https://manchali3.blogspot.com/2018/09/blog-post.html
दूधसागर ट्रेक
ठिकाण - गोवा
चढाई श्रेणी- मध्यम कठीण
दिनांक - १ सप्टेंबर २०१८
दूधसागर धबधबा थोडक्यात माहिती- आपल्या भारत देशात गोवा राज्यात दूधसागर हा धबधबा आहे. कर्नाटक राज्यातून वाहत येणारी मांडवी नदी गोवा राज्यातून वहाते. या नदीला गोमती नदी असेही म्हणतात.मांडवी नदीच्या उगम स्थानावर दूधसागर हा धबधबा आहे.गोव्यातील ब्रिगांझा घाटामध्ये हा दूधसागर धबधबा आहे. दूधसागर धबधबा सुमारे १०३१ फूट इतका उंच आहे. चेन्नई एक्सप्रेस या शाहरुख-दीपिकाच्या सुंदर हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे हा धबधबा जरा जास्त प्रसिद्ध झाला आहे.
कातळधारा ट्रेकनंतर अजून एका धुव्वाधार पावसाळी ट्रेकच्या प्रतीक्षेत आम्ही ट्रेकर्स असतानाच दूधसागर ट्रेकचा दिवस उजाडला आणि दिवाळीच्या सणाला शाहीस्नानाची वेळ होते तशी शाहीट्रेक करण्याची वेळ आली होती. कारण दूधसागर ट्रेक म्हणजे इतर धबधब्यांमध्ये तसा प्रशस्त विस्तारलेला आणि देखणा धबधबा असल्याने या ट्रेकला शाहीट्रेक म्हणावे वाटते. दूधसागर हे ठिकाण गोवा राज्यात असल्याने आणि दूर असल्याने रेल्वेचे बुकिंग ३ महिने आधी करावे लागले होते. त्यामुळे माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा ८४वा ट्रेक होता. त्यानंतर २ट्रेक झाले परंतु हा नियोजित ट्रेक आधीच बुक असल्याने याचा क्रमांक ८४ वा होता. दूधसागर ट्रेक हा जून ते सप्टेंबर या कालावधीत केल्यास जास्त अल्हाददायक होतो. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होत असल्याने पावसाळी ट्रेकची मजा कमी होते. कारण पाऊस नसेल तर फेसाळणारे पाणी कुठून येणार आणि नावाप्रमाणे दूधसागर कसा दिसणार त्यामुळे सप्टेंबर नंतर गोव्याचे जंगल, गोव्याचे सौन्दर्य आपण अनुभवू शकतो परंतु दूधसागरचे फेसाळलेले देखणेपण आपल्याला अनुभवता येणार नाही.
दूधसागर धबधबा मोबाईल नकाशानुसार निगडीपासून सुमारे ४५० कि. मी. वर आहे. माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे आयोजित ८४ व्या दूधसागर ट्रेकसाठी आम्ही सर्व माऊंटेनियर्सनी ३१ ऑगस्ट २०१८ दुपारी अडीचच्या सुमारास घरातून निघून पुणे स्टेशन गाठले.
म्हणता म्हणता सर्व ट्रेकर्स आपापले लगेज घेऊन अगदी वेळेत हजर होते. पुणे स्टेशनला आमची एच.निजामुद्दीन-वास्को एक्सप्रेस येईसस्तोवर उत्साही चेहऱ्याने ग्रुप फोटो,आणि वेळजाऊ फोटो घेत होतो.महाराष्ट्राबाहेरचा दूरचा माझा हा पहिलाच ट्रेक होता. संध्याकाळी ५च्या सुमारास आमची एक्सप्रेस येऊन ती ५:२०च्या सुमारास गोव्याकडे निघाली. अजून सूर्यास्त व्हायचा असल्याने आम्ही लगेच वेळ न घालवता एकीकडे अंताक्षरी आणि दमशेराज खेळ सुरु केले आणि एकीकडे बाहेरचे निरीक्षण आणि फोटोग्राफी सुरु होती. सासवडनंतर एका ठिकाणी वळणावर ट्रेनचा छान फोटो घेता आला अगदी नागमोडी नागिणीच्या शेपटीप्रमाणे ती ट्रेन भासली.
आमचा १०-१२ जणांचा कल्ला ऐकून अजून काही जण आमच्यातलेच दुसरीकडे बसलेले आम्हाला सामील झाले आणि मग तर दमशेराजला अजून गम्मत येऊ लागली. म्हणता-म्हणता केव्हा रात्रीचे ८ वाजून गेले समजले नाही.
पहाटे ४ वाजता आमच्या ट्रेकस्टेशनवर पोहोचणार होतो त्यामुळे जरा लवकर जेवण करून झोप घ्या अशी सूचना ट्रेक लीडर्सने केली त्यानुसार आम्ही ९ वाजता घरून आणलेले जेवण करून घेतले आणि ११च्या सुमारास आपापल्या जागी झोप घेण्यास गेलो खरे परंतु रात्री १ वाजेपर्यंत एकतर पॅसेंजर ट्रेन मध्ये चढल्यावर कल्ला करीत होते नाहीतर इतर कुणीतरी सारखे काहीकाही कारणाने जाग आणीत होते. आम्हाला रात्रीचे फक्त २ तास झोप मिळाली असेल. पहाटे ४च्या आधी सगळे आम्ही तयार होऊन बसलो आणि ट्रेन थोडा उशिरा पोहोचणार आहे असे समजल्यावर काहीजण पुन्हा आपल्या जागेवर जाऊन लुडकले. काही जण ट्रेनच्या दारात उभे राहून अंधारात दूधसागर दिसतो का याची प्रतीक्षा करीत होते. दूधसागरला पोहोचवायचे असल्यास कुलें, सोनालीयम, या स्टेशन वर उतरून गाईड घेऊन जावे लागते. परंतु जशी गोव्याची हद्द सुरु झाली तशी प्रत्येक स्टेशनवर दूधसागर धबधब्याला जाण्यास सक्त मनाई असल्याने कोणीही कुलें स्टेशनवर उतरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल अश्या माईकवर सूचना ऐकू येत होत्या. ट्रेन मध्ये ५-७ पोलीस होते ते देखील आम्हाला वारंवार सूचना करीत होते. मनातून धीर खचत चालला होता. इतक्या दूर येऊन जर दूधसागर ट्रेक झाला नाही तर मग आमची झोळी रिकामीच राहणार होती. परंतु आमचे ग्रेट लीडर्स नेहमीप्रमाणे काहीतरी शक्कल लढवून काहीनाकाही सोय करतील अशी आशा आम्हाला असते.
ट्रेनच्या दारातून आणि खिडकीतून त्या गुडूप अंधारात देखील काहींना दूधसागरने दर्शन दिले त्यामुळे त्याची शुभ्रता तिथेच जाणवली. जवळून पाहायला अनुभवायला काय मजा येणार आहे याची झलक मिळाली. आता मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आम्ही पहाटे साडेपाचच्या सुमारास कुलें स्टेशनवर उतरलो. दूधसागरच्या जवळच्या स्टेशनवर उतरू दिले नाही त्यामुळे आम्हाला आता जरा जास्तीचे ट्रेकअंतर चालून जाणावे लागणार होते.त्या स्टेशनवर १-२ गाईडदेव दिसले. त्यातून आम्ही कृष्ण जन्माष्टमी जवळ आल्याने कृष्णा गाईडला फिक्स करून, हो म्हणून कुलें गावात जाऊ लागलो.
गाव तर अजून झुंजू-मुंजूच होते. हे वातावरण सगळ्यांनाच आवडते. छोटेसे गाव त्यात ती हिरवी गर्द झाडी. स्वच्छ पावसामुळे चमकणारे छोटे छोटे रस्ते. बऱ्याच ठिकाणी शेणाचे पोहटे पडलेले दिसले म्हणजे अजून देखील खेड्यात काँक्रीटीकरण झाले असले तरी किमान गाईगुरे आहेत हे पाहून खूप छान वाटले.सकाळी ६ वाजता आम्ही उडपी प्युअर व्हेज या घरगुती छोट्या हॉटेल मध्ये चहा घेऊन ट्रेकला सुरुवात केली. कुलें गावात चर्च, खरा हत्ती, हत्तींच्या प्रतिकृतीच्या सुंदर कमानी पाहावयास मिळतात.
दूधसागर धबधब्याकडे जाताना मोठमोठे ओढे ओलांडून जावे लागत असल्याने कुलें गावातून रेन्टवर सेफ्टी-जॅकेट घेऊनच निघालो. गाव सोडून लगेचच घनदाट जंगल सुरु झाले. पावसाने रिमझिम सुरु करून कमानीतच आमचे स्वागत केले. घनदाट जंगल सुरु झाल्याने मला मात्र जळवांची प्रचंड भीती वाटत होती. कारण ऐकले होते की या जंगलात जळवांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जरा काही वळवळले के जळूचाच भास होत होता.
कृष्णा गाईड जरा जास्तच फास्ट आणि गमतीशीर होता. तो स्वतः स्लीपर घालून थ्री-फोर्थ घालून होता, ना जाकेट ना रेनकोट ना टोपी. फक्त संपर्कापुरता एक मोबाइल त्याच्याजवळ होता. मला त्याने त्या दिवसापुरते पी. टी. उषा नाव दिले. परंतु माझे त्याचे एक मिनिट पटत नव्हते. सारखा माझी खोड काढून डोक्यात जात होता परंतु तो त्या दिवसापुरता आमचा देव होता त्यामुळे मी गप्प तो सांगेल ते ऐकून घेत होते.
अंदाजे एक कि.मी.गेल्यावर कृष्णाने ट्रेनच्या पटरीवरून आम्हाला चालायला लावले. त्याला कोणत्या वेळेला ट्रेन येते ते बरोब्बर माहित होते. परंतु आम्ही इतके वेगात चालत असताना तो आमच्या अर्धा कि. मी. मोगलीसारखा तुरुतुरु पळत होता आणि उलट मलाच पी. टी. उषा म्हणत होता. त्याला दोराने बांधून आमच्यासोबत ठेवावे म्हणजे तो थोडा हळू चालेल असे वाटत होते. पण आपण त्याच्या राज्यात होतो म्हटल्यावर कुठे “आ बैल मुझे मार” करता. आम्ही आपले गुलाबाची फुले ओलांडीत काळजीने जात होतो की जेणे करून केक कापू नये. या ट्रेनच्या टॉयलेटच्या सोयीचे काहीतरी करावयास हवेच. एकतर आम्हाला त्या पटरीवरून चालणे कठीण जात होते शिवाय बाजूने खडीवरून चालावे लागत होते. ट्रेन आली तर बाजूला फार क्वचित ठिकाणी छोटी पायवाट असे. त्यामुळे पटरीवरून काहीही करून खाली उतारण्याशिवाय पर्याय नव्हता. रेल्वेरुळांच्या दुरुस्तीच्या वेळी रेल्वेखात्यातील कामगारांना या अश्या ठिकाणी काम करावे लागत असेल ते वेगळेच.हॅट्स ऑफ टू रेल्वे खाते.
आमच्यामध्ये आता चालीच्या वेगानुसार २ ते ३ ग्रुप आपोआपच पडले होते. पहिल्या ग्रुपमध्ये मंदार सर राणे सर,कविता, दिनेश,निलेश, नितीन, विनोद, अपर्णा, अमित, परवीन,संदेश, मनोज धोके, गोपाळ,असे आम्ही आणि आमच्यासोबत आमचा गाईडदेव कृष्णा होता. त्या पटरीवरून चालताना मात्र कसरत करावी लागत होती.अजून अर्धा ट्रेक झाला नाही तर पाय आत्ताच दुखू लागले होते. अंदाजे ३ कि.मी कसरत केल्यावर कृष्णा गाईडने मात्र आम्हाला घनदाट जंगलात उतरावयास सांगितले. तिथे नदीच्या पाण्याचा आवाज येत होता. नदीचे पात्र मोठे होते. हीच ती मांडवी किंवा गोमती नदी होती. जिच्या उगमस्थानी दूधसागर धबधबा आहे. धबधब्यापासून आम्ही अजून सात ते आठ कि.मी अंतरावर होतो. नदीजवळ ५मिनिटे थांबून पुढच्या वाटेला निघालो.
आम्ही भगवान महावीर अभयारण्यातून जात होतो. कच्चा रस्ता, उंच हिरवीगार झाडी, थंड वातावरण, अधून मधून पावसाच्या सरी झेलीत आम्ही चालत होतो. इथे बोलेरो गाडीतून छोटा ग्रुप घेऊन देखील जाता येते. गाईडला तसे सांगून गाड़ीची सोय होते. परंतु आम्हाला घनदाट जंगलातून ट्रेक करावयाचा होता. त्यामुळे आम्ही कृष्णाच्या मागे-मागे चालत नव्हे पळत राहिलो. हा मोगली कृष्णा मधेच गायब व्हायचा आम्हालाच त्याला हाक मारून थांबवावे लागत असे. एक क्षण आम्ही गाईड आहोत की तो गाईड आहे समजतच नव्हते असला अवली होता तो. जंगल पार करताना एका ठिकाणी एक मोठे वृक्ष कोलमडून पडले होते मला ते अगदी अनाकोंडाप्रमाणे भासले.
निसर्गाकडे आपण जितक्या सौंदर्यदृष्टीने बघू तितका तो आपल्याला जास्त सुंदर दिसतो आणि मुळात तो असतो आणि आहेच. पाऊस पडून अनेक ठिकाणी चहाच्या रंगाची तळी साठली होती. त्या गडद रंगात देखील आमच्या प्रतिमा खूप छान उठून दिसत होत्या.
सकाळी ६ला सुरु केलेला ट्रेक आम्ही गाईडने सांगिल्याप्रमाणे त्याने ठरवलेल्या सकाळच्या नाश्त्यासाठी ३ तासाच्या नॉनस्टॉप चालीनंतर ९च्या सुमारास आम्ही गणपती मंदिर, दूधसागर मंदिर आणि एक धर्मशाळा असलेल्या ठिकाणी थांबलो. प्रत्येकाच्या पाठीवर ५-७ किलोचे लगेज होते कारण लगेज ठेवण्याची तशी सोय नव्हती. आम्ही पुन्हा कुलें गावात जाणार नव्हतो त्यामुळे जवळ पर्याय नसल्याने ३ तास प्रत्येकजण ते जड ओझे काही केल्या घेऊन फिरत होता.नाश्त्यासाठी थांबल्यावर ती जड बॅग पाठीवरून खाली ठेवल्यावर पाठीला काय सुख मिळाले आमचे आम्हाला माहिती.
चहा नास्ता झाल्यावर आता मात्र आम्ही त्या जास्तीच्या वजनाच्या बॅगा तिथल्या छोट्या खोलीत ठेऊन आम्ही सेफ्टी जॅकेट आणि आमचे रेनकोट घालून १ पाण्याची बाटली सोबत घेऊन पुढच्या वाटेला निघालो. कृष्णाच्या अंगात हळूहळू आता शंकर संचारू लागला होता. चिर्कुट मध्ये मध्ये नुसता चिडत होता. ट्रेकर्सचा वेग काय एकसारखा नसतो त्यामुळे मागेपुढे होत होते.इथून दूधसागर धबधबा जवळपास साडेचार कि. मी. अंतरावर होता. एक मोठा ओढा पार करताना तिथे आधीच नायलॉन आणि तारेचा रोप लावला होता. पाण्याचा प्रवाह थोडा जास्त होताच. त्यामुळे दोर सोडायचा नाही आणि पाय पाण्यातून बाहेर काढून टाकायचा नाही अंदाज घेत लीडर्सच्या आणि गाईडच्या सूचनांचे पालन करीत जायचे.
दूधसागर धबधब्याच्या हद्दीजवळ गेल्यावर अजून घनदाट आणि चकवा लागणारी वाट लागली. गाईड न घेता इथे कुणीही जाऊ नये. एका ठिकाणी कृष्णा गाईड अचानक गायब झाला. हाक मारून दमलो. शेवटी आमचे मागे असलेले ट्रेकर्स येईस्तोवर थांबलो. तो अर्धा कि.मी पुढे जाऊन पुन्हा मागे आला मग थोडा वेळ कृष्णाची गोड बोलून शाब्दिक धुलाई केली.
थोडा त्याला त्याच्याच भाषेत चण्याच्या झाडावर चढवले. “क्या कृष्णा तू भी भाग रहा है और हमें भी भगा रहा है, तू आज हमारा भगवान है थोड़ा सब को आने दे फिर चल”.त्यानंतर मात्र तो सगळे आल्याशिवाय चल म्हंटलं तरी निघायचाच नाही. अर्धा कि.मी.ची दूधसागर दरी उतरल्यानंतर मात्र वर जो दूधसागर धबधब्याचा नजारा दिसला तो शब्दात वर्णन करणे कठीण आहे. ब्रिगांझा घाटातील दरी, त्यात तो ३-४ कमानींचा प्रशस्त पूल त्यातून वाहणारा तो दूधसागर धबधबा आणि आम्ही बॅनर फोटो घेत असताना अगदी त्याच वेळी दुधात साखर म्हणजे त्या पुलावरून रेल्वे नागमोडी वळणे घेत झुकझुक आवाज करीत हॉर्न वाजवीत चालली होती. तिचा नाद पूर्ण दरीत घुमत होता. आम्ही दरीमध्ये जल्लोष करणारे ट्रेकर्स आणि रेल्वेतून वरतून आम्हाला सगळ्या प्रवाश्यांचे टाटा करणारे हात दिसत होते. अर्धा ट्रेक सफल झाल्याचे समाधान तिथेच मिळाले होते. नियोजक,लीडर मंदार सर, रोहित सर,राणे सर,अनिल सर, निकाळजे सर की जय हो.
दरीमध्ये एका बाजूला छोटीशी जागा आहे तिथे मात्र जरा जास्तच जपून जावे. सेफ्टी जाकेट घालणे अत्यंत गरजेचे आहे. इथे खूप कमी ट्रेकर्स येत असल्याने दरीतील खडक फारच घसरडे आहेत त्यामुळे चुकून कोणी घसरले तर किमान सेफ्टी जाकेटमुळे जीव तरी वाचेल. आता मात्र दूधसागरचा वरचा टप्पा बाकी होता त्यामुळे उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. दरीतून एकूण एकाला येऊन दिल्यानंतरच आता वर धबधब्याच्या दिशेने जंगलातून निघालो. चांगलाच चढ असल्याने आता सगळ्यांनाच जरा कठीण जात होते परंतु दूधसागरची ओढ मात्र सपासप वाट काढीत होती.
अर्ध्या पावून तासात पुन्हा आम्ही पटरीवर आलॊ दोन्ही बाजूला दोन बोगद्यामध्ये आम्ही. जोरदार पावसाच्या सरीने आमचे स्वागत केले. आम्ही डाव्या बाजूच्या बोगद्यातून सरळ जाऊ लागलो. डाव्या बाजूला खोल दरी आणि उजवीकडे भला मोठा दुधाच्या सांडव्याप्रमाणे तो दूधसागर धबधबा नजरेस पडला आणि डोळ्याचे पारणेच फिटले. चार थरात विस्तारलेला दूधसागर इतका मोठा आणि देखणा धबधबा आम्ही पहिल्यांदा पहिला.
गोमती नदीच्या प्रवाहातून हे पाणी ज्या वेगाने पडून दुधाप्रमाणे पांढरे शुभ्र दिसते आणि चार थरामध्ये हा धबधबा अथांग समुद्राप्रमाणे विस्तारला गेला आहे म्हणून याला दूधसागर हे नाव पडले असावे. चेन्नई-एक्सप्रेस या हिंदी चित्रपटामुळे हा धबधबा खूप प्रसिद्ध झाला आहे. मला आधी वाटायचे की हे ठिकाण चेन्नईमधेच आहे. परंतु खरे तर गोवा राज्यात हा सुंदर असा धबधबा आहे.
१२च्या सुमारास तिथे पोहोचलेलो आम्ही मनसोक्त फोटोग्राफ़ी करीत बसलो आणि धबधबा डोळ्यात साठवीत बसलो. खाली दरीत आम्ही ज्या ठिकाणी आधी गेलो ती जागा वरून खूपच लहान दिसत होती. वरच्या पुलाच्या कमानी अतिशय सुंदर आणि मजबूत अशा बांधल्या आहेत. तिथे एके ठिकाणी आधारासाठी रेलिंग लावले आहे त्यावरदेखील लोकांना बसायची इच्छा होते आणि मग असेच जीव गमावतात आणि शिस्तीत जाणाऱ्या ट्रेकर्सना अश्या सुंदर ठिकाणी जाण्यास मुकावे लागते.निसर्गाला त्रास न देता, कमी न लेखता त्याचे सौन्दर्य न बिघडवता निसर्गाचा आंनद घ्या. मग आपण निसर्गाचे आणि निसर्ग आपला.
बॅनर फोटो, सोलो फोटो, ग्रुप फोटो, ट्रेन आली की ट्रेन सोबत फोटो, काही विचारू नकात. प्रत्येकाच्या आनंदाला उधाण आले होते. एकीकडे दूधसागरचे दूध ओसंडून वाहत होते तर एकीकडे आम्हा ट्रेकर्सचा आनंद ओसंडून वाहत होता. ग्रेट लीडर्स हो, मनापासून धन्यवाद तुम्हाला इतक्या स्वर्गमयी ठिकाणी आमचा ट्रेक घडवून आणलात. एक तास कसा गेला समजलेच नाही. वेळेचा अभाव असल्याने आम्ही १च्या सुमारास तिथून अगदी जड अंतःकरणाने दूधसागरचा निरोप घेतला आणि पुन्हा पटरीवरून चालू लागलो. आता मात्र सगळ्यांना भूक लागल्याने जो तो आपल्या तंदरीतच चालत होता. त्यामुळे येताना असलेले ग्रुप तसेच्या तसे नव्हते. कोणीही कोणाही सोबत होते. कारण आता निशाणा लावून गोळ्या मारून धबधब्याची शिकार करून झाली होती. आता जेवणाची ओढ लागली होती. परंतु जवळपास साडेचार कि.मी. चालवायचे होते.
आमचा कृष्णा गाईड मात्र स्वतःहून त्याच्या मोबाइलने चक्क आमचे फोटो काढीत होता.आम्ही चुकून आमचा फोटो काढ म्हंटलं की मग मात्र जास्त भाव खायचा. मग त्याला धमकी दिली जायची ब्लॉग मध्ये तुझे नाव लिहिणार नाही तर म्हणतो, "नाम मत लिखो बस मेरा काम लाखो".तो पक्का बोलबच्चन होता परंतु आपल्या पुणेकरांपुढे कमीच पडणार ना तो. आम्ही दूधसागरचा निरोप घेतला तरीदेखील जसजसे आम्ही एक एक कि.मी दूर जात होतो तस-तसा तो दुरून हात वर करून जणू काय टाटा करीत होता. येताना ३-४ टप्प्यांवर पुन्हा पुन्हा दिसला पुन्हा-पुन्हा वेगवेगळी फोटोग्राफी करण्यात आली.
सव्वादोनच्या सुमारास आम्ही सोनालीयम रेल्वेस्थानकाजवळ एका छोट्या गावात जिथे आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या होत्या तिथेच आमच्या जेवणाची सोय होती. आम्ही पटापट ओले कपडे चेंज करून लगेच एका कौलारू घरात जेवण केले. जेवण साधेच होते, सांबार-भात, कोबीची भाजी, लोणचे -पापड इतकेच परंतु गरम जेवण भुकेल्या जीवाला पंचपक्वान्नांचा शाही स्वाद देऊन गेले. अन्नदाता सुखींभव:
नाही म्हटले तरी इतर १-२ छोटे ग्रुप दिसत होते.जेवण उरकल्यावर आम्ही सेफ्टी जॅकेट आणि बॅगा घेऊन तेथील दूधसागर मंदिराच्या पायऱ्यांवर थोडा वेळ बसलो त्यावेळी लीडर्सने पुढील सूचना दिल्या आणि सर्वजण एकत्र आल्यानंतर आमच्या एक्सप्रेसची संध्याकाळी ४ची वेळ झाल्यावर आम्ही तेथून निघालो. सोनालीयम स्टेशनजवळ आलो. आम्ही घेतलेले सेफ्टी जॅकेट मधील ४ जाकेट जेवणाच्या जागी राहिल्याने कृष्णाचा आता शंकर अवतार झाला. माझ्या तोंडून आपोआप शंकर नाव आले. ४ जॅकेट दुसऱ्या ग्रुपने नेले म्हणतो. ते चार घरांचे गाव त्याचेच, जेवण त्याचेच. तिथे कोणी दुसरा ग्रुप नव्हता तरी तो गाईड सरड्याप्रमाणे रंग बदलू लागला. जॅकेटच्या किमती सांगू लागला की जेणेकरून आमच्याकडून मिळाले तर मिळाले पैसे. परंतु आमचे लीडर्स आणि ट्रेकर्स देखील चलाख आहेत तो काहीही फेकेल आणि आपण झेलीत बसणारे आपण पुणेकर नव्हेच. त्याचा सगळा हिशोब त्याला देऊन त्याने काढलेले फोटोज किमान वॉट्सअँपला तरी मिळतील या आशेवर त्याचा निरोप घेतला आणि ५च्या सुमारास पुन्हा पुण्याकडच्या एक्सप्रेसमध्ये बसलो. जवळपास सतरा कि. मी. आणि इतर चाल २ कि.मी असा एकूण एकोणीस कि.मी चा मोठा ट्रेक आम्ही ३८ ट्रेकर्सने पूर्ण केला. (भूषण चौधरी आणि प्रेरणा यांनी पावले मोजण्याच्या छोट्या यंत्राने हे अंतर मोजले.. धन्यवाद ट्रेकर्स)
येताना पुन्हा दूधसागर ट्रेन मधून दिसणार हे माहित होते त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याला कॅमेऱ्यात कैद केले. ट्रेन मधून आम्ही ज्या मंदिरात गेलो होतो ते भगवे मंदिर या असंख्य दर्यांच्या पसाऱ्यात उठून दिसत होते.
आपण कुठून कुठे जाऊन आलो याचा अंदाज रेल्वे मधून आला.सोनालीयम, कॅसलरॉक, रेल्वे स्टेशने सोडल्यानंतर आम्ही बेळगावी प्रसिद्ध कुंदा विकत घेऊन तिथेच त्याचा आस्वाद घेतला. कुंदा, गुलाबजामून आणि कॉफीची बर्थडेची मी मिनी पार्टी दिली असे समजा. हाहाहाहा.... येताना लोंढा जंक्शनला वडापाव,भजी, मेदू-वड्याचा आस्वाद घेतला. कुंदा खरेदी करताना आमच्यातील तिघे त्यांचे तिघांचे फोन गाडीत ठेऊन खाली राहिले असे समजले तेव्हा आम्हाला भीती वाटली. परंतु थोड्याच वेळात कुठून तरी तिघे धूमकेतू सारखे समोर आले आणि आम्हाला हायसे वाटले. सकाळी पुन्हा आमची एक्सप्रेस पहाटे पोहोचणार असल्याने आणि आम्ही थकलो असल्याने जास्त दंगा न करता ११च्या सुमारास आपापल्या जागेवर जाऊन झोपी गेलो. पहाटे ४च्या सुमारास गाडी वेळेआधी पोहोचली. जसे आलो होतो तसेच आम्ही ५ वाजता घर गाठले. माझा दुसऱ्या राज्यातील असा मोठा ट्रेक उत्स्फूर्तपणे आणि यशस्विरीत्या पार पडला.
"जखेमवर जळू आणि मीठ लावण्यासाठीची खास टीप" -:लीडर रोहित सर आणि सौ वैशाली रोहीत, तसेच प्रतीक,विवेक,शेवाळकर सर, सागर,सायली, सुप्रिया, आणि या दूधसागर ट्रेकला न आलेले सर्वच ट्रेकर्सहो, तुम्ही अप्रतिम, सुंदर, उत्स्फूर्त, फँटॅस्टिक, अफलातून ट्रेक खूप म्हणजे खूप मिस केलात. रेल्वेमधील धमाल आणि ट्रेकमधील धमाल आणि मी दिलेली बर्थडे ट्रीटदेखील खूप म्हणजे खूप मिस केलीत . आपण आला असता तर या ट्रेकला चारचाँद लागले असते.
"जखेमवर जळू आणि मीठ लावण्यासाठीची खास टीप" -:लीडर रोहित सर आणि सौ वैशाली रोहीत, तसेच प्रतीक,विवेक,शेवाळकर सर, सागर,सायली, सुप्रिया, आणि या दूधसागर ट्रेकला न आलेले सर्वच ट्रेकर्सहो, तुम्ही अप्रतिम, सुंदर, उत्स्फूर्त, फँटॅस्टिक, अफलातून ट्रेक खूप म्हणजे खूप मिस केलात. रेल्वेमधील धमाल आणि ट्रेकमधील धमाल आणि मी दिलेली बर्थडे ट्रीटदेखील खूप म्हणजे खूप मिस केलीत . आपण आला असता तर या ट्रेकला चारचाँद लागले असते.
गोवा म्हंटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर फक्त स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे,किल्ले,चर्च, मंदिरे,खाद्यसंस्कृतीमध्ये खास करून मासे आणि बिअर असे सगळे डोळ्यासमोर येते. परंतु दूधसागर ट्रेकमुळे आम्हाला सुंदर घनदाट महावीर अभयारण्य अनुभवावयास मिळाले, हा प्रशस्त धबधबा अगदी जवळून पाहता आला कॅमेऱ्यात कैद करता आला. गोव्याची ही वेगळी ओळख नव्याने झाली. मी गोवा ट्रिप केली तेव्हा ५दिवस देखील कमी पडले होते किंबहुना गोवा अर्धेच फिरून झाले होते. इथे आम्ही एका दिवसाच्या ट्रेकमध्ये स्वर्गसुखाचा आनंद पदरात पाडून घेऊन आलो. दोन रात्रीत बारा-बारा तास रेल्वेचा प्रवास कसा झाला ते समजले देखील नाही. याचे पूर्ण श्रेय जाते ते आमचे ट्रेकचे नियोजन करणारे ग्रेट लीडर्स मंदार सर, राणे सर, रोहित सर,अनिल जाधव सर, आणि सर्प मित्र निकाळजे सर यांना आणि अर्थातच संपूर्ण ट्रेकर्सना देखील जाते कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आणि टिमवर्कशिवाय हा ट्रेक यशस्वी होणे अशक्य होते.अशक्य ट्रेक शक्य करून तो उत्तम घडवून आणण्यासाठी लीडर्सने काय जुगाड केले असेल ते त्यांचे त्यांना माहिती बाबा. माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स च्या १ सप्टेंबर च्या ८४ वा ट्रेकचे फोटोग्राफर्स प्रेरणा आणि ग्रुप, नितीन, युवराज-स्नेहल, विनोद, रवी नेमाडे, गोपाळ, दिनेश, मनोज धोके, राणेसर, भूषण चौधरी, मंदारसर,संदेश,निलेश,आकाश,शोभा,तनुजा, सागर, ज्ञानराजे-भाग्यश्री,सचिन दीक्षित, ऋतुजा,लष्करी सर, आणि सगळ्या ट्रेकर्सचे अप्रतिम अफलातून फोटोग्राफीसाठी अभिनंदन आणि उत्तम सहकार्यासाठी खूप खूप कौतुक.माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स रॉक्स...