक्त करत असते. सध्या सर्वत्र कोकणातील पठारं विविध रंगांच्या रानफुलांनी बहरलेली असल्याचे पाहायला मिळते.

उन्हाळ्यात रखरखीत भासणारे हे सगळे पावसाळ्यात मात्र कात टाकू लागतात. कोकणातील सड्यांवरील कातळ जांभा असल्याने तो काळ्या कातळाच्या तुलनेत नरम असतो. या जांभ्या दगडाचा उपयोग घरबांधणीसाठी केला जात असल्याने अनेक ठिकाणी सडय़ांवर जांभ्या दगडाच्या उत्खननासाठी खाणी लावल्या जातात. या उत्खननामुळे सडय़ांवरील पावसाळ्यातले हे सौंदर्य काहीसे बाधित होऊ लागले आहे.

ऊन-पावसाच्या खेळांतून पडणारे इंद्रधनुष्य, त्याच्या जोडीने डोंगररांगांमधून दाटून येणारे दाट धुके, त्यातूनच अवचितपणे पडणारे सोनेरी ऊन… अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीमध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागांतील कातळ परिसर विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी खुलला आहे. एरवी काळा तुळतुळीत, काहीसा भेसूर आणि कोरडा दिसणारा कातळ परिसर सध्या आकर्षक फुलांनी असा काही खुलून गेला आहे की, पाहणाऱयाच्या नजरेचे पारणे फिटावे. सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपटय़ांवर फुललेल्या फुलांनी खुललेले निसर्गसौंदर्य मनामध्ये साठविण्यासाठी पर्यटकांची पावले त्याकडे वळली नाहीत तर नवलच.

प्रत्येक पठाराचं महत्त्व जरी भिन्न असलं तरी कास पठारावरील सौंदर्याच्या तुलनेत कोकणची पठारंदेखील आपलं महत्त्व अधोरेखित करत आहेत. कोकणातील प्रत्येक पठारावरील कातळावर पावसात आणि विशेषत: श्रावण महिन्यात फुलणारी रानफुलं भिन्न प्रकारची आहेत. निसर्गाच्या या सौंदर्याला बाधित न करता पर्यटनदृष्टय़ा त्याचे महत्त्व वाढविणे प्रशासनाला अद्याप न जमल्याने कोकणचे हे सडे अप्रतिम सौंदर्याने नटूनदेखील पर्यटकांपासून मात्र वंचित राहात आहेत. ठिकठिकाणी उंचावून कोसळणारे धबधबे आणि त्याच्या जोडीने निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल नजरेचे पारणे फेडते.  गेल्या काही दिवसांपासून कातळ परिसर मात्र रंगीबेरंगी फुलांनी साजशृंगार केल्यासारखा सजला आहे. अशाच प्रकारची सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपटय़ांना निळय़ाशार रंगाच्या फुलांसह अन्य फुले आली आहेत. आता फुलांना  बहर आला असून निळ्या-जांभळ्या-पांढऱया रंगाच्या या फुलांचे सौंदर्यही चांगले खुलले आहे. इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे सप्तरंगांची फुले माळरानांवर आपले अधिराज्य गाजवत आहेत. खरं तर कोकणच्या माळरानांवर फुलणारी ही रानफुले म्हणजे निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांना एक सुवर्णसंधीच मानली पाहिजे. यातील असंख्य फुलांचे अजूनही नामकरण होणे बाकी असेल. कोकणच्या माळरानावर सध्या सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी, सोनवेल, कर्टूल, सोनतळ, शेरवड, कुडा, कोरंटी, गायरी, गोवीळ, गांधारी, कोंडानी, भेंद्री, हळुदा, तेरडा, दूधवेल, नावळी, हरणतोंडी, कळलावी, रानहळद, कवळा, घाणेरी, रानमोडी, कोसमोस, कारवी (ही नऊ वर्षांतून एकदा फुलते) डिकेमाळी, टोपली, सोनकी, गवळण, कुमुदिनी, गंधारी, अग्निशिखा यांसह अनेक प्रकारची रानफुले बहरलेली पाहायला मिळत आहेत. कोकणात येणाऱया पर्यटकांसाठी निसर्गसौंदर्याच्या अभ्यासाची ही एक अनोखी पर्वणी ठरत आहे.

खाऊगल्ली – गिरगावच्या खानावळी अन् थाळ्या

सामना ऑनलाईन

>> संजीव साबडे

जवळपास 35 वर्षं गिरगावच्या परिसरात आाफिस होतं. त्यामुळे तिथल्या शाकाहारी व मांसाहारी रेस्टॉरंटची चव जणू पाठ झाली होती. राजा राममोहन रॉय रस्त्यावरचं व्हॉइस ऑफ इंडिया, श्रीराम बोर्डिंग, मॉडर्न लंच होम, ठाकुरद्वारच्या नाक्यावरलं सत्कार, चिरा बाजारातलं चर्च रेस्टॉरंट, खत्तर आळीतलं मराठी खानावळ, पुढे अग्यारी लेनची मराठा खानावळ आणि नंतर स्रू झालेली मालवणी स्वाद, सायबिणी गोमांतक अशी किती तरी. यात शाकाहारीचा उल्लेख केला तर आणखी 40 रेस्टॉरंटची नावं तरी लिहावी लागतील. तरीही अद्याप स्रू असलेल्या चाफेकर, पणशीकर, कोल्हापुरी चिवडा, विनय, मनोहर, मेवाड, प्रकाश दुग्ध मंदिर, तांबे, न्यू आनंद भुवन, सेंट्रल लंच होम, राजा, बंद झालेले वीरकर, कोना, मॉडर्न आणि मांसाहारी अनंताश्रम, लीलाधर ही यादीही मोठी होईल.

गिरगाव चर्चच्या रांगेत जरा पुढे असलेलं श्रीराम खूप जुनं आणि मासे खाणाऱ्याचं अत्यंत प्रिय व आवडतं ठिकाण. सर्व प्रकारचे मासे, त्यांचं कालवण वा तव्यावर तळलेले तुकडे तिथे मिळतात. जणू गोपी टँकचा मासळी बाजारच. कोळंबी, पापलेट, बांगडा, तिसऱया, रावस, जिताडा, जवळा, मोरी, माकूळ, सुरमई, हलवा, खेकडे अगदी सर्व काही. सर्वांचं कालवण एकाच प्रकारचं नसतं. तर त्याची चव माशानुसार बदलते. मासे न खाणाऱयांसाठी चिकन आणि मटण यांचे असंख्य प्रकार यांच्या मेन्यूमध्ये आहेत. इथे जेवायला मांसाहारी लोकच येतात, पण त्यांच्यासह येणाऱ्या शाकाहारींसाठीही बरेच प्रकार आहेत. गिरगावात थाळी हा प्रकार लोकप्रिय. नव्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा श्रीराम बऱ्यापैकी स्वस्त आहे. चर्चच्या आधी नाक्यावर व्हॉइस ऑफ इंडिया हे मस्त आणि स्वस्त रेस्टॉरंट. अनेक मित्रांच्या सुलेमानी चहा पीत मैफली रंगण्याचं हे ठिकाण. इथलं मटण व चिकन अप्रतिम. फक्त तेल कमी असं सांगावं लागतं. इथे ऑम्लेट पाव खाण्यासाठी येणाऱयांची संख्याही मोठी. शाकाहारी मंडळींसाठी शेजारी मनोहर आहे. तिथली पावभाजी खूप प्रसिद्ध. पावभाजीसाठी ते जो चटणीसारखा मसाला तयार करतात, तो तर अप्रतिम. त्याच्या पलीकडे मेवाड हॉटेल. पूर्वी दुपारी गरमागरम मिसळ आणि ताजे पाव खाण्यासाठी तिथे गर्दी असे. खिशात कमी पैसे असले की तेच आसरा.

चर्चच्या समोर मॉडर्न लंच होम. छोटंसं, पण जेवण उत्तम आणि दरही बऱयापैकी वाजवी. अनेकजण इथे सुरमई थाळी वा बोंबील थाळी मागवतात. काही जण मांदेली थाळीचे शौकीन. इथेही श्रीराम बोर्डिंगप्रमाणे समुद्रात सापडणारे सर्व जीव मिळतात. परवडणारी मटण थाळी, चिकन थाळीही आहे. तीन-चार जण गेले तर माशांचे दोन प्रकार, एखादा चिकन वा आवडीनुसार मटणाचा प्रकार असेल तर जिभेचे चोचले एकदम पूर्ण होतात. इथे पंजाबी व चायनीज प्रकारही मिळतात. चर्चकडून जगन्नाथ शंकरशेट मार्गावर काळबादेवीच्या दिशेला चालू लागलात की एक किलोमीटरवर नाथ माधव पथवर खत्तर गल्लीपाशी मराठी खानावळ आहे. इथले जेवणही उत्तम. इथली जवळा भाजी, जवळा फ्राय, खेकडा मसाला, बांगडा, पापलेट, सुरमई असलेली त्यांच्या भाषेत मच्छी कढी खास. इथली चिकन वा मटण बिर्याणी ही लखनवी वा हैदराबादी बिर्याणीपेक्षा पूर्ण वेगळी. किंचित तिखट. तसंच मटण, चिकन व वडे खूपच छान आहेत.

शाकाहारी हवं असेल तर जगन्नाथ शंकरशेट रोडवर आसपास पणशीकर व कोल्हापुरी चिवडा आहे आणि ठाकुरद्वारात वैद्य वाडीत बी. तांबे यांचं सुजाता आहे. ठाकुरद्वारातच विनय हेल्थ होम. प्रचंड मेन्यू आहे तिथे. या चारही ठिकाणी मिळणारा वडा, पियुष, मिसळ हे पदार्थ मन तृप्त करतात. ठाकुरद्वारात, म्हणजे बाबासाहेब जयकर मार्गावर शिरलात की लगेच डाव्या बाजूला आहे सत्कार रेस्टॉरंट. मत्स्यप्रेमी मंडळींचं विशेष आवडतं. ठाकूरद्वारच्या सत्कारमध्ये चिकन व मटणाचेही असंख्य प्रकार आहेत. शाकाहारी मंडळींसाठी काळ्या वाटाण्याची उसळ व अन्य अनेक प्रकारही आहेतच. पुढे काळबादेवीच्या दिशेने जाताना दादीशेठ अग्यारी लेनच्या परिसरात मराठा हॉटेल आहे. तेही मांसाहारी जेवणासाठीच प्रसिद्ध. आसपासच्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा इथले दर आणखी कमी आहेत आणि चवही छान. थाळी घेतली तर सुमारे अडीचशे/तीनशे रुपयांत दोघांचं जेवण होतं.

त्याच परिसरात आहे चर्च रेस्टॉरंट आहे. तिथे जवळच सेंट झेविअर चर्च असल्याने रेस्टॉरंटच्या नावातही चर्च आलं आहे. बरंच जुनं रेस्टॉरंट. बाहेरून ते इराण्याचं असावं असं वाटतं. हेही सामान्यांना परवडणारं ठिकाण. इथल्या जेवणात मासे आहेत. पण मटण, खिमा, मटण करी, सुकं मटण, चिकन व अंडय़ाचे अनेक प्रकार मिळतात. इथेही जेवण स्वस्तात होतं. लॅमिंग्टन म्हणजे भडकमकर मार्गावर असाल तर अमृत पंजाब व शबनम रेस्टॉरंटला नक्की भेट द्यावी.

आता गिरगावातली मराठी लोकसंख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे शाकाहारी व जैन खाद्यपदार्थांचा प्रभाव वाढतोय.

sanjeevsabade1@gmail.com

सृजन संवाद – शत्रुघ्नाचा राज्याभिषेक

सामना ऑनलाईन

>> डॉ. समिरा गुजर जोशी

काही व्यक्तिरेखा अशा असतात की, त्या खूप महत्त्वाच्या असूनही त्यांच्याविषयी फार तपशील सांगितले जात नाहीत. त्या तशा गौणच राहतात. असेच काहीसे शत्रुघ्नाबद्दलदेखील म्हणता येईल. रामासह लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत हे चार बंधू. शत्रुघ्न हाही सुमित्रेचा मुलगा. म्हणजे लक्ष्मणाचा जुळा भाऊ. पण त्याचे आणि भरताचे साहचर्य अधिक दिसते. रामाची सावलीसारखा पाठराखण करणारा लक्ष्मण आपल्याला सुपरिचित. रामाच्या अनुपस्थितीत राज्य सांभाळणाऱया भरताचे कर्तृत्वही सगळ्यांना माहीत आहे. पण त्या तुलनेत शत्रुघ्नाबद्दल आपल्याला कुठे काय ठाऊक असते? म्हणूनच उत्तरकांडात येणारा शत्रुघ्नाच्या राज्याभिषेकाचा हा प्रसंग वेगळा म्हटला पाहिजे.

राम अयोध्येत परत आल्यानंतर सुविहित पद्धतीने रामराज्य सुरू झाले. एके दिवशी त्याच्या राजसभेमध्ये अचानक काही ऋषी आले. यमुनेच्या तीरावर राहणारे ते काही समस्या घेऊन आले होते. रामाने त्यांना काय अडचण आहे हे विचारले. त्यांनी सांगितले की, तू रावणाचे पारिपत्य केल्याचे ऐकून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. ज्याप्रमाणे दंडकारण्यात ऋषींवर आक्रमणे होत होती, ते करत असलेल्या यज्ञांमध्ये विघ्ने आणली जात होती तशीच परिस्थिती यमुनेच्या तीरावरही उद्भवली आहे. त्यांना लवण नावाचा असुर त्रास देत असे. तू जसे रावणाला पराभूत केले त्याचप्रमाणे या लवणालासुद्धा पराभूत करावे अशी प्रार्थना घेऊन ते आले होते. या लवणासुराकडे त्याच्या वडिलांपासून आलेला शिवाचा एक अतिशय प्रभावी असा भाला (शूल) होता. या भाल्याचे वैशिष्टय़ असे की, तो कोणावरही फेकला की त्या माणसाची राख करून तो परत लवणासुराच्या हाती येत असे. या दिव्य भाल्यामुळे त्याची ताकद इतकी वाढली होती की, तो कोणालाच जुमानेसा झाला होता.

प्रभू श्रीरामांनी त्या ऋषींना अभयदान दिले व मी त्या असुराचा बंदोबस्त करेन, असे वचनही दिले. कोण त्याला मारायला तयार आहे असा प्रश्न श्रीरामांनी राजसभेत उपस्थित केला. भरताने आपण हे कर्तव्य बजावू शकतो हे लगेचच सांगितले. पण त्याच वेळी शत्रुघ्नही उभा राहिला. भरताने गेली 14 वर्षे राज्य सांभाळले आहे. आत्ताच तो त्या जबाबदारीतून मोकळा झाला आहे. त्याने ही मोहीम हाती घेण्यापेक्षा मला ही जबाबदारी द्यावी, असे मत त्याने व्यक्त केले. श्रीरामांनी त्याचे म्हणणे मान्य केले, पण ते म्हणाले, ही मोहीम तू सांभाळायची. इतकेच नव्हे, तर तो प्रदेश जिंकून तेथील राज्यकारभार तू पाहावास असे मला वाटते. त्यासाठी आताच मी तुला अभिषेकही करणार आहे. म्हणजे ही मोहीम खरे तर अयोध्येच्या राज्याच्या विस्ताराची मोहीम आहे. पण श्रीराम शत्रुघ्नाला केवळ सेनापती म्हणून पाठवत नाही आहेत. तर त्या विस्तारित राज्याचे राज्यपद त्याला देत आहेत. आजच्या काळात असे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. उलट सगळे अधिकार आपल्या हातात ठेवण्याची धडपडच सर्वत्र दिसून येते.

शत्रुघ्नाने मात्र लगेच या प्रस्तावाचा स्वीकार केलेला नाही. “भरत थोरला असताना मी हे पद कसे स्वीकारू? मला अशा धर्मसंकटात टाकू नका,’’ असे त्याने सांगितले आहे.

प्रभू श्रीरामांनी विश्वासाने ही जबाबदारी त्याच्यावर सोपवली. त्याला लगेचच राज्याभिषेकही करवून घेतला. कारण हे राज्य त्याला आयते मिळणार नव्हते. लवणासुरासारख्या अतिशय ताकदवान असुराचा पराभव करूनच हे राज्य त्याला प्राप्त होणार होते. प्रभू श्रीरामांनी त्याला एक खास शस्त्र दिले. हे अतिशय संहारक असून अंतिम पर्याय म्हणून हे वापर असे सांगितले.

ह्या मोहिमेचे आणि शत्रुघ्न आणि लवणासुर यांच्यामध्ये झालेल्या द्वंद्वयुद्धाचे अतिशय सुंदर वर्णन उत्तरकांडात वाचायला मिळते. शेवटी रामाने दिलेल्या संहारक अस्त्राच्या सहाय्याने शत्रुघ्नाने त्या असुराचा पराभव केला. त्यानंतर प्रसन्न होऊन च्यवन ऋषींनी त्याला सांगितले की, तू वर माग. शत्रुघ्नाचे मोठेपण त्याने मागितलेल्या वरामधून कळते. तो म्हणाला, “लवणासुराचे वडील मधु यांनी वसवलेली मधुपुरी आता मी माझी राजधानी करणार आहे. एक सुंदर नगरी वसवण्यात मी यशस्वी होईन असा मला वर द्या.’’ त्याने या परिसराचा कायापालट केला. शूर सैनिकांच्या वस्त्या वसवल्या. गावे वसवली. शेतीचा विकास केला. लोकांना प्रोत्साहन देऊन व्यापार उदीम सुरू केला. एखाद्या भू-भागाचे पुनर्वसन कसे करावे याचे आदर्श वर्णन या निमित्ताने केले आहे. रामायणात या नगरीचे नवे नाव मधुरा असे आले आहे. ती आजची मथुरा नगरी होय. आजही मथुरेच्या जवळ असलेल्या माहुली नावाच्या गावामध्ये लवणासुराची गुहा आणि शत्रुघ्न मंदिर पाहावयास मिळते. शत्रुघ्नाची एक पराक्रमी राजा आणि उत्तम प्रशासक म्हणून ओळख खास म्हणायला हवी.

samira.gujar@yahoo.com

सीतास्वरुपा – सर्वगुणसंपन्न सीता

सामना ऑनलाईन

>> वृषाली साठे

सीतामाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना अनेक प्रश्नांची उत्तरे या कथेमार्फत आपल्याला मिळताना दिसतात. गुणवर्णन ऐकताना आपण त्या गुणांना स्वतमध्ये आकर्षित करतो. सीतामाईचे हे विविध पैलू मीनाक्षी म्हणजेच लेखिका डेना मॅरिअम, ज्या पूर्वजन्मी सीतामाईच्या दासी होत्या, त्यांच्याकडून जाणून घेत आहोत.

आपण पाहिलं की, सीतामाईचा जन्म संपूर्ण पृथ्वीसाठी झाला. जनकबाबा आणि सुनयना मातेची ती लाडकी लेक होतीच. पण सर्व मिथिलावासीही तिच्यावर खूप प्रेम करत होते. कारणही तसेच होते. सीतामाईचा पायगुणच चांगला होता. मिथिलेतील दुष्काळ संपला होता. अन्नधान्याची कमतरता नव्हती. सर्वत्र सुखसमृद्धी भरून वाहत होती. राजवाडय़ात तर सगळे सतत सीतामाईच्या अवतीभवती राहण्याचा प्रयत्न करायचे. एक गंमत होती की, या लहान बाळाची प्रभाव इतका विलक्षण होता की सर्वजण तिला सीतामाई म्हणूनच हाक मारायचे. बाळ इतके अद्भुत होते की जे जनकबाबा जंगलात ऋषी मुनींच्या सहवासात त्यांचा वेळ जास्त घालवायचे ते आता बाळ घरी आल्यापासून एक वर्ष कुठे बाहेरच गेले नाहीत. अर्थात जगन्माता नारायणीच्या बाळलीला बघण्याचे सौख्य कोणी का सोडेल?

पण जेव्हा सीतामाई एक वर्षाची झाली, तेव्हा मात्र एक दिवस जनकबाबा जंगलात ऋषींच्या आश्रमात जायला निघाले. सीतामाईने त्यांच्या पायाला मिठी मारली व नंतर आपले दोन्ही हात उंचावून मला पण घेऊन चला असे म्हणू लागली.

सुनयना मातेला इतक्या लहान मुलीला जंगलात जाऊ द्यावे हे काही बरोबर वाटेना. सीतामाईचे मन दुखवायला नको असे बाबांनी समजावले. जेव्हापासून सीतामाई राजवाडय़ात आल्या तेव्हापासून बाबांनी मीनाक्षीला सीतामाईची देखभाल करण्याचे काम दिले. त्यामुळे जनकबाबा आणि सीतामाईसोबत मीनाक्षीदेखील जंगलात गेली.

जनक महाराज ऋषींबरोबर विचारविनियम करत एका कुटीमध्ये होते. तर एक वर्षाच्या सीतामाईंना सांभाळत मीनाक्षी दुसऱया कुटीमध्ये होती. मीनाक्षीला मध्येच डोळा लागला. उठल्यावर बघते तर सीतामाई तिथे नव्हत्या. ती धावत हे जनकबाबांना सांगायला गेली तर तिथे तिने पाहिले की जनकबाबांच्या शेजारी जमिनीवर सीतामाई झोपून गेली आहे. जनकबाबा म्हणाले की, ती स्वत चालत इथे आली आणि माझ्या व ऋषींच्या चर्चा ऐकत झोपून गेली. एक वर्षाचे बाळ पण किती शांतपणे चर्चा ऐकत होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते, कारण ती प्रत्यक्ष नारायणी होती. केवळ पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी तिने मानवी जन्म घेतला होता.

जेव्हा जेव्हा जनकबाबा जंगलात जायचे तेव्हा तेव्हा सीतामाई त्यांच्याबरोबर जायच्या. एकदा अशाच सीतामाई 2-3 वर्षांच्या असताना जंगलात गेल्या असताना त्या एका झाडाकडे बोट दाखवून जनकबाबांना काही सांगू पाहात होत्या. जनकबाबांना समजेना, पण जवळ जाऊन बघितले तर एक पिल्लू जखमी अवस्थेत पडले होते. सीतामाईने त्याला उचलून घेतले. सीतामाईला प्रकृतीमधील प्रत्येकाचे दुःख जाणवायचे व ते दुःख दूर करायला त्या धडपड करायच्या.

आजकाल आपण आत्मकेंद्री बनत चाललो आहोत. ही अशी संवेदनशीलता आपल्यात नाही तर आपण लहान मुलांना काय शिकवणार? लहानपणापासून सीतामाई ध्यान करायच्या. खूप आनंद झाला असेल तरी ध्यान. दुःख झाले तरी ध्यान. ध्यान करून त्या प्रकृतीशी सतत कनेक्ट करायच्या. ही गोष्ट आज खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने रोज सुरुवातीला किमान 10 मिनिटे जरी मेडिटेशन करायला हवे. मानसिक शक्तीचा विकास केवळ ध्यानाने होतो.

एकदा अशीच सीतामाई मीनाक्षीबरोबर जंगलात गेली होती. पण आश्रमात न जाता ती जंगलाकडे पळत गेली. पाठोपाठ मीनाक्षी तर होतीच. ती एका पक्ष्यांच्या थव्याजवळ गेली. त्यांच्याशी बोलू लागली. बोलून झाल्यावर पुन्हा जंगलात गेली. तिथून तिने औषधी वनस्पती आणली. जनकबाबांनी त्याबद्दल विचारताच ती म्हणाली की, आश्रमातल्या एका ऋषींचे पोट खूप दुखत होते. म्हणून ती औषधी वनस्पती आणायला जंगलात गेली. त्याची माहिती पक्ष्यांनी तिला दिली. ज्या ऋषीचे पोट दुखत होते त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. कारण त्यांचे पोट दोन दिवसांपासून दुखत होते आणि त्यांनी कोणीलाही ते सांगितले नव्हते.

जनकबाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते समजून गेले की ही नारायणी या जगातील दुःख दूर करायला आली आहे. हे माझे परम भाग्य की मी हिचा पिता आहे. यातून आपल्याला सीतामाईचे व्यक्तित्व उलगडत जाते. कशा प्रकारे त्या प्रकृतीशी कनेक्टेड होत्या. कोणी न सांगताही त्यांना दुसऱयांचे भाव समजत होते. त्यांना फक्त माणसांशीच नाही, प्राणी, पक्षी, झाडे, निसर्गाशीसुध्दा संवाद साधता यायचा.

अजून एक प्रसंग मीनाक्षी सांगते. एकदा सीतामाईला जंगलात जाऊन खूप वेळ झाला. ती परत आली नाही म्हणून जनकबाबा आणि मीनाक्षी शोधायला गेले. तर जंगलात एका झाडाखाली एका मोठय़ा माकडिणीच्या मांडीवर सीतामाई डोके ठेवून झोपली होती. त्या दोघांना बघताच माकडीण पळून गेली. सीतामाईना विचारले तर तिने सांगितले की, या माकडिणीचे पिल्लू काल झाडावरून पडून मेले. ती खूप दुःखी होती. म्हणून सीतामाई तिला सांत्वना देत होती. ते बघून जनकबाबांच्या डोळ्यातून पाणी आले. बघा सीतामाई दुसऱयाचे दुःख बघू शकत नाही.

आज आपण हे प्रकृती (निसर्ग) बरोबरचे कनेक्शन हरवून बसलो आहोत. `अन्टोल्ड स्टोरी आाफ सीता’ या पुस्तकाच्या निमित्ताने आपण मनाने प्रकृतीच्या जवळ गेलो तर सीतामाईला ते खूप आवडेल. सीतामाई एकदा आठ-नऊ वर्षांची असताना तिला आणि जनकबाबांना एका आश्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवले होते. सीतामाई आश्रमात यायला तयारच होईनात. सगळे ऋषी-मुनी विचारायला लागले की तुम्ही आत का येत नाही? त्यावर सीतामाई म्हणाल्या की, हा आश्रम बांधताना तुम्ही किती झाडे तोडलीत? प्रकृतीचा नियम आहे, तुम्ही जेवढे प्रकृतीकडून घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला प्रकृतीला द्यावे लागेल. म्हणजे जेवढी झाडे तोडाल, त्याच्या दुप्पट झाडे तुम्हाला लावावी लागतील. बघा आजच्या काळात आपण एवढा विचार तरी करतो का? आपल्याला फक्त घ्यायचे माहीत आहे. सीतामाई त्या काळात शिकवत होती की, प्रकृतीकडून कधीही काहीही फुकट घेऊ नये.

यानंतर या कहाणीत एका महत्त्वाच्या पात्राचा प्रवेश होतो, आणि तो म्हणजे सोमा. सोमा सीतामाईपेक्षा एक-दोन वर्षांनी मोठी असेल. ती जेव्हा काम मागण्यासाठी राजवाडय़ात आली तेव्हा जनक बाबांनी तिला सीतामाईची सखी म्हणून काम करायला सांगितले. सोमा आणि सीतामाई यांच्यातला संबंध अद्वितीय होते. दोघींनाही एकमेकांच्या मनातले काही न सांगता कळायचे. सीतामाईंना गोड खावेसे वाटले तर सोमा गोड बनवायची. सीतामाईंना एखादे फळ खावेसे वाटले की सोमा ते फळ त्यांच्यासमोर आणून ठेवत असे. त्या दोघींचा संबंध अद्वितीय होता. आजकाल आपण ज्याला मेंटल टेलिपथी म्हणतो, अगदी तसेच. जशी कथा पुढे जाते तेव्हा सोमा हे पात्र किती महत्त्वाचे आहे हे कळत जाते.

जशी जशी सीतामाई मोठी होत गेली, तसे ती ध्यानाला जास्त महत्त्व द्यायला लागली. तिला जंगलात जाऊन ध्यान करायला फार आवडायचे. आज आपण लोकतंत्र, प्रजातंत्र हे शब्द वापरतो पण 7000 वर्षांपूर्वी सीतामाई आणि जनकबाबांनी मिथिलेत स्वशासनाचा पाया रचला. प्रत्येक गावात पंचायत असली पाहिजे. तिथली लोकंच आपला प्रतिनिधी निवडून समितीमार्फत गावात सुव्यवस्था व शासन उत्कृष्टपणे करण्याची संकल्पना सीतामाई आणि जनकबाबांनी आणली. आपल्याला रामायणात सीतामाईबद्दल एवढे माहीत नव्हते. सीतामाईची निर्णयक्षमता व प्रत्येक जिवाबद्दल असलेला कळवळा यासारख्या गोष्टी सीतामाईची नवीन ओळख करून देतात.

ज्याप्रमाणे सीतामाईंना ध्यान आवडायचे, त्याप्रमाणे जेवण बनवून प्रेमाने दुसऱयाला खाऊ घालणे ही गोष्ट त्यांना खूप आवडायची. वेगवेगळय़ा भाज्या, कंदमुळे, वनस्पती यांचा वापर करून त्या उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या. अन्नापासून मन बनते. त्यामुळे सात्त्विक जेवणावर त्यांचा भर असायचा. सर्व शास्त्र व शस्त्रविद्या त्यांना गुरुकुलात जात असल्याने येत होत्या. त्या सर्व वडीलधाऱया मंडळीची सेवा करायच्या आणि लहान बहिणींची काळजी घ्यायच्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याप्रमाणे पाचवा पुरुषार्थ प्रेम हा आहे. आणि हे प्रेम काय असते हेच आपण सीतामाईकडून शिकतो.

भटकंती- प्राचीन शक्तिपीठ मुंडेश्वरी भवानी मंदिर

सामना ऑनलाईन

>> वर्षा चोपडे

बिहारमधील पैमूर (भबुआ) जिह्यातील रामगढ गावातील देवी मुंडेश्वरी भवानी व महामंडलेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवानपूर टेकडीवर सुमारे 600 फूट उंचीवर वसलेल्या या प्राचीन मंदिराचे आगळे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

देशातील सर्वात प्राचीन मंदिर देवी मुंडेश्वरी भवानी व महामण्डलेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर बिहारमधील पैमूर (भबुआ) जिह्यातील रामगढ गावातील भगवानपूर टेकडीवर सुमारे 600 फूट उंचीवर आहे. हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध असून ते पंवरा डोंगराच्या दऱयांमध्ये वसलेले आहे. इथले तलाव आणि धबधबे या भागाच्या सौंदर्यात भर घालतात. येथे एक प्राचीन किल्लादेखील आहे.

रामगढ हा प्रदेश ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून शक्तिशाली मगध साम्राज्याचा भाग बनला होता. मुंडेश्वरी मंदिरातील शिलालेखात असे म्हटले आहे की, सत्ताधारी प्रमुख राजा उदयन हा या प्रदेशाचा राज्यपाल होता. माहितीनुसार 635 या शतकातील हिंदू शिलालेख मंदिरात सापडले. ऐतिहासिक माहितीनुसार 1904 च्या दरम्यान ब्रिटिश पर्यटक आर. एन. मार्टिन आणि फ्रान्सिस बुकानन यांनी या मंदिरास भेट दिली. प्रसिद्ध चिनी यात्रेकरू ह्युएन-तांग इसवी सन सातव्या शतकात या भागात राहत होता, असेही म्हटले जाते.

असे म्हणतात येथे देवीने चंड आणि मुंड राक्षसांचा नाश केला. चंडचा नाश झाल्यानंतर मुंड युद्ध करताना या टेकडीमध्ये लपला आणि येथेच आईने त्याचा वध केला. मुंडेश्वरी भवानी मंदिराचे कोरीव काम आणि शिल्पे ही दगडाने बनवलेली असून अत्यंत आकर्षक मंदिर भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे. मंदिरातील कोरीव काम आणि शिल्प उत्तरगुप्त काळातील आहेत. दगडाने बनवलेले हे अष्टकोनी मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वेकडील भागात मुंडेश्वरी देवीची भव्य आणि प्राचीन दगडी मूर्ती आहे. माता देवी वाराहीच्या रूपात विराजमान आहे. देवीचे वाहन महिष (म्हैस) आहे. मंदिराला चार दरवाजे आहेत. त्यापैकी एक बंद आहे आणि एक अर्धा दरवाजा आहे. मंदिराच्या मध्यभागी पंचमुखी शिवलिंग स्थापित केले आहे. त्याचा दगड सूर्याच्या स्थितीनुसार रंग बदलतो. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला विशाल नंदीची मूर्ती आहे, जी अजूनही शाबूत आहे.

मंदिरात पशू बलिदानाची परंपरा आहे. ज्यामध्ये बकरी अर्पण केली जाते, परंतु कापली जात नाही. ही सात्त्विक त्यागाची परंपरा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अद्वितीय आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर बकऱयाचा बळी दिला जातो. परंतु माता रक्ताचा बळी घेत नाही, तर बळीच्या वेळी भक्तांमध्ये मातेबद्दल अद्भुत श्रद्धा निर्माण होते. जेव्हा बकरी मातेच्या मूर्तीसमोर आणली जाते, तेव्हा पुजारी अक्षत (तांदूळ) मूर्तीला स्पर्श करतो आणि तीच अक्षत बकरीवर फेकतो. बकरी लगेच बेशुद्ध पडते. जवळ जवळ मृत होते. काही वेळाने अक्षत फेकण्याची प्रक्रिया पुन्हा होते आणि बकरी उभी राहते. त्यागाच्या या कृतीमुळे आईवरील श्रद्धा वाढते. सध्या टेकडीवर असलेले हे मंदिर भग्नावस्थेत आहे. हे मंदिर कोणीतरी पाडल्याचे दिसते. धारदार शस्त्राने वार केल्याप्रमाणे मूर्तींचे हात-पाय तुटले आहेत.

पंचमुखी महादेवाचे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे. याच्या एका भागात देवीची मूर्ती दक्षिणाभिमुख उभी करून पूजा केली जाते. म्हशीवर स्वार होणारी मातेची साडेतीन फूट काळ्या पाषाणाची मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. कनिंगहॅमने आपल्या पुस्तकातही या मंदिराचा उल्लेख केला आहे. पैमूरमध्ये मुंडेश्वरी टेकडी आहे. तिथे मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत आहे, असा स्पष्ट उल्लेख त्यात आहे. टेकडीवर विखुरलेले दगड आणि खांब बघितले तर त्यावर श्रीयंत्रासारखी अनेक सिद्ध साधने व मंत्र कोरलेले आहेत. प्रत्येक कोपऱयात शिवलिंग आहे. टेकडीच्या पूर्व-उत्तर भागात माता मुंडेश्वरीचे मंदिर स्थापन झाले असावे व त्याभोवती विविध देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित केल्या गेल्या असाव्यात. खंडित पुतळे टेकडीच्या वाटेवर ठेवलेले आहेत. या मंदिराच्या वाटेवर नाणीही सापडली असून टेकडीच्या दगडांवर तामीळ आणि सिंहली भाषेत काही अक्षरे कोरलेली आहेत. श्रीलंकेतूनही येथे भाविक येत असत, असे सांगितले जाते. सुरुवातीला फक्त टेकडीच्या खाली राहणारे लोकच या मंदिरात दिवे लावायचे आणि पूजा करायचे. सध्या या मंदिराचे आयोजन आणि पूजा धार्मिक विश्वस्त मंडळ, बिहारद्वारे केली जाते. माघ पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत या टेकडीवर जत्रा भरते ज्यात दूरदूरवरून भाविक येतात. मंदिराचे पुरातन महत्त्व आणि वाढती श्रद्धा पाहून राज्य सरकार भाविकांच्या सोयीसाठी विश्रामगृह, रोपवे आदी बांधकाम करत आहे. डोंगरावर असलेल्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला असून त्यावरून छोटी वाहने थेट मंदिराच्या दरवाजापर्यंत जाऊ शकतात. मंदिरात जाण्यासाठी पायऱयांचाही वापर करता येतो.

varshakisanc@gmail.com

पाऊलखुणा- चोलांचे देखणे स्थापत्य

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

पंपहारेश्वर मंदिर हे चोल स्थापत्याचे सर्वांगसुंदर रूप. त्यावर असलेले मूर्तिकाम, त्याचे ते भव्यदिव्य शिखर आणि या मंदिराशी निगडित असलेल्या कथा यामुळे हे मंदिर चोल स्थापत्यात खूप मोलाची भर घालते.

तंजावरचे बृहदीश्वर, गंगैकाsंडचोलपुरम इथलेही बृहदीश्वर आणि दारासुरम इथले ऐरावतेश्वर मंदिर ही तीन मंदिरे म्हणजे ग्रेटर चोल मंदिरे म्हणून ओळखली जातात. चोळ स्थापत्याचा मेरुमणी असे या मंदिरांना म्हटले जाते. याच मंदिरांच्या पंक्तीमध्ये अजून एक चोल मंदिर येते आणि ते म्हणजे तिरुभुवनम इथले पंपहारेश्वर मंदिर. याचे नाव काहीसे वेगळे वाटते. ‘पंप-हर-ईश्वर’ अशी याची पह्ड करता येते. पंप किंवा पंपवात म्हणजे इंग्रजीत ज्याला पार्किन्सन म्हणतात, त्या रोगाचे हरण करणारा ईश्वर तो पंपहारेश्वर. हे शिवमंदिर आहे. इथल्या महादेवाला हे असे नाव पडण्यामागे एक कथा कारणीभूत आहे. वरगुण पांडय़ नावाचा राजा हा ब्रह्मराक्षसाने पछाडलेला होता. राजाच्या अंगाचा भीतीमुळे सतत थरकाप व्हायचा. त्याने इथे येऊन महादेवाची आराधना केली आणि तो पंपमुक्त झाला, अशी आख्यायिका आहे. कदाचित त्या राजाला त्या काळी पार्किन्सन्ससारखा आजार म्हणजेच पंपवात झालेला असेल आणि तो राजा इथे येऊन त्याचा तो पंपवात बरा झाला असेल आणि तेव्हापासून हा देव मात्र पंपहारेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. आश्चर्याची बाब म्हणजे आजही पंपवात, अपस्मारसारख्या मेंदूच्या आजारांनी त्रस्त लोक या ठिकाणी मुद्दाम दर्शनाला येतात आणि या पंपहारेश्वराच्या दर्शनाने त्यांचा आजार बरा होतो अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

तंजावर जिह्यातल्या मईलादुरतुरई-पुंभकोणम मार्गावर असलेल्या ‘तिरुभुवनम’ या गावी हे मंदिर वसलेले आहे. इ.स.च्या 12 व्या शतकात चोल साम्राज्यातील शेवटचा पराक्रमी राजा कुलोत्तुंग चोल तिसरा याने आपल्या उत्तर हिंदुस्थानवरील विजयाची स्मृती म्हणून हे मंदिर बांधले. मंदिराच्या दक्षिण भिंतीवर असलेल्या शिलालेखातून हे स्पष्ट झाले. शिलालेखात राजाच्या नावाचा उल्लेख ‘कुलोत्तुंग चोलदेव’ इतकाच आलेला आहे. इतर अनेक गोष्टींचा विचार करून अभ्यासकांचे हे मत पडले की, हा कुलोत्तुंग चोलदेव म्हणजे इ. स. 1176 साली राज्यावर असलेला कुलोत्तुंग चोळ तिसरा हाच होय. इतर तीन चोल मंदिरांप्रमाणे हे मंदिरसुद्धा ग्रॅनाईट दगडात बांधलेले आहे. गोपुरापेक्षा उंच असे मंदिराचे शिखर आणि त्यावर बसवलेली देखणी स्तुपी हे चोल स्थापत्याचे वैशिष्टय़ इथेसुद्धा पाहायला मिळते.

मंदिराचे स्थापत्य अत्यंत देखणे आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे हे मंदिर बघताना वारंवार दारासुरम इथल्या ऐरावतेश्वर मंदिराचा भास होतो, इतके या दोन मंदिरांचे स्थापत्य एकसारखे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे उत्तुंग अशा राजगोपुराने सजलेले आहे. हे गोपुर पाच थरांचे आहे. याचा खालचा भाग ग्रॅनाईटचा तर त्याच्या वरचा भाग हा विटा आणि चुन्यात बांधलेला आहे. गोपुराच्या दरवाजावर दोन्ही बाजूंवर विविध शिल्पे कोरलेली आहेत. गोपुरातून आत गेल्यावर स्तंभ आणि बळीपीठ दिसते. तिथेच पुढे नंदी मंडप आणि त्यात नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. तामीळनाडूमधल्या इतर मंदिरांसारखे इथे पण दोन भव्य सभा मंडप आहेत. अनेक खांबांनी युक्त असे हे सभा मंडप खूप प्रशस्त आणि सुंदर दिसतात. इथून पुढे असलेल्या गाभाऱयात शिवलिंग असून त्याची पंपहारेश्वर म्हणून पूजा केली जाते. या मंदिराचे ‘विमान’ म्हणजेच गाभाऱयावर असलेले शिखर हे चांगले उंच केलेले आहे.

मंदिर परिसर विस्तीर्ण असून त्याच्या तीनही बाजूंनी ओवऱया केलेल्या आहेत. मंदिराच्या प्रशस्त आवारात देवीचे आणि चंडिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर आहे. गर्भगृहाबाहेरील देवकोष्ठांमधून नटराज शिव, लिंगोद्भव शिव, दुर्गा आणि भिक्षाटन शिव यांच्या मूर्ती आहेत. तसेच ज्या ओवऱया आहेत त्यांच्या पायाशी असलेल्या भागातसुद्धा विविध शिल्पांकन केलेले दिसते. याच मंदिरात शरभेश्वराचे अजून एक मंदिर आहे. शरभ हा शिवाचा रौद्र अवतार होय. शरभ म्हणजे पंख असलेला सिंह अशी पौराणिक समजूत आहे. इथे असलेल्या शरभेश्वर मंदिरातील श्री शरभाची मूर्ती उत्कृष्ट कलात्मक काम असलेली धातूची बनवलेली आहे. या मंदिरालासुद्धा सुंदर प्रवेशद्वार, त्याच्या बाजूला दोन द्वारपाल तसेच आत गेल्यावर अनेक खांबांनीयुक्त असा सभा मंडप आणि काहीशा उंचावर असलेला गाभारा आणि गाभाऱयात शरभेश्वराची धातुमूर्ती असे सगळे साग्रसंगीत काम केलेले दिसते. हे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे इथे मंदिराचे शिखर आणि बाह्य भिंती भरपूर रंगवलेल्या आहेत. आता हे चांगलं का वाईट हे ज्याचं त्यानं ठरवावं. एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी की, आज जरी आपल्याला काळ्या दगडातली मंदिरे बघायला सुंदर दिसत असली तरी पूर्वीच्या काळी ही सगळी मंदिरे रंगवलेली असत. अनेक मंदिरांवर, तिथे असलेल्या शिल्पांवर आजही आपल्याला तत्कालीन रंगाचे अवशेष दिसतात. पुंभकोणमच्या भेटीदरम्यान पंपहारेश्वर मंदिराचे दर्शन घेणे त्यामुळेच अपरिहार्य आहे.

ashutosh.treks@gmail.com

सृजन संवाद – रामायणातील ऋषी जीवन

सामना ऑनलाईन

>>डॉ. समिरा गुजर जोशी

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी श्री गणरायांचे आगमन झाले की, भाद्रपद पंचमीला ऋषिपंचमी साजरी केली जाते. या दिवशी ऋषींचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रमाणे स्वावलंबी व निःस्पृह जीवन जगण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित असते. रामायणात अनेक ऋषींच्या आश्रमांचे वर्णन येते. या लेखात ऋषींचे आश्रम जीवन कसे होते हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

ऋषिपरंपरा हे आपल्या संस्कृतीचे खास वैशिष्टय़ आहे. ऋषींचे आश्रम म्हणजे ज्ञानप्रसाराचे मोठे केंद्र होते. एखादा ऋषी असे म्हटल्यावर त्याचे वसतिस्थान म्हणजे एखादी पर्णकुटी किंवा झोपडी असाच बहुधा आपला समज होतो. पण रामायणातील आश्रमांची वर्णने वाचल्यानंतर लक्षात येते की, एखादे मोठे नगर असावे तशीच ही मोठी वसाहत असे. जिथे लोकांची शहरांमधून वस्ती आहे त्याला ‘जनपद’ असे म्हटले जाई तसेच वनामध्ये असणारे हे ‘आश्रम-पद’ असत.

हो आश्रम नगराबाहेर असत, पण म्हणून ते अगदी दाट अरण्यात असत असेही नाही. आश्रम अशा भागात असे जिथे हिंस्र प्राण्यांचा वावर फार नसेल. तसेच झाडेसुद्धा या भागात फार घनदाट नसत. कारण खूप दाट झाडे असतील तेथे वणवा लागण्याचे भय असते. श्रीरामांनी वनवास स्वीकारल्यानंतर ते लक्ष्मण आणि सीता यांच्या समवेत गंगा ओलांडून पलीकडे गेल्यानंतर त्यांना सर्वप्रथम भारद्वाज मुनींचा आश्रम लागला. त्या वेळेस वाल्मीकी मुनींनी वर्णन केले आहे की, ‘घरांमधून, यज्ञशाळांमधून येणारा धूर दिसायला लागला. आणखी पुढे गेल्यावर लक्षात आले की, लाकडे कापून नीट रचून ठेवण्यात आली आहेत. यावरून जवळपास कुठेतरी आश्रम असला पाहिजे असा अंदाज रामचंद्रांनी बांधला.’

भारद्वाज मुनींनी श्रीरामांचे स्वागत केले आणि त्यांनी वनवासाचा काळ या आश्रमात राहूनच घालवावा असे सुचवले. आश्रम जनपदाच्या कक्षेबाहेर असल्याने आपण आपल्या प्रतिज्ञेचे पालन करू शकाल असे त्यांनी सुचवले. पण ही जागा अयोध्येच्या फार जवळ असल्याने येथे लोक मला भेटण्यासाठी सतत येत राहतील, तेव्हा मी अधिक एकांताची जागा शोधतो असे श्रीरामांनी त्यांना सांगितले. यावरून आश्रम नगरांपासून खूप लांब नसत हे लक्षात येते.

वनवासात राहणाऱया या मुनींचे आणि वनवासी लोकांचे भोजन साधे असे. यासंदर्भात नीवाराचा उल्लेख अनेकदा होतो. नीवार म्हणजे वनात आपोआप उगवणारे तृणधान्य होय. हे त्यांचे प्रमुख अन्न मानले जाई. यामध्ये वरीचे तांदूळ, शिंगाडय़ाचे पीठ, हिंगोली फळांचे पीठ अशा वनात मिळणाऱया गोष्टींचा समावेश होत असे, असे अभ्यासकांनी सांगितले आहे. (म्हणूनच आपण ऋषिपंचमीच्या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काही खात नाही.) अयोध्या कांडात उल्लेख येतो की, चमचमीत चटण्या आणि कोशिंबिरीयुक्त भोजन करण्याची सवय असलेली सीता वनातील नैवार आहार कसा बरं खाईल? स्वत श्रीरामांनीही भारद्वाज ऋषींना मी तपोवनाचे सर्व नियम पाळून कंदमुळे खाऊन येथे राहीन असे म्हटले आहे. यावरून आश्रमातील राहणीमान किती साधे असले पाहिजे याची कल्पना येते.

श्रीरामांनी उल्लेख केलेल्या तपोवनाच्या नियमांचा विचारही या ठिकाणी करायला हवा. हे आश्रम राजसत्तेसाठीही आदरपूर्वक नतमस्तक होण्याचे स्थान होते. आजच्या भाषेत ढोबळपणे सांगायचे तर समाजाचे नियम (Legislature) तयार करण्याचा अधिकार मुनींकडे होता आणि त्याची अंमलबजावणी (Administration) राजा करत असे. पुढे कालांतराने यात बराच बदल झाला. पण रामायणात तरी राजा ऋषीमुनींच्या सल्ल्याने राज्यकारभार करताना दिसतो. त्यामुळे आश्रम हे ऋषींच्या अधीन असत. तिथे राजा प्रवेश करतानाही परवानगी विचारत असे. तेथील शांती आणि तपसाधना भंग होणार नाही, त्याचे पावित्र्य जपले जाईल याची काळजी घेत असे.

पण याचा अर्थ हे आश्रम आर्थिकदृष्टय़ा संपन्न नसत असा नव्हे. राजाकडून तसेच अन्य धनिकांकडून त्यांना आर्थिक पाठबळ मिळत असे. श्रीराम जेव्हा वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी आपला खासगी कोश रिकामा केला. हे दान ज्यांना दिले त्यांच्यामध्ये त्यांचा सेवक वर्ग होता, मित्रपरिवार होता, तसेच मोठमोठे आचार्यही होते. त्रिजट नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या आश्रमाची व्यवस्था व्हावी म्हणून श्रीरामांनी अनोख्या पद्धतीने दान दिले. श्रीरामांनी त्यांना हाती असलेला धर्मदंड सर्व ताकदीनिशी फेकायला सांगितले. तो जेवढय़ा अंतरावर पडेल त्या प्रदेशात मावतील तितक्या गायी देण्याचे कबूल केले. त्रिजट ऋषींचा दंड शरयू नदीच्या पैलतीरी पोहोचला, तर श्रीरामांनी तेवढय़ा भागात सामावतील एवढय़ा गायी दिल्या. यावरून आश्रमांना किती भरघोस दान मिळत असेल याची कल्पना येते. याचे आणखी एक बोलके उदाहरण म्हणजे वर उल्लेखलेल्या भारद्वाज ऋषींनी जेव्हा त्याच वाटेने श्रीरामांना शोधत आलेल्या भरताची भेट घेतली तेव्हा त्यांनी भरतासमवेत त्याच्या बरोबर आलेल्या सगळ्या सैन्याची उत्तम बडदास्त ठेवली. आयत्या वेळेस आलेल्या मोठय़ा सैन्याला कंदमुळे नव्हे तर सुग्रास अन्न खाऊ घातले. भरत हा अयोध्येचा होऊ घातलेला नवा राजा आहे हे लक्षात घेऊन त्याचे राजेशाही स्वागत करण्यात आले. आजच्या एखाद्या विद्यापीठाने देशाच्या राष्ट्रपती वा शासकीय पदाधिकाऱयाचे स्वागत करावे तसेच हे होते. यावरून या आश्रमांची सुसंपन्नता आणि सुसज्जता लक्षात यावी.

 samira.gujar@yahoo.com (निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)

भटकंती – हिंदुस्थानातील भुलोका वैकुंठम

सामना ऑनलाईन

>> वर्षा चोपडे

भुलोका वैकुंठम म्हणजे काय तर हिंदू देवता लक्ष्मीनारायणाचे निवासस्थान. पवित्र, स्वर्गीय ईश्वरी धाम. आपल्या विठोबाचे भक्त जिथे मुक्ती मिळवण्यासाठी जातात ते स्थान. केरळातील गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर अद्भुत कलाकुसर असलेले अत्यंत भव्य मंदिर आहे. हे मंदिर केरळच्या शिरपेचातील मोरपीस आहे.

कोची ते गुरुवायूर मंदिर 88 किलोमीटर आहे आणि त्रिवेंद्रमपासून उत्तर-पश्चिम दिशेला 292 किमी अंतरावर आहे. हे मंदिर त्रिशूर शहराचे उपनगरीय शहर आहे. हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे व प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हिंदूंच्या हृदयात या मंदिराला एक विशेष स्थान आहे. कारण भगवान कृष्णाचे जागृत देवस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वासोबतच हे मंदिर त्याच्या भव्य पारंपरिक वास्तूकलेसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पवित्र घंटानाद, फुलांच्या विविध माळा, भक्तीने भारावलेले वातावरण व स्वच्छता बघून मन उल्हासित होते. या मंदिराची विशेषतः अशी की, केवळ हिंदूंना या मंदिरात प्रवेश आहे.

मंदिर पारंपरिक केरळ शैलीत बांधलेले असून मंदिराशेजारी भले मोठे तळे आहे. कृष्ण मंदिराचा बाहेरील भाग सोन्याने मढवलेला आहे आणि त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. दीपमाळ तर खूप आकर्षक, सुंदर आहे. गाभाऱ्यातील दैवी कृष्णमूर्ती प्रसन्न मुद्रेत असून दिव्याच्या प्रकाशात भगवान कृष्ण साक्षात दर्शन देत असल्याचे जाणवते. तुळशी हार, शंख पांचजन्य, चकती सुदर्शन चक्र, गदा कौमोदकी आणि कमळ घेऊन चार हात असलेल्या विष्णू देवतेचे रूप बघून मन भक्तीने भावविभोर होते. आत भिंतीवर सुबक कृष्ण पेंटिंग्स तसेच गणेश, अय्यप्पन आणि भगवती यांची उप-तीर्थस्थाने आहेत. तसेच संकुलाच्या बाहेरील मंदिराखाली गणेश आणि नागदेवतांची दोन तीर्थस्थाने आहेत. ईश्वराचे अस्तित्व जाणवणाऱ्या या मंदिरात अनेक नामांकित व्यक्तींची वर्दळ असते.

हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान कृष्णाने द्वारकेमधील मंदिरातील मूळ कृष्ण मूर्ती पुरामुळे नष्ट होऊ नये म्हणून देवता आणि ऋषींना केरळमध्ये स्थापित करण्यास सांगितले होते. त्यानुसार ऋषी बृहस्पतींनी कृष्ण मूर्ती गुरुवायूर मंदिरात स्थापना केली असे मानले जाते. ही मूर्ती स्वयंभू असल्यामुळे हिंदू भक्तांसाठी तिचे विशेष महत्त्व आहे. सुट्टीच्या दिवशी या मंदिरात खूप गर्दी असते, पण इतर दिवशी लवकर दर्शन होते. महिलांना साडी घालणे आणि पुरुषांना पांढरे धोतर (मुंडु) घालणे बंधनकारक आहे. महिलांनी पंजाबी ड्रेस घातला तर त्यावर मंदिराशेजारील दुकानातील साडी घेऊन ती लपेटली तरी चालते, पण पांढरी साडी हवीच.

गुरुवायूर एकादशी हिंदूंसाठी खूप शुभ आहे. वर्षातील 24 एकादशींपैकी वृश्चिका शुक्ल पक्ष एकादशीला गुरुवायूर मंदिरात विशेष महत्त्व आहे. गुरुवायूरमध्ये गजराजन केशवन म्हणजे केरळातील प्रसिद्ध मानाच्या हत्तीचा पुतळा असून याला आदर म्हणून कार्यक्रम आयोजित केला जातो. करणवर किंवा हत्ती कुटुंबाचे प्रमुख श्रीवलसम गेस्ट हाऊससमोरील केशवनाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात आणि इतर सर्व हत्ती आजूबाजूला उभे राहून नमस्कार करतात. एकादशीच्या दिवशी उदयस्थान पूजा (पहाटे ते संध्याकाळची पूजा) पारंपरिक पद्धतीने केली जाते. पहाटेच्या शिवेलीनंतर एकादशीला पार्थसारथी मंदिरात भव्य हत्तीची मिरवणूक निघते. कारण हा दिवस गीतोपदेशम म्हणूनही ओळखला जातो. रात्रीच्या पूजेनंतर एकादशीला प्रसिद्ध एकादशी विलक्कूची हत्तीची मिरवणूक निघते. हा सोहळा विलोभनीय असतो. देवतेला संगीत आणि नृत्याने अभिवादन केले जाते. त्यासाठी चेंबई वार्षिक संगीतोल्सवम हा कर्नाटक शास्त्रीय संगीतातील एक प्रमुख उत्सव सादर केला जातो. हा उत्सव सुमारे 12-15 दिवस चालतो.

याशिवाय मंदिराच्या तीन किमी अंतरावर कोट्टापाडी येथे स्थित एक किल्ला आणि पूर्वीचा राजवाडा आहे. तसेच मम्मीयुर महादेवाचे मंदिर, श्री पारधसाराधी मंदिर, कृष्णनट्टम मंदिर बघण्यासारखे आहे. आपला देश, आपली संस्कृती, आपली मंदिरे केरळवासीयांनी पारंपरिकरीत्या जपली हे प्रशंसनीय आहे.

– varshakisanc@gmail.com
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

संस्कृती-सोहळा – मी अनुभवलेली यात्रा…

सामना ऑनलाईन

>>सायली भोसले

सातारा जिल्ह्यातील बावधन या निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावातील बगाड यात्रा आता सर्वदूर प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहे. गुलालात उधळणीने माखलेल्या या उत्सवात ‘काशिनाथाचं चांगभलं…’ म्हणत पाहिलेल्या बगाड यात्रेचा हा वृत्तांत.

बगाड यात्रा.. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा. खूप जणांकडून ऐकले होते या यात्रेबद्धल पण जाण्याचा काही योग येत नव्हता. मी तळकोकणातील असल्यामुळे ही यात्रा पाहण्याची उत्सुकता मला मात्र नक्कीच होती. सातारा जिह्यातील बावधनची बगाड यात्रा सर्व जगभरात प्रसिद्ध आहे. ही बावधन बगाड यात्रा बघण्याचा योग नुकताच आला. तिन्ही बाजूने डोंगरांच्या कुशिमध्ये वसलेल्या बावधनमध्ये मैत्रीण रोहिणीच्या घरी मुक्काम करीत या यात्रेचा अनुभव घेतला.

आम्ही पोहोचलो तो यात्रेचा पहिला दिवस होता. रोहिणीने त्या दिवशी पुरण पोळी, कटाची आमटीचा बेत आखला होता. तिच्या घरासमोरून काशिनाथ देवाच्या मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक निघाली होती. घराच्या अंगणातूनच देवाच्या मुखवट्याचे दर्शन घेतले व मंदिराच्या दिशेने निघालो. वाटेत गुलाल घेतला आणि मंदिरात शिरलो. त्याच वेळी काशिनाथ म्हणजेच भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांच्या लग्नाचा सोहळा पार पडत होता. मंदिराच्या गाभाऱ्यात वर्षातून यात्रेच्या या दोन दिवसांतच महिलांना प्रवेश असतो. त्यामुळे महिलांची तोबा गर्दी झालेली दिसत होती. कसेबसे गर्दीतून वाट काढत आम्ही मंदिराच्या गाभ्रायात पोहचलो आणि देव काशिनाथाचे दर्शन घेतले. त्याचवेळी यात्रेमध्ये जी व्यक्ती बगाडय़ा म्हणून ठरवली जाते तिचा पोषाखही त्या मंदिरात आणला होता.

या बगाड्याला होळीनंतर यात्रेच्या आधी पाच दिवस मंदिराच्या परिसरात ठेवले जाते. नवसकारी जे असतात त्यामधून देवाला कौल लावून हा बगाड्या ठरविला जातो. मंदिराच्या परिसरात बगाडाचा गाडा तयार करण्याची जय्यत तयारी सुरू होती. या बगाडच्या गाडय़ाला दगडांचे चाक तयार केले जातात. या गाडय़ाला 12 खिल्लारी बैलांचे जोड बांधतात आणि या बैलांच्या साहाय्याने हा बगाडचा गाडा हा ओढला जातो. हा संपूर्ण बगाड बाभळीच्या झाडापासून तयार करतात. ब्रिटिश काळाच्या आधीपासून म्हणजे तब्बल 350 वर्षापासून सुरू असलेली ही यात्रेची परंपरा. यात्रेची तयारी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमी ला सुरू होते. यानंतर भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात गेलो. ज्योतिबाच्या मंदिरात ज्योतिबा देव आणि त्यांची बहीण या दोघांचे दर्शन घेतले.

यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजेच छबिन्यादिवशी हा संपूर्ण गाडा तयार केला जातो. रात्री चंद्रोदयानंतर देवाच्या पालख्या वाजत गाजत निघाल्या होत्या आणि त्याचसोबत झांज पथक, ढोल, सनई, डफडेच्या आवाजात या पालख्या गावभर फिरत होत्या. यासोबत आगीचे आणि दांडपट्टाचे खेळही सुरू होते. फुलांच्या छत्र्या देवापुढे फिरवल्या जातात. छबिनादरम्यान देवावर गुलाल वाहतात. मध्यरात्री या पालख्या ब्राम्हण वाडय़ात येऊन पोहोचल्या आणि तेथेच गोंधळी ने बगाड आणि त्यामागे असलेली देवाची आख्यायिका कथन केली. या पालख्यांसोबत असलेले बगाडचे मानकरीसुद्धा गावामध्ये फिरतात. बगाडामध्ये प्रत्येक समाजाला म्हणजेच बारा बलुतेदारांना मान देण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच यात्रेच्या दिवशी या बगाडचे कृष्णा नदीच्या काठी नेऊन त्याची पूजा केली जाते. कृष्णामाईची ओटी भरून बगाड रथास प्रारंभ होतो.

सर्व पुरुष आणि महिला मंडळी पांढ्रया रंगाचा पेहराव करून बगाड पाहण्यासाठी नदीकाठी जातात. नदीवरून शेतामध्ये हे बगाड आणले जाते. या बगाडवर बगाडचे मानकरी म्हणजेच बगाड्याला लोखंडी गळात अडकवले जाते आणि त्यांच्या हातात कडुनिंबाचा पाला दिला जातो. “काशीनाथचे चांगभलं’’ अशी गर्जना करून या यात्रेला सुरुवात केली जाते. त्याचसोबत हा बगाड व्यवस्थित चालावे याकरिता बगाडच्या शिडेवर एक व्यक्ती तेल घालण्यासाठी चढलेला असतो. तसेच गाड्यावर अनेक मानकरी बसलेले असतात. 12 खिल्लारी बैलांच्या जोड्या या गाडय़ाला जोडलेल्या असतात. या गाड्याला जोडण्यासाठी वाटेमध्ये अनेक शेतकरी शिवारात आपले बैल घेऊन उभे असतात. कोणत्याही यंत्राचा वापर न करता फक्त हवेची दिशा, बैलांची ताकद आणि गाडा ओढण्यासाठी लोकांनी केलेला आटापिटा, उधळलेल्या बैलांमुळे लोकांची झालेली धावपळ हे सर्व खरेच पाहण्यासारखे असते. या सगळ्या क्षणांचे आम्हाला साक्षीदार होता आले.

घरी आल्यानंतर रोहिणीच्या सासूच्या आग्रहाखातर आम्ही वाई येथील गणपती मंदिरात गेलो. गणपतीचे दर्शन घेऊन गावातीलच एकच ठिकाणी असलेल्या पाचीदेऊळांचे दर्शन घेतले. उंचावर असलेले ही पाच देवळे संध्याकाळच्या वेळेस खूपच रमणीय दिसत होती. या देवळांच्या सानिध्यात लाभलेली शांतता खूपच भावून गेली. यात्रेनंत रात्रीच्या वेळेस बोकडांचा बळी दिला जातो आणि हा मटणाचा प्रसाद म्हणून घरोघरी शिजवला जातो. गाडीची वेळ लवकरच ची असल्याने आम्ही घरातून लवकर निघालो. घरातील सर्वचजण राहण्याचा आग्रह करत होते. दाभाडे दादा आणि त्यांच्या आई तर उद्याचे अगदी घराजवळुन बगाड जाणार आहे ते पाहूनच जा असे सतत सांगत होते. पण पर्याय नव्हता. राहणे शक्य नव्हते. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.

आम्ही नको म्हणत असताना देखील त्यांचे आलेले पाहुणे सोडून दादा आम्हाला बस स्टँडपर्यंत पोहोचवायला आले होते. सर्वांना सोडून जायची ईच्छा नव्हती पण जाणे तर भाग होते. दोन दिवसांतील आलेला थकवा बराच जाणवत होता. बसमध्ये शांत झोपी गेलो. इतक्या छान अनुभवांचे साक्षीदार होण्याकरिता रोहिणीला मनोमन धन्यवाद देत आणि मनात खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही परत मुंबईला प्रयाण करत होतो.
– ssbhosale2012@gmail.com

फिरस्ती- आतेशगाह हिंदू अग्नी मंदिर

सामना ऑनलाईन

>> प्रांजल वाघ 

साधारण सातव्या शतकात अझेर्बैजानमध्ये इस्लामचा प्रवेश झाला. आज हा देश संपूर्णपणे इस्लामी आहे, पण आजही या देशात एक वास्तू उभी आहे, जी प्राचीन काळातील अझेर्बैजानची ओळख टिकवून आहे. बाकूजवळ असलेल्या सुराखानी जिह्यात उभी असलेली ही वास्तू ज्याला किल्ल्यासारखी तटबंदी आहे. या वास्तूचे नाव आहे ‘आतेशगाह’! अग्नीचे गृह असणारी आतेशगाह!

जगाचा नकाशा उघडून दिल्लीपासून हिंदुस्थानच्या वायव्येस एक सरळ रेष काढली तर साधारण 3800 किमी दूर एक छोटासा देश लागतो. 1991 च्या अगोदर सोव्हिएत संघाचा भाग असलेलं, दागेस्तान नावाच्या प्रदेशात कॅस्पिअन समुद्राच्या काठावर असलेलं हे राष्ट्र म्हणजे अझेर्बैजान! 1991 मध्ये सोव्हिएत संघातून अनेक राज्यं तुटली आणि वेगवेगळी राष्ट्रे जन्मास आली. अझेर्बैजान हे त्यातलंच एक! भरमसाट तेलाचे साठे असल्यामुळे हा देश मुळातच श्रीमंत आहे आणि याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला त्याची राजधानी बाकू हिच्या स्थापत्यात दिसते.

साधारण 7व्या शतकात अझेर्बैजानमध्ये इस्लामचा प्रवेश झाला आणि हळूहळू तिथला ख्रिस्त धर्माचा प्रभाव कमी होत गेला. आज हा देश संपूर्णपणे इस्लामी आहे, पण आजही या देशात एक वास्तू उभी आहे, जी प्राचीन काळातील अझेर्बैजानची ओळख टिकवून आहे. बाकूजवळ असलेल्या सुराखानी जिह्यात एक वास्तू उभी आहे. त्याला किल्ल्यासारखी तटबंदी आहे. या वास्तूचे नाव आहे ‘आतेशगाह’! फारसीमध्ये ‘आतेश’ म्हणजे ‘अग्नी’ आणि ‘गाह’ म्हणजे ‘गृह’ किवा ‘स्थान’. जे अग्नीचं गृह आहे ते आतेशगाह!

‘ग्रँड ट्रंक रोड’ हा गेली 2500 वर्षे हिंदुस्थानला आशियासोबत जोडणारा एक प्राचीन व्यापारी मार्ग. महाभारतात ‘उत्तरापथ’ म्हणून ज्याचा उल्लेख आला आहे तोच हा रस्ता. चंद्रगुप्त मौर्य याने हा रस्ता पुढे विकसित केला असे म्हणतात. याच प्राचीन व्यापारी मार्गावर बाकू आणि इतर जागेवरून मालाची ने-आण होत असे. त्यामुळे बाकू येथे अनेक हिंदू, पारसी आणि शीख व्यापारी आपला उद्योग करायचे आणि त्यांचे वास्तव्य तात्पुरते अथवा कायमस्वरूपी वास्तव्य तिथे होते. याच वास्तव्यामुळे तिथे हे ज्वालामंदिर जन्मास आले असावे!

‘आतेशगाह’ येथे त्या जागेचा इतिहास सांगणारी जवळ जवळ 10 संस्कृत, 2 गुरमुखी (पंजाबी) आणि 2 फारसी शिलालेख आहेत! मंदिराच्या कोटसदृश महाद्वारावर असलेल्या शिलालेखाची अथवा आतमधील बहुतांश शिलालेखाची सुरुवात ‘श्री गणेशाय नम’ या वाक्याने होते! इतकेच नव्हे तर महाद्वारावर ‘कमळ’ चिन्ह कोरलेलं आहे. या अग्नी मंदिराचा प्राकार ‘पंचकोनी’ असून मंदिराच्या कोटाच्या भिंतीत वाटसरू, व्यापारी आणि भक्तांसाठी (हिंदू, पारसी आणि शीख) अनेक खोल्या आहेत. आज या खोल्यांमध्ये त्या काळचे जनजीवन दर्शविणारे अनेक पुतळे ठेवले आहेत. अनेक खोल्यांमध्ये त्या काळची भांडी, कपडे आणि त्या ठिकाणचा इतिहास यावर भाष्य करणारे माहिती फलक आहेत. एका खोलीत तर चक्क ‘ॐ गं गणपतये नम’ची ध्वनिफीत अखंड सुरू असते, तर दुसऱया एका खोलीत सध्याच्या काळी स्थापन केलेली श्री गणेशाची मूर्ती आहे! भारतापासून इतक्या दूर येऊन श्री गणेशाचे दर्शन होताच हात आपोआप जोडले जातात!

पंचकोनी आवाराच्या मध्यभागी उभे आहे ते मंदिराचे ‘गर्भगृह’ किवा ‘अग्नीचे स्थान’. या वास्तूवर असलेल्या शिलालेखात स्वस्तिक, त्रिशूल यांसोबत अनेक हिंदू चिन्ह आपल्याला सापडतात!

‘सुराखानी’ हा जिल्हा आपल्या तेलसाठय़ासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश. आजही इथे ‘यानारदाग’ या जागी जमिनीतून अविरत ज्वाला बाहेर येत असतात. तसेच ‘आतेशगाह’ येथे पूर्वी होत असे आणि म्हणूनच ‘ज्वालाजी’ या देवीला अर्पित अशी ही वास्तू आहे. तसा उल्लेख अनेक शिलालेखांत सापडतो! येथील अग्नी ही नैसर्गिकरीत्या अनेक शतके अखंडपणे जळत होता, पण विसाव्या शतकात 1969 साली हा अचानक थांबला. आजूबाजूच्या परिसरात जमिनीतून तेल काढले जाऊ लागले आणि त्यामुळे येथील ज्योत मालवली. आज येथे असलेली ज्योत ही कृत्रिमरीत्या तेवत ठेवली आहे.

साधारण 11-12 व्या शतकांपासून ऐतिहासिक पुरावे आणि उल्लेख सापडणारी वास्तू ही हिंदू आहे की पारसी (zoroastrian) यावर अनेक इतिहासकारांमध्ये वादविवाद होते, पण खुद्द पारसी धार्मिक गुरूंनी ही वास्तू हिंदू असल्याचे मान्य केले आहे. कधी अझेर्बैजान येथे जाणे झालेच तर ‘आतेशगाह’ येथे नक्की भेट द्या!

pranjalwagh@gmail.com  

नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागल

नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला

तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने रविवारी विश्रांती घेतली असली तरी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला पूर आले. नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा या मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहे. नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे.या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे सहस्रकुंड धबधबा खळखळून वाहत आहे.

पाऊलखुणा – हिरापूर येथील चौसष्ट योगिनी मंदिर

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी चुकता पाहावे असे हे आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी. वर असलेले हे मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मंदिरांपैकी एक आहे. कोण असतात या योगिनी आणि कशी असतात यांची मंदिरे?

निसर्गरम्य ओडिशामध्ये विविध देवदेवता आणि त्यांची मंदिरे यांचीसुद्धा विपुलता मोठय़ा प्रमाणावर आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. इथल्या देवता संप्रदायांवर आणि त्यांच्या उपासना पद्धतींवर आदिवासी परंपरेची मोठी छाप पडलेली दिसते हेसुद्धा इथले एक वेगळेपण आहे. बऱ्याच आगळ्यावेगळ्या देवता आणि उपासना पद्धती या भूमीमध्ये रुजलेल्या दिसतात. हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी न चुकता पाहावे असे हे आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी. वर असलेले हे मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मंदिरांपैकी एक आहे. कोण असतात या योगिनी आणि कशी असतात यांची मंदिरे?

योगिनी या शाक्त संप्रदायाच्या गौण देवता आहेत. त्यांना आवरण देवता असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनींची संख्या कोटय़वधी असल्याचे सांगितले असले तरीसुद्धा 64 योगिनी प्रसिद्ध आहेत. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुर्गेनी 64 रूपे घेतली आणि त्यांच्या सर्वांच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले व त्यात त्या दैत्याचा पराभव केला. या युद्धानंतर त्या योगिनींनी दुर्गेकडे याचना केली की, स्मारक रूपाने त्यांना तिच्या जवळच स्थान मिळावे. दुर्गेने ते मान्य केले आणि त्या योगिनी दुर्गेच्या सर्व बाजूने स्मारक रूपाने वास्तव्य करून असतात अशी समजूत आहे.  दुसऱ्या एका कथेनुसार घोर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गेने त्याच्याशी युद्ध मांडले, परंतु तिचा युद्धात विजय होईना म्हणून शंकराने सूक्ष्म रूपाने तिच्या शरीरात प्रवेश केला आणि तिची शक्ती शतगुणित केली. त्या वेळी दुर्गेचे रूप पाहता पाहता भयानक रौद्र झाले आणि त्यातून तेजस्वी, युयुत्सु, भयंकर गर्जना करणाऱ्या अशा योगिनी बाहेर पडल्या.

भारतात 64 योगिनींची फक्त चार-पाच मंदिरेच आहेत आणि विशेष म्हणजे त्यातली दोन ओडिशामध्ये आहेत. एक हिरापूरला आणि दुसरे रानीपूर-झरीयाल या ठिकाणी. मध्य प्रदेशात भेडाघाटला एक आणि खजुराहोला एक अशी 64 योगिनींची मंदिरे आढळतात. त्याचबरोबर ग्वाल्हेरजवळ मितावली इथे एक चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. हिरापूर इथले 64 योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स. च्या 9 व्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. उघडय़ा आकाशाखाली 64 कोनाडय़ांच्या रूपात असलेले हे मंदिर निश्चितच अत्यंत वेगळे आहे. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेल्या एकेका देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते. अशा 56 मूर्ती या वर्तुळाकृती भिंतीच्या आत असलेल्या कोनाडय़ात आहेत. मंदिराच्या मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे. बुद्धीचा मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते. तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात. या चंडी मंडपाच्या चारही बाजूंनी एकूण 8 योगिनींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. पूर्वी या चंडी मंडपावर महाभैरवाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. वर्तुळाकार भिंतीच्या आतील कोनाडय़ात असलेल्या 56 आणि चंडीमंडपावरील 8 अशा 64 योगिनी इथे दिसतात. इथे अजून एक वेगळी मूर्ती दिसते ती आहे एकपाद भैरवाची. 64 योगिनींची पूजा ही तांत्रिक पूजा समजली जाते. योगिनी शक्यतो प्राणी, राक्षस किंवा माणसाचे मुंडके यावर उभ्या असलेल्या दाखवतात.

रानीपूरझरीयाल

बोलांगीर जिह्यात असलेले रानीपूर-झरीयाल हे ठिकाणसुद्धा 64 योगिनींच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या वास्तूला राष्ट्रीय महत्त्व असलेले ठिकाण असा दर्जा राज्य सरकारने दिलेला आहे. या ठिकाणी मध्यभागी शिव पार्वती आलिंगन मुद्रेत असून त्यांच्या सर्व बाजूंनी 64 योगिनींच्या मूर्ती दिसतात. या सर्व योगिनी विविध नृत्यमुद्रेत दाखवलेल्या आहेत. हे या ठिकाणचे अगदी सुंदर आणि अत्यंत वेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. यातल्या 13 मूर्ती आता दिसत नाहीत तर इतर काही भग्न झालेल्या आहेत, परंतु तरीही त्यांचे सौंदर्य मात्र अजिबात कमी होत नाही. इथे जवळच 20 मीटर उंचीचे ‘इंद्रलथ’ नावाचे एक विटांचे मंदिर असून ते तत्कालीन ओडिशामधील सर्वात उंच विटांचे मंदिर समजले जाते. ओडिशाच्या भटकंतीमध्ये या आगळ्यावेगळ्या मंदिरांना मुद्दाम भेट द्यावी व भटकंती समृद्ध करावी.

ashutosh.treks@gmail.com

(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)

पाऊलखुणा – बंदलिके : आडवाटेवरचा चालुक्य ठेवा

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट


कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना एक खजिना गवसला. राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर ‘बंदलिके’. इथे जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर मंदिर अशी ठिकाणं आहेत. अप्रतिम कलाकुसर, कोरीव व देखणं शिल्पकाम असलेली ही मंदिरे पाहण्याचा अनुभव अद्भुत असाच असतो.

एकदा धोपट वाट सोडून आडवाटेवर जायची सवय लागली की पाय आपोआप तिकडे वळतात. मग ती आडवाट कोकणातली असो, मराठवाडय़ातली असो किंवा कर्नाटकातली असो. बऱयाचदा आडवाटेवर काहीसा दुर्मिळ आणि सुंदर खजिना सापडतो आणि तो जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. कर्नाटक प्रांत हा वारसा स्थळे, संस्कृती, कला यांनी समृद्ध आहे. मोठमोठी ठिकाणं तर इथे आहेतच, पण इथल्या आडवाटेवरसुद्धा कमालीची सुंदर स्थळं आणि देखणी ठिकाणं सापडतात. कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना असाच एक खजिना गवसला. शिरसी-बनवासी-बळ्ळीगावी असं हिंडत असताना आणि तिथली देखणी मंदिरं बघत असताना बळ्ळीगावी या ठिकाणी एक प्राथमिक शिक्षक भेटले. मोडक्यातोडक्या हिंदी-इंगजीमध्ये त्यांचाशी बोलत होतो. इतक्या लांब ही मंदिरं बघायला मी आलोय हे कळल्यावर त्यांनी आवर्जून काही ठिकाणं सुचवली. त्यातले एक होते ‘बंदलिके’. ‘बळ्ळीगावीवरून तालेगुंडा, बिलकी, शिरीहळ्ळीमार्गे फक्त 15 किमी आहे. तुम्ही अवश्य जा तिथे’, असं अगदी अजिजीने सांगत होते. रस्ता कळणारा नाही म्हणून या मधल्या गावांची नावे कानडीमध्ये लिहून दिली आणि ‘लोकांना हे दाखवा, ते वाट दाखवतील’ असे सांगितले. त्यांचा आग्रह बघूनच बंदलिकेला जायचे ठरवले आणि तिथे मोठा खजिनाच हाती आला.

बंदलिके हे इ.स.च्या 10 व्या शतकातले एक महत्त्वाचे शहर होते. राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर होते. नगरखंड-70 या प्रदेशाच्या राजधानीचं हे नगर. जैन आणि कालामुख या संप्रदायांचे हे महत्त्वाचे केंद्र. बंदलिकेचा इतिहास हा इथे मिळालेल्या 31 शिलालेखांवरून समजला आहे. काही शिलालेखांतून याचे नाव ‘बांधवपुरा’ असेही आले आहे. या गावी जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर मंदिर अशी ठिकाणं आहेत. बंदलिके इथे खूप मोठा पाण्याचा तलाव आहे. इथली मंदिरे या तलावाच्या आजूबाजूलाच वसली आहेत. त्यातल्या शांतीनाथ बसदीमध्ये आता कुठलीही मूर्ती नाही. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी या बसदीची रचना आहे.

त्रिमूर्ती नारायण मंदिर हे तीन गाभारे असलेले मंदिर आहे. इ.स. 1160 मधे बांधलेले खास कल्याणी चालुक्य शैलीचे मंदिर. मुख्य मंदिरात विष्णूची उभी मूर्ती असून बाजूच्या दोन गाभाऱयांत शिवलिंगे आहेत. गाभाऱयाचे दार, त्याला दगडी जाळी, ललाटबिंब म्हणून गजलक्ष्मी अशी सगळी चालुक्यांची वैशिष्टय़े इथे दिसतात. तीनही गाभारे असेच सजवलेले आहेत. मंदिराच्या परिसरात बरेच वीरगळ मांडून ठेवलेले. काही वीरगळांवर जुन्या कानडी लिपीतले लेख कोरले आहेत. कुण्या वीराचे हे स्मारक त्याच्या देहत्यागानंतरसुद्धा वर्षानुवर्षे इथे उभे आहे. परिसरात अनेक लढाया झालेल्या असणार, त्याशिवाय हे एवढे वीरगळ इथे दिसायचे नाहीत. हे बघून बाहेर पडत असताना तिथला पुरातत्त्व विभागाचा सेवक माझ्यापाशी आला आणि ‘सोमेश्वर मंदिर बघितलं का?’ असं विचारलं. मी ‘नाही’ म्हटल्यावर मला म्हणाला, ‘मग एवढय़ा लांब येऊन काय बघितलं तुम्ही?’ मला हाताला धरूनच तो एका छोटय़ाशा उंचवटय़ापलीकडे घेऊन गेला. तिथे एक छोटेखानी देऊळ वसले आहे. आम्ही पाठीमागच्या बाजूने गेलो. माझ्या चेहऱयावरील आश्चर्य बघून तो म्हणाला, ‘पुढे तर चला…’ समोरच्या बाजूला गेल्यावर एक मंदिर त्याचा दरवाजा बंद असलेला, पण त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन शिल्पपट! एकावर रामायण कोरलेलं आणि दुसऱया बाजूच्या शिल्पपटावर महाभारत कोरलेलं. वरपासून खालपर्यंत सात पट्टय़ा. खालून वर बघत जायचे की, रामायण आणि महाभारताच्या कथा दिसू लागतात. सगळी शिल्पं अगदी प्रमाणबद्ध आणि फार सुंदर. अगदी बारीक, पण कमालीचं कोरीव आणि देखणं शिल्पकाम केलेलं. ते बघून थक्क व्हायला झालं. बाकी मंदिर अगदी साधं. नगरखंड-70 चा प्रशासक बोप्पसेट्टी याने हे मंदिर इ.स. 1274 साली बांधले. गाभाऱयात शिवलिंग, ललाटावर गजलक्ष्मी आणि बाहेर दोन बाजूंना हे अफाट शिल्पवैभव.

कोण कधी कुठे कशासाठी एखादं मंदिर बांधेल… तेव्हा त्यांचा काय उद्देश असेल…आणि ते मंदिर शेकडो वर्षांनतरही त्या माणसाची महती सांगत उभे असेल हे सगळं आश्चर्यकारक म्हणायला हवं. त्याचबरोबर रामायण आणि महाभारत हे भारतीयांच्या मनात किती खोलवर रुजले आहे याची प्रचीती इथे आली. असं वाटलं की, हे रामायण आणि महाभारताचे शिल्पपट दाखवण्यासाठीच जणू हे मंदिर बांधले आहे की काय! त्या पुरातत्त्व विभागाच्या सेवकाचे मनोमन आभार मानले. तो म्हणाला, ‘इथे येणारी माणसे हे न बघताच जातात म्हणून माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं.’ मला आपले राज्य आठवले. जाऊ दे. इतके सुंदर आणि देखणे शिल्पवैभव कर्नाटकात अगदी आडभागात वसले आहे ते बघता आले. भटकंती समृद्ध झाली. देवाक काळजी दुसरं काय!

– ashutosh.treks@gmail.com
(लेखक लोक संस्कृतीचे अभ्यासक आहेत)

दखल – भटकंतीचे मार्गदर्शन

सामना ऑनलाईन

>> अस्मिता येंडे

‘महाराष्ट्र’ हा शब्द जरी उच्चारला तरी त्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी डोळ्यांसमोर येते. डोंगरदऱया, कडेकपारी, समुद्रकिनारे, लेणी, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, घाट, निखळ पाण्याचे प्रवाह, ऐतिहासिक काळाची साक्ष देणाऱया खुणा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, देवस्थाने अशा विविधतेने साकारलेल्या महाराष्ट्राची प्रतिभा या निसर्गसौंदर्यामुळे आणि संस्कृतीमुळे अधिक उठून दिसते. नवीन पिढीलाही हे महाराष्ट्राचे वैभव माहीत व्हावे यासाठी लेखक, चित्रकार आणि भटकंतीचा मनमुराद आनंद लुटणारे रामदास खरे घेऊन आले आहेत नवेकोरे पुस्तक ‘स्मरण महाराष्ट्राचे…निमित्त भटकंतीचे.’

गेल्या 40 वर्षांत विविध कारणांमुळे त्यांनी महाराष्ट्रातील विविध स्थळांना भेटी दिल्या. त्या स्थळांची माहिती, स्थळांची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती, तेथील आख्यायिका, आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती  या माहितीपर पुस्तकात त्यांनी दिलेली आहे. एकूण 112 लेखांतून महत्त्वपूर्ण ठिकाणे त्यांनी या पुस्तकाद्वारे प्रकाशझोतात आणली आहेत.

लेखांची रचना आटोपशीर असून अगदी नेमक्या शब्दांत मुद्देसूद आणि मार्गदर्शनपर, वैशिष्टय़पूर्ण  माहिती  या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने दिलेली आहे. पुस्तकात वास्तू, किल्ले, वास्तुशिल्प, कातळशिल्प, निसर्गरम्य ठिकाणे, मंदिरे, नदीची उगमस्थाने, घाट, तलाव, समुद्रकिनारे, राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, साहित्यिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वास्तू इत्यादी माहिती देताना त्याविषयी रूढ असणाऱया दंतकथा, आख्यायिकाही लेखक सांगतात. पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यातील बरीचशी ठिकाणे आपल्याला माहीत नाहीत. त्या ठिकाणांचे अस्तित्व हळूहळू लुप्त होत चालल्याने कदाचित ही स्थळे लोकांना स्मरणात नाहीत. असा ऐतिहासिक वारसा न जपल्यामुळे, तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंदिर, गडकिल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे. अशाने हे वैभव पुढील पिढीला दाखविण्यासाठी उरेल का? ही खंत लेखकाने लेखातून व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टिने किती व्यापक आणि वैभवशाली आहे याची परिपूर्ण प्रचीती रामदास खरे यांनी दिली आहे. एखाद्या वाटाडय़ाप्रमाणे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल.

स्मरण महाराष्ट्राचे…निमित्त भटकंतीचे

लेखसंग्रह / लेखक ः रामदास खरे

प्रकाशक ः अनघा प्रकाशन   मूल्य ः 360 रुपये

फिरस्ती – वाघबीळ धबधबा निसर्गाचा आविष्कार!

सामना ऑनलाईन

>> प्रांजल वाघ

मुंबईपासून अगदी जवळ निसर्गाच्या कुशीतला आडवाटेचा असा ताहुलीचा डोंगर आणि याच ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा! कडय़ावरून कोसळणारा पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि पाणी यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं, निसर्गाचा आविष्कार असलेलं हे एक विवर.

अनेक महिन्यांनी सह्याद्रीत भटकंती करण्याचा योग गेल्या आठवडय़ात जुळून आला. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत असताना जवळच असलेला छोटेखानी भिवगड पाहून झाला होता. आता उन्हाच्या काहिलीपासून जरा आराम मिळण्यासाठी आम्हाला पावसात चिंब भिजायचं होतं. सह्याद्रीच्या डोंगरातील जंगलाचा आनंद लुटायचा होता. मग आम्ही निवडली एक थोडीशी आडवाटेला असलेली जागा – वाघबीळ!

बदलापूरला रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर पूर्वेस बाहेर पडायचं. स्टेशनवरून तुम्ही सावरोली गावासाठी रिक्षा घेऊ शकता. स्वतचे वाहन असल्यास सर्वात सोयिस्कर आणि उत्तम! सावरोली गाव बदलापूरच्या नैऋत्येस वसलेले एक छोटेसे. सह्याद्रीतील ताहुली डोंगराच्या कुशीतल्या दाट जंगलाची हिरवी गोधडी पांघरून गुडूप झोपलेलं! इथल्या डांबरी सडकेवर रिक्षा आपल्याला सोडते. लगेच डावीकडे आपल्याला झेडपीची शाळा दिसते. त्याच्या बाजूनेच एक छोटासा रस्ता नदीकडे जातो. त्या रस्त्याला लागून चालताच पाच मिनिटांत आपण ओढावजा नदीपाशी पोहोचतो. ती पायीच ओलांडून जंगलात जाणारी ठळक आणि रमलेली वाट आपल्याला लागते आणि इथून खऱ्या ट्रेकची सुरुवात होते.

जंगल अधिक दाट होत जाते. चालता चालता आपण झाडावेलींनी तयार केलेल्या एका नैसर्गिक बोगद्यातून थोडासा चढ चढतो आणि अचानक समोर एक विस्तीर्ण पठार लागतं, तिथे आपल्यासमोर विश्वरूप दर्शन देत उभा असतो ताहुलीचा महाकाय आणि प्राचीन डोंगर. आपले दोन्ही बाहू पसरून तुम्हाला कवेत घेऊ पाहणारा! याच ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा!
इथून पुढे दाट जंगलातून वाट काढत दोन-तीन ओढे ओलांडत अचानकपणे आपण थबकतो. कोसळणाऱया धबधब्याची गाज आपल्या कानी पडू लागताच आपला चालण्याचा वेग वाढतो आणि अगदी काही क्षणात वाघबीळचा धबधबा नजरेस पडतो. कडय़ावरून कोसळणारा पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि पाणी यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं, निसर्गाचा आविष्कार असलेलं एक विवर – वाघबीळ!

त्या विवराकडे जाणारी वाट मात्र शेवाळलेली आहे. त्यामुळे तिथे जाताना अत्यंत काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे. तसेच धबधब्यापर्यंत पोहोचायला लागणारे ओढे ओलांडताना पाण्याचा जोर बघूनच ते ओलांडावेत.

त्या विवरात प्रवेश करून आम्ही आतमध्ये पडणाऱ्या पाण्याच्या संततधारेखाली चिंब भिजून मन तृप्त करून घेतले आणि त्या धारांचा अभिषेक आपल्या मस्तकी करून घेतला. पाऊस आता वाढायला लागला होता. खालच्या ओढय़ांना पाणी वाढायच्या आत आम्ही परत फिरलो. वाघबीळच्या थंडगार आठवणी सोबत घेऊन झपाझप पाऊले टाकीत घराकडे निघालो.

भटकंती – एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी वामनमूर्ती मंदिर

सामना ऑनलाईन

>> वर्षा चोपडे

आज जे महाबलीपूरम शहर आहे तेच शहर बळीराजाची राजधानी होती. या भागात पूर्वी घनदाट जंगल असावे. बाजूला कोचीन युनिव्हर्सिटी आहे. आजूबाजूला घरेही आहेत, पण हे मंदिर दोन सहस्र वर्षांपूर्वीचे आहे असे म्हटले जाते. विष्णू देवतेला समर्पित असलेले हे मंदिर भव्य आहे आणि आजही राजघराण्याद्वारे येथे विशेष पूजा केली जाते. शेजारी तेवढेच आकर्षक शिवमंदिर आहे. एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे.

बळीराजा आणि वामन अर्थात भगवान विष्णू यांची गोष्ट  सर्वश्रुत माहीत आहे, पण या वामन देवतेचे  मंदिर कुठे आहे, याबाबत खूप कमी लोकांना माहिती असावी. राजगिरी कॉलेजला जाताना रस्त्याच्या कडेला असलेले हे भव्य वामन मंदिर अर्थात थ्रिक्काकर-अप्पन मंदिर मला आकर्षित करायचे. मुंबईला जरी पोस्टिंग मिळाली तरी या मंदिराचा भव्यपण व सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड स्रोत मनातून जात नाही. थ्रिक्काकर मंदिर हे ओणम उत्सवाचे केंद्र मानले जाते. कारण कोची शहरातील थ्रिक्काकर हे राजा महाबली यांचे निवासस्थान मानले जाते.

 हिंदुस्थानला  स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्रावणकोरच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली 61 नादुवजी (स्थानिक शासक) यांनी ओणम उत्सवाचे संयुक्तपणे आयोजन केले होते. जातीय सलोखा हा उत्सव साजरा करण्याचे वैशिष्टय़ आहे. उत्सवाच्या भावनेनुसार ओणसद्य किंवा ओणम मेजवानीसाठी विविध धर्मांचे लोक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. विष्णुमूर्ती असुर राजा महाबलीवर पाय ठेवत असलेल्या मुद्रेत आहे. मूर्तीचा चेहरा प्रसन्न आणि देखणा आहे. परशुरामाने मंदिराची स्थापना केल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात 861 सालच्या ओणम उत्सवाच्या सर्वात जुन्या उल्लेखांच्या नोंदीदेखील आहेत. मूर्तीची सजावट  मुख्यत चंदनाची पेस्ट, दागिने आणि कपडे वापरून केली जाते.

प्रत्येक दिवशी विष्णू देवतेला  मत्स्य (मासे), कूर्म (कासव), वराह (डुक्कर), नरसिंह (अर्धा मानव अर्धा सिंह), वामन, परशुराम, राम, बलराम, कृष्ण, कल्की आणि त्रिविक्रम (वामनाचे दुसरे रूप) यांसह विष्णूच्या दहा अवतारांपैकी एकाच्या रूपात सजवले जाते. ओणम उत्सवात मंदिरात चक्यर कुथू, ओट्टमथुल्लाल, कथकली आणि पटकमसारख्या अनेक सांस्कृतिक कलांचे तसेच पंचवाद्यम आणि थायंबका नृत्य आणि संगीताचे सादरीकरण केले जाते. इतर वेळी येथे पारंपरिक वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे मंदिर त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या प्रशासनाखाली आहे. मंदिराच्या जवळ दोन मोठे तलाव आहेत. आतमध्ये गोडय़ा पाण्याची विहीर आहे.

दरवर्षी ओणम उत्सवात जुना ध्वज काढून नवीन ध्वज  चढवण्यात येतो. मूर्तीला हत्तीवर बसून तलावाजवळ नेण्यात येते तेथे विधिवत पूजा होते. साऱ्या मंदिराभोवती नेहमीप्रमाणे दिवे लावले जातात. पारंपरिक वाद्यांचा गजर होतो. अनेक भक्त त्याकरिता मदत करतात. दिव्याच्या रोषणाईने मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघते. पारंपरिक पांढऱ्या, सोनेरी पोशाखात सजून महिला-पुरुष,  लहान मुले-मुली सामील होतात. वामन मंदिराच्या उपदेवता म्हणजे भगवती, सस्थवू, गोपालकृष्ण, नाग, ब्रह्मराक्षस आणि यक्षी. ब्रह्मराक्षस मंदिराबाहेरील संकुलात वटवृक्ष देवता आणि सर्पदेवता विराजमान आहेत.

भागवत पुराणात वर्णन केले आहे की विष्णुदेवतेने  स्वर्गावर इंद्राचा अधिकार पुनर्संचयित करण्यासाठी वामन देवतेच्या  रूपात अवतार घेतला होता.  कारण परोपकारी असुर राजा बळी याने स्वर्ग ताब्यात घेतला होता. बळी हा विरोचनाचा मुलगा आणि भक्त प्रल्हाद याचा नातू होता. राजा बळी उदार होता आणि कठोर तपस्या आणि तपश्चर्येत गुंतला होता. त्याने आपल्या परोपकाराने आणि शूरपणामुळे जगाची प्रशंसा मिळवली होती. असे म्हणतात,  इतरांकडून मिळालेल्या कौतुकामुळे तो स्वत:ला जगातील सर्वशक्तिमान राजा मानत असे आणि ते सत्य होते.

इंद्राला त्याचे राज्य परत मिळावे म्हणून ताडपत्राची छत्री घेऊन एका लहान ब्राह्मणाच्या वेषात वामन, बळीराजाकडे तीन पावले जमीन मागण्यासाठी गेला. राजा बळी उदार होता. देवावर त्याची प्रचंड आस्था होती. राजा बळीने त्याच्या गुरू शुक्राचार्य यांच्या इशाऱ्याला न जुमानता होकार दिला. त्यानंतर वामनाने आपली ओळख प्रकट केली आणि तीन पावले जमीन मागितली. वामनाने तिन्ही लोकांवर पाऊल ठेवण्यासाठी प्रचंड भव्य रूप घेतले. त्याने पहिले पाऊल स्वर्गातून पृथ्वीवर टाकले आणि दुसरे पाऊल पृथ्वीवरून पाताळात टाकले. राजा बळी आपले वचन पूर्ण करू शकला नाही. त्याने तिसऱ्या वेळी  आपले डोके वामनासमोर केले. त्यानंतर वामनाने आपला  पाय त्याच्या डोक्यावर ठेवला आणि राजाला त्याच्या नम्रतेसाठी अमरत्व दिले. वामनाने महाबली आणि त्याचे पूर्वज प्रल्हाद यांची पूजा करून आशीर्वाद मागितले आणि वामनाने त्याचे  सार्वभौमत्व मान्य केले. काही ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की, वामनाने बळीराजाच्या  डोक्यावर  पाऊल ठेवले नाही, तर त्याची केवळ परीक्षा घेतली. त्यानंतर  त्याचे राज्य बळीला परत दिले व त्याला पुढील इंद्र होण्याचे वरदान दिले. याबाबत मतभेद आहेत. महाकाय स्वरूपात असलेल्या  वामनाला त्रिविक्रम म्हणून ओळखले जाते. ही आख्यायिका उलागलंथा पेरुमल मंदिर, तिरुकोयिलूर मंदिर, उलागलंथा पेरुमल मंदिर, कांचीपुरम आणि काझीराम विन्नगरम, सिरकाझी या मंदिराशीदेखील संबंधित आहे.

या थ्रिक्काकारा मंदिरातील उत्सवाचा समारोप म्हणजे ध्वज खाली उतरवणे आणि मूर्तीला आंघोळ घालणे. याला आरत्तू असे संबोधले जाते. खजुराहोला वामन मंदिर आहे, पण ते या मंदिरासारखे फार प्राचीन नाही. राजा बळीला दुष्ट राजा म्हणून चित्रित का गेले, याचे उत्तर नाही, परंतु काही पौराणिक कथांनुसार तो एक दानशूर आणि न्यायप्रिय राजा म्हणून ओळखला जात असे. त्याच्या राज्याला स्वर्गासारखे मानले जात होते आणि त्याच्या राज्यात कोणताही अन्याय किंवा दुःख नव्हते. दिवाळीच्या सणातील बलिप्रतिपदा म्हणजेच बळीचा पाडवा  म्हटलं की,  आपल्याला बळीराजा आठवतो. त्याला ‘बळी’ किंवा ‘महाबली’ या नावानेही ओळखले जाते. त्याच्या राज्याचा उल्लेख ‘बळीचे राज्य’ असा केला जातो, जो ‘इडा-पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ या प्रसिद्ध वाक्यात आजही वापरला जातो. नाशिक शहरात बळीराजाचे एकमेव मंदिर आहे. पुराणात जे लिहिले त्याला अनुसरून हा लेख आहे. सत्य काही का असेना, पण परशुरामाने स्थापन केलेले  दक्षिणेतील हे वामनमूर्ती मंदिर अत्यंत सुंदर,भव्य आणि नक्षीदार असून तेथील पावित्र्य अनुभवायला काहीही हरकत नाही.

varshakisanc@gmail.com

सिनेविश्व – पडद्यावरच्या स्थळांचे पर्यटकांना आकर्षण

सामना ऑनलाईन

>> दिलीप ठाकूर

आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक अतिशय भन्नाट व जगावेगळे. ते आवडलेला चित्रपट पडद्यावरच ठेवून बाहेर पडत नाहीत. ते त्यांच्या मनात, हृदयात, मेंदूत राहतात आणि त्याचा ते कुठे, कसा, सकारात्मक प्रत्यय देतील हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! कोणी एखादा प्रसंग लक्षात ठेवतो, कोणी संवाद तर कोणी चित्रीकरण स्थळ. कोल्हापुरातील गगनबावडा येथे फिरायला गेल्यावर अनेकजण पंत अमात्य बावडेकर वाड्याला आवर्जून भेट देतात. का, तर ‘पछाडलेला’ या चित्रपटात हा वाडा पाहिला होता. तसे तर इतरही काही चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले, पण ‘पछाडलेला’मध्ये त्याचे अस्तित्व जास्त जाणवते. परशुरामपंत अमात्य यांनी 1935 साली बांधलेल्या या वाडय़ाच्या आसपास जंगल आहे. त्यामुळेच भयदृश्यात त्याचा उपयोग होतो. ‘रात्रीस खेळ चाले’ या भयमालिकेचं चित्रीकरण झालेल्या कोकणातील घराला अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. त्यासह फोटो वा सेल्फी काढतात.

चित्रपटात पाहिलेल्या स्थळांना प्रत्यक्षात महत्त्व येणे हे केव्हापासून सुरू आहे. ‘आराधना’चे ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू…’ गाणे लोकप्रिय होताच दार्जिलिंगला गेलेल्या प्रत्येक पर्यटकास तेथील रेल्वेत बसावेसे वाटले. ‘बॉबी’चे उदाहरण अतिशय उत्तम. श्रीनगरमधील ज्या बंगल्यात ऋषी कपूर व डिंपल शिरतात आणि मग त्यांच्या मोकळ्याढाकळ्या प्रणयात ‘हम तुम एक कमरे मे बंद हो’ हे गाणे सुरू होते. ते घर कायमच

‘बॉबी’तलं घर म्हणून दाखवले जाते. आणखीही अनेक चित्रपटांत पहलगामचे हिरवेगार सौंदर्य दिसते. पण जेव्हा पर्यटकांना येथे ‘बॉबी’चा संदर्भ देईपर्यंत चित्रपट रसिक मात्र ‘बॉबी’, ‘आप की कसम’, ‘जिंदादिल’ अशा इतर चित्रपटात पहलगामचे निसर्गसौंदर्य आपण पाहिले याचे संदर्भ देतात. ‘बेताब’चे चित्रीकरण झालेली कश्मीरमधील व्हॅली तेव्हापासून म्हणजेच तब्बल चाळीस वर्षांपासून ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखली जाते. ‘1942- अ लव्ह स्टोरी’मधील हिमाचल प्रदेशातील डलहौसीतील प्रत्येक स्पॉटचे पर्यटकांचे आकर्षण वाढवणारे. देशविदेशात पर्यटनास जायचे ठरवल्यावर तेथे कोणत्या चित्रपटाचे शूटिंग झालेय हे आज गुगल सर्चने समजू शकते. अनेक वर्षे मात्र ते आवडीनुसार लक्षात राहायचे. त्यातल्या जिव्हाळ्यात जास्त आनंद मिळे. आज मुंबईतील वांद्रय़ाचा बॅण्ड स्टॅन्ड परिसर फार गजबजलेला असतो. 50-55 वर्षांपूर्वी मात्र तेथे बराच शुकशुकाट असे. त्यातही कोणी तेथे फिरायला गेल्यावर त्याला ‘बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटातील ‘रात कली एक ख्वाब मे आयी’ हमखास आठवायचे. ‘एक दुजे के लिए’पासून गोव्यातील प्रसन्न, दिलखुलास अशा समुद्र किनाऱ्यावरील वाळूत शिंपले शोधणे, दगडावर आपलेही नाव कोरण्याची क्रेझ निर्माण झाली. जे पडद्यावर तेच प्रत्यक्षात असेच हे समीकरण.

‘लोकल ते ग्लोबल’ असा हा चित्रपटातील लोकेशन व चाहत्यांचे त्याच्याशी जमलेले नाते असा हा प्रवास आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी स्वित्झर्लंडला सातत्याने आपल्या चित्रपटातील प्रणय प्रसंग, प्रणयगीतांचे चित्रीकरण केल्याने स्वित्झर्लंडमधील इंटरलाकेन परिसरात त्यांचा पुतळा बसवला. एका रस्त्याला त्यांचे नाव दिले. त्यांच्या नावाने एक ट्रेनदेखील तेथे आहे. युरोप पर्यटनात हे सगळेच अनुभवता येते. पूर्वीच्या पर्यटकांना लंडनला गेल्यावर राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’मधील अनेक स्पॉट दिसत नि त्यात त्यांना आनंद मिळे. अशी आणखी अनेक उदाहरणे आहेत. देशविदेशातील अनेक पर्यटनस्थळांचे महत्त्व चित्रपटातील त्यांच्या दर्शनाने वाढवले. पिक्चर हिट तर अशी स्थळेही लोकप्रिय.

अमिताभ बच्चनच्या ‘अग्निपथ’ने मांडवा गाव लोकप्रिय केले, पण यातले मांडवा गाव हे अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील मांडवा नाही. ते ‘दो जासूस’, ‘इन्साफ’ चित्रपटात दिसले. ‘अग्निपथ’मध्ये (त्याच्या रिमेकमध्येही) मांडवा गाव एक व्यक्तिरेखा आहे. प्रत्यक्षात शूटिंग इतरत्र केलेय. आपला चित्रपट रसिक पडद्यावर बरेच काही पाहतो आणि त्यात त्याला दिसलेली अनेक स्थळे त्याला भटकंतीच्या वेळेस पाहावीशी वाटतात हीच तर गंमत आहे.

glam.thakurdilip@gmail.com

संस्कृती-बिंस्कृती- गधेगाळ : एक सांस्कृतिक दस्तावेज

सामना ऑनलाईन

>> डॉ. मुकुंद कुळे

महाराष्ट्रात शिलाहारांपासून ते यादव काळ ते अगदी शिवपूर्व काळापर्यंत (बहामनी राज्य) हे शापवाणीयुक्त शिलालेख सर्रास सापडतात. हे सारेच शिलालेख साधारणपणे नऊ ते पंधरा या शतकातील आहेत आणि हे प्रामुख्याने मंदिर किंवा देवस्थानांना राजाने दिलेल्या विविध प्रकारच्या दान वा देणगीच्या निमित्ताने कोरण्यात आलेले आहेत. मात्र हे शिलालेख कोरताना, जवळजवळ प्रत्येकाने दानपत्राबरोबरच अर्वाच्य आणि अभद्र अशी शापवाणीही कोरलेली आहे. किंबहुना राजाज्ञेचे पालन न करणाऱयाला सणसणीत शिवीच घातली आहे… आणि ही शिवी मुख्यत्वे त्याच्या आईवरून घातलेली आहे. कारण शेवटी आई हा कुणाचाही संवेदनशील-नाजूक-हळवा कोपरा असतो. बहुधा ही मानसिकता तत्कालीन राजेशाहीला ठाऊक असावी आणि म्हणूनच आपल्या आदेशाचे सगळ्यांनी निमूट पालन करावे, यासाठी त्यांनी आज्ञा मोडणाऱयाला एकप्रकारे त्याच्या आईवरून शिवी घातलेली आहे. अशा शिलालेखांविषयी…

‘गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।

स्त्राr कोंकणा चक्री- वर्ती। स्त्राr केसीदेवराय।

महाप्रधा– न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।

सकु संवतुः 934 प्रधा- वी सवसरेः अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।

भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु। महालषु– मीची वआण। लुनया कचली ज-’

संस्कृत आणि मराठी भाषेचं मिश्रण असलेला हा शके 934 (इसवी सन 1012) मधला शिलालेख. या शिलालेखातील मजकुराचा अर्थ असा… ‘कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री कोकण चक्रवर्ती श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत 934 प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो…’

मात्र रायगड जिह्यातील अलिबाग-चौल-रेवदंडा मार्गावरील अक्षी गावात सापडलेल्या मराठीतील या आद्य शिलालेखात पुढे एक घृणास्पद शापवाणीही कोरलेली आहे. ‘हे शासन (राजाज्ञा) जो कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झविजे.’

हा शिलालेख ज्या कुणी कोरून घेतलेला आहे, तो ही शापवाणी केवळ शब्दांकित करून थांबलेला नाही; त्याने ती शिल्पांकितही केलेली आहे. शिल्पांच्या माध्यमातून कोरलेल्या अशा शापवाणीचे दाखले अनेक मिळतात. या प्रकारच्या अश्लील शापवाणीतून तत्कालीन मुस्लीम समाजही सुटलेला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, रायगड जिह्यातील दाभोळ येथील जामा मशिदीत सापडलेला मराठी शिलालेख. शापवाणी कोरलेल्या या शिलालेखात म्हटलंय-

‘यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल, त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे.’

(जो हिंदू अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील, त्याच्या आईवर गाढव चढेल, हे पक्के जाणून असा…)

अर्थात अशी शापवाणीयुक्त शिळा कोरण्यामागचा राजाचा-शासनकर्त्याचा हेतू काहीही असो, प्रत्यक्षात त्याला स्त्राrची अवहेलना करायची असो व नसो; पण कळत नकळत त्याच्याकडून स्त्राr लज्जित होते, एवढं नक्की… आणि म्हणूनच या शापवाणीयुक्त शिलालेखांकडे केवळ ऐतिहासिक वस्तू-वारसा म्हणून पाहण्याऐवजी, त्यांच्याकडे सामाजिक-सांस्कृतिक अंगानेही पाहिलं पाहिजे. कोणत्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय अवकाशात तत्कालीन शासनकर्त्यांना हे शापवाणीयुक्त शिलालेख कोरावेसे वाटले, शिलाहारपूर्वकाळात महाराष्ट्रात असे शिलालेख का सापडत नाहीत आणि शापवाणी कोरताना त्यांनी गाढवासारख्या प्राण्याचीच निवड का केली? काळाच्या पटलावर कोणतीही घटना सहज किंवा आपसूक घडत नसते. तिच्यामागे काही ना काही कार्यकारण भाव असतो. काळाचा, परिस्थितीचा रेटा असतो. त्यामुळे या साऱया मुद्दय़ांच्या परिप्रेक्ष्यातच या शापवाणीयुक्त शिलालेखांकडे पाहायला हवं.

या शापवाणीयुक्त शिलालेखांसाठी वापरण्यात आलेली शिळा, वीरगळांसाठी (वीरांच्या स्मरणार्थ उभारलेली शिळाशिल्पं) वापरण्यात आलेल्या शिळेसारखीच (पाटास्वरूप आणि चार ते पाच फूट उंच) असते. काहीशा चपटय़ा असलेल्या या शिळेच्या वरील भागात चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात. चंद्र-सूर्याच्या या प्रतिमा त्या-त्या राजाची राजवट एकप्रकारे चंद्र-सूर्य असेपर्यंत शाबूत राहणार असल्याचं दर्शवत असतात. त्यानंतर मधल्या भागात राजाने दिलेलं दानपत्र कोरलेलं असतं. दानपत्राच्या खालीच अर्वाच्य भाषेतील शापवाणी कोरलेली असते. ही शापवाणी शक्यतो संस्कृतऐवजी स्थानिक भाषेतच कोरलेली असते. जेणेकरून ती सर्वसामान्यांना वाचता यावी.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्राrवर गाढव आरूढ होण्याची शापवाणी असल्यामुळे, ही शापवाणी कोरलेल्या शिळाखंडाना सरसकट ‘गधेगाळ’ किंवा ‘गधेगळ’ असं म्हटलं जातं. गाढवावरून दिलेली शिवी असल्यामुळेच हे नामाभिधान या शिळांना मिळालेलं आहे. अगदी मराठी भाषेतिहासातही ‘गधेगळ’ हाच शब्द वापरण्यात आला आहे आणि तो ‘वीरगळ’ या शब्दाच्या धर्तीवर तयार झालेला आहे. वीरगळ शब्दाची व्युत्पत्ती सांगताना ती वीरगळ अशी केली जाते. वीर म्हणजे शूरवीर-पराक्रमी, तर गळ हा शब्द कन्नडमधून आलेला आहे. कन्नडमध्ये कोणत्याही दगडाला कल्लू म्हणतात, तर कोनशिलेसारख्या दगडाला गल्लू म्हणतात. त्यामुळे वीरगळमधला ‘गळ’ हा शब्द कन्नडमधील कल्लू किंवा गल्लूचा अपभ्रंश आहे, हे नक्की. त्यामुळे वीरगळाचा अर्थ ‘वीराचा दगड’ असा होतो. साहजिकच वीरगळ आणि गधेगळ किंवा गधेगाळ यातील ‘गळ’ शब्दाच्या साधर्म्यामुळे गधेगळ म्हणजे ‘गाढवाचा दगड’ असा शब्दश अर्थ होतो. मात्र ‘वीरगळ’प्रमाणे ‘गधेगळ’ व्युत्पत्ती योजली आणि कदाचित ती खरी असली, तरी ‘गधेगळ’ या संबोधनात ‘गधा’ हा हिंदी शब्द का वापरण्यात आला आहे, ते कळत नाही. जर गधेगळा असलेली शिल्पं प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळत असतील, तर मग त्यांचं संबोधन ‘गाढवगाळ’ का नाही? की ‘गधेगाळ’ हा शब्दच हिंदीवरून आलेला आहे? कारण गधा हा शब्द तर थेट हिंदी आहेच, परंतु गाळ हा शब्द हिंदीतील ‘गाली’चा (म्हणजेच शिवीचा) अपभ्रंश असू शकतो. तसंही आपण मराठीत ‘शिवीगाळ’ हा शब्द वापरतो. म्हणजे कदाचित वीरगळधील ‘गळ’ हा शब्द कन्नडवरून आलेला असू शकतो. परंतु गधेगाळमधील ‘गाळ’ शब्द दगडनिदर्शक नसून तो संस्कृत-हिंदीतील शिवीनिदर्शक ‘गाली’ शब्दावरून आलेला शब्द असावा. मात्र अगदी पूर्वीपासून अशा प्रकारच्या शापवाणीयुक्त शिलालेखासाठी ‘गधेगाळ’ हाच शब्द रूढ आहे, एवढं खरं!

शेवटी गधेगाळ म्हणजे काय तर, शासकाची आज्ञा कुणी मोडल्यास, त्याच्या आईवर (किंवा परिस्थितीवश त्याच्या पत्नीवर) गाढव आरूढ होईल, असा दिलेला शाप. प्राचीन काळी अश्वमेधासारख्या यज्ञप्रसंगी अश्व आणि यज्ञाचा यजमान असलेल्या राणीचा संयोग घडवून आणतच असत. त्याचे दाखले पुराणग्रंथात अनेक सापडतात. त्यात अश्व हा पुरुषत्व आणि पराक्रमाचा प्रतीक. किंबहुना घोडय़ाला पूर्ण पुरुष मानलं जातं. कारण त्याला स्तन नसतात. मग घोडय़ासारखा वीर्यरसाने फुरफुरणारा प्राणी असताना, शापवाणी असलेल्या शिळाशिल्पांमध्ये घोडय़ाऐवजी गाढवाची (क्वचित काही शापयुक्त शिलालेखांमध्ये स्त्राrवर घोडा किंवा हत्तीही आरूढ झाल्याचं दाखवलं आहे.) योजना का केलेली आहे? खरं तर घोडा काय किंवा गाढव काय, स्त्राrसोबत एखादा प्राणी रत होण्याची कल्पना शापवाणीतही निषेधार्हच आहे. तरीही स्त्राrसोबत गाढव का, याची उकल व्हायला हवी. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ‘लोकसाहित्य ः शोध आणि समीक्षा’ या पुस्तकातील ‘शिवी आणि समाजोतिहास’ लेखात या प्रश्नाचा मागोवा घेतला आहे. ते म्हणतात- ‘घोडा आणि गाढव हे दोन्ही एकाच वर्गातील प्राणी असले, तरी घोडा हा केव्हाही अप्रतिष्ठित, अशुभ किंवा अमंगल मानला गेलेला नाही. उलट तो शौर्य आणि सौष्ठव यांचं प्रतीक मानला गेला आहे. तर गाढवाचा निकटचा संबंध शीतला, ज्येष्ठा आणि निऋती या तीनही अशुभ व विघ्नकर देवतांशी असल्यामुळे, त्यांचा प्रतिनिधी असलेला गाढव हा सुफलतेचा-समृद्धीचा दाता नसून तो निष्फळतेचा दरिद्रतेचा आणि अशुभाचा कारक आहे.’

याचा अर्थ दानपत्राचा भंग करणाऱयासाठी शापवाणी उच्चारणारा शासक केवळ स्त्राrची विटंबना करून थांबत नाही. तर एकप्रकारे त्या कुटुंबाला दारिद्रय़-अवकळा येईल, असंही सुतोवाच करतो. प्राचीन भारतीय वेदवाङ्मयात गाढवाचा- गदर्भ, रासभ, खर अशा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आलेला आहे. उज्जैन (उज्जयिनी) येथे आजही भरणारा गाढवांचा बाजार हा विक्रमादित्याच्या काळापासून (दोन हजार वर्षांपासून) भरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

गधेगाळ शब्द, गधेगाळ असलेल्या शिल्पाचं स्वरूप नि त्या शिल्पामागच्या विशिष्ट संकेताचा अर्थ जाणून घेतल्यावर या गधेगाळ का निर्माण झाल्या असतील, याचा शोध घ्यायला हवा. कदाचित याचं उत्तर मुस्लिमांच्या दक्षिण भारतावरील आक्रमणात असू शकतं. दहाव्या-बाराव्या शतकापासूनच मुस्लिमांनी दक्षिणेत उतरायला सुरुवात केली होती. परिणामी शिलाहार ते यादव राजवटीचा महाराष्ट्रातला सुवर्णकाळ कालवंडायला सुरुवात झाली होती. या काळात महाराष्ट्र मोठय़ाच सामाजिक-सांस्कृतिक संकटातून जात होता. हे संकट दुहेरी होतं. एकीकडे परकीयांचं आक्रमण आणि दुसरीकडे महाराष्ट्रात वाढत चाललेला ब्राह्मणी धर्मवाद. परकीय आक्रमक मंदिरांच्या ठायी एकवटलेली अर्थसत्ता उद्ध्वस्त करण्याच्या मागे होते, तर यादव काळात हेमाद्रीपंताच्या वर्चस्वामुळे ब्राह्मणीधर्म आक्रमक झाला होता. त्याच्या ‘चतुर्वर्ग’ चिंतामणी या ग्रंथामुळे तर ब्राह्मणी व्रतवैकल्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले. परिणामी  मंदिर संस्थांमध्ये त्यांचं प्राबल्य वाढलं होतं. सर्वसामान्य अशिक्षित जनता (संस्कृत येत नसलेली) आणि दुसरीकडे काही कारणाने मंदिर संस्था डळमळीत करणारे परकीय आक्रमक यांच्यासाठी निर्वाणीचा संदेश म्हणून या गधेगाळीचा प्रसार झाला असावा का?

म्हणजेच गधेगाळ असलेल्या शिलालेखांतून एकप्रकारे तत्कालीन समाजातील लोकरहाटीचं दस्तावेजीकरणही झालेलं दिसतं. महत्त्वाचं म्हणजे वीरगळ सापडण्याचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक असलं, तरी वीरगळावर शिल्पाबरोबर शिलालेख कोरण्याची प्रथा नसल्यामुळे तो वीरगळ कुठल्या वीराचा, त्या वीराला कधी आणि कुणाकडून मरण आलं किंवा अन्यही कुठल्या प्रकारची माहिती मिळत नाही. याउलट गधेगाळ कोरलेल्या शिळांमधून किमान तत्कालीन शासनकर्त्याची, राजसेवकांची, सर्वसामान्यांची माहिती मिळते. या अनुरोधाने गधेगाळ कोरलेल्या शिळांकडे पाहिलं, तर या शिळा समाज-संस्कृतीच्या वाहकच ठरतात. त्यांच्यावर आईवरून शिव्या कोरलेल्या आहेत आणि म्हणून त्या निषेधार्हच आहेत, पण एक सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज म्हणूनही त्याकडे पाहायला हवे!

mukundkule@gmail.com

रोखठोक – छत्रपती शिवरायांचा प्रसाद; श्री सप्तकोटेश्वराकडे चला!

सामना ऑनलाईन

गोव्यातील नार्वे परिसरात 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवराय गेले तेव्हा  तेथे धड रस्तेही नव्हते. त्या डोंगरांच्या खाली सप्तकोटेश्वराचे मंदिर पोर्तुगीजांच्या धर्मसत्तेने उद्ध्वस्त केले होते. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून शिवरायांनी गोव्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला. त्या श्री सप्तकोटेश्वराचे माहात्म्य हिंदवी स्वराज्यातही आहेच.

छत्रपती शिवाजीराजांनी देवळे उभारली नाहीत. त्यांनी अभेद्य किल्ले निर्माण केले. त्या किल्ल्यांमुळे महाराष्ट्रातील मंदिरांचे रक्षण झाले. शिवरायांनी इतर राजांसारखे महाल आणि राजवाडे उभे केले नाहीत. त्यामुळे इतर राजांसारखा शिवरायांचा राजवाडा कोणाला दिसणार नाही. शिवराय दऱ्याखोऱ्यांत, डोंगरकपारीत आणि अवघड किल्ल्यांवरच वावरले व राहिले. तरीही त्यांनी स्वत:चे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या स्वराज्यात मंदिरांना संरक्षण होते. सोरटी सोमनाथ मंदिरावर मोहम्मद गजनीने आक्रमण केले. त्याचा जीर्णोद्धार स्वातंत्र्यानंतर झाला. त्याची कहाणी आज वारंवार राजकीय कारणांसाठी सांगितली जाते, पण हिंदूंचे एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतक भूमीत पोर्तुगीजांनी पाडलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराचा आपल्या हयातीत जीर्णोद्धार केला.

हा इतिहास अंधारात आहे. गोव्याला जो येतो तो या निसर्गरम्य भूमीच्या प्रेमात पडतो. महाराष्ट्रातून काही आमदार आसामच्या गुवाहाटीमध्ये गेले. ते हॉटेलच्या खिडकीतून डोंगर, झाडी, नदी पाहून प्रभावित झाले. हे आमदार आमच्या कोकणात व बाजूच्या महाराष्ट्रवादी गोव्यात कधी फिरकले नाहीत. गोव्याच्या वातावरणातील ताजेपणा, हिरवी झाडे, हिरवे डोंगर, नारळ-सुपारीच्या बागा, मांडवी-जुवारीसारख्या समुद्रसंपन्न नद्या, आरामशीरपणे जगणारी माणसे, गोव्यातली सुंदर मंदिरे, सुंदर हिरव्या वनराईतून देवळांचे वैभवशाली कळस आपल्याला प्रसन्न करतात. त्यातले एक महत्त्वाचे मंदिर श्री सप्तकोटेश्वराचे, जे छत्रपतींनी उभे केले, ते आजही उपेक्षित आहे. गोव्यात येणारा पर्यटक मंगेशीपासून शांतादुर्गेपर्यंत सर्व तीर्थाटने करतो, पण तो नार्वेतल्या सप्तकोटेश्वरापर्यंत पोहोचत नाही. चारशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याचे राजे गोव्यात आले, ते पोर्तुगीजांशीही लढले व पोर्तुगीजांनी पाडलेले हे शिवमंदिर त्यांनी पुन्हा उभे केले. त्या मंदिराने राजांना आशीर्वाद दिले. गर्द झाडी व डोंगरांत उभ्या राहिलेल्या या मंदिराचे दर्शन विलोभनीय व सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. दोन दिवस गोव्यात होतो व शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात गेलो तेव्हा त्या मंदिरात आजही प्रत्यक्ष शिवप्रभू व राजे संभाजी वावरत आहेत असा भास झाला. मुसळधार पावसात गोव्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्याच पावसात न्हाऊन निघालेले सप्तकोटेश्वराचे मोहक दर्शन घडले. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेले नार्वे आणि शिवरायांच्या हातून जीर्णोद्धार झाला तो सप्तकोटेश्वर गोव्याच्या एका बाजूला व रानात आहे. चारशे वर्षांपूर्वी शिवरायांनी या मंदिराचे बांधकाम केले, पण या सर्व भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. डिचोलीहून मये तलावाच्या बाजूने सप्तकोटेश्वराचे मंदिर तीन-चार मैलांवर पडते. दुसरा मार्ग पणजीहून. रायबंदरहून वाफोर म्हणजे फेरी लाँच पकडून जायचे. त्या मोटार लाँचमध्ये तुमची गाडीच जाते. एका वेळी जेमतेम चार गाडय़ा त्या वाफोरात जातात. पणजीहून 10-15 मिनिटांत तेथे पोहोचतो. हा प्रवास बहारदार आहे, पण शिवराय आले ते मचव्याने. तेव्हाचा प्रवास खडतर असावा. गोव्यात त्या काळी ख्रिश्चनांची प्रचंड धर्मसत्ता राज्य करीत होती. अल्फोंसो अल्बुकर्क एका हातात क्रूस आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊनच गोव्यात उतरला. त्यामुळे त्याच्या तलवारीने सर्वप्रथम उद्ध्वस्त झाले ते हे सप्तकोटेश्वर शिवमंदिर. याच धर्मसत्तेचा बीमोड करण्यासाठी शिवछत्रपती सप्तकोटेश्वराच्या मंदिरात दाखल झाले होते. छत्रपती फक्त गोव्याच्या पर्यटनासाठी आले नव्हते. त्यांनी केवळ देवळाचा जीर्णोद्धार केला नाही. पोर्तुगीज राजसत्ता उलथवून टाकणे हे त्यांच्या गोवा मोहिमेचे ध्येय होते.

कदंबांचे स्थान

कदंबांची गोव्यावर सत्ता होती. कदंब राजाच्या मूळ पुरुषाची उत्पत्ती शंकराच्या कपाळावरील घामातून झाल्याचे मानण्यात येते. या महापरामी त्रिनेत्र जयंत राजाने सप्तकोटेश्वराचे पूजन केले. `श्री सप्तकोटेश्वरलब्धवर प्रसाद’ आणि `निजाराध्य श्री सप्तकोटेश्वर देव’ अशी वचने त्यांनी वापरलेली आढळतात. 1174 साली कदंबाच्या एका

राणीने देवगाव गाव ब्राह्मणांना दान दिले, त्याचे श्री सप्तकोटेश्वर देवाच्या पायाजवळ उदक सोडले, असे देवगावच्या शिलालेखात म्हटले आहे.  1210 मध्ये कदंबांनी सोन्याच्या नाण्यावर `श्री सप्तकोटेशलब्धवर वीर जयकेशि देव’ अशी नोंद केलेली आहे. कदंबांवर सप्तकोटेश्वर प्रसन्न होते. 1352 ते 1366 अशी 14 वर्षे गोवा बहामनी सत्तेखाली होते. यापैकी शेवटच्या आठ-दहा वर्षांत मंदिरांची मोडतोड मुसलमान सरदारांनी केली. सोमनाथाच्या शिवलिंगाप्रमाणे या शिवलिंगातही भरपूर संपत्ती लाभेल या अपेक्षेने हे भव्य शिवलिंग त्यांनी मुळासकट उखडून टाकले, पण त्यांना काहीच लाभ झाला नाही.

हिंदवी स्वराज्य किती?

हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात सप्तकोटेश्वराचे महत्त्व मोलाचे आहे. शिवरायांचे स्वराज्य फक्त साडेतीन जिल्ह्य़ांचे, असे चेष्टेत सांगणारे आजही आहेत. हे स्वराज्य कोकणच्या सीमा पार करून गोव्यापर्यंत पोहोचले होते ते मोठय़ा संघर्षातून. हे साडेतीन जिल्हे गोव्याच्या पार होते. पोर्तुगीजांची परकीय सत्ता भारताच्या या निसर्गरम्य भूमीवरून नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न शिवछत्रपतींनीच केला व सप्तकोटेश्वर हे त्याचे अधिष्ठान होते. फक्त सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवछत्रपती नार्वेला आले नव्हते, तर गोव्याच्या स्वातंत्र्याचे शिल्प  बांधण्यास, हिंदवी स्वराज्याचे घोडे पुढे नेण्यासाठी नार्वे येथे त्यांनी तळ ठोकला होता. आजही जेथे सर्वसामान्य गोमंतकीय कामाशिवाय जात नाही, अशा नार्वेसारख्या ठिकाणी रस्ते नसताना डोंगर, समुद्र ओलांडून शिवछत्रपती कसे आले असतील व त्यांनी तेथे कसा तळ ठोकला असेल? हा प्रश्न मला पडला.

गोव्यात माणसे पेरली

छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून येतील व स्वराज्याचा विस्तार करतील, आपली धर्मसत्ता खिळखिळी करतील याचा अंदाज गोव्यातील पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांना आला होता. पोर्तुगीज व्हाईसरॉय शिवरायांच्या हालचाली व मनसुबे याबाबतची सर्व माहिती लिस्बनला (पोर्तुगाल) पाठवीत असे. गिफर्ड आणि चेंबरलेन यांनी 26 डिसेंबर 1668 रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवाजीचे गोव्यावरील स्वारीचे बेत तडीस नेण्यासंबंधी कार्य सुरू आहे. त्याने त्याच्या माणसांचे वेगवेगळे गट आणि कामाची विभागणी केली आहे. वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्याने पोर्तुगीजांच्या गोव्यात पाच-सहाशे माणसे आधीच सोडून दिल्याची माहिती आहे. नार्वेतील सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी सामान हवे हे त्यापैकी एक महत्त्वाचे निमित्त असल्याचे इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकरांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे. शिवराय स्वत: वेंगुर्ल्यात बसून गोव्यावरील हल्ल्याची मांडणी करीत आहेत व सप्तकोटेश्वर मंदिराची उभारणी हे निमित्त असल्याचे पोर्तुगीजांचे ठाम मत झाले होते आणि संघर्षाची ठिणगी तेथे पडली. पोर्तुगीजांचा विरोध न जुमानता शिवरायांनी गोव्यात पाऊल ठेवलेच. गोवा मोहिमेची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी आधी श्री सप्तकोटेश्वराची पुनर्स्थापना केली.

श्रावणी सोमवार

गोमंतक भूमीचे प्रेमी माधव गडकरी यांच्या बरोबर नार्वे, डिचोलीत जाण्याचा योग एकदा आला होता. श्री सप्तकोटेश्वराचे शिवरायांच्या मोहिमेतील महत्त्व त्यांनी तेव्हा विषद केले होते. ते आजही तसेच आहे. गडकरी यांनीसुद्धा या मंदिराचे माहात्म्य लिहून ठेवले आहे. नार्वेत प्रवेश केल्यावर बरेच पुढे मंदिर जवळ आले तरी कळस दिसत नाही. मंदिर खोल डोंगरदरीत आहे. तरीही ते भव्य आणि आकर्षक आहे. मंदिर बांधलेले नाही, तर डोंगराची कपार खोदूनच ते एकसंध शिलेचे बनवले आहे. पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले शिवलिंग जेथे आहे, तो गाभारा प्राचीन लेण्याप्रमाणे खडकातून खोदलेला आहे. गाभाऱ्याची ही शिला व त्यावरचा कळसापर्यंतचा सर्व भाग हा एका शिलेचा आहे. प्रत्यक्ष डोंगर खोदूनच हे मंदिर उभे केलेले आहे. गाभाऱ्याच्या मागच्या शिलेस आता काचेचे संरक्षक कवच बसवले. ही शिला प्रत्यक्ष छत्रपतींच्या हातून पुढे गेली. त्यातून एक छोटा जिना मंदिराच्या वर गेलेला दिसतो. मंदिराच्या पुजाऱ्यांनी माहिती दिली, ”हा गुप्त दरवाजा नंतर संभाजीराजांनी तयार केला. त्या जिन्यावरून संभाजीराजे वर जात व मोहिमेच्या गुप्त बैठका घेत.” या सर्व शिवकालीन इतिहासाच्या खुणा मंदिरात आजही आहेत. शिवाजीराजांनी पेडणे ताब्यात घेतले व ते डिचोलीत आले. तो श्रावण महिना होता. सप्तकोटेश्वराचे माहात्म्य शिवरायांनी ऐकले होते. श्रावणातला सोमवार त्यांनी निवडला व पूजा करण्यासाठी नार्वेत आले. मंदिरात गर्भगृहासमोर चौक, छप्पर वगैरे काहीच नव्हते. पावसाळ्यासाठी लव्हाळ्याची शाकारणी केली होती. शिवछत्रपती पूजेस बसले व एक लव्हाळा खाली पडला. मंदिर बांधण्याचीच ही आज्ञा असल्याचे त्यांनी मानले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शिवरायांनी सुरू केले. 13 नोव्हेंबर 1668 रोजी श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधण्यास प्रारंभ झाला. याचा संस्कृत शिलालेख आजही त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. हा मूळ शिलालेख आहे. पोर्तुगीजांनी केलेल्या पाडापाडीत तो इतरत्र पडला होता. तो पुन्हा लावला.

श्री सप्तकोटीशके 1590 

किलकाब्द कार्तिक कृष्ण पंथ 

म्यांसोमेश्री शिवराज्ञा 

देवालयस्य प्रारंभ!

असा हा शिलालेख आजही झळकतो आहे. शिवरायांनी मंदिराचा चौक, घुमट बांधून घेतले. मंदिरासमोर दीपमाला आहे. देवस्थानच्या खर्चासाठी शिवरायांनी ग्रामसंस्थेकडून 700 होन मिळण्याची सनद करून दिली. त्याशिवाय जमीन दिली. अर्ध्यापेक्षा अधिक गोवा 1675 मध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या अमलाखाली होता. श्री सप्तकोटेश्वराचा तो प्रसाद होता व शिवाजी महाराजांची या देवावर श्रद्धा होती. सप्तकोटेश्वराच्या इतिहासात हिंदवी स्वराज्य आणि गोव्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास सामावलेला आहे. नार्वेच्या त्या रानात, डोंगराच्या कपारीत श्री सप्तकोटेश्वर उभा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने एकदा तरी या नार्वेच्या डोंगरावरून खाली पहायला हवे. त्या खोल दरीत छत्रपती शिवरायांनी उभा केलेला मंदिराचा कळस व गाभाऱ्यातला श्री सप्तकोटेश्वर तुम्हाला बोलवत आहे!

Twitter – @rautsanjay61

Gmail- rautsanjay61@gmail.com

अनवट काही – एका बंडाची रोचक हकिकत

सामना ऑनलाईन

>> अशोक बेंडखळे

प्रत्यक्ष युद्ध पाहून त्याची वर्णनात्मक अनेक पुस्तके आहेत. परंतु मराठीत अपवादाने एकच आहे आणि ते म्हणजे विष्णुभट गोडसे (वरसईकर) या तरुण भिक्षुकाने लिहिलेले ‘माझा प्रवास’, जे 1907 साली प्रसिद्ध झाले.

एखाद्या युध्दभूमीवर तिथले युध्द प्रसंग प्रत्यक्ष पाहून त्यावर आधारित डायरी लिहिण्याची आपल्या मराठीत प्रथा नाही. इंग्रजी भाषेत अशी अनेक उदाहरणे सापडतात. तिथे वॉर रिपोर्टर प्रसिद्धच आहेत. 1857 च्या हिंदुस्थानातील बंडावर ब्रिटिशांनी खूप हकिगती लिहिल्या. मराठीतही एक अपवाद म्हणजे विष्णुभट गोडसे (वरसईकर) यांनी ‘माझा प्रवास’ नावाने लिहिलेले पुस्तक! त्यासाठी जिथे हे बंड घडले त्या ग्वाल्हेर, झांशी, काल्पी या भागात बंडखोरांबरोबर राहिले व हे अनुभव लिहिले. संपादक चिं. वि. वैद्य यांनी हे पुस्तक संपादित करून 1907 साली प्रसिद्ध केले (प्रकाशक ः चित्रशाळा प्रकाशन, पुणे )

विष्णू गोडसे हा पेणजवळच्या वरसई गावचा भिक्षुक तरुण. तो आणि त्याचा काका यांनी द्रव्यार्जनासाठी म्हणून उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरवले. त्यांच्या प्रवासाला 30 मार्च 1857 रोजी पुण्याहून सुरुवात झाली. 1 जुलै रोजी महूच्या छावणीत बंड उठले त्या दिवशी तो तिथे होता. तिथून धार उज्जैन, करीत तो ग्वाल्हेरला पोहोचला प्रवासात दोन-तीन प्रसंग घडले. महूच्या छावणीजवळ बंडवाल्यांनी त्यांना घेराव केला. त्यांनी बायबाजी शिंदे यज्ञ करणार आहेत, त्यासाठी आम्ही वेदशास्त्रसंपन्न गरीब भिक्षुक जात आहोत असे परोपरीने सांगितले. त्यांच्या पोथ्या पाहून बंडवाल्यांनी त्यांना अभय देऊन आम्हाबरोबर चलावे असे फर्मान दिले.

एक प्रसंग नानासाहेब पेशव्यांचा. प्रयागला एक आगबोट गोरे लोकांनी भरून चालली होती. बंडखोरांच्या दुर्बिणीने ती हेरली व नानासाहेबांना सांगितले, हुकूम दिल्यास गोळा टाकतो. त्यावर नानासाहेबांनी नावेत जर बायका-मुले असतील तर मारू नये असे सांगितले आणि माणुसकीचा प्रत्यय दिला. तिसरा प्रसंग ऐकलेला. काडतुसामुळे शिपायांमध्ये बंड पसरले हे सर्वांना माहीत आहे. त्यासाठी इंग्रजांनी एक सभा कोलकात्यास भरवली. अनेक संस्थानिक आले होते. एक नबाब म्हणाला, “हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान एकदिलाने राहतात. परस्परांचे धर्मास उपद्रव करीत नाहीत. उभयतांचे धर्मास हानी करणारा राजा जय पावत नाही.’’ त्याचा हा स्पष्टपणा महत्त्वाचा वाटतो.

या पुस्तकामध्ये भिक्षुक लेखकाने प्रवासाबरोबर प्रत्यक्ष लढाईचे दोन प्रसंग वर्णन केले आहेत. झांशी संस्थानावरील हल्ला त्याचे वर्णन असे केले आहे… “शहरावर तोफांचे गोळे सुरू झाल्यापासून जनतेला अति त्रास होऊ लागला. एखादा गोळा रस्त्यात पडला म्हणजे तो फुटून पाच-पंचवीस माणसे जखमी होत व दहा-पाच मरत.’’ लक्ष्मीबाईचा शूरपणाही काही वर्णनातून येतो. “राणी न डगमगता ठिकठिकाणी जास्त लोक ठेवून ती स्वत काळजी न करता किल्ल्यावर व शहराच्या टपावर खपत होती. गरीबांचे दुःख कमी करण्यास मागे पाहिले नाही. देवालयात अन्नछत्रे उभारली, सदावर्त चालू केली.’’ राणीविषयी वेगळी माहितीही दिली आहे. “राणी साहेबास अश्वपरीक्षा चांगली होती. त्या वेळी उत्तर हिंदुस्थानात नानासाहेब पेशवे व बाबासाहेब आपटे यांच्याबरोबर लक्ष्मीबाई झांशीवाली हिचे नाव गाजत होते. बाईसाहेब लोकांची काळजी फार वाहत. तसेच दरिद्री भिक्षुक कधीही विन्मुख गेला नाही. एका प्रसंगी चार हजार गरीबांना पोथी, बंडी व घोंगडे वाटल्याचा उल्लेख आहे. झांशीत तोफेचे गोळे वाडय़ावर पडत होते त्यावेळी एका खोलीत लेखकासह चौसष्ट माणसे फक्त चारच घटका होते, पण सर्वजण कासावीस झाले आणि मृत्युभयाहून दुसरे भय नाही याचा प्रत्यय मिळाला.

नंतर लेखक काल्पीला नगरात आला तेव्हा त्याने प्रत्यक्ष लढाईचा प्रसंग पाहिला. झांशीहून काल्पीला येताच इंग्रज फौजांनी काल्पी शहरावर हल्ला केला. इथे तीन दिवस लढाई चालली होती. इतिहासात आपण वाचतो तेच लेखक इथे सांगतो. पेशव्यांची फौज निरुपयोगी झाली होती. दिल्ली, लखनौ, झांशी आदी ठिकाणी इंग्रजांना जय झाल्यामुळे बंडवाले निराश झाले होते, फलटणी सोडून गेले व दुसरे उद्योग सुरू लागले. काशी शहराची दुर्दशा त्याने पाहिली. दांडग्या लोकांनी त्यात हात धुऊन घेतले आणि निराश झालेला लेखक ब्रह्मावर्ताकडे वळला. दरम्यान जवळचा पैसा लुटणे आदी अनुभव मिळत होते. एके ठिकाणी त्याचा काका बेशुद्ध झाला. त्यावेळी सामान्य गाडीवान देवासारखा धावून आला. ब्रह्मावर्ताहून कानपूर, लखनौ, अयोध्या असा प्रवास झाला. अयोध्येला रामदर्शन घेऊन त्याने काशी प्रयाग ही तीर्थे केली. पुढे इंदूर, नाशिक, त्रंबकेश्वर करीत गावी पोहोचला तो तीन वर्षांनी.

…तर असा हा प्रवास केवळ तीर्थयात्रा न राहता लढाईच्या काही प्रसंगामुळे वेधक ठरतो. आणि भिक्षुक लेखकाने हा रोमांचकारी अनुभव शब्दांत मांडला तो लक्षवेधी झाला त्याला लाभलेल्या 1857 बंडाच्या पार्श्वभूमीमुळे.

ashok.bendkhale@gmail.com

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

वाचावे असे काही – गोमंतकभूमीची माहितीपूर्ण सफर

सामना ऑनलाईन

>> धीरज कुलकर्णी

काही प्रवासवर्णने प्रेक्षणीय स्थळे, प्रवासाची साधने, हवामान इत्यादी याच्या पलीकडे जाऊन, त्या काळाचा महत्त्वाचा दस्तऐवज होतात. तेथील समाजजीवन, इतिहास, रूढीपरंपरा, चालीरीती, राजकारण, पर्यावरण आदी घटक वाचकाला काही वेगळे व संपन्न वाचल्याचा अनुभव देतो. ज्येष्ठ संपादक व लेखक दिवंगत माधव गडकरी यांच्या 1974 साली प्रसिद्ध झालेल्या ‘असा हा गोमंतक’ या पुस्तकात त्या काळच्या गोव्याचे दर्शन घडते.

गोवा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात सुंदर समुद्रकिनारे, देखणी चर्चेस, मंगेशी, शांतादुर्गेची मंदिरे, मांडवी नदीतील जलविहार आणि जागोजागी हुराक फेणीची बरसात करणारी टावराने. गोव्यातील पर्यटन देशविदेशात विशेष लोकप्रिय असून, गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाला महत्त्व आहे. आजच्या काळात स्मार्टफोनवर नेहमी आपल्याला गोव्याबद्दलचे व्हिडीओ व लेख पाहायला मिळतात. तसेच यापूर्वीच्या काळातही जुन्या लेखकांनी गोव्याबद्दल लिहून ठेवले आहेच.

प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार मराठीत बऱयापैकी लोकप्रिय आहे. गोडसे भटजींच्या पुस्तकापासून ते या काळातील मीना प्रभू यांनी केलेल्या देशविदेशाच्या वर्णनामुळे वाचकांना जणू घरबसल्या पर्यटनाचा आनंद मिळाला. मराठी माणसात पर्यटनाचे प्रमाणही गेल्या दशकात बरेच वाढले आहे. विविध ठिकाणी गेल्यानंतर तिथले अनुभव लोक आपापल्या सोशल मीडिया पेजवर सांगतात. हे लोक साहित्यिक नाहीत, सामान्य माणसे आहेत. त्यांच्या पर्यटनाच्या अनुभवात वेगवेगळ्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे, प्रवासाची साधने, हवामान इत्यादी सामान्यत सर्व वर्णनात आढळणारे घटक असतात.

मात्र, काही प्रवासवर्णने ही यापलीकडे जाऊन, त्या काळाचा महत्त्वाचा दस्तऐवज होतात. एखाद्या ठिकाणच्या वर्णनात, तेथील समाजजीवन, इतिहास, रुढीपरंपरा, चालीरीती, राजकारण, पर्यावरण आदी घटक आल्यास वाचकाला काही वेगळे व संपन्न वाचल्याचा अनुभव मिळतो. ज्येष्ठ संपादक व लेखक दिवंगत माधव गडकरी हे कामानिमित्त काही काळ गोव्यात राहायला होते. हा काळ आजपासून साठेक वर्षांपूर्वीचा. या काळात त्यांनी गोव्यात भरपूर भ्रमंती केली. माहिती गोळा केली. अनेक संदर्भग्रंथ धुंडाळले. लोकांमध्ये मिसळून त्यांचे जीवन जवळून पाहिले. गोव्याच्या ते प्रेमातच पडले. 1974 ला प्रसिद्ध झालेल्या ‘असा हा गोमंतक’ या माधव गडकरी यांच्या पुस्तकात त्याकाळच्या गोव्याचे बरेचसे यथार्थ दर्शन घडते. या वर्णनात सर्वच समाविष्ट करणे शक्य नाही. हे प्रस्तावनेत गडकरींनी मान्यही केले. या पुस्तकाचा पुढील भाग काढण्यास ते उत्सुक होते, पण ते होऊ शकले नाही. मात्र ज्याचा समावेश केलाय त्याची इत्यंभूत माहिती दिली असल्याने वाचकाला गोव्याची उत्तम माहिती कळते.

आजच्या काळातही 2023 साली मॅजेस्टिक प्रकाशनाने याची नवी आवृत्ती प्रकाशित केली, यातच पुस्तकाचे महत्त्व समजू शकते. माणूस उत्सवप्रिय प्राणी. भारतात सर्वच ठिकाणी अनेक प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. त्यातही कोकणातील, गोव्यातील माणसाला उत्सव अधिकच प्रिय.

गडकरींना गोवा पाहताना अनेक देवस्थाने दिसली. स्वत ते फारसे धार्मिक नसतानाही या स्थानांकडे ते आकर्षित झाले. तिथल्या देवतांचा इतिहास जाणला, त्यांच्याबद्दलचा सुरस लोककथा नोंदवून ठेवल्या. तिथे साजरे होणारे सण, त्यातील चालीरीती यांची नीट माहिती वाचकांना त्यातून मिळते. तसेच मंदिराची स्थापत्यशैली समजते.

गोव्यात शिमगा जितक्या उत्साहात साजरा केला जातो, तितक्याच उत्साहात गोव्याचा कार्निव्हलसुद्धा साजरा होतो. या दोहोंची इत्यंभूत माहिती आपल्याला यातून कळते. कला, साहित्य, संगीत या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अनेक कलाकार गोव्याचे. संगीततज्ञ व लेखक स्नेही गोपालकृष्ण भोबे यांच्यामुळे अनेक कलाकारांचा इतिहास व माहिती गडकरींना गोळा करता आली. नाटय़ गंगोत्रीच्या प्रवाहात या लेखात अनेक गायक, वादक, नट यांची माहिती आहे. मराठी नाटकाची जननी खरे तर गोवाच. विष्णुदास भावे यांना मराठी नाटक लिहिण्याची प्रेरणा इथूनच मिळाली. इथल्या अभ्यासकांनी ते सप्रमाण सिद्धही केले आहे.

महादजी शिंदेंचे सेनापती जिवबादादा बक्षी, उत्कृष्ट तबलावादक खापरुजीमामा पर्वतकर या मराठी माणसांप्रमाणेच गोवा घडवण्यात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला असे अनेक पोर्तुगीज ख्रिश्चन लोक आपल्याला समजतात. मिनेझिस ब्रिगांझा यांचा भव्य वाडा, म्हामई कामतांचा पणजीतील वाडा आणि त्यांच्या घरातील इंद्राचे ताट, याच्या सुरस कथा वाचताना आपण तल्लीन होतो.

मांडवी व जुवारी या गोव्यातील दोन प्रमुख नद्या. सागरालाही पोटात घेणाऱया, असे त्यांचे वर्णन आहे. या नद्यांमधून आजही वाहतूक चालते. पुरातन काळापासून या वाहतुकीने येथील संस्कृती संपन्न झाली आहे. या नद्यांच्या किनाऱयाने अनेक देवस्थाने, चर्चेस, तसेच प्रेक्षणीय वास्तू उभ्या आहेत.

शिवछत्रपती व संभाजी महाराज यांच्या उल्लेखाशिवाय तर गोव्याचा इतिहास अपूर्णच. एका बाजूला आदिलशाही, दुसऱया बाजूला पोर्तुगीज असे शत्रू असतानाही छत्रपतींनी गोव्यावर स्वारी केली होती. जुन्या दप्तरामधून संशोधन करून गोव्यातील अनेक लेखकांनी याबद्दल लिहिले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी तर गोवा जवळपास जिंकलाच होता, पण ऐनवेळी नदीला पूर आल्याने त्यांचा मनसुबा रहित झाला.

गोवा क्षेत्रफळाने तसे लहान राज्य. त्यामुळे दोनेक दिवसांच्या सहलीत ते पूर्ण पाहायचा लोक प्रयत्न करतात. मात्र पुरेशी माहिती नसल्याने आपण काय महत्त्वाचे ठिकाण पाहिले याची त्यांना कल्पना नसते. म्हणून, ‘असा हा गोमंतक’सारखे पुस्तक संग्रही असल्यास त्याचा जास्त फायदा पर्यटकांना होईल हे निश्चित.

संस्कृती बिंस्कृती- गडरक्षक गणपती आणि मारुती

सामना ऑनलाईन

>> डॉ. मुकुंद कुळे

गणपती काय किंवा मारुती काय, एखादं गाव असो वा किल्ला तिथे असतातच ठाण मांडून बसलेले. बरं त्यांची ही ठाणी म्हणजे तरी काय, तर अनेकदा साधी घुमटीच असते. जेमतेम मूर्ती नीट राहील एवढय़ाच उंचीची आणि तेलवात नीट करता येईल एवढय़ाच रुंदीची, पण या दोन्ही देवतांचा आव तर असा असतो की, जणू काही संपूर्ण गावाच्या-किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी यांच्यावरच असावी आणि ती नसते असं तरी का म्हणावं? म्हणजे गाव असो वा किल्ला त्यांच्या रक्षणासाठी माणसं असतातच, पण त्यांना मनोबल पुरवण्यासाठी हक्काचं कुणीतरी असावं लागतं म्हणूनच अनेकदा गावागावात आणि किल्ल्या-बुरुजांवर कधी गणपती, तर कधी मारुती या दैवतांची स्थापना केलेली आढळते.

आज गणपती किंवा मारुतीरायाच्या मंदिरांचा जो बडेजाव दिसतो, तो पूर्वीच्या काळी नव्हता. पूर्वी गणपती किंवा मारुती यांची छोटी-मोठी मंदिरं एका टोकालाच असायची. फक्त रोजच्या रोज दिवाबत्ती  केली जायची. कारण गणपती आणि मारुतीराया आहे म्हणजे आपण सुरक्षित आहोत, अशी तेव्हाच्या माणसांची भावना होती. म्हणजेच एकप्रकारे या क्षेत्रपाळ देवता होत्या. गावांच्या किंवा किल्ल्यांच्या राखणदार देवता. तेव्हा गणपती किंवा मारुती यांची प्राचीन व मध्ययुगीन काळात गाव वा किल्ल्यावर स्थापना केली जायची ती राखणदार म्हणूनच. त्यामुळेच या राखणदार असलेल्या देवतामूर्तींचं नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की, आज आपण शहरांतील वा मोठय़ा गावांतील मंदिरांत या देवतांच्या ज्या सुबक-सुंदर नि घडीव मूर्ती बघतो, तशा या मूर्ती नाहीत. या मूर्ती काहीशा अनघड, उग्र आणि प्रेरणास्वरूप असलेल्या दिसतात. उदाहरणार्थ तुम्ही अगदी अष्टविनायकांची जी स्थानं आहेत तिथल्या मूर्ती बघा. त्यातल्या बऱयाचशा मूर्ती या तांदळ्यासारख्याच आहेत. तसंच गडावरील मारुतीरायाच्या मूर्तीचं नीट निरीक्षण करा. त्या मारुतीच्या हात जोडून उभ्या असलेल्या मूर्ती नाहीत, त्या उड्डाण किंवा आक्रमणाच्या-युद्धाच्या आवेशात असलेल्या मूर्ती आहेत. कारण या देवतांची निर्मिती एकप्रकारे संरक्षक देवता म्हणूनच झालेली होती. या क्षेत्र राखणाऱया किंवा पाळणाऱया देवता नंतर क्षेत्रपाळ किंवा ग्रामदेवता म्हणून नावारूपाला आलेल्या दिसतात.

आज आपण गणेशोत्सव, संकष्टी, अंगारकी यांसारखे गणपतीशी संबंधित दिवस, सण मोठय़ा उत्साहात साजरे करतो. तसंच हनुमान जयंतीला ग्रामीण भागात मोठमोठे उत्सव होतात किंवा अगदी शहरातही दर शनिवारी नित्यनेमाने मंदिरात जाऊन मारुतीचं दर्शन घेणाऱयांची कमी नाही. म्हणजे एका परीने आज या दोन्ही देवतांचं नागर आणि अनागर दोन्ही समूहांत स्थिरीकरण झालेलं आहे. त्यांचं चांगल्या अर्थाने बस्तान बसलेलं आहे. मात्र आज या देवतांकडे ज्या पद्धतीने हिंदू देवतामंडळातील प्रमुख देवता म्हणून पाहिलं जात आहे, तसं या देवतांचं स्वरूप प्राचीन कालखंड किंवा मध्ययुगीन कालखंडात नव्हतं. तेव्हा या देवता आजच्यासारख्या ‘आराध्य’ किंवा ‘उपास्य’ देवता नव्हत्या, तर सकाम भक्तीच्या देवता होत्या. म्हणजे विशिष्ट हेतूने प्रतिष्ठापना केलेल्या देवता. ज्या सकाम भक्तीतून स्थापना झालेल्या देवता असतात, त्यांना मोठमोठय़ा मंदिरांची आवश्यकता नसते. त्या आपल्या छोटय़ाशा मठीतच आपला आब राखून असतात. गावपातळीवर किंवा गडकोटांवर आपल्याला गणपती किंवा मारुतीच्या ज्या मूर्ती पाहायला मिळतात, त्यांची स्थापना सकाम भक्तीच्या हेतूनेच करण्यात आली. हा हेतू काय तर तू या गावाचं किंवा गडकोटाचं रक्षण कर आणि म्हणूनच या दोन्ही देवता या क्षेत्रपाळ किंवा संरक्षक देवता ठरतात. क्वचित कधी त्या ग्रामदेवताही ठरलेल्या आहेत. अर्थात लोकदेवता, क्षेत्रपाळ देवता आणि ग्रामदेवता यात फार फरक नाही. मात्र वैदिक देवता आणि या लोकदेवता, क्षेत्रपाळ देवता यांत फरक आहे. कारण या दोहोंच्या केवळ उपासनापद्धतीतच फरक आहे असं नाही, तर त्यांच्या निर्मितीच्या मुळाशीच भेद आहे. वैदिकांनी इतर जनांच्या दैवतांना म्हणजेच लोकदेवतांना कायमच दुय्यम, कनिष्ठ मानलेलं आहे.

मात्र कालौघात उच्च वर्गाकडून या दोन्ही देवतांचं सांस्कृतिक उन्नयन झालेलं आहे. त्यामुळेच आज गणपती चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. गणपतीला आद्यपूजेचा मान दिल्याशिवाय कोणत्याही शुभकार्याला सुरुवात होत नाही, तर मारुती हा मुख्यत रामभक्त म्हणून जनमानसात स्थिरावलेला आहे. त्यामुळे कधी काळी या दोन्ही दैवतांचं कूळ नि मूळ एकच असेल याची कुणाला साधी शंकाही येणार नाही. शंका तरी का यावी? एकाचं मुख हत्तीचं आणि दुसऱयाचं वानराचं. मग गणपती आणि मारुती यांच्यात कसलं आलंय साम्य किंवा संबंध, असंच कुणालाही वाटेल. मात्र आता जरी गणपती आणि मारुती यांच्यात किमान दृश्यरूपात काही नातेसंबंध असलेला दिसत नसला तरी अदृश्य रूपांत मात्र हा संबंध अक्षरश हजारो वर्षं राहिलेला आहे. या दोघांचं शरीर जरी मानवी असलं तरी मुख मात्र प्राण्याचं आहे. एकाच्या धडावर हत्तीचं शिर आहे, तर दुसऱयाच्या धडावर वानराचं शिर आहे. अगदी प्राथमिक समाजशास्त्राrय, मानवशास्त्राrय दृष्टिकोनांतून याची उकल करायची तर असं म्हणता येईल की, ज्या गणसमूहांचं कुलचिन्ह (Totem-टोटेम) हत्ती किंवा वानर-मर्कट होतं, त्या समूहातील हे दोघे असावेत आणि कालांतराने ते आपापल्या कर्तृत्वाने आजच्या दैवतरूपापर्यंत पोहोचले असावेत. अर्थात कुणीही व्यक्ती सामान्याची असामान्य होण्यात तिच्या कर्तृत्वाबरोबरच समाजाचाही हात असतो. कारण अनेकदा समाज किंवा समाजाची बौद्धिक अधिसत्ता ज्यांच्या हाती असते तेच एखाद्या व्यक्तीला घडवत वा बिघडवत असतात. गणपती आणि मारुती यांची महत्ता अशीच वर्धिष्णू झालेली आहे. मात्र या दोन्ही देवतांचा हा जो एकूणच स्थित्यंतराचा किंवा अवस्थांतराचा काळ आहे, तो नंतरचा आहे आणि या दोन्ही देवतांची जी विकसनप्रक्रिया आहे, तीदेखील वेगवेगळी आहे. मात्र या दोहोंमधील सगळ्यात महत्त्वाचं साम्य किंवा एकत्व म्हणजे गणपती आणि मारुती दोघेही यक्षकुळातील आहेत!

आता यक्ष म्हणजे कोण? तर भारतीय परंपरेने यक्ष ही एक अतिमानवी योनी मानलेली आहे आणि यक्षांचा उल्लेख कायमच गंधर्व, किन्नर किंवा राक्षसांबरोबर केलेला आहे. वैदिक, पौराणिक देवतांची निर्मिती झाल्यावर तत्कालीन अभिजनवर्गाने राक्षसांना दुष्प्रवृत्तीचं निदर्शक बनवून टाकलं, तर यक्ष, गंधर्व आणि किन्नरांना दुय्यमत्व दिलं. म्हणजे यक्ष, गंधर्व, किन्नर कधीही प्रमुख देव म्हणून गणले गेले नाहीत, ते दुसऱया स्थानावरच राहिले. प्रत्यक्षात वेदपूर्वकालीन लोकमानस लक्षात घेतलं तर असं दिसतं की, आज आपण ज्या देवदेवतांची पूजाअर्चा करतो त्यांच्याही आधी बहुजन लोकमानसाने यक्षांना देव म्हणून स्वीकारलेलं होतं. म्हणूनच पं. महादेवशास्त्राr जोशी संपादित संस्कृतिकोशात म्हटलंय, ‘लोकमानसातील यक्षविषयक कल्पना म्हणजे यक्ष पाऊस पाडतात, अन्न, फळे व वनस्पती यांची समृद्धी करतात, गाव आणि गाई यांचे रक्षण करतात. तसेच रोग, भूतबाधा व वांझपण घालवतात. ते विघ्नकर्ते असतात, तसेच विघ्नहर्तेही असतात.’

म्हणजेच वेदपूर्व आणि वेदकालीन सर्वसामान्य समाजाने यक्षांना आपलं भलंही करतील किंवा वाईटही करतील अशा देवतास्वरूपात स्वीकारलेलं होतं. गंमत म्हणजे गणपतीचं मूळ रूपही याच प्रकारचं आहे. कारण गणपती ही मूळ यक्षदेवताच आहे. गणपतीची पुरातत्त्वीय, दैवतशास्त्राrय किंवा ऐतिहासिक छाननीही अशीच आहे. एखादं गूढ उकलत जावं, तसा गणपतीचा हा प्रवास आकळत जातो आणि तो जसा आकळत जातो, गणपतीच्या विविध प्रतिमा या उत्खननातून हाती लागतात. मग कधी तो गणनायक असतो, कधी तंत्रमार्गी असतो, कधी तो विघ्नहर्ता असतो, तर कधी आजचा सुखकर्ता-दुःखहर्ता!

मारुतीही मूळ अशीच यक्षदेवता. त्यामुळेच संस्कृतिकोशातील यक्षावरील टिपणात मारुतीच्या रूपविशेषांवर भाष्य करण्यात आलंय ते असं, ‘भारतीय लोक मारुतीला महावीर समजतात आणि तो यक्षांचा नियंत्रक असतो. महाराष्ट्रात ‘दास मारुती’ व ‘वीर मारुती’ अशी मारुतीची दोन रूपं प्रसिद्ध आहेत. दास मारुती हा रामापुढे हात जोडून आणि मान वाकवून उभा असतो, तर वीर मारुती हा हात उभारून सदैव युद्धोन्मुख असतो. वीर मारुतीचं हे यक्ष समन्वित रूपच गावोगावी पाहायला मिळतं.’

महत्त्वाचं म्हणजे वैदिकांनी सुरुवातीला ज्या यक्षांना नाकारलं त्या वैदिकांनी यक्षांची लोकप्रियता पाहून नंतरच्या काळात त्यांना आपल्यात सामावून घेतलं आणि त्यांचं वैदिकीकरण केलं. म्हणूनच आता जेव्हा आपण वैदिक वा हिंदू देवतामंडळ बघतो, तेव्हा त्या मंडळांत यक्षदेवताही समाविष्ट झालेल्या दिसतात. यासंबंधी प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक म. श्री. माटे यांनी विश्वकोशात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, ‘द्रविड संस्कृतीत ज्या अनेक गोष्टी पूज्य किंवा उपासनीय मानण्यात आल्या होत्या, त्यात हरप्रकारच्या निसर्गदेवता व उपदेवता होत्या. आर्यानी या देवतांचा स्वीकार केला. सर्वात प्राचीन ज्ञात आर्य शिल्पांत, तसेच बौद्ध शिल्पांत त्यांच्या मूर्ती आढळतात अशा देवतांत यक्ष व यक्षी यांचाही समावेश होतो.’

आपल्या मध्ययुगीन इतिहासात या गडकिल्ल्यांना अतिशय महत्त्व आलेलं असलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत स्वराज्यातील किल्ल्यांची डागडुजी करून घेतलेली असली तरी प्रत्यक्षात काही किल्ले इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे किल्ल्यावरील अनेक देवदेवतांची ठाणी ही पूर्वापार आहेत. शिवशाही किंवा पेशवाईत गणपती वा मारुतीची मंदिरं उभी राहिली असं अजिबातच नाही आणि गाव असो वा किल्ला, त्या ठिकाणी गणपती अथवा मारुतीचं ठाणं उभारलेलं दिसतं ते त्या-त्या देवतेच्या ठिकाणी परंपरेने चालत आलेल्या काही संस्कृती-विशेषांमुळेच. अर्थात कालौघात काही सांस्कृतिक अवशेष लोप पावतात. उदाहरणार्थ, आज बाह्य लक्षणांवरून तरी मारुती किंवा गणपतीला कुणीही यक्षदेवता म्हणणार नाही. मात्र त्यांचं अंतरंग खरवडत गेलं की, त्यांचं मूळ रूप नक्कीच उघड होईल आणि ते यक्षमहतीनुसार पराक्रमाचं द्योतक असल्याशिवाय राहणार नाही.

z mukundkule@gmail.com

(लेखक लोककला, साहित्य, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत.)

बॅग पॅकर्स- रोमांचक ट्रेक्स

सामना ऑनलाईन

Backpackers Thrilling Trekking Adventures and Nature Exploration

>> चैताली कानिटकर (Chaitalikanitkar1230@gmail.com)

गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ट्रेकिंग ही आवड जपण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय थ्रील म्हणून व निसर्गरम्य ठिकाणी चांगले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची हौस भागवण्यासाठी अनेक जण ट्रेकिंगसोबत जोडले जाऊ लागले आहेत. कारण काहीही असो. यानिमित्ताने निसर्गाच्या जवळ जाण्याची सवय लोकांमध्ये रुजत आहे. मावळतीचा सूर्य, पावसात धबधबे, जैववैविध्याचा अभ्यास करणे, उत्तुंग व बर्फाच्छादित पर्वत न्याहाळणे, स्थानिक लोकांची संस्कृती समजून घेणे हे हेतूही ट्रेकमुळे साध्य होतात. मात्र हे करताना निसर्ग जतन, संवर्धन, रक्षण करणे हे मात्र आपल्याला करायचेच आहे हे विसरून अजिबात चालण्यासारखे नाही.

चला ट्रेकला जायचंय असं जरी म्हटलं तरी रोमारोमात उत्साह संचारतो. आपण आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देऊ लागतो. थोडं थोडं का होईना पहिल्या मोठय़ा ट्रेकपूर्वी कष्ट करू लागतो. मध्यम किंवा मोठय़ा ट्रेकला जाण्याचा मानस असेल तरी चालणे, धावणे, प्राणायाम, योगासन याकडे आपण धाव घेतो. आपण जाणार ती जागा हा एक नावीन्यपूर्ण अनुभव असल्यामुळेच मनात त्या जागेविषयी आपण अनेक कल्पना मांडतो आणि ट्रेकचा दिवस उजाडण्यापूर्वी सुरू होतो काऊंटडाऊन!

ट्रेक म्हणजे फक्त गडकिल्ल्यांची केलेली भटकंती नव्हे, तर डोंगरदऱयांवर केलेले प्रेमही असते. गडकिल्ल्यांवर असलेल्या खाणाखुणा वा इतिहासाची पार्श्वभूमी असेल तर एक वेगळाच आदर मनात दाटून येतो. त्यामुळे कधी एकदा तो क्षण येतोय नि पाठीवर सॅक टाकून चालू पडतोय अशी होणारी तळमळ, रोजच्या रटाळ धावपळीच्या जीवनापासून दूर जाण्यासाठी आसुसलेले ट्रेकरचे मन पहायला मिळते.

ट्रेकचे सोपा, मध्यम आणि कठीण असे तीन प्रकार असतात. सर्वसाधारणपणे एक-दोन दिवसीय ट्रेक्स आपण आपल्या राज्यात करू शकतो. महाराष्ट्रात तर अनेक गडकिल्ल्यांचा खजिना आहे. त्यामुळे विकेंड ट्रेकला अनेक युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळतो. राजमाची, हरिश्चंद्रगड, गोरक्षगड, हरिहर, कलावंतीण, कळसुबाई, कर्नाळा अशा अनेक किल्ल्यांवर ट्रेकर्स मनसोक्त भटकंती करतात. पण जिथे घामाच्या धारा, तंगडतोड, तडजोड, निसर्गात सामावून घेणे येतच नाही त्याला ट्रेक म्हणताच येणार नाही. हाडाचा ट्रेकर जोखीम पत्करून मजल दरमजल करत पर्वताच्या माथ्यावर पोहोचून आकाशाला गवसणी घालतोच.

आपल्या देशात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मनाली, कश्मीर येथे अनेक दहा-पंधरा दिवसांचे सुंदर ट्रेक्स आहेत. युथ हॉस्टेल ही सरकारी ट्रेकिंगची संस्था वाजवी दरात अनेक ट्रेक्सचे काटेकोर, शिस्तबद्ध नियोजन करते. तरुण-तरुणी युथ हॉस्टेलच्या साइटवरून बुकिंग आधीच करून ठेवतात. याशिवाय ट्रेक द हिमालयाज् इंडिया हाइक्स, बिकत अॅडव्हेन्चर अशा काही संस्था, तर काही तेथील स्थानिक व ट्रेकिंगचे प्रशिक्षण घेतलेली मंडळी या ट्रेकचे वार्षिक वेळापत्रक सामाजिक माध्यमांवर आधी देतात. त्यामुळेच ट्रेकर्सना दहा ते पंधरा दिवसांचे बुकिंग आधी करून तेथील अविस्मरणीय ट्रेक्सचा अनुभव घेण्यासाठी तयार होता येते. आज अनेक जण ट्रेकला जाताना दिसतात.

काही मंडळी तर वयाच्या पन्नाशीतही ट्रेकिंग करतात. ट्रेक म्हटले की ट्रेक बॅग, ट्रेक शूज,
कॅप, ग्लेअर्स शिवाय विंटर ट्रेक तोही उत्तरेकडचा असेल तर स्वेटर्स, थर्मल्स, ग्लोव्ज व अगदी एप्रिल-मे महिन्यात असेल तर पान्चो, स्टीक, फ्लोटर्स या गोष्टी सोबत ठेवाव्याच लागतात. बॅग पॅक करणे हा मोठा टास्क असतो. तिथेही कपडे, फस्टएड, एनर्जी बार, पावर बँक, सर्वात महत्त्वाचे पाणी या बेसिक गोष्टी ठेवून ट्रेकच्या प्रकारानुसार इतर आवश्यक सामान बरोबर ठेवावे लागते.
एकंदरीत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ट्रेकिंग आवड म्हणून जपण्याचे प्रमाण वाढलेच आहे. शिवाय थ्रील म्हणून व निसर्गरम्य ठिकाणी चांगले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्यासाठीची हौस भागवावी म्हणूनही अनेक जण ट्रेकिंगसोबत जोडले जाऊ लागले आहेत. अर्थात कारण काहीही असो. यानिमित्ताने निसर्गाच्या जवळ जाण्याची सवय लोकांमध्ये रुजत आहे.

मावळतीचा सूर्य पाहणे, पावसात धबधबे पाहणे, जैववैविध्याचा अभ्यास करणे, उत्तुंग व बर्फाच्छादित पर्वत न्हाहाळणे, स्थानिक लोकांची संस्कृती समजून घेणे हे हेतूही ट्रेकने साध्य केले आहेत. मात्र हे करताना निसर्ग जतन, संवर्धन, रक्षण करणं हे मात्र आपल्याला करायचेच आहे हे विसरून अजिबात चालणार नाही.

Backpackers Thrilling Trekking Adventures and Nature Exploration

जंगल बुक- काळाकभिन्न

सामना ऑनलाईन

>> अमोल हेंद्रे

युगांडा टुरिझम बोर्डाचा मी गेले काही महिने पाठपुरावा करत होतो. युगांडातल्या बियुंडी नॅशनल पार्क आणि तिथे मुक्त संचार करणाऱया गोरिलाने माझ्या मनावर गारुड केलं होतं. बियुंडीसारखी आफ्रिकेतली जंगलं म्हणजे स्वर्ग आहेत. घनदाट झाडंझुडपं, थरकाप उडवणाऱया नद्यानाले, तलाव, थांगपत्ता लागू न देणाऱया पाऊलवाटा आणि अजस्र जनावरं असा त्या जंगलांचा दरारा आहे. तिथे वावर असलेले जिराफ, झेब्रा, हत्ती, सिंह, साप, अजगर इत्यादी प्राणी आपापल्या परिसराचे राजे आहेत. जंगलात उगीच कोणी कोणाच्या वाटय़ाला जात नाहीत. भूक लागली की, ते आपापले अन्न शोधतात, शिकार करतात. क्षुधाशांती झाली की, गुण्यागोविंदाने नांदतात. त्यांच्या मनात उद्याचा विचार नसतो. त्यामुळे स्वार्थ नसतो. उदरभरण, प्रजोत्पादन आणि स्वरक्षण ही तीन उद्दिष्टे बाळगून ही जनावरं जगत असतात. जीवनविषयक तत्त्वज्ञान अनुभवायचं असेल तर आफ्रिकेतली जंगलं हे उत्तम व्यासपीठ आहे.

बियुंडी नॅशनल पार्क इथे जाण्याची माझी धडपड सुरू होती. युगांडाच्या जंगलप्रेमींशी माझा संवाद सुरू होता, पण हवं तसं यश मिळत नव्हतं.

यादरम्यान मला एकाने लिलीशी ओळख करून दिली. लिली आजारोवा! एक धडाडीची जंगल सेवक. युगांडा शासनातल्या पर्यटन विभागाची प्रमुख. त्या वेळी लिली चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत होती. तिला मी सगळी माहिती ईमेल केली आणि मी युगांडातल्या गोरिलांवर अभ्यास करावा, असा तिने प्रस्ताव मांडला.

मी युगांडा, क्वीन एलिझाबेथ नॅशनल पार्क आणि गोरिला या विषयावर अभ्यास सुरू केला. लिलीने विमानाची तिकिटं, हॉटेल बुकिंग आणि ट्रिपचा संपूर्ण आराखडा पाठवला. युगांडा सरकारने माझा दौरा प्रायोजित केला होता! 21 मे 2024 रोजी भल्या पहाटे आम्ही बियुंडीच्या जंगलात पायउतार झालो. आम्ही एकूण आठ जण वेगवेगळ्या देशांतून आलेले जंगल अभ्यासक होतो. आमच्या सोबत रेंजर (प्राणिमित्र) आणि पोर्टर (पर्यटकांचं सामान उचलणारे हमाल) होते. गोरिला हा प्रेमळ, कुटुंबवत्सल प्राणी आहे. ओळखीच्या, सरावाच्या माणसांशी तो आपुलकीने वागतो. विनाकारण कोणाला त्रास देत नाही. स्थानिक पोर्टर, रेंजर यांना गोरिला ओळखतात. त्यांच्याकडे अधिकृत पिस्तूल असतं. त्यांना इंग्रजी बोलता येतं. गोरिलांशी ते खाणाखुणा करून संवाद साधतात. त्यांच्याकडे बंदूक असली तरी ते कोणत्याही परिस्थितीत जनावरावर फायरिंग करत नाहीत. चुकून कधी गोरिला हिंस्त्र झाला तर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी रेंजर हवेत गोळीबार करतात. गोरिलाला ठार करणं ही कल्पनाही ते लोक करू शकत नाहीत. तो युगांडाचा राष्ट्रीय प्राणी नसला तरी त्याला तो प्रोटोकॉल दिला जातो. गोरिलामुळे तिकडचं पर्यटन चालतं आणि पर्यटनावर सारा देश चालतो!

जंगलातली पहाट प्रसन्न होती. वातावरण उत्साही होतं. जंगलातल्या ठरावीक अंतरापर्यंत आम्ही मिनी बसने गेलो. पुढचा मोठा पल्ला पायी चालत गाठला. त्याला गोरिला ट्रेक म्हणतात. आम्ही जंगल तुडवत चालू लागलो. तो परिसर गोरिलांचा होता. त्यामुळे इतर प्राण्यांचा धोका नव्हता, पण तिथे पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत होते. युगांडात सुमारे एक हजाराच्या वर पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. तऱहेतऱहेचे बगळे, बिटरन, सारस, आयबिसेस आम्हाला दिसले. त्यांचा शुबिल हा राष्ट्रीय पक्षी आम्हाला काही दिसला नाही. जंगलाचा जो परिसर गोरिला अधिवासासाठी निवडतात तिथे खूप प्रकारचे पक्षी असतात. याचं कारण गोरिला हा शाकाहारी प्राणी आहे. त्याला झाडं, फुलं, पानं, फळं खायला आवडतात.

गोरिला ट्रेक करत असताना आम्हाला प्रथमदर्शनी दिसलं गोरिलाचं पिल्लू. ते पाहून आमच्या रेंजरने तोंडाने एक प्रकारचा आवाज काढला. आवाज ऐकून तीन गोरिला तिथे आले. ते अवाढव्य होते. तो क्षण थरारक होता. त्यांना पाहून रेंजर आणि पोर्टर पुढे सरसावले. त्यांनी खुणेने आम्हाला गप्प बसायला सांगितले. आमच्यातला एक पोर्टर हुशार होता. आमचे सामान सांभाळत तो दबक्या आवाजात म्हणाला, “कॅमेरा काढा, फोटोग्राफी करा.” एक पिल्लू आणि तीन मोठे गोरिला पाहून आमचं भान हरपून गेलं. दोन माद्या व एक नर होता. काळ्याकुट्ट नराकडे पाहून मला ‘काळाकभिन्न’चा शब्दश अर्थ कळला. त्याचे हात म्हणजेच पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा मजबूत आणि लांबीने मोठे होते. अधूनमधून तो माणसासारखा दोन पायांवर उभा राहत होता. त्यांची उंची साडेपाच-सहा फूट सहज असेल. डोक्याचा आकारही चांगला मोठा होता. त्याला जवळून पाहताना तो महाकाय भासत होता, पण त्याचा चेहरा प्रेमळ आणि डोळ्यांतले भाव आपुलकीचे होते. त्या कुटुंबातली एक मादी झाडावर चढून करवंदांसारखी लाल, हिरवी फळं काढून खात होती. ते इतरांना दाखवत होती. बहुधा तिला वाटत असावं की, छोटय़ा पिल्लाने फळांचा रस चाखावा, पण त्या पठ्ठय़ाला तिची फिकर नव्हती. तो जमिनीवरचं गवत उपटून इकडे तिकडे फेकण्यात बिझी होता. हे सारं जंगलनाटय़ आम्ही झाडाआडून पाहत होतो, डोळ्यांत साठवून ठेवत होतो. माझा कॅमेरा खचाखच फोटो खेचत होता. पुढच्या तासाभरात मी एक हजारहून जास्त फोटो खेचले. गोरिलासारखी लोप पावत चाललेली प्रजाती आठ-दहा फुटांवरून पाहायला मिळणं म्हणजे पर्वणीच. आमच्यापैकी प्रत्येकाने या ट्रेकसाठी 850 डॉलर्स मोजले होते. हा दर तिकडच्या शासनाने ठरवलेला आहे. या निधीतून ते जंगल आणि त्यातल्या गोरिलांचं संवर्धन युद्धपातळीवर करतात. माझा संपूर्ण खर्च लिली आजारोवाने युगांडा टुरिझमच्या वतीने केला. अशा प्रकारचा सन्मान मिळवणारा मी एकमेव भारतीय आहे या विचाराने माझी छाती गोरिलाच्या छातीपेक्षा मोठी झाली.

आम्ही सुमारे अर्धा दिवस गोरिलांच्या सान्निध्यात घालवला. त्यांच्या विश्वात मग्न असलेल्या त्या चार गोरिलांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. गोरिला प्रजाती पाणी कमी पितात. त्यांना पाण्याचे भय वाटते. त्यांना जगायला लागणारे पाणी ते फळाफुलांमधून शोषतात. त्यांना पोहता येत नाही. त्यामुळे पाण्यापासून ते चार हात दूर राहतात. जंगलातून परत फिरताना रेंजर म्हणाला, “नेहमी लक्षात ठेवा. आपण जंगलाचे पाहुणे आहोत. आपण जंगलांचा आस्वाद जरूर घ्यावा, पण त्यांच्या अधिवासाचा अनादर कधी करू नये.”

आम्ही जंगलातून माघारी फिरलो. कॅमेऱयात पकडलेले क्षण कधी एकदा लॅपटॉपवर पाहतो असं झालं होतं. परतीच्या प्रवासात रेंजर म्हणाला, “रवांडा हा आमच्या युगांडाशेजारचा देश. तिथे या गोरिलांना मोठा मान आहे. तिथे दरवर्षी एक आगळावेगळा गोरिला महोत्सव आयोजित केला जातो. ‘क्विता इझयाना’ नावाने तो ओळखला जातो. 2005 पासून ही प्रथा सुरू झाली. नुकत्याच जन्मलेल्या गोरिलाच्या बाळाचं बारसं असं त्याचं स्वरूप असतं.” रेंजरने दिलेली माहिती ऐकून माझ्या मनाला क्विता इझयाना सेरिमनीचे वेध लागले होते!

शब्दांकन ः निलय वैद्य

इकोभान – मज हवा किंग कोब्रा!

सामना ऑनलाईन

>> भावेश ब्राम्हणकर

मध्य प्रदेशात सध्या दोन घोषणांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातील एक आहे मध्य प्रदेशात किंग कोब्रा आणण्याची घोषणा. ही कुणा दुसऱया-तिसऱयाची मागणी नसून खुद्द मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांना किंग कोब्रा का हवाय? एवच नाही तर त्यांना राज्यात चक्क सापांची गणनाही करायची आहे. मध्य प्रदेशात नेमकं काय घडतंय?

– मध्य प्रदेशात पूर्वी किंग कोब्रा होता का? याच्या कुठल्याही नोंदी वन्य जीव किंवा सर्प अभ्यासकांना इतिहासात आढळत नाहीत. मध्य प्रदेशातील उष्ण हवामान हे त्यास कारणीभूत आहे. अशा वातावरणात किंग कोब्रा तग धरू शकणार नाही आणि त्याला आणले तरी ते प्रजनन करणार नाहीत, असे तज्ञांना वाटते. त्यामुळे ज्या पद्धतीने मध्य प्रदेशात वाघ, त्यानंतर चित्ते आणले गेले. तशा पद्धतीने कोब्रा आणणे संयुक्तिक ठरणार नाही. तसेच कोब्रा अन्य विषारी सापांना खाऊन टाकेल किंवा विषारी साप पळून जातील हा मुख्यमंत्री यादवांचा दावाही निरर्थक असल्याचे पर्यावरण आणि वन्य जीव अभ्यासकांना वाटते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत डॉ. मोहन यादव. ते सर्वप्रथम चर्चेत आले 2023 मध्ये. राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. शिवराजसिंग चौहान यांच्या पश्चात राज्याचे नेतृत्व कुणाच्या हाती सोपवले जाणार याची देशभर उत्सुकता होती. नेता निवडीच्या बैठकीत मागच्या रांगेत बसलेल्या यादव यांच्या गळ्यात माळ टाकण्यात आली. त्यामुळे ते प्रकाशझोतात आले. त्यानंतर आता पुन्हा देशभर ते चर्चिले जात आहेत. निमित्त आहे ते दोन मोठय़ा घोषणांचे. पहिली म्हणजे मध्य प्रदेशात किंग कोब्रा आणण्याचे आणि दुसरी राज्यात सापांची गणना करण्याचे. या घोषणांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी त्या का केल्या? जनतेवर त्यांचा काय परिणाम होणार आहे? पर्यावरणाचे काय? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.

यादव यांना किंग कोब्रा का हवा आहे? याचा उलगडा त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या भाषणात केला. ते म्हणाले की, “मी 2020 मध्ये कॅबिनेट मंत्री असताना दिंडोरी जिह्याचा पालकमंत्री होतो. या जिह्यात सर्पदंशाने वर्षाकाठी 200 जणांचा मृत्यू होतो. आजही त्यात बदल झालेला नाही. त्यामुळे किंग कोब्रा जर मध्य प्रदेशच्या जंगलात आला तर त्याने सर्पदंशाच्या घटना नक्कीच कमी होतील. कारण किंग कोब्रामुळे अन्य विषारी साप पळून जातील किंवा किंग कोब्रा त्यांना खाऊन टाकेल.’’ मात्र, त्यांच्या या घोषणेनंतर मध्य प्रदेश सरकारने कर्नाटक सरकार सोबत ‘द्या-घ्या’ (गिव्ह अँड टेक) या धोरणांतर्गत दोन वाघ दिले आणि त्या बदल्यात दोन किंग कोब्रा घेतले. यातील एक कोब्रा भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यानात आणला गेला. मात्र काही दिवसांनी हा कोब्रा मृत झाला, तर इंदूरमधील कोब्रा अद्याप जिवंत आहे.

किंग कोब्राचे शास्त्राrय नाव Ophiophagus Kalinga असे आहे. खास करून पश्चिम घाटात तो आढळतो. विविध कारणांमुळे किंग कोब्राची प्रजाती धोक्यात आली आहे. म्हणूनच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन (आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेने किंग कोब्राला लाल यादीसह अत्यंत धोकादायक श्रेणीत टाकले आहे. त्यामुळे किंग कोब्रांची अशी अन्य प्रदेशात पुनर्स्थापना करणे हे अत्यंत धोक्याचे असल्याचे सर्प आणि वन्य जीव तज्ञांचे मत आहे. कारण यात अपयश आले तर जे कोब्रा आहेत, ते मृत होतीलच. शिवाय कोब्रा अस्तंगत होण्याची भीतीही आहे.

मध्य प्रदेशात वर्षाकाठी तब्बल अडीच हजार जणांचा बळी सर्पदंशाने होतो. खास करून जून ते ऑगस्ट या पावसाळ्याच्या काळात सर्पदंशाचे प्रकार अधिक असतात. गेल्या चार वर्षांत राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी 400 कोटी रुपये दिले आहेत. सरकारवरील हा भार कमी करतानाच नागरिकांच्या सुरक्षेस्तव यादव यांनी सक्षम पर्याय किंवा योजना आणली तर ती योग्य ठरेल. मात्र, केवळ प्रसिद्धी मिळविणाऱया घोषणा प्रत्यक्षात उपयुक्त ठरत नाहीत, असे जाणकारांचे मत आहे.

राज्यात सर्पगणना करण्याची यादव यांची वल्गनाही अशीच आहे. खास म्हणजे जगभरात आजवर कुठेच अशी गणना झालेली नाही. त्यामुळे आता ती होईल याची शाश्वती नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्याचा वन विभागच बुचकळ्यात पडला आहे. देहराडूनची वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था देशातील वन्य जीव क्षेत्राचे जणू विद्यापीठच. या संस्थेतील तज्ञांनीही सर्पगणनेला हास्यास्पद ठरवले आहे. कारण सापांची गणना करणे शक्य नाही. सर्पगणनेची कुठलीही शास्त्राrय पद्धत उपलब्ध किंवा विकसित झालेली नाही. त्यावर कधी संशोधन किंवा काम झालेले नाही. किंबहुना तशी गरजही निर्माण झाली नाही. शास्त्राrयदृष्टय़ा सर्पगणना शक्य होणार नाही. सापांचा ना आवाज असतो, ना त्यांच्या पायांचे ठसे की एकाच ठिकाणी वास्तव्य! साप बिळात राहतात आणि सतत इकडून तिकडे जात असतात. त्यामुळे कॅमेरा ट्रप, मूव्हमेंट ट्रकिंग यांसारख्या तंत्राचा अवलंब केला तरी गणनेला यश येणार नाही. तसेच एकाच सापाची गणना पुनः पुन्हा होण्याचीही शक्यता आहे. परिणामी सर्पगणनेची घोषणा हवेतच राहणार आहे.

सर्पदंशाचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी सरकारने विशेष कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यात मोठय़ा प्रमाणामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रबोधन करायला हवे. सर्पदंश झाला तर त्यासाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध होणे आवश्यक आहे. प्रशिक्षित सर्पमित्रांची नियुक्ती करणे, सर्पदंशावर परिणाम करणाऱया औषधांची उपलब्धता करून देणे, सर्पदंश झाल्यास तातडीने काय करावे आणि करू नये याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्पदंशासंदर्भात विशेष टोल फ्री क्रमांक किंवा हेल्पलाइनही जारी करता येईल. युद्धपातळीवर संबंधितांना वैद्यकीय मदत उपलब्ध करता येऊ शकते. सर्पदंशाबाबत विमा योजनाही कार्यन्वित करता येईल. सर्पदंशाच्या प्रश्नाकडे राजकीय किंवा प्रसिद्धी म्हणून पाहणे अयोग्य आहे.

वन्य जीव किंवा पक्षी-प्राण्यांची पुनर्स्थापना करण्याचा प्रकार हा सरसकट लागू होत नाही किंवा त्याकडे तसे पाहणे चुकीचे आहे. आफ्रिकेतील चित्ते भारतात आणले. मात्र अद्यापही मध्य प्रदेशात ते चांगल्या पद्धतीने रुळलेले नाहीत. पर्यावरणीय आणि जैविक साखळीत विनाकारण हस्तक्षेप करणेही अयोग्यच आहे. वाघ, चित्त्यांनंतर किंग कोब्राला राज्यात आणण्याचा अट्टाहास किंवा श्रेयाची अहमहमिकासुद्धा अत्यंत वाईटच म्हणावी लागेल. कुठलाही निर्णय घेताना त्या त्या विभागातील सरकारी अधिकारी, कर्मचारी, त्या क्षेत्रातील तज्ञ, जाणकार, अभ्यासक यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. ती झाली नाही तर केवळ प्रसिद्धीलोलुप घोषणा होईल. प्रत्यक्षात काहीही घडणार नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या दोन्ही घोषणा या तशाच म्हणाव्या लागतील. बाकी दुसरे काहीही नाही. मात्र, या घोषणांनी त्यांना देशभर पुन्हा एकवार प्रसिद्धी मिळवून दिली. हीच काय ती पोचपावती.

– bhavbrahma@gmail.com
(लेखक पर्यावरण अभ्यासक तसेच मुक्त पत्रकार आहेत.)

जगाच्या पाठीवर – जगातील मोठे कार्टून म्युझियम

सामना ऑनलाईन

>> समीर गोखले

बालमित्रांनो, नुकताच पाच मे रोजी जगभर जागतिक व्यंगचित्रकार दिन साजरा झाला. भारतामध्ये फार कमी व्यंगचित्र नियतकालिके आहेत. त्यामध्ये ‘शंकर्स विकली’, जे बंद पडले, पण ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक हे अव्याहतपणे चालू आहे.

जगातले सगळय़ात मोठे व्यंगचित्र संग्रहालय अमेरिकेत फ्लोरिडा येथे आहे. या व्यंगचित्र संग्रहालयात एक लाख साठ हजारांहून अधिक ओरिजिनल व्यंगचित्रे आहेत. सुमारे 10 हजार व्यंगचित्रविषयक पुस्तके या संग्रहालयात आहेत, तर सुमारे दहा हजार तास होतील एवढय़ा रेकार्डेड व्यंगचित्रकारांच्या मुलाखती, कार्टून्स, डाक्युमेंटरीज आहेत. हे म्युझियम 2000 साली सुरू झाले.

भटकंती – डर के आगे जीत है!

सामना ऑनलाईन

>> हेमलता जाधव

भटकंतीचा आनंद आपण सारेच घेत असतो, परंतु ही भटकंती थरारक अनुभव देणारी ठरणार असेल तर तो अनुभव औरच म्हणायला हवा. कुडाळ तालुक्यातील बारमाही कोसळणाऱ्या पालमळई येरम धबधब्याचे रौद्र रूप आणि तिथला निसर्ग न्याहाळत सत्तर फूट उंचीवरून रॅपलिंग करण्याचा आनंद वेगळी अनुभूती देणारा ठरला.

जीवन म्हणजे रोजचा नवीन खेळच! आयुष्यात येणाऱ्या चांगल्या – वाईट गोष्टी, नवनवीन संकटे यांना तोंड देत प्रवास करायचा. त्यातूनच ऊर्मी येते ती काहीतरी वेगळे करायची. धाडसी निर्णय घेण्याची ऊर्जा मिळते ती जीवनाच्या संघर्षातूनच! असाच एक अनुभव घेण्याची संधी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात कडेकपाऱ्यातून बारमाही कोसळणाऱया पालमळई येरम धबधब्याच्या डोक्यावरून निसर्ग न्याहाळण्याची मजा काही औरच आहे.

दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून पालमळई येरम धबधबा येथे सर्व सदस्यांची सहल आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळीच सहा वाजता छोटा भाऊ प्रसाद आणि मी कुडाळहून निघालो. कुडाळपासून साधारणतः 30 किमी अंतरावर हळदीचे नेरूर गावापासून पुढे पाच किमी अंतरावर पालमळई येथे श्री क्षेत्रपाल मंदिर या ठिकाणी रस्ता संपतो. तेथूनच सुरू होतात सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गाच्या कुशीतील सुंदर प्रवास. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य या ठिकाणी एकत्र जमलो. श्री क्षेत्रपाल मंदिरात जाऊन दर्शन घेऊन सर्वांनी येरम धबधब्याच्या दिशेने आगेकूच केली. जंगलातील पायवाट तुडवत 15 ते 20 मिनिटे चालून गेल्यानंतर धबधबा नजरेस पडतो. धबधब्याकडे जाणारी पायवाट अजिबात दमछाक करत नाही. धबधब्याच्या परिसरात उंबराची अनेक झाडे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकतात. या ठिकाणी मानवाचा विशेष वावर नसल्यामुळे घनदाट जंगलातील शांतता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे अनुभवता येतात. भर उन्हाळ्यात 90 फूट उंचीवरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह, खडकावर आदळून उडणारे तुषार शरीराला आणि मनाला रोमांचित करतात.

येरम धबधब्याच्या वर जाऊन मोठ्या उंचीवरून दोरीच्या सहाय्याने खाली उतरणे (रॅपलिंग) हा खरे तर धाडसी आणि तितकाच रोमहर्षक अनुभव होता. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अ‍ॅडव्हेंचर विभागप्रमुख संदेश गोसावी, गणेश नाईक, समील, रोहन, विशाल यांनी धबधब्याच्या वर जाऊन सुरक्षितरीत्या रॅपलिंगची सर्व तयारी केली. सर्वात आधी गोसावी यांनी (रॅपलिंग) खाली उतरत अंदाज घेतला. टीममधील सर्वांच्या सुरक्षेची खात्री करणे ही प्रमुखाची जबाबदारी असते याची प्रचीती या वेळी दिसून आली. त्यानंतर आम्हा महिलांना म्हणजे गार्गी नाईक, समृद्धी आणि मी एवढय़ा उंचीवर निसरडय़ा वाटेवरून (क्लायंबिंग) करत वर घेऊन जाणे खचितच सोपे नव्हते, परंतु गोसावी यांनी आम्हाला प्रोत्साहन देत, प्रसंगी हात देत, क्लायंबिंगची बेसिक कौशल्ये शिकवत वर नेले. त्या वेळी मनाला झालेला आनंद शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. धबधब्याच्या वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर म्हणजे अद्भुत पर्वणीच. रॅपलिंगसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी केल्यानंतर प्रमुखांनी महत्त्वाच्या प्राथमिक गोष्टी सांगून खाली उतरण्यास (रॅपलिंग) प्रोत्साहन दिले.

दुर्ग मावळा प्रतिष्ठानमधील सर्व सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे सत्तर फूट उंचीवरून रॅपलिंग करण्याचा अविस्मरणीय आनंद आणि अनुभव माझ्यासह सर्वांना घेता आला. मनात कोणतीही भीती न बाळगता हा विलक्षण अनुभव मी घेऊ शकले. ‘डर के आगे जीत है’ हे केवळ टीव्हीवरील जाहिरातीत पाहिले होते. मात्र यानिमित्ताने ते प्रत्यक्षात अनुभवता आले.

रॅपलिंग झाल्यानंतर धबधब्याच्या खाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. वन भोजनाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.

सुखाचे कव्हरेज क्षेत्र

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कधीतरी असे शांत वातावरणात निसर्गाच्या कुशीत जाऊन पहुडण्याचा आनंद फार वेगळाच असतो. तिथे भलेही मोबाईलला रेंज नसेल. मात्र तुमच्या मनाला मिळणारे शांती, सुखाचे आणि समाधानाचे कव्हरेज क्षेत्र मात्र नक्कीच भरभरून प्रेम देते. हा आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या कुशीत नक्कीच जायला हवे. जीवनातील खऱयाखुऱया तृप्तीचा आनंद मिळवायचा असेल तर अशा ठिकाणांची सफर केव्हा ना केव्हा तरी व्हायलाच हवी.

शब्दांकन : स्वप्नील साळसकर

भटकंती – मिनिएचर पुस्तकांचे म्युझियम

सामना ऑनलाईन

>> जयप्रकाश प्रधान

झरिफा या अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे प्रदर्शन थाटले आहे. आगळ्यावेगळ्या आणि जगातील एकमेव मिनिएचर म्युझियमने जागतिक पातळीवरील अनेक पारितोषिके मिळवत 2015 मध्येगिनीज बुक आाफ वर्ल्ड रेकार्डस्मध्ये नोंद झाली आहे.

‘मिनिएचर’ (छोट्यात छोटी) पुस्तकांचे जगातील पहिले आणि एकमेव असे म्युझियम, युरोप आणि आशिया अशा दोन्ही खंडांना जोडणाऱ्या ‘अझरबैजान’ या देशात पाहावयास मिळते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये 2015 मध्ये त्याची नोंद झाली आहे. राजधानीच्या बाकू शहरातील जुन्या इचेरी शहरात हे म्युझियम थाटण्यात आले आहे. बाकूच्या भटकंतीत म्युझियमच्या निर्मात्या सालाखोव्हा झरिफा तेयमूर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

एका अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे प्रदर्शन थाटले आहे. झरिफा या अझरबैजान देशात सांस्कृतिक क्षेत्रात सन्माननीय कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. अशा या कर्तृत्ववान महिलेच्या आयुष्याला 1982 मध्ये मोठी कलाटणी मिळाली. त्या नोव्हेंबर 1982 ला मॉस्को येथे पुस्तकप्रेमींच्या भरलेल्या ‘ऑल युनियन व्हॉलेंटरी सोसायटीच्या’ अधिवेशनाला गेल्या होत्या. तेथे क्रायलोव्ह या नामांकित लेखकाच्या 1935 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दंतकथांच्या संग्रहाची, अगदी छोट्या आकारातील आवृत्ती 23 रुबेल्सना विक्रीसाठी उपलब्ध होती. झरिफा यांनी त्याची खरेदी केली. त्याचे पैसे देऊन त्या ते पुस्तक घेण्यासाठी बाजूच्या गोदामात गेल्या. तेथे त्यांनी आयुष्यात प्रथम, अगदी छोट्या आकाराची ‘मिनी’ पुस्तके पाहिली आणि त्या दिवसापासून अशी पुस्तके जमविण्याचा छंदच त्यांना लागला. दरवर्षी या पुस्तकांची संख्या वाढतेच आहे. त्या म्युझियममध्ये 2002 मध्ये अशा प्रकारच्या मिनिएचर पुस्तकांनी भरलेली काचेची 25 कपाटे होती. आता त्या कपाटांची संख्या 39 झाली असून एकूण 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700 मिनिएचर पुस्तके तेथे पाहावयास मिळतात. यात विशेष म्हणजे भारतातील ‘हनुमान चालिसा’ व गीतेची अगदी छोटी आवृत्तीही तेथे आढळली.

मिनिएचर पुस्तकाची व्याख्या काय, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या प्रमाणानुसार 75 * 75 मि.मी.पर्यंतच्या आकाराचे पुस्तक हे मिनिएचर पुस्तक ठरते. झरीफा यांच्या संग्रहालयात अशी 3370 पुस्तके आहेत. पूर्वीच्या सोव्हिएत रशियाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे 100 * 100 मि.मी. पानाच्या आकाराचे पुस्तक ‘मिनिएचर’ सौंधेत बसते. त्या मापनानुसारही अनेक पुस्तके त्यांनी जमविली. म्युझियममधील चार पुस्तके ही सर्वात छोटी म्हणजे अक्षरशः ‘मायक्रो’ आकाराची व अत्यंत दुर्मिळ अशी आहेत. त्यात जपानची राजधानी टोकियो येथून प्रसिद्ध झालेल्या ‘टोपान’ (Toppan) पुस्तकाचा आकार 0.75 * 0.75 मि.मी. एवढा आहे. तेथील चार मोसमांतील फुलांचे वर्णन त्यात आहे. ते एका खास आकर्षक बॉक्समध्ये ठेवण्यात आले असून ‘मायक्रो बुक’ असे त्यावर इंग्रजीत लिहिले आहे. आणखी एक जपानी पुस्तक 2 * 2 मि.मी.चे आणि दोन जर्मन मायक्रो पुस्तकेही येथे पाहावयास मिळतात. त्यापैकी एकाचा आकार 2.0 * 2.9 मि.मी. आणि दुसऱ्याचा 3.5 * 3.5 मि.मी. एवढा आहे. या सर्वांच्या शेजारी जाड भिंग ठेवण्यात आले असून, त्याच्या सहाय्यानेच ती पुस्तके वाचता येतात. या म्युझियमसाठी शिरव्हान शहाज राजवाडय़ाजवळची छोटी, पण मध्यवर्ती जागा शासनाने दिली आणि 23 एप्रिल 2002 मध्ये या म्युझियमचे तिथे उद्घाटन झाले. सालाखोव्हा यांनी उद्घाटनासाठी तो दिवस मुद्दाम निवडला. कारण याच दिवशी 1616 मध्ये जागतिक कीर्तीचा नाटककार विल्यम शेक्सपिअर याचे निधन झाले आणि तो दिवस आंतरराष्ट्रीय  पुस्तके आणि पुस्तकांचे हक्क (कॉपी राईट) यासाठी जगभर पाळण्यात यावा असा निर्णय युनेस्कोने घेतला. शेक्सपिअरचे नाव चिरकाल राहावे हा त्या मागचा हेतू होता आणि त्याच दिवशी हा ‘मिनिएचर म्युझियम’ पर्यटक, स्थानिक नागरिक या सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला.

87 वर्षे वयाच्या झरिफा माडम आजही मोठ्या उत्साहाने साऱ्या जगभर विविध बैठका, परिषदांच्या निमित्ताने लंडन, बर्लिन, म्युनिक, ब्रुसेल्स, बीजिंग, पारीस तसेच हवाना, मास्को येथे गेल्या होत्या. तेथील अँटिक पुस्तकांची दुकाने, बाजारपेठांना त्यांनी भेटी दिल्या. मिनिएचर पुस्तकांची माहिती घेऊन त्यांनी ती खरेदी केली. त्याखेरीज अनेक स्नेही, पुस्तकप्रेमी, राजकारणी व्यक्ती यांनी काही मिनी पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. तसेच 1985 पासून त्यांनी मिनिएचर पुस्तकांचे प्रकाशन सुरू केले. विशेषतः सोव्हिएत रशियात अशी पुस्तके जमविणारी पुस्तकप्रेमी मंडळी आहेत. त्यांचे खूपच सहाय्य झाले.

हे म्युझियम 145 चौ.मीटर क्षेत्रफळाच्या जागेत थाटण्यात आले असून त्याची रचना अतिशय आखीव अशी आहे. एकूण 39 काचेच्या भव्य कपाटात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. पुस्तकांची वर्गवारी केल्याने कोणत्या कपाटात कोणती पुस्तके आहेत याची कल्पना येते. शेक्सपियरच्या अजरामर साहित्याचा ठेवा येथे पाहावयास मिळतो. ‘रोमियो आण्ड ज्युलिएट’पासून संपूर्ण शेक्सपिअरच्या एकूण 40 खंडांपैकी 24 खंड हे 50*73 मि.मी.च्या आकारात आहेत. झरिफा यांच्या या अगदी आगळ्यावेगळ्या आणि जगातील एकमेव मिनिएचर म्युझियमने जागतिक पातळीवरील अनेक पारितोषिके मिळविलीत. पण सर्वात मोठा सन्मान म्हणजे 2015 मध्ये या म्युझियमची ‘गिनीज बुक आाफ वर्ल्ड रेकार्डस्’मध्ये नोंद झाली आहे. बाकू शहरात इचेरी शहरात असलेले हे मिनिएचर म्युझियम पुस्तकप्रेमींना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असते.

अनवट काही- तंजावर संस्थान आणि मराठी सहसंबंध

सामना ऑनलाईन

>> अशोक बेंडखळे

दक्षिणेकडील तमिळनाडूमधील तंजावर प्रांतात मराठय़ांनी राज्य केले आणि तिथे राजवाडय़ात सरस्वती महाल ग्रंथालय असून त्यात अनेक ग्रंथ-हस्तलिखिते आहेत. एवढे आपल्याला माहीत असते, पण तिथल्या राजांविषयी वा एकूण राज्यकारभाराविषयी खूप कमी माहिती असते. विनायक सदाशिव वाकसकर लिखित आणि दामोदर सावळाराम आणि कंपनीने प्रकाशित केलेले (सन 1933) ‘तंजावरचे मराठे राजे’ या पुस्तकाने ही उणीव काही प्रमाणात भरून काढलेली आहे. बडोद्याचे महाराज विद्याभिलाषी सयाजीराव गायकवाड यांच्या देणगीतून हे पुस्तक प्रकाशित झाले हे नमूद करायला हवे.

शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशहाच्या पदरी सरदार होते. शहाजीराजांना दोन पुत्र शिवाजी जिजाबाईंच्या पोटी तर व्यंकोजी दुसरी पत्नी उमाबाईंच्या उदरी जन्मास आले. या व्यंकोजीने तंजावरला मराठी राज्य स्थापन केले (1676). त्यापूर्वी तंजावरला चौल आणि नायक राजांनी अनेक वर्षे राज्य केले होते. शहाजींचा हा मुलगा व्यंकोजी भोसले बंगलोरचा जहागीरदार होता. तंजावरच्या अलगिरी नायकांची हकालपट्टी करण्याची जबाबदारी आदिलशहाने व्यंकोजीवर सोपवली. व्यंकोजीने युद्ध करून नायकाच्या ताब्यातून तंजावरची मुक्तता केली. त्याच वेळी तंजावरच्या लोकांमध्ये यादवी झाली आणि त्यांनी व्यंकोजीला (म्हणजे मराठय़ांना) राज्य हस्तगत करण्यास सांगितले. अशा प्रकारे व्यंकोजीकडे तंजावरचे राज्य आले. खरे म्हणजे निराळी भाषा जाणणारे लोक राज्यावर अधिष्ठीत झाले होते. मात्र या नवीन राजांनी तंजावर हे आपलेच घर आहे असे समजून तिथे राज्यकारभार हाकला आणि प्रजासंरक्षणाची परंपरा चालविणे, धर्मासंबंधी कार्याचा पुरस्कार करणे, कला व शिक्षणाला उत्तेजन देणे ही सत्कृत्ये त्यांनी सतत व अखंड चालवली म्हणून मराठी राज्ये तिथे पुढील काही काळ बस्तान बसवू शकले.

व्यंकोजीच्या कारकिर्दीतील रोमांचकारी धामधुमीचा प्रसंग म्हणजे शिवाजीराजांनी व्यंकोजीवर व कर्नाटकवर केलेली स्वारी होय (1676-77). राजांच्या सैन्याने जिंजी व काही प्रांत काबीज केला. राजांची व व्यंकोजीची भेटही झाली; पण ती निष्फळ ठरली. पुढे मोगलांची स्वारी आपल्या राज्यावर होईल अशी शंका येऊन शिवाजी राजे रायगडावर परत आले. त्यांच्यात एक तह झाला आणि वार्षिक खंडणी देण्याचे व्यंकोजीने मान्य केले. शिवाजी राजांच्या मृत्यूपर्यंत (1680) ही खंडणी तंजावरहून येत होती. पुढे बंद झाली आणि सातारकर भोसले व तंजावरचे भोसले यांचा संबंध राहिला नाही.

व्यंकोजी राजा 1683मध्ये निवर्तला आणि त्याचा वडीलपुत्र राजा शहाजी तंजावरचा दुसरा राजा गादीवर आला (1684-1712). शहाजीच्या मृत्यूनंतर सरभोजी व तुकोजी राज्यव्यवस्था पाहत. सरभोजीनंतर तुकोजी हा राज्याचा एकटा धनी झाला. त्याने (1728-1736) असे राज्य केले. तुकोजीला प्रताप नावाचा पुत्र होता. तंजावरच्या लोकप्रिय व प्रसिद्ध राजाच्या नामावलीत हा शेवटचा राजा ठरतो (1739-1763). त्यानंतर तुळजाजी (1763-1787), अमर सिंग (1787-1798), दुसरा सरभोजी (1798-1833) आणि शिवाजी (1833-1855) यांनी राज्य केले. पण प्रभावी ठरले नाहीत. शेवटी ब्रिटिशांनी हे राज्य खालसा केले आणि तंजावर संस्थानावर राज्य करीत असलेली मराठी सत्ता नष्ट झाली.

खरे म्हणजे शिवाजी राजांनी कर्नाटकवर स्वारी केली ती व्यंकोजीला मदत करून कर्नाटकात भगवा झेंडा फडकवावा या हेतूने. मात्र व्यंकोजीने बंधू शिवाजीचे सामर्थ्य ओळखले नसावे आणि त्यांनी राजांची मदत नाकारली असे दिसते. एकूणच तंजावरच्या बाहेर जाणे, ते वाढवणे, लष्करी सामर्थ्याची वृद्धी करणे हे प्रकार व्यंकोजीने वा नंतरच्या मराठी राजांनी केले नाहीत. व्यंकोजीने शिवाजी राजांना हात दिला असता तर कदाचित दक्षिणेकडे मराठी राज्य विस्तारले असते. व्यंकोजीनंतर तंजावरचे राजे इतके निक्रिय व सामर्थ्यहीन होते की, इंग्रजांना तंजावर संस्थान बिनखर्चाने मिळाले असे म्हटले जाते.

आता तंजावरच्या काही चांगल्या बाबी – संस्थानात न्यायदान व्यवस्थित होते. सरकारी पुस्तकालयाशिवाय खाजगी पुस्तकालये होती. येथील राजे विनोद, वाङ्मय, वाद्य, नृत्य, रंगकाम, धातू व लाकूड यावरील नक्षीकाम, रेशीम विणण्याची कला आदींना आश्रय देत असत.  यावरून आर्थिक स्थिती ठीक असावी. चोल राजापासून ते मराठे राजापर्यंत हे संस्थान हिंदू राज्याखाली होते. या राजांनी प्राचीन संस्कृती व त्या संस्कृतीची ओळख अशी मंदिरे ही यवन अथवा ख्रिस्ती यांच्या आक्रमणापासून वेगळी ठेवून त्यांचे संरक्षण केले. प्रतापसिंह या मराठय़ांच्या राजाची उपपत्नी मुद्दुपल्लानी ही प्रसिद्ध नायकीण होती. तिने ‘राधिकासन्तवनम्’ नावाचे काव्य रचले आहे.

एकूण राजे अल्पसंतुष्ट असतील, त्यांच्याकडे दूरदृष्टी नसेल तर ते राज्य लयास जाण्यास वेळ लागत नाही. तंजावर त्याचे उदाहरण आहे. काही काळ तंजावरला मराठे राजे राज्य करीत होते असे म्हणून आपण समाधान करू शकतो.

ashok.bendkhale@gmail.com

भटकंती – सफर बार्सिलोनाची

सामना ऑनलाईन

>> निमिष पाटगावकर, npatgaonkar@yahoo.com

युरोपात पर्यटन करताना पहिला शिक्का बसतो तो इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली या देशांचा आणि एकदा का हे टॉपचे देश बघून झाले की, मोर्चा वळतो तो स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को या देशांकडे. यातल्या स्पेनचे दर्शनजिंदगी मिले ना दोबारामध्ये आपल्याला झाले आहेच, पण ही स्पेनची झलक आहे अन् त्यातही बार्सिलोना शहर अधिक लोभस आहे

प्रत्येक देशाचे वेगळेपण हे तिथल्या विविधतेवर ठरत असते. युरोपात तर आपण भारतात राज्यांच्या सीमा बदलतो तशा देशांच्या सीमा ओलांडत असतो. पण इतके एकमेकांना खेटून हे युरोपीय देश गर्दी करून असले तरी सीमा बदलल्यावर त्या-त्या देशाचे वैशिष्टय़ दिसायला लागते. अगदी भाषेपासून ते संस्कृतीपर्यंत देशादेशांतील वेगळेपण जाणवायला लागते. स्पेनचे आपल्याला असेच दर्शन होते.  स्पेनचे दर्शन ‘जिंदगी मिले ना दोबारा’मध्ये आपल्यापैकी बहुतेकांना झाले आहेच. पण ही स्पेनची झलक आहे. मी जेव्हा स्पेनला जातो तेव्हा दरवेळी मला स्पेनचे वेगळे पैलू दिसतात. स्पेनमधील बार्सिलोना, माद्रिद , व्हॅलेंशिया आणि सेव्हिल ही प्रमुख शहरे धरली तरी यात प्रत्येक शहराचे वेगळेपण आहे. कारण स्पेनचा भूभाग इतर युरोपियन देशांच्या मानाने खूप मोठा आहे.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मी बार्सिलोनाच्या विमानतळावर उतरलो तेव्हा थंडीचा मोसम संपत होता.  मुंबईच्या उकाडय़ातून तिथे गेल्यावर चांगलीच थंडी जाणवत होती. माझी टॅक्सी विमानतळावरून बाहेर पडली आणि शहरातील हायवे ओलांडून जेव्हा डोंगरांच्या कुशीत शिरली तेव्हा आजूबाजूचे चित्र पालटले. उंच डोंगर आणि बोगदे पार करत माझी टॅक्सी हॉटेलपर्यंत पोहोचली तेव्हा मी भूमध्य समुद्राच्या काठावर उभा होतो. थोडक्यात, शहराला वळसा घालून डोंगरांच्या पलीकडे समुद्राच्या काठावर माझे हॉटेल मेलिया सिजेस होते. माझ्या हॉटेलच्या खोलीत पोहोचलो तर बाल्कनीतून भूमध्य समुद्राच्या लाटा समोरच्या किनाऱ्यावर लुप्त होत होत्या आणि समुद्राच्या काठावर अनेक छोटी छोटी रेस्टॉरंट्स स्वागत करायला तयार होती.

बार्सिलोना शहर कळायला सुरुवातीला थोडा वेळ लागतो. कारण स्पॅनिश भाषा कानाला कितीही सुंदर वाटत असली तरी आपल्याला हवी असलेली माहिती मिळवायला उपयोगाची नाही. इंग्लिश स्पेलिंग आणि स्पॅनिश उच्चार यांचा काही संबंध असेलच असे नाही. कुठलेही शहर कळायला पायी फिरण्यासारखा उत्तम पर्याय नाही. तेव्हा टॅक्सीचा नाद सोडून मी शहरात जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय शोधला. माझ्या हॉटेलपासून एक किलोमीटर चालल्यावर एक आपल्या गावातल्या स्टेशनसारखे एक रेल्वे स्टेशन होते. तिथून अर्ध्या तासात मला बार्सिलोना सिटी सेंटर म्हणजे मध्यवर्ती भागात जाता येणार होते.

बार्सिलोना बघायचे असेल तर सॅगराडा फॅमिली चर्चला भेट दिल्याशिवाय बार्सिलोनाची भेट पूर्ण होणार नाही. एका अपूर्ण चर्चची ही कहाणी आहे. 1882 साली या चर्चच्या बांधकामाला सुरुवात झाली. फ्रान्सिस्को फिलारनंतर पुढे गाऊडी या स्थापत्य विशारदाने कार्यभार स्वीकारला. गाऊडी 1926 साली निधन पावला. तोपर्यंत चर्चचे एक चतुर्थांशही काम झाले नव्हते. पुढे हे काम स्पेनच्या यादवी युद्धात अडकले. आजही  हे बांधकाम चालू आहे. इतकी वर्षे बांधकाम चालू असलेली वास्तू म्हणून त्याची नोंद जागतिक वारसा हक्काच्या स्थानात झाली. गाऊडीच्या मृत्यूच्या शताब्दी वर्षात म्हणजे 2026 साली हे पूर्ण करण्याचा मानस आहे. या चर्चला भेट देताना जाणवते ते म्हणजे जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक.

युरोपच्या कुठल्याही शहराची एक ओळख म्हणजे विस्तीर्ण मध्यवर्ती जागा. तिथे कारंजी, पुतळे असतात आणि कबुतरखाना असतो. लंडनच्या ट्रपाल्गार स्क्वेअरची आठवण करून देणारा असा हा बार्सिलोनाचा कॅटालुनिया भाग. शहराचा हा मध्यवर्ती भाग असल्याने प्रचंड वर्दळीचा भाग, पण तो भाग आता लोकांना बसायला, कबुतरांना आश्रयाला ठेवला आहे हे कौतुक. तुम्हाला जर का थोडा वेळ असेल तर बार्सिलोनापासून दोन तासांवर असलेले मॉँटसेराट बघायलाच हवे. इथल्या कॉग व्हील रेल्वेने डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर जे दृश्य दिसते ते शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे.

स्पेनच्या विस्ताराने बार्सिलोना वेगळे, माद्रिद वेगळे आणि समुद्रकाठावरचे सेविला वेगळे आणि ‘जिंदगी मिले ना दोबारा’त दाखवलेले स्पेन अजून वेगळे आहे. जशी मुंबईची ओळख म्हणजे भारताची ओळख नाही, पण मुंबई विविधता दाखवते तसेच बार्सिलोनाचे आहे. स्पेनची विविधता थोडक्यात बघायची असेल तर बार्सिलोनासारखे सुंदर शहर नाही.

भटकंती- हिंदुस्थानातील सप्तभाषा संगमभूमी कासारगोड

सामना ऑनलाईन

>> वर्षा चोपडे

सप्तभाषा संगमभूमी अशी ओळख असलेला कासारगोड हा केरळमधील देखणा व समुद्राने वेढलेला जिल्हा. वास्तुकलासंपन्न अशा या भागातील संरक्षित किल्ल्यांमध्ये बेकल किल्ल्याचे महत्त्व आगळे आहे.

केरळ राज्य सुशिक्षित, बुद्धिवादी लोकांचे राज्य आहे. इथले लोक सुसंस्कृत आहेत. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा त्यांना खूप अभिमान आहे. भाषा त्यांचा प्राण आहे. कासारगोड अत्यंत स्वच्छ आणि सुंदर जिल्हा. सप्तभाषा संगमभूमी अशी या कासारगोडची ओळख आहे. मल्याळम, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी, कोंकणी आणि तमीळ भाषा या शहराची ओळख आहे. बहुतांश लोकांना या सगळ्या भाषा येतात हे विशेष. मल्याळममध्ये कासारगोडला कानरम वृक्षांची भूमी अथवा कान्हिरा वृक्षांची भूमी म्हणून ओळखले जात असे. हा जिल्हा अत्यंत देखणा आणि समुद्राने वेढलेला असून या जिह्यात केरळमधील सर्वाधिक नद्या आहेत.

16 व्या शतकापर्यंत कासारगोड कुंबळा राजवंशाच्या ताब्यात होते. ते कन्नूर येथील कोलाथुनाडू राज्याचेही वतनदार होते. 16 व्या शतकात कन्नड राज्यांनी बंदर आणि परिसरावर लक्ष केंद्रित केले. 12 व्या शतकातील जुने मल्याळम भाषेत लिहिलेले कदाचित सर्वात जुने साहित्यिक लिखाण रामचरितम कासारगोड जिह्यात लिहिले गेले असावे असे मानले जाते. कारण त्याची हस्तलिखिते नीलेश्वरम येथून सापडली होती. त्यात कुंबळा येथील अनंतपुरा तलाव मंदिराचा तपशीलवार उल्लेख आहे.

बेकल किल्ला येथील मुख्य आकर्षण आहे. या बेकल किल्ल्याविषयी जाणून घ्यायला हवे.  हा केरळमधील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम संरक्षित किल्ला आहे. 40 एकर (160,000 चौरस मीटर) मध्ये पसरलेल्या भव्य बेकल किल्ल्याची रचना डच लोकांनी बांधलेल्या कन्नूर येथील थलासेरी किल्ला आणि सेंट अँजेलो किल्ल्यासारखी दिसते. गडाच्या खालच्या बाजूला अथांग अत्यंत स्वच्छ समुद्रकिनारा आहे. किल्ल्याचा आतील बराच भाग पडला असून या किल्ल्याचा तीन-चतुर्थांश भाग पाण्याच्या अगदी जवळ आहे. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या या ठिकाणावरून किनारपट्टी आणि कान्हांगड, पल्लीकारा, बेकल, मावळ, कोट्टिकुलम आणि उदुमा या शहरांचे दृश्य दिसते. किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि आजूबाजूचे खंदक त्याच्या बचावात्मक रणनीतीचे दर्शन घडवतात. बाहेरील भिंतींवरील छिद्रे नौदलाच्या हल्ल्यांपासून प्रभावीपणे किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. पेरुमल काळात बेकल हा महोदयपुरमचा एक भाग होता. महोदयपुरम पेरुमलांच्या पतनानंतर, 12 व्या शतकात बेकल मुशिका किंवा कोलाथिरी किंवा चिराक्कल राजघराण्याच्या सार्वभौमत्वाखाली आला. कोलाथिरींच्या काळात बेकलचे सागरी महत्त्व वाढले आणि मलबार एक महत्त्वाचे बंदर शहर बनले. 1565 मध्ये तालीकोटाच्या लढाईनंतर केलाडी नायक (इक्केरी नायक) या प्रदेशात सामंती सरदार शक्तिशाली बनले.

बेकल हे प्रथम वर्चस्व गाजवण्यासाठी आणि नंतर मलबारचे रक्षण करण्यासाठी एक केंद्र म्हणून काम करत होते. या बंदर शहराच्या आर्थिक महत्त्वामुळे नायकांना नंतर बेकलला मजबूत करण्यास प्रवृत्त केले. हिरिया वेंकटप्पा नायक यांनी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आणि ते 1650 मध्ये शिवप्पा नायक यांनी पूर्ण केले. कासारगोडजवळील चंद्रगिरी किल्लादेखील याच काळात बांधण्यात आला. हैदर अलीने नायकांवर विजय मिळवला तेव्हा कोलाथिरी आणि नायकांमधील हा परिसर ताब्यात घेण्यासाठीचा संघर्ष संपला व बेकल म्हैसूर राजांच्या हाती लागला. टिपू सुलतानने मलबार काबीज करण्यासाठी लष्करी मोहिमेचे नेतृत्व केले तेव्हा ते त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे लष्करी तळ होते. बेकल किल्ल्यावर पुरातत्वीय उत्खननात सापडलेली नाणी आणि कलाकृती म्हैसूर सुलतानांच्या मजबूत उपस्थितीचे संकेत देतात. चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान टिपू सुलतानच्या मृत्यूमुळे 1799 मध्ये म्हैसूरचे नियंत्रण संपुष्टात आले. त्यानंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला आणि मुंबई प्रेसिडेन्सीमधील दक्षिण कॅनरा जिह्यातील बेकल तालुक्याचे मुख्यालय बनले. बेकल आणि त्याच्या बंदराचे राजकीय व आर्थिक महत्त्व कमी झाले. 1992 मध्ये भारताने बेकल किल्ल्याला एक विशेष पर्यटन क्षेत्र घोषित केले आणि तीन वर्षांनंतर त्याचा प्रचार करण्यासाठी बेकल पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली. या किल्ल्यास भेट दिल्यास हिंदुस्थानातील अत्यंत सुंदर किल्ल्यास भेट दिल्याचे पर्यटकांना समाधान मिळेल हे नक्की.

varsha@rajagiri.edu

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

पाऊलखुणा- आठवणींचा सुवर्णकाळ मालगुडी म्युझियम

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

‘मालगुडी म्युझियम’ असे लिहिलेली कमान, हिरव्या-लाल रंगात नटलेले जुने रेल्वे स्टेशन आणि मालिकेतील अनेक आठवणी… हे सारे पाहायला मिळते शिमोग्याजवळील ‘अरासळू’ या गावात. ‘मालगुडी डेज’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेची संकल्पना मांडणारे हे म्युझियम आपल्याला नॉस्टॅल्जिक अनुभव देणारे ठरते.

‘मालगुडी डेज’ ही अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिका. मालगुडी नावाच्या खेडेगावाचे कथानक मांडणाऱया या मालिकेचे चित्रीकरण   या शिमोग्याजवळील गावात झाले. अरासळू येथे उभे केलेले मालगुडीचे रेल्वे स्टेशन आता म्युझियममध्ये परावर्तित झाले आहे.

ही गोष्ट आहे एका प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या टीव्ही मालिकेची. जेव्हा मनोरंजनासाठी फक्त दूरदर्शन एवढे एकच माध्यम होते आणि इतर कुठल्याही खासगी वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या त्या काळातली. तो जमाना होता दूरदर्शनचा. अनेकविध सुंदर मालिका त्या काळात दूरदर्शनचा पडदा गाजवून गेल्या. काही मालिका मुलांसाठी, तर काही तरुणांसाठी. काही घरातल्या वडीलधारी मंडळींसाठी, तर काही खास महिलांसाठी. घरातल्या प्रत्येक घटकासाठी एकेक मालिका त्या काळी दूरदर्शनवर दाखवली जात असे. मात्र एक मालिका अशी होती, ती सुरू झाली की, घरातली झाडून सगळी मंडळी टीव्हीसमोर येऊन ठाण मांडून बसत असत. ती मालिका म्हणजे ‘मालगुडी डेज’!  सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या लेखनावर आधारित ही मालिका आणि तिच्या जोडीला त्यांचे बंधू आर. के. लक्ष्मण यांची चित्रे यामुळे ही मालिका अफाट लोकप्रिय झाली. गिरीश कर्नाड, शंकर नाग अशा दिग्गज कलाकारांनी ही मालिका गाजवली. दक्षिण भारतातले एक छोटेसे खेडेगाव मालगुडी आणि त्या गावाशी निगडित असलेल्या विविध कथा असे या मालिकेचे कथानक. स्वामी हा लहान मुलगा आणि त्याचे कुटुंब ही त्या मालिकेतील मध्यवर्ती संकल्पना.  मालगुडी डेजचा काळ दाखवला होता तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. त्यामुळे इंग्रजी राजवट, त्यांचे पोलीस, त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक आणि त्यांच्या काळातल्या शाळा असा सगळा जुना मामला आर. के. नारायण यांनी फार समर्थपणे मांडला होता. छोटय़ाशा खेडय़ातले स्वामी हे मालिकेतील पात्र तर घराघरांत जाऊन पोहोचले आणि त्याचबरोबर ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचले होते ते या मालिकेचे युनिक म्युझिक…! ‘मालगुडी डेज’ची ती टय़ून तर आजही अनेकांची मोबाइल रिंगटोन आहे.

‘मालगुडी डेज’ या मालिकेत अनेक प्रसंग, अनेक पात्रे, अनेक घटना आपल्याला भेटत जातात. त्या गावचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मालगुडीचे रेल्वे स्टेशन. त्या स्टेशनला मध्यवर्ती ठेवून काही पात्रे येतात, काही कथानके तयार होतात आणि रेल्वे स्टेशनच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर कथानक साकार झालेले दिसते. ‘मालगुडी डेज’च्या रेल्वे स्टेशनचे शूटिंग कर्नाटकातील एका सुंदर ठिकाणी केले गेले होते. ‘अरासळू’ असे त्या गावाचे आणि स्टेशनचे नाव. शिमोग्याच्या जवळ असलेले हे ठिकाण. या अरासळू रेल्वे स्टेशनवर मालगुडी डेजच्या काही भागांचे चित्रीकरण झालेले आहे.

रेल्वे स्टेशनचे शूटिंग जिथे झाले त्या ठिकाणी आता एक सुंदर ‘मालगुडी म्युझियम’ उभारले आहे. मालिकेमध्ये दिसणारे ‘मालगुडी’ हे रेल्वे स्टेशन आता एका सुंदर म्युझियममधे परावर्तित झाले आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेऊन हे स्टेशन आणि तिथले म्युझियम तयार केले आहे. शिमोग्यापासून फक्त 34 किलोमीटर अंतरावर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या तालीगुप्पा-शिमोगा मार्गावर ‘अरासळू’ हे स्टेशन आहे. अरासळूच्या जुन्या स्टेशनवर ‘मालगुडी डेज’चे शूटिंग झाले होते. इथेच शेजारी आता नवीन अरासळू स्टेशन उभारले आहे आणि जुन्या स्टेशनचे रूपांतर ‘मालगुडी म्युझियम’मध्ये केले आहे.

शिमोग्याकडे जाताना वाटेत उजवीकडे अरासळू स्टेशनपाशी ‘मालगुडी म्युझियम’ असे लिहिलेली कमान आपले स्वागत करते. कमानीतून आत गेल्यावर आपल्याला समोर दिसते ते हिरव्या-लाल रंगांत नटलेले बुटके जुने रेल्वे स्टेशन.  त्याच्या बाहेरच्या बाजूला नॅरो गेजवरील इंजिनाची प्रतिकृती आपले लक्ष वेधून घेते. परिसर अतिशय शांत आणि हिरवागार आहे. 1960 च्या दशकातले स्टेशन तसेच ठेवले आहे. तीच जुनी तिकीट खिडकी, तीच जुनी घडय़ाळे, जुनी समयसारिणी असा सगळा सुंदर सरंजाम तिथे आहे. स्टेशनच्या भिंतींवर ‘मालगुडी डेज’ या मालिकेतील वेगवेगळे प्रसंग चित्रित केलेत. एका टीव्हीवर सतत ‘मालगुडी डेज’ मालिका सुरू असते आणि सगळ्यात भारी म्हणजे या स्टेशनच्या  बाहेरच्या बाजूला स्वामी, त्याचे मित्र मणी आणि राजम यांचे पुतळे केलेले आहेत.

या मालगुडी स्टेशनच्या शेजारी रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर करून ‘मालगुडी कॅफे’ तयार केला आहे. एखादी संकल्पना घेऊन त्याचं चीज कसं करायचं याचा परिपाठ म्हणजे हे ‘मालगुडी म्युझियम’ आहे. याचे प्रवेश शुल्क फक्त पाच रुपये आहे, पण इथे मिळणाऱया अनुभवाचे गाठोडे प्रचंड मोठे आहे. शिमोग्याला जाऊन मुद्दाम हे स्टेशन आणि म्युझियम बघायलाच हवे. तिथे असेपर्यंत मालगुडीची ‘ता ना ना नाना नाना ना…’ ही अफाट गाजलेली धून मनात सतत रुंजी घालत असते. काही गोष्टी शब्दांत नाही सांगता येत, तर त्या तिथे जाऊनच तो सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवायला हवा.

ashutosh.treks@gmail.com

संस्कृती सोहळा – जोतिबाचे खेटे : एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

सामना ऑनलाईन

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

तमाम कृषिवलांचे कुलदैवत व मराठी मुलखातील लोकदैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या डोंगरावर माघ महिन्यातील पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या पाच रविवारी चालत जाऊन दर्शन घेऊन गुलाल-खोबरे उधळण्याची परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यंदा माघ शुद्ध 15, बुधवार दिनांक 12 फेब्रुवारीला पौर्णिमा झाल्यानंतर रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जोतिबाच्या खेटय़ांना प्रारंभ झाला आहे. 16 व 23 फेब्रुवारी, तसेच 2, 9 व 16 मार्च रोजी हजारोंच्या संख्येने जोतिबाचे भक्त पायी डोंगरावर येतात, `जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर दुमदुमतो. पाचव्या खेटय़ानंतर शेतकरी आपल्या कुटुंबासह येऊन देवाला पुरणपोळीचा नैवेद्य करतात. इथल्या गुरवांचे आदरातिथ्य वाखाणण्याजोगे आहे. ते निरपेक्षपणे भक्तांची सेवा करतात हे या जोतिबाच्या डोंगरावरचे वैशिष्टय़ आहे!

`दवणा’ ही वनस्पती जोतिबाला, तसेच काळभैरव व यमाईदेवीला प्रिय असून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिरे, पुशिरे या गावातील शेतकरी दवणा पिकवतात. त्याला एक प्रकारचा मनमोहक असा सुगंध येतो. इतरत्र कुठेही न पिकणाऱया दवणा वनस्पतीबद्दल इथल्या शेतकऱयांना खूप आदर आहे. जोतिबाच्या भक्तांना दवणा माफक दरात उपलब्ध करून इथला शेतकरी वर्ग एक प्रकारे देवाप्रति भक्तांसाठी सेवाभाव जपतो आहे.

प्रतिवर्षी माघ महिन्यात पाच रविवारी दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनाला जाण्याची अनेक बहुजन शेतकरी घराण्याची परंपरा आहे. या वेळी जोतिबा डोंगरावर (वाडी रत्नागिरी) प्रचंड गर्दी होते. जोतिबाला गुलाल, खोबरे, दवणा वाहायचा व मंदिराच्या ओटय़ावर कापूर लावून दर्शन घेण्याची परंपरा आहे, यालाच `जोतिबाचे खेटे’ म्हणतात. या खेटय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे काही घराण्यांतील कुलाचार म्हणून पायी चालत जाऊन हे खेटे पूर्ण केले जातात. याबाबत अधिक माहिती घेताना एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे, पूर्वीच्या काळी श्री केदारनाथ (जोतिबा) आपली दख्खनची मोहीम संपवून हिमालयाच्या दिशेने परत निघाले हे अंबामातेला कळताच ती करवीरातून अनवाणी पळत वाडी रत्नागिरीच्या या डोंगरावर आली व केदारनाथला तिने विनंती करून इथेच वास्तव्य करण्यास सांगितले. श्री केदारनाथांनी अंबामातेच्या विनंतीला मान देऊन इथेच कायमचे वास्तव्य केले. तेव्हापासून करवीरनगरीतून जोतिबा डोंगरावर पायी चालत जाऊन खेटे घालण्याची प्रथा चालत आली आहे. ती आजतागायत सुरू आहे. माघ महिन्यात सलग पाच रविवारी कोल्हापूरसह आजूबाजूच्या पंपोशीतील असंख्य भक्त कुशिरे (ता. करवीर) मार्गे पायी गायमुखमार्गे दक्षिण दरवाजातून जोतिबाच्या दर्शनाला मंदिरात जातात. डोंगराच्या पायथ्याशी पुष्करणी तीर्थ तलाव म्हणजेच गायमुख तलावाच्या काठावर थोडा विसावा घेऊन चालत डोंगरावर जाण्यासाठी रीघ लागलेली असते. कोल्हापुरातील `सहजसेवा ट्रस्ट’ व `मेहता चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने या तलावाच्या काठावर मोफत अन्नछत्र चालविले जाते. दररोज हजारो भाविक या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतात. पूर्वी हा गायमुख परिसर ओसाड होता. सहजसेवा ट्रस्ट व इतर सेवाभावी संस्थांनी या परिसरात वृक्षारोपणाचा उपाम राबविला. भाविक पाण्याची बाटली भरून आणून या वृक्षाच्या संगोपनासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे हा परिसर वनराईने सुशोभित झाला आहे. पूर्वी चालत खेटय़ाला जाताना सर्वप्रथम कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत आंघोळ करून शुचिर्भूत होऊन चालत जोतिबा डोंगरावर जाण्याची प्रथा होती. मात्र अलीकडे धावत्या काळात सर्वांना ते शक्य होईलच असे नाही. कर्नाटकातील बेळगाव, पंढरपूर, लातूर, बार्शी या भागांतूनही जोतिबाच्या दर्शनासाठी पायी चालत येणारे भाविक आहेत. ते भाविक पंचगंगा नदी काठावर येऊन विसावा घेतात व पंचगंगेत स्नान करून मगच जोतिबाच्या खेटय़ाला सुरुवात करतात. हे भाविक वडणगेमार्गे निगवे (दुमाला) या गावात असणाऱया हिंमत बहादूर चव्हाण (सरकार) यांच्या वाडय़ाच्या प्रांगणात असणाऱया जोतिबाच्या पादुकांचे दर्शन घेतात आणि मगच कुशिरेमार्गे डोंगर चढतात. कोल्हापूर परिसरात आजही या जोतिबाच्या पाच खेटय़ांना जोतिबाभक्तांच्या दृष्टीने फारच महत्त्व आहे.

या माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबाचे भक्त पायी अथवा वाहनाने प्रवास करत जोतिबा डोंगरावर येतात. देवाला गुलाल, खोबरे, दवणा वाहतात व प्रदक्षिणा घेताना काळभैरवाच्या मंदिरासमोर जोतिबाच्या गुरव मंडळींकडून नारळ फोडून घेतात. तो फोडलेला नारळ प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. पाचव्या रविवारी म्हणजेच शेवटच्या खेटय़ाला जोतिबाला नैवेद्य करण्याची प्रथा आहे. या वेळी गुरवाच्या घरात तांदूळ, तुरडाळ, हरभरा डाळ, गूळ असा `शिधा’ दिला जातो. जोतिबाच्या गुरव समाजातील महिला पुरणपोळी, भात, आमटी, भाजीचा नैवेद्य करतात व प्रत्येकाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. तो नैवेद्य भाविक आपल्या परिवारासह गुरवाच्या घरात बसून ग्रहण करतात. या पाचव्या रविवारी म्हणजेच शेवटच्या खेटय़ाला नैवेद्य दिल्यानंतरच पाच खेटय़ाची यात्रा पूर्ण होते. काही भक्त पाच खेटे न घालता पहिला व शेवटचा पाचवा खेटा घालतात. मात्र घराण्याचा कुलाचार म्हणून कमी-अधिक प्रमाणात जोतिबाला नैवेद्य करून खेटय़ाची समाप्ती करतात. हे खेटे पूर्ण झाले की, जोतिबाच्या भक्तांना वेध लागतात ते जोतिबाच्या भव्यदिव्य चैत्री यात्रेचे.

`जोतिबाच्या नावानं चांगभलं’, `काळभैरवाच्या नावानं चांगभलं’ या चांगभलंच्या गजरात जोतिबाच्या डोंगरावर चालत जाणारे भाविक आणि जोतिबाच्या खेटय़ाचे अप्रूप आजही करवीरवासीयांच्या जनजीवनात एक आगळेवेगळे वैशिष्टय़पूर्ण स्थान टिकवून आहे.

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)

पाऊलखुणा – शिल्पसमृद्ध जांजगीर

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

छत्तीसगड जांजगीर आणि चंपा ही दोन्ही ठिकाणं सुंदर व देखणी आहेत. त्यातील जांजगीर येथील शिल्पसमृद्ध मंदिरं पाहायलाच हवीत.

जांजगीर-चंपा हा भाग छत्तीसगडच्या मध्यवर्ती भागात वसलेला असल्यामुळे त्याला छत्तीसगडचे हृदय असे म्हटले जाते. जांजगीर आणि चंपा ही दोन वेगवेगळी ठिकाणे पण एकमेकांना लागून असलेली. जांजगीर-चंपा प्रदेशाचे मुख्यालय जांजगीर इथेच आहे. छत्तीसगड म्हटले की भोरमदेवाचे मंदिर डोळ्यासमोर येते. मात्र जांजगीर इथे असलेले विष्णू मंदिरसुद्धा तितकेच सुंदर, देखणे आणि भोरमदेवपेक्षा जास्त शिल्पसमृद्ध आहे. जांजगीर हे विलासपूरपासून 65 कि.मी. आणि रायपूरपासून 175 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. इथे असलेले विष्णू मंदिर जवळ जवळ 12 फूट उंच जोत्यावर बांधलेले. तिथे चढून जायला पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराचा सभामंडप आता शिल्लक नाही. फक्त गर्भगृह दिसते. त्यावर असलेल्या अनेक मूर्ती आणि त्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार इतके अप्रतिम आहे की वर्णन अपुरे पडेल. द्वारशाखेवरील शिल्पकला फारच देखणी आणि विविधतेने नटलेली आहे.

गाभाऱ्यात 4 पायऱ्या चढून जावे लागते. त्यातल्या दोन पायऱ्या हत्ती आणि व्याल शिल्पांनी मढवल्या आहेत. उंबरठासुद्धा खूप सुरेख सजवला आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखा फारच सुंदर दिसतात. गंगा आणि यमुनेच्या मूर्ती दोन बाजूंना आणि त्यांच्या बाजूला द्वारपाल. ललाटबिंबावर विष्णूची प्रतिमा असून त्याच्या खाली असलेल्या तीन कोनाड्यात ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या प्रतिमा. मंडोवरावर म्हणजे गाभाऱ्याच्या बाह्यभिंतींवर अगदी खच्चून शिल्पकला केलेली आहे. विष्णूच्या विविध मूर्ती, नरसिंह, वराह वगैरे अवतार आणि महत्त्वाचे म्हणजे विष्णूच्या 24 विभवांच्या मूर्ती इथे ठरावीक जागी एकेक अशा कोरलेल्या दिसतात.

निरनिराळ्या व्यालप्रतिमा, साधक, वादक, नागपुरुष अशा एक ना अनेक प्रतिमा इथे या मंदिरावर आहेत. तसेच अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनांसमवेत त्यांच्या त्यांच्या दिशांना कोरलेले आहेत. मंदिराची पार्श्वदेवता सूर्य आहे. फार सुंदर अशी ही सूर्याची मूर्ती. हातात दोन कमळे, पायाशी सेविका अशी देखणी मूर्ती इथे दिसते. तसेच विविध सुरसुंदरींनी हे मंदिर मढलेले आहे. देखणे स्थापत्य आणि सुंदर मूर्तीकला यांनी बहरलेले आहे. सर्वांगसुंदर असे हे मंदिर बघून डोळे दिपून जातात. एकाच जोत्यावर उभे असलेले हे स्थापत्य आपल्याला खिळवून ठेवते. या जोत्यावरून मंदिराला प्रदक्षिणा घालता येते. त्यावेळी विविध शिल्पे बघून इथून पाय निघत नाही. कितीही वेळा प्रदक्षिणा घातली तरी ती शिल्पे बघून समाधान होत नाही इतकी सुंदर इथली शिल्पकला आहे.

मंदिराचा निव्वळ गाभारा आज शिल्लक आहे. याचा सभामंडप, मुखमंडप जेव्हा इथे अस्तित्वात असतील तेव्हा त्याच्यावर केलेली सुबक शिल्पकला किती सुंदर असेल याची नुसती कल्पनाच करावी लागते. पण गाभाऱ्यावर असलेल्या शिल्पांवरून आपण त्या शिल्पकलेचा किमान अंदाज बांधू शकतो. अतिशय देखणे आणि डौलदार असे हे मंदिर छत्तीसगडच्या अनेक सुंदर मंदिरांपैकी एक आहे. अशा एकाहून एक देखण्या मंदिरांमुळे हा प्रदेश रमणीय झालेला आहे. धार्मिकतेबरोबर कलाकारांची बहरलेली सौंदर्यदृष्टी ही या प्रदेशाची खासियत होती.

या विष्णू मंदिराशेजारीच रस्त्याच्या पलीकडे एक शिवमंदिर आहे. हे शिवमंदिर सध्या पूजेत नाही. त्याच्या गाभाऱ्यात काही मूर्तींचे अवशेष ठेवलेले दिसतात. पण या छोटेखानी मंदिराचा परिसर छान ठेवला आहे. याला अगदी लागून देवीचे एक मंदिर आहे. त्या मंदिरात भक्तांचा खूप राबता असतो. त्यामुळे तिथे बसायला बाके वगैरे ठेवलेली आहेत. पण तिथल्याच या शिव मंदिराकडे कुणाचे फारसे लक्ष जात नाही. या शिव मंदिराच्या द्वारशाखा फार आकर्षक असून याच्या ललाटबिंबावर शिवप्रतिमा कोरलेली आहे. उत्तरांगावर म्हणजे या ललाटबिंबाच्या वरच्या बाजूला नृत्यशिवाचे फार देखणे शिल्प दिसते. या मंदिरालासुद्धा सभामंडप वगैरे काहीच नाही. नुसता गाभारा शिल्लक आहे. आणि मंदिराचे शिखर चांगल्या स्थितीत आहे. गाभाऱ्याच्या बाह्यभिंतीवर अंधकासुरवध, नृत्य गणेश तसेच योगीशिवाचे शिल्प कोरलेले दिसते.

या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य याच्या गाभाऱ्याच्या पाठीकडील भिंतीवर आहे. इथे मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवर जिथे पार्श्वदेवतेचे शिल्प असते तिथे एकावर एक दोन देवकोष्ठे असून त्यात असलेल्या मूर्ती केवळ अफलातून आणि अवश्य बघण्यासारख्या आहेत. त्या दोनपैकी खालच्या देवकोष्ठात उभ्या स्थितीतील सूर्याची मूर्ती आहे. तिच्या हातात कमळे असून पायाशी 7 घोडे दिसतात. तर त्याच्यावर असलेल्या देवकोष्ठात `शिव-सूर्या’ची अत्यंत दुर्मीळ अशी मूर्ती आहे. ही मूर्ती बसलेली असून तिला चार हात आहेत. मागच्या दोन हातात त्रिशूळ आणि नाग अशी शिवाची आयुधे तर नैसर्गिक दोन हातात कमळे दिसतात. डोक्यावर मुकुट असून अंगावर दागिने कोरलेले आहेत. अशी मूर्ती फारशी कुठेच दिसत नाही. अत्यंत दुर्मीळ प्रकारातली ही मूर्ती आहे. डॉ. किरीट मनकोडी यांनी अशा प्रकारच्या मूर्तीवर सविस्तर लिखाण केलेले आहे. जांजगिर इथले विष्णू मंदिर बघितल्यावर शेजारचे हे मंदिर अवश्य बघायलाच हवे. द्वारशाखेपासून ते अगदी सगळ्या मंदिरावर शिवप्रतिमा कोरलेल्या दिसतात यावरून हे शिव मंदिर आहे हे स्पष्टच आहे. मात्र पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकावर हे विष्णू मंदिर असल्याचे लिहिले आहे. ते असे का लिहिले ते त्यांनाच माहीत.

(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)

पाऊलखुणा – शिवचरित्राचा मागोवा

सामना ऑनलाईन

>> रोहित पवार

परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिसपासून ते अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलाने भरलेल्या नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या. त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना भूतकाळातील घटनांचा पडदा उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जाणून घेताना या परदेशी प्रवाशांच्या नोंदी तितक्याच महत्त्वपूर्ण ठरतात.

‘कुतूहल’… माणसाला जगण्याची प्रेरणा देणारा हा शब्द. दगडी हत्यारे बनविणाऱ्या अश्मयुगीन माणसाने पुढे चंद्रावर पाऊल ठेवले. हा संपूर्ण प्रवास या कुतूहलाचाच. युगानुयुगे याच कुतूहलाने प्रेरित होऊन मानवाने अज्ञात क्षितिजांचा वेध घेतला आहे. पलीकडचे जग कसे असेल? तिथले लोक कसे असतील, त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली आपल्यापेक्षा वेगळी असेल का? अशा अगणित प्रश्नांनी मानवी मनात काहूर उठवले आणि याच अतृप्त जिज्ञासेपोटी काही धाडसी माणसे आपल्या ज्ञात जगाच्या सीमा ओलांडून अज्ञात वाटा तुडवत निघाले.

समुद्रांच्या लाटांवर स्वार होऊन आणि दूरवरच्या दुर्गम भूभागांना तुडवत हे प्रवासी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांच्यापैकी काही भारतभूमीकडेही आले. परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन नाही. चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस पासून ते अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलपूर्ण नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या. असे काही क्षण नोंदवून ठेवण्याच्या त्यांच्या सवयीतून त्यांनी तत्कालीन भारताचे जे चित्र रेखाटले, उद्या त्या नोंदींकडे जग ‘इतिहास’ म्हणून बघणार आहे याची बहुतांशी प्रवाशांना जाणीवही नसावी. त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना भूतकाळातील घटनांचा पडदा उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. ते केवळ प्रवासी नव्हते तर ते भूतकाळाचे साक्षीदार होते!

शिवकाळात अनेक परकीय प्रवासी महाराष्ट्रात येऊन गेले. यात काही  प्रवासी होते, काही वैद्य, काही धर्मप्रसारक, काही व्यापारी तर काही अधिकारी लोकसुद्धा. काही जण थोडे दिवस इथे राहिले तर काही कायमचेच या भारतभूमीशी एकरूप झाले. या लोकांनी  ज्या घटनांची, व्यक्तींची नोंद केली त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आणि ही सर्व माहिती अपरिचित तर आहेच, पण महत्त्वपूर्णदेखील आहे. शिवाजी महाराज हयात असतानाच त्यांची कीर्ती दूर युरोपपर्यंत पोहोचली होती. त्यांच्या पराक्रमी कार्यांनी, धाडसी कृत्यांनी आणि चलाखीने समकालीन परदेशी इतिहासकारांच्या लेखनात स्थान मिळवले होते. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इटालियन लेखक मराठय़ांचे नाव जगात प्रसिद्ध होण्याआधीच शिवाजी महाराजांचे वर्णन करत होते. त्यापैकी काही जणांनी ओळखले होते की, शिवाजी महाराज हे  फक्त बंडखोर सरदार नव्हते तर ते एक थोर सेनानी आणि त्याहूनही महान राजनीती धुरंधर होते.

या बुद्धिमान निरीक्षकांमुळेच आपल्याला या मराठा वीराची सर्वात जुनी चरित्रे उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अचूक माहिती किंवा निष्पक्ष इतिहासाची अपेक्षा करता येत नाही, परंतु त्यांनी आपल्यासाठी अनेक रंजक किस्से, तेव्हाच्या चर्चा आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा काही सत्य घटनांचा  खजिना जतन करून ठेवला आहे. तब्बल 100 वर्षांपूर्वी बंगालचे साक्षेपी इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये अशाच परकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या नोंदींचा समावेश केला होता.

इतिहासाचा अभ्यास करत असताना माझ्या मनात सारखे यायचे की, सेनांचे हे ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ हे पुस्तक एक वेगळी दृष्टी देणारे आहेच, परंतु ते इंग्रजीतच राहिल्याने अपरिचित राहिले आहे. जर हे मराठीमध्ये असते तर किती सोपे झाले असते आणि मग विचार आला की, हे काम आपणच का करू नये? म्हणून मग मी सदर पुस्तकाच्या अनुवादाच्या कामाला लागलो. या पुस्तकात परकीय लोकांनी केलेल्या समकालीन नोंदी आहेत, यात संक्षिप्त-दीर्घ अशी शिवचरित्रेही आहेत. त्यामुळे हा ग्रंथ अन्य कोणत्याही ग्रंथांप्रमाणे भावानुवाद करून चालणार नव्हते. साधन ग्रंथांचे भाषांतर काटेकोरपणे करून तो साधन ग्रंथाप्रमाणेच मांडणे आवश्यक होते. अखेरीस ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ गेल्या महिन्यात 15 मार्च 2025 रोजी प्रकाशित झाला.

या पुस्तकात ‘कॉस्मी द ग्वार्द’ याने लिहिलेले पोर्तुगीज भाषेतील शिवचरित्र आहे, जे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधराच वर्षांत लिहिले होते. या पोर्तुगीज शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहे. शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना भरघोस पगार देत ही गोष्ट या शिवचरित्रात नोंदवली आहे. पुढे या पुस्तकात फ्रांस्वा व्हॅलेंटाइन या डच अधिकाऱ्याची नोंद आहे, जी शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरत लुटीचा वृत्तांत सांगते. महाराज कसे दिसायचे, याचे वर्णन करणारा फ्रेंच प्रवासी ‘थिवेनो’ याचाही समावेश पुस्तकात केला आहे.

‘अॅबे कॅरे’ हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात भारतात येऊन गेला. तो शिवाजी महाराजांच्या प्रदेशातून प्रवास करत असताना त्याची मराठा अधिकाऱ्याशी भेट झाली. या चर्चेदरम्यान त्याने अत्यंत महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. कोकणातून प्रवास करताना या कॅरेने टिपलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न आणि हेरगिरीचे रहस्य वाचण्यासारखे आहे. रायगडावर राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पार पडला. या सोहळ्याचा साक्षीदार हेन्री ऑक्सिडेन हा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याची रोजनिशी या पुस्तकात दिली आहे. याशिवाय सध्या चर्चेत असणारी ‘मार्टिनची डायरी’देखील या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. या डायरीत शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय या अतिशय महत्त्वाच्या मोहिमेच्या घटनांचा समकालीन वृत्तांत वाचायला मिळतो. याशिवाय अनेक अप्रकाशित डच पत्रांचासुद्धा समावेश या पुस्तकात केला आहे.

आज मराठय़ांच्या इतिहास संशोधनाला सुरुवात होऊन एक शतकाहून अधिक काळ लोटला आहे. इतिहासाचार्य राजवाडे, का.ना. साने, मेहेंदळे, परांजपे आदी मंडळीनीं मराठय़ांच्या इतिहासाशी निगडित कागदपत्रे शोधून त्यांची चिकित्सा केली. पुढे ग.ह. खरे,  द.वा. पोतदार, आप्पासाहेब पवार आदी मंडळींनी तो वारसा पुढे चालवला. सध्याच्या काळात गजानन मेहेंदळे, डॉ. उदय कुलकर्णी यांसारखे इतिहासकार अविरतपणे इतिहासाचे कार्य पुढे नेत आहेत,  ‘जिथे पुरावा नाही तिथे इतिहास नाही’ हे ब्रीद आम्हाला शिकवणारे, अवघ्या महाराष्ट्राला आपल्या वाणीने समृद्ध करणारे इतिहास तज्ञ निनाद बेडेकर यांना हा ग्रंथ मी अर्पण केला आहे. या पुस्तकामागची प्रेरणाही तेच आहेत. ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती’ हा अस्सल साधन ग्रंथ असल्याने येणाऱ्या पिढय़ांना, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच उपयोगी ठरणार आहे.

pawarrohit14@gmail.com

(लेखक इतिहास संशोधक आहेत.)

भटकंती- मुंबई ते गोवा एक मनोरम सायकल यात्रा

सामना ऑनलाईन

>> नमिता दामले

नितांत सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, भरपूर जैवविविधता, निसर्गसौंदर्य, तिथली खाद्य संस्कृती… त्याचसोबत तिथल्या लोकांची आपुलकी… मुंबई ते गोवा या सायकलवरून केलेल्या मनोरम सफरीचा आल्हाददायक अनुभव!

मुंबई ते गोवा सागरी महामार्ग नितांत सुंदर आणि रमणीय आहे. त्यातच डिसेंबर-जानेवारीची कोकणाला आल्हाददायक बनवणारी थंडी होती. 11 जानेवारी 2024 ला पॅनिअरमध्ये सामान भरून पहाटे 6.30 ला घर सोडले. लाँचनी मांडवा इथे पोहोचलो आणि मांडव्याहून निघाल्यावर आवासचा बसस्टँड माझ्या खापर पणजीची आठवण घेऊन आला. हिने रस्त्यासाठी जमीन देताना मोबदला न घेता माझ्या फाटकात बसथांबा करा अशी अट घातली होती. आवासचे कानिटकरांचे घर, इथे बैलगाडीमधून फिरतानाच्या आठवणी क्षणभर तरळून गेल्या. किहिममध्ये प्रवेश करताच इथे झालेल्या प्राथमिक शिक्षा वर्गाच्या आठवणीही मनात रुंजी घालू लागल्या.

मुरुडला संध्याकाळी पोहोचलो. फार शोधाशोध न करता मुरुड सागरकिनाऱयावार एलिगंट हॉटेलमध्ये मुक्कमासाठी खोली मिळाली. जेवण करून येताना बकुळीची फुले वेचली, त्यांचा गंध घेत शांत झोप लागली. दुसऱया दिवशी सकाळी लाँचमध्ये गुजरातची विशी भेटली. शुक्रवारी घाटकोपरहून ती निघाली होती. एकटीनेच सायकलवरून गोव्यापर्यंत फिरून येण्याचा तिचा मानस होता. शांतपणे दर दिवशी 40-50 किमी. अंतर कापत फिरत-फिरत ती जाणार होती आणि विशेष म्हणजे हा प्रवास ती पहिल्यांदाच करत होती. आम्ही दिघी ते बागमांडला वेळास मार्गे गेलो. इथून जाताना मोठा घाट चढ संपवून उतरताना मी जोरदार आपटले, गुडघे सडकले. देवाची कृपा म्हणून एवढय़ावरच निभावले. दुपारनंतर आधी कस बघणारे चढ होते आणि नंतर तीव्र उतार, खडखडाट रस्ता. बाणकोट-मांदवली-केळशी असा गावा-गावांमधून वळणा-वळणांचा प्रवास सुरू झाला आणि केळशीला आंबाडीच्या भाजीला खमंग फोडणी घातल्याचा ओळखीचा वास आला. ताईचे जन्मगाव आंजर्ले, गाठेपर्यंत अंधार दाटला. जागोजागी गावातील मुले उत्साहाने हाय करत, टाळ्या द्यायला उत्सुक होती. मोठी माणसे कुठून आलात कुठे चाललात वगैरे आपुलकीने चौकशी करत. तिखट चढ असले तरी बकुळ, पांढरा चाफा, लाल चाफा, रातराणी, प्राजक्त, सोनचाफा, जाई-जुई यांनी सुगंधी केलेले, सावली धरलेले मार्ग थकव्याला थारा द्यायला तयार नव्हते. वाटेतली 2-3 रिसॉर्ट फुल होती, पण आमच्यासाठी आंजर्ल्यामधले पहिलेच घर दिव्यांच्या माळा लावून स्वागत करत होते. अजय शिगवण यांच्या साई समर्थ होम स्टेमध्ये मुक्कामी राहिलो. जेवण रुचकर आणि नाश्त्याला गरमागरम आंबोळ्या-चटणी, वाफाळता चहा मिळाला. रात्री आंजर्ल्यामधल्या मंदिरात कीर्तन सुरू होते. कीर्तनकार बुवांच्या रसाळ वाणीने वातावरण प्रसन्न, भक्तीरसमय झाले होते.

आंजर्ले-हर्णे-दापोली रस्त्यावर गिम्हवणे नावाच्या टेकडीवर वसलेले एक सुंदर गाव भावून गेले. दापोली कृषी विद्यापीठ परिसर, दापोली-दाभोळ रस्ता सरसर मागे सरला. दाभोळच्या रस्त्यावर सायकलवर भारत भ्रमण केलेले दाभोळचे सायकलपटू संदेश चव्हाण यांची वळणेच्या अलीकडे भेट झाली. ते स्कूटरवर होते; पण थोडा वेळ त्यांनी माझ्या सायकलच्या वेगाशी जुळवून घेत आवर्जून सोबत केली म्हणून ओळख झाली. वळणे पॉइंटला जेवण मस्त मिळाले. रत्नागिरी गॅस कंपनीपर्यंत कस बघणारा चढ होता. पण नंतर मात्र सुसाट रस्ता मिळाला.

गुहागरला समीर घाणेकर आणि श्रध्दा घाणेकर यांच्या अभंग होम स्टेमध्ये मुक्काम केला. मागच्या बाजूच्या नारळी-पोफळीच्या बागेसोबत हे वास्तव्य मनोहर चित्रासारखे भासले.

तवसाळकडे जाताना वैराण प्रदेश होता. वाटेत न जेवता तडक फेरी पकडायला पोहोचलो; पण 12.40 ची फेरी चुकली. मग 2 वाजताची फेरी मिळाली. पालशेतच्या तिखट चढाईनंतर बकुळ फुलांनी आणि भजनाच्या सुरांनी मन प्रसन्न झाले.

कोकणातले रस्ते, कधी आवळा, सुपारी वाळवतानाचा वास, तर कधी बासमती तांदळासारखा येणाऱया गवताचा सुगंध घेत आम्ही पुढे चाललो होतो. आडिवरेला महाकालीमातेचे व रवळनाथाचे दर्शन घेतले. आडिवरे ते मालवण अंतर दुपारनंतर कापणे जरा अवघड होते. पण वाटेत कोणत्या गावी मुक्कामाची सोय होऊ शकते यांची थोडी चाचपणी केली होती. नाटेजवळच्या पवार यांच्या यश होम स्टेमध्ये उत्तम सोय झाली.

मालवणहून निघाल्यावर म्हापणला देवीचे दर्शन घेतले. आंब्याचा मोहोर, बकुळाचा सुगंध, दिमाखात फिरणाऱया लाल पऱयांचे सौजन्यशील चालक अशी आमची सायकल यात्रा चालली होती. वेंगुर्ल्याला जेवण उत्तम मिळाले. तिथे ठाण्याची, परळची माणसे भेटली. वि. स. खांडेकरांचे शिरोडा आले. त्यांच्या नावाचे इथे विद्यालय आहे. शाळेच्या आवारात खेळणारी मुले, त्यांचा चिवचिवाट ऐकल्यावर एकदम उत्साह आला. मुक्कामासाठी हॉटेल माहेर गुगलवरून आधीच हेरून ठेवले होते. हॉटेलचे आवार झाडी राखून होते. वर गेल्या-गेल्या गॅलरीतून खंडय़ा पक्षाचे दर्शन झाले. रात्री कळवा-डोंबिवली येथील तिघे सायकलस्वार भेटले. त्यांनीही आमच्याबरोबरच शनिवारी ठाण्याहून सुरुवात केली होती. त्यांच्याकडून पणजीमधून नाईक ट्रव्हल्सच्या बसेस मिळतात हे समजले.

आरवलीच्या, शिरोडय़ाच्या, आजगावच्या देवा वेतोबा, आत्तापर्यंत आमची सायकल यात्रा जशी सुरळीत पार पाडली तशीच आज पूर्ण होऊ देत, असे गाऱ्हाणे घालून, आजगावला आमचे कुलदैवत भूमिका माता आणि वेतोबाला नमस्कार करून पुढे, मळेवाड जंक्शन-सातर्डा गाठले. सातर्डा आले तसे भूदृश्य एकदम बदलले. रस्त्याच्या दुतर्फा भातशेती लागली आणि सातर्डा सोडल्यानंतर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला NH 66 हायवे आला. एकही झाड नाही, सततचा बारीक चढ, अगदी रटाळ… पणजीमध्ये जिथे-तिथे मेट्रोची की कसली कामे सुरू होती. मला तर ठाण्यातल्या घोडबंदर रस्त्याची आठवण झाली. पणजीत पोहोचल्यावर देवाच्या कृपेने मोहीम फत्ते झाली. मग काय डोसा, उत्तप्पा, दही-वडा, सँडविच, फालुदा अशी चंगळ केली आणि हॉटेल रिट्झ क्लासिकजवळच्या खाजगी बसस्थानकातून 4.45 ची परतीची बस पकडली. घरी गेल्यावर माझी हर्षदा (ट्रेक 8.2 डी.एस.) आणि श्रीकांतची हर्षाली (स्कॉट सबक्रॉस 25) दोघी सायकलींने आम्हाला एवढय़ा दूर फिरवून आणलं, एकदाही काही त्रास दिला नाही म्हणून दोघींचीही दृष्ट काढली.

namitasd811@gmail.com

वारसावैभव – महेश्वरच्या अहिल्याबाई!

सामना ऑनलाईन

>> सर्वेश फडणवीस

महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला. आजही महेश्वरच्या कणाकणात अहिल्याबाईंचा वास आहे हे सतत जाणवतं.

होळकर घरातल्या तिन्ही पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे अहिल्याबाईंना आता इंदूरला होळकर वाडय़ात राहणे नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी नवीन राजधानीचा शोध सुरू केला. नेमाडमध्ये नर्मदेच्या काठी पुराणात ज्याचे वर्णन मर्दाना या नावाने आले आहे. ते स्थान त्यांच्या पसंतीस उतरले. परंतु ज्योतिषी मंडळीचे म्हणणे पडले की, हे स्थान राजधानीसाठी योग्य नाही. त्या पुढे निघाल्या. नर्मदेकाठचे महेश्वर हे गाव पाहताच त्या हरखून गेल्या. नर्मदा नदीचे केवढे रुंद पात्र, दाट झाडी, भुईकोट किल्ला आणि मल्हारराव होळकरांनीच काही वर्षांपूर्वी महेश्वर वसविले होते. ज्योतिषी, ब्राह्मण इत्यादींना विचारणा करून त्यांनी तेच स्थान राजधानीसाठी सुनिश्चित केले.

प्राचीन साहित्यात महेश्वरचा उल्लेख माहिष्मती म्हणून आहे. रामायण, महाभारत, पुराणे, बौद्ध धर्मग्रंथ आणि सुप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनात सर्वत्र या नगरीचा उल्लेख होता. हरिवंशात म्हटले होते, महिष्मान नावाच्या राजाने या नगरीची उभारणी केली. पुराणातील प्रसिद्ध राजा सहस्रार्जुन याने ज्या अनुप देशावर राज्य केले, त्या अनुप देशाची राजधानी हीच होती. या नगरीस ‘सहस्रबाहू की वस्ती’ असेही संबोधले जात असे. वाल्मीकी रामायणात म्हटले होते की, लंकापती रावण सहस्रबाहुच्या राजधानीत आला असता त्याने आपल्या बाहुबळाने नर्मदेचा प्रवाह कोंडून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या बाहूतून निसटून नर्मदेचा प्रवाह सहस्रधारांनी बाहेर पडला आणि वाहू लागला. कालिदासाने रघुवंशात माहिष्मती व नर्मदा यांचा उल्लेख केला आहे. जगद्गुरू शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा विख्यात शास्त्रार्थ याच नगरीत झाला होता. मंडनमिश्रांची पत्नी या वादात न्यायाधीश होती. पौराणिक काळाप्रमाणे ऐतिहासिक काळात हे नगर महत्त्वाचे होते. सुप्रसिद्ध हैहय वंशी राजांचे राज्य येथेच होते. चालुक्य परंपरांच्या काळातही महेश्वर ही एक प्रसिद्ध नगरी होती. नंतर मांडूच्या सुलतानांनी ती जिंकून घेतली. इ.स. 1422 मध्ये ती गुजरातच्या सुलतान अहमदशहाने तत्कालीन हुशंगाबादकडून अर्थात आताचे नर्मदापुरम जिंकली. अकबराच्या काळातही महेश्वर हे एक प्रसिद्ध स्थान होते. यातील बराचसा इतिहास अहिल्याबाईंना माहिती होता.

इ.स. 1730 च्या सुमारास मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर आपल्या अधिपत्याखाली आणले. या नगरीचे महत्त्व जाणून मल्हाररावांनी 1745 मध्ये एक राजाज्ञा काढून महेश्वर नगरी उत्तम प्रकारे वसविण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करण्याची द्वाही फिरवली. महेश्वरची परंपरा अहिल्याबाईंच्या प्रकृतीला भावणारी होती. किंबहुना त्यांच्या अंतःप्रेरणेला या नगरीने साद घातली होती. शिवाय त्यांची राज्य कारभार करणारी व्यवहारी वस्तुनिष्ठ नजर त्यांना सांगत होती, येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. राज्य कारभारासाठी सुरक्षित. होळकरांच्या वारसाचा प्रश्न अजून निकालात निघालेला नव्हता. परंतु अहिल्याबाईंनी महेश्वर हे गाव स्वतःला राहण्यासाठी म्हणून निश्चित केले. किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्ल्याच्या आत एक साधाच वाडा बांधला गेला. मालेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वर किल्ल्याच्या आत राहू लागल्या. तेथून नर्मदेचे दर्शन स्पष्टपणे घडत होते. घरात राजदरबाराचीही जागा होती. येथेच प्रमुख कारभाऱयांसमवेत अहिल्याबाईंचा दरबार भरू लागला. त्या पांढऱया घोंगडीवर बसत असत. या घराच्या एका भागात एक मंदिर होते. त्यात शिवलिंगे होती. इतर देवदेवतांच्या मूर्तीही होत्या. याच ठिकाणी अहिल्याबाई नेहमी पूजा करत असत. अहिल्याबाई कायमच्या महेश्वर-निवासिनी झाल्या. मग मंदिरांच्या अंगणांतून होमहवनांचा पवित्र धूर भोवताली पसरू लागला. ग्रंथपठणाचे, मंत्रजागराचे गंभीर स्वर वातावरणात घुमू लागले. भजन-कीर्तनाचा आणि टाळ-मृदंगाचा घोष नर्मदेच्या तटावर सतत निनादत होता.

महेश्वरहून अहिल्याबाई राज्य कारभार पाहू लागल्या. होळकर म्हणजे शिंदे आणि पेशव्यांचे दोन नेत्रच असे म्हटले जात होते. अहिल्याबाई सत्तेवर आल्या तेव्हा, घरातील कुटुंबात जवळची रक्ताच्या नात्याची माणसे बोटांवर मोजण्याइतकीच होती. अहिल्याबाईंनी ज्या क्षणी महेश्वर दरबारात कार्य हाती घेतले त्यावेळी देवा-ब्राह्मणांसमक्ष पत्र ठेवले आणि मनोमनी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा महेश्वरच्या वाडय़ावर आजही लिहिलेली आहे.

“माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत जबाबदार आहे.
सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
परमेश्वराने ज्या जबाबदाऱया माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.”

महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला. आजही महेश्वरच्या कणाकणात अहिल्याबाईंचा वास आहे हे सतत जाणवतं. कितीदा अनुभवले महेश्वर, पण ही भावना मनात आजही कायम आहे. स्त्राr पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले आणि म्हणून समृद्ध अशी महेश्वरची नर्मदा आजही पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या अस्तित्वाची जाणीव करून देते आहे. एकदा तरी या स्थानाची ऊर्जा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासारखी आहे.

fadnavis.sarvesh@gmail.com

भटकंती – सह्याद्रीचा मुकुटमणी

सामना ऑनलाईन

>> जे. डी. पराडकर

देखण्या, राजबिंडय़ा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला प्रचितगड जणू सह्याद्रीचा मुकुटमणीच! महाराजांच्या गडकोट ऐश्वर्यातील हा हिरा गडवाटा धुंडाळणाऱयांसाठी तितकाच धाडसी अनुभव देणारा आहे.

प्रत्येक ऋतूमध्ये सह्याद्रीचे सौंदर्य वेगवेगळं दिसतं. अशा देखण्या, राजबिंडय़ा सह्याद्रीच्या कुशीत संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर, तिवरेघेरा या ऐतिहासिक गावात गेल्यानंतर आठवतो तो प्रचितगड! सह्याद्रीच्या उंच शिखरावर असल्याने तो सह्याद्रीचा मुकुटमणीच भासतो. या प्रचितगडाची वाट खूपच बिकट! ही वाट एवढी अवघड आहे की, छत्रपती संभाजी महाराज कसबा येथून वेळीच प्रचितगडावर पोहोचले असते तर शत्रूच्या हाती कधीही लागले नसते. याबरोबरच महाराष्ट्राचा इतिहासदेखील बदलला असता. स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट म्हणजे स्वराज्याचे ऐश्वर्य तर होतेच, शिवाय ढालीप्रमाणे संरक्षण करणारेदेखील होते. संगमरत्न फाऊंडेशनचे शिलेदार अल्पेश सोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचितगड परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करत आहेत ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे.

शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर तिवरेघेरामार्गे प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिह्याची हद्द लागते. सातारा जिह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. कंधार डोहाची छायाचित्रे व माहिती उपलब्ध असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात. प्रचितगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग शृंगारपूर, तिवरेघेरा येथून जातो. या मार्गावरून जाण्यासाठी साडेतीन तासांची उभ्या डोंगराची चढाई करावी लागते. या मार्गावरून जायचे म्हणजे ट्रेकिंगची सवय असायला हवी. दुसरा मार्ग निवळी, नेरदवाडी, मळेघाटमार्गे प्रचितगडावर जातो. याच मार्गावरून छत्रपती संभाजी महाराजांना दगाबाजीने पकडल्यानंतर नेण्यात आले होते. या मार्गावरून जाणे शृंगारपूर येथून जाणाऱया मार्गाच्या तुलनेत सुकर आहे. साधारण 1985 सालापर्यंत पाटण येथून हेडी म्हणजे गुरे विक्रेते संगमेश्वर तालुक्यातील आठवडा बाजारांमध्ये जनावरे विक्रीसाठी घेऊन येत.

पाटण, मळेघाटमार्गे नेरदवाडी, निवळी येथून संगमेश्वर येथे शेकडो जनावरे धूळ उडवत येत असत. प्रचितगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग राखीव वनक्षेत्रात येत असल्याने गडावर जायचे असेल तर वन विभागाची लिखित परवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी जाणाऱया इतिहासप्रेमींवर वन विभागाकडून कारवाई केली जाते. याबरोबरच सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे गडावर जाण्यासाठी मळलेली वाट नसल्याने सोबत वाटाडय़ा न्यावाच लागतो.

छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात भवानीदेवी प्रसन्न होती याची साक्ष प्रत्येक गडकिल्ल्यावर पटते. प्रचितगडावरदेखील खडक खोदून आत असलेले थंड पाण्याचे टाके आहेत. ऐन मे महिन्यातही इथे मुबलक पाणी असते. गडावरील गढी अर्धवट पडक्या स्थितीत आहे. गडाच्या दक्षिणेकडील भागात एक कोठार आहे. कोठाराचे छप्पर शिल्लक नसले तरी भिंती अर्धवट पडक्या स्थितीत आहेत. कोठारात किंवा कोठारसदृश या बांधकामात दिवा लावण्यासाठी छोटा कोनाडा केलेला दिसतो. कोठाराशेजारून वाट गडाच्या दक्षिणेकडील शेवटच्या टोकावर जाते. कोठारसदृश भागाजवळ आणि भवानी मंदिराजवळ बांधकामाची काही जोती दिसून येतात. गड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा वेगळा झालेला दिसतो. गडाला एकूण 18 बुरूज असल्याचा उल्लेख असून प्रत्यक्षात आज गडाचे 12 बुरूज अस्तित्वात आहेत. गडावर पडणाऱया प्रचंड पावसामुळे गडावरील अवशेष हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला दिसतो. सूर्यराव सुर्वे हे संगमेश्वर व शृंगारपूर या भागाचे आदिलशाहाचे सरदार होते. त्यांच्या अमलाखाली शृंगारपूर व प्रचितगड होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी एप्रिल 1661 मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्यावर स्वारी करून प्रचितगड जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड घेतल्याचे उल्लेख शिवभारत, जेधे शकावली व शिवचरित्र प्रदीप या ग्रंथांमधे येतात, परंतु सभासद बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रचितगडचे नाव येते. याचा अर्थ असा की, किल्ला महाराजांनी बांधला; परंतु काही काळ तो सुर्व्यांकडे होता व नंतर परत महाराजांनी तो घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात प्रचितगड हा स्वराज्यातच होता, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा मुक्काम प्रचितगडच्या पायथ्याशी असलेल्या शृंगारपूरमध्ये अनेक वेळा झालेला होता. किल्ल्यांवरील वास्तू व इतर अवशेष पाहून किल्ला कधीच मोगलांकडे किंवा मुस्लिम सत्ताधीशांकडे गेला नसावा. मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून घेतला (1818). किल्ला जिंकल्यावर तो पाडल्याचे उल्लेख येतात; परंतु किल्ला न पाडता किल्ल्यावर जाणारे रस्ते सुरुंग लावून उडविण्यात आले.

– jdparadkar@gmail.com

फिरस्ती – शीवचा दुर्ग! मुंबईचा 350 वर्षीय पुराणपुरुष

सामना ऑनलाईन

>> प्रांजल वाघ

1665 साली पोर्तुगीजांनी हुंडय़ात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील ‘परळ’ या बेटाचं उत्तर टोक म्हणजे ‘शीवचा दुर्ग’ – मुंबईच्या उत्तरी सीमेचा रक्षणकर्ता आणि एकमेव असा ‘गिरिदुर्ग’! ‘शीव’ म्हणजे सीमा किवा वेस! ‘सायन’ हा शीवचा पोर्तुगीज अपभ्रंश! पुढे 1733-39 असे दीर्घकालीन युद्ध करून चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचं नामोनिशाण उत्तर फिरांगाणातून मिटवून टाकलं. दीव-दमण ते आजचं वांद्रे-ठाणे-उरण इथपर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडल्या! इंग्रजांनी मराठय़ांच्या भीतीने मुंबईतील सर्व कोटांची डागडुजी करून ते मजबूत करून घेतले. त्यात शीवच्या दुर्गावर 32 सैनिक व त्यांचा एक म्होरक्या असे कायम केले.

सोळाव्या शतकात बिंबस्थान म्हणजे मुंबई आणि साष्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. थेट दीव-दमण ते चौलपर्यंत पोर्तुगीजांची क्रूर सत्ता या परिसरात थैमान घालू लागली. पुढे 1665 साली पोर्तुगीजांनी हुंडय़ात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील ‘परळ’ या बेटाचं उत्तर टोक म्हणजे ‘शीवचा दुर्ग’ – मुंबईच्या उत्तरी सीमेचा रक्षणकर्ता आणि एकमेव असा ‘गिरिदुर्ग’!

‘शीव’ म्हणजे सीमा किवा वेस! ‘सायन’ हा शीवचा पोर्तुगीज अपभ्रंश! पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीत ही टेकडी तटा-बुरुजांनी मजबूत करून घेतली होती, पण मुंबईचे पहिले गव्हर्नर – जेराल्ड ऑन्जियर यांनी खऱया अर्थाने हा किल्ला साधारण 1665-1671च्या आसपास बांधून काढला. जवळच एका टेकडीवर ‘रिवा’ नामक एकांडा बुरूज बांधून काढला गेला.

पुढे 1733-39 असे दीर्घकालीन युद्ध करून चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचं नामोनिशाण उत्तर फिरांगाणातून मिटवून टाकलं. दीव-दमण ते आजचं वांद्रे-ठाणे-उरण इथपर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडल्या! इंग्रजांनी मराठय़ांच्या भीतीने मुंबईतील सर्व कोटांची डागडुजी करून ते मजबूत करून घेतले. त्यात शीवच्या दुर्गावर 32 सैनिक व त्यांचा एक म्होरक्या असे कायम केले. किल्ला तोफांनी सज्ज केला गेला. किल्ल्यावर या सैनिकांची राहण्याची सोय, शौचालय, दारू कोथर इत्यादी वास्तू होत्या. त्यांचे अवशेष आजही दिसतात. किल्ल्यावर पाण्याची दोन बांधून काढलेली टाकीदेखील आढळतात. इथे आजही एक तोफ आहे.

पुढे पुढे जशी मराठी ताकद कमी होत गेली तसं इंग्रज हळूहळू खाडी ओलांडून मराठय़ांचा प्रदेश जिंकू लागले. 1818 मध्ये मराठेशाही खालसा झाल्यावर इंग्रजांना भारतात कोणी शत्रू उरलाच नाही आणि या किल्ल्याचं महत्त्व अस्तास जाऊ लागलं. भराव टाकून खाडी भरली, मुंबईच्या सीमा विस्तारल्या. मग विमाने आली, क्षेपणास्त्रs आली आणि किल्ले कालबाह्य होऊ लागले. मुंबईच्या झपाटय़ाने होणाऱया शहरीकरणात, भयंकर वेगवान जीवनात पैसा आणि प्रगतीच्या मागे हात धुऊन लागलेल्या माणसाने आपल्या फायद्यासाठी निसर्गाच्या आणि मानवतेच्या ऱहासाच्या साऱया सीमा पार केल्या तिथे या लहानग्या ‘शीव’च्या किल्ल्याची काय बात करता?

2025 सालचा पहिला सूर्योदय या किल्ल्यावरून पाहताना सहज म्हणून उत्तरेकडे नजर फेकली. प्रदूषणयुक्त धुके अर्धवट झोपेत असलेल्या मुंबईवर गोधडीसारखे पसरले होते. राहून राहून वाटत होते, जर 1739 मध्ये मराठय़ांनी खाडी ओलांडून इंग्रजांपासून मुंबई मुक्त केली असती तर आज देशाचा इतिहास वेगळा असता! पण इतिहासात ‘जर-तर’ला जागा नसते.

‘आय लव्ह यू’ खरडलेल्या भिंती, कोपऱयात एकमेकांच्या मिठीत हरवलेली प्रेमी युगुले, रील्स बनवण्यात खर्ची पडणारी पिढी माझे लक्ष वेधून घेत होती. इतिहासाबद्दल असलेली आस्था पाहून मन खिन्न झाले. गगनचुंबी इमारतींच्या वेढय़ात अडकलेल्या, कालबाह्य म्हणून निरुपयोगी ठरवून अडगळीत टाकलेल्या या 350 वर्षीय पुराणपुरुषाचा निरोप घेऊन मी नवीन वर्षात घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱया असंख्य मुंबईकरांच्या गर्दीत सामील झालो!

 pranjalwagh@gmail.com

पाऊलखुणा – शिवरीनारायण आणि खारोद

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य बराच काळ प्राचीन काळातील दंडकारण्य म्हणजेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात होते अशी इथल्या लोकांची ठाम समजूत आहे. त्यामुळेच येथील मंदिर रचना, स्थापत्यामध्ये रामायणाचे संदर्भ प्रामुख्याने आढळतात. जांजगिर चंपा जिल्ह्यातील शिवरीनारायण संगम, नर नारायण मंदिर, खारोद येथील लक्ष्मेश्वर मंदिर, मठमंदिरे प्राचीन संस्कृतीची साक्ष देतात.

छत्तीसगडचा दक्षिण भाग हा प्राचीन काळापासून दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य बराच काळ याच भागात होते अशी इथल्या लोकांची ठाम समजूत आहे. श्रीराम ज्या मार्गाने चालत जाऊन पुढे दक्षिणेला किष्किंधा नगरीला गेले त्या मार्गाला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्तीसगड सरकारने ‘श्रीराम-वन-गमन-मार्ग’ अशा नावाने हा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करायचे ठरवले आहे. या भागात हिंडताना आपल्याला अगदी हमरस्त्यावरसुद्धा असे लिहिलेल्या पाटय़ा बघायला मिळतात. रामायणातील प्रभू श्रीराम आणि शबरी यांची कथा सर्वांनाच माहिती असते. ती शबरीसुद्धा इथलीच असल्याचे इथे सांगतात. शबरीचे एक लहान मंदिरसुद्धा इथे आहे. आज जे आपण शिवरीनारायण ठिकाण बघणार आहोत त्याचे मूळ नाव ‘शबरी नारायण’ असल्याचे सांगितले जाते.

जांजगिर चंपा जिह्यात शिवरीनारायण हे एक विष्णूक्षेत्र आहे. तिथे महानदी आणि शिवनाथ या नद्यांचा संगम होतो व पुढे काही अंतर गेल्यावर त्यांना जोंक नावाची नदी येऊन मिळते. या जोंक नदीच्या संगमावर शबरीचे एक मंदिर आहे. शबरी याच ठिकाणी राहायची अशीही लोकांची दृढ समजूत. इतिहास आणि लोककथा यांचा संगम असलेले शिवरीनारायण हे विष्णू संप्रदायाचे महत्त्वाचे ठिकाण. साहजिकच इथे असलेली सगळी मंदिरे एक अपवाद वगळता विष्णूची आहेत. त्यातले प्राचीन आणि शिल्पसमृद्ध मंदिर म्हणजे ‘नरनारायण मंदिर.’ हे मंदिर जवळ जवळ पाचशे वर्षे जुने आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडपात डावीकडे गरुडारूढ विष्णू-लक्ष्मीचे नितांत सुंदर शिल्प आपले लक्ष वेधून घेते. शिल्पाच्या बाजूने विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. गाभाऱयात एकाशेजारी एक अशा दोन मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या वस्त्रांनी झाकलेल्या असतात. त्यातली एक नराची आणि दुसरी नारायणाची आहे. नारायणाची मूर्ती इथे झालेल्या उत्खननात सापडली. इथले पुजारी या मूर्तींना राम आणि लक्ष्मणाची मूर्ती असे संबोधतात. तसेच गाभाऱयाची द्वारशाखा खूप सुंदर आहे. नरनारायण मंदिराच्या शेजारी ‘केशव नारायण मंदिर’ आहे. याच्या दरवाज्याच्या ललाटबिंबावर विश्वकर्म्याची मूर्ती कोरली आहे. देवांचा स्थपती असलेला हा महत्त्वाचा देव. इथल्या द्वारशाखेवर विष्णूच्या विविध विभवांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या हातातल्या आयुधांचा क्रम बदललेला लक्षात येतो. विष्णूच्या मुख्य मूर्तीच्या पायाशी एक लहान स्त्राr प्रतिमा आहे. ती अर्थातच लक्ष्मी असते. मात्र स्थानिक लोक तिला शबरी असे म्हणतात.

खारोद ः शिवरीनारायणपासून फक्त 3 किमीवर खारोद आहे. या गावाचे संदर्भ थेट रामायणाशी जोडलेले आहेत. रामायणात रावणाचे दोन राक्षस होते त्यांची नावे ‘खर’ आणि ‘दूषण.’ त्या खर आणि दूषणांनी या ठिकाणी रामाशी युद्ध केले म्हणून या गावाचे नाव खारोद असे पडले. ते नेमके युद्ध कुठे झाले त्याची खूण म्हणून एक झाडसुद्धा दाखवतात. शिवरीनारायण हे विष्णूक्षेत्र आहे, तर खारोद हे शिवक्षेत्र. शिवाशी संबंधित इथे विविध मंदिरे आहेत. एके ठिकाणी शिवाला ‘दुल्हादेव’ असे संबोधून त्याचे मंदिर बांधले आहे. या ठिकाणी तरुण मुलींनी येऊन शिवाची उपासना केली की, त्यांना उत्तम वर प्राप्त होतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.

इथले सर्वात प्राचीन मंदिर आहे लक्ष्मेश्वराचे. इ.स.च्या 7 व्या शतकात हे मंदिर बांधले. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे इ.स.च्या 12 व्या शतकातला कलचुरींचा एक शिलालेख या मंदिरावर आहे. या शिलालेखात कलचुरींची वंशावळ दिलेली आहे. गाभाऱयात असलेल्या शिवलिंगाला एक लाख पंचवीस हजार छिद्र असल्याचे सांगितले जाते. याचा संबंध रामायणाशी जोडलेला आहे. रामायणात लक्ष्मणाला शाप मिळाल्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला. त्याने एक लक्ष पंचवीस हजार शिवलिंगे तयार करून ती शिवाला अर्पण केल्यावर त्याची या शापातून मुक्तता झाली. हाच धागा पकडून इथे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला तेवढय़ा संख्येचे भाताचे दाणे अर्पण केले जातात. त्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा.

इथे शबरीच्या नावाचे एक मंदिर आहे. या मंदिराचे शिखरसुद्धा अस्तित्वात आहे. मंदिराच्या गाभाऱयाच्या दारावर गंगा, यमुना नसून शालभंजिका कोरलेल्या आहेत. खरं तर शालभंजिका या मंदिराच्या बाह्यांगावर सजावटीसाठी कोरलेल्या असतात. मात्र या ठिकाणी त्यांना द्वारशाखेवर स्थान दिलेले दिसते.

खारोद इथे 126 तलाव असल्याच्या नोंदी आहेत. सगळे छत्तीसगड राज्यच मुळी तळ्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. खारोद हे त्यातलेच एक ठिकाण. खारोदला तिवारीपारा नावाचा एक भाग आहे तिथे बोरांचा बगीचा आहे. आजही तिथली बोरे खूप गोड असतात. रामायण-शबरी-तिची बोरे आणि खारोद यांचा हा परस्पर संबंध, अशा काही गोष्टी बघितल्या की प्रकर्षाने जाणवतो. खरं तर सगळा छत्तीसगड प्रदेश या अशा विविध सुंदर कथांनी भरलेला आहे. इथली मंदिरे, इथली ठिकाणे आणि त्यांचा प्रभू श्रीरामचंद्रांशी असलेला संबंध बघितला की, आपल्या प्रवासाला साहजिकच एक धार्मिक किनार प्राप्त झाल्याचे वाटते. आपण अक्षरश मंत्रमुग्ध होऊन जातो. हजारो वर्षे मागे जातो. इथली भोळी माणसे, त्यांची श्रीरामावर असलेली अपार श्रद्धा आणि त्यांनी आजही विविध कथांमधून जपलेली आपली संस्कृती बघितली की अतीव समाधान वाटते. हा प्रदेश अशा अनेक रमणीय कथांनी आणि ठिकाणांनी भरलेला आहे. याचे मनमुराद दर्शन घेणे आणि त्या कथेत आपणही रमून जाणे यामुळे आपली भटकंती अजून समृद्ध होते.

 ashutosh.treks@gmail.com
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)

पाऊलखुणा – कदंबांचं रायपट्टण आणि मराठी पशुपालक

सामना ऑनलाईन

>> प्रणव पाटील

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून आलेल्या धनगरांनी रायपट्टण परत वसवलं आहे. इतिहासकाळात या प्रदेशावर बनवासीच्या कदंब राजाची सत्ता होती. या कदंब राजाची राहायची जागा दांडेलीत जिथे होती तिथे एक नगर उभं राहिलं. त्या नगराला रायपट्टण म्हणजे राजाची नगरी असं नाव पडलं. इतिहासात कदंब हरवलं तसं काळाबरोबर रायपट्टणही लुप्त झालं.

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिह्यात दांडेलीचं घनदाट अरण्य आहे. या प्रदेशाला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. हळियाळ या तालुक्याच्या ठिकाणावरून आम्हाला दांडेलीतल्या सिद्दी आदिवासींच्या पाडय़ावर जायचं होतं. हळियाळ शहरात आपल्याला बाजारात, बसमध्ये बहुतांश लोक मराठीत बोलताना दिसतात. परंतु सगळे फलक मात्र कानडीत दिसतात. दांडेलीतही कन्नड बरोबरीनेच मराठी आणि कोकणी भाषा बोलली जाते असं वाचलं होतं. दांडेलीच्या जंगलात शिरताच रस्त्यावर कोह्याचं दर्शन झालं. रस्त्यात आम्हाला मिन्गेल सिद्दी हा तरुण कार्यकर्ता भेटला. गप्पांच्या ओघात मिन्गेल म्हणाला, काही वर्षांपूर्वी तुमच्या महाराष्ट्रातून आलेल्या धनगरांनी इथे रायपट्टण परत वसवलं आहे. इतिहासकाळात या प्रदेशावर बनवासीच्या कदंब राजाची सत्ता होती. या कदंब राजाची राहायची जागा दांडेलीत जिथे होती तिथे एक नगर उभं राहिलं. त्या नगराला रायपट्टण म्हणजे राजाची नगरी असं नाव पडलं. इतिहासात कदंब हरवलं तसं काळाबरोबर रायपट्टणही लुप्त झालं.

भूतकाळाच्या पटलावरून रायपट्टण या गावाला पुन्हा भेट द्यायचं ठरवलं. गर्द जंगलातून मध्येच उघडय़ावर असलेलं रायपट्टण गाव लागलं. अतिशय आखीव-रेखीव असणारं ते गाव डंगे धनगरांनी काही दशकांपूर्वीच वसवलेलं होतं. हे डंगे धनगर म्हणजे सह्याद्रीच्या खोऱयात दुर्गम जागी डोंगरात राहणारे पशुपालक. डोंगरी धनगरांच्या घरांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या घरांना कुंपण घातलेलं नसतं. परंतु रायपट्टणमध्ये जागोजागी बांबूच्या तट्टय़ांनी सुरेख कुंपण घातलेलं होतं. रानटी प्राण्यांचा वावर आजूबाजूलाच असल्यामुळे ही योजना केली होती. थंडीच्या दिवसांत हत्ती स्थलांतरित होताना या प्रदेशात धूमाकूळ घालतात. इथल्या पट्टेरी वाघाचा संचार दांडेली ते साताऱ्यातल्या चांदोलीच्या जंगलापर्यंत असतो.

या धनगरांच्या घरांचं वैशिष्टय़ म्हणजे स्थानिक गावांमध्ये दिसतात त्याप्रमाणे न भाजलेल्या विटांची घरं. त्या पिवळसर राखाडी विटांची सुरेख बांधणी जागोजागी दिसत होती. दुसरं वैशिष्टय़ म्हणजे या धनगरांच्या घराच्या पडवीत गुरांचा गोठा नसून तो घराशेजारी स्वतंत्रपणे दगडमातीत बांधलेला दिसतो. या भल्यामोठय़ा गोठय़ांची रचना रानटी प्राण्यांमुळे बंदिस्त असते. या प्रदेशात पाऊस असतो. त्यामुळे साधारण तीन फुटी उंचीच्या चौथऱ्यावर घर बांधलं जातं. या घरांना स्थानिक नक्षीच्या रेखीव चौकटी, दरवाजे आणि खिडक्या असतात. या धनगरांचा गायी आणि म्हशी पाळणे हा मुख्य व्यवसाय असला तरी भात शेती या भागात होते.

रायपट्टणमध्ये बहुतेक साताऱयाच्या पाटण खोऱयातून आलेल्या धनगरांची वस्ती आहे, ज्यात शिंदे, येडगे, फोंडे, झोरे, लांबोटे, गावडे इत्यादी आडनावांच्या पंचाहत्तर कुटुंबांची घरं आहेत. त्याशिवाय दहा-बारा सिद्दी आदिवासी राहतात. गावाच्या प्रमुखाला गावडे म्हणतात. रायपट्टणमध्ये पंढरमिसे आडनावाच्या कुटुंबाकडे ही गावडकी अर्थात पाटीलकी होती. गावात दसऱ्याला हे धनगर त्यांचा वैशिष्टय़पूर्ण पांढरा पोशाख, पागोटं, पायात चाळ आणि तलवार घेऊन नृत्य करतात. पंढरपूरचा विठोबाला ते आपला पूर्वज आणि कुलदेव मानतात.

गावातील लोकांनी कदंब राजवटीविषयी सांगितलं की, जंगलात जागोजागी पडलेली मंदिरं आहेत, अनेक ठिकाणी खंडित मूर्ती दिसतात, काही ठिकाणी दगडाचे ढीग आहेत तिथे राजचा राजवाडा होता असं म्हणतात. या परिसरात मृत सैनिकांची स्मारक शिल्पं असणारे वीरगळ जंगलात आहेत. अनेक ठिकाणी माणसाच्या उंचीची शिल्पं पडून आहेत. गावातच एक फेरफटका मारून संध्याकाळी गुरांना घेऊन घरी चाललेल्या धनगरांना भेटून आम्ही निघालो. शेकडो वर्षे लुप्त झालेलं रायपट्टण पुन्हा गजबजलं होतं आणि इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.

pranavpatil26495@gmail.com

पाऊलखुणा – वाराणसीतील जंतरमंतर

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट

वाराणसी ही केवळ एक नगरी नाही, तर ती भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. येथे धर्म आणि तत्त्वज्ञान, कला आणि संगीत, साहित्य आणि खगोलशास्त्र यांचा अद्वितीय संगम आहे. ही नगरी मृत्यूतूनही मोक्षाचा संदेश देणारी, जीवनाच्या अस्थिरतेतून शाश्वत सत्याचे भान देणारी, म्हणूनच वाराणसीला `भारताचा आत्मा’ म्हणतात.

भारतातील सात मोक्षपुरी समजल्या गेल्या आहेत त्यातले वाराणसीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देवाधिदेव महादेव इथे विश्वनाथाच्या रूपात वसलेले आहेत, तर माता पार्वती प्रत्यक्ष अन्नपूर्णेच्या रूपात इथे असून तिचा वरदहस्त या नगरीवर राहिलेला आहे. वाराणसी धार्मिक शक्तिकेंद्र अस}s तरी खगोलशास्त्र, त्याचे अभ्यासक आणि त्यांनी तयार केलेली उपकरणे हीसुद्धा वाराणसीची खासियत आहे. भारतातील सांस्कृतिक इतिहासात खगोलशास्त्र आणि गणित या शास्त्रांना एक विशेष स्थान आहे. वेदकाळापासून ते आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त यांसारख्या महान गणितज्ञ-खगोलज्ञांपर्यंत भारताने जगाला अनेक मौलिक संकल्पना दिल्या. ग्रह-नक्षत्रांचे गणन, ग्रहणांची भाकिते, पंचांग निर्मिती, कालमापन यांमध्ये भारतीय खगोलशास्त्राचा गौरवशाली वारसा आहे. या परंपरेचा परिपाक म्हणूनच अठराव्या शतकात जयपूरचे शासक महाराजा जयसिंग द्वितीय यांनी अद्वितीय खगोलशास्त्राrय वेधशाळा उभारल्या.

सन 1724 ते 1737 या कालावधीत त्यांनी पाच महत्त्वाच्या वेधशाळा बांधल्या. त्या जयपूर, दिल्ली, मथुरा, उज्जैन आणि वाराणसी येथे उभारल्या गेल्या. या वेधशाळा आज `जंतरमंतर’ म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी प्रचंड आकारमानाची भौमितिक साधने, सूर्यघटिका, भिंतींवर कोरलेले चाप, भूमितीय यंत्रे अशा स्वरूपाची संरचना बांधली गेली. त्या काळात दुर्बिणी किंवा सूक्ष्म यंत्रे भारतात सहज उपलब्ध नसल्याने जयसिंग यांनी प्रचंड आकारमानाची स्थिर वास्तू स्वरूपातील उपकरणे तयार करून ग्रह-नक्षत्रांचे स्थान, उंची, कोन इत्यादींची अचूक मोजणी साध्य केली. या यंत्रांच्या सहाय्याने ग्रहणांचे गणित, पंचांग निर्मिती, ऋतुपा यांचा अभ्यास अधिक अचूकतेने करता आला. यामध्ये वाराणसीतील वेधशाळेचा इतिहास वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा ठरतो. वाराणसी ही प्राचीन काळापासून खगोलशास्त्र व गणित यांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. काशीतील पंडित, वेदशाळा आणि शास्त्रचर्चा यामुळे येथे खगोलज्ञानाची अखंड परंपरा होती. त्यामुळे जयसिंग यांनी वाराणसी येथे वेधशाळा बांधणे स्वाभाविक होते. अधिकृत नोंदीनुसार ही वेधशाळा 1737 च्या सुमारास पूर्ण झाली.

वाराणसीतील प्रसिद्ध अशा दशाश्वमेध घाटाजवळ असलेल्या मनमंदिर घाटावर अशाच एका खगोलशास्त्राrय जंतरमंतरची निर्मिती केलेली दिसते. गंगेच्या काठी मनमंदिर घाटावर पूर्वाश्रमीच्या एका हवेलीच्या छतावर जयसिंगाने आपली ही वेधशाळा उभारली आहे. सम्राट यंत्र, पायंत्र, नाडी वलय यंत्र ज्यांच्या सहाय्याने आपल्याला रात्रीच्या आकाशातील नक्षत्र, तारे आणि ग्रहगोलांचे वेध, निरीक्षणे करता येतात अशी काही उपकरणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यातील सम्राट यंत्र हे एक वैशिष्टय़पूर्ण यंत्र आहे, ज्याच्या सहाय्याने आपण दिवसा सूर्याच्या सावलीचा उपयोग करून अचूक स्थानिक वेळ सांगू शकतो. खरे तर हे यंत्र म्हणजे एक मोठे सूर्याच्या सावलीचे घडय़ाळ आहे (एल्ह अत्). या सम्राट यंत्राच्या सहाय्याने आपल्याला अचूक स्थानिक वेळ मोजता येते.

सम्राट यंत्र या उपकरणात एक मोठा काटकोन त्रिकोणी आकाराचा उहदस्aस् असतो. याच्या हायपोटेनियस म्हणजे कर्णाची बाजू आपण ज्या ठिकाणाहून बघतो, त्या ठिकाणच्या अक्षांशाइतकी कललेली असते. ( The gnoman’s inclination equal to the latitude of the observer’s place ) याचाच दुसरा अर्थ असा की, हा Gnoman रात्रीच्या आकाशातील त्या ठिकाणच्या ध्रुव ताऱयाकडे निर्देश करतो. तो थेट आपल्याला उत्तर दिशा दाखवतो. या Gnoman च्या डाव्या आणि उजव्या हाताला पूर्व व पश्चिम दिशेत दोन अर्ध वर्तुळाकृती ण्aत्ग्ंratाd प्aत्न पाहायला मिळतात. सूर्य ज्या वेळी पूर्वेला उगवतो तेव्हा त्याची सावली पश्चिमेकडील या अर्ध वर्तुळाच्या एका भागावर पडते. सूर्य माध्यानानंतर पश्चिमेला झुकला की, त्याची सावली पूर्वेकडील अर्धवर्तुळाच्या भागावर पडते. या दोन्ही भागांवर वेळेचे आकडे नोंदवलेले असतात.

सूर्याची सावली या अर्धवर्तुळाच्या एका भागावर पडल्यानंतर त्यावरील जी वेळ आपल्याला मिळते ती स्थानिक वेळ असते. त्यात स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेतील त्या स्थानासाठीचा फरक मिळवल्यानंतर आपल्याला अचूक भारतीय प्रमाण वेळ (घ्एऊ) म्हणजेच आपल्या घडय़ाळात किती वाजले आहेत ते कळते. काय अद्भुत आहे ना हे सर्व? खगोलीय निरीक्षणाची ही राजा जयसिंगाची उपकरणे, वेधशाळा त्या वेळच्या प्रगत खगोलीय निरीक्षणातील भारताच्या योगदानाचे महत्त्व आणि महात्म्य सांगतात हे नक्की. वाराणसी येथे भेट देणारे फार कमी पर्यटक दुर्दैवाने आपल्या या ऐतिहासिक खगोलीय वारसा स्थळाला भेट देतात.

ही सगळी वास्तू भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्तम राखली आहे. तिथे वाराणसीची ओळख सांगणारी म्युरल्स, चित्रे काढलेली आहेत. वाराणसीवर आधारित सुंदर अशी 10 मिनिटांची फिल्म दाखवली जाते. तसेच हवेलीतील एका मोठय़ा दालनात भगीरथाने स्वर्गातून आणलेली गंगा या विषयावर आधारित दाखवला जाणारा लेझर शो डोळ्यांचे पारणे फेडतो.

(प्रकाशचित्रे आणि तांत्रिक माहिती : पराग लिमये)
(लेखक लोकसंगिताचे अभ्यासक आहेत)

बॅग पॅकर्स – नयनरम्य बियास कुंड

सामना ऑनलाईन

>> चैताली कानिटकर , chaitalikanitkar1230@gmail.com

बियास कुंड ट्रेक हा मनालीजवळील एक अतिशय निसर्गरम्य आणि रोमांचक ट्रेक. मनालीतून वाहणाऱया बियास नदीच्या उगम स्थानापर्यंत घेऊन जाणारा हा ट्रेक अतिशय सुंदर व नवशिक्यांसाठी सर्वोत्तम असा आहे.

वेदवाङ्मयात विपाट या नावाने ओळखली जाणारी आपल्याला परिचित असणारी बियास नदी! बियास कुंड ट्रेक हा मनालीजवळील एक अतिशय निसर्गरम्य आणि रोमांचक ट्रेक. मनालीतून वाहणाऱया बियास नदीच्या उगम स्थानापर्यंत आपल्याला घेऊन जाणारा बियास कुंड ट्रेक अतिशय सुंदर व नवशिक्यांसाठी सर्वोत्तम आहे. बियास कुंड ट्रेक 3700 मीटर उंचीवर असलेल्या बियास नदीच्या उगमस्थानाकडे आणि तिच्या सभोवतालच्या अनेक प्राचीन हिमनद्यांकडे घेऊन जातो. बियास कुंड या सुंदर तलावाशी स्थानिक आख्यायिका देखील जोडली गेली आहे. असे मानले जाते की, महाभारत लिहिणारे ऋषी महर्षी व्यास येथे नियमितपणे स्नान करायचे आणि म्हणूनच या तलावाचे नाव बियास कुंड आहे. या ट्रेकच्या वाटेत धबधबे आणि बियास कुंड नावाचा स्फटिकासारखा स्वच्छ तलाव आहे. बियास कुंडकडे जाणारा मार्ग सोलांग नाल्याजवळून सुरू होतो. सोलांग नाल्यापासून धुंडीपर्यंत एक जीप रस्ता जातो जिथे एसएएसई, मनाली येथे एक अभ्यास युनिट आहे.

पीर पंजाल पर्वतरांगांनी वेढलेल्या या ट्रेकची उंची 12200 फूट आहे. ट्रेक फक्त चार दिवसांचा असून सोपा ते मध्यम पातळीत येतो. बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनने यायचे असेल तर जवळील स्टेशन चंदिगढ आहे तर विमानानं यायचे असल्यास जवळचे विमानतळ भुंतर आहे. कोणत्याही ट्रेकिंग कंपनीसोबत जाताना मनालीत रिपोर्टिंग करावे लागते व मग ट्रेकिंगला सुरवात होते. मनाली ते धुंडी ड्राइव्ह आहे व नंतर तीन तास पालछनी थाचपर्यंत चालावे लागते. पुढील दिवसांत पालछनी थाच ते लोहाली हा 3-4 तासांचा ट्रेक करता येतो.

लोहालीकडे जाताना बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेले एक सुंदर उंच कुरण लागते. हे उंचावरील कुरण आहे. तिथे पोहोचण्यासाठी 2-3 तासांचा प्रवास करावा लागतो. हा मार्ग शंकूच्या आकाराच्या झाडांमधून अल्पाइन कुरणांपर्यंत जातो. हा मार्ग मध्यम असून त्या दरम्यान काही चढाई देखील कराव्या लागतात. आपण बकर गवतावर पोहोचताच बर्फाच्छादित शिखरे, खडकाळ पर्वत, हिमनद्या आणि मोरेन दिसतात. या पर्वतरांगेत केलेल्या सर्व मोहिमा आणि ट्रेकिंगसाठी बकर गवत हा एक महत्त्वाचा तळ आहे. या ट्रेकचा पुढचा थांबा म्हणजे बियास कुंड, जो मोठय़ा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला एक पवित्र तलाव आहे.

लोहालीहून, हा मार्ग लेडी लेग म्हणून ओळखल्या जाणाऱया एका उंच भागातून जातो व बियास कुंडच्या शिखरावर पोहचवतो. हा दिवस आपल्या ट्रेकिंगच्या आधीचा फिटनेस तपासतो कारण ट्रेक करत करत आपण 12200 फुटावर पोहोचतो. इथे पोहोचल्यानंतर बियास कुंडचे अंतकरणात साठवून ठेवावे इतके विहंगम रूप दिसते. यानंतर रात्री कॅम्प करताना आकाश दर्शनाचा आनंदही घेता येतो.

हा ट्रेक एप्रिल ते ऑक्टोबर या काळात कधीही करता येतो. अगदी एप्रिल, मे, जून मध्येही हा ट्रेक नयनरम्य ठरतो. जुलै, ऑगस्टमध्ये हिरव्या कुरणांसोबत अनेकविध रंगांची फुलेही ट्रेकच्या वाटेवर उमललेली दिसतात. ट्रेकच्या महिनाभर आधी रोज 35 मिनिटांत पाच किलोमीटर धावण्याचा सराव असेल तर नक्कीच ट्रेक करताना न थकता सर्व ट्रेकिंगची मजा अनुभवता येईल.

कमी दिवसांचा हा ट्रेक प्राथमिक पातळीवरील असल्याने नवशिक्यांसाठी उत्तम आहे यात शंकाच नाही.

पाऊलखुणा – श्रीरामांच्या मूळ मूर्ती : कालेराम मंदिर

सामना ऑनलाईन

>> आशुतोष बापट , ashutosh.treks@gmail.com

अयोध्येच्या मध्यभागात असलेल्या स्वर्गद्वार इथे असलेले रामाच्या मूळ मूर्ती असलेले हे मंदिर अयोध्या भेटीत अवश्य बघायला हवे.

इ.स.च्या 12 व्या शतकात अयोध्येमध्ये बांधलेले रामलल्लाचे मंदिर पाडण्यासाठी सन 1528 मध्ये बाबर आला. त्याने राममंदिर पाडण्याचा हुकूम त्याचा सेवक मीर बकी याला दिला. त्या वेळी रामाच्या मूर्ती शामानंद सरस्वती या पुजाऱयांनी नदीच्या डोहात विसर्जित केल्या. चार पुजारी गाभाऱयाच्या बाहेर पहारा देत उभे राहिले. ते चारही पुजारी मारले गेले. या मूर्ती 1528 ते 1749 पर्यंत डोहात होत्या. सन 1749 ला नरसिंहराव मोघे या सत्पुरुषांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी त्या मूर्ती डोहातून बाहेर काढल्या व आज असलेल्या कालेराम मंदिरात प्रस्थापित केल्या.

हे एक राम पंचायतन आहे. श्रीराम, सीतामाता, चार भाऊ आणि पायाशी हनुमान अशा या मूर्ती. प्रभू राम इथे बद्धपद्मासनात बसले असून त्यांच्या डाव्या मांडीवर सीता आहे. पायाशी श्रीयंत्र असून शेजारी हनुमान आहेत. मढीकर, आंबेकर यांनी हे मंदिर सांभाळले. मढीकर यांनी हे देऊळ बांधले. तत्कालीन इंग्रज अधिकारी या देवळात येत असत. देवळाच्या मागे लोक कचरा करत म्हणून देवळाच्या मागची बाजूसुद्धा इंग्रज अधिकाऱयांनी देवस्थानला देऊन टाकली. रामजन्माचा उत्सव त्याकाळी 50 रुपयांत होत असे. दरवर्षी वाण्याकडून उधारीवर सामान घ्यायचे आणि उत्सव करायचा. वर्षभर वाण्याचे कर्ज फेडण्यात जायचे. उत्सवाच्या वेळी पुन्हा कर्ज. एके वर्षी वाण्याने उधारीवर वस्तू देण्यास नकार दिला. व्यवस्थापक आंबेकरांनी देवाला ही व्यथा सांगितली. पैसे उभे नाही झाले तर देवळाला कुलूप लावून किल्ली शरयूमध्ये टाकून द्यायची आणि आपण अयोध्या सोडून निघून जायचे ठरवले.

त्याच दिवशी एक बाई देवळात आल्या. घरी भांडण झाल्यामुळे आपल्या जवळ असलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन वडिलांचा सल्ला घेऊन त्या देवळात राहायला आल्या. त्या बाईंनी आपल्या जवळचे 1200 रुपये आणि दोन सोन्याच्या बांगडय़ा रामाच्या सेवेत अर्पण केल्या. त्यावेळेपासून आजतागायत अव्याहत उत्सव सुरू आहे. आता या उत्सवाला 10 लाख रुपये खर्च होतो. अयोध्येतील रामाच्या मूळ मूर्ती असलेल्या या कालेराम मंदिराची व्यवस्था देशपांडे नामक मराठी गृहस्थ बघतात. अयोध्येतील स्वर्गद्वार भागात नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे हे मंदिर आहे. प्रशस्त असे हे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात 15 कोटी रामनामाचा जप लिहिलेले कागद आहेत. त्या खोलीत आजही अनेक जण रामनामाचा जप लिहीत बसलेले असतात. संत श्री गोंदवलेकर महाराज या मंदिरात तीन वेळा चातुर्मासात राहून गेले आहेत. त्यांच्या मातोश्री त्यांना दरवेळी अयोध्येला नेण्यासाठी आग्रह करीत असत, पण महाराज अजून वेळ आली नाही असे सांगून मातोश्रींना घेऊन येत नव्हते. मात्र एके वर्षी गोंदवलेकर महाराज आपल्या आईला अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी घेऊन आले. श्रीरामाच्या दर्शनानंतर त्या माऊलीने याच कालेराम मंदिरात आपला देह ठेवला अशीही या मंदिराची महती आहे.

इथले अजून एक वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेली मारुतीरायाची मूर्ती दक्षिणाभिमुख असून ती स्त्राr रूपातली आहे. त्याची कथा अशी की, अहिरावणाने राम-लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना देवीला बळी देण्यासाठी तयार केले. हनुमंताला हे समजल्यावर तो पाताळात गेला आणि त्याने त्या देवीच्या मूर्तीत प्रवेश केला. अहिरावणाने या बंधूंना समोर आणल्यावर देवीच्या रूपातील मारुतीने श्रीरामांना शेवटची इच्छा विचारली. प्रभू रामांनी आपला भक्त हनुमंताला भेटायची इच्छा प्रकट केली. हनुमंत ही इच्छा ऐकून गहिवरले. इतक्या अवघड प्रसंगीसुद्धा श्रीरामांना आपली आठवण व्हावी हे समजल्याने हनुमंताला धन्य वाटले. त्याने त्याच देवीच्या रूपात अहिरावणाला आपल्या पायाखाली दाबून ठार केले आणि राम-लक्ष्मणांना घेऊन तो पृथ्वीवर आला. या देवीच्या रूपातील अशी ही मारुतीची मूर्ती इथे कालेराम मंदिरात बघायला मिळते.

या मंदिरात भाविकांची राहण्याचीसुद्धा सोय होते. पूर्वापार अनेक मराठी मंडळी अयोध्येला आली की, या मंदिरात राहत आले आहेत. अयोध्येच्या मध्यभागात असलेल्या स्वर्गद्वार इथे असलेले रामाच्या मूळ मूर्ती असलेले हे मंदिर अयोध्या भेटीत अवश्य बघायला हवे. श्री गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही जागा अतिशय प्रसन्न आणि सात्त्विक भाव जागृत करणारी आहे. त्यांचे स्मरण करताना आपणही रामनामाचा काही जप करावा. शक्य असेल तर लिहून काढावा. अयोध्येतली इतकी आगळीवेगळी अशी ही वास्तू ज्याचा मराठी माणसांशी जवळचा संबंध आहे ती वेळ काढून बघितली पाहिजे. शक्य असेल तर इथे मुक्काम करावा. अन्यथा किमान तिथे जाऊन रामरायाच्या मूळ रूपाचे दर्शन तरी अवश्य घ्यावे.

वेधक – चकाकणारं हुपरी

सामना ऑनलाईन

>> वर्णिका काकडे

कोल्हापूर ही करवीरनगरी आदिशक्ती महालक्ष्मीचे अधिष्ठान. दैवी माहात्म्य लाभलेल्या या शहराची ओळख असलेला दागिना म्हणजे कोल्हापुरी साज आणि ठुशी. दागिन्यांचा हा वारसा चांदीच्या कलाकुसर केलेल्या दागिन्यांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहरालगत असलेला हुपरी परिसरचांदीचे गावकिंवारजत नगरीम्हणून ओळखले जातो. या गावातल्या घरोघरी चांदीचे दागिने घडविले जातात. या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागे मोठा इतिहास आहे

इसवी सन 1300 पासून इथे चांदीच्या दागिने घडविण्याचा इतिहास असल्याचे पुरावे सापडले आहेत. तेव्हाचे देवगीरीचे राजे श्री रामचंद्रराव यादव याच काळात कर्नाटकातील विजापूरहून महाराष्ट्रतील कोकण भागात व्यापारासाठी जायचे. प्रवासादरम्यान विसावा म्हणून हुपरीत त्यांचा मुक्काम असायचा. त्या काळात इथले कारागीर हत्ती-घोडे यांना घालण्यासाठी दागिने तयार करत असत. इसवी सन 1800 मध्ये निपाणीकर देसाई यांनी हल्ला करुन हुपरी गाव किल्ल्यासह ताब्यात घेतले. पुढे कोल्हापूरच्या छत्रपतींनी हे गाव काबीज केले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थान काळापासून इथे बदल होत गेले. या गावाला चांदीची नगरी म्हणून ओळख मिळण्यामागेसुद्धा मोठा इतिहास आहे. शाहू महाराज फिरण्यासाठी आणि शिकारीसाठी हुपरीत यायचे. तेव्हा त्यांच्या घोडय़ाचा दागिना खराब झाला व हुपरीतील कृष्णाजी पोतदारांनी त्याची दुरुस्ती करुन दिली.

हुपरीत तयार केलेले चांदीचे दागिने त्यावरील हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे एकाच प्रकारचे काम पिढय़ानपिढय़ा करणारी कुटुंबे आहेत. कौशल्यांना अनुसरून कामे इथल्या आजुबाजुच्या गावांमध्ये केली जातात. तंत्रज्ञानामुळे हस्तकला मागे पडत असली तरी सध्या इथे चांदी हस्तकला उद्योगांची संख्या जास्त आहे. यात महिलांचा सहभागही आहे. चांदीची जोडणी करुन देण्याच्या त्यांच्य या कामाला या भागात ‘भरणी’ म्हणून ओळखले जाते. हुपरी आणि परिसरातल्या घराघरातून बायका हे काम करतात. कच्च्या मालापासून पैंजण-जोडवी असे वेगवेगळे डिझाईन  तयार केले जातात. पैंजण, जोडवी, करदोडे, बिंदली, मासोळ्या, बाजूपट्टा, ब्रेसलेट, भांडी यापासून ते अगदी घागरी, शोपीस, कळस इतकंच काय, तर चांदीचे नक्षीकाम केलेले सुबक दरवाजेही घडवले जातात.



 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...