भिवंडी निजामपूर महापालिका : सन २००२मध्ये ही महानगरपालिका अस्तित्वात आली. भिवंडी हे यंत्रमागाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. भिवंडीत १९२७मध्ये खानसाहेब समदशेठ यांनी पहिला यंत्रमाग सुरूकेला. ‘सोने विका आणि यंत्रमाग घ्या’ अशी त्यांची घोषणा होती. आजमितीला पाच लाख माग येथे आहेत. सध्या या उद्योगावर मंदीची लाट आहे. पूर्वीच्या काळी कामोरी नदीतून वसई खाडीमार्गे भिवंडी ते गुजरात, तसेच दक्षिण भारतातही व्यापार चालत असे. तांदूळ, लाकूड आणि हातमाग कापड या वस्तूंची मुख्यत्वे जहाजाद्वारे ने-आण या ठिकाणी होत असे. म्हणूनच भिवंडीच्या या परिसराला ‘बंदर मोहल्ला’ या नावाने आजही ओळखले जाते. भिवंडीत आजमितीला दिसणारी मोठी कुटुंबे २५० वर्षांपूर्वी व्यापाराच्या निमित्तानेच या ठिकाणी आली असावीत. भिवंडी गावात यापैकी काही कुटुंबीयांची भातशेती आणि सावकारी होती. आजही भिवंडीत भाताच्या काही गिरण्या शिल्लक आहेत. गावातील निजामपुरा, सौदागर मोहल्ला, बंदर मोहल्ला, भुसार मोहल्ला, तांडेल मोहल्ला, दर्गा रोड, सुतार आळी, हमाल आळी, ब्राह्मण आळी आदी परिसरांत जुन्या वास्तू आजही पाहायला मिळतात. भिवंडीतील ब्राह्मण आळीत असणारा १८ खोल्यांचा जोगळेकर वाडा त्यापैकीच एक. याच्या भिंती दोन फूट जाडीच्या आहेत आणि तो चौपाखी कौलारू आहे. अनेक जुन्या वाड्यांची जागा आता अपार्टमेंटनी घेतली आहे.
| लोनाड ची लेणी (Lonad Caves) |
ही बौद्ध लेणी कल्याणच्या जवळ आहेत. सध्या ह्या लेण्यांच खंडेश्वरी देवी मंदिरात रुपांतर झालेलं आहे. अगदी लहानशी ही लेणी पण अगदी स्वच्छ परिसर आणि बहुदा रोज होणारी पुजाअर्चा त्यामुळे परिसर अगदी प्रसन्न वाटतो. साधारण ५ व्या शतकातली ही लेणी असावी असं इतिहास सांगतो
साधी लेणी आणि शांत वातावरण हे लेण्यांना भेट दिली की लगेचच जाणवतो. संपूर्ण प्रवास उन्हात केल्यावर मंदिराच्या गुहेत नैसर्गिक एयर कंडीशनर मध्ये गेल्यावर फारच सुंदर आणि मस्त वाटलं. बाहेर व-हंडा मग आत प्रर्थानेचा हॉल आणि मग आत गाभारा अशी मांडणी आहे. व-हंडा ला चार खांब होते पण त्यातला एक खांब भग्न झाला आहे आणि त्याचे काही अवशेष आवरून ठेवलेले दिसतात.
डावीकडे एक पाण्याचं टाकं आहे आणि अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हातही तिथे पाणी दिसतं. पाणी वापरात नसल्याने मासे बेडूक ही आहेत आत पण पाणी दिसायालात तरी शुद्ध दिसतं.
पाण्याच्या टाकी समोर म्हणजे मंदिराच्या उजवीकडे. दगडात कोरलेली शिल्प आहेत त्यांना मारुतीला फसतात तसा शेंदूर फसलेला आहे. आत ही बऱ्याच मूर्त्या आणि शिल्प अशीच शेंदुराने सजवलेली दिसतात. हे शिल्प तसं बघायला गेलं तर उत्तम परिस्थितीत आहे. ह्या शिल्पा बद्दल माहिती उपलब्ध झाली पण दोन वेगळ्या माहित्या पदरात पडल्या म्हणजे
एक अशी की दुसरा खुश्रु याने पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे हे दृश्य आहे तर दुसरी माहिती अशी की हा प्रसंग बौद्ध आपल्या वडिलांच्या राज्यात ज्ञानप्राप्ती नंतर येवून पूर्वजन्माची माहिती देतांना चा प्रसंग आहे. शिल्पामध्ये राजा, दरबार, सेवक, कलाकार दिसतात.
प्रर्थाना सभागृहात विशेष असं काही नाही. मूळ गाभाऱ्याच्या बाजूला दोन कोनाडे कोरले आहेत त्यात एका कोनाड्यात गणपती आणि मूषकाची मूर्ती आहे तर दुसरा कोनाडा रिकामा आहे. गाभाऱ्याच्या समोरील यज्ञकुंड आणि लेण्याच्या बाहेरील तुळशी वृंदावन हे नवीन बनवलेले दिसतात.
गाभाऱ्यात ही एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे आणि एका खड्यात पाणी झिरापातांना दिसतं.
मंदिराच्या गाभाऱ्यात खंडेश्वरी देवी आणि हनुमान अश्या मूर्त्या आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात आम्हाला एक रंगीबेरंगी बेडूक ही दिसला. Hylarana nigrovittata जातीचा हा बेडूक होता. लेण्याबाहेर वेडा रघु, दयाळ वगैरे पक्षी ही दिसले.
लोनाड ची बौद्धकालीन लेणी बघून (खांडेश्वरी देवी मंदिर) बघून पुढच्या मंदिरा केडे मोर्चा वळवला. लेण्यांची टेकडी उतरलो आणि मूळ रस्त्याला लागलो की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे आहेत. साधारण ५-७ मिनिटं बाईक ने गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा जवळ पोचलो. हेच ते शिलाहार कालीन शिव मंदिर.
हे मंदिर साधारण ११व्य शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थित आहेत. व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला विखुरलेले दिसतात. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या दगडांवर कपडे वाळत घातले होते. एक आजोबा एका मोठ्याश्या आडव्या दगडावर आडवे झाले होते, ते आमच्या केडे "कुठून आली हि ब्याध" अश्या चेहऱ्याने बघून परत कुशी बदलून झोपले. काही लहान मुलं त्या पडीक मंदिराच्या ढासळत चालेल्या एका मोठ्या दगडाखाली आनंदात खेळत होती
आम्ही प्रथम शिवदर्शानासाठी गाभाऱ्यात शिरलो. गाभारा हा साधारण पाच सहा मोठ्या पायऱ्या उतरून मग खाली आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा स्वच्छ ही होता आणि रोजची पूजा ही होत असावी कारण विड्याच्या पानावर काही नेवेद्य वाहिलेला दिसला. नंदी चा चेहरा पार झिजून गेलेला आहे तर मूळ पिंडी शेजारी एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी ते काही कळलं नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे
गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा स्वच्छ दिसतात.
मंदिराची पडझड बघून वाईट ही वाटतं. त्वरेने जर काही उपाय योजना केली गेली नाही तर हा इतिहासाचा अमूल्य ठेवा संपूर्ण भुईसपाट होईल.
मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं
मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे साधेसे आहे. मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख ही सापडला आहे पण ते आम्हाला नंतर कळलं आणि तो बघायचा राहिला. तो शिलालेख प्रदर्शांत हलवायची योजना होती पण गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे ती प्रत्यक्षात आणली गेलेली नाही. आजुबाजीला विखरलेले मंदिराचे अवशेष बघून आणि शंकराचरणी परत एकदा नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली. नेहमी प्रमाणे मनात तोच प्रश्न की एवढी अवाढव्य आणि अप्रतिम मंदिरं हजारो वर्षा पूर्वी बनवलीच कशी असतील. त्या सर्व अज्ञात कलाकारानाही शतशः प्रणाम
लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - गुगल नकाश्यावर
श्रीगंगा गोरजेश्वर : शहापूर तालुक्यातील आणि टिटवाळ्यापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी काळू नदीपात्रात हे एक पुरातन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात होडीने जावे लागते. हे मंदिर ५०० वर्षे जुने असावे, असे बोलले जाते. त्याचे बांधकाम प्राचीन हेमाडपंती शैलीतले. मंदिरातील शिवलिंगही पाण्यात आहे. मंदिर परिसरातील विविध देव-देवतांच्या मूर्ती, शिल्प आणि घोटीव शिलालेख या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. मंदिराच्या वरच्या बाजूला नदीपात्रात असणाऱ्या मोठ-मोठ्या दगडांवर अवाढव्य अशी सात भोके कोरलेली दिसून येतात. या मंदिरामागे गरम पाण्याची पाच कुंडे आहेत. येथे पर्यटन विभागाने लक्ष देऊन मंदिर परिसरातील गाळ काढावा, तसेच रस्त्याची सुविधा करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. आसपासच्या गावातून भाविक, तसेच अभ्यासू पर्यटक येथे येत असतात.
वज्रेश्वरी : पूर्वी वडवली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील देवतेच्या सन्मानार्थ या शहराचे नाव वज्रेश्वरी करण्यात आले. हे मंदिर थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजीअप्पांनी नव्याने बांधले. वज्रेश्वरीला वज्रबाई आणि वज्रयोगिनी म्हणून ओळखले जाते. पृथ्वीवर देवी पार्वती किंवा आदिमायेचा अवतार मानले जाते. तिच्या नावाचा शब्दशः अर्थ ‘वज्राची बाई (गडगडाट)’ असा आहे. हे गाव गरम पाण्याच्या कुंडांमुळे प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेप्रमाणे, श्रीराम आणि श्री परशुराम यांची येथे भेट झाली असे म्हणतात. पौराणिक कथेत म्हटले आहे, की परशुरामांनी वडवली येथे यज्ञ (अग्नी अर्पण) केला. शिवमंदिरासमोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात अशी भावना आहे.
या मंदिराच्या आजूबाजूला पाच ते १० किलोमीटरच्या परिसरात गरम पाण्याची २० ते २२ कुंडे आहेत. सन १७३९मध्ये चिमाजीअप्पांनी वसईचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी वडवली भागात तळ ठोकला होता. तीन वर्षे ही मोहीम चालू होती. चिमाजीअप्पांनी वज्रेश्वरी देवीला प्रार्थना केली होती, की वसई मोहीम फत्ते झाली तर आपण देवीसाठी मंदिर बांधू. स्थानिक दंतकथेनुसार, चिमाजीअप्पांना वज्रेश्वरी देवी स्वप्नात दिसली आणि किल्ला कसा जिंकता येईल हे तिने सांगितले. त्याप्रमाणे वसईत पोर्तुगीजांचा पराभव झाला. त्याचा विजय साजरा करण्यासाठी आणि वज्रेश्वरी देवीला बोललेले नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजीअप्पांनी मंदिर बांधून घेतले.
मानस मंदिर, आसनगाव : शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळ अत्यंत सुंदर जैन मंदिर आहे. माहुली किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य ठिकाणी ही सुंदर वस्तू जैन समाजाने निर्माण केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर हे ठिकाण आहे.
आटगाव : या मंदिराची फारशी ऐतिहासिक माहिती नाही. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरातील गाभाऱ्यामधील शिवलिंग काळाच्या ओघात नष्ट झाले असावे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील गणपतीचे शिल्प हे ते मंदिर शिवाचे असल्याचे द्योतक आहे. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटलीकर, शैलेश पाटील व सात्त्विक पेणकर यांच्या लेखनामुळे अशी अपरिचित गावांची इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासकांना माहिती होते आहे. या गावातील प्राचीन मंदिर पूर्ण भग्नावस्थेत आहे; पण अस्तित्वात असलेले जोते, नक्षीकाम केलेले आडवे पडलेले अखंड खांब आणि गाभाऱ्यावरून मंदिराचे स्वरूप डोळ्यापुढे येते. येथील विखुरलेल्या अवशेषांवरून व येथे दिसून येणारे वीरगळ यांमुळे हे मंदिर बहुधा शिलाहार काळात अंबरनाथ मंदिराच्या वेळीच बांधले गेले असावे, असा कयास आहे. ठाण्याच्या गॅझेटियरमध्ये मंदिराबद्दल माहिती आहे.
त्या वेळी महाबतखानचा मुलगा खानजमान याने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंना किल्ला सोडावा लागला. पुढे जानेवारी १६५८मध्ये रोजी शिवरायांनी हा किल्ला मुघलांकडून परत घेतला; पण १६६१मध्ये तो मुघलांना परत द्यावा लागला. लगेचच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकूट परत करावे लागले. त्यानंतर मुघलांचा सरदार मनोहरदास गौड याने गडावर बरेच बांधकाम करून गड बळकट केला. फेब्रुवारी १६७०मध्ये खुद्द शिवाजीराजांनी माहुलीवर हल्ला केला; पण तो अयशस्वी झाला. नंतर १६ जून १६७० रोजी मराठ्यांनी पुन्हा हल्ला केला व मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे तीनही किल्ले जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले.
History Of Shahapur District Thane Maharashtra
History of Shahapur Thane, Places to Visit in Shahapur, Shahapur Town, Shahapur Taluka, Maharashtra.
ठाणे जिल्हयातील भिवंडी उपविभागात सामाविष्ट करण्यात आलेला शहापूर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. एकूण क्षेत्रफळ १,५४,२७० हेक्टर म्हणजे १९३९ चौ.कि.मी. आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या, आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरु झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरु झाले.१ ऑक्टोंबर १८५५ पर्यंत कल्याण वासिंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. मुंबई ते वासिंद या पहिल्या रेल्वेची जाहिरात The Bombay Times मध्ये दिवाळीत देण्यात येवून वासिंद कडे गाडी सोडण्यात येणार असल्याची बातमी देण्यात आली. ७ नोव्हेंबर १८५५ रोजी दुपारी १ वाजता बोरीबंदरहून (सीएसटी ) गाडी सुटणार आणि ३.३० वाजता वासिंडला पोहचून ती पुन्हा संध्याकाळी ६.१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर १८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश असणारया शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता.
शहापूर तालुक्यातील वासिंद हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरु झाल्या थळघाट सुरु होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा, शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा हि रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात. ब्रिटीश कालीन ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे (GIP) म्हणजे सध्याच्या मध्य रेल्वेवर असणाऱ्या आसनगाव स्थानकाचे सध्याचे आसनगाव हे नाव अलीकडील असून त्याचे पूर्वीचे नाव शहापूर होते. आसनगाव स्थानकापासून शहापूर गाव २ कि.मी. अंतरावर आहे. ब्रिटीश काळात बांधलेले रेल्वे गुदाम, बुकिंग ऑफीस आजही कायम आहेत. रेल्वे व रस्ता वाहतुकींच्या सोयीमुळे शहापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे.
शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतर वसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रीटिशकालात तानसा धरणाचे काम सुरु झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशी वस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले. नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे.
शहापूर नावाचे दुसरे एक वैशिठ्य म्हणजे आज शहापूर म्हणून ओळखला जाणारा तालुका पूर्वी म्हणजे सुमारे दीड शतकापूर्वी "कोळवण" तालुका म्हणून ओळखला जायचा. १८६०-६३ मधील "मिलिटरी डीपार्टमेंट डायरी" क्र. ९५७ मधील पृष्ठ ३२५ वर माहुली किल्ल्याचे वर्णन असून हा किल्ला कोळवण तालुक्यात असल्याचा उल्लेख आहे. यावरून शहापूर तालुका पूर्वी कोळवण तालुका म्हणून ओळखला जायचा. ई.स . १८८० च्या सुमारास ब्रीटिशानी कोळवण चे रुपांतर शहापूरमध्ये केले व मोरवाडा पेठा प्रशासनाच्या सोयीसाठी शहापूर पासून वेगळा केला. सिंहपूर, माहुली कोळवण, अशी नावे शहापूरला होती असे लक्षात येते.
शहपुरचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे. भरपूर पाउस व सदाहरित जंगले यासाठी तालुक्याला प्रसिद्धी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. १९४१ मध्ये शहापूर येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात आले. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन जास्त असून "भाताचे कोठार" म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई. ब्रिटीश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास मात्र होवू नाही. नो केमिकल झोन मुळे औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत.
तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसानदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून हि नदी येथे उल्हास नदीस मिळते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास मिळते. भारंगी नदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटीशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली. आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा आणि वैतरणा (मोडकसागर ) हि धरणे बांधण्यात आली. तर भातसा धारण १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा, भातसा हि मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली, वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीने उभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे.
Mahuli Fort Shahapur Thane Maharashtra
Mahuli Fort Trek Shahapur, Asangaon, Thane, Maharashtra.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडका पासून बनलेला हा किल्ला एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली, भंडारगड, आणि पळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे.त्यामुळे ह्या किल्ल्याची रचना तीन वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिनेस भंडारगड अश्या दुर्गत्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे.
माहुलीगाव ते किल्लाच्या पायथा या १० मिनिटांच्या रस्त्यात आपल्याला एकूण ४ मंदिरे लागतात. हि मंदिरे सुद्धा ऐतिहासिक आहेत. प्रथम मारुतीचे मंदिर लागते. या मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती जुनी आहे. विहिरीच्या समोर एक शिवमंदिर असून त्याला माहुलेश्वेर असे म्हणतात. १९८२-८३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारा लगतच नांदी असून नंदी ज्या पायावर तो पाय पाहता त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. नंदिसमोर शिवलिंग असून इतर शंकराच्या मंदिरा प्रमाणेच हे शिवलिंग सुद्धा जमिनीच्या समान पातळीवर नसून काहीसे खाली आहे. गाभारयातील शिवलिंगाच्या मागे एका कोनाड्यात मत पार्वतीचे शिल्प आहे. या माहुली मंदिरात माहुलीचा संक्षिप्त इतिहास व माहुलीची रचना दुर्गप्रेमी मंडळाने चित्रित केली आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या बाजूने उजव्या हाताला एक रस्ता जातो. तो माहुली किल्ल्यावर उगम पावणाऱ्या भारंगी नदीकडे जातो. पावसाळ्या व्यतिरिक्त या नदीत फारसे पाणी नसते. मंदिराच्या डावीकडे देवीचे मंदिर असून त्यातील देवीची मूर्ती शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. यातील मुख्य मूर्ती हि वज्रेश्वरीच्या मूर्तीसारखी आहे असे पुजारी सांगतात. या दोनही मंदिराच्या आसपास काही प्राचीन शिल्प सुद्धा विखुरलेली आहेत. देवीच्या मंदिरामागे एका पिंपळ वृक्षाखाली गाडी चौथऱ्यावर शिवलिंग व गणेश मूर्ती आहे. माहुलेश्वर मंदिराच्या मागून एक पायवाट जाते.या पायवाटेने पुढे गेल्यास दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून त्याचा जीर्णीधार १९७८-७९ ला झाला आहे.

मंदिराच्या समोर एक दगडी घुमट, दगडी अर्धवट फुटलेला पाटा, युद्धप्रसंगांचे चित्रण असलेले अर्धवट फुटलेले विरगळ आहे. या चारही मंदिरातील मूर्ती किती जुन्या आहेत हे सांगता येणे तसे अशक्य आहे. पण त्य शिवकालीन वा पेशवेकालीन म्हणजेच मध्ययुगीन तर नक्कीच आहेत. पेशावेकाळात यातील काही मंदिरांची स्थापना झाली असे मानले जाते. किल्ल्याचा इतिहास आणि पायथ्याचा परिसर एकदा लक्षत आल्यानंतर प्रत्यक्षात किल्ला चढणे व किल्ल्याची पाहणी करणे सोपे जाते. मुळात हा एकाच किल्ला नसून दुर्गत्रिकुट आहे. मध्यभागी माहुली उजवीकडे पळसगड आणि डावीकडे म्हणजे काहीसा पश्चिमेकडे भंडारगड असे हे त्रिकुट असल्याने एका दिवसात हे तीनही पाहता येणे शक्य आहे. गडावर जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. किल्लाचा महादरवाजा हा मूळ मनाला जातो. एका नाळेच्या तोंडाशी कातळ खोदून पायरया खोदलेल्या असून पहारेकारांच्या देवड्या कोरलेल्या आहेत. या देवड्याच्या पुढे बुरुज उभारले आहेत. वास्तविक हि किल्ल्यावर जायची मूळ वाट आहे. पण ह्या वाटेवर केवड्याचे वन वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या मुख वाटेवर दुर्लक्ष झालेले आहे. ह्या महादरवाजा बरोबरच भंडारगडावरून कल्याण दारावाजाद्वारे किल्ल्यावर जाता येते. पण हा मार्ग खूपच अवघड असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाण्यासाठी गणेश मंदिराच्या समोरून गेलेली पायवाट हाच एक योग्य मार्ग आहे. सध्या ह्या पायवाटेने किल्ल्याकडे जाता येते.
या पायवाटेने जाताना वाटेत एक डोंगराचा सुळका वा डोंगराची कडा लागते. तिचा आकार घोड्याच्या मानेसारखा असल्याने त्याला घोड्याची मान असे म्हणतात तेथून पुढे वर आल्यानंतर वाट साधी आणि एकदम उभी चढणीची होते. येथे आपण माहुलीच्या कड्याला येतो. कडा चढून जाण्यासाठी सुमारे ८-९ फुट उंचीची एक लोखंडी शिडी आहे. पूर्वी हि शिडी मोकळी होती. आता मात्र ती मजबूत केली आहे. संपूर्ण किल्ला चढताना हे एकाच ठिकाण अवघड आहे. ते मात्र जपून जावे लागते. शिडी चढून वर आल्यानंतर जवळ जवळ किल्ल्यात मागील बाजूने प्रवेश होतो. हा पायवाटेचा मार्ग मुळच्या महादरवाज्याच्या वाटेपासून किमान पाचशे फुटापेक्षाहि दूर आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे झाडा झुडूपात न जाता उजवीकडे जी पायवाट आहे, तेथून महादरवाजाकडे जाता येते. तेथे एक पाण्याचे टाके व देवड्या म्हणजे पहारेकरयाची जागा आहे. दुसरे एक पाण्याचे टाके शिडी चढून वर आल्यानंतर लगेच दिसून येते. पायथ्याशी शिवमंदिरासमोर विहीर आणि दोन टाकी या व्यतिरिक्त पाण्याची सोय अन्यत्र नाही. महादरवाज्या वरून उजवीकडे न जाता सरळ वरच्या अंगाकडे गेल्यानंतर एक भिंत आणि कलाकुसरीची काही शिल्प आढळतात. तेथे उर्दू लिपीतील शिलालेख असून त्याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही. या जागेला नमाजगिर असे म्हणतात. नमाजगिराच्या उजवीकडे गेल्यानंतर एका वाड्याचे अवशेष आढळतात. एकेकाळी चिरेबंदी असणाऱ्या वाड्याचे आज भग्नावशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावरच्या पठाराच्या मध्यभागी एक तळे असून त्याला माहुलेश्वराचे तळे असे म्हणतात. पळसगडावरून तानासातलावाचे विहिंगमय दृश्य दिसते. पळसगडावर जाणारी वाट बांबूच्या बनातून जाते. पळसगड का म्हंटले जाते हे सांगता येत नाही. मात्र कदाचित येथे पूर्वी पळसाची झाडे विपुल प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यालाच गिर्यारोहक छोटा माहुली असेही म्हणतात
कल्याण सुभ्याकडून येणारा रस्ता म्हणून त्याला कल्याण दरवाजा असे नाव मिळाले असावे. या दरवाजातील आतल्या बाजूस मराठीत एक शिलालेख असून त्याची भाषा दुर्बोध आहे. माहुली किल्ला व भंडारगड यांच्यामध्ये एक आडवी तिडवी पसरलेली खिंड असून भंडारगडावर पोहोचण्यासाठी खिंड उतरून एक डोंगर चढावा लागतो. पळसगडावरील कल्याण दरवाजातून खाली उतरण्याची वाट अत्यंत अवघड आहे. एका घळीत एक झिजलेला व अर्थबोध न होणारा लेख व काही कोरीव पायरया आहेत. तर दरवाज्याजवळ एक टाके असून त्याला माठ टाक म्हणतात. तेथून पुन्हा माहुलीकडे जाताना उजव्या बाजूस एका डोंगराच्या माथ्यावर कड्यापाशी एका दरवाजाचे अवशेष आढळतात. याला हनुमान दरवाजा म्हणतात. तेथून पुढे हनुमान व गणपतीची कोरीव शिल्पे आहेत. तेथून खाली पायथ्याशी येणे किव्हा माहुलीच्या मध्यभागी जावून त्या रस्त्याने पायथ्याशी येता येते, परंतु ह्या वाटेने स्थानिक लोकच ये जा करू शकतात कारण वाट अवघड आहे. भंडार गडाच्या दक्षिणेस असलेल्या चार सूळक्यांचा व खिंडीच्या अलीकडे एक डोंगर असून त्यास माहुली-चंदेरी या नावाने ओळखले जाते पण हे नाव मुळचे नाही. माहुली किल्ल्यावरील भारंगी नदी तेथे उगम पावते. हि नदी पायथ्याला वेढाघालून पुढे जाते तेथून ती शहापूर येवून शेवटी भातसा नदीलाजावून मिळते.
असे एकंदरीत माहुली किल्ल्याचे स्वरूप असून दोन शिलालेख, कल्याण, हनुमान व महादरवाजा, चिरेबंदी वाड्याचे अवशेष, पाण्याच्या टाक्या, माहुलेश्वर, मंदिर, तळे, बुरुज, देवड्या, विरगळ घोड्याची मान, भटजी, नवरा, नवरी, व करंगळी हे सुळके, तीन जोती, डूक्करतोंडी शिल्प, हनुमान व गणेशाची शिल्पे, तानसा तलाव पोंईन्ट, भारंगी नदीचा उगम, सूर्योदय व सूर्यास्त, खिन्डी, दरी, बांबू व केवड्याची बने, पावसाळ्यातील धबधबे व दुथडी भरून वाहणारी भारंगी नदी, किल्लाच्या पायथ्याशी असणारी चार मंदिरे, माथेरान पेक्षाही उंच व थंड हवा, हिरवीगार वनश्री यामुळे माहुली हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे. वानरे, ससे, माकडे, डुकरे, हरीण, हे प्राणी व मोर, घार, गिधाड, यासारखे पक्षी तर फुरश्यासारखे विषारी साप असे येथील वन्य जीवन समृद्ध आहे.
सावरोली रस्त्यावरील सरकारी गोदामाजवळ एक वाघोबाचे मंदिर आहे. माहुलीच्या जंगलातील वाघाचा आपणास उपद्रव होवू नये म्हणून हे मंदिर बांधले गेल्याचे सांगितले जाते. यावरून माहुलीच्या वन्यजीवानाची कल्पना येते. माहुलीवरील सुळके, माहुली किल्ला, व भंडारगड यामधील खिंड, वाटेवरली शिडी, हनुमान दरवाजा व कल्याण दरवाजा वरून खाली उतरण्याची वाट याठिकाणी दक्षता घ्यावी लागते. सकाळी लवकर जावून संध्याकाळी परतणे शक्य आहे. किल्ल्यावर राहायची व्यवस्था नाही. स्थानिक लोकांना विचारून रस्त्याची माहिती करून घ्यावी. माहुली किल्ला हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. किल्ल्यावरील व पायथ्यावरील ऐतिहासिक अवशेष हा आपल्या इतिहासाचा व संस्कृतीचा एक अनमोल ठेवा असून पर्यटकांनी, गिर्यारोहकांनी आणि अभ्यासुनी त्याचे योग्य ते जतन करावे.
पोहोचण्याबाबत माहिती
माहुली किल्ल्याकडे जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशन वर उतरून रिक्षा अथवा बसने शहापूर गावात उतरणे सोयीस्कर ठरते. शहापूर गावातून माहुली गावाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षा, बस असतात. बस अनिश्चित आहेत. किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात विश्रांती घेवून किल्ला चढणे हा एक उत्तम पर्याय आहे. सुमारे दीड ते दोन तासाच्या चढणीत वाटेत कोठेही पाणी नसल्याने पाणी जवळ असावे. किल्लाच्या पायथ्याशी जी मंदिरे आहेत त्यांना सुद्धा इतिहास आहे. पेशवेकालीन वाड्याचे काही अवशेषही किल्लाच्या पायथ्याशी आहेत. पेशवाईच्या काळात किल्लाच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे होते. त्यांचे अवशेष आजही आहेत. मंदिरासाठी वर्षासने दिली होती. परंतु पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटीश काळात आणि स्वातन्त्रायानंतर मंदिराकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन उदासीनच होता.
माहुली धबधबा / Mahuli Waterfall Shahapur Near Thane
श्री क्षेत्र गंगास्थान / Ancient Temple Shahapur
गंगास्थानातील हे गंगाजल मधुमेह व रक्तदाब या विकारांवर परिणामकारक असल्याचे मानण्यात आले. येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. शहापूर पंचक्रोशीतील एक जेष्ठ तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी गंगापुजनाचा विधी येथे केला जातो. आसनगाव रेल्वे स्थानकापासून २ कि. मी., शहापूर गावापासून १ कि. मी. व मुंबई- नाशिक महामार्गापासून १/२ कि.मी. अंतरावर असलेले हे सुमारे ७०० वर्षापूर्वीचे ठिकाण तीर्थस्थान म्हणून जेष्ठ व पवित्र आहे.
श्री लक्ष्मी-नारायण मंदिर / Laxmi Narayan Temple Shahapur Thane
लक्ष्मी-नारायणाच्या ह्या मूर्ती मुंबईतील ठाकुरद्वार येथी झावबा मंदिरात होत्या, त्या लहान असल्याने तेथे त्यांची प्रतिस्थापना केली नव्हती. या मूर्ती १९२५ च्या सुमारास शहापूरमध्ये आणण्यात आल्या. सुरुवातीला मंदिर वगेरे न बांधता केवळ मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.
विठ्ठल मंदिर / Vitthal Mandir Shahapur, Thane
वेताळ मंदिर : वेताळेश्वर / Vetal Mandir Shahapur Thane
शेतीची कामे सुरु करण्यापूर्वी शेतकरी कुटुंबाकडून वेताळेश्वराला नारळ अर्पण केला जातो. देवतेचा कौल घेवूनच मंगल कार्य केले जाते. प्रथेप्रमाणे जत्रा तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा, श्री गणेशोत्सव, शिवजयंती वगेरे उत्सव साजरे केले जातात. मंदिराची व्यवस्था परंपरेने गोणे कुटुंबीयांकडे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून कौलारू छपराऐवजी सिमेंट कौक्रीटचे छत तसेच पूर्वीच्या लाकडी खांबांएवजी सिमेंटचे खांब, लोकांडी दरवाजा असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. वेताळेश्वराची फेरी निघत असल्याने मंदिराला भिंती नाहीत. अश्यारीतीने हे वेताळ मंदिर शहापूरच्या धार्मिक जीवनातील महत्वाचा भाग आहे.
राम मंदिर / Ram Mandir Shahapur
ब्राम्हणआळीतील ह्या मंदिराचा जीर्णोद्धार कसारा येथील बागेसर हरीलाल अग्रवाल यांनी केला. तत्पूर्वी मंदिर बैठे असून जमीनही साधी सारवणाची होती. चातुर्मासातील व्रतवैकल्ये आणि रामनवमी येथे साजरी केली जाते. त्या निमित्ताने येथे प्रवचने, कीर्तने होतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला सिमेंटने बांधलेल्या चौकोनात हनुमानाची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या वरील बाजूस शेषशाही विष्णू व त्यांचे पंचायतन चित्रित केलेले आहे.
Manas Mandir Shahapur
माहुली टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले जैन मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. मंदिराची उंची 76 फूट आहे या तीर्थात घुमट, एक फार मोठी छत, कोरीवकाम व उत्तम वास्तुकला अशा सर्व गोष्टी उत्तम प्रकारे अनुभवायला मिळतात.
भगवान महावीर यांचा ब्रास पुतळा हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे. सावरोली गावाच्या नदी किनारी ह्या सुंदर मंदिराची रचना केली गेली आहे. पलिताणा येथील जैन शत्रूंजय तीर्थाची हि एक सुंदर प्रतिकृती आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आहे. येथून जवळच माहुली किल्ला आहे.
Jambhe Dam Shahapur Thane
Jambhe Dam Shahapur, Jambha Dam, Jambhe Dam Overflow Shahapur, Dam Near Shahapur Thane, Maharashtra
मुंबईला पाणीपुरवठा करणारी भातसा, तानसा, मोडकसागर ही जलाशये, तर ट्रॅकरसाठी माहुली किल्ला, बळवंतगड, आजा पर्वत, तर स्वछंद भिजण्यासाठी नरपंडी, अशोका, टँगो, माहुली हे प्रमुख धबधबे, तसेच वनविभागाचे वाफे येथील निसर्ग पर्यटन केंद्र व नुकतेच साकारणारे नक्षत्रवन, चोंढे, घाटघर प्रकल्प, मानस मंदिर, गंगा देवस्थान, अशी अनेक पर्यटन स्थळे तालुक्यामध्ये असून शनिवार व रविवारी शेकडो पर्यटक शहापुरात दाखल होत असतात.
कसे पोहचावे ?
मुंबईहून रेल्वेने येत असाल तर आसनगाव स्टेशनला उतरून शहापूरच्या बस स्थानकाजवळ जांभे गावात जाणार्या प्रवासी गाड्या उभ्या असतात. तसेच शहापूर बस स्थानकातूनही एसटी बस असतात अन्यथा मुंबई-नाशिक महामार्गावरून शहापूर येथे यावे व येथून १५ किमी अंतरावर शहापूर-मुरबाड रोडवर १० किमी गेलयावर शेंद्रूण येथे यावे व येथून जांभे गावाकडे जाणारा रस्ता आहे. तसेच कल्याण-नगरमार्गे मुरबाडवरूनदेखील या ठिकाणी येता येते. एकंदरीत आठवड्याच्या शेवटचे शनिवार व रविवार कुटुंबासोबत पांढर्या शुभ्र पाण्याचे शहारे अनुभवायचे असतील तर जांभे धरणाला नक्की भेट द्या.
Tansa Dam Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra

Tansa Dam Shahapur, Tansa Dam Overflow, Tansa Dam Histroy, Tansa Dam Information, Where is Tansa Dam, Most Famous Dam of Mumbai, Maharashtra.
शहापूर तालुका हा धरणांचा तालुका म्हटले तर वावगे ठरु नये. तानसा, वैतरणा, भातसा ही मोठी धरणे तर खराडा, जांभा डोळखांब ही छोटी धरणे तसेच चोंढा प्रकल्प ही शहापूर तालुक्याची वैशिष्ट्ये आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीची मुंबईची पाण्याची गरज ही तीन मोठी धरणे पूर्ण करीत आहेत. यातील तानसा धरण हे एक शतकापूर्वीचे आहे. हे धरण मुंबईला दररोज सुमारे दोन कोटी गॅलन पाण्याचा पुरवठा करते. मुंबईबरोबरच धरण परिसरातील मोहिली, अघई, वेहडवाल, नेवरा, खलिंग अशा जवळपासच्या गावांनासुद्धा पाणी पुरवले जाते. तानसा जलवाहिन्यांमार्फत पाणी पवई, पोगाव या ठिकाणी पोहचवले जाते आणि तेथून ते मुंबईला जाते. मुंबईच्या उपनगरातील भांडुप येथे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प आहे.
Modak Sagar Dam, Vaitarna, Thane, Mumbai, Maharashtra
Modak Sagar Dam Vaitarna, Modak Sagar Dam News, Modak Sagar Dam Information in Marathi, Modak Sagar Lake, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.
Bhatsa Dam Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra
Bhatsa Dam, Bhatsa Lake and Dam, Bhatsa Dam Information, Where is Bhatsa Dam, Bhatsa Dam Distance, Bhatsa Dam Picnic Spot, Bhatsa Dam Capacity, Bhatsa Dam History, Shahapur, Thane, Mumbai, Maharashtra.
शहापूर तालुक्यातील मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठा नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच दगडी धरण हे त्याचे वैशिष्ट्य आहे. उल्हास नदीची भातसा ही उपनदी असून या नदीवर हे धरण बांधले असल्याने त्याला भातसा प्रकल्प हे नाव प्राप्त झाले आहे. पण प्रत्यक्षात हे धरण भातसा नदी व चोरणानदीच्या संगमावर बांधले आहे. मुख्य नदी भातसा नदी असल्याने त्याला भातसा प्रकल्प म्हणतात. या नदीला भातसई असेही संबोधले जाते. शहापूर तालुक्यातील साजिवली गावाच्या ठिकाणी हे धरण बांधलेले आहे. भातसानदी मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडे जाताना कसारा घाट ओलांडल्यावर ठाणे जिल्हा हद्द व नाशिक जिल्हा हद्द यांच्या सरहद्दीवर उगम पावते आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ती येतांना तिला चोरणा, भारंगी यासारख्या नद्या येऊन मिळतात. भातसा धरण शहापूरपासून २० कि.मी. अंतरावर आहे. शहापूरपासून नाशिककडे जाताना सुमारे १२ कि.मी. अंतरानंतर उजव्या हाताला जाणारा रस्ता असून तेथून सुमारे ८ कि.मी. भातसा प्रकल्प लागतो. प्रकल्प असल्याने सर्व श्रेणीच्या लोकांची निवासस्थाने, बाजार कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सोय, उत्तमप्रतीचे शासकीय विश्रामगृह, भूकंपाचे मोजमाप करणारी यंत्रणा अशा सोयी या ठिकाणी आहेत.









No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.