चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार
सायकल रिक्षा असल्या तरी आम्ही त्या करायला जरा बिचकत होतो. पण दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही शेवटी दोन रिक्षा ठरवून निघालो. एका माणसाने आपल्यासारख्या ४ धडधाकट व्यक्तींना ओढून न्यावं हा थोडा विचित्र विचार मनात येत होता.
पण त्यांच्याकडे पाहून सगळ्यांनी असा विचार केला तर हा रोजगार म्हणून निवडलेल्या माणसांनी काय करावं हा हि विचार येत होता.
१५ मिनिटात आम्ही होशियारपूरी हॉटेलला पोचलो. १९३७ पासून असा त्याचा फलक ते किती जुनं हॉटेल आहे हे दर्शवत होता. फार मोठं टापटीप हॉटेल नसलं तरी तिथल्या गर्दीवरून ते लोकप्रिय आहे याचा अंदाज येत होता. आम्हाला ४-५ मिनटात ८ जणांना पुरेसं एक टेबल मिळालं.
टेबल मिळण्याआधीच तिथल्या वेटरने अगत्याने दुसरी बसायला जागा दिली होती, पाणी आणून दिलं होतं, आणि ऑर्डर ठरवायला मेन्यूकार्डसुद्धा आणलं होतं. त्यामुळे इतक्या उन्हातून आलो असलो तरी टेबल मिळेपर्यंत आम्ही आत स्थिरावलो होतो, आमची ऑर्डर देऊन झाली होती.
तिथल्या प्रत्येक पदार्थाची चव उत्तम होती. आम्ही मनसोक्त जेवलो. आम्हाला विशेष आवडली ती म्हणजे फणसाची भाजी. हा पदार्थ आपल्याकडे सहजासहजी हॉटेल मध्ये मिळत नाही. आणि लस्सी. आपल्याकडे लस्सी फारच घट्ट आणि अति गोड असते. उत्तरेकडे ताजी, पातळ आणि फेसाळती लस्सी पिण्याची मजा वेगळीच आहे.
जेवुन निघाल्यावर पुन्हा ५-१० मिनिटे आम्ही सायकलरिक्षा ला काही पर्याय मिळतो का बघत होतो. पण तो काही मिळाला नाही. सायकलरिक्षा मधेच पुन्हा आमची स्वारी निघाली रूमकडे.
अगदी तासभर पहुडलो आणि लगेच बाहेर निघण्याची वेळ झाली. तयार होऊन आम्ही हर कि पौडीला जायला निघालो. तिथे आम्हाला संध्याकाळची गंगा आरती बघायची होती आणि मग आजूबाजूच्या भागात खादाडगिरी करायची होती. त्याव्यतिरिक्त गर्दी मध्ये मंदिरांमध्ये फिरण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. विचार जुळायला लागले कि ट्रिपची मजा जास्त असते.
जाताना मात्र आम्हाला बॅटरीवाली रिक्षा मिळाली. आम्ही पण निवांत होतो, आणि तो रिक्षावाला पोरगा पण, त्यामुळे काही सेकंद ती रिक्षा चालवायची माझी हौस पूर्ण झाली.
या वेळेस गंगेचं पाणी फार स्वच्छ वाटलं. मागच्या वेळेस इतकं काळं गढूळ पाणी होतं कि त्याला हात लावायची पण इच्छा होत नव्हती. पण यावेळी मात्र आम्ही बिनधास्त पाण्यात उतरलो, टाईमपास केला, फोटो काढले. आता हि कमाल आपोआप झाली का नमामि गंगे, स्वच्छ भारत योजनेमुळे ते ती गंगामैय्याच जाणे.
गंगा घाटावर गर्दी सतत असते आणि आरतीची वेळ जवळ येते तशी ती वाढत जाते. लोक एकेक दोन दोन तास जागा पकडून बसून राहतात. त्यामुळे आम्हाला फार चांगली जागा मिळाली नाही. आणि मागे लोक उभेच होते. तिथले चौकीदार बसून घ्या बसून घ्या अशी विनंती करत होते पण आमच्या पुढचे लोक काही जुमानत नव्हते, त्यामुळे आम्हालासुद्धा उभं राहण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
तिथे बराच वेळ मंत्रघोष आणि आरती चालु असत. लोकांचे पूजापाठ चालु असतात. तुम्ही सुद्धा पूजा करा आरती करा दान करा म्हणत दलाल मागे लागत असतात. गंगेत स्नान केलं कि पाप मिटतात, अस्थी वाहिल्या कि मोक्ष मिळतो असे समज आहेत. त्यामुळे लोकांच्या अंघोळी, अस्थी/निर्माल्य विसर्जन हेही चालु असतं. लोकांची फोटोग्राफी चालु असतं. आणि हे सगळं सोबत चालु असतं.
गुरुजींच्या मंत्रघोषानंतर गंगेची आरती (रेकॉर्डेड) सुरु होते. ती आठ दहा गुरुजी मिळून करतात. छान सोहळा आहे. त्यानंतर बरेच लोक आरतीचं ताट घेऊन फिरतात. कुठली ऑथेंटिक थाळी ते कळत नाही. पण दानाच्या अपेक्षेमुळे बरेच लोक फिरतात. आणि आलेले लोक दान टाकतात सुद्धा.
आरती झाल्यावर आमची खादाड भटकंती सुरु झाली. आमच्यातल्या समीरने इंटरनेट वरून तिथे खायला चांगलं मिळतं अशी माहिती काढली होती.
सर्वात पहिले खाल्लं ते म्हणजे सामोसे, खस्ता कचोरी, पुरी भाजी आणि चंद्रकला मिठाई. सगळ्यात तेल तूप अगदी भरपूर. चव अगदी विशेष नाही. नशीब चांगलं म्हणून आमचा ८ जणांचा ग्रुप होता. नाहीतर अशा भरपूर गोष्टी ट्राय करणे हे काही सोपे काम नाही.
मग तिथल्या चिंचोळ्या गल्ल्यातुन फिरत फिरत, थोडी किरकोळ शॉपिंग करत आम्ही पुढे निघालो. मोठे पान दि गिलोरी, बेलफळाचा ज्यूस असा आस्वाद घेत घेत आम्ही पोचलो जैन चाट भांडारला. हे आपल्याला गुगल मॅप्स शिवाय सापडणे मुश्किल आहे. किंवा पुन्हापुन्हा विचारत जावे लागेल.
जैन चाट भांडार अगदी पैसे वसूल होतं.तिथले काका अगदी गप्पिष्ट होते आणि आमच्या नशिबाने रात्र होत आली असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. त्यांनी अगदी निवांत त्यांच्या पदार्थांबद्दल माहिती देत प्रेमाने आम्हाला खाऊ घातलं.
त्यांच्या गोडगोड बोलण्याइतकंच त्यांचे पदार्थ अप्रतिम होते. कांजिवडा (त्यांची खासियत), गोलगप्पे (पाणी पुरी), आलू चाट हे सगळं आम्ही मनापासुन एन्जॉय केलं. मला आधी इथे न आल्याचा आणि बाकी ठीकठाक गोष्टी खाऊन पोट थोडं भरल्याचा पश्चाताप झाला. पण तरी ह्या जागेची माहिती मिळाल्या बद्दल इंटरनेटचे आणि माहिती काढणाऱ्या समीरचे मी मनोमन आभार मानले.
तिथून निघाल्यावर मग एका गाडीवर कुल्फी आणि बदाम मिल्क (दोन्हीही सुरेख) याने आम्ही आमच्या चरण्याची सांगता केली.
रात्री साधी इकडच्या टमटम सारखी रिक्षा मिळाली. तुडुंब पोट घेऊन रात्री कसेबसे झोपलो. सकाळी लवकर उठून निघायचं होतं दिवसभराच्या प्रवासासाठी. सारी या आमच्या ट्रेकच्या आरंभ स्थानासाठी.
क्रमशः
ता. क. हरिद्वारचा हा दिवस दृक्श्राव्य माध्यमातून अनुभवण्यासाठी हा युट्युब व्हिडीओ बघा.
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल
हीच मालिका युट्युबवर दृकश्राव्य माध्यमात :
Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar
Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal
आणि त्यात भर पडली ती हरिद्वार आणि ऋषिकेश जवळ झालेल्या ट्रॅफिक जॅमची. पर्यटनाचा मोसम असल्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूची भरपूर गर्दी झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामेही चालू आहेत. त्यामुळे सध्या रोज ट्रॅफिक होत असल्याचं आम्हाला समजलं.
आमचा ८ जणांचा ग्रुप, आणि अजून ६ ट्रेकर्स हरिद्वार मध्ये आलेले होते. ट्रेक दि हिमालयाजकडून आमच्यासाठी ३ गाड्यांची (सुमो/बोलेरो) व्यवस्था करण्यात आली होती. हरिद्वार स्टेशनहुन आम्हाला घेऊन या गाड्या निघाल्या आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्या. ऋषिकेश पार करायलाच ५-६ तास लागले.
आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे मी ज्या गाडीत होतो त्या गाडीचं चाक जॅम झालं. ट्रॅफिक जॅम असल्यामुळे बाकी गाड्या पुढेमागे झाल्या होत्या. आमची गाडी बाजूला घेईपर्यंत बाकी गाड्या पुढे गेल्या आणि आम्ही मागे हरिद्वार शहराच्या थोडंसंच बाहेर अडकलो.
मेकॅनिक बोलावणे, तीच गाडी नीट करायचा प्रयत्न करणे ह्यात २-३ तास गेले. तोपर्यंत आम्ही बाजूला धाब्यावर वेगवेगळे चविष्ट पराठे, लस्सी असा भरपेट नाष्टा केला, पत्ते खेळले. दुसरी गाडी बोलावली पण तीसुद्धा हरिद्वारहुनच याच ट्रॅफिकमधुन येणार असल्यामुळे भरपूर वेळ गेला. शेवटी एकदाचे आम्ही निघालो.
ऋषिकेशच्या पुढेच जरा रस्ता मोकळा झाला आणि ड्रायव्हरचं कौशल्य पाहायला मिळायला लागलं. तिथले सगळेच ड्रायव्हर अशा दुर्गम घाटातसुद्धा इतक्या सफाईनं आणि वेगात गाड्या चालवतात. आपण शहरातसुद्धा बारीक गल्ल्यांमध्ये समोर गाडी आली कि जरा जपून थांबत थांबत चालवतो. पण ते अशा घाटातसुद्धा कोणाच्या बापासाठी थांबत नाहीत. सुरुवातीला जरा धडकी भरू शकते, पण थोड्यावेळाने आपल्यालासुद्धा ह्याची सवय होते.
रस्त्यात अलकनंदा आणि भागीरथीचा संगम म्हणजेच देवप्रयाग लागतं. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा, प्रवाहाचा वेग वेगळा, आणि संगम झाल्यावरसुद्धा काही अंतरापर्यंत हा वेगळेपणा स्पष्ट दिसत राहतो. बरोब्बर संगमाच्या कोपऱ्यावर एक सुंदर घाट आणि गाव आहे. तिथे जायला रस्ता पण आहे. मागे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जाताना आणि याही वेळेस तिथे थांबण्याची आणि जाण्याची खूप इच्छा होती. पण खूप दूर जायचं असल्यामुळे तेवढा वेळ नसतो. आणि आजतर आम्हाला खूप उशीरही झाला होता.
जेवण सोडता आम्ही कुठेही थांबलो नाही. सारीला आम्हाला पोचायचं होतं ५ वाजता पण वाजले १०. जेवण करून आम्ही लगेच झोपून गेलो.
सकाळी देवेंदर या आमच्या ट्रेक लीडरने ब्रिफींग घेतली. सगळ्यांच्या ओळखी झाल्या, कोणी कोणकोणते ट्रेक केलेत, काय तयारी केली आहे यावर बोलणं झालं. सारी ते देओरीया ताल हा आजचा ट्रेक अगदीच छोटा आणि सोपा असल्यामुळे आम्ही आरामात नाश्ता करून निघालो.
३-४ किलोमीटरचा हा ट्रेक आहे आणि ह्यात मुख्यतः चढच आहे. अगदी रमत गमत जाऊनसुद्धा आम्ही ३-४ तासात लंचच्या आधी आरामात पोचलो.
कॅम्पसाईट वर आमचं वेलकम ड्रिंक देऊन स्वागत करण्यात आलं. तिथे एक बुरांश नावाची त्या भागात उगवणारी वनस्पती आहे. त्याला लालसर रंगाची फुलं येतात. त्याचं इंग्रजीतील नाव Rhododendron आहे. हे म्हणताना सगळ्यांची गम्मत येते. त्याचा अगदी रुह अफझासारखा दिसणारा ज्यूस बनतो. आणि हे वेलकम ड्रिंक सुद्धा रुह अफझासारखंच तजेलदार आहे. तिथे सर्व दुकानात कोकमसारख्या ह्याच्या बाटल्या मिळतात. ट्रिपहुन येताना मी बुरांश आणि बेलफळ अशा स्क्वाशच्या दोन बाटल्या ट्राय करायला घेऊन आलो.
तिथे कॅम्पसाईटवर पोचल्यावर देवेंदरने सगळ्यांकडून ५-१० मिनिटे स्ट्रेचिंग करून घेतलं. हि गोष्ट मला खूप आवडली. ट्रेकनंतर जो शीण येतो किंवा अंग दुखतं ते ट्रेक संपल्या संपल्या अशी स्ट्रेचिंग करण्यामुळे जवळपास नाहीसं होऊन जातं. एकदम ताजंतवानं वाटतं.
मी या आधी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, एव्हरेस्ट बेस कॅम्प असे दोन हिमालयातले ट्रेक्स केलेत, पण तिथे आमच्याकडून हे करून घेतलं नव्हतं. स्ट्रेचिंगची हि जादू पहिल्यांदाच पाहिली, त्यामुळे ट्रेक दि हिमालयाजच्या त्यांनी ह्या विचारपूर्वक टाकलेल्या गोष्टीचं कौतुक वाटलं.
थोड्याच वेळात पाऊस सुरु झाला. ताजेतवाने होऊन जेवण वगैरे झाल्यावर आम्ही थोडावेळ पाऊस थांबण्याची वाट बघितली. पण कमीअधिक जोराने पाऊस चालूच होता. त्यामुळे आम्ही शेवटी पावसातच ताल म्हणजेच तलाव बघायला गेलो. ह्याच्यामुळेच ह्या जागेच नाव देओरीया ताल असं आहे.
अतिशय सुंदर तलाव आहे, पण पावसामुळे आम्हाला तिथली दृश्य मात्र फार काही बघता आली नाही. परत आलो.
मग सगळ्यांमध्ये मिळून बराच वेळ काही गेम्स खेळण्यांमध्ये छान टाईमपास झाला. संध्याकाळी पाऊस जरा थांबला आणि आम्ही मग जवळपासच्या छोट्या मोठ्या टेकड्यांवर जाऊन फेरफटका मारला. हळूहळू ढग बाजूला होत आम्हाला फार सुंदर दृश्य दिसायला लागली.
आणि काहीच वेळाने आम्हाला पहिल्यांदाच हिमाच्छादित शिखरे दिसायला लागली. तेव्हा सर्वांना झालेला आनंद शब्दांच्या पलीकडे होता. वाह, जब्बरदस्त, क्लास, एक नंबर असे सतत एका मागून एक उद्गार आमच्या सर्वांच्या तोंडून निघत होते.
संध्याकाळची कातरवेळ आणि ढगांचा प्रकाशसोबत खेळ चालू असल्यामुळे कॅमेऱ्यात मात्र ते आम्हाला तितक्या ताकदीने टिपता आलं नाही.
कधी कधी देव माणसाला असं काही दाखवतो कि ते टिपायला त्याची कला आणि त्याने बनवलेली यंत्रेसुद्धा पुरी पडत नाहीत. अशा वेळेस आपण फक्त तो सुंदर क्षण आपल्या डोळ्यात आणि मनात साठवु शकतो आणि तो अनुभवायला दिल्याबद्दल देवाचे आभार मानु शकतो. अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने ह्या ओळी मला पुसटश्या आठवत होत्या पण नेमके शब्द आठवत नव्हते. नंतर गुगल करून शेवटी सापडल्या.
छोटासा ट्रेक, गेम्स, निसर्गसौंदर्य असा हा दिवस छान गेला. पुढच्या दिवशी मात्र तिथून बनियाकुंडपर्यंत २० किलोमीटरच्या ट्रेकचं आव्हान होतं. त्याबद्दल पुढच्या वृत्तांतात.
(क्रमशः)
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ
तिथून समोर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. हळु हळू सूर्य आमच्या उजवीकडच्या डोंगरामागून वर येत होता आणि प्रकाशाची तिरीप आपला कोन बदलत खाली खाली येत होती. ह्या दृश्यांनी आम्हाला किती तरी वेळ तिथेच खिळवून ठेवलं होतं.
तुंगनाथ मंदिरापर्यंत तर ट्रेकला आल्यासारखं वाटतच नाही. यात्रेकरू मध्ये पुष्कळ लोक घरातल्या लहान मोठ्यांसकट सर्व कुटुंबाला घेऊन येतात. त्यामुळे यात्रेला आल्यासारखंच वाटतं. तसे सर्व वयाचे लोक कुटुंबासकट ट्रेकवरसुद्धा भेटतात, पण तिथे संख्या कमी असते.
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ५ : ऋषिकेश रिव्हर राफ्टिंग
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ
---
ऋषिकेशला सकाळी आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे फार मोठी समस्या झाली. खरंतर ते हॉटेल म्हणजे एक हॉस्टेल होतं. ऋषिकेशमध्ये हॉटेलइतकेच होस्टेल आहेत.
या हॉस्टेलमध्ये सिंगल बेड, डबल बेड, बंक बेड, हॉल आणि किचन सामाईक वापरासाठी आणि बेडरूम स्वतंत्र भाड्याने अशा अनेक प्रकारच्या व्यवस्था आहेत. स्वस्त भाड्यामुळे भटकंती करणाऱ्या तरुणांमध्ये हे युथ होस्टेल बरेच लोकप्रिय आहेत.
आम्ही जिथे थांबलो होतो (दि अननोन प्लेस) तिथे सेवा खूपच वाईट होती. इतक्या मोठ्या होस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी फक्त एकच माणूस थांबला होता.
पहाटे जेव्हा आम्ही आवरायला उठलो तेव्हा आमच्या रूममध्ये पाणीच बंद झालं. आम्ही खाली गेलो तेव्हा ऑफिससमोर आणखी लोक जमले होते. आणि तो मुलगा ऑफिसचं दार बंद करून आत ढाराढूर झोपला होता.
आम्ही सकाळी लवकरच राफ्टींग बुक करून ठेवली होती. जेणेकरून राफ्टिंग लवकर संपून आम्हाला उरलेला दिवस फिरायला मिळेल. पण पाणी नसल्यामुळे आम्हाला आवरायला मोठा अडथळा निर्माण झाला.
खूपदा दार वाजवल्यावर शेवटी तो मुलगा उठला. आणि उद्धटपणे उत्तरे द्यायला. पाणी कधी येईल, मागवलं आहे का, हे काहीच नीट सांगत नव्हता. "त्याने पाणी येईल तेव्हा येईल" असं उर्मट उत्तर दिलं.
"मला काहीच माहिती नाही मालकाशी बोला" असं म्हणून मालकाचा नंबर दिला आणि पुन्हा दार बंद करून आत निघून गेला.
मालक काही फोन उचलत नव्हता. आणि लोक ऑफिसच्या दारावर धाडधाड वाजवत होते.
आम्ही शेवटी राफ्टिंगवाल्याला फोन करून थोडा उशिरा येऊ असं सांगितलं. आम्हाला त्यादिवशी राफ्टिंग आणि जमलं तर बंजी जम्पिंग एवढंच करायचं होतं.
पण बाकी काही बिचार्यांचे मात्र प्रवासाचे बेत होते. थोड्याच वेळात त्यांना निघायचं होतं. त्यांची फारच गैरसोय झाली. एक आजी तर त्या मुलाच्या नावाने खुप ओरडत होत्या. त्यांच्या मुलाचं का नातवाचं पोट बिघडलं होतं. आणि तो आत असताना पाणी गेलं होतं. आता हे वाचुन ऐकून गंमतशीर वाटेल पण जो त्या परिस्थितीत असतो त्याची मात्र फार फजिती होते.
अर्ध्या एक तासाने थोडं थोडं पाणी नळाला यायला लागलं आणि पुन्हा संपायच्या आत आम्ही फटाफट आवरून निघालो. बाहेर एका ठेल्यावर पराठ्यांचा भरपेट नाश्ता केला.
मग राफ्टिंग एजंटच्या ऑफिससमोर येऊन थांबलो. ऋषिकेशमध्ये ढिगाने राफ्टिंगचे एजंट्स आहेत. खास करून तपोवनमध्ये. ऋषिकेशच्या मुख्य गावाजवळ तपोवन हा एरिया आहे इथे होस्टेल्स, राफ्टिंग आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी खूप आहेत.
राफ्टिंगची फीस अंतरानुसार असते. ९, १५, २३ असे वेगवेगळे पॅकेज असतात. जेवढं अंतर निवडाल तेवढं अंतर एका ट्रकमध्ये बसून रस्त्यावरून तपोवन पासून दूर जायचं. ह्या ट्रक/टेम्पो मधेच राफ्ट, वल्हे, कयाक, जॅकेट्स, प्रवासी आणि गाईड असे सर्व जातात. मग हि राफ्ट हाताने उतरवून नदीपर्यंत घेऊन जावी लागते.
सर्व प्रवासी (जास्तीत जास्त ८) आणि एक गाईड राफ्टमध्ये बसतात. गाईड राफ्टच्या मधोमध बसून सर्वांना मार्गदर्शन करतो. दुसरा एक गाईड छोट्याशा एका माणसाच्या कयाकमध्ये बसून आपल्या राफ्टच्या आसपास राहतो. जर चुकून कोणी खाली पडलं किंवा काही झालं तर राफ्टवाला गाईड बाकी लोकांसोबत राफ्टमधेच राहतो. आणि कयाकवाला गाईड मदतीला जातो.
राफ्टिंग सुरु करण्याआधी गाईड सुरक्षेसंबंधी सर्व सूचना अगदी सविस्तर पद्धतीने देतो. ह्या सविस्तर सूचना ऐकून आमच्या ग्रुपमधल्या एक दोन जणांना भीती वाटली. त्यांनी आधी एवढा विचार केलेलाच नव्हता. पण गाईडचं बोलणं ऐकून हे पण होऊ शकतं ते पण होऊ शकतं असं सर्व ऐकून त्यांना भीती वाटली. पण आम्ही थोडा धीर दिला कि हे सांगणं तर त्यांचं कामच आहे. असं होईलच असं नाही. पण काही झालं तर आपल्याला माहित तर हवं काय करायचं. त्यांनी हिम्मत करून ते आलेच.
गंगेचा प्रवाह एकदम जोरदार असतो आणि पाणी महाथंड. तरी त्यामानाने राफ्टिंग सुरु केल्या केल्या प्रवाहाचा वेग थोडा कमी असतो. पण नंतर अतिजास्त वेगाच्या प्रवाहाचे काही क्षेत्र येतात, त्यांना रॅपिड म्हणतात. इथे प्रत्येक रॅपिडला एक नाव दिलेलं आहे. आमच्या गाईडच्या मते सर्वात जास्त डेंजर रॅपिड म्हणजे गोल्फ कोर्स.
सर्वच रॅपिड्समध्ये खूपच मजा आली. बोट प्रचंड हेलकावे खात वर खाली आपटत राहते, इकडून तिकडून थंड पाणी अंगावर येत राहतं. गाईड सतत ओरडत राहतो, फॉरवर्ड, बॅकवॉर्ड, स्टॉप, स्लो. त्याच्या सूचना पाळत पाळत वल्हे मारताना आपली त्रेधा तिरपीट होते.
थोड्या थोड्या अंतराने जिथे प्रवाह संथ आहे तिथे गाईड आपल्याला होडीला पकडून पाण्यात उडी मारायची आणि होडी जवळच तरंगण्याची परवानगी देतो. हे गंगेच्या पाण्यात डुंबणं मला सर्वात जास्त आवडलं. इतक्या थंड वाहत्या पाण्यात डुंबण्याची मजा शब्दात सांगण्यासारखी नाही. इतकं ताजं तवानं वाटतं आणि तिथून निघण्याची इच्छाच होत नाही.
मजा तर मजा आणि गंगेत नाहण्याचं पुण्य मिळतं ते वेगळंच. हरिद्वार सारख्या तीर्थक्षेत्रात इतकी गर्दी अंघोळ करत असते, अंग कपडे धूत असते कि तिथे पाण्यात शिरावं सुद्धा वाटत नाही. (तरी या वेळी खरंच फरक पडलेला दिसला हरिद्वार ला). इथे स्वच्छ पाण्यात कळतं नदीमध्ये स्नान इतकं पवित्र का मानलं गेलं असेल.
गोल्फ कोर्स रॅपिडजवळ एक छोटा अपघात घडला. तिथे लाटा इतक्या उंच उसळत होत्या कि एका क्षणी आमची बोट समोरून मागे पलटते कि काय असं वाटत होतं इतकी वर गेली. पण सुदैवाने आमची बोट वाचली. पण जवळच फिरणारी एक बोट उलटली आणि त्यातले २-३ लोक पाण्यात पडले. अचानक इतका कल्लोळ झाला कि काही काहीच कळेना. लाटांचा आवाज तर होताच.
त्यातलीच एक मुलगी क्षणात वाहत आमच्या बोटीला येऊन धडकली आणि तिने लगेच घट्ट आमच्या बोटीचा दोरखंड आणि मध्ये बसलेल्या समीरचा पाय धरून ठेवला. सगळे ओरडायला लागले. काही सेकंद नुसते ओरडण्यात गेले. कोणाला काही समजत नव्हतं. शेवटी समीरला गाईडने सुरुवातीला सांगितलेल्या पद्धतीने तिला ओढून आत आणता आलं. (ती सुरुवातीची माहिती कामी आलीच म्हणायची)
थोडा वेळ ती आमच्या बोटाच्या मध्यभागी बसून राहिली. ती इतकी घाबरली होती कि तिला काही बोलायला पण सुचत नव्हतं. गाईडने आणि आम्ही तिच्याशी बोलून वातावरण जरा हलकं केलं. मग ती जरा शांत झाली. पुढे एका सुरक्षित ठिकाणी ती तिच्या बोटमध्ये पुन्हा गेली.
राफ्टिंगला जी गर्दी असते त्याचा असा एक फायदा आहे. एका वेळी २-४ राफ्ट आणि कयाकवाले गाईड पाण्यात जवळपास फिरत असतात. त्यामुळे असं काही झालं तर मदतीला सर्वजण धावून येऊ शकतात.
राफ्टिंगच्या शेवटच्या स्टॉपआधी मॅगी पॉईंट आहे. का ते सांगायला नको. गरम मॅगी, चहा, पकोडे याचे बरेच ठेले तिथे लावलेले आहेत. तिथेच एका उंच खडकावरून लोक पाण्यात उद्या मारून क्लिफ जम्पिंगचा आनंद घेतात. आम्हाला आमच्या गाईडने पाण्याचा वेग खूपच वाढलेला असल्यामुळे ते न करण्याचा सल्ला दिला.
आयुष्यातला पहिला राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन आम्ही परत निघालो. राफ्टिंगलाच बराच उशीर झालेला होता. त्यामुळे दिवस फारसा उरला नव्हताच. ऋषिकेशला येऊन उरलेला दिवस टाईमपास केला. लक्ष्मण झुला पाहिला. ह्यावर इतकी गर्दी का असते मला समजत नाही. हँगिंग ब्रिज इतर ठिकाणी सुद्धा खूप आहेत. हा पहिला वहिला असेल म्हणून कदाचित.
बंजी जम्पिंग आम्हाला करता आलं नाही. त्यासाठी पूर्व बुकिंग आवश्यक आहे. ऐन वेळेवर मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
रात्री जेवणानंतर दिल्लीची बस पकडली, आणि सकाळी दिल्लीहून विमानाने आम्ही पुण्याला परत आलो.
हरिद्वारला खादाड भटकंती, चोपता चंद्रशिला ट्रेक आणि परतीच्या वाटेवर ऋषीकेशला रिव्हर राफ्टिंग अशी अविस्मरणीय सहल संपन्न झाली.
---
ह्या दिवशीचा थरार आणि हि संपूर्ण सहल तुम्ही माझ्या युट्युब चॅनलवर बघु शकता. लिंक खालील प्रमाणे.
Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar
Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal
Chopta Chandrashila Trek | Part 3 | Deoria Tal to Baniya Kund
Chopta Chandrashila Trek | Part 4 | Tunganath Temple Chandrashila Summit
Chopta Chandrashila Trek | Part 5 | Rishikesh River Rafting | Thats My Take
आणखी व्हिडीओज बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा.
वॅली ऑफ फ्लॉवर्स : १ : कशीबशी केलेली बुकिंग
पण बाकी ठिकाणाहुन म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीला सगळ्यांनी हो हो केलं. आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. त्यावर सगळी प्लानिंग सुरु केली. हळूहळू काही लोक मागे हटले. नंतर ज्यांनी हा प्लान सुरु केला, तेच टंगळमंगळ करायला लागले. शेवटी फक्त आम्ही म्हणजे डस्सुझ तेवढे उरलो.
आम्ही केलेल्या तुलनेत आम्हाला आमच्यासाठी ब्लु पॉपीज हाच पर्याय योग्य वाटला, आणि आम्ही तो ठरवून टाकला. आता राहिली प्रवासाची तिकिटे.
मग आहेत ते लोक बुकिंग करून घेऊ असे म्हणत म्हणतसुद्धा काही दिवस गेले.
असे करता करता मला काही अडचणी आल्या. त्याच महिन्यात माझा अमेरिकेसाठी विसा इंटरव्ह्यू, आणि कंपनीच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे माझे जाणे डळमळीत झाले. अनुजाने निर्वाणीची धमकी दिली, कि आता बुकिंग केले नाही तर मी येणार नाही.
मग आधी मुंबईहून जाणाऱ्यांनी बुकिंग केली. काही दिवसातच मग अनुजा आणि अरूप यांनी पुण्याहुन जाण्याची तिकिटे बुक केली.
सगळ्यांची तिकिटे काढून झाली आणि माझे काही ठरेना. पण शेवटी माझा विसा इंटरव्ह्यू ट्रीपच्या आधीच ठरला, आणि अमेरिकेला जाणे काही दिवस पुढे ढकलले गेले. माझा ट्रीपला जाण्याचा मार्ग आपोआप मोकळा झाला. मी हा दैवी आदेश मानुन माझी तिकिटे बुक केली.
पण मला उशीर झाला होता, विमानाची तिकिटे प्रचंड महाग झाली होती. मी नाईलाजाने पुणे-दिल्ली-हरिद्वार-दिल्ली- पुणे अशी ट्रेनचीच तिकिटे बुक केली. जाताना पुणे-दिल्लीला जाताना एसी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. पण परत येताना मात्र स्लीपर कन्फर्म, आणि एसी तोपर्यंत पुढे सरकेल अशा वेटिंगमध्ये होते, म्हणून दोन्ही काढून ठेवली.
पण दुर्दैव म्हणजे एक आठवडा आधीच मला दिल्लीला जाणारी ट्रेन रद्द झाल्याचा मेसेज आला. का रद्द झाली, कशामुळे काही कळले नाही. त्या दिवशी काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन रद्द होणे वेगळे, पण हे आधीच रद्द म्हणून सांगणे काय प्रकार होता काही कळला नाही.
आता अगदीच ट्रेन रद्द झाली म्हणुन रडावे कि, अगदी शेवटच्या क्षणाला फजिती होण्यापेक्षा एक आठवडा वेळ मिळाला म्हणून हसावे काही कळेना. आता दुसरी कुठली ट्रेन मिळणे शक्य नव्हते, आणि विमानाने जाणे भाग होते. विमान मी ट्रेन तिकीट बुक केले तेव्हापेक्षाही महाग वाटत होते. पुणे दिल्लीचे विमान तर वारंवारता कमी असल्यामुळे मुंबई दिल्लीपेक्षा एरवीदेखील महाग असते, ते आता एकच आठवडा शिल्लक असताना विचारायलाच नको. मुंबई दिल्ली त्यामानाने बरेच स्वस्त वाटले म्हणुन तेच बुक केले.
ट्रीपसाठीचा तयारीतला सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे तिकिटे काढणे, हॉटेल बुकिंग करणे अशा प्रकारे कसाबसा पार पडला.
वॅली ऑफ फ्लॉवर्स : २ : बंद घाटातुन गोविंदघाटापर्यंत
हिरवेगार डोंगर, धबधबे, तळी असे सर्व पाहताना छान उत्साह येत होता. डोंगरदऱ्या, काही ओळखु येणारे किल्ले पाहुन वाटत होते आत्ता इथेच उतरून ट्रेकला जावे.
मुंबईला पोहचुन विमान पकडले, दिल्लीला गेलो. दिल्लीला सगळे भेटलो, मग हरिद्वारची ट्रेन पकडली. हरिद्वारपर्यंत संध्याकाळी पोहोचलो.
आधीच अंधार पडलेला होता. इथपर्यंतचा प्रवास आम्ही आमचा केला होता. इथून पुढे ट्रीपचे पॅकेज सुरु होणार होते. हरिद्वारपासून पुढे सगळी हॉटेल्सची बुकिंग, हरिद्वार ते गोविंद घाट आणि परत अशी खाजगी गाडी, हे सगळे त्यात होते.
हरिद्वार पुढे एटीएम सहजासहजी मिळणार नाही त्यामुळे लागेल तितकी रक्कम आधीच काढून घ्या अशी सूचना त्यांनी दिलेलीच होती. त्यामुळे स्टेशन बाहेर पडलो कि आवारातच आम्ही सगळ्यांनी रांगा लावुन पैसे काढले.
ऑपरेटरला आम्ही फक्त आगाऊ रक्कम दिलेली होती, बाकी सगळी आम्ही गोविंदघाटला पोचल्यावरच देणार होतो. ती रक्कम अधिक आम्हाला खर्चासाठी लागणारी अशी प्रत्येकाची वैयक्तिक रक्कम बरीच होती. त्यामुळे दहाजण दोन एटीएमवर तुटून पडले तेव्हा आमच्या मागे रांगेत असणारे पोचेपर्यंत तर जाऊच दे, आमच्यातच जे शेवटी होते त्यांचा नंबर लागेपर्यंत काही रक्कम शिल्लक राहते का अशी गमतीशीर भीती वाटत होती.
सगळ्यांचे पैसे काढून झाल्यावर दोन रिक्षा ठरवून आम्ही हॉटेलला गेलो. अंधार पडलेला होता, आधी सगळ्यांची हरिद्वारमध्ये फिरण्याची इच्छा होती, पण आता थकव्यामुळे, उशीर झाल्यामुळे, भूक लागल्यामुळे आम्ही ते रद्द केले. रिक्षातून जाताना दिसेल तशी गंगा, घाट, मंदिरे, दिवे सगळे पाहत जात होतो.
हॉटेलला पोचून जेवण केले, आणि काही वेळात झोपलो. उद्या सकाळी लवकर उठून जायचे होते.
हरिद्वार ते गोविंद घाट हा जवळपास ८-१० तासांचा प्रवास आहे. वाटेत ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग अशी ठिकाणे आहेत. तिथे थांबत थांबत जायचे, त्यात चहा, जेवण असे आवश्यक थांबे आलेच. आणि दरड कोसळली तर प्रवास आणखी लांबतो. हे सर्व पकडून जितके लवकर निघाल तितके चांगले.
पहिल्या दिवशीपासूनच रोज सकाळी सर्वांना उठवण्याची जबाबदारी स्नेहाने घेतली होती. ती स्वतः उठून सगळ्यांच्या रूमचे दरवाजे वाजवून जागे करायची. आणि असे करूनसुद्धा आवरायला तिलाच वेळ लागायचा. ती आणि हरप्रीत हे आमच्याकडचे तयार व्हायला सर्वात जास्त वेळ घेणारे सदस्य.
आम्ही तयार झालो, तरी ड्रायवरने येउन शांतपणे सामान लावत, गाडी साफसुफ करत निघायला बराच वेळ घेतला. १० जण असल्यामुळे आम्हाला टेम्पो मिळाली होती. ड्रायवरचं नाव मनोज. अगदी लहानसर चणीचा. एवढा छोटा दिसणारा माणुस एवढी मोठी गाडी चालवताना पाहुन आश्चर्य वाटेल. पण तो इतकी वेगाने आणि भन्नाट गाडी चालवत होता कि बस.
तिकडचे रस्ते आपल्यापेक्षा बरेच वेगळे आहेत. उंच डोंगरातले घाट, निमुळते रस्ते, तीव्र उतार आणि चढण, तितकेच तीव्र वळण. जिथे आपण एक गाडी चालवायला पुढे मागे पाहू, तिथे हे लोक बिनधास्त दोन्ही बाजूने गाड्या पळवतात. शैलीदार कट मारतात. ते कशी गाडी चालवत आहेत ह्याकडे लक्ष दिले कि आपलेच ठोके वाढतात. मधून मधून "भैय्या आरामसे" म्हणत आपल्यालाच आरामसे घेत दुर्लक्ष करावे लागते.
हरिद्वारहून निघालो आणि ऋषिकेश जवळ कुठेतरी एका कार्यालयासमोर गाडी थांबली आणि ड्रायवर उतरून काही वेळ गायब झाला. मग आम्ही उतरून बघत होतो कि का थांबवली.
एकमेकांना विचारत होतो कि "क्यू रोका है यार?"
एक म्हातारे दाढी वाढवलेले साधु लुक असलेले बुवा आले, आणि कार्यालयाकडे बोट दाखवून म्हणाले "वहा आपका 'पंजीकरण(?)' किया जाता है".
आम्ही बघायला गेलो कसलं पंजीकरण. उत्तराखंड पोलिस आणि सरकार, तिथे तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या सर्व प्रवाशांची माहिती गोळा करते. नाव, पत्ते, फोन नंबर, घरचे नंबर आणि कुठल्या ठिकाणी प्रवासाला जाणार अशी सगळी महत्वाची माहिती. उत्तराखंडमध्ये दरड कोसळणे, हवामान खराब होणे, पूर येणे असे प्रकार होत राहतात. त्यामुळे कुठल्या ठिकाणी साधारण किती प्रवासी आहेत याचा अंदाज येतो.
प्रत्येक प्रवाशाला एक कार्ड मिळतं. काही अनुचित प्रकार घडला, तर ओळख पटवायला याचा उपयोग होऊ शकतो.
तिथेच बाहेर एका फलकावर तिथल्या प्रमुख तीर्थस्थळांच्या वातावरणाची माहिती लावली होती.
आम्हाला याचं कौतुक वाटलं. आणि आणखी कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आम्ही तिकडे असेपर्यंत आम्हाला उत्तराखंड पोलिसकडून कुठल्या रस्त्यांवर दरड कोसळली आहे, कुठे काम चालू आहे, कुठे रस्ता बंद आहे याचे मेसेज येत होते. परत येताना त्याचा फायदा झाला.
ते करून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. एका ठिकाणी थांबून नाश्ता झाला. तिथे निखिलने (आमच्या बहुभाषिक बहुप्रांतीय मंडळातला तेलगु प्रतिनिधी) मेन्युकार्ड न बघता वडा सांबर घेणार म्हणुन सांगितलं. आम्ही इथे कसे मिळेल म्हणुन हसत होतो. तो एकदम विश्वासाने म्हणाला कि आता सगळीकडे मिळतं. पण मेन्युकार्ड आल्यावर त्याचा पोपट झाला. या गोष्टीवरून त्याची पूर्ण ट्रीपमध्ये आम्ही उडवली. "अरे इसको वडा सांबर दो", जो त्याला परतीच्या मार्गावर लागेपर्यंत कुठेही मिळाला नाही.
जाताना देवप्रयागचा संगम लागला. पाहायला अगदी छान. दोन नद्यांचा वेगळ्या रंगाचा प्रवाह एक होताना दिसतो. तिथे काही वेळ थांबून फोटो काढले आणि निघालो.
तिथून निघालो आणि मग पुढे घाटात आम्ही अडकलो. बरंच पुढे कुठे तरी दरड कोसळली होती, ती काढण्याचं काम चालु होतं आणि गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली होती. आम्हाला पुढे फक्त गाड्या दिसत होत्या. काम काही दिसत नव्हतं आणि किती दूर आहे, किती वेळ लागेल काही अंदाज येत नव्हता.
सगळ्या ड्रायवर लोकांनी गाड्या बाजूला लावल्या. बहुतेक सगळे एकमेकांना ओळखत होतेच आणि अशा ठिकाणी नव्या ओळखीपण होतात. त्यांनी आपला गप्पांचा अड्डा जमवला. आम्ही एका हॉटेलच्या अंगणात फतकल मारली, आणि आमचा अड्डा जमवला.
काही तास तरी लागतील असा नूर दिसत होता. तिथेच दुपारचं जेवण करावं का असा विचार केला. पण नुकताच नाश्ता झाला असल्यामुळे कोणालाही भूक नव्हती. तसाच टाईमपास चालु होता. वेळ लागायला लागला तसा आम्ही गमतीने या हॉटेलमधेच रूम घ्यावी कि काय असाही विचार करायला लागलो.
आमच्याच कंपनीकडे बुकिंग केलेल्या आणखी दोन तीन गाड्या म्हणजेच आणखी ग्रुप होते. त्यातले एक मराठीच होते. त्यांनी खरोखर रूम घेऊन टाकली आणि आत जाऊन बसले. आम्ही नुसता विचारच करत होतो.
हरप्रीत आणि अंगद तिथे बसण्याचा कंटाळा आला म्हणून "बघू तरी पुढे काय झालंय नेमकं" म्हणत चालत पुढे निघाले. आणि चालत चालत ते जवळपास ६-७ किमी पुढे गेले होते. असं ते म्हणत होते. आम्हाला खरं वाटत नव्हतं. कारण हरप्रीत आदल्या दिवशी पोटदुखीमुळे एकदम परेशान होता. पण शक्यता नाकारतासुद्धा येत नव्हती. दोघं पंजाबी, अति उत्साही.
त्यांचा काही वेळात फोन आला, कि इथलं काम झालंय, गाड्या निघतायत. ड्रायवरला सांगून पटकन निघा. आम्ही ताबडतोब उठून ड्रायवरला शोधलं, माहिती सांगितली, आणि निघायला सांगितलं. पण तो तयार होत नव्हता. तो म्हणाला दोन्हीकडून गाड्या येऊ जाऊ देत. अशी रांगेबाहेर गाडी काढणं बरोबर नाही. पोलिस पकडतात, आणि ड्रायवरच फसतो.
हळूहळू गाड्या सरकायला लागल्या. तिकडून हरप्रीत अंगदचे फोन वर फोन येत होते, आणि इकडे हा निघायला तयार नव्हता. तो म्हणाला कि लाईन सोडायला नाही पाहिजे, अजून प्रॉब्लेम होतो. "ये पहाडी इलाका है साबजी. यहा का तरीका अलग होता है."
काही वेळाने आमच्या समोरच्या गाड्या हलल्या तेव्हा कुठे आम्ही निघालो. रांग अगदी काही फुट पुढेपुढे सरकत होती. काही छोट्या गाड्या, जीप वगैरे रांगेबाहेर जाउन पुढे जात होते. काही वेळाने आम्ही थोडं पुढे पोचलो, तेव्हा अशा गाड्यांमुळे खरच अडथळे झाले होते, मग त्या गाड्या पुन्हा मागे येउन रांगेत घुसत होत्या.
सगळे लोक त्यांच्यावर चिडले होते, तुमच्यामुळे अर्धा एक घंटा अजून वाढला म्हणून लाखोली वाहत होते. आम्हीसुद्धा त्यांच्या नावाने शंख करत होतो. ड्रायवर म्हणाला ते खरंच होतं. सगळे शांतपणे रांगेत राहिले तर परिस्थिती लवकर हाताळता येते. उतावळेपणामुळे समस्या वाढते. ड्रायवरने आम्हाला सुनावलंच मग, "देखा साबजी, आपकी सुनके गाडी आगे ले लेता तो यु हि बीच मी फस कर सबकी गाली खा रहा होता."
आम्ही खाली उतरून फोटोबिटो काढले, असाच टाईमपास केला. एक एक करत बाकी लोकांनापण गाडीत बसून राहायचा कंटाळा आला आणि पायीपायी पुढे निघाले.
वेळ चालला होता, आणि आम्ही आज गोविंदघाटला पोचतो कि नाही अशी शंका येत होती. कारण तिकडे रात्री रस्ते बंद करतात. आम्ही रस्ते बंद होण्याआधी त्या मार्गावर लागणे आवश्यक होतं.
जिथे काम चालू होते ती जागा आली आणि एकदाचे आम्ही त्या जाममधून बाहेर निघालो. तो भागच तसा होता. तिथे नेहमी अशा घटना होत राहतात. चालत निघालेले सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर भेटले. सर्वात शेवटी हरप्रीत आणि अंगद. सगळ्यांना गाडीत घेऊन निघलो.
काही अंतरावरच एका हॉटेलमध्ये थांबलो. पण तिथे सगळ्या आत्ता जाममधून सुटलेल्या गाड्या थांबल्या होत्या. लवकर काही खायला मिळण्याची चिन्हे नव्हती. आम्ही तिथे जेवण्याचा विचार सोडला आणि पुढे काहीतरी खाऊ असा विचार केला.
बराच उशीर झालेला असल्यामुळे रुद्रप्रयागचा संगमसुद्धा न पाहता सोडला. एका ठिकाणी फक्त थोडी फळे वगैरे सामान गाडीतच खायला म्हणून घेतली. कुठे थांबून जेवायला वेळ नव्हता.
गोविंदघाटच्या थोडं अलीकडे असलेल्या जोशीमठला पोचलो तेव्हा अंधार पडून गेला होता. तिथे आमच्या टूर कंपनीचे ३ गाईड आमच्या गाडीत चढले. आता पुढे जाता येईल कि नाही यावर त्यांची चर्चा चालू होती. शेवटी प्रयत्न करायचे ठरले.
रस्त्यात पोलिसांनी अडवून दटावलेच, कि अंधार पडलाय, आता रस्ता बंद. पण थोडी विनंती केली, आमची गोविंदघाटमध्ये बुकिंग आहे, यावेळी जोशीमठला राहायची गैरसोय होईल, दरड कोसळली वगैरे सगळ्या गोष्टी सांगून जाऊ देण्याची विनंती केली. त्यांनी शेवटी आमचं ऐकलं.
इथून पुढे जाता जाता सगळ्यांचे मोबाईल कवरेज गेले. हेही अपेक्षित होते. तिकडे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालतात असे आम्हाला सांगितलेच होते. त्यामुळे दोघातिघांनी ते सीम आणले होते.
थोड्यावेळात गोविंदघाटला हॉटेलवर जाउन पोहोचलो. आमचे टूर मॅनेजर देवकांत संगवान यांनी आमच्या ड्रायवरची पाठ थोपटली. "लडके तू विनर है. फर्स्ट आया है आज. हरिद्वारसे निकले हुए सब अभी तक जोशीमठभी नही पहुचे. अब उनको तो वही रुकना पडेगा. बस तू यहा तक आ गया आज."
आम्हीपण आमच्याकडून थोडी बक्षिसी त्याला दिली. वर जाऊन फ्रेश झालो. देवकांतशी दुसऱ्या दिवशीच्या प्लानवर चर्चा केली. पैसे देऊन आमचे (मानसिक) ओझे हलके केले. आणि गरमागरम जेवणावर ताव मारून झोपलो. दुसऱ्या दिवशीपासून ट्रेक चालु.
वॅली ऑफ फ्लॉवर्स : ३ : ट्रेकची सुरुवात, घांगरीयापर्यंत
गोविंदघाटातून पदयात्रा सुरु करण्याचा दिवस उगवला. स्नेहाने सगळ्यांना उठवण्याची जबाबदारी पार पडली.
रात्री तिथे पोचल्यापासून आम्हाला पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता. तिथे नदी होती हे तर माहीतच होतं. पण ती नदी आमच्या अगदी समोर होती हा साक्षात्कार आम्हाला पहाटे जरा उजाडल्यावर झाला. कारण आम्ही आलो तेव्हा मिट्ट काळोख होता.
आमचं हॉटेल छोट्या घाटाच्या कडेला होतं. आणि त्याच्यामागे खाली नदी वाहत होती. त्यामुळे तिथल्या रूमची दारे नदीच्याच बाजूने केली होती. नदीचा सुंदर व्ह्यू होता.
आम्ही आवरून भरपेट नाष्टा केला. आमच्याच कंपनीतर्फे अजून दोन ग्रुप चालले होते ते आम्हाला भेटले. एक ग्रुप म्हणजे फक्त एक आजी आजोबांची जोडी. दोघं हि उत्साही आणि काटक. त्यांच्या वयात ते अशा प्रकारच्या ट्रीपला आलेले पाहून आम्हाला कौतुक वाटलं. दुसरा ग्रुप म्हणजे एक खूप मोठं कुटुंब होतं.
ते आजी आजोबा आणि या ग्रुपमधले आजी आजोबा दोघं मस्त मुडमध्ये होते. ब्रेकफास्ट टेबलवर आमच्या आणि त्यांच्या थोड्या गप्पासुद्धा झाल्या.
घांगरीया हे वॅली आणि हेमकुंड या दोन ठिकाणांच्या पायथ्याशी असलेले गाव. गोविंदघाट त्याहुन खाली. आम्हाला वॅली आणि हेमकुंड अशा दोन्ही ठिकाणी जाऊन यायचं होतं. त्यासाठी मुक्काम घांगरीयालाच करावा लागतो. त्यामुळे तिथल्या ३ दिवसासाठीचं (४ रात्री) सामान वेगळं काढा अशी व्यवस्थापकांची सूचना होती. ते सामान खेचरावर लादून वर नेता येईल, आणि अनावश्यक सामान गोविंदघाटमधेच राहील अशी व्यवस्था होती.
ते वेगळं करून सगळ्यांचं सामान एकत्र करण्यात, सगळ्यांनी आवरून खाली येण्यात, आणि नाश्ता करण्यात असा प्रत्येकात थोडा थोडा वेळ गेला. आणि आम्हाला ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला. आमचे व्यवस्थापक म्हणाले "कल आप फर्स्ट थे आज आप लास्ट हो".
आमचं हॉटेल गोविंदघाटच्या एका टोकाला आणि घांगरीयाचा रस्ता दुसऱ्या टोकाला होता. जिथपर्यंत गाड्या जातात अशा २-३ किमी अंतरापर्यंत आमचं सर्व सामान आणि आम्हाला न्यायला त्यांनी गाड्या दिल्या. त्या ठिकाणापासूनच सामान लादण्यासाठी खेचर/घोडे घेऊन माणसं उभे असतात. आम्ही २ खेचर ठरवले. एका खेचराचे ८०० रु. होतात.
तिथे सगळ्यांसाठी काठ्या विकत घेतात. एरवी चालण्यासाठी फक्त वयोवृद्ध लोक काठ्या वापरतात. पण ट्रेकला जाताना मात्र बरेच लोक काठ्या वापरतात. कारण त्याचा खूप फायदा होतो. चढताना किंवा उतरताना आपला थोडा भार त्यावर टाकून, किंवा फक्त आधाराला म्हणून, आणि कधी फोटो काढताना पोज द्यायला म्हणून.
भारीतली घ्यायची म्हटली तर थोडी लोखंडी, वेगळी मुठ, खाली टोकदार अशासुद्धा स्टिक्स मिळतात. एरवी आपल्या जवळपासच्या किल्ल्यावाल्या ट्रेकला आम्ही जातो तेव्हा ज्याला काठी घेऊन फिरायला आवडतं ते तिथल्या तिथे एखादी वाळकी काठी उचलतो. ती मग वर जाऊन येईपर्यंत सगळ्यांच्या हातात फिरते, तिच्यावर बलप्रयोग होतात. ती खाली येईपर्यंत राहेल कि नाही सांगता येत नाही.
आता ४ दिवस वापरायला हव्या म्हणून आम्ही साध्या पण चांगल्या लाकडी काठ्या प्रत्येकी ३० रु. दराने आणल्या.
इथुन आमचा ट्रेक सुरु झाला. जाता जाता एका आजीकडून हिरवी सफरचंदे घेतली. त्या फ्लेवरचे मी याआधी फक्त एक पेय (सुज्ञांनी ओळखावे :-) ) प्यालो होतो. प्रत्यक्ष ते फळ मी पहिल्यांदाच खाल्ले आणि आवडले.
मधून मधून खायला ज्यातून उर्जा मिळेल, असा सुका मेवा, बिस्किटे, डीहायड्रेशन झाल्यास म्हणून ग्लुकोन डी आणि तत्सम पावडर, चोकलेट अशा गोष्टी सोबत राहू द्या असे आम्हाला सांगितलेले होतेच. ते आम्ही प्रत्येकाने एवढे गांभीर्याने घेतले कि प्रत्येकाच्या सामानात रोज अशा गोष्टी असायच्या. पण त्याचा तितका उपयोग झाला नाही.
वेगळ्या वातावरणात भूक लागत असेल कदाचित, पण आम्ही बहुतांश ढगाळ वातावरणात फिरत होतो. त्यामुळे आम्हाला विशेष भूक लागत नव्हती. रोज आमचे हे पदार्थ बळजबरी खाउनसुद्धा उरत होते. हिमालयात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहते पाणी मिळते आणि पाण्याचा तुटवडा होत नाही.
आमचा शांतपणे, रमतगमत टीपी करत प्रवास चालु होता. हा पूर्ण प्रवास पुष्पावती नदीच्या काठाने आहे. आधी नदीच्या अलीकडच्या बाजूने आणि मग ती नदी पार करून पलीकडच्या बाजूने. बऱ्याच ठिकाणी झाडी असल्यामुळे सावली आहे. रस्त्यात एका ठिकाणी एक २५० मि. उंच आणि मोठा धबधबा लागतो.
सुरुवातीचे २-३ किमी वगळले तर साधारण ११ किमीचा उरलेला प्रवास पायी किंवा हेलीकॉप्टरनेच करावा लागतो. गाडी जात नाही. वर सर्व सामान खेचराकरविच वाहून नेतात. काही जनावरांचे इतके हाल होतात, कि दोनतीनदा आम्हाला थोडी जखम झालेले, रक्त पडत चाललेले जनावर दिसले. पण नाईलाज. त्या लोकांची रोजीरोटी त्यावरच आहे. असेहि वाटते आणि वाईटसुद्धा वाटते.
आम्ही एका ठिकाणी नदीकिनारी बराच टाईमपास केला. मला त्या पाण्यात उतरायची आणि बसायची खूप इच्छा होती. मला एरवीच खूप घाम येतो. तेच थोडा वेळ तीव्र उन लागल्यामुळे भरपूर आलेला होता, त्यामुळे थंडगार पाण्यात उतरून फ्रेश वाटेल असं वाटत होतं.
पण तो प्रवाह इतका जोरदार होता कि भीती पण वाटत होती. मग एक मोठा दगड शोधला ज्यावर पाय पसरून बसता येईल, एका मित्राला बोलवून मला पायाजवळ पकडायला सांगितलं आणि मी आडवा होऊन डोकं आणि होईल तेवढं अंग पाण्यात बुडवलं. मजा आली पण त्या थंडगार पाण्यानी हुडहुडी भरली. :D आमचा गाईड "कहा कहा से आ जाते है" अशा प्रकारचे लुक्स देत होता.
पण मी एकदम ताजातवाना झालो. आणि जोमात पुढे चालायला लागलो. आम्ही १० जण असल्यामुळे प्रत्येकाची स्पीड वेगळी. सहनशक्ती वेगळी. तर आम्ही जवळ जवळ असलो तरी अगदी सोबत फिरत नव्हतो. एक-दोन, दोन-तीन सोबत असे फिरत होतो.
मी आणि निखिल आमच्या ग्रुपमध्ये थोडे मागे मागे राहायचो. बाकीचे पुढे जाऊन थांबायचे आणि आम्ही पोचलो कि पुढे निघायचे. त्यात उन आणि गर्मी हे माझे शत्रू. उन आलं कि प्रचंड घाम येतो आणि शरीरातली शक्ती एकदम गळुन जातो. तर मी पुढे कि मागे हे त्या दिवशीच्या उन्हावर अवलंबुन असायचं.
फोटो काढायला म्हणुन कॅमेरा-लेन्स वगैरे सगळं सोबत घेऊन हिंडत होतो, पण उन आलं कि फोटोग्राफी करायला इच्छा असूनसुद्धा त्राण राहायचं नाही. मग प्राधान्य फक्त अंतर कापत जाण्याला.
तर इथे नदीत डुंबेपर्यंत मी थोडा मागे मागे होतो. पण त्यानंतर मग उत्साहात आणि सुदैवाने थोडी सावली पण लागल्यामुळे बरंच अंतर एकटाच पुढे गेलो. बराच वेळ तर मी माझा ग्रुप सोडून एक पंजाबी ग्रुप जो हेमकुंडच्या तीर्थयात्रेला चालला होता, त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत चाललो होतो.
त्यांना हिंदी नीट येत नव्हती. येत असेल पण ते सारखे हिंदीतून पंजाबीमधेच घसरत होते. त्यातले दोघे तिघे भरभर चालत पुढे गेले. आणि एकजण मागे राहिला जो त्यांच्या ग्रुपमधला माझ्यासारखा होता. :D
तो मला आणि माझ्या मार्गे स्वतःला धीर देत होता. "कोई नई यार, वाहेगुरू दा नाम लेके चलते रहो बस. कभी न कभी पोहोच जाएंगे. क्या जलदी है?" हे तो पुन्हा पुन्हा म्हणायला लागला. आणि त्यानंतर थोडं तत्वज्ञान पण झाडायला लागला. थोडा वेळ ऐकलं आणि मी थांबलो. त्याला म्हटलं ग्रुपसाठी थांबलो आणि पुढे पाठवून दिलं. आणि मी एकटा सापडलो तर परत चिटकेल म्हणून खरंच कोणीतरी येईपर्यंत थांबलो.
मग अमित भेटला तोपण असाच एकटा पुढे आला होता. आम्ही दोघं काही अंतर जाऊन पुन्हा थांबलो. त्याने बेंचवर एक डुलकी मारून घेतली. आम्ही बरेच पुढे आलो असु किंवा मागचे थांबत थांबत, फोटो ब्रेक्स घेत येत होते. बराच वेळ लागला.
असं म्हणतात कि अशा वेळेस चालत राहणे उत्तम. खूप थांबले कि वेळसुद्धा जातो आणि लय तुटते. तेव्हा काहीसं तसंच झालं. तिथे थांबून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पुन्हा उन आलं आणि माझी पण गती मंदावली. आणि पुढचा प्रवास खूप रेंगाळला.
बाकीजण पुढे गेले. मी,निखिल, अरूप, अनुजा आणि अंशुल थोडे मागे मागे चाललो. जाताना फोटो काढणे, निरीक्षण करणे चालूच होते. एका झाडावर असा फुलांचा गुच्छ दुसला जो दुरून पक्ष्यांचा थवा दिसतो, पण मुळात फुल आहे.
अशाच गोष्टी पाहत पाहत आम्ही ३ च्या दरम्यान पोचलो. आता सगळे थकले होते आणि भूकसुद्धा लागली होती. इथे आमची व्यवस्था येत्या ४ रात्रींसाठी हॉटेल प्रिया मध्ये केलेली होती. त्या दिवशीच्या डिनरपासून ते घांगरीयामधून निघेपर्यंत खाण्याची व्यवस्थासुद्धा कंपनीकडेच होती. आम्ही अशा विचित्र वेळेस जेवण मागवताना पाहून व्यवस्थापक काळजीत पडले. ते म्हणाले आत्ता काही तरी हलकं फुलकं खा, संध्याकाळी जेवण जाणार नाही. आपके पैसे भी जाएंगे मेरे पैसे भी जाएंगे. कोणी त्यांचं ऐकलं नाही आणि दोन्ही वेळेस दाबून खाल्लं.
थोडा वेळ आराम करून आम्ही वॅलीच्या रस्त्यावर एक ग्लेशिअर आहे ते पाहायला गेलो. मोठ्ठा धबधबा, वाहतं पाणी आणि भरपूर बर्फ. बराच वेळ बर्फात खेळण्यात गेला.
तिथे आजूबाजूला असलेली सुंदर फुल झाडे सुद्धा पाहिली.
घांगरीया गावात पोचताना घामेघूम अवस्था, मग थंडी, मग स्वेटर घालून बाहेर पडून चालत गेलो कि पुन्हा गर्मी, आणि बर्फाजवळ गेलो कि पुन्हा थंडी असे वातावरणात अचानक विरुद्ध बदल होत गेल्यामुळे मला स्वतःला थोडा त्रास झाला. बाकी अंगदुखी, डोकेदुखी अशा किरकोळ तक्रारी जवळपास सगळ्यांना होत्या.
रूममध्ये परत आलो आणि गप्पा गोष्टी करून झोपलो. ज्यासाठी इतक्या दूर आलो त्या वॅलीचं दर्शन दुसऱ्या दिवशी होणार होतं.
वॅली ऑफ फ्लॉवर्स : ४ : वॅलीमधला पहिला दिवस


ती व्हॅली आणि तिथे जाण्याचा प्रवास सर्वच अप्रतिम अविस्मरणीय. मांझीच्या भाषेत शानदार झबरदस्त झिंदाबाद.

कालसारखा थांबुन गतीभंग होऊ नये म्हणुन मी फार न थांबता पुढे चाललो होतो. त्यामुळे मी एकटाच पुन्हा पुढे होतो. बाकीजण थांबत फोटो काढत येत होते. बाकी ग्रुपमध्ये अंगदकडे प्रोफेशनल कामेरा होता, हरप्रीतकडेसुद्धा सुपरझुम होता. बाकी सर्व जणांकडे आयफोनसारखे भारी फोन होतेच. सर्व आपला फोटोग्राफीचा शौक पुरा करत होते.
एस.एल.आर कॅमेरा गळ्यातच अडकवून चढाईवर जाणे म्हणजे कसरत आहे. माझ्यात थोडं उन असल्यामुळे तेवढा उत्साह नव्हता. काही वेळ मी फोटो न काढताच चाललो होतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तिथलं प्रत्येक पाउल, प्रत्येक व्ह्यु इतका सुंदर वाटतो कि किती म्हणुन फोटो काढणार?
तरी आता डिजिटल क्रांतीमुळे मोबाईल, डिजिटल कॅमेरा वापरून फोटो काढणे, आठवणी जतन करणे इतके सोपे झाले आहे. आणि महत्वाचे म्हणजे स्वस्त झाले आहे. प्रत्येक जण खचाखच क्लिकक्लिकाट करून ढीगभर फोटो काढू शकतो. रोलच्या जमान्यात प्रत्येक फोटो किती विचारपूर्वक काढावा लागायचा.

वॅलीच्या जवळ पोचल्याची चिन्हे दिसत होती. मग मी मोबाईल काढला आणि हिमालयाच्या पार्श्वभूमीवर माझा सेल्फी काढून फोटो काढणे पुन्हा सुरु झाले. तो सेल्फी पुढे बरेच दिवस माझा डीपी होता. तिथून पुढे मग मी जरा निवांत मोबाईलवरच फोटो काढत फिरलो.
उन सुद्धा कमी झालं, थोडा दिलासा मिळाला. पण लगेच आभाळ अगदी गडद झालं आणि मग जरा भीती वाटली. पाऊस पडेल असंही वाटत होतं आणि धुकंसुद्धा दाटून येत होतं. त्या भागात धुकं दाटून सगळं काही दिसेनासं व्हायला वेळ लागत नाही. आणि पुन्हा उन पडून सगळं स्वच्छ व्हायलासुद्धा वेळ लागत नाही. पण या दोन्हीमध्ये किती वेळ जाईल ते सांगता येत नाही. दुपारपर्यंत हे टिकलं असतं तर आजचा दिवस बराच अंशी वायाच. कारण दुपारनंतर तिकडून परतीला निघावेच लागते.
वॅली अगदी जवळ आली आणि तिथे छान पक्षी दिसु लागले. माझा कॅमेरा आता वर काढणे भागच होते. त्यांचे फोटो घेण्याचे निष्फळ प्रयत्न करून झाले. फारच चपळ आणि चंचल पक्षी होते.
मग एक जलप्रवाह पार करायला कामचलाऊ लाकडं आणि पत्रा टाकला होता. तो पार करून आम्ही अधिकृतरित्या वॅलीमध्ये दाखल झालो. आणि समोरचा नजारा पाहून एकदम उल्हसित (पागल) झालो. हिमालयाच्या रांगा, भरपूर हिरवळ, आणि भरपूर फुलं.
दिसेल त्या प्रत्येक फुलाचा फोटो काढणं सुरु झालं. आमचे मॅनेजर जे होते देवकांत संगवान. ते स्वतः आधी काही वर्षांपूर्वी फिरत फिरत इथे आले आणि या जागेच्या प्रेमात पडले. मग पुन्हा पुन्हा आले, आणि हा व्यवसायच सुरु केला. (हेवा वाटतो अशा लोकांचा) ते वॅली आणि हेमकुंड प्रवाशांसाठी खुले असतानाचे वर्षातले ४ महिने गोविंदघाटला येउन राहतात. आणि एक एक आठवडा भरपूर ग्रुप्सला घेऊन फिरतात.
इतकी वर्षे आल्यामुळे त्यांच्याकडे इथल्या जवळपास सगळ्याच फुल पक्षी प्राण्यांच्या फोटो आणि व्हिडीओचा संग्रह आहे. एका भेटीमध्ये सर्वकाही दिसणे शक्य नाही. त्यांनी एक फोटोबुक छापले आहे या फोटोंचे. आम्हाला सगळ्यांना एक एक प्रत दिली होती. आम्ही ती काढुन समोर दिसणाऱ्या फुलाचे नाव शोधत होतो.
पण हा उत्साह खूप टिकत नाही. आपल्याला वैज्ञानिक नाव आणि माहिती जाणून तरी काय करायचं असतं? तेव्हा काही पाठ झालेली नावं आता इथे आल्यावर पुन्हा विस्मरणात गेली. त्या रात्री आम्ही घांगरीया गावात एका छोटेखानी दालनात प्रोजेक्टरवर एक माहितीपट पाहिला. त्यात फुल आणि वनस्पतींची शास्त्रीय माहिती जरा जास्तच होती. तो पाहता पाहता अंधारात सगळेच झोपले होते. आणि आपण सोडून बाकी लोक सुद्धा झोपले होते हे आम्हाला बाहेर आल्यावर कळलं. शेवटी आपल्याला (म्हणजे आम आदमीला) भावतं आणि लक्षात राहतं ते सौंदर्य.

थोड्या अंतराने तीच तीच फुले असली तरीसुद्धा न थांबता फोटो सुरु होते. कारण प्रत्येक ठिकाणी फुलांचं कॉम्बिनेशन वेगळं होतं. आणि मग ज्याची भीती होती तेच झाले. पाउस सुरु झाला. खूप जोरात नसला तरी कॅमेरा आत ठेवणे भाग होते. मग पुन्हा मोबाईल (पिशवीत गुंडाळुन) फोटो काढणे सुरु.


बरीच गर्दी वाटली त्या दिवशी. आम्ही बरेच पुढे गेलो. पाऊस न थांबता चालू होता. काही जण येताना भेटले. ते म्हणाले आम्ही खूप लवकर आलो इथे, त्यांना पूर्ण उन्हात, बिना पावसात फिरता आलं. आम्हाला उशीर झाला म्हणून मनात जर चरफड झाली.
![]() |
| हिमालयन ऑर्किड |
देवकांत यांनी आम्हाला सांगितले होते कि बाकी सगळे ऑपरेटर एकच दिवस वॅलीमध्ये नेतात. आणि इथपर्यंतच नेतात. मी दुसऱ्या दिवशीसुद्धा नेतो. आणि यापेक्षा बरंच पुढे. तिकडे कोणी नेत नाही. आणि खरंच जेव्हा आम्ही नंतर त्यापुढे बरंच अंतर गेलो, तेव्हा कोणीही तिकडे नव्हतं. फक्त आमचा ग्रुप.
मग परत आलो. पाउस आणि वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. वॅलीच्या सुरुवातीला एक मोठ्ठी शिळा आहे. तिथे बसायला खडकावर बरीच जागा आहे. तिथेच सगळे जेवत होते. आम्हीपण तिथे जेवायला बसलो. थंडीमुळे पुरीभाजी आणलेली होती, ती एकदम कडक झाली होती. ती खायला जरा कठीण झाली होती. कसंबसं ते संपवलं. आणि परत निघालो. परतीचा प्रवास नेहमीच निवांत आणि मजेत होतो. लवकर लवकर चढुन जाण्याची घाई नसते.
येताना सुदैवाने मला पक्ष्यांचे थोडे फोटो मोठ्या मुश्किलीने घेत आले. एक लाल रंगाचा चिमणी सारखा पक्षी, तितकाच चपळ, सतत इकडून तिकडे उडत होता. लेन्स बदलून फोटो काढायचा प्रयत्न करत होतो, पण बरेच फोटो काढूनही स्थिर आले नाहीत. शेवटी एका जागी बसला, ती लेन्स च्या आवाक्या बाहेरची होती, तरी फोटो काढला. झूम केलेली प्रत इथे टाकली आहे.

आणि एक स्थानिक जातीचे कबुतर. हि जोडी रस्त्या पासून बरीच बाजूला एका झाडावर शांत बसली होती. पण दोघांचा चांगला व्ह्यू मिळत नव्हता. होईल तितके जवळ जाऊन फोटो काढण्याच्या नादात माझे पाय (बूट) शेणात बरबटले. ते साफ करण्याचा एक वेगळा उद्योग करावा लागला.

घांगरीयाला रूमवर आम्लेट, भजे मागवुन त्याच्या सोबतीने गप्पा झाल्या. तिथे असेपर्यंत रोज संध्याकाळी ट्रेक संपल्यावर आम्ही हेच करायचो.
घांगरीया गावात फोनची खूप समस्या आहे. खाली गोविंदघाटला आम्ही नेलेल्या बी.एस.एन.एल कार्डवर फक्त फोन येऊ शकत होते. जात नव्हते. मेसेज जात होते. पण इथे वर आल्यावर मात्र आमचे सगळे फोन बंद पडले. इथे फक्त बी.एस.एन.एल आणि आयडिया चालतं म्हणतात. पण तेही बहुधा उत्तराखंडचेच. आमचे फोन काही चालले नाहीत.
त्यामुळे इथे बाकी गोष्टींचे भाव ठीकठाक असले तरी फोन करणे मात्र एकदम महाग. आयडियाचे वायरलेस लॅंडलाइन फोन वापरून इथे पीसीओ उघडले होते. १० रुपये एका मिनिटाला असा किती तरी पट भाव होता. आणि ते प्रीपेड फोन असल्यामुळे किती पैसे कटले ते दिसायचे आणि राग यायचा. कि आपण काही पैशांच्या कॉलला २०-३० रुपये मोजतोय. पण हे ४ महिने हाच त्या लोकांचा धंद्याचा टाईम. आणि रोज बोलून जरा ओळख झाल्यावर ते लोक थोडी सवलतसुद्धा देत होते.
जेवण झालं. देवकांत विचारत होते कि आता तुमच्यापैकी कोण कोण उद्या पुन्हा वॅली मध्ये येणार? त्यांचं असं विचारण्याचं कारण म्हणजे त्यांनी प्लानमध्ये दोन दिवस वॅलीमध्ये ठेवले होते. एक दिवस असा पाउसपाण्यामुळे जादा असावा हा एक हेतू. आणि जास्त फिरण्यासाठी सुद्धा. पण बऱ्याच लोकांना पहिल्या दिवशी जाऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी त्राण राहायचं नाही. आम्ही जाणारच म्हणुन सांगितलं.
रूमवर आलो, पुन्हा गप्पागोष्टी करून, भरपूर टीपी करून, आणि उद्या लवकर जायचंच अशी एकमेकांना तंबी देऊन आम्ही झोपलो.
वॅली ऑफ फ्लॉवर्स : ५ : हेमकुंड साहिब
मी आणि अरूप आधी तयार झालो. बाकीच्यांना अजून वेळ लागेल आणि पुन्हा उशीर होईल असं वाटत होतं. आम्ही खाऊन झालं कि पुढे निघतोय असं सांगुन निघालो. बाकीच्यांना अजून वेळ होता. त्यांच्यावर लवकर आवरायला दबावसुद्धा टाकायचा होता, आणि कोणी उशीर केलाच तर आज थांबुन वेळसुद्धा घालवायचा नव्हता.
आम्ही नाश्त्याला जाऊन बसलो. एक एक जण येऊ लागले. भरपूर धुकं आणि ढग होते. थेंब थेंब पाऊस सुरु झाला होता. आमचं खाणं चालू असताना जोरात पाऊस सुरु झाला. आम्ही डोक्यावर हात मारून बसलो. घ्या आता लवकर निघुन काय फायदा? सगळे येउन बसले, खाऊन झालं तरी पाउस थांबला नाही.
आम्ही बराच वेळ थांबलो. मग आमचे मॅनेजर देवकांत यांनी एक पर्याय सुचवला. कि तुम्ही आज हेमकुंडला जाऊन या. तिकडे जायला पावसामुळे काही बिघडत नाही, आणि उलट उन्हाऐवजी ढग आणि पाउस असेल तर चांगलंच. आम्हाला ते पटलं.
काही जणांनी दुपारच्या जेवण्यासाठी अंडी असलेले कॉम्बो बांधून घेतले होते. ते बदलून पूर्ण शाकाहारी गोष्टी घेतल्या. तसे हेमकुंडला जाताना लंच सोबत न्यायची गरज नसते, तिकडे गुरुद्वारेच्या लंगरमधेच जेवणे होतात. पण आज हेमकुंडचा दिवस नसल्यामुळे लंच तयार होता. आमची इच्छा होती कि अनावश्यक ओझं वाढू नये. पण देवकांत नि त्यांची टिपिकल लाइन मारलीच. "ले लो यार, मेरे पैसे तो लग गये है इसमे. गिन के बनाते है ये लोग. आप नही लोगे तो ये होटलवाला तो फेक देगा इसको. इससे अच्छा आप ले जाओ. रस्ते मे काही खा लेना."
आम्ही पुन्हा रूमवर गेलो. लवकर आवरायचं म्हणून आम्ही अंघोळीवर पाणी सोडलं होतं. आता हेमकुंड गुरुद्वाऱ्यात जायचं म्हणजे तसं कसं चालेल? पुन्हा आवरून निघण्यात वेळ गेला. मी आज कॅमेरा घेतलाच नाही. हेमकुंडला जाताना खूप उंची आणि विरळ ऑक्सिजनमुळे खूप जणांना त्रास होतो असं विकीपेडिया, आणि नेटवर वाचलं होतं आणि ऐकलंही होतं. त्यामुळे फोटोपायी त्रास वाढवुन घेण्याऐवजी मी त्या दिवसापुरतं फोन आणि बाकी लोकांच्या फोटोग्राफीवर विसंबून राहायचं ठरवलं.
आवरून निघेपर्यंत पावसाचा जोर कमी झाला आणि थेंब थेंब सुरु होता. घांगरीयातून वॅली आणि हेमकुंडकडे जाण्याचा रस्ता एकच आहे, पुढे एका धबधब्यापाशी ते रस्ते वेगळे होतात. तिथे पोहचेपर्यंत पाउस पूर्ण थांबला. आता इकडे जावे कि तिकडे जावे असा प्रश्न होता. पण आम्ही हेमकुंडला जाणार म्हणून सगळे गाईड पुढे गेले होते. उशीर तर झालेलाच होता. कालपेक्षा कमी वेळ मिळाला असता. आणि वॅलीमध्ये दुसऱ्या दिवशी तर आम्हाला अजून लांब जायचं होत. आम्ही आता हेमकुंडलाच जाण्याचं ठरवलं.
वर जाईपर्यंत पूर्ण आभाळ मोकळं झालं आणि कडक उन पडलं. वॅलीचे डोंगर दिसत होते, तिकडे काही वेळ ढग दिसत होते. आम्ही आमची समजूत काढत होतो, कि ठीके तिकडे ढग आहेत अजून. नसतं दिसलं काही. पण तिकडे पण आभाळ साफ झालं आणि आमची फजिती झाली यावर शिक्कामोर्तब झालं.
घांगरीया ते हेमकुंड हे अंतर ६ किमी आहे. हेमकुंडची पायवाट जवळपास पूर्ण रस्त्यावर मोठी आणि प्रशस्त आहे. चालत जायचं बस. चिंचोळ्या रस्त्यावरची चढाई नाही. पण जी चढण आहे ती खूप तीव्र नसली तरी सतावत राहते. रस्ता मोठा आहे. सपाटीवरचं अंतर आणि चढाईवरचं यात हाच फरक आहे. चढताना तेच अंतर दुप्पट वाटतं.
दोन अगदी तरुण पंजाबी पोरं आमच्या पुढेमागे वर निघाली होती. त्यातल्या एकाकडे सामान होतं आणि एकाकडे गॉगल. गॉगलवाला भरपूर स्टाईल मारत होता. सामान घेऊन मागे येणाऱ्यावर लवकर चल म्हणुन दमदाटी करत होता. थोड्याच वेळात त्यांचा दम निघाला, आणि त्यांनी वाटेत भेटलेली पोनी ठरवली आणि त्यावर बसून गेले.
जसं जसं आम्ही वर गेलो तसं तसं उन भरपुर वाढलं. आणि त्यामुळे खुप त्रास होऊ लागला. भरपुर घाम येउन डीहायड्रेशन झालं. आणि शरीरातलं त्राण कमी होऊ लागलं. थांबत थांबत जाऊ लागलो. सुरुवातीला सगळे एकमेकांसाठी थांबत थांबत जात होते. पण असं खुपदा केलं कि सगळ्यांनाच थकवा येतो. आमचा बाकीचा ग्रुप आणि मी आणि निखिल यातलं अंतर वाढत गेलं. आणि नंतर तर ते दिसेनासेच झाले. त्यालासुद्धा तसाच त्रास होत होता.
आम्ही दोघं एकमेकांपासून काही पावलांच्या अंतरावर सावकाश चाललो होतो. निखिल ला खूपच त्रास होत होता. काही पावलं चालुन काठीच्या आधाराने उभ्याउभ्याच किंवा जागा मिळाली तर कुठेतरी बसुन विश्रांती घेत होता. मी आता मुद्दाम ठरवून बिलकुल बसत नव्हतो. तसं केलं कि जास्त थकवा येतो असं वाटत होतं.
आता दुपार झाली होती आणि तिकडून लोक परत येत होते आणि आम्ही पोहोचलोसुद्धा नव्हतो. आमच्या चेहऱ्यावरूनसुद्धा आमची हालत दिसत असावी. वरून परत जाणारे शीख भक्त लोक आम्हाला धीर देत होते. "कोई नई जी, पोहोच गये बस. वो उधर रहा उपर. १० मिनट मे पोहोच जाओगे." ते १० मिनिट काही संपता संपत नव्हते.
चल थोडंच राहिलं आता असं एकमेकांना म्हणत आम्ही वर पोहोचलो शेवटी. पूर्ण शरीराची वाट लागली होती. बाकी जणांचं दर्शन झालं होतं. गुरुद्वारेचा दरवाजा पण बंद झाला होता. आम्हाला वाटलं इतकं रखडत वर येउन काही फायदा नाही, पण हरप्रीत आला. त्याने तिथल्या लोकांना पंजाबीमध्ये काहीतरी बोलून विनंती केली. त्यांनी आम्हाला जाऊ दिलं.

आम्ही आत गेलो आणि एकदम शांत वाटलं. वेगळंच समाधान.
गुरु गोविंदसिंग पूर्वीच्या जन्मात इथे तप करत होते असा शिखांच्या धर्मग्रंथात उल्लेख आहे. तसंच लक्ष्मणानेसुद्धा इथे तप केले असल्याचे वाचले. त्यामुळे त्यांचा पूर्व जन्मीचा किंवा काही तरी संबंध आहे अशी मान्यता आहे. नेमका मला कळाला नाही. तिकडे काही चित्रांमध्ये गुरु गोविंद सिंग आणि लक्ष्मण असे दोन्ही दाखवले आहेत.

त्यामुळे हि जागा हिंदू आणि शीख दोन्हींसाठी पवित्र आहे. इथे लक्ष्मणाचे मंदिरसुद्धा आहे. काही वर्षांपूर्वी इथे गुरुद्वारा बांधला गेला. त्याची रचना पाहून मला सिडनी ओपेरा हाउसची आठवण आली.
खुप वर्षांपूर्वी नांदेडच्या गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो होतो त्यानंतर आजच. माझ्या शहरात, औरंगाबादलासुद्धा एक छान गुरुद्वारा आहे. सगळीकडेच जी स्वच्छता असते, तिथल्या सेवकांचा नम्रपणा, शांतपणे होणारं प्रसाद वाटप, लंगर मधली शिस्त, ते पाहुन आल्याचं समाधान वाटतं. नांदेड, औरंगाबाद, हेमकुंड तिन्ही ठिकाणी माझा अनुभव असाच होता.
स्वच्छ आणि शांत धार्मिक स्थळे पहिली कि मला थोडं छान वाटतं, थोडा हेवा वाटतो, आणि थोडा आपल्या मंदिरांचा, विशेषतः महाराष्ट्रातल्या, राग येतो. अंगावर येणारे दुकानदार, उद्धट पुजारी, ढकलाढकली करणारे रक्षक, रांगेत मधूनच घुसणारे लोक इ. इ. गर्दीची जागृत देवस्थाने टाळून, जवळपासची शांत, कमी लोकप्रिय मंदिरात जाण्याचा हल्ली माझा कल असतो. असो. मंदिरांचा विषय निघाला कि नेहमीच असं भरकटायला होतं.

बाहेर आलो आणि तिथल्या कुंडाकडे गेलो. ह्या कुंडामुळेच ह्या जागेचं नाव हेमकुंड आहे. हेम (संस्कृत) म्हणजे बर्फ. ७ बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं हे कुंड. हिवाळ्यात पूर्ण गोठलेलं. आम्ही गेलो तेव्हा वितळुन पाणी तर होतं पण अतिथंड. त्या कुंडात डुबक्या मारायचं आम्ही ठरवलं होतं.

आम्ही हिम्मत करून डुबकी मारली. भयानक थंड होतं पाणी. सगळे मोठमोठ्याने ओरडत होते. त्या थंड वातावरणातसुद्धा पाण्याबाहेर आलो कि लगेच गरम वाटलं इतकं ते पाणी थंड होतं. मग फोटोसाठी पुन्हा. मग मी विषम आकडा करावा म्हणुन अजून एकदा उतरलो. असं प्रत्येकाने १, २, ३ अशा वेगवेगळ्या वेळा डुबक्या मारल्या. मस्त हुडहुडी भरली मग.
अंग घासून कोरडं केलं, कपडे बदलले. आणि लक्ष्मणाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो. मग थोडे फोटो काढले.


इथलं पाणी खूप पवित्र समजतात म्हणून सगळ्यांसाठी कॅन आणल्या. त्यात पाणी भरून घेतलं. आता उन पूर्ण गेला आणि धुकं गडद होऊ लागलं. थंड वारे वाहू लागले. पाहता पाहता समोर स्पष्ट दिसत असलेलं कुंड धुक्यात हरवू लागलं.

लंगरमध्ये पटकन जेवून खाली निघणं भाग होतं. येण्यात खूप उशीर झाला होता त्यामुळे आता फक्त आमचा ग्रुप वर उरला होता. बाकी सगळे खाली निघाले होते.
जेवण झालं कि पुन्हा मी आणि निखिल मागे राहायला नको म्हणून आम्ही तडक पुढे निघालो. त्या घाईत आमचा हलवा खाण्याचा राहिला. त्या थंडीमध्ये गरम गरम हलवा खाउन मजा आली असती, पण ते राहूनच गेलं.

येताना उन पूर्ण जाऊन त्याजागी गडद धुकं आलं होतं. उन नसल्यामुळे खाली जाताना काही त्रास झाला नाही. आरामात थांबत थांबत आलो. हळू हळू बाकी लोक पण पुढे आले.
आणि जगातलं सर्वात उंच ठिकाणी असलेलं गुरुद्वारा पाहून, हेमकुंडात स्नान करण्याच (काही असलंच तर ते) पुण्य पदरात घालुन आम्ही घांगरीयाला रूममध्ये परतलो. आणि दाबून जेवण करून बिछान्यावर कलंडलो.
वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस
वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता. पण त्यादिवशी सुद्धा सकाळी पाउस पडल्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून हेमकुंडला गेलो आणि नंतर कडक उन पडून आमची फजिती झाली.
आता आज खरोखरीच शेवटचा दिवस होता. आज पाऊस पडो कि न पडो, धुकं असो वा नसो आम्हाला वॅलीमधेच जाणे भाग होते. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घांगरीयामधून पुन्हा गोविंदघाटकडे निघायचे होते.
आमचे मॅनेजर देवकांत यांनी सांगितलेच होते, कि एकदा वॅलीमध्ये जाऊन आल्यावर सहसा लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्यात आळशीपणा करतात, आणि हेमकुंडला जाऊन येउन आराम करतात, किंवा हेमकुंडला जाण्याआधी एक दिवस घांगरीयामधेच जवळपास वेळ घालवतात.
सकाळी आमच्या ग्रुपमधूनसुद्धा थोडी गळती होईल अशी चिन्हे दिसत होती. आदल्या दिवशी हेमकुंडला जाऊन आल्यामुळे सगळ्यांना थोडा थकवा तर आलाच होता. पण शेवटी एकमेकांच्या उत्साहाचा सगळ्यांवर परिणाम झाला आणि सगळेच जण निघाले.
असे म्हणतात कि जे होते ते चांगल्यासाठीच ते खरे वाटावे असा त्या दिवशीचा अनुभव होता. सकाळपासुन थोडं ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे वॅलीमध्ये पोहचेपर्यंत तिथे फिरून येईपर्यंत धाकधुक चालू होती. पण पाऊस पडला नाही.
मध्ये चढताना काही वेळ उन पडून गेले, थोडासा त्रासही झाला. पण पुन्हा गेले आणि वातावरण जरा सुखद झाले. माझी आणि निखिलची पुन्हा वेगळी गम्मत झाली. आम्ही चढताना थोडे मागेच होतो. काही वेळ मी सगळ्यात मागे होतो. आणि माझ्या थोडं पुढे निखिल. उन्हामुळे त्राण कमी होऊन माझा वेग खूपच मंदावला होता. पण मी आज ठरवलं होतं कि कितीही वेग कमी असला तरी चालत राहायचं. उभ्या उभ्या थांबून लगेच निघायचं. निखिल काल सारखाच पुन्हा पुन्हा थांबत होता. पण मी त्याच्या जवळ पोचलो कि तडक पुढे जात होता. रस्ता चिंचोळा होता म्हणून ओव्हरटेक करता येत नव्हतं. आणि मलाही खूप वेगात पुढे जायचं नव्हतं म्हणुन मी त्याच्या मागेच चालत होतो. पण मला मजा वाटत होती.
थोड्यावेळाने आम्ही एका झऱ्यापाशी पाणी प्यायला थांबलो. बाकी काहीजण पण होते. तिथुन रस्तापण जरा मोठा होता. आणि वॅलीपण जवळ आली होती. मी पाणी पिउन ताजातवाना झालो आणि मग जवळपास न थांबताच पुढे गेलो.
आज ग्रुपमधल्या लोकांमध्ये तसं खूप जास्त अंतर नव्हतं. निखिल जेव्हा पोचला तेव्हा त्याने सांगितलं कि काल जसे आम्ही दोघंच मागे राहिलो होतो, तसं होईल असं त्याला वाटत होतं. पण माझी परिस्थिती कालपेक्षा बरी होती म्हणून मी पुढे गेलो तर तो एकटाच राहिला असता आणि त्याला मग पुढे यायचा उत्साह कमी झाला असता, म्हणून तो मला येऊ देत नव्हता. :D. पण आज उन तुलनेने कमी असल्यामुळे, आणि बाकीचे खूप पुढे नसल्यामुळे काल इतकी वाईट परिस्थिती नाही झाली.
घांगरीया हे छोटेसे गाव आहे. तिकडे फक्त पावसाळ्यात लोक जाऊन दुकाने हॉटेल्स चालवतात. त्यामुळे तिथली क्षमता मर्यादित आहे. म्हणून टूर कंपन्या गट करून साधारण एकाच वेळापत्रकानुसार लोकांना तेथे आणत असाव्यात.
स्वतःच्या योजनेनुसार, किंवा तंबूमध्ये सामानसुमान घेऊन येणाऱ्या गटांबद्दल मी बोलत नाही. किंवा हेमकुंडच्या दिशेने जाणाऱ्या शीख यात्रेकरू यांच्याबद्दलसुद्धा नाही. त्यांना गोविंदघाट, आणि घांगरीया या दोन्ही ठिकाणी अजून गुरुद्वारा आहेत, तिथे आसरा, मदत मिळते.
पण जसा आमचा मुळात आदला दिवस वॅलीसाठी होता तसाच बाकी अनेक जणांचा सुद्धा होता. आम्हाला वॅली पावसाशिवाय पाहण्याची अति हौस असल्यामुळे फक्त आम्ही तो दिवस टाळून हेमकुंडला गेलो. पण बाकी सगळे जण थांबले किंवा वॅलीमध्येच गेले.
त्यामुळे आज फक्त आम्ही वॅलीमध्ये गेलो. बाकी एखाद दुसरे एकटे फिरणारे परदेशी लोक सोडता वॅलीमध्ये कोणीही नव्हते. वॅली आमच्यासाठी राखून ठेवल्यासारखी वाटत होती.
भरपूर भटकलो आम्ही. खूप दूरपर्यंत जाऊन आलो. पहिल्या दिवशी आम्ही घांगरीयापासून साधारण ६ किमीपर्यंत आलो होतो. आज १० किमी आलो. म्हणजे आजची पूर्ण पदयात्रा २० किमीची होती.
पाउस नसल्यामुळे दूरपर्यंत सगळं स्पष्ट दिसत होतं. आधी एवढा स्पष्ट व्ह्यू मिळालाच नव्हता.
भरपूर प्रकारची फुलं असली तरी वॅली नेटवर पाहिलेल्या फोटो सारखी फुलांनी गच्च भरलेली नव्हती. हिमालय मूलतःच इतका सुंदर आहे, त्यामुळे आमच्या समोरची दृश्ये छानच होती.
पण फुलांमुळे थोडा अपेक्षाभंग झाला. गाईडकडून याचं कारण समजलं ते असं. ह्या भागात दर वर्षी पूर्ण बर्फ जमतो आणि तो उन्हाळ्यात वितळल्यावर फुले यायला सुरुवात होते. आणि मग तापमान, पाउस, यावर प्रत्येक फुलाच्या जातीचा एक हंगाम असतो. साधारणपणे जुलै महिन्यात सर्वात जास्त फुलं असतात. त्यामुळे आमची वेळ निश्चितच बरोबर होती. पण या वर्षी बर्फच जरा उशिरा वितळला होता. म्हणुन अजून म्हणावी तितकी फुले नव्हती.
आम्ही थोड्या मनातल्या मनात अन थोड्या उघडपणे शिव्या दिल्या. कि हे आधी सांगता येत नव्हतं का? १-२ आठवडे सुट्टी काढुन, दूरचा प्रवास करून आपण इतक्या वर येउन पोहोचल्यावर, जेव्हा थोडा अपेक्षाभंग होतो, तेव्हा त्याचं शास्त्रीय कारण ऐकून काही समाधान होत नाही. त्याच वर्षी १० जणांच्या सुट्या पुढे मागे ढकलणं अवघड आहे. पण आम्ही पुढच्या वर्षी आलो असतो.
मुद्दा असा कि, पुन्हा येणं अशक्य जरी नसलं तरी असे मोठे बेत सहजासहजी होत नाहीत. एवढ्या दूरची जागा एकदा पाहिली असेल तर आपण बेत आखताना दुसऱ्या जागांना साहजिकच जास्त प्राधान्य देतो.
पण ते शेवटी व्यावसायिक लोक. म्हणावी तितकी फुलं आली नाहीत म्हणून घेतलेली आगाऊ रक्कम परत करून आरक्षण त्यांनी स्वतःहून रद्द करणे तर अशक्यच. त्यापेक्षा आम्ही ठरवलेल्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो, गाईड देतो, फिरवून आणतो, फुलं कमी कि जास्त ते आमच्या हातात नाही म्हणून हात वर करणे हेच सोपं आहे.
पण मी म्हटल्याप्रमाणे "थोडा"च अपेक्षाभंग. कारण आम्हाला अनुभवायला मिळालं ते सौंदर्यसुद्धा अप्रतिम. आणि ह्या ट्रीपमध्ये बेत आखताना, जाताना, येताना, फिरताना, सगळ्याच गोष्टीत आम्ही भरपूर आनंद लुटला होता.
काही ठिकाणी आनंद तिथल्या वैशिष्ट्यांमुळे येतो, काही ठिकाणी आपल्या सोबत असलेल्या लोकांमुळे. आणि कधी त्या दोन्हींमुळे.
प्रेमकथांमध्ये त्या जोडप्याला कुठे तरी दूर दूर जाण्याची इच्छा असते असं दाखवतात. आणि संन्यासी लोकसुद्धा जगापासून वेगळे होण्यासाठी शांत जागी जातात. हि जागा तशीच होती. बाकी जगाचा काहीच संबंध नाही. एकदम शांत. सोबतचे लोक पुढे मागे झाले, किंवा फोटो काढण्यासाठी कुठे रेंगाळलो तर पूर्ण शांतता. आणि आजूबाजूला फक्त सुंदर दृश्य. वेड लावेल इतका सुंदर आहे हिमालय.
जर चाललं असतं तर तिथेच पडून राहून एक रात्र काढायची इच्छा होती. तिथे मावळणारा आणि उगवणारा सूर्य पहायची इच्छा होती. पण काय करणार?
फिरत फिरत, फोटोज काढत, भरपूर पाण्याचे ओढे पार करून आम्ही गाईडच्या मते शेवटच्या टोकाला पोचलो.
गाईडच्या मते यासाठी म्हटलं कि, त्या पुढेसुद्धा वॅली पसरलेलीच आहे. पण तिकडे कोणी जात नाही. तिकडून परत यायला इतका वेळ लागतो कि, आणि तिथे मुक्काम किंवा संध्याकाळपर्यंत फिरलेलं चालत नाही. आणि पुढे जास्त नवीन फुलेही नाहीत, आतापर्यंत पाहिलेलीच फुले इस्ततः विखुरलेली आणि कमी संख्येने दिसतात.
मग आम्ही जर निवांत एका नदीकिनारी बसलो. सोबत आणलेले डबे काढुन जेवलो. चिक्कार सोलो आणि ग्रुप फोटो काढले.
गाईड इथून लवकर परत जायला घाई करत होता. उन कमी होऊन आता पुन्हा ढग यायला लागले होते. जाताना पाऊस पडला तर रस्त्यात लागलेल्या कुठल्याही ओढ्यांचा प्रवाह वाढू शकतो असं त्याला वाटत होतं. आमच्यापैकी काही जण अजून किती पुढे जाता येईल ते बघत होते. त्याला आग्रह करून आम्ही काही जण अजून पुढे एका हिमखंडापर्यंत जाऊन आलो.
थोडासा पाउस पडला तरीही सुदैवाने गाईडला भीती होती तसं काही झालं नाही. आम्ही सावकाश, टाइमपास करत, ती इंद्राची बाग (वॅली) शेवटची डोळ्यात भरून घेत तिथून बाहेर पडलो.
ता. क. आज शेवटचा दिवस म्हणून प्राणी पक्षी यापैकी कसले तरी फोटो काढायचेच म्हणून परतीच्या वाटेवर जवळपास अर्धा तास खर्च करून काढलेले फोटो. खूप इकडे तिकडे पळुन हाती लागले फक्त लाल चिमणी

आणि बिन शेपटीचा पहाडी चुहा. (म्हणतात ना, खोदा पहाड, निकला चुहा. :D)


जकार्ताच्या आठवणी : १ : तयारी
मी आता पुन्हा पॅक करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. म्हणून मी आवश्यक असल्यास सामान शुल्क भरण्याची मनाची तयारी केली. माझी टँक्सी वेळेवर आली आणि मी मुंबईला रवाना झालो. साधारणपणे, पुणे मुंबई प्रवासाला 3-3.5 तास लागतात. पण कधी मोठ्या कंटेनरचा एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला, आणि काही तास रस्ता पूर्ण ब्लॉक होऊन जाईल ते तुम्हाला सांगता येत नाही. किंवा तुम्ही पटकन पनवेलला पोहोचूनसुद्धा नंतर विमानतळापर्यंत जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे मी खूपच लवकर पुण्याहून निघालो आणि वेळेच्या खूप आधी विमानतळावर पोहोचलो.
माझी एक मैत्रीण विमानतळावर मला भेटण्यासाठी आली नसती तर मी विमानाचं बोर्डिंग होईपर्यंत खूप कंटाळलो असतो. आम्ही भरपूर वेळ गप्पा मारल्या आणि नंतर ती गेली. अशातच सुरु झालेलं मुंबई विमानतळ टर्मिनल 2 खूपच मस्त आहे. सर्व काही अगदी भव्यदिव्य, चकचकीत आणि नवल वाटावं इतकं सुंदर आहे. क्षणभर तुम्ही मुंबईमध्ये उभे आहात हेच विसरून जाल. :D
चेक इनच्या रांगेत अर्धा एक तास प्रतीक्षा केल्यानंतर शेवटी मी माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानात बसलो, आणि जकार्ताकडे निघालो. :)
जकार्ताच्या आठवणी : २ : प्रथम दर्शनी
जकार्ताच्या आठवणी : ३ : सुरुवातीचे दिवस
मी माझ्या मागील पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे इंडोनेशियन लोक हे अगदी हसतमुख आणि प्रसन्न लोक आहेत. ते दिवसभर गप्पा मारत राहतात, मोठमोठ्याने हसत राहतात. आणि ऑफिसमध्ये दिवसभरातून किमान एकदातरी त्यांचे इतके विचित्र आवाज ऐकू येतात कि नेमकं त्यांना काय व्यक्त करायचं आहे हेच कळत नाही. जेवढे लोक मी पाहिले त्यातले बहुतांश लोक मनमिळावू, आणि मदतीस तत्पर असे लोक होते. मग ते माझ्या ऑफिसमधले सहकारी असोत कि रिसेप्शनिस्ट. बँकेचे चपराशी असोत वा रखवालदार. सर्वच प्रकारच्या लोकांकडून मला असाच अनुभव आला. काही अपवाद होते खरे, पण विरळा. आणि हे आम्ही तिथे परदेशी दिसत असल्यामुळेच नाही तर मी जेवढं पाहिलं त्यानुसार ते एकमेकांशीसुद्धा असेच वागत होते.
इथले लोक फुटबॉलबद्दल वेडे आहेत, आणि माझ्या ऑफिसमधले काही भारतीय सहकारीसुद्धा तसेच होते. फिफा वर्ल्डकप जवळ येत असल्यामुळे माझ्या आजूबाजूला कायम फुटबॉलसंबंधी चर्चा ऐकू यायची. प्रत्येकजण तो कोणत्या टीमला सपोर्ट करत आहे त्या टीमबद्दल उत्साहाने बोलायचा. कोणती टीम जिंकणार यावरून तावातावाने वाद व्हायचे. त्या लोकांनी यावरून पैजापण लावून ठेवल्या होत्या. माझ्या ऑफिसमधल्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळे फुटसॉल खेळायला गेलो होतो. फुटसॉल म्हणजे फुटबॉलचंच छोटं स्वरूप. बंदिस्त आणि छोट्या आकाराच्या मैदानात, अगदी तासभरच चालणारा गेम. आम्हाला तिथे खेळून खूप मजा आली. आयटीवाले असल्यामुळे सगळेजण तासभर पळत पळत खेळू शकले यामध्येच समाधानी होते.
इथे शुक्रवारी एक स्ट्रीट मार्केट भरते. भारतातील अनेक शहरे आणि गावांमधिल साप्ताहिक बाझारांसारखे, हे फक्त शुक्रवारी असते. या मार्केटची जागा माझ्या ऑफिसपासून जवळ आहे. माझा एक सहकारी, तेथे मला घेऊन गेला. इथल्या लोकांची फुटबॉलची आवड इथेपण दिसून आली. सर्वात जास्त गर्दी असलेले दोन स्टॉल्स फक्त फुटबॉल जर्सीज आणि फुटबॉलसंबंधित वस्तू विकत होते. त्याव्यतिरिक्त बाकी छोटी हत्यारे, गृहोपयोगी साधने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, DVDs इ. विविध गोष्टी विकणारे बरेच स्टॉल्स होते.
थोडे किंवा काही काम नसताना, किंवा ब्रेकच्या वेळी ते लोक चक्क ऑफिसमध्ये काउंटर स्ट्राइकसारखे गेम खेळतात. काही कारणास्तव एकदा मी तेथे एकजणाला भेटायला क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेलो, आणि पाहिलं तर ते लोक पद्धतशीरपणे गेमिंग कन्सोल त्यांच्या वर्कस्टेशनवर जोडून फिफावाला गेम खेळत होते. पण हे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये प्रचलित आहे. भारतातील अनेक कंपन्यामात्र सोशल मीडियावर बंदी घालतात, अगदी पत्त्यांचे गेमसुद्धा सिस्टममध्ये ठेवत नाहीत. आपल्या ऑफिसमध्येसुद्धा अशा प्रकारचे स्वातंत्र्य असलेले मला आवडेल. पण हे सगळं चालू दिलं तर आपण काम करू का हा प्रश्न आहे. :D
आम्हाला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागलं. त्यामुळे शनिवारी मी उशिरापर्यंत झोपा काढल्या. तो दिवस अर्धा झोपेमुळे आणि उरलेला पावसामुळे वाया गेला. संध्याकाळी सोबत कोणी नव्हतंच. मी एकटाच माझा कॅमेरा घेतला आणि कुनिंगान म्हणजे जिथे मी राहत होतो तो भाग, तिथे आसपास फोटो काढत भटकून आलो.
कुनिंगान मध्ये मी संध्याकाळी भटकत काढलेले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मी भटकून परत हॉटेलमध्ये आलो आणि मला लिफ्टमध्ये ऑफिसमधला एकजण भेटला. आम्ही एकमेकांना नावाने ओळखत नव्हतो पण ऑफिसमध्ये पाहिलेलं असल्यामुळे आम्ही ओळखीची स्माईल दिली. मी सहज विचारून बघावं म्हणून त्याला उद्या कुठे जवळपास साईट सीईंगला यायला आवडेल का असं विचारलं. आणि तो चक्क हो म्हणाला. माझा मजला आला होता, बाहेर येण्याआधी आम्ही पटापट एकमेकांचे नाव आणि नंबरची देवाणघेवाण केली. आणि मी रूममध्ये परत आलो तेव्हा माझ्याकडे उद्यासाठी सोबत आणि प्लान दोन्ही होते. :)
जकार्ताच्या आठवणी : ४ : तमन मिनी इंडोनेशिया
जकार्ताच्या आठवणी : ५ : सहस्र द्विप
जकार्ताच्या आठवणी : ६ : डॉल्फीन आणि सी लायन शो
जकार्ताच्या आठवणी : ७ : तमन सफारी
सफारी जवळपास दोन तासांत संपली. आणि आम्ही आतल्या फन पार्कमध्ये पोचलो. हा बाकी कुठल्या हि फन पार्कसारखाच होता. काही राईड्स, प्राण्यांचे खेळ, 4D सिनेमा, खाण्याचे अड्डे, असं बरंच काही होतं. इथली विशेष गोष्ट म्हणजे इथे पेंग्विन्स, आणि कोमोडो ड्रॅगन पाहायला मिळतो. (हा ड्रॅगन सिनेमामध्ये आपण पाहतो तसा मुळीच दिसत नाही. आणि आगसुद्धा ओकत नाही. :D )
कोकण सफर : १ : तयारी आणि सुरुवात
कॉलेज मध्ये असताना आम्ही गेलेल्या या ट्रीपची आठवण काही वर्षे होऊन गेली तरी ताजी आहे. म्हणुन याबद्दल लिहायची खूप दिवसांपासून इच्छा होती. शेवटी आता लिहायला घेतलंय.
पण दुर्दैव असं कि त्याने आणि मी सोबत बनवलेल्या प्लानमध्ये बऱ्याचदा त्याला स्वतःला कधी येता आलं नाही. बारावीनंतर तो पुण्याच्या कॉलेजला गेला आणि मी आमच्याच शहरात म्हणजे औरंगाबादला. मग आमच्या परीक्षा आणि सुट्या नेहमी पुढे मागे व्हायच्या आणि त्याची काहीतरी गडबड व्हायची. आम्ही कॉलेजमधून बाहेर पडून नोकरीला लागल्यावर कुठे त्याला आमच्यासोबत फिरता यायला लागलं आणि त्याचं एक छोटंसं दुःख संपलं. थोडक्यात या ट्रीपमध्ये यायची इच्छा असून त्याला येता आलं नाही.
मयुरसुद्धा माझा शाळेचा मित्र. ११वि आणि १२ वि वेगळी झाल्यावर एमआयटीमध्ये आम्ही इन्जीनियरिंगला पुन्हा सोबत आलो. आणि अक्षय माझा फर्स्ट ईअरमधेच झालेला मित्र. काही दिवसातच आमचं मस्त जमलं. आमची बस-पासवाली कल्पना मी या दोघांसमोर मांडली. दोघांनाही हि ती आवडली आणि आमची योजना बनायला सुरुवात झाली.
सर्वात आधी आम्ही आमच्या घरच्यांची परवानगी घेतली. आम्ही तिघे तेव्हा १६-१७ वर्षांचेच असू. त्यामुळे इतके दिवस बाहेर फिरण्याआधी संमती मिळवणं आवश्यकच होतं. आमच्या सर्वांच्याच आई-बाबांनासुद्धा अशी आवड असल्यामुळे आम्हाला अगदी सहज परवानगी मिळाली.
अशी परवानगी असली तरी आम्हाला काही अगदी उधळपट्टी करत फिरायचं नव्हतं. आपल्या फिरण्याचा खर्च मर्यादेबाहेर जाता कामा नये हे आमचं ठरलेलं होतं. त्यामुळे हि कल्पनाच मुळी एसटीचा पास काढून अगदी कमी खर्चात फिरायचं इथून सुरु झाली होती.
आम्ही एसटीचा १० दिवसांचा पास काढून फिरायचं ठरवलं. आणि १० दिवस फिरण्याजोगी, प्रेक्षणीय स्थळे अगदी जवळजवळ असणारी महाराष्ट्रातली जागा म्हणजे कोकण. कोकणात अशी ठिकाणे अगदी कमी अंतरावर आहेत. बाकी भागातसुद्धा प्रेक्षणीय स्थळे असली तरी अंतरे बरीच जास्त असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यातच बराच वेळ गेला असता. त्यामुळे कोकणात जायचं आम्ही पक्कं केलं.
कम्प्युटर आणि इंटरनेटमुळे काळ खरोखर इतक्या झपाट्याने बदललाय, कि अगदी काही वर्षापूर्वी "त्या काळी" अशा भाषेत मला सांगावं लागतंय. तर "त्या काळी" गुगल मॅप्स इतके प्रचलित नव्हते. घरी असलेल्या इंटरनेटचा वेगसुद्धा विशेष नव्हता.
आमच्या सहलीची आखणी आम्ही सिग्नलवर मिळतात तश्या एका महाराष्ट्रावरच्या पुस्तकातून केली. त्यात प्रत्येक जिल्ह्याबद्दल माहिती, तिथली ठिकाणे, मंदिरे, जिल्ह्याचा नकाशा, आणि शेवटी महाराष्ट्राचा एक मोठा नकाशा होता. ह्यातूनच आम्ही ठिकाणे निवडली आणि हे पुस्तक सोबत घेऊनच प्रवास केला.
काही दिवशी आम्ही एकाच दिवशी दोन तीन छोट्या गावात फिरणार होतो. मग अशावेळेस सामान घेऊनच फिरायचं तर पाठीवर घेऊन जाता येणारी आणि तरी १० दिवसाचे सामान मावेल अशी मोठी बॅग हवी होती. टीव्हीवर (डिस्कव्हरी) ट्रेकिंगला जाणारे किंवा मोठ्या प्रवासाला जाणारे लोक जशी बॅग घेऊन फिरताना दाखवतात तशी बॅग मी खास या सफरीसाठी घेतली. तिचा मला खूप छान उपयोग झाला. बरंच काही कोंबता येतं या बॅगमध्ये. ती अजूनही माझ्याकडे आहे.
उत्तर कोकण काही अंशी आम्ही घरच्यांसोबत किंवा शाळेच्या सहलीत पाहिलेला होता. म्हणून आम्ही दक्षिण कोकणावर जास्त भर दिला.
पासमुळे प्रवास खर्च तर कमी झालेलाच होता. आम्ही बाकी खर्चसुद्धा कमीत कमी करायचा ठरवला होता. जमेल तिथे रात्री प्रवास ठरवला, म्हणजे त्या रात्री राहायचा खर्च नाही. काही ठिकाणी सकाळी एसटी स्थानकावरच प्रातःविधी उरकले.
औरंगाबादपासून कोकण तसं बरंच लांब आहे. एकाच दमात खूप प्रवास न करता आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गातली ठिकाणे बघत जायचा विचार केला. त्यामुळे दक्षिण कोकणात आम्ही कोल्हापूरमार्गे जायचं ठरवलं. तळकोकणात जाऊन मग एक एक ठिकाण बघत वर सरकायचा आमचा बेत होता.
औरंगाबादहून रात्री कोल्हापूरला जाणारी गाडी आम्हाला मिळाली नाही. म्हणून आम्ही पुण्याची गाडी पकडली. आमचे आईबाबा आम्हाला सोडायला आले होते. रात्री १० ची गाडी पकडली आणि आमचा पास पुढच्या तारखेला म्हणजे १२ वाजता सुरु होणार होता, म्हणून आम्हाला १०-१२ असं अंदाजे अर्ध्या अंतराचं तिकीट काढावं लागलं.
आमच्या या अविस्मरणीय सहलीचा प्रवास अशाप्रकारे सुरु झाला.
कोकण सफर : २ : मार्गे कोल्हापूर : महालक्ष्मी आणि मिसळ
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
आवरून लगेच आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो. महाराष्ट्रातल्या साडेतीन महत्वाच्या शक्तीपीठांपैकी हे एक आहे. सकाळी सकाळी अगदी प्रसन्न वातावरणात दर्शन झाले.
आम्ही बाहेर आलो. कोल्हापूरच्या मिसळ पावचे बरेच कौतुक ऐकलेले होते. कुठली मिसळ चांगली अशी चौकशी करत आम्ही एका मिसळ पावच्या गाडीवर पोचलो. ती गाडी पाहुन तिथली मिसळ कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळीपैकी असेल असं वाटत नव्हतं.
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
पॅलेस, पन्हाळा, ज्योतिबा
शाहु पॅलेस
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
एका दालनात भोसले घराण्याची वंशावळी लावलेली होती. ती पाहून काही लोक आपले ज्ञान पाजळत होते. शिवाजींचे मोठे भाऊ संभाजी राजेसुद्धा पराक्रमी होते. पण ते तरुणपणीच युद्धात मारले गेले. पण त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थच शिवरायांनी आणि जिजाऊ यांनी शिवरायांच्या मुलाचे नाव संभाजी ठेवले असेही मी वाचले होते. आमच्यासमोर वंशावळीचा जो भाग होता त्यात शिवरायांच्या पिढीपर्यंतचीच माहिती होती. पुढच्या पिढीची माहिती दुसऱ्या भागात होती. त्यामुळे त्या पिढीतल्या संभाजींचे नाव वाचून एकाला ते संभाजी म्हणजेच शिवपुत्र संभाजी असा गैरसमज झाला. त्याने दुसऱ्याला विचारले,
"अरे!!! संभाजी राजे शिवाजी महाराजांचे भाऊ होते कि काय?"
दुसऱ्यानेही ठोकून दिले. "हो मग. लहाने भाऊ होते महाराजांचे. महाराज गेल्यावर त्यांना गादीवर बशिवलं."
हे ऐकताच मी आणि अक्षयने एकमेकांकडे पाहिले. काही काही लोकांची आणि आपली फ्रिक्वेन्सी अशी जुळते, कि दोघांना लगेच कळते कि तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल विचार करत आहात. अक्षय त्या लोकांपैकी एक आहे. एकमेकांकडे पाहताच आम्हाला हसू आले.
पन्हाळा
कोल्हापूरजवळच पन्हाळा हा शिवरायांचा प्रसिद्ध किल्ला आहे. इथेच ते वेढ्यात अडकले होते. आणि इथून विशाळगडापर्यंत त्यांनी एका रात्रीत मजल मारली होती. त्यांना पुढे सुखरूप पोहोचू देण्यासाठी बाजीप्रभूंनी घोडखिंड (आता पावनखिंड) आपल्या पराक्रमाने अडवून धरली होती, आणि आपले बलिदान दिले होते.
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
बाजीप्रभूंचा एक युद्धाच्या आवेशात असलेला पूर्णाकृती पुतळा या पन्हाळ्यावर उभारलेला आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी आपलं मन इतिहासात जातं. तिथे कर्तृत्व गाजवलेल्या थोर व्यक्तींबद्दल आदर दाटून येतो. इतक्या पराक्रमी माणसाचा पुतळा पाहून आपोपाप नतमस्तक व्हायला होतं.
हा किल्ला आम्ही आतापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपेक्षा वेगळा होता. बराच मोठा. आणि त्या किल्ल्यावर अगदी मोठं गावच होतं. आम्ही उतरल्यावर आम्हाला किल्ल्यावर आलो आहोत असं वाटतच नव्हतं. तिथे रिक्षावाले पुढे येउन पूर्ण किल्ला फिरवून आणतो, आणि माहिती पण सांगतो असं म्हणत पुढे आले. आम्ही एक रिक्षा ठरवली . आणि त्याच्यासोबत फिरून आलो. आणि ते बरंच झालं. पायी फिरायला खरंच खूप वेळ लागला असता, आणि गावात दडलेल्या जागांमध्ये महत्वाच्या कोणत्या तेही लक्षात आलं नसतं. जमेल तेव्हा तिथल्या गाईडची मदत घेऊन ती जागा चांगल्या प्रकारे पहावी.
ज्योतिबा
ज्योतीबाला आम्ही संध्याकाळी पोहोचलो. दर्शन झालं. तिथे आम्ही सुदैवाने योग्य दिवशी पोहोचलो होतो. कारण दुसऱ्या दिवशीपासून तिथे कसलीतरी यात्रा सुरु होणार होती. गर्दी लोटण्याआधीच आमचं तिथे जाऊन दर्शन झालं हि ज्योतीबाचीच कृपा म्हणायची.
तिथली गमतीशीर आठवण म्हणजे, दर्शन करून येताना सूर्य मावळला होता. आणि आम्ही तिथे स्थानकावर जाऊन कोल्हापूरच्या बसची वाट पाहत होतो. तिथे आणखी एक मुलांचा घोळकासुद्धा थांबलेला होता. अचानक कुठून तरी जोरात गाणं वाजायला लागलं. ते स्थानक उघड्यावर आणि अगदी साधं होतं, त्यामुळे आम्ही बघत होतो कि गाणं वाजतंय कुठे? मग आमचं लक्ष त्या घोळक्यातल्या एका मुलाकडे गेलं. त्याच्या मोबाईल वर ते गाणं वाजत होतं.
पण मोबाइलच्या तुलनेत आवाज एकदम जोरात होता. "त्या काळी" गाजलेला चायना फोन आम्ही सर्वप्रथम तिथे पाहिला. त्या फोनवर सात स्पीकर होते. आम्ही सहज म्हणून तो फोन हातात घेऊन पाहिला. त्या वेळेसच्या फोनच्या मानाने तो बराच मोठा होता. आणि स्वस्तसुद्धा होता.
ती मुलं आमच्याच बसमध्ये चढली आणि बसमध्ये पण गाणे चालू होते. पूर्ण बसमध्ये आवाज घुमत होता. बसचीच म्युझिक सिस्टम असावी असं वाटत होतं. आमच्याप्रमाणेच बाकीच्या लोकांचं पण लक्ष त्या मोबाईलकडे जात होतं आणि सगळेच तो हाताळून बघत होते. इथे पहिल्यांदा पाहिलेला हा फोन लवकरच सगळीकडे लोकप्रिय झाला. आणि काही दिवस सगळीकडे दिसत होता.
स्नो पार्कची फसलेली चक्कर
या सहलीला निघण्याआधी मी वर्तमानपत्रात कोल्हापूरमध्ये एक स्नो पार्क चालू झाल्याची बातमी वाचली होती. असंच एक स्नो पार्क हैदराबादलासुद्धा आहे. कोल्हापूरला केंट क्लब या नावाने बहुतेक ते चालु झालेलं होतं. मला तिथे जायची उत्सुकता होती.
पण याबद्दल तेव्हा कोल्हापुरात फारशी कोणाला माहिती नव्हती. मुश्किलीने ते ज्योतिबाच्या डोंगराजवळच कुठेतरी असल्याची माहिती मिळाली. आम्हाला थोडं चुकल्यासारखं वाटलं. आधी माहित असतं तर स्नो पार्क आणि ज्योतिबा दोन्ही एकाच दिवशी केलं असतं. आता एकाच दिशेने दोनदा चक्कर होणार होती.
मला आठवतंय त्याप्रमाणे एका हायवे वरून आत ज्योतिबाच्या दिशेने रस्ता जातो. ह्या रस्त्यावर काही किलोमीटर पुढे एक फाटा आहे. इथून उजवीकडे ज्योतिबा आणि सरळ तो स्नो पार्क होता. आम्हाला एसटीच्या बसने ह्या फाट्यापर्यंतच येता आलं.
पण इथे येउन आमची फजिती झाली. ज्योतिबाची जत्रा सुरु झालेली होती. आणि एसटीने भरपूर जादा गाड्या ज्योतीबाच्याच दिशेने सोडल्या होत्या. या फाट्यावरून पार्कच्या दिशेने कोणतीच गाडी जात नव्हती. आम्हाला एखादी खाजगी गाडीसुद्धा मिळाली नाही.
आम्ही तिथे तासभर तरी उभे असु. शेवटी कंटाळून आम्ही परत जायचं ठरवलं. पण पुन्हा पंचाईत. जत्रेमुळे ज्योतिबाकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या आधीच भरून येत होत्या. त्यामुळे बसवाले आम्ही उभे होतो त्या फाट्यावर थांबण्याची तसदीच घेत नव्हते.
आम्हाला बस पकडायला आता हायवेपर्यंत जावं लागणार होतं. तिथून दुसरीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या गाड्या मिळण्याची शक्यता होती. आम्ही पायपीट सुरु केली. आणि चालता चालता त्याच दिशेने जाणाऱ्या गाड्यांना खाणाखुणा करून थांबवण्याचे प्रयत्नसुद्धा चालू होते. पण कोणी थांबत नव्हते.
मागुन एक बुलडोझर आला. सगळ्यांना लिफ्ट मागत होतो म्हणून आम्ही गंमत म्हणून त्याला पण लिफ्ट मागितली. आणि आश्चर्य म्हणजे त्याने आम्हाला चढा गाडीत म्हणून सांगीतलं. बुलडोझर असल्यामुळे एकदम हळूहळूच चालत होता. त्याने तो थांबवला नाही. पण आम्ही एक एक करून तसेच चालत्या बुलडोझरवर चढलो.
मयुरची चढताना चांगलीच मजा आली होती. मी त्याचा व्हिडीओ पण काढला होता. त्याच बुलडोझरवर आम्ही बरंच अंतर पुढे आलो. हायवेला येउन कोल्हापूरची गाडी पकडली. अगदी अनपेक्षितरित्या आम्हाला स्नो पार्क ऐवजी बुलडोझरवर राईड मिळाली होती. :D
कोकण सफर : ४ : सावंतवाडी आणि आंबोली
अक्षय सामान घेऊन बसस्थानकावर थांबला. मी आणि मयुर हॉटेल शोधायला बाहेर पडलो. पहाटेच पोहोचल्यामुळे सगळी दुकाने बंद होती. रस्त्यावरसुद्धा सामसुम होती. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर जवळ असल्यामुळे सगळी हॉटेल्स पूर्ण भरलेली होती. कुठेच जागा नव्हती.
मला एका म्हाताऱ्या काकांनी त्यांचा कोकणी हेल काढून टोमणा/सल्ला पण दिला.
"हा सीझन असा ते माहित नाय का तुला? सावंतवाडीस या टायमाला यायचे म्हणजे बुकिंग करायला नको?"
मी आणि मयुर एका चौकातून वेगवेगळे होऊन हॉटेल शोधत होतो. थोड्या वेळातच मला मयुरची हाक ऐकू आली. मयुरसोबत एक म्हातारा कृश माणूस दिसत होता. मी तिकडे गेलो. मयुर म्हणाला हे काका आता आपल्याला नेतील एका हॉटेलवर.
मयुरला अशी कुठल्याही ठिकाणी तिथल्या लोकांशी गप्पा मारत सलगी करायची सवय आहे. ह्या सवयीने त्याचे लोकांशी फार लवकर चांगले संबंध तयार होतात. तो अशा गप्पा मारून बरीच माहिती गोळा करतो. त्याचा आम्हाला आमच्या सहलींमध्ये फायदासुद्धा होतो. आणि आता ह्या सवयीचा त्याला त्याच्या कामातसुद्धा फायदाच होतोय. पण फायद्याबरोबर कधी कधी विचित्र लोक भेटले तर डोक्याला तापसुद्धा होतो, आणि कधी मजेदार किस्से होतात. तसा ह्या माणसाने सावंतवाडीत आमच्या डोक्याला चांगलाच ताप करून ठेवला होता.
पहाटे पहाटे बाकी सगळी सामसूम असताना रस्त्यावर भेटलेल्या माणसाकडून फार काय अपेक्षा करणार?
मला तो माणूस पिलेला वाटत होता. आम्ही त्याच्याबरोबर गेलो. तो त्याच्याबद्दल सांगायला लागला. म्हणे मी क्रिकेट कोच आहे. शाळेतल्या मुलांना शिकवतो. खासगी कोचिंगसुद्धा करतो. गरीब मुलांना मदत करतो.
त्याने आम्हाला एका हॉटेलवर नेलं. बाहेरून ते काही खास वाटतच नव्हतं. पण कोकणात बऱ्याच लोकांनी आपल्या घरात एक दोन खोल्या बांधून घरगुती निवारा सुरु केलेला आहे. आम्हाला वाटलं तसाच हा असेल. आणि काटकसर हे आमचं या ट्रीपचं धोरणच होतं त्यामुळे आमच्या काही अपेक्षा नव्हत्या.
त्याने "अप्पा…" अशी हाक मारून एका म्हाताऱ्याला उठवलं. त्याने आम्हाला सांगितलं होतं कि हे त्याच्या मित्राचं हॉटेल आहे. पण त्या आप्पांनी याला काही भाव दिला नाही. हा माणूस भाडेकरू घेऊन आल्याचं त्याला काही कौतुक नव्हतं. आम्ही भाडं भरलं आणि रूममध्ये गेलो.
इतक्या दळभद्री हॉटेलमध्ये आम्ही त्याआधी आणि त्यानंतरसुद्धा गेलो नाही. सगळ्या भिंतीना ओल लागली होती. पंख्याला काही वेग नव्हता. गाद्यासुद्धा कुबट वासाच्या. एका गाडीला बहुतेक बेडशिटसुद्धा दिलेलं नव्हतं. पण काही इलाज नव्हता. बाकी कुठे जागाच नव्हती. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
तो माणुस आमच्या मागेमागे रूमवर आला होता. आम्हाला रूम आवडली नव्हती हे बघून लगेच म्हणाला चला मग माझ्या घरी चला. मीपण माझ्या घरी खोल्या बांधलेल्या आहेत . मी तुम्हाला आधीच म्हणणार होतो. पण तिथे माझ्या कोचिंगची मुलं राहतात. म्हटलं तुम्ही शहरातली माणसं तुम्हाला असं शेरिंग मध्ये चालणार नाही. म्हणून इथे घेऊन आलो.
आम्ही आता हा त्याच्या घरी घेऊन जाइल या भीतीने हॉटेलमधेच ठीक आहे म्हणून सांगितलं. तो माणूस मी संध्याकाळी चक्कर मारतो (कशाला???) म्हणून निघून गेला.
आम्ही आवरायला म्हणुन रूमच्या बाहेर असलेल्या संडास बाथरूमकडे गेलो. अतिशय गलिच्छ होतं. आम्ही शेवटी त्या सकाळी आणि दुसऱ्या सकाळी जवळच बसस्थानकावर असलेल्या सुलभमधेच पैसे देऊन प्रातःविधी उरकले.
सावंतवाडीला तिथली लाकडी खेळणी आणि जवळचा एक किल्ला बघायचा आमचा बेत होता. पण असं कळलं कि तो किल्ला चढायला फार अवघड होता आणि बघायला काही विशेष नव्हतं. आणि तिकडे जायचं तर सकाळी खूपच लवकर जायला हवं होतं.
कोणीतरी आम्हाला आंबोलीला जाण्याबद्दल सुचवलं. आणि आम्ही सावंतवाडीला येउन चुकलो, कोल्हापूरहून सावंतवाडीला येताना आधी आंबोली लागतं, तर आधी आंबोलीलाच जायला हवं होतं असंही सांगितलं. आंबोली आमच्या आधीच्या प्लानमध्ये नव्हतं. पण आंबोलीबद्दल माहिती ऐकून आम्ही तिकडे गेलो.
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
इथे बसमधून उतरताच पन्हाळ्यासारखे रिक्षावाले आमच्याजवळ आले. आम्ही एक रिक्षा आंबोलीमधली ठिकाणे पाहण्यासाठी ठरवली. त्यानेच आम्हाला दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नेउन आणलं आणि माहितीसुद्धा दिली.
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
हि खरेदी सहलीच्या सुरुवातीच्या भागात केल्यामुळे आम्हाला पूर्ण सहलीत ती घेऊन फिरावं लागलं. त्यातल्या एक दोन वस्तू इतक्या विचित्र आकाराच्या होत्या कि त्यांच्या टोकदारपणामुळे पिशवी फाटत होती, मोठ्या आकारामुळे आमच्या बॅगमध्ये ठेवता येत नव्हती. आम्हाला ती तशीच हातात घेऊन फिरावं लागलं. एक दोनदा आम्ही हि पोस्टाने घरी पाठवून देता आली असती तर किती छान झालं असतं असासुद्धा विचार केला.
असो. तेव्हा आम्हाला सगळ्यांना नंतर कटकट वाटल्या त्या गोष्टींना शेवटी अक्षयच्या घरी शोकेसमध्ये जागा मिळाली आणि त्या तिथून सगळीकडे बाळगत घेऊन येण्याचं सार्थक झालं.
आंबोली पावसाळ्यात आणखी छान असणार याचा अंदाज येतच होता. आमचा प्लान नसतानासुद्धा आमचं इथे येणं झालं ते कोणा अज्ञात माणसाच्या सल्ल्यामुळे.
रिक्षावाल्याने आम्हाला सनसेट पॉइन्टसुद्धा दाखवला. पण तोपर्यंत आम्हाला थांबता येणार नव्हतं. आम्ही परत एसटी पकडून सावंतवाडीला गेलो. हि थोडी उलटीच पण छान चक्कर झाली होती. आंबोली तेव्हापेक्षा आता खूपच लोकप्रिय ठिकाण झालेलं आहे.
सावंतवाडीला संध्याकाळी आम्ही लाकडी खेळण्यांची दुकाने पहायला जाणार होतो. पण तेवढ्यात तो माणूस टपकला. आणि चला मी घेऊन जातो म्हणून आमच्यासोबत लटकला. मला त्याला टाळावं वाटत होतं कारण तो पैसे मागणार याची मला खात्री होती. पण तो ओळखीच्या दुकानात नेउन सवलत मिळवून देईल अशा आशेवर आम्ही गेलो. त्याने एका ओळखीच्या ठिकाणी नेलं खरं, पण ते अगदीच छोटं आणि घरगुती दुकान होतं. त्यामुळे तिथे खूपच कमी मोजकी खेळणी होती. त्यात वैविध्यसुद्धा नव्हतं.
आम्ही तिथे काही न घेता पुढे एका मोठ्या दुकानात गेलो. तो माणूस बाहेरच थांबला. आम्ही तो कटावा म्हणून भरपूर वेळ त्या दुकानात घालवला. पण तो काही कटला नाही. त्या दुकानात मात्र खूप प्रकारची छान खेळणी आणि वस्तू उपलब्ध होत्या. पण थोड्या महागसुद्धा होत्या. तिथून आम्ही काही वस्तु घेतल्या.
बाहेर तो माणुस आम्हाला जेवायलासुद्धा त्याच्या ओळखीच्या जागी न्यायच्या तयारीत होता. आम्ही शेवटी त्याला कटवायचं ठरवलं आणि त्याने पैसे मागितले. आम्ही काही ३०-४० रुपयेच दिले असावेत. तेवढ्यात त्याचा पिच्छा सुटला हे नशीब. ३०-४० रुपयांसाठी सकाळी आणि संध्याकाळी इतका वेळ गावात नव्या लोकांना चिटकणारा असा हा अजब क्रिकेट कोच होता. जाता-जातासुद्धा तो आम्हाला जेवण्यासाठी हॉटेल सांगून गेलाच.
त्याने आम्हाला राहण्यासाठी नेलेलं हॉटेल, लाकडी खेळण्यासाठी नेलेलं दुकान याचा इतका छान अनुभव असल्यामुळे आम्ही हटकुन त्याने सांगितलेलं हॉटेल सोडून दुसऱ्याच ठिकाणी जाउन जेवलो.
रूमवर परत येउन कशीबशी त्या भयानक हॉटेलमध्ये रात्र काढली आणि सकाळी (बसस्थानकावर) आवरून मालवणला निघालो.
कोकण सफर : ५ : सिंधुदुर्ग आणि स्नोर्केलिंग
मालवण ला पोहोचलो कि लगेच आम्ही चौकशी करत सिंधुदुर्गा साठी जिथून होड्या सुटतात त्या धक्क्यावर आलो. तिकीट काढून होडीत बसलो. सिंधुदुर्ग मालवण जवळ समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. तिथे होडीनेच जावे लागते.
तिकडे जाताना दुरूनच तो दुर्ग दिसायला लागतो. तिथे पोहोचल्यावरच त्याची रचना किती विचारपूर्वक केली आहे हे जाणवायला लागते. याआधी मी जंजिरा पाहिलेला असल्यामुळे किल्ल्याची काही वैशिष्ट्ये लक्षात येत होती. जसे कि, हे किल्ले बेटावर असल्यामुळे चहूबाजूंनी गलबते होड्या येऊ शकतात, त्यामुळे दरवाजा छुप्या पद्धतीने बांधलेला आहे. दुरून लवकर लक्षात येत नाही, माहितगार लोकच तिथे त्वरित जाऊ शकतील. तसेच शत्रू आलेच तर त्यांच्यावर दगड, गरम तेल यांनी हल्ले करण्यासाठी सोय करून ठेवलेली आहे.
इथे सुद्धा आम्ही माहिती दाखवण्यासाठी गाईड केला. जवळच एका दुकानात ५ रुपये देऊन आमच्या बॅग तिथे काढून ठेवल्या.
ह्या किल्ल्यावर काही एकमेव अशा गोष्टी आहेत. किल्ल्याच्या प्रवेशा जवळच शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत.
शिवरायांचे मंदिर आहे. शिवरायांना आणि जिजाऊ यांना अनेक जण देव मानत असले तरी त्यांचे प्रत्यक्ष मंदिर इथेच आहे. शिवरायांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवांची मंदिरे आहेत.
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटावर गोड पाण्याचा स्त्रोत आहे, हेच पाहून महाराजांनी हा किल्ला बांधला होता.
मालवण हून या किल्ल्यावर येण्यासाठी एक पायी येण्याजोगा रस्ता सुद्धा होता. पाण्यातून च असला तरी तो उथळ भागात असल्यामुळे चालत येण्या जोगा होता. काही गावातले जाणते लोक तो वापरत होते. पण जपान मध्ये आणि दक्षिण भागात सुनामीच्या लाटा जेव्हा आल्या होत्या, तेव्हा त्याचा परिणाम इथपर्यंत झाला आणि ती वाट पाण्यात गेली. निसर्गाच्या रौद्र रूपाचा परिणाम किती दूरवर होतो.
किल्ल्यावर फिरून आम्ही परत होडीने मालवणला पोहोचलो. धक्क्यावर आम्हाला लोक स्नोर्केलिंग साठी विचारात होते. आम्हाला याबद्दल पूर्ण कल्पना नव्हती.
त्यांनी आम्हाला माहिती दिली कि स्कुबा डायव्हिंग मध्ये जसे संपुर्ण संच घेऊन प्रशिक्षित लोक समुद्रात खोलवर जाउन येतात, प्रवाळे, मासे बघतात. पण त्याला प्रशिक्षण लागते ते महागडे असते, संच लागतो तो हि महागडा असतो.
तसे स्नोर्केलिंग हे फार खोल न जाता वरच्या वर पोहत थोडी डुबकी मारत करायचे असते. आणि इथे तिथले गार्ड आपल्या सोबत येउन आपली मदत करतात. आणि संरक्षक जाकीट घालून जायचे असल्यामुळे पोहणे यायची हि गरज नाही.
आम्ही लगेच तयारी दाखवली. पण अक्षयला पाण्याची भीती असल्यामुळे तो तेव्हा यायला तयार झाला नाही. आम्ही त्याला तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो काही बधला नाही.
मी आणि मयुर दोघेच अक्षयकडे सामान ठेवून गेलो. एका होडीत बसून आम्ही पुन्हा सिंधुदुर्गाच्या दिशेने गेलो. सिंधुदुर्गा जवळच पाणी कमी खोल आहे आणि तिथे बऱ्यापैकी उथळ पाण्यात बघण्यासारखी सुंदर प्रवाळेसुद्धा आहेत. त्यामुळे तिथे स्नोर्केलिंगची चांगली सोय झाली आहे, अनेक स्थानिक मुलांना रोजगारसुद्धा मिळाला आहे.
मी तिथे पहिल्यांदाच स्नोर्केलिंग केलं आणि नंतर काही वर्षांनी जकार्ता ला. आणि दोन्ही वेळेसचा अनुभव अगदी सुंदर होता.
पाण्यात गेल्यावर वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. तिथला झिरपणारा प्रकाश, त्यात दिसणारे रंग. परमेश्वराने या दृष्टी आडच्या सृष्टीत रंग अजूनच मनसोक्त उधळले आहेत.
ते लोक आम्हाला माहिती सुद्धा सांगत होते. त्यांच्या अंदाजे ते प्रवाळ ३०० वर्ष आधीचे असावेत. म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळातले.
मी स्नोर्केलिंग करून खूपच खुश झालो होतो. ते करून आल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं.
धक्क्यावर पोचल्यावर आम्हाला सार्वजनिक स्नानगृहात अंघोळ करणं भाग होतं आता नेमकं आठवत नाही, पण तिथे नंबर लागण्यात, पाणी आणि साबण मिळण्यात खूप वेळ लागला होता आणि तिथल्या चालकाशी भांडण झालं होतं असं आठवतंय.
अंघोळ झाल्यावर आम्ही गावात जाउन एक प्रसिद्ध खानावळ शोधत होतो, पण तिथे खूप गर्दी होती, आणि वाट बघावी लागणार होती. आम्हाला तेवढी वाट बघवणार नव्हती म्हणुन आम्ही एका अगदी छोट्या खानावळीत गेलो. तिथे फक्त आम्हीच होतो, आम्ही गेल्यावर तिथल्या आजोबांनी स्वयंपाक केला आणि वाढलं. इतकी भूक लागलेली असल्यामुळे आम्ही ते साधंच पण गरमागरम जेवण आनंदाने घेतलं.
मालवणहून आम्ही पुढे निघालो कुणकेश्वरला.
कोकण सफर : ६ : कुणकेश्वर
एका घरी काही खोल्या भाड्याने देण्याची व्यवस्था केली होती, तिथे आम्ही चाललो होतो. समुद्राचा आवाज येत होता आणि वारं सुद्धा खुप छान सुटलेलं होतं.
तिथे सुदैवाने आम्हाला जागा मिळाली. काही जणांनी तिथे आधी जागा आरक्षित केलेली होती, पण ऐन वेळेवर त्यांनी बेत रद्द केला, आणि तो आमच्या पथ्यावर पडला. त्यांनी एक मोठी आणि एक छोटी खोली घेतली होती. त्या मालकांच्या सुदैवाने त्यांना दोन्ही खोल्यांसाठी भाडेकरू मिळाले. आम्हाला त्यातली छोटी खोली मिळाली.
ती खोली काही खास नव्हती. पण आम्ही तिथे ज्या वातावरणात पोहोचलो होतो ते इतकं छान होतं कि आम्हाला खोलीबद्दल काहीच वाटलं नाही.
कधी कधी असंच होतं. एखादी गोष्ट वेगळ्याच कारणासाठी आवडते. काही खाण्याच्या प्रसिद्ध जागी बसायलाही जागा नसते. तरी तिथे लोक जातात. काही ठिकाणी खाद्यपदार्थांचा दर्जा अगदी सुमार असतो, पण ती जागा खूप निवांत असते, तिथे गप्पा छान होतात म्हणून लोक जातात.
हातपाय धुवून आम्ही बाहेर पडलो. कुणकेश्वर मंदिरात गेलो. हे मंदिरसुद्धा खूप छान आहे. समुद्रकिनाऱ्याला अगदी लागून उंच असं मंदिर बांधलेलं आहे. तिथून किनाऱ्यावर उतरायला मोठ्ठा जिना आहे.
दंतकथा अशी आहे कि एका वादळात अडकलेल्या जहाजावरून एक व्यापारी बचावून या किनाऱ्यावर पोहोचला. आणि त्याने इथे हे मंदिर बांधलं.
आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात फार गर्दी नव्हती. प्रसन्न आणि मनासारखं दर्शन झालं.
मंदिरात गेलो कि अक्षय त्याला येतील तेवढे सगळे मंत्र आणि स्तोत्र म्हणतो आणि त्याला बाकीच्यांच्या तुलनेत नेहमी जास्त वेळ लागतो. इथे मात्र आम्ही सगळेच प्रसन्न वातावरणामुळे, मंदिराच्या सौंदर्यामुळे, तिथल्या शांततेमुळे भारावून गेलो होतो. अशा ठिकाणी जी देवाशी जवळीक जाणवते, भक्ती दाटते, ती रांगेत लागून, मंदिरात ओळख काढून किंवा पैसे मोजून पास काढून रांगेला बगल देत जे दर्शन उरकलं जातं त्यात कधीच होत नाही.
चराचरात ईश्वर आहे असे मानणाऱ्या आणि शिकवणाऱ्या आपल्या समाजात देवाचे वेगळे मंदिर बांधण्याचा उद्देश देवाजवळ जाता यावे, त्याचा सहवास जाणवावा म्हणूनच असावा. पण आताच्या कर्मकांडांच्या पद्धतीत सगळं काही उरक्ल्याची, फक्त पार पडल्याची भावना होते, देव भेटल्याची नाही.
इथे आम्हीसुद्धा जास्त वेळ बसलो होतो. पण अक्षय त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षासुद्धा खूप जास्त वेळ बसला होता. आम्हाला वाटलं मंत्र एकदा नाही तीनदा म्हणेल. पण अक्षय खूपच वेळ बसून होता. त्याची तंद्री लागली होती. आम्हाला आता आपला मित्र संन्यास घेतो कि काय अशी भीती वाटायला लागली. पण तसं काही झालं नाही, काही वेळाने अक्षय परत माणसात आला.
आम्ही बराच वेळ बाहेर कठड्यावर बसलो.
एक काका भेटले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. पण त्या काकांना तरुण श्रोते मिळाल्यामुळे जास्त हुरूप चढला. माझा अध्यात्माचा सुद्धा अभ्यास आहे, आणि आपण इथे मंदिरात या वातावरणात बसलेलो आहोत तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगतो असं म्हणून चांगलंच प्रवचन दिलं. आता त्यातलं काहीही आठवत नाही. फक्त असं गाफील पकडून प्रवचन दिल्यामुळे त्या काकांची आठवण राहिली आहे.
आम्ही गावात फेरफटका मारून एका ठिकाणी जेवलो. तिथे अतिशय मोठा ग्रुप आलेला होता. त्यांचा धिंगाणा, मौजमजा चालू होती. थोडावेळ दुरून त्यांची मजा बघितली आणि आम्ही परत रूमवर जाऊन झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर किनाऱ्यावर जायचा विचार होता पण आम्हाला जाग आली नाही. आम्ही उठलो तेव्हा मयुर गायब होता. तो काही वेळातच आला. त्याला जाग आली होती, आणि आम्ही उठलो नाही म्हणून तो एकटाच जाऊन फिरून आला होता. आणि असलं भारी वातावरण होतं यार, खूप मस्त वाटत होतं म्हणून आम्हाला जळवत होता.
या पूर्ण सहलीत कुणकेश्वरला आम्ही जे वातावरण आणि शांतता अनुभवली त्यामुळे या गावाची आणि मंदिराची एक वेगळ्याच प्रकारची रम्य आठवण आहे. काही दिवसांनी एकदा अक्षयला एका वक्तृत्व कलेच्या तासामध्ये आवडत्या जागेबद्दल बोलायला सांगितलं, तेव्हा तो याच जागेबद्दल बोलला.
आम्ही आवरून पुन्हा मंदिरात दर्शन घेतलं. आणि किनाऱ्यावर बराच वेळ घालवला. मग नाश्ता करून आम्ही त्या सुंदर गावातून निघालो.
कोकण सफर : ७ : विजयदुर्ग आणि राजापुर
आधी चहुबाजूंनी पाण्याने वेढलेला हा जलदुर्ग होता. पण आता एका बाजुला भर टाकुन तो जमिनीशी जोडला गेला आहे. त्यामुळेच आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा अगदी किल्ल्याच्या दारासमोरच उतरलो. आणि तो असा जमिनीवर पाहुन आम्हाला आश्चर्य वाटले. तो सिंधुदुर्गासारखाच बेटावर असेल आणि होडीने जावे लागेल अशी आमची कल्पना होती.
खूपच रणरणतं उन होतं त्या दिवशी. आम्ही समोरच्या हॉटेलमध्ये पाणी शरबत वगैरे घेतलं. किल्ला पाहून आल्यावर तिथेच जेवू असं सांगितलं आणि आमचं जड सामान त्याच हॉटेलमध्ये ठेवुन आम्ही किल्ला पाहायला गेलो.
तो सुटीचा दिवस नव्हता, एवढं उन होतं आणि किल्ल्यावर सामसुम होती. इथे आम्हाला कोणी गाईडसुद्धा दिसला नाही. किल्ल्यावर फक्त आम्हीच फिरत होतो. आणि तसाही एक जलदुर्ग नुकताच पाहिला असल्यामुळे रचनेबद्दल थोडीफार कल्पना होतीच. गाईडकडून किल्ल्याचा इतिहास तेवढा नव्याने समजला असता.
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
किल्ला फिरून बाहेर गेलो. ठरलेल्या हॉटेलमध्ये जेवलो. कोकणात पर्यटन हा मोठा उद्योग आहे आणि तो दिवसेंदिवस फोफावतोय. आजकाल कोकणातल्या कुठल्याही (पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या) गावात जवळपास सगळ्या घरात खानावळी आणि कॉटेज असतात.
कोकणात मांसाहारी अथवा मत्स्याहारी लोकांची चंगळ असते. अशा लोकांना चिकन अथवा माश्याची एखादी छान डिश मिळाली कि ते खुश होतात. ती कोकणात मिळतेच. पण आम्ही तिघे मुख्यत्वे शाकाहारी लोक. मी कधी कधी चिकन किंवा फिश चवीला घेतो, पण आवड नाही. आणि इतक्या गरमीत तर नाहीच नाही. तर शाकाहारी लोकांची मात्र पंचाईत होते.
घरगुती जेवण या शीर्षकाखाली सगळी कडे तेच (तेच!!!) जेवण मिळतं. तुम्ही फक्त व्हेज कि चिकन कि फिश थाळी एवढंच सांगा. व्हेज म्हटलं कि बटाटा, पत्ताकोबी या पैकी एक भाजी, एक पातळ मटकी वगैरेची उसळ आणि सपक वरण भात हा ठरलेला मेनू. काहीच बदल नाही. त्यातली सोलकढी फक्त काय ती आम्हाला आवडायची.
जेवण करून आम्ही पुढे निघालो राजापूरला. राजापुर ला आम्हाला फक्त मुक्कामाला जायचे होते. आणि तिथुन सकाळी पुढच्या प्रवासाला.
आम्हाला बसच्या प्रवासात अगदी मागच्या बाजूला थोड्या पुढेमागे जागा मिळाल्या. त्या बसमध्ये बरेच लोक तो प्रवास रोज करणारे होते. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. ते एकाच गावात राहणारे, कामानिमित्त रोज सोबत प्रवास करणारे लोक होते. एकमेकांचे मित्रच होते. त्यांच्या आपसातसुद्धा गप्पा आणि हसणे खिदळणे चालू होते. आम्ही त्यांच्यात लगेच मिसळलो.
त्यांनी आमची सगळी हकीकत ऐकली, प्रवास कुठून कसा केला, आता कुठे जाणार ते ऐकलं. मग आमचं कसं चुकलं हे ऐकवलं. (हे अपेक्षितच होतं, पण ते टीकेच्या सुरात नाही तर सहज गप्पांच्या ओघात हे महत्वाचं :D ) तुम्ही इकडून तिकडे मग इकडे मग तिकडे असं करायला पाहिजे होतं असं सांगायला लागले. ह्यावरून त्यांचे आपसात मतभेद झाले. छ्याः, तिकडे काय आहे बघण्यासारखं, अरे तो रस्ता किती खराब आहे, असे त्यांचे दावे प्रतिदावे चालले होते. पण आमचा प्लान चुकला होता ह्यावर त्यांचं एकमत होतं. :)
एक दोघांनी आम्हाला त्यांच्या घरीच राहायला बोलावलं. पण सावंतवाडीमधल्या त्या क्रिकेट कोचच्या आपुलकीचा चांगला अनुभव असल्यामुळे आम्ही तो धोका पत्करला नाही. आणि त्यांनी हि फार आग्रह केला नाही. आम्ही बसस्थानका जवळच एका हॉटेलात मुक्काम केला. मला वाटतं त्याच रात्री का दुसऱ्या दिवशी पहाते बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली होती. हॉटेलचा चालक त्या ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर पाहत बसला होता.
आमची मग हॉटेलच्या लॉबीमध्ये भारत पाकिस्तान राजकारणावर बरीच चर्चा झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
कोकण सफर : ८ : काही मंदिरे
सर्व प्रथम आम्ही गेलो आडिवरे या गावी. इथे या भागातले प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. कोकण आणि गोव्यातली बरीच मंदिरे कौलारू असतात. एरवी मंदिराचे साधारण प्रवेश, गाभारा, कोरीव भिंती, कळस असे जे स्वरूप असते त्यापेक्षा इथे बरीच वेगळी मंदिरे पाहायला मिळतात.
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
एसटी मंदिराच्या अगदी समोर थांबली. विचारत जावे लागले नाही. अगदी पटकन आणि सहज दर्शन झाले. मंदिर सुंदर होते. मंदिरात एक वेगळ्याच प्रकारची विहीर होती. विहीर वेगळ्या प्रकारची म्हणण्यापेक्षा तिथला पाणी काढण्याचा रहाट खूपच वेगळा होता. आता नीटसा आठवत नाही. पण खूप वेगळा होता. त्याने पाणी काढणे अगदी सोपे होते. तिथे काही बायका पाणी काढत होत्या, तर आम्हीपण थोडं पाणी काढुन पाहिलं होतं.
![]() |
| छायाचित्राचा स्त्रोत |
तिथून आम्ही गेलो पावसला. पावसला स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे. गीता हा ग्रंथ असा आहे, कि त्यात बहुमोल आणि चिरकालीन टिकणारी तत्वे सांगितली आहेत. ज्यांच्या बळावर आपण आयुष्य जगू शकतो, ज्यांचा आधार घेऊ शकतो अशी हि तत्वे आहेत. त्यामुळे अनेक महान लोकांचा (भारतीय आणि परकीय दोन्ही ) गीतेचा अभ्यास असलेला दिसतो.
काही प्रतिभावंत लोकांचा अभ्यास फक्त स्वतःपुरता राहत नाही. त्यांना गीतेवर भाष्य करणे अथवा आपल्या भाषेत ती पुन्हा लिहून काढणे याचा मोह आवरत नाही. त्यामुळेच ज्ञानेश्वर यांनी सामान्यांना कळण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. विनोबांनी गीताई लिहिली. टिळकांनी गीतारहस्य लिहिले. तसेच या स्वामींनी आपल्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांचे आणखीही लेखन आहे. आम्ही या आधी लहानपणी तिथे गेलो होतो तेव्हा हि ज्ञानेश्वरी आम्ही आणली होती.
या मठाबाहेर अगदी स्वस्त दरात (तेव्हा ३ रुपये फक्त, आता अशात ६ रुपयांना आहे असं ऐकलं) कोकम शरबत मिळत होतं. हे मी पिलेलं आतापर्यंतचं सर्वोत्तम कोकम शरबत. अशी सर्वोत्तम चव मिळते तेव्हा मी सहसा एकावर थांबत नाहीच. आणखी एक दोन शरबत रिचवून आम्ही पावसहून निघालो.
पुढे आम्ही एका ठिकाणी (बहुतेक तरी देवरुख) मुक्काम करून नंतर मार्लेश्वरला गेलो. हि जरा वाकडी वाट असली तरी गेलो. एक तर आम्ही पास काढलेला होता त्यामुळे वाकडी तिकडी, उलट सुलट कशीही असली तरी आम्हाला फरक पडत नव्हता. आणि दुसरे म्हणजे आम्ही सहलीचा प्लान करत होतो तेव्हा अक्षयने मार्लेश्वरची खूप स्तुती केली होती. तो तिथे आधी जाऊन आला होता, आणि तिथे जायलाच पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. त्याची पुन्हा जायची प्रबळ इच्छा होती, आणि आम्हाला पण पहिल्यांदा जायची इच्छा होती.
मग चांगलं ठिकाण असेल तर तिथे जायला जी वाट असेल तिकडून तुम्हाला जावंच लागतं. मार्लेश्वर हे शिवाचे मंदिर आहे. हे एवढे वर्णन पुरेसे नाही. मार्लेश्वर हे उंच डोंगरात गुहेतले शिवाचे मंदिर आहे. तिथून जवळच पुढे मोठे धबधबे आहेत. खाली वाहती नदी आहे. अत्यंत सुंदर निसर्गात वसलेलं मंदिर. अक्षय मागे आला होता तेव्हा त्याने इथे जिवंत सापसुद्धा पाहिले होते. पण आम्हाला यावेळी ते दिसले नाहीत.
मंदिरातून बाहेर आल्यावर आम्ही पुढे जाऊन धबधबा पाहायला गेलो. तो तेव्हा पूर्ण जोरात वाहत नसला तरी तो पावसाळ्यात किती भव्य असेल याची कल्पना येत होती. इथे मंदिर धबधबा आणि परत असे यायला जायला खूप चालावे आणि चढावे उतरावे लागते. आम्ही उन्हात फिरून त्रस्त झालो होतो.
पावसाळ्यात पुन्हा यायला हवे असे आम्हाला वाटले. पण ती जागा खरोखर सुंदर आहे, आणि तिथे जाणे वर्थ होते, व्यर्थ नाही.
परत जातांना आम्ही फोटोग्राफी सुरु केली. काही ग्रुप काही सोलो असे फोटो काढले. मी एक फोटोग्राफीचा कोर्स केला असल्यामुळे मी फोटोग्राफर असल्यासारखं मिरवायचो. मित्र माझी उडवायचे, पण फोटो चांगले आले कि कौतुक पण करायचे. मयुरलासुद्धा फोटो काढण्याची हौस होती. जास्त करून मीच फोटो काढायचो पण, मधेच तो कॅमेरा घेऊन तिरप्या तार्प्या पोजमध्ये बसून फोटो काढायचा, आणि पहा कसला भारी फोटो काढलाय अशा अविर्भावात कॅमेरा परत द्यायचा.
पण त्याला फोटो काढून घेण्याची जास्त हौस होती. अक्षयची ती हौस तेव्हा इतकी प्रबळ नव्हती, पण आताशा खूपच वाढली आहे. त्या सहलीत मात्र मयुर फोटो काढून घेण्यामध्ये सर्वात पुढे होता. तो साध्या, फिल्मी अशा पोज तर द्यायचाच. पण त्याला सरकार चित्रपट प्रचंड आवडला होता, आणि त्यामुळे नेते, भाई लोक यांच्यासारखे, बुवा महाराज यांच्या सारखे सुद्धा फोटो काढून घ्यायचा.
कधी कधी मजा म्हणुन उगाच और एक, और एक करून फोटो काढायला लावायचा. मला फोटो काढायला काही अडचण नसली तरी दिवसभर फिरायचे तर बॅटरी जपून पुरवावी अशा विचाराने चिडचिड व्हायची. तशी मस्ती नेहमीच चालू असली तरी या ठिकाणी बॅटरी कमी झाली असल्यामुळे आमचं भांडण झालं होतं. शेवटी कॅमेरा बंद पडला, आणि तो आणि पुढचा दिवस चार्ज करता आला नाही. :D
वाकड्या वाटेने पुन्हा मागे येउन आम्ही रत्नागिरीला गेलो.














































