१ दिवस, २२ किलोमीटर, १ किल्ला आणि महाराष्ट्रातील २ उंच शिखरे: शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव
पुण्यावरून निघून रात्रभर प्रवास करून पहाटे साडेतीनच्या दरम्यान आम्ही शिरपुंजे या गावातील एका ग्रामस्थांच्या घरी पोहोचलो. आजूबाजूचे गर्द जंगल, अंधार आणि परिसरात वावर असलेले हिंस्र प्राणी यामुळे आम्ही गाडीमध्येच झोपून राहिलो.
साधारण पहाटे पाचच्या दरम्यान गाडीतून उतरून फ्रेश झालो, नाष्टा केला आणि शिरपुंजाचा भैरवगड या आमच्या पहिल्या ट्रेक कडे प्रस्थान सुरू केले. शिरपुंजाचा भैरवगड हे त्या परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत. त्या दिवशी रविवार होता. रविवारी खंडोबाचे दर्शन होणे माझ्यासाठी एक अलभ्य लाभच.दोन महिन्यांपूर्वी इथे जत्रा झाली होती. जंगलातील हिरव्या झाडीमध्ये पिवळ्या, पांढऱ्या, केशरी रंगांनी सुशोभित केलेले प्रवेशद्वार खुलून दिसत होते.
प्रवेशाच्या पायऱ्यांनी पुढे आमचा ट्रेक चालू झाला काही ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या, तर काही ठिकाणी अंगावर येत असलेली चढण यामुळे सकाळच्या गारव्यात देखील घाम फुटत होता. संपूर्ण ट्रेक हा चढणीचाच होता. आम्ही पुढे सरकत होतो. आजूबाजूचा परिसर आणखीनच मोहक वाटतो आणि पुढे काय आहे ? या कुतूहलतेने आम्ही आपोआपच गड सर करू लागलो.
आम्ही निमुळत्या खिंडीत पोहचलो. खिंडीत पोचल्यावर डाव्या बाजूला भैरवगडाकडे जाणाऱ्या पायऱ्या तर उजव्या बाजूला घनचक्कर कडे नेत असलेला लोखंडी पायर्यांनी लक्ष वेधून घेतले.
आम्ही डाव्या बाजूला असलेल्या भैरवगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. भैरवगडाची उंची समुद्रसपाटीपासून ११४५मी. जवळपास २५०० वर्षे जुना असा हा किल्ला. प्रचंड मोठे पठार, पाण्याची टाकी, खांब टाकी, भैरोबाचे मंदिर, वीरगळी, गडावरून दिसणारे कळसुबाई च्या कुशीत वसलेले इतर किल्ले, घनचक्कर, गवळदेव यासारखे ठिकाणी सहज नजरेस पडतात. वातावरणामध्ये धुक असल्याकारणाने किल्यांच्या रांगा तितक्या स्पष्ट दिसत नव्हत्या. जरा डोळे मोठे करून या सर्व रांगा आणि कळसुबाई शिखराचे सोबती पाहण्याचा प्रयत्न मात्र मनापासून चालू होता.
भैरवगड या किल्ल्यावर अनेक अवशेष आहेत. माथ्यावर दोन मोठ्या गुहा आहेत ज्या एका गुहेत भगवान भैरवनाथाचे मंदिर आहे, तर दुसरी गुहा निवासासाठी वापरली जाते.
गुहेतील मूर्ती अतिशय उत्तम कोरीव रंगकाम केलेली असून गावकऱ्यांनी तिची देखभाल केली आहे.
जराशी विश्रांती घेऊन आम्ही गड पाहण्यासाठी निघालो. प्रचंड मोठे पठार, पाण्याची टाकी त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे खांब टाक, इथे म्हणजे थांब टाक्यांमध्ये आम्हाला पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळालं. त्यानंतर पुढे जाता तिथे अनेक विरगळ पाहायला मिळाल्या. एका गुहेत भैरोबाचे मंदिर आहे. गुहेमध्ये असलेल्या भैरवाची मूर्ती साजेसी आणि आकर्षक आहे. भैरोबाचे दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. समोरच्या बाजूलाच आणखीन एक भली मोठी विरघळ बघण्यास मिळाली. नीट पाहिले असता असे दिसते की त्यावर चंद्र आणि सूर्य शिळे मध्ये कोरलेले आहेत.तसेच वरच्या बाजूला दोन कोरलेली फुले, हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर स्वार असलेला वीर लढत आहे. किंबहुना त्याच्या चेहऱ्यावरील भाव देखील अनोखे आहेत.
सकाळी आठच्या सुमारास आम्ही तिथून परतीला निघालो.आम्हाला पुढे अजून बराच पल्ला गाठायचा होता. त्याच खिंडीत उतरलो. आता समोर असलेल्या घनचक्कर कडे नेत असलेल्या जिन्यावर आम्हाला चढायचे होते. लोखंडी जिन्याचा आधार घेत आम्ही घनचक्कर चा रस्ता पकडला. विस्तृत पसरलेले पठार, कारवीची कमरे इतकी वाढलेली झाडी आणि कळसुबाईच्या कुशीतील दूर दूर पसरलेल्या डोंगर रांगा यामुळे आपण काहीतरी विलक्षण करतोय असे पदोपदी भासत होते. काही अंतर चालून गेल्यावर आम्ही एका घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला. इथे नक्कीच मोठा पाण्याचा प्रवाह पावसाळ्यामध्ये वाहत असावा अशा काही खुणा त्या तिथे स्पष्ट दिसत होत्या. त्याच ठिकाणी आम्ही थोडावेळ थांबलो विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा घनचक्कर कडे चालायला लागलो. काही वेळातच आम्ही घनचक्करच्या माथ्यावर पोहोचलो.
समुद्र सपाटीपासून साधारण १५३२ मीटर उंचीवर आम्ही होतो. तिथून मुडा, रतनगड यांसारखे सह्यसोबती जवळ भासत होते. घनचक्कर हे कळसुबाईच्या रांगेतील एक सुंदर असे हे शिखर. तिथे थोडावेळ थांबलो खोल असलेल्या भव्य दरीचा आनंद घेतला. सुरक्षिततेचे भान ठेवून काही फोटो काढले. थोडीशी पूजा देखील केली. अकरा वाजले होते. आता आम्हाला आमचे उद्दिष्ट गाठायचे होते ते म्हणजे गवळण. काही वेळातच आम्ही गवळदेवसाठी निघालो.
हिवाळा असला तरी आता ऊन डोक्यावर येत चालले होते. आम्हाला गवळदेव कडे जाण्यासाठी पूर्ण घनचक्कर उतरून खिंडीत उतरलो. उतरून समोर असलेल्या गवळदेव शिखराच्या डाव्या बाजूची म्हणजेच दरीच्या बाजूकडील वाट धरली. शिखर जरी समोर दिसत असले तरी संपूर्ण वेढा घालून मागच्या बाजूने माथा गाठायचा होता. गवळदेव हे १५२२ मीटर उंची असलेले हे महाराष्ट्रातील तीन क्रमांकाचे उंच शिखर. उंची गाठायला मेहनत ही तितकीच!
घनचक्करचा डोंगर डाव्या हाताला ठेवून आम्ही गवळदेव ला पूर्ण ट्रॅव्हर्स मारून त्याच्या मागच्या बाजूला गेलो. शिखराच्या ट्रेक रूटवर आम्हाला फक्त एकमेव पानवठा दिसला. त्यापाणवठ्याच्या बाजूला असलेल्या चिखलात प्राण्यांच्या पंजाचे ठसे उमटले होते. त्यावरून त्या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर आहे हे स्पष्ट कळून येत होते आणि पाणी प्यायला सर्व पशु याच ठिकाणी येत असावेत यात काही शंका नव्हती. त्यात आमचा देखील सहभाग होता. गवळदेव - महाराष्ट्रातील कमी ज्ञात आणि ऑफबीट शिखर… ४५६६ फूट उंचीवर असलेले काळसुबाई नंतरचे अधिकृतपणे तिसरे सर्वोच्च शिखर तुम्हाला भंडारदरा प्रदेश आणि आजूबाजूच्या पर्वतांचे संपूर्ण विहंगम दृश्य माथ्यावरून घडवते.
अवघ्या दोन तासाच्या डोंगरयात्रेनंतर आम्ही गवळदेव च्या झेंड्यापाशी नेणाऱ्या चिंचोळ्या वाटेवर पोहचलो. काहीसा दगडांचा आधार घेऊन जरासे क्लाइंबिंग या ठिकाणी अनुभवायची संधी मिळाली. तो लहान टप्पा पार करून पुन्हा एकदा छोटीशी टेकडी ओलांडायची होती. पावलं आता झपझप पडत नव्हती. मात्र मन पळत होत. पांढऱ्या झेंड्याकडे प्रस्थान करून अखेर गवळदेवाच्या मंदिरासमोर आम्ही नतमस्तक झालो. गवळदेवाचे वैशिष्ट्य म्हणजे या देवाला शेंदूर लावत नसून चुना लावतात आणि त्यामुळे अगदी दुर्मिळ अशी गवळदेवाची मूर्ती पाहायला मिळाली.
दुपारचा एक वाजला होता जेवढे अंतर आम्ही परत आलो होतो तितकेच आम्हाला पुन्हा परत जायचे होते म्हणजे साधारण बारा किलोमीटर एक मार्गी प्रवास झाला होता आणि तितकाच प्रवास पुन्हा जाताना करायचा होता. वेळेचे भान ठेवून आम्ही अवघ्या काही मिनिटात मध्येच आमचा आनंद तिथे साजरा केला. जवळ देवाच्या माथ्यावरून अग्निबाण या कात्राबाईच्या कुशीतील सुळक्याचे, रतनगड, हरिश्चंद्रगड या भव्य किल्ल्यांचे दर्शन झाले.
संध्याकाळी ५. ३० वाजता आम्ही पुन्हा शिरपुंजे गावात आलो आणि जेवणावर ताव मारून परतीच्या प्रवासाला निघालो.
लेख आणि फोटो आवडले असल्यास तुमच्या ट्रेक करणाऱ्या मित्र परिवारास आवश्यक शेअर करा.आमच्या ट्रेक मध्ये सहभागी होण्याकरिता www.gtribe.in या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क करा 7588592020 | 7588492020
डोंगरवाट आडवाटेची आणि त्या वाटेवरचा प्रवास !!
काही ठिकाणांना आणि डोंगरांना नाव नसतात, ना नाव असतात तिथल्या घाटांना!
तिथे अनुभवायच असत अस्तित्व! आनंद घ्यायचा असतो आज त्या क्षणांचा. अशीच ही डोंगरवाट आडवाटेची आणि त्या वाटेवरचा प्रवास !!
सकाळी पुण्यावरून सातच्या दरम्यान आम्ही गाडी काढली. सर्वाना घेत घेत ७.
३० वाजता जुना मुंबई पुणे हायवे पकडला. तिथून पुढे कान्हे फाट्यावरून आत
मध्ये गाडी टाकली आणि थेट इंगळून गावांमध्ये थांबली.
साधारण आठ सव्वा आठच्या दरम्यान आम्ही नाष्टा केला. पुढे पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि आमच्या ऑफ बीट ट्रेकला सुरुवात केली. इंगळून गावामध्ये अनसुदे ही एक पाडी. त्या पडीमधून एक वाट डोंगराकडे जात होती. ती पकडून आम्ही उजव्या हाताकडे चालायला सुरुवात केली. पुढे थेट डोंगराकडे जात असलेला रस्ता दिसतो.
डोंगरावर
भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या एका रांगेत स्वागतासाठी उभ्या होत्या. चालायला
सुरुवात केली आणि एका शेततळ्यामध्ये सकाळच्या वेळेस एका मागोमाग एक अशा
अनेक म्हशी जलविहाराचा आनंद घेताना दिसल्या.
त्या शेततळ्याच्या बाजूने पुढे डोंगराकडे जाणारा रस्ता आम्ही पकडला.
जसजसं
वर जायला लागलो तसतसं इंगळुन गाव आणि धरणाचा परिसर स्पष्टपणे नजरेस दिसत
होता. पुढे बैलदरा नावाच्या एका ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो. त्या ठिकाणाहून
बैल त्या घळीत म्हणजेच दरीमध्ये पडला म्हणून त्या ठिकाणाचे नाव बैलदरा असे
तिथले ग्रामस्थ मानतात. पुढे ती वाट चढत आम्ही झाडीतून डोंगरातून वर चालत
राहिलो.
डोंगर पूर्ण संपल्यावर गर्द झाडीतून रस्ता पुढे एका विस्तृत पठारावर जाऊन थांबला. त्या ठिकाणी पवनचक्क्या अगदी नजरेस सहज पडत होत्या. इतक्या मोठ्या पवनचक्क्या जवळून बघण्याचा अनुभव माझ्यासोबत असलेले सहकारी पहिल्यांदाच घेत होते
त्याच वाटेने आम्ही पुढे गेलो तर वाटेमध्ये आम्हाला छोट्याशा पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची चादर पसरल्याचा भास होत होता. सोनकीची पिवळी आणि जांभळ्या-पांढऱ्या रंगाची फुले चादरीप्रमाणे पसरलेली होती, त्यामुळे मातीचा रंग जांभळट वाटत होता. ते ठिकाण पार केले पुढे भला मोठा रस्ता लागला. वरसुबाई या गावदेवी कडे जाणारा तो रस्ता. आम्ही मुख्य वाटेने न जाता जंगलातून जाण्यात रस्ता पकडला.
गर्द मोठाली झाडी, शांत परिसर, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि हलकासा उतरणीचा रस्ता यामुळे आम्ही सर्व खुश होतो. वृक्षांच्या सहवासात उन्हाचा तडाखा अजिबात जाणवत नव्हता. त्या गारव्याचा आनंद घेत आम्ही सावकाशपणे त्या पुढे जात होतो.त्या जंगलात फार मोठी आणि गर्द झाडी पाहायला मिळाली. एक क्षण तर भीमाशंकरच्या जंगलात आल्याचा भास झाला. आजूबाजूला आमच्या शिवाय कुणीही नव्हतं. शांतता आणि प्रसन्नता यांचा वरदान आम्ही अनुभवत होतो.
जंगलातून बाहेर पडलो आणि समोरच आम्हाला केशरी रंगाचं मंदिर दिसलं तेच वरसूबाईचं मंदिर.
मंदिर अत्यंत साध. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला वरसुबाई या देवीचा भाग असलेली दगडातील एक मूर्ती पाहायला मिळाली. तसेच एकावर एक रचलेला दगडी स्तंभ देखील बघण्यासारखा आहे. तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. बॅगमध्ये असलेला पौष्टिक आहार पोटात घातला. आणि अर्ध्या तासानंतर आम्ही पुढे तळ्याच्या दिशेने निघालो.
तळ
बघून झाल्यावर आता आम्हाला म्हणजे सर्वांनाच वेध लागले होते ते म्हणजे
तिथे असलेल्या पवनचक्की जवळ जाण्याचे आणि पवनचक्की जवळून पाहण्याचे.
माझ्यासोबत असलेल्या सर्वांचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे सगळे खूप
उत्साहात होते. इतकी भली मोठी पवन चक्की बघून सगळ्यांचा आनंद द्विगुणित
झाला.

तिथे आम्ही अनेक फोटो काढले. आणि आलेल्या वाटेने परतीला निघालो.
लेख आणि फोटो आवडले असल्यास तुमच्या ट्रेक करणाऱ्या मित्र परिवारास आवश्यक शेअर करा.
आमच्या ट्रेक मध्ये सहभागी होण्याकरिता www.gtribe.in या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क करा 7588592020 | 7588492020
डोंगरवाट आडवाटेची आणि त्या वाटेवरचा प्रवास !!
काही ठिकाणांना आणि डोंगरांना नाव नसतात, ना नाव असतात तिथल्या घाटांना!
तिथे अनुभवायच असत अस्तित्व! आनंद घ्यायचा असतो आज त्या क्षणांचा. अशीच ही डोंगरवाट आडवाटेची आणि त्या वाटेवरचा प्रवास !!
सकाळी पुण्यावरून सातच्या दरम्यान आम्ही गाडी काढली. सर्वाना घेत घेत ७.
३० वाजता जुना मुंबई पुणे हायवे पकडला. तिथून पुढे कान्हे फाट्यावरून आत
मध्ये गाडी टाकली आणि थेट इंगळून गावांमध्ये थांबली.
साधारण आठ सव्वा आठच्या दरम्यान आम्ही नाष्टा केला. पुढे पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि आमच्या ऑफ बीट ट्रेकला सुरुवात केली. इंगळून गावामध्ये अनसुदे ही एक पाडी. त्या पडीमधून एक वाट डोंगराकडे जात होती. ती पकडून आम्ही उजव्या हाताकडे चालायला सुरुवात केली. पुढे थेट डोंगराकडे जात असलेला रस्ता दिसतो.
डोंगरावर
भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या एका रांगेत स्वागतासाठी उभ्या होत्या. चालायला
सुरुवात केली आणि एका शेततळ्यामध्ये सकाळच्या वेळेस एका मागोमाग एक अशा
अनेक म्हशी जलविहाराचा आनंद घेताना दिसल्या.
त्या शेततळ्याच्या बाजूने पुढे डोंगराकडे जाणारा रस्ता आम्ही पकडला.
जसजसं
वर जायला लागलो तसतसं इंगळुन गाव आणि धरणाचा परिसर स्पष्टपणे नजरेस दिसत
होता. पुढे बैलदरा नावाच्या एका ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो. त्या ठिकाणाहून
बैल त्या घळीत म्हणजेच दरीमध्ये पडला म्हणून त्या ठिकाणाचे नाव बैलदरा असे
तिथले ग्रामस्थ मानतात. पुढे ती वाट चढत आम्ही झाडीतून डोंगरातून वर चालत
राहिलो.
डोंगर पूर्ण संपल्यावर गर्द झाडीतून रस्ता पुढे एका विस्तृत पठारावर जाऊन थांबला. त्या ठिकाणी पवनचक्क्या अगदी नजरेस सहज पडत होत्या. इतक्या मोठ्या पवनचक्क्या जवळून बघण्याचा अनुभव माझ्यासोबत असलेले सहकारी पहिल्यांदाच घेत होते
त्याच वाटेने आम्ही पुढे गेलो तर वाटेमध्ये आम्हाला छोट्याशा पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची चादर पसरल्याचा भास होत होता. सोनकीची पिवळी आणि जांभळ्या-पांढऱ्या रंगाची फुले चादरीप्रमाणे पसरलेली होती, त्यामुळे मातीचा रंग जांभळट वाटत होता. ते ठिकाण पार केले पुढे भला मोठा रस्ता लागला. वरसुबाई या गावदेवी कडे जाणारा तो रस्ता. आम्ही मुख्य वाटेने न जाता जंगलातून जाण्यात रस्ता पकडला.
गर्द मोठाली झाडी, शांत परिसर, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि हलकासा उतरणीचा रस्ता यामुळे आम्ही सर्व खुश होतो. वृक्षांच्या सहवासात उन्हाचा तडाखा अजिबात जाणवत नव्हता. त्या गारव्याचा आनंद घेत आम्ही सावकाशपणे त्या पुढे जात होतो.त्या जंगलात फार मोठी आणि गर्द झाडी पाहायला मिळाली. एक क्षण तर भीमाशंकरच्या जंगलात आल्याचा भास झाला. आजूबाजूला आमच्या शिवाय कुणीही नव्हतं. शांतता आणि प्रसन्नता यांचा वरदान आम्ही अनुभवत होतो.
जंगलातून बाहेर पडलो आणि समोरच आम्हाला केशरी रंगाचं मंदिर दिसलं तेच वरसूबाईचं मंदिर.
मंदिर अत्यंत साध. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला वरसुबाई या देवीचा भाग असलेली दगडातील एक मूर्ती पाहायला मिळाली. तसेच एकावर एक रचलेला दगडी स्तंभ देखील बघण्यासारखा आहे. तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. बॅगमध्ये असलेला पौष्टिक आहार पोटात घातला. आणि अर्ध्या तासानंतर आम्ही पुढे तळ्याच्या दिशेने निघालो.
तळ
बघून झाल्यावर आता आम्हाला म्हणजे सर्वांनाच वेध लागले होते ते म्हणजे
तिथे असलेल्या पवनचक्की जवळ जाण्याचे आणि पवनचक्की जवळून पाहण्याचे.
माझ्यासोबत असलेल्या सर्वांचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे सगळे खूप
उत्साहात होते. इतकी भली मोठी पवन चक्की बघून सगळ्यांचा आनंद द्विगुणित
झाला.

तिथे आम्ही अनेक फोटो काढले. आणि आलेल्या वाटेने परतीला निघालो.
लेख आणि फोटो आवडले असल्यास तुमच्या ट्रेक करणाऱ्या मित्र परिवारास आवश्यक शेअर करा.
आमच्या ट्रेक मध्ये सहभागी होण्याकरिता www.gtribe.in या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क करा 7588592020 | 7588492020
BMC बेसिक माउंटेनिरिंग कोर्स म्हणजे काय रे भाऊ?
BMC बेसिक माउंटनिअरिंग कोर्स म्हणजे काय रे भाऊ ?
कुठे करतात? नेमकं काय असत त्यात ?
या सारखे अनेक प्रश्न आणि त्या संदर्भातील माहिती देणारा हा लेख.
१९९९ मधील टायगर हिल च्या लढाईनंतर भारतीय जवानांना सोबत सर्व सामान्य जनतेला देखील माउंटनिअरिंग मध्ये प्रशिक्षित करण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली. ही गरज लक्षात घेता हे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात उदयास आल्या.
भारतात स्थापन केलेल्या सर्व माउंटनिअरिंग संस्थांचा उद्धेश एकच आहे, ते म्हणजे
भारतातील युवा पिढीला माउंटनिअरिंगसाठी प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रात प्राविण्य गिर्यारोहक घडवणे. असा गिर्यारोहक जो जगाच्या पाठीवर भारताचे नाव उज्ज्वल करेल. या प्रशिक्षण केंद्रात केवळ गिर्यारोहण नाही तर आकाशातील साहसी क्रीडाप्रकार (स्काय डायविंग), स्की ,पॅराग्लायडिंग, स्कुबा डायविंग, माउंटन बाईक, राफ्टिंग, सर्च अँड रेस्क्यू या सारख्या विविध साहसी क्रीडा प्रकारात देखील प्रशिक्षण दिले जाते. अर्थात, त्यासाठी काही वयाच्या आणि (शाररीक क्षमतेच्या) फिटनेस बाबत चौकटी आखुन दिल्या गेल्या आहेत.
- माउंटनिअरिंग आणि ट्रेकिंग मधला फरक
ट्रेकिंग म्हणजे - एखाद्या विशिष्ठ ठिकाणी जाणे, फिरणे, निसर्गाचा आनंद घेणे आणि परत येणे. या मध्ये जंगल, नदीकाठचा प्रदेश, लहान -मोठे डोंगर आणि किल्ले त्यांचा समावेश होते. यात चालणे हा मुख्यउद्दिष्ट असतो.
माउंटनिअरिंग म्हणजे -बर्फाच्छादित प्रदेशातील भटकंती, बर्फाच्छादित शिखरे चढणे , प्रस्तरारोहण (सुळक्यावंर चढणे), रोप आणि इतर साहित्याचा आधार घेऊन डोंगर-दऱ्यात नवीन मार्ग शोधणे, रॅपलिंग, अवघड श्रेणीतील किल्ले चढणे. या सारखे उपक्रम साहसी प्रकारात मोडले जातात. अशा ठिकाणी शाररिक आणि बौद्धिक क्षमतेची परीक्षा होते.
प्रशिक्षण दरम्यानचा फोटो - स्त्री अथवा पुरुष सो नियम समानच
- हे प्रशिक्षण कोणासाठी आणि कशासाठी?
सह्याद्रीच्या कुशीत असो वा हिमालयात, भटकायच म्हणजे साधी गोष्ट नाही. भटकंतीला देखील अभ्यास लागतो. 'गिरिभ्रमण' हे साहसी क्रीडाप्रकारात मोडणारे प्रकरण आहे हे सर्वानी लक्ष्यात घ्यायला पाहिजे. दऱ्या-खोऱ्यातून भटकायचे म्हणजे जोखिम. येणाऱ्या काळात सुरु राहणारी भटकंती सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी आपल्याला अभ्यास आणि पुर्वतयारीचे महत्व समजणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना भेटले असता असं समजत कि गिर्यारोहण या विषयात दूरपर्यंत मजल मारायची असेल आणि टिकून राहायचं तर काही ठराविक गुण आणि विशिष्ट्य कौशल्य अंगीअसणे गरजेचे आहे. तरच गिरिभ्रमण करताना येणाऱ्या असंख्य अडथळ्यांवर आपण मात करू शकतो. या अडथळ्यांवर मात करायची असेल तर या क्षेत्राचं शास्त्रीय ज्ञान अवगत असणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच "Basic Mountaineering Course" (BMC ) करणे आवश्यक आहे. त्यानंतर Advance Mountaineering Course(AMC ), मेथड ऑफ इंस्ट्रकशन्स (MOI) , सर्च अँड रेस्क्यू या सारखे प्रशिक्षण टप्याटप्याने घेता येते.
खर तर या अभ्यासक्रमाची गरज ट्रेकर्स , ट्रेक ऑरगॅनिझर, सोलो ट्रॅव्हलर, फोटोग्राफर या सर्वानाच आहे. किंबहुना ज्यांना निसर्गात जायला भटकायला आवडता त्या सर्वांसाठीच आहे. या कोर्से मध्ये आपल्याकडून करवून घेतला जाणारा अभ्यासक्रम सर्वांसाठीच उपयुक्त आहे. अभ्यासक्रमात शिस्त, परिश्रम, सांघिक भावना, शाररिक आणि मानसिक कसोटी यावंर आधारित अशा विषयांचा समावेश असतो.
| आम्ही सर्व- २०१९ सप्टेंबर-ऑक्टोबर बॅच |
- हा कोर्स कधी आणि कुठे घेतला जातो?
- NIM - नेहरू इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग ,उत्तराखंड https://www.nimindia.net/
- NIMAS - नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स, अरुणाचल प्रदेश http://nimasdirang.com/Home/
- HMI - हिमालय माउंटनिअरिंग इन्स्टिटयूट, दार्जिलिंग https://hmidarjeeling.com/
- ABHIMAS - अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स अलाईड स्पोर्ट्स, हिमाचल प्रदेश . https://www.adventurehimalaya.org/
- JIM - जवाहर इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग अँड विंटर स्पोर्ट्स, जम्मू-काश्मिर http://www.jawaharinstitutepahalgam.com/
- IHCAE इंडियन हिमालयन सेंटर ऑफ ऍडव्हेन्टचर स्पोर्ट्स अँड इको टुरिझम, सिक्कीम. http://www.ihcaesikkim.org/
- IISM -इंडिया इस्टिटूट ऑफ स्किंग अँड माउंटनिअरिंग , http://www.iismgulmarg.in/ जम्मू-काश्मिर
- SGIM - सोनम ग्यासो माउंटनिअरिंग इन्स्टिटयूट, सिक्कीम
![]() |
| ग्लेशिअर मधला ट्रेनिंग स्पॉट |
वरील इन्स्टिट्यूटची यादी पाहता लक्षात येईल कि या
इन्स्टिट्यूट्स हिमालय पर्वत रांगेजवळ असुन यातील एक देखील महाराष्ट्रात नाही. त्यामुळे माउंटनिअरिंगचे प्रशिक्षण जर कोणी देत असेल तर कोण आणि कुठे देत आहे या बद्दल प्रवेश घेताना नक्कीच सर्व बाबींचा विचार करावा.👈
- प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते ?
वर्षातून दोन वेळा म्हणजे एप्रिल-मे आणि ऑगस्ट- सप्टेंबर च्या काळात हे कोर्स घेतले जातात. कमीत कमी ४० आणि जास्तीतजास्त ८०-९० विदयार्थांना दर कालावधीत प्रत्येक इन्स्टिटयूटमध्ये प्रवेश दिला जातो. त्यासाठी -
प्रवेश फॉर्म
रहीवासी दाखला
ओळखपत्राचा दाखला
आधार कार्ड
पॅनकार्ड
फोटो
फी भरल्याचे चलन / पुरावा
फिटनेस सर्टिफिकेट इत्यादी आवश्यक आहे.
काही इन्स्टिटयूट मध्ये मेल पाठवून तर काही ठिकाणी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रवेश दिला जातो.
सध्य परिस्थिती पाहता प्रत्येक इन्स्टिटयूट मध्ये कमीतकमी ६ महिने आणि
जास्तीत जास्त २ वर्षाचे वेटिंग आहे. म्हणजे तुम्हाला आज अर्ज केलात तर ६
महिने किंवा २ वर्षानंतर प्रवेश मिळतो.
हे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हे सैन्य दलातील अधिकारी असून अनेक वर्ष हिमालयातील वातावरणात रुजलेले दमदार आणि कणखर सैनिकच असतात. त्यामुळे कळत - न कळत एक महिन्याकरिता का होईना आपण देखील भारतीय सैनिकांचे खडतर जीवन काही अंशी अनुभवत असतो.
- प्रशिक्षणामधील अभ्यासक्रम
या प्रशिक्षणाचा कालावधी भारतातील प्रशिक्षण केंद्रांत २८ दिवसांचा आहे. सर्वसाधारण ५ किलोमीटर धावणे आणि नंतर कसून शाररिक कसरत यांपासून दिवसाची सुरुवात होते. पहिल्या १०दिवसात प्रशिक्षण केंद्रावर गिर्यारोहणाची माहिती, त्यात वापरण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक वस्तू म्हणजेच equipment ची ओळख आणि हाताळणी, या सर्व गोष्टी कशा वापरायच्या, त्याची प्रात्यक्षिके आणि सराव देखील घेतला जातो. यात मुख्यतः रोप आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नॉट्स व त्यांचा गिर्यारोहणात होणार उपयोग. त्याच सोबत पर्वतारोहण, प्रस्तरारोहण (रॉक क्लाइंबिंग) आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरुन जिवंत राहणे या कौशल्याची मूलभूत तंत्रे शिकवण्यात येतात आणि त्याविषयीची माहिती आणि अनुभव कथन देखील होते. पर्वतारोहण आणि त्यासंबंधित संबंधित विषयांचे नकाशा वाचन, हवामान अंदाज, प्रथमोपचार प्रशिक्षण आणि चढाईचे धोके यासारख्या विविध बाबी शिकवल्या जातात.
![]() |
| प्रशिक्षण केंद्रातून मिळालेला नजराणा |
१०-१२ दिवसानंतर सर्व विद्यार्थांना हिमालयातील एखाद्या पर्वतांवर घेऊन जाण्यात येते. जिथे बर्फ आणि बर्फाचे विविध प्रकार दाखवण्यात येतात. तसेच, प्रशिक्षणाची माहिती व प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येतात. यामध्ये,बर्फाच्या भिंतींवर चढणे, बर्फाचे प्रकार,स्वबचाव यांसारखी वेगवेगळी कौशल्य शिकवली जातात. हि सर्व करामत करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे अगदी बॅगेपासून सर्व काही केंद्र पुरवते. त्यामुळे आपल्या सामानाची आणि दिलेल्या वस्तूंची काळजी घेणे व त्या सर्व गोष्टी स्वतः उचलून ६०-७० किलोमीटरचा प्रवास करण्यात खरा कस निघतो.
प्रशिक्षणांतर्गत प्राणवायु कमी असलेल्या या ठिकाणी येणारा आरोग्याचा प्रश्न, विशेषत: उच्च उंचींमध्ये (high altitude ) नेमकं काय करायचं, येणाऱ्या शाररिक व्याधींना कसं हाताळायचं, अनिश्चित अडचणी कशा टाळायच्या आणि चढाई यशस्वीरित्या कशी पूर्ण करायची याचा देखील कळत न कळत सराव पडतो जे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे. हे प्रशिक्षण पुर्ण करताना अति थंडी असो वा बर्फवृष्टी, चांगलाच घाम निघतो खरा.
बर्फातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर,असते ती म्हणजे 'परीक्षा'! या दिवशी धमाल असते. रोजच्या पेक्षा वेगळा दिवस कारण, या दिवशी सर्व उद्दीष्टे साध्य करत, शिकवलेली सर्व कौशल्य एकत्रिरीत्या वापरून साधारण १७५०० -१९००० फुट या दरम्यान उंची गाठावी लागते ते देखील लवकरात लवकर. जेव्हा आपण ती ठराविक उंची गाठतो तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.
![]() |
| टो अँड हीट टेक्निक वापरून बर्फाची भिंत चढावी लागते |
त्यानंतरचा तीन चार दिवसांचा चालत चालत परतीचा प्रवास इन्स्टिटयूट वर येऊन थांबतो. प्रशिक्षण केंद्रावर आल्यावर लगेच सुटका नाही. आपण जे काही शिकून आलो आहोत त्याची लेखी परीक्षा,तोंडी परीक्षा किंवा काही सांघिक प्रात्यक्षिक घेण्यात येतात. तसेच धावण्याच्या स्पर्धा देखील काही ठिकाणी आयोजित केल्याजातात.
आपली एकंदर प्रगती, परीक्षेतील गुण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपली २८ दिवसातील वागणूक यांचा आढावा घेऊन अखेर ग्रेड दिली जाते. A ग्रेड मिळालेला विद्यार्थीच फक्त पुढील अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतो. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच स्वतःची वागणूक नीट ठेऊन आणि जे काही शिकवले जाते आहे ते सर्व व्यवस्थितरीत्या ध्यानात घेणे गरजेचे आहे.
- मला हे जमणार का?
हे सर्व आपोआप जमत नसतं त्यासाठी सराव गरजेचा आहे . पाठीवर १५-१८ किलो ओझं घेऊन १४-१५ किलोमीटर चालणे, त्यांत सिंहगड, पर्वती, कात्रज-सिंहगड यांसारखी ठिकाण पादाक्रांत करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ५ किलोमीटर पळणे आणि कवायत यांचा ३ महिन्यापासून सराव करणे आवश्यक आहे. वास्तविक स्वरूपात या कोर्सेसमध्ये पर्वतारोहण करणे सोपे काम नाही. प्रशिक्षण केंद्र सर्व काही पुरवते आपल्याला एकाच गोष्ट सोबत न्यावी लागते ती म्हणजे त्या २८ दिवसाचा खडतर कालावधीत तग धरुन राहण्याचा आत्मविश्वास,जिद्द, मानसिक व शाररीक तयारी आणि चिकाटी.
प्रशिक्षण केंद्रात संपूर्ण भारतातून १५- ४५ वयोगटातील विद्यार्थी येतात, १ महिन्यात सर्वांमध्ये सर्वांची चांगली मैत्री होते. प्रत्येक जण कशा न कशात तरी पारंगत असतो. प्रत्येकाचं या प्रशिक्षणाला येण्याचं ध्येय देखील वेगळं असत. या सर्वांनमध्ये एक गोष्टची साम्य असत ते म्हणजे त्यांना साहसी क्षेत्रातच त्यांना पुढे जायचं असतं, त्यातच काम करायच असत. ती कोणती क्षेत्र असू शकतात तर,
ऍडव्हेंचर फोटोग्राफर
प्रोफेशनल ट्रेकर
ट्रॅव्हल गाईड
ट्रॅव्हल ब्लॉगर
माउंटन गाईड
ऍडव्हेंचर टूर ऑपरेटर
ऍडव्हेंचर ट्रॅव्हल रायटर
ऍडव्हेंचर फिल्म मेकर
रेस्क्यू टीम मेंबर ( DMF/ NDRF - डिझास्टर मॅनॅजमेण्ट फोर्स )
यांसारख्या अनेक ...
![]() |
| रंगीबेरंगी टेन्स नी सजलेला आमचा बेस कॅम्प |
वरील क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी किंवा त्या त्या क्षेत्रात उत्तम कार्य करण्यासाठी जे जे अत्यावश्यक लागतात ते सर्व गुण आणि शिस्त या कोर्सेस मुळे सहज अंगी बाणता येतात.
- पुढे काय?
महाराष्ट्राच्या सीमेबाहेर, सर्वांपासुन दुर, नवीन लोकांमध्ये, शिस्तीच्या वलयामध्ये हे खडतर दिवस घालवताना आपल्याला आपली एक वेगळीच ओळख होते. स्वतःच्या शाररिक-मानसिक क्षमतेचा खरा- खुरा अंदाज लागतो. विचारसरणी व्यापक होते, दृष्टीकोन बदलतो. २८ दिवसात तासून निघाल्यावर आपण माउंटनिअरिंग मध्ये टिकणार- कि नाही हे सुद्धा स्वतःच स्वतःला समजते. त्यामुळे निकाल काहीही असो पण प्रामाणिकपणे स्वतःच आत्मपरीक्षण करून पुढे काय करायचं यावर नक्कीच विचार करा.
कोर्स दरम्यान ज्या ज्या ठिकाणी जे काही कमी पडले असेल म्हणजे चिकाटी असेल, स्टॅमिना असेल, एखादी लहान-मोठी शाररिक व्याधी उद्भवलेली असेल त्याला ओळखून त्यावर मात करायचा प्रण करा. पुन्हा एखादा नव्या जोशाने, दमाने उभे राहा.
कोर्स करून आल्यावर पुढे जाण्याच्या अनेक वाटा, संधी ज्या या आधी कदाचित अंधुक स्वरूपाच्या असतात त्या आता स्पष्ट दिसायला लागतात. उत्तम श्रेणी आणि प्रमाणपत्र हातात आल्यावर पुढच्या कोर्ससाठी तयारी करायला हरकत नाही. नवीन नवीन लोकांना भेटल्यावर नवनवीन कल्पना, विचार मनात घर करून जातात. या प्रवासात अनेक समविचारी लोकं एकत्ररित आलेले असतात त्यामुळे एखादी नवीन दिशा - कल्पनांचा उदय देखील होतो. तोच विचार अथवा दिशा कदाचित तुमच्या आयुष्यातील एक सुवर्णसंधी देखील असू शकते.. माझ्या मते त्या संधीसाठी तरी पुढे चालत राहावे न थांबता आणि नवीन लोकांना भेटत राहावे,काहीतरी नवीन शोधण्यासाठी, नवीन जगण्यासाठी...*अत्ता सध्या कोरोना मुळे काही इन्स्टिटयूट मध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी व्यवस्थित माहिती घेऊनच प्रवेश निश्चित करावा.
- अधिक माहितीसाठी
ज्या विद्यार्थांना बेसिक/ऍडव्हान्स कोर्ससाठी काही अडचणी येत असतील किंवा कोर्स संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास, पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA) शी संपर्क करावा. ही संस्था अशा मुला-मुलींना माउंटनिअरिंग कोर्सेससाठी मोफत मार्गदर्शन करते. पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सुमारे ६५०-७०० विद्यार्थ्यांनी भारतातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्सेस केले आहेत.
पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA)
pcmaclimbing@gmail.com
७५८८४९२०२०/९०९६४७४२२४
ट्रेकिंगला निघण्याआधीची पुर्व तयारी भाग २
नमस्कार मित्र- मैत्रणींनो!!
कसे आहात??? चालता आहात कि नाही.. नसेल तर चालायला सुरुवात करायला हवी. कारण आता ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या मस्त अनुकूल मौसमाला सुरुवात झाली आहे.
नोव्हेंबर-फेब्रुवारी हे महीने म्हणजे आमच्या सारख्या भटक्यांसाठी "सोन्याचे दिवस. एकंदर हिवाळा म्हणजे सर्वांसाठीच अल्हादायी वातावरणाचा काळ!
या वर्षी सबंध महाराष्ट्रात पावसाळा चांगलाच लांबला. त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही वाहते झरे आणि सह्याद्रीच्या कुशीत उसळ्या मारणारे लहान-मोठे धबधबे सहज पाहायला मिळतात.
मग, तयारीला लागा 🏃🏃🏃 आता.
या आधीच्या पोस्टमध्ये म्हणजे ट्रेकिंगला निघण्याआधीची पुर्व तयारी भाग १ मध्ये नवख्या ट्रेकर्सच्या
दृष्टीने अत्यंत महत्चाच्या आणि गंमतीदार गोष्टी नमूद केल्या आहेत.या मध्ये
नेमकी सुरुवात कशी करावी, कुठल्या पद्धतीची काळजी घ्यावी आणि काय काय चुका
होऊ देऊ नये या संदर्भातील माहिती सविस्तर पद्धतीने दिली आहे.
तर, या पोस्ट मध्ये ट्रेकिंगला जाताना नेमकं कोणत्या वस्तूंचं पॅकिंग करावं आणि खाण्या-पिण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी या विषयाची उपयुक्त माहिती देत आहे.
पॅकिंग करण्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कि आपली बॅग आपल्याला उचलायची आहे. त्यामुळे ती
"कमीत कमी सामान असलेली (हलकीच) असावी".😉.
पॅकिंग करताना बॅग मध्ये एखादी गोष्ट भरण्यापूर्वी एकच प्रश्न मनाला विचारावा - "मला खरोखरच या गोष्टीची गरज आहे का"? जर उत्तर हो असेल तर - आने दो,नही तो रख दो !!! So Simple 👍
स्व-अनुभव- अर्ध्यापेक्षा जास्त सामानाची आपल्याला आठवणच होत नाही कि त्या बॅग मध्ये आहेत. थोड्यात काय - त्या वस्तू अनावश्यक असतात तरी आपण कॅरी करतो आणि जशाच्या तश्या घरी परत आणतो.
आता या बाबतीत मी जरा हुशार झाले आहे बर का !!(बरीच वर्ष लागली म्हणा हे ज्ञान यायला)असो !!
![]() |
| २ वर्षांची स्वानंदी .. जानेवारी २०१९ रायरेश्वर च्या पायथ्याशी.. |
लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक अशा लागणाऱ्या गोष्टी :
मुलांचे वय १-२ वर्ष असेल तर :
- बेबी कॅरिअर (सविस्तर माहिती ट्रेकिंगला निघण्याआधीची पुर्व तयारी भाग १ मध्ये दिली आहे)
- ३-४ डायपर (वापरत नसाल तर आवश्यकतेनुसार लहान चड्ड्या)
- वापरलेलं डायपर गुंडाळ्यासाठी पेपर आणि प्लास्टिक पिशवी
- वेट टिशु/ ड्राय टिशु
- दुधाची बाटली
- पाण्याची बाटली (वेगळं उकळलं वापरात असाल तर )
- बाळाचे आवश्यकतेनुसार जेवण
- २ कपडे-जोडी (अगदी बारीकशी घडी होईल असे कपडे.कपड्याची निवड ऋतुमानानुसार )
- नॅपकिन्स
- सॉक्स २ जोडी
- अंगावर घेण्यासाठी सुती कापड
- एखादंच आवडत खेळणं
![]() |
| पाच महिन्याच्या स्वानंदीची आवडती बॉटल आणि लहानसं खेळणं .. सगळं नवीन नवीन असताना काढलेला फोटो ..वाटलं नव्हतं इथे हा फोटो वापरेन म्हणून.. 😂😂 |
मुलांचे वय २.५ वर्षाच्या पुढे असेल तर :
जरासं आपण स्वतःला नशीबवान समजू शकतो. कारण अडीच वर्षावरील मुले सहसा सु-शी
आली असेल तर सांगतात त्यामुळे बरच मोठं टेंशन इथेच कमी होत. (डायपर कॅरी न
करण्याचं)
तरी देखील खालील गोष्टी सोबत असाव्यात :
- ओंडेम किंवा प्रवासात उलटी होऊ नये त्यासाठीची औषधे
- १ जोडी ड्रेस
- सुती नॅपकिन किंवा लहान टॉवेल
- २ आतल्या चड्ड्या
- उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी / स्कार्फ
- मोजे
- न घसरणारे शूज
- वॉटरबॅग- ग्लुकाँडी / टॅंगो /लिंबू सरबत पिण्यासाठी (मुलांच्या आवडीच्या वॉटरबॅग असाव्यात त्यानिमित्ताने भरपूर पाणी पितात)
![]() |
| स्वानंदीच्या वॉटरबॅगची जागा-- माझ्या गळ्यात .!!! |
बाई! बाई!! "मुलांचं इतकं सामान सगळं ठेवलं तर आमचं म्हणजे मोठ्यांच सामान कुठे ठेवायचं"? असा प्रश्न पडला असेल तर-
"टेंशन नही लेने का रे बाबा" !!
मोठ्यांना फक्त -
- उलटी-मळमळ गोळी😝😝
- सॅनिटायझर /पेपर सोप
- लहान टॉवेल /नॅपकिन
- ३-४ लिटर पिण्याचे पाणी(मुले देखील हे पाणी पिणार असतील तर मुलांची वेगळी पाण्याची बाटली घेण्याची गरज नाही)
- गॉगल 😎😎
- जुने वर्तमान पत्र - (जेवताना अंथरण्यासाठी )
- टोपी 🤠🤠👒
- हेड टॉर्च -(अंधार किंवा संध्याकाळी अत्यंत गरजेची गोष्ट. कारण मोबाईल ची बॅटरी अशाच वेळी जाते जेव्हा आपल्याला खूप गरज असते)
- ओडोमॉस (सगळ्यांना उपयुक्त)
बस्स !!!
स्वानंदी २ वर्षांची होई पर्यंत आम्ही २ बॅग्स घेऊन फिरत होतो. एक तिच्यासाठी आणि आमच्या दोघांसाठी एक. आता तिच्या एकंदर गरजा कमी झाल्याने आमच्या तिघांचं सगळं सामान एका बॅगमध्ये सहज बसतं.
आता आपण जरा महत्वाच्या विषयाकडे म्हणजे पोट्या-पाण्याकडे बघू 🍝🍝🍝🍝
ट्रेकिंग दरम्यान लहान (१ ते १० वर्षांची मुले) आणि मोठ्यांना देखील खाता येतील असे पदार्थ :
खालील गोष्टी आपण सहज घरातून बनवून नेऊ शकतो म्हणजे बाहेर विकत घ्यावे लागत नाही. रानावनात जेवताना वनभोजनाचा 🌳🌳🌳🌳 आनंद देखील लुटता येतो.
![]() |
| विसापूर किल्यावर भोजन कार्यक्रम .. दिवाळीच्या (😌😌उरलेल्या) चकली/चिवड्या सकट. |
- भाजी-चपातीचा डबा- (खालील भाज्या चपातीमध्ये रोल करून दिल्यास मुले आवडीने खातात)
- सुक्या भाज्या ज्या जास्त वेळ टिकून राहतात आणि ज्यात कांदा नसतो -
- बटाटा
- तोंडली
- भेंडी
- मेथीची भाजी डाळ घालून (जरा वाढते हो!! )
- डाळ-दोडका
- तेलावर परतलेले कारलं - तिखट आणि मीठ घालून
- गवार - तेलावर परतून मिरची-मीठ घालून
- डाळ-वांग
- शेपू
- खार वांग (खोबरं,कोथिंबीर, हळद घालून)
- चटण्या - शेंगदाण्याची /कारळे/ जवस/खोबरं-लसूण
- जॅम/ गूळ-आंबा/
- गूळ/ साखर-तूप चपाती
सकाळच्या नाष्टयासाठी आणि आधे -मध्ये खाण्यासाठीच्या पदार्थांची यादी - आनंदाची गोष्ट म्हणजे कमी वेळात होतात .
दिवसाची सुरुवात फळं आणि भिजवलेल्या बदाम किंवा मनुक्यांनी केलेली उत्तम !!
- इडली
- परतलेले -मोड आलेल्या कडधान्याची भेळ (लिंबू मारके)
- भेळ
- उपमा
- केळी
- संत्री 🟠🟠
- मोसंबी
- बोरं
- पेरू
- सफरचंद 🍎
- सुकामेवा - बदाम,काजू,मनुके,खजूर
- भिजवलेले हिरवे मूग
- शेंगदाणे -फुटाणे -गूळ
- लाडू- दाण्याचा/ कणकेचा/नाचणीचा/मिश्र डाळींचा / राजगीरा
- चिक्की
- टॅंगो / ग्लुकाँडी १-२ पाकीट (लहान१०-१५ रुपयात मिळतात )
- चॉकलेट्स
![]() |
| विसापूर किल्यावर.. आदिनाथच्या या बॅग मध्ये आमच्या तिघांचं दिवसभराचं सामान पाण्याच्या बाटल्यांसकट बसलं आहे. |
माझ्या मते, आता तुम्हाला बरीच कल्पना आली असेल कि नेमकं काय काय घ्यावं आणि काय घेऊ नये.
सुचवलेल्या लिस्ट पैकी डबा आणि खाण्याच्या कोणत्याही ३-४ गोष्टी बाळगल्यास तुमचा ट्रेक कमी खर्चात आणि झक्कास होऊ शकतो👍👍.
💪💪स्वस्थ खाओ ... 💓💓तन मन से घुमो...
हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना जरूर फेसबुक,व्हाट्सअपवर शेअर करा आणि खाली कंमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला हा लेख वाचून काय वाटत आहेत ते देखील कळवा.
सह्याद्रीतील एक रत्न - रतनगड
सकाळी ठरल्याप्रमाणे दहा वाजता प्रबोधिनीच्या गेटवर आमची गाडी उभी बघून आता आपण रतनगडच्या प्रवासाला निघणार आहोत याची शाश्वती झाली. काही दिवांपूर्वीच रतनगडला होणाऱ्या गर्दीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कारवी ला आलेल्या फुलांमुळे आणि त्या फुलांचा आनंद घेण्यासाठी म्हणून ही गर्दी रतनगडावर होत होती. त्यामुळे आज जाऊ-उद्या जाऊ या विचारांमध्ये रतनगडला जाण्यासाठी अखेर आठवड्यातील सोमवार -मंगळवार हा दिवस निवडला.
आमच्या टीम मधील विश्वराज व्यवहारे ने सर्वांकडून तयारी करून घेतली बॅग तयार झाल्या आणि अखेर आम्ही गाडीत बसलो.
वाटेमध्ये दोनच्या सुमारास आम्ही मजबूत जेवलो.
भंडारदरा धरणाच्या आजूबाजूचा परिसर
संध्याकाळी वातावरण बदलला. अकोले मध्ये आम्ही आलो होतो. हवेतील गारवा , निसर्गाची मोहकता हिरवीगार झाडी, सोन्यासारखी पिवळी झालेली भात शेती यावरून आपण वेगळ्या विश्वात आलो याची अनुभूती आली. महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या अभयारण्यामध्ये आम्ही प्रवेश केला होता. साधारण पाचच्या दरम्यान आम्ही भंडारदरा या परिसरामध्ये पोहोचलो होतो. भंडारदरा धरणाच्या आजूबाजूचा परिसर आणि त्या परिसराची भवती पहारा देत उभी असलेली कळसूबाईची शिखराची रांग, कळसुबाई शिखर, अलंगगड,मदनगड,कुलंगगड आणि रतनगड याचे दर्शन एकाच ठिकाणाहून होते. सह्याद्रीच्या या आगळावेगळा परिसरात आणि जलसंपत्ती लाभलेल्या अशा स्वर्गात आम्ही सूर्यास्ताच्या वेळेला जाऊन पोहोचलो. सूर्यकिरणांनी आकाश तांबडे करून सोडले होते. त्यामध्ये ही सर्व किल्ल्यांच्या रांगा अधिकच मोहक वाटत होत्या.
पिवळे गवत त्या सौंदर्यामध्ये भर घालत होते. आणि पक्षांचा चिव चिवट आमचे स्वागत करत होता. अशा निसर्गाने भारावून टाकलेल्या सायंकाळी आमचा पाय तिथून काही निघत नव्हता. पण भानावर येऊन काहीशा छान आठवणी डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही तिथून निघालो. साडेसातच्या सुमारास आमची गाडी साम्रद या गावी जाऊन थांबली.
शेकोटीभोवती आम्ही बसलो
वातावरणामध्ये हलकासा गारवा होता. गरमागरम जेवणामुळे त्या गारव्याला आणखी मजा आली. जेवणाच्या आधी आशियातील दुसऱ्या क्रमांकावरील सांदण व्हॅली या ठिकाणी आम्ही शेकोटी पेटवून आमचं बस्तान काही वेळ मांडलं. एकमेकांचे गिर्यारोहणातील अनुभव आणि ओळख यातून गप्पा रंगल्या. गप्पांमुळे आणि ज्या शेकोटीभोवती आम्ही बसलो होतो त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये एक विश्वास निर्माण झाला. सर्व वयोगटातील लोक एकत्र असल्यामुळे प्रत्येकाचे अनुभव, विचार,दृष्टिकोन सर्वच कौतुकास्पद होतं. जेवण करून आम्ही रतनगड ची स्वप्ने बघू लागलो सकाळी सहाला आम्हाला रतनगडाकडे प्रस्थान करायचे होते.
पाच वाजता सगळ्यांच्या मोबाईल मधील गजराने आम्हाला झोपेतून जागा केलं. पटकन उरकून आम्ही झटकन बाहेर पडलो. नाश्ता आणि गरम चहा घेऊन रतनगडाची वाट पकडली. शेताच्या बांधांवरून आम्ही चालू लागलो.
रतनगड त्यावेळेला फारच उंच दिसत होता. कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराचा तो परिसर. साहजिक आहे रतनगड त्याच रांगेत असल्यामुळे त्याची उंची देखील कळसुबाईच्या आसपासच असणार, आणि चढण्यासाठी तितकाच आव्हानात्मक. जंगलातून अगदी 100 मीटरचा रस्ता पूर्ण केला आणि चांगली चढण लागली. वातावरणातील थंडता आणि सकाळची ऊर्जा आम्हाला पुढे नेत होती. आठवड्यातील सोमवार असल्यामुळे गर्दी अजिबातच नव्हती. गडाच्या वाटेवर आम्ही काय ते पंधरा सोळा जण गप्पाटप्पा करत फोटो काढत दमत पुढे जात होतो.
बाणाच्या आकाराचा बाण नावाचा सुळका
साडेआठच्या दरम्यान शिडीच्या वाटेवर पोहोचलो. त्या ठिकाणाहून सांधन व्हॅलीची मागची बाजू अगदी सहज दिसत होती. त्या मागच्या बाजूस अलगदपणे बाणाच्या आकाराचा बाण नावाचा सुळका डोकावत होता. साधारण 970 फुटी असा हा सुळका फारच आकर्षक तितकाच आव्हानात्मक भासत होता. गडावरील एका टप्प्यावर आम्ही पोहोचलो. गडावरील लोखंडी रेलिंग च्या मदतीने आम्ही पुढे पुढे जात राहिलो. गडावर आल्यानंतर कळसुबाई शिखर आणि आजूबाजूचा परिसर आणखीनच मनमोहक वाटत होता आणि त्यात भर पडत होती ते म्हणजे तिथल्या जलाशयाची. जितका मोहक परिसर तितके जास्त कष्ट शरीर अनुभवत होते चढण चांगलीच होती. मात्र निसर्गाची साथ लाभली आणि आम्ही तो चढणीचा भाग अवघ्या काही वेळातच पार केला. पुढील टप्प्यावर आम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या पार करायच्या होत्या. अंगावर येणारा चढ आणि त्यात मोठ्या पायऱ्या हे आवाहन केलं आम्ही किल्ल्यावरील पहिल्या दरवाज्यात पोहोचलो.
किल्ल्याचा पहिला दरवाजा मोहक वाटला. पुढे पंधरा एक पायऱ्या चढल्यावर एका पठारावर पोहोचलो. जरा वेळ विश्रांती घेतली आणि पहिला टप्पा म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले रतनगडचे नेढे. ज्याचे आकर्षण सर्वच ट्रेकर्सला असते. आठवड्यातील पहिलाच दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी अजिबात गर्दी नव्हती आणि आम्हाला वैयक्तिक रित्या नेढ्यामध्ये फोटो काढण्याची संधी लाभली.
पहिला टप्पा
नेढ्यातून खाली डाव्या हाताला उतरून आम्ही तिथे असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या. आकाशातील निळ्या रंगामुळे टाक्यातले पाणी फार सुंदर निर्मळ वाटत होते. त्याच परिसरामध्ये काही जिवंत झऱ्यांचा आनंद देखील आम्ही घेतला. रतनगडावरील पाण्याच्या टाक्यांच्या विस्तारावरून त्या ठिकाणी पाणी कसे वाचवावे, साठवावे याबद्दल दूरदर्शी विचार झालेला दिसून येतो.
रतनगडावरील पाण्याच्या टाक्यांच्या विस्तार
त्याच ठिकाणाहून काही अंतर पुढे जाता कात्राबाईचा डोंगर, अग्निबाण सुळका, आजोबा डोंगर अगदी व्यवस्थितपणे दृष्टिक्षेपात येतात.
नैसर्गिक रित्या तयार झालेले रतनगडचे नेढे
कडेलोटाच्या समोरील भग्नावस्थेतेतील बुरुज आजही तिथे तग धरून ताठ मानेने उभा आहे. खिडकी असलेला हा बुरुज येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी एक आकर्षण बिंदू आहे. बुरुजाच्या डाव्या बाजूला चालत जाता गणेश दरवाजा लागतो. गणपतीचे आणि हनुमानाचे शेंदरी रंगात असलेले कोरीव काम त्या काळा कातळातील दगडांमध्ये खुलून दिसते.
कडेलोटाच्या समोरील भग्नावस्थेतेतील बुरुज
रत्नाई देवीचे मंदिर व पुढील 70 80 लोकांना राहता येईल अशी भव्य गुहा पाहण्यासारखी आहे .
रत्नाई देवीचे मंदिर
भव्य अशा रतनगडास वेढा मारून आणि वर नमूद केलेली सर्व ठिकाणे पाहून अकराच्या दरम्यान आम्ही गड उतार करण्यास सुरुवात केली.
असा आमचा हा रतनगडाचा ट्रेक मनामध्ये खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही पूर्ण केला
आदराई जंगल ट्रेक! एक हलका फुलका परफेक्ट पावसाळी ट्रेक!
जुन्नर मधील खिरेश्वर या गावाजवळ असलेल्या आदराईजंगलात भटकण्याचा योग या वर्षी लवकरच आला.पहाटे आम्ही साधारण ५. ४५ ला पुण्याहून खिरेश्वरकडे निघालो.
पुण्यातून निघालो तेव्हा वातावरण ढगाळ होतं, पण पाऊस मात्र बिलकुल नव्हता. पुढे पावसाची चिन्ह दिसत होती मात्र, पडेल का नाही यात मात्र शंकाच होती. आळेफाट्याजवळ पोहचताच हलका-हलका पाऊस रस्ता भिजवत होता. शेतांच्या वाफार्यांमध्ये हिरव्या अंकुरांनी आता माती घरून ठेवलेली दिसली. पावसामुळे झाडे देखील स्वच्छ धुऊन निघालेली होती. दोन तासांनी पिंपळेगावच धरण लागलं. अवघ्या १०-१५ मिनिटातच आम्ही खिरेश्वर गावात पोहचलो.
हा ट्रेक सहज सोपा आणि केवळ वर्षाविहाराचा आनंद घेणे या उद्देशाने आखला होता. म्हणून या ट्रेक ला स्वानंदी देखील माझ्या सोबत आली होती. सकाळी अगदीच म्हणजे पहाटे ४. ३० ला उठल्यामुळे स्वारीचा मूड निम्मा अर्धा झोपेत होता. हिरवी गार कुरणं, शेतातून वाहणारे पाणी आणि त्या हिरव्या हिरव्या कुरणांवर पांढऱ्या बगळ्यांची भरलेली शाळा!! हे पाहून स्वानंदी जाम खुश झाली.
नास्ता झाला. गरम गरम पोहे आणि चहा पोटात गेले. आता आम्ही गाव सोडलं आणि जंगलाच्या दिशेने चालायला लागलो.
स्वानंदी देखील चालत होती. वातावरण आल्हादायी होत. खूप पाऊस नव्हता आणि ऊनही नव्हते. पावसाने हळू हळू हजेरी लावायला सुरुवात केली. आम्ही पुढे पुढे गर्द झाडीत आत आत जायला लागलो. तसा पावसाने जोर धरला.
सुंदर असं हे जंगल. आंबे, करवंदांच्या, सागाच्या झाडांनी भरलेलं. लहानशी वळ्णावळणाची वाट पुढे गर्द झाडीत घुसत होती.
सकाळच्या वेळी विविध पक्षांनी वेगवेगळे आवाज करून आमचे स्वागत केले असावे. पावसात भिजून आनंदून गेलेल्या पक्षांच्या किलबिलाटाने जंगल दणाणून गेलं होत. हलकंसं ऊन झाडीतून डोकावून पाहत होत. अशा रम्य वातावरणात आम्ही चालत होतो. एक तास चालल्या नंतर आता कानावर पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा आवाज पडू लागला होता. नक्कीच पुढे पाण्याचा मोठा प्रवाह वाहत आहे हे जाणवत होत. पाण्याच्या आवाजाच्या दिशेने पावले आता झपझप चालत होती. झाडीतून बाहेर येताच मोठा असा पाण्याचा प्रवाह वाहताना दिसला. किमान एक ते सव्वा तास आम्ही इथं पर्यंत पोहचण्या करिता चालत होतो. आता आम्हाला या प्रवाहाजवळ विश्रांती घेण्याची गरज वाटत होती. तिथे जवळच लहानशी टपरी होती. इथे पोहचे पर्यंत स्वानंदी देखील पूर्ण भिजली होती आणि थंडीने गारठली होती.
तब्बल दोन वर्षानंतर मी आज बेबी कॅरिअर सोबत घेतलं होत. अनेक महिन्यांनी स्वानंदी माझ्या सोबत ट्रेकला आली होती. मला खात्री होती कि बॅगची गरज पडेल म्हणून. तसंच झालं. साधारण २ किलोमीटरच्या ट्रेक नंतर तिला झोप आवरेना. अखेर बॅगेची मदत घ्यावी लागली. पहिल्या प्रवाहाजवळ पोहचल्यावर तिला गरम गरम मॅगी खाऊ घातली. आम्ही देखील या वातावरणात गरम मॅगी आणि चहाचा आनंद लुटला. सोबत माझी अजून एक ट्रेक मैत्रीण होती सोनाली, तिने देखील खूप धमाल केली. स्वानंदीची झोप आणि तिचं गारठण हे सांभाळण जास्त आव्हाहनात्मक होत. तिला बॅग मध्ये बसवलं. मग मात्र तिला देखील उब आली.
साधारण अर्धा तास आम्ही तिथेच थांबलो. निसर्गाचा आनंद घेतला आणि पुढील टप्यावर निघालो. अगदी १-२ मिनिटांमध्येच परत पुढचा धबधबा लागला. जिथे अजिबात गर्दी नव्हती. बॅग बाजूला ठेवली. पाणी जिथून येत होतं त्या दिशेला चालायला सुरुवात केली. वाह्ह काय नजारा होता तो! स्वच्छ शुभ्र फेसाळलेलं पाणी! मी, सोनाली आणि मोनिकाने तिथे खूप फोटो काढले. पाण्यात उड्या मारल्या. धबधब्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेतला. या ठिकाणी स्वानंदी देखील काही वेळ छान रमली. पावसाची ये-जा चालूच होती.
दोन तास या ठिकाणी वाहत्या निखळ पाण्याचा मनमुराद आनंद घेतला. पुढे परतीच्या वाटेवर लागलो. जंगलातून बाहेर पडताना एका झाड्याच्या बुंध्यांमध्ये गणपती बाप्पा अवतरले कि काय असा भास झाला. एव्हाना स्वानंदी रमली. ती देखील आता वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजाचे निरीक्षण करायला लागली आहे. पाऊस या वेळेपर्यंत पूर्ण थांबला होता. ती जाताना बरीच चालली.
जंगलातून आम्ही बाहेर पडलो तेव्हा दुपारचे १ वाजले होते. स्वानंदी ला चिखलात देखील उड्या मारायच्या होत्या. आणि तिने त्या भरपूर मारल्या. तिच्या आवडत्या पेपा पिग प्रमाणे! वातावरण फारच स्वच्छ झाल होत, त्यामुळे निसर्गाचा आणि हरिश्चंद्र गडाच्या परिसराचं रूप निघताना डोळ्यात भरून घेता आलं.
याच ठिकाणाचा पुढील ट्रेक ऑगस्ट महिन्यात आहे. नाव नोंदणी चालू. संपर्क ७५८८४९२०२०
लेख आवडला असल्यास तुमचा अभिप्राय जरूर कळवा. तुमच्या निसर्ग मित्र मैत्रिणीला शेअर करा.
'महादेवाचा डोंगर' २०२२ ची सुरुवात
मुलांना घेऊन ट्रेक साठी नेमकं कुठे घेऊन जात येईल. किंवा योग्य ठिकाण कसं निवडावं? या वर प्रकाश टाकणारा लेख
२०२२ ची सुरुवात चांगली झाली. घरातल्यांसोबत कुलदैवताचे दर्शन घेऊन आमच्या गिरिभ्रमंतीला सुरुवात झाली आहे. या वर्षीचा पहिला ट्रेक म्हणून आम्ही आमच्या गावाजवळील - 'महादेवाचा डोंगर' चढण्याचे ठरवले. नावाप्रमाणेच डोंगरावर शंकराचे मंदिर आहे म्हणून याला महादेवाचा डोंगर अस म्हणतात. सांगोला तालुक्यातील, टिपेआळी, म्हणून हे गाव.
अनेकजण, विशेषतः महिला मला नेहमीच प्रश्न विचारतात कि मुलांना घेऊन ट्रेकसाठी नेमकं कुठे जाता येईल किंवा योग्य ठिकाण कसं निवडावं?
आज आम्ही त्या तिथे दिसणाऱ्या पवनचक्कीला हात लावायला जाणार आहोत
सर्वात प्रथम म्हणजे मुलांसोबत ट्रेक करायचा असल्यास ट्रेक किंवा त्या ठिकाणाची उत्कटता निर्माण करण फार गरजेचे आहे. महादेवाच्या डोंगर चढ़याआधी डोंगरावरील भली मोठी अशी पवनचक्की स्वानंदीसाठी एक आकर्षणाचा भाग होती. "चल आपण त्या पवनचक्कीला हात लावायला जाऊ". असं म्हंटल्यावर नक्कीच कोणामध्येही ट्रेक साठी उत्साह निर्माण होईलच, अगदी मोठ्यांमध्येही. प्रत्येक ठिकाणाचं अशी वैशिट्ये मुलांना सांगावीत, जस डोंगरावरील तलाव, धबधबा, आंब्याचं झाड इत्यादी. त्या विचाराने मुल तिथं पर्यंत चालण्याचा प्रयत्न करत.
आमच्या सोबत २-३ लहान मुले होती आणि आम्ही तिघे मोठे असे सर्वजण सकाळी डोंगरावर चढाई साठी निघालो.
ठिकाण
शोधताना किंवा एखाद्या डोंगरावर, किल्यावर चढाई करताना त्या गावातील किंवा
भागातील जाणकार लोक सोबत असण फार गरजेचे आहे. म्हणजे ठिकाण कितीही
माहितीतील असल तरीही ग्रुप मध्ये ट्रेक करा. लहान मुलांना घेऊन एकट्याने ट्रेक करणे टाळा.
किमान ३-४ पाण्यासाठी ब्रेक घेतले
चढणीचा असा हा महादेवाचा डोंगर येऊन-जाऊन आमच्यासाठी ५-६ किलोमीटर भरला. सोबत पाण्याची बाटली, नॅपकिन, थोडासा खाऊ.. घेऊन आम्ही निघालो. अगदी रमत गमत नाही पण, किमान ३-४ पाण्यासाठी ब्रेक घेतले. त्या दरम्यान डोंगरावरून दिसणारी छोटी छोटी गावं, लांबसडक जाणारा रस्ता,शेततळी यांविषयी आमच्या गप्पा रंगायच्या. हायवे वरून पळणाऱ्या पिटुकल्या गाड्याची रेस बघायला स्वानंदीला खूप धमाल वाटते. अजून वर वाजून बघू चला, असं म्हणत म्हणत डोंगराचा माथा कधी आला हे समजलं नाही. आज काल आम्हाला पक्षी निरीक्षणाचे देखील वेड लागले आहे, त्यामुळे ट्रेकिंग आणखीनच नावीन्यपूर्ण अनुभव देणारा असा विषय झाला आहे.
स्वानंदीसाठी माझ्या सोबत नेहमीच काही ना काही खाण्यासाठी असत. जस चॉकलेट,गोळ्या,लाडू असं. आवडत जिन्नस सोबत बाळगलं तर मुल खात खात त्या ट्रेकचा आनंद घेतात. जर मुलांसोबत (पाच-सहा वयोगटातील) पहिला किंवा दुसराच ट्रेक असेल तर ट्रेक साधारण ५-६ किलोमीटर् अंतराचाच असावा. सोबत खाऊ बाळगावा म्हणजे ब्रेक (पाण्यासाठी असावा) घेतल्यावर मुलांच्या आवडीच्या गोष्टी त्यानं देता देतात आणि पुढील ब्रेक झाल्यावर परत खाऊ मिळणार म्हणून देखील मुलं नीट ट्रेक करतात.
४५-५० मिनिटात आम्ही माथ्यावर पोहचलो. डोंगरावर विस्तृत पठार, त्या पठारावर वाऱ्यावर डुलणारी ज्वारीची कणसं, त्यात स्वतःच्या तालावर गोल-गोल फिरणारी पवनचक्की. हा नजारा म्हणजे आमच्या आत्तापर्यंतच्या डोंगरयात्रेतीच्या सर्वात वैशिष्ठपूर्ण आणि वेगळा अनुभव. या आधी पवनचक्की इतक्या जवळून पाहण्याचा योगच कधी आला नव्हता. एक नाही तर किमान १५-२० विंडमिल्स त्या परिसरात असतील. मुलांनी एका पवनचक्कीच्या ठिकाणी मुक्काम ठोकला आणि विंडमिल्सच्या जिन्यावर वर-खाली उड्या मारून, त्यावर आडवं-तिडवा होऊन जाम धमाल केली.
डोंगरावर विस्तृत पठार, त्या पठारावर वाऱ्यावर डुलणारी ज्वारीची कणसं, त्यात स्वतःच्या तालावर गोल-गोल फिरणारी पवनचक्की.
अशा ठिकाणी घड्याळ बाजूला ठेवून मुलांना जे हवं ते करून द्या, पडेल तर पडू द्या पण अनुभव घेऊ द्यात . कारण अशा आठवणीच अखेर हसवतात!
विहीर आमची वाट पाहत होती.
दाण्याने
भरत आलेल्या कोवळ्या कणसाचे दाणे गोड़ लागत होते. त्या वातावरणात कोवळ्या
धान्याचा वास पसरला होता. उर भरून श्वास घेतला तरी तरी मन भरत नव्हत.
कणसं-कणसं डोलून आमच स्वागत करत होती. ती कोवळी कणसं बघून चुल आठवायला
लागली होती. चुलीतील हुरड्याची चव नकळतच जिभेवर उतरायला लागली. शेतात
फिरून-बागडून मन भरल. खाली उतरायची वेळ झाली होती. पुढे विहीर आमची वाट
पाहत होती.
विंडमिल्सच्याच्या सावलीत आराम करायची मजा काहीच औरच! शहरातील, सर्व व्याप कुठेतरी दूर सोडून इथे अशा शांत ठिकाणी वर्षातून एकदा पळून येण्यास काही हरकत नाही.
१० वर्षांनंतर ... ढाक सुळका प्रस्तरारोहण मोहीम
वेळ आहे , चला ट्राय करू, अशा विचाराने या सुळक्याकडे अजिबात पाहू नये. डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या खोल दऱ्या , सटकन पाय निसटणारी चढण आणि होल्ड म्हणून पकडलेल्या दगडाची टिकून राहण्याची अनिश्चितता यांमुळे दिसायला उंचीने लहान असला तरी धोकादायक असा हा कळकराय समोरील 'सून' किंवा 'ढाकचा' सुळका.
अनेक वर्ष म्हणजे जवळ जवळ १० वर्ष झाली असतील या सुळक्यावर इतक्यात कोणीही चढाई केली नव्हती. कारणे बरीच असू शकतात. त्यातील काही पुढील प्रमाणे:-
- एकतर हा जेमतेम ८० फुटी सुळका.
- या सुळक्यावर बोल्टिंग नाही.
- सुळक्यावर रोवलेल्या ३ मेखा आणि उजव्या बाजूला एक रिंग बोल्ट त्याच्या आधारावर चढाईची जोखीम उचलणे आवाहात्मक नक्कीच आहे.
- चढाई दरम्यानची स्क्रि
सुळक्याच्या पायथ्याशी विश्रांती
दुपारी १ च्या आसपास वाजले असतील. वातावरण उत्तम होते. हवेतील थंडाव्यामुळे शरीरात उर्जालहरी फिरत होत्या. भुकेची वेळ जवळ आली होती मात्र, कळकराय च्या खिंडीतील उपद्रवी माकडांमुळे डबे उघडायची हिम्मत तिथे काही झाली नाही. कळकरायच्या चढाईनंतर सगळं सामान घेऊन आम्ही आमच बस्तान ढाकच्या खिंडीत हलवायचं ठरवलं. काहीवेळ चालून सुळक्याच्या दिशेने नवीन वाटेचे शोध लावत, झाडीत रानडुक्करांच्या पावलांनी तयार झालेली वाट पकडली, त्या चढणीने आमची चांगलीच वाट लावली. प्रचंड झुडपांची गर्दी आणि चांगलाच चढ! त्यात स्वतःच सामान,रोप, इतर चढाईसाठी लागणार साहित्य यांमुळे चांगलाच घाम फुटला. अगदी समोर दिसणाऱ्या ढाकच्या सुळक्याकडे पोहचण्याकरिता चकवा लागली कि काय अशी शंका मनात येऊ लागली.
कारवीच्या मदतीने तो सरळ चढ चढून त्या अंधाऱ्या वाटेवरून आमची टीम बाहेर आली. डावीकडे ढाक सुळका तर उजवीकडे ढाकचा किल्ला आहे हे मात्र निश्चित झालं. आता आम्हाला खिंड दिसू लागली. त्या दिशेने पुढे गेलो तेव्हा आम्ही ढाक सुळक्याच्या खिंडीत पोहचलो होतो. पाठीवरच सामान खाली ठेवलं. शांत बसून श्वास मोकळा केला. त्यानंतर ज्या कार्यकर्त्याने (तुषार दिघे) आम्हाला त्या वाटेवरून चला आणि चाला असं सांगितलं त्याचा (शिस्तीत) शाब्दिक सत्कार करण्यात आला. सध्या त्या वाटेल आम्ही - 'डुक्कर नाळ' असेच संबोधतो.
पोटापाण्याची सोय
कळकराय पेक्षा हा सुळका उंच ठिकाणी असल्यामुळे ढाकचा सुळका लहान असला तरी मोठाच वाटतो. ही खिंड झाडीत नसल्यामुळे माकडांचा काही त्रास जाणवला नाही. माणसांची, गुरु ढोरांची वर्दळ या ठिकाणी क्वचितच असेल असं एकंदर पाहण्यात आलं. पोहचलेल्या ठिकाणाची पाहणी करून, असलेल्या सामानाची रचना करून चिंचोळ्या अशा त्या खिंडीत आम्ही सर्व असे बसे जेवायला बसलो. उतरणीवर बसावे लागत असल्या कारणाने बसण्यासाठी समतोल राखणे कठीण जात होते. एक एक डबे उघडायला लागले. मोदक, भाज्यांचे दोन- चार प्रकार,शेंगा, चटण्यांनी प्रत्येकाची ताट सजली. त्या पदार्थानी सगळ्यांची पोट टम्म केली. आत्मा तृप्त झाला. तृप्त झालेल्या आत्म्याला आता ८० फुटी सुळका ८०० पेक्षा फुट उंचीपेक्षा जास्त भासू लागला होता. पण परतीच्या प्रवासाची वेळ लक्षात घेता सुरक्षितपणे उरकत घेणे गरजेचे होते. नाहीतर एक-पाचेक मिनिटांची पडी तर निश्चितच होती. (हे आम्ही दर वेळेला ठरवतो पण नाही जमत).
जेवणाने संतुष्ट झालेल्या आणि सुस्त शरीराला जागवून आम्ही सर्वानी हार्नेस घातलं, गरजेचे साहित्य ज्यांनी त्यांनी घेतलं. चढाईच्या बाजूची आम्ही पाहणी केली. लावलेल्या मेखांची मजबूत आहेत कि नाही हे देखील तपासून घेतलं. गरज पडेल म्हणून आम्ही देखील आमच्या मेखा व साहित्य घेऊन तयार होतो. पण ज्यांनी कोणी त्या मेखा बसवल्या होत्या त्या आजही मजबूत आणि चांगल्या अवस्थेत आहेत याची शहानिशा झाली व चढाई करू शकतो हे देखील निश्चित झाले. आमच्या टीम मधील कृष्णा याने सर्व प्रथम चढाईस सुरुवात केली, लावलेल्या मेखांचा वापर करून त्याने मजबूत सुरक्षित मार्ग शोधून काढला.मोजून १० मिनिटात त्याने तो सुळका सर केला. कृष्णा नंतर 'डुक्कर नाळेचा' शोध लावलेल्या तुषारने बाजी मारली.
आत मला चढाई करायची होती. मी त्यांच्यात शिकाऊ असल्यामुळे चढताना होल्ड्स म्हणून पकडण्यात आलेले २ - ३ दगड माझ्याकडून उचकटत होते. तेव्हा मला सुळक्यावरील 'स्क्रि' ही संज्ञा स्पष्ट समजली. स्वतःच्या वजनाचा भार सावरत व कमीत कमी पाडापाडी करत मी देखील माथा गाठला. त्यांनतर मनोज ने उत्तम आणि पटकन चढाई केली. आम्ही सर्व जण म्हणजे ५ जण एकामागोमाग एक चढत राहिलो. सगळे वर आले. आता आपल्या सगळ्यांच्या वजनाने हा सुळका तग धरून ठेवेल का या बद्दल चर्चा रंगली. सर्व परिस्थीचा अंदाज घेत आम्ही सुळक्यावरील त्या पसरट, निमुळत्या , जेमतेम आठ-दहा पावलात संपून जाणाऱ्या अश्या माथ्यावर उभे राहिलो. अर्थात, आम्हाला फोटो काढायचा होता.
एक निवांत क्षण.. पुढे दिसणारा कळकराय सुळका
माझे बाकीचे सहकारी येई पर्यंत सुरक्षा रोप बांधून मी तिथल्या परिसरावर नजर फिरवली. माझ्या लक्षात आलं कि मी त्या परिसरातील सगळ्यात उंच जागी उभी आहे, कळकराय वरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा आणि ढाक या सुळक्यावरून दिसणारा नजारा नक्कीच काही अंशी वेगळा आहे. त्या क्षणी माझ्या आजूबाजूला माझे सहकारी होते तरी मी एकांत क्षण अनुभवत होते. .. वारा माझ्याशी बोलत होता ... पडून गेलेल्या पावसाच्या सरींचा सुवास वातावरणात मिसळला होता, हवेतील गारव्याचा स्पर्श नाकातून फुफुसापर्यंत पोहचत होता.. एक आगळी प्रसन्नता होती तिथे.. खूप खप वर्षांनी म्हणजे तब्बल १० किंवा त्यापेक्षा जास्तच वर्षांनीआम्ही तिथे यशस्वी चढाई केली होती. ते संपूर्ण जंगल, डोंगर आमचं अभिनंदनच करत होते असं मला जाणवलं. दूरवरून जंगलातील मोरांनी देखील आम्हाला पहिला कि काय म्हणून ते देखील आवाज करत होते. या क्षेत्रात आल्यावर निसर्गाचा आवाज आणि भाषा समजून घ्यायला शिकलं पाहिजे. कारण 'शिकला तोच टिकला'!
कळकराय च्या पुढे लहान असं टोक दिसत आहे तोच सून सुळका
लहान मुलांच्या झुकगाडीच्या डब्यांप्रमाणे एका मागे एक अशी रांग करून आम्ही आमचं फोटो प्रकरण आवरत घेतलं. उतरण्यासाठी बिले रोप आणि सेफ्टी अँकरसाठी देखील एक मेख सपाट जागी उत्तम स्थितीत होती. तिचा वापर करून आम्ही एका मागे एक सर सर खाली आलो. सगळे सुरक्षितपणे खाली आलो. रोप,सामान सगळं नीट घेतलं. संध्याकाळच्या चार च्या दरम्यान परतीच्या वाटेला लागलो.
पुन्हा लवकरच कि परत १०-१२ वर्षांनी तिथे कोणी चढाईसाठी जाणार आहे त्याची वाट हा 'ढाकचा' (सून) सुळका पहात आहे.
ठिकाण - ढाक किल्ल्याजवळ च्या खिंडीत
सुळक्याची उंची - ८०-९० फूट
राहण्याची सोय - ढाक गुहा
पाण्याची सोय - गावात
टप्पे -१
श्रेणी- सोपी मात्र स्क्रि खूप
अधिक माहिती - सकाळी लवकर सुरुवात केली तर एकाच दिवशी कळकराय आणि ढाक हे दोनही सुळके चढता येऊ शकतात. जाणकार व्यक्ती सोबत नसल्यास,विना साहित्य चढाई करणे धोक्याचे ठरू शकते.
लागणार वेळ - १ तास पुरे (किती जण आहेत यावर अवलंबून आहे, दिलेली वेळ ५ जणांकरिता नोंदवण्यात आली आहे.)
* सुळक्यावर कोणतेही बोल्टिंग नाही त्यामुळे क्लाइंबिंग सुरक्षित करण्यासाठी स्वःताचे साहित्य घेऊन जाणे.
लेख आवडला असल्यास या पेज ला like आणि follow करा. या क्षेत्रातील तुमच्या तीन गिर्यारोहक (ट्रेकर) मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा म्हणजे त्यांना या पानावरील नवनवीन ठिकाणांची, चढाईची माहिती मिळेल.
.png)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)










.jpeg)












.png)




















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.