Saturday, November 9, 2024

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक

 

१९ एप्रिल २०२४

प्रवास:

एक वाजता एकदाची मायक्रोबस हलली तेव्हा जरा खिडकीतून वारं यायला लागलं. वाटलं काठमांडूतच इतकं उकडतंय तर खाली काय होईल? अर्थात बेसीसहरला एक रात्रच तर काढायची होती म्हणा. उद्या सकाळी वर जायला सुरुवात झाली की गार होईलच असं मी स्वतःला समजावलं.

नेपाळमधल्या रस्त्यांपेक्षा भारतातले खूप चांगले. त्यामुळे प्रवास रमणीय होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे अपेक्षाभंग नाही झाला. घाटात रस्तादुरुस्ती सुरु असल्यामुळे मध्ये दीड तास गाडी एकाच जागी थांबलेली होती. रस्ते खड्डेयुक्त असल्याने आणि मी शेवटच्या सीटवर असल्याने पाठीला दणके बसत होते. सामान ठेवायला पुरेशी जागा नसल्याने सॅक मांडीवरच ठेवावी लागली. त्यात खुपसलेल्या हायकिंग पोल्स मध्ये मध्ये हनुवटीचा वेध घेत होत्या. बसमध्ये बसण्यापूर्वी जेवायला वेळ मिळाला नव्हता. वाटेत एकदा ३ वाजता आणि एकदा ५ वाजता मायक्रो बस थांबली, पण “ही जेवणाची वेळ नाही” असं पुणेरी उत्तर नेपाळी भाषेत मिळाल्याने दिवसभर उपास झाला. हां, पण या किरकोळ गोष्टी सोडल्यास इतका काही वाईट पण नाही झाला प्रवास. रात्री ९ वाजता का होईना, बेसीसहर मुक्कामी पोचलो हेही नसे थोडके.

ठरवून इतका पॉझिटिव्ह विचार केल्यानी मला खूपच बौद्धिक थकवा आला त्यामुळे मी रात्री पण न जेवता झोपून गेलो. तसाही काल रात्रभर दिल्ली विमानतळावर जागाच होतो, त्यामुळे झोप आवश्यकच होती. झोप झाल्यावर सकाळी मात्र मला विनाकष्ट पॉझिटिव्ह वाटायला लागलं. त्यात हॉटेल मालक चक्क मराठी समजणारा होता. कारण तो पूर्वी भारतीय सैन्यात होता आणि पुण्यात बराच काळ होता. त्याच्याशी गप्पा मारता मारता ब्रेकफास्ट केला. नंतर जीप ड्रायव्हरला फोन केला तर तो म्हणतो मी तुमच्या हॉटेल समोरच पार्क केली आहे जीप. आनंदी आनंद! आठ वाजता मी चेकआऊट करून जीपमध्ये जाऊन बसलो पण. पण… आणखी प्रवासी येणार होते. आम्ही वाट बघत बसलो. दरम्यान मी एटीममधून आणखी थोडे पैसे काढून घेतले, कारण आता पुन्हा मुक्तिनाथपर्यंत एटीम नाही. शेवटी साडेनऊ-दहा वाजता उर्वरित प्रवाशांसकट आम्ही निघालो.

काठमांडू आहे १४०० मीटर उंचीवर आणि बेसिसहार ८५०, पण तरी इथे अजिबात उकडत नव्हतं. काठमांडू हे खूप मोठं शहर आणि कॉंक्रिटचं जंगल आहे म्हणून गरम असेल कदाचित.

आता इथपासून ते २६५० मीटर उंचीवरच्या चामे पर्यंत जीप प्रवास. पण जीप आधी खाली खाली जात होती. कारण नदीकिनारा गाठायचा आहे आणि मग नदीकाठानीच वर वर जाणारा रस्ता. बेसीसहर ते चामे हे फक्त ६६ किमी अंतर. पण रस्ता खराब असल्याने ४ तास लागतील असं ड्रायव्हर म्हणाला होता. पण प्रत्यक्षात रस्ता तर खूपच छान दिसत होता. नवीनच केलेला वाटत होता. जीप पण सुसाट पळत होती. पण हा प्रकार १५ मिनिटंच चालला. त्यानंतर कच्चा रस्ता सुरु झाला. वेग कमी झाला. पण तरी प्रवास होता भलताच प्रेक्षणीय. डावीकडे उंच डोंगर आणि उजवीकडे नदी. खळाळत वाहणारी. कधी अगदी जवळ तर कधी खूप खोल दरीत. पाण्याचा रंग मात्र थोडासा राखाडी होता. अधून मधून छोटे धबधबे दिसत होते. मध्ये मध्ये एखादं खेडेगाव. आता गाडीचा वेग १५-२० किमीच्या पुढे जाईना. पण त्याबद्दल माझी काही तक्रार नव्हती.

एका ठिकाणी धरण आणि जलविद्युत प्रकल्प दिसला. “प्रवेश बंद” सारख्या पाट्या आणि कंपनीचे नाव इंग्लिश आणि चिनी भाषेत होत्या. काल काठमांडू ते बेसिसहार प्रवासात पण अशाच इंग्लिश आणि चिनी पाट्या बघितल्याचं आठवलं. नेपाळमधल्या कम्युनिस्ट सरकारनी चीनशी मैत्रीचं धोरण ठेवल्याची खात्री पटली.

जीपमध्ये माझ्याखेरीज दोन नेपाळी प्रवासी, एक बंगाली जोडपं (राज आणि संगीता) आणि त्यांचा गाईड कम पोर्टर (धीरज) होता. ते तर पूर्ण वेळ विडिओ शूटिंग करण्यात मग्न होते. आणि सतत बडबड. परिसर खूप सुंदर होता पण त्यांच्या बडबडीने वीट आला. फोटोसाठी गाडी थांबव असं ते अनेक वेळा म्हणाले, पण ड्रायव्हरने त्यांना भीक घातली नाही. साधारण साडेअकरा वाजता ड्रायव्हरनी स्वतःहून गाडी थांबवली आणि lunch break झाल्याचं जाहीर केलं. नेपाळमध्ये जेवणाची हीच वेळ आहे. आणि मलाही भूक लागली होती. पण जीपमधून उतरेपर्यंत लक्षात आलं की तिथे एक जोरदार धबधबा पण आहे! नदीच्या पश्चिम किनाऱ्याला आमचं भोजनालय आणि पूर्व किनाऱ्याला हा सुंदर धबधबा.
रेस्टॉरंट: https://maps.app.goo.gl/FVT68nDZFMpA6e4m6
धबधबा: https://maps.app.goo.gl/m4Zt4GmXX1dx1Etx9

chamche_waterfall.jpeg

हे चामचे गाव असल्याने चामचे धबधबा असंच त्याचं नाव.
छान खिडकीजवळ बसून धबधबा बघत जेवलो. जेवण म्हणजे दाल भात. नेपाळी भाषेतही भाताला भातच म्हणतात. बटाट्याची भाजी. एक पालेभाजी. डाळ आणि भात. इथे पाश्चात्य प्रवासी / ट्रेकर भरपूर येतात, म्हणून जेवण मात्र पूर्ण अळणी असते. म्हणजे तिखट शून्य. नेपाळी प्रवाशाना मात्र त्यांनी मिरची आणून दिली. ते पाहून मीपण मागून घेतली. मग छानच जेवण झालं. ड्रायव्हरची विडी काडी झाली. मग निघालो.

रस्ता खराब तर आहेच पण अति तीव्र चढणही आहे. जीप महिंद्राची होती पण काही बदल करून फोर व्हील ड्राईव्ह केली होती. (की महिंद्राचे हे स्टँडर्ड मॉडेल आहे कोण जाणे?) म्हणजे नेहेमी टू व्हील ड्राईव्हच असते, पण तीव्र चढ असेल तेव्हा ड्रायव्हर खाली वाकून एक दांडी ओढून फोर व्हील ड्राईव्ह मोड सुरु करायचा. रस्ता अरुंद. समोरून दुसरी गाडी आली की आपली अगदी दरीच्या काठाला टेकते. त्यामुळे जीव मुठीत धरला - सोडला असं ख वेळा केलं गेलं. दुपारी अडीच वाजता चामेला पोचलो.
चामेमधील हॉटेल: https://maps.app.goo.gl/rTLXGrSs1jsohYvq8

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक मार्गावरील हॉटेल्स मध्ये पद्धत अशी आहे की आपल्याला बेड फुकट मिळतो. (मनांगमधील तिलीचो हॉटेल मात्र अपवाद आहे: ते बेडचं भाडं आकारतात) अट एकच: सर्व खाणं पिणं आपण तिथेच घ्यायचं. ते मात्र थोडं महाग असतं, त्यामुळेच त्यांना बेड फुकट देणं परवडतं. एका खोलीत सहसा २ किंवा ३ बेड असतात. म्हणजेच एक किंवा दोन प्रवासी तुमच्या साथीला असणार. क्वचित एकादी खोली एकच बेड असलेली असू शकते. किंवा फार गर्दी नसेल तर २ बेडच्या खोलीत तुम्ही एकटेच असं पण होऊ शकतं.

कालचा उकाडा विसरलो कारण इथे चांगलीच थंडी होती. सर्व हॉटेल्समध्ये पिण्यासाठी गरम पाणी विकत मिळतं. मी तेच घेतलं आणि नंतरही प्रत्येक ठिकाणी तेच घेत गेलो. चहा घेऊन मग चामे गावात एक चक्कर मारून आलो.

बेसीसहरपासून इथपर्यंत ज्या नदीच्या काठानी आलो तिचं नाव मर्स्याङ्दी (Marsyangdi). चामे गावात याच नदीच्या काठाला एक गरम पाण्याचा झरापण आहे. गरम पाण्याच्या झऱ्याचा माझा सिक्किममधला अनुभव फारसा चांगला नव्हता म्हणून मी त्या वाटेला गेलो नाही.

मर्स्याङ्दी नदीचं खोरं चामे गावात अगदी अरुंद आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला अगदी जवळ खूप उंच पर्वत दिसतात. त्यांच्या डोक्यावर बर्फ. बर्फाचं पहिलं दर्शन इथे झालं.

तासाभरात गाव फिरून मी परत आलो. माझ्याकडे कानटोपी नव्हती ती इथे एका दुकानातून घेतली. गाव अगदी लहान असलं तरी ट्रेकर्सना लागणारं सारं काही इथे दुकानांमध्ये होतं.

परत येऊन खोलीत थोडा आराम केला. पाच मिनिटात गार वाटायला लागलं. पुन्हा चहा घ्यावा म्हणून खाली रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे एव्हाना त्यांनी बंब पेटवला होता त्यामुळे छान उबदार होतं. म्हणूनच अनेक ट्रेकर्स तिथेच गप्पा मारत बसले होते. नंतर लक्षात आलं की प्रत्येक हॉटेलमध्ये असंच दृश्य असतं. खोलीत हीटिंग नसतं. रेस्टॉरंटमध्ये असतं. म्हणून बहुतेक जण दिवसभर रेस्टॉरंटमधेच पडीक असतात. रात्री झोपण्यापुरतं खोलीत.

आतापर्यंत मला राज-संगीता सोडल्यास दुसरे कुणी ट्रेकर्स भेटलेच नव्हते (राज-संगीता चामेमधल्याच दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते). आता इथे रेस्टॉरंटमध्ये नाना देशातील ट्रेकर्स भेटले. बहुतेक जण ग्रुपबरोबर होते. उदाहरणार्थ दोन जर्मन मुली. तीन फ्रेंच तरुण + एक अमेरिकन मुलगी. एक ऑस्ट्रेलियन कुटुंब. एक माझ्यासारखा एकटा डच तरुण. पण या संपूर्ण ट्रेक मध्ये राज-संगीता सोडल्यास भारतीय आणखी कुणीच नाही भेटलं. हा ट्रेक भारतीयांमध्ये फारसा लोकप्रिय नाही. एक तर लांबचा प्रवास आणि खर्च पण पुष्कळ आहे. गम्मत म्हणजे हाच ट्रेक पाश्चात्यांमधल्या (त्यातल्या त्यात) गरीब लोकांमध्ये लोकप्रिय आहे, कारण तो त्यांना स्वस्त वाटतो. अर्थातच स्वित्झरलँडमधल्या ट्रेकपेक्षा हा खूपच स्वस्त आहे.

असो.

संध्याकाळी साडेसात वाजता जेवलो. घरी फोन केला. इथे बहुतेक सगळ्या हॉटेल्स मध्ये WiFi फ्री मिळतं. त्यामुळे रोज घरी (किंवा आणखी कुणालाही!) फोन करणं शक्य होतं. झालंच तर youtube वगैरे करमणुकीची पण सोय होते. टाईमपास करून शेवटी कंटाळून साडेनऊला झोपलो.

उद्यापासून ट्रेक सुरु होणार होता! त्याचा वृत्तांत पुढच्या भागांमध्ये देईनच. आधी प्लॅन काय होता ते सांगतो.
अन्नपूर्णा सर्किट ट्रेकबद्दल इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. हा ट्रेक ३ दिवस ते ३ आठवडे असा वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. मी माझा प्लॅन असा केला होता:

ट्रेकची सुरुवात चामे गावातून (समुद्रसपाटीपासून उंची २६५० मी).
१ ला दिवस: चामे ते अप्पर / लोअर पिसांग (उंची अनुक्रमे ३३०० / ३२०० मी)
२ रा दिवस: अप्पर / लोअर पिसांग ते मनांग (उंची ३५४० मी)
३ रा दिवस: मनांगला एक दिवस जादा मुक्काम - acclimatization साठी.
४ था दिवस: मनांग ते याक खरका (४००० मी) किंवा लेदार (४१०० मी)
५ वा दिवस: याक खरका / लेदार ते हाय कॅम्प (४९०० मी)
६ वा दिवस: हाय कॅम्पहुन निघून थोरोंग ला (५४०० मी) खिंड गाठायची आणि मग पलीकडे उतरून मुक्तिनाथ (३८०० मी)

ठरल्याप्रमाणे काय काय झालं आणि काय बदल करावे लागले ते पुढच्या भागांमध्ये.

 

२१ एप्रिल २०२४

ट्रेकची सुरुवात:

रात्री झोप तुटक तुटकच झाली. सकाळी पाच वाजताच जाग आली. पण उठून करणार तरी काय? म्हणून पडून राहिलो. साडेपाच वाजता बाहेर बराच उजेड दिसला तेव्हा उठून बाहेर आलो. बर्फाच्छादित शिखरं बघून एकदम ताजतवानं वाटलं. आज खरा ट्रेक सुरु करायचा आहे! त्या उत्साहात पटापट आवरून साडेसहा वाजता रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो. आम्लेट आणि चहा घेऊन सव्वासात वाजता निघालो. ट्रेक सुरु!

जो ट्रेक मार्ग मी नकाशात अनेक वेळा बघितला होता त्या मार्गानी आता मी खरोखर निघालो होतो. ठरवून एकटाच. काल चामे गाव फिरून झालंच होतं. लवकरच गावातून बाहेर पडलो. पहिले दोन दिवस बहुतेक गाडी रस्त्यानेच चालायचं होतं. गाडी रस्ता म्हणजे तोच कालचा पुढे चाललेला. क्वचितच एकादी जीप येत जात होती. लांबवर दोन ट्रेकर्स दिसत होते. म्हणजे काहीजण माझ्यापेक्षाही लवकर निघालेत तर! अर्थात मला काही कुणाला गाठायची किंवा सगळ्यांच्या आधी पोचायची घाई अजिबात नव्हती. मी माझा वेग एन्जॉय करत निवांत चाललो होता. अर्ध्यापाऊण तासातच तलेखू गावात पोचलो. हे तर चामेपेक्षाही लहान गाव. तरी तिथेही २ रेस्टॉरंट होती. पण इतक्या लवकर ब्रेक घायची गरज नव्हती म्हणून थांबलो नाही.

संपूर्ण ट्रेक मार्ग म्हणजे सतत चढण असेल असं वाटतं आपल्याला. पण प्रत्यक्षात चढ आणि उतार दोन्हीही आलटून पालटून होतं इथे. उजव्या बाजूला उत्तुंग पर्वत. डावीकडे खळाळती नदी. त्यापलीकडे आणखी उंच पर्वत. त्या बाजूला अन्नपूर्णा २ व ३ शिखरे आहेत असं नकाशात बघितलं होतं. पण ती शिखरं आत्ता दिसत नव्हती. कारण हे डोंगर खूप जवळ आणि उभे होते. अन्नपूर्णा २ व ३ या डोंगरांपेक्षा खूप उंच आहेत पण ते जरा मागे होते, म्हणून दिसत नव्हते. पण नदीच्या किनाऱ्याने रस्ता छानच वाटत होता.

नदीच्या एका सुंदर वळणाजवळ एक तरुण डोंगरांचे आणि नदीचे फोटो काढण्यात मग्न होता. मी जवळ पोचल्यावर म्हणतो माझा एक फोटो काढून देशील का? माझ्यामागे नदीचा उतार दिसला पाहिजे. नतंर चौकशी केल्यावर कळलं कि तोही एकटाच होता. स्पेन मधून आला होता. नंतर काही वेळ आम्ही बरोबर चाललो. पण मग मीच त्याला म्हणलं तुला भरभर जायचं असेल तर तू जा पुढे, मी आपला हळूहळू जाणार. तो खरंच बाय करून गेला आणि बघता बघता दिसेनासा झाला.

दीड तास चालल्यावर दमल्याची जाणीव झाली. एक छोटा ब्रेक घ्यावासा वाटायला लागला. नकाशानुसार भ्रतांग गाव जवळच असायला पाहिजे होतं. तसं खरोखर २-३ मिनिटात गाव दिसायला लागलं. पण तरी तिथे पोचायला १५ मिनिटं लागली. भ्रतांग हे सफरचंदाचं गाव. सगळीकडे सफरचंदाच्या बागा. घरं कुठं दिसलीच नाहीत. नुस्तीच २-३ रेस्टॉरंट्स. उंच त्रिकोणी छप्पर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलो. पावणेदोन तास चालल्यानंतर टेकायला मिळालं तेव्हा अगदी बरं वाटलं. खरं तर नुसता चहा घ्यायचा मूळ बेत होता. पण म्हणलं सफरचंदाच्या गावात आलोय तर निदान एक ऍपल पाय तरी घ्यावं. मस्त होतं!

खाऊन पिऊन रिफ्रेश होऊन पुढे निघालो. गावातून बाहेर पडल्यावर रस्ता लगेचच उजवीकडे वळत होता. म्हणजे नदीला वळण असल्यामुळे रस्त्याला वळणं भागच होतं. लवकरच तीव्र चढ सुरु झाला. जीपमध्ये असतो तर ड्रायव्हरनी फोर व्हील ड्राईव्ह चा गियर टाकला असता. मीपण दोन पायांना दोन हायकिंग पोल्सची जोड देऊन चार चाकं नाही तरी चार टोकांचा वापर सुरु केला. चढ इतका तीव्र होता की थंड हवेतही घाम निघाला. इथे नदीला तीव्र उतार असल्याने खळाळणारा आवाज वाढला. पुढे काही अंतरावर रस्ता पुलावरून नदीच्या दुसऱ्या बाजूला जातोय असं दिसत होतं. पण त्याआधी एक छोटा झुलता पुलपण होता. पादचाऱ्यांसाठी. यापूर्वी मी कधी झुलता पूल ओलांडला नव्हता, म्हणून बिचकत पाय ठेवला. पण वाटलं होतं तितका काही हा झुलत नव्हता. आणि पुलाच्या मध्यभागी पोचल्यावर नदी काय सुंदर दिसत होती! व्वा!

पूल ओलांडून पलीकडे गेल्यावर लक्षात आलं की पुन्हा मुख्य रस्ता (म्हणजे जीप रस्ता) लगेच मिळणार नाहीये. त्याआधी जंगलातून पायवाट होती.

forest_route.jpeg

दगडांवर बाण रंगवून ठेवलेले होते, त्याप्रमाणे जात राहिलो. इथे तर जास्तंच तीव्र चढ होता. १०-१५ मिनिटात एक भग्नावस्थेतील घर दिसलं. तिथे एक पोर्टर विश्रांती घेत बसला होता. मीही बसलो. पाणी प्यायलो. त्याला हवंय का विचारलं. त्यानी नम्रपणे नकार दिला. आपल्याला कुणी पाणी हवंय का असं विचारेल असं त्याला अपेक्षित नव्हतं बहुतेक. माझ्यामागून २-३ मिनिटात आणखी बरेच ट्रेकर्स आले. एक नेपाळी तरुण, त्याच्या ऑस्ट्रेलियन मैत्रिणीबरोबर होता. तो पूर्वी पुण्यात विप्रोमध्ये नोकरी करत होता पण नंतर ऑस्ट्रेलियाला गेला. आणखी इतर अनेक गोरे ट्रेकर्स , पण ते विश्रांती न घेता पुढे निघून गेले. थोड्या वेळानी मीही उठून चालायला लागलो. आता जंगलामुळे डोंगर आणि नदी दोन्ही दिसत नव्हते. हे जंगल अर्थातच आपल्या महाराष्ट्रातील जंगलासारखं नाही. इथे खूप उंच झाडं. बहुतेक पाईन वृक्ष असावेत. थोडा वेळ चालल्यावर चढाची तीव्रता कमी होऊ लागली. जीप रस्ता जवळ आल्याचं लक्षात आलं. अर्धा तास जंगलातून चालल्यावर पुन्हा जीप रस्ता. थोड्याच वेळात गाव दिसू लागलं. बघता बघता पोचलो: धुकुर पोखरी. धुकुर म्हणजे धुरकट किंवा राखाडी रंग. पोखरी म्हणजे तळं. नदीतल्या पाण्याचा रंगही राखाडी आहे असं आधीच लक्षात आलं होतं. तळंही राखाडी. कदाचित जमिनीतल्या विशिष्ट खनिजांमुळे असेल. तर धुकुर पोखरी. ऍपल पाय खाऊन दोन तास होत आले होते. थोडी विश्रांती आणि जेवण दोन्ही आवश्यक होतं. कमला हॉटेलमध्ये दोन्ही साधलं.
कमला हॉटेल, धुकुर पोखरी: https://maps.app.goo.gl/pRNybYRQHLVfJTtr5

इथून मनांगला जायला दोन रस्ते आहेत: वरचा आणि खालचा. साताऱ्यासारखे.
वरचा आणि खालचा रस्ता हे अनुक्रमे अप्पर आणि लोअर पिसांग मार्गे जातात. त्यानुसार आजचा मुक्काम अप्पर किंवा लोअर पिसांगला करायचा होता.
वरचा रस्ता म्हणजे अप्पर पिसांग ते घ्यारू मार्गे मनांग. हा रस्ता पुष्कळ उंच चढून मग पुन्हा खाली उतरून मनांगला पोचतो. हा रस्ता पूर्णपणे नदीच्या उत्तर किनाऱ्याने जातो. हा मार्ग खडतर आहे, कारण अंतर जास्त (जवळ जवळ २० किमी) आणि चढ पण खूप आहे. पण हा लोकप्रिय आहे कारण त्या वाटेने जाताना अन्नपूर्णा २ व ३ चे विहंगम दृश्य दिसते (ढग नसतील तर).
खालचा रस्ता म्हणजे लोअर पिसांग ते हुमदे मार्गे मनांग. हा सोपा. अंतर कमी (१५ किमी). चढ कमी. पण अन्नपूर्णा २ व ३ मात्र दिसत नाहीत. आज मला दिसले नाहीत तसेच. हा मार्ग सुरुवातीला बराचसा नदीच्या दक्षिण किनाऱ्यानी जातो आणि शेवटी नदी ओलांडून मनांग गाठतो.

वरच्या रस्त्यानी जाणं झेपेल की नाही याबद्दल मला खात्री वाटत नव्हती. पण मग अन्नपूर्णा २ व ३ कसे दिसणार? म्हणून मी वेगळाच प्लॅन केला. लोअर आणि अप्पर पिसांग हे नावाप्रमाणे खाली आणि वर आहेत. अनुक्रमे नदीच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्याला आहेत. म्हणजे अप्पर पिसांग गावातून अन्नपूर्णा २ व ३ दिसणार; लोअर मधून नाही. म्हणून मग आजचा मुक्काम अप्पर पिसांगला करायचा. आणि उद्या तिथून खाली लोअर पिसांगला जाऊन मग खालच्या रस्त्यानी मनांग गाठायचं.

तसा अप्पर पिसांगकडे चालायला लागलो. लवकरच फाटा आला. डावा लोअर पिसांग आणि उजवा अप्पर. मी उजवीकडे.
थोडं पुढे गेल्यावर पेटंट राखाडी रंगाचं पाणी असलेलं तळं दिसलं. हेच ते धुकुर पोखरी.

अचानक लक्षात आलं की इथला परिसर एकदम वेगळाच आहे. काही तासांपूर्व पाईन वृक्षांच्या जंगलातून चालत होतो. इथं मात्र झाडं खूप कमी. आणि होती तीपण जरा बुटकी झुडुपं. शिवाय मर्स्याङ्दी नदीचं खोरं इथं बऱ्यापैकी रुंद झालंय. त्यामुळे उजेड पुष्कळ होता. चामे ते धुकुर पोखरीपर्यंत परिसर प्रामुख्याने हिरवा होता. इथे मात्र हिरवा कमी आणि मातीचा राखाडी रंग प्रबळ होता. मला हिरवा रंग आवडत नाही असं नाही, पण हा परिसर मला जास्त आवडला!

थोड्या वेळात छोट्या पुलावरून मर्स्याङ्दी नदी ओलांडून उत्तर किनारा गाठला. पुढची पायवाट नदीपासून हळू हळू दूर जात डोंगरावर चढत होती. एक उंचवट्यानंतर अप्पर पिसांग मधली घरं / टी हाऊसेस दिसायला लागली. हा चढ काही फार तीव्र नव्हता पण एव्हाना दुपार झाल्याने जरा गरम होतं त्यामुळे घामाघूम झालो. पण बघता बघता मुक्कामी पोचलो:
हॉटेल रॉयल माउंटन: https://maps.app.goo.gl/AxCzuFDCmnSytyEx6

आज नाही म्हणलं तरी १५-१६ किमी चालणं झालं होतं. रोज थोडीच आपण इतकं चालतो? त्यामुळे खोलीत जाऊन आरामात पडलो थोडा वेळ. आणि लवकरच गार पडलो! चालताना घाम गळत होता तरी शेवटी थंडी होतीच. तापमान ८-९ डिग्री असावं. थोड्या वेळाने मस्त चहा प्यायल्यावर एकदम फ्रेश वाटलं. इथे बहुतेक रेस्टॉरंट्सना मोठ्या काचेच्या खिडक्या असतात. इथून अन्नपूर्णा २ अगदी समोरच आहे - नदीच्या पलीकडे. पण...सध्या नुसते ढग दिसत होते. हॉटेल मालक म्हणत होता की थोड्या वेळानी आकाश उघडेल. पण तसं काही झालंच नाही. त्यामुळे अप्पर पिसांगला आल्याचा काही फायदा नाही झाला. असो.

संध्याकाळी नेहेमीप्रमाणे दाल भात मिरचीसकट खाऊन लवकर झोपलो. इथे पण झोप तुटक तुटक लागली. खरं तर शांतता होती. मऊ गादी आणि उबदार ब्लॅंकेट होतं. पण तरी नाही. कदाचित अनोळखी जागा आहे म्हणून असेल.

२२ एप्रिल २०२४

नेहेमीप्रमाणे पाच वाजता जाग आली तरी साडेपाचपर्यंत पडून राहिलो. मग उठून बाहेर आलो. बघतो तर अन्नपूर्णा २ शिखर सोनेरी रंगात चमकत होतं. शिखरावर दिवसाचे पहिले सूर्यकिरण आत्ताच पोचले होते. बर्फाच्छादित शिखरावर सूर्योदय होत असल्याचे फोटो बघितले होते. पण प्रत्यक्षात मात्र आज पहिल्यांदाच. फोटोपेक्षा किती तरी जास्त सुंदर!

Sunrise_on_Annapurna_II.jpeg

म्हणजे अप्पर पिसांगला आलो त्याचा फायदा झालाच शेवटी! १० मिनिटं नुसतं बघतच उभा राहिलो. हॉटेल मालक उठून स्वयंपाकघरात खुडबुड करत होता. त्याला या दृश्याचं कौतुक नाही हे मी समजू शकतो, कारण त्याला हे रोज दिसतं. पण हे सौन्दर्य बघायला मी सोडल्यास एकपण ट्रेकर जागा नव्हता. निदान बाहेर गच्चीत आलेला नव्हता. १० मिनिटांनंतर मीपण गारठलो म्हणून शेवटी रेस्टॉरंटच्या आत गेलो आणि काचेतून बघत बसलो. तेवढ्यात हॉटेल मालकानं चहा आणून दिला. सुरेख केला होता. दिवसाची सुरुवात काय भारी झाली!

मग आवरून कालसारखाच सव्वासात वाजता नाश्ता करून निघालो. वरचे ट्रेकर्स वरच्या रस्त्यानी जातात नी खालचे खालच्या. मी मात्र वरून खाली आणि मग खालच्या रस्त्यानी जाणार होतो. अप्पर पिसांग ते लोअर पिसांग रस्ता म्हणजे थोडी पायवाट आणि थोड्या पायऱ्या. नाही म्हणलं तरी शंभरेक मीटर उतरायचं होतं. जाताना वाटेत एक कुत्रं गुरगुरलं पण अंगावर नाही आलं. इथून कुणी ट्रेकर्स सहसा जात नाहीत म्हणून त्याला अनोळखी लोकं बघायची सवय नव्हती बहुधा. असो.

शंभर मीटर उतरून नदीपाशी आलो. पुन्हा एक झुलता पूल ओलांडून लोअर पिसांग. आता मी पुन्हा नदीच्या दक्षिण किनाऱ्याला आलो.

नेपाळ जरी हिंदू बहुसंख्य देश असला तरी इथे या भागात बौद्ध लोक जास्त. तिबेट शेजारीच असल्यानी तिथल्या संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे इथे बहुतेक गावांमध्ये बौद्ध मंदिर / मठ असतोच. गावाच्या वेशीजवळ मणीचक्र असलेली एक भिंत असते. जणू काही रस्ता दुभाजक असल्यासारखी. आपण जाताना नेहेमी त्याच्या डाव्या बाजूनेच जायचं. आणि शक्य असल्यास उजव्या हातानी मणीचक्र फिरवत फिरवत जायचं. असं केल्यानी प्रार्थना म्हणल्याचं पुण्य लागतं म्हणे. ही प्रथा मी प्रत्येक गावात इमाने इतबारे पाळली. तसाही रोज निघताना गणपती बाप्पा मोरया म्हणूनच निघतो. मग आणखी बौद्ध प्रार्थना म्हणल्याचं पुण्य अनायसे मिळतंय ते का सोडा? तर तसंच मणीचक्र फिरवत लोअर पिसांगमधून बाहेर पडलो.

पुढे विशेष काही न घडता मी तासाभरात एका छोट्या खिंडीत पोचलो.
https://maps.app.goo.gl/xX8wVGPLPo7mjDua9
छोटासा स्तूपही होता तिथे. थोडा वेळ बसलो. वरच्या रस्त्यापेक्षा सोपा असला तरी हा पण रस्ता दमवणाराच होता. लोअर पिसांगपासून इथपर्यंत २००-२५० मीटर उंच आलो होतो. त्यातही सुरुवातीला बराचसा रस्ता सपाट होता पण शेवटच्या १५ मिनिटांनी दमवलं. चहा मिळाला असता तर आवडलं असतं. पण तशी काही सोय नव्हती. नुसताच बसलो थोडा वेळ. इथेच आणखी एक एकांडा शिलेदार भेटला. म्हणजे नुसता दिसला आणि हसला. तोही तिथेच विश्रांती घ्यायला थांबला. युरोपिअन वाटत होता पण आपल्यासारखाच छान मांडी घालून जमिनीवर बसला. हाच पुढे रोज भेटत राहिला पण कधीच बोलला नाही. माझ्याशी नाही आणि इतर पण कुणाशी नाही. मुका होता की काय कोण जाणे. पण प्रत्येक वेळी भेटला की गोड हसायचा. हसो. असो.

जरा गार झाल्यावर मग निघालो. त्यापुढे उतार होता. एका वळणापाशी दिसलं की गाडीरस्ता सोडून एक पायवाट डावीकडे जातेय. शॉर्टकट असेल असे गृहीत धरून मी वळलो. कालच्यासारखं पाईन वृक्षांचं जंगल होतं पण जरा विरळ होतं. समुद्रसपाटीपासून जसं जसं उंच जाऊ तशी झाडी विरळ होते असं सिक्कीममध्ये पण बघितलं होतं. पण तरी कंटाळवाण्या गाडीरस्त्यापेक्षा ही वाट छान होती. १० मिनिटात उतार उतरून पुन्हा गाडीरस्त्याला लागलो. थोड्याच वेळात लांबवर घरं दिसू लागली. गाव. म्हणजे चहा मिळणार! त्या विचारानं पावलं झपझप पडू लागली आणि बघता बघता मी हुमदे गावात प्रवेश केला. लगेचच उजवीकडे एअरपोर्ट हॉटेल दिसलं: https://maps.app.goo.gl/bpPVxrzKVdYZ7rKo7
खरं तर घरच होतं. पण चहा उत्तम मिळाला!
मनांगला एअरपोर्ट आहे असं ऐकून माहिती होतं. पण तो एअरपोर्ट खरं तर इथे हुमदे गावात आहे. म्हणून हॉटेलचं नाव एअरपोर्ट हॉटेल. इथून मनांग अजून निदान ८ किमी दूर असेल. तरी याला मनांग एअरपोर्ट का म्हणतात कोण जाणे.

चहा आणि वॉशरूम ब्रेक झाल्यावर एकदम ताजातवाना झालो. आजची अर्धी चाल झाली होती. घाई करायचं काहीच कारण नव्हतं. निवांत चालत हुमदे गावातून बाहेर पडलो. तंद्रीत चालत असताना अचानक हॅलो असं कानावर पडलं. उजवीकडे पोलीस चेकपोस्ट होती. तिथला अधिकारी बोलवत होता. ट्रेकर्सना जो परवाना घ्यावा लागतो (Annapurna Conservation Area Permit अर्थात ACAP) तो असा अधे मध्ये तपासतात. आणि अमुक ट्रेकरनी तमुक गाव किती तारखेला किती वाजता पार केलं अशी नोंद पण ठेवतात. कुणी बेपत्ता झाला तर तपास करायला बरं.

ट्रेकचं प्लॅनिन्ग करताना इंटरनेटवर माहिती वाचली होती. काही जणांनी लिहिलं होतं की या ट्रेकसाठी गाईड घेणं कायद्याने बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात बहुतेक वेळा पोलीस बिना गाईड ट्रेकर्सना सुखेनैव जाऊ देतात अशी पुस्ती पण त्यांनीच जोडली होती. एकटाच ट्रेकर असेल तर मात्र ते अडवू शकतात म्हणे. पण मी जेव्हा ACAP साठी अर्ज भरला त्यात तर मी स्वच्छ लिहिलं होतं की मी एकटाच आहे. गाईड नाही. पोर्टर पण नाही. तरी मला परवाना मिळाला त्याअर्थी मला कुणी अडवणार नाही असा माझा समज होता. अपेक्षेप्रमाणे त्या अधिकाऱ्यांनी विचारलंच की मी एकटा कसा. पण सुदैवानी मी एकटा असण्याला त्यांची हरकत काहीच नव्हती.

त्यांना धन्यवाद देऊन चालू लागलो. पुढे आणखी एक छोटी खिंड ओलांडल्यावर मात्र झाडी खूपच कमी झाली. नाही म्हणायला काही ठिकाणी सफरचंदाच्या बागा मात्र होत्या. एव्हाना सूर्य वर आल्यामुळे गरम वाटायला लागलं होतं.

इथे बघावं तिकडे मातीचा रंग. पुढचा एक तास मला एकपण मनुष्यप्राणी दिसला नाही. थोड्या वेळानी दूरवर गाव दिसायला लागलं. तेच मनांग असावं असं वाटलं. पण तिथे पोचल्यावर कळलं की ते मुंगजी गाव आहे. आणखी पुढे अजून एक गाव दिसत होतं, पण तेसुद्धा मनांग नव्हतं - ते होतं भ्राका. भ्राकाच्याही पुढे अजून एक गाव दिसत होतं ते मनांग होतं म्हणे. म्हणून मग इथे मुंगजी गावात लंच ब्रेक घेणं आवश्यक आहे असं मी ठरवलं. झंबाला हॉटेल: https://maps.app.goo.gl/mBsnxuyepHiuytBt9
हॉटेल म्हणजे घरगुती अगदी. मी गेल्यावर मावशींनी भात शिजवला. त्यामुळे माझी थोडी विश्रांती झाली.
आता पुढचं गाव भ्राका. आणि त्यानंतर मनांग. काही हरकत नाही. आत्ताशी जेमतेम १२ तर वाजलेत. जेवल्यावर आणखी दहा मिनिटं निवांत बसलो आणि मग निघालो. आता पुन्हा नदी माझ्या डावीकडे होती. थोड्या वेळानी नदी ओलांडायला पूल होता. पण ती वाट मिलारेपा गुहेकडे जाणारी होती. माझी वाट सरळ होती.

या भागातील डोंगर मुंग्यांच्या वारुळासारखे दिसत होते.

Varul.jpeg

लवकरच भ्राका आलं. या गावात २-३ टी हाऊसेस / हॉटेल्स दिसली. उजवीकडे थोड्या उंचावर एक बौद्ध मठ दिसत होता. इथूनच उजवीकडे आईस लेक कडे वाट जाते अशी पाटी होती. पण माझी वाट सरळच होती. आता मनांग गाव स्पष्ट दिसू लागलं. रस्त्याला पुन्हा एक फाटा होता: डावा रस्ता खान्गसारला जातो, उजवा मनांगला. डावा रस्ता नदीच्या जवळून जातो. मनांग गाव मात्र नदीपासून थोडं उंचावर आहे. गावात प्रवेश करताना छोटीशी कमान. इथपर्यंत जीप येऊ शकतात. पण जीप किंवा कोणत्याच चार चाकी वाहनांना गावात मात्र प्रवेश नाही. गावकरी मोटरसायकल वापरतात, त्या मात्र गावात नेता येतात.

आज बहुतेक कालच्या पेक्षा जास्त पायपीट झाली. पाय दुखायला लागले. शेवटी २ च्या सुमारास मी माझ्या आजच्या मुक्कामी
पोचलो: तिलीचो हॉटेल: https://maps.app.goo.gl/EQJiwXunZ8nfKnFj7 (उंची ३५४० मी.)

२३ एप्रिल २०२४

सक्तीची विश्रांती:

तिलीचो हॉटेल हे अन्नपूर्णा सर्किट ट्रेक मार्गावरील बहुधा सर्वात सुप्रसिद्ध हॉटेल आहे. आणि खरंच छान आहे. स्वच्छ खोल्या. बहुतेक खोल्यांमध्ये attached टॉयलेट आहे. गरम पाण्यानी आंघोळीची सोय मात्र कॉमन बाथरूम मध्ये. सुसज्ज स्वयंपाकघर, ३ प्रशस्त आणि प्रसन्न डायनिंग हॉल्स. सगळे नेपाळी, पाश्चात्य, चिनी पदार्थ मेनू मध्ये आहेत. आणि बनवतात पण सगळे चविष्ट. झालंच तर तळमजल्यावर बेकरी पण आहे. नाना तऱ्हेचे चहा, कॉफी.

या हॉटेलचा मालक तिबेटी आहे. लोपसांग नाव त्याचं. खरं तर या भागात बहुसंख्य लोक तिबेटी वंशाचेच आहेत. त्यातले बरेचसे बौद्ध, पण थोडे हिंदू पण आहेत. अर्थात बौद्ध आणि हिंदू एकमेकांच्या धर्माचा आणि देवादिकांचा आदरच करतात.
लोपसांगला अध्यात्मिक संगीताची आवड आहे. त्यामुळे इथे तशीच गाणी सतत सुरु असतात. मला पण ती फार आवडली. चौकशी केल्यावर कळलं की एक नेपाळी प्रसिद्ध गायिका आहे, तिची ही गाणी होती. तिचं नाव Ani Choying Drolma. मला फार आवडलं इथलं संगीत.

हे हॉटेल मोठं आणि खूप लोकप्रिय असल्याने इथे तर खूप ट्रेकर होते. वेगवेगळ्या देशातले. त्यामुळे डायनिंग रूममध्ये भरपूर चहल पहल होती. बेसीसहर - चामे प्रवासात भेटलेले राज-संगीता इथे पुन्हा भेटले.

विरळ हवेचा त्रास होऊ नये म्हणून मनांगला एक रात्र जादा मुक्काम करावा असं वाचलं होतं आणि माझा तोच प्लॅन होता. बहुसंख्य ट्रेकर्स तसंच करतात, कारण नाही तर त्रास होण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे आजचा दिवस मला पूर्ण मोकळा होता. नुसती विश्रांती न घेता छोटा मोठा साईड ट्रेक करावा म्हणजे मग aclimatizaton चांगलं होतं म्हणे. त्यानुसार मी ठरवलं होतं की प्राकेन गोम्पाला जाऊन यायचं.
https://maps.app.goo.gl/qPu6avTFENL99hTn9
लोपसांगकडून माहिती विचारून घेतली होती. त्याच्या मते २ तास पुष्कळ झाले तिथे पोचायला. सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो तर लंचसाठी हॉटेल मध्ये परत असा विचार होता. पण काल रात्रीच पाऊस सुरु झाला होता. मी नेहेमीप्रमाणे लवकर उठलो. लोपसांगही तेव्हाच उठला होता. स्वयंपाकघर पण उघडलेलं होतं आणि स्वयंपाकी कामाला लागला होता. ६ वाजता मी चहा पीत असताना हिमकण मिश्रित पाऊस पडताना दिसत होता. दृश्य छान दिसत होतं, पण प्राकेन गोम्पाचं काय? म्हणलं पाऊस थांबेल थोड्या वेळानी. ७ वाजले. ८ वाजले. पाऊस सुरूच. फरक एकच झाला की आता हिमकण थांबले आणि नुसता पाऊस. माझ्याकडे रेनकोट तर होता. ब्रेकफास्ट करताना लोपसांगला विचारलं की या पावसात प्राकेन गोम्पाला जाऊ शकतो का? त्यानं उत्तर द्यायच्या आधीच शेजारच्या टेबलवर बसलेल्या एका गाईडनी दिलं : don't go, the path is too steep and becomes very slippery when it rains. हिरमोड झाला. पण अनुभवी गाईडचा सल्ला डावलून जाणं पण बरोबर वाटेना. त्यापेक्षा पुस्तकं वाचत बसू म्हणलं. कारण हॉटेल मध्ये बरीच पुस्तकं होती. ही सगळी प्रवाशांनी इथे सोडून दिलेली. पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी. बहुसंख्य इंग्लिश पण थोडी जर्मन, फ्रेंच सुद्धा. पूर्ण सकाळ पुस्तकं चाळण्यात आणि दर थोड्या वेळानी चहा पिण्यात गेली. दुपारी थोडं उघडलं. तेव्हा मात्र बाहेर पडलो. आता इतक्या उशिरा प्राकेन गोम्पाला जाण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून नुसताच गावात फेरफटका मारून येऊ असं ठरवलं. पण चार पावलं चालल्यावर धाप लागली. विरळ हवेचा परिणाम पहिल्यांदाच जाणवला कारण काल इथे पोचल्यापासून आत्तापर्यंत निव्वळ आरामच केला होता. धाप लागली तरी तसाच हळूहळू चालत राहिलो. निश्चयानी तासभर फिरून आलो. पण चालण्याचा वेग केवढा कमी झाला होता! तरी बरं आज पाठीवर ओझं काहीच नव्हतं. उद्या सगळं सामान पाठीवर घेऊन कसं काय जमणार आहे कोण जाणे.
दरम्यान पुन्हा पावसाची भुरभुर सुरु झाली म्हणून मग परतच आलो. हॉटेल शेजारच्या दुकानातून मायक्रो स्पाईक्स विकत घेतल्या. स्नोमध्ये चालताना यांचा उपयोग होतो असं ऐकलं होतं. २ दिवसांनंतर त्याचा प्रत्यक्ष उपयोग करावा लागणार होता.

अशी दिवसभर विश्रांतीच झाली.

झोपण्यापूर्वी उद्याचा कार्यक्रम विचार करून ठरवणं आवश्यक होतं.

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. बरेच जण तिलीचो सरोवरचा साईड ट्रेकपण करतात. मी त्या वाटेला (यावेळी) जाणारच नव्हतो. माझ्यासारख्या लोकांसाठी मनांग सोडल्यानंतर २ पर्याय असतात:

१. याक खरका (उंची ४००० मी.) पर्यंत जाऊन तिथे मुक्काम. पुढच्या दिवशी थोरोंग फेडी (४५४० मी.) मुक्काम. पुढच्या दिवशी थोरोंग ला ही खिंड (५४१६ मी.) ओलांडून पलीकडे मुक्तिनाथला पोचायचं (३८०० मी.)

किंवा

२. लेदार (उंची ४१०० मी.) ला एक मुक्काम. मग हाय कॅम्पला (४९०० मी.) मुक्काम. पुढच्या दिवशी थोरोंग ला ही खिंड (५४१६ मी.) ओलांडून पलीकडे मुक्तिनाथला पोचायचं (३८०० मी.)

दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे आहेत.

अल्टीट्यूड सिकनेस होण्याची शक्यता कमी करण्यासाठी एक जगमान्य सूचना आहे: ३५०० मी पेक्षा अधिक उंचावर गेल्यानंतर, कालच्या आणि आजच्या मुक्कामाच्या ठिकाणाच्या उंचीत +५०० मी पेक्षा जास्त फरक नसावा. हा नियम पाळायचा असेल तर पर्याय १ बरोबर ठरतो. पण त्यामुळे शेवटच्या दिवशी जवळजवळ १००० मी चढाई आणि १६०० मी उतार अशी ८ ते १२ तासांची पायपीट करावी लागते. ते ज्यांना झेपणार असेल त्यांनी पर्याय १ नक्की घ्यावा.

मला त्याबद्दल खात्री वाटत नव्हती.

पर्याय २ घेतला तर शेवटच्या दिवशी १००० च्या ऐवजी ६०० मीटरच चढाई करावी लागेल आणि एकूण वेळ २ तासांनी कमी होईल हा फायदा होता. पण अल्टीट्यूड सिकनेस होण्याची शक्यता वाढणार होती. तसं झालं तर ट्रेक अर्धवट सोडून परत फिरायची वेळ आली असती.

बराच विचार करून मी शेवटी पर्याय १ नक्की केला. शेवटच्या दिवशीची मॅरेथॉन झेपणार की नाही याची खात्री नव्हती तरी. अल्टीट्यूड सिकनेसचा धोका वाढवण्यापेक्षा ते बरं. म्हणजे उद्या सकाळी इथून निघून याक खरका गाठायचं.

असं ठरल्यावर मग मी सुखानी झोपी गेलो.

२४ एप्रिल २०२४

काल ठरवल्याप्रमाणे सकाळी ७ - ७। ला निघालो. लवकरच लक्षात आलं की कालच्यासारखी धाप आज लागत नाहीये. Acclimatization झालं बहुतेक. देवाची कृपा!

मनांग गावातच एक पोलीस चेकपोस्ट होतं. हवालदारानी थांबवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, नाही तर मी आपल्याच तंद्रीत जात होतो. नेहेमीप्रमाणे परमिट दाखवलं. नोंद झाली. त्याच्याकडून कळलं की आता पुढचं चेकपोस्ट एकदम मुक्तिनाथ नंतर. असो.

हळू हळू गावाबाहेर पडलो. लगेच रस्त्याला फाटा होता. डावीकडचा रास्ता खांगसार, श्री खरका मार्गे तिलीचो सरोवराकडे जातो. मी उजवी बाजू घेतली. तीव्र चढ सुरु झाला पण सिमेंटचा गाडी रस्ता होता. मी तर वाचलं होतं की मनांगच्या पुढे गाडी रस्ता नाही. पण आहे. साधारण अर्धा किमी अंतरावर एक छोटं गाव (टांकी मनांग) आहे तिथपर्यंत. त्यानंतर मात्र केवळ पायवाट. वाहनं अजिबात नाही. मस्त मजेत जात होतो.

उंचावरून खाली मर्स्याङ्दी नदी तर दिसत होतीच, पण उत्तरेकडून एक दुसरी नदी येऊन तिला मिळत होती तीपण दिसायला लागली. संगम पण. आजची यापुढची पूर्ण वाट याच नदीच्या बाजूनी होती. ही मर्स्याङ्दीची उपनदी आहे, पण Google Maps मध्ये हिचं पण नाव मर्स्याङ्दी असंच लिहिलं आहे. सोयीसाठी आपण तिला उपनदी म्हणू.

Confluence1.jpeg

वाट उपनदीच्या काठानी होती असं मात्र नाही. कारण उपनदी राहिली खाली दरीत. आणि वाट १०० ते २०० मी उंचावरून. पण अतिशय सुंदर वाट. वाटेल तेव्हा थांबावं. दरीत वाहणाऱ्या नदीकडे बघत बसून रहावं. वाहत्या पाण्याचा बारीक आवाज. बाकी काही नाही! संपूर्ण ट्रेकमधला हा टप्पा सर्वात सुंदर आणि आनंददायी होता म्हणलं तरी चालेल.

उपनदीला उजवीकडून एक उपउपनदी येऊन मिळत होती. तिच्यावर तारांचा पूल. तो ओलांडल्यावर दरीची खोली थोडी कमी झाली. एका वळणानंतर आजचं मुक्कामाचं ठिकाण दिसायला लागलं. थोड्याच वेळात पोचलो तेव्हा फक्त ११ वाजले होते. हॉटेल याक खरका. https://maps.app.goo.gl/yrU4BkPjV2Zf9Et27

हे खरं तर एका कुटुंबाचं घरच. पण ट्रेकर्ससाठी आणखी खोल्या बांधल्या होत्या. मी त्यांच्याकडे पोचणारा आजचा पहिलाच पाहुणा होतो. मालकीणबाई मोबाइल फोनवर काही तरी बघत बसल्या होत्या. आणि त्यांचा मुलगा मोबाइल “मला पाहिजे” म्हणून रडत होता. या ट्रेक मार्गावरचं हे एक वैशीष्ट्य. लहान-मोठे समस्त गावकरी जरा मोकळा वेळ मिळाला की लगेच मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतात.

मनांग सोडल्यानंतर मुक्तिनाथ पर्यंत कुठेही फोन चालत नाही. पण वायफाय इंटरनेट मात्र सगळीकडे उपलब्ध. या लोकांनी बहुतेक केबल टाकून ठेवली असेल. ट्रेकर्ससाठी खास सुविधा म्हणून हे केलं गेलं असणार. पण लाभ (?) गावकऱ्यांनाही झालाच की.

तर मी तिथे गेल्यामुळे त्या पोराला मोबाइल मिळाला. कारण बाई मला माझी खोली दाखवण्यासाठी उठल्या. छोटीशी खोली. थंडगार. बाई लगेच जेवणाचं काय विचारत होत्या. माझं तर उत्तर तयारच होतं: दाल भात. पण मी जेवायला १२ वाजता येईन असंपण सांगून टाकलं. तासभर आराम केला. खरं तर आज विशेष थकवा आलेला नव्हता. पण पाठ टेकल्यावर छानच वाटलं. पण गारेगार. ब्लॅंकेट ओढण्याशिवाय पर्याय नव्हता.

तासाभराने डायनिंग हॉलमध्ये परत गेलो. वायफाय फक्त इथेच चालत होतं, खोलीत नाही. व्हॉट्सअँपवर संदेशांची देवाण घेवाण होईपर्यंत जेवण आलं. गरमागरम. काचेच्या खिडकीतून समोर डोंगर आणि दरीत सुंदर नदी दिसते आहे. अजून काय हवं माणसाला? व्वा. मजा आली.

जेवण होईपर्यंत आणखी पाहुणे हळू हळू आले. अदोनीस आणि सोफिया हे एक जोडपं. अदोनीस ग्रीक तर सोफिया डच होती. एक लाटवियन कुटुंब. दोन मलेशियन महिला आणि त्यांचा गाईड आणि पोर्टर. या दोघी मलेशियन होत्या, पण मुस्लिम नव्हे. चिनी वंशाच्या बौद्ध होत्या. आणि केवळ ट्रेक नव्हे तर मुक्तिनाथ दर्शन हापण त्यांचा उद्देश होता. मग पूर्ण दिवस आम्ही सगळे तिथेच गप्पा मारत बसून होतो. थोड्या वेळाने तर मालक, मालकीणबाई आणि त्यांचा छोटा पण तिथेच येऊन बसले. त्याचं साधं कारण हे की फक्त डायनिंग हॉलच उबदार होता, बाकी इतरत्र अती थंडी.

दोन्ही मलेशियन महिलांना विरळ हवेचा त्रास होत होता. म्हणजे तीव्र डोकेदुखी. खरं तर त्या दोघी diamox घेत होत्या. अल्टीट्यूड सिकनेस टाळण्यासाठी या औषधाचा उपयोग होऊ शकतो. पण तरी त्या त्रस्त होत्या. सोफिया पण diamox घेत होती. तिला अजून तरी काही त्रास नव्हता. मला आणि इतरांना सुदैवानी काही त्रास होत नव्हता (थंडी सोडल्यास). मलेशियन महिलांच्या नेपाळी गाईडकडे pulse oximeter होता. त्याने त्या दोघींची ऑक्सिजन पातळी मोजली. ८०. म्हणूनच तुमचं डोकं दुखतं आहे, उद्या बरं वाटलं तरंच आपण पुढे जायचं असं त्याने दोघीना बजावलं.

मग त्या गाईडनी सगळ्यांचीच ऑक्सिजन पातळी मोजायची टूम काढली. सगळ्यांची ८५ ते ८७ होती. माझी ८५. ते पाहून मी खरं तर हादरलो होतो. ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली जाणे म्हणजे गंभीर गडबड असा माझा समज होता. पण गाईडनी सगळ्यांची ऑक्सिजन पातळी उत्तम आहे असं जाहीर केलं तेव्हा जरा हायसं वाटलं. त्याच्या मते आमचं acclimatization उत्तम रीतीने होत होतं आणि आम्ही सगळे थोरोंग ला सहज पार करू अशी त्यानी खात्री व्यक्त केली. म्हणलं तुझ्या तोंडात साखर पडो.

लाटवियन कुटुंब उद्या इथून निघून थेट हाय कॅम्पला मुक्काम करणार होतं. अदोनीसला हाय कॅम्प की थोरोंग फेडी हा प्रश्न पडला होता. शेवटी त्याला माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी पण उद्या थोरोंग फेडीलाच मुक्काम करायचं ठरवलं.

सगळ्यांचा उद्याचा कार्यक्रम ठरला. जेवणं झाली. आणि मग सगळे एकमेकांना good night म्हणून आपापल्या खोलीत गेलो. आणि गार पडलो.

२५ एप्रिल २०२४

पाच वाजता जाग आलीच. पण पडून राहिलो. ६ च्या सुमारास डायनिंग हॉलमध्ये हालचाल जाणवली तेव्हा उठलो. चुळ भरायला गेलो तर वॉश बेसिनचा नळ गोठला होता. आतल्या दुसऱ्या नळाला पाणी येत होतं पण अति थंड. शेवटी गरम पाणी मागून घेतलं (म्हणजे विकत घेतलं) तोंड धुवायला. तपमान शून्याखाली होतं पण तरी काल रात्रीइतकी थंडी वाटत नव्हती. झोप होऊन शरीर ताजंतवानं झाल्यामुळे असेल बहुतेक.

नेहेमीप्रमाणे नाश्ता करून मी ७। वाजता बाहेर पडलो. बाकी ट्रेकर्स अजून आवरत होते, त्यांना बाय बाय केला.
मी राहिलो होतो ते हॉटेल याक खरका गावाच्या सुरुवातीलाच होतं. तिथून पुढे थोडा उतार आणि मग आणखी काही हॉटेल्स होती. त्यानंतर चढ सुरु झाला. आता मात्र विरळ हवेचा परिणाम चांगलाच जाणवला. चालण्याचा वेग एकदम कमी झाला. काही हरकत नाही. आज तसंही फक्त ७-८ किमी चाल होती. तेव्हा हळूहळू चालत राहिलो. लवकरच लेदारला पोचलो. इथे ३-४ हॉटेल्स आहेत. पण निघून जेमतेम एक तास झाला होता. तेव्हा इतक्यात कशाला ब्रेक घ्यायचा म्हणून मी थांबलो नाही तिथे.

आजचा रस्ता कालच्याइतकाच सुंदर होता. फक्त चालताना श्रम जाणवत होते. आणि चालण्याचा वेग कमी झाला होता. शिवाय काल मला ४ तासांच्या प्रवासात अगदी तुरळक ट्रेकर्स भेटले होते. आज मात्र बरेच जास्त होते. अर्थात भारतीय मात्र कुणीच नाही. राज-संगीता मनांग सोडल्यानंतर पुन्हा भेटले नव्हते. आज या वाटेवर चालणारे पुढे आणि मागे बरेच लोक दिसत होते. अचानक लक्षात आलं की डावीकडे थोड्या खालच्या बाजूला आणखी एक वाट आहे आणि त्या वाटेने पण बरेच ट्रेकर्स जाताहेत. म्हणजे मी वाट चुकलो की काय? थांबून पुढे मागे बघत होतो. मागून एक गोरा येत होता. त्याने जणू माझ्या मनातला प्रश्न ओळखला. स्वतःच म्हणाला की दोन्ही वाटा थोरोंग फेडीलाच जातात. डावीकडची (खालची) वाट म्हणजे जुनी वाट. त्या वाटेत दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे. म्हणून ही नवी वाट तयार केली आहे. या वाटेवर दरड कोसळण्याचा धोका नाही किंवा कमी आहे. पण ही वाट थोडी लांबून जाते आणि बरीच उंच चढून मग थोरोंग फेडीला खाली उतरते. मग मी निश्चिन्त होऊन मार्गक्रमण चालू ठेवलं. दमछाक मात्र होत होती. नंतर नकाशा बघितल्यावर कळलं की इथे एक फाटा होता:
https://maps.app.goo.gl/HyKPRKXVRzsrg3PM7
पण तंद्रीत चालताना मला तो लक्षात आला नव्हता! मी चुकून उजवा रस्ता घेतला होता पण सुदैवानी तोच बरा होता डाव्यापेक्षा.

सकाळी याक खरकामध्ये १ लिटर गरम पाणी भरून घेतलं होतं. मध्ये मध्ये थांबून ते पीत होतो. खायला मात्र काही नव्हतं. एनर्जी हळू हळू कमी होऊ लागली. चहा मिळाला तर बरं होईल असं वाटायला लागलं. दूर अंतरावर एक घर दिसत होतं आणि तिथे काही ट्रेकर्स थांबले आहेत असंही दिसत होतं. तेव्हा तिथे टी हाऊस असणार असं वाटून जरा बरं वाटलं. पण तिथे पोचल्यावर कळलं की टी हाऊस बंद आहे. निराशा झाली. माझ्यासारखेच निराश झालेले ट्रेकर्स कट्ट्यावर बसून नुसतंच पाणी पीत होते. मीही तेच केलं. आता तर माझं पाणी पण संपत आलं. पुन्हा पायपीट करण्यावाचुन पर्याय नव्हता.

थोड्या वेळानी दिसलं की डावीकडचा मार्ग आता नदी ओलांडून पलीकडे गेला आहे. आणि तिथे २-३ ठिकाणी खरोखर दरड कोसळण्याच्या खुणा दिसत होत्या. ते दृश्य इतकं भीतीदायक होतं की मी (चुकून का होईना) उजवा रस्ता घेतला त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटली.

Darad.jpeg

थोड्याच वेळात बरंच दूर आणि बरंच खाली थोरोंग फेडी दिसायला लागलं. चला, आता निदान उद्दिष्ट नजरेच्या टप्प्यात आलं. उत्साह वाढला. पण एव्हाना पाणी मात्र संपलं. तसाच जात राहिलो. सुदैवानी लवकरच उतार सुरु झाला. खरं तर तीव्र उतार. जवळ जवळ १५० मी उतरून नदीवरील पुलापाशी पोचलो. पूल ओलांडून थोरोंग फेडी!
https://maps.app.goo.gl/8LxKgRTa3GeuPW7G9

इथे माझ्या आधी पुष्कळ लोक येऊन पोचले होते. मी १२।। वाजता पोचलो. चांगलाच दमलो होतो. खोलीत जाऊन अर्धा तास पडलो तेव्हा जरा बरं वाटलं. मग पुन्हा रेस्टॉरंटमध्ये आलो. इथे एकदम छान वातावरण होतो. नाना देशीचे नाना लोक आपापल्या भाषेत बोलत होते. संगीत (अर्थात पाश्चात्य) सुरु होते. वायफाय इंटरनेट नेहेमीप्रमाणे फक्त रेस्टॉरंटमधेच चालतं.
एक वाजला होता. सकाळी ७ नंतर फक्त पाणीच पोटात गेलं होतं. पण तरी जेवायची इच्छापण होत नव्हती. काही तरी खायला हवं म्हणून मी मॅश्ड पोटॅटोज विथ चीझ मागवलं. रोज दाल भात खात होतो, म्हणलं आज जरा चैन करावी. मीठ , मिरपूड घालून छान लागेल. छानच लागत होतं पण का कुणास ठाऊक २ घासांपुढे मला खाववेना. शेवटी मी थांबलो. चहा मागवला. चहा पिऊन किंचित बरं वाटलं. परत खोलीत जाऊन थोडा वेळ आराम केला. आता माझ्या लक्षात आलं की माझं डोकं सूक्ष्म दुखतं आहे.

आज मी जेमतेम ७-८ किमी अंतर चाललो. आणि सुमारे ७०० मी चढून पुन्हा १५० मी खाली उतरून इथे पोचलो. यानीच माझी काय हालत झाली आहे! आणि उद्या तर १३ किमी अंतर, १००० मी चढाई आणि १६०० मी उतार. म्हणजे आजच्या दीडपटपेक्षा जास्त अंतर, दीडपट चढाई आणि दसपट जास्त उतार. आणि ते पण आजच्यापेक्षा आणखी विरळ हवेत. कसं होणार माझं? जसा विचार करत गेलो तसं मला प्रश्नाचं गांभीर्य जाणवलं. डोकं दुखतं आहे म्हणजे मला अल्टीट्यूड सिकनेसचा सौम्य त्रास होतो आहे आत्ताच. उद्या आणखी उंच गेल्यावर तो वाढेल का? मी खिंड ओलांडून जाऊ शकेन की परत माघारी जावं लागेल? की आणखी काही गंभीर होईल?

नेमकं तेव्हाच एक हेलिकॉप्टर भिरभिरत वरती हाय कॅम्पच्या दिशेने गेलेलं दिसलं. म्हणजे तिथे कुणाची तरी अवस्था गंभीर आहे आणि त्याला / तिला उचलून न्यायला हेलिकॉप्टर आलंय. बाप रे! माझ्यावर ही वेळ येईल की काय?

मी काय करू? उद्या वर जाऊ, का परत मागे (म्हणजे खाली) जाऊ? मागं जाणं सेफ होतं. पण तसं केलं तर आयुष्यभर बोच राहील की मी ट्रेक अर्धवट सोडला. मी काय करू??? काही समजेना.

शेवटी पुन्हा रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलो. पुन्हा चहा. थोडा वेळ करमणूक म्हणून यूट्यूबवर गाणी बघत आणि ऐकत बसलो. यूट्यूब स्वतःहून आपल्याला काही बाही विडिओ बघायला सुचवत असतं. त्यात एक सूचना आली:
https://youtu.be/x0AUAR2eKSY?feature=shared
रेडु या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं गाणं. मी हे गाणं कधी ऐकलं नव्हतं. उत्सुकता म्हणून क्लिक केलं. गाण्याचा मुखडा आणि पहिला कोरस ऐकला आणि अचानक ट्यूब पेटली. हे गाणं ऐकून बघा म्हणजे का ते कळेल. एकदम विचार बदलले. अरे तू कशाला काळजी करतो आहे? देवाक काळजी रे!

नकारात्मक भावना जेव्हा मनाचा कब्जा घेतात तेव्हा विचारशक्ती नीट काम करत नाही. उद्या माझं कसं होणार एवढा एकच प्रश्न मनात होता, पण त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणं पण जमत नव्हतं. गाणं ऐकल्यावर नकारात्मक भावना सपशेल गेल्या. मग डोकं चालायला लागलं.

लोकं विचार करतात की मुक्काम थोरोंग फेडीला करावा की हाय कॅम्पला. मीपण हाच विचार केला होता. पण दोन्हीकडे मुक्काम करायला काय हरकत आहे? एक दिवस जादा लागेल इतकंच. मी परतीच्या विमानाचं तिकीट तब्बल २ दिवस मार्जिन ठेवून काढलं होतं. म्हणजे एक दिवस जादा खर्च करणं मला परवडणार होतं! म्हणजे प्रश्न मिटलाच की. उद्या इथून निघून हाय कॅम्पला जायचं. म्हणजे फक्त ३५० मी चढाई. आणि परवा तिथून मुक्तिनाथ गाठायचं. म्हणजे परवा ६०० मी चढाई आणि १६०० मी उतार. उताराला कोण घाबरतंय इथं?

एकदम मन:स्थिती बदलून गेली. पण तरी डोकं दुखणं काही थांबलं नाही. मग अल्टीट्यूड सिकनेस बद्दल माहिती इंटरनेट वर शोधून वाचू लागलो. बरंच काही वाचलं आणि २ गोष्टी पटल्या आणि त्या मी करायचं ठरवलं. एक म्हणजे क्रोसिन घेतल्याने डोकेदुखी कमी होईल म्हणून लगेच घेऊन टाकली. दुसरं असं की दर थोड्या वेळानी दीर्घ श्वसन करावं म्हणजे कार्बन मोनॉक्साईड फुफुसातून बाहेर निघून जातो, ज्यामुळे ऑक्सिजन पातळी सुधारते. लगेच खोलीत गेलो आणि अधून मधून दीर्घ श्वसन करत पडून राहिलो. परिणाम कशाचा झाला माहिती नाही, पण तासाभराने लक्षात आलं की आता डोकं दुखत नाहीये. अरे वा!

संध्याकाळी परत रेस्टॉरंटमध्ये गेलो तर अदोनीस परत भेटला. एकटाच होता. सोफिया अति दमल्यामुळे झोपून गेली होती म्हणे. अदोनीस ठीक होता. मी त्याला सांगितलं की माझं डोकं दुखत होतं पण क्रोसिन घेऊन आता बरंय. आणि माझा बदललेला प्लॅनपण त्याला सांगितला. तो मात्र म्हणाला की आम्ही उद्या थेट मुक्तिनाथ गाठणार.

आज दुपारचं जेवण म्हणजे केवळ २ घास बटाटे खाल्ले होते. तरीही आता संध्याकाळी पण काहीही खायची इच्छा होत नव्हती. पण उद्या सकाळी उठून जायचं आहे तर पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी खाणं आवश्यक होतं. म्हणून मी गरम सूप मागवलं. आणि सिनॅमोन रोल सुद्धा. या रेस्टॉरंट मध्ये चक्क बेकरी आहे आणि छान छान पदार्थ ते तयार करतात. सिनॅमोन रोल होता चांगलाच, पण मी जेमतेम अर्धा खाऊ शकलो. सूप तेवढं संपवलं.

थोरोंग फेडी ते मुक्तिनाथ हा खूप मोठा टप्पा आहे. त्यातही थोरोंग ला या खिंडीत सकाळी लवकर पोचलेलं चांगलं कारण नंतर तिथे जोरदार वारं सुटतं अशी माहिती आधीच वाचलेली होती. त्यामुळे बरेच ट्रेकर्स इथनं पहाटे ३ लाच निघतात. त्यामुळे इथे पद्धत अशी आहे की पहाटेच्या नाश्त्याची ऑर्डर रात्रीच द्यायची. आणि पूर्ण बिल रात्रीच देऊन टाकायचं.

अदोनीसही म्हणाला की आम्ही ४ वाजता निघणार. मला मात्र केवळ हाय कॅम्प गाठायचा असल्याने इतक्या पहाटे निघायची काहीच गरज नव्हती. मग त्याला शुभेच्छा देऊन उरलेला सिनॅमोन रोल घेऊन खोलीवर गेलो. आणि शांत झोपलो.

 

२६ एप्रिल २०२४

पहाटे ३-३।। लाच जाग आली. आजूबाजूच्या खोलीतील लोक उठून जायची गडबड करत होते, त्यांच्या आवाजामुळे. शेवटी ४ वाजता उठून मी पण चहा प्यायला रेस्टॉरंट मध्ये गेलो. अदोनीस आणि सोफिया ४ वाजता निघणार होते पण प्रत्यक्षात मी चहा प्यायला गेलो तेव्हा ते नाश्ता करत बसले होते. मला तर काहीच घाई नव्हती. चहा पीत इतरांची घाई गडबड बघत बसलो. अदोनीस-सोफियाला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. परत खोलीवर गेलो पण आता पुन्हा झोपणं काही शक्य नव्हतं.

प्रचंड थंडीत सकाळचे महत्वाचे कार्यक्रम कसेबसे आटोपले. इथे पाणी नसतं. बर्फ असतं. दिवसासुध्दा तपमान शून्याखाली असतं, रात्री किंवा पहाटेचं तर विचारूच नका. तेव्हा टॉयलेट पेपरचा वापर अपरिहार्य.

निघायची घाई नव्हती पण थांबून तरी करायचं काय? भूक अजिबात नव्हती तरी कालचा उरलेला सिनॅमोन रोल खाल्ला. आणि ६ वाजता निघालोच.

थोरोंग फेडी हॉटेलमधून बाहेर पडलो की लगेचच चढ सुरु होतो. तीव्र चढ. संपूर्ण ट्रेक मार्गात इथे सर्वात तीव्र चढ आहे. त्यातच हवा विरळ, त्यामुळे चालण्याचा वेग चांगलाच कमी झाला होता. पण मला आज खूप छोटासा पल्ला गाठायचा होता, आणि घाई तर अजिबात नव्हती. हळू हळू पावलं उचलून पुढे टाकत होतो. चार पावलं गेलो न गेलो तेवढ्यात मागून अदोनीसची hello again Pramod अशी हाक आली.
अरेच्चा! मला वाटलं तुम्ही तर तासाभरापूर्वीच गेला असाल?
तसा अदोनीस सोफियाकडे बघायला लागला. आणि म्हणाला निघे निघेपर्यंत ६ वाजून गेले. सोफियानी उशीर लावला असं तो शब्दात म्हणला नाही, पण त्याची बॉडी लँग्वेज स्पष्ट सांगत होती. घरोघरी मातीच्या चुली!

“काही हरकत नाही” असं मी त्यांना म्हणालो खरं, पण ते दोघं खिंडीत केव्हा पोचतील याचं गणित मी मनातल्या मनात करायला लागलो. जे आज खिंड ओलांडणार होते (म्हणजे मी सोडून बहुतेक सगळे) ते केव्हाच निघून गेले होते. थोरोंग फेडी हॉटेल रिकामं पडलं होतं. आणि हे दोघं आत्ता निघताहेत. पण असो.

त्या दोघांची चालण्याची गती सुरुवातीला माझ्यासारखीच होती त्यामुळे सगळे बरोबर हळूहळू जात राहिलो. पण लवकरच लक्षात आलं की सोफिया फारच लवकर दमते आहे. दर २०-२५ पावलानंतर तिला विश्रांतीसाठी थांबावं लागत होतं. माझा प्रॉब्लेम वेगळा होता. दर वेळी थांबून पुन्हा चालायला सुरुवात केली की माझा वेग आधी अति हळू असायचा. आणि थोड्या वेळानी हळू हळू वाढत वाढत जरा बरा व्हायचा. सोफियासाठी सतत थांबे घेणं मला परवडणार नव्हतं. शेवटी मी त्या दोघांना माझा प्रॉब्लेम समजावून सांगितला आणि मग मी हळू हळू पुढे जात राहिलो.

म्हणजे मी विनाथांबा सलग चढत होत असं नाही. मी पण थांबत थांबत जात होतो, पण त्यांच्यापेक्षा कमी वेळा.
थांबायचं म्हणजे एखादा खडक पाहून बसायचं. पाठीवरचं ओझं उतरवून ठेवायचं. २ घोट गरम पाणी प्यायचं. ५ मिनिटं बसायचं. मग पुन्हा चालू …

थोरोंग फेडी ते हाय कॅम्प अगदी खडी चढण आहे. हाय कॅम्प कुठे दिसत नाही. त्यामुळे अजून किती अंतर बाकी आहे याचा काही अंदाज येत नाही. उलट मागे वळून खाली बघितलं तर आपण थोरोंग फेडीपासून किती उंच आलो ते कळतं. काल ज्या वाटेने मी थोरोंग फेडीला पोचलो ती वाट पण नदीपलीकडच्या डोंगरावर दिसत होती. पण अदोनीस-सोफिया सोडल्यास मनुष्यप्राणी मात्र कोणी नाही. एव्हाना त्यांच्या माझ्यातलं अंतर बरंच वाढलं होतं.

थोड्या वेळानी वाट किंचित उजवीकडे वळली. पुढे एक छोटीशी खिंड होती, तिथे वरती पताकांची माळ लावली होती. ते पाहून मात्र हाय कॅम्प जवळ आला असणार असं वाटायला लागलं. बौद्ध गुंफा, मठ किंवा धार्मिक स्थळाजवळ अशा पताकांच्या माळा नेहेमी असतात असं मी बघितलं होतं. हाय कॅम्प हे तर हॉटेल आहे, धार्मिक स्थळ नव्हे. कदाचित केवळ सुस्वागतम असा अर्थ असेल या माळांचा. हळू हळू चालत त्या छोट्या खिंडीत पोचलो तेव्हा हाय कॅम्पचं दर्शन झालं. मागं वळून अदोनीसला हाक मारून ही सुवार्ता दिली.

हाय कॅम्प समोरच दिसत असला तरी हळू हळू चढत तिथे पोचायला आणखी १० मिनिटं लागली. ७।। वाजले होते. दीड तास लागला इथे पोचायला! थोरोंग फेडी ते हाय कॅम्प हे अंतर जेमतेम दीड किमी आहे, आणि उंचीत फरक ३५० मी. तरी सुद्धा “१ ते २ तास लागतात” असं मी वाचलं होतं. आणि ते मला खरं वाटत नव्हतं. दीड किमीला इतका वेळ कसा लागेल? पण लागतो. हे आत्ता कळलं. कारण एकतर खडी चढण आहे, आणि विरळ हवा.

केवळ दीड तासात माझी आजची चाल पूर्ण झाली होती. मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो होतो. नेहेमी मी ७-७। ला चालायला सुरुवात करत होतो, पण आज तर ७।। वाजता मी मुक्कामी पोचलो होतो!

पोचलो खरा पण हाय कॅम्प हॉटेल मध्ये काही जाग दिसेना. हाय कॅम्पहून लोकं पहाटे ५ च्या आधीच निघून जातात हे माहिती होतं. पण हॉटेल चालक - मालक तरी असायला पाहिजेत?

हाय कॅम्प हॉटेल म्हणजे ५-६ स्वतंत्र बसक्या इमारती. त्यातील एक रेस्टॉरंट. बाकीच्या इमारतीमंध्ये ट्रेकर्ससाठी खोल्या.
कुठेही कुणी मनुष्यप्राणी दिसेना. शेवटी एका कट्ट्यावर बसलो. पाठपिशवी उतरवून पाणी प्यायलो. तेव्हा कुठं हॉटेल मालक रेस्टॉरंटचं दार उघडून बाहेर आला. त्याच्याकडून कळलं की रेस्टॉरंट आणि खोल्यांचीपण स्वच्छता सुरु आहे. तेव्हा लगेच आत जात येणार नाही. किमान अर्धा तास तरी लागेल म्हणे.
लागू द्या की. मला कुठे घाई आहे? मला तर आता पूर्ण दिवस मोकळाच आहे.

तेवढ्यात अदोनीस-सोफिया येऊन पोचले. एव्हाना ८ वाजले होते. सोफियाची अवस्था पाहून मला वाटलं की हे पण आता विचार बदलून इथेच मुक्काम करणार. पण त्यांचा निश्चय पक्का होता: आजच थोरोंग ला खिंड ओलांडून मुक्तिनाथ गाठायचं. सोफियाची अवस्था पाहून “आज इथेच विश्रांती घेऊन उद्या सकाळी जा” असं म्हणावसं मला वाटत होतं. पण मी तो मोह टाळला. उगाच कुणाला अनाहूत सल्ला कशाला द्या? आणि ती दोघं काही लहान मुलं थोडीच आहेत. त्यांना कळतंय ना काय करावं ते.

सोफियाचं डोकं खूप दुखत होतं. माझ्याकडे क्रोसिन आहे हे तिला अदोनीसकडून कळलं होतं. तिनी माझ्याकडून गोळी मागून घेतली. पाच मिनिटं बसून ती दोघं निघालीसुद्धा.

इथून थोरोंग ला खिंड गाठायला तुमच्या फिटनेसनुसार २ ते ५ तास लागतात असंही वाचलेलं होतं. ८ तर वाजून गेले होते आत्ताच. ही दोघं खिंडीत पोचेपर्यंत १२ वाजून जाणार बहुतेक. आणि जसा दिवस वर येईल तसं खिंडीत प्रचंड वेगानी वारं वहायला लागतं म्हणे. दुसरं म्हणजे सर्व ट्रेकर्स केव्हाच पुढे गेले होते, म्हणजे या दोघांना काही मदत लागली तर कुणी भेटण्याची शक्यता नव्हती. खरं तर मला त्यांची थोडी काळजीच वाटत होती. पण इथपासून थोरोंग ला खिंडीपर्यंतच्या अर्ध्या वाटेत एक टी हाऊस आहे आणि शिवाय ऐन खिंडीत पण एक आहे हे माहिती होतं. तशीच वेळ आली तर त्या २ ठिकाणी त्यांना मदत मिळू शकली असती कदाचित. देव त्यांचं भलं करो!

तेवढयात हॉटेल मालकांनी रेस्टॉरंट उघडल्याची शुभवार्ता दिली. काही खोल्यापण स्वच्छ करून झाल्या होत्या, त्यामुळे पाठपिशवी खोलीत टाकून मग रेस्टॉरंटमध्ये येऊन बसलो. गरम चहा पीत. काचेच्या खिडकीतून बाहेरचं सौन्दर्य बघत. स्वर्गसुख!

या ट्रेकमार्गावर आत्तापर्यंत जिथे जिथे मुक्काम केला तिथे WiFi Internet सुविधा फुकट मिळत होती. हाय कॅम्प मात्र त्याला अपवाद. इथे त्यासाठी १०० रु मोजावे लागतात. त्यानंतर घरच्यांशी संवाद होऊ शकला.

आज चालणं कमीच झालं होतं आणि वेळही होता. म्हणून हॉटेल मागे एक उंचवटा आहे तिथे गेलो. म्हणजे हे ठिकाण:
https://maps.app.goo.gl/dthS88v8znPkUHjq6
इथून आजूबाजूचा बराच परिसर छान दिसतो. खालचं थोरोंग फेडी हॉटेलपण दिसतं. पण वारं सुटलं होतं म्हणून जास्त वेळ थांबलो नाही. खाली येऊन पुन्हा रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलो.

तिलीचो हॉटेलप्रमाणे इथेपण बरीच पुस्तकं होती. मी Lord of the rings घेऊन बसलो. एव्हाना आणखी काही ट्रेकर्स येऊन पोचले होते. खोलीपेक्षा रेस्टॉरंट उबदार असल्याने बहुतेक लोकं इथेच पडीक असतात. नुसतंच गप्पा मारत किंवा पुस्तक वाचत बसायचं. अधून मधून चहा.

दुपारपर्यंत नाना देशाचे ट्रेकर्स इथे येऊन पोचले. एक फ्रेंच जोडपं. एक डच महिला आणि तिचा गाईड. ५-६ ऑस्ट्रेलियन मित्र मैत्रिणी. एक अमेरिकन कुटुंब. म्हणजे एक १२ वर्षांचा मुलगा आणि त्त्याच्याबरोबर त्याची आई आणि मावशी शोभतील अशा २ महिला. त्यांचे नातेसंबंध खरे काय होते कोण जाणे. असे अनेक.

कालचा दिवसभर खाणं खूप कमीच झालं होतं. आज सकाळीपण नाश्ता केलाच नव्हता - थोडासा सिनॅमोन रोल तेवढा खाल्ला होता. आता जरा भूक लागल्यासारखं वाटत होतं. पण तरी दाल भात पूर्ण खाऊ शकेन असं वाटत नव्हतं. काल मॅश्ड पोटॅटोज विथ चीझ जेमतेम दोन चमचे खाऊ शकलो. आज काय घ्यावं? मी पिझ्झा मागवला. गरम पिझ्झा समोर आल्यावर आणखी भूक लागली. पिझ्झा छानच होता. पण जेमतेम एक चतकोर खाल्ला आणि मला पोट भरल्याची भावना झाली. पण अन्न वाया घालवायचं नाही ही लहानपणापासूनची शिकवण. पाऊण पिझ्झा असाच कसा सोडून द्यायचा? म्हणून नेटानी खात राहिलो. आणखी एक चतकोर खाल्ल्यावर मात्र मी शरणागती पत्करली. आणखी जास्त खाणं शक्यच नव्हतं. हा सगळा विरळ हवेचा परिणाम असावा. कारण पिझ्झा तसा लहानच होता. एरवी मी इतका पिझ्झा एकट्याने अगदी आनंदानी खाल्ला असता. आज मात्र अर्धा कसाबसा खाऊ शकलो. शेवटी हॉटेल मालकाला सांगितलं की पिझ्झा खूप चांगला आहे, पण माझं पोट भरलं; मी पूर्ण संपवू शकत नाही. त्यानी काही फारशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याला बहुतेक सवय असावी अशा प्रसंगांची. पण त्यानी पिझ्झाची ताटली उचलूनही नेली नाही. असो. मी ती नुसती थोडी पुढे ढकलली आणि पुस्तक वाचत बसलो.

शेजारी फ्रेंच बाई नवऱ्याच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती. थोड्या वेळानी ती उठली. तेव्हा फ्रेंच बुवानी त्याचा मोबाइल माझ्या डोळ्यासमोर धरला. त्याने गूगलच्या मदतीने फ्रेंच वाक्य इंग्रजीत भाषांतर केलं होतं: Are you going to save the pizza for later? If not, can I eat it? हा प्रकार मला अनपेक्षित होता. पण मी अर्थातच आनंदानी होकार दिला. नवरा बायकोनी मिळून पिझ्झा संपवला तेव्हा मला अन्न वाया गेलं नाही याचं समाधान वाटलं!

रेस्टॉरंट जरी उबदार असलं तरी तिथे खूप वेळ बसून पाठ दुखायला लागली. कारण तिथे खुर्च्या नाहीत, नुसती बाकं आहेत. पाठ टेकायची सोय नाही. म्हणून मग खोलीत जाऊन थोडा वेळ पडलो. दुपारी झोपायची सवय नसल्यानी झोप काही लागली नाही. पण थंडी मात्र प्रकर्षाने जाणवली. स्वेटर घालून, ब्लँकेट घेऊन पहुडल्यावर बरं वाटत होतं, पण पाय मात्र गारठले होते. इतके दिवस जी वापरायला लागली नव्हती ती थर्मल पॅन्ट आज घालावी लागली. शिवाय पायातही एकावर एक असे २ मोजे घातले तेव्हा थोडं बरं वाटलं.

तास दोन तास आराम करून पुन्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो तेव्हा तर आणखी अनेक ट्रेकर्स येऊन रेस्टॉरंट जवळ जवळ पूर्ण भरलं होतं. एव्हाना राज-संगीता पण तिथे येऊन पोचले होते. शिवाय इतर अनेक ट्रेकर्स. इस्राएलमधून आलेला एक मोठा समुदाय खूप मोठ्यांनी अगम्य बडबड करत होता. आणि एक चिनी घोळका पण. त्यातच एक ऑस्ट्रेलियन मुलगा गिटार वाजवून गाणी म्हणत होता. असा सगळा उत्साही गलबला होता.

लोकांच्या बोलण्यातले बरेचसे शब्द कळत नव्हते पण हावभावावरून अर्थ अंदाजे कळत होता. अर्थात अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन लोकांचं बोलणं थोडंफार कळत होतं.

अमेरिकन मुलगा गॅसेस झालेत म्हणून तक्रार करत होता. हापण विरळ हवेचाच एक साईड इफेक्ट. तर संगीता त्याला कोणती योगासने केल्याने वायू सुटून जातो हे शिकवत होती. म्हणलं इथं नको रे बाबा, स्वतःच्या खोलीत जाऊन कर.

बरेच जण उद्याच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होते. किती वाजता निघायचं? नाश्ता करून जायचं की डबा भरून घेऊन जायचं? दुपारच्या जेवणाचं काय? वाटेत स्नो असेल का? किती वाजेपर्यंत थोरोंग ला खिंड गाठणं आवश्यक / सुरक्षित आहे?
११ वाजायच्या आधी खिंडीत पोचलंच पाहिजे असं सर्वसाधारण मत होतं. कारण नंतर खूप जोरदार वारं सुटतं. बहुतेक लोकांप्रमाणे मीपण ४ वाजता उठून चालू लागायचं असं ठरवलं.

भूक अजिबात नव्हती तरी ऊर्जेसाठी काही तरी खायला हवं. म्हणून मी थुक्पा मागवला. हे तिबेटी पद्धतीचं सूप असतं. मला आवडलं.

हाय कॅम्प आणि कालचं थोरोंग फेडी यांचं सामायिक वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीकडे वीज नाही. रेस्टॉरंटमधील दिवे, वायफाय राउटर वगैरे सगळं सोलरवर चालतं. त्यामुळे खोलीत दिवे नसतात. आपण आपला हेड टॉर्च लावून वावरायचं. कॉमन टॉयलेटमध्ये दिवा असतो पण बॅटरीचा चार्ज कमी झाला की तोही बंद.

त्यामुळे थुक्पा खाऊन हेड टॉर्च लावून खोलीत पोचलो. आता तर अजून जास्त गार झालं होतं. त्यामुळे साडेआठच झाले होते तरी ब्लॅंकेट ओढून बिछान्यात पडलो. केव्हा झोप लागली कोण जाणे.

२७ एप्रिल २०२४

चार वाजता गजर वाजला. चाचपडत हेड टॉर्च चालू केला. डोक्याला लावला. बूट घातले. बाहेर येऊन बघतो तर बरीच चहल पहल होती. माझ्या आधी बरेच जण उठलेले होते. कुणी टॉयलेटच्या दारात थांबून आतला बाहेर येण्याची वाट बघताहेत. कुणी नळाला पाणी कसं येत नाही म्हणून आश्चर्य वाटून घेत होते. कसं येणार? सगळं गोठलेलं होतं. तपमान -९ होतं म्हणे. काही जण रेस्टॉरंटकडे जात होते. काही तर तयार होऊन थोरोंग ला खिंडीकडे निघालेले दिसत होते. म्हणजे माणसं दिसत नव्हती, पण त्यांच्या डोक्यावरचे हेड टॉर्च त्या दिशेने चालत होते. ते पाहून आपण खूप उशीर केला की काय असं वाटून गेलं. पण ६ वाजेपर्यंत निघालो तरी चालेल असं अनुभवी लोकांकडून ऐकलेलं होतं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, जाऊ सावकाश.

तसंही टॉयलेटच्या रांगेत अनेक जण असल्याने बऱ्यापैकी वेळ गेलाच. सगळं आटोपून रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिथे ही धांदल. अनेक जण एकदम आले आणि सगळ्यांनाच निघायची घाई. त्यामुळे स्वयंपाकी लोकं पटापट पदार्थ तयार करत होते. आणि ट्रेकर्स बरोबरचे पोर्टर ते पदार्थ ट्रेकर्सपर्यंत पोचवत होते.

मला बसायला कशीबशी जागा मिळाली. काल परवाच्या अनुभवावरून मी खायला काहीच मागवलं नव्हतं आणि खायची इच्छा पण अजिबात नव्हती. मी नुसताच चहा सांगितला होता. पण तोही मिळायला वाट बघावी लागली.

आज मोठा पल्ला गाठायचा होता. शिवाय नाश्ता केलेला नव्हता. म्हणून खायला काही तरी बरोबर घेऊन जाणं आवश्यक होतं. एक चॉकलेट आणि छोटा बिस्कीट पुडा घेतला. आणि निघालो खिंडीकडे!

पाच वाजले होते. अंधार होता. पण हेड टॉर्चचा प्रकाश पुरेसा होता. कालच्यासारखंच हळू हळू पावलं टाकत सुरुवात केली. काही पावलांनंतर डावीकडे वळण. वळल्यावर हाय कॅम्प दिसेनासा झाला. अचानक लक्षात आलं वाटेच्या डाव्या बाजूला बर्फ आहे. पण नशीब वाटेवर नव्हता.

थोड्या वेळानी उजवीकडे वळण. पण वळल्यानंतर वाटेच्या कडेला बर्फ नव्हतं.

वाट अशीच नागमोडी होती. प्रत्येक वळणानंतर आलटून पालटून बर्फ असायचं किंवा नसायचं. अरेच्चा! चमत्कारच म्हणायचा. असो. मी आपला हळू हळू पुढे जात होते. माझ्या पुढे चालणाऱ्या ट्रेकर्सचे दिवे दिसत होते.

एका वळणानंतर मात्र वाट पूर्ण बर्फात बुडलेली होती. मग थांबणं भाग होतं. पिशवीतून मायक्रो स्पाईक्स बाहेर काढले. ते वापरायची वेळ आता आली होती. बूट त्यात अडकवण्यासाठी थोडी खटपट करावी लागली. पण जमलं शेवटी. मग बर्फात पाय घातला. सुदैवानी बर्फाचा थर फार जाड नव्हता. पण बर्फामुळे चाल मात्र अजून हळू झाली.

एव्हाना उजेड वाढला होता. दूर अंतरावर छोटा पूल दिसत होता. तिथपर्यंत वाटेवर बर्फच बर्फ. पुलानंतर उजवीकडे वळण. मग बर्फ गायब!

तेव्हा माझी ट्यूब पेटली. उत्तराभिमुख उतारांवर ऊन पडत नाही, त्यामुळे त्यांच्यावरचं बर्फ वितळत नाही. याउलट दक्षिणाभिमुख उतारांवर सतत (म्हणजे दिवसा) ऊन असतं, त्यामुळे त्यांच्यावरचं बर्फ वितळून गेलं होतं. म्हणून प्रत्येक वळणानंतर आलटून पालटून बर्फ असायचं किंवा नसायचं.

या वाटेत कायम डावीकडे डोंगर आणि उजवीकडे उतार / दरी आहे. काही ठिकाणी उजवीकडे दगडं रचून कठडा केलेला होता.

आता सूर्याचा उजेड आल्यामुळे हुरूप वाढला. हेड टॉर्च बंद. पण सूर्य उगवला म्हणून थंडी काही लगेच जात नसते. चांगले हातमोजे घातले होते तरी आत हातांची बोटं गारठली. थांबून जाकिटाच्या खिशात हात खुपसून ठेवले थोडा वेळ. पण असं दर थोड्या वेळानी करावं लागत होतं. शिवाय कोरड्या हवेमुळे घशाला कोरड पडत होती. थांबून घोटभर पाणी प्यायचं आणि पुन्हा चालू लागायचं. अचानक थोड्या अंतरावर टी हाऊस दिसलं. “ते पाहून हुरूप आला आणि चहाच्या आशेनं पावलं झपझप पडायला लागली” असं घडणं अपेक्षित होतं. पण तसं काही झालं नाही. म्हणजे हुरूप आला. पण पावलं झपझप टाकणं मात्र शक्य नव्हतं. ती आपली हळूहळूच जात होती.

सूर्य उगवला असला तरी थंडी कमी व्हायच्या ऐवजी वाढतच होती. कारण मी उंच उंच जात होतो. त्या छोट्याश्या टी हाऊसमध्ये प्रवेश केल्यावर जरा उबदार बरं वाटलं. मस्त गरम चहा प्यायलो. चहाबरोबर बिस्कीट मात्र खावंसं वाटेना. पण चहा पिऊन बरं वाटलं.

तिथे काही पोर्टर होते. आणि काही खेचरे आणि त्यांचा मालक. म्हणजे कुणाबरोबर पोर्टर नसेल आणि ओझं असह्य झालं असेल तर इथे पोर्टर सेवा उपलब्ध होती. किंवा ज्यांना अजिबात चालणंच जमत नसेल त्यांच्यासाठी खेचर स्वारी हा पर्याय उपलब्ध होता. अर्थात या दोन्ही सेवा महाग होत्या. पण अडले नारायण ५००० नेरु मोजून खेचरांच्या पाठीवर बसून जात होते. ५००० रुपयात या टी हाऊसपासून थोरोंग ला खिंडीपर्यंत.

मला अदोनीस-सोफियाची आठवण झाली. काल कदाचित सोफिया खेचरावर बसून गेली असेल का? असो. पुन्हा एकदा देव त्यांचं भलं करो.

माझा काही या सेवांचा लाभ घ्यायचा इरादा नव्हता. चहा पिऊन माझा उत्साह रिचार्ज झाला होता. त्यामुळे मी पुन्हा चालायला लागलो. अमेरिकन मुलगा माझ्यापुढे काही अंतरावर एकटाच चालताना दिसला. तो अस्सल अमेरिकनांसारखा चांगला खात्या पित्या घरचा होता. पण तरी न दमता चालत होता छान. त्याची आई-मावशी (?) मात्र मागे राहिल्या होत्या.

डाव्या बाजूचे डोंगर पूर्णपणे बर्फाच्छादित होते. उन्हामुळे बर्फाचा वरचा थर थोडा थोडा वितळू लागला होता त्यामुळे ते ओले होऊन चकाकत होते. वाटेवरचे बर्फ मात्र एव्हाना गायब झाले होते. नुसती माती. खडक क्वचितच.

कालच्या मानाने आज सौम्य चढ होता.

संपूर्ण वाटेत ठराविक अंतरावर खांब होते. वाट नेमकी कुठे आहे ते कळावे म्हणून. २०१४ साली इथे प्रचंड बर्फवृष्टी होऊन वाट दिसेनाशी झाली होती आणि कित्येक ट्रेकर्स मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर हे खांब उभे केलेले होते. हे मला आधीच वाचून माहिती होते. म्हणूनच तर मी एकट्याने, विना गाईड यायचं धाडस केलं.

चालणं थांबणं असं करत करत पुढे पुढे जात होतो. दूरवर दिसणारा खांब पाहून त्या खांबाशी पोचलो की ब्रेक घ्यायचा असं मी ठरवायचो. असाच एकदा थांबलो असताना २ गाईड भेटले. मला म्हणतात, काका तुम्ही एकटे कसे आलात? बर्फ जास्त असतं तर तुम्हाला वाट नसती सापडली. मग मी त्यांना खांब दाखवले, तेव्हा ते निरुत्तर झाले. मी एकटाच आलो याचं त्यांना कौतुक तर वाटत होतं पण त्याच वेळी मी गाईड नाही घेतला हे त्यांना आवडलं नव्हतं. असो.
पण त्याच गाईडनी मला मायक्रो स्पाईक्स काढून टाकायचा सल्ला दिला. “आता मुक्तिनाथ पर्यंत कुठेही (वाटेवर) बर्फ नाही” अशी माहिती दिली त्यानी. मायक्रो स्पाईक्स काढल्यावर खरंच चाल जरा सुधारली.

मागच्या टी हाऊस जवळ दिसलेला अमेरिकन मुलगा केव्हाच पुढे दिसेनासा झाला होता. त्याच्यापेक्षा माझा वेग बराच कमी होता. अर्थात माझ्यापेक्षाही हळू जाणारे होतेच.

मी आपला खांब-थांब करत हळू हळू जात होतो. वाट वळण वळणांची, त्यामुळे खूप दूरचं दिसत नाही. दूरवर अशाच एका वळणाजवळ दिसणारा खांब मी हेरून ठेवला होता. तिथे जाऊन थोडी विश्रांती घ्यायची.

आज कुठेही फार दमलो असं वाटत नव्हतं, निदान अजूनपर्यंत तरी. पण चालण्याचा वेग मात्र कमी झाला होता आपोआप. हळू हळू चालत त्या हेरलेल्या खांबापाशी पोचलो. तेव्हा वळणापलीकडचे दृश्य दिसले: चक्क थोरोंग ला खिंड दिसत होती! अवघ्या शे-दीडशे मीटरवर! अर्थातच ब्रेक घ्यायचा रद्द करून चालत राहिलो. आणि बघता बघता खिंडीत पोचलो!

हा ट्रेकचा हायलाइट. सर्वोच्च बिंदू. ५४०० मी. चक्क मी पोचलो तिथे!

Thorong_la1.jpeg

तिथे तर खूपच उत्साही वातावरण होतं. सगळे जण खिंड गाठल्याचा आनंद साजरा करत होते. आनंदाने चित्कारत होते. फोटो काढत होते. मीपण काढून घेतला एकाकडून.

अमेरिकन मुलगा बहुतेक बराच आधीच पोचला होता. आणि आई-मावशीची वाट बघत बसून होता.

काल हाय कॅम्पमध्ये भेटलेले दोन मोठे ग्रुप - एक ऑस्ट्रेलियन आणि एक इस्रायली - चक्क नाचत होते. इथे शॅम्पेन मिळायची सोय असती तर या लोकांनी नक्की कारंजं उडवलं असतं.

शॅम्पेन नाही पण चहा मात्र मिळतो इथे. ऐन खिंडीत एक छोटंसं टी हाऊस आहे. सर्वोच्च बिंदूला पोचून गरम चहा पिणे म्हणजे सर्वोच्च आनंद. मस्त वाटलं. एकट्याने - तेही विना गाईड, विना पोर्टर - ट्रेक करायचं ठरवलं तेव्हा खूप लोकांनी वेड्यात काढलं. घरच्यांना पण काळजी वाटत होती. मला आत्मविश्वास होता, तरी इतक्या लोकांचं बोलणं ऐकून किंचित शंकापण वाटत होती. जमेल का? जमलं! थँक यू देवा!

मी हाय कॅम्पहुन निघताना एक लिटर गरम पाणी भरून घेतलं होतं, पण ते एव्हाना संपलं होतं . या छोट्या टी हाऊसमध्ये बाटली पुन्हा गरम पाण्यानी भरून घेतली.

मागच्या टी हाऊस पासून ज्यांनी खेचर स्वारी केली होती ते इथे खिंडीत उतरतात. खेचरं (त्यांच्या मालकासकट) इथून माघारी जात होती.

सर्वोच्च बिंदू गाठला म्हणजे ट्रेक पूर्ण झाला असं नाही. इथून मुक्तिनाथपर्यंत अजून ८ किमीची चाल होती. आणि तब्बल १६०० मी उतरायचं होतं. शिवाय इतक्या उंचावर, विरळ हवेत खूप वेळ थांबणं बरं नाही. त्यामुळे साडेनऊला मी निघालो आणि चालायला लागलो. खिंडीच्या पलीकडच्या बाजूला बरंच बर्फ साठलं होतं, त्यामुळे थोडा वळसा घालून मग वाटेला लागलो.

आता उतार. म्हणजे मज्जा. आता वेग वाढेल आणि बघता बघता मी मुक्तिनाथ गाठेन, असं मला वाटत होतं. सुरुवात खरंच तशी झाली. त्यामानाने सौम्य उतार होता आधी. तेव्हा बऱ्यापैकी झपझप चालत होतो. साधारण अर्धा तास चालल्यावर मात्र दमलो. उतार असला तरी विरळ हवेमुळे दमायला होत होतं. तेव्हा थांबलो. थांबत थांबतच जावं लागणार असं लक्षात आलं. त्यानंतर थोडं हळूहळूच चालायला लागलो.

एका छोट्या पठारावर दोन चिनी महिला आणि त्यांचा गाईड भेटले. म्हणजे दिसले. विश्रांती घेत थांबले होते. मी त्यांना रामराम करून पुढे जाताना त्यांचा संवाद ऐकू आला. त्या दोघी थकल्या होत्या. आणि गाईडला म्हणत होत्या की आमच्यासाठी खेचरं घेऊन ये. गाईड मात्र तयार नव्हता. त्याचंही बरोबर होता. कारण खेचरं आणण्यासाठी त्याला पुन्हा वर चढून खिंड गाठून पुन्हा मागच्या टी हाऊस पर्यंत खाली जावं लागलं. त्याचं म्हणणं होतं की आता तर उतारच आहे, मग कशाला खेचर पाहिजे तुम्हाला? माझ्याकडे बोट दाखवून म्हणतो - तो बघा कसा चाललाय पटापट. खरं तर मी हळूहळूच चालत होतो पण त्यानी मला पटापट सर्टिफिकेट देऊन टाकलं. असो.

हळू हळू उताराची तीव्रता वाढते आहे असं लक्षात आलं. एका ठिकाणी वाटेला Y फाटा आहे असं वाटलं दुरून. पण जवळ गेल्यावर कळलं की उजवीकडे रस्ताच नाहीये, डावीकडे वळणं भाग आहे. वळलो. पण त्यापुढे खूपच तीव्र उतार होता. पायाच्या बोटांवर खूप दबाव येऊन ती दुखायला लागली. तेव्हा आठवलं की मी एकावर एक दोन पायमोजे घातले आहेत. थांबून एक मोजा काढून टाकला. शिवाय बूट थोडा सैलच बांधला. त्यानी थोडी सुधारणा झाली पण तरी उतार तीव्र असल्यानं पायाची बोटं दुखतंच होती.

माझ्याकडे दोन हायकिंग पोल्स होते. म्हणजे काठ्याच खरं तर, पण हलक्या. शिवाय त्यांची लांबी कमी जास्त करता येते. मी जवळ जवळ ट्रेकच्या सुरुवातीपासून त्यांचा वापर करतच होतो. पण इथे उतारावर तर त्यांचा खूपच उपयॊग होत होता. किंवा खरं तर त्या काठ्यांशिवाय हे उतरणं जमलंच नसतं. आता उतार असल्याने मी काठ्यांची लांबी शक्य तितकी वाढवली. पण तरी ती कमीच पडत होती. त्यामुळे मी पुढे झुकून काठ्या टेकवायचो आणि मग पाय उचलून पुढे टाकायचो. अचानक माझा तोल गेला आणि मी अनियंत्रित वेगानी खाली जाऊ लागलो. पडू नये म्हणून पाय आणि काठ्या पटापट टेकवत होतो पण ताबा सुटल्यासारखा वेगानी खाली खाली जात होतो. १५-२० अनियंत्रित पावलांनंतर कसा बसा स्वतःला थांबवू शकलो. हादरलो. केवळ नशीब म्हणून पडलो नाही. नाही तर कोलांट्या उड्या घेत कुठे गेलो असतो कोण जाणे. बाप रे! थांबल्यावर पटकन खाली मातीत बसलो. पाठपिशवी काढून ठेवली. छातीत धडधडत होतं. ५ मिनिटं नुसता बसलो. मग पाणी प्यायलो. तेव्हा जरा शांत झालॊ.

मग मला माझी चूक कळली. पाठीवर जवळ जवळ ९ किलो वजन घेऊन, तीव्र उतारावर मी पुढे झुकून चालत होतो. हा केवढा मूर्खपणा आहे! पण मी तो केला. आणि झटका बसल्यावर आता ते कळतं आहे. छे छे! मला आधीच का नाही कळलं? मी मोठी चूक करत होतो. पण सुदैवानी त्याची मोठी शिक्षा नाही मिळाली.

त्यानंतर मात्र मी सुधारलो. न झुकता, सरळ उभं राहूनच चालायला लागलो. त्यामुळे (आणि काठ्यांची लांबी पुरेशी नसल्याने) पावलं छोटी टाकावी लागत होती. हरकत नाही. पडण्यापेक्षा हळू हळू गेलेलं बरं.

आणखी एक बरं झालं. माझा स्वतःवरचा ताबा सुटला होता तेव्हा पुढे आणि मागे कुणीही दृष्टीक्षेपात नव्हतं. म्हणजे झालेली फजिती कुणी बघितली नव्हती!

आता खरं तर भूक लागली होती. तरी बिस्कीट काही खावंसं वाटेना. एका ठिकाणी थांबून चॉकलेट तेवढं खाल्लं. पाणी प्यायलो. निघालो. पुढे काही अंतरावर वाट लुप्त होतेय असं वाटत होतं. तिथे पोचल्यावर कळलं की वाट थोडी वळून एकदम खाली खाली जातेय, म्हणून पुढची वाट दिसत नव्हती. त्याच ठिकाणी एका मोठ्या खडकावर ॐ लिहिलेलं होतं. तिथून दिसलं की आणखी थोडं खाली गेल्यावर २-३ टी हाऊस आहेत! तिथे जरा ब्रेक घ्यावा असं ठरवून टाकलं.

हळू हळू पोचलो टी हाऊसला. आणि नीट खुर्चीवर बसलो. तेव्हा कळलं की खूप दमलोय आपण!

या ठिकाणाची उंची सुमारे ४२०० मी होती. म्हणजे खिंडीपासून १२०० मी खाली आलो तर.
एक वाजला होता एव्हाना. इथेही थंडीच होती. पण खूप वेळ उन्हात चालत होतो. शिवाय दिवसभर गरम पाणीच पीत होतो. म्हणून मग तिथे गार ऍपल ज्युस प्यायलो. बरं वाटलं. भूक होती पण तरी काही खावं वाटेना.

इथपासून मुक्तिनाथपर्यंत गाडी रस्ता होता. म्हणजे मातीचा खडबडीत रस्ता. जेमतेम मोटर सायकल जाऊ शकेल असा. त्यामुळे इथपासून मुक्तिनाथपर्यंत मोटर सायकल किंवा घोड्यावरून जायची सोय होती. अर्थात महागडी सोय. पण इथून मुक्तिनाथ फक्त एक तासावर आहे. मग आता कशाला पाहिजे मोटर सायकल किंवा घोडा? म्हणून मी थोडा वेळ बसून पुन्हा चालायला लागलो.

विशेष म्हणजे त्यापुढे उताराची तीव्रता पण कमी झाली. त्यामुळे पायाच्या बोटांचं दुःख कमी झालं.

लवकरच एक झुलता पूल ओलांडला आणि खाली मुक्तिनाथ मंदिर दिसायला लागलं! अर्थात तिथे पोचायला १५-२० मिनिटं लागली. शिवाय मंदिर गावाबाहेर आहे. खाली उतरून गावात हॉटेलला पोचलो तेव्हा २ वाजून गेले होते. पहाटे ५ वाजता निघालेलो, दुपारी २ वाजता पोचलो. चांगलाच दमलो होतो. पण आता ट्रेक पूर्ण झाला होता!

चक्क ट्रेक पूर्ण झाला होता! कारण एकच: देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे!

माहिती:

अन्नपूर्णा सर्किट ट्रेकबद्दल भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण मला तरी त्यात मराठी काही सापडलं नाही. कारण फारशी मराठी माणसं या ट्रेकला जात नाहीत. एकूण भारतीयच फार कमी जातात. म्हणून स्वानुभवावरून थोडीफार माहिती इथे नोंदवत आहे. इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे (इंग्रजीमध्ये) त्याची पुनरावृत्ती टाळायचा प्रयत्न केला आहे, तरी संदर्भासाठी थोडी पुनरावृत्ती झालेली असू शकते.

१. इथे लिहितो आहे ती माहिती आज ना उद्या कालबाह्य ठरणारच आहे. म्हणून लक्षात घ्या की ही माहिती एप्रिल २०२४ मधील अनुभवावर आधारित आहे.

२. अन्नपूर्णा सर्किट ट्रेकला जाण्यासाठी परवाना, म्हणजेच ACAP (Annapurna Conservation Area Permit) घ्यावा लागतो. तसेच TIMS card सुद्धा घ्यावं लागतं असं नेपाळ सरकार म्हणतं. प्रत्यक्षात २०२० पासून TIMS कुणी मागत नाही. मला पण कुणी TIMS विचारलं नाही, पण परवाना (ACAP) मात्र वेळोवेळी तपासला जातो.

३. ACAP आणि TIMS हे दोन्ही काठमांडूमध्ये सरकारी कचेरीत जाऊन मिळवता येतात. मी मात्र एका माहितीतल्या ट्रेकिंग एजन्सीला आधीच माझ्या पासपोर्टची फोटो कॉपी पाठवली होती आणि त्यांना माझ्यासाठी ACAP आणि TIMS मिळवायला सांगितलं होतं. ते त्यांनी केलं आणि त्यांच्या माणसानी ते मला काठमांडू विमानतळावर आणून दिलं. त्यासाठी अर्थात त्यांनी सेवा शुल्क आकारलं पण त्यामुळे माझा वेळ वाचला. माझं विमान सकाळी १० वाजता काठमांडूला पोचलं आणि त्याच दिवशी मी बसनी बेसीसहरला पोचू शकलो.

४. ट्रेकसाठी बेसीसहरला जाणं अटळ आहे. तिथे जाण्यासाठी काठमांडूहून बस / मायक्रोबस मिळतात. आपण ज्याला मिनीबस म्हणतो त्याला तिकडे मायक्रोबस म्हणतात. ल्होत्से मॉल (https://maps.app.goo.gl/3JyuJpS293xFAqVE8) इथून या मायक्रोबस सुटतात. त्यांचं काही ठराविक वेळापत्रक नसतं. साधारणपणे मायक्रोबस भरली की सुटते. सकाळी ७ पासून या सुटत असतात. मी दुपारी एक वाजताच्या मायक्रोबसने बेसीसहरला गेलो. त्यानंतर आणखी उशीरा मायक्रोबस असतात की नाही हे नक्की माहिती नाही. काठमांडू बेसीसहर प्रवासाला ६ ते ८ तास लागतात. तिकीट ७२० नेपाळी रुपये (नेरु).

५. एके काळी अन्नपूर्णा सर्किट ट्रेक बेसीसहरलाच सुरु व्हायचा, कारण त्यापुढे गाडी रस्ता नव्हता. अजूनही पाहिजे तर तिथेच ट्रेकची सुरुवात करता येते आणि तुरळक लोक तसं करतातही. पण बहुसंख्य लोक जीपनी चामे गावापर्यंत जातात आणि चामेपासून ट्रेक सुरु करतात. मी तेच केलं. बेसीसहर ते मनांग या रस्त्यावर फक्त ४ व्हील ड्राईव्ह असलेल्या गाड्याच जाऊ शकतात. बेसीसहरहुन सकाळपासून या जीप सुटतात आणि प्रवासी आणि सामान घेऊन चामे किंवा मनांगपर्यंत जातात. बेसीसहर ते चामेसाठी माणशी ३५०० नेरु तिकीट घेतात. अंतर फक्त ६६ किमी असलं तरी प्रवासाला ४ तास लागतात. या जीपसाठी एक तथाकथित जीप तिकीट काऊंटर (https://maps.app.goo.gl/et4jP5LiFQ1es46RA) आहे, पण प्रत्यक्षात ते बहुतेक वेळा बंदच असतं. त्याच्या समोर रस्त्याकडेला रांगेनी जीप उभ्या असतात. थेट ड्रायव्हरला गाठून व्यवहार ठरवता येतो. मी चामेला ईगल आय (https://maps.app.goo.gl/VPLsgZWzZHH6LpmWA) नावाच्या हॉटेल मध्ये राहायचं आधीच ठरवलं होतं. त्याच्या मालकाचं नाव टेक. फोन नंबर google map मध्ये दिलेला आहे. मी त्याच्याशी व्हॉट्सअँपवरून संपर्क केला. त्या हॉटेलची जीप जवळ जवळ रोज बेसीसहरहुन चामेला जाते. मी त्याच जीपनी गेलो, ३५०० नेरु देऊन.

६. ट्रेकचा पहिला दिवस (चामे ते पिसांग) आपण गाडीरस्त्यानेच चालतो - काही छोटे पायवाटेचे शॉर्टकट वगळता. पण रस्त्याला वाहतूक अगदी तुरळक आहे आणि नदी, डोंगरांची साथ असल्याने चाल कंटाळवाणी होत नाही.

७. पिसांग ते मनांग वरच्या रस्त्याने गेलो तर पूर्ण डोंगरातील पायवाट आहे. सुंदर आहे, पण खडतर आहे. खालचा रस्ता म्हणजे गाडीरस्ता. त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग छान आहे, मधला काही भाग थोडा कंटाळवाणा वाटू शकतो.

८. अल्टीट्यूड सिकनेस बद्दल माहिती नीट समजून घेतल्याशिवाय हा ट्रेक कुणीही करू नये! त्याबद्दल भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, ती वाचा. काही जण अल्टीट्यूड सिकनेस होऊ नये म्हणून diamox ही गोळी घेतात. पण ती ३५०० मी उंची गाठायच्या २-३ दिवस आधीपासून सुरु करावी लागते. विरळ हवेचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यावर औषध म्हणून diamox चा उपयोग नाही!

९. अल्टीट्यूड सिकनेसचा धोका कमी करण्यासाठी मनांगला एक दिवस जादा मुक्काम अवश्य करावा. मनांगच्या आजूबाजूला भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण पावसामुळे कुठेच जाता आलं नाही तरी हॉटेलमधील मुक्कामही कंटाळवाणा होत नाही.

१०. अल्टीट्यूड सिकनेसचा बाऊ पण करायची गरज नाही. हा त्रास सगळ्यांना होतोच असं नाही. मी diamox किंवा कुठलीच गोळी घेतली नव्हती पण सुदैवानी मला काही त्रास झाला नाही. पण अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होत असताना हट्टाने अजून वर वर जाणं मात्र फारच धोक्याचं. त्रास होत असेल तर आहोत तिथेच एक दिवस विश्रांती घेऊन परिस्थिती सुधारली तर पुढे; अन्यथा न लाजता माघार घ्यावी.

११. मनांग सोडल्यानंतर कुठे कुठे मुक्काम करावा हे स्वतःचा फिटनेस जोखून आणि अल्टीट्यूड सिकनेसचा धोका ओळखून प्रत्येकानी आपापला निर्णय घ्यावा. मी निवडलेला मार्ग (म्हणजे ३ मुक्काम: याक खरका, थोरोंग फेडी आणि हाय कॅम्प) हा त्या मानानी सोपा आणि कमी धोक्याचा होता.

१२. मनांगनंतर थेट याक खरका / लेदारला न जात तिलीचो सरोवराला भेट देऊन जाता येते. पण त्यासाठी ३-४ दिवस जास्त लागतात. शिवाय तिलीचो बेस कॅम्प ते तिलीचो सरोवर ही जवळ जवळ १००० मी ची चढाई करण्यासाठी पुरेसा स्टॅमिना हवा. मी यावेळी तिलीचो सरोवराला गेलो नव्हतो, पण पुढच्या वेळी जाईन म्हणतो!

१३. बहुतेक सर्व टी हाउसेसमध्ये वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध असते. हाय कॅम्पचा अपवाद सोडल्यास बाकी सगळीकडे विनामूल्य असते (हाय कॅम्पला वीज नसल्यामुळे फोन चार्ज कारण्यासाठीपण १०० नेरु मोजावे लागतात). नेपाळी सिमकार्ड घ्यायचे असल्यास NTC ची सेवा या ट्रेकमार्गावर चांगली आहे.

१४. खर्च: बहुतेक सर्व टी हाउसेसमध्ये बेड फुकट आणि खाणं पिणं थोडं महाग असतं. चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळून १५०० ते ३५०० नेरु रोजचा खर्च होऊ शकतो. अर्थात तुम्ही काय खाता आणि काय पिता यावर ते अवलंबून आहे. मनांग येथील हॉटेल तिलीचो मात्र बेड साठी ५०० नेरु आकारतात. तसेच मुक्तिनाथ हे धार्मिक पर्यटन स्थळ असल्याने तिथे बेड फुकट ही कल्पना लागू पडत नाही.

१५. गूगल मॅपमध्ये शोधलत तर ट्रेकमार्गावरील सर्व गावात भरपूर टी हाउसेस आहेत असं दिसेल. बऱ्याच ठिकाणचे फोन नंबरपण दिसतात, पण फोन लागेलच असं नाही. व्हॉट्सअँप संदेश पाठवलात तर त्याला उत्तर थोड्या वेळानी येण्याची शक्यता जास्त. मी या मार्गावर खालील ठिकाणी मुक्काम केला होता:
चामे: ईगल आय हॉटेल (https://maps.app.goo.gl/VPLsgZWzZHH6LpmWA)
अप्पर पिसांग: हॉटेल रॉयल माऊंटन (https://maps.app.goo.gl/KfM935pSq1uGxR2G7)
मनांग: तिलीचो हॉटेल (https://maps.app.goo.gl/sB4qBDPWU9KpSyKu7)
याक खरका: हॉटेल याक (https://maps.app.goo.gl/ebrK6umnTXfAtiJm8)
थोरोंग फेडी: थोरोंग फेडी बेस कॅम्प लॉज (https://maps.app.goo.gl/dUdpC5LLdZZXuxBK7)
हाय कॅम्प: थोरोंग हाय कॅम्प हॉटेल अँड रेस्टॉरंट (https://maps.app.goo.gl/5g249yNLvBkciCGf7)
मुक्तिनाथ: हॉटेल डी पुरांग (https://maps.app.goo.gl/KsP4vDvh3jRMNUw77)
या बहुतेक सर्व ठिकाणी चांगला अनुभव आला:
हॉटेल रॉयल माऊंटन येथे सूर्योदयाला अन्नपूर्णा २ शिखराचं दृश्य उत्कृष्ट.
तिलीचो हॉटेलमधील वातावरण (ambience) खूपच आल्हाददायक.
हॉटेल याक येथून दरी व दरीतील नदीचं दृश्य बघतच रहावे असे.
फक्त थोरोंग फेडी बेस कॅम्प लॉज व थोरोंग हाय कॅम्प हॉटेल अँड रेस्टॉरंट येथील चालक / मालक थोडे उद्धट वाटले. किंबहुना त्यांची गोऱ्या ट्रेकर्सशी वागण्या बोलण्याची तऱ्हा वेगळी होती आणि भारतीय / चिनी लोकांशी वेगळी. बरेच गोरे ट्रेकर्स पेयपानावर पुष्कळ खर्च करत होते, आणि म्हणून कदाचित ते हॉटेल चालकांना जास्त प्रिय वाटत असतील. शिवाय त्या दोन हॉटेल्सची त्या दोन ठिकाणी मोनोपॉली आहे - ट्रेकर्सना मुक्कामाची दुसरी काही सोयच नाहीये. त्यामुळे त्यांना उद्धटपण करणं परवडतं; बाकी इतरत्र सगळे ट्रेकर्सचे प्रेमानी स्वागत करतात.

इच्छुकांना अन्नपूर्णा सर्किट ट्रेक सुरक्षित पूर्ण करता यावा आणि आनंददायी व्हावा ही शुभेच्छा!

चूकभूल देणेघेणे.

(समाप्त)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...