लेखांक ९६ : गुजरातमधील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेच्या दक्षिण तटावरील मार्गक्रमणा
श्रीराम नामक त्या तरुण आचाऱ्याच्या हातचा महाप्रसाद घेऊन रामपुरा सोडले .
पुन्हा एकदा किनारा पकडला . इथून काठाने चालण्याचा रस्ता जवळपास अशक्य या
कोटीतला आहे . त्याचे महत्त्वाचे कारण असे की इथे फक्त माती किंवा फक्त दगड
नसून मातीत कालवलेले दगड आहेत ! गेली लाखो वर्षे नर्मदा मातेने वाहून
आणलेल्या गाळाच्या मातीमध्ये नर्मदेचीच जाडसर वाळू कालवून तयार झालेले कठीण
वालुकाश्म युक्त खडक येथे आहेत . यातील एकेक खडा एकेक इंचाचा आहे .
त्यामुळे याच्यावरून चालताना पायांची कसरत होते . बर हे वाळूचे टिले सरळ
नसून मध्ये येऊन मिळणाऱ्या असंख्य ओढ्यांमुळे कधी दहा फूट ,कधी पंधरा फूट ,
तर कधी तीस फुटापर्यंत खोल गेलेले आहेत . इथे घाटावरती मला एक परिक्रमा
असे भेटले . महाराष्ट्रातील नगरच्या पाथर्डी या गावचे हे परिक्रमावासी
वारकरी सांप्रदायिक होते . विठ्ठल महाराज पठाडे असे त्यांचे नाव .
त्यांच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसले म्हणून मी विचारले की बाबाजी काय झाले
? ते मला म्हणाले की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा देखील
पूर्ण करायची आहे आणि आषाढी वारी देखील गाठायची आहे . तरी कसे करावे याचा
प्रश्न त्यांना पडला आहे . मी त्यांना सांगितलं की जर ते किनाऱ्याने चालले
तर त्यांची परिक्रमा लवकर पूर्ण होईल . परंतु आजपर्यंत ते धोपट मार्गाने
चालल्यामुळे त्यांना थोडीशी शंका होती की नक्की कुठला मार्ग पकडावा . मी
त्यांना सांगितले की तुम्ही एक दिवस माझ्यासोबत किनाऱ्याने चालून पहा . जर
तुम्हाला बरे वाटले तर तसेच पुढे जा अन्यथा सडक मार्ग आहेच . त्यांनाही
युक्ती पटली आणि ते माझ्यासोबत चालू लागले . चालताना चे नियम मी त्यांना
समजावून सांगितले की दोघांनी अंतर ठेवून चालायचे आणि गप्पा मारायच्या नाहीत
. तसेच इथे किनाऱ्यावर मगरी असणार आहेत हे देखील मी त्यांना सांगितले .
त्यामुळे जरी मगर दिसली तरी आरडाओरडा न करता शांतपणे तिचे दर्शन घ्यायचे
असे आम्ही दोघांनी ठरवले . थोडे अंतर चाललो असू नसू इतक्यात एका भव्य
मगरीने दर्शन दिलेच ! ती मगर इतकी मोठी होती की एखाद्या म्हशीला सहज
पाण्यात खेचेल ! संथपणे चाललेला तिचा जलविहार पाहून मन तृप्त झाले ! अतिशय
संथ लयी मध्ये तिची शेपटी सर्पाकार हलत होती . त्यातून तयार होणाऱ्या लाटा
एखादी नाव गेल्यावर मागे कसे नक्षीकाम होते तसे नक्षीकाम पाण्यामध्ये तयार
करत होत्या . परंतु मध्येच मगरीने ठरवले की ती अशी पुढे सरकायची की जणूकाही
पाण्यात कुठली हालचालच दिसणार नाही ! या दोन्ही प्रकारे तिला पोहता येत
होते ! विठ्ठल महाराजांना चष्मा असल्यामुळे त्यांना मगर दिसत नव्हती . ते
म्हणाले नर्मदा मैया मला आंधळे केलेले आहेस तुझी मगर मला जवळ आल्याशिवाय
दिसणार नाही . असे म्हटल्याबरोबर मगरीने डावीकडे वळण घेतले आणि वेगाने ती
आमच्या दिशेला पोहत येऊ लागली ! तिची ती गती तिचे डोळे आणि तिचे दात
चांगलेच लक्षात राहिले ! आम्ही दोघे मूर्ती सारखे हतबुद्ध होऊन थांबलो होतो
! तिचे ते सौंदर्य आणि पोहण्यातले लालित्य केवळ अविस्मरणीय होते ! विठ्ठल
महाराजांना अचानक असे वाटले की तिचा व्हिडिओ घ्यावा म्हणून त्यांनी
त्यांचा छोटा जिओ फोन काढण्यासाठी झोळी खाली ठेवली . ती हालचाल पाहिली आणि
त्या क्षणी ती मगर अक्षरशः अदृश्य झाली ! एका क्षणात ती पाण्यामध्ये शिरली .
आणि खालूनच पोहत कुठेतरी निघून गेली . मी बराच वेळ ती कुठून बाहेर येते का
पाहायचा प्रयत्न केला परंतु ती बाहेरच आली नाही ! विठ्ठल महाराजांना मी
पुन्हा एकदा वन्य जीवन पाहण्याचे नियम सोप्या शब्दात समजावून सांगितले .
मध्ये येणारे ओढे नाले पाहून विठ्ठल महाराज थांबायचे आणि सांगायचे इथून
रस्ता नाही . मला काही दिवसांपूर्वी मोहन साधू ला हेच वाक्य ऐकणारा मी
आठवायचो ! मी असेच त्याला सांगायचो की इथून पुढे रस्ता नाही . आणि मग तो
रस्ता काढून दाखवायचा ! आज फक्त त्याची जागा मी घेतली होती . आणि माझ्या
जागी विठ्ठल महाराज पठाडे होते ! विठ्ठल महाराजांचे कौतुक आहे . कारण फार
खोल आणि फार कठीण ओढेनाले माझ्या नादाने कधी वेलींना पकडत ,कधी झाडांच्या
लटकणाऱ्या मुळांना पकडत ,तर कधी उड्या मारत ते उतरले आणि चढले सुद्धा . हा
परिसर नक्की कसा होता याचा आपल्याला अंदाज यावा म्हणून काही गुगल नकाशे आणि
चित्र आपल्या साठी सोबत जोडत आहे .
वाळूचे ओढे नाले यांच्यामुळे कातरले गेलेले किनारे कसे आहेत
हे लक्षात येण्यासाठी रामपुरानंतरचा किनाऱ्याचा हा भाग पहावा म्हणजे
तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल . हा भूभाग पार करण्यासाठी
अतिशय कठीण असा आहे त्यामुळे परिक्रमावासी या भागातून जात नाहीत . परंतु
वैयक्तिक संकल्पा मुळे मी इथून गेलो आणि नर्मदा मैयाने देखील अतिशय सुंदर
पद्धतीने हा संपूर्ण टापू पार करविला .
नर्मदामाई किनारी जळणारी चिता (प्रातिनिधिक चित्र )
श्री धनेश्वर महादेव महादेवाचे
हे सुंदर मंदिर खूप दुरून दिसते समोरच्या तटावरून पण छान दिसते .
समोरच्या तटावरून मंदिर असे दिसते
आम्ही चाललो तो वाळूचा किनारा पहा
स्वामी महाराज वरती राहतात तर भक्तांच्या खोल्या खालील मजल्यावर आहेत .इथे अनेक गावातील भक्त दर्शनासाठी येत असतात .
याच व्हरांड्यातील याच कट्ट्यावर बसून आम्ही तरुण साधू सोबत चहाचा आस्वाद आणि सत्संग घेतला .
हाच तो स्नानाचा घाट जिथे सर्व परिक्रमावासी स्नान करत होते
स्नान घाटाकडून आश्रमाकडे घेऊन जाणारी सुंदर पायवाट
स्वामी रामानंद संत आश्रम गोवार
इथून
पुढे सगळा असाच किनारा होता . प्रत्यक्षात इथली पाणी पातळी नैसर्गिक
रित्या कमी झालेली नसून सरदार सरोवर धरणामुळे इथला जलस्तर एकदम खाली गेलेला
आहे . तिथे पाणी अडवले नसते तर इथे पाणी पातळी याहून किमान दहा-वीस फूट
अधिक राहिली असती .
त्यामुळेच इथे सुंदर अशी शिवलिंगे सापडतात फक्त तुमची नजर शोधक हवी आणि ... 

आज
फक्त गरुडेश्वरापासून खाली समुद्रापर्यंत आढळणाऱ्या या मगरी पूर्वी
संपूर्ण नर्मदा नदीमध्ये आढळायच्या त्यामुळे परिक्रमा वासींना पाण्यात
उतरून स्नान करायला परवानगी नसावी . काठावर बसून स्नान करण्याचा हेतू हा ही
एक असावा असे वाटते . तरी देखील पर्यटक कुठलाही विचार न करता नर्मदा मैया
मध्ये खोलपर्यंत आत जातात हे चुकीचे आहे असे वाटते .
काठावरून चालताना अशा प्रकारची जमीन आहे . थकलेल्या पायांना अशा
गुळगुळीत गोट्यांवरून चालताना खूप आराम मिळतो . पायाची 'ॲक्युप्रेशर थेरपी '
होते . फक्त मध्येच कुठे ॲक्युपंक्चर होणार नाही याची देखील काळजी घ्यावी
लागते ! कारण काटे खूप असतात . चालण्याची गती अर्थातच मंदावते .
मैयाच्या काठाजवळ मोठे मोठे दगड आहेत . यांच्या वरून चालताना देखील
फार सावधपणे चालावे लागते . कधी कुठला दगड फिरेल आणि तोंडावर आपटवेल याचा
नेम नसतो .
शूलपाणीचे डोंगर मागे सोडून आपण आता बऱ्यापैकी पुढे आलेला आहोत हे तुम्हाला हे चित्र पाहिल्यावर लक्षात येईल .
नदीजवळ मोठे खडक असले तरी आपल्या चालण्याच्या वाटेमध्ये अशा प्रकारचे
वाळू आणि गाळ याच्यापासून तयार झालेले मोठाले टिले किंवा मोठ्या मोठ्या
भिंती आढळतात . याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर शिवलिंगे सापडतात . फक्त ती
काढणे खूप त्रासाचे असते . कारण ती चुनखडक आणि गाळाच्या मदतीने पक्की
बसलेली असतात .
हे चित्र खूप वरून काढलेले आहे . प्रत्यक्षा मध्ये आम्ही अगदी
पाण्याजवळून चालत होतो . त्यामुळे मगर खूप मोठी दिसायची . माणसाची जराशी
चाहूल लागली तरी मगर क्षणात अदृश्य होते !
रामपुरा गावापासून तिलकवाडा पर्यंत नर्मदा मैया उत्तर दिशेला वाहते
म्हणून या भागाला उत्तरवाहिनी नर्मदा असे नाव आहे आणि एवढ्याच भागाची
परिक्रमा करणे म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करणे होय . आज मला या
उत्तर वाहिनी परिक्रमेचा दक्षिण तट पार करायचा होता .
परंतु इथला प्रवास अतिशय संस्मरणीय असा ठरला ! इथे मानवी वावर शून्य असल्यामुळे मगरींचा चांगला सुळसुळाट होता .
इथे
नर्मदा मातेचे पाणी शांत खोल आणि अतिशय धीर गंभीर भासते . त्यामुळेच
मगरींसाठी ही जागा एक नंदनवन आहे . शिवाय आम्ही ज्या बाजूने चालत होतो ती
बाजू मैयाने उभी कातरलेली आहे . त्यामुळे या उभ्या भिंतीमध्ये काही खोल
गुहा बनवून तिथे अंडी घालणे मगरींना सोपे जाते .
या भागातील उभा किनारा पहा . असा वालुकाष्माचा उभा किनारा
असल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याच्या सतत आपटल्यामुळे तयार झालेल्या
भगदाडात मगर अंडी घालते .
मला काही केवट लोकांनी पूर्वीच
सावध केले होते की किनाऱ्याने चालायचे तर अवश्य चाला फक्त मगरीची अंडी ज्या
भागात असतात तिथे तिच्या फार जवळ जाऊ नका . कारण तुम्हाला अंडी दिसत नसतात
ती तुमच्या खाली कुठेतरी गुहेमध्ये घातलेली असतात . परंतु मगरीला मात्र
त्या अंड्यांची काळजी असल्यामुळे ती अंड्यांच्या संरक्षणासाठी तुमच्यावरती
हल्ला करू शकते . मगरीच्या जबड्याची ताकद ही पृथ्वीवरील कुठल्याही जीवाच्या
चावण्यापेक्षा किती तरी पटींना जास्त आहे हे आता सिद्ध झालेले आहे .शिवाय
भक्ष्य पकडल्यावर त्याला मगर जो एक 'डेथ रोल ' देते तो सहन करण्याची शक्ती
मानवी शरीरामध्ये अजिबातच नाही . त्यामुळे तिच्या जबड्यात आपण जाण्यापेक्षा
शांतपणे पुढे निघून गेलेले कधीही चांगले . इथे पांडुरंग पठाडे थकले होते
म्हणून काही काळ एका झाडाच्या सावलीत जाऊन बसले . मी मैयाच्या काठावर
उन्हामध्येच एका वालुकाश्माच्या टोकावर येऊन बसलो . नर्मदा मातेचे रुपडे
अनिमीष नेत्रांनी मी पाहत होतो . इतक्यात मला नर्मदा मातेमध्ये काहीतरी
आश्चर्यकारक दिसले .माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता म्हणून डोळे
चोळून चोळून मी पुन्हा ते दृश्य पहायचा प्रयत्न केला . परंतु मला जे दिसत
होते ते बरोबर होते !
मगर शक्यतो पाण्यामध्ये जेव्हा पोहते तेव्हा पुढे सरकण्यासाठी शेपटीचा वापर करते .
तिच्या एकूण शरीरामध्ये शेपटीची लांबी खूप जास्त
असते . आणि शेपटीच्या टोकापर्यंत तिचे चांगले नियंत्रण असल्यामुळे अतिशय
सुंदर अशी सर्पिलाकृती हालचाल करत ती मंदपणे पुढे सरकत असते . त्यामुळे
तिला एक विशिष्ट लय आणि गती प्राप्त झालेली असते . इथे मात्र मला एक अतिशय
प्रचंड धूड असलेली मगर दिसली जिची अर्धीच शेपटी होती ! अर्ध्याहून अधिक
शेपटी तुटलेली असल्यामुळे हिला शेपटी हलवत पोहता येत नव्हते . त्यामुळे ती
वेगाने शेपटीचे उरलेले टोक हलवत पुढे चालली होती .
शेपूट नसल्यामुळे हिला पुढे
जाण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत होते . तसेच तिच्या शरीराचा एकंदरीत तोल
ढळल्या सारखा वाटत होता . मला सुरुवातीला वाटला की मला भास होत आहे परंतु
नंतर ती मगर माझ्या इतकी जवळ आली की मला स्पष्टपणे दिसले की तिला अर्धी
शेपूट नाही . मगर माझ्या जवळ येऊ शकली कारण तिला मी बसलो आहे हेच माहिती
नव्हते . तिला जर मी दिसलो असतो तर ती जवळ आली नसती . शेपूट तुटलेल्या पाली
आपण पाहिल्या असतील . अगदी तशीच ही मगर होती . फक्त आकार फार मोठा एखाद्या
म्हशीसारखा होता . आश्चर्यकारक असे ते दृश्य हृदयामध्ये साठवत पुढे
निघालो . पठाडे महाराजांना मी हा अनुभव सांगितला तर त्यांना तो माझा भ्रम
आहे असे वाटले . पुढे मांगरोल गावाच्या घाटावर काही केवट लोक गप्पा मारत
बसले होते . त्यांना भेटून मी मला दिसलेल्या मगरी विषयी सांगितले . ते
सर्वजण एकमेकांची तोंडे पाहू लागले ! कारण इथे अशी मगर आहे हे या केवट
लोकांना माहिती होते परंतु त्यांच्यातीलच एकाला हे खोटे वाटायचे कारण
त्याला आज वर ती मगर कधीच दिसली नव्हती ! मी त्यांच्याशी कुठलाही संबंध
नसताना आलेला अनोळखी व्यक्ती असल्यामुळे मी सांगितल्यावर त्याचा विश्वास
बसला . केवट मला सांगू लागले की त्या मगरीची कथा फार भयानक आहे ! आम्हाला
दगडावर बसवून त्यांनी तीन दगडांची चूल मांडून चहा करायला सुरुवात केली .
चहाचे सामान सर्वच नावाडी आपल्या नावे मध्ये ठेवत असतात . चहा करता करता एक
केवट त्या मगरीची कथा सांगू लागला . आणि आम्ही सर्वजण कानात प्राण आणून
ऐकू लागलो !
" वह पूँछकटा मगरमच्छ बडा खतरनाक है बाप्पू ! उसके
कारनामे आप नही जानते । सबसे बडा शैतान है वह । पूरी की पूरी गाय , पूरी की
पूरी भैंसिया खींच के ले जावे वह पाणी मे ! बछडा देखेगा भी नही । उसको
सिर्फ बडा जानवर चाहिये । " काळ्या चहाचे झुरके घेत आम्ही ऐकू लागलो .
"उसकी और एक गंदी आदत थी दादाजी । यहा हर गाव का शमशान मैया किनारे होता है
।अब यह क्या करेगा जब भी कोई चिता जल रही हो तो वहां पानी में घात लगा कर
बैठेगा । और जैसे ही सारे आदमी चले जाए , जोरदार झपट्टा मारकर किनारे पर आ
जाएगा । उसकी पुछ में बहुत बड़ी ताकत होती है । पूछ के एक ही झटके से पूरी
चिता गिरा देगा । और शव लेकर पानी में चला जाएगा ! और ठंडा करके फिर आराम
से बैठकर खाएगा । "
हा
प्रकार माझ्यासाठी नवीनच होता ! यापूर्वी सातारा शहरातल्या माहुली
शहरांमध्ये असलेल्या स्मशानामध्ये कुत्री असे करताना मी स्वतः पाहिले होते .
कृष्णा नदीमध्ये शरीर ओले करून ही कुत्री वेगाने पळत यायची आणि चितेमध्ये
घुसायची . जळणाऱ्या प्रेताचा जो कुठला भाग तोंडाला लागेल तो तोडून पुन्हा
पळून जायची . हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी घडताना पाहिलेले आहे .
त्यांच्या अशा पद्धतीने घुसण्यामुळे चिता कशी ढासळते हे देखील मी अनुभवलेले
आहे . परंतु मगर देखील असे करते हे मला माहिती नव्हते . "लेकिन पूँछ का
क्या हुआ फिर ? " मी विचारले . "बताते हैं बताते हैं दद्दा । सब कुछ बताते
हैं । "विडी चा एक झुरका घेत नर्मदा मातेच्या किनाऱ्याकडे एका विशिष्ट
जागेकडे बोट करत तो केवट सांगू लागला . "वह दूर आपको शमशान दिख रहा है ? बस
वही शमशान था । एक बड़ी सी चिता जल रही थी । और अपना यह मगरमच्छ वहां चला
गया ।लोग मगरमच्छ के डर से छुप जाते थे । यहां बहुत लोगों की जान मगरमच्छ
ले चुके हैं । आज भी मगरमच्छ हर साल दो चार लोग आराम से खींच कर ले जाता है
। छुपे हुए हमारे गांव के लोगों ने जो देखा वह बता रहे हैं । अपना यह बड़ा
सा मगरमच्छ आया और मस्त स्टाइल में पूछ घूमाकर के चिता पर फटकार डाला ।
चीता धड़ाधड़ गिर गई । अब हुआ यह है कि यह मगरमच्छ वहां से भाग नहीं पाया ।
क्योंकि सारी चिता उसके पूछ पर ही गिर गई । और उसमें बड़े से एक दो लकडे
थे । यह बेचारा उसके नीचे दब गया । उसकी पुछ बुरी तरह से जल गई । यह जितना
हिलने की कोशिश करता उतनी और लकडियाँ उस पर गिर जाती । इस हादसे में बेचारे
की आधी पूछ कट गई । और कैसे भी करके जान बचाकर , कटी हुई आदि पूछ वहीं पर
छोड़कर बेचारा पानी में भाग गया । तब से ऐसे ही अधकटा पूछ लेकर घूम रहा है ।
" नुसता प्रसंग ऐकूनच अंगावर काटा येत होता . प्रत्यक्षामध्ये ते पाहणारे
लोक किती घाबरले असतील पहा ! " अब छिपकली की पूछ कटती है उसको नयी आती है ।
पर मगरमच्छ को नही आती ।तब से यह बेचारा ऐसे ही घूम रहा है । अब पूछ कटने
से इसका तैरने का गति कम हो गया है । इसीलिए यह जब भी हमला करता है तो
बहुत जोर से करता है । पहले से ज्यादा खूंखार ,पहले से ज्यादा खतरनाक हो
गया है । " स्वाभाविक होते . नैसर्गरित्या शिकारीसाठी लागणारे अवयवच नष्ट
झाल्यामुळे या मगरीला शिकार मिळविण्यासाठी थोडेसे अधिक कष्ट करावे लागणे
स्वाभाविक होते . त्यामुळे तिच्यामध्ये एक स्वाभाविक आक्रमकपणा वाढला होता .
निसर्गाचा हा चमत्कार पाहून मौज वाटली . आद्य शंकराचार्य म्हणतात
त्याप्रमाणे मगरींचे देखील नर्मदा मैया कल्याण करते . आम्ही पुढे निघालो
परंतु ही पूँछकटी मगर मात्र लक्षात राहिली . इथे काठावर ओळीने अनेक
महादेवाची पुरातन मंदिरे आहेत . त्या सर्वांचे दर्शन करत मार्गक्रमणा केली .
धनेश्वर , मंगलेश्वर ,कामनाथेश्वर , धनदेश्वर , लुंकेश्वर अशा महादेवांची
दर्शने घेतली . आपण ही दर्शन घ्यावे .
धनेश्वर महादेव मंदिर परिसर
महंत जानकी दास बापू इथली व्यवस्था बघतात
या यानंतर लागणाऱ्या गावाला मांगरोल नाव ज्याच्यावरून पडले ते मंगळेश्वर महादेवाचे मंदिर मैय्याकाठी आहे .
त्यानंतर नानी मांगरोल गावातील कामनाथाचे मंदिर डावीकडे वरती दिसू लागले . सर्व मनोकामना पूर्ण करणारा म्हणून हा कामनाथेश्वर आहे .
श्री कामनाथेश्वर महादेव
(ता.क.
: आपल्या एका वाचकांनी खाली कमेंट मध्ये कळविल्याप्रमाणे गेल्या वर्षी
आलेल्या महापुरामध्ये कामनाथेश्वराचे मंदिर पूर्णपणे वाहून गेलेले आहे .
ग्रामस्थांनी खूप शोध घेऊनही ते शिवलिंग त्याचा नंदी आणि अन्य कुठलाही भाग
पुन्हा सापडलेला नाही . मला या शिवलिंगाचे दर्शन लाभले ही नर्मदेची कृपाच )
आम्ही चाललेला वालुकाश्म असलेला किनारा समोरून असा दिसतो .आता तुम्हाला इथे काठावरून चालण्याची काठीण्य पातळी लक्षात येईल .
उत्तरवाहिनी परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी मात्र गावातून वेगळा मार्ग
केलेला आहे . अगदी थोड्या काळासाठी ते काठावरून चालतात . त्या मार्गावरती
प्रचंड प्रमाणात कचरा केला जातो . हे थांबले पाहिजे . म्हणजे आपण परिक्रमा
अवश्य करावी परंतु कचरा कशासाठी करावा ? आपल्या जवळची एकही वस्तू नर्मदे
काठी पडू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली तर ही वेळ येणार नाही .
आजकाल उत्तरवाहिनी परिक्रमेला एखाद्या जत्रेचे स्वरूप आलेले असून कधी कधी दिवसाला एक लाख लोक परिक्रमा करतात . चहाचे
कप , प्लास्टिकच्या पत्रावळ्या , द्रोण , बिस्कीटचे पुडे, चॉकलेटची
वेष्टने , उदबत्तीच्या पिशव्या इत्यादी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात
नर्मदा मैया काठी टाकला जातो .हे दृश्य हृदय हेलावणारे असते . तरी आजकाल
अनेक स्वयंसेवी संस्था उत्तरवाहिनी परिक्रमा झाल्यावर किंवा परिक्रमेच्या
दरम्यान कचरा गोळा करण्याचे महत्त्वाचे काम करताना दिसतात . परंतु कचरा
टाकणारे हातच नसतील तर कचरा गोळा करणाऱ्या हातांची सुद्धा गरज लागणार नाही
हे साधे गणित आपल्या लक्षात आले पाहिजे .
उत्तर वाहिनी परिक्रमा झाल्यावर जमावाने केलेला कचरा गोळा करताना स्वयंसेवक
हा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात गोळा करावा लागतो की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही . अशा प्रकारची कृती केल्याने नर्मदा मैया कधीच प्रसन्न होणार नाही हे भक्तांनी कायम लक्षात ठेवावे .
हा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात गोळा करावा लागतो की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही . अशा प्रकारची कृती केल्याने नर्मदा मैया कधीच प्रसन्न होणार नाही हे भक्तांनी कायम लक्षात ठेवावे .
उत्तर वाहिनी परिक्रमा या विषयावर थोडेसे मनापासून बोलावेसे वाटत आहे .
परिक्रमा
म्हणजे " च्या भोवती फिरणे . " उत्तरवाहिनी नर्मदा मातेच्या भोवती फिरणे
म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमा . या मार्गावर फिरताना एकट्याने , संकल्प
पूर्वक , शक्यतोवर अनवाणी पायांनी , परिसरातील सर्व मंदिरांची दर्शने घेत ,
तिथे आपली वैयक्तिक उपासना साधना करीत , अयाचित वृत्तीने नर्मदा मातेचे
नामस्मरण ,चिंतन , दर्शन करीत काठाने पायी चालणे म्हणजे उत्तर वाहिनी
परिक्रमा करणे . जरी ही परंपरा अतिशय पुरातन असली तरी देखील स्थानिक
लोकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की या परिक्रमेचा प्रचार प्रसार गेल्या
दहा वर्षात मोठ्या प्रमाणात झालेला आहे . तत्पूर्वी केवळ इथे पंचक्रोशी
मध्ये अर्थात आसपास राहणाऱ्या गावातील लोकच ही परिक्रमा करायचे . माझी आजी
सांगायची ही मंदिरामध्ये नेहमी तीन प्रकारचे लोक येतात . हौशे , नवशे आणि
गवसे . हवशे म्हणजे ज्यांना देवदर्शनाची हौस आहे असे लोक . दुसरा प्रकार
आहे नवस सायास बोलून तो फेडण्यासाठी येणारे भक्त लोक . आणि तिसरा प्रकार
आहे तो अशा लोकांचा जे तिथे आपल्याला काही गवसते का अर्थात काही सापडते का
काही मिळते का ह्या लोभा पायी आलेले स्वार्थी लोक असतात . उदाहरणार्थ चप्पल
चोर . नर्मदा खंडामध्ये देखील असे तिन्ही प्रकारचे लोक आपल्याला आढळतात .
मनोभावे नर्मदा मातेची अनुभूती यावी आणि स्वतःचा शोध घ्यावा या कारणासाठी
परिक्रमा करणारे काही परिक्रमावासी असतात . काही लोकांनी एखादे व्रत
स्वीकारलेले असते किंवा काहीतरी नवस बोललेला असतो तो फेडण्यासाठी ते
परिक्रमा करत असतात . तर तिसरा आणि अत्यंत बेकार प्रकार अशा लोकांचा आहे
ज्यांना परिक्रमेशी काही देणे घेणे नसते परंतु परिक्रमेपासून मिळणारे लाभ
मात्र हवे असतात . असे लोक संपूर्ण परिक्रमा करण्याच्या भानगडीत न पडता
त्यांना सापडलेला अतिशय सोपा आणि सुलभ उपाय म्हणजे उत्तर वाहिनी परिक्रमा
हा आहे . अर्थात हे सरसकट विधान नसून मी मुख्यत्वे करून स्थानिक लोकांबद्दल
बोलत आहे जे ही परिक्रमा मोठ्या संख्येने आजकाल करताना दिसतात . अशाच
लोकांपैकी काही हुशार लोकांनी मग याचा धंदा करण्याची युक्ती शोधून काढली
आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असे ब्रॅण्डिंग करून लोकांना भुलविणाऱ्या
जाहिराती प्रसृत करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा
व्यवसाय या भागात फोफावला आहे असे सर्वच स्थानिक साधुसंतांनी सांगितले .
तुम्हाला उत्तर वाहिनी परिक्रमा करवून आणतो असे सांगणारे अध्यात्मिक एजंट
इथे हळूहळू तयार होत आहेत . ह्या लोकांचे टारगेट शहरातील श्रीमंत परिक्रमा
वासी असतात . मी बोलतो आहे हे वाचून काही लोकांना खूप राग येणार आहे याची
मला जाणीव आहे परंतु सत्य मांडणे हे मी एक नर्मदा भक्त म्हणून माझे कर्तव्य
समजतो . अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून लोकांना ही २१ किलोमीटरची सफर
घडविली जाते आणि नर्मदा परिक्रमेचे पुण्य आता तुम्हाला मिळाले असे सांगितले
जाते .मी पूर्वी देखील वेळोवेळी अनेक लेखांमध्ये त्या त्या भागातील
प्रसिद्ध पंचकोशी परिक्रमांविषयी माहिती लिहिलेली आहे तशीच ही देखील एक
पंचकोशी परिक्रमा आहे . परंतु गेल्या काही वर्षात तिचे ज्या पद्धतीने
बाजारीकरण झालेले आहे व होत आहे ते पाहता भविष्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ
मिळून या परिक्रमेवर काही निर्बंध आणतात की काय अशी अवस्था निर्माण होणार
आहे असे माझे स्पष्ट मत झालेले आहे .जसे गिरनार परिक्रमेचे गेल्या काही
वर्षात बाजारीकरण झाले आहे तसेच याही परिक्रमेचे आता होते आहे. मी २०२२
सालीच गिरनर परिक्रमा केली होती तेव्हा दिवसाला नऊ लाख लोक चालत होते !
कल्पना करा याचा त्या वनक्षेत्रावर किती ताण येत असेल ! तसेच इथेही आता
झालेले आहे . या परिक्रमेला जाणाऱ्या अनभिज्ञ लोकांविषयी माझा काहीही
आक्षेप नाही . माझे म्हणणे इतकेच आहे की अशा पद्धतीने लोकांना उत्तर वाहिनी
परिक्रमा करण्यासाठी आणणारे जे लोक आहेत त्यांनी सुरुवातीलाच जर सर्वांना
या परिक्रमे दरम्यान काय करावे आणि काय करू नये याचे पुरेसे डोस पाजले तर
त्यांच्याकडून होणारे उन्माद कमी प्रमाणात होतील आणि नर्मदा मातेची कृपा
मिळण्याची शक्यता वाढत जाईल .
उत्तर वाहिनी परिक्रमा करविणारे
आणि १५ ते २० दिवसांमध्ये गाडीने परिक्रमा करविणारे परिक्रमावीर यांची
संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नर्मदा भक्तांनी अतिशय सावधपणे
निर्णय घेऊन मगच यांच्यासोबत यात्रा करावी . आपल्या यात्रेतील पावित्र्य ,
भावभक्ती कुठेही हरपणार नाही याची काळजी घेतली तरच मजा आहे . अशा लोकांची
थांबण्याची ठिकाणे ठरलेली असतात आणि त्या आश्रमाबरोबर शक्यतो यांचे टाय अप
किंवा साटेलोटे झालेले असते . तुम्हाला उत्तर वाहिनी परिक्रमा करायची
इच्छाच असेल तर कोणाचीही मदत न घेता सरळ रामपुरा गाव गाठावे आणि तिथून
नर्मदा मैया सुचवेल त्याप्रमाणे परिक्रमा पूर्ण करावी हे सर्वात सोपे आणि
हिताचे आहे . एक साधे उदाहरण सांगतो . तिलकवाडा या गावांमध्ये समर्थ रामदास
स्वामी यांनी स्थापन केलेला एक अतिशय जागृत मारुती आहे .
परंतु
हा किंचित म्हणजे साधारण दोनशे तीनशे मीटर बाजूला असल्यामुळे परिक्रमा
काढणारे लोक भाविकांना या मारुतीच्या दर्शनासाठी नेत नाहीत . आज या ही
परिक्रमेला सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रीयन लोकांचीच असते . त्यांना जर
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती गुजरात मध्ये आहे हे लक्षात
आले तर त्यांना किती आनंद होणार आहे ! परंतु या आनंदाला ते मुकतात कारण
त्यांनी परिक्रमा एजंटची बुकिंग घेतलेली असते आणि त्याला जास्तीत जास्त
लोकांना परिक्रमा करविण्यात रस असतो . त्यांना सर्वकाही दाखवण्यात फारसा रस
नसतो . अर्थात याला काही सन्माननीय अपवाद देखील असणार आहेत परंतु नियमाला
असलेले अपवाद नियम सिद्ध करू शकत नाहीत हे देखील तितकेच कटु सत्य आहे . असो
. बुद्धी दे रघुनायका !
नदीचा खोल डोह हळूहळू उथळ होत गेला आणि
आता ते पाणी इतके उथळ झाले की या काठावरून त्या काठावर चालत जाता येईल !
उथळ पाण्यामध्ये मगरीचा धोका थोडा कमी असतो . परंतु पूर्णपणे संपलेला नसतो .
नुकतेच काही उत्तर वाहिनी परिक्रमा करून आलेले लोक मला भेटले ज्यांनी ती
नदी पाण्यातून पार केली असे मला सांगितले . हे धोकादायक आहे . आता तिथे
तात्पुरता पूल उभा करण्यात आला आहे असे फोटो पाहिल्यावर माझ्या लक्षात आले .
यापूर्वी मात्र नाविक लोकांना पैसे दिल्याशिवाय तुम्हाला पलीकडे जाता येत
नसे . उत्तर वाहिनी परिक्रमेच्या रूपाने या पंचक्रोशी मध्ये नवे नवे
व्यवसाय उभे राहताहेत हे मात्र अगदी निश्चित आहे . इथे ग्रामस्थांमध्ये
दोनच प्रकारचे लोक दिसतात . एक या परिक्रमेला वैतागलेले गावकरी आणि एक या
परिक्रमेमुळे अत्यंत आनंदित झालेले लाभार्थी !
त्यामुळे केवळ या
परिक्रमेत लोक तुमच्याशी कसे वागतात यावरून नर्मदा खंडातील समग्र
लोकांविषयी आपण आपले मत बनविणे थोडेसे चुकीचे ठरेल असे वाटते . नुकतेच काही
बसने परिक्रमा केलेले लोक मला भेटले ज्यांनी नर्मदा खंडातील लोक अतिशय
उद्दाम आणि उर्मट आहेत असे मत व्यक्त केले .हे वागणे तुम्हाला कोण घेऊन
गेले आहे यावर बऱ्यापैकी अवलंबून असते याचे ज्ञान आपल्याला शक्यतो नसते.
म्हणून असे सरसकट मत न करून घेणे श्रेयस्कर .असो .
इथे मध्ये
तपोवन नावाचा एक अतिशय सुंदर आश्रम लागला . या आश्रमाचा सुंदर असा घाट
पाहून वर जायची इच्छा झाली . घाटाने वरती गेल्यावर अतिशय भव्यदिव्य
आश्रमाने स्वागत केले . आश्रमामध्ये सुंदर असा बाग बगीचा आणि शेती केलेली
होती . आश्रमामध्ये एक तरुण साधू सर्व व्यवस्था पाहत होते . इथले मुख्य
स्वामी महाराज वरच्या एका खोलीमध्ये समाधी लावून बसलेले होते . कोरोना
काळापासून त्यांनी लोकांना प्रत्यक्ष दर्शन देणे बंद केले होते . फक्त काही
विशिष्ट दिवशी ते बाहेर दर्शनासाठी काही काळ बसायचे परंतु आमच्या नशिबात
ते दर्शन नव्हते . सतत मौनामध्ये राहणाऱ्या या महाराजांना रोज सकाळी
जेवणाची थाळी फक्त दरवाज्यातून सरकवली जायची इतके ते एकांतप्रिय होते . या
आश्रमाची व्यवस्था पाहण्यासाठी परळी वैजनाथ येथून आलेले वडगावकर नावाचे
सुविद्य व सत्वशील दांपत्य नेमले होते .हे दोघेही स्टेट बँक ऑफ हैदराबाद
मधून निवृत्त झाले होते . यांच्याशी काही गप्पा मारल्या . तिथे एक तमिळ
साधू राहिला आहे असे मला त्यांनी सांगितल्यामुळे मी माझा मोर्चा त्या
साधूकडे वळवला . या साधूचे नाव बाळ नंदू असे होते . त्याला तमिळ मध्ये
बोलणारा मनुष्य मिळाल्यामुळे खूप आनंद झाला . याला देखील इथे राहून आश्रम
चालविणाऱ्या महाराजांचे अजून दर्शन झालेले नव्हते . मला या प्रकारची मोठी
गंमतच वाटली ! काही भाग्यवान परिक्रमा वासींना मात्र यांचे दर्शन होते असे
ऐकण्यात आले .
इथली
व्यवस्था पाहणारा तरुण साधू मात्र अतिशय सात्विक , हुशार ,तेजस्वी आणि
कुशल होता . त्यामुळे शिष्यावरून गुरुचा अंदाज लावता येऊ शकतो !
या घाटाच्या दुतर्फा सुंदर बागबगीचे आणि शेती केलेली आहे
आश्रमाची भव्य दिव्य वास्तू आपले स्वागत करते !
आश्रमाची भव्य दिव्य वास्तू आपले स्वागत करते !
इथून
थोडेसे पुढे गेल्यावर एका घाटावर काही परिक्रमा वासी स्नान करताना दिसले .
यांनी हाका मारून आम्हाला बोलावून घेतले . यातील प्रत्येक जण कुठल्या ना
कुठल्या मुक्कामी मला भेटला होता परंतु एक हसरा चेहरा मात्र मला फारच
ओळखीचा वाटू लागला ! मी त्या दाढीवाल्या साधूला विचारले देखील की आपण आधी
कुठे भेटलो आहोत बरे ? त्याने मला आठवण करून दिली भिकमपूर येथे चालू
असलेल्या नर्मदा पुराण कथेमध्ये मी तिथल्या धर्म शाळेमध्ये मुक्कामी राहिलो
होतो .तिथल्या सेवेमध्ये आणि तिथे रात्री आलेल्या भजनकऱ्यांमध्ये देखील हा
चंदन नावाचा मनुष्य होता !
मला पाहताच त्याला आतोनात आनंद झाला !
आमची काही वेळ परिक्रमा या विषयावर चर्चा झाली होती आणि आता याने खरोखरच
स्वतः नर्मदा परिक्रमा उचलली होती ! हा मला आश्रमामध्ये राहण्यासाठी आग्रह
करू लागला परंतु अजून थोडासा दिवस शिल्लक असल्यामुळे पुढे चालायचे मी
ठरविले होते तसेही हे आंघोळ करणारे सर्व परिक्रमावासी इथे मुक्कामी होते
म्हणजे सगळा सावळा गोंधळ असणार होता ! परंतु हा आश्रम खूप चांगला आहे असे
नंतर मला कळाले . इथे पाऱ्याचे शिवलिंग सुद्धा होते .
शिवलिंग शोधतानाच नर्मदा मैया च्या वाहनाकडे देखील आपले लक्ष हवे .
अशा रीतीने काठावर विसावलेल्या अजून तीन मगरी त्याच दिवशी आम्ही पाहिल्या .
ज्याप्रमाणे
पुणे जिल्ह्यामध्ये अलीकडे बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष नित्याचा
झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने या परिसरात मगर आणि मनुष्य यांच्यातला
संघर्ष सर्वज्ञात आहे , सर्वव्यापी आहे आणि जुना आहे .
समोर
दिसणारे तिलकवाडा नगर पहात या उत्तर वाहिनी किनाऱ्याचा निरोप घेतला आणि
मैय्या सह डावीकडे वळलो . पठाडे महाराज वाळूचा किनारा आला की अतिशय
डावीकडून चालायचे जेणेकरून वाळूला स्पर्श होऊ नये . कोणीतरी त्यांना
सांगितले होते की वाळूच्या खाली देखील नर्मदा मैय्या असते . हे विधान
बरोबरच आहे . परंतु केवळ वाळूच्या खाली नव्हे तर नदीच्या आसपास कित्येक
मीटर आतपर्यंत आणि कित्येक मीटर खोल तिचा पाण्याचा प्रवाह कायमस्वरूपी वाहत
असतो हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे .
त्यामुळे मी काही
नर्मदा मैया चा स्पर्श करून देणारा किनारा सोडला नाही . मला थोडा लांबचा
वळसा पडायचा परंतु तो अधिक आनंददायी असायचा . मगरींचे अस्तित्व काही ठिकाणी
जाणवायचे . एकदा तर एक मगर माझ्या डाव्या हाताला होती . आणि उजव्या हाताला
नर्मदा माता ठेवून आपण चालत असतो . मला पाहताच ती अतिशय वेगाने सरपटत
मैयामध्ये शिरली . हे सारे इतके अचानक घडले की जर मी तिला पाहिले नसते आणि
जागेवर उभा राहिलो नसतो तर आमची दोघांची नक्की धडक झाली असती ! ती सरकत
जाताना आणि पाण्यात शिरताना जो काही आवाज झाला तो अजूनही माझ्या कानात
पक्का बसलेला आहे ! या एका प्रसंगावरून मला कळाले की मगरीला माझ्यामध्ये
काहीही रस नाही . उलट ती शक्य तेवढे मनुष्य प्राण्यापासून लांबच पळायला
पाहते . निसर्गाचे नियम ठरलेले असतात .प्रत्येक हिंस्र प्राणी आपली हद्द
आखून बसलेला असतो . त्याच्यामध्ये आलेल्या कुठल्याही प्राण्याला तो सोडत
नाही . परंतु तो जर त्या हद्दीच्या बाहेर गेला असेल तर तो आपण होऊन
कोणावरही हल्ला करत नाही तर पळून जायला प्राधान्य देतो . परिक्रमावासी
देखील नर्मदा मातेचा काठ ही त्याला नर्मदा मैयाने आखून दिलेली हद्द जोवर
पार करत नाही तोवर त्याच्यावर फारशी संकटं येत नाहीत . आणि कसे काय कोणास
ठाऊक परंतु मगरींना ज्ञात असते की परिक्रमावासी आला की तो त्याच्या
हद्दीतूनच चाललेला आहे . त्यामुळे ती कधीच हल्ला करणार नाही . याउलट धुणे
धुणाऱ्या बायका किंवा कोळी , केवट यांच्यावर मात्र हल्ले केल्याचे प्रसंग
ऐकायला मिळतात . नर्मदा परिक्रमा तुम्हाला अशा रितीने तुमच्या मर्यादा
शिकविते . एका मर्यादेमध्ये चालता चालता , मर्यादेमध्ये राहताना , एका
मर्यादित भूगोलाची परिक्रमा करताना , अतिशय अमर्याद अशा आत्मस्वरूपाला
गवसणी घालण्याची कला तुम्हाला रेवामाई अलगद देऊन जाते . तुम्हाला
साधुत्वाच्या सज्जनत्वाच्या मर्यादेमध्ये राहून अमरत्वाचे अमर्यादत्व
प्राप्त करून देते .
काठ सोडताच तिचा । बाधतील आपदा ।
मार्गी चालता सवे । गवसताति संपदा ।
रम्य मार्ग चालता । तिच्या जळासवे सदा ।
बंधमुक्त मोक्षदायी । अमर्याद नर्मदा ॥
लेखांक शहाण्णव समाप्त ( क्रमशः )
लेखांक ९७ : सेहराव मधील शंखचूडेश्वर , शूलपाणी गुंफा व हरी गिरी साधू
पुढे निघाल्यावर लक्षात येऊ लागले की आता झाडी सुरू झाली आहे . अंधार ही
हळूहळू वाढू लागला . पुढे कुठलेच गाव किंवा घाट असल्याचे चिन्ह दिसेना .
आता मात्र संकटात सापडतो की काय असे वाटू लागले . एकतर पुन्हा खोल पाणी
सुरू झाल्यामुळे मगरींचा वावर वाढला होता . त्यात अंधार पडायला सुरुवात
झाली होती . त्यात दोन-तीन भयंकर ओढे नाले आडवे आले .भिक्षा पात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
एक तर फार खोल
होता . तो पार करून पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते . मी एका झाडाच्या
मुळाला लटकून कसाबसा खाली उतरलो . परंतु माझ्यासोबत विठ्ठल महाराज पठाडे
होते . त्यांना थोडे कठीण जाऊ लागले . मी झोळी खाली ठेवून पुन्हा वर गेलो .
त्यांचे सामान घेऊन खाली आलो . मग पुन्हा वर गेलो आणि त्यांना घेऊन खाली
आलो ! हे करताना माझ्या लक्षात आले की तो ओढा सुरुवातीला जितका कठीण वाटत
होता तितका पुढच्या वेळी वाटला नाही ! आयुष्याचे असेच आहे ! एखादी गोष्ट
नवी-नवी करताना कठीण वाटू शकते . एकदा सरावाची झाली की सोपी वाटू लागते .
नर्मदा परिक्रमेतील कठीण मार्गांचे गणित असेच आहे . प्रथमच सर करताना
तुम्हाला कदाचित ते कठीण वाटतील . परंतु सरावाने तुम्हाला माहिती होते की
हे वाटते तेवढे कठीण नाही . सहज साध्य आहे .
हा ओढा पार
केल्यावर मात्र अंधार चांगलाच दाटू लागला . आता आपले काही खरे नाही असे
वाटून पठाडे बुवा मला म्हणाले की आपण मगाशी मागे सोडली ती धर्मशाळा चांगली
होती . मी विठ्ठल महाराजांना म्हणालो , " महाराज काळजी कशाला करायची ! मैया
बरोबर सोय करते " " अहो पण आता अंधार पडला ना ! आता मैय्या कुठून सोय
करणार ?" त्यांचा हा प्रश्न स्वाभाविक होता कारण त्यांना काठाने चालण्याची
तितकीशी सवय नव्हती . आणि माझ्या आग्रहाखातर ते काठावरून आले होते . तसे मी
त्यांना सोबत घेतले नसते परंतु हा मनुष्य अत्यंत धार्मिक ,सात्विक आणि खरा
वारकरी होता . पावला पावलाला माऊलींचे , तुकोबारायांचे अभंग त्यांना
आठवायचे . आम्ही मध्ये मस्त भजने गात आलो होतो . मी त्यांना आठवण करून दिली
, " महाराज , जैशी स्थिती आहे तैशा परी राहे । कौतुक ते पाहे संचिताचे ॥ "
"
रामकृष्ण हरी ! " विठ्ठल महाराज आनंदाने गरजले ! राम कृष्ण हरी चा गजर करत
, दोघे पुन्हा नव्या उमेदीने झपाझप पावले टाकू लागलो ! काठावरती दोन मगरी
दिसल्या . मी महाराजांना सावध केले . आम्ही हळूहळू पुढे निघून गेलो . तिथे
काही नावा नांगरल्या होत्या . नांगरलेल्या नौका दिसल्या की शेजारी गाव असते
. मी विठ्ठल महाराजांना सांगितले की बघा कुठलेतरी गाव आले आहे . महाराज
म्हणाले चला आपण आता गावात घुसूया . मी त्यांना सांगितले की काठाने चालताना
शक्यतो गावामध्ये शिरूच नये . संध्याकाळची वेळ असते . प्रत्येक जण
आपापल्या कुटुंबासोबत ,गुराढोरांसोबत , नित्यनैमित्तिक कर्म करण्यात व्यग्र
असतो . अशावेळी अचानक कोणी अतिथी आला तर त्याला विन्मुख पाठवणे त्यांच्या
जीवावर येते . आणि मग पर्याय नसल्यामुळे दयाभावातून सेवा दिली जाते . अशी
सेवा शक्यतो घेऊ नये . स्वयंपूर्ण होऊन कोणी आग्रहपूर्वक भक्ती भावे सेवा
देत असेल तरच तिचा स्वीकार करावा . तुकोबारायांचा या विषयावर एक खूप सुंदर
अभंग आहे .
भिक्षा पात्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥
देवा पायीं नाहीं भाव । भक्ती वरी वरी वाव । समर्पीला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥
जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हेचि अभाग्य रोकडें । मूळ आणि अविश्वास ॥२॥
काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥
तुकाराम
महाराज म्हणतात की देवाच्या भक्तीचे अवडंबर माजवून दीनवाणे होऊन जगाला
तुमचे कोड पुरविण्याचे साकडे घालणे यासारखे अभाग्याचे लक्षण नाही . ज्याचा
परमेश्वरावर पक्का विश्वास आहे त्याने नेहमी विश्वास ठेवावा की देव सहाय्य
करतो . फक्त त्याचे पाय घट्ट धरावेत . सोडू नयेत .
विठ्ठल
महाराजांना माझे म्हणणे पटले . परंतु पुढे काय हे अनुत्तरीतच होते .
इतक्यात डावीकडून एक साधू पळत आला . तरुण होता . चांगला उंचापुरा होता .
काळा सावळा वर्ण , सहा फूट उंची , कमरेला पंचा गुंडाळलेला . त्याने दोघांना
साष्टांग नमस्कार घातला . आणि दोघांचे पाय घट्ट धरून बसला . त्याच्या
डोळ्यातून अश्रू धारा वहात होत्या . म्हणाला , " तुझी सेवा स्वीकार करतो
म्हणा . आज गरिबाच्या झोपडी मध्ये राहा . कृपा करून पुढे जाऊ नका ! " आम्ही
याच तर क्षणाची वाट पाहत होतो !
परंतु झोपडी तर कुठे दिसत
नव्हती ! आम्ही देखील त्याच्या पाया पडलो . एकमेका लागतील पायी रे ! साधू
झपाझपा पुढे चालू लागला . आम्ही त्याच्या मागे पळू लागलो . १०० मीटर
अंतरावर एका दहा फूट बाय दहा फूट मापाच्या सपाट जागेवर तो आम्हाला घेऊन आला
. "आली आपली झोपडी ! " साधू म्हणाला . मी आजूबाजूला पाहू लागलो . इथे
ज्याला झोपडी म्हणता येईल असे काहीच नव्हते ! चार खांब रोवलेले होते . तेही
खांब म्हणण्याच्या योग्यतेचे नव्हते . तर चार जंगली झाडे किंवा त्यांचे
वेडे वाकडे बुंधे जमिनीत खोचलेले होते . वरती दोन आडवे बांबू टाकले होते .
बास ! खाली जमीन वर आकाश , चार दिशांच्या भिंती ! "हा माझा परिक्रमावासी
आश्रम आहे ! " साधू अतिशय उत्साहाने सांगू लागला ! "म्हणजे अजून तसा पूर्ण
झालेला नाही . परंतु आज नाहीतर उद्या नक्की होईल ! मैय्याची इच्छा असेल तर
पूर्ण नक्की होईल !" आम्हाला देखील आनंद झाला ! त्या साधूने आश्रम असे
म्हटल्याबरोबर ती जागा खरोखरच सुरक्षित अशा आश्रमासारखी भासू लागली ! मी
कल्पनेनेच तिथे एक आश्रम बांधून पाहिला ! आणि लक्षात आले की ती जागा किती
सुंदर आहे ! कारण मुख्य म्हणजे समोरच नर्मदा मैया वाहत होती ! आम्ही नर्मदा
माते पासून फक्त दहा फूट उंचावर होतो . आम्ही दोघांनी आसन लावले . साधूला
आमच्यासाठी काय करू आणि काय नाही असे झाले होते ! या तरुण साधूचे नाव होते
हरी गिरी . हा मूळचा हरदा जिल्हया चा होता .याचे गुरु सोमगिरी महाराज हे
धडगाव तालुक्यातील होते . आदिवासी असल्यामुळे याला मराठी भाषा तेवढी येत
नव्हती . परंतु हिंदी चांगले बोलायचा . याने २०१६ ते २०२१ दरम्यान सलग सहा
नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या होत्या . त्याच वेळी त्याला ही जागा आवडली
होती . त्यामुळे परिक्रमा झाल्यावर सर्वसंगपरित्याग करून तो इथे आला होता .
ही जागा गावच्या मालकीची होती . मागे सेहराव नावाचे गाव होते . या गावात
बहुतांश केवट लोक आहेत . त्यांच्या नावा येथे लावलेल्या असतात . नावांना
चांगला राखणदार होईल म्हणून त्यांनी साधूला ही जागा दिली . आजच त्याने खांब
रोवले होते .अजून छपरासाठी लागणारी लाकडे तोडून आणायची होती . त्याने
मैय्याला विचारले होते , की माझा परिक्रमावासी सेवा आश्रम बांधण्याचा हा
निर्णय योग्य आहे का ? कारण मोठ्या प्रमाणात परिक्रमावासी आले तर त्यांना
मी काय खायला देऊ ? माझा निर्णय योग्य आहे का नाही हे तूच मला सांग . माझा
निर्णय योग्य असेल तर आजच परिक्रमावासी इथे राहायला येतील ! असे साकडे
त्याने नर्मदा मातेला घातले आणि थोड्याच वेळात आम्ही तिथे आलो . आम्ही आलो
असे तरी कसे म्हणायचे ? मागच्या आश्रमामध्ये राहावे अशी इच्छा दोघांनाही
झाली होती . परंतु माझा आतला आवाज नाही म्हणाल्यामुळे मी पुढे निघालो होतो .
तो आतला आवाज म्हणजेच या साधूचाही आतला आवाज आणि तोच नर्मदा मातेचा आवाज !
आपल्या सर्वांचे आतले आवाज एकमेकांशी जुळलेले असतात ! कारण या आतल्या
आवाजांचे एक 'ग्लोबल नेटवर्क ' आहे ! 'युनिव्हर्सल नेटवर्क' म्हणा फार तर !
त्याच्याशी एकदा जुळले गेले की मग आपल्याला कॉलिंग व्हाट्सअप फेसबुक
इंस्टाग्राम ची गरज लागत नाही . हा आतला आवाजच आपल्याला वेळोवेळी
मार्गदर्शन करतो . योग्य तो मार्ग दाखवतो . बरोबर काय चूक काय याचा निवाडा
करतो . एखादी गोष्ट करावी की न करावी हे देखील सांगतो . समोरची व्यक्ती कशी
आहे हे देखील सांगतो . माझा आतला आवाज सांगत होता की हरी गिरी अत्यंत
पुण्यात्मा आहे ! तो इतका सत्वशील होता की काय सांगू ! त्याला काडीचेही
व्यसन नव्हते . सतत मैया मैया करायचा . आम्ही मुक्काम केला खरा परंतु या
आश्रमात चूलच नव्हती ! मग आम्हीच चार दगड आणून चूल तयार केली ! ती लिंपली .
साधू म्हणाला तुम्ही स्नान संध्या आटोपून घ्या .तोपर्यंत मी गावातून
भिक्षा मागून आणतो . आम्हीच स्नानाला निघणार तेवढ्यात तो पुन्हा माघारी
आला . त्याने समोर पोहणारी एक अजस्र मगर दाखवली . आणि सांगितले की
मगरींपासून सावध राहून काठावर बसून स्नान करा . जास्ती आत जाऊ नका . आम्ही
स्नानासाठी गेलो . पाठाडे बुवा काठावर बसले . परंतु मला असे वाटले की केवळ
मगर आपल्याला खाईल या क्षूद्र भीतीने आपण नर्मदा मातेच्या स्नानाला आणि
स्पर्शाला मुकले नाही पाहिजे . खाल्ले तर खाल्ले ! नर्मदा मातेच्या
उदरामध्ये मरण येण्यासारखे भाग्य ते काय ! आणि मी रीतसर आत मध्ये जाऊन
डुबक्या मारून स्नान केले . अर्घ्य प्रदान केले . आणि शांतपणे बाहेर आलो .
हरी गिरीने दाखवलेली मगर अजूनही त्याच भागात दिसत होती . या मगरी रात्री
शिकार करतात . रात्री माशांच्या हालचाली संथ झालेल्या असतात . एखाद्या
दगडाच्या कपारीमध्ये किंवा कोपऱ्यामध्ये सर्व मासे एकत्र शांतपणे उभे असतात
. अशा ठिकाणी अचानक हल्ला करून मगर जबड्यात मावतील तेवढे मासे खाते .
यावेळी मोठी खळबळ माजते . त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो . मगरीचा
ओरडण्याचा आवाज देखील मी पहिल्यांदाच ऐकला ! म्हशी किंवा रेडे जसे रेकतात
अगदी तसाच आवाज मगर काढते . फक्त तिचा जबडा मोठा असल्यामुळे तो आवाज थोडा
अधिक मोठा आणि घुमणारा असतो . मगरींचे आपापसामध्ये मेटिंग कॉल सुरू असतात .
ते देखील आम्ही ऐकले . या भागात मगरींचा अक्षरशः सुळसुळाट होता . रात्री
आश्रमापाशी मगर तर येणार नाही ना असे मी भीक्षा घेऊन आलेल्या हरीगिरीला
विचारले . त्याने सांगितले की रात्री त्या समोरच्या तटावर जातात . सकाळी
लवकर उठल्यावर तुम्हाला समोरच्या ताटावर आडव्या-तिडव्या पडलेल्या मगरी
सापडतील . इकडे गाव असल्यामुळे त्या इकडे येत नाहीत . हरी गिरीने पीठ आणले
होते . आणि कुठलीतरी पाने घेऊन आला होता . एका पुडीत तिखट मीठ घेऊन आला
होता . एक चांगला दगड पाहून त्याने स्वच्छ केला . त्यावर कणिक मळली .
त्याच्याकडे एकच तवा होता . त्यावर आधी परतून भाजी केली . मग टिक्कड बडवले .
इकडे आम्ही संध्याकाळची पूजा वगैरे तोपर्यंत आटोपून घेतले . खरोखरच असे
वाटत होते की आम्ही एका आश्रमामध्ये बसलेलो आहोत ! आजूबाजूला काहीच नव्हते
तरीदेखील चहूबाजूने भिंत आहे असे वाटत होते ! गावाच्या बाजूला मातीचा उतार
होताच . तीच काय ती एक सीमा होती . परंतु बाकी तीनही बाजू मोकळ्या होत्या .
गंमत म्हणजे आम्ही तिघेही आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकाच जागेचा
वापर करत होतो .तेच दार आहे अशी कल्पना आम्ही करून घेतली होती .बाकीच्या
ठिकाणी आमच्या कल्पनेतल्या भिंती असल्यामुळे आम्ही जात नव्हतो ! मला या
आश्रमाची खूप मजा वाटली ! जगण्यासाठी खरंच काही लागत नाही ! आपल्या
कल्पनेतून आपण स्वर्ग उभा करू शकतो ! ते सामर्थ्य , ती शक्ती देवाने फक्त
मनुष्य प्राण्याला दिलेली आहे !
मनी चिंतीले ते होते । विघ्न अवघेची नासते ।
कृपा केलीया रघुनाथे ।प्रचित येते ॥
एखाद्या
पंचतारांकित आश्रमापेक्षाही अधिक सुख या मुक्कामामध्ये लाभले ! कारण इथे
कुठलाच बडे जाव किंवा अवडंबर नव्हते ! हा एक महत्त्वाची गोष्ट मात्र इथे
होती . एका कोपऱ्यामध्ये दगडाचा पाट आणि कोनाडा करून त्यावर हरीगिरीने
त्याला नर्मदा मातेमध्ये सापडलेले अतिशय सुंदर असे शिवलिंग स्थापन केले
होते . स्थापन केले होते म्हणजे नुसता बाण ठेवला होता . आणि रानातली फुले
वाहून पूजा केली होती . शेजारी एक त्रिशूल आणि चिमटा मात्र ठेवला होता .
त्या एका अधिष्ठानामुळे त्या संपूर्ण जागेला एका आश्रमाची अवस्था प्राप्त
झाली होती . हरी गिरी ने भोजन बनवून ठेवून दिले . वरती काही पुरातन मंदिर
होती . त्यांचे दर्शन घेऊन यावे असा माझा मानस होता . हरी गिरीने सगळ्या
मंदिरांची माहिती दिली आणि मी दर्शनासाठी वर गेलो . विठ्ठल बुवा हरिपाठ करत
बसले . शंकरचूडेश्वर महादेवाचे मंदिर वरती होते . सिद्धेश्वराचे मंदिर
होते . आणि शूल पाणी ची गुफा म्हणून एक गुहांवरती देखील वरती होती . या
गुहेमध्ये बसून बऱ्याच साधुसंतांनी तपश्चर्या केलेली आहे असे तिथे
राहणाऱ्या साधूने मला सांगितले . तिथे देखील एक साधू राहत होता परंतु
परिक्रमावासी येथे उतरत नसत . किंबहुना या किनाऱ्याने फारसे कोणी परिक्रमा
वासी जातच नाहीत असे देखील मला या साधूने सांगितले . संपूर्ण परिसर अतिशय
ऊर्जेने भारलेला होता . गावामध्ये खेरामाई मातेचे मंदिर होते .या भागात
तिला खोडीयाल माता किंवा खोडियार माता म्हटले जाई . तिचे देखील दर्शन घेतले
. घराबाहेर गप्पा मारत बसलेल्या काही ग्रामस्थांनी माझी चौकशी केली . मी
खाली हरीगिरीच्या कुटीमध्ये उतरल्याचे सांगितले . गावकऱ्यांना प्रश्न पडला
की कुठली कुटी ! मग माझे मलाच हसू आले ! कारण आम्हाला जी कुटी किंवा जो
आश्रम स्पष्टपणे जाणवत होता तो इतरांसाठी तिथे नव्हताच ना ! सर्व दर्शने
आटोपून आश्रमामध्ये गेलो .
समोर नांगरलेल्या नावा दिसत आहेत . उत्तर तटावरील वाळूमध्ये सकाळी मगरी ऊन खात पडलेल्या दिसतात .
श्री शूलपाणेश्वर महादेव . हे मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीन होते .
दगडी खांब आणि दगडी बांधकाम होते . पांढऱ्या रंगाच्या चुन्याचा रंग
सगळीकडे मारला होता .
हे मंदिर सुंदर होते आणि गावाच्या ऐन चौकात होते . सहराव गाव छोटे आहे .मंदिर परिसरामध्ये जुन्या देवदेवतांच्या मूर्ती आढळतात .
आम्ही
तिघांनी एकत्र बसून भोजन घेतले . पहिलेच परिक्रमावासी मुक्कामी राहिले
आहेत त्यांना गोड काहीतरी खाऊ घालावे म्हणून हरीगिरी साधने कुठून तरी लोटा
भर दूध आणले आणि त्यात खडीसाखर कालवून आम्हाला बासुंदी किंवा खीर म्हणून
दिले ! त्या दिवशीच्या भोजनाची लज्जतच काही न्यारी होती ! नर्मदा मैया चा
जयजयकार करत आम्ही तिघांनी भोजन प्रसाद घेतला . हरीगिरीचे परिक्रमेतील
अनुभव ऐकत त्या चंद्रमौळी झोपडी मध्ये पडून राहिलो ! आकाशातील प्रत्येक
चांदणी स्पष्ट दिसत होती ! जमिनीवर पडून आकाशाकडे पाहायला मला फार आवडते !
तुम्हाला तुम्ही किती शुल्लक आहात याची जाणीव करून देणारे हे दृश्य असते !
हजारो लाखो तारे तारका आकाशगंगा पाहिल्यावर लक्षात येते की आपण या
विश्वाच्या पसाऱ्यामध्ये अतिशय कफल्लक आहोत . क:पदार्थ आहोत . मी हरीगिरीला
आकाशातून धावणारे उपग्रह दाखवले . त्याला हा "धावणारा तारा" म्हणजे अपशकुन
वाटायचा . परंतु जेव्हा मी त्याला त्या मागचे शास्त्र समजावून सांगितले
तेव्हा त्या दोघांनाही आश्चर्य वाटू लागले . मानवनिर्मित उपग्रह
अवकाशामध्ये सोडलेले असतात . त्याचे सोलर पॅनल सूर्याचा प्रकाश जेव्हा
परावर्तित करतात तेव्हा आपल्याला ते एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकताना दिसतात .
त्यामुळे असे उपग्रह केवळ सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या आसपासच दिसतात .
कारण एरव्ही सूर्याचा उजेड त्यांच्यावर पडत नाही . त्यांच्या दिशा
वेगवेगळ्या असतात .गती वेगवेगळ्या असतात . मी कुठल्याही संध्याकाळी
आकाशाकडे पाहत बसलो की असे किमान २५ ते ३० उपग्रह नक्की पाहतो ! त्यासाठी
एक वेगळी नजर लागते , मला ती सवयीने प्राप्त झालेली आहे . कोणालाही होऊ
शकते . सगळा सरावाचा खेळ आहे . असो .
मला असे वाटले की रात्र
झाल्यावर हा किनारा शांत होईल . परंतु झाले उलटेच ! गावातून एक एक दांपत्य
येऊ लागले आणि आपापल्या नावा काढू लागले . जाताना सर्वजण आमच्या इथे थांबून
हरी गिरी शी चार शब्द बोलून मग पुढे जायचे . गावातील बहुतेक लोकांनी
त्याला इथे आश्रम बांधणे वेडेपणाचे आहे असे सांगितले होते . त्यामुळे " हे
पहा ! माझ्या इथे आज दोन परिक्रमावासी मुक्कामासाठी थांबलेले आहेत ! " असे
दाखवताना त्याला अतिशय अभिमान वाटत होता ! लोकांनाही आश्चर्य वाटत होते की
आम्ही असे कसे काय थांबलो आहोत . त्या लोकांशी गप्पा मारून मी रात्री ते
काय काय करतात ते समजून घेतले . रात्री पाण्यामध्ये नावा घालून हे लोक जाळी
पसरवून ठेवतात . दिवसा ऊन खूप असते आणि मगरींचा त्रासही असतो . रात्री मगर
शक्यतो हल्ला करत नाही असे त्यांनी सांगितले . रात्रभर जाळी पसरण्याचे काम
चालते . त्यासाठी नाव पाच सात किलोमीटर बाजूला न्यावी लागते . प्रत्येकाचे
परिसर ठरलेले आहेत . तिथेच ते जाळी लावतात . सोबत भोजन घेतलेले असते .
जोडीने जाण्याचे अनेक फायदे असतात . एक म्हणजे नाव वल्हवायला मदत होते .
कारण जाळे सोडत असताना प्रवाहाबरोबर नाव वाहत राहते . तिला थांबवावी लागते .
तसेच सोबत गप्पांना कोणी असले म्हणजे कंटाळा येत नाही . झोप येत नाही .
भीती देखील वाटत नाही . रात्रभर काम करून अडीच तीनच्या सुमाराला एक एक
नावाडी जोडपे परत आले . यांच्याकडे अतिशय प्रखर असे कृषक टॉर्च होते . मला
रात्री मगरी बघायच्या होत्या . हरी गिरीने सांगितले की नावेतून टॉर्चचा
प्रकाश झोत कुठे किनाऱ्यावर पडला की तिथे बघायचे .मगर दिसेल . आणि तसेच
झाले !मगर दिसल्याबरोबर एका नवाड्याने बाकीच्या नावाड्यांना इशाऱ्याने मगर
कुठे आहे ते दाखवून दिले . हे एकमेकांच्या नावेवर मात्र कधीच टॉर्च मारत
नाहीत . सर्वच जण एकमेकांची " प्रायव्हसी" जपतात ! सारे आपल्या तर्काच्या
पलीकडचे विश्व आहे !
पहाटे एक एक करत सर्व जोडपी परत आली .
सर्वजण जाताना आणि येताना हरीगिरीला सांगून जात होते . ही खेड्यातली पद्धत
आहे . इथे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे याची काळजी समाज
घेत असतो . उद्या काही दुर्घटना घडलीच तर हरीगिरीला नक्की माहिती असते की
रात्री कोण कोण परत आले होते आणि कोण आलेच नव्हते . हे करताना समोरच्याला
आपण त्रास देतो आहे असा भाव कोणाच्याही मनात नसतो . उलट हे एकमेकांना सर्व
माहिती सांगणे अपेक्षित असते आणि गृहीत धरलेले असते . शहरामध्ये अशा
पद्धतीच्या संपर्क यंत्रणेचा अभाव आढळतो . किंबहुना मुळात अशा प्रकारची
संपर्क यंत्रणा नको असलेले लोकच शहरांमध्ये येऊन स्थिरावतात ! ज्यांना
फारशी बंधने नको असतात ते लोक पूर्वी खेड्यातून शहराकडे यायचे . आता शहरात
देखील खेड्यासारखे वातावरण निर्माण होऊ लागले आहे . त्यामुळे ज्यांना
समाजाची बंधने नको असतात आणि यादृच्छिक पद्धतीने आयुष्य जगायचे असते ते लोक
आजकाल अमेरिकेला किंवा अन्य कुठल्यातरी परक्या देशात स्थिरस्थावर होतात !
इथे समाजामध्ये हे नवीन असल्यामुळे समाजाची फारशी बंधने त्यांच्यावर
बंधनकारकरित्या लादलेली नसतात ! हे वेगळ्या संस्कृतीतून आलेले आहेत असे
डोक्यात ठेवून स्थानिक समाज त्यांना जसे आहे तसे स्वीकारतो . अर्थात हे
सरसकट सर्वांनाच लागू होणारे विधान नाही . परंतु हे माझे अनुमान नाही तर
अनुभूती आहे हे देखील सांगतो ! असे स्वतंत्र जगणे आवडणारी मुले वाटेल तेवढे
कष्ट विद्यार्थी दशेतच घेऊन अमेरिकेत शिकण्यासाठी जातात . कारण अशा अनेक
मुलांचा मी भाऊ , मित्र वगैरे आहे ! त्यामुळे माहिती पक्की आहे ! परंतु
असे करून तुमची सांस्कृतिक सुटका होत नसते ! आणि याबाबतीतही माझे
लोकांपेक्षा उलटे मत आहे ! अमेरिकेत जाऊन तुम्ही भारतात अमेरिका आणत नाही
तर अमेरिकेत भारत नेता ! जे अतिशय स्वागतार्हच आहे ! जिकडे तिकडे स्वदेश
भरला असे ! खेडोपाडी मात्र अजूनही प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात काय चालू
आहे ते माहिती असते . सामाजिक दबाव म्हणजे काय असते हे अनुभवायचं असेल तर
खेड्यात राहायला या ! आता देखील सर्व केवट लोकांनी हरी गिरी साधूचा
त्यांच्या गावाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार केलेला दिसत होता . तोही
डोळ्यात तेल घालून त्यांच्या नावांची राखण करायचा . विशेषतः नावांची इंजिन
चोरीला जाण्याचे प्रमाण येथे खूप आहे . अर्थात इथल्या नावा साध्याच होत्या .
परंतु येन केन प्रकारेण नावेला नुकसान करता येणे सहज शक्य असते , त्यावर
हरी गिरी साधू लक्ष ठेवून राहत असे . व दिवसभर आपल्या भजनामध्ये तल्लीन
राहत असे . परिक्रमावासींची सेवा कशी करावी याचा आदर्श वस्तू पाठ म्हणजे
हरीगिरी साधू चा आश्रम होता . पहाटे लवकरच आम्हाला जाग आली . नर्मदा मैया
चा काठ असल्यामुळे भरपूर दव पडले होते . आन्हिके आटोपली आणि पुन्हा एकदा
मैयामध्ये उतरूनच स्नान केले . मैय्याची पूजा केली . खरे म्हणजे नर्मदा
मातेची जी शिशी अथवा बाटली आपण सोबत बाळगत असतो तिचे प्रयोजन असे आहे की
समजा तुम्हाला समोर नर्मदा मैया काही कारणामुळे दिसू शकली नाही तर तिचे
अस्तित्व जाणवावे म्हणून ती बाटली सोबत ठेवायची असते . सध्या मात्र त्या
बाटलीचीच दोन्ही वेळ पूजा करावी लागते अशा ठिकाणी सर्व आश्रम असतात . मला
मात्र जेव्हा जेव्हा अशी मैया समोर दिसली तेव्हा बाटलीतील किंवा कुपीतील
मैया आणि प्रत्यक्ष मैय्या या दोघींची आरती मी करायचो . आजही तशीच आरती
केली आणि सूर्योदय समयी झोळी उचलली . हरी गिरीच्या डोळ्यात पाणी आले .
प्रथमच त्याच्या चंद्रमौळी झोपडी मध्ये कोणी परिक्रमा वासी राहून गेले .
त्याच्या पाया पडल्यावर त्याने कडकडून मिठी मारली . आणि म्हणाला माझा आश्रम
व्यवस्थित चालू दे आणि माझ्या हातून खूप परिक्रमावासींची सेवा होऊ दे असा
आशीर्वाद देऊन जा ! मी त्याला म्हणालो एका साधूला आशीर्वाद देण्याएवढी या
पामराची योग्यता कुठल्या जन्मात होईल असे वाटत नाही ! सध्या तरी तुझे हे
साकडे नर्मदा मैया समोर बसूनच ऐकते आहे ! त्यामुळे ती ते नक्की पूर्ण करेल !
आणि त्याला नर्मदे हर केले ! विठ्ठलराव पठाडे यांना अतिशय गतीने पुढे
निघून जाणे फार आवश्यक होते . नाहीतर त्यांना वारी सापडली नसती . त्यामुळे
मी त्यांना विनंती केली की इथून पुढे त्यांनी माझ्यासोबत न चालता वेगाने
पुढे निघून जावे . त्यांची फार इच्छा होती की मी त्यांच्यासोबत चालावे .
परंतु त्यांना मी माझ्या एकटे चालण्याच्या संकल्पा बद्दल फारसे न सांगता
त्यांना सध्या गतीने चालणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले आणि पुढे जाऊ दिले
. तशी संधी देखील लगेचच आली . कारण पुढे पोईचा नावाच्या गावामध्ये
स्वामीनारायण मंदिर होते . तिथे मला थांबायचे होते . त्यामुळे विठ्ठल
महाराज पठाडे पुढे निघून गेले . यांचा पुन्हा काही संपर्क झाला नाही .
परंतु जो काही हृद्य प्रवास आम्ही मैय्या सोबत केला व जो काही अल्पकाळ
एकत्र व्यतीत केला तो अतिशय भक्ती भावपूर्ण आणि आनंदाचा होता एवढे निश्चित !
विठ्ठल महाराज जिथे कुठे असतील तिथे त्यांना या पामराचा राम कृष्ण हरी !
चालता
चालता मी हरी गिरी साधूचा विचार करू लागलो . हा मुलगा आदिवासी समाजातला
होता . तरुण होता . हुशार होता . सहृदय होता . त्याचे एकंदर चालणे वागणे
बोलणे पाहिल्यावर असे वाटत होते की एखाद्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या घरातील
तो असावा . असे असताना देखील शेती उद्योग धंदा काहीतरी करून चार
बोळक्यांचा संसार थाटून आपल्या गावातल राहून सुखी आयुष्य जगण्यापेक्षा
त्याला असे काहीतरी वेगळे करावे असे का वाटले असेल ? ही कुठली प्रेरणा आहे ?
ही कुठली विद्या आहे ? जी तुम्हाला सहज उपलब्ध भौतिक सुखांचा त्याग करून
रानावनामध्ये , उन्हातान्हा मध्ये , थंडी - वारा - पावसामध्ये भटकायला भाग
पाडते ? उपाशी तापाशी भटकत ठेवते ? कुठेही उघड्यावर आश्रय घ्यायला भाग
पाडते ? कोणापुढेही भिक्षेची झोळी पसरायला लावते ? आणि तरीदेखील परमोच्च
सुखाचा आनंद देते ! गणित फार साधे आहे ! अगदी उलट पद्धतीने नकारात्मक विचार
करून बघू . जर साधू जीवन हे आनंद देणारे नसते तर दरमहा एक लाख रुपये देऊन
सुद्धा कोणी साधू झाले नसते ! त्या जीवनामध्ये काहीतरी मजा नक्की आहे .
काहीतरी नशा अवश्य आहे . ज्यामुळे अनेक चांगले चांगले लोक आपल्या हातचे
सर्व सोडून या पळत्याच्या पाठीमागे लागतात ! ते काय आहे हेच शोधायला आपण
नर्मदा परिक्रमा करत असतो ! नर्मदा परिक्रमा तुम्हाला काय देते ? तर हाच
चिरंतन सुखाचा ठेवा कुठे ठेवला आहे त्या कपाटाची किल्ली देते
.चंदनाचे
खोड एका जागी पडून राहिले तर ते हळूहळू कुजू लागते . आणि एक दिवस त्याची
काळी माती होऊन जाते . परंतु तेच खोड जर सहाणेवर घासत राहिले तर मात्र
थोडेसे कष्ट त्या खोडाला होतात परंतु त्याचे मूळ स्वरूप प्रकट होते ! जे
सुगंधरूप आहे ! चंदनाचे लाकूड सुगंधी आहे हे घासल्याशिवाय लक्षात येत नाही
! किंवा हे लाकूड चंदनाचे आहे की बाभळीचे आहे याची परीक्षा सुद्धा सहाणेवर
घासल्यावरच होते ! त्यामुळे परिक्रमेत होणारे कष्ट हे एक प्रकारे सहाणेवर
घासले जाणे आहे ! साधूंचे जीवन देखील असेच असते . बरोबर पाहता सोने आणि
पितळे या दोन्ही धातूंचे दागिने तेवढेच चमकत असतात ! भले भले तज्ञ सुद्धा
नुसत्या डोळ्यांनी परीक्षा करून सांगू शकत नाहीत की यातले खरे सोने कुठले
आणि खोटे सोने कुठले आहे . परंतु त्याच सोन्याला प्रचंड उष्णता असलेल्या
भट्टीमध्ये टाकले आणि चांगले तावून-सुलाखून घेतले की मात्र ते झळाळून उठते !
आणि पितळ मात्र अशा परीक्षेमध्ये संपूर्णपणे काळवंडून जाते . साधू जीवन ही
अशीच भट्टी आहे . इथे खरे सोने उजळते ! खोटे सोने आपोआप बाहेर फेकले जाते .
ही परीक्षा सुरू आहे हे खऱ्या साधूला माहिती असते . त्यामुळे तो निर्विकार
पणे निश्चलपणे आणि प्रतिकार न करता प्राप्त परिस्थितीला सामोरा जात असतो .
हरी गिरी साधूचा क्रमांक कोणीतरी मागितला त्यामुळे तो कुठून तरी मिळवला
आणि पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क झाला . त्यांनी सांगितले की सेहराव
गावातील त्यांचा संपूर्ण आश्रम मैय्या पुरामध्ये तिच्या घरी घेऊन गेली
!फक्त शिवलिंग त्रिशूळ आणि चिमटा तेवढे वाचले ! आता ते हरदा जिल्ह्यामध्येच
खिरकिया गावाजवळ सारंगपूर येथे एक नवीन आश्रम उभा करण्याचे ठरवत आहेत.
तसेच कोणाला महादेवाचे मंदिर स्थापन करून सेवा करण्याची इच्छा असेल तर
त्यांच्या जवळचे शिवलिंग ते द्यायला तयार आहेत असे त्यांनी मला सांगितले .
त्यांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत . श्रीहरी गिरी सोमगिरी महाराज
८३२०१३ ७७९३ आणि ९६४४४५५३९६ .दोन्ही क्रमांक साधे असून त्यावर व्हाट्सअप
किंवा जीपे नाही परंतु आपण संपर्क करू शकता . सध्या आश्रम वाहून गेल्यामुळे
परिक्रमावासियांची सेवा ते करू शकत नाहीत परंतु लवकरच पुन्हा नवीन आश्रम
उभा करण्याची त्यांची मनापासून तळमळ आहे .साधू जीवन म्हणजे दररोज नवीन
परीक्षा असते . नर्मदा परिक्रमे मध्ये आपल्याला अगदी हेच करायचे असते .
आपली पदोपदी परीक्षा घेणारी एक शक्ती आपल्या सोबत चालत असते . ती प्रत्येक
क्षणी आपल्याला दोन मार्ग देते . एक सोपा परंतु चुकीचा आणि एक कठीण परंतु
कल्याणकारक मार्ग ! आपण योग्य मार्ग निवडतो की नाही यावर आपली पुढची वाटचाल
अवलंबून असते ! सतत त्या शक्तीचे स्मरण करत राहिले की मात्र आपल्याला
देखील मार्ग निवडायची गरज पडत नाही . मार्ग दाखविणे देखील त्या शक्तीचेच
काम होऊन जाते . त्यामुळेच परिक्रमा म्हटले तर सोपी आहे , म्हटले तर खूप
अवघड आहे . स्वतःचे डोके लावायचे ठरवले तर परिक्रमा खूप अवघड आहे . परंतु
मैयाच्या इच्छेने चालले तर मात्र परिक्रमेसारखे सोपे काहीही नाही ! खरोखरीच
काहीही नाही !
हेच शाश्वत सत्य हृदयाशी बाळगून पुढे पावले
टाकायला सुरुवात केली . प्रत्येक पावलाला फक्त एकच एक गोष्ट घडत होती .
तिचे नामस्मरण . तिचे चिंतन . तिचे दर्शन . आणि तिचेच स्पर्शन सुद्धा . . .
कारण हा सगळा किनारी मार्ग आता वाळूचा होता !
लेखांक सत्याण्णव समाप्त ( क्रमशः )
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.