एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 1
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेली सह्याद्री किंवा पश्चिम घाट पर्वतराजी ही सर्वपरिचित आहे. किनारपट्टीला साधारणपणे समांतर असलेली ही सह्याद्री पर्वतराजी, भारताच्या दक्षिण टोकापासून ते पार महाराष्ट्रामधील नाशिक शहराच्या थोड्या उत्तरे पर्यंत विस्तारलेली आहे. मात्र नाशिक शहराच्या उत्तरेला असलेल्या याच स्थानापासून पूर्वेकडे, सह्याद्री पर्वतराजीला काटकोन करून, विस्तारत जाणारी आणखी एक पर्वतराजी फार कमी लोकांना माहिती आहे. सातमाला किंवा इंध्याद्री पर्वत या नावाने ओळखली जाणारी ही पर्वतराजी, दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.
साधारण 2200वर्षांपूवी किंवा इ.स.पूर्व 200या कालात याच पर्वतराजीच्या दक्षिण उतारावर, अतिशय अरूंद व खोल असलेल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण दर्यांमध्ये, दोन बौद्ध मठ स्थापन केले गेले. या दोन्ही दर्यांमध्ये तळाला छोटेखानी नद्या वहात होत्या. दोन्ही दर्या संपूर्णपणे घनदाट जंगलांनी व्यापलेल्या होत्या आणि दर्यांच्या दोन्ही बाजूंना असलेले कडे सरळ रेषेत तुटलेले होते. हे दोन्ही मठ जरी या कालखंडात दख्खनची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान (पैठण) शहराच्या उत्तर दिशेलाच असले तरी या मठांपैकी एक मठ पूर्व दिशेला होता तर एक पश्चिमेकडे होता. हे दोन्ही मठ अतिशय भव्य आणि विशाल दिसतील याच पद्धतीने त्यांचे आराखडे बनवण्यात आलेले होते. बौद्ध धर्माचे वर्चस्व असलेल्या या काळात या दोन्ही मठांना खूप प्रसिद्धी मिळाली व भारतीय उपखंडात त्यांचे नाव सर्वश्रुत झाले. यापैकी पूर्वेकडचा व अजंठा या नावाने ओळखला जाणारा बौद्ध मठ अजूनही म्हणजे 21व्या शतकातही प्रसिद्धच आहे. जगभरातून या ठिकाणी असलेली 1500ते 2000 वर्षांपूर्वीची शिल्पे व भित्तीचित्रे बघण्यासाठी म्हणून पर्यटकांची गर्दी अजिंठ्याला आजही होत असते.
पश्चिमेकडे असलेला दुसरा मठ मात्र आज सर्वस्वी अपरिचित आहे. ज्यांना भारताच्या बौद्धकालीन इतिहासात विशेष रुची किंवा रस आहे असे फारच तुरळक असलेले पर्यटक, या बौद्ध मठाला आज भेट देताना आढळतात. हा बौद्ध मठ आज पितळखोरे गुंफा या नावाने ओळखला जातो. पितळखोरे गुंफांबद्दल, अजंठ्याच्या गुंफाच्या मानाने, सर्वसाधारण पर्यटकांना अज्ञान असण्याला काही कारणे आहेत. पहिले महत्वाचे कारण म्हणजे पितळखोरे दरी ही खोल, अरूंद व कमी लांब पसरलेली असल्याने भेट देण्यासाठी बरीच दुर्गम आहे. अजंठा गुंफा असलेली दरी ही या मानाने उथळ,रूंद आणि एखाद्या घोड्याच्या नालाच्या आकाराची आहे. यामुळे या दरीची एकूण लांबी बरीच जास्त आहे. या कारणामुळे इ.स. नंतर 6व्या शतकापर्यंत अजंठा येथे नवीन नवीन गुंफांची खोदाई चालूच राहिली आणि एकूण 30गुंफा येथे खोदल्या गेल्या. पितळखोरे दरीत मात्र फक्त 14 च गुंफा आहेत. याशिवाय एक दुसरे महत्त्वाचे कारण पितळखोरे गुंफा फारशा माहिती नसण्यामागे आहे. अजंठा आणि पितळखोरे या दोन्ही ठिकाणच्या गुंफा जरी दख्खनचे पठार ज्या काळ्या बॅसॉल्ट पाषाणाचे बनलेले आहे त्यातच खोदलेल्या असल्या तरी पितळखोरे येथील बॅसॉल्ट पाषाण हा जरा मृदू प्रकारातील आहे व हवामान व पाण्याचा मारा यापुढे हा पाषाण तितकासा टिकाव न धरता तो भंग होत असल्याचे दिसून आले आहे. या कारणांमुळे पितळखोरे गुंफा आज अत्यंत खंडप्राय अवस्थेत व भग्न झालेल्या असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असेच म्हणावेसे लागेल. मात्र प्राचीन काळी म्हणजे जेंव्हा भारतात बौद्ध धर्म लोकप्रियतेच्या शिखरावर होता त्यावेळची परिस्थिती अतिशय निराळी होती. पितळखोरे मठ त्यावेळी सर्वज्ञात होता. टॉलेमी याने पितळखोर्याचा ' Petrigala' असा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे तर बौद्ध धर्माच्या इतिहासाची नोंद करणार्या महामयूरी या ग्रंथात पितळखोर्याला 'Pitanglya' असे संबोधले आहे.
मी आता पितळखोरे येथील पुरातन लेण्यांना भेट देण्यासाठी म्हणून निघालो आहे. पितळखोरे लेणी ज्या खोल दरीमध्ये आहेत ती, सातमाला पर्वतराजीच्या डोंगरांच्या मध्ये असलेली, दरी, मुंबई—आग्रा महामार्ग या उत्तर व पश्चिम भारताला जोडणार्या व अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार्या महामार्गावर वसलेल्या चाळिसगाव या शहरापासून 12मैलावर आहेत. असे असले तरी पितळखोरे येथे जाण्यासाठी औरंगाबाद शहरापासून निघणे जास्त सोईचे पडते असे मला वाटते. एकतर औरंगाबाद शहरामध्ये रहाण्यासाठी असलेल्या सुविधा जास्त चांगल्या दर्जाच्या व भरपूर प्रमाणात आहेत आणि अजंठा, वेरूळ व दौलताबाद या सारखी इतर प्रेक्षणीय ठिकाणेही औरंगाबादच्या याच वास्तव्यात बघता येतात. अतिशय सुस्थितीत असलेला व डांबरीकरण केलेला औरंगाबाद- धुळे हा एक रस्ता औरंगाबादकडून उत्तर दिशेला जातो. या रस्त्यावर पुढे दौलताबादचा किल्ला, वेरूळ लेणी सारखी प्रेक्षणीय स्थळे तर वाटेत लागतातच. परंतु या शिवाय, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर व औरंगजेबची कबर ही ठिकाणे सुद्धा या रस्त्यावरून प्रवास करताना मधे थांबून बघता येतात. या रस्त्यावर पर्यटकांना आकर्षित करणारी एवढी प्रेक्षणीय स्थळे आहेत की पितळखोरे येथे आवर्जून बघण्यासारखी लेणी आहेत व तेथे जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता निवडावा लागतो हेच औरंगाबादला भेट देणार्या बहुतेक पर्यटकांना माहीत सुद्धा नसते.
डाव्या बाजूला दिसणारा भव्य दौलताबादचा किल्ला ओलांडून मी आता पुढे निघालो आहे. लगेचच पुढे वेरूळचा घाट लागतो. आसमंतात भरपूर प्रमाणात झाडी असल्याने सगळीकडे हिरवेगार दिसते आहे. उजव्या हाताला डोंगरतळाशी एक मोठा जलाशय दिसतो आहे. वेरूळ घाटाच्या माथ्यावरच्या भागात असलेले खुलताबाद गाव ओलांडून पुढे आल्यावर या रस्त्याला दोन फाटे फुटताना दिसतात. डावीकडचा फाटा नाशिककडे जातो तर उजवीकडचा चाळिसगाव मार्गे धुळ्याला! दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सोडले तर महाराष्ट्रातील बाकी सर्व प्रमुख शहरे औरंगाबादपासून इतक्या जवळच्या अंतरावर आहेत की महाराष्ट्राची राजधानी म्हणून याच परिसरात असलेले पैठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन राजांनी का निवडले असावे याची खात्री पटते. आता रस्ता वेरूळचा घाट उतरू लागला आहे. त्यामुळे गाडी अतिशय वळणे घेत खाली जाते आहे. सध्या सगळ्याच रस्त्यांवर भराव्या लागणारा पथकर या रस्त्यावरही भरावा लागतोच व त्यासाठी गाडी येथे थांबवावी लागते आहे. गाडी घाटपायथ्याशी पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या गर्द झाडीमधून खूप लांब अंतर पसरलेली वेरूळची लेणी मला दिसतात पण बराच पल्ला गाठायचा असल्याने आम्ही पुढे जात राहतो.
घाट ओलांडून पुढे निघाल्यावर आता सभोवतालचे दृष्य महाराष्ट्रातील
सर्वसाधारण ग्रामीण भागात दिसते तसेच दिसू लागले आहे. दोन्ही बाजूंना
दृष्टी पोचेल तिथपर्यंत शेते पसरलेली आहेत. पुष्कळ शेतात कापणीसाठी जवळजवळ
तयार झालेला ऊस ऊभा आहे तर अनेक शेतात मका व कपाशीची छोटी छोटी रोपे काळ्या
मातीतून नुकतीच फुटलेली दिसत आहेत. आसमंतात झाडोराही बर्यापैकी दिसतो
आहे. उत्तर आणि पश्चिम दिशांना दूर क्षितिजावर मला धूसर निळसर हिरवट
दिसणार्या पर्वतांच्या रांगाही दिसत आहेत. आमची गाडी मधून मधून
रस्त्याच्या कडेला वसलेल्या छोट्या छोट्या गावांमधून जाते आहे. यापैकी
बहुतेक गावांच्यात, मी प्रवास करत असलेला औरंगाबाद- धुळे रस्ता हा एकच
रस्ता असल्याचे दिसते आहे. प्रत्येक गावात दिसणारे वाणीसामानाचे वा मोबाईल
फोन आणि सिम कार्ड हे विकणारी दुकाने रस्त्याच्या कडेलाच दिसत आहेत.
साधारण एका तासाच्या प्रवासानंतर आम्हाला कन्नड गाव लागते. या गावाभोवती
असलेली तटबंदी व बुरुज अजूनही सुस्थितीत बघून मला आश्चर्य वाटते. मात्र
हायवे या तटबंदीच्या बाजूने जातो आहे व त्यामुळे गावाची मुख्य बाजारपेठ या
तटबंदीच्या बाहेरच वसलेली आहे. थोडे पुढे गेल्यावर, डाव्या बाजूला जाणारा
एक छोटासा रस्ता लागतो. या रस्त्याच्या कडेला कालीमठाकडे म्हणून बाण
दाखवलेला एक छोटासा फलक मला दिसतो. आम्हाला येथेच वळायचे आहे. हा कालीमठ
म्हणजे कोण्या एका स्वामी प्रणवानंद महाराजांनी स्थापन केलेले एक मंदिर
आहे. या फाट्यापासून साधारण 2किमी अंतरावर असलेले लाल रंगाचे हे मंदिर
दिसायला तरी मोठे आकर्षक वाटते आहे. परंतु आम्ही तसेच पुढे जातो.
साधारणपणे बरा म्हणता येईल असा व एका वेळी एकच वाहन जाऊ शकेल एवढाच रूंद
असलेल्या या रस्त्याने आम्ही साधारण 8किमी तरी पुढे जातो. पुढे अचानक
रस्त्यावर एक प्रवेशद्वाराची कमान, दोन्ही बाजूंना संरक्षक गार्डसच्या
खोल्या व मध्यभागी रस्त्यावर एक मोठे प्रवेशद्वार दिसते. या कमानीवर
लावलेल्या फलकाप्रमाणे, रस्त्याचा यापुढे जाणारा भाग गौताळा वन्य प्राणी
संरक्षित विभागामधून जात असल्याने प्रवेशासाठी वन विभागाची परवानगी घेणे
आवश्यक दिसते आहे. परंतु प्रत्यक्षात तेथे कोणी चिटपाखरूही नाही व
प्रवेशद्वार पूर्णपणे उघडे असल्याचे मला दिसते आहे. एखादा किमी अंतर पुढे
गेल्यावर समोर एक वाहनतळ दिसतो. एका कडेला असलेल्या झाडाखाली चालक गाडी उभी
करतो. ही जागा म्हणजे सभोवती पसरलेल्या एका जंगलवजा भागात वनविभागाने
निर्माण केलेला एक वाहनतळ आहे हे माझ्या लगेच लक्षात येते. परंतु येथे
असलेली बहुसंख्य झाडे वनीकरण करून वाढवलेली आहेत हेही माझ्या लक्षात
आल्यावाचून रहात नाही. काहीही असो! हा भाग अतिशय सृष्टीसौंदर्ययुक्त व
रमणीय आहे यात शंकाच नाही. मी खाली उतरतो. गाडीचा चालक मला समोरच दिसणारा व
बाजूच्या लोखंडी कठड्यासह उत्तम रित्या बांधून काढलेला एक पदपथ दाखवतो व
पितळखोरे लेण्यांकडे जाण्याचा तो मार्ग असल्याचे सांगतो.
या पदपथावरून चालत थोडे पुढे गेल्यावर माझ्या लक्षात येते की एका खोल व अरूंद दरीच्या अगदी कडेवर मी पोचलो आहे. माझ्या समोर, फक्त समोरच्या दरीत, गोलगोल फिरत खाली उतरणार्या पायर्या मला दिसत आहेत. पुरातत्व विभागाने बांधलेल्या, दगडाचा पृष्ठतल व मजबूत लोखंडी कठडा असलेल्या या पायर्या कोठे जात आहेत हे मात्र दिसत नाहीये. समोर दिसणारी दरी संपूर्णपणे हिरव्यागार झाडाझुडुपांखाली झाकलेली दिसते आहे. एकूणच दृष्य अतिशय सुंदर दिसते आहे. समोर दिसणार्या जंगलात, मोठी पाने असलेले सागाचे वृक्ष मला ओळखू येतात. जंगलातील बाकी झाडे काही माझ्या ओळखीची वाटत नाहीत. आपण समोरच्या अज्ञातात काहीतरी साहसी मोहीमेवर निघालो आहोत असे माझ्या मनाला समोरचे दृष्य बघून उगीचच वाटू लागते व त्याच उत्साहात मी पायर्या उतरण्यास सुरूवात करतो.
पायर्या उतरत बरेच अंतर खाली आल्यानंतरही समोर दिसणार्या घनदाट जंगलामुळे पितळखोरे लेण्यांचे कोणतेही दृष्य मला अजूनही दिसू शकलेले नाही. अनंत पायर्या मी उतरलो आहे असे वाटू लागल्यावर अखेरीस लेण्यांचे प्रथम दृष्य माझ्या नजरेसमोर साकार होते आहे. काळ्या कातळाचे कडे दोन्ही बाजूंना असलेली व समोर दिसणारी ही दरी, वक्राकार आकारात पुढे पसरत गेलेली मला दिसते आहे व या वक्राकार असलेल्या समोरच्या काळ्या कातळावरच पितळखोर्याची 8किंवा 10 लेणी पसरलेली आहेत. लेण्यांच्या तोंडांच्या उर्ध्व दिशेकडे उभा कडा दिसतो आहे तर खालच्या बाजूला, दरीच्या खोल तळाला, पाऊसकाळातील पाण्याने फोफावणारी पण सध्या मात्र फारसे पाणी नसलेली एक छोटी नदी दिसते आहे. मी उतरत असलेल्या पायर्या मला याच पावसाळी नदीच्या वरच्या अंगाला असलेल्या एका धबधब्याच्या वरील खडकाळ भागात घेऊन जातात. नदीला पाणी नसल्याने मी ती नदी सहज पार करू शकतो आहे. मात्र तिथला एकूण प्रकार बघता, पितळखोरे ही वरूणराजांच्या कृपाकाळात भेट देण्याची जागा नव्हे याबाबत माझी खात्री पटते आहे.
आणखी थोड्या पायर्या उतरल्यावर, खालच्या खोल नदीवर, पुरातत्व विभागाने बांधलेला एक मजबूत लोखंडी पूल सहजपणे पार करता येतो आहे. पलीकडच्या तीरावर पोहोचल्यानंतर मी समोर बघतो.
समोर दृष्टी टाकल्यावर माझ्या लक्षात येते की मी पितळखोरे लेण्यांपाशी पोहोचलो आहे. माझ्या समोर असलेला कड्याचा भाग एखाद्या अर्धवर्तुळाकार आकाराचा कसा काय दिसतो आहे? म्हणून मी जरा कुतुहलानेच समोर बघतो. मात्र हा समोरचा अर्धवर्तुळाकार आकाराचा कडा, खालच्या अंगाला खोदलेल्या गुहेच्या संपूर्ण छताचा खडक खाली कोसळल्यामुळेच निर्माण झाला असावा असे स्पष्टपणे दिसते आहे. प्रत्यक्षात ही नष्ट झालेली गुहा म्हणजे पितळखोरे लेण्यामधील 1क्रमांकाची गुंफा आहे. गुंफेच्या तळाला बौद्ध भिख्खूंसाठी खोदलेल्या छोट्या छोट्या शयनगृहांच्या पडक्या भिंती व भिख्खूंसाठी पाषाणात कोरलेले मंचक स्पष्टपणे दिसत असल्याने ही गुंफा म्हणजे बौद्ध भिख्खूंच्या रहाण्यासाठी बनवलेला 'विहार' असला पाहिजे हे स्पष्ट आहे.
क्रमश:
दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा
उत्तरेकडून होऊ शकणार्या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक
तटबंदी होती असे म्हणता येते.
हिमालयानं आणि आल्प्सनं(काही प्रमाणात सह्याद्रीनंही) बर्याच
आक्रमणकार्यांना नुसत्या हवामानानं परतायला लावलं, तसं ह्या
पर्वतरांगांमुळं नेहमीच कुणी दूर राहिले वगैरे ऐकले नाही.
खिल्जीही एलिचपूरानंतर हे ओलांडूनच आला, नंतर दिल्लीची मुघल सल्तनतही आदिल-निजाम शाह्यांवर इथूनच कडाडून तुटून पडली.
लिखित उल्लेख नाहीत पण उत्तरेतील मौर्यसत्तेखालीही हा भाग असावाच(दक्षिणेपर्यंतच्या भौगोलिक सलगतेचा विचार केल्यास.)
पितळखोरे मठ त्यावेळी सर्वज्ञात होता. टॉलेमी याने पितळखोर्याचा '
Petrigala' असा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे तर बौद्ध धर्माच्या
इतिहासाची नोंद करणार्या महामयूरी या ग्रंथात पितळखोर्याला 'Pitanglya'
असे संबोधले आहे.
नव्यानेच समजले.
औरंगाबादला भेट देणार्या बहुतेक पर्यटकांना माहीत सुद्धा नसते.
पर्यटक सोडा, औरंगाबादला काही दशके राहूनही, अधूनमधून ह्या भागात फिरायची हौस असूनही बर्याच जणांना तिथे काही असते हे ठाउकच नसते.
डाव्या बाजूला दिसणारा भव्य दौलताबादचा किल्ला ओलांडून मी आता पुढे
निघालो आहे. लगेचच पुढे वेरूळचा घाट लागतो. आसमंतात भरपूर प्रमाणात झाडी
असल्याने सगळीकडे हिरवेगार दिसते आहे. उजव्या हाताला डोंगरतळाशी एक मोठा
जलाशय दिसतो आहे. वेरूळ घाटाच्या माथ्यावरच्या भागात असलेले खुलताबाद गाव
ओलांडून पुढे आल्यावर
गंमत सांगतो. कधी निवांत वेळ असताना तिथे गेलात तर एक करुन बघा.
खुल्ताबादहून पुढे वेरूळपर्यंत गाडीने जायला त्या काळात अर्धाएकतास वगैरे
लागायचा. आम्ही दोन् तीन् वेळेस पायी पोचलो फक्त् दहा-बारा मिनिटात!
योग्य रस्ता माहीत हवा फक्त.
गुंफाच बघत असाल तर एक अनवट जागा सांगतो, त्याच परिसरात आहे. "शरणापूर".
इथे डोंगर् आहे आणि डोंगराच्या मधोमध माणूस जेमतेल् उभा राहील इतपत खोदत
खोदत जागा बनवली आहे. ४-५ हजार स्क्वेअर फूट तरी असावी. मध्ये खांब आहेत,
फारसे नक्षीकाम नाही. पुढे रेणुकेची मूर्ती( शेंदूर् फासलेला दगड) आहे. पण्
आपण् डोंगराच्या आतमध्ये आहोत, ही कल्पनाच भारी वाटते. तुमच्या
अभ्यासाच्या दृष्टीने तिथे काही सापडेल की नाही ठाउक नाही, पण एकदा तरी
अवश्य पहावे असे खोदकाम् आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सोडले तर महाराष्ट्रातील बाकी सर्व
प्रमुख शहरे औरंगाबादपासून इतक्या जवळच्या अंतरावर आहेत की महाराष्ट्राची
राजधानी म्हणून याच परिसरात असलेले पैठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन
राजांनी का निवडले असावे याची खात्री पटते.
छे हो. ती "आजची " मोठी शहरे असतीलही. दीडेक हजार वर्षापूर्वीही तिथंच
वस्ती असेल असे कसे म्हणू शकतो? तेव्हा कल्याण-चौल -महिकावती इकडॅ
समुद्रकिनार्याला, बीड-नांदेड, झालच तर तुमच्याच लेखात आल्याप्रमाणं
नाणेघाटाच्या आसपासचा परिसर (जुन्नर मावळ, जुन्नर पेठ) जिल्हा ही प्रमुख
वस्ती होती. सातारा, सांगली, कोल्हापूर ही "आजची " शहरे तेव्हा वसायची
होती.
घाट ओलांडून पुढे निघाल्यावर आता सभोवतालचे दृष्य महाराष्ट्रातील सर्वसाधारण ग्रामीण भागात दिसते तसेच दिसू लागले आहे. दोन्ही बाजूंना दृष्टी पोचेल तिथपर्यंत शेते पसरलेली आहेत. कुठल्या काळात गेलात म्हणायचं? मी हिरवीगार शेतं सलग पसरलेली प्रथम पुणे आणि आसपासच्या भागातच पाहिली. आमच्याकडे अजूनहे ग्रामीण भाग बराचसा भकास, कोरडा कोरडा जाणवतो वर्षातले बहुतेक काळ.
दरीच्या खोल तळाला, पाऊसकाळातील पाण्याने फोफावणारी पण सध्या मात्र फारसे पाणी नसलेली एक छोटी नदी दिसते आहे.
बहुतेक तो चंदन नाला असावा. तिथं भटाकायला गेलेलं पब्लिक तिथलं पाणी
बिंदास प्यायला वगैरे वापरायचं. चांगलं स्वच्छ, ताजं पाणी असायचं त्याला.
वनविभागाने बिबट्यांची मोजणी करतानाही त्याच्या आसपास, त्याच्या काठानं नजर
ठेवायला सांगितली होती.
--मनोबा
नैसर्गिक तटबंदी होती
हा माझा शोध नाही. बॉम्बे गॅझेटियरच्या नाशिक जिल्ह्याबद्दलच्या खंडात सातमाला पर्वताबद्दल हा उल्लेख आहे.
पैठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन राजांनी का निवडले असावे
पैठण हे गाव कसे मध्यवर्ती आहे एवढेच दाखवण्याचा उद्देश आहे. कोल्हापूरला सातवाहन कालात वस्ती होती हे तिथे सापडलेली नाणी व जवळ सापडलेला शिलालेख यावरून सिद्ध झालेले आहे. या काळात इतरही शहरे होतीच मुंबईजवळचे सोपारा,पुण्याजवळचे जुन्नर, तुम्ही म्हणता तसे बीड, खानदेशातील शहरे आणि नागपूरजवळच्या वैनगंगा नदीकाठी वसलेले शहर ही सगळी होती. पैठण या सर्वांसाठी मध्यवर्तीच होते.
मी पितळखोर्याला जुलै महिन्यात गेलो होतो. या महिन्यात जे मला दिसले त्याची मी नोंद केली आहे.
ठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन राजांनी का निवडले असावे
मध्यवर्ती हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्याशी सहमत आहेच. शिवाय बाजूला बारा महिने वाहणारी नदी, व्यापार केंद्र वगैरे गोष्टीही महत्त्वाच्या. औरंगाबाद वगैरे ही नवी शहरे असतील पण मौर्य साम्राज्यापासून वेगळे झालेल्या तरीही खेटून असणार्या सातवाहन साम्राज्याला तत्कालीन उज्जैन, भडोच, अमरावती वगैरे शहरांसाठीही पैठण हे मध्यवर्ती ठिकाण होते. राजधानीच्या दृष्टीने महत्त्वाचे होते असे वाटते.
पुरातत्त्व खाते एकूणच सगळीकडे ठीक काम करते आहे असे वाटते.
नाही हं! थोडा ढीला कारभार असतो. साफसफाई, रस्ते काढणे हे काम ठीक करतात पण काही रिस्टोर (मराठी गंडलं) करायचं झालं की फारच स्वस्त काम करून टाकतात. थत्ते याला सहमती देतील. ;-)
पैठण हे गाव कसे मध्यवर्ती आहे एवढेच दाखवण्याचा उद्देश आहे.
कोल्हापूरला सातवाहन कालात वस्ती होती हे तिथे सापडलेली नाणी व जवळ
सापडलेला शिलालेख यावरून सिद्ध झालेले आहे.
ओह्. अस्सय होय. नाणी आणि शिलालेख ह्याबद्दल आयडीया नव्हती. म्हणजे
"महायोगपीठे तटे भीमरथ्याम्" असं म्हणवून घेणारा पंढरीचा पांडुरंगच नव्हे
तर मराठी संस्कृतीचे अजून एक प्रतीक असलेली कोल्हापूरची अंबाबाई ही सुद्धा
इतकी प्राचीनच का काय. म्हणजे कोल्हापूर प्राचीन आहे तसच मंदीरही प्राचीन
आहे का?
या काळात इतरही शहरे होतीच मुंबईजवळचे सोपारा,पुण्याजवळचे जुन्नर,
तुम्ही म्हणता तसे बीड, खानदेशातील शहरे आणि नागपूरजवळच्या वैनगंगा नदीकाठी
वसलेले शहर ही सगळी होती. पैठण या सर्वांसाठी मध्यवर्तीच होते.
मान्य. शिवाय ह्यासोबतच नदीकाठचं मोक्याचं ठिकाण असं काहीसं प्रियालीतै म्हणाल्या तेही असेल.
पुरातत्त्व खाते एकूणच सगळीकडे ठीक काम करते आहे असे वाटते.
ह्याबद्द्ल इथे चंदीगडामध्ला अनुभव सांगू इच्छितो. इथे आसपास भटाकण्यासारखं
काय आहे (विशेषतः जे आम्हा बाहेरच्यांना ठाउक नाही असे काहीतरी ) म्हणून
स्थानिक सहकार्यांना विचारले तेव्हा सगळ्यानी कुलु-मनाली नेहमीचीच ठिकाणं
सांगितली. काहींनी हायवेवरील पिझ्झा आणि बर्गरसेंटरही प्रेक्षणीय वगैरे
म्हणून सांगितले.
शेवटॅए कुठून तरी मुघल गार्डन म्हणवल्या जाणार्या पिंजोर गार्डन किंवा
यादविंद्र गार्डनचा पत्त्ता मिळाला. चंदिगडाबाहेर तीसेक किलोमीटार असावे
फक्त.
ते गार्डन बर्याच जणांनी पाहिलेले. अगदि सुंदर्, छान्, नेटाके होते. आत
मध्ये केवळ फुलांची झाडे नसून आमरायाही होत्या. इतर स्थानिक प्रजातीचे
वृक्षही होते. एकत्रित केलेल्या दोन-चार क्रिकेट स्टेडिअम एवढे तरी ते
भव्य असावे. वरतून चिंब , श्रावणात सतत पडणारा पाऊस आणि खाली मस्त मी फिरत
निघालेलो.
तिथे आलेल्या जवळपास कित्येक पर्यटकांस मी सहज बोलणे काढून "भीमादेवी
टेम्पल" पाहण्यास उत्सुक आहात काय असे विचारले, बहुतांशांना(अगदि
चंदिगडाच्या पिढिजात स्थानिकांनाही) ते माहितीच नव्हते! ज्यांना ठाउक होते
त्यांना "तिथे जाउन काय करायचे?" हा रास्त, रोकडा, व्यवहारी सवाल होता.
पण पिंजोरच्या दुकानदार, हाटॅलवाल्यांना मात्र व्यवस्थित माहीत होते.
दोन प्रश्न उद्भवतात भीमादेवी टेम्पल म्हणजे काय? किती दूर् आहे?
तर ते भीमादेवी टेम्पल म्हणजे काय?
तोमर का कुठल्यातरी प्राचीन भारतीय वंशाच्या राजवटीत हजारवर्षाहूनही
पूर्वी पंचपूर(आजचे पिंजोर) शहर भरभराटीस आले होते. त्या राजघराण्याने
बदामी, कोणार्क, खजुराहो इथल्या राजघराण्यांप्रमाणेच एक मंदिर उभारून घेतले
पाषाणाचे. तिथले नक्षीकाम वगैरेही उत्तम होते. इस्लामी आक्रमणात बाराव्या
का तेराव्या शतकात प्रथम त्याची नासधूस करण्यात आली. पुन्हा मुघल कालात
त्याची संपूर्ण् तोडफोड करून शब्दशः धुळीस मिळवण्यात आले. ते मंदिर
(भारतभरातल्या अगणित इतर मंदिरांप्रमाणे)पांडवकालीन मानले जात होते.
पांडवांचे अज्ञातवासात जाण्यापूर्वीचे व तिथून परततानाचे निवासस्थान होते
म्हणतात. नंतर कालौघात नष्टा करण्यात आले. १९७४ साली झालेल्या उत्खननात
शेवटी त्याचे अवशेष खणून काढले गेले तेव्हा बरेच काही हाती लागले.
(शिखराचा तीनेक फूट् उंचीचा सर्वोच्च भाग, खांबांवरील नक्षीकाम केलेले
भाग.सगळे भाग जवळ जवळ तीन-चार् फूट् उंचीचेच् होते. सुंदर असे हजार
बाराशे वर्स्।आपूर्वीचे नक्षीकाम होते.)
मंदिर असे एकसंध अस्तित्वात आज नाही, फक्त् त्याचे जोते(base) तेवढा आहे. बाकीचे तुकडे बाजूच्याच खोल्यांमध्ये ठेवलेत.
किती दूर् आहे?
पिंजोर गार्डानच्या भिंतीला भिंत लागून आहे!
पिंजोर गार्डनच्या तटाबंदितही ह्याचे अवशेष दिसून येतात म्हणे! पण जाण्यात कुणालाच इंटरेस नव्हता.
अजिंठा सर्वांना माहिती आहे पण या गुंफा ज्या पर्वतराजीमध्ये आहेत तिची माहिती फारशी कोणाला नाही
काही गोष्टी फारच अपरिचित भीमादेवी टेम्पलप्रमाणे का राहतात ते समजले नाही.
क्रीडा पत्रकार द्वारकनाथ संझगिरी पाकिस्तानच्या दौर्यावर गेले होते तेव्हा त्यांना दीडेकशे किलोमीटरवरील तक्षशीला विद्यापीठाला भेट द्यायची इच्छा झाल्यावर "तिकडं कशाला जातोस, आम्हीही कधी फारसे गेलो नाही; माझ्या माहितीतल्या लोकांपैकीही कुणी तिकडे गेलेलं नाही " असे पाकिस्तानी मित्राने सांगितले होते.
त्या लोकांना तक्षशीला, तक्षशीला विद्यापीठ, पुरु, आंभी ह्यांची फारच त्रोटक् माहिती होती. असो, फारच अवांतर होतय. क्षमस्व.
एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 2
आधी उल्लेख केल्याप्रमाणे, पितळखोरे दरीत एकूण 14 गुंफा आहेत. अजंठा गुंफांच्या मानाने हा आकडा बराच लहान आहे. त्याचप्रमाणे या गुंफांचा शोध सुद्धा अजंठा गुंफांच्या नंतरच म्हणजे 1853 च्या सुमारास लागलेला आहे. मी आता माझ्या सर्वात उजव्या बाजूस असलेल्या 1 क्रमांकाच्या गुंफेसमोर उभा आहे. माझ्या डाव्या हाताला समोरच्याच कातळकड्यावर खोदलेल्या आणखी 8गुंफा लांबवर पसरत गेलेल्या मला दिसत आहेत. माझ्या मागे असलेल्या खोल दरीच्या पलीकडच्या अंगाला 10ते 14 क्रमांकच्या आणखी 4 गुंफा आहेत.
माझ्या समोर असलेल्या 1ते9क्रमांकांच्या गुंफांची मुखे उत्तरेकडे आहेत आणि मागे असलेल्या बाकीच्या अर्थातच दक्षिणाभिमुख आहेत. चैत्यगृह असलेली माझ्या समोरची 3 क्रमांकाची गुंफा सोडली तर माझ्या समोरच्या बाजूच्या किंवा उत्तराभिमुख सर्व गुंफा या बौद्ध विहार आहेत. तर नदीच्या दुसर्या बाजूस असलेल्या सर्व गुंफा या चैत्यगृहे आहेत व यापैकी 11क्रमांकाच्या चैत्यगृहात, उपासना केले जाणारे (Votive) स्तूप आहेत.
दुर्दैवाने आजमितीला, पितळखोरे येथे असलेल्या सर्व गुंफा मोडतोड झालेल्या व भग्नावस्थेत असलेल्या अशा आहेत. असे जरी असले, तरी जे काय थोडे फार उरले आहे ते बघितल्यावर या गुंफा मूळ अवस्थेत किती भव्य व दिमाखदार दिसत असतील याची सहजपणे कल्पना करता येते. क्रमांक 2 ते 4 या गुंफांच्या समोरचे सामाईक प्रांगण पाषाणामध्ये खोदलेले असले तरी एकाच पातळीवर असल्याने, या गुंफा समान कालावधीतच खोदल्या गेल्या असल्या पाहिजेत याची सहज कल्पना करता येते. पुरातत्त्व विभागाने बांधलेला लोखंडी पूल पार केल्यावर मी, खालच्या उतारापासून 3 ते 5 फूट एवढ्या उंचीवर असलेल्या, याच प्रांगणात थेट येऊन पोहोचलो आहे. माझ्या अगदी समोर, भिख्खूंच्या मोडक्यातोडक्या अवस्थेत असलेल्या कोठड्या, तळाला असलेला, एक तुटलेला कडा दिसतो आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही गुंफा क्रमांक 1 होती. याच्या उजव्या बाजूला गुंफा क्रमांक 2 आहे. ही गुंफा म्हणजे सुद्धा अगदी साध्या स्वरूपात असलेला बौद्ध भिख्खूंचा एक विहार आहे. या विहाराच्या अगदी आतल्या अंगाला, भिख्खूंच्या कोठड्यांची काही द्वारे दिसत आहेत. या विहार गुंफेचा तल हा समोरच्या प्रांगणाच्या पातळीपेक्षा निदान 2ते 3 फूट तरी उंचीवर आहे. व या गुंफातलावर चढून जाण्यासाठी पाषाणातच दोन पायर्या खोदलेल्या आहेत. गुंफा तल आणि समोरचे प्रांगण यांच्या सीमारेषेवर गुंफातलापासून 1 फूटभर तरी वर येणारी व कठड्याचे कार्य करणारी अशी एक भिंत कोरलेली दिसते. या भिंतीच्या बाह्य पृष्ठभागावर उभे खांब व आडवे रेलिंग यांचे डिझाइन कोरलेले दिसते आहे. पितळखोरे येथे असलेल्या एकूण विहारांची संख्या बघता येथे बर्याच मोठ्या संख्येने बौध भिख्खू वस्तीस असले पाहिजेत याची सहज कल्पना करता येते.
3 क्रमांकाची व चैत्यगृह असलेली गुंफा ही दरीच्या या बाजूला असलेल्या गुंफांमध्ये सर्वात महत्त्वाची गुंफा होती. त्यामुळे या चैत्यगृहापासून सुरूवात करावयाचे मी ठरवतो. बौद्धधर्मातील हीनयान पंथाच्या अनुयायांसाठी खोदलेल्या या चैत्यगृहाच्या आतील रचना त्या कालातील वास्तूशास्त्रानुसार व कार्ले येथील चैत्यगृहाप्रमाणेच एकूण दिसते आहे. मात्र हे चैत्यगृह कार्ल्यापेक्षा बरेच लहान आणि बरेच आधी निर्माण झालेले असल्याने तेथे दिसणार्या कोरीवकामासारखे काहीच कोरीवकाम न केलेले, असे दिसते आहे. मात्र अजंठा येथील 9 किंवा 10 क्रमांकाची चैत्यगृहे व हे चैत्यगृह यात विलक्षण साम्य दिसते आहे. अर्थात अजंठा येथील या दोन्ही गुंफा याच कालखंडात खोदलेल्या आहेत व कार्ले येथील चैत्यगृह निदान 100ते 200 वर्षे नंतर खोदलेले आहे ही गोष्टही लक्षात घेणे गरजेचे आहे. 1880 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकात, जेम्स बर्जेस या चैत्यगृहाचे वर्णन करताना लिहितो की,
“ तेथील पाषाणाचा चुरा झाल्याने, मुखाचा संपूर्ण भाग नष्ट झालेले हे चैत्यगृह 34 ½ रूंद व 50फूट तरी खोल आहे. त्याच्या वक्र छताच्या सर्वात ऊंची असलेल्या जागी या चैत्यगृहाची ऊंची 30 ½ फूट आहे. या प्रार्थनागृहाच्या मध्यवर्ती भागाची रूंदी 20फूट 8 इंच आहे व 14 फूट उंच असलेल्या 25 अष्टकोनी खांबांनी हा मध्यवर्ती भाग बाजूच्या पॅसेजेस पासून अलग केला गेला आहे. 11खांब शाबूत स्थितीत आहेत व इतर 14खांबांचे तुकडे पडलेले दिसू शकतात. खांबाच्या वरील छताला लाकडी वक्राकार तुळया बसवलेल्या होत्या. आता फक्त त्या बसवण्यासाठी केली गेलेली पाषाणातील चौकोनी छिद्रे फक्त जागेवर आहेत. बाजूच्या पॅसेजेस वर अजंठ्यातील 10 क्रमांकाच्या गुहेप्रमाणेच, वक्राकार दगडी तुळया खोदलेल्या आहेत. मूळ गुंफा खोदताना, काम चालू झाल्यानंतर, कामगारांना एका ठिकाणी 4-1/2 फूट जाडीचा एक जरासा मृदू असलेला पाषाणाचा स्तर लागलेला असावा. या स्तरामुळे त्यांच्या कामात बर्याच अडचणी निर्माण झाल्याने, स्तूपाच्या जवळपास असलेल्या 20खांबांचा तळाचा भाग त्यांना अधिक मोठा व मजबूत करावा लागला असला पाहिजे. याच कारणासाठी या स्तरामधे बाजूच्या पॅसेजेसचा जो भाग आला तेथे दगडाच्या 6 ते 8 इंच जाड फरशा टाइल्स सारख्या बसवल्या गेल्या होत्या. या सर्व फरशा आता पडून गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्तूपाचा सर्वच भाग या मृदू पाषाण स्तरामध्ये आल्यामुळे तोही पूर्णपणे पडून गेला आहे आणि आता फक्त स्तूपाचा तळाचा भाग शिल्लक उरला आहे. संपूर्ण चैत्यगृह हे बुद्धाचे चेहरे व निरनिराळ्या मुद्रांमधील बुद्ध रूपे यांच्या चित्रांनी रंगवलेले होते. मात्र या सर्व चित्रात बुद्धाच्या शिरावर तिहेरी छत्री रंगवलेली दिसते आहे. अजंठ्यामधील 10 क्रमांकाच्या व पितळखोर्यातील चैत्यगृहाच्या खोदण्याचा कालावधी एकच असल्याने हे सर्व चित्रण बर्याच नंतरच्या कालात केलेले असणार आहे हे उघड आहे. हे चैत्यगृह व अजंठा येथील 10क्रमांकाचे चैत्यगृह या दोन्हींच्या बांधणीत अतिशय साम्य आहे.”
हा अहवाल सुमारे 130वर्षांपूर्वी लिहिलेला आहे हे लक्षात घेता, मला आणखी पडझडीच्या खाणाखुणा समोर दिसत आहेत. पुरातत्त्व विभागाने पडलेल्या सर्व खांबांच्या जागी छताला आधार देण्यासाठी दगडी बांधकाम केलेले चौकोनी खांब उभारलेले दिसत आहेत. परंतु काही मूळ खांब अजूनही दिसू शकत आहेत. मूळ खांबांवर काढलेली चित्रे अधिक जीर्ण झालेली असली त्यांचे मूळ सौंदर्य अजूनही मनात ठसल्याशिवाय रहात नाही. दोन खांबांच्यावर, इ.स. पूर्व दुसर्या शतकातील अक्षर वळणांत, खोदलेले ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहेत. सातवाहन राजांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान (पैठण) या गावामधील दोन धनिकांनी हे खांब खोदण्यासाठी दिलेल्या देणगीचा या शिलालेखांत उल्लेख आहे. खांबांवरील चित्रात अनेक रंगांची वस्त्रे परिधान केलेल्या बुद्धाचे चित्रण आहे. त्यात लाल, गुलाबी व नील वस्त्रे परिधान केलेल्या बुद्धाची चित्रे विशेष खुलून दिसत आहेत. बाजूच्या पॅसेजेसच्या भिंतीवर अनेक बुद्ध मुखे रंगवलेली आहेत. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे शिरस्त्राण परिधान केलेल्या व बुद्धाकडे बघत असलेल्या एका मुलीचे (किंवा मुलाचे) सुंदर चित्र कालौघात टिकून राहिले आहे. या चैत्यगृहात असलेल्या सर्व चित्रात हे छोटे चित्र माझ्या मताने तरी सर्वात सुंदर आहे. पितळखोरे मठाच्या गुंफा मूळ कधीतरी इ.स. पूर्व दुसर्या शतकात खोदल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच सिमुक, कृष्ण किंवा श्री सातकर्णी यापैकी कोणत्या तरी राजांच्या कारकिर्दींमध्ये या खोदलेल्या आहेत असे म्हणता येते. या नंतरच्या काही शतकांनंतर, पितळखोरे मठातील बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य, काही अज्ञात कारणास्तव संपुष्टात आल्यासारखे दिसते. वाकटक राजांच्या कारकिर्दीत, म्हणजेच 5व्या शतकाच्या आसपास या मठात परत एकदा राबता सुरू झाला असावा. चैत्यगृहातील सर्व चित्रे या काळात रंगवलेली आहेत. मात्र या गुंफांतील मूळ शिल्पे आणि कोरीव काम हे मात्र सातवाहन राजांच्या कालातील असल्याने त्या काळातील लोक आणि जनजीवन यांच्यावर या शिल्पांच्यातून काही प्रकाश पडू शकेल अशी आशा मला वाटते आहे. चैत्यगृहात फिरताना बर्जेस यांचा 1880 साली लिहिलेला अहवाल किती अचूकपणे लिहिलेला आहे याची जाणीव मला होते आहे.
चैत्यगृह बघून झाल्यामुळे मी परत समोरच्या प्रांगणात येतो आहे. तिथे मला मॉन्सूनच्या पावसापासून या लेण्यांतील शिल्पे व कोरीवकाम हे अधिक नष्ट होता त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्यावर ताडपत्री पसरून घेण्यासाठी आलेले पुरातत्त्व विभागाचे अधिकारी नशिबाने भेटतात. त्यांच्याशी चर्चा करत असताना मला प्रांगणापासून खाली जमिनीवर जाण्यासाठी असलेल्या 8 किंवा 10 पायर्या दिसतात. मुळात असे दोन पायर्यांचे जिने येथे होते. परंतु त्यातील एक जिना आता संपूर्णपणे नष्ट झालेला दिसतो आहे. पायर्या उतरून खाली जमिनीवर आल्यावर पुरातत्त्व विभागाचा अधिकारी या जिन्याच्या त्रिकोणी आकाराच्या बाजूंकडे माझे लक्ष वेधून घेतो. या त्रिकोणी दगडी पृष्ठभागावर काही बास रिलिफ शिल्पे कोरलेली मला दिसत आहेत. जरा लक्षपूर्वक त्या शिल्पांकडे बघितल्यावर, माझ्या अपेक्षेप्रमाणे, पितळखोरे गुंफा, अनेक लपलेली आश्चर्ये मला आज दर्शवणार आहे याची एक चुणूक मला मिळते आहे. या जिन्याच्या दोन्ही त्रिकोणी बाजूंपैकी प्रत्येक बाजूवर कमी होत जाणार्या उंचीची तीन शिल्पे कोरलेली आहेत. यापैकी सर्वात मोठे शिल्प हे दोन्ही हात उंचावून विकट हास्य करणार्या यक्षाचे आहे. हा यक्ष हात उंचावून जिन्याला आधार देतो आहे असे दर्शवतो आहे. या यक्षाच्या कानाच्या पाळ्या हतीसारख्या विशाल दाखवलेल्या आहेत व त्याची नाभी मोठ्या लंबगोल आकाराची आहे. या यक्षाच्या शेजारी कोरलेली या यक्षाचीच आणखी एक छोटी आवृत्ती आपला हात उंचावून जिन्याला आधार देते आहे. या छोट्या यक्षाच्या शेजारी व त्रिकोणाच्या अगदी कोपर्यात कोरलेले चित्र बघून मात्र मी आश्चर्याने थक्क होतो आहे. ग्रीक पुराणांच्यात वर्णन केलेल्या व पंख असलेल्या पेगॅसस या घोड्याचे शिल्प येथे कोरलेले आहे. इ.स. पूर्व दुसर्या शतकात किंवा बावीसशे वर्षांपूर्वी कोणत्या तरी दूरवरच्या जंगलातील कडेकपारीत खोदलेल्या या बौद्ध मठामध्ये, ग्रीक पुराणातील एक काल्पनिक प्राणी कोरलेला सापडावा हे माझ्या दृष्टीने खरोखरच अद्भुत किंवा कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. अलेक्झांडरच्या भारतातील स्वारी नंतरच्या एका शतकानंतरही भारतात ग्रीक प्रभाव कसा टिकून कसा राहिला होता याचे हे एक मोठे प्रभावी उदाहरण आहे. पितळखोरे मठ, त्या वेळी भारताच्या वायव्येला असलेल्या ग्रीक किंवा यवन प्रभावाशी काही ना काहीतरी स्वरूपात संबंधित होता हे यावरून स्पष्टपणे दिसते आहे.
पितळखोरे गुंफांमध्ये सापडलेला एक मोठ्या आकाराचा यक्ष पुतळा,
दिल्लीमधील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे. परंतु
कोरलेली मूळ स्वरूपातील बास रिलिफ यक्ष शिल्पे अशी पितळखोर्याला बघता
येतील, असे मला स्वप्नात सुद्धा कधी वाटले नसते आणि म्हणूनच येथे मला खूपच
आनंद वाटतो आहे हे सत्य आहे. मागे मी उल्लेख केलेल्या महामयूरी या बौद्ध
इतिहास सांगणार्या ग्रंथात " पितंगालया येथील सांकरी यक्ष" असा एक
उल्लेख सापडतो. कोणी सांगावे! या ग्रंथात वर्णन केलेला यक्ष, दिल्ली
संग्रहालयातील, पूर्णपणे कोरलेला, स्वतंत्रपणे उभा राहू शकणारा, व मोठ्या
आकाराचा असा यक्ष पुतळा आहे की जिन्याच्या बाजूंना कोरलेल्या छोट्या बास
रिलिफ यक्ष शिल्पांचे ते वर्णन आहे.
नवी दिली येथील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शित केलेला पितळखोरे येथील
यक्षाचा पुतळा मात्र खचितच मनावर जास्त छाप उमटवणारा वाटतो. आपल्या
डोक्यावर ठेवलेले पात्र सांभाळण्यासाठी या यक्षाचे दोन्ही हात वर केलेले
दाखवलेले आहेत.परंतु डाव्या हाताचा पुढचा भाग मोडलेला असल्याने वरच्या
पात्राला फक्त उजव्या हाताने आधार दिलेला सध्या दिसतो. यक्षाचे पोट खूप
मोठे दाखवलेले आहे व त्यावर एखाद्या शंकरपाळ्याच्या आकाअराची मोठी व खोल
अशी नाभी दाखवलेली आहे. हात पाय जाड-जाड आणि मांसल व एकूण आकार बुटका असे
या शिल्पाचे स्वरूप आहे. चेहरा गोल आणि मोठा दाखवलेला आहे. डोळे मोठे,
बटबटीत व बाहेर आलेले, लहान नाक व फेंदारलेल्या नाकपुड्या, मोठे कान आणि
जाड ओठ अशी चेहेरेपट्टी आहे. त्याला कसला तरी खूप आनंद झाला असल्याने तो
खदाखदा हसतो आहे. डोक्यावर त्याने अनेक कडी ठेवलेली आहेत. कदाचित वरच्या
पात्राला आधार देण्यासाठी ही असावीत. त्याच्या शरीराचा वरचा भाग अनावृत्त
आहे व त्यावर दोन मानवी शिरे अडकवलेली माला त्याच्या गळात दिसते आहे.
याशिवाय कर्णकुंडले, दंडावर पोची, मनगटावर कडी हे अलंकारही त्याच्या
अंगावर दिसत आहेत. कमरेवर नाभी प्रदेशाच्या खाली नेसलेले धोतर जागेवर रहावे
म्हणून त्याने कंबरेभोवती एक कडे अडकवलेले आहे व धोतराची या कड्याला गाठ
मारलेली दिसते आहे.
इतिहासाच्या दृष्टीने या यक्षमूर्तीच्या उजव्या तळहाताच्या मागील बाजूस कोरलेला शिलालेख मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. मोर्य किंवा सम्राट अशोककाली जी ब्राम्ही अक्षरे वापरात होती तीच अक्षरे येथे कोरलेली असल्याने हा यक्ष व हा जेथे सापडला त्या पितळखोर्यातील गुंफा हे सर्व इ;स; पूर्व दुसर्या किंवा तिसर्या शतकातील आहेत हे निर्विवाद्पणे सिद्ध होते. या शिलालेखामधील मजकूर असा आहे.
पात्रवाहक यक्ष
कान्हादासेन हिरनकरेन काता
बर्जेस याने याचा अनुवाद असा केलेला आहे.
Pot carrier Yaksha
sculpted by Krishnadasa goldsmith
या शिलालेखामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात येतात असे मला वाटते.
एकतर हे पाषाण शिल्प एका सुवर्णकाराने कोरलेले आहे. आणि कृष्णदास हे
त्याचे नाव! या नावावरून प्रथम एकतर कृष्ण ही व्यक्ती त्या वेळेपर्यंत
दैवी समजली जाऊ लागली होती याचे हे नाव द्योतक आहे व हे हिंदू नाव धारण
करणार्या व्यक्तीने एका बौद्ध मठासाठी हे शिल्प कोरलेले आहे.
जरा जड पावलांनीच, हे सर्व यक्ष आणि पेगॅसस यांचा निरोप घेऊन, मी आता डाव्या बाजूसच असलेल्या 4 क्रमांकाच्या गुंफेकडे वळतो आहे.
क्रमश:
आता अवांतराचा भडिमार :-
बर्याच मोठ्या संख्येने बौध भिख्खू वस्तीस असले पाहिजेत याची सहज कल्पना करता येते.
हे भिख्खू एक्झॅक्टली काय करायचे सतत एकत्रित जमून? पुरोहित कसे नेहमीच
एकत्र जमलेले नसत. ते लोकांची लग्ने लावून देत, समरंभ्, य्ज्ञ करीत.
तसे हे भिक्खू मोठ्या संख्येने येउन् नक्की काय करायचे?
हे संन्यस्त्, भ्टाके नसायचे का? स्थिर होते का?
दोन खांबांच्यावर, इ.स. पूर्व दुसर्या शतकातील अक्षर वळणांत, खोदलेले ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहेत.
ब्राम्ही वाचलीत? कमाल आहे. आश्चर्य आहे.
सातवाहन राजांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान (पैठण) या गावामधील
दोन धनिकांनी हे खांब खोदण्यासाठी दिलेल्या देणगीचा या शिलालेखांत उल्लेख
आहे.
ह्जा जागतिक phenomena आहे, वैश्विक सवय आहे. राज्धानीच्या ठिकाणचे
श्रेष्ठी सत्तेशी चांगले जुळवून घ्यायला असे काम करत, मर्जीत रहात.
मध्यपूर्वेत अकराशे वर्षांपूर्वी कित्येक मशीदी स्वतः खलिफानं बांधलेल्या
नाहीत. त्याला इंप्रेस करायला विविध व्यापरार्यांनी धनिक खलाशी समूहांच्या
प्रमुखांनी देणग्या देउ देउ त्या बांधल्या.
त्यात लाल, गुलाबी व नील वस्त्रे परिधान केलेल्या बुद्धाची चित्रे विशेष खुलून दिसत आहेत
रंग् अजून् टिकलेत? मसतच् आहे. पण् त्यांना काही काचेचे आवरण् वगैरे होते का? काहीतरी संरक्षक असे हवे ना.
मी ऐकलय् की निळा, जांभळा हा रंग तिथे वापरायला आणत ते थेट त्या काळाच्या
पर्शिया मधून्(आजचा इराण, पश्चिमोत्तर अफगाणिस्तान, आणि मध्य आशियाच्या
पठाराचा त्यालगतचा बहग(उझबेकिस्तान , ताजिकिस्तान वगैरे.))
पितळखोरे मठाच्या गुंफा मूळ कधीतरी इ.स. पूर्व दुसर्या शतकात खोदल्या गेलेल्या आहेत.
बाब्बो. बौद्ध् गुंफा आहेत् ना? पण म्हणजेच अशोक् मृत्यू पावला इ स् पू २३२
मध्ये. त्याच्या नंतर त्याच्या बौद्ध मिशनर्यांनी प्रचार सुरु ठेवला असं
मानलं तरी तिथून पुढं निदान दोन् अडीच शतकं त्या धर्माचं भक्कम अधिष्ठान्
प्रस्थापित् व्हायला लागली असवीत असं वाटत होतं. पण हे फारच झपाट्याने
झालेलं दिसतय.
यापैकी सर्वात मोठे शिल्प हे दोन्ही हात उंचावून विकट हास्य करणार्या यक्षाचे आहे
यक्ष ना. विकटहास्यच करणार. स्मितहास्य नाही. यक्ष, गंधर्व, किन्नर ह्या
आपल्याकडे demi God योनी मानल्या जातात. त्यामुळे वरवर पाहिले तर हे सगळेच
"देव" किंवा "सज्जन/चांगलेच" असतील असं वाटातं. पण ते तसं नाही. यक्ष भयंकर
वगैरेही असू शकतात. यक्षिणी रात्रीच्या वेळी बाहेर पडून लहान बाळांना
खातात अशा आख्यायिका अहेत.
त्या काळात तरी यक्ष हे भयंकरही मानले जायचे.
हात पाय जाड-जाड आणि मांसल व एकूण आकार बुटका असे या शिल्पाचे
स्वरूप आहे. चेहरा गोल आणि मोठा दाखवलेला आहे. डोळे मोठे, बटबटीत व बाहेर
आलेले, लहान नाक व फेंदारलेल्या नाकपुड्या, मोठे कान आणि जाड ओठ अशी
चेहेरेपट्टी आहे.
तर्क देणार होतो ह्याबद्दल. वरच्या माहितीच्या आधारवर. पण उगाच वंशवादी म्हणून टिका व्हायची. त्यामुळे पास.
या नावावरून प्रथम एकतर कृष्ण ही व्यक्ती त्या वेळेपर्यंत दैवी समजली जाऊ लागली होती याचे हे नाव द्योतक आहे
कृष्ण हे नाव काही उपनिषदांतही येतं (प्रक्षिप्तही मानलं जात नाही. ऑथेंटिक
व्हर्जनमध्ये आहे.). किम्वा अजून काही महाभारत पूर्व मानल्या जाणार्य
वाङ्मयातही येतं. जैनांकडेही एक कृष्ण् आहे. जैनांचे ग्रंथ इसवीसनाच्या
बरेच आधीचे असावेत.
(पार्श्वनाथ् वगैरेंचा काळ् लक्षात घेतला तर.)व्यापारी हिंदू होता, हे नक्की का?
बादवे, कृष्णदास, छबिलदास, करमचंद अशी नावे तेव्हापासूनच धनिक व्यापारी
वापरायचे असं दिसतय. भारतीय समाज चौकट्, उतरंड तेव्हापासून् कसली
घट्टपणे टिकली आहे.
कमाल् आहे. त्या अजून् एका लेखाच्या शिलालेखातही असाच उल्लेख् दिसला.
जातक कथांत कित्येकदा राम - कृष्ण ह्यांचे उल्लेख येतात म्हणे. ते
बुद्धाचे पूर्वावतार होते अशी त्यांची मान्यता/समजूत आहे. खरे खोटे ठाउक
नाही.
कृष्ण् हे नाव त्या काळात त्यामुळं जैन् व् बौद्धांतही प्रचलित असू शकेल ना.
हात पाय जाड-जाड आणि मांसल व एकूण आकार बुटका असे या शिल्पाचे स्वरूप आहे. चेहरा गोल आणि मोठा दाखवलेला आहे. डोळे मोठे, बटबटीत व बाहेर आलेले, लहान नाक व फेंदारलेल्या नाकपुड्या, मोठे कान आणि जाड ओठ अशी चेहेरेपट्टी आहे.
तर्क देणार होतो ह्याबद्दल. वरच्या माहितीच्या आधारवर. पण उगाच वंशवादी म्हणून टिका व्हायची. त्यामुळे पास.
नेग्रॉइड वंशाचे लोक असाच तर्क ना. तसे लोक आजही भारतात आहेत आणि तेव्हाही होते. त्यात वंशवादी म्हणण्यासारखे काय आहे. लिहावं की बिनधास्त!
1.मनोबांच्या अवांतरातील मुद्यांचा मला शक्य तेवढा खुलासा खाली देतो आहे.
सध्या कर्नाटक मध्ये दोन बौद्ध मठ तिबेटी स्थलांतरितांसाठी म्हणून चालवले
जातात. या प्रत्येक मठात हजार ते पंधराशे भिख्खू सहज रहात आहेत. प्तयेक
भिख्खू हा काही सर्वसंगत्याग केलेला मुनी नसतो. त्यात अध्ययन करणारे
विद्यार्थी असतात. थोड्या कालासाठी या पंथाला आलेले काही असतात.
2.थोडी ब्राम्ही मूळाक्षरे मला वाचता येतात.परंतु त्याची आवश्यकता नाही. पुरातत्त्व विभागाच्या पूर्वीच्या गोर्या साहेबांनी हे काम आधीच करून ठेवलेले आहे.
3.हे रंग खनिजांपासून केलेले असल्याने टिकू शकले आहेत. निळा रंग 4 थ्या शतकापासून पुढे वापरला जाऊ लागला. Lapis lazuli या पासून हा रंग बनवला जात असे.
सुंदर लेख, मस्तच! वाचताना मजा आली. चित्रे तर सुरेखच.
नावावरून प्रथम एकतर कृष्ण ही व्यक्ती त्या वेळेपर्यंत दैवी समजली जाऊ लागली होती याचे हे नाव द्योतक आहे व हे हिंदू नाव धारण करणार्या व्यक्तीने एका बौद्ध मठासाठी हे शिल्प कोरलेले आहे.
असे काय करता? आपण इथेच उपक्रमावर पूर्वी चर्चा केली नाही का की कृष्ण अलेक्झांडरच्या काळातच दैवत्वाला पोहोचला होता असे. :-) तेव्हा तुमचा तर्क बरोबरच आहे.
बौद्धांनी स्तूप बांधायची कला ग्रीकांकडून घेतली. पूर्वीच्या स्तुपांना खांब नव्हते. खांबांवर इमारत उभी करणे हे ग्रीक स्थापत्य. मूर्तीकला हे देखील ग्रीकांकडून घेतलेले. बौद्ध स्तुपांवर हळूहळू संस्करण कसे होत गेले त्याचे एक चित्र येथे बघा. तरीही, तो एकटा पेगॅसस तेथे काय करत असावा याचे आश्चर्य वाटते. रोचक आहे खरेच.
खांब तोलून धरणारे यक्ष प्रसिद्ध आहेतच. हे शिल्प त्यातीलच एक वाटते पण गंमत म्हणजे एक गोष्ट ध्यानात आली. पौर्वात्य संस्कृतींमध्ये "लाफिंग बुद्धा" म्हणून बोचके बांधून नेणारा एक ढेरपोट्या नजरेस पडतो. तो गोतम बुद्ध नाही असे सांगितले जाते. त्यांचा या यक्षांशी दूरगामी संबंध असावा. चू. भू. दे. घे.
| Picture taken from http://net4.ccs.neu.edu |
यक्ष आणि लाफिंग बुद्ध यांचा काहीतरी संबंध असावा असे मलाही वाटले होते. परंतु लाफिंग बुद्धाच्या चेहर्यावरील हास्य नेहमीच फ्रेन्डली दाखवले जाते तर यक्षाचे हास्य विकट असते.मनोबा म्हणतात तसे यक्ष हे व्हिलन कॅटेगोरी मधे कदाचित मोडणारे असू शकतात. बौद्ध साहित्याचा कोणी अभ्यासक यावर प्रकाश कदाचित टाकू शकेल.
दुष्ट देवतांचे सुष्ट देवतांमध्ये रुपांतर अलमोस्ट सर्व संस्कृतींमध्ये होत असते. यक्ष रुपाचे लाफिंग बुद्ध हे रुपांतर होणे अशक्य नाही. त्या चित्रातून काय दर्शवायचे आहे हे महत्त्वाचे ठरते. आपल्याकडे "गणपती" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दुष्टांचे रुपांतर सुष्टांत झाले की त्यांच्या चेहर्यावरचे भीतीदायक भाव जाऊन प्रसन्न मुद्रा यायचीच. शेवटी ही सर्व शिल्पकाराची आणि त्याच्या भावनांची किमया आहे.
उत्तम व माहितीपूर्ण लिखाण.
इथल्या चैत्यगृहाच्या स्तूपाच्या पाठीमागील दगडी खांब अगदी जवळजवळ दिसत आहेत. सहसा इतके दाटीवाटीने असलेले खांब फारसे पाहाण्यात येत नाहीत.
या यक्षाच्या शेजारी कोरलेली या यक्षाचीच आणखी एक छोटी आवृत्ती आपला हात उंचावून जिन्याला आधार देते आहे
भारवाहक यक्षांचे एक आगळेवेगळे शिल्प नाशिकच्या पांडवलेणीतल्या क्र. ३ च्या देवीलेणी येथे आहे. जणू काही ही लेणीरूपी पालखी यक्ष आपल्या खांद्यावर वाहात आहेत. पालखीचे दांडे त्यांनी आपल्या खांद्यावर धारण केले आहेत.
ग्रीक पुराणांच्यात वर्णन केलेल्या व पंख असलेल्या पेगॅसस या घोड्याचे शिल्प येथे कोरलेले आहे.
ग्रीक शिल्पांचा प्रभाव महाराष्ट्रातील बर्याच लेण्यांमध्ये दिसतो. व्यापाराबरोबरच संस्कृतीच्या आदानप्रदानाचा हाही एक पुरावाच.
भाजे लेणीतही पेगॅसस आणि सेंटोर ही शिल्पे कोरलेली आहेत तर् नाशिक लेण्यांमध्ये स्फिन्क्स, ग्रिफीन्, नेमियन लायन आणि अथेनाची शिल्पे कोरलेली आढळतात.
भाजेलेणीतील हे पेगॅससचे शिल्प बघा.
![]() |
ह्या शिल्पाच्या समोरच भाजेतील सर्वात महत्वाचे सूर्यगुंफेचे शिल्प आहे.
एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 3
पितळखोरे येथे असलेली 4 क्रमांकाची गुंफा, ही सुद्धा तसे बघितले तर भिख्खूंचे निवासस्थान किंवा एक विहार आहे. परंतु माझ्या समोर असलेल्या भग्नावशेषांवर एक नजर टाकता क्षणीच, हा विहार प्रमुख किंवा वरिष्ठ आचार्यांसाठी खोदला गेला असला पाहिजे याची खात्री पटते. अर्थात या विहारात असलेल्या कोठड्या मात्र इतर विहारांतील कोठड्यांप्रमाणेच तेवढ्याच आकाराच्या व तशाच साध्या स्वरूपातील आहेत. पण ती बहुदा त्या काळातील पद्धत असावी. कदाचित हा विहार VIP साठी असल्याने येथील सर्व कोठड्यांना लाकडी द्वार झडपा बसवण्याची व्यवस्था होती. दगडात लाकडी खुंट्या मारण्यसाठी पाडलेली चौकोनी छिद्रे काय ती आता फक्त उरलेली आहेत.
मात्र या विहारातील बाकी सर्व काही मोठे वैशिष्ट्यपूर्ण किंवा (Exquisite) आहे यात शंकाच नाही. गुहेच्या दर्शनी भागापासून (Facade) ते आतील भिंतीपर्यंतच्या सर्व जागी, कलाकुसर, बास रिलिफ शिल्पे आणि पूर्णाकृती शिल्पे यांनी हा विहार संपूर्णपणे सजवला होता याच्या खाणाखुणा अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत. या कालातील कोणत्याच विहारात किंवा स्तूपावर संपूर्ण कोरलेली शिल्पे (Rounds) आढळून येत नाहीत. त्या दृष्टीने पितळखोरे मधील हा विहार वैशिष्ट्यपूर्णच मानावा लागेल.
या विहाराच्या अगदी समोर, पण जमीन पातळीवर मी आता उभा आहे. गुंफेसमोरचे प्रांगण, मी उभ्या असलेल्या जमीन पातळीपेक्षा निदान 5 ते 6 फूट तरी, म्हणजे बर्याच जास्त उंचीवर आहे. हे संपूर्ण प्रांगण व त्याचा जमिनीलगतचा समोरचा भाग हा पुरातत्त्व विभागाने एका मोठ्या पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीने आच्छादून टाकला आहे व त्यामुळे या समोरच्या भागाच्या भिंतीवरचे कोणतेही कोरीवकाम बघणे मला शक्य दिसत नाहीये. परंतु माझ्या नशीबाने, पुरातत्त्व विभागाचा तेथे आलेला अधिकारी मला मदत करण्याचे मान्य करतो आणि ती ताडपत्री वर उचलून मला तो समोरचा भाग बघता येईल अशी व्यवस्था करतो.
5 किंवा 6 फूट ऊंच असलेला व एखाद्या भिंतीप्रमाणे दिसणारा प्रांगणाचा हा बाह्य पृष्ठभाग, एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत भरगच्च दिसणार्या, बास रिलिफ व पूर्णाकृती शिल्पांनी संपूर्णपणे भरलेला आहे. डावीकडून सुरूवात केली तर या भिंतीच्या कोपर्यात व भिंतीला काटकोन करणार्या एका पाषाणावर, कोरलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या खाणाखुणा मला दिसतात. पुतळा आता तेथे नाही परंतु हा पुतळा नाग राजाचा असला पाहिजे हे पुतळ्याच्या पार्श्वभूमीला असलेल्या 3फणाधारी नागाच्या बास रिलिफ शिल्पावरून लक्षात येते आहे.
या नाग राजाच्या पुतळ्याला लागूनच परंतु समोरच्या भिंतीच्या कोपर्यात एक द्वारपालाचा पूर्णाकृती पुतळा होता. त्याच्या फक्त खाणाखुणा उरल्या आहेत. (हा पुतळा मुंबई येथील संग्रहालयात आता प्रदर्शित केलेला आहे.) या द्वारपालाच्या डोक्यावर एका हतीचे बास रिलिफ शिल्प आहे. पुढे पाऊल टाकण्यासाठी या हत्तीने आपले पुढचे डावे पाऊल वर उचललेले दिसते आहे. या द्वारपालाच्या खाणाखुणांशेजारी, डाव्या हाताला पाषाणात कोरलेली दाराची एक चौकट आहे. या संपूर्ण चौकटीवर, फुले व पाने यांची नक्षी कोरलेली आहे. दाराच्या चौकटीच्या डाव्या हाताला, उजव्या बाजूस असलेल्या हत्तीच्या शिल्पाप्रमाणेच असलेले, एक बास रिलिफ शिल्प त्या शिल्पाच्या अगदी समोरच कोरलेले आहे. मात्र या हत्तीने आपले पुढचे उजवे पाऊल वर उचललेले दिसते आहे. दोन्ही हत्तींच्या सोंडा व मस्तकाचा काही भाग नष्ट झाला आहे. दरवाज्याच्या डाव्या हाताला असलेला द्वारपाल पुतळा मात्र सुदैवाने अजूनही शाबूत आहे. हे शिल्प बास रिलिफ पद्धतीने कोरलेले नसून पूर्णाकृती आहे. हा द्वारपाल सुद्धा एक यक्ष प्रतिमाच असल्याचे या विषयातील तज्ञ मंडळी सांगतात. सातवाहन कालातील सामान्य पद्धतीप्रमाणे, या द्वारपालाची केशरचना आहे. याच्या डोक्यावर, कपाळाजवळ, केसांचा एक बुचडा बांधलेला दिसतो आहे. त्याच्या डोक्यावर असलेले पागोटे किंवा पगडी बांधतानाच ती या बुचड्याला घट्ट बांधून टाकलेली आहे. या पागोट्यासाठी जे वस्त्र वापरलेले आहे, त्या वस्त्राच्या काठावर केलेले नक्षीकाम, पुतळ्याच्या पुढच्या बाजूस स्पष्टपणे दिसेल असे कोरलेले आहे. हा द्वारपाल यक्ष असल्याचे त्याच्या हत्तीसारख्या कानांवरून दिसून येते. हे मोठे कान या यक्षाच्या दैवी सामर्थ्याचे द्योतक मानले जात होते. या मोठ्या कानात त्याने पिळाचे डिझाइन असलेली कर्णभूषणे घातलेली आहेत. हाताच्या मनगटाजवळ याने चार जाडजूड ब्रेसलेट्स घातलेली आहेत तर डाव्या दंडावर पोची आहे.आपल्याकडे कोकणात शेतकरी कुणबी पद्धतीचे धोतर नेसतात. साधारण याच पद्धतीचे धोतर हा द्वारपाल नेसलेला आहे. या धोतरावर त्याने एक उत्तरीय घेतलेले आहे. हे उत्तरीय व कंबरेवरचे धोतर यांच्या काढलेल्या निर्या त्याने कंबरेला घट्ट बांधलेल्या शेल्याजवळ दिसत आहेत. कंबरेवरच्या शेल्यात त्याने तलवारीचे म्यानही अड्कवलेले दिसते आहे. मात्र तलवारीचे पाते महाराष्ट्रात किंवा भारतात वापरल्या जाणार्या तलवारींसारखे वक्र नसून सरळ आहे. (तलवारीचे हे सरळ पाते बहुदा त्या काळातील ग्रीक प्रभावामुळे कोरलेले असावे. याच काळात काढलेल्या अजंठा लेण्यातील चित्रात सैनिकांकडे वक्र तलवार दर्शवलेली दिसते.) आपल्या उजव्या हातात या द्वारपालाने एक जाड भाला धारण केलेला दिसतो आहे. मी या द्वारपालाची केशरचना व कपडे यांचे एवढ्या बारकाईने वर्णन करतो आहे, कारण शिल्पकाराने त्या काळातील सर्वसामान्य सैनिक काय प्रकारची वेशभूषा करत असतील तीच वेशभूषा या द्वारपालाचे शिल्प कोरताना दाखवणे स्वाभाविक आहे असे मला वाटते. त्यामुळेच या द्वारपालाची केशभूषा बघून तत्कालीन सर्वसामान्यांच्या वेशभूषेबद्दल एक चांगली कल्पना आपल्याला येऊ शकते.
या द्वारपालाच्या डाव्या बाजूसपासून ते गुंफेच्या डाव्या टोकाच्या भिंतीपर्यंत पसरलेल्या या पेडस्टलच्या बाह्य पृष्ठभागावर 6भले थोरले हत्ती कोरलेले आहेत. या हत्तींचे मस्तक व पुढचे दोन पाय हे संपूर्णपणे कोरलेले आहेत व शरीराचा उर्वरित भाग बास रिलिफ शिल्पामधून दाखवलेला आहे. हत्तींच्या सोंडा व मस्तकाच्या बराचसा भाग हा तुटून नष्ट झाला आहे. एका हत्तीचे तुटलेले मस्तक मला विहाराच्या समोरच जरा लांबवर पडलेले दिसते आहे. हतींच्या पायात जाडजूड कडी घातलेली आहेत आणि गळ्यात मण्यांच्या निदान 8तरी माळा घातलेल्ल्या दिसत आहेत. माझ्या जवळ असलेल्या एका हत्ती शिल्पाच्या पाठीवर भरतकाम केलेली व गोंडे लावलेली झूल घातलेली स्पष्टपणे दिसू शकते. या झुलीला छोट्या घंटा अडकवलेल्या दिसत आहेत. या संपूर्ण बाह्य पृष्ठभागावर अगदी बारकाईने कोरीव काम केलेले असल्याने मला पितळखोर्याच्या आपल्या भेटीचे चीज झाल्यासारखे वाटते आहे हे मात्र खरे!
वर उल्लेख केलेल्या दोन द्वारपालांच्या पुतळ्यांच्या मध्ये जी दाराची चौकट दिसते आहे त्या चौकटीमधून आत गेल्यावर गुंफेसमोरच्या प्रांगणात जाण्यासाठी, खडकामध्ये काढलेला एक जिना आहे. परंतु या सर्व भागावर पुरातत्त्व विभागाने एक पिवळी ताडपत्री पसरून टाकलेली असल्याने वर जाण्यास काही मार्ग दिसत नाहीये. परंतु पुरातत्त्व खात्याचा तेथे आलेला अधिकारी मला सुचवतो की हा विहार व याच्या उजवीकडे असलेला 5कमांकाचा विहार यांच्या मधली भिंत आता ढासळलेली असल्याने मला 5 क्रमांकाच्या गुंफेतून परत 4 क्रमांकाच्या गुंफेत सहज येता येईल. मी त्याचा सल्ला मानतो व 5क्रमांकाच्या गुंफेत चढून मधल्या भिंतीला पडलेल्या मोठ्या भगदाडातून 4 क्रमांकाच्या वैशिष्ट्यपूर्ण व अती महत्त्वाच्या व्यक्तींसाठी खोदलेल्या या विहारात प्रवेश करतो.
जेम्स बर्जेस 1880 साली लिहिलेल्या आपल्या पुस्तकात, या विहाराचे वर्णन करताना लिहितो की,
"डावीकडे, कोसळलेल्या दगडांच्या एका भल्या थोरल्या ढिगार्याच्यामागे, मुखाचा संपूर्ण भाग (Whole front) कोसळून नष्ट झालेली अशी एक आश्चर्यजनक विहार गुंफा आहे. मागच्या टोकाला ही गुंफा 50 1/2 फूट तरी रूंद आहे. वेरूळ मधील 'दशावतार' किंवा 'तीन थाल' या नावाने ओळखल्या जाणार्या गुंफाप्रमाणे, मुखद्वाराला समांतर अशा खांबांच्या ओळींनी ही गुंफा अनेक कॉरिडॉर्स (Corridors) मध्ये विभागलेली आहे. हे सर्व खांब तळाला छताजवळ चौरस आकाराचे आहेत आणि मधल्या भागात कडांना चप (Chamfered) मारलेला आहे. अंदाजे 6 फूट लांबीवर असलेले हे खांब छतालगत असलेल्या एका मोठ्या दगडी तुळईला (Architrave) आधार देताना दिसतात. दोन तुळयांच्या मध्ये असलेल्या प्रत्येक कॉरिडॉरमधील छताला आधार देण्यासाठी चपटे दगडी वासे ( Rafters) खोदलेले आहेत.
गुंफेच्या मागच्या अंगाला असलेल्या भिंतींमध्ये 7कोठड्या खोदलेल्या आहेत. त्यातील निदान 5 कोठड्यांना तरी प्रवेशद्वारांबरोबर जाळीचे डिझाइन असलेल्या खिडक्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक कोठडीचे प्रवेशद्वार व जाळीची खिडकी या दोन्हींवर मिळून घोड्याच्या नालाच्या आकाराची असलेली चैत्य गवाक्ष कमान कोरलेली आहे. अजंठा येथील या गुंफेला समकालीन असलेल्या 12 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणे या गुंफेत सुद्धा बाजूंच्या भिंतीवर मुखाच्या दिशेने आणखी अशाच 2 चैत्य कमानी कोरलेल्या आहेत. यातल्या प्रत्येक (शेजारी शेजारी असलेल्या) दोन कमानींच्या मध्ये (दुसरी व तिसरी चैत्य कमान वगळून) अर्ध्या खोलीपर्यंत (Half depth) खोदलेला एक अष्टकोनी स्तंभ व त्याच्यावर बास रिलिफ पद्धतीने कोरलेला एक कॅपिटल (Capital) हे कोरलेले आहेत. घंटेच्या आकाराचे असलेले हे कॅपिटल, खूप प्रमाणातील कोरीव कामाने सजवलेले आहेत. मात्र कोरीव कामाची खोली (Depth) ही कॅपिटलच्या एकूण रूंदीच्या मानाने खूपच कमी आहे. (कोरीव काम पृष्ठभागावर अगदी वरवर कोरलेले आहे.) काही कॅपिट्ल्स् वरचे कोरीव काम खूपच बारकाईने केलेले आहे.”
बर्जेस यांनी केलेल्या या अचूक वर्णनाप्रमाणे, या विहारातील अंतर्गत वास्तूरचना ही या गुंफेला समकालीन असलेल्या अजंठ्याच्या 12 क्रमांकाच्या गुंफेसारखीच जवळपास आहे. कोठड्यांच्या द्वारावरील चैत्य कमानी सुद्धा तशाच आहेत. फरक आहे तो कमानींच्या मध्ये असणारे स्तंभ आणि स्तंभांवरील बास रिलिफ पद्धतीने कोरलेले कॅपिटल्स यांचा! अजंठा गुंफेत कमानींमध्ये काहीच कोरीवकाम केलेले नाही व भिंती तशाच ठेवलेल्या आहेत. मी या भिंतीला समांतर चालत जातो. घंटेच्या आकाराची असलेली ही कॅपिटल्स फुले,पाने,पक्षी आणि प्राणी यांचा वापर केलेल्या अगदी बारीक नक्षीने सजवलेली आहेत. प्रत्येक कॅपिटल वरील डिझाइन निराळे आहे.
मात्र आश्चर्यचकित करणारी खरी गोष्ट निराळीच आहे. कोरलेले प्रत्येक कॅपिटल व छत यांच्यामधल्या मोकळ्या जागेत प्राण्यांची एक जोडी कोरलेली आहे. अगदी डाव्या भिंतीलगत असलेल्या कॅपिटल्च्या वरची प्राण्यांची जोडी कसली आहे ते मला आधी समजत नाही. जरा बारकाईने बघितल्यावर लक्षात येते की छत आणि कॅपिटल यांच्या मधल्या जागेत बसलेले दोन प्राणी, ग्रीक पुराणांतील स्फिंक्स आहेत. यातील उजव्या हाताचा स्फिंक्स बरोबर एखाद्या सिंहाच्या पोजमधेच बसलेला दाखवलेला आहे. या स्फिंक्सने आपला पुढचा डावा पंजा उचलेला असून त्याला दोन पंखही दाखवलेले आहेत. मात्र डाव्या हाताचा स्फिंक्स मोठ्या विचित्र पोजमध्ये आहे. एखादे उताणे पडलेले लहान मूल दिसेल तसा काहीसा हा स्फिंक्स दिसतो आहे. बहुदा पहिला स्फिंक्स कोरल्यावर डाव्या बाजूला भिंत येत असल्याने पूर्ण स्फिंक्स कोरण्यास जागा राहिलेली नसावी त्यामुळे शिल्पकाराने हा मार्ग स्वीकारलेला असावा. दोन्ही स्फिंक्सना अर्थातच मानवी शिरे आहेत. हे स्फिंक्स दैवी अंशाचे असल्याने परत त्यांचे कान खूप मोठे दाखवलेले आहेत,डोळे मोठे व बट्बटीत आणि कानात लोंबणारी कर्णफुले आहेत. या दोन्ही स्फिंक्सची केशभूषा बघताना मला परत एकदा या शिल्पकारावरील ग्रीक प्रभाव जाणवतो आहे. या दोन्ही स्फिंक्सच्या मस्तकावर, ग्रीक पुतळ्यांवर दाखवतात तसेच कुरळे छोटे केस दाखवलेले आहेत.
उरलेल्या सहा कॅपिटल्सवर लांडगे, बकरे, हत्ती, घोडे आणि सिंह यांच्या बसलेल्या जोड्या कोरलेल्या आहेत. मात्र या सर्व प्राण्यांना पंख दाखवलेले आहेत. बर्जेसच्या म्हणण्याप्रमाणे या प्रकारचे पंखधारी प्राणी, सांची येथील स्तूपाची तोरणे सोडली तर बाकी कोठेही समकालीन शिल्पकलेत सापडत नाहीत. (कदाचि भाजे येथील गुंफेत असू शकतात असे मला वाटते.) पितळखोर्याची ही गुंफा त्यामुळेच अद्वितिय अशी मानली जाते.
अगदी उजवीकडे असलेल्या कोठडीच्या दारावर मोर्य किंवा अशोकाच्या कालात रूढ असलेल्या अक्षरांत लिहिलेला ब्राम्हीमधील एक शिलालेख आहे. प्राकृतातील हा शिलालेख असा आहे.
बर्जेसने याचे भाषांतर असे केलेले आहे.
या शिलालेखाचा थेट संदर्भ त्या वेळच्या सातवाहन राज्यकर्त्यांशी लावता येतो. हा शिलालेख सांगतो आहे की (आजचे पैठण किंवा त्या वेळचे प्रतिष्ठान येथे राज्य करणार्या राजाच्या) वछिपुत्र मागिला या राजवैद्याच्या दत्ता या कन्येने हा विहार बनवण्यासाठी देणगी दिलेली आहे.
विहारातील मागच्या व बाजूच्या भिंतीमधील कोठड्यांचे भग्नावशेष बघून मी
पुढच्या व्हरांड्यात येतो. येथे आणखी आवर्जून बघावे अशी एक गोष्ट आहे. या
विहारासाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्याची सोय केलेली होती. विहाराच्या
छतावरच्या खडकात लांब भुयारे खोदलेली होती. खडकामधूनखाली झिरपणारे पाणी या
भुयारात जमा करून ते खडकातच खोदलेल्या एका उभ्या भुयारातून गुंफेच्या
प्रवेशद्वाराजवळ आणलेले होते. गुंफेचा मुखाजवळचा भाग कोसळल्यानंतर या उभ्या
भुयाराचा भाग उघडा पडला व हे सर्व पाणी गुंफेच्या छतामध्ये असलेल्या एक
मोठ्या छिद्रातून विहाराच्या तळावर पडते आहे. हे पाणी पडून विहाराची आणखी
नासधूस होऊ नये म्हणून पुरातत्त्व विभागाने एक मोठे प्लॅस्टिक पात्र या
उघड्या भुयाराखाली ठेवलेले आहे व त्याला एक नळ जोडून हे पाणी खाली नदीत
सोडलेले आहे.

गुंफा क्रमांक 5 मधून मी परत बाहेर येतो आणि गुहेच्या मुखाजवळचा व छताजवळचा संपूर्ण भाग कोसळून समोर खच पडलेल्या शेकडो दगड धोंड्यावर काही कोरीवकाम असल्यास ते शोधण्याचा प्रयत्न सुरू करतो.
क्रमश:
अतिशय माहितीपूर्ण लेख.
पंखधारी बैल, पंखधारी घोडे भाजेलेणीतही कोरलेले आहेत.
पुतळा आता तेथे नाही परंतु हा पुतळा नाग राजाचा असला पाहिजे हे पुतळ्याच्या पार्श्वभूमीला असलेल्या 3फणाधारी नागाच्या बास रिलिफ शिल्पावरून लक्षात येते आहे
नाशिकच्या पांडवलेणीतील नहपानविहाराच्या एका हाती मुसळ आणि दुसर्या हातात जंबिया असलेली आणि मस्तकी नागाचा फडा धारण् केलेली द्वाररक्षक यक्षमूर्ती कोरलेली आहे. पितळखोर्याची मूर्ती साधारण अशीच असावी.
नाग् राजा मूर्ती
धन्यवाद् भटक्या
नाशिक मूर्तीच्या मागे 5 फणाधारी नाग आहे तर पितळखोर्यात 3 फणाधारी. पितळखोर्यातील मूर्ती बसलेली असावी असे खाणखुणांवरून वाटते. नाशिक मूर्ती निदान 200 वर्षे तरी नंतरची असावी. परंतु दोन्ही मूर्तीत साम्य असणारच आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे पितळखोर्याला समकालीन असलेल्या अजंठा मधे या कालातील जी चित्रे सापडलेली आहेत त्यात नाग राजा म्हणून सातवाहन राजांचे चित्रण केले आहे असे मानले जाते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
सुरेख
आणखी एक वाचनीय भाग.
यक्ष हे उत्तर दिशेचे रक्षण करतात असे ऐकले आहे. या यक्षमूर्ती कोणत्या दिशेकडे तोंड करून आहेत त्याबद्दल काही माहिती मिळेल का?
ग्रीकांकडून त्यांच्या संस्कृतीतील शिल्पे घेतली तर त्यांच्या भाषेतील शब्द का नाही घेतले असा नेहमी प्रश्न पडतो मला पण उत्तर मिळत नाही.
द्वारपाल यक्ष
द्वारपाल यक्ष, गुंफा उत्तराभिमुखी असल्याने अर्थातच उत्तरेकडे तोंड
करून उभे आहेत. तेंव्हा प्रियालीताई म्हणतात ते योग्यच असावे. कदाचित
भारतीयांनी काही ग्रीक शब्द घेतलेही असतील त्या काळी! मिनॅंडर राजा जसा
मिलिंद झाला तसे कालांतराने त्या शब्दांचे भारतीयीकरण झाल्याने आपल्याला
त्या शब्दांचे मूळ जाणवत नसावे. अर्थात मला या बाबतीत काहीच ज्ञान नाही हे
मी मान्य करतो. हा आपला एक ढगात गोळीबार इतकेच!
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
+१
प्रियाली
आणखी एक वाचनीय भाग.
+१
ग्रीकांकडून त्यांच्या संस्कृतीतील शिल्पे घेतली तर त्यांच्या भाषेतील शब्द का नाही घेतले
नको. आता पुन्हा नको. हा प्रतिसाद पु ना school of thoughts ना उचकावण्यासाठी लिहिलाय का? बरे चालले आहे ते बघवत नाही का? असो.
माझ्या माहितीत पितळखोर्याला खूप चांगली झाडे होती. त्याचा रस इथले लोक
वापरायचे लांब गुंडाळी बनवायला. हे बघून "त्यांनी" ती झाडे तिकडे नेली.
तिथे त्याचे नाव "पेत्तीयोरस" (पितळखोर्याहून् आणलेली झाडे) असे ठेवले.
गमग त्याचा अपभ्रंश होत "पेपीरस/पपायरस" नामक झाड बनले. पेपीरस मधूनच पुढे
"पेपर"/कागद निघाला.
तस्मात हा शोध ग्रीस देशात राहणार्या आर्यांनी पितळखोर्यातल्या आर्यंकडून इजिप्शिअन आर्यांमर्फत नेला.
समजलें?
--मनोबा
फार फार आवडली
ही मालिका फार आवडली आहे. वर्णनाची शैली तिथला परिसर जिवंत करते. मालिका अत्यंत माहितीपूर्ण आहे हे वेगळे सांगायला नकोच. पुढील भागाची वाट पाहतो आहे.
चित्रांसहित लेख
चंद्रशेखर यांचा चित्रांसहित लेख सुरेख दिसतो आहे.
द्वारपाल यक्ष, गुंफा उत्तराभिमुखी असल्याने अर्थातच उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. तेंव्हा प्रियालीताई म्हणतात ते योग्यच असावे.
मागे कोणीतरी म्हणाले होते की कुबेर हा उत्तर दिशेचा स्वामी आहे त्यामुळे उत्तरेकडील घराचे दार धनसंपत्ती देते आणि यक्ष त्याची राखण करतात. :-) त्यावरून आठवले.
एका साम्राज्याच्या शोधात; पितळखोरे गुंफा भाग 4
पितळखोर्यामधील 4 क्रमांकाच्या विहारातून परत बाहेर आल्यानंतर समोर पडलेल्या पाषाण खंडांकडे मी बघत असतानाच, माझ्या बरोबर असलेला पुरातत्त्व विभागाचा अधिकारी, गुंफेच्या मुखाच्या बर्याच वर, म्हणजे मी उभा आहे त्या स्थानापासून निदान 90 ते 100 फूट तरी ऊंचीवर, असलेल्या समोरच्या पाषाण कड्याकडे माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रथम नीटसे दिसत नाही. परंतु नंतर लक्षात येते की समोरच्या उभ्या कड्यावर एवढ्या ऊंचीवर काहीतरी कोरीव काम केलेले आहे. या एवढ्या ऊंचीवर काय कोरले असावे असे आश्चर्य व्यक्त करत असतानाच हे कोरीव काम म्हणजे खाली असलेल्या विहारातील कोठड्यांच्या द्वारावर जशा घोड्याच्या नालाच्या आकाराच्या चैत्य कमानी कोरलेल्या आहेत, बरोबर तशाच, पण आकाराने बर्याच मोठ्या असलेल्या कमानींच्या रांगा आहेत हे माझ्या लक्षात येते आहे. कड्याचा बराचसा भाग ढिसूळ झाल्याने पडला असल्याने, आता फक्त 4किंवा 5 कमानी वर दिसत आहेत. या प्रत्येक कमानीमधील आतल्या खड्डेवजा भागात एकापेक्षा एक मोठा व्यास असलेल्या 3 किंवा 4 बेर्म रेल कमानींचा (berm-rail arches) एक संच कोरलेला आहे तर दोन कमानींच्या मधल्या (आडव्या पातळीवर) भागात लाकडी जाळी समान दिसणार्या जाळ्या (wooden lattice design) कोरलेल्या आहेत. मोठ्या आकाराच्या कमानींच्या रांगेच्या खाली तशाच पण लहान आकाराच्या चैत्य कमानींची रांग दिसते आहे. या रांगेपैकी सुद्धा फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कमानी आता शाबूत आहेत. जरा उजवीकडे नजर फिरवल्यावर 3 क्रमांकाच्या चैत्यगृहाच्या डोक्यावरच्या पाषाणात सुद्धा, मला बेर्म रेल कमानींचा एक संच दिसतो आहे. म्हणजेच चैत्य कमानींचे डिझाइन येथेही कोरलेले होते.
या चैत्य कमानी, बेर्म रेल कमानी व लाकडी जाळी पॅटर्न, या प्रकारचे कोरीव काम सर्व हीनायन पंथांच्या बौद्ध मठात दिसून येते.त्यात विशेष असे नाही. कार्ले यथील चैत्यगृहाच्या आतल्या भिंतीवर हे डिझाइन खालील पातळीवरील शिल्पांच्या डोक्यावर अगदी 30 ते 40 फूट ऊंचीपर्यंत केलेले आढळते किंवा अजंठ्याच्या 9 क्रमांकाच्या व पितळखोर्याला समकालीन असलेल्या चैत्यगृहाच्या मुखावर (Facade) सुद्धा हे डिझाइन आढळते. परंतु 3 क्रमांकाचे चैत्यगृह व 4 क्रमांकाचा विहार यांच्या मुखाच्या वर असलेल्या उभ्या कड्यावर, 50 ते 60 फूट ऊंचीपासून ते खाली पार गुंफेच्या तळापर्यंतच्या कड्यावर येथे कोरीव काम केलेले होते. या सर्व कोरीवकामामुळे त्या काळात ही गुंफा केवढी भव्य व नेत्रदीपक दिसत असेल याची फक्त कल्पनाच आज करता येते. टॉलेमीच्या लेखनापासून ते बौद्ध महामयूरी या बौद्ध इतिहास सांगणार्या ग्रंथामध्ये पितळखोर्याच्या गुंफांचा का उल्लेख केलेला होता याचे कारण या गुंफांच्या भव्यतेमध्ये सापडते असे मला वाटत राहते. पितळखोरे गुंफा माझ्यासमोर आणखी किती आश्चर्ये सादर करणार आहेत हेच मला आता कळेनासे झाले आहे.
कड्यांवरील कमानींकडे परत एकदा डोळे भरून मी पाहून घेतो व जमिनीवर
पडलेल्या पाषाण खंडांकडे माझे लक्ष वळवतो. 4 क्रमांकाच्या विहारासमोर
असलेल्या हत्तींच्या शिल्पांपैकी एक हत्तीचे डोके समोरच्या वाळूवर पडलेले
दिसते आहे. त्याची सोंड मात्र पूर्णच तुटून गेलेली दिसते आहे. माझ्या
आजूबाजूला पडलेल्या शिलाखंडांपैकी बरेचसे समोरच्या कडा तुटून खाली आलेले
असले पाहिजेत. एका शिलाखंडावर बौद्ध पद्धतीचे रेलिंग कोरलेले मला दिसते.(या
पद्धतीचे रेलिंगचे डिझाइन सांची व अमरावती येथील समकालीन स्तूपांच्या
भोवताली केलेले आढळते.) तर एका शिलाखंडावर लाकडी जाळीचा पॅटर्न कोरलेला
आहे. पलीकडे अगदी छोट्या छोट्या चैत्य कमानी व लाकडी जाळ्यांचा पॅटर्न
कोरलेले एक पॅनेल पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी आधार देऊन उभे करून
ठेवलेले दिसते आहे. 3 क्रमांकाचे चैत्यगृह वा 4क्रमांकचा विहार यांच्या
मुखाच्या भागावर (Facade) या प्रकारचे डिझाइन संपूर्णपणे कोरलेले होते हे
या पॅनेलवरून लक्षात येते आहे.
ज्या शिलाखंडांवर सुस्थितीत असलेली बास रिलिफ शिल्पे होती असे सर्व
पाषाणखंड, पुरातत्त्व विभागाने त्यांची अधिक हानी होऊ नये किंवा ते चोरली
जाऊ नयेत या साठी आधीच येथून निरनिराळ्या ठिकाणच्या संग्रहालयांत हलवलेले
आहेत. यापैकी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात असलेली शिल्पे सातवाहन
साम्राज्यकालातील सर्वसामान्य लोक किंवा राजेरजवाडे यांचे आयुष्य किंवा
त्यांची वस्त्रप्रावरणे या बद्दल काही माहिती आपल्याला देऊ शकतील असे मला
वाटते. या संग्रहालयातील पितळखोरे शिल्पांसंबधी थोडी चर्चा आपण नंतर करणार
आहोत.
क्रमांक 5 पासून ते क्रमांक 9 पर्यंत असलेल्या गुंफा या सर्व बौद्ध विहारच होत्या.मात्र या सर्व गुंफांची आता खूपच पडझड झालेली आहे. या गुंफात थोडीफार शिल्पे का रंगकाम आहे असे मी वाचले आहे. परंतु पुरातत्त्व विभागाने त्यांची डागडुजी करून त्या भेट देता येतील अशा अवस्थेला आणल्याशिवाय तेथे जाणे शक्य नाही हे लक्षात आल्याने नदीच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या दक्षिणाभिमुखी गुंफांकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु या गुंफाकडे जाणारा मार्ग एकतर अतिशय चिंचोळा व अरूंद आहे. एका बाजूला खोल नदी व दुसर्या बाजूस उभा कडा यांच्यामधून हा रस्ता जातो. एकंदरीत हा रस्ता जाण्यास फारसा सुरक्षित नाही हे थोडे पुढे गेल्यावर माझ्या लक्षात येते व त्या गुंफांना भेट देण्याचा माझा प्रयत्न मी अर्धवट सोडून देतो व नाईलाजाने दरीत खाली उतरलेल्या 175 पायर्या चढून आमची गाडी पार्क केलेली आहे त्या ठिकाणाकडे जाण्यासाठी पायर्या चढण्यास प्रारंभ करतो.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात पितळखोर्याला सापडलेल्या शिल्पांपैकी 4 शिल्पे प्रदर्शित केलेली आहेत. त्यांच्याकडे आपण वळूया. यापैकी पहिले बास रिलिफ शिल्प एका प्रेमी युगुलाचे आहे. हे युगुल हातात हात गुंफून उभे असल्याचे या चित्रात दर्शवलेले आहे. या युगुलापैकी उजव्या बाजूला असलेल्या स्त्रीने नाभी प्रदेशाखाली नेसलेला असा एक लांब स्कर्ट परिधान केलेला आहे. हा स्कर्ट तिच्या पावलांच्या थोड्या वर म्हणजे घोट्यांपर्यंत लांब आहे. कंबरेजवळ या स्कर्टला चुण्या (pleated) ठेवलेल्या आहेत व कंबरेजवळ या स्कर्टलाच, भरतकाम केलेल्या शेल्यासारखे एक वस्त्र जोडून टाकलेले आहे. या स्त्रीने अंगावर बरेच दागदागिने परिधान केलेले दिसतात.गळ्यात अनेक पदरी मोती किंवा मण्याचे हार घातलेले आहेत व या हाराला मध्यभागी एक रत्नजडित पेंडट जोडलेले आहे. कर्णभूषणे लोंबती व पेंडंट लावलेली आहेत. हातात 2 तरी पाटल्या व 6 बांगड्या दिसत आहेत. कपाळाजवळ या स्त्रीच्या लांब केसांच्या दोन वेण्या घातलेल्या असून या वेण्या कपाळावरून दोन्ही बाजूंना खांद्यांपर्यंत पोचतील एवढ्या लांब व मुंडावळ्या बांधल्यावर दिसाव्या तशा सोडलेल्या आहेत. डाव्या बाजूच्या पुरुषाने गुढग्यापर्यंत येईल असे धोतर परत नाभीखालीच नेसलेले आहे. या धोतरावर त्याने पोढे गाठ मारलेला शेला कंबारेवर बांधला आहे. हातात त्याने 4 ब्रेसलेट्स घातलेल्या आहेत तर गळ्यात एक पुष्पमाला आहे. खांद्यापर्यंत लांब असलेल्या केसांचा त्याने आपल्या कपाळाजवळ बुचडा बांधलेला आहे. हा पुरुष एका पडद्यासारख्या बांधलेल्या वस्त्राच्या पदराजवळ उभा असल्याचे दिसते आहे.
दुसरे बास रिलिफ शिल्प एक राजा व राणी यांचे आहे. कोणत्या सातवाहन राजाचे हे शिल्प आहे हे कळण्यास वाव नसला तरी सिमुक, कृष्ण किंवा श्री सातकर्णी यांच्यापैकी एका राजाचे हे शिल्प असले पाहिजे. उजव्या बाजूच्या राणीने केलेली केशरचना गुंतागुंतीची वाटते आहे. पहिल्या शिल्पाप्रमाणेच राणीच्या पुढच्या केसांच्या वेण्या कपाळाजवळ घातलेल्या असून त्या मुंडावळ्यांप्रमाणे खांद्यांपर्यंत आलेल्या आहेत. मागच्या बाजूस राणीच्या केसांचा एक मोठा अंबाडा बांधलेला आहे. राणीच्या अंगावर भरपूर दागदागिने अर्थातच आहेत. यात गळ्यात हार, लांब व लोंबती कर्णभूषणे, दंडावर असलेली पोची, हतात पाटल्या व बांगड्या आणि पायात रत्नखचित कडी यांचा समावेश आहे. भरत नाट्यम करणार्या नर्तकींसारखी तिची साडी दोन्ही पायांभोवती घट्ट गुंडाळलेली असून ती खाली घोट्यांपर्यंतच्या लांबीची नेसलेली आहे. साडीवर व काठांना जरीचे भरतकाम केलेले आहे. कंबरेभोवती रत्नखचित शेला बांधलेला आहे. एका दासीने पुढे केलेल्या तबकातून ती फुलांसारखे काहीतरी उचलताना दाखवलेली आहे. डाव्या बाजूल कोरलेल्या राजाच्या अंगावर गुढग्यापर्यंत येणारे धोतर असून त्यावर शेला गाठ मारून बांधलेला आहे. त्याच्या गळ्यात एक हार आहे. दंडावर 2 पोची दिसतात आणि कानात कुंडले घातलेली आहेत. त्याचे खांद्यापर्यंत येणारे केस कपाळाजवळ बुचडा करून बांधलेले आहेत. एका बारीक नक्षीकाम केलेल्या दगडी किंवा लाकडी सिंहासनावर किंवा मंचकावर व्याघ्रांबर पसरून त्यावर राजा व राणी बसलेले दाखवलेले आहेत. त्यांच्या मागे त्यांचे 3 दास दासी दाखवलेले असून त्यांची वेशभूषा साधारण राजा राणी यांसारखीच वाटते आहे.
तिसर्या बास रिलिफ शिल्पात 2 युगुले व त्यांच्या मध्ये 2 घोडे दिसत आहेत. स्त्री पुरुषांची एकूण वेशभूषा आधी उल्लेख केलेल्या शिल्पातील स्त्री- पुरुषांसारखीच असली तरी साधी वाटते आहे. पुरुषाचे कपडे पितळखोर्यातील यक्ष द्वारपालासारखेच एकूण दिसत आहेत. दाखवलेले दोन घोडे शिल्पात फक्त एक सुशोभन म्हणून कोरलेले असावेत.
4थ्या शिल्पात बुद्धाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण; त्याने केलेला राजगृहाचा त्याग (Great Renunciation) हा दर्शवलेला आहे. हीनयान पंथाच्या पद्धतीप्रमाणे, बुद्ध अर्थातच दाखवलेला नाही. एक सजवलेला घोडा वा त्याच्यापुढे हातात मशाल घेऊन चालणारा एक सेवक हे दाखवलेले आहेत. मागे 2सेवक आणि त्याने स्वीकारलेला नवीन या नवीन पंथाचे द्योतक म्हणून स्तूपाच्या प्रवेशमार्गावर ज्या पद्धतीची तोरणे उभी करत असत तसे एक तोरण दाखवलेले आहे. या शिल्पातील सेवकांची वेशभूषा सुद्धा आधी वर्णन केलेल्या पुरुष वेशभूषेप्रमाणेच आहे.
पितळखोर्याच्या माझ्या भेटीत मी काय बघितले याचा सारांश घ्यायचा ठरवला तर या लेण्यांमध्ये सातवाहन राजांबद्दल थेट कोणतेच संदर्भ मिळत नाहीत हे मान्य करावेच लागेल. परंतु लेण्यांमध्ये जे शिलालेख सापडलेले आहेत त्यातील हस्ताक्षराचे वळण पूर्णपणे मौर्य किंवा सम्राट अशोककालीन ब्राम्ही लिपीचे असल्याने पितळखोरे येथील लेणी सातवाहन राजे सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी यांच्या राज्यकालात खोदली गेलेली आहेत हे निर्विवाद्पणे सिद्ध होते.
सातवाहन राजे स्वत: हिंदू ब्राम्हण होते. तरीही इतर धर्मांविषयी त्यांची अधिकृत भूमिका सर्व धर्म सहभाव व आदर अशीच होती.या राजांचा, प्रतिष्ठान किंवा पैठण या ठिकाणी असलेल्या राजधानीत वास्तव्य करणारा, राजवैद्य मोगिला याने या बौद्ध मठाला विहार खोदण्यासाठी देणगी देणे हे काही राजाच्या विरोधात जाऊन केले असणे शक्य नसल्यामुळे राजाचे अधिकृत धोरण काय होते याची आपण कल्पना करू शकतो.
राजा स्वत: राणी व इतर सर्वसामान्य जनसामान्य यांची वेशभूषा अतिशय साधी आणि रोजच्या व्यवहारास अनुकूल होती हे पितळखोरे येथील बास रिलिफ व पूर्णाकृती शिल्पांवरून दिसून येते आहे. या शिल्पातील स्त्रियांच्या काही फॅशन्स अजूनही प्रचलित आहेत हे कोणासही सहजपणे लक्षात येऊ शकते.
पितळखोरे लेणी ही त्या काळात किती भव्य आणि नेत्रदीपक दिसत असली पाहिजेत याची फक्त कल्पनाच आता आपण करू शकतो. ही लेणी एवढ्या दुर्गम ठिकाणी का बांधली असावीत? असा एक प्रश्न मनात येतो. परंतु चाळीसगावच्या बाजूने आल्यास कदाचित एखादा सोपा मार्ग या लेण्यांकडे येत असल्याची शक्यता नकाशावरून तरी वाटते. पितळखोर्याच्या दरीतील नाला किंवा नदी पुढे पाटण या खेडेगावावरून वहात जाते. या नदीच्या काठाने हा रस्ता असण्याची बरीच शक्यता आहे.
पितळखोर्याच्या लेण्यांमधील शिल्पांवर असलेला ग्रीक प्रभाव बघता या लेण्यांचा मुख्य वास्तुशिल्पकार यवन किंवा यवनांच्याकडे शिक्षण घेतलेला तरी असला पाहिजे असे माझे मत झाले आहे. यानंतर याच कालात निर्माण झालेल्या दुसर्या म्हणजेच अजंठ्याच्या लेण्यांकडे आपण वळूया.
समाप्त
पितळखोर्याच्या लेण्यांवरची ही लेखमाला उत्तम आहे. फार आवडली.
विशेषतः या भागातील शिल्पांची वर्णेने फारच सुरेख आहेत.
राजा राणीच्या शिल्पात राणी राजाच्या मांडीवर बसली असावी. राजाचा हातही तिला कवेत घेतो आहे. कदाचित अंतःपुरातील आराम या शिल्पातून व्यक्त होत असावा.
मला असे वाटत नाही. पत्नी पुरुषाच्या मांडीवर बसली असल्याचे ग्रीक उदाहरण पटकन डोळ्यासमोर येत नाही. या शिल्पकारांनी ग्रिकांकडे "शिक्षण" घेतले असेल हे गांधार शैलीवरून म्हटले असते तर पटायला हरकत नव्हती. पण गांधार शैली नंतर विकसित झाली. प्रभाव यवनी असावा यात शंका नाही पण जाणीवा भारतीय वळणाच्या असाव्यात.
पितळखोरे वा अजंठा ही दोन्ही लेणी समकालीन आहेत. परंतु अजंठ्यामधील चित्रकलेत असा यवनी प्रभाव अजिबात जाणवत नाही. पितळखोरे लेणी बनवली तेंव्हा गांधार शैली अजून विकसित व्हायची होती, त्यामुळे हा प्रभाव गांधार शैलीचा असणे संभवनीय नाही. श्री भटक्या यांच्या प्रतिसादाप्रमाणे भाजे लेण्यांत हा यवनी प्रभाव आढळतो. भाजे लेणी ही सर्वात जुनी म्हणजे पितळखोर्याच्या आधीची समजली जातात. त्यामुळे या काळात यवनी (भाजे-पितळखोरे) वास्तुशिल्पकार असणे मला तरी शक्य वाटते.
अजंठ्यातील चित्रात तोरण मात्र आढळते. (समकालीन गुंफा 9 आणि 10 मध्ये)











No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.