पाहिल्यांदाच माझ्या लेखणीतून एखादे प्रवास वर्णन करत आहे, म्हणून थोडी प्रस्तावना. गेली 1०-१२ वर्षे भारतात आणि भारताबाहेरील सहली करण्याचा योग आला. संपूर्ण राजस्थान, हिमाचल, लेह-लडाख, कोस्टल कर्नाटक, हंपी-होस्पेट, ऊटी-कोडाईकॅनॉल, केरळ, गोआ, दुबई, सिंगापुर आणि अगदी मागच्या वर्षी श्रीलंका. याशिवाय पुण्याजवळील अनेक छोटी-मोठी ठिकाणे. यातील महत्वाची बाब म्हणजे हि ठिकाणे फिरताना बहुतांशवेळा जवळचा मित्र-परिवार बरोबर होता. गेली काही प्रवासवर्णने मित्रांनी त्यांच्या लेखणीतून उतरवली, म्हणलं या वेळेला आपण लिहून बघू.
या वर्षी कुठे जायचे असा विचार केला तेव्हा भूतान किंवा नॉर्थ ईस्ट या पैकी एक पर्याय निवडू असे पक्के होते. बऱ्याच चर्चेनंतर मेघालय-आसाम-अरुणाचल असा भारतातील पूर्वेचा भाग नक्की केला. तारखा निश्चित होईना, अखेर नाताळच्या सुट्टीत जायच नक्की झालं. 2 मित्र, त्यांचा परिवार आणि आम्ही असे दहाजण नक्की झालो. लॅण्डमास्टर हॉलीडेसकडून प्रत्यक्ष ठिकाणे आणि तारखा पक्क्या झाल्या.
दिवस १ -प्रवास – २२ डिसेंबर २०१८ ला आम्ही दहा जणांनी पुणे-दिल्ली-बागडोगरा-गुवाहाटी हा लांबचा विमान प्रवास पहाटे ४ ते दुपारी १ पर्यंत पूर्ण केला.

विमानतळावर १३ सीटर टेम्पो ट्रॅव्हलर आम्हाला घ्यायला आली होती, पुढचे ११ दिवस आम्ही याच गाडीतून प्रवास करणार होतो. इथे आमच्या सहलीचा पहिला टप्पा सुरु झाला, गुवाहाटी ते चेरापुंजी व्हाया शिलाँग. साधारण १५० किलोमीटरचा हा टप्पा पूर्ण करायला ५ तास लागतात, परंतु दुपारचे जेवण आणि क्रिसमसमुळे शिलाँगमध्ये असलेल्या ट्रॅफिकमुळे आम्हाला हा टप्पा पूर्ण करायला ८ ते ९ तास लागले. गुवाहाटी ते शिलॉंग हा रोड चौपदरी आहे आणि आजूबाजूची नयनरम्य दृश्ये आपल्याला सतत गाडीच्या खिडकीतून डोकावयास भाग पाडतात. मध्ये गाडी थांबली तेव्हा आम्ही इथल्या आंबट-गोड अननसाची चव घेतली. उमिअम लेकवर आम्हाला सूर्यास्त बघायला मिळाला. सर्व पूर्वेच्या राज्यांमध्ये या सुमारास सूर्योदय (साधारण ५.३०) आणि सूर्यास्त (साधारण ४.३०) लवकर होतो . उशीर झाल्यामुळे मेघायलायतून परताना इथे पुन्हा थांबू असे ठरले. रात्री उशिरा आम्ही कुटमदन रिसॉर्ट चेरापुंजी इथे थांबलो. हे रिसॉर्ट अतिशय सुंदर ठिकाणी आहे, जिथून खाली असलेल्या बांगलादेश व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते.


उमिअम लेक 

बांगलादेश व्हॅली 
कुटमदन रिसॉर्ट
दिवस २ – चेरापुंजी – स्थानिक भाषेमध्ये या
गावाला सोहरा संबोधले जाते. अनेक छोटे – मोठे धबधबे, नदी-नाले, झाडं-झुडपे
आणि शुष्कपणा अश्या दोन्हींनी नटलेल्या अजस्त्र पर्वतरांगा, थंड हवा आणि
निमुळते रस्ते असा हा निसर्गरम्य परिसर. मेघायलायला स्कॉटलंड ऑफ ईस्ट असेही
संबोधले जाते. परंतु कुठल्याही ठिकाणाला दुसया नावाने संबोधून त्याला छोटे
करायला नको. हे भारताचे पूर्वेतील एक सुंदर राज्य.
सध्याच्या ऋतूनुसार ३ ठराविक ठिकाणे करायचे आम्ही ठरवले. संपूर्णतः एक दुसर्यापासून विभिन्न.
वेई सावंडोन्ग फॉल –मूळ
जागी पोचल्यावर साधारण अर्ध्या तासाचा छोटेखानी ट्रेक करून या ठिकाणाला
पोचता येते. त्यानंतर दिसतो तो हिरव्या पाण्याचा जंगलातील एक सुंदर डोह आणि
त्यात पडणारा धबधबा. निसर्गाचा एक सुंदर तुकडा.

वेई सावंडोन्ग फॉल
अर्वाह केव्ह – अत्यंत रोहमार्शक रहस्यमय अश्या गुहा , तिथे पोचायचा रहस्यमय रस्ता आणि आतमधील पाण्याच्या प्रवाहाने झालेले fossils.
नोहाकालीकाई फॉल्सला पाहिलेला शीतल सूर्यास्त. या जागेचे नाव हे एका आख्यायिकेनुसार मेघालयीन स्त्रीचे दिले आहे. पावसाळ्यात इथला प्रवाह अजस्त्र असा असेल. थोडीफार ठोसेघरची आठवण होते.
हि तिन्ही ठिकाणे करता करता ४.३० वाजले आणि सूर्यास्त झाला. परंतु हॉटेलला जाईपर्यंत या तीनही ठिकाणी पोचायचा रस्ता, आजूबाजूचा निसर्ग आणि डोंगरदऱ्या तुम्हाला साद घालत राहतात. हॉटेलला पोचेपर्यंत थंडीचा कडाका आणखी वाढला होता, आम्हाला रिसॉर्टनि कॅम्पफायर लावून दिला. गप्पागोष्टी, भेंड्या आणि चविष्ट गरमागरम जेवण करत दिवस संपला.
दिवस ३ – मावलीलॉन्ग, डावकि आणि क्रांगसुरी फॉल्स आणि तिथून शिलाँग असे डोंगरदऱ्यातील आणि घाटातील साधारण ३०० किलोमीटर अंतर संध्यकाळपर्यन्त पूर्ण करायचे होते. आम्ही सकाळी ७ वाजता नास्ता पॅक करून घेऊन निघालो. जाताना वाटेमध्ये काही गावांमध्ये स्नोफॉल झाला होता. मोहक असे दृश्य होते ते. पुढे घाट उतरून खाली आम्ही मावलीलॉन्ग गावाजवळ सकाळी ९ ला पोचलो. काही अंतर खाली उतरून झाडाच्या जिवंत मुळापासून तयार झालेला नदीवरील सेतू पाहिला (लिविंग रूट ब्रिज). मेघालयात असे अनेक छोटे मोठे सेतू आहेत. प्रसिद्ध असा हा त्यातील एक. या पेक्षा मोठा डबल डेक्कर ब्रिज आहे, परंतु तिथे पोचायचा ट्रेक थोडा अवघड असल्याकारणाने आणि सोबत फॅमिली असल्याने आम्ही केला नाही. परंतु एक दिवस अजून काढून तो नक्की करावा असे स्थानिक म्हणाले. तिथून पुढे आम्ही मावलीलॉन्ग या आशियातील सर्वात स्वच्छ गावामध्ये गेलो. अतिशय टुमदार असे हे गाव , याला गावापेक्षा अधिक एखादा फुलांचा बगीचा म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

लिविंग रूट ब्रिज, मावलीलॉंग

मावलीलॉंग व्हिलेज
मावलीलॉन्गहुन पुढे आम्ही डावकि या बांगलादेश सीमेवरील गावाला निघालो. डावकी गावातील उंगोट नदीचे पारदर्शक पात्र गेल्या काही दिवसापासून प्रसिद्ध झाले आहे. नदीतील बोटी इथे हवेत तरंगत आहे असे वाटते. साधारण १२०० रुपयाला १ तासाची नदीतील फेरी तुम्हाला बोटीतून मारता येते. अत्यंत सुंदर, स्वचछ, मोहक आणि तितकेच आश्चर्यकारक असे हे दृश्य.
डावकीला जायच्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅममुळे थोडा वेळ गेला आणि पुढचा साधारण २ किलोमीटर रस्ता चालत गेलो. हे टाळायचे असेल तर थोडे अधिक लवकर प्रवास सुरु करणे गरजेचे आहे. या पुढचे आजचे शेवटचे ठिकाण क्रेंगशूरी फॉल्स. डावकिपासून साधारण ४० किलोमीटर. तिथे पोचून मूळ ठिकाणापर्यंत पोचायला पुन्हा एकदा थोडे खाली उतरायला लागते. नंतर दिसतो तो एखाद्या स्विमिंग पूल सारखा निळा डोह आणि जंगलातील वाटमार्गे पडत असलेला धबधबा. लाजवाब.

क्रेंगशूरी फॉल्स.
आज खऱ्या अर्थानी निसर्गाची वेग वेगळी रूपे पाहायला मिळाली. याबरोबरच नमूद करावेसे वाटेल माणसाची इचछाशक्ती असेल तर मावलीलॉंगसारख्या छोट्या गावालाही सुरेख करता येऊ शकते आणि आपल्यासारख्या शिकूनही अशिक्षितांसारखे वागणाऱ्या शहरी मनोवृत्तींना विचार करायला भाग पाडते. ४ वाजता संध्याकाळ झाली आणि आम्ही शिलॉंगकडे प्रस्थ झालो. रात्र शिलॉंगमध्येच हॉटेल ब्ल्यूबेरी इन् मध्ये काढली. भरपेट जेवण करून रात्री ९ वाजता झोपून गेलो.
दिवस ४ – लेटलूम कॅनॉन, शिलॉंग पीक, उमिअम लेक आणि तिथून पुढे गुवाहाटी. पहिले लेटलूम कॅनॉनला गेलो, पर्वतरांगा आणि मोठे पठार असे कॉम्बिनेशन असलेली हि जागा. भारत हा किती विविधतेनी नटलेला देश आहे याचं प्रत्यक्ष दृश्य आमच्यासमोर होते. साधारण २ तास तिथे काढून आम्ही पुढे निघालो. शिलॉंग पीक ला टुरिस्ट जॅम असल्यामुळे कॅन्सल केले आणि उमिअम लेक हा पिकनिक स्पॉट सारखा गजबजल्यामुळे तेही टाळले. मेघालयाच्या सुखद आठवणी मनात ठेऊन आमचा गुवाहाटीचा प्रवास सुरु केला. वाटेमध्ये जेवण केले.


दिवस ५ – काझीरंगा अभयारण्य – आमची पूर्ण सहल तीन टप्प्यामध्यें आखली होती. आता सहलीचा दुसरा आणि छोटा टप्पा म्हणजे गुवाहाटी ते काझीरंगा सुरु केला. सकाळी न्याहारी करून ७.३० वाजता आम्ही गुवाहाटी सोडले. साधारण २२० किलोमीटर्सचा हा टप्पा ४ तासात पूर्ण होतो. रोड कंडिशन्स खूप चांगली आहे. एका छोट्या हॉटेलमध्ये थोडेफार खाऊन घेतले आणि १.३० वाजता आमची जीप सफारी सुरु झाली. काझीरंगा नॅशनल पार्क हे प्रामुख्याने रायनासॉरकरता (गेंडे) प्रसिद्ध आहे. या शिवाय येथे हत्ती, रानडुक्कर, साप, विविध पक्षांच्या प्रजाती (गरुड, वूडपेकर, इंडियन रोलर), हरणाच्या विविध जाती या तुम्हाला सहज दिसतात. वाघ मात्र नेहमीप्रमाणे आपल्याला काही दिसत नाहीत. काझीरंगा अरण्य हे मुख्यतः ग्रास फॉरेस्ट म्हणून गणले जाते आणि १४० स्क्वेर मीटरवर पसरले आहे. दर पावसाळ्यामध्ये ब्रह्मपुत्रेचे पाणी या अरण्यात शिरते. आम्हाला असे सांगितले गेले, त्यावेळेस सर्व प्राणी मधल्या रस्त्यावर एकत्र जमा होतात. एकंदरीत या अरंण्यांची सहल सुंदर झाली आणि आणखी एक अनोखे अरण्य बघावयास मिळाले. जर वेळ मिळाला तर रात्री या जंगलाच्या जवळ राहायची सोय बघावी म्हणजे सकाळी हत्तीवरून सफारी करता येते. आम्ही मात्र वेळेच्या अभावी इथून पुढे ५० किलोमीटरवर तेझपूरला आमचा मुक्काम केला.
दिवस ६ – दिरांग – आमच्या प्रवासाचा तिसरा आणि अखेरचा टप्पा आज सुरु झाला. अरुणाचल प्रदेश. साधारण २०० किलोमीटरचा हा टप्पा पूर्ण करायला आम्हाला ९ तास लागले. प्रामुख्याने भालुकपॉंग या गावानंतर ३०-३५ किलोमीटर घाटाचे दुरुस्तीचे काम चालले आहे त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत हा रस्ता कामानिमित्त बंद असतो. पहाटे ४ ला निघाल्यामुळे, आम्ही ९ च्या आत हा टप्पा पूर्ण करू शकलो. तुम्ही जसे तेजपूर सोडता आणि भालुकपॉंगमध्ये (अरुणाचलमध्ये) प्रवेश करता निसर्ग बदलायला सुरु होतो, कामेंग नदी सतत तुमचा पाठलाग करायला सुरु करते, हिमालयीन पर्वतरांगा तुम्हाला साद घालायला लागतात, स्वचछ सूर्यप्रकाश तुम्हाला स्पर्श करू लागतो आणि भारतीय सैन्य दल आणि त्यांच्या विविध तुकड्या तुमच्या अंगावर शहारे आणतात. घाट पार केल्यावर नदीकिनारी आम्ही थोडा विसावा घेतला. मुलांनी कुर्त्र्याच्या गोड पिल्लांशी खेळण्यात आपला वेळ घालवला. पुढे आम्ही बोमडिला मोनेस्टरी बघून निसर्गाकडे बघत दिरांगकडे प्रस्थान केले. रात्र दिरांग मध्ये घालवली. सुसाट्याचे वारे आणि बाजूला नदी असे दिरांगमधील हॉटेल होते. सर्विस मात्र सोसो होती.
दिवस ७ – तवांग व्हाया सेला-पास – आज बर्फ असलेल्या हिमालयीन पर्वतरांगात आम्हाला जायचे होते. सकाळी लवकरच दिरांग सोडले, वातावरण थोडे ढगाळ होते. बर्फ पडायची शक्यता असल्याने लवकर सेला-पास पार करणे गरजेचे होते. वाटेत एका टपरीवजा- दुकानातून किवी खायला घेतले. वळणावळणाच्या घाटातून आपण खूप उंच चाललो आहोत याची जाणीव होत होत होती. एका बाजूला खोल दरी आणि वर शिखर असा रस्ता होता. जवळपास अर्धा घाट पूर्ण केल्यावर अचानक वातावरण बदलले आणि एका आर्मी कॅन्टीनच्या परफेक्ट स्पॉटला बर्फवृष्टी सुरु झाली. सर्वजण खूपच उत्साहित झालो . पहिल्यांदाच आम्ही सगळ्यांनी बर्फवृष्टी बघितली होती. गाडीतून खाली उतरून आम्ही सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला. कॉफी घेऊन पुढे प्रवास सुरु केला. आता सर्वत्र बर्फ दिसायला सुरुवात झाली होती आणि बर्फवृष्टीहि सुरु होती. आम्ही आता सेला-पासला पोचलो. सेला पास हा हिमालयातील टॉप मोटोरेबल पीक मध्ये एक गणला जातो. १३७०० फिट अल्टीट्युडवर आहे हा. इथे ऑक्सिजन कमी असल्यामुळे आम्हाला सर्व ऍक्टिव्हिटी शांतपणे करा असे ड्राइवरने सांगितले. मुलांनी मात्र मनमुराद बर्फात खेळण्याचा आनंद लुटला. आम्हीही भरपूर फोटो काढले. सेला लेक पूर्णपणे गोठला होता. ढगाळ वातावरणामुळे थंडी वाजत होती. साधारण अर्धा तास काढून आम्ही तवांगचा रस्ता धरला. आता जोरात बर्फवृष्टी सुरु झाली होती. नदी नाल्यापासून ते छोट्या धबधब्यापर्यन्त सर्व काही गोठले होते. सुरुच्या वृक्षांवर बर्फ पसरला होता. अतिशय स्वप्नवत स्वर्गात असावे असे दृश्य होते ते. थंडीही एव्हाना बोचरी झाली होती. अशातच एका खडतर मार्गावर वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर बर्फ आल्यामुळे सैन्याचे १०-१२ ट्रक एका मागे एक थांबले होते आणि घसरू नये म्हणून चाकांना साखळ्या लावत होते. मागील रांगेतील सर्व गाड्यांनीही चाकांना मोठे दोरखंड लावले. साधारण दिड तास गेला कोंडीत. पुढे एका पिकवर जसवंतसिंघ रावत स्मृती स्थळ लागले. ६२ च्या चीन युद्धात जसवंतसिंघांना वीरमरण आले. ३ दिवस एकटे ३०० चिनी बटालियन ते लढले आणि त्यांना रोखून ठेवले. सगळी कथा या ठिकाणी लिहिली आहे आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. हे सर्व पाहून आणि हा पराक्रम ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले आणि आम्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या पराक्रमामध्ये जसवंतसिंघांना सेला आणि नुरा या दोन स्थानिक महिलालांनी मदत केली. सेलाला वीरमरण आले तर नुराला पकडले गेले. सेला पास, नूरानांग नदी आणि नूरानांग फॉल्स हि नावे हे या दोन रणरागिणींच्या आठवणीत ठेवली आहेत. मराठा बटालियनच्या कॅन्टीन मध्ये चहा आणि डोसा खाऊन गारठलेल्या अवस्थेत आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. हळू हळू दिवस मावळायला लागला, बोचरी थंडी होती आणि आम्ही तवांगचा प्रवास सुरु केला. सर्वजण खूप दमलो होतो. एव्हाना पुन्हा जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली होती. साधारण ७ वाजता आम्ही तवांगला, कायगी कांग झेन्ग या हॉटेल मध्ये पोचलो. कडाक्याच्या थंडीत थोडे फार जेऊन घेतले आणि झोपलो.

सेला-पास
दिवस ८ – तवांग – तवांग हे अरुणाचलमधील छोटेसे
शहर १०,००० फीट अल्टीट्युडवर वसले आहे. सकाळी उठून हॉटेलच्या खिडकीतून
बाहेर बघितले तर सर्व शहर बर्फ़ानी आचछादलेले होते आणि आजू बाजूला बर्फाच्या
पर्वतरांगा. अद्भुत. मूळ प्लॅन प्रमाणे आज आम्ही बुम्ला पास आणि माधुरी
लेक करणार होतो. पण आदल्यादिवशी झालेल्या झालेल्या अति बर्फवृष्टीमुळे
सैन्याने पुढे जायला परवानगी दिली नाही. तेथील तापमान उणे १५ अंश आणि वारा
१५ केएमपीएच होता. यामुळे आम्ही आज तवांगमध्येच दिवस काढायचा ठरवलं. उणे
तापमानामुळे नळातील पाणीही गोठले होते, साचवलेले टाकीतील पाणीही गोठले
होते. हॉटेल स्टाफनि बर्फ फोडून पाणी तापवून दिले. येथे पाण्याची थोडी
गैरसोय झाली, पण एक्सट्रीम क्लायमेटमुळे त्याला पर्याय नव्हता. अजून एक
नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अरुणाचलमध्ये स्त्रिया आपल्या तान्ह्या
बाळांना एका विशिष्ट प्रकारे पाठीला बांधून सतत काम करताना दिसतात. फोटो
काढायचा राहिला त्याचा. तवांगमध्ये सगळीकडे बुद्धिस्ट कल्चर आहे. आम्ही आज
इथली मोनेस्टरी, बुद्धा स्टॅचू, १९६२ वॉर मेमोरियल, लेझर शो आणि शॉपिंग
केले. आज सर्वत्र स्वचछ सूर्यप्रकाश होता पण सुसाटयाचे वारा असल्यामुळे
दिवसभर
खूप बोचरी थंडी होती . तवांग मोनेस्टरी हि भारतातील सर्वात मोठी आणि
जगातील दुसरी मोठी मोनेस्टरी आहे. तवांग मोनेस्टरी हि पर्वताच्या रांगेवर
एका बाजूला अधांतरी आहे आणि गौतम बुद्धांनी तिला धरून ठेवले आहे अशी
आख्यायिका येथील स्थानिक सांगतात. यामध्ये बुद्धाची खूप मोठी मूर्ती आहे,
इसवीसन पूर्वकालीन वस्तूंचे संग्रहालय आणि बुद्धिस्ट मॉंकची शिक्षणाची सोय
आहे. आत मोनेस्टरीमध्ये काही वेळ ध्यान धरले, अतिशय सुंदर आणि शांत जागा
होती ती.
१९६२ वॉर मेमोरियल तुम्हाला युद्धाच्या परिस्थिती, मॅकमोहन लाईन या इतिहासातील आठवणी ताज्या करते. याबरोबरच वीरमरण आलेल्या २००० पेक्षा अधिक सैनिकांसमोर नमन करायला भाग पाडते. सैन्याने इथे युद्धाची माहिती द्यायला ओपनथिएटर मध्ये दररोज लेजर शो ठेवला आहे. तो शो बघून कडाक्याच्या थंडीत आम्ही हॉटेलमध्ये परतलो आणि साधारण ७ वाजता झोपून गेलो.
दिवस ९ – तवांग ते बोमडिला व्हाया सेला पास – आज आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. साधारण २०० किलोमीटरचा अंतर सेला-पास मधून पार करायचे होते, म्हणून आम्ही लवकर निघालो. आकाश निरभ्र होते. जाताना वाटेत एका छोट्या हॉटेलमध्ये मॅगी आणि मोमोस खाल्ले. वाटेत पुढे जन्ग फॉल्स लागतो, जावे कि नाही या विचारात तिथे पोचलो. पण जेव्हा पोचलो तेव्हा होता तो अद्भुत नजारा. धबधब्याचे पाणी कोसळत होते आणि खाली येऊन गोठत होते, बाजूला नदी आणि हिमालयीन पर्वतरांगा. कुठल्याही कॅमेरात हा नजारा कैद करणे अवघड होते. तिथे साधारण अर्धा तास घालवून पुढे निघालो.आकाश निरभ्र असल्यामुळे जाताना चुकलेला निसर्ग बघत होतो. परत एकदा सेला पास मध्ये थांबलो. खाली उतरून सेला लेक पाशी फोटो काढले या वेळेला. मुलंही खेळली परत इथे. सेला लेक पासून पुढे निघाल्यावर मोठा घाट, सर्वत्र बर्फ आणि बर्फातून काढलेले वळ्णावळणाचे घाटातील रस्ते. परमेश्वराने निसर्गाची उधळण केली होती. गाडीमध्ये गप्पा गोष्टी, गाणी म्हणत साधारण ६ वाजता बोमडिलाला पोचलो. रात्र बोमडिलामध्ये काढली.
दिवस १० – बोमडिला ते गुवाहाटी – साधारण ३०० किलोमीटरचं हे अंतर पार करायला १० तास लागतात. ब्रेड जॅम पाक करून सकाळी ७.३० वाजता आम्ही निघालो. निघाल्यावर जवळच घाटात एका ठिकाणी खाली उतरून नदीपाशी गेलो, थोडा विसावा घेतला आणि निसर्गाचा आस्वाद घेतला. सेला-पास नंतर पुढे बराच वेस्ट कामेंग जिल्हा आहे. मोठा घाट आणि वळ्णावळणाचे रस्ते उतरून आम्ही खाली उतरलो. आणि आम्हाला अरुणाचल-आसाम-भूतान हि ट्रँग्युलर बॉर्डर लागली. त्यानिमित्ताने भूतानमध्ये गाडीत डिझेल भरले आणि आणखी एक देश झाल्याचे समाधान मिळाले. एका ठिकाणी मुलांनी हत्तीवर बसण्याचा आनंद घेतला. पुढचा प्रवास पूर्ण करून ३१ डिसेंबर च्या रात्री गुवाहाटीमध्ये पोचलो आणि नवीन वर्षाचे स्वागत हॉटेलच्या रूममध्ये कॉफी पिऊन केले.

भूतान 
दिवस ११ – परतीचा प्रवास – आज सकाळी थोडं निवांत उठून ब्रम्हपुत्रेचे पात्र बघायला गेलो. फार काही मिळाले नाही. थोडे शॉपिंग करून गुवाहाटी एरपोर्टला गेलो. तिथून गुवाहाटी-बंगलोर-पुणे हा विमान प्रवास करून रात्री १ ला घरी आलो. या सगळ्या प्रवासात बिपुल हा आमचा ड्राइवर अतिशय स्किलड आणि प्रोफेशनल होता. एकंदरीत हा ११ दिवसाचा प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील. अजून एक नमूद करावेसे वाटते भारताचा पूर्व भाग विकासापासून वंचित राहिला. तवांग सारख्या ठिकाणी कॉलेज १ वर्षांपूर्वी सुरु झाले. आपण या सर्व बांधवांचे आणि भारतीय सैन्याचे आभार मानायला हवे कि काश्मीर सारखा फुटीरता वाद येथे मोठ्या प्रमाणात फोफावला नाही. अरुणाचल मधले बहुतांश लोक भारतीय सैन्याची सेवा करतात आणि जरुरत पडेल तेव्हा सेला सारख्या स्त्रिया आपली आहुतीही देतात. हळू हळू हा भाग आता पुढे जायला लागला आहे, अजून खूप मोठा पल्ला आहे.
इतके लिहून, इथेच हे स्वप्नवत प्रवास वर्णन संपवून काही दिवस आठवणींमध्ये रमायला आम्हा सर्वांना आवडेल. धन्यवाद.

































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.