मधुवंतीचा मेसेज जेव्हा whatsapp वर पॉप झाला तेव्हाच मन स्पितीकडे धाव घ्यायला लागलं. तर झालं असं की लेडीज स्पेशल स्पिती टूर प्लॅन केली होती our only planet च्या मधुने. १५-१६ बायकांचा ग्रुप घेऊन जायचं धाडस नव्हे, वेडं धाडस करायचं मधुने ठरवलं होतं, त्यात आम्ही घरच्या ६ जणी. खरंतर हे ग्रुप टूर प्रकरण मला मुळीच पसंत नाही, मुक्त स्वछंदपणे फिरण्यावर बंदी म्हणजे अशा ग्रुप टूर असतात असं माझं मत! आपण मुक्त मुसाफिर, मन सांगेल तिथे मुक्काम आणि पळेल तिथे पुढचं गाव. अशा साचेबद्ध ट्रिपचं बुकिंग करायची हिम्मत शेवटी मी केलीच.
बघता बघता जायचा दिवस उजाडला. आमची ट्रिप सुरु होणार होती दिल्लीच्या ISBT हुन. पहाटे उठून मुंबई हुन आम्ही दिल्ली गाठलं, त्या आधी RTPCR आणि ऐनवेळी बदलणारी विमानाची वेळापत्रकं आणि इतर बारीक सारीक गोष्टी पार करत शेवटी आम्ही दिल्ली गाठलं. आम्ही सगळ्या प्रचंड excited होतो. एकतर घरातल्या ६ जणी प्रथमच एकत्र अशी ट्रिप करत होतो, त्यात मायलेकींच्या जोड्या म्हणजे भांडणं आलीच हे माहीतच होतं पण मजाही तितकीच करणार होतो. दिल्लीच्या भयंकर ट्रॅफिक ची प्रचिती लगेचच आली. आणि आम्ही 'दिल्ली दूरही' बरी म्हणत कसेतरी एकदाचे त्या बस स्टॅन्ड वर पोचलो. सकाळी ८. ३०ला शिमला गाठलं. लाल-हिरव्या छपरांच्या टुमदार घरांनी आमचं स्वागत केलं. हिमालयाची हि वेगळीच जादू आहे, तो पहिल्याच वेळी इतकं आपलंसं करतो की पुन्हा परतवंसं वाटत नाही. बबलूजी त्यांची टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आमची वाट पाहत थांबले होते, पुढचे काही दिवस हि आमची धन्नो आम्हाला स्पितीच्या खोऱ्यात सांभाळून नेणार होती.
आमचा प्रवास आता स्पिती च्या दिशेने सुरु झाला, शिमल्यात प्रथमतः भेटायला आलेली हि पाईन ची सुंदर सुंदर उंच झाडं आता आम्हाला प्रवासात सोबत करणार होती. थिऑग नावाच्या छोट्याश्या ठिकाणी पराठ्यांवर येथेच्छ ताव मारून आम्ही पुढे जात राहिलो, आजचा मुक्काम रकच्छम गावात असणार होता. ते अजून बरच लांब होतं, ह्या भागात छोटंसं अंतर कापायला पण खूप वेळ लागतो.
स्पितीचं खोरं इतकं अवघड का आहे ह्याचा अनुभव पहिल्या दिवसापासून यायला लागला. ह्या पहाडी भागात अगदी कसलेल्या डड्राइव्हर कडून सुद्धा चुका होऊ शकतात; आमच्या आयुष्याचं स्टेरिंग आम्ही बबलूजींच्या हातात देऊन रकच्छम ची वाट पाहत शांत बसून होतो, संध्याकाळी ७ च्या दरम्यान आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो, खूप प्रवास झाल्याने सगळेच खूप थकले होते. बस मधून उतरलो तर थंडीने अक्षरशः वाजायला लागलो, थंडी म्हणजे काय रे भाऊ म्हणणारे मुंबईचे आम्ही बापुडे अचानक बर्फात बुचकळले जातोय कि काय म्हणत कुडकुडत आवरायला गेलो. जेवण वगरे आटपून आजचा दिवस संपला.
पहाटे लवकर उठायच होतं. ४-४.३० ला जाग आली, रात्री अंधारात आल्याने आजूबाजूचा परिसर पाहता आला नव्हता. उजाडल्यावर नजरेसमोर जे दृश्य होतं ते मी आत्तापर्यंत च्या आयुष्यात पाहिलेलं सगळ्यात सुंदर दृश्य असावं. लाकडी टुमदार गेस्ट हाऊस, मागे हे मोठे पहाड, वरती खोबरं टाकून गार्निश केल्यासारखं बर्फ आणि गेस्ट हाऊस च्या बाजूला नाजूक गुलाबी फुलांची चादर. काय वर्णन करावं?कुठून शब्दं जमवावे? समोर बास्पा नदीचं पात्र. जसा प्रवास पुढे गेला तश्या गोष्टी अणिकच सुंदर होत गेल्या, ठिकाणं अधिकच अभूतपूर्व होत गेली पण रकच्छमने मनावर जी छाप उमटवली ती कायमची.
गोबरी गोबरी लाल चुटुक सफरचंद लगडलेली झाडं आणि बागा बघून, "भैय्या, मिठा है ना?" म्हणून सफरचंद विकत घेणारे आम्ही अक्षरशः अधाशासारखे बघतंच राहिलो. एक साधं ते सफरचंद, ते खाली पडलं काय आणि न्यूटन ने शोध लावला काय! माझ्या मनात विचारत येऊन गेले, न्यूटन जर रकच्छम च्या सफरचंदाच्या बागेत बसला असता, तर कदाचित वैज्ञानिक न होता एखादा कवी किंवा चित्रकाराच झाला असता.
किती आणि कोणत्या शब्दांत वर्णन करू शकणार आहे मी ह्या बागांचं ? या परिसराचं? मुळात सफरचंद ही झाडावर तयार होत नसून न्यूटन थेट मुंबईत भैय्याला पाठवत असेल इतपत झाडं पाहिलेले आम्ही, या बागा बघून वेडे झालो नसतो तरंच नवल होतं.
आज आमचं पाहिलं ठिकाण भारताचं सगळ्यात शेवटचं गाव, छिटकूल! छिटकूल, ११३२० फुटांवर स्थित, भारत-तिबेट बॉर्डर वरचं भारतातलं तुरळक लोकसंख्येचं शेवटचं गाव!पांढऱ्याश्या वाळूचे रस्ते, समोर नजर जाईल तिथपर्यंत हिरव्या रंगात न्हालेले अणिकच उंच डोंगर, आणि ह्या सगळ्यांमधून नजाकतीने वाहणारी बास्पा नदी! बाईंचा डौलच निराळा. काही गोष्टी किंवा माणसं इतकी सुंदर इतकी चांगली असतात आणि आपण असे आहोत हे त्यांना माहित असतं आणि त्या डौलातच ती लोकं वावरत असतात पण त्यांना तो डौलच मुळी शोभत असतो, त्यापैकी एक म्हणजे हि बास्प नदी! पुढे ती सतलज ला मिळते.
त्या नंतर चा मुक्काम नाको गाव, इथून अंदाजे १५० किमी.
भाग २-https://www.maayboli.com/node/81449
१
२
३
४
५
६
भाग २
नाको जसजसं जवळ येत होतं डोंगर उघडे बोडके होऊ लागले होते. पाईन च्या झाडांची जागा आता रिकामी ओकोबोकी दिसत होती. इथे सूर्यास्त लवकर होतो, संधी प्रकाशात आम्ही नाको जवळ पोचत आलो होतो. रस्ताभर सगळे वाळूचे-मातीचे डोंगर, मधूनच जाणारा रस्त्याचा काळा राखाडी पट्टा त्यात ठळकपणे दिसत होता. आकाशात ताऱ्यांची लगबग सुरु झाली होती आणि लांब डोंगरावर दिवेलागण झालेली. ते तारे आहेत कि दिवे कळत नव्हतं इतके ते डोंगर उंच होते. ते नाको गाव त्या तिन्हीसांजेच्या वेळे दरम्यान जेव्हा जवळ येताना पाहिलं तेव्हा एक वेगळीच भावना मनात येऊन गेली. एक धीर गंभीर शांतता सतत जाणवत होती. कोण कुठले आपण, कुठे आलोय, आजूबाजूच्या डोंगरांचा परिणाम असेल पण आपण राहत असेलेली पृथ्वी, आपला प्रदेश हा फार फार लांब राहिल्याची जाणीव फार प्रकर्षाने त्या वेळेस होत होती. आपल्यासारख्या शहरात वाढलेल्याना इतक्या शुद्धतेची, शांततेची सवय नसते, रोजचा कोलाहलच आपलं विश्व असतं. शांततेची अनुभूती मला नाको च्या त्या वळणा-वळणाच्या रस्त्यात आली. उघडे एकही झाड नसलेले डोंगर, बेशिस्त बोचरा वारा, खचून चांदणं भरलं आकाश आणि ह्या सगळ्यात चिवटपणे उभं असलेलं नाको गाव, ह्या सगळ्याची वेगळीच छबी निर्माण झाली मनात. हे असे क्षण त्या जागांपेक्षा जास्तं लक्षात राहतात. पुन्हा तिथे गेल्यावर तीच भावना येईल असंही नाही पण काही गोष्टी अनुभवाव्याच लागतात, पैकी ही एक होती नक्कीच.
साधारण संध्याकाळी ७ च्या दरम्यान मुक्कामाच्या जागी पोहोचलो. इतक्या अवघड ठिकाणी राहण्याची इतकी उत्तम सोय बघून मन प्रसन्न झालं. नाको मध्ये मुख्यतः मटार, बटाटे, मुळा, गाजर अशी मुख्य पिके. इथले मटार इतक्या अवीट गोडीचे की ते भारतभर आणि भारताबाहेरही पाठवले जातात. जेवणं आटपून आम्ही नाकोच्या उबदार दुलईत गुडूप झालो.
आज सकाळी नाको लेक ला भेट द्यायची होती, नाको हे बऱ्यापैकी मोठं म्हणजे साधारण ५००-५३० लोकसंख्येचं गाव,आपल्याकडे एका मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये आजकाल इतकी लोकंराहत असतात. पण ह्या स्पितीच्या खोऱ्यात ३० लोकसंख्या असलेलीही गावं आहेत त्यापुढे नाको मोठंच वाटतं. लेक चा रस्ता गावातूनच जातो, वाटेत प्रार्थना कोरलेले अनेक लहानमोठे दगड रचून ठेवलेले दिसतात, जणूकाही ते माणसाच्या चिवटपणाची साक्ष देत असतात.
गावातल्या लहान वाटेवरून थेट तलावाकडे पोचलो, मोठासा तलाव आणि बाजूला शरद ऋतूची उधळण. पिवळी केशरी लाल रंगाची पानं आणि त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, किती सुरेख असावं.
काळ्या रंगाच्या डोंगरांवर ती पिवळी केशरी झाडं खुलून दिसत होती. लेक ची फेरी संपवून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो, आज काझा ला पोचायचं होतं. वाटेत परत तेच उघडे डोंगर, इथल्या ह्या अशा डोंगरांना मून लँड म्हणतात, चंद्रावर असलेल्या डोंगरांसारखेच हे डोंगर आहेत.
अशा खडतर ठिकाणी आपल्या भारतीय जवानांची एक तुकडी ट्रैनिंग ड्रिल करत होती, तात्पुरत्या गाड्या थांबवल्या होत्या. कोण कुठली हि माणसं आपल्या साठी, आपल्या देशासाठी, आपली घरं सोडून इतक्या लांब अशा ठिकाणी येऊन हे काय करत असतात, पाहून डोळे भरून आले. त्यांना शुभेच्छा देत आमची गाडी काझा च्या वाटेला लागली.
वाटेत ग्यु ममी मोनेस्टरीला भेट देणार होतो. ह्या भागात बऱ्यापैकी बुद्ध धर्म प्रचलित आहे. ग्यु हि जागा एकदम वेगळी आहे, सांघा तेनसिंग या लामांची इथे ममी आहे. आता त्याचं मंदिर केलं गेलंय. ही ममी ५०० वर्ष जुनी आहे असं म्हणतात. आणि ह्याच वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचे केस, नखं आणि दात अजुनी टिकून आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ममी चे केस अजुनी वाढतात. १९७५ च्या भूकंपात ही ममी सापडली आणि त्याची समाधी नंतर बांधण्यात आली. असंही म्हणतात की स्वतः लामा तेनसिंग ह्यांनी बौद्ध पद्धत 'सोकुशिंबुत्सु' ह्या प्रमाणे स्वतःहूनच आपलं ममीफिकेशन केलंय. तर ही अनोखी समाधी एका टेकडीवर आहे, खाली ग्यु नाला नावाची लहान नदी वाहते. गंमत म्हणजे इतक्या खडतर वातावरणात सफरचंदाच्या बागा सर्वत्र भरभरून दिसत होत्या. म्हणूनच म्हणत असावेत, an apple a day keeps the doctor away. इतक्या कठीण ठिकाणी जे फळ दिमाखात उभं असतं ते आपल्याला थोडेतरी गुणधर्म देतंच असेल नाही का ?
ग्यु ला मागे सोडून आता आम्ही ताबो मोनेस्टरी जवळ पोहचलो. ताबो मोनेस्टरीला तिबेट मधल्या 'थोलिंग' मोनेस्टरी ची मुलगी मानलं जातं. ९९६AD च्या आसपास तिबेटियन मॉंक लोत्सावा ह्यांनी ती उभारली असल्याचं म्हणलं जातं. १९७५ च्या भूकंपानंतर ह्याची डागडुजी करून, शेजारीच नवीन इमारत बांधली आहे.
जुन्या इमारतीत बुद्धांची अनेक भित्तीचित्र पाहायला मिळतात. पांढऱ्या फिकट राखाडी मातीची इमारत, आजूबाजूला त्याच रंगाचे डोंगर आणि काटेरी झुडुपं, आणि ताबो मधल्या शांततेचा मनावर खोलवर परिणाम होतो.
ताबो नंतर संध्याकाळी काझा ला पोचलो. आता मात्र स्पिती नदीच्या काठावर मुक्काम होता. किती मोठं पात्रं तिचं. काझा हे स्पितीच्या कुशीत वसलेलं, जास्त लोकसंख्येचं, राजधानीचं शहर, सफरचंदाबरोबर जर्दाळू साठी प्रसिद्ध!
उद्या आम्हाला लाग्नझा, कॉमिक आणि किब्बर-हिक्कीम करायचं होतं. गरम गरम दाल मखनी चावल वर आडवा हात मारत आजचा दिवस संपला.
१ ताबो मोनेस्टरी
२
३
४ ताबो मोनेस्टरी-२
भाग ३
आज दिवस चौथा, काझा हा बेस पकडून पुढचे ३ दिवस आम्ही किब्बर हिक्कीम कोमिक असे आसपास फिरणार होतो. बऱ्यापैकी मोनेस्टरीज बघायच्या होत्या तरी प्रत्येक ठिकाणी वेगळा अनुभव आणि वेगळं निसर्ग सौन्दर्य असणार होतं. आज सकाळी लवकर आवरून नाश्ता करून आम्ही किब्बर मोनेस्टरीकडे कूच केलं. इथे दोन मुख्य आकर्षणं, एक किब्बर मोनेस्टरी आणि दुसरं म्हणजे किब्बर वाईल्डलाईफ सँक्चरी. हिवाळ्यात मुख्यतः ऑक्टोबर-मार्च दरम्यान जेव्हा संपूर्ण किब्बर बर्फाच्छादित असतं तेव्हा इकडे वरच्या भागात स्नो लेपर्डस दिसतात. खुष उंचीवर राहणारा बर्फात हिंडणारा हा गोंडस दुर्मिळ प्राणी फक्त भारतात ह्या भागातच आढळून येतो. जगभरातून लोकं हिवाळ्यात खास स्नो लेपर्ड सायटींग साठी इथे येतात. किब्बर मधले स्थानिक लोकं त्या दरम्यान काझा किंवा अजून खालच्या काही भागात राहायला जातात आणि बर्फ ओसरल्यावर पुन्हा परततात. अर्थात सगळेच लोकं असं करत नाहीत परंतु इथे हिवाळ्यात रोजचं जगणं खूप अवघड असतं. किब्बर समुद्रसपाटीपासून अंदाजे १४००० फुटांवर आहे. ह्या गावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव जगातलं सर्वात उंचीवरचं वाहन चालवण्यास योग्य असं गाव आहे. असं असूनही किब्बरहे सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेलं असं सुंदर गाव आहे.
तर अशा ह्या स्वप्नवत ठिकाणी आम्ही सकाळी १० ला पोचलो. काझाहुन १९ किमी अंतरावर आहे. प्रथम मोनेस्टरीला भेट द्यायची होती. एका उंच टेकडीवर सुप्रसिद्ध अशी 'कि मोनेस्टरी'स्थिरावली आहे. थोडासा चढ चढून आपण मुख्य प्रवेशद्वाराशी येतो. इथून संपूर्ण किब्बर आणि आसपासचा परिसर असं विहंगम दृश्य दिसतं. प्रार्थनांच्या रंगीत शांती पताका, वर निळाई आणि संपूर्ण वेळ सोबत करणारी स्पिती असा सुंदर नजारा बघतच आम्ही आत प्रवेश केला. आमचं स्वागत तिथल्या मॉंक साधूंनी त्यांचा चहा देऊन केलं, मग सत्तू किंवा बार्ली सारख्या पिठाचा प्रसाद दिला आणि मग पुढे दर्शन घ्यायला सांगितलं. आधीच प्रसाद दिल्यामुळे मन जास्तच प्रसन्न झालं. साधारण प्रत्येक मोनेस्टरी मध्ये आतली रचना सारखी असते. तसंच गाभाऱ्यातली भित्तिचित्रं आणि रंगसंगती सुद्धा बऱ्यापैकी सारखी असते. पण हे सगळं असं असूनही प्रत्येक मोनेस्टरीमध्ये जाणवणारी शांतता हि अगदी मनात भिनत जाते. आपोआप आपल्यात शांत बदल होत जातात असं आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप जाणवलं. कि मोनेस्टरी सुद्धा ह्याला अपवाद नव्हती. आता इथून पुढचा स्टॉप लान्गझा! किब्बर मधून पाय निघत नव्हता पण लान्गझा मनात रुंजी घालत होतं. गंमत म्हणजे कि मोनेस्टरी मधून निघताना पुन्हा प्रसाद दिला. ते सुद्धा अगदी वेगळा. एका बॅग मध्ये ज्युसचं एक पाकीट, एक कप केक, इथला लोकल तिबेटियन ब्रेड काही चॉकलेट्स आणि पाण्याची लहान बाटली. दिल औरही खुश हो गया!
लाग्नझा किब्बर पासून साधारण ३०-३१ किमी. समुद्रसपाटीपासून १४५०० फुटांवर स्थित! आणि हिमाचल मधलं सगळ्यात दूरस्थ वसाहतीचं गाव. लाग्नझाला बुद्धांची खूप उंच मूर्ती आहे, असं म्हणलं जातं कि हि मूर्ती साधारण १००० वर्ष जुनी आहे. परान ला (ला म्हणजे मार्ग) आणि लडाख ह्यांना जोडणारा व्यापारी मार्ग लाग्नझा मधून जात असे, त्यामुळे ह्या दोन प्रदेशांना जोडणारा लान्गझा हा प्रमुख दुवा होता. अजून एक खास गोष्ट अशी कि इथल्या आसपासच्या परिसरात समुद्रात आढळणाऱ्या जीवांचे अवशेष सापडतात त्यामुळे ह्या शास्त्राचा अभ्यास करणारे बरेच लोकं इथे अभ्यासाला येतात. कधीकाळी हा भाग समुद्रात होता हे मानायला मन तयारच होत नाही. पण जीवाश्म पाहून आपण अंदाज बंधू शकतो. दूर दूर वाळूचे मातीचे मोठे ओके बोके डोंगर आणि त्यात मधेच उंच स्थितप्रज्ञ बुद्धांची मूर्ती, कधीतरी आपण उभे आहोत त्या ठिकाणी समुद्राचं अस्तित्व असल्याची ग्वाही देणारे अवशेष हे सगळं आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं.
गोबऱ्या गोबऱ्या गालांची लहान मुलं आपल्याला हे अवशेष शोधून देतात, १००-२०० रुपयांना आपण ते विकत घेऊ शकतो. कठीण परिस्थितीतही चिवटपणे उभं राहण्याची मानवाची सवय निसर्गाचीच देण असल्याचं हे अवशेष सांगत राहतात. दूर वाळूच्या डोंगरावरच्या पताका फडकत होत्या, त्यांना मागे टाकत आम्ही पुढे कोमिकला प्रस्थान केलं. कोमिक हे जगातलं सर्वाधिक उंचीवर स्थित मानव वस्ती असलेलं एकमेवं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. साधारण समुद्रसपाटीपासून १५५०० फुटांवर स्थित आहे. कोमिकला मैत्रेय बुद्धांची स्थापना असलेली लंडूप त्सेमो गोम्पा हि मोनेस्टरी पाहण्यासारखी आहे. १४व्या शतकात ह्याचं बांधकाम करण्यात आलं आहे. मातीच्या लिंपलेल्या भिंती, सुबक भित्तीचित्र आणि शिल्प असं सगळं जुन्या काळाची सफर करून आणतं. कोमिकला तिबेटियन जेवणावर आणि सिबकथॉर्न चहा वर आम्ही येथेच्छ ताव मारून पुढे आम्ही जगातल्या सर्वात उंचीवर असणाऱ्या पोस्ट ऑफिसला भेट द्यायला निघालो. साधारण १०-१५ मिनिटे हमरस्ता सोडून खाली चालत गेल्यावर हिक्किमचे टुमदार पोस्ट ऑफिस दिसते. गंमत म्हणून आम्ही आपापल्या घरी इथून पत्रं पाठवली. अशा ठिकाणहून पत्रं पाठवायचा अनुभव विलक्षण होता. आजचा शेवटचा टप्पा धंकर मोनेस्टरी. हिक्कीमहुन ५० किमी वर असलेली हि मोनेस्टरी संपूर्ण स्पिती खोऱ्यातल्या सुंदर अनुभवांपैकी एक.
स्पिती खोऱ्यात फिरताना दर वळणांगणिक लँडस्केप बदलत जातात आणि अधिकाधिक भुरळ पाडत राहतात. वळणावळणाचा घाट, पिन नदीची सततची संगत आणि अचानक समोर येणारी धंकर मोनेस्टरी हा जो काही नजारा आपल्यासमोर येतो तो शब्दात सांगता येणं खरंच अशक्य. दुपारची उन्हं कलली होती. मुंग्यांचं मोठं वारूळ असावं असे मोठे डोंगर दिसत होते, माती लिंपून जणू मुंग्याच राहाव्यात तशा डोंगरांना चिकटून धंकर मोनेस्टरी आणि आसपासची घरं दिसत होती. जवळ-जवळ १००० वर्ष जुनी हि मोनेस्टरी. इथे आतून कोरीव असा रस्ता आपल्याला मोनेस्टरीच्या वरच्या भागात घेऊन जातो, वरच्या भागात ध्यान करण्यासाठीच्या जागा आहेत. तिथून आणि वर गच्चीवर एक पायवाट जाते. सूर्यास्ता दरम्यान आम्ही वर गच्चीवर पोचलो. थोडंसं वर गेलो तर स्वर्गच येईल का? असं वाटावं इतकी तिथली उंची होती, समोर पिन नदीचा अत्यंत देखणा परिसर, सूर्य अस्ताला निघालेला, आकाशात केशरी निळी चादर पसरलेली. आम्ही ३-४ जणीच वर गच्चीवर होतो. कोणी काहीच बोलत नव्हतं किंवा बोलू शकत नव्हतं. समोरचं पिनचं पात्र, आसपासचा सगळा परिसर आणि आम्ही असे सगळे एक होऊन गेलो होतो. तिथून पाय निघत नव्हता. डोळे भरून आलेले. धंकर मोनेस्टरी अक्षरशः मनात भरून घेऊन आम्ही जड पावलाने पुन्हा काझा गाठलं. रात्री खूप उशिरा पर्यंत धंकर मोनेस्टरी मनात रुंजी घालत राहिली. आता ती आमच्या सोबत आली ते कायमची. उद्या काझा फिरायचं होतं आणि परवा स्पिती आणि पिन हे खोरं सोडून जायचं ह्या विचारानेच मन अस्वस्थ होत होतं. गरम गरम दाल चावल खाऊन दिवस मावळला. उद्या काझा!
१. धंकर मोनेस्टरी परिसर

२. हिक्किमचे टुमदार पोस्ट ऑफिस

३. लाग्नझा

४. सिबकथॉर्न चहा

५.

भाग ४
आजचा पाचवा दिवस, आज आमचं एकदम निवांत शेड्युल होतं. सकाळी जरा निवांत तयार होऊन नाश्ता करून आम्ही निघालो चिचम (की छिछम) ब्रिज कडे.
हा पूल काही साधा सुद्धा आपल्याकडे असतो तसा पूल नव्हे. तर चिचम हा
आशियामधला सगळ्यात उंचीवर बांधलेला खास असा झुलता पूल म्हणून ओळखला जातो,
साधारण समुद्रसपाटीपासून १३,५९६ फूट उंचीवर स्थित, आणि जवळपास १००० फूट खोल
घाटावर उभारलेला, चिचम आणि किब्बर ह्या दोन गावांना जोडणारा पूल आहे, ह्या
पुलाच्या बांधकामाला तब्बल १५ वर्ष लागली असं म्हणतात. उद्याचा आमचा
चंद्रतालला जाण्याचा मार्ग ह्याच पुलावरून जाणार होता तरीसुद्धा निवांतपणे
ह्या जागेचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही आजच इकडे आलो होतो. बऱ्यापैकी
पर्यटकांची गर्दी होती. आम्ही सुद्धा झुलत्या पुलावर मनसोक्त फोटो काढून
घेतले, खाली खोल दरी बघून मन दडपत होतं पण एकूणच एक वेगळाच अनुभव त्यामुळे
दिवसाची सुरुवात छान झाली. चिचम पुलावरून पुन्हा मागे काझा कडे आलो. काझा
राजधानीचं शहर असल्याने इथलं मार्केट तसं बाकी गावांच्या मानाने खूपच मोठं
म्हणावं असं आहे, बायका आणि खरेदी हे खूपच सम समीकरण असल्याने नेहमीपेक्षा
सगळ्याजणींचा उत्साह जास्तंच वाटत होता. काझाची बाजारपेठ अतिशय सुंदर आहे,
याकच्या फर पासून बनवलेले विविध प्रकारचे हातमोजे,पायमोजे, स्वेटर आणि अजून
बरंच काही इकडे विकायला होतं. इथली लोकं सुद्धा इतकी छान होती. काझचे
जर्दाळू खूपच प्रसिद्ध आहेत, आम्ही खरेदी करण्यासाठी ज्या आज्जीच्या
दुकानात गेलो होतो, त्यांनी आम्हाला खूप प्रकारची जर्दाळू दाखवली, आणि
चाखायलाही दिली. ओल्या जर्दाळू पेक्षा इकडे वाळवून सुखे जर्दाळू खाण्यात
जस्त वापरले जातात, जर्दाळू प्रमाणेच याकच्या दुधापासून बनवलेले चीज सुद्धा
प्रसिद्ध आहे. आज्जींनी आम्हाला तेही खायला दिले. याक प्रमाणे इकडे गायी
च्या दुधाचे चीज सुद्धा सुखावून ठेवले जाते, हिवाळ्यात जेव्हा बाकी
गोष्टींचा जेवणासाठी पुरवठा कमी असतो तेव्हा हि दोन तीन प्रकारची चीज घालून
भाजी/सूप तत्सम प्रकार करून स्थानिक लोकं खातात असं आज्जींनी आम्हाला
सांगितलं. याकच्या चीज ची चव अगदीच वेगळी होती, मिठाचं प्रमाण नेहमी पेक्षा
थोडं जास्त होतं, आणि ते तसं नैसर्गिक असतं असंही आम्हाला कळलं.
बाजारात चक्कर झाल्यावर इथल्या अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय देखण्या हॉटेल
मध्ये आम्ही दुपारच्या जेवणासाठी गेलो, काझाला आल्यापासून 'हिमालयन कॅफे'
ने मनाला भुरळ घातली होती, आज तिथे जायला मिळतंय म्हणल्यावर खूपच उत्सुकता
होती. पहाडी भागाला साजेसं छोटंसं टुमदार असं हे कॅफे. संपूर्ण लोकल जेवण
खायचं असं आमचं अगोदरच ठरलं होतं. इथे तिबेटियन जेवणाचा खूप प्रभाव बघायला
मिळतो. थुक्पा, सिबकथॉर्न चे ज्यूस, चहा, बार्ली पासून बनलेले केक आणि पाय
असे इतके वेगवेगळे प्रकार होते. आम्ही स्थानिक जेवणावर यथेच्छ ताव मारला,
पुन्हा एकदा सिबकथॉर्न मिळाल्याने मी वेगळ्याच खुशीत होते. इथे आहोत
तोपर्यंत सिबकथॉर्नचा पिच्छा सोडायचा नाही असा प्रण केल्याप्रमाणे मी जाईन
तिथे सिबकथॉर्न शोधत होते. मनसोक्त जेवण झाल्यावर पुन्हा एकदा मार्केटची
चक्कर मारून आम्ही संध्याकाळी हॉटेल वर परतलो. आज संध्याकाळ अक्खी हॉटेल
मध्ये निवांत जाणार होती, उद्या इथून निघायचं होतं. उद्या चंद्रताल, ह्या
ट्रिप चा सर्वोच्च सुंदर टप्पा. पण काझा आणि स्पिती खोरं मागे पडणार ह्याची
मनाला खूपच खंत होत होती. इथे येऊन फक्त ३-४ दिवस झाले होते पण हे डोंगर
हि स्पिती-पिन जणू काही खूप पूर्वीपासून ओळखीचे आहेत असं वाटत होतं. हे
सगळं सोडून आपण परत घरी जाणार ह्या कल्पनेनं मन खरंच अस्वस्थं झालेलं.
संध्याकाळ छान गप्पांमध्ये गेली, एकूणच सगळ्याच जणी स्पिती खोरं मागे पडणार
म्हणून अस्वस्थ वाटल्या. पण चंद्रतालचे कुतूहलही तितकेच होते. आज जेवणात
खीर होती, फ्रुट सॅलड होते, राजमा चावल, माझी लाडकी काली दाल, पराठे असं
सगळं होतं तरी जेवणाची गोडी कळली नाही. आम्ही जिथे राहिलो होतो त्या जागेचे
मालक खूपच छान होते, सगळ्या बायकांचा उत्साह बघून त्यांनी मोमो बनवायला
शिकवण्याचे ठरवले, जेवणच्या आधी आम्ही सगळ्या जणी मोमो शिकायला गेलो.
काझाची शेवटची संध्याकाळ अशी खूपच सुंदर गेली. मनात सगळ्या आठवणी साठवत तो
दिवस संपला. सकाळी आम्ही खूप लवकर निघालो, आज चंद्रताल ला मुक्काम. काझा ते
चंद्रताल अंतर फक्त ९७ किमी आहे, पण संपूर्ण रस्ता अतिशय अवघड आहे.
त्यामुळे हे ९७-१०० किमी चे अंतर पार करायला सहज ४-५ तास लागतात. पुन्हा
एकदा चिचमचा झुलता पूल पहिला, काझा किब्बर मागे जात राहिलं तसं मन उदास
झालं. आता चंद्रतालचा रस्ता पकडला तसं बरेच बायकर्स दिसले. दूर दुरून लोकं
आपल्या आपल्या बाईक्स घेऊन खास चंद्रतालला आले होते. मी आणि माझ्या बहिणीने
ठरवलं परत इथे येऊ ते बाईक घेऊनच, इतक्या देखण्या बाईक्स बघून खरंच हात
पाय शिवशिवायला लागले. चंद्रतालचा रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यापेक्षा एकदमच
वेगळा होता, खूपच ओबडधोबड, ऑफ रोडींग म्हणता येईल असा! बऱ्यापैकी रुक्ष
डोंगर, वाटेत एकही झाड लागले नाही. काही सफरचंद आणि पेर ची झाडं मागे पडली
त्या नंतर झाडं झुडुपं अगदी तुरळक. दुपारी १.३०-२ दरम्यान आम्ही चंद्रताल
ला पोचलो. इकडेही बरीच गर्दी होती! बस किंवा तुमचं वाहन पार्क करून
चंद्रताल पर्यंत चालत जावं लागतं. २०-३० मिनिटांचा छोटासा ट्रेल थेट
तळ्याकडे घेऊन जातो. नावाप्रमाणे चंद्राच्या कोरीसारखा साधारण ह्या तळ्याचा
आकार आहे, हा ताल समुद्र नावाच्या पठारावर आहे आणि चंद्र नदीचा उगम इथूनच
होतो आणि पुढे ती भागा नदीला मिळून त्यांची चंद्रभागा नदी बनते, हि
चंद्रभागा पुढे चेनाब म्हणून ओळखली जाते. चंद्रभागा पर्वत रंगांवरून
चंद्रतालला त्याचे नाव मिळाल्याचे हि म्हणले जाते. ह्याचं निळशार गोड पाणी
अमृताहून कमी नाही. आकाशाच्या रंगानुसार ह्याचे रंग वेगवेगळे दिसतात.
संपूर्ण तलाव २.५किमी व्यासाचा आहे. आणि त्याची चालत परिक्रमा साधारण २
तासात करता येते. चंद्रतालच्या ट्रेल वरून जेव्हा आम्ही तळ्यावर पोचलो तो
क्षण कधीही विसरता येणार नाही. समोर निळंशार निरभ्र आकाश, मागे चंद्रभागा
डोंगर, आणि समोर आकाशाची निळाई ल्यालेला चंद्रताल. नजर हटेना. आणि तोंडातून
शब्द निघेना अशी अवस्था झाली. काय वर्णन करावं कुठून सुरु करावं. आयुष्य
सार्थक झालंय असं वाटावं हा तो क्षण! जगात इतकं सुन्दर काहीच नाही असं
वाटावं इतकं समोरचं दृश्य विहंगम होतं. तटावरच्या वाळूत काही क्षण बसून
राहिलो, जितकं जसं जमेल तसं ते तळं मनात भरून घेत राहिलो. पाय निघवेना पण
इकडे वातावरण क्षणात पालटते. ढग भरून आलेले, आणि आम्ही यायच्या ३ दिवस
आधीपासून जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली होती असं सांगितलं होतं, त्यामुळे
नाईलाजाने इथून निघावं लागलं. इथे राहून राहून सारखं एक वेगळं अस्तित्व
जाणवत होतं, हीच गोष्ट वाटेत येताना लागलेल्या कुंजूम पासला जाणवली. देवाचं
अस्तित्व कधीतरी प्रत्येकाला जाणवतं म्हणतात ते असं!
चंद्रताल बद्दल एक गमतीशीर दंतकथा आहे ती आम्हाला बबलूजींनी सांगितली. ती
अशी कि,असं मानलं जातं कि चंद्रताल मध्ये खाली पऱ्याचं राज्य आहे. ह्या
तळ्याची खोली कोणालाही मोजता आलेली नाही, इथे रात्रीचं जर कोणी आलं तर,
पऱ्या त्या व्यक्तीला तळ्यात नेतात, आणि पुन्हा ती व्यक्ती बाहेर येत नाही.
अर्थात ह्याचं सत्य पडताळण्याची कुणी अजून तरी हिम्मत केली नाहीए. गमतीचा
भाग सोडला तर खरंच हा परिसर इतका सुंदर आहे कि इथे पऱ्यांचं राज्यं असेलही
ह्यात शंका वाटत नाही.
आजचा आमचा मुक्काम तळ्यापासून थोडाच दूर तंबू मध्ये होता. इकडे लक्झयूरियस
म्हणता येईल असं कॅम्पिंग करतात. थंडी मी म्हणत होती, तापमान उणे मध्ये
होतं पण आज बर्फ पडत नव्हतं. आमची जेवणाची जिकडे सोया होती तिकडे सगळीकडे
हिटर लावले होते. त्याशिवाय काय खरं नव्हतं कारण मुंबईला २० च्या खाली
तापमान गेलं तरी थंडी म्हणणारे आम्ही आज उणे तापमानात बसलो होतो, तोंडातून
शब्द निघाले तर बर्फाचे तुकडे येतील कि काय असं वाटत होतं.
गरम गरम खीर पुरी, भाजी आणि दाल चावल खाऊन आम्ही आमच्या तंबूत परतलो,
थोड्या गप्पाटप्पा मजा मस्ती झाली, आजचा आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस, उद्या
मनालीला पोचलो कि सगळ्यांचे मार्ग वेगळे होणार होते. कधीकधी इतक्या कमी
वेळात कोणाशी असे ऋणानुबंध जुळतात कि जे कैक वर्ष सोबत राहून जुळू शकत
नाहीत, अश्याच काही मैत्रिणी, आणि ह्या खोऱ्यातले हे अनमोल क्षण सोबत घेऊन
आम्ही परतणार होतो. उद्या येऊच नये असं वाटत असतानाच पाहट झाली. नाश्ता
करून आम्ही मनाली साठी निघालो. रस्ता प्रचंड खडतर आहे. साधारण ४-५ तास
लागतात. ओकेबोके डोंगर, पांढरी वाळू, हे ताल, ह्या अनवट वाटा,
स्पिती,पिन,चंद्र, भागा नद्या त्यांचे संगम, लालचुटुक सफरचंद, हिरवीगार
पेरं, बुद्धांच्या मूर्ती, शांती पताका, वाटेत भेटलेले इतके चेहरे,हे सगळं
सगळं मागे जात राहिलं. मन खिन्न झालेलं. अजून काही दिवस तरी इथे घालवावे,
अजून थोडे डोंगर बघावे, अजून थोडं थंडीत भटकावं, अजून एकदा स्पिती
बघावी,थोडी पिऊन घ्यावी. आठवण म्हणून सोबत मी स्पितीमधले दगड आणले होते,
त्या निमित्ताने स्पिती कायम माझ्या सोबतच राहील. तरी सुद्धा अजून एकदा
सगळं बघावं असं वाटत राहिलं. खडबडीत रस्ता सोडून आम्ही गुळगुळीत डांबरी
रस्त्याला लागलो. शहर जवळ आल्याची ती खूण. पुढे अटल टनेल लागला. १००००
उंचीवर असलेला सगळ्यात मोठा बोगदा म्हणून अटल टनेल ओळखला जातो. मनालीला
पोचे पर्यंत संध्याकाळ झाली. आम्ही घरातल्या ६ जणी मनालीत मुक्काम वाढवणार
होतो. मनालीतून पुढे बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या वाटाना गेल्या. मनात
स्पिती-पिन कायमचं मुक्कामाला आलं. पुन्हा भेटायचे प्लॅन्स करून आम्ही
शहरात परतलो. मन मात्र पहाडात राहिलं ते अजून शहरात परतायचंय!
भाग 3 - https://www.maayboli.com/node/83199
१. चंद्रताल साठवून घेताना मी

२. चंद्रताल

३. चंद्रतालचा रस्ता

४. कुंजूम पास
१.
२.
५.हिमालयन कॅफे मधले जेवण

६. मोमोचा क्लास

७. आमचे टेन्ट्स

८. चंद्रताल
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.