Sunday, December 3, 2023

तामिळनाडूचे कांदळवन

http://2jh.a35.myftpupload.com/tourism/tamilnaduche-kandalvan/3346/

सकाळ साप्ताहिक

दीप्ती योगेश आफळे

आमची होडी कालव्यांमधून फिरून आम्हाला खारफुटी जंगलसफर घडवून आणीत होती. वरून खारफुटीच्या फांद्या आणि खालून खारफुटीच्या मुळ्या आणि त्यातून तयार झालेल्या बोगद्यामधूनच आमचा प्रवास सुरू होता.

तामिळनाडूच्या सहा दिवसांच्या सहलीचा प्लॅन आखून आम्ही सातजण बंगळूरहून निघालो. सहलीचा भरगच्च कार्यक्रम योगेशने स्वतःच आखला होता. अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या यादीबरोबरच एक पूर्ण दिवस त्याने पिच्छावरमसाठी दिला होता. ‘त्या खारफुटीत काय बघायचे आहे? त्याऐवजी आपण कन्याकुमारी किंवा उटकमंडला जाऊन येऊ!’ असे सर्वांनी परोपरीने सांगून बघितले, पण त्याने ऐकले नाही. शेवटी तो एक दिवस ‘वाया घालवायच्या’ तयारीने आम्ही निघालो.

महाबलीपुरमला मंदिरे, लेण्या इत्यादी नेहमीच्या स्थळांबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण ‘इंडिया सीशेल म्युझियम’ पाहिले. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनासुद्धा विविध रंग-आकाराच्या शंख-शिंपल्यांचे खूप आकर्षण असते. असेच निरनिराळ्या प्रकारचे चाळीस हजारहून अधिक शंख-शिंपले इथे बघायला मिळतात. एक भला मोठा शंख उभारून या म्युझियमचे प्रवेशद्वारच खूप आकर्षक बनवण्यात आले आहे. इमारतीसुद्धा विशिष्ट आकाराच्या आणि त्यावर शंख, ऑक्टोपस इत्यादींच्या मोठमोठ्या प्रतिकृती करण्यात आल्या आहेत. मोत्यांचे शिंपले, पाणघोडा अशा भव्य प्रतिकृती पाहायला मिळतात. आतील कमानी, बसण्याचे बाक, पायवाटा अशी सर्व ठिकाणे विविधरंगी शंख-शिंपल्यांनी सुशोभित केली आहेत. इमारतींचे रंग पाहता आपण समुद्रातून प्रवास करीत आहोत असेच वाटते. स्वच्छ आणि सुबक मांडणी हे इथले वैशिष्ट्य आहे.

इथे चार दालने आहेत. पहिले दालन शंख-शिंपल्यांचे. यात मोहरीसारख्या अगदी सूक्ष्म आकारापासून प्रचंड आकारापर्यंतचे निरनिराळे नैसर्गिक शंख-शिंपले ठेवलेले आहेत. काटेरी, बसके, उभे, रंगीत आणि नाजूक नक्षीकाम असलेले शंख, दुर्मीळ असे उजवे शंख; मोत्यांसह जोड शिंपले, हत्तीच्या कानासारखे, ऑक्टोपससारखे शेपट्या असलेले, स्टारफिशसारखे शिंपले असे क्वचितच बघायला मिळणारे शंख-शिंपले येथे पाहिले. शंख-शिंपल्यांनी मढवलेले रेल्वे इंजिन, मोटर, विमान, जहाज, निरनिराळ्या बाहुल्या, डॉल्फिन बघायला मजा वाटते.

दुसरे छोटे दालन मत्स्यालयाचे आहे. येथे निरनिराळ्या प्रकारचे अगदी दुर्मीळ मासे बघायला मिळतात. तिसऱ्या दालनात मोती आहेत. अगदी लहान-मोठे विविध रंग आणि आकाराचे खरे मोती येथे बघायला मिळतात. मूळ शिंपल्यासह ठेवलेले शेकडो मोती खूप मौल्यवान आहेत. कल्चर्ड मोती तयार करण्याची प्रक्रियाही इथे समजावून सांगितली आहे. चौथ्या ‘माया बाजार’ नावाच्या दालनात अनेक वस्तू विकायला ठेवल्या आहेत. सर्व वस्तू शंख-शिंपले किंवा मोती यांपासून तयार केलेल्या आहेत. लहान-मोठ्या दागदागिन्यांबरोबरच शंख-शिंपल्यांनी आकर्षक पद्धतीने मढविलेले फ्लॉवर पॉट, तबक, परडी, शोभेच्या वस्तू इत्यादी गोष्टी आठवण म्हणून खरेदी करायला पर्यटकांची गर्दी असते.

नंतर आम्ही चिदंबरम येथे नटराजाचे मंदिर बघायला गेलो. भव्य मंदिर, विशाल परिसर, सुंदर कोरीवकाम केलेले खांब आणि भिंती, भाविकांचा अलोट जनसागर बघून डोळे दिपून जातात. नटराजाची मूळ मूर्ती बघितल्यावर तर अगदी धन्य वाटते. पुढे वाटेत मिठागरे बघून तिसऱ्या दिवशी आम्ही पिच्छावरमला पोहोचलो.

बोट-राईड घेण्यासाठी बरीच गर्दी होती. निवांत आणि शांतपणे निरीक्षण करता यावे म्हणून आम्ही वल्हवायची होडीच घेण्याचे ठरविले. आमचा नंबर यायला दीड ते दोन तास लागले. सात जणांसाठी एक स्वतंत्र होडी मिळाली. प्रथम सुमारे एक किलोमीटरचे अंतर रुंद खाडीतून जावे लागते. त्यानंतर कांदळवन म्हणजेच खारफुटीचे जंगल चालू होते. जाताजाता नावाडी आम्हाला त्याला झेपेल अशा इंग्रजीतून माहिती सांगत होता. वाळूच्या एका टेकडीमुळे मुख्य समुद्रालगत ही रुंद खाडी तयार झाली आहे. कालांतराने वाळूच्या टेकडीची असंख्य छोटी छोटी बेटे आणि त्याभोवती कालवे तयार झाले आहेत. यातील बेटे खारफुटी वनस्पतींनी पूर्णपणे व्यापलेली आहेत. आमची होडी या कालव्यांमधून फिरून आम्हाला खारफुटी जंगल-सफर घडवून आणीत होती. वरून खारफुटीच्या फांद्या आणि खालून खारफुटीच्या मुळ्या आणि त्यातून तयार झालेल्या बोगद्यामधूनच आमचा प्रवास सुरू होता. बऱ्याच ठिकाणी खारफुटीच्या मुळ्या, जमीन व पाण्याच्या बाहेर आल्या होत्या आणि उघड्यावर त्यांची दाट जाळी तयार झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जाडजाड फांद्या खूप खाली आल्या होत्या. होडीतून जाताना त्या ठिकाणी मान खाली करूनच जावे लागते, अन्यथा कपाळमोक्षच व्हायचा. कालवे अगदी अरुंद आहेत, एकच होडी त्यातून कशीबशी जाऊ शकते. काही ठिकाणी डावी-उजवीकडून आत आलेल्या फांद्या चुकवून जावे लागते. घनदाट खारफुटीतून तिथे सूर्यकिरणसुद्धा पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे भर दुपारीसुद्धा तिथे हलक्याशा संधिप्रकाशाचा अनुभव येतो. आपल्याच होडीमुळे होणारा पाण्याचा मंदसा खळखळाट आणि झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाट सोडला, तर बाकी सगळीकडे नीरव शांतता असते. लहानपणी गोष्टीत वाचलेल्या घनदाट अरण्याच्या वर्णनाचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेत होतो.

अनेक निरनिराळ्या प्रकारचे पक्षी तिथे पाहायला मिळाले. लांब चोचीचा पाणकावळा, विविध रंगांचे बगळे, करकोचा असे पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात भ्रमण करताना पाहायला मिळाले. तसेच खारफुटीबरोबरच अनेक दुर्मीळ प्रकारची झाडेसुद्धा बघायला मिळाली. नावाडी पक्ष्यांची आणि झाडांची नावे सांगत होता. सर्वत्र गर्द हिरवी झाडे, त्यातून तुरळक ठिकाणी डोकावणारे निळे आकाश आणि खाली संथ पाणी…! निसर्गप्रेमींसाठी हे एक अत्यंत रमणीय स्थान आहे. बंगालच्या उपसागराला लागून ११०० हेक्टर क्षेत्रफळावर हे कांदळवन पसरलेले आहे. मोठ्या कालव्यातले पाणी दहा फुटांपर्यंत तर छोट्या कालव्यात तीन फुटापर्यंत खोल पाणी आहे. मात्र तळाला चिखल आणि झाडाच्या मुळ्यांचे कोंडाळे असल्यामुळे पाण्यात उतरणे धोकादायक आहे, असेही नावाडी सांगत होता.

आगळ्यावेगळ्या सौंदर्याने नटलेल्या या जागी अनेक तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. २००४मध्ये आलेल्या त्सुनामीच्या लाटांनी तामिळनाडूचा पूर्व किनारा खूप मोठ्या प्रमाणात उद्‍ध्वस्त झाला. मात्र खारफुटीच्या या जंगलाला धडकल्यामुळे त्सुनामीच्या लाटांची तीव्रता कमी झाली आणि परिणामी या प्रदेशातल्या आतील भूभागाच्या नुकसानीचे प्रमाण कमी झाले. आपल्याकडे खारफुटी ही एक अत्यंत दुर्लक्षित आणि निरुपयोगी वनस्पती समजली जाते. पण तटरक्षण आणि निसर्ग संवर्धन या कामासाठी ती किती उपयोगी आहे हे इथे आल्यावर समजते. तामिळनाडू टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि वन विभागातर्फे हे क्षेत्र विकसित करून होडीमधून अधिकृत सहली आयोजित केल्या जातात. सुमारे एक तासाची ही जलसफर असते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर काही कांदळवने आहेत. परंतु भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील वने अधिक घनदाट आहेत असे सांगण्यात आले. असे हे निसर्गरम्य ठिकाण आम्हा सर्वांना खूपच आवडले. आधी कितीही नावे ठेवली तरी असे हे अनोखे ठिकाण निवडल्याबद्दल सर्वांनी योगेशचे खूप कौतुक केले.

पुढे आम्ही रामेश्वरमला गेलो. जातानाचा लांबलचक पंबन ब्रीज, रामेश्वराचे भव्य मंदिर, धनुष्कोडीचा समुद्रात घुसलेला जमिनीचा सुळका, तिथून दाखवण्यात येणारे रामसेतूचे अवशेष बघितले. नंतर मदुराईला मीनाक्षी मंदिर बघून सहलीची सांगता केली. तामिळनाडूची ही संपूर्ण सहलच संस्मरणीय झाली, पण विशेष लक्षात राहिले ते अनवट असे पिच्छावरमचे खारफुटी जंगल!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...