Sunday, December 3, 2023

निष्काळजीपणा नकोच!

 

सकाळ साप्ताहिक

ओंकार ओक

उन्हाळ्याच्या सुट्या आणि ट्रेकिंचा सीझन येतो आहे. ट्रेकिंग करताना वाट चुकून, कुठून तरी पडून जबर जखमी होणं किंवा मृत्यू ओढावणं, सेल्फी किंवा साधा फोटो काढायच्या नादात कड्यावरून पाय घसरून अपघात होणं, मुख्य वाट सोडून शॉर्टकट घेण्याच्या अट्टहासामुळे पाय घसरणं वगैरे गोष्टी निष्काळजीपणामुळे सर्रास घडतात. नव्याण्णव टक्के अपघात माणसाच्याच चुकीमुळे होत असल्यानं यात ‘ट्रेकिंग हा अत्यंत रिस्की खेळ आहे’ या वाक्याला काहीही प्रमाण उरत नाही.

“सर माहुली किल्ल्याला एक ग्रुप चुकला आहे. गेले तीन तास त्यांचा काहीच पत्ता लागला नाहीये. प्लीज काही मदत पाठवता येईल का?”

“सर एका मुलाचा सेल्फी काढताना फॉल झालाय. वाचण्याचे चान्सेस काहीच नाहीयेत. त्याच्या ग्रुपची लोकं खूप घाबरली आहेत. प्लीज रेस्क्यू टीम पाठवता येईल का?”

सह्याद्रीतल्या गिर्यारोहणाशी संबंधित आपत्कालीन घटनांच्या मदत कार्यासाठी ‘रेस्क्यू को-ऑर्डिनेटर अर्थात बचावकार्य समन्वयक म्हणून गेली दहा वर्षं काम करत असताना असे फोन येणं यात आता काहीच नवीन उरलेलं नाही. साधारणपणे पावसाळ्याचा सीझन सुरू झाला की महिना दोन ते चार अपघात होणारच हे आता जणू दुर्दैवी समीकरण झालंय. रोजच्या कटकटीच्या रुटीनमधून दोन पळ विश्रांतीचे आणि समाधानाचे मिळावेत म्हणून नावाजल्या गेलेल्या गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग या खेळाला या अपघातांच्या रूपानं सध्या एक काळी किनार लाभली आहे आणि त्यामुळे नवख्या गिर्यारोहकांमध्ये साहसाची बीजं रोवताना कुठेतरी पुन्हा फिरून विचार केला जातो आहे. पण या सर्वांचं मूळ शोधताना अपघात का होतात आणि ते टाळण्यासाठी काय करता येईल, हा ऐरणीवरचा प्रश्न मात्र जसाच्या तसा उरतो. इथं एक गोष्ट सुरुवातीलाच ठळकपणे सांगावीशी वाटते, ती म्हणजे सह्याद्रीत होणाऱ्या अपघातांमध्ये ट्रेकर्सचं प्रमाण बोटावर मोजण्याइतकं असून ह्या खेळाला अत्यंत ‘लाईटली’ घेणारे नवीन भटके किंवा सहलीसाठी आलेली अतिउत्साही मंडळी यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. पण हे अपघात कुणाचे होतात यापेक्षा अपघात का होतात आणि ते टाळून गिर्यारोहण अधिकाधिक प्रगल्भ आणि संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयाचा धांडोळा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या लेखाच्या माध्यमातून थोडासा करूया.

अपघात म्हणजे काय ?

खरं तर या शब्दाची व्याख्या परिस्थितिजन्य असून ती वस्तुनिष्ठ आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलं, तर मानवी निष्काळजीपणा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घडणारी अशी एखादी घटना, ज्या घटनेमुळे सुरळीत सुरू असलेल्या ट्रेक किंवा भटकंतीमध्ये अडथळा येऊन त्यामुळे अनेकदा जीवावर बेतू शकतं किंवा आणि त्यातून त्या भटकंतीला खीळ बसते, असं ढोबळमानानं म्हणता येईल. प्रत्येकवेळी अपघातात जीव जातोच असं काही नाही, पण तसं होण्याची परिस्थितीदेखील निर्माण होणे, यालाही एक प्रकारचा अपघात म्हणता येऊ शकतो. सुतासारख्या सरळ सुरू असलेल्या ट्रेकमध्ये आपण कल्पनाही केलेली नसते अशी एखादी घटना घडते आणि त्याचा सहभागी ट्रेकर्सच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. परिस्थितीचं गांभीर्य हासुद्धा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगला अनुभव असेल तर अशी परिस्थिती डोकं शांत ठेवून हाताळता येऊ शकते आणि त्यावर मार्ग निघू शकतो. साधी वाट चुकण्यापासून ते अगदी मृत्यू होण्यापर्यंत अशा दुर्दैवी घटनांची मालिकाच अनेकदा पाहायला मिळते आणि त्या ट्रेकला आणि परिणामी पुढचे काही दिवस संपूर्ण गिर्यारोहण विश्वाला त्याच्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

अपघात का होतात ?

प्रत्येक अपघाताच्या मुळाशी जाऊन कारणांचा खोलवर विचार करणं, हा सर्व ट्रेकर्स मंडळींचा स्थायीभाव. सह्याद्रीतल्या अपघातांच्या बाबतीतही हे अगदी तंतोतंत लागू होतं. त्यामुळे अपघात कसे टाळावेत या मुद्द्याकडे वळण्याच्या आधी अपघात होण्याची कारणं काय आहेत, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. अगदी वैयक्तिक मत द्यायचं झालं, तर अपघातांची कारणं खालीलप्रमाणे सांगता येतील –

  • निष्काळजीपणा ः सह्याद्रीतल्या अर्ध्याहून जास्त अपघातांची सुरुवात ही याच एका कारणामुळे होते. याची सुरुवात होते ती आपण जात असलेल्या ठिकाणाची शून्य किंवा अगदी अपुरी माहिती असणं. ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ हे ह्या निष्काळजीपणाचंच सख्ख भावंडं! ‘जाऊ रे आपण, काही होत नाही’ ह्या वाक्याचा जन्म झाला म्हणजे समजावं की पुढे काहीतरी अघटित वाढून ठेवलं आहे. सह्याद्रीमध्ये ‘गाइड’ हा पाठीच्या कण्यासारखी भूमिका असलेला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सोबतीला गाइड न घेता ट्रेक करणं हे आजकाल भूषणावह समजलं जातं. अत्यंत नवख्या ठिकाणी जातानाही स्वतःचे स्वतः मार्ग शोधण्याकडे नवख्या ट्रेकर्सचा कल असतो, आणि हा केविलवाणा प्रयत्न करत असतानाच अत्यंत वाईटरितीनं वाट चुकून ट्रेकची माती होते. पूर्वी गिर्यारोहण प्रगत झालेलं नसताना गाइडला द्यायची बिदागी हा खिशाला न परवडण्यासारखा विषय असल्यानं तेव्हा स्वतःच वाट शोधण्यावर आणि ती न सापडल्यास परत फिरण्यावर जास्त भर दिला जात असे. पण सध्या फेसबुक, इन्स्टाच्या जमान्यात ‘सेल्फ एक्स्प्लोरेशन’च्या वायफळ हव्यासापायी वाट चुकून अपघाताला निमंत्रण दिलं जातं. या मंडळींकडे अनेकदा ‘सर्व्हायव्हल’ची अत्यंत अपुरी सामग्री असल्यानं परिस्थिती अजूनच बिकट होते. अशातच मोबाईलला रेंज नसणं, खूप फोटो-व्हिडिओ काढल्यामुळे गरजेच्यावेळीच फोनमध्ये बॅटरी उरलेली नसणं, आपण नक्की कुठं अडकून बसलोय हे लोकेशनच माहीत नसणं इत्यादी प्रकार दुष्काळात तेरावा महिना म्हणून समोर येतात.

पण हा निष्काळजीपणा फक्त वाट चुकण्यापर्यंतच मर्यादित नसतो. वाट चुकून कुठून तरी पडून जबर जखमी होणं किंवा मृत्यू ओढावणं, सेल्फी किंवा साधा फोटो काढायच्या नादात कड्यावरून पाय घसरून अपघात होणं, मुख्य वाट सोडून शॉर्टकट घेण्याच्या अट्टहासामुळे पाय घसरणं वगैरे गोष्टी सर्रास घडतात. यात नव्याण्णव टक्के अपघात माणसाच्याच चुकीमुळे होत असल्यानं यात ‘ट्रेकिंग हा अत्यंत रिस्की खेळ आहे’ या वाक्याला काहीही प्रमाण उरत नाही. अनेकदा इतर लोकांना आपला फिटनेस दाखवायच्या नादात एका दमात एखादा किल्ला किंवा घाटवाट चढून जाणं, पाणी न पिता कित्येक किलोमीटर अंतर चालणं, दम लागल्यावर थांबल्यास बदनामी होईल या वायफळ समजुतीमुळे शरीराची क्षमता संपुष्टात आलेली असतानाही फक्त ‘पीअर प्रेशर’मुळे स्वतःची फरपट करत राहणं, गरज असलेल्या ठिकाणी रोप न वापरणं, ऋतूनुसार ट्रेक न करणं (उदाहरणार्थ, मोरोशीचा भैरवगड पावसाळ्यात करणं किंवा वजीर सुळका फ्री क्लाइम्ब करणं वगैरे) या सगळ्या गोष्टी अपघातांना निमंत्रण देतात. प्रत्येकाची प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ऋतूला वैयक्तिक क्षमता अत्यंत वेगळी असते, हा मुद्दा विसरून चालत नाही. भर उन्हात न थकता ट्रेक करणाऱ्या ट्रेकरला एखाद्या कातळटप्प्यावर मदतीची गरज भासूच शकते. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला बायपास सर्जरी किंवा ब्रेन ट्रान्सप्लान्टचं ऑपरेशन करता येईल का? हेच तत्त्व इथं लागू होतं. त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात, हे ओळखणं आणि त्यानुसार कोणाचंही खच्चीकरण न करता ती परिस्थिती व्यवस्थित हाताळणं योग्य असतं. त्यामुळे जाणूनबुजून केलेल्या चुकीलाच निष्काळजीपणा म्हणता येईल आणि हा आपल्याकडून कधी घडल्यास त्यातून योग्य तो बोध घेऊन पुढच्यावेळी ती चूक कटाक्षानं टाळणं यातच सर्वकाही आलं.

  • नैसर्गिक आपत्ती ः अपघाताच्या या प्रकारात मानवी चुकीला काहीही स्थान नसावं. जिथून दरवर्षी हजारो लोक जातात, त्या एखाद्या कड्याखालून नेमकं आपणच जाताना त्या कड्यातला एक मोठा दगड निसटून आपल्यावर पडला तर त्याला पूर्णपणे नैसर्गिक आपत्ती म्हणता येईल. नैसर्गिक आपत्ती किंवा ‘ॲक्ट ऑफ गॉड’ या पद्धतीत मोडणारे अपघात हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणाच्या बाहेरचे असल्यानं यात अनुभवी किंवा नवखा असा भेदभाव करता येत नाही. अनेकदा एखादी आडवी वाट ओलांडताना पुढचे दहा जण एखाद्या पक्क्या दगडावर पाय ठेवून पुढे गेलेले असताना अकराव्या गड्यानं त्याच दगडावर ठेवलेला पाय त्याच्या वजनामुळे म्हणा किंवा अजून कोणत्या कारणामुळे का होईना पण तिथून निसटतो आणि गंभीर अपघात होतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अपघातांमध्ये दोषारोप करायला वाव नसतो आणि हळहळण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही.
  • चुकीची माहिती / निष्काळजीपणे दिलेली माहिती ः हा आजकाल नव्यानंच उदयाला आलेला प्रकार आहे. अनेकदा लेख लिहिताना, ब्लॉग लिहिताना किंवा तोंडी माहिती सांगताना चार गोष्टी वाढवून सांगण्याकडे कल दिसून येतो. म्हणजे एखाद्या अत्यंत अवघड असलेल्या टप्प्यालासुद्धा रोपची गरज नाही असं सांगणं किंवा जो ट्रेक फक्त हिवाळ्यातच करण्यासारखा आहे त्याला ‘जा रे भर पावसात, काही होत नाही’ अशी माहिती दिल्याचे अनेक दाखले आहेत. इथं एक गोष्ट कटाक्षानं लक्षात घेतली पाहिजे, की तुमचा अनुभव आणि तुम्ही ज्याला सांगताय त्याचा अनुभव यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो. दुसरं म्हणजे तुम्ही ट्रेक केलात त्यावेळची परिस्थिती आणि ही व्यक्ती जाईल तेव्हाची परिस्थिती यातही तफावत असू शकते. तुम्हाला एखादा किल्ला किंवा ठिकाण किंवा घाटवाट सोपी वाटली म्हणजे ती समोरच्यालाही तितकीच सोपी जाईल याची खात्री देता येते का? एखादा कातळटप्पा तुम्ही लीलया चढून जाता, तोच टप्पा समोरच्याला दरीत लोटून देऊ शकतो, याचा विचार निक्षून व्हायला हवा. त्यामुळे कोणतीही माहिती देताना अतिशय ग्राउंड लेव्हलला जाऊन वस्तुनिष्ठ पद्धतीनं सांगावी, कारण ती माहिती ऐकणारा पूर्णपणे तुमच्यावर विसंबून असतो हे विसरता कामा नये.

अपघातानंतरची परिस्थिती आणि रेस्क्यू यंत्रणेवर पडणारा ताण

सह्याद्रीतल्या सध्याच्या वाढत्या अपघातांना सामोरं जाताना एक रेस्क्यू समन्वयक म्हणून आजवर अनेक भल्याबुऱ्या अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. अपुऱ्या माहितीमुळे लोकेशनपर्यंत पोहोचण्यात आलेल्या अनंत अडचणी ते अगदी रेस्क्यू केलेल्या लोकांकडून रेस्क्यू टीमना मिळालेली दुय्यम दर्जाची आणि घृणास्पद, अपमानकारक वागणूक इथपर्यंत अनेक प्रसंग अनेक रेस्क्यू टीमनी आणि आम्ही को-ऑर्डिटरनी अनुभवले आहेत. अर्थात बचावदलाच्या अनंत कष्टांची जाणीव ठेवून मनापासून कृतज्ञता ठेवणारे लोकही आहेत, पण त्यांचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. रेस्क्यू करणं ही त्या टीमची जणू काही सरकारनं नेमून दिलेली जबाबदारी आहे आणि ते आपल्या मदतीला धावून आले यात त्यांनी खास असं काय केलं, असं बोलून दाखवणारे महाभागही आम्हाला भेटलेले आहेत. मागच्या पावसाळ्यात पेब किल्ल्याला साधी पाण्याची बाटलीसुद्धा घेऊन न गेलेला एक ग्रुप गडावर जाताना इतक्या वाईट पद्धतीनं रस्ता चुकला की ते पेबऐवजी भलत्याच डोंगरावर जाऊन पोहोचले. मदतीसाठी त्यांचा मला फोन आल्यावर मी एका रेस्क्यू टीमला संपर्क करून त्यांच्या काही सदस्यांना या मुलांच्या मदतीसाठी जाण्याची विनंती केली. त्या रेस्क्यू टीमच्या शिलेदारांनी या ग्रुपला सहीसलामत बाहेर काढलं. मी त्या ग्रुपला जेव्हा संध्याकाळी परत फोन केला तेव्हा त्यांचं, ‘उन्होंने इतना क्या बडा काम किया है? इट वॉज देअर ड्युटी. उस में बोल के दिखाने की क्या जरूरत है?’ हे वाक्य सगळ्या पडद्यांची चिरफाड करून त्यांचं निष्काळजीपणाचं आणि बेमुर्वतखोरपणाचं खरं चित्र समोर आणणारं होतं. मित्रांनो आज लोणावळ्याची ‘शिवदुर्गमित्र’, पनवेलची ‘निसर्गमित्र’, नाशिकची ‘वैनतेय’, महाबळेश्वरची ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ आणि ‘सह्याद्री रेस्क्यू फोर्स’, साताऱ्याची ‘शिवेंद्रराजे ग्रुप’ या आणि यांसारख्या अनेक संस्था ग्राउंड लेव्हलला जाऊन पूर्णपणे विनामोबदला हे आभाळाएवढं काम गेली कित्येक वर्षं करत आहेत. स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करून आणि वेळप्रसंगी वैयक्तिक कारणं, नोकऱ्या, व्यवसाय बाजूला ठेवून हे शिलेदार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाट्टेल त्या परिस्थितीमध्ये धावून जातात आणि त्या बदल्यात त्यांना कौतुकाचे किंवा कृतज्ञतेचे चार शब्द पण ऐकायला मिळू नयेत, इतका निर्लज्जपणा लोकांमध्ये येतो तरी कुठून? आज या सर्व रेस्क्यू ग्रुपना ना कोणतं सरकारी अनुदान मिळतं, ना खासगी स्पॉन्सरशिप, ना कुठे कौतुकाचे चार शब्द, ना कोणता कार्यसन्मान. पण तरीही या सर्व टीमचं कार्य आजतागायत अविरत सुरू आहे. कुठंही जाऊन अडकायला काही लागत नाही, पण ती परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळून अडकलेल्या लोकांना सहीसलामत परत आणणं यातच खरं शौर्य असतं हा मुद्दा नाकारून चालणारच नाही. स्थानिक पातळीवर आज हरिश्चंद्रगडचा आपला भास्कर बादड, माहुलीचं आगीवले कुटुंब, राजगड पायथ्याच्या गुंजवणे गावातले बाळकृष्ण रसाळ, बेलपाड्याचे कमा व कमळू पोकळे यांसारखे अनेक लोक निःस्वार्थ वृत्तीनं या सर्व बिकट समयी मदत करताहेत आणि त्यांचे अनंत उपकार ट्रेकर कम्युनिटीवर आहेत यात शंकाच नाही. त्यामुळे अपघात झाल्यावर रेस्क्यू टीमनं केलेल्या मदतीची जाण ठेवून त्याची परतफेड जरी नाही करता आली, तरी त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव ठेवणं यातच एका अस्सल भटक्याची खरी ओळख आहे.

रेस्क्यू व रिकव्हरी यातला फरक

सर्वसाधारणपणे आपण सर्वच बचावकार्यांना रेस्क्यू हे नाव देऊन मोकळे होतो. पण जिवंत व्यक्तींना सहीसलामत बाहेर काढणं याला रेस्क्यू असा शब्द आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढणं याला रिकव्हरी म्हटलं जातं. ह्या निमित्तानं हा फरकही स्पष्ट करावासा वाटतो.

अपघात होऊ नये म्हणून काय करावे

  • सर्वात आधी जात असलेल्या ठिकाणाची संपूर्ण माहिती तिथं जाऊन आलेल्या व्यक्तीकडून जाणून घ्यावी.
  • ज्या ठिकाणाचा जो योग्य सीझन आहे, त्याच सीझनला जावं.
  • गाइड घेण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात ठेवावं आणि स्थानिक माणूस कायम बरोबर ठेवावा. लक्षात ठेवा, चुकून एखादी दुर्घटना घडल्यास हीच व्यक्ती तुमच्यासाठी देवासारखी धावून येते.
  • गिर्यारोहणाची किमान बेसिक सामुग्री बरोबर ठेवावी.
  • डोंगरांचा मान ठेवावा व त्यांना गृहीत धरू नये.
  • सर्वतोपरी काळजी घेऊनही अपघात झालाच तर
  • शक्यतो गांगरून न जाता स्वतःवर संयम ठेवावा व ग्रुपमधील इतरांना परिस्थितीची जाणीव करून द्यावी.
  • लवकरात लवकर किल्ल्याचा किंवा त्या ठिकाणाचा पायथा किंवा जवळचं गाव गाठून स्थानिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा.

नेटवर्क मिळाल्यास तातडीनं रेस्क्यू टीमला पाचारण करावं व हे करताना एक गोष्ट निक्षून लक्षात घ्यावी की एकाच वेळी पोलिस किंवा अनेक रेस्क्यू टीमना संपर्क करू नये. याचं कारण त्यांच्यात योग्य तो समन्वय न झाल्यास गोंधळ निर्माण होऊन परिस्थिती अजून बिघडू शकते.

  • याच्याशी संबंधित एक किस्सा जाता जाता पटकन सांगतो. एका किल्ल्यावर अडकलेल्या काही मुलांनी एकाच वेळी चार रेस्क्यू टीमना फोन करून आपण अडकल्याची माहिती दिली. यातल्या प्रत्येक रेस्क्यू टीमला आपण सोडून इतरसुद्धा रेस्क्यू टीमना बोलावण्यात आलंय हे अर्थातच माहीत नव्हतं. त्यापैकी एक रेस्क्यू टीम किल्ल्याच्या एका पायथ्याकडून चढून वर आली व त्यांनी त्या मुलांची सुटका करून त्यांना खाली उतरवलं. पण त्याच वेळी याच मुलांची सुटका करायला किल्ल्याच्या पलीकडच्या पायथ्याच्या गावातून चढून आलेल्या अजून एका रेस्क्यू टीमला ही मुलं दिसलीच नाहीत. त्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झाली आणि मुलांचं शोधकार्य सुरू झालं. मोबाईलला नेटवर्क नसल्यानं अर्थातच संपर्क होईना. शेवटी हाती काहीच न लागल्यानं दुसरी रेस्क्यू टीम थकूनभागून खाली परत आली आणि त्यांना दोन दिवसांनी खरी परिस्थिती कळली. त्यामुळे भावनेच्या भरात चार-चार रेस्क्यू टीमना संपर्क करून गोंधळ वाढवू नये व काहीच सुचत नसल्यास पोलिसांना फोन करावा.अपघात झालेल्या व्यक्तीला कधीही स्वतःहून दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये.
  • वाट चुकल्यास व शोधकार्यासाठी रेस्क्यू टीमला बोलावलं असल्यास ते लोक येईपर्यंत आहे तिथंच शांतपणे बसून राहावं, कारण तुम्ही त्यांना जर तुमचं गुगल लोकेशन दिलेलं असेल आणि ते येईपर्यंत स्वतः वाट शोधण्याच्या नादात तुम्ही भरकटलात तर रेस्क्यूच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.
  • सोशल मीडियावर कुठंही आपण अशा परिस्थिती अडकलो आहोत याचे स्टेटस वगैरे अपडेट करू नयेत. अगदीच काहीच मार्ग उपलब्ध नसल्यास शेवटचा उपाय म्हणून हे सगळं करणं ठीक आहे, पण आधी वर दिलेले मार्ग वापरावेत.परिस्थिती स्वीकारावी व शांत डोक्यानं मार्ग काढण्याकडे कल ठेवावा.मित्रांनो गिर्यारोहण हा अतीव आनंद देणारा, तसंच निसर्गाचा आत्मा आणि माणसाचं मन एकरूप करणारा नितांतसुंदर प्रकार आहे. त्याचा सुरक्षितपणेच स्वीकार करण्यातच खरं गम्य असतं. एक छोटी चूक आपल्या आयुष्यभराच्या भटकंतीसाठी स्पीडब्रेकर म्हणून काम करू शकते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा साकल्यानं विचार करून व्यवस्थित वेळ देऊन भटका आणि लवकरच आपली भेट डोंगरात होईल अशी सह्याद्रीचरणी प्रार्थना करूया!

अबिदजान! आयव्हरी कोस्ट

 

सकाळ साप्ताहिक

डॉ. सुमेधा कुलकर्णी

रेन फॉरेस्ट काय असते हे जाणून घेण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आयव्हरी कोस्टमध्ये पूर्ण झाली. ताय नॅशनल पार्क हे नक्कीच बघण्यासारखे राष्ट्रीय उद्यान आहे. जंगलातून वाहणाऱ्या नद्या, त्यांची खोरी आणि हिरवीगार दाट झाडी अशा अलौकिक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत तिथेच बसून राहावे असे वाटते. तेथून पाय निघता निघत नाही.

आयव्हरी कोस्ट हा पश्चिम आफ्रिकेच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील एक देश. आयव्हरी कोस्ट कोटे डी’व्होयर म्हणूनही ओळखले जाते. कामाच्या निमित्ताने मला या देशातील अबिदजानला जाण्याची संधी मिळाली होती. देशाच्या मध्यभागी असलेले यामुसौक्रो हे शहर आयव्हरी कोस्टची राजधानी आहे, पण अबिदजान हे बंदराचे शहर देशातील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक केंद्रही आहे. मी तिथे जाण्याआधीच आयव्हरी कोस्टबद्दल माहिती गोळा केली होती. त्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेचा किनारा शोधणारे पहिले युरोपियन पोर्तुगीज होते. त्यानंतर लवकरच फ्रान्स आणि इतर देश पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवर व्यापारासाठी हातपाय पसरू लागले. सुरुवातीला या व्यापारात सोने, हस्तिदंत आणि मिरे यांचा समावेश होता. हस्तिदंताच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या देशाचे नाव आयव्हरी कोस्ट पडले. परंतु हत्तींच्या संख्येमध्ये इतकी घसरण झाली की अठराव्या शतकाच्या सुरुवातीस हा व्यापार संपला, असे कळाले. आणखीही बराच इतिहास वाचला आणि काही माहिती तिथल्या गाइडने पुरविली. १८९३मध्ये फ्रान्सची वसाहत बनलेला हा देश १९६०मध्ये स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ आयव्हरी कोस्ट सौहार्द, तसेच विकसित अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध होता. पश्चिम आफ्रिकेतील स्थैर्याचे मॉडेल म्हणून या देशाकडे पाहिले जायचे. परंतु २००० सालापासून तिकडे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. देशाची लोकसंख्या दोन कोटीपर्यंत होती. अस्थिरता असूनही आयव्हरी कोस्ट कोको बीन्सची जगातील सर्वात मोठी निर्यात करणारा देश होता. तेथील मूळ भाषा फ्रेंच असली, तरी बऱ्याच स्थानिक भाषा बोलल्या जातात. काही लोकांना इंग्रजी भाषा येते खरी, पण ते इंग्रजी बोलायला फारसे उत्सुक नसतात हा माझा अनुभव. इथले बहुतेक लोक इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचे आहेत. त्यांच्या स्थानिक चलनाला सीएफए (कम्युनॉट फिनान्सिएर आफ्रिकाइन) फ्रॅंक म्हणतात. एका अमेरिकी डॉलरची किंमत ५५०-६०० सीएफए. त्यामुळे या देशात ‘भलीमोठी’ पर्स घेऊन हिंडावे लागते.

यामुसौक्रो शहरातही फिरण्याची संधी मिळाली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठी बॅसिलिका म्हणून नोंद असलेल्या तिथल्या प्रसिद्ध ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ पीस’ या चर्चची इमारत खूपच प्रेक्षणीय आहे. चर्चचे आर्किटेक्चर खरेच खूप छान आहे. चर्चचा आतील भाग इटलीमधून आयात केलेल्या संगमरवरी वस्तूंनी तयार केलेला आहे आणि समकालीन स्टेन्ड ग्लासने सजवलेला आहे. या बॅसिलिकामध्ये एकावेळी १८ हजार लोक प्रार्थना करू शकतात.

अबिदजानमध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. फ्रेंच वसाहतीमुळे आबिदजान शहराचे सुशोभीकरण थोडेफार पॅरिसच्या धर्तीवर झाले आहे. उंच आकाशकंदील आणि सभोवताली जिकडेतिकडे तलाव यामुळे आबिदजानला ‘पश्चिम आफ्रिकेचे पॅरिस’ आणि व्यावसायिक उलाढालींमुळे ‘पश्चिम आफ्रिकेचे मॅनहॅटन’ म्हणूनही ओळखले जात असे. फॅशन, संस्कृती आणि इतरही बाबतीत आबिदजान सर्वात आघाडीच्या आफ्रिकी शहरांपैकी एक आहे.

अबिदजान येथील समुद्रकिनारे छान आहेत. या किनाऱ्यावर स्टारफिश – चांदणीच्या आकाराचे मासे आणि झाडे बघावयास मिळतात. हॉटेलच्या खिडकीतून शहराचा नयनरम्य देखावा दिसत होता. त्याचा फोटो मी अजूनही जपून ठेवला आहे. मला कामाच्या ठिकाणी जाता-येता शहर बघायला मिळत होते.

अबिदजान शहरामध्ये सेंट पॉल्स कॅथेड्रल हे एक रोमन कॅथलिक कॅथेड्रल आहे. हे कॅथेड्रल अद्वितीय आणि आधुनिक असेच आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे क्रॉसची रचना; हा क्रॉस मागील बाजूने सात केबलच्या साहाय्याने बांधलेला आहे. त्रिकोणी आकारात असलेल्या कॅथेड्रल आणि क्रॉसच्या संपूर्ण रचनेतून हात पसरून, गुडघ्यांमध्ये वाकून प्रार्थना करणाऱ्या येशू ख्रिस्ताचा पायघोळ रोब मागे उडत आहे, असा भास होतो. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या काँक्रिटच्या या उंच प्रतीकात्मक आकृतीला अँथ्रोपोमॉर्फिझम आर्ट असे म्हणतात.

अबिदजान शहराच्या जवळच बँको राष्ट्रीय उद्यान आहे. बँको नॅशनल पार्कमध्ये दुर्मीळ वनस्पती आणि प्राणी बघावयास मिळतात. सागवानासारख्या झाडांची उष्णकटिबंधीय जंगले येथे आढळतात. प्राण्यांमध्ये आफ्रिकन सिव्हेट, ड्यूकर, बुशबक, जेनेट, माकडे इत्यादींचा समावेश आहे. पर्यटक तर इथे भेट देतातच, पण स्थानिकांसाठीसुद्धा हे आकर्षणाचे ठिकाण आहे. या उद्यानात आपल्या मुलाबाळांसह पिकनिकला आलेले अनेक स्थानिक दिसत होते.

तीन-चार दिवसांच्या मुक्कामात येथे मिळणारे वेगवेगळे फ्रेंच स्टाईलचे ब्रेड आणि सॅलड खाऊन कंटाळा आला होता. आमच्या टूर गाइडने अबिदजानमध्ये सम्राट नावाचे भारतीय हॉटेल असल्याचे सांगितले. गाइडला चिकन टिक्का, सब्जी-रोटी हे पदार्थ माहीत होते, याचे मला थोडे आश्चर्य वाटले. बहुतेक भारतीय प्रवाशांना या हॉटेलमध्ये जेवायला आवडते, त्यांच्यामुळेच मला हे पदार्थ माहिती झाले, असे तो सांगत होता.

आयव्हरी कोस्टमध्ये भारतीय वंशाचे दोनेक हजार लोक राहतात. त्यापैकी बहुतेक व्यापार, व्यवसाय करतात तर काहीजण खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रात आहेत. अबिदजानमध्ये इस्कॉन आणि गीता आश्रम असल्याचेही समजले.

तिथल्या प्रसिद्ध मार्केटमध्ये आम्ही एक चक्कर मारली. मार्केटमध्ये लाकडापासून तयार केलेले वेगवेगळे मानवी मुखवटे विकायला होते. येथील लोक त्यांच्या पूर्वजांची प्रतिके म्हणून या मुखवट्यांचा वापर करतात असे गाइडने सांगितले. मुखवट्यांशिवाय विणकाम केलेल्या वस्तू, कपडे, दागिने आणि रंगीबेरंगी पेंटिंगही होती. पलीकडेच मोठे क्युरिओ मार्केट (लाकडाचे प्राणी) होते. तिथेही भेट दिली. बहुतांश आफ्रिकी मार्केटमध्ये अशी हस्तकला बघावयास मिळते.

रेन फॉरेस्ट काय असते हे जाणून घेण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा इथे पूर्ण झाली. ताय नॅशनल पार्क हे कोटे डी’व्होरमधील नक्कीच बघण्यासारखे राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात अप्पर गिनी रेन फॉरेस्टच्या अवशेषांचे सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. या उद्यानातील वनस्पती आणि प्राण्यांच्या विविधतेमुळे या उद्यानाचा १९८२मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला गेला.

ताय नॅशनल पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी डजोरआउटो या गावी जावे लागते. हे गाव सॅन पेड्रोपासून अंदाजे २१५ किमी अंतरावर होते आणि रस्ता खूप खराब होता, पण जंगल मात्र सुंदर होते. या जंगलात पिग्मी हिप्पोपोटॅमस, ऑलिव्ह कोलोबस वानर आणि ड्युकर्स अशा दुर्मीळ प्राण्यांच्या प्रजाती बघावयास मिळाल्या. ताय नॅशनल पार्कच्या मध्यभागी माउंट निनोकोउ हा ४०० मीटर उंच डोंगर आहे. थोडा चढाव जास्त आहे, पण चढण्यासाठी तितका अवघड नाही. डोंगरावरून जंगल किती घनदाट आहे याचा अंदाज येतो. हा डोंगर स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान आहे.

जंगलातून वाहणाऱ्या नद्या, त्यांची खोरी आणि हिरवीगार दाट झाडी अशा अलौकिक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत तिथेच बसून राहावे, असे वाटते. तेथून पाय निघता निघत नाही. शेवटी गाइड अंधार होईल, लवकर निघूया असे मागे लागला तेव्हा तिथून निघालो.

या उद्यानात गोलाकार तंबू असलेले इकोटेल (हॉटेल) आहे. जंगलात दिवसभर चालून आल्यावर विश्रांती घेण्यासाठी थोडावेळ आम्ही इकोटेलमध्ये थांबलो होतो. चहाचा आनंद घेत जवळच्या झाडांच्या फांद्या ओलांडून उड्या मारत इकडून तिकडे जाणारी माकडे आणि रंगीबेरंगी पक्षी बघताना खूप मजा आली. एकंदरीतच रेन फॉरेस्टचा अनुभव खूपच विलक्षण होता.

गूढरम्य पाटेश्वर देवस्थान संकुल

 

सकाळ साप्ताहिक

गूढरम्य पाटेश्वर देवस्थान संकुल

डॉ.  मोहीत विजय रोजेकर

छोट्या तटबंदीमधून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. फरसबंदी प्रांगण, दोन दीपस्तंभ, छोट्या घुमटीमधला नंदी आणि मंदिराची एकूणच रचना कसल्याशा गूढतेची जाणीव करून देते.

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

या ओळींमध्ये म्हटल्याप्रमाणे दगडांचा कणखरपणा आणि फुलांचा कोमलपणा एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर पाटेश्वर देवस्थान अतिशय योग्य स्थळ आहे. साताऱ्यापासून सुमारे दहा-बारा किलोमीटर अंतरावर देगांव एमआयडीसीजवळ हे ठिकाण आहे. देगांव पार केल्यावर छोटासा घाटरस्ता आपल्याला डोंगरावर घेऊन जातो. थोड्या सपाटीवर तेथे गाडी लावून पुढे चालत निघायचे. येथे येण्यासाठी बोरगावमार्गेसुद्धा एक रस्ता आहे, पण देगांवची वाट जास्त प्रचलित आहे. सुरुवातीच्या टप्प्यात थोड्या पायऱ्या अन् उजवीकडे बाजूला श्रीगणेशाची रिद्धीसिद्धीसहित शेंदूर लेपित मूर्ती कोरलेली दिसते. एकटा गेलो होतो म्हणून ‘बिबटे आणि रानडुकरांचा वावर येथे आहे’ अशी सूचना वाचून जरा धडकी भरली खरी, पण तुम्ही एकटे नसाल तर घाबरण्याची गरज नाही. पण थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

पायऱ्या संपल्यावर पायवाट पुढे डोंगरातून जवळपास एकदीड किलोमीटर असेल. दोन्ही बाजूला जंगल आणि त्यातून पक्ष्यांचा गुंजारव सतत कानी पडत असतो. त्याचबरोबर मुंगूस, साळिंदर, माकडे, साप, रानडुक्कर यांच्या हालचालींमुळे पाल्यापाचोळ्याचा आवाज येत असतो. आपण एकटे नसल्याची जाणीव सतत सोबत असते. एखादा प्राणी-पक्षी दिसला की आपल्याला भारी वाटते, पण जंगलात शिरण्याअगोदरच शंभराहून अधिक नजरा आपला मागोवा घेत असतात, याची जाणीवही आपल्याला नसते. परंतु प्राण्यांचे मनुष्यासारखे नसते, आपण डिवचल्याखेरीज ते त्रास देत नाहीत.

मुख्य मंदिराजवळ आले, की उजवीकडे एक बांधीव तलाव दिसतो. भरपूर कमळे त्यात नेहमीच फुललेली दिसतात. पायवाट तलावासमोरच्या आश्रमासमोर संपते. गोविंदस्वामी महाराजांचा आश्रम आणि तलाव यांच्यामधून बांधीव पायऱ्यांचा मार्ग मुख्य मंदिराकडे जातो. मंदिर प्रकारच्या अलीकडे एक पायवाट उजवीकडे जाते. तेथे एक छोटे घुमटीवजा मंदिर आहे. त्याआधी एका वृक्षाला टेकून एक गरुडमूर्ती उभी आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी डावीकडे भिंतीमध्ये एक प्रचंड शिवलिंग आहे. तर उजवीकडे एका देवडीमध्ये हनुमानाची मूर्ती आहे. छोट्या तटबंदीमधून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. फरसबंदी प्रांगण, दोन दीपस्तंभ, छोट्या घुमटीमधला नंदी आणि मंदिराची एकूणच रचना कसल्याशा गूढतेची जाणीव करून देते. मुख्य मंदिराशिवाय इथे महिषासुर मर्दिनी आणि चतुर्मुख ब्रह्मदेव यांचीही छोटी मंदिरे आहेत. शेषशायी विष्णूचीदेखील एक सुंदर मूर्ती इथे नजरेस पडते. मंदिराच्या एकंदरीत रचनेवरून ते ४००-५०० वर्षे पुरातन असावे असा अंदाज आहे. मंदिराच्या तटबंदीला वळसा घालून वरच्या बाजूला गेल्यास तेथे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. मोरावर आरूढ एक छोटी मूर्ती तेथे आहे. बोरगावची वाट कार्तिक स्वामी मंदिराच्या जवळ पोहोचते.

मुख्य मंदिराव्यतिरिक्त येथे अन्य आठ मंदिरे आहेत, जी आश्रमाच्या मागच्या बाजूला गुहांमध्ये आहेत. ही मंदिरेच खरेतर इथली मुख्य आकर्षण आहेत. इथल्या गुहांमधून, मंदिरातून असंख्य शिवपिंडी आढळून येतात. एका गुहावजा मंदिरात अग्निवृष मूर्ती आहे. ऋग्वेद आणि इतर भारतीय ग्रंथात वर्णन केल्यानुसार सात हात, तीन पाय आणि दोन डोकी अशा मानव आणि वृषभ अशा दोहोंचा भास होणारी सुंदर मूर्ती इथे आहे. प्रथमदर्शनी मूर्ती नंदीची वाटते, पण तो अग्निवृष आहे. भारतात इतरत्र अशी मूर्ती आढळल्याची नोंद नाही.

चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य।
त्रिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश।।

हे ऋग्वेदातील वर्णन या मूर्तीला चपखल लागू पडते,

अग्निवृष मंदिराच्या पाठीमागे गुहांमध्ये ब्रह्मिणी, वैष्णवी आणि माहेश्वरी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. खाली कोरलेल्या त्यांच्या वाहनांवरून आपण ते सहज ओळखू शकतो. इतर गुहांमध्ये असंख्य शिवपिंडी आढळून येतात. त्याशिवाय इतरही अनेक कोरीवमूर्ती तेथे आहेत, पण संशोधनाअभावी त्यावर व्यक्त होणे धारिष्ट्याचे ठरेल. सर्वात शेवटी इथे वऱ्हाडघर मंदिर आहे. इथल्या नंदीच्या अंगावरील कोरीवकाम अप्रतिम आहे. याठिकाणी एक चतुर्मुख शिवपिंड आहे. याशिवाय लिंगाच्या जागी दोन कुंभ असलेले कुंभेश्वर महादेवदेखील इथे आहे. इथल्या मंदिरात मूळ शिवलिंगावर असंख्य शिवपिंडी कोरलेल्या आहेत. त्या हजारांहून जास्त असाव्यात. त्याशिवाय इथल्या खांबावरील कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. शिळेवर नवग्रह कोरलेले आढळून येतात. काहींच्या मते ते विष्णू अवतार आहेत. एका शिळेवर सप्तमातृका कोरलेल्या आहेत. त्यात एक गणेश शिल्पसुद्धा आहे. अतिशय पुसट आणि अगम्य असा एक शिलालेखही आहे. कदाचित देवनागरी लिपीमधील असावा. पण अजूनतरी त्याचे वाचन करण्यात यश आलेले नाही.

मुख्य पाटेश्वर मंदिरापेक्षा या सर्वांचा काळ बराच जुना आहे. एकंदरीतच इथले वातावरण गूढतेने भारलेले आहे. त्यात जंगल आणि किमान मानवी हस्तक्षेप अधिकच भर घालतो. पुरातनकाळी शाक्त किंवा इतर अघोरी पंथाच्या उपासनेचे हे मुख्य स्थान असावे, असे वाटते. सोमवार आणि महाशिवरात्रीला इथे मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र हे दिवस सोडल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळी नऊनंतर आणि सायंकाळी पाचपूर्वीच या ठिकाणाला भेट देणे उचित ठरेल. अजूनही हे ठिकाण फार प्रसिद्ध नाही, परंतु पर्यटकांची नसली तरी संशोधकांची पावले इकडे वळावी ही अपेक्षा. इतका मोठा अनमोल ठेवा इथे आहे. मात्र इतिहासाबाबत अनभिज्ञता आहे. स्थानिकांनाही त्याबाबत फारशी माहिती नाही. शेकडो वर्षांपासून या साऱ्या मूर्ती, मंदिरे मुकेपण वागवत आहेत. कुण्या संशोधकांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करायला हवा. हे सारे दगड जर बोलायला लागले तर फार मोठ्या इतिहासावरचा पडदा बाजूला होईल आणि आपल्या सांस्कृतिक, सामाजिक वारशात अजून मोलाची भरच पडेल.

अनोखे चार धाम

 

सकाळ साप्ताहिक

रश्मी कापशीकर

चार धामच्या प्रत्येक क्षेत्राचा अनोखा महिमा आहे. हिमालयाच्या भव्य आणि दिव्य निसर्गासमोर आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. अशा निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या चार धाम यात्रेला जाऊन धन्य वाटते!

आम्ही चार धामची यात्रा करून परतलो तरी मन अजूनही तिथेच रेंगाळत होते. मी, माझे मिस्टर, माझी आई, माझ्या दोन मावश्या आणि एका मावशीचे मिस्टर असे आम्ही सहा जण ट्रॅव्हल्समार्फत बुकिंग करून गेलो होतो. आधी दिल्लीहून हरिद्वारला गेलो. रात्री हरिद्वारला पोहोचलो आणि तिथेच मुक्काम केला. दुसरा दिवसही पूर्ण प्रवासाचाच होता. दुसऱ्या दिवशी आम्ही हरिद्वारहून स्यानाचट्टीला गेलो. २०६ किलोमीटरचा प्रवास होता. त्यासाठी आम्हाला जवळजवळ आठ तास लागले. आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला याची पहिल्याच दिवशी कल्पना दिली होती, की आता याच्या पुढचा बराचसा वेळ बसमध्ये जाणार आहे. कारण याच्यापुढे घाट रस्ता सुरू होतो. अतिशय अवघड, लहान आणि घाटाचे रस्ते असल्यामुळे वेळ जास्त लागतो. शिवाय मधेच ट्रॅफिक लागला, तर अजूनच उशीर होत जाणार. तेव्हा तयार राहा, असे टूर मॅनेजरने आधीच सांगून ठेवले होते.

पण जसजसा उत्तराखंडमध्ये प्रवेश केला, तसतसे ठिकठिकाणी ‘देवभूमी मे आपका स्वागत है’ असे फलक दिसू लागले, आणि त्या निसर्गसौंदर्य देवभूमीची प्रचिती येऊ लागली. बसमध्ये बसून बाहेरचा सुंदर निसर्ग पाहण्यात वेळ कसा निघून गेला ते कळालेच नाही. स्यानाचट्टीला रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्हाला पहिले धाम यमुनोत्रीला जायचे होते. स्यानाचट्टीपासून वीस किलोमीटर अंतरावर यमुनोत्री धाम आहे. पहाटे लवकर उठून आम्ही निघालो. यमुना नदीचे उगमस्थान आणि यमुना देवीचे मंदिर इथपर्यंत जायला सात किलोमीटरचा ट्रेक करून जावे लागते. त्यासाठी चालत जाणे, डोली आणि घोडा हे पर्याय आहेत. आम्ही डोलीचा पर्याय निवडला. त्यादिवशी खूपच गर्दी असल्याने डोलीवाल्यांचे भाव बरेच वाढले होते. एरवी चार ते पाच हजार रुपयांपर्यंत असलेला भाव प्रत्येकी दहा ते बारा हजारापर्यंत झाला होता. शेवटी प्रत्येकी आठ हजाराप्रमाणे भाव ठरला. आम्ही डोलीत बसलो. हवेत बराच गारठा होता. अधूनमधून थंड पावसाचे तुषारही अंगावर पडत होते. सात किलोमीटरचा रस्ता पार करायला आम्हाला चार ते पाच तास लागले. हिमालयातला प्रवास अवघडच आहे. त्यात यमुनोत्रीचा विशेष अवघड आहे. डोलीत बसायचा अनुभवही पहिलाच असल्याने भीतीही वाटत होती. असा हा खडतर प्रवास करून वर उगमस्थानी पोहोचलो तेव्हाचा आनंदही अनोखाच होता. जोरदार आवाज करीत उंच ठिकाणाहून खाली येणारा तो शुभ्र स्फटिकासारखा खळखळून वाहणारा प्रवाह पाहून मन अचंबित झाले. यमुना देवीचे दर्शन घेऊन गरम पाण्याचे सूर्य कुंड पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. आकाशात काळे ढग जमा व्हायला लागले होते. येथे कधी हवा पालटेल याचा नेम नसतो. येताना जरा कमी वेळ लागला. पण खाली उतरून बसमध्ये जाऊन बसेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. जाताना डोलीवाल्यांशी घासाघीस करून भाव ठरविले होते. पण जाऊन आल्यावर त्यांच्या कष्टांची जाणीव झाली. त्यांनीच आम्हाला सुरक्षितपणे परत आणले होते. त्यामुळे आम्ही ठरवल्यापेक्षा थोडे जास्त पैसे दिले. अशा तऱ्हेने पहिले धाम पार पडले.

दुसऱ्या दिवशी उत्तर काशीला जायचे होते. एकशे दहा किलोमीटरचे अंतर पार करायला चार तास लागले. रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्हाला गंगोत्रीसाठी निघायचे होते. तिथून गंगोत्री शंभर किलोमीटर अंतरावर आहे. गंगा नदीचे हिमालयातील उगमस्थान म्हणजे गंगोत्री. वाटेत सफरचंदाच्या अनेक बागा पाहिल्या. लालबुंद सफरचंदांनी लगडलेली झाडे पाहून वेडावल्यासारखे झाले. चाळीस रुपये किलोप्रमाणे झाडावरची ताजी सफरचंदे आम्ही घेतली. रसरशीत ताज्या सफरचंदांची ती चव काही औरच होती!

गंगोत्री… गंगामातेच्या उगमाचे हे ठिकाण. गंगेचे ते दिव्य रूप साठवत उत्तर काशीला मुक्कामासाठी आलो. आता आम्हाला सीतापूरला जायचे होते. उत्तर काशी ते सीतापूर हा आमच्या प्रवासाचा सहावा दिवस होता. २२५ किलोमीटरचा हा प्रवास सगळ्यात मोठा होता. जवळजवळ नऊ ते दहा तास लागले. रात्री सीतापूरला पोहोचलो तेव्हा तिथली गर्दी आणि पार्किंगमधल्या गाड्या पाहून उरात धडकीच भरली. रात्री आम्हाला पोहोचायला अकरा वाजले होते आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून केदारनाथला जायचे होते. सीतापूरला रात्री खूपच थंडी होती. शिवाय मुसळधार पाऊसही पडला. आम्ही थंडीने गारठून गेलो होतो आणि आणि भीतीचीही भर पडत होती. कारण सगळ्यात अवघड असा २१ किलोमीटरचा ट्रेक करून आम्हाला केदारनाथला जायचे होते. खूप प्रयत्न करूनही आम्हाला हेलिकॉप्टरचे तिकीट मिळाले नाही. हेलिकॉप्टरनेच जायचे या विचाराने आम्ही आलो होतो, कारण माझी आई आणि मावशी सत्तरीच्या घरातल्या आहेत. त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरने जाणे जास्त सोयीचे होते, पण ती सोय होऊ शकली नाही. आणि आम्ही ज्या दिवशी केदारनाथला निघालो त्या दिवशीच दोन्ही काउंटरही बंद झाले, म्हणजे डोलीचा पर्यायही राहिला नाही. आता घोड्यावरून सहा ते सात तास लागणार होते. मला तर हे सगळे अशक्यच वाटू लागले. हा अवघड प्रवास आईला घोड्यावरून जमेल असे मला वाटेना. मी आईला म्हणाले, ‘आपण नको जायला. आपण परत फिरू. मी थांबते तुझ्याबरोबर.’ पण माझी आई आणि मावशी परत फिरायला तयार नव्हत्या. दोघी बहिणींची प्रबळ इच्छाशक्ती बघून मीही तयार झाले, पण मनातली भीती काही केल्या कमी होईना. आमच्या ग्रुपमधले बरेच लोक पुढे गेले होते. आम्हालाच तसा उशीर झाला होता. मग आम्हीही निघालो, आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा घोड्यावरचा प्रवास सुरू झाला. अतिशय अवघड, दुर्गम असा रस्ता़़़़; त्या लहान रस्त्यावरून पायी जाणारे-येणारे, वरून घोड्यावरून परतणारे आणि आमच्यासारखे वर दर्शनाला जाणारे, सगळ्यांचीच गर्दी! त्यात मधेच पावसाला सुरुवात झाली. टपाटप बर्फाचे खडे पडत होते. चांगलीच हुडहुडी भरली होती. घोड्यावरून उतरून तीन तीन कप चहा प्यायलो, तरीही काही केल्या हुडहुडी कमी होईना. मनावरचा ताणही वाढू लागला. पाऊस थांबेल ना? आपण अंधार पडायच्या आत केदारनाथला पोहोचू ना? याचे टेन्शन येऊ लागले. पावसाचा जोर थोडा कमी झाला, तसा घोडेवाला घाई करू लागला, चला म्हणू लागला. पण आमच्यासाठी ते शक्य नव्हते. मग मी त्या घोडेवाल्याला विनंती केली, तुला जास्तीचे पैसे देऊ, चहा पाण्याला पैसे देऊ, पण पाऊस थांबू दे, पावसात नको जायला. तोही तयार झाला. सुदैवाने पाऊस थांबला. मग आमची घोडेसवारी सुरू झाली. हिमालयाचे ते रौद्र पाहतच आम्ही निघालो. आजूबाजूचा सुंदर निसर्ग डोळ्याला सुखावत होता.

ती हिम शिखरे, गर्द वनराई, मंदाकिनी नदीचा प्रवाह… सगळेच नयनरम्य आणि दुसऱ्या बाजूला ती खोल दरी, निसरडा रस्ता… छातीतली धडधडही वाढत होती. पावसामुळे रस्ता दलदलीचा झाला होता. घोड्याचा पाय अधूनमधून निसटला, की छातीचा ठोका चुकायचा. अधूनमधून मी आईकडे पाहायची. ती मात्र शांत होती. तिचे नामस्मरण चालू असायचे. शेवटी सात तासांनी आम्ही केदारनाथला पोहोचलो. अंधार पडायला सुरुवात झाली होती, थंडीही वाढू लागली. जिथे आमची उतरायची सोय केली होती, तिथे आम्ही सावकाश चालत निघालो. अंतर तसे फार नव्हते, पण आम्हाला चालायला वेळ लागत होता. रूमवर पोहोचल्यावर आम्ही दुलई पांघरून पडून राहिलो. सगळेच थकलो होतो. रात्री दहा वाजता मंदिरात पूजा होती. तेव्हा आम्ही फ्रेश होऊन बाहेर पडलो. बाहेर अतिशय थंडी होती. उणे दोन तापमान होते, पण मंदिरात प्रवेश करताच अतिशय उबदार वाटले.

रुद्राभिषेक पूजा अतिशय सुंदर झाली. खूप प्रसन्न वाटले. सगळा शीण नाहीसा झाला, प्रसन्न चित्ताने आम्ही रूमवर परतलो. पण रात्री थंडीमुळे आम्हाला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा घोड्यावरूनच खाली उतरायचे होते, त्याचाही मनावर ताण होता. पण इलाज नव्हता, घोड्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा घोड्यावर बसायला तयार झालो. चार तासात आम्ही गौरी कुंडापर्यंत पोहोचलो. हॉटेलवर जायला आम्हाला चार वाजले. सगळे आमची वाट पाहत होते. आम्ही सगळे शरीराने जरी थकलो असलो, तरी मनाने खूप आनंदित होतो. कारण खूप अवघड अशी यात्रा सुखरूपपणे पार पडली होती. माझ्या आईला आणि मावशीला काहीही शारीरिक त्रास झाला नाही. त्यांच्यासाठी तर ही एक साहसी यात्रा होती.

आता बद्रीनाथच्या दर्शनाला जायचे होते. आमच्या प्रवासाचा हा नववा दिवस होता. सीतापूरहून आम्ही जोशीमठला निघालो. जोशीमठाजवळ अलकनंदेच्या पाच संगमांपैकी तीन संगम पाहायला मिळतात, विष्णुप्रयाग – नंदप्रयाग – कर्णप्रयाग. प्रत्येक नदीचा वेगवेगळ्या रंगाचा प्रवाह मिसळताना बघून नवल वाटत राहते. मंदाकिनी, अलकनंदा, गंगा, यमुना, सरस्वती… या साऱ्या हिमालय कन्या, पण युगानुयुगे अखंड वाहणारे ते प्रवाहांचे सौंदर्य पाहताना, त्या नावांत असलेले सौंदर्यही नव्याने उमगले. गंगोत्रीला गंगेचा प्रवाह अगदी पांढराशुभ्र लकाकणारा, जणु हिराच! अलकनंदेचे पाणी फिकट हिरव्या रंगाचे, पाचूसारखे! निसर्गाचे हे भव्यदिव्य रूप पाहून नतमस्तक व्हायला होते.

जोशीमठहून बद्रीनाथला आलो. त्यादिवशी आम्ही संध्याकाळी दर्शनाला जाणार होतो. सकाळी आम्ही माना व्हिलेजला भेट दिली. त्‍या मार्गावरचे शेवटचे चहाचे दुकान पाहिले. सरस्वती नदी, व्यास गुफा, गणेश गुफा, भीम ब्रिज आणि पांडवांचे स्वर्गारोहण मार्गदर्शन हे सगळे पाहून झाले. पौराणिक कथा ऐकतच हे सर्व पाहत होतो. सगळ्या आसमंतात असलेला दैवी स्पर्श जाणवत राहतो. संध्याकाळी बद्रीनाथाचे दर्शन घेतले आणि मन भरून पावले.

आमचे चार धाम दर्शन पूर्ण झाले होते. आता आम्हाला कीर्ती नगरला जायचे होते. तिथून ऋषिकेशला गेलो. तिथे आम्ही लक्ष्मण झुला, बाबा काली कमली वाला आश्रम, गीता भवन पाहिले आणि हरिद्वारला गंगा घाटावर गंगा आरती पाहिली. आमच्या प्रवासाचा हा बारावा दिवस होता.

त्यादिवशी हरिद्वारलाच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीला आलो, तिथून फ्लाईटने पुण्याला पोहोचलो.

चार धामच्या प्रत्येक क्षेत्राचा अनोखा महिमा आहे. हिमालयाच्या भव्य आणि दिव्य निसर्गासमोर आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. अशा निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या चार धाम यात्रेला जाऊन धन्य तर वाटलेच, शिवाय विश्वनिर्माता विधाता असलेल्या परमेश्वराचे अस्तित्व पुन्हा एकदा जाणवले.

सुट्टी आणि प्रवास..

 

सकाळ साप्ताहिक

लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मोठी ट्रिप तर होतेच. बुकिंगचा टप्पा पार पडला की त्यापुढचा टप्पा असतो पॅकिंगचा. काय घेऊ? काय काय लागेल? काय नेले नाही तरी चालेल? आणि सगळ्यात महत्त्वाचे बॅगेत किती सामान बसेल? असे प्रश्न निघेनिघेपर्यंत पाठ सोडत नाहीत. आमच्याकडेही काही वेगळी परिस्थिती नसायची. प्रवासादरम्यान उपयुक्त, गरजेच्या आणि बॅगेत भरून नेण्यासाठी सोप्या काही गोष्टी आम्ही शोधल्या…

रणरणत्या उन्हात फिरताना अचानक एका दाट वृक्षाची शीतल छाया मिळाली किंवा गरम झळा जाणवत असताना वाऱ्याची थंड झुळूक आली की मन कसे सुखावते; अगदी तसेच ‘मला सुट्टी मिळाली बरं का आणि या सुट्टीत आपण मस्त फिरायला जाणार आहोत,’ हे बाबांचे वाक्य कानावर पडले की होत असे.

शाळेत असेपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टीने खूश होणाऱ्या मला; आता ऑफिसमधून ऑफिशियल सुट्टी मिळणार नसून रजा काढावी लागणार, हे समजल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीची खरी किंमत कळाली. सुट्टीचा अर्ज भरल्यापासून तो मंजूर होईपर्यंत मनात एक वेगळीच धाकधूक असते. त्यापेक्षा ‘परीक्षेच्या ताणानंतर सुट्टी मिळणार’ ही खात्री मला जास्त बरी वाटते. शाळा, कॉलेजच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची वेळ साधारणतः ठरलेली असते आणि त्या दरम्यान पालकही सुट्टी घेऊन एखादी छानशी फॅमिली ट्रिप प्लॅन करण्याच्या तयारीत असतात.

जसजशा दळणवळणाच्या सोई वाढत गेल्या तसे पर्यटनाला उधाण आले हे जरी खरे असले, तरी प्रवास करण्याची आवड, प्रवास करताना अनुभवता येणाऱ्या सुखकर क्षणांना परत एकदा जगण्याची ओढ आणि हौस या गोष्टी मोठी सुट्टी काढून फिरायला जाण्यास भाग पाडतात.

मग सर्वात मोठा प्रश्न असतो कुठे जायचे? अर्थातच जिथे तप्त उन्हाळा नसेल तिथे. मग महाराष्ट्रातल्या माथेरान, महाबळेश्‍वर-पाचगणी, चिखलदऱ्यासह, लडाख, सिमला, मनाली, काश्मीर, गुलमर्ग, नैनीताल, माऊंट अबू, हरिद्वार, ऋषिकेश, चार धाम, मुक्तेश्वर, गंगटोक, दार्जिलिंग, म्हैसूर, उदगमंडलम, कुर्ग अशा देशभरातल्या काही ठिकाणी फॅमिली ट्रिपचे नियोजन होते. ट्रिपचे बुकिंग झाले असेल तर त्यापुढचा टप्पा असतो पॅकिंगचा. काय घेऊ? काय काय लागेल? काय नेले नाही तरी चालेल? आणि सगळ्यात महत्त्वाचे बॅगेत किती सामान बसेल? या विचारांनी पुरत्या गोंधळून गेलेली घराघरातली मंडळी निघेनिघेपर्यंत सामानच भरत असतात. माझ्याही घरी काही वेगळे नव्हते. आम्ही तीन बहिणी आणि आई अशा चौघीजणी असल्याने बॅगा भरण्याचा मोठाच कार्यक्रम रंगायचा! ‘आपल्याला उचलता येईल तेवढेच सामान घ्या,’ असे बाबांचे सांगणे असायचे. मग आम्ही प्रवासादरम्यान उपयुक्त, गरजेच्या आणि बॅगेत भरून नेण्यासाठी सोप्या काही गोष्टी शोधून त्यांची एक यादीच करून ठेवली.

सगळ्यात आधी तर तुमच्याकडे उत्तम ट्रॅव्हलिंग बॅग हवी. बॅगचे स्वतःचे वजन जास्त असले की त्यात सामान भरल्यावर ती अधिकच जड होते. त्यामुळे अल्ट्रालाइट बॅग सोयीच्या असतात. तुम्हाला लागणाऱ्या वस्तू जागच्या जागी हव्या असतील, तर सुटकेस आणि व्हील बॅग मला अतिशय सुटसुटीत वाटतात. त्यात आपले सामान व्यवस्थित बसवता येते. शिवाय ट्रॅव्हल स्पेस बॅग वापरल्यास कपड्यांमध्ये अकारण जाणारी जागा वाचवता येते. यात चप्पल किंवा बूट ठेवण्यासाठी वेगळी जागा नसली, तरी स्वतंत्र ट्रॅव्हल शू बॅग घेऊन ती मोठ्या बॅगमध्ये ठेवता येते. सहसा ट्रिपदरम्यान आपण कपडे धुण्याच्या भानगडीत पडत नाही. पण वापरलेले व मळलेले कपडे आणि न वापरलेले कपडे एकत्र ठेवायला नको वाटतात. त्यासाठी छोट्या ट्रॅव्हल फ्रेंडली लाँड्री बॅगाही मिळतात. यामुळे बॅगेतल्या बॅगेत कपडे सॉर्ट करून ठेवता येतात.

ट्रॅव्हल पिलो आणि बसून प्रवास करणाऱ्यांनी नेक पिलोही सोबत ठेवावी. उन्हाळा असला तरी काही भागांमध्ये थंडी आणि पाऊस असतो. तुम्ही ठरवलेल्या ठिकाणच्या वातावरणाचा अंदाज घेऊन कपड्यांची निवड करावी. ‘मिनी ट्रॅव्हल अंब्रेला’ किंवा फोल्डेबल छत्री यांना खूप छोटी जागा लागते. त्याचबरोबर पॉकेट ब्लँकेट, सोबत लहान मुले असतील लहान मुलांसाठीची स्लिपिंग सॅक आणि पोर्टेबल मॉस्किटो नेट असेही काही पर्याय उपलब्ध आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टॉयलेटरी बॅग ही तर कोणत्याही प्रवासातील ‘मस्ट हॅव’ आहे. आपला टुथब्रश कुठे आणि कशात ठेवायचा, हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी तुम्ही फोल्डेबल टूथब्रश घेऊ शकता. साबणासाठी वेगळा डबा करण्यापेक्षा शॉवरजेलच्या पॉकेट फ्रेंडली बाटल्या सोईस्कर असतात. प्रत्येक गावचे पाणी तुमच्या केसांना सूट करेलच असे नाही; मग तुम्ही ड्राय शाम्पू वापरू शकता. प्रवासात वेट वाइप आणि छोटे कापडी ड्राय टिशू पेपर होल्डर बरोबर ठेवावेत. प्रत्येक ठिकाणचे स्वच्छतागृह स्वच्छ असेलच असे नाही आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर अनेक जण करत असल्याने त्यातून संसर्ग होण्याची शक्यता टाळता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेता पेपर टॉयलेट सीट कव्हर, स्टँड अँड पी होल्डर, टॉयलेट सीट सॅनिटायझर, पेपर सोप या गोष्टी सोबत असणे उपयुक्त ठरते. बाळासाठी फोल्डेबल पॉटी सीटसुद्धा नेता येतात; ते अगदी छोट्या डबीच्या आकाराचे करून बॅगेत सहज बसते. यासोबतच छोटी कात्री, छोटे नेलकटर आणि तुमची फर्स्ट एड किट सोबत असायलाच हवी.

खास प्रवासासाठी उपयुक्त अशा पोर्टेबल ट्रॅव्हल कटलरी मिळतात, ज्या एकात एक बसतात, दुमडून ठेवता येतात आणि कमी जागा घेतात. लहान बाळ सोबत असेल तर ‘स्पिल प्रूफ कप’ उपयुक्त ठरतो, म्हणजे खेळायच्या नादात ते भांडे वाकडेतिकडे झाले तरी काही सांडत नाही. कागदाच्या आणि झाडांच्या पानापासून तयार केलेल्या डिस्पोजेबल ताटल्या, वाट्या, चमचे आणि ग्लास यामध्येही भरपूर वैविध्य बघायला मिळते.

मोठ्या बॅगव्यतिरिक्त तुम्ही पाठीवरची एक छोटी बॅग घेऊ शकता. याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे, वारंवार लागणाऱ्या गोष्टी तुम्ही त्यात ठेवू शकता आणि दुसरा फायदा म्हणजे, जिथे फिरायला जाणार आहात तिथे फिरताना तुम्हाला ही छोटी बॅग सोबत ठेवता येऊ शकते. यासाठी छोट्या, भरपूर कप्पे असलेल्या बॅकपॅक घ्याव्यात. गॅजेट चार्ज करता येतील अशाही बॅकपॅक उपलब्ध आहेत, त्याही नेता येतील. याशिवाय तुम्ही पोर्टेबल चार्जर बॉक्स घेऊ शकता. एका वेळेस सगळ्यांचे फोन चार्ज करणे, कॅमेरा, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ इयरबड अशा सगळ्याच गोष्टी एकावेळी चार्ज करता येऊ शकतात.

प्रवासात खेळण्यासाठी अनेक गेम आहेत. आपले साधे पत्ते सोडून अनेक वेगवेगळे कार्ड गेमही मिळतात. फोल्डेबल चेस आणि छोटे बोर्ड गेम, ट्रॅव्हल स्क्रॅबल गेम यांसारखे बरेच पर्याय उपलब्ध आहे. अंताक्षरी आणि डम्ब शराड्स या ठरलेल्या खेळांव्यतिरिक्त वेगळ्या काही मनोरंजक खेळांची यादी गूगलवर पाहायला मिळते. लहान बाळ सोबत असेल, तर त्याच्यासाठी काही खेळणी बरोबर ठेवावीच लागतात. तुम्ही सहज कुठेही घेऊन जाऊ शकाल अशा बाळांसाठीच्या खेळण्यांमध्ये चिक्कार विविधता आहे.

प्रवासादरम्यान आईच्या बॅगेबद्दल मला नेहमी कुतूहल असायचे. हॅरी पॉटरमधल्या हर्मायनीच्या बॅगेसारखीच बॅग वाटायची ती, कारण कुणालाही काहीही लागले, तरी आई एका झटक्यात बागेतून ते काढायची. बडीशेप, ओवा, सुपारी, लवंग, चॉकलेट गोळ्या, चिक्की, सुकामेवा अशा काही गोष्टी आई आवर्जून सोबत ठेवत असे. लहानपणी मला बाटलीने पाणी प्यायला अवघड जायचे, त्यामुळे माझ्यासाठी आई नेहमी एक छोटा पेला सोबत ठेवत असे आणि अचानक आजारी पडल्यावर लागणाऱ्या नेहमीच्या औषध-गोळ्यांचा डबा बाबांकडे असायचाच.

कुटुंबासोबत प्रवास केल्याने एकमेकांबद्दलचा विश्वास, जिव्हाळा, प्रेम अजून अजून वाढत जाते, मला असे वाटते. त्याशिवाय त्या सहलींच्या अनेक गोड आठवणींची पुंजीही आपल्याजवळ कायम राहते. कुटुंबासोबत असेच काही गोड अनुभव घेत फिरायला जाणाऱ्या सर्वांचा प्रवास सुखकर होवो!

इस्राईल : वाळवंटातील नंदनवन

 
सकाळ साप्ताहिक

इस्राईल : वाळवंटातील नंदनवन

डॉ. नरेंद्र पटवर्धन

कारमेल पर्वतावर वसलेल्या हाइफा या सुंदर गावाला मोठा समुद्र किनारा आहे व इस्राईलचे सर्वात मोठे बंदर आहे. डोंगरावर छोटी घरं, बिल्डिंग्ज व गगनचुंबी इमारती आहेत. येथे बहाई धर्मियांचं प्रसिद्ध मंदिर आहे. येथून समुद्राचा, बंदराचा देखावा खूप सुरेख दिसतो.

पश्चिम आशियातल्या चिमुकल्या परंतु अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली अशा इस्राईल या देशाच्या पर्यटनाचा योग २०१६मध्ये अचानकच आला. इस्राईलला गेल्यावर सर्व बेने इस्रायली मित्र पुन्हा भेटणार म्हणून खूप आनंद झाला. यापूर्वी अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी इस्राईलला जाणे झाले होते. भव्य आणि अत्याधुनिक अशा बेन गुरियन विमानतळावर आमचा मित्र सॅमसन व बातशेवा आम्हाला घेण्यासाठी आले होते. जवळच्या लूद या गावात त्यांच्या घरीच मुक्काम होता. खूप मनापासून आमचे उत्तम आदरातिथ्य केले.

या सहलीत इस्राईलच्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा बघण्याचा आनंद घेता आला. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी एका सभेमध्ये वर्षभरात देशासाठी आहुती दिलेल्या सैनिकांना जनतेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी अतिशय भव्य आणि शिस्तबद्ध लढाऊ विमानांचे प्रदर्शन आणि एअर शो बघितला. जेरुसलेम ही इस्राईलची राजधानी. उंच टेकड्यांवर वसलेली, तेल अविवपासून ५५ किलोमीटरवर, समुद्रसपाटी पासून ८०० मीटर उंचीवर आहे. पिवळसर पांढऱ्या रंगाच्या टेकड्या, घरे, वास्तू आणि दुतर्फा हिरवीगार झाडी बघून मन प्रसन्न होऊन जाते. ही सर्व झाडे, जंगलं मानव निर्मित आहेत. ह्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी वापरले जाते.

जेरुसलेम नवीन व जुन्या भागात विभागले आहे. जुन्या जेरुसलेम मध्ये लांबून लक्ष वेधून घेणारा ‘डोम ऑफ रॉक’ सोन्याने मढलेला आहे. मशिदीचा गोल घुमट. जुने जेरुसलेम ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांचे पवित्र स्थान. ख्रिश्चन धर्मियांच्या श्रद्धेनुसार येशू ख्रिस्तांना जेथे क्रूसावर चढवले ते ‘चर्च ऑफ होली सेपल्‌चर’ व ते स्वर्गवासी झाले त्या जागा इथेच आहेत. मुस्लिमांची पवित्र ‘अल अक्सा’ मशीद येथेच आहे. ज्यूंची प्रसिद्ध ‘वेस्टर्न वॉल’ म्हणजे दुसऱ्या मंदिराचे उरलेले अवशेष. हिला ‘वेलिंग वॉल’ असेही म्हटले जाते. सर्व ज्यू इथे प्रार्थना करतात व आपली इच्छा एका कागदावर लिहून दगडांच्या फटीत सरकवतात. नवीन जेरुसलेम अतिशय प्रगत आहे. मोठे रस्ते, उंच इमारती. इस्राईलची लोकसभा ‘क्नेसेट’ येथे आहे. पण महत्त्वाचे होलोकॉस्ट म्युझियम आहे. पन्नास लाखांवर ज्यू लोकांवर नाझीनी केलेले अत्याचार व हत्येची जिवंत चित्रे येथे आहेत. बघताना डोळे पाणावतात.

जेरुसलेममरून आम्ही मृत समुद्राकडे प्रयाण केले. समुद्रसपाटी खाली ४३० मीटरवर असलेले हे एक भले मोठे तळेच आहे. पाण्यात असलेल्या जास्त खनिजांमुळे कोणताही सजीव त्यात नाही. पाण्याची घनता जास्त आहे. पाण्यावर तरंगण्याचा अनुभव औरच होता. आतली माती शरीराला फासली तर सोरीयासिस सारखे आजार बरे होतात, असा समज आहे. जवळच साधारण सिंहगडाएवढ्या उंचीचा ‘मसादा किल्ला’ आहे. वर जायला रोप वे आहे. जुन्या राजवाड्याचे भग्नावशेष वर आहेत.

तेल अविव शहर हा इस्राईलचा आर्थिक केंद्रबिंदू. स्वच्छ समुद्र किनारा, किनाऱ्यावर तयार केलेली पायवाट, मोठाली हॉटेल, पब. एका बाजूला असलेले जाफा बंदर, अशी सुरेख जागा आहे. मोठे रस्ते, हॉस्पिटल, म्युझियम, प्राणिसंग्रहालय भरपूर आहेत. तेल अविव बेन गुरियन युनिव्हर्सिटी येथेच आहे. नंतर आम्ही उत्तरेला प्रयाण केले. पहिलं गाव लागते ते हायफा. कारमेल पर्वतावर वसलेल्या ह्या सुंदर गावाला मोठा समुद्र किनारा आहे व इस्राईलचे सर्वात मोठे बंदर आहे. डोंगरावर छोटी घरं व गगनचुंबी इमारती आहेत. येथे बहाई धर्मियांचं प्रसिद्ध मंदिर आहे. येथून समुद्राचा, बंदराचा देखावा खूप सुरेख दिसतो. अजून उत्तरेला जाताना रोश हनिक्राला थांबलो. जवळच इस्राईल – लेबनॉन बॉर्डर आहे. रोश हनिक्राच्या डोंगरावरून भूमध्य समुद्राचे अथांग दर्शन घडते. खाली गुहा आहेत. तेथे एक जुनी रेल्वे लाईन आहे. ब्रिटिशांनी ५० किलोमीटरची रेल्वे लाईन लेबनॉन पर्यंत टाकली होती. त्या रात्री मुक्काम आक्को या गावी होता.

दुसऱ्या दिवशी गोलन हाईट्स, गॅलिली खोरं व गॅलिली समुद्राकडे प्रयाण केले. रखरखीत वाळवंटात येथील निसर्ग, हिरवाई, वनश्री डोळ्यांना सुखावते. हिरवे डोंगर व खाली गॅलिलीचा समुद्र.

इस्राईल मधली सर्वात सुरेख, निसर्ग कृपा लाभलेली ही जागा आहे. चालता चालता एक आपल्याकडच्या कॅनॉलच्या रुंदीची जॉर्डन नदी लागली. ख्रिश्चन लोकांसाठी ही गंगेइतकीच पवित्र. बरेचजण बाटलीत पाणी भरून नेत होते. हवा आल्हाददायक. रात्री थंडी होती.

लूदला परत आल्यावर अश्दोद व अश्केलॉन गावांना भेट देऊन सर्व बेने इस्रायली मित्रांच्या गाठीभेटी घेतल्या. तेथील अत्याधुनिक शेती व पोल्ट्री बघण्याचा योग आला. सर्व ट्रीपमध्ये आमचा तिथला मित्र सॅमसन आमच्या बरोबर होता. शक्य असेल तर एक आठवड्याची सुट्टी काढून इस्राईल अवश्य बघावे.

तामिळनाडूचे कांदळवन

http://2jh.a35.myftpupload.com/tourism/tamilnaduche-kandalvan/3346/

सकाळ साप्ताहिक

दीप्ती योगेश आफळे

आमची होडी कालव्यांमधून फिरून आम्हाला खारफुटी जंगलसफर घडवून आणीत होती. वरून खारफुटीच्या फांद्या आणि खालून खारफुटीच्या मुळ्या आणि त्यातून तयार झालेल्या बोगद्यामधूनच आमचा प्रवास सुरू होता.

तामिळनाडूच्या सहा दिवसांच्या सहलीचा प्लॅन आखून आम्ही सातजण बंगळूरहून निघालो. सहलीचा भरगच्च कार्यक्रम योगेशने स्वतःच आखला होता. अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या यादीबरोबरच एक पूर्ण दिवस त्याने पिच्छावरमसाठी दिला होता. ‘त्या खारफुटीत काय बघायचे आहे? त्याऐवजी आपण कन्याकुमारी किंवा उटकमंडला जाऊन येऊ!’ असे सर्वांनी परोपरीने सांगून बघितले, पण त्याने ऐकले नाही. शेवटी तो एक दिवस ‘वाया घालवायच्या’ तयारीने आम्ही निघालो.

महाबलीपुरमला मंदिरे, लेण्या इत्यादी नेहमीच्या स्थळांबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण ‘इंडिया सीशेल म्युझियम’ पाहिले. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनासुद्धा विविध रंग-आकाराच्या शंख-शिंपल्यांचे खूप आकर्षण असते. असेच निरनिराळ्या प्रकारचे चाळीस हजारहून अधिक शंख-शिंपले इथे बघायला मिळतात. एक भला मोठा शंख उभारून या म्युझियमचे प्रवेशद्वारच खूप आकर्षक बनवण्यात आले आहे. इमारतीसुद्धा विशिष्ट आकाराच्या आणि त्यावर शंख, ऑक्टोपस इत्यादींच्या मोठमोठ्या प्रतिकृती करण्यात आल्या आहेत. मोत्यांचे शिंपले, पाणघोडा अशा भव्य प्रतिकृती पाहायला मिळतात. आतील कमानी, बसण्याचे बाक, पायवाटा अशी सर्व ठिकाणे विविधरंगी शंख-शिंपल्यांनी सुशोभित केली आहेत. इमारतींचे रंग पाहता आपण समुद्रातून प्रवास करीत आहोत असेच वाटते. स्वच्छ आणि सुबक मांडणी हे इथले वैशिष्ट्य आहे.

इथे चार दालने आहेत. पहिले दालन शंख-शिंपल्यांचे. यात मोहरीसारख्या अगदी सूक्ष्म आकारापासून प्रचंड आकारापर्यंतचे निरनिराळे नैसर्गिक शंख-शिंपले ठेवलेले आहेत. काटेरी, बसके, उभे, रंगीत आणि नाजूक नक्षीकाम असलेले शंख, दुर्मीळ असे उजवे शंख; मोत्यांसह जोड शिंपले, हत्तीच्या कानासारखे, ऑक्टोपससारखे शेपट्या असलेले, स्टारफिशसारखे शिंपले असे क्वचितच बघायला मिळणारे शंख-शिंपले येथे पाहिले. शंख-शिंपल्यांनी मढवलेले रेल्वे इंजिन, मोटर, विमान, जहाज, निरनिराळ्या बाहुल्या, डॉल्फिन बघायला मजा वाटते.

दुसरे छोटे दालन मत्स्यालयाचे आहे. येथे निरनिराळ्या प्रकारचे अगदी दुर्मीळ मासे बघायला मिळतात. तिसऱ्या दालनात मोती आहेत. अगदी लहान-मोठे विविध रंग आणि आकाराचे खरे मोती येथे बघायला मिळतात. मूळ शिंपल्यासह ठेवलेले शेकडो मोती खूप मौल्यवान आहेत. कल्चर्ड मोती तयार करण्याची प्रक्रियाही इथे समजावून सांगितली आहे. चौथ्या ‘माया बाजार’ नावाच्या दालनात अनेक वस्तू विकायला ठेवल्या आहेत. सर्व वस्तू शंख-शिंपले किंवा मोती यांपासून तयार केलेल्या आहेत. लहान-मोठ्या दागदागिन्यांबरोबरच शंख-शिंपल्यांनी आकर्षक पद्धतीने मढविलेले फ्लॉवर पॉट, तबक, परडी, शोभेच्या वस्तू इत्यादी गोष्टी आठवण म्हणून खरेदी करायला पर्यटकांची गर्दी असते.

नंतर आम्ही चिदंबरम येथे नटराजाचे मंदिर बघायला गेलो. भव्य मंदिर, विशाल परिसर, सुंदर कोरीवकाम केलेले खांब आणि भिंती, भाविकांचा अलोट जनसागर बघून डोळे दिपून जातात. नटराजाची मूळ मूर्ती बघितल्यावर तर अगदी धन्य वाटते. पुढे वाटेत मिठागरे बघून तिसऱ्या दिवशी आम्ही पिच्छावरमला पोहोचलो.

बोट-राईड घेण्यासाठी बरीच गर्दी होती. निवांत आणि शांतपणे निरीक्षण करता यावे म्हणून आम्ही वल्हवायची होडीच घेण्याचे ठरविले. आमचा नंबर यायला दीड ते दोन तास लागले. सात जणांसाठी एक स्वतंत्र होडी मिळाली. प्रथम सुमारे एक किलोमीटरचे अंतर रुंद खाडीतून जावे लागते. त्यानंतर कांदळवन म्हणजेच खारफुटीचे जंगल चालू होते. जाताजाता नावाडी आम्हाला त्याला झेपेल अशा इंग्रजीतून माहिती सांगत होता. वाळूच्या एका टेकडीमुळे मुख्य समुद्रालगत ही रुंद खाडी तयार झाली आहे. कालांतराने वाळूच्या टेकडीची असंख्य छोटी छोटी बेटे आणि त्याभोवती कालवे तयार झाले आहेत. यातील बेटे खारफुटी वनस्पतींनी पूर्णपणे व्यापलेली आहेत. आमची होडी या कालव्यांमधून फिरून आम्हाला खारफुटी जंगल-सफर घडवून आणीत होती. वरून खारफुटीच्या फांद्या आणि खालून खारफुटीच्या मुळ्या आणि त्यातून तयार झालेल्या बोगद्यामधूनच आमचा प्रवास सुरू होता. बऱ्याच ठिकाणी खारफुटीच्या मुळ्या, जमीन व पाण्याच्या बाहेर आल्या होत्या आणि उघड्यावर त्यांची दाट जाळी तयार झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जाडजाड फांद्या खूप खाली आल्या होत्या. होडीतून जाताना त्या ठिकाणी मान खाली करूनच जावे लागते, अन्यथा कपाळमोक्षच व्हायचा. कालवे अगदी अरुंद आहेत, एकच होडी त्यातून कशीबशी जाऊ शकते. काही ठिकाणी डावी-उजवीकडून आत आलेल्या फांद्या चुकवून जावे लागते. घनदाट खारफुटीतून तिथे सूर्यकिरणसुद्धा पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भर दुपारीसुद्धा तिथे हलक्याशा संधिप्रकाशाचा अनुभव येतो. आपल्याच होडीमुळे होणारा पाण्याचा मंदसा खळखळाट आणि झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाट सोडला, तर बाकी सगळीकडे नीरव शांतता असते. लहानपणी गोष्टीत वाचलेल्या घनदाट अरण्याच्या वर्णनाचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेत होतो.

अनेक निरनिराळ्या प्रकारचे पक्षी तिथे पाहायला मिळाले. लांब चोचीचा पाणकावळा, विविध रंगांचे बगळे, करकोचा असे पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात भ्रमण करताना पाहायला मिळाले. तसेच खारफुटीबरोबरच अनेक दुर्मीळ प्रकारची झाडेसुद्धा बघायला मिळाली. नावाडी पक्ष्यांची आणि झाडांची नावे सांगत होता. सर्वत्र गर्द हिरवी झाडे, त्यातून तुरळक ठिकाणी डोकावणारे निळे आकाश आणि खाली संथ पाणी…! निसर्गप्रेमींसाठी हे एक अत्यंत रमणीय स्थान आहे. बंगालच्या उपसागराला लागून ११०० हेक्टर क्षेत्रफळावर हे कांदळवन पसरलेले आहे. मोठ्या कालव्यातले पाणी दहा फुटांपर्यंत तर छोट्या कालव्यात तीन फुटापर्यंत खोल पाणी आहे. मात्र तळाला चिखल आणि झाडाच्या मुळ्यांचे कोंडाळे असल्यामुळे पाण्यात उतरणे धोकादायक आहे, असेही नावाडी सांगत होता.

आगळ्यावेगळ्या सौंदर्याने नटलेल्या या जागी अनेक तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. २००४मध्ये आलेल्या त्सुनामीच्या लाटांनी तामिळनाडूचा पूर्व किनारा खूप मोठ्या प्रमाणात उद्‍ध्वस्त झाला. मात्र खारफुटीच्या या जंगलाला धडकल्यामुळे त्सुनामीच्या लाटांची तीव्रता कमी झाली आणि परिणामी या प्रदेशातल्या आतील भूभागाच्या नुकसानीचे प्रमाण कमी झाले. आपल्याकडे खारफुटी ही एक अत्यंत दुर्लक्षित आणि निरुपयोगी वनस्पती समजली जाते. पण तटरक्षण आणि निसर्ग संवर्धन या कामासाठी ती किती उपयोगी आहे हे इथे आल्यावर समजते. तामिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि वन विभागातर्फे हे क्षेत्र विकसित करून होडीमधून अधिकृत सहली आयोजित केल्या जातात. सुमारे एक तासाची ही जलसफर असते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर काही कांदळवने आहेत. परंतु भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील वने अधिक घनदाट आहेत असे सांगण्यात आले. असे हे निसर्गरम्य ठिकाण आम्हा सर्वांना खूपच आवडले. आधी कितीही नावे ठेवली तरी असे हे अनोखे ठिकाण निवडल्याबद्दल सर्वांनी योगेशचे खूप कौतुक केले.

पुढे आम्ही रामेश्वरमला गेलो. जातानाचा लांबलचक पंबन ब्रीज, रामेश्वराचे भव्य मंदिर, धनुष्कोडीचा समुद्रात घुसलेला जमिनीचा सुळका, तिथून दाखवण्यात येणारे रामसेतूचे अवशेष बघितले. नंतर मदुराईला मीनाक्षी मंदिर बघून सहलीची सांगता केली. तामिळनाडूची ही संपूर्ण सहलच संस्मरणीय झाली, पण विशेष लक्षात राहिले ते अनवट असे पिच्छावरमचे खारफुटी जंगल!

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...