Friday, July 10, 2020

गुळसुंद्याचा सिध्देश्वर आणि कराडेचा गढीवजा वाडा

आपल्याकडे गाव तिथे मंदिरे असं समीकरण आहे. काही गावे तर नदीवरील घाटांनी सजली आहेत. माणूस आणि नदी फार जवळच नातं आहे. मानवी संस्कृती नद्यांच्या खोऱ्यातच बहरली, फुलली. अनेक गावे शहरे नद्याच्या अमृतावरच मोठी झाली. अनेक देवस्थाने नद्याच्या कुशीत नावारूपाला आली काही पुण्यक्षेत्रे झाली तर, काही नद्याच्या कडेने पावित्र्य जपत काळाचा महिमा शांत चित्ते पाहत उभी राहीली. भटकंती करताना अशी अनेक पवित्र स्थाने आडमार्गाच्या गावांमधून आपल्याला भेटतात. त्यांना तीर्थक्षेत्रांचा मोठेपणा नसला, तरी आपल्या भक्तांच्या श्रद्धेच्या फुलांनी प्रसन्न शांतता मनात जागवत असतात. अशाच पवित्र क्षेत्राचा आपण परामर्श घेणार आहोत.
पनवेल पासून साधारण सोळा किमीवर गुळसुंदे गाव आहे. पनवेल वरून दांडा मोहपाडा मार्गाने आणि सावळा मार्गाने पेण, आपटा गावी जाणाऱ्या बस आहेत. या बसने गुळसुंदेला उतरता येते. गुळसुंदे कोकणातील गावांप्रमाणेच निसर्गाच्या कुशीत वसले आहे. कर्नाळा किल्ल्यासारखा पाठीराखा आणि कर्नाळा अभयारण्यामुळे लाभलेलं हिरवळीच लेणं. यात भर म्हणून पाताळगंगेचा सहवास, असा हा टुमदार गुळसुंदे गाव. या गावातच पातळगंगेच्या पश्चिम तीरावर वसला आहे सिद्धेश्वर. शिवाचे इथे वास्तव्य कसे झाले आणि केव्हापासून आहे याविषयी काही माहिती नाही. गावातून मंदिराकडे येणारी वाट सोपी आहे. दुतर्फा घरांना पार करत एका बाजूला नदीकाठी वसलेल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहोचतो.
सिद्धेश्वर मंदिर संकुल मुख्य प्रवेशद्वार
मंदिर तिन्ही बाजूने बंदीस्त आहे. स्थानिक हे मंदिर ८०० वर्षे जूने असल्याचे सांगतात. आताच्या झालेल्या सुधारणा पाहता मंदिराचे प्राचीनत्व सांगणे अवघड आहे. सद्याचे मंदिर पेशवेकालीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे. मंदिर पेशव्यांचे सुभेदार रामजी महादेव यांनी बांधले आहे. मंदिराचे छत आणि कळस दुसऱ्या बाजीरावाने नव्याने बांधून घेतले होते.
मारुती, राम, भैरव
मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डावीकडे मारूती मंदिर आणि राम मंदिर आहे आणि उजवीकडे भैरव आहे. भैरवाच्या समोरच मंदिर परीसरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ आहे. त्याच्या बाजूलाच धर्मशाळा आहे.
सिद्धेश्वर मंदिर
 मुख्य सिद्धेश्वर मंदिर मध्यभागी आहे. मंदिराचे तोंड नदीकडे आहे. भक्कम पायाचा चौथारा त्यावर मंदिराचे जोते वर मंदिर असे बांधकाम आहे. मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप असे स्वरूप आहे. दोन्हीवर कळस आहे.
मंदिराचे कळस आणि मंदिर डाव्या बाजूने 
मुख्य कळसापेक्षा मंडपावरील कळस लहान पण घुमटाकार आहे. मुख्य द्वार फारच कलात्मक पद्धतीने शिल्पांकीत आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील मखर आणि नक्षीकाम
ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे आणि द्वारशाखेवर पाच लहान मखरांमधील पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या मखरात नंदीआरूढ उमामहेश्वर शिल्प आहे. दुसऱ्या मखरात दोन्ही बाजूस चवरी ढाळणाऱ्या सेविका असणारे गणपती शिल्प आहे, तर चौथ्या मखरात दोन्ही बाजूला हात जोडून उभ्या गोपीका आणि मध्ये श्रीकृष्ण तसेच खाली दोन्ही बाजूला गायी असे शिल्प आहे. द्वारावर उंबरठ्यालगत दोन्ही बाजूला वेगळ्याच पद्धतीचे द्वारपाल कोरलेले आहेत. मंदिराबाहेर दोन्ही बाजूस असणाऱ्या जोत्यावरील कठड्यावर दर्शनी भागावर समोरासमोर गजारूढ माहूत अशी शिल्पे आहेत.
मंदाराचे प्रवेशद्वार आणि खाली दिसणारी गजशिल्पे
पायाच्या चौथाऱ्यावरही गजद्वंद्व शिल्पे आहेत.  मंदिराला मुख्य प्रवेशद्वाराव्यतीरीक्त डाव्या आणि उजव्या बाजूलासुद्धा प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारांच्या ललाटबिंबावरही गणपती आहे. सभामंडप षोडश:कोनी आहे. छतावर मध्यभागी दगडी झुंबर कोरलेले आहे.
नंदी
मंडपात मधोमध मोठा नंदी आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही वेलबुट्टीने अलंकृत आहे.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम आणि गणपती
याच्या ललाटबिंबावरील गणपतीचे शिल्प जरा मोठे आणि सुबक आहे. गणपतीच्या वर मधोमध एक पोपटाची जोड आहे आणि त्याच्यावर चतुर्भुज ढाल, तलवार, कपाल धारण केलेला मांडी घालून बसलेला भैरव आहे.
गणपती
या प्रवेशद्वाराच्या डावीकडे देवकोष्टकात गणपतीची अंदाजे दोन अडीच फुटांची सुंदर मुर्ती आहे. या मुर्तीच्या दोन्ही बाजूस उंदिर आहेत.
गरूडारूढ विष्णुलक्ष्मी
तर उजवीकडे देवकोष्टकात गरुडारूढ विष्णु लक्ष्मीची अप्रतीम मुर्ती आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे पण मध्ये खळगा आहे. नेहमीप्रमाणे वर असणारे लिंग इथे नाही.
शिवलिंग आणि मागे देवळीत पार्वतीची मूर्ती
शिवलिंगाच्या मागे एक शळुंका आहे. मागील भिंतीच्या देवळीत पार्वतीची मूर्ती आहे.
पेशवेकाळात गावातील गणपतराव भीडे यांना जमिनीची सनद देऊन देवाच्या पूजाअर्चेची सोय करण्यात आली होती. महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार यादिवशी पंचक्रोशीतील भाविकांची इथे गर्दी होते. मंदिरात हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो. मंदिर परीसरात मुंज आणि गंगापूजन सारखे विधी होतात सिद्धेश्वर मंदिराशेजारी लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे मंदिर आनंद काशिनाथ जोशी यांनी १८६७ मध्ये बांधले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला विश्रामधाम आहे. येथे एक शिलालेख आहे त्यात महादेव सुत बाजी करमरकर यांनी अर्पण केले असा उल्लेख आहे. सिद्धेश्वर मंदिरासमोर नदीवर सुंदर घाट बांधला आहे.
दिपमाळ आणि घाटावरून दिसणारे दृष्य उजवीकडे माणिकगड डोके उंचावताना
मंदिरासमोर एक दिपमाळ आहे. ती १७२६ मध्ये बाजी करमरकरांनी बांधली आहे. वरील शिलालेख कदाचित या दिपमाळेशी संबंधीत असावा. याच बाजी करमरकरानी १८०४ साली गुळसुंदे पासून १.६ किमीवर चावणे आणि लाडिवली गावांमध्ये पाताळगंगा नदीवर धरण बांधले होते. लक्ष्मी नारायण मंदिरासमोर झाडाखाली एक सुबक तुळशी वृंदावन आहे.
घुमटीवजा देवळातले विरगळ तुकडे आणि तुळशी वृंदावन
याच्या शेजारी घुमटीवजा छोट्या देवळात विरगळीचे तुकडे उभे करून ठेवले आहेत. यात उभी केलेली एक शीळा मात्र गद्धेगाळ सारखी वाटते पण शेंदूर फासल्यामुळे कळून येत नाही.   दिपमाळेच्या उजवीकडे एका बाजूला नंदीची भग्न मुर्ती आणि जाते आहे. नदीवरील घाटावरून नदीचे पात्र सुंदर दिसते दूरवर नजर फिरवताना उजवीकडे आकाशात डोकं उंचावणारा माणिकगड दिसतो तर डावीकडे कराडे खुर्द गावाचा नदीवरील घाट आणि तेथील शिवमंदिर दिसते.
घाटावरून दिसणारा कराडे गावचा घाट आणि मंदिर
पुर्वी स्थानिक लोक गुळसुंदेमधून कराडे गावात नावेने जायचे. या गावात एक ऐतिहासिक वास्तू आपली वाट पाहत आहे. कराडे खुर्दला जाण्यासाठी रसायनी - सावरोली- खारपाडा रोड मार्गे जाता येते. या रोडवर सिद्धेश्वरी आँटो स्टॅण्ड वरून कराडे खुर्दसाठी गाड्याही मिळतात. रस्त्याने जाताना डावीकडे चौंडली गावाजवळ एक छोटे देवी मंदिर आहे. मंदिराचे पुनर्निर्माण झाले असले तरी, आतले मुळ लाकडी बांधकाम तसेच ठेवले आहे.
दरवाजा जवळचे महिषासुरमर्दिनी शिल्प
या मंदिराच्या दरवाजा जवळ आणि गाभाऱ्यात महिषासुरमर्दिनीचे सुंदर शिल्प आहे.
गाभाऱ्यातील शिल्पे 
गाभाऱ्यात एक अस्पष्ट विरगळ आहे. तसेच मंदिराच्या डावीकडे एक स्मृतीशिला आहे. जाता जाता मंदिरातील देवी शिल्पे नक्की पहावीत.
गारमाता मंदिर, मंदिरातील लेख आणि तलाव 
कराडे गावात जाताना डावीकडे एक मोठा तलाव लागतो. या तलावाकाठी गारमातेचे मंदिर आहे. मंदिर १८२३ साली बांधले आहे. हे मंदिर कोकणात आढळतात तसे कौलारू पण छान आहे.
देवीचा तांदळा
गाभाऱ्यात जमिनीपासून अंदाजे दोन फुट खाली देवीचा तांदळा आहे. देवीचे दर्शन घेऊन गावात प्रवेश करतानाच सुरूवातीलाच मोठी गढी दिसते.
गढी
गढीच्या चार बाजूस एक असे चार बुरूज आहेत. गढीचा आकार आयताकृती असून मुख्य द्वार गावाकडे तोंड करून आहे. दुर्दैवाने या बाजूची भिंत पुर्णतः ढासळली असल्यामुळे आता नक्की कसे स्वरूप होते ते नीट सांगता येत नाही. गढीच्या आत तिन्ही बाजूला चौथारे दिसतात, आणि चौथाऱ्यावर खांबांचे दगडी तळखडे दिसतात.
चौथारा, तळखडा, पडझड झालेले खोलीसदृश्य बांधकाम, जंग्या
हे चौथारे पाहता या गढीत मोठा वाडा असावा पण आता राहिलेले अवशेष पाहता या वास्तूची फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्य द्वार असणाऱ्या भागापासून ते ह्या चौथाऱ्या दरम्यान चौक काढल्याप्रमाणे थोडे अंतर आहे. आपल्या उजवीकडे चौथाऱ्याच्या कोपऱ्यात एक खोली सदृश्य बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत आहे. या गढीत बरीच झाडी माजली आहे. म्हणून हे सारं पाहताना फार काळजी घ्यावी लागते. बुरूजांमध्ये बंदुकीच्या मारासाठी जंग्या आहेत.
विहीरी
गढीच्या आत पाण्याची सोय नाही पण गढीच्या मागील बाजूला एक हौदासारखी पायऱ्यांची विहीर आहे. तसेच उजवीकडे आणखी एक गोल विहीर आहे. याच विहीरींचे पाणी वाड्यात नेण्यासाठी नक्कीच सोय असणार. एकंदरीत रचना पाहता हा एक गढीवजा वाडा असावा. सदाशिव माणकेश्वर यांचा दिवाण राघो मल्हार कुळकर्णी याने दोन लाख रूपये खर्चून एक वाडा बांधला होता तो हाच असावा. सध्या वाड्याची मालकी वैद्य आडनावाच्या गृहस्थाकडे आहे.
रामेश्र्वर मंदिर
हा वाडा पाहून गावातून सरळ पाताळगंगा नदीकिनारा गाठावा. इथे नदीकिनारी सदाशिव माणकेश्वर यांनी बांधलेले रामेश्वराचे मंदिर आहे. मंदिराचे तोंड गावाकडे आहे. मंदिरावर घुमटाकार कळस आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपती आहे.
खिडकीला गणपती
मंदिरात डाव्या बाजूच्या खिडकीत एक गणेशाची मूर्ती आहे. गाभाऱ्यात एक शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती आहे.
शिवलिंग आणि भिंतीवरील लेख
गाभाऱ्याच्या उजव्या भिंतीवर लेख कोरलेला आहे.  या मंदिराशेजारी मारुती मंदिर आहे आणि जवळच एक गणपती मंदिर आहे.

घाट आणि शिलालेख
इथे नदीवर घाट आहे हा घाट राघव अनंत यांनी बांधला आहे त्यांचा नातू भास्कर अनंत पटवर्धन यांनी घाटाचा जिर्णोद्धार केला या संबंधीत शिलालेख  पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या कठड्यावर बसवलेला आहे घाटावरून समोर डावीकडे गुळसुंद्याचा सिद्धेश्वर आणि घाट दिसतो
 या व्यतिरिक्त गुळुसुंद्यापासून १.७ किमीवर असलेले आपटा गावातील गणपती आणि शिवमंदिर ही पाहता येते. ही मंदिरे पेशवेकालीन आहेत. मंदिरांचा इतिहास सापडत नाही पण ही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. आपटा बस स्थानकाच्या आधी मुख्य रस्त्याशेजारी उजवीकडे ही मंदिरे आहे.
गणपती मंदिर
प्रथम गणपती मंदिर दिसते. गणपती मंदिराला दोन कळस आहेत. यापैकी मंडपाचा कळस घुमटाकार आणि गाभाऱ्याच्या कळसा पेक्षा लहान आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे.
गणरायाची मखरातील सुंदर मूर्ती
गाभाऱ्यात सुंदर मखरात गणरायाची सुबक मूर्ती आहे. गणपती शेजारी दिवाबत्तीसाठी ठाणोळी आहे. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे.
शिवमंदिर
या मंदिराच्या शेजारी मारुती मंदिर आणि त्यापलीकडे शिवमंदिर आहे.
मारूती मंदिर
हे शिवमंदिर कृ. रा. गोखले यांच्या खाजगी मालकीचे आहे. मंदिराचा सभामंडप लाकडी आहे. वर पुर्वी कौलारू छत असावे. सध्या मात्र या मंडपावर पत्र्याचे छत आहे.
खांब आणि त्यावरील नक्षीकाम
मुळ लाकडी मंडप काढून नवीन बांधकाम करण्याचा अट्टाहास इथे झाला नाही हे सुदैव म्हणायला हवे. कारण या लाकडी मंडपाची कलाकुसर पाहण्यासारखी आहे.
भिंतीवरील नक्षीकाम
तसेच मंडपाच्या भिंतीवर ही नक्षीकाम केलेले आहे.
गणपती आणि विष्णुमूर्ती
गाभाऱ्याच्या द्वाराच्या डावीकडील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. तर उजवीकडील देवकोष्टकात विष्णु लक्ष्मीची मूर्ती आहे.
शिवलिंग आणि पार्वती मूर्ती
गाभाऱ्यात सुंदर शिवलिंग आहे. शेजारी दिवे लावायची ठाणोळी आहे. मागे देवळीत पार्वतीची मूर्ती आहे.
नंदी मंडप आणि तुळशीवृंदावन
या मंदिरासमोर नंदीमंडप आहे. नंदीमंडपामागे दीपमाळ आहे आणि बाजूला सुंदर नक्षीदार तुळशी वृंदावन आहे मंदिराभोवती पुर्वी भिंती आणि डावीकडे ओवरी असावी सध्या मात्र पडझड झालेली भिंत शिल्लक आहे. मंदिराच्या मागील बाजूला एक मोठा तलाव आहे. याबाजूला बाहेर येण्यासाठी भिंतीत चौकट आहे. तलावाच्या कडेला घाटासारखे बांधकाम आहे. पण वापर नसल्यामुळे सगळी दुरावस्था आहे. मंदिर परिसरात गवत आणि झुडुपे खूप वाढली आहेत.
मंदिरामागील तलाव
तलावा भोवती काही घरे आहेत मंदिर आणि तलाव एकत्र पहाताना एखाद्या चित्रासारखे वाटते. ही सगळी मुशाफिरी एका दिवसात सहज होते. स्वत:चे वाहन असेल तर उत्तमच तशाही एसटी, सहा आसनी या सुविधा आहेतच.
मग काय कधी निघताय पहायला!!
संदर्भ:- कुलाबा गॅझेट, कित्ता आणि सर्वेक्षण

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...