एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग १
भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्यालगतच असलेल्या सह्याद्री पर्वतराजीच्या एका कानाकोपर्यात असलेल्या नाणेघाटाच्या माथ्यावर असलेल्या गुंफेला मी दिलेल्या भेटीला आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेले आहे. खरे म्हटले तर दख्खनच्या पठारावर इ.स.पूर्व 200पासून पुढील 400वर्षे राज्य करणारे एक राजघराणे व त्यांचे साम्राज्य यांच्याशी, त्या दिवशीची ती छोटीशी सफर म्हणजे फक्त एक झालेली तोंडओळख होती असे मला त्यानंतर वाटत राहिले होते. नाणेघाटच्या त्या भेटीनंतर या साम्राज्याचा अगदी अल्पसा शोध घेण्याचा जरी प्रयत्न करायचा असला तरी पश्चिम घाटावरील पुण्याजवळच्या डोंगरलेण्यांपासून ते मध्य भारतातील सांची, आंध्र प्रदेशातील अमरावती, आणि उत्तरेला असलेल्या नाशिक आणि औरंगाबाद जवळील पितळखोरे या ठिकाणांना भेट देण्याची किमान आवश्यकता मला जाणवली होती. गेले वर्षभर काही ना काही कारणांनी यापैकी कोणत्याच ठिकाणाला भेट देणे मला जमले नव्हते. त्यामुळे वर्षभराने का होईना, पण इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात कोरल्या गेलेल्या व त्या काळातील बौद्ध चैत्य-गृह व विहार यांचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून ज्यांची गणना केली जाते त्या कार्ले येथील गुंफांना भेट द्यायला मी आज चाललो आहे याचे एक समाधान मनाला वाटते आहे यात शंकाच नाही.
कार्ल्याच्या गुंफा भारतातील महत्त्वाचा असा मानला जाणार्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 4) जवळच फक्त काही किमी अंतरावर आहेत. मुंबईहून पुण्याला येत असताना खंडाळ्याचा घाट चढून वर आल्यावर लागणारे लोणावळा गाव पार केले की तिथून 8ते10 किमी अंतरावर एक छोटेखानी रस्ता डावीकडे वळतो. या रस्त्यावर कार्ले लेणी अशी पाटी असल्याने शोधायला फारसे प्रयास पडत नाहीत. रस्त्याच्या सुरूवातीसच एक मोठी कॉन्क्रीटची कमान आपले स्वागत करते. परंतु ही कमान एकवीरा देवीच्या मंदिराकडे तुम्ही आला आहात म्हणून तुमचे स्वागत करते, कार्ले लेण्यांकडे आल्याबद्दल नाही. हे एकवीरा देवीचे मंदीर कार्ल्याच्या लेण्यांच्या अगदी मुखाशी प्रस्थापित केलेले आहे. या आधी मी सुमारे 55ते 60वर्षांपूर्वी ही लेणी बघायला आलो असल्याचे मला स्मरते आहे. मात्र त्यावेळी हे एकवीरा देवीचे देऊळ फारसे लोकप्रिय नसावे. गेल्या काही दशकांत भारतात एकूणच देवळांना जास्त जास्त लोकप्रियता दिवसेंदिवस लाभत चालली आहे. त्याचप्रमाणे कदाचित या देवळालाही आता लोकप्रियतेचा लाभ झालेला दिसतो आहे.
सह्याद्री पर्वतराजीच्या कुशीत दडलेला कार्ले लेणी परिसर ब्रिटिश
राजवटीत मुंबई प्रांताचा (Bombay Province) एक भाग होता. या काळातील
ब्रिटिश शासनाने हा भाग, याचा इतिहास व या भागातील जनजीवन यांचे अतिशय
बारकाईने केलेले अचूक वर्णन 'गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेंसी' ( Gazetteer
of Bombay Presidency) या नावाने प्रसिद्ध करून ठेवलेले आहे. 1855 मध्ये
प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथामध्ये कार्ले परिसराचे एवढे अचूक वर्णन केलेले
आहे की त्याचा संदर्भ आजही घेता येतो. कार्ले परिसराबद्दल हा ग्रंथ सांगतो
की,
“ इंद्रायणी नदी खोर्याची उत्तर सीमा असलेल्या पर्वत रांगांमध्ये, तळ
जमिनीपासून पर्वत शिखराच्या उंचीच्या एक तृतियांश किंवा साधारण 400फूट
एवढ्या उंचीवर व पुणे शहराच्या वायव्येला 35मैलावर असलेली कार्ले लेणी ही
वेहरगाव या खेड्याच्या हद्दीत मोडतात. लेण्यांच्या समोरील बाजूस असलेल्या
सपाट जागेवरून दक्षिण व पूर्व दिशेला भातशेतीची सपाट जमीन सलगपणे दिसत
राहते. मधून मधून दिसणारे गर्द झाडीचे घोळके व सगळीकडे तुरळक दिसणारे
झाडांचे ठिपके, यामुळे या जमिनीचा सपाट सलगपणा भंग झाल्यासारखा वाटतो.
खोर्याच्या पलीकडच्या सीमेवर, मधेमधे असलेल्या खिंडींमुळे तुटक तुटक
भासणार्या उंच पर्वतांची एक निसर्ग रमणीय व नयनमनोहर रांग दिसते. या
रांगेमध्ये असलेल्या खिंडींमधून आणखी दूरवर असलेली पर्वतशिखरे दिसतात.
सर्वात पूर्वेला गोल डोक्याची कुडव टेकडी दिसते. त्याच्या पश्चिमेला
बादरसी शिखर दिसते. या शिखराच्या आणखी पलीकडे पूर्वेला असलेला सपाट
माथ्याचा विसापूर व पश्चिमेला असलेला गोल माथ्याचा लोहगड हे दोन किल्ले
दिसतात. याकिल्याच्या शेजारी विंचवाची नांगी या नावाने ओळखला जाणारा सुळका
दिसतो. याच्या पश्चिमेला असलेल्या खिंडीमधून लांबवरचे तुंग शिखर दिसते आणि
त्याच्या पलीकडे पश्चिमेला साखरपठाराचा सपाट माथा व त्याच्या मागे लांबवर
मोरगिरी व जांभुळणी ही पर्वत शिखरे दिसतात.”
कार्ले लेण्यांच्या रस्त्याला लागल्यानंतर मी आजूबाजूला एक नजर फिरवतो. 'गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेंसी' मधले वर्णन व सभोवती दिसणारे दृष्य यात फारसा काहीच फरक मला तरी जाणवत नाहीये. फक्त जुन्या काळच्या खेडेगावातील कौलारू घरांऐवजी भडक रंगांत रंगवलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांच्या पुंजक्यांचे ठिपके मला जागोजागी अनेक ठिकाणी दिसत आहेत इतकेच! या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिसॉर्ट्स व पिकनिक स्पॉट्सचे पेव फुटल्यासारखे दिसते आहे. मात्र या पर्यटक सुविधा कार्ले लेण्यांमुळे नक्कीच निर्माण झालेल्या नसून ही एकवीरा देवीची कृपा आहे हे नक्की. या देवीच्या मंदिरामुळेच हा भाग पर्यटकांत बराच लोकप्रिय झालेला असावा. अनेक भक्त मंडळी दर्शनाला येत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा छोटी दुकाने,चहा कॉफी,फराळाचे जिन्नस विकणारे हॉटेलवाले आणि लॉजेस यांची एक रांगच उभी राहिली आहे. या भाऊगर्दीतून जाण्यासाठी गाडी जरा हळूहळूच चालवत आम्ही कार्ल्याच्या डोंगराच्या तळाशी जाऊन पोहचतो. समोर मला चकित करून सोडणारा असा एक गुळगुळीत,काळाशार डांबरी रस्ता वर डोंगर चढून जाताना दिसतो आहे. मला नक्की स्मरते आहे की पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी जेंव्हा आम्ही कार्ले लेणी बघण्यासाठी म्हणून आलो होतो त्या वेळेस वर जाण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता व आम्ही पायीच डोंगर चढून वर गेलो होतो. हा डांबरी रस्ता अंदाजे निम्मी चढण तरी वाचवतो. वर पोचल्यावर गाड्या ठेवण्यासाठी एक चांगला वाहन तळ बांधलेला आहे व वाहनाची देखभाल करण्यासाठी तेथे कर्मचारी हजर असतात. 10रुपये फी भरून एकदा पावती घेतली की वाहन तेथे सोडून निर्धोक मनाने पुढे जाता येते. या वाहनतळाच्या एका टोकाला भक्कम बांधणीच्या दगडी पायर्या बर्याच उंचीपर्यंत वर जाण्यासाठी बांधलेल्या आहेत. गाडीतून उतरत असताना माझ्या लक्षात येते की आताच पावसाची एक जोरदार सर पडून गेलेली आहे व दगडी पायर्यांवरून मातकट पाण्याचे लोटच्या लोट खाली वाहत येत आहेत.
बर्याच काळजीपूर्वक मी समोर दिसणार्या पायर्या चढायला सुरूवात करतो. पायर्या बनवताना त्यात दगड बसवलेले आहेत ते सर्व प्रकारच्या आकारांचे आहेत व त्यावरून पाण्याचे लोट खाली वहात येत असल्याने पाय घसरू न देता चालणे जरा कौशल्याचे काम वाटते आहे पण वाटले तेवढे अवघडही नाही. पायर्यांच्या दुतर्फा जिथे शक्य असेल तेथे टपर्यांच्या रांगा उभ्या आहेत. फुले, शोभेच्या वस्तू, फोटो स्टुडियो, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सोललेल्या काकड्या, ताजे घुसळलेले ताक, लिंबाचे सरबत आणि देवीचे फोटो व पूजासाहित्य अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या टपर्यांच्यातून विक्रीला ठेवलेल्या दिसत आहेत. यातल्या पुष्कळ दुकानदारांनी देवीच्या आरत्या किंवा भक्तीपर गीतांच्या कॅसेट्स कानठळ्या बसतील इतपत मोठ्या आवाजात सतत चालू ठेवलेल्या आहेत. आपल्या दुकानाची विक्री वाढवण्याचा बहुदा त्यांचा प्रयत्न चालू असावा. एकूण प्रकार कोणत्याही देवाची जत्रा किंवा उरूस यामध्ये जसा असतो तसाच साधारण आहे. कार्ले येथील गुंफा बघायला जाताना अचानक सुरू झालेला हा गोंधळ व कोलाहल माझा मूड एकदम बिघडवूनच टाकतो व कोठून येथे येण्याचा मूर्खपणा केला असे मला वाटते आहे. या पायर्या अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत की एका बाजूला काळ्याकभिन्न पाषाणाची एक भिंतच उभी आहे तर दुसर्या बाजूला अगदी पायर्यांलगत उभ्या खडकांत तयार झालेली एक अरूंद व खोल घळ दिसते आहे. वर चढत असताना मी या खोल घळीमध्ये सहज डोकावून बघतो. तेथे दिसणार्या ओंगळ दृष्याने मला इतकी किळस व घृणा वाटते आहे की आता आपल्याला ओकारी होणार असे मला वाटू लागले आहे. बाजूची खोल घळ कचर्याने संपूर्णपणे भरून गेली आहे. प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कप, कागदाचे तुकडे,पत्रावळी, निर्माल्य आणि फेकलेले शिळे खाद्यपदार्थ या सारख्या सर्व गोष्टींनी ती घळ भरून वाहते आहे. ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या स्थानाला तेथे असलेल्या देवळाच्या लोकप्रियतेची किंमत अशाप्रकारे एक विशाल कचरापेटी बनून मोजावी लागते आहे. येणारे भाविक, दुकानदार व विक्रेते हे सर्व या घाणीला तितकेच जबाबदार आहेत यात शंका नाही.
मी माझ्या मनातले क्लेशदायक विचार बाजूला सारत पायर्यांच्या शेवटी असलेल्या एका प्रांगणात पोचतो आहे. या प्रांगणाच्या एका बाजूला ज्याच्यातच लेणी खोदलेली आहेत असा पाषाणाचा उभा कडा आहे तर बाकी बाजूंना भारतीय पुरातत्व खात्याने मजबूत कुंपण घातलेले आहे. त्यामुळे सुदैवाने लेण्यांच्या जवळ दुकानदार व खाद्यपदार्थ विक्रेते यांचा उपद्रव होत नाहीये. आत प्रवेश मिळवण्यासाठी एक छोटीशी फी द्यावी लागते. विक्रेत्या मंडळींपासून सुटका करून घेण्याची बहुदा ती फी असावी असेच मला वाटत राहते. आत आलेल्या 10पर्यटकांपैकी बहुदा 9 तरी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी म्हणूनच आलेले असावेत. कार्ले लेण्यांमधील गुंफांमधील 8क्रमांकाची गुंफा ही चैत्यगृहाची गुंफा असल्याने सर्वात महत्त्वाची समजली जाते. या गुंफेचे मुख (Facade) अतिशय भव्य व सौंदर्यपूर्ण आहे यात शंका नाही. परंतु एकवीरा देवीची या भव्य मुखाच्या समोर प्रतिष्ठापना करून व त्यावर पत्र्याचे छप्पर असलेले एक मंदिर बांधून काय औचित्य साधले गेले असावे हे मला तरी कळणे अवघड आहे. या मंदिरामुळे या पुरातन चैत्यगृह गुंफेच्या भव्य मुखाचे सौंदर्य नीट दिसत नाही असे मला तरी वाटते. परंतु एकवीरा देवीचे मंदिरही खूपच जुने आहे व रायगड जिल्ह्याच्या किनार्यावर मासेमारी करणार्या कोळी मंडळींचे हे एक महत्त्वाचे दैवत आहे या गोष्टी लक्षात घेतल्या तर एकवीरा मंदिर त्या स्थानावर नसते तर चैत्यगृह किती जास्त भव्य दिसले असते या सारख्या विचारांना काहीच अर्थ नाही हे माझ्या लक्षात येते व माझ्या मनातील विचार बाजूला सारून मी जे बघण्यासाठी येथे आलो आहे त्या चैत्यगृहाकडे वळतो.
कार्ले येथील या प्राचीन बौद्ध मठाच्या विस्तीर्ण परिसरातील मुख्य गुंफा अर्थातच 8क्रमांकाची गुंफा किंवा चैत्यगृह ही आहे. याशिवाय येथे असलेल्या भिख्खूंच्या वास्तव्यासाठी खोदलेली निवास स्थाने किंवा विहार, पाण्याच्या टाक्या हे सगळे विचारात घेतले तर एकूण 16गुंफा येथे आहेत. मात्र या गुंफा एकाच पातळीवर नसून तीन किंवा चार पातळ्यांवर आहेत.एका गुंफेतून दुसरीकडे जाता यावे यासाठी पाषाणाच्या आतून जिना आणि मार्ग खोदलेले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने वरच्या पातळीवरील सर्व गुंफाना लाकडी दारे बसवून त्यांना कुलुपे ठोकून टाकली आहेत. त्यामुळे वरच्या पातळीवरील गुंफा बघणे शक्य होत नाही. मला ही गोष्ट फारशी रुचलेली नाही, परंतु नाइलाज असल्याने मी खालच्या पातळीवरील गुंफांकडे माझा मोर्चा हलवतो. 8नंबरची गुंफा अर्थातच बघितली पाहिजे अशी असल्याने मी प्रथम या गुंफेकडे वळतो.या गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळ पुरातत्त्व खात्याने आणखी एक मजबूत कुंपण उभारलेले आहे व आत जाण्याआधी एक सुरक्षा रक्षक तुम्ही प्रवेशपत्रिका घेतलेली आहे किंवा नाही हे परत एकदा तपासतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस डावीकडे सम्राट अशोक कालीन स्थापत्याला अनुसरून असलेला (इ.स.पूर्व 300ते 200 या कालातील) आणि 16बाजू असलेला असा एक भव्य सिंह स्तंभ उभा आहे. या स्तंभाच्या डोक्यावर चारी दिशांना तोंड करून बसलेले चार सिंह कोरलेले आहेत. या चार सिंहांच्या मागील बाजू एकमेकास जोडलेल्याच ठेवलेल्या आहेत. या वरून हे चारी सिंह एकाच पाषाणातून कोरले आहेत हे स्पष्ट होते. खालून बघताना या सिंहांच्या मुखात कोरलेले दात स्पष्ट दिसू शकतात. या अशोक स्तंभाला लागूनच व संपूर्ण चैत्यगृहाचे पाऊसपाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून पाषाणातच कोरलेल्या एका बाह्य पाषाण पडद्याचे अवशेष आजही स्पष्टपणे दिसत आहेत. हा पडदा चैत्यगृहाच्या तळाच्या पातळीवर खोदलेल्या 3 दणकट स्तंभांच्या मजबूतीवर जागेवर राहिलेला असावा. या पडद्याच्या वरच्या भागात चैत्यगृहात हवा व उजेड भरपूर प्रमाणात यावे यासाठी म्हणून खोदलेल्या 3मोठ्या गवाक्षांचे अवशेष दिसत आहेत. या पडद्याच्या दोन्ही कडांच्या जवळील भिंती आजही उभ्या आहेत. या भिंतींवर चौरस आकाराची अनेक छिद्रे पाषाणात पाडलेली दिसतात.या छिद्रात लाकडी खुंटी ठोकून त्यावर सजावटीचे आणि रेशमी किंवा जरीचे भरतकाम केलेले कापडी किंवा रेशमी फलक व बॅनर्स त्या काली टांगत असत. या सर्व सजावटी नंतर हे चैत्यगृह किती भव्य आणि रूबाबदार दिसत असेल याची कल्पना आजही करता येते. आज या बाह्य पडद्याच्या बाजूच्या भिंती व तळाला असलेले स्तंभांचे अवशेष एवढेच काय ते शिल्लक आहे. या बाह्य पडद्याच्या व त्याच्या मागे असलेल्या अंतर्गत पडद्यांच्या मध्ये एक पडवी आहे. ही पडवी 15.85मीटर (52फूट) रूंद आणि 4.57मीटर (15फूट) खोल या आकाराची असून या पडवीतून आपल्याला पुढील व्हरांड्याकडे जाता येते.
पुढचा व्हरांडा आणि चैत्यगृह यांमध्ये पाषाणातच खोदलेला आणखी एक पडदा आहे. या पडद्याच्या वरच्या भागात हवा खेळती राहण्यासाठी व उजेड आत येण्यासाठी म्हणून खोदलेले एक भव्य अर्धवर्तुळाकार आकाराचे गवाक्ष आहे. व्हरांड्यातून चैत्यगृहात प्रवेश करण्यासाठी 3प्रवेशद्वारे खोदलेली आहेत. या अंतर्गत पडद्याच्या बाह्य (बाह्य पडद्यासमोर असलेला) पृष्ठभागाच्या द्वारे आणि गवाक्ष सोडून राहिलेला उर्वरित सर्व भाग हा 'बास रिलिफ'(bass reliefs)प्रकारच्या शिल्पांनी सजवलेला आहे. या शिवाय पुढील व्हरांड्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंती व बाह्य पडद्याच्या कडांचा आतील पृष्ठभागाचा भाग यावरही शिल्पे कोरलेली आहेत. कोरलेल्या शिल्पांच्यात, त्या कालात अगदी सर्वसामान्यपणे वापरात असलेले कठड्यांवरील कोरीवकाम (या प्रकारचे कोरीव काम सांची येथील स्तूपाच्या बाह्य भिंतीवर दिसते.),युगुले व इतर नक्षीकाम यांचा समावेश आहे. काही ठिकाणी भगवान बुद्धांचे नंतरच्या कालात बसवले गेलेले पुतळेही दिसत आहेत. अशा प्रकारची कोरीव शिल्पे कर्नाटकतील ऐहोले किंवा पट्टडकल येथेही बघता येतात. मात्र तेथील शिल्पातील स्त्री-पुरुष व कार्ले येथील शिपातील स्त्री-पुरुष यांच्या शरीराची ठेवण,बांधा, केशरचना, वस्त्रप्रावरणे आणि अंगावरील अलंकार यात बराच फरक दिसून येत असल्याने या परिसरात राहणारे त्या काळचे लोक व ऐहोले-पट्टडकल मधील लोक यांत बराच फरक असला पाहिजे हे स्पष्ट होते.
कार्ले येथील चैत्यगृहातील मुख्य प्रार्थनागृह हे भारतात सापडलेल्या तत्कालीन लेण्यांमधील सर्वोत्कृष्ट असे मानले जाते. या प्रार्थनागृहाचे बारकाईने व अचूक वर्णन करण्यासाठी परत एकदा 'गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेंसी' ( Gazetteer of Bombay Presidency)चाच आधार मला घ्यावासा वाटतो आहे. या प्रार्थनागृहाचे वर्णन गॅझेटियर या शब्दात करतो.
“ कार्ले लेण्यांमधील चैत्यगृह हे संपूर्ण भारतात सापडलेल्या या प्रकारच्या लेण्यांमध्ये सर्वात मोठे व विशाल आहे असे म्हणता येते. पुढच्या दरवाजापासून मागील भिंतीपर्यंत या कक्षाची खोली 37.87 मीटर असून रूंदी 13.87मीटर तर उंची 14.02मीटर एवढी आहे. या चैत्यगृहाची रचना म्हणजे एक प्रार्थना कक्ष व त्याच्या पुढे एक व्हरांडा अशी आहे. प्रार्थनाकक्षाचे 3भाग करता येतील. यात मध्यवर्ती मोकळी जागा,या जागेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभांच्या ओळी व त्यांच्या बाजूंना असलेले कडेचे पॅसेज यांचा समावेश करता येईल. स्तंभांच्या ओळी मागील बाजूला असलेल्या स्तूपाच्या मागे अर्धवर्तुळाकार आकारात एकमेकाला जाऊन मिळतात. या रचनेमुळे मागील बाजूस असलेला हा स्तूप पूजास्थान असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. आत खोदलेले स्तंभ त्या कालातील स्थापत्याप्रमाणे अतिशय हुशारी व कष्टपूर्वक कौशल्याने खोदलेले आहेत. प्रत्येक स्तंभाची रचना बघितली तर पायर्या पायर्या काढलेला पिरॅमिडच्या आकाराचा तळाचा भाग,त्यावर एखाद्या माठासारखा गोलसर दिसणारा भाग आणि त्यावर अष्टकोनी आकाराचा स्तंभ अशीच आहे. स्तंभांच्या माथ्यावर उलट्या ठेवलेल्या फुलदाणीसमान दिसणारा भाग,त्याच्यावर एक गोल चकती व त्यावर परत पायर्या काढलेला पण उलटा ठेवलेला पिरॅमिड अशी रचना दिसते. हा माथ्याचा भाग व छत यामध्ये असलेल्या स्तंभशीर्षांवर (capital) स्त्री,पुरूष आरूढ असलेले हत्ती व घोडे हे प्राणी कोरलेली शिल्पे आहेत. स्तूपाच्या मागील बाजूस असलेले7स्तंभ फक्त अष्टकोनी आकाराचे असून त्यावर कोणतेही कोरीव काम नाही. स्तंभांच्या ओळीच्या बाजूला असलेल्या पॅसेजचे छत सपाट आहे. मात्र मध्यवर्ती भागातील छत हे वक्राकार आकाराचे आहे आणि ही वक्रता मागील बाजूस असलेल्या स्तूपाच्या डोक्यावर असलेल्या छताच्या अर्धवर्तुळाकार वक्रतेला बेमालूमपणे मिळवलेली आहे. छताच्या आतील बाजूस, छताच्या वक्रतेला मिळून येतील अशा आकाराच्या शिसवी लाकडाच्या तुळया एकमेकाला समांतर अशा बसवलेल्या आहेत.या तुळयांच्या मध्ये स्तंभांच्या ओळींना समांतर असे शिसवी वासे बसवलेले आहेत. अगदी पुढील बाजूला असलेल्या स्तंभांच्या पुढे, काटकोनात असलेली व अंतर्गत पडद्याला समांतर असलेली 4 स्तंभांची एक ओळ आहे. चैत्यगृहामध्ये असलेले पूजास्थान मागील बाजूस असलेला स्तूप हेच आहे.हा स्तूप एकावर एक ठेवलेल्या दोन लंबवर्तुळाकार पाषाणांचा असून त्याच्या माथ्यावर घुमट आहे. घुमटावर चौरस आकाराचा एक पाषाण असून त्यावर 7पायर्यांचा एक उलटा पिरॅमिड बसवलेला आहे. या पिरॅमिडमध्ये असलेल्या एका छिद्रात बारीक नक्षीकाम केलेली एक लाकडी छत्री खोचून उभी केलेली आहे.”
छतात बसवलेल्या शिसवी तुळया व वासे हे सर्व 2000वर्षांपूर्वी बनवलेले मूळ स्वरूपातील आहेत. हे लाकूड सर्व लाकडांत दणकट व वाळवी न लागणारे असे मानले जाते. मात्र या एवढ्या अवाढव्य तुळया व वासे त्यावेळी कसे बनवले असतील व उचलून जागेवर कसे बसवले असतील याची कल्पनाच करता येत नाही.
चैत्यगृहाच्या आत भगवान बुद्धांचे अस्तित्व कमल पुष्प किंवा स्तूप चित्र यासारख्या सांकेतिक चित्रांनीच फक्त दर्शवलेले आहे व भगवान बुद्धांचे शिल्प कोठेही दाखवलेले नाही. यावरून कार्ले बौद्ध मठ हा हिनयान कालखंडातील असला पाहिजे हे स्पष्ट होते. इ.स.पूर्व पहिले शतक ते इ.स. नंतरचे दुसरेशतक या कालखंडात हा मठ प्रथम खोदला गेला असे इतर पुराव्यावरून दिसते. चैत्यगृहाच्या बाहेर असलेल्या पडद्यावर बुद्धमूर्ती शिल्पे दिसतात. ही शिल्पे महायान कालात किंवा इ.स.200ते400 या कालात कधीतरी बसवली गेलेली असावीत.
चैत्यगृह बघून झाल्यावर मी बाहेर येतो व समोरील प्रांगणाच्या कडेला बांधलेल्या संरक्षक भिंतीजवळून दक्षिणेकडे चालू लागतो. या भिंतीच्या दुसर्या बाजूला निदान 200फूट खोल असा सरळ तुटलेला कडा आहे. तेथून खाली बघताना मला परत एकदा सकाळचे ओंगळ दृष्य दिसते. हा कडा पण प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कप, कागदाचे तुकडे,पत्रावळी, निर्माल्य, करवंट्या आणि फेकलेले शिळे खाद्यपदार्थ यांनी भरून गेलेला दिसतो आहे. येथे येणार्या उत्साही भक्त मंडळींनी व पर्यटकांनी या सुंदर पर्यटन स्थळाची एक कचरापेटी करून टाकली आहे.
कार्ले मठातील बौद्ध भिख्खूंचे निवासस्थान असलेली फक्त एक गुंफा बघण्यासाठी उघडलेली आहे. मी त्यामध्ये आत डोकावतो. समोर एक व्हरांडा,त्याच्या मागे हॉल व हॉलच्या तिन्ही भिंतींमध्ये भिख्खूंचे कक्ष अशी रचना आहे. व्हरांडा व हॉल या मध्ये असणार्या भिंतीत दोन गवाक्षे आहेत व एक प्रवेशद्वार आहे. हॉलच्या मागच्या भिंतीवर मध्यभागी भगवान बुद्धांचे एक बास रिलिफ पद्धतीचे शिल्प कोरलेले आहे. येथे वास्तव्य करणार्या भिख्खूंचे आयुष्य अतिशय साधे व आत्यंतिक कष्टप्रद असले पाहिजे या बद्दल माझ्या मनात तरी काहीही शंका नाही.
कार्ले गुंफांना भेट दिल्यावर माझ्या मनाला प्रश्न पडला आहे की या गुंफांचा आणि या कालखंडातच (इ.स.पूर्व 200ते इ.स.200) महाराष्ट्रावर व भारतीय द्विपकल्पावर राज्य करणार्या सातवाहन साम्राज्याचा संबंध कसा जोडायचा? या साम्राज्याच्या पाऊलखुणा या गुंफांमध्ये कोठे शोधायच्या? या शोधाची गुरुकिल्ली नाणेघाट प्रमाणेच या गुंफांमध्ये सापडणार्या शिला लेखांतच असली पाहिजे. सुदैवाने कार्ले गुंफा या भारतवर्षातील अनेक शक्तिमान व धनवान मंडळींच्या मदतीतून खोदल्या गेलेल्या असल्याने या ठिकाणी तब्बल 21 शिलालेख सापडतात. या शिला लेखांचा अर्थ लागला की या कालातील राजकीय परिस्थितीवर प्रकाश पडण्याची शक्यता दिसते.
(क्रमश:)
इतर मालिकांप्रमाणेच ही देखील रोचक होणारच. लेणी बघायला म्हणून
आमच्यासारखे बरेच टुरिस्ट्, पिकनिकवाले बरेच जण जातात. पण तुमच्याइतकं
बारकाइनं नाही पाहता येत.
अशाच एका मिपावरच्या कलंदर व्यक्तीचा आपण फ्यान आहोत. http://www.misalpav.com/user/8469/authored?page=1 इथे त्याची प्रोफाइल पाहता येइल.
कित्येकदा लेखापेक्षाही प्रतिसादांतून तिथे सुंदर माहिती मिळते.
नुसते फोटोच पहायचे असतील कार्ल्याचे तर इथे पाहता येतीलः- http://www.misalpav.com/node/17159. नाणेघाटाचे इथे:- http://www.misalpav.com/node/16716, http://www.misalpav.com/node/16823
.
अत्यंत माहितीपूर्ण, ससंदर्भ लेखः- कान्हेरी गुंफा :- http://www.misalpav.com/node/20983
पांडावलेणी व अनुषंगाने प्रचंड माहिती http://www.misalpav.com/node/19395 आणि http://www.misalpav.com/node/19608.
एका चर्चेच्या निमित्ताने मिळालेली थोडीफार माहिती :- http://www.misalpav.com/node/20736
भुलेश्वराचे दोन- चार फोटु:- http://www.misalpav.com/node/12558
ह्याशिवाय हळेबीड,बेल्लारी, श्रवणबेळगोळ इथल्या भटकंतीबद्दल, शिल्पांबद्दल दशानन ह्यांचे काही धागे दिसले ते असे:-
http://www.misalpav.com/node/19934 (त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१)
http://www.misalpav.com/node/20008 (त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२)
http://www.misalpav.com/node/20164 (त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -३)
http://www.misalpav.com/node/20340 (त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -४)
आता हे सर्व दिलेले दुवे सातवाहनांशीच संबंधित आहेत का? तर नाही. पण
एकूण ह्यांच्या शिल्पांवरून, त्या शैलीवरून काही इतर संदर्भ लागू शकतात, व
एकूणच भारतीय शिल्पकलेबद्दल
एखादे सामायिक निरीक्षण हाती लागू शकते , ती विकसित कशीकशी होत गेली ह्याचा
अंदाज लावता येउ शकेल म्हणून हे सर्व धागे एकाच सूत्रात देण्याचा प्रयत्न
करतोय.
रायगड किल्ला पहायला जाताना रायगाडाच्या अलीकडे कुठेतरी ५-७ किलोमीटरवर एक
छोटिशी टेकडी व त्यावर लेणी दिसली. बहुतेक "पाली" नाव होतं ठिकाणाचं.
अवांतर :- परवाच "भारत एक खोज " मध्ये तालीकोट /राक्षसतागडी ची लढाई पुन्हा पहात असताना तुमच्या हंपी-विजयनगरवरल्या धाग्यांची राहून राहून आठवण येत होती.
मुळात भारतात अजूनही अनेकानेक जागा अनएक्सप्लोर्ड असाव्यात असे मला राहून राहून वाटते.
या गुंफांना तीन-चारदा बघणे झाले आहे. पण बहुतांशवेळा मित्रांचा गट
असल्याने निरिक्षण करण्यास वावही नव्हता आणि तेव्हा इतका उत्साह + रस
नव्हता
आता या लेखमालेनंतर पुन्हा एकदा लेण्यांचे दर्शन करुन घ्यायला हवे!
प्रत्येक लेखावर प्रतिक्रीया देण्याइतके वाचन्/निरिक्षण नसल्याने कदाचित
प्रत्येक लेखांकावर प्रतिक्रीया देणार नाही मात्र वाचत असेनच.. तुम्ही(ही)
लिहित रहा(लच!)
अगदी ८०-८५ सालापर्यंतही मळवलीला उतरणारे लोक बुद्धविहारांसाठीच येत असत.
एकवीरेचे देऊळ अगदी छोटेसेच असे होते आणि तिथे पूजा आरत्यांची फारशी
धामधूमही नसे. पूजासाहित्याचे अवडंबरही नसे. कोळी बांधव पूजाप्रसादाचे
साहित्य स्वतःबरोबर घेऊनच डोंगर चढत असत. त्यामुळे ही यात्रा खडतर मानली
जात असे. ही देवी जशी कोळ्यांची कुलदेवता तशी कायस्थांचीही. शिवसेनेच्या
उदयाबरोबर इथे वर्दळ आणि गजबज वाढली. तसे रायगड जिल्ह्यातही कडाप्पा येथे
एकवीरेचे पुरातन स्थान आहे आणि कुलाबा जिल्ह्यातले समस्त कायस्थ ह्या
देवीला जात असत. हेही स्थान तसे दुर्गमच (होते) असे म्हणता येईल. आता
वाहतुकीचे आणि वसतीचे अनेकानेक पर्याय उपलब्ध होऊ लागल्याने दुर्गमता आणि
खडतरपणा संपला आहे. एवरेस्ट् च्या शिखरमाथ्यावरही जिथे गर्दीमुळे अपघात घडू
लागले आहेत तिथे सह्याद्रीची काय कथा.
कार्ल्याचे हे एकवीरेचे स्थान (देऊळ नव्हे.) पुरातन असावे. राजवाड्यांच्या
मते बौद्धविहारकाळाआधीपासून या स्थानाचे महत्त्व असावे. त्यांनी 'एकवीरा'
नामाचा संबंध अक्कवीरा, अक्कम्मा,अल्लम्मा, येल्लम्मा असा काहीसा लावल्याचे
वाचलेले आठवते. एव्हढेच नव्हे तर या आदिम दैवतापुढे पशुबळी होत असत (हे तर
आत्ता-आत्तापर्यंत सुरू होते.) आणि त्यासाठीच इथे गौतम बुद्धाचा अहिंसेचा
संदेश देणारे विहार मुद्दाम बांधले असावेत असेही एक मत वाचल्याचे आठवते.
[माझे हे सर्व वाचन अनेक दशकांपूर्वीचे आहे. नोंदी किंवा टिपणे काढून
ठेवावीत अशी आवश्यकता किंवा प्राधान्य तेव्हा वाटले नाही. त्यामुळे हे सर्व
निव्वळ स्मरणाधारित आहे. स्थानिक इतिहासासाठी विकीचे दुवे शोधणे व्यर्थ
आहे असेही मला वाटते कारण स्थानिक इतिहास पूर्वसूरींकडून लिहिल्या गेलेल्या
स्थानिक भाषांतील (कित्येकदा बिगरऐतिहासिक अशा) वाङ्मयामधूनच अधिक चांगला
उमजतो असे माझे मत आहे.]
अगदी ८०-८५ सालापर्यंतही मळवलीला उतरणारे लोक बुद्धविहारांसाठीच येत
असत. एकवीरेचे देऊळ अगदी छोटेसेच असे होते आणि तिथे पूजा आरत्यांची फारशी
धामधूमही नसे. पूजासाहित्याचे अवडंबरही नसे.
१९८५ नंतर सर्वत्रच मंदिरे फोफावली भारतभर. नव्यानेच आलेला रंगीत टीव्ही,
त्यात १९८८ च्या आसपास लोक्प्रियतेच्या कळसाला पोचलेली "रामायण" आणि तिच्या
पाठोपाठ आलेल्या "महाभारता"ने लोकप्रियतेचे उच्चांक स्थापित केले, ते आजही
अबाधित असावेत. त्यामुळे तसाही धार्मिक् प्रभाव वाढत होताच. १९८४ला केवळ २
लोकसभा सदस्य असणारे भाजप शहाबानो केसला प्रत्युत्तर म्हणून् पुन्हा
एकदा आक्रमक हिंदुत्व घेउन मैदानात उतरले ते १९८९ ला तब्बल११९ खासदार
जिंकवूनच. ह्या सर्वादरम्यान मागील चार दशकात काहिसा मवाळ होइल असे वाटत
असलेला समाजावरचा धार्मिक पगडा अचानक पुन्हा वाढला. १९८५ ला मुंबै मनपा
काबीज केलेल्या सेनेनं महाराष्ट्रात सर्वत्र धडाक्यातराअघाडी उघडली. शाखा
उघडल्या. १९९० च्या आसपासपर्यंत भाजपाशी घरोबा केला. परिणामी कित्येक
ओरिजनल ग्रामदैवते मागे पडली. नवीन पर्याय उभे राहून तिथली वर्दळ वाढली.
उदा:- पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी. पण स्वातंत्र्याच्या
काळापर्य्ंत दगडूशेठला ग्लॅमर आलेले होते. इकडे आमच्या औ बाद मध्ये अनेक
जुनी ठिकाणे होती.(कर्णपुर्याची, पदमपुर्याची देवी वगैरे) ती सुरु
राहिली. मात्र थेट आत संगमरवरी हॉल असलेले वरद गणेश मंदिर फेमस झाले. पॉश
गजानन महाराज मंदिर पहायला औ बाद भेटिला बाहेरचे आलेले लोकही "जागृत
ठिकाण" म्हणून् जाउ लागले. आमचे तीर्थरूप मी चिमुरडा असताना मला कडेवर
घेउन् सूनसान, एकाकी असलेल्या वेरूळजवळच्या खुलताबादच्या झोप्या मारुतीच्या
मंदिरात आठवणीने जात.
१९९० च्या नंतर मात्र् हळूहळू तिथलीही वर्दळ् वाढली. आज फार मोठ्या
प्रमाणावर तिकडे गर्दी होते. आम्ही पाहिलेले मोकळे माळरान आता जत्रेच्या
गर्दित गायब झालेले दिसते. आम्ही गाडी पार्क् करायचो तिथून आता पायर्या
आणि मंडप सुरु होतात, पार्किंग पार बाहेर आलेली आहे. खुद्द औरंगाबादला
माझ्या कॉलनीच्या आसपास कित्येक ठिकाणी आम्ही क्रिकेट, लिंगोरचा, पकडापकडी
खेळत असू, त्या मैदानांवर आता मंदिर उभी राहिलेली आहेत. सरकार नवीन
धर्मस्थळ उभी करण्यास परवानगी देत नाही. म्हणून मग "प्राचीन मंदिराचा
जीर्णोद्धार" ह्या नावाने हे सर्व चालते.(म्हणजे जागा आम्ही हडपत नाही
आहोत, तर तिथे खरोखरिच पूर्वीपासूनच मंदिर होते असा तो दावा असतो.) हे सर्व
मी का सांगतोय? तर केवळ१९८५ नंतर एकवीरा देवीच्या इथली गर्दी वाढली, हे
वाक्य म्हणजे सुटी, एकटी घटना नाही तर सलगपणे आधीच देशात, विशेषतः राज्यात
घडणार्या घटनांचे एक उदाहरण आहे एवढे सांगण्यासाठीच.
अर्थात ह्यामुळे आमच्या औरंगाबदला कित्येक चांगल्या गोष्टीही झाल्या, पण ते इथे सांगणे प्रस्तुत होणार नाही.
. त्यामुळे हे सर्व निव्वळ स्मरणाधारित आहे. स्थानिक इतिहासासाठी
विकीचे दुवे शोधणे व्यर्थ आहे असेही मला वाटते कारण स्थानिक इतिहास
पूर्वसूरींकडून लिहिल्या गेलेल्या स्थानिक भाषांतील (कित्येकदा
बिगरऐतिहासिक अशा) वाङ्मयामधूनच अधिक चांगला उमजतो असे माझे मत आहे.]
हो ही आणि नाही ही. विकीचे दुवे शोधणे व्यर्थ ह्यामध्ये मी
"व्यर्थ" ऐवजी "पुरेसे" असे म्हणेन. विकीवरचे दुवे तरी शेवटी काय आहेत.
कित्येक मौखिक परंपराचा त्यात उल्लेख असतोच की.हां , पण भारताच्या बाबतीत
तो फारच कमी असतो, हेही खरे. माणूस,समाज, समाजजीवन, बोलीभाषा ह्यांच्याशीही
चांगली ओळख असल्याशिवाय त्या त्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण झाला असे म्हणता
येत नाही. उदाहरणच द्यायचे तर भारतात सुमारे वीसेक दशके विविध ठिकाणी ज्यू
रहात होते. गंमत अशी की ह्यातले कित्येक् ठिकाणचे ज्यू आपण् मुळात "ज्यू"
आहोत हेच विसरले. इतर जगालीही इथे काही ज्यू राहतात ह्याचा पत्ताच नव्हता.
ज्यू जीवनशैलीचा कुणीएबभ्यासक सहज भारतात फिरत असता त्याच्य नजरेला ह्या
लोकांच्या चालीरिती,पद्धती पडल्या.
"तुम्ही ज्यू आहात" हे त्यांना एका "बाहेरच्याने" सांगितले! त्याबद्दल नंतर कधीतरी.
विकि म्हणजे लिखित इतिहास. लिखित इतिहास हा १८व्या शतकापूर्वीचा पाहिला, तर
त्यात बहुतांशी लोककथा,सम्जात रुळलेले वाक्प्रचार ह्यावरचाच अधिक दिसतो.
बाकी नंतर लिहिन म्हणतो.
विकीचे दुवे शोधणे व्यर्थ ऐवजी पुरेसे म्हणेन
मूळ प्रतिसादात हे वाक्य स्थानिक इतिहासाला उद्देशून होते. योरपीय आणि
अमेरिकन इतिहासाचे दस्त-ऐवजस्वरूपी मूलस्रोत लॅटिन्.इंग्लिश्, इ. भाषांत
आणि एकाच रोमन लिपीत असल्यामुळे ते एका विस्तृत भौगोलिक पटावर
अभ्यासासाठी उपलब्ध होऊ शकले. लिपीसौकर्यामुळे विकीवरही त्वरित येऊ शकले.
भारतातले स्थानिक स्रोत मात्र अद्यापही जुन्या ग्रंथवाङ्मयामधेच पडून आहेत.
एक तर हे वाङ्मय साकल्याने वाचणारे विरळा. त्यातून ते समजण्यासाठी
तत्कालीन भाषा,समाजव्यवहाराचे ज्ञान असणारे अधिकच विरळा. भारतासारख्या
विशाल, प्राचीन देशामध्ये इतकी बहुविधता आहे की इतिहासकाराच्या ठायी तिची
नोंद घेण्याइतपत आणि त्याचे पृथक्करण करून निष्कर्ष काढण्याइतपत सकलज्ञान
असणे आवश्यक असले तरी दुर्मीळ आहे.त्यातून केवळ हौसेखातर आणि सामाजिक
कृतज्ञतेपोटी ह्या नोंदी (प्रसंगी समकालीन भाषांमध्ये अनुवादित करून)
विकीवर चढवणारे हे अत्यंत दुर्मीळ. त्यामुळे स्थानिक इतिहासाच्या नोंदींचा
विकीवरचा साठा अत्यंत मर्यादित आणि पुष्कळ अंशी अविश्वसनीय आहे. यामुळेच
स्थानिक इतिहासासाठी विकी धुंडाळणे व्यर्थ ठरते, किंवा पुरेसे ठरत नाही.
राही यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. पाश्चात्य इतिहास, साहित्य, कला यांची माहिती रोमन लिपीत असल्याने पूर्वीच स्थानांतरित आणि भाषांतरित झाली होती. ती विकीवर आणणे सोपे होते. इतकेच नव्हे तर ती माहिती आधीच बर्यापैकी प्रमाणित असल्याने ती बहुतांशी विश्वसनीयही असते. भारतात ही माहिती जुन्या ग्रंथवाङ्मयामधेच पडून आहे, शिवाय, काही माहिती संस्कृतात किंवा स्थानिक भाषांत असल्याने ती तज्ज्ञांकडून ज्या प्रमाणात भाषांतरित आणि प्रमाणित व्हायला हवी तसे झालेले खूप प्रमाणात झालेले नाही त्यामुळे येणारी माहिती १००% खात्रीशीर नसते. (उदा. बाजूच्या चर्चेतील काली'ज चाइल्ड का वेन्डी'ज चाइल्ड ;-)) लोकवाङ्मय आणि लोककथा वगैरेंचा मुद्दा आणखी भरीचा.
त्यातून केवळ हौसेखातर आणि सामाजिक कृतज्ञतेपोटी ह्या नोंदी (प्रसंगी समकालीन भाषांमध्ये अनुवादित करून) विकीवर चढवणारे हे अत्यंत दुर्मीळ. त्यामुळे स्थानिक इतिहासाच्या नोंदींचा विकीवरचा साठा अत्यंत मर्यादित आणि पुष्कळ अंशी अविश्वसनीय आहे. यामुळेच स्थानिक इतिहासासाठी विकी धुंडाळणे व्यर्थ ठरते, किंवा पुरेसे ठरत नाही.
खरे आहे.
लेख पुन्हा एकदा वाचला.
मंदिरामुळे या पुरातन चैत्यगृह गुंफेच्या भव्य मुखाचे सौंदर्य नीट दिसत नाही असे मला तरी वाटते. परंतु एकवीरा देवीचे मंदिरही खूपच जुने आहे व रायगड जिल्ह्याच्या किनार्यावर मासेमारी करणार्या कोळी मंडळींचे हे एक महत्त्वाचे दैवत आहे
इथे एकवीरा देवीचे देऊळ हे चैत्यगृहापेक्षा नवीन असावे का? कोळी समाजाने आपले मंदिर समुद्रापाशी न बांधता कार्ल्याला का बांधले असावे याबाबत काही माहिती उपलब्ध होते का? (म्हणजे विशेष कारण असावेच असा आग्रह नाही.)
अशा प्रकारची कोरीव शिल्पे कर्नाटकतील ऐहोले किंवा पट्टडकल येथेही बघता येतात. मात्र तेथील शिल्पातील स्त्री-पुरुष व कार्ले येथील शिपातील स्त्री-पुरुष यांच्या शरीराची ठेवण,बांधा, केशरचना, वस्त्रप्रावरणे आणि अंगावरील अलंकार यात बराच फरक दिसून येत असल्याने या परिसरात राहणारे त्या काळचे लोक व ऐहोले-पट्टडकल मधील लोक यांत बराच फरक असला पाहिजे हे स्पष्ट होते.
या विषयी अधिक लिहा. किंवा, दोन फोटो समोर ठेवून तुलना करणारा एखादा लहानसा लेखही चालेल. सोबत दोन्ही शिल्पांचा काळ, त्यात दाखवलेले प्रसंग (असलेच तर) या विषयीही लिहा.
बॉम्बे गॅझेटियर मध्ये दिलेल्या माहितीनुसार (सन१८८५) सध्याचे देऊळ 1866मधे बांधलेले आहे. स्थानिक आख्यायिकेप्रमाणे याच्या आधीचे देऊळ 4पिढ्या जुने होते. कोळी मंडळींनी भेट दिलेल्या देवळाच्या घंटेवर 1857हे साल इंग्रजीमध्ये कोरलेले आहे. स्थानिक दंतकथेप्रमाणे हे देऊळ कार्ले चैत्यगृहापेक्षा पुरातन असून या देवळाची कीर्ती कमी व्हावी म्हणून बौद्ध काळात येथे चैत्य गृह बनवले गेले.
ऐहोले व कार्ले येथील युगुलांचे एक तुलनात्मक छायाचित्र दिले आहे. अंगावरील वस्त्रभूषणे, अलंकार यातील फरक स्पष्टपणे लक्षात येण्यासारखा आहे. केशरचनेमध्ये फरक आहे. कार्ले येथील शिल्पातील स्त्री-पुरुष जास्त थोराड बांध्याचे वाटतात.ऐहोले युगुल नाजुक वाटते. कार्ले शिल्पातील स्त्रीच्या पायातील कडी व कपाळावरील बिंदी खूप मोठी दाखवलेली आहेत.
स्थानिक दंतकथेप्रमाणे हे देऊळ कार्ले चैत्यगृहापेक्षा पुरातन असून या देवळाची कीर्ती कमी व्हावी म्हणून बौद्ध काळात येथे चैत्य गृह बनवले गेले.
हे अशक्य नसावे. पूर्वी एखादे लहान मंदिर असूही शकेल.
ऐहोले व कार्ले येथील युगुलांचे एक तुलनात्मक छायाचित्र दिले आहे. अंगावरील वस्त्रभूषणे, अलंकार यातील फरक स्पष्टपणे लक्षात येण्यासारखा आहे. केशरचनेमध्ये फरक आहे. कार्ले येथील शिल्पातील स्त्री-पुरुष जास्त थोराड बांध्याचे वाटतात.ऐहोले युगुल नाजुक वाटते. कार्ले शिल्पातील स्त्रीच्या पायातील कडी व कपाळावरील बिंदी खूप मोठी दाखवलेली आहेत.
धन्यवाद. फरक लक्षात आला. ऐहोलेची शिल्पकला द.पू. आशियातील शिल्पकलेशी (कंबोडिया वगैरे) अधिक मेळ खाते असे वाटले. चू. भू. द्या. घ्या. आभूषणे आणि मुकुट वगैरे.
हे अशक्य नसावे. पूर्वी एखादे लहान मंदिर असूही शकेल.
कार्ल्याचा चैत्य जवळजवळ २१०० वर्ष जुना आहे. म्हणजे जवळजवळ वैदिक कालखंडातला. त्या संस्कृतीत मंदिरनिर्माणाची प्रथा नव्हती. जरी ही देवता स्थानिक आदिवासींची असली तरी ते तिथे मंदिर नसून धोंडासदृश असे एखादे पूजास्थान असावे.
दुसरे असे की कार्ले लेणी ही बोरघाटाच्या प्राचीन सार्थवाहपथावर उभारली
गेलीत. बाजूलाच बेडसे, भाजे इ. लेण्या आहेत. ह्या प्रदेशावर तेव्हा
सातवाहन - क्षत्रपांचे आलटून पालटून राज्य होते. या दोघाही राज्यकर्त्यांचा
बौद्ध धर्माला राजाश्रय असला तरी हे दोघेही बौद्ध नव्हते. तेव्हा आधीच्या
पूजास्थानाच्या नजीक चैत्य बांधला जाईल असे वाटत नाही.
किंवा आधीची पूजास्थाने उद्धस्त करून् तिथे चैत्य/ विहार बांधल्याचे कुठेही उल्लेख नाहीत.
ऐहोलेची शिल्पकला द.पू. आशियातील शिल्पकलेशी (कंबोडिया वगैरे) अधिक मेळ खाते असे वाटले. चू. भू. द्या. घ्या. आभूषणे आणि मुकुट वगैरे.
कार्ल्याची शिल्पकला अतिप्राचीन आहे. तर ऐहोळेची साधारण ६ व्या /७ व्या शतकातली. कार्ल्याच्या काळी मूर्तीकला फारशी नव्हतीच. नंतरच्या काळात ती हळूहळू समृद्ध होत जाऊन तिला ऐश्वर्य प्राप्त झाले. राम - कृष्णाच्या दैवतीकरणाचा काळ हाच.
जरी ही देवता स्थानिक आदिवासींची असली तरी ते तिथे मंदिर नसून धोंडासदृश असे एखादे पूजास्थान असावे.
शक्य आहे पण राज्यकर्ते बौद्ध नसले आणि हिंदू असले तरीही पूजास्थानाच्या नजीक चैत्य बांधला जाईल किंवा नाही याविषयी साशंकता असू शकते. याचे कारण आदिवासींच्या देवतांना तत्कालिन राजे किती महत्त्व देत? किंवा देत का नाही याविषयी माहिती मिळत नसावी. तरीही, पूजास्थाने उद्ध्वस्त करून चैत्यगृह बांधले नसावे हे पटण्याजोगे आहे कारण तसे इतरत्र झाल्याचे पुरावे नाहीत.
तसेही कोणाचे कुलदैवत कुठे असावे ह्याचे नियम किंवा अंदाज लागू शकत नाहीत. मानवी स्थलांतराच्या अभ्यासातून ते थोडेफार उमगू शकते. कोंकणस्थांची कुलदेवता जोगेश्वरी ही मराठवाड्यातल्या 'जोगाईचे आंबे' इथे असते. राजस्थान-गुजरातेतल्या लोहाणा-पांचाळांची हिंगजलाज माता बलुचिस्तानात असते. देशस्थांचा व्यंकटेश दक्षिणेला असतो.कश्मीरातल्या पंडितांचे गोव्यातल्या एका मठाशी नाते असते (होते)वगैरे वगैरे.
हेच टंकायला आलो होतो. राजवाड्यांच्या महिकावतीची बखर ह्या पुस्तकाची एक
सुंदर ओळखमाला जालावर पूर्वी प्रकाशित झालेली आहे, त्यातही हेच दिलेले
आहे.
माझे निरिक्षण :- कोंढाणा किल्ल्याचा अधिकृत उल्लेख तुघलकाच्या
स्वारीदरम्यान प्रथम आटढळतो तो "कुंधियाना" ह्या नावाने. १२९० च्या दशकात
दिल्लीपुरतीच सत्ता असलेले एक राज्य अल्लौद्दीन खिल्जी-मलिक काफूर ह्यांना
मिळालेले. त्यांनी आजूबाजूला हल्ले करत अफाट, अतिप्रचंड असा राज्यविस्तार
केला.दिल्लीपासून सर्वप्रथम जयपूर--अजमेर-मेवडा-मारवाखाणि मग गुजरात,
मांडूगड्(म प्र मध्ये धार जवळ)इथे झपाट्याने मोहिमा काढत तो भाग प्रथमच
बाहेरच्या मुस्लिम सत्तेखाली आणलेला. ह्यावेळपर्यंत mainland India मध्ये
इस्लामपूर्व (हिंदू??)राजे राज्य करित. पश्चिम भारतात राजपूत, मध्य नागरी
भागात यादव, दक्षिणेत चोळ-पांड्य-पल्लव-होयसळ-श्रवणबेळगोळवाले गंग वगैरे.
खिल्जीने त्याकाळात झपाट्याने हल्ले करत दोनेक दशकातच सर्वत्र,लाहोरपासून
ते पार मदुरैपर्यंत मुस्लिम सत्ता स्थापित केली. पण ही सत्ता म्हणजे काही
सलग राज्य नव्हते. तेव्हाची दळणवळणाची साधने लक्षात घेतली तर ते तसे असूही
शकत नव्हते. त्याने सलग जाता येइल असा पॅसेज तयार करत नागरी भाग जिंकले.
कित्येक् डोंगराळ, ट्रायबल इलाके राहिले.
ह्यातच विदर्भातले गोंडही स्वतंत्र होते , नाशिकच्या आसपास भिल्लही ऑटोनॉमस होते अन कित्येक गडकिल्ले कोळ्यांकडे होते.
आपल्याला ब्रिटिशांमुळे मराठे हे warrior clan/martial race म्हणून ठाउक
आहेत. पण मराठा राज्य शिवपूर्व काळात नव्हते तेव्हा इतर कुणीच नव्हते का?
तर होते. स्वतंत्र शहाण्णव मराठा घराणी होती. तशीच कित्येक ठिकाणी कोळी
होते. ही त्याकाळात लढवय्यी जमात होती. ह्यातलेच काही लोक समुद्रकिनारी
गेले त्यांना "समुद्र कोळी" /मच्छिमार म्हणतात. मुरुडा जंजिरा हा शिवाजी
महाराजांनी कधीही न जिंकलेला किल्ला काही जंजिर्याच्या सिद्दीने बांधलेला
नव्हता. सिद्दी येण्यापूर्वी तो कोळ्यांच्या ताब्यात होता. (बहुदा रामभाउ
कोळी हा तिहला प्रमुख होता.)तसेच कोंढाणाही कोळ्यांच्या ताब्यत् होता.
तुघलकाने तो जिंकल्यावर काही सर्वच्या सर्व कोळी नष्ट झाले नाहित. कित्येक
तिथेच लढाउ शिपाई, नम्हणून नव्याने सैन्यात दाखल झाले. आजही कोंढाण्याच्या
खाली कोळ्यांची एक वस्ती दिसते. एक मंदिरही आसपास आहे म्हणतात. पण हे कोळी
समुद्र कोळी नव्हेत. लोहगड वगैरे इतर नाणेघाट सह्याद्रीच्या कडेने उभे
असलेले कित्येक् इतर दुर्गम किल्ले हे ही त्यावेळी कोळ्यांच्या ताब्यात
असावेत.(कोळी हे यादवांची नॉमिनल चाकरी राखून असावेत.यादव गेले की हे
स्वतंत्र) हे राज्यकर्ते कोळी. भारतात एकसलग राज्ये नव्हती. विविध जाती
जमाती होत्या. आपण ट्रायबल म्हणू शकतो अशी काहिशी रचना होती. अफगाण व
आसपासच्या बहगात नाही का मुघल सत्तेला कायम आफ्रिदी, तिक्रिती , हजारा अशा
कित्येक टोळ्यांचा सामना करावा लागे, तसाच. फक्त ह्या टोळ्या मुस्लिम
नव्हत्या.
ता. क :- हां हे घ्या डिटेल्स. मूळ प्रतिसाद दिल्यावर आत्ता कुठे हवी माहिती मिळाली.
ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि
त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर
लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच
समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे
मूळ वंशज कोल हे होते.
"महिकावतीची बखर" ह्या राजवाड्यांच्या पुस्तकाची एक सुंदर ओळख् इथे
मिळाली.(ऑथेंटिक इतिहासाबद्दल कुणाला वाचण्यात रस असेल तर त्याने वाचलेच
पाहिजे असे हे धागे:-
http://mimarathi.net/node/6389 ह्या अकराव्या भागतलीच दोनेक् वाक्ये इटालिक्स करुन् दिलीत वर.)
शिवाय विकिवर "राघोजी भांगरे" ह्या व्यक्तीबद्दल् वाचताना मिळालेली ही वाक्ये :-
राघोजींचा जन्म महादेव कोळी जमाती झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या
नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या
परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या
शिलेदार्या, वतनदार्या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव
कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.
म्हणजेच कोळ्यांकडे काही किल्ले, जहागिरी तरी एकोणीसाव्या शतकापर्यंत तरी असावेतच.
कार्ल्याचे एक जुने चित्र - (ब्रिटिश लायब्ररीवरून साभार)
'Ekvera'. Coloured aquatint by Thomas Daniell after James Wales.
डिसेंबर १७९२ मध्ये चित्रकार जेम्स वेल्स याने या ठिकाणाला भेट दिली तेव्हा हे एकवीरा या नावे ओळखले जात होते. या चित्रमालिकेविषयी अधिक माहिती ब्रिटिश लायब्ररीवर या ठिकाणी मिळेल.
त्या काळातील देऊळ खूपच चांगले वाटते आहे. सध्या यावर पत्र्याचे छप्पर असून अतिशय भडक रंगात सर्व रंगवलेले आहे.तसेच भक्तगणांनी रांगेत नीट उभे रहावे म्हणून पिंजरे बांधलेले आहेत.
अजून एक लेख् मिपावर नुकताच मिळाला "चैत्यगृहे" नावाने.("http://www.misalpav.com/node/22230")
तिथे थेट पर्सेपोलिटन(इराणी) संस्कृतीची छापही इथ्लया लेण्यामध्ये बघायला मिळते असं लिहिलय.
पुस्तक - देवांच्याही मागें बायकामुलांचीं लचांडें, लेखक :- प्रबोधनकार ठाकरे, मधील काही भाग -
लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची, तेथल्या त्या ओ-या, ते दिवाणखाने, ते स्तूप, सा-या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा. तेथें बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नांव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेहि म्हणतात. ही म्हणजे पांडवांची बहीण. हिच्यासाठीं भीमानें एका रात्रीत हीं लेणीं कोरून काढली. हिचा दुसरा इतिहास काय, तर ही रेणुका, परशुरामाची आई. स्वतः परशुरामच जेथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तेथे त्याची ही एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार?
चैत्री पौर्णिमेची कार्ल्याची जत्रा मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जाता. नवसापायीं शेळ्यामेंढ्यांचे कळपच्या कळप फडशा पाडून हीं कार्ला लेणी रक्तांत न्हाऊन निघतात. जो प्रकार कार्ला येथें, तोच प्रकार इतर सर्व लेण्यांत. जेथे असले बोकडखाऊ देवदेवींचे देऊळ नाहीं, तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धां कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यांत अखंड सुरू असलेले हे `देवळी’ प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय?
संदर्भ - पुस्तक देवांच्याही मागें बायकामुलांचीं लचांडेंआणखी अवांतर : या विहार तलावापासून आठ दहा मैलांच्या परिसरात कान्हेरी लेणी आहेत. आज जरी हे अंतर खूप दूरचे वाटत असले आणि कान्हेरी लेण्यांचा आणि विहार गावाचा संबंध असणे शक्य नाही असेही वाटत असले तरी दीड हजार वर्षांपूर्वी; पंचक्रोशी म्हणजे जवळचेच अंतर मानले जात असणार/होते.
या वरून आणखीही एक निष्कर्ष काढता येईल. ज्या अर्थी हे गाव एकवीरागाव किंवा तत्सम नावाने ओळखले न जाता विहारगाव म्हणून ओळखले जात होते त्या अर्थी एकवीरेपेक्षा बौद्धविहारांचा प्रभाव अति दूरच्या भूतकाळात अधिक असावा. तसेही राजवाडे हे बुद्ध आणि बौद्धांविषयी पूर्वग्रह आणि आकस बाळगून होते आणि सनातन धर्माचे अभिमानी होते हे त्यांच्या लिखाणातून लपत नाही. (अर्थात त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कार्याचे महत्त्व अजिबात कमी होत नाही हे खरेच.) त्यामुळे एकवीरेला अधिक प्राचीन ठरवण्याच्या (निदान) राजवाड्यांच्या संशोधनाबाबत शंका घेता येऊ शकेल.
एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग २
कार्ले गुंफांमध्ये फिरताना लक्षात येते की अनेक ठिकाणी म्हणजे भिंतीवरील दोन बास रिलिफ शिल्पांमध्ये, शिल्पातील रेलिंगवर, स्तंभांवर अशा अनेक ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत. एक रोचक गोष्ट अशी की दिसणारे हे सर्व शिलालेख फक्त प्राकृत भाषेत आणि ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले आहेत. यावरून ज्या कालखंडामध्ये हे शिलालेख लिहिले गेले आहेत त्याची अचूक कल्पना येते. यापैकी बहुतांशी शिलालेख (एकवीस पैकी वीस) फक्त गुंफा क्रमांक 8 किंवा चैत्यगृह या ठिकाणीच कोरलेले आहेत. कार्ले बौद्ध मठाचा खर्च व तेथे निर्माण केलेल्या सर्व गुंफा व त्यातील शिल्पे यांच्या निर्मितीचा खर्च हा पूर्णपणे त्या कालातील सत्ताधीश व धनिक यांच्याकडून मिळालेल्या देणग्यांवरच चालत असे. यामुळे या चैत्यगृहातील बहुतेक शिलालेख, ते शिल्प किंवा स्तंभ हा कोणाच्या देणगीतून मिळालेल्या धनातून बनवले गेले आहेत हे फक्त सांगतात.त्यामुळे त्या काळातील काही गावांची नावे व व्यक्तींची नावे एवढीच माहिती त्यातून मिळत असल्याने या शिलालेखांना फारसे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे असे मला तरी वाटत नाही. चैत्यगृहातील 15 शिलालेख या प्रकारचे आहेत व त्यामुळे या 15 शिलालेखांचा विचार मी येथे केलेला नाही.
चैत्यगृहातील उरलेले 5 शिलालेख व गुंफा क्रमांक 12 येथील एक महत्त्वाचा शिलालेख यांना ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे असे मला वाटते व म्हणून या शिलालेखांचा विचार मी येथे करणार आहे. या उरलेल्या 6 शिलालेखांपैकी 4 शिलालेखात, कोणत्या राजाच्या कारकीर्दीतील कोणत्या वर्षी ते शिल्प किंवा विहार खोदण्यासाठी धन दिले गेले याचा स्पष्ट उल्लेख असल्याने सातवाहन साम्राज्याच्या इतिहासाशी या शिलालेखांचा थेट संबंध जोडता येतो. नाणेघाटावरील माझ्या लेखात काही सातवाहन राजांबद्दलची माहिती आपण बघितली होती. सम्राट अशोकाच्या निधनानंतर सातवाहन घराणे दख्खनवर किंवा भारतीय द्वीपकल्पावर राज्य करू लागले असे म्हणता येते. सम्राट अशोकाने खोदवून घेतलेल्या एका शिलालेखात या राजघराण्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने सातवाहन राजे सम्राट अशोकाचे मांडलिक राजे म्हणून दख्खनवर राज्य आधीपासूनच करत होते हे दिसून येते. सम्राटाच्या निधनानंतर लगेचच बहुदा सातवाहन राजांनी आपण सार्वभौम राजे असल्याचे जाहीर केलेले असावे. इ.स.पूर्व 220 ते179 या कालखंडात होऊन गेलेले या राजघराण्यातील पहिले तीन राजे; सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी यांच्याबद्दलची माहिती आपण नाणेघाटावरील लेखात बघितली आहे.
मात्र या ठिकाणी उरलेल्या दोन शिलालेखांचा मी प्रथम विचार करणार आहे.
यापैकी पहिला शिलालेख समोरच्या व्हरांड्यातील डाव्या कडेच्या भिंतीवर
कोरलेल्या तीन हत्तींच्या मस्तकावरील रेलिंगवर कोरलेला आहे. या शिलालेखाचा
मी प्रथम विचार करतो आहे कारण हा शिलालेख हे चैत्यगृह कोणाच्या देणगीतून
बनवले गेले आहे याचा स्पष्ट निर्देश करतो आहे. मूळ प्राकृतमधील शब्द असे
आहेत.
बर्जेस याने केलेले या शिलालेखाचे भाषांतर खालीलप्रमाणे आहे.
या शिलालेखाचे महत्त्व लक्षात येण्यासाठी थोड्या खुलाशाची गरज आहे असे वाटते. प्रचलित मराठीमध्ये या शिलालेखाचा अर्थ असा लावता येतो की संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात सर्वोत्तम असलेले हे चैत्यगृह वैजयंती येथील एक श्रेष्ठी भूतपाल यांनी स्थापन केले. वैजयंती हे नाव कर्नाटकमधील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील बनवासी या गावाचे पुरातन काळातील नाव आहे. श्रेष्ठी म्हणजे कोणीतरी VIP किंवा महत्त्वाची व्यक्ती! म्हणजे हा शिलालेख आपल्याला सांगतो आहे की बनवासी गावातील भूतपाल या VIP व्यक्तीने हे चैत्यगृह स्थापन केले आणि ते भारतवर्षातील सर्वोत्तम आहे. या बनवासी गावात कोणतेही पुरातन बौद्ध मठ वगैरे मिळालेले नाहीत. फक्त या कालखंडापासून अस्तित्वात असलेले मधुकेश्वर म्हणून एक शिव मंदीर आहे. या मंदीराला, शिल्प कोरलेली एक शिला, सातवाहन राजा हरितापुत शतकर्णी (इ.स.दुसरे शतक) याने दान केली होती व ही शिला आपल्याला आजही बघण्यास मिळते. या बनवासी गावापासून सुमारे 550 किमी (350मैल) अंतरावर असलेल्या या बौद्ध चैत्यगृहाची स्थापना करण्यासाठी बनवासी गावातील एक कोणी श्रेष्ठी एवढ्या उदारपणे मदत करतो आणि यानंतर 100 वर्षांनी राज्यावर आलेला सातवाहन राजा या दूरवरच्या मंदिराला एका शिल्प शिला भेट देतो; याचा अर्थ, इ.स.पहिले शतक या कालखंडापासूनच (ज्यावेळी कार्ले चैत्यगृह निर्माण केले गेले.) बनवासी गाव सातवाहन राजांच्या शासनाखाली तरी होते किंवा निदान बनवासी गाव व सातवाहन राजे यांचा काहीतरी निकट संबंध होता असा लावता येणे शक्य आहे. सातवाहन साम्राज्य कोठेपर्यंत पसरलेले होते त्याचा हा एक अप्रत्यक्ष पुरावाच म्हणता येईल.
मी विचारात घेत असलेला दुसरा शिलालेख चैत्यगृहाच्या बाहेर असलेल्या अशोक
स्तंभावर कोरलेला आहे. प्राकृतमधील या शिलालेखाचे शब्द असे आहेत.
बर्जेस भाषांतराप्रमाणे याचा अर्थ असा लावता येतो.
अर्थ अगदी सरळ असल्याने त्यावर भाष्य करण्याची काहीच जरूरी नाही. सुरूवातीस या शिलालेखातील अग्निमित्र ही व्यक्ती म्हणजे शुंग राजघराण्यातील दुसरा राजा हा असला पाहिजे असे भाष्य बुहलर सारख्या काही इतिहास संशोधकांनी केलेले आहे.(कालिदासाच्या मालविकाग्निमित्र नाटकाचा हाच राजा नायक आहे.) परंतु या राजाचा काल इ.स.पूर्व 152 ते 141 हा असल्याने या स्तंभावर कोरलेले नाव या राजाचे नाही हे मान्य झाले. या स्तंभावरील अग्निमित्र हा एक महारथी आहे. सातवाहन शासनकालात महारथी हे नाव धारण करणार्या व्यक्ती या राज्याच्या एका भागाचे संपूर्ण शासन सांभाळणार्या Governor समान पदावरील व्यक्ती असत. नाणेघाट गुंफेत महारथी "त्रिनक यिरो" याचा पुतळाच राजे,राणी व राजपुत्र यांच्या पंक्तीत उभारलेला होता व त्या पुतळ्याच्या डोक्यावर हे नावही कोरलेले होते. कित्येक महारथी स्वत:च्या नावाची नाणी पाडून घेत असत. अशी नाणी आजही उपलब्ध आहेत. या महारथी अग्निमित्राने जर स्वत:च्या नावाबरोबर आपल्या राजाचे नाव सुद्धा जर या स्तंभावर कोरून घेतले असते तर आपल्याला कितीतरी जास्त माहिती मिळू शकली असती.
यानंतर आपण उरलेल्या व ते शिलालेख लिहिले गेले त्या वेळी राज्यावर असलेल्या राजांच्या नावाचे उल्लेख असलेल्या 4 शिलालेखांकडे वळूया. 14 क्रमांकाच्या शिलालेखामध्ये "वशिष्ठीपुत्र स्वामी श्री पुलुमयी" या सातवाहन राजाचा ऊलेख आहे. गुंफा क्रमांक 12 मध्ये असलेल्या 20 या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये याच राजाचा उल्लेख "वशिष्ठिपुत्र श्री पुलुमयी" असा केलेला आहे. 19 क्रमांकाच्या शिलालेखात "गौतमीपुत्र सातकर्णी" याच्या नावाचा उल्लेख आहे असे मानले जाते. राजाचे नाव कोरलेले आहे तेथील अक्षरे पुसट झाल्याने दिसू शकत नाहीत. मात्र इतर संदर्भामुळे याच राजाचे नाव तेथे कोरलेले असावे या अंदाजाला पुष्टी मिळू शकते. शिलालेख क्रमांक 13 मध्ये "थोर राजा क्षह(स)रत क्षतप नहापन" राजाच्या नावाचा उल्लेख आहे. परंतु ऐतिहासिक क्रमाने गेले पाहू असता हा नहापन राजा इतर राजांच्या पूर्वी गादीवर होता असे दिसते त्यामुळे शिलालेख क्रमांक 13 चा विचार आपण सर्वप्रथम करुया.
इ.स.पूर्व 220 मध्ये राजा सिमुक याने प्रस्थापित केलेले व त्याचा भाऊ कृष्ण व पुत्र श्री सातकर्णी (नाणेघाट प्रसिद्ध) यांनी वर्धित केलेले सातवाहन साम्राज्य पुढील वारसदार राजांच्या अधिपत्याखाली अबाधित राहिले. या पुढच्या कालखंडात लंबोदर(इ.स.पूर्व 87-69),अपिलक (इ.स.पूर्व 69-57),मेघस्वाती (इ.स.पूर्व 57-39)आणि स्वाती (इ.स.पूर्व 30-21) या राजांनी राज्य केले. मात्र या पुढची 40 वर्षे या साम्राज्यासाठी संपूर्ण अनागोंदी कारभार, बंडे व गोंधळाची ठरली. राज्याच्या वारसदारांचे आपापसातील कलह, अंतर्गत भांडणे, परदेशी सैन्याची आक्रमणे आणि बंडे यामुळे ही राजसत्ता या काळात अगदी खिळखिळी झाली होती. या 40 वर्षात 5 राजे गादीवर आले व गेले. इ.स.22 मध्ये अरिष्टक हा राजा गादीवर आला व अतिशय आकुंचित झालेल्या सातवाहन साम्राज्यावर त्याने पुढील 25वर्षे किंवा इ.स.47 पर्यंत राज्य केले. या राजाच्या अखेरच्या दिवसात, गुजराथ व काठेवाड भागात आपली सत्ता प्रस्थापित करण्यात आधीच सफल झालेला शक क्षत्रप "भुमक" याने सातवाहन साम्राज्याचा भाग असलेल्या माळवा प्रांतावर स्वारी केली व अरिष्टक राजाच्या सैन्याचा पराभव करून माळवा प्रांत ताब्यात घेतला.
क्षत्रप "भुमक" याचा वारसदार इ.स. 55 ते 60 या कालात कधीतरी सत्तेवर आला. मात्र तो भुमकाचा पुत्र होता की नाही यासंबंधी काहीच माहिती उपलब्ध नाही. इ.स.70 पर्यंत या पराक्रमी राजाने सातवाहनांकडून पूर्व माळवा (आकार), पश्चिम माळवा (अवंती), कोकण (अपरान्त) आणि उत्तर व मध्य महाराष्ट्र हे भाग जिंकून घेतले. या शिवाय त्याचे राज्य आधीच उत्तर गुजराथ, काठेवाड आणि पार अजमेर पर्यंतचा मध्य राजस्थानचा भाग या प्रदेशात विस्तारलेले होतेच. सातवाहनांवरील विजयानंतर हे राज्य उत्तरेला अजमेर ते दक्षिणेला पुणे,पश्चिमेला काठेवाड मधील द्वारका ते पूर्वेला मध्यप्रदेशातील सागर या चार सीमांपर्यंत विस्तारले.
क्षत्रप भुमक याचा वारसदार असलेल्या व या विस्तीर्ण राज्याचा कर्ता होता "क्षहरत किंवा क्षसरत क्षत्रप नहापन".या राजाच्या नावाचा उल्लेख, शिलालेख क्रमांक 13 मध्ये असल्याचे आपण आधीच पाहिलेले आहे.
(क्रमश:)
6 जुलै 2012
(क्षमस्व: माझ्या फ्लिकर खात्यातील 200 छायाचित्रांची मर्यादा ओलांडली गेली असल्याने या लेखासोबतची छायाचित्रे मला येथे देता आलेली नाहीत. ती पहाण्यात ज्यांना रस असेल ते माझ्या http://www.akshardhool.com/2012/06/traces-of-empire-rock-cut-buddhist_21... या ब्लॉगवर जाऊन ही छायाचित्रे बघू शकतात.)
कार्ले चैत्यगृहात बाहेरील पडदा व बाजू यावर बुद्ध शिल्पे बर्याच् नंतर म्हणजे महायान पंथ रूढ झाल्यावर बसवलेली आहेत. (साधारण इ.स. 200) कार्ले मठ शुएन झांग याच्या भारत भेटीच्या वेळी अस्तित्वात नसावा कारण तो कार्ले मठाबद्दल काहीच लिहित नाही. त्याने फक्त (माझ्या मताप्रमाणे ) नाशिक येथील पांडवलेणी बद्दल उल्लेख केलेला आहे.
या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर इ.स.400 पर्यंत या मठात राबता असावा असे मला तरी वाटते.
शिलालेख लिहितेवेळी ते भविष्यात इतरांना माहिती, इतिहास पुरवतील या दूरदृष्टीने लिहिले गेले नसावे. अकाउंटींग, दानपत्रे आणि घोषणा इतकेच त्यांचे स्वरूप असावे. बहुधा यामुळे या त्रोटक शिलालेखांवरून संदर्भ लावणे आणि संबंध जोडणे थोडेफार कठीण पडत असावे.
हाही भाग आवडला. फोटो लेखांसोबत असते तर बरे झाले असते. चित्रांमुळे तुमच्या ब्लॉगवर लेख वाचणे अधिक सुकर होते.
अतिशय उत्तम भाग.
शिलालेख क्र. १३ चे मूळ स्वरूप मिळेल काय?
नाशिक लेण्यातील (पांडवलेण्यातील) नहपान क्षत्रपाचा जावई ऋषभदत्ताच्या
शिलालेखात नहपानाचा उल्लेख क्षत्रप म्हणून् आला आहे तर त्याच्या
कारकिर्दीचे वर्ष ४२ असे नोंदवलेले आहे.
तर जुन्नरच्या मानमोडी लेण्यांमधील् शिलालेखात नहपान क्षत्रपाचा उल्लेख महाक्षत्रप म्हणून येतो.
[रञो] महाखतपस सामिनहपानस
[आ]मतस वछतगोतस अयमस
[दे]यधम च [पो]ढि मटपो च पुञथय वसे ४० [+] ६ कतो |
राजा महाक्षत्रप स्वामी नहपानाच्या वत्सगोत्री अर्यम अमात्याने हे टाके व हा मंडप (विहार) पुण्याप्राप्तीसाठी धर्मदाय म्हणून वर्ष ४६ मध्ये केला.
पांडवलेण्यातील आणि जुन्नरच्या ह्या शिलालेखांवरून ४ वर्षात नहपान क्षत्रपावरून महाक्षत्रप पदापर्यंत वर चढला. कदाचित सातवाहनांचे खूपसे राज्य त्याने मिळवल्याने हा किताब त्याला (कुषाणांकडून?) मिळालेला असू शकतो.
पण त्याचे हे महाक्षत्रपपद फार काळ टिकले नाही. लवकरच गौतमीपुत्र सातकर्णीने नाशिकच्या डोंगररांगांमध्ये नहपानाचा संपूर्ण पराभव करून त्याचा निर्वंश केला व आपले राज्य परत मिळवले.
अवांतरः ही शक ही कालगणना कुषाणसम्राट कनिष्काने सुरु केली होती व क्षत्रपांनी (शकांनी) त्याचे निष्ठेने पालन केले असे म.म. वा. वि. मिराशी व इतरही अनेक संशोधकांचे मत आहे व याला क्षत्रपांच्या शिलालेखातील कालगणनेचा पुरावा आहे. परंतु शकनिर्माता गौतमीपुत्रालाचा समजले जाते जे तद्दन चुकीचे असावे.
एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 3
मगध देशामध्ये राज्य करणार्या शुंग राजघराण्याची इ.स.पूर्व 26
मध्ये संपुष्टात आलेली कारकीर्द व कुषाणांचा इ.स. नंतरच्या पहिल्या
शतकामध्ये झालेला उदय या दोन घटनांच्या मधल्या कालखंडातील उत्तर व वायव्य
भारताचा इतिहास, फार अल्प माहिती उपलब्ध असल्याने, बराचसा अज्ञातच आहे असे
म्हणता येते. इ.स.पूर्व 170 मध्ये कुषाण (Yueh-chi) या नावाने ओळखल्या
जाणार्या भटक्या टोळ्यांना चीनच्या वायव्य भागातून पिटाळून लावून त्यांना
पश्चिमेकडे प्रस्थान करण्यास भाग पाडले गेले. या टोळ्यांच्या पश्चिमेकडच्या
प्रस्थानात त्यांची प्रथम उझबेकीस्तान मधील सिर दर्या (Syr Darya)
नदीच्या उत्तरेला वसाहत करून राहणार्या शक किंवा शे (Saka or Scythians or
Se) या दुसर्या टोळीच्या लोकांशी गाठ पडली. हा प्रदेश सुपीक असल्याने
साहजिकच या दोन्ही टोळ्यांमध्ये युद्धे होऊन त्यात कुषाण किंवा Yueh-chi
टोळ्यांनी, शक टोळ्यांना सिर दर्या नदीच्या खोर्यातून हाकलून लावले व या
टोळ्या तेथे स्थायिक झाल्या. पराभूत शक टोळ्यांनी दक्षिणेकडे हेलमंड
(Helmand)नदीच्या खोर्यात आपले बस्तान बसवले. अफगाणिस्तानातील सध्याच्या
सिस्तान(Sistan) या शहराजवळ असलेला या नदीच्या खोर्याचा भाग शकस्तान
(Sakastan) या नावानेच ओळखला जाऊ लागला. काही कालानंतर Yueh-chi टोळ्या
द्क्षिणेकडे सरकल्या व त्यांनी शक टोळ्यांना शकस्तान मधूनही आणखी
दक्षिणेकडे पिटाळण्यास सुरुवात केली. शक टोळ्या इ.स.पूर्व 90 ते 60 या
कालात कधीतरी भारतामध्ये उत्तरेकडून आल्या. मौस किंवा मोगा (Maues or
Moga) हा भारतातील पहिला शक सम्राट; त्याने पाडलेल्या नाण्यांमुळे
इतिहासकारांना माहिती आहे. सिस्तान मधून प्रयाण करून त्याने प्रथम सिंधू
नदीचे खोरे व मुखाचा प्रदेश ताब्यात घेतला. या नंतर शकांनी सिंधू खोरे व
पंजाब मधे आपले बस्तान बसवले व शक साम्राज्य भारतात प्रस्थापित केले.
पहिल्या शतकात, कुषाणांचा उदय होईपर्यंत, शक राज्यकर्ते उत्तर व वायव्य
भारतावर राज्य करत होते.
शक राज्यकर्त्यांपैकी एक पाती याच कालखंडात पश्चिम भारतावर आपले राज्य
स्थापण्यात यशस्वी झाली. मात्र हे शक राज्यकर्ते स्वत:ला क्षत्रप म्हणूनच
ओळखत असत. त्यांनी उत्तरेकडील सिंध व पंजाब मधील शक राज्यकर्त्यांचे
मांडलिक किंवा feudatory governors म्हणूनच राज्य केले. पुढे पेशवाई मध्ये
ज्या प्रमाणे संपूर्ण सत्ता हातात असूनही पेशव्यांनी सातार्याच्या
महाराजाचे पंतप्रधान पेशवे म्हणून राज्यकारभार पाहिला त्या पद्धतीचीच बहुदा
ही व्यवस्था होती. उत्तरेकडे शक राजांची राजसत्ता उलथवून कुषाण राजसत्ता
स्थापन झाली तेंव्हा पश्चिम भारतातील शक राज्यकर्त्यांनी त्यांचे मांडलिक
म्हणून स्वत:ला घोषित केले. क्षत्रप(Ksatrapa) हा शब्द मुळात इराणी शब्द
क्षत्रपवंश (Ksatrapavans) या शब्दावरून आलेला आहे. अखमद राजांच्या पुरातन
लेखांत प्रांतीय राज्यपालांना (provincial governors) क्षत्रपवंश या
शब्दाने उल्लेखिलेले आहे. क्षत्रप शब्दाच्या या परदेशी मूळावरून, पश्चिम
भारतातील क्षत्रप राज्यकर्ते, मुळात परकीय असण्याच्या शक्यतेला चांगलीच
पुष्टी मिळते. क्षत्रपांच्यापैकी सर्वात प्राचीन राजघराणे हे क्षहरत किंवा
क्षसरत (Ksaharata) या नावाने ओळखले जाते. आधी बाघितल्याप्रमाणे, भुमक
(Bhumaka) हा या राजघराण्याचा सर्वात आधीच्या काळातला म्हणून परिचित असलेला
राजा आहे. नहापन (Nahapana) हा भुमकानंतर राजा म्हणून गादीवर आला. भुमक व
नहापन यांच्यामधील नाते हे ज्ञात नसले तरी नहापन भुमकाचा पुत्र असण्याची
शक्यता नाकारता येत नाही. नहापन साधारण इ.स. 55 मध्ये गादीवर आला आणि
त्याने इ.स. 105 पर्यंतच्या प्रदीर्घ कालावधीत राजसत्ता अनुभवली. या काळात
नहापनाने आपले राज्य माळवा, दक्षिण गुजराथ, कोंकण व उत्तर महाराष्ट्र या
भागापर्यंत वाढवले. राज्याचा हा विस्तार त्याने प्रामुख्याने सातवाहनांचे
राज्य जिंकून केला.
नहापनाची कन्या दक्षमित्रा हिचा विवाह ऋषभदत्त किंवा उषभदत्त याच्याबरोबर
झालेला होता. त्यांच्या पुत्राचे नाव मित्रदेवनक असे होते. ( कार्ले येथील
चैत्यगृहातील डाव्या बाजूच्या सातव्या स्तंभावर, या उषभदत्तपुत्र
मित्रदेवनकाचे नाव कोरलेले आहे. या स्तंभावरील शिलालेखाचा दोन कारणांसाठी
विशेष उल्लेख केला पाहिजे. पहिले कारण म्हणजे प्रचलित पद्धतीनुसार या
मित्रदेवनकाने आपल्या नावाचा उल्लेख दक्षमित्रापुत्र असा न करता पित्याचे
नाव लावून उषभदत्तपुत्र असा केला आहे. दुसरे कारण म्हणजे हा मित्रदेवनक आपण
धेनुकाकट, या अजूनपर्यंत तरी शोध न लागलेल्या, गावाचा रहिवासी असल्याचे
सांगतो आहे. धेनुकाकट ही नहापनाच्या राज्याच्या व उषभदत्त व्हाइसरॉय
असलेल्या प्रांताची राजधानी असण्याची यामुळे शक्यता वाटते.) उषभदत्त किंवा
ऋषभदत्त याचे नाव जरी भारतीय वाटत असले तरी मुळात तो शक किंवा परकीयच होता व
दक्षिण गुजराथ, भडोच ते सोपारा हा उत्तर कोंकणातील भाग आणि महाराष्ट्राचे
नाशिक व पुणे जिल्हे या सर्व भागांचा राज्यकारभार, नहापनाचा व्हाइसरॉय
(viceroy) म्हणून चालवत असे. ऋषभदत्त हा सढळ हाताने धार्मिक स्थळांना
देणग्या देत असे व याचसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने दिलेल्या देणग्या व
दानांचा दूरदूर ठिकाणी पसरलेल्या अनेक शिलालेखांत उल्लेख सापडतो. कदाचित
आपण परकीय राज्यकर्ता असल्याने या देणग्या देण्याने स्थानिक जनतेला
आपल्याबद्दल आत्मियता वाटावी हे कारणही या देणग्यांमागे असू शकते.
कार्ले येथील 13क्रमांकाचा शिलालेख याच पद्धती प्रमाणे उषभदत्तने कार्ले मठातील भिख्खू:ना दिलेल्या देणग्यांचे एक दानपत्र आहे. याबरोबरच आपण किती दानशूर आहोत हे ही लोकांना पटवून देण्याचा तो येथे प्रयत्न करताना दिसतो आहे.
मूळ प्राकृतातील लेख असा आहे.
(2) गोसतसहसदेण नदिया बणासयं सुवण(ति) रयकरण (देवा)ण ब्रम्हणानंसोळस गा-
(3) मदे(न) पभासे पूततिथे ब्रम्हणाणं अठभायाप(देण)गावसापि त्रिसतसहसं
(4) दाययिता वलूरकेसु लेणवासान पवजितान चातुदिससघस
(4) यापणय गामो करजिको दतो सवानं(व)सावासितानं
ई.सेनार्टच्या भाषांतराप्रमाणे हा शिलालेख सांगतो की
या शिलालेखाचे प्रचलित मराठीमध्ये भाषांतर केले तर साधारण असे होईल.
काही खुलासा केल्यावर या शिलालेखाचा अर्थ स्पष्ट होतो. बाणसा या नावाच्या दोन नद्या या कालात अस्तित्वात होत्या. पहिली नदी गुजरातच्या अबु पर्वतावरून उगम पावून कच्छ्च्या रणात समुद्राला जाऊन मिळत असे. तर दुसरी नदी पूर्व राजस्थानमध्ये उगम पावून चंबळ नदीला जाऊन मिळत असे. यापैकी एका नदीवर या ऋषभदत्ताने एक तीर्थक्षेत्र निर्माण केले होते. सोमनाथ मंदिराजवळच्या गावात राहणार्या 8ब्राम्हणांचा विवाहखर्च याने केला होता. परंतु माझ्या दृष्टीने या शिलालेखाचे खरे महत्त्व हे आहे की हा शिलालेख, आपण जिंकलेल्या प्रदेशातील संस्कृतीशी, तिथल्या चालीरितींचे पालन करून, आपण किती एकजीव झालो आहोत हे दाखवण्याचा शक राज्यकर्त्यांचा हा एक प्रयत्न आहे. मात्र मूळ शिलालेख अतिशय खराब अवस्थेत असल्याने प्रत्येक शब्दनशब्द सत्य असेल असे मानता येणार नाही. मात्र नाशिक किंवा इतर ठिकाणच्या ऋषभदत्ताच्या शिलालेखांवरून साधारण हा अर्थ काढता येईल असे वाटते.
यानंतर मी 19 क्रमांकाच्या शिलालेखाकडे वळतो. हा शिलालेख, बाह्य
व्हरांडा व चैत्यगृह यामध्ये असलेल्या पडद्याच्या समोरील पृष्ठभागावर
(नंतरच्या काळात बसवल्या गेलेल्या) बुद्धमूर्तीच्या वरील भागावर आणि या
पडद्याला असलेले मध्यवर्ती द्वार व उजव्या हाताचे द्वार यामध्ये कोरलेला
आहे. हा शिलालेख मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो कारण वर निर्देश केलेल्या
शिलालेखाच्या (क्रमांक 13 ) कालानंतर झालेल्या एका महत्त्वाच्या ऐतिहासिक
घटनेचा, हा शिलालेख मूक साक्षीदार आहे. वर मी म्हटल्याप्रमाणे, क्षत्रप
नहापन इ.स. 55 मध्ये राज्यावर आला व त्याने इ.स. 86 पर्यंत सततच्या
युद्धांमध्ये सातवाहन सैन्याचा पराभव करून, सातवाहन साम्राज्याचा
महाराष्ट्र, कोकण व दक्षिण गुजराथ मधील बहुतेक प्रदेश जिंकून घेतला. शक
राज्यकर्ते भारतीय नसून अफगाणिस्तानातून आलेले असल्याने, नहापनाच्या
विजयानंतर हा भाग परकीय राज्यसत्तेच्या अंमलखाली किंवा पारतंत्र्यात गेला
होता असे म्हणता येते. या कालात, हल मंतलक, पुरिंद्र्सेन, सुंदर, सातकर्णी,
चकोर स्वातीकर्ण आणि शिवस्वाती या राजांनी उरल्या-सुरल्या सातवाहन
साम्राज्यावर राज्य केले होते.
इ.स. 86 मध्ये, शिवस्वाती या राजानंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा सातवाहन
गादीवर आरूढ झाला व दख्खनमधील तत्कालीन राजकीय परिस्थितीला वेगळेच वळण
मिळाले. शिवस्वाती या आधीच्या राजाबरोबर गौतमीपुत्राचे काही नातेसंबंध होते
किंवा नाही हे ज्ञात नाही. मात्र त्याच्या राज्यारोहणाच्या वेळी सातवाहन
साम्राज्याचे ग्रह सर्वात नीच स्थानावर पोचलेले होते हे खात्रीलायकपणे
म्हणता येते. नहापनाने सातवाहन राज्याचे अनेक प्रांत जिंकून घेऊन त्यावर
पूर्ण स्वामित्व मिळवलेले होते. उत्तरेला कुषाण राजा कनिष्क हा सत्तेवर आला
होता व तो पूर्वेकडून आक्रमण करून सातवाहन राज्याचा मिळेल तो भाग गिळंकृत
करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत, अतिशय
तेजस्वी व आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या या राजाने, उच्च दर्जाचे व्यक्तिगत
शौर्य, रणनीती आणि सेनानेतृत्व यांचे प्रदर्शन करून नहापनाच्या ताब्यात
असलेला सातवाहन साम्राज्याचा प्रदेश तर परत जिंकून घेतलाच परंतु युद्धकक्षा
नहापनाच्या राज्यामध्ये नेऊन काठेवाड व आग्नेय राजस्थानमधील कुकुर
प्रांतही जिंकून घेतला. गौतमीपुत्र सातकर्णी याच्या नहापनावरच्या विजयानंतर
नहापन राजाचे तर उच्चाटन झालेच पण त्याचा क्षहरत किंवा क्षसरत राजवंशही
नष्ट झाला. गौतमीपुत्र सातकर्णी राजाचे नहापन राजा विरूद्धचे हे युद्ध
म्हणजे महाराष्ट्राचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते आणि नंतरच्या काळात
शिवाजी महाराजांनी अदिलशाही व मुघली साम्राज्यंविरूद्ध केलेल्या स्वराज्य
स्थापनेच्या युद्धाइतकेच हे ही युद्ध महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने
महत्त्वपूर्ण होते असे मला वाटते.
एवढ्या विवेचनानंतर आपण परत एकदा 19 क्रमांकाच्या शिलालेखाकडे वळूया. हा शिलालेख ज्या राजाच्या कारकिर्दीत खोदला गेला आहे त्याचे नाव दुर्दैवाने कालौघात नष्ट झालेले आहे. मात्र मजकुरावरून, हा शिलालेख 13क्रमांकाच्या किंवा राजा नहापनाच्या कालानंतर लिहिला गेल्याचे स्पष्ट होते. 13क्रमांकाच्या शिलालेखात करजिका हे ग्राम भिख्खूंच्या उदरनिर्वाहासाठी दान दिल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचे आपण बघितले आहे. हा शिलालेख परत एकदा हे ग्राम याच कारणासाठी इनाम दिले असल्याचे सांगतो आहे. याचा स्पष्ट अर्थ असा लावता येतो की दुसरी राजवट आलेली असल्याने आधीच्या राजवटीत दिली गेलेली इनामे, नवीन राजवटीत तशीच चालू ठेवण्यासाठी नवे शासकीय आदेश आवश्यक होते व ते दिले गेल्याचे हे एक रेकॉर्ड आहे. लाभार्थींजवळ नवा आदेश काढल्याचा पुरावा हवा म्हणून हा शिलालेख कार्ले येथे कोरलेला आहे.
मूळ प्राकृतमधील शिलालेखाची प्रत मला मिळू शकली नाही. ई. सेनार्टने केलेल्या भाषांतराप्रमाणे शिलालेखातील मजकूर असा आहे.
या शिलालेखावरून हे स्पष्ट होते की शिवस्कंदगुप्त या शासकीय लिपिकाने, 14व्या वर्षातील हेमंत ऋतूच्या 4थ्या पंधरवड्यातील पहिल्या दिवशी, विजयी झालेल्या राजाच्या तोंडी आज्ञेप्रमाणे, ही सूचना काढलेली आहे. या सूचनेप्रमाणे मामदा किंवा मावळ जिल्ह्यातील करजका गाव हे वेलुरका मठातील भिख्खूंच्या उदरनिर्वाहासाठी इनाम गाव म्हणून दिलेले आहे आणि या गावात राजाच्या अधिकार्यांच्या प्रवेशावर प्रतिबंध असून या गावाला सर्वप्रकारचे संरक्षण दिलेले आहे हे स्पष्ट होते.
या शिलालेखामध्ये निर्देश केलेले 14 वे वर्ष हे इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वाटते. शके 14 हे वर्ष म्हणजे इ.स. 92 हे वर्ष येते. या वर्षी म्हणजे राज्याभिषेक झाल्यापासून फक्त 6वर्षात गौतमीपुत्र सातकर्णी राजाने सध्याच्या पुणे जिल्ह्याचा हा भाग, शक राजवटीपासून मुक्त केल्याचा हा स्पष्ट पुरावा आहे. व या नोंदीमुळेच हा शिलालेख याच राजाच्या कारकिर्दीत खोदला गेला असला पहिजे असे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो.
क्रमश:
12जुलै 2012
(क्षमस्व: माझ्या फ्लिकर खात्यातील 200 छायाचित्रांची मर्यादा ओलांडली गेली असल्याने या लेखासोबतची छायाचित्रे मला येथे देता आलेली नाहीत. ती पहाण्यात ज्यांना रस असेल ते माझ्या http://www.akshardhool.com/2012/06/traces-of-empire-rock-cut-buddhist_25... या ब्लॉगवर जाऊन ही छायाचित्रे बघू शकतात.)
धेनुकाकट म्हणजे सध्याचे डहाणू असावे. आंध्रप्रदेशातील अजून एका शहरालाही धेनुकाकट मानले जाते. किंबहुना या नावाची दोन शहरे असावीत. पैकी क्षत्रपांचा पश्चिम किनारपट्टीवरील वावर बघता उपरोक्त ठिकाण डहाणू हेच असावे. तेव्हाच्या व्यापारात हे बंदर भरभराटीला आलेले होतेच.
शिलालेख क्र्. १९ चे प्राकृत रूप पुढीलप्रमाणे (संदर्भ . वा. वि. मिराशी )
(१) . . . . . . . . . . .[आनपयति] [*] मामाडे अमच परगत . मसु एथ लेनेसु वालुरकेसु वाथवान
(२) पवजितान भिखुन निकायस महास[घि]यान यपनय एथ मामालाहा उतरेमगे [गामे] करजके[सु*]
(३)भिखुहले[ल] ददम [|*] एतेस तु गाम करजके भिखुहल ओयपापेहि [|] एतस चस
(४) गामस करजकान भिखुहलपरिहार वितराम [|] अपावेस अनोमस पारिहारिक च [|*] एतेहि न परिहारेहि परिहरह [|] एतस चस गामे करजकेसु
(५)भिखुहलपरिहारे च एथ निबधापेहि [|*] अवियेन आनत . . . छतो विजयखधावारे दतो ठे रञा [|*] पटिका सव १० [+*] [८]**
(६) वा प ४ दिव १ सिवखदगुतेन कटा [|]
** ब्युह्ररने हे चिन्ह '४' चे मानले आहे. सेनार्टला ते संशयास्पद वाटले तरी त्यानेही तेच दिले आहे. पण ते '८' चे द्योतक असावे असे रॅप्सनने दाखवले आहे.
धेनुकाकट म्हणजे डहाणू असण्याची खूपच शक्यता वाटते. क्षत्रपांचे राज्य मध्य प्रदेशातील सागर या ठिकाणापर्यंतच सीमीत असल्याची नोंद आहे. त्यामुळे आंन्ध्र प्रदेशातील गाव धेनुकाकट किंवा धेनुककट असण्याची शक्यता खूपच कमी. या शिवाय डहाणू जवळील भाग क्षत्रपांच्या ताब्यात होताच.
महाराष्ट्रामधील डहाणू आणि आजूबाजूचा सीमावर्ती प्रदेश पुष्कळसा गुजराती प्रभावाखाली आहे. गुजरातीमध्ये डहाणू साठी 'ढाणुं' असा शब्द लिहिलेला वाचला आहे. हे तर मला ठाणे (आणि अंतिमतः स्थान )या शब्दाशी साधर्म्य दाखवणारे वाटते.
नहापन् क्षत्रपाची राजधानी भडोच येथे बहुदा होती असे मानले जाते. उत्तर कोकण व पुणे नाशिक हे जिल्हे त्याच्या राज्याचे सर्वात दक्षिणेकडचे जिल्हे असल्याने या जिल्ह्यांसाठी नियुक्त व्हाइसरॉयचे निवासस्थान डहाणूला असणे तर्कसंगत आहे. धेनुकाकट येथे वास्तव्य असलेल्या आणखी काही लोकांनी,ज्यात 2 ग्रीक (यवन) आणि काही इराणी नावे आहेत, कार्ले येथील स्तंभ दान केलेले आहेत. या कारणांसाठी धेनुकाकट हे गाव फारसे दूर नसावे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात तर मुळीच नसावे असे मला वाटते.
एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 4
सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या 24 वर्षाच्या राज्यकालानंतर इ.स.110 मध्ये त्याचा पुत्र वशिष्ठीपुत्र पुळुमावी हा सातवाहनांच्या गादीवर आला. पुळुमावीने 28 वर्षे राज्य केले. इ.स. 115ते 125 या कालखंडात राज्यावर असलेल्या उज्जैन येथील क्षत्रप राजा चष्टन याचा तो समकालीन होता. उत्तरेकडील पर्थियन सम्राटाने चष्टन याला सातवाहनांचा बिमोड करून दख्खन परत जिंकून घेण्यासाठी पाठवले तेंव्हा तो अजमेर येथे होता. चष्टन क्षत्रपाने चढाई करून माळव्यामधील उज्जैन व त्या पाठोपाठ कच्छ व उत्तर गुजराथ हे भाग पुळुमावी कडून जिंकून घेतले व तो उज्जैन मधून राज्यकारभार पाहू लागला. पुळुमावी या युद्धात पराभूत झाल्याने माळवा व उत्तर गुजराथ हे भाग आपल्या राज्यातून गेल्याचे नाईलाजाने त्याला बघत बसावे लागले. मात्र राज्याचा आणखी कोणताही भाग हातातून जाणार नाही याची काळजी तो घेऊ लागला. दरम्यान चष्टन राजाचा मृत्यू झाल्याने त्याचा मुलगा जयदमन हा गादीवर आला. आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात पुळुमावीने जयदमनचा पराभव करून त्याला परत मांडलिक केले असावे असे मानले जाते. पुळुमावीच्या राज्यकालाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध असल्याने तो किंवा त्या कालातील सातवाहन साम्राज्याचा इतिहास बराचसा अज्ञातच आहे. परंतु जी तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे त्यावरून अतिशय कर्मठ हिंदू असलेला पुळुमावी राजा आपल्या कर्तुत्ववान वडिलांचा यथार्थ वारसदार होता असे दिसते. सर्व धर्मांबद्दल समभाव बाळगण्याचे आपल्या वडिलांचे धोरण त्याने पुढे चालवले असावे असे दिसते. अनेक बौद्ध मठांना त्याने सढळ हाताने देणग्या दिल्याचे आढळून येते.
कार्ले येथील 14 क्रमांकाच्या शिलालेखात कार्ले बौद्ध मठाला एक गाव इनाम म्हणून दिल्याची नोंद आहे. प्राकृतमधील हा शिलालेख असा आहे.
1.सिधं [I ] रञो वसिठिपुतस सामिसिरि [पु][ळुमावि]स
सवछरे सतमे [गि]म्हपखे पचमे
2. [दि]वसे पथमे एताय पुवाय ओखळ्कियान महारथिस
कोसिकिपुतस मितदेवस पुतन
3. [म] हारथिना वासिठिपुतेन सोमदेवेन गामो दतो वलुरकसघस
वलुरकलेतात सकरूकरो सदेय
4. मेयो [ I]
बर्जेस याने केलेल्या भाषांतराप्रमाणे या शिलालेखाचा मजकूर याप्रमाणे आहे.
“King Vasisthiputa, the illustrious lord (Swami Shree) (Pulumavi) in the year 7th of summer the fifth fortnight and first day. On that day , a great warrior, Vasithiputa Somadeva, son of the great warrior of Okhalakiyas, Kosikiputa Mitadeva gave a village to the Sangha at Valuraka”
शिलालेखाचा अर्थ सहज समजण्यासारखा आहे. ओखळक येथील महारथी कौशिकीपुत्र मित्रदेव याचा पुत्र महारथी वासिष्ठीपुत्र सोमदेव याने एक गाव वलुरक लेण्यातील वलुरक संघाला दिल्याचे यात नमूद केलेले आहे. हा गाव लहान मोठ्या करांसह व देय (रोख नाणी) व मेय (धान्यादिक) यांसह दिलेला आहे. प्र्स्तुत शिलालेखाचा काल वासिष्ठीपुत्र पुळुमावि याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातील पाचव्या ग्रीष्म पक्षातील प्रथम दिवस हा असल्याचेही येथे नमूद केलेले आहे.
कार्ले येथील 20 क्रमंकाचा शिलालेख हा मुख्य चैत्यगृहामध्ये नसून बौद्ध भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या 12क्रमांकाच्या विहारामधील 2क्रमांकाच्या द्वाराच्या वरील बाजूस कोरलेला आहे.
1.सिधं रञो वासिठिपुतस सिरिपुळुमाविस सवछरे चतुर्विसे
हेमंतान पखे ततिये दिवसे बि-
2.तिये उपासकस हरफरणस सेतफरणपुत्तस्य सो [व] सकस्य अबुला-
माय वथवस्य इम देयधम म[ड] पो
3.नवगभ माहासघियानं परिगहो सघे चातुदिसे दिन मातापितुनं
पुजा[ये] सवसतानं हितसुघस्थये एकविसे स-
4.वछरे निठितो सहेत च मे पुन बुधरखितेन मातर चस्य
[उ]पासिकाय बुधरखितस मातु देयधंम पाठो अनो
बर्जेसच्या भाषांतराप्रमाणे या शिलालेखातील मजकूर याप्रमाणे आहे.
“ To the perfect! The king Vasisthiputa, the illustrious _Shree) Pulimavi in the year (of his reigh) twenty four, in the third fortnight of the winter months, the second day. This meritorious gift of a nine celled-mandapa by the (Upasaka) layman Harapharans, son of Satapharana, a Sovaska, native of Abulama, for the possesion of Sangha of the mahasanghas of the four quarters. For the continuance in welfare and happiness of father and mother abd all people and living beings. Established in 21st year and with me Budharakhita and his mother Upasika. And in addition the meritorious gift of another passage by the mother of Budharakhita”
या शिलालेखातील महत्त्वाचा वाटणारा भाग म्हणजे हरफरण व त्याचे वडील
असलेले सतफरण या दोन व्यक्तींची नावे. ही दोन्ही नावे भारतीय वाटत नाहीत.
बर्जेसच्या मताने ही नावे पार्थियन वाटतात. त्याच प्रमाणे या व्यक्ती जेथून
आलेल्या होत्या ते अबुलामा हे गाव भारतातील असेल असे वाटत नाही. पुळुमवी
राजाच्या काळात सातवाहन साम्राज्याला सतत पार्थिअन सम्राटाचा क्षत्रप
असलेल्या राजा चष्टन याच्या आक्रमणाचे भय होते. त्यामुळे या काळात
महाराष्ट्राता असलेल्या एक बौद्ध मठाला दोन पार्थियन व्यक्तींनी दिलेली ही
देणगी मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटते.
या लेखमालिकेत उल्लेख आलेल्या सर्व राजांनी आपली छबी असलेली नाणी आपापल्या
कारकिर्दीमध्ये पाडलेली होती. या नाण्यांवरून हे राजे कसे दिसत असत याची
कल्पना येऊ शकते. कार्ले गुंफांमधील शिलालेख त्या काळच्या इतिहासावर फारसा
प्रकाश टाकू शकत नसले तरी ते खोदले गेल्याचा कालसमय निश्चित करू शकतात.
यामुळे इ.स.पहिल्या शतकामध्ये महाराष्ट्रात वास्तव्य करणार्या स्थानिक
जनतेचे आयुष्य कसे असेल? ते कोणत्या प्रकारचा पेहराव करत असत याची थोडीफार
तरी कल्पना नक्कीच येऊ शकते. कार्ले गुंफांचे तेच महत्त्व आहे असे मला
वाटते.
समाप्त.
लेखात उल्लेख केलेला पार्थियन सम्राट कोण हे कळते/ले का?
उपक्रमींना ही पद्धत् फारशी रुचत् नाहीये असे वाटते त्यामुळे या लेखमालिकेतील् पितळखोरे व अजिंठा लेण्यांसंबंधीचे पुढचे भाग् उपक्रमवर् टाकताना परत् एकदा विचार् केला पाहिजे असे वाटते.
छे! छे! असे काही नसावे. जर लोक तुम्हाला सूचना देत असतील तर ते तुमचे लेख अधिक उठावदार व्हायला किंवा तुम्ही "जमत नाही" असा उल्लेख केल्याने मदत करायला. जर जमत नसेल तर तुमच्या ब्लॉगवर जाऊन बघतीलच पण इथेच फोटो दिलेत तर लेख उठावदार होईल.
उत्तर् व वायव्य भारतात शकांचे साम्राज्य इ.स.पूर्व 90ते 60 या कालात कधीतरी आले व इ.स. 80 ते90 च्या सुमारास कुषाणांनी हा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला असे वाटते. या मधल्या कालात शकांनंतर, पार्थिअन् व पहलवी राजे या भागात् राज्य् करत् होते. यापैकी कोणत्या राजाने क्षत्रप् चष्टनाला पुळुमावी विरुद्ध् मोहिम् काढण्याची आङ्या दिली ते सांगणे कठीण् आहे. परंतु सनावळ बघता हा राजा गोंडोफेरेस असू शकतो किंवा कोणी पहलवी राजा असू शकतो. कुषाण राजा कनिष्क किंवा त्याच्या आधीचा राजा विमा काडफिसेस सुद्धा असू शकतो. सांगणे खूपच कठिण आहे.
उत्तम् सुरु आहे.
अवांतर शंका क्र १ :- मानववंश शास्त्र दृष्टीने शक = सिथियन हे बरोबर का?(मागील भागांत शकांचा उल्लेख होता, म्हणून विचारले.)
आणि सिथियन हे आजच्या अनेक राजपूत घराण्यांचे पूर्वज; हे ही बरोबर का?
कारण तसे असेल तर शकांचे भारतीयीकरण झाले असे म्हणणे ठीक; पण शकांना पिटाळून लावले, शकांपासून मुक्ती मिळ्वली असे
बरेच जण म्हणतात, ते बरोबर कसे?
अवांतर शंका क्र २ :- पर्थियन म्हणजे इराणच्या उत्तर पूर्व भागाच्या
आसपास(पश्चिम उत्तर अफगाणिस्तान व् त्यापलीकडील मध्य आशिया) असणार्या
पठारी भागातील जमाती ना?
काहीजण दक्षिणेतील पल्लव राजवंशाची नाळ पर्थिअयनांशी जोडतात, म्हणून विचारले.
अवांतर शंका क्र३ :- शिलालेखातील भाषा आजच्या मराठीच्या थोडीही आसपासची वाटत नाही. सातवाहन कालात मराठीची पायाभरणी होउन गेली होती असे ऐकले होते.(तिकडे "अभिजात भाषा" वरील फडात वाचले.)
1.. शक म्हणजे सिथिअन हे बरोबर आहे. त्यांचे राज्य राजस्थान मध्ये बराच काळ होते त्यामुळे काही राजपुत राजघराण्यात त्यांचा वंश आला असण्याची शक्यता आहे. परंतु असे जनरलायझेशन करता येईल असे वाटत नाही. जिनिऑलॉजिकल संशोधनाप्रमाणे सर्व उत्तर भारतीय एकाच हॅपलो गटाचे आहेत हे सिद्ध झालेले आहे.
2. पल्लव राजे मुळात कोठून आले हे कसे सांगणार? जर चीन मधून आलेले शक व कुषाण किंवा युरोप मधून आलेले इंग्रज भारतावर राज्य करू शकले तर अफगाणिस्तान मधल्या पार्थियन लोकांनी दक्षिणेकडे राज्य स्थापण्यात काहीच असंभव नाही.
3. प्राकृत भाषा ही सर्व भारतीय (तमिळ वगळून) भाषांचे उगमस्थान आहे.संस्कृत मधून प्राकृत आले की प्राकृत मधून संस्कृत हे आधी कोंबडी का अंडे हे सांगण्यासारखेच आहे. शिलालेखांच्यातील प्राकृत वा मराठी यात खूपच साधर्म्य आहे असे मला तरी वाटते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.