| Prahaar.in
प्रत्येक गावाला, शहराला त्याचा एक इतिहास असतो. त्यामुळे
आगळ्या वेगळ्या नावांची गावेही आपल्या कायम स्मरणात राहतात. अशाच काही
वेगळ्या नावांच्या गावाची सफर आपल्याला घडवून आणणार आहोत.
>> साखरवाडी
महाराष्ट्र
राज्यातील सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील एक गाव. साखरवाडी
फलटणच्या ईशान्येस १५ किमी, तर सातारच्या वायव्येस सु. ६० किमी.वर असून
लोणंद-फलटण रस्त्यावरील बडेखाननामक थांब्यापासून उत्तरेस ६ किमी. वर आहे.
पूर्वी साखरवाडी भागाचा समावेश फलटण संस्थानातील होळ गावामध्ये होत असे.
साखरवाडी म्हणजे साखरेचे गाव. उद्योजक लक्ष्मणराव आपटे यांनी अमाल्गमेशन ही
कंपनी स्थापन करून येथील काही हेक्टर ओसाड जमीन खरेदी करून ती विकसित केली
आणि त्या ठिकाणी १९३३ मध्ये फलटण शुगर वर्क्स हा जिल्ह्यातील पहिला
आधुनिक साखर कारखाना स्थापन केला. १९३७-३८ मध्ये या कारखान्यात ५०,८५,१९१
रुपये एवढी गुंतवणूक करून २०,२०,९८९ रुपये किमतीची ९१,९४३ पोती, तर १९४६-४७
मध्ये ९४,९०,६२५ रुपये गुंतवणूक करून ४६,१९,१६२ रुपये किमतीची ७९,६२० पोती
इतके साखरेचे उत्पादन केले. सन १९५७-५८ साली या कारखान्याची प्रतिदिन
गाळपक्षमता ८०० ते १,००० मे. टन होती. साखर कारखान्याशी निगडित काही
व्यवसाय येथे सुरू करण्यात आले. त्यांत कॅडबरी-चॉकलेट निर्मिती महत्त्वाची
आहे. १९८५ मध्ये या कारखान्याचे सहकारी तत्त्वावरील कारखान्यात रूपांतर
करण्यात आले. या कारखान्यामुळे साखरवाडीत हायस्कूल, वाचनालय, क्रीडांगण,
जिमखाना, रुग्णालय, दवाखाने, गुरांचा दवाखाना, मागासवर्गीय
विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, बँका वगैरे सुविधा आल्या आहेत.
>> विटा
महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यांतील खानापूर तालुक्याचे मुख्य
ठिकाण. सातारा शहराच्या आग्नेयेस सु. ७५ किमी., कराडच्या पूर्वेस ४२. तर
तासगावच्या उत्तरेस २९ किमी. वर हे असून तालुक्याच्या साधारण मध्यवर्ती व
विटा आणि येरळा नद्यांदरम्यानच्या काहीशा खोलगट भागात ते वसलेले आहे. येथे
गुहागर-चिपळूण-कराड-विजापूर आणि शिंगणापूर-बेळगाव हे दोन रस्ते एकत्र
येतात.
विटय़ापासून पश्चिमेस ११ किमी. वर येरळा नदीचे पात्र आहे. छत्रपतींच्या प्रतिनिधीचे वास्तव्य येथे होते. त्रिंबक कृष्ण यांनी एक वाडा येथे बांधला. विटय़ाला येण्यापूर्वी ते पन्हाळगडच्या प्रतिनिधींचे कारभारी होते. सध्या या वाडय़ाचे केवळ भग्नावशेष आढळतात. त्रिंबक कृष्ण यांनीच येथील त्रिंबकेश्वर मंदिर बांधले असे सांगतात.
विटा हे तालुक्यातील प्रमुख वाणिज्य व व्यापारी केंद्र आहे. सोमवार व गुरुवार असा दोनदा बाजार भरतो. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, उडीद, तूर, भुईमुग शेंग, मिरची, हळद यांचा व्यापार येथे चालतो. येथील गुरांचा बाजारही मोठा असतो. नगरात पूर्वीपासून विणकाम व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालत आहे. पूर्वी नगराभोवती ६.०९ मी. उंचीची दगड व मातीतील भिंती होती व तिला पूर्वेच्या व पश्चिमेच्या बाजूला दरवाजे होते. १८५४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सोयी येथे आहेत. भैरवनाथ (ग्रामदैवत), विठोबा, मारुती, गणपती, दत्तात्रय, त्रिंबकेश्वर यांची मंदिरे नगरात आहेत.
>> रेवदंडा
महाराष्ट्र
राज्याच्या रायगड जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध बंदर. हे अलिबाग
तालुक्यात चौलच्या नैऋत्येस रेवदंडा खाडीच्या मुखाशी वसलेले असून पूर्वी
‘खालचे चौल’ म्हणून ते ओळखले जात होते. सांप्रत रेवदंडा व चौल ही दोन
वेगवेगळी गावे आहेत. पूर्वीच्या अष्टांगरांपैकी हे एक असावे असे मानले
जाते. इ. स. सहाव्या शतकाअखेरील बादामीच्या चालुक्यांपैकी मंगलेश राजाने
रेवतींद्वीप जिंकल्याचा उल्लेख ऐहोळेच्या शिलालेखात आढळतो. ते द्वीप
म्हणजेच रेवदंडाक्षेत्र अथवा चंपावती (चौल) असावे असे म्हणतात. सोळाव्या
शतकात पोतुर्गिजांनी याचा व्यापारी बंदर म्हणून खूपच विकास केला होता.
परंतु कालांतराने गाळ साचल्याने व धरमतर बंदराच्या विकासामुळे, तसेच धरमतर
खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे रेवदंडय़ाचे व्यापारी महत्त्व कमी झाले.
सांप्रत याला जिल्ह्यातील मोठय़ा गावाचा दर्जा देण्यात आला असून येथून लहान
नावा व होडय़ा यांमधून वाहतूक चालते. या बंदरातून मुख्यत: नारळ व मासे यांची
निर्यात होते. गावात बँका, सार्वजनिक ग्रंथालय, दवाखाने, चित्रपटगृह व
माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असून येथील आगरकोट नावाचा किल्ला
प्रसिद्ध आहे.
>> जत
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या जत संस्थानची
राजधानी. हे साता-याच्या आग्नेयीस सु. १४८ किमी. व बेळगावच्या ईशान्येस
सु. १५३ किमी.वर आहे. तसेच येथून सु. १६ किमी. वरील जत रोड हे रेल्वे
स्थानक असून चिपळूण-गुहागर-विजापूर हा रस्ता जत जवळूनच जातो. याच्या
पूर्वेला सु. ५ किमी.वर रामपूर किल्ला व रामराव आबासाहेब डफळे यांची छत्री व
अनेक मंदिरे असून संस्थानी काळातील अनेक अवशेष येथे आढळतात.
भुईमूग, ज्वारी, बाजरी, कापूस, गहू, हरबरा इत्यादींची ही बाजारपेठ असून
येथे कांबळी व हातमागावरील कापड विणणे, पितळी भांडी बनविणे इ. अनेक घरगुती
उद्योग चालतात. शासनातर्फे येथे खिलार जातीच्या गुरांच्या पैदाशीचे केंद्र
उघडण्यात आले असून येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथे प्राथमिक आणि
माध्यमिक शाळा, दूरध्वनी, पुतळाराजे रुग्णालय व इतर दवाखाने आदी सोयी आहेत.
>> अंकाई टंकाई
नासिक जिल्ह्याच्या येवले तालुक्यातील ऐतिहासिक स्थान मनमाडच्या दक्षिणेस
१४ किमी. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई
(अनकाई) गाव आहे. गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत. पायथ्यापासून सु. ३२८
मी. उंच असलेल्या टेकडीचा माथा १६ किमी. परिघाचा आणि अवघड कडय़ांचा असून
त्यावर अंकाई किल्ला आहे. सात तटांच्या बिकट वाटेतून वर जावे लागते.
टंकाईच्या बांधणी भांडागारपद्धतीची आहे. शहाजहानचा सेनापती खान याने १६३५
मध्ये आलकापालका व अंकाई – टंकाई घेतल्याचा उल्लेख मिळतो. दक्षिणेकडील
गोदावरीचे खोरे व उत्तरेकडील गिरणेचे खोरे, खानदेश या मूलखांवर नजर
ठेवण्यासाठी अंकाई-टंकाई उपयुक्त असत. अंकाईवर तीन मंदिरे आणि ब्राह्मणी
लेणी असून टंकाईच्या दक्षिण बाजूस सात जैन लेणी आहेत. अप्रतिम कोरीव काम
असलेली ही लेणी सध्या भग्नावस्थेत आहेत.
>> सासवड
महाराष्ट्रातील
एक इतिहासप्रसिद्घ स्थळ. ते पुणे जिल्ह्यात पुण्याच्या आग्नेयीस सु. २७
किमी. वर कऱ्हा नदीकाठी बाबदेव व दिवे घाटातून जाणा-या जुन्या पुणे-सातारा
रस्त्यावर वसले आहे. या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही; तथापि हे बाळाजी
विश्वनाथ (पहिला पेशवा) याच्या काळापासून भट घराण्याचे (पेशवे घराण्याचे)
दक्षिणेकडील निवासस्थान होते. उत्तर पेशवाईतील पुरंदरे सरदारांचे हे मूळ
गाव होय. या गावात पेशव्यांचा जुना वाडा असून सांप्रत तेथे तहसील कार्यालय
आहे, तर पुरंदरे सरदारांचा वाडा संगमेश्वर मंदिराजवळ आहे. तो तटबंदीयुक्त
आहे. कऱ्हा आणि एक उपनदी यांच्या संगमावर संगमेश्वराचे भव्य मराठाकालीन
वास्तुशैलीचे मंदिर आहे. त्यांत भित्तिचित्रे, मूर्तिकाम व शिखरात
चुनेगच्चीतील प्रतिमा नाहीत. सासवडमध्ये इ. स. १८७९ मध्ये नगरपालिकेची
स्थापना झाली. नगरपालिका पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अन्य सुविधा पुरविते.
पाणीपुरवठा मुख्यत्वे कऱ्हा आणि कम्बळी या नद्यांतील पाण्याद्वारे होतो;
मात्र उन्हाळ्यात या नद्या आटत असल्यामुळे नगरपालिकेने जॅकवेलची व्यवस्था
कार्यवाहीत आणली आहे.
>> साक्री
धुळे
जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे गाव मूळचे पिंपळनेर
तालुक्यातील असून १८८७ मध्ये पिंपळनेर येथील तालुक्याचे मुख्यालय साक्री
येथे हलविण्यात आले व १९०८ मध्ये तालुक्याचे नावही साक्री करण्यात आले.
याच्या परिसरात गावित, कोकणा, भिल्ल, पावरा, मावची, कातकरी, वंजारी इ.
जमातींचे प्रमाण जास्त आहे. येथील हवामान उष्ण व कोरडे असून वार्षिक सरासरी
पर्जन्यमान ६० सेंमी. आहे. परिसरातील ऊस, कापूस, भुईमूग, ज्वारी इ.
शेतमालाची साक्री ही बाजारपेठ असून जिल्ह्यांतील या उत्पादनांची प्रमुख
बाजारपेठ म्हणून या शहराची ओळख आहे. साक्री तालुक्यातील भाडणे येथे
पांझरा-काना सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.