Friday, March 1, 2024

माझी दुर्गसफर, करोना आणि स्वर्गीय सिंधुदुर्ग

 https://agtravel.home.blog/2021/03/14/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8/

– भाग १

शीर्षक वाचून जरा विचित्र वाटले असेल, पण अगदी सहज सुचलेले शीर्षक आहे आमच्या सिंधुदुर्गच्या सहलीमध्ये आणि या प्रवासवर्णनाशिही त्याचा निकटचा संबंध आहे. या प्रवासवर्णनात मी प्रामुख्याने गेल्या ४ महिन्यात केलेले गिर्यारोहण आणि त्यानंतर केलेल्या सिंधुदुर्ग सहलीबद्दल लिहिले आहे. ऐतिहासिक नोंदी मात्र मी फारश्या लिहिल्या नाहीयेत, कारण तो माझा विषय नाहीये. परंतु या किल्यांच्या आसपासचा निसर्ग आणि त्यावेळचे काही अनुभव मात्र लिहायचा प्रयत्न केला आहे.

आपल्या सर्वांचे गेले १ वर्ष करोनामुळे मानसिक दृष्ट्या अतिशय तणावाखाली गेले. पायाला भिंगरी असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींना हे वर्ष एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हते. त्यातच ऑफिस घरी आल्यामुळे, ऑफिसमधील ताणतणाव घरापर्यन्त येऊन पोहोचले आणि या सर्वात करोनापासून स्वतःला वाचवायचा संघर्ष. हे असे रटाळ जीवन कधीपर्यंत चालेल याचा काहीच अंदाज येत नव्हता. दिवाळीच्या दरम्यान साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरनंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल व्हायला लागले आणि सर्वजणच घरातून हळू हळू बाहेर पडायला लागले. मीही परिवारासोबत नाशिकची एक छोटेखानी सहल केली.

पुढे नोव्हेंबरमधील अशाच एका शनिवारी, गिर्यारोहणाच्या जुन्या आठवणी निघाल्या आणि वाटले उद्या रविवारी ट्रेक करायचा का? मला मुळात ट्रेकची फार आवड नाहीये, पण मित्र सोबत असले तर धाडस करतो आणि या वेळेला मोकळ्या हवेत श्वास घायची इच्छाही होती. आम्ही ४ जण नक्की झालो, जुन्नर तालुक्यातील हडसर गडावर जायचे नक्की झाले. आमचे सगळे ट्रेक साधारण आमच्यातील गिर्यारोहणाची आवड असलेला मंदार ठरवितो. मंदाररच्या सांगण्यानुसार सकाळी ४.३० ला निघायचे ठरले, म्हंणजे सकाळी ३.३० लाच उठावे लागणार होते. थोडेसे अघोरी होते सगळ्यांकरिता, पण त्यामागचे उद्दिष्ट अगदी बरोबर होते. सकाळी लवकर गड चढायचा आणि सूर्योबा डोक्यावर यायच्या आत खाली उतरायचे. पुढे ३ महिने आमचे हे कॅलेंडर फिक्स झाले.

दुर्ग एक- किल्ले हडसर / २९.११.२०२० – ठरल्याप्रमाणे ४.३० वाजता निघालो. यापूर्वी बहुतांशी ट्रेकला टाटा सफारी वापरायचो, कारण साधारण ६-७ जण असायचे. या वेळेला चौघेच असल्यामुळे छोटी गाडी घेतली आणि पुणे नाशिक महामार्गाला लागलो. साधारण दिड तासात, ६५ किलोमीटरवर नारायणगावामध्ये चहा प्यायला थांबलो आणि पुढे जुन्नरच्या दिशेने निघालो. जुन्नरपासून १४ किलोमीटरवर, पेठेची वाडी हे पायथ्याचे गाव लागते. हडसर किल्ला चढायला २ वाटा वाचण्यात आल्या, एक हडसर गावातून असलेली अवघड अशी खिळ्याची वाट आणि दुसरी तुलनेनी सोपी अशी पेठेच्या वाडीतून (राजमार्ग). आम्ही साहजिकच राजमार्गाहून चढणार होतो. सकाळी साधारण ७ वाजता चढायला सुरुवात केली, समोर डोंगर दिसत होते पण गडावर जायचा मार्ग नक्की कुठला ते कळत नव्हते. थोडे पुढे गेल्यावर मात्र मार्ग दिसला, साधारण तासाभरात आम्ही गडावर पोहोचलो. चढाईच्या शेवटच्या भागात दगडात कोरलेल्या सुबक पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर, गडाच्या एका बाजूला भगवा फडकताना दिसला. आम्ही त्या दिशेने गेलो आणि माणिकडोहाच्या जलाशयाचे मोहक असे दृश्य दिसले. काही वेळ घालवून, नंतर बाकीचा गड बघितला. त्यामध्ये पाण्याची टाके, नानाचा वाडा, धान्याचे गोदाम आणि शिव मंदिर होते. फार कोणी आलेले नसल्यामुळे, गडावर निःसीम शांतता होती आणि तेथील काही खडकांवर बसून आम्ही त्या शांततेचा अनुभव घेतला. आमच्यातील एका मित्र (मंदारला) खिळ्याची वाट बघायला काहीसा पुढे गेला. काही वेळाने आम्हीही त्या दिशेने गेलो. तेथे पोहोचल्यावर, मंदिराचे काही भग्न अवशेष, पाण्याची आणखी काही टाके आणि भगवा दिसला. डोळ्यांसमोर आजूबाजूच्या सह्याद्रीचे विहिंगम असे दृश्यही दिसत होते. पुण्यातील एक तरणेला मुलगा, एकटाच ती खिळ्याची वाट चढून येताना दिसला. आमच्यातील दोन मित्रांनी, थोडेसे खाली उतरून वाट किती अवघड आहे याचा अंदाज घेतला. एव्हाना साधारण सकाळचे ११.३० झाले होते आणि आम्ही परत राजमार्गाने उतरायला सुरुवात केली. त्याच वेळेस मुंबईची २ मुले खिळ्याच्या वाटेने उतरणार असल्याचे कळाले. मंदारला मोह आवरला नाही आणि धाडस करून तो खिळ्याच्या वाटेने उतरला. आम्ही बाकीचे मात्र राजमार्गाने उतरून, हडसर गावाच्या पायथ्याशी मंदारला भेटायचे ठरवले. आम्ही हडसरच्या पायथ्याशी पोहचेपर्यंत मंदार गड उतरलाही होता. आम्हाला भेटल्यावर त्याने प्रांजळपणे कबूल केले, मार्ग अतिशय अवघड आणि थरारक होता. कड्यावर ठोकलेल्या खिळ्यांवरून उतरायला लागले. कदाचित या वयात, हे साहस करण्याची गरज नव्हती. परंतु मनुष्य जेव्हा एखादा निर्धार करतो तेव्हा निश्चयाच्या जोरावर तो पूर्णही करतो. त्याचाच आनंद मंदारच्या चेहऱ्यावर दिसत होता. येताना पहाटेचा अंधार असल्यामुळे आजू बाजूचा निसर्ग फार दिसला नव्हता. आता परतीच्या प्रवासात मात्र माणिकडोहाच्या जलाशयाचे मोहक दृश्य आकर्षित करत होते. डोंगरावरुन एक निमुळती वाट जलाशयाकडे जात होती, आम्ही त्या वाटेने जलाशयाच्या काठाशी गेलो. ऐन दुपारी १२ वाजता आम्ही काठाशी काही वेळ घालवला आणि परत प्रवास सुरु केला. वाटेत नारायणगावात “भुजबळ बंधूंच्या हॉटेल श्रीराजमध्ये” भरपेट जेवण केले आणि ५ पर्यंत घरी परत आलो.

दुर्ग दोन- किल्ले कमळगड, वाई – ५.१२.२०२० – डिसेम्बरचा पहिला आठवडा सुरु झाला आणि मंदारने नवीन गडाची योजना आखली. या वेळेला आम्ही जाणार होतो, सातारा जिल्ह्यातील वाईमधील कमळगडावर. माहितीतले ठराविक गड सोडले तर मला गड-किल्ल्यांबद्दल फारशी माहिती नाही आणि ऐतिहासिक नोंदीही माहित नाही. मंदारने सर्व महत्वाचे किल्ले यापूर्वी केले असल्यामुळे, न केलेल्या गड किल्यांवर जायची त्याची योजना होती. या वेळेला आणखी नोंद घ्यायची म्हणजे, मंदारचा १० वर्षाचा चिरंजीव छोटा सोहमही ट्रेकला आला. पुढच्या सगळ्या ट्रेकमध्ये सोहम आमच्याबरोबर अगदी उत्साहाने येत होता. बाकी यावेळेलाही मागचाच गृप होता. मागच्या वेळेप्रमाणे या वेळेसहिआम्ही 4.३० ला निघालो. वाई सोडल्यानंतर कृष्णा नदीवरील धोम धारण पार केले आणि पुढे नदीचे मोठे पात्र लागले. नदीवर पसरलेल्या धुक्याची दुलई आणि आजूबाजूच्या सह्याद्री पर्वत रांगावरून नजर हटत नव्हती. नजरेत ते दृश्य साठवून आम्ही पुढे निघालो. गूगलमॅपनुसार आम्ही कमळगडाच्या पायथ्याशी तोंडवली गावाला जाऊन पोहोचलो. या गडावर जायलाही दोन मार्ग आहेत, एक नांदिवली गावातून सोपा मार्ग जो जावळीच्या वनातून जातो आणि दुसरा मार्ग तोंडवली गावातून तुलनेने अवघड असा. यावेळेला मात्र चुकून आम्ही अवघड मार्गाला येऊन पोहोचलो. तोंडवली गाव हे महाराजांचा मावळा जीवा माहालचे मूळ गाव. सध्या इथे स्मारकाचे काम चालले आहे. देवळाशी गाडी लावून आम्ही गड चढायला सुरुवात केली. थोडेसे चढल्यावर खालील कृष्णा नदीचे विस्तृत पात्र, त्यातून दिसणारा सुर्योदय आणि कोवळ्या सूर्यकिरणांनी सोनेरी दिसणारे डोंगरावरील गवत लाजवाब असा नजारा होता. आम्ही पुन्हा गड चढायला सुरुवात केली आणि जाणवले पुढची वाट उभी, अरुंद आणि थकवणारी आहे. थोड्या वेळाने मात्र जाणवायला लागले काही तरी चुकत आहे, त्यातच आजूबाजूचे गवत काट्यासारखे हातापायांना टोचत होते. काही अंतर पार केल्यावर एका मंदिरापाशी येऊन पोहोचलो. पुढे सरळच्या सरळ सुळके दिसत होते आणि उजव्या बाजूला लांब एक घर दिसत होते. त्याबाजूला काही मुले चढताना दिसत होती, परंतु ते रस्त्यामध्येच अडकल्यासारखे वाटत होते. दुसऱ्या बाजूला काही कातकरी सुळके चढताना दिसत होते, परंतु तो मार्ग काही सुरक्षित वाटत नव्हता. अखेर देवाचे नाव घेऊन घराच्या दिशेने निघालो आणि अर्ध्या तासामध्ये जंगलातील मार्गातून त्या घरापाशी पोहोचलो. तेथे गेल्यावर कळाले गडाला पोहोचायला अजून तासाभराची अरुंद चढण आहे. चालत असताना बाजूला असलेले दोन जुळे गड दिसत होते. थोडयाश्या अवघड अश्या पायवाटेने पुढे आल्यावर एक छोटा कडा लागला. पुढचा गड पूर्ण करायचा तर हा कडा चढणे आवश्यक होते आणि परतीचा प्रवास शक्य नव्हता. जीव मुठीत धरून मित्रांच्या मदतीने तो कडा चढलो आणि नंतर जाणवले याला उतरायचेही आहे. आणखी काही मैल प्रवास करून, एका पठारावर पोहाचलो. तेथील काही आदिवासी बांधवानी केलेली शेती नजर वेधून घेत होती. रंगांची संपूर्ण उधळण होती. निळे आकाश, हिरवीगार शेती आणि उन्हाने तपकिरी झालेले गवत. काही फोटो काढून उरलेल्या गडाची चढाई पूर्ण केली. या गडाला एखाद्या किल्ल्यापेक्षा टेहळणी बुरुज म्हणून जास्त महत्व असावे. एका बाजूला जावळीचे घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला कृष्णेचे पात्र. विलक्षण, थरारक आणि तितकेच मोहक दृश्य होते. गडावरील रहस्यमय अशी कावेची विहीर जिने उतरून, खाली जाऊन बघितली. एव्हाना दुपारचे १२.३० वाजलेले. पुन्हा थोडे खाली उतरून त्या शेतातील एका झाडाखाली, घरातून आणलेली थालपीठे खाल्ली आणि उतरणीचा प्रवास सुरु केला. सोप्या जंगलातील मार्गाने जावे का पुन्हा तो कडा उतरावा असा विचार केला. परंतु कड्यावरुनच उतरायचे ठरवले. पुन्हा एकदा मित्रांच्या साहाय्याने उतरलो. मध्ये लागलेल्या घरात थंडगार ताक प्यायले आणि ४ वाजेपर्यन्त पूर्ण गड उतरलो. हा गड मात्र पूर्णपणे थकवणारा होता. उतरलेली बाजू थोडी वेगळी असल्या कारणाने, थोडे पुढे जाऊन गाडी घ्यायची होती. अंगात अजिबात त्राण उरला नव्हता, पण उसने अवसान आणून गाडी घेतली आणि परत निघालो. अवेळी निघाल्यामुळे रस्त्यात हवे तसे जेवण मिळाले नाही. वाकडला आल्यावर रंगला पंजाब या हॉटेलमध्ये जेवण करून रात्री ८ पर्यंत घरी परत आलो.

दुर्ग ३ – किल्ले पेब (विकटगड) – १२.१२.२०२० – पुणे आणि सातारा जिह्यानंतर यावेळेला रायगड जिल्ह्यातील पेब किल्ला करायचे ठरले. आणखी तीन मित्र येणार असल्यामुळे, साहजिकच दोन गाड्या घेतल्या. पुणे-मुबई द्रुतगतीमार्गाने नेरळमार्गे साधारण अडीच तासात माथेरान पार्किंग पॉइंटला पोहचलो. वाटेत धोकादायक अश्या माथेरान घाटामध्ये, काही उत्साही कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता व्यायाम करताना दिसले. गाड्या पार्क करून माथेरान रेल्वे रुळावरून चालायला सुरुवात केली. वाटेमध्ये कड्यावरचा गणपती पाहावयास मिळाला. माथेरानपासून साधारण पाऊण तास चालल्यावर एक कमान लागते, तेथून पेब किल्याची वाट सुरु होते. एक शिडी उतरून आणि पुढे २ शिड्या चढून आणखी तासाभरात गडाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो. कमानीपासून गडाच्या शेवटच्या टोकापर्यंतची पूर्ण वाट अतिशय अरुंद अशी आहे आणि एका बाजूला खोल दरी आहे. गडावर गेल्यावर पेब देवीचे मंदिर आणि पाण्याची दोन टाके दिसली. पुरातन वास्तूंचे काही भग्न अवशेषही दिसतात. शेवटची शिडी चढल्यावर कडयाच्या टोकाला दत्ताचे मंदिर नजीकच्या काळात बांधले आहे. थोडे दमट वातावरण असल्यामुळे, आजूबाजूचा निसर्ग स्पष्ट दिसत नव्हता. परंतु अधून मधून सूर्याने दर्शन दिल्यावर मात्र निसर्गाची चौफेर उधळण दिसत होती. येताना वाटेत बाजूला कलावंतीण दुर्गही दिसला. शेवटच्या टोकाला पोहोचल्यावर अचानक तिथे १०-१२ माकडे आली आणि आम्ही निघायचे ठरवले. गडावर पोहचायचा मार्ग मुख्यतः उतार आहे, परतीच्या प्रवसात मात्र पूर्ण चढण लागले. कोकणच्या दमट वातावरणामुळे शरीर शुष्क पडले. साधारण दिड तासात आम्ही पुन्हा माथेरानला पोहोचलो आणि तिथल्या ट्राफिक जॅममधून गाडी काढत परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत सोमाटणे फाट्याजवळ भजनसिंग ढाब्यावर जेवण केले आणि ४ पर्यंत घरी परतलो.

दुर्ग ४ – किल्ले घनगड – १९.१२.२०२० – मागील ३ किल्ले झाल्यावर, एखादा छोटेखानी ट्रेक करू असे ठरले. जिथे सर्व मुलांना पण नेता येईल आणि घनगडावर जायचे ठरले. या वेळेला सोहमसोबत सई , मुक्ता व अर्जुन यांनाही न्यायचे ठरवले. अजून एक मित्रही यावेळेला आला. लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवरून रस्ता घनगडाकडे जातो. रस्त्याचा शेवटचा भाग खराब आहे. घनगड रायगड जिल्ह्यात येत असला तरी मुळशीपासून जवळ आहे. साधारण पहाटे ६ वाजता आम्ही घनगडाच्या पायथ्याशी म्हणजेच ऐकोले गावात पोहोचलो. धुक्यात दिसणारे गडाचे समोरील दृश्य हे अगदी मनमोहक होते. मुलांसकट गड चढायला साधारण पाऊण तास पुरला. शेवटच्या टोकाजवळ गेल्यावर एक शिडी चढायला लागते आणि थोडा निमुळता कडाही आहे. थोडासा अवघड भाग आहे हा. वर गेल्यावर चारही बाजूला जो निसर्ग दिसत होता, तो मात्र अप्रतिम आणि लाजवाब होता . गेल्या ३ किल्यांच्या तुलनेत हा गड छोटा होता परंतु इथून दिसणारा निसर्ग अद्वितीय होता. पावसाळ्यात हा भाग अधिकच सुंदर दिसत असेल. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात. गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत. पाण्याची एक ते दोन टाकी आहेत. आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत. थोडीशी न्याहारी केली आणि निसर्ग डोळ्यात सामावून परत निघालो. मुलांनीही मजा केली. परत येताना तळेगावजवळ थंडा मामला या हॉटेलात जेवण केले. आणि ४ पर्यंत घरी पोहोचलो.

हा प्रवास किंवा गिर्यारोहण करताना एक मात्र नक्की जाणवले, संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा आणि आजूबाजूचा निसर्ग हा थक्क करणारा आहे. यामध्ये महाराजांनी त्याकाळी अतिशय मोक्याच्या ठिकाणी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधलेले किल्ले, त्याकाळातील स्थापत्यशास्त्रहि किती प्रगत होते याचे उदाहरण देतात.

पुढे २५ डिसेंबरच्या दरम्यान आमच्यापैकी तीन मित्रांनी सापुतारा – वणी – इगतपुरी अशी सहल केली. परत आल्यावरही काही वैयक्तिक कारणास्तव मला सोलापूरला जावे लागले. या सर्वांमध्ये आमच्या दुर्गसफरीमध्ये थोडा खंड पडला. परंतु या खंडानंतर आम्ही आमची दुर्गसफर पुन्हा सुरु केली आणि त्याचा शेवटहि अतिशय रम्य आठवणींनी केला. या भागातील हि सफर मात्र इथेच संपवून, पुढचा प्रवास नवीन भागामध्ये तेवढयाच उत्सहाने पुन्हा लिहितो. धन्यवाद.

क्रमशः

 

भाग २

नमस्कार! पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमधील शेवटच्या आठवड्यात आमच्या दुर्गसफरीमध्ये खंड पडला . आम्ही तीन मित्र सापुतारा आणि इगतपुरीच्या सहलीला सहपरिवार गेलो. सापुतारा हे महाराष्ट्राच्या सीमेवरचे गुजरातमधील हिल स्टेशन. ४ दिवसाच्या सहलीत आम्ही सापुतारा आणि डांग जिल्ह्यातील आजूबाजूच्या काही जागा बघितल्या. जागा ठीक ठीक स्वरूपाच्या होत्या, पण रिसॉर्ट मात्र छान होते. हा भाग पावसाळयात अधिक मोहक असेल, परंतु पुण्यातील पर्यटकांना पावसाळी जागांचे फार कौतुक नसावे. एकंदरीत परिवारासोबत छान वेळ गेला. सापुतार्याहुन पुढे आम्ही सप्तशृंगीगडावर गेलो आणि वणीच्या देवीचे दर्शन घेतले. या गडावर रोपवेने जाता येते, एकूणच छान सोय केली आहे आणि स्वछताही आहे. पुढे आम्ही नाशिकजवळील इगतपुरीमध्ये एक रात्र घालवली आणि छोटीशी पार्टी केली. इगतपुरीतील विपश्यना केंद्राला भेट देऊन परतीचा प्रवास सुरु केला.

सापुतारा – डिसेंबर – २०२०

इगतपुरी विपश्यना केंद्र – डिसेंबर २०२०

दुर्ग ५ – किल्ले सरसगड / ०९.०१.२०२१ – आमचा पुढील गड होता, रायगड जिल्ह्यातील किल्ले सरसगड. पाठदुखीमुळे आमच्यातील एक मित्र येऊ शकला नाही. आदल्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्यामुळे, आमच्याही प्रवासाची शाश्वती नव्हती. परंतु प्रवासाच्या दिवशी सकाळी पाऊस थांबल्यामुळे, आमचे जायचे निश्चित झाले. सरसगड हा अष्टविनायकातील प्रसिद्ध अश्या पाली गावाच्या सीमेलगत येतो. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने खोपोलीहून आम्ही पालीच्या दिशेने गेलो. सकाळचा प्रहर असल्यामुळे मंदिरापाशी पार्किंगची सहज सोय झाली. बाजूलाच असलेल्या एका टपरीमध्ये चहा पिऊन चढायला सुरुवात केली. गावातील घरांमधूनच गडाचा पायथा लागतो. आमच्याबरोबर काही स्थानिकही शनिवारचे रुटीन म्हणून गड चढत होते. कोकण आणि त्यात ढगाळ वातावरणामुळे हवा अधिकच दमट होती. चढणही बऱयापैकी असल्यामुळे दम लागत होता आणि घामाच्याही धारा लागल्या. साधारण अर्धा-पाऊण तास गड चढल्यानंतर, अतिशय सुबक अश्या दगडात कोरलेल्या १००-१५० उंच पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर, नजीकच्या काळातच नूतनीकरण केलेले मुख्य प्रवेशद्वार लागले. इथून संपूर्ण वळसा घालून गडाचे विरुद्ध दिशेतील प्रवेश द्वार लागते. वळसा घालताना वाटेत पाण्याची भरपूर टाके, गुहा आणि गोदामे लागतात. या प्रवेश द्वारापासून गडाची पुढील चढाई सुरु होते. पुढील साधारण १५-२० मिनिटामध्ये गड चढून पूर्ण होतो आणि बालेकिल्ला लागतो. इथे पाण्याचे एक मोठे तळे आणि केदारेश्वर मंदिर आहे. गडावरून खाली संपूर्ण पाली गाव दिसते आणि अंबा नदीही दिसते. या गडावरून सुधागड आणि घनगडही दिसतात, परंतु दमट वातावरणामुळे आम्हाला दिसले नाहीत. येथे लिहिलेल्या ऐतिहासिक दाखल्यानुसार या गडाचा मुख्यतः टेहळणी बुरुज म्हणून वापर होता. आत्तापर्यंत केलेल्या सर्व ५ गडांमध्ये हा गड राहण्यासाठी उत्तम होता आणि गड म्हणूनही आकर्षक होता. काही वेळ एका झाडाखाली बसून घरातून आणलेले दडपे पोहे आणि गुळाच्या पोळ्या खाल्ल्या आणि परतीचा प्रवास सुरु केला. एव्हाना ऊन डोक्यावर आलेले आणि या वेळेला उतरतानाही तेवढीच दमणूक झाली. एक मित्र थोडासा मागे राहिला आणि त्याच्याजवळ पाणी नसल्यामुळे त्याला अधिकच त्रास झाला. खाली उतरून लिंबू सरबत पिऊन शरीराला थोडे थंड केले. परत येताना लोणावळ्यामधे मम्मीज किचनमध्ये जेवलो. अतिशय सामान्य दर्जाचे हॉटेल आहे, पण गर्दी मात्र खूप होती.

दुर्ग ६ – ढाकोबा / १६.०१.२०२१ – या वेळेस पुन्हा जुन्नर तालुक्यातील ढाकोबा हा गड करायचे ठरले. जुन्नरमार्गे सकाळी ७ वाजता आंबोली या पायथ्याच्या गावाशी पोहचलो. उजाडले असल्यामुळे आजूबाजूचा निसर्ग आणि सधनता स्पष्ट दिसत होती. पायथ्याशी गाडी लावून चढायला सुरुवात केली. दऱ्याघाट म्हणून फलकही दिसला. डोंगर दर्यातून येणारा पाण्याचा मार्ग आणि दगड-माती वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने बांधावर जाळ्या बांधल्या आहेत. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच खुलत असेल यात काही वाद नाही. थोडे अजून पुढे गेल्यावर डोंगरदऱ्यातून होणाऱ्या सूर्योदयाने लक्ष वेधून घेतले आणि आम्ही पुढची चढाई सुरु केली. पुढे गेल्यावर मार्ग काही सापडत नव्हता, काट्याकुट्यातून चढून पुढे आम्ही एका घळीशी येऊन पोहोचलो. तेथून खाली दिसणारा निसर्ग हा अप्रतिम असा होता. आता आम्हाला पुढे दोन डोंगर दिसत होते आणि या दोन्हीतील नक्की ढाकोबा कुठला हे कळत नव्हते. एक पायवाट दिसली आणि त्याबाजूने चढायला सुरुवात केली. काही प्रमाणात अवघड असे उंच खडक चढून पुढे गेलो आणि मध्यावर येऊन पोहोचलो. डोंगराचा शेवट दिसत होता पण मार्ग काही दिसेना. एका बाजूने चढायला सुरुवात केली पण खूपच काटेरी झुडपे होती आणि तेथून चढता येईना. एका ठिकाणी शांत बसून थोडी न्याहारी केली आणि पुढे डोंगराच्या दुसऱ्या बाजूला निमुळत्या वाटेने चालायला लागलो. एका विशिष्ठ ठिकाणाहून पुन्हा डोंगर चढायला सुरुवात केली आणि जाणवले अतिशय निमुळती, उंच आणि घसरडी वाट आहे. २ मित्र पुढे वाट बघायला गेले. आम्ही काही खडकांवर चढून अर्धवट थांबलो. आमच्या बरोबर मंदारचा लहान मुलगाही होता. काही वेळात आम्ही तिघे परत फिरलो. दोन मित्रांनी मात्र संपूर्ण वर जाऊन आजूबाजूच्या जुन्नरमधील जीवधन आणि अहुपे घाटाचा नजारा बघितला. थोड्यावेळाने तेही परतले. आम्ही परतीचा प्रवास सुरु केला आणि जाणवले आता उतरायची वाटही सापडत नाहीये आणि मोठेच्या मोठे कडे उतरायला लागणार आहेत. थोडा अजून शोध घेतल्यावर अखेर एक पाण्याची वाट सापडली आणि आम्ही तेथून खाली उतरलो. पायथ्याशी आल्यावर जाणवले कि आपले या वेळेला काही तरी चुकले तसेच इथे गडाच्या कुठल्याही खुणा सापडल्या नाहीत. थोडी अधिक माहिती घेतल्यावर कळाले ढाकोबा हा मुख्यतः कोकणातील घाटवाटांवर लक्ष ठेवायचा डोंगर आहे. थोडे फ्रेश होऊन पुण्याकडे परत निघालो आणि या वेळेला पुन्हा वाटेत भुजबळ बंधूंच्या हॉटेलमध्ये जेवण केले.

दुर्ग ७ – रोहिडा – २४.०१.२०२१ – या वेळेस रविवारी सातारा जिल्ह्यातील रोहिडा गडावर जायचे ठरले. दुर्दैवाने २० जानेवारीला मला ताप आला, गुरुवारी माझ्या पत्नीला आणि मुलीलाही आला. मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. शुक्रवारी ताप पूर्ण उतरला होता, पण रविवारी मित्रांबरोबर जायचे असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. शुक्रवारी सकाळी करोनाची चाचणी केली आणि शनिवारी रिझल्ट पॉसिटीव्ह आला आणि म्हणता म्हणता घरातील सर्वच जण पॉसिटीव्ह आले. आमच्या ग्रुप मधील अजून एकास अगदी त्याच वेळेस करोना झाला. बाकीच्या मित्रांनी मात्र ठरल्याप्रमाणे रोहिडा पूर्ण केला. करोनामुळे पुन्हा एकदा साधारण महिन्याचा खंड पडला.

दुर्ग ८ – किल्ले निमगिरी आणि हनुमानगड – १४.०२.२०२१ – साधारण महिन्याभरानंतर आणि करोनानंतरच्या विश्रांतीनंतर, आम्ही पुन्हा त्याच जोशाने दुर्गसफर पुढे सुरु करायची ठरवली. जाऊ नको अशी थोडी धाकधूक होती, कारण डॉक्टरांनी शाररिक श्रम कमी करण्यास सांगितले होते. पण शेवटी मनाचा निश्चय करून जायचे ठरवले. या वेळेला पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यातील हडसर जवळील किल्ले निमगिरी करायचे ठरवले. नेहमीप्रमाणे सकाळी पायथ्याशी पोहोचलो आणि चढायला सुरुवात केली. साधारण तास-दिड तासात वर चढलो आणि निमगिरी आणि हनुमानगड हे जुळे गड पूर्ण केले. गडावर काही पडके बुरुज आणि अवशेष दिसतात. येथूनही आजूबाजूचा सुंदर निसर्ग दिसतो. काही दुर्गप्रेमींनी येथील जुन्या पायऱ्या पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अजून पूर्ण झाल्या नाहीयेत. गडाच्या पायथ्याशी अजून काही ऐतिहासिक वास्तू अवशेष आणि स्मारके दिसतात. १२ वाजेपर्यंत खाली उतरलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

या वेळेला खाली उतरल्यावर जाणवले आता ऊन बर्यापैकी लागले आहे, त्यामुळे आता या दुर्गप्रवासात थोडा मोठा खंड घेण्याची गरज आहे. हा विचार मनात आणून या मोसमातील दुर्गसफर आम्ही इथेच संपवायचे निश्चित केले आणि पुन्हा एकदा नव्याने दिवाळीनंतर दुर्गसफर करायचे ठरवले. परंतु या सफरीचा शेवट एखाद्या मस्त सहलीने करावा वाटले आणि तेथेच आमचे सिंधुदुर्गला जायचे नक्की झाले.

स्वर्गीय सिंधदुर्ग – ०४ मार्च ते ०७ मार्च २०२१ – गेल्या ३ महिन्यात ८ गड केल्यानंतर, कुठेतरी आता आम्हाला सहलीचा ब्रेक हवा होता. एखाद्या शांत जागी ३-४ दिवस जावे असे वाटत होते. यु-ट्यूबवर सिंधूदुर्ग पर्यटनाचे काही ट्रॅव्हल विडिओ पहिले आणि येथे जावे हे नक्की केले. थोडा फार ऑनलाईन रिसर्च करून शेवटी लॅण्डमास्टर हॉलीडेच्या मदतीने कुडाळ तालुक्यातील खवणे बीचजवळ “खवणे पॅरॅडाईस” हा होमस्टे नक्की केला. शुक्रवारी सकाळी लवकर उठून खवणेला डायरेक्ट जायचे का आदल्यादिवशी कोल्हापुरात राहून सकाळी उठून जायचे यावर बराच काथ्याकूट झाला. अखेर पुणे-कोल्हापूर-खवणे-पुणे अशी साडेतीन दिवसाची रूपरेषा नक्की झाली. ८ जण नक्की झालेले, जाईपर्यंत शेवटी मेम्बर अदलाबदल होत सात जण राहिले. दोन डीझेल गाड्या घ्यायचे ठरले, मारुती एर्टिगा आणि महिंद्रा क्सयूव्ही ३००.

ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी ४.३० ला सर्वजणांना पिक करत चिंचवड व्हाया बावधन असे कोल्हापूरच्या दिशेने निघालो. शिरवळमध्ये वडापाव आणि चहाचा ब्रेक घेऊन रात्री ८.३० वाजता कोल्हापूरला पोहोचलो. हॉटेल मराठा रिजन्सीमध्ये आम्ही २ रूम्स बुक केल्या होत्या. कोल्हापुरात राहायचे असल्यामुळे बहुतांशी मित्रांना कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्या रश्यावर ताव मारायचा होता. काहीजणांना असलेली माहिती आणि वाचनात आलेल्या आलेल्या माहितीनुसार हॉटेल ओपेलमध्ये रात्रीचे जेवण करायचे ठरले. पण जेवढे ऐकले, तेवढा काही विशेष मेनू वाटला नाही. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे वेळेत झोपलो. काही मित्र सकाळी लवकर उठून महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले. साधारण ८ वाजता आम्ही सिंधुदुर्गच्या दिशेने निघालो. कोल्हापूरहुन खाली तळकोकणात उतरायला ३ मार्ग आहेत, आंबोली, गगनबावडा आणि फोन्डा. आंबोली सगळ्यात सोपा मार्ग आहे पण तो निपाणीहून कर्नाटकातून खाली सावंतवाडीमध्ये उतरतो. कोव्हीडमुळे कर्नाटक सीमेवर कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट लागतो असे ऐकलेले. त्यामुळे कुठून जावे हे नक्की होत नव्हते. शेवटी धाडस करून आणि ऐकीव माहितीनुसार आंबोली घाटातूनच जायचे ठरले. चेकपोस्टला थोडीशी विचारपूस करून सोडण्यात आले. मग काय निपाणी-आजरा-आंबोली-सावंतवाडी-मुंबई गोआ महामार्ग – खवणे असा निसर्गरम्य प्रवास ११.३० वाजता पूर्ण केला.

खवणे पॅरॅडाईस – आमच्या रिसॉर्टवर पोहोचल्यावर जाणवले, हा होमस्टे अगदी मोक्याच्या ठिकाणी खवणे समुद्रकिनार्याच्या बॅकवॉटरवर बांधला आहे. एका बाजूला रिसॉर्ट आणि समोर संपूर्ण कांदळवन. निवांत वेळ घालवण्यासाठी योग्य ठिकाण होते. जेवण होईपर्यंत सर्वजण खूप वर्षांनी तास- दिड तास मस्त क्रिकेट खेळलो आणि फ्रेश झालो. जेवणात फ्रेश सुरमई, प्रॉन्झ आणि सोलकडी मिळाली. मूळ्याची भाजी मात्र विशेष आवडली नाही कुणाला. जेवण करून तास-दोन तास मस्तपैकी झोपलो.

वेन्गुर्ला लाईट हाऊस – थोडीशी वामकोक्षी घेऊन आणि चहा पिऊन आम्ही वेन्गुर्ला लाईट हाऊसला जायचे ठरवले. साधारण १०-१५ किलोमीटरवर पाऊण तासाच्या अंतरावर वेन्गुर्ला गाव आहे. वेन्गुर्ला बीचनजीक डोंगरावर लाईट हाऊस आहे. गाडी पार्क केली आणि दोघा तिघांनी लिंबू सरबत प्यायले. साधारण १०० पायऱ्या चढून आपण वर पोहोचतो. पायऱ्यांवर सुशोभीकरणाचे काम चालू आहे. सुरक्षारक्षाकडून परवानगी घेऊन आम्ही वर गेलो आणि तेथून अथांग पसरलेल्या सागराचा नजारा दृष्टीमध्ये मावत नव्हता. खाली जमिनीवरील काळे खडक, आकाशात फिरणाऱ्या घारी आणि अस्ताकडे चाललेला सूर्य नजर वेधून घेत होता. थोडा वेळ घालवून आम्ही खाली परत आलो. येथे खाली असलेला सागर बंगला डच आक्रमकांनी काबीज केला असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व आहे. थोडा वेळ घालवून, लिंबू सोडा घेऊन आम्ही परत जायला निघालो. वेंगुर्ल्यात काही गरजेच्या वस्तू विकत घेतल्या आणि सूर्यास्तापर्यंत खवणे बिचवर पोहोचलो. २ मित्र माघारीच बसले होते, थोडा वेळ समुद्र किनारी घालवून रिसॉर्टवर परत गेलो आणि जंगी पार्टी केली.

कांदळवन सफारी – शनिवारी सकाळी साधारण ६ वाजता जाग आली आणि कांदळवनाच्या किनारी शांतपणे चहाचा आस्वाद घेतला. सकाळी सात वाजता कांदळवनाची सफारी बोटीने करायचे ठरले होते. साधारण अर्धा तास त्या बॅकवॉटरमध्ये आम्ही फेरी मारली. सुंदर आणि मोहक असे कांदळवन आहे हे. डिझेल बोट असल्यामुळे बोटीच्या आवाजाचा थोडासा त्रास झाला. साधी बोट असती तर अधिक मजा आली असती, परंतु ती चालवणेही अधिक कठीण झाले असते. येथील वनस्पती तोडायला मनाई आहे असे बोटवाल्या काकांकडून समजले. परत येऊन मस्तपैकी चहा – पोहे नाश्ता केला आणि आंघोळी केल्या.

वालावल – साधारण १५ किलोमीटरवर असलेल्या वालावरच्या लक्ष्मीनारायण मंदिराबद्दल एका विडिओमध्ये बघितले होते. आंघोळी झाल्यावर आम्ही त्या दिशेने निघालो. वाटेत परुळेमध्ये डिझेल भरले आणि पुढे निघालो. नागमोडी वाटा आणि आजूबाजूला ताडामाडाची झाडे असा नयनरम्य रस्ता होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही वालावलला पोहचलो. अतिशय सुंदर, शांत आणि तितकेच प्रसन्न असे कौलारू लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आम्ही आलो होतो. मंदिराच्या बाजूला नारळाच्या झाडांनी आणि इतर वनस्पतींनी वेढलेला सुंदरसा तलाव होता. तासन-तास या मंदिरात बसून ध्यान धरावे असे वाटत होते. तलावात आम्ही पाय सोडून बसलो आणि छोट्या माशांनी पेडीक्यूअर केले . मंदिरापाशी भक्तनिवासाचे काम चालले आहे. तासभर तेथे बसून आम्ही पुढे निघालो.

धामापूर तलाव – वालावलहुन पुढे १० किलोमीटरवर असेलेल्या धामापूरला १५-२० मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो. साधारण १०-१२ पायऱ्या चढून गेल्यावर, समोर आपल्याला भगवती देवीचे मंदिर दिसते आणि बाजूला प्रशस्त पात्र असलेला धामापूर तलाव. अप्रतिम असे दृश्य होते डोळ्यांसमोर. येथे बोटिंग सोय आहे, पण कदाचित कोविडमुळे बंद होती. तेथे काहीवेळ बसून आम्ही पुढे निघालो. मंदिराच्या बाजूस असलेल्या हॉटेल वजा खानावळीत जेवायचा विचार केला परंतु खूप गर्दी असल्यामुळे परत निघालो. बाहेर टपरीवर कोकम सरबत पिऊन उन्हाची लाही थोडी कमी केली. मिळालेल्या माहितीनुसार २० किलोमीटरवर असलेल्या कुडाळ गावात दुपारचे जेवण करायचे ठरले. कुडाळकडे जाताना कारली नदीवरील पुलावर थोड्यावेळ थांबलो आणि नदीचे संथ पात्र पाहिले. कुडाळमध्ये कोकोनट या हॉटेलमध्ये जेवलो. जेवण बरे होते परंतु सर्व्हिस मात्र संथ होती. साधारण ३ वाजता तेथून बाहेर पडलो. परत खवणेला जायचे कि निवती बीचवर जायचे यासाठी आमच्यात दोन मतप्रवाह होते. शेवटी आम्ही काही जण निवती बीचकडे निघालो आणि काही जणांनी रिसॉर्टवर जाऊन विश्रांती घेतली.

किल्ले निवती बीच – कुडाळहून आम्ही साधारण ३ वाजता परुळेमार्गे किल्ले निवती बीचकडे निघालो. साधारण ४ किलोमीटर आधी आपल्याला किल्ले निवती आणि भोगवे बीच असा फाटा लागतो. भोगवे बीचही मोठे आणि व्हाईट-सेंड बीच म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही चुकामुक व्हायला नको म्हणून निवती बीचच्या दिशेने निघालो. ४ वाजायच्या दरम्यान आम्ही किल्ले निवतीच्या एसटी स्टॅंडपाशी पोहोचलो. गाडी स्टँडला लावून, गावातील वस्तीतून या बीचकडे रस्ता जातो. वस्तीतून बाहेर पडल्यावर समोर एक मोठा खडकाळ सोनेरी डोंगर, मध्ये पांढऱ्या मातीचा छोटासा बीच आणि समोर अथांग समुद्र असे दृश्य आमच्या समोर होते. साऊथ ईस्ट देशांमधील एखादे छोटेसे बेट वाटत होते. डोंगराच्या एका बाजूने आम्ही थोडे वर गेलो आणि लांबवर पसरलेला समुद्र बघितला. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, सकाळच्या कोवळ्या किरणांनी येथील डोंगर अधिक सोनेरी दिसतो. तेथे थोड्यावेळ बसून आम्ही खाली उतरलो आणि डोंगराच्या विरुद्ध दिशेला जाऊन समुद्रातील काही खडकांवर बसलो. सूर्याच्या विरुद्ध दिशेला असल्यामुळे डोंगराची सावलीही होती. समुद्राच्या लाटांशिवाय कुठलाही आवाज येत नव्हता. अर्धा पाऊण तास आम्ही समुद्राकडे शांत बघत बसलो. सर्व ताणतणाव तेथेच निघून गेल्यासारखे वाटत होते. काही वेळात बाकीचे मित्रही आले, बाजूच्या एका डोंगरावर समुद्रात थोडे चालून जाता येते. तेथे बसून सूर्यास्त बघितला आणि खाली आलो. आता थोडा अंधार झाला होता. समुद्रातील लाईट हाऊसवरील दिवे दूरवर चमकत होते. हा सगळा नजारा डोळ्यांमध्ये साठवून आम्ही रिसॉर्टच्या दिशेने परत निघालो. परत आल्यावर पुन्हा मासे, प्रोम्प्लेट आणि सोलकडी असा मेनू होता, शाकाहारी जेवणपण होते. जेवण झाल्यावर गाडी घेऊन डोंगरावर अंधारात काही गप्पा मारण्यात वेळ घालवला. अरुंद रस्ता असल्यामुळे गाडी फार वेळ पार्क करता येत नव्हती, त्यामुळे परत आलो आणि थोड्यावेळ गप्पा मारून झोपी गेलो.

सफर समाप्ती – रविवारी सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा कांदळवनाच्या शांततेचा अनुभव घेतला. नाश्त्यामध्ये मालवणी घावण्या आणि चटणी होती. नाश्ता करून साधारण सकाळी १० वाजता आम्ही खवणेहुन निघालो. तळकोकणातील फार वर्दळ नसणारे समुद्र किनारे, इथले नागमोडी रस्ते, नारळ-सुपारी-ताडामाडाची झाडे, छोटे मोठे नदीतलाव आणि एकूणच इथला सर्व निसर्ग आपल्याला सुंदर अनुभुती देऊन शहरी गोंगाटापासून दूर घेऊन जातो. येथील निसर्ग संपूर्ण अनुभवण्याकरिता कदाचित तीन दिवस अपुरे वाटले. शेवटी कुठलाही प्रवास कधीनाकधी संपत असतो आणि आयुष्यभराच्या आठवणी ठेऊन जातो. आमची हि सहल अशीच संपली होती. आम्ही पुण्याचा प्रवास सुरु केला. वाटेत कोल्हापूरमध्ये हॉटेल सातबारामध्ये भरपेट जेवण करून रात्री ८ पर्यंत घरी परत आलो, पुढचा प्रवास सुरु करण्याकरीता.

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...