Saturday, July 25, 2020

किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड.

मल्हार चटणीस बखरीत गड रांगडा गौरविती !
ऐकोनी महती शिवछत्रपती गड प्रसिद्ध म्हणविती !!
ऐतिहासिक हणमंत्या घाटाचा संरक्षक, सह्याद्रीच्या मुख्य धारेतून दक्षिणेस पसरलेल्या मात्र घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर वसलेला इतिहासप्रसिद्ध किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड. समुद्रसपाटीपासून ६७९ मीटर उंचीवर असलेल्या वनदुर्गाला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कळीचे स्थान लाभले आहे. किल्ले रांगणा हा देश, कोकण आणि गोवा या तिनही ठिकाणापासून मोजक्या अंतरावर असून, अतिशय मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. त्यामुळे रांगणा किल्ला इतिहास काळापासून संरक्षणाच्या दृष्टीने आपले महत्व राखून आहे. गर्द वनराई, खोल दऱ्या, अल्हाददायक वातावरण, निरव शांतता आणी नयनरंम्य दृश्ये यामुळे रांगणा किल्ला अजूनही दुर्गप्रेमींच्या मनाला भुरळ घालतो. खुद्द गडपती छत्रपती शिवाजीराजांच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये रांगण्याला महत्वाचे स्थान होते. रांगणा म्हणजे एक रांगडा दुर्ग, याच्या भटकंती साठी संपुर्ण जंगलातून पायपीट करावी लागतो. देखण्या आणी प्रंचड विस्तार असलेल्या गिरीदुर्गावर जाण्यासाठी तब्बल पाच रानवाटा आहेत.
पहिली वाट, पुणे - कोल्हापूर - गारगोटी - पाटगाव - भटवाडी - चिकेवाडी, ही चांगलीच मळलेली आणी घाटमाथ्यावरून जात असलेल्यामुळे सोयीची रानवाट आहे.
दुसरी वाट, कुडाळ - सालगाव - वडोस - हळदीचे नेरूर, या गावातून खड्या चढणाऱ्या रानवाटेने पुर्वेकडच्या दरवाज्यातून रांगण्याचा माथा गाठता येतो.
तिसरी वाट, कुडाळ - बांबर्डे तर्फे कल्सुली - नारूर, या गावातून खड्या रानवाटेने कोकण दरवाज्यातून गडावर प्रवेश करता येतो. नारूर गावातील भवानी मंदिरात रांगण्यावरून आणलेली तोफ ठेवलेली आहे.
चौथी वाट, नारूर गावातूनच लांबचा वळसा घेत किल्ले रांगणा आणी सह्याद्रीची मुख्य रांग यांच्यामधील सपाटीवर येते. या वाटेने रांगण्याच्या महादरवाज्यातून गडप्रवेश करता येतो.
पाचवी वाट, कुडाळ - सालगाव - वडोस - केरवडे (महादेवाचे केरवडे), या रानवाटेने रांगणा गडाच्या हत्तीच्या सोंडेसारख्या माचीवर असलेल्या दरवाज्यातून प्रवेश करता येतो.
चिकेवाडीची वाट सोडली तर बाकी सर्व वाटा कोकणातून गडावर जातात. कोणत्याही वाटेने रांगण्याचा माथा गाठायला दोन ते तीन तास लागतातच. कोल्हापूर वरून पाटगावच्या पुढे तांब्याचीवाडी अन सरते शेवटी भटवाडी गाठायची. भटवाडीच्या पुढे पाटगाव धरण आहे, या धरणापर्यंत गाडी रोड आहे. येथून पुढे चिकेवाडी पर्यंत साधारणपणे ८ कि. मी. एका बाजूचा जंगल ट्रेक करावा लागतो. धरणाच्या बंधाऱ्याला डावीकडे ठेवत थोड अंतर गेल्यावर पहिल्यांदाच उजवीकडे वाट फुटते, ही चांगली मळलेली प्रशस्त वाट किल्ले रांगण्याकडे जाते. वाटेत ठिकठिकाणी दिशादर्शक पाट्या लावलेल्या आहेत. थोड्याथोड्या अंतरावरच तब्बल आठ ओढे आडवे येतात. पावसाळ्यात भटकंतीला गेल्यास काही ठिकाणी असे वाटते की रांगण्यावर रांगतच जावे की काय! वाटेवर उमटलेले रानगवे, सांबर, भरळ यांच्या पायाचे ठसे पहात वन्यजीवनाचा आनंद घेत चिकेवाडी गाठायची. समोर आलेला आठवा ओढा पार करून शेताच्या कुंपणावरून उड्या मारत निघावे. चिकेवाडीत सहा सात घरे आहेत. तेथील अधिवासी लोकांनी पिकवलेल्या भात शेतीच्या बांधावरून चालताना स्वर्गलोकात असलयाचा आभास होतो. काय तो अफाट सुंदर निसर्ग! अप्रतिम! या पृथ्वीवरील देवलोकात रहाणाऱ्या भिकाजी कृष्णा लाड या दादांकडे सांगितल्यास जेवणाची सोय होते.
चिकेवाडीच्या मागे असलेला डोंगराचा एक माथा चढून सह्याद्री पर्वतराजीच्या कड्यावर यावे. या ठिकाणास उंबरठा असे म्हणाता, येथे तटबंदीचे काही अवशेष दिसताता. तसेच गडाच्या माहितीचे बरेच फलक येथे लावलेले आहेत. जवळच झाडीमधे बांदेश्वराचे मंदिर आहे. आतमधे श्रीगणेश, विष्णू आणि देवी यांच्या छोट्या कोरीव मूर्त्यांचे दर्शन होते. या ठिकाणावरून उतार उतरून पर्वतराजीपासून वेगळा झालेला पण एका अरूंद दांडाने सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडला गेलेल्या रांगणा किल्ल्याचे प्रथम दर्शन होते. सह्यकड्यावरून गडाचे सौंदर्य नजरेत भरताना इतीहासही कानात गुंजतो. महाराष्ट्रात पुर्वी चालुक्याचा अंमल होता. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांताची जबाबदारी देवगिरीचे यादव सामंत संभाळीत होते. दक्षिण प्रांत व कोकण प्रांताची जबाबदारी वाळव्याचे शिलाहार संभाळीत होते. यादवांनी आपले सामर्थ्य वाढवून चालुक्याचे वर्चस्व झुगारून स्वतः सम्राट झाले. याचवेळी चालुक्य व यादवांच्या संघर्षाचा फायदा घेवून वाळव्याच्या शिलाहार घराण्याचा राजा भोज (द्वितीय) याने चालुक्याचे वर्चस्व नाकारले. त्याने स्वतः राजाधीराज पश्चिम चक्रवर्ती किंवा राजा महामंळेश्वर असा किताब धारण केला. राजा भोज याने राज्याच्या सुरक्षिततेसाठी १५ किल्ले बांधले त्यात पन्हाळा, गगनगड, खेळणा / विशाळगड, भूदरदड आणी रांगणा यांचा समावेश आहे. हा किल्ला इ. स. ११८७ मधे बांधण्यात आला. किल्ले रांगणा इ. स. १२०९ पर्यंत शिलाहारांच्या ताब्यात होता. पण दक्षिणेकडील यांचे वर्चस्व देवगिरीच्या यादवांना मानवनारे नव्हते. राजा सिंधन याने इ. स. १२०९ मधे कोल्हापूरवर आक्रमण केले आणी शिलाहारांचा प्रदेश जिंकून घेतला. सिंधनचा मुलगा जैत्रपाल याने यादवांचे साम्राज्य कोकणापर्यंत नेले. त्यावेळी पन्हाळा परिसरातील रांगणा, भूदरगड सह सगळे किल्ले व प्रदेश यादवांच्या साम्राज्या खाली आला. इ. स. १३०७ मधे मलिक काफुरने यादवांचा पराभव केला.



 
पुढे १९ जुलै १४७० राजी महमंद गवानने रांगणा जिंकून घेतला. बहामनीच्या ऱ्हासानंतर रांगण्याचा ताबा आदिलसहाकडे गेला. इ. स. १३०७ ते इ. स. १६५८ पर्यंत महाराष्ट्रात मुसलमान सत्ता नांदत होती. शिवकाळात आदिलशहाचे चाकर सावंतवाडीचे सावंताकडे हा दुर्ग होता. ५ मे १६५८ च्या गोव्याच्या पत्रानुसार विजापूरचा सरदार रूस्तम - इ - जमानने लखम सावंताकडून रांगणा घेतला होता. ५ सप्टेंबर १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यानी विजापूरचा सरदार रूस्तम - इ - जमानकडून रांगणा घेतला. पुढे आदिलशहाने रांगण्याविरूद्ध मोहिम उघडली. १४ एप्रिल ते १६ मे १६६७ या कालावधीत बहलोलखान व महाराजांचे सावत्र भाऊ तंजावरचे व्यंकोजीराजे यांनी गडास वेढा घातला. पण शिवाजी महाराजांनी स्वतः येवून हा वेढा मोडून काढला. इ. स. १६७० ते १६७१ मधे शिवरायांनी रांगण्याच्या मजबूतीसाठी ६००० होन खर्च केला. हा किल्ला औरंगजेबाला ही जिंकता आला नाही. तसेच ताराराणी रांगण्यावर असताना सातारकर छत्रपती शाहूंनी या किल्ल्यास तीन महिने वेढा घातला. पण त्यांना गड जिंकता आला नाही. सावंतवाडीचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा इ. स. १७६७ च्या मार्च महिन्यात हस्तगत केला. पण करवीरच्या सेनासाहेब सुभा यशवंतराव शिंदे यांनी रांगणा अडीच महिने झुंज देवून पुन्हा जिंकून घेतला. पुढे इ. स. १७८१ मधे खेमसावंतानी तब्बल ८ महिने रांगण्यास वेढा घातला. अखेर छत्रपतींशी एकनिष्ठ रहाण्याचे मान्य करून त्यांनी वेढा उठवला. पुढच्या काळात रांगणा करवीरांच्या ताब्यात राहिला. इ. स. १८४४ च्या बंडामधे इंग्रजांनी तोफा डागूग रांगण्याचे बरेच नुकसान केले. इ. स. १९४८ पर्यंत हा किल्ला करवीरांच्याच अधिपत्याखाली राहिला.
अशा अनेक घडामोडी घडलेला रांगणा किल्ला ज्या डोंगर दांडाने घाटमाथ्याला जोडलेला आहे, त्या डोंगराला चिरून गडाच्या भव्य मजबूत बुरूज आणी त्या समोर खंदक तयार केला आहे. या ठिकाणावरून पावसाळ्यात हिरवीगार शालू परिधान केलेला रांगणा खुपच मनमोहक दिसतो. त्याच्या अंगावरून कोसळणारा धबधबा लक्ष वेधून घेतो. बुरूजाच्या डाव्या बाजूने कातळ कोरून दरवाजा पर्यंत वाट बनविली आहे. या बाजूने गडाला एका समोर एक असे तीन दरवाजे लागतात. त्या वाटेने पहिल्या दरवाजातून गडप्रवेश होतो, हा गणेश दरवाजा! दरवाजाच्या उजवीकडे बुरूज, तटबंदी, बुरूजावर जाण्यासाठी जिना असून त्याचे बांधकाम थोडे काळ्या तर थोडे जांभ्या दगडात आहे. तसेच पाण्याचे कुंड, घरांची जोती आणी हनुमंताचे शिल्प कोरलेला भुयारी मार्ग आहे. हे पाहून पुढे गेले कि दुसरा दरवाजा दिसतो तो हनुमंत दरवाजा! हा दरवाजा बुरूजामधे लपविलेला असून त्यास पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. त्यावर कमळे कोरलेली दिसतात. दरवाज्यातून आत गेल्यास डाव्या हाताला पाण्याचे कोरडे पडलेले टाके दिसते. उजव्या हाताला एक कोरडा तलाव व भव्य असा जांभ्या दगडात बांधलेला निंबाळकर वाडा दिसतो. वाड्यात पायऱ्या असलेले चौकोनी टाके आहे त्यास निंबाळकर बावडी म्हणतात. जवळच फारसी शिलालेख पहायला मिळतो. वाडा पाहून पुढे डावीकडे जाणारी वाट हि गणेश मंदिर, महादेव मंदिर, तलाव, दोन चिलखती बुरूज पाहून पुढे पुर्वेकडील दरवाज्याकडे जाते. मंदिरात गणेशाची सुबक मुर्ती आहे तसेच मंदिरा समोरील धबधबा ही अप्रतिम! येथून दिसणारा सह्याद्री पर्वतरांगेचा नजारा काही औरच! महादेव मंदिराकडे जाताना वाटेत एक भलेमोठे जाते दिसते. त्यात सध्या फलक उभारलेला आहे. पुढे पावसाळ्यात साठणारी तळी खुपच भारी! महादेवाच्या नंदीवरील कलाकुसर ही सुंदर! त्याच वाटेवर लागणारे पाण्याचे चौकोनी खोल टाके ही छान आहे. हे पाहून पुन्हा वाड्याकडे यायचे. या ठिकाणावरून दक्षिणेस नाकासमोर जाणाऱ्या वाटने एकासमोर एक अशा दोन दरवाजा तटबंदीतून गडाच्या पुढच्या भागात प्रवेश होतो, हा यशवंत दरवाजा! समोरच कातळ खोदून पाणी आडवलेला खुपमोठा तलाव आहे. त्याच्या पासून पुढे कड्याकडे महादेवाचे दुसरे मंदिर व काही समाधी आहेत. मंदिराला चार नक्षीदार खांब असून समोर दोन नंदी विराजमान आहेत. तसेच आत श्रीगणेश आणी भवानी मातेची पुरातन मुर्ती आहे. समाधीच्या भिंतीवर चारही बाजूस गजमुख बसवलेले दिसते. तलावापासून डावीकडे जाणारी वाट गडावरील प्रमुख देवी रांगणाई माता मंदिराकडे जाते. तलाव व मंदिर या मधे मोठी दरी असल्यामुळे बरेच फिरून जावे लागते. रांगणाई माता मंदिरा शेजारी हनुमंताचे मंदिर आहे. रांगणाई मंदिराचा जिर्णोद्धार राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी केला आहे. मंदिर कौलारू खापऱ्यांचे असून आत दगडी चौथऱ्यावर मध्यभागी रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूल अशी आयुद्ये परिधान केलेली शत्रसज्ज मुर्ती आहे. देवीच्या उजव्या हाताला शंकचक्र, गदा, पद्मधारी श्री विष्णूची मुर्ती आहे. तर डाव्या हाताला भैरवाची मुर्ती आसून येेथेच एका दगडावर फारशी भाषेतील गोल शिलालेख आहे. मंदिरा समोर भव्य दिपमाळ आहे. तिच्या चोहीकडे एक सारख्या चिऱ्यांचे चौथरे आहेत. त्याला लागूनच एक पाणी टाके आहे. रांगणाई देवी मंदिराच्या मागच्या बाजुला गडाचा कोकण दरवाजा पहायला मिळतो. दरवाज्यावर गोल बुरूजाची रचना दिसते. दरवाज्याच्या आतल्या बाजुस जमीनी लगत दगडावर व्यालाचे शिल्प व दोन कोरीव खांब आहेत. या दरवाजातून उतरून वाट नारूरगावाला जाते.
रांगणाई माता मंदिर व परिसर पाहून झाल्यावर गडाच्या दक्षिण टोकाकडे निघायचे. वाटेत तटबंदी उजव्या हाताला आणि दाट झाडी असलेली टेकडी डाव्या हाताला ठेवायची. काही ठिकाणी वाट बुजल्याने अधून मधून वाट काढत सपाटीवर जायचे. या ठिकाणावरून हत्तीच्या सोंडेसारखी गडाची एक निमुळती माची लांबवर पसरलेली दिसते. सोंड जिथून चालू होते तिथेच तटबंदीत खाली गोमुखी बांधणीचा उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजातून उतरून वाट केरवडे गावी जाते. दरवाजा पाहून लांबलचक पसरलेल्या माची कडे जाताना एक दगडी दरवाज्याची चौकट दिसते. माचीची तटबंदी भक्कम असून काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या दिसतात. पुढे माचीला दुहेरी तटबंदी तळापासून साधारण वीस फुट उभी बांधली आहे. तटाच्या उजव्या बाजुला एक चिलखती बुरूज दिसतो, बुरूजातून बाहेर जायला चोर दरवाजाही आहे. दरवाजातून बाहेर गेल्यास तटबंदीला देवळ्या आणी जंग्या पहायला मिळतात. माचीच्या टोकाशी खाली उतरायला चोर दरवाजा दिसतो. यातून उतरून चिलखती बुरूजावर जाता येते, पण कडा कोसळल्यामुळे अवघड बनले आहे. माचीच्या टोकावरून आग्नेय दिशेला मनोहरगड - मनसंतोषगड, नारायणगड व अंबोलीचा महादेवगड दिसतो. तसेच तळकोकणाचा संपुर्ण भाग नजरेच्या टप्प्यात येतो. गडाच्या पुर्वेस घाटमाथ्यावर असलेल्या हणमंतेवाडीतुन खाली नेरूरला एक प्राचिन घाटवाट उतरते तोच ‘हणमंत्या घाट’! माची पाहून गडाच्या पुर्वेकडे निघायचे. पुढे काही अंतरावर वाटेला पायऱ्या दिसतात, त्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर दरवाजा दिसतो. या पुर्वेकडील उत्तराभिमुख दरवाज्यातून उतरून वाट हळदीचे नेरूर गावाकडे जाते. पुढे डाव्या बाजुच्या तटबंदीत कमानीखाली एक साधारण दोन फुट व्यासाचे बांधीव कुंड आहे. हे पाहून तटबंदीच्या कडेने टेकडीस डावीकडे ठेवत वळसा मारला की आपण पुन्हा गणेश मंदिरापाशी पोहोचतो. तेथून गणेश दरवाजा मार्गे पुन्हा चिकेवाडीकडे !
किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड, ता. भूदरगड, जि. कोल्हापूर

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...