एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 1
शुएन त्झांग या अत्यंत विद्वान बौद्ध भिख्खूने, इ. स, 629, या वर्षी, मूळ स्वरूपातल्या बौद्ध धर्मग्रंथाचे अध्ययन व प्राप्ती हे दोन्ही हेतू मनात ठेवून, भारतात येण्याच्या आपल्या पायी प्रवासाला चीनमधून प्रारंभ केला हा इतिहासाचा भाग आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहेच. आपल्या सुदैवाने शुएन त्झांग याने आपल्या प्रवासाचे अतिशय सूक्ष्म दृष्टीने केलेले वर्णन लिहून ठेवले आहे व त्याच्या अनुयायांनी हे वर्णन जपून ठेवल्याने आपल्याला आज उपलब्ध आहे. या कालातील भारतवर्षाचे सर्वात अधिकृत वर्णन म्हणून हे प्रवास वर्णन आज गणले जाते. शुएन त्झांगने आपला परतीचा प्रवास तमिळनाडू मधील कांचीपुरम येथून सुरू केला होता. व या नंतर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्रातून प्रवास करून तो गुजराथ मधील भडोच या गावी पोहोचला होता. या प्रवासात शुएन त्झांग महाराष्ट्राच्या राजधानीत काही दिवस राहिला होता. आपल्या प्रवास वर्णनात शुएन त्झांगने महाराष्ट्राच्या राजधानीचा नामोल्लेख केलेला नाही. त्यामुळे ही राजधानी कोणती असावी या बाबत इतिहासकारांच्यात बरेच मतभेद आढळतात. परंतु सर्व परिस्थितीजन्य पुराव्याचा अभ्यास केला तर ही राजधानी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर नाशिक हीच असली पाहिजे असे मला तरी वाटते. शुएन त्झांगने आपल्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राच्या राजधानीच्या पूर्वेला असलेल्या व अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या अशा बौद्ध मठाचा उल्लेख केलेला आहे. मात्र सर्व इतिहासकारांचे या बाबतीत मात्र एकमत दिसते की शुएन त्झांगने या बौद्ध मठाला भेट कधीच दिलेली नव्हती व जमा केलेल्या माहितीवरून त्याने बहुदा हे वर्णन केलेले असावे.
या बौद्ध मठाचे वर्णन करताना शुएन त्झांग म्हणतो.(बील भाषांतर)
“ या देशाच्या (महाराष्ट्र) पूर्व सीमेवर, ऊंच सुळके, ओबड-धोबड
दगडांच्या राशी व उभे कापलेले कडे विपुल प्रमाणात असलेला एक अतिशय उत्तुंग
पर्वत आहे. या पर्वतात असणार्या एका अंधार्या गुंफेमध्ये एक बौद्ध विहार
खोदलेला आहे. या बौद्ध विहारामधील प्रशस्त हॉल व बाजूस असणारे मोठे पॅसेजेस
यांची प्रवेशद्वारे उभ्या कड्याच्या बाजूला आहेत. या विहारात असलेल्या
एकावरील एक मजल्यांच्या मागे, पर्वताचे उभे सुळके तर पुढे जलप्रवाह असलेली
दरी आहे. हा मठ अरहत (प्राचार्य) अचल (ओ-चे-लो) यांनी बनवून घेतला असून या
मठातील विहार ऊंचीला 100फूट तरी आहे. या विहाराच्या मध्यभागी बुद्धांची
70 फूट ऊंचीची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीच्या माथ्यावर, कोणत्याही
आधारशिवाय उभे असलेले, सात पायर्यांचे एक पाषाण छत्र (Canopy) आहे. या
छत्रातील प्रत्येक पायरी 3 फूट उंच आहे. एका जुन्या वर्णनाप्रमाणे हे छत्र
आपल्या जागेवर आचार्यांच्या शब्दाच्या ताकदीवर फक्त उभे आहे. असेही म्हणले
जाते की हे छत्र आचार्यांच्या दैवी शक्तीमुळे जागेवर राहिलेले आहे तर
इतरांच्या मते तेथे फासलेल्या व चमत्कार दर्शविणार्या एका मिश्रणामुळे हे
जागेवर राहिलेले आहे. परंतु या आश्चर्याचे सयुक्तिक कारण अजून कोणीही देऊ
शकले नाही. विहाराच्या कडेस असलेल्या चारी दगडी भिंतींच्यावर, 49
निरनिराळ्या देखाव्यांचे चित्रीकरण केलेले आहे. या देखाव्यांत तथागतांनी,
बोधिसत्व म्हणून पुढच्या कालाच्या पूर्वतयारीसाठी केलेली कालक्रमणा,
बुद्धत्त्वाच्या फलप्राप्तीची सुदैवी चिन्हे आणि निर्वाणकालातील दैवी संकेत
या सर्व गोष्टींचे अत्यंत अचूक व सूक्ष्म चित्रण केलेले आहे. या
विहाराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या व डाव्या हातांना, म्हणजेच उत्तर आणि
दक्षिण दिशांना, पाषाणात कोरलेले हत्ती आहेत. अशी समजूत आहे की जेंव्हा हे
हत्ती मोठ्याने चित्कारतात तेंव्हा संपूर्ण पृथ्वी हादरते. अशीही समजूत
आहे की प्राचीन काली चन्न बोधिसत्त्व या विहारात बर्याच वेळा येत असत."
सर्व इतिहास तज्ञांचे या बाबतीतही एकमत आहे की शुएन त्झांगने वर्णन
केलेला बौद्ध मठ हा अजंठा मठाशिवाय दुसरा कोणताही असू शकत नाही. या शिवाय
आजमितीला आपल्या समोर अजंठा गुंफाचे जे दृष्य दिसते ते या वर्णनाशी
बर्यापैकी जुळते आहे. (अर्थात त्या काळातील अंधश्रद्धेनुसार केली गेलेली व
बरीच अतिरंजित अतिशयोक्ती असलेली वर्णने वगळण्याची गरज आहे.) अजंठ्याच्या
26 क्रमांकाच्या गुंफेमध्ये, इ.स.450ते 525 या कालात कोरलेल्या एका
शिलालेखात कोरलेला " स्थविर अचल याने बुद्धांसाठी हे शैलगृह बनवले" हा
मजकूर शुएन त्झांगच्या वर्णनातील बौद्ध मठ अजंठ्याचाच असला पाहिजे याचा थेट
पुरावा मानला जातो.
शुएन त्झांगच्या वर्णनातील या भागाचा मी येथे उल्लेख अशासाठी करतो आहे की
जेणेकरून त्या काळातील बौद्ध जगतात, अजंठा गुंफांना असलेले अनन्यसाधारण
महत्त्व स्पष्ट व्हावे. अजंठा येथील काही गुंफात आढळणार्या शिलालेखांतील
हस्ताक्षरांचे वळण स्पष्टपणे मोर्य किंवा सम्राट अशोककालीन असल्याने, हा
पुरावा ग्राह्य धरून असे मानले जाते की अजंठा गुंफांचे खोदकाम इ.स.पूर्व
तिसर्या शतकात किंवा सातवाहनांचे महाराष्ट्रावर राज्य असताना सुरू झाले
होते व त्याच काळात हा मठ कार्यान्वित झालेला होता. गुंफांचे खोदकाम
सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू होते. क्रमांक 26 मधील गुंफेत
मिळालेल्या एका अर्धवट खोदलेल्या शिलालेखावरून या गुंफांत 8 व्या किंवा 9
व्या शतकापर्यंत म्हणजेच राष्ट्रकूट राजांची सत्ता असतानाच्या कालापर्यंत
राबत चालू होता असे म्हणता येते. अजंठा गुंफांचे किंवा त्यांचा विस्तार
करण्याचे कार्य 700 ते 800 वर्षे चालू होते व तेथे 1000 किंवा 1100 वर्षे
राबता चालू होता या गोष्टी लक्षात घेतल्यावर बौद्ध जगात या मठाला असलेले
आत्यंतिक महत्त्व आणि त्याचा उमटलेला ठसा याची आता आपण फक्त कल्पनाच करू
शकतो.
सातमाला(ळा) किंवा इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेला असलेल्या एका खोल दरीमध्ये खोदल्या गेलेल्या अजंठा गुंफांना भेट द्यायची असल्यास औरंगाबाद पासून प्रयाण करणे अतिशय सोईचे पडते. औरंगाबाद- जळगाव रस्त्यावर, औरंगाबाद पासून 100 किमी अंतरावर या गुंफा आहेत. मी आता या रस्त्यानेच अजंठा गुंफांना भेट देण्यासाठी निघालो आहे. महाराष्ट्र महामार्ग क्रमांक 8 असे नाव असलेला व जळगाव कडे जाणारा हा महामार्ग बराच गजबजलेला दिसतो आहे. शहरातून बाहेर पडताना दिल्ली दरवाजा या नावाचे एक भव्य प्रवेशद्वार उजवीकडे दिसते. अशी 52 प्रवेशद्वारे औरंगाबाद शहरात असल्याची माहिती आमचा वाहन चालक मला पुरवतो. या नंतर उजव्या बाजूसच डॉ.सलीम अली जलाशय व सावंगी जलाशय अशी नावे दिलेले दोन जलाशय दिसत आहेत. शहरातून बाहेर पडल्यावर मात्र हा रस्ता दुतर्फा, ऊस, मका व कापूस यांची लागवड केलेल्या शेतांच्या मधूनच जाताना दिसतो आहे. या शेतांच्यावरून इथली जमीन बर्यापैकी सुपीक वाटते आहे. चौक घाट या नावाने ओळखला जाणारा डोंगराळ भाग लागेपर्यंत रस्ता या अशा शेत जमिनींच्या मधूनच जातो आहे. चौक घाटाला काही मोठा दुर्गम घाट वगैरे म्हणता येणार नाही. तरी सुद्धा या टेकडीवजा भागातील गर्द हिरवाईमुळे, प्रवास, नयनांना सुखद वाटतो आहे हे मात्र खरे! या टेकडीच्या माथ्यावर एक छोटेसे मंदिर दिसते आहे. या डोंगराळ भागानंतर आम्ही परत एकदा शेत जमिनींमधून गेलेल्या रस्त्याने आमचा प्रवास करतो आहोत. हा कृषी प्रधान टापू व मधे मधे लागणारी छोटी छोटी खेडेगावे हे सगळे सिल्लोड गाव लागेपर्यंत तसेच दिसत राहते. सिल्लोड गावाला खरे म्हणजे एक बाय पास रोड आहे. परंतु सतत विस्तार होणार्या गावाने आता हा बाय पास रस्ता गिळंकृत केल्याने हा रस्ता आता शहराचाच भाग झाला आहे. सिल्लोड गाव मागे टाकल्यावर परत एकदा त्या तशाच शेतजमिनी दिसू लागल्या आहेत. अजंठा गावात आमची गाडी शिरल्यानंतर अखेरीस या शेत जमिनी संपतात आणि काही किमी पुढे गेल्यावर अखेरीस सातमाला पर्वतराजीच्या पायथ्याशी असलेल्या पायटेकड्यांमधून आमची गाडी घाट चढू लागली आहे. या अजंठा गावाच्या नावामुळेच पुढे असलेल्या बौद्ध गुंफा, अजंठ्याच्या गुंफा म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहेत. रस्ता बराच वळणावळणाचा व गर्द झाडीतून जातो आहे. अखेरीस आम्ही घाटमाथ्यावर पोचतो व गर्द झाडीत लपलेल्या व खाली दरीत असलेल्या गुंफाच्याकडे जाण्यासाठी म्हणून खाली उतरण्यास सुरूवात करतो.
घाट उतरून खाली पोचल्यानंतर लगेचच एक वळण, मला एका अजंठा गुंफांच्या आंतर्राष्ट्रीय पर्यटन स्थळ या पदवीला शोभेल अशा पद्धतीने अतिशय रेखीव आराखडा बनवला गेलेल्या मोठ्या वाहनतळाकडे घेऊन जाते. येथे आत शिरताना 10रुपये प्रवेश शुल्क व वाहन ठेवण्यासाठी अतिरिक्त शुल्क एवढे द्यावे लागते. ते दिले की तुमचे वाहन अतिशय सुरक्षित रित्या दिवसभर ठेवता येते. वाहन त्याच्या नियोजित जागेवर ठेवल्यानंतर मी जवळच असलेल्या शटल बसच्या थांब्याकडे निघालो आहे. हा मार्ग, अजंठा मॉल या नावाने ओळखल्या जाणार्या एक छोट्याशा बाजारातून जातो आहे. दुतर्फा असलेल्या अनेक दुकानांतून, खाद्य पदार्थांशिवाय पुस्तके, फिल्म, व्हिडिओ, पाषाणापासून बनवलेले क्यूरिओज, टी शर्ट वगैरेसारख्या असंख्य गोष्टी विक्रीस ठेवलेल्या दिसत आहेत. परत येताना या मॉल मध्ये थांबण्याचे ठरवत मी शटलबसच्या थांब्याकडे वळतो आहे. शटल बसचा हा थांबा मोठ्या उत्तम रितीने बांधलेला आहे. मात्र आज रविवार असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी दिसते आहे. परदेशी नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. 10ते15मिनिटे वाट बघितल्यावर मला बस मिळते. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने चालवलेल्या या सेवेतील बसेस, प्रदुषण कमी व्हावे म्हणून सीएनजी वर चालणार्या अशा खास बनवून घेतलेल्या आहेत. बसेस मोठ्या व आरामदायी वाटत आहेत. बसचे भाडे म्हणून 12रुपये द्यावे लागतात. अर्थात हा बसचा प्रवास 5किंवा 10मिनिटाचाच असल्याने गुंफांपाशी पोचण्यासाठी फारसा कालावधी लागत नाही. त्याच प्रमाणे हा 3 किंवा 4 किलोमीटरचा रस्ता डोंगराळ व सभोवताली गर्द झाडी असलेल्या भागातून जात असल्याने हा प्रवास एकूण सुखकर वाटतो आहे यात शंकाच नाही. बरोबरच्या पर्यटकांत जळगावच्या एका शाळेतील मुलामुलींचा एक मोठा ग्रूप आहे. त्यांच्याकडे बघून मला 60 वर्षांपूर्वी एक शाळकरी विद्यार्थी म्हणून केलेल्या माझ्या आधी केलेल्या अजंठ्याच्या पर्यटनाची परतपरत आठवण होते आहे. आमची बस गुंफांच्या साधारण 150ते 200फूट खाली असलेल्या एका जागी थांबते व मी खाली उतरतो.
समोरच गुंफांकडे जाण्याच्या मार्गावर, पुरातत्त्व विभागाने उभारलेले
कुंपण व प्रवेशद्वार दिसते आहे. आत गेल्यावर स्वागत कक्षातील तिकिट काऊंटर
वर प्रवेश शुल्क द्यावे लागते. आतली व्यवस्था चांगली दिसते आहे. समोर एक
कॅफे व स्वछतागृह आहे तर उजव्या हाताला एक छोटासा पण स्वच्छ बगीचा दिसतो
आहे. मी जरा फ्रेश अप होतो व गुंफांकडे जाणार्या पायर्या चढण्यास प्रारंभ
करतो.
गुंफाकडे जाणार्या पायर्या दगडी चिरे वापरून चांगल्या भक्कम बांधून
काढलेल्या दिसत आहेत. तुम्हाला चालायचे नसले तर डोलीची व्यवस्थाही आहे. चढण
फार लांब नसली तरी खूपच चढाची असल्याने ज्यांना गुढग्याच्या वगैरे काही
समस्या असतील त्यांनी डोली केलेलीच बरी! चढ बराच असल्याने, एका दमात
पायर्या चढणे मला शक्य होत नाही. 4 किंवा 5 वेळा थांबून दम घेतल्यावर
अखेरीस शेवटचे वळण येते व ते चढून वर गेल्यावर, समोर अजंठा घळीचा संपूर्ण
देखावा माझ्या नजरेसमोर अचानक फुलतो व माझी पाय आपसूकच थबकतात. अजंठा
गुंफांची ही घळ, घोड्याच्या नालाच्या आकाराची आहे. बाहेरच्या वक्रतेवर
गुंफा खोदलेल्या आहेत तर आतील वक्रता एवढी वर्तुळाकार होते आहे की एक डोंगर
फक्त त्यात कसाबसा मावतो आहे. या घळीच्या तळाला असलेली वाघोरा ही छोटेखानी
नदी, 180 अंशाचा कोन करून या नालाकृतीत वळण घेते आहे. समोरचे दृष्य बघून
मला कसली आठवण होत असेल तर भारत-तिबेट यांच्या सीमेवर ब्रम्हपुत्रा किंवा
यारलुंग त्सांगपो नदी जे विशाल वळण (great bend) घेते, त्याच्या पाहिलेल्या
छायाचित्राची! त्या विशाल वळणाचे एखादे मॉडेल बनवावे तशी ही अगदी छोटेखानी
अशी आवृत्ती आहे.
माझ्या उजव्या हाताला असलेली गुंफा ही 1 क्रमांकाची गुंफा आहे. या
गुंफांना क्रमांक ज्या क्रमाने त्या खोदल्या गेल्या त्या क्रमाने दिलेले
नाहीत. सर्वात मध्यभागी व सर्वात खालच्या पातळीवर असलेल्या गुंफा सर्वात
प्रथम खोदल्या गेल्या होत्या व दोन्ही टोकांना असलेल्या गुंफा सर्वात शेवटी
खोदल्या गेल्या होत्या. या क्रमांक पद्धतीने मध्यावर असलेल्या 9 ते 13
क्रमांकाच्या गुंफांचा गट हा सर्वात प्राचीन आहे तर कडेच्या 1, 2 तसेच 26,
27 या गुंफा सर्वात नवीन आहेत. कडेच्या गुंफा सर्वात नवीन असल्याने साहजिकच
या गुंफांच्यातील रंगवलेली चित्रे, ज्यासाठी अजंठा गुंफा जगप्रसिद्ध आहेत,
सर्वात जास्त सुस्थितीत आहेत.
इ.स.पूर्व 300ते 100 या कालात, बौद्ध धर्मियांनी, दख्खनच्या पठारावरील
भाजे, कोंडाणे, पितळखोरे व नाशिक या सारख्या अनेक स्थानी नवनवीन मठ स्थापन
करण्याची जी एक मोहिम सुरू केली होती त्या मोहिमेच्या अंतर्गत खोदलेल्या
गुंफात, अजंठ्यातील प्राचीन गुंफांचाही (क्रमांक 9 ते 13) समावेश केला
जातो. अजंठ्याला येणारे बहुतेक पर्यटक कडेच्या गुंफा बघण्यासाठी म्हणूनच
आलेले असतात. मला सातवाहन साम्राज्याशी अजंठा गुंफांचा काही संबंध लागतो
का? हेच शोधायचे असल्याने मला या 9 ते 13 क्रमांकाच्या प्राचीन गुंफांत खरा
रस आहे.
या विहाराच्या मध्यभागी बुद्धांची 70 फूट ऊंचीची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीच्या माथ्यावर, कोणत्याही आधारशिवाय उभे असलेले, सात पायर्यांचे एक पाषाण छत्र (Canopy) आहे. या छत्रातील प्रत्येक पायरी 3 फूट उंच आहे. एका जुन्या वर्णनाप्रमाणे हे छत्र आपल्या जागेवर आचार्यांच्या शब्दाच्या ताकदीवर फक्त उभे आहे. असेही म्हणले जाते की हे छत्र आचार्यांच्या दैवी शक्तीमुळे जागेवर राहिलेले आहे तर इतरांच्या मते तेथे फासलेल्या व चमत्कार दर्शविणार्या एका मिश्रणामुळे हे जागेवर राहिलेले आहे.
या विषयी, विशेषतः अधोरेखिताविषयी वाचायला आवडेल.
प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन हत्तींचे वर्णन असल्याने हे वर्णन अजंठ्यामधील 16वा17 क्रमांकाच्या गुंफाबद्दल आहे असे मानता येते. या दोन्ही गुंफांमध्ये बर्यापैकी मोठ्या बुद्ध मूर्ती आहेत. ( अर्थात 70फूट ऊंच वगैरे ही ऐकीव अतिशययोक्ती आहे.) या दोन्ही बुद्ध मूर्तींच्या मागे तेजोवलय कोरलेले आहे परंतु छत्र मला तरी कोठे दिसले नाही. कदाचित छतामधून टांगलेले दिसावे असे कोरलेले असण्याची शक्यता आहे. परंतु तेथे प्रकाश अतिशय कमी असल्याने जिथे स्पॉटलाइट टाकलेला असतो तेवढाच भाग स्पष्ट दिसू शकतो.
बुद्धांच्या चित्रावर तिहेरी छत्र बर्याच ठिकाणी रंगवलेले आढळते परंतु
7 पायर्यांची ( प्रत्येक पायरी 3 फूट जाड) कॅनपी ही जरा अतिरंजित
अतिशययोक्ती वाटते. हत्तींच्या चित्कारण्याने पृथ्वी हादरते या
वर्णनासारखी.
शुएन त्झांगच्या वर्णनाशी थोडेफार जुळणारी छत्री मला 19 क्रमांकाच्या गुंफेमध्ये आढळली. ही गुंफा चैत्यगृह असल्याने गुंफेच्या आतल्या टोकाला एक स्तूप आहे. या स्तूपाच्या दर्शनी भागावर बुद्ध मूर्ती कोरलेली आहे. स्तुपाच्या डोक्यावर 7 पायर्यांची छत्री आहे. यापैकी पहिल्या 4 पायर्या उलट्या पिरॅमिड सारख्या असून त्यावर 3 पायर्या उपड्या ठेवलेल्या वाट्यांप्रमाणे आहेत.
आता फासलेल्या मिश्रणासंबंधी: बील भाषांतराप्रमाणे येथे मुळात some magical compound असे शब्द आहेत. शुएन त्झांग कोणत्यातरी magical adhesive चा बहुदा येथे उल्लेख करत असावा.
शुएन त्झांग कोणत्यातरी magical adhesive चा बहुदा येथे उल्लेख करत असावा.
शुएन त्झांग हा बौद्ध भिख्खू भारतात आला त्या वेळेस आपल्या एवढे शिल्पकलेचे
(दगडात कोरलेली लेणी या संदर्भात) ज्ञान चीनी लोकांकडे नव्हते (चीनी
लोकांची शिल्पकला याविषयी या लोकांचे पॅगोडा बांधण्याचे ज्ञान इतपतच मला
माहिती/ज्ञान आहे, हे पॅगोडाही मुख्यत्वेकरून लाकूड सामानापासून बनवले
जात), त्यामुळे शुएन त्झांग magical adhesive असे म्हणत असेल का?
आपले हे वाक्य बर्याच धाडसाचे वाटते. चीन मधील डुनहुआंग शहराजवळ असलेल्या 1000 बुद्धांच्या किंवा मोगॅओ गुंफा या जगप्रसिद्ध आहेत. त्या इ.स.366 मध्ये खोदल्या गेल्या होत्या. हा काल शुएन त्झांगच्या कालाच्या निदान 200वर्षे तरी आधीचा आहे. त्यामुळे शुएन त्झांगच्या कालात चिनी लोकांना पाषाणावर शिल्पकला कोरण्याची कला अवगत नव्हती असे म्हणणे योग्य वाटत नाही.
मुरुडजवळच्या जंजिर्याची इथे आठवण येते कारण जंजिर्याला दगड जोडण्यासाठी जो दर्जा भरला आहे तो इतका बळकट आहे की समुद्रांच्या लाटांनी दगडांची झीज झाली आहे पण हे मिश्रण तसेच्या तसे आहे. या "मॅजिकल अडेजिव"मुळे सहज आठवले.
चंद्रशेखर, चिन्यांना गुंफा आणि चित्रे काढता येत होती पण दगड कोरून शिल्पकला (जी बहुधा येथे ग्रीकांकडून उसनी घेतली) ती माहित होती का? त्याचे काही प्रमाण मिळते का?
युनगॅन्ग येथील 252 गुंफांमध्ये 51000 बुद्ध पुतळे आहेत असे विकिपिडिया म्हणतो. या दुव्यावर बघा . या गुंफा 5 व्या शतकात खोदलेल्या आहेत. अर्थात भारतीयांनी याच्या बरीच वर्षे आधी हे तंत्र आत्मसात केलेले होते हे मात्र खरे आहे.
एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 2
अजंठा घळीतील गुंफांमध्ये, "पूर्वकालीन गुंफा" या नावाने ओळखला जाणारा गुंफांचा गट आहे. या गटात 6 गुंफा असून त्या इ.स.पूर्व 200ते100 या किंवा सातवाहन राजे, सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी हे राज्यावर असण्याच्या कालखंडात खोदल्या गेलेल्या आहेत. या गुंफांना 8, 9, 10, 12, 13, आणि 15अ असे क्रमांक दिले गेले आहेत. या गटापैकी क्रमांक 13, व 15अ या गुंफा म्हणजे अगदी छोटे असे भिख्खू विहार किंवा भिख्खूंची निवासस्थाने आहेत. या दोन्ही गुंफांच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीचा भाग कोसळल्याने नष्ट झालेला आहे. 13 क्रमांकाच्या गुंफेत असलेल्या 7 निवास कोठड्या, अतिशय चिंचोळ्या व लहान असल्याने, प्रशिक्षार्थी भिख्खूंसाठी एक डॉरमेटरी म्हणून ही गुंफा खोदलेली असावी असे समजले जाते. या गुंफेतील काही कोठड्यांमध्ये पाषाणातच कोरलेले मंचक व डोके ठेवण्यासाठी पाषाणातूनच उशी खोदलेली आहे. 15 अ क्रमांकाच्या गुंफेत फक्त 3 कोठड्या आहेत. मात्र या गुंफेत कोठड्यांच्या द्वाराजवळ कोरीवकाम केलेले आढळते. या द्वारांच्या वरच्या बाजूस घोड्याच्या नालाच्या आकाराच्या चैत्य कमानी कोरलेल्या आहेत. या कमानींच्या वरच्या बाजूस,म्हणजेच छताच्या जवळ सलग अशी एक मोल्डिंग पट्टी खोदलेली आहे. या मोल्डिंग पट्टीत उलट्या ठेवलेल्या व पायर्या पायर्या असलेल्या पिरॅमिड्सचे डिझाइन कोरलेले आहे. या गुंफेच्या पुढच्या भिंतीवर बौद्ध रेलिंग पॅटर्न कोरलेला होता. या गटातील 8 क्रमांकाच्या तिसर्या गुंफेत, आता काहीच उरलेले नाही; पुरातत्त्व विभाग कोठी म्हणून ही गुंफा सध्या वापरत आहे. थोडक्यात म्हणजे वरील 3 गुंफांत फारसे बघण्यासारखे असे आता काहीच उरलेले नाही. त्यामुळे मी माझे लक्ष उरलेल्या 3 गुंफांकडे वळवतो.
12 क्रमांकाची गुंफा हा एक मोठा भिख्खू विहार आहे. बर्जेसच्या मोजणी प्रमाणे हा विहार, 36-1/4 फूट प्रत्येक बाजूची लांबी असलेली एक चौरसाकृती आहे. आतल्या तिन्ही बाजूंना प्रत्येकी 4 कोठड्या आहेत. प्रत्येक कोठडीत खोदलेले 2 दगडी मंचक असून त्यावर पाषाणांच्या कोरलेल्याच उशा आहेत. गुंफेच्या मुखाजवळील भिंत पूर्णपणे ढासळून गेलेली आहे. परंतु या भिंतीच्या बाजूच्या भिंतीवर उरलेल्या खाणाखुणांमुळे, या मुखाजवळील भिंतीच्या बाहेरील बाजूस एक व्हरांडा असल्याचे मात्र दिसते. या विहारातील आतील भिंतींच्यावर कोठड्यांच्या द्वारांच्या वरच्या बाजूस, चैत्य कमानी कोरलेल्या आहेत. व्हरांड्यालगत असलेल्या बाजूच्या भिंतीवर सुद्धा, आतील भिंतीवर असलेल्या सारख्या चैत्य कमानी व रेलिंग पॅटर्न कोरलेले दिसत आहेत. फक्त उजव्या बाजूच्या आतील भिंतीवर लाकडी जाळी पॅटर्न, फुलांचे डिझाइन, बेर्म रेल कमानी यांचे विशेष नक्षीकाम केलेले दिसते आहे. या नक्षीकामाच्या वरच्या बाजूस छताजवळ एक सलग कठडा खोदलेला आहे. या कठड्यावर पायर्यापायर्या असलेल्या त्रिकोणांची नक्षी कोरलेली आहे. या नक्षीला असिरियन पॅटर्न या नावाने ओळखले जाते कारण इराण मधील अनेक ठिकाणी ही नक्षी आढ्ळून आलेली आहे. दारांच्या सिल्स आणि लिंटेल्स यावर खुंट्या मारण्यासाठी म्हणून छिद्रे पाडलेली आहेत. या छिद्रांवरून या कोठड्यांना दारे बसवण्याची सुविधा होती असे समजले जाते. या बाजूस असलेल्या विशेष नक्षीकामामुळे या बाजूच्या कोठड्या वरिष्ठ, महत्त्वाच्या पदावर असलेले भिख्खू वा आचार्य यांच्या रहाण्यासाठी असाव्यात. विहाराच्या मागील भिंतीवर असलेल्या सर्वात उजव्या कोठडीच्या द्वाराच्या डाव्या बाजूस एक शिलालेख कोरलेला आहे.
धनामदडस वणिज(स)
सउवयरको सउपा(सयो)
या शिलालेखाचे बर्जेस याचे भाषांतर असे आहे.
या शिलालेखातील मजकुरावरून मिळणार्या माहितीपेक्षा ज्या ब्राम्ही लिपीत
ही मूळाक्षरे खोदलेली आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत व आपल्याला जास्त
माहिती सांगतात. ही मूळाक्षरे पूर्णत: मौर्य किंवा सम्राट अशोककालीन
असल्याने या गुंफेचा खोदण्याचा काल इ.स.पूर्व दुसरे शतक असा निश्चित करता
येतो. या विहाराच्या भिंती त्या कालात संपूर्णपणे चित्रांनी रंगवलेल्या
होत्या परंतु आता काहीही दिसू शकत नाही.
मी आता 9 आणि 10 क्रमांकांच्या उरलेल्या दोन गुंफांकडे वळतो आहे. या दोन्ही
गुंफा चैत्यगृहे किंवा उपासना स्थळे होती. या दोनपैकी कोणती गुंफा जास्त
जुनी असावी यावरून पुरातत्त्व शास्त्रज्ञांमध्ये आधी मतभेद होते.परंतु आता
10 क्रमांकाची गुंफा ही जास्त जुनी व अजंठ्याच्या गुंफांमधील सर्वात प्रथम
खोदलेली असल्याचे मानले जाते.
बर्जेसने केलेले या गुंफेचे वर्णन असे आहे.
"ही गुंफा 41 फूट 1 इंच रूंद, अंदाजे 95-1/2 फूट खोल व 36 फूट ऊंच आहे. गुंफेच्या आतील टोकाचा भाग व मधल्या कक्षाच्या आणि स्तूपाच्या सभोवती असलेल्या स्तंभांची ओळ हे दोन्ही स्तूपाच्या मागील बाजूस अर्धवर्तुळाकार आकारात खोदलेले असून, अष्टकोनी आकाराच्या या स्तंभांची संख्या, कार्ले येथील विशाल चैत्यगृहापेक्षा 2ने अधिक किंवा 39 आहे. यातील बरेच स्तंभ मोडकळीस आलेले आहेत. या स्तंभांच्या वरच्या बाजूस मोल्डिन्ग्ज व पट्टे असलेली एक 9-1/2फूट ऊंचीची सपाट तुळई (entablature) आहे. या तुळईतून 12-1/2 फूट ऊंचीचे व 23-1/2 फूट विस्तार असलेले कमानी आकाराचे छत वर गेलेले आहे. कार्ले येथील चैत्यगृहाप्रमाणेच या छताला आतल्या बाजूने लाकडाच्या कमानी बसवलेल्या आहेत. खांबांच्या बाजूंना असलेले पॅसेजेस 6 फूट रूंदीचे आहेत व त्यांना अर्धकमानी आकाराचे छत आहे. या छताला दगडात कोरलेले वासे (rib) काढलेले आहेत. स्तूपावर कोणतेही नक्षीकाम नाही. तळाचा पिंपवजा आकार 12 ते 15 फूट व्यासाचा आहे. यावर अर्धगोलापेक्षा मोठा असलेला घुमट आहे. या घुमटावर एक कॅपिटल बसवलेला आहे. हा कॅपिटल म्हणजे चौरस आकाराची एक ठोकळेवजा दिखाऊ पेटी व त्याच्या डोक्यावर आकाराने वाढ्त जाणार्या पातळ स्लॅब्ज्चा एक उलटा पिरॅमिड आहे. स्तूपाच्या मागील बाजूला असलेल्या स्तंभांच्या डोक्यावरील तुळईचा (entablature)आकार एका विशाल कमानीसारखा आहे. या कमानीच्या पुढच्या बाजूस उजव्या हाताला एक शिलालेख कोरलेला आहे. “
हादिनो घरमुख
दानं
या शिलालेखाचे बर्जेस याने केलेले भाषांतर असे आहे.
12 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच या शिलालेखातील मूळाक्षरे ही मौर्य किंवा सम्राट अशोककालीन असल्याने ही गुंफा इ.स.पूर्व दुसर्या शतकातील असल्याचा पुरावा मिळतो. अष्टकोनी स्तंभांसह, ही सर्व गुंफा चित्रांनी सजवलेली, रंगवलेली होती.
मुंबईच्या Bombay School of Arts किंवा आताचे जे.जे स्कूलचे तत्कालीन प्राध्यापक मिस्टर जॉन ग्रिफिथ व त्यांचे काही विद्यार्थी यांनी 1875 ते 1885 या कालखंडात अजंठ्याच्या गुंफांमधील चित्रांच्या प्रती बनवण्याचे काम पूर्ण केले होते. हे काम करत असताना जॉन ग्रिफिथ यांना असे आढळून आले की 10 क्रमांकाच्या गुंफेमधील चित्रांचे काही भाग हे अधिक जाडीचे आहेत. जास्त जवळून निरीक्षण केल्यावर त्यांना आधी काढलेल्या जुन्या चित्रांवरच परत दुसरी नवीन चित्रे रंगवली असल्याचे आढळून आले. वरच्या थरातील चित्रांमध्ये वापरलेले रंग व शैली यावरून ती चित्रे 5व्या किंवा 6 व्या शतकात काढलेली आहेत हे स्पष्ट दिसत होते. हे रंग व शैली खालील थरातील चित्रांपेक्षा भिन्न असल्याचेही स्पष्ट होत होते. या शोधामुळे ग्रिफिथ या निष्कर्षाप्रत आले की खालच्या थरातील चित्रे आधीच्या म्हणजे इ.स.पूर्व कालातील आहेत व वरच्या थरातील चित्रे या जुन्या चित्रांवरच 500 किंवा 600 वर्षांनी रंगवलेली आहेत. ग्रिफिथ यांच्या शोधामुळे सातवाहन कालातील लोकांचे आयुष्य कसे होते याची थोडीफार कल्पना प्राप्त करून घेण्याची एक सुसंधीच आपल्याला प्राप्त झाली असे मला वाटते.
मात्र 1875 नंतरची अनेक दशके, अजंठ्याच्या गुंफा बघण्यास येणार्या दर्शकांवर कोणतेही निर्बंध पुरातत्त्व विभागाने न घालता, त्यांना अजंठ्याच्या गुंफात मुक्त संचार करू दिला. या कालात अजंठा गुंफांमधील रंगवलेली चित्रे हा भारताच्या इतिहासाचा केवढा अनमोल ठेवा आहे त्याची अजिबात जाणीव नसलेल्या पर्यटकांनी आपली नावे, आपण कोणावर प्रेम करतो त्याच्या जाहीर घोषणा व नुसत्याच रेघोट्या काढून या अनमोल ठेव्याला अशक्य प्रमाणात विद्रूप केले व त्याची जी नासधूस केली ती बघता दैवाने दिले पण कर्माने नेले या म्हणीची मला आठवण येथे होते आहे. मी या चित्रांच्या काढलेल्या छायाचित्रांत, मुख्यत्त्वे या रेघोट्याच दिसून येत असल्याने छायाचित्रांतून फारशी काहीच माहिती मिळण्याची शक्यता नाही हे मला येथे स्पष्ट दिसते आहे. या वास्तवामुळे जॉन ग्रिफिथ याने काढलेल्या या चित्रांच्या प्रती हाच फक्त या गुंफेतील चित्रांचे अध्ययन करण्याचा एकच मार्ग उरलेला आहे हे माझ्या लक्षात येते आहे. जॉन ग्रिफिथ यांनी काढलेली सर्व चित्रे, भारतातील ब्रिटिश सरकारने नीट रहावी म्हणून लंडनला 'इंडिया ऑफिस' कडे नंतर पाठवून दिली. या कचेरीला दुर्दैवाने नंतरच्या कालात आग लागली व यातली काही अनमोल चित्रे जळून खाक झाली. ग्रिफिथ याने काढलेल्या चित्रांची यादी व त्यातील कोणती जळून गेली हे त्याने नंतर प्रसिद्ध केले.परंतु जी चित्रे बचावली ती कोठे आहेत? ही माहिती कदाचित पुरातत्त्व विभागाला असेल परंतु ती त्यांनी प्रसिद्ध केलेली मला तरी कोठे सापडली नाही. या सर्व दुर्दैवी घटनाक्रमामुळे या चित्रांची जुनी छायाचित्रे व त्यावरून काढलेली रेखाचित्रे हा एवढाच ठेवा आता आपल्या हातात उरलेला आहे.
10 क्रमांकाच्या गुंफेमध्ये, विद्रूप झालेल्या स्थितीतील, मोठ्या आकाराची 5 रंगचित्रे व बुद्धाच्या अनेक प्रतिमा आपल्याला आज बघायला मिळतात. या पैकी बुद्धाच्या सर्व प्रतिमा या महायान कालातील म्हणजेच 4थ्या किंवा 5व्या शतकातील आहेत. मोठ्या रंगचित्रांपैकी, दोन अतिशय सुंदर दिसणार्या रंगचित्रांत, साम आणि छद्दान्त जातक या मधील कथांचे चित्रण केलेले असल्याने ती महायान कालातील (4थे किंवा 5वे शतक) समजली जातात. यामुळे उरलेली 3 मोठी रंगचित्रे इ.स.पूर्व किंवा सातवाहन कालातील आहेत असे नक्की म्हणता येते व याच चित्रांचा जास्त खोलात जाऊन मी विचार करणार आहे.
सर्वप्रथम बर्जेस् या चित्रांबद्दल काय म्हणतो ते आपण पाहूया. बर्जेसची ही टीकाटिप्पणी मला अतिशय रोचक वाटते आहे.
"(या चित्रांत) दाखवलेले राजवाडे किंवा इमारती यातील अंर्तभाग सर्व साधारणपणे एक मध्यवर्ती हॉल व बाजूला दोन पॅसेजेस किंवा व्हरांडे या स्वरूपाचा दाखवलेला आहे. या इमारतींची छते सपाट किंवा धाब्याची दाखवलेली आहेत व त्यांना आधार देणारे स्तंभ हे बारीक व्यासाचे व छताजवळ एक कॅपिटल असलेले असे दाखवलेले आहेत. व्यक्तींच्या अंगावरील वस्त्रे असंख्य प्रकारची असली तरी ती त्यांच्या जाती वर्णाचे प्रतिनिधित्व करतील अशीच दाखवलेली आहेत. वरिष्ठ वर्णातील देव, राजे, दिवाण आणि सरदार यांच्या सारख्या व्यक्ती कंबरेच्या वर कोणतेच वस्त्र न घेतलेल्या दाखवलेल्या आहेत मात्र त्यांच्या अंगावर पोची, गळ्यातील हार, बाजूबंद आणि डोक्यावरचा मुगुट या सारखे अनेक अलंकार दाखवलेले आहेत. कनिष्ठ वर्णातील लोक मुख्यत्त्वे अंगभर कपडे घेतलेले परंतु काहीच अलंकार न घातलेले असेच दाखवलेले आहेत. भिक्षू व मठवासी हे उजवा खांदा उघडा राहील या पद्धतीचा पायघोळ अंगरखा घातलेले आहेत. राण्या, राजप्रासादातील स्त्रिया आणि त्यांच्या दासी यांच्या अंगावर त्यांच्या स्थानाला अनुसरून वैशिष्ट्यपूर्ण व रत्नजडित अलंकार घातलेले अशा दाखवलेल्या आहेत. काही वेळा, दर्शकाला चित्रातील राण्या विवस्त्र दाखवल्या आहेत की काय? असे प्रथमदर्शी भासते. परंतु नीट बघितल्यास, राण्यांनी अंगावर सर्वात उत्कृष्ट प्रतीची व तलम अशी मलमल परिधान केलेली आहे हे दर्शवण्याचा चित्रकाराचा हा प्रयत्न आहे हे लक्षात येते. अंगावरील हे मलमलीचे वस्त्र दर्शवण्यासाठी चित्रकार या व्यक्तीच्या मांड्यांजवळ वस्त्राला पडलेल्या चुण्या व फुलांचे डिझाइन असलेले वस्त्राचे काठ हे ब्रशने पांढर्या धूसर रंगाचे काही फटकारे मारून व कटिवर हे वस्त्र जागेवर रहावे म्हणून बांधलेल्या शृंखलेच्या चित्रणातून दर्शवतो. नर्तकी सध्याच्या कालातीलच आहेत की काय? असे भासावे असे रंगीबेरंगी व नाचताना हवेत उडणारे कपडे परिधान केलेल्या दर्शवलेल्या आहेत. दास दासी आणि कंचुकिणी यासारखे घरगुती नोकर व गुलाम हे उत्तरीय परिधान केलेले दिसतात व कंबरेखाली साडी किंवा धोतर नेसलेले दर्शवलेले आहेत. त्यांच्या अंगावरील वस्त्रावर पट्यापट्यांचे डिझाइन बर्याच वेळा आढळते.”
बर्जेसची ही टीकाटिप्पणी मनात ठेवून, 10 क्रमांकाच्या गुंफेतील सातवाहन कालात चित्रण केलेल्या 3 रंगचित्रांचा विचार आता मी पुढे करणार आहे.
क्रमश:
अजिंठा व वेरुळ (किंवा अजिंठा आणि इतर कुठल्याही प्रमुख लेण्यांतील)इथल्या
लेण्यांतला मुख्य फरक मला वाटतो तो म्हणजे अजिंठ्यात खोदकाम तुलनेने फारच
कमी आहे, रंगकाम फारच जास्त. इतर कुठल्या ठिकाणी इतकं प्रचंड रंगकाम,
चित्रकारी त्याकाळातली दिसत नाही(की शिल्लक नाही?) इतर ठिकाणी त्यांना
रंगकाम का करावेसे वाटले नसेल( रंगवायची विद्या अवगत असूनही) ?
.
एक अवांतर पण पूरक :- वेरूळ मध्ये आपण मुख्यत्वे शिल्पे पाहण्यास जातो. पण
तिथेही काही कोपर्याकापर्यातल्या कागी अजूअन्ही थोडेफार रंग काम दिसते.
म्हणजे खोडरबरने संपूर्ण पानभर असलेले चित्र व्यावस्थित खोडून काढल्यावरही
कुठेतरी मागे दोन चार पेन्सिलीची चिन्हं राहून जावीत तसेच.(नेमके कुठे
दिसले?/ वेरूळ मधील सुप्रसिद्ध कैलास लेण्यात एक खोली/गर्भ्ग्रुह्/मंदिर
सदृश काही आहे. त्याच्या बाहेरील भिंतीएवर रावण आख्खा कैलास पर्वत उचलु
पाहतो असे काहीसे कोरलेले आहे. बरोब्बर त्याच्या समोर जो जो त्यास
प्रदक्षिणा घालायला पॅसेज आहे, त्या पॅसेजच्या अगदि टोकाला, छतावर साधारण
एक्-दोन चौरस फूट आकाराचे लाल,हिरवे बॅकग्राउंड दिसले . कुठले तरी मोठे
चित्र पुसले गेले असावे, आणि त्याचा हा टवका राहून गेला असावा असे वाटले..)
तर असे रंगकाम इतरत्र आपल्या मंदिरात कुठ्बेही का दिसत नाही?(के एआह्जेबर्ह्याच ठिकाणी, पण म्,अला ठाउक नाही?)
हजारेक वर्षापूर्वीच्या काही प्राचीन चर्च मध्ये मेरी-येशू ह्यांची
उत्तमोत्तम रंगीत चित्रे आहेत. त्याच काळात इथल्याही सुस्थित नागरी समाजाला
असे चित्र काढायची हौस नसावी का?)
साधारणपणे असे म्हणता येते की भारतातील बौद्ध मंदिरांवर (स्तूप, चैत्यगृहे) चित्रे व शिल्पकला ही दोन्ही वापरून सजावट करण्याची पद्धती इ.स.पूर्व तिसर्या शतकापासून पुढे रूढ झालेली होती. 5व्या किंवा 6व्या शतकापर्यंत बनवलेल्या बौद्ध मंदिरात या दोन्ही पद्धतींचा वापर सजावटीसाठी केलेला आढळतो. यानंतर आलेल्या हिंदू मंदिरातही या दोन्ही पद्धती आहेतच. रंगचित्रे कालौघात नष्ट होतात व शिल्पे त्या मानाने टिकून राहतात. त्यामुळे आपल्याला जुन्या मंदिरातील रंगकाम आता दिसू शकत नाही. पूर्वीच्या काळची ही बौद्ध मंदिरे कशी दिसत असतील याची उत्तम कल्पना मागच्या 25 वर्षात बांधलेल्या लेहमधील शांतीस्तूपाला भेट दिल्यास येऊ शकते. दक्षिण भारतातील विशेषत: तंजोर मधील मंदिरात उत्तम रंगकाम केलेले आहे.
अतिशय सुंदर वर्णन करत आहात. सोबत येणारी माहिती अजून छान आहे.
या कालात अजंठा गुंफांमधील रंगवलेली चित्रे हा भारताच्या इतिहासाचा
केवढा अनमोल ठेवा आहे त्याची अजिबात जाणीव नसलेल्या पर्यटकांनी आपली नावे,
आपण कोणावर प्रेम करतो त्याच्या जाहीर घोषणा व नुसत्याच रेघोट्या काढून या
अनमोल ठेव्याला अशक्य प्रमाणात विद्रूप केले व त्याची जी नासधूस केली ती
बघता दैवाने दिले पण कर्माने नेले या म्हणीची मला आठवण येथे होते आहे. हे तर अनेक ठिकाणी अजूनही होते आहे. :( कोरिव कामाचे नमुने फोडलेले मी स्वतः पाहिले आहेत...
ते १८१९ साली जॉन स्मिथ हा इंग्रज धिकारी वाघाची शिकार करायला येथे फिरत होता. तेव्हा त्याला दहाव्या गुहेचे मुख दिसले. आत काय आहे ते पाहिल्यावर त्याला ही अनमोल चित्रे दिसली. जॉन स्मिथ आत आला आणि त्याने या चिरखाडीची सुरुवात आपले नाव आणि दिनांक दहाव्या गुहेत खरडून केली....
तोवर ठेवा उत्तम रित्या जपला गेला होता. कारण चौथ्या शतकापासून येथ फक्त जंगलच होते!
पुढचे तुम्ही लिहिलेच आहे...
आवांतरः
चोरटी निर्यात हे अजून एक मोठे संकट सदैवच आहे. इतक्यात (सुमारे ६
महिन्यांपुर्वी?) एक मोठा भारतीय तस्कर पकडला गेला आहे. परंतु त्याची
पाळेमुळे अजूनही उध्वस्त झालेली नाहीत.
एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 3
सातवाहन कालातील म्हणता येतील अशी 3 भित्तीचित्रे अजंठ्याच्या 10 क्रमांकाच्या गंफेत आहेत आणि ती अतिशय विद्रूप व खराब अवस्थेत असल्याने कॅमेर्याच्या सहाय्याने, झूम करून सुद्धा, त्यावरून तत्कालीन काहीही माहिती प्राप्त करण्याची सुतराम शक्यता नाही हे आपण आधी बघितले आहे. या मूळ 3 चित्रांवरून, ग्रिफिथ यांनी काढलेल्या चित्रांपैकी काही त्यांनी आपल्या पुस्तकात प्रसिद्ध केली होती. मात्र हे पुस्तक अत्यंत दुर्मिळ असल्याने मला वाचण्यास मिळणे अशक्यप्राय दिसल्याने दुसर्या कोणत्या पुस्तकात ही चित्रे पुनर्मुद्रित केली आहेत का याचा शोध मी घेऊ लागलो. हा शोध घेत असता श्री. जी. याझदानी यांनी लिहिलेल्या पुस्तकात मला काही चित्रे व रेखाचित्रे मिळाली. बर्जेस यांच्या पुस्तकातही काही स्केचेस सापडली. व या रेखाचित्रांवर मला समाधान मानावे लागणार हे स्पष्ट झाले.
माझ्या दृष्टीने या तिन्ही भित्तीचित्रांचे वैशिष्ट्य हे आहे की त्या सर्वात कोणी एक राजा बुद्धाच्या स्तूप, तोरण किंवा बोधिवृक्ष या सारख्या, कोणत्या न कोणत्या तरी सांकेतिक चिन्हापुढे विनम्र झालेला दाखवलेला आहे. काही ब्रिटिश लेखकांनी हा राजा म्हणजे बौद्ध ग्रंथांच्यात ज्याला नाग जमातीचा राजा म्हटले जाते असा एखादा आदिवासी लोकांचा राजा असावा असे अनुमान काढले होते. परंतु चित्रांचा सखोल अभ्यास केल्यावर हा राजा आदिवासी राजा नसून सुरूवातीच्या सातवाहन राजांपैकी एक असला पाहिजे हे मला स्पष्ट झाले. वर उल्लेख केलेले जी. याझदानी हे लेखक तर नाणेघाटात ज्याच्या कर्तुत्त्वाचा शिलालेख कोरलेला आहे व दगडात कोरलेला ज्याचा पुतळा किंवा शिल्प तेथे उभे होते तो राजा श्री सातकर्णी, अजंठ्यामधील या चित्रांत दाखवलेला असला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करतात व मला तरी ते योग्य वाटते आहे.
मी वर्णन करित असलेले पहिले रंगचित्र डाव्या बाजूच्या पॅसेजच्या भिंतीवर
3ते 9 क्रमांकाच्या स्तंभांच्या मागे रंगवलेले आहे. लांबलचक असलेले हे
चित्र "बोधी वृक्षाला वंदन करण्यासाठी आलेला राजा व राजपरिवाराचे आगमन"
(“Arrival of Raja (King) with his retinue to worship the Bodhi tree.”)
या नावाने ओळखले जाते. जी याझदानी यांच्या मते सातवाहन राजा श्री सातकर्णी
हा बुद्ध गया येथील बोधी वृक्षाची प्रार्थना करताना या चित्रात दाखवलेला
आहे. या चित्राच्या साधारणपणे मध्यभागात राजा एका बोधी किंवा पिंपळ
वृक्षासमोर प्रार्थना करताना दाखवलेला आहे. हा संपूर्ण बोधीवृक्ष, बौद्ध
मठांमध्ये बहुतेक वेळा दिसतात तशा प्रकारच्या, बॅनर्सनी सजवलेला आहे.
राजाबरोबर असलेल्या राजपरिवारात 10 स्त्रिया व बोधी वृक्षाजवळ उभे असलेले
बालक हे आहेत. या बालकाच्या उभे रहाण्याच्या स्थानावरून, राजा करित असलेली
प्रार्थना ही त्या बालकाच्या संबंधित असण्याची शक्यता आहे. राजाच्या
डावीकडे असलेल्या 5 स्त्रिया, राजाच्या चेहर्याकडे टक लावून बघत आहेत तर
बाकीच्या स्त्रिया हा समारंभ बघत आहेत. एक छोटी मुलगी समारंभ नीट दिसत
नसल्याने एका घडवंचीवर उभी राहून हा समारंभ बघते आहे. राजपरिवारातील सर्व
स्त्रिया, सध्या वापरात असलेल्या अलंकारांसारख्याच दिसणार्या, अलंकारांनी
नटलेल्या सजलेल्या आहेत. या अलंकारांत कर्णफुले, गळ्यातील हार, बांगड्या,
दंडावरील बाजूबंद यांचा समावेश आहे. हातात खूप संख्येने घातलेल्या
बांगड्या बहुदा हस्तीदंती आहेत व या बांगड्यांनी या स्त्रियांच्या हाताचा
कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग भरून गेला आहे. लमाणी स्त्रिया आजमितीला
सुद्धा अशा बांगड्या भारतामध्ये वापरत असतात. स्त्रियांची उत्तरीय वस्त्रे
अतिशय तलम अशा मलमलीची असल्याने त्या अर्धनग्न असल्याचेच चित्रकाराला भासत
असल्याने या स्त्रिया तशाच स्वरूपात त्याने दाखवलेल्या आहेत. असे असूनही
त्यांच्या अंगावरील वस्त्रप्रावरणे अतिशय कलाकौशल्याने बनवलेली असल्याचे
चित्रकार सूचित करतो आहे. एका स्त्रीने मुगुट घातलेला आहे तर दुसरीने
केसांभोवती एक पट्टा बांधून त्यात 3 मोरपिसे खोचलेली आहेत. बाकी सर्व
स्त्रियांनी राजस्थान मधील स्त्रिया डोक्यावर घेतात तसे घुंगट डोक्यावर
घेतलेले आहे. राजपरिवारातील सर्वांचे चेहरे गोलसर दाखवलेले असून नाक सरळ
आणि टोकदार, भरदार ओठांची लहानखुरी जिवणी अशी त्यांच्या चेहर्यांची
वैशिष्ट्ये आहेत. मात्र सर्वांचे डोळे अतिशय पाणीदार व तेजस्वी काढलेले
आहेत. राजपरिवारातील व्यक्ती पश्चिम भारतातील किंवा महाराष्ट्रातील
सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच दिसत आहेत. उत्तर किंवा दक्षिण हिंदुस्थानी
लोकांशी त्यांचे साधर्म्य अजिबातच दिसत नाहीये. राजाच्या डोक्यावर मुगुट
नसला तरी माथ्यावर केसांचा एक बुचडा बांधून त्या भोवती एक रत्नजडित पट्टा
त्याने बांधलेला आहे. अनेक स्त्रियांच्या डोक्यावरचा भांग डाव्या बाजूला
काढलेला दिसतो आहे. काही स्त्रियांच्या कपाळावर कार्ल्याच्या गुंफेत
असलेल्या शिल्पांसारखी बिंदी रंगवलेली आहे.
राजाच्या समोर एका आंब्याच्या वृक्षाखाली 3 किंवा 4 नर्तकी नृत्य करताना
दिसत आहेत. त्यांच्या मागील बाजूस वेताचे विणकाम करून तयार केलेल्या
(wicker work stools) मोड्यांवर, या नर्तकींना साथ करणार्या 6
स्त्रियांचा गट बसलेला दिसतो आहे. या पैकी 2 स्त्रियांच्या हातात पिपाणी
सारखे फुंकून वाजवण्याचे वाद्य दिसते आहे तर बाकीच्या साथीदार स्त्रिया
टाळ्या वाजवून ताल धरताना दाखवल्या आहेत. ताल वाद्य मात्र या चित्रात दिसत
नाही. या शिवाय आणखी 5ते6स्त्रिया मागे बसून हा नाच बघत आहेत. त्यात 2 लहान
मुली आहेत. या नृत्य व गायन वादन करणार्या गटातील स्त्रियांची वेषभूषा
साधारण राजपरिवारातील स्त्रियांप्रमाणेच दिसते आहे.
राजाच्या मागील बाजूस परशू, भाले, वक्र तलवारी व धनुष्यबाण धारण केलेले
अनेक सैनिक दिसत आहेत. डोकयावर कान संपूर्णपणे झाकले जातील असे मुंडासे
बांधलेला एक गदाधर सैनिकही दिसतो आहे. बहुतेक सैनिकांची चित्रे नष्ट
झालेली असून आता त्यांचे भाले फक्त दिसू शकत आहेत. बाकीच्या सैनिकांकडे
धनुष्यबाण किंवा वक्र तलवारी असल्याचे दाखवलेले आहे.
चित्रकाराने त्या काळातील लोकांची रहाणी कशी होती ती विविध अंगांनी दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटत राहते. सातवाहन कालातील लोकांची वेशभूषा, संस्कृती, सर्वधर्मसहभाव याची उत्तम कल्पना या चित्रावरून येते आहे. महाराष्ट्रातील लोकजीवन व संस्कृतीची परंपरा किती अखंड व अबाधितपणे गेली 2000 वर्षे चालू राहिलेली आहे याची कल्पना आपल्याला या चित्रावरून येऊ शकते असे मला वाटते. या चित्रातील बोधीवृक्षाऐवजी तेथे शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती दाखवली तर हे चित्र शिवकालीन किंवा अगदी पेशवेकालीन म्हणून सुद्धा खपवता येईल.
ग़ुंफा क्रमांक 10 मधील दुसरे चित्र सुद्धा डाव्या भिंतीवरच परंतु 9ते 11
क्रमांकाच्या स्तंभांच्या मागील बाजूस आहे. हे चित्र " राजपरिवाराचे
स्तूपाला वंदन" (“ The Royal Party worshipping a Stupa.”) या नावाने ओळखले
जाते. या चित्रात अर्थातच राजपरिवार एका स्तूपाला वंदन करताना दाखवलेला
आहे. जी. याझदानी या लेखकाच्या मताने हे चित्र सातवाहन राजा श्री सातकर्णी
याने सांची स्तूपाला भेट दिली असल्याचे दर्शवतो आहे. ( या स्तूपाच्या एका
तोरणावर या राजाचे नाव कोरलेले आहे.) या चित्रातील स्तूपाच्या डोक्यावर
एक ध्वज व छत्री आहे. हा स्तूप म्हणजे एक अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ
असल्याचे दर्शवण्यासाठी, चित्रकाराने स्तूपाच्या दोन्ही बाजूंना उडणार्या
2 अप्सरा दाखवलेल्या आहेत. मात्र या अप्सरा व त्यांची वेशभूषा ही मानवी
स्वरूपातील दाखवलेली आहे.
या चित्राच्या उजव्या भागात (दर्शकाच्या डाव्या बाजूस) 10 उपासक हात
जोडून स्तूपासमोर प्रार्थना करताना दर्शवलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरील
शिरस्त्राणांवरून ते भिख्खू नाहीत हे स्पष्ट दिसते आहे. चित्राच्या
उजवीकडच्या भागात हात जोडलेले आणखी 4 उपासक दिसत आहेत. त्यांच्या मागील
बाजूस परत एक आंब्याचे झाड दाखवलेले आहे.
या गुंफेतीलच व सातवाहन कालातील असे ज्याला नक्की म्हणता येते असे चित्र
क्रमांक 3 हे ही डाव्या भिंतीवरच रंगवलेले आहे. हे चित्र मागील चित्राला
जोडूनच सलग रंगवलेले आहे. मागचे चित्र व हे चित्र यांच्यामध्ये एक उपासकाचा
चेहरा फक्त आता उरलेला आहे. राजपरिवारातील बाकी व्यक्तींची चित्रे संपूर्ण
नष्ट झालेली आहेत. हे चित्र " राजपरिवाराचे तोरणाखालून आगमन व प्रयाण "
(“The Royal Party passing through a gateway.”) या नावाने ओळखले जाते.
चित्राच्या ज्या भागांचे आकलन होऊ शकते त्यात प्रथम एक छत्री दिसते आहे व
त्या शेजारी एक आंब्याचे झाड दिसते आहे. या झाडाखाली 4 व्यक्तींची फक्त
डोकी दिसू शकत आहेत. यापैकी एक व्यक्ती वर वर्णन केलेले खास मुंडासे परिधान
केलेली गदाधर व्यक्ती आहे. याच्या उजवीकडे एक बौद्ध तोरण दिसते आहे.
अजंठा गुंफांना समकालीन असलेल्या सांची येथील स्तूपाभोवती चारी प्रमुख
दिशांना अशीच तोरणे उभारलेली आजही दिसतात. राजपरिवारापैकी एक व्यक्ती
तोरणाखालून जाताना दिसते आहे तर इतर अनेक व्यक्ती बाहेरच्या बाजूला दिसत
आहेत. एक हत्तीस्वार आपल्या उजव्या हातात दुहेरी धारेची तलवार धरून बसलेला
आहे आणि त्याच्या डाव्या हातात मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराची मुगूट किंवा
ढालीसारखी एक वस्तू दिसते आहे. या तलवारधारक व्यक्तीच्या उजव्या बाजूला
असलेला एक सेवक आपला हात वर उचलून अंगठा व तर्जनी हे एकमेकाला जुळवून
काहीतरी मुद्रा दर्शवतो आहे. उजव्या बाजूला असलेला गजराज आपली सोंड उंचावून
राजाला अभिवादन करतो आहे. हत्तीवर बसलेल्या व्यक्तीच्या हातात पराणी आहे.
उजवीकडे आणखी निदान 3 तरी हत्ती असून त्यावर राजपरिवारातील व्यक्ती
बसलेल्या आहेत हे त्यांच्या डोक्यावरील छत्रांवरून कळते आहे. यातील 2
हत्ती तोरणांकडे येत आहेत तर तिसरा तोरणापासून दूर जात आहे. जी. याझदानी
यांच्या मताने, स्तूपाला भेट देणार्या राजाचे आगमन व प्रयाण या द्वारे
चित्रकाराने सूचित केले आहे. चित्राच्या सर्वात उजवीकडे असलेल्या
हत्तीवरील राजाचे चित्र बघितल्यास त्यावरील राजा आपल्या हाताने हत्तीच्या
गंडस्थळावर ठेवलेल्या व झाडाची फांदी खोचलेल्या एक फुलदाणीला आधार देताना
दाखवलेला आहे. बुद्धाला ज्या बोधी वृक्षाखाली दैवी साक्षात्कार झाला त्या
बोधी वृक्षाची ही फांदी असली पाहिजे व या दृष्यामुळे 3 क्रमांकाचे हे चित्र
सातवाहन राजा श्री सातकर्णी याने बोधीगयेला दिलेल्या भेटीचे असले पाहिजे
असे जी याझदानी मानतात.
बर्जेसने ग्रिफिथ्सच्या मूळ चित्रांमधील काही व्यक्तींची चित्रे मोठी करून काढून घेतली होती. वर दिलेल्या वर्णनातील व्यक्तीवैशिष्ट्ये या चित्रांवरून अगदी स्पष्ट होतात असे मला वाटते. 10 क्रमांकाच्या गुंफेतील ही भित्तीचित्रे, सातवाहन कालातील लोकांची राहणी व जीवन कसे होते हे समजण्यासाठी पितळखोर्याच्या बास रिलिफ शिल्पांइतकीच उपयुक्त आहेत असे मला वाटते.
मी आता माझा मोर्चा 9 क्रमांकाच्या गुंफेकडे वळवतो आहे. या गुंफेमध्ये सुद्धा सातवाहन कालातील काही भित्तीचित्रे आहेत.
क्रमश:
मागील सर्व भागांप्रमाणेच.
दुहेरी धारेची तलवार आणि हत्तीवर बसलेल्या व्यक्तीच्या हातात पराणी आहे.
हे हत्ती नियंत्रित करण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंकुश असावेत काय?
(अंकुश हा सहसा भाल्याची लहान प्रतिकृती असावी तसा पाहिलेला आहे. शिवाय
त्याला अर्ध वर्तुळाकार अशी एक चकतीही बसवलेली असते. कसा वापरतात देव/माहुत
जाणे.)
या दृष्यामुळे 3 क्रमांकाचे हे चित्र सातवाहन राजा श्री सातकर्णी याने बोधीगयेला दिलेल्या भेटीचे असले पाहिजे असे जी याझदानी मानतात
सातकर्णीच्या काळात सातवाहन सत्तेचा विस्तार बोधगयेपर्यंत झाला होता काय?
नसेल तर दुसर्याच्या राज्यातल्या तीर्थक्षेत्रात जाणे
राजाला/सम्राटाला/राजघराण्यातील व्यक्तीला त्याकाळात शक्य होते का?(मला ते
शक्य असेल असे वाटत नाही.)
विवाहसंबंधांनी जर राज्ये जोडली गेली असतील तर किम्वा एखाद्या मोठ्या
संघाचा/confederateचा किंवा एकाच मोठ्या आघाडीचा जर ती दोन राज्ये भाग
असतील तर तसे होण्याची शक्यता आहे. पण तरीही कठीणच दिसते.
कल्पना करा नर्मदातीरी घनघोर लढाई करणारे पुलकेशी आणि हर्षवर्धन हे एकमेकांच्या राज्यात ये-जा करु शकतील का?
हर्षवर्धन अजिंठ्यास कीम्वा प्रतिष्ठानास भेट देतो म्हणाला किंवा पुलकेशी कनौजमुक्कामी राहतो म्हणाला तर कसे चालेल?
अर्थात, जर सातवाहनांचे राज्य दूरवर पसरले असेल तर ही पूर्ण शंकाच गैरलागू आहे.
.
अवांतरः-
हर्षवर्धनाच्या काळात वर्धनांचे थेट राज्य आपल्याला वाटते तितके मोठे नाही
हे माझ्या नंतर लक्षात आले. त्याने दोन्-तीन राज्ये विवाह्संबंधाने जोडून
घेतली होती; ती थेट नियंत्रणात नव्हती. म्ह्णूनच त्याच्या मृत्युनंतर
त्याचे साम्राज्य फार काळ टिकले नाही.
हा महापराक्रमी राजा इ.स.पूर्व 189-179 या कालात राज्यावर होता असे मानले जाते. या कालात उत्तर हिंदुस्थानातील परिस्थिती अतिशय दोलायमान होती असे म्हणता येते. मौर्य घरण्याची राजसत्ता संपुष्टात आली होती व शुंग घराण्याने पूर्ण सत्ता प्रस्थापित केलेली नव्हती काही ग्रंथात श्री सातकर्णी राजाने शुंग राजाचा पराभव केल्याचा उल्लेख सापडतो.परंतु महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटप्रमाणे हा राजा नंतरचा असला पाहिजे. माळवा प्रांत नकीच श्री सातकर्णीच्या ताब्यात होता असे तेथे सापडलेल्या नाण्यांवरून म्हणता येते. इतक्या अनसेटलड परिस्थितीत श्री सातकर्णी राजाने एखाद्या मोहिनेच्या दरम्यान सांची व बोधी गया येथे भेट देणे मला तरी अशक्य वाटत नाही. अर्थात चित्रकाराने काढलेले चित्र कल्पनेतीलही असू शकते.
सांची येथील स्तूपाच्या तोरणावर श्री सातकर्णी राजाचे नाव कोरलेले आहे ही सत्य परिस्थिती आहे.
पुढे टोकदार खिळा बसवलेल्या वस्तूला पराणी म्हणतात या साठी हा शब्द मी वापरला आहे.तो अंकूशही असू शकतो.
असय होय.
मौर्यानंतरचं ते अस्थैर्य. कल्पना आहे. बल्ख/अफगाणिस्तान मधून ग्रीक राजा
मिनँडर/मिलिंद (तोच तो प्रसिद्ध "मिलिंद पन्हो" वाला) थेट भारताच्या मुख्य
भूमीत घुसला होता. त्याच्या नंतर डिमिट्रस्/दत्तमित्र ह्यानंही घुसायचा
प्रयत्न केला.
खारवेलानं तिकडे कलिंगाचं राज्य वाढवलेलं. पूर्वीची प्रबळ मगध सत्ता/साम्राज्य खिळखिळे होउ लागलेले.
तिकडे शकांनी त्यापाठोपाठ उच्छाद पश्चिमेस सुरु केलेला. एकसंध असे उत्तर भारतात काहीच राज्य म्हणून उभे नव्हते.
थोडिफार कल्पना आहे.
पण सातकर्णी उत्तर भारतात मोहिम घेउन गेल्याची काही कल्पना नव्हती. नवीन माहिती. आभार.
अवांतर:- दूर उत्तरेत गांगा- यमुनेच्या दुआबात दक्षिणेकडून उत्तरेत घुसणारे
पहिले राजे शाळकरी दिवसात मी पेशव्यांना/छत्रपतींना समजत होतो. आतापर्यंत
म्हणून राष्ट्रकूटांना समजत होतो. (काही काळ आजच्या युपी मधील कनौज त्यांनी
ताब्यात ठेवले होते.) तसे नसण्याची (सातकर्णी पहिला ) असण्याची
शक्यता/माहिती लक्षात ठेवायला हवी.(आपली आधीची माहिती चूक होती हे समजणं
कधी थांबेल? ;) )
अतिअवांतरः-
खरे तर उत्तर भारत मागच्या अडीच हजार वर्षात किती काळ स्थिर होता?
मौर्यांची ऐंशी ते शंभर वर्षे; कनिष्काची दोनेक दशके, गुप्त राजांची दोनेक शतके, हर्षवर्धानाची दोनेक दशके.
बस्स. पुन्हा थेट खिल्जी-- तुघलक ह्यांचे अर्धशतक; मुघल सत्तेची कळसाची सव्वाशे वर्षे.
टोटलात, एकूण अडीच हजार वर्षापैकी एक तृतीयांश काळाच्या आसपासच स्थिर सत्ता
म्हणता यावी अशी उत्तर भारतात राज्ये/साम्राज्ये होती;ज्यांची बहुतांश
उत्तर भारतावर सलग सत्ता होती. एरवी सदैव विभाजित रुपच दिसते.
एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 4
अजंठा येथील गुंफा क्रमांक 9 ही आपण आधी बघितलेल्या 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच एक चैत्य गृह आहे. आयताकृती आकाराची असलेली ही गुंफा मात्र बर्याच लहान आकाराची आहे. ही गुंफा 22 फूट 9 इंच रूंद, 45 फूट खोल आणि 23 फूट 2 इंच उंच आहे.
बर्जेस व फर्ग्युसन यांनी प्रथम असे मत मांडले होते की ही गुंफा 10 क्रमांकाच्या गुहेच्या पूर्वकालात खोदलेली असावी. परंतु नंतर प्राप्त झालेल्या पुराव्यानुसार आता असे मानले जाते की ही गुंफा 10 क्रमांकाच्या गुंफेच्या निदान 100 वर्षे तरी नंतर खोदली गेलेली असावी. समकालीन इतर चैत्यगृहांप्रमाणेच या चैत्यगृहात सुद्धा स्तंभांच्या 2 रांगा, या गुंफेचे, मध्यवर्ती व बाजूचे पॅसेजेस असे 3 भाग पाडतात. गुंफेच्या मागील किंवा अगदी आतील बाजूस स्तंभांची ही रांग अर्धवर्तुळाकार बनते व या अर्धवर्तुळाच्या बरोबर मध्यावर स्तूप उभारलेला आहे. या स्तूपाचा पाया म्हणजे 5 फूट उंचीचा एक सिलिंडर असून त्यावर 4 फूट ऊंच व 6 फूट 4 इंच व्यासाचा एक घुमट बसवलेला आहे. या घुमटावर सर्व बाजूंना बौद्ध कठडा डिझाईन कोरलेले असलेला एक चौकोनी कॅपिटल बसवलेला आहे. कार्ले येथील स्तूपावर जशी लाकडी छत्री बसवलेली आहे तशीच छत्री या कॅपिटलवर बसवलेली होती.
मध्यवर्ती कक्षाच्या दोन्ही बाजूस असणार्या 21 स्तंभांच्या डोकयावर एक दगडी तुळई (entablature) खोदलेली आहे व या अखंड तुळईपासूनच मधे मधे कप्पे असलेले कमानीदार छत खोदलेले आहे. या छतावर कार्ले येथील चैत्यगृहासारख्याच कमानीच्या आकाराच्या लाकडी तुळया बसवलेल्या होत्या. दोन्ही बाजूस असलेले आईल्स किंवा पॅसेजेस यांची छते मात्र सपाट आहेत. गुंफेच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस घोड्याच्या नालाच्या आकाराचे एक मोठे गवाक्ष दिसते आहे. या गवाक्षाची उंची 11 फूट 6 इंच आहे. या गवाक्षाच्या बाजूंना छोटी चैत्य गवाक्षे, लाकडी जाळ्यांचे डिझाईन, बेर्म रेल्स आणि बौद्ध रेलिंग डिझाईन या सारखी हिनायन कालातील बौद्ध सांकेतिक चिन्हे सगळीकडे कोरलेली आहेत.
या गुंफेचा अंतर्भाग 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच प्रथम इ.स.पूर्व 100 या कालात संपूर्णपणे भित्तीचित्रांनी रंगवलेला होता. 4थ्या किंवा 5 व्या शतकात या भित्तीचित्रांवरच नवी चित्रे रंगवली गेली होती. गुंफेमधील सर्व स्तंभ बुद्धाच्या चित्रांनी सजवलेले आहेत. यातील अनेक चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत.1875मध्ये जॉन ग्रिफिथ्स याने केलेल्या संशोधनानंतर इ.स.पूर्व 100 या कालात रंगवलेली 3 मूळ भित्तीचित्रे उघडकीस आली. जी याझदानी या लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे ही तिन्ही भित्तीचित्रे नक्कीच सातवाहन कालातील आहेत व त्या काळातील जनसामान्य व त्यांच्या चालीरीती यावर उत्तम प्रकाश टाकू शकतात. या तिन्ही भित्तीचित्रांचे जास्त खोलात जाऊन वर्णन मी करणार आहेच.
या 3 चित्रांपैकी पहिले चित्र "सेवकांसह असलेला नागा राजा" (A Naga king with his attendants) या नावाने ओळखले जाते. हे चित्र या गुंफेचे प्रवेशद्वार असलेल्या पुढच्या भिंतीच्या आतील बाजूस व डाव्या गवाक्षाच्या वरच्या भागात रंगवलेले आहे. या मूळ चित्रात रंगवलेल्या 2 भिख्खूंच्या चित्रांवरच 2 नवीन भिख्खू त्यांच्या नावासह रंगवलेले आहेत हे बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रिन्सिपल जॉन ग्रिफिथ्स यांना प्रथम आढळून आले होते. वरच्या स्तरावरील भिख्खूंचे चित्र ग्रिफिथ्स यांना निराळे करता आले होते. तसे केल्यावर खालील स्तरावर असलेले मूळ चित्र दिसू लागले होते.
या मूळ चित्रामध्ये डाव्या हाताला आंब्यांनी लगडलेल्या एका झाडाखाली 2 व्यक्ती बसलेल्या रंगवलेल्या आहेत. पागोटे किंवा फेटे बांधण्यासाठी जसा कापडाचा एक लांब पट्टा वापरला जातो तसा पट्टा व त्या व्यक्तींचे केस हे एकत्र बांधून डोक्याच्या वरच्या बाजूस त्याचा बुचडा येईल असे सातवाहन कालातील एक मोठे वैशिष्ट्य्पूर्ण पागोटे या व्यक्तींच्या डोक्यावर दिसते आहे. या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या डोकयावर 7 नागांच्या फण्या असलेला मुगुट आहे तर दुसर्या व्यक्तीच्या डोक्यावर 1 नागफणी असलेला मुगुट आहे. 7नागफणीचा मुगुट डोक्यावर असलेली व्यक्ती अर्थातच राजा व 1 नागफणीचा मुगुट असलेली व्यक्ती राजकुमार असली पाहिजे या बाबत शंका वाटत नाही. दोन्ही व्यक्तींच्या अंगाखांद्यावर भरपूर अलंकार दिसत आहेत. चक्राकृती डिझाईन असलेली कर्ण कुंडले, गळ्यात जाडजूड हार, धातूचे बाजूबंद व पोच्या या व्यक्तींनी परिधान केलेल्या दिसत आहेत. गळ्यातील हार अनेक पदरी मोत्याचे असून ते सोन्याच्या बंदांनी एकत्र बांधलेले असावेत. दोन्ही व्यक्तींची चेहेरेपट्टी पूर्णपणे या भागातील लोकांसारखी आहे. गोलसर किंवा लंबगोलाकृती चेहरा, अपरी नाके, भरदार ओठ व तेजस्वी डोळे ही या चेहर्यांची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. वरच्या बाजूस एक अप्सरा राजाकडे उडत येताना चित्रात रंगवलेली आहे.
या चित्राच्या उजव्या बाजूला असलेल्या दुसर्या पॅनेलमध्ये याच चित्रामधील दुसरा देखावा रंगवलेला आहे. येथे राजा त्याच्या दोन सेवकांबरोबर दाखवलेला आहे. यापैकी एका सेवकाने राजाच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे तर दुसरा सेवक चवरी ढाळताना दिसतो आहे. राजाच्या समोरच्या भूमीवर राजाकडे काहीतरी तक्रार घेऊन आलेले 5अर्जदार विनम्रपणे रिंगण करून बसलेले दिसत आहेत.
या गुंफेतील व सातवाहन कालातील म्हणता येते असे दुसरे भित्तीचित्र डाव्या भिंतीवर रंगवलेले आहे. हे चित्र "स्तूपाकडे येणार्या उपासकांचा गट:(A group of Votaries approaching a Stupa) या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्षात हे चित्र अनेक छोट्या देखाव्यांचे मिळून रंगवलेले होते. महायान कालात या चित्राच्या वरील भागावरच बुद्धाच्या 6 प्रतिमा रंगवण्यात आलेल्या होत्या. चित्राच्या पहिल्या भागात 16 उपासकांचा 1गट चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराकडे येताना दाखवलेला आहे. मात्र हे सर्व उपासक एकसारखे न दिसता या सर्व उपासकांच्या केशरचना, त्यांच्या धोतरावरून त्यांनी कंबरेवर बांधलेले शेले आणि त्या शेल्यांच्या बांधलेल्या गाठी यात सूक्ष्म असे फरक चित्रकाराने रंगवलेले आहेत.
या चित्राच्या दुसर्या भागात 4भिंतींच्या आत असलेला 1 स्तूप दाखवलेला
आहे. यापैकी 2 भिंतींमध्ये प्रवेशद्वारे बनवलेली आहेत. एका प्रवेशद्वारावर
एखाद्या पिंपाच्या आकाराचे छत आहे तर दुसर्या प्रवेशद्वाराला सांची मधील
तोरणाचा आकार दिलेला आहे. स्तूपावर छत्र्या लावून स्तूप सुशोभित केलेला
दिसतो आहे. तोरणाचा आकार दिलेल्या प्रवेशद्वारामधून एक व्यक्ती चालताना
दिसते आहे. स्तूपाभोवती असलेल्या भिंतींच्या बाहेर एक झाड दिसते आहे. या
झाडाच्या पलीकडच्या बाजूस 2मोठे कक्ष असलेला एक बौद्ध मठ दिसतो आहे. या
मठाच्या बाहेर दोन व्यक्ती उभ्या आहेत.
या चित्रातील तिसर्या भागात स्तूपाला भेट देऊन आलेले उपासक एका
वनराईमध्ये एकत्र जमलेले दिसत आहेत. उजव्या हाताला असलेल्या एका घरात 4
स्त्रिया दिसत आहेत. यांपैकी खुर्चीवर बसलेली स्त्री राणी असू शकते.
2स्त्रिया बाहेरच्या अंगणात पेटवलेल्या अग्नीजवळ बसलेल्या आहेत.
9 क्रमांकाच्या गुंफेमधील व सातवाहन कालातील नक्की म्हणता येईल असे तिसरे चित्र हे छताजवळ असलेल्या तुळईच्या भागावर काढलेले असून ते नक्षीकाम या स्वरूपामधील आहे. खूप ठिकाणी या चित्राचे टवके उडालेले असले तरी अनेक रानटी जनावरांच्या शेपट्या पिरगळणारा एक गुराखी या चित्रात अजूनही स्पष्ट दिसतो आहे.
अजंठ्यातील इतर गुंफा 4थ्या किंवा 5व्या शतकात खोदलेल्या असल्याने माझ्या या अभ्यासाच्या दृष्टीने त्या गुंफातील शिल्पे किंवा चित्रे यांची फारशी मदत होणे शक्य नसल्याने मी फक्त एक धावती चक्कर मारून अजिंठ्याची माझी सफर पूर्ण करतो. परत येताना खाली अजंठा मॉलमध्ये थांबून पाषाणात कोरलेल्या एक दोन वस्तू, या सफरीची एक आठवण म्हणून खरेदी करण्यास मी विसरत नाही.
सातवाहन राजांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती आपल्याला अजंठा गुंफांच्यात मिळू शकत नाही. मात्र ही अशी एकच जागा आहे जेथे सातवाहन राजांच्या समकालीन असलेल्या चित्रकारांनी सातवाहन राजा, त्याचे दरबारी व राणी यांची चित्रे रंगवलेली आढळतात. त्यामुळे हे राजे किंवा राण्या कोणती वस्त्रे परिधान करत असत? कोणते अलंकार घालत असत? स्वत: हिंदू असूनही बौद्ध धर्मस्थानांबद्दल ते कसे आदर बाळगत? या सारख्या अनेक गोष्टींबद्दल येथे माहिती मिळाली व बरेच काही शिकता आले.
माझा या पुढील मोर्चा सातवाहन इतिहास संशोधनातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानल्या जाणार्या जागेकडे मी वळवणार आहे. कारण फक्त याच ठिकाणी या राजांचे कर्तुत्व, शौर्य याचे त्यांच्या कालात लिहिलेले वर्णन सापडते. ही जागा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर मानल्या जाणार्या नाशिक जवळ असलेली पांडव किंवा पांडु लेणी.
समाप्त
हिनायन कालात बुद्ध मूर्ती दाखवत नसत त्यामुळे बुद्धाचे अस्तित्व
स्तूपासारख्या चित्रांनी दर्शविण्याची प्रथा होती. त्याचप्रमाणे काही
सांकेतिक चिन्हे त्या स्थळाचे धार्मिक महत्व दर्शविण्यासाठी सर्व ठिकाणी
कोरलेली दिसतात. या लेखासोबत असलेल्या छायाचित्रात 9 क्रमांकाच्या गुंफेचा
बाह्य भागाचे छायाचित्र आहे ते बघावे. यात घोड्याच्या नालाच्या आकाराची
छोटी छोटी कोरलेली गवाक्षे आहेत.या गवाक्षांच्या आत एका खाली एक अशा कमानी
कोरलेल्या आहेत त्यांना बेर्म रेल्स असे म्हणतात. गुंफेच्या उजव्या वरच्या
कोपर्यात लाकडी जाळीचा पॅटर्न दिसू शकतो. ही सर्व कोरीव कामे बौद्ध
सांकेतिक चिन्हे आहेत. बौद्ध रेलिंग़ डिझाईन (स्तूपावर असलेल्या कॅपिटल वर
कोरलेले) हे सुद्धा ते स्थळ एक पवित्र स्थान असल्याचे दर्शवते व त्यालाही
सांकेतिक चिन्ह म्हणता येईल.
हिनायन हा शब्द हीनयान असा असावा का? की हिनायन आणि हीनयान हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थांचे शब्द अस्तित्वात आहेत?
खरे सांगायचे तर देवनागरीमध्ये हा शब्द इतक्या प्रकारे लिहिलेला असतो की बरोबर काय व चूक काय हे सांगणे अवघड वाटते. अर्थाच्या दृष्टीने बघितले तर हीनयान असे लिहिले गेले पाहिजे ( Inferior vehicle या अर्थाने) परंतु इंग्रजीमध्ये हा शब्द Hinayan असा लिहिला जातो. त्यामुळे देवनागरीत तो कसा लिहायचा हा एक प्रश्नच आहे.
महायान आणि हीनयान ह्या बौद्ध तत्त्वविचाराच्या दोन प्रमुख शाखा आहेत. 'महा' ह्याच्या विरुद्ध 'हीन' म्हणून हीनयान हाच योग्य शब्द आहे. इंग्रजीत तो Hinayan असा लिहिला जातो कारण रोमन लिपीमध्ये देवनागरी दीर्घ 'ई 'आणि अखेरचा 'अ' हे स्वर दाखविण्यासाठी सोपा मार्ग नाही. Heenaayana HInayAna हे कृत्रिम वाटते. ह्यामुळेच अमेरिका-ब्रिटनमधील लोक योग yoga ह्याचा उच्चार सार्वत्रिक वापरात 'योगा' असा कानावर पडतो आणि हिमालय Himalaya हिमलया होतो! रशियनमध्ये 'राम' हा शब्द इंग्लिशवरून 'Рама' असा लिहिला जातो आणि रशियन व्याकरणानुसार 'आ' ने शेवट होणारी बहुतांश नामे स्त्रीलिंगी असल्याने राम Рама शब्दाचे व्याकरण आणि विभक्तिप्रत्यय स्त्रीलिंगानुसार चालतात.
कोल्ह्टकर म्हणतात तसे अर्थाच्या दृष्टीने हीनयान हा शब्द जरी योग्य असला
तरी हा बौद्ध धर्म ज्या देशांच्यात प्रचलित आहे, उदा. श्री लंका, कंबोडिया
वगैरे, तेथे हा शब्द कसा उच्चारला जातो हे आता जास्त महत्त्वाचे वाटते.
त्यामुळे मी योग्य असूनही हीनयान असा हा शब्द न लिहिता हिनयान किंवा हिनायन
असा लिहावा या मताचा आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.