Sunday, December 3, 2023

अबिदजान! आयव्हरी कोस्ट

 

सकाळ साप्ताहिक

डॉ. सुमेधा कुलकर्णी

रेन फॉरेस्ट काय असते हे जाणून घेण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आयव्हरी कोस्टमध्ये पूर्ण झाली. ताय नॅशनल पार्क हे नक्कीच बघण्यासारखे राष्ट्रीय उद्यान आहे. जंगलातून वाहणाऱ्या नद्या, त्यांची खोरी आणि हिरवीगार दाट झाडी अशा अलौकिक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत तिथेच बसून राहावे असे वाटते. तेथून पाय निघता निघत नाही.

आयव्हरी कोस्ट हा पश्चिम आफ्रिकेच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील एक देश. आयव्हरी कोस्ट कोटे डी’व्होयर म्हणूनही ओळखले जाते. कामाच्या निमित्ताने मला या देशातील अबिदजानला जाण्याची संधी मिळाली होती. देशाच्या मध्यभागी असलेले यामुसौक्रो हे शहर आयव्हरी कोस्टची राजधानी आहे, पण अबिदजान हे बंदराचे शहर देशातील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक केंद्रही आहे. मी तिथे जाण्याआधीच आयव्हरी कोस्टबद्दल माहिती गोळा केली होती. त्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेचा किनारा शोधणारे पहिले युरोपियन पोर्तुगीज होते. त्यानंतर लवकरच फ्रान्स आणि इतर देश पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवर व्यापारासाठी हातपाय पसरू लागले. सुरुवातीला या व्यापारात सोने, हस्तिदंत आणि मिरे यांचा समावेश होता. हस्तिदंताच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या देशाचे नाव आयव्हरी कोस्ट पडले. परंतु हत्तींच्या संख्येमध्ये इतकी घसरण झाली की अठराव्या शतकाच्या सुरुवातीस हा व्यापार संपला, असे कळाले. आणखीही बराच इतिहास वाचला आणि काही माहिती तिथल्या गाइडने पुरविली. १८९३मध्ये फ्रान्सची वसाहत बनलेला हा देश १९६०मध्ये स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ आयव्हरी कोस्ट सौहार्द, तसेच विकसित अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध होता. पश्चिम आफ्रिकेतील स्थैर्याचे मॉडेल म्हणून या देशाकडे पाहिले जायचे. परंतु २००० सालापासून तिकडे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. देशाची लोकसंख्या दोन कोटीपर्यंत होती. अस्थिरता असूनही आयव्हरी कोस्ट कोको बीन्सची जगातील सर्वात मोठी निर्यात करणारा देश होता. तेथील मूळ भाषा फ्रेंच असली, तरी बऱ्याच स्थानिक भाषा बोलल्या जातात. काही लोकांना इंग्रजी भाषा येते खरी, पण ते इंग्रजी बोलायला फारसे उत्सुक नसतात हा माझा अनुभव. इथले बहुतेक लोक इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचे आहेत. त्यांच्या स्थानिक चलनाला सीएफए (कम्युनॉट फिनान्सिएर आफ्रिकाइन) फ्रॅंक म्हणतात. एका अमेरिकी डॉलरची किंमत ५५०-६०० सीएफए. त्यामुळे या देशात ‘भलीमोठी’ पर्स घेऊन हिंडावे लागते.

यामुसौक्रो शहरातही फिरण्याची संधी मिळाली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठी बॅसिलिका म्हणून नोंद असलेल्या तिथल्या प्रसिद्ध ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ पीस’ या चर्चची इमारत खूपच प्रेक्षणीय आहे. चर्चचे आर्किटेक्चर खरेच खूप छान आहे. चर्चचा आतील भाग इटलीमधून आयात केलेल्या संगमरवरी वस्तूंनी तयार केलेला आहे आणि समकालीन स्टेन्ड ग्लासने सजवलेला आहे. या बॅसिलिकामध्ये एकावेळी १८ हजार लोक प्रार्थना करू शकतात.

अबिदजानमध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. फ्रेंच वसाहतीमुळे आबिदजान शहराचे सुशोभीकरण थोडेफार पॅरिसच्या धर्तीवर झाले आहे. उंच आकाशकंदील आणि सभोवताली जिकडेतिकडे तलाव यामुळे आबिदजानला ‘पश्चिम आफ्रिकेचे पॅरिस’ आणि व्यावसायिक उलाढालींमुळे ‘पश्चिम आफ्रिकेचे मॅनहॅटन’ म्हणूनही ओळखले जात असे. फॅशन, संस्कृती आणि इतरही बाबतीत आबिदजान सर्वात आघाडीच्या आफ्रिकी शहरांपैकी एक आहे.

अबिदजान येथील समुद्रकिनारे छान आहेत. या किनाऱ्यावर स्टारफिश – चांदणीच्या आकाराचे मासे आणि झाडे बघावयास मिळतात. हॉटेलच्या खिडकीतून शहराचा नयनरम्य देखावा दिसत होता. त्याचा फोटो मी अजूनही जपून ठेवला आहे. मला कामाच्या ठिकाणी जाता-येता शहर बघायला मिळत होते.

अबिदजान शहरामध्ये सेंट पॉल्स कॅथेड्रल हे एक रोमन कॅथलिक कॅथेड्रल आहे. हे कॅथेड्रल अद्वितीय आणि आधुनिक असेच आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे क्रॉसची रचना; हा क्रॉस मागील बाजूने सात केबलच्या साहाय्याने बांधलेला आहे. त्रिकोणी आकारात असलेल्या कॅथेड्रल आणि क्रॉसच्या संपूर्ण रचनेतून हात पसरून, गुडघ्यांमध्ये वाकून प्रार्थना करणाऱ्या येशू ख्रिस्ताचा पायघोळ रोब मागे उडत आहे, असा भास होतो. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या काँक्रिटच्या या उंच प्रतीकात्मक आकृतीला अँथ्रोपोमॉर्फिझम आर्ट असे म्हणतात.

अबिदजान शहराच्या जवळच बँको राष्ट्रीय उद्यान आहे. बँको नॅशनल पार्कमध्ये दुर्मीळ वनस्पती आणि प्राणी बघावयास मिळतात. सागवानासारख्या झाडांची उष्णकटिबंधीय जंगले येथे आढळतात. प्राण्यांमध्ये आफ्रिकन सिव्हेट, ड्यूकर, बुशबक, जेनेट, माकडे इत्यादींचा समावेश आहे. पर्यटक तर इथे भेट देतातच, पण स्थानिकांसाठीसुद्धा हे आकर्षणाचे ठिकाण आहे. या उद्यानात आपल्या मुलाबाळांसह पिकनिकला आलेले अनेक स्थानिक दिसत होते.

तीन-चार दिवसांच्या मुक्कामात येथे मिळणारे वेगवेगळे फ्रेंच स्टाईलचे ब्रेड आणि सॅलड खाऊन कंटाळा आला होता. आमच्या टूर गाइडने अबिदजानमध्ये सम्राट नावाचे भारतीय हॉटेल असल्याचे सांगितले. गाइडला चिकन टिक्का, सब्जी-रोटी हे पदार्थ माहीत होते, याचे मला थोडे आश्चर्य वाटले. बहुतेक भारतीय प्रवाशांना या हॉटेलमध्ये जेवायला आवडते, त्यांच्यामुळेच मला हे पदार्थ माहिती झाले, असे तो सांगत होता.

आयव्हरी कोस्टमध्ये भारतीय वंशाचे दोनेक हजार लोक राहतात. त्यापैकी बहुतेक व्यापार, व्यवसाय करतात तर काहीजण खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रात आहेत. अबिदजानमध्ये इस्कॉन आणि गीता आश्रम असल्याचेही समजले.

तिथल्या प्रसिद्ध मार्केटमध्ये आम्ही एक चक्कर मारली. मार्केटमध्ये लाकडापासून तयार केलेले वेगवेगळे मानवी मुखवटे विकायला होते. येथील लोक त्यांच्या पूर्वजांची प्रतिके म्हणून या मुखवट्यांचा वापर करतात असे गाइडने सांगितले. मुखवट्यांशिवाय विणकाम केलेल्या वस्तू, कपडे, दागिने आणि रंगीबेरंगी पेंटिंगही होती. पलीकडेच मोठे क्युरिओ मार्केट (लाकडाचे प्राणी) होते. तिथेही भेट दिली. बहुतांश आफ्रिकी मार्केटमध्ये अशी हस्तकला बघावयास मिळते.

रेन फॉरेस्ट काय असते हे जाणून घेण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा इथे पूर्ण झाली. ताय नॅशनल पार्क हे कोटे डी’व्होरमधील नक्कीच बघण्यासारखे राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात अप्पर गिनी रेन फॉरेस्टच्या अवशेषांचे सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. या उद्यानातील वनस्पती आणि प्राण्यांच्या विविधतेमुळे या उद्यानाचा १९८२मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला गेला.

ताय नॅशनल पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी डजोरआउटो या गावी जावे लागते. हे गाव सॅन पेड्रोपासून अंदाजे २१५ किमी अंतरावर होते आणि रस्ता खूप खराब होता, पण जंगल मात्र सुंदर होते. या जंगलात पिग्मी हिप्पोपोटॅमस, ऑलिव्ह कोलोबस वानर आणि ड्युकर्स अशा दुर्मीळ प्राण्यांच्या प्रजाती बघावयास मिळाल्या. ताय नॅशनल पार्कच्या मध्यभागी माउंट निनोकोउ हा ४०० मीटर उंच डोंगर आहे. थोडा चढाव जास्त आहे, पण चढण्यासाठी तितका अवघड नाही. डोंगरावरून जंगल किती घनदाट आहे याचा अंदाज येतो. हा डोंगर स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान आहे.

जंगलातून वाहणाऱ्या नद्या, त्यांची खोरी आणि हिरवीगार दाट झाडी अशा अलौकिक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत तिथेच बसून राहावे, असे वाटते. तेथून पाय निघता निघत नाही. शेवटी गाइड अंधार होईल, लवकर निघूया असे मागे लागला तेव्हा तिथून निघालो.

या उद्यानात गोलाकार तंबू असलेले इकोटेल (हॉटेल) आहे. जंगलात दिवसभर चालून आल्यावर विश्रांती घेण्यासाठी थोडावेळ आम्ही इकोटेलमध्ये थांबलो होतो. चहाचा आनंद घेत जवळच्या झाडांच्या फांद्या ओलांडून उड्या मारत इकडून तिकडे जाणारी माकडे आणि रंगीबेरंगी पक्षी बघताना खूप मजा आली. एकंदरीतच रेन फॉरेस्टचा अनुभव खूपच विलक्षण होता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...