काल परवा कुठेतरी व्हाॅट्सअॅपवर एक पोस्ट आली होती. .एका प्रसिद्ध ऐतिहासीक
स्थळाला जाण्यासंदर्भात ती पोस्ट होती.मला पण आवडलं असतं तिथं जायला परंतू
माझ्या व त्यांच्या प्रवासाच्या तारखा जुळत नव्हत्या.मी सहज विचार करत
बसलो होतो.मी आतापर्यंत पाहिलेली अप्रसिद्ध ठिकाणं व
तिथे मला मिळालेली संस्मरणीय माहिती व त्यायोगे माझा काही अतिशय विद्वान व व्यासंगी आणि विनम्र व्यक्तींशी झालेल्या फोनवरील चर्चा. या प्रसंगामध्ये असंच एक नाव आठवलं तिवरीचं आणि साधारणतः चार -पाच वर्षांपूर्वीचा तो प्रसंग सगळा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.
मी दिग्रसला आलो होतो. दुपारचं जेवण झालं, आई तिच्या मैत्रिणीकडे गेली होती तर पप्पा वामकुक्षी घेत होते.मी काहीतरी कामानिमित्य माझ्या घराशेजारी असणाऱ्या गेस्ट हाऊस समोरील रस्त्यावरून चालत होतो. बहुतेक विड्याची पानं किंवा फळं घ्यायला आलो असेल.तितक्यात मला माझा बारावीचा वर्गमित्र विजय कपिले भेटला.विजय शिक्षक आहे.फार दिवसांनी आमची भेट झाली होती. थांबुन आम्ही बोलत होतो.क्षेमकुशल विचारून झाल्यावर मी विजयला सहज विचारलं की तो कुठे निघाला आहे? विजय म्हणाला की तो तिवरीला जातोय.माझा एक शेजारी मित्र आहे प्रशांत झोळ.या प्रशांतचा लहान भाऊ पण शिक्षक आहे. तो या विजयचा मित्र.या झोळ परिवारातर्फे तिवरीच्या प्रसिद्ध खडकी मारोती संस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम होता व तिथे विजयला बोलावलं होतं त्यामुळे विजय त्याच्या गाडीने तिवरीला जाणार होता.आता विजयने मला मी दिवसभर काय करणार आहेस? हे विचारलं.मला तसं काही विशेष काम नव्हतं असं त्याला सांगताच तो म्हटला की मग चल माझ्यासोबत तिवरीला.मी त्याला म्हटलं की अरे पण मला बोलावलेलं नाहीये.त्यावर तो म्हटला की तू मंदिरात थांब मी प्रसाद घेतो व मग आपण परत निघू.तसा प्रशांत माझा मित्र आहे म्हणून मी पण जायला तयार झालो.घेतलेल्या वस्तू घरी ठेवल्या व पप्पांना मी तिवरीला जातोय हे सांगुन मी विजयसोबत निघालो.
तिवरी, पूर्वी हे गाव दिग्रस वरून अमरावती यवतमाळ जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर होतं, पण अरूणावती प्रकल्पाचं पाणी चिंचोलीच्या पुलावर आलं आणि तो रस्ता आता रोहणा हरसूल साखरा लाख मार्गे जातो. तिवरी चांगलंच आडवळणाचं गाव झालंय आता.हरसूल साखरा यागावांपासुन मोख मार्गे तिवरीला जावं लागतं किंवा लाख या गावापासुन एक रस्ता दारव्ह्याला जातो तर दुसरा तिवरीकडे. इंग्रजी T सारखा फाटा आहे तो. या तिवरीला पूर्वी माझे काका शिक्षक होते तर पप्पांच्या शाळेचं दहावी परिक्षेचं केंद्र तिवरी असायचं.यामुळे मला तिवरी ऐकून माहिती होतंच.एखाद्या जागृत देवस्थानाची जशी भक्तांना हमखास पावणारं क्षेत्र म्हणुन ख्याती असते तशीच तिवरीच्या दहावीच्या परिक्षा केंद्राची नव्वदच्या दशकात ख्याती होती.त्या केंद्रावरून परिक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना क्वचितच निराश व्हायला लागलं असेल.यामुळे पंचक्रोशीतील दहावी पास न होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तिवरीचं परिक्षाकेंद्र बरंच लोकप्रिय होतं.
मी व विजय त्याच्या बाइकने निघालो,मार्च महिना असावा….वसंत ऋतूचं प्रसन्न वातावरण होतं.रस्त्यात ठिकठिकाणी पळस फुललेला दिसत होता.आमच्या गप्पा सुरू होत्या.गप्पांच्या नादात आम्ही कधी अरूणावतीवरचा पुल ओलांडून साखरा पार करून लाख पर्यंत आलो ते कळलंच नाही.लाखपासुन आम्ही तिवरीकडे वळलो.लाख ते तिवरी या रस्त्यावर बरीच झाडी दिसत होती,डोंगरपण आहे.विदर्भात पळस खुप आहे.लाल फुलांनी बहरलेली पळसाची झाडं बघुन प्रसन्न वाटत होतं पंधरा वीस मिनीटांत आम्ही तिवरीला पोहोचलो.तिवरीचं खडकी/खडक्या मारोती हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे.प्रशांतकडचा प्रसादाचा कार्यक्रम तिथेच होता.आम्ही तिथे गेलो.दुपारची वेळ होती.आजुबाजूचा परिसर खडकाळ आहे.त्यातच एका खडकात हनुमानाची स्वयंभू शेंदूर लावलेली प्रतिमा आहे.आम्ही दर्शन घेतलं व प्रशांतला भेटलो.विजय सोबतच मला पण जेवायला बसायला सांगितलं त्यानी.आपल्याकडे देवाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं हा संस्कार व रिवाजपण आहे.मी विजयसह पंगतीत बसलो.पंगतीत माझा अजुन एक मित्र अमोल गुल्हानेपण होता.जेवण खुप छान होतं.
जेवण झाल्यावर पाच दहा मिनीटं सर्वांशी बोलुन आम्ही परत निघालो. चर्चेत सगळ्यांनी आम्हाला आम्ही दूरच्या रस्त्यानी आलो,मोखमार्गे आलो असतो तर अंतर कमी पडलं असतं असं सांगितलं.त्यामुळे आम्ही परत जाताना मोख मार्गे जाण्यासाठी निघालो तेवढ्यात मला आठवलं की तिवरीला एक वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची मूर्ती आहे असं मी लहानपणापासुन ऐकत आलो होतो.एका शिळेवर चार बाजूला चार गणेशप्रतिमा आहेत असं माझे काका व पप्पा सांगायचे.मी मात्र आजपर्यंत ती मूर्ती कधी बघितली नव्हती.मी विजयला त्या गणेशाचं दर्शन करूयात असं सांगितलं.विजय पण तयार झाला.आम्ही गावकऱ्यांना गणेश मंदिर विचारत गावात गेलो. हे मंदिर गावाच्या दुसऱ्या टोकाला एका शेतात होतं.रस्ता संपला तिथे गाडी उभी करून आम्ही पायवाटेने पुढे चालत निघालो.वाटेच्या दोन्ही बाजुला भारतात सर्व खेड्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा असते तशीच घाण होती.ज्या दिवशी आपल्या समाजाची ही घाण सवय सुटेल तो सुदिन समजावा. अतिशय अनिच्छेनेच ते गलिच्छ दृश्य व दुर्गंधी सहन करत आम्ही त्या मंदिराकडे गेलो.
हे मंदिर एका शेतात आहे.त्या शेतमालकाला ही गणेश मूर्ती त्यांच्या शेतात सापडली.त्यांनी आपल्या शेतातच मंदिर बांधून गणेशमूर्तीची स्थापना केली आहे,त्यांचं नाव मी आता विसरलोय.आम्ही गणेशाचं दर्शन घेतलं.खरोखरच एका शिळेच्या चारही बाजूला चार गणेश प्रतिमा होत्या.शिळेच्या वरच्या बाजूला एक उंचवटा होता,त्याला मी शिवपिंडी समजलो.मूर्तीला शेंदूर लावणं सुरू आहे पण अद्याप त्या शेंदुरातूनही मुळ मूर्तीचं स्वरूप दिसत होतं.दर्शन घेऊन आम्ही परत निघालो तर मला गावातील काही घरांच्या मध्ये एक पडकं पण प्राचिन मंदिरासारखं बांधकाम दिसलं.मनात थोडं कुतुहल जागृत झालंच होतं.गाडी उभी होती तिथपर्यंत येऊन पोहोचलो,पहातो तर काय?त्या पडक्या मंदिराचं प्रवेशद्वार जवळच होतं.मी विजयला घेऊन मंदिरात आलो.तिथं असलेल्या ग्रामस्थाला मंदिर कोण्या देवाचं आहे हे विचारलं तर त्यांना ते माहिती नाही असं उत्तर आलं. प्राचिन हेमाडपंथी मंदिर पार मोडकळीला आलं होतं म्हणून ग्रामस्थांनी उर्वरीत अवशेष सिमेंटने बांधून काढले होते व पांढऱ्या रंगाने रंगवले होते.अवशेषावरून मंदिर फार मोठं नसावं हे कळत होतं.मी आत आलो एका छोट्या गाभाऱ्यात एक मूर्ती ठेवली होती.तिला पण ग्रामस्थ शेंदूर लावत होतेच.मी मूर्ती बघितली.मूर्तीचा सिंहाचा चेहरा व मांडीवरची आडवी पोट फाडलेली हिरण्यकश्यपूची प्रतिमा बघुन ती मूर्ती नृसिंहाची आहे हे माझ्या लक्षात आलं.मी विजयला त्याच्या मोबाइलमध्ये मूर्तीचा फोटो घ्यायला सांगितलं व तिथं उपस्थित ग्रामस्थाला मी ती मूर्ती नृसिंहाची आहे हे सांगितलं,मूर्तीचं मूळ शिल्प सगळ्यांना दिसावं म्हणून व तसंही नृसिंह मूर्तीला शेंदूर लावल्याचं मला कधी माहिती नव्हतं म्हणुन तुम्ही या मूर्तीला शेंदूर लावू नका अशी विनंती केली.पण अशा बाबतीत श्रद्धा,रूढी व परंपरा या अन्य सर्व बाबींवर भारी पडतात.दर्शन घेऊन आम्ही मोख मार्गे परत निघालो येताना रस्त्यात कळशाला विजयने गाडी गावात टाकली.लवकरच आम्ही एका झोपडीसमोर आलो.मला काही कळेना की आम्ही तिथे का आलोय? लवकरच विजयने बारा तेरा वर्षाच्या एका मुलाला आवाज देऊन बोलावलं.विजयला पाहुन तो जरा ओशाळवाणा झाला होता.त्याच्या पालकांना समोर बसवून विजय त्या मुलाला शाळेत नियमित येण्याविषयी समजावून सांगायला लागला.त्याने शाळेत नियमित यावं,परिक्षा द्यावी यासाठी विजय मोठ्या तळमळीने त्या मुलाला व त्याच्या पालकांना समजावत होता.झोपडी बघुन ती लोकं खुप गरीब असावीत याचा अंदाज करता येत होता.विजयची तळमळ बघुन माझ्या मनात विचारांचं काहुर उठलं होतं.आपला समाज कधी शिक्षणाप्रती जागरूक बनेल देवालाच माहिती. तिथुन निघुन आम्ही माझ्या घरी आलो.विजयजवळून तो नृसिंह मूर्तीचा फोटो माझ्या मोबाइलमध्ये घेतला.चहापाणी घेऊन विजय निघुन गेला.
ती नृसिंह मूर्ती मात्र माझ्या मनात घर करून गेली होती. मांडीवर हिरण्यकश्यपूची पोट फाडलेली प्रतिमा असलेली मी बघितलेली ही पहिलीच मूर्ती होती.याविषयी अधिक माहिती कुठून मिळवावी याचा मी विचार करत होतो.कधीतरी तरूण भारत या वृत्तपत्रात ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ञ देगलुरकर सरांविषयी आलेला एक लेख मी वाचला होता.त्या लेखाच्या लेखकाचा मोबाइल नंबर मी शोधुन काढला व त्यांना फोन करून देगलुरकरांचा फोन नंबर मागितला.त्यांनी देगलुरकरांची परवानगी घेऊन नंबर देतो असं सांगितलं.त्यानंतर सहा सात महिने उलटलेत पण मला त्यांचा नंबर भेटला नव्हता.अचानक एका कौटुंबीक कार्यक्रमात माझ्या मावसभावाच्या मेहुण्याने गप्पांच्या ओघात देगलुरकर सरांचं नाव घेतलं.मी त्यांना देगलुरकरांचा नंबर मागितला आणि त्यांनी तो मला दिला.दुसऱ्याच दिवशी मी देगलुरकर सरांना काॅल केला.माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं.एका अतिशय ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ञासोबत मी बोलणार होतो.माझी ओळख दिली व नंबर कोणाजवळून मिळाला ते सांगितलं.सरांना ती नृसिंह मूर्ती,लोकांचं तिला शेंदूर लावणं हे सगळं सांगितलं व सरांच्या सांगण्यावरून तो फोटो सरांना मेल केला.एक दोन दिवसांनी सरांच्या पूर्वपरवानगीने त्यांना काॅल केला तेव्हा सरांनी मला ही नृसिंह मूर्ती ‘विदरण नृसिंह’ प्रकारची आहे हे सांगुन नृसिंह मूर्तींचे पाच प्रकार सांगितलेत.तसंच या मूर्तीविषयी सगळी माहिती सांगितली.एखादं शिल्प कसं बघायचं असतं याचं मला मिळालेलं ते सर्वोत्तम मार्गदर्शन होतं.चर्चेच्या ओघात मी त्यांना शेतातल्या गणेशमूर्तीविषयी पण बोललो,त्यांना सांगितलं की एका शिळेवर चारही बाजूंनी गणेशप्रतिमा आहेत तर त्यांनी ही ‘सर्वतोभद्र गणेश’प्रतिमा आहे हे सांगितलं.मी त्यांना या मूर्तीच्यावर शिवलिंग आहे का? हे विचारलं तर ते म्हणाले की ते शिवलिंग नसतं.मूर्तीच्या रचनेचा भाग होता तो उंचवटा.
सरांनी अतिशय शांतपणे माझ्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिलीत.मला हे पण आठवलं की यवतमाळजवळच्या कळंबला चिंतामणी देवस्थानात दारातुन आत प्रवेश केला की खाली गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी तळघरात जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात तिथे पण शेंदूर लावलेली अशीच ‘सर्वतोभद्र गणेशाची’मूर्ती बसवलेली आहे.
मी ही संधी हातची जाऊ देणार नव्हतोच,मी सरांना इथुन पुढे असे वेगवेगळ्या शिल्पांचे फोटो पाठवत जाऊ का? असं विचारलं,सरांनी अतिशय मोकळेपणी मला त्याची अनुमती दिली.सोबतच माझा हा छंद खुप चांगला आहे असं प्रोत्साहनपण दिलं.या प्रसंगानंतर मी बरेचदा सरांना वेगवेगळ्या मूर्तींचे फोटो पाठवले आहेत व सरांनी पण अतिशय मोकळेपणानी मला माहिती दिली आहे.माझं तिवरीला जाणं हा एक योगायोगच होता.कदाचित खडक्या मारोतीवरून जेवण करून सरळ घरी परत आलो असतो तर नंतर आठवला सुद्धा नसता हा प्रसंग.परंतू तिथे गणेशमूर्ती बघण्यासाठी म्हणून मी जातो काय आणि नृसिंह मूर्ती बघुन देगलुरकरांसारख्या ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ञाकडून माहिती मिळवतो काय? सगळंच माझ्यासाठी तरी अकल्पनीयच होतं.मी फारसा देवभोळा नाही पण हा प्रसंग आठवला की मला वाटतं ही त्या नृसिंहाचीच इच्छा असावी की मला देगलुरकर सरांचं मार्गदर्शन मिळावं.
(सर्वतोभद्र गणेश मूर्तीचे फोटो मी व विजयने काढले नव्हते.पुढे मला हे फोटो माझ्याजवळ असावे असं मला वाटलं तेव्हा माझे मित्र कुलदीप जोशी यांनी हे फोटो काढून मला पाठवले होते.)
(सर्वतोभद्र गणेशाचं मंदिर तिवरीच्या श्री.भास्कर जवके पाटील यांच्या शेतात आहे या माहितीबद्दल व सर्वतोभद्र गणेशमूर्तीच्या फोटोंबद्दल कुलदीपचे मनःपूर्वक आभार.)

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.