तरीही Villach ला (स्थानिक उच्चार - फिलाख) आमचे पाय लागले त्याला पर्यटनापलीकडचं एक वेगळंच कारण ठरलं.
ध्वनीप्रदूषणाविरोधात काम करणार्या एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेची
माहिती वाचण्यात आली. ही संघटना शांततेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आटापिटा
करते; जगभरातल्या सर्वाधिक शांत जागा शोधते. त्यांच्या वेबसाइटवर अशा
जागांची माहिती दिलेली असते. एकदा सहज ती माहिती वाचताना Vilaach, Austria
हे नाव तिथे दिसलं. योगायोगाने तेव्हा आमचं जर्मनी-ऑस्ट्रियाला जायचं चाललं
होतं. त्यात साल्झबर्गला जाणार होतोच. तिथून Vilaach ला जावं का, असा किडा
डोक्यात वळवळायला लागला.
गूगलच्या मदतीने आणखी थोडी माहिती शोधली. साल्झबर्गहून ट्रेन होती; एका
दिवसात जाऊन येता येणार होतं. मग तो किडा कुठली पाठ सोडायला! अखेर
साल्झबर्गमधल्या साडेतीन दिवसांपैकी एक दिवस Villach ला बहाल करून टाकला.
आणि त्या दिवशी दोन तास ट्रेन प्रवास करून ध्यानीमनी नसणार्या त्या गावात
जाऊन पोहोचलो.
त्या दिवसाच्या आमच्या फिरस्तीला एकच tag होता- जगातल्या सर्वाधिक शांत
जागांपैकी एका ठिकाणी आपण जातोय. तो टॅग सोबत बाळगूनच रेल्वे स्टेशनमधून
बाहेर आलो.
फोनवरच्या नकाशात city centre दिसलं ती दिशा पकडली आणि चालायला सुरुवात केली. १०-१५ मिनिटांत रमतगमत तिथे पोहोचलो. तर हा एक ब्राँझमधला बिअर-बाबा सामोरा आला. बिअरचा मग उंचावून मजेत उभा होता. डावीकडे एक रस्ता ‘बिअर गार्डन’ला जात होता. तिकडे दुर्लक्ष करून पुढे झालो तर एक storyteller दिसला. तुम्हाला वाटलं तर थांबा, पुढे गेलात तरी माझी हरकत नाही, असं जणू सांगत होता तो.

युरोपमधलं हे असं street art मला फार भुरळ घालतं. कुणा ग्रेट लोकांचे
पुतळे असतात असं नाही. तुमच्या-आमच्यासारखी साधीसुधी माणसं असतात ती. कधी
त्यामागच्या कलाकारांची माहिती तिथे दिलेली असते, इंग्रजीत असली तर वाचली
जाते. माहिती वाचता आली नाही तरी तो पुतळा/म्युरल न्याहाळण्याची उत्सुकता
वाटल्याशिवाय राहत नाही. सर्वाधिक भावतं ते त्यामागचं surprise element.
चालताचालता अचानक दिसतात हे public art pieces. त्यात भारी मजा असते. असंच
आणखी एक surprise element पुढे वाढून ठेवलं होतं. पण तेव्हा आम्हाला त्याची
कल्पना नव्हती.
स्टोरीटेलरची स्टोरी थोडावेळ ऐकून पुढे झालो. आता पुढे एक नदी आडवी येत होती. ही Drava नदी.

संथ प्रवाह, मध्यम रुंदीचं पात्र. नदीवर एक पूल दिसत होता. पुलाच्या आधी
एका ठिकाणी एक ब्राँझ विदूषक दिसला. त्याच्या चेहर्यावरचं मंद स्मित आणि
निवांतपणा मला फार आवडला. त्याच्या मागच्या कॅफेत काहीजण निवांत बिअर पीत
बसले होते.
आम्ही पूल ओलांडून old town मध्ये प्रवेश केला. दुपारची वेळ असूनही
हवेतला गारवा, कोवळं ऊन, शांत रस्ते, शुकशुकाट, पानगळीचे लाल-पिवळे-केशरी
रंग... Villach चं जग अगदी धीम्या गतीत निघालं होतं. अधल्यामधल्या वाराची
अधलीमधली वेळ होती म्हणूनही असेल. तो शांतपणा, निवांतपणा डोक्यात, मनात आत
आत उतरत होता. भले ते शहर म्हणजे सर्वाधिक शांत जागांपैकी एक नसेल,
त्याच्या आसपासच्या एखाद्या जंगलामुळे त्याला ते बिरुद दिलं गेलं असेल, पण
तरी ती शांतता हवेवर स्वार होऊन शहरात येत असणारच. वाटलं, तिथल्या लोकांना
कल्पना असेल का अशा काही बिरुदाची? पण ती शांतता त्यांच्या जगण्याचाच एक
भाग होती; त्याची वेगळी नोंद ते कशाला घेतील? ते काम आपलं, कारण अशी शांतता
दुर्लभ आहे ती आपल्यासाठी. तिथल्या लोकांना थोडी गजबज, वर्दळ हवीशी वाटत
असेल का? पिकतं तिथे विकत नाही वगैरे?
सौंदर्य बघणार्याच्या दृष्टीत असतं म्हणतात. तशी त्या दिवशी ती शांतता माझ्या कानांमध्येच होती.

मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहानसहान रस्ते, गल्लीबोळ दिसत होते. वाटलं तर तिथे वळायचं, जरा पुढे जाऊन परतायचं, असं आमचं चाललं होतं. असंच एका गल्लीत एक केक-शॉप दिसलं. आत शिरलो. ते दुकान १८५९ सालापासून त्या जागी उभं आहे म्हणे. त्याची मालकी तेव्हापासून एकाच कुटुंबाकडे आहे. अशा केक शॉपमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये मेनूकार्डातले आंतरराष्ट्रीय ओळखीचे पदार्थ सोडून काहीतरी local शोधण्याची तयारी हवी. मग त्यासारखी दुसरी मजा नाही. असाच एक पेस्ट्रीचा प्रकार आम्ही मागवला. जोडीला कॉफी. शांततेने कॉफीला पोटात सोडलं, की कॉफीसहित शांतता पोटात गेली, सांगता येणार नाही. कॉफी ढवळताना होणारा चमच्याचा आवाजही मोठा वाटत होता. चमचा कपावर आपटू न देता ढवळण्याचा आपसूक प्रयत्न केला गेला. डोळे मिटून शांतपणे कॉफीचे एक-एक घुटके घेतले गेले.
तिथे बसल्या बसल्या पुन्हा एकदा नकाशा पाहिला. साधारण अर्धा-एक किमी
अंतरावर एक बाग दिसत होती. वेळेचा अंदाज घेतला. तिथपर्यंत जायचं, बागेत
थोडा वेळ काढायचा आणि निघायचं, असं ठरवलं. केक-शॉपवाल्या बाईशी दोन-चार
वाक्यं बोलून बाहेर पडलो.
पुन्हा सुरू- ही गल्ली, तो रस्ता, इथे थांब, तिथले फोटो काढ. रस्त्यावर
पिवळ्या-केशरी पानांचा खच पडला होता, सिमेंटच्या रस्त्यांचा करडा रंग आणि
ते रंग- कमाल रंगसंगती! (fall च्या दिवसांमध्ये ही रंगसंगती सगळीकडेच असते,
कितीही बघा, समाधान होत नाही.) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना राहती घरं,
मध्येच एखादी १००-२०० वर्षं जुनी इमारत, त्यावर चढलेल्या लालचुटुक
पानांच्या वेली. या वेली इमारतींसाठी धोकादायक असतात म्हणे. पण दिसतात फार
सुंदर.
...आणि एका छोटुशा स्मारकवजा रचनेने मनातल्या शांततेचा भंग झाला.

रस्त्याच्या कडेला एका इमारतीच्या कम्पाउंडच्या भिंतीला लागून कोपर्यात एक वीतभर चौथरा होता आणि त्यावर नारळाएवढा अगदी गोल एक दगड. त्या चौथर्यावर ‘25.2.1945’ अशी तारीख कोरलेली होती. दुसर्या महायुद्धादरम्यान त्या दिवशी Vilaach वर दोस्तराष्ट्रांनी तुफान बॉम्बहल्ले केले होते. बहुतांश शहर बेचिराख झालं होतं. त्याची आठवण म्हणून ते स्मारक. विध्वंसाच्या तुलनेने अगदीच लहानसं. फार कलापूर्ण काही नव्हतं. जवळ जाऊन उभं राहिलं तर उंची गुडघ्याइतकीही नव्हती. अर्थात इतका इतका विध्वंस म्हणजे इतकं इतकं मोठं स्मारक हवं, असं काही सूत्र नसतंच म्हणा. काळाच्या पट्टीवर ती आठवण आता खूप मागे गेलीय, त्यामुळे स्मारकही लहानसं आहे, असं आपलं उगीच स्वतःला सांगितलं आणि पुढे झाले. मनातली शांतता मला धरून ठेवायची होती.
थोड्या वेळात त्या बागेपाशी पोहोचलो. दर्शनी भागात एक चर्च आणि मागे बाग होती. मध्यम आकार, भरपूर झाडी, मध्यात कारंज्याचा आयताकृती हौद. बागेत बसायला बाकं असल्याचं लांबूनच दिसलं होतं.

आधी जाऊन एक बाक पकडला. अशी जागा ‘पकडण्याची’ आपल्याला एक फार सवय असते. एरवी पर्यायच नसतो दुसरा. तिथे त्याची गरज नव्हती, हे बाकावर टेकल्यावर जाणवलं. जरा पाणी वगैरे पिऊन आसपास पाहिलं तर तिथे जागोजागी पांढर्या रंगाची abstract sculptures दिसली. जमिनीवर केशरी पानांचा सडा आणि तो पांढरा रंग. मी टुणकन उडीच मारली.

उठून बागेत एक मोठी फेरी मारून आले. सगळी शिल्पं शांतपणे बघितली. काही समजली. काही नाही समजली. कदाचित एकदा पाहून कळत नसतील, ते घडवणार्यांची तीच योजना असेल, चार-पाचदा पाहिल्यावर काहीतरी लक्षात येईल, असंही असू शकतं. असं थबकून प्रत्येक शिल्पाकडे बघायला, त्यावर विचार करायला अवसर मिळणं, हा सुद्धा शांततेचाच एक प्रकार म्हणावा का? सर्वात आवडलं ते INFINITY चं शिल्पं. कारण विचारू नका. ते पाहिल्या-पाहिल्या त्याला दाद दिली गेली, बस्स!

बागेत तासभर वेळ ‘काढायचा’ ठरवला होता, तो भराभर पळूनच गेला. निघायची वेळ झाली.
आम्ही कशी काय त्या बागेची निवड केली? कल्पना नाही.
की Vilaach च्या शांततेनेच आम्हाला निवडलं होतं?
त्या शहरात आणखीही काही बघण्यासारखं असेल, जे आम्ही शोधलंच नाही, असंही असू शकतंच.
सगळ्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या नादातच पर्यटनातली शांतता आपण गमावतो का?
---
(युनिक फीचर्स पोर्टलवर पूर्वप्रकाशित)
फारच सुंदर जागा.
२०११ मध्ये स्लोवेनियामध्ये फिरत असताना, चुकीचा एक्झिट घेतला आणि कारावान्क्स टनेल मधून ऑस्ट्रियामध्ये आलो. मग आलोच आहोत म्हणून पुढे विलाख ला आलो. त्याची आठवण आली. कधी या भागाला भेट दिलीत तर तितकाच सुंदर स्लोवेनियालाही भेट द्या. ब्लेड, बोहिन्स्क्य, स्लाप कोझ्याक वगैरे नितांत सुंदर जागा आहेत इथे. २०११ - १४ च्या दरम्यान स्लोवेनिया पर्यटकांच्या नकाशावर फारसा नव्हता त्यामुळे गर्दी तुलनेने कमी होती. स्लोवाकिया वगैरे गेम ऑफ थ्रोन्स मुळे फार गर्दीचे होउ लागले होते.
१९४५ च्या स्मारकावरून. युरोपातल्या दफनभुमींना भेट दिलीत १९३८-४५ च्या दरम्यान सगळे तरुण मृत्यु झालेले दिसतात. हंगेरीसारख्या देशातून याच काळात अनेक लहान मुलेही दगावलेली दिसतात (कदाचित युद्धकाळात कुपोषण तसेच वैद्यकीय सुविधांचा अभाव ). आणि बर्याच शहरात एक अडगळीत पडलेला दगड असतो "इथे अमूक अमूक शहराचे सिनॅगॉग होते'. जसे मी राहायचो त्या शहरात हे होते https://www.tripadvisor.com/Attraction_Review-g274913-d26494162-Reviews-...
पुढच्या वर्षी गाडी घेऊन ऑस्ट्रिया फिरणार आहे तेव्हा इथे जाऊन यावे म्हणतो. टुरिस्टांच्या नेहमीच्या ठिकाणाहून अनेक अशी शांत ठिकाणे असतात एकाच अमुक ठिकाणी जायची गरज नसते, जरा उन्नीस बिस फरक असतो इतकेच. आणि अशी ठिकाणी काही ना काही लेगॅसी असतेच. मी राहतो त्या लहान गावाला देखील ९०० पासूनचा डॉक्युमेंटेड इतिहास आहे. त्यामुळे इथेच जाईन असे काही नाही. मी झेकिया मधे एका सिक्रेट वाड्यात हिवाळ्यात गर्द धुक्यात जाऊन चार पाच दिवस राहतो. मालकाने जंगलातून मारलेले ससे वगैरे भाजून खातो. ससेशिकारीचा सीझन हिवाळ्यातच असतो . ते इतके रिमोट आणि शांत आहे की मी तिथे जंगलात खपलो तरी शिकारी कुत्र्यांशिवाय वर्षभर कुणाला कळायचे देखील नाही. त्याचे भाडे भारतीय हॉटेलपेक्षाही कमी आहे. आणि मी गेली काही वर्षे नित्य नेमाने तिथे जात असल्याने मला अलीकडे सूट देखील मिळते. पर्यटनात सुद्धा परंपरा तयार करावी. मला परंतु अलीकडे नितांत सुंदर जागांचा जरासा कंटाळा आला आहे. नितांत सुंदर हे विशेषण मराठी लोकांनी लावले की तो चित्रपट आणि जागा बाद समजावे अशा मताचा मी आहे.
जाल्जबुर्गात मराठी लोक दिसतात आणि ते इतके annyoing असतात की बापरे.
मी एकदा एका रोपवेची वाट पाहत का कुठेतरी थोडावेळ फोन वरती बोलत होतो. मी मराठी बोलतो आहे हे ऐकल्यावर एक गोरी बाई मला म्हणाली 'तुम्ही पण पेठेतले का?'
मला त्यावेळेस खूप राग आला. मी लगेच म्हणालो, "होय तुम्हाला कसं कळलं? मी उत्तरेश्वर पेठेत तालमीच्या मागेच राहतो. तुम्ही कुठ राहता पेठेत?' असा प्रश्न केला. त्या म्हणाल्या 'हे कुठं आलं? मी सदाशिव पेठेत राहते.' मी म्हणालो 'सदाशिव पेठ कुठं आली? कोल्हापुरात तर अशी पेठ नाही.'
त्यावर त्या बाईंचा चेहरा पडला आणि मग मला कुणीतरी हाक दिली, मी तिथून निघालो.
युरोपात मी तीन देश पहिले आहेत.
कोणत्याही देशात पर्यटन कंपनी नेतात ती स्थळे त्याच चार प्रकारची असतात,
१) चर्च/ कॅथेड्रल
२) राजवाडा / किल्ला
३) संग्रहालय
४) सिटी स्क्वेअर आणि तेथील ओपन एअर रेस्टोरंटस
आणि याच ठिकाणी सर्व पर्यट्क फोटो काढतात.
सर्व शहरात थोड्याफार फरकाने ह्याच गोष्टी दाखवल्या जातात किंवा पाहिल्या जातात.
यामुळेच आता युरोपात जायचे तर केवळ निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असे मी ठरवले आहे.
आपल्या लेखातील स्थळे हि अशीच सुंदर शान्त आणि नुसतं बसून त्याचा आनंद
घेण्ययासारखी दिसत आहेत. पुढच्या वर्षी ऑस्ट्रियाला जाण्याच्या विचारात
होतो. त्यात माझी भाची ग्राझ शहरात आहे आणि तिने आवर्जून बोलावणे केले आहे.
हे स्थळ याच्या जवळच आहे त्यामुळे जाण्याचा बेत ठरवतो आहे. अतिशय बरोबर
वेळेत हा लेख आला आहे
धन्यवाद
>> यामुळेच आता युरोपात जायचे तर केवळ निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असे मी ठरवले आहे. <<
सुबोधराव, निसर्ग सौंदर्य लांबून पाहणे काही काळाने बोअर होते. शिवाय आपल्या आजूबाजूला फोटोकाढू मंडळी असतात त्यांना त्या त्या ठिकाणी जायचेच असते त्यांचा आग्रह मोडवता येत नाही त्यामुळे त्यांची ड्रायव्हरगिरी किवा गाइडगिरी करावीच लागते. शिवाय काही ठिकाणे ही खरोखर तशी वर्थ असतात.
उदा. बर्लिनमधे आलात आणि ईस्ट स्ट्रीट गॅलरीला येऊन फोटो काढावाच. त्यात काही वावगे नाही.
युरोपात एखादे ठिकाण एंजॉय करायचे असेल तर तिथे खोपच्यात कुठेतरी एखादे AIR BNB बुक करायचे. लहान गावांत उन्हाळ्यात लोकल जत्रा वगैरे असतात. तिथे उत्तम लोकल मद्यापासून लोकल खाणे सहज मिळते. शिवाय त्या त्या गावाच्या काही परंपरा असतात त्याही अशा जत्रांमध्ये पाळल्या जातात. आजूबाजूची लहान सहान स्पॉट्स मग ते कितीही स्मॉल का असेनात पाहून यायचे. खुपदा अशा छोट्या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात. पण निसर्गाची लयलूट सगळीकडेच असते. उन्हाळ्यात विशेषत: पाय निघवत नाही.
त्यामुळे मिक्स्ड बॅग असावी. पॉपुलर ठिकाणे सुद्धा इतरांच्या आनंदासाठी पाहून यावीत पण अशा लहान सहान जगांना भेटी द्यायला वेळही राखून ठेवावा!
६०-७०
वर्षांपुर्वी फक्त गोरे लोक पर्यटक म्हणून हिंडायचे , त्यांची संख्या कमी
होती. आता गेल्या २०-३० वर्षात आशियाई देशात लोकांकडे पैसा आला आहे. तिथे
मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. त्यामुळे कुठेही पर्यटकांची गर्दी
पुर्वीच्या तुलनेने होणारच.
दुसरे म्हणजे माहितीची उपलब्धता. इंटरनेट व मोबाईल अॅप्सच्या आधीच्या
काळात फक्त पर्यटनाला वाहिलेली नियतकालिके/अनियतकालिके, पर्यटक
व्यावसायिकांकडे असलेली माहितीपत्रके हेच माहितीचे साधन होते. त्यामुळे
पर्यटनाच्या ठिकाणांची माहिती, तिथल्या स्थानिक लोकांची माहिती (होम स्टे,
विविध प्रकारचे गाइड्स) सहज उपलब्ध नसे.
आता समाज माध्यमांच्या सहज उपलब्धतेच्या काळात, बहुसंख्य लोक्संख्या
असलेल्या देशांतील जनतेकडे फिरण्यासाठी पैसा उपलब्ध असण्याच्या काळात
कुठलेही ठिकाण प्रिस्टिन, वर्जिन राहील ही आशा करणे वास्तवाला धरून नसेल.
मिरजेत दंडोबाच्या टेकडीवर २५ वर्षांपुर्वी पर्यंत कोणीही जात नसे. २० किमी दूर असलेले ठिकाण तेव्हा फार दूर होते - लोकांकडे गाड्या नव्हत्या, ना सहज यायला जायला बस होत्या. आता २०किमी लांब जायला लहान मुलाकडे पण मोटरसायकल आहे. त्यामुळे सहज म्हणून संध्याकाळी फिरायला जाणारे, रात्री आकाश दर्शनाला जाणारे, सकाळी पळायला जाणारे आणि या सगळ्यांना सुविधा पुरविणारे लोक वाढले. देवळाला मोठा विदृप मंडप घातला गेला. भेळेची आणि चायनीझच्या गाड्यांची घाण.
विलाख या गावाचे उदाहरण घ्या. इंटरनेट पूर्व काळात आपल्यापैकी कदाचित कोणीच प्रितीला ओळखत नव्हते, आज ईंटरनेट नसते तर आजही ओळखत नसतो. मग विलाख बद्दल माहिती अवलिया ट्रॅवलर्स पुरतीच सिमीत राहिली असती. आता इथले वाचून दहा जण तरी जातील. मग ते कसे शांत राहील. जिथे आज एव्हरेस्ट वर ट्रॅफिक जाम लागतो तिथे बाकी ठिकाणांचे काय.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.