‘दक्षिणतीर्थ’ - भाग -१ - लेखांक - ३ – (04/01/2023)
लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू
लेखांक -३ - कन्याकुमारी रहस्य
आज सकाळी आम्हाला खरतर मरुत्वमलै पर्वत शोधत जायचं होतं.. पण 46 तासांची तुंबलेली झोप संपेपर्यंत उठायला सकाळचे 10 वाजले.. त्यामुळे मरुत्वमलैचा प्लॅन पुढच्या दिवशी ढकलला.. आवरून 11 ला चेक आऊट केलं.. आणि चालत चालत त्या अथांग हिंदी महासागराच्या त्रिवेणी संगमाजवळ आलो..
हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा हा संगम.. जिथे या तीन सागरांच्या तीन वेगवेगळ्या निळ्या छटा एकमेकात मिसळून जाताना दिसतात.. निसर्गातल्या आपतत्वाच्या एकरूपतेचं हे सर्वोच्च प्रतिक.. भारताच्या दक्षिणेकडचं हे सगळ्यात शेवटचं टोक जिथून पुढे दक्षिण धृवापर्यंत एकही भूखंड नाही. आणि जर कधी असेल तर तो हजारो वर्षांपूर्वीच काळाच्या पडद्याआड गेलाय.. येस.. द लॉस्ट इंडिअन कॉन्टिनेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कुमारी कंदम’ महाद्विपाची कन्याकुमारीच्या याच टोकापासून अग्नेय दिशेकडे ऑस्ट्रेलिया पर्यंत आणि नैऋत्य दिशेकडे मादागास्कर बेटांपर्यंत पसरलेली हद्द काही हजार वर्षांपूर्वी जलमग्न झाली ती या इथल्याच पाण्याखाली. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या वैवस्वत मनु प्रलायाआधी आधुनिक मानवी सभ्यतेचा आणि संस्कृतीचा विकास या महाद्विपावर झाला. 'कुमारी कंदम' हिंदी महासागरात हरवलेल्या तमिळ संस्कृतीच्या प्राचीनतेचा संदर्भ देते. त्याला पूर्वी कुमारी नाडू असंही नाव होतं ज्याची कन्याकुमारी प्रांत ही राजधानी होती. तमिळ साहित्य पुराणानुसार अशी मान्यता आहे की त्रेतायुगात श्रीलंकेची हद्द ही आत्ताच्या श्रीलंकेचा प्रदेश आणि पूर्ण ‘कुमारी कंदम' अशी भव्य होती.. पुढे द्वापार युगात इथे बाणासुराची सत्ता होती.. बाणासुराचा वध करून कन्या कुमारीने या संपूर्ण प्रदेशावर राज्य केलं.. आणि अखेर शिव आराधनेत अंतर्लीन झाली.. पुढे ती रावणाची सोन्याची लंका आणि संपूर्ण कुमारी कंदम महाद्वीप तत्कालीन मन्वंतराच्या मनु प्रलयात जलमग्न झालं.
काही वेळ तिथेच लाटांचा नाद ऐकत त्या अथांग महासागराला एकटक न्याहाळत आम्ही बसलो.. समुद्र किनारी तंद्री लावून बसण्यात एक वेगळीच मजा असते.. तिथल्या खडकावर आदळणाऱ्या लाटांनी एव्हाना आम्हाला नखशिखान्त न्हाऊ घातलं..
श्रीपाद वल्लभ चरीत्रामृतातल्या संदर्भाप्रमाणे या पवित्र संगमावर इथेच कुठंतरी शंकर भट्टानं कन्यका परमेश्वरीचं (कन्या कुमारीचं) दर्शन घेण्याआधी स्नान केलं असेल.. दर्शन घेऊन याच वाटेनं पुढं जात तो मरुत्वमलै पर्वतावर वाट चुकला असेल.. आणि त्याला त्या दिव्यात्म्यांचं दर्शन झालं असेल. हा विचार करत असताना एकदम घडाळ्याकडे लक्ष गेलं.. अर्धा तास उलटून गेला होता.. दक्षिणेकडची बहुतेक मंदिरं दुपारी 12 ते 4 यावेळात बंद असतात..मंदिर बंद होण्याआधी आम्हाला कुमारीअम्मन मंदिरात कन्याकुमारीचं दर्शन घ्यायचं होतं.. आम्ही चालतच मंदिरात प्रवेश केला.. शंकरभट्टाप्रमाणे एक लाल फूल आणि इतर पूजा साहित्य घेतलं. मंदिराच्या गर्भगृहाजवळ जात असताना तिथली स्थापत्यशैली बघून मंदिर किती प्राचीन असेल याचा अंदाज आला.. आम्ही अगदी मंदिर बंद होण्याच्या आरतीच्या वेळी देवीसमोर उभे होतो.. अजिबातच गर्दी नव्हती आम्ही नेलेलं लाल फूल आणि इतर साहित्य तिथल्या पुजाऱ्याने मोठ्या श्रद्धेने देवीला अर्पण केलं.. चरित्रामृतातल्या वर्णनाप्रमाणेच देवी अंबा मोठ्या स्नेहपूर्ण नजरेनं आमच्याकडे बघत असल्याचं जाणवलं.. आरती झाल्यावर देवीच्या उत्सवमूर्तीची प्रदक्षिणा होती त्यात आम्ही काही तुरळक दर्शनार्थी आणि तिथले पुजारी असे 5 जणच होतो.. प्रदक्षिणा झाल्यावर देवीसमोरचा पडदा ओढला गेला.. आणि आम्ही काही वेळ शांत तिथल्या गर्भगृहाबाहेर बसलो..देवी कुमारिका असल्यानं कुमारिकेचे सगळे शृंगार इथे वाहिले जातात.. आणि त्याच साज शृंगारानी तीला सजवलं जातं.. भारताच्या दक्षिण टोकाचं सगळ्यात शेवटचं शक्तीपीठ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.. सतीदाहाच्या वेळी भगवान शंकर विलाप करत माता सतीचा देह आकाश मार्गाने घेऊन जात असताना तिचा मेरूदंड म्हणजेच पाठीचा कणा इथे प्रविष्ट झाला.. विश्वचैतन्याचं प्रमाण असलेली कुंडलिनी शक्ती जिथून प्रवाहित होते असा साक्षात आदिशक्तीचा कारण देहात प्रस्थापित असलेला मेरूदंड या ठिकाणी प्रस्थापित झाला असल्यामुळे इथली ऊर्जा स्पंदनं फारच जागृत आणि प्रभावी आहेत.. सत्ययुगात ज्या ज्या ठिकाणी माता सतीच्या जळत्या देहाचे भाग आणि इंद्रिय प्रस्थापित झाली त्या सगळ्या ठिकाणी आदिशक्तीने त्रेता आणि द्वापार युगात कारण अवतार घेतले. कन्याकुमारी हा अवतार द्वापार युगात झालेला.. तेव्हापासूनच हे स्थान उर्जित आहे आणि इथला परिसर बांधणी हे सगळच द्वापारयुगात तयार झालेलं अत्यंत प्राचीन आहे.. द्वापार युगातला कुमारी कंदम द्विपाचा राजा असुरराज बाणासुर याला फक्त कुमारिकेकडून मृत्यू होण्याचं शिवाचं वरदान होतं. या पराक्रमी वरदानाने तो निर्भय झाला आणि त्याने सर्व जगावर कहर केला. त्याने इंद्राला जिंकून त्याच्या गादीवरून बेदखल केलं.. त्याचा प्रकोप वाढल्यामुळे आदिशाक्ति देवी भगवती ब्रह्म संकल्पाने राजा भरताच्या पोटी कन्या कुमारी रुपात जन्मली. बाणासुराचा वध करून ती शिवाची तपश्चर्या करत त्रिवेणीसंगमा जवळच्या समुद्रात एका खडकावर शिवाराधनेत बसली अशी ही गोष्ट. तमिळ पुराणानुसार कन्याकुमारीत दत्ततत्वाचा अविर्भाव होण्यामागची गोष्ट ही इथल्या सुचीन्द्र्म नावाच्या गावात त्रीलीन्गम स्वरुपात ‘थानुमलायन’ या नावानी दत्ताने घेतलेल्या अवताराशी निगडीत आहे.
देवीच्या त्या प्रांगणात गर्भगृहाजवळच्या चौथऱ्यावर साधनेत काही काळ तसाच लोटला.. थोड्यावेळाने डोळे उघडले आणि प्रदक्षिणा करून बाहेर पडलो..आता आम्हाला विवेकानंद रॉक मेमोरियलला जायचं होतं.. आम्ही जेवण करून जेट्टीच्या रांगेत उभे राहिलो.. आणि सुमारे 2 तासांनी आमचा नंबर लागला. जेट्टीत चढल्यापासून पाचव्या मिनिटाला आम्ही शीला स्मारकावर पोहोचलो.. आणि बाहेर पाऊल ठेवल्या ठेवल्या भारावलेली अवस्था होती.. हीच ती जागा जिथे स्वामी विवेकानंदांना ध्यान साधनेत आत्मज्ञान झालं.. पुराणकथेनुसार वासवांबिका कन्यका परमेश्वरी म्हणजेच कन्याकुमारी हिने देखील याच शिळेवर शिवाची तपश्चर्या केली होती.. ज्याच्या परिणाम स्वरूप ही शिळा साक्षात आदीशक्तीच्या तपोबळाने उर्जित होती.. देवीच्या पायाचे ठसे त्या शिळेवर कोरले गेल्यामुळे या शिळेला ‘श्रीपद पराई’ हे नाव प्रचलित झालं.
1880 सालच्या एका श्रुती नुसार राजयोग आणि कर्मयोगावरच विश्वास ठेवणाऱ्या आणि 18 वर्षांच्या वयातच अतिशय परखडपणे आपले विचार मांडणाऱ्या नरेंद्रला कोणी व्यक्ती सांगतो की कलकत्त्याच्या एका भागात कोणीतरी एक रामकृष्ण नावाचा गूढवादी सिद्ध पुरुष आहे ज्याचं थेट कालीमातेशी अनुसंधान आहे.. आणि तो योगी या देवांशी बोलतो.. त्याच्याकडे तुला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळतील..
विचारांनी परखड, स्पष्टवक्ता आणि तेवढाच तापट असलेला नरेंद्र त्यांच्याकडे जातो आणि जोरात ओरडून त्यांना प्रश्न करतो..”मी असं ऐकलंय तुम्ही देवांशी बोलता म्हणे? हे काय तुम्ही सारखं देव देव करत असता.. देव आहे हे सिद्ध करू शकता का? परमहंसांनी शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले "मी स्वतः याचं प्रमाण आहे".. हे उत्तर ऐकून नरेंद्र शांतच झाला.. कारण त्याला यावर रामकृष्ण यांच्याकडून युक्तिवाद अपेक्षित होता.. हे उत्तर ऐकून त्याने पुढचा प्रश्न केला की "मग असं असेल तर मला तुम्ही त्याचा अनुभव करून द्या"
तुझ्यात ते धारिष्ट असेल तर जशी तुझी इच्छा असं म्हणून परामहंसांनी नरेंद्रच्या छातीला पाय लावला.. आणि ज्या क्षणी पायाचा स्पर्श छातीला झाला तसा हा नरेंद्र समाधी अवस्थेत गेला.. तो अनेक तास बाहेर आलाच नाही.. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या, अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि जेव्हा त्या अवस्थेतून नरेंद्र बाहेर आला तेव्हा त्याने पुढे एकही प्रश्न विचारला नाही.. त्या समाधी अवस्थेत त्यानं असं काहीतरी पाहिलं ज्याची उभ्या आयुष्यात त्यानं कल्पनाही केली नव्हती.. आणि एका ध्येयाच्या वेडानं त्याला पछाडलं.. पुढे याच नरेन्द्राचा स्वामी विवेकानंद झाला.. परमहंसांच्या समाधीनंतर ते भारत भ्रमण करू लागले आणि कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकास येऊन पोहोचले. इथे आल्यावर त्रिवेणी सागर संगमात स्नान करून त्यांनी महासागरात उडी मारली आणि साक्षात कन्याकुमारीने साधना केलेल्या या शिलाखंडावर पोहत येऊन उन, वारा, पाऊस कशाचीच पर्वा नं करता 3 दिवस 3 रात्र सलग ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचं कासावीस झालेलं मन अधिकच हळवं झालं. त्यांना आत्मज्ञान झालं आणि भारताच्या कल्याणासाठी, इथल्या जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोहोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचं ठरवलं. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते.
ज्या शिळेवर साधना करत असताना कन्या कुमारीला शिवाचं अधिष्ठान झालं, जिथे स्वामी विवेकानंदांना आत्मज्ञान झालं नेमक्या त्याच ऐतिहासिक ‘श्रीपद पराई’ शिलाखंडासमोर आत्ता आम्ही उभे होतो.. त्या शिळेला साष्टांग नमस्कार केला.. आणि त्या शिळेच्या खाली असलेल्या, त्या शिळेमध्येच कोरलेल्या, मेडिटेशन रुम मधे येऊन बसलो.. पूर्ण अंधार.. कानावर फक्त समुद्राच्या लाटांचा आणि तिथे लावलेल्या ओंकाराच्या रेकॉर्डचा नाद.. समोर ग्रीन ब्लुइश निऑन लाईट मधली ॐ ची प्रतिमा...एक वेगळीच व्हाईब होती. डोळे न मिटताच ध्यान लागण्यासारखी.. आता इथून आम्हाला फक्त घ्यायचं होतं.. या वास्तूच्या ऊर्जेशी फक्त स्पंदनांनी बोलायचं होतं.. शरीरातली उष्णता वाढल्यासारखं तिथे बसल्यावर जाणवत होतं.. तिथे केंद्रित असलेली सकारात्मक उर्जा आत्मतत्वाला स्पर्श करतीये याची जाणीव होत होती. प्रत्येक वास्तू आपल्याला काहीतरी सांगत असते.. ते ऐकण्यासाठी आपले कान मात्र तयार हवेत..
बराच वेळ आम्ही तिथेच त्या साधनागृहात बसून होतो.. डोळे उघडले तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती.. आम्ही बाहेर आलो.. सनसेट बघूनच आम्ही परतीच्या जेट्टीत बसणार होतो.. बरोबर मोक्याची जागा बघून तिथे मांडी ठोकून बसलो. डावीकडे विवेकानंद स्मारक, उजवीकडे तामिळनाडू मधले ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक तिरुवल्लुवर स्वामी यांचा भव्य पुतळा, चारही बाजूंनी निळंशार पाणी त्यात मधेच डोकं वर काढलेली छोटी छोटी हिरवीगार शेवाळी बेटं. त्या बेटांवर उर्ध्वमुखी ध्यान लावून स्तब्ध बसलेले समुद्री पक्षी आणि समोर क्षितिजापलीकडे जायची घाई झालेला रक्तवर्णी सूर्य.. एखादं लाईव्ह पेंटिंग बघावं असा नजारा होता.. साधारण साडे सहाला तिथून निघालो. कन्याकुमारीच्या मार्केट मध्ये एके ठिकाणी फार सुंदर शहाळी मिळतात.. तिथे आलो.. तिथून आता मार्केट मध्ये आलोच आहोत तर काहीतरी खरेदी करू या धोरणाने तिथे जरा दुकानांमध्ये घुसलो.. त्या काहीतरी खरेदीची खूप काही खरेदी कधी झाली आमचं आम्हालाच कळलं नाही.. गाडीत सामान टाकलं.. रूम वर आलो.. आणि सगळ्या कॅमेऱ्यांमधला बॅकअप लॅपटॉप वर घेण्याचं महत्वाचं काम सुरू केलं... उद्या आमचा मुख्य दिवस होता.. कारण आम्ही मरुत्वमलै पर्वताच्या शोधात पहाटेच निघणार होतो.. त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या तमिळनाडूच्या घनदाट जंगलात किर्र झाडीत कुठेतरी त्याचं लोकेशन मॅपमधे दिसत होतं.. बॅकअप घेऊन झाल्यावर बेड वर आलो.. हेडफोन्स घालून शांतपणे पुन्हा एकदा श्रीपाद वल्लभ चरित्रामृतातले पाहिले 2 अध्याय ऐकले ज्यात मरुत्वमलैचा उल्लेख होता..आणि उद्या आपण त्याच पर्वतावर जाऊन राहणार हे आठवून अजून भारी वाटलं.. पण निर्जन अरण्यात असलेला तो पर्वत.. शंकर भट्ट 1336 साली ज्या गुहेत राहिले असतील ती गुहा खरंच तिथे सापडेल का? जरी सापडली तरी त्या निर्जन पर्वतावर त्या गुहेत रात्रभर रहाता येईल का? त्या गुहेपर्यंत जायला मुळात वाट असेल का? असे सगळे प्रश्न एक एक करत मनात येत होते.. हा विषय मी संस्कारशी बोललो.. म्हंटलं आलो तर आहोत इथपर्यंत.. जे जे डोक्यात आहे ते तसं व्हावं म्हणजे झालं.. कारण या आधी हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर महावतार बाबाजींच्या गुहेकडे जातानाचा एक वेगळा अनुभव आहे. अचानक ढग भरून येऊन पाऊस सुरू झाला आणि हिमालयातल्या द्रोणागिरीच्या जंगलात आम्ही वाट चुकलो. दरीतल्या जंगलात अडकलेलो असताना एका खडकावरून पाय घसरला आणि दरीत फर्लांगभर खाली फरपटत गेलो होतो..पण एवढं होऊनही आम्हाला ती गुहा सापडली.. आता यावेळी कसा अनुभव येतो याकडेच लक्ष लागून राहिलं होतं..
संस्कार एकदम थंड होता.. त्याला ट्रेकिंगची सवय होती.. हिंजवडीच्या नामांकित आय टी कंपनीत काम करत असूनही त्यानं त्याची ट्रेकिंगची आवड कायमच जोपासली होती.. दर शनिवार रविवारी सह्याद्रीतल्या कुठल्यातरी गडावर संस्कार हमखास सापडेल.. ट्रेकर असल्यामुळे सह्याद्रीत अनेक ठिकाणी अश्याप्रकारे कडे कपाऱ्यामधे तो राहिला होता.. त्यात इंजिनिअरिंगचं डोकं असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आयत्या वेळी काय इंप्रोवायजेशन्स करावी लागतात याचा अनुभव त्याला आधीपासून होता.. सारंग गोसावी म्हणजे आमचा सारंग दादा त्याच्या असीम फौंडेशन या सीमावर्ती भागात काम करणाऱ्या नामांकित एनजीओचा तो खंदा कार्यकर्ता असल्यामुळे काश्मीर खोऱ्यातल्या पहाडी इलाख्यात राहून काम करण्याचाही त्याला अनुभव आहे.. त्यामुळे जे होईल ते आयत्यावेळी टॅकल करता येईल असा विश्वास त्यानं पण दर्शवला..
नंतर सहज मनात विचार आला.. ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं ते का आपली इच्छा पूर्ण करणार नाहीत? श्रीपादांच्या संकल्पाशिवाय झाडाचं पानही जर हलत नसेल तर त्यांच्या संकल्पशिवाय आपण इथपर्यंत तरी येऊ शकलो असतो का? त्यामुळे तू इथे आलेला नाहीयेस.. तर त्यांच्या संकल्पानं तुला इथे आणलंय.. मग पुढची काळजी कशाला.. कर्तेपणाचा भाव सोडून समर्पण भावनेनं त्यांना शरण गेलास तर तुझ्या मनातल्या सगळ्या धर्मबद्ध इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प तुझ्या गुरूंचा असतो.
मनाला समजावून फार विचार नं करता आता आम्ही उद्याची बॅग भरायला घेतली.. आसनं, ग्रंथपीठ, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ, सोवळी वस्त्र, उपरणी, मेणबत्त्या, पॉवर बँक, फोन, कॅमेरे, गोप्रो, स्लीपिंग मॅट, टॉर्च , इ-लॅम्प भरून बॅग्ज रेडी झाल्या.. उद्या तिथे रेंज येईल की नाही याची कल्पना नव्हती त्यामुळे घरी आत्ताच फोन करून घेतले.. बेड वर आलो, डोळे मिटले आणि उद्याचा दिवस कसा असेल या विचारातच मनानी तिथे आधीच पोहोचलो मरुत्वमलैच्या पर्वत रांगांमधल्या त्या अतर्क्य अनुभवांचे साक्षीदार व्हायला...
(क्रमशः)
लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu
पुणे
Ph: 9881999034
© ALL RIGHTS RESERVED ©
For related photos and videos - Please visit – facebook & Instagram profile -
Facebook Handle: Abhishek Shalu
Instagram Handle: abhishek__shalu
दक्षिणतीर्थ’ - भाग - १ - लेखांक - 4 – (05/01/2023)
लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू
लेखांक -४ - मरुत्वमलैच्या जंगलात
पहाटे 5 वाजता जाग आली. अंघोळी आटपून बॅग्ज गाडीत टाकल्या.. जीपीएस वर मॅप सेट केला आणि त्या अज्ञात वाटेनं आम्ही निघालो.. नारळाच्या आणि केळीच्या बागांमधून वाट चालली होती.. पर्वताचा पायथा जसा जवळ येत होता तशी भुकेची जाणीव वाढली.. जे काही आहे ते आत्ताच मिळणार होतं.. कारण पुढचं जेवण डायरेक्ट पुढच्या दिवशी मरुत्वमलै उतरून आल्यावर होणार होतं..रस्त्यात एक छोटं घरगुती हॉटेल दिसलं.. आम्ही तिथे थांबलो.. त्या हॉटेलचे मालक बरेच वयस्कर होते.. ते आमच्याशी तमिळमध्ये काहीतरी बोलायला लागले.. अगदी मृदू भाव त्यांच्या त्या बोलण्यातून उमटत आहेत असं आम्हाला जाणवलं.. खरतर सुरवातीला ते काय बोलत आहेत ते काहीच समजत नव्हतं. नंतर आम्ही खाणा खुणा करून इडली, वडा वैगेरे ऑर्डर देण्यात यशस्वी झालो.. त्यांच्या सुनेनं समोर इडल्या, डाळीचे वडे आणि मिरचीच्या भज्या आणून ठेवल्या.. बरोबर चटणी आणि सांबरची पातेलीच आणून ठेवली.. ते आजोबा सतत आमच्याशी काहीतरी बोलत होते.. त्यांना हिंदी किंवा इंग्लिश काहीच परिचयाचं नसावं कदाचित.. त्यांना हेही समजलं होतं की आम्हाला त्यांची भाषा बोलणं तर दूर त्यातला एक शब्दही समजत नाहीये.. तरीही ते बोलतच होते.. त्यांच्या हावभावावरून ते आम्हाला कुठली तरी गोष्ट सांगत आहेत असं जाणवलं.. आम्हाला कोणालाच तिथे कोण काय बोलतंय ते कळत नव्हतं.. पण या हृदयीचे त्या हृदयी हा भाव नक्की येत होता.. आपल्या देशाचा माझा अभिमान आणखीन द्विगुणीत झाला. किती वेगवेगळ्या भाषा, आणि संस्कृती असलेला देश आहे हा.. तरी लोकं गुण्यागोविंदाने राहतात.. एकमेकांची भाषा येत नसताना सुद्धा आदरानं चौकशी करतात.. प्रेमानं जेऊ घालतात.. त्या आजोबांचे बोलताना होणारे हावभाव अगदी बघण्यासारखे होते.. आम्हाला त्यांचा उत्साह मावळू द्यायचा नव्हता.. आम्ही पण हूं हूं करून जणू काही तुम्ही बोलताय ते आम्हाला सगळं समजत आहे अश्या अविर्भावात होतो.. थोड्यावेळाने आम्हाला कळलं की ते मरुत्वमलै पर्वतातल्या गुहेत तपश्चर्या केलेले अध्यात्मिक संत श्री नारायण गुरू यांची गोष्ट आम्हाला सांगत होते..
त्यांना काहीच माहीत नव्हतं आम्ही कोण आहोत, कुठून आलो, कुठे चाललोय अगदी काहीच नाही.. तरी त्यांनी आम्हाला त्यांची गोष्ट का सांगावी? आणि हा भाव त्यांना आमच्याबद्दल असा का उमटावा याचं आम्हाला आश्चर्य वाटत होतं..मग आम्हीच तुटकं मुटकं काहीतरी बोलून मरुत्वमलैला जायला आम्ही महाराष्ट्रातून आलो वैगेरे हे समजावण्यात यशस्वी झालो.. त्यानंतर तर त्यांचा आनंदी चेहरा बघण्यासारखा होता.. अगदी लहान मुला सारखे ते मरुत्वमलैची तामिळ भजनं म्हणू लागले..
फारा दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही कोणाचं कोणाला काही कळत नसताना पण एकमेकांशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात घड्याळाकडे लक्ष गेलं..आता जरा उशीर झाला.. आम्ही त्यांना नमस्कार करून निघालो.. जाताना गुगल ऑडिओ ट्रान्सलेटरची मदत घेऊन "तुम्ही जे बोललात ते आम्हाला शब्दांनी जरी कळलं नसलं तरी हृदयापर्यंत पोहोचलं.. तुमची भाषा आणि आवाज फार गोड आहे.. अशी काही वाक्य त्यांना तुटक्या मुटक्या तमिळ मधे वाचून दाखवली तर त्यांना एकदम गहिवरल्या सारखं झालं.. त्यांचे डोळे भरून आले.. परत एकदा त्यांना नमस्कार करून आम्ही बाहेर आलो..
रात्रभर त्या गुहेत राहायचं असल्यानं रात्री जेवायला कोरडा खाऊ वैगेरे घ्यावा लागणार होता.. पण वायफळ गोष्टी खाणं टाळायचं होतं त्यामुळे काय घ्यावं या विचारात शेजारच्या जनरल स्टोअर मधे गोष्टी न्याहाळत असताना सोन केळीचा भला मोठा घड दिसला.. बास बास.. हेच रात्रीचं जेवण असं म्हणून मी तो घड उचलला.. संस्कारनं पाण्याच्या बाटल्या घेतल्या एका बाटलीत बरोबर आणलेला कोकम आगळ भरून घेतला आणि आम्ही मरुत्वमलैच्या पायथ्याकडे जायला गाडी काढली..नागरकोईलच्या अगस्तीस्वरम तालुक्यात पोत्तीयडी नावाचं छोटं गाव आहे.. तिथून अतिशय निमुळता होत गेलेला रस्ता या पर्वताच्या पायथ्यापाशी जातो.. गाडीत चरीत्रामृताचा पहिला अध्याय ऐकत आम्ही जंगल रस्त्याला लागलो आणि काही अंतर पुढे गेल्यावर फोटोत पाहिल्याप्रमाणे समोरच्या एका पर्वताचा आकार दिसायला लागला.. येस येस येस ... हाच तो पर्वत.. मरुत्वमलै सापडला.. आमच्यासाठी ती युरेका मुमेंट होती. त्या रस्त्याला फॉलो करत करत जिथे मॅप एन्ड झाला तिथे गाडी थांबवली आणि लक्षात आलं की पायथ्याचा रस्ता चुकलाय.. आता तर आजूबाजूला कोणी माणूसही नव्हता.. गाडी लावून त्या जंगलाच्या रस्त्यानं थोडं चालत गेलो तिथे एक मनुष्य दिसला त्यानं खाणा खुणा करत पायथ्याचा रस्ता सांगितला आणि आम्ही साधारण 10 वाजता पायथ्याला येऊन पोहोचलो.. तिथेच कोपरा बघून गाडी पार्क केली आणि बॅग्ज घेऊन आणि कॅमेऱ्याची हत्यारबंदी चढवून चालायला सुरुवात केली..
केरळ आणि तामिळनाडू क्षेत्रात अध्यात्म मार्गात बरंच मोठं कार्य असलेले श्री नारायण गुरू यांच्या शिष्य संप्रदायामध्ये हा पर्वत प्रसिद्ध आहे.. पण बाकी या पर्वतावर केरळ, तमिळनाडू भागातले काही हौशी ट्रेकर सोडल्यास फारसं कोणी फिरकत नाही.. नारायण गुरू यांच्या समाधी पर्यंतच्या भागापर्यंत या पर्वतावर रीतसर पायऱ्या आहेत.. तिथून पुढे अवघड वाट चालू होते.. आम्ही एक एक पायरी चढत वर चाललो होतो. जाता जाता मधे श्रीकृष्णाचं प्राचीन मंदिर, मारुती मंदिर अशी काही देवालयं आम्हाला लागली.. नारायण गुरू यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही वरच्या बाजूला असलेल्या परमार्थ लिंगेश्वर नावाच्या एका शिवालया जवळ आलो.. तिथे एक संन्यासी पुजारी होते.. त्यांनी आम्हाला दर्शन दिलं.. तिथून बाहेर पडून वर चढायला सुरुवात करणार तेवढ्यात गुढग्यापर्यंत लुंगी बांधलेला एक अतिशय किडकिडीत मनुष्य पायऱ्या उतरत पळत पळत खाली चालला होता.. डोक्याला टक्कल, अस्ताव्यस्त दाढी असं त्याचं रूप होतं.. अगदी कधी काळची ओळख असल्यासारखा तो आमच्याकडे बघून हसला आणि दोन्ही हात जोडून नमस्कार केला.. आम्ही नमस्कार करून त्या केळ्याच्या घडातली 4 केळी त्यांना दिली.. तर त्याच्या चेहेऱ्यावरचे भारावलेले भाव आणि डोळ्यातला करुणा कटाक्ष बघून आत्ता त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल की काय असं वाटायला लागलं.. हसून नमस्कार करून आम्ही पुढे निघालो.. आता वाट अवघड व्हायला लागली. पुढे एके ठिकाणी आम्ही वाट चुकून वेगळ्या वळणावरून पुढे वर जाऊ लागलो.. तिथे एका मध्यम वयीन संन्यासी यतींची कुटी होती.. ते तिथे साधनेला बसले होते.. त्यांच्या साधनेत व्यत्यय न आणता त्या रस्त्यानं आम्ही पुढे गेलो आणि उजवीकडे दोन कातळाच्या मध्ये एक गुहा दिसली..पुढे जायला रस्ता नव्हता.. पण ती गुहा अतिशय गूढ दिसत होती.. त्या गुहेच्या दरवाज्याजवळ कातळाच्या फटी मधोमध एक झाड उगवलं होतं.. अश्या अनेक गूढ आणि गुप्त गुहा मरुत्वमलैवर आहेत जिथे स्थूल देहधारी आणि सूक्ष्म देहधारी सिद्धयती आपापल्या मितीत साधना करत असतात. आम्हाला लक्षात आलं रस्ता गंडला आहे.. कारण पुढे जायला वाट नव्हती.. आम्ही परत खाली उतरून त्या संन्यासी साधकाच्या कुटी जवळ आलो.. त्यांनी हातानेच आम्हाला मार्ग सांगितला आणि आम्ही पुढे निघालो. एका वळणावर आलो आणि बघितलं तर पुढचा सगळा रस्ता हा मोठमोठ्या खडकातून आणि कातळातुन जात होता.. मान वर केली आणि बघितलं.. ढगांमध्ये हरवलेला प्रचंड मोठा कातळ ज्यात खडक फुटून मधे मधे औषधी वनस्पती आणि मोठ मोठाली झाडं उगवलेली.. ओळख पटली.. तीच द्रोणागिरीची व्हाईब.. तीच झाडं त्याच औषधी वनस्पती आणि कातळाचा पॅटर्न पण अगदी तसाच. हा पर्वत संजीवनी पहाडीचा हिस्सा असल्यामुळे मरुंधु वाझुम मलाई ( ज्याचा अर्थ "औषधी वनस्पतींचे निवासस्थान") या नावानं पण ओळखला जातो..
अगस्ती मुनींचं काही काळासाठी वास्तव्य असलेल्या अगस्तीस्वरम तालुक्यातील पश्चिम घाटाचं हे सगळ्यात दक्षिणेकडचं टोक.. या पर्वताला अय्यावाझी या तमिळ पुराण कथेप्रमाणे पर्वत उच्ची मलाई म्हणून ओळखलं जातं. अशी मान्यता आहे की हिंदू पौराणिक कथांव्यतिरिक्त, तमिळ उपधर्म किंवा संप्रदाय असलेल्या आय्यावाझी पुराणाप्रमाणे हा पर्वत त्रिमूर्ती दत्ताच्या तीव्र तपानंतर त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून श्रीमन्नारायण आणि लक्ष्मीच्या पोटी कलियुगात जन्माला आलेला दत्ताचाच पूर्णावतार अय्या वैकुंदर स्वामी यांच्या जीवनाशी संबंधित आहे. या अवताराचा संबंध विष्णूच्या कल्की अवताराशी जोडला आहे. या पुराणाप्रमाणे कलीच्या समाप्ती साठी कल्की आणि अय्या वैकुंदर यांची संयुक्त भूमिका आहे. यात कल्कीचं मुख्य कर्तव्य हे कलीचा नायनाट करणे हे आहे तर अय्या वैकुंदरची भूमिका जगात पुनश्च धर्म संस्थापना करणे ही आहे. म्हणून काही धर्मशास्त्रज्ञ या पर्वताला पवित्र मानतात आणि अय्यावाझी पुराणातल्या पवित्र स्थळांपैकी एक मानतात. मूळ तमिळ ग्रंथ अय्यवझी पुराण यामध्ये या अवताराची मोठी रोमांचक कथा आहे..
याच पर्वतावरच्या पिल्लाथाडम गुहेत 1882 साली सलग 8 वर्ष तपस्या करत असताना दक्षिणेतील थोर संत, आणि समाज सुधारक नारायण गुरू यांना आत्मज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी तमिळ आणि मल्याळम भाषिक हिंदू समाजामध्ये जातीयवाद नष्ट करण्यासाठी लोकोद्धारचं काम केलं. एका श्रुती प्रमाणे ज्या पिल्लाथाडम गुहेत त्यांना आत्मज्ञान झालं त्याच गुहेत शंकरभट्टाला व्याघ्रेश्वराचं आणि त्या वृद्ध तपस्वी ऋषींचं दर्शन झालं असावं.. याचं अजून एक कारण म्हणजे या पर्वतामधल्या बऱ्याच गुहा या एक एकट्याच कातळात प्राकृत पद्धतीने कोरल्या गेल्या आहेत.. मात्र पिल्लाथाडम गुहा तीन ते चार कपार गुहांचा समूह आहे.. चरीत्रामृतातल्या उल्लेखाप्रमाणे शंकर भट्ट साऱ्या गुहांच दर्शन घेता घेता तिथल्याच एका गुहेपाशी आला जिथे त्याला एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यामुळे तो या गुहांच्या समूहापाशी आला असावा.. आणि एक एक गुहा न्याहाळत पुढे जात असताना त्याला एका गुहेबाहेर व्याघ्रेश्वरच दर्शन झालं.. हाच वाघ पुढे मनुष्य रुपात अवतरून आकाश मार्गानं निघून गेला हा संदर्भ लक्षात घेता आणि त्याच बरोबरीनं पिल्लाथाडम गुहांची रचना लक्षात घेता या गुहांच्या समोर असलेली कातळातली कपार ही दरीच्या बाजूला उघडते आणि तिथून हिंदी महासागर स्पष्ट दिसतो.. थोडक्यात आकाश मार्गानं येण्या जाण्यासाठी हीच कपार अनुकूल आहे..
आज आम्हाला ती गुहा शोधून त्याच गुहेत आजची रात्र राहायचं होतं. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा अक्षरसत्य ग्रंथ आहे.. त्यातील उल्लेखानुसार हनुमान लंकेवरून द्रोणागिरी स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा मोठा भाग इथे कन्याकुमारीत पडला तोच हा मरुत्वमलै आणि आजही इथल्या अनेक गुहांमध्ये सिद्ध पुरुष, यती, महात्मे आणि योगी गुप्त रुपात अगोचर अश्या चतुर्मितीय अवस्थेत सूक्ष्म शरीर धारण करून योगसाधनेमध्ये लीन आहेत.. जे सामान्य माणसाला स्थूल नेत्रांना दिसणार नाहीत कदाचित पण त्यांच्या त्या तपाची स्पंदनं तिथे जाणवल्या शिवाय रहाणार नाहीत.. आणि त्याचा अनुभव आम्हाला मिळावा यासाठी कोणतीतरी एक अनामिक शक्ती आम्हाला तिथे खेचून घेऊन जातीये असा आमचा भाव होता..
आम्ही आत्ता एका मोठ्या खडकावर उभे होतो.. वर मान करून अजून किती राहिलंय याचा अंदाज घेताना तिथून त्या कातळाचं शेवटचं टोक बघण्यासाठी आम्हाला फार कष्ट घ्यावे लागले.. पुढे सगळा रॉकी पॅच होता.. ऊन जाऊन जरा आता ढग दाटून आले होते.. इतका सोसाट्याचा वारा सुटला होता की आमची शरीरं बॅगांसकट हेलकावे खात होती.. या पर्वताच्या रचनेचं तिथल्या खडकांचं नीट निरीक्षण केल्यावर हे नक्की लक्षात येईल की हे इथे बनलेले नक्कीच नाहीत.. म्हणजे नैसर्गिकरित्या तिथेच ते तयार झालेले नाहीत..तर मोठ मोठाले दगड उल्का पिंडांसारखे आकाशातून पडल्यावर कसे एकमेकांवर रचले जातील किंवा मोठे कातळ प्रचंड उंचावरून खाली पडल्यावर जसे उभे राहतील अगदी अशीच रचना त्यांची आहे.. त्यामुळे वरून पडलेला द्रोणागिरीचा तुकडा ही केवळ एक दंतकथा नसावी.. तर वास्तविक तसं घडलेलं असावं यावर विश्वास ठेवायला लावणारी अशी त्या पर्वताची रचना आहे .. खरंतर पर्वत म्हणावा इतका तो मोठाही नाहीये.. जेमतेम दीड सिंहगड एवढं अंतर असेल.. पण तरीही खडकाळ चढण असल्यामुळे ढाल काठीच्या कड्यापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं..
मोठ मोठाल्या शिलांमधून वाट काढत असताना लांब दूरवर त्या कातळांवर लक्ष्मी, सरस्वती, गणपती, नंदी, शिवलिंग अश्या प्रतिमा ठिकठिकाणी कोरलेल्या दिसल्या.. जिथे माणसाला जायला ऍक्सेसही नाही अश्या ठिकाणी कातळात या मुर्त्या कोणी आणि कशा कोरल्या असतील याचं राहून राहून आश्चर्य वाटलं.. त्याच्याच शेजारी पाण्याचं एक कुंड होतं. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाण्याच्या टाक्यासारखं दिसत होतं. ज्यात जिवंत झरे होते.. तिथून थोडं पुढे गेल्यावर डावीकडे दोन खडक मधोमध दुभंगून तयार झालेल्या एका कातळ गुहेत वाकून बघितलं तर तिथे दगडात कोरलेली अगस्ती मुनींची मूर्ती होती.. इथल्या लोकांच्या मान्यतेनुसार अगस्ती मुनींनी काही शे वर्ष या गुहेत साधना केली.. म्हणूनच या तालुक्याला प्राचीन काळापासून अगस्तीस्वरम हे नामाभिधान आहे.
आता त्या खडकाळ रस्त्यावरून वर चढत आम्ही एका उंच दगडावर येऊन थांबलो समोर बघितलं तर प्रचंड मोठ्या दोन शिळांमध्ये एक घळ तयार झाली होती.. जिथून आत्ताच आम्ही वर आलो.. टॉप अँगलनं कन्याकुमारीतलं ते प्रचंड मोठं जंगल खतरनाक दिसत होतं.. निलगिरी, रबर, फर्न, बांबू, रक्त चंदनाची भली मोठ्ठी झाडं आणि औषधी वनस्पतींचं भांडार असलेलं इथल्या आजूबाजूचा जंगल परिसर वाघांव्यतिरिक्त बायसन, जंगली हत्ती, ब्लॅक पँथर, निलगिरी तहर,सिंह-पुच्छ मकाक, स्लॉथ बेअर अश्या अनेक हिंस्त्र प्राण्यांचं घर आहे.. डोळ्यात ते कमालीचं हिरवं गार दिसणारं निसर्गाचं सौन्दर्य साठवून आम्ही वाऱ्याच्या वेगाला कापत परत वर शिखराकडे जायला निघालो.. शिस्तीत पाय ठेवायला कुठंच नीट जागा नव्हती त्यामुळे न थांबता पट पट पावलं टाकत आम्ही एक एक टप्पा सर करत चाललो होतो.. कारण कातळावरून चढताना जरा अंदाज चुकला आणि तोल गेला तर डायरेक्ट दरी.. हिमालयात द्रोणागिरी चढत असताना आलेल्या अनुभवामुळे आम्ही शहाणे झालो होतो.. बराच वेळ खड्या कातळावर उभी तिरकी पावलं टाकून जीव निघाला होता. अखेर एक एक टप्पा पार करत आम्ही शिखराच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो..तिथे मोकळी जागा मिळाली त्यामुळे एका मोठ्या खडकावर आम्ही आता जरा निवांत बसलो. इथून समोरचं चित्र स्पष्ट दिसायला लागलं.. जंगलाच्या पलीकडे पुढचा सगळा भाग हा नारळाच्या बागांनी वेढलेला होता.. उजव्या बाजूला दूरवर हजारो पवनचक्क्या आणि या सगळ्याच्या पलीकडे दक्षिण ध्रुवापर्यंत पसरलेला अथांग हिंदी महासागर आता डोळ्यांना स्पष्ट दिसत होता.. पाय निघत नसला तरी आता जरा घाई करणं गरजेचं होतं.. करण आम्हाला आधी वर शिखरावर असलेल्या हनुमंताचं दर्शन घेऊन त्या ऐतिहासिक गुहेच्या रस्त्याचा शोध घ्यायचा होता..
(क्रमशः)
लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu
पुणे
Ph: 9881999034
© ALL RIGHTS RESERVED ©
For related photos and videos - Please visit – facebook & Instagram profile -
दक्षिणतीर्थ’ - भाग - १ - लेखांक - 5 – (06/01/2023)
लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू
लेखांक -५- व्याघ्रेश्वराच्या गुहेत
दुपारचे १२ वाजले होते.. कधी एकदा त्या कातळातल्या गुहांची वाट सापडते असं आम्हाला झालं होतं. त्या उत्साहात आम्ही झरझर वर चढत गेलो..सगळ्यात वरच्या कड्यावर मारुतीचं एक मंदिर आहे तिथे पोहोचलो. मंदिराशेजारीच ढालकाठीच्या बुरुजावर असतो तसा भला मोठा भगवा ध्वज फडकत होता. मंदिराजवळ कोणीच नव्हतं.. मला वाटतं पूर्ण मरुत्वमलै वर त्यावेळी तिथे दडलेल्या गुहांमध्ये साधना करणारे यती त्या परमार्थ लिंगेश्वर मंदिरातले पुजारी आणि आम्ही दोघेच असू कदाचित..
काळ्या पाषाणातल्या मारुतीच्या मूर्तीला सोवळी वस्त्र म्हणून केशरी, सोनेरी काठाची पांढरी लुंगी नेसवली होती.. शेजारीच त्याची गदा ठेवलेली होती आणि मोठ मोठाले खिळे ठोकलेल्या खडावा होत्या.. तिथल्या प्रचंड वाऱ्यात आम्ही काही वेळ त्या हनुमंतासमोर डोळे मिटून बसलो.. आणि नंतर चौफेर न्याहाळून त्या गुहेच्या शोधात चढ्या कड्यावरून थोडं खाली उतरायला लागलो.. खाली येतना दिसलं, एक प्रचंड मोठा कातळ मधून दुभंगला आहे.. त्याच्या बरोबर मधे एक छोटीशी फट आहे.. इथून रस्ता असणं शक्यच नव्हतं..जेमतेम एक माणूस आडवा जाईल एवढीच जागा..म्हणजे हा एखाद्या गुहेकडे जाणारा रस्ता असेल असं वाटणारही नाही एवढा गुप्त.. पण आश्चर्य म्हणजे तोच फटीतला रस्ता खाली त्या कातळातल्या पिल्लाथाडम गुहेत जात होता.. येस रस्ता तर सापडला.. पण रस्ता सापडून फक्त उपयोग नव्हता.. त्या फटीतून आत जाऊन खड्या पहाडाच्या उभ्या कातळात उतरणं सोपं नव्हतं.. कारण त्याला लागूनच भली मोठी दरी होती. एकावेळी माणूस आणि बरोबर नेलेलं समान एकत्र आत जाणं त्या रस्त्यानं शक्य नव्हतं त्यामुळे मी बॅग्स घेऊन अलीकडे थांबलो..
संस्कार त्या फटीतून आत गेला आणि खाली उतरल्यावर त्यानं अजून एक थोडा मोठा पण याहून अवघड रस्ता शोधून काढला.. फक्त तो रस्ता आकाराने मोठा असल्यामुळे त्या भागात येऊन एक एक करत मी बॅग्ज खाली त्या कातळात टाकल्या कारण अलीकडच्या रस्त्यानं सामान नेणं अवघड होतं.. बॅग्ज खाली टाकून मी पण त्या कातळात वरून धरत धरत खडकांवर आडवे पाय लॉक करत खाली उडी मारली.. खडकाच्या आतल्या भागात भली मोठी कपार आणि त्याच्या बरोबर शेजारी त्या गुहांचा समूह होता.. तिथल्या अलीकडच्या फटीत आम्ही उतरलो.. पुढे जायला वाट नव्हती त्यामुळे झोपून सरपटत सरकत पुढे जावं लागणार होतं.. रस्ता फारच अवघड आणि तितकाच अगम्य होता.. सरकत सरकत..बॅग्ज पुढे नेत त्या फटीतून आम्ही खाली उतरत होतो.. रस्ता आता आणखीनच निमुळता होत गेला.. साधारण कोणाही माणसाला इथे गुहा आहे हे कळूच नये आणि तिथल्या सूक्ष्ममितीत साधना करणाऱ्या यतींना त्रास होऊ नये अशीच त्या गुहेच्या वाटेची रचना होती.. आम्हाला आता घाम फुटला होता.. त्या चिंचोळ्या वाटेतून जाताना श्वास कोंडत होता.. कुठे खरचटत होतं.. तर कुठे तिथले लहान टोकदार दगड घासले जात होते.. पण काही करून आम्हाला आत उतरायचं होतं.. एखादा ट्रॅप कसा असावा अगदी तशीच त्या वाटेची रचना होती.. आता शेवटचाच टप्पा राहिला होता.. अंग झोकून देऊन सरपटत पुढे आलो आणि तिथल्या भल्या मोठ्या शिळेवर पाय ठेऊन हातानी खडकांचा आधार घेत खाली उडी मारली.
पुढचं पाऊल टाकून डावीकडे बघितलं तर प्रचंड वाऱ्याचा झोत आमच्या कानशिलावर आदळला.. कातळाच्या मधोमध तयार झालेली भली मोठी कपार.. तिथून डोकावून पाहिलं तर खाली खोल दरी आणि कपारीच्या आजू बाजूंनी चार शिलांमध्ये कोरल्या गेलेल्या गुहा..
येस्स.. सापडली.. मिळाली.. एक मोठा श्वास घेतला.. चेहेऱ्यावर कमालीचं समाधान होतं. काय आनंद झाला म्हणून सांगू.. शेवटी इथपर्यंत त्यांनी आणलं.. सामान अस्ताव्यस्त पडलं होतं ते एकत्र करून सरळ नीट ठेवण्याची पण शुद्ध नव्हती.. आम्ही निशब्द झालो होतो.. त्या गुहांचं दर्शन घ्यायच्या आधी ‘पोहोचलो एकदाचे’ या भावात पुढे येऊन कपारी शेजारच्या एका खडकावर दरीच्या बाजूला खाली पाय सोडून बसलो.. एकही शब्द तोंडातून नं काढता त्या कपारीमधून दिसणारं ते निसर्गाचं सौंदर्य न्याहाळत..
हिरवं गार जंगल, त्यामागे कमळाची शेती आणि नारळाच्या बागा.. सागराचा त्रिवेणी संगम आणि त्यामागे अनंतापर्यंत व्यापलेला निळाशार हिंदी महासागर.. त्या सागराच्या दिशेनं येणारा सोसाट्याचा घोंगावणारा वारा आमच्या कानात सांगत होता.. You are meant to be here.. You are destined to be here.. आमच्या नशिबावर आमचा विश्वास बसत नव्हता.. श्रीपाद चरित्रामृतातल्या शंकर भट्टाच्या त्या प्रसंगाची आठवण झाली.. कपारीच्या कड्यावरून पुन्हा एकदा शंकरभट्टाप्रमाणे श्रीपाद स्वामींच्या नावाची आरोळी दिली.. तिचा प्रतिध्वनी पुन्हा एकदा त्या कडे कपाऱ्यांमध्ये गुंजत होता.. थोड्या वेळानं भान आलं आणि बॅग्ज एकत्र करून त्या गुहेजवळ असलेल्या एका बांधीव गुहेसदृश पडवी जवळ ठेवल्या. त्याची हलवा हलव करत असताना "सांभाळून रे" असं म्हणेस्तोवर उरलेल्या शेवटच्या 2 पाण्याच्या बाटल्यांपैकी एक बाटली बॅगमधून बाहेर निसटून घरंगळत त्या दरीत जाऊन पडली.. झालं.. आता उद्या पायथ्याला पोहोचेपर्यंत एकच बाटली पुरवावी लागणार होती. पण तिथे पोहोचल्याचा आनंदच एवढा होता की त्यापुढे दुसरा कुठलाच भौतिक विचार मनात येत नव्हता. बॅग्ज ठेवल्यावर संस्कारनं दुसऱ्या रस्त्यानं वर चढून इकडून तिकडून सरपणासाठी काही काटक्या गोळा करून आणल्या.. गुहेबाहेर शेकोटी पेटवण्यासाठी तीन दगड मांडून जागा तयार केली.. तोपर्यंत तिथल्या एका बांधीव गुहेत कपडे बदलून सोवळी वस्त्र नेसली.. आणि बाहेर आलो तसा या प्रचंड वाऱ्यामुळे शरीरासकट कपडे उडून जातात की काय असं वाटायला लागलं.. मी एक एक करत आता त्या गुहांचं आतून दर्शन घ्यायला लागलो आणि त्या पिल्लाथाडम गुहेत जसा प्रवेश केला तसा उष्म स्पंदनांचा एक झोत पूर्ण शरीराला चेतवून गेला.. बाहेर प्रचंड थंड वारं सुटलेलं असताना आत भट्टी तापावी त्याप्रमाणे कमालीचं उष्ण वातावरण होतं.. दिवसासुद्धा त्या गुहेत प्रकाशाचा लवलेशही नव्हता.. टॉर्च लावून एक एक मेणबत्ती पेटवली आणि त्या गुहेच्या खोलवर आतमध्ये प्रत्येक चौथऱ्यावर एक एक ठेवली.. तशी पूर्ण गुहा स्वर्ण प्रकशानं उजळून गेली.. नीट बघितल्यावर लक्षात आलं त्या गुहेत निसर्गतःच अनेक चौथरे तयार झाले होते आणि खाली यज्ञ यागाचं उर्वरित साहित्य इतस्ततः पसरलेलं होतं.. म्हणजे इथे नक्कीच कोणीतरी साधनेला येत असणार.
मला ती गुहा न्याहाळत असताना व्याघ्रेश्वर शर्माची चरीत्रामृतातल्या पहिल्या अध्यायातली गूढ आणि अगम्य कथा आठवली. व्याघ्रेश्वर त्याच्या मागच्या जन्मात एक मल्ल होता तो त्याच्या ताब्यात असलेल्या वाघांना अत्यंत क्रूरपणे वागवून त्यांचा छळ करत असे.. या कर्माच्या परिणाम स्वरूप अनेक नीच योनीत त्याला जन्म घ्यावा लागला असता पण श्रीपादांच्या अनुग्रहाने त्याला मनुष्य जन्म मिळाला.. पण पूर्वजन्म कर्माचे भोग म्हणून जन्मतःच अज्ञानी असल्यामुळे लोक त्याची निंदा करत. एकदा त्याला स्वप्नात श्रीपादांचा दृष्टांत झाला ज्यात त्याला हिमालयातल्या बद्री अरण्यात जाण्याची आज्ञा झाली. हिमालयातल्या उर्वशी कुंडाजवळ त्याला त्याचे गुरु भेटले आणि हिमालयात त्यांच्या शिष्यांबरोबर तो ध्यान करू लागला.. पण सतत व्याघ्र रुपाचंच ध्यान झाल्यामुळे त्याला इच्छित असं व्याघ्ररूपच प्राप्त झालं.. इथल्या सिद्ध संतांच्या तपोगुफांचं तो वाघ विध्वंसक वृत्ती असलेल्या सामान्य मनुष्य प्राण्यांपासून किंवा अन्य वाईट शक्तींपासून रक्षण करत असे. तसंच हिमालयातल्या प्रत्येक गुहांमधला निरोप किंवा इति वृत्तांत पोहोचविण्याचं काम तो करायचा.. आत्मज्ञान प्राप्तीनंतर श्रीपादांच्या अनुग्रहाने तो व्याघ्ररूपातच कुरवपुरला आला आणि पंचदेव पहाडच्या किनाऱ्यावरून स्वामींना हाक मारायला लागला.. ते बघून श्रीपाद स्वामी कृष्णेच्या पाण्यावरून चालत पलीकडच्या तीरावर गेले.. आणि त्या वाघावर स्वार होऊन कुरवपुरला आले.. वाघावर बसून आलेले स्वामी बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तेव्हा त्या वाघातून एक कांतिमान पुरुष अवतरला आणि त्यानं त्याचं व्याघ्राजीन (वाघाचं कातडं) स्वामींनी आसन म्हणून स्वीकारावं अशी प्रार्थना केली. स्वामींनी त्याच्यावर केलेल्या अनुग्रहाबद्द्ल त्याला सांगून त्याला कधीही इच्छित असं वाघाचं रूप धारण करता येईल आणि इच्छेप्रमाणे सोडताही येईल असा आशीर्वाद दिला..
तेव्हापासून हा व्याघ्रेश्वर शर्मा सिद्ध संतांच्या तपोबलाने उर्जित अश्या अनेक पर्वतांवर तिथल्या गुहांमध्ये येऊन व्याघ्र रुपात साधना करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातल्या मरुत्वमलै पर्वताशी निगडित कथेच्या प्रत्येक वाक्याचा विचार केला तर शंकर भट्ट भ्रमण करत करत एका गुहेजवळ आला.. तिथे त्याला एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला.. त्याला घाबरून शंकरभट्टानं श्रीपाद प्रभूंच्या नावाची आरोळी दिली.. आणि तिचा प्रतिध्वनी ऐकून त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले.. त्या वाघाने श्रीपाद स्वामींच्या आवाजाचा जयघोष केला आणि व्याघ्रजिन त्यागून मनुष्यरूपात आला.. पुढे आकाश मार्गानं तो निघून गेला..
हे सगळं कसं कुठे, कुठल्या ठिकाणी झालं असेल, घडलं असेल या सगळ्याचा आम्ही अंदाज बांधत होतो.. गुहेजवळ एक मोठा खडक होता ज्याची रचना प्राकृत चौथऱ्यासारखीच होती जिथे कदाचित तो वाघ बसला असेल, त्याच्या बरोबर शेजारी पिल्लाथाडम गुहा होती जिथून ते वृद्ध तपस्वी बाहेर आले असतील, आणि त्या चौथऱ्याच्या बरोबर समोर ती कपार होती जिचा रस्ता हा फक्त आकाशमार्गानं जाणाऱ्या येणाऱ्यांसाठीच अनुकूल आहे .. त्यामुळे याच मार्गाने व्याघ्रेश्वर गेला असेल असं दृष्य डोळ्यासमोर आणत आम्ही परत त्या गुहेत आलो.
प्रकाशमान झालेल्या गुहेचं आम्ही कोपऱ्या कोपऱ्याचं हळू हळू निरीक्षण करू लागलो.. तर असं निदर्शनास आलं की तिथे प्राकृतिक बनलेले ते चौथरे सूक्ष्म रुपात साधना करणाऱ्या सिद्ध पुरुषांची आसनं असावीत.. आणि आत्ताही ही सगळी मंडळी आमच्या समोर साधनेत लीन असावीत पण आमच्या दृष्टीला मात्र ती दिसत नसावीत.. डोळे मिटून निट ऐकल्यावर भ्रामरी प्रमाणे नाद ऐकू येत होता.
हे निरीक्षण चालू असताना प्रत्येक चौथऱ्याला नमस्कार केला.. न जाणो तिथे असलेली अदृश्य शक्ती नकळत आपल्याला काही आशीर्वाद देऊन जाईल हा भाव त्यामागे होता.. याच गुहेत त्या वृद्ध तपस्वी ऋषींनी शंकरभट्टाला आणलं असेल.. उल्लेखानुसार जेव्हा ते त्याला घेऊन गुहेत आले तेव्हा त्यांनी तिथे फक्त संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला.. त्यात आहुती देण्यासाठी लागणारं पवित्र साहित्य आणि मधुर फळं यांची निर्मिती केली आणि वैदिक मंत्रोच्चारासह त्या पदार्थांची अग्नीत आहुती दिली.. आणि सांगितलं की या यज्ञाचं फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं दर्शन होईल..हे सगळं इथे कसं घडलं असेल याचाच विचार डोक्यात चालू होता..
एका चौथऱ्यावर चढून मांडी घालून बसलो आणि डोळे मिटले.. डोळे मिटल्या मिटल्या भुवयांमध्ये कुटस्थ चैतन्याचं स्थान असलेल्या आज्ञा चक्राजवळ कॅमेऱ्याचा फ्लॅश पडावा तसा प्रकाश जाणवला.. श्वास स्थिर झाला..हळू हळू तो प्रकाश मंद होत गेला आणि त्यातून दोन लाईट स्पॉट वेगळे झाले.. प्रकाशाच्या वेगानं ती दोन्ही प्रकाशबिंब पुढे पुढे जात आहेत असा भास झाला.. आणि मनोवेगानं दृष्टी पण त्या मार्गानं त्याच वेगानं प्रवास करत आहे असं जाणवलं.. डोळे वर जाऊन ऊर्ध्व लागला आणि मान आपोआप मागे पडली.. एखादी वीज पाठीच्या कण्यातून सळसळावी तद्वत ऊर्जा स्पंदनांची उधळण शरीरामध्ये होत होती.. बऱ्याच वेळानं हा पाठलाग संपला आणि ती दोन प्रकाश बिंब पुन्हा एकमेकात जशी विलीन झाली तसा प्रकाशाचा झोत आता आणखीन प्रखर झाला.. तो सहन न झाल्यामुळे खाडकन डोळे उघडले..
दोन मिनिटं काहीच सुधरेना.. दीर्घ श्वास घेतला आणि तिथून खाली उतरलो.. याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता.. या ट्रान्स मधून मी बाहेर येतोय तोपर्यंत संस्कार कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन तिथे आला..जरा रेकॉर्डर लावून तिथे त्या गुहेच्या माहितीचा व्हिडिओ केला आणि काही वेळ कॅमेरा तसाच ऑन ठेऊन गुहेचा पूर्ण भाग त्यात रेकॉर्ड केला.
आता संध्याकाळचे 6 वाजले होते.. आम्ही गुहेच्या बाहेर आलो आणि सूर्यास्त बघायला म्हणून तिथल्याच एका मोठ्या कातळावर येऊन बसलो..वेस्टर्न घाटाच्या जंगलाच्या बॅकग्राऊंडला निळाशार हिंदी महासागर आणि त्याच्या क्षितिजाला आलेला मावळतीचा सूर्य हे दृश्य आम्हाला रोज रोज दिसणारं नव्हतं.. त्या लालबुंद रक्तवर्णी अग्नी गोलकाकडे पहात आम्ही त्राटक करत होतो.. वाऱ्याचा वेग आता आधीपेक्षा बराच वाढलेला जाणवला.. सूर्यास्त झाला आणि हेलकावे खात आम्ही खाली उतरून आजूबाजूच्या सगळ्या गुहांचं दर्शन घेतलं.. सगळीकडे तसेच चौथरे आणि यज्ञ साहित्य दिसून आलं.. आता अंधार पडायला लागला.. आम्ही तिथल्या बांधीव गुहेत आलो.. तिथेही मेणबत्त्या लावल्या आणि तिन्ही सांजेच्या वेळी आसन घालून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या जन्मापर्यंतच्या पहिल्या सहा अध्यायांचं वाचन करायला सुरुवात केली..
जसा व्याघ्रेश्वर शर्मा आणि मरुत्वमलैचा पहिला अध्याय वाचायला घेतला तश्या डोळ्यांना घळाघळा पाण्याच्या धारा... बांध फुटला आणि एवढा की समोर ठेवलेल्या चरीत्रामृताला त्याचा अभिषेक झाला.. जो अध्याय इतर वेळी घरी बसून वाचला जातो तो आज मरुत्वमलैच्याच पवित्र भूमीवर आणि नेमक्या त्याच अतर्क्य गुहेत वाचला जावा आणि हा योग जुळून यायला त्या परातत्व शक्तीनं आपली निवड करावी याहून दुसरं सुख नव्हतं..'तू इधर आया नहीं लाया गया है' असं ते तत्त्व सांगत आहे असं वाटत होतं. हा अष्टसात्विक भाव कायम हवाहवासा वाटतो.. खतरनाक फिलिंग असतं ते.. आनंदाची अत्युच्च स्थिती म्हणूया हिला.. या एकाच स्थितीला मनात जिवा शिवाची भेट झालेली असते.. तो अनुभव घेत..डोळ्यातलं पाणी पुसत, हुंदके आवरत एक एक अध्यायाचं वाचन पुढचा बराच वेळ चालू होतं.. आम्हा दोघांव्यतिरिक्त ते ऐकायला अजूनही कोणी तिथे आहे याची जाणीव होत होती.. का कोणास ठाऊक पण तिथल्या सगळ्या गुहांमध्ये गुप्तपणे साधना करणारे सिद्ध ते चरीत्रामृताचे अध्याय ऐकण्यासाठी आमच्या गुहेत गोळा झाले असतील असा भास झाला.
जन्माचा अध्याय संपला आणि मी वाचन थांबवलं.. आत्ता रात्रीचे 9.30 झाले होते. नमस्कार करून आम्ही बाहेर आलो.. कभिन्न अंधार.. टॉर्च आणि इमर्जन्सी लॅम्पच्या उजेडात गुहेच्या दरवाजापाशी मांडलेल्या दगडांमध्ये लाकडं सरकवली आणि भट्टी तयार झाली.. त्या शेकोटीची धग घेत.. त्या प्रकाशात आम्ही गुहेच्या दाराजवळच्या कातळावर बसलो.. अंगावर एक शाल आणि सोनेरी काठाची लुंगी एवढंच होतं.. घोंगावणाऱ्या वाऱ्याचा जोर आता वाढला होता.. जरा भुकेची जाणीव व्हायला लागली.. तो सोनकेळीचा भला मोठा घड वर काढला.. मूठभर बदाम आणि हवी तितकी केळी हेच आमचं आजचं जेवण होतं.. आम्ही शेकोटी शेजारी बसून त्या कपारीकडे तोंड करून हिंदी महासागराच्या किनाऱ्या लागत असलेल्या दीपस्तंभाकडे बघत आमचं हे जेवण करत होतो.. बाकी सगळीकडे पूर्ण अंधार.. अख्ख्या मरुत्वमलै वर यावेळी कदाचित आम्ही दोघेच असू. त्या कातळात साप, नाग, विंचू किंवा इतर हिंस्त्र प्राण्यांची गाठ पडण्याची 100 % खात्री होती.. पण सुदैवानं तसं झालं नाही.. हॉरर फिल्म मध्ये दाखवतात तसा वाऱ्याचा घोंगवणारा आवाज येत होता.. पण आम्ही हे सगळं कमालीचं एन्जॉय करत होतो.. थोड्यावेळानं गुहेत आलो.. बरोबर आणलेली स्लीपिंग मॅट संस्कारला दिली आणि साधनेची 2 आसनं शेजारी शेजारी घालून मी त्यावर आडवा झालो..आता रात्रीचे 11 वाजले होते.. ब्राह्म मुहूर्तावर जाग यावी या उद्देशानं लगेच डोळे मिटले..
(क्रमशः)
लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu
पुणे
Ph: 9881999034
© ALL RIGHTS RESERVED ©
For related photos and videos - Please visit – facebook & Instagram profile -
Facebook Handle: Abhishek Shalu
Instagram Handle: abhishek__shalu
‘दक्षिणतीर्थ’ - भाग -१ - लेखांक - ६ – (07/01/2023)
लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू
लेखांक -६- पद्मनाभपुरमच्या वाटेवर
पुढच्या दिवशी पहाटे 4.30 ला जाग आली.. संस्कारला गाढ झोप लागली होती.. त्याला न उठवता आसन आणि टॉर्च घेऊन शेजारच्या नारायण गुरू यांच्या गुहेत जाऊन ध्यानाला बसलो.. टॉर्च बंद केला.. कानावर फक्त वाऱ्याचा आवाज होता. अंगावरची सोवळी वस्त्र तशीच होती.. डोळे मिटले आणि पुन्हा एकदा त्या प्रकाश बिंबाचा पाठलाग सुरू झाला.. मनाच्या वेगाची गम्मत अश्यावेळी आपल्याला कळते.. इतरवेळी सैरभैर भरकटणारं मन जेव्हा ताळ्यावर येतं आणि एकाच (ध्येयाच्या) प्रकाश झोता मागे धावू लागतं तेव्हा त्याचा वेग पराकोटीचा असतो. शरीर सैल पडलं.. वेगानं डोकं जमिनीला टेकलं.. आणि त्याच्या पुढचं मला आठवत नाही.. तुमच्या नकळत खूप गोष्टी तुम्हाला ध्यानात मिळत असतात.. फक्त आपण डोळसपणे लक्ष द्यायला हवं.. बऱ्याच वेळानी कसल्यातरी मोठ्या आवाजानं जाग आली.. तो आवाज कसला तेही कळलं नाही.. उठलो.. बाहेर येऊन बघतो तर अजूनही नीटसं उजडलेलं नव्हतं.. वाऱ्यानं उडून चाललेलं उपरणं सांभाळत परत रहात्या गुहेत येऊन आडवा झालो.. विचार करत करत परत कधी झोप लागली ते कळलंच नाही..
सकाळी 7 वाजता मल्याळम भजनांचा सामूहिक आवाज कानावर पडला.. कोण आत्ता यावेळी इथे आलं हे बघायला डोळे चोळत बाहेर आलो तर 10 ते 12 बायका, तेवढेच पुरुष आणि लहान मुलं वैगेरे वरच्या गुहेबाहेर खडकांवर बसून नारायण गुरूंची भजनं म्हणत बसलेले दिसले.. संस्कार पण तो आवाज ऐकून उठला.. आम्ही आवरलं आणि बॅग भरून निघायचीच तयारी केली.. ही माणसं कोण आणि अशी इतक्या आत अवघड वाटेने येऊन गुहेच्या बरोबर समोर बसून ही भजनं का म्हणत असतील याच विचारात आम्ही होतो.. ते लोक आमच्याकडे आश्चर्यानं, उत्सुकतेनं, विस्मयतेनं, कुतूहलानं अश्या सगळ्या नजरांनी पहात होते.. हे एवढे लोक एकदम इथे मावले कसे? पोहोचले कुठून आणि पहाटे निघाले कधी असतील? याचाच मी विचार करत होतो..केरळमधल्या कुठल्यातरी खेड्यातून ते आले होते.. इतक्या अवघड वाटेवरून या गुहेच्या कातळात उतरणं काय तर हा रस्ता समजणही अवघड आहे.. इतर वेळी इथे कोणी इतकं सहजपणे येणं शक्यच नाही.. देवाची इच्छा म्हणून ते भाग्य आपल्यालाच लाभलं हा नकळत झालेला अहंकार पार गळून पडला.. कशी गम्मत असते.. अनुभव आणि अनुभूती देणारा तोच...आणि नकळत उफाळून येणाऱ्या अहंकाराला ठेचून आपले डोळे उघडणाराही तोच.
आमच्या परतीच्या वाटेवर गर्दी झाल्यामुळे संस्कारनं वर जायचा पर्यायी रस्ता शोधून काढला होता जो फारच कठीण होता..आम्ही आमच्या रहात्या गुहेतून बाहेर पडलो.. तिथून नव्या रस्त्याने जाण्याआधी एकदम गुहे समोरच्या कातळाकडे लक्ष गेलं तर त्या शिळेवर अगस्ती मुनींची प्रतिमा कोरलेली दिसली.. एवढं चपखल कोरीव काम इथे कोणी आणि कसं केलं असेल याचं आम्हाला आश्चर्य वाटलं..
बॅग घेऊन मोठ्या दगडावर हाताचा आधार घेत तिरकी पावलं टाकत वर चढून गेलो आणि पुढचं पाउल टाकणार तेवढ्यात तिथे काहीतरी भन्नाट दिसलं.. एक भली मोठी चिंचोळी कपार जिथे एखादा फक्त सरपटत, रांगतच जाऊ शकेल एवढी निमुळती.. लांबून तिथे काहीतरी मूर्ती सारखं दिसत होतं.. संस्कारनी ती कालच काटक्या गोळा करायला गेला असताना बघितली होती. संस्कारला म्हंटलं हे बघायचंच आहे आता मला.. बॅग्ज तिथेच त्या कातळावर ठेवल्या आणि पटकन दोन हातावर भार देऊन वर चढून त्या कपारीत घुसलो.. सरकत सरपटत पुढे गेलो.. आणि उजवीकडे बघितलं तर एक बारीकशी फट जिथून फक्त हिंदी महासागर दिसत होता.. अजून सरपटत पुढे त्या मूर्तिजवळ गेलो.. तर पंचमुखी हनुमानाची भगवी मूर्ती होती ती.. जीचं तोंड बरोबर त्या कपारीच्या समुद्राकडच्या भागाकडे म्हणजे दक्षिणेकडे होतं.. इथे एवढ्या खाचेत कोण आणि कसं येत असेल यार? राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्या मूर्तीजवळ पूजा साहित्य.. उदबत्तीचा बॉक्स या सगळ्या गोष्टी होत्या.
एरवी कोणाला ही कपार दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती.. कारण या भागातून वर चढणं म्हणजे जोखमीचं काम होतं.. त्यामुळे इथे कोण येत असावं हा प्रश्नच होता. जे जे दिसेल ते नवल होतं आमच्यासाठी. नमस्कार करून तसंच उलटं सरपटत सरपटत बॅग्जच्या बाजूला आलो आणि त्या घेऊन वर शरीर झोकून दिलं.. फायनली आता आम्ही बाहेर पडलो होतो.. वर पण काही माणसांची वर्दळ होती.. आमचे असे अतरंगी पोशाख बघून एक माणूस आमच्याजवळ आला आणि काहीतरी बोलला.. आम्ही त्याला हिंदी ऑर इंग्लिश एवढंच म्हंटलं.. आता तो हिंदीत बोलायला लागला.. म्हणाला आज नारायण गुरू यांना आत्मज्ञान झालं तो दिवस.. त्यानिमित्तानं केरळ मधले सगळे त्यांचे भक्त दर वर्षीप्रमाणे या गुहेच्या दर्शनाला आलो आहोत.. या गुहेतच त्यांना आत्मज्ञान झाल्यामुळे आमचा हा विश्वास आहे की समाधी अवस्थेत असून सुद्धा या गुहांमध्ये नारायण गुरुंबरोबर अनेक तपस्वी गुप्त रुपात साधना करत आहेत.. आजचा दिवस हा आमच्यासाठी महत्वाचा असल्यानं या गुहेबाहेर येऊन आम्ही त्यांची भजनं म्हणतो.. त्यांचं आवाहन करतो.. आणि आमचा हा विश्वास आहे की ते आमच्या या ऑफरिंग्ज सूक्ष्म अवस्थेत स्वीकारत असतात..
ऐकावं ते एक एक नवल होतं.. आम्ही रात्री गुहेत राहिलो होतो सांगितल्यावर एकदमच विस्मित होऊन बघू लागले..इथे असं कोणी रहात नाही.. त्यात पुणे महाराष्ट्रवाले तर तुम्ही पहिलेच इथे येणारे असाल.. त्यांच्या इच्छेनेच तुम्ही इथे येऊ शकलात.. ते म्हणाले.. आम्ही त्यांना नमस्कार केला.. चौकशी विचारपूस झाली बाकी पण बरीच माहिती त्यांच्याकडून कळली आणि काही वेळानं आम्ही खाली उतरायला लागलो.. चढण्यापेक्षा हा कातळ उतरणे म्हणजे कस लागणार होता.. चढताना कुठे ना कुठेतरी आधारासाठी कपारीत किंवा शिळांच्या सापटीत हाताने आधार घेता येतो पण उतरताना हे होणार नव्हतं.. उतरत आता त्या घळीपर्यंत येऊन पोहोचलो आणि पुढचं पाउल चुकीचं पडलं.. त्यात तो वुडलँडचा जाड जोडा असल्यामुळे त्याला माझं आणि पाठीवरच्या सामानाचं वजन जास्त झालं. तोल गेला आणि कातळाच्या कडेत पाय अडकून उजव्या पायाचा सोल पूर्ण फाटला.. फाटला म्हणजे डायरेक्ट अर्धा हातात आला.. थोडी गुडघ्याला खरचटा खरचटी झाली.. उठून बसलो.. तसाच तो सोल बुटाला वर बांधून चालायला लागलो तर लगेच पुढच्याच कातळावर अर्धा निघालेला तो सोल मुडपला गेला आणि तोल जाऊन तोंडावर आपटणार तेवढ्यात दोन हातांनी त्या मोठया दगडावर रेस्ट झालो.. आता मात्र तो सोल पूर्ण फाडून काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता..आता फक्त आतल्या स्पंजच्या सोलवर सगळी भिस्त होती.. आणि अर्धा मरुत्वमलै अजून उतरायचा राहिला होता.. आता खरी परीक्षा होती.. पण तसच मारुतीचं नाव घेऊन झर झर उतरायला लागलो.. पायथ्याशी येईपर्यंत बुटाच्या चिंध्या झाल्या होत्या.. शेवटी जोडे काढून टाकले.. तिथल्या हापश्यावर तोंड धुतलं आणि निघालो. आज आम्हाला केरळ मधल्या सात गुप्त दरवाज्यां मधल्या अपार धनाचं रहस्य आपल्या तळघरात दडवलेल्या विष्णूच्या पद्मनाभ मंदिराचं दर्शन घ्यायला जायचं होतं..
मंदिर दुपारी 12 ते 5 बंद असतं.. निघायला 10 वाजले होते.. तसही वेळेत पोहोचणार नव्हतोच.. मग निवांतच गाडी घेतली..आता हा पूर्ण कोस्टल रोड होता.. रस्त्याच्या डाव्या बाजूला समुद्र, उजव्या बाजूला गावं आणि किनाऱ्यालगत ओळीनी लावलेली असंख्य नारळाची झाडं.. लोकल रेडिओ वरची तमिळ गाणी आणि पूर्ण रिकामा रस्ता.. आहाहा..इथे ड्राइव्ह करण्याचं सुख वेगळंच.. मॅप वर पद्मनाभ मंदिर 3 तासांवर दाखवत होतं.. पण अंघोळ झाल्याशिवाय दर्शन नाही त्यामुळे तिरुअनंतपूरम मधे एंटर केल्या केल्या घातली गाडी कोवालम बीच वर.. निळाशार समुद्र.. निळा म्हणजे प्रॉपर निळा बरं.. उगाच निळ्या रंगाची छटा वैगेरे असलं काही नाही.. आपण भारतातच आहोत ना असा प्रश्न पडावा इतका निळा.. एरवी अंदमान, लक्षद्वीप आणि कन्याकुमारी सोडल्यास इतर ठिकाणी असा समुद्र आपल्याला बघायला मिळत नाही.. गाडीतनच स्विमिंग कॉस्च्युम घालून बाहेर पडलो.. आणि पळत पळत थेट समुद्रात.. अगदी बऱ्याच वेळ पोहून झाल्यावर बाहेर येऊन एके ठिकाणी अंघोळ केली आणि पद्मनाभ मंदिराजवळ असलेल्या तिरुअनंतपूरम मधल्या प्रसिद्ध अन्नपूर्णा डायनिंग हॉल मधे जेवायला आलो..
आज बऱ्याच दिवसांनी आम्ही इडली वडा सोडून काहीतरी वेगळं जेवणार होतो.. चित्रांन्न, सांबार, थक्कली सादम, रस्सम, बिशी बिळी अन्ना, पोंगल,पायसम्, रागी संकटी या सगळ्या पदार्थांनी भरलेलं ताट समोर आलं.. मग काय जोरदार फडशा.. जेवण झाल्यावर पाण्याचा एक घोट घेतला तर ते गरम लागलं.. नीट बघितलं तर त्याचा रंग गुलाबी होता.. चवही वेगळी होती.. विचारलं हे काय.. तर कळलं केरळमधे सगळीकडे हेच आयुर्वेदिक घटक असलेलं गरम पाणी पितात त्यात पत्रंग ज्याला सॅपन वूड किंवा इंडियन रेड वूड म्हणतात या औषधी वनस्पतीच्या देठाचा अर्क, दालचिनी आणि लवंग घालून उकळवतात..
एकदम भन्नाट चव होती त्या पाण्याची..पोटाचे अनेक विकार या पाण्यानं बरे होतात असा अनुभव इथल्या लोकांमध्ये प्रचलित आहे.. शेवटचा घोट घेऊन आम्ही निघालो.. सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क केली.. मंदिरात सोवळ्यातच प्रवेश असल्यामुळे गाडीतच सोनेरी काठाची लुंगी आणि उपरणं असा पोशाख करून चालतच मंदिराच्या रस्त्यानं यायला निघालो..
आज नवरात्रातली महानवमी असल्यानं सरस्वती मंडपामध्ये प्रचंड गर्दी होती.. आणि ते मंदिर आज बंद नव्हतं..पद्मनाभ मंदिर मात्र अजून उघडायचं होतं.. पायात काहीच नसल्यानं त्या कडकडीत उन्हात पाय भाजायला लागले.. त्या तापलेल्या रस्त्यावरून साउथ इंडिअन हिरो सारखी ती लुंगी पायानं वर उचलत कमरेला बांधली आणि आम्ही सरस्वती मंदिराकडे पळत सुटलो.. तिथल्या क्लोक रूम मधे सगळ्या मौल्यवान वस्तू ठेवल्या आणि सरस्वती मंदिराच्या गर्भगृहाकडे जाणाऱ्या लाईनीत उभे राहिलो.. महानवमीच्या निमित्तानं सभा मंडप, गोपूरं, प्रांगण फुलांनी सजलेलं होतं.. नृत्य, गायन आणि वादन सेवेसाठी त्रिवेंद्रम मधले वाद्यवृंद, आणि कलाकार आले होते..ते तिथल्या सभामंडपात देवीसमोर त्यांची कला सादर करत होते.. सगळ्या स्त्रिया सोनेरी काठाच्या ऑफ व्हाइट साड्या, वेगळीच कलाकुसर असलेले सोन्याचे दागिने आणि केसात अबोली मोगऱ्याचे गजरे या पोशाखात होत्या तर सगळे पुरुष सोनेरी काठाच्या सोवळ्या लुंग्यांमध्ये होते... मंदिरात प्रवेश करण्यासाठी हा ड्रेसकोड इथे असावाच लागतो.. इथल्या संस्कृतीचं ते प्रतिक आहे.. आम्ही पुढे सरकत गर्भगृहापाशी आलो.. देवीची मूर्ती प्रसन्न होती.. फार प्राचीन असावी.. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो.. कथक, भरतनाट्यम, कथकली, कुचिपुडी या नृत्यांचं सादरीकरण प्रांगणातल्या वेगवेगळ्या मंडपांमध्ये चालू होतं.. सनई, घटम, बासरी, रुद्रविणा, मृदुन्ग, पखवाज आणि दक्षिणेतल्या काही खास अश्या कधीही न बघितलेल्या किंवा ऐकलेल्या मंगलवाद्यांच्या ध्वनीनं ते प्रांगण निनादून गेलं होतं.. आम्ही तिथून लगेच पद्मनाभ मंदिराच्या रांगेत उभं रहाण्यासाठी साऊथ गेटला आलो.. मंदिर उघडायला अजून एक तास होता तरीही भली मोठी रांग होती..
इथे पद्मनाभपूरम आणि अनंत पद्मनाभ अशी दोन देवालयं आहेत..कासरगोडमधील बेकल जवळ असलेलं मंदिर तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील देवता पद्मनाभ यांचं मूळ स्थान मानलं जातं. दोन्ही मंदिरांमध्ये भगवान पद्मनाभ मुख्य देवता आहे.
अनंतपुरा तलाव मंदिराचं आणखी एक आकर्षण म्हणजे ‘बाबिया’ नावाची शाकाहारी मगर जिचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. देवतेला विधींचा एक भाग म्हणून अर्पण केलेल्या तांदूळावर ती रहात होती.. मुख्य म्हणजे अनेक वेळा आरतीच्या वेळी सगळ्या भविकांसमक्ष तलावातून ती आत मंदिरात येऊन पुजाऱ्याकडून प्रसाद ग्रहण करायची. ही मगर तलावातल्या माशांचीही शिकार करत नसे. आताची मगर येथे जवळ जवळ ६० वर्षांपासून तिथे होती. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कायम केवळ मांसाहार करणाऱ्या इतर मगरींप्रमाणे या मंदिरातील मगर केवळ नैवेद्य, सात्विक आहार भक्षण करते ते सुद्धा केवळ मंदिराच्या पूजाऱ्याच्या हातून! इथल्या मूर्तीला दाखविण्यात आलेले नैवेद्याचे पदार्थ नंतर बबियाला दिले जातात तेही तेथील पुजारी तिला भरवतात, अन्य कोणाला ही परवानगी नाही.
या दोन्ही मंदिरांना जोडणारी एक मनोरंजक पुराणकथा आहे. असे मानले जाते की बिल्वमंगलम स्वामी..अनंतपुरा तलाव मंदिरात पूजा करत असत. त्यांचा एक मदतनीस म्हणून एक मुलगा असाच कुठून तरी तिथे आला होता, त्याचा ठावठिकाणा माहीत नव्हता. तो मुलगा खूप खोडकर होता आणि स्वामींना वारंवार त्रास देत असे. एकदा, स्वामींना मुलाचा राग आला आणि त्यांनी त्याला बाजूला ढकलले. मुलगा जमिनीवर फेकला गेला. पण तो पटकन उठला आणि त्यानं स्वामींना सांगितले की मला पुन्हा भेटायचे असेल तर स्वामींना अनंताच्या वनात मला शोधत यावं लागेल. त्यानंतर तो तरुण बेपत्ता झाला. तो मुलगा दुसरा कोणी नसून साक्षात भगवान विष्णू आहे हे आत्मज्ञान झाल्यावर विल्वमंगल स्वामींनी त्या जागेच्या शोधात दक्षिणेकडे प्रवास केला. ते अनंताच्या जंगलात पोहोचले आणि त्यांना तिथे पद्मनाभस्वामींचं दर्शन झालं.. हेच अनंताचं जंगल आता तिरुअनंतपुरम शहर आहे.
दैवी संकल्पानं पुढे इथे त्रावणकोर राज्याचा राजा मार्तंडवर्मा यानं हे भव्य मंदिराचं पुनर्निर्माणाचं काम केलं. सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या पांडू लिपीमध्ये लिहिलेल्या साहित्यांतही या मंदिराचा उल्लेख आढळतो.. त्याच्याही आधी स्कंद पुराण आणि पद्म पुराणातल्या उल्लेखानुसार श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे सात परशुराम क्षेत्रामध्ये मोडतं.. त्यामुळे सगळ्यात पाहिलं मंदिर आणि दैव प्रतिष्ठापना इथे परशुरामाने केली असावी. भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानात याची गणना होते त्यामुळे टिपू सुलतानासकट अनेक मुस्लिम आक्रमण कर्त्यांनी या मंदिरावर हल्ला केला.. पण तरीही त्यांना या सात दारवाज्यांच्या रहास्याबद्दल समजू शकलं नाही..
(क्रमशः)
‘दक्षिणतीर्थ’ - भाग -१ - लेखांक - 7 – (08/01/2023)
लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू
लेखांक -७ - पद्मनाभच्या गाभाऱ्यात
अशी मान्यता आहे की त्रावणाकोरच्या राजांनी परकीय आक्रमणापासून संपत्तीचं रक्षण व्हावं या उद्देशानं हा दैवी तिजोरीतला खजिना या गुप्त दरवाज्यांमागे दडवला जो अनेक वर्षांपर्यंत तसाच होता.. पुढे इंग्रजांच्या शासकीय काळात पण या गुप्त धनाबद्दल कोणालाच कल्पना नव्हती.. पण गेल्या काही वर्षात 2011 मध्ये, एक सेवानिवृत्त आईपीएस अधिकारी सुंदरराजन यांनी मंदिराच्या गुप्त दरवाज्यांमागे नक्की काय दडलंय हे जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.. आणि त्यावर कार्यवाही होऊन पाहिले 6 दरवाजे उघडण्यात सरकारला यश आलं.. तिथे जवळ जवळ 1,32,000 कोटी रुपयांची संपत्ती सापडली असा अंदाज आहे..
सातवा दरवाजा मात्र अजून कोणाला उघडता आला नाही. जशी आपली सरकारी माणसं कोर्टच्या ऑर्डरने सातव्या दरवाज्याजवळ पोहोचली तसे त्यांना सापाच्या फुत्कारण्याचे आवाज येऊ लागले.. दरवाज्यावर कोरलेल्या शेष नागाचे शिल्प बघून तिथे कोणी पुढे येऊन प्रयत्न करायला धजावले नाहीत.. खरंतर या दरवाज्याच्या पलीकडे किती संपत्ती असेल याचा अंदाज बांधता येत नाही पण लोकांच्या मान्यतेनुसार जर सातवा दरवाजा उघडला तर काही अशुभ घटना घडू शकते.. ही मान्यता होण्याचं एक कारण म्हणजे सातवा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाल्या झाल्या एका महिन्यात सेवानिवृत्त आईपीएस अधिकारी सुंदरराजन यांचा अनपेक्षित मृत्यू झाला.
हा दरवाजा पंचधातूचा असावा ज्यावर 2 प्रचंड मोठ्या रक्षक नागांची शिल्प कोरली आहेत.. हॅरी पॉटर मधल्या चेंबर ऑफ सिक्रेटच्या दरवाजाची आठवण झाली.. विशेष म्हणजे या दरवाज्याला अजिबातच कडी कोयंडे, नट बोल्ट किंवा कुलूप वैगेरे काही नाही, तरीही तो जराशी हवाही आत जाऊ शकणार नाही इतका घट्ट बंद आहे.. काही पुजाऱ्यांच्या म्हणण्या प्रमाणे हा दरवाजा नाग बंधम् किंवा नाग पाशम् तंत्राचा प्रयोग करून बंद करण्यात आला आहे.. जो फक्त गरुड मंत्राच्या अचूक मंत्रोच्चारानेच उघडला जाऊ शकतो.. आणि जर मंत्रोच्चार करताना काही चूक झाली तर जीवावर बेतू शकतं अश्या इथल्या लोकांच्या मान्यता आहेत..
हे म्हणजे कम्प्लिट हॅरी पॉटरच्या रहस्यमयी तेहखाना उघडायला वापरल्या जाणाऱ्या सर्प भाषेची आठवण करून देणारं होतं..काही पूजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा दरवाजा आद्यसर्प आदीशेष आणि कांजीरोट्टू नावाच्या यक्षाच्या सुरक्षा अखत्यारीत आहे.. या सातव्या दरवाज्याला कान लावून नीट ऐकल्यास आतून समुद्राच्या लाटांसदृश आवाज ऐकायला मिळतो.. आता ते लाटांचे आवाज आहेत का सर्पाच्या फुत्कारण्याचे देवच जाणे.
या सगळ्याची चर्चा करत असताना एक तास कसा निघून गेला कळलं नाही आणि मुख्य दरवाजा उघडला.. ओळीनी आम्ही आतमध्ये शिरलो. प्रचंड मोठ्या प्रांगणात काळ्या पाषाणात कोरलेली शिल्प आणि स्तंभ गर्भगृहाच्या चारही बाजूंना लयबद्ध पद्धतीनं वेढलेली होती.. ज्यात सप्त स्वर मंडप हे इथलं मुख्य आकर्षण आहे.. जिथल्या खांबांमधून 7 प्रकारचे स्वर उमटतात.. आणि एका लयबद्ध पद्धतीनं ते वाजवल्यावर त्यातून सांगीतिक ध्वनी उमटतो..
जिथे छतावर नऊ ग्रह स्पष्ट दिसतात अश्या नवग्रह सभामंडपातून पुढे जाताना भृगु मुनी,मार्कंडेय मुनी, गरुड वाहन, नारद मुनी, तंबुरू गंधर्व (एक आकाशीय दैवी संगीतकार), सूर्य (आकाशीय संगीतकार) सूर्य देव, चंद्र देव, सप्तर्षी (सात ऋषी), गणपती, गजांत लक्ष्मी, नरसिंह,मधु आणि कैतभ राक्षस यांच्या अतिप्राचीन अश्या मूर्ती कातळात कोरलेल्या दिसत होत्या. ठिकठिकाणी असलेल्या स्तंभाची बांधणी, त्यावरचं नक्षीकाम, द्राविडियन स्थापत्यशैली.. चितारलेल्या उपदेवता.. आणि स्थापत्य शैलीतून मांडलेल्या त्यांच्या पुराणकथा या अफलातून होत्या.. थोडक्यात मंदिर बांधणी कशी असावी किंवा कोरल्या गेलेल्या चित्रांचा अर्थ काय आणि कसा घ्यायचा याचा जर अभ्यास करायचा असेल तर हे मंदिर याचा उत्तम नमुना आहे. कोरीव कामातली किंवा बांधणीतली सिमीट्री, प्रत्येक खांबावर केलेलं नक्षीकाम आणि त्याचा नेमकेपणा हे मशीननं घडवावं इतकं सुंदर आणि नेमकं होतं.. फोटोग्राफीला फुल्ल स्कोप होता पण आत कॅमेरा अलाउड नसल्यानं आम्हाला नैराश्य आलं. त्या सगळ्या शिल्पांचं दर्शन घेत आम्ही हळू हळू त्या रांगेतून पुढे सरकत होतो.
कापूर, अत्तर, धूप आणि तेवत्या दिव्यांच्या काजळीचा वास एकत्र होऊन तो तिथल्या दैवी स्पंदनांची जाणीव करून देत होता.. सरस्वती मंडपातून उजवीकडे पाऊल टाकलं आणि समोरचं ते रूप बघून स्तब्ध झालो..आजूबाजूला पूर्ण अंधार आणि बरोबर समोर उंच अश्या खडक कपारीवर आतल्या बाजूच्या गर्भगृहात उघडणारे तीन भव्य दरवाजे. ज्याच्या पलीकडे नंदादीपांच्या आणि समयांच्या प्रकाशात स्वर्ण किरणांनी न्हाऊन निघालेली.. लखलखत्या सोन्याच्या अलंकारांनी नटलेली, अनंत शयन योग निद्रावस्थेत असलेली, नेपाळ मधल्या पवित्र अशा काली गंडकी नदीतून मिळवलेल्या 12008 अस्सल विष्णुस्वरूप शाळिग्रामांपासून बनवली गेलेली, आदी शेषावर आरूढ झालेली पद्मनाभ स्वामींची अनंत काळापासून विराजमान असलेली ती अठरा फुटी शेषशायी मूर्ती..
वेद मंत्रांच्या घोषात पूर्ण गाभारा निनादून गेला होता.. साक्षात देव डोळ्यासमोर प्रकटावा तशीच अवस्था..आदी शेषाच्या सहा फण्यांचं छत्र धारण केलेल्या आणि ऊर्ध्वमुखी तल्लीन असलेल्या या मूर्तीचा उजवा हात हा एका शिवलिंगावर विसावला आहे.. शंख चक्र आणि पद्म धारण केलेले हात अनंत शयन आसनात ऊर्ध्वगामी उन्नत अश्या आत्मतत्वाला आशीर्वाद देत आहेत. नाभीतून प्रकटलेल्या पद्मामध्ये ब्रह्मा विराजमान आहेत तर चरणांशी श्री देवी रुपात ओळखली जाणारी लक्ष्मी माता आणि पृथ्वीची देवी म्हणून संबोधली जाणारी मही किंवा भूमाता अश्या दोघीही आसनस्थ आहेत..
एका नजरेच्या कटाक्षात त्या मूर्तीचं रूप सामावणं कठीणच होतं.. आणि फक्त समयांच्या उजेडात ते दिसत असल्यामुळे संपूर्ण मूर्ती डोळ्यात भरणं हे कठीण जात होतं.. आ वासून फक्त न्याहाळणं चालू होतं.. सुमारे १८ फूट लांबीच्या त्या पूर्ण मूर्तीचं दर्शन एकावेळी तीन वेगवेगळ्या दरवाज्यातून घ्यावं लागत होतं. पहिल्या दरवाजातून मुख, बाहू आणि उर, दुसऱ्या दरवाजातून हस्त, उदर आणि नाभी, तर शेवटच्या आणि तिसऱ्या दरवाजातून पाय दिसत होते. आणि हे सगळं त्या गर्भगृहात तेवत असलेल्या शेकडो समयांच्या प्रकाशात आम्ही विस्फारलेल्या डोळ्यांनी एकटक पहात होतो.. कारण आता तर पापणीही लवायला नकार देत होती.. बास बास..अजून काय हवं? याचसाठी केला होता अट्टहास..
पळापळी ढकला ढकली सुरू झाली.. या टोकापासून त्या टोकापर्यंत ढकलत आम्हाला ती गर्दीच घेऊन जात होती.. कारण आमची नजर फक्त त्या विष्णूमूर्तीचं तेज डोळ्यात साठवत स्थिरावली होती..पलीकडून ढकलले गेलो आणि बाहेर पडलो तेव्हा कुठे भान आलं.. चेहेऱ्यावर मंद हास्य आणि डोळ्यात त्या देवाची चमक अजूनही होती.. बाहेर पडून लॉकर रूम मधून सामान घेतलं.. एक छानशी फिल्टर कॉफी मारली आणि निघालो.
आमचं पुढचं ठिकाण हे गोकर्ण महाबळेश्वर असल्यामुळे आजच आम्हाला कोचीन पर्यंतचं अंतर पार करायचं होतं आणि तरच आम्ही पुढच्या दिवशी संध्याकाळपर्यंत गोकर्णला पोहोचू शकणार होतो.. पद्मनाभ ते कोचीन जवळ जवळ 5 तासांचा प्रवास होता.. आणि महानवमीच्या निमित्तानं गर्दी लागणार हे निश्चित होतं.. पटकन गाडी काढली आणि कोचीनच्या रस्त्याला लागलो.. गणेश उत्सवाप्रमाणे देवीचे रथ लाईनीत लागले होते.. आणि काही मंडपात कार्तिकेय (मुरुगन) आणि नंदी अश्या उंच उत्सव मूर्ती उभ्या केल्या होत्या.. त्यातूनच वाटा काढत मुख्य हायवेला लागलो आणि सुसाट गाडी पळवत साधारण रात्री 12 पर्यंत कोचीनला पोहोचलो.. फोनवरून हॉटेल बुक केलं आणि चेक इन करून झोपायला रात्रीचा एक वाजला..
सकाळी आम्हाला अगदी सहा वाजताच निघणं गरजेचं होतं. तरचं आम्ही रात्रीच्या आत गोकर्णला पोहोचणार होतो.. पुढच्या दिवशी दसरा होता.. पहाटे पाच वाजता जाग आली.. आजचा प्रवास जवळ जवळ सोळा तासांचा होता..आवरून 6 वाजता गाडी काढली आणि गोकर्णच्या दिशेनं निघालो.. गोकर्णला पोहोचेपर्यंत वाटेत शंकर भट्ट यांच्या तीर्थाटनातली गुरुवायूर, मंगलोर, उडुपी अशी काही महाक्षेत्र आम्हाला लागणार होती.. सुरवातीचा बराच रस्ता मळयाळ प्रांतातल्या छोट्या खेड्यांमधून जात होता.. तिथलं निसर्ग सौन्दर्य काय वर्णावं, नारळ, केळी, कोकम, पोफळीच्या पसरलेल्या हिरव्या गडद बागा, निळाशार समुद्र आणि त्यात ढग भरून आलेले.. हा रस्ता कुठे संपूच नये असं वाटत होतं.. एक एक गाव मागे सोडत आम्ही गुरुवायूरला पोहोचलो.. शंकर भट्टाच्या तीर्थयात्रेमधलं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं स्थान..
गुरुवायूरप्पन या कृष्णाच्या बालरूप अवताराचं हे मंदिर 5000 वर्षांहूनही जास्त जुनं असून याला दक्षिणेतली द्वारका असंही म्हणतात.. गुरु, वायु आणि उर या तीन शब्दापासून या मंदिराचं नामकरण झालंय. विष्णू पुराणानुसार गुरुवायुर मंदिराची स्थापना देवगुरु बृहस्पति आणि वायुदेव यांनी केली होती.. बाळकृष्णाची इथली मूर्ती इतकी प्राचीन आहे की ती द्वारकेच्या देवस्थानाच्या समकालीन म्हणजेच द्वापारयुगापासून अस्तित्वात असावी.. पुराणानुसार कालियुगाच्या प्रारंभी देव गुरू बृहस्पतींना समुद्रकिनारी पाण्यावर तरंगत असलेली ही मूर्ती मिळाली जी द्वारका जलमग्न झाल्यानंतर तिथल्या समुद्र किनाऱ्यावरून वाहत आली असावी.. बृहस्पतींनी वायू (पवन) देवाचं आवाहन करून त्याच्या मदतीनं या मूर्तीची इथे प्रतिष्ठापना केली.
आम्ही आता गुरुवायूर सोडलं.. पुढे कोझिकोडे, थालासरी, कन्नूर, पायन्नूर, बेक्कल, कासारगोड करत संध्याकाळी सहा वाजता कर्नाटकातल्या मंगलोरला पोहोचलो.. विजयादशमी असल्यानं मंगलोरच्या मंगला देवीच्या सीमोल्लंघन रथयात्रेमुळे तिथून पुढचा सगळा वन साईड हायवे बंद केला होता.. दसऱ्याला इथे कमालीचं उत्साही वातावरण असतं.. गणपती उत्सवासारखं प्रत्येक रथावर देवीबरोबर वेगवेगळे पुराण कथांमधले देखावे.. आणि या सगळ्या जिवंत देखाव्यात मंगलोर मधल्या अगदी लहान मुलापासून ते सत्तर वर्षाच्या वयस्कर गृहस्थापर्यंत सगळे जण आपले चेहरे रंगवून, शेपट्या लावून, देव दानवांचे पोशाख करून त्या पूर्ण रस्त्यावर इतस्ततः विखुरले होते.. रस्त्यावर कुठे वानर सेना पळतीये तर कुठे इंद्रसभा..कुठे रावण वध, तर कुठे लंका दहन, कुठे सीता स्वयंवर तर कुठे दशावतार..
पूर्ण हायवे वर जणूकाही तेहेत्तीस कोटी देवांची गर्दी झाली होती.. आणि या सगळ्यांच्या बॅकग्राऊंडला टिपिकल साऊथ इंडियन म्युझिक.. काय ते दृश्य, काय तो उत्सव, काय तो उत्साह.. सगळंच दैवी..
एक पूर्ण लेन यात अडकली असल्यामुळे दुसऱ्या लेन मधून येणारी आणि जाणारी अश्या दोन्ही वाहनांची गर्दी झाली आणि नंतर असं लक्षात आलं की ट्रॅफिक टू अँड फ्रो अश्या पद्धतीनी अडकलंय. सगळी वाहनं समोरा समोर तिथेच कडेला येऊन उभी राहिली आणि अडकली.. गाडी आत्ता संस्कारच्या हातात होती.. आता इथून गाडी घातली तर पोहोचायला उद्याची सकाळ उजडणार.. त्यामुळे इथेच थोड्यावेळ थांबणं श्रेयस्कर असं म्हणून काही वेळ तिथे थांबलो.. तासभर तसाच गेला आणि थोड्याच वेळात मिरवणूक पुढे येण्याआधी आमच्यासाठी दुसरी लेन थोड्यावेळासाठीच ओपन केली.. बास बास.. ती लेन ओपन झाल्यावर गाडीत फुल्ल नाच्चो.. संस्कारनं गाडी त्या लेन मधून घातली.. पूर्ण मोकळा रोड.. जी काही गर्दी होती ती शेजारच्या लेन मधे अडकलेली.. येणाऱ्या आणि जाणाऱ्याचीही.. जिथे आता पूर्ण रात्र या गर्दीत जाते का काय असं वाटत होतं तिथून तासाभरात आम्ही त्या गर्दीतून बाहेर पडलो.. एक गाडी रस्त्याला नव्हती त्यामुळे आम्ही तासाभरातच उडुपी तिर्थक्षेत्रजवळ आलो ..
श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृताप्रमाणे शंकर भट्टानं तीर्थाटन सुरू केल्यावर भेट दिलेलं उडुपी हे पहिलंच ठिकाण.. कृष्णमठातल्या इथल्याच कृष्णाच्या आज्ञेवरून तो कन्याकुमारीला गेला.. कर्नाटकातल्या पूर्वीपासून तुलूनाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुलू भाषिक भागात मोडणारं हे मंगलोर आणि उडुपी शहर.. संत माधवाचार्यांनी तेराव्या शतकात या दिव्य क्षेत्राचा आणि श्रीकृष्णाच्या या सुंदर मूर्तीचा शोध लावला.. देशभरात प्रसिद्ध असलेल्या उडुपी खाद्य पदार्थांचा शोध सुद्धा या मंदिराच्या स्वयंपाक घरातूनच लागला असं म्हणतात.
उडुपा या शंकराच्या अवतारावरून या क्षेत्राचं नाव उडुपी असं पडलं.. याच उडुपाला इथे चंद्रमौळीश्वर या नावानं पण ओळखलं जातं..
आम्ही उडुपी वरून जात असताना उशीर झाला होता. रात्रीचे दहा वाजले होते त्यामुळे न थांबता पुढे जायचं ठरवलं.. कारण आता आम्हाला गोकर्ण आणि कुरवपुरचे वेध लागले होते.
(क्रमशः)
लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू - Abhishek Shalu
पुणे
Ph: 9881999034
© ALL RIGHTS RESERVED ©
For related photos and videos - Please visit – facebook & Instagram profile -
Facebook Handle: Abhishek Shalu
Instagram Handle: abhishek__shalu
‘दक्षिणतीर्थ’ - भाग -१ - लेखांक - ८ – (09/01/2023)
लेखन – अभिषेक चंद्रशेखर शाळू
लेखांक - ८ – श्री क्षेत्र गोकर्ण महात्म्य
रात्रीचे १० वाजले होते.. गाडीत बसल्या बसल्याच गोकर्ण मधे एक जंगल कॉटेज बुक केलं जे कुदळे बीचच्या अगदी किनाऱ्याजवळ होतं.. पुढे मुरुडेश्वर वरून रात्री 12 वाजता आम्ही गोकर्णला पोहोचतोय तोच प्रचंड पाऊस सुरू झाला होता.. आम्ही त्या कॉटेजच्या रस्त्याला लागलो. त्या मिट्ट काळोखात जंगल वाटेनं पुढं जाताना पावसाच्या रिपरिपीचा आवाज खतरनाक वाटत होता.. रस्त्याला दिवे नव्हते.. त्यामुळे सांभाळून जावं लागत होतं.. अखेर पाऊण वाजता त्या कॉटेजच्या पार्किंग मधे गाडी लावली. चेक इन केलं.. टेंट मध्ये बॅग्ज टाकल्या आणि मागच्या वाडीतून चालत बीचवर आलो.. पाऊस आता जरा कमी झाला होता.. काळे कभिन्न ढग आणि त्याच्यामागून मधे मधे आपलं तोंड दाखवणारा चंद्र.. ढगांच्या आतून त्या चंद्राच्या प्रकाशाचा एक झोत खाली समुद्राच्या लाटांवर पडलेला.. कमाल दृश्य होतं ते. चप्पल काढली आणि मांडी घालून बसलो.. लाटांच्या आवाजाचा एक ट्रान्स असतो.. डोळे मिटून तो अनुभवत होतो.. आत्ता पर्यंतचा प्रवास कसा झाला.. काय अनुभव आले.. कसे आले.. यावेळी नेमकं इथेच बोलावणं का होतं.. या सगळ्याचं अवलोकन मनात चालू होतं. बऱ्याच वेळानं डोळे उघडले तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते.. उठून टेंट मधे आलो..
सकाळी जाग आली ती पावसाच्या घणाघाती आवाजमुळेच... अगग.. उठून बघितलं तर पूर्ण टेंट पाण्यात तरंगत होता.. रात्रभरात बराच पाऊस पडून गेला असावा.. तरी बरं ते वॉटर प्रूफ असल्यानं आत पाणी आलं नव्हतं.. बॅग्ज तश्याच ठेऊन बाहेर आलो.. आजचं सगळंच गणित गंडणार बहुतेक या पावसामुळे.. शेवटी जे होईल ते होईल असं म्हणून पळत पळत तिथल्या जंगलातल्या त्यांच्या कॅफेटेरिया मधे जाऊन बसलो.. आता सक्तीचं थांबणं आलंच आहे तर इथेच चहा आणि गरम गरम मॅगी मागवू असं एकमत झालं आणि पाऊस थांबण्याची वाट पहात आम्ही तिथल्या तिबेटीअन हाउंडशी खेळत बसलो.. बराच वेळ पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता.. मग तसेच भिजत बाहेर बीच वर आलो.. पावसात समुद्र आणखीनच खवळला होता.. काहीच गर्दी नव्हती.. जरा दोन राउंड मारून परत आलो.. आवरलं आणि तसेच भिजत वर ट्रेक करत पार्किंग गाठलं.. आता आम्हाला इथून गोकर्ण महाबळेश्वरच्या मूळ आत्मलिंगाचं दर्शन घ्यायला जायचं होतं.. आजचा दिवस आम्ही इथेच रहाणार असल्यामुळे मंदिराजवळच एखादं हॉटेल बुक करावं असं ठरवून त्या रस्त्यानं निघालो.. बुकिंग करून चालतच गोकर्णच्या त्या चिंचोळ्या वाटांनी कोटीतीर्थ जलकुंडाजवळ येऊन पोहोचलो..
कोटीतीर्थ कुंड हे पितृतर्पण आणि श्राद्धविधी यासाठी पवित्र मानलं जातं.. एकदमच प्राचीन सरोवर आहे हे.. एका श्रुती प्रमाणे एक हजार जिवंत पाण्याचे झरे आणि कोटी कोटी शिवलिंगे या तीर्थात आहेत.. तीर्थाच्या चारही बाजूला मोठं मोठी मंदिरं आणि सरोवराच्या मधोमध प्राचीन काळी अगस्ती ऋषींनी प्रस्थापित केलेलं शिवलिंग आहे.. त्या पाण्यात घोट्यापर्यंत पाय बुडवून उभे राहिलो.. तसे अनेक मासे पायांच्या भोवती पेडिक्युअर करायला गोळा झाले.. गर्दी करून त्यांनी दोन्ही पायांना पूर्ण विळखा घातला आणि तोंडानं पायांना गुदगुल्या करू लागले.. थोड्यावेळ ते करून घेतल्यावर आम्ही तिथल्या दत्तप्रसाद हॉटेल मध्ये अस्सल कारवारी पद्धतीचं शाकाहारी जेवण करायला म्हणून गेलो.. गोकर्ण मध्ये उत्तम घरगुती आणि सात्त्विक जेवण करण्यासाठी हा एक नंबर ऑप्शन आहे.. जेवण करून आम्ही चालतच गोकर्ण शिवलिंग मंदिर आणि बाल गणेश मंदिराच्या आवारात आलो.. आणि मंदिर उघडायची वाट बघत तिथल्या चौथऱ्यावर गोकर्ण क्षेत्राची कथा आणि दत्ततत्वाशी त्या जागेचा असलेला संबंध याबद्दल वाचत बसलो..
गोकर्ण महाक्षेत्राचा उल्लेख श्रीमद गुरुचरित्र या पंचम वेद मानल्या जाणाऱ्या ग्रंथात सापडतो. हे शिवाचं आत्मलिंग आहे.. इथं अतिशय पुरातन शिव मंदिर असून अत्यंत प्रासादिक तीर्थक्षेत्र आहे. अनेक जन्मांची पापं इथे केवळ दर्शनाने नाश पावतात असा क्षेत्रामहात्म्यात उल्लेख आहे. तसच श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रामृतात सुद्धा या स्थानाचा उल्लेख आहे. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून निघाल्यानंतर तीर्थक्षेत्रे फिरत असता याठिकाणी ३ वर्षे राहिल्याचा उल्लेख आढळतो. ते कुठे राहिले असतील याचा विचार मनात चालू होता..
या ठिकाणी 'महाबळेश्वर' नावाचं शिवलिंग (आत्मलिंग) आहे. रावणानं घोर तपश्चर्या करून जे शिवाचं आत्मलिंग मिळविलं त्याची श्रीगणेशाने या क्षेत्री स्थापना केली. आत्मलिंगाची उत्पत्ती होण्यामागे पण एक रंजक आख्यायिका आहे. पुराण काळात अत्री मुनींच्या प्रचंड तपोबलाने काल अग्नी प्रबळ झाला त्याच कालअग्नीने मूर्त स्वरूपात कालाग्नी नावानी एका महाकाय पशूच्या रुपात जन्म घेतला होता. त्या पशुला तीन शिंगे होती. केवळ संकल्पाने तो कोणत्याही मानवाच्या शरीरात अनुसंधान साधून योग प्रक्रियेने दाह उत्पन्न करू शकत असे.. त्याच्या उन्मत्त आणि विनाशक प्रवृत्तीमुळे साक्षात दत्ताला वेगळा अवतार घ्यावा लागला. दत्ताच्या सोळा अवतारांपैकी या अवताराला कालाग्निशमन या नावानं ओळखलं जातं.. त्यांनी त्या कालाग्नीचा अंत केला आणि त्याची तिन्ही शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होतं. त्यातलं एक प्राणलिंग दत्तात्रयांच्या शिव मुखातील आत्मतत्वात प्रविष्ट होऊन शिवरूप झालं. भगवान शंकराचं निर्गुण आत्मतत्व या प्राणलिंगात विलीन झाल्यामुळे सगुण अवस्थेत आलं. शिवाची आंतरिक आत्मशक्ती असलेलं हे आत्मलिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. जो या आत्मलिंगाची तीन वर्षे सलग पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल असं विधान या आत्मलिंगाबाबत होतं.
साक्षात महादेवांचे आत्मलिंग पूजेस लाभल्याने दुष्ट रावण अधिक बलशाली व दिग्वीजयी होईल. त्याचा उन्मतपणा आणखी वाढेल आणि देवगणांना याचा त्रास होईल या विचारांनी सर्व चिंताग्रस्त देवदेवतांनी श्रीनारदमुनींसह विघ्नहर्त्या श्रीगणेशाकडे धाव घेतली. श्रीगणेशाने देवांची विनंती मान्य करुन त्यांना निश्चिंत होण्यास सांगितलं. रावणानं सायंसंध्येच्या वेळी याच गोकर्ण क्षेत्रात बालगुराखीरुपी गणेशाला मदत मागितली. गणेशाने रावणाची विनंती मान्य केली. रावणाने संध्या सुरु करताच गणेशाने घाईघाईने रावणास तीनदा हाक मारली आणि हातातलं आत्मलिंग जमीनीवर ठेवलं.
क्रोधीत रावणानं आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण आत्मलिंग तसूभरही हललं नाही. त्या क्रोधापाई रावण सर्वशक्तीनीशी आत्मलिंग जोरजोरात खेचू लागला आणि त्यामुळे आत्मलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा होतो. ते लिंग गोकर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखं झालं तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावानं प्रसिद्ध झालं. गोकर्ण महाबळेश्वराच्या शिवलिंगाचा अधोभाग खूप खोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. स्वतः भगवान सदाशिव, भगवान विष्णू, ब्रम्हदेव, कार्तिकेय, गणेश व सर्व देवादिकांनी या ठिकाणी वास्तव्य केले असे गुरुचरित्रात सांगण्यात आले आहे.
गोकर्णक्षेत्रात भगवान शंकरांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो. सूर्याशिवाय अंधाराचा जसा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही. हजारो ब्रम्हहत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्राचं माहात्म्य इतकं थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रम्हदेवाने आणि विष्णूने इथे तप केलं. अहल्येच्या शापानंतर प्रायश्चित्त घेण्यासाठी गौतम ऋषी यांनी इथे शिवलिंग स्थापून शिवार्चन केले.. देवेंद्राने देखील त्याच्या पापाचं क्षालन होण्यासाठी याठिकाणी शिवलिंग स्थापून तप केलं. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा गोकर्ण क्षेत्री केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे आहे . जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची श्रध्देनं पूजा करतो तो ब्रम्हपदाला जातो (संदर्भ- गुरुचरित्र अध्याय ७ व स्कंध पुराण)
याचीच चर्चा करत असताना तिथल्या पूजाऱ्यांनी मंदिर उघडलं आणि आम्ही आत गेलो.. आतमध्ये आधी पूर्ण प्रांगणाचं दर्शन घेत असताना तिथे प्रस्थापित अजून काही शिवलिंगाची दर्शनं घेऊन रांगेत उभे राहिलो.. थोड्याच वेळात आतमध्ये त्या अमृतलिंगासमोर पोहोचलो.. तिथे आम्हाला समजलं हे गोकर्णाच्या आकाराचं आत्मलिंग कायम अमृतलिंगाखाली झाकलेलं असतं आणि हे अमृतलिंग सदैव आत्मलिंगाच्या मुळापासून नखशिखान्त या पाण्यामध्ये कायम प्रस्थापित असतं. ज्याचं पाणी दर काही वेळानं जलाभिषेकानं बदललं जातं..ज्या पाण्यात ते कायम प्रविष्ट असतं ते अभिषेक जल आपल्याला अमृतलिंगाच्या वरच्या खळग्यातून तीर्थ म्हणून दिलं जातं.. त्या खळग्यातल्या विवरातून आत हात घातल्यास त्या आत्मलिंगाचा स्पर्श आपल्या बोटांना होतो.
मुख्य आत्मलिंगाचं दर्शन दर 60 वर्षांनीच होतं, जे एवढ्यात शेवटचं 1983 साली देण्यात आलं. त्यावेळेला त्याचा जो फोटो काढला तोच आजतागायत प्रचलित आहे. ते अग्निस्वरूप आत्मलिंग असल्यानं फार तेजस्वी आणि उर्जित असावं त्यामुळे त्याचं डायरेक्ट दर्शन कोणालाच देता येत नाही यामागे नक्की काहीतरी दृष्टांतात सांगितलेलं गूढ प्रयोजन असावं.. किंवा नक्कीच काहीतरी गूढार्थ दडलेला असावा..
आम्ही नमस्कार करून त्या जलमग्न आत्मलिंगाच्या डोक्यावरच्या खळग्यातलं तीर्थ घेतलं, आणि अर्ध परिक्रमा करून बाहेर आलो.. या प्रांगणात मला काही काळ ध्यानात घालवण्याची इच्छा होती.. पण शांत आणि योग्य जागा सापडत नव्हती.. त्यात श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या 3 वर्षाच्या मुक्कामात इथे कुठे राहिले असतील हा प्रश्न सारखा मनात येत होता.. एक मन म्हणत होतं जिथे राहून त्यांनी साधना केली असेल ते ठिकाण आत्मलिंगाच्या जवळच कुठेतरी असलं पाहिजे.. पण ते नक्की कुठे? हा विचार करत त्याच प्रांगणात ध्यानासाठी जागा शोधण्याच्या नादात असताना एके ठिकाणी हिना अत्तराचा सुगंध आला. डावीकडे नजर गेली आणि गुहेसदृश दगडाच्या कपारीत आत लपलेलं प्राचीन दत्त मंदिर दिसलं. दत्ताची मुर्ती, पादुका तिथे स्थापित होत्या.. आहाहा.. मनात इच्छा धरावी आणि पुढच्या क्षणी दर्शन व्हावं.. जागा बघून नक्की लक्षात आलं याहून दुसरी जागा साधनेसाठी कशी अनुकूल असेल.. आत अंधार होता. त्या दगडी पायऱ्यांवरून वर चढून पादुकांसमोर बसलो.. पादुकांच्या मागे दत्ताची संगमरवरी मूर्ती होती. संस्कारला खुणेनेच सांगितलं.. तासभर तरी आता काही उठत नसतो इथून.. कानात हेडफोन्स घातले आणि करुणात्रिपदी प्ले करून डोळे मिटले.. आणि ऑफ टू हिमालय. हिना अत्तराचा वास आता स्ट्रॉंग होत चालला होता.. तो वास सोडला तर बाकीचे सेन्सेस आता काम करत नव्हते.. त्याची किक बसली आणि रोलर कोस्टर राईड सारखा मेंदू डोपामाईन एक्झर्ट करायला लागला.. गाडी बुंगवावी तसा मनाचा वेग.. कानात वाजत असलेलं लूप वर लावलं नसल्यानं कधी संपलं ते पण कळलं नाही.. पण त्याची आता गरज नव्हती.. अवचेतन अवस्थेत ते कानात कायमचं वाजतच होतं..तो स्टार्टर होता फक्त..
सेन्सेस वर आता मनाचा ताबा नव्हता.. पण कोणाचा तरी आहे याची जाणीव मात्र नक्की होत होती.. बऱ्याच वेळानं ब्रेक मारला.. मारला म्हणजे काय तो लागला..कारण आपण इथे काहीच करत नसतो.. डोळे मिटून स्टार्टर मारण्याचं काम फक्त आपलं आहे.. पुढचं काम आपलं नव्हे.
हाताचे तळवे घासून डोळ्यांना लावले.. सगळं शरीर गरम झालं होतं.. डोळे उघडले आणि बघितलं तर दीड तास उलटून गेला होता.. उठून बाहेर आलो.. संस्कार तो पर्यंत आजूबाजूला हिंडून आला होता.. आम्ही बाहेर आलो.. एक केळीचा घड घेतला.. काही केळी खाऊन झाल्यावर मंदिराच्या बाहेर असलेल्या लहान वासरांना ती भरवली आणि बालगणपती मंदिराकडे निघालो.. मुख्य मंदिरापासून 40 पावलांवर या बाल्य स्वरूपातल्या महागणपतीचं मंदिर आहे..
काही मूर्ती या कालातीत असतात.. म्हणजे त्या मानवनिर्मित न वाटता प्राकृतिक किंवा स्वयंभू असाव्यात इतक्या खऱ्या वाटतात.. अशी गणेशाची ती मूर्ती होती.. कथेप्रमाणे आत्मलिंग जमिनीवर ठेवल्यावर रावणानं चिडून त्या गुरख्याच्या रुपात असलेल्या बाल गणपतीच्या डोक्याच्या मध्यभागी सहस्त्रारा जवळ हाताने प्रहार केला तसा त्याच्या डोक्याच्या मधोमध एक खड्डा पडला.. त्यानंतर बाल गणेश त्याच्या मूळ रुपात आला.. त्याचा तो वार जसाच्या तसा त्या मूर्तीवर कोरला गेलाय.. म्हणजे जणू काही मूळ रुपात आल्यावर शरीराचं स्थिर स्तब्ध मूर्तीत परिवर्तन व्हावं अगदी तसा.
ही मंदिरं आणि तिथला समुद्र किनारा बघताना अक्षरशः हे सगळं इथे कसं घडलं असेल याचं चित्र डोळ्यासमोर उभं रहातं.. म्हणजे बरोबर समोरच्या समुद्र किनाऱ्यावर रावण सायंसंध्या करायला गेला असेल.. तेवढ्यात बाल गुराखीरुपी गणपतीने चाळीस ते पन्नास पावलं दूर या मंदिराच्या ठिकाणी आत्मलिंग ठेवलं असेल.. लांबूनच रावणानं ते बघितलं असेल आणि संध्येनंतर तो त्या गुराख्याच्या मागे धावला असेल आणि पळत जाऊन याच गणेश मंदिराच्या ठिकाणी त्याने हा प्रहार केला असेल.
काही वेळानं आम्ही तिथून निघालो. फारशी भूक नव्हती त्यामुळे थेट रूमवर आलो.. पुढच्या दिवशी आम्हाला पहाटे निघायचं होतं.. शंकरभट्टच्या यात्रेतलं आणि आमच्याही प्रवासातलं अंतिम गंतव्यस्थान असलेल्या कुरवपूरला..
(क्रमशः)
लेखन - अभिषेक चंद्रशेखर शाळू
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.