मुंबई आणि गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आमची चंदीगडहून मुंबईकडे येणारी रेल्वे अचानक रद्द झाली. नवीन गाडीचे आरक्षण मिळेपर्यंत आम्हाला चंदीगडमध्येच अडकून पडावे लागणार होते. अडचण तर होतीच; परंतु या अडचणीनेच आम्हाला चंदीगड आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस मिळवून दिला. आणि अशा वेळी सर्वात आधी आठवण झाली ती कर्नलतपस्वी यांनी सांगितलेल्या पिंजोर गार्डन आणि भीमादेवी मंदिराची! अडकून पडलेल्या सर्वांसाठी एक गाडी भाड्याने केली आणि आम्ही निघालो हरियाणातील पिंजोरच्या दिशेने. प्रसिद्ध पिंजोर अर्थात यादविंद्र गार्डनला अगदी लागूनच, गर्द झाडीच्या शांत परिसरात भीमादेवी मंदिराचे प्राचीन अवशेष आणि संग्रहालय आहे.
प्रवेश शुल्क प्रत्येकी रु . २ ५ /-
येथील संग्रहालयाची मांडणीही आम्हाला विशेष आवडली. विविध शिल्पावशेष एकाच मोठ्या दालनात गर्दीने न ठेवता स्वतंत्र छोट्या दालनांमध्ये मांडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक शिल्प निवांतपणे आणि जवळून पाहता येते.
आज येथे पूर्ण स्वरूपातील प्राचीन मंदिर उभे नाही. दिसतात ते मंदिराचे भग्नावशेष, दगडी अधिष्ठान आणि परिसरात जतन करून ठेवलेले अनेक शिल्पखंड. पण हे अवशेष पाहताना कल्पना येते की शेकडो वर्षांपूर्वी येथे किती भव्य मंदिरसंकुल उभे असावे! या परिसरातील पुरातत्त्वीय अवशेष साधारण ८व्या ते १२व्या शतकांदरम्यानच्या मंदिरनिर्मितीशी संबंधित मानले जातात. उत्खननात येथे अनेक मंदिरांचे अवशेष आणि शेकडो शिल्पखंड सापडले. मूळ मंदिरसंकुल पंचायतन पद्धतीचे असल्याचे मानले जाते—मध्यभागी मुख्य देवालय आणि त्याच्या चार बाजूंना चार उपमंदिरे, अशी पाच मंदिरांची रचना. आज भग्न अवस्थेत असले तरी मंदिराच्या जोत्याचे अवशेष आणि आजूबाजूला ठेवलेले कोरीव दगड त्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात हे अवशेष पाहताना इतिहासाशी थेट संवाद साधत असल्यासारखे वाटते.
या ठिकाणाचे खरे आकर्षण म्हणजे येथील अप्रतिम शिल्पसंपदा मंदिराच्या भिंती, स्तंभ, द्वारशाखा म्हणजेच दारांच्या कोरीव चौकटी, देवकोष्ठे आणि इतर वास्तुघटकांवर विविध देव-देवता, अप्सरा, नर्तिका, संगीतकार तसेच तत्कालीन सामाजिक जीवनातील अनेक प्रसंग कोरलेले होते. मंदिर नष्ट झाले, पण त्यावरील अनेक शिल्पे काळाच्या आघातातून वाचली. संग्रहालयात शिव, विष्णू, गणेश, देवीची विविध रूपे, लकुलीश शिव यांसारखी अनेक शिल्प येथे दिसतात .
धार्मिक प्रतिमांबरोबरच सुंदर स्त्रीप्रतिमा आणि अलंकारिक शिल्पे पाहायला मिळतात. . स्त्रीदेहाची सहज, लयबद्ध मुद्रा दगडात इतक्या सुंदर रीतीने साकारलेली पाहून त्या काळातील शिल्पकारांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.
मिपाकर प्रचेतस यांनी एका प्रतिसादात म्हटले आहे की या संकुलातील छायाचित्रे अजून हवी होती .
@प्रचेतस , हि घ्या तुमच्या आवडीची दर्पणा ! सोबत आलस्या
स्तंभ, द्वारशाखा, देवकोष्ठे आणि इतर वास्तुघटकांवर विविध देव-देवता, अप्सरा, नर्तिका, संगीतकार तसेच तत्कालीन सामाजिक जीवनातील अनेक प्रसंग कोरलेले होते. मंदिर नष्ट झाले, पण त्यावरील अनेक शिल्पे काळाच्या आघातातून वाचली.
जाता जाता कर्नलतपस्वींनी सुचवल्यामुळेच हे हे मंदिर पाहता आले तेव्हा त्यांच्या आवडीच्या छंदाची येथे घेतलेली दोन छायाचित्रे .
खरं तर या ठिकाणी येण्याचे आमचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. आमची रेल्वे वेळेवर सुटली असती, तर कदाचित आम्ही या मंदिरापासून अगदी जवळ असूनही ते न पाहताच मुंबईला परतलो असतो. पण गाडी रद्द झाली, आम्ही चंदीगडमध्ये अडकलो आणि त्यामुळेच हे प्राचीन मंदिरसंकुल पाहण्याची संधी मिळाली. गर्द झाडीच्या सान्निध्यात शांतपणे उभे असलेले मंदिराचे भग्नावशेष, दगडात गोठलेली शेकडो वर्षांपूर्वीची कला आणि संग्रहालयात जपून ठेवलेली त्या काळातील शिल्पसंपदा पाहताना एकच विचार मनात आला— काही भेटी आपण ठरवतो... आणि काही भेटी नियती आपल्यासाठी ठरवून ठेवते!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.