https://prasaddanve.blogspot.com/2021/01/blog-post.html
तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? पुन्हा पाचवीचा अभ्यास चालू केला की काय? लेखनाची सुरुवात पद्याने करायचा नवीन छंद जडलाय का? वगैरे वगैरे... पण खरंच, मला २०२० चं वर्ष, सरता सरता जे काही आनंद देऊन गेलं त्याचा लेखन-प्रपंच मांडायला घेतला आणि कवी अनिलांचं अवखळ वासरू डोळ्यासमोर उड्या मारायला लागलं.
"काहीही झालं तरी ह्या वर्षाच्या सरत्या पावसाळ्यात, हे उरलेले तीन दुर्ग पाहायचेच" अशी भीष्म-प्रतिज्ञा करून सिद्ध होतो न होतो तोच समस्त मानवजातीवर जणू सुलतानढवा करण्यासाठी दबा धरून बसलेल्या विषाणूचा वेढा पडला आणि सक्तीचा बंदिवास नशिबी आला. गनिमीकाव्यानेही सुटकेला काही वाव उरला नाही तेव्हा ह्या सक्तीच्या बंदिवासाचं संधीत कसं रूपांतर करता येईल असा विचार सुरु झाला आणि त्यातून जन्माला आलं नियोजनबद्ध "महाराष्ट्राटन" !!! पण हा काही आत्ताच्या लेखनाचा विषय नाही, ह्यावर पुन्हा कधीतरी बोलू.
उंबरगडातल्या (घराचा उंबरा) बंदिवासातून एकदाची सुटका झाली आणि ८-नोव्हेंबरला आदित्यसोबत मोरगिरी सर झाला. मोरगिरी हे पवन आणि कोरबारस ह्या दोन मावळांच्या हद्दीवरचं एका उत्तुंग डोंगरावर वसलेलं टेहाळणीचं ठाणं. एकाच वेळी दोन्ही मावळांवर नजर ठेवायला आणि कोकणातून वर येणाऱ्या पायमोडी, सव, कोराई, अनघाई अश्या घाटवाटांवर लक्ष ठेवायला ह्या सारखी दुसरी जागा नाही. डोंगराच्या अर्ध्या-पाऊण उंचीवर भलं थोरलं पठार पण तरी वसाऊ दुर्ग म्हणून हा डोंगर कधी नावारूपाला आला नाही. डोंगराच्या सर्वोच्च कातळाच्या उदरात एका अनगड गुहेत वसलेल्या जाखमातेवर इथल्या रहाळाची श्रद्धा. पठारापर्यंत पोहचायला मध्यम आणि कातळकड्याशी पोहचायला किंचित अवघड अशी ह्या दुर्गाची श्रेणी म्हणता येईल. त्यातल्या त्यात सरता पावसाळा हीच काय ती ह्या जागेला भेट देण्याची सुरक्षित वेळ. जवळपास दहा महिन्यांच्या विरहानंतर माझा सखा-सह्याद्री मला भेटला होता. त्याला पाहून हर्षभराने डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या (चित्र १).
![]() |
| चित्र १: दहा महिन्यानंतर सह्याद्रीची भेट - मोरगिरी (चित्रकृपा: आदित्य जोशी) |
परतीच्या वाटेवरच वडगाव (मावळ) येथील मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास आणि महादजी शिंदे व नाना फडणवीसांच्या युद्धकौशल्याच्या स्मृती जागवणाऱ्या पहिल्या इंग्रज-मराठे युद्धस्मारकालाही भेट दिली (चित्र २). वडगावकरांचं उत्सवाचं कारण होऊन बसलेल्या इष्टुर फाकड्याचंही स्मारक ओघाने पाहणं झालंच.
![]() |
| चित्र २: पहिले इंग्रज-मराठे युद्ध स्मारक - वडगाव |
आठवड्याभरानंतरच, म्हणजे १५-नोव्हेंबरला संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वर मंदिराची सायकलवारी झाली. फिरंगोजींच्या पराक्रमाला पुन्हा एकदा मनाचा मुजरा झडला (चित्र ३). चक्रेश्वरजवळच्या उपेक्षित कूर्मावतार सदृश मूर्तीला आणि यज्ञवराह मूर्तीला काही क्षण नीट न्याहाळलं. यज्ञवराह म्हणजे विष्णूच्या वराह अवताराची संपूर्ण वराह स्वरूपातली मूर्ती. मूर्तीतील बारकावे विषयातील आवड असणाऱ्यांनी आवर्जून पहावे असेच आहेत (चित्र ४). (संग्रामदुर्ग आणि चक्रेश्वरबद्दल सखोल माहिती इथे पहा)
![]() |
| चित्र ३: संग्रामदुर्ग - चाकण |
![]() |
| चित्र ४: यज्ञवराह - चक्रेश्वर - चाकण |
![]() |
| चित्र ६: कैलासगडावरून दिसणारा मुळशी धरणाचा जलफुगवटा |
ठरलेला दिवस उगवला, १२-नोव्हेंबरला संध्याकाळी निघून उरुळी कांचन गाठलं. गावातच जेवण उरकून रात्रीच्या अंधारातच शिंदवणे घाटमार्गे ढवळगड पायथा गाठला. पंधराच मिनिटांच्या चढाईने पडक्या तटात शिरल्यावर गडावरील ढवळेश्वर महादेवाचं प्रशस्त राऊळ समोर आलं. पाठपिशव्या उतरवून गाभाऱ्यातल्या प्रसन्न वातावरणात जाऊन ढवळेश्वराला दंडवत घातला. उल्कावर्षाव पाहण्यासाठी देवळाबाहेर उघड्यावरची जागा निश्चित केली आणि चटया अंथरून पहुडलो. ढगांनी झाकोळलेलं आकाश मोकळं व्हावं म्हणून खगोलदेवतेला साकडं घातलं आणि तासाभरापुरतं का होईना, ते खगोलविश्व आमच्यावर प्रसन्न झालं. तेवढ्या तासाभरात अश्विनीपासून - पुनर्वसूपर्यंतची नक्षत्रे आणि काही तारकासमूहांची ओळख सवंगड्यांना करून दिली. त्यादरम्यानच सर्वांनी मिळून चार एक उल्कांची नोंदही केली. आमच्या आधी खगोलदेवतेलाच जणू झोप आली आणि पुन्हा ती ढगांची दुलई ओढून झोपी गेली. नाईलाजाने आम्हीही मग आमच्या पथाऱ्या देवळात हलवल्या आणि गप्पाष्टके उरकून झोपी गेलो.
![]() |
| चित्र ७: माचीवरून ढवळगडाचा तट आणि देऊळ |
![]() |
| चित्र ८: नित्य सूर्योदय पाहणारा गड-गणपती |
![]() |
| चित्र ९: सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहू शकणारा दुतोंड्या गड-मारुती |
काहीच क्षणांत गाड्यांपाशी पोहचलो आणि ढवळगडाला रामराम करून पायथ्याच्या आंबळे गावात आलो. आंबळे गावात सरलष्कर दरेकरांचे वाडे आणि काही मंदिरं ह्यासारख्या देखण्या वास्तू उभ्या आहेत (चित्र १०). त्या पाहून सुपे गावाच्या दिशेने प्रवास सुरु केला.
![]() |
| चित्र १०: सरलष्कर दरेकर वाडा - आंबळे |
पाहण्याचं नियोजित ठिकाण होतं सुपे-पाटस रस्त्यावरील पुही घाटाच्या माथ्यावर असणारी यादवकालीन पाणपोई. प्राचीन आणि मध्ययुगीन काळी नगर शहराशी जोडणारा हमरस्ता म्हणून वापरात असणाऱ्या ह्या रस्त्यावरची आज शिल्लक असणारी एकमेव खूण म्हणजे ही पाणपोई (चित्र ११). संवर्धनाच्या प्रतीक्षेत उभी असणारी ही सुघड वास्तू आजही बऱ्यापैकी स्थितीत उभी आहे. आतमध्ये एकेकाळी तीन रांजण असावेत असं वाटतं. आज मात्र त्यातलं एकच नक्षीदार रांजण जागेवर आहे (चित्र १२).
![]() |
| चित्र ११: यादवकालीन पाणपोई - सुपे |
![]() |
| चित्र १२: पाणपोईतील नक्षीदार रांजण |
पुढचा टप्पा होता लोणी भापकर. त्याआधी सुपे गावात येऊन पोटभर न्याहारी केली. शरीराला दिवसभरासाठी पुरेसं इंधन मिळालं होतं. लोणी भापकर गावातल्या एका देवळाबाहेर ठेवलेले अनेक आणि त्यातले काही चारही बाजूनी कोरीवकाम असलेले वीरगळ सवंगड्यांना दाखवले आणि माझ्या अनेक आवडत्या मंदिरांपैकी एक, मल्लिकार्जुन मंदिरापाशी आलो. सर्वात पहिले मित्रांना दाखवली ती यज्ञवराहाची मूर्ती (चित्र १३). चाकणच्या चक्रेश्वरातल्या यज्ञवराह मूर्तीसारखीच इथेही एक रेखीव आणि बारीक कलाकुसर असणारी यज्ञवराह मूर्ती उपेक्षित पडून आहे. पुस्तकातलं सखोल वर्णन वाचत मूर्ती न्याहाळली.
![]() |
| चित्र १३: यज्ञवराह - लोणी भापकर |
मल्लिकार्जुन मंदिरात प्रवेश केला. इथेही द्वारशाखा, सभामंडपातले जणू एखाद्या कातकाम यंत्रावर कोरून काढल्यासारखे वाटणारे खांब, छतावर कोरलेले दगडी झुंबर, कृष्णलीला आणि इतरही मूर्ती पाहताना पुस्तकाचा पूर्ण आधार घेतला (चित्र १४ व १५). मंदिरातलं एक एक कोरीवकाम पाहून सवंगड्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायला मजा वाटत होती.
![]() |
| चित्र १४: कातकाम केल्यासारखे वाटणारे खांब - मल्लिकार्जुन (चित्रकृपा: दुर्गेश वैकर) |
![]() |
| चित्र १५: छतावरचं दगडात कोरलेलं झुंबर आणि कृष्णलीला (चित्रकृपा: दुर्गेश वैकर) |
आता मंदिरासमोरच्या पुष्करणीत प्रवेश केला. विष्णूची दशावतार रूपे, प्रसूतिदशेतील स्त्री, कामशिल्पे आणि इतरही मूर्तींचं पुन्हा एकदा जमेल तेवढं सखोल निरीक्षण केलं. ह्यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे जवळपास दहा वर्षांनी पुष्करणीत इतकं पाणी साठलं होतं.
![]() |
| चित्र १६: पुष्करणी - लोणी भापकर |
इथून पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी कोणीच उठायला तयार नव्हतं. तशी भुरळच घालणारी जागा आहे ही. पण पुढे जे काही बघायचं होतं तेही छानच आहे असं सांगून सगळ्यांना बाहेर काढलं.
![]() |
| चित्र १७: द्वारपाल - पांडेश्वर (चित्रकृपा: दुर्गेश वैकर) |
पुढचा टप्पा, म्हणजेच जेजुरीजवळील बल्लाळेश्वर. पेशव्यांनी बांधलेली ही एक अप्रतिम कलाकृतीच म्हणावी लागेल. बंधारा बांधून तयार केलेल्या ह्या तलावाला पेशवे तलाव ह्याच नावाने ओळखतात. बंधाऱ्याच्या पोटात सिंचनासाठी लागणारं पाणी साठवण्याची व्यवस्था केलीये आणि त्याच बरोबर चार सुघड असे जिने आणि एक महादेवाचं मंदिरही निर्माण केलं आहे, जे बल्लाळेश्वर ह्या नावाने संबोधलं जातं. मागच्या भेटीच्या वेळी कोरडा पडलेला हा तलाव ह्या वर्षी भरलेला पाहून छान वाटलं (चित्र १८).
![]() |
| चित्र १८: बल्लाळेश्वर (जुन्या भटकंतीवेळी घेतलेलं चित्र) |
पुढचं ठिकाण जेजुरीजवळच असणारं लवथळेश्वर हे होतं. पण हमरस्त्याला लागूनच असलेलं हे ठिकाण आता रस्तारुंदीकरण आणि वृक्षतोडीमुळे आपली रयाच हरवून बसलं आहे. रामदासस्वामींचा ह्या मंदिरात मुक्काम झाल्याची आणि "लवथवती विक्राळा" ही आरती त्यांना ह्याच ठिकाणी स्फुरल्याची माहिती मिळते. दुर्गेशच्या मित्रांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
![]() |
| चित्र १९: सिद्धेश्वर - सासवड |
पुढे गराडे गावाच्या दिशेने छोटासा प्रवास करून कोडीत गावाजवळील कोटेश्वर मंदिरालाही भेट दिली (चित्र २०). मंदिरापाशी अचानक गावातलेच एक काका भेटले आणि त्यांनी ह्याच गावात असणारा आचार्य अत्रे आणि मुंबईतलील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाची इमारत बांधण्यात ज्यांचा सहभाग होता ते अभियंता रावसाहेब वैद्य ह्यांचाही वाडा मंदिरापासूनच दाखवला.
![]() |
| चित्र २०: कोटेश्वर - कोडीत - सासवड |
एका दिवसात इतकं सारं पाहून झालं होतं. आता परतीच्या मार्गावरचं, हिवरे गावातलं आणि पुन्हा एकदा मला आवडणारं असं शंकेश्वराचं देऊळ दुर्गेशला दाखवून बोपदेवघाट मार्गे आम्ही पुण्याच्या शहरी गजबजाटात मिसळून गेलो.
श्री लवथळेश्वर मंदिर
श्री समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' आरती रचिली होती .
काही वर्षा पुर्वी या मंदिराविषयी माहिती वाचण्यात आली आहे . जेव्हा जेजुरी
ला जाईन तेव्हा नक्की दर्शन घेऊन अस ठरवलेच होते , कुटुंबांसहित
देवदर्शनास जाने झाले आणि या मंदिराच्या भेटीची ओढ लागली होती . "कुलस्वामी
खंडोबा " दर्शन घेऊन पुढे निघलो , बहुतेक लोकांना इथे अश्या प्रकारचे
मंदिर आहे का ? हेच माहित नाही , अनेक लोकांना विचारल्यावर काहींनी समोर
कुठे तरी बोट दाखवून तिथे मंदिर आहे असे दाखवले , पण आपण मंदिराविषयी जो
अंदाज बांधतो कि , २० एक फुट उंच कळस , फडकणारा भगवा वैगरे वगरे , त्याच
ठिकाणावरून तीनवेळा जवळून गेलो परतू मदिर काही दिसे ना , इथे रत्याच्या
कामकरणार्या कामगारांना विचारले तेव्हा त्यांनी रीतसर ठिकाण दाखवले .…
एका मोठ्या पडलेल्या वादाच्या झाडा जवळ हे मंदिर आहे , अर्थ वर्तुळ कमानीवर "श्री श्री लवथळेश्वर मंदिर " असलेले फलक आहे ,
जमिनीशी समांतर असलेले हे मंदिर , प्रथमदर्शी मंदिराची कोणतीही खानाखुणा जाणवली नाही .
जमिनीत कोरलेल्या पायर्या, आधी right मग Left मारत मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करतो ,
मादिरचा कळस म्हणजे एक शिवपिंडच .
भिंतीवर कृष्णूमूर्ती ,हनुमान शिल्प आणि इतर देविदेवता पाहता पाहता आत यावे .

आत प्रवेश केल्यावर रंग मारलेला मोठ्ठला नंदी दिसतो ,
त्या मागेच गणेश मूर्ती आणि नागमूर्ती आहे .
नंदी समोर अडीच एक फुट गर्भगृहेत "गेट" च्या पलीकडे जमिनीत "शिवशंकराचे "
दर्शन होते . मुळपिंड तसेच ठेऊन सर्वत्र " टाईल्स " बर्या पैकी लावले आहे
....

या मंदिराविषयी काही कथा सांगितल्या जातात .
लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे जागृत स्थान असे मानले जाते. या
स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महत्म्य सांगितले आहे, दुर्वास
ऋषींचा लवा नामक शिष्य होता त्याला स्वतःला आपल्या तप साधनेमध्ये व्यत्यय
येवू नये असे वाटत होते, ही बाब त्यांनी आपल्या गुरूच्या कानी घातल्यानंतर,
दुर्वास ऋषींनी शिष्याच्या तपश्चर्येसाठी हा परिसर
दानव-शाकिनी-डाकिनी-भूत-पिशाच्च यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून मुक्त
केला, तोच हा लवथळेश्वर परिसर. पुढे कृतयुगामध्ये मणीचूल पर्वतावरील
सप्तऋषींना मणीमल्ल दैत्यांपासून आपली कुटुंबे सुरक्षित ठेवण्यासाठी नारद
मुनींनी याच परिसरामध्ये धेवण्याचे सुचविले. समर्थ रामदास स्वामींना या
मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' ही आरती स्फुरल्याचे सांगितले
जाते.
माहिती साभार (jejuri.in )
फोटो इतके छान नाही आलेत , cameraची battery low झाली म्हणून सारे फोटो मोबाईलच्या कृपेने आले आहेत .
धन्यवाद __/\__
https://www.maayboli.com/node/56972
आहे की नाही हे सारं कवी अनिलांच्या त्या कवितेतल्या ओढाळ वासराप्रमाणेच !!!
अत्यंत महत्त्वाचं असं काही:
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंची कुठल्याही प्रकारची हानी टाळूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपूयात.
- निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनात जमेल तेवढा हातभार लावूयात.
- हा वारसा पुढील पिढीला तो जपण्याच्या संस्कारांसहीत हस्तांतरीत करूयात.
- अभ्यासपूर्ण आणि डोळस भटकंती करूयात.
- आपली मायबोली मराठी भाषाही टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहूयात.




















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.