जानेवारीत
बातमी आली की महिला दिनानिमित्त १ मार्च ते ८ मार्च दरम्यान MTDC च्या
कोणत्याही रिसॉर्टमध्ये बुकिंग कारणाऱ्या महिलांना ५० टक्के सूट दिली
जाईल. निश्चित कोणा कोणाला सूट मिळेल ते बातमीतून समजत नव्हते. मंडळाकडे
चौकशी केली असता कळले कि ज्या महिलेच्या नावावर बुकिंग आहे तिच्या सोबत
पुरुष व्यक्तीही येऊ शकतात. अट मात्र अशी होती की जिच्या नावावर बुकिंग
आहे ती महिला हॉटेलमध्ये प्रवेश करते वेळी तेथे हजर असावी.
व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा होऊन आम्हा तीन मैत्रिणींच्या नांवे गणपतीपुळे आणि
हरी हरेश्वर या दोन ठिकाणी एक एक मुक्कामासाठी रुमही बुक झाल्या. तिघींचे
नवरे सोबत येणार होते. त्यामुळे सहलीचे नियोजन, गाडी, ड्रायव्हर, सामानाची
उचलठेव तसेच चुकांचे खापर फोडण्यासाठी हक्काची व्यक्ती अशा छोट्या मोठ्या
गोष्टींची आपोआप व्यवस्था झाली. एकंदरीत महिला दिन मजेत साजरा होणार होता.
असाच एक दीड महिना गेला आणि १ मार्चला परत चर्चा सुरु
झाली.गणपतीपुळ्यापर्यंत लांबचा प्रवास करून परत यायचे तर अजून एखादा
मुक्काम हवा. गोवा हायवेने प्रवास करत थेट रत्नागिरी गाठून पुढे
कशेळीपर्यंत जायचे ठरले. तेथे मुक्काम करून परतीच्या प्रवासात किनारपट्टीने
गणपतीपुळे व हरिहरेश्वर करायचे निश्चित झाले.
सहलीचा दिवस उजाडला. पहाटे साडेपाचलाच नव्या मुंबईतून प्रवास सुरु झाला.
आमच्या दोन चारचाकी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून निघून पळस्पे फाट्याजवळ गोवा
हायवेला लागणार होत्या. पण वडखळजवळ रस्ता खराब आहे असे समजल्याने पाली
मार्गे गोवा हायवेला पोहचायचे ठरले. गाड्या थोड्या मागे पुढे झाल्या तरी
पालीला पुन्हा एकत्र भेटायचे ठरवून प्रवास सुरु केला.
आज रहदारी खूपच कमी होती. अपेक्षेपेक्षा खूप लवकर रत्नागिरी ओलांडून पुढे
आलो. त्यामुळे कार्यक्रमात थोडा बदल करून पावसच्या नंतर समुद्रकिनारी
असलेला पूर्णगड बघायचे ठरले.
मुचकुंडी नदीच्या तीरावर खाडीच्या मुखाशी पूर्णगड गावाजवळ हा किल्ला आहे.
कान्होजी आंग्रेंच्या काळात इ.स. १७२४ मध्ये किल्ला बांधल्याचे समजते.
गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत गाड्या जातात पण किल्ल्याजवळ रस्ता कच्चा व
दगडगोट्यांचा असल्याने आम्ही थोड्या दूरच गाड्या लावल्या. चालायला सुरुवात
केली.रस्त्याच्या बाजूने आमराई व काजूच्या बागा होत्या.
पाच-सात मिनिट थोडा चढ चढून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहचलो. दरवाजाच्या आधी हनुमानाचे एक मंदिर आहे.
किल्ल्याचा लाकडी दरवाजा अलीकडचा असला तरी बाजूचे बांधकाम उत्तम स्तिथीत दिसते. दरवाजाच्या वरच्या भागात चंद्र, सूर्य व मध्ये गणेशाची प्रतिमा आहे.
दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस देवड्या आहेत.
देवड्या पार केल्यावर अजून एक दगडी कमान आहे. देवडीच्या बाजूने व कमानीच्या आतील बाजूने भिंतीवर फुल शिल्प दिसते.
किल्ल्याच्या आत बांधकामाची जोती दिसतात
किल्याच्या पश्चिम दरवाजा मार्गे समुद्राकडे जात येते. बाहेरून दिसणारा दरवाजा. दरवाजाच्या आतील एका बाजूस देवडी आहे.
किल्ल्याचा उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भागापेक्षा थोडा उंचीवर असून काही पायऱ्या चढून तेथे जाता येते. किल्ल्याचे बांधकाम जांभ्या दगडात आहे. किल्ल्याचे संवर्धन खूपच चांगल्या प्रकारे केल्याचे जाणवते.
वरच्या भागातून दिसणारी किल्ल्याची तटबंदी व सागरी परिसर
किल्ल्याच्या तटबंदीस बाहेरील बाजूने फेरी मारतांना
किल्ला बघून निघालो. पूर्णगड ला खडकाळ समुद्र किनारा आहे. तेथे थोडा वेळ थांबलो.समुद्र व गावखडी किनाऱ्यावरील सुरूचे बन खूप सुंदर दिसत होते.
मुचकुंडी नदीच्या एका तीरावर पूर्णगड तर दुसऱ्या तीरावर गावखडी गांव . दोन्ही तीरांना जोडणाऱ्या पुलाचे सुंदर दृष्य.
पूल ओलांडून कशेळी गावात पोहचलो. अजूनही सूर्यास्तास बराच वेळ होता.
त्यामुळे येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर 'कनकादित्य' पाहून घ्यायचे ठरले.कनक
म्हणजे सोने परंतु या नावाबद्दल एक वेगळीच कथा सांगितली जाते. गावात एक
कनका नावाची सूर्योपासक स्त्री होती. तिला मिळालेल्या दृष्टांतानुसार शोध
घेतला असता किनाऱ्यावरील घळीत (सध्याची देवघळ) मूर्ती आढळली. गावकर्यांनी
मूर्ती गावात आणून मंदिर स्थापन केले. कनका या स्त्रीच्या नावामुळेच
मंदिराला कनकेश्वर नाव मिळाले. मंदिराच्या विश्वस्थांकडे एक ताम्रपट आहे
असे समजते. त्यानुसार मंदिर ८०० वर्षांपेक्षाही जुने असल्याची नोंद मिळते.
मंदिराला दोन बाजुंनी प्रवेश द्वारे आहेत.
मंदिर प्रांगणाच्या बाजूने भिंत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आतल्या बाजूने दरवाजाच्या दोन्ही बाजूस दीपमाळा दिसतात.
मंदिराला जोडून भव्य लाकडी, कौलारू सभागृह आहे.
त्यामागे गाभाऱ्यात साधारण एक मीटर उंचीची काळ्या पाषाणात घडवलेली सूर्यदेवाची सुंदर मूर्ती आहे.
(फोटो घेऊ दिला नाही)
आवारात विहिरीचे पाणी काढण्यासाठी जुन्या काळातील व्यवस्था पाहण्यास मिळते . तिला 'कोटंब' म्हणतात असे समजले.
सूर्य अस्ताला जाण्याची वेळ होत आली होती. जवळच समुद्र किनारी असलेल्या कड्यावर पोहचलो. येथे येण्याआधी थोडी चौकशी करून आलो होतो. पूर्वी मुंबईस नोकरीला असलेले संदीप भाऊ लॉक डाऊनमध्ये गावी परतले. परत मुंबईस जाण्याऐवजी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी, राहण्यासाठी काहीतरी सोय करावी या हेतूने त्यांनी कड्यावरच एक स्टॉल/हॉटेल सुरु केले. सध्या ते एक पॅकेज देतात. त्यात चहा, नाश्ता, व्हेज/नॉनव्हेज जेवण व राहण्यासाठी तंबूची व्यवस्था करून देतात.
संदीप भाऊंनी स्वागत केले.. हॉटेलच्या बाजूलाच मोकळ्या जागेत गाड्या
लावल्या. व्ह्यू पॉइंटला पायऱ्या उतरून जायचे नसेल तर हॉटेलच्या मागेच
कड्याच्या खडकांहूनही सूर्यास्त चांगला दिसतो असे सांगिल्याने तेथेच
थांबायचे ठरवले. संदीपभाऊ चहा नाष्ट्याच्या तयारीला लागले.
कड्याचा वरचा भाग ते समुद्र किनारा याच्या साधारण मध्यावर व्ह्यू पॉईंट/टेबल पॉईंट आहे.
हळू हळू सूर्य अस्ताला जाऊ लागला. हातात चहाचा कप,सोबत गरमागरम कांदा भजी समोर दिसणारा सागरी किनारा आणि बुडत्या सूर्याचे विलोभनीय दृश्य .
येथे विजेची सोय नाही. सर्व काही चार्जिंगच्या दिव्यांवर. दिवसभरात
सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या संपत आल्या होत्या. संदीपभाऊ मोटारसायकलने
सगळयांचे मोबाइल व चार्जर घेऊन गावात त्यांच्या घरी जाऊन चार्जिंगला लावून
आले.
अंधार पडायला सुरुवात झाली. जेवणात व्हेज-नॉनव्हेज काय हवे ते विचारून
संदीप भाऊ व त्यांची पत्नी स्वयंपाकाला लागली. खडकांच्या बाजूलाच असलेल्या
सपाट जागेत चटई अंथरून तिघाही नवरोबांची बैठक सुरु झाली. आम्ही तिघीही
बाजूच्या खडकावर बसून, काजू-शेंगदाण्यांचा आस्वाद घेत त्यांच्या
गप्पांमध्ये सामील झालो. खाली खडकांवर आदळणाऱ्या लाटांचा आवाज आणि गार
वारा याच्या संगतीत एक दीड तास भर्रकन निघून गेला. संदीपभाऊंनी जेवणासाठी
आवाज दिला तेव्हा पटकन आवरून जेवायला आलो.
रात्री आमच्यासाठी टेन्ट लावून देण्यात आले. एका टेन्ट मध्ये चार जण
झोपू शकतात पण आमच्यासाठी स्वतंत्र तीन टेन्ट लावून मिळाले. सर्व दिवे
विझले. बाकीचे सगळे तंबूत झोपायला गेले. आम्ही दोघे मात्र थोडा वेळ बाहेरच
गप्पा मारत उभे होतो. मिट्ट काळोख, निरभ्र आकाश आणि आकाशात लुकलुकणारे
असंख्य तारे. नवरा सांगू लागला डोक्यावर थोडेसे दक्षिणेस दिसते ते मृग
नक्षत्र, त्याखाली दक्षिण-पूर्वेला ठळक तारा दिसतो तो व्याध, मृगाच्या
पोटात तीन तिरक्या चांदण्या दिसतात तो व्यधाने सोडलेला बाण, मृगाच्या
थोड्या वर पंचकोन दिसतो ते रोहिणी, दोघांच्या मध्ये ताऱ्यांचा पुंजका दिसतो
ते कृत्तिका, उत्तरेस थोडा अंधुक दिसणारा ध्रुव तारा, पूर्वेकडून उगवणारे
अनुराधा, त्याच्या बाजूस चित्रा, स्वाती अशी एक ना अनेक नावे त्याच्या
तोंडून भरभर बाहेर येत होती. मी आवाक झाले. म्हटलं तुम्ही गेल्या पंचेचाळीस
वर्षांपासून मुंबईत आहात, कधी स्वच्छ आकाश बघायला मिळत नाही, तुम्हाला
एव्हडी माहिती कशी. तेव्हा त्याने सांगितले, साधारण १९७४--७५ चा काळ, आम्ही
८वी -९वीत असतांना नंदुरबारला गावाबाहेरच्या घरात रहात होतो तेव्हा
महाराष्ट्र टाइम्सला आकाश दर्शनाचे सदर यायचे. तेव्हा घराच्या गच्चीतून
तासनतास आकाश निरीक्षणाचा छंद लागला होता. आता असं कुठेतरी बाहेर गेल्यावर
संधी मिळाली तर सर्व आठवण्याचा प्रयत्न करतो.गारवा जाणवायला लागला होता.
तंबूत शिरलो. झोपायला गाद्या होत्या. त्यावर अंथरायला गोधडी, पांघरून,
छोट्या उशा घरुन आणलेल्या होत्याच. रात्री बाहेर पडावे लागले तर टॉर्च
हाताशी ठवून झोपी गेलो.
पहाटे उठून बाहेर पडलो. दव पडल्याने तंबू बाहेरून पूर्ण ओले झाले होते.
थोडासा आजूबाजूला फेरफटका मारला.
आता चांगले उजाडले होते. बिचवर जायचे राहिले होते. डोंगरकडा आणि
त्यावरून दिसणारा अप्रतिम समुद्रकिनारा हे येथले वैशिष्ट. असे मानतात की
अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर आक्रमण करून आला तेव्हा मूर्तींची नासधूस
होऊ नये म्हणून पुजाऱ्याच्या मदतीने एक व्यापारी प्रभासपट्टण येथील येथील
काही मूर्ती गलबतात घेऊन दक्षिणेकडे निघाला. त्याला मिळालेल्या
दृष्टांतानुसार त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील एका घळीत सोडली. यामुळेच या
किनाऱ्यास कशेळी बिच किंवा देवघळी बीच असेही म्हणतात. पायऱ्या उतरून
व्ह्यू पॉइंटला आलो.
सूर्योदय आणि देवघळ
येथून अजून थोडं खाली उतरलं कि आपण समुद्र किनाऱ्यावर पोहचतो. अगदी
छोटासा बिच आहे हा. देवघळ येथून अगदी बाजूलाच दिसते. घळीतील ज्या गुफेत
मूर्ती होती असे सांगतात तेथपर्यंत जाऊन परत फिरलो.
चहा, नाश्ता घेतला व आजच्या भटकंतीसाठी प्रवास सुरु केला.
क्रमश:
कशेळीहून गणपतीपुळेला निघालो. सागरी किनाऱ्याच्या रस्त्याने प्रवास करत वाटेत जमेल तेव्हडी ठिकाणे पाहणार होतो. कशेळीजवळ कातळशिल्प आहेत ती बघायची होती. शिल्प मुख्य रस्त्यापासून थोडी दूर आहेत. थोडे अंतर पायी चालावे लागते. चालायची तयारी होती पण कोणी वाटाड्या मिळाला नाही म्हणून विचार रद्द केला. कशेळी हे कनकादित्य मंदिरासाठी प्रसिद्ध असले तरी येथे अजून एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे श्री लक्ष्मीनारायण मंदिर.
थोड्याच वेळात येथे पोहचलो.
रस्त्यापासून थोडेसेच खाली काही पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिर आहे.
मंदिराला सभोवताली भिंत आहे. प्रवेश केल्यावर दोन दीपमाळा आहेत त्यानंतर लाकडी खांब असलेला कौलारू सभामंडप आहे.
त्यानंतर अजून एक सभागृह आहे. प्रवेशद्वारावर गणेश पट्टी आहे.
लाकडी खांब, तुळ्या यावर सुंदर नक्षीकाम आहे.
त्यानंतर गाभारा आहे. गाभाऱ्यात विष्णूची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. आम्ही मूर्तीला अभिषेक करायच्या थोडा वेळ आधी पोहचलो होतो. मूर्तीवरचा आदल्या दिवशीच्या पूजेच्या वेळचा बहुतेक साज उतरवलेला असल्याने मूळ मूर्तीचे देखणे रूप पाहावयास मिळाले. फोटोही मिळाला पण मंदिर नियमांचा मान ठेवत फोटो सार्वजनिक करणे योग्य वाटत नाही.
माझा मूर्ती अभ्यास नाही पण थोडेफार वाचनात आले त्याप्रमाणे आयुधक्रमानुसार (गदा,चक्र,शंख,पद्म) ही मूर्ती माधव विष्णूची आहे. असे असले तरी हे मंदिर लक्ष्मीनारायण (नारायण विष्णू) नावानेच ओळखले जाते. मूर्तीच्या डाव्या हातास लक्ष्मी व उजव्या हातास भूदेवी (विष्णू अवतार वराहाची पत्नी) आहे. गरुडाचीही मूर्ती आहे.
साधारणतः मंदिरात एकच शिवलिंग असते परंतु येथे लागूनच असलेल्या मंदिरात दोन शिवपिंडी आहेत. यातील एक स्वयंभू आहे असे सांगतात.
बाजूलाच एक तुटलेले शिल्प दिसते. त्यावर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत.
लाकडी सभा मंडपाच्या सुरवातीला विष्णू मूर्तीकडे तोंड करून असलेले विष्णूचे वाहन गरुड
काल कनकादित्य मंदिरात पाहिलेली विहिरीतून पाणी काढायची पद्धत येथेही दिसून आली. पुजाऱ्याच्या सांगण्यानुसार हिस 'कोळंब' किंवा 'उक्ती' (का युक्ती?) असे म्हणतात. पाणी काढतांनाचे प्रात्यक्षिकही पाहावयास मिळाले. (मला मिपावर व्हिडीओ चढविता आले नाहीत त्यामुळे यू ट्यूबवर चढवून लिंक देत आहे)
लिंक १
https://youtube.com/shorts/fC0U-_cPlF8?feature=share
लिंक २ विहिरीच्या आत तोंडाशी गोलाकार भिंतीत दगड बसवून पाणी काढणाऱ्यास उभे राहता यावे यासाठी व्यवस्था केली आहे.
https://youtube.com/shorts/BfFE7H9TP58?feature=share
निसर्ग सानिध्यातले हे सुंदर मंदिर बघून पुढचा प्रवास सुरु केला.
थोड्याच वेळात गावखडी समुद्र किनाऱ्यास पोहचलो. पांढऱ्या, काळपट अशा मिश्र वाळूचा छान स्वच्छ किनारा
काल पूर्णगड किल्यावरूनहा बीच पाहत होतो तर आज बीचवरुन खाडीच्या पलीकडील किल्ला.
विविध आकाराचे आणि रंगांचे शिंपले
किनाऱ्यावरील सुरूचे बन
थोडा वेळ थांबून पुढे निघालो गणेशगुळेला. काही अंतर मुख्य रस्त्याने गेल्यावर डाव्या बाजूस उतरत जाणाऱ्या वळणावळणाच्या अरुंद रस्त्याने साधारण ३-४ किमी अंतरावर हा समुद्र किनारा. वाटेत ठिकठकाणी आंब्याच्या मोहराने बहरलेल्या आमराई.
पांढरीशुभ्र, मुलायम वाळू असलेला हा अतिशय सुंदर किनारा
स्वछ आणि नितळ पाणी. स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यातून टिपलेला तळ .
पाण्यात जायचे ठरवलेले नव्हते पण येथली मुलायम पुळण, नितळ पाणी पाहून राहवले नाही. मनसोक्त समुद्र स्नानाचा आनंद लुटला.
पाण्याबाहेर पडून चहा घेतला. सुरुच्या वनात स्थानिक महिला,शाळकरी मुले वन- विहाराचा तसेच वन-भोजनाचा आनंद घेत होती. शहरी पर्यटक मात्र दिसले नाहीत. गणेशगुळे येथे गणेश मंदिर तसेच नारायण मंदिरही आहे पण वेळेअभावी पाहता आले नाही.
वाटेत भाट्ये बीच लागला. अगदी रस्त्याला लागून. रस्त्यालगतच गणेश मंदिर आहे.
किनाऱ्यालगत नारळ बागा आहेत.
उत्तरेस दूरवर रत्नागिरीच्या बाजूस समुद्रात शिरलेला एक डोंगरकडा आणि त्यावरील दीपगृह नजरेस पडत होते.
किनारा बराच अस्वच्छ वाटला. जास्त वेळ थांबलो नाही.
रत्नागिरी पार करून सागरी रस्त्याने गणपतीपुळ्याकडे निघालो. आरे बिचला पोहचलो. रस्त्यावरून थोडेसे खाली उतरले की पांढऱ्या शुभ्र वाळूचा हा लांबच लांब किनारा.
खेकडयाच्या छोट्या छोट्या पिल्लानी बिळातून उपसलेल्या वाळूमुळे तयार झालेले हे सुंदर नक्षीकाम
बाजूला नारळ व सुरूचे बन आहे. पर्यटकांना उंचावरून समुद्र सौंदर्य पाहता यावे तसेच खेळाची मजा अनुभवता यावी यासाठी आरेवारेच्या कड्यावरून येणारी झिपलाइन दिसली.
आरे वारेच्या कड्याहुन दिसणारे आरे समुद्र किनाऱ्याचे मोहक दृष्य .
एका बाजूने घाट व दुसऱ्या बाजूने समुद्र किनारा असा सुंदर रस्ता आहे.
आणि हा वारे समुद्र किनारा.
वारे किनाऱ्याचे वरूनच दर्शन घेऊन पुढे निघालो. गणपतीपुळे पर्यटक निवासाला पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली.
थोडावेळ आराम करून सर्वजण बाहेर येऊन बसलो. अंधार झाल्यामुळे समोरच असलेला समुद्र दिसत नसला तरी लाटांचा आवाज स्पष्ट येत होता.
थोडावेळ गप्पा गोष्टी झाल्यावर येथील उपहारगृहात जेवलो व परत येऊन झोपायला गेलो. सकाळी सातलाच सर्व आवरून बाहेर पडलो. समोरच्या कुंपणाच्या बाजूने किनाऱ्यावर उतरायला पायऱ्या होत्या.
किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सची भरपूर उपकरणं दिसत होती.
खाण्यापिण्याची सुविधा, लहान मुलं -तरुणांना आकर्षित करणारे पाण्यातील खेळ, व जोडीला धार्मिक पर्यटन यामुळे खुप लोक पुळ्याकडे आकर्षित होत आहेत. थोड्याच वेळात किनारा माणसांनी फुलून जाणार होता. शनिवार-रविवार आणि जोडून सार्वजनिक सुटी आली तर विचारायलाच नको. किनाऱ्याहून चालत चालत गणपती मंदिरापर्यंत पोहचलो.
लगतच असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी मंदिर आहे. मूर्ती स्वयंभू आहे. खारफुटी व नारळाच्या झाडांनी वेढलेला हा परिसर.
२५-२६ वर्षांपूर्वी येथे आले होते तेव्हा लहानसे मंदिर होते. खूप शांत वातावरण होते. आज मात्र येथे भव्य मंदिर उभारले गेलेले दिसले. सकाळी लवकरच दर्शनाला आलो असल्याने गर्दी नव्हती पण दर्शनासाठी असलेली अनेक पदरी रांगांची व्यवस्था पाहून किती गर्दी होत असेल याचा अंदाज येत होता. मंदिरात फोटो घेता येत नाही त्यामुळे बाहेरून घेतलेले काही फोटो.
दर्शन घेऊन हॉटेलला परत आलो.
चहा-नाश्ता घेतला आणि हरी-हरेश्वरचा प्रवास सुरु केला.
क्रमश:
आज गणपतीपुळ्याहून हरीहरेश्वरसाठी प्रवास सुरु केला. साधारण पंधरा मिनिटातच कवी केशवसुतांचे गांव मालगुंड येथे पोहचलो. केशवसुतांचे जन्मस्थान असलेले घर आज त्यांचे स्मारक म्हणून उत्तम प्रकारे जतन केलेले आहे. प्रवेश फी रु.१०/- प्रत्येकी.
केशवसुतांचे घर
पडवी
जन्मखोली
येथे त्यांच्या कविता वाचता येतात
मागील बाजूस सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आहे.
स्मारक पाहून पुढच्या प्रवासाला निघालो . वाटेत लागलेला 'उंडी' बीच
जयगडजवळ पोहचलो. गेल्या सहलीत येथील किल्ला पाहिला होता त्यामुळे तिकडे न वळता पुढे निघालो. गुहागरकडे जाण्यासाठी शास्त्री नदी अरबी समुद्राला जेथे मिळते ती खाडी पार करावी लागते. यासाठी जयगडजवळच्या साखर मोहल्ल्यातून पैलतीरावरील तवसाळपर्यंत फेरीबोट सेवा आहे. फेरीबोटीतून प्रवासी आणि वाहने दोन्हीचीही वाहतूक होते.
जयगड धक्क्यातूनआम्ही गाड्यांसहित फेरीबोटीवर दाखल झालो.
तवसाळ धक्क्यावर उतरून पुढचा प्रवास सुरु झाला.
जवळचे हेदवी आणि वेळणेश्वर किनारा दोन्हीही पाहिलेले असल्याने थांबायचा विचार नव्हता पण अचानक एका वळणावर अगदी समोरच हेदवीचे दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर आले. आम्ही थांबावे असाच काही संकेत असावा. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी लहानशा टेकडीवर हे मंदिर आहे. आंबा, काजू व इतर फळाफुलांनी समृद्ध असा हा भाग.
थोड्याशा पायऱ्या चढून वर जात येते.
आता गाड्या अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकतात. मंदिर पेशवे कालीन असावे. पेशव्यांनी दिलेल्या निधीतून केळकर स्वामींनी हे मंदिर उभारले अशी आख्यायिका आहे. मंदिरात दहा भूजा असलेली गणपतीची संगमरवरी सुरेख मूर्ती आहे. (मंदिरात फोटो घेऊ देत नाहीत)
येथून जवळच असलेल्या हेदवीचा समुद्रकिनारी आलो.
उमा महेश्वर मंदिराच्या मागे असलेली बामन घळ बघायची होती. खडकाळ किनाऱ्याहून चालत येथे जावे लागते.
भरतीच्या वेळी काळ्या कातळांमध्ये असलेल्या लांबच लांब घळीत पाणी शिरून तयार होणारा निसर्ग निर्मित जलस्तंभ हे येथील वैशिष्ठ. आम्ही पोहचलो तेव्हा ओहोटी असल्याने आम्हाला घळ तर बघायला मिळाली पण तो निसर्ग चमत्कार मात्र दिसला नाही.
दुपारच्या जेवणाला बराच उशीर झाला होता. वाटेत एक शाकाहारी जेवणाची सोय असलेलले श्री व सौ. जोग यांचे हॉटेल 'अगत्य' लागले. मालकीण जोग बाईंनी जेवण बनवायला थोडा वेळ घेतला पण १३०/- रुपयात ताजे, रुचकर, पोटभर जेवण दिले. हॉटेलच्या नावाप्रमाणेच बाई अगत्याने विचारपूस करीत वाढत होत्या. ठिकाणचे नाव विचारले असता 'मोडके गुहागर' असल्याचे समजले.
पुढे निघालो. अजून बरेच अंतर जायचे असल्याने आज गुहागरलाही थांबायचे नव्हते. रस्त्यालगत असलेले व्याढेश्वर मंदिर मागे पडले. गुहागर पार करून पुढे अंजनवेल फाटा आला. मागील सहलीत येथील गोपाळगड किल्ला आणि दीपगृहास भेट दिली होती त्या आठवणी ताज्या झाल्या. पुढे उजवीकडे वळून दापोलीकडे जाण्यासाठी दाभोळ धक्क्याचा रस्ता पकडला. थोडी चढण चढत उंच टेकडी पार करून दोभोळ-धोपावे जंगल जेट्टीला पोहचलो. वाशिष्ठी नदी सागराला मिळते ती खाडी पार करण्यासाठी गाडीसहित आम्ही फेरीबोटीवर चढलो.
धोपावे येथे उतरून दापोली कडे निघालो. दापोलीस पोहचल्यावर हर्णे-आंजर्ले-केळशी मार्गे हरिहरेश्वरला जाण्याचा विचार होता पण वेळ कमी असल्याने मधलाच एक जंगलमार्गे जाणारा रस्ता निवडला. घाटवळणांचा रस्ता, आजूबाजूने घनदाट जंगल आणि वाहतूक तर जवळजवळ नसल्यासारखी. संध्याकाळ होऊन प्रकाशही अंधुक झाला आणि GPS गंडले. थोडी भीती जाणवली. थोड्या वेळात एक रिक्षा आली. त्याला विचारले असता तुम्ही रस्ता चुकलात, आधीच वळण घ्यायला पाहिजे होते असे त्याने सांगितले. आता याच रस्त्याने केळशीला जाऊन पुढे निघा असा सल्ला देऊन तो गेला. थोड्याच वेळात एक मोटार सायकल आली. त्याने सांगितले येथून दोनच मिनिटावर मागे वळण आहे तेथून गेल्यास तुम्ही काही वेळात मुख्य रस्त्याला लागाल.
त्याने सांगितल्याप्रमाणे निघालो. थोड्याच वेळात मोबाईलला GPS ही आले. मुख्य रस्त्याला पोहचलो. हरिहरेश्वर जवळ आले. रस्त्याला समांतर उजव्या बाजूने सावित्री नदी दिसू लागली. हळूहळू अंधार झाला आणि आम्ही वेश्वी-बागमांडला जेट्टीला पोहचलो. फेरीबोटीचा निघण्याचा भोंगा वाजला. एकजण पटकन गाडीतून उतरून तिकिटासाठी पळाला. तो येईपर्यंत गाड्या बोटीवर चढवल्या देखील गेल्या. एखादा मिनिट जरी उशीर झाला असता तरी बराच खोळंबा होणार होता. उतरून अगदी १०-१५ मिनिटात MTDC च्या रिसॉर्टला पोहचलो. रिसेप्शनला आमचीच वाट पाहत होते. आज येथे पोहोचणारे आम्ही शेवटचेच पर्यटक. (वाट पाहण्याचे खरे कारण म्हणजे त्यांना आठ वाजता कार्यालय बंद करायचे होते). पटकन रूम ताब्यात घेतल्या. रूम चांगली असली तरी बाथरूममध्ये अनेक त्रुटी होत्या.
रूममध्ये जेवण पाठवणार का विचारले असता हॉटेलमध्ये सध्या आम्ही दोघेच कर्मचारी आहोत त्यामुळे देता येणार नाही असे सांगितले. जेवणाची शेवटची ऑर्डरही दहाच्या आतच घेतली जाईल असेही सांगितले. आम्हालाही प्रवासाचा थकवा होता. पटकन जेवण आटोपून झोपायला गेलो.
क्रमश:
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.