Friday, June 19, 2026

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव

 





अनुभव २: बंगलोर ते मलावली ९३ किमी

लेखकमार्गीयांनी सोमवार, 16/03/2026 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
✪ वन्य परिसरातून सायकल प्रवास ✪ कर्नाटकमधील शांत रस्ते आणि छोटी गावं! ✪ “अरे ओ सांबा" जिथे घडलं असेल असे डोंगर ✪ ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू ✪ स्वीडनमधील सायकल मित्रासोबत भेट ✪ सूर्य नमस्काराची सप्त नमस्कार आवृत्ती ✪ Well began is half done! नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १२ जानेवारी! विवेकानंद जयंती! बंगलोर जवळच्या एस-व्यासामधला शांत परिसर! काल आकाश ढगाळ होतं, पण पहाटे तारे दिसत आहेत. काल रात्री बर्‍यापैकी झोप झाली आणि सकाळी फ्रेश वाटतंय. एस- व्यासामधले वरिष्ठ अधिकारी श्री. अमित सिंह आणि निरामयचे श्री धनंजय इंचेकर ह्यांची भेट घेऊन निघालो. जाताना कँपसमधल्या गणेश मंदिरात दर्शन घेतलं. अगदी दाक्षिणात्य शैलीचं मंदिर! शिवाय कृष्ण- अर्जुनाची सुंदर मूर्ती. (माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल आणि सायकल प्रवासातले फोटो इथे बघता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) . . . आजचा पहिला टप्पा ९३ किलोमीटर्सचा आहे. जुन्या बंगलोर- मैसूर महामार्गाने काही अंतर जाईन. महामार्गाला जाण्याआधी इथून काही छोट्या गावांमधले रस्ते लागतील. एस-व्यासामधून निघेपर्यंत सव्वा सात झाले. निघताना हेलसकर मॅडमनी दिलेला सुका मेवा खाल्ला. लाईव्ह लोकेशन ग्रूपवर शेअर केलं आणि निघालो हवामान स्वच्छ आहे! आणि आता पेडलिंग सुरू केल्यावर खूप हलकं वाटतंय. सायकल मोहीमेतले पहिले तीन दिवस तसे कठिण असतात. एक लय यायला आणि दिनक्रम शरीराने व मनाने स्वीकारायला थोडा वेळ लागतो. मनातल्या शंकाकुशंका हळु हळु निघून जातात. सायकलिंग सुरू केल्यावर मन हलकं झालं आणि छोट्या छोट्या टप्प्यांचा विचार करत पुढे जात राहिलो. सुरूवातीला वळणं खूप असल्यामुळे थोडा वेळ लागला. शहराच्या खुणा मागे पडल्या आणि मोकळं आकाश मिळालं! बंगलोरच्या ट्रॅफिकमधून सुटका झाली! पुढचं काही अंतर रस्ता राखीव वन क्षेत्रातून जातोय! हत्ती रस्ता ओलांडू शकतात, असे फलक आहेत. व्वा! हा रस्ता तमिळ नाडूच्या अगदी जवळून जातोय. आणि इथले छोटे डोंगर थेट शोलेमधल्या डोंगरांसारखे वाटतात! जणू शोलेतले ते सगळे प्रसंग इथेच झाले असावेत! छोट्या छोट्या गावांमधले विलक्षण शांत रस्ते! ग्रामीण कर्नाटक बघता आला. पुढे जुना बंगलोर- मैसूर मार्ग आला. उत्तम आहे हा महामार्ग. फक्त काही ठिकाणी काम सुरू असल्यामुळे थोड्या डायवर्जन्स आहेत. सुरूवातीला थोडे चढ होते, पण नंतर रस्ता उताराचा वाटला. इडली चटणीचा आणि चहा- बिस्कीटांचा नाश्ता दोनदा घेतला. कनकपुरामध्ये थोडा वेळ लागला. गूगल मॅपची मदत घेत जात राहिलो. वाटेत मला अजून एक सायकलिस्ट भेटला! चढावर तो हातात धरून सायकल नेताना दिसला. थोडा वेळ त्याच्याशी बोललो. तो नूप नावाचा स्वीडनचा सायकलिस्ट आहे! पण तो अगदी पहिल्यांदाच सायकल चालवतोय म्हणाला. बंगलोर ते मैसूर जातो आहे. त्याने स्वीडनमध्ये सायकल विशेष चालवली नव्हती म्हणाला. भारत फिरायला तो आला आहे आणि सायकल घेऊन त्याला जावसं वाटलं! त्याची तयारी तशी नाहीय पण तरीही मस्त सायकलवर निघाला आहे! थोड्या वेळ सोबत पायी पायी चाललो. चढ पूर्ण झाल्यावर फोटो घेऊन निरोप घेतला. . . आज जिथे थांबायचं आहे, त्या मलावलीमध्ये कोणत्या संस्थेशी‌ संपर्क होऊ शकला नाही. पण तिथल्या संघ परिवारातल्या श्री. कृष्णाजींशी बोलणं झालं आहे. ते व्यवस्था करणार आहेत. अपेक्षेच्या बरंच आधी म्हणजे साडेबारालाच तिथे पोहचलो. ४.३० तासांच्या आतच ९४ किमी झाले आहेत. कृष्णाजी लगेचच भेटले आणि त्यांच्या ओळखीच्या एका रेसिडन्सीमध्ये त्यांनी मला थांबायला सांगितलं. पोहचल्यावर आंघोळ करून जेवण केलं. दक्षिण भारतीय जेवण (मील)! भात, भाज्या आणि सांबार! एकदम पौष्टिक! दुपारी आराम झाल्यावर लॅपटॉपवर थोडा वेळ काम केलं. माझं प्रोफेशनल काम ऑनलाईन आहे, त्यामुळे लॅपटॉप सोबत ठेवून ते कामही रोज दुपारनंतर करणार आहे. संध्याकाळी कृष्णाजींनी त्यांच्या माहितीतल्या एका योग साधकांसोबत भेट करून दिली. ते श्री पतंजली योग समितीचं काम करतात. त्यांनी सूर्य नमस्काराच्या एका वेगळ्या पद्धतीची माहिती दिली. त्यामध्ये रोज वेगळ्या प्रकारचा सूर्य नमस्कार केला जातो. त्याला ते सप्त नमस्कार म्हणतात. त्यांना निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेच्या कामाबद्दल सांगितलं. सायकल प्रवासाची योजना सांगितली. थोडं इंग्लिश, थोडं हिंदी असं हे बोलणं झालं. आणि मला कन्नड किंचित येतं हे मी सांगत होतोच! ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू! भाषेची अडचण कुठेच आली नाही. मोहीमेचा पहिला दिवस खूप व्यवस्थित गेला. विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. आणि वाटेतला रस्ताही हायवे होता. त्यामुळे रस्त्यावरही लोकांशी बोलणं झालं नाही. पण कर्नाटकचा अगदी आतला भाग बघायला मिळाला. २० पैकी पहिला दिवस पूर्ण झाला! रोज असे वेगवेगळे अनुभव येणार आहेत! सायकल दिनक्रमानुसार रात्री लवकर झोपलो. सलग सायकलिंग करताना त्या त्या दिवशीचा थकवा त्याच दिवशी भरून काढावा लागतो. मन बरंच शांत झालंय. पण अजून नीट रुळायला दोन- तीन दिवस लागतील! पुढच्या लेखात दुसर्‍या दिवसाचे अनुभव शेअर करेन. धन्यवाद! पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ३: मलावली ते गुंडलुपेट ९८ किमी वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 13 मार्च 2026.



अनुभव ३: मलावली ते गुंडलुपेट ९८ किमी

लेखकमार्गीयांनी सोमवार, 13/04/2026 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
✪ कर्नाटकातील रम्य सरोवरे आणि कावेरी नदी ✪ छोटी गावं आणि शांत रस्ते ✪ बेगूरच्या ऐवजी गुंडलुपेटमध्ये मुक्काम ✪ बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्रातून प्रवास ✪ दक्षिण भारतातील शिस्त आणि सहकार्याचा अनुभव ✪ गुडलूरमधील मराठी बोलणार्‍याची‌ भेट! ✪ दक्षिण भारतीय कुटुंबीयांची आपुलकी ✪ पोंगलची पूर्वसंध्या आणि उटीच्या उंबरठ्यावर नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १३ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा दुसरा दिवस. काल मलावलीमध्ये चांगला आराम झाला. आजचा टप्पा आधी बेगूरपर्यंत होता. पण ते छोटं गाव असल्यामुळे तिथे थांबण्याची सोय लगेच मिळत नव्हती. म्हणून श्री कृष्णा जी, श्री निरंजन कुमार जी आणि इतरांच्या सांगण्यानुसार बेगूरच्या पुढे १४ किलोमीटरपर्यंत जायचं ठरवलं. त्यामुळे थोडा उशीर होणार होता पण पर्याय नव्हता. कालच्या अनुभवावरून वाटलं की, फार तर एकच्या ऐवजी दीडपर्यंत पोहचेन. हा विचार करून पावणेसातला निघालो. आजचा टप्पा मोठा झाला तरी पुढचा टप्पा छोटा होईल. . . . (माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल, सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) कर्नाटकातली जुनी राजधानी आणि सत्ताकेंद्र असलेल्या मैसूरच्या बाजूने जाणारा रस्ता! छोटी गावं, शांत रस्ते! आकाशही निरभ्र आहे. आता बंगलोरचे ढग आणि दमटपणाचा मागमूस नाहीय! सायकलिंगचा दुसरा दिवस असल्यामुळे मनही बरचसं शांत झालंय. फक्त पुढच्या टप्प्यावरच्या वन क्षेत्राची काळजी वाटते आहे. इथून उटीकडे जाणारा रस्ता राष्ट्रीय उद्यानातून जातो. तिथे हत्ती आणि इतर वन्य प्राणी आहेत. सायकल नेऊ देतील का आणि नेऊ दिल्यावर राईड करता येईल का ही शंका आहे. पूर्वी‌ तर इथे सायकलिस्टस गेलेले आहेत. ही गोष्ट मनामध्ये सतत येते आहे. अर्थात सुंदर आसमंत आणि हळु हळु मागे जाणारी गावं- लोक- दृश्य ह्यामुळे मन प्रफुल्लित होतं आहे. मुख्य हायवेला इडलीचा नाश्ता केल्यानंतर आतला रस्ता घेतला. काही अंतर अगदी निर्जन परिसर आहे. छोटी गावं, शेतं आणि शांत परिसर! पण रस्ते अगदी चांगले. वाटेत छान सरोवरं लागली. पुढे नरसीपूराजवळ दोन नद्या लागल्या. त्यातली एक कावेरी! कावेरीवरचा पूल अगदी छोटा आहे, त्यामुळे थांबता आलं नाही. अंतर्गत रस्त्याला अनेक वळणं आहेत, त्यामुळे थोडं बघून बघून जातोय. ह्या आतल्या रस्त्यांवर वाटेतले लोक थोडं बोलत आहेत. एका रिक्षावाल्याशी थोडा वेळ गप्पा झाल्या. हळु हळु दूरवर डोंगर दिसायला लागले! पुढे नंजानगुड गाव आणि श्री‌ वेंकटेश्वरा मंदिर लागलं. इथे रेल्वे लाईनही आली आणि मैसूर- उटी महामार्ग आला. आज हेडविंड बराच जास्त आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतोय. दुपारचं ऊनसुद्धा आहे. आणि आज दुसराच दिवस असल्यामुळे मूमेंटम तेवढा नाहीय. त्यामुळे थोडा जोर लावावा लागला. आसमंत मध्ये मध्ये बदलतोय. शेतं आणि छोटी गावं जाऊन आता औद्योगिक परिसर आला आहे. डोंगरही जवळ येत आहेत. हळु हळु बेगूर आलं. तिथून पुढे उतार असेल असं वाटलं होतं. पण तसा उतार नाहीय. परत एक ब्रेकफास्ट केला आणि जात राहिलो. अपेक्षेपेक्षा थोडं उशीरा म्हणजे दोन वाजता गुंडलुपेटला पोहचलो. इथे अशोकजींनी गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था केली होती. पण राहुल गांधींच्या दौर्‍याच्या प्रोटोकॉलमुळे ते बदलावं लागलं. नंतर त्यांनी दुसर्‍या एका लॉजमध्ये व्यवस्था केली. त्यात थोडा वेळ गेला. नंतर त्यांनी आपुलकीने जेवणाचीही व्यवस्था करून दिली. असं आजचं अंतर ९८ किमी अधिक दोन म्हणजे शंभरच झालं! गुंडलुपेट! दमायला झालं, पण पुढे व्यवस्था चांगली झाली. दुपारी आराम करून लॅपटॉपवर काम केलं. परभणी आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी फोनवरून रेकॉर्डिंगही केलं. हॉटेलचं खाऊन पोटाला थोडा त्रास होतो आहे. पण अपेक्षितच आहे. विशेष म्हणजे मला हव्या त्या चिक्क्या सगळीकडे मिळत आहेत. त्यामुळे तेवढी अडचण नाहीय. आता प्रश्न आहे की, उद्या वनातून जाताना कसं होईल??? . . जंगलातला थरारक प्रवास! १३ जानेवारीला गुंडलुपेटमध्ये आराम चांगला झाला. १४ जानेवारीची सकाळ! सायकल प्रवासाचा चौथा दिवस! आवरून निघालो. मनामध्ये शंकाकुशंका तर आहेतच. हत्ती- वाघ समोर असताना सायकलवर कसं जाता येईल हा प्रश्न आहे! पण जे होईल ते बघू म्हणून निघालो! सकाळचं स्वच्छ आकाश आणि नुकताच झालेला सूर्योदय! इथून बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाचं गेट साधारण १४ किलोमीटरवर आहे. ह्या महामार्गावर चक्क नागापट्टीणमची पाटी दिसते आहे! अपेक्षेप्रमाणे गेटवर वन रक्षकांनी अडवलं! युटर्न घे म्हणाले! दुचाकी तर जात आहेत, जाऊ द्या म्हणून सांगितलं. पण ते नाही म्हणाले. त्यांनी सांगितलं की, पूर्वी सायकली जायच्या. पण आता जाऊ देत नाहीत. आणि इतर दुचाकी वेगात जाऊ शकतात. हत्ती अंगावर आला तर सायकल काय करणार! मुद्दा रास्त होता. त्यांना सांगितलं की, असा असा प्रवास करतो आहे. काही उपाय सांगा. किंवा अनेक ट्रक- लॉर्‍या जात आहेत. त्यामधून सायकल नेऊ‌ द्या. ते तयार झाले! वन रक्षकांनी खूपच सहकार्य केलं! अजिबात उद्धटपणा किंवा नकार नाही! थोडं‌ थांबावं लागलं, पण त्यांनी एका गाडीला थांबवून सायकल चढवूनही दिली! आणि जंगलातला थरारक प्रवास सुरू झाला! अनेक ठिकाणी मोर, लाल माकडं, ससे दिसलेच. पण दोन ठिकाणी अगदी‌ जवळून हत्ती दिसले! लॉरीमधून वन अगदी‌ जवळून बघता आलं. ड्रायव्हर आणि एक वन रक्षक ह्यांच्यासोबत वेगळ्याच गप्पा झाल्या! थोडं हिंदी, थोडं इंग्लिश असं करत बोलणं झालं! पुढे बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाची‌ हद्द संपून मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्राची हद्द सुरू झाली! आणि तमिळ नाडूही सुरू झाला! खूप दाट जंगल. जवळून वाहणार्‍या नदीमध्येही हत्ती दिसले! काही आदिवासी गावंही इथे दिसले. ३० किलोमीटरचा प्रवास वनातून झाला. पलीकडच्या गेटवर लॉरीतून उतरलो. तो गुडलूरला सोडायला तयार होता, पण पुढचं अंतर सायकलवरच जावसं वाटलं. अर्थात् ते फार नव्हतं. साधारण १० किलोमीटरचा प्रवास करून गुडलूरला पोहचलो! उटीचे डोंगर अगदी जवळ आलेले आहेत! गुडलूर! उटीच्या पायथ्याचं‌ वेगळंच गाव. इथे कालिकतचाही‌ बोर्ड दिसला! केरळची सीमासुद्धा फार लांब नाहीय. चढ- उतारांवर वसलेलं आणि कोकणची आठवण करून देणारं गाव. तमिळ नाडू आणि पोंगलची पूर्व संध्या! इथेसुद्धा सुरूवातीला कोणत्या संस्थेची माहिती‌ मिळाली नव्हती. पण चिन्मय मिशनच्या स्वामी सुंदर चैतन्यजींनी ओमप्रकाशजींशी जोडून दिलं. ते इथे संघाचं काम करतात. ते खरं तर बाहेर जाणार होते. पण मला थोडा वेळ भेटले. संघ कार्यालयात त्यांनी माझी व्यवस्था केली. बस स्टँडपासून संघ कार्यालयापर्यंत त्यांनी मला रस्ता दाखवला. वाटेत त्यांच्या ओळखीचे अनेक जण भेटले! ते बाहेर जाणार होते, म्हणून नंतर त्यांनी पप्पू सामीजींशीही माझं बोलणं करून दिलं. ह्या दोघांना भेटताना कुठेच पहिल्यांदा भेटलोय असं वाटलं नाही. तिसर्‍या दिवसाचं सायकलिंग अगदी थोडं झालं. ५१ किलोमीटरच्या ऐवजी ८ आणि १४ असे फक्त २२ किमीच झाले. एका अर्थाने बरंच झालं. उद्या उटीच्या वाटेवर २० किमीचा विशाल घाट आहे! त्यामुळे आज आराम मिळाला ते चांगलंच. दुपारी‌ जेवायला शोधत शोधत एका ठिकाणी गेलो. आणि काय गंमत! हॉटेलवाला चक्क मराठी बोलणारा निघाला! त्याने १० वर्षं तळेगांव दाभाडेत काम केलं होतं! दोघांनाही छान वाटलं. मराठी चांगल बोलत होता! आणि त्याला इतकं मस्त वाटलं! योग असं जोडतो आणि परत जोडतो! तिथेच थोडा वॉक केला आणि नंतर एक जवळचं मंदिरही बघितलं. चहावर संशोधन करणारं महामंडळही दिसलं! लॉरीमधून सायकल आणताना एक नट निघालेला दिसला होता. लॉरीमध्ये सायकल आडवी केली होती, तेव्हा धक्का लागून निघाला. आधी वाटलं की तो सायकल स्टँडचा नट असेल. पण इकडे पोहचल्यावर नीट बघितल्यावर कळालं की, तो कॅरीअरच्या एका रॉडचा आहे. त्यामुळे कॅरीअर थोडं लूज झालं आहे. सोबतच्या ऍलेन की च्या मदतीने त्याला थोडं घट्ट केलं. अगदी योग्य नाही, पण तात्पुरतं जमलं. पुढे ते नीट करून घ्यावं लागेल. अन्यथा सामान घसरू शकतं. असो. संध्याकाळी पप्पू सामीजी भेटले. त्यांना इंग्लिश नीट येत नव्हतं, म्हणून त्यांनी दुभाषी म्हणून त्यांच्या मुलीला आणलं. त्यामुळे बोलणं छान झालं. नंतर ते घरी घेऊन गेले. तिथून उटीच्या घाट वाटेवरचा परिसर छान दिसला! त्यांच्या घरी सुरू असलेली पोंगलची तयारी बघता आली. नंतर त्यांनी गुडलूरच्या थोडं बाहेर असलेलं एक मंदिर दाखवलं. अगदी निर्जन आणि वनातून जाणारा रस्ता! रात्रीच्या स्वच्छ आकाशात तेजस्वी गुरू आणि इतर तारे दिसले! नंतर सर्वाणा भवनमध्ये जेवण झालं. ओमप्रकाशजी आणि पप्पू सामीजींना भेटून खूप छान वाटलं. आणि एका अर्थाने खरा भारत कसा असतो, संघ काय असतो, हेसुद्धा जाणवलं. गावात सगळीकडे पोंगलची तयारी आणि सजावट सुरू झाली आहे! तिसरा दिवस तसा सायकलिंगच्या दृष्टीने शांत गेला. पण जंगलातला थरारक प्रवास झाला! आणि आता उद्या घाटाची मोठी परीक्षा! बघूया कसं होतंय. वाचल्याबद्दल धन्यवाद! पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ४: पोंगल आणि गुडलूर- उटी- वेलिंग्टन ६७ किमी वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 19 मार्च 2026.

अनुभव ४: पोंगल आणि गुडलूर- उटी- वेलिंग्टन ६७ किमी

लेखकमार्गीयांनी सोमवार, 13/04/2026 09:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ उदकमंडलम् अर्थात् उटी!! ✪ हिमालय आणि सह्याद्रीचा संगम ✪ पोंगलचा उत्साह आणि सजावट ✪ २० किलोमीटरमध्ये १२०० मीटर चढ असलेला उटीचा घाट ✪ वन्य परिसरातून वर चढत जाणारा रस्ता! ✪ वेलिंग्टन कँटमध्ये राहण्याचा अनुभव नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १५ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा चौथा दिवस. काल गुडलूरमध्ये थांबलो होतो. गुडलूर! उटीच्या पायथ्याचं आगळं- वेगळं ठिकाण. अगदी डोंगराळ प्रदेशात आल्यासारखं वाटावं असं. आज उटीला जायचं आहे. उटीचा घाट! लहानपणी आजोबांसोबत व्यापार खेळताना उटी, कोचीन, दार्जीलिंग, मद्रास अशी‌ गावं ओळखीची झाली! ते उटी! ह्या दक्षिण भारत सायकल प्रवासातला सगळ्यांत मोठा घाट हाच असेल. एका अर्थाने ही एक मोठी परीक्षा आहे. उटीच्या पुढे फार कठिण टप्पे नाहीत, असं वाटतंय. उत्तर भारतातली संक्रांत अर्थात् लोहरी म्हणजे दक्षिणेकडचा पोंगल! काल संध्याकाळीसुद्धा गुडलूरमध्ये लोकांची सजावट आणि तयारी सुरू होती. घरासमोर काढलेल्या रांगोळ्या! त्यासाठी दूरवरून आणलेला ऊस! साग्रसंगीत सजावट आणि सुवासित वातावरण! आज निघताना सुरूवातीला ढग असतील असं वाटलं. पण आकाश खूप स्वच्छ आहे! दूर डोंगरात धुकं दिसतं आहे! गुडलूरमध्ये चहा बिस्कीट घेऊन निघालो. गुडलूरमधूनच घाट सुरू झाला. हा घाट २० किलोमीटर लांब आणि १२०० मी. चढ असलेला आहे. पण चढ पसरट आहे आणि फार तीव्र नाही. त्यामुळे हा घाट मला सायकलवर जमेल असं वाटतंय. आधी ह्याहून तीव्र अनेक घाट चढलो आहे. फक्त एक आहे की, ह्याची लांबी खूप मोठी आहे. त्यामुळे थोडी परीक्षा तो घेऊ शकतो. (माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)......सकाळचं प्रसन्न वातावरण! अजिबात ढग नाहीत. खूप सुंदर नजारे! नजा-यांचा आनंद घेत सायकल चालवतोय. गुडलूरच्या बाहेर छोट्या गावांमध्ये "पोंगलच्या वाईब्ज" जाणवत आहेत! रस्त्यावर वाहनं तुरळक आहेत. रस्ता चढाचा असला तरी खूप आरामात सायकल चालवता येते आहे. हळु हळु रस्ता वर चढत जातोय तसा दूरवरचा आसमंत नजरेच्या टप्प्यात येतोय! किती विलक्षण डोंगररांग आहे ही! हे वन क्षेत्र नसलं तरी प्रत्यक्षात वन आहेच. हत्ती रस्ता ओलांडतात, असे बोर्डस दिसत आहेत. काही ठिकाणी लाल तोंडाची माकडंही दिसत आहेत! व्वा! काही अंतरानंतर धुकं लागलं. पण विजिबिलिटी चांगली आहे. सायकलीच्या मागे ब्लिंकर लावला आणि लक्षपूर्वक सायकल चालवत राहिलो! असा विलक्षण निसर्ग बघून आपोआप गाणी आठवायला लागली. उटी पर्यटनाचं मोठं केंद्र आहे. त्यामुळे इथे बरेच स्पॉटस आहेत आणि म्हणून छोटे हॉटेल्स मिळत राहतील. पहिल्या तासाभरात साधारण नऊ किलोमीटर झाले! म्हणजे जवळ जवळ अर्धा घाट पूर्ण झाला. दूरवर पुढचे मोठे डोंगर दिसत आहेत! काय ठिकाण आहे हे! मनाली, शिमला, श्रीनगर, नैनिताल ह्या सगळ्यांपेक्षा उटीची उंची (२३०० मी.) जास्त आहे! हिमालय आणि सह्याद्रीचा अद्भुत संगम! आणि त्याला साजेसा निसर्ग. सुरूवातीला वृक्षराजी सपाटीवरची होती. पण पुढे युकेलिप्टस आणि पाईन वृक्ष लागले! गुडलूर साधारण १००० मी. उंचीवरचं गाव. तिथला निसर्ग आणि २३०० मी. उंचीवरचा निसर्ग! खूप फरक पडताना दिसतोय! अजिबात ढग नाहीत, त्यामुळे थोडीही आर्द्रता नाहीय. आणि थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे ऊन विशेष नाहीय. त्यामुळे आरामात जात राहिलो. इथे जर ढग किंवा पाऊस आणि आर्द्रता असती तर मात्र हे फार कठिण गेलं असतं! वाटेत अनेक व्ह्यू पॉईंटस लागले पण थांबावसं वाटलं नाही. हळु हळु वाहनांची वर्दळ सुरू झाली. काही बसेसमधली मुलं मला बघून हात करत आहेत! अशा घाटात लोकांना सायकलिस्ट बघण्याची तेवढी सवय नाहीय. अखेर अडीच तास सायकल चालवल्यावर साडेदहाला २० किलोमीटर पूर्ण झाले आणि घाटाचा मुख्य टप्पा संपला. कोणताही त्रास न होता उटीचा मोठा घाट पार झाल्याचा खूप आनंद झाला! आता वेलिंग्टन ४५ किलोमीटर आहे. ते अडीच तासांमध्ये पूर्ण होईल असं वाटतंय. पण नंतर जास्त वेळ लागत गेला. उटीच्या पुढेही छोटे चढ आहेत. मुख्य घाट २० किलोमीटरला पूर्ण झाल्यावर काही उतार आहेत पण मग परत चढ आहेत. त्यामुळे वेळ जास्त लागतोय. आणि सकाळ संपून आता दुपार जवळ येते आहे. त्यामुळे गरमही होतं आहे. उटी हळु हळु जवळ येतंय. जुनं पर्यटन केंद्र! अगदी ब्रिटीशांपासून प्रसिद्ध असलेलं ठिकाण. वाटेत पायकारा लेकसारखे अनेक लेक लागले. किती विलक्षण हा परिसर आहे! २००० मी. हून जास्त उंची असलेलं एक लांब पसरलेलं पठार! टेबललँड! साधारण २:३० पर्यंत तरी वेलिंग्टनला पोहचायचा विचार आहे. कारण तिथल्या कँटोनमेंटमधलं कँटीन २:३० ला बंद होतं. त्यामुळे थोडी वेळेची शर्यत झाली. उटीमध्ये तिसरा ब्रेक घेतला. शहरातली गर्दी मागे पडून लवकर मोकळ्या रस्त्यावर कधी येईन असं वाटतंय. कूनूर- कोईम्बतूरची दिशा दाखवणारा रस्ता घेतला आणि हळु हळु उटी मागे पडत गेलं. दोडा बेट्टा शिखराकडे जाणारा फाटा येईपर्यंत चढ कायम राहिला. तिथून पुढे मात्र सुसाट उतार! पेडल मारण्याचीच जवळ जवळ गरज नाही. थेट वेलिंग्टन कँटोनमेंटमध्ये येईपर्यंत उतार! तिथली व्यवस्था अर्चना ताईंनी केली आहे. अशा मिलिटरी एरियामध्ये जाताना थोडं अस्वस्थ वाटलं! पण तिथला शांत परिसर आणि निसर्ग बघून छान वाटलं. थोडं उशीरा म्हणजे पावणेतीनला पोहचलो. अर्चना ताईंनी तिथल्या लोकांना सांगून ठेवल्यामुळे काही अडचण आली नाही. जेवण करून मग गेस्ट रूममध्ये थांबलो. आजचे ६७ किलोमीटर पूर्ण व्हायला जवळपास ६ तास लागले! उटीच्या पुढेही चढ असल्यामुळे वेळ लागला. सायकल प्रवासातले चार दिवस पूर्ण झाले! दक्षिण भारत सायकल प्रवासातला उटीचा मोठा टप्पा पार झाला! सायकलिंगच्या एका परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो! वेलिंग्टन! सेनेचं एक महत्त्वाचं युनिट, सैनिकी महाविद्यालय आणि प्रशिक्षण केंद्र इथे आहे! संध्याकाळी अर्चनाताईंचे ओळखीचे एक सिनियर ऑफिसर मला भेटायला आले. खूप अगत्याने त्यांनी विचारपूस केली. इतके मोठे ऑफिसर, पण इतक्या सहजपणे भेटले आणि बोलले! ऑफिसर म्हणून ते आलेच नाहीत, एक मित्र म्हणून सिव्हिलियन वेषातच भेटले. त्यामुळे काही दडपण वाटलं नाही. कँटोनमेंटमध्ये गेस्ट रूममध्ये राहण्याचा खूप नवीन अनुभव मिळाला! गेस्ट रूम परिसरातल्या इतर काही जणांसोबत अनौपचारिक भेटी झाल्या. काय दिवस गेला हासुद्धा! स्वत:च स्वत:चा हेवा वाटावा अशी स्थिती आहे! निसर्गरम्य परिसरामध्ये छान आराम झाला. आता उत्सुकता आहे ती उद्याच्या अशाच मोठ्या ठिकाणाची! पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ५: वेलिंग्टन- ईशा आदि योगी (कोईम्बतूर) ९८ किमी वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 8 एप्रिल 2026.





अनुभव ६: ईशा आदि योगी (कोईम्बतूर) ते वडक्कनचेरी ११७ किमी

लेखकमार्गीयांनी गुरुवार, 23/04/2026 14:08 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कोईम्बतूरजवळच्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत भेट 
✪ तमिळनाडूतून केरळ प्रवेश
✪ वडक्कनचेरी, पण ते नाही हे!
✪ “ते वालं" हॉटेल नको, राहण्याचं हवं!
✪ पेडलिंगपेक्षा हॉटेल शोध मोहीम जास्त दमवणारी
✪ दक्षिण भारतीय लोकांची आत्मीयता!

नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे हे अनुभव. १७ जानेवारी. ईशा आदियोगीची भव्य योग नगरी! इथे रात्री साडेनऊलाच निजानीज होते. निवास परिसरात मौन असतं. अशा शांत जागेत आराम छान झाला. पहाटे खिडकीतून बाहेर तारे दिसत आहेत. आकाश स्वच्छ आहे! वा! आजचा टप्पा थोडा मोठा आहे. पण निघताना आदि- योगी शिव मूर्तीसोबत थोडा वेळ थांबणार आहे. आवरून. रूमची किल्ली देऊन आणि निरोप घेऊन निघालो. सायकल प्रवासाचा सहावा दिवस! काय प्रवास होतोय हा. कालचा तो थरारक उतार! आजसुद्धा डोंगर आणि चढ- उतार असतीलच. आज पहिले ईशा आदि योगीच्या अगदी जवळच असलेल्या चिन्मय इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूल, कोईम्बतूर इथे विद्यार्थ्यांना थोडा वेळ भेटायचं आहे. माझ्या रूटला लागूनच आहे, त्यामुळे फार डायवर्शन होणार नाही. तमिळ नाडूतली ही एक सर्वोत्तम शाळा, असं मला चिन्मय मिशनच्या स्वामी सुंदर चैतन्यजींनी सांगितलं. त्यांनीच तिथे ही भेट ठरवली.

(<a href="https://niranjan-vichar.blogspot.com/2026/04/south-india-cycle-expediti…">माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल आणि सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील.</a> त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)

<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOaCrhj89pU6QLpnijX1BUIIiYEb9…" alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczM61kjw4xEyNXx5iDJw5Y_3JMNfWb…" alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPGeD8_5Vousyx5qDFAesSxpebZeZ…" alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOAmx-KwQvmWyKInFwZA7MJ7g9uLR…" alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPFEH5KEK0kh2YjjbtoZsBeXWSkRD…" alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPrYC-QFwT9G-oYK1rOPc8ByOF8lw…" alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPu0O35ZhKs_Au6AGbd0KwoFChBSc…" alt=" "width= “500” />
.
<img src= "https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPbil6XMKay8QoGAprj4p_UMY5IMS…" alt=" "width= “500” />

काही क्षण ध्यान करून भव्य शिव मूर्तीजवळून हळु हळु पुढे आलो! काय परिसर आहे हा! पलीकडे पर्वतरांग आणि पुढे केरळ! तीन बाजूंनी डोंगर आहेत! विलक्षण आसमंत. त्यात सकाळची‌ शांतता, थंडी आणि हलकं धुकं! अगदी छोटी गावं असली तरी रस्ते मात्र अप्रतिम. अनेक मिशनरी‌ शाळा आणि महाविद्यालयं दिसली. रस्ता थोडा चुकलो, पण स्वामी सुंदर चैतन्यजी माझं लोकेशन ट्रॅक करत होते, त्यामुळे त्यांनी लगेच मला फोन करून सांगितलं! चिन्मय इंटरनॅशनल शाळेमध्ये पोहचलो! विस्तीर्ण हिरवागार परिसर! अगदी मंत्रमुग्ध करणारा परिसर. मोरांचा केकारव! विद्यार्थ्यांसोबत पाऊण तास गप्पा मारल्या. त्यांना माझ्या प्रवासाचा उद्देश सांगितला. परभणीच्या निरामय योग प्रसार संशोधन संस्थेचं काम सांगितलं. ह्या शाळेतही योग आणि क्रीडा महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यानुसार त्यांच्याशी बोललो. खेळात उत्सुक असलेल्या अनेक मुला- मुलींनी प्रश्न विचारले. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसोबत आणि स्वामी शाश्वत चैतन्यजींसोबत छान संवाद झाला आणि निघालो!  

हा रस्ता कोईम्बतूरच्या जवळून जाईल आणि कोईम्बतूर- पलक्कड महामार्गाला मिळेल. ईशा जवळ असल्यामुळे हॉटेल्स भरपूर आहेत. पहिल्यांदा पोंगलचा नाश्ता केला. पोटाला अगदी चांगला असा हा नाश्ता. एक प्रकारचा बिनमिठाचा उपमा, पण चटणी- सांबार असल्यामुळे छान चव लागली. तीन्ही बाजूंना डोंगर असल्यामुळे रस्ता फिरून जातोय. कोईम्बतूरच्या थोडं अलीकडे मोठा रस्ता मिळाला. ऐसपैस रस्ता, पण अगदीच निर्जन! आजूबाजूला नारळाची झाडं! बाजूला असलेले डोंगर अजूनही धुक्याच्या दुलईत आहेत! अशा ठिकाणी सायकलीचा सर्वाधिक आनंद घेता येतो!

पुढे मुख्य महामार्ग आल्यावर तर सायकलने अजून वेग घेतला. गेले दोन- तीन दिवस डोंगर, घाट, उतार असल्यामुळे वेग कमी होता. काही वेळ तिस-या गेअरवर सायकल चालवली. पण नंतर वाटलं की, नको. अति जोर नको लावायला. त्यामुळे मग दुस-या गेअरवर जास्त आरामदायक प्रकारे सायकल चालवत राहिलो. तमिळ नाडू संपून आता केरळ सुरू होणार! डोंगरातून हळु हळु समुद्र सपाटीकडे जाणारा रस्ता असल्यामुळे उतार चांगला आहे. त्यामुळे वेगात जात राहिलो. पलक्कड! ती प्रसिद्ध पलक्कड गॅप! पश्चिम घाटामध्ये पलक्कडजवळ अशी एक गॅप आहे जिथे पर्वतरांगेमध्ये एक ओपनिंग आहे. नैसर्गिक अशी ही घाटाची सोपी वाट आहे. डोंगर हळु हळु मागे पडले आणि कोंकणासारखा केरळ जवळ आला! हिरवी कुरणं, लांब पात्राच्या नद्या आणि जलाशय! नारळाचे झाडं आणि कौलारू घर!

११ नंतर ऊन्हाचा जोर वाढला. डोंगरांमधून जमिनीजवळ आल्यामुळे उष्णता वाढली. पण वडक्कनचेरीपर्यंतचा प्रवास खूप वेगाने झाला. अलाथूर ओलांडून दीड वाजता वडक्कनचेरीला पोहचलो. म्हणजे सव्वा सहा तासांमध्ये ११२ किमी झाले! आधी अलाथूरला थांबायचा विचार होता. पण मग पुढच्या दिवशीचा टप्पा जास्त मोठा होत होता. त्यामुळे वडक्कनचेरीला थांबायचं ठरवलं. गंमत म्हणजे इथे अगदी शेवटपर्यंत कोणत्याही संस्थेसोबत/ व्यक्तीसोबत बोलणं झालं नाही. स्वामी सुंदर चैतन्यजींनी खूप प्रयत्न केले. त्यांनी संघाच्या एका कार्यकर्त्यासोबत मला जोडूनही दिलं. तेव्हा वाटलं की, राहण्याची सोय होईल. पण फोन केला तेव्हा कळालं की, ते वडक्कनचेरी हे नाही तर दुसरं आहे! त्यामुळे वडक्कनचेरीला पोहचल्यावरही खूप वेळ थांबावं लागलं. योगायोगाने तिथे एक ट्रक ड्रायव्हर मराठी बोलणारा भेटला! आणि हिंदी फार चांगलं बोलणारा एक हॉटेलवाला भेटला. कुठेच व्यवस्था होत नाही हे लक्षात आल्यावर वडक्कनचेरीमध्ये हॉटेल्सची शोधाशोध सुरू केली.

लोकांनी सांगितल्यावरून पहिले सरकारी गेस्ट हाऊसमध्ये गेलो! तिथे रूम मिळणार नाही, हा अंदाज होताच. पण तिथल्या ताई खूप चांगलं बोलल्या. अगदी या, बसा म्हणाल्या! इतकं सौजन्य आणि आत्मीयता! पुढे आणखी काही हॉटेल शोधले. वडक्कनचेरी तसं लहान गाव. त्यामुळे हॉटेल कमी आहेत. चौकशी करता करता एका माणसाने मला सांगितलं ते आहे की हॉटेल. मी बोललो "ते नाही", तर त्याने मला बाटलीचा इशारा केला आणि "तिकडे" असं सांगितलं! मग बोललो की, “स्टे हॉटेल!” एकदा तर वाटलं की, असंच पुढे २७ किलोमीटर त्रिशूरला जावं. तिकडे व्यवस्था होत होती. आधीच ११५ किमी झाले आहेत, त्यामुळे नको असं वाटलं.  हॉटेल काय मिळेल इथेच असं वाटत होतं. अशी बरीच शोधाशोध केली. शेवटी दोन हॉटेल बघून त्यातलं एक निवडलं. पण त्यात दोन तास गेले आणि सायकलिंगमध्ये मनाला जेवढं दमायला झालं नव्हतं तेवढं ह्या शोधामुळे दमायला झालं!

मुख्य महामार्गाला लागूनच एक रूम मिळाली! वाहनांचा आवाज सोडला तर बाकी ठीक आहे! एक रात्र तर थांबायचं आहे. मी, निरामय टीम आणि चिन्मय मिशनच्या स्वामी सुंदर चैतन्यजी आणि इतरांनी मिळून प्रवासाचं नियोजन तर केलं होतं. पण तरीही अशी गंमत झाली. पण त्यामुळे पुढे अजून जास्त प्रयत्न करायचे आणि ठिकाण आधीच ठरवून टाकायचं असं ठरवलं. हा एक धडा मिळाला. ह्या गोंधळामुळे त्या दिवशी मानसिक बॅटरीसुद्धा थोडी लो झाली. पण मग नंतर आराम झाला. फोनवर जवळच्यांशी बोलणं झालं. आणि मग परत फ्रेश वाटलं.

आज वडक्कनचेरीला भेटी अशा नाही झाल्या. उद्या मात्र त्रिशूरला एक आणि पिरोवमला चिन्मय मिशन विद्यापीठ अशा दोन भेटी जोरदार होतील! आता डोंगर जवळपास संपले आहेत. उद्या त्रिशूरच्या अलीकडे एक बोगदा आहे. त्यानंतर बराचसा सपाट भाग येईल असं वाटतंय. अर्थात् कोकणात असतात तसे सततचे छोटे चढ- उतार असतीलच. पण पुढे आता सोपा प्रदेश येईल असं वाटतंय! त्याचं उत्तर मात्र नंतरच्या दिवसांमध्ये मिळालं आणि पुढे इतरही गमती- जमती होत राहिल्या!

<strong>पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ७: वडक्कनचेरी- त्रिशूर- पिरोवम (इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशन) १२५ किमी
</strong>
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 एप्रिल 2026.


अनुभव ७: वडक्कनचेरी- त्रिशूर- पिरावोम (इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशन) १२५ किमी

लेखकमार्गीयांनी शुक्रवार, 22/05/2026 17:50 या दिवशी प्रकाशित केले.

✪ इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशमधल्या आत्मीय भेटी 

✪ दर्शन योग भवन, त्रिशूर 

✪ सायकलला छोटी दुखापत आणि दुरुस्ती 

✪ कोंकणाची‌ आठवण करून देणारा केरलम 

✪ सततचे चढ- उतार आणि वळणं 

✪ दाट वस्तीची गावं आणि सुंदर रस्ते 

✪ स्वामी सुंदर चैतन्यजींसोबत संवाद 

✪ आदि शंकराचार्यांचं जन्मस्थान 

✪ निर्वाण षटक आणि "भज गोविन्दम्" नमस्कार. 

१८ जानेवारीची सकाळ. काल हॉटेल रूम शोधण्यात गेलेला वेळ आणि व्यवस्था न झाल्यामुळे झालेला ताण अजिबात जाणवत नाहीय. नवा दिवस- नवी सुरूवात! सकाळचं प्रसन्न वातावरण! वडक्कनचेरीवरून आज निघून त्रिशूरमार्गे पिरोवम (चिन्मय मिशनचं मुख्य सेंटर) हे १२५ किमी असा आजचा टप्पा आहे. वाटेत त्रिशूरला माझ्या बाबांचे मित्र योगी जयदेवन आणि त्यांची संस्थाही बघायची आहे. 

रोजच्या प्रमाणे साधारण ६:४५ ला निघालो. निघताना ग्रूपवर लाईव्ह लोकेशनही शेअर केलं. इथून त्रिशूर तसं अगदी जवळ म्हणजे २८ किमीच आहे. निघाल्यावर थोड्याच वेळात मागे एका चर्चच्या आडून सूर्य वर आलेला दिसला. समोर हळु हळु डोंगर दिसायला लागले. ह्या डोंगरांमध्ये एक बोगदासुद्धा लागेल. ह्या बोगद्यामध्ये सायकल नेऊ देतील का, अशी एक शंका होती. पण काही अडचण आली नाही. पुढे त्रिशूरवरून येणारे सायकलिस्टही दिसले. साधारण १८ किमीवर चहा- बिस्कीट घेण्यासाठी थांबलो. निघताना सायकलचा स्टँड पायाने सरळ केला तेव्हा कळालं की तो परत खाली पडतोय! मागे सरळ होत नाहीय. रस्त्याला घासण्याच्या अगदी थोडा वर तो स्थिर होतोय. पुढे बघता येईल, काही अर्जंट नाही म्हणून निघालो.

 ..... 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) 

मला जायचं आहे तो रस्ता त्रिशूरच्या अलीकडूनच वळेल. त्यामुळे मुख्य शहर लागणार नाही. दर्शन योग भवन हे केंद्र हे त्रिशूरच्या जवळ एका उपनगरात आहे. नकाशावर रस्ता बघून ठेवला आणि योग्य वेळी मुख मार्गापासून आत वळलो. पुढच्या गल्ल्यांमध्ये मात्र नीट बघून जावं लागतंय. थांबत थांबत आणि रस्ता बघत गेलो आणि केंद्रापाशी पोहचलो. इथले योगी जयदेवनजींसोबत छोटी पण छान भेट झाली. बाबांचे ते मित्र असल्यामुळे मला आवर्जून भेट म्हणून सांगत होते. योगाबद्दल काही‌ अभ्यासक्रम, शिबिरं आणि कार्यशाळा असं त्यांचं काम चालतं. ते योगाबद्दल परिसंवादही आयोजित करतात. मी गेलो तेव्हा त्यांचा योग वर्ग सुरू होता. त्यातून त्यांनी मला थोडा वेळ दिला आणि पौष्टिक असा केरळी नाश्ताही‌ दिला! त्यांना माझ्या प्रवासाबाद्दल आणि महाराष्ट्रातल्या निरामय संस्थेच्या कामाबद्दल माहिती दिली आणि पुढे निघालो. 

मी त्यांच्याकडे जायचं म्हणून महामार्ग सोडून आत गेलो आणि नंतर मधल्या रस्त्याने महामार्गाला आलो. पुढे टोल क्रॉस केल्यावर वेग घेतला. सायकलचा स्टँड थोडा कुरकुर करतोय. पुढे जाताना अनेक सायकलिस्टस दिसले! थोडा वेळ हाय- हॅलो झालं. मग त्यांनी माझा पडत असलेला स्टँड बघितला. आम्ही थोडा वेळ थांबलो. त्यांच्यातल्या एका सायकलिस्टने मला सांगितलं की, अरे मागेच त्रिशूर डिकॅथलॉन गेलं, तुला दिसलं नाही का. मी नेमका त्या टप्प्यावर आतल्या बाजूने जाऊन आलो होतो! मग त्यांच्या सांगण्यानुसार युटर्न घेतला आणि अगदी दोनच किलोमीटरवर ते डिकॅथलॉन होतं! तिथे सायकलचा स्टँड नवीन बसवून घेतला. बाकीही सायकल तपासून घेतली! उटीनंतरच्या भयाण उतारामुळे काही नुकसान झालेलं दिसलं नाही. ह्या सगळ्या गडबडीत वेळ मात्र खूप गेला. पण सायकल पूर्ववत झाल्याचं समाधानही मिळालं. 

कन्याकुमारी, कोची, थिरूवनंतपूरम असे बोर्डस आता दिसत आहेत! आणि डोंगरही आता बरेच मागे पडले. पिरावोम! केरलमच्या अगदी अंतर्भागातलं एक गाव. इथली गावं म्हणजे वेगळाच प्रकार असतो. अगदी दाटीवाटीची वस्ती असते. गावं सलग सुरूच असतात. नकाशावर पुढचा टर्न कुठे घ्यायचा हे बघत राहिलो. स्वामी सुंदर चैतन्यजींनी मला कालाडीवरून (आदि शंकराचार्यांच्या आईंचं गाव) ये सांगितलं आहे. तो टर्न लक्षात ठेवला. बराच टप्पा हायवे सुरू असल्यामुळे वेग चांगला मिळतोय. साधारण ८० किलोमीटरवर परत भूक लागली. केरळी भात आणि भाजी असं मस्त जेवण मिळालं! 

इथून पुढचा टप्पा कठिण गेला. दुपार झाल्यामुळे कडक ऊन सुरू झालं. कालाडीसाठीचा टर्न घेताना थोडी घाई केली आणि आधीच वळालो. पण तो रस्ता लांब पडेल कळाल्यावर परत महामार्गाला आलो. आणि नेमका योग्य तो टर्न चुकला आणि पुढे गेलो! आलेला कळालाच नाही. कळालं तेव्हा खूप पुढे गेलो होतो आणि कोचीची उपनगरं सुरू झाली होती. कोचीच्या विमानतळाचा रस्ता आणि काही मेट्रो स्टेशन्सही लागली. पिरोवमचा रस्ता परत बघून पुढचा मुख्य टर्न लक्षात ठेवला. जेवल्यानंतरचा एक तास कठिण गेला. जास्त थकल्यासारखं वाटलं. महामार्ग सोडून डावीकडे वळालो आणि आता पिरावोम ३० किलोमीटर राहिलं. एकदा एनर्जालही घेतलं. सतत रस्त्यावर टर्न आहेत आणि प्रत्येक वेळी थांबून ते बघून जायला वेळ लागतोय. शेवटी आत्तापर्यंत जे केलं नव्हतं ते केलं. सायकलच्या हँडलला एका सॉकेटमध्ये मोबाईल अडकवला आणि सरळ गूगल मॅप सुरू केला. प्रत्येक वळणावर थांबून रस्ता बघण्याचा प्रश्न असा सोडवला. गूगल मॅप दाखवतंय की, अजूनही साधारण २७ किमी अंतर आहे आणि दिड तास लागेल! पण ठीक आहे. आता रस्ता चुकण्याची भिती नाही! 

जवळ आलेलं कोची परत थोडं दूर गेलं आणि परत केरलममधली छोटी गावं सुरू झाली! अगदी कोंकणाचीच आठवण! पण कोंकणात इतकं शहरीकरण नाहीय आणि इतकी दाट वस्तीही नाहीय! रस्ते मात्र तसेच- मध्ये मध्ये एकदम वर चढणारे तर परत खाली उतरणारे आणि सतत वळणारे! एनर्जालमुळे नंतर परत फ्रेश वाटायला लागलं. हळु हळु पण चिन्मय मिशनचं केंद्र जवळ येत असल्यामुळे बरं वाटत गेलं. १५ किमी राहिले असताना परत एकदा ओआरएस घेतलं आणि जात राहिलो. 

अखेर दुपारी ४ वाजता इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशनच्या (आयसीएफ) मुख्यालयात पोहचलो! त्रिशूरमधली योगी जयदेवनजींसोबतची भेट, त्रिशूर डिकॅथलॉनमध्ये उलटा केलेला प्रवास आणि सायकल दुरुस्ती ह्यामुळे दोन तास गेले होते. शिवाय रस्ते शोधण्यात गेलेला वेळ. पण पोहचलो अखेर. १२५ किमी झाले! स्वामी सुंदर चैतन्यजी, प्रतिकजी रुमडे आणि इतर साधक अक्षरश: स्वागतासाठी थांबले आहेत. त्यांना माझं खूप कौतुक वाटतंय. मलाही चिन्मय मिशनमध्ये येऊन अगदी घरी आल्यासारखं वाटतंय! स्वामी सुंदर चैतन्यजींशी छान भेट झाली! अगदी गुडलूरपासून त्यांनी प्रत्येक ठिकाणी माझी काळजी केली आहे आणि व्यवस्थेसाठी मदत केली आहे! शिवाय निघण्याच्या आधी ३१ डिसेंबरला झालेली चिन्मय विभूतीमधली भेट आठवतेय! इथल्याच (पण आज इथे उपस्थित नसलेल्या) डॉ. गौरी माहुलीकर मॅडमनी केलेली मदत आठवते आहे..... 

 

आयसीएफचा सुंदर रमणीय परिसर! आंघोळ करून थोडा वेळ पडलो. नंतर श्री प्रतिकजी रुमडेंनी मला आदि शंकराचार्यांचं जन्मस्थान दाखवलं. त्या स्थानामुळेच इथे हे केंद्र उभं केलं गेलं आहे. जुना वाडा, त्यातल्या खोल्या आणि त्याबद्दलच्या मान्यता सांगितल्या! ओशोंकडून शंकराचार्यांबद्दल खूप ऐकलं आहे. “भज गोविन्दम" ही ओशोंची आदि शंकराचार्यांबद्दलची सुंदर प्रवचन माला. शिवाय आदि शंकराचार्यांचं निर्वाण षटक् आणि गंगा स्तुती! शिवाय अगदी जोशीमठ- श्रीनगर मध्ये बघितलेले आदि शंकराचार्यांचे मठ आठवले! छान वाटलं हा परिसर बघून! 

संध्याकाळी स्वामी सुंदर चैतन्यजींसोबत खास गप्पा झाल्या. चिन्मय मिशनचं काम त्यांनी सांगितलं. इथे चिन्मय विद्यापीठसुद्धा आहे. योग, संस्कृत आणि भारतीय संस्कृतीबद्दलचे विविध अभ्यासक्रम आणि उपक्रम इथे चालतात. योगा रिट्रीटस होतात. देश- विदेशातले लोक येत असतात. ब्रह्मचारी व ब्रह्मचारिणी आणि साधकही इकडे साधना करतात. त्याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. 

स्वामीजींनी पुढच्या टप्प्यांबद्दलही आस्थेने चौकशी केली आणि पुढच्या टप्प्यांसाठी मदतही केली. त्यांच्यासोबत छान गप्पा झाल्या. ब्रह्मचारी किंवा स्वामीजी म्हणजे तसे कर्मठ समजले जातात. किंवा कर्मकांडात मग्न मानले जातात. पण स्वामीजी खूपच मनमिळावू बोलले. माझ्या सायकल प्रवासाचं त्यांना काय कौतुक! It is a Tapas, what you are doing is a great Sankalpa! मी फक्त हसलो आणि त्यांना नम्रपणे म्हणालो की, मला असं काही वाटत नाही. सायकलिंग तपस तर वाटतच नाही, इतकं ते सोपं आणि आनंददायी आहे! अर्थात् एक प्रकारचं ध्यान नक्की वाटतं. त्यांनी त्यांचे बरेच अनुभव सांगितले. छान भेट झाली. मी खरंच किती भाग्यवान आहे की, मला इतकं फिरता येतंय आणि अशा साधक लोकांसोबत राहता येतंय. 

उद्याचा टप्पा- अमृतापूरी आश्रम. तिथेही स्वामीजींच्या ओळखीच्या संन्याशासोबत त्यांनी बोलणं केलं. निरामय संस्थेचा मेल त्यांना गेला होताच, पण तरी बोलणं गरजेचं होतं. त्यानंतरचा टप्पा थिरूवनंतपूरम- तिथे तर मला चिन्मय विभूतीमध्ये भेटलेले स्वामी सुधीर चैतन्यजी आहेत- चिन्मय मिशनचं मोठं केंद्र तिथे आहे. त्यानंतर कन्याकुमारी. असे पुढचे टप्पे आहेत! त्यातही योगाच्या दृष्टीने आजचा दिवस व पुढचे तीन टप्पे विशेष महत्त्वाचे! आज २० पैकी ७ दिवस पूर्ण झाले. सात दिवसांमध्ये ६२१ किमी‌ झाले. सुरूवातीचे दिवस लवकर जात नाहीत. पण हळु हळु पुढचे दिवस झपाट्याने जातात! बघूया पुढे कसं कसं होतं. उद्यापासून किनारपट्टीचा रूट सुरू होईल आणि "तो" भेटेल! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ८: पिरावोम (इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशन) - अमृतापूरी ११० किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 22 मे 2026.


अनुभव ८: पिरावोम (इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशन) - अमृतापूरी ११० किमी

लेखकमार्गीयांनी शनिवार, 23/05/2026 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

✪ समुद्रालगत सायकलिंगचा आनंद 

✪ बॅकवॉटर आणि खाड्यांवरील पूल! 

✪ केरलममधल्या मित्रांसोबत गप्पा 

✪ कोस्टल रोड आणि वस्ती नसलेला केरलम 

✪ अमृतापूरी आश्रम- भजन, सत्संग आणि भक्ती रस 

✪ अम्मांच्या दर्शनाचा योग 

✪ रात्रीच्या वेळचा किनारा! 

 

नमस्कार. १९ जानेवारीची सकाळ. पिरावोमच्या आयसीएफ परिसरात सकाळी लवकर आवरून स्वामी सुंदर चैतन्यजींसोबत चहा घेतला. इथे काल एक कार्यशाळा सुरू होती आणि गंमत म्हणजे त्यातले बरेचसे लोक महाराष्ट्रीयन होते! स्वामीजींसोबत परत गप्पा झाल्या. त्यांचं तमिळ नाडूतलं गाव, लोक संपर्क, संघाचं काम आणि नंतर ते चिन्मय मिशनसोबत जोडले गेले तो अनुभव! अतिशय मनमिळावू. स्वामी असल्याचा कोणताच अहंकार नाही! अखेर निघायची वेळ झाल्यावर त्यांचा निरोप घेतला आणि निघालो! आजचा टप्पा ११० किलोमीटरचा आहे. आणि काही अंतर गेल्यावर "तो" भेटणार आहे! इथून पुढे जवळ जवळ प्रत्येक दिवशी तो सोबत असेल! 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) 

पिरावोममधून बाहेर येईपर्यंत थोडं अंतर कालच्या सारखा मोबाईल समोर ठेवून नकाशा लावला होता. मुख्य रस्त्यावर आल्यावर मोबाईल काढला. अनेक हॉटेल बघितल्यावर चहा- बिस्कीटासाठी एक हॉटेल ठीक वाटलं. इडली चटणीसुद्धा मिळाली. इथे पिण्याचं पाणी गरमच देतात. हॉटेलमध्ये नारायण गुरूंचा फोटो! मानस सरोवर मार्गावर धारचुलाच्या पुढे ज्यांचा आश्रम आहे ते नारायण गुरू मुळचे केरलमचे! हॉटेलवाल्यासोबत थोडं बोलणं झालं. मल्याळम कानावर पडताना खूपसं संस्कृतसारखं वाटतं! 

.. 

पुढे काही अंतर रस्ता सरळ आहे. अगदी राष्ट्रीय महामार्ग नसला तरी मोठा आहे आणि वाहतुकसुद्धा खूप आहे. समुद्र किनारा हळु हळु जवळ येतोय! पण चक्क हवामानसुद्धा बदललं आहे. एकदम ढगांची दाटी झालीय! थोडे थेंब पडायला सुरूवात होते आहे. छोट्या छोट्या उपनगरांमधून रस्ता पुढे जातोय. आलापुळ्ळा (Alapuzza) च्या आधी एक प्रचंड मोठा खाडी पूल लागला! इतका विस्तीर्ण पूल! पलीकडे दुसरा किनाराच दिसत नाहीय! सगळा अथांग समुद्रच वाटतोय. आणि असं‌ वाटतंय की, मी खोल समुद्रात जातोय का काय! पण रस्ता अगदी अरुंद असल्यामुळे निवांत थांबून फोटो घेता आले नाहीत. काय विलक्षण परिसर आहे! वाटेत एका ठिकाणी भागवत सप्ताहाचं आमंत्रण लाउड स्पीकरने दिलं जातंय! अगदी कोकणासारखा परिसर. लाल माती आणि कुठे कुठे कौलारू घरंसुद्धा! खाडीमध्ये होड्या! नारळाची झाडं! 

इथल्या छोट्या हॉटेलमध्ये चिक्कीसुद्धा मिळते आहे. त्यामुळे माझी चांगली सोय होतेय. पुढे सायकलची दुकानंसुद्धा लागली. परत एकदा ब्रेक चेक करून घेतला. काहीच झालेलं नाहीय, मॅकेनिकने सांगितलं. आलापुळ्ळामध्ये हायवेची बरीच डायवर्जन्स आहेत. इथून थिरूवनंतपूरम- कन्याकुमारीचा महामार्ग परत समोर आला. रस्ता अगदी समुद्राजवळून जातोय आता, पण अजून मोठा "तो" दिसत नाहीय! कारण घरं- दुकानं- वस्ती इतकी जास्त आहे की, मोकळा परिसरच नाहीय! बरंच पुढे आल्यावर आणि मुख्य मार्ग सोडून अमृतापुरीकडे जाणारा किनारी रस्ता घेतल्यानंतर कुठे खुला समुद्र दिसला! नंतर मग एका ठिकाणी रस्त्याला लागून मस्त वाळुचा किनाराच आला! विराट दर्शन झालं! अहा हा! आकाशही आता मोकळं झालं आहे. तिथेच एकाने मला थांबवून हिंदीमध्ये माझी छोटी मुलाखत घेतली! अनेक जण टीशर्टवर महाराष्ट्र लिहीलेलं बघून हिंदीतच बोलत आहेत! 

अथांग सागर! त्याची गर्जना! कुठे कुठे तर रस्ता इतका जवळून आहे की, लाटांचे तुषारही अंगावर येत आहेत! इतके डोंगर आणि चढ उतार पार केल्यावर मिळणारी समुद्राची अथांग स्थिरता! जणू मनाच्या सर्व विकारांचा अनुभव घेतल्यावर मिळणारी ध्यानाची समता! 

अमृतापुरीला पोहचण्याच्या आधीचे तीस किलोमीटर थोडे अवघड गेले. एक तर समुद्रालगतची आर्द्रता. शिवाय मला वाटेमध्ये ८०- ९० किलोमीटर झाल्यावर जेवण किंवा ब्रेकफास्टचं हॉटेलच मिळालं नाही. अमृतापुरीकडे जाणारा किनारी रस्ता तसा खूप शांत. पर्यटनाच्या नकाशाच्या बाहेर असावा, इतका शांत! इथे हॉटेल्स अगदीच थोडे. त्यातले बह्वंशी नॉन व्हेजचे. त्यामुळे तसंच पुढे पुढे यावं लागलं. पण समुद्राचा सत्संग असल्यामुळे हळु हळु जात राहिलो. वाटेत अनेक छोट्या खाड्यांवरचे पूलही लागले! अमृतापुरीपर्यंत समुद्राने सोबत केली!... 

अमृतापुरी येईपर्यंत बाहेर काहीच खुणा दिसल्या नाहीत. अमृता विद्यापीठ खाडीच्या पलीकडे आहे. आणि इकडे आश्रम. मला आश्रमातच जायचं आहे. दुपारी ३ वाजता आश्रमात पोहचलो. आजचे ११० किमी पूर्ण झाले. पोहचल्यावर रवीजींना फोन केला. मूळचे गोव्याचे असलेले ब्रह्मचारी रवीजी अनेक वर्षांपासून इकडेच राहतात. त्यांनी माझी खूपच काळजी घेतली. नोंदणी- प्रवेश प्रक्रिया सोपी करून दिली. इतकंच नाही‌ तर जेवणाची वेळ संपूनही त्यांनी माझ्यासाठी ताट आणून दिलं! मराठीत छान गप्पा सुरू झाल्या! नंतर थोडा वेळ आराम केला. 

अमृतापुरी आश्रम! आणि माँ अमृतानंदमयी अम्मा! त्यांच्याबद्दल जास्त माहिती नव्हती. पण रवीजी म्हणाले की, त्या इथे आहेत आणि त्यांचं दर्शनही होईल. फार काही अवघड नव्हतं. थोडा वेळ रांगेत थांबून अम्मांचं दर्शन घेतलं! त्या लोकांना कसं दर्शन देतात, कसा आशीर्वाद देतात आणि जवळ घेतात हे बघितलं आणि मलाही तोच अनुभव मिळाला. अनेक वयाने मोठे असलेले लोकही रडल्यासारखे वाटत आहेत! मला जवळ घेऊन त्या कानात काही कुजबुजल्या! असं दर्शन झालं! प्रसादही मिळाला. बाकी‌ तिथले भजन- कीर्तन थोडा वेळ बघितलं! चक्क आश्रमामध्ये लक्ष्मी नावाची हत्तीणही आहे! अनेक विदेशी लोक दिसले. रवीजी सांगत आहेत की, जे लोक अम्मांना ओळखतात, त्यांच्यासाठी त्या देवच आहेत. 

रवीजींनी त्यांच्या सोबतच्या ब्रह्मचारींसोबत माझी ओळख करून दिली. कोणीच साधक असल्याचा काही विशेष भाव ठेवलेले वाटत नव्हते. सहजपणे बोलत होते. आश्रमात भारतभरातून लोक आलेले दिसले. संध्याकाळी रवीजींनी मला पूर्ण आश्रम फिरून दाखवला. अम्मा कोण होत्या, काय काय करत गेल्या, हा आश्रम कसा सुरू झाला, त्या लोकांना कसं सतत दर्शन देतात हे सांगितलं. त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. 

रात्री रवीजींनी मला समोरच्या आश्रमाच्या खाजगी बीचवर नेलं! रात्रीच्या भर अंधारात बीचवर जाण्याचा अनुभव! अंधारात न दिसणारा तो! पण त्याची उपस्थिती, त्याची विलक्षण गाज आणि वारं! अहा हा! काही क्षण तिथे घालवले. खूप वेगळा अनुभव वाटला. आठवा दिवस पूर्ण झाला. एक खूप वेगळ्या ठिकाणी व वेगळ्या वातावरणात राहता आलं! इतके स्वामी, ब्रह्मचारी व साधकांसोबत राहता आलं! पुढच्या दिवसांमध्येही हा क्रम सुरू राहील! आणि आता दररोज सोबतीला "तो" असेल! आजच्या दिवसाबद्दल अजून एक- आज ओशो पुण्यतिथी होती! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ९: अमृतापूरी- थिरूवनंतपूरम १०० किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 मे 2026.


अनुभव ९: अमृतापूरी- तिरूअनंतपूरम १०० किमी

लेखकमार्गीयांनी रविवार, 24/05/2026 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

✪ चिन्मय मिशन पद्मनाभ केंद्रात भेट 

✪ रस्ता, डायवर्जन आणि परत रस्ता 

✪ "आर्याज" हॉटेलातला अप्रतिम केरळी उपमा! 

✪ तिरूअनंतपूरम- दक्षिणेकडील महानगर 

✪ प्राचीन आणि रमणीय मंदिरं 

✪ स्वामी सुधीर चैतन्यजींसोबत संवाद 

✪ “Appointments and disappointments!” 

 

नमस्कार. २० जानेवारीची सकाळ. अमृतापुरीमध्ये ब्रह्मचारी रवीजींनी छान व्यवस्था केली होती. त्यांच्याशी छान बोलणं झालं. अगदी घरच्याप्रमाणे त्यांनी सोबत केली. सकाळचा चहा घेतला, आठवणीसाठी रवीजींसोबत फोटो घेतला आणि निघालो. “त्याच्या" सोबत पुढचा प्रवास सुरू झाला! कधी कधी विश्वास बसत नाहीय मी इथे सायकल चालवतोय आणि इतकं कुठे कुठे फिरतोय! गेल्या आठ दिवसांमध्ये कुठे कुठे जाऊन इथे आलोय, हे लवकर आठवतसुद्धा नाहीय! खरंच माझं नशीब! आणि हे करण्याची मला बुद्धी झाली! 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) 

.. 

सायकल दौ-याच्या आयोजनामध्ये समन्वयन- कोऑर्डिनेशनसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. थांबण्याचे टप्पे, तिथे भेट द्यायची त्या संस्था, राहण्याची सोय इ. प्रत्यक्ष पेडलिंग, योग्य आहार, योग्य विश्रांती, गरजेनुसार इलेक्ट्रॉल ह्यासोबत हे समन्वयनसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणीची टीम सगळ्या टप्प्यांचं नियोजन करते आहे. ओळखीतल्या- परिचयातल्या व्यक्ती व संस्थांशी संपर्क सुरू आहे. त्यामुळेच तर बराचसा प्रवास खूप सुलभ होतो आहे. अनेक नवीन व्यक्ती व संस्थांशी ओळखीही होत आहेत. 

सकाळच्या शीतल हवेत पहिला टप्पा पूर्ण केला. समुद्र किना-याने काही अंतर जाऊन परत मुख्य महामार्ग आला. पण हा महामार्ग डायवर्शन्स म्हणजे विचलनांनी भरलेला आहे! रस्ता- डायवर्जन आणि रस्ता असा क्रम सुरू राहिला! त्यात कुठे कुठे मोठ्या वाहनांची दाटी. साधारण ३० किलोमीटर अंतरावर नाश्त्यासाठी थांबलो. आर्याज नावाच्या हॉटेल फ्रँचायजीमध्ये अतिशय उत्तम असा उपमा मिळाला! कधीही विसरणार नाही इतका स्वादिष्ट! 

सायकलिंग आता खूप सोपं झालंय. इतके दिवस सलग राईडस करतोय, त्यामुळे पायांमध्ये खूप शक्ती आली आहे. स्नायु सरावले आहेत. एक मूमेंटमसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे आता विशेष दमायलासुद्धा होत नाही. फक्त इतर घटकांमुळे थोडा फरक पडतो. दुपारनंतर परत किना-यालगतचा दमटपणा सुरू झाला. शिवाय महामार्ग असल्यामुळे झाडं व सावल्या नाहीच. पाणी पीत राहिलो आणि ओआरएससुद्धा घेतलं. नंतरच्या टप्प्यावर जेव्हा काही खावसं वाटलं, तेव्हा नेमकं व्हेज हॉटेल नाही मिळालं. चहा- बिस्कीट आणि चिक्क्या असंच खाल्लं. रस्ता तसा समतलच आहे. चढ- उतार नाहीत. हळु हळु तिरूअनंतपूरम जवळ येतंय. मनातल्या मनात रँडम गाणी ऐकतोय आणि सायकलिंगचा आनंद घेतोय. 

भारताने पहिलं रॉकेट जिथून सोडलं ते थुंबा नकाशात जवळच दिसलं! तिरूवनंतपूरम! केरलमची राजधानी आणि दक्षिणेतलं एक मोठं शहर! मोठ्या इमारती, विस्तीर्ण शहरी वस्ती आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं. दुपारची वेळ असल्यामुळे विशेष रहदारी नाही आहे. अगदी वेळेत म्हणजे १ वाजता चिन्मय मिशनच्या पद्मनाभ नावाच्या मुख्य केंद्रात पोहचलो. बरोबर १०० किमी झाले. ईशा आदि योगीपासूनचे सलग चार दिवसांमध्ये चार शतक झाले. स्वामी सुंदर चैतन्यजींनी इथे बोलून ठेवलं आहेच. स्वामी सुधीर चैतन्यजी बाहेर गेले आहेत. 

चिन्मय मिशनचं हे कॉरपोरेट कार्यालय आहे. प्रशासन, समन्वयन, बैठका, कार्यशाळा, प्रशिक्षण इ. इथे होतात. व्हॉलंटीअर्स राहण्याच्या डॉर्मिटरीमध्ये मला राहायची जागा मिळाली. इथे व्हॉलंटीअर असलेला एक जण पूर्वी ईशा केंद्रात होता, असं म्हणाला. त्यांच्याशी अनौपचारिक संवाद झाला. दुपारचं जेवण खूप दिवसांनी घरासारख्या ठिकाणी केलं! किचनमधल्या ताईसुद्धा एक एक शब्दाने पण आपुलकीने विचारपूस करत आहेत!.... 

आज टप्पा थोडा छोटा असल्यामुळे दुपारी लॅपटॉपवर थोडं काम करता आलं. ह्या सगळ्या प्रवासात असं काम करण्यासाठीच लॅपटॉप जवळ ठेवला आहे. काही काही दिवस तरी काम करता येतंय. संध्याकाळी स्वामी सुधीर चैतन्यजी भेटले. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. चिन्मय मिशनने आधी एकदा तिरूअनंतपूरम ते कासारगोडा (दक्षिण ते उत्तर केरलम) अशी सायकल यात्रा केली होती. त्याबद्दल त्यांनी सांगितलं. ते स्वत:ही त्यात होते. त्यावेळी ते लोक त्या त्या ठिकाणी थांबून योग सत्रही घेत होते. संध्याकाळी ते मला पद्मनाभस्वामी मंदिर आणि अत्तुकाल भगवती मंदिर दाखवायला घेऊन गेले. दक्षिणेतली मंदिरं खूपच वेगळी आहेत! अतिशय सुंदर असं सूक्ष्म कला असलेलं बांधकाम! ती गोपुरं! खूप वेगळी भव्यता! हे बघताना प्रश्न पडतो की, आज अशी भव्य, सुंदर आणि तितकीच सूक्ष्म निर्मिती करणारे लोक कुठे असतील! 

एकूणच दक्षिण भारतात वेगळी शिस्त आणि मेहनतीची वृत्ती जाणवते. भाषेचा किंवा पार्श्वभूमीचा फरक असूनही लोक सहज बोलतात. हावभावातून संवाद होतो. अगदी एक- दोन शब्दांमधूनही छान बोलणं होतं! 

स्वामी सुधीर चैतन्यजी नंतर त्यांच्या साधनेमध्ये आणि पूजेमध्ये व्यस्त आहेत. चिन्मय मिशनच्या ह्या कार्यालयामध्ये स्वामी चिन्मयानंदांचा छान पुतळा आहे. जागोजागी त्यांचे सुविचार लावलेले आहेत. काही काही सुविचार तर अगदी सटीक आहेत. उदा., “Disappointment can come only to those who make an appointment with the future!” “In life, to handle yourself, use your head and to handle others, use your heart!” 

असा मस्त दिवस गेला. उद्या १० वा दिवस आणि हा दौरा अर्धा पूर्ण होईल! कन्याकुमारी! आणि हो, आता डोंगर जवळपास संपले. पुढे कुठेच घाट किंवा चढ लागणार नाहीत! आणि अगदी सहज पुढचे टप्पे होतील... पण हा भ्रम होता! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १०: तिरूअनंतपूरम- कन्याकुमारी ९४ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 24 मे 2026.


 अनुभव १०: तिरूअनंतपूरम- कन्याकुमारी ९४ किमी

लेखकमार्गीयांनी सोमवार, 25/05/2026 16:46 या दिवशी प्रकाशित केले.

✪ अखंड सुरू‌ राहणारी गावं! 

✪ अगस्त्यमलाई पर्वतरांग! 

✪ सुचिंद्रमचं अप्रतिम मंदिर 

✪ दूरवरून दिसणारा अगाध आणि अथांग तो 

✪ योग आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारं विवेकानंद केंद्र 

✪ सायकलवर कन्याकुमारी- स्वप्नपूर्ती 

✪ निवेदिता ताईंसोबत संवाद नमस्कार. 

२१ जानेवारीची सकाळ. तिरूअनंतपूरम! आज मोठा दिवस आहे! कन्याकुमारी! अर्धा प्रवास पूर्ण होईल. खरंच विश्वास बसत नाहीय. कन्याकुमारीला सायकलवर जायचं‌ हे अनेक सायकलिस्टचं स्वप्न असतं! आज ते पूर्ण होणार. टप्पा छोटा म्हणजे ९४ किलोमीटरचाच आहे. सलग चार शतकं झाल्यानंतर आता टप्पे थोडे लहान आहेत. आज केरलममधला शेवटचा दिवस! १६ वर्षांपूर्वी कन्याकुमारीला गेलो होतो, त्यावेळच्या आठवणी आहेत. तीन बाजूंनी समुद्र आणि जमिनीचं टोक! आणि त्याबरोबर निमुळता होत जाणारा पश्चिम घाट! 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)..... 

तिरूअनंतपूरमधून बाहेर पडून महामार्गावर आलो. वाहनांची विशेष गर्दी नाहीय. सकाळची प्रसन्न हवा! हा महामार्ग छोट्या गावांमधून जातोय. किंवा छोट्या गावांचा एक प्रदेशच सुरू आहे असं‌ वाटतंय. मागच्या वेळच्या तुलनेत मार्ग मोठा झालाय आणि काही‌ गावांमध्ये पूल झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर गर्दी अशी नाहीय. दूरवर डोंगर रांगा दिसत आहेत! अगस्त्यमलाई पर्वतरांग! ऋषी अगस्त्य आणि दक्षिण भारताचं खूप विशेष नातं आहे. त्यांना तमिळ भाषेचा जनक मानलं जातं. शिवाय आकाशातल्या अगस्त्य तार्‍याचाही इथे विशेष संबंध आहे. रात्रीच्या आकाशातला दुसरा सर्वांत तेजस्वी तारा अगस्त्य- पूर्वीच्या काळी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे (precession) तो पूर्ण भारतातून नाही तर फक्त ह्या अगस्त्यमलाई रांगांच्या परिसरातून- भारताच्या अगदी दक्षिणेकडच्या टोकावरूनच दिसायचा! आज हा अगस्त्य तारा दिल्लीवरूनसुद्धा दिसू शकतो. कुठेही फिरताना हे वेगवेगळे पैलू आणि पार्श्वभूमी लक्षात असली पाहिजे. असो! 

तिरूअनंतपूरम- कन्याकुमारी महामार्गाचं‌ एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर सुंदर चढ आहेत. छोट्या छोट्या टेकड्या लागतात आणि दृश्य छान दिसतं. काही अंतर समुद्र किंचित बाजूला राहतो. एका हॉटेलात इडली- चटणी असा नाश्ता करून पुढे निघालो. नवीन महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाहीय. त्यामुळे एका ठिकाणी जाऊन परत मागे येऊन जुन्या सिंगल लेन महामार्गावर जावं लागलं. तमिळ नाडू सुरू झाला! परत काही‌ अंतरासाठी दाटीवाटीची गावं लागली. अशाच एका गावात पाणी पिण्यासाठी थांबलो असताना स्वच्छता करणार्‍या दोन महिला भेटल्या. त्यांनी नजरेनेच माझी विचारपूस केली. त्या हसून आणि हावभावाने माझ्याशी बोलल्या, की सगळं ठीक आहे ना. 

कन्याकुमारीचे बोर्डस दिसत असल्यामुळे "कन्याकुमारीचा" उल्लेख असलेलं गाणं आठवलं! मनातल्या मनात असे रँडम गाणे ऐकत पेडलिंग करत राहिलो. मध्ये मध्ये डोंगर आणि तळ्यांची सुंदर दृश्यं आहेतच. नागरकॉईल ओलांडलं. सुचिंद्रमचं मंदिर नक्की पाहा, असं मित्राने सांगितलं आहे. त्यामुळे सुचिंद्रममध्ये आल्यावर बायपास न घेता गावातून गेलो. मंदिर रस्त्यावरच लागलं. खरोखर थक्क करणारी वास्तुकला! आता वाटेत अशी बरीच मंदिरं लागणार आहेत! 

सुचिंद्रमनंतर थोडा ग्रामीण परिसर सुरू झाला. गावांमध्ये मोकळं अंतर दिसतंय. कन्याकुमारी साधारण १० किलोमीटर होतं तेव्हा दूरवर अथांग आणि अगाध असा "तो" दिसला! अहा हा! हिमालय उतरताना दूरवर जमीन दिसावी तसा! विलक्षण! छोटे छोटे ओहळ वाटेत लागत आहेत. समुद्र जवळून दिसत नाहीय. आलं कन्याकुमारी! कन्याकुमारी आलं तसा मोठा वारा सुरू झाला! समुद्री वारे! कन्याकुमारीसुद्धा आता खूप मोठं शहर वाटतंय! आधी थेट किनार्‍याकडे गेलो. गाव ओलांडून बीचजवळ आलो. विवेकानंद रॉक मेमोरियलचा रस्ता थोडा चुकला. त्यामुळे बाजूच्या दुसर्‍या बीचवर पोहचलो! तिथून तीन बाजूंचा समुद्र बघितला! एका पोलिसांनी माझा फोटो घेऊन दिला. सायकल प्रवासाच्या ह्या टप्प्यावर थोडं मनोगतही रेकॉर्ड केलं! कन्याकुमारीच्या विवेकानंद जयंतीला १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थेतून सुरू करून दहाव्या दिवशी विवेकानंद केंद्रामध्ये पोहचलो!...... 

काही‌ क्षण किनार्‍यावर थांबलो. डोळे भरून "त्याला" बघितलं! त्याचा वारा अंगावर घेतला. आणि हळु हळु परत रस्त्यावर आलो आणि विवेकानंदपुरममधल्या विवेकानंद केंद्रात आलो. आजचे ९४ किलोमीटर पूर्ण झाले. रिसेप्शनमध्ये इथले प्रमुख सुनीलजी भेटले. आधी बोलणं झाल्यामुळे रूम लगेच मिळाली. विवेकानंद केंद्राचाही परिसर खूप वाढल्यासारखा वाटतोय. अगदी गावाच्या आतलं छोटं गाव वाटतंय हे. आंघोळ केल्यावर समोरच्याच कँटीनसारख्या हॉटेलात जेवण केलं. दुपारी आराम केला. 

संध्याकाळी विवेकानंद केंद्रात हे केंद्र उभं करणार्‍या एकनाथजी रानडेंच्या जीवन कार्याची माहिती देणारं संग्रहालय बघितलं. विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिताताई भिडेंना भेटलो. त्या जीवनव्रती आहेत आणि गेली अनेक दशकं विवेकानंद केंद्रासाठीच काम करतात. इथला आतला परिसर विलक्षण सुंदर आहे. आतमध्ये मोरसुद्धा राहतात! नंतर स्वामी विवेकानंदांच्या जीवनाबद्दलचं दुसरं एक संग्रहालयसुद्धा बघितलं. विवेकानंद केंद्राचा एक वेगळा बीच आहे. उद्या सकाळी तो बघून पुढचा प्रवास करेन. 

विवेकानंद केंद्र योगाच्या क्षेत्रातही मोठं काम करतं! मला आठवतं, अगदी लहानपणापासून परभणीत नेतीसाठी वापरली जाणारी नेतीपात्रं विवेकानंद केंद्रातच बनवली जायची. निरामय संस्थेचा विवेकानंद केंद्रासोबत तेव्हापासून संबंध आहे. विवेकानंद केंद्रामध्ये बहिरंग योगाबरोबर अंतरंग योगावरही तितकंच काम केलं जातं. वर्षातून दोनदा महिनाभराचे अभ्यासक्रम होतात आणि योग शिबिरंही होत असतात. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं काम विवेकानंद केंद्र आणि देशभरातले त्यांचे कार्यकर्ते करतात. इथे आधी थोडं अजून व्यवस्थित बोलणं झालं असतं तर इथल्या लोकांसोबत संवाद करू शकलो असतो. संध्याकाळी सुनीलजींसोबतही परत भेट झाली. वेळ कमी असल्यामुळे रॉक मेमोरियल बघता आलं नाही. आणि उद्या निघताना परत बीचवर जाईन. 

२० दिवसांच्या प्रवासातले १० दिवस पूर्ण झाले! मुख्यत: पश्चिमेकडे व दक्षिणेकडे असलेला प्रवास आता दिशा बदलेल! एका रात्रीत भारताच्या पश्चिम किनार्‍यावरून पूर्व किनार्‍याकडे पोहचेन! पुढच्या टप्प्यामध्ये अनेक गावं खूप छोटी आहेत. आणि बर्‍याच ठिकाणी कोणताच संपर्क झालेला नाही. त्यामुळे माझ्या काकाचे मित्र विजय राजमोहनजींच्या माध्यमातून सेवा भारती दक्षिण तमिळ नाडूसोबत संपर्क केला. पुढचा प्रवास, संस्थांच्या भेटी व राहण्याची व्यवस्था ह्यासाठी ते मदत करतील. अर्ध्या टप्पा पूर्ण झाल्यावर मनामध्ये एकच एक भावना सतत येते आहे. ती म्हणजे कृतज्ञता! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ११: कन्याकुमारी ते तिरूचेंदूर ९१ किमी वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 25 मे 2026.



अनुभव ११: कन्याकुमारी ते तिरूचेंदूर ९१ किमी

लेखकमार्गीयांनी मंगळवार, 26/05/2026 20:38 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पूर्वेकडचा प्रचंड वारा! 

✪ शेकडो पवनचक्क्यांच्या आसमंतात 

✪ तमिळ नाडूची शांत गावं! 

✪ "तो" जवळच आहे पण दिसत नाही (जलवा जो ओझल भी है सामने भी है) 

✪ तिरूचेंदूरचं विलक्षण अरूलमिगु सुब्रमनिया स्वामी मंदिर 

नमस्कार. २२ जानेवारीची पहाट. विवेकानंद केंद्रातल्या बीचवर जायचं असल्यामुळे थोडं लवकर आवरलं. केंद्राच्या कँपसच्या आतमध्ये बीचकडे जाणारा रस्ता आहे. परिसर खूप छान जपला आहे. सूर्योदयासाठी अनेक जण आलेले आहेत! महाराष्ट्रात बीचवर सूर्यास्ताची सवय असते! इथून पुढे बीचवर सूर्योदय असेल! खूप शांत आणि सुंदर बीच आहे. काही क्षण तिथे थांबलो. पूर्वेला ढग आहेत, त्यामुळे सूर्योदय तर दिसणार नाहीय. केंद्राच्या रिसेप्शनमधल्या व्यक्तींकडे रूमची किल्ली देऊन निघालो. आजपासून खूप वेगळ्या गावांचा टप्पा सुरू होईल! वाटेतमध्ये विशेष ओळखीसुद्धा नाही आहेत आणि संस्थापण माहिती नाही आहेत. बस ९०- ९५ किलोमीटर अंतरावर थांबायचं, इतकंच माहिती आहे. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.).... 

सकाळी रहदारी अगदी कमी आहे. त्यामुळे कन्याकुमारीच्या बाहेर लगेचच आलो. पण हाsss वारा! तोही पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारा! म्हणजे माझ्या बरोबर विरुद्ध दिशेला. हा असाच राहिला तर नक्कीच माझा वेग कमी होईल! आणि मनात लगेचच शंका आली, इथेच किनार्‍यावर इतका वारा असेल तर पुढे पंबनचा पूल आणि धनुषकोडीला तर किती जास्त वारा असेल! थोडं पुढे आल्यावर मोकळा निसर्ग परत मिळाला! गेले अनेक दिवस दाट वस्तीच्या केरलममध्ये होतो. त्यामुळे झाडं, शेतं, मोकळा निसर्ग बघायला मिळाला नव्हता. इथून पुढे परत तसा परिसर मिळणार! रस्तेही तसे आतलेच. पण उत्तम दर्जाचे! 

एका चौकात हॉटेलमध्ये थांबलो. चहा बिस्किट आणि बाजूला दुसर्‍या हॉटेलात इडली चटणी असा नाश्ता केला. केळीच्या पानावरच इथे पदार्थ वाढले जातात. इथल्या एका मंदिरात पुणे जिल्ह्यातल्या एका गावाने देणगी दिलेली दिसली! मध्ये मध्ये लागणारी मंदिरंही सुंदर आहेत. चर्चसुद्धा काही ठिकाणी आहेत. पुढे मुख्य मार्गाला आलो तेव्हा अनेक सायकलिस्टस दिसले. बहुतेक ते २०० किलोमीटरची राईड करत असावेत. काही अंतर महामार्ग लागला. नंतर तिरूचेंदूरसाठी रस्ता परत किनार्‍याच्या बाजूला वळला. इथे चक्क ECR लिहीलंय! म्हणजे ईस्ट कोस्ट रोड सुरू झाला! व्वा! 

तिरूचेंदूर बहुतेक प्रसिद्ध गाव आहे. त्यामुळे खूप ठिकाणी त्याचं अंतर लिहीलेलं दिसतं आहे. त्याबरोबर तिरूनेलवेली, टुटीकोरीन (तूतुकडी) अशा गावांचे अंतरही दिसत आहेत. पण वारा फार जास्त आहे! वेग लक्षणीय प्रकारे कमी होतोय. साधारण २१- २२ प्रति तास मिळणारा वेग अगदी १७- १८ किमी तास इतका कमी होतोय. इतक्या वार्‍यामुळेच पवनचक्क्याही आहेत इथे. आणि पुढे गेल्यावर तर अक्षरश: शेकडो पवनचक्क्या लागल्या! नक्कीच इथे मोठा वारा नेहमी वाहत असला पाहिजे. पण ह्याचाच अर्थ मला पुढेही हा उलटा वारा लागणार! रोज पोहचायला एक तास उशीर होणार! असो. 

रस्ते अतिशय सुंदर. कुठेच काही कमतरता नाही. शाळांमध्ये जाणारी मुलं हात करतात! एखादी बस जाते तेव्हा बसमधून मुलं वळून बघतात! आज अकरावा दिवस आहे. सायकलीला काहीही झालं नाहीय. कदाचित पुढेही साधं पंक्चरही होणार नाही असं वाटतंय. तिच्याकडे लक्ष मात्र द्यावं लागेल. तिच्याशी बोलत राहावं लागेल, तिचं ऐकत राहावं लागेल! 

११.३० च्या सुमारास अजून एकदा ब्रेकफास्ट केला. हॉटेलमधल्या लोकांसोबत अनौपचारिक बोलणं छान होतं. लोक बघता येतात, वाचता येतात! ह्या सगळ्या रस्त्यावर "तो" अगदी जवळ आहे. पण जवळ असूनही दिसत नाही! अगदी कुठे कुठे दूरवर त्याची निळी पट्टी दिसतेय. पण जास्त करून तो "जलवा जो ओझल भी है सामने भी है" आहे! 

तिरूचेंदूरजवळ सेवा भारतीच्या एका कार्यकर्त्यांचं फार्म हाऊस आहे असं कळालं. पण ते थोडं लांब आणि तिथे कोणीच राहात नाहीत. आणि तिरूचेंदूरचं मंदिर बघण्यासारखं आहे. त्यामुळे तिरूचेंदूरमध्येच थांबायचं ठरवलं. श्री. विजय राजमोहनजींनी तिथली व्यवस्था केली. इथे सध्या यात्रा सुरू असलेली दिसते आहे. लोक अनवाणी पायी जाताना दिसतात. सोबत ऊस घेतलेला दिसतो. जसं उटीच्या बाजूला दिसत होतं तसंच दृश्य. गावातही खूप गर्दी असेल, असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात गावात सुरूवातीला तेवढी गर्दी वाटली नाही. प्रसिद्ध असलं तरी लहान रस्त्यांचं छोटं गावच वाटतंय. 

उलट्या वार्‍यामुळे साडेचार तासांच्या ऐवजी साडेपाच तास लागले. दुपारी १.३० ला तिरूचेंदुरला पोहचलो. मंदिराजवळच्या एका हॉटेलमध्ये आज थांबेन. हॉटेलात थांबण्यापेक्षा होम स्टे आवडला असता. किंवा कार्यकर्त्यांच्या घरीसुद्धा. पण शेवटी श्री. विजय राजमोहनजींनी सांगितल्याप्रमाणे हॉटेलात थांबलो. आजचे ९१ किलोमीटर आणि ११ दिवसांचे १०१७ किलोमीटर पूर्ण झाले!....... 

संध्याकाळी मंदिर आणि बीच बघायला बाहेर पडलो. इथे मंदिरात जाताना ड्रेस कोडचा फार विचार करावा लागतो! इथल्या देवाच्या अटी फार असतात! मंदिर परिसरातही उघडेबंब फिरणारे लोक दिसत आहेत. त्यामुळे मी अगदी आत न जाता बाहेरून परिसर बघेन. अहा हा! काय सुंदर उंच मंदिर आहे! विलक्षण! इतक्या लहान गावात इतकं भव्य आणि सुंदर मंदिर कसं काय असू शकतं! आणि एकच नाही, तर परिसरात बरीच छोटी मंदिरं आहेत. अरूलमिगु सुब्रमनिया स्वामी हे मुख्य मंदिराचं नाव. तिरूचेंदूर, तिरूपती किंवा तिरूअनंतपूरममधला थिर शब्द सुंदर आहे. स्थिर, शाश्वत असा त्याचा अर्थ! 

अरे! इतक्या गर्दीत चक्क एक हत्तीसुद्धा जाताना दिसतोय. लोक तर प्रचंड आहेतच! कोणी मला ड्रेस कोड न पाळल्यामुळे अडवेल का, अशी भिती बाळगत बाळगत पुढे गेलो. बरेचसे लोक चपला न घातलेलेही आहेत. पण काही जण चपलावालेही आहेत! पुढे तसंच जाऊन कठड्याकडे आलो! आणि समोर तो! अहा हा! समोरच बीच आहे! मंदिराचं शिखर खूप वेळ बघितलं. इतरही वास्तु सुंदर आहेत! कळसाच्या बरोबर वर चंद्र दिसतोय! वा! बीचवरही अनेक जण आहेत. थोडा वेळ नुसता उभा राहिलो. मनसोक्त परिसर बघितला. बीचवर चहासुद्धा मिळाला! दक्षिण भारतीय मंदिरं! वेगळी वेशभुषा- केशभुषा! पांढर्‍या आणि इतर रंगाच्या दक्षिण भारतीय साड्या नेसलेल्या महिला! गजरेही वेगवेगळ्या रंगांचे! 

अंधार पडल्यावर "त्याच्या" वर उगवलेला गुरूसुद्धा दिसला. गर्दीमधून हळु हळु परत फिरलो. दुपारी जेवलो होतो तिथे उत्तप्पा घेतला. हॉटेलमधल्या लोकांशी थोडं बोलणं झालं. संध्याकाळचं जेवण घेऊन हॉटेलवर परत आलो. इथे कोणी भेटले नाहीत. किंवा शाळा- महाविद्यालयामध्येही भेटणं नाही झालं. पण लोक वाचता आले, गाव अनुभवता आलं! आणि मंदिर! खरंच माझा योग खूप चांगला आहे! चक्क ११ दिवस पूर्ण झालेसुद्धा! पुढचे दिवस खूप लवकर संपणार असं वाटतंय! शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळ जवळ परत मी कधीही इकडे येणार नाहीय ही जाणीव! त्यामुळे एक एक टप्पा, एक एक किलोमीटर किंवा एक एक पेडलही खूप युनिक अनुभव देतंय! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १२: तिरूचेंदूर ते सायलकुडी १०४ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 26 मे 2026.


अनुभव १२: तिरूचेंदूर ते सायलकुडी १०४ किमी

लेखकमार्गीयांनी बुधवार, 27/05/2026 19:05 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ग्रामीण तमिळ नाडूतल्या लोकांसोबत संवाद! 

✪ टुटिकोरीनचा औद्योगिक परिसर 

✪ ११००+‌किलोमीटरनंतर अखेर पंक्चर! 

✪ "अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे" न पाळल्याचा परिणाम! 

✪ सोलो सायकलिस्ट कधीच एकटा नसतो! 

✪ लोकांची सोबत आणि मदत 

✪ सायलकुडीमध्ये नित्यानंदमजी आणि शक्तीवीरजींसोबत गप्पा 

नमस्कार. २३ जानेवारीची सकाळ! हॉटेलमध्ये रात्रीच सांगितलं होतं की, सकाळी लवकर जाणार आहे. साधारण ६:४५ पर्यंत खाली येऊन सामान बांधायला लागलो. आज कोणाकडे थांबायचं आहे हे मी जाईपर्यंत ठरेल. सकाळचं‌ तिरूचेंदूर! पण अजूनही खूप वारा वाहतोय! रस्त्यावर आलो आणि कालच्यासारखाच वारा जाणवला! काल तिरूचेंदूर जवळ आलं तेव्हा अनेक कारखाने दिसत होते. आज टुटिकोरीनचा औद्योगिक पट्टा लागेल. थोडं‌ पुढे गेल्यावर धुर सोडणारे अजस्र कारखाने आणि औद्योगिक वसाहती दिसायला लागल्या. टुटिकोरीन अर्थात् स्थानिक भाषेत तूतुकडी! प्रत्यक्ष गाव येण्याआधी महामार्गाचं मोठं जंक्शन लागलं. एक महामार्ग थेट समुद्रावरच्या बंदराकडे जातोय. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)... 

बायपासने गेलो असतो तर बरंच फिरून जावं लागलं असतं. त्यामुळे गावातूनच पुढे गेलो. तूतुकडी शहर बघायला मिळालं. बरंच मोठं‌ शहर आहे. काही मंदिरंसुद्धा बघण्यासारखी आहेत. शहर ओलांडल्यावर थोड्या वेळाने परत बायपास रस्ता येऊन मिळाला. इथे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी रस्ताही धुळीने भरलेला आहे. एका हॉटेलमध्ये नाश्ता घेतला. इथे काही हॉटेलवाले थोडं थोडं हिंदी बोलतात. विशेषत: मुस्लीम असतील तर हिंदी बोलतात. इथे एक जण बंगाली‌ भेटला. त्याच्याशी हिंदीत बोललो. हा प्रवास कसा आहे, काय उद्देशाने व कुठून कुठे जातोय हे सांगितलं. 

हॉटेलमधून पुढे निघालो. ५० किलोमीटर होऊन गेले आहेत. अजून साधारण ६५ किमी बाकी‌ आहेत. सायकलिंगमध्ये अंतराचा विचार कधीच जास्त मी करत नाही. आत्ता समोरचा टप्पा- पुढचे १०- १५ किलोमीटर इतकंच नजरेसमोर ठेवतो. आणि खरं तर तेही नाही. अगदी चालू असलेला टप्पा- नजर जाईल तिथपर्यंतचा भाग. म्हणजे मग अंतराचं दडपण येत नाही. अंतराऐवजी ह्या प्रवासातली थांबण्याची व्यवस्था, जास्त भेटी गाठी कशा होतील, विद्यार्थ्यांसोबत संवाद कसा करायला मिळेल, असे विचार मनात सुरू होते. त्यामुळे एक चूक अखेर झाली! योगाच्या दृष्टीने सायकलिंग हे अखंड सजगतेचं काम आहे. प्रत्येक पेडल हा सजग राहूनच पुढे टाकला पाहिजे. कुठेही बेहोशी नको. "अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे!” पण नेमकं विचारांमध्ये असताना ही सजगता राहिली नाही! आणि नजर हटी, दुर्घटना घटी तसं झालं! 

सायकलने मला इशारा दिला होता. पण डोळ्यांवर जणू अंधारी आली होती. किंवा पंक्चर आता होऊच शकत नाही, ह्या भ्रमात मी होतो! त्यामुळे टायरचा थोडा आवाज झाला तेव्हा सायकल न थांबवता नुसतं वरवर बघितलं. असं वाटलं की, बॅनरची दोरी टायरला घासत असेल! पण हा सूचक इशारा होता! थक् थक् असा आवाज येत होता. पुढे तर तो अजून मोठा झाला! ढग् ढग् असा! आणि धक्काही जाणवतोय आता! सायकल थांबवण्याच्या आधीही दिसतंय की, काही तरी चिकटलंय टायरला! अखेर सायकल थांबवली आणि बघितलं काय झालंय! ओहह! एक खिळा घुसलाय! अगदी आतमध्ये रुतलाय. दिसायला कानातलं असावं तसा दिसतोय. हाताने जोर लावून तो काढला आणि झटकन हवा उतरायला लागली! पं क्च र!!! ११०० किलोमीटरनंतर अखेर पंक्चर! 

एकट्याने असं लांब फिरताना सायकलच्या दुरुस्तीचं पूर्ण किट सोबत ठेवावं लागतं. ते आहेच माझ्याकडे. पण नायलॉन टायर्स वापरत असल्यामुळे सहसा पंक्चर होतच नाही. त्यामुळे पंक्चर दुरुस्त करण्याचं कौशल्य अगदीच कामातून गेलंय. आधी इथे बघतो कोणी मॅकेनिक आहे का. हवा पूर्ण जाण्याआधी हळु हळु सायकल चालवत पुढे गेलो. समोरच एक दुकान दिसलं. दोन जण तिथे बसलेले आहेत. खुणेने आणि एक एक शब्द बोलून त्यांना विचारलं. पंक्चर. मॅकेनिक. हाऊ फार?‌ त्यांनी सांगितलं की, दोन किलोमीटर पुढेच मॅकेनिकचं‌ दुकान आहे. आता ते नक्की दोन किलोमीटर आहे की, चार किलोमीटर आहे हे कळायला मार्ग नाही. पण ते म्हणाले की, समोर जे टॉवर दिसतंय, त्याच्या पुढेच आहे! एक श्वास घेतला आणि सायकल हातात घेऊन जायला लागलो. बघू जे होईल ते! अचानक आलेल्या ह्या नवीनच परिस्थितीचाही आनंद घ्यायला लागलो! वीस मिनिटात पायी पायी चालत २ किलोमीटर पुढे पोहचलो. आणि इथे खरंच गॅरेज आहे! पहिल्या गॅरेजमध्ये गेलो. तो माणूस सायकल पंक्चर करत नाही म्हणाला! पण त्याने सांगितलं की, पुढेच सायकलचं दुकानसुद्धा आहे! अगदी जवळ! तिकडे जाताना अजून एक मॅकेनिकचं दुकान लागलं! तिथे सहज गेलो आणि खुणेने- एका शब्दाने सांगितलं की, असं असं झालंय. आधी तो माणूस नको म्हणाला. मग मी बोललो की, माझ्याकडे सगळं किट आहे. मीच पंक्चर काढतो. तुम्ही‌ फक्त मदत करा, कारण मला इतकं चांगलं जमत नाही. दोनच मिनिटांनी त्याने स्वत:चं सामान काढलं आणि पंक्चर काढायला सुरूवात केलीसुद्धा! माझ्या सायकलचे वॉल्व्ह मी बदलले होते. त्यामुळे त्याला काही अडचण आली नाही. अगदी हा हा म्हणता म्हणता त्याने पंक्चर काढूनही दिलं! परत ट्युब घमेल्यातल्या पाण्यात तपासली. बुडबुडे आले नाही! पंक्चर नीट झालंसुद्धा! त्याने ट्युब परत फिट करूनसुद्धा दिली. खूपच वेगाने त्याने काम केलं. पैसे घेत नव्हता, पण तरी ५० रूपये त्याला जीपेवर पाठवले. दोन मिनिट हावभावांनी बोललो! आणि निघालो! 

सगळा मिळून एक तास त्यात गेला. पण खूप चांगली दुरुस्ती झाली. मी दुरुस्त केलं असतं तर जास्त वेळ लागला असता आणि कदाचित दोन- तीन वेळेस करावं लागलं असतं. माझं नशीब खरंच चांगलं की, मला पंक्चर काढणारा मॅकेनिक लगेचच मिळाला! आणि तो आहे हे सांगणारे लोकही आधी मिळाले! सोलो सायकलिस्टसुद्धा एकटा कधीच नसतो! सायकलने इशारा दिलेला कळला असता तर कदाचित पंक्चर टाळता आलं असतं. वरवर रुतलेला खिळा आधीच काढता आला असता! कानाला खडा! सायकलकडे जास्त लक्ष देईन असं स्वत:ला सांगून पुढे निघालो. दर ४-५ किलोमीटरनंतर हवा तपासतो आहे. उत्तम आहे! मधल्या वेळेत मी ज्यांच्याकडे थांबणार आहे, त्या नित्यानंदमजींशी बोलणं झालं. अजून अर्ध अंतर बाकी आहे! छोटे छोटे टप्पे करून पुढे निघालो. दुपारी खूप गरम झालं आणि काही वेळाने पावसाचं वातावरण झालं. समुद्र दिसत नाहीय. 

३० किमी बाकी असताना परत एकदा नाश्ता केला. मध्ये मध्ये केळीही खाल्ली होती. सायलकुडीच्या काही अंतर अलीकडे रस्ता उजवीकडे वळला. गूगल मॅप एक शॉर्टकट दाखवतोय. पण स्थानिक लोकांना विचारून मुख्य रस्त्यानेच गेलो. ५ किलोमीटर अंतर बाकी असताना नित्यानंदमजींना कॉल केला व कसं यायचं विचारलं. त्यांनी मला तिथलं लोकेशन पाठवलं. पण प्रत्यक्ष पोहचल्यावर थोडा गोंधळ झालाच. त्यांचं लोकेशन योग्य जागी नव्हतं. थोडी चुकामुक व थोडा शोधाशोध! बरचसं गाव फिरल्यावर अखेर नित्यानंदमजी मला भेटले! त्यांचं घर तर मुख्य रस्त्यावरच आहे! त्यांच्याकडे गेल्यावर त्यांचा भूभू टायगरने स्वागत केलं! नित्यानंदमजी स्वभावाने मोकळे आणि बर्‍यापैकी इंग्लिश बोलू शकणारे! त्यामुळे गप्पा छान झाल्या. घरात त्यांच्या चेन्नैला काम करणार्‍या मुलाने काढलेलं बुद्ध चित्र बघायला मिळालं! आजचे १०४ किलोमीटर पूर्ण झाले! पोहचेपर्यंत ३:३० वाजले.

 . 

संध्याकाळी‌ ते आणि सेवा भारतीचे अजून एक कार्यकर्ते ऍडव्होकेट शक्तीवीरजींसोबत गप्पा झाल्या. जवळचं एक मंदिर बघायला आम्ही गेलो. दोघांनाही इंग्लिश बर्‍यापैकी येतंय, त्यामुळे चांगलं बोलणं झालं. मंदिराच्या पुजार्‍याची आर्थिक स्थिती चांगली नाहीय असं कानावर आलं. इथे सेवा भारती कसं काम करते, ह्याबद्दल दोघांनी सांगितलं. नित्यानंदमजींनी अजून एक गोष्ट सांगितली. त्यांचे पाय दुखायचे. त्यांनी‌ उत्कटासनाचा सराव केला. आणि नंतर त्यामुळे ते शबरीमलाच्या पायर्‍याही सहज चढू शकले. माझ्याशी इंग्लिश बोलणं त्यांना आवडतंय! अशी संधी कधी येत नाही म्हणाले. छान गप्पा झाल्या. 

आता उत्सुकता आहे ती पंबनचा पूल आणि धनुषकोडीची! उद्या पंबनच्या उंबरठ्यावर म्हणजे मंडपमला पोहचेन. 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १३: सायलकुडी ते मंडपम ८९ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 27 मे 2026.


अनुभव १३: सायलकुडी ते मंडपम ८९ किमी

लेखकमार्गीयांनी गुरुवार, 28/05/2026 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ नित्यानंदमजींकडचं इडियाअप्पम! 

✪ छोट्या गावातल्या लोकांसोबत गप्पा 

✪ We meet people if we don’t get deceived by their backgrounds 

✪ तळ्यांचा प्रदेश आणि मोरांची सोबत 

✪ पावसासोबत सायकलिंगचा आनंद 

✪ मंडपमचं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आणि प्रचंड वारे 

✪ सायकलिस्ट कथिरंगाजींच्या घरी मुक्काम नमस्कार. 

२४ जानेवारीची सकाळ! नित्यानंदमजींकडे छान आराम झाला. रोज नवीन ठिकाणी थांबताना आराम होणं महत्त्वाचं. पण एकदा हे रुटीन सेट झालं की, जिथे कुठे थांबतो तिथे आराम होतोच. मन त्यासाठी तयार होत जातं. सकाळी लवकर नित्यानंदमजीसुद्धा उठले आणि आम्ही त्यांच्या आवडीच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतला. त्यांनी मला वाटेत खाऊ म्हणून इडियाअप्पम दिलं. पांढर्‍या रंगाचा हा पदार्थ मला खूप आवडला! एक तर पचायला अगदी हलका. तितकाच पौष्टिकसुद्धा. आणि गंमत म्हणजे गोड किंवा तिखटासोबतही तो खाता येतो. सकाळी नित्यानंदमजींच्या टायगरला थोडं फिरवून आणलं. आठवणीसाठी शक्तीवीरजी व नित्यानंदमजींसोबत फोटो घेऊन निघालो. निघण्याच्या आधी मुक्कामाचं ठरलं. मंडपममध्ये सेवा भारतीच्या शुण्मुगा राजाजींनी कथिरंगाजींकडे थांबायला सांगितलं. नित्यानंदमजींचं एकदा कथिरंगाजींशी बोलणं करून दिलं, भाषेची अडचण नको म्हणून! 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)... 

सायकल प्रवासाचा तेरावा दिवस! निघण्याआधी हवा परत तपासली. काहीच कमी झालेली नाहीय! पंक्चरची दुरुस्ती अगदी उत्तम झाली आहे. नित्यानंदमजींचं घर महामार्गालगतच आहे. दोन मिनिटांमध्ये सायलकुडी गाव मागे पडलं. कन्याकुमारी जसं एक वेगळं टोक आहे, तसंच रामेश्वरम आणि मंडपम हेही वेगळं टोक. मंडपम मुख्य जमिनीचं टोक आणि रामेश्वरम बेटाचं धनुषकोडी हे पुढचं टोक! अशा ठिकाणी सायकल चालवण्याची मजा अनुभवायला मिळणार. पण मनात शंकाकुशंकासुद्धा आहेत. कारण वारा! भयाण वारा वाहतोय! 

इथून पुढचे बरेचसे टप्पे छोटे आहेत. शेवटचा पुद्दुचेरी- चेन्नै टप्पा मात्र मोठा म्हणजे १४६ किमीचा आहे. रस्त्यावरच्या अंतरांच्या नावामध्ये आता चेन्नैसुद्धा दिसतं आहे! व्वा! मी सायकल प्रवास कुठे सुरू केला, कुठे कुठे जाऊन काल कुठे होतो, ह्याची मलाच आठवण करून द्यावी लागते आहे. बंगलोर- उटी- कोची- तिरूअनंतपूरम आणि आता इथे! खरंच माझे नशीबाचे शेअर्स खूप जास्त असले पाहिजेत! पहिल्या चहा- बिस्कीटाच्या ब्रेकच्या वेळी नित्यानंदमजींनी दिलेलं इडियाअप्पम खाल्लं. दक्षिणेतला चहा थोडा वेगळा असतो. पण मला आवडतो. आणि चहा नसेल तेव्हाच मी कॉफी घेतो. अधून मधून हॉटेल आणि रंग रूप बघून इडली, डोसा, वडा चटणी, रस्सम, पोंगल असेही पदार्थ घेतो आहे. जेवणासाठी भात आणि भरपूर भाज्या! काहीच अडचण वाटत नाही. 

रामनाथपूरम! महामार्ग रामनाथपूरमवरून पुढे जाईल. मला उजवीकडे मंडपमकडे जायचं आहे, त्यामुळे आधीच उजवं वळण घेतलं. रामनाथपूरमला इथले लोक रामनद म्हणतात. वळण घेतल्यानंतरचा रस्ता तसा लहान आणि कमी वाहतुकीचा आहे. हळु हळु वातावरण बदलतंय. ढग आलेले आहेत. एक- दोनदा गावातल्या लोकांना रस्ता परत विचारला. लोक अचंभित नजरेने माझ्याकडे बघत आहेत. मग त्यांच्याशी थोडं थोडं बोलतो. छोट्या गावातल्या लोकांसोबत हमखास एक संवाद होतो. आणि आपण जर बॅकग्राउंड, राहण्याची पद्धत, वेशभुषा, भाषा अशा गोष्टी थोड्या बाजूला ठेवू शकलो तर अगदी सहज लोकांसोबत संवाद होतो. अगदी मन:पूर्वक भेट होते. वाटेत दुसर्‍या ब्रेकसाठी थांबलो तेव्हाही हॉटेलवाल्या काका- काकूंसोबत अशी भेट झाली. लोकांचं अगत्य अनुभवता आलं. 

काय गावं आहेत पण ही! चक्क मोर गावात फिरत आहेत! आणि सहजपणे रस्त्यावरून जात आहेत. हळु हळु पाऊस सुरू झाला! पावसाची तयारी आहेच. मोबाईल कॅरीबॅगमध्ये ठेवला आणि जात राहिलो. अशा वातावरणामध्ये हमखास एक गाणं आपोआप मनात वाजायला लागतं- होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है! थोडा बदल करून- होशवालों को खबर क्या साईकिल क्या चीज़ है! भुरभुर पावसात अगदी शांत रस्त्यांवरून पुढे जात राहिलो. पुढे पुढे तर रस्ता चक्क तळ्यांच्या प्रदेशातून जातोय! रस्त्याला लागून छोटी तळी आहेत. काही वेळेस तर रस्त्याच्या दुतर्फा अशी तळी आहेत! त्यामध्ये फुललेली कमळाची फुलं! दक्षिण भारतात फुललेलं कमळ दिसलं! 

पाऊस वाढला थोडा. पण थांबावसं वाटलं नाही. पावसाचा आनंद घेत जात राहिलो. नजारे मंत्रमुग्ध करणारे! अतिशय शांत आणि आल्हाददायक परिसर! पुढे महामार्ग येईपर्यंत हा सुंदर रस्ता सुरू राहिला. काही वेळ वाटलं की, पुढे तळंच आहे आणि रस्ता डेड एंडकडे जातोय. पण नाही. पुढे रस्ता वळून जातोय. अखेर मंडपमला १५ किलोमीटर बाकी असताना छोटा रस्ता मुख्य महामार्गाला मिळाला. हा महामार्ग मात्र मोठ्या रहदारीचा. रामेश्वरम मोठं तीर्थस्थान आहे आणि पूर्ण भारतभरातले लोक इथे येतात. त्यामुळे रस्ता रहदारीचा आहे. 

ह्या महामार्गावर रामेश्वरमला जाणारे एक ज्येष्ठ नागरिक सायकलिस्टही दिसले! दोघांनीही एकमेकांना हात केला. नक्कीच ते लांबून आले असावेत. मंडपमच्या थोडं आधी कथिरंगाजींना फोन केला. त्यांनी एच.पी. पंपावर यायला सांगितलं. मंडपम कँप नावाचं रेल्वे स्टेशन लागलं. मंडपम सुरू झालं. आधी एका एच.पी. पंपावर थांबलो. पण ते जो म्हणत होते तो पुढे होता. मग तिकडे गेलो आणि कथिरंगाजी लगेच भेटले. ते स्वत: सायकलिस्ट आहेत. सोबत त्यांचा मुलगा नित्शनसुद्धा आहे. त्यामुळे भाषेची अडचण आली नाही. आजचे ८९ किलोमीटर पूर्ण झाले! पावसाच्या वातावरणात मस्त राईड झाली. कथिरंगाजींचं घर रस्त्यापासून थोडंच आत आहे. चाळीमध्ये एक तीन खोल्यांचं छोटं घर. त्यात बैठकीच्या खोलीला संघ कार्यालयाचं स्वरूप. कथिरंगाजी, त्यांचा मुलगा नित्शन, सून आणि आठ महिन्यांचा नातू आरव असे चार जण राहताना दिसले. घर लहानसं, पण अगत्य आणि आत्मीयता खूप मोठी. नित्शनजींसोबतही छान गप्पा झाल्या. ते फोटोग्राफर आहेत, त्यामुळे माझे अस्ट्रोफोटोग्राफीचे काही अनुभव शेअर केले. कथिरंगाजी मंडपम बंदरात काम करतात. 

दक्षिण भारतात फुललेलं कमळ...... 

मंडपम! काय विलक्षण वारं आहे! ओसरीसमोर लावलेली सायकल वार्‍याने पडली! नंतर पत्र्याच्या शेडमध्ये दोन कारच्या मधोमध लावून ठेवली. बाजूला एक उंच मोबाईल टॉवर आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर ढगांचा वेगवान लपंडाव विलक्षण सुंदर दिसतोय! मध्ये मध्ये पूर्ण ढग येतात तर कधी कधी आकाश एकदम स्वच्छ होतं! उद्या किती वारं असेल, हा प्रश्न पडतोय! दुपारी चांगला आराम झाला. कथिरंगाजींसोबत दोन दोन शब्द वापरून बोलणं होतं आहे. नित्शन असेल तर इंग्रजीत छान बोलणं होतं. छोट्या आरवसोबतसुद्धा थोडं बोललो आणि खेळलो! संध्याकाळी बाहेर फिरून आलो. वारं तुफान आहे! पंबन ब्रिज आणि धनुषकोडीच्या निमुळत्या रस्त्यावर कसं होणार, हा प्रश्न पडतोय! 

ह्या सायकल प्रवासात पहिल्यांदाच दोन मुक्काम एका ठिकाणी असतील. उद्या सामान इथेच ठेवून रामेश्वरम आणि धनुषकोडीला जाईन. भर समुद्रातला दोन किलोमीटरचा पूल! आणि पुढे समुद्रातला चिमुकला रस्ता! व्वा! मजा येणार! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १४: मंडपम- रामेश्वरम- धनुषकोडी- मंडपम ८६ किमी! 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 28 मे 2026.


अनुभव १४: मंडपम- रामेश्वरम- धनुषकोडी- मंडपम ८६ किमी!

लेखकमार्गीयांनी शुक्रवार, 29/05/2026 22:42 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पहाटेचा मंडपम बंदराचा परिसर 

✪ कोस्ट गार्डसोबत काम केलेले नागराजजी 

✪ अविस्मरणीय पंबन ब्रिज- God of headwinds! 

✪ बेटावरचे प्रचंड वारे 

✪ धनुषकोडी- Ghost town of India 

✪ आरीकल मुनाई- भारताचं टोक 

✪ कोदंड रामार मंदिराकडचा थरारक प्रवास! 

✪ रामेश्वरमचं अप्रतिम मंदिर 

✪ महान शिक्षक अब्दुल कलामांचं स्मारक नमस्कार. 

२५ जानेवारीची पहाट! पहाटे ५ ला उठलो. कथिरगमाजीसुद्धा उठले आहेत. त्यांनी थोडा वेळ पूजा केली आणि मग मला चल फिरून येऊ म्हणाले. सुरूवातीला ते मला चालत चालत मंडपमच्या बंदरावर घेऊन गेले! अहा हा! छोट्या छोट्या नांगरून ठेवलेल्या होड्या. ते म्हणाले की, वादळाचा अलर्ट आहे, त्यामुळे ह्या होड्या इथे दिसत आहेत. नाही तर रात्रीही समुद्रात गेलेल्या असतात! समुद्रावरचा धक्का! अंधारात हळुच चमकणारं लाटांचं पाणी! विलक्षण रोमांच आणि थोडी भितीही! तिथून त्यांनी दूरवर प्रकाशझोताची एक रेषा दाखवली- तो पाहा पंबनचा ब्रिज! व्वा! 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.).... 

नंतर ते मला चहासाठी एका हॉटेलात घेऊन गेले. रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे गेलो. वाटेत अनेक जण त्यांच्या ओळखीची भेटली! चहावाल्यालाही कौतुकाने ते माझ्याबद्दल सांगत आहेत की, असा असा सायकलवर आलाय. तिथून परत येताना एक वृद्ध आणि काहीसे वाकलेले त्यांचे मित्र भेटले. त्यांची तब्येत आणि परिस्थिती नाजुकच वाटत होती. थोडे खुरडत चालत ते दुकानात काही सामान आणायला आले होते. कथिरगमाजींनी माझी त्यांच्याशीही ओळख करून दिली! गंमत म्हणजे ते माझ्याशी हिंदीत बोलले! ते मुंबईमध्ये कोस्ट गार्डसोबत काही वर्षं काम केलेले नागराजजी होते. माझ्या प्रवासाचा हेतु व स्वरूप कळाल्यावर त्यांनी माझ्या हातावर १०० रू. ठेवले. कितीही म्हणालो नको तरी घ्यायलाच लावले! असे विलक्षण लोक! कृतज्ञता आणि कृतज्ञता! 

घरी‌ आलो. येईपर्यंत चांगलं उजाडलं आहे. आज सामान सोबत न्यायचं नाहीय! फक्त पाण्याची बाटली आणि सायकलचं किट सोबत ठेवलं आणि निघालो! सुरूवातीला समुद्र दिसत नाहीय. थोड्या वेळाने जमीन अगदी निमुळती होताना दिसली आणि मग समोर तो आलाच! आधी दोन्ही‌ बाजूंना आणि मग पुढेही! पंबनचा अविश्वसनीय सेतू! अहा हा! सायकलिस्टसनी ह्या ब्रिजवरच्या वार्‍यांना God of head winds असं नाव दिलंय! आणि खरंच! प्रचंड वारं आहे तिथे. कारण हा ब्रिज खाडीवरचा नाही तर खुल्या समुद्रावरचा आहे! निव्वळ अफाट! मानव निर्मित आश्चर्य! प्रचंड भव्य असा पसरलेला तो! आजूबाजूला होड्या आणि नौका! रस्त्याचा ब्रिज आणि बाजूला रेल्वेचा ब्रिज! तो तर अजून खाली आहे! आणि वारा सायकलला ढकलतोय! थोडं थोडं थांबत काही फोटो काढले! विलक्षण! ब्रिजवर रस्त्याची रुंदी तशी कमी आहे आणि वाराही खूप आहे! त्यामुळे जास्त थांबलो नाही. विलक्षण दृश्य बघत पंबनचा सेतू पार झाला आणि बेट सुरू झालं! 

रामेश्वरम! ज्योतिर्लिंग असल्यामुळे इथे देशभरातले लोक येतात. महाराष्ट्रातल्याही अनेक मोटरसायकली व बसेस दिसल्या. रामेश्वरममध्ये ट्रॅफिक जामही लागला. काही‌ वेळ त्यात अडकलो. पण सायकल असल्यामुळे लवकर सुटलो. नंतर मंदिराचा कॉर्नर ओलांडून पुढे गेलो. रामेश्वरम शहर संपत आल्यावर एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. अनेक मराठी बोलणारे जण आहेत! एकाने माझी विचारपूससुद्धा केली. इथे गर्दी असल्यामुळे खूप थांबावं लागलं. मसाला डोसा खाऊन पुढे निघालो! आता ओढ आहे धनुषकोडीची आणि त्या आरिकल मुनाईची! जिथे रस्ता संपतो, जमिनीची पट्टी संपते आणि भारताचा प्रदेशही संपतो! 

वारे सुदैवाने माझ्या दिशेने आहेत. त्यामुळे चांगला वेग मिळतोय. रामेश्वरमनंतर गर्दी कमी झाली. पण वाहनं खूप येत आहेत. त्यामुळे नंतर तर ट्रॅफिक जाम होणार आहे. हळु हळु बेट आक्रसत जातंय! आधी लांबवर दिसणारा तो आता जवळ येतोय! आणि हळु हळु रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बीच आले. दूरवर धनुषकोडीतलं टॉवर दिसतंय. धनुषकोडीला Ghost town of India म्हणतात! पूर्वी इथपर्यंत रेल्वे यायची. तेव्हा इथे नियमित वस्ती होती. पण २२ डिसेंबर १९६४ च्या भयानक वादळामध्ये रेल्वे ट्रॅक फेकला गेला. मोठी‌ उलथापालथ झाली. तेव्हापासून इथली वस्ती एकदम कमी झाली. इथे संध्याकाळी ६ नंतर कोणी थांबत नाही. आम्ही २००९ मध्ये आलो होतो तेव्हा धनुषकोडी स्टेशनचे अवशेष दिसत होते. पण आता तेही बहुतेक नाही आहेत. दुकानं खूप वाढली आहेत. 

धनुषकोडी! इथपर्यंत तर वारे भितीदायक नाही आहेत. आरामात जाता येतंय! आणि समुद्रही किंचित दूरवर आहे. इथे दोन्ही‌ बाजूंना बीच आहेत. पण थांबावसं‌ वाटलं नाही. धनुषकोडीच्या चार किलोमीटर पुढे भारताचं टोक- आरिकल मुनाई! इथे एक अशोकस्तंभ उभा केलेला आहे! तिथून रस्ता युटर्न घेतो! इथेही काही वारे नाहीत. आणि दोन्ही बाजूंना समुद्र आहे, पण मध्ये थोडी जागा आहे. ही भीषण गर्दी! इथेही ट्रॅफिक जाम! लोक त्या अशोकस्तंभावर चढून फोटो घेत आहेत! अरे रे! थोडा वेळ हा आसमंत बघितला! काही फोटो घेतले! आणि परत फिरलो! 

परतीच्या वाटेवर मात्र लगेच वारं अंगावर आलं. हेड विंड किंवा उलटा वारा! त्यामुळे वेग कमी झाला. ट्रॅफिक जाममधून आधी बाहेर पडलो! हळु हळु गर्दी मागे पडली! शांत रस्ता आणि समुद्राची सोबत सुरू झाली! मनामध्ये हे दृश्य साठवून ठेवतोय! निसर्गाने कसा हा भाग निर्माण केला असेल! समुद्राच्या मधोमध अगदी छोटी म्हणजे फार तर ३० मीटर बाय ३० मीटर इतकी जमिनीची पट्टी. त्यातच हा छोटा रस्ता! बाजूला खडक, वाळू आणि लगेच लाटा! धनुषकोडीवरून रात्री श्रीलंकेचे दिवे दिसतात म्हणतात. आणि मोबाईल नेटवर्कही श्रीलंकेचं येतं! हा परिसर गूगल सॅटेलाईट आणि स्ट्रीट व्ह्यू मध्ये बघितला तर कळेल की, मुख्य भूमीपासून किती वेगळा व समुद्राच्या आत आहे! पंबनच्या सेतूने जोडलेलं रामेश्वरम बेट! 

हळु हळु जमिनीची पट्टी पसरत जातेय. समुद्राचे वेगवेगळे दृश्य दिसत आहेत! रामेश्वरमच्या आधी उजव्या बाजूला कोदंड रामार मंदिर आहे! तेसुद्धा जवळ जवळ समुद्रात आहे! एक बारीक रस्ता फक्त त्याला जोडतो! तिकडे सायकल वळवली! आणि आरिकल मुनाईपेक्षा जास्त थरार इथे वाटला! इथे समुद्र तितका खुला नाहीय. पण रस्त्याच्या थेट खाली समुद्र आहे! आणि रस्त्यावर कठडे आहेत. पण कुठे कुठे गॅप आहे. आणि ती गॅप वार्‍यामुळेच आहे. जर सलग कठडे असते तर वार्‍याने ते टिकले नसते. म्हणून वार्‍यासाठीही रस्ता सोडला आहे. सायकल जेव्हा अशा गॅपमध्ये येते, तेव्हा लगेच ढकलली जातेय! छोटा रस्ता आणि मागून येणारी वाहनं! खूपच रोमांचक वाटला हा रस्ता. अगदी एक किलोमीटरच असेल. मंदिराजवळ पोहचलो. दूरवर रामेश्वरमची स्कायलाईन दिसतेय! मंदिर बाहेरून तर सुंदर वाटतंय. आतमध्ये जाऊन बघू म्हणून गेलो तर प्रचंड मोठी‌ रांग! त्यामुळे जास्त न थांबता परत फिरलो. परत मुख्य रस्त्याकडे येताना ढकलणार्‍या वार्‍याचा आणि बाजूला पहुडलेल्या समुद्राचा रोमांच! आत्ताच इथे इतका वारा आहे तर पावसाळ्यात काय होत असेल! मी मूळ योजनेप्रमाणे पावसाळ्यात आलो असतो तर!!??

 .......... 

 

 

रामेश्वरममध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आणि विवेकानंद केंद्राच्या एका जणाचा संपर्क मिळाला होता. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. रामेश्वरमचं मंदिर बघायला गेलो. प्रचंड गर्दी! रोखलेली वाहनं आणि वन वे रस्ते! थोड्या अंतरावर सायकल लावली आणि चालत गेलो. थक्क करणारी वास्तु! अतिशय देखणं मंदिर. निर्माण करणारे लोक कोण असतील, कसे असतील! आत जायला खूप रांग आहे. त्यामुळे बाहेरच थोडा वेळ थांबलो. ते मंदिर काही क्षण अनुभवलं आणि डोळ्यांमध्ये साठवलं. आणि परत फिरलो! 

रामेश्वरममधलं अजून एक आकर्षण म्हणजे डॉ. अब्दुल कलाम स्मारक! मुख्य रस्त्याला थोडं पंबनच्या बाजूला ते आहे. तिथेही भेट दिली. मोबाईल बाहेर लॉकरमध्ये ठेवावा लागतो. त्यामुळे फोटो नाही घेता आले. डॉ. अब्दुल कलामांचं लहानपण, वाटचाल, त्यांचं‌ संशोधन, अग्नीबाण- रॉकेट- मिसाईल असं वेगवेगळं योगदान आणि काम ह्याची माहिती देणारे सुंदर फोटोज आहेत. शिवाय रॉकेटस- मिसाईलच्या छोट्या प्रतिकृतीसुद्धा आहेत. मोठा वैज्ञानिक आणि शिक्षक- पण त्याचं माणूसपण छान उलगडलं आहे. असंख्य लोकांसोबतचे त्यांचे छायाचित्र आहेत. आणि अगदी सामान्य व्यक्तीपासूनची त्यांची वाटचाल दाखवली आहे. आपणसुद्धा असे कोणी होऊ शकतो, हा विश्वास बघणार्‍याला मिळू शकतो. त्यामुळे मुलांनी आवर्जून भेट द्यावी असं हे स्मारक आहे. 

मोबाईल लॉकरमधून घेतला. तिथेच चिक्की आणि ज्युस घेतला आणि निघालो! हळु हळु रामेश्वरम बेट पार होतंय! अर्थात् परिसर इतका मोठा आहे की, आपण बेटावर आहोत, ही जाणीव अशी होत नाही! ती‌ जाणीव पंबनचा सेतू दिसायला लागल्यावर होते! स्थापत्यशास्त्राने निर्माण केलेलं आश्चर्य! रामेश्वरमकडून जाताना दुसर्‍या बाजूचा व्ह्यू बघता आला! अथांग- अफाट सागर आणि त्यातल्या असंख्य नौका! लाटाच लाटा! आणि आडवा- तिडवा वारा! त्यातच ट्रॅफिक जाम! थांबावं लागतंय. पण त्यामुळे फोटोही घेता आले. तो रोमांच अनुभवता आला. हळु हळु ब्रिज पार झाला! मंडपम गाव आलं. 

१४ व्या दिवसाची राईड पूर्ण झाली. आजचे ८६ किमी झाले. निसर्गाने खूप साथ दिली. समुद्रालगतचा किंवा समुद्रावरचाच रस्ता असल्यामुळे आज चढ/ क्लाइंब अगदी कमी होतं. पण परतीच्या वाटेवर वारा मोठा होता. दुपारी थोडा आराम केला. छोट्या आरवसोबत खेळलो. सलग दुसरा मुक्काम एका ठिकाणी होईल असं वाटत असताना संध्याकाळी दुसरीकडे जावं लागलं. कथिरगमाजींकडे पाहुणे येणार असल्यामुळे त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या घरी सोय केली. स्वत: सायकल चालवत सोबत आले. तिथे जाण्याच्या वेळी परत एकदा सगळं सामान पॅक करावं लागलं! निघण्याच्या आधी मी त्यांना निरामयने प्रकाशित केलेलं योगावरचं इंग्रजी पुस्तक दिलं. मंडपम स्टेशनच्या पलीकडे त्यांच्या मित्रांचं घर आहे. कथिरगमाजींनी मला हॉटेलमध्ये जेवायला नेलं. इथे काही ठिकाणी पोळी भाजी मिळते. त्याला कुर्मा म्हणतात. ते छान जेवलो. दुसर्‍या मुक्कामाची रूम गच्चीत आहे! जवळून जाणार्‍या ट्रेनचे आवाज आणि ढगांमधून दिसणारे तारे! काय दिवस गेला! नागराजजींसारखे काय लोक भेटत आहेत! वा! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १५: मंडपम- तोंडी ८४ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 29 मे 2026.



अनुभव १५: मंडपम- तोंडी ८४ किमी

लेखकमार्गीयांनी शनिवार, 30/05/2026 15:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पूर्व किनारी मार्गाने प्रवास 

✪ मध्य तमिळ नाडूमधील गावं 

✪ १५ दिवसांमध्ये १३८० किमी झाले 

✪ त्सुनामीच्या वेळच्या गावांची आठवण 

✪ तमिळ नाडूमध्ये प्रजासत्ताक दिवसाचं वेगळं स्वरूप 

✪ मनाला वर्तमानामध्ये ठेवणं! 

नमस्कार. २६ जानेवारीची सकाळ! काल मंडपममध्ये सेवा भारती दक्षिण तमिळ नाडूचे श्री. मुनियासामीसुद्धा भेटले होते. त्यांच्या ओळखीने आज तोंडी गावामध्ये थांबणार आहे. काल बघितलेला धनुषकोडीचा परिसर अजून आठवतोय. तो पंबन ब्रिज! काल रात्रीच्या ठिकाणी चांगला आराम झाला. बरोबर सव्वासहाला कथिरगमाजीसुद्धा आले. ज्यांच्याकडे थांबलो होतो त्यांच्याशी चहासोबत थोड्या गप्पा झाल्या. नंतर कथिरगमाजींनी परत त्यांच्या आवडीच्या हॉटेलमध्ये नेऊन चहा पाजला. रोडपर्यंत ते मला निरोप द्यायला सायकलवर आले. त्यांनी दोन दिवसांच्या मंडपमच्या वास्तव्यामध्ये मला छान सोबत केली. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.).... 

सायकल प्रवासाचा १५ वा दिवस! प्रजासत्ताक दिन. इथे विशेष उत्साहाचं वातावरण दिसत नाहीय. तिरंगा असलेले फलक किंवा फुल दिसत नाही आहेत. शाळांमध्येही काही कार्यक्रम सुरू आहेत असं वाटत नाहीय. किंचितसं पावसाळी हवामान आहे. आज परत उलटा वारा लागतोय. परिसर कोणताही असो, निसर्ग त्याची‌ रंगांची उधळण काही थांबवत नाही! वेगवेगळी झाडं दिसत आहेत. बराचसा तळ्यांचा परिसर आहे. रामनाथपूरम बायपासच्या आधी नाश्ता केला. काही काही लोकांशी छान बोलणं होतंय. वाटेत एका ठिकाणी नौदलाचं एक केंद्रही दिसलं. 

रामनाथपूरम बायपासवरून उजवीकडे वळालो. हे शहर त्यामुळे बघता आलं नाही. अंतराच्या पाट्यांमध्ये आता चेन्नै आणि तिरूचिरापल्लीबरोबर पुंपूहार, नागापट्टीणम अशी गावंही येत आहेत. २१ वर्षांपूर्वी जानेवारी २००५ मध्ये त्सुनामीनंतरच्या मदत कार्यासाठी ह्या गावांमध्ये आलो होतो. आठ दिवस किनारपट्टीलगत नागापट्टीणम, तरंगमबाडी, पुंपूहार, कराईकल अशा काही गावांमध्ये मदत कार्यात सहभाग घेतला होता. तो परिसर हळु हळु जवळ येतोय. खूप वेगळ्या अशा त्या आठवणी आहेत. मदत कार्यामध्ये मिलिटरीच्या लोकांसोबत केलेलं काम, सगळं उध्वस्त होऊनही‌ हळु हळु मुला- मुलींना काम करताना बघून सावरणारे लोक. खूप वेगळा तो अनुभव होता. त्या परिसरातून पुढच्या काही दिवसांमध्ये सायकल चालवेन. 

आजचं तोंडी गाव तसं लहानसं आहे. कोणाकडे थांबायचं हे खूप उशीरापर्यंत ठरलं नव्हतं. नंतर तिथल्या एका कार्यकर्त्यांचा नंबर मिळाला आणि त्यांच्याशी बोलणं केलं. पण त्यांना इंग्रजी काहीच येत नाहीय! एका एका शब्दाने बोलणं झालं. त्यांनी मला तिथल्या बस स्टँडला यायला सांगितलंय. बघू कसं होतं. 

८४ किलोमीटरचं अंतर तीन टप्प्यांमध्ये मनाने विभागलं आणि एक एक टप्पा असा विचार करत जात राहिलो. साधारण ५५ किलोमीटरवर दुसरा ब्रेक घेतला. आजचा रस्ता बराचसा गावांमधूनच जातोय. मोठं शहर असं नाहीच लागलं. पण हा रस्ताही महत्त्वाचा असावा. कारण दूरवरून आलेल्या ट्रॅवल्स आणि सरकारी बसेस खूप लागत आहेत. नंतरही प्रजासत्ताक दिवसाचं काही वातावरण जाणवलं नाही. अगदीच नाही म्हणायला एक महिला तिरंग्याच्या रंगाचा पोशाख केलेली दिसली तितकीच. शाळासुद्धा कमी लागल्या किंवा कदाचित शाळांना सुट्टी असेल. 

आकाशात ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारीसुद्धा ऊन्हाचा त्रास होत नाहीय. गंमत म्हणजे वारे आहेत, त्यामुळे वेळ जास्त लागतोय पण थकवा तितका होत नाहीय. वारे असल्यामुळे गरम जास्त होत नाहीय. आरामात जात राहिलो. तोंडीमधले शक्तीवेलजींशी परत बोललो. पण बहुतेक ते जास्त मोबाईल वापरत नसावेत. त्यामुळे त्यांना लाईव्ह लोकेशन वगैरे कळत नसावं. शेवटी मीच त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी विचारत विचारत जाईन असं ठरवलं. 

तोंडीमध्ये पोहचलो तेव्हा दुपारचा एक वाजतोय. लोकांना विचारून गावात बस स्टँडकडे गेलो. तिथे थोड्या वेळाने शक्तीवेलजी आले. त्यांचं वय ६५ च्या पुढे असेल! त्यांना इंग्रजी काहीच येत नाहीय. हिंदीचा तर विषयच नाही. त्यामुळे थोडा वेळ गोंधळ झाला. मला मुक्कामाच्या जागी जाऊन फ्रेश व्हायचं आहे हे त्यांना कळत नव्हतं. मी त्यांनी एका माणसासोबत जिथे जायला सांगितलं तिथे मी गेलो तर ते मंदिर होतं. पण राहण्याची सोय नव्हती. नंतर त्यांच्याच हॉटेलमध्ये जेवण केलं. थोडा आराम करता आला पाहिजे, अशी रूम पाहिजे हे त्यांना दुसर्‍यांच्या मदतीने सांगितलं. पण तशी जागा त्यांच्याकडे नाहीय. त्यांनी बस स्टँडजवळचे लॉज शोधले, पण ते बंद होते. मग मला दुसर्‍याच एका ठिकाणी ते घेऊन गेले. पण तिथेही ठीक वाटलं नाही. बराच वेळ थांबून बघितलं. पण अखेर आराम होणं गरजेचं असल्यामुळे इमर्जन्सीमध्ये श्री. विजय राजमोहनजींना विचारलं. त्यांनी थोडी माहिती घेऊन मला जवळचंच एक दुसरं चांगलं हॉटेल सुचवलं. सायकलीवरून काढलेलं सामान घेऊन मी तिकडे गेलो. तिथे प्रॉपर रूम होती. मग तिकडेच थांबलो. असा एकूण गोंधळ! पण ठीक आहे. अशा पद्धतीच्या प्रवासात ह्या गोष्टी होतातच!

 ..... 

प्रवासाचा १५ वा दिवस पूर्ण झाला. आणि १३८० किलोमीटर झाले. आता फक्त ५ दिवस बाकी! चेन्नै फक्त ५५० किलोमीटर दूर आहे! आधी अगदी हळु हळु जाणारे दिवस आता खूप वेगाने जात आहेत! उद्या मल्लिपट्टिणम, परवा तंजावूर, नंतर श्रीमुशनाम आणि मग पाँडेचेरी! पण नाही. मनाला वर्तमानामध्ये ठेवलं पाहिजे. आज फक्त १५ च दिवस झाले आहेत. आणि उरलेले अजून बाकी आहेत! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १६: तोंडी- मल्लिपट्टिणम ७४ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 30 मे 2026.



अनुभव १६: तोंडी- मल्लिपट्टिणम ७४ किमी

लेखकमार्गीयांनी रविवार, 31/05/2026 21:16 या दिवशी प्रकाशित केले.

✪ समुद्र, नौका आणि मंदिरांच्या प्रदेशातील राईड 

✪ सेतूभावछत्रमच्या ऐवजी मल्लिपट्टिणममध्ये मुक्काम 

✪ दूरच्या देशबांधवांसोबत जवळची भेट 

✪ अभिमन्युजींचे नावेवरचे थरारक अनुभव 

✪ रात्रीचा मल्लिपट्टिणम बंदराचा परिसर 

✪ लाटा, समुद्राची गाज, दूरवरच्या बोटींचे दिवे आणि आकाशातले व्याध- अगस्त्य 

नमस्कार. २७ जानेवारीची सकाळ! तोंडीवरून निघालो. पुढचे काही टप्पे छोटेच आहेत. आज फक्त ७४ किलोमीटर असतील. एकदा असंही वाटून गेलं की, दोन छोटे टप्पे थोडे मोठे करावेत, पुढचा टप्पाही थोडा मोठा करावा, म्हणजे एक दिवस वाचेल. पण तसं केलं नाही, कारण छोटे टप्पे हे खूप सोपे आहेत. जवळ जवळ रिकव्हरी राईडससारखे आहेत. ते मोठे केले तर एक दिवस तर वाचेल, पण मध्ये जास्त जोर लावावा लागेल. आणि मला माझ्या मर्यादा खूप चांगल्या कळतात. आणि त्यांचा मी आदर करतो. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर मी‌ स्वत:ला मर्यादित फटके मारणारा, मर्यादित रेंज असलेला खेळाडू समजतो. मोठे सिक्स किंवा चौके मला जास्त मारता येत नाहीत. पण मी सिंगल्स नक्कीच जास्त घेऊ शकतो. सोपं जे काम आहे- चेंडू मोकळ्या जागेत ढकलायचा आणि लगेच धावायचं- ते मी करू शकतो. त्यामुळे त्या मर्यादेत राहूनच हे सर्व सायकलिंग करत जाईन. आणि गरज कशाला मर्यादेच्या पलीकडे जायची! केल्याने होत आहे रे! हळु हळु करत राहिलो तर त्याचं एकत्रित स्वरूप मोठं होत जातं. निरामयच्या अर्चना ताई म्हणतात तसं brick by brick करत गेलो तर घर उभं राहातं. आज शेवटून पाचवा दिवस असं मन म्हणतंय! पण त्याला परत चालू ठिकाणी आणतोय. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)...... 

तोंडीपासून पुढचा रस्ता हा सगळा ईसीआर म्हणजे ईस्ट कोस्ट रोडच आहे. समुद्रालगतच जातोय. आज समुद्र दिसणार्‍या जास्त जागा लागत आहेत. एका गावामध्ये जवळच बीचसुद्धा आहे! दोन मिनिट तिकडे जाऊन आलो. बीच आणि त्याला लागूनच नावाही नांगरलेल्या! वा! आणि तिथेच एक सुंदर मंदिरही आहे. सगळ्या किनारी भागात समुद्राशी संबंधित जीवनशैली महत्त्वाची आहे. मत्स्यपालन आणि जहाजाद्वारे व्यापार इथे चालतात. डॉ. अब्दुल कलामसुद्धा अशाच कुटुंबातले होते. किनारी भागामध्ये नारळाचे वृक्षही मोठ्या प्रमाणात दिसतात. अजूनही फार शहरीकरण न झालेली इथली जीवनशैली दिसते. लोकांचं राहणीमान साधं आणि एकमेकांना धरून आहे. अशाच काही घरांमध्ये मला राहायला मिळतंय. 

पहिल्या ब्रेकनंतर सेवा भारतीकडून संपर्क मिळालेल्या अभिमन्युजींशी फोनवर बोललो होतो. त्यांना इंग्रजी छान येतं आहे. त्यामुळे कुठे भेटायचं ते त्यांनी चांगलं सांगितलं. एक मोठा पोंगलचा नाश्ता आणि एक फक्त चहा- बिस्कीटाचा ब्रेक असे दोनच ब्रेक घेतले. वाटेतल्या दृश्यांचा आनंद घेत राईड छान झाली. दुपारी साडेबारालाच मल्लिपट्टिणमला पोहचलो. अभिमन्यूजींना फोन केल्यावर ते पाच मिनिटातच ठरलेल्या ठिकाणी आले आणि मोटरसायकलने रस्ता दाखवत मला घरी घेऊन गेले. रस्ता बघितला तर तो सरळ बीचकडे जातोय! हायवेवरून गावात आणि गावातही समुद्राकडे! समुद्र अगदी जवळ येतोय! समुद्रापासून फक्त दोनशे मीटर अंतरावर त्यांचं घर आहे! ते मला बोलले की, मी फोन केला तेव्हा ते जहाजावर होते! व्वा! त्यांच वय लहान म्हणजे जेमतेम २० असेल. इंग्रजी छान बोलतात, त्यामुळे संवाद छान झाला. आजचे ७४ किलोमीटर पूर्ण झाले. आधी सेतूभावछत्रमला थांबण्याचा विचार होता, पण तिथला संपर्क मिळाला नाही. म्हणून थोडं पुढे आलो. 

आजच्या राईडइतक्याच नंतरच्या भेटीही छान झाल्या. अभिमन्युजींचे बाबा सेवा भारतीचं काम करतात. मत्स्यपालन करणारं कुटुंब. त्यांच्या आईसुद्धा माझ्याशी खाणा- खुणांनी छान बोलल्या. मंडपम आणि नंतर इथला हा होम स्टे- अर्थात् देशबांधवांसोबत राहण्याचा अनुभव फार विशेष वाटला. आणि अशा भेटीगाठी- संवाद ह्या संदर्भातसुद्धा ही सायकल मोहीम किती वेगळी आणि महत्त्वाची आहे, ही जाणीव झाली. एका कुटुंबातल्या दोन शाखा. त्यांच्यात कुटुंब असण्याचा भाव असण्यासाठी भेटणं अत्यंत आवश्यक टॉनिक! नुसते सारे भारतीय माझे बांधव आहेत, म्हणून काय होणार! ती गोष्ट करता आल्याचं समाधान वाटलं. योगाचा एक अर्थ- connecting and reconnecting आहेच. त्या लोकांनाही खूप छान वाटताना दिसतंय की, मी असा लांबचा त्यांच्याकडे आलोय. लांबचा असेन पण परका अजिबात नाही. कुठेच एक सेकंदालाही कोणी मला परका मानलं नाही. पूर्ण प्रवासात. 

दुपारी भात आणि भाज्यांचं घरचं अप्रतिम जेवण! अभिमन्युजींच्या मदतीने त्याच्या आई- बाबांशीही थोडं थोडं बोललो. त्या ताईंना कळवलं की, जेवण खूप सुंदर आहे. आणि अभिमन्यु इंग्लिश छान बोलतो! तो ते सांगायला किंचित लाजत होता. त्यांच घर छान आहे. जवळ जवळ वाळूमध्ये असलेलं पक्क घर. जुन्या पद्धतीचं गाव. पण पक्की घरं. संध्याकाळी अभिमन्युजींसोबत बंदरावर गेलो! अहा हा! जवळच्यांसोबत मनसोक्त व्हिडिओ कॉल्स केले. इथे बंदर आहे पण बीच थोडा लांब आहे. अभिमन्युजींनी त्यांचे अनुभव सांगितले. ते बोटीने श्रीलंकेपर्यंत गेलेले आहेत. लांब लांब जातात. समुद्रातही जीपीएसने मार्ग शोधतात. वादळही त्यांनी अनुभवलं आहे! ते तिरूचिरापल्लीला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये आहेत. सुट्टीवर आले होते. छान गप्पा झाल्या!

 ..... 

त्यांच्यासोबत संध्याकाळी गावातल्या हॉटेलवर जाऊन चहा घेतला. तिथे डीएमकेची एक सभाही सुरू असलेली दिसली! मी स्टॅलिनच्या राजवटीमध्ये सायकलिंग करतोय, आठवण झाली! गावातलं रामर कोविल- रामाचं मंदिर छान वाटलं. अंधार पडल्यावर परत बंदरावर गेलो. रात्रीचा समुद्र! खाली येऊन आदळणार्‍या त्याच्या मोठ्या मोठ्या लाटा! त्याची गाज! अंधारात चमकणार्‍या बोटी! आणि खूप दिवसांनी रात्रीचं आकाश नीट बघता आलं. दक्षिण भारतातून थोडं उत्तरेला आलो असलो तरी अजूनही बरंच दक्षिण अक्षांश आहे. आकाशामध्ये व्याध आणि अगस्त्य क्षितिजापासून चांगले वर दिसत आहेत! व्वा! त्याच्या काही मित्रांसोबतही थोडा संवाद झाला. 

रात्री त्या ताईंनी जेवायला इडियाप्पम आणि भरपूर सांबार- रस्सम- भाज्या असा बेत केला. माझ्यासाठी व्हेजमधले पंचपक्वान्न बनवले. खूप अगत्य जाणवलं. लोकांकडे असं राहणं, लोक जवळून अनुभवणं आणि कनेक्ट होणं! खरंच मी खूप भाग्यवान आहे. पुढचा प्रवासही अशा विशेष ठिकाणांवरून होणार आहे. माझ्या मित्राने सुचवल्यानुसार मी किनारपट्टीचा पूर्ण रस्ता न निवडता तंजावूर घेतलं होतं. त्यानुसार उद्या तंजावूरला जाईन. आणि पुढेही असाधारण लोक आणि ठिकाणं असतील. दक्षिण भारताच्या इतिहासातल्या आणि सांस्कृतिक वाटचालीतल्या चोला, पांड्य, नायक आणि मराठा अशा महत्त्वाच्या राजवटींच्या वैभवशाली परिसरातून जाईन. आता खरं तर शेवटचे फक्त चार दिवस राहिले म्हणून वाईट वाटतंय! हे लिहीतानासुद्धा ते दिवस आठवून डोळे पाणावत आहेत. 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १७: मल्लिपट्टिणम- तंजावूर ६८ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 31 मे 2026.





अनुभव १८: तंजावूर- कुंभकोणम- श्रीमुशनाम ९४ किमी

लेखकमार्गीयांनी मंगळवार, 02/06/2026 16:16 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कुंभकोणमची मंदिरं आणि कावेरी नदी! 

✪ शांत गावं आणि रमणीय रस्ते 

✪ निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत भेट 

✪ “अगर शिवाजी महाराज नही होते तो...” 

✪ “कमकुवत युवा पिढी" हासुद्धा देशाचा शत्रू 

✪ श्रीमुशनामचं वेलुनाव्हियार केंद्र – वेगळी संस्था 

✪ “रगड़ा बनाएगा तगड़ा" 

नमस्कार. २९ जानेवारी! ह्या सायकल प्रवासात इतक्या वेगवेगळ्या भेटी होत आहेत! आजसुद्धा एक वेगळी भेट होणार आहे. सेवा भारती दक्षिण तमिळनाडूच्या डॉ. सिद्धार्थजींनी श्रीमुशनाममध्ये अशा ठिकाणी मला जोडून दिलं. तंजावूरनंतर पुद्दुचेरीच्या आधी सोलाथरम असा एक टप्पा होता. पण तिथे गाव किंवा कोणी संस्था मिळत नव्हती. तेव्हा सिद्धार्थजींनी सोलाथरमपासून ७ किलोमीटरवर हे ठिकाण सुचवलं. त्यामुळे निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत खूप छान भेट झाली. त्यांची संस्था व त्यांचं काम बघता आलं. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)....... 

बृहदीश्वरा! रामकृष्ण मठातून बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्यावर येतानाही बृहदीश्वरा मंदिर दिसतंच आहे! सकाळी सात वाजता विशेष गर्दी नाहीय. किती वेगळं हे नगर आहे! हळु हळु बाहेर पडून महामार्गाला आलो. आजचा टप्पा थोडा मोठा म्हणजे ९४ किमी आहे. आणि उद्या व परवाही मोठे टप्पेच आहेत. वाटेमध्ये कुंभकोणम लागणार आहे! इथलं मंदिरसुद्धा जगप्रसिद्ध आहे. किंबहुना इथे अनेक मंदिरं आहेत. त्यातली रस्त्यावर असलेली तरी मी बघणार आहे. अनेक दिवस मध्यम रस्त्यांवर सायकल चालवल्यानंतर आता टू बाय टू महामार्गाचा आनंद घेतोय! पूर्ण मोकळा रस्ता! आजूबाजूला हिरवीगार शेतं! उलटा वारा आहेच! आणि त्यामुळे परवाचा पुद्दुचेरी- चेन्नै १४६ किमीच्या टप्प्याची थोडी काळजीही वाटते आहे. पण तो विचार बाजूला ठेवला आणि मोकळ्या महामार्गाचा आनंद घेत सायकल पळवली! 

२५ किलोमीटर झाल्यावर कुंभकोणमच्या थोडं अलीकडे नाश्त्यासाठी थांबलो. इडली सांबारचा नाश्ता केला. हॉटेलवाल्यांसोबत थोड्या गप्पाही झाल्या. कुंभकोणमच्या नंतरचा रस्ता नकाशात बघून घेतला. राईड परत सुरू केल्यावर लगेचच कुंभकोणम आलं. इथे अनेक मंदिरं आहेत. माझ्या रस्त्यावर त्यातलं कुंभेश्वरा आहे! सायकल बाजूला लावली आणि आत गेलो. बृहदीश्वरासारखंच सुंदर आणि भव्य! विलक्षण! ह्या सगळ्या दक्षिण भारतीय मंदिरांना अनेक प्रकारे वेगळा अर्थ आहे. स्थापत्य, शिल्पकला, रचनेमागची दृष्टी, त्यातल्या चित्रांमधल्या कहाण्या, समरूपता असलेली मांडणी अशा अनेक प्रकारे त्यांच्यात खूप अर्थ दडलेला आहे. ही सगळीच मंदिरं आज "मानव निर्मित आश्चर्य" प्रकारात येतात. तंजावुर आणि कुंभकोणममध्येही देश- विदेशातले दर्दी पर्यटक फिरताना दिसत आहेत. 

कुंभकोणममध्ये अजून छोटी मंदिरंही रस्त्यावर लागली. कुंभकोणमचं भाजी मार्केट आणि बस स्टँड ओलांडलं. कावेरी नदी लागली! बंगलोरनंतर दुसर्‍या दिवशी कर्नाटकात ओलांडलेली कावेरी इथे परत भेटली! वा! वस्ती कमी होत गेली आणि हळु हळु एकदम शांत परिसर सुरू झाला. श्रीमुशनाम प्रसिद्ध स्थळ असलं तरी हा रस्ता खूप आतून जातोय. वाटेत शहर असं नाहीच आहे. त्यामुळे अगदी ग्रामीण तमिळ नाडू बघायला मिळतोय. रस्ते अंतर्गत आणि छोटे असले तरी एकही खड्डा नाही! नकाशात बघताना कोणताही रस्ता घेतला तरी तो चांगलाच असेल, इतकी इथल्या रस्त्यांची खात्री देता येते! 

समुद्राची आठवण येत असतानाच कोल्लिदम नदीवरचा प्रचंड मोठा पूल लागला! अफाट पसरलेलं पाणी! सुंदर दृश्य. पुढेही रस्त्यावरची रमणीय दृश्य सुरूच राहिली. किती वेगवेगळ्या रस्त्यांवरून जायला मिळतंय! मध्ये मध्ये काही अंतर तर चहाची हॉटेलसुद्धा नाही आहेत. साधारण ६० किलोमीटरला परत नाश्ता करायचा होता. पण काही मिळालं नाही. तेव्हा चिक्की आणि सोबत ठेवलेले बिस्कीट खाल्ले. पाणी भरून घेण्यासाठीसुद्धा हॉटेल हवं. प्रवासात मी कुठेच बिस्लरी पाणी पीत नाहीय. हॉटेलमधलंच भरून घेतोय. पुढे एक चौक आला आणि दुसरा महामार्ग क्रॉस झाला. तेव्हा चहा- बिस्कीट घेतलं. पाणी भरून घेतलं. आता चांगलं गरम होतंय. मोबाईलमध्ये नकाशा तपासला आणि पुढे जात राहिलो. 

छोट्या छोट्या गावांमध्येही मोठी चर्च आणि चर्चच्या शाळा दिसत आहेत. श्रीमुशनामच्या थोडं आधी मुख्य रस्त्यापासून परत आत वळालो. इथली वळणं जेव्हा फार अवघड वाटली, तेव्हा सरळ मोबाईल समोर लावून गूगल मॅप लावला. मला कॅप्टन आनंदनजींनी खाणा- खुणा सांगितल्या होत्या. त्यानुसार मॅपच्या मदतीने त्यांच्या केंद्रावर पोहचलो! दुपारचा अडीच वाजला आहे. आजचे ९४ किमी पूर्ण झाले. केंद्रावर कॅप्टन आनंदजी व इतर कोणीच नाही आहेत. पण त्यांनी माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवून मला पूर्ण ब्रिफिंग दिलं होतं. की अशा रंगाचं दार असेल, अशी दुर्गा मूर्ती असेल, असा जिना वर जाईल, इकडे ट्रेनिंग सेंटर असेल, तिथून आत गेलं की तुझी रूम! कुलुप लावलेलं नव्हतंच. मी त्यांच्या मिलिटरी पद्धतीच्या अचूक सूचनांनुसार गेलो आणि रूममध्ये पोहचलो. ताईंनी माझ्यासाठी अगदी जेवणही एका ठिकाणी ठेवलं होतं! त्यामुळे आराम केला, जेवून घेतलं. अगदी दाट झाडीच्या मध्ये हे गाव आणि हा परिसर आहे! इथे त्यांचं वेलुनाव्हियार केंद्र चालतं. 

दुपारी आनंदजींच्या पत्नी आणि मुलं- मुली आले. संध्याकाळी ५:३० ला मुलांचा एक योग वर्ग आहे. आनंदजींना यायला उशीर होतोय. त्यामुळे ते येण्याआधीच मला त्यांनी वर्गात जायला सांगितलं. गावातली लहान मुलं! उत्साही आणि निरागस चेहरे. इथे भाषेची थोडी अडचण आहे. त्यांना शिकवणार्‍या एका ताईंना थोडं इंग्लिश येतं. आणि आनंदजींची मुलगी भारतीसुद्धा इंग्लिश बोलते. दोघींच्या मदतीने मुलांशी संवाद साधला. त्यांची ओळख करून घेतली. फिटनेस, खेळ व योगाबद्दल बोललो. माझे सायकल प्रवासातले अनुभव सांगितले. दहा मुलं इथे सायकलवर आलेली दिसली! अनेक जण खेळात पारंगत आहेत! दोन मुलींनी तमिळ लहेजाचं सुंदर वंदे मातरम गायलं. छान कार्यक्रम झाला. 

निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत संवाद 

आनंदनजी आल्यावर त्यांच्याशी खूप सविस्तर गप्पा झाल्या! त्यांनी २४ वर्षं सेनेमध्ये सेवा दिली. त्यातली ५ वर्षं ते चेन्नैच्या ओ.टी.ए. मध्ये प्रशिक्षक होते. कोरोना काळामध्ये त्यांनी गावातल्या मुलांचं रिकामं‌बसणं बघितलं. त्यानंतर त्यांनी देशसेवेची ही सेकंड इनिंग सुरू केली. सैनिकाचं पूर्ण आयुष्य देशासाठी- मग तो निवृत्त झालेला असला तरीही, हा त्यांचा विचार. युवक आणि गावासाठी हे वेलुनाव्हियार महिला सक्षमीकरण केंद्र सुरू केलं व त्या अंतर्गत मुलांना उत्तम प्रशिक्षण, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खडतर तयारी, योग, व्यावसायिक शिक्षण, युवांना करिअर मार्गदर्शन असं खूप वेगवेगळं काम केलं जातं. मुख्य म्हणजे मुलांना व युवांना देशभक्ती, ग्राम विकास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या दिशेने पुढे नेलं जातं. आनंदनजींची विजन आहे की, सीमेवर असलेला शत्रू एक गोष्ट आहे. पण देशाचे तरुण कमकुवत असणं- भरकटलेले असणं- गावं विकासाच्या मार्गावर नसणं‌ हे छुपे शत्रू मोठे आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. सेनेतले त्यांचे मित्र आणि इतर सोबती ह्या कामात त्यांना मदत करतात. त्यांच्या सेनेतल्या सेवेद्वारे ते कुटुंबाचा प्रपंच बघतात आणि ह्या सामाजिक प्रपंचासाठी त्यांनी नव्याने नोकरी सुरू केली आहे. वय ५० हून अधिक असलं तरी अतिशय तरूण व्यक्तिमत्व! त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. मुलांना असं रगडून काढतो की, ते छान तयार होतात, त्यांनी सांगितलं. त्यांना मी अजिबातच आराम देत नाही म्हणाले. सुरूवातीला मुलं पळून जायची. पण नंतर त्यांनाही गोडी लागली. हे सगळं ऐकताना अर्थातच प्रहार चित्रपटातला नाना पाटेकर आठवत होता! "रगड़ा बनाएगा तगड़ा!” 

आनंदनजींचे प्रयत्न खूप मोठे आहेत. मुलांना संगणक व तंत्रज्ञान शिकवण्यासाठी प्रयोगशाळा आहे. वाचनालय आहे. गावासाठी प्रयत्न आहेत. इतकंच काय, मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या मुलांसाठी व व्यक्तींसाठी काम करणार्‍या संस्थेसाठी जागा द्यायची त्यांची तयारी आहे. त्यांना परिसरातील जास्तीत जास्त गावांमध्ये हे काम करायचं आहे. त्यांच्या ह्या सामाजिक कामाच्या संदर्भात माझ्या अनेक संस्था बघण्याच्या अनुभवाच्या आधारे त्यांच्याशी चर्चा केली! माझ्या रूपाने बरोबर त्यांना काही गोष्टी सांगू शकणारा माणूस भेटला! असाही योग असतो! जीवनात असेही योग येत असतात. माझं त्यांना कौतुक वाटतंय. आणि त्यांच्या मुलांना मी काही सांगू शकलो, माझ्या उदाहरणातून सांगू शकलो, ह्याचाही खूप "आनंद" होतोय!..... 

नंतरही खूप बोलणं झालं. त्यांचं हिंदी छान असल्यामुळे संवादात काहीच अडचण नाही! त्यांनी त्यांचे काही अनुभवसुद्धा सांगितले. त्यांच्या रूपाने सैनिकाचं एक खूप वेगळं रूप बघायला मिळालं. समाजापासून अलिप्त न राहता स्वत:च्या गावाला आणि समाजाला सतत पुढे नेण्याचा प्रयत्न करणारा आणि देशाच्या वेगळ्या शत्रूंसोबत पूर्ण शक्तीने झुंज देणारा वीर बघायला मिळाला! खूप हृद्य भेट झाली. माझे वाटेतले अनुभवही त्यांना सांगितले. मग तंजावुरचं मंदिर आणि पॅलेसबद्दल बोललो. त्यावेळी ते जे बोलले ते वाक्य फार महत्त्वाचं वाटलं. “अगर शिवाजी महाराज नही होते, तो यह कुछ भी‌ नही दिखाई देता! कुछ नही बचता!” 

असा १८ वा दिवस गेला. आता राहिले दोनच दिवस! उद्या पुद्दुचेरी! किती स्वप्नवत प्रवास आहे हा! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १९: श्रीमुशनाम- पुद्दुचेरी ९६ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 जून 2026.


अनुभव १९: श्रीमुशनाम- पुद्दुचेरी ९६ किमी

लेखकमार्गीयांनी बुधवार, 03/06/2026 20:38 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कडलोर जिल्ह्याचा ग्रामीण परिसर 

✪ त्सुनामीच्या वेळच्या आठवणी 

✪ जेवढं फिरू, तेवढं कळतं की, आपण काहीच फिरू शकत नाही! 

✪ पुद्दुचेरीचा श्री अरविंद आश्रम! 

✪ व्हाईट टाऊनमधला बीच 

✪ श्री. मातृप्रसादजींसोबत संवाद 

✪ आप्त जनांच्या भेटीमुळे घरी आल्याची भावना 

नमस्कार. ३० जानेवारीची सकाळ! सायकल प्रवासाचा शेवटून दुसरा दिवस! पण काही बाबतीत सायकलिंग हे क्रिकेटसारखं आहे. जोपर्यंत शेवटचा रन होत नाही, तोपर्यंत मॅच पूर्ण होत नाही. शेवटचा किलोमीटर पूर्ण होईल, तेव्हाच हा प्रवास पूर्ण होईल. पण किती वेगळा अनुभव मला मिळतोय. आता तर आधीचे टप्पे आठवतसुद्धा नाही आहेत! काय ती गावं होती- उटीअलीकडचं गुडलूर, कर्नाटकातलं मलावली आणि रामेश्वरमजवळचं मंडपम! पहिल्या आठ दिवसांमध्येच कोपरापासूनचे हात काळवंडले. आणि आता तर चेहरासुद्धा दक्षिण भारतीय चेहर्‍यांसारखा झाला आहे. पण हा मिरवायचा दागिना असतो! त्याचा आनंद घ्यायचा असतो. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)

 ... 

रोजच्या प्रमाणे हेलसकर मॅडमनी दिलेला अंजीर खाऊ खाऊन दिवसाची सुरूवात केली. सकाळी आनंदनजींसोबत गप्पा झाल्या. खूप काही त्यांचे प्रयत्न आहेत. गावासाठी त्यांना खूप काही करायचं आहे. खूप छान वाटलं त्यांना भेटून. त्यांचा निरोप घेऊन निघालो. लाईव्ह लोकेशन ग्रूपवर शेअर केलं. आजचा रूट अगदी निर्जन परिसरातून जातोय. अतिशय शांत गावं! शेतांमागे झालेला सूर्योदय! एका मुख्य रस्त्यापर्यंत मोबाईलमधल्या नकाशाचा वापर केला. पुढे रस्ता समजून घेतला आणि मोबाईल पाऊचमध्ये ठेवून निघालो. वाटेत एक वेगळंच दृश्य दिसलं! चक्क ट्रॅफिक जाम झाला आहे. त्याचं कारण शेकडो जंगली कोंबड्यांचा झुंड! भयानक वेगाने शेकडो कोंबड्यांनी रस्ता ओलांडला! आणि मग वाहनं निघाली. साधारण २५ किलोमीटरवर कुंभकोणमवरून आलेला महामार्ग मिळाला. इथे नाश्ता करून घेतला. आजसुद्धा हेडविंड आहे. पण आता त्याचीही सवय झालीय. त्यामुळे वेग चांगला मिळतोय. 

काही अंतर महामार्गावरून गेलो. आज पुद्दुचेरीला जायचं आहे. कडलोरसाठी पुढे एका शहरातून उजवीकडे वळालो. हळु हळु किनारपट्टी जवळ येते आहे. जानेवारी २००५ मध्ये इकडे आलो होतो तेव्हाच्या आठवणी. त्सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेली गावं. विशेषत: अगदी किनार्‍यालगत राहणारे गरीब लोक. लोकांना मदत मिळत होती, पण त्यात खूप असमानता होती. आणि तमिळ नाडू किनारपट्टीच्याही पलीकडे अंदमानपासून बांग्लादेश- इंडोनेशियामध्येसुद्धा त्सुनामीने प्रलय घडवून आणला होता. किती वेगळी नैसर्गिक आपत्ती होती ती! तेव्हा आम्ही चाणक्य मंडलकडून १०० मुलं- मुली आलो होतो. आठ दिवस मदत कार्यात भाग घेतला. कॉलेजच्या दिवसांमध्ये खूप काही शिकवून जाणारे ते दिवस होते. त्सुनामी नंतरही तरंगमबाडीसारख्या गावांमध्ये पहाटे होणारी काकड आरती अजूनही आठवते. हळु हळु दु:ख बाजूला ठेवून उभे राहिलेले लोक! मिलिटरीच्या जवानांसोबत काम केल्याचा अनुभव! 

आपण देश जेवढा फिरतो तेवढं कळतं की, आपण काहीच फिरू शकत नाही! काही सुंदर प्रदेश व मंदिर बघता आले तरी इतर अनेक गोष्टी राहूनच जातात. एका एका गावातच इतक्या विशेष गोष्टी असतात! इथून काहीसं जवळ असलेलं तिरूवनामलाई आणि अरुणाचलम! रमण महर्षींचं ठिकाण! “योग" येईल तेव्हा बघणं होईल. 

२१ वर्षांपूर्वीचं कडलोर आणि आताचं कडलोर! वस्ती व दाटीवाटी खूप वाढल्यासारखी दिसते. दुपारी ऊन वाढतंय. मोठे रस्ते झाले असल्यामुळे सावली अगदी दुर्मिळ झालीय! लहान गावांमधून जाताना सावलीचा फायदा मिळतो. एका ठिकाणी खूप वेळाने सावली असलेलं झाड आलं. तिथे थांबून पाणी प्यायलो आणि आनंदनजींनी दिलेलं मोठं केळं खाल्लं. तेव्हा मोटरसायकलवरचे एक जण थांबले. दोन मिनिट बोलले. माझी विचारपूस केली! फोटोही काढला आणि स्टेटसला ठेवतो म्हणाले. आणि हो, ह्या पूर्ण प्रवासामध्ये माझे बाबाही माझे अपडेटस रोज शेअर करत आहेत! 

रस्ता किनार्‍यालगत असला तरी "तो" दिसत नाहीय. त्याला मिळणार्‍या अनेक नद्या व खाड्या लागत आहेत. वस्ती खूप वाढली आहे. पुद्दुचेरी जवळ येत गेलं. पण ऊन्हाचा कडाका तितकाच वाढतोय. शिवाय झाड कमी असलेल्या आणि मोकळ्या प्रदेशातून मी समुद्रालगत आणि शहरी भागात आल्यामुळेही गरम होतंय. एका ठिकाणी ओआरएस घेतलं. 

श्री अरविंदांचा आश्रम असलेलं पुद्दुचेरी! अजूनही एक वेगळी ओळख आणि वेगळी शैली टिकवून ठेवलेलं पुद्दुचेरी! आधी थेट आश्रमात जाणार होतो. पण इथे राहणार्‍या श्रीपाद वैद्य काकांनी सांगितलं की, दुपारी तो बंद असतो. त्यामुळे मग थेट त्यांच्या क्वार्टरवर जायचं ठरवलं. मुख्य शहरामध्ये थोडी गर्दी आहे. अनेक दिवसांनी ट्रॅफिक सिग्नल्स बघितले! इतक्या दिवसांनी गर्दीत सायकल चालवतोय. लक्ष देत राहिलो- सजगता- प्रत्येक पेडल सजगतेसह होईल असा प्रयत्न आहेच. जिपमर हॉस्पिटलमध्ये वैद्य काकांचा मुलगा- वेदांत डॉक्टर आहे. सुंदर कँपस! काका माझ्यासाठी समोर येऊन थांबले होते! त्यांच्या घरी आलो, आप्त भेटले आणि अगदी घरी आल्यासारखं वाटलं! आजचे ९६ किलोमीटर झाले. हेड विंड असूनही पेडलिंगच्या पाच तासांच्या आत पोहचलो. 

नंतर आराम, गप्पा आणि जुन्या परभणीच्या आठवणी निघाल्या. काका- काकूंसोबत छान भेट झाली. संध्याकाळी काका, त्यांचे नातेवाईक आणि मी तिघं रिक्षाने श्री अरविंद आश्रमात गेलो. श्री‌ अरविंद! त्यांच्याबद्दल खूप वाचलं आहे. एके काळचे क्रांतीकारक आणि नंतर उच्च कोटीचे संन्यासी! श्री अरविंद आणि श्रीमाताजी. मानव उच्च प्रज्ञेपर्यंत पोहचावा, ह्यासाठी त्यांनी खूप वेगळ्या प्रकारे स्वत:ला वाहून घेतलं. एका प्रवचनात ओशोंनी म्हंटलंय की, स्वातंत्र्यासाठी गांधीजी किंवा क्रांतीकारकांनी केलेले प्रयत्न दिसतात. पण श्री अरविंदांचे प्रयत्न भविष्यात लोकांना कळतील. त्यांनीसुद्धा पडद्याआड राहून चेतनेच्या पातळीवर खूप मोठं काम केलं आहे. त्यांची सगळी साधना- ऊर्जा तिकडे त्यांनी वळवली होती. 

आश्रम तसा छोटेखानी आहे. मोबाईल बाहेर ठेवून आत गेलो. समाधीपाशी काही वेळ बसलो. सगळे जण मौनात आहेत. थोड्या वेळाने आश्रमातलं ग्रंथालय बघितलं. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांची आणि त्यांच्याबद्दलची पुस्तकं. त्यांच्या एका शिष्याचं पुस्तक विकत घेतलं. 

काकांसोबत बीचवर आलो. व्हाईट टाऊन परिसर. इथल्या इमारती फ्रेंच पद्धतीच्या आहेत. अगदी घरांची नावं व रस्त्यांची नावंसुद्धा! बीचवर आल्यावर तो दिसला! त्याची गर्जना! लाटा! आणि समुद्राच्या थोडा वर आकाशात चंद्र! हे दृश्य महाराष्ट्राच्या तुलनेत अगदी वेगळं! समुद्रावर चंद्राची कोर बघितलेली आहे. पण शुक्ल पक्षातला द्वादशी- त्रयोदशीचा चंद्र समुद्राच्या पार्श्वभूमीवर! वा! बीचवर गर्दी आहे. पण तरीही काही ठिकाणी‌ समुद्र शांतपणे अनुभवता आला. बीचवर फिरत फिरत काका गांधीजींच्या पुतळ्याकडे घेऊन गेले. आज ३० जानेवारी असल्यामुळे गर्दी आहे. बराच वेळ फिरल्यावर आश्रमासमोरचं मंदिर बघायला गेलो. सुंदर बांधकाम आणि शिल्प! इथे आतमध्ये खूप गर्दी आहे. त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. 

आश्रमातले एक वरिष्ठ सदस्य श्री. मातृप्रसादजींसोबत थोड्या वेळ भेट झाली. ते व्यस्त होते पण त्यांनी वेळ दिला. ते मुळचे उत्तर भारतातले आहेत. ते माझ्या बाबांच्या ओळखीचे आहेत. त्यांना सायकल प्रवासाचा उद्देश, निरामय संस्थेचं काम आणि स्वरूप सांगितलं. ते बोलता बोलता सहज म्हणाले की, मी इथे ५३ वर्षांपासून आहे! म्हणजे त्यांचं वय किमान ७५ तर असेल. पण वाटत होते अगदी पन्नास- पंचावन्न वयाचे. वैद्य काका व दुसरे काकाही चकित झाले..... 

संध्याकाळी वैद्य काकांचा मुलगा- वेदांतसोबत गप्पा झाल्या. जिपमर हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर आहे आणि प्रचंड व्यस्त असतो. आता ओढ आहे ती थिऑसॉफिकल सोसायटी आणि शेवटच्या दिवसाची! आज हेड विंड असूनही चांगला वेग मिळाला. उद्या बघू कसं होतं! हेड विंडने वेळ तर जास्त लागतोच, पण मग जास्त ऊन, जास्त दमणं आणि वेळेचं गणितही कोलमडतं! वेळ लागेल, पण थेट एकाच दिवसात उद्याचा टप्पा पूर्ण करेन. थिऑसॉफिकल सोसायटी बघून निरामयच्या चेन्नै शाखेमध्ये म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी सायकल प्रवासाचा शेवट करेन! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २०: पुद्दुचेरी- चेन्नै १५० किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 3 जून 2026.


अनुभव २०: पुद्दुचेरी- चेन्नै १५० किमी

लेखकमार्गीयांनी गुरुवार, 04/06/2026 15:30 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ईसीआर आणि समुद्राची सोबत 

✪ उलट्या दिशेने ढकलणारा वारा 

✪ थिऑसॉफिकल सोसायटी- ऐतिहासिक संस्था 

✪ खरंच हा सायकल प्रवास थांबवू? 

✪ "निरामयच्या" चेन्नै शाखेत सायकल उपक्रमाचा समारोप 

✪ २० दिवसांमध्ये ठरल्याप्रमाणे १८६१+ किमी पूर्ण 

✪ टीम वर्कचं यश आणि उद्दिष्टाची पूर्तता नमस्कार. 

३१ जानेवारीची सकाळ! आज शेवटचा दिवस! एका बाजूला आनंद होतोय आणि एका बाजूला दु:खही होतंय! बंगलोर- मलवली- उटी- केरळ- रामेश्वरम आणि पुढे असा हा प्रवास आज थांबणार! खूप वेगवेगळे लोक, संस्था, साधक, विलक्षण निसर्ग आणि अविश्वसनीय भारत ज्या प्रवासात बघायला मिळाला तो प्रवास आज थांबणार! आणि शेवटच्या दिवसाला साजेसं आजचं अंतर, आजची संस्था आणि आजचं आव्हानसुद्धा आहे! अंतर तर मोठं आहेच. पण त्या अंतरासोबत किनारपट्टीवरची आर्द्रता आहे आणि उलटा वारासुद्धा आहे! त्यामुळे ही शेवटची राईडसुद्धा अगदी थरारक होणार आहे. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) 

रोजच्या पेक्षा थोडं लवकर निघालो. वैद्य काका आणि वेदांतचा निरोप घेतला. मला सगळ्यांनी निघताना खाली येऊन शुभेच्छा दिल्या! खूप छान भेट झाली ही. सेवा भारतीचे डॉ. सिद्धार्थजी पुद्दुचेरीलाच असतात. पण ते हॉस्पिटलमध्ये खूप व्यस्त होते. त्यामुळे भेट राहिली.

 .... 

आता नवीन दिवस सुरू! ३१ जानेवारी! माझ्या प्रिय काकाचा स्मृतीदिन. त्याला फिरण्याची व ड्रायव्हिंगची खूप आवड! माझ्या सायकल प्रवासाचा त्याला प्रचंड आनंद झाला असता! आणि सायकल प्रवासाचा समारोप त्याच्याच मुलीच्या घरी- माझी चुलत बहिण अदितीकडे आहे! आणि सगळा योग आल्यामुळे आजच्या दिवशी तिच्याकडे पोहचता येतंय. ती ह्या पूर्ण प्रवासात नियोजन, वाटेतलं जेवण- आहार, समन्वयन ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेच. निरामयच्या टीमची सदस्य म्हणूनही बॅक स्टेजच्या कामामध्ये सहभागी आहे! शिवाय जेव्हा दक्षिण भारतात सायकल प्रवासाचा विचार मनात आला होता, तेव्हा आधी तिच्याशी बोललो होतो. तिने सांगितलं होतं की, कर असा प्रवास, शिवाय त्याला जोडून उपक्रमसुद्धा कर. तेव्हा मग हे ठरत गेलं होतं! म्हणून थिऑसॉफिकल सोसायटीबरोबर ह्या भेटीचीसुद्धा तितकीच ओढ आहे. 

६.५० ला निघालो. पुद्दुचेरी शहर ओलांडलं. मुख्य मार्ग सुरू झाला. हा पूर्व किनारी रस्ता म्हणजेच ईसीआर. पण त्याची मजा इथे येतच नाहीय. कारण "तो" दिसतच नाहीय. शहरांच्या बाहेरही घरं- दुकानं आहेत. ईसीआरचा मला खरा फील आला तो मंडपम- मल्लिपट्टिणम परिसरात. तिथे तो खराखुरा किनारी रस्ता वाटतो. इथे तर तो अतिशय गर्दीचा हायवे फक्त वाटतोय. 

पहिल्या तासात २२ किमी पूर्ण झाले. व्वा! वेग तर छान मिळतोय. इतका वेग असेल तर खूप कम्फर्टेबली पोहचेन. मनामध्ये गेल्या २० दिवसांमधले प्रसंग येत आहेत. काय काय लोक भेटत गेले! किती जणांनी केवढी सोबत केली, किती मदत केली! तिरूअनंतपूरमला पोहचताना शेवटच्या टप्प्यात ऊन्हाचा त्रास होता आणि हॉटेल न मिळाल्यामुळे ऊर्जा कमी होती. तेव्हा मोटरसायकलवर मागे बसलेल्या लहान मुलीने हात हलवला आणि किती छान वाटलं होतं! भाषा येत नसूनही लोकांच्या डोळ्यांमध्ये नेहमी दिसलेला आपलेपणा! ह्या विचारांमध्ये अंतर हळु हळु पार होतंय. 

आजचा टप्पा मोठा आहे. त्याचे मानसिक पातळीवर छोटे तुकडे केले. सकाळी ९ पर्यंत ४०, १२ पर्यंत ८५ असे छोटे टप्पे बनवले. आणि इतका तर विश्वास आहेच की, वार्‍यामुळे किंवा उष्णतेमुळे उशीर झाला तरी आजच पोहचणार आहे. फक्त ४ वाजता का ६ वाजता हाच तो फरक असेल. थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये साधारण तीन वाजता पोहचेन असं श्री शिखरजी अग्निहोत्री सरांना सांगितलं आहे. तेसुद्धा खूप उत्सुक आहेत. 

सकाळी १०:४५. ७४ किमी झाले 

सकाळच्या वेळेमध्ये छान वेग मिळतोय. आज रोजच्यापेक्षा थोडे कमी ब्रेक्स घ्यायचे ठरवलं आहे. त्यामुळे थेट ७४ किलोमीटरनंतर पावणे अकराला पहिला मोठा ब्रेक घेतला. इथून थिऑसॉफिकल सोसायटी ६९ किमी बाकी आहे. जवळ जवळ अर्ध अंतर साडेतीन तासांच्या पेडलिंगमध्ये झालंय! वेगही छान आहे. इथे एक गंमत झाली. नाश्त्यासाठी अनेक हॉटेल्स होते. अनेक बघून शेवटी एका हॉटेलमध्ये थांबलो. आणि मी इथेच का थांबलो तेही कळालं! तिथला माणूस चक्क मराठी बोलतोय! तो बंगालमधला आहे पण महाराष्ट्रात राहिला आहे. नकळत आपल्याला अशा गोष्टी जाणवतात आणि आपण तशी कृती करतो. पुढचा ब्रेक १०० किलोमीटर पूर्ण झाल्यावर घेणार. काकूंनी दिलेलं जेवण तिथे जेवणार. तिथून पुढचा टप्पा छोटा असेल. 

१२:१५. १०४ किमी झाले 

कल्पक्कमच्या आधी मोठी खाडी लागली! खूप वेळानंतर "तो" छान दिसला! हळु हळु ऊन आणि वारा दोन्ही वाढतंय. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे वेग कमी झाला. महाबलीपूरम जवळ येतंय! रस्त्यावर बरेच डायवर्जन्स येत आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहे. रहदारीसुद्धा वाढते आहे. इथे मुख्य रस्त्यापासून मला उजवीकडे वळायचं आहे. ते वळण नीट लक्षात आलं नाही. त्यामुळे थोडं पुढे गेल्यावर दुसरं वळण घेतलं. पण त्यामुळे महाबलीपूरम गाव थोडं मागे पडलं. गाव संपताना मी त्या रस्त्यावर आलो. हा रस्ता तुलनेने थोडा रुंद आणि जास्त शांत वाटला. १०० किलोमीटर पूर्ण झाले! दुपारचे बारा वाजले आहेत. समुद्र थोडा पलीकडे आहे आणि मधून मधून दिसतोय. इथे मला हॉटेल नकोय, पण सावली हवीय. सावलीसाठी अजून पुढे जावं लागलं. काही बस स्टॉपही आहेत. त्याच्या पुढे एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एक शेड आहे आणि दूर किनाराही‌ दिसतोय. कोणाचं तरी दुकान असावं. तिथे बसलो आणि घरच्या जेवणाचा आनंद घेतला आणि लगेच निघालो! 

चेन्नै हळु हळु जवळ येतंय! वस्ती वाढताना दिसते आहे. माझा पहिला थांबा अदितीची बँक ऑफ महाराष्ट्र असेल. तिथे ती माझं स्वागत करणार म्हणाली आहे. तिथे शौनकजी भेटतील आणि तिचे काही सहकारीही भेटतील. तिथून थिऑसॉफिकल सोसायटीचं अडयार साधारण ७ किलोमीटर पुढे आहे. आता अंतर तसं कमीच आहे. पण ऊन फार जास्त आहे. पाणी पीत राहिलो. सोबत असलेली चिक्की- अंजीर खाल्लं. आता हा ह्या राईडमधला सगळ्यांत खडतर टप्पा! दुपारी दीड वाजला आणि साधारण १२२ किमी पूर्ण झाले. अजून १२ किलोमीटरवर बँक ऑफ महाराष्ट्र असेल. 

प्रचंड ऊन! त्यात शहर सुरू झाल्यामुळे अजून जास्त गरम होतंय. एनर्जाल किंवा ओआरएसची गरज भासतेय. नेमकं त्या टप्प्यात मेडीकल दिसत नाहीय. तसंच बघत बघत पुढे जात राहिलो. चेन्नैची उपनगरं सुरू झाली! दूरवर उंच इमारती दिसत आहेत! समुद्र आता घर आणि दुकानांमुळे झाकला गेलाय. उलटा वारासुद्धा अजिबात थांबत नाहीय. एका हॉटेलमध्ये बिसलरी बाटली विकत घेतली- प्रवासात पहिल्यांदाच. सोबत असलेली इलेक्ट्रॉलची‌ पावडर त्यात पूर्ण मिसळली. ते पाणी हलवून घेतलं! थोडा आराम मिळाला. पुढे जात राहिलो! अदितीची कोटीवक्कम ब्रँच जवळ येते आहे! समोर मेडीकल आलं. तेव्हा एक ओआरएस घेतलं. आता एकदम बरं वाटलं. 

दुपारी ३:१५: कोटीवक्कम ब्रँच, बँक ऑफ महाराष्ट्र, १३४ किमी 

हळु हळु पुढे जात राहिलो. त्यात ट्रॅफिक आणि सिग्नल्स! एक बरं आहे की, ही शाखा माझ्या रस्त्यावरच आहे. त्यामुळे शोधावं लागलं नाही. अदिती आणि तिचे एक सहकारी रस्त्यावर येऊन थांबलेले दिसले! त्यांनी मला थांबवलं आणि रस्ता ओलांडून शाखेकडे नेलं! व्वा! “अरे तू असा कसा दिसतो आहेस!” अदितीला प्रश्न पडला! शौनकजीसुद्धा इथे आले आहेत. सगळ्यांनी अभिनंदन केलं. अदितीने भर रस्त्यात ओवाळलं! तिचे काही सहकारी भेटले. पंधरा मिनिटं थांबून पुढे निघालो. शौनकजी खूप कामात आहेत. पण तरी ते मला थिऑसॉफिकल सोसायटीचा रस्ता दाखवायला आले. इथून साधारण ७-८ किलोमीटरच पुढे असेल.

 .. 

दुपारी ४: थिऑसॉफिकल सोसायटी, १४२ किमी 

गर्दी आणि सिग्नल्स कमी लागतील अशा रस्त्याने ते मला घेऊन गेले. अडयार! जुनं चेन्नै! आतले प्रशस्त रस्ते! पोहचलो थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये! इथले मुख्य अधिकारी शिखरजी अग्निहोत्री भेटायला आले. ते खूप व्यस्त आहेत. पण त्यांनी मला सोसायटीची माहिती दिली. माझ्या प्रवासाबद्दल अभिनंदन केलं. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी ही संस्था! भारतातल्या ध्यान किंवा अध्यात्म ह्यावर काम करणार्‍या संस्थांमधली एक अतिशय मोठी संस्था. आणि तिचं स्वरूप खूप वेगळं आहे. डॉ. ऍनी बेझंटना आपण स्वातंत्र्य लढ्यातील सहभागासाठीच ओळखतो. पण ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. शिवाय लीडबीटर सारखे लोक होते. सगळ्या पंथांना एकत्र आणून सगळ्या पथिकांसाठी काम करणारी ही संस्था. गुरू नानक किंवा रामकृष्ण परमहंसांनी जे केलं होतं, काहीसं तसंच. ज्याला ज्या साधना मार्गाने जायचंय त्याने तो मार्ग घ्या, इथे तुम्हांला सगळे साधना मार्ग मिळतील, ही सोसायटीची व्हिजन. 

ओशोंकडून लीडबीटर, ब्लॅवटस्की, गुरजीफ आणि कृष्णमूर्तींबद्दल ऐकलं होतंच. इथे त्या व्यक्तींचा परिसर आणि घर, रस्त्यांची नावं बघून छान वाटलं. झरत्रुष्ट, बोधिधर्मा, कृष्ण, जीसस अशा सगळ्यांचा इथे समावेश आहे. शिखरजींनी मला सोसायटी फिरून बघायला सांगितली. सायकलवरच तिथे मस्त फिरलो! एक जणसुद्धा माझ्यासोबत सायकलवर दाखवायला आले. खूप वेगळी ही संस्था आहे आणि खूप वेगळं काम चालतं. इथे कार्यशाळा होतात. साधक एकत्र येतात. ह्या योग प्रवासाचा समारोप करायला खूपच उत्तम संस्था मिळाली! सुंदर परिसर. ध्यान करण्यासाठी छान वातावरण. तासभर फिरलो. अनेक कक्ष, सभागृह, ध्यानासाठीची छोटी मंदिरं असं खूप काही इथे आहे.

 ...... 

सायंकाळी ५: ५० निरामय शाखा चेन्नै १५० किमी 

निघण्याआधी शिखरजींच्या घरी गेलो. त्यांच्या कन्येचा वाढदिवस. त्यामध्ये ते व्यस्त आहेत. पण तरी थोडा वेळ भेटले. आणि तिथून निघालो! शौनकजी थांबलेले आहेतच. आता शेवटचा टप्पा- इथून निरामय संस्थेची चेन्नैमधली शाखा- म्हणजे अदितीचं घर! अंतर सहा- सात किलोमीटर. शौनकजींनी त्यांच्या बुलेटवरून मला गाईड केलं. अडयारमधून कोटीवक्कमला आलो. काही गर्दीचे रस्ते तर काही शांत रस्ते! अखेर त्यांच्या घरी पोहचलो! खरंच हा सायकल प्रवास आता थांबवू? इच्छाच होत नाहीय. किलोमीटर बघितले तर १४९ च्या थोडे जास्त! चला, थोडं फिरून येतो म्हणजे १५० होतील! दोन मिनिटांमध्ये फिरून आलो आणि १५० किमी पूर्ण झाले. एकूण १८६१+ किमी. सायकल प्रवास थांबवला! अर्ध्या अंतरानंतरचा उलटा वारा, उष्णता, शहरातले सिग्नल्स आणि ट्रॅफिक आणि थिऑसॉफिकल सोसायटीत गेलेला दीड तास ह्यामुळे प्रत्यक्ष निरामयच्या चेन्नै शाखेत पोहचायला ५:५० झाले! पेडलिंगचे ८ तास १२ मिनिट.

 . 

ह्या २० दिवसांच्या प्रवासात १३ योग केंद्रांना भेट दिली. तसंच त्या निमित्ताने आधीही आणि नंतरही अनेक योग संस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या. अगदी ठरल्याप्रमाणे २० दिवसांमध्येच पूर्ण प्रवास झाला. एकही दिवस जास्त लागला नाही. सायकल चालवताना आणि संपल्यावरही मला कुठेच "हे मी केलं" असं वाटत नाहीय. कारण मला स्पष्ट दिसतं आहे की, अनेक जणांची सोबत त्यात आहे. अनेकांनी मदत केली आहे. हा उपक्रम अनेकांच्या मदतीमुळेच पूर्ण होऊ शकला. त्या त्या टप्प्यावर मदत करणारे स्थानिक मित्र असतील किंवा निरामयमधून बॅक स्टेजला राहून मदत करणारे लोक असतील. किंवा स्वामी सुंदर चैतन्यजी- चिन्मय मिशनसारख्या संस्थांमधले साधक. ह्या सगळ्यांचाही पूर्ण प्रक्रियेत तितकाच वाटा आहे. आणि त्यामुळे सायकलिंग तर पूर्ण झालंच, पण त्याबरोबर अपेक्षित असलेला संवाद, लोकांना भेटणं, आपला देश समजून घेणं, योग संस्थांचा परिचय करणं आणि निरामय संस्थेचा परिचय त्यांना करून देणं, ह्या गोष्टीही होऊ शकल्या! सायकलनेसुद्धा खूप चांगली साथ दिली! 

अशी अविश्वसनीय राईड पूर्ण झाल्यावर मनामध्ये एकच भावना आहे- कृतज्ञता! फक्त कृतज्ञता! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २१ (अंतिम): फक्त कृतज्ञता! 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 4 जून 2026.


अनुभव २१ (अंतिम): फक्त कृतज्ञता!

लेखकमार्गीयांनी शुक्रवार, 05/06/2026 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी ह्या २० दिवसांमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" प्रवास झाला. तो ३१ जानेवारीला चेन्नै येथे पूर्ण झाला. आपला देश खूप वेगळ्या प्रकारे अनुभवता आला आणि आपल्या देशबांधवांना भेटता आलं. चेन्नैमध्ये हा प्रवास थांबवताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आणि कोणत्याच प्रकारे ही एखादी अचिव्हमेंट आहे असं वाटत नाही. सायकलिंगची आवड, त्यासाठीचं मार्गदर्शन, तयारी, निसर्गाने दिलेली क्षमता, निरामय सदस्यांची मदत, प्रवासासाठीची मदत अशा गोष्टी सगळ्या बाहेरून आल्या व मी त्या फक्त माझ्यामध्ये साकार होताना बघितल्या. प्रत्येकाला निसर्गाने दिलेली ही क्षमता असते. मी फक्त एक उदाहरण समोर‌ ठेवू शकलो. त्याची जाणीव ही राईड पूर्ण करताना आहे. 

(माझा ब्लॉग. सायकल अनुभवांविषयी संवाद.)

 .... 

३१ जानेवारीला माझी बहिण- अदितीच्या घरी थांबलो. अदिती आणि शौनकजींशी गप्पा झाल्या. १ फेब्रुवारीला जवळच्याच कोटीवक्कम बीचवर वॉक केला. नंतर सायकलच्या पॅनिअर सॅकमधून सगळं सामान बाहेर काढलं. तेव्हा कळालं की, अरे इतके कपडे आणि इतकं सामान त्यात होतं! ही पॅनिअर सॅक माझी सायकलिस्ट मैत्रीण स्मिताने दिली होती. १ फेब्रुवारीच्या संध्याकाळी निरामयच्या टीमसोबत गूगल मीटद्वारे संवाद झाला. सायकलिंग पूर्ण झाल्यानंतरची प्रतिक्रिया, वाटेतल्या संस्थांचे मुख्य अनुभव हे सगळं तिथे बोलता आलं. 

सायकलिंगच्या ह्या उपक्रमातलं संचित अजून समोर यावं म्हणून अदितीने मला अनेक प्रश्न विचारले. योगाचा एक अर्थ जोडणे, असा आहे. ह्या पूर्ण प्रवासाच्या प्रक्रियेत आपण लोकांशी कसे जोडलेले असतो हे अनुभवता आलं. योगाच्या दृष्टीने सर्व जग एक ऑरगॅनिक अस्तित्व आहे. सगळे एकमेकांसोबत जोडलेले आहेतच. ती गोष्ट ह्या प्रवासात अनुभवता आली. एकाच कुटुंबातल्या पण अंतराने आणि संपर्क नसल्याने दुरावलेल्या कुटुंबियांना भेटता आलं. मला वाटतं अशा भेटी, हा संवाद ह्या उपक्रमामधील एक महत्त्वाचा भाग ठरला. त्याशिवाय दक्षिण भारतातल्या अनेक प्रसिद्ध आणि उत्तम काम करणार्‍या योग संस्थांचं काम बघता आलं. चिन्मय मिशन असेल, ईशा आदि योगी असेल, विवेकानंद केंद्र, अमृतापुरी आश्रम, अरविंद आश्रम, रामकृष्ण मठ किंवा थिऑसॉफिकल सोसायटी. त्यांची वेगवेगळी कार्यपद्धती, स्वरूप, तिथे चालणारे उपक्रम अशा गोष्टी बघता आल्या आणि त्यामध्ये समान असलेलं योगाचं सूत्रही अनुभवता आलं. 

एक उद्दिष्ट दक्षिण भारताचा असाधारण वारसा अनुभवणं, तो समजून घेणं हेसुद्धा होतं. तंजावुर, कुंभकोणम, थिरूअनंतपूरम आणि रामेश्वरम अशा ठिकाणी त्या गोष्टी अनुभवता आल्या. शिवाय ह्या भागांमध्ये चौल, पांड्य, नायक अशा पूर्वीच्या राजवंशांच्या काळातील अविश्वसनीय वास्तु आणि नगर रचनेची ओळख करून घेता आली. आज ह्या राजवटींचा ठसा आपल्याला अगदी पूर्व आशियापर्यंत दिसतो. त्याचं एक मुख्य केंद्र बघता आलं. कलेसाठी आणि उपासनेसाठी इतकी प्रचंड निर्मिती करणारी ती संस्कृती किती प्रगत असेल, हा प्रश्न पडला. 

दक्षिण भारतात आज वेगवेगळे पंथ, वेगवेगळ्या चालीरिती आणि आधुनिक जीवनशैली असं मिश्रण दिसतं. कदाचित काही जणांना वाटेल की, हे आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जाणं नाही का. पण मला असं वाटलं की, उपासना पंथाचं नाव किंवा लेबल बदललं असलं किंवा बाह्य फरक दिसत असले तरी त्यातले मूल्य आणि त्याचं सार अजूनही टिकून आहे. आत्मीयता, मेहनत करण्याची वृत्ती, शिस्त, एकमेकांसोबत बांधिलकी ह्या गोष्टी तर जाणवत होत्याच. पण त्याबरोबर सण- उत्सवांमध्ये एकत्र येण्याची भावना, उत्साह, रांगोळ्या, सुगंधी धूप, संगीत अशा गोष्टी आहेतच. शिवाय जेवणासाठी केळीचं पान, साग्रसंगीत स्वयंपाक, स्थानिक पातळीवर बनणारे विविध पदार्थ अशी परंपरा अजूनही टिकून आहे. 

अदितीने मला एक प्रश्न खूप छान विचारला. तो म्हणजे ह्या सायकल प्रवासानंतर तू काय मागे ठेवशील आणि काय नेहमी सोबत ठेवशील? त्याबद्दल मला असं वाटलं की, ह्या प्रवासातले अंतरं- किलोमीटरचे आकडे किंवा टप्पे हे मी बाजूला ठेवून देईन. आणि फक्त आणि फक्त कृतज्ञता सदैव सोबत ठेवेन. इतकं काही मला ह्या प्रवासात मिळालं. लोकांची मदत, निसर्गाची सोबत आणि माझ्या सायकलचीसुद्धा साथ मिळाली. जीवन खूप वेगळ्या प्रकारे जगता आलं. ती कृतज्ञता नेहमी सोबत राहील. घरातूनही सगळ्यांनी साथ दिली. आई- बाबा, बायको- मुलगी आणि इतर. अगदी क्लाएंटससुद्धा. त्यांच्यामुळेच हे सगळं इतकं करता आलं. 

ह्या सायकल प्रवासात फिरण्याचा खूप वेगळा अनुभव मला घेता आला. एक प्रकारची निसर्ग तीर्थयात्रा. एक प्रकारचा निसर्ग सत्संग. जेव्हा आपण प्रचंड असा समुद्र बघतो, उत्तुंग पर्वत बघतो तेव्हा आपल्या आतमध्ये असलेल्या उच्च तत्त्वाला साद घातली जाते. आपल्यात असलेल्या विराट तत्त्वालाही साद घातली जाते. आणि अर्थातच ह्या पूर्ण प्रवासात मला भेटलेले विविध स्वामीजी, संन्यासी आणि साधक. त्यामुळे मनामध्ये फक्त आणि फक्त कृतज्ञताच येते. 

अजून एक गोष्ट मला जाणवली की, जी प्रत्येक स्थितीमध्ये महत्त्वाची असते. ती म्हणजे समर्पण. केवळ संकल्प करून गोष्टी होत नाहीत. संकल्पाबरोबर समर्पणही आवश्यक असतं. ऑगस्टमध्ये व्हायरल फीवरमुळे बंगलोरला जाऊन एकही पेडल न मारू शकता परत यावं लागलं होतं. ह्यावेळी अगदी निघेपर्यंत ती शंका मनात होती. जानेवारीत राईडसाठी निघताना संकल्प होताच. माझ्या बाजूने तयारी होती, पण ही जाणीवसुद्धा होती की, केवळ माझ्या तयारीने हे होणार नाही. जीवनाचीसुद्धा तशी इच्छा असली तरच तसा प्रवास होईल.त्यासाठी मी मनोमन समर्पण केलं होतं. मनामध्ये ही जाणीव होती. 

असा हा प्रवास तर २० दिवसांमध्येच झाला, पण त्याचे अनुभव लिहायला मात्र पुढचे पाच महिने लागले! त्यावरून तुम्हांला कळेल की, सोपं काय आहे आणि अवघड काय आहे! पण हे अनुभव इतके वेगळे होते की, ते लिहून त्यामधली प्रक्रिया व संचित लोकांसोबत शेअर करणं हे अपरिहार्यच होतं. आणि ते मी करू शकलो ह्याचा नक्कीच मला आनंद आहे. 

दोन दिवस चेन्नैमध्ये बहिणीकडे राहिलो. बंगलोरला सायकल नेली तेव्हा बसमधून नेली होती. आता चेन्नैवरून परत बंगलोरला बसने आणायची व बंगलोरवरून बसने पुण्याला आणायची असा एक पर्याय होता. पण हा प्रवास मोठा होता. ट्रेनने सायकल आणता येते- तिचे चाक आणि मुख्य भाग वेगळे केले की, अशी डिसमँटल केलेली सायकल ट्रेनमध्ये सीटच्या खाली बसून जाते. पण त्यासाठी‌ एक पिशवी लागते! ह्यावर अदिती आणि शौनकजींनी उपाय शोधला. सायकल ठेवण्यासाठी एक DIY पिशवी बनवली! टर्पोलिनची शीट त्यांनी आणली आणि त्याला पट्ट्या लावून सायकल ठेवण्यासाठीची एक तात्पुरती पिशवी बनवली. सायकल डिसमँटल केल्यावर अशा पिशवीमध्ये मावली! तत्काळचं ट्रेनचं तिकिटही शौनकजींनी मिळवून दिलं! ट्रेनमध्ये डब्यात सायकल ठेवताना थोडी अडचण आली, पण सह- प्रवाशांनी सहकार्य केल्यामुळे काही त्रास झाला नाही! बंगलोरला न जावं लागता थेट पुण्यात आलो.... 

पुणे स्टेशनवर आल्यावरही निरामय पुणे टीमचे सदस्य स्वागतासाठी आले! हेलसकर मॅडम, कारेगांवकर सर आणि बाबा. खूप भावुक करणारे क्षण ते होते. सगळ्यांना वाटलं की, मी काही तरी अवघड काम केलं आहे. माझा अर्थात् तो गैरसमज होत नव्हता. हे सगळे करू शकतात, पण आपल्याकडे फार लोक असे करत नाहीत आणि त्यामुळे हे फार अवघड आहे, असा आपला समज होतो. घरी पोहचल्यावर मुलीने "वेलकम बेस्ट फादर" असं दारावर लिहीलं होतं! तीसुद्धा नकाशात माझा प्रवास बघत होती. 

पुण्यामध्ये निरामय टीमने अनुभव कथनाचा कार्यक्रम ठेवला. तिथेसुद्धा हे अनुभव शेअर करता आले. निरामय टीममधल्या हेलसकर मॅडम, अर्चनाताई जाधव, श्रीधरजी कारेगांवकर आणि इतरांनी पूर्ण नियोजन व प्रवासात खूप मदत केली. विशेषत: अर्चनाताई आणि श्रीधरजींना मी थोडा जास्त त्रास दिला. 

चिन्मय मिशनचे स्वामी सुंदरजी चैतन्य ह्या प्रवासामध्ये सदैव सोबत होते. जिथे कुठे अडचण होती, तिथे ते मदत करत होते. इंटरनॅशनल चिन्मय फाउंडेशनच्या ऍकेडेमिक डायरेक्टर डॉ. गौरी माहुलीकर मॅडमनीसुद्धा सुरूवातीपासून खूप मदत केली. त्यांनीच केरळमध्ये अनेकांशी जोडून दिलं. मी तिथे असताना त्या प्रवासात होत्या, त्यामुळे त्यांची भेट राहून गेली होती. पण आल्यानंतर लवकरच त्या पुण्याला आल्या होत्या. तेव्हा त्यांची छान भेट झाली. त्यांनी खूप कौतुक केलं आणि प्रोत्साहन दिलं. गंमत म्हणजे माझ्या वहिनीची आणि त्यांची जुनी ओळख. त्यांची ह्या निमित्ताने अनेक वर्षांनी भेट झाली. Yoga reconnects! 

त्या त्या ठिकाणी मदत करणार्‍या व्यक्तींबद्दलही कृतज्ञता मनात आहे. त्याशिवाय प्रवासाच्या उत्तरार्धामध्ये सेवा भारती तमिळ नाडूचे शुण्मुगा राजा जी, सिद्धार्थजी, केशवनजी आणि श्री. विजय राजमोहनजी ह्यांनी खूप मदत केली. ह्या सगळ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. 

पुढच्या सायकल प्रवासाची इच्छा नक्की आहे. तो लगेच करणार नाही. पण येत्या काही वर्षांमध्ये करू शकतो. एक सायकल दौरा ईशान्य भारत- नॉर्थ ईस्टमध्ये असेल आणि एक सायकल दौरा लदाख़मध्ये असेल. सध्या तरी हे स्वप्न आहे. बघूया कसं होतं. 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 5 जून 2026.



























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

राजस्थान ट्रिप

  तयारी, भाग १ लेखक जेडी यांनी मंगळवार, 14/04/2026 18:51 या दिवशी प्रकाशित केले. राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची...