Sunday, December 3, 2023

अनोखे चार धाम

 

सकाळ साप्ताहिक

रश्मी कापशीकर

चार धामच्या प्रत्येक क्षेत्राचा अनोखा महिमा आहे. हिमालयाच्या भव्य आणि दिव्य निसर्गासमोर आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. अशा निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या चार धाम यात्रेला जाऊन धन्य वाटते!

आम्ही चार धामची यात्रा करून परतलो तरी मन अजूनही तिथेच रेंगाळत होते. मी, माझे मिस्टर, माझी आई, माझ्या दोन मावश्या आणि एका मावशीचे मिस्टर असे आम्ही सहा जण ट्रॅव्हल्समार्फत बुकिंग करून गेलो होतो. आधी दिल्लीहून हरिद्वारला गेलो. रात्री हरिद्वारला पोहोचलो आणि तिथेच मुक्काम केला. दुसरा दिवसही पूर्ण प्रवासाचाच होता. दुसऱ्या दिवशी आम्ही हरिद्वारहून स्यानाचट्टीला गेलो. २०६ किलोमीटरचा प्रवास होता. त्यासाठी आम्हाला जवळजवळ आठ तास लागले. आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला याची पहिल्याच दिवशी कल्पना दिली होती, की आता याच्या पुढचा बराचसा वेळ बसमध्ये जाणार आहे. कारण याच्यापुढे घाट रस्ता सुरू होतो. अतिशय अवघड, लहान आणि घाटाचे रस्ते असल्यामुळे वेळ जास्त लागतो. शिवाय मधेच ट्रॅफिक लागला, तर अजूनच उशीर होत जाणार. तेव्हा तयार राहा, असे टूर मॅनेजरने आधीच सांगून ठेवले होते.

पण जसजसा उत्तराखंडमध्ये प्रवेश केला, तसतसे ठिकठिकाणी ‘देवभूमी मे आपका स्वागत है’ असे फलक दिसू लागले, आणि त्या निसर्गसौंदर्य देवभूमीची प्रचिती येऊ लागली. बसमध्ये बसून बाहेरचा सुंदर निसर्ग पाहण्यात वेळ कसा निघून गेला ते कळालेच नाही. स्यानाचट्टीला रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्हाला पहिले धाम यमुनोत्रीला जायचे होते. स्यानाचट्टीपासून वीस किलोमीटर अंतरावर यमुनोत्री धाम आहे. पहाटे लवकर उठून आम्ही निघालो. यमुना नदीचे उगमस्थान आणि यमुना देवीचे मंदिर इथपर्यंत जायला सात किलोमीटरचा ट्रेक करून जावे लागते. त्यासाठी चालत जाणे, डोली आणि घोडा हे पर्याय आहेत. आम्ही डोलीचा पर्याय निवडला. त्यादिवशी खूपच गर्दी असल्याने डोलीवाल्यांचे भाव बरेच वाढले होते. एरवी चार ते पाच हजार रुपयांपर्यंत असलेला भाव प्रत्येकी दहा ते बारा हजारापर्यंत झाला होता. शेवटी प्रत्येकी आठ हजाराप्रमाणे भाव ठरला. आम्ही डोलीत बसलो. हवेत बराच गारठा होता. अधूनमधून थंड पावसाचे तुषारही अंगावर पडत होते. सात किलोमीटरचा रस्ता पार करायला आम्हाला चार ते पाच तास लागले. हिमालयातला प्रवास अवघडच आहे. त्यात यमुनोत्रीचा विशेष अवघड आहे. डोलीत बसायचा अनुभवही पहिलाच असल्याने भीतीही वाटत होती. असा हा खडतर प्रवास करून वर उगमस्थानी पोहोचलो तेव्हाचा आनंदही अनोखाच होता. जोरदार आवाज करीत उंच ठिकाणाहून खाली येणारा तो शुभ्र स्फटिकासारखा खळखळून वाहणारा प्रवाह पाहून मन अचंबित झाले. यमुना देवीचे दर्शन घेऊन गरम पाण्याचे सूर्य कुंड पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. आकाशात काळे ढग जमा व्हायला लागले होते. येथे कधी हवा पालटेल याचा नेम नसतो. येताना जरा कमी वेळ लागला. पण खाली उतरून बसमध्ये जाऊन बसेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. जाताना डोलीवाल्यांशी घासाघीस करून भाव ठरविले होते. पण जाऊन आल्यावर त्यांच्या कष्टांची जाणीव झाली. त्यांनीच आम्हाला सुरक्षितपणे परत आणले होते. त्यामुळे आम्ही ठरवल्यापेक्षा थोडे जास्त पैसे दिले. अशा तऱ्हेने पहिले धाम पार पडले.

दुसऱ्या दिवशी उत्तर काशीला जायचे होते. एकशे दहा किलोमीटरचे अंतर पार करायला चार तास लागले. रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्हाला गंगोत्रीसाठी निघायचे होते. तिथून गंगोत्री शंभर किलोमीटर अंतरावर आहे. गंगा नदीचे हिमालयातील उगमस्थान म्हणजे गंगोत्री. वाटेत सफरचंदाच्या अनेक बागा पाहिल्या. लालबुंद सफरचंदांनी लगडलेली झाडे पाहून वेडावल्यासारखे झाले. चाळीस रुपये किलोप्रमाणे झाडावरची ताजी सफरचंदे आम्ही घेतली. रसरशीत ताज्या सफरचंदांची ती चव काही औरच होती!

गंगोत्री… गंगामातेच्या उगमाचे हे ठिकाण. गंगेचे ते दिव्य रूप साठवत उत्तर काशीला मुक्कामासाठी आलो. आता आम्हाला सीतापूरला जायचे होते. उत्तर काशी ते सीतापूर हा आमच्या प्रवासाचा सहावा दिवस होता. २२५ किलोमीटरचा हा प्रवास सगळ्यात मोठा होता. जवळजवळ नऊ ते दहा तास लागले. रात्री सीतापूरला पोहोचलो तेव्हा तिथली गर्दी आणि पार्किंगमधल्या गाड्या पाहून उरात धडकीच भरली. रात्री आम्हाला पोहोचायला अकरा वाजले होते आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून केदारनाथला जायचे होते. सीतापूरला रात्री खूपच थंडी होती. शिवाय मुसळधार पाऊसही पडला. आम्ही थंडीने गारठून गेलो होतो आणि आणि भीतीचीही भर पडत होती. कारण सगळ्यात अवघड असा २१ किलोमीटरचा ट्रेक करून आम्हाला केदारनाथला जायचे होते. खूप प्रयत्न करूनही आम्हाला हेलिकॉप्टरचे तिकीट मिळाले नाही. हेलिकॉप्टरनेच जायचे या विचाराने आम्ही आलो होतो, कारण माझी आई आणि मावशी सत्तरीच्या घरातल्या आहेत. त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरने जाणे जास्त सोयीचे होते, पण ती सोय होऊ शकली नाही. आणि आम्ही ज्या दिवशी केदारनाथला निघालो त्या दिवशीच दोन्ही काउंटरही बंद झाले, म्हणजे डोलीचा पर्यायही राहिला नाही. आता घोड्यावरून सहा ते सात तास लागणार होते. मला तर हे सगळे अशक्यच वाटू लागले. हा अवघड प्रवास आईला घोड्यावरून जमेल असे मला वाटेना. मी आईला म्हणाले, ‘आपण नको जायला. आपण परत फिरू. मी थांबते तुझ्याबरोबर.’ पण माझी आई आणि मावशी परत फिरायला तयार नव्हत्या. दोघी बहिणींची प्रबळ इच्छाशक्ती बघून मीही तयार झाले, पण मनातली भीती काही केल्या कमी होईना. आमच्या ग्रुपमधले बरेच लोक पुढे गेले होते. आम्हालाच तसा उशीर झाला होता. मग आम्हीही निघालो, आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा घोड्यावरचा प्रवास सुरू झाला. अतिशय अवघड, दुर्गम असा रस्ता़़़़; त्या लहान रस्त्यावरून पायी जाणारे-येणारे, वरून घोड्यावरून परतणारे आणि आमच्यासारखे वर दर्शनाला जाणारे, सगळ्यांचीच गर्दी! त्यात मधेच पावसाला सुरुवात झाली. टपाटप बर्फाचे खडे पडत होते. चांगलीच हुडहुडी भरली होती. घोड्यावरून उतरून तीन तीन कप चहा प्यायलो, तरीही काही केल्या हुडहुडी कमी होईना. मनावरचा ताणही वाढू लागला. पाऊस थांबेल ना? आपण अंधार पडायच्या आत केदारनाथला पोहोचू ना? याचे टेन्शन येऊ लागले. पावसाचा जोर थोडा कमी झाला, तसा घोडेवाला घाई करू लागला, चला म्हणू लागला. पण आमच्यासाठी ते शक्य नव्हते. मग मी त्या घोडेवाल्याला विनंती केली, तुला जास्तीचे पैसे देऊ, चहा पाण्याला पैसे देऊ, पण पाऊस थांबू दे, पावसात नको जायला. तोही तयार झाला. सुदैवाने पाऊस थांबला. मग आमची घोडेसवारी सुरू झाली. हिमालयाचे ते रौद्र पाहतच आम्ही निघालो. आजूबाजूचा सुंदर निसर्ग डोळ्याला सुखावत होता.

ती हिम शिखरे, गर्द वनराई, मंदाकिनी नदीचा प्रवाह… सगळेच नयनरम्य आणि दुसऱ्या बाजूला ती खोल दरी, निसरडा रस्ता… छातीतली धडधडही वाढत होती. पावसामुळे रस्ता दलदलीचा झाला होता. घोड्याचा पाय अधूनमधून निसटला, की छातीचा ठोका चुकायचा. अधूनमधून मी आईकडे पाहायची. ती मात्र शांत होती. तिचे नामस्मरण चालू असायचे. शेवटी सात तासांनी आम्ही केदारनाथला पोहोचलो. अंधार पडायला सुरुवात झाली होती, थंडीही वाढू लागली. जिथे आमची उतरायची सोय केली होती, तिथे आम्ही सावकाश चालत निघालो. अंतर तसे फार नव्हते, पण आम्हाला चालायला वेळ लागत होता. रूमवर पोहोचल्यावर आम्ही दुलई पांघरून पडून राहिलो. सगळेच थकलो होतो. रात्री दहा वाजता मंदिरात पूजा होती. तेव्हा आम्ही फ्रेश होऊन बाहेर पडलो. बाहेर अतिशय थंडी होती. उणे दोन तापमान होते, पण मंदिरात प्रवेश करताच अतिशय उबदार वाटले.

रुद्राभिषेक पूजा अतिशय सुंदर झाली. खूप प्रसन्न वाटले. सगळा शीण नाहीसा झाला, प्रसन्न चित्ताने आम्ही रूमवर परतलो. पण रात्री थंडीमुळे आम्हाला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा घोड्यावरूनच खाली उतरायचे होते, त्याचाही मनावर ताण होता. पण इलाज नव्हता, घोड्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा घोड्यावर बसायला तयार झालो. चार तासात आम्ही गौरी कुंडापर्यंत पोहोचलो. हॉटेलवर जायला आम्हाला चार वाजले. सगळे आमची वाट पाहत होते. आम्ही सगळे शरीराने जरी थकलो असलो, तरी मनाने खूप आनंदित होतो. कारण खूप अवघड अशी यात्रा सुखरूपपणे पार पडली होती. माझ्या आईला आणि मावशीला काहीही शारीरिक त्रास झाला नाही. त्यांच्यासाठी तर ही एक साहसी यात्रा होती.

आता बद्रीनाथच्या दर्शनाला जायचे होते. आमच्या प्रवासाचा हा नववा दिवस होता. सीतापूरहून आम्ही जोशीमठला निघालो. जोशीमठाजवळ अलकनंदेच्या पाच संगमांपैकी तीन संगम पाहायला मिळतात, विष्णुप्रयाग – नंदप्रयाग – कर्णप्रयाग. प्रत्येक नदीचा वेगवेगळ्या रंगाचा प्रवाह मिसळताना बघून नवल वाटत राहते. मंदाकिनी, अलकनंदा, गंगा, यमुना, सरस्वती… या साऱ्या हिमालय कन्या, पण युगानुयुगे अखंड वाहणारे ते प्रवाहांचे सौंदर्य पाहताना, त्या नावांत असलेले सौंदर्यही नव्याने उमगले. गंगोत्रीला गंगेचा प्रवाह अगदी पांढराशुभ्र लकाकणारा, जणु हिराच! अलकनंदेचे पाणी फिकट हिरव्या रंगाचे, पाचूसारखे! निसर्गाचे हे भव्यदिव्य रूप पाहून नतमस्तक व्हायला होते.

जोशीमठहून बद्रीनाथला आलो. त्यादिवशी आम्ही संध्याकाळी दर्शनाला जाणार होतो. सकाळी आम्ही माना व्हिलेजला भेट दिली. त्‍या मार्गावरचे शेवटचे चहाचे दुकान पाहिले. सरस्वती नदी, व्यास गुफा, गणेश गुफा, भीम ब्रिज आणि पांडवांचे स्वर्गारोहण मार्गदर्शन हे सगळे पाहून झाले. पौराणिक कथा ऐकतच हे सर्व पाहत होतो. सगळ्या आसमंतात असलेला दैवी स्पर्श जाणवत राहतो. संध्याकाळी बद्रीनाथाचे दर्शन घेतले आणि मन भरून पावले.

आमचे चार धाम दर्शन पूर्ण झाले होते. आता आम्हाला कीर्ती नगरला जायचे होते. तिथून ऋषिकेशला गेलो. तिथे आम्ही लक्ष्मण झुला, बाबा काली कमली वाला आश्रम, गीता भवन पाहिले आणि हरिद्वारला गंगा घाटावर गंगा आरती पाहिली. आमच्या प्रवासाचा हा बारावा दिवस होता.

त्यादिवशी हरिद्वारलाच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीला आलो, तिथून फ्लाईटने पुण्याला पोहोचलो.

चार धामच्या प्रत्येक क्षेत्राचा अनोखा महिमा आहे. हिमालयाच्या भव्य आणि दिव्य निसर्गासमोर आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. अशा निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या चार धाम यात्रेला जाऊन धन्य तर वाटलेच, शिवाय विश्वनिर्माता विधाता असलेल्या परमेश्वराचे अस्तित्व पुन्हा एकदा जाणवले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...