Wednesday, April 21, 2021

नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा;

 

 

 

 

एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 1

नाशिक मधील त्रिरश्मी पर्वतामध्ये असलेल्या प्रसिद्ध बौद्ध गुंफा बघण्यासाठी मी आता निघालो आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून जरी आजमितीला नाशिक प्रसिद्ध असले तरी ऐतिहासिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा नाशिकचे स्थानमाहात्म्य कोणत्याही प्रकारे कमी लेखता येत नाही. नाशिक शहराचे भौगोलिक स्थानच मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिणेकडे पसरत जाणार्‍या सह्याद्री पर्वताच्या रांगा व पूर्वेकडे पसरणारी सातमाला पर्वतराजी यांच्या कुशीत नाशिक पहुडले आहे असे म्हणता येते. शहराच्या कोणत्याही भागातून आजूबाजूला एक नजर जरी टाकली तरी सभोवती दिसणारा आसमंत काही आगळाच भासतो. कोणत्याही दिशेला बघितले तरी त्या परिसरात दिसणारे अनेक मध्यम उंचीचे डोंगर सुळके एकदम जमिनीतून मधूनच बाहेर आल्यासारखे दिसतात. अशा दिसणार्‍या दोन सुळक्यांमधली जमीन मात्र एकदम सपाट आहे हेही लक्षात येते. या अशा अनेक डोंगर सुळक्यांच्या परिसरात सुद्धा, अगदी विरुद्ध दिशेला असलेले परंतु जुळे भाऊ शोभतील असे दिसणारे व जमिनीतून अचानकच उगवलेले दोन उंच डोंगर सुळके मात्र माझे खास लक्ष वेधून घेतात. यापैकी उत्तरेला असलेला डोंगर सुळका "चांभार टेकडी" या नावाने ओळखला जातो. या टेकडीच्या एका कड्यावर जैन लेणी आहेत तर दक्षिणेकडे असलेला डोंगर सुळका "त्रिरश्मी पर्वत" या नावाने परिचित आहे. तीन सूर्यकिरण असे मोठे आकर्षक नाव धारण करणार्‍या या पर्वताच्या एका बाजूच्या साधारण मध्यावर मी ज्या गुंफा बघण्यासाठी म्हणून निघालो आहे त्या गुंफा आहेत.

16 लाख लोकवस्ती असलेले नाशिक हे आज महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. मुंबई-आग्रा या महत्त्वाच्या राजरस्त्यावर असलेले नाशिकचे स्थान व मुंबई-नाशिक या प्रवासासाठी लागणारा फक्त दोन अडीच तासांचा कालावधी या कारणांमुळे उत्पादन उद्योगाबरोबरच नाशिक मध्ये सेवा उद्योग मोठ्या प्रमाणात आलेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे इथल्या प्रसिद्ध द्राक्षांपासून वाईन बनवणारे उद्योगही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. या किंवा इतर काही कारणांमुळे नाशिकची गणना मात्र आता श्रीमंत शहरांत केली पाहिजे असे दिसते आहे. रस्त्यांवर मधून मधून दिसणारे व ओळीने लावलेल्या असंख्य विद्युतदीपांमुळे लखलखणार्‍या समोरील काचेच्या भिंती दिमाखाने दर्शवणारे बडे बडे मॉल बघून माझी या बाबतीत खात्री पटते आहे. माझ्या आजूबाजूने जाणारा मोटारींचा प्रवाह मेट्रो शहरांइतका दाटी वाटीचा नसला तरी बर्‍यापैकी दाट आहे आणि रस्त्यावर दिसणार्‍या मोटारींमध्ये आलिशान लिमुझिन गाड्याही मोठ्या प्रमाण दिसत आहेत, रस्त्यावरून जात असताना अशा बर्‍याच आलिशान गाड्यांच्या शो रूम्सही मला दिसत आहेत. या सर्व दृष्यांमुळे नाशिकच्या नवश्रीमंतीबद्दल माझी खात्री पटत चालली आहे. असे जरी असले तरी नाशिकची खरी व पूर्वापार चालत आलेली ओळख ही असंख्य धार्मिक स्थळे व देवळे असलेले एक ऐतिहासिक शहर म्हणूनच केली पाहिजे. नाशिक एवढ्या धर्मादाय संस्था बहुदा काशी सोडल्यास दुसरीकडे कोठेही नसाव्यात. हे शहर कमीत कमी दोन हजारांपेक्षा जास्त वर्षे अस्तित्वात असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. भारतातील एक अत्यंत महत्त्वाची नदी 'गोदावरी' नाशिक जवळच उगम पावते. मात्र नाशिक शहरामध्ये मध्ये असलेले या नदीचे स्वरूप उन्हाळ्यात जवळ जवळ कोरडा ठणठणीत पडणारा एक ओढा असेच करावे लागेल.

नाशिकची दोन औद्योगिक उपनगरे आहेत. यापैकी एक उपनगर सातपूर या नावाने ओळखले जाते तर दुसर्‍याला अंबड असे नाव आहे. मी आता या अंबड उपनगरात आलो आहे. मला भेट द्यायची आहे तो 'त्रिरश्मी' पर्वत, या अंबड उपनगराच्या अगदी कडेला उभा आहे. नाशिक कडून मुंबई कडे जाणारा मुंबई-आग्रा रस्ता हा नाशिक शहराची दक्षिण हद्द असे पूर्वी समजले जात असे. मात्र आता नाशिक बरेच आणखी दक्षिणेकडे वाढलेले दिसते आहे. 'त्रिरश्मी' पर्वत या मुंबई-आग्रा रस्त्याला लागूनच दक्षिणेकडे आहे.

या पर्वताच्या पायथ्याजवळचा संपूर्ण भाग नाशिक महानगरपालिकेने मोठ्या विचारपूर्वक विकसित केला असावा असे वाटते आहे. नेहरू उद्यान म्हणून हा भाग आता ओळखला जातो आहे. पर्वतांच्या तळापासून ते मध्य भागापर्यंत गर्द हिरवीगार अशी दाट झाडी दिसते आहे. पर्वताच्या तळाशी एखाद्या बौद्ध स्तूपाचा आकार दिलेले फाळके स्मारक या परिसरात मोठे खुलून दिसते आहे. फाळके स्मारकाशेजारूनच पर्वताकडे जाणारा रस्ता जातो आहे. या रस्त्याच्या कडेला आम्ही गाडी ठेवतो व समोरच दिसणार्‍या पायर्‍या चढण्यास प्रारंभ करतो. पायर्‍या वर चढणे सोपे जावे या विचाराने बनवल्या गेल्या आहेत हे लगेचच लक्षात येते आहे.

घडीव दगडांनी बसलेल्या इथल्या प्रत्येक पायरीची उंची फारशी जास्त नाहीये आणि ती अरुंद न बनवता चांगली पसरट अशी बनवली आहे. या दोन्ही कारणांनी पर्वत चढणे हे एकदम सोपे काम वाटते आहे. पायर्‍या अतिशय घनदाट अशा झाडी खालून जात असल्याने वर तळपणार्‍या सूर्याचा प्रकाश खाली पोहोचतच नाहीये त्यामुळे ही सर्व चढण फारसा थकवा न जाणवता मी पार करू शकतो आहे. एकूण 230 पायर्‍या येथे आहेत. आणि पायर्‍यांचा रस्ता वळणावळणांचा असल्याने थोडा गूढरम्यही भासतो आहे. पायर्‍यांच्या शेवटाला एक लोखंडी गेट व तिकीट ऑफिस दिसते आहे. आत जाण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून तिकीट घ्यावे लागते. परंतु त्याची किंमत अगदीच माफक म्हणजे फक्त 5 रुपये आहे.

गेट मधून आत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूंना म्हणजे माझ्या डाव्या व उजव्या हातांना, या गुंफाचा विस्तार पसरलेला मला दिसतो आहे.
नाशिकच्या त्रिरश्मी पर्वतमधील या एकूण 24 बौद्ध गुंफा साधारणपणे उत्तर किंवा ईशान्येकडे मुख असलेल्या आहेत. क्रमांक 1 ते 20 या गुंफांसमोर एकाच पातळीत असलेले व पूर्व- पश्चिम पसरलेले असे एक प्रांगण आहे व त्या प्रांगणातच मी आता उभा आहे. पहिल्या नजरेतच माझ्या लक्षात येते आहे की पुरातत्त्व विभागाकडून इथल्या गुंफांची देखभाल अतिशय योग्य रितीने केली जात असल्याने जवळपास सर्व गुंफांना भेट देणे शक्य आहे. कार्ले येथील गुंफांशी तुलना केली तर तेथील बर्‍याचशा गुंफांना कुलुपे लावून टाकलेली आहेत व आत जाण्यासाठी योग्य परिस्थितीत असलेले मार्गही राखलेले दिसत नाहीत. अजंठ्याला सुद्धा काहीं गुंफा कुलूप लावलेल्या दिसतात.

इ.स. 629-645 या कालखंडात भारतवर्षाला भेट देणारा चिनी प्रवासी शुएन त्झांग याने आपल्या परतीच्या प्रवासात महाराष्ट्राच्या राजधानी जवळ असलेल्या एका बौद्ध मठाचा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनात केलेला आहे. त्याने आपल्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राच्या राजधानीच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी आजूबाजूचा प्रदेश व इतर स्थळे यांच्या वर्णनावरून तो वर्णन करत असलेली ही राजधानी नाशिकच असली पाहिजे याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही. त्याचप्रमाणे तो वर्णन करत असलेला बौद्ध मठ म्हणजे मी आता उभा आहे तो त्रिरश्मी पर्वतातील बौद्ध मठच असला पाहिजे याची मला खात्री वाटते आहे. महाराष्ट्राच्या राजधानीचे वर्णन करताना शुएन त्झांग म्हणतो:
"(या शहरात) शंभराहून जास्त बौद्ध मठ असून त्यात पाच सहस्त्राहून जास्त भिक्षू रहात असतात. महायान व हिनयान या दोन्ही पंथांचे येथे पालन होते. येथे देवांची शंभर मंदिरे असून त्यात अनेक पंथांचे साधू वास्तव्य करून असतात."

नाशिकला हे वर्णन चपखलपणे लागू होते असे मला वाटते. शुएन त्झांग राजधानीजवळ असलेल्या बौद्ध मठाचे वर्णन या शब्दात करतो:

"(राजधानीच्या) अगदी जवळच, दक्षिणेला, एक बौद्ध मठ असून त्यात बोधिसत्त्वाची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीच्या दैवी सामर्थ्याची कीर्ती दूरवर पसरलेली असून या मूर्तीपाशी गुप्तपणे प्रार्थना केलेल्या अनेकांची मनोकामना पूर्ण झालेली आहे."

शुएन त्झांग या ठिकाणी त्रिरश्मी गुंफांमधील 20 क्रमांकाच्या गुंफेतील 10 फूट उंच बुद्ध मूर्तीकडे निर्देश करतो आहे या बाबत माझ्या मनात तरी शंका नाही.

त्रिरश्मी गुंफांमधील 19 क्रमांकाची गुंफा ही सर्वात प्रथम खोदलेली गुंफा आहे असे मानले जात असल्याने त्या गुंफेला प्रथम भेट द्यावी असे मी ठरवतो. साधारणपणे अशा गुंफा समुहाच्या मध्यवर्ती भागात खोदलेल्या आढळतात. त्याचप्रमाणे ही गुंफा साधारण इतर गुंफांच्या मध्यावरच आहे. ही गुंफा 18 क्रमांकाच्या गुंफेच्या उजव्या बाजूला लागूनच आहे व 20 क्रमांकाच्या गुंफेच्या खाली आहे. मी उभा असलेल्या प्रांगणाच्या साधारण समपातळीतच ही गुंफा आहे. ही गुंफा म्हणजे भिख्खूंसाठी बांधलेला व सर्वात जुना असा एक छोटा विहार आहे. गुंफेचे 3 भाग आहेत. पुढे व्हरांडा त्याच्या मागे हॉल आणि हॉलच्या तीन बाजूंना असलेल्या भिख्खूंच्या सहा कोठड्या असे या विहाराचे स्वरूप आहे. मधला हॉल 14 फूट रूंद, 14 फूट खोल व 8 फूट उंच आहे. हॉलच्या मागे आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी 2 कोठड्या खोदलेल्या आहेत.

प्रत्येक कोठडीच्या प्रवेशद्वारावर घोड्याच्या नालाच्या आकाराची कमान कोरलेली आहे व दोन कमानींच्या मधील भागात 1 फूट रूंद असलेले सांची स्तूप पद्धतीचे बौद्ध रेलिंग कोरलेले आहे. हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे व या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस, पाषाणातच जाळी कोरून दोन गवाक्षे बनवलेली आहेत. व्हरांड्याच्या समोरील बाजूस दोन साधे स्तंभ खोदलेले आहेत. या स्तंभांचा आकार मध्यात अष्टकोनी असून खालच्या व वरच्या बाजूस तो चौरस ठेवलेला आहे. एका स्तंभावर अर्धकमल कोरलेले आहे.

वरील वर्णनावरून हे लगेच लक्षात येऊ शकते की ही गुंफा अगदी साधी व कोणतेही कोरीव काम न केलेले एक भिक्षू निवासस्थान किंवा विहार आहे. तरीसुद्धा ही गुंफा नाशिकच्या गुंफांपैकी एक महत्त्वाची गुंफा म्हणून गणले जाते. याचे कारण म्हणजे उजव्या बाजूला असलेल्या व जाळीचे डिझाईन कोरलेल्या गवाक्षाच्या व्हरांड्याच्या बाजूच्या वरच्या सिलवर असलेला 2 ओळींचा शिलालेख हे आहे.
हा शिलालेख सांगतो की,

"सातवाहन कुलातील कृष्ण राजा असताना नाशिक येथील श्रमण महामात्र याने (हे) लेणे कोरविले."

या शिलालेखाचा अर्थ कसा लावायचा या बाबत तज्ञांत मतभेद असले तरी सेनार्टने लावलेला अर्थ मला तरी जास्त सयुक्तिक वाटतो. या अर्थाप्रमाणे सातवाहन कुलातील कृष्ण राजाच्या कालात श्रमणांसाठी (बौद्ध भिख्खूंसाठी) नाशिक येथे नेमलेल्या ज्येष्ठ धर्माधिकार्‍याने हे लेणे कोरविले असे हा शिलालेख सांगतो.

पुराणांतील वर्णनाप्रमाणे कृष्ण राजा हा सिमुक राजानंतर झालेला दुसरा सातवाहन राजा मानला जातो. या राजाने बौद्ध भिख्खूंसाठी नाशिकमध्ये एका ज्येष्ठ धर्माधिकार्‍याची केलेली नेमणूक ही सम्राट अशोकाच्या राज्यकारभाराच्या पद्धतीतील अशाच प्रकारच्या नेमणूकींसारखी असल्याने असे अनुमान काढता येते की सम्राट अशोकाचा काल व कृष्ण राजाचा काल यामध्ये फारसे अंतर नसावे. यामुळे कृष्ण राजा इ.स.पूर्व 200 च्या सुमारास होऊन गेला असावा असे म्हणता येते.

क्रमश:

 

हा 'कृष्ण' राजा म्हणजे सिमुक सातकर्णीचा धाकटा भाऊ. सिमुकाच्या मृत्युनंतर सिमुखाचा पुत्र पहिला सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने हा गादीवर आला. याचे आणि प्रथम सातकर्णीचे संबंध ठिक नसावेत कारण नाणेघाटातल्या प्रतिमालेखात प्रथम सातकर्णीची पत्नी नागनिका हिने कृष्ण सातवाहनाची प्रतिमा कोरलेली नाही अथवा त्याचा उल्लेखही केलेला नाही याचा अर्थ पहिल्या सातकर्णीला आपले राज्य कृष्णाशी झगडूनच मिळवावे लागले असले पाहिजे.

पुराणांनी जरी सिमुकाला आद्य सातवाहन म्हटलेले असले तरी हल्लीच उपलब्ध झालेल्या पुराव्यांनुसार तो आद्य सातवाहन नाही. सातवाहन कुळाचा प्रमुख 'सातवाहन' नावाचाच राजा होता. 'सातवाहन' असे त्याचे नाव कोरलेली नाणी औरंगाबाद, हैदराबाद, अकोला येथे जमिनीवर आणि नेवासे, कोंडापूर येथे उत्खननात सापडली आहेत. या नाण्यांवर 'रञो सिरी सादवाहनस' असे कोरलेले असून मागील बाजूस उज्जैन चिन्ह कोरलेले आहे. या आद्य सातवाहनापासूनच त्याच्या कुळाला सातवाहनकुल असे म्हटले गेले.

सातवाहन राजांचा थोडाफार इतिहास या मालिकेच्या पुढील भागात देण्याचा मी प्रयत्न करणार आहेच.
अवांतर: वि.वा.मिराशी यांच्या मताने सिमुख व कृष्ण हे राजे अशोकाचा मांडलिक असलेल्या मूळ सातवाहन राजाचे पुत्र नसून त्यांच्यात कही पिढ्यांचे अंतर असावे. तज्ञात मतभिन्नता असल्याने मी या गोष्टीचा उल्लेख माझ्या लेखात केलेला नाही.

वि.वा.मिराशी यांच्या मताने सिमुख व कृष्ण हे राजे अशोकाचा मांडलिक असलेल्या मूळ सातवाहन राजाचे पुत्र नसून त्यांच्यात कही पिढ्यांचे अंतर असावे.

सहमत आहे. सिमुख अतिशय सामर्थ्यवान होता. केवळ सातवाहनाच्या एकाच पिढीत सातवाहन राज्य इतक्या उत्कर्षाला पोचेल आणि त्याचा इतका विस्तार होईल असे वाटत नाही. तेव्हा किमान एक ते दोन पिढ्यांचे अंतर असलेच पाहिजे. अर्थात सातवाहन आणि सिमुख यादरम्यान असलेल्या सातवाहनांच्या पिढ्यांचा कुठलाही उल्लेख पुरातत्विय किंवा पौराणिक पुराव्यांत नाही हे ही खरे.

पुढच्या भागाची वाट पाहातो आहेच.

बाकी ते वि. वा. मिराशी नसून वा. वि. मिराशी -वासुदेव विष्णू मिराशी.

 

एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 2

(मागील भागापासून पुढे)

सातवाहन कुलातील कृष्ण राजाच्या कालात खोदलेल्या 19 क्रमांकाच्या गुंफेला भेट दिल्यानंतर त्या गुंफेच्या बाजूलाच असलेल्या 18 क्रमांकाच्या गुंफेकडे मी आता निघालो आहे. नाशिक येथे असलेल्या या त्रिरश्मी पर्वतातील गुंफांमध्ये, ही 18 क्रमांकाची गुंफा म्हणजे येथे असलेले एकुलते एक उपासना गृह किंवा चैत्य गृह आहे. या गुंफेची वैशिष्ट्ये अभ्यासण्यापूर्वी, सातवाहन इतिहासातील या गुंफेच्या संबंधित काही संदर्भांची उजळणी करणे योग्य ठरेल.
इ.स.पूर्व 200 या कालात राज्यावर असणारा सातवाहन राजा कृष्ण हा या राजघराण्याचा संस्थापक म्हणून मानल्या जाणार्‍या सिमुक (सिमुख, श्रीमुख) या राजाचा बहुदा सख्खा भाऊ असावा असे मानले जाते. मात्र ज्या राजाच्या नावावरून सातवाहन कुल असे नाव या राजघराण्यातील राजांनी धारण केले होते तो सातवाहन राजा, सिमुख व कृष्ण यांचा पिता होता की नाही याबाबत मतभिन्नता आहे. वा.वि. मिराशी यांच्या मताने सातवाहन राजा व सिमुक यांच्यामध्ये 7 किंवा 8 पिढ्या होऊन गेलेल्या असाव्यात. सातवाहन राजाचा काल व त्याचे कृष्ण राजाशी नाते यांचा सध्याच्या विषयाच्या दृष्टीने काहीच संबंध नसल्याने त्याचा विचार न करता कृष्ण राजाच्या पुढील काळाकडे मी वळतो.

पुराणांतील माहितीप्रमाणे, कृष्ण राजानंतर गादीवर आलेला पुढचा सातवाहन राजा म्हणजे पहिला सातकर्णी हा राजा. सुदैवाने या राजाबद्दल विपुल माहिती, मुख्यत्वे, मागच्या वर्षी मी भेट दिलेल्या व जुन्नर जवळ असलेल्या, नाणेघाट येथील गुंफेमधील विस्तृत शिलालेखातून प्राप्त झालेली आहे. मात्र हा सातकर्णी राजा, पुराणे म्हणतात तसा कृष्ण राजाचा पुत्र होता का सिमुक राजाचा पुत्र होता हे सांगणे कठीण आहे. नाणेघाटातील गुंफेच्या मागच्या भिंतीजवळ सातकर्णी राजाच्या कोरलेल्या पुतळ्याच्या उजव्या अंगाला, सिमुकाचा पुतळा कोरलेला होता व कृष्ण राजाच्या नावाची नाणेघाटातील गुंफेत कोठेही नामोनिशाणीही नाही या निरिक्षणांमुळे सातकर्णी राजा, सिमुकाचा पुत्र असण्याची शक्यता मला जास्त योग्य वाटते आहे. तरीही आपण हा नातेसंबंधांचा गोंधळ तूर्त बाजूस ठेवून या गुंफेमधील इतर कोरीव पुतळ्यांकडे प्रथम वळूया. गुंफेच्या मागील भिंतीजवळ एका रांगेत असलेले असे 8 पुतळे येथे कोरलेले होते. यापैकी उजवीकडचे पहिले 4 पुतळे, राजा सिमुक, राजा सातकर्णी, राणी नयनिका व एक सरदार महारथी त्रिनक यारो यांचे होते. वा.वि. मिराशी यांच्या मताने डावीकडचे 4 पुतळे या राजा-राणीच्या भय, वेदिश्री, हकुश्री व सातवाहन या 4 पुत्रांचे किंवा राजकुमारांचे असले पाहिजेत. या पुत्रांपैकी भय व सातवाहन यांचे अकाली निधन झाल्याने प्रथम वेदिश्री ( इतिहास तज्ञ शोभना गोखले याचे नाव स्कंदश्री असे वाचतात.) व नंतर हकुश्री हे दोन राजकुमार, सातवाहनांच्या राजसिंहासनावर आले असले पाहिजेत. मिराशी यांच्या मताने यांच गुंफेत असलेल्या दुसर्‍या एका शिलालेखात या राजा हकुश्रीचा, श्री सती (शक्ती) असा उल्लेख आढळतो. श्री सतस अशी अक्षरे कोरलेली नाणीही सापडलेली आहेत. मिराशी यांच्या मते ही नाणी या हकुश्री राजाने पाडवून घेतलेली असावीत.

नाशिक गुंफांचा विषय सोडून हे नाणेघाटचे वळण मी अचानक घेतले याच्या मागे एक कारण आहे. मी आता भेट देत असलेल्या 18 क्रमांकाच्या चैत्य गृहामधील एका शिलालेखात या हकुश्री राजाचा महाहकुश्री असा उल्लेख केलेला दिसतो. मात्र नाशिक आणि नाणेघाट येथे उल्लेख असलेले हे दोन्ही हकुश्री एकच का निरनिराळे याबाबत इतिहाससंशोधकांमध्ये एकमत दिसत नाही. वा. वि. मिराशी या दोन्ही ठिकाणी उल्लेखलेल्या व्यक्तींना एकच मानतात तर ए.एस.आळतेकर यांच्या मताने या दोन निराळ्या व्यक्ती असल्या पाहिजेत. हा विषय सध्या बाजूला ठेवून आपण चैत्य गृहाकडे वळूया.

अजंठा येथील 10 क्रमांकाचे चैत्य गृह किंवा पितळखोरे येथील चैत्य गृह यांच्याशी असलेले या चैत्य गृहाचे साम्य लगेचच नजरेत भरते व त्यामुळे या तिन्ही गुंफा साधारण एकाच कालात खोदवून घेतलेल्या असाव्यात हे लक्षात येते. नाशिक गुंफाच्या पूर्व-पश्चिम विस्ताराच्या साधारण मध्यावर असलेली ही 18 क्रमांकाची गुंफा, 40 फूट खोल व 21 फूट-6 इंच रूंद आहे. वर छताला खण कोरलेले आहेत आणि अगदी आतील बाजूची खोदाई गोलाकार आहे. मध्यवर्ती उपासनेच्या जागेच्या सभोवती अष्टकोनी स्तंभांच्या सलग ओळी आहेत. दोन्ही बाजूंना 5 व आतील गोलाकार खोदाईसमोर 5 असे एकूण 15 स्तंभ येथे आहेत. दोन्ही बाजूंचे स्तंभ व कडेच्या भिंती यामध्ये साधारण 4 फूट रूंदीचे पॅसेजेस ठेवलेले आहेत. दोन्ही बाजूंचे स्तंभ कसलेही कोरीव काम न केलेले व अष्टकोनी आकाराचे आहेत. स्तंभांच्या पायाच्या बाजूला, पायर्‍या असलेल्या चौरस प्लॅटफॉर्मवर एखादा मातीचा घट ठेवल्यावर जसा आकार दिसेल तसा आकार दिलेला आहे. मात्र आतल्या गोलाईजवळ असणारे 5 स्तंभ अगदी साधे सरळ आहेत. एका बाजूच्या स्तंभांच्या डोक्यावर चौरस आकाराचे कॅपिटल खोदलेले दिसत आहेत. दुसर्‍या बाजूस मात्र कॅपिटल्स दिसत नाहीत. या चैत्य गृहाच्या आतील भागातील अगदी साध्या रचनेमुळे हे चैत्य गृह, कार्ले येथील चैत्य गृहाच्या बर्‍याच आधी व साधारणपणे 19 क्रमांकाच्या व कृष्ण राजाच्या कालातील गुंफेच्या खोदाईच्या काळाच्या जवळपासच खोदले गेले असावे असा अंदाज केला तरी फारसा अयोग्य ठरू नये. गुंफेच्या आतील भागात असलेले स्तंभ अर्थातच मागील बाजूच्या वक्रतेला समांतर अशा वक्रतेवर खोदलेले आहेत. या वक्रतेच्या साधारण मध्यावर व प्रवेशद्वारापासून 26 फूट अंतरावर एक साधा सरळ दिसणारा स्तूप दिसतो आहे. स्तूपाच्या मध्यावर, सांची येथील प्रसिद्ध बौद्ध रेलिंगचे डिझाईन, स्तूपाच्या परिघावर कोरलेले दिसते आहे. स्तूपाच्या माथ्यावर एक चौरस पेटी व त्यावर उलटा ठेवलेला पायर्‍यांचा एक पिरॅमिड खोदलेला/ठेवलेला दिसतो आहे.
उजव्या बाजूला असलेल्या 5 आणि 6 क्रमांकाच्या स्तंभांवर मी वर निर्देश केलेला शिलालेख मला स्पष्ट दिसू शकतो आहे. या शिलालेखातील मजकूर या प्रमाणे आहे. ( मिराशी भाषांतर)


" चलिसिलण येथील राजअमात्य अरहलय याची कन्या, महा हकुश्री याची नात, राज अमात्य व भांडार अधिकारी अगियतनक याची पत्नी आणि कपणणक याची माता असलेल्या भटपालिका हिने त्रिरश्मी पर्वतामधील हे चैत्य गृह पूर्ण केले"

वा.वि. मिराशी यांच्या मताने या गुंफेचा अंतर्भाग इ.स.पूर्व प्रथम शतकाच्या सुरूवातीस खोदला गेला असला पाहिजे. या चैत्य गृहाच्या अंतर्भागातील वास्तूशास्त्रीय रचना या काळास अनुसरूनच वाटते आहे. गुंफेचा अंतर्भाग बघून झाल्याने मी बाहेर येतो. प्रवेशद्वाराच्या आजूबाजूचा भाग अतिशय बारकाईने केलेल्या हिनायन पद्धतीच्या कोरीव कामाने संपूर्णपणे भरून टाकलेला दिसतो आहे. गुंफेच्या मुखाचा हा भाग बघून कार्ले येथील चैत्यगृहाच्या प्रवेशद्वार भिंतीवरील कोरीव काम आठवते आहे. मागच्या शतकातील प्रसिद्ध पुरातत्त्व तज्ञ जॉन मार्शल याच्या मताने या गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळील कोरीव काम नंतर म्हणजे इ.स.पूर्व प्रथम शतकाच्या अखेरीस केलेले असावे. कदाचित या कारणामुळे या गुंफेतील साधा अंतर्भाग व बारीक कोरीव कामाने भरलेला मुखाजवळचा भाग हे एवढे निराळे दिसत असावेत.

प्रवेशद्वाराच्या अगदी वर, घोड्याच्या नालाच्या आकाराची व आधारासाठी 11 तुळया असलेली एक कमान कोरलेली आहे. ही कमान व प्रवेशद्वार या मधील जागेत 4 कमानीदार रेलिंग कोरलेली आहेत. कमान व 4 रेलिंग्ज या मधील जागांच्यात अनेक प्राणी, फुले, मोर व मानवी आकृती कोरलेले आहेत. प्रवेश्द्वाराच्या बाजूचे दोन्ही स्तंभ याच प्रमाणे बारीक नक्षीकामाने सजवलेले आहेत. प्रवेश्द्वाराच्या उजव्या बाजूस एक बास रिलिफ पद्धतीने कोरलेली यक्षाची आकृती आहे. यक्षाने आपल्या उजव्या हातात देठासकट असलेले एक कमल पुष्प धरलेले आहे तर डाव्या हाताने कंबरेला असलेल्या शेल्याचे टोक पकडले आहे. कदाचित या हातात त्याने एखादा खंजिर घेतला असण्याचीही शक्यता वाटते. यक्षाची केशरचना सातवाहन कालातील दिसते आहे. त्याने कानात मोठी जाड कर्णभूषणे व मनगटावर कंगण घातलेले आहेत. त्याने कंबरेला झोकदार गाठ मरलेला शेला बांधलेला दिसतो आहे. या यक्ष आकृतीकडे बघताना मला पितळखोरे गुंफेमधील द्वारपाल असलेल्या यक्ष आकृतीची आठवण होते आहे कारण या दोन्ही लेण्यांमधील यक्ष आकृत्यात मला विलक्षण साम्य भासते आहे. द्वाराच्या दाव्या बाजूकडील स्तंभ व त्यापलीकडे असलेली यक्षाची आकृती या दोन्ही नष्ट झालेल्या आहेत.

प्रवेशद्वारावरील कमानीच्या वरच्या बाजूस अंदाजे 9 फूट ऊंच, 10 फूट रूंद व 4 फूट खोल असलेली एक घोड्याच्या नालाच्या आकाराची भव्य कमान खोदलेली आहे. या कमानीच्या दोन्ही अंगांना असलेला गुंफेच्या मुखपृष्ठाचा भाग याच प्रकारच्या छोट्या कमानी, बास रिलिफ पद्धतीने कोरलेले स्तंभ, स्तूप, बेर्म कमानी व बौद्ध रेलिंग डिझाईन हे सर्व कोरून भरून टाकलेला आहे. कोरलेल्या स्तंभांवर कॅपिटल्स दाखवलेले असून त्यावर प्राण्यांची चित्रेही कोरलेली आहेत. या सर्व कोरीव कामाने गुंफेचे प्रवेशद्वार अतिशय प्रभावी व उठावदार दिसते आहे.

गुंफेच्या या समोरील भागावर दोन शिलालेख आहेत. या शिलालेखातील मजकूरामुळे जॉन मार्शल यांच्या मताला मोठा आधार मिळतो. यापैकी पहिला शिलालेख प्रवेशद्वारावरील कमानीला लागून खालच्या बाजूस आहे. या शिलालेखात असलेला मजकूर या प्रमाणे आहे.

" नाशिकवासियांनी दिलेली दंभिक या ग्रामाची देणगी"

या शिलालेखाचा अर्थ बहुदा नाशिक येथील रहिवाशांनी ही गुंफा पूर्ण करून तिच्या देखभालीसाठी दंभक नावाचे ग्राम या मठातील भिख्खूंना दिले असा असावा. दुसरा शिलालेख अर्धवट वाचता येतो आहे व तो यक्ष आकृतीच्या साधारण 6 फूट उजवीकडे असलेल्या मोल्डिंगवर आहे.

" मधे असलेले रेलिंग आणि यक्ष .......... आणि नंदश्री यांनी बनवले."

या दोन्ही शिलालेखावरून गुंफेचा मुखाजवळील भाग नंतरच्या कालात पूर्ण केला गेला असावा हे स्पष्ट होते आहे.

पुढच्या गुंफेकडे मी जाणार तेवढ्यात समोर दिसत असलेल्या कमानीच्या अवतीभवती असलेल्या आणखी काही बास रिलिफ शिल्पांकडे माझे लक्ष जते. कमानीच्या दोन्ही बाजूंना फणा काढून उभे असलेल्या नागांची चित्रे कोरलेली दिसत आहेत. त्याचप्रमाणे कमानीच्या अगदी वरच्या टोकाजवळ दोन्ही अंगांना घोड्याच्या नालाच्या आकाराच्याच पण छोट्या आकाराच्या दोन दोन कमानी कोरलेल्या मला दिसत आहेत. जरा निरखून बघितल्यावर मधल्या विशाल कमानीच्या दोन्ही बाजूंना उड्डाण करत असलेल्या परंतु जरा विचित्र दिसणार्‍या यक्षिणी किंवा किन्नरांच्या आकृत्या मला दिसत आहेत. कमानीच्या उजव्या बाजूला असलेल्या आकृतीचा वरचा भाग हातात एक तबक घेतलेली मानवी आकृती असली तरी त्या आकृतीच्या शरीराचा खालचा भाग मोराचा आहे. डाव्या बाजूच्या आकृतीचा वरचा भाग तसाच हातात तबक घेतलेल्या मानवी शरीराचा आहे पण खालचा भाग मात्र एखाद्या माशाच्या शरीराचा दाखवलेला आहे. या अर्धवट मानवी आकृतींच्या पलीकडे मला आणखी काही मानवी आकृती दिसत आहेत. उजव्या बाजूस एक पुरुष व त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या दोन स्त्रिया असे बास रिलिफ पद्धतीचे शिल्प दिसते आहे. सातवाहन काळातील केशरचना असलेल्या मधल्या पुरुषाच्या बाजूच्या स्त्रिया बहुदा त्याच्या बायका असाव्यात व त्यांचे भांडण तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. उजव्या बाजूच्या स्त्रीने बहुदा साडीसारखे वस्त्र परिधान केले आहे तर डावीकडील स्त्रीने घागरा किंवा तत्सम वस्त्र परिधान केलेले असावे. पुरुष धोतर नेसलेला आहे. आणखी उजव्या बाजूला खांद्यावर घट घेतलेली आणखी एक स्त्री अस्पष्ट दिसते आहे. मधल्या कमानीच्या डाव्या बाजूस मात्र घट घेतलेल्या स्त्रीच्या शिल्पाशेजारी फक्त एका स्त्री पुरुष जोडपे कोरलेले आहे. ते सुद्धा एकमेकाशी भांडताना बहुदा दाखवलेले आहेत.
या एवढ्या वर व नीट दिसू शकणार्‍या जागी ही छोटी बास रिलिफ शिल्पे कोरण्याचे प्रयोजन काय असावे? असा विचार करूनही मला ते समजू शकत नाहीये. स्त्रिया असल्या की भांडणे होणारच! मग ती एक असो वा दोन! असे शिल्पकाराला सुचवायचे आहे की काय, कोणास ठाऊक!

क्रमश: 

 

नाशिकमधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 3

(मागील भागावरून पुढे)

18 क्रमांकाच्या चैत्यगृहाला भेट दिल्यानंतर मी या चैत्यगृहाच्या पश्चिम दिशेला साधारण 50 ते 60 मीटर अंतरावर असलेल्या त्रिरश्मी पर्वतावरील आणखी एका महत्त्वाच्या गुंफेकडे चालत जातो आहे. 10 क्रमांकाची ही गुंफा नहापान राजाची गुंफा या नावानेही ओळखली जाते. इ.स.पूर्व 26च्या सुमारास उत्तर हिंदुस्थानमध्ये राज्य करत असलेल्या शुंग व कण्व राजवटींचा अस्त झाल्यानंतर अफगाणिस्तानातून आलेल्या शक (Scythians) टोळ्यांनी राज्य बळकावले होते. नहापान हा राजा स्वताला राजा न म्हणवून घेता प्रथम या शक राजांचा व त्यांना पदच्युत करून नंतर गादीवर आलेल्या कुशाण राजांचा क्षत्रप (Satrap) म्हणवून घेत असे. पुणे व नाशिक हे महाराष्ट्रातील जिल्हे या नहापान राजाच्या अंमलाखाली इ.स.नंतरच्या पहिल्या व दुसर्‍या शतकात (55 CE to 102CE) होते. या कारणामुळे मी टाकत असलेल्या या साठ किंवा सत्तर पावलांत मी अंदाजे 100 ते 150 वर्षांचा कालावधी ओलांडतो आहे असे म्हणता येईल.

मी मागे भेट दिलेल्या आणि वर्णन केलेल्या कार्ले येथील गुंफांमधील एका शिलालेखात या नहापान राजाचे नाव असल्याचा मी उल्लेख केला होता हे काही वाचकांना कदाचित स्मरत असेल. नहापान राजाने सातवाहन राजांचा युद्धात पराभव करून त्यांचे माळवा, दक्षिण गुजरात, कोकण व उत्तर महाराष्ट्र हे भाग युद्धात जिंकून घेतले होते. या नहापान राजाच्या दक्षमित्रा या कन्येचा, भारतीय नाव असलेल्या परंतु शक जमातीचाच असलेल्या, ऋषभदत्त याचे बरोबर विवाह झालेला होता. या ऋषभदत्ताला नहापान राजाने दक्षिण गुजरात, सोपारा ते भडोच हा उत्तर कोकणाचा भाग व नाशिक व पुणे या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा सुभेदार (viceroy) म्हणून नेमलेले होते. कार्ले, नाशिक व कान्हेरी येथील लेण्यांमध्ये या ऋषभदत्ताने आपण कसा दानधर्म केला आहे व आपण कसे उदार आहोत हे सांगणारे बरेच शिलालेख खोदून घेतलेले सापडतात. आपण कसे कृपाळू व दयावंत राज्यकर्ते आहोत हे येथील प्रजेला नीट समजावे व त्यांची खात्री पटावी म्हणून त्याने हेतूपूर्वक केलेले बरेच प्रयत्न या गुंफात लक्षात येतात. नाशिक मधील या 10 क्रमांकाच्या गुंफेमध्ये सुद्धा त्याने व त्याच्या कुटुंबियांनी खोदवून घेतलेले असेच काही शिलालेख आहेत.

10 क्रमांकाची गुंफा भिख्खूंच्या वास्तव्यासाठी म्हणून खोदलेला असाच एक भव्य विहार आहे. ही गुंफा 3 कक्षांची मिळून खोदलेली आहे. बाहेरील प्रांगणातून प्रवेश घेता येणारा एक व्हरांडा, त्याच्या मागे हॉल आणि हॉलच्या बाजूंना भिख्खूंसाठी 16 कोठड्या अशी या गुंफेतील रचना आहे. या हॉलमध्ये मी आता प्रवेश करतो आहे. हा हॉल 45-1/2 फूट खोल, 40 फूट रूंद आणि 10 फूट उंचीला आहे. हॉलच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये भिख्खूंसाठी खोदलेल्या प्रत्येकी 5 कोठड्या आहेत तर मागच्या भिंतीत 6 कोठड्या आहेत. मागच्या भिंतीत खोदलेल्या या कोठड्यांच्या प्रवेशद्वारापैकी क्रमांक 3 चे प्रवेशद्वार व क्रमांक 4 चे प्रवेशद्वार यामध्ये जरा विचित्र दिसणारे एक लो रिलिफ प्रकारचे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पाच्या वरच्या भागात हिनयान पंथाच्या शिल्पांमध्ये दाखवतात त्या पद्धतीच्या स्तूपाचा वरचा भाग कोरलेला आहे. त्याच्या डोक्यावर अस्थी-अवशेष कोश व त्यावर उलटा ठेवलेला पायर्‍या पायर्‍यांचा एक पिरॅमिड दाखवलेला आहे. या पिरॅमिडच्या वरच्या अंगाला असलेल्या सर्वात मोठ्या पायरीच्या कडांवर हिनयान कालातील घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानी कोरलेल्या दाखवलेल्या आहेत. यावर एक छत्री कोरलेली आहे तसेच स्तूपाच्या दोन्ही बाजूंना आणखी दोन छत्र्या व दोन बौद्ध पद्धतीची निशाणे कोरलेली आहेत.

मात्र स्तूपाच्या खालच्या अंगाचे सर्व शिल्पकाम तोडून टाकून त्या जागी एक मानवी आकृती कोरलेली दिसते आहे. या मानवी आकृतीकडे बघत असताना मला स्मरण होते की गुंफेत प्रवेश करताना गुंफेच्या उजव्या बाजूस समोरील प्रांगणाकडे तोंड करून उभी असलेली मूर्ती व ही मूर्ती यात काहितरी साम्य दिसते आहे. आत असलेल्या या आकृतीचा चेहरा नष्ट झालेला असला तरी तिच्या डाव्या हातात असलेला सोटा किंवा गदा व उजव्या हातात असलेला खंजीर मात्र स्पष्टपणे दिसू शकतो आहे. या मूर्तीच्या मागेची 5 फणा असलेला नाग बहुदा कोरलेला असावा असे भिंतीवरील खुणांवरून वाटते आहे. या सर्पाच्या शरीराचा मागचा भाग या आकृतीच्या घोट्यांजवळ स्पष्टपणे दाखवलेला दिसतो आहे.

मात्र बाहेरील बाजूस असलेली आकृती व ही आकृती यात एक मोठा फरक लक्षात येण्यासारखा आहे. बाहेरील आकृती सरळ व ताठ उभ्या असलेल्या एखाद्या रक्षकाची वाटते आहे तर ही आकृती उजव्या बाजूला थोडीफार कललेली वाटते आहे. बर्‍याच पुढच्या कालात कोणीतरी स्तूपाचे शिल्प नष्ट करून तेथे ही मानवी आकृती खोदण्याचा प्रयास केलेला आहे हे स्पष्टपणे कळते आहे. ही मानवी आकृती नंतरच्या कालातील आहे हे लक्षात आल्याने मी दोन्ही बाजूंना असलेल्या व मूळ स्तूप शिल्पाबरोबरच म्हणजे इ.स. पहिल्या शताब्दीच्या उत्तरार्धात कोरलेल्या दोन स्त्रियांच्या शिल्पांकडे लक्ष केंद्रीत करतो.

शिल्पातील दोन्ही बाजूंच्या स्त्रिया मोठ्या सुदृढ अंगकाठीच्या दाखवलेल्या आहेत. उजव्या बाजूकडील स्त्रीने आपले हात डोक्यावर ऊंच करून जोडलेले आहेत व ती स्त्री आपले मस्तक थोडे डावीकडे कलवून शेजारील स्तूपाला नमस्कार करताना दाखवली आहे. तिच्या मस्तकावरील केश खांद्यापर्यंत येतील एवढ्या लांबीचे कापलेले आहेत आणि मस्तक डावीकडे कलल्यामुळे केसांच्या बटा डावीकडून पुढे आलेल्या आहेत. तिने घागर्‍यासारखे एक वस्त्र परिधान केलेले असून त्याच्या पुढच्या बाजूस बरेच भरतकाम केलेला व छोटे गोंडे लावलेला एक शेला कंबरेस बांधलेला आहे. अंगात तिने चोळी समान वस्त्र परिधान केलेले असून हातात बांगड्या व पायात कडी आहेत. उजव्या बाजूची स्त्री बहुदा चवरी धारक असावी मात्र आता ती चवरी दिसू शकत नाहीये. तिने ऊंच दिसणारी केशरचना तरी केलेली आहे किंवा तिने डोक्यावर एक घट धारण केलेला आहे. चेहर्‍याच्या दोन्ही बाजूंना खांद्यापर्यंत येणार्‍या केसांच्या बटा दिसत आहेत. तिच्या अंगातही घागरा-चोळी व कंबरेला शेला अशीच वस्त्रे आहेत. तिचा डावा हात मात्र तसाच लोंबकळत खाली सोडलेला दर्शवलेला आहे. या दोन्ही शिल्पांवरून त्या कालातील व या भागातील सर्वसाधारण स्त्रिया कशा दिसत असतील? काय प्रकारची वस्त्रे व आभूषणे परिधान करत असतील? याची एक सर्वसाधारण कल्पना येऊ शकते.

हॉलमधून बाहेर पडून मी आता बाहेरच्या व्हरांड्यात आलो आहे. व्हरांड्यातून हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी असलेले प्रवेशद्वार अंदाजे 6 फूट रूंद व 10 फूट तरी ऊंच आहे. बाजूची दोन्ही दारे 3 फूट रूंद व 8 फूट ऊंच आहेत. मधले द्वार व बाजूची द्वारे यात दोन गवाक्षे आहेत. द्वारे व गवाक्षे यांच्या सील्सवर किंवा बाजूंना काहीच नक्षीकाम वगैरे कोरलेले नसून ती सर्व अगदी साधी आहेत. व्हरांडा अंदाजे 35 फूट रूंद व 9 फूट खोल असा आहे. मात्र त्याचे छत हॉलपेक्षा जास्त ऊंच दिसते आहे. व्हरांड्याच्या दोन्ही टोकांना भिख्खूंच्या कोठड्या आहेत. व्हरांड्याच्या पुढच्या बाजूस 6 स्तंभ आहेत. त्यापैकी 2 कडेचे खांब बाजूच्या भिंतींना जोडलेले असल्याने पिलॅस्टर सारखेच वाटत आहेत. सर्व स्तंभांचे डिझाइन, 18 क्रमांकाच्या गुंफेत असलेल्या सातवाहन कालातील, म्हणजे तळाच्या बाजूस पायर्‍या-पायर्‍यांच्या एका चौकोनी पिरॅमिड्वर ठेवलेला घट अशा आकाराचे आहे. स्तंभ अष्टकोनी असून वर परत उलटा ठेवलेल्या घटाचा आकार दिलेला आहे.

या उलट्या ठेवलेल्या घटाच्या वरच्या बाजूस असलेले डिझाइन फारच सुंदर व रोचक दिसते आहे व कार्ले चैत्य गृहामधील स्तंभांची आठवण करून देणारे आहे. उलट्या घटावर, प्रत्येक बाजूला एक आयताकृती गवाक्ष असलेली एक चौरस आकाराची पेटी ठेवलेली आहे. या पेटीच्या बाजूंना बौद्ध रेलिंगचे कोरीव काम आहे. या पेटीच्या आत एखाद्या कंगणासारखी दिसणारी एक गोल बांगडी कोरलेली आहे. या कंगणाच्या परिघावर खाचा-खाचांचे डिझाइन आहे. या चौकोनी पेटीच्या वरच्या बाजूस एक उलटा ठेवलेला पायर्‍या पायर्‍यांचा चौकोनी पिरॅमिड कोरलेला असून या पिरॅमिदचा वरचा भाग व छत या मधील जागेत एकामेकाकडे पाठ करून बसलेल्या प्राण्यांच्या 2 जोड्या कोरलेल्या आहेत. या पैकी काही प्राणी कल्पनेतील दिसत आहेत. एक जोडी व्हरांड्याच्या बाजूने तर एक बाहेरील प्रांगणातून दिसू शकते. व्हरांड्याच्या बाजूने दिसणारे व खर्‍या प्राण्यांसारखे असणारे प्राणी म्हणजे वाघ व बोकड हे आहेत. एका स्तंभावर स्फिंक्सची जोडी आहे तर दुसर्‍या खांबावर वाघाचे शरीर, हरिणासारखे कान व पोपटाची चोच असलेला एक काल्पनिक प्राणी आहे. प्रांगणातून दिसणार्‍या प्राण्यांच्या जोड्यात सिंह, वृषभ व हत्ती आहेत. या सर्व प्राण्यांच्यावर एक किंवा दोन स्वार बसलेले दाखवलेले आहेत. व्हरांड्याच्या उजव्या बाजूस आधी निर्देश केल्याप्रमाणे एका रक्षकाची मानवी आकृती कोरलेली आहे. या आकृतीचे हॉलमधील लो रिलिफ आकृतीशी बरेच साम्य दिसते आहे. मात्र ही आकृती आतील आकृतीप्रमाणेच बर्‍याच नंतरच्या काळात कोरलेली वाटते आहे.

या गुंफेत सर्व मिळून 6 शिलालेख आहेत. यापैकी 3 शिलालेख हे क्षत्रप नहापान राजाचा जावई ऋषभदत्त याने मठाला दिलेल्या देणगी संबंधी असून यात ऋषभदत्त याने कोणकोणत्या धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या आणि कोणती धर्मिक कृत्ये पार पाडली याचे विस्तृत विवरण दिलेले आहे. लघू स्वरूपातील 2 शिलालेखात ऋषभदत्त याची पत्नी दक्षमित्रा हिने मठाला दिलेल्या देणग्यांचा उल्लेख केलेला आहे. ऋषभदत्त याचे शिलालेख तोच तोच मजकूर सांगणारे असल्याने एका शिलालेखाचा मिराशी यांनी केलेला अनुवाद मी खाली देत आहे.

rushabhadatt inscription

हा शिलालेख वाचल्यावर ऋषभदत्त आपली उदारता व क्षमता या बाबत लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो आहे असे माझे तरी मत झाले. त्याच्या पत्नीचे शिलालेख याच्या अगदी उलट म्हणजे मुद्यास धरून व संक्षिप्त आहेत. कदाचित प्रत्यक्ष क्षत्रपाची कन्या असल्याने आपले महत्त्व कोणाला सांगण्याची गरज तिला भासली नसावी. तिचा शिलालेख सांगतो.
dakshamitras inscription

10 क्रमांकाच्या गुंफेला भेट दिल्यावर माझी पावले आता नाशिक गुंफांमधील सर्वात महत्त्वाची गुंफा म्हणून मानल्या जाणार्‍या 3 क्रमांकाच्या गुंफेकडे वळली आहेत. ही गुंफा बघण्यासाठी मी मुख्यत्वे नाशिकला आलो आहे.

क्रमश: 

बाकी तो नहपान विहारातला पक्ष्याची चोच असलेला प्राणी म्हणजे ग्रीक दंतकथांमधला 'ग्रिफिन' हा होय. तर सिंहाची जी शिल्पे आहेत ती म्हणजे ग्रीक दंतकथांमधलीच 'नेमियन लायन' यांची असावी.

ग्रीक मिथकांतील ह्या शिल्पांवरून ह्या विहाराच्या बांधकामात ग्रीक शिल्पकारांचा मोठा सहभाग असावा असे वाटते.

 

ग्रिफिन

नाशिक लेण्यांतच लेणी क्र. २३ (किंवा २४) मध्ये बुद्धमूर्तीच्या पायाजवळ एक लहानसे घुबडाचे शिल्प कोरलेले आहे.
ग्रीक उपदेवता अथेनाचे ते शिल्प.

 नहापना (?) चा पराभव केल्यानंतर गौतमीपुत्र शालिवाहनाने आपला शक जाहीर केला (इ.स. ७८ साली) असे वाचले होते.
 शालिवाहन शक हा गौतमीपुत्र याने चालू केला ही सर्वसाधारण समजूत चुकीची आहे. या बद्दलची माहिती माझ्या लेखमालेच्या पुढील भागात वाचता येईल.
या लेण्यांना पांडव लेणी हे नाव कोणी व का दिलेआहे याचे कोडे मलाही तुमच्या प्रमाणेच आहे. बॉम्बे गॅझेटियर नध्ये दिलेला खुलासा मला त्यातल्या त्यात ग्राह्य वाटतो. गुंफा क्रंमाक 23 मध्ये बर्‍याच बुद्ध मूर्ती आहेत. या मूर्ती पांडवांच्या असाव्यात अशा समजूतीने बहुदा हे नाव पडले असावे असे गॅझेटियर म्हणतो. 

एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 4

(मागील भागावरून पुढे)

नहापनाच्या गुंफेला भेट दिल्यानंतर मी नाशिक मधील या त्रिरश्मी पर्वतावरील सर्वात महत्त्वाची गुंफा म्हणून समजल्या जाणार्‍या 3 क्रमांकाच्या गुंफेकडे निघालो आहे. ही गुंफा, गौतमीपुत्र सातकर्णी राजाची गुंफा या नावानेही ओळखली जाते. संपूर्ण सातवाहन राजघराण्यातील राजांमध्ये, गौतमीपुत्र हा राजा, सर्वश्रेष्ठ म्हणून मानला जातो. याच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत सातवाहन साम्राज्य उत्कर्षाच्या टोकाला जाऊन पोचले होते असे म्हणता येते. शक (Scythian) क्षत्रप नहापन याने आधीच्या काळात सातवाहनांकडून जिंकून घेतलेला सर्व प्रदेश गौतमीपुत्राने परत जिंकून तर घेतलाच परंतु याशिवाय त्याने आपले साम्राज्य उत्तरेला असलेल्या माळवा प्रांताच्या पलीकडेही वाढवले होते. महाराष्ट्रात गौतमीपुत्र हा राजा शालिवाहन या नावाने ओळखला जातो व महाराष्ट्रावर राज्य करणारा प्राचीन काळातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानला जातो. कोणा एका शक (Scythian) राजाच्या नावाने इ.स.78 मध्ये चालू झालेल्या सनाला, इ.स. 1300 च्या आसपास, शालिवाहन शके असे नाव कोणीतरी व कोणत्यातरी कारणासाठी दिले गेले व आजतागायत हा सन याच नावाने आपल्याला परिचित आहे. मात्र या सनाशी गौतमीपुत्र किंवा शालिवाहन राजाचा संबंध नाही असे इतिहासकार डॉ. ए.एस.आळतेकर म्हणतात व ते योग्य वाटते.

गौतमीपुत्र इ.स.86 मध्ये सिंहासनावर आरूढ झाला. त्या वेळेस त्याचे राज्य अपकर्षाच्या न्यूनतम पातळीवर पोचले होते. क्षत्रप नहापनने सातवाहन साम्राज्याचे अनेक प्रांत जिंकून तेथे आपले स्थान मजबूत केलेले होते. पूर्वेकडून कुषाण राजा कनिष्क सातवाहन साम्राज्याचे लचके तोडण्याच्या प्रयत्नात होता. इ.स. 101 किंवा त्याच्या कारकिर्दीच्या काळात गौतमीपुत्राने आधी गमावलेले आपल्या राज्याचे सर्व प्रांत तर परत मिळवलेच पण त्या शिवाय नहापनाच्या मालकीच्या प्रांतात मोहिमा काढून त्याने काठेवाड व कुकुरा ( आग्नेय राजस्थान) हे प्रांतही जिंकून आपल्या साम्राज्याला जोडले. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीतच सातवाहन साम्राज्याची कीर्ती संपूर्ण भारतवर्षात प्रथम पसरली.

या प्राचीन काळातील ऐतिहासिक बारकाव्यांवरून हे स्पष्ट होते की त्रिरश्मी पर्वतावरील गुंफा क्रमांक 3 ही साधारण, कार्ले येथील लेण्यामधील मुख्य चैत्यगृह खोदले गेले, त्याच सुमारास खोदली गेली असली पाहिजे. या दोन्ही गुंफामधील मुलभूत स्थापत्यामध्ये बरेच साम्य असल्यासारखे मला वाटते आहे. या गुंफेचा व्हरांडा व समोरचे प्रांगण हा समोरील भाग मात्र अतिशय उठावदार व बराचसा मी आधी वर्णन केलेल्या नहापनाच्या गुंफेसारखाच आहे. ही गुंफा, हॉल, त्याच्या तिन्ही बाजूस असलेल्या भिख्खूंच्या 18 कोठड्या व समोरील व्हरांडा अशा 3 भागात आहे. हॉल 45 फूट खोल, 41 फूट रूंद व साडेदहा फूट ऊंच आहे. या हॉलच्या मागील भिंतीच्या मागे 6 कोठड्या खोदलेल्या आहेत तर उजव्या भिंतीत 7 व डाव्या भिंतीत 6 कोठड्या खोदलेल्या आहेत. मागील भिंतीत असलेल्या तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकांच्या कोठड्यांच्या दारांमध्ये असलेल्या भिंतीवर एक स्तूपाचे बास रिलिफ कोरलेले आहे. आतापर्यंत मी बघितलेल्या इतर सर्व गुंफांच्या मानाने ही गुंफा कोरीवकाम करून बरीच सजवलेली दिसते आहे. या कोरीवकामामुळे सुद्धा, ही गुंफा आधी बघितलेल्या गुंफांच्या मानाने नंतरच्या कालातील असल्याची खात्री पटू शकते.

हॉलच्या मागील भिंतीवर कोरलेला स्तूप हा 10 क्रमांकाच्या गुंफेतील हॉलच्या मागील भिंतीवर असलेल्या परंतु नंतर बर्‍याच अंशी नष्ट केला गेलेल्या स्तूपाप्रमाणेच दिसतो आहे. या स्तूपाच्या डोक्यावर दुहेरी छत्री कोरलेली आहे तर बाजूच्या दोन छत्र्या कमल पुष्पांच्या देठाच्या आधारावर उभ्या आहेत. या बाजूंच्या छत्र्यांच्या जरा खाली 2 गंधर्व आकाशात विहार करताना दाखवलेले आहेत.

उजव्या बाजूचा गंधर्व दोन्ही हातात पुष्पमाला घेतलेला दाखवला आहे तर डाव्या बाजूचा गंधर्व डाव्या हातात फुलांची परडी घेऊन उजव्या हाताने स्तूपावर पुष्पवृष्टी करताना दर्शवलेला आहे. उजव्या बाजूच्या गंधर्वाने सातवाहन कालातील सर्वसामान्य केशरचनेप्रमाणे कपाळाच्या जरा वर असा केसाचा बुचडा बांधलेला आहे तर डाव्या बाजूच्या गंधर्वाच्या डोक्यावर, ग्रीक शिल्पात दिसतात तसे कुरळे केस दाखवलेले आहेत. दोन्ही गंधवांच्या कानात लांब कर्णभूषणे व मनगटावर कडी आहेत. उजव्या बाजूच्या गंधर्वाच्या खाली एक सिंहमूर्ती कोरलेली असून डाव्या गंधर्वाच्या खाली धर्मचक्र कोरलेले आहे. सिंह मूर्तीच्या खाली सुदृढ अंगकाठीची एक स्त्री आपले डावे पाऊल उजवीकडे व उजवे डावीकडे अशा मोठ्या विचित्र पोझमध्ये उभी असून स्तूपाला नमस्कार करताना कोरलेली आहे. तिच्या घोट्याजवळ पायात 2 कडी आहेत व कानात लांब कर्णभूषणे आहेत. कंबरेला तिने समोर गाठ मारलेला शेला बांधलेला आहे. या शिवाय तिच्या अंगावर काय वस्त्रे किंवा आभूषणे असल्याचे दाखवले आहे हे नीटसे कळू शकत नाहीये. धर्मचक्राच्या खाली उजव्या हातातील चवरी, स्तूपावर ढाळणारी एक स्त्री शिल्पात कोरलेली आहे. या स्त्रीने आपला हात गुढघ्याच्या थोड्या वर आपल्या मांडीवर ठेवलेला दिसतो आहे. आतल्या हॉलमध्ये या शिवाय दुसरे काहीच बघण्यासारखे नसल्याने मी बाहेरच्या व्हरांड्यात येतो.

व्हरांड्याच्या आतील भिंतीच्या मध्यभागात हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे द्वार अंदाजे 6 फूट रूंद आणि 10 फूट ऊंच आहे. या द्वाराच्या दोन्ही बाजूस आणखी दोन, 4 फूट रूंद व 8 फूट ऊंच असलेली प्रवेशद्वारे आहेत. मधले द्वार व बाजूची द्वारे या मध्ये 6 फूट रूंद व 3 फूट ऊंच असलेली 2 गवाक्षे आहेत. व्हरांड्याची पुढील बाजू म्हणजे बसता येईल असा एक दगडी ओटा असून त्या मधूनच 6 स्तंभ व कडांना असलेले 2 पिलॅस्टर वर काढलेले आहेत. हे सर्व स्तंभ अष्टकोनी असून वरच्या बाजूस उलटा ठेवलेल्या घटाचा आकार दिलेला आहे. या उलट्या ठेवलेल्या घटाच्या वरच्या बाजूस, क्रमांक 10च्या गुंफेप्रमाणेच प्रत्येक बाजूला एक आयताकृती गवाक्ष असलेली एक चौरस आकाराची पेटी ठेवलेली आहे. या पेटीच्या बाजूंना बौद्ध रेलिंगचे कोरीव काम आहे. या पेटीच्या आत एखाद्या कंगणासारखी दिसणारी एक गोल बांगडी कोरलेली आहे. या कंगणाच्या परिघावर खाचा-खाचांचे डिझाइन आहे. मधल्या 4 स्तंभांवर असलेल्या या चौकोनी पेट्यांच्या चारी कोपर्‍यांवर पक्षी प्राणी व मुले यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. यापैकी काही वाघाचा चेहरा, सशाचे कान व पंख असलेल्या कल्पनेतील प्राण्याच्या आहेत तर काही वाघाचा चेहरा व हरणाची शिंगे असलेल्या आहेत. या प्राण्यांच्यावर स्वार आरूढ झालेले दाखवलेले आहेत. मधल्या दोन स्तंभावर असलेल्या आकृत्या मानवी असून बाजूच्या स्तंभावर हे कल्पनेतले प्राणी आहेत. या चौकोनी पेट्यांच्या वरच्या बाजूस एक उलटा ठेवलेला पायर्‍या पायर्‍यांचा चौकोनी पिरॅमिड कोरलेला असून या पिरॅमिडचा वरचा भाग व छत या मधील जागेत एकमेकाकडे पाठ करून बसलेल्या प्राण्यांच्या 2 जोड्या कोरलेल्या आहेत. यापैकी एक जोडी व्हरांड्याच्या बाजूने तर एक बाहेरील प्रांगणातून दिसू शकते. या प्राण्यांच्यात मला स्वार आरूढ झालेले हत्ती, बोकड व ग्रीक पुराणांतील सिंहाच्या शरीरावर चोच असलेल्या पक्षाचे तोंड असलेला ग्रिफिन हा प्राणी ओळखता येतो आहे. या प्राण्यांवर आरूढ झालेल्या स्वारांत स्त्री पुरुष असे दोन्ही आहेत.

या गुंफेमधील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूंना, सांची येथील प्रसिद्ध तोरणासारखे दिसणारे संपूर्ण तोरण कोरलेले दिसते आहे. या तोरणावर प्रत्येकी 1 फूट चौरस आकाराची 19 पॅनेल्स कोरलेली आहेत. यापैकी 7 पॅनेल्स द्वाराच्या वरच्या बाजूस असून प्रत्येकी 6 पॅनेल्स द्वाराच्या बाजूंना आहेत. वरच्या 7 पॅनेल्समध्ये स्तूप, ज्याच्या खाली शाक्यमुनी गौतम सिद्धार्थ यांना दैवी ज्ञान प्राप्त झाले तो बोधि वृक्ष, धर्मचक्र, आणि काही उपासक कोरलेले आहेत. द्वाराच्या बाजूला असलेल्या पॅनेल्सवर, पतीशी प्रामाणिक व अप्रामाणिक असणार्‍या दोन स्त्रियांच्या कहाण्या कोरलेल्या आहेत. या पैकी एक पत्नी अनेक प्रलोभने असताना सुद्धा पतीशी प्रामाणिक राहते वा त्यामुळे तिला शेवटी पतीचा आधार मिळतो अशी गोष्ट आहे तर अप्रामाणिक पत्नी, तिचा पती प्रेमळ असूनही दुसर्‍या पुरुषाचा हात धरून पळून जाते व त्यामुळे तिला पती जबरदस्तीने ओढत परत घरी आणतो अशी कथा आहे. अतिशय कडक नियम व ब्रम्हचर्य पाळणार्‍या भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या या विहाराच्या प्रवेशद्वारावर प्रामाणिक, अप्रामाणिक भार्यांची पॅनेल्स कोरण्याचे काय प्रयोजन असावे हे खरे तर मला कळत नाहीये. कदाचित जातककथांप्रमाणे या कथांतून काहीतरी बोध या भिख्खूंना दिला जात असावा. प्रवेशद्वाराभोवती असलेल्या या पॅनेल्सच्या बाजूंना 6 फूट उंचीचे दोन यक्ष द्वारपाल कोरलेले आहेत. दोघेही धोतर नेसलेले असून त्यावर शेला पुढच्या बाजूस गाठ मारून बांधलेला आहे. व या शेल्याची दोन्ही टोके पुढे लोंबत आहेत. डाव्या बाजूच्या यक्षाच्या हातात 2 ब्रेसलेट आहेत. दोन्ही यक्षांची केशरचना सातवाहनकालीय म्हनजे पुढे बुचडा बांधलेली अशी आहे. उजव्या बाजूच्या यक्षाच्या मनगटावर एकच ब्रेसलेट व दंडावर पोची आणि कानात लांब कर्णभूषणे आहेत. दोन्ही यक्षांच्या उजव्या हातात देठासह असलेले कमलपुष्प आहे. व्हरांड्याच्या जोत्यापर्यंत येणार्‍या पुढच्या भिंतीवर, मध्यभागी असलेल्या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना, प्रत्येकी तीन अशा एकूण 6 यक्ष मूर्ती कोरलेल्या आहेत. पृथ्वी व स्वर्ग या मध्ये असणारे हे यक्ष या विहाराला आधार देत आहेत.

व्हरांड्याच्या मागील व बाजूच्या भिंतींवर अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे प्रसिद्ध शिलालेख कोरलेले आहेत. असे म्हणता येते की गौतमीपुत्र राजा व त्याच्यावेळचे सातवाहन साम्राज्य यांची जी काय माहिती आपल्याला आहे त्यापैकी बहुतांशी माहिती याच शिलालेखामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे.

क्रमशः

 

बारकावे टिपत केले वर्णन खूपच सुरेख होत आहे.

मात्र या सनाशी गौतमीपुत्र किंवा शालिवाहन राजाचा संबंध नाही असे इतिहासकार डॉ. ए.एस.आळतेकर म्हणतात व ते योग्य वाटते.

शक संवत् हे कनिष्काने सुरु केले आणि पुढे शक क्षत्रपांनी ते प्रचलित केले असे मिराशी म्हणतात. गौतमीपुत्राने तो सुरु केला नाही हे निश्चित कारण नहपानाचा पराभव इ.स. १२५ च्या सुमारास झाला.
गौतमीपुत्राच्या उदयाच्या वेळी कुषाण सम्राट कनिष्काच्या मृत्युनंतर कुषाण साम्राज्य कमजोर झाले होते व शकांचे वर्चस्व वाढले होते. नहपान हा क्षत्रप पदावरून महाक्षत्रप झाला होता व जवळपास स्वतंत्रपणेच राज्य करत होता.

अतिशय कडक नियम व ब्रम्हचर्य पाळणार्‍या भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या या विहाराच्या प्रवेशद्वारावर प्रामाणिक, अप्रामाणिक भार्यांची पॅनेल्स कोरण्याचे काय प्रयोजन असावे हे खरे तर मला कळत नाहीये.

ही पॅनल्स गौतमीपुत्र सातकर्णी आणि त्याचा मुलगा वाशिष्ठीपुत्र पुळुवामी यांच्या राज्यसत्तेचे, पराक्रमाचे प्रतिक मानले जाते.
डावीकडच्या खालच्या शिल्पचौकटीमधे एक तरूण एका तरूणीबरोबर अनुनय करताना दाखवला आहे हे म्हणजे गौतमीप्पुत्राचा पिता शिवस्वाती आणि सातवाहन राज्यलक्ष्मी एकत्र नांदतांनाचे प्रतिक आहे. तर त्यावरच्या पटांमध्ये एक तरूण त्या तरूणीला जबरदस्तीने हरण करून नेतांना दाखवला आहे. हे म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहनांच्या राज्यावर ताबा मिळवला याचे प्रतिक तर त्यापुढील पटांमध्ये त्या तरूणीला एक तरूण दुसर्‍या तरूणाकडून खेचून घेतांना दाखवला आहे. हे म्हणजे नहपानाने बळकावलेले सातवाहनांचे राज्य गौतमीपुत्राने कसे परत मिळवले याची कहाणी. नंतरच्या पटांमध्ये त्या तरूणीचे म्हणजेच सातवाहनांच्या राज्यलक्ष्मीचे पालन गौतमीपुत्र आणि त्याच्या पुत्र पुळुवामीने निष्ठापूर्वक कसे केले हे दाखवले आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...