Sunday, October 5, 2025

दक्षिणतीर्थ’ अभिषेक चंद्रशेखर शाळू

 दक्षिणतीर्थ’ - भाग -१ -  लेखांक - ३ – (04/01/2023)

लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक -३ -  कन्याकुमारी रहस्य   
 
आज सकाळी आम्हाला खरतर मरुत्वमलै पर्वत शोधत जायचं होतं.. पण 46 तासांची तुंबलेली झोप संपेपर्यंत उठायला सकाळचे 10 वाजले.. त्यामुळे मरुत्वमलैचा प्लॅन पुढच्या दिवशी ढकलला.. आवरून 11 ला चेक आऊट केलं.. आणि चालत चालत त्या अथांग हिंदी महासागराच्या त्रिवेणी संगमाजवळ आलो.. 
हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा हा संगम.. जिथे या तीन सागरांच्या तीन वेगवेगळ्या निळ्या छटा एकमेकात मिसळून जाताना दिसतात.. निसर्गातल्या आपतत्वाच्या एकरूपतेचं हे सर्वोच्च प्रतिक.. भारताच्या दक्षिणेकडचं हे सगळ्यात शेवटचं टोक जिथून पुढे दक्षिण धृवापर्यंत एकही भूखंड नाही. आणि जर कधी असेल तर तो हजारो वर्षांपूर्वीच काळाच्या पडद्याआड गेलाय.. येस.. द लॉस्ट इंडिअन कॉन्टिनेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कुमारी कंदम’ महाद्विपाची कन्याकुमारीच्या याच टोकापासून अग्नेय दिशेकडे ऑस्ट्रेलिया पर्यंत आणि नैऋत्य दिशेकडे मादागास्कर बेटांपर्यंत पसरलेली हद्द काही हजार वर्षांपूर्वी जलमग्न झाली ती या इथल्याच पाण्याखाली.  हजारो वर्षांपूर्वी झालेल्या वैवस्वत मनु प्रलायाआधी आधुनिक मानवी सभ्यतेचा आणि संस्कृतीचा विकास या महाद्विपावर झाला. 'कुमारी कंदम' हिंदी महासागरात हरवलेल्या तमिळ संस्कृतीच्या प्राचीनतेचा संदर्भ देते. त्याला पूर्वी कुमारी नाडू असंही नाव होतं ज्याची कन्याकुमारी प्रांत ही राजधानी होती. तमिळ साहित्य पुराणानुसार अशी मान्यता आहे की त्रेतायुगात श्रीलंकेची हद्द ही आत्ताच्या श्रीलंकेचा प्रदेश आणि पूर्ण ‘कुमारी कंदम' अशी भव्य होती.. पुढे द्वापार युगात इथे बाणासुराची सत्ता होती.. बाणासुराचा वध करून कन्या कुमारीने या संपूर्ण प्रदेशावर राज्य केलं.. आणि अखेर शिव आराधनेत अंतर्लीन झाली.. पुढे ती रावणाची सोन्याची लंका आणि संपूर्ण कुमारी कंदम महाद्वीप तत्कालीन मन्वंतराच्या मनु प्रलयात जलमग्न झालं. 
काही वेळ तिथेच लाटांचा नाद ऐकत त्या अथांग महासागराला एकटक न्याहाळत आम्ही बसलो.. समुद्र किनारी तंद्री लावून बसण्यात एक वेगळीच मजा असते.. तिथल्या खडकावर आदळणाऱ्या लाटांनी एव्हाना आम्हाला नखशिखान्त न्हाऊ घातलं..  
श्रीपाद वल्लभ चरीत्रामृतातल्या संदर्भाप्रमाणे या पवित्र संगमावर इथेच कुठंतरी शंकर भट्टानं कन्यका परमेश्वरीचं (कन्या कुमारीचं) दर्शन घेण्याआधी स्नान केलं असेल.. दर्शन घेऊन याच वाटेनं पुढं जात तो मरुत्वमलै पर्वतावर वाट चुकला असेल.. आणि त्याला त्या दिव्यात्म्यांचं दर्शन झालं असेल. हा विचार करत असताना एकदम घडाळ्याकडे लक्ष गेलं.. अर्धा तास उलटून गेला होता.. दक्षिणेकडची बहुतेक मंदिरं दुपारी 12 ते 4 यावेळात बंद असतात..मंदिर बंद होण्याआधी आम्हाला कुमारीअम्मन मंदिरात कन्याकुमारीचं दर्शन घ्यायचं होतं.. आम्ही चालतच मंदिरात प्रवेश केला.. शंकरभट्टाप्रमाणे एक लाल फूल आणि इतर पूजा साहित्य घेतलं. मंदिराच्या गर्भगृहाजवळ जात असताना तिथली स्थापत्यशैली बघून मंदिर किती प्राचीन असेल याचा अंदाज आला.. आम्ही अगदी मंदिर बंद होण्याच्या आरतीच्या वेळी देवीसमोर उभे होतो.. अजिबातच गर्दी नव्हती आम्ही नेलेलं लाल फूल आणि इतर साहित्य तिथल्या पुजाऱ्याने मोठ्या श्रद्धेने देवीला अर्पण केलं.. चरित्रामृतातल्या वर्णनाप्रमाणेच देवी अंबा मोठ्या स्नेहपूर्ण नजरेनं आमच्याकडे बघत असल्याचं जाणवलं.. आरती झाल्यावर देवीच्या उत्सवमूर्तीची प्रदक्षिणा होती त्यात आम्ही काही तुरळक दर्शनार्थी आणि तिथले पुजारी असे 5 जणच होतो.. प्रदक्षिणा झाल्यावर देवीसमोरचा पडदा ओढला गेला.. आणि आम्ही काही वेळ शांत तिथल्या गर्भगृहाबाहेर बसलो..देवी कुमारिका असल्यानं कुमारिकेचे सगळे शृंगार इथे वाहिले जातात.. आणि त्याच साज शृंगारानी तीला सजवलं जातं.. भारताच्या दक्षिण टोकाचं सगळ्यात शेवटचं शक्तीपीठ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.. सतीदाहाच्या वेळी भगवान शंकर विलाप करत माता सतीचा देह आकाश मार्गाने घेऊन जात असताना तिचा मेरूदंड म्हणजेच पाठीचा कणा इथे प्रविष्ट झाला.. विश्वचैतन्याचं प्रमाण असलेली कुंडलिनी शक्ती जिथून प्रवाहित होते असा साक्षात आदिशक्तीचा कारण देहात प्रस्थापित असलेला मेरूदंड या ठिकाणी प्रस्थापित झाला असल्यामुळे इथली ऊर्जा स्पंदनं फारच जागृत आणि प्रभावी आहेत.. सत्ययुगात ज्या ज्या ठिकाणी माता सतीच्या जळत्या देहाचे भाग आणि इंद्रिय प्रस्थापित झाली त्या सगळ्या ठिकाणी आदिशक्तीने त्रेता आणि द्वापार युगात कारण अवतार घेतले. कन्याकुमारी हा अवतार द्वापार युगात झालेला.. तेव्हापासूनच हे स्थान उर्जित आहे आणि इथला परिसर बांधणी हे सगळच द्वापारयुगात तयार झालेलं अत्यंत प्राचीन आहे.. द्वापार युगातला कुमारी कंदम द्विपाचा राजा असुरराज बाणासुर याला फक्त कुमारिकेकडून मृत्यू होण्याचं शिवाचं वरदान होतं. या पराक्रमी वरदानाने तो निर्भय झाला आणि त्याने सर्व जगावर कहर केला. त्याने इंद्राला जिंकून त्याच्या गादीवरून बेदखल केलं.. त्याचा प्रकोप वाढल्यामुळे आदिशाक्ति देवी भगवती ब्रह्म संकल्पाने राजा भरताच्या पोटी  कन्या कुमारी रुपात जन्मली. बाणासुराचा वध करून ती शिवाची तपश्चर्या करत त्रिवेणीसंगमा जवळच्या समुद्रात एका खडकावर शिवाराधनेत बसली अशी ही गोष्ट. तमिळ पुराणानुसार कन्याकुमारीत दत्ततत्वाचा अविर्भाव होण्यामागची गोष्ट ही इथल्या सुचीन्द्र्म नावाच्या गावात त्रीलीन्गम स्वरुपात ‘थानुमलायन’ या नावानी दत्ताने घेतलेल्या अवताराशी निगडीत आहे.           
देवीच्या त्या प्रांगणात गर्भगृहाजवळच्या चौथऱ्यावर साधनेत काही काळ तसाच लोटला.. थोड्यावेळाने डोळे उघडले आणि प्रदक्षिणा करून बाहेर पडलो..आता आम्हाला विवेकानंद रॉक मेमोरियलला जायचं होतं.. आम्ही जेवण करून जेट्टीच्या रांगेत उभे राहिलो.. आणि सुमारे 2 तासांनी आमचा नंबर लागला. जेट्टीत चढल्यापासून पाचव्या मिनिटाला आम्ही शीला स्मारकावर पोहोचलो.. आणि बाहेर पाऊल ठेवल्या ठेवल्या भारावलेली अवस्था होती.. हीच ती जागा जिथे स्वामी विवेकानंदांना ध्यान साधनेत आत्मज्ञान झालं.. पुराणकथेनुसार वासवांबिका कन्यका परमेश्वरी म्हणजेच कन्याकुमारी हिने देखील याच शिळेवर शिवाची तपश्चर्या केली होती.. ज्याच्या परिणाम स्वरूप ही शिळा साक्षात आदीशक्तीच्या तपोबळाने उर्जित होती.. देवीच्या पायाचे ठसे त्या शिळेवर कोरले गेल्यामुळे या शिळेला ‘श्रीपद पराई’ हे नाव प्रचलित झालं.  
1880 सालच्या एका श्रुती नुसार राजयोग आणि कर्मयोगावरच विश्वास ठेवणाऱ्या आणि 18 वर्षांच्या वयातच अतिशय परखडपणे आपले विचार मांडणाऱ्या नरेंद्रला कोणी व्यक्ती सांगतो की कलकत्त्याच्या एका भागात कोणीतरी एक रामकृष्ण नावाचा गूढवादी सिद्ध पुरुष आहे ज्याचं थेट कालीमातेशी अनुसंधान आहे.. आणि तो योगी या देवांशी बोलतो.. त्याच्याकडे तुला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळतील..
विचारांनी परखड, स्पष्टवक्ता आणि तेवढाच तापट असलेला नरेंद्र त्यांच्याकडे जातो आणि जोरात ओरडून त्यांना प्रश्न करतो..”मी असं ऐकलंय तुम्ही देवांशी बोलता म्हणे? हे काय तुम्ही सारखं देव देव करत असता.. देव आहे हे सिद्ध करू शकता का? परमहंसांनी शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले "मी स्वतः याचं प्रमाण आहे".. हे उत्तर ऐकून नरेंद्र शांतच झाला.. कारण त्याला यावर रामकृष्ण यांच्याकडून युक्तिवाद अपेक्षित होता.. हे उत्तर ऐकून त्याने पुढचा प्रश्न केला की "मग असं असेल तर मला तुम्ही त्याचा अनुभव करून द्या"
तुझ्यात ते धारिष्ट असेल तर जशी तुझी इच्छा असं म्हणून परामहंसांनी नरेंद्रच्या छातीला पाय लावला.. आणि ज्या क्षणी पायाचा स्पर्श छातीला झाला तसा हा नरेंद्र समाधी अवस्थेत गेला.. तो अनेक तास बाहेर आलाच नाही.. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या, अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि जेव्हा त्या अवस्थेतून नरेंद्र बाहेर आला तेव्हा त्याने पुढे एकही प्रश्न विचारला नाही.. त्या समाधी अवस्थेत त्यानं असं काहीतरी पाहिलं ज्याची उभ्या आयुष्यात त्यानं कल्पनाही केली नव्हती.. आणि एका ध्येयाच्या वेडानं त्याला पछाडलं.. पुढे याच नरेन्द्राचा स्वामी विवेकानंद झाला.. परमहंसांच्या समाधीनंतर ते भारत भ्रमण करू लागले आणि कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकास येऊन पोहोचले. इथे आल्यावर त्रिवेणी सागर संगमात स्नान करून त्यांनी महासागरात उडी मारली आणि साक्षात कन्याकुमारीने साधना केलेल्या या शिलाखंडावर पोहत येऊन उन, वारा, पाऊस कशाचीच पर्वा नं करता 3 दिवस 3 रात्र सलग ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचं कासावीस झालेलं मन अधिकच हळवं झालं. त्यांना आत्मज्ञान झालं आणि भारताच्या कल्याणासाठी, इथल्या जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोहोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचं ठरवलं. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते.
ज्या शिळेवर साधना करत असताना कन्या कुमारीला शिवाचं अधिष्ठान झालं, जिथे स्वामी विवेकानंदांना  आत्मज्ञान झालं नेमक्या त्याच ऐतिहासिक ‘श्रीपद पराई’ शिलाखंडासमोर आत्ता आम्ही उभे होतो.. त्या शिळेला साष्टांग  नमस्कार केला.. आणि त्या शिळेच्या खाली असलेल्या, त्या शिळेमध्येच कोरलेल्या, मेडिटेशन रुम मधे येऊन बसलो.. पूर्ण अंधार.. कानावर फक्त समुद्राच्या लाटांचा आणि तिथे लावलेल्या ओंकाराच्या रेकॉर्डचा नाद.. समोर ग्रीन ब्लुइश निऑन लाईट मधली ॐ ची प्रतिमा...एक वेगळीच व्हाईब होती. डोळे न मिटताच ध्यान लागण्यासारखी.. आता इथून आम्हाला फक्त घ्यायचं होतं.. या वास्तूच्या ऊर्जेशी फक्त स्पंदनांनी बोलायचं होतं.. शरीरातली उष्णता वाढल्यासारखं तिथे बसल्यावर जाणवत होतं.. तिथे केंद्रित असलेली सकारात्मक उर्जा आत्मतत्वाला स्पर्श करतीये याची जाणीव होत होती. प्रत्येक वास्तू आपल्याला काहीतरी सांगत असते.. ते ऐकण्यासाठी आपले कान मात्र तयार हवेत..     
 बराच वेळ आम्ही तिथेच त्या साधनागृहात बसून होतो.. डोळे उघडले तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती.. आम्ही बाहेर आलो.. सनसेट बघूनच आम्ही परतीच्या जेट्टीत बसणार होतो.. बरोबर मोक्याची जागा बघून तिथे मांडी ठोकून बसलो. डावीकडे विवेकानंद स्मारक, उजवीकडे तामिळनाडू मधले ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक तिरुवल्लुवर स्वामी यांचा भव्य पुतळा, चारही बाजूंनी निळंशार पाणी त्यात मधेच डोकं वर काढलेली छोटी छोटी हिरवीगार शेवाळी बेटं. त्या बेटांवर  उर्ध्वमुखी ध्यान लावून स्तब्ध बसलेले समुद्री पक्षी आणि समोर क्षितिजापलीकडे जायची घाई झालेला रक्तवर्णी सूर्य.. एखादं लाईव्ह पेंटिंग बघावं असा नजारा होता.. साधारण साडे सहाला तिथून निघालो. कन्याकुमारीच्या मार्केट मध्ये एके ठिकाणी फार सुंदर शहाळी मिळतात.. तिथे आलो.. तिथून आता मार्केट मध्ये आलोच आहोत तर काहीतरी खरेदी करू या धोरणाने तिथे जरा दुकानांमध्ये घुसलो.. त्या काहीतरी खरेदीची खूप काही खरेदी कधी झाली आमचं आम्हालाच कळलं नाही.. गाडीत सामान टाकलं.. रूम वर आलो.. आणि सगळ्या कॅमेऱ्यांमधला बॅकअप लॅपटॉप वर घेण्याचं महत्वाचं काम सुरू केलं... उद्या आमचा मुख्य दिवस होता.. कारण आम्ही मरुत्वमलै पर्वताच्या शोधात पहाटेच निघणार होतो.. त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या तमिळनाडूच्या घनदाट जंगलात किर्र झाडीत कुठेतरी त्याचं लोकेशन मॅपमधे दिसत होतं.. बॅकअप घेऊन झाल्यावर बेड वर आलो.. हेडफोन्स घालून शांतपणे पुन्हा एकदा श्रीपाद वल्लभ चरित्रामृतातले पाहिले 2 अध्याय ऐकले ज्यात मरुत्वमलैचा उल्लेख होता..आणि उद्या आपण त्याच पर्वतावर जाऊन राहणार हे आठवून अजून भारी वाटलं.. पण निर्जन अरण्यात असलेला तो पर्वत.. शंकर भट्ट 1336 साली ज्या गुहेत राहिले असतील ती गुहा खरंच तिथे सापडेल का? जरी सापडली तरी त्या निर्जन पर्वतावर त्या गुहेत रात्रभर रहाता येईल का? त्या गुहेपर्यंत जायला मुळात वाट असेल का? असे सगळे प्रश्न एक एक करत मनात येत होते.. हा विषय मी संस्कारशी बोललो.. म्हंटलं आलो तर आहोत इथपर्यंत.. जे जे डोक्यात आहे ते तसं व्हावं म्हणजे झालं.. कारण या आधी हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर महावतार बाबाजींच्या गुहेकडे जातानाचा एक वेगळा अनुभव आहे. अचानक ढग भरून येऊन पाऊस सुरू झाला आणि हिमालयातल्या द्रोणागिरीच्या जंगलात आम्ही वाट चुकलो. दरीतल्या जंगलात अडकलेलो असताना एका खडकावरून पाय घसरला आणि दरीत फर्लांगभर खाली फरपटत गेलो होतो..पण एवढं होऊनही आम्हाला ती गुहा सापडली.. आता यावेळी कसा अनुभव येतो याकडेच लक्ष लागून राहिलं होतं..
संस्कार एकदम थंड होता.. त्याला ट्रेकिंगची सवय होती.. हिंजवडीच्या नामांकित आय टी कंपनीत काम करत असूनही त्यानं त्याची ट्रेकिंगची आवड कायमच जोपासली होती.. दर शनिवार रविवारी सह्याद्रीतल्या कुठल्यातरी गडावर संस्कार हमखास सापडेल.. ट्रेकर असल्यामुळे सह्याद्रीत अनेक ठिकाणी अश्याप्रकारे कडे कपाऱ्यामधे तो राहिला होता.. त्यात इंजिनिअरिंगचं डोकं असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आयत्या वेळी काय इंप्रोवायजेशन्स करावी लागतात याचा अनुभव त्याला आधीपासून होता.. सारंग गोसावी म्हणजे आमचा सारंग दादा त्याच्या असीम फौंडेशन या सीमावर्ती भागात काम करणाऱ्या नामांकित एनजीओचा तो खंदा कार्यकर्ता असल्यामुळे काश्मीर खोऱ्यातल्या पहाडी इलाख्यात राहून काम करण्याचाही त्याला अनुभव आहे.. त्यामुळे जे होईल ते आयत्यावेळी टॅकल करता येईल असा विश्वास त्यानं पण दर्शवला.. 
नंतर सहज मनात विचार आला.. ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं ते का आपली इच्छा पूर्ण करणार नाहीत? श्रीपादांच्या संकल्पाशिवाय झाडाचं पानही जर हलत नसेल तर त्यांच्या संकल्पशिवाय आपण इथपर्यंत तरी येऊ शकलो असतो का? त्यामुळे तू इथे आलेला नाहीयेस.. तर त्यांच्या संकल्पानं तुला इथे आणलंय.. मग पुढची काळजी कशाला.. कर्तेपणाचा भाव सोडून समर्पण भावनेनं त्यांना शरण गेलास तर तुझ्या मनातल्या सगळ्या धर्मबद्ध इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प तुझ्या गुरूंचा असतो.
मनाला समजावून फार विचार नं करता आता आम्ही उद्याची बॅग भरायला घेतली.. आसनं, ग्रंथपीठ, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ, सोवळी वस्त्र, उपरणी, मेणबत्त्या, पॉवर बँक, फोन, कॅमेरे, गोप्रो, स्लीपिंग मॅट, टॉर्च , इ-लॅम्प भरून बॅग्ज रेडी झाल्या.. उद्या तिथे रेंज येईल की नाही याची कल्पना नव्हती त्यामुळे घरी आत्ताच फोन करून घेतले.. बेड वर आलो, डोळे मिटले आणि उद्याचा दिवस कसा असेल या विचारातच मनानी तिथे आधीच पोहोचलो मरुत्वमलैच्या पर्वत रांगांमधल्या त्या अतर्क्य अनुभवांचे साक्षीदार व्हायला...

(क्रमशः)
लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu
पुणे
Ph: 9881999034
© ALL RIGHTS RESERVED ©


 ‘दक्षिणतीर्थ’ - भाग - १ -  लेखांक - 4 – (05/01/2023)
लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू

लेखांक -४ -  मरुत्वमलैच्या जंगलात

पहाटे 5 वाजता जाग आली. अंघोळी आटपून बॅग्ज गाडीत टाकल्या.. जीपीएस वर मॅप सेट केला आणि त्या अज्ञात वाटेनं आम्ही निघालो.. नारळाच्या आणि केळीच्या बागांमधून वाट चालली होती.. पर्वताचा पायथा जसा जवळ येत होता तशी भुकेची जाणीव वाढली.. जे काही आहे ते आत्ताच मिळणार होतं.. कारण पुढचं जेवण डायरेक्ट पुढच्या दिवशी मरुत्वमलै उतरून आल्यावर होणार होतं..रस्त्यात एक छोटं घरगुती हॉटेल दिसलं.. आम्ही तिथे थांबलो.. त्या हॉटेलचे मालक बरेच वयस्कर होते.. ते आमच्याशी तमिळमध्ये काहीतरी बोलायला लागले.. अगदी मृदू भाव त्यांच्या त्या बोलण्यातून उमटत आहेत असं आम्हाला जाणवलं.. खरतर सुरवातीला ते काय बोलत आहेत ते काहीच समजत नव्हतं. नंतर आम्ही खाणा खुणा करून इडली, वडा वैगेरे ऑर्डर देण्यात यशस्वी झालो.. त्यांच्या सुनेनं समोर इडल्या, डाळीचे वडे आणि मिरचीच्या भज्या आणून ठेवल्या.. बरोबर चटणी आणि सांबरची पातेलीच आणून ठेवली.. ते आजोबा सतत आमच्याशी काहीतरी बोलत होते.. त्यांना हिंदी किंवा इंग्लिश काहीच परिचयाचं नसावं कदाचित.. त्यांना हेही समजलं होतं की आम्हाला त्यांची भाषा बोलणं तर दूर त्यातला एक शब्दही समजत नाहीये.. तरीही ते बोलतच होते.. त्यांच्या हावभावावरून ते आम्हाला कुठली तरी गोष्ट सांगत आहेत असं जाणवलं.. आम्हाला कोणालाच तिथे कोण काय बोलतंय ते कळत नव्हतं.. पण या हृदयीचे त्या हृदयी हा भाव नक्की येत होता.. आपल्या देशाचा माझा अभिमान आणखीन द्विगुणीत झाला. किती वेगवेगळ्या भाषा, आणि संस्कृती असलेला देश आहे हा.. तरी लोकं गुण्यागोविंदाने राहतात.. एकमेकांची भाषा येत नसताना सुद्धा आदरानं चौकशी करतात.. प्रेमानं जेऊ घालतात.. त्या आजोबांचे बोलताना होणारे हावभाव अगदी बघण्यासारखे होते.. आम्हाला त्यांचा उत्साह मावळू द्यायचा नव्हता.. आम्ही पण हूं हूं करून जणू काही तुम्ही बोलताय ते आम्हाला सगळं समजत आहे अश्या अविर्भावात होतो.. थोड्यावेळाने आम्हाला कळलं की ते मरुत्वमलै पर्वतातल्या गुहेत तपश्चर्या केलेले अध्यात्मिक संत श्री नारायण गुरू यांची गोष्ट आम्हाला सांगत होते.. 
त्यांना काहीच माहीत नव्हतं आम्ही कोण आहोत, कुठून आलो, कुठे चाललोय अगदी काहीच नाही.. तरी त्यांनी आम्हाला त्यांची गोष्ट का सांगावी? आणि हा भाव  त्यांना आमच्याबद्दल असा का उमटावा याचं आम्हाला आश्चर्य वाटत होतं..मग आम्हीच तुटकं मुटकं काहीतरी बोलून मरुत्वमलैला जायला आम्ही महाराष्ट्रातून आलो वैगेरे हे समजावण्यात यशस्वी झालो.. त्यानंतर तर त्यांचा आनंदी चेहरा बघण्यासारखा होता.. अगदी लहान मुला सारखे ते मरुत्वमलैची तामिळ भजनं म्हणू लागले.. 
फारा दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही कोणाचं कोणाला काही कळत नसताना पण एकमेकांशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात घड्याळाकडे लक्ष गेलं..आता जरा उशीर झाला.. आम्ही त्यांना नमस्कार करून निघालो.. जाताना गुगल ऑडिओ ट्रान्सलेटरची मदत घेऊन "तुम्ही जे बोललात ते आम्हाला शब्दांनी जरी कळलं नसलं तरी हृदयापर्यंत पोहोचलं.. तुमची भाषा आणि आवाज फार गोड आहे.. अशी काही वाक्य त्यांना तुटक्या मुटक्या तमिळ मधे वाचून दाखवली तर त्यांना एकदम गहिवरल्या सारखं झालं.. त्यांचे डोळे भरून आले.. परत एकदा त्यांना नमस्कार करून आम्ही बाहेर आलो..
 रात्रभर त्या गुहेत राहायचं असल्यानं रात्री जेवायला कोरडा खाऊ वैगेरे घ्यावा लागणार होता.. पण वायफळ गोष्टी खाणं टाळायचं होतं त्यामुळे काय घ्यावं या विचारात शेजारच्या जनरल स्टोअर मधे गोष्टी न्याहाळत असताना सोन केळीचा भला मोठा घड दिसला.. बास बास.. हेच रात्रीचं जेवण असं म्हणून मी तो घड उचलला.. संस्कारनं पाण्याच्या बाटल्या घेतल्या एका बाटलीत बरोबर आणलेला कोकम आगळ भरून घेतला आणि आम्ही मरुत्वमलैच्या पायथ्याकडे जायला गाडी काढली..नागरकोईलच्या अगस्तीस्वरम तालुक्यात पोत्तीयडी नावाचं छोटं गाव आहे.. तिथून अतिशय निमुळता होत गेलेला रस्ता या पर्वताच्या पायथ्यापाशी जातो.. गाडीत चरीत्रामृताचा पहिला अध्याय ऐकत आम्ही जंगल रस्त्याला लागलो आणि काही अंतर पुढे गेल्यावर फोटोत पाहिल्याप्रमाणे समोरच्या एका पर्वताचा आकार दिसायला लागला.. येस येस येस ... हाच तो पर्वत.. मरुत्वमलै सापडला.. आमच्यासाठी ती युरेका मुमेंट होती. त्या रस्त्याला फॉलो करत करत जिथे मॅप एन्ड झाला तिथे गाडी थांबवली आणि लक्षात आलं की पायथ्याचा रस्ता चुकलाय.. आता तर आजूबाजूला कोणी माणूसही नव्हता.. गाडी लावून त्या जंगलाच्या रस्त्यानं थोडं चालत गेलो तिथे एक मनुष्य दिसला त्यानं खाणा खुणा करत पायथ्याचा रस्ता सांगितला आणि आम्ही साधारण 10 वाजता पायथ्याला येऊन पोहोचलो.. तिथेच कोपरा बघून गाडी पार्क केली आणि बॅग्ज घेऊन आणि कॅमेऱ्याची हत्यारबंदी चढवून चालायला सुरुवात केली.. 
केरळ आणि तामिळनाडू क्षेत्रात अध्यात्म मार्गात बरंच मोठं कार्य असलेले श्री नारायण गुरू यांच्या शिष्य संप्रदायामध्ये हा पर्वत प्रसिद्ध आहे.. पण बाकी या पर्वतावर केरळ, तमिळनाडू भागातले काही हौशी ट्रेकर सोडल्यास फारसं कोणी फिरकत नाही.. नारायण गुरू यांच्या समाधी पर्यंतच्या भागापर्यंत या पर्वतावर रीतसर पायऱ्या आहेत.. तिथून पुढे अवघड वाट चालू होते.. आम्ही एक एक पायरी चढत वर चाललो होतो. जाता जाता मधे श्रीकृष्णाचं प्राचीन मंदिर, मारुती मंदिर अशी काही देवालयं आम्हाला लागली.. नारायण गुरू यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही वरच्या बाजूला असलेल्या परमार्थ लिंगेश्वर नावाच्या एका शिवालया जवळ आलो.. तिथे एक संन्यासी पुजारी होते.. त्यांनी आम्हाला दर्शन दिलं.. तिथून बाहेर पडून वर चढायला सुरुवात करणार तेवढ्यात गुढग्यापर्यंत लुंगी बांधलेला एक अतिशय किडकिडीत मनुष्य पायऱ्या उतरत पळत पळत खाली चालला होता.. डोक्याला टक्कल, अस्ताव्यस्त दाढी असं त्याचं रूप होतं.. अगदी कधी काळची ओळख असल्यासारखा तो आमच्याकडे बघून हसला आणि दोन्ही हात जोडून नमस्कार केला.. आम्ही नमस्कार करून त्या केळ्याच्या घडातली 4 केळी त्यांना दिली.. तर त्याच्या चेहेऱ्यावरचे भारावलेले भाव आणि डोळ्यातला करुणा कटाक्ष बघून आत्ता त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल की काय असं वाटायला लागलं.. हसून नमस्कार करून आम्ही पुढे निघालो.. आता वाट अवघड व्हायला लागली. पुढे एके ठिकाणी आम्ही वाट चुकून वेगळ्या वळणावरून पुढे वर जाऊ लागलो.. तिथे एका मध्यम वयीन संन्यासी यतींची कुटी होती.. ते तिथे साधनेला बसले होते.. त्यांच्या साधनेत व्यत्यय न आणता त्या रस्त्यानं आम्ही पुढे गेलो आणि उजवीकडे दोन कातळाच्या मध्ये एक गुहा दिसली..पुढे जायला रस्ता नव्हता.. पण ती गुहा अतिशय गूढ दिसत होती.. त्या गुहेच्या दरवाज्याजवळ कातळाच्या फटी मधोमध एक झाड उगवलं होतं.. अश्या अनेक गूढ आणि गुप्त गुहा मरुत्वमलैवर आहेत जिथे स्थूल देहधारी आणि सूक्ष्म देहधारी सिद्धयती आपापल्या मितीत साधना करत असतात. आम्हाला लक्षात आलं रस्ता गंडला आहे.. कारण पुढे जायला वाट नव्हती.. आम्ही परत खाली उतरून त्या संन्यासी साधकाच्या कुटी जवळ आलो.. त्यांनी हातानेच आम्हाला मार्ग सांगितला आणि आम्ही पुढे निघालो. एका वळणावर आलो आणि बघितलं तर पुढचा सगळा रस्ता हा मोठमोठ्या खडकातून आणि कातळातुन जात होता.. मान वर केली आणि बघितलं.. ढगांमध्ये हरवलेला प्रचंड मोठा कातळ ज्यात खडक फुटून मधे मधे औषधी वनस्पती आणि मोठ मोठाली झाडं उगवलेली.. ओळख पटली.. तीच द्रोणागिरीची व्हाईब.. तीच झाडं त्याच औषधी वनस्पती आणि कातळाचा पॅटर्न पण अगदी तसाच. हा पर्वत संजीवनी पहाडीचा हिस्सा असल्यामुळे मरुंधु वाझुम मलाई ( ज्याचा अर्थ "औषधी वनस्पतींचे निवासस्थान") या नावानं पण ओळखला जातो..
अगस्ती मुनींचं काही काळासाठी वास्तव्य असलेल्या अगस्तीस्वरम तालुक्यातील पश्चिम घाटाचं हे सगळ्यात दक्षिणेकडचं टोक.. या पर्वताला अय्यावाझी या तमिळ पुराण कथेप्रमाणे पर्वत उच्ची मलाई म्हणून ओळखलं जातं. अशी मान्यता आहे की  हिंदू पौराणिक कथांव्यतिरिक्त, तमिळ उपधर्म किंवा संप्रदाय असलेल्या आय्यावाझी पुराणाप्रमाणे  हा पर्वत त्रिमूर्ती दत्ताच्या तीव्र तपानंतर त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून श्रीमन्नारायण आणि लक्ष्मीच्या पोटी कलियुगात जन्माला आलेला दत्ताचाच  पूर्णावतार अय्या वैकुंदर स्वामी यांच्या जीवनाशी संबंधित आहे. या अवताराचा संबंध विष्णूच्या कल्की अवताराशी जोडला आहे. या पुराणाप्रमाणे कलीच्या समाप्ती साठी कल्की आणि अय्या वैकुंदर यांची संयुक्त भूमिका आहे. यात  कल्कीचं मुख्य कर्तव्य हे कलीचा नायनाट करणे हे आहे तर अय्या वैकुंदरची भूमिका जगात पुनश्च धर्म संस्थापना करणे ही आहे. म्हणून काही धर्मशास्त्रज्ञ या पर्वताला पवित्र मानतात आणि अय्यावाझी पुराणातल्या पवित्र स्थळांपैकी एक मानतात. मूळ तमिळ ग्रंथ अय्यवझी पुराण यामध्ये या अवताराची मोठी रोमांचक कथा आहे..
याच पर्वतावरच्या पिल्लाथाडम गुहेत 1882 साली सलग 8 वर्ष तपस्या करत असताना दक्षिणेतील थोर संत, आणि समाज सुधारक नारायण गुरू यांना आत्मज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी तमिळ आणि मल्याळम भाषिक हिंदू समाजामध्ये जातीयवाद नष्ट करण्यासाठी लोकोद्धारचं काम केलं. एका श्रुती प्रमाणे ज्या पिल्लाथाडम गुहेत त्यांना आत्मज्ञान झालं त्याच गुहेत शंकरभट्टाला व्याघ्रेश्वराचं आणि त्या वृद्ध तपस्वी ऋषींचं दर्शन झालं असावं.. याचं अजून एक कारण म्हणजे या पर्वतामधल्या बऱ्याच गुहा या एक एकट्याच कातळात प्राकृत पद्धतीने कोरल्या गेल्या आहेत.. मात्र पिल्लाथाडम गुहा तीन ते चार कपार गुहांचा समूह आहे.. चरीत्रामृतातल्या उल्लेखाप्रमाणे शंकर भट्ट साऱ्या गुहांच दर्शन घेता घेता तिथल्याच एका गुहेपाशी आला जिथे त्याला एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यामुळे तो या गुहांच्या समूहापाशी आला असावा.. आणि एक एक गुहा न्याहाळत पुढे जात असताना त्याला एका गुहेबाहेर व्याघ्रेश्वरच दर्शन झालं.. हाच वाघ पुढे मनुष्य रुपात अवतरून आकाश मार्गानं निघून गेला हा संदर्भ लक्षात घेता आणि त्याच बरोबरीनं पिल्लाथाडम गुहांची रचना लक्षात घेता या गुहांच्या समोर असलेली कातळातली कपार ही दरीच्या बाजूला उघडते आणि तिथून हिंदी महासागर स्पष्ट दिसतो.. थोडक्यात आकाश मार्गानं येण्या जाण्यासाठी हीच कपार अनुकूल आहे.. 
आज आम्हाला ती गुहा शोधून त्याच गुहेत आजची रात्र राहायचं होतं. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा अक्षरसत्य ग्रंथ आहे.. त्यातील उल्लेखानुसार हनुमान लंकेवरून द्रोणागिरी स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा मोठा भाग इथे कन्याकुमारीत पडला तोच हा मरुत्वमलै आणि आजही इथल्या अनेक गुहांमध्ये सिद्ध पुरुष, यती, महात्मे आणि योगी गुप्त रुपात अगोचर अश्या चतुर्मितीय अवस्थेत सूक्ष्म शरीर धारण करून योगसाधनेमध्ये लीन आहेत.. जे सामान्य माणसाला स्थूल नेत्रांना दिसणार नाहीत कदाचित पण त्यांच्या त्या तपाची स्पंदनं तिथे जाणवल्या शिवाय रहाणार नाहीत.. आणि त्याचा अनुभव आम्हाला मिळावा यासाठी कोणतीतरी एक अनामिक शक्ती आम्हाला तिथे खेचून घेऊन जातीये असा आमचा भाव होता..
आम्ही आत्ता एका मोठ्या खडकावर उभे होतो.. वर मान करून अजून किती राहिलंय याचा अंदाज घेताना तिथून त्या कातळाचं शेवटचं टोक बघण्यासाठी आम्हाला फार कष्ट घ्यावे लागले.. पुढे सगळा रॉकी पॅच होता.. ऊन जाऊन जरा आता ढग दाटून आले होते.. इतका सोसाट्याचा वारा सुटला होता की आमची शरीरं बॅगांसकट हेलकावे खात होती.. या पर्वताच्या रचनेचं तिथल्या खडकांचं नीट निरीक्षण केल्यावर हे नक्की लक्षात येईल की हे इथे बनलेले नक्कीच नाहीत.. म्हणजे नैसर्गिकरित्या तिथेच ते तयार झालेले नाहीत..तर मोठ मोठाले दगड उल्का पिंडांसारखे आकाशातून पडल्यावर कसे एकमेकांवर रचले जातील किंवा मोठे कातळ प्रचंड उंचावरून खाली पडल्यावर जसे उभे राहतील अगदी अशीच रचना त्यांची आहे.. त्यामुळे वरून पडलेला द्रोणागिरीचा तुकडा ही केवळ एक दंतकथा नसावी.. तर वास्तविक तसं घडलेलं असावं यावर विश्वास ठेवायला लावणारी अशी त्या पर्वताची रचना आहे .. खरंतर पर्वत म्हणावा इतका तो मोठाही नाहीये.. जेमतेम दीड सिंहगड एवढं अंतर असेल.. पण तरीही खडकाळ चढण असल्यामुळे ढाल काठीच्या कड्यापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं..
मोठ मोठाल्या शिलांमधून वाट काढत असताना लांब दूरवर त्या कातळांवर लक्ष्मी, सरस्वती, गणपती, नंदी, शिवलिंग अश्या प्रतिमा ठिकठिकाणी कोरलेल्या दिसल्या.. जिथे माणसाला जायला ऍक्सेसही नाही अश्या ठिकाणी कातळात या मुर्त्या कोणी आणि कशा कोरल्या असतील याचं राहून राहून आश्चर्य वाटलं.. त्याच्याच शेजारी पाण्याचं एक कुंड होतं. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाण्याच्या टाक्यासारखं दिसत होतं. ज्यात जिवंत झरे होते.. तिथून थोडं पुढे गेल्यावर डावीकडे दोन खडक मधोमध दुभंगून तयार झालेल्या एका कातळ गुहेत वाकून बघितलं तर तिथे दगडात कोरलेली अगस्ती मुनींची मूर्ती होती.. इथल्या लोकांच्या मान्यतेनुसार अगस्ती मुनींनी काही शे वर्ष या गुहेत साधना केली.. म्हणूनच या तालुक्याला प्राचीन काळापासून अगस्तीस्वरम हे नामाभिधान आहे.        
आता त्या खडकाळ रस्त्यावरून वर चढत आम्ही एका उंच दगडावर येऊन थांबलो समोर बघितलं तर प्रचंड मोठ्या दोन शिळांमध्ये एक घळ तयार झाली होती.. जिथून आत्ताच आम्ही वर आलो.. टॉप अँगलनं कन्याकुमारीतलं ते प्रचंड मोठं जंगल खतरनाक दिसत होतं.. निलगिरी, रबर, फर्न, बांबू, रक्त चंदनाची भली मोठ्ठी झाडं आणि औषधी वनस्पतींचं भांडार असलेलं इथल्या आजूबाजूचा जंगल परिसर वाघांव्यतिरिक्त बायसन, जंगली हत्ती, ब्लॅक पँथर, निलगिरी तहर,सिंह-पुच्छ मकाक, स्लॉथ बेअर अश्या अनेक हिंस्त्र प्राण्यांचं घर आहे.. डोळ्यात ते कमालीचं हिरवं गार दिसणारं निसर्गाचं सौन्दर्य साठवून आम्ही वाऱ्याच्या वेगाला कापत परत वर शिखराकडे जायला निघालो.. शिस्तीत पाय ठेवायला कुठंच नीट जागा नव्हती त्यामुळे न थांबता पट पट पावलं टाकत आम्ही एक एक टप्पा सर करत चाललो होतो.. कारण कातळावरून चढताना जरा अंदाज चुकला आणि तोल गेला तर डायरेक्ट दरी.. हिमालयात द्रोणागिरी चढत असताना आलेल्या अनुभवामुळे आम्ही शहाणे झालो होतो.. बराच वेळ खड्या कातळावर उभी तिरकी पावलं टाकून जीव निघाला होता. अखेर एक एक टप्पा पार करत आम्ही शिखराच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो..तिथे  मोकळी जागा मिळाली त्यामुळे एका मोठ्या खडकावर आम्ही आता जरा निवांत बसलो. इथून समोरचं चित्र स्पष्ट दिसायला लागलं.. जंगलाच्या पलीकडे पुढचा सगळा भाग हा नारळाच्या बागांनी वेढलेला होता.. उजव्या बाजूला दूरवर हजारो पवनचक्क्या आणि या सगळ्याच्या पलीकडे दक्षिण ध्रुवापर्यंत पसरलेला  अथांग हिंदी महासागर आता डोळ्यांना स्पष्ट दिसत होता.. पाय निघत नसला तरी आता जरा घाई करणं गरजेचं होतं.. करण आम्हाला आधी वर शिखरावर असलेल्या हनुमंताचं दर्शन घेऊन त्या ऐतिहासिक गुहेच्या  रस्त्याचा शोध घ्यायचा होता..
(क्रमशः)
लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu
पुणे

Ph: 9881999034

© ALL RIGHTS RESERVED ©







































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...