Monday, October 20, 2025

लक्षद्वीप

 http://www.misalpav.com/node/53294

निळ्यागर्द समुद्रकिनारी..

लक्षद्वीप आणि मावदिव ही दोन बेटं आहेत, तिथे स्वच्छ समुद्रकिनारे आहेत एवढी माहिती लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचली होती. पाठही केली होती. (कारण माझा भूगोल प्रचंड गोलच होता.) यापलीकडे काहीही कधीही कळलं नव्हतं. BScला असताना कोरल रीफ वगैरेबद्दल ऐकायला येई, त्या वेळी परत लक्षद्वीपचा उल्लेख व्हायचा. पण यातलं एक बेट आपलं आणि दुसरं चक्क परदेशात, याचा शोध थोडा उशिराच लागला. तोवर फिल्म स्टार्सची मालदिवची रील्स आली होती.
मालदिवला जायला पासपोर्ट लागतो, प्रायव्हेट बीच व्हिलाज आहेत तिथे‌, जरा महागडं प्रकरण आहे इतपत माहितीचा साठा जमला होता. याउलट लक्षद्वीप म्हटलं की डोळ्यासमोर यायचा तो विविधरंगी कोरल्सनी भरलेला प्रदेश, अभ्यासाला असलेली कोरल्स आणि त्यांचा तो ठरावीक फोटो.

लक्षद्वीप
खरंच, किती दिवस हा शब्द मनाच्या तळाशी जपून ठेवला होता. अगदी पाण्यात बुडालेल्या प्रवाळांसारखा. जायचं ठरल्यावर माहिती मिळवण्याच्या तयारीला लागले.
आजकाल शोध घ्यायचा म्हणजे गूगलबाबांची भक्ती आलीच. पूर्वी वाचनालयात जाणं, प्रवासवर्णनं शोधणं हे करावं लागे. पत्ते, फोन नं. टिपून घ्यावे लागत. प्रवासवर्णनपर काही वाचायचं, तर त्यासाठी खास वेळ काढून लायब्ररीत जायचं, एखादा कोपरा गाठायचा आणि निवांत हरवून जायचं त्या माहितीच्या महापुरात.आज बदल इतकाच झालाय की हा महापूर आता चक्क आपल्या घरी येतो. त्या पाण्यात भिजायला लायब्ररीचे किनारे गाठावे लागत नाहीत. हां.. पण निवांत वेळ हा काढावाच लागतो, बरं का!
तर असं माझं शोधकार्य सुरू झालं. लिखित स्वरूपात ही माहिती फारशी उपलब्ध नव्हती, पण यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ होते. अर्थातच ते सगळे हाय, I am so and so.. you r watching my video.. pl do like, share and subscribe या प्रकारातले.
निळ्याशार समुद्राचे ड्रोनने घेतलेले सुंदर शॉट्स,तोकड्या पण ट्रेंडी कपड्यातल्या मुली, हातात वाइनचे ग्लास असं सगळं. (ते कपडे पाहिले की नेहमी वाटतं, कधी आपण इतकं बारीक होणार आणि कधी हे असे कपडे घालून बिनधास्तपणे पाण्यात लोळणार. एरवी फोटो काढायचे, तर आपण किमान बघणेबल तरी बारीक दिसू ना, हा भुंगा कुरतडत असतोच. फोटो लांबून काढ हां, पोट जास्त दिसत नाहीये ना. असं नको, हा अँगल छान नाही, असं म्हणतं मी शंभर सूचना देत असते. कारण फोटो कसाही काढा, आपण छान सडपातळ दिसू इतक्या उच्च पातळीची बारीक मी अजून स्वप्नातही कधी झाली नाहिये. राजकारण्यांच्या आश्वासनासारखं ते आश्वासन मी माझ्या मनाला दर वर्षी देत असते.अर्थात ते अजूनही आश्वासनच राहिलं आहे.)
सविता नाडकर्णी म्हणते ते अगदी पटतं. तिच्या मते जे जे आपल्याला घालून पाहावसं वाटतंय, ते आपण बिनधास्त घालावं की. आकार-प्रकाराच्या खुळचट फुटपट्ट्या किती दिवस लावत बसायच्या.
त्यामुळे या वेळी मीही वय विसरून बिनधास्त व्हायचं ठरवलं. जो अनुभव समोर येईल, तो आनंदाने घ्यायचा अगदी झोकून देऊन, अशी खुणगाठ बांधली.
तर.
परत मुद्द्यावर येऊ या. जरा विषयांतर झालं, पण होऊ दे. मी कुठे प्रवासवर्णन वगैरे लिहितेय! आज ती शब्द मोजण्याची कटकट नाहीये. ते word counter लावा, शब्द मोजा, लेख झाला की वाचून पाहा, त्याचा रिदम बघा, व्याकरणाकडे लक्ष द्या. छे! आज मी यातलं काहीही करणार नाहीये. आज मुक्तपणे लिहिणार आहे. त्यामुळे होऊ दे विषयांतर.
आता लिहितानासुद्धा तुम्हाला सांगते, इतका मस्त माहोल आहे. सूर्य अजून उगवायचाय, कॉटेजच्या बाहेर बीचवर शांतपणे आरामखुर्चीत रेललेय. सोबत छान कॉफीचा वाफाळता मग आहे आणि मंद आवाज करत लाटा माझ्या पायापाशी येताहेत. आणखी काय हवं हो!
लक्षद्वीप म्हणजे नक्की कसा अनुभव आहे? असं जर म्हटलं, तर
ते कोकण, तारकर्ली, होम स्टे हे सगळं दूर सारलं (यांचा अनुभव घेऊन झालाय. जन्मच कोकणातला, त्यामुळे समुद्र आम्हाला नवा नाही.)
तरी इथला अनुभव दशांगुळे उरतोच.
समुद्र इतका समजूतदार शांत आणि आश्वासक असतो, असं मी तरी कधी अनुभवल नव्हतं.
लहानपणी आमचा आंजर्ल्याचा समुद्र मला भीतिदायक वाटायचा. पोर्तुगीज आणि हबश्यांनी लोकांना पोत्यात भरून बुडवल्याच्या गोष्टी मी याच किनार्‍यावर बसून ऐकलेल्या. त्यामुळे समुद्रावर जाण्यापेक्षा कड्यावरच्या गणपतीच्या देवळात कळसावर असलेल्या छोट्या खोलीत बसणं मला जास्त आवडायचं.
तीच गोष्ट हर्णेची. दुसरा तो मुंबईचा समुद्र. आमच्यासारख्यांना अप्राप्य. चौपाटी म्हणत भेळवाल्या गाड्यांनी व्यापलेला.
भुवनेश्वरचा तर त्याहीपेक्षा वेगळा, ब्लू बीचचा मान मिळवणाऱ्या किनार्‍यावर बसलं किंवा मग अगदी सीगलसारख्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलच्या खोलीत बसलं, तरी स्वर्गद्वारी निघालेली प्रेतं हमखास दिसणार.
भुवनेश्वरच्या मेन मार्केटमध्ये अगदी किनार्‍यालगत, जगन्नाथच्या देवळाअलीकडे चक्क स्मशान आहे. स्वर्गद्वार त्याचं नाव. तो चौकच स्वर्गद्वार म्हणून ओळखला जातो. तिथे अगदी सहज खरेदीला उतरा किंवा किनार्‍यावर जा ,भडक मेकअप केलेली (सवाष्णी कोणी असेल तर) प्रेतं तिरडीवर हेलकावे खात जाताना दिसतात. सोबत दोन-चार लोक "रामनाम सत्य आहे" असं बंगाली, गोलाकार उच्चारात म्हणत चालत असतात.
त्या वेळी मृत्यू अगदी सामान्य झाल्यासारखा वाटतो. रडारड, शोक यांच्या पलीकडे एक शांत आध्यात्मिक क्रिया घडल्यासारखा.

कोकणातल्या अनेक होम स्टेवर गेल्यावर समुद्रकिनारी बसता येतं, पण तिथला मासळीचा वास, उजाडत्या सकाळी मासे पकडणार्‍या कोळ्यांची लगबग आणि त्यापाठोपाठ मांजरं, कावळे आणि सीगल यांची पळापळ कितीही टाळू म्हटलं तरी टाळता न येणारी.त्यापेक्षा इथला (लक्षद्वीपचा) समुद्र अगदीच वेगळा वाटला. होड्या, बोटी, माणसं अशी कुठलीच लगबग नाही. मुळात तो मच्छीचा उग्र वास नाही. नजर जाईल तिकडे फक्त निळाशार समुद्र आणि हो, त्या दूरवर हेलकावे खाणार्‍या बोटीसुद्धा नाहीत. चित्रकलेच्या तासाला स्मरणचित्र काढायला सांगितलं की त्या मेमरी ड्रॉइंगमध्ये बीचवरच्या चित्रात लाटा, पाणी, निळा रंग, मागे पिवळा सूर्य आणि बोटी, उडणारे तेच ते चार आकड्यांचे काळे पक्षी हे सगळं ठरलेलं.
यातलं इथे काहीssसुद्धा नाही.
तुमच्याशी बोलता बोलता म्हणजेच लिहिता लिहिता तो पाहा सूर्योदय झाला. सूर्यनारायण आलेसुद्धा.
विवेकानंद आश्रमातल्या प्रायव्हेट बीचवरचा सूर्योदय मी अनुभवलेला आयुष्यातला पहिला सूर्योदय. किती कौतुकाने बाबा तो दाखवायला घेऊन गेले होते. त्यासाठी खास विवेकानंद आश्रमात राहिलो होतो. मोठ्या कौतुकाने सूर्योदय पाहिला होता. सूर्यास्तासाठी गांधी मेमोरियल हे तर ठरलेलंच.
८० सालीची गोष्ट सांगतेय मी ही. त्याही वेळी सूर्यास्त बघायला गांधी स्मारकात ही प्रचंड गर्दी होती. मोबाइल नव्हता तेव्हा, पण कॅमेरे होतेच की, त्यांचा लकलकाट होताच.
मला ती जत्रा आणि तो सूर्यास्त मुळीच आवडला नाही. मनात रुतून राहिली ती एकच गोष्ट - नथुरामची. ती मी इथे पहिल्यांदा ऐकली.
पुढे मणीभवनशी जोडले गेले, गांधींवर अनेक निबंध लिहिले, मोठ्या रकमेची बक्षिसंही मिळवली, गांधींचं समग्र साहित्य वाचलं, पण मनातला नथुराम, तो लाल किल्ल्यातला त्याच्यावर चालवलेला खटला, ते साक्षी-पुरावे आणि आमचे तात्याराव सावरकर, काहीच विसरता आलं नाही.
तर..
सांगत होते ते सूर्योदय-सूर्यास्ताबद्दल.
अबूला गेले असताना एका संध्याकाळी सूर्यास्त पाहिला होता, तो मात्र विलक्षण आवडला होता.
समोर गणेशाच्या आकाराची टेकडी होती. मागे मावळता सूर्य. ढगांचे असंख्य रंग त्यातून दिसणाऱ्या वाटा जणू स्वर्गाच्या असाव्यात असा फील देणार्‍या. तो सूर्यास्त खरंच भावला होता. पण या सगळ्याचं वेड लागलं नव्हतं. स्काय स्क्रॅपरमध्ये राहायला आल्यावर मात्र प्रत्येक सकाळ ही सूर्योदय बघण्यासाठीच असते आणि संध्याकाळ ही सूर्यास्त बघण्यासाठीच असते, इतकं वेडावून आणि आसुसून मी ते पाहिले.
खरं तर सूर्य आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे तिथेच कळलं.
आता कधी असं टूरला गेलं की माझी यासाठीची धडपड सगळ्यांना पाठच झालीय.
लक्षद्वीपचा सूर्योदय मात्र फारच वेगळा वाटला.
शांत, संयमी लाटांच्या किणकिणत्या आवाजात अल्लद वर येणारं ते सूर्यबिंब अगदी विनाअडथळा माझ्या पुढ्यातच जणू निर्माण झाल्यासारखं हळूहळू उगवतीला आलं, समोर साकारत गेलं. त्याची लालिमा अगदी जवळ, हाताच्या अंतरावर, समोरच्या लाटांवर गर्दशी पसरत गेली. सोबतीला होता सकाळचा मंद वारा.
हे क्षण मुठीत धरून ठेवावेत असे.
वेडावल्यासारखी बघतच राहिले.
वाटलं, आजचा हा सूर्योदय किती वेगळा आहे, नाही!
पण हे तर हिमनगाचं टोक होतं. अजून खूप सुंदर अनुभव घ्यायचे होते. लक्षद्वीप म्हणजे पाचूचंच नाही, तर मोत्याचं, तुषारांचं आणि त्यापलीकडेही अतीव शांततेचं बेट आहे.
अंतर्मनाशी संवाद साधायचा असेल, आपणचं आपल्याशी निवांत बोलावं असं वाटतं असेल, तर लक्षद्वीपला जाणं अगदी मस्ट.

तेव्हा शांततेची अपॉइंटमेंट घ्या आणि निघाच.

मैत्रेयी केळकर









































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...