जिम कॉर्बेट या व्यक्तीविषयी माझ्या मनात आत्यंतिक आदर आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं मॅन-ईटर्स ऑफ कुमाऊं हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं आणि कॉर्बेटचं अफाट धैर्य, जंगल ’वाचण्याची’ त्याची असामान्य क्षमता, सर्वसामान्य माणसाबद्दल त्याला वाटणारी मनापासूनची कणव, लिखाणात मधूनच डोकावणारा खास ब्रिटिश मिश्किलपणा आणि या सगळ्याबरोबरच, आतून येणारा खराखुरा विनम्रपणा असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला खूप प्रभावित करून गेले. मग त्याची ’माय इंडिया’, ’ट्री टॉप्स’ अशी अजूनही काही पुस्तकं वाचली आणि त्याच्याबद्दलचा आदर वृद्धिंगत होत गेला. सध्या डफ हार्ट-डेव्हिस या लेखकाने लिहिलेलं ’हीरो ऑफ कुमाऊं’ हे त्याचं चरित्र वाचायला घेतलं आहे. तेही आवडतंय.
या पार्श्वभूमीवर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला जायचं ठरलं, तेव्हा नकाशात बघताना कालाढुंगी, हलद्वानी वगैरे नावं वाचून आपण आता ’कॉर्बेटच्या’ परिसरात जाणार, यामुळे छान वाटत होतं. कालाढुंगीला जिम कॉर्बेटचं, आता संग्रहालयात रूपांतरित केलेलं घर आहे. हे त्या कुटुंबाचं हिवाळ्यातलं निवासस्थान होतं. काही वर्षांपूर्वी नाशिकला कुसुमाग्रजांचं निवासस्थान बघताना मला जसा भारावून गेल्याचा अनुभव आला होता, तसाच मला आत्ता जिम कॉर्बेटचं घर बघताना आला.

या घरात जिम कॉर्बेटने वापरलेल्या काही वस्तू आहेत, त्याची काही पत्रं आहेत, काही फोटो आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांच्या कॉर्बेटबद्दलच्या प्रेमाचं आणि आदराचं भरून राहिलेलं अस्तित्व आहे.

.
.
.
मॅगी, म्हणजे मार्गारेट ही जिम कॉर्बेटची बहीण. हे दोघेही आयुष्यभर अविवाहित राहिले. या बहीण-भावाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि मरेपर्यंत त्यांनी एकमेकांना साथ दिली. ज्यांनी जिम कॉर्बेटची पुस्तकं वाचली आहेत, त्यांनी जरूर जावं, असं हे संग्रहालय आहे. जिम कॉर्बेटवरची अजून दोन वेगवेगळी संग्रहालयंही याच परिसरात इतरत्र, थोडी लांब आहेत. मला तिथे यावेळेस जायला जमलं नाही. परत कधीतरी.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात आम्ही एकूण दोन सफारी केल्या. एक सकाळी आणि दुसरी दुपारी-संध्याकाळी. दोन्ही वेळचे गाईड्स एकदम चांगले होते. ’वाघ बघणं’ हे आपल्यासाठी मुळात जरी तितकं महत्त्वाचं नसलं तरी तिथला एकूण माहौल असा असतो की आपल्यालाही ती सफारीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटायला लागते. सुदैवाने आम्हाला वाघ दिसला! (फोटो मात्र मिळाला नाही!)
सकाळी उजाडता उजाडताच पहिल्या सफारीला सुरुवात झाली. वातावरण सुंदर होतं. या सफारीत आम्हाला कोल्हे, हरणं, मोर, रानडुकरं असे काही प्राणी-पक्षी दिसले. संध्याकाळच्या सफारीत बरेच वेगवेगळे पक्षी दिसले आणि वाघ दिसला.
चितळ
सांबर
कोल्हे
.Pied bushchat
सुतारपक्षी

कापशी घार. ( हा फोटो नाही. व्हिडिओमधली फ्रेम आहे. ती हॉवरिंग करत होती, म्हणजे एका जागी उडत होती. स्पष्ट फोटो मिळाला नाही.)
common stonechat
changeable hawk eagle
गांधारी
गंमत म्हणजे जीप ड्रायव्हर आणि गाईडनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या की कुठलाही प्राणी दिसला तरी उत्तेजित होऊन ओरडू नका, कायम हळू बोला वगैरे. पण झालं असं की हा वरचा तारेवर बसलेल्या भिंगर्यांचा फोटो काढायला आम्ही थांबलो होतो. कुठेही हरणं किंवा माकडांचे ’वॉर्निंग कॉल्स’ वगैरे नव्हते. फोटो काढून झाला आणि आता निघणार तितक्यात समोर साठ-सत्तर मीटर्सवर दस्तुरखुद्द वाघ रस्ता ओलांडताना दिसला. त्याबरोब्बर गाईड आणि ड्रायव्हर ’टायगर निकला है, टायगर निकला है’ म्हणून चक्क मोठ्याने ओरडले आणि ड्रायव्हरने जी जोरात गाडी पुढे नेली, त्यामुळे आम्ही, असा अचानक वाघ दिसला या घटनेपेक्षाही जास्त आश्चर्यचकित झालो असं म्हणायला हरकत नाही. आता तो वाघ कशाला तिथे थांबला असेल, असंही आम्हाला वाटलं. पण आमची जीप आणि आमच्या मागचीही जीप जिथून वाघाने रस्ता ओलांडला होता तिथे जरा वेळ थांबून राहिली. वाघ परत काही दिसला नाही. एकंदरीत त्या दिवशी फक्त आम्हालाच वाघ दिसला म्हणे! वाघानेही आम्हाला बघितलं असणारच. आम्ही तिथे थांबलेलो असताना तो कदाचित तिथेच गवतात बसलेलाही असेल, कुणी सांगावं.
आमच्या दहावीच्या मराठीच्या पुस्तकात सुनीता देशपांड्यांचा
’दर्शनमात्रे’ नावाचा धडा होता. आता त्यातलं खूपसं विस्मरणात गेलं असलं,
तरी अशाच, जंगलात वाघ दिसण्याच्या अनुभवाचं सुंदर वर्णन होतं, हे आठवतंय.
आम्हाला वाघाचं दर्शन अगदी काही क्षणच घडलं, पण त्यातला थरार जाणवायला ते
काही क्षण पुरेसे होते.
सकाळच्या सफारीत वाघाच्या पावलाचे ठसे दिसले होते.
कॉर्बेटने स्वतः वाघ या प्राण्याचं वर्णन ’ a large-hearted gentleman with boundless courage' असं केलंय! जिम कॉर्बेट या व्यक्तीचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं, तरी याहून योग्य शब्द सापडणार नाहीत!

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.