Tuesday, July 26, 2022

पिंडारी

 

हिमालय - तयारी आणि सुरुवात

Submitted by साक्षी on 24 June, 2022 - 15:08

२०२१ मधे आयुष्यातल्या पहिल्या हिमालय ट्रेक साठी पैसे भरले पण करोना कृपेने तो पुढे ढकलावा लागला. या वर्षी सगळं मार्गी लागलं आणि २८ मे ते ३ जुन पिंडारी ग्लेशिअर ट्रेक नक्की झाला. पहिल्याचं नाविन्य असल्याने उत्सहात खरेदीही भरपूर झाली. decathlon चा एक दिवसचा turnover वाढवल्यावर जरा बरं वाटलं.

२०१४ मधे सिंहगड उतरताना माझा पाय गुढग्यात ट्विस्ट झाला. ligament injury झाल्याने सिंहगड पण बंद झाला. आत्मविश्वास फारच कमी झाला होता. आता ट्रेकच्या निमित्ताने आठवड्यातून एकदा सिंहगड सुरू करु असे ठरवताना अचानक मार्चमधे मैत्रीण कळसुबाई करुया का म्हणाली आणि दमत भागत का होइना जमला. गेलेला अर्धा आत्मविश्वास परत आला. मग जमेल त्या शनिवारी सिंहगड वार्‍या केल्या.

२७ ला सकाळी पुण्याहून दिल्ली आणि तिथुन दुपारी पंतनगर ला पोचलो. पंतनगर चा लुटुपुटूचा विमानतळ बघुन जरा मज्जा वाटली.
PantnagarAirport.jpg
काठगोदामला जाण्यासाठी विमानतळावर गाड्या घ्यायला आल्या.
Kaladhungi.jpg
गाडीतून जाताना करमणूक नको का Happy

उत्तराखंड आहे म्हणजे थंडी असणार या कल्पनेला काठगोदामने तडा लागला. मरणाचं उकडत होतं. संध्याकाळी जरा वेळ मिळाला तसे पाय मोकळे करायला गावाच्या जरा बाहेर फेरफटका मारुन आलो. नाहीतर गाव अगदीच सुमार, प्रदुषण युक्त आहे.
Kathgodam.jpg

राहिलो ते हॉटेलही ठिकच होतं पण एका रात्रीचाच प्रश्न होता. दुसर्‍या दिवशी १० तासाचा प्रवास होता, त्यामुळे सकाळी लवकर निघालो. दरडी कोसळल्यामुळे खडबडीत रस्ते, पावसामुळे चिखल आणि निसरड्या वाटा पार करत जलकुणी नावाच्या गावात संध्याकाळी ६:३० च्या आसपास पोचलो. आता उंचीवर आल्यामुळे गाडीतून उतरल्यावर हवेत चांगलाच गारवा जाणवला. अंधार पडायला लागला होता तरी समोर दिसणार्‍या डोंगर रांगा लक्ष वेधून घेत होत्या.

रात्र झाली तशी प्रचंड थंडी वाजू लागली. टॉयलेट १० पावलांवर होतं पण गच्च अंधार आणि थंडीचा कडाका यामुळे जावंस वाटत नव्हतं. नको वाटत होतं तर दोनदा जावं लागलं. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ही रात्र जावी लागणार होती. उद्यापासून खरा ट्रेक चालु होणार होता. कुडकुडत असतानाच १२ वाजता वगैरे झोप लागली. सकाळी त्या रांगा स्पष्ट दिसत होत्या. ढगही जरा निवळले होते.
Jalkuni.jpg
समोर ज्या रांगा दिसतात त्या सुंदरढुंगा (असंच नाव आहे Happy )

https://www.maayboli.com/node/81826

हिमालय - पिंडारी - ओडोरी

Submitted by साक्षी on 28 June, 2022 - 09:46

हिमालय - तयारी आणि सुरुवात

इथुन पुढे पाच दिवस आमचा दिनक्रम साधारण ठरलेला होता. ५ वाजता कोरा चहा, ६ वाजता नाष्टा, ७ वाजता त्या दिवशीच्या ट्रेकला आरंभ. आमच्या बरोबर आमचे ट्रेक लिडर, गाइड असणार होते आणि बाकीचा कंपू म्हणजे कूक, मदतनिस आणि आमचं सामान वाहून नेणारी खेचरं.
आमच्या बरोबर आम्ही पाणी, रेनकोट, थोडा कोरडा खाऊ, सुकामेवा अशा गरजेच्या गोष्टी घेऊन जायचो. सकाळी एकेकाने तंबूतून सगळं आवरूनच बाहेर पडायचो. इतकं वाकून तंबूमधे ये जा करणं एक दोन दिवसांत नकोसं होतं. तिथल्या मायका नावाच्या दगडांवरून वहात येणारं पाणी पचायला जड असतं. त्यामुळे उठल्या उठल्या एकदा आणि त्या शिवाय एक दोन वेळा टॉयलेट टेंट ला भेट द्यावी लागायची. सूर्य मावळला की गारवा वाढत जातो. त्यामुळे संध्याकाळीदेखिल जेवण, गप्पा, टॉयलेट टेंट भेट सगळं उरकूनच तंबूत sleeping bag मधे शिरायचं ते थेट पहाटे बाहेर हे रुटीन आपोआप बसतं. रात्रीचं जेवण ७ वाजता असल्याने ८ किंवा जस्तित जास्त ९ पर्यंत झोपलो की सकळी ४:३० लाच जाग यायची आणि बाहेरही उजाडलेलं असायचं. त्या गारेगार पाण्याने एक दिवस दात घासणे कार्यक्रम केला पण मग राहिलेले दिवस नुसत्या चुळा भरल्या. आंघोळीचा तर विचारही केला नाही.
तर आज पहिल्या दिवस तसा सोपा होता. ५ किमी चा रस्ता होता. तोही गावातून जात असल्याने इकडे तिकडे बघत, रमत गमत पोचलो. गावातून आल्यामुळे घरं, शेतं बघत मजा करत करत आलो. ताज्या लसणीचा गावात सगळीकडे घमघमाट होता. ओडोरी नावाच्या या पहिल्या कॅम्प साइटला पोचलो. नदीच्या कुशीतली कॅम्प साइट बघून जीव सुखावला
campsite2.jpg

सगळ्यांचं फोटोसेशन, बागडणं सुरु झालं
campSite1.jpg

आजचा दिवस असाच संपला. उद्या याहून जरा मोठा पल्ला होता आणि उंची वाढत जाणार होती. अजुनही हिमालयाचं दुरुनच दर्शन होत होतं. आज बिच्छु काटा अशा विनोदी नाव असलेल्या वनस्पतीची ओळख झाली. तिच्या काट्यांनी काही जणांना प्रसाद दिला. पण मग जवळच उगवणारी पालकासारखी दिसणारी दुसरी वनस्पती यावरचा उतारा आहे अशी महिती मिळाली. ती पानं चुरगाळून त्याचा रस चोळला की दाह कमी होतो. ओक्सीमीटरने माझा ऑक्सिजन नेमका पहिल्याच दिवशी जरसा कमी दाखवल्याने थोडी अस्वस्थ झाले. पण नंतर सगळे दिवस आकडे अगदी व्यवस्ठित होते.

हे असेच काही फोटो
view1.jpg
डोंगर
view2.jpg
नदी

हिमालय - पिंडारी - ओडोरी ते खाती

Submitted by साक्षी on 6 July, 2022 - 06:43

हिमालय - पिंडारी - ओडोरी

आज दुसरा दिवस. ओडोरीहून खातीला जायचे होते. खाती हे उत्तराखंड मधील अगदी छोटंसं आणि सुंदर खेडं आहे. बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे.
खातीला जातानाचा पूर्ण रस्ता Rhododendron (लोकल भाषेत बुरांस) च्या झाडांनी आणि अर्थातच देवदार वृक्षांनी सुखकर झाला. बुरांसमधे वेगवेगळ्या शेड्स आहेत. उंचावर जाऊ तसा बुरांसचा रंग डार्क पासून बेबी पिंक होत जातो. चक्राता ला आम्ही फक्त राणीकलरची बुरांस फुले बघितली होती. इथे ही फिकट बघायला मिळाली. अर्थात रंग सगळेच सुंदर दिसत होते. सिजन संपत आल्यामुळे झाडावर थोडीच फुलं शिल्लक होती. आजही पूर्ण रस्ता चढण नव्हते. एखादी व्हॅली चढायची मग उतरायची असं करत ट्रेक पूर्ण झाला. खाती ७२५० फूटावर आहे. ट्रेकचं अंतर जास्त नसेल तरी जसजसे तुम्ही उंचीवर जायला लागता तसतसं दमायला जास्त होतं. सवय नसणार्‍यांना त्रास जाणवू शकतो. पण वेळोवेळी भरपूर पाणी पिऊन बॉडी हाय्ड्रेट ठेवणे. हे केले तर त्रास होत नाही. जवळ असायलाच हवं असा म्हणजे सुकामेवा. त्याचाही खूप चांगला उपयोग होतो.
ट्रेक ला जाऊन मॅगी खाल्ली नाही तर पाप लागेल म्हणतात. त्यामुळे मधे मधे मॅगी ब्रेक, वॉटर ब्रेक, खाऊ ब्रेक होतच असायचे. त्याचबरोबर ब्रिज फोटो ब्रेक्स अटळ असायचे. असे छान छान ब्रिज दिसले की लगेच सगळ्यांचं फोटोसेशन सुरू!
bridge.JPG
शिवाय जाता येता कुणी ना कुणी फोटो काढायचंच
OnTheWay2.jpg
आज मधे मधे थोडा बर्फ पण मिळाला. पण हा बर्फ खेळण्यासारखा नसतो. चिखल आणि बर्फ एकत्र आणि त्यामुळे घसरडं..
20220531_100438.jpg
आमचे ट्रेक लिडर, गाईड यांच्यापैकी कुणीतरी पुढे जाऊन ट्रेल बरा आहे ना बघून ठेवायचे. काही वेळा बर्फाचा लेअर पातळ असतो आणि त्याखालून पाणी वहात असते. तो बर्फ वरून चालण्याइतका घट्ट आहे का नाही बघावे लागते. आपण सरसकट बर्फ म्हणतो पण हाच तो आइस आणि स्नो मधला फरक!

आजची कँप साईट पण छानच होती पण किडे, मुंग्यांची पण आवडती असावी. जरा टेंट उघडा राहिला की वेगवेगळे किडे आत येत होते. त्यात सगळीकडे ओलं होतं. आजही पावसाने कृपा केली होती. आम्ही यायच्या आधी पडून गेला होता, आणि आम्ही चारच्या आधी साईटवर पोचलो आणि तोवर आम्हाला वाटेत लागला नाही. गारवा मात्र चांगलाच जाणवत होता. तिथल्या वातावरणाशी acclimatize होण्यासाठी कान उघडे ठेवायचे असतात. पण थंडीने आणि वार्‍याने कान झाकायचा मोह होतो. संध्याकाळी गरम सूप आणि पॉप कॉर्न ने मजा आणली
campSightKhaatee.jpg
खेचरांना आवडता खाऊ इथे भरपूर होता. त्यामुळे ती पण खुश. गळ्यातल्या घंटांची मंजूळ किणकिण करत भरपूर वेळ ती चरत होती
Khechar.JPG
दमणूक आणि थंडी यामुळे झोप कधी लागली समजलंच नाही.

हिमालय - पिंडारी - खाती ते द्वाली

Submitted by साक्षी on 12 July, 2022 - 05:04

हिमालय - पिंडारी - ओडोरी ते खाती

तिसर्‍या दिवशी खातीहून द्वाली ला जायचे. आम्ही थंडीला बर्‍यापैकी सरावलेलो होतो. नेहमीची आन्हिके आवरून, कपडे बदलून आज जरा लवकरच निघालो. निघताना चढवलेले लेअर्स थोड्या वेळाने एक एक बॅगेत जातात. आजचा पल्ला मोठा होता. १३ किमी आणि १३०० फूट वर जायचं होतं. नदीची साथ पूर्ण ट्रेक मधे रोजच असायची पण आज प्रोमिनंट जाणवली. ही पिंडार गंगा नदी! कितीही दमलो असलो तरी तिच्या खळखळाटाने आपला उत्साह टिकवून ठेवते. आज रस्त्यावर धबधबेही भरपूर दिसत होते. एकंदरच पिंडारी ट्रेक एकदम सिनिक आहे. मधेच दाट जंगल, मधेच मोठे मोठे दगड, मधेच पायवाटा आणि मधे बर्फ!
khateeCampSite.JPG
आजही हमने बदले है कपडे! (आज भी हम नहाए नही है! *LOL* )

नदी बरोबरच मधले हे ब्रेक्स ताजेतवाने होण्यासाठी फार महत्वाचे ठरतात!
Break1.jpgbreak2.jpg
२०१३ च्या आपत्तीमधे झालेल्या नुकसानाचे पुरावे इथे जागोजागी दिसत रहातात. ट्रेल मधल्या बर्‍याच वाटा सुद्धा डॅमेज झालेल्या आहेत. आजच्या ट्रेलच्या शेवटच्या टप्पा एकदमच वेगळा जाणवतो. आधीचा सगळा रस्ता दाट जंगलातून आणि शेवटचे १.५- २ किमी एकदम दगडातला चढउतार येतो.
जंगलातून वाट
OnTheWay4.JPGOnTheWay5.jpg
वाटेत धबधबे
DhababeCollage.jpg
मधेच बर्फ
snowCollage.jpg
आणि ही दगडांतून वाट
OnTheWay3.jpgOnTheWayDwali.jpg
पोचल्यावर आज स्ट्रेचिंग अगदी जरुरीचं होतं. इथे पोचल्यावर शीण पळून गेला. त्याला कारण होतं, संध्याकाळी मिळालेले गरम स्नॅक्स, चहा आणि समोरचं दृश्य
Cover.jpg
अजुन काही वर्णन करायची गरजच नाही.

हिमालय - पिंडारी - द्वाली ते फुकरिया

Submitted by साक्षी on 21 July, 2022 - 05:38

हिमालय - पिंडारी - खाती ते द्वाली

आज चौथा दिवस, आम्ही जास्तच उत्साहात होतो करण आज फुकरिया अर्थात बेस कॅम्पला पोचणार होतो. साधारण पाचच किमी चा रस्ता आणि जायला ३-३:३० तास लागणार होते. गरम चहा आणि नाश्ता करून आम्ही फुकरियाच्या दिशेने निघालो. आजचा दिवस आमच्या ट्रेकमधील सर्वात नयनरम्य भागांपैकी एक होता.

हवा चांगली असल्यामुळे आम्हाला समोर नंदा देवी आणि नंदा खाट पर्वत सतत दिसत होते. ते इतके अफलातून दिसतात की फोटो काढू तितके कमीच! त्यांच्या ओढीने जातानाचा थकवाही थोडा कमी जाणवतो. जातानाच्या रस्त्यात दोन छोटे ओढे ओलांडले आणि त्यानंतर सुंदर पायवाट लागली.
OnTheWayF1.jpg

ही पायवाट संपूच नये असं वाटत रहातं. ही पायवाट आम्हाला खोल पिंडार व्हॅलीमधे घेउन गेली. तिथुन पुढे हीच वाट जंगलाच्या दिशेने गेली आणि आम्ही सुंदर ओक आणि रोडोडेंड्रॉन (बुरांश) च्या दाट जंगलात प्रवेश केला. जंगलात चालायला लागलो आणि हळुहळु चढ जाणवू लागला. अर्थात फक्त चढ किंवा फक्त उतार असे नव्हतेच. जसजसे आम्ही चढावर गेलो. पिंडार नदी आम्हाला खाली वहाताना दिसायला लागली होती. तिची खळखळ अजुनही आमच्या बरोबर होतीच. चढ चढून गेल्यावर आम्ही एका सुंदर जागी पोहोचलो. लांबवर हिरवेगार कुरण होते. हा फ्रेश हिरवा रंग डोळ्यांना सुखावणारा होता. कुरणाजवळच्या पायवाटेवरून जवळपास ३० मिनिटे चालत गेलो.

OnTheWayF.JPG

जाताना लांबवर Siberian Ibex चरताना दिसली. ही भारतातली सगळ्यांत मोठी शेळी! ह्या कुरणातून वरच्या बाजूला बघितलं तर रोडोडेंड्रॉनचे मोठं जंगल दिसतं. तसंच जंगलातून जाताना काही ठिकाणचे अवघड पॅचेस भूस्खलन झाल्यामुळे अजुन अवघड बनले आहेत. शेवटचे दोन छोटे पाण्याचे प्रवाह ओलांडले आणि फुकरियाला पोचलो. फुकरिया १०५०० फूट उंचावर आहे. कॅम्प साइट अप्रतिम होती.
Basecamp.jpg
साइटवरून मागेच एक छोटासा ग्लेशियरचा तुकडा होता. जवळच एक मोठा खडक होता. टेहेळणी करण्यासाठी हा खडक उत्तम होता. समोरच्या डोंगरावर Ibex इथुन बघायला फार छान वाटत होतं. अजुन एक म्हणजे पक्षी निरिक्षण करायला ही अतिशय उत्तम जागा होती. सामान कमीत कमी नेण्याच्या नादात मी दुर्बिण न आणल्याचा मला पश्चात्ताप झाला. लांबवर हिमालयन मोनाल दिसत होता. आमच्या २६ जणांत एकानेच दुर्बिण आणली होती. आळीपाळीने ती घेऊन आम्ही मोनालला डोळ्यांत साठवून घेतले.

आजची साइटवर थोडं फोटो सेशन केलं
Basecamp1.jpgbasecamp2.jpg
आज आम्ही दगडावर बसून भरपूर गप्पा, फोटो, गाणी म्हणून साइट यादगार बनवली.
इतकी मस्त साइट, पण उतारावर होती. उद्याचा महत्वाचा दिवस, समिट गाठायचं होतं म्हणून लवकर झोपायचं ठरवलं पण हाय! मला झोपच लागेना. स्लीपिंग बॅग मधून सारखं घसरायला होत होतं. कुस बदलून, हात आत बाहेर करून सगळं करुन बघितलं. अजुन एक रात्र इथेच काढायची आहे या आठवणीने पोटात गोळा आला. शेवटी रात्री १२ वाजता झोप लागली.

झिरो पोइंटच्या आठवणीने लवकर जाग आलीच. आणि त्या वाट पहात असलेल्या सुंदर दिवसाची सुरुवात झाली.
BaseCampPahat.JPG

हिमालय - पिंडारी - फुकरिया ते झीरो पॉइंट

Submitted by साक्षी on 25 July, 2022 - 07:32

हिमालय - पिंडारी - द्वाली ते फुकरिया

आज समिट. भरपूर अंतर, आणि भरपूर उंचीवर जायचं होतं. आणि तिथे थोडा वेळ थांबून परत यायचं होतं. फुकरियाहून समिटला पोचायला साडे तीन ते चार तास लागणार होते. १२ किलोमीटरचा पल्ला होता. सकाळी लवकर निघालो होतो. लवकरची वेळ आणि गारवा यामुळे पाणी फार प्यायले नव्हते आणि चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या पाच मिनिटांत मला गार वार्‍याने इंगा दाखवला. डोकं भणभणल्यासारखं झालं. थांबून पाणी प्यायले तशी पाच मिनिटांत परत नॉर्मल झाले. जाताना हिमालयाची निरनिराळी चित्तथरारक लँड्स्केप्स आपल्याला मंत्रमुग्ध करुन टाकतात. आम्ही आजही पिंडार व्हॅलीतून प्रवास करत होतो. पिंडार ग्लेशियरमधील हवामान काही मिनिटांत बदलू शकते, त्यामुळे सकाळी लवकर निघुन ९:३०-१०:०० पर्यंत आम्ही समिटला पोचणार असा बेत होता. आजही मधे काही प्रवाह, काही ठिकाणी कडक बर्फ असे पॅचेस होते. घसरणार्‍या बर्फाचा एक पॅच ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि मोठ्या हिरव्यागार कुरणापाशी येऊन पोहोचलो.
मधली ही काही दृश्य

पहिला थांबा..इथुन बेस कॅम्प असा दिसत होता
OnTheWaySummit.JPG

चढा, चढा, चढत रहा
OnTheWaySummit1.jpg

मंत्रमुग्ध
OnTheWaySummit2.jpg

इथे शेवटच्या टप्प्यात आम्ही रॉकफॉल एरियात पोचलो. हा अतिशय संवेदनशील भाग आहे, कधीही वरून खडक कोसळू शकतात, त्यामुळे इथुन जाताना जरा सावध रहावं लागतं. एक जरा घसरडा बर्फ ओलांडला आणि आम्ही पायवाटेला लागलो. ही पायवाट जरा अवघड, अगदी निमुळती आहे, अनेक ठिकाणी तुटलेली आहे. पण समोर बर्फाच्छादीत चांगुच शिखर डोळ्यांचं पारणं फेडतं.

आणि आम्ही समिटला पोचलो. इथे एक पठार आहे. तिथे एक झोपडी आणि एक मंदीर. हे सुप्रसिद्ध पिंडारी बाबा किंवा बाबा धर्मानंद यांचे घर आहे. काही जण तिथल्या गवतात लोळत होते. मुलं बर्फात जोरदार दंगा करत होती आणि काही जण बाबा धर्मानंद यांच्या कडे चहा घेत होते. बाबा धर्मानंद आलेल्या प्रत्येकाला चहा देतात.
आता अगदी जवळ आलोय
OnTheWaySummit3.jpg

पण आजचा ट्रेक अजुन संपला नव्हता. झीरो पॉइंट साठी इथुन पुढे दिड किलोमीटर थोडं चालत, चढत जायचं होतं. इथे बसले असते तर परत उठणं आणि चढणं नकोसं झालं असतं , त्यामुळे पाच मिनिटं थांबून आम्ही पुढे निघालो. दमत दमत हे अंतर पार केलं आणि अहाहा! एका निमुळत्या वाटेवर पोचलो आणि आडो! 'You have reached the Zero Point' असा फलक दिसला आणि शीण काही काळापुरता निघुन गेला. १२,८०० फूटावर आम्ही उभे होतो. हा आनंद अवर्णनीय होता. इथे येईपर्यंत मला मी हे करु शकेन अशी खात्री नव्हती. इकडे तर फोटो सेशन मस्ट!
ZeroPoint1.jpgZeroPoint.jpgZeroPoint2.JPG
लिडर्स
TrekLeaders.jpg

शीण काही काळापुरता निघुन गेला असं म्हणते आहे कारण दुसर्‍याच मिनिटाला मला गरगरल्यासारखं झालं. इतक्या निमुळत्या कड्यावर आम्ही होतो. तिथे मी चक्क मांडी घालून बसले आणि हातात हनुवटी ठेउन बसले. आणि त्याहून विशेष म्हणजे तिथे मला काही सेकंद झोप लागली. ओक्सिजन लेव्हल कमी झाली असणार. भरपूर पाणी प्यायलं, जरा बरं वाटल्यावर खाली मंदिराशी परत आले. तिथे तो चहाही मला जाईना. मळमळ, डोकेदुखी, चक्कर यातलं काहीही मला आलटून पालटून होतंय असं मला वाटत होतं. आमच्यातल्या माहितगारांपैकी कुणीतरी कुठलीशी गोळी दिली. गोळी घेउन दहा मिनिटं डोळे मिटून बसले त्यांनन्तर मी परत माणसात आले. एकदम फ्रेश वाटायला लागलं. मग सगळे आपापल्या वेगाप्रमाणे परत फुरकिया ला परत आलो. आज झोप न होउन मला चालणार नव्हते. त्यामुळे आज मी गोळी घेउनच पडी टाकली ती एकदम पहाटेच जागी झाले.

हिमालय - पिंडारी - फुकरिया ते खाती - शेवट

Submitted by साक्षी on 14 August, 2022 - 20:48

हिमालय - पिंडारी - फुकरिया ते झिरो पॉइंट

आज २ जून उजाडला. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. टेंटची excitement संपून गादीची आठवण यायला लागली होती. पण अजुन धीर धरायला हवा होता. कारण आजचा ट्रेकिंगचा शेवटचा दिवस असला तरी longest distance कव्हर करायचं होतं. जवळपास १९ किमी.
RoadMap.jpg

शेवटचा ग्रुप फोटो
Group.jpg

काही ब्रँड्स इतके नावाजले आहेत त्यामुळे त्यांची जाहिरात करतोय असंच वाटेल कुणाला
Dcath.jpg

आधी दोन दिवसांत जितकं केलं तेवढं आज एका दिवसांत करायचं होतं. नेहेमीप्रमाणे सकाळी लवकर चालायला सुरुवात केली. रोजच्या सारखंच चालायला लागल्यावर थंडी जरा कमी झाली. फुकरिया पासून द्वालीला जवळ पास २ तासांत पोचलो. उतरण असल्यामुळे सगळ्यांचा वेग जरा चांगला होता. त्यानंतर मात्र वेगामधे तफावत होऊ लागली. काही जण पुढे गेले. काही रेंगाळत , थांबत निघाले. मुलं टणाटण उड्या मारत पुढेच!
खरं तर तेच जंगल, परत आज नव्याने बघितल्यासारखं वाटत होतं. इतकं मोहक की परत फोटो काढलेच.

काय झाडी, काय डोंगर, काय आकाश...सगळ ओके मधी हाय Mosking
यापेक्षा वेगळं कॅप्शन काय सुचलं नाही या फोटोला
DongerJhadAkash.jpg

सकाळचं कोवळं ऊन
HaladicheUn.jpg

मोहक जंगल
JungleWat.jpg
जंगलात मी
JunglatMe2.jpg

डाव्या गुढग्याची ligament आठवून उतरताना मला जास्त भिती वाटत होती. मी कायम ट्रेक करताना डाव्या गुढग्याला कॅप घालतेच, त्यामुळे उजव्या वर प्रेशर येतं आणि पुढे दोन दिवस तो दुखतो. तो तसा दुखणार असं मी गृहितच धरलं होतं, पण तो दुखलाच नाही. १५ दिवस आधी रनिंग करताना दोन्ही पायांची एकेक नखं दुखावली होती. काळी झाली होती. आत्ता उतरताना शूज मधे पाय हलत होता आणि नखं आपटत होती, ते जाणवत होतं. नंतर नंतर दुखायला लागली होती. मग मी शूज अजुन घट्ट बांधले. त्यामुळे नखं वाचली पण नंतर दुसर्‍या दिवशी तीन बोटांना ब्लिस्टर्स झाले. अर्थात ते मला तेंव्हा जाणवले पण नाहीत. त्या रात्री कळले आणि दुसर्‍या दिवशी चालताना जाणवले.

मधे एक वेळ अशी आली की मी एकटीच चालत होते. निरव शांतता, त्यात मधेच एखादा पक्षी गायचा आणि पावलांचा आवाज, हे इतकं अमेझिंग होतं पण तोवर एक गाइड कुठुन तरी प्रकट झाला. असं एकटं शक्यतो राहु नये म्हणून! मग आमचा एक कंपू मला भेटल्यावर तो परत गायब झाला. मधे एक लोकल मेंढपाळ जोडी भटली. त्यांच्या ६००-७०० मेंढ्या आहेत. त्यांच्या एका निवांत क्षणी त्यांच्याशी जरा गप्पा मरल्या. त्यांना विचारून फोटो काढलाय.
mendhpaal.jpg
ऊन त्यांना सहन होत नव्हतं त्यामुळे त्यांना ब्रेक्स घ्यावे लागत होते. तिथेही ऊन फार वाढलंय असं ते सांगत होते.

आज मी अगदी मजल दरमजल करत हा शेवटचा टप्पा पार केला. एका क्षणी, कुठुन मला इथे यायची दुर्बुद्धी झाली असंही वाटून गेलं, पण साईट गाठल्यावर दु:ख अर्थातच विसरायला झाले. आज आम्ही ७ तास चालत/ चढत आणि जास्त उतरत होतो. आज दुपारचं जेवण उशीरा
साइटला पोचल्यावरच केलं. इथे चार खोल्या मिळाल्या होत्या, त्यामुळे ज्यांना पाठीचे त्रास होत होते, ते आणि मुलं अशी खोल्यांत झोपली. बाकीचे टेंट मधे. रात्री गप्पा, थोडा वेळ शेकोटी असा कार्यक्रम रंगला.

दुसर्‍या दिवशी गाड्या जिथे येणार होत्या तिथपर्यंत परत चढउतार असल्याने नाइलाजाने दुखर्‍या पायांवर शूज चढवले. छोट्यांना सगळ्यांच्या समोर Certificate देऊन त्यांना जरा खुश केलं आणि निघालो
Certificate.jpg

आमच्यातल्या ज्यांना जमतंय ते ऐश करण्यासाठी बिनसरच्या महिंद्रा रेसॉर्ट्ला दोन दिवस रहाणार होतो. चेक इन करायला पण कुणाला दम नव्हता. पहिलं काय तर नेट. ते मिळाल्यावर कशाची शुद्ध! रूम्स मिळाल्यावर या खालोखाल दुसरं महत्वाचं काम केलं, ते म्हणजे आंघोळी! गरम पाण्याने आंघोळ आणि केसांना पाणी लगल्यावर एकदम प्रफुल्लित वाटलं.
काही जण आधी आणि काही नंतर फोनला चिकटले.
Binsar.jpg

दोन दिवस इथे जरा बाजारात फिरून, खाण्याचे चोचले करून आम्ही सुंदर आठवणी आणि अनुभव घेऊन आपापल्या गावी परतलो.

समाप्त.

https://www.maayboli.com/node/82068





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...