Sunday, April 18, 2021

कुमाऊं

 

कुमाऊं - पूर्वतयारी

यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीमधे कुठे जायचे ह्याची चर्चा नविन वर्ष सुरु झाल्यावर लगेच सुरु झाली. एप्रिलमधे साधारण एक आठवड्याची ट्रीप करावी असा विचार होता. उन्हाळा जोरदार असणार म्हणुन एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध घेत होतो. पूर्वी एकदा दिल्लीच्या मित्राबरोबर बोलत असताना त्याने “कुमाऊं परिसर बघ” असा सल्ला दिला होता. तो अजुन डोक्यात घुटमळत होता. म्हणुन तोच भाग बघायचे ठरवले. बायकोचीही कुठली ठरविकच ट्रीप करायची अशी मागणी नव्हती त्यामुळे ही जरा वेगळी ट्रीप करायचे ठरले. अर्थात, हा परिसर पुणे-मुंबईकरांसाठी वेगळा असला तरी दिल्ली/NCRवाल्यांसाठी मात्र महाबळेश्वर सारखाच जवळचा आहे.

एप्रिलमधे कुमाऊंचे हवामान आल्हाददायक असते. थंडी नुकतीच संपलेली असते आणि उन्हाळ्याची तीव्रता फारशी नसते. साधारण महाराष्ट्रात जसे वातावरण थंडीत असते तसेच काहीसे तिथे एप्रिलमधे असते. पर्यटनाचा मुख्य काळ हा मे व जून असा असल्याने एप्रिलमधे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते. उत्तरेत शाळांच्या सुट्ट्यादेखिल उशीराच असतात ते देखिल एप्रिलमध्ये पर्यटक कमी असण्याचे कारण असू शकते. ह्या सगळ्या कारणास्तव आम्ही एप्रिलमध्येच जायचे ठरवले.

हा परिसर खुणावण्याचे अजुन एक कारण म्हणजे साक्षात ‘हिमालय’ पहायला मिळणार होता!!

आता एकदा कुठे जायचे हे ठरले की पुढचे नियोजन करणे सोपे पडते. त्या परिसरात काय काय पहायला आहे ह्याची कल्पना मित्राने दिलेलीच होती. तरी मी माहिती गोळा करायचे काम सुरु केले. त्यासाठी मला नेहमी ऊपयोगी पडणारे साधन म्हणजे Tripadvisor चा वापर सुरु केला. उत्तराखंडच्या फोरमवर ८ दिवसांच्या ट्रीपमधे काय काय पहाता येईल ह्याची चौकशी केली. यथावकाश मला त्यावर योग्य प्रतिसाद मिळाले. Google Maps तर सोबतीला होताच. मग साधारणपणे काय बघायचे आणि त्याचा काय मार्गक्रम असेल हे निश्चित झाले.

पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रवासाचे आरक्षण. प्रवास लांबचा असल्यामुळे दिल्लीपर्यंत विमान आणि पुढे रेल्वेने प्रवास करायचे ठरवले. रेल्वेने दिल्लीपासुन काठगोदामपर्यंत जाता येते. तिथुन पुढे अर्थात टॅक्सी/बस शिवाय पर्याय नाही. रेल्वे आरक्षण मिळायला काहीच अडचण आली नाही. (हे सर्वात महत्त्वाचे... IRCTCचा काहीच भरवसा नसतो). अणि रेल्वे आरक्षण झाल्यावर मगच विमान तिकिट बुक केले.

कुमाऊंमधे पहायला बरेच काही आहे. Tripadvisor वर मिळणारे पर्याय, मित्र सुचवत असलेले पर्याय, मला बघायची असलेली ठिकाणे ह्यावरुन मी बरेच वेगवेगळे प्लॅन बनवत होतो आणि बायकोला “मेरे नये पिलॅन के मुताबिक...” सांगत होतो. तरी आम्ही उपलब्ध दिवस, प्रवासाला लागणारा वेळ आणि बरोबर असलेला ५ वर्षाचा मुलगा ह्या सगळ्याचा विचार करून खालील प्लॅन बनवला.

काठगोदाम --> बिन्सर (१रात्र) --> चौकोरी (१रात्र) --> मुन्स्यारी (२रात्र) --> कौसानी (१रात्र) --> रानीखेत (१रात्र) --> नैनिताल (२रात्र) --> काठगोदाम.

Kumaon Route Map

आता वेळ आली होती हॉटेल शोधायची. इथेदेखिल अर्थात Tripadvisor चीच मदत घेतली. आम्हा दोघांच्या हॉटेलच्या बाबतीत फार अवास्तव अपेक्षा नसतात. ४/५ चांदण्यावालेच पाहिजे असे काही नाही. पण मूलभूत सुविधा व्यवस्थित असायलाच हव्या हा आग्रह मात्र नक्कीच असतो. आता कुमाऊं परिसरात काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत तर काही ह्या सगळ्या कोलाहलापासुन मैलोन् मैल दूर असलेली. त्यामुळे हॉटेलपण ठिकाणाप्रमाणे वेगवेगळी होती.

अशातच एके दिवशी कार सर्व्हिसिंगला द्यायला गेलो असताना सहज सर्व्हिस स्टेशनच्या समोर पाहिले असता ‘कुमाऊं मंडल विकास निगम' (KMVN) चे ऑफिस दिसले! म्हटले अरे वा! ज्याचा शोध घेत आहे ते तर समोरच आहे. ऑफिसमधे जाउन सरकारी हॉटेलची चौकशी केली. KMVNनी जवळपास सर्वच पर्यटन स्थळांपाशी त्यांची रेस्ट हाउस (TRH) उभारलेली आहेत. मुख्य म्हणजे आपल्या MTDC सारखे त्यांची पण सर्व हॉटेल मोक्याच्या ठिकाणीच आहेत. Tripadvisorवर सुद्धा लोकांनी बरेच बरे रिव्ह्यू लिहिलेले होते. म्हणुन सरतेशेवटी बिन्सर, चौकोरी, मुन्स्यारी व कौसानी येथे KMVNची हॉटेल बुक केली. रानीखेत आणि नैनितालला मात्र दुसरे पर्याय शोधले.

कुमाऊं मधल्या संपुर्ण प्रवासासाठी एक कार बुक केली जी आम्हाला पहिल्या दिवशी काठगोदामला उचलुन सगळे कुमाऊं दाखवुन शेवटच्या दिवशी परत काठगोदामलाच सोडणार होती.

अशा प्रकारे सर्व बुकींग्ज करुन आम्ही ट्रीपसाठी सज्ज झालो.

 कुमाऊं – प्रवासाला निघताना

ट्रीपची तारीख जवळ यायला लागली आहे हे साधारण कसे कळते? तर “अरे, ८ दिवसांवर ट्रीप आलीये आणि अजुन तुम्ही बॅग पण नाही काढली”, “अरे, काय काय न्यायचे आहे त्याची यादी तरी केलीत का?”, “प्रवासात खायला काही करुन देऊ का?” अश्या प्रकारचे संवाद घरात ऐकू येऊ लागले म्हणजे ट्रीपची तारीख जवळ आली हे नक्की. एकटा पुरुष महिनाभराच्या Onsiteवर जाणार असेल तरी तो त्याचे सगळे सामान एका दिवसात व्यवस्थित तयार ठेवू शकतो. पण जेव्हा “कुटुंब" असते तेव्हा मात्र सगळ्या “सूचनांचे" पालन करावे लागते. आणि मग किमान ८ दिवस तरी आधी तयारीला लागावे लागते. आम्ही जिथे कुठे जाऊ तिथले स्थानिक पदार्थ खाणेच पसंत करतो. त्यामुळे प्रवासात ‘तिखट-मिठाच्या पुर्‍या’ सारखे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य असतात. तर आम्ही पण अश्या सर्व सुचनांचे पालन करत ‘बॅगा बांधल्या'. मुलगा तर पहिल्यांदा विमान प्रवास करायला मिळणार म्हणुन भलताच खुश होता.

दिल्लीला पोहोचल्यानंतर काठगोदाम रेल्वे सुटेपर्यंत मधे बराच अवांतर वेळ होता. दिल्ली विमानतळ ते पुरानी दिल्ली जंक्शन हे साधारण २५किमी अंतर होते. हे पार करायला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होते. पण वेळ भरपूर असल्याने मी दिल्ली मेट्रोने जायचे ठरवले होते. ह्याची कल्पना मी बायकोला शेवटच्या दिवसापर्यंत दिली नव्हती. घरातुन निघताना तिने विचारल्यावर मी तिला मेट्रोबद्दल सांगितल्यावर ती खुशच झाली.

विमानाने पहिल्यांदा प्रवास करणार म्हणुन मुलगा खुश, दिल्ली मेट्रोमधुन प्रवास करणार म्हणुन बायको खुश. आणि ते दोघे खुश हे बघुन मी पण खुश.

विमानतळावरचे सगळे सोपस्कार पार पाडुन आम्ही विमानात दाखल झालो. मुलाने अर्थातच खिडकीची जागा पटकावली. विमानाचे टेक-ऑफ तर मुलाला फारच रोचक वाटले. कुतुहलाने तो खाली दिसणार्‍या आणि हळुहळु बारीक होत चाललेल्या गोष्टी बघत होता. स्थिरस्थावर झाल्यावर जेट एअरवेजने खायलापण आणले. मुलगा अजुनच खुश. पण मग आता जेवण झाले, विमान पण आता बरेच वर आले होते, खालचे काही दिसत नव्हते. असे सगळे झाल्यावर मुलाची चलबिचल सुरु झाली. मग सीटवरच उभे रहा¸ मागच्या-पुढच्या सीटवर काय चाललय ते बघ असे उद्योग सुरू झाले. ‘कुर्सी की पेटी’ तर त्याला बांधायचीच नव्हती. थोडक्यात काय, तो कंटाळला. दिल्लीला पोचल्यावर विमानाच्या बाहेर पडल्यावर त्याला जरा मोकळे वाटले. ठरल्याप्रमाणे आम्ही भूमिगत मेट्रोकडे वळालो.

दिल्ली मेट्रो हा एक सुखद अनुभव होता. (दिल्लीमध्ये फक्‍त दोनच गोष्टी मॉडर्न आहेत. एक दिल्ली मेट्रो आणि दुसरी विकी डोनरची आजी) विमानतळापासुन पुरानी दिल्ली पर्यंत काही एक सलग मेट्रो नव्हती. आम्हाला प्रथम केशरी लाईन मेट्रोने नवी दिल्ली आणि तिथुन मार्ग बदलुन पिवळी लाईन मेट्रोने चांदनी चौकला जावे लागणार होते. मेट्रोला पण सिक्युरिटी चेक झाले आणि सगळे सामान वागवत आम्ही फलाटावर पोहोचलो. एअरपोर्ट मेट्रोला काही गर्दी नव्हती. मेट्रो मधे व्यवस्थित announcements होत होत्या. मार्गदर्शक फलक होता आणि त्यावर एक मस्त एलईडी लाईट्सचा ‘प्रोग्रेस बार’ होता. जसजसे अंतर जात होते तसे ते एलईडी लाईट्स प्रकाशत होते. आणि स्टेशन आले की त्या दोन स्टेशनमधला प्रोग्रेस बार भरुन जायचा. स्टेशन यायला किती वेळ आहे ते समजायला मदत होत होती. मेट्रो मधेच एका ठिकाणी जमिनीतुन बाहेर आली आणि काही वेळाने पुन्हा जमिनीखाली गेली. नवी दिल्ली पासुन चांदनी चौक फार लांब नाही. त्यामुळे रिक्षाने पण जाता आले असते. पण आम्ही मेट्रोनेच जाणे पसंत केले. हा अनुभव मात्र सुखद म्हणण्यापेक्षा ‘ओळखीचा' होता. पिवळ्या लाईनला तोबा गर्दी होती. म्हणजे अगदी लोकल ट्रेनला जशी असते तशी. एकतर आमच्याकडे भरपुर सामान होते. आणि मुलगादेखिल. २-३ ट्रेन अशाच सोडुन दिल्या. नंतर मात्र एका ट्रेनमधे दारापाशी बर्‍यापैकी जागा दिसली. म्हणुन घुसलो. फार काही त्रास न होता चांदनी चौकला पोहोचलो. तिथे मेट्रो स्टेशन मधुनच एक रस्ता पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनकडे जातो. त्रास फक्त एवढाच आहे की तिथे कुठे रॅम्प नाही. त्यामुळे खुप वेळा सामान उचलुन जीने चढावे लागत होते.

रेल्वे सुटायला वेळ होता म्हणुन आधी जेवण करुन घ्यावे म्हटले. जवळपास कुठे जावे म्हणले तर मुलगा पेंगुळला होता. शेवटी रेल्वे स्टेशनवरच ‘कमसम’ मधे खाणे उरकले. दिल्ली मेट्रो जेवढी स्वच्छ व व्यवस्थित आहे त्याच्या एकदम विरुद्ध रेल्वे स्टेशन. अतिशय घाण. ‘स्वच्छ भारत अभियान’ इथे पोचायला किमान अडीचशे वर्षे तर नक्कीच लागतील. असो. रेल्वे वेळेवर आली आणि वेळेवर सुटली! आमचे काठगोदामकडे मार्गक्रमण सुरु झाले.

काठगोदामला पहाटे पाचच्या आसपास पोहोचलो. हवेतला बदल लगेचच जाणवला. आम्ही ठरवलेली गाडी पण थोड्या वेळात पोहोचली. गाडीचा सारथी एक तरुण मुलगाच होता. २०-२५ वर्षाचा असावा. टिपीकल चेहरेपट्टी आणि हिन्दी बोलायची एक विशिष्ठ पद्धत. थोडा उद्धट वाटू शकेल असा भाषेचा लहेजा. सारथी चांगलाच देवभक्त होता. त्याने कारमध्ये एक छोटी घंटा बसवली होती. (छोटी म्हणजे, साधारण आपल्या देवघरात जी घंटी असते तिचा दांडा काढल्यावर जे उरेल तसे काही) रस्त्यावरुन जाताना कुठलेही मंदिर दिसले की तो ती घंटा वाजवायचा. त्याच्या नजरेतुन साधारणपणे सुक्ष्म/छोटे/मोठे असे कुठलेच मंदिर सुटायचे नाही. नंतर नंतर तर आम्हाला त्याची एवढी सवय झाली की घंटा वाजली की प्रथम आजुबाजुला कुठले मंदिर दिसतेय का ते बघायचो. आणि नाहीच दिसले तर मग रस्त्यावर खड्डा असेल असे समजुन घ्यायचो. असो. तर आमचे आमच्या पहिल्या ठिकणाकडे मार्गक्रमण सुरु झाले. गेल्या २४ तासातले वाहतुकीचे हे आमचे चौथे साधन होते.

काठगोदाम सोडल्यावर लगेचच घाटरस्त्याला सुरुवात झाली. वळणावळणाचे रस्ते. ते पाहुन आम्ही नाश्ता करणे टाळले. मुक्कामी पोहोचल्यावरच बघू असे ठरले. रस्ते चांगले होते. एकुण डोंगराळ भाग, पावसाचे प्रमाण, दरडी वगैरे पहाता रस्त्यांची स्थिती बरीच बरी होती. निसर्ग तर मस्तच होता. डोंगर, दाट झाडी, मधेच उथळ पात्राच्या नद्या आणि त्यांचे मस्त निळे पाणी. सगळेच छान वाटत होते. आमची नजर मात्र हि्मालय कधी आणि कुठे दिसतोय ह्याचा शोध घेत होती. अखेर अल्मोडा सोडल्यावर थोड्याच वेळाने आमची हिमालयाशी पहिली नजरानजर झाली. वाह!! काय मस्त नजारा होता तो. आता पुढचे काही दिवस आम्ही त्याच्याच साथीने रहाणार होतो.

उथळ पात्राच्या नद्या
उथळ पात्राच्या नद्या

हिमालयाचे पहिले दर्शन (अल्मोडा)
हिमालयाचे पहिले दर्शन (अल्मोडा)

घाटरस्ता मात्र काही संपत नव्हता. सलग अर्धा किमी रस्ता सरळ दिसेल तर शप्पथ. अश्या प्रकारे असंख्य वळणेवळणे घेत साधारण ४-४.५ तास प्रवास करुन आम्ही बिन्सर TRHला पोहोचलो.

खरेतर, लंपनच्या भाषेत सांगायचे झाले तर तब्बल सतराशे एक्क्याऐंशी वळणे घेउन आमची गाडी पहिल्या मुक्कामी पोहोचली. तंतोतंत!!

क्रमश: ...

कुमाऊं – बिन्सर-चौकोरी

आमच्या प्रवासातला पहिला टप्पा ‘बिन्सर’ होता. बिन्सर हे मुख्यत: अभयारण्य म्हणुन प्रसिद्ध आहे. हे उत्तरांचल राज्यातील ‘अल्मोडा’ जिल्ह्यात आहे. समुद्रसपाटीपासुन साधारण २४१२मी ऊंचीवर असलेले बिन्सर हे निसर्गाच्या अत्यंत जवळ आहे. इथे वेगवेगळे पक्षी, प्राणी तसेच काही खास हिमालयीन प्राणी देखिल आढळतात. अभयारण्य प्रवेशासाठी प्रवेश फी आहे. तुम्हाला स्वत:च्या वाहनानेच आत जावे लागते. आतमधे गाईड आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही पायी फिरुन अभयारण्य बघू शकता. बिन्सरमधे मुक्कामासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रिसॉर्ट, हॉटेल्स, गेस्ट हाऊस ज्याच्या त्याच्या बजेटनुसार सोय आहे. ‘क्लब महिंद्रा’ सारखे काही नावाजलेले पर्याय सुद्धा आहेत. पण हे सर्व पर्याय हे अभयारण्याच्या सीमारेषेबाहेर आहेत. KMVNनी मात्र एक रिसॉर्ट थेट अभयारण्याच्या आत उभारलेले आहे. आणि आम्ही आमच्या मुक्कामासाठी हाच पर्याय निवडला.

KMVN चे रिसॉर्ट अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासुन १०किमी आतमध्ये आहे. हा रस्ता अरुंद, बराचसा दगडमातीचा आणि घनदाट जंगलातुन जाणारा घाटरस्ता आहे. कुठेही नजर गेली तरी मुबलक प्रमाणात ओक, पाईन, देवदार ही झाडे दिसतात. बिन्सर अभयारण्याचे अजुन एक वैशिष्ट्य की तिथे आतमधे वीज पोचलेली नाही. सर्वकाही नैसर्गिकच ठेवायचा जंगल विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुमच्या हे लक्षात यायला वेळ लागला नसेल की KMVNच्या रिसॉर्टवर देखिल वीज नाही. आता क्षणभर तुम्ही डोळे बंद करुन विचार करा की घरात वीज नसल्यावर काय काय होते? आता तेच घर तुम्ही जंगलाच्या मधोमध नेऊन ठेवा आणि परत एकदा विचार करा. तर असाच काहीसा अनुभव घेता यावा म्हणुन आम्ही हे रिसॉर्ट निवडले होते खरे. पण आम्हाला कल्पना नव्हती की आमच्या पुढ्यात काय वाढुन ठेवले आहे ते.

तर आम्ही रिसॉर्टवर पोहोचल्या पोहोचल्याच मॅनेजरने आम्हाला पहिला धक्का दिला. ‘पाणी खेचायचा पंप ४ दिवसांपूर्वी ब्लो झालाय आणि त्यामुळे रिसॉर्टवर पाणी नाहीये. पिण्यासाठी पाणी मिळेल आणि इतर गरजांसाठी फक्त एक बादली पाणी मिळेल.’ २० तास प्रवास करुन तिथे पोहोचल्यावर असे काही ऐकायला मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. आणि आता परिस्थिती अशी होती की काही करता पण येणार नव्हते. आजुबाजुला दुसरे काहीही नाही. दुसरे हॉटेल बघायचे म्हणजे परत पूर्णपणे अभयारण्याच्या बाहेर जाउन नव्याने शोध घ्या. बरे, हे सरकारी रिसॉर्ट असल्याने रिफंड वगैरे असली काही भानगड नाही. एकुण काय तर नारायण पूर्णपणे अडला होता. प्रश्न एका रात्रीचाच असल्याने आम्ही तिथेच थांबायचे ठरवले.

रिसॉर्टवर २-३ प्रकारच्या एकूण १६ रूम्स उपलब्ध आहेत. आम्ही त्यातल्या त्यात चांगली रूम निवडली होती. रिसॉर्टचे बांधकाम जरी कॉन्क्रीटचे असले तरी अंतर्गत सजावट ही पूर्णपणे लाकडाचीच होती. फ्लोअरिंग, बेड, खुर्च्या, टेबल तसेच भिंतींवरदेखिल लाकडी पट्ट्या मारल्या होत्या. त्यामुळे एकदम जंगल रिसॉर्टचा फील होता. रूम मात्र त्यामानाने छोट्या होत्या. रूममधुन व्ह्यू पण चांगला होता. वीजच नसल्याने रूममध्ये कुठलेच इलेक्ट्रॉनिक साधन नव्हते. रिसॉर्टवर संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत जनरेटरवर वीज असते. तेवढ्या वेळात मोबाईल चार्ज करणे, जेवण करणे वगैरे गोष्टी उरकुन घ्याव्या लागतात. नंतर मात्र पूर्ण अंधार. रूममध्ये त्यांनी पुरेशा मेणबत्त्या ठेवलेल्या आहेत. त्याच प्रकाशात उरलेली रात्र ते सकाळी उजाडेपर्यंतचा वेळ काढावा लागतो. हा एक विलक्षण अनुभव आहे. आणि तो प्रत्यक्षच अनुभवायला हवा. बिन्सर उंचावर व जंगलात असल्याने गर्मी अशी नाहीच. गारठा मात्र प्रचंड. पाणीदेखिल प्रचंड गार. मग ते पिण्याचे असो वा वापरण्याचे. इथली अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे गच्ची (टेरेस). इथे उभे राहुन हिमालयाची लांबलचक पर्वतरांग दिसते. असे म्हणतात की वातावरण स्वच्छ असेल तर साधारणपणे ३००किमी लांबीची पर्वतरांग इथुन दिसू शकते.

Binsar
संध्याकाळचा हिमालय (बिन्सर)

तर प्राप्त परिस्थितीत जेवढे ताजेतवाने होता येईल तेवढे झालो. कुमाऊंनी पद्धतीने बनवलेले पण घरगुतीच वाटू शकेल असे जेवण करुन थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी बाहेर बर्‍यापैकी ढग जमुन गडगडाटाला सुरुवात झाली होती. जंगल सफारीला जायची इच्छा होती. पण गाईडने सांगीतलेले अंतर, मुलाला बरोबर घेउन चालायची गती आणि गडगडणारे ढग ह्याचे गणित नीट जमत नव्हते. मग आम्ही रिसॉर्ट नजरेच्या टप्प्यात राहील अशा अंतरापर्यंत स्वत:च चालत जायचे ठरवले. थोडे अंतर जातोय तेवढ्यातच पाऊस सुरु झाला. आमच्या उत्साहावर पावसाने चांगलेच पाणी फेरले. संध्याकाळचा सूर्यास्त बघायला मिळणार नाही पण दुसर्‍या दिवशीचा सूर्योदय तरी पहायला मिळेल का अशा ‘शंकांचे ढग’ आमच्या मनात दाटले. पाऊस थांबल्यावर टेरेसवर बराच वेळ थांबलो. पण हिमालय बराचसा ढगांनी झाकोळलेला होता. मुलाला मात्र वार्‍यामुळे बदलत जाणारे ढगांचे वेगवेगळे आकार बघण्यातच मौज वाटत होती. तिथल्या कर्मचार्यांनी ‘आज पाऊस पडलाय ना, मग उद्या सकाळी आकाश मोकळे झालेले असेल’ असा दिलासा द्यायचा प्रयत्न केला. पण आता आम्ही त्या लहरी हवामानाच्या ताब्यात होतो. तो जे खेळ दाखवेल ते पहाणे भाग होते.

रात्री जोपर्यंत वीज होती तेवढ्या वेळात जेवण उरकुन घेतले. जनरेटर बंद झाल्यावर मेणबत्त्यांनी खोली उजळुन टाकली. मग त्या मंद प्रकाशात गप्पा मारत, पत्ते खेळत, मुलाला गोष्टी सांगत निवांत वेळ घालवला. आजुबाजुला कुठली ई-आकर्षणे नसली की कुटुंबाबरोबर घालवलेल्या वेळाचे खरे मूल्य समजते. पहाटे सूर्योदय पहायला आम्ही ५ वाजताच उठलो. पण लहरी हवामान आमच्या बाजुने नव्हते. बर्फाच्छादित हिमालय अजुनही ‘ढगाच्छादितच’ होता. मूड तर नक्कीच खराब झाला. पण टेरेसवरुन आजुबाजुचा परिसर मात्र अद्भूत दिसत होता. दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, अधेमधे असलेली छोटी-छोटी गावे, आजुबाजुची शेती, डोंगरांच्या मधे पसरलेले धुके सारेच छान होते. पहाटेच्या निळसर प्रकाशापासुन उजाडल्यावर पसरणार्‍या फक्कड प्रकाशापर्यंतच्या बदलत जाणार्‍या रंगछटा फारच सुंदर होत्या.

Binsar
सूर्योदयापूर्वी....

Binsar
सूर्योदय

बाकी सकाळी आमचे आवरुन होईपर्यंत गाईड एक ग्रुप घेऊन जंगलात गेला होता. सकाळची सफारीसुद्धा हुकली. आता तिथे करण्यासारखे काहीच राहीले नव्हते. त्यामुळे तिथुन काढता पाय घेणेच उचित होते. खूप अपेक्षेने इथे आलो होतो. पण बरीचशी निराशाच झाली. अर्थात, हा आमचा तात्कालिक अनुभव होता आणि प्रत्येकाला असाच अनुभव येईल असे नक्कीच नाही. पाण्याची सोय आणि हवामान जर चांगले असते तर नक्कीच मजा आली असती. आम्ही मात्र आता पु्ढे तरी हवामान साथ देईल अशा आशेने चौकोरीकडे निघालो.

Binsar
Binsar
Binsar
बिन्सर KMVN TRHच्या टेरेसवरून दिसणारा हिमालय.

अवांतर:
बिन्सर अभयारण्यात एक ‘झीरो पॉईंट' म्हणुन जागा आहे. तिथुन वा रिसॉर्टच्या टेरेसवरुन हिमालयाची खालील शिखरे दिसतात.
कामेट (7756 मीटर), मन (7273 मीटर), घोरी पर्वत (6708 मीटर), हाथी पर्वत (6727 मीटर), नंदाघुंटी (6309 मीटर), त्रिशूल (7120 मीटर), त्रिशूल दुसरा (6690 मीटर), त्रिशूल तिसरा (6008 मीटर), म्रुगथुनी (6855 मीटर), मैकतोली (6803 मीटर), नंदादेवी (7824 मीटर), नंदादेवी (पूर्व 7434 मीटर), छांगुछ (6322 मीटर), नंदाकोट (6861 मीटर), नंदाखाट (6611 मीटर), पनवलीद्वार (6663 मीटर), राजरंभा (6537 मीटर), पंचचुली एक (6354 मीटर), पंचचुली दुसरा (6903 मीटर), पंचचुली तिसरा (6312 मीटर), पंचचुली चौथा (6334 मीटर), पंचचुली पाच (6437 मीटर) आणि नेपाळ मधली मच्छपुच्छ (6993 मीटर), एपीआय (7132 मीटर), बियान्स (6670 मीटर), गुरांश (6644 मीटर), लिपु लेक (5000 मीटर) नंपा (6757 मीटर)

चौकोरीकडे जाताना आमच्या सारथ्याने ‘शॉर्टकट मारतो' असे सांगुन मुख्य रस्त्यावरुन जायच्या ऐवजी जंगलातुन नेले. हा रस्ता पूर्णपणे मातीचा होता. बहुदा आमची एकमेव कार त्या संपुर्ण रस्त्यावर असावी. कोणी चिटपाखरु सुद्धा दिसत नव्हते. एवढेच काय तर त्या संपुर्ण पट्ट्यात कारमधली घंटा एकदा पण वाजली नाही.(!) आम्ही टरकुनच होतो. गाडी बंद पडली वा पंक्चर झाली तर आजुबाजुला काहीच नव्हते. सारथी मात्र जोमात होता. म्हणजे चेहर्यावर तरी तसेच दिसत होते. त्याने आम्हाला पाईनच्या झाडांना रबराच्या झाडाच्या खोडाला चीक गोळा करायला जश्या वाट्या लावलेल्या असतात तश्या लागलेल्या दाखवल्या. पाईनच्या झाडातुन पण एक चिकट द्रव निघत असतो जो रेझिन वा इतर adhesives बनवण्यासाठी वापरतात. तसेच बुरांश हे एक लाल रंगाची फुले असलेले झाड दाखवले. माहिती उपयुक्त होती. पण आम्हाला लवकरात लवकर मुख्य रस्त्यावर पोचायचे होते. तर साधारण १०-१२किमी अंतर गेल्यावर आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. हुश्श...

चौकोरी हे तसे काही लौकीकार्थाने प्रसिद्ध स्थळ नाही. बिन्सरपासुन साधारण ४ तासांच्या अंतरावरचे हे एक छोटेसे गाव ‘पिथोरागड’ जिल्ह्याचा भाग आहे. मुन्स्यारी खूप दूर असल्याने प्रवासी मुख्यत: एक रात्र घालवण्यासाठी जाताना अथवा तिथुन परत येताना इथे थांबतात. हेतु हाच असतो की लांबचा प्रवास किमान एका बाजुने तरी टळावा. डोंगराळ भाग असल्याने इथे रात्रीचा प्रवास करत नाहीत. आमच्याही इथे फार काही अपेक्षा नव्हत्या. आम्ही मुक्कामासाठी कॉटेज घेतले होते. नुकतेच नुतनिकरण झाल्यामुळे ते चांगलेच होते. इथेदेखिल अंतर्गत सजावट ही पूर्णपणे लाकडाचीच होती. इथुनसुद्धा हिमालय खूप छान दिसतो. पण हवामान अजुन आमच्यावर प्रसन्न झाले नव्हते. इथेसुद्धा संध्याकाळी जोरदार पाउस व सकाळी ‘ढगाच्छादित' हिमालय. इथेसुद्धा निराशाच. इथुन जवळ ‘पाताळ भुवनेश्वर' म्हणुन एक जागा आहे जिथे जाता येइल का अशी विचारणा आम्ही सारथ्याकडे केली. पण त्याने नकार दिला. तिथे जाण्याचा रस्ता खूप खराब असल्याने सारथी लोक तिकडे जायचे टाळतात असे त्याच्याकडुन कळाले. मग आम्हीपण त्या फंदात पडलो नाही. कॉटेजमध्येच विश्रांती घेत दिवस घालवला.

KumaonKumaon
KumaonKumaon
कुमाऊंचे घाटरस्ते

पहिले दोन दिवस हवामानाने साथ दिली नाही आणि फार काही पहायला पण मिळाले नाही. निदान पुढेतरी हवामानाने साथ द्यावी अशी अपेक्षा होती. शाहरुखचा ‘ओम शांती ओम'चा डायलॉग आमच्या बाबतीत जरा उलटाच होत होता. शिद्द्तने तर आम्ही देखिल हिमालय बघायची कोशिश करत होतो पण हे हवामान ते व्हावे अशी साजिश करत नव्हते. असो. आम्ही मुन्स्यारीकडे निघालो.

अवांतर:
चौकोरीमधुन हिमालयाची खालील शिखरे दिसतात.
चौखंबा १ (7138 मीटर), चौखंबा २ (7058 मीटर), चौखंबा ३ (6974 मीटर), चौखंबा ४ (6854 मीटर), कामेट (7756 मीटर), मन (7273 मीटर), घोरी पर्वत (6708 मीटर), हाथी पर्वत (6727 मीटर), नंदाघुंटी (6309 मीटर), त्रिशूल (7120 मीटर), त्रिशूल दुसरा (6690 मीटर), त्रिशूल तिसरा (6008 मीटर), म्रुगथुनी (6855 मीटर), मैकतोली (6803 मीटर), नंदादेवी (7824 मीटर), नंदादेवी (पूर्व 7434 मीटर), छांगुछ (6322 मीटर), नंदाकोट (6861 मीटर), नंदाखाट (6611 मीटर), पनवलीद्वार (6663 मीटर), राजरंभा (6537 मीटर), पंचचुली एक (6354 मीटर), पंचचुली दुसरा (6903 मीटर), पंचचुली तिसरा (6312 मीटर), पंचचुली चौथा (6334 मीटर), पंचचुली पाच (6437 मीटर) आणि नेपाळ मधली मच्छपुच्छ (6993 मीटर), एपीआय (7132 मीटर), बियान्स (6670 मीटर), गुरांश (6644 मीटर), लिपु लेक (5000 मीटर) नंपा (6757 मीटर)

क्रमश: ... 

कुमाऊं – मनमोहक मुन्स्यारी

आमच्या प्रवासातला तिसरा टप्पा ‘मुन्स्यारी’ होता. इथे आम्ही २ रात्री राहणार होतो. मुन्स्यारीबद्दल तसे पूर्वी कधी ऐकलेले नव्हते. आणि ‘केसरी’ वा तत्सम टूर कंपनीच्या सहलींमध्ये पण कधी हे नाव दिसलेही नव्हते. ज्या मित्राने मला कुमाऊं ट्रीपचा सल्ला दिला होता त्यानेच मला ‘मुन्स्यारी’ला नक्की जा असे सांगीतले होते. त्याच्या म्हणण्यानुसार इथुन हिमालय खूप जवळून दिसतो. इतर कुठल्याही पर्यटन स्थळापेक्षा जास्त. इंटरनेटवर शोधले असता चांगली माहिती मिळाली. मित्र पण पूर्वी जाउन आला होता, त्याने काढलेले फोटोज् पाहिले. मुन्स्यारी फारच आकर्षक वाटले. आणि मुन्स्यारीला आमच्या ट्रीपमध्ये सामील केले.

मुन्स्यारी हे एक छोटेसे गाव ‘पिथोरागड' जिल्ह्यात येते. उत्तरांचलचे अगदी ईशान्येचे टोक. इथुन भारत-चीन-नेपाळ ची सीमारेषा फक्‍त ६०किमी वर आहे. व्यवस्थित रस्त्याने जाता येणारे हे ह्या भागातले शेवटचे गाव. इथुन पुढे मात्र सगळे कच्चे रस्ते आहेत. हिमालयात गिर्यारोहणासाठी इथुन विविध मार्ग सुरु होतात त्यामुळे गिर्यारोहकांमधे हे गाव विशेष परिचित आहे. कुमाऊं मधली सर्वात मोठी हिमनदी, ‘मिलम हिमनदी’, इथुन ६०किमीवर आहे. हा ट्रेक तसेच आदि कैलास, ओम पर्वत वगैरे इतर साहसी ट्रेकचे मार्ग पण इथुनच सुरू होतात.

Munsyari
गोरीगंगा नदी

चौकोरीवरुन मुन्स्यारीला जाणारा रस्तादेखिल मस्त आहे. घनदाट जंगलातुन जाणारा घाटरस्ता, डोंगरउतारावर केलेली गव्हाची शेती, अधुनमधुन दिसणारी छोटीछोटी गावे आणि डोंगरांच्या मधुन वाहणार्‍या नद्या. एकदम मनमोहक. ताजाता वाटेत ‘थल' नावाचे एक छोटेसे गाव लागले. तिथुन पुढे रस्ता नदीपात्राच्या एकदम जवळुन जात होता. इथे मात्र मोह आवरला नाही. सारथ्याला थोडे कडेला थांबायला सांगितले आणि सरळ नदीकडे गेलो. पात्र एकदम उथळ, दगडधोंड्यांनी भरलेले, नदीचे पाणी एकदम नितळ. नदी एकदम सुशेगात वळणेवळणे घेत चालली होती. दुपारच्या उन्हातदेखिल नदीचे पाणी अगदी थंडगार होते. मुलाने तर तातडीने नदीत दगडांची आहुती द्यायला सुरुवात केली. तिथे थोडा वेळ घालवुन मग पुढे निघालो. लवकरच ‘बिर्थी धबधब्यापाशी’ पोहोचलो. हा मुन्स्यारीपासुन २५किमी अलिकडे असलेला एक प्रसिद्ध धबधबा. धबधबा छानच आहे. त्याच्या पाण्यापर्यंत चालत जायची सोय केलेली आहे. ह्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे बर्फाचे वितळलेले पाणी. इथे KMVNचे TRH व Restaurantसुद्धा आहे. एकुण छान जागा आहे.

Munsyari
Munsyari
बिर्थी धबधबा

बिर्थीपर्यंत वातावरण बरे होते. पण बिर्थी सोडताच पावसाला सुरुवात झाली. बिर्थी नंतरचा रस्ता एकदम धोकादायक होता. मी आजवर प्रवास केलेल्या रस्त्यांपैकी सर्वात जास्त. ठिकठिकाणी धबधबे होते. काही ठिकाणी दरड कोसळून रस्ता वाहून गेला होता. अश्या ठिकाणी तात्पुरता भराव टाकुन सपाटीकरण केले होते. हिमालय तरुण पर्वत असल्याने हे असे द्रुश्य बर्‍याच ठिकाणी दिसत होते. सारथ्याने तर एका छोट्या धबधब्यापाशी थांबून एक बुक्की मारुन छोटा भाग तोडला आणि त्यातल्या एका छोट्या तुकड्याला हातावर कुस्करुन भुगा करुन दाखवला. काही काही ठिकाणी तर डोंगर ‘C’ आकारात पोखरुन रस्ता तयार केलेला होता. घाटरस्त्याच्या दरीकडच्या बाजूला कठडेही नव्हते. आणि दरी तर जवळपास १किमी खोल असावी. नजर जरा जरी चुकली तर सरळ दरीत कपाळमोक्ष नक्की. १-११/२ लेनचा रस्ता. समोरुन एखादे वाहन आले तर मुख्य रस्ता सोडुन थोडे कडेला जावे लागत होते. समोरुन जेव्हाजेव्हा एखादी गाडी येत होती तेव्हा आमचा सारथी फार कडेला जाणार नाही ना हीच काळजी. त्याला काही फुकटचे सल्ले पण द्यायला नको म्हटले. उगाच लक्ष विचलीत व्हायला नको. त्यात वरुन पाऊस पण होता. तर असे करत करत गाडी साधारण २८६०मी उंचीवर पोहोचली. मला वाटते इथपर्यंत पोहोचल्यावर रस्ते बांधकाम विभागाला पण रस्ता बांधायचा कंटाळा आला असेल. कारण इथे डोंगरात त्यांनी एक ‘पास' केला आहे जिथुन पलिकडच्या बाजुचा उतार सुरु होता.

Munsyari
Munsyari
मुन्स्यारीच्या आसपासचा परिसर

यथावकाश मुन्स्यारीला पोहोचलो. मुन्स्यारीला पोहोचताच पहिली ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे ‘हिमालय'. हिमालयाच्या ‘पंचचुली’ पर्वतरांगा मुन्स्यारीच्या अत्यंत जवळ आहे. अगदी सारस बागेतुन पर्वती दिसावी किंवा डोणजे फाट्यावरुन सिंहगड दिसावा इतक्या जवळ. असे काही दिसल्यावर आमचा थकवा कुठच्या कुठे पळाला. हॉटेलच्या सगळ्या रूम्सची तोंडेही हिमालयाच्या दिशेलाच होती. आम्हाला पहिल्या मजल्यावरची रूम दिली त्यामुळे कुठल्याही अडथळ्याविना आम्हाला रूम मधुन हिमालय दिसत होता. अगदी समोर...

Munsyari
Munsyari
Munsyari
रूममधुन दिसणारा हिमालय

मुन्स्यारी हे एक डोंगरउतारावर वसलेले छोटेसे टुमदार गाव आहे. शहरी कोलाहलापासुन मैलोन् मैल दूर. नैनितालच्या साधारण ३००किमी उत्तरेला. फार प्रसिद्ध पर्यटन स्थळ नसल्याने इथे श्रीमंती हॉटेल्स नाही. ट्रेकर्सना मानवतील अशी छोटी/मध्यम हॉटेल्स; पण तीदेखिल ५-६ असावीत. इकडच्या भागातले हे एकमेव मोठे गाव असल्याने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा सोयी आहेत. इथे उत्पादीत होणार्‍या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी इथुन ३००किमी दूर असलेल्या शहरी भागातून रोज येतात. हिवाळ्यात महामार्गावर बर्फ पडल्यावर अथवा दरड कोसळल्यास बाकी सर्व जगाचा संपर्क तुटतो. स्थानिक लोकांची चेहरेपट्टी ही नेपाळी लोकांच्या जवळपास सारखीच. बोलीभाषा ‘कुमांऊनी’ जी हिन्दीपेक्षा ऐकायला बरीच वेगळी वाटते आणि काही कळत नाही. अर्थात, लोकांना हिन्दी येते, त्यामुळे तशी काही अडचण नाही. गावात एक छोटी बाजारपेठ आहे तसेच गिर्यारोहणाला लागणार्‍या साहित्यांची देखिल बरीच दुकाने आहेत. गावात एक हेलिपॅड सुद्धा आहे. कदाचित अत्यावश्यक सेवेसाठी त्याचा वापर होत असावा.
Munsyari
Munsyari
सकाळचा हिमालय

आम्ही पोहोचलो त्या दिवशी संध्याकाळी पाउस पडला. हिमालय बराचसा झाकोळलेला होता. पण सूर्यास्ताच्या वेळेस जरा आकाश मोकळे झाले. आम्ही हेलिपॅड पर्यंत चालत गेलो. तिथुन आजुबाजूचा परिसर फारच छान दिसत होता. हेलिपॅडची जागा म्हणजे बर्‍यापैकी मोठे मैदान होते. मुले मस्त क्रिकेट खेळत होती. मैदानाच्या मागेच हिमालय होता. मुलांचा जाम हेवा वाटला. रोज हिमालयाच्या सान्निध्यात त्यांना खेळायला मिळते. हिमालय जरी मोकळा झालेला असला तरी आता सूर्य ढगांच्या आड होता. त्यामुळे सूर्यास्ताची हिमालयावर पडणारी सोनेरी किरणे काही पहायला मिळाली नाही. भारतात इतरत्र जरी जोरदार उन्हाळा असला तरी इथे मात्र चांगलीच थंडी होती. दिवस मावळल्यानंतर गारठा चांगलाच वाढला.
Munsyari
हेलिपॅड परिसरात क्रिकेट खेळणारी मुले

दुसर्‍या दिवशी पहाटे लवकर उठलो. आदल्या दिवशी संध्याकाळी पाऊस झाल्याने सकाळी आकाश मोकळे असेल अशी अपेक्षा होती. परंतु थोडेफार ढग होतेच. पूर्ण पंचचुली रांग काही दिसली नाही. आज आजुबाजूचा परिसर पहायचे ठरवले होते. इथे जवळच ‘खुलीया टॉप' हा एक छोटा पण चांगला ट्रेक आहे. जाउन-येउन एक संपूर्ण दिवस त्यात जाऊ शकतो. काही लोक तर तंबू वगैरे घेउन एक रात्र मुक्कामासाठी जातात. अर्थात गाईड असतो बरोबर जो गाईड-कम-कुक असतो. पाऊस आणि लहान मुलगा असल्याने आम्ही हा ट्रेक केला नाही. इथे जवळच नंदा देवीचे मंदिर आहे. मंदिर छोटेच आहे पण तो परिसर मात्र एकदम मस्त आहे. हिरव्यागार डोंगरावर असलेल्या ह्या मंदिराच्या समोरच बर्फाच्छादित हिमालय आहे. त्यामुळे ते संपूर्ण द्रुश्यच एकदम विलोभनीय दिसते. तासन् तास तिथे बसले तरी कंटाळा येणार नाही. आजुबाजूच्या छोट्या डोंगरउतारांवर पूर्णपणे गव्हाची शेती केलेली आहे. त्या लयबद्ध शेतीमुळे डोंगरावर जणू काही हिरवे तरंगच उठले आहेत की काय असा भास होतो. मुन्स्यारीमध्ये जुन्या काळातील कुमांऊनी वस्तू, कपडे, चित्रे अशा गोष्टींचे एक छोटे संग्रहालय आहे. कुमांऊनी जीवनशैलीची थोडीफार माहिती मिळते. बाकी इथे अजुन काही इतर थंड हवेच्या ठिकाणासारखे टिपीकल ‘पॉईन्ट्स' नाहीत. आणि खरेतर त्याची आवश्यकता पण नाही. नायगारा धबधब्याला गेल्यावर मुख्य आकर्षण तो धबधबा असतो, बाकी आजुबाजूच्या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नसतात. तसेच मुन्स्यारीला आल्यावर तुम्ही मस्तपैकी हिमालयात ट्रेकला जा, नाहीतर, रूमच्या टेरेसमधे हातात वाफाळणार्‍या कॉफीचा कप घेऊन नुसता हिमालय बघत बसा, तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही.
Munsyari
नंदादेवी मंदिर

Munsyari
Munsyari
नंदादेवी मंदिर परिसर

Munsyari
डोंगरउतारावर केलेली शेती

इथे विकत घेण्यासारखे म्हणजे हातांनी बनवलेले उबदार कपडे, शाली, पश्मीने वगैरे तसेच खास पहाडी राजमा आणि इतर औषधी (स्वतःच्या जबाबदारीवर घेणे!) व मसाले. आम्हाला खरेतर कुमांऊनी पद्धतीचे जेवण खायची इच्छा होती परंतु ‘आत्ता इथल्या भाज्यांचा सीझन नाही’ असे सांगुन आमच्या हॉटेलवाल्याने आमची बोळवण केली. एकुण इथले दोन दिवस छानच गेले. शेवटच्या दिवशी हवा एकदम छान होती, ढग नव्हते त्यामुळे पंचचुली पर्वतरांग एकदम मस्त दिसत होती. सूर्यप्रकाशात चमकणारा बर्फ जणु चांदीच वाटत होता. आता आम्हाला परत जाताना त्याच अवघड घाटरस्त्याने जायचे होते पण आता मात्र तो रस्ता एवढा भीतीदायक वाटत नव्हता.

Munsyari
पंचचुली पर्वतरांग

KMVNच्या आवारात एक फलक होता ज्यावर एक संस्क्रुत श्लोक लिहीलेला होता. त्यात पाप-पुण्याचा हिशेब मांडून असे म्हटले होते की आयुष्यात तुम्ही एकदा तरी हिमालयाचे दर्शन घेतले पाहिजे. भविष्यात कदाचित आमच्या अजुन हिमालय वार्‍या होतीलही पण हिमालयाची ही पहिली भेट मात्र नक्कीच संस्मरणीय राहील!

Munsyari

क्रमश: ...

कुमाऊं – कौसानी-रानीखेत

मुन्स्यारीचे दोन दिवस मस्तच गेले. इथुन पुढे आम्ही कौसानीला जाणार होतो. मुन्स्यारीकौसानी हा आमच्या ट्रीपमधला सर्वात लांबचा प्रवास होता. प्रवासाला साधारण ७-८ तास लागणार म्हणुन मुन्स्यारी सकाळी लवकरच सोडले. सकाळी वातावरण मस्त होते. स्वच्छ सूर्यप्रकाश होता. मु्न्स्यारीला येताना जी जी ठिकाणे दिसली होती ती आता जरा पटापटच मागे चालली होती. थल गाव गेल्यावर सारथ्याने पुन्हा शॉर्टकट मारतो म्हणुन दुसर्‍या एका रस्त्याने नेले. हा रस्तादेखिल दाट जंगलातून जाणारा होता. इथेपण अभावानेच एखादे वाहन दिसत होते. फरक फक्‍त एवढाच होता की बिन्सरचा शॉर्टकट मातीचा रस्ता होता तर हा मात्र एक चांगला डांबरी रस्ता होता.

दुपारपर्यंत पिथोरागड जिल्हा ओलांडून आम्ही ‘बागेश्वर' जिल्ह्यात आलो. बागेश्वर शहर आणि आजुबाजूचा परिसर बर्‍यापैकी मैदानी भाग वाटले. इथे डोंगरउतारांऐवजी सपाट भागावर शेती दिसत होती. इथे पोहोचेपर्यंत जेवायची वेळ झाली होती. पण शहरात रस्ते फारच छोटे होते आणि गर्दी देखिल होती त्यामुळे पार्कींग मिळणे अवघड झाले. शेवटी गावाबाहेर गेल्यावरच एका ठिकाणी व्यवस्थित खायला मिळाले. इथे जवळच ‘बैजनाथ' देवस्थान होते. देवभक्‍त सारथ्याने नेहमीप्रमाणे ‘देख लो' अशी आदेशयुक्‍त विनंती केली. शरयु नदीच्या काठावरचा हा बैजनाथ मंदिर समुह नक्कीच धावती भेट देण्यासारखा आहे. दुर्दैवाने आम्ही तिथे पोहोचलो आणि जोरदार पाउस सुरु झाला. त्यामुळे मंदिरे नीट पाहता नाही आली आणि फोटो पण काढता नाही आले. इथुन पुढे पुन्हा घाट सुरु झाला आणि पावसाचा जोर पण चांगलाच वाढला. आता लवकरात लवकर कौसानीला पोचायचे होते. सुदैवाने आम्ही फार काही त्रास न होता कौसानीच्या हद्दीत पोहोचलो.

Kausani
गहू शेती

आमच्या प्रवासातील शेवटची तिन्ही पर्यटनस्थळे ही प्रसिद्ध ह्या प्रकारात मोडणारी होती त्यामुळे इथुन पुढे पर्यटकांची गर्दी असणे अपेक्षित होते आणि झालेदेखिल तसेच. एका उपहारग्रूहापाशी थांबलो असता गुजरातीमधली कुजबूज कानी पडली. कौसानी आल्याची तसेच ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याची लगोलग खात्री पटली. प्रसिद्ध पर्यटनस्थळामध्ये गुज्जू किंवा मराठी पर्यटक नाही असे क्वचितच होते. किंबहुना गुज्जू पर्यटक नसेल तर ते पर्यटनस्थळ अजुन प्रसिद्ध ह्या प्रकारात आलेलेच नाही असे तुम्ही डोळे झाकून मान्य करु शकता. (अशा ठिकाणी किमान एक तरी ‘गुजराथी भवन' वा तत्सम थाळी रेस्तरों हमखास असते) आमच्या पहिल्या तिनही मुक्कामाच्या ठिकाणी एकही गुज्जू अथवा मराठी कुटुंब दिसले नाही. आश्चर्याची बाब अशी की त्या तिनही ठिकाणी बंगाली पर्यटक मात्र मुबलक प्रमाणात दिसले. किंबहुना मुन्स्यारी KMVNमधे आम्ही एकमेव मराठी कुटुंब होतो व बाकी सर्व रूम्स बंगाली पर्यटकांनी गजबजलेल्या होत्या.

कौसानी एक निवांत हिल स्टेशन आहे. हॉटेल्सचे भरपूर पर्याय इथे उपलब्ध आहेत. आणि economic पासून luxurious पर्यंत सर्व प्रकारची हॉटेल्स इथे पहायला मिळतात. इथुनदेखिल हिमालयाची एक खूप लांबलचक रांग (साधारण ३५०किमी लांबीची) पहायला मिळते. KMVNचे रिसॉर्ट बाकी हॉटेल्सपेक्षा जरा ऊंचावर आहे. आणि अर्थातच सरकारी हॉटेल असल्याने लोकेशन एकदम प्राईम आहे. त्यामुळे इथुन (वीजवाहक तारा सोडल्यास) विनाअडथळा हिमालय दिसतो. आम्ही पोहोचलो तेव्हा जोरदार पाउस पडत होता. इथे एकच रात्र मुक्काम असल्याने हिमालय दिसणार का हा एक प्रश्नच होता. पण थोड्याच वेळात पाउस थांबला आणि ढग देखिल कुठच्या कुठे गायब झाले. हिमालयाची ती लांबलचक रांग आता आम्हाला रूममधुन दिसू लागली. सूर्यास्ताच्या वेळेस तांबूस पिवळसर रंगात हिमालयाची काही शिखरे फारच मस्त दिसत होती. कौसानीतून प्रामुख्याने त्रिशूल व नंदादेवी ही शिखरे दिसतात. तसेच अजुनही काही प्रमुख शिखरे आणि हिमालयाची पार नेपाळमधली देखिल काही शिखरे स्पष्ट दिसतात. हिमालयासमोरचे ढग मोकळे झाले तेव्हा अजुन एक गमतीशीर द्रूश्य दिसले. कौसानीच्या जमिनीच्या लेव्हलला समांतर असे दरीमध्ये ढग पसरले होते आणि कौसानीच्या वर सगळे आकाश मोकळे होते. थोडक्यात आम्ही ढगांच्या वर होतो. बागेश्वर शहर जे कौसानीच्या खाली मैदानी भागात होते त्यांच्यासाठी आकाशात ढग आहेत पण प्रत्यक्षात ते ढग कौसानीच्या ऊंचीपर्यंतच आहेत. आणि आम्हाला त्या ढगांच्या आडून अधुनमधुन बागेश्वरही दिसतेय.

Kausani
संध्याकाळचा हिमालय

Kausani
पंचचुली पर्वतरांग

कौसानीमधे बघण्यासारखे म्हणजे एक चहाची फॅक्टरी आहे आणि त्याच्या मागेच चहाचे मळे आहेत. तसेच हातमागावर शाली व इतर उबदार कपडे बनवण्याचे छोटे उद्योग आहेत. आम्ही चहाची फॅक्टरी पहायला गेलो तर तिथे गेल्यावर कळाले की ती फॅक्टरी कच्चा माल नसल्याने ३-४ महिने आधीच बंद पडली आहे. तिथे मागेच चहाच्या मळ्यात गेलो तर तो देखिल फार काही आकर्षक नव्हता. मुन्नारचे चहाचे मळे जसे नयनरम्य दिसतात तसे काही नव्हते. तिथे इतर पर्यटकांचे ग्रूप देखिल आलेले होते. बहुदा कंपनी बंद आहे हे माहित असुनसुद्धा दाखवायचे म्हणुन त्या पर्यटक कंपन्या त्यांना तिथे घेउन येत असाव्यात. असो. शाली बनवण्याचा कुटिरोद्योग मात्र चांगला होता. आपण हातमागावर प्रत्यक्ष शाली बनताना पाहू शकत होतो. वेगवेगळ्या रंगांचे दोरे वापरुन, हातमागाचे दट्टे इकडून तिकडे फिरवून शालीवर बनणारी नक्षी पाहणे हा एक रंजक अनुभव होता. बाकी कौसानीमधे अजुन विशेष काही बघण्यासारखे नाही. एक गांधी आश्रम आहे. गांधीजी इथे २ आठवडे राहीले होते. पण आम्ही काही तो पहायला गेलो नाही. खरेदीसाठी उबदार कपडे, इथे बनणारा हर्बल चहा तसेच स्थानिक फळांचे जॅम व सिरप. कौसानीमधे मॉल रोड आहे पण तो फक्‍त नावापुरताच. तिथे खरेदीसाठी फार काही नाही.

Kausani
कौसानीतून दिसणारी हिमालय पर्वतरांग

Kausani
नंदाकोट

अवांतर:
कौसानीमधुन हिमालयाची खालील शिखरे दिसतात.
केदारनाथ (३८५० मीटर), चौखंबा १ (7138 मीटर), चौखंबा २ (7058 मीटर), चौखंबा ३ (6974 मीटर), चौखंबा ४ (6854 मीटर), कामेट (7756 मीटर), मन (7273 मीटर), घोरी पर्वत (6708 मीटर), हाथी पर्वत (6727 मीटर), नंदाघुंटी (6309 मीटर), त्रिशूल (7120 मीटर), त्रिशूल दुसरा (6690 मीटर), त्रिशूल तिसरा (6008 मीटर), म्रुगथुनी (6855 मीटर), मैकतोली (6803 मीटर), नंदादेवी (7824 मीटर), नंदादेवी (पूर्व 7434 मीटर), छांगुछ (6322 मीटर), नंदाकोट (6861 मीटर), नंदाखाट (6611 मीटर), पनवलीद्वार (6663 मीटर), राजरंभा (6537 मीटर), पंचचुली एक (6354 मीटर), पंचचुली दुसरा (6903 मीटर), पंचचुली तिसरा (6312 मीटर), पंचचुली चौथा (6334 मीटर), पंचचुली पाच (6437 मीटर) आणि नेपाळ मधली मच्छपुच्छ (6993 मीटर), एपीआय (7132 मीटर), बियान्स (6670 मीटर), गुरांश (6644 मीटर), लिपु लेक (5000 मीटर) नंपा (6757 मीटर)

इथुन आम्ही रानीखेतला गेलो. रानीखेत कौसानीपासून साधारण २ ते २.५ तासाच्या अंतरावर आहे. रानीखेत हे इथपर्यंतच्या प्रवासातले स्वच्छ शहर वाटले. रानीखेतमधे कुमाऊं तसेच नागा रेजिमेंटचे मुख्यालय आहे. त्यामुळे शहर परिसरात एक प्रकारची लष्करी शिस्त तसेच स्वच्छता दिसत होती. आमचे हॉटेल हे एकदम मार्केटमध्येच होते. हॉटेल छोटे असले तरी स्वच्छ होते. आमच्या रूममधुन दूरवर हिमालयाची पर्वतरांग स्पष्ट दिसत होती. हॉटेलच्या मालकाने रानीखेतमधे कायकाय बघता येईल ह्याचे एक brochureच बनवले आहे. त्यात एक चौबतिया बाग दिसली. त्याने ती बघायला जा तसेच तिथे असलेला एक बंधारा देखिल बघा असे सांगितले. बागेबद्दल बाकी काहीच माहिती नव्हते. इतर बागांसारखीच एक असेल म्हणुन आम्ही जरा उशीराच तिकडे गेलो. पण प्रत्यक्षात ती बाग नैसर्गिक माहितीचे एक भांडार होती. अगदी चुकवू नये अशीच.

Ranikhet
रानीखेत हॉटेलमधुन दिसणारी हिमालय पर्वतरांग

चौबतीया बाग मुख्यतः विविध फळा-फुलांची बाग आहे आणि इथे शास्त्रीय पद्धतीने झाडांचे संवर्धन केले जाते. बाग खूप मोठ्या परिसरावर पसरलेली आहे. आपण एकटे देखिल फिरू शकतो, पण बागेबद्दल सविस्तर माहिती जाणुन घ्यायची असेल तर मात्र इथे गाईड घेणे जरूरीचे आहे. मी तर सांगेन की ही बाग बघायला तुम्ही गाईड घ्यायलाच हवा. आम्ही गाईड घ्यावा की नाही असे करत घेऊया असे ठरवले आणि थोड्याच वेळात आमचा निर्णय किती योग्य होता ते आम्हाला समजले. बागेत असलेली विविध प्रकारची झाडे, ती कशी ओळखायची ह्याचे सोपे मार्ग, विविध फळझाडे, सुक्यामेव्याची झाडे, सुगंधी फुलांची झाडे, वेगवेगळ्या झाडांचे व्यावसायिक उपयोग अशी खूप मोलाची माहिती त्या गाईडने आम्हाला दिली. जर आमचे आम्ही गेलो असतो तर ह्यातले काडीचे काही कळले नसते. ह्या बागेत सफरचंदाच्या अनेक जाती पिकवल्या जातात. आम्ही गेलो तेव्हा नुकतीच सफरचंदाच्या झाडाला फुले यायला लागली होती. गाईडच्या माहितीनुसार जूनमध्ये सफरचंद पिकुन तयार होतात. तेव्हा इथे येणार्‍या पर्यटकांची चंगळच असते. सरळ झाडावरुन सफरचंद तोडुन खाल्ली तरी कोणी काही बोलत नाही. पक्षी आणि माकडे जेवढी सफरचंदे फस्त करतात त्याच्यापुढे हे प्रमाण खूपच कमी असते. इथे फलोत्पादन व संशोधन केंद्र आहे, तसेच फळ-शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे. इथे फळ-प्रक्रिया कारखाना देखिल आहे. फळांचे जॅम, सिरप, लोणची वगैरे गोष्टी इथे बनवल्या जातात. इथे बुरांश-लिंबू-डाळिंब-आले वापरून एक मस्त appetizer बनवले जाते जे इतरत्र कुठे बनवतही नाही आणि विकतही नाहीत. (चव छान आहे, त्यामुळे घ्यायला हरकत नाही) बाग डोंगरउतारावर पसरलेली आहे. अजुन थोडे पुढे गेले की एक छोटा बंधारा, भालू डॅम, आहे. हा एक छोटा ट्रेकच आहे. जाउन-येउन १-२ तास सहजी लागतात. आम्हाला काही पूर्वकल्पना नसल्याने व आम्ही बागेतच मुळात उशीरा गेल्याने तिकडे गेलो नाही, पण तो भागदेखिल चांगला आहे असे गाईडचे म्हणणे होते. चौबतिया बागेतून हिमालय दिसतो, तसेच सूर्यास्त देखिल छान दिसतो. बागेच्या थोडे वरच्या बाजूला हनुमान मंदिर आहे तिथुन सूर्यास्त जास्त व्यवस्थित दिसतो. इथे जवळच झूलादेवीचे मंदिर होते. सारथ्याने नेहमीप्रमाणे गाडी थांबवलीच. हे मंदिर जरा वेगळे वाटले. इथे पहावे तिथे लोकांनी छोट्या-मोठ्या घंट्या/घंटा बांधल्या होत्या, अक्षरशः माळा, तोरणे वगैरे देखिल होती. संपुर्ण मंदिर व परिसर घंटांनी भरून गेला होता. जरा गमतीशीरच वाटले हे सगळे. असो.

Ranikhet
चौबतीया गार्डनमधुन दिसणारा सूर्यास्त

रानीखेतमधे एक छोटे नऊ होल्सचे गोल्फ कोर्स आहे. आशियातील ऊंचावरच्या गोल्फ कोर्सपैकी एक. हा भाग एकदम फोटोजेनिक आहे, नक्कीच भेट देण्यासरखा. शहरात लष्कराचे एक संग्रहालय आहे. कुमांऊ तसेच नागा रेजिमेंटचा इतिहास, युद्धातील पराक्रमाची माहिती व युद्धात वापरल्या गेलेल्या गोष्टी अशा सर्वांचे हे एक चांगले संग्रहालय आहे. हैदराबादच्या निजामाच्या काळात स्थापन झालेल्या ह्या रेजिमेंटने पहिल्या महायुद्धापासुन अनेक युद्धात भाग घेतला आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीची नीट माहिती घ्यायची ठरवली तर इथे एक संपूर्ण दिवस जाईल.

अवांतर:
रानीखेतमधुन हिमालयाची खालील शिखरे दिसतात.
केदारनाथ (३८५० मीटर), चौखंबा १ (7138 मीटर), चौखंबा २ (7058 मीटर), चौखंबा ३ (6974 मीटर), चौखंबा ४ (6854 मीटर), कामेट (7756 मीटर), मन (7273 मीटर), घोरी पर्वत (6708 मीटर), हाथी पर्वत (6727 मीटर), नंदाघुंटी (6309 मीटर), त्रिशूल (7120 मीटर), त्रिशूल दुसरा (6690 मीटर), त्रिशूल तिसरा (6008 मीटर), म्रुगथुनी (6855 मीटर), मैकतोली (6803 मीटर), नंदादेवी (7824 मीटर), नंदादेवी (पूर्व 7434 मीटर), छांगुछ (6322 मीटर), नंदाकोट (6861 मीटर), नंदाखाट (6611 मीटर), पनवलीद्वार (6663 मीटर), राजरंभा (6537 मीटर), पंचचुली एक (6354 मीटर), पंचचुली दुसरा (6903 मीटर), पंचचुली तिसरा (6312 मीटर), पंचचुली चौथा (6334 मीटर), पंचचुली पाच (6437 मीटर) आणि नेपाळ मधली मच्छपुच्छ (6993 मीटर), एपीआय (7132 मीटर), बियान्स (6670 मीटर), गुरांश (6644 मीटर), लिपु लेक (5000 मीटर) नंपा (6757 मीटर)

Ranikhet
Ranikhet
रानीखेत हॉटेलमधून दिसणारे नंदादेवी आणि त्रिशुल पर्वतशिखर

रानीखेतमधला एक दिवस चांगला गेला. इथुन पुढे आम्ही आमच्या ह्या ट्रीपच्या शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार होतो. दुसरे म्हणजे आता इथुन पुढे आमची हिमालयाची साथ सुटणार होती. कुमांऊतील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळाकडे, नैनितालकडे, आमचा प्रवास सुरु झाला.

क्रमश: ...

कुमाऊं – नयनरम्य नैनिताल

नैनिताल, आमच्या प्रवासातला शेवटचा टप्पा आणि सुरुवातीलाच सांगायला हरकत नाही की मी आजवर भेट दिलेल्या हिल स्टेशनपैकी सर्वात छान व रोमॅंटीक!! नैनितालबद्दल पूर्वी जेव्हा केव्हा ऐकले/वाचले होते तेव्हा कायम नैनिताल-मसुरी-जिम कॉर्बेट असेच असायचे. प्रत्यक्षात नैनिताल आणि मसुरी हे एकमेकांपासून बरेच लांब आहेत. ह्या ट्रीपची तयारी करताना ही माहिती कळाली. उत्तरेतील पर्यटक सहसा नैनिताल व मसुरी एकत्र करत नाही, आपल्याकडच्या पर्यटन कंपनी मात्र कायम हे एकत्र ठेवतात. असो. नैनितालचे एक हिंदी चित्रपटातले गाणे पण ऐकल्याचे आठवत होते. “तालों मे नैनिताल, बाकी सब तलैया. . .” असे काहीसे बोल होते त्या गाण्याचे. तर असे हे नैनिताल कुमाऊंमधले सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. नैनिताल हा साधारण डोळ्याच्या आकारासारखा एक मोठा तलाव आहे. तलावाच्या काठावर नैना देवीचे मंदिर आहे. ह्या देवीच्या नावावरुनच नैनिताल हे ह्या गावाचे नाव पडले. ‘ताल’ म्हणजे तलाव. नैनितालमधे अनेक तलाव आहेत. त्यामुळे ह्याला ‘तलावांचा गाव’ म्हणायला काहीच हरकत नाही. नैनिताल आमच्या प्रवासात सर्वात शेवट ठेवण्याचे कारण म्हणजे इथुन रेल्वेस्टेशनचे गाव, काठगोदाम, जवळ आहे. आमची परतीची रेल्वे सकाळी ९ वाजता होती त्यामुळे लांबचे पर्यटनस्थळ सर्वात शेवट ठेवून काही उपयोग नव्हता.

Nainital
नैनिताल

रानीखेतपासून नैनिताल साधारण २-३ तासांच्या अंतरावर आहे. नैनितालचे मुख्य आकर्षण हे अर्थातच ‘नैनिताल तलाव’ आणि त्याच्या बाजूनेच जाणारा ‘मॉल रोड' हे आहे. तलावाचा व्ह्यू मिळावा म्हणुन ह्या मॉल रोडच्या बाजूने अनेक हॉटेल्स आहेत. तुमच्या बजेटनुसार स्वस्त ते लक्झुरीयस असे अनेक पर्याय ह्या मॉल रोडच्या आजुबाजूला आहेत. ह्यापैकीच एक, ‘हॉटेल अलका’, आम्ही आमच्या नैनितालमधल्या मुक्कामासाठी निवडले होते. हॉटेलचे लोकेशन पाहिल्यावर आमची निवड एकदम अचूक निघाल्याचे जाणवले!! हे हॉटेल नैनी तलावाच्या एकदम बाजूलाच. मराठीतच सांगायचे तर बॅंग ऑन नैनी लेक आणि बॅंग ऑन मॉल रोड!! आम्ही रूमदेखिल मुद्दामच सर्वात वरच्या, म्हणजे चौथ्या मजल्यावर घेतली. चौथ्या मजल्यावर हॉटेलने रूम्सच्या समोर एक छोटे artificial lawn केले होते. आणि तिथे मस्त टेबल-खुर्च्या टाकलेल्या होत्या. तिथे बसुन कॉफी पिता पिता समोरचा नैनी तलाव बघणे एक वेगळीच मौज होती. दुपारी १२-१च्या उन्हातसुद्धा तिथे काही फारशी गर्मी जाणवत नव्हती. हॉटेलचे नुसते लोकेशनच उत्तम नव्हते तर एकुणच सर्व सोयी, जेवण, कर्मचारी सगळेच अगदी व्यवस्थित व मस्त होते.

Nainital

Nainital
नैनिताल

नैनितालमध्ये बघण्यासारखे तसेच खरेदी करण्यासारखे बरेच काही आहे. मुख्य म्हणजे नैनितालचा तलाव व आजुबाजूचा परिसरच खूप मस्त आहे. तलावच मुख्य आकर्षण असल्याने प्रशासनाने तो स्वच्छ ठेवलेला आहे. बोटींगची चांगली सोय आहे. तुम्ही स्वतः चालवणार असाल तर पेडल बोट घेऊ शकता अथवा नेहमीच्या बोटी देखिल आहेत. पण एक मात्र नक्की की तुम्ही नैनिताल तलावात एकतरी बोटीतुन फेरी मारायलाच हवी. हा तलाव सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेला असल्याने बोटींग करताना नैनितालचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल. ह्या तलावाच्या पाण्याचा स्त्रोत सुद्धा मुख्यतः डोंगरावरून वाहत येणारे पाणी हाच आहे. तलावाच्या बाजूनेच जाणार्‍या मॉल रोडवरून चालणे हा सुद्धा एक रोमांचक अनुभव आहे. अट फक्‍त एकच आहे की तुमचा जोडीदार तुमच्या बरोबर हवा. अर्थात, ही अट तिथल्या प्रशासनाची नाही तर त्या तलावाची आणि आजुबाजूच्या नयनरम्य परिसराची आहे. जोडीदाराचा हात हातात घेऊन तुम्ही नैनिताल तलावाला फेरी मारायला लागलात तर किती चाललात आणि किती वेळ गेला याचे काही भान राहणार नाही ह्याची ग्यारंटी. पण एक काळजी घ्यायची की चालताना स्त्री पार्टीला तलावाच्या बाजूला ठेवून चालायचे. कारण रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला खरेदीसाठीच्या दुकानांची रेलचेल आहे. चुकुन जरी तिकडे लक्ष गेले तरी तुमच्या खिशाला मोठ्ठे बीळ पडेल याची खात्री बाळगा. मॉल रोडच्या बाजूने खरेदीची तसेच खाण्यापिण्याची भरपूर दुकाने आहेत. प्रशासनाने अजुन एक चांगली गोष्ट केली आहे की वाहतुकीला चांगल्या प्रकारे वेसण घातली आहे. तुम्ही जर स्थानिक नसाल तर प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही तुमचे वाहन मॉल रोडवर आणाल तेव्हा तुमच्याकडुन प्रवेशकर घेतला जातो. त्यामुळे सहाजिकच मॉलरोडवर येणारी वाहने कमी होतात. दुसरे म्हणजे संध्याकाळी सहानंतर मॉल रोडची दुकानांकडची बाजू वाहतुकीसाठी बंद केली जाते आणि तो भाग फक्‍त पर्यटकांना चालण्यासाठी ठेवला जातो. वॉकींग प्लाझा. संध्याकाळी सहाजिकच मॉल रोडवर पर्यटकांची झुंबड उडते. आमच्या सारथ्याच्या सांगण्यानुसार, peak seasonमधे तर संध्याकाळी जत्रेसारखी गर्दी होते, इतकी की चालायलादेखिल जागा राहत नाही. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नव्हती कारण आम्ही गेलो तेव्हासुद्धा संध्याकाळी बर्‍यापैकी गर्दी होती. इथेच असलेल्या ‘Café De Mall’ ह्या caféमध्ये ‘Cinnamon Roast’ असा कॉफीचा एक अफलातून प्रकार प्यायला मिळाला.

Nainital
नैनिताल तलाव

Nainital
नैनिताल तलाव

नैनितालमध्ये बघण्यासारखे अजुन बरेच काही आहे. नैनिताल प्राणीसंग्रहालय हे त्यापैकीच एक. त्याचे नावच मूळात Nainital High Altitude Zoo असे आहे. हे प्राणीसंग्रहालय डोंगरावर आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी चढ चढत-चढतच जावे लागते. दुसरे म्हणजे काही खास हिमालयीन प्राणी सोडले तर इथे वेगळे असे काही नाही. पण एक मात्र आहे की इथुन वरून तुम्हाला नैनिताल शहर तसेच तलाव खूप छान दिसतो. नैनितालमध्ये अजुन एक आकर्षक ठिकाण म्हणजे Cave Garden अर्थात गुहांची बाग. वेगवेगळ्या प्राण्यांच्या गुहा इथे पहायला मिळतात. गुहेच्या एका टोकाकडुन आत जाउन दुसर्‍या बाजूने बाहेर यायचे असते. आतमध्ये प्रकाशाची सोय आहे पण आतमध्ये जाउन बाहेर येणे हा एक फार धमाल अनुभव आहे. छोट्या-छोट्या कपारीतून जाताना चांगलीच कसरत करावी लागते. बर्‍याचदा रांगत तर काही वेळा तर अगदी सरपटत जावे लागते. त्यामुळे ह्या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायला हवी. नैना देवीचे मंदिर चांगले आहे आणि संध्याकाळच्या वेळेस इथुन तलाव पण खूप छान दिसतो. जवळच एक छोटी केबल कार देखिल आहे. जर पूर्वी कधी बसला नसाल तर एक चक्कर मारायला हरकत नाही.

Nainital
Nainital
Nainital
नैनिताल प्राणीसंग्रहालय

Nainital
नैनिताल

नैनितालच्या आजुबाजूला बरेच तलाव आहेत. भीमताल, सातताल, नौकुचियाताल, सुखाताल वगैरे. हे सगळे तलाव बघायला अर्धा-एक दिवस पुरेसा आहे. प्रत्येक तलावाचे काही ठराविक वैशिष्ट्य असले तरी साधारणतः सगळे नैनितालसारखेच आहेत. साततालमधे काही Flying Fox, Water Baloon सारखे Water Sports आहेत. तर नौकुचियातालच्या जवळच्या डोंगरावर Paraglidingची सोय आहे. नौकुचियातालच्या तलावाला नऊ कोपरे आहेत म्हणुन त्याचे नाव नौकुचियाताल पडले असे सांगतात. नैनितालपासून जवळच China Point वा Snow View Point आहे. इथुन हिमालयाचे दर्शन होते. इतक्या वेळा हिमालय पाहिला असल्याने आम्ही काही तिकडे गेलो नाही.

Nainital
नैनिताल तलाव

नैनितालचे दोन दिवस मस्तच गेले. आता परतीचे वेध लागले. परतीचा प्रवासदेखिल खूपच रंजक आणि अपेक्षेपेक्षा जास्तच रोमहर्षक झाला. सकाळी ८:५०ची ट्रेन होती आणि नैनितालपासून काठगोदाम साधारण ३०-३५किमी होते. तरी घाटरस्त्याचा प्रवास म्हणुन आम्ही सकाळी ७वा. नैनिताल सोडले. साधारण ८ पर्यंत आम्ही रेल्वेस्टेशनच्या जवळ पोहोचलो होतो. फक्‍त १किमी एवढेच अंतर राहीले होते. पुरेसा वेळ होता म्हणुन एके ठिकाणी अल्पोपहार करायचा ठरवला. पण इथेच गडबड झाली. साधारण २०मिनीटे बाकी असताना आम्ही निघालो खरे, पण पुढे बेक्कार ट्राफिक जॅम झाले होते. एवढे की गाडी जागची हलायलाच जागा नव्हती. प्रसांगवधान दाखवून सारथ्याने एके ठिकाणी मधुनच गाडी काढली खरी पण स्टेशनवर पोहोचेपर्यंत ८:४२ झाले. वाटले, की झाले आता, गाडीतच बसायचे; पण आतमध्ये जाउन पाहतो तर गाडी प्लॅटफॉर्म क्र. ३ वर लागलेली होती. बोंबला, एक मोठी बॅग, एक छोटी बॅग, सॅक, छोटा मुलगा हे सगळे घेऊन, पादचारी जीना चढुन-उतरून, डबा शोधुन जागेवर बसायला आमच्याकडे फक्‍त ८मिनीटे होती. आणि आमचा समय शुरु हो चुका था. मी तर मोठी बॅग घेऊन आणि मुलाला बरोबर घेऊन पळतच सुटलो पण बायकोला ‘जब वी मेट’च्या गीत सारखी ट्रेन चुकवायची नव्हती म्हणुन वाटेत भेटलेल्या पहिल्या हमालाला तिने तिच्याकडचे सामान हवाली केले. वेळेत गाडीत बसलो खरे पण बायकोचा श्वासोच्छ्वास नॉर्मल व्हायला १०-१५मिनीटे जावी लागली. प्रवासातली रंजकता अजुन बाकी होती. दिल्ली रेल्वेस्टेशनपासून विमान सुटेपर्यंत आमच्याकडे २:३० तास होते. मेरू कॅबला फोन करुन ठेवला होता, पण वाटेत कळाले की त्या दिवशी कॉंग्रेस पार्टीने किसान रॅलीचे आयोजन केले होते. मेरु कॅबच्या सारथ्याने हुशारीने वेगळ्या रस्त्याने गाडी काढुन योग्य वेळेत गाडी विमानतळावर पोहोचवली आणि आमच्या परतीच्या प्रवासात अजुन काही रंजकता राहणार नाही ह्याची काळजी घेतली.

एकुण पूर्ण ट्रीप खूप छान झाली. हवामानाने थोडे अडथळे आणले पण एकुण अनुभव फारच रोचक होता.

समाप्त.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...