नेहमीप्रमाणेच कामानिमित्त परदेश योग जुळून आला आणि मलेशियाची वारी घडली. यापूर्वी मलयभूमीला फक्त पदस्पर्श केला होता. एकदा चीनला जाताना काही काळ थांबलो होतो तेवढेच. त्यामुळे ‘क्वालालुंपुर’ विमानतळ तसा परिचित होता; पण देशात प्रवेश केला नव्हता. त्या प्रवासादरम्यान विमानतळावर वाद्यवॄंद पाहायला मिळाला होता. पारंपरिक वाद्यांचा उत्तम मेळ होता. आपल्याकडच्या सारंगी, संतुरसारखीच वाद्ये होती त्यांचे चलचित्रण केले होते; पण नंतरच्या काळात ते कुठे गेले कळलेच नाही, असो ! २४ ते २८ जून २०१३ दरम्यान हा दौरा होता. कंपनीतील आठजण एकत्र होतो. त्यामुळे एक प्रकारे ती सहलच वाटत होती.
क्वालालुंपुरमधील ( केएलमधील ) कामे आटोपून मी आणि आमचा विरलभाई ‘क्वांटनला’ मिटींगसाठी जाणार होतो. बाकीचे सगळे थेट ‘क्वांटन’ गाठणार होते. प्रगत राष्ट्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे विमानतळाशी शहराची केलेली जोडणी. केएल विमानतळातच घुसलेली रेल्वे व बसेसही आहेत. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात थेट नेणाऱ्या सेवा आहेत. २५ तारखेला सकाळी उतरल्यावर आमची पहिली गरज होती- स्वच्छ अंघोळपांघोळ करून मग कस्टमरकडे जाणे. शोध घेताघेता ‘समासमा’ नावाच्या ‘स्पा’पर्यंत पोहोचलो. ६० रिंगिटमध्ये आमची गरज पूर्ण झाली. दिवसभर बॅगा सुरक्षित ठेवण्यासाठी क्लोकरूमपण त्याच पैशात. मग काय, वा:! आपल्या खणाची चावी म्हणजे स्पाच्या माणसाने एक प्रकारचे प्लॅस्टिकचे घड्याळ मनगटावर बांधायला दिले. अंघेाळीचे वेळेस भिजले तरी प्रश्न नाही आणि चावी हरवण्याची भानगड नाही. खणासमोर घड्याळ धरले की खण उघडतो. मजा होती ! तिथल्या व्यवस्थापकाने सांगितले, दुपारी परत अंघोळ करायची असल्यास वेगळे पैसे आकारले जाणार नाहीत. त्याने केएलचे मानचित्रही ( नकाशा ) दिले; सगळे आवरून झाल्यावर निघालो.
‘टेक्सी’ ( टॅक्सी ) असे लिहिलेल्या ठिकाणी गाडी बुक केली कामे आटोपल्यावर थोडा वेळ होता. ( साधारण अर्धा दिवस ). त्यानुसार ठरवले, जे काही बघणे शक्य आहे ते बघूनच जाऊया. मी यादी काढूनच गेलो होतो. ‘मलेशिया टुरिझम’ असे आंतरजालावर टाकल्यावर ‘पेनिन्सुला व बॉर्निओ’ अशी दोन नावे पुढे येतात. त्या अंतर्गत पेट्रोनास टॉवर, कॅमेरून आयर्लंड, तमान नेगरा असे बरेच काही वाचायला मिळते. गाडीत बसतानाच चालकाचे नाव कळले, ‘रवि.’ मी आपले हिंदीत सुरू केले; पण तो म्हणाला, “स्सार नो हिंदी. ओन्ली इंग्लिश.” मग त्याच्याशी बोलताना कळले, त्याचे वडील मूळचे भारतातले. ब्रिटिशांच्या काळात रेल्वे व खाणीत काम करण्यासाठी आलेल्या भारतीयांपैकी ते एक होते. आताही त्याच्या घरात तमिळ किंवा मलय भाषाच बोलली जाते. तमिळ भाषेत ‘मलई’ म्हणजे टेकड्यांचा प्रदेश’. ही लोकं पर्यटकांशी बहुतकरून इंग्रजीतच संवाद साधतात. इंग्रजांच्या काळात हे भारतीय आले, ते इथेच रूजले. छान रस्त्यांवरून आमची गाडी धावू लागली. सगळीकडे आखीव-रेखीव चौक, पल्लेदार रस्ते आणि स्वच्छता मनाला सुखावत होती. या देशात पेटतेल ( पेट्रोल ) आपल्या तुलनेत स्वस्त आहे. साधारणपणे आपल्याकडच्या किमतीच्या तीसेक टक्के कमी किंमतीत उपलब्ध आहे. घरांच्या किंमती मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्या तुलनेत जास्त आहेत. अर्थात् घरांच्या किंमती सापेक्ष आहेत हेही विसरून चालणार नाही. कुठल्या शहरात कुठल्या भागात आहे ह्यावरही बरेच काही अवलंबून असते.
राजवाड्यात रुपित्र ( कॅमेरा ) नेण्यास परवानगी नव्हती. आतमध्ये अनेक छायाचित्रांचा संग्रह होता. बरीचशी छायाचित्रे ब्रिटिशांच्या राजवटीतली होती. ग्वाल्हेर, मैसूरच्या अंकित राजांप्रमाणेच सगळा थाटमाट होता. ती दालनं, वापरावयाच्या वस्तू, बेल्जियम ग्लासची चहापानाची भांडी, भलीमोठी न्हाणीघरे इ. सगळं तसंच होतं. इंग्लंडच्या राजा-राणीला आज जसा मान आहे तसाच इथल्यांना; पण ते सत्ताधीश नाहीत, लोकशाहीच नांदते. या सगळ्यात माझं मन फार रमलं नाही. काय आवडलं आणि काय नाही याचं उत्तर नाही माझ्याकडे. पुढच्या टप्प्याकडे निघालो. जाता-जाता रविशी गप्पा घडत होत्या त्याला भारताविषयी ओढ असेल का हा प्रश्न मनात डोकावत होता. तो म्हणाला, भारतातले लोक येतात, त्यांच्याशी बोलतो तेव्हा बरं वाटतं. कदाचित् मला बरं वाटावं म्हणूनही बोलला असेल. वाटेत एक क्रीडासंकुल लागलं. “बॅडमिंटनमध्ये आमच्या देशाचा चांगला ठसा आहे -” इति रवि. मला आपली शटल क्वीन ‘सायना नेहवाल’ आठवली. खेळात पुढे जाण्यासाठी मलय सरकार बरंच प्राधान्य देते असंही कळलं. इथेही इंटरनॅशनल स्कूल नावाचा महागडा प्रकार आहे. शिक्षणासाठी माध्यम म्हणून मलय भाषा वा इंग्रजीच. रवि एक एक गोष्ट सांगत होता आणि मी निरीक्षणात गुंतत होतो.
पुढचं ठिकाण होतं ‘के एल्’ म्युझियम. इथे अनेक गोष्टींना ‘नगर’ असा शब्द जोडण्याची पद्धत आहे. नगर म्हणजे प्रांत, इलाका, विभाग असं काहीतरी असावं, असा ढोबळ अंदाज लावला. पण १ रिंगिटच्या नोटेवरही ‘बँक नगर मलेशिया’ पाहून मी गोंधळलो. इतर बाबतीत माझा तर्क जुळत होता, म्हणजे म्युझियम नगर, पुत्रनगर (चक्क राजपुत्र नगर असाच अर्थ आहे, बरं का !) मात्र नगरचे स्पेलिंग Negera करतात. इथल्या भाषेवर संस्कृत व अरबीचा प्रभाव आहे. इथे भूमीला ‘बूमी’ म्हणतात. ‘वर्ण म्हणजे रंग’ असाच अर्थ धरला जातो. ‘दारूल एहसान’ असाही शब्द कुठेतरी बघायला मिळाला. मूळ शब्द ‘दर् –उल-एहसान’ असा आहे. त्याचा अर्थ अल्लाचे उपकार असलेली भूमी. टांझानियाची राजधानी ‘दारेस्सलाम’ ‘( दर्–उल-इस्लाम )’ नांवही असंच रूढ झालेलं आहे. मनाशी असे तर्क जुळवत म्युझियमनगराच्या दाराशी पोहोचलो तेव्हा दुपारचे साडेबारा वाजून गेले होते.
रविने सांगितलं, जर ‘बातू केव्हज्’ बघायच्या असतील तर बाहेरूनच काही वस्तू बघा आणि चला. माझा नेहमीचा एक अनुभव आहे, प्रत्येक दर्शनीय ठिकाणी गेलं की हुरहुर लावणाऱ्या एखाद्या गोष्टीवर पाणी सोडूनच यावं लागतं. राजवाड्याच्या संग्रहालयाप्रमाणेच इथे असंच काही असलं तर असा थोडासा साधक-बाधक विचार केला. बाहेर ठेवलेली रेल्वे इंजिनं बघायला मिळाली. समोरच ‘बी. जी. बाग्नल’ कंपनीने बनवलेलं वाफेवर चालणारं इंजिन होतं. १९२९-साली मलेशियातल्या डॉक सेवेसाठी बनवलेल्या इंजिनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची भट्टी पोलादाची बनलेली होती. एकतीस टनी इंजिनाने १९६४ पर्यंत ‘केलांग’ बंदराजवळ सेवा केली आणि १९७५ साली मलय रेल्वेने संग्रहालयाला ते देऊ केलं. त्याच्याच बाजूला ‘इंग्लिश इलेक्ट्रिक ऑफ ग्रेट ब्रिटन’ कंपनीने बनविलेलं ‘डिझेल इंजिन’ होतं. १२०० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेलं एंजिन सिमेंट, लाकूडफाटा आणि इंधन वाहून नेण्याच्या सेवेत १९७१ साली रुजू झालं. अजून एक इंजिन होतं. ‘किटसन आणि कंपनीने’ बनवलेलं हे यंत्र १९२१ ते १९६९ या कालावधीत सेवारत होतं. १० लाखाहून अधिक मैल प्रवास करूनही ते थकलेलं नव्हतं. सुस्थितीत होतं. दिल्लीचं रेल्वे संग्रहालय पाहिलं असेल तर या सगळ्याची सहज कल्पना येईल.
हे संग्रहालय म्हणजे एके काळचा किल्ला होता. १७८० साली दगड-विटांचा वापर करून बांधलेला किल्ला आजवर टिकलाय. त्या काळी बांधकामास नऊ वर्षे लागली. दरवाज्यापाशी नांव होतं. ‘कोट क्वाला केदाह’ कोट म्हणजे गडकोट, क्वाला म्हणजे किल्ल्याचा अपभ्रंश ( हा शोध माझा आहे ) व ‘केदाह’ या नदीकाठी वसवला हा किल्ला म्हणून ‘कोट क्वाला केदाह. ’आपण किल्ले रायगड म्हणतो तसे ! नदी व समुद्राच्या बाजूची तटबंदी दुहेरी भिंतीची आणि त्याच्याविरुद्ध बाजूस एकपदरी भिंत आहे. दोन एकर परिसरात पसरलेल्या किल्ल्यावर ‘बदाक बेरेंन्दाम’ व ‘काटक पुरु’ नावाच्या दोन तोफा आहेत. समुद्रमार्गे येऊ पाहणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या सज्ज ठेवल्या जात. त्या इंग्रजांकडून खरेदी केल्या होत्या. १७६० साली तख्ताधिपती बनलेल्या ‘सुलतान अब्दुल्ला मुकर्रम शेखच्या’ राजवटीत किल्ला बांधला गेला. सयामी लोकांच्या आक्रमणापासून संरक्षण करता यावं हा मूळ उद्देश होता. ‘दातोक मजाराजा’ आणि त्याचा पुतण्या ‘मौलाना इब्राहीमने’ किल्ल्याचा आराखडा बनवला. विशेष म्हणजे हे दोघे भारतीय होते व किल्ल्याच्या बांधणीचे दगडही भारतातून आणले गेले होते. ( यातली बरीचशी नावं, विशेषत: विशेषनामं, माझ्या समजुतीनुसार लिहिली आहेत. त्यांचे स्थानिक भाषेतले उच्चार तपासून घ्यायची संधीच मिळाली नाही. त्यामुळे ते थोडे वेगळे असू शकतात ). महाराष्ट्रातल्या दुहेरी तटबंदी असलेल्या राजगडासमोर ही लिंबू-टिंबू गढीच वाटली मला.
बातु केव्हजकडे जाताना सध्याचा राजवाडा लागतो. राजा राहत असल्याने तो आतून पाहवयास मिळत नाही; पण त्याचं बाह्यावलोकनही सुखद होतं. सोनेरी कळस लांबूनच दिसतो. प्रवेशद्वारापाशी एका मोठ्या व छोट्या खांबांची जोडगोळी दिसली. या जोडगोळीने आपल्या डोक्यावर घुमट तोलून धरले आहेत. त्यावरच्या कमानीतून तीन मजली राजवाडा दिसतो. प्रत्येक मजल्याच्या डोक्यावर मोठा घुमट व बाजूचे छोटे घुमट आणि वेलबुट्टीची नक्षी त्याची शोभा वाढवते. कमानीवर मधमाशांच्या पोळ्यासारख्या छोट्या छोट्या कोनांची नक्षी भलतीच सुंदर दिसते. तैनातीला दोन-दोन दरवान समोर असतात. एक उभा तर एक घोड्यावर! तुकतुकीत कांतीचे उंचेपुरे घोडे बघून मजा वाटली. राजाचं राजेपण आजही टिकून आहे असं वाटत राहतं. राजवाड्याचं नाव मोठं गमतीशीर‘स्थान नगर’ स्पेलिंग होतं – Istana Negara.
शेवटी एकदाचे बातु केव्हजपाशी पोचलो. केएल उत्तरेला १३ किमीवर असलेल्या केव्हजचा बोलवा बराच आहे. एका खाद्यपेयाच्या दुकानात विचारलं, ही गुंफा चढून जायला किती वेळ लागेल? त्याने सांगितलं, या २७२ पायऱ्या चढलात की लगेच. उभ्या चढणीच्या पायऱ्या एका दमात चढताना चांगलीच दमछाक करतात. आसपास बरीच झाडी होती; पण ओळखीची झाडं काही दिसेनात. उगाचच कुतूहल होतं ते चंदनाच्या झाडाचं ! प्रवासाला सुरूवात झाली तेव्हापासून मनात एक सुभाषित रेंगाळत होतं,
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ।।
अर्थात् आताच्या काळात भिल्लीण कुठून येणार? आणि ती तरी सरपणासाठी काय चंदन थोडीच वापरू शकणार आहे?
मुख्य गुंफेलगतच एक छोटी गुंफा आहे. तिथे दुर्मीळ कोळी (Trapdoor Spider) बघायला मिळतात. हा कोळी रेशमाच्या किड्यांना खातो. त्याचं विष फार जहाल असतं. या कोळ्याचं आयुष्यमान २० वर्षांपर्यंतही असू शकतं. इतर बऱ्याच कीटकांच्या, जीवांच्या जाती-प्रजातीही बघायला मिळतात. ती एक वेगळी सफरच होती; पण वेळेअभावी मी काही जाऊ शकलो नाही. या गोम्बकाला (म्हणजेच गुंबज) धावती भेट देऊन काढता पाय घेणं जीवावर आलं होतं; पण नाईलाज होता.
‘पाहांग’ राज्याची राजधानी क्वांटनकडे निघालो पुढचे दोन दिवस तिथेच मिटिंग होती. केएल पासून ईशान्येकडे वसलेलं एक बेटच म्हणा ना ! केएल् विमानतळापासून अडीच तीन तासांच्या अंतरावर ही जागा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आमची बस केएलमधून बाहेर पडेस्तोवरच एक-दीड तास गेला. वाटेत धो-धो पावसाची सलामी अनुभवली; पण रस्त्यात पाणी कुठेही साठत नव्हतं. नंतर बस चक्क बंदच पडली. मग जो तो आपापल्या पद्धतीने वेळ घालवू लागला. माझ्या निरीक्षणात आणखी काही गोष्टी येत गेल्या. कारणाशिवाय रस्त्यावर जास्त काळ गाडी थांबवायला परवानगी नाही. पाऊण तासापेक्षा जास्त काळ थांबलात तर पोलीसांची गाडी येते. आधुनिक यंत्रणेद्वारे त्यांना तात्काळ कळतं. बस बंद पडली तिथे स्वच्छतागृह वगैरे होतं हे सुदैव! आजूबाजूला छोट्या टपऱ्याही पाहिल्या; पण काही कळेनात. थोड्या वेळाने दिसून आलं, मोटरसायकलस्वारांना रेनकोट घालायला, सिगरेट प्यायला केलेली ती सोय होती. बस दुरूस्त होण्याची चिन्हं काही दिसेनात म्हणून शेवटी दुसरी बस आणण्यात आली. एकदाचे सातेक तासांनी आम्ही इप्सित स्थळी पोचलो. आमच्या आधीच पोहोचलेल्यांकडे दुसऱ्या दिवशी चौकशी केली तर ती मंडळीही गाडीत बिघाड नसूनसुद्धा पांच सहा तासांनी पोचली होती. आपल्या गावाकडची लोकं कशी सांगतात ना, “हे आले पघा गांव” तशातला प्रकार होता सगळा. पुलं असते तर ‘म्हैस’ची नवीन आवृत्ती लिहून मोकळे झाले असते. अर्ध्या दिवसाचे मलेशियादर्शन हे असं होतं.
अवांतर निरीक्षण :- या देशात ‘प्रोटोन’ नावाची स्थानिक कार कंपनी आहे. बाहेरून दिसायला चांगल्या वाटणाऱ्या या गाड्या फार खास नाहीत. पळताना फार लवकर धापा टाकू लागतात; पण रस्ते चांगले असल्याने तेवढं जाणवत नाही. ३१ ऑगस्ट १९५७ ला मलेशियाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र नंतर केलेली प्रगती नजरेत भरण्यासारखी आहे. देशाचं क्षेत्रफळ कमी आहे, लोकसंख्यादेखील आपल्या तुलनेत कमी आहे हे मान्य आहे; पण केलेली प्रगती लोभविते.
क्वांटनचं आमचं हॉटेल समुद्रकिनारी होतं. नाष्टा व जेवणाची जागा समुद्रकिनारी होती. पदार्थांचा आस्वाद घेताघेता दिसे – पिवळसर वाळूवर येणाऱ्या लाटा मऊ पावलांनी वर्दी देत होत्या. ज्या भागात फिरलो तिथे खूप टोलेजंग इमारती दिसल्या नाहीत. इथला पेहराव वर्णन करायचा झाला तर डोक्यावर रुमाल बांधून मुसलमानी स्त्रिया वावरतात. डोक्यावरचा रुमाल साधा किंवा नक्षीदार असतो. रुमालावरची नक्षी, त्याचे रंग, आकार याद्वारेच काय ती फॅशन करतात; पण सक्तीचा पोशाख असेल असं वाटत नाही. मुस्लीमेतर बायका पॅन्टशर्ट वगैरे घालतात. पुरुषांना विविधतेला फारसा वावच नाही. आमच्या हॉटेलात तरी दारूबंदी होती. कडक प्रकारातली कुठलीही मद्यविक्री नव्हती. कदाचित् मलेशियाचा घोषित धर्म ‘ईस्लाम’ असल्याने ही बंदी सर्वत्र असावी.
रबर व पामची झाडं खूप असल्याने संबंधित उद्योगधंदे फोफावले आहेत. मलेशियाची अर्थव्यवस्था सशक्त आहे. रुपयाची तुलना करता डॉलरसमोर रिंगिट बलवान आहे. ३ रिंगिट म्हणजे १ डॉलर. मलेशियातल्या माणसांच्या सवयी, स्वभाव याचं म्हणावं तसं दर्शन नाही झालं.
परतीच्या प्रवासाची वेळ येऊन ठेपली. आधीच्या अनुभवावरून ६ तासाची खूणगांठ बांधून निघालो. साधारण दोन-अडीच तास प्रवास झाल्यावर विरलभाईने एक झटका दिला. तो हॉटेलवरच पासपोर्ट विसरला, मग आमची पळापळ, फोनाफोनी झाली. दुसऱ्या गाडीने पासपोर्ट मागवला; पण आमच्या वेळेत पासपोर्ट काही पोचला नाही. विरलभाईला मागे सोडून आम्ही ठरलेल्या विमानाने परतलो. तो नंतरच्या विमानाने पोहोचला. ‘भारताचे या देशाशी असलेलं सांस्कृतिक नातं ’ याबाबत बरंच कुतूहल अजूनही दाटून आहे. कदाचित् परत कधी जायची वेळ आल्यावर उलगडेल. आठवणींचा दरवळ काळाच्या झुळुकीने विरल व्हायच्या आत, कागदावर उतरवायला घेतला. लिहिता-लिहिता पहाट झाली. लांबून कुठून तरी कानावर ओळी पडू लागल्या,
धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता
उठी उठी गोपाला । उठी उठी गोपाला ।
पानफुटीचं एक झाड असतं. एका पानालाच दुसरं पान फुटतं, तसं मलेशिया दौऱ्यावर अजून एक दौरा निश्चित झाला. एका छोट्याशा विरामानंतर त्याचं वर्णन तुमच्यापर्यंत येईलच.





No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.