Friday, November 22, 2024

इट्स टाइम फॉर आफ्रिका

https://www.maayboli.com/node/86025

पूर्वतयारी

दक्षिण आफ्रिकेला जाण्याचं अनेक वर्षांपासून मनात होतं. २०१७ साली न्यूझीलंडला गेलो तेव्हाही आधी द.आ.च मनात होतं. पण त्याच्या आदल्या वर्षीच केपटाऊनमधल्या पाण्याच्या दुर्भिक्षाच्या बातम्या वाचल्या होत्या. त्यामुळे तेव्हा ते लांबणीवर टाकलं गेलं, ते यंदा प्रत्यक्षात आलं.

सुरुवात प्लॅनिंगपासून करतेय, कारण आतापर्यंतच्या आमच्या टूर्समध्ये द.आ.चं प्लॅनिंग मला सर्वात चॅलेंजिंग वाटलं आहे.
द.आ. म्हटल्यावर पहिल्यापासून माझ्या डोक्यात केप टाऊन आणि क्रूगर नॅशनल पार्क ही जोडी फिट्ट बसलेली होती. ती माझी चूक होती. नकाशा पाहिला तर कळतं, की केप टाऊन आणि क्रूगर जवळपास diagonally opposite आहेत आणि त्यांच्यातलं अंतर भरपूर आहे. (क्रूगर आसाम-अरुणाचल मानलं तर केप टाऊन गोवा आहे.) क्रूगर नॅशनल पार्क हे आफ्रिकेतल्या महत्त्वाच्या नॅशनल पार्कपैकी एक. क्रूगरला जवळचं मोठं शहर म्हणजे जो’बर्ग किंवा प्रिटोरिया. भारतातून जो’बर्गला रोज फ्लाइटस आहेत. शिवाय जो’बर्ग हे राजधानीचं शहर. त्यामुळे पहिला प्लॅन ठरला- मुंबई-जो’बर्ग, तिथून क्रूगर. पहिले प्लॅन्स थोड्याच दिवसांत मान टाकतात. हा प्लॅनही आठवड्याभरात ढेपाळला. (का ते पुढे सांगणारच आहे.)
क्रूगर नॅशनल पार्कतर्फे वेगवेगळ्या टूर्स डिझाइन केलेल्या आहेत. २ दिवस, ३ दिवस, ४-५ दिवस. त्यांच्या वेबसाइटवरून त्याचं बुकिंग करावं लागतं. टूरमध्ये कुठल्याही ठिकाणी किमान ३ दिवस तरी हवेत, असा आमचा thumb rule, आम्ही Scandinavia tour नंतर ठरवलेला. त्यावर मी ठाम होते. त्यामुळे ३/४/५ दिवसांच्या क्रूगर टूर्सची माहिती काढायला सुरुवात केली. त्यातली ४ दिवसांची एक टूर सर्व तर्‍हेने आवडली. कोणती ते आता आठवत नाही, कारण ही मे-जूनची गोष्ट आहे आणि ढेपाळलेल्या प्लॅनमधली आहे. मुंबईहून फ्लाइट्सच्या वेळा इ. पाहता जो’बर्गला रात्री पोहोचून, एक रात्र राहून दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर क्रूगरची वाट धरावी लागणार होती. तो गाडीने साधारण ४ तासांचा प्रवास, तिथे पोचल्यावर लगेच safari वगैरे सुरू. इतका एकसलग प्रवास, आणि लगेच क्रूगरमध्ये भटकंती आम्हाला दोघांनाही नको वाटली. मग क्रूगरमध्ये ४ ऐवजी ५ दिवस राहू असं ठरवलं, तशी तिथली एक टूर बुकमार्क करून ठेवली आणि केप टाऊनकडे वळलो.
केप टाऊनची जसजशी माहिती काढत गेलो, तसं लक्षात आलं, की तिथे किमान चार दिवसांचा मुक्काम तरी हवाच. (हा हिशोब आमच्या फिरण्याच्या पद्धतीनुसार. सर्वांना हे लागू होईल असं नाही.) त्याच्याहीपेक्षा, असं दिसलं, की केप टाऊनपासून पूर्वेकडे समुद्रकिनार्‍यालगत पार पूर्व किनारपट्टीपर्यंत टूरिस्टांसाठी घबाड होतं! (त्याला ‘गार्डन रूट’ असं नाव आहे, हे नंतर समजलं. त्याबद्दलही पुढे सांगेनच.) क्रूगर ५ दिवस, केप टाऊन ४ दिवस, मुंबई-जो’बर्ग येण्याजाण्याचा एक-एक दिवस, ११ दिवस तर असेच संपत होते. तेवढेच दिवस फिरून परतायचा पर्याय होताच. पण नाही, घबाडाबद्दल समजल्यावर ऐसी जीभ लपलपाई, की आणखी आठ-एक दिवस टूर वाढवून तेवढ्यात त्या घबाडातलं काय काय हाती लागतंय याचा शोध सुरू केला.

Screenshot 2024-11-14 at 19-50-02 Google Maps.png

पश्चिमेला केप टाऊन ते पूर्वेला पोर्ट एलिझाबेथ अशी ही गार्डन रूटची किनारपट्टी. (काटेकोरपणे बोलायचं तर मोझल बे ते जेफ्रीज बे.) द.आ. देशाची, तसंच आफ्रिका खंडाचीही ही दक्षिण किनारपट्टी. केप टाऊन आणि पोर्ट एलिझाबेथ ही दोन्ही नावं क्रिकेटमुळे आपल्याला ठाऊक असतात. त्यामुळे दोन्हींच्या मधला हा टापू उगीचच आपला वाटायला लागतो. असो.
तर या दोन शहरांच्या दरम्यान किनारपट्टीलगत आख्खं ’गार्डन रूट नॅशनल पार्क’ आहे. हे वाचून ‘अबब!’ झालं. गार्डन रूटला जाणारे टुरिस्टस्‌ केप टाऊन किंवा पोर्ट एलिझाबेथमध्ये कार भाड्याने घेतात आणि ४-५ दिवसांत गार्डन रूटची रोड-ट्रिप करतात. बहुतेक blogs, vlogs वर अशीच माहिती मिळत होती. यातलं काहीच ‘आमच्या लायनीपरमाने’ नव्हतं. ६००-७०० किमी ४-५ दिवसांत हाकायचे हे काही आम्हाला पटेना.

मग, केप टाऊनपासून जवळपास गार्डन रूटचा कोणकोणता भाग येतो, कोणती ठिकाणं पाहण्यासारखी आहेत, हे शोधायला सुरुवात केली. पण google, TripAdvisor वगैरे ‘केप टाऊनपासून जवळपास’ या filter ला कुठले दाद द्यायला! त्यांनी आख्खा गार्डन रूट आमच्यासमोर उलगडला.
गार्डन रूटवर किमान १० ते १२ मध्यम/छोटी towns आहेत. त्यांच्या भोवताली अनेक नॅशनल पार्क्स, nature reserves आहेत, ही सगळी त्या गार्डन रूट नॅशनल पार्कची पिल्लं. प्रत्येक नॅ.पा.ची आणि प्रत्येक टाऊनची आपापली खासीयत आहे, प्रत्येकाला 4.5 stars onwards ratings आहेत. आणि ही सर्वात महत्त्वाची ठिकाणं. इतरही अनेक जागा आहेत असं समजलं. बघता बघता आमच्यासमोर problem of plenty ठाकला. काय निवडायचं, काय वगळायचं, उरलेल्या ५-७ दिवसांत काय काय बसवायचं कळेना. त्यात पूर्व किनारपट्टीवरचं Durban ही एव्हाना खुणावू लागलं होतं.

एकीकडे खर्चाचा अंदाज बांधायला सुरुवात केली होती. बघता बघता लक्षात आलं, की क्रूगर मुक्कामापेक्षा तुलनेनं कमी खर्चात गार्डन रूटवर आरामात फिरता येऊ शकतं. (म्हणजे क्रूगरचा ५ दिवसांचा खर्च गार्डन रूटवरच्या ५ दिवसांच्या खर्चापेक्षा बर्‍यापैकी जास्त असल्याचं दिसलं. हे सुद्धा आमच्या फिरण्याच्या, खर्च करण्याच्या पद्धतीला अनुसरून.) इथे आमच्या प्लॅननं पहिली गटांगळी खाल्ली.
तरी काथ्याकूट करायला हाताशी वेळ होता. त्यामुळे केप टाऊन आणि गार्डन रूटला जरा बाजूला ठेवलं आणि जो’बर्ग, प्रिटोरियाकडे वळलो. मुंबई-जो’बर्ग-क्रूगर-प्रिटोरिया-जो’बर्ग-मुंबई अशा compact plan चा २-३ दिवस बारीकसारीक विचार केला. पण काहीही केलं तरी गार्डन रूटचं पारडंच जड राहत होतं. आणि केप टाऊनला (म्हणजे पर्यायानं cape of good hope ला) अव्हेरणे काही पटत नव्हतं.
शेवटी आम्ही चक्क क्रूगरला अव्हेरण्याचा निर्णय घेतला. खर्चाचा मुद्दा होताच. शिवाय तिथे पहाटे ५ वाजता उठून जीप सफारी, दुपारी पुन्हा सफारी, रात्री आणखी एक सफारी – हे विशेषत: माझ्या वृत्तीला मानवणारं नव्हतं. अशी धावाधाव करत wildlife काय बघायचं! पुन्हा, wildlife बघायचं तर केनिया-टांझानिया अधिक चांगले, द.आ. काय कामाचं! (हा युक्तीवाद प्लॅनच्या गटांगळीनंतर सुचलेला.)

एकदा हा निर्णय झाल्यावर, गार्डन रूटवर २० दिवसांचं रान मोकळं होतं...... असं आधी वाटलं, पण पुढचा चॅलेंज तिथे होता. गार्डन रूटवरची महत्त्वाची सगळी ८-१० ठिकाणं पहायची तर खूप नाचानाच झाली असती. नकाशा पाहून अंदाज येत नाही, पण द.आ.चा विस्तार खूप मोठा आहे. अंतरं खूप आहेत. नुसतं hotel hopping झालं असतं. म्हणजे पुन्हा त्या ८-१० तून निवड करणे आलं.
यादी मोठी होती – Cape Town, Hermanus, Cape Agulhas, Mossel Bay, Wilderness, Knysna, Plettenberg bay, Nature’s valley, Stormsrivier, Jeffrey’s bay, Port Elizabeth

यातलं सर्वात पहिलं गळलं ते PE. गार्डन रूटवर road travel शिवाय पर्याय नाही हे एव्हाना लक्षात आलं होतं. पण self drive tour नको होती. केप टाऊनहून हर्मानसला day tours जातात, फार फार तर एक रात्र मुक्कामाच्या टूर्स असतात, असं नेटवर दिसत होतं. हर्मानसवर हा अन्याय होता, असं त्याची माहिती काढल्यावर दिसलं. Customisation ने आता आपलं जाळं पसरायला सुरुवात केलीच होती. आम्ही हर्मानसला ३ दिवस राहण्याचा निर्णय घेतला. (तो किती योग्य होता हे तिथे पोचल्यावर लक्षात आलंच. त्याबद्दल पुढच्या लेखांमध्ये येईलच.)

केप अगुलहास इथे अटलांटिक आणि हिंद महासागर एकत्र येतात (म्हणे), आफ्रिका खंडाचं हे सर्वात दक्षिणेकडचं टोक, पण बाकी तिथे मुक्काम करावा असं विशेष काही वाटलं नाही. इथेही केप टाऊनहून day tours येतात, असं समजलं, ते सुद्धा बाद. त्यामुळे यादीतला दुसरा मेंबर गळला तो Cape Agulhas.

मोझल बे म्हणजे गार्डन रूटवरचा बहुधा सर्वात टुरिस्टी स्पॉट. तिथून पुढची सगळी ठिकाणं साधारण एकसारख्या अंतरावर आहेत. Hotel hopping करण्यापेक्षा यातल्या एक आड एक ठिकाणी आरामात ३/४ दिवस मुक्काम करायचा आणि अलीकडची-पलीकडची ठिकाणं बघायची, असा साधारण प्लॅन आकाराला यायला लागला. यावर खूप वेळ घालवून, बराच काथ्याकूट (आणि मतभेद) होऊन शेवटी आमची अंतिम यादी तयार झाली: केपटाऊन (४ दिवस), हर्मानस (३ दिवस), नाय्ज्ना (४ दिवस), स्टॉर्म्सरिव्हर (४ दिवस), डर्बन (३ दिवस).

घाई, गर्दी, धावाधाव टाळून अगदी निवांत फिरण्याचा आमचा हा प्लॅन पूर्णतः यशस्वी झाला- अपवाद फक्त केप टाऊन टेबल माऊंटन व्हिजीटचा अर्धा दिवस.
-----
बेसिक आराखडा ठरल्यावर विमानाची तिकिटं.
द.आ.ला जायला दोन पर्याय आहेत. एक दुबईमार्गे केप टाऊन, एक आदिसअबाबामार्गे जो’बर्ग. दुबईमार्गे विमानतिकीट बरंच महाग होतं. त्यामुळे आम्ही दुसरा पर्याय निवडला: मुंबई-आदिसअबाबा-जो’बर्ग, जो’बर्ग-आदिसअबाबा-मुंबई. हॉटेल बुकिंग केली. जो’बर्गचा वापर फक्त एअरपोर्टपुरता आणि विमानांच्या वेळा odd असल्याने एकेका रात्रीच्या मुक्कामापुरता करायचा ठरवला. त्यासाठी जो’बर्ग एअरपोर्टच्या अगदी जवळचं हॉटेल बुक केलं. दुसर्‍या दिवशी स्थानिक विमानाने केप टाऊनला गेलो. (हे सगळं धरूनही दुबईमार्गे तिकीट महाग पडत होतं.)

केप टाऊनमध्ये हॉटेल बुक करताना आणखी एक उपकाथ्याकूट केला. केप टाऊनमध्ये दोन प्रमुख आकर्षणं होती- Cape of Good Hope आणि Table mountain. केप टाऊनचा विस्तार साधारण मुंबईसारखा दक्षिण-उत्तर आहे. बहुतांश टूर कंपन्या उत्तरेकडच्या भागांमध्ये वेस्ट कोस्टलगत हॉटेल्स बुक करतात. आम्हीही आधी तसंच केलं होतं- समजा दहिसर-बोरिवली. तर टेबल माऊंटन येतो अंधेरीत आणि केप ऑफ गुड होप म्हणजे नेव्ही नगरचं टोक. (यावरून relative locations चा अंदाज येईल. प्रत्यक्षात केप टाऊनची अंतरं जास्त आहेत.) बारीकसारीक प्लॅनिंग करताना लक्षात आलं की केप टाऊनमध्ये road travel बरंच करावं लागणार आहे. हॉटेल ते cape येऊन-जाऊन १००+ किमी. मग आधीचं हॉटेल रद्द करून साधारण मध्यात येणारं ईस्ट कोस्टवरचं दुसरं हॉटेल बुक केलं. (समजा शिवडी.) याचा आम्हाला खूप फायदा झाला. केप टाऊनमध्ये फिरतानाही आणि पुढे Hermanus exit साठी सुद्धा...
-----
भारतीय पर्यटकांसाठी द.आ.व्हिजा प्रोसेसिंग फुकट असतं.
इथिओपियामार्गे जायचं तर yellow fever ची लस घ्यावी लागते, असं कुठे कुठे वाचण्यात आलं होतं. म्हटलं, व्हिजा मिळाला तर घेऊ लस, त्यात काय. तर कसलं काय, व्हिजासाठी yellow fever vaccination certificate अनिवार्य होतं. मुकाट्याने लस टोचून घ्यायला गेलो. तिथल्या डॉ.नं विचारलंच- ‘Going to South Africa?’ लशीमुळे काही ताप वगैरे आला नाही, ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.

व्हिजाला अपॉइंटमेंटचीही गरज नव्हती, walk-in प्रकरण होतं. गणपती जवळ आले होते. महालक्ष्मी VFSला जावं लागणार होतं. गर्दी, ट्रॅफिक इ.विचार करून गणेश चतुर्थीच्या १-२ दिवस आधी नीट ठरवून, सुट्ट्या काढून visa application देऊन आलो; कशी बरोबर वेळ साधली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली. चार दिवसांत पासपोर्ट्स घरी आले सुद्धा. पण २१ दिवसांच्या टूरसाठी २० दिवसांचा व्हिजा दिला होता!
VFS ला फोन केला, तिथल्या बाईनं सांगितलं, ‘प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही २१व्या दिवशी सकाळी निघू शकता.’ आम्ही २१ व्या दिवशी सकाळी निघणार होतो हे बरोबर, पण व्हिजा २०व्या दिवशी रात्री १२ वाजता संपला असता ना. ही रिस्क कोण घेणार! VFS ला इमेल केलं, तरी त्यांचं उत्तर तेच. म्हटलं, काही खरं नाही. मग थेट द.आ.वकिलातीलाच इमेल केलं. त्यांच्याकडून उत्तर आलं, visa correction साठी पुन्हा apply करावं लागेल!
आणि अशा प्रकारे भर गणपतीच्या गर्दीत आम्ही पुन्हा एकदा महालक्ष्मीला गेलो. (व्हिजा प्रोसेसिंग फुकट होतं, पण त्यासाठी कॅबच्या डोंबलावर दोनदा खर्च करावा लागला. दोघांचा कामाचा आणखी एक-एक दिवस त्यात गेला.)
Correction application दिलं. त्यांच्या सिस्टिमचं date arithmetic तेव्हाही गंडलेलंच होतं. २० दिवसच दिसत होते. मग मात्र आम्हाला जरा आवाज चढवावा लागला. शेवटी तिथल्या मुलीने हाताच्या बोटांवर दिवस मोजले आणि वरमलेल्या आवाजात म्हणाली- ‘बरोबर आहे तुमचं, २१ दिवस होतात.’ आता बोला! मग ती कुठेतरी आतल्या केबिनमध्ये अंतर्धान पावली. १० मिनिटांनी बाहेर येऊन म्हणाली- ‘आठवडाभरात पासपोर्ट मिळतील.’ visa correction होणार की नाही याबद्दल अवाक्षर नाही. उगीच शंका यायला लागल्या- २० दिवसांचा व्हिजा पूर्णच रद्द केला तर? उगीच भांडायला आलो का? एका दिवसाने टूर कमी करणे सहज शक्य होतं, तसंच करायला हवं होतं का? जो’बर्गला २०व्या दिवशी रात्री १२च्या आत इमिग्रेशन पूर्ण करून रात्रभर एअरपोर्टवर थांबलो असतो, असा s-o-s (आणि silly) विचारही करून झाला.
पण त्यांनी सांगितल्यानुसार आठवडाभरात पासपोर्ट्स आले, आता त्यावर ३० दिवसांचा व्हिजा दिसत होता. मुख्य पूर्वतयारी झाली होती. आता आम्ही म्हणू शकत होतो- It’s time for Africa!

 गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : १

पहिल्या भागात टूर प्लॅन लिहिला. पण पुढचे लेख त्या क्रमानुसार नाहीत. किंबहुना प्रत्येक ठिकाणासाठी एक लेख अशी विभागणी मला करताच येणार नाही. त्याचं एक कारण- गार्डन रूटची geology. दुसरं कारण- तिथे आम्ही केलेले nature trails, walking/hiking trails. आणि तिसरं कारण तिथला flora-n-fauna. आणि या सगळ्यांचं समुद्रासोबतचं अद्वैत! मी ना geology ची अभ्यासक आहे, ना botanist आहे. पण या सगळ्या गोष्टींचा एकजिनसीपणा, परस्परावलंबित्व, एकमेकांना धरून राहणे, तिथे ठिकठिकाणी इतकं विलक्षणरीत्या जाणवत होतं, की बस्स!
त्यामुळे random क्रमाने लिहिणार आहे. सर्वात पहिला फोकस दगडधोंडे, rock structures यांच्यावर.

नैसर्गिक खडकांबद्दल मला लहानपणापासून आकर्षण आहे. मोठाले फत्थर, शिळा, दगडधोंडे ते लहान गोटे, खडे सगळ्याबद्दल. बरं, महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या परिसरात राहणार्‍यांना मोठाले डोंगरकडे, शिळा वगैरेंचं नाविन्य असायचं कारण नाही. तरीही गार्डन रूटवरच्या डोंगरकड्यांनी, फत्थरांनी असं काही थक्क करून सोडलं की विशेषणं कमी पडावीत. आत्ता हे लिहितानाही मी वारंवार थबकते आहे, कारण त्यांचं वर्णन करायला नेमके शब्द सापडत नाहीयेत. त्या डोंगर-कड्यांमध्ये नजरबंदी व्हावी असं काहीतरी होतं. सवयीनं `कातळकडे’ हा शब्द डोक्यात येतो. पण तो कातळ नव्हता. मुख्यत्वे वालुकाश्म होता.

या नजरबंदीची पहिली झलक केपटाऊनमध्ये मिळाली. केपटाऊन विमानतळावरून आमच्या हॉटेलच्या दिशेनं निघालो होतो. (विमानतळ समजा ठाण्यात. आधीच्या भागात बाकी सगळी लोकेशन्स सांगितली, तर हे सुद्धा.) टिपिकल शहरी रुंद, सुंदर रस्ता, दोन्ही बाजूंना चकाचक घरं, तुरळक ट्रॅफिक... बघता बघता रस्ता चढाचा व्हायला सुरुवात झाली. शहरी वस्ती डावीकडे खाली खाली जायला लागली. आणि अचानक एका वळणानंतर डावीकडे खाली विस्तीर्ण समुद्रकिनारा, पांढरी वाळू, काठावरची लहानसहान घरं आणि उजवीकडे डोंगर दिसायला लागले. हा बदल अगदी नकळत, बेमालूम घडला. डावीकडचा समुद्रकिनारा म्हणजे false bay चा भाग. या फॉल्स-बेचा विस्तार असा आहे, की समुद्रातून दोन-एकशे किलोमीटरवरूनही किनार्‍यावरचे दिवे दिसू शकतात, म्हणे. १५ व्या-१६ व्या शतकांत युरोपी दर्यावर्दी इथपर्यंत यायचे तोवर त्यांच्या प्रवासाच्या आशा-आकांक्षा सगळ्या शून्य झालेल्या असायच्या. खवळलेला समुद्र, महिनोन्‌महिने जमिनीचं दर्शन नाही, अशा हतबल-हताश परिस्थितीत त्यांना फॉल्स-बे नजरेस पडायचा. आणि त्यांच्या good hopes पुन्हा उसळी मारून वर यायच्या- अशा आशयाचा display नंतर एका ठिकाणी बघायला मिळाला. (अधिक उत्सुकता असणार्‍यांनी केप टाऊनजवळ नकाशा झूम-इन करून बघा. केप टाऊनच्या दक्षिण-पूर्वेला खाली हा अर्धगोलाकार bay दिसतो.)

आमची कॅब सुसाट निघाली होती. खालचा समुद्राचा सुंदर नजारा बघावा की उजवीकडचे डोंगर बघावेत ते समजत नव्हतं. डोंगरावर अर्ध्या उंचीपर्यंत खुरटं पण हिरवं गवत दिसत होतं. आणि वरती हळूहळू रुक्ष, उजाड, करडा रंग होत गेलेला. साहजिक विचार आला, इथे हिवाळ्यात बर्फ पडत असणार. ड्रायव्हरला विचारलं. तो म्हणाला, अगदी क्वचित आणि ते सुद्धा मोजक्या स्पॉट्सवर. आम्हाला दिसणारे स्पॉट्स त्यातले नव्हते. बर्फ न साचणारा, पण हिरवा सुद्धा नसणारा डोंगरमाथा होता तो! त्याची उंची अशी, की त्याला लागून समुद्रकिनारा असेल हे एरवी डोक्यातही आलं नसतं.
ते वळण, तो false bay जितक्या पटकन समोर आले तितकेच बघता बघता मागेही पडले. तिथल्या landscape ची एक झलक तेवढी दिसली. रस्ता पुन्हा खाली उतरला. आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या म्हणजे Fish Hoek परिसरात शिरलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी Cape चा रस्ता पकडला. (केप टाऊनमध्ये आम्ही टाऊन कमी, केप आणि जंगल भागात जास्त वेळ घालवला.) केप भागात ‘केप ऑफ गुड होप’ आणि ‘केप पॉइंट’ अशी दोन ठिकाणं आहेत. केपटाऊनच्या तुलनेत दोन्ही दक्षिणेला, पण तिथे एकमेकांच्या थोडंफार विरुद्ध दिशेला. मला काही करून आधी केप ऑफ गुड होपला जायचं होतं. म्हणून २-२ वेळा कॅब ड्रायव्हरला विचारून खात्री करून घेतली. (दक्षिण आफ्रिकेत public transport ची सोय फारशी नाही; जी काही आहे ती विशेष सोयीची नाही. त्यामुळे एकतर car rent किंवा cab हेच पर्याय आहेत.)
Fish Hoek चा नीटनेटका भाग मागे पडला. रस्ता जरा सुनसान व्हायला लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तुरळक गॅरेजेस, वर्कशॉप्स दिसत होती. तिथे ॲफ्रो माणसं काम करताना दिसत होती. फुटपाथवरून क्वचित चालत निघालेली माणसं दिसत होती, ती सुद्धा सगळी ॲफ्रोच. पुढे एका ठिकाणी काही चाळवजा बुटक्या इमारतींचा समूह होता, शेजारी मोठं मैदान होतं, तिथे काहीजण फुटबॉल खेळत होते, जवळ एक शाळेची बैठी इमारत दिसत होती. वस्ती सगळी ॲफ्रो माणसांची. केप टाऊन सर्वात पहिल्यांदा वसलं ते इथे, असं ड्रायव्हर म्हणाला. आता तो भाग पारच वेगळा वाटत होता.
ती वस्तीही मागे पडली. एकच एक रस्ता. थोडीफार वळणं घेत जाणारा. फार चढ-उतार नव्हते. दोन्ही बाजूंना विस्तीर्ण सपाट प्रदेश. लहानसहान झुडुपं किंवा जमिनीलगत वाढलेलं बारीक, खुरटं गवत. झाडं अगदी क्वचित दिसत होती. लांबवर टेकड्या दिसत होत्या. त्या सुद्धा अशाच खुरट्या गवताच्या. वाटेत एका ठिकाणी २ springboks चरताना दिसले. म्हणजे ड्रायव्हरने दाखवले म्हणून लक्ष गेलं. पुढे एका ठिकाणी ४-५ wild ostritches दिसली. उंची भारी होती त्यांची. आसपास फारशी झाडं नसल्यामुळे तर त्यांची उंची आणखीनच कळत होती. पण हे सगळं कारमधून जाताना, झपकन, दिसलं म्हणेपर्यंत मागे पडलं, असं. रस्त्याच्या कडेला मोठ्या, पिवळ्या फुलांची झुडुपं अखंड दिसत होती. हे Protea, दक्षिण आफ्रिकेचं राष्ट्रीय फूल. हे राष्ट्रीय फूल झाडावरून तोडायला तिथे राष्ट्रीय मनाई आहे, म्हणे. त्याचा व्यापार करायचा असल्यास विशेष परवानग्या काढाव्या लागतात. (आपल्यासाठी springboks, protea हे शब्द क्रिकेटशी जोडलेले आहेत.)

समुद्रकिनारा आसपासच कुठेतरी आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं. आणि एका ठिकाणी ‘केप ऑफ गुड होपकडे’ अशी पाटी दिसली. गाडी वळली. थोडं अंतर गेलो आणि पुन्हा तसंच, एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला समुद्र. पण आता आम्ही अगदी समुद्रकिनार्‍यालगत होतो. आणि मग... रस्ता संपला. Just like that! कल्पना करा, ते त्या रस्त्याचं किंवा त्या परिसराचं शेवटचं टोक नव्हतं. ते त्या देशाचं, नव्हे आफ्रिका खंडाचंच एक टोक होतं. केप ऑफ गुड होप : एक खास cul-de-sac.

कॅबमधून उतरलो तर तिथे जो काही अशक्य वारा भणाणत होता! सॅकमधून जॅकेट्स, टोप्या, गॉगल्स एक-एक करत बाहेर निघाले. डोळ्यांना सहन न होणारं टळटळीत ऊन आणि प्रचंड बोचरा वारा हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा अनुभवलं.
म्हटलं तर तो भाग अगदी ओसाड होता. पुरातत्व उत्खननाच्या ठिकाणांचे फोटो आपण पाहतो, तसा. किंवा भूकंपाने पडझड झालेला गावखेड्यातला भाग दिसेल, तसा.

collage-01.jpg

पण एकंदर दृश्य म्हणाल तर देखणं होतं. स्वच्छ निळं आकाश, समोर त्याहून गडद निळाशार समुद्र आणि त्याच्या अलीकडे फिकट पिवळसर, पांढुरक्या, तांबूस, लालसर, विटकरी रंगांच्या दगडगोट्यांचा, धोंड्यांचा, मोठ्या शिळांचा खच पडलेला. त्या संपूर्ण चित्रचौकटीला स्वतःची एक खास कलर-स्कीम होती. त्यात पिवळसर छटा कळत-नकळत होती. Dominant होता तो तांबडा, विटकरी रंग. ती विलक्षण रंगसंगती आजही नजरेसमोर आहे. मागच्या टेकड्यांवरच्या गवताचा हिरवा रंग नजरेच्या टप्प्याच्या १८० अंशांपलीकडे होता. त्यामुळे माझ्या आठवणीत तर तो उरलेलाच नाही.

केप ऑफ गुड होप. शाळेतल्या इतिहासापासून आपल्याला या जागेबद्दल ठाऊक असतं. पण त्या जागी प्रत्यक्ष उभं राहिल्यावर तो इतिहास खर्‍या अर्थानं उमगल्यासारखा वाटला. ‘वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात आला’ हे वाचल्यावर वाटायचं की आफ्रिका खंडाच्या दक्षिण किनारपट्टीवर मध्यात कुठेतरी हे ठिकाण असणार. पण ही तर त्या किनारपट्टीच्या एका कोपर्‍यातली बारीकशी जागा. त्यापूर्वी युरोपी राज्यकर्त्यांचा जमिनीमार्गे आशियाशी संपर्क झालेला होता. आणि काही दर्यावर्दी केप ऑफ गुड होपपर्यंत येऊन परत गेले होते. वास्को द गामाने सर्वात पहिल्यांदा समुद्रामार्गे भारतापर्यंत प्रवास केला. केवढी अनिश्चितता भरली असेल त्या प्रवासात! वार्‍याला तोंड देतादेता तिथे नुसतं उभं राहणेही आम्हाला जड जात होतं. मग तेव्हा खोल समुद्रात तर काय परिस्थिती ओढवली असेल! तरी वास्को द गामाला खात्री होती, की त्या मार्गाने पुढे जात राहिल्यास आपण नक्की भारतात पोहोचणार. तिथे त्या दिवशी दगडगोट्यांत तोल सावरत उभ्या उभ्या समुद्राकडे पाहताना जाणवलं, की ’केप ऑफ गुड होप’ म्हणजे त्या अनिश्चिततेचं आणि सकारात्मकतेचं, दोन्हींचं प्रतीक. म्हणून तर त्याचं जुनं नाव (Cape of Storms) बदललं गेलं... त्या भणाण वार्‍यात तेच नाव अधिक समर्पक वाटत होतं, ते सोडा.

02.jpg

तिथे दगडधोंड्यांचा खच असण्यामागे वार्‍याचंच कारण असावं. एका बाजूला उंच, खडकाळ, कातरलेली टेकडी होती. ते दगडधोंडे म्हणजे तिचीच पिलावळ असणार. त्या जागेचे अक्षांश-रेखांश लिहिलेली एक मोठी पाटी तिथे लावलेली आहे. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला तिकडे हाकलं. तिथे आमचे फोटो काढले. आणखी ३-४ गाड्या तिथे होत्या. त्या लोकांनीही फोटोसाठी रांग लावलेलीच होती. तिथून बाजूला झालो.

जवळच आणखी एक पाटी दिसली- Cape of Good Hope Scenic walk- आणि एक पायवाट त्या टेकडीच्या दिशेनं जात होती. इतक्या वेळात माझं पहिल्यांदा लक्ष गेलं, की त्या टेकडीवर पार वरपर्यंत माणसं गेलेली दिसत होती. ती चालत (हलत) असली तरच दिसत होती. एरवी लपून जात होती. कारण- त्या टेकडीचे रंग आणि texture. अहा! काय वर्णन करायचं! उभ्या-आडव्या, लहान-मोठ्या चिरा पडलेले थर, एकावर एक कुणीतरी आणून ठेवल्यासारखे. मग त्यातून fork ने तुकडे तोडून घेतल्यासारखे... किंवा बिघडलेला केक आपसूक उकलला जातो तेव्हा कसं दिसतं, तसे ते दगडांचे गठ्ठे... किंवा चुरगाळलेला कागद? अंहं. वाळलेला चिखलाचा गठ्ठा? नाही. गुलकंद-नारळाच्या बिघडलेल्या वड्या? Maybe... म्हटलं ना, वर्णनाला नेमके शब्द सापडत नाहीत.

03.jpg
--
04.jpg
--
07.jpg

साधारण १०-१२ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन super-continent फुटण्याच्या अंतिम काळात गार्डन रूट किनारपट्टी तयार झाली. ऊन, पाऊस, समुद्राच्या लाटा यामुळे त्यात अनेक बदल होत गेले. त्याबद्दल नेटवर भरपूर माहिती आहे. ती वाचायला प्रवृत्त करणार्‍या अनेक विलक्षण नैसर्गिक रचना, असंख्य दृश्यं गार्डन रूटवर आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी माझ्यासारखी दगड-प्रेमी व्यक्ती वेडी होते. (विलक्षण रचना असं का म्हटलं ते पुढच्या लेखांमध्ये सांगेनच.)

त्या टेकडीवर चढण्याचं नक्की ठरत नव्हतं. नुकतीच गुडघ्याच्या छोट्याशा दुखापतीतून सावरत होते. त्यामुळे उत्साहाला जरा आवर घालण्याचं घरून निघतानाच स्वतःला बजावलं होतं. (गार्डन रूटनं हा निश्चय पुढे पुरता हाणून पाडला, ती बात निराळी.) पण म्हटलं, थोडंसं तरी वरती जावं. चढ फार काही अवघड, steep नव्हता. मग खरोखरच थोडंसंच वरती गेले. एक रुंद दगड पाहून बसले.

05.jpg
--
06.jpg

आता खालचा परिसर आणखी विस्तीर्ण, छान दिसत होता. आता गाड्यांची गर्दी वाढली होती. वाटलं, इथे आलेल्या प्रत्येकाला इतिहासातलं केप ऑफ गुड होप ठाऊक असेल का? की भारताशी संबंध असल्यामुळे आपल्यालाच तो इतिहास अधिक जवळचा वाटतो?
मी बसले होते तो दगड आधी फिकट, गुलबट रंगाचा वाटला होता. बसल्यावर जवळून त्यात अनेक छटा दिसल्या.

collage-02.jpg

मी त्या दगडावरून हळूच हात फिरवला. भटकंतीदरम्यान आवडलेली ठिकाणं नेणीवेत register करण्याची ही माझी आवडती पद्धत. माझ्यासाठी केप ऑफ गुड होपची वारी तिथे पूर्ण झाली होती. तो दगड ना वार्‍यामुळे थंडगार पडला होता, ना कडक उन्हामुळे तापलेला होता. Cape of Good Hope हे ठिकाणही मला तसंच वाटलं- balancing act साधणारं.

 

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३

Submitted by ललिता-प्रीति on 6 December, 2024 - 00:22

गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : २

टूरचा नववा दिवस. हर्मानसचं सरप्राइज पॅकेज बॅगेत बांधून आम्ही Knysna ला पोहोचलो होतो. (उच्चार : नाय्ज्ना, ‘ज’ जहाजातला).
हर्मानस ते नाय्ज्ना अंतर बरंच आहे. इतका कार प्रवास करण्याऐवजी आम्ही एक पर्याय शोधला. हर्मानसहून कॅबने उलटं केप टाऊनला आलो. (तास दीड तास प्रवास). केप टाऊनहून विमानाने George ला गेलो. (एक तास). जॉर्जहून कारने नाय्ज्नाला गेलो. (अर्धा तास). motion sickness वाल्यांना असे उलटे घास घ्यावे लागतात. असो.

तर, नाय्ज्ना. हे एक टुमदार टाऊन आहे. नाय्ज्नात दुपारी १-२ वाजता पोहोचलो. रिपरिप पाऊस आणि प्रचंड गारठा होता. टाऊनचा काही रहिवासी भाग उंचावर वसलेला आहे. हे नुसतं टेकाड किंवा चढ नाही. याला तिथे ‘नाय्ज्ना हेड’ असं नाव आहे. तिथे अशी दोन हेड्स आहेत- east head आणि west head. दोन्हींच्या मधून नाय्ज्ना नदी समुद्राला मिळते. आमचा मुक्काम east head च्या अगदी हेडवरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये होता. (टूरमध्ये आम्ही बहुतेक ठिकाणी मोठी घरं converted into guest houses अशा ठिकाणी राहिलो. सगळीच घरं छान होती. आणि मुळात ‘घरं’ असल्यामुळे खोल्यांची आणि टुरिस्टांची संख्या कमी होती. घरगुती वातावरण कायम होतं. त्यामुळे निवांतपणा वाटायचा.)

तर, त्या हेडवर उंचीमुळे वाराही होता. घराशेजारून एक वाट जरा खाली उतरत होती. तिथे एक lookout point होता. तिथल्या रेलिंगवरून खाली वाकून पाहिल्यावर खरं लक्षात आलं आपण कुठे आहोत. ते हेड म्हणजे खडकाचा एक मोठा, उंच सुळका समुद्रातून वर आलेला आहे. पुन्हा सांगते, ‘सुळका’ म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर सवयीने कातळकडा येतो. पण इथे sand stone चा कातरलेला कडा होता. उभाच्या उभा. खाली थेट खळाळता समुद्रच.
Sandstone चे कडे आणि खळाळत्या लाटा यांची ही जी काही जोडगोळी जागोजागी दिसत होती की नाही! वा! त्या लाटा पाहून वाटायचं, भरती असावी, काही तासांनी ओहोटीला पाणी जरा मागे जाईल. पण छे, सतत आपल्या पाण्याच्या पांढर्‍या फेसाळत्या मोठाल्या रेषा, उसळून येणार, खडकांवर आपटून मागे सरणार, दिवसागणिक तो खडक धागाभर झिजत जाणार... गार्डन रूटची आताची किनारपट्टी अशा wave-cut platform मुळेच तयार झालेली आहे. आणि लाटांनी केलेली ही कापाकापी नीटनेटकी थोडीच असणार! त्यातूनच खडकांचे एक से एक आकार, नक्षीकाम, गुहा, कमानी, काय म्हणाल ते तिथे हजर!

knysna-west-head.jpg

नाय्ज्नाच्या त्या viewpoint वरून समोर west head दिसत होतं. त्याच्या पायथ्याशी कडेकपारीत तयार झालेल्या अशाच २-३ लहान-मोठ्या ओबडधोबड कमानी दिसत होत्या. लाटांचंच कृत्य ते. एव्हाना खडकांमधले असे वेगवेगळे आकार शोधण्याचा नाद लागलेला होता. नीट पाहिल्यावर दिसलं, की त्या कमानींपर्यंत जाणारी एक पायवाटही होती. ती वेस्ट हेडच्या मागे कुठेतरी लुप्त होत होती. पुन्हा माझी जीभ लपलपायी! पण इस्ट हेडवरून वेस्ट हेडला जाण्यासाठी जवळपास २०-२५ किमीचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे तो विचार सोडून दिला. शिवाय तसाच आणखी एक प्रसिद्ध arch rock बघण्याचा आमचा विचार होताच.
तसा हा आर्च रॉक Plettenberg bay भागात येतो. पहिल्या लेखात नकाशा दिलाय, त्याच्या संदर्भाने सांगायचं, तर प्लेटेनबर्गला आम्ही नाय्ज्नाच्या पोटात ढकललं होतं. म्हणजे नाय्ज्नाहून जमल्यास प्लेटेनबर्गला जायचं असं ठरवलं होतं. नाय्ज्नात जी गाडी भाड्याने घेतली होती त्याच्या ड्रायव्हर-कम-गाइडला एक मोठी विश-लिस्ट पाठवून ठेवली होती. (नाय्ज्ना म्हणजे heart of the garden route म्हणू शकतो. आणि तिथे आमचा चार दिवस मुक्काम होता. त्यामुळे लिस्टही मोठी होती.) स्थानिक रस्ते, अंतरं, प्रवासाचा वेळ हे सगळं गृहित धरून यातलं काय काय आरामात जमेल तिथे आम्हाला घेऊन चल, असं ड्रायव्हरला कळवलं होतं. त्याने यादीची २-३ versions कळवली, सगळ्यात Plett होतंच. (Plett हा तिथल्या लोकांच्या बोलण्यातला shortform, त्यांच्या तोंडून ऐकायला छान वाटायचा.)
दुसर्‍या दिवशी सकाळीही पाऊस, गारठा काही कमी झालेला नव्हता. ब्रेकफास्टच्या वेळी गेस्ट हाऊस मॅनेजर मुलीशी गप्पा मारत होतो. ‘आज संध्याकाळनंतर हवामान बदलेल,’ असं तिचं म्हणणं होतं. सहज तिला विचारलं, आसपासच्या not to miss जागा कोणत्या? तर तिनंही पहिलं Plett चंच नाव घेतलं. आम्ही जमल्यास जाऊ म्हणत असलो तरी ‘पूरी कायनात’ वगैरे आम्हाला प्लेटेनबर्गकडे ढकलत होती. प्लेटेनबर्गमध्ये not to miss होता तो arch rock आणि Robberg Nature Reserve. नाय्ज्ना ते प्लेट अंतर आणि रॉबर्ग नेचर रिझर्वच्या सुंदर पण अवघड hike चे reviews यामुळे प्लॅनिंगदरम्यान आम्ही रॉबर्गकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं.
नाय्ज्नातला तिसरा दिवस. पाऊस उघडला होता. त्या दिवशी ठरवलं, Plett ला जाऊ. आर्च रॉक अगदी समुद्रकिनार्‍यावरच आहे, तो तरी बघून येऊच.
इंटरनेटवर आर्च रॉकचे भारी भारी फोटो आहेत. त्या समुद्रकिनार्‍याला arch rock beach असंही कुठे कुठे म्हटलं होतं. त्या रॉकच्या एखाद किलोमीटर अलीकडे एक हॉटेल आहे, Hotel Enrico, तिथेच पार्किंग लॉट आहे. हॉटेलच्या मागच्या बाजूने एक छोटा बोर्डवॉक समुद्रकिनार्‍याला समांतर जातो. साधारण अर्धा किमी. त्याच्या शेवटपर्यंत चालत गेलो. तिथून पुढे जेमतेम ४००-५०० मीटरवर आर्च रॉक आहे, असं GPS वर दिसत होतं. पण पुढे रस्ता दिसत नव्हता. तिथे आणखी एका हॉटेलचं बांधकाम सुरू होतं. तिथल्या कामगारांना विचारलं. ते म्हणाले, ‘जा असंच बीचवरून, वाळूतून’... बरं, म्हटलं, जाऊन बघू... तेवढ्या वाटेतही बीचवरच्या वाळूत दोन-तीन लहान, मोठे, अगडबंब खडक दिसले. प्रत्येकाचे रंग, छटा, आकार सगळं वेगवेगळं; प्रत्येकाच्या पृष्ठभागावरच्या नैसर्गिक रेषा, नक्षीकाम, layers वेगवेगळे.
५-१० मिनिटं मी त्यांच्याकडे नुसती बघत उभी राहिले. समुद्राच्या काठावर कुणीतरी आकाशातून आणून टाकल्यासारखे ते खडकांचे एकमेकांपासून स्वतंत्र गठ्ठे... कसे आले हे इथे? कोणे एके काळी यांच्या आजूबाजूलाही संपूर्ण असाच ऐवज असावा का? त्यांची धूप झाली आणि हे उरले असावेत का? गेले ८-१० दिवस रोज पडणारा प्रश्न मला पुन्हा पडला.
त्या खडकांच्या पायथ्यापर्यंत लाटा येत होत्या. पाण्यापासून बचाव करत करत मी त्यांचं फोटोसेशन केलं.

03-arch-rock-collage-01.jpg
--
04-arch-rock-collage-2.jpg

आम्ही थोडं पुढे झालो. आता एक dead end type जागा आली. आधीच्या खडकांहून मोठा एक खडक, वरच्या रस्त्यापासून अखंड खाली उतरलेला, आणि त्याचा पायथा लाटांमध्ये चांगलाच भिजणारा. म्हणजे पुढे जायला कोरडी वाट नव्हती. एक लाट मागे जाईल, तेवढ्या वेळात तिथून पुढे जावं का, असा आम्ही विचार केला. पण खडकाचा वाटेला समांतर span मोठा होता. दोन लाटांच्या मध्ये तेवढी उसंत नव्हती, हे एक. आणि सपाट, सखल समुद्रकिनार्‍यावरच्या लाटांपेक्षा इथल्या लाटा वेगळ्या होत्या. कारण त्यांच्या वाटेत आधीही लहानमोठे, कातरलेले खडक होतेच. त्यांच्यावर आपटून अधिक खळाळत पाणी पुढेपर्यंत येत होतं.
त्या मोठ्ठ्या खडकावर एका जागी लाटा आपटून आपटून कंबरभर उंचीचा एक कोनाडा तयार झाला होता. एका नव्या arch ची ती सुरुवात होती. कोनाड्याचं तोंड अर्थातच समुद्राकडे, आमच्या वाटेच्या काटकोनात होतं.

4-arch-rock-collage-3.jpg

एक लाट मागे गेली तेवढ्यात मी त्या कोनाड्यात जरासं वाकून पाहिलं. आतल्या पृष्ठभागावर रेषांचे काय अप्रतिम abstract patterns होते! ते नीट पाहण्यासाठी कोनाड्याच्या तोंडाशी चवड्यांवर बसावं लागणार होतं. पण लाटा अजिबातच उसंत देत नव्हत्या. तरी मी एक-दोन प्रयत्न केले आणि एका splash ला बूट-मोजे, आणि घोट्याच्या वीतभर वरपर्यंत पॅन्ट, सगळं भिजलं.
मी कपाळावर हातच मारून घेतला. ऊन होतं तितकाच गारठाही होता. आणि मला थंडी अजिबात सहन होत नाही. आता बूट-मोजे वाळणार कसे आणि आपण दिवसभर फिरणार कसे, हे कळेना. दरम्यान डोक्यात आणखी एक प्रकाश पडला होता, की या लाटांमधून आपल्याला पुढे जाता येणार नाही; तेव्हा arch rock ला विसरा. जरा वाईट वाटलं, पण ‘चलता है’ म्हणून मागे फिरलो. (बहुधा भरती-ओहोटीच्या वेळा नीट बघून गेलं तर पुढे जाता येण्याची शक्यता असेल. तसं करायला हवं होतं, असं नंतर वाटून गेलं; म्हणजे गार्डन रूट किनारपट्टीवरची ओहोटी दिसते तरी कशी ते समजलं असतं.)
त्या बोर्ड वॉकवर १-२ ठिकाणी छान बाक होते. त्यातल्या एका बाकापाशी मी बूट-मोजे काढून उन्हात ठेवले. बाकावर सावली होती. तिथेच अर्धा-पाऊण तास निवांत बसलो. बरोबर cherries आणल्या होत्या त्या खाल्ल्या. घड्याळ पाहिलं, तर जेमतेम एकच वाजत होता. म्हणजे तिथूनच नाय्ज्नाला परतण्यात काही अर्थ नव्हता.
आम्ही बसलो होतो तिथून लांबवर Robberg peninsula चं समुद्रात घुसलेलं टोक अंधुक दिसत होतं... शेवटी ठरवलं, रॉबर्गला जायचं. तेव्हा कुठे कल्पना होती, की रॉबर्गची भटकंती आमच्या आजवरच्या परदेश टूर्समधली सर्वात breathtaking भटकंती ठरणार होती... आणि त्याला कारणीभूत ठरणार होते तेच- दगड-धोंडे, डोंगर-कपारी.
GPS नं सांगितल्यानुसार साधारण अर्ध्या तासात Robberg nature reserve च्या दारात पोहोचलो. तिथली पाटी वाचून कळलं, की ही world heritage site आहे. पण त्या वर्णनासोबत UNESCO ही अक्षरं काही दिसली नाहीत. इतर कुठल्या संस्थेचा/संघटनेचा उल्लेखही दिसला नाही. ड्रायव्हरनं पार्किंग लॉटमध्ये सोडलं.
आपण जराशा उंचीवरच्या ठिकाणी आहोत, एका दिशेला आलो तो रस्ता, इतर तीनही बाजूंनी समुद्र आहे, इतकं कळत होतं. बाकी तिथल्या landscape चा काही अंदाज येत नव्हता.
इतर कोणत्याही hiking trail सारखाच इथला trail ही सुरू झाला. पार्किंग लॉटच्या भोवताली कंबरभर उंचीची झाडी झुडुपं होती. त्यातून एका कोपर्‍यातून एक वाट आत जात होती. चालायला सुरुवात केली. सुरुवात छान, टापटीप बोर्डवॉकनं झाली. पाच-एक मिनिटांत कच्ची पायवाट सुरू झाली. डावीकडे खुरटी हिरवी झुडुपं, त्यापलीकडे खाली समुद्र, उजवीकडे टेकाड, त्यावरही खुरटी झुडुपं. पुढे-मागे कुणी ना कुणी चालणारे पर्यटक दिसत होते. सकाळी आर्च रॉक बीचवर लख्ख ऊन होतं, इथे मात्र पूर्ण ढगाळ हवा होती. पण पाऊस अजिबात नव्हता. त्या हवेनं त्या दिवशी फार मजा आणली. पण मजा आणणार्‍या गोष्टींच्या यादीत ही ढगाळ हवा बघता बघता खाली ढकलली गेली...
चालायला सुरुवात करून दहा-एक मिनिटंच झाली असतील. मी pebble-प्रेमी असल्यामुळे असं कच्च्या रस्त्यांवरून वगैरे चालताना माझा एक डोळा पायांखालच्या वाटेकडे असतोच. इथेही होता. ‘पायवाट’ म्हटलं तरी ती साधी, सुरळीत, निव्वळ मातीची नव्हती. ओबडधोबड खडकांचे छोटे गठ्ठेही वाटेत सतत होते. ते लक्षपूर्वक negotiate करत मला चालावं लागत होतं. अशा वाटांवर उंच झाडं असली की जरा आधार असतो. तो इथे नव्हता. पायांत बूट होते, पण ते काही hiking shoes नव्हते. त्यामुळे अधिक लक्ष द्यावं लागत होतं. आणि अशात मला जाणवलं, की पायांखालचे ते खडकांचे गठ्ठे काहीतरी वेगळेच आहेत. म्हणजे लहान-मोठ्या विविध आकारांचे पण अगदी गोल, गुळगुळीत भरपूर गोटे कसल्याशा गोंदाने एकत्र करून ठेवले तर कसे दिसतील, तसे. किंवा एका मोठ्याच्या मोठ्या कणकेच्या गोळ्यात अनेक लहान-मोठ्या चारोळ्या खोचल्या आणि ते 10x zoom केलं तर कसं दिसेल, तसे. असे embedded pebbles मी पहिल्यांदा पाहत होते. जरा खाली वाकून जवळून पाहिलं, तर प्रत्येक गोटा इतका बेमालूम खोचला गेलेला होता! ते बघून माझा शब्दशः ‘आ’ वासला गेला.

10_compressed.jpg

पण तिथे फार वेळ थांबता आलं नसतं. त्या गठ्ठ्यांची उंची जेमतेम आपल्या घोट्यांच्या जरा वरपर्यंत; गोटे बेमालूम खोचले गेले असले तरी टेकता येईल इतपतही सपाट जागा कुठे नव्हती; वाटही अरुंद होती; आणि मागून सतत कुणी ना कुणी येतच होतं. त्यामुळे पुढे झालो.
ते embedded pebbles हळूहळू विरळ होत गेले, आणि मग दिसेनासे झाले. इतका वेळ डावीकडे दाट, हिरवी झुडुपं होती. त्यांच्याजागी जरा विरळ, छोट्याशा पिवळ्या फुलांची झुडुपं दिसायला लागली. आणि त्यांच्या पलीकडे खाली तीच- उसळणार्‍या लाटा आणि कातरलेल्या कड्यांची देखणी जोडगोळी! उजवीकडचं टेकाड उंच-उंच होत चाललं होतं. वाट आणखी अरुंद झाली होती. आम्ही Robberg peninsula वरून आत-आत निघालो होतो. पुढे लांबवर ते भूशीर जरासं डावीकडे वळून समुद्रात आणखी आत घुसलं होतं. तिथेही एक टेकाड दिसत होतं.

11.jpg

जसजसं ते पुढचं भूशीर दृष्टीपथात येत गेलं, तसतसं दिसलं की hikers त्याच्या शेवटापर्यंत, किंवा त्याच्या सर्वात उंचावरच्या स्पॉटपर्यंत गेले होते; जात होते.
त्या arm चे उभे-आडवे कातरलेले तांबूस-करडे कडे, त्यावर आपटणार्‍या अखंड उसळणार्‍या प्रचंड लाटा, लांबून येणारा त्यांचा आवाज, लाटांच्या force मुळे काठालगत ३०-४० फूट उंचीपर्यंत पसरलेलं पांढुरकं mist, वरती गच्च करडं आकाश, त्यामुळे क्षितिजापर्यंत समुद्राचं पाणीही करडंच दिसणारं, ११-१२ अंश तापमान, वारा ... या सगळ्याची एकत्रित भूल पडत असल्यासारखी वाटायला लागली. त्या mist सारखीच. ते वातावरण घेरून टाकायला लागलं. आपण कोण आहोत, कुठून आलो, इथे काही तासांसाठी थांबणार आहोत, हा विरंगुळा काही काळात संपुष्टात येणार आहे, हे सगळे विचार मागे पडत गेले. तिथला निसर्ग, तो तांबूस-करडा-हिरवा रंग आपल्यालाही त्याच्यात सामावून घेईल असं वाटायला लागलं. मी चालत होते, तरी एक तंद्री लागल्यासारखी झाली...
त्या तंद्रीतून मला भानावर आणलं, तिथल्या दगडधोंड्यांनी आणि डोंगरकपारींनीच.
अचानक एका बिंदूपाशी पायांखालची वाट जवळपास ९० अंशांत डावीकडे वळली. त्या वळणापाशी समोर डोंगरकड्यांतलं एक अद्‌भुत उभं होतं. आधी पिवळसर खडकाचा थर, साधारण आपल्या खांद्यांपर्यंत उंचीचा, त्याच्यावर जरा डोकं पुढे काढलेला काळसर होत गेलेला खडक, overhang म्हणतात तसा, तो असाच आणखी पुरुषभर वरती गेलेला, आणि त्याच्यावर... पुन्हा ते embedded pebbles! पण इथे त्यांचा रंग चांगलाच काळा! चकचकीत. आणि इथे ते बेमालूम खोचले गेलेले नव्हते. सिताफळाचे डोळे वरून दिसतात तसे जरा बाहेर आलेले दिसत होते. पुन्हा माझा ‘आ’ वासला गेला.

मी नंतर नेटवर थोडीफार शोधाशोध केली. माझ्या अल्पमतिनुसार, geology terms मध्ये याला Enon conglomerate म्हणतात. यातला enon हा झाला खडकाचा प्रकार. तो गार्डन रूट भागात सापडतो. त्या भागात चार प्रकारचे खडक सापडतात, त्यातला हा सर्वात जुना- साधारण १२ ते १४ कोटी वर्षांपूर्वी तो तयार झाला. यापेक्षा ते conglomerate प्रकरण मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. ते गोलमटोल गोटे, त्यांना म्हणायचं clasts; त्यांच्याभोवती अगदी बारीक sediments असतात, त्यांना म्हणायचं matrix. Clasts आणि matrix ना एकत्र सांधणारे वेगवेगळे घटक असू शकतात- घट्ट झालेली माती, कॅल्शियम कार्बोनेट, आयर्न ऑक्साइड, सिलिका. मला वाटलेले गोंद/कणीक म्हणजे ते हे! सगळ्यांचं मिळून होतं conglomerate. कसला भारी शब्द दिलाय त्यांना. रॉबर्ग नेचर रिझर्व आणि Plettenberg bay, in general, इथे हे खडकांचे प्रकार प्रामुख्याने आणि सहजी बघता येतात, म्हणे.
... हे सगळं मी भारतात, घरी परत आल्यावर नेटवर वाचलं. आणि मला पुन्हा एकदा त्या डाव्या वळणापाशी जावंसं वाटलं. म्हणजे त्या खडकांकडे ‘ते १२-१४ कोटी वर्षांपूर्वीचे खडक आहेत’ या आशाळभूत नजरेनं पाहता आलं असतं!
तेव्हा तिथे पुन्हा माझा ५-१० मिनिटं पुतळा झाला. एका दगडधोंडेप्रेमीला ध्यानीमनी नसताना एक never seen before गोष्ट पहायला मिळाली होती! तेव्हा ही geology ची माहिती नव्हती तरी हे काहीतरी वेगळं, काहीतरी भारी आहे इतकं तर नक्की समजलं होतं. मी जवळ जाऊन वरच्या त्या overhang वरून अलगद हात फिरवला. Conglomerate चा थर बराच उंचीवर होता. त्याचे फोटो काढणे अवघड होतं. मोबाइल कॅमेरे पुरते तोकडे होते. तरी जमेल तसे काही फोटो घेतले.

13_compressed_0.jpg
--
15_0.jpg
--
12.jpg

डावीकडचं वळण घेतल्यावर आता पुढे लांबवर गेलेलं ते भूशीर पुन्हा एकदा नीट बघितलं. त्याच्या शेवटापर्यंत काही आपण जाऊ शकणार नाही, हे मनात स्वतःला समजावलं. आता आमच्या उजव्या हाताला तो conglomerate चा कडा होता.
GPS वर दिसत होतं, की पुढे एका ठिकाणी The Gap नावाचा स्पॉट आहे. तिथपर्यंत जाण्याचं ठरवलं. त्या स्पॉटच्या दिशेनं वाट जराशी उताराची होती. १०-१५ मिनिटांत तिथे पोचलो. तो स्पॉट काय क-मा-ल होता! पुढे-मागे तो घसघशीत कडा, डावी-उजवीकडे उधाणलेला समुद्र, बाकी नेपथ्य तेच- गच्च आकाश, करडा-हिरवा-तांबूस रंग, थंडगार हवा. आणि या सगळ्याच्या मध्ये आपण. बस्स! त्या जागी रॉबर्गच्या निसर्गानं त्याच्यात सामावून घेतल्यासारखं वाटलं.

16.jpg

The Gap म्हणजे उजव्या हाताला कडा संपून (तुटून) २५-३० फुटी रिकामी जागा तयार झालेली आहे. कोणे एके काळी तो अखंड कडा असणार. कड्याच्या पलिकडून आपटणार्‍या लाटांमुळे मधला एक मोठा तुकडा तुटून खाली कोसळला असणार आणि ती गॅप, एक फट तयार झाली असणार. डावीकडे एका कोपर्‍यात एक लाकडी viewing platform बांधलेला होता. बसायला २-३ बाक होते. आमच्यासारखे आलेले, पुढे जाऊन परतणारे अशांची तिथे जरा वर्दळ होती.
अगदी समोरच पुढच्या टेकाडाच्या दिशेनं वाट वर चढत होती आणि मग उजवीकडे वळत त्या पुढच्या कड्यामागून पुढे जात होती. पुढे जायचं नाही असं ठरवलं होतं, तरी त्या वळणापर्यंत जाऊन येऊ म्हणत तेवढं चढून गेलोच. तिथून मागे वळून पाहिलं. Peninsula चं अप्रतिम दृश्य दिसत होतं.

17.jpg

उजवीकडे खाली लाटा अविरत खडकांवर आदळत होत्या. लाटांचा हात पोहोचत नव्हता तिथून वरती बारीक, हिरवं खुरटं गवत आणि पिवळी, केशरी बारीक बारीक फुलं यांचे पॅचेस दिसत होते. आम्ही आलो ती पायवाट शोधायचा प्रयत्न केला. सापडली नाही. सापडली नसतीच. नाहीतर त्याला hiking trail कशाला म्हटलं असतं. हे trails असे जंगलात लपलेलेच असायला हवेत, त्यातच मजा आहे.
इथे पहिल्यांदा जाणवलं, की स्वच्छ ऊन असतं तर इथपर्यंत चालत येणे जरा त्रासाचंच झालं असतं. ढगाळ हवेनं मजा आणली असं सुरुवातीला म्हटलं ते यासाठी.
आम्हाला तिथून पुढे जायचं नव्हतं, आणि ते वळण अरुंद होतं, त्यामुळे थांबता येणार नव्हतं. तिथल्या conglomerate ना हातानं एकदा गोंजारलं. परत खाली उतरून गॅपपाशी आलो. तिथून पाय निघत नव्हता. आणि गॅपमुळे खुली झालेली उजवीकडची (आता डावीकडची) वाट खुणावत होती. त्या वाटेवरही थोड्या अंतरावर एक वळण दिसत होतं. तिथून पुढे ती वाट डावीकडे लुप्त होत होती. तिथपर्यंत अधेमध्ये कच्ची पायवाट, मधूनच लाकडी बोर्डवॉक दिसत होता. त्या वळणापर्यंत जाऊन येऊ म्हणून निघालो. जंगलवाटा, trails हे असं जे काही भरीला घालतात ना, ते भारी असतं. तो मोह दूर सारता येणं महामुश्कील! मग असा काहीतरी मध्यममार्ग शोधावा लागतो.
त्या वाटेवर १-२ अवघड पॅचेस होते. Hiking shoes ची फार गरज भासली. पण कडेला जाड दोरखंड बांधलेले होते. त्यामुळे adventure चा अनुभव आला. एका ठिकाणी तर वाटेच्या दोन्ही बाजूंना खडकांचे मोठे गठ्ठे, ७-८ फूट उंचीचे, एका बाजूचा वाटेला समांतर, दुसर्‍या बाजूचा वाटेवर लंब टाकल्यासारखा. दोन्हींच्या मध्ये जेमतेम दीड-दोन फूट जागा. त्यातून पुढे सरकताना फार मजा आली. खडकांमधल्या बारीकसारीक कपारी अशा वेळी आधारासाठी उपयोगी ठरतात. आणि गार्डन रूटचे खडक तर या मदतीला सर्वात पुढे!
हे सगळं करताना उजवीकडच्या उधाणलेल्या समुद्राकडे मला दुर्लक्ष होऊ द्यायचं नव्हतं. आतापर्यंतच्या वाटेपेक्षा आता ही वाट बरीच खाली उतरली होती. समुद्र जवळ आला होता. काठावरचे कातरलेले खडक गडद विटकरी, लालसर दिसत होते. लाटा आणि ते खडक नजरबंदी करत होते. The Gap ची वर्दळ आता मागे पडली होती. आमच्या आगेमागे इतर कुणीच नव्हतं.
आरामात चालत त्या ठरवलेल्या वळणापाशी पोहोचलो. तर नजरेसमोर १५०-१६० अंशांत समुद्र आणि मग डावीकडे उरलेल्या १०-२० अंशांत त्या पुढच्या भूशीराची उजवी बाजू open-up झाली.

18.jpg
--
19.jpg

त्या बाजूला लांबवर एका ठिकाणी खडकांमध्ये २-३ प्रचंड मोठ्या गुहा तयार झालेल्या दिसत होत्या. गुहांसमोरूनच १-२ hikers चालत होते. त्यांचे आकार इतके लहानसे दिसत होते, की त्यावरून त्या गुहा केवढ्या huge होत्या याचा अंदाज आला!
मी बराच वेळ ती वाट पुढे कुठे, कशी जातेय ते trace केलं. Robberg च्या सर्वात लांबवरच्या hike चा शेवटचा टप्पा (‘The Point’) याच वाटेवर शेवटी असणार, हे ताडलं. पुन्हा आशाळभूतासारखं त्या गुहांकडे काही सेकंद बघितलं; आपण त्या गुहांच्या तोंडाशी उभं राहून समुद्राकडे पाहतो आहोत अशी कल्पना केली आणि मग मात्र त्या सगळ्याकडे सरळ पाठ फिरवून ५ मिनिटं उभी राहिले. मोह टाळण्याचे, मनाला आवर घालण्याचे हेच प्रसंग असतात. अवघड असतात. वेळ लागतो. त्रास होतो. पण ते करावं लागतं.

जरा वेळाने तिथून निघालो. गॅपच्या चौकात आलो. परतण्याच्या दोन वाटा होत्या. एक, ज्या वाटेनं आलो, ती. शिवाय आणखी एक होती. चौकातले ३ रस्ते पाहून झाले, चौथा का सोडा, म्हणून ती दुसरी वाट धरली. आता आमच्या उजवीकडे conglomerate च्या पहिल्या कड्याची पलीकडची बाजू होती, जी अजून दिसलेली नव्हती. डावीकडे समुद्र, जो मगाशी १५०-१६० अंशांत दिसला होता. त्या वाटेवर पाच-एक मिनिटं बोर्ड-वॉक होता. आणि नंतर एक मोठा चढ-cum-अवघड पॅच आला. (म्हणजे माझ्यासाठी तो अवघड होता.) तिथे एक mini-adventure पार पाडलं. लाटांचा आवाज, वारा, तिथल्या खडकांमधल्या कपारी, तो पॅच पार करण्याचा माझा हरतर्‍हेचा खटाटोप - हे सगळं लख्ख आठवतंय. या वाटेनं येऊन चूक केली का, अशी शंकाही एका क्षणी टप्पल मारून गेली. पण हळूहळू, one step at a time करत शेवटी तो पॅच पार केला.
ती वाट पुढेही चढाचीच होती. अर्ध्या तासात सावकाश, दमादमानं तो चढ पार केला. एका जराशा सपाट जागी आलो. हा त्या पहिल्या conglomerate कड्याचा माथा.

21_0.jpg

म्हणजे आम्ही त्या कड्याला आख्खा वळसा घालून त्याच्या माथ्यावर आलो होतो. रॉबर्ग हायकिंग 3 ट्रेल्सपैकी (२ किमी, ४ किमी, ११ किमी.) आम्ही २ किमीचा ट्रेल पूर्ण केला होता. शिवाय थोडं पुढे जा, थोडं उजवीकडे खाली उतर, हे सुद्धा केलं होतं. अशा भटकंतीची सवय नसल्यामुळे बर्‍यापैकी दमायला झालं होतं. त्यामुळे त्या कड्याच्या काठाशी जाऊन, खाली वाकून ते काळे embedded pebbles दिसतात का वगैरे बघण्याचं डोक्यातही आलं नाही. तिथे एक बाक होता. तिथे बसलो नसतो तर त्या बाकाचा अपमान झाला असता. आता त्या पुढच्या भूशीराकडे बघण्याचा एक वेगळा angle मिळाला. रॉबर्ग peninsula चा तो arm चार वेगवेगळ्या angles मधून आणि zoomed-out frames मधून पाहता आला. सगळीच दृश्यं कमाल होती! एकमेकांपासून पूर्णतः वेगळी होती. सगळ्यात कॉमन होती एकच गोष्ट- कातरलेले कडे आणि उसळणार्‍या लाटांची जोडगोळी...
त्या बाकापासून पार्किंग लॉटपर्यंत वीस-एक मिनिटांची वाट होती. वाटेत पांढुरक्या, पिवळसर pebbles चा अक्षरशः खच पडलेला होता. हे तिथल्या conglomerate मधले निसटून आलेले clasts होते. साहजिकच इथे काही matrix चे असे गठ्ठे दिसले, की ज्यात clasts च्या खाचा रिकाम्या होत्या... जणू कुणीतरी scoop करून ते pebbles बाहेर काढले असावेत!

22.jpg

मी तिसर्‍यांदा ‘आ’ वासला... नैसर्गिक आश्चर्यं पचवण्याचंही आपलं एक limit असतं, हे त्यादिवशी समजलं.
Thanks to ‘पूरी कायनात’!

20.jpg

-----
भाग-१ : https://www.maayboli.com/node/86025
भाग-२ : https://www.maayboli.com/node/86039

(लेखातल्या geological माहितीत काही दुरुस्ती असेल किंवा याबद्दल कुणाला आणखी काही माहिती असेल तर अवश्य सांगा

 

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ४

Submitted by ललिता-प्रीति on 18 December, 2024 - 00:31

दगडधोंडे, डोंगरकपारी - ३

‘हर्मानसचं सरप्राइज पॅकेज’ असं मागच्या लेखात म्हटलं, कारण आमच्या Hermanus experience चा काही भाग दगडधोंडे कॅटेगरीत मोडणारा आहे. तर काही भाग nature trails कॅटेगरीत मोडणारा आहे. शिवाय ओंजळभर हर्मानस उरणारच आहे, जमलं तर त्यावरही लिहिणार आहे.

केप टाऊनहून हर्मानसची day tour करणे v/s हर्मानसमध्ये निवांत मुक्काम करणे, हे म्हणजे टूरिस्ट आणि ट्रॅव्हलर यांच्यातला फरक सांगणारे forwards येतात त्यातला प्रकार आहे. (मी टूरिस्ट आणि ट्रॅव्हलरच्या अधेमध्ये कुठेतरी आहे, ट्रॅव्हलरच्या बाजूला जरा जास्त आहे.) सांगायचा मुद्दा असा, की द.आ.ला गेलात आणि दक्षिण किनारपट्टीवर customised भटकंती करणार असाल, तुमच्या यादीत हर्मानस असेल, तर एकवेळ हर्मानसहून केप ऑफ गुड होपला आणि केप पॉइंटला day tour करा, पण उलट करू नका. एकवेळ केप टाऊनमध्ये मुक्काम केला नाहीत तरी चालेल, पण हर्मानसचा भोज्जा करू नका. असो.
तर आधी हर्मानसचे दगडधोंडे.

हर्मानस हे लहानसं टाऊन असावं. आम्ही तिथला जेवढा भाग पाहिला त्यावरून तरी तसंच वाटलं. समुद्रकिनार्‍याला समांतर मुख्य रस्ता, रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला हॉटेल्स, दुकानं वगैरे, त्यांच्यामागे रहिवासी भाग - असं लंबुळकं पसरलेलं आहे. पण एकूण पसारा फार नसावा.

आम्ही तिथल्या गेस्ट हाऊसला पोहोचलो साधारण दुपारी १२ वाजता. केप टाऊनहून तास दीड तास Uber प्रवास. वाटेत Sir Lowry's Pass नावाचा awesome घाटरस्ता लागला. गेस्ट हाऊसची खोली ताब्यात मिळायला वेळ लागणार होता. हे आधीपासून माहिती होतंच. त्यामुळे सामान तिथे टाकलं, हर्मानसमध्ये जी cab ठरवली होती त्या ड्रायव्हरला बोलावून घेतलं, सिटी सेंटरला आलो, एका हॉटेलमध्ये जेवलो आणि बीचची दिशा पकडली.

हर्मानसच्या समुद्रकिनार्‍याचा १२-१३ किमीचा भाग नकाशात biodiversity walk म्हणून दर्शवलेला आहे. म्हटलं, काही का असेना, बायोडायव्हर्सिटी तर बायोडायव्हर्सिटी, आपल्याला दोन वाजेपर्यंत तर टीपी करायचाय, एखादा सावलीतला बाक वगैरे दिसला तर निवांत बसून राहू तिथे... sitting doing nothing - ही गोष्ट आम्ही आमच्या भटकंतीत अधूनमधून करतो. मस्त वाटतं. तसाच काहीसा विचार होता.

आम्ही होतो तो होता हर्मानस बीचवरचा Gearing’s Point. चौकातून समुद्राच्या दिशेला जाताना वाटेत काही abstract sculptures दिसतात. (ही शिल्पं वेळोवेळी बदलत असावीत. कारण जाण्यापूर्वी आम्ही नेटवर पाहिलेली शिल्पं-झलक आणि प्रत्यक्ष पाहिलेली शिल्पं वेगवेगळी होती.)
Gearing’s point ला एक whale watching spot आहे. हर्मानस ही गार्डन रूटची whale watching capital म्हणवली जाते. केप टाऊनहून इथे day tours येतात त्या व्हेल्स पाहण्यासाठी. बोटी भरभरून टूरिस्ट्स समुद्रात आत जातात, व्हेल्स बघतात. जून ते नोव्हेंबर या काळात हर्मानसमध्ये सकाळी लवकर गिअरिंग्ज पॉइंटला गेलं तर किनार्‍यावरून सुद्धा व्हेल्स दिसतात म्हणे. (आम्ही यातलं काहीच केलं नाही ते सोडा.)

दुपारची वेळ. कडक ऊन. समुद्रावरून येणारा गार वारा. थंडी. गिअरिंग्ज पॉइंटपाशी जरा वर्दळ होती. आम्ही तिथले एक-दोन माहिती फलक वाचले आणि उजवीकडे biodiversity walk ची पायवाट दिसत होती त्या दिशेला लागलो. जरा माणसांची वर्दळ असली की आपण तिथून आऊट!
तर रस्ता आणि समुद्र यांच्या मध्ये ती पायवाट. डाव्या हाताला समुद्र, उजव्या हाताला जरासा वरच्या बाजूला रस्ता. वाट जरा इकडे, जरा तिकडे वळत होती. शांत परिसर, निळ्याभोर समुद्राची गाज. (त्या biodiversity walk बद्दल नंतर पुढच्या एखाद्या लेखात सांगेनच. कारण आम्ही दोन हप्त्यांत ती पायवाट चांगली तुडवली.)
पायवाट आणि समुद्राच्या मध्ये अखंड rocky patch होता. चांगला रुंद, दणदणीत, खडबडीत. पण तो बायोडायव्हर्सिटी वॉकचा परिसर होता, तिथे जैववैविध्याला महत्व होतं. झुडुपं, फुलं, त्यांच्या आधारानं तिथे राहणारे पक्षी-छोटे प्राणी वगैरेंना जास्त फूटेज मिळणार, हे उघड होतं. त्यामुळे तो रॉक पॅच त्या पायवाटेवर अजिबात वरचढ न होता निमूटपणे बसलेला होता... minding its own business.
पण त्याचे रंग, छटा आणि textures काय विचारता!

पायवाटेपेक्षा त्याची पातळी जराशी खालीच होती. तरी त्या खडकांनी अखेर त्यांची दखल घ्यायला लावलीच. तांबूस, गुलबट, करडा रंग बर्‍यापैकी कॉमन होता; मात्र दर २०-३० पावलांवर त्यांचं texture वेगवेगळं होतं. सुरुवात झाली nib painting सारख्या दिसणार्‍या एका भारी texture नं. अगदी ‘ये कौन चित्रकार है’ ओळ गुणगुणावी इतकं ते भारी होतं. त्याकडे बघत बघत जरा पुढे झालो तर तिथे क्रीम कलरच्या अस्सल लेदरच्या सोफ्यासारखं texture होतं. आणखी जरा पुढे गेल्यावर कुणीतरी ओळीनं पटापट मांडून ठेवल्यासारखे साधारण एकसारख्या आकाराचे दगड. मध्येच काही पांढुरक्या रंगाचे गठ्ठे- चुरगाळलेला कागद, बिघडलेल्या नारळाच्या वड्या, वगैरे वगैरे.

hermanus collage 6_0.jpg

त्या rocky patch चे काही लंबुळके गठ्ठे समुद्रात जास्त आत घुसले होते. जरा नीट पाहिलं तर दिसलं, की त्यावर बरंच पुढेपर्यंत जाता आलं असतं. तसंच तिथल्या एक-दोन माहिती फलकांवरून समजलं, की काही विशिष्ट ठिकाणी त्या खडकांवरून खाली पाण्याच्या दिशेनं उतरलं तर तिथल्या geological रचनेबद्दलची काही वैशिष्ट्यं प्रत्यक्ष बघता येणार होती. दोन-तीन जण तिथे उतरलेले दिसतही होते. पण त्या जागांपाशी खूप लाटा उसळत होत्या. खूप वारा होता. शिवाय मला माझ्या दुखर्‍या गुडघ्याची शाश्वती नव्हती आणि थोडा वेळ टीपी करायचा म्हणून आलो असल्याने माझ्या पायांत बूटही नव्हते. त्यामुळे खाली उतरण्याचा विचार तर सोडूनच दिला.
मात्र समुद्रात जरा पुढे घुसलेल्या एका सुळक्यावर मी जरा वेळ जाऊन बसलेच. तिथे जाऊन बसल्यावर वाटलं, planning दरम्यान नकाशात हा किनारा किती वेळा न्याहाळला होता, तरी तो ‘असा’ असेल, इतका awesome निघेल, असं अजिबात वाटलं नव्हतं. तासाभरापूर्वी ही जागा आपल्यासाठी पूर्णपणे अनोळखी होती, आणि आता?... दगडधोंड्यांची आवड असली की हा फायदा असतो. त्या जागेशी लगेच परिचय झाल्यासारखा वाटतो. Rather युरोपमध्ये वगैरे काही ठिकाणी उलट झालेलं आहे, की तास दोन तास भटकून सुद्धा पायांखाली एकही pebble येत नाही म्हणजे काय, असं वाटून मी desperately कच्चे रस्ते शोधलेले आहेत. असो.

hermanus collage 7.jpg

काहीतरी करून २ वाजेपर्यंत वेळ घालवायचा म्हणून आम्ही बाहेर पडलेलो, ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत तिथेच रेंगाळलो. केवळ त्या सुंदर rocky patches मुळे. आणखीही थांबलो असतो. पण cab driver नं त्याच्या quotation मध्ये संध्याकाळी ५ पर्यंतचीच service देऊ केली होती. त्यामुळे परतावं लागलं.
पण ध्यानीमनी नसताना हर्मानसच्या दगडधोंड्यांकडून झकास सलामी मिळाली होती.
-----
हर्मानसमधला दुसरा दिवस. आम्ही निघालो होतो Betty’s bay ला, नकाशात उलट पश्चिमेला. गार्डन रूट म्हणजे ओळीनं असा bay चा पाढाच आहे. बेटीज्‌ बे, हर्मानस आणि केप ऑफ गुड होप नकाशात साधारण एका रेषेत येतात आणि बेटीज्‌ बे दोन्हीच्या मध्यात येतो. फॉल्स बे कलिंगडाएवढा असेल, तर बेटीज्‌ बे आहे मोहरीएवढा.
गार्डन रूटवर काही निवडक जागी मुक्काम करून अलीकडच्या-पलीकडच्या जागा बघण्याच्या आमच्या प्लॅनची खरी सुरुवात हर्मानसपासून झाली असं म्हणता येईल.
Betty’s bay च्या किनार्‍याला लागून त्याच नावाचं लहानसं गाव आहे. गाव आणि समुद्र यांच्या मध्ये Stony Point Nature Reserve आहे. इथे आफ्रिकन पेंग्विन्सचं संवर्धन केलं जातं.
आफ्रिकेत पेंग्विन्स आहेत ही एक भारी गोष्ट केप टाऊनमध्ये पहिल्याच दिवशी समजली होती. अंटार्क्टिकाच्या बाहेर कुठे पेंग्विन्स असतील आणि ते आपल्याला पहायला मिळतील, असं कधी वाटलंच नव्हतं. पेंग्विन्सची ही जमात द.आ.ची indigenous जमात आहे. केप टाऊनमध्ये एका अत्यंत टुरिस्टी बीचवर (Boulder’s beach) पैसे भरून भरपूर पेंग्विन्स पाहता येतात. आणि एका शांत बीचवर (Seaforth beach) पैसे न भरता थोडे पेंग्विन्स पाहता येतात. आम्ही अर्थात दुसर्‍या बीचवर जाऊन थोडे पेंग्विन पाहिले. पण स्टोनी पॉइंटला खरी मजा आली.
मी निसर्गात रमणारी असले, तरी प्राण्या-पक्ष्यांत फारशी रमत नाही. अर्थात, पेंग्विन्स त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आणि अगदी जवळून बघण्याचं आकर्षण होतं; नाही असं नाही. स्टोनी पॉइंट नेचर रिझर्वच्या प्रवेशद्वारापाशी पार्किंग आहे. आत एक हॉटेल आहे. हॉटेलच्या समोर समुद्रकिनार्‍यालगत एक बोर्डवॉक आहे. त्यावरून आपण चालत जायचं.
बोर्डवॉकच्या अलीकडे-पलीकडे पेंग्विन्स मजेत फिरत होते; ऊन खात गटागटानं बसले होते; कुणी पाण्यात एक डुबकी मारून येत होते; एकानं पाण्यात उडी मारली की त्याच्या मागे आणखी २-४ जात होते; तसेच ओळीनं एका मागोमाग एक पाण्यातून बाहेर येत होते. त्यांची मान झटकण्याची पद्धत मस्त होती. मध्येच एखादा उठून बोर्डवॉकच्या खालून दुसर्‍या बाजूला त्यांच्यासाठी बांधलेल्या घरांच्या दिशेनं जात होता. अंटार्क्टिकाचे पेंग्विन्स टीव्हीवर वगैरे पाहून माहिती आहेत, त्यांच्यापेक्षा हे आकारानं लहान वाटले. त्यांच्या डोळ्याभोवती गुलबट रंगाची एक छटाही वेगळी वाटली. पेंग्विन्सची ही जमात अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून इथे त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जातात. त्या संवर्धन कर्मचार्‍यांशी २-४ वाक्यं बोललो. पेंग्विन्सचे काही फोटो-व्हिडिओ काढले. हे सगळं करत करत निवांतपणे बोर्ड वॉकच्या शेवटापर्यंत जायला अर्धा तास लागला.

hermanus collage 1 penguins.jpg

आता परत फिरायचं होतं. बोर्डवॉकच्या टोकापाशी खाली पुन्हा एक पेंग्विन्सचा गट दिसला. जरा लांब होता. ‘उन्हात पांढर्‍या-ग्रेइश दगडांमध्ये कसे केमोफ्लाज झालेत,’ असं काहीतरी आम्ही बोलत होतो... आणि... डोक्यात एकदम scene transfer झाल्यासारखं झालं. आपण landscapes चे फोटो काढतो तेव्हा कधीकधी जवळच्या वस्तू out of focus जातात आणि लांबच्या वस्तू स्पष्ट capture होतात, तसं आता माझ्या नजरेत ते पेंग्विन्स-बिंग्विन्स सगळं out of focus गेलं आणि मागचे दगड स्पष्टपणे समोर आले. दगड कुठले, abstract शिल्पंच होती ती.

hermanus photo 4.jpg
--
hermanus photo 2.jpg

आता हे व्यक्तिसापेक्ष आहे. कुणाला हे कसलेतरी विचित्र ओबडधोबड दगड वाटतील; कुणाचं त्यांच्याकडे लक्षही जाणार नाही; तर माझ्यासारख्यांना त्यांचे आकार कमाल वाटतील.
इतका वेळ त्यांच्याकडे माझं लक्ष कसं गेलं नाही या विचारानं मीच जरा खजील झाले. ‘स्टोनी पॉइंट’ या नावावरूनही माझ्या डोक्यात प्रकाश पडला नव्हता. कदाचित गार्डन रूटच्या भटकंतीत दगडधोंड्यांची माझी स्वतःची स्टोरी तयार होणार आहे, हे तोवर ध्यानात आलेलं नव्हतं. काहीही असो, तेव्हा पेंग्विन्ससाठी खुद को माफ़ कर दिया।
ते दगडांचे गठ्ठे पांढरे, करडे, रवाळ दिसणारे होते. त्यांचे रंग, texture वगैरे सगळं टेबल माऊंटनवरच्या दगडांशी साधर्म्य असणारं होतं. क्वचित वेगळ्या प्रकारचे एक-दोन गठ्ठे दिसले- रॉबर्गसारखे. (तेव्हा रॉबर्ग अजून पहायचं होतं) पण तेवढेच.
ती abstract शिल्पं काही ठिकाणी किंचित उजवीकडे झुकलेली होती, काही ठिकाणी डावीकडे झुकलेली होती. सगळी एकसारखी. वार्‍याने गवत डोलावं तशी ती डोलत असावीत आणि कुणीतरी त्यांना एकदम ‘स्टॅच्यू’ करावं तशी दिसत होती. कसं झालं असेल हे! फार आश्चर्य वाटलं मला. (यामागे geology चं काही कारण आहे का आणि असल्यास कोणतं, हे मला अजून सापडलेलं नाही.) बोर्डवॉकवरून खाली उतरायला परवानगी नव्हती. नाहीतर मी नक्की त्या दगडांच्या आणखी जवळ जाऊन आले असते. आणखी चांगले फोटो काढता आले असते.

hermanus photo 3.jpg
--
hermanus photo 5.jpg

आम्ही पाहिलेल्या सगळ्या बीचेसवरची rock structures आता ओळीनं नजरेसमोर आणल्यावर लक्षात येतंय, की हर्मानसच्या आगेमागेच कुठेतरी ही पांढुरक्या, करड्या वालुकाश्मांची geology बदलली आणि त्यांची जागा रॉबर्गसारख्या करड्या, तांबूस नाहीतर पिवळसर खडकांनी घेतली. ते देखील वालुकाश्मच. पण टेबल माऊंटन किंवा बेटीज बे, इथले खडक हातात घेतले तर भुस्सकन वाळू होऊन हातातून निसटून जातील असे वाटणारे होते. पुढचे त्या मानाने जरा घट्ट बांधले गेलेले दिसत होते. आपण सर्वसामान्य माणसं सुद्धा केवळ नजरेनं हा फरक सांगू शकतो, तर geologists ची नजर आणखी किती काय काय गोष्टी नोंदवत असेल. असो.
-----
हर्मानसमधला तिसरा अख्खा दिवस आम्ही खूप फिरलो, खूप दमलो. संध्याकाळचे पाच वाजत आले होते, गेस्ट हाऊसला परतायची वेळ झाली होती, cab driver ठरलेल्या ठिकाणी वाट बघत थांबलेला होता, अशात दगड-स्टोरीचा हा show stopper अगदी अचानक समोर आला -

hermanus photo 8 showstopper.jpg

माझ्या तर डोळ्यांचं पारणंच फिटलं!
हर्मानसमध्ये तीन दिवसही कमी पडतील हे नकाशातला तिथला किनारा पाहून समजण्यातलं नव्हतंच, ते त्या किनार्‍यावरच्या दगडधोंड्यांनी निघायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी अशा तर्‍हेनं सांगितलं...
‘गोडी अपूर्णतेची’ यालाच म्हणत असावेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...