Tuesday, July 26, 2022

दुर्गरक्षण

 

दुर्गनिवेश ✽


          दुर्ग म्हणजे  जिंकण्यास अवघड, सहजी हल्ला करून कोणी  जिंकू पाहिल त्यास परमकठीण; असे बलदंड स्थान. या दुर्गाचे दुर्गमत्व अवलंबून असते त्याचे भौगोलिक स्थान आणि त्याची बांधणी यावर. यातही बांधणी कैसी यावर बरेच काही अवलंबून.. म्हणूनच संग्रामदुर्गसारखा किल्ला २ -२ महिने भांडता राहतो.. या साऱ्या बांधणीत महत्वाची अंगे म्हणजे भोवतीचे खंदक, तट-बुरुज आणि त्या दुर्गात प्रवेशायचे ती महाद्वारे. 

          अगदी कौटिल्यापासून आज्ञापत्रापर्यंत किल्ल्याचे दरवाजे कसे बांधावेत  याबद्दल उल्लेख आहेत. आपल्या महाराष्ट्रात नानाविध प्रकारचे प्रवेशायचे मार्ग अनेक दुर्गांवर आहेत. जसा 'सीतेच्या हृदयात प्रवेश मिळणे रावणास अशक्य तद्वत अनाहुतास या दरवाज्यातून प्रवेश अशक्य.' अशा  महत्वपूर्ण अंगाचे दर्शन आपण या ब्लॉगद्वारे करणार आहोत.

          'दरवाजे  बांधावे ते खालील मारा चुकवून , पुढे बुरुज देऊन, येताजाता सर्व बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे', असा उल्लेख आज्ञापत्रात आहे. म्हणजे दरवाजे बांधताना तो सहजी खालून दिसणारा नसावा, जणू तटाचाच भाग असल्यासारखा वाटावा, जेणे करून गनिमास तो ओळखू येऊ नये. या प्रकारची बांधणी जवळपास सर्व किल्ल्यांवर हमखास दिसते. अगदी शेवटचा बांधलेला किल्ला म्हणजे सोनोरीजवळचा मल्हारगड. येथेदेखील महाद्वार, वर उल्लेखल्या प्रमाणे बांधले आहे. याच बांधणीला गोमुखी पद्धतीची बांधणी देखील म्हणतात. याचा युद्धशास्त्रीय पहिला उपयोग म्हणजे शत्रू सैन्य येथपर्यंत पोचले तरी भोवतीच्या बुरुजांवरून ते मारगीरीच्या टप्यात येते आणि बाण, हुक्के, बंदुकांनी ते भाजून काढता येते.
          दुसरे म्हणजे हत्तीच्या धडकेने अथवा मोठ्या ओंडक्याच्या माराने असा दरवाजा तोडता येत नाही, कारण एकदम वळण असल्याने फोडण्यासाठी लागणारा वेग आणि त्याद्वारे मिळणारे बल (force) प्राप्त करता येत नाही. 
          अजून एक वैशिठ्य म्हणजे अनेकदा या महाद्वारापाशी जाण्यासाठी पायऱ्या असतात .. म्हणजेच चढ असतो, जेणेकरून पायऱ्या चढूनच शत्रुसैन्य धापा टाकीत दमून गेले पाहिजे.
खालील आकृतीमध्ये साधारणपणे आढळणारी बांधणी दाखवली आहे.
गोमुखी बांधणी

          अशा दरवाजातून आत प्रवेश करते झाले दोन्ही बाजूस वर कोपऱ्यातून पाहावे .. काय दिसते ? दगडी गोल कोपऱ्यातून पक्के केले असतात . कशाकरिता ? तर महाकाय दरवाजे फिरवून उघडबंद करण्यासाठी. क्वचित प्रसंगीच हे दरवाजे पूर्ण उघडण्याची वेळ येई. नाहीतर सारी यातायात दिंडी दरवाज्यातून.  अनेक ठिकाणी हे दगडी गोल दिसतातच.काही ठिकाणी यांच्या बरोबर खाली गोल Grooves दिसतात . वरीलप्रमाणे दरवाजे फिरवण्याकरिता यात बसवले जायचे. 

          एखाद्या किल्ल्याच्या महाद्वारावर अणकुचीदार खिळे मुद्दाम लावलेले असत, म्हणजे हत्तींना अथवा इतर कोणासही धडक देणे शक्य होऊ नये.
महाद्वार, त्यावरील अणकुचीदार खिळे, दिंडी दरवाजा

          दरवाज्यामागे समोरासमोर दोन चौकोनी आकाराची भोके दिसतात. एक खूप लांब असते, इतके कि साध्या डोळ्यांनी शेवट दिसत नाही आणि दुसरे साधारण दोन-तीन फुटांचे.  जे लांब भोक असते, यात मोठा लाकडी ओंडका म्हणजे अर्गळा असे . एकदा दरवाजा फिरवून बंद केला कि हि अर्गळा आरपार बसवून पक्की करायची मग तो दरवाजा बाहेरून धक्के देऊन तोडणे अगदी अशक्य होत असे. 
दरवाजा फिरवण्यासाठी असणारे गोल आणि अर्गळा
      पुरंदरच्या सर दरवाज्यात हा ओंडका सहज पुढे ओढता यावा म्हणून लोखंडी रोलर सुद्धा वापरलेला दिसतो.
पुरंदरच्या सर दरवाज्यातील रोलर

          आता दरवाज्यातून पुढे आलो कि बाजूला दिसतात देवड्या, देवडी म्हणजे द्वाररक्षकांची छोटीशी खोलीच. ... या ठिकाणी पहारेकरी येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करीत, त्याकडे असणारे सामानसुमान, परवाने तपासूनच अभ्यागतास गडावर प्रवेश दिला जात असे..

          महाद्वाराचा विशेष भाग म्हणजे उंबरा. प्रचंड आकाराचा उंबरा बहुतेक सर्व किल्ल्यांवर आढळून येतो. महाद्वारातून पाणी जाण्यासाठी मोरी म्हणजेच एक आरपार भोक केलेले असते. वाहून येणाऱ्या पाण्यासाठी मार्गिका करून ते पाणी मोरीपर्यंत आणून दाराबाहेर काढून दिले जात असे.

          या महाद्वार बांधणीचे प्रकार मात्र अनेक आहेत.  काही आहेत पत्थरात कोरून काढलेले मार्ग.. एक आहेत भुयारी मार्ग हे देखील काही वेळेस दगडात कोरून काढलेले तर काही आहेत मुद्दाम बांधून काढलेले. बांधून काढलेल्या दरवाजांचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत.

  • दगडात कोरून काढलेले मार्ग --- विविध दुर्ग हे जसे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य तसेच त्यांच्या बरोबरीने उभ्या असलेल्या लेण्या हे देखील एक वेगळेपण. इतक्या मोठ्या प्रमाणात डोंगरच्या डोंगर पोखरून त्यात विहार घडवलेले. याला कारण म्हणजे या मुलुखात असणारे एकसंघ दगडांचे डोंगर . या  डोंगरांवर मग तयार झाले गडकोट आणि त्याचे मार्ग देखील याच दगडात कोरून तयार केले. वरून सरळ दगड कोरत कोरत आणायचा. एखाद्या नळीतून गेल्यासारखा मार्ग .. घडीव पायऱ्या .. कित्येकदा अखंड दरवाजेच आरपार पोखारायचे.. मागे देवड्या बांधायच्या, त्याही दगड पोखरून. बरे पोखरला म्हणून कुठे अडवा तिडवा कापलाय असे खचित होणार नाही. एकसलग कातरत नेलेल्या भिंती, सम प्रमाणात उंचीच्या पायठण्या, वळण असेले तर तेही अगदी प्रमाणबद्ध.  असे दरवाजे कोठे आहेत तर जुन्नर जवळचा हडसर अथवा पर्वतगड . जीवधनदेखील असाच. मग पेठचा कोथळीगड , अहुप्या खालचा गोरख, त्रंबकेश्वरचा त्रंबकगड किंवा ब्रह्मगिरी आणि भंडारदुर्ग.. समोरचे हरिहर आणि भास्करगड सध्या प्रसिद्धच आहेत. पाटणपासला सुंदरगड देखील विसरता कामा नये. सर्वात उंच असा साल्हेर आणि समोरचा सालोटा.अशा  कितीतरी दुर्गांचे दरवाजे अखंड कातळात कोरून काढलेले. 
    • हडसरचा राजमार्ग या सर्वात उजवा असेल. राजमार्गाच्या पायऱ्या चढून गेलो कि समोर उभी राहते दोन्ही डोंगरांना जोडणारी प्रचंड भिंत. या भिंतीपासूनच सुरु होते कातळकोरीव वाट.
      हडसरची वळणावळणाची वाट आणि दोन्ही दरवाजे
    • पहिला दिसतो तो साधारण १५ ते २० फुट उंच बुरुज आणि त्याच्या उजवीकडे वळणारी वाट आपल्याला उभी करते पहिल्या दरवाज्यात. येथून हि कलाकारी सुरु होते.दरवाजा, त्याच्या मागे असणाऱ्या साधारण पाच पन्नास पायऱ्या, उजवीकडे असणरी देवडी संपूर्ण दगड कोरून काढलेले. पायऱ्या चढून आले कि पुन्हा एक वळण घेऊन काही पायऱ्या चढून आपण येतो एका नळीच्या तोंडावर.
      गोल गोल फिरत जाणारी वाट आपणास दुसऱ्या दरवाजासमोर उभी करते. येथेही पहिल्याचीच प्रतिकृती; मात्र अधिक भव्य. दरवाजासमोर उभे राहिले कि चारही बाजूस २५ -३० फुट उंचीच्या भिंती आपणाला वेढून टाकतात.
      हडसर -- दुसरा दरवाजा
      कदाचित पूर्वी यावर छतदेखील असावे, आत्ता मात्र थेट अस्मान दिसते. यामागे जाणाऱ्या पायऱ्या अगदी कमाल आहेत, १० -१२ फुट रुंद असा हा वळणदार जिना आपणाला गडात आणून सोडतो. एकूण १०० पायऱ्या,दोन भव्य दरवाजे, देवड्या अशी हि कलाकृती पाहता आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. अशीच गम्मत जीवधनच्या किल्ल्यावर आहे. 
    • अशा प्रकारचाच दरवाजा आहे तो हडसर-जीवधनपासून बराच लांबच्या किल्ल्यावर. तो किल्ला म्हणजे सुतोंडा. हा आहे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर. मुख्य डोंगरापासून विलग करण्याकरिता अक्षरशः पन्नास फुट खिंडच कातळ कोरून इथे तयार केली आहे.याच खिंडीत पूर्णपणे दगडात कोरून काढलेला दरवजा आणि पायऱ्या आहेत. हडसरचीच छोटी प्रतिकृती जणू .
      सुतोंडा कातळात कोरलेले द्वार
    • अजून एक दुर्ग म्हणजे कराड पाटण जवळचा सुंदरगड अथवा दातेगड. यावर असणारी विहिर प्रेक्षणीय आहेच मात्र दातेवाडीकडून येणारा मार्ग देखील पूर्णपणे दगडात कोरून काढलेला, इतकेच काय पण समोर ५ -५ फुट उंचीचे मारुती आणि गणपती देखील कोरून काढलेले. 
    • आता काही वैशिट्यपूर्ण दरवाजे. एक आहे पेठ कोथळीगड.. याच्या बालेकिल्यावर जायचे म्हणजे भैरोबाच्या गुहेत जायचे, उजवीकडे गुहेतूनच वर जाणाऱ्या पायऱ्या. संपूर्णपणे आच्छादित.हा जिना चढून गेलो कि दिसतो मुख्य दरवाजा.
      कोथळीगडावर जाणारा मार्ग
      सध्या हरिहरगड प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. याच्या पायऱ्या देखील पूर्णपणे दगडात कोरून काढलेल्या. हरिहर इतक्याच सुंदर कोरीव पायऱ्या आहेत गोरखगडावर. विशेष म्हणून याचा दरवाजादेखील कोरून काढलेला.
  • कोरून काढलेल्या पायऱ्यांचे मार्ग -- काही दुर्गांवर जाण्यासाठीच्या पायऱ्या दगडात कोरून काढलेल्या आहेत. तर दरवाजे  अथवा बाजूची तटबंदी चिरेबंदी बांधणीची. असे दुर्ग अनेक आहेत. पुणे -मुंबईकरांचा आवडता दुर्ग म्हणजे विसापूर . याच्या दिल्ली दरवाजाच्या पायऱ्या दगड फोडून केलेल्या, मात्र वरील दरवाजा बांधलेला असावा. याच विसापूरच्या एका बुरुजावरून येणारा चोर दरवाजा असाच अर्धा दगडात कोरलेला तर अर्धा बांधलेला. सज्जनगडावर देखील चढताना पहिल्या दरवाज्याची हीच गत, कराड जवळचा वसंतगड याच जातीचा. केंजळगड, नारायणगड यासारख्या गडांची तटबंदी पार ढासळून गेली आहे मात्र पायऱ्या आणि बाजूला असणारे अवशेष यांवरून हा अंदाज लावता येतो. तिकोन्याचा बालेकिल्ला मात्र यातला दादा आहे, नुकत्याच येथील काही दगडी पायऱ्यांवर सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या असल्या तरी उर्वरित पायऱ्या  जश्याच्या तश्या कातळात घडवलेल्या आहेत.
    तिकोना बालेकिल्ला मार्ग
    सरसगडावर जाताना देखील या कातळकोरीव पायऱ्या मन मोहून टाकतात.
    सरसगड
    पट्टागडावर पूर्वी वापरात असणारा त्रंबक दरवाजासुद्धा असाच आहे.. कितीतरी नावे सांगता येतील पण विस्तारभयास्तव थांबणे उचित. 
  • बांधून काढलेले मार्ग -- अनेक दुर्गांवर मार्ग कोरून काढावा अशी परिस्थिती असेलच असे नाही, मात्र येथील मार्ग, दरवाजे सारेच दगडांनी बांधून काढलेले. 

    • एकद्वारी -- काही किल्यांवर पायऱ्या अथवा फरसबंद मार्ग आणि त्यानंतर एखादे महाद्वार कि गडप्रवेश झाला. वानगीदाखल अनेक दुर्ग आहेत. कोकणातले दुर्ग उंचीने थोडके, त्यातही महत्वाचे अपवाद सोडल्यास सगळेच घाटांवर, नदी मार्गांवर लक्ष देण्यासाठी बांधलेले. अशा किल्ल्यांवर एखादा दरवाजा पुरेसा होई. माहुलीपासून, तळा - घोसाळा,  अवचितगड,  निवती किल्ल्यापोवेतो एखादेच महाद्वार आहे. समुद्रतीरावरील कोरलाई,  बाणकोट, पूर्णगड, जयगड या किल्ल्यांना देखील एकेक द्वार आहे. कमी महत्वाच्या किल्यांना अशी एकद्वारी रचना आहेच मात्र मातब्बर म्हणता येतील असे सुधागड आणि सिद्धगड यांना देखील एकच द्वार आहे. देशावरील अनेक किल्ले असे एकद्वारी आहेत, मात्र महत्वाचे असे अजिंक्यतारा, प्रतापगड यांसही एकच महाद्वार आहे ,  तोरणा, पुरंदर, राजगड यांच्या किमान माचीवर जाण्याकरिता असे एकद्वारी मार्ग आहेत.  समुद्रात बांधलेले सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग देखील याच प्रकारात मोडतात. 
      सुवर्णदुर्ग 
    • अनेकाद्वारी -- एखादा दुर्ग असा कि त्यास जाण्याकरिता दरवाजांची शृंखला पार करावी लागते. अतिमहत्वाच्या दुर्गांवर अशी बांधकामे आढळतात. यात सर्वात थोरला दुर्ग म्हणजे शिवनेरी.. महा दरवाजा,  गणेश , परवानगी, पीर, हत्ती , मेणा, कुलूप दरवाजा असे ७ दरवाजे आहेत. त्या पुढे क्रमांक लागतो लोहगडचा. गणेश दरवाज्यापासून सुरु झालेली हि शृंखला नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महाद्वार अशी संपते. यातील सर्पिलाकार मार्ग आणि सुबकतेने बांधलेल्या पायऱ्या दर्शनीय आहेत. पुणेकरांचा प्रिय सिंहगड देखील असाच. पुणे दरवाजा म्हणजे एकूण ३ दरवाजांची मालिका आहे, तसेच कल्याण दरवाजा याचे एक जवळचे उदाहरण आहे.
      कल्याण दरवाजा
      पुरंदरचा सर दरवाजादेखील ऐसाच एकामागोमाग एक उलगडत जातो. विजयदुर्गसारख्या मातब्बर किल्ल्यास तिहेरी दरवाजा आहे. अन्तुरचा किल्ला देखील असाच अनेकद्वारी. वेताळवाडीचेही दरवाजे अतिसुंदर.
      वेताळवाडी 
      कर्नाटकातील सागर अथवा शहापूरच्या दुर्गावर एकामागोमाग अनेक दरवाजे आहेत. एकूण तटबंदीचेच ६ स्तर आहेत. प्रत्येक वेढ्यात प्रवेश  करण्यासाठी एकेक दरवाजा आहे. 
      शहापूर अथवा सागरचा किल्ला  
    • भूदुर्ग -- भूदुर्गांचे बलस्थान म्हणजे भोवतीचे खंदक, एकामागोमाग असणारी भव्य तटबंदी  आणि त्याचे दरवाजे हेच होय. परंडा, नळदुर्ग, बिदर, कल्याणी यांसारख्या दुर्गात जाताना खंदक आहेत, अनेक पदरी तटबंदी आहे. यांचे मार्गही वळणावळणाचे आहेत, त्यासाठी अनेक दरवाजे ओलांडीत प्रवेश करावा लागतो. बाजूला भव्य उंचीची तटबंदी, बुरुज ,मारगीरीच्या जागा असे पाहून जीव दडपून जातो.
      किल्ले बिदरचा बुलंद दरवाजा आणि अलीकडे असलेले खंदक
      किल्ले पल्लकड -- खंदक 

    • किल्ले परांडा

  • विशेष दरवाजे -- विशेष दरवाजे म्हणजे बांधणीच्या अथवा निवेश दृष्टीने वेगळे. म्हणजे कसे तर जंजाळा उर्फ वैशागडचा एक दरवाजा चक्क बुरुजातून बाहेर काढला आहे. मल्हारगडास एक रस्ता बुरुजातून बाहेर पडतो.
    वैशागडाचा बुरुजातील दरवाजा
    वनदुर्ग नावाचा एक किल्ला आहे कर्नाटकात, त्याचे महाद्वारच बुरुजाच्या मागून काढले आहे.
    वनदुर्गात जाणारा मार्ग
    तिकोन्याला महाद्वाराला लागुनच चोरदिंडी आहे. राजगडला गुंजावाण्याकडून चढताना चोरदिंडीतून बसूनच आत शिरावे लागते. वैराटगडाचा चोर दरवाजा म्हणजे अक्षरशः चिंचोळा बोळ उतरून जावे लागते. 
    वैराटगडाचा चोर दरवाजा
द्वारशिल्पे -- अनेक दरवाज्यांवर विविध प्रकारची शिल्पे अथवा शिलालेख दिसतात, त्यावरून त्या दरवाज्यांच्या बांधणीचा काळ अथवा राजवट ठरवता येते. किल्ल्यावर कोणी कोणी आधिपत्य गाजवले त्याचा अंदाज येतो. साधारणतः या शिल्पांवर कमळ अथवा चक्राकार नक्षी दिसून येते, मारुती, गणपती सारखी दैवते असतात. काही ठिकाणी बहिरोबा, म्हसोबा, वेताळ, जनाई मनाई  अशी दैवते विराजमान असतात. पुरंदरच्या सर दरवाज्यात लक्ष्मी आहे. अजिंक्याताऱ्याच्या महाद्वारावर गणपती, मारुती आणि गरुड आहेत. तसेच आतील बाजूस अनेक शिल्पे आहेत.. गडाच्या महाद्वारावर गंडभेरुंड, शरभ अथवा व्याल असे काल्पनिक प्राणी बहुदा आढळून येतात. 
विविध शिल्प
सुधागडच्या महाद्वारावरील शिल्प

रायगडाच्या महाद्वारावरील शिल्प
          अनेकदा किल्ल्यांच्या द्वारावर अथवा एखद्या बाजूस /आतल्या बाजूस शिलालेख आढळून येतात. त्यांवर निर्मात्याचे नाव, अथवा राज्यकर्त्याचे नाव कोरलेले असू शकते अथवा दुर्गनिर्मितीचा अथवा दुरुस्तीचा कालावधी  कालावधी यावरून कळू शकतो.. 
रोहिड्यावरील गजशिल्प आणि शिलालेख
वनदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारावर सूर्य चंद्र आणि  विष्णूच्या दक्षिणात्य गंधाची तसेच शंख आणि चक्राची प्रतिमा आहे.
वनदुर्ग --अनुक्रमे सूर्य , चक्र, वैष्णव गंध , शंख आणि चंद्र
गजांत लक्ष्मी आणि वेल -- किल्ले शहापूर
महिमानगड, सातारा येथील महाद्वाराच्या  खालच्या बाजूस असणारे गजराज
किल्ले मार्तूर,कर्नाटक-- अस्सल कानडी मुलुखात मराठी मध्ये श्री पांडुरंग प्रसन्न लिहिलेले आहे 

किल्ल्यास एकच दरवाजा हा ऐब थोरालाच आहे 


            ऐब म्हणजे व्यंग, दोष . म्हणजे दुर्गास एकच दरवाजा असेल तर तो फार मोठा दोष आहे. कारण ? कारण असा एकच दरवाजा शत्रूने अडवून धरला किंवा जिंकून घेतला तर अगदीच कठीण अवस्था होत असे. आतले आत अडकून जात असत. जणू बिळात कोंडल्यासारखी अवस्था होई. त्यामुळे ' याकरिता गड पाहोन एक, दोन तीन दरवाजे तैशाच थोर दिंड्या करून ठेवाव्यात.' असे 'मार्ग सर्वदा चालो न देता ' वेळप्रसंगी त्या उघड्या करून त्यातून पळ काढावा अथवा रसदीचा पुरवठा करीत जावा. अशाच केदार दरवाजातून पुरंदरास रसद पोचविल्याची कथा आहे. झुल्पिकार खानाचा वेढा राबत्या बाजूस असताना, वाघ दरवाज्याने राजाराम महाराज निसटून गेल्याचे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे असे एकाहून अधिक दरवाजे कित्येक किल्ल्यांवर आढळून येतात.


        या साऱ्या दरवाज्यांची उदाहरणे पहायची असल्यास राजगड आणि रायगडासारखे दुसरे उदाहरण नाही. 
उभय दुर्ग साक्षात शिवछत्रपतींच्या देखारीखीखाली उभारलेले. राजधानीचे दुर्ग. फक्त संपूर्णपणे दगडात कोरलेल्या पायऱ्या सोडल्यास सर्व प्रकारचे मार्ग राजगडावर आहेत. खालील उदाहरणात माची आणि त्यावर असणारे मार्ग त्यांचे प्रकार लिहिले आहेत.
  1. पद्मावती माची -
    1. पाली दरवाजा -- बांधून काढलेला अनेकद्वारी गोमुखी पद्धतीचा मार्ग
    2. चोर दिंडी -- विशेष मार्ग . संकटकालीन मार्ग
  2. सुवेळा माची --
    1. गुंजवणे दरवाजा --बुरुजात बांधून काढलेला अनेकद्वारी गोमुखी पद्धतीचा मार्ग
    2. काळेश्वरी दरवाजा  -- मिश्र पद्धतीचा एकद्वारी मार्ग
    3. चोर दिंडी -- विशेष मार्ग . संकटकालीन मार्ग
  3. संजीवनी माची --
    1. आळू दरवाजा -- बांधून काढलेला एकद्वारी मार्ग
  4. बालेकिल्ला
    1. महाद्वार -- कोरून काढलेल्या पायऱ्यांचे मार्ग, बांधलेला दरवाजा
    2. चोर दिंडी -- विशेष मार्ग . संकटकालीन मार्ग
          रायगडचे महाद्वार म्हणजे परमभाग्य. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' ... हा अनुभव देणारे. यातून प्रवेश करताना पूर्णपणे U आकारात वळावे लागतेच, पण प्रवेश केल्यावर काय दिसते ,तर प्रचंड भिंत. आत आलेला शत्रू याने अचंबित व्हावा असे यामागचे प्रयोजन. त्या भिंती शेजारून छोट्याश्या बोळातून बाहेर पडावे लागते. मोकळ्यात प्रवेशताच समोर आणखी दोन बुरुज आणि पायऱ्या. यातून गेल्यावर आपण पोहोचतो एका प्रांगणात. आधीच भांबावलेला शत्रू या चक्रव्युहात अलगद सापडला जावा अशी योजना यामागे आहे. 



रायगड महाद्वार
प्रवेश केल्यावर

रायगड परिक्रमा करताना दिसणारे महाद्वार

असेच बांधकाम लोहगडावर देखील आहे. मात्र लोहागडचे बांधकाम अगदी अलीकडचे, उत्तर पेशवाईत झालेले.

          या अशा अभेद्य महाद्वारांनी अनेक राजवटी पहिल्या, अनेक थोर विभूतींचे, महात्म्यांचे चरणस्पर्श यांना झाले. कित्येकदा  त्यांचे शब्द यांनी ऐकले असतील , त्यांच्या भावभावना जवळून पहिल्या असतील, इतकेच काय त्यांचे श्वास देखील येथल्या दगडांवर आदळून वाहत्या वाऱ्यात मिसळून गेले असतील, गड चढताना त्यांच्या घामाच्या धारा येथेच निवारल्या असतील.  या द्वारातून आम्ही मात्र करंटेपणा करीत आमची नावे लिहितो आहोत. त्यांवर चढून सेल्फी काढतो आहोत, शत्रूच्या अग्निमाराने न ढासळले ते दो बाजूचे बुरुज , वरचे दगड आमच्या धक्क्याने लोटून देतो आहोत.  

        याहून जर गड चढताच उंबऱ्यावर डोई ठेऊन त्या वास्तुपुरुषाचे दर्शन घेतेले, त्याला विचारले कि, 'गड्या तू बघितलेल्या अनुभवलेल्या  त्या असंख्य क्षणांपैकी एखादा मला सांगशील का' ? तरच आमचे गड दर्शन  खऱ्या अर्थाने सुरु होईल. हे जमले नाही, तर उथळपणे ट्रीपला जायला ठिकाणं कमी नाहीत, खुशाल ती वाट धरावी.

--- मर्यादेयं विराजते
टीप :
  • येथे मी स्वत: पाहिलेल्या दुर्गांचाच उल्लेख केला असल्याने, अनेक उल्लेख राहिले असतील. 
  • माझ्या अल्पमतीप्रमाणे लिहिण्याचा यत्न  केला आहे, यात काही राहून गेले असल्यास अथवा काही  विशेष असे दरवाजे असतील तर नक्की कळवावेत म्हणजे त्यांचा उल्लेख करता येईल.
  • साधारणपणे पुणे-मुंबई जवळच्याच किल्ल्यांची उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून  जिज्ञासू,नवीन भ्रमंती करणारे  प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेता येईल.
 
 
 
 
 http://nileshbhinge.blogspot.com/
 
 
 
 

        'गडकोट संरक्षणाचे कार्य परम नाजूक आहे' असा उल्लेख आज्ञापत्रात येतो. या 'परम नाजूक' कार्याचे  'परम कठीण' असणारे भाग म्हणजे तटबंदी आणि खंदक.
    मागच्या ब्लॉगमध्ये आपण दुर्गनिवेश म्हणजे किल्ल्यांच्या दरवाज्यांबद्दल माहिती पहिली होती. या ब्लॉगमध्ये दुर्गाचे संरक्षण करणारे तटबंदी खंदक यांच्याबद्दल माहिती घेऊ. 
 तटबंदी म्हणजे किल्याच्या संरक्षणाचे प्रमुख अंग. खरेतर तटबंदी किंवा खंदक यांच्यामुळेच किल्ल्याच्या सीमा निश्चित होतात. किल्याला आकार येतो. किल्ल्याचा विस्तार ठरतो. यामुळे दुर्ग बंदिस्त होतो. तटबंदी बांधताना पहिला विचार येतो तो किल्याचा प्रकार कुठला आहे ते . भुदुर्ग असेल तर थेट तटबंदी न बांधता त्याबाहेर एकेरी दुहेरी क्वचित तिहेरी खंदक खोदले जायचे. डोंगरी किल्ला असेल ते कड्यांचे नैसर्गिक संरक्षण पाहून तटबंदी बांधली जात असे.

      खंदक  खंदक म्हणजे दुर्गाचे सर्वात बाहेरचे अंग. राज्यव्यवहारकोशात यास परिखा असे म्हणले आहे. खंदक म्हणजे मोठे मोठे लांबवर सलग खणलेले खड्डे. मोठे म्हणजे किती मोठे तर साधारण पंधरा वीस फूट रुंद आणि तितकेच खोल. लांब आणि सलग म्हणजे किती तर संपूर्ण किल्ल्याला वेढले जातील इतके. असे खंदक खणून त्यात पाणी फिरवायचे. त्यात मगरी सुसरीसारखे प्राणी सोडायचे. यामुळे शत्रू थेट तटबंदीस भिडू शकत नसे. तटबंदीवर चाल करून येण्याआधी हे खंदक बुजवणे आवश्यक होऊन जाई. त्याशिवाय शत्रूसैन्य किल्ल्यात घुसवणे अशक्य असे. 
         कौटिलीय अर्थशास्त्रामध्यें खंदक म्हणजे पारिखा कश्या बांधायच्या त्याचे विवरण तिसऱ्या अध्यायात आले आहे. त्यामध्ये तिहेरी खंदक बांधावेत ते अनुक्रमे चौदा,बारा आणि दहा दंड इतक्या रुंदीचे असावेत, असे म्हणले आहे. एक दंड म्हणजे साधारण सहा फूट. खंदकाची खोली रुंदीच्या पाऊणपट किंवा अर्धी असावी. हे खंदक दगडांनी किंवा विटांनी बांधलेले असावेत, असा उल्लेख आहे. या खंदकात अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग असावेत. खंदकात कमळे आणि मगरी असाव्यात असेदेखील सांगितले आहे.
        आज्ञापत्रात 'भुईकोट किल्यास तटाखालते जितके मैदान असेल तितका खोल आणि रुंद खंदक खणून तटाचे पायी दुसरा परकोट मजबूद बांधून त्यावर भांडी, जुंबरे ठेऊन खंदकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊ न पावे ऐसे करावे.'  यावरून खंदकाचा मुख्य उपयोग शत्रूस मुख्य तटापासून दूर ठेवण्यासाठी होई असे कळते. तसेच खंदकामुळे थेट तटबंदीला सुरुंग लावून उडवणे अशक्य होते. 
        खंदकाची रचना समजून घेण्यासाठी आपल्याला जावे लागते कर्नाटकात. बिदर, विजापूर, नळदुर्ग असे नामांकित किल्ले. यांच्याभोवताली मोठाले खंदक आहेत. काळाच्या ओघात काही बुजवले आहेत. पण त्यांचे अवशेष देखील भव्यता दाखवून देतात. नळदुर्ग किल्ल्याला खंदक म्हणून बोरी नदीचे पात्रच फिरवले आहे. 
 
बिदर किल्ल्याचे खंदक
 
  
वेल्लोर किल्ला खंदक आणि तटबंदी

    महाराष्ट्रात मी पाहिलेल्या किल्ल्यांमध्ये समुद्रतटावर असलेल्या बऱ्याच किल्यांभोवती खंदक आहेत. हे दुर्ग समुद्राच्या तटावर, थोड्याश्या उंचीवर बांधले आहेत. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूने जमीन अशी यांची रचना आहे. किल्यापासून समुद्राकडे तटबंदी बांधलेली आहे आणि  हे खंदक मुख्यत्वे जमिनीच्या बाजूस आहेत. बाणकोटच्या किल्यास खंदक आहे. यशवंतगड नाटे या किल्ल्यासदेखील खंदक आहे. गणपतीपुळे जवळ असलेला जयगडदेखील याला अपवाद नाही. गुहागरजवळ असलेला गोपाळगड अतिशय मजबूत किल्ला, इथे सुद्धा खंदक बांधून मजबुती आणली आहे. मात्र सध्या अनेक खंदकांमधून झाडेझुडपे उगवली असल्याने त्यांच्या खोलीची कल्पना आपल्याला येत नाही. 
जयगडचा खंदक  

अंतुर किल्ल्यास जमिनीच्या बाजूने रुंद  खंदक खणून मुख्य रांगेपासून अलग केले आहे

      पण नुसते खंदक असून उपयोग होत नसे,कारण तोफांचा मारा करीत त्याच्या covering fire मध्ये  शत्रू हे खंदक भरून काढीत असे. एकदा खंदक भरून त्यामार्गाने शत्रू थेट किल्याला भिडू शकत असे. अशी उदाहरणाने औरंगजेबाच्या स्वारीत भरपूर आहेत. तसेच डोंगरी किल्यांवर सपाट जागा नसल्याने असे खंदक बांधणे शक्य नसे. त्यामुळेच डोंगरी किल्यांवर खंदक कमी प्रमाणात अथवा दिसतच नाहीत . 

    तटबंदी तटबंदी हे कोणत्याही दुर्गाचे सर्वात महत्वाचं अंग आहे. तटबंदीचे मुख्यतः दोन भाग पडतात पहिला  सरळ रेषेत बांधलेली भिंत आणि दुसरा बुरुज
संस्कृतमध्ये तटास प्राकार तर बुरुजांना कोटगुल्मक वा अट्टालक म्हणले आहे. या तटबंदीची उंची बाहेरच्या बाजूने  किती असावी हे त्याच्या ठिकाणावर ठरते. म्हणजे एखाद्या कड्यावर नैसर्गिक संरक्षण लाभले असल्याने तेथील तटबंदी १५ ते २० फूट उंच असेल तरी चालेल मात्र भूईकोट किल्ले अथवा थोड्या सपाट जागेवर असणाऱ्या प्रकारची उंची ५०-६० फूट असते.  तटबंदी बांधताना सगळे दगड हे साधारणतः चौकोनी आकाराचे असले तरी एकसारखे नसतात. हे चिरे एकमेकात घट्ट बसतील अशाप्रकारे घडवून अगदी शेवटी एकाच उंचीवर तटबंदी येईल असे घडवलेले असतात. अशा बांधणीमुळे तटास जास्त मजबुती प्राप्त होते. हे दगड शक्यतो गडावरच खणून काढीत असावेत. कारण अशा खाणी बऱ्याच किल्यांवर दिसून येतात. विशेषतः विसापूरकिल्यावर पश्चिमदिशेस लोहगडाच्या बाजूस अशा खाणी पडलेल्या आहेत. यामध्ये दगड काढताना कापलेले भाग आजही व्यवस्थित दिसून येतात. मात्र यामध्ये आज पाणी साठेलेलं असल्याने पावसाळासोडून इतरवेळी हे कापलेले दगड व्यवस्थित ओळखू येतात. 
पट्टा उर्फ विश्रामगडावरील कापलेले दगड 

तटबंदी बांधताना दोन चिरे एकमेकात बसवण्यासाठी सिमेंट म्हणून पूर्वी चुना वापरीत असत. यासाठी लागणारे घाणे अनेक गडांवर आजही दिसून येतात.

चुन्याचा घाणा 



घाणा चालवण्याची पद्धत

        या तटबंदीचे फांजी, जंग्या, जिने,चर्या असे भाग असतात. 
        फांजी म्हणजे तटबंदीच्या आतील बाजूस चालण्याकरिता जो भाग असतो ती जागा. राज्यव्यवहारकोशात याला प्राकार-वेदिका असे म्हणले आहे. याची रुंदी वेगवेगळ्या किल्यांवर वेगवेगळी पाहायला मिळते, उपलब्ध जागेनुसार एका माणसाला उभे राहण्यापुरती जागा ते तोफेचा गाडा जाऊ शकेल इतकी मोठ्या जागेपर्यंत फांजी बघायला मिळते. हि फांजी अतिशय समतल बांधलेली असते त्यावर चुन्याचा गिलावा केलेला असतो. फांजीच्या वरीलबाजूस संरक्षकभिंत असते जिच्यामागे उभे राहून सैनिक शत्रू सैन्यावर आक्रमण करू शकतात. भिंतीचे संरक्षण लाभल्याने किल्यातील सैनिकाचा बचाव होतो.  याच  संरक्षकभिंतीत खाचा केलेल्या आढळतात. त्यांना जंग्या म्हणतात.  राज्यव्यवहारकोशात यांना प्राकार-रंध्र असे म्हणले आहे. या जंग्या विविध कोनातून खालील बाजूस मारा करता याव्यात अशा बांधलेल्या असतात . यातून बंदूक आणि बाणांचा वर्षाव शत्रूवर करता येतो. तसेच शत्रूच्या हालचालीवर यातून लक्ष ठेवणे सोपे जाते. जेथून तोफा डागायच्या त्या ठिकाणी जंग्या मोठ्या आकाराच्या पाहायला मिळतात.

आजकाल 'पूर्वीची माणसे ७ -८ फुट उंच होती वगैरे दंतकथा सांगितल्या जातात. किंवा किल्यांवर बांधलेल्या पायऱ्या दाखवून यासंबंधी चुकीचा समज करून दिला जातो '. फांजीपासून या जंग्यांच्या उंचीवरून आपल्याला त्याकाळात माणसाची उंची किती असेल याचा अंदाज बांधता येतो. काही ठिकाणी जंग्या बसूनदेखील मारा करता येतील इतक्या खालच्या उंचीवर असतात. 
अनेकदा फांजीच्या वरील बाजूस मशाली ठेवण्यासाठी गोलाकार दगडी ठाणवया असतात.
फांजीवर जाण्यासाठी ठिकठिकाणी जिने केलेले आढळून येतात. 


    चर्या म्हणजे तटबंदीच्या वरच्या भागात पाकळ्यांसारखी रचना पाहायला मिळते. यांचाही उपयोग जंग्यासारखाच होत असे. पश्चिम महाराष्ट्रात या चर्या कमी पाहायला मिळतात. राज्यव्यवहारकोशात याला प्राकार-फालिका असे म्हणले आहे. 
किल्ले वेताळवाडी येथील तटबंदी, जंग्या आणि चर्या

         एकेरी, दुहेरी, तिहेरी अशा एकामागेमाग तटबंदीचे पदर बांधून दुर्गास मजबुती आणली जात असे. दुर्गनिवेश प्रकरणात आपण पहिले कि महाद्वाराची साखळी निर्माण केली जाई, तसेच अनेक पदरी तटबंदी निर्माण करून दुर्ग दुर्लंघ्य , दुर्जय केला जाई. पहिली तटबंदी पडली तरी दुसऱ्या तटबंदीच्या मागे उभे राहून लढता येई. या दोन तटबंदीच्या मध्ये अनेकदा दारूगोळा आणून ठेवला जाई. या दारूगोळ्यावर शत्रूकडून अनेकदा ठिणगी उडून संरक्षक तटबंदीच उडाली असल्याचे आपल्याला दिसून येते. पुरंदरच्या वेढ्यात सफेद आणि काळ्या बुरुजाच्या मध्ये उडालेला दारुगोळा मराठी सैनिकांचे प्राण घेऊन गेला. 
        राजगडच्या संजीवनी माचीवर दुहेरी तटबंदी आहे. या तटबंदीच्या प्रेमात राजगडावर जाणारा प्रत्येकजण पडलाय. या दोन भिंतींच्या मध्ये उतरायला जिने आहेत. राजगडाच्या तीनही माच्यांमध्ये संजीवनीमाची थोडी खालच्या उंचीवर आहे. त्याकरिता तिला विशेष संरक्षण दिले आहे. 
कर्नाटकात किल्ले खालच्या उंचीवर आहेत त्यामुळे हे किल्ले एकापेक्षा जास्त तटबंदीयुक्त आहेत.डोंगरी किल्यापेक्षा भुईकोट जिंकणे सोपे. उदाहरण द्यायचे तर औरंगजेबाला विजापूर आणि गोवळकोंडा असे किल्ले सहज जिंकता आले त्याविरुद्ध डोंगरी किल्ल्यांमध्ये त्याला फक्त तोरणा जिंकता आला. बाकीचे किल्ले त्याने लाच देऊनच घेतले. यामुळे भूदुर्गास अनेक पदरी तटबंदी असावायाचीच.

शहापूरच्या किल्याची अनेकपदरी तटबंदी

   
परांडा हा किल्ला मोगल आणि विजापूर यांच्यात नेहमीच वादाचा मुद्दा राहिला होता.
त्याची दुहेरी तटबंदी आणि भोवतीचा खंदक गूगलमॅप वरून 


शौचकूपअनेकदा  तटबंदीमध्ये शौचकूप बांधलेले असतात. राजगड, सिंधुदुर्ग, विसापूर अशा अनेक ठिकाणी हे शौचकूप बांधून मलनिःसारणाची सोय देखील केलेली आढळून येते.
किल्ले विसापूरयेथील शौचकूप


बुरुज: बुरुज हा तटबंदीचा अत्यंत महत्वाचा भाग. बुर्ज या शब्दाचा अर्थ मिनार असा होतो. खरेतर एकसलग भिंत बांधूनही किल्ल्याचे संरक्षण झाले असते पण मग बुरुजांची आवश्यकता काय असावी ? याला तीन चार कारणे आहेत, पहिले कारण म्हणजे तोफा. वजनदार आणि लांबच लांब तोफा ठेवण्यासाठी बुरुजांसारखी मजबूत वास्तुच पाहिजे. त्या तोफेचे बसणारे हादरे पेलण्यासाठी भिंत तितकी मजबूत नसे. त्यामुळे भिंतीवर असणाऱ्या तोफा लहान असत. 
बुरुजावरून या तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना वळवून मारा करता येत असे. तसेच अवजड तोफांसाठी असणारे गोळेसुद्धा मोठे आणि वजनदार असत. हा सारा संभार पेलण्यासाठी बुरूजाइतकी मजबूत जागाच नाही. 
दुसरे कारण म्हणजे शत्रूवर हल्ला करताना बुरुजांमुळे मारा करण्याचा कोन वाढत जातो. तसेच उंची वाढल्याने तोफांचा टप्पा देखील लांबपर्यंत वाढला. 
  
दुसरे कारण म्हणजे तटाजवळ आलेले शत्रुसैन्य माराच्या टप्यात आले. कसे ? तर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तटावरून मारा करताना तटाजवळ असलेला भाग माऱ्याच्या टप्यात न आल्याने शत्रुसैन्य सुरक्षित रहात असे.   
याउलट बुरुज बांधल्याने अगदी तटापर्यंत आलेले शत्रुसैन्य माराच्या टप्प्यात येते. यामुळेच खूप जुन्या किल्यांचे बुरुज हे अगदी जवळ जवळ बांधलेले दिसतात. कारण त्याकाळी  असणारी बाण, भाले यांसारखी कमी टप्याची शस्रे. याउलट उत्तरोतर किल्ले बांधत जाताना बंदुकांचा, अग्निबाणांचा वापर लक्षात घेता दोन बुरुजांमधील अंतर वाढत गेले. 

बुरुजामुळे तटबंदीच्या जवळचे सैन्य टप्यात आले


    तिसरे कारण म्हणजे एकसलग भिंत एखाद्या ठिकाणी उध्वस्त झाली कि बाजूचा भाग पडायला लागतो या उलट दोन बुरुजांच्या मधील भिंत कोसळली तरी बुरुजांमुळे उर्वरित भिंत शाबूत राहते. तसेच कोसळलेल्या भागाव्यतिरिक्त तटाला आधार मिळतो. 
    बुरुजाचा अजून एक उपयोग म्हणजे  जिथे तटाने वळण घेतले आहेत त्या कोनावर बुरुज बांधलेले आढळतात.
    
बुरुजांच्या आतील बाजूने अनेकदा खोल्या केलेल्या दिसतात. यांना अलंगा (परीरक्षा) म्हणतात.यामध्ये सैनिकांना विश्रांती घेणे, दारुगोळा साठवणे इत्यादी कामे करता येतात. लोहगड विसापूरच्या किल्यांवर अशा अलंगा आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्यात असे बांधकाम आढळून येते.
    
 
वेताळवाडीकिल्यावरील अलंगा बाहेरून आणि आतील बाजूने


        चिलखती बांधणी : चिलखती बांधणी म्हणजे मुख्य बुरुजाच्या बाहेरील बाजूने अजून एक भिंत उभी करायची. बुरुजाच्या आणि या भिंतीमध्ये किमान एखादा माणूस जाईल इतकी जागा असतेच. तसेच येथे उतरण्यासाठी अनेकदा बुरुजाच्या बाजूने दरवाजे असतात. चिलखताचा उपयोगसुद्धा तटबंदीप्रमाणे करता येतो. तसेच मागील बुरजाला अतिरिक्त संरक्षण लाभते.  अशी चिलखती बुरुजांची बांधणी राजगडावर जागोजागी दिसते. 


    शक्यतो बुरुज म्हणले कि आपल्यासमोर उभा राहतो तो दंडगोल आकार. मात्र दुर्गस्थापत्य करताना आपल्या पूर्वजांनी दंडगोल, चौकोनी , षटकोनी असे अनेक आकार उपयोजिले आहेत. 

षटकोनी बुरुज राजगडावर बालेकिल्ल्याच्या महाद्वाराचे संरक्षण करीत आहेत. 

 नळदुर्ग तर बुरुजांची प्रयोगशाळाच आहे कि काय असे वाटते.  नळदुर्गची तटबंदी जवळपास ३ किमीलांबीची आहे आणि १०० पेक्षा जास्त बुरुज आहेत.  नळदुर्गाचा एक बुरुज दंडगोल, तर दुसरा चौकोनी. तिसरा षट्कोनी . मात्र या सगळ्यात कौतुकाचा विषय आहे तो नऊ पाकळ्यांचा बुरुज. अतिशय भव्य आणि इतरत्र क्वचितच कुठे दिसणारी हि बांधणी पाहणे म्हणजे पर्वणी आहे. एखाद्या फुलाप्रमाणे नऊ छोट्या छोट्या बुरुजांची हि बांधणी अचंबित करणारी आहे . 


नऊ पाकळी बुरुज 

    काही वेळेस हे बुरुज देखील अगदी रक्ताचे नाते सांगणारे . म्हणजे काय ? तर यामागे जी कथा असते, ती अशी, एखादा बुरुज बांधताना सारखा ढासळत असे. मग त्याखाली एखादी जिवंत व्यक्ती , एखादं वेळेस जिवंत जोडपे बळी दिले आणि मग तो बुरुज उभा राहिला. देवांच्या शस्त्रासाठी आपली हाडे देणाऱ्या दधिची ऋषींचेचे हे वशंज जणू. 
    
    या तटबंदीवर अनेकदा शिल्प कोरलेली आढळतात. शक्तीची देवता म्हणून मारुतीराया असतोच मात्र राजगडावर सुवेळा माचीवर गजानन स्थिरावला आहे. संजीवनी माचीवर शरभ आणि अशीच वेगवेगळी शिल्प आहे.
विसापूरच्या तटावर असलेले मारुती रायाचे शिल्प आणि समोरच तळ्यात असणारे मारुतीराया अगदी हुबेहूब आहेत. आजच्या काळात ज्याला 'miniature' म्हणतात त्याप्रकारची हि शिल्प आहेत.
    परंडा किल्ल्यावर आत जाताना वाटेत लागणाऱ्या तटांवर देखील अशी अनेक शिल्प आहेत, तसेच बसवकल्याणच्या (कल्याणीचा) किल्यावर देखील रामायणातील शिल्प दिसतात. मात्र हि शिल्प मूळची इथे नसावीत. नंतर कधीतरी हि त्या त्या जागी जमतील तशी बसवली असली पाहिजेत कारण हि सगळी शिल्प एक सलग नाहीत. एक इथे तर दुसरे तिथे अशी कुठही बसवली आहेत.
    
परंडा (वरील) आणि कल्याणीच्या (खालील) शिल्प


     खंदक आणि तटबंदी व्यतिरिक्त गडाचे संरक्षण करणारी फळी म्हणजे गडाभोवतीचे जंगल अथवा वन. विशेषत: सह्याद्रीच्या पर्वतीय भागात जंगल फार. हे जंगल देखील संरक्षणासाठी महत्वाचे होते. आज्ञापत्रात 'गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी (डोंगर उतारावरील झाडी).(मोडीमध्ये 'म' आणि 'ला' एकसारखे दिसतात त्यामुळे काही ठिकाणी  'कमरग्याची' असे काही ठिकाणी वाचतात .).ती झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोडो न द्यावी. बलकुबलीस (अडचणीचे वेळी) त्या झाडीमध्ये बंदुकी हशम घालावे, या कारणाजोगे असो द्यावे.', असा उल्लेख आहे.
दुर्गांच्या प्रकारात 'प्रथमं गिरिदुर्ग च वनदुर्ग द्वितीयकम्'' म्हणजे वनदुर्ग संरक्षणाच्या दृष्टीने दुसऱ्या प्रतीचा आहे. इतका महत्वाचे जंगल आहे.
     याव्यतिरिक्त  'गडाभोवती नेहमी मेटे असावी. घेरीयाची गस्त करीत जावी. गस्तीचा जाब मेटेकरी यांनी देत जावा.' मेट म्हणजे गडाभोवती  गडाच्या उतारावर ठिकठिकाणी पहारेकरी ठेवणे. या पहारेकर्यांनी गडाभोवती गस्त घालून तटावर गस्त घालणाऱ्या सैनिकांनी एकमेकांना आपापला भाग सुरक्षित असल्याची खात्री देत जावी. यामुळे गडाच्या घेऱ्यातच संरक्षक फळी तयार होते.

        विशेष :  आता काही विशेष तटबंदी बांधणीची उदाहरणं पाहू.
  1. राजगड : बांधणीच्या दृष्टीने सर्वात उजवा दुर्ग. कारण स्वतः गडपतीने जातीने उभं राहून  हा दुर्ग बांधवून घेतला. संजीवनी आणि सुवेळा दोन्ही माच्या वेळ देऊनडोळा भरून पाहाव्या.
  2. विसापूर : विसापूरच्या किल्याची तटबंदी देखील अतिशय सुंदर एका लयीत सुबक बांधलेली आहे.
  3. लोहगड : लोहगडावर जाताना एक ठिकाणी तटबंदीत दोन दगड एकमेकात बसवताना चक्क लोखंडी पट्टी बसवली आहे. 

  4. कुलाबा किल्ला : याची तटबंदी बांधताना मुद्दाम फटी ठेवल्या आहेत, जेणेकरून समुद्राच्या लाटांचे पाणी या फटींमध्ये शिरून त्याचा प्रभाव कमी होई.
  5. सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग बांधताना याच्या पायात शिसे ओतले गेले, त्यामुळे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण होईन मजबुती लाभली
  6. विजयदुर्ग : विजयदुर्गची दुहेरी तटबंदी आणि सज्जे (मजले) बघण्यासारखे आहेत.
  7. जयगड : गणपतीपुळ्याजवळ असलेल्या जयगडावर दुमजली बुरुज आणि आणि जवळच असलेले त्रिकोणी बांधकाम. हि त्रिकोणी इमारत इंग्रज काळात बांधलेली आहे (जयगड खंदकाच्या फोटोत उजवीकडे त्रिकोणी बांधकाम दिसत आहे). तसेच भोवताली खंदकदेखील दिसून येतो.

  8. परांडा, नळदुर्ग, बिदर, गुलबर्गा असे भुईकोट खंदक आणि बहुपदरी तटबंदी यांचा अभ्यास करण्यासाठी आवर्जून पाहावेत. यापैकी नळदुर्गावर उपळी बुरुज नावाचा एक बुरुज आहे. तो तटबंदीचा भाग नाही. मात्र किल्यातून लांबवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे. यावर मगर आणि हत्ती अशा दोन बलाढ्य तोफादेखील आहेत. असाच प्रकार गुलबर्गा येथे देखील आहे.
  9. पन्हाळा : पन्हाळा किल्यावरील सज्जाकोठी हि देखील तटबंदीवर बांधलेली वास्तू आहे.
  10. वेताळवाडी :  एकावर एक बांधलेली तटबंदी, तटबंदीचे विविध भाग  (चर्या, फांजी, जंग्या  इत्यादी)
  11. वसंतगड: कराडजवळ असलेल्या वसंतगडावर असेले बुरुज हे तटबंदीच्या आतील बाजूने वेगळे बांधलेले आहेत. यांना संपूर्ण प्रदक्षिणा घालता येते.
तुम्ही असावे सावध : मित्रहो या दुर्गरक्षकाची माहिती आपण पहिली, ती प्रत्यक्ष पाहायला आपण दुर्गवारी नक्की करावी. पण थोडी काळजी घ्यायला हवी. म्हणजे कशी तर तटबंदी क्वचित ठिकाणी पडझड झालेली असते, त्यावरून खाली डोकावून पाहणे, त्याचे दगड खालते लोटून देणे, उगीच अवघड ठिकाणी चढून जायचा अट्टाहास करणे. कड्याच्या बाजूने सेल्फी काढणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण फार मोठा पराक्रम गाजवून येथे आलो आहोत आणि त्यासाठी आपले नाव तेथे लिहिलेच पाहिजे अशा गोष्टी टाळाव्यात.

ज्या तटबंदीवरून आपले पूर्वज चालले असतील, वेळ प्रसंगी रक्षणार्थ  त्यांनी आपले असूद सांडले असेल,  ज्यावर उभे राहून त्यांनी सूर्योदय आणि सूर्यास्त निरखले असतील. तीच हि तटबंदी, तोच हा वारा आणि तोच हा तेजोनिधी.......
आज मी तिथेच उभा राहून त्या अनाम वीरांचा आठव ठेवतोय. 

जर्मनीमधील नुरेम्बर्ग शहराची तटबंदी आणि बुरुज
त्यांनी आपले किल्ले कसे जतन केले आहेत हे दाखविण्यासाठी केलेला एक प्रयत्न 
        

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...