Thursday, February 3, 2022

किलीमांजारो

 २०१९ मध्ये किलीमांजारो ट्रेक केला आणि त्याबद्दल २०२० च्या सुरुवातीला कधीतरी लिहून ठेवलं - स्वतःपुरतंच. आता आशुचॅम्पनी लिहिलेलं कांचनगंगा बेसचे वर्णन वाचलं - एकदम उत्साह आला - पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. ते वाचताना या लिखाणाची आठवण झाली. पर्सनल असलं तरी what's most personal is most universal आणि इथे पोस्ट करायला हरकत नाही असं वाटलं, म्हणून टाकते आहे. त्यात माझे कुटुंबीय व अन्य माणसांची नावं आहेत ती संदर्भाने लक्षात येतील असं वाटलं म्हणून बदलली नाहीत.
----------------------------------------
२०१९ च्या मार्च-एप्रिल मध्ये कधीतरी गिरीपरममित्र अरुण परांजपे यांनी ते किलीमांजारो hike plan करत आहेत हे पिल्लू आमच्याकडे सोडले. त्यासोबत motivation, support चे भरपूर डोससुद्धा दिले. २-३ महिन्यांपूर्वीच पेरूमध्ये इंका trail करून आले होते व त्याची धुंदी उतरली नव्हती त्यामुळे १-२ weekend उगीचच विचार - analysis करूनही माझा मासा लगेच गळाला लागला. मिहीरला १२ व्या वर्षी तेथे नेणे शहाणपणाचे नाही (जे अनुभवांती चुकीचे वाटले) आणि आनंदला त्या उंचीचे दडपण आल्याने त्या दोघांचा पास होता, तेव्हा ही माझी सोलो ट्रिप असणार होती.
सगळ्या गोष्टींची सुरुवात हल्ली whatsapp ग्रुपने होते तशी या मोहिमेचीसुद्धा झाली. देवेन उपाध्ये, पराग वाकणकर आणि निलाद्री रॉय ( पुन्हा एकदा mount Whitney नंतर ) भेटले. As expected हे सर्वजण या मोहिमेचा सर्वांगीण research - analysis करण्यात थोडक्यात कीस काढण्यात इतके मग्न होते की मी तो प्रकार पूर्ण option ला टाकण्याचे ठरवले आणि Fool's luck - अज्ञानात सुखाचा अनुभव घेण्याचे ठरवले.
फ्लॉरिडासारख्या ठिकाणी राहणे त्यामुळे थंडी आणि समुद्रसपाटीपासून उंची यांचा पूर्ण अभाव. मध्ये एकदा फक्त जूनमध्ये परांजप्यांबरोबरच Mount Mitchell ला hike करून आले तेव्हा एवढेच लक्षात आले की फिटनेस अजून वाढवायला हवा. उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात गेले तेव्हा फक्त एकदा सिंहगडावर गेले एरवी घरचे ८-१० मजले रोज २-३ वेळा चढणे-उतरणे इतकाच व्यायाम झाला. घरी परत आल्यावर मिहीरचे soccer पुन्हा चालू झाले याचा त्याच्यापेक्षा मलाच जास्त फायदा झाला. आठवड्यातून किमान ३ दिवस संध्याकाळी दीड -दोन तास माझे मला मिळू लागले. तेव्हा चाल-चाल-चालले. चालण्याचा कंटाळा आला की mountain climbers, walking lunges, push ups, squat, sit ups व जोडीला कपालभाती, अनुलोम-विलोम, deep breathing आणि all time favorite सूर्यनमस्कार. आपापल्या मुलांना सॉकर प्रॅक्टिसला घेऊन आलेली मंडळी मला प्रोत्साहन द्यायला असत, मी काय करतेय हे बघत आणि थांबले तर येऊन थोडे push करून जात. ऑफिसची ४ मजली बिल्डिंग दिवसातून २-३ वेळा उगीचच चढणे उतरणे, मध्येच push ups वगैरे करणे इत्यादी प्रकार बघून लोकांना विचित्र वाटले असणार पण लवकरच त्यांना सवय झाली. शनिवार रविवारी, माझ्या अत्यंत आवडत्या Markham woods trail वर माझी मैत्रीण अनिता सिंग नेहमी सोबत असायची. ७-८ मैल चाल आरामात व्हायची. अनिताला स्वतःच किलीमांजारोला यायचे होते पण जॉबचा issue झाल्याने ती commit करू शकत नव्हती. पण त्या weekend walks च्या निमित्ताने आम्ही इतकं काही share केलं की प्रत्यक्ष hike च्या वेळेस ती प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे असेच वाटत होते. हे सगळं केलं तरी समुद्रसपाटीपासून शून्य उंचीवर आणि छान हवा असताना, ही जाण असली तरी सगळे कुठेतरी - कसेतरी कामी येईल याची खात्री वाटत होती.
हे सर्व चालू असताना नेमके २०१९ मध्येच नाटके, tutoring, ऑफिसमधले काम फारच जोरात चालू होते. शिरीष कीर्तने नाटकाच्या निमित्ताने दर आठवड्याला भेटायचे. Pulmonologist आणि एकूणच friend -philosopher - guide म्हणून त्यांना पुष्कळच त्रास दिला. सप्टेंबरमध्ये दीपशिखा ( DS )अचानक भेटली, तिलाही यायचे होते. थोडे हो नाही करत तिचे येण्याचे ठरले आणि मी एकदमच निर्धास्त झाले. दीपशिखाने कधी hiking केले नसले तरी मी तिच्यासोबत मॅरेथॉनसाठी एकत्र running करताना ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही किती मजबूत आहे याची कल्पना होती. अरुण परांजपे त्यांच्या अनुभवाने आणि दीपशिखा तिच्या support ने मला शिखरापर्यंत घेऊन जाईल अशी आशा मला वाटू लागली. दीपशिखा आदल्याच वर्षी टांझानियाला सफारीसाठी जाऊन आल्याने तिला त्या परिसराची चांगली माहितीही होती.
आता प्रकरण ६-७ आठवड्यांवर आलेलं. REI मध्ये किलीमांजारोला जाऊन आलेल्या एकीचे सेशन होते त्याला मी व DS गेलो. तिथे कपडे वगैरेचा चांगला अंदाज आला. २-३ जण भेटले ज्यांनी काहीही अनुभव नसताना नुकतेच EBC केलं होतं, त्यांना बघून आमचा हुरूप वाढला. Diamox या औषधांबद्दल बऱ्याच शंका कुशंका असून तिथे त्याचे गुणवर्णन ऐकून ते घेण्याचे निश्चित केले आणि त्याचा मला पुष्कळच फायदा झाला असावा असे आता वाटते. Immunization कोणते कोणते करायचे याच्यावर ग्रुपमध्ये बराच खल झाला. त्यामुळे काही दिवस अस्वस्थ होऊन शेवटी नेहमीप्रमाणे किरणकाकाचा आवडता सल्ला - "Trust in your body, do not focus on diseases" डोळे मिटून घेतला व पाळला. फक्त Hep A चे injection (उगीचच) घेतले.
किरण कुलकर्णी स्वतः जाऊन आले नसले तरी त्यांना किली हायकिंगची उत्तम माहिती होती, चालण्याचा route अजिबात नयनरम्य वगैरे नसून किती boring असेल याबद्दल त्यांनी आधीच कल्पना दिल्याने मी तयार होते व अपेक्षाभंगाचे दु:ख अजिबात झाले नाही. मी height, थंडी वगैरेला कशी सामोरी जाणार आहे याबद्दल बऱ्याच लोकांना कुतूहल होते त्यांना विशेष काहीही करत नाहीये असे सांगितल्याने बहुदा माझी बरीच काळजी वाटू लागली. नितीन पळसुले अगदी जाण्यापूर्वी माझ्यासाठी खास socks आणि crampons घेऊन आला. खाडिलकर आजींनी थंडीसाठी सुंठ गोळीची ट्रिक सांगितली जी १०० % उपयोगी पडली.
जाण्याआधी ८-१० दिवस अरुण परांजपे यांचा फोन. त्यांना गाऊटमुळे चालायला प्रचंड त्रास होत होता, कदाचित ट्रिप कॅन्सल करायला लागेल वगैरे. माझ्यासाठी सुरुवातीला तरी हा चांगलाच धक्का होता. नंतर मात्र मी त्यांना धीर देत होते आणि स्वतः तयार झाले होते. इतके प्लँनिंग केल्यावर अशा कारणांमुळे त्यांना ट्रेक करता आला नसता तर मी तरी फारच निराश झाले असते. त्यामुळे एकूणच विचित्र मनस्थितीत काही दिवस गेले. पण त्यांनी पूर्ण hike नंतर ज्या तयारीने केला त्यावरून I was pleasantly surprised and happy for him. जाण्यापूर्वी १ आठवडा आधी मिहीर मग आनंद आजारी पडले. ते दोघे लवकर बरे झाले. माझा खोकला मात्र जाता जाईना. सर्व प्रकारच्या औषधांचा भडीमार केला. नेत्रा, always like a good friend खास औषध घेऊन आली. आतापर्यंत सर्व तयारीत आनंद बराच तटस्थ होता, positive वा negative अशी काहीच टिप्पणी करत नव्हता पण माझ्या खोकल्यामुळे तो चिंतेत पडला असावा. त्याला खरेतर ट्रेकिंगचे वेड माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून जेव्हा एअरपोर्टवर निघालो तेव्हा मात्र तो स्वतः बरोबर जात नाहीये याबद्दल कुठेतरी हळहळ असावी असे वाटले. जाण्यापूर्वी २-३ वेळा मिहीरलाही अगदी यायचेच होते असे वाटले पण नंतर मात्र तो मजेत होता, किमान त्याने तसे दाखवले. बाप-मुलगा एकमेकांची उत्तम काळजी घेतील याची खात्री असल्याने मी निर्धास्त होते. त्या दोघांनी एअरपोर्टवर मला अगदीच "जा सिमरन, बस जी ले अपनी जिंदगी" moment दिली ( पहा - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे)
श्रीराम लागूंनी स्वतः किली hike केली तेव्हाचा अनुभव लमाणमध्ये अतिशय सुंदर शब्दांत लिहिला आहे, तो पुन्हा एकदा डोळे भरून वाचला. घरातून निघण्यापूर्वी काही वेळच डॉ लागू वारले अशी news मिळाली आणि विचित्र वाटले. पण Now I was all set. मार्च एप्रिलपासून चाललेला पडद्यामागचा गोंधळ संपून entry ची वेळ आली होती. DS आणि मी IAD ला जाण्यासाठी निघालो - डिसेंबर १७, २०१९.

 १७ डिसेंबर ला निघून १९ डिसेंबरला किलीमांजारो एअरपोर्टला उतरेपर्यंतचा प्रवास अगदी इतर कोणत्याही प्रवासासारखाच झाला. अदिस अबाबा एअरपोर्टला कधी नाही ते पायधूळ झाडली. प्रवासातल्या गंमती जमती नेहमीसारख्याच. IAD ला अरुण परांजपे भेटले. उपाध्ये आणि फॅमिली अदिस अबाबाला. त्यांच्या मुलाचे नावही मिहीर. नेहमीच्या सवयीने त्याला दिवसांतून १० वेळा हाक मारत राहू असे वाटले, तसे झाले नाही पण चिरंजीवांची मात्र पुष्कळच आठवण आली. किलीमांजारो एअरपोर्ट एकदम टुमदार आहे, खूपच आवडला. गुलमोहर, अशोकाची झाडे बघून एकदम मुंबईच्या घराची आठवण झाली. वाटेत सूर्यफूल, केळी, मका, जोडीला cattle वगैरे पुष्कळ दिसले. लाल चिऱ्यांची वाटावी अशी पण घरे दिसली आणि एकदम कोकणच आठवले. माणसे इथल्या आफ्रिकन अमेरिकनसारखी अवाढव्य व अति उंच पण नव्हती. सलून- बार्बरशॉप जरा जास्तच दिसत होती. बायकांचेही केस खूप बारीक दिसले. भडक कपडे त्यांना शोभत होतेच आणि बांधा एकदम आवडलाच. एकूण तालुका वगैरेचे ठिकाण असावे असे वाटत होते. एक दीड तास प्रवास करून मोशीमध्ये चन्या लॉजला पोहोचलो. स्वागताला कोकमाच्या चवीचे आणि रूपाचे जास्वंदाचे सरबत ( रेसिपी शोधली पाहिजे) प्यायला मिळाले. मध्ये रेस्टोरंटची जी open space होती तिथे पुढे २ दिवस आम्ही तासनतास पडीक होतो. चन्या लॉज मस्तच होते, काहीही न करता तिथे ५-१० दिवस असेच निरुद्देश आरामात रहायला आवडले असते. दिल्लीचा शेफ छान पंजाबी जेवण बनवत होता ज्याचा आम्ही सर्वांनी पुरेपूर आस्वाद घेतला. रेस्टोरंटच्या मागेच अचानक एक गोष्ट दिसली - किलीचे peak - आपण इथे ज्याच्यासाठी आलोय ती गोष्ट अशी अचानक दिसल्याने एकदम थ्रिल्लिंग वाटले.
1.jpg
२० तारखेला आरुषा नॅशनल पार्क सफारी केली. त्याचे वर्णन नंतर कधीतरी. तिथली मनांत रेंगाळलेली गोष्ट म्हणजे तिथे २ तास केलेले कनूईंग. स्वच्छ ऊन, आजूबाजूला डोंगर, क्वचित दिसणारे प्राणी व त्यांचे आवाज. त्या २ तासांना आयुष्यांतल्या काही अत्यंत सुंदर क्षणांत सामील केले आहे. अर्थातच इथे आनंदची फार आठवण आली.
२१ तारखेला तिथल्या लोकल मार्केटमध्ये टूरिस्टी visit आणि shopping. इथे आनंद सोबत नसल्याने बरे वाटले, कारण मी जो वेळ खाल्ला त्यावरून आमचे हमखास भांडण झाले असते. अरुण परांजपे आणि पराग वाकणकर वैतागले तरी बिचाऱ्यांना तसे सांगता आले नाही. मशीद आणि कृष्णाचे देऊळ लागून होते, अगदी मथुरा style. देवळाच्या आवारात पुष्कळ फुलझाडे होती पण अनंत आणि चाफा खासच, वेड लावणारे.
आणि आता डिसेंबर २२ - ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास त्या ट्रेकची सकाळ उजाडली. तोवर १५ किलोत सामान बसवण्याचा , शूज water प्रूफ आहेत\ नाहीत यावर बराच खल झाला होता. माझे rain jacket तितकेसे ठीक नसल्याने व बॅगपॅक न भिजण्याचा दृष्टीने मी poncho शाह टूर्स कडून भाड्याने घेतला. त्याच्या १ size fit all नुसार २-३ लोक त्यात अजून मावले असते. संपूर्ण ट्रेकमध्ये पावसाने जी आम्हाला सोबत दिली ते बघता poncho च सगळ्यात vital आणि सगळ्यात तापदायक होता. परांजप्यांचे शूज उत्तम असूनही David या आमच्या मुख्य guide ने त्यांना waterproofing वरून एकूण बरेच nervous करून ठेवले आणि बराचसा ट्रेक या सद्गृहस्थाने साध्या sneakers मध्ये केला.
सकाळी ९ ला वगैरे सामानासकट आम्हाला ८ जणांना गाडीत फिट बसवण्यात आले. दुसऱ्या गाडीत David, Walles , Focus आणि Joshua हे guides. २३ पोर्टर आणि १ शेफ आणि सर्व सामान. आदल्या दिवशी briefing पासून Pole Pole म्हणजे स्वाहिली मध्ये "हळू हळू" हा शब्द ऐकू येऊ लागला होता. संपूर्ण ट्रेक संपेपर्यंत मी दहाहजार वेळा तरी तो ऐकला. इथले सगळेच काम एकूण "इंडिअन स्टॅंडर्ड टाइमने" पोले पोले चालते. कसली घाई नाही, रेस नाही, सगळे काही आरामात-सुशेगात. वेळ आणि अंतर सुद्धा अंदाजपंचे. हीच इथली गम्मत आहे, तिच्याशी जुळवून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पोले पोले हेच किलीमांजारोचे संपूर्ण सार आहे हे खरे पण त्याच्या अतिरेकामुळे माझ्या काही गोष्टी हुकल्या असे आता खेदाने म्हणावेसे वाटते ( त्याबद्दल क्रमश:). गाडीने २-३ तास प्रवास होता. मोशीमधून उत्तरेकडच्या रोंगाई गेटला जाणार होतो. हाईक करायचे जे अनेक रस्ते आहेत त्यात ७ दिवसांचा रोंगाई रूट आम्ही घेतला होता. वाटेत सर्व प्रकारच्या डेटाचे सुपर analyst आणि अत्यंत हौशी फोटोग्राफर ( read निलाद्री, परांजपे आणि थोडेसे उपाध्ये) यांच्या चर्चांकडे दुर्लक्ष करत मी दिशा, हवामान, पाऊस, बर्फ व फोटो काढणे वगैरे कसलीही फिकीर न करता आजूबाजूला बघत मस्त enjoy करत जात होते. ११:३० च्या दरम्यान गाडी थांबली, तिथे porters जेवणार आहेत असे सांगितले, ती एक epic जागा होती. अरुंद, चिखलाने भरलेला खाली उतरत गेलेला रस्ता कम बोळ , दोन्ही बाजूला दुकाने ( आणि भरपूर हेअर कटिंग सलून) , एक खास "हाटेल" , कशी कोण जाणे पण restrooms मात्र अतिशय स्वच्छ होती. Do not judge the book by its cover हा धडा पुन्हा घेतला. तिथे काही काळ रेंगाळून निघालो ते एकदम पार्क गेट लाच. पार्क चालू झालेले कळलेही नाही इतके साधे गेट होते. सुरुवातीला २ बाजूला शेती, कसली कसली लागवड. तिथे दुपारच्या जेवणाच्या वेळेस पोहोचलो, boxed picnic लंच म्हणजे mushy sandwich आणि फ्राईज, कपकेक, गोगोड फ्रुटी, शंकरपाळ्यासारखे पण जरा मोठे, चविष्ट फिंगर फूड, सफरचंद, केळं. डोंगरात जास्त खाल्ले पाहिजे म्हणून guide आग्रह करकरून खायला घालत होते. हे असेच चालले तर इतके जड खाऊन चालणार कसे हा प्रश्न. वजन वाढवूनच आपण इथून परत जाणार आणि त्यावर तू निश्चित कुठे गेली होतीस हे ऐकायला मिळेल असे वाटले. माझे २ extra पाय - walking sticks फिक्स केल्या, त्याचे bands घरी विसरल्याने Christmas ट्री ची हिरवी रिबीन एकाला आणि एक पिवळा नायलॉनचा दोर दुसऱ्याला त्यामुळे माझ्या walking sticks शंभरात ओळखू येतील अशा unique झाल्या.
2.jpg
पोले पोले चालायला सुरुवात झाली. rain forest, उंच झाडं, मधून खळाळत वाहणारं पाणी, अशा परिचयाच्या trail ने सुरुवात झाली. कोणताही ट्रेक अशाच प्रकारे चालू करण्यात मजा असते, निसर्गाचं हे रूप सगळ्यात सुखद, हवंहवंसं, प्रेमळ असतं. चालताना येणारा पायांचा आवाज, हवेची, पानांची सळसळ, पाण्याचा खळखळाट, उंच झाडांमधून झिरपणारं ऊन आणि जराशी अंधारलेली वर खाली जाणारी वाट, चिमुकले bridges. Picture perfect. हर जर्रा अपनी जगह पे आफताब !
3.jpg
कोणाशीही काही न बोलता असे चालणे सुरु झाले की मनांत मेहदी हसन, थोड्या मालिनीबाई , थोडे भीमसेन येऊच लागतात. तसे ते कुठे गेलेलेच नसतात. काही वेळाने नकळत - ना जेओ ना किंवा ओ सजना बरखा बहार आई वगैरे आठवतेच. आणि मग बोला फुलाला गाठ म्हणावी तशी पाऊस सुरुच झाला. मग तो मोठा poncho घालण्याचा एक सोहळा झाला. formula १ race ला काही क्षणांत tire वगैरे बदलतात त्याची आठवण ठेऊन मी बॅगच्या खाली अडकवलेला poncho क्षणात घातला. बहुतेक वेळा मी हे transition, record time मध्ये करत असावे असे वाटले, time record करायला हवा होता खरंच - पण कशासाठी ? तारीख, वेळ, काळ सगळे भान विसरून इथे फिरण्याचा मानस होता ना? poncho पिवळा होता, जर पांढरा असता तर रात्री निश्चित भुतासारखे काहीतरी दिसले असते. असेच poncho घातलेल्या अवस्थेत चालत चालत, मनातल्या मनात हरवत, पहिल्या मुक्कामी पोहोचलो - Simba Camp - किती उंचीवर, किती वेळ लागला - ही चिल्लर फिकीर कशाला ? खाली फोटोत बघा नाहीतर गुगला.
4.jpg
पोर्टर्सनी पिवळे तंबू उभे केलेच होते. आत शिरून कोरडे झालो खरे, पण पुढील ६ दिवस सतत पाऊस, गारठा, एक ओलेपण सतत बरोबर होते. पावसामुळे बरोबरच्या इतर लोकांचा कितीही निरुत्साह झाला तरी मी मनात अतिशय अतिशय आनंदात होते - मला पाऊस आवडतो. आजूबाजूला जरा हिरवळ होती त्यामुळे शूज काढून टाकले, हिरवळीवर मनसोक्त अनवाणी फिरले. ठरवल्याप्रमाणे stretching आणि सूर्यनमस्कार केले. आधी गरमागरम कॉफी आणि मग सूप, भात , स्ट्यू किंवा तत्सम खाऊन तंबूत परतलो. दीपशिखाबरोबर दुनियाभरच्या गप्पा मारताना उशिरा कधीतरी डोळा लागला. किलीमांजारो - प्रथम दिवसे अध्याय समाप्त !

सिम्बा कॅम्पची सकाळ सुंदर होती, सूर्योदयालाच उठले. DS ची लवकरात लवकर बाहेर जाऊन पहिला चहा घेण्याची इच्छा असायची आणि मला सगळं यावरून एकदम tent मधून बाहेर पडायला आवडायचे, त्यामुळे खूपच सोयीचे झाले. इथे सांगणे अप्रस्तुत ठरणार नाही पण इंका trail च्या मानाने आमच्या बरोबरचे portable टॉयलेट्स बरेच चांगले होते. इतक्या उंचीवर, इतक्या गैरसोयीच्या ठिकाणीही गैरसोय झाली नाही. सकाळी लख्ख ऊन पडले होते, किलीचे शिखरही स्वच्छ दिवस होते. अर्थात फोटो काढले गेलेच पण त्याआधी प्रत्येकाने सगळे कपडे, shoes, socks जे दिसेल ते उन्हात वाळवायला घातले होते. आदल्या रात्री पाऊस आणि गारठ्याने ओलसर झालेले. कशानेही, अगदी गॅसची धग देऊनही सुकले नसते. तासाभराच्या उन्हाने तो चमत्कार केला.
ब्रेकफास्ट म्हणून एक पॉरिज देण्यात आले, शेवटच्या दिवसापर्यंत ते मला खाववले नाही. पण केळी , टोस्ट, ऑम्लेट आणि dehydrate व्हायची भीती असून कॉफी भरपूर प्यायली. David pulse आणि oximeter reading घ्यायला आला. सगळ्यांच्या समोर ती टेस्ट करताना, दुसऱ्याची पाहताना , एकमेकांचे आकडे compare करताना मला तरी जरा चमत्कारिक वाटायचे. आता बॅग उचला, निघायचे आहे असे सांगण्यात आले. पहिल्या दिवशी gaiters लावले नव्हते, ते आज लावले, तेही भाड्याने घेतले होते, they worked extremely well and did the job. David ने किती चालायचे आहे, किती तास, steep आहे का easy वगैरे कालच सांगितले होते पण एकूण या माणसाच्या बोलण्याकडे आणि आकड्यांकडे फार लक्ष देण्यात अर्थ नाही हे कळले होते, एकूणच कारभार पोले पोले. ट्रेकच्या सर्व दिवशी आम्ही सगळे त्यांनी दिलेल्या वेळेत तयार असायचो पण guide , पोर्टर वगैरेंचे आटोपलेले नसल्याने जवळ जवळ प्रत्येक दिवशी ठरल्यापेक्षा उशिरा निघालो, अर्थात मी त्याची आतातरी फारशी फिकीर करत नव्हते.
आज वाट जरा steep होती पण मजेत गेली. उंच झाडे आता नव्हतीच, होती ती खुरटी bushes. मला wild flowers पण कल्पनेपेक्षा फारच कमी दिसली. पहिले तासभर छान ऊन होते असे म्हणेपर्यंत 'गडद निळे गडद निळे जलद भरून आले' आणि पावसाची ये जा सुरु झालीच. एक मोठा सरडा Joshua ने पकडून दिला, तो पकडून एक फोटो सेशन झालेच. वाटेत guide बरोबर bollywood, स्टार्स, तिथल्या चालीरीती, history वगैरे आवडीच्या गोष्टींवर बडबड झालीच. या गोष्टी universal असतात आणि वेळ चांगला जातो. शेवटचा तासभर poncho नावाचा अवाढव्य gown घालून चालत चालत एकूण ३-४ तासात second camp मुक्कामी पोहोचलो. पोहोचलो तेव्हा भरपूर पाऊस होता. आता पोहोचलो आहोतच तर poncho झुगारून दिला आणि टेन्ट तयार होईपर्यंत तशीच भिजले. वाट steep असली तरी सोपी वाटली. आज हाताशी भरपूर वेळ होता. झोपायचे तर नव्हतेच मग tent मध्येच अदितीने Contact नावाचा एक मस्त game शिकवला तो खेळण्यात छान रंगून गेलो. खाली सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होते, हिरवळही जवळ जवळ नव्हतीच त्यामुळे नेहमीचे shoes घालावे लागले. ४ च्या दरम्यान acclimatization साठी १०० - २०० फूट मजेत अजून वर चढून आलो, परांजपे तर sleepers मध्ये. वाकणकरांनी आता काहीही acclimatization करणार नाही असे सांगून David ला साभार नकार दिला. DS आणि निलाद्री काही अंतर आले, मला अजून अजून वर जावेसे वाटत होते पण पाऊस - पुन्हा भिजणे वगैरे संभाव्य अडचणी टाळण्यासाठी परतलो. एकूण मोकळा खडकाळ माळ, दगड, मागे एक गुहा, पाणी, चिखल आणि झाड जवळ जवळ नाहीच असे landscape होते. किरण कुलकर्ण्यांचे बोलणे आठवले आणि शांत बसले. तसेही भरपूर धुके आणि ढग असले की आजूबाजूला पाहण्यासारखे काही नसतेच. अपने गिरेबानमें झाककर देखने के लिये यही तो सही मौका है. खाली कुठे ५ फूट पण फ्लॅट कोरडी जमीन नव्हती त्यामुळे सूर्यनमस्कार, stretching वगैरे काहीही करता आले नाही. मधल्या काळात आज मुगाचे वरण -भात किंवा तत्सम जेवण आहे हे कळले होते, तेव्हा उत्साहाने मी मदत करेन म्हणून सांगितले. संध्याकाळी त्यांचा माणूस खरंच बोलवायला आला तेव्हा नाईलाजाने उठावेच लागले. परांजपे already उत्साहाने स्वंयपाक करत होतेच. मग मी व पराग यांनी मदत करून मटार भात आणि फोडणी घालून मुगाचे वरण \डाळ बनवली. गॅसजवळ होतो तोवर छान उब होती. नंतर फारच थंडी वाजू लागली. तिथे बसल्या बसल्या त्यांची सगळी pantry पाहून झाली, हिरवे मूग, मिरच्या, लसूण, आलं, वेगवेगळी फळं - आणि काय काय होतं . एक अत्यंत कडू पाला पण होता पण चौथ्या का पाचव्या दिवशी त्या पाल्याला परतून भाजी / salad सारखे काही केले होते ते फार चविष्ट होते. एकूण जेवण मस्तच होते. Second camp ला भरपूर वेळ मिळाल्याने सुस्तावले. उपाध्ये काकांची तब्बेत जरा बिघडली होती, त्यांना त्यांच्या मुलांमुळे आणि गाईडमुळे सगळेच पापाजी वगैरे म्हणायला लागले होते, त्यात त्यांनी शेफ कम preacher सारखी हॅट घालून गम्मत आणली होती. एकूण बरोबरच्या मंडळींबरोबर comfortable झाले होतेच. निलाद्री ४-६ महिने स्वाहिली शिकत होता त्यामुळे सराईतपणे गाईड आणि पोर्टर मंडळींशी बोलत होता. मी त्या भाषेला दुरूनच hello म्हणजे जांबो केले आणि ४-५ शब्द वगळता फारसे जवळ येऊ दिलेच नाही. एकूण संध्याकाळ pole pole सरली, मी ८:३० ला वगैरेच झोपून गेले. रात्रभर निलाद्री किंवा कोणाच्यातरी घोरण्याचा आवाज ऐकू येत होता, अर्थात मला फारसा फरक पडत नसल्याने मस्त झोप लागली. आमच्या बडबडीने आणि क्चचित माझ्या गाण्याने मंडळी वैतागली असे नंतर सांगण्यात आले. मी फिटंफाट झाली असे समजून जास्त लक्ष दिले नाही ही गोष्ट निराळी. एकूण दिवस छान गेला. इति किलीमांजारो द्वितीय दिन सुफळ संपूर्ण.
क्रमश:..https://www.maayboli.com/node/81000
5.jpg

या hike मधली सगळ्यांत उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे प्रत्येक सकाळ सुंदर असायची. माझ्यापाशी तोडी, भैरव किंवा ललत चे रेकॉर्डिंग नाही किंबहुना जाणीवपूर्वक आपण रेकॉर्डेड गाणी आणलीच नाहीत याबद्दल त्या सकाळी जरासे वाईट वाटायचे. पराग वाकणकरांनी गाणी आणली होती पण बहुदा पहिल्याच दिवशी त्यांचा फोन आणि player बॅगमध्ये उघड्या कप्यात राहून पावसात स्वाहा झाले होते, त्यामुळे तो मार्गही बंद होता. फोन कामातून जाऊनही गृहस्थ calm and composed आहे हे बघून थक्क झाले. माझे, इतरांचा फारसा विचार न करता स्वतःच्याच वेड्यावाकड्या आवाजात गाण्याचे प्रयत्न चालू होते आणि जास्त करून स्मरणरंजन. तरीही एकूण digital detox was working well.
second cave हे आम्ही राहिलेल्या जागांमध्ये मला सर्वांत कमी आवडलेले ठिकाण. इथून सकाळी निघताना तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि जरासे ऊन पण होते. जवळ जवळ रोजच सकाळी ४:३० -५ पर्यंत छान झोप होऊन जाग येत असल्याने कपालभाती, अनुलोम विलोम, थोडे breathing exercises अगदी मनासारखे होत होते. सकाळच्या उन्हात जरासे stretching सुद्धा करता आले. आज सकाळी पोर्टर्सनी गाणी म्हटली, एक किलीमांजारोचे गाणे आणि missing XXX चे गाणे मस्त होते, ते त्यांनी नंतरही अनेक वेळा म्हटले.
इंडियन स्टॅंडर्ड टाइमप्रमाणे ठरवलेल्या वेळेच्या तासभर नंतर पोले पोले निघालो. आज वाट छान होती. वाटेत पुष्कळ धुके. जेव्हा धुके नसायचे तेव्हा खालचे खोरे दिसायचे, आपण परवा कुठे होतो आणि आता कुठे आलो असे काहीतरी चमत्कारिक विचार डोक्यात आल्याचे आठवते. second cave च्या इथली cave फारशी चांगली नव्हती, पण आज त्याने चांगली cave दाखवेन असे सांगितले होते. हे guide इतका हळू pace सेट करत होते की चालण्याचे काहीही श्रम वाटत नव्हते, न श्वास लागत होता. दिल ढुंढता है फिर वही फुरसतके रात दिन, वगैरे काहीसे वाटल्याचे स्पष्ट आठवते. चालत चालत त्या cave जवळ पोहोचलो. मोठी cave होती, आत मिट्ट अंधार, एका बाजूने भिंतीला धरून धरून आत जात होतो. बरोबरची मंडळी उगीचच चित्कार काढत होती आणि echo च्या आवाजाने शहारे येत होते. मध्ये अर्थातच दगड, चिखल असा भाग होता, पण cave च्या आत एक वेगळीच शांतता होती. मला Guide सिनेमात सुरुवातीला वहिदा रेहमानचा नवरा शोधत असतो त्या गुहेच्या सीनची आठवण झाली. अचानक कोरीव मूर्ती वगैरे दिसल्या तर काय मजा होईल असं काहीसं वाटल्याचे आठवत. अर्थात तसला काही चमत्कार घडला नाही. काही अंतर गेल्यावर मंडळी कंटाळली. पुढे जरासे वाकून व सरपटत आत जावे लागेल असे सांगण्यात आले, अर्थात तिथे कोणताही खजिना नव्हता त्यामुळे फोटो काढून मंडळी परत वळली. मिहीरला पुढे जाण्यात interest होता, मी पण कंपनी दिली असती पण सगळेच मागे फिरलो आणि पुढच्या रस्त्याला लागलो.
6.jpg
पुढे कुठेतरी बराच पुढे पाऊस लागला. मध्ये १,२ वेळा ओढे - पाणी सुद्धा ओलांडले. बराच वेळ मी बहुतेक एकटीच चालत होते असे आठवते. ती सगळी वाट magical होती. एकदाही घड्याळ पहिले नाही, काळ-वेळ सगळेच भान हरपले होते. अचानक इंदिरा संतांची निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे ही कविता आठवली. तीच मनातल्या मनात म्हणत राहिले. मग फुलराणी म्हटली. झपूर्झा सुद्धा. भय इथले संपत नाही वगैरे वगैरे. पाऊस आणि धुक्यामुळे इतर काही दिसत नव्हते आणि अचानक कीकेलेवा कॅम्पला पोहोचलेच. आल्या आल्या टेन्टमध्ये सर्वप्रथम काय केले तर - आजची विडिओ डायरी. गेल्या १-२ तासांत एक eternal bliss , काहीतरी शब्दांत न पकडता येण्यासारख्या क्षणांचा प्रवास घडला होता.
यथावकाश DS आली. हा camp आम्ही राहिलो त्या सगळ्यात मला सर्वांत जास्त आवडला. पाठी एक लहान धबधबा होता आणि त्याचा रात्रभर इतका सुंदर आवाज येत होता की त्या आवाजाचा होत असणारा परिणाम शब्दांत सांगणे अशक्य आहे. दूरवर अजून १,२ धबधबे दिसत होते पण डेविडने तिथे जाणे फारच अवघड आहे असे सांगितल्याने ते दूरच राहिले. दुपारी जरा ऊन पडले होते. तिथे भरपूर जागा होती मग मी आणि DS ने बरेच stretching , योगा केले. एका पोर्टरने अतिशय गंभीर चेहऱ्याने उगीचच जरा अजून stretching करून घेतले. आम्ही म्हटले फुकटात योगालेसन मिळाला. तिथे हिंडताना Patrick भेटला. एकदम young , enthusiastic, bubbly. आम्ही ३ दिवसात केले ते अंतर त्याने दोन दिवसातच पार केले होते. मूळ Seattle चा असणारा आणि आता ऑस्ट्रेलियात राहणारा. JRO ला सकाळी ६ ला आला आणि लगेच hike सुरु केली होती. आमचा Summit डे एकच असणार होता. तो त्याच्या ग्रुप मध्ये एकटाच होता आणि सोबत ३-४ पोर्टर-guide. तो चांगलाच hiker असावा. त्याच्या उत्साही बडबडीत संध्याकाळचा वेळ मजेत गेला. DS आणि मी सुद्धा इथे खूप गप्पा मारल्या. धुके असले तरी valley खाली आहे हे जाणवत होते. DS ला इथे बहुदा जरा पोटाचा त्रास सुरु झाला, other than that she was going strong . आणि मी स्वतः - खोकला almost गेलाच होता, अंगप्रत्यंगात वेगळाच उत्साह होता.
7.jpg
रात्री ३ च्या आसपास जाग आली तेव्हा बाहेर आले. प्रचंड थंडी होती पण टेन्टमध्ये जावेसे सुद्धा वाटत नव्हते. वर पहिले तर clear skies आणि "पसरली जणू तारकादळे गगनात". इतके सुंदर आकाश इतके जवळून मी कधीही अनुभवले नव्हते असेच वाटले. परवा summit night ला अमावस्या आहे तेव्हा हेच आकाश असेच पुन्हा दिसेल या कल्पनेने अद्भुत वाटले. घरी असताना meteor shower असेल तर किंवा कधीतरी आनंद असे रात्रीचे आकाश बघायला उठतो, तेव्हा मी गाढ झोपेत असते, चुकूनही उठत नाही पण आज अचानक ते भेटले. परत टेन्टमध्ये आल्यावर - सतारीचे बोल अचानक डोक्यात आली. त्या प्रचंड कवितेची सर्व कडवी पुन :पुन्हा आठवत राहिले,
दिक्कालांसह अतीत झालो - उगमी विलयी अनंत उरलो. किंवा
नक्षत्रे तो अगणित दिसली, अस्तित्वाची त्यांच्या नव्हती हा वेळवरी दादच मज ती
आणि मग शेवटचे -
शांत वाजली गती शेवटी , शांत निशा ती शांत धरित्री, शांतच वारे शांतच तारे, शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो, शांतीत अहा झोपी गेलो, बोल बोललो परी कितीकदा , स्वप्नी दिडदा दिडदा दिडदा

झोप येणे शक्य नव्हते. DS पण लवकर उठली. मी तिच्याशी कितीतरी बोलत राहिले, काहीतरी उच्च. पण तिच्यावर काहीही परिणाम नव्हता, त्यामुळे अनिताची आठवण झाली. अर्थात माझ्या उत्साहात काहीही फरक पडला नव्हता. सकाळी टेन्टमध्ये समोर सूर्योदय दिसत होता, भैरवचे सूर आठवत होते. प्राणायाम व आवराआवरसुद्धा लवकरच झाली. चौथ्या दिवसासाठी सज्ज झाले. सा रम्या मधुरा कीकेलेवास्थित तृतीय रात्री संपूर्णम।
किकेलेवाची रात्र जितकी रम्य तितकीच सकाळही प्रसन्न. मोठा canvas भवताली दिसत होता, सावरकरांना असाच कोणतातरी सूर्योदय बघताना 'दिक क्षितिजांचा दैदिप्यरथ तुझा सुटता ' सुचली असणार. मग त्या कवितेचे मनातल्या मनात पारायण झाले. पण पुढे जायचेच होते. सकाळचा ब्रेकफास्ट आणि बाकी तयारी नेहमीप्रमाणे झाली. ऊन होते त्यामुळे सुरुवातीला तरी काही वेळ हॅट लागणार होती आणि ती सापडत नव्हती. कपडे उबदार रहावेत म्हणून रात्री sleeping बॅग मध्ये घालून झोपत होतो. हॅट तिथेच राहिली असणार असे वाटले. छान पॅक केलेली sleeping बॅग उघडली, अपेक्षेप्रमाणे हॅट सापडली. रागारागात पुन्हा sleeping bag जास्तच चांगली पॅक झाली. summit नंतर फोनच्या शोधात पुन्हा एकदा हा सोपस्कार करावा लागला.
आजची वाट steep असणार होती but I did not care at all. पाय इतके उत्तम साथ देत होते की आपण चालत आहोत असेही वाटत नव्हते, कसलेच श्रम जाणवत नव्हते. पण वाट steep होती खरे, हळू हळू चढत होतो. आज Christmas day असे अचानक लक्षात आले मग उगीचच Christmas Carol वगैरे म्हटली. गेल्या वर्षी २०१८ ला याच वेळी इंका trail वर होतो हे आठवले , आज इथे तर २०२० च्या Christmas ला कुठे असू या कल्पनेत काही वेळ गेला. चालायला लागल्यावर १ दीड तासात नेहमीप्रमाणे पावसाने आगमन केले. कपडे भिजतात, ते अजून पुरवायचे आहेत, कमी पडू नयेत वगैरे भीती होती म्हणून मी poncho घालत होते नाहीतर मला अखंड भिजत चालायला आवडले असते. आज मात्र जमेल तितका वेळ poncho घालण्याचे टाळले. वारंवार चढत होतो. height चा काहीही त्रास जाणवत नव्हता, आश्चर्य म्हणजे डोके वगैरे अजिबात दुखत नव्हते. Diamox मुळेच ही करामत झाली असे माझ्या मनाने घेतले, आपण ही गोळी घेतली हे बरे झाले असेच वाटत राहिले.
जरासा पाऊस लागला तरी तसेच चालत राहिले. माझ्याबरोबर बहुतेक Walles होता आणि पुढे मिहीर, पराग होते. जरा वेळाने मिहीर त्याच्या वडिलांसाठी मागे राहिला आणि आम्ही तिघेच पुढे जात राहिलो. पुढे जात होतो तसतसे अधिकाधिक धुके, थंडी आणि पाऊस. चष्म्याच्या काचांवर पाणी आणि बाष्प आल्याने काहीही दिसत नव्हते, मग तो काढून ठेवला. शेवटी poncho घातलाच. अजून किती वेळ हे guide ला विचारलेसुद्धा नाही, फक्त चालत राहिलो. मधेच चढ - उतार लागत होते, एकीकडे किबो हट ला जाणारी वाट guide ने दाखवली जी उद्या घेणार होतो. मला वाटते बहुतेक १२ च्या सुमारास मावेन्झी हटला पोहोचले. आमचे टेन्ट होते त्याच्या जरासे आधी एक सुंदर तळे होते, पण धुक्यामुळे काहीही - अगदी ५-१० फुटांच्या पुढचे दिसत नव्हते. जिथे पोहोचलो तिथे छान केबिन होते त्याच्या छपराखाली बेंचवर पाय वर करून नुसते पडून राहिले. पाय दमले म्हणून नाही पण आधी पावसाची मजा आली तरी जरा म्हणजे जरासुद्धा सूर्यप्रकाश नाही, इतके सुंदर तळे बघता पण येत नाहीये म्हणून खट्टू झाल्याने. अर्थात जरासेच. टेंटमध्ये जाऊन ड्राय झाल्यावर जरा बरे वाटले. इतर दिवशी दुपारी आकाश जरातरी मोकळे व्हायचे पण आज तशी काहीच चिन्हे दिसत नव्हती. जेवण झाल्यावर टेंटमध्ये जाऊन उद्याचा कॅम्प - किबो हट आणि summit च्या रात्रीची स्वप्ने उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. सकाळी सावरकरांची एक कविता डोक्यात असल्याने दुपारी त्यांचेच 'सागरा प्राण तळमळला' आठवत होते. आपण जर summit ला पोहोचलो तर ती आठवण विडिओमध्ये कशी साठवायची याचा विचार करता करता मग सागरा प्राण तळमळला च्या चालीवर पर्वता प्राण तळमळला हे parody song तयार झाले आणि जरासे productive वाटले. खरेतर मावेन्झी हटचा परिसर सुद्धा सुंदर असणार असे वाटत होते पण पावसाळी हवा, प्रचंड गारठा आणि धुके या तीन वैऱ्यांमुळे ती संध्याकाळ कधी एकदाची संपून उद्याचा सूर्य उगवतो असे झाले होते. पॅट्रिकचा टेन्ट पण आमच्या जवळच होता, टेन्ट उघडा असताना एक उंदीर आत शिरला, अगदीच काही नाही तरी त्या गोंधळात एकूण चांगली करमणूक झाली. संध्याकाळी त्या हटच्या आत शिरले. तिथे दरवाजा बंद केला की जरा उबदार वाटते आणि आणि चांगले कोरडे पण आहे हे लक्षात आल्याने अक्खी संध्याकाळ त्या केबिन मध्येच काढायचा मी निश्चय केला पण ' उत्पनंते विलीयंते दरीद्राणां मनोरथ:' !केबिनमध्ये जरा stretch, breathing करत असताना तिथे वस्तीस असणारे २ ranger आले. तिथे १० दिवस ड्युटी. मग ३ दिवस खाली चालत जायचे, पुन्हा ३ दिवसांनी वर येऊन मावेन्झी हट मध्ये रहायचे असा दिनक्रम असणारे हे ranger. अर्थात त्यांना माणूस फारसे दिसत नसणार त्यामुळे त्यांनी माझ्याशी अखंड प्रश्न आणि बडबड चालवली. त्याला कंटाळून पुन्हा आमच्या टेन्टमध्ये आले. oximeter ने बहुतेक रात्री ८८ वगैरे दाखवल्याने मला उगीचच टेन्शन आले पण हा नंबर नॉर्मल आहे असे कळले. एकूण कंटाळून, उद्याच्या सूर्याच्या प्रतीक्षेत झोपेच्या अधीन झाले. इति पर्जन्ययोगे चतुर्थदिन निष्फळ संपूर्ण।
मावेन्झी हटला अखेर एकदाचा सूर्योदय झाला, तो अपेक्षेइतका स्वच्छ नसला तरी होता तितकाही हवाहवासा वाटत होता. फ्लॉरिडात सूर्यनारायण आमच्यावर जी अखंड कृपा करीत असतो त्याची व घराची एकदा आठवण झालीच. एकदाचे ते तळे बघायला मिळाले, छानच होते. आमच्या राहण्याच्या जागेच्या आसपास, टेकड्या होत्या त्यावर गेले. gloves न घालता बाहेर गेल्याने हातांची लाकडे व्हायची बाकी राहिली. वरून खालचे खोरे मात्र खल्लास दिसत होते. इथे cable car करावी असा Chinese investment चा प्रस्ताव आहे. ही कल्पना तिथल्या पोर्टर्सना बहुदा मान्य नाही. कदाचित एकूण सगळे commercialization झाले की या जागेला आता जो एक rustic feel आहे तो निघून जाईल आणि म्हणून cable कार होऊ नये असे वाटले पण काही वर्षांनी ती बहुदा होईलच. आपण सगळेच रिव्हर्स न घेता येणाऱ्या गाडीत बसलो आहोत वगैरे आवडीचे विचार एकदा मनात येऊन गेले.
8.jpg9.jpg10.jpg
बोटांची लाकडे झाल्याने की काय माहित नाही पण pulse आणि oxi meter माझे reading अजिबात दाखवेना. पल्स न दाखवल्याने, आपण मेलो आहोत आणि स्वतःची प्रेतयात्रा बघत आहोत अशी शकुंतला परांजपे यांची एक मस्त कथा आहे ती आठवली. पल्स दिसत नसली तरी मी चांगली शुद्धीत होते आणि height मुळे आपल्याला hallucination वगैरे काहीही होत नाहीये हे मी मनातल्या मनात स्वतःला पटवत होते. शेवटी गरम पाण्यात बुडवून जिवंत केलेले middle finger खास अमेरिकन style ने त्या oximeter ला दाखवल्यावरच त्याने माझ्या जिवंतपणाचे दाखले दिले आणि पुढे जाण्याची परवानगी.
इथे आमचे पोर्टर आणि बाकी सगळ्यांची ओळख परेड केली आणि एकत्र फोटो वगैरे काढले. या साऱ्यात अपेक्षित उशीर होऊन किबो हटची वाट नेहमीप्रमाणे ठरल्यापेक्षा उशिरा, पोले पोले चालू लागलो. अर्थात ही ओळख परेड गरजेचीच होती. कोण कुठली ही माणसे, त्यांचा हा धंदा असला तरी काय, इतक्या उंचीवर आमचे सामान उचलत होती, आमची सोय-गैरसोय, खाणे-पिणे सर्व बघत होती. त्यांचा माझा काही ऋणानुबंध नव्हता, पुन्हा आम्ही कधी भेटू असेही शक्य नव्हते. पण या सर्वस्वी अपरिचित दिसणाऱ्या-बोलणाऱ्यांबरोबर कोणत्याही माणसा-माणसांत जरूर असावा असा बंध निर्माण झाला होता. Degree of separation ६ नाही, ३ नाही फक्त १ असते असे काहीसे वाटल्याचे आठवते. या मंडळींत एक rapper पण होता, त्याचा बहुतेक स्वतःचा youtube चॅनेलपण होता पण त्याचे रॅप ऐकण्याचा योग मात्र आला नाही.
किबो हट ची वाट विचित्रच होती, एकतर जवळजवळ १४००० फुटांवरून वाट प्रथम खाली उतरत होती आणि नंतर चिंचोळी वाट वगैरे असा काही प्रकार नसून प्रचंड मोठे माळरान आणि त्यावर आखल्याप्रमाणे वर वर जाणारा भयंकर उजाड आणि भकास रस्ता होता. तिथे कुठे म्हणे एक स्पॉट होता जिथे केनियाच्या बाजूने मोबाईलला range येत असल्याचे कळले, अरुण परांजपे प्रयत्न करत होते पण बहुदा range मिळाली नाही. मी १४००० फूटाला आहे कि १५००० फूटाला याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते, शरीराने फक्त थंडीची दखल घेतली होती, बाकी सर्व नॉर्मल - अगदी Markham woods trail वर (अर्थात अगदी उजाड) असावे तसे चालणे चालू होते. दीपशिखा जरा कंटाळली किंवा थकली असावी मग थोडावेळ तिला सोबत केली. थोड्या वेळाने मी व परांजपे जरा पुढे चालत होतो. जरासे ऊन enjoy करत होते तेवढ्यात पावसाने नेहमीप्रमाणे हजेरी दिली. तो महाकाय poncho चढवला, आता त्याची सवय झाली होती. पाऊस - धुके - चष्म्यावर बाष्प - मग तो काढून कुठेतरी अडकवला आणि निमूटपणे पुढच्या orange poncho च्या मागे पावले टाकत राहिले. कितीतरी वेळ हे चालले असावे, कदाचित थोडे फास्ट चालत असेन, जरासा श्वास लागत होता, याचे मुख्य कारण एका तालात श्वासोच्छ्वास होत नव्हता. मध्ये २-३ porter बसलेले दिसले म्हणून आपणही २ मिनिटे दम खावा म्हणून बसले तर sunglasses कुठेतरी पडून गेल्याचे लक्षात आले. २ मिनिटे घाबरले पण पाठून चालत येणाऱ्या कोणालातरी दिसतील आणि ते उचलून आणतीलच असे वाटले, मागून Walles येत होता, त्याला माझे sunglasses सापडून त्याने नीट ठेवले होते. त्याचे आभार मानले पण त्या दीड शहाण्याने मी कशी फास्ट चालत आहे, how I will hurt myself वगैरे lecture दिले. sunglasses पडण्याचा आणि फास्ट चालण्याचा काहीही संबंध नव्हता आणि खरेतर मी अजिबात वेगात वगैरे नव्हतेच. मला त्याचा भयंकर राग आला, पण आता थोडीच वाट राहिली आहे, जरा कंटाळा आला आहे, जरासे थकल्यासारखे वाटत आहे तर मिळालेल्या rhythm ने लवकर संपवून टाकावी म्हणून तशीच चालत राहिले आणि काही वेळातच किबो हट आली. १५००० फुटांवर गेले होते, आयुष्यात स्वतःच्या पायाने प्रथमच या उंचीला गेले होते. मनातल्या मनात याहू ! केले. पण तिथे रजिस्टरमध्ये सही करताना लक्षात आले की पुन्हा ग्लोव्ह न घातल्याने बोटांची लाकडे झाली आहेत, बाकी बॉडी गरम होती. बराच वेळ प्रयत्न करून वेड्यावाकड्या हाताने नाव लिहून सही केली आणि टेंटमध्ये येऊन पडले.
11.jpg
आमचा सोबती पाऊस होताच. हाताची बोटे हलती करण्यासाठी वॉर्मर, गरम पाण्यात बुडवणे, काही ना काही लिहिणे इत्यादी करत बसले. जेवणाची वाट पाहता पाहता शीण गेला. D डे उद्यावर आला होता. ६ ला supper ऐवजी रात्री १० नंतरच जेवण घ्यावे आणि midnight - कत्तल की रात चा walk चालू करावा अशी सूचना येऊन बहुमताने पास झाली. रात्री वेळेत ७-८ तास झोप नीट झाली नाही की दुसऱ्या दिवशी माझा Zombie होतोच होतो त्यामुळे रात्रीच्या चालण्याचे थोडे टेन्शन होते. पण किबो हटला पोहोचले की ६-७ तास झोप घेण्यासाठी आपल्या हातात असतील, ते वापरले की रात्री १२ ला आपण फ्रेश असू असा हिशोब आधी चालता चालता मनात केला होता. जेवल्यानंतर झोपण्यासाठी मनाचे कंडिशनिंग झाले होते. सुदैवाने मला झोपायचे म्हटले की लगेच झोप लागते, तळमळावे लागत नाही. तसेच आताही झाले. ३ नंतर कधीतरी एकदम गाढ झोप लागली. ६:३० वगैरे जाग आली ते चांगलेच झाले. दुसऱ्या दिवशीचे कपडे - वर ५ लेअर, पायांत ३, सॉक्स २, हॅन्ड वॉर्मर, बॅगपॅक असा सगळा जामानिमा sleeping बॅग मध्ये नीट लावला आणि पुन्हा १५-२० मिनिटांत झोपी गेले ती इतकी गाढ की रात्री एका पोर्टरने १०:३० ला टेन्टजवळ येऊन डिनरसाठी पुकारा करेपर्यंत अजिबात जाग आली नाही.
रात्रभर छान झोपून सकाळी उठावे इतके फ्रेश वाटत होते. सर्व लेअर एकामागून एक चढवले आणि जेवणासाठी आले. इतक्या height ला भूक मरते, काही खावेसे वाटत नाही असे होते. मी सर्वांना बोलून दाखवले नाही पण मला उलट कडकडून भूक लागली होती. ब्रेड पकोडे, सूप आणि काय काय होते, ४ घास जास्तच खाल्ले. सगळेच जण एका चमत्कारिक ताणाखाली वावरताना दिसत होते, लोक comfortable वाटत नव्हते. मला मात्र आतून शांत वाटत होते. काहीच वेळ आणि आम्ही summit कडे निघणार होतो. मार्च एप्रिलपासून फक्त याच एका रात्रीसाठी तयारी करत होते. शनिवार रविवारी Markham woods trail ला चालताना, या रात्री काय काय करायचे आहे याचाच विचार चालायचा आणि ती रात्र प्रत्यक्ष येईल तेव्हा ते सगळे आठवावे इतकीच अपेक्षा होती. मी शांत होते आणि ते सगळे वाट चालू लागलो की आपोआप आठवेल अशी खात्री वाटली. पाणी आणि इतर आवश्यक गोष्टी बॅगपॅक मध्ये घेतल्या. हॅन्डवॉर्मर shoes मध्ये घातले. Tip to toe तयार होऊन, १२:३० च्या दरम्यान सुरु केला the night-long romance with mount Kilimanjaro.

पोले पोले एकेक पाऊल टाकायला सुरुवात केली. आगगाडीच्या डब्यांसारखे एकाच दिशेत एकाच वेगाने सर्वजण चालत होतो. डेविड पुढे मागे परांजपे, मग निलाद्री, मग उपाध्ये फॅमिली मग DS , मी आणि वाकणकर. एक गाईड मागे, दुसरे २ आणि काही पोर्टर्स आजूबाजूला. ते सतत जवळ येऊन कसं वाटतंय हे विचारत होते, पाण्याची नळी बॅगबाहेर काढणे, poncho घालणे वगैरे मदत करत होते. डेव्हिडने भयंकर slow pace set केला. रात्रभर चढायचे आहे, श्वास लागू नये, शरीर हळूहळू तयार व्हावे, आणि त्यांना सगळा अनुभव आहे हे लक्षात घेता ते ठीकच वाटले. चालू लागलो आणि मी सर्वप्रथम काय केले असेल तर तीनताल डोक्यात ठेवून त्या तालात श्वासोश्वास चालू केला. एका मात्रेला श्वास, १ मात्रेला hold , २ मात्रांचा उश्वास. जरासे थांबलो तर ताल बदलायचा पण लय तीच ठेवायची. याबद्दल मी लागूंच्या पुस्तकात वाचले होते. अगदीच कंटाळा आला तर एखादे विलंबित लयीतले गाणे डोक्यात ठेऊन तसे श्वसन केले. प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक घेतला गेला. उश्वास जरा जोरात घेतला तर श्वासही त्याच जोमाने घेतला जायचा. So far so good. पोर्टर्स मध्ये मध्ये गाणी म्हणत होते, त्यांची गाणी चालू झाली की माझ्या डोक्यातला ताल आणि श्वासांचा rhythm बिघडायचा, जो पुन्हा नॉर्मलला आणावा लागे. अर्थात पोर्टर्सच्या गाण्यांमुळे रात्रीचा भीषण अंधार सुखावह होत होता. आम्ही बहुदा निघायला उशीर केला किंवा खूपच पोले पोले चालत होतो, असणारच, कारण काही वेळातच खूप पुढे असणाऱ्या hikers चे headlights वाटेत वर वर दिसू लागले. त्यामुळे त्या उभ्या कड्यासारख्या वाटेचा अंदाज येत होता. आम्ही David च्या आदेशानुसार चालत होतो.
सुरुवातीला धुके होते, आभाळातही काही खास नव्हते. मग मिलिंद बोकीलांचे शाळा, लंपनची पुस्तके, कविता काही ना काही असेच आठवत राहिले. या दोन्ही पुस्तकातले पौगंडावस्थेतले नायक अशीच शाळेची किंवा अन्य कुठली वाट तुडवत असतात. तुंबाडचे खोत मधला एक नायक असाच अमावास्येच्या रात्री होडी वल्हवत पलीकडच्या तीरावरच्या जंगलात जात असतो ते सर्व आठवले. मग Roots, Walden पण आठवले. पाय चालूच होते पण दुसऱ्याने ठरवलेल्या वेगाने. मी आणि बहुतेक आम्ही सगळेच जण guide वर पूर्णपणे विसंबून राहिलो होतो. मध्येच जराशी चक्कर आली असे वाटले. तात्काळ Ibuprofen घेतली. १५००० फुटांपर्यंतच्या प्रवासात एकही घेतली नव्हती. आता १९००० पर्यंत जाताना मात्र मला कोणताही loose end ठेवायचा नव्हता. पोर्टरने मारी सारखे पण गोड बिस्कीट खायला दिले त्याने एकदम तरतरी आली. पहिला टप्पा एका cave जवळ जिथे natures call घेता येईल तिथे आहे असे सांगण्यात आले. ते साधारण midway आहे असेही सांगण्यात आले. वाट खूपच उंच, चढण चांगलीच होती पण माझे ध्येय सध्यातरी पुढील माणसाची पाठ इतकेच होते, त्यामुळे फार वर बघतही नव्हते. आता जरा जरा आकाश दिसू लागले, पण वर बघत चालणे शक्य नव्हते आणि ते बघायला थांबणे परवडणारे नव्हते. एका मस्तीत, धुंदीत आणि वेळेकडे पूर्ण दुर्लक्ष करत एकाच अतिविलंबित लयीत चालत राहिलो - उगीच प्रभा अत्रेंचे विलंबित एकतालातले मारुबिहाग मधले 'कल नाही आये' आठवत राहिले.
एकदाचे त्या cave ला पोहोचलो. natures call साठी म्हणून guide ने cave च्या वर जायला सांगितले, तिथे ऑलरेडी बर्फ पडलेला होता आणि उभा निसरडा दगड चढायला लागला. इथेच सरकून कोसळून the end होईल असे वाटले पण इलाज नव्हता, कार्यभाग उरकल्यावर मात्र छान वाटले. परांजप्यांना हाताला थंडी वाजू लागल्याने hand warmer दिले. इथे घड्याळ बघून डेविडला अजून वाट किती आहे हे विचारायलाच पाहिजे होते, ते चुकले, पुन्हा त्याच एक संथ गतीत चढत राहिलो. कोणी तरी म्हणाले की झोप येत आहे, मला खरेतर नवल वाटले. ज्या एका रात्रीसाठी गेले कित्येक महिने सर्व खटाटोप चालू होता, त्या रात्री झोप येणे कसे शक्य होते? मी रात्रीच्या झोपेच्या बाबतीत फारच sensitive असूनही टक्क जागी होते. काही वेळ गेला आणि वाकणकरांनी एकदम withdraw केले. मी sleep deprived आहे, पाऊल सरळ पडत नाहीये वगैरे म्हणत ते परतच निघाले. मी आमच्या इतर group कडे बघत राहिले पण कोणी एक शब्दही बोलले नाही याचे मला अधिकच आश्चर्य वाटले. मीच न राहवून 'you can do it' म्हटले. जरासे थांबलो असतो तर सगळ्यांच्या प्रोत्साहनाने ते पुढे येऊ शकले असते असे वाटले. जो तो आपल्यापुरता असला तरी group मध्ये हा support द्यायला हवा होता असे वाटले. आपलेही असेच झाले तर आपणही असेच एकटे राहू पण कदाचित अरुण परांजपे आणि DS ने मला तो support दिला असता. सुरुवातीपासून उपाध्ये guide ना म्हणत की फोटोसाठी सर्वजण एकत्र शिखरावर असू , असे जायचे आहे. एक member already गळाला. असो, पण आम्ही पुढे चालत राहिलो. पाय उत्तम होते, श्वासही लयीत, हा फक्त एक mental, patience चा खेळ चालू आहे, आणि तो काही केल्या आपण सोडायचा नाहीये इतकेच कळत होते.
12.JPG
काही वेळातच आमच्या पाठी मावेन्झीच्या बाजूने तांबडे फुटले. जे काही आकाशात दिसत होते ते कॅमेरात काही अंशीच उतरवता आले असते. डोळ्यांत ते साठवून घेतले. सूर्योदय झालाय म्हणजे ६ वाजून गेले, अजून किती वाट राहिली आहे वगैरे काही न विचारता अजूनही guides वर आंधळेपणाने विसंबून चालत होते. खरेतर ज्या वेगाने चालत होतो त्यापेक्षा १० टक्के वेग तरी आमच्यातील काहींना सुरुवातीपासूनच निश्चित वाढवता आला असता पण ते सुचलेच नाही किंवा भीतीने केले नाही. काही वेळाने परत फिरणारे लोक दिसू लागले. हाफ मॅरेथॉनला साडेबारा मैल संपल्यावर जसे वाटते तसे वाटू लागले. आता किती अंतर उरले, किती वेळ लागेल वगैरे विचारले तर प्रत्येक guide वेगवेगळी उत्तरे देत होते, सगळ्यांचाच भयंकर राग आला. David ला म्हटले आता काही सांगूच नकोस आणि तोच Gilman point ची पाटी अचानक दिसलीच - १८६५२ फूट फक्त ! पाटी तर दिसली तर तिथे पोहोचेपर्यंत अजून काही वेळ लागला पण नवीन उत्साहात तो कधी गेला ते कळलेच नाही आणि अखेरीस ९:३० च्या दरम्यान आम्ही किलीमांजारोच्या माथ्यावर रिमच्या एका बाजूला होतो. उभ्या कड्यासारखा चढ संपला होता. समोर बर्फाचा अथांग crater दिसत होता. आता रिमच्या कडेने पुढची २०० मीटर उहूरुपर्यंत gradual height चढत जायची एवढेच डोक्यात होते. ७-८ महिने करत आणलेला प्रवास अचानक संपत आला होता, आत चाललेला कल्लोळ थांबून अचानक शांत शांत झाले होते.
क्रमश:.. https://www.maayboli.com/node/81006
13.jpg

गिलमन पॉइंटला ९:३० ला फक्त मीच पुढे उहूरुपर्यंत जाऊया म्हणून उत्साहात होते, बाजूला रिम दिसत होते आणि खुणावत पण होते. निलाद्री आधी उत्साहात दिसला पण नंतर नको म्हणाला. परांजप्यांनी अख्खा ट्रेक गाऊटमधला ग सुद्धा उच्चारला नव्हता, पण तरी ते ही नको म्हणाले. शक्य असते तर मी त्यांना "You too Brutus ?" म्हटले असते. या क्षणीसुद्धा डेविड आणि वॉलेस यांची पुढच्या वेळेबद्दल आणि अंतराबद्दल एकवाक्यता नव्हती. तरी फार तर १ दीड तास अजून . माध्यान्हीच्या आधीच तिथे पोहोचले असते. परत यायला २ तास, किबो हट पर्यंत उतरायला २-३ तास. पुढे होरोम्बोला १२००० फुटांपर्यंत उतरेपर्यंत अजून ३ तास. रात्री ८:३० पर्यंत का होईना मुक्कामी पोहोचलो असतो. एका क्षणात मनात हिशोब झाला पण सगळेच स्थिरावले होते. डोंगरमाथ्याला पोहोचलो आहोत तर कुणाचाच पाय अजून पुढे उहूरुपर्यंत रेटेना. अदिती आणि मिहीर सोडले तर उरलेले ४ जण माझ्यापेक्षा बरेच मोठे. Age does take toll on you. आता call माझा होता, मी एकटीच guide बरोबर जाते म्हटले तर शक्य होते पण कच खाल्ली, group बरोबर रहायचे ठरवले. गाईडसुद्धा अजिबात प्रोत्साहन देत नव्हते. ७:३० - ८ लाच गिलमन पॉइंटला पोहोचलो असतो तर निश्चित पुढे गेले असते. इतके हळूच जायचे होते तर रात्री १२:३० च्या ऐवजी १० लासुद्धा चढायला सुरु करण्याची माझी तयारी होती. guides च्या अतीव ढिसाळपणाने आणि माझ्या वेळेच्या बाबतीतल्या ignorance ने ही वेळ आणली. त्यांनी सर्वांना एकाच अतिसंथ वेगाने चालवले. ज्यांना शक्य होते किमान त्यांना तरी पुढे जाऊ द्यायला हवे होते. आमच्या group मधल्या सगळ्या analysts नी ही time management इतक्या lightly कशी घेतली याचे वैषम्य वाटले. guides च्या मूर्खपणाचा, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकल्याने स्वतःचाच चिक्कार राग आला. पाय -फुफ्फुस आणि instinct सगळे तयार असताना शेवटच्या २ तासांसाठी - २०० मीटरसाठी हा जिंकत आणलेला डाव थोडक्यासाठी हरले अशी भावना झाली.
१९००० cross केले नाही तरी १८६५२ फूटही वाईट नाही. आई -बाबा, आनंद - मिहीर आता आपलाच विचार करत असतील या कल्पनेने छान वाटले. या सगळ्यात काही ना काही प्रकारे सामील असणारे Orlando चे सगळे मित्रमंडळ एकदमच आठवले. मावेन्झी हट ला केलेले Parody song म्हटले - mood जरा light झाला. सभोवार बर्फच बर्फ होते आणि भीषण शांतता. गिलमन पॉइंटचे ते काही क्षण जरा जड अंत:करणाने का होईना पण साजरे केले.
उपाध्ये मंडळींकडे १२ वर्ष सोबत असणारी त्यांची कुत्री त्यांचा प्रवास सुरु व्हायच्या अगदी आदल्या दिवशीच वारली होती. त्यांनी तिच्या फोटोसह तिथे फोटो काढले. म्हणजे - हे सगळे दु:ख मनात ठेऊन गेले ७-८ दिवस ही मंडळी प्रवास करत होती या कल्पनेने काटा आला. DS , निलाद्रीपण शांत होते. परांजपे तर दिसलेच नाहीत, बहुदा खाली उतरायला लागले होते. प्रत्येकालाच तिथे काहीतरी वेगळी अनुभूती मिळत असणार.
परतीचा प्रवास चालू केला. आता ridge वरून स्कीईंगसारखे घसरत खाली यायचे होते. थोडे समाधान, थोडा राग, थोडी शांती अशा संमिश्र भावनेत ते ridge उतरायला सुरुवात केली. भुसभुशीत मातीवर sticks रुतवत भसाभस ridge उतरू लागले. १९००० फूट क्रॉस न केल्याने मनात साचलेल्या रागाला उतरताना मुक्तद्वार मिळाले. रडू येईल असे वाटले पण आले नाही. गेल्या काही वर्षांत पूर्ण समर्पित होऊन, तन मन अर्पण करून इतक्या इर्षेने काही केले नव्हते, पण आता तसे काहीसे घडून गेले असे क्षणभर वाटले. ७-८ महिने वाट बघून, एक रात्र प्रसववेदनेत काढून एक जन्म घ्यायचा - द्यायचा आणि जन्मलेले क्षणातच विरून गेल्यावर लगेच निर्लेप, सगळ्यापासून अलिप्तसुद्धा व्हायचे असा काहीसा मनाचा प्रवास झाला. असेच अलिप्त होत होत आधी किबो हट , तिथून होरोम्बो हट आणि मग उरलेला सगळा परतीचा प्रवास झाला.
असो, या ब्लॉगच्या निमित्ताने हा प्रवास मनातल्या मनात पुन्हा एकदा करून झाला. हळूहळू या स्मृती विरळ होतील तत्पूर्वी पंचेंद्रियांनी आणि त्याच्या पल्याड जे जे काही अनुभवास आले ते जमेल त्या शब्दांत पकडायचा यत्न केला, ते बरेच झाले असे वाटते. दुर्गाबाई भागवत लेखन संपले की जो अनुभव येतो त्याबद्दल लिहिताना म्हणतात तसे सर्व काही आवरून तृप्त मनाने सुपारी चघळत भिंतीला टेकून बसले आहे - यानंतर पुढे कोणत्या अनुभवांचे ताट येणार आहे याची स्वप्ने पहात. इति किलीमांजारो अध्याय सुफळ संपूर्ण ।
14.jpg

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...