Sunday, March 17, 2024

शेफाली वैद्य यांचे लिखाण

 https://www.esakal.com/author/shefvhotmailcom-2

बाह्य सृष्टी... आंतदृष्टी

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

भारतातली जुनी दगडी बांधणीची मंदिरं बघायला मला खूप आवडतं. कुठलीही आधुनिक यंत्रसामग्री हाताशी नसताना, केवळ छिन्नी-हातोड्याच्या साह्यानं भारतीय मूर्तिकारांनी, स्थापत्यतज्ज्ञांनी दगडाला बोलतं केलं. अनुपमेय अशी शिल्पं घडवली. वेरूळच्या एका अखंड कातळातून तीनमजली कैलासलेणं हे अप्रतिम मंदिर कोरून काढण्याइतकी या अनाम कलाकारांची प्रतिभा उत्तुंग होती.

अगदी आजही हजार, दीड हजार वर्षानंतर, उन्हा-पावसाचे, काळाचे, धर्मांध मुसलमानी आक्रमकांचे घाव सोसून ही मंदिरं तशीच ताठ उभी आहेत. विशेषतः दक्षिण भारतातली आजही उभी असलेली मंदिरं तर खूपच सुंदर आणि भव्य-दिव्य अशी आहेत. पांड्यांची मदुराई, चोल राजांनी बांधलेलं तंजावरचं ‘पेरिय कोविल’ म्हणजे मोठं देऊळ, चालुक्यांची वातापी, काकतीय राजांनी उभी केलेली वारंगळची मंदिरं, विजयनगर साम्राज्याची अद्भुत राजधानी हम्पी...किती म्हणून नावं घ्यावीत? असं एखादं जुनं पाषाणमंदिर बघताना मी तर पार भारावूनच जाते.

आयुष्यात कधीही मंदिरात गेलेली नाही अशी हिंदू व्यक्ती विरळाच; पण आजकाल आपण मंदिरात दर्शनाला जातो तेव्हा घाई-गडबडीत रांगेत राहून गाभाऱ्यापाशी जातो, आतल्या मूर्तीचं क्षण, दोन क्षण दर्शन घेतो, हात जोडतो आणि पुजाऱ्यानं दिलेला तीर्थ-प्रसाद घेऊन बाहेर पडतो. अगदी भाविक हिंदू लोकदेखील, मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीनंच का केलेली असते, मंदिराची शैली कशी ओळखायची, मंदिरबांधणीचा काळ कोणता, मंदिर कुणी व का बांधलं, त्या मंदिरातल्या शिल्पांमागच्या कथा काय आहेत याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असतात. गाभाऱ्यातल्या देवाला नमस्कार करणं इतकाच बहुतेक भाविकांचा उद्देश असतो; पण मंदिर म्हणजे केवळ गर्भगृह आणि त्यातली मूर्ती नव्हे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या पूर्वजांनी जेव्हा अथक् प्रयत्नांनी इतकी मोठी मंदिरं बांधली तेव्हा त्या संपूर्ण वास्तूमागं एक फार मोठा धर्मविचार होता. मंदिराच्या वास्तूतल्या विविध मूर्ती, मंदिराचे रंगमंडप, द्वारशाखा, शिखर, गर्भगृह, प्रदक्षिणापथ असे विविध भाग, मंदिरावर कोरलेली प्रतीकं, शिलालेख, विविध शिल्पं या प्रत्येकाचं एक विशिष्ट प्रयोजन होतं.मंदिर हे देवाचं पृथ्वीवरचं आलय तर आहेच; पण मंदिर ही एक फार महत्त्वाची सामाजिक संस्थासुद्धा आहे. मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धर्मविचार सोपेपणानं समजावा, आपली संस्कृती, आपलं धर्मज्ञान सर्वसामान्य माणसांना सहज कळावं यासाठी मंदिरांचं बांधकाम एका विशिष्ट पद्धतीनं केलं जात होतं. अगदी आजही भारतात नवीन मंदिरं बांधताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच मंदिरांचं बांधकाम केलं जातं. अयोध्येत बांधण्यात येणारं भव्य राममंदिर हे प्राचीन मंदिरस्थापत्याचा विचार करूनच बांधलं जाणार आहे.

"खरं तर कुठल्याही अभिजात कलेप्रमाणे मंदिरस्थापत्यकलेचीही एक परिभाषा असते. अभिजात संगीत समजून घ्यायला जशी त्याची परिभाषा आधी समजून घ्यावी लागते, तसंच मंदिर बघतानाही तिथलं स्थापत्य समजून घ्यायला शिकावं लागतं. मात्र, आपल्या शिक्षणक्रमात कलास्वाद या विषयाला स्थान नाही आणि त्यात आपण चुकूनमाकून ‘आर्ट ॲप्रिसिएशन’च्या नावाखाली चालवलेल्या अभ्यासक्रमांना गेलोच तर तिथं भारतीय शिल्पकला सोडून जगातल्या इतर कलाप्रकारांबद्दलच जास्त शिकवतात."

मी भारतीय शिल्पकलेचा आस्वाद-आनंद घ्यायला शिकले; कारण, एकतर मुळात शिल्पकला, भारतीय तत्त्वज्ञान आणि आपल्या पुराणकथा व इतिहास या विषयांची मला आवड होती आणि नंतर गो. बं. देगलूरकर सरांसारख्या या क्षेत्रातल्या दिग्गज माणसाच्या सहवासात आल्यामुळे. पुढं भारतभर भ्रमण करताना जसजशी प्राचीन मंदिरं शोधत गेले तसतशी मी मंदिरस्थापत्य या विषयाच्या जास्त जास्त प्रेमात पडत गेले.

आपल्या मंदिरांमधून जेव्हा भव्य-दिव्य अशी पौराणिक कथांवरची शिल्पं कोरली गेली तेव्हा त्यांचं प्रयोजन केवळ देव-देवतांपुढं लोकांनी नतमस्तक व्हावं एवढंच नव्हतं. धार्मिक श्रद्धा जोपासण्याबरोबरच लोकांना रामायण-महाभारत या महाकाव्यांबद्दलची माहिती मिळावी, त्यांना आपल्या धर्माचं शिक्षण मिळावं, भोवतालचं जग, प्राणिसृष्टी, झाडं-झुडपं, तत्कालीन लोकसंस्कृती, वेशभूषा, साहित्य, पर्यावरण अशा सर्व गोष्टींचं दर्शन लोकांना व्हावं असा मंदिर निर्मिणाऱ्या लोकांचा हेतू असायचा. मंदिरात येताना माणसानं बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावं आणि आत गाभाऱ्यात मात्र पूर्णपणे अंतर्मुख व्हावं आणि सर्व लक्ष देवावर केंद्रित करावं असा काहीसा भाव मंदिरनिर्माणकर्त्यांच्या मनात असावा. म्हणूनच अगदी कामशास्त्रापासून ते प्राणिसृष्टीपर्यंतची शिल्पं आपल्याला जुन्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर दिसू शकतात; पण आतला गाभारा मात्र अगदी साधा आणि अनलंकृत असतो. केवळ आराध्यदेवतेची मूर्ती आणि तेलाचे मंद तेवते दिवे इतकंच गर्भगृहात असावं असा शिल्पशास्त्राचा संकेत आहे आणि दक्षिण भारतात तो संकेत आजही कटाक्षानं पाळला जातो.

ईश्वरोपासनेसाठी शैलगृहं बांधण्याची भारतीय परंपरा फार प्राचीन आहे. अगदी इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात डोंगरात-कातळात कोरलेल्या लेणी आपल्याला आजही बिहारमध्ये गयेजवळ बघता येतात; परंतु भारतातल्या मंदिरस्थापत्याचा विचार करताना आपण वाचतो, की गुप्त काळात म्हणजे ‘कॉमन इरा’च्या चौथ्या शतकात बांधलेली मंदिरं आज भारतात अस्तित्वात असलेली सर्वात प्राचीन मंदिरं आहेत. साधारणतः दीड हजार वर्षापूर्वी दगड-विटांनी बांधलेली ही प्राचीन मंदिरं आजही आपल्याला मध्य प्रदेशातल्या सांची आणि भितरगाव या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात्‌, ही मंदिरं अगदी साधी आहेत. पुढं मंदिरस्थापत्यशास्त्र जसजसं प्रगल्भ होत गेलं तसतशी मंदिरं अधिकाधिक भव्य होत गेली. आज आपण जेव्हा तंजावरमधलं हजार वर्षं जुनं असलेलं बृहदीश्वराचं भव्य मंदिर बघतो तेव्हा आपली छाती ते अद्भुत मंदिर बघून दडपूनच जाते. भारतीय द्रविड स्थापत्यशैलीचा सर्वात प्रगत आविष्कार या मंदिरात बघायला मिळतो. सांची ते तंजावर हा भारतीय मंदिरस्थापत्यशास्त्राचा पाचशे वर्षांतला प्रवास हा खरोखरच स्तिमित करणारा आहे.

भारताच्या विविध भागांतली प्राचीन मंदिरं, त्यांच्या स्थापत्यशैलीमधलं वैविध्य, त्या त्या मंदिराच्या आराध्यदेवतेची स्थापना करण्यामागचा त्या त्या काळातला धर्मविचार, त्या मंदिरांच्या शिल्पवैभवाची ओळख, त्यामागच्या कथा, त्या मंदिरांचा, त्यांच्या निर्मात्यांचा प्रेरणादायक इतिहास आणि अगदी आजच्या काळात ही मंदिरं बघताना आपल्या मनात जाग्या होणाऱ्या भावना या सगळ्याची ओळख या नवीन साप्ताहिक सदरातून ‘सकाळ’च्या वाचकांना होणार आहे. हे सदर वाचकांना त्यांच्या भारतभ्रमंतीमध्ये निश्चित उपयोगी पडेल अशी आशा आहे.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

मंदिर स्थापत्यशैलीमागचा विचार...

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

एखादं जुनं हिंदुमंदिर बघताना आपल्यापैकी काही जणांना तरी प्रश्न पडत असेल की या मंदिराचं स्थापत्य असंच का आहे? या कोनाड्यात हीच मूर्ती का बसवली आहे? काही मंदिरांमध्ये गर्भगृहाच्या दरवाजाच्या, म्हणजे द्वारशाखेच्या, दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुना या नदीदेवतांच्या मूर्ती दिसतात, त्यांचं प्रयोजन काय? उत्तरेकडची बहुतेक सारी मंदिरं एका विशिष्ट पद्धतीनं का बांधलेली असतात? उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये काही गोष्टी सारख्या असल्या तरी नवशिक्या नजरेलाही दोन्हीकडच्या मंदिरांच्या स्थापत्यातला फरक एका नजरेत कळू शकतो, त्यामधले बारकावे समजत नसले तरी. या दोन्ही स्थापत्यशैली वेगळ्या का आहेत? हे प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी पडलेले असतीलच.

आजच्या लेखातून अशाच काही प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे, पुढच्या लेखांमध्ये जेव्हा मी वेगवेगळ्या पुरातन मंदिरांविषयी लिहीन तेव्हा मंदिर समजून घ्यायला या लेखातली माहिती उपयुक्त ठरेल. मंदिरस्थापत्य हे शास्त्र फार अभ्यासानंतर विकसित झालेलं शास्त्र आहे हे आपण कुठलंही प्राचीन मंदिर बघताना लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही मंदिरात असलेली कोणतीही मूर्ती, प्रतिमा, मंदिराचे वेगवेगळे भाग हे सगळं मंदिरनिर्मात्यांनी, त्यांच्या मनात आलं म्हणून, उगाचच घडवलेलं नाही. मंदिर म्हणजे देवाचं घर. मानवी जीवनाचं नियंत्रण करणाऱ्या देव-देवतांचं प्रतीकरूपानं अथवा मूर्तींच्या रूपानं भाविकांना दर्शन घडवणारं मानवानंच निर्मिलेलं आलय म्हणजे मंदिर.

हिंदुमंदिराच्या वास्तूच्या प्रत्येक भागामागं हिंदू धर्मतत्त्वज्ञान तर आहेच; पण एक निश्चित अशी वैज्ञानिक बैठकसुद्धा आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत असा विचारही आहे आणि मंदिरात आलेल्या माणसाला कलास्वाद घेता आला पाहिजे अशी अपेक्षाही आहे. 

मुळात कुठलीही भारतीय कला  - मग ती गायन, वादन, नृत्य, चित्रकला, वस्त्रकला, शिल्पकला - अशी कुठलीही असो, ‘केवळ कलेसाठी कला’ हा भारतीय कलेचा उद्देश कधीच नव्हता. संत तुलसीदासांची एक प्रसिद्ध चौपाई आहे :
राम नाम मनिदीप धरु जीह देहरीं द्वार।
तुलसी भीतर बाहेरहुँ जौं चाहसि उजिआर॥ 
म्हणजे, रामनाम हा देहा-मनाच्या उंबरठ्यावर ठेवलेला असा दीप आहे की ज्याचा प्रकाश शरीराच्या आतही पडतो आणि बाहेरही. 
भारतीय मंदिरस्थापत्यकलेचंही तसंच आहे, एखादं मंदिर बघताना, त्यावर कोरलेली अद्भुत शिल्पं समजून घेताना आपली दृष्टी तर दिपून जातेच; पण मंदिर भाविकाना एक आत्मिक समाधानही देतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘भारतीय कलेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रसनिष्पत्ती. ही रसनिष्पत्ती दोन्ही बाजूंनी असावी लागते, म्हणजे एखादी कलाकृती निर्माण करताना त्या कलाकाराला स्वतःला रसानुभूती व्हावी लागते आणि त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे रसिकालाही त्याच रसाची अनुभूती व्हावी लागते तरच त्या कलाकृतीमागचं प्रयोजन सिद्ध होतं,’ असं भारतीय सौंदर्यशास्त्राचे थोर अभ्यासक आनंद कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्थापत्यशास्त्राचंही हेच वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कलेचा आस्वाद घेणं ही अत्यंत एकाग्र होऊन करायची क्रिया आहे, मग मंदिरस्थापत्य तरी त्याला अपवाद कसं असेल? पण या निरामय आस्वादासाठी रसिकाचं मन भाविक तर असलं पाहिजेच; पण त्याचबरोबर संस्कारितही असलं पाहिजे.

मंदिरस्थापत्यातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपल्याला काहीतरी संदेश देण्यासाठी किंवा काहीतरी शिकवण्यासाठी विचारपूर्वक घडवलेली असते. उदाहरणच द्यायचं झालं तर, मंदिराची जगती किंवा जोतं हे सहसा आजूबाजूच्या जमिनीच्या समतलापासून चांगलंच वर धरलं जातं. काही पायऱ्या चढूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करता येतो. आपल्या मर्त्य जीवनाच्या पातळीपेक्षा देवाची पातळी वरची आणि म्हणूनच देवदर्शनाला जाताना आपणही स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढवून स्वतःला त्यायोग्य करावं हा त्यामागचा विचार. खजुराहोमधल्या लक्ष्मणमंदिराचं जोतं प्रचंड उंच आहे.

बऱ्याच मंदिरांमध्ये बाह्य भिंतीवर आकर्षक विभ्रम असणाऱ्या सुंदर स्त्रियांची शिल्पं असतात. त्यांना ‘सुरसुंदरी’ किंवा ‘शालभंजिका’ असं म्हटलं जातं. काही मंदिरांच्या बाह्य भिंतींवर मैथुनशिल्पं असतात. ही सर्व शिल्पं म्हणजे मानवाच्या भौतिक आयुष्याचं प्रतीक आहेत. मानवी आयुष्यातले काम, लोभ आदी विकार हे अशा प्रतीकांच्या रूपानं मंदिराच्या बाहेरच्या भागावर दाखवले जातात. ते सर्व विकार बाहेर ठेवून भक्तानं ईश्वराच्या ठाई चित्त ठेवून मंदिरात प्रवेश करावा असा धर्मविचार यामागं होता, म्हणूनच गर्भगृहाच्या द्वारशाखेवर दोन्ही बाजूंना गंगा-यमुना असतात. गंगा ही पावित्र्याचं प्रतीक आणि यमुना ही भक्तीचं. मनातले सर्व क्षुद्र विकार मंदिराबाहेर सोडून भक्तानं पवित्र मनानं देवाच्या दर्शनाला भक्तिपूर्वक यावं हेच जणू त्या गंगा-यमुना भक्तांना सांगत असतात.

प्राचीन हिंदुस्थापत्यशास्त्रानुसार, मंदिरशैलीचे ‘नागर’ म्हणजे साधारणतः उत्तर भारतीय आणि ‘द्राविड’ म्हणजे दक्षिण भारतीय असे दोन प्रकार मानले जातात. या दोहोंचा संगम असलेली ‘वेसर’ नावाची आणखी एक उपशैलीही दिसून येते. नागर शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, गर्भगृहावर उंचच उंच शंकूसारखं निमुळतं होत जाणारं शिखर आणि शिखरावर बसवलेला गोल आवळ्याच्या आकारातला आमलक; किंबहुना आवळ्याच्या आकारात आहे म्हणूनच त्याला ‘आमलक’ असं नाव दिलेलं आहे. द्रविडशैलीच्या मंदिरांत शिखराच्या उंचीपेक्षा विस्ताराला जास्त महत्त्व आहे. द्रविडशैलीचं शिखर तळाला पसरत पिरॅमिडच्या आकाराचं असतं आणि अगदी वर आमलकाऐवजी एक मोठी शिळा बसवलेली असते, जिला ‘स्तूपी’ असं नाव आहे. द्रविडशैलीचं अजून एक मोठं आणि सहज लक्षात येण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे भव्य अनेकमजली गोपुर! हे गोपुर मंदिराच्या संपूर्ण प्राकाराभोवती मोठा तट बांधून प्रवेशद्वारावर बांधलेलं असतं. दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये मदुराई मीनाक्षीमंदिराची आणि श्रीरंगम्‌च्या रंगनाथमंदिराची गोपुरं जगप्रसिद्ध आहेत.

साधारणतः पूर्ण विकसित मंदिरस्थापत्यामध्ये मंदिराचे चार भाग असतात, मुख्य आराध्यदेवतेची प्रतिष्ठापना असलेलं गर्भगृह आणि त्यावरचं शिखर हे दोन्ही मिळून मंदिराचं विमान बनतं. अंतराळ म्हणजे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह या दोहोंमधली चिंचोळी जागा. भाविकानं मुख्य मंडपात संगीत, नृत्य आदी कलांचा आस्वाद घेतल्यानंतर गर्भगृहाकडे वळताना या अंतराळात घटकाभर थांबून चित्त एकाग्र करायचं असतं. मंडप म्हणजे गर्भगृहापुढं असलेलं मंदिराचं मुख्य दालन. हे बहुधा अनेक स्तंभांवर तोलून धरलेलं असतं आणि प्रदक्षिणापथ हा बहुधा जुन्या मंदिरांमध्ये मुख्य मंदिराच्या बाहेर असतो. मंदिरात दर्शनाला आलेल्या भक्तानं आधी मंदिराचं चोहोअंगानी बाह्य दर्शन घ्यावं, मंदिराचं प्रयोजन समजून घ्यावं आणि मगच आत प्रवेश करावा हा त्यामागचा विचार.

मंदिर म्हणजे दैवी शक्तीच्या प्रतीकरूपातल्या दर्शनाचं आणि उपासनेचं स्थान. हिंदू धर्मातल्या देव-देवता जितक्या विपुल आहेत तितकीच त्यांची मंदिरंही विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फक्त मंदिरं बघताना मंदिरस्थापत्याचे  बारकावे समजून घेतले तर आपलं देवदर्शन तर जास्त सुफल होईलच; पण सुसंस्कृत रसिक म्हणून आपण जास्त अनुभवसंपन्न होऊ यात दुमत नसावं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

कथा केळदीची

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

महाराष्ट्राच्या शेजारच्याच कर्नाटक राज्याला मंदिरनर्मितीची आणि मंदिरस्थापत्याची मोठी परंपरा आहे. वातापीच्या पराक्रमी चालुक्य राजांनी अनेक भव्य हिंदुमंदिरं बांधली. आजही ती मंदिरं बदामी, ऐहोळे आणि पट्टडक्कल या ठिकाणी आपण पाहू शकतो. चालुक्यांची मंदिर-उभारणीची परंपरा पुढं होयसळ राजवंशानं आणि त्यानंतर विजयनगरच्या रायांनी अजूनच भरभराटीला आणली. पुढं दक्षिणेतल्या सर्व मुसलमान सल्तनतींनी एकत्र लढून तालीकोटाच्या लढाईत विजयनगरच्या रामदेवरायाचा पराभव केला आणि विजयनगर साम्राज्य धुळीला मिळालं. तिथली मंदिरं लुटली गेली, मूर्ती खंडित केल्या गेल्या; पण नवीन मंदिरनिर्मिती थांबली नाही. 

विजयनगरच्या साम्राज्याच्या अस्तानंतर विजयनगरच्या काही पराक्रमी सेनापतींनी आपापली छोटी राज्ये कर्नाटकात ठिकठिकाणी निर्माण केली आणि आपल्याला शक्य असेल त्या प्रमाणात मंदिर-उभारणीची परंपरा कायम ठेवली. अशाच एका सदाशिव नायक नावाच्या सेनापतीनं शिमोगा जिल्ह्यात सागरजवळ स्वतःचं स्वतंत्र छोटं राज्य स्थापन केलं. सागर शहरापासून फक्त आठ किलोमीटवर असलेलं केळदी हे आजचं एक छोटं गाव या नायक राजवंशाच्या राजधानीचं ठिकाण होतं.

आज हे गाव ओळखलं जातं ते इथल्या रामेश्वर मंदिरसमूहामुळे. नायक राजवंशाचा राजा चौडप्पा ऊर्फ चंद्रप्पा नायक यानं सोळाव्या शतकात इथं एकाच प्राकारात तीन मंदिरं बांधली. कदंब, होयसळ आणि विजयनगर अशा तीन मिश्र द्रविड स्थापत्यशैलींचा वापर करून बांधण्यात आलेली ही तीन मंदिरं आजही डौलात उभी आहेत. मंदिरप्राकारातली तीन मंदिरं ही अनुक्रमे पार्वती, रामेश्वर आणि वीरभद्र अशा तीन देवतांची असली तरी मुख्य देवता श्रीशिवरामेश्वर असल्यानं या मंदिरसमूहाला रामेश्वरमंदिर म्हणूनच ओळखलं जातं. 

आजचं केळदी हे माडा-पोफळींच्या बागांनी नटलेलं एक छोटेसं गाव आहे. अगदी कोकणातल्या किंवा गोव्यातल्या एखाद्या सुंदर खेड्याची आठवण करून देणारं. रामेश्वरमंदिरही बाहेरून थेट एखाद्या मोठ्या कोकणी घरासारखं वाटतं. मोठमोठ्या लाकडी खांबांनी तोलून धरलेली कौलारू छपराची भलीमोठी लांबच लांब ओवरी आणि तीत असलेलं मंदिराचं छोटंसं प्रवेशद्वार बघून आपल्याला कल्पनाही येत नाही की आतमध्ये केवढं प्रचंड शिल्पवैभव दडलेलं आहे. मात्र, दरवाजातून आत प्रवेश केल्यावर मात्र फरसबंदीच्या एका प्रशस्त प्रांगणात बाजूबाजूला उभी असलेली तीन सुंदर दगडी मंदिरं लक्ष वेधून घेतात.

‘लेडीज फर्स्ट’या नियमानुसार त्यातलं पहिलं मंदिर देवी पार्वतीचं! या मंदिराची खासियत म्हणजे, रक्तचंदनाच्या लाकडातून अतिशय कुशलतेनं कोरून काढलेलं या मंदिराच्या सभामंडपाचं वितान म्हणजेच छत. अगदी कसबी सुवर्णकारानं घडवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर जितकी बारीक आणि नाजूक कलाकुसर असू शकेल तितकी सूक्ष्म कलाकुसर इथल्या छतावर आहे. देखणे अष्टदिक्पाल, देवीची विविध रूपं, गंधर्व, अप्सरा, पुराणातली दृश्यं, पाना-फुलांची नक्षी...सगळंच इतकं सुरेख आहे की, काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. अठरा हस्त असलेल्या शिव अघोरेश्वराची एक मूर्ती इथल्या छतावर कोरलेली आहे. ही मूर्ती इतकी देखणी आहे की बघताना अंगावर रोमांच उभे राहतात. 

पार्वतीमंदिराला लगटूनच रामेश्वराचं मंदिर आहे. होयसळ आणि द्राविड अशा मिश्र शैलीत राखाडी रंगाच्या ग्रॅनाईटच्या दगडात बांधलेलं हे मंदिर आटोपशीर व्यासाचं; पण अत्यंत सुरेख आहे. प्रदक्षिणापथ असलेलं गर्भगृह, महामंडप आणि मुखमंडप अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात रामेश्वराचं लिंग आहे, तर समोरच त्याचं वाहन असलेला नंदी गुडघे टेकून बसलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर देखणा व्याळ आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे स्तंभ अत्यंत सुंदर आहेत. छतावर सुंदर ब्रह्मकमळ कोरलेलं आहे.

या मंदिरप्राकारातलं सर्वात शेवटचे मंदिर म्हणजे वीरभद्राचं. या मंदिराच्या भिंतीवर आणि वितानावर काही अप्रतिम शिल्पं आहेत. त्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचं शिल्प म्हणजे गंडभेरुंडाचं. गंडभेरुंड म्हणजे दोन तोंडांचा गरुड. एक शरीर, दोन डोकी व दोन पंख असलेला हा काल्पनिक पक्षी म्हणजे श्रीविष्णूचं एक रौद्र स्वरूप. गंडभेरुंड हे प्रतीक कर्नाटकात अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. 

विजयनगरच्या सम्राटांच्या नाण्यावर गंडभेरुंडाचं अंकन असायचं. पुढं म्हैसूरच्या राजघराण्याचं राजचिन्ह आणि सध्या कर्नाटक राज्याचं राजचिन्ह म्हणून गंडभेरुंड सुविख्यात आहे. वीरभद्रमंदिराच्या छतावर कोरलेल्या गंडभेरुंडानं त्याच्या दोन्ही चोचींत दोन सिंह, तर दोन्ही पंजांमध्ये विशाल हत्ती पकडलेले आहेत! हा गंडभेरुंड म्हणजे शक्ती, शौर्य आणि सामर्थ्य यांचं प्रतीक आहे. इथलं दुसरं सुंदर वितानशिल्प म्हणजे नागबंध. एकमेकांत गुंतलेले नागबंध हे अनंताचं प्रतीक आहे. याच छतावर देखणा नवग्रहसमूहही कोरलेला आहे. मंदिरातलं सर्वच कोरीवकाम दृष्टी दिपवणारं आहे.

गाभाऱ्याच्या भिंतीवर अजाचं, म्हणजेच बोकडाचं तोंड असलेल्या दक्ष राजाची हात जोडून उभी असलेली सुरेख आणि दुर्मिळ अशी मूर्ती आहे, तर गाभाऱ्याच्या मागं बाह्य भिंतीवर वास्तुपुरुषाचं अंकन आहे. मंदिराच्या आवारात एक देखणा सप्तमातृकापट आहे. 

वीरभद्रमंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिराबाहेर असलेला दगडी विजयस्तंभ. या स्तंभाशी मराठी इतिहासाचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे सुपुत्र, हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराममहाराज यांचं चित्र या विजयस्तंभावर कोरलेलं आहे. 

आता तुम्ही विचाराल, छत्रपती राजाराममहाराजांचा आणि केळदीचा काय संबंध? तर शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ही कपटी औरंगजेबाच्या ताब्यात गेली. औरंगजेबानं संभाजीमहाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली. महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू हे औरंगजेबाच्या कैदेत होते. प्रसंग मोठा बाका होता. अशा वेळी छत्रपती राजाराममहाराज आजच्या तामिळनाडूत असलेल्या जिंजी किल्ल्याकडे निघाले. त्यांच्या मागावर औरंगजेबाची फौज होती. अशा वेळी छत्रपती राजाराममहाराजांनी केळदीच्या चेन्नम्मा राणीकडे मदत मागितली. 

कुंदापूरचा एक व्यापारी सिद्दप्पा शेट्टी याची मुलगी चेन्नम्मा ही सन १६६७ मध्ये केळदीचा राजा सोमेश्वर नायक याच्याशी विवाह करून केळदीची राणी झाली होती. सोमेश्वर नायकाच्या मृत्यूनंतर राणी चेन्नम्मानं तब्बल २६ वर्षं केळदीचा राज्यकारभार चालवला. विजयनगरच्या साम्राज्याच्या सेनापतीचा वंशज असलेला तिम्मण्णा नायक हा राणीचा मुख्य प्रधान होता. त्याच्या सल्ल्यानं राणी चेन्नम्मानं धाडसानं राजाराममहाराजांना आश्रय दिला आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य, क्रूरकर्मा मुघल बादशहाला आव्हान दिलं. 

मुघलांची फौज केळदीवर चालून आली. राणी चेन्नम्मानं स्वतः लढाईचं नेतृत्व करून मुघल सैन्याचा पाडाव तर केलाच; पण मुघलांना तिच्याशी तह करायला भाग पाडून तिनं राजाराममहाराजांना जिंजीपर्यंत सुखरूप पोहोचवलं. या विजयाचं प्रतीक म्हणून राणीनं वीरभद्रमंदिराच्या समोर एका जोत्यावर विजयस्तंभ उभारला. त्या स्तंभाच्या पायथ्याशी एक सुरेख श्रीगणेश कोरलेला आहे आणि त्याखाली राणी चेन्नम्मा, छत्रपती राजाराममहाराज आणि त्यांच्या दोन राण्यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. 

केवळ हिंदवी स्वराज्यावरच नव्हे, तर संपूर्ण भारत देशावर केळदीच्या या राणी चेन्नम्माचे किती उपकार आहेत! या लढवय्या राणीचं कर्तृत्व स्मरण्यासाठी आणि रामेश्वर मंदिरसमूहातलं अपूर्व शिल्पवैभव अनुभवण्यासाठी केळदीला जायलाच हवं.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

इक्केरीचा अघोरेश्वर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेल्या रविवारी आपण कर्नाटक राज्यातल्या शिमोग्याजवळच्या केळदी या गावातल्या सुंदर अशा वीरभद्रमंदिराबद्दल जाणून घेतलं. आज केळदीपासून जवळच असलेल्या इक्केरी या गावात असलेल्या अघोरेश्वराच्या देखण्या मंदिराची ओळख करून घेऊ. कर्नाटकातल्या मालेनाडू या परिसरात फिरायला जाणार असाल तर ही दोन्ही मंदिरं तुम्ही एका दिवसात बघून येऊ शकता. या दोन्ही मंदिरांची निर्मिती एकाच राजवंशातल्या लोकांनी केली आहे; पण दोन्ही मंदिरांचं स्थापत्य वेगळं आहे. आधी केळदी आणि मग इक्केरी या ठिकाणाहून राज्य करणाऱ्या नायक या छोट्या राजवंशातल्या लोकांनी निर्माण केलेली ही मंदिरं आजही आपल्या स्थापत्यकौशल्यानं लक्ष वेधून घेतात.

कन्नड भाषेत इक्केरी शब्दाचा अर्थ होतो ‘दोन रस्ते’. एकेकाळी मालेनाडू भागाला जोडणाऱ्या मोठ्या दोन रस्त्यांच्या संगमावर वसलेलं हे गाव. कधीकाळी एका छोट्या का होईना; पण स्वतंत्र राज्याची ही राजधानी होती हे आज कुणाला सांगूनदेखील खरं वाटणार नाही; पण इक्केरी ही नायक राजवंशाची पूर्वाश्रमीची राजधानी होती.

सदाशिव नायक या राजानं सन १५४० च्या आसपास केळदी इथली आपली राजधानी इक्केरी इथं हलवली. तेव्हापासून केळदीच्या नायकांना ‘इक्केरीचे नायक’ अशी उपाधी लागली. पुढची १२० वर्षं या नायकांनी इक्केरी इथून आपला राज्यकारभार चालवला; पण हे नायक मुळात होते कोण आणि ते आले कुठून याचा इतिहास मोठा चित्तवेधक आहे.

शिवाजीमहाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी कर्नाटकमधलं विजयनगर साम्राज्य हे भारतातलं शेवटचं स्वतंत्र, सार्वभौम हिंदुसाम्राज्य होतं. हम्पी ही या साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरच्या साम्राज्याच्या सीमा दक्षिण भारतात सर्वदूर पसरलेल्या होत्या. त्या सर्व भागावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून आणि प्रशासनाच्या सोईसाठी साम्राज्याचं विभाजन मदुराई, तंजावर, जिंजी, इक्केरी, म्हैसूर अशा वेगवेगळ्या भागांत केलं गेलं होतं. या विभागांचं प्रशासन पाहण्याऱ्या लोकांना नायक अथवा पाळेगार असं म्हणत. हे अधिकारी सहसा राजघराण्याशी संबंधित असत. त्यांचं कर्तृत्वही तसंच असे. आपल्या अखत्यारीतल्या विभागात त्यांना निर्णय घेण्याची बऱ्यापैकी स्वायत्तता असे. त्यामुळे असे नायक किंवा पाळेगार त्या प्रदेशाचे जवळजवळ राजेच बनत.

पुढं सोळाव्या शतकात तालिकोटाच्या लढाईत दक्षिणेतल्या सर्व मुसलमान सल्तनतींनी एकत्र लढून विजयनगरच्या हिंदुसाम्राज्याचा दारुण पराभव केला आणि राजधानी हम्पी लुटून, जाळून पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. स्वतः सम्राट रामराया या लढाईत मारला गेला. राजवंशातले उरलेसुरले लोक पेनुकोंडा या किल्ल्यातून नाममात्र राज्यकारभार पाहू लागले; पण विजयनगरचं साम्राज्य तर लयाला गेलंच होतं; त्यामुळे ठिकठिकाणी जे राज्याचा कारभार पाहणारे नायक होते त्यांनी, छोटी का होईना; पण स्वतंत्र राज्ये निर्माण केली.

मदुराई, जिंजी, इक्केरी, तंजावर इत्यादी स्वतंत्र राज्ये अशीच निर्माण झाली.

इक्केरीबद्दल सांगायचं तर, बिदनूरचा बसप्पा हा या घराण्याचा मूळ नायक. त्यानं प्रथम काही सैन्य जमवून आसपासची गावं आपल्या ताब्यात घेतली व तो पाळेगार झाला. त्याचा मुलगा सदाशिव हा अत्यंत शूर होता. त्यानं विजयनगरच्या राजाला लढाईमध्ये खूप मदत केली, त्याबद्दल त्याला ‘रायनायक’ ही पदवी मिळाली. त्यानंच आपली राजधानी केळदीहून इक्केरीला हलवली. त्याचा किल्ला आणि राजवाडा एकेकाळी इक्केरीत होता; पण आज मात्र या गावात एकच जुनी इमारत शिल्लक आहे व ती म्हणजे, सदाशिव नायकाचा धाकटा मुलगा चिक्क संकण्णा या नायक राजानं सोळाव्या शतकात बांधून घेतलेलं अघोरेश्वराचं मंदिर. 

माडा-सुपाऱ्यांच्या गर्द रायांनी वेढलेलं अघोरेश्वराचं हे सुंदर मंदिर कदंब, होयसळ आणि कर्णाट-द्रविड अशा मिश्रशैलीतलं आहे. प्रवेशद्वारावर मोठं रायगोपुर हे खास विजयनगरशैलीचं वैशिष्ट्य मात्र इथं दिसत नाही. भव्य गोपुराऐवजी अघोरेश्वरमंदिराच्या प्रवेशद्वारापाशी ग्रॅनाईटची एक साधी अनलंकृत कमान आहे. त्या कमानीखालून आपण गेलो की काही पायऱ्या चढून मंदिराच्या भव्य प्राकारात आपण प्रवेश करतो.

मंदिरप्राकारात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेतो तो अतिशय भव्य असा चौकोनी आकाराचा स्वतंत्र नंदीमंडप. हा नंदीमंडप मंदिराशी जोडलेला नाही. लालसर ग्रॅनाईट दगडात उभारलेल्या या नंदीमंडपाच्या दर्शनी भिंतीवर सुरेख कोरीव काम आहे. बाहेरच्या लालसर दगडाच्या पार्श्वभूमीवर आतला काळा कुळकुळीत नंदीश्वर चांगलाच उठून दिसतो. आपल्या देवाकडे, म्हणजे शिवाकडे, एकटक दृष्टी लावून डौलात बसलेला हा नंदी त्याच्या गळ्यातल्या घंटांच्या माळांमुळे खूपच गोड दिसतो. हा नंदी एकाच काळ्या पाषाणातून कोरलेला आहे. नंदीमंडपाच्या महिरपी कमानीवर इस्लामी वास्तुशैलीचा थोडासा प्रभाव दिसतो. नंदीमंडप आणि मुख्य मंदिराच्या मध्ये नैवेद्य किंवा बळी अर्पण करण्यासाठी वापरले जाणारे बळीपीठ आहे.

नंदीमंडपासमोर मुख्य मंदिराचं उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत. तिन्ही दरवाजांच्या दर्शनी भिंतींवर उत्तम कोरीव काम आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागांत मंदिर विभागलेलं आहे.  सभामंडप भव्य अशा १२ खांबांवर तोललेला आहे. खांबांवरदेखील उत्तम कोरीव काम आहे. सभामंडपाच्या बरोबर मध्यावर छतावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूंना दोन छोटी देवकोष्ठे आहेत, ज्यांत श्रीगणेश आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा आहेत. भिंतीवर अजून दोन देवकोष्ठे आहेत, जिथं महिषासुरमर्दिनी आणि भैरवाची शिल्पं आहेत. सभामंडपाच्या भिंतीच्या वरच्या भागात दगडात कोरलेली जालवातायनं आहेत. गर्भगृहाची द्वारशाखा कोरीव कामानं नटलेली आहे. दोन्ही बाजूंना शैव द्वारपाल आहेत. गर्भगृहात अघोरेश्वराची सध्या शिवलिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते; पण एकेकाळी इथं अघोरेश्वराची चोवीस हातांची भव्य मूर्ती होती. पुढं मुसलमानी आक्रमकांनी त्या मूर्तीचा विध्वंस केला. आज आपल्याला त्या मूर्तीचे केवळ तुटलेले पाय दिसतात, तेही बाजूच्या हिरवळीवर नुसतेच ठेवलेले!

दक्षिणी स्थापत्यानुसार आणि आगमशास्त्रानुसार, अघोरेश्वर शिवाच्या मुख्य मंदिराशेजारी शिवपत्नी पार्वतीचं अखिलांडेश्वरी या स्वरूपात स्वतंत्र छोटंसं मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरच्या स्तंभांवर व्याळ या काल्पनिक पशूची  सुंदर शिल्पं कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे. सागर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे अघोरेश्वराचं सुंदर मंदिर मुद्दाम जाऊन बघण्यासारखं निश्चित आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

अप्रतिम जलमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

आज आपण जे मंदिर बघणार आहोत ते रूढार्थानं मंदिर नाही, आणि तरीही मंदिरच आहे. प्राचीन भारतात नगरसंरचनेत पाण्याचं महत्त्व असाधारण होतं. पाण्याचे स्रोत शोधणं, ते जपणं, पावसाचं पाणी अडवण्यासाठी तलाव, पुष्करिणी, पायऱ्यापायऱ्यांच्या विहिरी म्हणजे बावडी बांधणं ही सर्व कामं भारतातले राजे-राण्या आवर्जून करायचे; किंबहुना नदीवर घाट बांधणं, मंदिरांपुढं पुष्करिणी बांधणं, तलाव खोदणं ही कामं मोठ्या पुण्याची मानली जायची. मृत्यूनंतर नाव मागं राहावं म्हणून हिंदू राजांनी आणि राण्यांनी, आपल्या मृत्यू पावलेल्या आप्तांच्या स्मरणार्थ मंदिरं, घाट आणि पाण्याचे तलाव बांधलेले आहेत. असे घाट आणि पावसाचं पाणी अडवून ठेवण्यासाठी विविध राजवंशांनी बांधलेल्या पुष्करिणी, तलाव आणि विहिरी भारतात आजही उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत जागोजागी दिसतात. त्यातल्या त्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या गुजरात आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमधून तर अशा पायऱ्यापायऱ्यांच्या बावडी  खूप ठिकाणी दिसतात. 

या सर्व बावड्यांची राणी म्हणजे गुजरातमधल्या पाटण या शहरातली प्रसिद्ध अशी ‘रानी की वाव’. जमिनीच्या पोटात चक्क सात मजले खोल गेलेली ही विहीर म्हणजे या भागात प्रचलित असलेल्या मरू-गुर्जर स्थापत्यशैलीचा पूर्ण विकसित असा सुंदर नमुना आहे; किंबहुना ही वाव म्हणजे, उलटं ठेवलेलं एक विशाल असं सातमजली भव्य मंदिरच आहे म्हणा ना! ही ‘रानी की वाव’ स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून इतकी सुंदर आहे, की जून २०१४ मध्ये ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. सध्या भारतीय चलनात असलेल्या नव्या शंभर रुपयांच्या नोटेवरदेखील या वावेचं चित्र आहे. 

गुजरातची राजधानी अहमदाबादपासून सुमारे दीडशे किलोमीटरवर वसलेलं पाटण हे शहर एकेकाळी अन्हीलवाड या नावानं प्रसिद्ध होतं. गुजरातमधल्या चालुक्य वंशाच्या शाखेची पाटण ही राजधानी होती. गुजराती भाषेत चालुक्यचं सोळंकी होतं. सुमारे तीनशे वर्षं सोळंकी राजवंशानं पाटणमधून उत्तर गुजरातवर राज्य केलं. सोळंकी राजे शूर तर होतेच; पण रसिकही होते, कलेचे भोक्तेही होते. जैन आणि हिंदू या दोन्ही विचारसरणींच्या लोकांना सोळंकी राजांनी उदारहस्ते आश्रय दिला. 

त्यांच्या काळात अनेक मंदिरं, पाणपोया, धर्मशाळा बांधल्या गेल्या.  पुढं तेराव्या शतकात दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यानं केलेल्या हल्ल्यात पाटण पूर्णपणे लुटून उद्ध्वस्त केलं गेलं. एकेकाळी अत्यंत संपन्न, समृद्ध असलेलं आन्हिलवाड कालांतरानं लोकांच्या पार विस्मृतीत गेलं. आज पाटणच्या त्या वैभवकाळाची आठवण करून देतात ते इथल्या एकेकाळच्या किल्ल्याचे अवशेष, काही मंदिरं आणि ‘रानी की वाव’!  पाणी हे भारतात कायमच पवित्र मानलं गेलेलं आहे. जिथं पाणी असतं तिथं जलदेवतेचा, अप्सरांचा वास असतो अशी श्रद्धा आपल्याकडे गावोगावी अजूनही आढळून येते. त्यामुळे जिथं पाण्याचा साठा असतो त्या विहिरींना मंदिरस्वरूप मानणं ओघानंच आलं. साहजिकच, अशा विहिरी खोदताना त्या मंदिरांप्रमाणे सजवणं सुरू झालं. यातूनच पाटणच्या ‘रानी की वाव’सारख्या अद्वितीय कलाकृती जन्माला आल्या. ‘रानी की वाव’ जेव्हा मी पहिल्यांदा बघितली तेव्हा माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. ‘रानी की वाव’ विश्ववारसास्थळांमध्ये का आली ते पहिल्या दहा सेकंदांत पुरतंच समजतं, इतकी भव्य आणि नजर खिळवून टाकणारी वास्तू आहे ही. 

सोळंकी घराण्यातला पराक्रमी राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी राणी उदयमती हिनं आपल्या राजधानीच्या गावी, पाटणमध्ये ही सातमजली विहीर बांधायचं ठरवलं. यावरून राजाच्या मृत्यूनंतरसुद्धा त्याच्या राणीच्या हातात केवढी सत्ता होती हे आपल्याला कळतं. या शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती पुढं राणी उदयमतीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानं, म्हणजे राजा कर्णदेवानं, पूर्ण केली. मात्र, राणी उदयमतीनं बांधायला काढलेली विहीर म्हणून या विहिरीचं नाव ‘रानी की वाव’ असं पडलं. इथले लोक अजूनही या बावेला ‘उदयमती की बाव’ असंच म्हणतात. 

अंदाजे ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल अशी ही सातमजली विहीर अकराव्या शतकात बांधून पूर्ण  झाली. तब्बल १० वर्षं ही विहीर बांधायचं काम सुरू होतं. राणीनं बांधलेल्या या विहिरीचा उल्लेख संस्कृत कवी मेरुंगसुरी यानं सन १३०४ मध्ये लिहिलेल्या ‘प्रबंधचिंतामणी’ या ग्रंथात आढळतो. मात्र, पुढं अल्लाउद्दीन खिलजीनं पूर्ण पाटण शहर बेचिराख केल्यानंतर या विहिरीचा वापर करणारे, झरे साफ ठेवणारे, पाण्याचा निचरा करणारे, विहिरीची साफसफाई करणारे कुणी लोक जवळपास राहिले नाहीत आणि विहीर गाळानं भरत गेली. पुढं जवळच्या नदीला पूर आला आणि ही संपूर्ण विहीर मातीखाली दबली गेली होती. तिचे काहीही अवशेष वरून दिसत नव्हते. इथल्या लोकांच्या स्मृतीत ही विहीर केवळ एक दंतकथा बनून राहिली होती. पुढं कालौघात मातीची धूप झाली आणि या विहिरीच्या वरच्या थरातली काही शिल्पं दिसू लागली. काही स्थानिक लोकांनी ती पळवलीदेखील. या वास्तूला खऱ्या अर्थानं परत चांगले दिवस आले ते अगदी अलीकडे, म्हणजे सन १९८० च्या दशकात. भारतीय पुरातत्त्व खात्यानं इथं उत्खनन करून, काळाच्या ओघात जमिनीत दडलेलं, हे शिल्पलेणं अथक् प्रयत्नांतून परत एकवार लोकांसमोर आणलं. 

जसजसे आपण या सातमजली विहिरीच्या पोटात जातो तसतसे आपण अधिकाधिक स्तिमित होत जातो. वरून खाली निमुळती होत जाणारी ही विहीर म्हणजे, उलटं बांधलेलं एक सातमजली भव्य मंदिरच आहे. खरं कोरीव काम तिसऱ्या मजल्यापासून सुरू होतं. पश्चिमेकडून प्रवेशमार्ग असलेल्या या विहिरीच्या दोन्ही बाजूंच्या, म्हणजे दक्षिण व उत्तर, भिंतींवर असंख्य मूर्ती आणि शिल्पं कोरलेली आहेत. अतिशय नाजूक कलाकुसर असलेल्या या मूर्ती किती पाहू आणि किती नको असं होऊन जातं. 

मंदिरस्थापत्यात गर्भगृह हा जसा मंदिराचा सर्वात मध्यवर्ती गाभा असतो, तसा इथं विहिरीचा पाणी असलेला सर्वात खालचा भाग आहे, जिथं भिंतीत शेषशायी श्रीविष्णूची अप्रतिम मूर्ती कोरलेली आहे. सध्या त्या भागात आपण जाऊ शकत नाही. एका चौकातून दुसरीकडे जायला मध्ये पूल आणि त्यावर ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांचे खांबसुद्धा बारीक कलाकुसरयुक्त असून यक्ष, कीर्तिमुखं, पूर्णकुंभ इत्यादी प्रतीकांची रेलचेल या खांबांवर दिसते. दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव-पार्वती, सप्तमातृका, सूरसुंदरी अशा अनेक देखण्या कोरीव मूर्ती ‘रानी की वाव’मध्ये पाहायला मिळतात. 

‘रानी की वाव’ ही फक्त पाणी भरण्याची विहीर नसून ते सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नयनाचं एक केंद्र होतं हे यावरून स्पष्ट होतं. पाणी भरायला येणारे लोक क्षणभर विसाव्यासाठी बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून धर्म आणि इतिहास याची माहिती मिळेल असा विचार यामागं असावा. प्रजेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणं हे राजाचं कर्तव्यच आहे; पण त्याचबरोबर इतकी देखणी शिल्पसृष्टी निर्माण करून लोककल्याणाबरोबरच धर्मशिक्षण साधणं ही राणी उदयमतीची दीर्घ दृष्टी चकित करून जाते.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

आध्यात्मिक प्रतीकांचं नटराजमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

तामिळनाडू राज्यात अनेक अतिभव्य शिवालयं आहेत. त्यातली बहुतेक चोळ/चोल राजवंशाच्या काळात बांधली गेलेली आहेत. या चोळ राजांची एक भव्य निर्मिती म्हणजे श्रीशंकरांची नटराज या रूपात उपासना होणारं चिदंबरम् इथलं अप्रतिम शिवमंदिर. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात, चेन्नई-तंजावर मार्गावर चेन्नईपासून २४५ किलोमीटरवर हे मंदिर आहे. स्वतःचं वाहन असेल तर पुदुचेरीमार्गे चेन्नईहून चार-पाच तासांत चिदंबरम् इथं पोहोचता येतं. 

चिदंबरम् इथलं हे भव्य मंदिर चोळ राजवंशाचं राज्याभिषेकमंदिर होतं. इथले परंपरागत पुजारी पोधू दीक्षितार नावाचे वैदिक ब्राह्मण आहेत. अगदी आजही चिदंबरम् इथल्या या मंदिरात केवळ पोधू दीक्षितारच सेवा देऊ शकतात. 

दक्षिण भारतात श्रीशंकरांची पंचमहाभूतस्थळं आहेत, जिथं श्रीशंकरांची उपासना पंचमहातत्त्वांच्या स्वरूपात केली जाते. यांपैकी चिदंबरम् इथलं हे शिवमंदिर आकाशतत्त्‍वाचं प्रतीक आहे. थिरुवनाईकवलचं जंबुकेश्वर हे जलतत्त्वाचं प्रतीक, कांचीचं एकाम्रेश्वर हे पृथ्वीतत्त्वाचं प्रतीक, तिरुवन्नमलईचं अरुणाचलेश्वर हे अग्नितत्त्वाचं प्रतीक आणि आजच्या आंध्र प्रदेशातलं श्रीकालहस्ती हे शिवमंदिर वायुतत्त्वाचं प्रतीक आहे. 

दक्षिणेत प्रत्येक मंदिराचं स्थळपुराण असतं. ते मंदिर कसं अस्तित्वात आलं याची पौराणिक कथा या स्थळपुराणात असते. असं म्हणतात की या जागी थिलाई या वृक्षाचं खूप मोठं वन होतं. थिलाई म्हणजे खारफुटीचा एक प्रकार. अगदी आजही चिदंबरम् पासून जवळच पिचावरम् इथं खारफुटीचं खूप मोठं वन आहे. एकेकाळी या वनाची व्याप्ती पार चिदंबरम् पर्यंत पसरलेली असावी. या जंगलात काही तामसी साधू राहून तंत्रसाधना करत असत. जेव्हा भगवान शिव इथं भिक्षाटनाच्या निमित्तानं आले तेव्हा त्यांना तिथून पिटाळून लावण्यासाठी म्हणून या तामसी ऋषींनी जादू-टोण्यानं अनुक्रमे नाग, वाघ व अपस्मार नावाचा पुरुष निर्माण केला. श्रीशंकरांनी नाग गळ्यात धारण केला, वाघाचं चर्म कटिवस्त्र म्हणून धारण केलं व अज्ञानाचं आणि अविद्येचं प्रतीक असलेल्या अपस्मार पुरुषाच्या पाठीवर पाय देऊन भगवान शिवांनी नटराजस्वरूपात आनंदतांडव सुरू केलं. 

इथल्या विष्णुभक्तांना जसं नुसतं मंदिर किंवा कोविल म्हटलं की श्रीरंगम् आठवतं, तसंच शिवभक्तांसाठी मंदिर म्हणजे चिदंबरम् इथलं हे नटराजमंदिर! 

पल्लव, चोळ, पांड्य आणि पुढं विजयनगरचे सम्राट आणि मदुराईचे नायक या विविध राजवंशांनी या नटराजमंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केला. तब्बल ४० एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर गेली एक हजार वर्षं हे मंदिरसंकुल दिमाखात उभं आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे, एकाच संकुलात भगवान शिवांची नटराजस्वरूपात व भगवान विष्णूंची  गोविंदराज पेरुमल या स्वरूपात उपासना केली जाते.  

भारतातलं हे एकमेव असं शिवमंदिर आहे, जिथं गाभाऱ्यात भगवान शिवांची साकाररूपात नटराजाच्या मूर्तिस्वरूपात, साकार-निराकाररूपात स्फटिक शिवलिंगस्वरूपात आणि पूर्ण निराकाररूपात अवकाशस्वरूपात पूजा केली जाते. गर्भगृहात नटराजांच्या मूर्तीच्या बाजूला एक काळा पडदा आहे. तो पडदा म्हणजे मायेचं प्रतीक. नित्यपूजेच्या वेळी तो पडदा सरकवला जातो आणि भाविकांना दिसतो तो त्यामागचा अवकाश, जो एकाच वेळी रिकामाही आहे आणि भरलेलाही. त्या अवकाशात केवळ पाच बिल्वपत्रं दिसतात. हेच ते प्रसिद्ध चिदंबररहस्य! 

मंदिरसंकुलात प्रवेश करताना चारी दिशांना सातमजली उंच भव्य गोपुरं दिसतात. ही चारही गोपुरं वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या शतकात बांधलेली आहेत, तरीही सर्व गोपुरं तितकीच उंच आहेत आणि प्रत्येकावर तांब्याचे तेरा कलश आहेत. सध्या आपण ज्या पूर्वगोपुरातून मंदिरात प्रवेश करतो, त्या गोपुराच्या भिंतीवर भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रा कोरलेल्या आहेत, ज्यांना ‘कारण’ असं नाव आहे. 

इथल्या मुख्य गाभाऱ्याला ‘कनकसभा’ असं नाव आहे, म्हणून इथं भगवान शिवांना ‘कनकसभापती’ असंही नाव आहे. कनकसभा किंवा चित्रांबलम या मंडपाचं  छत २१ हजार ६०० सुवर्णकौलांनी शाकारलेलं आहे. चोळ राजा परांतक यानं या मंदिराचं छत दहाव्या शतकात सोन्यानं मढवून घेतलं असे मंदिरातल्या शिलालेखात उल्लेख आहेत. परांतक स्वतःला ‘भगवान शिवांच्या चरणकमलांपाशी रुंजी घालणारा भृंग’ असं म्हणवून घेतो. 

ही २१ हजार ६०० कौलं म्हणजे योगशास्त्रानुसार, आपण दिवसातून जितक्या वेळा श्वास घेतो त्याचं प्रतीक आहेत. ही कौलं ७२ हजार सोनेरी खिळ्यांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. हे खिळे म्हणजे आपला श्वास किंवा प्राण ज्या ७२ हजार नाड्यांमधून वाहतो त्यांचं प्रतीक आहेत. मानवी शरीरात जसं हृदय किंचित डावीकडे असतं, तशी इथं श्रीनटराजांची मूर्ती किंचित डावीकडे आहे. एकूणच, हे मंदिर गूढ आध्यात्मिक प्रतीकांनी भरलेलं आहे. 

खुद्द भगवान शिवांचं नटराजस्वरूप हेच मुळात अखिल विश्वाच्या नियमबद्ध हालचालींचं लयबद्ध प्रतीक आहे. भगवान शंकर जेव्हा तांडवनृत्य करतात तेव्हा ते नृत्य त्यांच्या सृष्टी (निर्माण) स्थिती, संहार, तिरोभाव (विश्रांती) आणि शेवटी अनुग्रह (मोक्ष) या पंचक्रियांचं प्रतीक मानलं जातं. शिव डमरू वाजवतात तेव्हा सृष्टीचं सृजन होतं, त्यांची अभयमुद्रा हे स्थितीचं, हातातला अग्‍नी हे नाशाचं, सभोवतालचं प्रभामंडळ हे तिरोभावाचं व उचललेला पाय हे अनुग्रहाचं प्रतीक समजलं जातं, म्हणूनच अगदी स्वित्झर्लंडमधल्या भौतिकशास्त्रात प्रगत संशोधन करणाऱ्या अत्याधुनिक पार्टिकल लॅबमध्येदेखील नटराजाची भव्य मूर्ती विराजमान आहे. 

भाविक हिंदूंचा असा विश्वास आहे की, जिथं श्रीनटराजांचं हे नृत्य चालतं ते चिदंबरम् हा विश्व तोलणारा बिंदू आहे. 

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानं आपल्या सर्वांच्याच हृदयात एक चिदंबरम् असून, तिथं आत्मस्वरूपी नटराजाचं नृत्य सर्व काळ चाललेलं असतं असा अध्यात्मविचार आहे,’ असं मला तिथल्या दीक्षितार पुजाऱ्यानं सांगितलं. 
आपल्या अंतरातला हा दैवी नृत्याविष्कार समजून घ्यायला तरी चिदंबरम् इथं अवश्य जावं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

चौसठी योगिनी : स्त्रीशक्तीचं प्रतीक

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

नजर जाईल तिथवर हिरवीगार भातशेती पसरलेली. एका बाजूला पाण्यानं काठोकाठ भरलेलं तळं, तळ्याच्या मधोमध एक मंदिर. तळ्याच्या काठावर सतत सळसळणारा एक पुरातन पिंपळ. एका बाजूला दहा-बारा घरं, काही कौलारू, तर काही गवतानं शाकारलेली. घरांच्या भिंती शेणानं सारवलेल्या आणि त्यांवर तांदळाच्या पिठानं अंगठ्यांचे ठसे वापरून चित्रं रंगवलेली. अगदी जुन्या गोष्टींच्या पुस्तकातल्या चित्रात असावा तसा देखणा गाव...हिरापूर. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या ओडिशा राज्यातल्या अनेक खेड्यांपैकी एक छोटंसं खेडं. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून हिरापूर जेमतेम २५ किलोमीटरवर आहे. गाडीनं एका तासात पोचता येतं. मी हिरापूरला जायचं मुख्य कारण म्हणजे तिथलं योगिनीमंदिर. ‘चौसठी जोगिनीमंदिर’ म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर अगदी आगळंवेगळं आहे.

भारतात चौसष्ट योगिनीमंदिरं खूप कमी अढळतात. मध्य प्रदेशात खजुराहो आणि जबलपूर इथली योगिनीमंदिरं आणि ओडिशामधली हिरापूर आणि बोलांगीरजवळच्या राणीपूर इथं अशी मंदिरं आहेत. साधारणतः आठव्या त्या दहाव्या शतकाच्या दरम्यान मध्य आणि उत्तर भारतात शाक्त पंथ खूप लोकप्रिय होता. त्या काळात बांधलेली ही मंदिरं आहेत. योगिनीमंदिरांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, ही मंदिरं वर्तुळाकार असतात आणि त्यांना छप्पर नसतं. आपल्याकडे स्थापत्यशास्त्राच्या प्राचीन ग्रंथामधून मंदिरांची वर्तुळाकार रचना नोंदली गेली आहे; पण प्रत्यक्षात मात्र ‘योगिनी’मंदिरं वगळली तर वर्तुळाकार मंदिरं फारशी कुठं दिसत नाहीत. मग योगिनीमंदिरांसाठीच हा आकार का वापरला गेला?

तज्ज्ञांचं असं मत आहे की, वर्तुळ हे अव्यक्त अशा पूर्ण शक्तीचं प्रतीक आहे. स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक, सृजनाचं प्रतीक आणि सर्व लयाला गेल्यानंतर उरणाऱ्या शून्याचंही प्रतीक. वर्तुळ कुठून सुरू होतं आणि कुठं संपतं ते सांगता येत नाही, म्हणूनच योगिनींची म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना करण्यासाठी वर्तुळाहून चांगली रचना कुठली असेल? 

हिरापूर इथलं चौसष्ट योगिनीमंदिर हेही वर्तुळाकार आहे आणि तिथल्याच वालुकाश्माच्या शिळा एकावर एक रचून ते घडवलेलं आहे. मंदिरात प्रवेश करायला वर्तुळातून बाहेर आलेलं चिंचोळं प्रवेशद्वार आहे आणि मंदिरावर छप्पर नसलं तरी प्रवेशद्वार मात्र वरून बंदिस्त आहे. मंदिराच्या मधोमध एक चौकोनी चंडीमंडप आहे आणि त्याची उंची मंदिराच्या भिंतींपेक्षा जास्त आहे. उंचावरून छायाचित्र घेतलं तर पूर्ण मंदिर एखाद्या शिवलिंगासारखं दिसेल. मंदिराच्या दर्शनी भागावर आठ स्त्रीमूर्ती कोरलेल्या आहेत. 

मुख्य मंदिराची घडण वालुकाश्मात असली तरी हिरापूरच्या मंदिरातल्या सर्व योगिनीमूर्ती मात्र काळ्या गंडकी पाषाणात घडवलेल्या आहेत. मंदिराच्या गोलाकार भिंतीवर जमिनीपासून तीन फुटांवर सुबक कोनाडे केलेले आहेत आणि प्रत्येक कोनाड्यात एक अशा योगिनींच्या मूर्ती आहेत. मधोमध चामुंडेश्वरीची मोठी आराध्यमूर्ती आहे; पण सध्या ती मूर्ती पूजेत असल्यामुळे, भरजरी वस्त्रांनी झाकून टाकलेली आहे. 

योगिनींच्या मूर्ती अत्यंत सुरेख आणि सालंकृत आहेत. पायात पैंजण, गळ्यात कंठा आणि इतर आभूषणं, हातात कंकणं, कंबरपट्टा, कानातली इत्यादी अनेक अलंकार योगिनींच्या मूर्तींवर आहेत. प्रत्येकीचा केशकलाप वेगळ्या पद्धतीचा आहे आणि केसात अनेक आभूषणं आहेत. प्रत्येक योगिनीच्या पायाखाली तिचं वाहन आहे. काही योगिनींनी अलंकार म्हणून सर्प किंवा मानवी मुंडकीदेखील परिधान केलेली आहेत. काही योगिनी द्विभुज आहेत, तर काही चतुर्भुज आणि अष्टभुजदेखील आहेत. मूर्ती छोट्याशाच आहेत; पण अतिशय नाजूक आणि प्रमाणबद्ध आहेत. त्यांचे विविध विभ्रम शिल्पकारांनी खूप सुंदररीत्या पाषाणात कोरून ठेवलेले आहेत. एक योगिनी एक पाय वर उचलून स्वतःचे पैंजण बसवत आहे, तर एक योगिनी हातातील धनुष्यबाण ताणून शिकारीच्या पवित्र्यात उभी आहे. एक आहे ती वैनायकी, म्हणजे श्रीगणेशाची शक्ती, तर एक आहे चामुंडेच्या स्वरूपातली, भयावह, अत्यंत कृश देह, गाल बसलेले, बरगड्यांच्या फासळ्या बाहेर आलेल्या, बटबटीत मोठे डोळे आणि चेहऱ्यावर हास्य अशी आहे.  रौद्र, बीभत्सपासून ते लावण्यवती अशा सर्व रूपांमधल्या योगिनींची शिल्पं हिरापूरच्या मंदिरात आहेत. 

हे मंदिर नवव्या शतकात भौम वंशाच्या हिरा नावाच्या राणीनं बांधून घेतलं. हे गावही तिनंच वसवलं म्हणून त्याला हिरापूर असं नाव दिलं गेलं आहे. पढं ‘काळा पहाड’ नावाच्या बंगालमधल्या मुसलमान सेनापतीनं ओडिशावर स्वारी करून इथली बरीच मंदिरं, शिल्पं उद्ध्वस्त केली. त्याच्या सैनिकांची वक्रदृष्टी या मंदिरावरही पडली. आज हिरापूरच्या मंदिरातल्या एकूण एक योगिनीमूर्ती उद्ध्वस्तावस्थेत आहेत. काहींचे हात-पाय तुटलेले, काहींचे चेहरे विद्रूप केले गेलेले, काहींच्या छातीवर घाव घातलेले; पण तरीही मूळच्या मूर्तींचं सौंदर्य आणि शक्ती लपत नाही. 

या चौसष्ट योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. रक्तबीज या दैत्याच्या निर्दालनासाठी देवीनं युद्ध केलं; पण त्या दैत्याला असा वर होता की, त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर सांडला तर त्यातून नवीन दैत्य निर्माण होईल. तेव्हा त्याचं रक्त पिण्यासाठी म्हणून देवीनं चौसष्ट शक्ती निर्माण केल्या व त्यांच्या मदतीनं रक्तबीजाचा वध केला अशी पुराणकथा आहे. 

पण योगिनी म्हणजे स्त्रीशक्ती. सृजनाची शक्ती निसर्गानं स्त्रीला बहाल केलेली आहे, त्यामुळेच अगदी आदिम काळापासून आपल्याकडे मातृशक्तीची उपासना केली गेली, अगदी सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या काळापासून भारतात याबाबतचे पुरावे सापडतात. अनादी कालापासून आपल्याकडे ‘स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे स्त्री’ असं समीकरण चालत आलं आहे, म्हणूनच मूर्तिशास्त्रानुसार कोणत्याही देवाची शक्ती दाखवताना ती स्त्रीमूर्तीच्याच स्वरूपात दाखवली जाते. 

विद्या दहेजिया यांनी आपल्या पुस्तकात, योगिनीमंदिरं बिनछपराची का असतात याचा उलगडा करताना लिहिलं आहे, की शक्ती ही अमर्याद असते, तिला आपण बांधून ठेवू शकत नाही आणि योगिनी या आभाळात मुक्त संचार करू शकणाऱ्या देवता असतात म्हणून त्यांची मंदिरं वरून उघडी असतात, त्यांच्यावर छप्पर नसतं. 

एक गूढ, वेगळा अनुभव घेण्यासाठी आणि स्त्रीशक्तीला वंदन करण्यासाठी तरी ओडिशामधल्या या सुंदर मंदिरात जायलाच हवं. 
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

दोड्डागड्डवलीचं श्रीलक्ष्मीमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

भारतातली बरीच प्राचीन मंदिरं मी बघितलेली, अभ्यासलेली आहेत; पण कर्नाटकमधल्या होयसळ राजवंशाच्या काळात बांधली गेलेली मंदिरं माझ्या विशेष आवडीची आहेत. होयसळ राजवंशानं कर्नाटकच्या कावेरी खोऱ्यातून सुरुवात करून पुढं आपलं साम्राज्य विस्तारत नेलं. अकरावं ते चौदावं शतक यांदरम्यान कर्नाटक राज्याच्या बऱ्याच भागात होयसळांची सत्ता होती. होयसळ राजांच्या कार्यकाळात जवळजवळ नऊशेहून अधिक मंदिरांची निर्मिती झाली असे पुरातन शिलालेखांत आणि कन्नड साहित्यात उल्लेख आहेत. पुढं चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचा धर्मांध सेनापती मलीक काफूर यानं तत्कालीन होयसळ राजाचा पराभव करून यांतली बरीच मंदिरं भग्न केली; पण आजही कर्नाटक राज्यात जवळजवळ शंभरेक होयसळ मंदिरं बऱ्या-वाईट परिस्थितीत तग धरून आहेत. त्यातलंच एक मंदिर म्हणजे हासन शहरापासून जवळच असलेलं बेलूर रस्त्यावरील दोड्डागड्डवलीचं श्रीलक्ष्मी मंदिर. हे मंदिर अतिशय सुरेख आहे; पण हमरस्त्याहून थोडं दूर असल्यामुळे काहीसं दुर्लक्षित आहे. बंगळूरहून निघून एका दिवसात बेलूर आणि हळेबिडू इथली जगप्रसिद्ध होयसळ राजमंदिरे आणि दोड्डागड्डवलीचं हे श्रीलक्ष्मीमंदिर बघता येतं. 

काही महिन्यांपूर्वी इथली आठशे वर्षं जुनी सुरेख भद्रकालीची मूर्ती मंदिरातच भग्नावस्थेत आढळून आल्यामुळे हे मंदिर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. मूर्तीखालचं पीठ गुळगुळीत झाल्यामुळे ती हलून पडली होती व कुणी मुद्दामहून मूर्तिभंग केला नव्हता असं पोलिसांच्या तपासात नंतर आढळून आलं. 

मी गेल्याच आठवड्यात हे मंदिर परत बघून आले. ‘एएसआय’च्या लोकांनी मूर्ती परत होती तशीच जोडली आहे ही समाधानाची गोष्ट. ही भद्रकालीची अष्टभुजा मूर्ती अत्यंत देखणी आहे. देवी एका राक्षसावर बसलेली आहे. तिच्या उजवीकडच्या चार हातांमध्ये खड्ग, त्रिशूळ, गदा आणि बाण ही आयुधं आहेत, तर डावीकडच्या हातात पात्र, डमरू, धनुष्य आणि पाश आहे. तिचा देह जरी शस्त्रसज्ज असला तरी मुखावरील भाव शांत आहेत, ओठांवर मंद स्मित आहे आणि नजर अंतर्मुख आहे. गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूंना तिचे भूतगण आहेत. अक्राळविक्राळ चेहऱ्यांचे, आ वासून उभे असलेले, छातीच्या फासळ्या दाखवणारे, विवस्त्रावस्थेतले हे भूतगण खरोखरच काहीसे भीतिदायकच आहेत. असे भूत द्वारपाल दुसऱ्या कुठल्याही होयसळमंदिरात बघायला मिळणार नाहीत. 

मंदिर जरी महालक्ष्मीचं म्हणून प्रसिद्ध असलं तरी या मंदिराला चार गाभारे आहेत. त्यातल्या दक्षिणेकडच्या गाभाऱ्यात ही भद्रकाली आहे. पूर्वेकडच्या गाभाऱ्यात महालक्ष्मी आहे, पश्चिमेकडच्या गाभाऱ्यात श्रीविष्णूची मूर्ती होती; पण ती काही वर्षांपूर्वी चोरीला गेली. उत्तरेकडच्या गाभाऱ्यात शिव आहेत. 

या मंदिराचे आणि महाराष्ट्राचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. हे मंदिर सन १११४ मध्ये होयसळांच्या राजवटीत तिथला हिऱ्यांचा व्यापारी कल्हण राऊतर यानं बांधून घेतलं. तो कोल्हापूरच्या अंबाबाईचा भक्त होता. कोल्हापूरला जशी देवीची मूर्ती आहे अगदी तशीच मूर्ती करून त्यानं या मंदिरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, म्हणून या मंदिराला त्या काळी ‘अभिनव कोल्हापूरम्’ म्हणूनही ओळखलं जायचं. इथली देवीची मूर्ती बघितल्यावर हे साम्य सहज लक्षात येतं. 

लक्ष्मीची मूर्ती सर्वसाधारणतः बैठ्या स्वरूपातील व हातात कमळ घेतलेली असते. ही मूर्ती उभी व हातात शंख-चक्र-गदा घेतलेली आहे, त्यामुळे ती म्हणजे पार्वती आहे असाही तर्क केला जातो. तिच्या मस्तकी सुरेख मुकुट आहे. चेहरा शांत, सस्मित आहे. अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखीच ही मूर्ती आहे. विशेष म्हणजे, ही सर्व माहिती तिथली व्यवस्था बघणारा कर्मचारी नेत्रपालाक्ष यालाही ठाऊक होती. डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि मूर्तिशास्त्र या विषयातले दिग्गज डॉ. गो. बं. देगलूरकर सरांबरोबर मी हे मंदिर बघायला गेले होते. सरांनी मला मंदिराबद्दल आधी जी माहिती सांगितली होती ती बहुतेक सगळी त्या नेत्रपालाक्षला ठाऊक होती. तो आणि त्याचा काळा कुळकुळीत वीरभद्राच्या कुत्र्यासारखा दिसणारा कुत्रा मंदिर बघताना पूर्ण वेळ आमच्याबरोबर होता. 

स्टेलेट म्हणजे तारकाकृती जगती, चार लेथवरून गुळगुळीत केलेल्या स्तंभांनी नऊ भागांत विभागलेला एकच नवरंगमंडप आणि त्याला विविध दिशांना जोडणारी एकाहून एक गर्भगृहं ही होयसळमंदिरांची वैशिष्ट्यं दोड्डागड्डवलीच्या या मंदिरातही आढळून येतात; पण या मंदिराची खासियत म्हणजे, होयसळशैलीत बांधलेलं हे एकमेव चतुष्कुट मंदिर आहे. म्हणजे या मंदिराला चार गाभारे आणि प्रत्येक गाभाऱ्यावर असलेलं स्वतंत्र शिखर आहे. 

त्याशिवाय मंदिरप्राकारात चार कोपऱ्यांत बांधलेली पंचायतन पद्धतीची चार छोटी देवालयंही आहेत. डॉ. देगलूरकरांच्या मते, मंदिराचं शिखर द्रविड-फणसना पद्धतीचं आहे, म्हणजे फणसना पद्धतीच्या शिखरावर द्रविडपद्धतीची स्तूपिका आहे. 

मंदिर बाहेरून अगदीच साधं आणि अनलंकृत आहे. या मंदिरानंतर काहीच वर्षांनी बांधण्यात आलेल्या बेलूर आणि हलेबिडूच्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर शिल्पांची नुसती रेलचेल आहे; पण इथं मात्र मंदिराच्या बाह्य भिंती अगदीच साध्या आहेत. मधूनमधून देवकोष्ठे आहेत; पण सध्या सगळी रिकामीच आहेत. मंदिराला विस्तीर्ण फरसबंद प्राकार आहे. प्राकाराला मुख्य जो दरवाजा आहे, त्याच्या समोर चार खांबांवर तोललेला एक मुखमंडप आहे. प्राकारभिंतींना एक मागचाही दरवाजा आहे. तिथून शेजारच्या नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. 

अत्यंत रमणीय ठिकाणी, नदीकाठी असलेलं हे शांत, सुंदर मंदिर आवर्जून बघावं असंच आहे. 

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

भोजपूरचं भोजेश्वरमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

मध्य प्रदेशातल्या गुंफाचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या जागतिक वारसास्थळापासून २५ किलोमीटरवर भोजपूर नावाचं गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. इथं असलेलं भोजेश्वर हे महादेवाचं मंदिर अत्यंत सुरेख आहे. 

धारानगरीच्या भोजराजाची भोजपूर ही एकेकाळची राजधानी. हा राजा शूर तर होताच; पण अत्यंत विद्वानही होता. रसिकही होता, कवीही होता. त्यानं जवळपास ८० ग्रंथांची निर्मिती केली होती. त्यांत ‘सरस्वतीकंठाभरण’ हे व्याकरणावरचं भाष्य आहे, ‘राजमार्तंड’ ही पतंजलीच्या योगसूत्रांवरची टीका आहे आणि ‘समरांगणसूत्रधार’ हा वास्तुशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हिंदी भाषेत त्याचं नाव आजही आदरानं घेतलं जातं.  

या भोजराजाला म्हणे एक असाध्य चर्मविकार जडला होता. ‘बेटवा नदीवर बांध बांधून झालेल्या सरोवरातल्या पाण्यानं आंघोळ केलीस तर तुझा चर्मविकार दूर होईल,’ असं त्याला एका वैद्यानं सांगितलं. भोजराजानं त्याप्रमाणे केलं व तो खडखडीत बरा झाला. या आजारातून उठल्यानंतर भोजराजानं भोजपूरचं भव्य शिवमंदिर बांधलं अशी आख्यायिका आहे. 

‘राजा भोजानं त्याची राजधानी धारानगरीमध्ये १०४ मंदिरांची निर्मिती केली होती,’ असं तत्कालीन जैन कवी मेरुतुंग यानं आपल्या ‘प्रबंधचिंतामणी’ या काव्यग्रंथात लिहिलं आहे. 

काही वर्षांपूर्वी मी हे मंदिर बघून आले. स्वतःच्या वाहनानं निघालो तर एका दिवसात आपण भीमबेटका आणि भोजपूर ही दोन्ही ठिकाणं बघून मुक्कामाला भोपाळला येऊ शकतो. भीमबेटकाची चित्रं बघून भोजपूरच्या मंदिरापाशी मी पोहोचले तेव्हा सकाळचे साडेअकरा वाजले होते. लाल वालुकाश्म दगडात बांधलेलं भोजपूरचं शिवमंदिर सूर्यप्रकाशात नुसतं झळाळून निघालेलं होतं. या मंदिराची खासियत म्हणजे, इथलं शिवलिंग तब्बल २३ फूट उंच आहे आणि एकपाषाणी आहे. भोवतालचं योनिपीठ चौकोनी आहे आणि तेही एकाच दगडातून तयार केलेलं आहे. 

सामान्यतः आपल्याकडे मंदिर आधी निर्माण केलं जातं आणि मग गाभाऱ्यात देवाची प्राणप्रतिष्ठा होते; पण भोजपूरचं हे शिवलिंग खूपच विशाल आहे, त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इथं प्रथम लिंगप्रतिष्ठा केली गेली आणि मग भोवती मंदिर उभारलं गेलं. हे मंदिर आधी वरून उघडं होतं. काही लोकांच्या मते, हे मंदिर ध्यानमंदिर आहे आणि म्हणूनच ते वरून उघडं होतं; पण आता पुरातत्त्‍व खात्यानं वर फायबरचं छत उभारून मंदिर बंदिस्त केलं आहे. मंदिराच्या मागं माती-दगडांनी तयार केलेला एक रॅम्प आहे. मंदिर-उभारणीच्या वेळी मोठमोठाले अवजड दगड वर नेण्यासाठी तो तयार केला गेला असावा. सामान्यतः मंदिर बांधून पूर्ण झालं की असे रॅम्प ठेवत नाहीत, ते पाडून टाकतात; पण इथं हा रॅम्प अजून अस्तित्वात आहे. त्यामुळे, हे मंदिर बांधून कधी पूर्ण झालंच नाही अशीही एक समजूत आहे. 

भोजपूरच्या मंदिरात जाऊन त्या भव्य शिवलिंगाचं दर्शन घेणं हा खरोखरच चित्तथरारक अनुभव आहे. भोजपूर या गावातच राहणाऱ्या एका वृद्ध गृहस्थांनी माझे गाईड होण्याची तयारी दर्शवली. त्यांना बरोबर घेऊन मी मंदिर बघत होते. मंदिरावर बाहेरच्या बाजूला तशा फारच कमी शिल्पाकृती आहेत. महादरवाजाच्या दोन्ही बाजूंना हातात कुंभ घेतलेल्या गंगा-यमुना आहेत. शिखराच्या भोवती मात्र यक्ष-गंधर्वांच्या सुंदर ब्रॅकेट फिगर्स आहेत. त्यांनी शिखराचा गोलाकृती घुमटाकार भाग तोलून धरलाय. हे मंदिर भोजराजाच्या काळात म्हणजे, सन १००० ते १०५५ च्या दरम्यान बांधलं गेलं, त्यामुळे दगडाला दगड जोडून शुष्कसंधी पद्धतीनं मंदिराचं बांधकाम केलं गेलं आहे. चुन्याचा वापर खूपच कमी आहे. भोजराजाच्या काळात इथं मंदिरस्थापत्याची कार्यशाळा असावी असं पुरातत्त्वज्ञांचं मत आहे. कारण, मंदिराच्या परिसरात असलेल्या शिळांवर विविध प्रकारच्या मंदिरांच्या रेखाकृती काढलेल्या आहेत. 

मंदिराच्या परिसरात थोडं दूर चालून गेलं की बेटवा नदीचा हिरवागार प्रवाह दिसतो. काठावर अक्षरशः शेकडो प्रचंड शिळा इथं तिथं विखुरलेल्या आहेत. त्या सर्व शिळा बेटवा नदीवर भोजराजानं उभारलेल्या बांधाच्या होत्या. त्या बांधामुळे निर्माण झालेल्या विशाल सरोवराच्या काठावर एकेकाळी भोजपूरचं शिवमंदिर उभं होतं. पुढं मुसलमान आक्रमक होशंगशहा यानं भोजपूरवर आक्रमण करून तो बांध तोडून टाकला आणि मंदिराचंही बरंच नुकसान केलं, मूर्तींचा विध्वंस केला. मुसलमानी आक्रमणानंतर प्राचीन हिंदुमंदिरांचं जे काही व्हायचं तोच भोग भोजपूरच्या या मंदिराच्याही वाट्याला आला. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हे मंदिर अत्यंत वाईट स्थितीत होतं. भारतीय पुरातत्त्व खात्यानं अत्यंत परिश्रमपूर्वक या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.  

भोजपूरच्या या मंदिरातलं शिवलिंग इतकं भव्य आहे की, वर चढून पिंडीला बेल वाहण्यासाठी शिडी लावावी लागते. माझ्याबरोबरचे ते वृद्ध गृहस्थ म्हणाले, ‘‘आधी कुणालाही पिंडीवर चढून फुलं वाहता येत असत. माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा एकदा या मंदिरात दर्शनाला आले होते तेव्हा त्यांनी विचारलं, ‘आलेल्या कुणालाही असं पिंडीवर चढायची परवानगी का दिली जाते?’ तेव्हापासून फक्त इथले पुजारी सकाळी एकदाच पिंडीवर चढून बेल वाहतात.’’ 

मंदिर बघून मी बाहेर आले. हातातली पाण्याची बाटली खाली ठेवून मी मंदिराचे फोटो काढत होते, तेवढ्यात मंदिर बघायला आलेल्या एका मोठ्या कुटुंबातली एक चिमुरडी लुटूलुटू येऊन ती पाण्याची बाटली उघडायचा प्रयत्न करू लागली. तिला तहान लागली असावी. मी कदाचित रागावेन म्हणून तिच्या आईनं लगेच तिला मागं ओढलं आणि दटावणीच्या स्वरात म्हटलं, ‘हाथ मत लगाना बेटा, वो पानी अपना नही है’. मी पाण्याची बाटली उघडून त्या मुलीच्या हातात देत तिच्या आईला म्हटलं, ‘पीने दीजिये ना बच्ची को पानी. कोई बात नही.’ 

हे सगळं संभाषण ऐकत असलेले माझ्याबरोबरचे ते म्हातारे काका त्या मुलीच्या आईला म्हणाले, ‘बेटा, पानी पानी होता है, अपना या पराया नही होता.’ माझ्या मनात आलं, किती कमी शब्दात हिंदुसंस्कृतीचं सार सांगून गेले ते काका!          

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी, मंदिरापासून थोडं दूर एएसआयनं जे एक छोटं संग्रहालय उभारलंय, तिथं गेले. तिथं मंदिराचे जुने फोटो आणि मॉडेल्स ठेवलेली आहेत. बाहेर जुन्या देवळांचे शेकडो अवशेष असेच जीर्ण, भग्नावस्थेत पडलेले आहेत. या परिसरात पूर्वी अनेक मंदिरं असावीत असं ते अवशेष पाहताना वाटलं. मी त्या संग्रहालयात गेले तेव्हा दुपारची वेळ होती. चौकीदार बाजूला एका झाडाखाली निवांत झोपलेला होता आणि तिथंच पलीकडे त्या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांच्या राशीवर बसून एक तरुण जोडपं गुजगोष्टी करत होतं. मागं बेटवा नदीचं पात्र दिसत होतं... सगळीकडे तो जुन्या दगडांचा खच आणि एका होडीत बसून मासे पकडणारा एक कोळी...बाकी सगळं शांत होतं... एकेकाळी हाच परिसर किती गजबजून गेलेला असेल! पूजेचे मंत्र, संगीत, ही मंदिरं निर्मिणाऱ्या कलाकारांच्या छिन्नी-हातोड्यांचे घाव यांच्या आवाजानं हा संपूर्ण परिसर निनादत असेल. आज मात्र भोजपूरच्या त्या मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात एक विचित्र, खिन्न शांतता होती. बाहेर अस्ताव्यस्त पडलेले ते हजार वर्षांपूर्वीचे शिलाखंड बघताना, का कोण जाणे, माझ्या उदास मनात ‘मातीची दर्पोक्ती’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ओळी तरळत होत्या... 

कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती!

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

तीन रसांचं श्रीविष्णुमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

मंदिरस्थापत्य हा माझा आवडीचा विषय असला तरी, मला त्यातही, कर्नाटकातल्या होयसळ राजांनी बांधून घेतलेली मंदिरं फार आवडतात. मंदिरांवरचं माझं हे सदर जे वाचक सुरुवातीपासून वाचत आलेले आहेत त्यांना ही बाब जाणवली असेल. ‘क्लोरायटिक शिस्ट’ नावाच्या दगडाच्या शिळांवरून होयसळ राज्यातल्या कुशल शिल्पकारांची बोटं फिरली आणि त्या दगडाची रेष न् रेष जिवंत झाली. एका मंदिराचं शिल्पसौंदर्य बघून आपण भारावून जातो न जातो तोच दुसऱ्या मंदिरात त्याहूनही अधिक सुंदर मूर्ती, अधिक सुबक कोरीव काम, मूर्तीच्या मुखावरचे भाव अजूनच देखणे. होयसळ मंदिरं बघताना - माझे गुरू देगलूरकर सरांचा शब्द वापरायचा तर - आपण एकदम शिल्पबंबाळ होऊन जातो! 

चिकमगळूर जिल्ह्यातलं बेलवाडीचं वीरनारायण मंदिर हे असंच एक अप्रतिम होयसळमंदिर. होयसळ राजा नरसिंह पहिला यानं बाराव्या शतकात या मंदिराच्या निर्मितीला सुरुवात केली. पुढं हे मंदिर त्याचा मुलगा वीर बल्लाळ पहिला यानं पूर्णत्वास नेलं. त्रिकुटाचल पद्धतीचं म्हणजे तीन शिखरं आणि तीन गर्भगृहं असलेलं हे विलक्षण देखणं मंदिर. तिन्ही मंदिरांना जोडणारा, १०८ खांबांवर तोलला गेलेला उघडा सभामंडप. त्या खांबांची तकाकी इतकी सुरेख की आजही, अगदी आठशे वर्षांनंतरदेखील तुम्ही तुमचा चेहरा त्या खांबात प्रतिबिंबित झालेला पाहू शकता. 

या मंदिराचं एक मोठं आकर्षण म्हणजे, हे मंदिर सुदैवानं अनाघ्रात राहिलं. मलीक काफूर या अल्लाउद्दीन खिलजीकडच्या मूर्तिभंजकाची वक्रदृष्टी या मंदिराकडे वळली नाही. चौदाव्या शतकात खिलजीच्या सैन्यानं बेलवाडीपासून जवळच असलेली होयसळ राज्याची राजधानी द्वारसमुद्रम् लुटून, तोडून-मोडून पार बेचिराख करून टाकली. इथली सर्व मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्ती फोडल्या, इथल्या हिंदू लोकांचा नरसंहार केला, तेव्हा बेलवाडी कदाचित थोडं दूर, जंगलात असल्यामुळे असेल; पण या संहारापासून हे गाव वाचलं. 

इथल्या वेणुगोपाल, वीरनारायण आणि श्रीनरसिंहाच्या मूर्ती आठशे वर्षांपासून अखंड पूजेत आहेत. पुढं म्हैसूर संस्थानच्या कारकीर्दीत हे गाव तिथल्या वडियार राजांनी श्रीशृंगेरी मठाला दान म्हणून दिलं होतं. तेव्हापासून या मंदिराची व्यवस्था श्रीशृंगेरी मठातर्फे बघितली जाते. प्रशांत भारद्वाज नावाचा एक हसरा तरुण अर्चक सध्या मंदिराचं पौरोहित्य करतो. गेल्या चारशे वर्षांपासून त्याच्या घराण्यात या मंदिराचं पौरोहित्य करण्याची अखंडित परंपरा आहे. औपचारिक उच्च शिक्षण घेऊनसुद्धा प्रशांत शहरातली नोकरी, तिथलं छानछोकीचं जीवन सोडून आपल्या घराण्याचा पारंपरिक वारसा जपण्यासाठी बेलवाडीत परत आला. मंदिराचं पौरोहित्य तो अत्यंत श्रद्धेनं, आत्मीयतेनं आणि सेवा म्हणून करतो; नोकरी म्हणून नव्हे. 

बेलवाडीच्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या तीन गर्भगृहांतल्या तीन मूर्ती भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानं सांगितलेल्या रससिद्धान्तानुसार, तीन वेगवेगळ्या रसांची निष्पत्ती भाविकांना देतात. भरतमुनींनी सांगितल्यानुसार, सर्व कलांची परिणती ही रसनिष्पत्तीमध्ये आहे आणि श्रृंगार, वीर, करुण, रौद्र, भयानक, अद्भुत, हास्य, शांत आणि बीभत्स असे नवरस आपण मानतो. बेलवाडीच्या मंदिरात ज्या मूर्ती पूजेत आहेत त्या म्हणजे श्रीविष्णूची तीन रसांतली वेगवेगळी रूपं आहेत. मंदिरात प्रवेश करताक्षणी थेट समोर जो गाभारा दिसतो, त्यामध्ये श्रीविष्णूची वीरनारायण या स्वरूपातली मूर्ती आहे. उजवीकडचा खालचा हात व्याघ्रहस्तमुद्रेत आहे, तर डावीकडचा खालचा हात वीरमुद्रेत आहे. जवळजवळ आठ फूट उंचीची ही मूर्ती गरुडपीठावर उभी आहे. चेहऱ्यावरचे भाव निग्रही आहेत. चक्र, गदा ही श्रीविष्णूची नेहमीची आयुधंही आहेत. वीररसाची अनुभूती देणारी ही मूर्ती आहे. 

श्रीवीरनारायणाकडे आपण तोंड करून उभे राहिलो तर उजवीकडच्या गाभाऱ्यात शांतरसाची अनुभूती देणारी श्रीनरसिंहाची योगमूर्ती आहे. श्रीनरसिंह योगमुद्रेत शांत बसलेत. त्यांच्या वरच्या दोन्ही हातांमध्ये शंख आणि चक्र आहेत आणि खालचे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवलेले आहेत. दोन्ही गुडघ्यांवर योगपट्ट आहे. मागं प्रभावळीवर नेहमीच्या कीर्तिमुखाऐवजी शांतिदर्शक पद्म आहे. मूर्तीच्या मुखावरचे भाव योगमग्न आहेत. 

इथली तिसरी मूर्ती आहे ती वेणुगोपालाची. ही मूर्ती अत्यंत सुरेख आहे. अगदी ‘एएसआय’च्या तज्ज्ञ मूर्तिशास्त्रज्ञ मंडळींनी तसं मान्य केलेलं आहे. काळ्याकुळकुळीत गंडकी पाषाणाच्या एकाच शिळेतून निर्माण केलेली मूर्ती म्हणजे खरोखरच कुणा अत्यंत समर्थ शिल्पकाराच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं फळ आहे. श्रृंगार आणि करुण अशा दोन्ही रसांची अनुभूती देणारी ही देखणी मूर्ती आहे. 

वेणुगोपाल आपल्याच तंद्रीत मग्न होऊन झाडाखाली मुरली वाजवतोय. त्याच्या कपाळावर सुरेख रेखलेलं ऊर्ध्व पुंड्र  आहे. त्याचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, हाताची बोटं लांबसडक आणि रेखीव आहेत. एक पाय जमिनीवर पूर्ण टेकलेला आहे, तर दुसऱ्या पायाची फक्त बोटं जमिनीवर टेकलेली आहेत. ती देखणी पावलं पाहिली की देवाच्या पावलांना चरणकमल का म्हटलं जातं ते पुरतंच उमगतं. 

श्रीकृष्णाचं शरीर त्रिभंगात आहे. मागं प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या पायाशी दोन्ही बाजूंना श्रीदेवी-भूदेवी आहेत. वर सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार हे चार ऋषी मुरली ऐकायला ध्यानस्थ बसलेले आहेत. ऋषींच्या खालच्या बाजूला, तल्लीन होऊन श्रीकृष्णाच्या गाई त्याचं मुरलीवादन ऐकत आहेत. सर्व गाईंची तोंडं श्रीकृष्णाकडे वळलेली आहेत. 

मुरलीधराच्या अस्फुट कमळकळीसारख्या ओठांवर मंद स्मित आहे. अशी ही अत्यंत देखणी मूर्ती. त्या मूर्तीवर प्रशांत अत्यंत प्रेमानं नित्यालंकार चढवतो. मोजकीच फुलं. मुकुटावर एक टपोरं फूल, मुरलीच्या टोकावर एक, पायांवर दोन, शेजारी श्रीदेवी-भूदेवीवर दोन, टपोऱ्या मोगरीचे गळ्यात एक किंवा दोनच हार आणि नीटनेटकं नेसवलेलं, एकही चुणी नसलेलं स्वच्छ पांढरं धोतर. गर्भगृहात भरून राहिलेला तो कापराचा, धुपाचा, आरतीचा, फुलांचा मंद, मिश्र दरवळ आणि खाली एका तबकात ठेवलेली घासून-पुसून स्वच्छ केलेली लखलखणारी चांदीची आणि तांब्या-पितळेची पूजेची उपकरणं. इतकं प्रसन्न वाटतं, बेलवाडीच्या मंदिरात गाभाऱ्याबाहेर उभं राहिलं की! वाटतं की कुठल्याही क्षणी तो मुरलीधर आपल्या त्या रेखीव ओठांनी त्या बासरीत हळुवारपणे फुंकर मारेल आणि आपण त्या स्वर्गीय सुरांच्या प्रवाहात वाहून जाऊ, आणि आपलं ते सुरात हरवून जाणं प्रसन्न नजरेनं तो सांवळा पाहत असेल. 

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

सागरतीरीचा मत्स्यनारायण

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेले तीन महिने मी ‘राउळी मंदिरी’ या सदरातून भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांतील प्राचीन मंदिरांची ओळख करून देतेय. आज ज्या मंदिराची मी ओळख करून देणार आहे ते मात्र जुनं नाही, अगदी पाचच वर्षांपूर्वी, म्हणजे २०१५ मध्ये, बांधलेलं आहे. तरीपण मला त्या मंदिराबद्दल लिहायचंय. कारण, हे मंदिर अगदीच वेगळं आणि सुंदर आहे. तामिळनाडूत चेन्नईजवळच्या उत्थांडी या गावी ऐन समुद्रकिनाऱ्यावर असलेलं हे देखणं, वेगळं मंदिर श्रीविष्णूंच्या मत्स्यावताराला समर्पित आहे. 

श्रीविष्णूंनी दुष्टांचा नाश, सज्जनांचं रक्षण आणि धर्माची स्थापना यांसाठी वेगवेगळ्या युगांत निरनिराळे दहा अवतार घेतले, असं भाविक हिंदू मानतात. साक्षात् भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे’. म्हणजे, ‘धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगं पृथ्वीवर अवतार घेत राहीन...’ 

श्रीविष्णूंचा पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार. त्यासंदर्भात पुराणातली गोष्ट अशी : ‘सत्ययुगाचा अंत जवळ येत चालला तसं देवांनी ठरवलं की एक महाप्रलय घडवून आणायचा आणि त्यात पृथ्वीवरील सर्व जीवांचा अंत झाला की ब्रह्मदेव परत सृष्टीची निर्मिती करतील आणि याकामी त्यांना चार वेदांचं साह्य लागेल...पण हे समजताच शंखासुर नावाच्या असुरानं ब्रह्मदेवांकडून चारी वेद चोरून खोल महासागरात दडवून ठेवले. तेव्हा मत्स्याचा अवतार घेऊन श्रीविष्णूंनी त्या असुराचा नाश केला अणि चारही वेद ब्रह्मदेवांना परत केले.’ 

भागवत पुराणानुसार, हा मासा सापडला होता वैवस्वत नावाच्या सातव्या मनूला. जेव्हा तो मासा मनूला सापडला तेव्हा तो अगदीच लहान आकाराचा होता. मनू त्याला मोठ्या माशांपासून वाचवण्यासाठी एका छोट्या, सुरक्षित परातीत पाण्यात घालून ठेवतो. मासा भराभर मोठा होतो तेव्हा मनू त्याला अनुक्रमे एका छोट्या तळ्यात, मग एका छोट्या नदीत, मग गंगेत आणि शेवटी महासागरात सोडतो. तेव्हा तो मासा मनूला येणाऱ्या महाप्रलयाची माहिती देतो आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक नाव तयार करायला सांगतो. मनू एक सोनेरी नाव तयार करतो आणि जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा तो महाकाय मत्स्य ती नाव ओढत हिमालयाकडे नेतो आणि मनूला प्रजोत्पादनाचं वरदान मिळतं. 
अशी ही मत्स्यपुराणाची कहाणी.

मात्र, भारतात मत्स्यावताराची मंदिरं फार कमी आहेत, आंध्र प्रदेशात नागलापुरम इथं विजयनगरचा सम्राट श्रीकृष्णदेवरायानं बांधून घेतलेलं मत्स्यावताराचं एक मंदिर आहे आणि शेजारच्या कर्नाटक राज्यात सन १९२६ मध्ये बांधलं गेलेलं एक मत्स्यमंदिर बेल्लारीजवळ हेगदाळ या गावी आहे. 

या दोन मंदिरांखेरीज मला माहीत असलेलं मत्स्यनारायणाचं एकमेव मंदिर म्हणजे चेन्नईहून २५ किलोमीटरवर असलेलं उत्थांडी या गावातलं हे मंदिर. चेन्नईहून महाबलिपुरमला किंवा पुड्डूचेरीला जाताना वाटेवरच हे मंदिर लागतं. मत्स्यनारायणाच्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर ऐन सागरतीरावर आहे. या मंदिराला भिंतीही नाहीत आणि वर छतही नाही. ‘ओपन टू स्काय’ या तत्त्वावर बांधलेलं हे मंदिर लक्षात राहतं ते तिथल्या भव्य बारा फूट उंचीच्या मत्स्यनारायणाच्या मूर्तीमुळे. जवळच्याच महाबलिपुरमच्या पारंपरिक मूर्तिकारांनी घडवलेली ही मूर्ती प्राचीन शिल्पशास्त्रानुसार घडवलेली आहे. मूर्तीचा खालचा भाग मत्स्यस्वरूपात आहे आणि वरचा भाग श्रीविष्णुमूर्तीचा असून तो शंख-चक्र-गदा-पद्म आदी सर्व आयुधांनी आणि लक्षणांनी सालंकृत असा आहे. मूर्तीभोवती अर्धवर्तुळाकार रचनेत नऊ फूट उंचीचे १०८ दगडी एकपाषाणी स्तंभ  उभारलेले आहेत. प्रत्येक स्तंभावर संस्कृत आणि तमिळ लिपीत विष्णुसहस्रनाम आणि श्रीस्वामी चिन्मयानंदांनी लिहिलेली अष्टोत्तरशत नामावली कोरलेली आहे. मंदिराच्या बाजूला छोट्या छोट्या गुळगुळीत गोट्यांनी घडवलेला पदपथ आहे, जो ॲक्युप्रेशरचं काम करतो. मंदिराच्या आवारात ध्यानस्थ बसायला दगडी फरसबंद पायऱ्या आहेत. रोज संध्याकाळी आणि सकाळी इथ षोडशोपचार पूजा आणि आरती होते. हे मंदिर ‘चिन्मय मिशन’नं बांधलेलं आहे. 

या मंदिराची खासियत म्हणजे, मंदिराच्या मागेच असलेली व आपल्याला सदैव सोबत करणारी अथांग दर्याची अखंड गाज. संध्याकाळी आणि सकाळी या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून ध्यान करणं हा एक मनःशांती देणारा उत्कट अनुभव आहे. हे मंदिर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे, त्यामुळे इथला सूर्योदय सूर्यास्तापेक्षा सुंदर असतो. 

पहाटे जर आपण इथ गेलो तर आपल्या डोळ्यांदेखत रात्रीच्या अंधाराचा पडदा हळूहळू झिरझिरीत होत विरून जातो. आभाळ लाल-केशरी रंगांच्या विविध छटांनी माखून जातं आणि जर आपण भाग्यवान असलो तर बरोबर मत्स्यनारायणाच्या चेहऱ्यामागून लालभडक, रसरशीत सूर्यबिंब हळूहळू वरती येतं आणि देवाचं मुख त्या दिव्य प्रभेनं झळाळून जातं. जोडीला वेदघोषासारखी दर्याची अखंड, अविरत गाज असतेच. 

तीच कथा सूर्यास्ताची. मंदिराच्या मागं समुद्रकिनाऱ्यावर हळूहळू आभाळ लालस होत मखमली काळोखात बुडून जातं. समुद्रकिनाऱ्यावरचा मानवी कोलाहल हळूहळू शांत होत जातो. खांबांवरचे दिवे उजळतात आणि सुरू होते सांजारती. आरतीचे शब्द, भक्तीत भिजलेले स्वर, बरोबर साथीला दर्याची ती घनगंभीर गाज आणि १०८ दगडी खांबांच्या प्रभावळीत उठून दिसणारी मत्स्यनारायणाची ती सुंदर, शांत, भव्य मूर्ती पाहता पाहता आपण कधी ध्यानात हरवून जातो हे आपल्यालाच कळत नाही. भाविक हिंदूंना तर हे मत्स्यनारायणाचं मंदिर प्रगाढ आत्मिक शांतीचा अनुभव देईलच; पण अगदी नास्तिक माणसालादेखील इथं एक वेगळाच गूढ आध्यात्मिक अनुभव येईल यात मला कुठलीच शंका नाही. 

हे मंदिर म्हणजे ‘चिन्मयतरंगिणी’ या आश्रमाचा भाग आहे. इथं मुक्काम करून आपण योगसाधनाही करू शकतो. ‘चिन्मय मिशन’च्या वेबसाईटवर याबाबतची सर्व माहिती मिळेल. इथं राहून दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी हे मंदिर आणि इथली शांतता अनुभवणं हा एक वेगळाच अनुभव आहे. मंदिराचा आणि आश्रमाचा परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. राहायला कंटेनरमध्ये उत्तम सोय केलेली आहे. दर्याची साथ तर सतत आहेच. भर समुद्रकिनाऱ्यावर इतक्या रमणीय ठिकाणी मत्स्यनारायणाचंच मंदिर हवं! 

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

तंजावरचं ‘पेरिय कोविल’

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

चोळ/चोल राजवंश हा दक्षिण भारतातला एक प्राचीन राजवंश. आजच्या तमिळनाडूचा बराच मोठा भूभाग चोळ राजांच्या आधिपत्याखाली होता. चोळ राजे अत्यंत विजिगीषु वृत्तीचे होते. अशोकाच्या शिलालेखात चोळ साम्राज्याचा उल्लेख आहे. ‘कॉमन एरा’च्या पहिल्या शतकात होऊन गेलेला करिकाल चोळ हा या राजवंशातला इतिहासाला ज्ञात असलेला पहिला थोर राजा. त्यानं पांड्य व चेर या दक्षिणेकडील त्याच्या शेजारीसाम्राज्यांचा पराभव केला आणि श्रीलंकेवर स्वारी केली. त्याची राजधानी उरैयूर इथं होती. पुढं नवव्या शतकात त्याच्या विजयालयनामक वंशजानं मदुरेच्या पांड्यांचा प्रदेश जिंकून त्या प्रदेशातल्या तंजावर इथं आपली राजधानी स्थापन केली.

मात्र, तंजावर भरभराटीला आणलं ते विजयालयानंतर दीडशे वर्षांनी राज्यावर आलेल्या राजराजा पहिला या अत्यंत कर्तबगार, शूर आणि थोर सम्राटानं. याचं मूळ नाव अरुलमोळीवर्मन. राजराजानं शेजारच्या चेर व पांड्य राजांचा तर पराभव केलाच; पण मालदीव बेट जिंकलं आणि श्रीलंकेवर स्वारी केली. त्यानं राज्यकारभारात सुधारणा घडवून आणल्या, कला आणि साहित्य यांना उदारहस्ते आश्रय दिला, आग्नेय आशियात आपलं आरमार पाठवलं आणि एका समृद्ध, कलासक्त आणि भव्य अशा साम्राज्याचा पाया घातला.

राजराजा चोळा हा शिवभक्त होता. त्यानं आपल्या कारकीर्दीत शिवाची अनेक भव्य मंदिरं बांधली; पण त्यानं बांधलेलं सर्वोत्कृष्ट मंदिर म्हणजे तंजावरचं बृहदीश्वर मंदिर! हे मंदिर इतकं भव्य आहे की अजूनही तमिळनाडूमध्ये या मंदिराला ‘पेरिय कोविल’ म्हणजे ‘प्रचंड मंदिर’ म्हणूनच ओळखलं जातं. द्रविड स्थापत्यशैलीचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं हे मंदिर गेली हजार वर्षं तंजावरमध्ये दिमाखात उभं आहे.

राजराजा चोळा सन ९८५ या वर्षी राज्यावर आला. त्याच्या राज्याभिषेकाच्या पंचविसाव्या वर्धापनदिनी त्यानं बृहदीश्वरमंदिराला सुवर्णकलश भेट दिला होता असा उल्लेख मंदिराच्या जगतीवर कोरलेल्या शिलालेखात आहे. म्हणजेच हे मंदिर सन १०१० या वर्षी बांधून पूर्ण झालं होतं. शिलालेखामध्ये या मंदिराचा उल्लेख ‘राजराजेश्वरम-उदयार’ असा आहे. ‘शिवपादशेखर’ ही राजराजा चोळाची उपाधी होती आणि खरोखरच त्या उपाधीला तो थोर राजा जागला आणि त्यानं इतकं देखणं मंदिर निर्माण केलं. पुढं हे मंदिर बृहदीश्वरमंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

या भव्य देवालयाचं गोपुर ६१ मीटर उंचीचं असून त्यात तेरा मजले आहेत. त्यावर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. वर द्रविड स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य असलेली स्तूपी आहे. ही स्तूपी म्हणजे मोठा अष्टकोनी घुमटाकार प्रस्तर जवळजवळ ८० टन वजनाचा आणि एकाच ग्रॅनाइट पाषाणातून घडवलेला आहे. एवढी प्रचंड शिळा त्या काळात जेसीबी, क्रेन्स वगैरे आधुनिक यंत्रसामग्री नसताना जवळजवळ दोनशे फूट उंचीवर कशी चढवली असेल याचा विचार करूनच मती गुंग होते. हा ८० टनी घुमट मंदिरावर चढवताना जवळच्या एका गावापासून मंदिराच्या शिखरापर्यंत कित्येक किलोमीटर लांबीचा मातीचा रॅम्प करण्यात आला होता आणि त्या रॅम्पवरून हत्तींनी तो दगड ओढत वर नेला होता असे उल्लेख प्राचीन तमिळ ग्रंथात आढळतात.

हे संपूर्ण मंदिर पूर्णपणे अत्यंत कठीण अशा ग्रॅनाईट दगडात बांधलेलं आहे, तेसुद्धा शुष्कसंधी या पद्धतीचा वापर करून. संपूर्ण मंदिरासाठी एक लाख ३० हजार टन ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर ज्या परिसरात आहे तिथून आसपासच्या पन्नास किलोमीटरच्या परिघात कुठंही ग्रॅनाईटच्या खाणी आढळत नाहीत. हा संपूर्ण दगड त्या काळी मंदिराच्या ठिकाणी कसा आणला गेला असावा?

हे देवालय बांधताना त्याची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की भर दुपारी या देवळाच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. मुख्य मंदिरापुढं स्वतंत्र नंदीमंडपात बसवलेला, सुमारे २० फूट लांब, आठ फूट रुंद व ११ फूट उंच असा भव्य, एकाच प्रचंड प्रस्तरशिळेतून कोरून काढलेला देखणा नंदी हेदेखील या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग २७ फूट उंच आहे, म्हणजे जवळजवळ दोनमजली उंचीचं ते आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकपाषाणी लिंगांपैकी ते एक आहे.

अतिशय भव्य आणि उत्तुंग अशा या शिवमंदिराला ‘युनेस्को’नं ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून दर्जा दिला आहे. गाभाऱ्याची भिंत दोनमजली आहे. बाह्य भिंतीवर अनेक देवकोष्ठ आहेत, ज्यांमध्ये शिवाच्या अनेक वेगवेगळ्या अवस्थेतील मूर्ती कोरलेल्या आहेत. वीरभद्र, भिक्षाटनशिव, चंद्रशेखरशिव, शिव-विष्णू यांचं एकत्रित रूप असलेला हरिहर, पार्वतीचं पाणिग्रहण करणारा कल्याणसुंदर शिव, लिंगातून प्रकट होणारा लिंगोद्भव, श्रीनटराज अशा विविध रूपांमधून आपल्याला इथं श्रीशंकरांचं दर्शन होतं. सर्व शिल्पं अत्यंत उच्च कलात्मक दर्जाची आहेत.

तंजावरच्या या अत्यंत भव्य बृहदीश्वर मंदिराचा आणि महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. सन १६७६ मध्ये विजापूरच्या सुलतानानं व्यंकोजीराजे भोसले यांना तंजावरला सरदार म्हणून पाठवलं. व्यंकोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजीमहाराजांचे सावत्रभाऊ. त्याच घराण्यातले बाबाजीराजे भोसले हे सध्या तंजावरचे राजे आहेत. तंजावरकर भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, एक प्रवेशद्वारही बांधलं, एक-दोन नवीन छोटी मंदिरंही बांधली. मंदिरप्रांगणात भोसलेघराण्याची वंशावळ कोरलेली आहे. आज या मंदिराची व्यवस्था सरकारतर्फे होत असली तरी आजही बाबाजीराजेंना आणि भोसलेराजांना इथं सर्वोच्च मानाचं स्थान आहे.

कुठल्याही भारतीय व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा असं हे तंजावरचं उत्तुंग बृहदीश्वरमंदिर शक्य असेल तर प्रत्येकानं पाहिलंच पाहिजे. तंजावरला तिरुचिरापल्ली किंवा त्रिची इथून विमानानं जाता येतं. रेल्वेनं तंजावर हे चेन्नईपासून ३२६, तर मदुराईपासून २१० किलोमीटरवर आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

गंगैकोंडचोळपुरमचं बृहदीश्वर मंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेल्या लेखात राजराजा पहिला या थोर चोळसम्राटानं निर्माण करवून घेतलेल्या तंजावरच्या भव्य बृहदीश्वरमंदिराची ओझरती ओळख आपण करून घेतली. आज आपण त्याच्याच मुलानं, म्हणजे राजेंद्र या चोळ राजानं, तंजावरजवळच गंगैकोंडचोळपुरम् या त्यानंच स्थापन केलेल्या नवीन राजधानीत बांधलेल्या भव्य मंदिराची तोंडओळख करून घेणार आहोत. हे मंदिरही बृहदीश्वराचं मंदिर म्हणूनच ओळखलं जातं.

सामान्यतः कर्तबगार पित्याचे पुत्र कर्तबगार निघतातच असं नाही; पण राजराज चोळाचा हा राजेंद्र नावाचा पुत्र मात्र ‘बाप से बेटा सवाई’ निघाला. पित्यानं एका थोर साम्राज्याचा पाया घालून ठेवला होता, राजेंद्रानं त्यावर कळस चढवला. राजराजानं आपल्या हयातीतच आपला पुत्र राजेंद्र याला युवराज म्हणून राज्याभिषेक केला होता. तो पित्यापेक्षाही थोर निघाला. त्याच्या वडिलांनी दक्षिणेत राज्यविस्तार केला होता. राजेंद्रानं उत्तरेत मुसंडी मारली आणि पार बंगालपर्यंत उत्तरदिग्विजय केला.

पित्याप्रमाणेच राजेंद्रही थोर शिवभक्त होता आणि म्हणूनच त्याला काशीपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार व्हावा असं मनापासून वाटत होतं. गंगानदीपर्यंत दिग्विजय करताना त्यानं उत्तर आणि पूर्व भारतातल्या कलिंग, दक्षिण कोसल, वंग इत्यादी राज्यांचा पराजय करून त्यांना आपलं मांडलिकत्व घ्यायला भाग पाडलं. यशस्वी होऊन परत आल्यावर त्यानं ‘गंगैकोंडचोळ’ म्हणजे ‘गंगाकिरीटचोळ’ अशी पदवी धारण केली आणि तंजावरपासून जवळच गंगैकोंडचोळपुरम् हे नवीन नगर स्थापून तिथं आपली राजधानी नेली.

गंगैकोंडचोळपुरम् इथं त्यानं स्वतःसाठी मोठा प्रासाद बांधला. वेदांच्या अध्ययनाकरिता मोठं विद्यालय स्थापन केलं आणि शेतीकरिता सुमारे २६ किलोमीटरचा विशाल तलाव खोदून त्याला ‘गंगासागर’ असं नाव दिलं. या नव्या राजधानीत या उत्तरदिग्विजयाचं स्मरण म्हणून त्यानं, पित्यानं निर्माण केलेल्या तंजावरच्या भव्य बृहदीश्वराच्या मंदिराच्या शिल्पसौंदर्याशी स्पर्धा करणारं एक अप्रतिम आणि उत्तुंग असं शिवालय बांधलं. तेच हे गंगैकोंडचोळपुरम् चं बृहदीश्वर मंदिर. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यानं गंगाकिनाऱ्यावरच्या त्याच्या मांडलिक राजांकडून गंगाजल आणून ते गंगासागर तलावात रितं केलं असे उल्लेख इथं सापडलेल्या शिलालेखात आहेत. हे मंदिर सन १०३५ मध्ये बांधून पूर्ण झालं. गंगैकोंडचोळपुरम् इथं राजेंद्र चोळराजानं इतरही अनेक मंदिरं बांधून घेतली होती. त्यामध्ये श्रीविष्णू, देवी आणि कार्तिकेय इत्यादी देवतांची मंदिरं होती; पण पुढं चोळसाम्राज्य लयाला गेल्यानंतर तेराव्या आणि चौदाव्या शतकात झालेल्या अनेक इस्लामी आक्रमणांमध्ये हे पूर्ण नगरच उद्ध्वस्त करण्यात आलं, त्यात ती मंदिरंही पाडली गेली. सुदैवानं बृहदीश्वराचं हे एकमेव मंदिर मात्र शाबूत राहिलं. पुरातन तामिळ शिलालेखांमध्ये या मंदिराचा उल्लेख ‘गंगैकोंडचोलीश्वर मंदिर’ असा केला जातो.

मंदिरस्थापत्याच्या दृष्टीनं पाहिलं तर हे मंदिर तंजावरच्या बृहदीश्वरमंदिरासारखंच आहे. द्रविड मंदिरस्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या मुख्य द्वाराबाहेर स्वतंत्र नंदीमंडप आहे, तसंच गर्भगृहाकडे जाताना अलंकारमंडप, मुखमंडप, महामंडप आणि अर्धमंडप असे विविध मंडप आहेत. या मंदिराचं विमान १८० फूट उंच आहे, म्हणजेच तंजावरच्या मंदिराहून जवळजवळ नऊ फूट कमी उंचीचं. तंजावरच्या मंदिराचं शिखर तेरामजली आहे, तर या मंदिराचं नऊमजली. इतिहासकारांचं असं मत आहे की राजेंद्रानं मुद्दामहूनच पित्याचा आदर करण्यासाठी म्हणून या मंदिराची उंची पित्यानं बांधलेल्या मंदिराहून कमी ठेवली. इथल्या गाभाऱ्यातलं शिवलिंगही तंजावरच्या मंदिरातल्या शिवलिंगापेक्षा कमी उंचीचं आहे; पण दोन्ही मंदिरांच्या स्थापत्यात खूप साम्य आहे. इतकं की मंदिरस्थापत्यतज्ज्ञांचं असं मत आहे की दोन्ही मंदिरं घडवणारे स्थपती आणि शिल्पकार एकच असावेत. आणि ते शक्यही आहे. कारण, दोन्ही मंदिरांच्या निर्मितिकालात फक्त २०-२५ वर्षांचा फरक आहे.

गंगैकोंडचोळपुरम््च्या या अतिशय भव्य अशा शिवमंदिराला ‘युनेस्को’नं जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. चोल शासनकाळातील तंजावरच्या बृहदीश्वरमंदिराबरोबरच गंगैकोंडचोळपुरम् चं हे बृहदीश्वरमंदिर आणि जवळच असलेल्या दारासुरम् या गावातलं राजराज चोळ दुसरा या राजानं बांधलेले ऐरावतेश्वराचं मंदिर ही तीन मंदिरं The Great Living Chola Temples म्हणून ओळखली जातात. ‘युनेस्को’नं या तिन्ही मंदिरांना मिळून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.

तंजावरच्या मंदिराप्रमाणेच याही मंदिराच्या बाह्य भिंतीवर अनेक देवकोष्ठे आहेत, ज्यामध्ये शिवांच्या अनेक वेगवेगळ्या अवस्थेतील मूर्ती कोरलेल्या आहेत; पण हे मंदिर प्रसिद्ध आहे ते इथल्या काही अनोख्या मूर्तींसाठी. शिवांच्या वीरभद्र, भिक्षाटनशिव, शिव-विष्णू यांचं एकत्रित रूप असलेले हरिहर, लिंगातून प्रकट होणारे लिंगोद्भव, नृत्यमग्न श्रीनटराज, मार्कंडेयाला वाचवण्यासाठी यमाला लाथ मारणारे कालारी शिव, मदनाला भस्म करणारे कामांतक शिव, गंगेला आपल्या जटांमध्ये धारण करणारे गंगाधर शिव अशा विविध रूपांमधून इथं श्रीशंकरांचं दर्शन होतं; पण इथली सर्वात सुंदर शिल्पं म्हणजे मंदिराच्या पूर्व बाजूला, पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना कोरलेली दोन नितांतसुंदर शिल्पं. आपण मंदिरात शिरताना आपल्या डाव्या बाजूच्या भिंतीतल्या देवकोष्ठात सरस्वतीची अतिशय सुंदर मूर्ती दिसते. देवी श्वेतपद्मासना आहे, तिच्या हातात अक्षमाला, पुस्तक आणि कमंडलू आहे. तिनं यज्ञोपवित धारण केलेलं आहे आणि तिच्या मुखावर अत्यंत सौम्य, सुंदर असं स्मितहास्य आहे.

दुसऱ्या बाजूला आहे ती चंडेशानुग्रहमूर्ती. ‘शिवसिद्धान्ता’नुसार, चंडेश या आपल्या परमभक्ताच्या डोईवर आपल्या गळ्यातला पुष्पहार बांधून भगवान शंकर त्याच्या भक्तीचा गौरव करतात. या शिल्पात नेमकं तेच दाखवलेलं आहे.

शिव उच्चासनावर बसलेले आहेत, त्यांच्या पायाशी चंडेश विनम्रपणे हात जोडून बसलेला आहे. शिव स्वहस्ते त्याच्या केसांवर पुष्पहार गुंडाळत आहेत. चंडेशाच्या चेहऱ्यावर कृतकृत्यतेचे भाव आहेत, तर शिवांची मुद्रा प्रसन्न आहे. शिवांच्या शेजारी बसून देवी पार्वती कौतुकानं हा सोहळा पाहते आहे. चोळ स्थापत्यशैलीचे तज्ज्ञ डॉ. सी. सिवराममूर्ती यांच्या मते, राजेंद्र चोळ राजानं चंडेशाच्या मूर्तीमध्ये स्वतःचाच चेहरा कोरलेला आहे. ‘जे जे लाभलं, ते ते शिवाचीच कृपा,’ असं समजून आपली शिवभक्ती राजेंद्रानं विनम्रभावे या शिल्पातून अजरामर केली आहे.

गंगैकोंडचोळपुरम् चं हे देखणं बृहदीश्वरमंदिर कुंभकोणम् पासून सुमारे ३० किलोमीटरवर, त्रिची आणि चिदंबरम् यांना जोडणाऱ्या रस्त्यावर आहे. तंजावरपासून ते ७० किलोमीटरवर आहे. स्वतःचं वाहन असेल तर दोन दिवसांत ही तिन्ही चोळमंदिरं आरामात पाहता येतील.

कलासक्त, शिवभक्त, महापराक्रमी अशा चोळ राजांनी बांधलेली मंदिरं म्हणजे द्रविड मंदिरस्थापत्याचा मेरुमणी आहेत. प्रत्येक भारतीय व्यक्तीनं शक्य असेल तर ही मंदिरं पाहायलाच हवीत.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

दारासुरमचा ऐरावतेश्वर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

चोळ/चोल राजवटीतील तंजावरच्या बृहदीश्वरमंदिराबरोबरच, गंगैकोंडचोळपुरमचं बृहदीश्वरमंदिर आणि जवळच असलेल्या दारासुरम या गावातील राजराज चोळ दुसरा या राजानं बांधलेलं ऐरावतेश्वराचं मंदिर ही तीन मंदिरं The Great

Living Chola Temples म्हणून ओळखली जातात, हे मागच्या लेखात सांगितलंच.

‘युनेस्को’नं या तिन्ही मंदिरांना मिळून ‘जागतिक वारसा स्थळा’चा दर्जा दिला आहे. पहिल्या दोन मंदिरांचा परिचय गेल्या दोन लेखांत आपण करून घेतला. आज आपण पाहणार आहोत ते पहिल्या दोन्ही चोळमंदिरांपेक्षा आकारानं छोटं; पण रेखीव आणि शिल्पवैभवानं तितकंच समृद्ध असलेलं तिसरं प्रसिद्ध चोळमंदिर, म्हणजेच दारासुरमचं ऐरावतेश्वर शिवमंदिर.

हे मंदिर सम्राट राजराजा चोळ दुसरा यानं सन ११६६ मध्ये म्हणजे बाराव्या शतकाच्या मध्यात निर्माण केलं. या राजानं राजराजपुरी या नावानं कुंभकोणमजवळ नवीन राजधानीची एक नगरी निर्माण केली. त्याच्या पूर्वसुरींनी, म्हणजे राजराजा पहिला आणि त्याचा मुलगा राजेंद्र यांनी, तंजावर आणि गंगैकोंडचोळपुरम या आपल्या राजधानीच्या जागी भव्य शिवालयं उभारली होती. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत राजराजा दुसरा यानं दारासुरमचं हे ऐरावतेश्वराचं मंदिर बांधलं.

या मंदिराबद्दलची आख्यायिका अशी : ‘देवांचा राजा इंद्र याचं वाहन असलेल्या ऐरावत हत्तीनं या ठिकाणी शिवपूजा केली होती. ऐरावत हा पांढऱ्या रंगाचा हत्ती; पण दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे त्याचा रंग बदलला, तेव्हा त्यानं शिवांची पूजा केली. प्रसन्न झालेल्या शिवांनी ऐरावताला या मंदिराच्या आवारात असलेल्या पवित्र कुंडात स्नान करायचा आदेश दिला. त्याप्रमाणे या कुंडात स्नान करताच ऐरावताला त्याचा मूळ शुभ्र रंग परत मिळाला, त्यामुळे या मंदिराचं नाव ऐरावतेश्वर असं पडलं.’

मी आधी नमूद केल्यानुसार, तंजावर आणि गंगैकोंडचोळपुरमच्या मंदिरांच्या मानानं हे मंदिर आकारानं लहान आहे; पण तरीही या मंदिराचं विमान ८० फूट उंच आणि शिखर पाचमजली आहे. मंदिराचं स्थापत्य खास द्रविड शैलीचं आहे. आता आपल्याला जे मंदिर दिसतं तो एकेकाळच्या भव्य मंदिरप्राकाराचा सर्वात आतला भाग आहे. मंदिरप्राकाराचं महाद्वार एकेकाळी भव्य गोपुरानं मंडित असावं; पण आता ध्वस्त स्थितीत आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर छोटासा नंदीमंडप आहे. इतर दोन चोळमंदिरांतल्या नंदीमंडपाच्या मानानं दारासुरमचा नंदीमंडप अगदीच लहान आहे; पण इथला एकपाषाणी नंदी आहे मात्र डौलदार. नंदीमंदिराच्या मागंच अत्यंत नजाकतीनं कोरलेलं कमलाकार बलिपीठ आहे. या बलिपीठाला जोडूनच श्रीगणेशाचं एक छोटंसं मंदिर आहे. या मंदिराला सात अरुंद पायऱ्यांचा जिना आहे.

या जिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे, या पायऱ्या चढून जाताना पायांचा आघात पायऱ्यांवर केला की सप्त सूर निर्माण होतात. प्रत्येक पायरी भरीव दगडातून बनलेली आहे, पोकळ नाही, तरीही त्या पायऱ्यांमधून हे सूर कसे उमटतात हे आजवर कुणालाही न उकललेलं कोडं आहे. अज्ञ पर्यटक त्या पायऱ्यांवर वाट्टेल तशा उड्या मारतात म्हणून पुरातत्त्‍व खात्यानं या पायऱ्यांभोवती एक अत्यंत कुरूप, गंजका लोखंडी पिंजरा उभारलेला आहे. मंदिराच्या सौंदर्यावर तो पिंजरा ओरखडा उमटवतो.

नंदीला नमस्कार करून आत गेल्यावर डोळ्यांसमोर मंदिराचं खरं शिल्पसौंदर्य उलगडायला लागतं. ऐरावतेश्वरमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिराचा भव्य मुख्य मंडप. राजगंभीरम् तिरुमंडपम् हे या मंदिराचं मूळ नाव. हा संपूर्ण मंडप घोड्यांनी ओढलेल्या रथाच्या आकारात कोरलेला आहे. रथाची चाकं एकपाषाणी आहेत आणि अप्रतिम कोरीव काम त्यांच्यावर आहे. रथ ओढणारे अश्व तर जिवंतच वाटतात. या मंडपाच्या पायऱ्या चढून ४८ कोरीव खांबांनी तोललेल्या नृत्यमंडपात आपण प्रवेश करतो. दर्शनी स्तंभ याळी या काल्पनिक प्राण्यानं तोललेले आहेत. खांबांवर अत्यंत सुंदर कोरीव काम आहे. या मंडपाच्या छतावरची, म्हणजे वितानावरची, शिल्पंही बघण्यासारखी आहेत. मंदिराला अंतर्गत प्रदक्षिणापथ नाही, त्यामुळे बाहेरूनच प्रदक्षिणा घालावी लागते व मंदिराचं बहिर्दर्शन होतं, जो प्रदक्षिणेचा मुख्य उद्देश आहे. तंजावर आणि गंगैकोंडचोळपुरमच्या शिवालयांप्रमाणेच इथंही बाह्य भिंतीत देवकोष्ठे आहेत आणि त्यांत शिवाच्या विविध अवस्थितीमधल्या मूर्ती बसवलेल्या आहेत; पण इथलं मंदिरही इतर दोन मंदिरांप्रमाणे ग्रॅनाईटमध्ये शुष्कसांधी पद्धतीचा वापर करून बांधलेलं असलं तरी इथल्या मूर्ती मात्र काळ्या बेसॉल्ट दगडातून कोरलेल्या आहेत.

या मंदिरातल्या देवकोष्ठात आठ हात आणि तीन चेहरे असलेला अनोखा अर्धनारीश्वर, त्रिमुखी मार्तंड-भैरव, शरभेश्वर शिव, शिव नटराज आणि लिंगोद्भव शिव, तसंच दुर्गादेवी वगैरे सुंदर मूर्ती आहेत. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या भिंतींवर कोरलेल्या ६३ नायनमार म्हणजे शैव संतांच्या मूर्ती. या संतांनी रचलेली तामिळ शिवस्तुतीपर स्तोत्रं आजही तामिळनाडूमध्ये शिवमंदिरांमधून नित्यपूजेचा अविभाज्य भाग म्हणून गायली जातात. वैष्णव मंदिरामधून आलवार संतांची पदं गायली जातात, तर शैवमंदिरांमधून नायनमार संतांची. ऐरावतेश्वरमंदिरात कोरलेल्या नायनमार संतांच्या रचना ‘पेरिय पुराण’ या ग्रंथात आहेत. ‘पेरिय पुराण’ या ग्रंथाचं संकलन बाराव्या शतकात राजराजा दुसरा याचे वडील कुलोत्तुंग दुसरा यांच्या कार्यकाळात कवी सिक्कीझर यांनी केलं होतं. त्या मूर्ती या मंदिरात कोरून एक प्रकारे राजराजा दुसरा यानं आपल्या पित्याच्या गुणग्राहकतेचा गौरवच केला आहे.

दारासुरमचं हे मंदिर तंजावरपासून सुमारे ३६ किलोमीटरवर आहे आणि कुंभकोणमपासून फक्त पाच किलोमीटरवर. सर्वात जवळचा विमानतळ इथून नव्वद किलोमीटरवर त्रिची इथं आहे. कुंभकोणमला रेल्वेस्थानक आहे. कुंभकोणमला राहायची सोयदेखील चांगली आहे. कुंभकोणमला मुक्काम करून आरामात हे मंदिर बघून येता येऊ शकेल.

चोळ राजे पराक्रमी आणि विजिगीषू वृत्तीचे तर होतेच; पण कलेलाही उदारहस्ते आश्रय देणारे होते. राजराजा दुसरा आणि त्याचे पिता कुलोत्तुंग दुसरा या दोन्ही राजांच्या कार्यकाळात तामिळ आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांमधील साहित्य बहरलं. ‘नानार्थार्णवसंक्षेप’ हा संस्कृत शब्दांचे विविधार्थ देणारा बृहत्तम कोश राजराज दुसरा याच्या दरबारी रचला गेला. तमिळ वाङ्मयामध्ये ‘जीवकचिंतामणि’, ‘कलिंगत्तुप्परणि’, ‘तक्कयागप्परणि’ अशी अनेक उत्कृष्ट तमिळ काव्यं या काळात रचली गेली. कंबन या कवीचं तामिळ रामायण हेही याच काळातलं. दुर्दैवानं आपण इतिहासाच्या धड्यांमध्ये यातलं काहीही शिकलो नाही!

राजराजा पहिला आणि राजेंद्र या आपल्या पूर्वजांच्या डोंगराएवढ्या लौकिकाला साजेशी कामगिरी करणाऱ्या राजराजा दुसरा या चोळनृपतीच्या कर्तृत्वाची खूण असलेलं दारासूरमचं हे ऐरावतेश्वर मंदिर आवर्जून पाहिलंच पाहिजे असं देखणं आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

कांचीपुरमचं कैलासनाथ मंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेल्या तीन लेखांमधून आपण आजच्या तामिळनाडू राज्यात चोळ राजांनी बांधलेल्या तीन भव्य मंदिरांची ओळख करून घेतली; पण तामिळनाडू राज्यात अशी अनेक भव्य मंदिरं आहेत. पल्लव, पांड्य आणि चोळ या तीन राजवंशांनी आजच्या तामिळनाडू राज्याच्या वेगवेगळ्या भागांत आपापली राज्यं स्थापन केली. या तिन्ही राज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, या राजवंशातल्या राजांनी रणांगणात तर शौर्य गाजवलंच पण; कला, स्थापत्य आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांतल्या विद्वानांना उदारहस्ते आश्रयही दिला आणि अनेक भव्य मंदिरंही बांधून घेतली, जी तामिळनाडूमध्ये आजही दिमाखात उभी आहेत.

आज आपण ओळख करून घेणार आहोत ती पल्लव राजांनी बांधलेल्या एका भव्य शिवालयाची. सहाव्या शतकाच्या शेवटी सिंहविष्णू या पल्लव राजानं कांचीपुरम इथं आपली राजधानी स्थापन केली. सिंहविष्णूनं कृष्णा ते कावेरीपर्यंतचा मुलूख काबीज करून आपल्या राज्याची व्याप्ती वाढवली. त्याचा पुत्र महेंद्रवर्मा हा मोठा प्रसिद्ध मंदिरनिर्माता होता. त्यानंच चेन्नईजवळच्या महाबलीपुरम इथं मोठमोठ्या एकसंध पाषाणांतून देवळं खोदून काढण्याचं काम करून घेतलं. ही देवळं आज ‘पांडवरथ’ म्हणून ओळखली जातात. त्यानंच ‘मत्तविलासप्रहसन’ नावाचं संस्कृत प्रहसन लिहिलं. संस्कृत भाषेतलं आज अस्तित्वात असलेलं हे पहिलं प्रहसन!

त्याचा खापरपणतू दुसरा नरसिंहवर्मा यानं कांचीपुरममध्ये कैलासनाथ अथवा राजसिंहेश्वरनामक शिवालय बांधलं. ‘नगरेषु कांची’ या शब्दात साक्षात् कविकुलगुरू कालिदासानं ज्या कांचीपुरमनगरीचं वर्णन केलं आहे, ते कांचीपुरम अगदी आजही तिथल्या मंदिरांसाठी आणि हातमागावर विणलेल्या झोकदार जरी-पदराच्या कांचीपुरम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी आजही या शहरात अक्षरशः पावलागणिक एक मंदिर आहे. आज कांचीपुरम कामाक्षीदेवीच्या मंदिरासाठी ओळखलं जात असलं तरी कांचीपुरममध्ये शिवाची, विष्णूची आणि देवीची मिळून हजारभर तरी लहान-मोठी मंदिरं असतील. त्यातलं सगळ्यात पुरातन मंदिर म्हणजे ‘कैलासनाथार कोविल’ किंवा कैलासनाथाचं मंदिर.

सध्याच्या कांची शहराच्या एका कोपऱ्यात असलेलं हे भव्य मंदिर इसवीसनाच्या आठव्या शतकात पल्लव राजा राजसिंह नरसिंहवर्मन दुसरा यानं बांधायला सुरुवात केली. पुढं त्याचा मुलगा महेंद्रवर्मन तिसरा यानं हे मंदिर पूर्ण केलं. दगडावर दगड रचून बांधलेलं हे पल्लव द्रविड स्थापत्यशैलीतलं पहिलं मंदिर. यापूर्वी, आधी सांगितल्यानुसार, पल्लव राजांनी महाबलिपुरमची एकपाषाणी मंदिरं बांधली होती. त्याआधी कदाचित लाकडी मंदिरंही बांधली असावीत; पण काळाच्या ओघात ती लुप्त झाली.

कांचिपुरमचं कैलासनाथमंदिर मात्र आज इतक्या शतकांनंतरही दिमाखात उभं आहे. या मंदिराचं मूळ नाव राजसिंहेश्वरमंदिर होतं, असे इथल्या शिलालेखात उल्लेख आहेत. स्वतः महाराजा राजसिंह नरसिंहवर्मननं या मंदिराचा उल्लेख ‘कांची महामणी’ म्हणजे ‘कांचीचं सगळ्यात सुंदर रत्न’ असा केला आहे. भगवान श्रीशिवशंकरांचं हे भव्य मंदिर इथल्या शिवशिल्पांसाठी प्रख्यात आहे.

दक्षिण भारतातल्या उत्तुंग शिवमंदिरांमधून श्रीशिवशंकरांच्या मूर्तींचं ‘शिवागम’ या ग्रंथामधून वर्णिलेले अनेक आविष्कार मंदिरांच्या बाह्य भिंतींवर आणि स्तंभांवर कोरलेले असतात. शंकरांची पार्वतीशी विवाह करतानाची कल्याणसुंदरमूर्ती, अंधकासुराचा वध करतानाची अंधकासुरवधमूर्ती, नृत्यमग्न शिवतांडवमूर्ती, शिव-पार्वतीसोबत कार्तिकेय असलेली सोमस्कंदमूर्ती, प्रकृती आणि पुरुष ही सृष्टीची दोन वेगळी; तरीही परस्परांना पूरक अशी तत्त्‍वं आहेत हे दर्शवणारी अर्धनारीनटेश्वराची मूर्ती, उग्र अशी भैरवमूर्ती, सौम्य अशी ध्यानमग्न दक्षिणामूर्ती असे कितीतरी शिवमूर्तींचे नयनमनोहर आविष्कार दक्षिणेतल्या शिवमंदिरांमधून दिसतात.

कांचीपुरमचं कैलासनाथमंदिर शिवांच्या सुंदर मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेल्या प्रत्येक शिवशिल्पाच्या चेहऱ्यावर एक गूढ, नयनमनोहर असं मंदस्मित आहे. त्या स्मिताबद्दल असं सांगतात की, वातापीच्या चालुक्यांची आणि कांचीच्या पल्लवांची अनेक पिढ्या लढाई चालू होती. कधी पल्लवांची सरशी व्हायची, तर कधी चालुक्यांची; पण धर्मांध परकीय आक्रमकांसारखी या दोन राजवंशांची विध्वंसक वृत्ती नसल्यामुळे त्यांनी एकमेकांच्या देवगृहांचा सदा आदरच केला. कांचीच्या या कैलासमंदिराविषयी असं सांगतात, की हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर काही दशकांतच चालुक्य राजा विक्रमादित्यानं कांचीवर स्वारी केली आणि विजय मिळवला. विजयी राजा म्हणून जेव्हा विक्रमादित्य हे मंदिर बघायला वाजत-गाजत आला तेव्हा इथल्या शिवमूर्तींच्या मंद स्मितानं त्याला इतकं प्रभावित केलं, की त्यानं या मंदिराला दाने तर देऊ केलीच; पण इथलेच स्थपती त्यानं आपल्या राज्यातल्या पट्टडक्कलला नेऊन तिथं विरूपाक्षाचं भव्य मंदिर उभारलं.

प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक आर. नागास्वामींच्या मते, ‘हे एक मंदिर जर आपण समजून घेतलं तर आपल्याला संपूर्ण द्रविड हिंदुमंदिरांचं स्थापत्य कसं असेल ते समजू शकतं. कांचीपुरमचं हे कैलासनाथमंदिर म्हणजे पल्लव स्थापत्यकलेचा परमोत्कर्षबिंदू आहे.’

मंदिराच्या दर्शनी प्राकारभिंतीच्या आतल्या बाजूला अनेक देवकोष्ठे आहेत, ज्यांमध्ये शिवांच्या विविध अवस्थितीतल्या मूर्ती बघायला मिळतात. मंदिराच्या दर्शनी भिंतीतल्या देवकोष्ठांमध्ये भिक्षाटनशिव, नृत्यशिव, लिंगोद्भवशिव, गंगाधरशिव, किरातार्जुनयुद्ध या अप्रतिम शिवप्रतिमा बघायला मिळतात. द्राविड स्थापत्यशैलीची सगळी वैशिष्ट्यं, म्हणजे शिखरावरची स्तूपी, मुख्य मंडपाबाहेरचा मुखमंडप, भव्य रंगमंडप, अंतराळ आणि गर्भगृह इथं पूर्णपणे विकसित झालेली बघायला मिळतात. याच मंदिरापासून प्रेरणा घेऊन चालुक्यांनी पट्टडक्कल इथलं विरूपाक्षमंदिर आणि राष्ट्रकूटांनी वेरूळचं कैलासनाथमंदिर बांधून घेतलं.

या मंदिराचा पाया आणि बाहेरची दर्शनी भिंत ही कठीण अशा ग्रॅनाईट दगडात बांधलेली आहे; पण आतल्या मंदिरासाठी काहीसा मऊ असा वालुकाष्म दगड वापरलेला आहे. काळाच्या ओघात हा वालुकाष्म दगड काहीसा झिजून गेलाय आणि त्यामुळे बऱ्याच शिल्पांचे बारकावे आणि चेहऱ्यावरचे भाव आता तितकेसे स्पष्ट दिसत नाहीत, तरीही जे उरलंय ते इतकं भव्य आणि सुंदर आहे, की हे मंदिर बघायला आलेली व्यक्ती भारावून गेल्याशिवाय राहत नाही. सध्या या मंदिराची व्यवस्था भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे.

चेन्नईहून स्वतःच्या वाहनानं पहाटे निघालो तर एका दिवसात आपण कांचीपुरमची काही प्रसिद्ध मंदिरं बघून मुक्कामाला चेन्नईला परत येऊ शकतो.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

कांचीपुरमची शान : श्रीवरदराज पेरुमल

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेल्या आठवड्यात आपण कांचीपुरमच्या सर्वात पुरातन मंदिराची, म्हणजे ‘कैलासनाथार कोविल’ची, ओळख करून घेतली. आजही आपण कांचीपुरममधल्याच अजून एका अप्रतिम मंदिराचं दर्शन घेणार आहोत. पल्लवसाम्राज्य हे आजच्या तामिळनाडूमधील तीन प्राचीन साम्राज्यांपैकी एक. त्यांची पहिली राजधानी होती चेन्नईजवळील मामल्लापुरम किंवा महाबलीपुरम आणि त्यानंतरची राजधानी म्हणजे कांचीपुरम. पल्लवसाम्राज्याच्या भरभराटीच्या काळात कांचीपुरम भौतिक आणि सांस्कृतिक प्रगतीच्या शिखरावर होतं. साधारणतः इसवीसनाचं चौथं शतक ते नववं शतक हा पल्लवांचा उत्कर्षकाळ; पण त्यानंतर राष्ट्रकूट आणि चोळ/चोल इत्यादी राजवटींचं मांडलिकत्व पल्लवांनी पत्करूनही कांचीपुरमचं वैभव कुठंही कमी झालं नाही. अगदी आजही कांचीपुरमचा उल्लेख ‘हजार मंदिरांचं शहर’ असाच केला जातो.

पल्लवांनी कांचीपुरममध्ये अनेक मंदिरं बांधली होती. त्या मंदिरांचा जीर्णोद्धार तर पुढच्या चोळ, राष्ट्रकूट, चेर वगैरे राजवटींनी केलाच; पण कांचीमध्ये नवनवीन मंदिरं बांधली, जुन्या मंदिरांचा विस्तार केला, त्यांना सढळ हस्ते दाने दिली. कुठल्याही जेत्या राजानं पराभूत राजाची राजधानी लुटली वा उद्ध्वस्त केली नाही. त्याला कारण भारतीय संस्कृतीची अंगभूत सहिष्णुता. राजधानी लुटणं, मंदिरं उद्ध्वस्त करणं, बायका-मुलांना गुलाम म्हणून विकणं, मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांची कत्तल करणं वगैरे क्रूर प्रकार सुरू झाले ते अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याच्या दक्षिण स्वारीनंतर.

त्याआधीच्या भारतीय साम्राज्यांनी एकमेकांच्या संस्कृतीचा सदैव सन्मानच केला. युद्ध रणांगणापुरतंच मर्यादित राहिलं.

आज आपण जे मंदिर बघणार आहोत ते वरदराज पेरुमलमंदिर या सांस्कृतिक सहिष्णुतेचा आजही भक्कम उभा असलेला पुरावा आहे. तब्बल २३ एकरांचा विस्तार असलेला या मंदिराचा प्राकार म्हणजे पल्लवांपासून ते विजयनगर साम्राज्यापर्यंतच्या हिंदुमंदिरबांधणीचा एक जिवंत आलेख आहे.

हे मंदिर प्रथम उभारलं ते पल्लव राजांनी; पण आजचं जे मुख्य मंदिर दिसतं ते इसवीसन १०५३ मध्ये चोळ राजांनी बांधलेलं आहे. पुढं चोळ वंशातल्याच राजा कुलोत्तुंग पहिला आणि विक्रमराज चोळ यांनी बाराव्या शतकात या मंदिराचा विस्तार केला आणि काही भागाचं नूतनीकरणही केलं. कांचीपुरम शहरातील श्रीविष्णूचं हे सगळ्यात जुनं मंदिर. वरदराज पेरुमलमंदिरात भगवान विष्णूची ‘देवराजस्वामी’ या नावानं उपासना केली जाते. पूर्ण विकसित द्रविड मंदिरस्थापत्यशैलीचं हे मंदिर एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

आपण या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला प्रथम दिसतं ते उत्तुंग सातमजली रायगोपुरम. त्या गोपुराखालच्या भव्य दरवाजातून आपण मंदिराच्या प्राकारात प्रवेश करतो आणि मंदिराच्या प्राकाराची भव्यता आपल्याला खऱ्या अर्थानं जाणवते. वरदराज पेरुमलमंदिरात एकात एक असे तीन भव्य प्राकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे तमिळ वैष्णव संतकवी आळवा यांच्या वास्तव्यानं पुनित झालेला आळवार-प्राकार, दुसरा म्हणजे मंदिराचं पवित्र स्वयंपाकघर जिथं आहे तो माडपल्ली-प्राकार आणि सगळ्यात आतला म्हणजे मुख्य मंदिराचा तो थिरुमलई म्हणजे पवित्र पर्वत-प्राकार. हे तिन्ही प्राकार मिळून वरदराज पेरुमलमंदिरसमूहात लहान-मोठी बत्तीस मंदिरं, एकोणीस विमानं, तीनशेच्या वर कोरीव खांबांच्या ओवऱ्या आणि लहान-मोठे मंडप व कित्येक लहान-मोठ्या पुष्करिणी आहेत. हे पूर्ण मंदिर बारकाईनं बघायला गेलो तर एक दिवस पुरणार नाही.

तमिळ श्रीवैष्णव संप्रदायातल्या भाविक

लोकांसाठी ज्याप्रमाणे श्रीरंगमचं मंदिर म्हणजेच ‘कोविल’, तिरुमलाचं मंदिर म्हणजे ‘मलई’ किंवा पवित्र डोंगर, त्याचप्रमाणे हे कांचीचं वरदराज पेरुमलमंदिर म्हणजे ‘पेरुमाळ कोविल’. दिव्य देसम म्हणजे ज्या मंदिरांमधून तामिळ वैष्णव संतकवींनी काव्यरचना केली अशी श्रीविष्णूची १०८ अतिपवित्र मंदिरं. त्या मंदिरांमधलं हे तिसऱ्या क्रमांकाचं मंदिर.

या मंदिरातली एक मुख्य आराध्यमूर्ती ही औदुंबराच्या लाकडापासून म्हणजे तमिळमध्ये ‘आती’ या नावाच्या वृक्षाच्या लाकडापासून बनवलेली आहे म्हणून तिला ‘आतीवरदार’ असं नाव आहे. पुढं सतराव्या शतकात औरंगजेबाच्या स्वारीच्या भीतीनं ही मूर्ती मंदिराच्या पुष्करिणीखाली असलेल्या एका गुप्त दालनात दडवण्यात आली. ही मूर्ती दर ४० वर्षांनी बाहेर काढली जाते आणि ४८ दिवस या मूर्तीचा दर्शनोत्सव साजरा केला जातो. देश-विदेशांतून लाखो भक्त या मूर्तीच्या दर्शनासाठी कांचीपुरमला येतात. शेवटचा आतीवरदार दर्शनसोहळा २०१९ मध्ये पार पडला, आता यापुढचा दर्शनसोहळा २०५९या वर्षी साजरा होणार आहे.

सध्या या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जी ‘मूळवर’ म्हणजे मुख्य मूर्ती आहे ती गंडकी पाषाणाची आहे. उभ्या अवस्थेतली ही श्रीविष्णूची सुंदर मूर्ती जवळजवळ दहा फूट उंच असून पाषाणाच्या एकाच शिळेतून कोरलेली आहे. या मंदिराच्या प्राकारात तीनशेहून अधिक शिलालेख आहेत जे पल्लव, पांड्य, चोळ, होयसळ, विजयनगर इत्यादी दक्षिणेतल्या सर्व साम्राज्यांच्या राजवटीतले आहेत. या सर्वच राजवटींनी वेगवेगळ्या काळात ह्या मंदिराचा विस्तार केला होता, दाने दिली होती किंवा देवाला दाग-दागिने अर्पण केले होते. ब्रिटिश राजवटीत लॉर्ड क्लाईव्हही वरदराज पेरुमलमंदिरात दर्शनासाठी आला होता आणि त्यानं देवाला एक हार अर्पण केला होता. ‘क्लाईव्ह महारकंडी’ या नावानं ओळखला जाणारा हा रत्नजडित हार आजही वर्षातून एकदा इथल्या उत्सवमूर्तीच्या अंगावर चढवला जातो.

हे मंदिर शिल्पसौंदर्यानं विनटलेलं आहे. विजयनगरच्या सम्राटांनी बांधलेला इथला १०० कोरीव स्तंभांचा कल्याणमंडप अत्यंत सुरेख आहे. प्रत्येक खांबावर अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. रती-मदन, अर्जुन, कर्ण, घोड्यावर बसलेल्या

स्त्री-सैनिक वगैरे मूर्ती निव्वळ अप्रतिम. दुर्दैवानं पुरातत्त्‍व खात्यानं सुरक्षेच्या नावाखाली या कल्याणमंडपाला अत्यंत कुरूप असे बोजड लोखंडी ग्रिल्स ठोकून ठेवलेत. या मंडपाच्या शिल्पसौंदर्याशी ते पूर्णतः विसंगत आहेत. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या खांबावरून लोंबकळणारी दगडी कड्याकड्यांची साखळी. एका पाषाणातून कोरून काढलेल्या या साखळीला कुठंही जोड दिसत नाही. हे कसब निव्वळ अप्रतिम.

कांचीपुरमला गेलात तर हे मंदिर आवर्जून बघा. कांचीपुरमचं हे श्रीविष्णूंना समर्पित वरदराज पेरुमलमंदिर, शिवांना समर्पित एकाम्रेश्वरमंदिर आणि देवी पार्वतीचं कामाक्षी अम्मनमंदिर या तिन्ही मंदिरांना मिळून ‘मूनमूर्तिवासम’ असं नाव आहे, म्हणजेच ‘त्रिमूर्तिवास’. पुढच्या दोन लेखांमध्ये आपण या दोन्ही मंदिरांची ओळखही करून घेऊ.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

कांचीपुरमची कामाक्षी

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

कांचीपुरममधील श्रीविष्णूंना समर्पित वरदराज पेरुमलमंदिर, शिवांना समर्पित एकाम्रेश्वरमंदिर आणि देवी पार्वतीचं कामाक्षी अम्मनमंदिर या तिन्ही मंदिरांना मिळून ‘मूनमूर्तिवासम’ म्हणजेच ‘त्रिमूर्तिवास’ असं नाव आहे हे आपण गेल्या वेळच्या लेखात पाहिलं.

आज आपण कांचीपुरमची अधिष्ठात्री देवता, कामाक्षी अम्मनच्या मंदिराला भेट देऊ. शिवांचं एकाम्रेश्वरमंदिर असलेली ‘शिवकांची’ आणि श्रीविष्णूंचं वरदराज पेरुमलमंदिर असलेली ‘विष्णुकांची’ या कांचीपुरमच्या दोन्ही भागांच्या मधोमध असलेली ही ‘शक्तिकांची’ आणि तिथलं हे कामाक्षीचं भव्य मंदिर म्हणजे इतिहास, आख्यायिका, पुराणकथा, द्रविड स्थापत्य आणि भारतीय वास्तुकला यांचा अनोखा संगम आहे. जवळजवळ पाच एकराच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या मंदिराची खासियत म्हणजे इथली पद्मासनात स्थित असलेली देवी कामाक्षीची सुंदर मूर्ती.

कांची येथील कामाक्षीमंदिर हे देशातील देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. शिवपत्नी सतीनं तिचा पिता दक्ष यानं तिच्या पतीचा म्हणजे शिवांचा अपमान केला म्हणून योगाग्नी प्रज्वलित करून देहत्याग केला. प्रिय पत्नीचा वियोग असह्य झालेल्या संतप्त शिवांनी सतीचं अचेतन शरीर खांद्यावर घेऊन भीषण तांडव सुरू केलं. सर्व ब्रह्मांड डळमळू लागलं तेव्हा इतर देवांनी भयभीत होऊन श्रीविष्णूंना विनवलं आणि श्रीविष्णूंनी आपलं सुदर्शनचक्र सोडून सतीच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे जिथं जिथं पडले तिथं तिथं देवीची मंदिरं निर्माण केली. ती देवीची शक्तिपीठं. सतीदेवीची नाभी जिथं पडली नेमकं तिथंच कांचीपुरमचं हे कामाक्षीमंदिर उभारलं आहे असा भाविक हिंदूंचा विश्वास आहे. या नाभीस्थानाचं प्रतीक असलेला एक रौप्यस्तंभ मंदिराच्या गाभाऱ्यात आजही दिसतो. नाभीचं प्रतीक म्हणून या खांबाला मधोमध एक छोटंसं छिद्र आहे.

मूळ मंदिराची वास्तू कधीची आहे याबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता नाही; पण मूळ वास्तू सहाव्या शतकापासूनच्या आधीची पल्लव राजांनी बांधलेली वास्तू असावी. मंदिराच्या मंडपातील पल्लवकालीन सिंहशिल्पे याची साक्ष देतात. पुढं चोळ/चोल राजांनी मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार आणि विस्तार केला. त्यानंतर पांड्य राजे, विजयनगरचे राजे आणि मदुराईचे नायक या सर्व राजवंशांनी या मंदिराला सढळ हस्ते राजाश्रय दिला.

पल्लव राजे तसंच चोळ राजे परंतक, राजा राजा, राजेंद्र चोल द्वितीय आणि कुलोत्तुंग तृतीय यांच्या कारकीर्दीत कोरले गेलेले शिलालेख आजही या मंदिराच्या बाराशे वर्षांच्या इतिहासाचा पुरावा देतात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, इथं पूजल्या जाणाऱ्या कामाक्षीदेवीचं म्हणजे पार्वतीदेवीचं स्वरूप हे ‘अविवाहित स्वरूप’ समजलं जात. मदुराईची मीनाक्षी आणि काशीची विशालाक्षी ही दोन्ही देवींची स्वरूपं ही ‘विवाहित स्वरूपं’ समजली जातात; पण कांचीची कामाक्षी ही सुईच्या अग्रावर उभी राहून शिवासाठी तपस्या करणारी कुमारिका आहे.

असं म्हणतात की कामाक्षीदेवी ही तापसी असल्यामुळे रौद्र स्वरूपात या मंदिरात विराजमान असायची; पण आदी शंकराचार्यांनी ‘सौंदर्यलहरी’ हे स्तुतीपर स्तोत्र रचून देवीला शांत केलं आणि तेव्हापासून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामाक्षी बनून शांत स्वरूपात देवी या मंदिरात नांदते आहे. स्वतः श्रीशंकराचार्यांनी स्थापित केलेलं श्रीयंत्र आजही या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीच्या पायापाशी असल्याचं दाखवलं जातं. कामाक्षीदेवीची गाभाऱ्यातली मूर्ती गंडकी पाषाणापासून तयार करण्यात आलेली असून ती अत्यंत सुरेख आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला गायत्रीमंडप असं नाव आहे. कामाक्षी अम्मन ब्रह्मासनावर पद्मासन घालून बसलेली आहे. तिला चार हात आहेत, खालच्या दोन्ही हातांत इक्षुकोदंड म्हणजे उसाचं धनुष्य आणि पाच फुलांचा पुष्पशर आहे, तर वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आहेत. देवीच्या डाव्या खांद्यावर एक पोपट आहे. देवी नेहमीच सालंकृत आणि फुलांनी सजवलेली असल्यामुळे मूर्तीचं मूळ सौंदर्य बघता येत नाही; पण मूर्तीच्या चेहऱ्यावरच्या शांत भावावरून आपण मूर्तीच्या सौंदर्याची कल्पना करू शकतो.

असं मानलं जातं की कामाक्षी अम्मनमंदिराच्या गर्भगृहाच्या चार भिंती या चार वेदांचं प्रतीक आहेत, तर गायत्रीमंडपातील २४ खांब हे गायत्रीछंदाच्या 24 अक्षरांचं प्रतिनिधित्व करतात. गर्भगृहाच्या मुख्य दरवाजाला बिल्वद्वार असंं नाव आहे. मंदिराच्या गाभाऱ्यावरील शिखराला सोन्याचा पत्रा मढवलेला आहे. तो सकाळच्या उन्हात झळाळत असताना बघणं हा एक सुंदर अनुभव आहे.

कामाक्षी अम्मनमंदिराचं आजचं बहुतेक बांधकाम हे साधारणतः चौदाव्या शतकाच्या आसपासचं असलं तरी हे मंदिर फार पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. पाचव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेलेले तमिळ शैव संतकवी नायनमार यांची पदं असलेल्या ‘तेवारम’ या ग्रंथात अप्पर आणि सुंदरार यांनी कामकोट्टम कांचीचा उल्लेख केला आहे, तर सातव्या शतकातील संगमकवी आदियारकुनाल्लार यांनी ‘कांचीकोत्ता कामाक्षी’ हे पद रचलं आहे, तर भागवतपुराणात बलारामाच्या तीर्थयात्रेच्या कथेत कामकोटीपुरी कांचीचा उल्लेख आहे, म्हणजेच हे शक्तिस्थल फार पुरातन काळापासून उपासनेत आहे.

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला अन्नपूर्णादेवी आणि सरस्वतीची स्वतंत्र मंदिरं आहेत. दुर्वास ऋषी आणि आदी शंकराचार्यांचीही मंदिरं इथं आहेत. दुर्वास ऋषींनी इथं देवीची प्रार्थना केली आणि प्रथम श्रीचक्र स्थापित केलं असं मानलं जातं. ‘सौभाग्यचिंतामणी कल्प’ या आपल्या ग्रंथात दुर्वास ऋषींनी लिहून ठेवलेला विस्तृत पूजाविधी आजही या मंदिरामध्ये अनुसरला जातो.

विशेष म्हणजे, श्रीविष्णूंच्या ‘१०८ दिव्य देसम’ मंदिरांपैकी एक थिरुवलनूर, जिथं श्रीविष्णूंची वराहस्वरूपात पूजा करण्यात येते, तेही मंदिर कामाक्षी अम्मनमंदिराच्याच प्राकारात आहे. मंदिरप्राकाराच्या चारी बाजूंना गोपुरे आणि दरवाजे आहेत. गोपुरांवर सुरेख संदला-शिल्पन किंवा स्टको वर्क आहे. चुना, बारीक रेती, जिप्सम, पाणी यांचं मिश्रण घोटून तयार केलेला गुळगुळीत गिलावा म्हणजे संदला किंवा सानला आणि या मिश्रणाचा उपयोग करून केलेली गोपुरावरची मूर्तिशिल्पनिर्मिती म्हणजे संदला-शिल्पन. कामाक्षी अम्मनमंदिराच्या गोपुरावरची संदला शिल्पे आवर्जून बघण्यासारखी आहेत.

भारतातल्या शाक्तपरंपरेचं भूषण असलेलं हे कांचीपुरमचं कामाक्षी अम्मनमंदिर बघितल्याशिवाय तुमची ‘कांचीयात्रा’ पूर्ण होऊच शकत नाही.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

पृथ्वीतत्त्‍वाचं प्रतीक एकाम्रेश्वर मंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

सुईच्या अग्रावर एका पायावर उभं राहून शिवासाठी घोर तपःश्चर्या करणाऱ्या कांचीपुरमची अधिष्ठात्री देवी कामाक्षीदेवीच्या मंदिराची ओळख गेल्या आठवड्यात आपण करून घेतली. ज्याच्यासाठी तिनं हा सगळा खटाटोप केला त्या कल्याणसुंदर शिव एकाम्रेश्वराच्या मंदिराचं दर्शन आज घेऊ या. कांचीपुरममधल्या ज्या प्रमुख तीन मंदिरांना मिळून ‘मूनमूर्तिवासम’ म्हणजे ‘त्रिमूर्तिवास’ अशी संज्ञा दिली जाते त्यातलं हे तिसरं मंदिर. शिवकांचीचं हृदय म्हणजे एकाम्रेश्वराचं हे अतिभव्य मंदिर. पल्लव, चोळ/चोल, पांड्य, नायक आणि विजयनगरचे राजे या दक्षिणेतल्या सर्वच प्रमुख साम्राज्यांनी या मंदिराला दाने दिली, वेळोवेळी मंदिराची वास्तू वाढवली, गरज पडली तेव्हा मंदिराच्या काही भागाचा जीर्णोद्धार केला. इथल्या शिलालेखांमध्ये हा १५०० वर्षांचा उज्ज्वल इतिहास नोंदवलेला आहे.

भाविक हिंदूंच्या मते कांचीपुरमच्या या भागात, वेगवती नदीच्या किनारी शिवांचं हे मंदिर अनादीकाळापासून अस्तित्वात होतं. इथल्या गाभाऱ्यातलं शिवलिंग नदीकाठच्या वाळूमिश्रित मातीपासून तयार केलं गेलेलं असून इतर शिवमंदिरांत होतो तसा इथं शिवलिंगावर नित्य अभिषेक होत नाही, तसंच ते वाळूपासून तयार केलं गेलेलं असल्यामुळे हे शिवलिंग पाषाणी शिवलिंगाप्रमाणे वरून गोलाकार नसून निमुळत्या शंकूच्या आकाराचं आहे. याबाबतची आख्यायिका मला इथल्या अर्चकांकडून ऐकायला मिळाली ती अशी : ‘एकदा देवी पार्वतीनं खेळकरपणे शिवांचे डोळे झाकले आणि पूर्ण विश्व अंधकारमय झालं. रागावून शिवांनी पार्वतीला पृथ्वीवर पाठवलं. ती कामाक्षी बनून कांचीपुरमला वेगवतीच्या किनारी आली आणि तिथल्याच वाळूचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू लागली. तिची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून भगवान शिवांनी नदीला पूर आणला. नदीच्या वाढत्या पाण्यात शिवलिंग वाहून जाऊ नये म्हणून देवी कामाक्षीनं ते आपल्या कवेत घेतलं आणि ती तशीच बसून राहिली. तिच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी आपलं खरं स्वरूप प्रकट केलं आणि नदीकिनारी असलेल्या एका आम्रवृक्षाखाली देवी कामाक्षीशी विवाह केला. पुढं याच शिवलिंगाभोवती मंदिर बांधण्यात आलं आणि ज्या एका आम्रवृक्षाखाली शंकर-कामाक्षीचा विवाह झाला त्या वृक्षामुळे हे मंदिर ‘एकाम्रेश्वर’ या नावानं ओळखलं जाऊ लागलं.’

अगदी आजही हा आम्रवृक्ष मंदिराच्या प्रांगणात उभा आहे. हे झाड किमान साडेतीन हजार वर्षं जुनं आहे असा भाविकांचा विश्वास आहे! झाडाच्या चार फांद्या चार वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देतात. या चार फांद्या म्हणजे चार वेदांचं प्रतीक आहे असं मानण्यात येतं. या मंदिराचा स्थळवृक्ष म्हणजे हा आंबा!

आता आपण बघू मंदिराची आज उभी असलेली वास्तू.

एकाम्रेश्वराचं हे मंदिर अतिशय भव्य असून, मंदिराची वास्तू जवळजवळ २५ एकर परिसरात आहे. मंदिराचा सर्वात पुरातन भाग हा चौथ्या पल्लवाच्या काळचा आहे. त्यानंतरच्या काळात नवव्या शतकात चोळ राजांनी मोठ्या प्रमाणात मंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार केला; पण इथं पल्लवांच्या आधीदेखील शिवमंदिर अस्तित्वात होतं. पाचव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘मणिमेगलाई’ या तमिळ संगमसाहित्यातल्या महाकाव्यात या मंदिराचा उल्लेख आहे.

पुढं विजयनगर साम्राज्याच्या काळात मंदिराला चारी दिशांनी भव्य रायगोपुरे बांधण्यात आली. एकाम्रेश्वर मंदिराचं प्रमुख रायगोपूर अकरामजली असून, जवळजवळ दोनशे फूट उंच आहे. सर्वच गोपुरांवर अप्रतिम संदला-शिल्पनकाम किंवा स्टको वर्क आहे. विजयनगरच्या सम्राटांनी बांधून घेतलेला अयिरम कालमंडपम् म्हणजे सहस्रस्तंभी मंडप ही या मंदिराची शान आहे. ग्रॅनाईट पाषाणातून कोरलेल्या या मंडपातल्या स्तंभांवर अप्रतिम कोरीव काम आहे.

एकाम्रेश्वर मंदिरात एकात एक असे चार प्राकार आहेत. सहस्रस्तंभ मंडप रायगोपुरानंतरच्या पहिल्याच प्राकारात आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्राकारात अनेक छोटी मंदिरं आहेत, ज्यांमध्ये नटराजांचं स्वतंत्र मंदिर आहे, तसंच विनायक, शरभेश आणि भद्रकालीची छोटी छोटी मंदिरं आहेत.

विशेष म्हणजे, या शिवमंदिराच्या प्राकारात श्रीविष्णूंचं एक ‘दिव्यदेसम्’ मंदिरही आहे, जिथं श्रीविष्णूंची वामनस्वरूपात पूजा केली जाते. या मंदिराचं तमिळ नाव आहे ‘नीलथिंगल थुंडम पेरूमल मंदिर’. मंदिराच्या चौथ्या प्राकारात मुख्य गर्भगृह आहे व त्याभोवती जी ओवरी आहे तीत अनेक शिवलिंगे स्थापित केलेली आहेत. एका बाजूला ६३ नायनमारांच्या म्हणजे तामिळ शैव संतकवींच्या मूर्ती आहेत. या नायनमार संतकवींपैकी अप्पर, थिरुज्ञानसंबंदर, सुंदरार आणि माणिकवासगर या चार प्रमुख शैव संतांनी या मंदिराच्या वैभवाचं गायन केलं आहे. म्हणून या मंदिराला ‘पाडल पेट्र स्थलम्’ असं नाव आहे.

एकाम्रेश्वर मंदिर हे तामिळनाडूमधल्या अतिभव्य शिवमंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या ध्वजस्तंभाच्या प्राकारातील जी ओवरी आहे तिचे खांब अतिशय सुंदर कोरीव कामानं नटलेले आहेत. भव्य रायगोपुरे, एकाहून एक सरस असे अप्रतिम मंडप, देखणं गर्भगृह आणि वर उत्तुंग शिखर इत्यादी द्रविड स्थापत्यशैलीची सर्व वैशिष्ट्यं असलेलं हे मंदिर म्हणजे खरोखरच मंदिरनगरी कांचीपुरमचं भूषण आहे.

या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, इथलं शिवलिंग हे पंचमहाभूतांमधील पृथ्वीतत्त्वाचं प्रतीक मानलं जातं. दक्षिण भारतात पंचमहाभूतांचं प्रतीक असलेली प्रमुख पाच शिवमंदिरं आहेत. ही मंदिरं पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू या पाच तत्त्वांचं प्रतिनिधित्व करतात. एकाम्रेश्वर मंदिरातील शिवलिंग नदीकाठच्या वाळूपासून तयार केलं गेलेलं आहे म्हणून ते पृथ्वीस्वरूप आहे. इतर पंचभूत मंदिरं पुढीलप्रमाणे आहेत. आपण आधी बघितलेलं चिदंबरमचं नटराजमंदिर आकाशाचं प्रतिनिधित्व करतं. तिरुवनकावलमधील जांबुकेश्वरमंदिर जलस्वरूप आहे. तिरुवन्नामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिरातील लिंग अग्निस्वरूप आहे, तर आंध्र प्रदेशामधील तिरुपतीजवळील श्रीकालाहस्ती मंदिरातलं शिवलिंग वायुस्वरूप आहे. किती सुंदर आणि उदात्त संकल्पना आहे ना ही, शिवांचं पंचमहाभूतस्वरूपात पूजन करण्याची?

कांचीपुरमची ही प्रमुख चार-पाच मंदिरं जरी बघायची म्हटली तरी आपल्याला कमीत कमी दोन पूर्ण दिवस तरी लागतील. चेन्नईहून कांचीपुरमला दोन तासांत स्वतःच्या वाहनानं जाता येतं. बसेस वगैरेही खूप आहेत. वेगवेगळ्या बजेटला परवडतील अशी हॉटेलंही आहेत. मंदिरनगरी कांची खरोखरच सुंदर आणि मुद्दाम जाऊन बघण्यासारखीच आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

पल्लवस्थापत्याचा सुंदर आविष्कार

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

काशी, कांची, हरद्वार, अयोध्या, द्वारावती, मथुरा आणि उज्जैन या सात तीर्थक्षेत्रांना भाविक हिंदू मोक्षदायक अशा सप्तनगरी किंवा सप्तपुरी मानतात. फार प्राचीन काळापासून या सात नगरी हिंदुमंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातल्या कांचीपुरम इथल्या काही प्रमुख मंदिरांची ओळख आपण गेल्या काही लेखांमधून करून घेतली. आज आपण पाहणार आहोत ते या लेखांच्या शृंखलेतलं कांचीपुरम इथलं शेवटचं प्रमुख मंदिर, श्रीवैकुंठ पेरुमलमंदिर.

कांचीपुरममध्ये आपण आधी बघितलेलं कैलासनाथमंदिर हे शिवांचं मंदिर आणि श्रीवैकुंठ पेरुमल हे श्रीविष्णूंचं मंदिर ही दोन्ही मंदिरं सर्वात पुरातन मानली जातात. आज अस्तित्वात असलेलं वैकुंठ पेरुमलमंदिर पल्लव राजा ‘नंदीवर्मन दुसरा’ यानं सातव्या शतकात बांधलं होतं असे शिलालेखात उल्लेख आहेत. त्यानंतर काळाच्या ओघात कांचीपुरमच्या इतर मंदिरांप्रमाणेच याही मंदिराला पल्लवांनंतर चोळ/चोल, पांड्य, विजयनगर व मदुराईचे नायक या राजवंशांनी उदारहस्ते दाने दिली व त्याची देखभाल केली. द्रविड स्थापत्यशैलीचं पल्लवकाळातील उत्तम उदाहरण असलेलं हे पुरातन मंदिर वालुकाष्म दगडातून बांधून घेतलेलं आहे.

‘नंदीवर्मन दुसरा’च्या काळात या मंदिराला ‘परमेश्वर विष्णुगृहम्’ असं अधिकृत नाव होतं. सध्या हे मंदिर वैकुंठ पेरुमलमंदिर म्हणून ओळखलं जातं. पेरुमल म्हणजे महान देव म्हणजे श्रीविष्णू. तमिळ भाषेत श्रीविष्णूंना पेरुमल म्हणूनच संबोधलं जातं आणि त्यांची पत्नी असलेल्या श्रीलक्ष्मीला ‘तायार’ म्हणजे आई! तामिळनाडूमधल्या प्रत्येक श्रीविष्णुमंदिरातील मुख्य मूर्तीला स्वतंत्र, वेगळं नाव असतं आणि मुख्य मंदिराच्या प्रांगणात श्रीलक्ष्मीचं व भूदेवीचं किंवा तिचं स्वरूप असलेल्या संतकवयित्री आंदाळचं स्वतंत्र छोटं मंदिर असतं. वैकुंठ पेरुमलमंदिरातील श्रीविष्णू ‘वैकुंठनाथ’ म्हणून ओळखले जातात आणि इथली श्रीलक्ष्मी ‘वैकुंठवल्ली’ या नावानं ओळखली जाते.

वैकुंठ पेरुमलमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला तीनमजली गाभारा, जिथं श्रीविष्णूंचं तीन स्वरूपांत पूजन होत असे. तळमजल्यावरच्या गर्भगृहात श्रीविष्णू बसलेल्या स्थितीत आहेत, तर पहिल्या मजल्यावरच्या गर्भगृहात ते अनंतशयनम् म्हणजे निद्रिस्त स्वरूपात आहेत. या गर्भगृहात आपल्याला केवळ एकादशीच्या दिवशी जाता येतं. सर्वात वरच्या गाभाऱ्यात श्रीविष्णूंची उभ्या स्वरूपातली मूर्ती होती, त्या मूर्तीची वर्णनं सातव्या शतकातले संतकवी थिरुमंगई आळवार यानी आपल्या काव्यात केलेली आहेत. सध्या हा गाभारा दुर्दैवानं रिकामा आहे. इथली मूर्ती कुठं गेली हे कुणालाच माहीत नाही.

या तीन गर्भगृहांत श्रीविष्णूंच्या तीन स्वरूपातील मूर्ती का आहेत याबद्दल एक अतिशय हृद्य आख्यायिका इथले पुजारी सांगतात. तळमजल्यावरच्या गाभाऱ्यातील श्रीविष्णू बसलेल्या स्थितीत राजा नंदीवर्माला आचार्य म्हणून सल्ला देत होते. पहिल्या मजल्यावरील शेषशायी श्रीविष्णू हे स्वतः राजे आहेत आणि राजा नंदीवर्मा शिष्य होऊन त्यांचे पाय चुरतो. तिसऱ्या मजल्यावरील उभ्या मूर्तीच्या स्वरूपातले श्रीविष्णू हे राजाचे कलागुरू होते. त्यांनी राजा नंदीवर्म्याला अठरा वेगवेगळ्या कला शिकवल्या.

या मंदिराच्या प्रथम प्राकारात आठव्या शतकातला एक शिलालेख आहे. अभिमानसिद्धी या राजानं या मंदिराला सोन्याची उरुळी आणि हजार सुवर्णमुद्रांचं दान दिलं होतं, असं या शिलालेखात नमूद आहे. या मंदिराशी संबंधित अशी अजून एक छान आख्यायिका आहे व ती म्हणजे, कांचीपुरमचा राजा विरोचा निपुत्रिक होता. तो मोठा शिवभक्त होता. मूल होण्यासाठी त्यानं शिवांना साकडंं घातलं. विष्णूंचे द्वारपाल पुत्र म्हणून त्याच्या घरी जन्म घेतील असा शिवांनी त्याला आशीर्वाद दिला. कालांतरानं विरोचा राजाला पल्लवन आणि विल्लवन असे दोन जुळे मुलगे झाले. ते विष्णुभक्त म्हणून वाढले. त्यांच्यासाठी श्रीविष्णू शिवकांचीमध्ये वैकुंठनाथ या स्वरूपात प्रकट झाले. ही सुंदर गोष्ट हिंदू धर्मातील दोन प्रमुख पंथ शैव आणि वैष्णव यांच्या समन्वयाची कहाणी आहे.

वैकुंठ पेरुमलमंदिर हे श्रीवैष्णवपंथाच्या अनुयायांना सर्वात पवित्र असणाऱ्या श्रीविष्णूंच्या १०८ दिव्य देसम् मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या गर्भगृहाबाहेर चारी बाजूंना शिल्पकामानं भरलेल्या ओवऱ्या आहेत. त्या अतिशय प्रेक्षणीय आहेत. चारी बाजूंच्या ओवऱ्या खास पल्लवशैलीच्या सिंहशिल्पांनी तोलून धरलेल्या स्तंभांवर टेकलेल्या आहेत. या ओवऱ्यांची खासियत म्हणजे मंदिरात प्रवेश करताना आपल्या डाव्या बाजूच्या भिंतीवरील शिल्पपट्ट श्रीविष्णूंशी संबंधित कथा दर्शवतात, तर उजवीकडील ओवऱ्यांमधून मंदिरकर्ता राजा नंदीवर्मन यांच्या जीवनातील प्रसंगांचं अंकन केलं गेलं आहे. या शिल्पांमधून तत्कालीन समाजजीवन, वेशभूषा, केशरचना इत्यादींची कल्पना येते.

नंदीवर्मनच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित या पॅनेल्सवरून हे स्पष्ट होतं, की पूर्वीचा पल्लव राजा मरण पावला म्हणून परमेश्वरवर्मन नावाच्या त्याच्या दूरच्या नातेवाईक मुलाला त्याच्या स्वत:च्या इच्छेनुसार आणि ईश्वरी संकेतानुसार कांचीपुरम इथं आणण्यात आलं. त्याचा कांचीपुरम इथं राज्याभिषेक होऊन त्यानं ‘नंदीवर्मन दुसरा’ या नावानं ६५ वर्षं दीर्घ काळ राज्य केलं! परमेश्वर वर्मन या त्याच्या मूळ नावावरूनच वैकुंठ पेरुमल मंदिराचं ‘परमेश्वर विष्णुगृहम्’ हे मूळ नाव ठेवण्यात आलं होतं. द्रविड स्थापत्यशैलीची सर्व वैशिष्ट्यं - म्हणजे मोठी चौकोनी प्राकारभिंत, दर्शनी दरवाजावरचं गोपुर, गर्भगृहाभोवतीच्या ओवऱ्या, मुख्य सभामंडप, अंतराळ, मंडोवरावरची शिल्पसमृद्ध देवकोष्ठे, द्रविड पद्धतीचं पिरॅमिडच्या आकारातलं विमान आणि शिखरावरची स्तूपी - या मंदिरात आपण पाहू शकतो. आपण याआधी बघितलेल्या श्रीविष्णूंच्या कांचीपुरममधल्या अतिभव्य वरदराज पेरुमलमंदिराच्या मानानं वैकुंठ पेरुमलमंदिर खूप छोटं आहे; पण इथली शिल्पं आणि बांधकाम खूप प्राचीन असल्यामुळे हे मंदिर खरोखरच प्रेक्षणीय आहे. इथं भाविकांची गर्दीही कमी असते, त्यामुळे एक अनोखा, शांत भावानुभव आपल्याला या मंदिरात मिळतो. तशी कांचीपुरममध्ये आजही लहान-मोठी मिळून शेकडो मंदिरं अस्तित्वात आहेत; पण या सदराच्या सोईसाठी आपण फक्त इथल्या प्रमुख पाच मंदिरांचीच ओळख करून घेतली. तुमच्या कांचीपुरमच्या प्रवासात या पाचही मंदिरांचं दर्शन घ्यायला विसरू नका.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

मोढेराचं सूर्यमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

‘राउळी मंदिरी’ या सदरातून आपण गेले काही आठवडे तामिळनाडूमधील कांचीपुरमनगरीतील काही प्रसिद्ध मंदिरांची ओळख करून घेतली. आता आपण थोडीशी दिशा बदलून भारताच्या पश्चिमेला, गुजरात राज्यात जाऊ. गुजरातमधील मोढेरा या गावात एक अप्रतिम सूर्यमंदिर आहे. ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुंदर मंदिराचा पावसाळ्यातला व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. त्यात मंदिरापुढच्या कुंडात पावसाच्या धारा पडतानाचं अप्रतिम दृश्य होतं. मी मोढेराला पोहोचले होते ते अशाच एका पावसाळी सकाळी. सोनेरी वालुकाष्मात कोरलेलं मोढेराचं अत्यंत देखणं सूर्यमंदिर पावसाच्या संततधारा अंगावर घेत बघणं हा एक भारावून टाकणारा अनुभव होता.

गुजरातमधलं प्रमुख शहर अहमदाबाद इथल्या ‘वल्लभभाई पटेल विमानतळा’पासून सुमारे शंभर किलोमीटरवर वसलेलं मोढेरा हे गाव पुष्पावती नदीच्या तीरावरच्या सूर्यमंदिराकरिता जगप्रसिद्ध आहे. मेहसाणा शहरापासून हे गाव सुमारे ४० किलोमीटरवर आहे. इथलं सूर्यमंदिर गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रचलित असलेल्या नागर स्थापत्यशैलीच्या ‘मरू-गुर्जर’नामक उपप्रकाराचं उत्कृष्ट उदाहरण आहे. दगडावर दगड रचून बांधलेल्या या मंदिराच्या बांधकामात कुठंही चुन्याचा उपयोग केलेला आढळत नाही.

गुजरातमधील पाटण इथून राज्य करणाऱ्या सोलंकी राजवंशातील पराक्रमी राजा भीमदेव पहिला यानं सन १०२६ मध्ये हे मंदिर उभारलं असे इथल्या शिलालेखात उल्लेख आहेत. म्हणजे, तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये जेव्हा राजराजा चोळ/चोल शिवांना समर्पित भव्य बृहदीश्वर मंदिर उभारत होता त्याच काळात गुजरातमध्ये राणा भीमदेव सोलंकी पहिला सूर्याला समर्पित हे सूर्यमंदिर उभारत होता.

गुजरातचे सोलंकीराजे म्हणजे सूर्यवंशी चालुक्य. ते सूर्यदेवाला स्वतःची कुलदेवता म्हणून भजत असत. त्यांच्या आराध्यदेवाच्या म्हणजे सूर्यदेवाच्या पूजेसाठी त्यांनी हे भव्य सूर्यमंदिर निर्माण केलं; पण या जागेचं महत्त्‍व फार पुरातन आहे असं मानलं जातं. स्कंदपुराणानुसार, आजच्या मोढेरा गावाभोवती एक मोठं अरण्य होतं. त्या अरण्यात ऋषी-मुनींचे खूप आश्रम होते म्हणून त्याला ‘धर्मारण्य’ असं संबोधलं जायचं. रावणाचा वध करून अयोध्येत परतणाऱ्या श्रीरामांनी रावणहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी सीतेसह या धर्मारण्यात जाऊन यज्ञ केला अशी कथा आहे. आम्हाला मंदिर दाखवणाऱ्या ‘गाईड’च्या मते, प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ केला आणि या ठिकाणी ‘मोढेरक’ या गावाची स्थापना केली. याच गावाला पुढं ‘मोढेरा’ असं म्हटलं जाऊ लागलं. श्रीराम इथं आले होते असा लोकांचा विश्वास असल्यामुळे मोढेराच्या सूर्यमंदिरासमोरील कुंडाला ‘रामकुंड’ असंही म्हटलं जातं.

सन १०२४-२५ च्या सुमारास सौराष्ट्रातील सोमनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करून पुढं सरकणारा गझनीचा क्रूरकर्मा महमूद याचं आक्रमण चालुक्य राजा भीमदेव पहिला यानं मोढेरा इथं युद्ध करून रोखलं होतं. इतिहासतज्ज्ञांचं असं मत आहे, की या देदीप्यमान विजयाचं प्रतीक म्हणून मोढेरा इथं हे भव्य सूर्यमंदिर उभारण्यात आलं.

या मंदिराच्या प्राकारात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डोळ्यात भरतं ते इथलं विशाल कुंड. याच कुंडाला ‘सूर्यकुंड’ किंवा ‘रामकुंड’ या दोन्ही नावांनी संबोधलं जातं. या रामकुंडाची रचना गुजरात-राजस्थानमध्ये प्रचलित असलेल्या ‘वाव’ किंवा खाली उतरता उतरता निमुळत्या होत जाणाऱ्या पायऱ्या पायऱ्या असलेल्या विहिरीप्रमाणे म्हणजेच स्टेपवेलप्रमाणे केलेली आहे. थोड्या थोड्या अंतरावर पायऱ्यांवर छोटी छोटी मंदिरं कोरलेली आहेत. एकेकाळी रामकुंडाच्या पायऱ्यांवर विविध देवतांना समर्पित केलेली १०८ छोटी मंदिरं होती. सध्या त्यातली फार थोडी चांगल्या स्थितीत आहेत. त्यातलं देवी घालवणाऱ्या शीतलामातेचं मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या गुजरातसारख्या परिसरात अशा वावी उन्हाळ्यात पूर्ण गावाचा पाण्याचा स्रोत असत.

रामकुंड पाहून आपण मंदिराकडे वळलो की आपल्याला प्रथम दिसतो तो अत्यंत नाजूक कोरीव कामानं नटलेल्या खांबांवर तोललेला भव्य सभामंडप. रामकुंडाच्या पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश करताना आधी दिसतं ते दोन प्रचंड कोरीव स्तंभांवर उभं असलेलं कीर्तितोरण. पुढं मुसलमानी आक्रमणात या मंदिरानं खूप घाव सोसले, त्यात या तोरणाचा वरचा भाग नष्ट झाला, तरी त्याचे दोन खांब अजूनही गतवैभवाची साक्ष देतात. सभामंडप ‘सर्वतोभद्र’ म्हणजे चारही बाजूंनी प्रवेशद्वारं असलेला आहे. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेले छोटे खांब आणि मुख्य मंडपात जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब, ज्यांच्यावर रामायण-महाभारतातले व इतर पौराणिक कथांमधले प्रसंग कोरलेले आहेत. या मंदिरात सौरवर्षातील ५२ आठवड्यांचं प्रतिनिधित्व करणारे ५२ स्तंभ आहेत.

सभामंडप बघून आपण जातो ते मुख्य मंदिराच्या वास्तूकडे, ज्याला ‘गूढमंडप’ असं नाव आहे. गूढमंडपाच्या बाहेरील भिंतीवर सूर्यदेवाच्या १२ प्रतिमा कोरलेल्या आहेत. या प्रतिमांचं वैशिष्ट्य म्हणजे, यातल्या काही प्रतिमांमध्ये सूर्याच्या पायात गुढघ्यापर्यंतचे बूट दाखवलेले आहेत. या मूर्तींवर पर्शियन शिल्पकलेचा प्रभाव आहे, असं काही पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं मत आहे. गूढमंडपाच्या बाहेरील देवकोष्ठांमधून सूर्याबरोबरच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती आणि अष्टदिक्पाल यांच्याही मूर्ती दिसतात.

गूढमंडपाला तीन बाजूंनी तीन खिडक्या आहेत. वर्षातून काही विशिष्ट दिवसांमध्ये या खिडक्यांमधून सूर्यकिरण प्रवेश करत आणि गर्भगृहात असलेल्या सूर्यमूर्तीवर पडत असे उल्लेख तत्कालीन लेखांमध्ये सापडतात. गूढमंडपाच्या दर्शनी भिंतीवर काही मिथुनशिल्पंही आढळतात. गूढमंडपावर दुर्दैवानं आज शिखर अस्तित्वात नाही. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी या धर्मांध सुलतानानं पाटणच्या सोलंकी राजांचा पराभव करून इथल्या हिंदुमंदिरांचा भरपूर विध्वंस केला. त्यातच त्यानं मोढेराचं हे सूर्यमंदिरही लुटलं आणि इथल्या मूर्ती घणाचे घाव घालून तोडल्या.

आज मोढेराच्या सूर्यमंदिरातलं गर्भगृह रिकामे आहे आणि आपण आत डोकावलं तर गर्भगृहात चांगला आठ-दहा फूट खोल असा एक खड्डा दिसतो. इथले गाईड आवर्जून सांगतात, की हा गर्भगृहातील दहा फूट खोल खड्डा एकेकाळी सोन्यानं भरलेला होता आणि त्यावर सूर्यदेवाची पूर्ण सोन्याची सात घोड्यांच्या रथावर विराजमान असलेली मूळ मूर्ती ठेवलेली होती. मूर्तीच्या भालप्रदेशात एक तेजस्वी हिरा जडवलेला होता. मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण त्यातून परावर्तित होत असत आणि मंदिराची सर्व वास्तू दिव्य प्रकाशानं उजळून निघे.

दुर्दैवानं आज त्यापैकी काहीही अस्तित्वात नाही. खिलजीनं या मंदिराचा पुरता विध्वंस केलेला आहे; पण तरीही जे शिल्लक आहे तेच इतकं डोळे दिपवणारे आहे, की मूळ मंदिर किती वैभवशाली असेल हा विचार राहून राहून अस्वस्थ करतो.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

सास-बहू की सहस्रबाहू?

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेल्या आठवड्यात आपण भारताच्या पश्चिमेकडील गुजरात राज्यातील मरू-गुर्जर स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण असलेलं मोढेरा येथील सूर्यमंदिर पाहिलं. आज आपण त्याच शैलीतील अजून एका अत्यंत सुरेख; पण दुर्लक्षित अशा श्रीविष्णुमंदिराची ओळख करून घेणार आहोत. गुजरातचं शेजारीराज्य म्हणजे राजस्थान. राजस्थानमधील उदयपूर हे शहर देशी-विदेशी पर्यटकांचं अत्यंत लाडकं आहे. उदयपूरमधले तलाव, तिथल्या भव्य हवेल्या, तिथून जवळच असलेला इतिहासप्रसिद्ध चित्तोडचा किल्ला बऱ्याच जणांनी बघितलेला असेल. चित्तोडचा वीर राजा महाराणा प्रताप याचं कुलदैवत असलेलं श्रीएकलिंगजीमंदिरही आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल; पण या एकलिंगजीमंदिरापासून जेमतेम दोन किलोमीटरवर, निसर्गरम्य बाघेला तळ्याच्या काठी, आरवली पर्वतरांगेच्या कुशीत असलेलं सहस्रबाहुमंदिर मात्र फार कमी लोकांना माहीत आहे.

उदयपूरहून नाथद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उदयपूरपासून जेमतेम २५ किलोमीटरवर नागदा नावाचं एक ठिकाण लागतं. बाघेला तळ्याच्या काठावर वसलेलं नागदा हे आज एक अगदी छोटं गाव आहे; पण एकेकाळी नागदा हे राजधानीचं शहर होतं. इसवीसनाच्या सहाव्या शतकात मेवाडचा चौथा शासक गुहिल राजा नागादित्यानं हे शहर वसवलं. नागादित्यानं वसवलेली राजधानी म्हणून हे शहर ‘नाघ्रिदा’ या नावानं ओळखलं जात असे. त्याचंच पुढं बोलीभाषेत नागदा हे नाव पडलं. हे शहर म्हणजे मेवाडची प्राचीन राजधानी होती. हे शिव, वैष्णव आणि जैनमंदिरांनी समृद्ध असलेलं शहर होतं असे प्राचीन शिलालेखांत उल्लेख आहेत. पुढं गुहिल राजवंशाचे दोन भाग होऊन एक चित्तोडचा रावळवंश झाला आणि दुसरा मेवाडचा सिसोदिया राजवंश. नागदा हे सिसोदियावंशीयांच्या आधिपत्याखाली आलं.

नागदा इथून प्राप्त झालेल्या अकराव्या शतकातील शिलालेखांनुसार, गुहिल राजा श्रीधर यानं नागदा इथं काही मंदिरं बांधली होती. सध्या अस्तित्वात असलेलं सहस्रबाहुमंदिर याच मंदिरांमधलं एक समजलं जातं. ही मंदिरं दहाव्या ते अकराव्या शतकात बांधली गेलेली दिसत आहेत हे भारतीय पुरातत्त्व खात्यानंही स्थापत्यशैलीच्या आधारे मान्य केलेलं आहे. मात्र, ‘हा मंदिरसमूह गुहिल राजा श्रीधरानं बांधलेला नसून कछवाह राजा महिपाल आणि त्याचा मुलगा रत्नपाल या पिता-पुत्रांनी बांधलेला आहे,’ असेही उल्लेख काही ठिकाणी आहेत.

या मंदिरसमूहात दोन मंदिरं आहेत, एक मोठं आणि एक छोटं, म्हणून त्यांना आसपासचे लोक ‘सास-बहू’मंदिर या नावानंही ओळखतात. मात्र, ‘सहस्रबाहू’ या मूळ संस्कृत नावाचा तो अपभ्रंश असावा; पण या मंदिरांना ‘सास-बहू’ हे नाव कसं पडलं याबद्दलही एक मजेदार आख्यायिका इथले गाईड सांगतात. राजा महिपालाची पत्नी शिवभक्त होती, तर त्याची सून - म्हणजे त्याचा मुलगा रत्नपाल याची राणी - श्रीविष्णूची भक्त होती. दोघी सासू-सुनांना एकाच ठिकाणी देवदर्शनासाठी जाता यावं म्हणून या मंदिरसमूहात दोन वेगवेगळी मंदिरं बांधण्यात आली.

सहस्रबाहू म्हणजे श्रीविष्णूचं मंदिर आणि त्याला लागूनच एकाच जगतीवर उभारलेलं शिवाचं मंदिर!

या मंदिरसमूहातलं मोठं मंदिर - ज्याला ‘सास-मंदिर’ असं स्थानिक नाव आहे - ते पंचायतनशैलीमध्ये दहा छोट्या मंदिरांनी वेढलेलं आहे, तर शेजारचं छोटं मंदिर - ज्याला ‘बहू-मंदिर’ म्हटलं जातं - ते पाच छोट्या मंदिरांनी वेढलेलं आहे. मंदिर बाघेला तलावाच्या अगदी काठावर, अत्यंत निसर्गरम्य परिसरात आहे. मरू-गुर्जरस्थापत्यशैलीची वैशिष्ट्यं म्हणजे कोरीव मकरतोरण, अष्टकोनी सभामंडप आणि तारकाकृती पीठ किंवा जगती या मंदिरसमूहात स्पष्टपणे पाहायला मिळतात.

असं म्हणतात की इथल्या मोठ्या मंदिराच्या गाभाऱ्यात हजार हात असलेली श्रीविष्णूची मूर्ती होती. पुढं इल्तुतमिश या दिल्लीच्या सुलतानानं चित्तोडवर स्वारी केली तेव्हा त्यानं हे मंदिरही तोडलं आणि लुटलं, त्यात ही मूर्तीही फोडली गेली. सध्या इथला गाभारा रिकामा आहे आणि मंदिरात पूजा होत नाही. उत्तरेमधल्या जवळपास सर्वच पुरातन मंदिरांची हीच उदासवाणी कथा आहे. अत्यंत सुरेख कोरीव काम; पण सर्व मूर्ती तोडलेल्या, भग्न केलेल्या, पूजेविना उदास गाभारा आणि आसमंतात भरून राहिलेली खिन्नता.

इथल्या छोट्या मंदिराच्या बाहेर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत आणि गाभाऱ्याबाहेरचा अष्टकोनी सभामंडप अत्यंत सुरेख आणि नाजूक कोरीव काम केलेल्या खांबांनी तोलून धरलेला आहे. आठ सुरसुंदरींनी हे अष्टकोनी छत आपल्या नाजूक खांद्यांवर तोलून धरलेलं आहे. गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर एका बाजूला एका वेदीवर भगवान ब्रह्म, शिव आणि विष्णू यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला राम, बलराम आणि परशुराम यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दोन्ही मंदिरांच्या बाह्य भिंतींवर अप्रतिम मिथुनशिल्पं आहेत. मोठ्या मंदिराच्या मंडपाच्या छतावर शतदल कमळाचं सुंदर वितानशिल्प आहे. दोन्ही मंदिरांच्या सभामंडपामधले खांब पूर्णपणे कोरीव कामानं विनटलेले आहेत आणि दोन खांबांना जोडणारी तोरणं व गर्भगृहाच्या द्वारशाखा पूर्णपणे कोरीव कामानं भरलेल्या आहेत. दोन्ही मंदिरं सोनेरी वालुकाश्मात घडवलेली आहेत. सकाळ-संध्याकाळच्या सोनेरी उन्हात ही दोन्ही मंदिरं सोन्यानं मढल्यासारखी देखणी दिसतात.

दुर्दैवानं हा अनमोल सांस्कृतिक वारसा आज पूर्णपणे दुर्लक्षित स्थितीत आहे. उदयपूरच्या इतक्या जवळ असूनसुद्धा सहस्रबाहू-मंदिरसमूह आवर्जून बघायला फार कमी लोक जातात. मी हे मंदिर बघायला गेले तेव्हा पूर्ण मंदिरसमूहात मी एकटीच होते. खरं तर हा मंदिरसमूह इतका देखणा आणि इतक्या निसर्गरम्य ठिकाणी आहे, की आपण इथं सहज तीन-चार तास घालवू शकतो. फक्त नागदा इथल्या या मंदिरसमूहाला भेट द्यायला स्वतःचं वाहन असणं आवश्यक आहे किंवा मुख्य रस्त्यापासून दीड-दोन किलोमीटर चालायची तयारी हवी. मरू-गुर्जरस्थापत्यशैलीचा हा देखणा आविष्कार बघायला नागदा इथल्या या सहस्रबाहू-मंदिरसमूहाला भेट द्यायलाच हवी.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

सेंबियन महादेवी : मंदिरनिर्माती राणी

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

आपल्याच इतिहासाविषयी किती अनभिज्ञ असतो ना आपण भारतीय? परदेशातून आलेल्या मुघल वंशाची पूर्ण वंशावळ आपण सर्वांनी शाळेत घोकलेली असते; पण गुप्त, राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य, यादव, गुर्जर-प्रतिहार, चोळ/चोल, पल्लव, पांड्य इत्यादी अस्सल भारतीय साम्राज्यांबद्दल आपण, वाचलाच तर, इतिहासाच्या सातवीच्या पुस्तकात एखादा परिच्छेद वाचलेला असतो. त्यातही स्त्रियांबद्दल कमीच लिहिलेलं असतं.

‘भारतीय स्त्रिया पूर्णपणे आपल्या नवऱ्याच्या सत्तेखाली असत...अगदी राजघराण्यातल्या स्त्रियांनाही स्वतंत्र निर्णय घ्यायचा अधिकार नसे... संपत्ती आणि संतती या दोहोंवर त्यांचा अधिकार नसे,’ असंच आपल्याला ‘इतिहासकार’ सांगत असतात; पण आपण जेव्हा शिलालेखांसारखे प्राथमिक पुरावे शोधत जातो तेव्हा कुठं आपल्याला सत्य कळायला लागतं. प्राचीन भारतीय मंदिरांच्या माझ्या अभ्यासात जेव्हा मी तामिळनाडू राज्यातल्या चोळ मंदिरस्थापत्याचा अभ्यास करत गेले तेव्हा एक नाव मला माझ्या अभ्यासात परत परत भेटत गेलं आणि ते नाव कुण्या पुरुषाचं नव्हतं, तर एका स्त्रीचं होतं. ते नाव म्हणजे सेंबियन महादेवी.

चोळ राजवंशाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे दहाव्या शतकात, होऊन गेलेली एक अत्यंत कर्तबगार, देवभक्त, रसिक, कलासक्त राणी. तिनं अनेक नवीन मंदिरं बांधली, जुन्या विटांच्या अनेक मंदिरांची ग्रॅनाईटमध्ये पुनर्बांधणी केली. तिनं बांधलेल्या सर्व मंदिरांचं स्थापत्य एकसारखं तर होतंच; पण विशेष म्हणजे, कल्पानी पद्धतीनं जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करताना सेंबियन महादेवीनं जुने शिलालेख जपून ठेवले व त्यांचा नवीन मंदिरांमध्ये अंतर्भाव केला.

ऐतिहासिक पुरावे जपण्याची ही जाणीव भारतीय इतिहासात विरळाच. सेंबियन महादेवीनं नवीन मंदिरं तर बांधलीच; पण अनेक जुन्या मंदिरांना सढळहस्ते दानेही दिली. स्वतःच्या आश्रयाखाली असलेल्या ब्राँझ मूर्तिशाळांमधून तिनं ब्राँझच्या अत्यंत सुरेख मूर्ती तयार करून घेतल्या. आज हजार वर्षांनंतरही यातल्या काही मूर्ती तामिळनाडूमधल्या मंदिरांमधून पूजेत आहेत, तर काही मूर्ती आपल्याच काही नतद्रष्ट लोकांनी चोरून परदेशात विकल्या आहेत.

खुद्द राणी सेंबियन महादेवीची ब्राँझची एक सुरेख मूर्ती आज अमेरिकेत वॉशिंग्टनच्या फ्रीअर गॅलरीत आहे. तिनंच बांधलेल्या एका मंदिरातून ही मूर्ती चाळीस वर्षांपूर्वी चोरीला गेली. अत्यंत नाजूक आणि सुरेख घडवलेल्या या मूर्तीमध्ये एके काळी राणीच्या हातामध्ये कमळाचं फूल होतं असं म्हणतात.

त्रिभंगात उभी असलेली ही मूर्ती पार्वतीची आहे की राणी सेंबियन महादेवीची आहे याबद्दल काही कलासमीक्षकांमध्ये वादही होते; पण भारतीय शिल्पसंकेतांनुसार देवी-देवतांच्या मूर्तींचे खांदे कधीही उतरते दाखवले जात नाहीत, तर नेहमी सरळच दाखवले जातात आणि या मूर्तीचे खांदे अत्यंत मानवी आणि जिवंत वाटतात. यावरून ही मूर्ती राणी सेंबियन महादेवीचीच असावी असं भारतीय कलेचे थोर समीक्षक आनंद कुमारस्वामी यांनी म्हटलेलं आहे.

मात्र, इतकी सुंदर मूर्ती जिच्यावरून घडली ती राणी सेंबियन महादेवी होती तरी कोण? खरं तर सेंबियन महादेवी ही आहे एक पदवी. सेंबियन म्हणजे शिबी राजाच्या वंशातली. चोळ राजे स्वतःला शिबी राजाचे वंशज म्हणवून घेत असत. महादेवी म्हणजे राणी. सेंबियन महादेवीनंतर इतरही अनेक चोळ राण्यांनी ही उपाधी धारण केली; पण ही पहिली सेंबियन महादेवी म्हणजे गंडरादित्य चोळ राजाची राणी आणि राजा उत्तम चोळाची आई. तिला ७५ वर्षांहूनही अधिक आयुष्य लाभलं. तिच्या आयुष्यात तिनं अनेक राजकीय स्थित्यंतरं पाहिली. तिनं तिच्या पतीचा मृत्यू पाहिला, तिचा मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पतीनंतर राज्यावर आलेल्या दोन दिरांचा राज्याभिषेक तिनं पाहिला, दिरानंतर राज्यावर बसलेल्या तिच्या पुतण्याचा खून तिनं पाहिला आणि मोठ्या भावाच्या खुनानंतर त्याच्या धाकट्या भावानं, म्हणजे सेंबियन महादेवीचा धाकटा पुतण्या अरुलमोळीवर्मानं, मोठ्या मनानं राज्यावरचा हक्क सोडून आपल्या काकाचा म्हणजेच सेंबियन महादेवीच्या मुलाचा - उत्तम चोळाचा- राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा करून दिलेलाही सेंबियन महादेवीनं पाहिला. पुढं हाच अरुलमोळीवर्मा राजराजा चोळ या नावानं आपल्या काकाच्या मृत्यूनंतर गादीवर बसला आणि त्यानं चोळ साम्राज्याची कीर्ती समुद्रापल्याड नेली.

सेंबियन महादेवी त्याच्या राज्याभिषेकानंतर तब्बल सोळा वर्षं हयात होती आणि तिला राजघराण्यात मानाचं स्थान होतं हे अनेक शिलालेखांवरून सिद्ध होतं. अशी ही दीर्घायुषी राणी. तिचा पती गंडरादित्य हा उत्तम कवी होता. चोळ राजवंशाचं आराध्यदैवत असलेला चिदंबरमचा श्रीनटराज याला उद्देशून त्यानं स्तुतिपर अकरा पदं लिहिली. ‘थिरुवसैप्पा’ या नावानं ती आजही चिदंबरममध्ये गायली जातात. तो चिदंबरमच्या नटराजाचा परमभक्त होता. गंडरादित्य आणि त्याची पत्नी सेंबियन महादेवी, दोघांनीही खूप मंदिरांना दाने दिली; पण नवीन मंदिरं बांधली मात्र फक्त सेंबियन महादेवीनं.

सेंबियन महादेवी इतकी जनप्रिय आणि कर्तबगार अशी देवलसी राणी होती की तिच्या नावानं एक आख्खं गाव वसवलं गेलं. सेंबियन महादेवी याच नावानं ओळखलं जाणारं हे गाव नागपट्टणमजवळ आहे. या गावात तिनं कैलासनाथस्वामींचं मंदिर बांधलं व चारी वेदांचं ज्ञान असलेल्या विद्वान चतुर्वेदी ब्राह्मणांना तिथं बोलावून त्यांना अग्रहार व दाने दिली व वेदपाठशाला काढून दिल्या. याच मंदिरात सेंबियन महादेवीचा वाढदिवस दर वर्षी साजरा केला जात असे. तिचा मुलगा उत्तम चोळ गादीवर आल्यावर सेंबियन महादेवीनं अनेक नवीन मंदिरंं बांधली, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, ब्राँझच्या मूर्ती घडवून त्या वेगवेगळ्या मंदिरांना भेट म्हणून दिल्या, वेगवेगळ्या मंदिरांना वर्षासने दिली, सोन्याचे दागिने दिले. तिचं पूर्ण आयुष्य केवळ कलासेवा आणि ईश्वरसेवा यात तिनं व्यतीत केलं. ती इतकी निःस्वार्थी आणि निरलस होती की तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर तिचा पुतण्या राजराजा चोळ गादीवर आला तरी राजघराण्यातल्या तिच्या स्थानाला कुठंच धक्का लागला नाही. तिनं बांधलेल्या मंदिरांना राजराजा चोळानं दाने दिली व तिनं दिलेली वर्षासनं कायम ठेवली. इतकंच नव्हे तर, राजराजाची बहीण आणि सेंबियन महादेवीची पुतणी, कुंदवै नाचियार हिनं आपल्या काकूच्या पावलावर पाऊल ठेवून मंदिरनिर्मितीची आणि ईश्वरसेवेची परंपरा कायम ठेवली.

सेंबियन महादेवीचा उल्लेख असलेले शिलालेख इसवीसन ९४० पासून ते अगदी १००१ पर्यंत वेगवेगळ्या मंदिरांमधून आढळतात. आदूतुराई, थिरुकोट्टीकावळ, कुट्रालम, थिरुनल्लम, कोनेरीराजपुरम, थिरुनरैयूर वगैरे अनेक ठिकाणी तिनं बांधलेली मंदिरं आजही तिच्या कलाप्रेमाची, रसिकतेची आणि ईश्वरसेवेची साक्ष देतात. पुढचे काही आठवडे आपण सेंबियन महादेवीनं बांधून घेतलेल्या काही प्राचीन मंदिरांची ओळख करून घेणार आहोत. दुर्दैवाची गोष्ट ही की, तामिळनाडूमधले काही लोक सोडता इतर भारतीयांनी तिचं नावही यापूर्वी कधी ऐकलंही नसेल.

पुढच्या आठवड्यात आपण ओळख करून घेऊ कुंभकोणमजवळ कोनेरीराजपुरम इथं सेंबियन महादेवीनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधलेल्या श्रीउमामहेश्वरस्वामी मंदिराची. जगातला सगळ्यात भव्य असा ब्राँझचा नटराज या मंदिरात आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

उमा-महेश्वराचं मंदिर : पती-पत्नीच्या प्रेमाची सुंदर कहाणी

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

चोळ/चोल साम्राज्याची मंदिरनिर्माती राणी सेंबियन महादेवी हिची ओळख गेल्या आठवड्यातल्या लेखात मी करून दिली. राणी सेंबियन महादेवीनं केवळ नवीन मंदिरंच उभारली नाहीत, तर जुन्या मंदिरांचा अत्यंत काळजीपूर्वक जीर्णोद्धार केला. जुनी मंदिरं पाडून नवीन बांधताना, जुन्या मंदिरांमधले शिलालेख जसेच्या तसे जतन करून ते तिनं बांधलेल्या नवीन मंदिरांत पुनर्स्थापित केले. जिथं ते अगदीच झिजले होते, तिथं तिनं जुने शिलालेख नवीन दगडात नकलून घेतले. राणीनं दाखवलेला हा आदर केवळ आपल्या पूर्वसुरींविषयीच नव्हता, तर इतिहासाची साधनं जपून ठेवण्याचं फार मोठं काम सेंबियन महादेवीनं पार पाडलं. कोनेरीराजपुरम इथं पती चोळराजा गंडरादित्य याच्या स्मरणार्थ तिनं बांधलेलं उमा-महेश्वराचं मंदिर आज आपण बघणार आहोत.

कुंभकोणमपासून २२ किलोमीटरवर कोनेरीराजपुरम हे गाव कुंभकोणम-कराईकल रस्त्यावर आहे. इथलं उमा-महेश्वराचं मंदिर दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथला श्रीनटराजाचा भव्य असा नऊ फूट व्यासाचा पंचधातूचा ओतीव पुतळा आणि सेंबियन महादेवीनं खास करवून घेतलेलं तिच्या पतीचं शिल्प व शिलालेख... गेल्या हजार वर्षांत सेंबियन महादेवीनं बांधलेल्या मंदिराच्या मूळ बांधकामात खूप बदल झाले असले तरी या दोन गोष्टी मात्र अजिबात बदलल्या नाहीत.

सेंबियन महादेवीनं या मंदिराची निर्मिती आपल्या पतीसाठी केली. पती-पत्नीच्या निस्सीम प्रेमाची खूण म्हणून इथल्या शिवलिंगाची उमा-महेश्वर या जोडनावानं उपासना केली जाते. सेंबियन महादेवीनं खरं तर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिच्या आधीही या जागी शिवमंदिर होतं. तिरुनल्लम या नावानं ते ओळखलं जायचं. तमिळ शैव संतकवी नायनमार यांनी ज्या शिवमंदिरांची पद्यात स्तुती केली आहे. अशा प्राचीन शिवमंदिरांना तामिळनाडू मध्ये ‘पाडल पेट्र स्थलम्’ हे नाव आहे. त्या ‘पाडल पेट्र स्थलम्’मधील हे एक मंदिर होतं. सातव्या शतकात होऊन गेलेल्या दोन नायनमार संतकवींनी या मंदिरावर केलेल्या रचना ‘तेवारम’ या शैव काव्यग्रंथात अंतर्भूत आहेत, त्यावरून हे सिद्ध होतं की इथं जुनं शिवमंदिर होतं. त्या मंदिराचा सेंबियन महादेवीनं आपल्या पतीच्या नावानं जीर्णोद्धार केला.

आज कोनेरीराजपुरममध्ये जे मंदिर उभं आहे त्याचा मूळ गाभा सेंबियन महादेवीनं बांधलेला आहे; पण पुढं त्या मंदिराचं नूतनीकरण मदुराईचे नायक व विजयनगरचे राज्यकर्ते यांनी केलं. त्यामुळे आज उभं आहे ते मंदिर अनेक वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचं मिश्रण आहे. मंदिराचं प्रमुख प्रवेशद्वार अगदीच साधं आणि गोपुरेविरहित आहे. तामिळनाडूच्या मंदिरांमधली भव्य गोपुरं बघायची सवय असलेल्या मनाला प्रथमदर्शनी हे जरा खटकतंच; पण मंदिरात प्रवेश केल्यावर जे शिल्पवैभव दिसतं ते खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे.

मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर अनेक दगडी शिलालेख आहेत. त्यांत चोळ राजा गंडरादित्य, त्याची पत्नी सेंबियन महादेवी आणि त्यांचा मुलगा उत्तम चोळ यांची नावं आढळतात. उत्तमानंतर गादीवर बसलेला राजराज चोळ, त्याचा मुलगा राजेंद्र आणि त्याचे वंशज राजाधिराज पहिला, राजेंद्र दुसरा आणि कुलोत्तुंग तिसरा यांचेही शिलालेख मंदिरात आहेत. हे मंदिर जवळपास अडीच शतकं चोळ राजांच्या देखरेखीत होतं आणि त्याला निरंतर दाने दिली गेली,

हे या शिलालेखांवरून स्पष्ट होतं. सेंबियन महादेवीनं बांधलेलं हे मंदिर पुढं तिच्या घराण्यातल्या कित्येक पिढ्यांनी नुसतं राखलंच नाही तर त्याला योग्य तो सन्मानही दिला.

सेंबियन महादेवीनं मंदिरं बांधली तेव्हा चोळस्थापत्य बाल्यावस्थेत होतं. त्यामुळे कोनेरीराजपुरमचं हे मंदिर फार भव्य वगैरे नाही. प्रवेशद्वार अगदीच साधं आहे. वर गोपुर नाही. मंदिराचं शिखरही छोटंसंच आहे; पण स्तंभयुक्त मुखमंडप, गर्भगृहाच्या बाहेर चारही बाजूंनी भक्तांसाठी ओवऱ्या, गाभाऱ्याच्या मंडोवरावर असलेली देवकोष्ठे आणि त्यात कोरलेल्या भव्य मूर्ती आणि शिखरावरची स्तूपी ही द्रविडस्थापत्याची सर्व वैशिष्ट्यं या मंदिरात पाहायला मिळतात. हीच स्थापत्यपरंपरा पुढं राजराजा चोळाच्या कार्यकाळात स्थिर आणि प्रगत होऊन तंजावरच्या बृहदीश्वरमंदिरासारखी थोर आणि अतिभव्य वास्तू उभी राहिली.

उमा-महेश्वराच्या या मंदिराच्या देवकोष्ठातली काही शिल्पं उल्लेखनीय आहेत.

उदाहरणार्थ : अगस्तीमुनींचं शिल्प, लिंगोद्भव शिवांचं शिल्प, नटराजाची नृत्यमग्न मूर्ती आणि महिषासुरमर्दिनी. गाभाऱ्याबाहेरच्याच भिंतीत सेंबियन महादेवीनं एक शिलालेख कोरून घेतलेला आहे. त्यात ती स्वतःचा उल्लेख ‘गंडरादित्य राजाची प्रिय पत्नी आणि जिच्या उदरातून उत्तमराज चोळ जन्मला अशी भाग्यवान आई’ असा करते. शिलालेखावर एक शिल्प कोरलेलं आहे. गंडरादित्य राजा बसून शिवलिंगाची उपासना करताना त्यात दाखवलेला आहे. मागं स्वतः सेंबियन महादेवी हात जोडून उभी आहे. हजार वर्षं उलटून गेली तरी हे शिल्प या पती-पत्नीच्या परस्परांवरच्या प्रेमाची, भक्तीची साक्ष देत आहे.

या मंदिराची शान म्हणजे, इथं असलेला नऊ फूट उंचीचा पंचधातूपासून तयार केलेला सुंदर असा श्रीनटराज. या नटराजाबद्दल जी आख्यायिका सांगतात तीही ऐकण्यासारखी आहे. असं सांगतात की, राणीनं नटराजाची एक विशाल ओतीव मूर्ती तयार करायला आपल्या मूर्तिकाराला सांगितलं.

धातूची ओतीव मूर्ती तयार करताना आधी मेणापासून तशी मूर्ती तयार करावी लागते, मग तिला मातीचे लेप देऊन ती मूर्ती वाळवावी लागते. नंतर ती भट्टीत भाजावी लागते. मातीच्या लेपाला वरून छिद्र ठेवलं जातं. भट्टीत मूर्ती भाजली की माती पक्की होते आणि आतलं मेण वितळून छिद्रातून बाहेर पडतं आणि मातीच्या मूर्तीच्या आत त्या आकाराची पोकळी तयार होते. पंचधातूचा रस मग त्या पोकळीत ओतला जातो आणि तो थंड झाला की मातीचा साचा फोडून आतली पंचधातूची मूर्ती बाहेर काढली जाते व शेवटी हातानं घासून, ठोकून ती पूर्णपणे तयार केली जाते.

या तंत्रज्ञानाला ‘लॉस्ट वॅक्स टेक्निक’ असं नाव आहे. भारतात फार प्राचीन काळापासून हे तंत्र वापरून ब्राँझच्या मूर्ती तयार केल्या गेल्या आहेत. अगदी पाच ते सात हजार वर्षांपूर्वीची सिंधू-सरस्वती संस्कृतीमधली ती ‘इंडियन म्युझियम’मध्ये असलेली प्रसिद्ध नाचती मुलगी म्हणजेच ‘डान्सिंग गर्ल’ अशीच तयार केली गेली आहे. चोळ राजवटीत हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित होऊन कलेच्या परमावधीला पोहोचलं होतं.

राणीनं नऊ फुटांची मूर्ती करायला सांगितली होती खरी; पण सतत प्रयत्न करूनही मूर्तिकार तेवढी मोठी मेणाची मूर्ती करू शकला नाही. कुंभकोणमच्या उन्हाळ्यात मेण सारखं वितळायचं, साचा तयार व्हायचाच नाही. इकडे राजाज्ञेबरहुकूम ठरलेल्या वेळेत काम नाही झालं तर शिक्षा व्हायची भीती. शेवटी हताश झालेल्या मूर्तिकारानं भगवान शिवांची प्रार्थना केली. तितक्यात एक वृद्ध जोडपं त्याच्या घरी आलं आणि त्या जोडप्यानं पिण्यासाठी थोडंसं पाणी मागितलं. निराश अवस्थेतल्या शिल्पकारानं रागानं त्यांना पंचधातूंचं वितळलेलं मिश्रण प्यायला सांगितलं.

त्या वृद्ध जोडप्यानं ते उकळतं मिश्रण पिऊन टाकलं आणि त्यांच्या जागी उभ्या राहिल्या त्या श्रीनटराज आणि शिवकामी पार्वतीच्या सुंदर मूर्ती...!

ही घटना ऐकताच राणीच्या मुलानं शिल्पकाराला भेट दिली; पण या दैवी चमत्कारावर विश्वास ठेवण्यास तो तयार होईना. शिल्पकाराच्या कथेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यानं आपल्या तलवारीनं श्रीनटराजाच्या मूर्तीच्या पायांवर वार केला आणि त्या घावानं मूर्तीला रक्तस्राव होऊ लागला. राजपुत्रानं परमेश्वराला शरण जाऊन क्षमा मागितली, ही या मूर्तीमागची आख्यायिका.

ही मूर्ती इतकी सुंदर आहे आणि या मूर्तीचा चेहरा इतका तेजःपुंज आणि जिवंत आहे की, ही मूर्ती कुण्या मर्त्य मानवाच्या हातची असणं शक्यच नाही असं त्या काळच्या लोकांना वाटलं असावं, म्हणून ही कथा जन्माला आली असावी. कोनेरीराजपुरमची ही श्रीनटराजमूर्ती जगातली सगळ्यात मोठी ओतीव नटराजमूर्ती आहे. अगदी चिदंबरमच्या गाभाऱ्यातील श्रीनटराजदेखील इतका भव्य नाही. खरी ही आहे उत्सवमूर्ती; पण नऊ फूट उंचीच्या या मूर्तीचं वजन इतकं आहे की, ती मिरवणुकीनं कुठं नेणं शक्यच नाही, म्हणून ही मूर्तीही या मंदिरातली मुख्य मूर्ती किंवा मूलवर समजली जाते. ही सुंदर मूर्ती बघायला आणि राणी सेंबियन महादेवीच्या भक्तीला, पतीवरच्या तिच्या प्रेमाला आणि मंदिरनिर्मितीच्या तिच्या ध्यासाला दाद द्यायला तरी कोनेरीराजपुरमला जायलाच हवे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

वृद्धाचलेश्वर : प्राचीन पर्वताचं मंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेल्या आठवड्यात सेंबियन महादेवी या दहाव्या-अकराव्या शतकात होऊन गेलेल्या थोर मंदिरनिर्मात्या चोळ/चोल राणीनं तिच्या पतीच्या स्मरणार्थ बांधलेलं कोनेरीराजपुरमचं उमा-महेश्वराचं मंदिर बघितलं. आज ओळख करून घेणार आहोत ती तिनंच बांधलेल्या अजून एका अतिभव्य मंदिराची, तामिळनाडूच्या कड्डलूर तालुक्यातल्या वृद्धाचलम येथील श्रीवृद्धगिरीश्वर किंवा विरुधाचलेश्वर मंदिराची.

विरुधाचलम किंवा वृद्धगिरी म्हणजे प्राचीन पर्वत. शुद्ध तामिळमध्ये या क्षेत्राला ‘तेवारम’ या शैव काव्यग्रंथात ‘मुधु कुंड्रम’ असं संबोधलं जातं. या मंदिराच्या स्थळपुराणामागची आख्यायिका अशी आहे की, ब्रह्मदेवानं पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करण्यापूर्वीच श्रीशंकर पर्वतरूपात या ठिकाणी प्रकट झाले होते, म्हणूनच वृद्धाचलम इथल्या मंदिराजवळच्या पर्वताचीही साक्षात शिव समजूनच पूजा केली जाते.

तिरुवन्नामलईच्या अरुणाचलेश्वर पर्वताची जशी गिरिवलयम या नावानं प्रदक्षिणा केली जाते, तशीच याही पर्वताची परिक्रमा केली जाते. हे ठिकाण प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. शैव संतकवी म्हणजेच नायनमार श्रीअप्पर, ज्ञानसम्बंधर आणि सुंदरार या तिघांनीही या मंदिराची प्रशस्ती करणारी काव्ये रचली आहेत. त्या काळी हे ठिकाण तामिळ भाषेत ‘पझामलाई’ म्हणजे प्राचीन पर्वत म्हणूनच ओळखलं जात असे. पुढं चोळकाळात पझामलाईचे संस्कृत नाव वृद्धाचलम जास्त प्रचलित झालं.

सध्या अस्तित्वात असलेलं मंदिर हे मुळात सेंबियन महादेवीनं दहाव्या शतकात बांधून घेतलेलं आहे. पुढं चोळ राजवंशातल्या तिच्या वंशजांनी, मदुराईचे पांड्य आणि नायक यांनी आणि विजयनगरच्या रायांनी या मंदिराचा वेळोवेळी विस्तार केला व त्याला सढळ हस्ते दानेही दिली. आज जे मंदिर उभं आहे त्यातल्या सर्वात आतील प्राकारातल्या वास्तू म्हणजे गर्भगृह, अंतराळ आणि अर्धमंडप या सेंबियन महादेवीच्या काळातल्या आहेत. त्यानंतरचे सर्व प्राकार आणि मंडप नंतरच्या राजांनी घडवलेले आहेत. सेंबियन महादेवीनं तिच्या आधी अस्तित्वात असलेलं विटांचं छोटं मंदिर पाडून चोळशैलीत हे मंदिर पुन्हा बांधलं. त्या वेळचे तिने कोरलेले शिलालेख तिच्या शिवभक्तीची आणि कलासक्ततेची साक्ष देतात; पण त्याआधीच्या मंदिरात असलेले शिलालेख, जे काळाच्या ओघात पुसट झाले होते, ते जसेच्या तसे नवीन पाषाणात नकलून या मंदिराच्या भिंतीवर कोरण्याची तिनं दक्षता घेतली. ही इतिहाससंशोधकांना तिनं दिलेली मोठी देणगीच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही.

या मंदिरात पाच या क्रमांकाचं विशेष महत्त्व आहे. पाच वेगवेगळ्या गाभाऱ्यांत पाच देवतांच्या मूर्ती आहेत...शिव, पार्वती, त्यांची दोन मुलं श्रीगणेश व कार्तिकेय म्हणजे मुरुगन, आणि शिवभक्त चंडिकेश्वर . विरुधगिरेश्वर, पाझमलाई नाथार, वृद्धाचलेश्वर, मुधु कुंड्रेश्वर आणि वृद्धगिरी या पाच वेगवेगळ्या नावांनी इथल्या शिवलिंगाची उपासना केली जाते. मंदिरात पाच वेगवेगळ्या गणेशमूर्ती आहेत - आझाठू विनायक, मत्तरू उरैथा विनायक, मुप्पील्लार, दशभुजा गणपती आणि वल्लभ गणपती या नावांनी त्या ओळखल्या जातात. मंदिराला बाहेरच्या प्राकारभिंतीला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारी दिशांमध्ये असलेली चार गोपुरे आणि आतील प्राकारातले सेंबियन महादेवीच्या पतीच्या नावानं बांधलेलं गंडरादित्य गोपुरम हे मिळून पाच गोपुरे आहेत.

वृद्धाचलम मंदिराला एकात एक असे विस्तीर्ण असे पाच प्राकार आहेत. येथे पाच ‘कोडीमारम’ म्हणजे ध्वजस्तंभ आहेत व प्रत्येक ध्वजस्तंभाबरोबर एक नंदी आहे. त्या पाच नंदींची नावे अशी आहेत इंद्र नंदी, वेद नंदी, आत्म नंदी, मालविदाई नंदी आणि धर्म नंदी. मंदिराला पाच वेगवेगळे आतले मंडप आहेत. त्याशिवाय २० स्तंभ मंडप, दीपाराधन मंडप, १०० स्तंभ कल्याणमंडप विपचिठू आणि चित्रमंडप या नावाचे पाच बाहेरचे मंडप आहेत. इथल्या देवांची पूजा दिवसातून पाच वेळा केली जाते. मंदिरात देवांसाठी पाच वेगवेगळे रथ आहेत. या क्षेत्राला तिरुमधुकुंड्रम, वृद्धकाशी, विरुधाचलम, नेरकुप्पाई आणि मुधुगिरी अशी पाच वेगवेगळी नावं आहेत.

मंदिराच्या प्रमुख पूर्व गोपुराखाली जो प्रचंड दरवाजा आहे त्यावर शिव-पार्वतीच्या नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याबाहेरचा मंडप एका रथाच्या आकारात कोरलेला आहे. त्याला खाली चाकं दाखवली आहेत व हत्ती-घोड्यांच्या आकृती तो रथ ओढताना दाखवल्या आहेत. इथल्या शिवांच्या उत्सवमूर्तीचा जो रथ आहे तो ओढायच्या साखळ्या, अठराव्या शतकात दक्षिण आर्कोट जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी चार्ल्स हायड यांनी, मंदिराच्या शक्तीचा प्रत्यय येऊन दान केलेल्या आहेत.

नायनमार संतकवींनी इथं वास्तव्य करून या मंदिरातल्या शिवलिंगाच्या स्तुतिपर काव्ये रचलेली असल्यामुळे या मंदिराला ‘पाडल पेट्र स्थळम’ असंही म्हटलं जातं. इथल्या पार्वतीदेवीची उपासना वृद्धांबिका या नावानं केली जाते. भाविकांचा असा विश्वास आहे की, पुण्यवान माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या घाबरलेल्या आत्म्याला इथली देवी आपल्या मांडीवर बसवून पदरानं वारा घालते आणि साक्षात शिव त्याच्या कानात पंचाक्षरी मंत्र सांगतात! किती हृद्य कल्पना आहे ना ही? हे मंदिर शैवागम शास्त्रानुसार निर्माण केलेलं असून इथल्या गर्भगृहाच्या देवकोष्ठावर शिवांच्या विविध अवस्थितीतल्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत.

हजार वर्षांहूनही अधिक प्राचीन अशा या मूर्ती म्हणजे भारताचा अनमोल असा सांस्कृतिक ठेवा आहे; पण दुर्दैवानं आपल्याला आपल्याच वारशाची किंमत नाही म्हणूनच अशा मूर्ती भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आणि लोभी स्थानिक लोकांच्या पुढाकारानं हातोहात चोरल्या जातात आणि परदेशात कोट्यवधी डॉलर्सना विकल्या जातात. वृद्धाचलमच्या या मंदिरात अर्धनारीश्वराची अत्यंत सुरेख मूर्ती १९७० पर्यंत होती. सध्या ती ऑस्ट्रेलियातल्या एका संग्रहालयात आहे. कुख्यात मूर्तिचोर सुभाष कपूर या न्यूयॉर्कस्थित दलालानं ती कोट्यवधी रुपयांना विकली. हल्लीच सिंगापूरमधल्या एका भारतीय ग्रुपनं ही चोरी पुराव्यासह उघडकीला आणली. दुर्दैवाची गोष्ट ही की, वृद्धाचलम मंदिराचं जे तामिळनाडू सरकारतर्फे नेमलेलं विश्वस्त मंडळ आहे, त्याच्या इतकी वर्षं हे गावीही नव्हतं की मंदिरातली मूळ मूर्ती चोरून त्याजागी त्या मूर्तीची प्रतिकृती बसवलेली आहे. सध्या सुभाष कपूर अटकेत आहे; पण त्यानं भारतातून चोरून पळवलेल्या शेकडो प्राचीन मूर्ती मात्र अजून विदेशी संग्रहालयांमध्ये काचेच्या कपाटात बंद आहेत.

वृद्धाचलमचं हे मंदिर चेन्नईपासून २००, पुड्डुचेरीपासून ६० आणि चिदंबरमपासून ३५ किलोमीटर दूर आहे. इथं रेल्वेचं स्थानकही आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

उक्तवेदीश्वर : वचनाला जागणारा ईश्वर!

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

चोळ/चोलसाम्राज्यातली थोर मंदिरनिर्माती राणी सेंबियन महादेवी हिनं बांधून घेतलेल्या शिवमंदिरांची ओळख गेले दोन आठवडे आपण करून घेतली. आज आपण पाहणार आहोत ते मंदिरही तिनंच बांधलेलं आहे. कुट्टलम या कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेल्या गावात हे मंदिर आहे. दुर्दैवानं हे मंदिर आज फारसं चांगल्या स्थितीत नाही; पण आहे मात्र अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी.

उक्तवेदीश्वर किंवा उत्तरवेदीश्वर या नावानं ओळखलं जाणारं हे मंदिर मायलादुथुराईपासून सुमारे १५ किलोमीटरवर मायलादुथुराई-कुंभकोणम या महामार्गावर आहे. या जागेला एकेकाळी ‘तिरुथुरुठी’ म्हणजे ‘दोन नद्यांच्या मधली पवित्र जमीन’ असं म्हणत. आता या जागेचं नाव कुट्टलम असं पडलं आहे. नायनमारनामक तमिळ शैव संतकवींनी ज्या शिवमंदिरांची पद्यात स्तुती केली त्यांना तमिळमध्ये नालवर पाडल पेट्रस्थळम असं नाव आहे. ही शिवमंदिरं अत्यंत पवित्र मानली जातात. कुट्टलमचं हे शिवमंदिर एक पाडल पेट्रस्थळ आहे. संत तिरुज्ञानसंबंदर, तिरुनावकुरसू, सुंदरार आणि मणिकवासागर या कवींनी या मंदिराला भेट देऊन भगवान शिवाच्या स्तुतिपर स्तोत्रं गायली आहेत. या ठिकाणी सातव्या शतकातही एक शिवमंदिर होतं असे उल्लेख तेवारम या ग्रंथात आहेत; पण नवव्या शतकात राणी सेंबियन महादेवीनं या मंदिराची ‘शिवागम’ ग्रंथांनुसार पाषाणात पुनर्निर्मिती केली.

हे मंदिर कोनेरीराजपुरमच्या उमा-महेश्वरमंदिरानंतर बांधलं गेलं, त्यामुळे त्याची रचना साधारणतः त्याच मंदिराच्या धर्तीवरची आहे. कोनेरीराजपुरमच्या मंदिरात राणी सेंबियन महादेवीनं स्वतःचा पती गंडरादित्य चोळ शिवलिंगाची पूजा करतोय असं शिल्प गर्भगृहाच्या दक्षिणेकडच्या बाह्य भिंतीवर कोरून घेतलं होतं. अगदी तसंच शिल्प याही मंदिरावर, अगदी त्याच ठिकाणी कोरलेलं आहे; पण पूजा करताना दाखवलेला राजा म्हणजे राणी सेंबियन महादेवीचा पती नसून तिचा पुत्र उत्तम चोळ आहे. यावरून स्पष्ट दिसून येतं की, हे मंदिर राणीनं पतिनिधनानंतर ती राजमाता झाल्यावर बांधलेलं आहे. वैधव्य आलेलं असतानाही अगदी दहाव्या शतकातही एका भारतीय हिंदू राणीच्या हातात किती आर्थिक, धार्मिक आणि राजकीय सत्ता होती हे या मंदिराच्या निर्मितीवरून दिसून येतं.

राणी सेंबियन महादेवीनं बांधून घेतलेल्या साऱ्या शिवमंदिरांची काही वैशिष्ट्यं आहेत. ती याही मंदिरात बघता येतात. छोटेखानी द्रविड विमान, पुढं अंतराळ, अर्धमंडप आणि बाजूला भक्तांसाठी बांधलेल्या स्तंभयुक्त ओवऱ्या तिनं बांधलेल्या सर्वच मंदिरांतून दिसू शकतात. मंदिराच्या गर्भगृहाबाहेरच्या देवकोष्ठांमधून भगवान शिवांच्या तीन अवस्थितीतल्या मूर्ती, लिंगोद्भव, अर्धनारीश्वर आणि नटराज हे राणी सेंबियन महादेवीच्या सर्वच मंदिरांमधून दिसतात.

उक्तवेदीश्वराचं हे मंदिरही त्याला अपवाद नाही, तसंच अर्धमंडपावरील देवकोष्ठांमधून कोरलेली अगस्ती ऋषींची मूर्ती, देवी दुर्गेची मूर्ती आणि भिक्षाटन शिवांची मूर्ती याही मूर्ती इथं दिसतात. संपूर्ण चोळ राजवंश हा चिदंबरमच्या श्रीनटराजाचा भक्त होता, त्यामुळे चोळमंदिरांमधून नटराजांच्या अनेक भव्य मूर्ती आढळतात; पण अशा भव्य नटराजांच्या मूर्ती मंदिराच्या देवकोष्ठांतून बसवायची सुरुवात राणी सेंबियन महादेवीनं केली असं चोळ राजवंशाचा अभ्यास केलेले इतिहासकार नीलकंठ शास्त्री यांचं मत आहे.

मंदिराच्या मुख्य दरवाजावर असलेलं पाचमजली रायगोपुर मात्र पुढं विजयनगरच्या राजांनी बांधलेलं आहे. या मंदिराला राणी सेंबियन महादेवीचा चुलतनातू राजराजा पहिला यानं पुढं अनेक दाने दिली. त्याच्या राजवटीच्या सातव्या वर्षात त्यानं या मंदिरात कोरलेल्या शिलालेखात असे उल्लेख आहेत की, हे मंदिर उत्तम चोळाची आई सेंबियन महादेवीर यांनी निर्माण केलं, तसंच मंदिरात नित्य अर्चना, पूजा आणि सामवेदगायन करण्यासाठी दोन विद्वान वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची तिनं नेमणूक केली होती.

या मंदिरामागची पुराणकथा मोठी मनोरंजक आहे. त्या पुराणकथेनुसार, देवी पार्वतीला पृथ्वीवर मनुष्यजन्म घेऊन भगवान शिवांशी विवाह करायची इच्छा झाली, तेव्हा तिला भगवान शिवांनी वचन दिलं की, तिनं कुट्टलम इथं भरतमुनी आणि त्यांच्या पत्नीच्या पोटी जन्म घ्यावा, भगवान शिव स्वतः वरवेशात येऊन तिच्याशी विवाह करतील. त्याप्रमाणे देवी पार्वतीनं मनुष्यजन्म घेतला आणि शिवांशी विवाह करण्यासाठी म्हणून तप केलं. दिलेलं वचन पाळून शिव वरवेशात पृथ्वीवर आले आणि त्यांनी मनुष्यजन्मातल्या पार्वतीशी विवाह केला. दिलेलं वाचन पाळलं म्हणून या मंदिरातल्या शिवलिंगाला सोन्नवरारीवर म्हणजे ‘दिलेला शब्द पाळणारा ईश्वर’ असंही नाव आहे.

चोळ राणीनं बांधलेलं मंदिर असल्यामुळे हे मंदिर ‘चोलीश्वर’ याही नावानं ओळखलं जातं.

आकारानं छोटंसं असलं तरी निसर्गरम्य परिसरात, कावेरी नदीच्या काठी असलेलं हे शांत, सुंदर शिवमंदिर आवर्जून बघण्यासारखं आहे. दुर्दैवानं इथं फार लोक दर्शनासाठी येत नसल्यानं हे मंदिर काहीसं दुर्लक्षित आहे. गोपुरावर झाडं वाढलेली आहेत, हवी तेवढी स्वच्छता राखलेली नाही हे बघून मन खिन्न होतं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

कैलासनाथ स्वामी मंदिर : इतिहास साडेतीनशे वर्षांचा

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

Kailasnath Swami TempleSakal

चोळ/ चोलसाम्राज्यातील महान मंदिर निर्माती राणी सेंबियन महादेवी हिने बांधवून घेतलेल्या मंदिरांची ओळख गेले तीन आठवडे आपण करून घेत आहोत. आज आपण पहाणार आहोत ते या मालिकेतले शेवटचे मंदिर. तशी सेंबियन महादेवीने तिच्या कारकिर्दीत जवळ जवळ पंधरा भव्य मंदिरे बांधली होती, पण आपण फक्त तिने बांधलेल्या प्रमुख चार मंदिरांची ओळख करून घेणार आहोत, कारण भारताच्या सर्वच भागात इतकी सुंदर सुंदर मंदिरे आहेत की त्यांचा परिचय न करून देणे हे अन्यायाचे ठरेल.

आज आपण पहाणार आहोत ते मंदिर आहे सेंबियन महादेवी नावाच्याच गावात. हे गाव स्वतः सेंबियन महादेवीनेच स्वतःच्या नावाने वसवले होते. तिचा मुलगा उत्तम चोळा तेव्हा गादीवर होता. सेंबियन महादेवीला तेव्हा वैधव्य आले होते, पण ती सतीही गेली नव्हती की तिच्या हातची सत्ताही कुणी काढून घेतली नव्हती. उलट स्वतःच्या नावाने एक नवीन गांव वसवून तिथे तिथे एक भव्य शिवमंदिर बांधले, चतुर्वेदी व्युत्पन्न ब्राह्मणांना तिथे बोलावून त्यांना जमिनींची दाने देऊन त्या गावात वेदपाठशाळा काढल्या आणि स्वतःच्या हिंदू नक्षत्राप्रमाणे येणाऱ्या जन्मदिवसाला ह्या मंदिरात अखंड तेवणारा सोन्याचा दिवा लावण्यात येईल अशी व्यवस्थाही करून ठेवली.

व्रतस्थ वृत्तीच्या सेंबियन महादेवीला चोळ राजघराण्यात इतका मान होता की तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या राजराज चोळा ह्या थोर सम्राटाने देखील तिने बांधलेल्या मंदिरांना उदारहस्ते दाने दिली, व तीच परंपरा पुढे इतर चोळ सम्राटांनी चालू ठेवली. नवव्या शतकातल्या एका हिंदू स्त्रीच्या हातात पतीनिधनानंतरही इतकी सत्ता होती, तिला घरी किती मान होता हे ह्यावरून दिसून येते. पण हा इतिहास आपल्याला कुणी कधी सांगितलाच नाही.

सेंबियन महादेवी ह्या नव्याने वसवलेल्या गावात राणी सेंबियन महादेवीने अनेक लहान-मोठी मंदिरे बांधली, पण तिथले सर्वात भव्य मंदिर म्हणजे कैलासनाथस्वामींन मंदिर. काळाच्या ओघात ह्या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार झाला. आज जे मंदिर उभे आहे त्याचा बराच भाग आधुनिक आहे, सेंबियन महादेवीने निर्माण केलेल्या मूळ मंदिराचा गाभा आजही आपल्या स्थापत्यसौंदर्यांने आपल्याला भुरळ घालतो. सेंबियन महादेवी हे गाव तिरुवलूर-नागापट्टिनम रस्त्यावर किवलूरच्या दक्षिणेस सहा मैलांवर वसलेले आहे. आज हे गाव शेती हाच मुख्य व्यवसाय असलेले छोटे खेडेगांव आहे, पण हजार वर्षांपूर्वी याच गावात अखंड वेदघोष घुमत असे. इथला अग्रहार फार संपन्न होता असे मंदिरावर कोरलेल्या शिलालेखांवरून दिसते. मंदिराची आजची वास्तू मुळातल्या सेंबियन महादेवीने निर्माण केलेल्या मंदिराच्या वास्तूपासून बरीच वेगळी आहे. गर्भगृहाच्या भिंतीवरील शिखर हे पूर्णपणे आधुनिक असून वरची सिमेंटमध्ये ओतलेली बटबटीत शिल्पे मूळ मंदिराच्या देखण्या दगडी भिंतींशी अगदीच विसंगत वाटतात. सध्या प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार त्या सिमेंटच्या शिखराला अनेक रंग फासलेले आहेत. मूळ मंदिराच्या गर्भगृहाच्या सुरेख करड्या पाषाणी रंगावरचे रंगीबेरंगी शिखर डोळ्यांवर आघात करते, पण लक्षात कोण घेतो?

मूळ मंदिराचा अर्धमंडप, मुख्यमंडप आणि गर्भगृह मात्र सुदैवाने अजून होते तसेच आहे. मंडपाच्या देवकोष्ठांमधून श्री नटराज, अर्धनारीश्वर, देवी दुर्गा आणि भिक्षाटन शिवांची अप्रतिम शिल्पे आहेत. एक लिंगोद्भव शिवांचे शिल्प देखील होते, पण ते कधीच इथून चोरीला गेले आहे. असेल कुठल्या तरी परदेशी वस्तुसंग्रहालयात, काचेच्या भिंतीआड बंद!

आपल्याकडे तशीही आपल्या अनमोल सांस्कृतिक वारशाची जाण किती जणांना असते? या मंदिराच्या भिंतीवर अगदी सेंबियन महादेवीच्या काळापासून ते पुढे राजा कुलोत्तुंग पहिला ह्या राजाच्या कारकिर्दीत कोरलेले शिलालेख चोळ राजवंशाचा साडेतीनशे वर्षांचा इतिहास सांगतात. सेंबियन महादेवीच्या मृत्यूनंतरही तिच्या कुळातल्या राजांनी आणि राण्यांनी या मंदिराला अनेक दाने दिली, ह्यावरून सेंबियन महादेवीला चोळ राजघराण्याच्या इतिहासात किती मान होता हे दिसून येते.

विशेष म्हणजे आजही ही थोर शिवभक्त राणी सेंबियन महादेवी लोकांच्या स्मरणात आहे. तिने वसवलेली गावे, तिने बांधलेले बंधारे, मंदिरे, स्वतःच्या मालकीच्या मूर्तिशाळांमधून तिने ओतवून घेतलेली नटराजांची अप्रतिम शिल्पे, तिच्या स्वतःच्या मूर्ती ह्या सर्वांमधून दहाव्या शतकात होऊन गेलेली कर्तबगार राणी आजही आपल्याला भेटते. अगदी हल्ली, म्हणजे २०१६ मध्ये तामिळनाडू मधले एक श्रीमंत कारखानदार श्री राममूर्ती ह्यांनी सेंबियन महादेवी आणि तिचे पती, गंडरादित्य चोळ ह्यांच्या ब्रॉन्झच्या मूर्ती बनवून त्या सेंबियन महादेवीने निर्माण केलेल्या तळ्याच्या काठी एक छोटेसे मंदिर बांधून प्रतिष्ठापीत केल्या. ह्यावरून दिसून येते की हजार वर्षे होऊन गेली तरी सेंबियन महादेवीला लोक विसरलेले नाहीत. दुर्दैवाने आपल्या शालेय इतिहासात मात्र या अत्यंत कर्तबगार राणीचे नाव कुठेच दिसत नाही. आपल्याला दिसतात त्या फक्त मुघल वंशावळी !

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

रामप्पा मंदिर : मंदिरांच्या आकाशगंगेतला तेजस्वी तारा

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

सर्व प्रसारमाध्यमांमधून गेले काही दिवस रामप्पा मंदिराचं नाव गाजतंय. तेलंगण राज्यातील वारंगलजवळील पालमपेट या गावात असलेलं रुद्रेश्वर शिवाचं हे अत्यंत देखणं मंदिर रामप्पा मंदिर म्हणूनच ओळखलं जातं. हे मंदिर आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालंय. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४४ व्या अधिवेशनात नुकताच हा निर्णय घेण्यात आला. आज आपण याच मंदिराची ओळख करून घेणार आहोत.

मी या मंदिराबद्दल प्रथम वाचलं ते माझ्या हैदराबादमध्ये शिकणाऱ्या भाच्याच्या इतिहासाच्या पुस्तकात. वारंगलच्या काकतीय राजघराण्यावरच्या छोट्याश्या परिच्छेदात या मंदिराचं छायाचित्र दिलेलं होतं. त्या श्वेत-श्याम छायाचित्रात देखील मंदिराची वास्तू इतकी छान दिसत होती की मला हे मंदिर प्रत्यक्ष जाऊन बघायचा मोह आवरला नाही. दुसऱ्याच दिवशी गाडी ठरवली आणि निघाले. हैदराबाद शहरापासून हे मंदिर जवळजवळ दोनशे किलोमीटरवर आहे. मी निघाले तो एप्रिलचा महिना होता, त्यात तेलंगणाचा कडक उन्हाळा, साडेचार तासानंतर पालमपेटला पोचले तेव्हा गाडीतून उतरता उतरता उन्हाने चक्करच आली क्षणभर, पण दुरूनच जेव्हा या लालसर वालुकाश्मात बनवलेल्या रामप्पा मंदिराचं प्रथम दर्शन झालं तेव्हा उन्हाच्या त्रासाचा पूर्ण विसर पडला.

मंदिराच्या आवारात आजही उभ्या असलेल्या एका भव्य शिलालेखानुसार, हे मंदिर काकतीय राजा गणपती देव यांच्या कारकिर्दीत, त्यांचा सेनापती, रिचर्ला रुद्र देव याने १२१३ मध्ये बांधायला घेतलं होतं. हे मंदिर निर्माण करण्यासाठी त्याने खास कर्नाटकहून रामप्पा नावाच्या कुशल स्थपतीला बोलावले होते. चालुक्य आणि होयसळ स्थापत्य परंपरेत प्रावीण्य मिळवलेल्या रामप्पा स्थपतीनं हे मंदिर इतकं सुंदर घडविलं की हे मंदिर रुद्रदेवाच्या नावानं न ओळखलं जाता रामप्पा स्थपतीच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं.

शिलालेखात असलेल्या माहितीनुसार हे मंदिर बांधून पूर्ण व्हायला ४० वर्षे लागली. इथल्या गर्भगृहात स्थापित शिवलिंगाची भगवान रुद्रेश्वर किंवा रामलिंगेश्वर ह्या दोन नावांनी पूजा केली जाते. इटालियन प्रवासी मार्को पोलो जेव्हा भारत भ्रमणाला आला होता तेव्हा त्यानं या मंदिराला भेट दिली होती. मार्को पोलो या मंदिराच्या स्थापत्य सौंदर्यानं इतका प्रभावित झाला होता की त्यानं रामप्पा मंदिराचे वर्णन ‘मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वांत तेजस्वी तारा’ ह्या गौरवपूर्ण शब्दांत केलं होतं. रामप्पा मंदिर आहेच इतके सुंदर. सहा फूट उंच अधिष्ठानावर उभारलेल्या या मंदिराच्या मंडोवरावर महाभारत आणि रामायणामधले प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिरासमोर नंदी मंडपात नंदीची एक विशाल एकपाषाणी काळी कुळकुळीत मूर्ती आहे. जवळ जवळ नऊ फूट उंचीच्या ह्या नंदीची आभूषणे, त्याची बसण्याची ऐट खरोखरच बघण्यासारखी आहे.

मंदिर उत्तर चालुक्य शैलीतील आहे. होयसळ स्थापत्याचेही काही संस्कार मंदिराच्या वास्तूत दिसतात, जसे तारकाकृती अधिष्ठान, बाह्य भिंतीवरील सुरसुंदरींची शिल्पे आणि गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील अप्रतिम कोरीव काम. ह्या मंदिराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर लालसर वालुकाष्म दगडात घडवलेले आहे, पण सुरसुंदरींची शिल्पे, नृत्यमंडपातील स्तंभ आणि द्वारशाखेशेजारची शिल्पपट्टिका मात्र काळ्या कुळकुळीत पाषाणातून घडवलेली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकारचे दगड आसपासच्या परिसरातले नाहीत, तर दुरून कुठूनतरी मागवलेले आहेत.

या मंदिराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथली सुरसुंदरींची शिल्पे. होयसळ स्थापत्य ज्यांनी पाहिलेले आहे त्यांना मंदिरा बाहेरच्या भिंतीवर ब्रॅकेट फिगर्स म्हणून विविध विभ्रमातील स्त्रीप्रतिमांची शिल्पे नवीन नाहीत. ही शिल्पे सुरसुंदरी किंवा मदनिका किंवा अप्सरा म्हणून ओळखली जातात. शिल्पशास्त्रात अशा सोळा प्रकारच्या सुरसुंदरींची माहिती दिली आहे. यापैकी काही प्रतिमा या मानवी मनःस्थिती दर्शविणाऱ्या आहेत, जसे कपडे ओढणाऱ्या माकडाला हाकलून लावणारी स्त्री, कडेवर मूल घेतलेली स्त्री, पायात रुतलेला काटा उपटून काढणारी स्त्री, आरशात बघून शृंगार करणारी स्त्री. या सुरसुंदरी सहसा मंदिराच्या बाहेर कोरलेल्या असतात. मंदिरात दर्शनाला जाताना भक्तांनी आपले मर्कटाप्रमाणे आचरट असलेले मन काबूत ठेवावे आणि मनात रुतून बसलेले विकार काट्याप्रमाणे उपटून काढून मगच मंदिरात प्रवेश करावा असे सांगण्यासाठी या मूर्तींचे प्रयोजन असते. रामप्पा मंदिरातली सुरसुंदरी शिल्पे अत्यंत सुरेख आहेत. विशेष म्हणजे होयसळ सुरसुंदरीसारख्या या स्त्री प्रतिमा स्थूल, बुटक्या आणि अलंकारांनी मढलेल्या नसून त्या उंच, कृश आणि अत्यंत मोजकेच अलंकार ल्यालेल्या आहेत. जवळ जवळ सहा फूट उंचीच्या काळ्या बॅसाल्ट शिळांवर या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराच्या लाल भिंतींच्या पार्श्वभूमीवर त्या अजूनच उठून दिसतात.

रामप्पा मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेवर भगवान शिवांच्या नृत्याची कारणे कोरलेली आहेत. ही शिल्पे बघूनच प्रख्यात कुचिपुडी नर्तक आणि कुलगुरू श्री नटराज रामकृष्णन ह्यांनी लोकांच्या विस्मृतीत गेलेले पेरीनी शिवतांडवम नावाचे नृत्य पुनरुज्जीवित केले. गाभाऱ्या बाहेरील नृत्यमंडपात चार शिल्पमंडित खांब आहेत, त्यातल्या एका खांबावर कृष्णलीला कोरलेली आहे. गोपी तलावात नृत्य करीत आहेत आणि वर झाडावर त्यांची वस्त्रे घेऊन कृष्ण बसलेला आहे हे दृश्य एका ठिकाणी कोरलेले आहे. कृष्ण ज्या झाडावर बसलेला आहे त्यावर बोटांनी हलकेच आघात केला तर संगीताचे स्वर निघतात. विशेष म्हणजे केवळ झाडाचे खोडच संगीत स्वर उमटवणारे आहे. गोपी, कृष्ण आणि झाड सर्व एकाच पाषाणातून कोरलेले आहे तरी !

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

भाऊराया श्रीकृष्ण !

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

आज रक्षाबंधन. भावा-बहिणीमधल्या पवित्र आणि प्रेमळ नात्याचा हा उत्सव. आज आपण जे मंदिर बघणार आहोत, तेही भावा-बहिणीमधल्या नात्याचा गौरव करणारं आहे, ओडिशामधल्या जगन्नाथपुरी इथलं, श्री जगन्नाथाचं जगप्रसिद्ध मंदिर. या मंदिरामध्ये पूजा होते ती श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तीन भावंडांची.

श्रीकृष्ण हा अनेक भक्तांचा लाडका देव. श्रीविष्णुचा अवतार आणि भागवत संप्रदायाची आराध्यदेवता. श्रीकृष्णाची पूजा अनेक स्वरूपात भारतात ठिकठिकाणी केली जाते. गोव्यात माशेल गावात तो देवकीचा कृष्ण असतो, तर कर्नाटकातल्या उडूपीला गोकुळातला रांगता बाळकृष्ण. उत्तरप्रदेशातल्या वृंदावनात तो राधेचा सखा असतो तर आपल्या राज्यात अर्थात पंढरपूरला रुक्मिणीचा पती. उज्जैनला सांदिपनी आश्रमात श्रीकृष्ण आपल्याला दिसतो तो सुदाम्यासमवेत, गुरुकुलातला एक विद्यार्थी म्हणून. तामिळनाडूमधल्या ट्रीपलीकेनच्या मंदिरात अर्जुनाचा मित्र, सखा आणि सारथी असा पार्थसारथी असतो तर गुजरातमधल्या द्वारकेला तो असतो द्वारकेचा स्वामी, द्वारकाधीश. जणू आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या नात्यांमध्ये आपण भारतीय श्रीकृष्णाचेच प्रतिबिंब पहात असतो.

या सर्व नात्यांमधले एक अनोखे नाते म्हणजे श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा ह्या बहीण-भावंडांचे. पुरीच्या मंदिरातला जगन्नाथ आपल्याला दिसतो तो बलरामाचा धाकटा भाऊ आणि सुभद्रेचा थोरला भाऊ. जगन्नाथपुरीचे हे मंदिर म्हणजे कलिंग मंदिरस्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे.

पुरी या प्रसिद्ध यात्रास्थानाचा उल्लेख श्रीक्षेत्र किंवा पुरुषोत्तम क्षेत्र म्हणून अनेक पुराणांमधून आलेला आहे. येथील जगन्नाथाचे मंदिर कलिंगदेशाचा गंग राजा चोडगंगाने बांधायला घेतले आणि पुढे त्याचा वंशज अनंग भीमदेवाने बाराव्या शतकात ते पूर्ण केले असे मानले जाते. हे मंदिर जगन्नाथाच्या म्हणजेच कृष्णाच्या नावाने ओळखले जात असले तरी गर्भगृहात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिन्ही भावंडांच्या प्रचंड लाकडी मूर्ती आहेत. या मूर्तींना फक्त डोळे, नाक, तोंड एवढेच अवयव आहेत आणि त्या दर बारा वर्षांनी येणाऱ्या अधिक आषाढात नवीन बनवाव्या लागतात.

पुरीचे हे मंदिर अगदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या नीलाचल पर्वत नामक टेकडीवर स्थित असून मंदिराच्या महाद्वारापुढे आठ मीटर उंचीचा काळ्या पाषाणाचा अरुणस्तंभ आहे. मंदिराचे चार लाख चौरस फुटांचे प्रचंड क्षेत्रफळ चारी बाजुंनी सहा मीटर उंचीच्या दगडी तटबंदीने वेढलेले आहे. तटाला चारी दिशांनी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यातले पूर्वेकडील प्रवेशद्वार सिंहद्वार म्हणून ओळखले जाते. हेच ते महाद्वार. ह्यातून प्रवेश करून अनेक पायऱ्या चढून गेलो की दुसरी एक तटबंदी लागते. या तटबंदीच्या आत मुख्य मंदिर समूह आहे. देवालयाच्या आवारात जगन्नाथाशिवाय अनेक देवतांची मिळून १२० मंदिरे आहेत. त्यांत तेरा शिवमंदिरे असून एक सूर्यमंदिरही आहे.

कलिंग स्थापत्य शैलीच्या संकेतांनुसार मंदिराचे चार स्वतंत्र भाग आहेत. ते म्हणजे सर्वांत बाहेरचा भोगमंडप, त्यानंतरचा नृत्यमंडप, त्या नंतरचा जगमोहन किंवा भव्य सभामंडप आणि देऊळ म्हणजे गर्भगृह. गर्भगृहाच्या भिंतीवर ६१ मीटर उंचीचे खास ओडिसी शैलीचे उंच निमुळते शिखर असून त्यावर आमलक आहे. आमलकावर गरुडध्वज व सुदर्शनचक्र बसवलेले आहे. शिखरावर व मंदिराच्या भिंतीवरील देवकोष्ठातून विविध प्रकारच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांत काही कामशिल्पेही आहेत. मंदिर अत्यंत सुरेख आहे पण आत कायम गर्दी असल्यामुळे शिल्पे नीट निरखून बघता येत नाहीत. विशेष म्हणजे ऐन समुद्रकिनाऱ्यावर मंदिर असूनदेखील मंदिराच्या आवारात कुठेही समुद्राची गाज ऐकू येत नाही.

जगन्नाथ मंदिराचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे येथील प्रचंड स्वयंपाकघर. या विशाल स्वयंपाकघरात ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० सहाय्यक श्री जगन्नाथ आणि इतर देवतांना रोज अर्पण करण्यात येणारा महाभोग तयार करण्याचे काम करतात. जगन्नाथाची रथयात्रा तर आपणा सगळ्यांना माहिती आहेच. दरवर्षी आषाढ महिन्यात श्री जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा ही तिन्ही भावंडं आपापल्या रथात बसून जवळच्या जनकपुरी येथील गुंदेचा मंदिरात आपल्या मावशीला भेटायला जातात अशी भाविकांची धारणा आहे. हे तिन्ही रथ दर वर्षी नव्याने बनवले जातात. श्री जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा जवळजवळ ५० फूट उंचीचा असतो. बाकीचे दोन रथ त्याच्याहून थोडे लहान असतात. हे तिन्ही अवजड रथ दरवर्षी हजारो लोक जाड दोरखंडाने ओढून नेतात. यावरूनच पुष्कळ लोकांच्या श्रमांमुळेच पूर्ण होऊ शकणाऱ्या कामाला ‘जगन्नाथाचा रथ’ असे नाव पडले. इंग्रजीमधला ‘जुगरनॉट’ हा शब्दही इथूनच आला. श्री जगन्नाथाचे आणि त्याच्या भावंडांचे हे अनोखे मंदिर हिंदू धर्मात सर्वांत पवित्र मानल्या गेलेल्या चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक असून जगन्नाथपुरीचे हे देखणे मंदिर सर्वांनी भेट दिलेच पाहिजे असे सुंदर आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

ओडिशातील मंदिरं कलिंग स्थापत्यशैलीचा अनुपम आविष्कार

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

ओडिशा राज्यातल्या जगन्नाथपुरी इथल्या प्रसिद्ध जगन्नाथमंदिराची ओळख आपण गेल्या रविवारी करून घेतली. ओडिशा राज्यात एकाहून एक सुंदर अशी पाचशेहून अधिक प्राचीन मंदिरं आहेत. यापुढचे काही आठवडे ओडिशामधल्याच काही प्राचीन मंदिरांची ओळख करून घेणार आहोत; पण त्याआधी ओडिशामधल्या मंदिरस्थापत्यशैलीबद्दल आणि ओडिशाच्या इतिहासाबद्दल थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे.

भारतीय मंदिरस्थापत्यशैलीचे साधारणतः तीन प्रकार मानले जातात. दक्षिण भारतात प्रचलित असलेलं द्रविड स्थापत्य, उत्तर भारतात प्रचलित असलेलं नागर स्थापत्य आणि या दोहोंचं मिश्रण असलेली वेसर मंदिरशैली. नागर मंदिरशैलीचे काही उपप्रकार उत्तर भारताच्या निरनिराळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यांपैकी कलिंग देशातील, म्हणजे आजच्या ओडिशा राज्यातील, मंदिरस्थापत्यशैली अत्यंत प्रेक्षणीय मानण्यात येते. या उपशैलीस ‘कलिंगशैली’ असं म्हणतात. जगन्नाथपुरी व कोणार्क इथली मंदिरं कलिंग स्थापत्यशैलीचा प्रगत आविष्कार आहेत. खुद्द ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये कलिंगशैलीची अनेक मंदिरं असून त्यांपैकी शंभर तरी उत्तम स्थितीत आहेत.

पण ही कलिंग स्थापत्यशैली नेमकी आहे तरी कशी? तर वर सांगितल्याप्रमाणे कलिंग मंदिरस्थापत्य हा उत्तर भारतीय नागर मंदिरशैलीचाच एक उपप्रकार आहे. नागरमंदिरस्थापत्यशैलीची सर्व वैशिष्ट्यं, म्हणजे चौकोनी गर्भगृह, त्यापुढचं आयताकृती अंतराळ, त्याला जोडून भव्य चौकोनी किंवा आयताकृती सभामंडप आणि गर्भगृहावरील उंच, निमुळतं शिखर हे सगळं कलिंग मंदिरस्थापत्यशैलीतही आपल्याला बघायला मिळतं. कलिंगमंदिरांचं शिखर एकाच रेषेत वर झेपावत निमुळतं होत जाणारं, बघणाऱ्या भाविकांचं लक्ष जमिनीपासून ते थेट शिखरावरच्या कलशापर्यंत नेणारं व वर गोल आमलक असलेलं असतं. ही मंदिरं सहसा ओडिशा राज्यात सहज आढळणाऱ्या लाल-गुलाबी वालुकाश्म दगडात घडवलेली असतात. मंदिराबाहेर असलेल्या देवकोष्ठांमधल्या मूर्ती उंचीला छोट्या असल्या तरी त्यांचं शरीरसौष्ठव व सुबकपणा डोळ्यात भरण्यासारखं असतं.

कलिंग स्थापत्यशैलीच्या हिंदुमंदिरांच्या बांधणीला ओडिशामध्ये साधारण सातव्या शतकात सुरुवात झाली. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ओडिशामध्ये महाभावगुप्त जनमेजय या राजानं नवं राज्य स्थापन करून कटकपर्यंत सीमाविस्तार केला. त्याच्या नातवानं म्हणजे महाशिवगुप्त ययाती नावाच्या राजानं स्वतःचं केसरी नावाचं राजघराणं सुरू केलं. भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराजमंदिर हे याच सुमारास बांधलं गेलं. पुढं अकराव्या शतकात या केसरी राजवंशाचा पराभव करून गंग वंशाचा राजा तिसरा वज्रहस्त यानं त्रिकलिंगाधिपती ही पदवी धारण केली. त्याचा नातू अनंतवर्मन् चोडगंग यानं अकराव्या शतकाअखेर पुरीचं जगन्नाथमंदिर बांधून पूर्ण केलं असं मानलं जातं. याच गंगवंशाचा राजा ''राजा नरसिंहदेव पहिला'' यानं कोणार्कचं प्रसिद्ध सूर्यमंदिर बांधून घ्यायला प्रारंभ केला.

केसरी आणि गंग या दोन्ही राजवंशातील राजांनी साहित्य, संगीत व स्थापत्य या कलांना उदारहस्ते आश्रय दिला. आज आपल्याला दिसणारं कलिंग मंदिरस्थापत्य हे प्रामुख्यानं या दोन राजवटींची देणगी.

ओडिशामधल्या मंदिरांची विभागणी साधारणतः तीन खंडांत करता येईल, साधारणतः सातवं ते नववं शतक, यामधील कलिंगस्थापत्याच्या बाल्यावस्थेचा काळ. नवव्या ते बाराव्या शतकादरम्यान ऊर्जितावस्थेचा काळ आणि शेवटचा एका शतकाचा उत्तरकाल.

साधारणतः तेराव्या शतकानंतर ओडिशावर इस्लामी राजवटींची वक्रदृष्टी वळली आणि भव्य नवी मंदिरं बांधणं तर जवळजवळ बंद झालंच; पण असलेल्या मंदिरांवरही अनेक हल्ले होऊन बरीच तोडफोड झाली. पुढं सोळाव्या शतकात बंगालचा सुलतान सुलेमानखान याचा सेनापती काला पहाड यानं केलेल्या स्वारीत ओडिशाचा शेवटचा राजा मुकुंददेव पडला आणि राज्य बंगालच्या मुसलमानांच्या हातात गेलं. याच स्वारीत जगन्नाथपुरीचं मंदिर भग्न केलं गेलं व मंदिरामधल्या मूर्ती चिल्का सरोवरातल्या एका बेटावर हलवण्यात आल्या हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत असेल.

सुरुवातीला कलिंगमंदिरांचं स्थापत्य हे नागर शैलीच्या इतर मंदिरांसारखंच होतं; पण पुढं गरजेनुसार त्यात बदल होत गेले. कलिंगमंदिरांचे स्थापत्यशैलीच्या दृष्टीनं तीन उपप्रकार निर्माण झाले, ते म्हणजे ''रेखा देऊळ'', ''पीढा देऊळ'' व ''खाखरा देऊळ''. रेखा देऊळ म्हणजे चौकोनी गाभाऱ्यावर निमुळतं होत जाणाऱ्या शिखराचं देऊळ. या प्रकारात बघणाऱ्या भाविकांची नजर शिखरावरून सरकत सरळ आमलकापर्यंत जाते. पीढा देवळाचं शिखर पसरट, पिरॅमिडसारखे अनेक टप्प्यांचं मिळून होतं, तर खाखरा देऊळ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असलेली आयताकार वास्तू.

कलिंग मंदिरस्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, ‘जगमोहन’ या नावानं ओळखला जाणारा गर्भगृहापुढचा प्रशस्त चौरस सभामंडप. त्यावर सामान्यतः पीढा पद्धतीचं पसरट छप्पर असतं. त्यापुढील गर्भगृहावरचं छप्पर मात्र रेखा पद्धतीचं असतं. पुढं मंदिरातील धार्मिक उपचार व आन्हिकं वाढत गेली, तसं जगमोहन या मुख्य मंडपाला आणखी मंडप जोडण्यात येऊ लागले. हे सगळे बहुधा जगमोहनला जोडून व त्याच ओळीत असत. अशा मंडपांना भोगमंडप व नृत्यमंडप अशी नावं मिळाली. कलिंग स्थापत्यशास्त्र जसजसं प्रगत होत गेले तसतशी शिखरांची उंची वाढू लागली. जगमोहनाचा विस्तार वाढला आणि वरच्या पीठांच्या थरांच्या संख्येतही वाढ झाली. कोणार्कच्या मंदिरात हे सर्व बघायला मिळते. अशा या कलिंग स्थापत्यशैलीमधील काही मंदिरांना आपण पुढचे काही आठवडे भेट देणार आहोत.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

भुवनेश्वरची चित्रकारिणी

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

ओडिशा राज्याची राजधानी, भुवनेश्वर ही मंदिरांची नगरी आहे. त्रिभुवनेश्वर म्हणजे शिवांची नगरी असलेल्या ह्या पवित्र जागेला शैव पुराणांमधून ’एकाम्रक्षेत्र’ किंवा हरक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सूर्यक्षेत्र कोणार्क, हरीक्षेत्र जगन्नाथपुरी आणि शिवक्षेत्र भुवनेश्वर ही तिन्ही ठिकाणे मिळून ओडिशा राज्याचा सोनेरी त्रिकोण होतो.

मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर हा परिसर महामेघवहन राजवटीच्या आधिपत्याखाली आला. खारवेल हा या राजकुलातला सगळ्यात महान राजा. त्याने भारतदिग्विजय केला होता. भुवनेश्वरजवळील उदयगिरी आणि खंडगिरी लेण्यांमध्ये त्याने खोदलेला शिलालेख आहे जो हाथीगुंफा शिलालेख ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

पुढे सातव्या शतकात केसरी नावाच्या सोमवंशी राजघराण्याने कलिंगमध्ये आपले राज्य स्थापन केले. भुवनेश्वरमधले सर्वांत प्रसिद्ध असे लिंगराज मंदिर याच राजवंशाने बांधले. त्यांच्यानंतर गंग राजवंशाने चौदाव्या शतकापर्यंत कलिंग देशावर राज्य केले. त्यांची राजधानी कलिंगनगरा सध्याच्या भुवनेश्वर शहराच्या ठिकाणी होती. भुवनेश्वर मधली बहुतेक सर्व जुनी मंदिरे ह्या दोन राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान बांधली गेली.

अगदी आजही भुवनेश्वर आणि आसपासच्या परिसरात शेकडो लहानमोठी पुरातन मंदिरे आपल्याला दिसतील. आज आपण बघणार आहोत हे मंदिर आहे चित्रकारिणी देवीचे, म्हणजे सरस्वतीचे. जुन्या भुवनेश्वरमध्ये प्रसिद्ध लिंगराज मंदिराच्या अगदी जवळच हे मंदिर आहे. पण लिंगराज मंदिरामध्ये कायम पर्यटकांची, भाविकांची गर्दी असते. चित्रकारिणी मंदिर मात्र त्या मानाने अगदीच शांत आहे.

सरस्वती ही विद्येची देवता, कलेची अधिष्ठात्री. साहजिकच तिचे मंदिर विद्यार्थीप्रियच असणार. अगदी आजही ह्या मंदिराच्या आवारात आसपासच्या वस्तीतले विद्यार्थी येऊन अभ्यास करताना दिसतात. मी गेले तेव्हा काही अभियांत्रिकीचे विद्यार्थी मिळून मंदिराच्या बाहेर बसून अभ्यास करत होते. विचारलं तर म्हणाले ‘यहाँ माँ सरस्वती का वास है’. मंदिर समूह पंचायतन पद्धतीचा आहे. मधोमध मुख्य रेखा मंदिर आणि त्याचा पिढा पद्धतीचा जगमोहन आणि चारी बाजूंना परिसर देवतांची चार रेखा मंदिरे, त्यांच्यापुढे जगमोहन नाही. मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे, आणि आकाराने फार भव्य नसले तरी अप्रतिम कलाकुसरीने नटलेले आहे.

साधारण तेराव्या शतकाच्या मध्यात हे मंदिर बांधले गेले असे मानले जाते. गंग राजा नरसिंह देव प्रथम या महापराक्रमी राजाने बंगालच्या मुसलमान सुलतानाला हरवून यवनवाणीबल्लव आणि अमीरमानमर्दन अशा दोन उपाधी धारण केल्या. थेट शत्रूच्या प्रदेशात सैन्यासह मुसंडी मारून कटासीनच्या किल्ल्यात झालेल्या युद्धात राजा नरसिंह देवाने इस्लामी मामलुक सल्तनतीवर निर्णायक विजय मिळविला. कोणार्कचे भव्य सूर्यमंदिर हे त्याच्या शौर्याचे प्रतीक आहे तर भुवनेश्वरचे चित्रकारिणी मंदिर त्याच्या कलाप्रियतेचे, रसिकतेचे.

कलिंग मंदिराचे साधारण दोन आडवे भाग करता येतात, जमिनीपासून जिथे शिखर सुरू होते, तिथपर्यंतचा भाग म्हणजे बडा किंवा भिंत आणि नंतर वरवर चढत जाणारं शिखर म्हणजे, गंडी. बडा म्हणजे भिंतीचेही खालून वर असे चार आडवे थर पाडता येतात, सगळ्यात खालचा थर म्हणजे पिष्टी किंवा पीठ, ज्यावर सर्व वास्तूचा डोलारा उभा असतो. त्यावर पभाग म्हणजे प्रभाग, हा वेगवेगळ्या थरांनी मिळून बनलेला असतो. त्यानंतर येतो तो भिंतीचा मोठा भाग ज्यात देवकोष्ठे बसवलेली असतात. त्याला नाव आहे जंघा. त्यावरचा शिखराला जोडणारा भाग म्हणजे बरंडा.

तसेच बडाचे म्हणजे गर्भगृहाच्या भिंतीचे उभे स्तरही असतात. गर्भगृहाच्या प्रत्येक भिंतीला दोन दिशांना दोन कोन असतात त्याना लागून असलेले स्तर म्हणजे कणिका पग आणि मधला एक स्तर म्हणजे रह-पग असे तीनच स्तर प्रत्येक भिंतीला असले तर त्या मंदिराला त्रिरथ मंदिर असे नाव आहे. पुढे मंदिरांचे आकार वाढले, भिंती उंचीला आणि रूंदीलाही भरपूर वाढल्या त्यामुळे अजून उभे स्तर रह-पग आणि कणिका-पगाच्या मध्ये निर्माण झाले. त्यांना अनुरथ पग आणि प्रतिरथ पग अशी नावे मिळाली आणि त्रिरथ मंदिर मोठे होऊन पंचरथ, सप्तरथ आणि अगदी क्वचित नवरथही झाले.

चित्रकारिणी मंदिराचे रेखा देऊळ सप्तरथ प्रकारचे आहे तर जगमोहन पंचरथ पद्धतीचे आहे. जगमोहनाच्या भिंतीवरची जंघा दोन भागात विभागलेली आहे, खालच्या भागात पाच स्तंभांवर मिथुन शिल्पे कोरलेली आहेत तर उत्तरेकडच्या भिंतीवर वरच्या भागात वेणूगोपाळाचे सुंदर शिल्प आहे. दक्षिणेकडच्या भिंतीवर खालची स्तंभनक्षी तीच आहे पण वरचे शिल्प शिव-पार्वतीविवाहाचे आहे.

बरीच शिल्पे दुर्दैवाने पुढे सोळाव्या शतकात मुस्लीम सुलतान काळा पहाडाच्या स्वारीत उध्वस्त केलेली आहेत. मंदिराच्या आवारात बरेच भग्नावशेष असेच पडलेले आहेत. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आता शांत सरस्वती नाही तर रौद्र चामुंडा आहे. त्यामुळे एक गूढ वातावरण अनुभवायला मिळते. छोटेसेच असले तरी चित्रकारिणी देवीचे हे मंदिर मुद्दाम जाऊन बघावे असेच आहे.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

शिव-विष्णूचं एकात्म प्रतीक : लिंगराजमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

ओडिशा राज्यातील कलिंग स्थापत्यशैलीचं प्रतीक असलेल्या काही प्रमुख प्राचीन मंदिरांची ओळख गेले काही आठवडे आपण या सदरातून करून घेत आहोत. आज आपण भेट देणार आहोत ते मंदिर आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मंदिर...श्रीलिंगराजमंदिर. इथं भगवान शिवांची उपासना श्रीत्रिभुवनेश्वर या नावानं केली जाते; किंबहुना भुवनेश्वर शहराचं नावच या प्राचीन मंदिरावरून पडलं आहे.

जुन्या भुवनेश्वरच्या केंद्रस्थानी असलेलं हे मंदिर इतकं भव्य आहे, की अगदी दुरूनसुद्धा आपल्याला या मंदिराचं शिखर दिसू शकतं. आज अस्तित्वात असलेली मंदिराची वास्तू साधारणतः अकराव्या शतकाच्या शेवटी बांधली गेलेली आहे असं पुरातत्त्वीय पुरावे सांगतात; पण लिंगराजमंदिराचे काही भाग मात्र चौदाशे वर्षांपेक्षाही जुने आहेत. इसवीसनाच्या सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ओडिया साहित्यातही या मंदिराचा उल्लेख येऊन गेलेला आहे. मदल-पंजी या नावानं प्रसिद्ध असलेल्या पुरीच्या जगन्नाथमंदिराच्या बाराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या इतिहासानुसार, भुवनेश्वरचं हे लिंगराजमंदिर प्रथम सहाव्या-सातव्या शतकात सोमवंशी राजा ललितेंदुकेसरी यानं बांधलं होतं. पुढं अकराव्या शतकात गंग राजवंशानं या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला. आज अस्तित्वात आहे तो बराचसा मंदिरसमूह अकराव्या शतकात बांधलेला आहे.

प्रख्यात ओडिया इतिहासकार के. सी. पाणिग्रही यांच्या मते, आज अस्तित्वात असलेलं मंदिर सोमवंशी राजा उद्योत्‌केसरी यानं अकराव्या शतकात बांधून घेऊन पूर्ण केलं. या जागेचं वर्णन ब्रह्मपुराणात ‘एकाम्रक्षेत्र’ असं करण्यात आलं आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, हे मंदिर शशांकानं म्हणजेच चंद्रानं बांधलं.

चंद्र म्हणजेच सोम, अर्थात्‌ सर्व सोमवंशी राजे चंद्राला आपला मूळ पुरुष मानत असत, हेच कदाचित या आख्यायिकेमागचं ऐतिहासिक सत्य असावं.

लिंगराजमंदिराचं प्रांगण जवळजवळ दीडशे चौरस मीटर आहे आणि कलशाची उंची पंचावन्न मीटर आहे. शेजारीच बिंदुसागर तलाव आहे. भाविकांची अशी धारणा आहे की, कृत्ती आणि वास या दोन राक्षसांशी युद्ध करून दमलेल्या आणि तहानलेल्या देवी पार्वतीसाठी साक्षात्‌ भगवान शिवांनी हा तलाव निर्माण केला आणि भारतातील प्रत्येक झऱ्याचं, तलावाचं आणि नदीचं बिंदुस्वरूप पाणी या सरोवरात साठवलं. हा परिसर भगवान शिवांना इतका आवडला की, त्यांनी लिंगस्वरूपात इथंच राहायचं ठरवलं. मंदिराच्या गर्भगृहात एक मोठं शिवलिंग आहे. ते स्वयंभू असल्याचं मानलं जातं. जवळजवळ आठ फूट व्यासाच्या या शिवलिंगात शिव आणि विष्णू हे दोघंही वास करतात अशी भाविकांची धारणा आहे. म्हणूनच या मंदिराला ‘हरिहरक्षेत्र’ असंही नाव आहे.

मुख्य मंदिर चार भागांत आहे. गर्भगृह म्हणजे रेखादेऊळ, जगमोहन म्हणजे पिढादेऊळ. हे दोन्ही भाग मूळचे आणि त्यांना पुढं जोडलेले भोगमंडप आणि नटमंडप. गर्भगृह पंचरथ पद्धतीचं आहे, म्हणजे प्रत्येक बाजूच्या भिंतीचे किंवा बडाचे उभे पाच भाग केलेले आहेत. मधला रह-पग, त्याच्या दोन्ही बाजूंना एकेक अनुरथ-पग आणि दोन्ही कोपऱ्यांत एकेक कनिका-पग असे पाच रथ किंवा उभे भाग, तसंच गाभाऱ्याच्या भिंतीचे जंघा नावाचे दोन आडवे भाग केलेले आहेत आणि त्यांना जोडणारी मध्यमा आहे.

खालच्या जंघाभागात चैत्यतोरणाकृती छपरांची देवकोष्ठे आहेत, तर वरच्या भागात सपाट छपरांची देवकोष्ठे आहेत. दोन्हींमध्ये वेगवेगळ्या मूर्ती बसवलेल्या आहेत. शिल्पपट्टात देव-देवता आणि सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. कलिंगस्थापत्यशास्त्रात सुरसुंदरींना आलसकन्या असं नाव आहे. या मंदिरातील आलसकन्या आकारानं लहान असल्या तरी अत्यंत कमनीय आहेत. तीन दिशांवरील भिंतींच्या मधल्या पट्‌ट्यातल्या मुख्य कोनाड्यात गणेश, कार्तिकेय आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. गंडी म्हणजे शिखर, लहान आकारांच्या शिखरांच्या प्रतिकृतींचं मिळून ते झालं आहे. मुख्य शिखराची उंची ५५ मीटर आहे, तर पुढच्या जगमोहनाच्या शिखराची उंची २५ मीटर आहे. मंदिराच्या शिखराच्या बांधणीत विविध थर अशा उठावानं कोरून काढले आहेत, की त्यामुळे मंदिरावरचा छाया-प्रकाशाचा खेळ उठावदार होतो. शिखराच्या खालीच असलेल्या बरंडा या भागातही देवकोष्ठे आहेत आणि त्यात शिवांच्याच अवस्थिती म्हणजे दक्षिणेला अंधकान्तक, पूर्वेला लकुलीश आणि पश्चिमेला नटराज यांच्या मूर्ती आहेत. उत्तरेकडच्या कोनाड्यात चामुंडा आहे. शुकनासीवरती मोठा गजसिंह आहे. कलशावरच्या आयुधात श्रीविष्णूचं सुदर्शन आणि शिवांचा त्रिशूल, दोन्ही आहेत.

मंदिरावरच्या सर्व शिल्पाकृतींच्या बाह्य रेषा लालित्यपूर्ण आणि सुबक आहेत. कलिंगशैलीच्या मंदिरांचं लिंगराजमंदिर हे एक भूषण आहे. वास्तुकला व मूर्तिकला या दोन्ही दृष्टींनी भुवनेश्वर इथलं लिंगराजमंदिर पर्यटकांचं-भाविकांचं मन मोहवून घेतं. मुख्य मंदिराच्या आवारात सूर्याचं, गोपालिनीदेवी या नावानं प्रसिद्ध असलेल्या पार्वतीचं, श्रीगणेशाचं, अनंताचं अशी इतरही अनेक लहान-मोठी मंदिरं आहेत. सर्व मंदिरपरिसर बघण्यात दोन तास सहज निघून जातात. पर्यटक आणि स्थानिक भाविक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी गजबजलेलं हे मंदिर चुकवू नये असंच आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी मंदिराचा काळपट सोनेरी वालुकाष्म दगड उन्हात प्रदीप्त होऊन झळाळत असताना हे मंदिर बघणं हा एक अत्यंत सुरेख अनुभव आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

तंत्रोपासनेचं गूढ वैतालमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

गेले चार आठवडे आपण ओडिशा राज्यातील विविध मंदिरांची ओळख करून घेतोय. आपण पाहिलं की कलिंग मंदिरस्थापत्य हे उत्तर भारतात प्रचलित असलेल्या नागर मंदिरस्थापत्यशैलीचीच एक उपशैली आहे. कलिंग मंदिरशिखरांचे स्थापत्यशैलीच्या दृष्टीनं तीन उपप्रकार मानले जातात, ते म्हणजे रेखा देऊळ, पिढा देऊळ व खाखरा देऊळ. रेखा देऊळ म्हणजे चौकोनी गाभाऱ्यावर निमुळतं होत जाणाऱ्या उंच शिखराचं देऊळ. या प्रकारात, बघणाऱ्या भाविकांची नजर शिखरावरून सरकत सरळ आमलकापर्यंत जाते. पिढा देऊळ म्हणजे शिखर पसरट, पिरॅमिडसारखं अनेक टप्प्यांचं मिळून होतं, तर खाखरा देऊळ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असलेली आयताकार वास्तू.

आज आपण ओळख करून घेणार आहोत ती वैताल देवळाची. नाव जरी ‘वेताळ देऊळ’ असं असलं तरी हे मंदिर समर्पित आहे चामुंडेश्वरीला. शहराच्या जुन्या भागात, लिंगराजमंदिराच्या जवळच हे मंदिर आहे; पण भुवनेश्वरला येणारे फार कमी पर्यटक या मंदिराला भेट देतात. खरं तर हे मंदिर बांधलं गेलं आठव्या शतकात. म्हणजे, आज जवळजवळ बाराशे वर्षं उलटली तरी हे मंदिर बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.

या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याचं खाखरा पद्धतीचं शिखर. दक्षिणेकडील मंदिरांबाहेर उत्तुंग गोपुरं असतात, त्यांची शिखरं गजपृष्ठाकार असतात व वर कलशांची रांग असते. साधारण त्याच पद्धतीचं हे शिखर आहे. शिखरावर रांगेनं तीन कलश आहेत म्हणून या मंदिराला ‘तीन मुंडिया देउळा’ असंही म्हणतात; किंबहुना स्थानिक रिक्षाचालकांमध्ये हे मंदिर याच नावानं ओळखलं जातं. हे तीन कलश म्हणजे देवीच्या तीन रूपांचं प्रतीक मानलं जातं...महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.

साधारणपणे भगवान शिव, श्रीविष्णू आणि सूर्यदेव आदी पुरुषदेवतांची देवालयं बांधताना रेखा व पिढा शैलीच्या शिखरांचा उपयोग केला जातो आणि देवीची मंदिरं, त्यातही तंत्रोपासना जिथं व्हायची अशी मंदिरं, खाखरा देऊळशैलीत बांधली जात असत. मंदिराबाहेर छोटेखानी मंडप म्हणजे जगमोहन आहे; पण त्यावर नेहमीचं पिढापद्धतीचं शिखर नाही. छप्पर सपाट आहे. मुख्य मंदिराच्या बाजूलाच रेखापद्धतीच्या शिखराचं शंकराचं मंदिर आहे. शीर्षेश्वर या नावानं ओळखलं जाणारं हे मंदिर चामुंडामंदिराच्या मानानं अगदीच दुर्लक्षित आहे. मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भैरव, श्रीगणेश, लकुलिश आणि सप्तमातृका यांची सुरेख शिल्पं आहेत. इथल्या आलसकन्याही अतिशय सुरेख आहेत. मूर्ती आकारानं लहान असल्या तरी अत्यंत सौष्ठवपूर्ण आणि नाजूकपणे कोरलेल्या आहेत.

या मंदिराच्या बाह्य भिंतीचं वैशिष्ट्य म्हणजे, गाभाऱ्याच्या भिंतीच्या देवकोष्ठांमध्ये असलेल्या दोन भव्य प्रतिमा! एक आहे अर्धनारीश्वराची. अर्धा शिव आणि अर्धी शक्ती अशा स्वरूपात असलेली ही मूर्ती म्हणजे कलिंग शिल्पकारांनी साकारलेली एक श्रेष्ठ कलाकृती आहे. शिवांच्या बाजूची शरीराची ठेवण आणि पार्वतीच्या बाजूची कमनीयता, पार्वतीच्या अंगावरचे दागिने, तिच्या चेहऱ्यावरचे कोमल भाव आणि शिवांच्या देहबोलीतला, चेहऱ्यावरचा पुरुषी कणखरपणा दाखवण्यात तो अनाम शिल्पकार कमालीचा यशस्वी झालेला आहे. दुर्दैवानं शिवांच्या बाजूचा एक हात नंतर झालेल्या इस्लामी आक्रमणात तुटलेला आहे.

इथली महिषासुरमर्दिनीची मूर्ती तर अत्यंत सुरेख आणि लयबद्ध आहे. अष्टभुजा देवी एक पाय महिषासुराच्या खांद्यावर रोवून उभी आहे. तिचा त्रिशूल त्याच्या गळ्यात रुतलाय. दुसऱ्या हातानं तिनं महिषाचं डोकं एका बाजूला वळवलेलं आहे. देवीच्या त्वेषापुढं, शक्तीपुढं महिषासुर असहाय्य आहे. त्याची असमर्थता त्याच्या देहबोलीतून दिसते आहे. देवीचा चेहरा, तिचा केशकलाप, तिच्या हातातली विविध शस्त्रं आणि ती उगारण्याचा तिचा आवेश, तिच्या अंगावरचे अगदी मोजकेच दागिने या सर्व गोष्टींमुळे हे शिल्प अत्यंत सजीव वाटतं. कितीही वेळा या शिल्पाकडे पाहिलं तरी मनाचं समाधान होत नाही.

या मंदिराच्या प्राकारात आणखी चार लहान मंदिरं आहेत. या मंदिराचं नाव वेताळ असलं तरी गर्भगृहात चांमुडादेवी आहे. गर्भगृहात नेहमी गूढ अंधार असतो आणि त्यात देवी चामुंडेश्वरीची डोळे खोल गेलेली, फासळ्या दाखवणारी, उग्र चेहऱ्याची मूर्ती! इथं प्राचीन काळी शाक्त पंथाचा प्रभाव होता आणि त्यांची तांत्रिक उपासना या मंदिरात चालायची असं पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे मंदिर ओडिशा राज्यात सहज सापडणाऱ्या लाल-गुलाबी वालुकाश्म दगडात घडवलेलं आहे. पहाटेचे पहिले सूर्यकिरण या दगडावर पडले की हे मंदिर सोन्यात घडवल्यासारखं झळाळून उठतं. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी हे मंदिर बघणं हा एक अनोखा सौंदर्यानुभव आहे. एकेकाळी हे मंदिर रस्त्याच्या पातळीला होतं; पण इतक्या वर्षांत वारंवार डागडुजी करून रस्त्याची उंची वाढलेली आहे, त्यामुळे मंदिर खाली गेलेलं आहे.

मंदिराबाहेर असलेल्या देवकोष्ठांमधल्या मूर्ती उंचीला छोट्या असल्या तरी त्यांचं शरीरसौष्ठव व सुबकपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. भुवनेश्वरच्या इतर प्रसिद्ध मंदिरांपेक्षा वेगळं असं हे वैतालमंदिर आवर्जून पाहिलंच पाहिजे असं आहे.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

मुक्तेश्वर मंदिर : एक सुंदर पाषाणस्वप्न

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

ओडिशा राज्यातील मंदिरांची ओळख गेले काही आठवडे आपण करून घेतोय. आज या शृंखलेतले शेवटचे मंदिर आहे. पुढचे दोन-तीन आठवडे आपण जाणार आहोत छत्तीसगढला, तिथल्या अतिप्राचीन, पण अप्रसिद्ध मंदिरांची सफर करायला पण त्या आधी आपल्याला आज भुवनेश्वरचे सगळ्यात सुरेख मुक्तेश्वर मंदिर बघायचे आहे.

ओडिशा राज्यातील बहुतेक मंदिरे वालुकाश्मापासून बनवलेली आहेत. मुक्तेश्वर मंदिरही त्याला अपवाद नाही. ‘कलिंग मंदिरस्थापत्यात साकार झालेले एक सुंदर स्वप्न म्हणजे मुक्तेश्वर मंदिर असे प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ एम एम गांगुली ह्यांनी मुक्तेश्वर मंदिराचे वर्णन केलेले आहे. उत्तर भारतातील नागर मंदिर-शैलीचा ओडिशा राज्यातील आविष्कार म्हणजे कलिंग स्थापत्यशैली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिर हे साधारण नवव्या शतकात बांधले गेले. म्हणजेच कलिंग स्थापत्यशैलीच्या प्राथमिक व प्रगत या अवस्थांच्या सीमारेषेवरचे हे मंदिर आहे. ह्या शैलीची चरमसीमा पुढे कोणार्क आणि पुरीच्या मंदिरात गाठली गेली.

आपण आधीच्या लेखांमधून पाहिलेच आहे की कलिंग स्थापत्यशैलीत मंदिर शिखरांचे तीन उपप्रकार निर्माण झाले, रेखा, पीढा व खाखरा. ‘रेखा देऊळ’ या प्रकारात शिखराची बाह्याकृती उंच आणि निमुळती होत सलग आमलकापर्यंत जाते. ‘पीढा’ या प्रकारात छप्पर पायरीसदृश्य अनेक टप्प्यांचे किंवा मजल्यांचे मिळून होते तर ‘खाखरा’ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असणाऱ्या शाला या आयताकार वास्तूचे कलिंग स्थापत्यशास्त्रातले रूप आहे. मुक्तेश्वर मंदिराचे शिखर रेखा पद्धतीचे तर बाहेरचा मंडप म्हणजे जगमोहन पीढा पद्धतीचा आहे.

भुवनेश्वरच्या जुन्या भागात लिंगराज मंदिराच्या जवळच असलेले हे मुक्तेश्वर मंदिर आकाराने खरेतर अगदीच छोटे आहे. लिंगराज किंवा जगन्नाथाच्या मंदिराची भव्यता येथे नाही. पण अप्रतिम कोरीव कामाने नटलेले हे मंदिर नाजूक कलाकुसर केलेल्या एखाद्या दागिन्यातल्या हिऱ्यासारखे भुवनेश्वरच्या मंदिरांच्या प्रभावळीत उठून दिसते. खरेतर हा एक मंदिर समूह आहे.

एकेकाळी ह्या जागेला सिद्धारण्य असे नाव होते. एका बाजूला मुक्तेश्वर मंदिर आणि दुसऱ्या बाजूला छोटी छोटी अनेक मंदिरे आहेत. अतिशय शांत आणि रमणीय असा हा परिसर आहे. जवळपासचे अनेक रहिवासी संध्याकाळी ह्या मुक्तेश्वर मंदिराच्या परिसरात फिरायला आलेले दिसतात.

मुक्तेश्वर मंदिराचे मंडपाचे म्हणजेच जगमोहनाचे छप्पर पिढा पद्धतीचे पायऱ्या पायऱ्यांनी बांधलेले आणि गर्भगृह म्हणजेच रेखा देऊळ पाच उभ्या भागात विभागलेले, म्हणजेच पंचरथ पद्धतीचे आहे. ह्या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मुक्तेश्वर मंदिरासमोरचे तोरणद्वार. असे तोरणद्वार भुवनेश्वर मध्ये दुसऱ्या कुठल्याही मंदिरात नाही. मंदिरासमोर कोरीव कामाने विनटलेले दोन भक्कम खांब व त्यांवर धनुष्याकृती तुळई असे हे तोरण आहे. तोरणावर यक्ष-यक्षी, देवदेवता, गंधर्व ह्यांच्या शिल्पांची रेलचेल आहे. तोरणाच्या दोन्ही कमानीवर दोन अत्यंत सुंदर आणि कमनीय अश्या यक्षी पहुडलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूला अगदी जिवंतच वाटणारी दोन माकडे कोरलेली आहेत. अशी कोरीव तोरणे या काळातील मंदिरांमध्ये देशाच्या इतरही भागात बांधली जात. गुजरात मधील मोढेराच्या शिवमंदिरात असेच एक तोरण आहे.

मंदिराच्या इतर भागांवर अप्सरा, नाग-नागी, गजव्याल यांच्या मूर्तीचेही दर्शन होते. द्वारशाखेवर नवग्रह आहेत. देवळाच्या जंघा व इतर भागांवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत त्यात उंदीर व मोर ही वाहने असणारे गणपती व कार्तिकेय, लकुलीश, नाग-नागी, सूर्य आणि श्रीविष्णू ही शिल्पे उल्लेखनीय आहेत. मुक्तेश्वर मंदिराचे दुसरे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जगमोहनाच्या छतावर कोरलेले अप्रतिम वितानशिल्प. हे वितानशिल्प म्हणजे अप्रतिम कोरीवकाम केलेले आठ पाकळ्यांचे दगडी कमळ आहे. ह्या कमळाच्या सर्वात बाहेरच्या भागात प्रत्येक पाकळीवर एक अशा सप्तमातृका कोरलेल्या आहेत, आणि आठवा वीरभद्र. प्रत्येक मातृका तिच्या बाळासमवेत आहे.

जगमोहनाच्या कोरलेल्या जाळीदार खिडक्या म्हणजेच जालवातायने अत्यंत सुंदर आहेत. ह्याच कमळाच्या आतील भागात कार्तिकेय आणि श्री गणेश ह्यांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. हे वितानशिल्प खरोखर केवळ अद्भुत आहे.

एकूणच मुक्तेश्वर मंदिराचा प्रत्येक कोपरानकोपरा अप्रतिम अशा नाजूक, रेखीव कोरीव कलाकुसरीने नटलेला आहे. हे शिवमंदिर असूनही मंदिरात नंदी नाही. गर्भगृहात शिवलिंग आहे ज्याची रोज पूजा होते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला आहे. कलिंगाच्या स्थानिक इतिहासाप्रमाणे हे मंदिर सोमवंशी राजा ययाती केसरी ह्याने नवव्या शतकात बांधवून घेतले. कलिंग स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक वॉल्टर स्मिथ ह्यांच्या मते स्मिथ हा राजा म्हणजे सोमवंशी सम्राट ययाती महाशिवगुप्त असावा.

ह्या मंदिराचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी अगदी भरभरून कौतुक केले आहे. जेम्स फर्गुसनने ह्या मंदिराला ‘ओडिशाच्या मंदिरांमधला एक सुंदर हिरा’ असे म्हटलेले आहे. मुक्तेश्वर मंदिर पाहिल्याशिवाय आपली कलिंग स्थापत्यशैलीची सफर पूर्णच होऊ शकत नाही. कलिंग स्थापत्य शैलीची ओळख करून देणारा आजचा हा शेवटचा लेख म्हणूनच मुक्तेश्वर मंदिरावर आहे.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

बस्तरची शान नारायणपाल विष्णुमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

बस्तर. छत्तीसगढ राज्याचा एक मोठा भाग. केरळ राज्यापेक्षाही आकाराने मोठा असलेला हा भाग. बस्तर म्हटले की आपल्या नजरेसमोर येते तिथले घनदाट जंगल, त्यात राहणारे आदिवासी, तिथले निखळ निसर्गसौंदर्य आणि या साऱ्याला गालबोट लावणारी नृशंस नक्षलवादी हिंसा. पण याच बस्तरमध्ये अनेक सुंदर, प्राचीन मंदिरे आहेत हे किती जणांना ठाऊक आहे?

बस्तर हे १९४७ पूर्वी एक संस्थान होते. बस्तरचे प्राचीन नाव चक्रकोट. इथल्या सध्याच्या राजघराण्याचा मूळ पुरुष आनमदेव हा वारंगलच्या काकतीय राजघराण्यातला धाकटा राजपुत्र मानला जातो. जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने चौदाव्या शतकात दक्षिण भारतावर स्वारी केली तेव्हा त्याने वारंगल लुटले व तिथल्या मंदिरांचा विध्वंस केला. तिथला राजा रुद्रप्रताप देव लढाईत मारला गेला पण त्यापूर्वी त्याने आपल्या धाकट्या भावाला, म्हणजे अनामदेवाला त्याचा जीव वाचवण्यासाठी काही विश्वासू सहकाऱ्यांसोबत आपल्या राज्याच्या सीमेवरच्या जंगलात पाठवले होते. या अनामदेवाने देवी दंतेश्र्वरीच्या कृपेने बस्तर येथे आपली सत्ता प्रस्थापित केली व आपले स्वतंत्र राज्य उभे केले अशी बस्तर भागात श्रद्धा आहे.

त्याआधी बस्तरवर नागवंशी राजे राज्य करीत असत. या राजांनी बस्तरमध्ये अनेक मंदिरे बांधली. त्यातली काही प्राचीन मंदिरे हजार वर्षांनंतरही बस्तरमध्ये उभी आहेत. इंद्रावती आणि नारंगी ह्या दोन नद्यांच्या संगमावर बांधलेले नारायणपालचे नऊशे वर्षे जुने विष्णू मंदिर हे त्यातले एक प्रमुख मंदिर.

हे मंदिर बस्तरमधील छिंदक नागवंशी राजांच्या गतवैभवाचे एक गौरवशाली स्मारक आहे. नागर स्थापत्य शैलीत बांधलेले हे मंदिर म्हणजे नागवंशी राजांच्या काळात प्रगत झालेल्या वास्तुकलेचा उत्तम पुरावा आहे.

मंदिरात असलेल्या प्राचीन शिलालेखावरून स्पष्ट होते की मंदिर जरी राजघराण्यातील राणीने बांधायला घेतले होते तरी बस्तर राज्यातले सामान्य नागरिक उदार हस्ते विविध स्वरूपाचे दान देऊन मंदिराच्या बांधकामात सढळ हाताने सहकार्य करत होते. संपूर्ण बस्तर भागातील हे एकमेव विष्णू मंदिर, कारण इथले आदिवासी पूजा करतात ती शिवाची आणि देवीची.

नारायणपाल मंदिर बस्तरच्या प्रमुख शहरापासून म्हणजे जगदलपूरहून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर आहे. भारतातला एक सर्वात रुंद धबधबा, चित्रकोट, इथून जवळच आहे. मंदिराचे बांधकाम नागर शैलीत झालेले असून मंदिर लाल वालुकाश्मात बांधलेले आहे. मंदिराचे शिखर सुमारे ७० फूट उंच आहे. इथे सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर नागवंशी राजा जगदेव भूषण याच्या विष्णू भक्त राणीने म्हणजे गुंडमहादेवीने तिच्या वयाच्या शंभराव्या वर्षी तिचा शूर पुत्र राजा सोमेश्वर देव याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ बांधायला घेतले.

१०६९ मध्ये चक्रकोटवर राजा राजभूषण सोमेश्वर देव याचे राज्य होते. सोमेश्वर देव यांचे राज्य म्हणजे चक्रकोटचा सुवर्णकाळ होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने हे मंदिर बांधायला घेतले. ते पुढे तिच्या मृत्यूनंतर तिचा नातू आणि सोमेश्वर देवाचा पुत्र राजा कन्हारदेव याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. त्याच वेळी, मंदिराच्या जवळ नारायणपूर नावाचे एक गाव देखील स्थापित केले गेले, जे आज नारायणपाल म्हणून ओळखले जाते. शिलालेखात नमूद केलेल्या तारखेनुसार इसवीसनाच्या ११११ वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे मंदिर आणि जवळचे नवीन वसवलेले गांव श्रीविष्णूला समर्पित करण्यात आले होते.

नारायणपाल मंदिराच्या आतच तो सुमारे आठ फूट उंचीचा काळ्या पाषाणात कोरलेला शिलालेख ठेवलेला आहे, ज्यात शिवलिंग, सूर्य-चंद्र आणि गाय-वासराच्या आकृती कोरलेल्या आहेत. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत येते पण म्हणावी तशी निगा राखली जात नाहीये.

मंदिराची वास्तुकला खजुराहोच्या नागर मंदिरांच्या धर्तीवर आहे. गर्भगृह, अर्धमंडप आणि मंडपामध्ये मंदिर विभागलेले आहे. उंच जगतीवर उभारलेल्या या मंदिराचे शिखर ७० फूट उंच आहे. पुढचा मंडप अष्टकोनी आहे. गर्भगृहात भगवान विष्णूची भग्न झालेली मूर्ती आहे. हे मंदिर कित्येक वर्षे भग्नावस्थेत होते. मंदिराचा पुढचा मंडप पाडण्यात आला होता. अशी आख्यायिका आहे की बस्तरच्या एका राजाने पुढे गुप्तधनाच्या लोभात मंदिराचा मंडप पाडला होता. या मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. आज हे मंदिर काही प्रमाणात त्याच्या मूळ स्वरूपात परत उभे राहिले आहे.

आकाराने छोटे असले तरी अतिशय प्रमाणबद्ध असे हे मंदिर आहे. मंदिराचे विमान सप्तरथ पद्धतीचे आहे, म्हणजे त्याचे उभे सात भाग पाडलेले आहेत. अष्टकोनी सभामंडपाचे छत फंसणा पद्धतीचे आहे. दुर्दैवाने मंदिराच्या भिंतीवरची सर्व देवकोष्ठे रिकामी आहेत. फक्त एकामध्ये श्री गणेशाची सुंदर उभी मूर्ती आहे. शिखर अत्यंत सुंदर आणि सुबक अशा नाजूक नक्षीने नटलेले आहे, वर आमलक आहे. गर्भगृहात जी श्रीविष्णूची मूर्ती आहे तिच्या हातात सुदर्शन चक्राबरोबरच नागवंशी राजवंशाचे प्रतीक म्हणून एक नागही दाखवलेला आहे. सभामंडपाचे छत आतून लहान लहान होत जाणाऱ्या दगडी वर्तुळांनी सुशोभित केलेले आहे. मुळात बस्तरला फार कमी पर्यटक भेट देतात, त्यातही या मंदिरात त्याहूनही कमी लोक जातात, त्यामुळे इथला परिसर अत्यंत स्वच्छ, रमणीय आणि शांत आहे. लोकांच्या वर्दळीपासून दूर असलेले हे हजार वर्षे जुने मंदिर आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. आजकाल जगदलपूरला विमानतळ झाल्यामुळे या मंदिराला आणि बस्तरला भेट देणे पूर्वी होते तितके कठीण राहिलेले नाही. मुद्दाम भेट द्यावे असे हे आगळे वेगळे विष्णू मंदिर म्हणजे बस्तरची शान आहे.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

लाल विटांचं सिरपूरचं लक्ष्मणमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

छत्तीसगड म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते ती तिथली आदिवासी संस्कृती, निसर्ग सौंदर्य आणि घनदाट जंगले. पण आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की भारतातले सर्वांत जुने विटांनी घडलेले मंदिर छत्तीसगड राज्यात सिरपूर येथे आहे? रायपूर जवळील महासमुंद जिल्ह्यात महानदीच्या तीरावर सिरपूर हे आजचे छोटे गांव प्राचीन काळी श्रीपूर म्हणून ओळखले जात असे. महाकोसल राज्याची वैभवसंपन्न राजधानी होती श्रीपूर. श्रीपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आजही तिथल्या प्राचीन इतिहासाच्या खुणा पदोपदी सापडतात. यातील एक प्रमुख ठिकाण म्हणजे सिरपूरचे लक्ष्मण मंदिर.

हे मंदिर देशात सापडलेले सर्वांत जुने लाल विटांनी बांधलेले मंदिर आहे असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दीड हजार वर्षांहूनही जास्त जुने असलेले हे मंदिर भूकंप, पूर, विध्वंसक इस्लामी आक्रमणे आदी अनेक विनाशकारी आपत्तींना तोंड देऊनही भक्कम उभे आहे.

प्रख्यात कला इतिहासकार आनंद कुमारस्वामी यांच्या मतानुसार सिरपूरचे लक्ष्मण मंदिर इसवीसन ५२५ ते ५४० च्या दरम्यान बांधले गेले. श्रीपूर येथे एकेकाळी महाकोसलवर राज्य करणाऱ्या सोमवंशी राजांचे राज्य होते. हे राजे शैव होते. या शैव राजांपैकी एक राजा होता सोमवंशी हर्षगुप्त. पण त्याची पत्नी राणी वस्तादेवी ही मगध राजा सूर्यवर्मा यांची मुलगी परम विष्णुभक्त होती. राजा हर्षगुप्ताच्या मृत्यूनंतर राणीने आपल्या पतीच्या आठवणीसाठी हे मंदिर बांधले. ती सती गेली नाही की विधवा म्हणून रडतही बसली नाही. आपल्या मुलाच्या नावाने तिने काही वर्षे राज्यकारभार चालवला आणि हे भव्य, सुंदर मंदिर बांधवून घेतले. तेही दीड हजार वर्षांपूर्वी. हिंदू स्त्रीला पती निधनानंतर समाजात काहीच अधिकार नव्हते म्हणणाऱ्या लोकांना दुर्दैवाने अशा गोष्टी दिसत नाहीत!

उत्तरभारतात प्रचलित असलेल्या नागर शैलीत बांधलेले हे मंदिर भारतातील पहिले लाल विटांनी बांधलेले मंदिर मानले जाते. लक्ष्मण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात विटांवर कोरून नाजूक कलाकृती बनवल्या गेल्या आहेत, ज्या अतिशय सुंदर आहेत. सामान्यतः अशी सुंदर कोरीवकामे दगडावरच केली जातात कारण दगड हे एक कठीण आणि टिकाऊ असे माध्यम असते. भाजलेली वीट मऊ आणि ठिसूळ असते. कोरीव काम करताना सहज तुटू शकते. पण सिरपूरच्या लक्ष्मण मंदिरावरचे कोरीव काम अत्यंत सुंदर आणि रेखीव आहे.

सामान्यतः नागर मंदिरात असतात तसे गर्भगृह, अंतराळ आणि सभा मंडप हे लक्ष्मण मंदिराच्या रचनेचे मुख्य भाग होते. दुर्दैवाने आता सभामंडप उध्वस्त झालेला आहे. अंतराळ आणि गर्भगृह शाबूत आहेत. विशेष म्हणजे मंदिर लाल विटांचे असले तरी खालचा चौथरा हा वोल्कॅनिक बॅसाल्ट म्हणजे जांभ्या दगडात उभारलेला आहे. हा दगड ह्या भागात मिळत नाही. तो ओडिशातून महानदी मार्गे गलबतांमधून आणला गेला असावा असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे मत आहे.

या मंदिराच्या गर्भगृहाची पूर्ण दगडी द्वारशाखा हे ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य आहे. द्वारशाखेवरच्या ललाटपट्टावर शेषशायी भगवान विष्णुची अप्रतिम मूर्ती कोरलेली आहे. ब्रह्मा मूर्तीच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान आहे. देवी लक्ष्मी भगवान विष्णुच्या चरणी बसलेली आहे. या ललाटपट्टावरून असे वाटते की आज जरी या मंदिराला लक्ष्मण मंदिर म्हणून ओळखत असले तरी हे एकेकाळी श्रीविष्णुचे मंदिर असावे. येथे उत्खननात सापडलेली श्रीविष्णुची एक भग्नावस्थेतीतली एक अत्यंत सुंदर मूर्ती शेजारच्याच म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ती मूर्ती एकेकाळी या गर्भगृहात असली पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. द्वारशाखेवर एका बाजूला भगवान विष्णुचे दशावतार चित्रित केले गेले आहेत. सध्या गर्भगृहामध्ये जी मूर्ती आहे ती लक्ष्मणाची मानली जाते. ही मूर्ती पाच मस्तके असलेल्या शेषनागावर विराजमान आहे.

सिरपूरचे लक्ष्मण मंदिर पारौली आणि भितरगावच्या गुप्त मंदिरांच्या परंपरेतील मानले जाते. १९५४ आणि १९७७ च्या उत्खननात, नंतरच्या गुप्त काळातील मंदिरांचे अवशेषही सिरपूर येथे सापडले आहेत. सिरपूरचे वर्णन करणारा उल्लेख ताम्रपट्ट जवळच्याच राजीम येथे उत्खननात सापडला आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, पुढे बाराव्या शतकात सिरपूरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने तत्कालीन श्रीपूरचे संपूर्ण वैभव हिरावून घेतले. या भूकंपात संपूर्ण श्रीपूर नष्ट झाले पण हे लक्ष्मण मंदिर होते तसेच राहिले. पण त्यानंतर तेराव्या शतकाच्या दरम्यान, महानदीच्या भयंकर पूराने सिरपूरमध्ये हाहाकार केला.

पुढे चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला हे शहर वारंगलच्या काकतीय राज्याच्या हद्दीत वसले होते. पण १३१० मध्ये, जेव्हा अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने आपल्या सैन्यासह दक्षिणेवर स्वारी करून तिथल्या देवस्थानांचा विध्वंस केला तेव्हा सिरपूरवरही हल्ला करून तिथली मंदिरे आणि बौद्धविहार त्याने उध्वस्त केले असे अमीर खुसराऊ याने आपल्या बखरीत नमूद केले आहे. या सर्व विनाशकारी आपत्तींमुळे सिरपूरची अनेक मंदिरे आणि देवस्थाने तोडली गेली आणि पुढे अनेकदा महानदीला आलेल्या पुरात त्यांचे अवशेष मातीत बुडून गेले, आणि सिरपूर हळूहळू लोकांच्या विस्मृतीत गेले. १९७७ मध्ये झालेल्या उत्खननात छत्तीसगडचे नावाजलेले पुरातत्व शास्त्रज्ञ अरुण कुमार शर्मा ह्यांनी इथली बरीच नवी मंदिरे शोधून काढली. आज सिरपूर मध्ये पाहण्यासारखे खूप आहे. सिरपूर रायपूर विमानतळापासून पंचाहत्तर किमी अंतरावर आहे. पूर्ण दिवस इथली विविध मंदिरे, बौद्ध विहार आणि इतर पुरातन अवशेष बघताना कसा जातो तेच कळत नाही.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत. )

शिवरीनारायण मंदिर : निरपेक्ष भक्तीचं प्रतीक

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

shivrinarayan templesakal

छत्तीसगड राज्यातील प्रसिद्धीच्या प्रकाशझोताबाहेर असलेली मंदिरे गेले दोन आठवडे आपण बघत आहोत. ह्या शृंखलंतलं शेवटचे मंदिर म्हणजे छत्तीसगडची राजधानी रायपूरहून फक्त १२० किलोमीटरवर असलेले शिवरीनारायण मंदिर. महानदी, शिवनाथ आणि जोंक ह्या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेले शिवरीनारायण हे छोटेसं शहर छत्तीसगडचे प्रयाग म्हणून ओळखले जाते. दरवर्षी माघ महिन्यात इथं मोठी जत्रा भरते आणि पार ओडिशापासून हजारो भाविक हिंदू येथे श्री नारायणाचे दर्शन घ्यायला येतात. स्कंद पुराणात ह्या क्षेत्राला श्री पुरुषोत्तम क्षेत्र असेही म्हटलेले आहे. विटांनी बांधून वर शुभ्र चुन्याचा लेप दिलेले इथले शिवरीनारायण मंदिर निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खूप खुलून दिसते.

त्रिवेणी संगमावर एकेकाळी मातंग ऋषींचा आश्रम होता असे मानले जाते. भक्त माता शबरी त्यांची शिष्या. ती या प्रदेशाचा आदिवासी राजा शबर ह्याची मुलगी होती आणि लहानपणापासूनच विष्णू भक्त होती. राजा शबरला शबरीचे लग्न करायचे होते. पण शबरीला लग्न करायचे नव्हते. एक दिवस ती राजवाडा सोडून मातंग ऋषींच्या आश्रमात गेली. आपला देह ठेवताना मातंग ऋषीनी शबरीला सांगितले की श्री विष्णूंचा अवतार श्रीराम अयोध्येत जन्मणार आहे आणि तो एक दिवस या आश्रमात येईल. त्या आशेवर शबरी आपले जीवन कंठीत राहिली. वर्षे उलटत गेली. इतर शिष्य आश्रम सोडून गेले. शबरी वृद्ध झाली पण कधीतरी श्रीरामांचे सावळे चरण आपल्या आश्रमाला लागतील ह्या आशेवर शबरी तिथे एकटीच राहिली. शेवटी भगवान राम, माता सीतेच्या शोधात जंगलातून भटकत असताना माता शबरीच्या कुटीत आले. भुकेल्या रामलक्ष्मणांना शबरीनें वडाच्या पानांच्या द्रोणातून बोरं खायला दिली, पण बोरात कीड असेल ह्या भीतीने प्रत्येक बोर चाखून तिने चांगली तीच बोरे श्रीरामाला दिली आणि भक्तीने ओथंबलेली शबरीची उष्टी बोरे खाऊन श्रीराम तृप्त झाले ही रामायणातील कथा आपण सर्वांनीच ऐकलेली आहे. तो प्रसंग जिथे घडला ते हे ठिकाण. अगदी आजही मंदिराच्या बाहेर वडाचे एक असे झाड आहे ज्याची पाने निसर्गतःच द्रोणासारखी आहेत! लोक मोठ्या आदराने या झाडाची पूजा करतात आणि त्याची पाने प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. या झाडाला कृष्णवट आणि माखन कटोरी वृक्ष असेही संबोधले जाते.

आज शिवरीनारायणाचे जे मंदिर आपल्याला दिसते ते अनेक जीर्णोध्दार झाल्यानंतरचे स्वरूप आहे. १७२ फूट उंचीचे नागर पद्धतीचे शिखर असलेले हे मंदिर कलचुरी कालीन स्थापत्य कलेचा नमुना मानले जाते. मंदिराच्या सभामंडपात डाव्या हाताला आठव्या शतकातील गरुडारूढ लक्ष्मी-नारायणाची काळ्या पाषाणातली एक अत्यंत सुंदर, भव्य मूर्ती भिंतीत बसवलेली आहे. गरुडाच्या चेहेऱ्यावरचा कृतार्थ भक्तीचा भाव साकारण्यात शिल्पकार कमालीचा यशस्वी झालेला आहे. मंदिराच्या गर्भगृहाबाहेरची द्वारशाखा म्हणजे कलचुरी कालीन मंदिर स्थापत्याचा एक उत्तम नमुना आहे. द्वारशाखेवर नागमंडळे कोरलेली आहेत तसेच गंगा-यमुना आणि श्री विष्णूचे आयुधपुरुष म्हणजे शंख पुरुष व चक्र पुरुष ह्यांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. गर्भगृहात दोन मूर्ती आहेत, काही लोक ह्या मूर्ती राम आणि लक्ष्मण ह्यांच्या आहेत असे मानतात तर काही लोक नर आणि नारायण यांच्या. मूर्तीच्या पायाखाली निर्मळ, गोड पाण्याचे एक कुंड आहे जे अक्षय्य आहे. त्याला रोहिणी कुंड असे नाव आहे.

मुख्य मंदिराच्या परिसरातच केशव नारायणाचे छोटे मंदिर आहे ज्याची द्वारशाखाही आठव्या-नवव्या शतकातली असून अत्यंत देखणी आहे. द्वारशाखेवर श्रीविष्णूंच्या चोवीस अवस्थिती जसे केशव , माधव, नारायण इत्यादी कोरलेले आहेत. आकाराने छोट्या पण अत्यंत सुरेख अशा गंगा यमुनाही द्वारशाखेवर आहेत. ललाटबिंबावर मात्र शिव आहेत. जवळच कलचुरी कालीन शिलालेख आहे. काळाच्या ओघात अनेकदा जीर्णोद्धार झाल्यामुळे मुख्य मंदिर आता बऱ्यापैकी आधुनिक झाले आहे, पण इथल्या आठव्या शतकातल्या द्वारशाखा आणि लक्ष्मी नारायणाची सुंदर गरूढारूढ मूर्ती मुद्दाम जाऊन बघण्यासारखी आहे.

शिवरीनारायण मंदिर आणि ओडिशामधल्या जगन्नाथपुरीचे जगन्नाथ मंदिर ह्यांचा खूप जवळचा संबंध मानला जातो. असे म्हणतात की नीलमाधव हा मूळचा इथल्या शबरांचा देव. पुढे त्याची स्थापना पुरीमध्ये केली गेली. चौदाव्या शतकातील ओडिया कवी श्री सरलादास यांनी आपल्या जगन्नाथावरच्या काव्यात असा उल्लेख केलेला आहे की श्री जगन्नाथाची मूर्ती शबरीनारायण इथून महानदीमार्गे ओडिशा इथे नेण्यात आली. आजही बरेच भाविक असे मानतात की रथयात्रेच्या काळात जेव्हा पुरीचे जगन्नाथ मंदिर दर्शनासाठी बंद असते तेव्हा त्यांचा निवास शिवरीनारायण येथे गुप्त स्वरूपात असतो.

(सदराच्या लेखिका मंदिर स्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

आधी कळस, मग पाया रे

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

‘राउळी मंदिरी’ या सदरात आतापर्यंत आपण देशभरातली अनेक मंदिरं पाहिली; पण दीपावलीनंतरच्या या आठवड्यात आपण बघणार आहोत ते मंदिर म्हणजे भारतीय शिल्पकलेचा मुकुटमणी, महाराष्ट्राचा शिल्पगौरव, वेरूळचं एका अखंड पाषाणात कोरून काढलेलं कैलासलेणं. ‘गुंफा क्रमांक सोळा’ या गद्य नावानं कैलासलेण्याची कागदोपत्री नोंद असली तरी हे पूर्ण तीनमजली मंदिर आहे. ते एकाच महाकाय पाषाणखंडातून कोरून काढलेलं असल्यामुळे हे संपूर्ण मंदिर म्हणजे एकसंध असं अद्वितीय शिल्पदेखील आहे. वेरूळच्या लेण्यामध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू अशा तिन्ही भारतीय धर्मपंथांची लेणी आहेत; पण या सर्व लेण्यांच्या सुंदर हाराच्या मधोमध असलेलं कैलासलेणं हे त्या हारातलं रत्नजडित सुवर्णपदक आहे.

राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत सातव्या शतकात वेरूळमध्ये काही हिंदू लेण्या कोरण्यात आल्या होत्या. कदाचित त्याच वेळी या ठिकाणी शिवमंदिर कोरायचा बेत आखला गेलेला असेल; पण दंतिदुर्गाच्या मृत्यूनंतर त्याचा काका, कृष्ण पहिला हा गादीवर आला. हा राजा महापराक्रमी होता. त्याच्या कारकीर्दीत त्यानं बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव या दोन्ही राजघराण्यांना राष्ट्रकूटांचं मांडलिकत्व स्वीकारायला भाग पाडलं होतं. असं म्हणतात की, कृष्णराजा कांचीच्या स्वारीवर गेलेला असताना त्यानं आणि त्याच्या राणीनं, म्हणजे माणकावतीनं, तिथं पल्लवांनी पाचव्या शतकात बांधलेलं कैलासनाथाचं भव्य मंदिर पाहिलं आणि त्या मंदिरानं भारावून जाऊन, असंच भव्य मंदिर आपल्याही राज्यात बांधून घ्यावं असा त्यांनी संकल्प केला. कांचीच्या कैलासनाथमंदिराचाच आदर्श डोळ्यापुढं ठेवून चालुक्यांची राणी लोकमहादेवी हिनं बदामीजवळच्या पट्टडक्कल इथं आपल्या नवऱ्याच्या नावानं भव्य असं विरुपाक्षमंदिर उभारलं होतं. तिथं काम करणारे शिल्पकार तिनं खास कांचीहून बोलावलेले होते. कृष्णराजानं बहुतेक त्याच शिल्पकारांकडून वेरूळचं कैलासलेणं खोदून घेतलं असावं. कारण, कैलासलेण्याच्या शिल्पशैलीवर पल्लव व चालुक्य या शिल्पशैलींचा स्पष्ट प्रभाव आहे.

‘आधी कळस, मग पाया रे’ अशा स्वरूपात खोदण्यात आलेल्या या भव्य शैलमंदिराचा मूळ गाभारा राजा कृष्णराजाच्या कारकीर्दीत पूर्ण होऊन इथली प्राणप्रतिष्ठा झाली होती; पण त्यानंतरच्या राजांच्या काळातही या मंदिराचं काम सुरूच होतं. मुख्य मंदिराभोवतीच्या शिल्पमंडित ओवऱ्या, सरितामंदिर, लंकेश्वरलेणं, यज्ञशाळा, तसंच मातृकामंदिर हे भाग नंतर खोदण्यात आले.

राष्ट्रकूट राजांच्या अनेक पिढ्यांची धर्मभावना, दातृत्व आणि कलादृष्टी यातून कैलासनाथाचं हे सुंदर शैलमंदिर साकार झालं.

शिल्पकारांच्या अनेक पिढ्या या कामात खपल्या; पण इतकं भव्य-दिव्य काम करूनदेखील त्यांनी कुठंही आपली नावं या मंदिरात कोरून ठेवलेली नाहीत. ‘इदं न मम’ ही उदात्त धर्मभावना असल्याशिवाय असलं अलौकिक काम कुठल्याही माणसाच्या हातून घडणंच शक्य नाही.

शिखरापासून सुरुवात करून खालपर्यंतचे तीन मजले कोरत आणणं - तेही अधिष्ठान, नंदीमंडप, अंतराळ, रंगमंडप, गर्भगृह, प्रदक्षिणापथ, द्रविडशिखर या सर्व मंदिर वैशिष्ट्यांसकट - हे सोपं काम नव्हे. त्यासाठी निव्वळ कलादृष्टीच नव्हे तर मंदिरस्थापत्याची कल्पना, ज्या माध्यमामधून हे काम केलं जात होतं त्या माध्यमावरची- म्हणजे सह्याद्रीच्या ज्वालामुखीजन्य दगडावरची, पकड आणि पूर्ण झाल्यानंतर मंदिर कसं दिसणार आहे त्याचा काल्पनिक आराखडा या सर्व गोष्टी नितांत आवश्यक होत्या.

दगड हे माध्यम तसं अक्षमाशील! एक छोटी चूक जरी झाली तरी ती दुरुस्त करता येण्यासारखी नव्हे. त्यातही सह्याद्रीचा हा व्होल्कॅनिक अग्निजन्य खडक कोरायला सोपा नव्हे. तरीही आठव्या शतकात आपल्याकडे हे आव्हान स्वीकारणारे शिल्पकार होते आणि त्यांनी हे काम करून दाखवलं.

आधी डोंगराच्या उतरत्या कडेला इंग्लिश ‘यू’ या अक्षराच्या आकाराचा एक मोठा चर खणून गोपूर आणि मुख्य मंदिरासाठी आवश्यक तेवढा मोठा पाषाणखंड मुख्य डोंगरापासून विलग केला गेला. हा चर थोडाथोडका नव्हे तर, तीस मीटर रुंद आणि तितकाच खोल होता. असं म्हटलं जातं की, हा चर खोदताना जवळजवळ २५०,००० टन दगड-माती खोदून काढावी लागली. त्या एवढ्या मातीचं काय झालं असेल हे आजही पुरातत्त्वज्ञांना न उलगडलेलं कोडं आहे. चर खोदून झाल्यानंतर मधोमध असलेल्या ६० मीटर लांब व ३० मीटर रुंद अशा महाकाय दगडातून मुख्य कैलासनाथमंदिराची इमारत कोरली गेली. चौकोनी गाभारा, वर द्रविडपद्धतीचे शिकार, आत प्रचंड मोठं शिवलिंग, गाभाऱ्याच्या बाहेर उघडा प्रदक्षिणापथ आणि त्याला लागून पंचायतनाची पाच छोटी मंदिरं, गाभाऱ्याबाहेर विस्तीर्ण रंगमंडप, त्या रंगमंडपाला तोलून धरणारे घटपल्लवयुक्त चौकोनी खांब व सभामंडपासमोर थोड्या अंतरावर असलेला नंदीमंडप व दोन्ही मंडपांना जोडण्यासाठी खोदलेला दगडाचाच पूल ही कैलासनाथ शिल्पमंदिराची वैशिष्ट्यं. मंदिराच्या वास्तूचा सबंध तळमजला हा भरीव प्रस्तरखंड आहे. मंदिराचं अधिष्ठान किंवा जगती चांगली पुरुषभर उंच आहे. ती जगती तोलून धरण्यासाठी शौर्य आणि शक्ती यांचं प्रतीक म्हणून हत्ती, सिंह आणि व्याळ यांच्या प्रचंड मूर्ती खोदलेल्या आहेत. मंदिरातले स्तंभ, देवकोष्ठे, छपरं, विमान व शिखर या सर्वांवर पल्लव शिल्पशैलीची छाप आहे.

कैलासनाथमंदिराची ही मूळ वास्तूच इतकी देखणी, प्रमाणबद्ध आणि भव्य आहे की, मंदिराच्या बाह्य भिंतीवर एकही शिल्प कोरलेलं नसतं तरी या मंदिराच्या भव्यतेनं आपण दिपूनच गेलो असतो; पण आपले पूर्वज कलेच्या बाबतीत इतके अल्पसंतुष्ट नव्हते म्हणून त्यांनी मुळातच सुंदर असलेल्या मंदिराला उत्कृष्ट शिल्पकलेचा साज चढवलेला आहे.

कांचीच्या कैलासनाथमंदिराच्या भिंतीवर श्रीशिवशंकरांच्या मूर्तींचे जितके म्हणून विविध शिल्पाविष्कार कोरलेले आहेत, त्यांपैकी बहुतेक आपल्याला वेरूळच्या कैलासनाथ मंदिरातही आढळतात. पार्वतीशी विवाह करणारा कल्याणसुंदर शिव, मार्कंडेयाला यमपाशातून सोडवणारी मार्कंडेयानुग्रह मूर्ती, रावणाचं गर्वहरण करणारे शिव, कार्तिकेयासहित सोमस्कंदशिवमूर्ती, तांडव करणारी तांडवमूर्ती, अंधकासुराचा वध करणारे रौद्र शिव, त्रिपुरान्तकशिवमूर्ती वगैरे ‘शिवागम’ या ग्रंथांत वर्णिलेले शिवमूर्तींचे सर्व प्रकार या मंदिरात कोरलेले आहेत.

वेरूळचं हे कैलासलेणं माझं अत्यंत आवडतं. मी जवळजवळ पंधरा वेळा कैलासाचं दर्शन घेऊन आलेय. तरीही प्रत्येक वेळी वेरूळहून परत आल्यानंतर काही दिवस मला काहीच सुचत नाही. जे बघितलं, जे अनुभवलं ते कितीही प्रयत्न केला तरी शब्दांत उतरवता येत नाही. जिवाची खूप तडफड तडफड होते. स्वतःची तुटपुंजी शब्दसंपदा आणखीच दरिद्री, कळाहीन वाटायला लागते. तिथल्या कलाकारांच्या छिन्नी-हातोड्याच्या एकेक घावागणिक जीव ओवाळून टाकावा इतकं त्यांचं थोर कसब. एका प्रचंड प्रस्तरातून कोरून काढलेलं तीनमजली मंदिर, गर्भगृह, प्रदक्षिणापथ, दोन दोन सभा मंडप, दोन उत्तुंग विजयस्तंभ, दोन्ही बाजूंना असलेल्या दीर्घिका, प्रत्येक भिंतीवर कोरलेली अप्रतिम शिल्पं...किती किती आणि काय काय बघायचं? घरी परत आले तरी डोळ्यांसमोर दिसतात ती कैलासलेण्यांमधली शिल्पं; हाडा-मांसाची माणसं नव्हे. विख्यात मूर्तितज्ज्ञ आणि भारतीय स्थापत्यशास्त्रातील गुरू डॉ. गो. बं. देगलूरकरांच्या शब्दात सांगायचं तर, नुसते ‘शिल्पबंबाळ’ होऊन परततो आपण!

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

साधेपणातील सौंदर्य : केरळी मंदिरं

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

या साप्ताहिक सदरातून आपण आजवर भारतातली अनेक मंदिरं पाहिली. दक्षिण भारतातील द्रविडमंदिर स्थापत्यशैली, उत्तर भारतातील नागर स्थापत्यशैली आणि तिचेच दोन उपप्रकार, ओडिशा राज्यातील मंदिरशैली आणि गुजरात-राजस्थानमधील मरू-गुर्जर स्थापत्यशैली हेही प्रकार आपण बघितले; पण या सर्व मंदिरांहून वेगळी अशी केरळी स्थापत्यशैलीतील काही मंदिरं आपण पुढील दोन-तीन लेखांतून बघणार आहोत. मात्र, तत्पूर्वी केरळी मंदिर स्थापत्यशैलीची थोडक्यात ओळख करून घेणं गरजेचं आहे. कारण, केरळ राज्याला स्वतःची अशी एक विशिष्ट वास्तुकलेची परंपरा आहे.

केरळची मंदिरं, तसंच निवासासाठी बांधलेले राजवाडे, घरं इत्यादी वास्तू या साधेपणावर भर देणाऱ्या वास्तुशैलीची उदाहरणं आहेत. केरळ हे समुद्री राज्य. इथं पाऊस भरपूर. हवेत प्रचंड आर्द्रता आणि उष्णकटिबंधीय प्रदेश असल्यामुळे मुबलक झाडी आणि जंगलं. त्यामुळे केरळमध्ये चांगल्या प्रतीचं लाकूड सहज उपलब्ध व्हायचं. साहजिकच इथल्या मंदिरांमध्ये लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ‘थाचू शास्त्र’ हा केरळ मधला सुतारकामाचा आणि वास्तुशास्त्रावरचा प्राचीन ग्रंथ. इथली बरीच प्राचीन मंदिरं या ग्रंथानुसार बांधली गेली आहेत. ‘तंत्रसमुच्चयम्’, ‘शिल्पचंद्रिका’ आणि ‘मनुषालयचंद्रिका’ हे केरळमधील वास्तुशास्त्रावरील इतर काही प्रमुख प्राचीन ग्रंथ. या ग्रंथांत दिलेल्या पद्धतीनुसार केरळी वास्तुशास्त्र प्रगत झालं.

केरळी स्थापत्यशास्त्राचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, तिथल्या जोरदार पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आणि वास्तूच्या भिंतींचं संरक्षण करण्यासाठी बांधलेलं उंच, उतरतं, कौलारू छप्पर, ज्याला लाकडी वाशांचा आणि लाकडापासूनच बनवलेल्या चौकटीचा आधार दिला जातो. छताची चौकट ही भिंतींवर आणि खांबांवर उभी असते. वास्तूचा चौथरा किंवा जोते हे उष्णकटिबंधीय हवामानातील आर्द्रता, तसंच कीटक-साप यांच्यापासून संरक्षणासाठी जमिनीपासून चार-पाच फूट उंचीवर उभारलं जातं.

लॅटराइट किंवा लाल चिरा हा केरळच्या बहुतेक भागांत सहज आणि मुबलक आढळणारा दगड आहे. हा दगड सहजपणे कापता येतो, त्याचे घडीव चिरे बांधकामात वापरले जाऊ शकतात; पण ठिसूळ असल्यामुळे लॅटराइटवर कोरीव काम नीट होत नाही. त्यामुळे केरळी मंदिरांच्या भिंती या साध्या आणि अनलंकृत असतात. भिंतीवर घोटीव चुन्याचं प्लॅस्टर करून, कोरीव मूर्तींच्या ऐवजी वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून काढलेली केरळी म्यूरल्स म्हणजे भीत्तिचित्रं हे केरळी मंदिरांचं दुसरं वैशिष्ट्य.

केरळी मंदिरांचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे, अतिशय देखणं लाकडी कोरीव काम. केरळमध्ये शिसवी लाकडापासून ते सागवानापर्यंत अनेक प्रकारचं लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं, त्यामुळे लाकूड ही प्रमुख संरचनात्मक सामग्री वापरून अतिशय सुरेख मंदिरं बांधण्यात आली.

केरळी मंदिरप्राकाराचे ढोबळ मानानं चार भाग करता येतात. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, मंदिरप्राकाराच्या मध्यभागी असलेलं स्वतंत्र गर्भगृह किंवा श्रीकोविल, जिथं मंदिराच्या प्रमुख देवतेची मूर्ती स्थापित केलेली असते. केरळी मंदिरांचं श्रीकोविल ही एक स्वतंत्र वास्तू असते, ती कुठल्याही मंडपाशी जोडलेली नसते. श्रीकोविलला खिडक्या नसतात आणि फक्त एकच मोठा दरवाजा असतो, जो सहसा पूर्वाभिमुख असतो. क्वचित् कधी हा दरवाजा पश्चिमेकडे किंवा उत्तराभिमुख असतो; पण कोणत्याही मंदिरातील श्रीकोविल दक्षिणेकडे उघडत नाही.

श्रीकोविल सहसा उंच चौथऱ्यावर बांधलेलं असतं. ते आकारानं गोल, आयताकृती, चौरस किंवा गजपृष्ठाकार असू शकतं. आत प्रवेश करायला तीन, पाच, किंवा सात पायऱ्यांचा जिना असतो. या पायऱ्यांना सोपानपाडी म्हणतात आणि सोपानपाडीच्या दोन्ही बाजूंना द्वारपालकांच्या मोठ्या मूर्ती असतात. केरळच्या रीती-रिवाजानुसार, फक्त मुख्य पुजारी म्हणजे तंत्री आणि त्यांचे सहाय्यक म्हणजे मेलसांती हेच केवळ या पायऱ्या चढून श्रीकोविलमध्ये प्रवेश करू शकतात. श्रीकोविलमध्ये कधीही विजेचे दिवे असत नाहीत. आतली देवमूर्ती तुम्ही फक्त दोन्ही बाजूंच्या उंच समयांच्या मंद उजेडात बघू शकता. श्रीकोविल म्हणजे वास्तुपुरुषाचं हृदय आणि आतली मूर्ती हा त्याचा आत्मा ही त्यामागची संकल्पना.

मंदिराच्या बाह्य भिंतीमधील ओवऱ्या या चुटुंबलम् या नावानं ओळखल्या जातात. सामान्यतः या चुटुंबलम्‌मध्ये जो मुख्य मंडप असतो जो मुखमंडपम् म्हणून ओळखला जातो. मुखमंडपाच्या मध्यभागी ध्वजस्तंभ असतो. मंदिर मोठं असेल तर या चुटुंबलम्‌नं बंदिस्त केलेल्या प्राकाराच्या आत इतर दोन-तीन मंडप असू शकतात. त्यातला प्रमुख मंडप म्हणजे नृत्य, संगीत आणि धार्मिक गायनासाठी असलेला कुथंबलम् या नावानं ओळखला जाणारा रंगमंडप.

याशिवाय श्रीकोविलच्या मागच्या बाजूला; पण एकीकडे नमस्कारमंडप नावाचा चौकोनी आकाराचा मंडप असतो. या मंडपाचा उपयोग धार्मिक विधींसाठी केला जातो. त्याशिवाय मंदिराच्या प्रांगणात एक विहीर असते आणि मोठं मंदिर असेल तर अंबाल-कुलम् या नावानं ओळखली जाणारी पुष्करिणी. मंदिराच्या बंदिस्त प्रांगणाला नलंबलम् हे नाव आहे. या नलंबलम्‌च्या प्रवेशद्वाराजवळ बलिथरा नावाची चौकोनी आकाराची दगडी वेदी असते. या वेदीचा उपयोग अर्धदेवता आणि इतर आत्म्यांना धार्मिक हवी अर्पण करण्यासाठी केला जातो.

अशी ही केरळची आगळीवेगळी मंदिरं. चला तर मग, पुढचे दोन-तीन आठवडे या साध्या, तरीही अतिशय देखण्या अशा काही केरळी मंदिरांची ओळख करून घेऊ.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

मधुरच्या शिवमंदिराचं माधुर्य!

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

आज आपण ओळख करून घेणार आहोत ती एका अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य स्थळी असलेल्या अत्यंत देखण्या अशा केरळी स्थापत्यशैलीतल्या शिवमंदिराची. केरळच्या कासरगोड जिल्ह्यात मधुर या छोट्याशा गावात असलेलं हे मंदिर मला फार आवडतं. हे मंदिर जरी केरळ राज्यात असलं तरी कर्नाटकातल्या मंगळूर शहरापासून केवळ तासाभराच्या अंतरावर ते आहे. मधुरचं हे शिवमंदिर खरं तर शिव आणि श्रीगणेश अशा दोन देवतांना समर्पित आहे. केरळमधल्या कासारगोड शहरापासून फक्त आठ किलोमीटरवर असलेलं हे तीनमजली, गजपृष्ठाकार विमान असलेलं अनोखं मंदिर तिथल्या मधुवाहिनी नदीच्या काठावर वसलेलं आहे. इथं भगवान शिवांची उपासना मदनंतेश्वर या स्वरूपात केली जाते. असं मानलं जातं की, याच ठिकाणी भगवान शिवांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाचं, म्हणजेच मदनाचं, भस्म केलं. मदनाचा, म्हणजेच पर्यायानं सर्व वासनांचा अंत करणारा तो मदनंतेश्वर!

खास केरळी स्थापत्यशैलीतले, जांभा दगड, ग्रॅनाईट आणि उत्तम लाकडाचा सढळ हस्ते वापर करून बांधलेलं हे अत्यंत सुरेख मंदिर सर्वप्रथम दहाव्या शतकात जवळच्या कुंबलाच्या मायपाडी राजांनी बांधलं होतं. पुढं पंधराव्या शतकात त्याचा विस्तार करून त्याला सध्याचं स्वरूप दिलं गेलं. हे तीनमजली भव्य मंदिर केवळ भाविकांनाच आकर्षित करत नाही, तर देशोदेशीचे स्थापत्यकलेचे जाणकारदेखील या मंदिराकडे आकृष्ट होतात.

मधुरचं मदनंतेश्वर अत्यंत भव्य आणि प्रशस्त अशा चौरस प्राकारात बंदिस्त आहे. मंदिराचं श्रीकोविल म्हणजे गर्भगृह तीनमजली असून वरच्या दोन मजल्यांवर तांब्याचं छत आहे आणि सर्वात खालच्या मजल्यावर मंगळुरी कौलांचं उतरतं छप्पर आहे. केरळच्या या भागात होणाऱ्या अफाट पावसाला तोंड देण्यासाठी असं उतरतं छप्पर हवंच! श्रीकोविल गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पार्श्वभागाच्या आकारासारखं मागून गोलाकार आणि पुढून आयताकृती आहे.

मंदिराच्या आवारात असलेले अत्यंत गुंतागुंतीचे आणि नाजूक कोरीवकाम केलेले लाकडी खांब आणि मजबूत तुळया केरळी ‘थाचू शास्त्र’ या सुतारशास्त्रावरील प्राचीन ग्रंथानुसार घडवलेले आहेत. या खांबांवरील अप्रतिम कोरीव काम प्राचीन काळातील स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचं दर्शन आपल्याला घडवतं. मंदिराच्या भिंती आणि छप्पर भारतीय पौराणिक कथांमधील दृश्यं दर्शवणाऱ्या स्टुको प्रतिमांनी सजवलेलं आहे. मंदिराच्या मंडपाच्या छतावर अष्टदिक्पालांच्या अत्यंत सुरेख लाकडी प्रतिमा कोरलेल्या आहेत. श्रीकोविलजवळच्या नमस्कारमंडपाच्या भिंती रामायणातील दृश्यं दर्शवणाऱ्या लाकडी कोरीव कामांनी अलंकृत करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आवारात खोल विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत असं म्हणतात. जवळच दगडी पायऱ्यापायऱ्यांनी सुशोभित केलेली मोठी पुष्करिणी किंवा अंबाल-कुलम् आहे. मंदिराच्या आवारात म्हणजे चुटंबलम् मध्ये अनेक लहान-मोठे आयताकृती आणि चौरस आकाराचे मंडप आणि परिसरदेवतांची मंदिरं आहेत.

या मंदिराचा इतिहास अनेक स्थानिक शासकांशी, विशेषत: कुंबलाचा मायपाडी शासक, जयसिंह याच्याशी संबंधित आहे. म्हैसूरचा सुलतान टिपू यानं कासरगोडवर स्वारी करून इथली अनेक मंदिरं जमीनदोस्त केली, तेव्हा असं मानलं जातं की, याही मंदिराचा नाश करण्याच्या उद्देशानं टिपू आपल्या सैन्यासकट इथं आला होता; पण काही कारणामुळे त्यानं तो विचार बदलला. मात्र, मंदिरविध्वंसक ही आपली प्रतिमा जपण्यासाठी म्हणून त्यानं आपल्या तलवारीचा वार या मंदिराच्या छपरावर केला, तो आपण आजही बघू शकतो.

स्कंदपुराणातील एका कथेनुसार, हे मंदिर आधी भगवान शिवांचंच मंदिर होतं; परंतु शेकडो वर्षांपूर्वी एका पुजाऱ्याच्या धाकट्या मुलानं मंदिराच्या भिंतीवर गणेशाची मूर्ती रेखली; पण आधी द्विमिती चित्रस्वरूपात असलेल्या श्रीगणेशाच्या चित्राचं रूपांतर त्रिमिती मूर्तीत झालं आणि ती दिवसेंदिवस मोठी होत गेली. तेव्हापासून हे मंदिर गणेशाचं खास मंदिर बनलं आहे. स्थानिक लोकांचा या कथेवर प्रचंड विश्वास आहे.

मूडप्पा सेवा ही मधुरच्या मंदिरातील एक विशेष पूजा आहे आणि एक विधी आहे, ज्यात श्रीगणपतीची मोठी मूर्ती अप्पम् या खाद्यपदार्थानं सुशोभित करतात आणि नंतर प्रसाद म्हणून ते अप्पम् वाटले जातात.

इथं साजरा केला जाणारा प्रमुख सण म्हणजे गणेशचतुर्थी आणि वार्षिक जत्रोत्सव, जो ‘मधुर बेदी’ या नावानं प्रसिद्ध आहे. हा उत्सव पाच दिवसांचा असतो. काहीसं इंडोनेशियामधल्या निसर्गरम्य बाली बेटावर असलेल्या मंदिरांची आठवण करून देणारं हे मधुरचं नयनरम्य शिवमंदिर बघितलंच पाहिजे असं देखणं आहे. विशेष म्हणजे, इथली पूजाअर्चा पूर्णपणे तांत्रिक पद्धतीनं चालते. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ राखण्यात आलेला आहे. सन २०१८ मध्ये या मंदिराच्या रिस्टोरेशनचं काम सुरू झालं. मूळ सौंदर्याला कुठंही धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं या मंदिराचं काम सध्या सुरू आहे.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

त्रिपुरसुंदरी राजराजेश्वरी

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

आज आपण जे मंदिर बघणार आहोत ते जरी पूर्णपणे केरळी मंदिर स्थापत्यशैलीत बांधलेलं असलं तरी ते आहे मात्र आजच्या दक्षिण कर्नाटकात. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोळली या छोट्या गावात असलेलं हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे. या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराची मुख्य देवता श्रीराजराजेश्वरीसहित मंदिराच्या गर्भगृहातल्या सर्व मूर्ती एका विशिष्ट प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेल्या मातीपासून तयार केलेल्या आहेत आणि त्यांना रंग दिलेला आहे. सामान्यतः मंदिरांच्या गर्भगृहातील मूर्ती काष्ठ, पाषाण किंवा पंचधातूपासून बनवलेल्या असतात; पण हे मंदिर त्याला अपवाद आहे.

इथला इतिहास असं सांगतो की, देवी राजराजेश्वरीचं हे मंदिर सर्वप्रथम इसवीसनाच्या आठव्या शतकात या भागातला राजा सुरथ यानं बांधलं होतं. पुढं दक्षिण कन्नड प्रदेशावर राज्य करणाऱ्या अनेक राजवंशांनी त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार आणि विस्तार केला. काळाच्या ओघात या परिसरावर कदंब, चालुक्य, अलुपा, राष्ट्रकूट, होयसळ, विजयनगर, इक्केरी, म्हैसूर इत्यादी अनेक राजवंशांनी राज्य केलं आणि या सर्व राजवंशांनी या मंदिराला वेळोवेळी दानं दिली.

साधारणतः आठव्या शतकात या प्रदेशावर राज्य करणाऱ्या अलुपा राजघराण्यातील राजांची या मंदिरावर विशेष श्रद्धा होती. केळदीची शूर राणी चेन्नम्मा यांनीही या मंदिराला भेट दिली होती आणि मंदिराला भव्य रथ भेट दिला होता असे उल्लेख प्राचीन ताम्रपत्रात आहेत. इथली आराध्यदेवता श्रीराजराजेश्वरीची मूर्ती म्हणजे देवी श्रीललिता त्रिपुरसुंदरीचं दुसरं स्वरूप. मंदिरातली राजराजेश्वरीची मृण्मय मूर्ती जवळजवळ दहा फूट उंचीची असून तिच्या चेहऱ्यावरचे भाव अत्यंत आश्वासक आणि प्रसन्न करणारे आहेत. बाजूच्या गाभाऱ्यात श्रीभद्रकाली, श्रीसुब्रमण्यम आणि श्रीगणेश यांच्या तितक्याच भव्य मृण्मय मूर्ती आहेत. दर बारा वर्षांनी ‘लेपाष्ट गंध’ नावाच्या धार्मिक उत्सवात या सर्व मूर्तींचं आठ औषधी गुणधर्म असलेल्या विशेष मातीच्या मिश्रणानं पुनर्लेपन केलं जातं व परत रंग दिला जातो.

दक्षिण कर्नाटकामधील सर्व मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराच्या परिसरात राखण्यात येणारी कमालीची स्वच्छता आणि शांतता! एक कागदाचा कपटादेखील इथं तिथं टाकलेला दिसणार नाही. इतके भाविक रोज दर्शनाला येतात; पण कसलाही गलिच्छपणा नाही की गोंगाट नाही. मंदिरात आल्यावर जी प्रसन्नता आणि शांतता आपल्याला अपेक्षित असते ती इथं भरभरून लाभते. पोळलीचं हे राजराजेश्वरी मंदिरही तसंच आहे.

दक्षिण कर्नाटकाच्या सर्व मंदिरांत असतं तसं इथंही अखंड अन्नछत्र सुरू असतं. दुपारच्या वेळी मंदिराच्या परिसरात आलेली कुणीही व्यक्ती उपाशी राहत नाही. इथला वार्षिक रथोत्सवही फार प्रसिद्ध आहे. रथ अतिशय देखणा आणि नाजूक लाकडी कोरीव कामानं नटलेला आहे.

सध्या आपल्याला मंदिराची जी वास्तू दिसते ती जेमतेम सात वर्षं जुनी आहे; पण मंदिराचा जीर्णोद्धार करताना कुठंही पारंपरिक मंदिरस्थापत्याशी तडजोड केलेली नाही. मंदिराच्या श्रीकोविल, म्हणजे आतल्या गाभाऱ्याबाहेर, अत्यंत सुरेख लाकडी नक्षीकाम आहे आणि ते सर्व जवळच्याच कारकळानामक गावच्या कसबी स्थपतींनी पारंपरिक साधनं वापरून घडवलेलं आहे. मंदिराचं छत उंच आणि उतरतं असून अत्यंत सुरेख लाकडी कोरीव कामानं सजवलेलं आहे. छत तोलून धरणारे स्तंभ ग्रॅनाईटचे आहेत आणि त्यांच्यावरही अप्रतिम कोरीव काम आहे. भारतातल्या कुठल्याही प्राचीन मंदिराच्या तोडीस तोड असणारं हे कोरीव काम आहे. भारतात इतर ठिकाणी जीर्णोद्धाराच्या नावाखाली जुनी सुंदर दगडी मंदिरं पाडून तिथं काँक्रिटच्या कुरूप वास्तू उभारल्या जातात, त्या पार्श्वभूमीवर या मंदिराचा जीर्णोद्धार खरोखरच सुखावणारा आहे.

या मंदिराचं अजून एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे, इथं साजरा होणारा वार्षिक ‘पोळली चेंडू उत्सव’, जो ‘फुटबॉल उत्सव’ म्हणूनही ओळखला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात वापरला जाणारा चामड्याच्या चेंडू तयार करण्याचा मान जवळच्याच एका गावातल्या चर्मकार कुटुंबाकडे वंशपरंपरेनं दिला गेलेला आहे. पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी हा चेंडू आणि एक ताडपत्रीची छत्री मंदिराच्या गोपुरावर ठेवली जाते. श्रीराजराजेश्वरीची पूजा केल्यानंतर हा चेंडू वाजतगाजत जवळच्या मैदानात नेला जातो आणि खेळ सुरू होतो.

या खेळात गोल नसतो; पण चेंडू पायानं प्रतिस्पर्धी टीमच्या क्षेत्रात लोटायचा असतो. प्रतिवर्षी जवळजवळ पाचशे लोक या खेळात भाग घेतात! अशी अनोखी प्रथा दुसऱ्या कुठल्याही मंदिरात असल्याचं मला तरी माहीत नाही.

फाल्गुनी नदीच्या काठावर, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाळ तालुक्यात असलेलं हे अतिशय देखणं आणि भव्य मंदिर मंगळूर शहरापासून फक्त २० किलोमीटरवर आहे. माडांच्या रायांनी आणि हिरव्यागार भातशेतीनं वेढलेलं हे मंदिर एक वेगळीच मनःशांती देऊन जातं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

मरोलीचं सूर्यमंदिर

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

सूर्य, आदित्य, प्रभाकर, भास्कर, रात्रीचा अंधार संपवून प्रकाशाकडे नेणारा तारा, सर्व जीवनाचा आणि ऊर्जेचा स्रोत! सूर्य त्याच्या तेजस्वी रूपामुळे फार प्राचीन काळापासून मानवाला वंद्य वाटत आलेला आहे. केवळ भारतीयच नव्हे तर, जगभरातल्या अनेक प्राचीन संस्कृतींनी सूर्याला देवता मानून त्याची उपासना केलेली आहे. सदैव उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहणारा सूर्य हा प्रज्ञेचा, ऊर्जेचा स्रोत, तो सार्वभौम परोपकारी जीवनदाता अशी कृतज्ञतेची भावना सदैव मानवी मनात होती.

वैदिक साहित्यात सूर्याला सवितृ, विवस्वत्, पूषन् अशी विविध नामं दिलेली आहेत. ऋग्वेदात सूर्याला ‘विश्वाचा आत्मा’ म्हटलेलं आहे. सूर्योपासना भारतात फार प्राचीन काळापासून रूढ आहे. भारतात अनेक ठिकाणी भव्य सूर्यमंदिरं होती, त्यातली कोणार्क, मोढेरा आणि काश्मीरमधलं मार्तंडमंदिर तर आपण जाणतोच. दुर्दैवानं इस्लामी आक्रमकांनी या तिन्ही मंदिरांची तोडफोड केलेली आहे आणि या तिन्ही मंदिरांतली गर्भगृहं आज रिकामी आहेत व तिथं पूजा-अर्चा होत नाही; पण भारतात आजही अनेक ठिकाणी अशी सुंदर सूर्यमंदिरं आहेत जिथं आजही सूर्यनारायणाची उपासना होते. कुंभकोणमचं द्रविड शैलीतलं सूर्यनारायण मंदिर, कोकणातलं कशेळी इथलं खास कोकणी शैलीत बांधलेलं देखणं कनकादित्य मंदिर, बिहारमधील गया इथलं दक्षिणार्क आणि उत्तरार्क अशी दोन सूर्यमंदिरं आणि आज आपण ओळख करून घेणार आहोत ते कर्नाटकमधलं मंगळूरजवळचं मरोली इथलं सूर्यनारायणमंदिर...ही काही आवर्जून बघितलीच पाहिजेत अशी सध्या पूजेत असलेली प्रसिद्ध सूर्यमंदिरं.

एका कार्यक्रमासाठी नुकतीच मी मंगळूरला गेले होते. तिथं मला स्थानिक लोकांनी या मंदिराबद्दल सांगितलं. मंगळूरपासून जवळजवळ २२ किलोमीटरवरील मरोली या गावात असलेलं हे मंदिर खरोखरच अतिशय भव्य आणि सुंदर आहे. पूर्णपणे केरळी शैलीत बांधलेल्या या मंदिराच्या बाहेरच्या भिंती या भागात मुबलक मिळणाऱ्या लाल जांभ्या दगडाच्या म्हणजे एक्स्पोज्ड् लॅटेराईटच्या आहेत, तर आतली गर्भगृहं म्हणजे श्रीकोविल आणि त्यापुढचा नमस्कारमंडप पूर्णपणे काळ्या पाषाणाचा आहे. छत केरळी शैलीनुसार उंच, उतरतं आणि लाल मातीच्या कौलांनी शाकारलेलं आहे. छतावर आतल्या बाजूला निव्वळ अप्रतिम असं लाकडी कोरीव काम आहे.

मंदिराच्या बाहेर भव्य दीपस्तंभ आहे आणि त्याच्या पायथ्याशी काळ्या पाषाणात कोरलेले सूर्याच्या रथाचे सात घोडे आहेत. सप्ताहाच्या सात दिवसांचं प्रतीक असलेल्या या घोड्यांची नावं तरी किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत! गायत्री, वृहति, उष्णिक, जगती, त्रिष्टुप, अनुष्टुप आणि पंक्ति... सर्व संस्कृत काव्यछंदांची नावं असलेलं हे डौलदार अश्व मंदिरात आपलं स्वागत करतात.

मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभांवरदेखील दोन डौलदार अश्व कोरलेले आहेत. मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना पिंगल आणि दंड या सूर्याच्या दोन द्वारपालांच्या भव्य एकपाषाणी प्रतिमा भक्तांचं स्वागत करतात.

इथल्या स्थानिक जनतेचा असा विश्वास आहे की, मरोलीच्या या सूर्यमंदिराचा इतिहास बाराशे वर्षं जुना आहे...इथं एकेकाळी घनदाट तपोवन होतं आणि तिथं तपश्चर्या करणाऱ्या ऋषी-मुनींना एका प्रकाशवलयाचा दृष्टान्त झाला...ते प्रकाशवलय मूर्तिस्वरूपात बंदिस्त करून त्यांनी इथं सूर्यमूर्तीची स्थापना केली.

पुढं या भागात राज्य करणाऱ्या अनेक राजवंशांनी वेळोवेळी या सूर्यमंदिराचा विस्तार आणि जीर्णोद्धार केला.

मात्र, सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी राजाश्रयाअभावी या मंदिराची पडझड झाली होती. त्या काळी या भागातील एका जैन महिलेनं या मंदिराला परत ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आणि सप्ताहाच्या सात दिवसांचं प्रतीक म्हणून जवळच्या मरोली, पडवू, आलापे, बजल, कन्नूर, जेप्पू आणि कंकनडी या सात गावांच्या ग्रामसमूहातील लोकांनी मरोलीच्या सूर्यनारायणाला आपली कुलदेवता म्हणून स्वीकारलं. अगदी आजही या सात गावांमधले हिंदू कुठंही स्थायिक झाले तरी घरात काही शुभकार्य करण्यापूर्वी या मंदिरात संकल्प सोडतात.

या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच झालेला आहे. विशेष म्हणजे, प्राचीन मंदिरस्थापत्याशी कुठंही तडजोड न करता हा जीर्णोद्धार केला गेलेला आहे आणि हे सर्व काम करणारे विश्वकर्मा स्थपती जवळच्याच कारकला गावातील आहेत हे विशेष. मरोलीच्या या श्रीसूर्यनारायणमंदिरात मुख्य गर्भगृहात श्रीसूर्यनारायणाची स्थानक म्हणजे उभी मूर्ती आहे, मूर्तीच्या दोन्ही हातांत कमळं आहेत. मुख्य सन्निधीच्या बाजूला हरी, हर, ब्रह्मा आणि शक्ती यांची स्वतंत्र गर्भगृहं आहेत. संपूर्ण मंदिरपरिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे. मंदिरात एका वेगळ्याच शांततेची आणि समाधानाची अनुभूती येते. यापूर्वी कोणार्क आणि मोढेराच्या सूर्यमंदिरांचा आक्रमकांनी केलेला विध्वंस पाहून उद्विग्न झालेल्या माझ्या मनाला हे देखणं, पूजेत असलेलं भव्य, सुंदर आणि स्वच्छ सूर्यमंदिर पाहून एक वेगळीच शांतता लाभली.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

काशीचा कायाकल्प

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

प्राचीन भारतीय साहित्यात या काशीनगरीचा उल्लेख ‘काशी, ‘वाराणसी’, ‘अविमुक्ता’, ‘आनंदवन’, ‘महाश्मशान’, ‘व्याप्ती’ अशा अनेक नावांनी केला गेलेला आहे.

आजवर आपण ‘राउळी मंदिरी’ या सदरामधून भारतातल्या अनेक पुरातन मंदिरांची ओळख करून घेतली; पण आज परिचय करून घेणार आहोत तो अशा एका मंदिराचा, जे एकाच वेळी पुरातनही आहे आणि नित्यनूतनही. भारतातच काय पण; संपूर्ण जगात एकही असा हिंदू नसेल ज्यानं काशी शहर आणि तिथल्या भव्य काशी विश्वेश्वराचं नाव ऐकलं नसेल. आयुष्यात एकदा तरी काशीला जावं आणि विश्वेश्वराचं दर्शन घेऊन तिथलं गंगेचं पाणी तामिळनाडूमध्ये रामेश्वरी नेऊन तिथं त्या पाण्यानं शिवावर अभिषेक करावा, असं प्रत्येक भाविक हिंदू व्यक्तीला वाटतं.

काशीमध्ये असं काय आहे की, हजारो वर्षांपासून हिंदूंचा जीव काशीमध्ये अडकलेला आहे? तेरा डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये ३३९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पा’चं लोकार्पण केलं तेव्हा मी काशीमध्येच होते. जवळजवळ पाच लाख चौरस फूट विस्तार असलेल्या या प्रकल्पानं इंदूर संस्थानची राणी, देवी अहिल्याबाई होळकर यांनी १७८३ मध्ये बांधलेलं विश्वनाथाचं मंदिर थेट गंगाभिमुख केलं. काशी ही काशी आहे ती गंगा नदीमुळे. हिंदूंना सदैव पवित्र असलेली गंगा नदी काशीमध्ये एक खूप मोठं अर्धचंद्राकृती वळण घेते. तिच्या विस्तीर्ण पात्राच्या उत्तरेला, गंगेच्या डाव्या काठावर, वाराणसी वसलेलं आहे. फार प्राचीन काळापासून काशी ही एक पवित्र नगरी मानली गेलेली आहे.

प्राचीन भारतीय साहित्यात या काशीनगरीचा उल्लेख ‘काशी, ‘वाराणसी’, ‘अविमुक्ता’, ‘आनंदवन’, ‘महाश्मशान’, ‘व्याप्ती’ अशा अनेक नावांनी केला गेलेला आहे. रामायण, महाभारत, स्कंद, मत्स्य, पद्म आदी पुराणं, बौद्धजातकं, बृहत्संहिता या सर्व ग्रंथांमधून काशीनगरीचा उल्लेख ‘भगवान शिवांची नगरी’ असा आहे.

महाभारतातील एका कथेनुसार, काशीराज दिवोदास हा या काशीचा संस्थापक आहे. त्यानं इंद्राच्या आज्ञेवरून गंगेकाठी हे नगर वसवलं आणि भगवान शिवांना काशीमध्ये येऊन कायम राहायची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन शिव इथं आले आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की, प्रलय आला तरी काशी शिवांच्या त्रिशूळाच्या तीन टोकांवर सुरक्षित राहील, आणि इथं प्राणत्याग करणाऱ्या सर्वांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यापासून कायमची मुक्ती मिळेल.

साक्षात् भगवान शिव काशीत राहायला आल्यामुळे इतर देव-देवताही इथं वास्तव्याला आल्या आणि मंदिरं घडत गेली. फार प्राचीन काळापासून काशी हे संस्कृत, वेद, ज्योतिष, व्याकरण आदी अध्ययनाचे एक प्रमुख केंद्र होते. चिनी प्रवासी ह्यूएन त्संग जेव्हा काशीत आला तेव्हा, ‘आपल्याला शंभर भव्य हिंदू मंदिरं दिसली’ असं त्यानं लिहिलं आहे, तर जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ यानं अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केलेल्या पाहणीत त्याला जवळजवळ एक हजार मंदिरं आढळली. काशी हे अतिशय सुंदर, श्रीमंत आणि हिंदूंसाठी पवित्र असं शहर होते आणि त्यामुळेच काशीवर इस्लामी आक्रमकांची सतत वक्रदृष्टी राहिली.

काशी हे एक जनपददेखील होतं. ‘बौद्ध अंगुत्तर निकाय’ या ग्रंथात तत्कालीन भारतातील सोळा महाजनपदांमध्ये काशीची गणना होत होती. पुढं अकराव्या शतकात कनौजच्या गाहडवालवंशीय राजांनी वाराणसी इथं आपली उपराजधानी स्थापन केली. त्यांनी बाराव्या शतकात बांधलेलं वाराणसीजवळच्या कंदावा इथलं कर्दमेश्वर महादेव हे एकमेव असं मंदिर आहे, जे आक्रमकांच्या विध्वंसापासून वाचलं. ते मंदिर आजही मूळ स्वरूपात कंदावा इथं एका सुंदर पुष्करिणीशेजारी उभं आहे.

कनौजचा राजा जयचंद राज्यावर असताना मुहंमद घोरीनं काशीवर स्वारी करून तिथली मंदिरं तोडली, हिंदूंचं शिरकाण केले आणि प्रचंड लूट केली. हे काशीवर झालेलं पहिलं इस्लामी आक्रमण. पुढं दिल्लीच्या तख्तावर आलेला कुतबुद्दीन ऐबक आणि त्यानंतरचा इस्लामी शासक अलाउद्दीन खिलजी यांनीही काशीवर हल्ला करून इथली हजार मंदिरं नष्ट केली, त्यात काशीविश्वेश्वराचंही मंदिर होतंच. हिंदूंनी ते परत उभारलं, हुसेन शाह शार्की आणि सिकंदर लोदी यांनी परत ते उद्ध्वस्त केलं. हा विध्वंसाचा आणि पुनर्निर्मितीचा क्रम सुरूच राहिला; पण हिंदूंनी कधीही काशीवरचा आपला हक्क सोडला नाही. जितक्या वेळा मंदिर पाडलं गेलं तितक्या वेळा ते परत बांधलं गेलं.

पुढं अकबराच्या काळात त्याचा सेनापती मानसिंह यानं १५८५ मध्ये काशी विश्वनाथाचं भव्य मंदिर नव्यानं बांधलं; पण औरंगजेबानं १६६९ मध्ये ते मंदिर जमीनदोस्त करून त्या जागी मशीद बांधली आणि हिंदूंवर जिझिया कर लादला. तेव्हा भक्तांनी तिथलं शिवलिंग नजीकच्या ज्ञानवापी विहिरीत लपवलं. औरंगजेबानं मंदिराची एक भिंत जाणून-बुजून अर्धीच पाडून तीवर मशीद उभारली; जेणेकरून हिंदूंना हा अपमान सदैव लक्षात राहावा. त्या काळी मंदिराच्या जागेलाच श्रीविश्वेश्वर मानून भक्त नमस्कार, पिंडदान व प्रदक्षिणा करत असत. औरंगजेबानं वाराणसीचं नावही बदलून महंमदाबाद असं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजीमहाराजांना या घटनेनं अपरिमित दुःख झालं होतं. उत्तरेवर स्वारी करून हे मंदिर पुन्हा उभारावं अशी त्यांची खूप इच्छा होती; पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते शक्य झालं नाही.

पेशव्यांच्या राजवटीच्या वेळी अहिल्यादेवी होळकरांनी औरंगजेबकालीन मशीद न पाडता ज्ञानवापीतून शिवलिंग बाहेर काढून, सध्या अस्तित्वात आहे ते पंचमंडपयुक्त विश्वनाथाचं मंदिर सतराव्या शतकात बांधलं. पुढं १८३९ मध्ये महाराजा रणजितसिंगानं या मंदिराचं शिखर सोन्यानं मढवून दिलं. हे मंदिर भारतातल्या सर्व हिंदूंना आकर्षित करतं. सध्या आहे ते मंदिर आकारानं छोटंसंच असलं तरी त्याचं शिखर रेखीव असून त्यावर कलात्मक नक्षी आहे. मागेच श्रीतारकेश्वराचं तसंच एक मंदिर आहे आणि दोन्ही मंदिरांना जोडणारा एक स्तंभयुक्त छोटा सभामंडप आहे; पण या मंडपाचं इस्लामी घुमटाकृती शिखर मुख्य मंदिरशिखराशी विसंगत वाटतं.

पूर्वी हे मंदिर काशीच्या अगदी चिंचोळ्या, गजबजलेल्या गल्लीत होतं, त्यामुळे मंदिराचं स्थापत्य नीट दिसायचंच नाही. आजूबाजूला सर्वत्र अस्वच्छता होती. मंदिराबाहेर जेमतेम पन्नास माणसं उभी राहू शकतील इतकीच जागा होती. मंदिराच्या छोट्या आकारामुळे शेजारी असलेल्या औरंगजेबाच्या मशिदीचे घुमट डोळ्यांना जास्तच खुपायचे. आता मात्र मंदिरपरिसराचा पूर्ण कायापालट झालेला आहे. मंदिराभोवती बांधण्यात आलेल्या भव्य प्राकारामुळे मंदिर तर नीट बघता येतंच; पण हजारो लोक एकाच वेळी पूजा करू शकतात.

प्रत्येक भारतीयानं काशीला जाऊन हे मंदिर बघितलंच पाहिजे इतकं सुंदर आणि भव्य-दिव्य असं हे मंदिर आता दिसतं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

निरोप घेताना...

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

नमस्कार. ‘राउळी-मंदिरी’ या भारतीय मंदिरांवरच्या साप्ताहिक सदरातला हा शेवटचा लेख.

नमस्कार. ‘राउळी-मंदिरी’ या भारतीय मंदिरांवरच्या साप्ताहिक सदरातला हा शेवटचा लेख. गेलं वर्षभर मी दर आठवड्याला एक या क्रमानं प्राचीन भारतीय मंदिरांची ओळख सकाळच्या ‘सप्तरंग’ पुरवणीतून वाचकांना करून देत होते.

मंदिरस्थापत्याची भारतीय परंपरा फार जुनी आहे. दगडात कोरलेल्या भारतातल्या सर्वात प्राचीन लेणी आपल्याला आढळतात त्या इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकातील, आजीवक पंथाच्या; पण त्याचबरोबर वेळोवेळी उत्खननांत सापडलेल्या पुराव्यांवरून सुमारे बावीसशे वर्षांपूर्वीही आपल्याकडं हिंदुमंदिरं होती असं अनुमान काढता येतं.

मंदिरस्थापत्य या क्षेत्रातील माझे गुरू आणि मूर्तिशास्त्र या विषयावरचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मतानुसार, ‘मंदिरं आणि मूर्ती ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यं आहेत.’ मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मी भारतात आणि भारताबाहेरही जितकी फिरते तितकं मला हे मत जास्त जास्त पटत जातं.

गेल्या एकाच महिन्यात मी राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि तामिळनाडू या पांच राज्यांतली मंदिरं हिंडून बघितली. या मंदिरांचा इतिहास, त्यांचा आकार, त्यांचा तलविन्यास, तिथली शिल्पकला यांचा अभ्यास करताना जाणवतं की, या सर्व मंदिरांचं स्थापत्य, आकार, बांधकामसाहित्य, शैली हे सर्व वेगवेगळं असलं तरी या सर्व मंदिरांच्या निर्मितीमागं एकच तत्त्वज्ञान आणि धर्मविचार आहे. जिवाला शिवाकडं नेण्याचा विचार.

मध्य प्रदेशातल्या सांची इथला गुप्तकाळात बांधला गेलेला साधा चौकोनी गाभारा आणि पुढं दोन खांबांची ओवरी या अतिशय साध्या मंदिरापासून ते ‘दक्षिणमेरू’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या तंजावरच्या हजार वर्षं जुन्या, तेरामजली उंच शिखर असलेल्या द्रविडशैलीतल्या बृहदीश्वरमंदिरापर्यंत किंवा खजुराहोच्या नागरशैलीमधल्या अप्रतिम अशा लक्ष्मणमंदिरापर्यंत झालेला भारतीय मंदिरस्थापत्याचा प्रवास म्हणजेच भारतीय कला-विज्ञान-साहित्याचा प्रवास आहे; किंबहुना हा भारतीय संस्कृतीचाच मूर्त स्वरूपातला प्रवास आहे.

कुठल्याही परिपूर्ण मंदिराची - मग ते मोठं असो वा छोटं - सहसा गर्भगृह, त्यापुढं अनेक स्तंभांवर तोलून धरलेला सभामंडप, गर्भगृह आणि सभामंडप यांना जोडणाऱ्या छोट्या जागेत अंतराळ आणि मुख्य मंडपाबाहेर छोटा मुखमंडप अशी आडवी रचना असते. उभ्या रचनेचा विचार केला तर गर्भगृहाच्या वर मंदिराचं निमुळतं होत जाणारं उंच शिखर असतं. गर्भगृहासमोरील मंडपांवर एक तर सपाट छत असतं किंवा शिखर असलंच तर ते मुख्य शिखरापेक्षा साधारण निम्म्या उंचीचं असतं. त्यामुळे मंदिर आणि त्याचं उंच शिखर हे भाविकांना हिमालयाच्या एखाद्या उंच पर्वताप्रमाणे भासतं. मंदिर हा पृथ्वीतलावरील देवांचा प्रासाद असल्यामुळे मंदिराची वास्तू बघताना भाविकांना त्यात देवांचा निवास असलेल्या मेरूपर्वताचा किंवा भगवान शिवांचा वास असलेल्या कैलासपर्वताची प्रतिकृती दिसावी हा त्यामागचा धर्मविचार आहे.

मंदिर हे देवाचं आलय, आणि देवांचं स्थान हे मर्त्य मानवांपेक्षा वरचं, म्हणून मंदिराचं जोतं किंवा जगती उंच धरली जाते. मंदिरात प्रवेश करण्याआधी या पायऱ्या चढताना भक्तानं आपल्या क्षुद्र वासनांचा, रागा-लोभाचा त्याग करून स्वतःला आध्यात्मिकतेच्या वरच्या पायरीवर आणायचं असतं, म्हणून कामशिल्पं मंदिरात असली तरी सहसा बाहेरच्याच बाजूला असतात.

शिखर आणि गर्भगृहाच्या भिंती बाहेरून कितीही शिल्पमंडित असल्या तरीही गर्भगृह आतून मात्र अगदीच साधं आणि अनलंकृत असतं. अंधाऱ्या गर्भगृहात तेवता लामणदिवा आणि त्या दिव्याच्या सौम्य, मंद प्रकाशात दिसणारी मूर्ती किंवा शिवलिंग हे शरीराच्या अंतरात्म्याचं प्रतीक. त्याचं दर्शन करणं म्हणजे नुसतंच मूर्ती ‘बघून’ येणं नव्हे तर, पंचेंद्रियं एकवटून, एकाग्र चित्तानं त्या मूर्तीत असलेल्या ईश्वरी तत्त्‍वाचं ध्यान करणं आणि शेवटी तोच दैवी अंश आपल्यातही आहे याची अनुभूती घेणं हे खरं दर्शन.

मी जितकी प्राचीन मंदिरं पहिली त्या सर्व मंदिरांमध्ये मला हेच जाणवलं. आज या सदरातला हा शेवटचा लेख लिहिताना मला जाणवतंय की, भारतातल्या कितीतरी भागांत हजारो मंदिरं आहेत, ज्यांच्याबद्दल लिहायचं राहूनच गेलं. माझ्या गोव्यातली स्वच्छ, सुंदर मंदिरं - ज्यांनी सोळाव्या शतकात पोर्तुगीजांचा धर्मच्छळ सोसला - आधी होती त्यापेक्षाही भव्य स्वरूपात परत बांधली गेली...होयसळांची शिल्पमंडित मंदिरं, ज्यांच्याबद्दल कितीही लिहिलं तरी मनाचं समाधान होत नाही...चोळ, पल्लव आणि पांड्य राजांनी तामिळनाडूत बांधलेली देखणी मंदिरं, ज्यांच्यापैकी मोजक्याच मंदिरांवर मी या सदरात लिहिलं...बंगालची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं, उत्तराखंड आणि हिमाचलमधली अत्यंत देखणी, पहाडी शैलीतली काष्ठमंदिरं, नेपाळची मंदिरं, भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा अजूनही अभिमानानं अंगावर मिरवत असलेली आग्नेय आशियातली मंदिरं...भारतातलीच प्राचीन जैन आणि बौद्धमंदिरं...किती किती राहून गेलं!

या सदराला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. दर रविवारी मला सरासरी पंधरा ते वीस ई-मेल्स यायच्या. प्रत्येक ई-मेलमध्ये एक प्रश्न आवर्जून असायचा, ‘मंदिरांवरचं तुमचं पुस्तक प्रकाशित झालं आहे का?’ या शेवटच्या लेखात मला वाचकांना सांगायला अत्यंत आनंद होतोय की, या सदरातील लेखांमध्ये आणखी विस्तृत माहितीची आणि चांगल्या फोटोंची भर घालून या लेखांचं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. या सदरात प्रसिद्ध न झालेल्या अनेक मंदिरांचीही माहिती त्या पुस्तकात असेल. या सदराला ज्याप्रमाणे वाचकांचा भरभरून, उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसंच प्रेम त्या पुस्तकालाही लाभेल अशी आशा करते.

एखाद्या सुंदर क्षणाचा, अनुभवाचा, व्यक्तींचा, जागेचा, कशाचाही ठरवून निरोप घेणं फार अवघड असतं. कारण, त्या अनुभवानं आपल्याला खूप काही दिलेलं असतं, समृद्ध केलेलं असतं. या सदरानं मला खूप श्रीमंती दिली, अनुभवाची, भटकंतीची, ज्ञानाची, अभ्यासाची, लोकसंग्रहाची, वाचकांच्या प्रेमाची. त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. फार सुंदर प्रवास होता हा; पण कुठलाही प्रवास कधी ना कधी संपतोच.‘राउळी-मंदिरी’ या सदराचा प्रवास आज इथं संपतोय.

आता थांबते; पण ‘कधीतरी पुन्हा भेटूच’ या विश्वासासह!

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...