
कोकण सफरीत बहुतेकांच्या नियोजनात विजयदुर्ग किल्ला समावेशीत असतो. गिर्येचं प्रसिद्ध रामेश्वर मंदिर याच वाटेवर. मात्र होतं असं, की ‘हायवे’वरच्या तळेरेतून हलल्यावर आपली गाडी सरळ विजयदुर्गच्या किनाऱ्यावर पोचते. गिर्येचं मंदिर त्याच्या थोडं अलीकडं. अगदी दोन किलोमीटरवर. मात्र मंदिर परिसर हा खोलगट भागात असल्यामुळं एरवी सहजी कुणाचं तिकडं लक्ष जात नाही.
गिर्ये हे गाव येतं देवगड (जि. सिंधुदूर्ग) तालुक्यात. अलीकडच्या कोैटुंबिक सहलीत विजयदुर्गला जाताना माझ्या चुलतभावानं- संकेतनं रस्त्यालगत असलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण कमानीकडं लक्ष वेधलं. मग आमच्या गाडीनं लगोलग ‘लेफ्ट टर्न’ घेतला. त्यातून रामेश्वरचं हे लक्षवेधक मंदिर गवसलं.
हे मंदिर आहे सोळाव्या शतकातलं.
इथलं वैशिष्ट्यं असं, की तिथं जाणारा
रस्ता सुमारे 50 फूट जांभ्या दगडात खोदून तयार करण्यात आला आहे. तो जवळपास
दीडशे मीटर लांबीचा आहे. तिथंच सुरवातीला मुख्य प्रवेशद्वार अाहे. त्यावर
एक अवजड घंटा दिसते.
तिच्यावर 1791 हे वर्ष कोरलेलं आहे.
ती पोर्तुगीजमधली आहे.
नाना फडणवीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याची रचना कौलारू अाहे. प्रांगणात कोकणी पद्धतीच्या दीपमाळा आहेत. मंदिराचा सभामंडपही नजरेत भरणारा आहे. त्याच्या खांबावरचं कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. भिंतीवर रामायणातील प्रसंगांची रंगीत चित्रं आहेत. आवारात मराठ्यांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. भोवताली दगडी तटबंदी आहे.
खरं तर कोकणात थोड्या आडवाटेवर
कुठं न् कुठं असं खूप काही गवसत
राहतं. ‘रुटीन स्पाॅट’पेक्षा ते काहीसं वेगळं असतं. वहिवाटीच्या वाटांहून
ते नक्कीच निराळं असतं. आपली नजर शोधत राहिली, की ते पटकन समोर येतं.
आपल्याला ते आनंद देतं अन् अचंबितही करतं. मग ते अनवट समुद्र किनारे असोत,
वा गिर्येचं अद्भुत रामेश्वर मंदिर असो!
शनिवार। 22 आॅक्टोबर 2022
। नागठाणे, जि. सातारा
sunilshedage123@gmail.com
Mob : 98224 54630
आचऱ्यातला आनंद!
0
अगदी अलीकडची कोकण सफर ती आचऱ्यातली. आचरा येतं सिंधुदूर्ग जिल्ह्यात. ते आहे मालवणनजीक.
आचरा
हे एकेकाळचं प्रसिद्ध बंदर. केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही ते प्रसिद्ध
होतं. छत्रपती शिवरायांचंही या बंदराकडं विशेष लक्ष होतं. सरखेल कान्होजी
आंग्रे यांचीही इथं कायम ये-जा असायची. आता आचरा ओळखलं जातं ते रामेश्वर
मंदिर अन् स्वच्छ, सुंदर बीचसाठी!
खरं तर कोकणात उतरण्यासाठी विविध घाटमार्ग आहेत. आम्ही उतरलो ते
अनुस्कुरा घाटातून. एरवी कधीही तिथून जाणं झालं नव्हतं. त्याआधीचं थोडं
थांबणं झालं ते मलकापुरात. तिथं दिग्विजय कुंभार, एन. डी. जामदार हे
‘व्हाॅटस अप’नं जोडलेले अगत्यशील मित्र आहेत. त्यांना विसरून पुढं जाणं
कधीच घडत नाही. आताची ही आमची चोैथी भेट.
कुंभार सरांचा वाचनाचा, पुस्तकांचा मोठा व्यासंग आहे. जामदारसाहेब ‘केडीसीसी’ बँकेत निरीक्षक आहेत.
मलकापुरातून मग इतिहासप्रसिद्ध पावनखिंड. घाट उरतून नंतर राजापूर,
कणकवली. सायंकाळी पोचलो ते थेट बीचवर. सांजवेळचा समुद्र यासारखी दुसरी
सुंदर गोष्ट ती कुठली? त्यातच
आचऱ्याचा बीच विस्तृत आहे. तो पावलांना दूर घेऊन जातो. मनात आनंदाचं वारं भरतो.
सकाळी उठून मग रामेश्वर मंदिरात.
ते
बीचपासून थोडं दूर आहे. मंदिर आहे ते सुमारे चारशे वर्षांपूर्वीचं.
प्रांगणात सात वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळा आहेत. मंदिरातलं नक्षीकाम लक्षवेधक
ठरतं. आतल्या भिंतीवर जुना शिलालेख पहावयास मिळतो. त्यावर शके 1584 असा
उल्लेख आढळतो. मंदिर परिसरात 16 हजारांहून पुस्तकं असलेलं समृद्ध ग्रंथालय
आहे.
आचऱ्यात दर तीन वा पाच वर्षांनी ‘गावपळण’ नावाची प्रथा पाळण्यात येते. ती सर्वदूर प्रसिद्ध आहे. या काळात साऱ्या गावातले लोक तीन दिवस गाव सोडून बाहेर जातात. अजूनही ही प्रथा अबाधित आहे.
आचऱ्यातनं मालवण मग नजीकच आहे. जेमतेम वीसेक किलोमीटरचं अंतर. वाटेवर वायंगणी, तोंडवली बीच लागतात. थोडं आत सर्जेकोट बंदरही आहे. एकूणच काय, तर मालवण ते आचरा आनंदी आनंद!
आरवलीच्या आठवणी!

शिरोड्यालगतच आरवली.
शिरोडा अन् आरवली म्हणजे जणू अगदी हाकेचं अंतर.
शिरोडा अन् वि. स. खांडेकर हे जसं जुळलेलं समीकरण. अगदी तसंच आरवली अन्
जयवंत दळवी यांचं.
आरवलीतलं वेतोबा मंदिर हे कोकणवासीयांचं श्रद्धास्थान. वेंगुर्ल्याहून गोव्याकडं जाताना अगदी रस्त्यालगतच मंदिर आहे. ते 1660 मध्ये बांधलं आहे. सुरवातीलाच आकर्षक प्रवेश कमान. वेतोबाची मूर्ती पंचधातूची आहे. त्याच्या हातात साडे तीन फुटांची तलवार आहे. वेतोबा मंदिरापुढं सातेरी देवीचं मंदिर. तिथंही आणखी एक प्रवेश कमान. लांब- रुंद मंदिर.
दळवींच्या बहुतेक लेखनात या दोन्ही मंदिरांचा उल्लेख कित्येकदा आला आहे. खास करुन त्यांच्या ‘महानंदा’ या प्रसिद्ध कादंबरीत तिथलं वर्णन आहे. ‘महानंदा’ सिनेमातलं चित्रीकरणही आरवलीतलंच.
मंदिरापासून काही अंतरावरच प्राथमिक शाळा. दळवींचं आरंभीचं शिक्षण या शाळेतच झालं. तिथंच समोर त्यांचं घर आहे. या घराचंही वर्णन त्यांच्या लेखनात पुष्कळदा आलं आहे. दळवींचा मित्र परिवार विस्तृत होता. पु. ल. देशपांडे, दुर्गाबाई भागवत, मधुमंगेश कर्णिक, महेश एलकुंचवार यासारख्या दिग्गजांचे पाय या घराला लागले. गोव्याला जाताना कित्येक साहित्यिक इथं उतरत.
दळवींचं लेखन हा माझा प्राणप्रिय विषय. त्याच ओढीतून मी पहिल्यांदा
एकटाच आरवलीत त्यांच्या घरी पोचलो होतो. मग कुटुंबासोबत तिथं गेलो. नंतर
गणेश शिंदे, राजेंद्र म. घोरपडे, विनोद शिंगाडे, कुंडलिक जगदाळे या
मित्रांसोबतही तिथं जाणं घडलं. राजेंद्र बोबडे, विक्रम साळुंखे
धनाजी
देशमुख, शिवाजी भोसले, जितेंद्र ढमाळ, शिवसागर जैस्वारा यांसारखे माझे
मित्रवर्यही तिथं जाऊन आले. दळवींचे पुतणे सचिंद्र दळवी यांच्या
कुटुंबियांचं आता तिथं वास्तव्य असतं. या भेटींतून त्यांचाही स्नेह जुळला.
मध्ये मी दळवींवर एक पत्र विस्तारानं लिहिलं. ते त्यांचे पुत्र गिरीश
यांच्यापर्यंत पोचलं. त्यांचाही मग फोन झाला.
एकूणच काय, तर आरवलीच्या या साऱ्याच आठवणी संस्मरणीय आहेत.
आयुष्यभर सोबत करणाऱ्या आहेत.
कधी तळकोकणाच्या वाटेवर असाल तर शिरोडा, आरवलीचं हे साहित्य वैभव नक्कीच पहा!
शिरोड्याचं शिल्प!
0
शिरोडा तळकोकणात. गोव्याच्या वाटेवर. ते प्रसिद्ध आहे इथल्या बीचसाठी. शिरोड्याला प्रशस्त समुद्र किनारा लाभला आहे. त्याच्या तीरानं पांढऱ्याशुभ्र रेतीत पाय बुडवून खूप दूरवर चालता येईल असं हे ठिकाण. एरवीचा गलबला, गोंगाट इथं आढळत नाही. त्यामुळंच शिरोडा बीचला कित्येकांची पसंदी मिळते.
देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातही शिरोड्याला स्थान आहे. 1930 मध्ये इथं मिठाचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला होता. तळकोकणातल्या मालवण, मिठबाव आदी भागात पूर्वी मीठ उत्पादन व्हायचं. आज तिथं मिठागरं उरली नाहीत. शिरोडा हेच एकमेव गाव, जिथं सध्या मीठ बनतं.
अर्थात शिरोड्याला आणखी एक नवी ओळख मिळवून दिली ती वि. स. खांडेकरांसारख्या दिग्गज साहित्यिकानं. ते मराठीतले पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते. त्यांचं सुमारे दोन दशकं वास्तव्य इथं होतं इथल्या तत्कालीन ट्युटोरिअल इंग्लिश स्कूलचं मुख्याध्यापकपद त्यांनी सांभाळलं. या प्रतिभावंताच्या दुर्मिळ आठवणी आता गुरूवर्य वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या रुपानं जिवंत करण्यात आल्या आहेत.
खांडेकराचं संग्रहालय अलीकडच्या काळातलं. म्हणजे 2016 च्या मे महिन्यात त्याचं लोकार्पण झालं आहे. गोव्याहून येणारा रस्ता, वेंगुर्ला अन् सावंतवाडीकडं जाणारे रस्ते. या तिन्ही रस्त्यालगत विद्यालयाची भव्य इमारत. तिथं हे आगळं साहित्यशिल्प आकारास आलं आहे.
दर्शनी बाजूलाच खांडेकरांचं शिल्प दिसतं. त्याला समुद्राची पार्श्वभूमी आहे. समुद्र गाजेचं पार्श्वसंगीत आहे. खांडेकर जणू साक्षात आपल्यासमोर ध्यानमग्न बसले आहेत, असाच भास होतो. शिरोड्यातील वास्तव्यात ते नेहमीच सागरकिनारी फिरायला जात. हा संदर्भ या शिल्पात अधोरेखीत होतो.
खांडेकर प्रथम इथं आले, तेव्हा सावंतवाडी ते शिरोडा हा प्रवास त्यांनी पायी केला होता. सारवट गाडीचे पैसे द्यायचीही त्यांची ऐपत नव्हती. ती आठवण म्हणून तत्कालीन सारवट गाडी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी ठेवण्यात आली आहे. आतील बाजूस तो काळ जिवंत करणारी छायाचित्रं, पत्रं, तेव्हाचे संदर्भ दिसतात. खांडेकर हे चित्रपट पटकथाकारही होते. त्यामुळे कॅमेरा, लाइट, माईक, बॅनर्स, पोस्टर्स, शूटिंग सेटही इथं पहायला मिळतो. खांडेकर जिथं बसून लेखन करत ती टेबल, खुर्चीही इथं दिसते.
1920 ते 1938 या काळात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, साहित्यसम्राट न. चिं.
केळकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, आचार्य प्र. के. अत्रे,
सिनेदिग्दर्शक मा. विनायक, बाबुराव *
पेंढारकर, कवी बा. भ. बोरकर, कवी
गिरीश, कवी यशवंत आदींचं शिरोड्याला येणं झालं. त्यांच्या तत्कालीन
छायाचित्रांचं दर्शनही आपल्याला घडतं.
खांडेकरांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप, भारतीय ज्ञानपीठ, पद्मभूषण आदी गोैरव प्राप्त झाले. त्यांच्या प्रतिकृतीही इथं पहावयास मिळतात.

दापोली म्हणजे कोकणातलं तालुका मुख्यालय. इथलं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे देशातलं सर्वात मोठं कृषी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. दापोलीतून सरळ जाणारा रस्ता हर्णेकडं जातो. उजव्या हाताचा रस्ता साने गुरुजींच्या पालगडकडं जातो. डाव्या हाताच्या रस्त्यानं आपण दाभोळला पोचतो. याच रस्त्यावर थोडी आत बुरोंडी. दापोलीतून जेमतेम अर्धा तास अंतर.
बुरोंडीत परशुरामाचं शिल्प आहे. ते पृथ्वीसदृश्य अर्धवर्तुळाकारावर विसावलेलं आहे. आतल्या बाजूस ध्यान मंदिर आहे. दापोलीतून एक- दोन गाव ओलांडली, काही घाटदार वळणांना वळसा घातला, की आपण उंच टेकडीवर पोहचतो. तिथंच ही थक्क करणारी सृष्टी आहे.
कोकण ही भगवान परशुरामाची भूमी.
परशुराम हे पराक्रमाचं प्रतीक.
त्याचं प्रेरणादायी दर्शन घडावं या हेतूनं पुण्यातल्या भोसरीच्या
‘इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लि’ अन् ‘न्यू मॉडर्न ऑप्टिशियन’चे
संचालक अनिल गानू अन् अश्विनी गानू यांनी या लाजवाब शिल्पाची निर्मिती केली
आहे.
सुमारे 40 फूट व्यास असलेल्या अर्धगोलाकृती पृथ्वीवर सोलापूरचे शिल्पकार ज्ञानेश्वर गाजूल यांनी फायबर ग्लासमधे घडवलेली परशुराम मूर्ती आहे. ती 21 फूट उंच आहे. उत्तराभिमुख असलेली ही मूर्ती पाहताना आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं. तिथं सभोवती असलेलं उद्यान प्रसन्नतेची अनुभूती देतं.
अर्थात इथलं खरंखुरं वैशिष्ट्य पुढंच आहे. म्हणजे अर्धवर्तुळाकृती पृथ्वी आकारात ध्यान मंदिर आहे. इतक्या मोठ्या व्यासाचं हे मंदिर. मात्र मध्ये कुठंही खांब दिसत नाही. तिथं शांतचित्तानं बसणं हा एक विलक्षण अनुभव असतो. तिथलं ‘ फोटोसेशन’ हेदेखील एका नव्या प्रांतात गेल्याचा भास निर्माण करतं.
इथून पश्चिमेस खोलवर समुद्राचं दर्शन घडतं. ते विलक्षण मनोहारी ठरतं. ते ठिकाण म्हणजे लाडघरचं तामसतीर्थ.
इथल्या
समुद्र किनाऱ्यावरची रेती तांबडी असल्यानं पाण्याचं लाल रंगात
‘रिफ्लेक्शन’ दिसतं. ते वेगळंच भासतं. लक्षात राहतं. काठचे शैवालखडकही
नजरेत भरतात.
तिथं प्रशस्त बीच आहे. घोड्यावरुन, उंटावरुन सफर, सी- रायडिंग,
पॅराग्लायडिंग, मोटर बोट, बडी हॉटेलं, धुंद पर्यटक वगैरे. तिथं अगदी
सारंकाही दिसतं.
‘श्यामची आई’ पुस्तकात साने गुरुजी यांनी लाडघरच्या
या तामसतीर्थाचं खूपच सकस, समर्थ अन् समर्पक भाषेत विस्तृत वर्णन केलं
आहे. अगदी एक प्रकरण या लाडघरनं भरलं आहे.

एरवी कोकण सफर म्हटलं, की त्यात हर्णे अन् करदे बीच ही स्थळं ओघानंच येतात. त्याच वाटेवर गच्च सावली पांघरलेलं एक नितांतसुंदर ठिकाण आहे. त्याचं नाव आसूद. दापोली सोडली, की बहुतेक जण सरळ हर्णे बंदराकडं वा करदे बीचची वाट धरतात. मग आसूद बाजूलाच पडतं.
दापोलीपासून अासूद वीसेक मिनिटांत. सुरवातीला आसूद बाग. तिथं शेकडो वर्षांपूवीची वृक्षसंपदा. उंचच उंच झाडं. उन्हाची किरणंही जमिनीवर दिसणं दुरापास्त. निसर्गानं इतकं भरभरून आसूदला दिलं आहे. हे गाव सुपारीसाठी प्रसिद्ध आहे. आंबा, फणस, काजू, नारळाचीही झाडंच झाडं. त्यामुळं अासूद म्हणजे जणू सावलीचं बन!
आसू्दच्या बागांतून सतत पाटाचं पाणी खळाळत असतं. नैसर्गिक उतारावरून हे पाणी आणलं आहे. ते शेतीसाठी वापरलं जातं. सुमारे दीडशे वर्षांपासून लोकसहभागातून पाणीवाटपाची ही अनोखी पद्धत आजही अखंडपणे इथं सुरू आहे.
आसूद बनातून पूल ओलांडून पुढं गेलं, की केशवराज मंदिर. गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण एक हजार वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगतात. पांडवांनी एका रात्रीत ते उभारल्याची आख्यायिकाही आहे. मंदिराच्या प्रांगणात दगडी गायमुख आहे. त्यातून वर्षभर पाणी वाहतं.
आसूदचं आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्यं आहे. सिद्धहस्त साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या बहुचर्चीत कादंबरीतलं बहुतेक वर्णन हे याच परिसरातलं. कादंबरीत लाकडी साकव दिसतो. तिथं राधा अन् बापू भेटत असत. बापूचं हॉटेलही याच परिसरातलं. आता साकवाचे केवळ उभे खांब उरले आहेत. त्याची जागा काँक्रिटच्या पुलानं घेतली आहे.
‘श्री. ना.’ हे हर्णेलगतच्या मुर्डी गावचे.
एका कोकणसफरीत त्यांच्या
घरी जाण्याचा योग आला होता. गमतीची गोष्ट अशी, की कोकणात गारंबी हे गाव
आपल्याला कुठंच दिसत नाही. मुळात ती ‘श्री.नां’च्या कल्पना अन्
प्रतिभाशक्तीची किमया मात्र गारंबीतलं बहुतांश वर्णन आहे ते आसूद गावातलं.
कादंबरीवर बेतलेला अन् काशीनाथ घाणेकर यांच्या अभिनयानं साकारलेल्या ‘गारंबीचा बापू’ या सिनेमाचं चित्रीकरणही याच परिसरात झालं आहे.
चोैलचं मंदिर अन् रेवदंडा किल्ला
0
अलिबाग सोडलं, की मुरूड जंजिऱ्यापर्यंत वाटेवर सतत काही न् काही प्रेक्षणीय भेटत राहतं. समुद्राच्या कडेनं अापण पुढं सरकत राहतो. सुरुची बनं, नारळीपोफळीच्या बागा कायम संगतीला असतात. अक्षी- नागावचा किनारा गर्दीनं ओथंबलेला असतो. सुटीच्या काळात काशीद बीचवर पर्यटक मावत नाहीत. या साऱ्यात चोैलचं रामेश्वर मंदिर अन् रेवदंड्याचा किल्ला आठवणीत घर करुन राहतो.
मुळात चोैल अन् रेवदंड्याचा उल्लेख बहुतेक जण एकत्रतच करतात. परस्परांशी बिलगलेली ही गावं. चोैलमध्ये तशी कितीतरी प्राचीन मंदिरं. मात्र अगदी रस्त्याकडेला असलेलं रामेश्वराचा मंदिर लगेचच अापलं लक्ष वेधून घेतं. ते अगदी चार- पाचशे वर्षे जुनं आहे. सभामंडपाची स्थापत्यशैली हेमाडपंथी आहे. मंदिरासमोरची भव्य पुष्करिणी नजरेत भरणारी ठरते.
चोैलनंतर पुढं रेवदंडा. अगदी रस्त्यावरच एक स्मृतिस्तंभ दिसतो. भारतात पाचशे वर्षांपूर्वी आलेल्या रशियन प्रवासाच्या स्मृतीप्रीत्यर्थ तो बांधण्यात आला आहे.
रेवदंड्याचा किल्ला अगदी समुद्राला खेटून आहे. किल्ला म्हणजे त्याची सध्याची तटबंदी. ती लांबलचक आहे. अगदी पाच किलोमीटर घेराची. त्यावरून तत्कालीन किल्ल्याची भव्यता नक्कीच ध्यानात येते. तटबंदीशेजारुन समुद्राचं घडणारं दर्शन अप्रतिम असतं. तटबंदी अन् तिथलं ‘फोटोसेशन’ याकडं बहुतेक पर्यटकांचा कल असतो. आमच्या सफरीतही मित्रांच्या संग्रही असे संस्मरणीय फोटो आले.
इथंच नजीक पाच मजली उंच मनोरा आहे. त्याला ‘सातखणी’ म्हणून संबोधतात. विविध आकाराच्या ओतीव तोफाही इथं पहावयास मिळतात.
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यानं रेवदंड्याचं नाव देशपातळीवर पोचलं आहे. डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, आध्यात्म, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती कैक समाजोपयोगी कामं उभी राहिली आहेत. त्यांच्या लाखो अनुयायांची पावलं रेवदंड्याकडं वळतात.
मध्ये एक पुस्तक वाचनात आलं. राजहंस प्रकाशनाचं ‘माझे किहीम’ असं त्याचं नाव. मीना देवल या त्याच्या लेखिका. किहीम हे अलिबागनजीकचं गाव. तिथला समुद्र, निसर्ग, माणसं याचं वर्णन या पुस्तकात होतं. पुस्तक वाचता वाचता मन किहिममध्ये जाऊन पोचलं.
कधीतरी किहिमला जायचं असं त्याच दिवशी ठरवून टाकलं. त्याला मुहूर्तही लगोलग मिळाला. दहा मित्र अन् दोन ‘फोर व्हीलर’. पुण्यातलं स्वामीनारायण मंदिर, शिरगावचं प्रति शिर्डी, भाजे लेणी, लोहगड- विसापूर किल्ल्यांतील खिंड या मार्गानं लोणावळ्यात आलो. मग खोपोली, पेण, वडखळ नाक्यावरुन सायंकाळी मुक्कामाला थेट किहिमला उतरलो.
किहिम हे स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. इथून बरोबर समोर खांदेरी अन् उंदेरी हे जलदुर्ग आहेत. इथं लांबच्या लांब किनारा आहे. पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स आहेत. स्पोर्ट्स बाईक आहे. नाईट कॅम्पिंगची सुविधा आहे. वाळूतून घोडागाडीची सफर अन् उंटावरूनही फेरफटका मारता येतो. पॅराग्लाइडिंगचा थरार अनुभवता येतो. उल्लेखनीय म्हणजे मुंबईतील गेट वे आॅफ इंडियाहून होैशी पर्यटक बोटीनं रेवस, मांडवा जेटीपर्यंत येतात. तिथून मग किहीम गाठतात.
इथं किनाऱ्यावर नारळाची झाडं, सुरुची बनं विपुल प्रमाणात आहेत. त्यामुळं सोैंदर्यात आणखीच भर पडते. इथल्या जैवविविधतेमुळं किहिममधलं पक्षीजीवनही समृद्ध बनलं आहे. त्यामुळंच जगत विख्यात पक्षी अभ्यासक सलीम अली यांचं इथं काही काळ वास्तव्य होतं.
किहिममधून अलिबाग जेमतेम अर्धा तासाच्या अंतरावर येतं. आक्षी, नागाव, रेवदांडा बीचदेखील नजीकच आहेत.
असगोलीची आठवण!
0
खरं तर ‘असगोली’ हे गावाचं नाव त्या आधी कधीही ऐकलं नव्हतं. मग त्या गावचं वैशिष्ट्य ठाऊक असणं तर दूरच. मात्र केवळ एकाच भेटीत असगोलीची आठवण कायम मनात घर करुन राहिली हे नक्कीच. तिथला शांत समुद्र, निवांत बीच, किनाऱ्यावरचं वालुकेश्वराचं प्राचीन मंदिर सदैव स्मरणात राहिलं.
गुहागरातून असगोली अगदीच जवळ. म्हणजे गुहागरची हद्द कधी संपते अन् असगोलीत आपण कधी येतो, हे लक्षातही नाही येत. गुहागरात व्याडेश्वराचं मंदिर, समुद्र पाहून बहुतेक जण पालशेत, वेळणेश्वर, हेदवीचा रस्ता निवडतात. असगोली याच रस्त्यावर. मुख्य मार्गावरुन उजव्या हाताचा उतार कोळीवाड्यातून थेट किनाऱ्याकडं जातो.
इथला बीच स्वच्छ आहे. इथं तुलनेनं शांतता असते. गर्दी नसते, की गोंगाटही नसतो. मऊ रेतीतून अनवाणी पाय घेऊन अगदी दूरवर चालत राहता येतं. एका टोकाला पाण्याबाहेर डोकावणारे खडक आहेत. ‘फोटोसेशन’साठी ते शोभून दिसतात. एकूणच ती जागा सुंदर आहे. आठवणीत राहणारी आहे.
किनाऱ्यावर वालुकेश्वराचं मंदिर आहे.
भोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे.
मंदिरासमोर भव्य दीपमाळ, तुळशी वृंदावन आहे. सभामंडप अन् गाभारा अशी
मंदिराची रचना आहे. सभागृहात मोठ्या नंदीचं शिल्प आहे.
असगोलीतून बाहेर पडल्यावर काही अंतरावर रस्त्यालगतच दुसऱ्या बाजीरावाचा वाडा आहे. रघुनाथराव पेशवे अन् आनंदीबाईचा हा पुत्र. त्याच्या या वाड्याचे आता केवळ भग्न अवशेष उरले आहेत. 1823 मध्ये इंग्रजांनी तो जमीनदोस्त केला.
याच रस्त्यानं नागमोडी वळणं घेत आम्ही उंचावर पोचलो. इथून दिसणारं समुद्रकिनाऱ्याचं दर्शन नितांतसुंदर होतं. सूर्य तेव्हा निरोपाच्या वाटेला निघाला होता. पश्चिमेकडून येणारा वारा थेट आमच्याकडं येत होता. खाली खोलवर जहाजांचे काफिले होते. होड्यांचे ठिपके हेलकावे खात होते. वाऱ्यावर त्यांची निशाणे फडफडत होती. हे सारं निव्वळ शब्दांतीत होतं. किंबहुना हेच दृश्य आमच्यासाठी आता असगोलीची आठवण बनून उरलं आहे.
वालावलच्या वाटेवर!
0
धामापूर सोडलं. मग वाटेत नेरुरपार. कर्ली नदीवरचा पूलही ओलांडला. पाच वाजून गेले होते. सावल्याही मंदावत चालल्या होत्या. एका तिठ्याजवळ थांबलो. शालेय गणवेशातली दोन- चार चिमुरडी घरी निघाली होती. शाळा सुटलेली. त्यांच्याशी थोडी प्रश्नोत्तरं झाली. मग वालावलच्या वाटेला लागलो.
वालावल दशावतारी नाटकासाठी प्रसिद्ध आहे. कोकणातल्या बहुतेक साहित्यिकांच्या लेखनात दशावतारी नाटकांचा संदर्भ येतो. खास करुन दळवींच्या ‘सारे प्रवासी घडीचे’ पुस्तकात दशावतारी प्रयोगाचं वर्णन वाचताना हसून पुरेवाट लागते. त्यातली पात्रं आठवत, गप्पा मारत वालावलमध्ये आलो. छोटेखानी बसथांबा होता. तिथंही दशावतारी नाट्य मंडळाचे बॅनर दिसत होते.
लक्ष्मीनारायण मंदिर ही वालावलची मुख्य ओळख. हेमाडपंथी वास्तुकलेची ही अद्भुत निर्मिती. मंदिर पूर्वाभिमुखी आहे. तेही अगदी सात- आठशे वर्षांपूर्वीचं. बहुतेक बांधकाम जांभ्या दगडातलं आहे. खांबावरचं कोरीव काम अचंबित करणारं आहे. प्रत्येक खांबावर पौराणिक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्यातली कलाकुसर अन्यत्र अभावानाचं पहावयास मिळते. मंदिरालगत विस्तीर्ण तलाव आहे. भोवताली नारळपोफळीची झाडंच झाडं आहेत. मंदिरासमोरचा नगारखाना अन् दीपमाळा यामुळं हा परिसर आणखीच अाकर्षक भासतं.
इथून नजीकच कर्लीची खाडी. तिथला निसर्ग अन् नजारा नजरेचं पारणं फेडणारा ठरतो. तिथं नोैकाविहारही सुरु असतो. आम्हांला तितकासा वेळ नव्हता. सांजेचीही चाहूल लागत होती. कुडाळ गाठायचं होतं.
हे वालावल म्हणजे कित्येक दिग्गजांची भूमी. ‘दी ग्रेट राॅयल सर्कस’चे मालक सीताराम वालावलकर, लेखक अनंत सी. देसाई, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसशास्रज्ञ डॉ. पंढरीनाथ प्रभू, कोकण रेल्वेचे आद्यपुरस्कर्ते अ. ब. वालावलकर, किर्लोस्कर कंपनीतील नटश्रेष्ठ दादा वालावलकर, संगीत दिग्दर्शक पुरुषोत्तम वालावलकर ही मंडळी इथलीच.
‘चानी’ ही प्रसिद्ध साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांची साहित्यकृती. त्यावर निघालेल्या ‘चानी’ या चित्रपटाचं चित्रीकरण याच परिसरात झालं आहे. असं हे वालावल. खास करुन इथल्या लक्ष्मीनारायण मंदिरासाठी ते एकदा तरी पहायलाच हवं!
धामापूरचं निसर्गधन!
0
कोकणात अनेकदा जावूनही धामापूर मात्र बाजूलाच पडायचं. धामापूरविषयी अनेक ठिकाणी वाचलं होतं. काही मित्रांकडूनही त्याविषयी ऐकलं होतं. तिथलं समृद्ध निसर्गधन, संपन्न जैवविविधता, अथांग पसरलेला तलाव या वैशिष्ट्यांचं कुतूहलही होतं.
अशातच अलीकडंच्या कोकणवारीत धामापूर गवसलं. मालवण ते कुडाळ रस्त्याच्या मध्यावर ते आहे. म्हणजे मालवणहून यायचं म्हटलं, तर सुमारे 15 किलोमीटरचं अंतर. कुडाळहूनही आलो, तरी त्यात फारसा फरक पडत नाही.
धामापूर म्हणजे आंबाफणसाच्या, माडापोफळीच्या बागाच बागा अन् हिरवाई घेऊन खळाळणारं पाणी.
साहित्यिक
पु. ल. देशपांडे यांच्या सहचारिणी सुनीताबाईंचं माहेरही धामापूर. खरं तर
रस्त्यावरुन इथली महती पटकन लक्षात येत नाही. गाडी पार्क करुन पायऱ्या चढून
वर गेलं, की मग इथली अद्भुतता लक्षात येते. अवर्णनीयता ध्यानात येते.
सुरूवातीला दिसतं ते भगवती देवीचं मंदिर. त्याची स्थापत्यशैलीही
तळकोकणातल्या मंदिरांसारखीच आहे. या कोैलारु मंदिरातलं लाकडावरचं कोरीवकाम
थक्क करणारं आहे.
अर्थात धामापूरचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरालगत असलेला तलाव. त्याची रचना अंडाकृती आहे. आपल्याकडचा कास तलाव जसा दूरुनही लक्षवेधक ठरतो, इथंही अगदी तसंच. निळेशार पाणी अन् सोबतीला गच्च वृक्षराजी.
हा तलाव जवळपास 500 वर्षांपूर्वीचा. 1530 मध्ये तो बांधण्यात आला आहे. खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्याही आहेत. त्याची रचना अभ्यासनीय आहे. तलावाभोवती शेकडो एकरांचं जंगल आहे. वन विभागानं ते विकसित केलं आहे. इथं कैक जातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. पक्षीनिरीक्षणासाठी 40 फूट उंचीचा मनोराही आहे.
उल्लेखनीय म्हणजे आम्ही तलावाभवती रेंगाळत असताना तिथलेच एक स्थानिक गृहस्थ आम्हांला भेटले. डाॅ. हरिष नातू हे त्यांचं नाव. त्यांनी तलावाची रचना, इथली भोैगोलिक, जैविक विविधता, ऐतिहासिक पार्श्वभूमी या साऱ्यांचा तपशील अगदी सूक्ष्मपणे सांगितला. त्यांच्या अभ्यासाचा आवाका अचंबित करणारा होता. धामापूरला निरोप देताना आम्ही डाॅक्टरांना मनोमन धन्यवाद दिले. मग आमच्या गाडीच्या पावलांना वालावलचे वेध लागले.
टणक ‘उंटाची पाठ’
0
साताऱ्याच्या अवतीभवती फेरफटका मारण्यासाठी कितीतरी खुणावणारी ठिकाणं आहेत. अजिंक्यतारा किल्ला,
चारभिंती,
मंगळाई देवीचं मंदिर, पेढ्याचा भैरोबा, जानाई- मळाई ही नावं त्यातलीच.
अलीकडच्या काळात त्यात ‘उंटाची पाठ’ या ठिकाणाची नव्यानं भर पडते आहे.
‘उंटाची पाठ’ हे डोंगरउंचावरचं ठिकाण. हे नावदेखील काहीसं गमतीदार. मात्र त्या ठिकाणाचा आकारच मुळी आहे तसा. अगदी उंटाच्या पाठीसारखा. वेगवेगळ्या मार्गानं तिथं पोचता येतं. हायवेनं दोन्ही बाजूंकडून सातारा शहरात येताना ही ‘उंटाची पाठ’ अगदीच ठसठशीतपणे नजरेत भरते.
सातारा शहरात प्रवेश करताना शिवराज पेट्रोल पंपानजीक डाव्या बाजूला खडा
डोंगर दिसतो. तिथून जाणाऱ्या मार्गाचा बहुतेक जण अवलंब करतात. गोळीबार
मैदान परिसराकडूनही वर पोचता येतं. खिंडवाडी बाजूकडून ‘एसपीएस’ काॅलेज
समोरची टेकडी वर चढून आल्यावर तिथूनही जाणारी पायवाट आहे. अर्थात कुठनही
साधारण 20 ते 30 मिनिटांची चढण चढावी लागते. सुरूवातीला मधल्या टप्प्यावर
सपाटीला छोटेखानी भैरवनाथ मंदिर आहे.
या मंदिरामागून जाणारी पाऊलवाट
थेट ‘उंटाच्या पाठी’कडं जाते. दोन्ही बाजूला दाट झाडी आहे. वाट एकदम खडी
आहे. दोन्ही बाजूंच्या झाडांचा आधार घेत तोल सावरत चढण गाठावी लागते. शेवटी
एक भला मोठा दगडी कडा आहे.
परिसरातील होैशी युवकांनी वायर रोप बांधून वर जाण्याची सोय केली आहे. त्याला धरून सावधगिरीनं वर जावं लागतं. हा मार्ग धोकादायक आहे. परीक्षा पाहणारा आहे. तिथून वर पोचल्यानंतर आपण डोंगरउंचावर पोचतो. इथून सातारा शहराचं विहंगम दृश्य दिसतं. सज्जनगड, जरंडेश्वर, कल्याणगड, चंदन- वंदन, पाटेश्वर, जानाई- मळाई डोंगर, शिलोबाचा डोंगर, दोन्ही बाजूकडचा हायवे असा दूरवरचा परिसर दृष्टिक्षेपात येतो.
‘उंटाची पाठ’ चढून सरळ अजिंक्यतारा किल्ल्याकडं पोचता येतं. काही ठिकाणी हा मार्ग अगदीच अरूंद आहे. दक्षता घेतच दक्षिण दरवाज्याकडं जाता येतं. तास-दीड तासाची ही भटकंती. अर्थात एकट्या-दुकट्यानं जाणं हे जोखमीचं. बिबट्यासह वन्य श्वापदाचा संचार परिसरात आढळतो. सापांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो.
एरवी नित्याच्या ठिकाणांना छेद देणारी ही ‘उंटाची पाठ’. त्यातून चांगलीच पायपीट होते. शरीरही घामाघूम होतं. खडतरतेची प्रचीती येते. नवंकाही पाहिल्याचं, अनुभवल्याचं समाधानही लाभतं, हे नक्कीच!
एक संस्मरणीय ट्रेक
0
खोलवर पसरत गेलेलं निळंशार पाणी, हिरवंकंच जंगल, उंचच उंच कातळ, पाखरांचा किलबिलाट… शिवसागरापलीकडच्या जगाची ही सारी वैशिष्ट्यं. 1967 मध्ये कोयना वीज प्रकल्पाची निर्मिती झाली. त्यानंतर कोयनेचं ‘बॅकवाॅटर’ थेट 70 ते 80 किलोमीटर दूर प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन भिडलं. त्यातून शिवसागरापलीकडं एक नवं जग आकारास आलं. पर्यटकांसाठी, निसर्गप्रेमींसाठी हा प्रदेश म्हणजे भटकंतीची पर्वणी.
दमछाक करायला लावणारे वासोटा, महिमंडणगड, मकरंदगडासारखे किल्ले, गरगरायला लावणाऱ्या चकदेवच्या शिड्या, पर्वत अन् उत्वेश्वराची डोंगराच्या सुळक्यावरची मंदिरं, माणसाच्या प्रबळ इच्छाशक्तीतून साकारलेला रघुवीर घाट, कोयनेचं घनगर्द अभयारण्य ही सारी स्थळं याच परिसरातील. जलविहारासाठी प्रसिद्ध असलेलं बामणोली अन् ‘मिनी काश्मीर’ म्हणून संबोधलं जाणारं तापोळा ही स्थानंही शिवसागराभोवतीच.
खरं तर विलक्षण निसर्गसोैंदर्यानं गच्च फुललेल्या शिवसागरापलीकडच्या या
मुलूखाची सफर कित्येकदा अनुभवली. त्यातून अनेक ट्रेक यशस्वी झाले. अर्थात
या परिसराचं वेड, तिथली ओढ कायमच मनाला भुरळ घालत राहिली. त्यामुळंच पावलं
पुनःपुन्हा या परिसराकडं वळत राहिली. त्यातून नुकताच पर्वतच्या
मल्लिकार्जुन मंदिराचा ट्रेक पूर्ण केला.
इतकंच काय, निर्जन, निर्मनुष्य
असलेल्या रघुवीर घाटातून कोकणातल्या खेड (जि. रत्नागिरी) इथं आम्ही उतरलो.
मग खेड, पोलादपूर तिथून अंबेनळी घाटाची चढण चढत महाबळेश्वर. पुढं
केळघरच्या घाटानं पुन्हा साताऱ्यात. हा ट्रेक अनेकार्थी संस्मरणीय ठरला.
कुठं नागमोडी घाटदार वळणं, कुठं जंगलातले कच्चे रस्ते, कुठं पाण्यातून
प्रवास, तर कुठं जंगलातली पायपीट. आमचा मुक्काम झाला तोदेखील पर्वतसारख्या
शांत, रमणीय, नितांतसुंदर ठिकाणी.
मुळात पर्वत हे सातारा जिल्ह्यातल्या सर्वात उंच स्थळांपैकी एक. ते महाबळेश्वर तालुक्यात येतं. सातारा अन् रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरचं हे ठिकाण. समुद्रसपाटीपासून सुमारे साडे चार हजार फूटांहून अधिक इथली उंची. इथून सातारा अन् रत्नागिरी जिल्ह्यातल्या निसर्गाचा आसमंत नजरेत उतरतो. मनाला मोहून टाकतो.
पर्वतला पोचण्यासाठी विक्रम साळुंखे या मित्रासोबत दुचाकीवरुन हललो. सातारा सोडल्यावर वाटेत यवतेश्वर, पेटेश्वर ही मंदिरं लागली. घाटाईची देवराई ओलांडून आम्ही कासच्या जगप्रसिद्ध पुष्प पठारावर पोचलो. मग सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटीशकालीन कास तलावास वळसा घालून आम्ही बामणोलीत आलो. बामणोली म्हणजे शिवसागराच्या काठावर वसलेलं शेवटचं गाव. इथं बोट क्लब आहे. शेकडो लाँच, स्पीड बोट, स्कूटरबोट, हातानं वल्हविता येणाऱ्या होड्या आदींचं दर्शन इथं घडतं. हाॅटेलं, रेस्टाँरंट, कृषी पर्यटन यासह मुक्कामाची सोयही इथं आहे.
आम्हांला मात्र पाण्यापलीकडं जायचं होतं. मग आमची दुचाकी होडीत चढवली. आनंद कांबळे या तरुणाची ही होडी. हातानं वल्हवित त्यानं आम्हांला पलीकडच्या काठावर पोचवलं. मग तिथून आम्ही दुचाकीनं डांबरी रस्ता धरला. काही अंतर गेल्यावर गाढवली हे कोैलारु घरांचं छोटं गाव आलं. तिथून उत्वेश्वराकडं जायला रस्ता लागला. सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं, डांबरीकरणाचं काम सुरू होतं. विजापूर भागातले पन्नासेक कामगार कामावर होते. एरवी हा सारा परिसर सुनसान असतो. जंगल ओलांडून एका खिंडीतून पलिकडं गेलं, की उत्वेश्वराचं मंदिर. वर जायला दगडी चिऱ्यांच्या पायऱ्या आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कल्याण- डोंबिवलीचे खासदार असलेले त्यांचे सुपुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अलीकडच्या काळात इथं कित्येक सोईसुविधा झाल्या आहेत. पायऱ्यांची कामंही त्यांच्याच माध्यमातून झाली आहेत.
मंदिराच्या सुरवातीलाच दगडी कमान. सभोवती दगडांची संरक्षक भिंत. उत्वेश्वराचं मंदिर प्राचीन आहे. भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे. मंदिरात दगडात घडवलेला महाकाय नंदी आहे. इथून कित्येक चोैरस किलोमीटर परीघातला प्रदेश दिसतो. मंदिरालगतच एक हायमास्ट पोल बसविण्यात आला आहे. परिसरातल्या कुठल्याही गावांतून, ठिकाणांहून तो दृष्टीस पडतो. इतक्या उंचीवर तो आहे.
उत्वेश्वराहून आम्ही खाली आलो.
सुरवातीलाच एकनाथ शिंदे यांचं दरे हे
गाव आलं. रस्त्यालगतच त्यांचं भव्य, टोलेजंग घर आहे. तिथली कलाकुसर
पाहण्यालायक आहे. भोवती शेततळी अाहेत. लोकांचं अगत्य भावणारं आहे. शिंदे
पिता-पुत्रांचा गावाशी सतत संपर्क असतो. सातत्यानं ये-जा सुरु असल्याची
माहिती ग्रामस्थांनी दिली. दरेतून
पिंपरी, आकल्पे, निवळी, लामज अशी गावं
मागं टाकत वाघावळेत पोचलो. ही सारीच कोैलारु घरांची गावं. त्यांची
लोकसंख्याही जेमतेम दीड- दोनशेच्या घरात. पशुपालन हे इथलं उदरनिर्वाहाचं
साधन. वरी, नाचणीसारखी पिकं इथं घेतली जातात.
वाघावळे हे त्यातल्या त्यात मोठं गाव. हायस्कूल, प्राथमिक शाळा, दुकान, बँक या सुविधा वाघावळेत आहेत. लगत काही अंतरावर चंद्रराव मोरे यांच्याशी संबंधित असलेलं उचाट गाव आहे. वाघावळेत पोचलो तेव्हा सांज पुरती कलली होती. तिथं प्रसाद झरेकर नावाच्या तरूणाच्या दुकानालगत दुचाकी लावली. मग पर्वतच्या दिशेने ‘कदम कदम बढाए जा’ सुरु केलं. अंधार पसरायला सुरूवात झाली होती. त्यामुळं धास्ती होतीच. तरीही मनाचा हिय्या करुन प्रवास सुरू होता. पर्वतमध्ये पोचायला रात्रीचे आठ झाले. मोबाईल बॅटरीच्या उजेडानं चांगलीच साथ दिली.
पर्वतमध्ये गोपाळ जंगम यांच्या घरी मुक्काम झाला. शेणानं सारवलेलं अंगण, स्वच्छता, टापटीप, आदरातिथ्य यामुळं थकवा पळाला. तांदळाची भाकरी, वरण, भात, दही, घेवड्याची भाजी हा मेन्यूही लक्षात राहिला. रेंजअभावी मोबाईलनं दुपारपासूनच मान टाकली होती. त्यामुळं गोपाळ जंगम यांच्याशी गप्पा इतकंच काम आता उरलं होतं. जंगम हे देवाचे पुजारी. गेली 35 वर्षे ते मंदिरात सेवा करतात. त्यांच्याकडून इथला इतिहास, भूगोल समजला.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठलो.
ओट्यावरच्या कट्ट्यावर स्नान उरकली.
मग चहा घेऊन जंगम यांच्यासोबत जोम- मल्लिकार्जुन मंदिराची वाट धरली. इथून
आणखी दीड तासाच्या अंतरावर हे मंदिर. अरुंद वाटेनं पाय तुडवत मंदिरात
पोचलो. जोम अन् मल्लिकार्जुन ही स्वतंत्र मंदिरं आहेत. बांधकाम हेमाडपंथी
आहे. ते सप्तशिवालयापैकी एक म्हणून गणले जाते. सातारा अन् रत्नागिरी
जिल्ह्यातले भाविक इथं येतात. पुण्यामुंबईचे पर्यटकही बहुसंख्येनं परिसरास
भेट देतात. मंदिरापर्यंत पोचण्यासाठी कठीण, कष्टप्रद ठरणाऱ्या जंगलवाटा
आहेत. ट्रेकर्ससाठी त्या आव्हान ठरतात. त्यामुळं पर्वतचा ट्रेक खडतर मानला
जातो.
गोपाळ जंगम वैविध्यपूर्ण माहिती सांगत होते. आम्ही ऐकत होतो. इथून अत्युच्च शिखरं, डोंगरकडे, हिरवागर्द निसर्ग पहावयास मिळत होता. कांदाटी, सिंधी या नद्यांचा उगम याच परिसरातला. या नद्या पुढं कोयनेला जाऊन मिळतात.
बाराच्या ठोक्याला पर्वत सोडलं.
पुन्हा एकदा पायपीट. आता उतरणीचा
मार्ग. तीव्र उतारामुळं पाय कापत होते. तासाभरानंतर मग वाघावळेत आलो.
प्रसादच्या दुकानात थंडगार पाणी घेतलं. मग पुन्हा रघुवीर घाटाची वाट धरली.
वाघावळे ते सिंधी हे 18 किलोमीटरचं अंतर. अर्थात कच्चा रस्ता अन् धुळीचं
साम्राज्य. वनविभागाचं क्षेत्र असल्यामुळं डांबरीकरण नव्हतं. रस्त्यावर
मोठमोठे दगडगोटे. त्यामुळं गाडी चालवणं जिकिरीचं ठरत होतं. त्यातच उन्हाचा
पारा चढलेला होता. अगदीच मंद गतीनं अंतर कापलं जात होतं. नुसत्या
प्रवासानंही घामाघूम झालो.
वाटेत जुलै महिन्यातल्या भूस्खलनाच्या खाणाखुणा दिसत होत्या. शेकडो वर्षापूर्वीची झाडं उन्मळून पडलेली दिसत होती. अवाढव्य दगडही ओढ्यातून वाहत आले होते. याच परिसरातल्या गंगाराम ढेबे नावाच्या शेतकऱ्याची 65 गुरे त्या पावसात वाहून गेल्याची माहिती सकाळी गोपाळ जंगम यांनी दिली होती. ते आठवलं. केवळ कल्पनेनंही अंगावर शहारा आला.
पुढं वाटेत वलवण हे गाव आलं. रस्त्यालगत मंडप थाटण्यात आला होता. लोकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. पारायण सोहळ्याचा कार्यक्रम सुरु होता. गावात सुरु असलेल्या ‘संकल्प शाळे’मुळं वलवणचं नाव सर्वदूर झालं आहे. ही शाळा रस्त्याकडेलाच दिसली. आमची गाडी तिकडं वळली. रविवार असल्यामुळं शाळेला सुट्टी होती. अर्थात शालेय प्रागंणातील चित्रावरुन विविधांगी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचं सूचित होत होतं. तिथून बाहेर पडताना काशिनाथ जाधव हे वयोवृद्ध ग्रामस्थ भेटले. शाळेविषयी ते भरभरून बोलले. मुख्याध्यापक डाॅ. विजय सावंत अन् त्यांच्या सहकाऱ्यांबाबत त्यांनी गोैरवोद्गार काढले.
वलवणनंतर सिंधी हे गाव आलं.
हे सातारा जिल्ह्यातलं शेवटचं गाव. सिंधीतून एक वाट बहुचर्चीत ठरलेल्या
चकदेवच्या
शिंड्याकडं जाते. दुसरी सरळ जाणारी वाट महिमंडणगड किल्ल्यावर पोचते. हे
दोन्ही ट्रेक आम्ही यापूर्वी केले होते. त्यामुळं अाम्ही सरळ रघुवीर
घाटाकडं निघालो.
रघुवीर घाट म्हणजे सातारा अन् रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा दुवा. मानवी इच्छाशक्तीच्या प्रबळतेचं तो उदाहरण. त्याचं कारणही अगदी तसंच. मैलो न् मैल पसरलेल्या किर्र जंगलातून, अभेद्य दगडी कातळातून रस्ता काढणं हे तसं कमालीचं खडतर काम. मात्र हे शिवधनुष्य यशस्वी पेललं गेलं. या घाटाच्या कामाचा आरंभ 1990 च्या सुमारास झाला. त्यानंतर एका तपानं हे काम पूर्णत्वास पोचलं. पावसाळ्यात रघुवीर घाटातला निसर्ग ओसंडून वाहतो. त्यामुळं घाटाचा परिसर पर्यटकांनी तुडूंब असतो.
या ट्रेकच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या एका अत्युच्च स्थानी पोचण्याचं अन् रघुवीर घाटातून कोकणात उतरण्याचं आमचं स्वप्न साकार झालं होतं. आमची गाडी आता खेडच्या दिशेनं सुसाट चालली होती.
कमाल केंजळ शाळेची…
0
केंजळ हे भोर (जि. पुणे) तालुक्यातलं गाव. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं या गावाचं नाव जगाच्या नकाशावर पोचवलं आहे. खास करुन लोकसहभागातून घडलेला शाळेचा कायापालट थक्क करणारा आहे. केंजळची किमया अचंबित करणारी आहे. केंजळची शाळा ही जणू ग्रामस्थांसाठी श्रद्धेची गोष्ट ठरली आहे. या गोष्टीत विश्वास हा शब्दही तितका महत्त्वाचा ठरला आहे. शाळेत उभारलेलं ‘विघ्नहर्ता एनर्जी पार्क’ आहे तब्बल 84 लाख रुपयांचं. यावरूनच लोकसहभागातली केंजळची कमाल ध्यानात येते.
केंजळला जायचं खूप दिवसांपासून मनात होतं. माझ्या नोकरीचा आरंभ याच भूमीतला. त्यामुळं इथल्या मातीविषयीचं ममत्व आजही कायम आहे. भोर- वेल्हेत भटकंतीच्या निमित्तानंही वेळोवेळी जाणं घडलं. मात्र या ना त्या कारणानं केंजळ बाजूलाच राहिलं. पुन्हा मध्ये लाॅकडाउन उगवलं. सारे मनसुबे मनातच राहिले. अशातच परवाच्या सुटीत ‘केंजळ वारी’ पक्की झाली. सोबतीला अामच्या शिक्षक मित्र परिवाराचे 40 शिक्षक होते.
शिरवळ ओलांडून नीरेवरचा पूल पार केला, की किकवी. मग पश्चिमेस केंजळ. अगदीच जेमतेम अंतर. गावाच्या आरंभीलाच शाळेचं देखणं चित्र अापलं लक्ष वेधून घेतं. इमारतीचा अनोखा ‘लूक’ नजरेत भरतो. समोरचं भव्य पटांगण हे शाळेच्या समृद्धीचं, संपन्नतेचं प्रतीक.
शालेय परिसरात असलेलं ‘विघ्नहर्ता एनर्जी पार्क’ हे इथलं आगळं वैशिष्ट्य. या शाळेचे माजी विद्यार्थी अन् जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे यांचं योगदान त्यात मोलाचं ठरलं आहे. लंडनमध्ये असणारे त्यांचे सुपुत्र स्वप्नील यांच्या संकल्पनेतून ते आकारास आलं आहे. तब्बल 84 लाख रुपयांतून इथं हा प्रकल्प उभा राहिला आहे. या पार्कमध्ये सौर ऊर्जा अन् मानवी ऊर्जेवर चालणारी बाईक, मोटार कार, पिठाची गिरणी, सोलर कूकर, ज्यूसर, सी- सॉ, झुले अशा कित्येक गोष्टींची नवलाई आहे.
35 लाखाचं बहुउद्देशीय सभागृह, 32
लाखाची ग्राम अभ्यासिका, 15 लाखाचं
अॅम्पीथिएटर, 10 लाखाचं खेळाचं मैदान, अडीच एकराचा शालेय परिसर ही
केंजळच्या लोकसहभागाची कमाल. अर्थात या आकड्यांपेक्षा त्यामागचा विश्वास
अन् त्यातली पारदर्शकता ही अधिक महत्त्वाची ठरते.
जे. के. पाटील हे इथले मुख्याध्यापक.
अत्यंत विनम्र, ऋजू , अभ्यासू, व्यासंगी व्यक्तिमत्व. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातले. 1991
पासून सलगपणे ते इथंच कार्यरत आहेत. कष्ट, मेहनत, चिकाटी, संघर्ष, आव्हान,
मानापमान हे सारे शब्द ते अक्षरशः जगले आहेत. मात्र ध्येयाचा ध्यास
त्यांनी कधी सोडला नाही.
केंजळ शाळेची यशोगाथा त्यांच्या तोंडून ऐकताना आपण देहभान हरपतो. अर्थात
यशाच्या या साऱ्या प्रवासाचे श्रेय ते लोकसहभागाला अन् ‘टीम वर्क’ला
देतात. पाटील सर बोलत राहतात. आपण ऐकत राहतो. त्याचवेळी शाळेचं एक सुंदर,
सुबक, सुवाच्य शिल्प आपल्या मनात आपोआपच कोरलं गेलेलं असतं.
या शिल्पाला आपण नकळतपणे वंदन करतो.
रंगनाथस्वामींची निगडी!
0
रंगनाथस्वामींची निगडी!
सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा
कोरेगाव तालुक्यातली निगडी म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थळ. कोरेगाव अन् रहिमतपूर यांच्या मध्ये वसलेलं हे गाव.
गावाचा उल्लेखही होतो रंगनाथस्वामींची निगडी असा. दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं अन् मध्ये रस्ता. इथं रंगनाथस्वामींची समाधी आहे.
निगडी हे छोटंसं गाव.
कोरेगाव- रहिमतपूर रस्त्यावरून अात प्रवेश
केला, की गाव येतं. सरळ रस्त्यानं गेल्यावर उजव्या हाताला वळसा घातला, की
लगेच मंदिर. भोवताली दगडांची भक्कम भिंत. त्याला जोडून असलेलं
प्रवेशद्वारही आकर्षक आहे. मंदिराचं बहुतेक बांधकाम घडीव दगडातलं आहे.
कळसाचं नक्षीकामही सुबक अन् लक्षवेधक आहे. मंदिर परिसरात नीरव शांतता असते.
प्रसन्नतेची अनुभूती लाभते.
रंगनाथस्वामी हे मूळचे नाझरे (जि. सोलापूर) गावचे देशपांडे होते. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला. त्यानंतर दैवी संकेत मानून ते निगडीत राहू लागले. मंदिर परिसरात घोड्याच्या खुराचे स्थळ आहे. स्वामींनी 1684 मध्ये समाधी घेतली. निगडीतला स्वामींचा उत्सव प्रसिद्ध आहे. हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप यासारखे प्रसिद्ध ग्रंथ लिहिणारे श्रीधरस्वामी हे त्यांचे पुतणे.
निगडीतल्या प्राथमिक शाळेचा लोैकिकही मोठा आहे. समाज, पालक अन् शिक्षक- विद्यार्थ्यांच्या समन्वयातून शाळेनं भरीव यश पटकाविलं आहे. मित्रवर्य रुपेश जाधव यांच्यामुळं या शाळेस भेट देण्याचा योग आला होता.
निगडीलगतच काही अंतरावर दुघी हे गाव आहे. ग्रामीण साहित्यात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारे प्रा. व. बा. बोधे याच गावचे. लगतच्या सासुर्वे गावात भरणारा कुस्त्यांचा फडही राज्यभर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यलढ्यातील दादासाहेब साखवळकर हेदेखील नजीक असलेल्या एकसळ गावचे. राजकीय पटलावर नाव असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ हेदेखील मूळचे निगडीशेजारच्या शिरंबे इथले.
एकूणच काय तर, कराड तालुक्यातली निगडी ते कोरेगाव तालुक्यातली निगडी हा प्रवास अनुभवसंपन्न करणारा ठरतो, हे नक्कीच!
निगडीचा राजवाडा
0
निगडीचा राजवाडा
सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा
प्रत्येक गावाच्या नावामागं कुठलासा इतिहास असतो, परंपरा असते. गावाच्या नावातही गमतीजमती दडलेल्या असतात. तशीच एकाच नावाची गावंही वेगवेगळ्या भागात वसलेली दिसतात. निगडी गावाबाबत असंच सांगता येईल.
अलीकडंच कराड अन् कोरेगाव तालुक्यातल्या निगडी गावांची भटकंती झाली. दोन्हीही गावं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना मोठा इतिहास आहे. कराड तालुक्यातल्या निगडी इथला ऐतिहासिक राजवाडा प्रसिद्ध आहे. अर्थात आताच्या काळात त्याचं सारं वैभव ओसरलं आहे. तरीही इतिहासाच्या पुसटशा पाऊलखुणा का होईना अद्यापि जिवंत आहेत.
साताऱ्याहून हायवेनं उंब्रज.
मग डाव्या हाताचा रस्ता मसूरकडं जातो. रेल्वे गेट ओलांडून पुढं गेलं, की काही वेळातच मसूरची बाजारपेठ येते.
मसूरहून
आधी किवळ अन् मग निगडी. किवळ हे स्वातंत्र्यलढ्यातलं महत्त्वपूर्ण गाव.
संत सखुबाईचं माहेर हेच. संत नावजीनाथही इथलेच. जोतिबाच्या सासनकाठीचं
आध्यात्मिक महत्त्वही मोठं. तिथून काही वेळातच निगडीत पोचता येतं.
निगडीतल्या चिटणीसांचा वाडा प्रसिद्ध आहे. महादजी शिंदे हे मराठेशाहीतले
पराक्रमी सरदार. बाळोजी अन् अाबाजी हे त्यांचे चिटणीस. त्यांनी सुमारे 300
वर्षांपूर्वी हा राजवाडा बांधला. सद्यस्थितीत त्याची मोठी पडझड झाली आहे
हे खरे. मात्र त्याचा पश्चिममुखी दरवाजा, प्रवेशद्वाराची बाजू यावरून
त्याच्या भव्यतेची साक्ष पटते. वाड्याची दर्शनी बाजू तुलनेने चांगली आहे.
मात्र अन्यत्र मोठी पडझड झाली आहे. आतील बाजूस पाण्याचा आड आहे.
सध्या चिटणिसांचे वंशज मध्य प्रदेशात ग्वाल्हेरला वास्तव्यास असल्याची माहिती ग्रामस्थ देतात.
वाड्यापासून काही अंतरावरच हनुमान मंदिर आहे. ते लक्षवेधक आहे. कळसाची कलाकुसर अप्रतिम आहे. प्रांगणातील दोन्ही दीपमाळा आजही भक्कम दिसतात. मंदिराचे सारे बांधकाम दगडी आहे. तिथून नजीक पाण्याचे तळे आहे. दगडी विहीर आहे. विहिरीचे बांधकाम नजरेत भरणारे आहे.
निगडीतून घोलपवाडी, गायकवाडवाडी, साठेवाडी या डोंगरमार्गातल्या आडवाटेनं वाठार किरोलीत पोचता येतं. तिथं तारगावलगत कृष्णातीरी बोरबन नावाचं आणखी एक शांत, रम्य धार्मिक स्थान आहे. मग रहिमतपूर- कोरेगाव रस्त्यावर येते ती दुसरी प्रसिद्ध निगडी. अर्थातच रंगनाथस्वामींची निगडी!
शिरोड्याचं शिल्प
0
वि. स. खांडेकर हे मराठीतले श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक. मराठीतले पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. ययाती, अमृतवेलसारख्या अव्वल साहित्यकृती त्यांनी लिहिल्या. 11 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. तळकोकणात शिरोडा (जि. सिंधुदूर्ग) इथं खांडेकरांचं देखणं स्मारकशिल्प आहे. गोव्याहून परतीच्या वाटेवर असताना दोनदा तिथं जाणं झालं.
खरं तर शिरोड्याला प्रशस्त सागरी किनारा लाभला आहे. त्याच्या तीरानं पांढऱ्याशुभ्र रेतीत पाय बुडवून खूप दूरवर चालता येईल असं हे ठिकाण आहे. एरवीचा गलबला, गोंगाट इथं आढळत नाही. त्यामुळंच शिरोडा बीचला कित्येकांची पसंदी मिळते.
देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातही शिरोड्याला स्थान आहे. म्हणजे 1930 मध्ये इथं मिठाचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला होता. मालवण, मिठबाव आदी भागात पूर्वी मीठ उत्पादन व्हायचे. आज तिथं मिठागरं उरली नाहीत. शिरोडा हेच एकमेव गाव, जिथं सध्या मीठ बनतं.
अर्थात शिरोड्याला आणखी एक नवी ओळख मिळवून दिली ती वि. स. खांडेकरांसारख्या दिग्गज साहित्यिकानं. सुमारे दोन दशकं त्यांचं इथं वास्तव्य होतं. इथल्या तत्कालीन ट्युटोरिअल इंग्लिश स्कूलचं मुख्याध्यापकपद त्यांनी सांभाळलं. कसदार साहित्यनिर्मिती केली.
या प्रतिभावंताच्या दुर्मिळ आठवणी आता गुरूवर्य वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या रुपानं जिवंत करण्यात आल्या आहेत. खांडेकराचं हे संग्रहालय अगदी अलीकडच्या काळातलं. म्हणजे 2016 च्या मे महिन्यात त्याचं लोकार्पण झालं आहे. गोव्याहून येणारा रस्ता, वेंगुर्ला अन् सावंतवाडीकडं जाणारे रस्ते. या तिन्ही रस्त्यालगत विद्यालयाची भव्य इमारत. तिथं हे आगळं साहित्यशिल्प आकारास आलं आहे.
दर्शनी बाजूलाच खांडेकरांचं शिल्प दिसतं. त्याला समुद्राची पार्श्वभूमी आहे. समुद्र गाजेचं पार्श्वसंगीत आहे. खांडेकर जणू साक्षात आपल्यासमोर ध्यानमग्न बसले आहेत, असाच भास होतो. शिरोड्यातील वास्तव्यात ते नेहमीच सागरकिनारी फिरायला जात. हा संदर्भ या शिल्पात अधोरेखीत होतो.
खांडेकर प्रथम इथं आले, तेव्हा सावंतवाडी ते शिरोडा हा प्रवास त्यांनी पायी केला होता. सारवट गाडीचे पैसे द्यायचीही त्यांची ऐपत नव्हती. ती आठवण म्हणून तत्कालीन सारवट गाडी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी ठेवण्यात आली आहे.
आतील बाजूस तो काळ जिवंत करणारी छायाचित्रे, पत्रे, तेव्हाचे संदर्भ दिसतात. खांडेकर हे चित्रपट पटकथाकारही होते. त्यामुळे कॅमेरा, लाइट, माईक, बॅनर्स, पोस्टर्स, शूटिंग सेटही इथं पहायला मिळतो. खांडेकर जिथं बसून लेखन करत ती टेबल, खुर्चीही इथं दिसते.
खांडेकरांमुळं शिरोड्यास कित्येक प्रतिभावंतांच्या पावलांचा पदस्पर्श
लाभला. त्यांच्या पदचिन्हांच्या स्मृती आजही कायम आहेत. खांडेकरांच्या
स्नेहापायी साहित्य, सिनेमा क्षेत्रातल्या दिग्गजांचा इथं सदैव वावर असे.
1920
ते 1938 या काळात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर,
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, आचार्य प्र. के. अत्रे, सिनेदिग्दर्शक मा.
विनायक, बाबुराव पेंढारकर, कवी बा. भ. बोरकर, कवी गिरीश, कवी यशवंत आदींचं
शिरोड्याला येणं झालं. त्यांची तत्कालीन छायाचित्रे, संदर्भ, लेख, पत्रं,
हस्तलिखित यांचं दर्शनही आपल्याला घडतं.
खांडेकरांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप, भारतीय ज्ञानपीठ, पदमभूषण आदी गोैरव प्राप्त झाले. त्यांच्या प्रतिकृतीही इथं पहावयास मिळतात.
एरवी अापल्यापैकी बहुतेकांचं कधी न् कधी कोकणात जाणं घडतंच. अशांसाठी हे स्मृती संग्रहालय नक्कीच प्रेक्षणीय ठरणारं आहे. शिरोडा परिसरातच अवतीभवती तेरेखोल, रेडी, आरवली, सावंतवाडी, मोचेमाड, वेंगुर्ला, निवती, भोगवे, देवबाग, तारकर्ली, मालवण ही पर्यटनस्थळे आहेत. ती मनाला भुरळ पाडतात.
सुळकफणीची सुंदरता
0
सुळकफणीची सुंदरता!
सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा
डोंगराच्या अगदी सर्वात उंच सुळक्यावर पोहोचणं अन् तिथून सारा अासमंत न्याहाळणं यातलं सुख हे निव्वळ शब्दांतीत. तिथल्या टोकावर वाहणारा वारा, तिथून दिसणारे डोंगर, खोलवरच्या दऱ्या, निसर्गात भरलेली हिरवाई हे चित्र अवर्णनीयच. सुळकफणीचा सुळका आपल्याला या सुंदर चित्राचं दर्शन घडवितो.
अलीकडंच सुळकफणीच्या ट्रेकची नितांतसुंदर अनुभूती घेतली. खरं तर हे नाव नव्यानंच ऐकलं. मनातली उत्सुकता दाटत गेली. मग राहुल देशमाने या सायगाव इथल्या मित्राकडून वाटेच्या नकाशाची माहिती घेतली. विजय साळुंखे, अनिल काटवटे, विनोद शिंगाडे हे नागठाण्यातले सवंगडी संगतीला घेतले.
सातारा तालुक्यातील कुशी गावानजीकचं हे स्थळ. त्याला धार्मिक, आध्यात्मिक, पोैराणिक संदर्भ आहेत. त्यापलीकडं जात इथला आल्हाददायक निसर्गही मनाला नक्कीच साद घालणारा अाहे. ट्रेकिंगसाठी खुणावणारा आहे.
साताऱ्यातून आनेवाडी टोलनाक्याच्या थोडं अलीकडं कुशी गावाकडं जाणारा रस्ता आहे. शांकभरी माता शक्तीपीठाच्या प्रवेशद्वारातून आपण गावात शिरतो. मग गावातल्या मुख्य वाटेनं सरळ पश्चिमेकडची शिवारवाट निवडावी. सुळकफणीचा सुळका अगदी बरोबर समोर. अर्थात तिथंपर्यत जाणारी वाट मात्र डोंगराच्या एका कडेनं सरकत राहते. चढण वरवर जात असते. आजूबाजूला मोर- लांडोरीचा वावर मोठ्या संख्येनं दिसतो.
पहिली गवळण, दुसरी गवळण, पाझर तलाव, ससे पठार हे नामफलक आपले स्वागत करत राहतात. प्राण्यांसाठी तयार केलेला पाणवठा दिसतो. विसाव्यासाठी ठेवलेले बाकही दिसतात.
सुळकफणीचा सुळका झाडीत लपलेला आहे. डोैलानं फडकणारा भगवा ध्वजस्तंभ त्याची साक्ष देतो. सुमारे तासाभरात आपण तिथं पोचतो. लक्षवेधक, आकर्षक भासणारं अन् एका उंच सुळक्यावर असलेलं सोनेरी कळसाचं हे सिद्धनाथाचं मंदिर. देवाच्या मूर्ती, शिवपिंड, शिवछत्रपतींची प्रतिमाही दिसते.
लोखंडी कमान, भोवताली पेवर ब्लाॅक, तुळशी वृंदावन, नंदी यामुळं परिसर लक्षवेधक ठरतो आहे. वृक्षारोपणामुळं त्याची शोभाही वाढते आहे. लगतच छोटं कृत्रिम तळं आहे. बाजूचे विविध आकाराचे महाकाय दगड थक्क करतात.
जिथं जिथं नजर पोचते, भवतालभर निसर्ग ओसंडलेला असतो ते सारंकाही इथून पाहता येतं. पश्चिमेची काहीशी अवघड वाटणारी पाऊलवाट मेरुलिंगकडं जाते. कण्हेर धरणाचं दूरवर पसरलेलं निळाशार पाणी दिसतं. पेटेश्वर, यवतेश्वराहून भिरभिरत आपली नजर अजिंक्यताऱ्यावर येऊन खिळते. जरंडेश्वरासह कल्याणगड, चंदनगड, वंदनगड, वैराटगड हे किल्लेही दृष्टिक्षेपात येतात. टोलनाक्यासह हायवेवरुन वाहणारी वाहनांची ओळ दिसते. मर्ढे गावातल्या गगनचुंबी देऊळाचं शिखरही आपल्याला साद घालतं. हिरव्या रानांचे चोैकोनी तुकडे मनाला प्रसन्नता देतात. आनेवाडी, सायगाव परिसरातील गावांतील घरांचे ठिपके उठून दिसतात.
उल्लेखनीय म्हणजे इथले युवक, ग्रामस्थ, देणगीदार गेले वर्षभर या स्थळाच्या सुशोभनासाठी मेहनत घेताना दिसतात. वाटांची निर्मिती असो, परिसराची सजावट असो, साऱ्यांनी मिळून जीव तोडून ही सुंदरता उभी केल्याचं पदोपदी दिसतं. त्यांच्या कामासाठी आपल्या तोंडून नकळत ‘ग्रेट’ हे शब्द बाहेर पडतात.
एखादा दिवस हाताशी असेल अन् सूर्योदय वा सूर्यास्त अनुभवायाचा असेल तर सुळकपणीचा ट्रेक नक्कीच आठवावा. तो कायम तुमच्या मनात साठत राहिल, हे नक्कीच!
सातारा जिल्ह्यातील अपरिचित, अनवट वाटांच्या माहितीसाठी वाचा:
कमाल का कमळगड
0काल पावलांना वेध लागले होते किल्ले कमळगडचे. कमळगडला कमालगड असंही संबोधतात. गडाच्या तिन्ही बाजूंनी अगदी गच्च, घनगर्द हिरवाई. थोडी दूरवर नजर टाकली, की मग धोम धरणाचं निळंशार पाणी. एखाद्या कसबी चित्रकारानं आधी हिरव्या अन् मग निळ्या रंगाच्या छटांनी एखादं सुंदर, लोभस चित्र सजवावं, मनात खोलवर उतरावं, असं हे दृश्य.
कमळगडावर घेऊन जाणाऱ्या वाटा तशा निरनिराळ्या. नांदगणे, परतवडी, आकोशी,
वासोळे ही पायथ्याची गावं. त्यातल्याच एखाद्या वाटेची निवड करायची. आम्ही
नांदगणेच्या वाटेवर बोट ठेवलं. शिक्षक मित्र आनंद गायकवाड यांचं हे गाव.
आरंभीलाच त्यांच्या घरी, त्याच्याही आधी शरद यादव सरांकडं गप्पागोष्टी
रंगल्या.
चहापाणी झालं. राजेंद्र कुंभार हा आणखी एक मित्र आवर्जून भेटायला आला. रत्नाकर थोपटे सरांनी घरी येण्याचा आग्रह केला. अर्थात
सकाळचा बराचसा वेळ त्यातच गेला.
मग धोम धरणाचा एक काठ धरला.
एकसर, व्याहळी काॅलनी, बोरीव, न्हाळेवाडी, चिखली, मालतपूर, मुगाव, धावली, बोरगाव, दह्याट, वयगाव एकेक गावं मागं पडत राहिली.
गव्हाची हिरवी शेतं, नागमोडी डांबरी वळणं, कोैलारु घरं सोबतीला होतीच. मध्ये दसवडीत सेवागिरी महाराजांचं भव्य मंदिर लागलं. बलकवडी प्रकल्पाचं दूरवर पसरलेलं पाणी नजरेला खुणावू लागलं.
संगतीला विनोद शिंगाडे, अनिल काटवटे, विजय साळुंखे हे नागठाण्याचे मित्र होतेच. या मित्रांची साथ अगदी शालेय जीवनातली. मग काय गाडीत मनमुराद हास्यविनोद, गप्पाटप्पा, गतकाळातल्या आठवणी वगैरे सारंकाही.
बलकवडी धरणाच्या खालील बाजूनं पल्लेदार वळसा मारला. कृष्णा नदीवरचा
सुमारे साडेतीन टीएमसीचा हा प्रकल्प. पाण्याचा खळाळ कायम होता. गावोगावी
शिवरात्रीचा ‘माहोैल’ होता. मंदिरांत गजबजाट दिसत होता.
कोंढवलीत आलो. छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक जीवाजी महाले यांचं हे गाव. चोैकशी करत त्यांच्या वंशजाच्या घरी पोहचलो.
जीवाजींची ही चोैदावी पिढी. जयश्री सपकाळ, त्यांची कन्या प्रतिक्षा घरी होत्या. मुलगा प्रतीक बाहेर गेला होता.
पती प्रकाश हे पॅरालिसीसच्या व्याधीनी आजारी असतात. घरात काही सन्मानपत्रं
फ्रेम करुन अडकवलेली. कुणीतरी भेट दिलेलं जीवाजींचं स्केच भिंतीवर लावलेलं.
जयश्रीताईंबरोबर बोलणं झालं.
कित्येक नव्या गोष्टी नव्यानं कळाल्या. ऐतिहासिक दस्तऐवज पाहिले. मग
त्यांचा निरोप घेतला. पुन्हा माघारी नांदगणेत आलो. अरुंद रस्त्यानं तसेच
पुढं सरकत आलो. गाडी सावलीत ‘पार्क’ झाली. तोवर घड्याळात भर बाराचा सुमार
उतरला होता.
आमची नजर आता कमळगडावर खिळली होती.
कमाल का कमळगड
0कमाल का कमळगड!
सुनील शेडगे। नागठाणे ता. सातारा
कमळगड हा गिरीदुर्ग प्रकारातला किल्ला. समुद्रसपाटीपासून 4200 फूट इतक्या उंचीवरचा. कमळगडाच्या दुर्गसाखळीत वैराटगड, पांडवगड, केंजळगड, रायरेश्वर, चंदन- वंदनगड यांचा समावेश होतो. पांडवगड वगळता अन्यत्र कधी न कधी जाणं घडलं होतं. आज कमळगडाची उत्सुकता मनात दाटून भरली होती.
मुळात चढणीला भर ऊन झालेलं.
नांदगणे गावातील शेवटच्या टोकावर असलेल्या घरासमोर एक आजी उभ्या होत्या.
त्यांना गडाकडं जाणारी वाट विचारली. थोडी सपाटी. मग पुन्हा थेट सुळका.
जागोजागी पिवळट गवत. मधून बारीकशी पायवाट. भर उन्हामुळं लगोलग थकायला झालं.
घामाच्या धारा. सूर्य अगदीच डोक्यावर. सावली हरवलेली. गड नेमका कुठं हेदेखील कळायला मार्ग नव्हता.
‘दुरून डोंगर साजरे’ असं का म्हणतात, याचा प्रत्यय पावलोपावली येत राहिला. उठ बस करत, पाण्याचे घोट घेत कसेबसे पुढं जात राहिलो. सारी वाट निर्मनुष्य. कारवीचं जंगल ओलांडून शेवटी सपाटीला लागलो. अर्थात गड दूरच होता. मध्येच वासोळे गावातले नवघणे नावाचे गृहस्थ भेटले. ते शिवरात्रीसाठी गडावर आले होते. त्यांच्याशी गप्पा झाल्या.
पुढं गोरक्षनाथ मंदिर आलं.
मग पाण्याचा थंडगार झरा.
पाणी गटागटा गटकावलं.
मग बरं वाटलं. वर आणखी बाटल्या भरून घेतल्या. सावलीत फराळ झाला. पुन्हा
गडाची वाट. गर्द झाडीच्या पलीकडं दोन लाल रंगाचे प्रचंड कातळ. त्यामध्ये
लोखंडी शिडी. हाच गडावर जाण्याचा मार्ग. गडावर विहिर आहे. हेच इथलं
वैशिष्ट्य. तिला कावेची विहीर म्हणतात. खाली उतरायला पन्नासेक दगडी पायऱ्या
आहेत. एकट्या दुकट्याला नक्कीच भीती वाटणार. एकमेकांना आधार देत आम्ही
खाली उतरलो. भर उन्हातही आल्हाददायक वाटलं. दारूगोळा साठविण्यासाठी या
विहिरीचा वापर केला जात असे. अशीच विहीर पूर्वी किल्ले दातेगड (ता. पाटण)
इथं पाहिल्याचं आठवलं.
गडाच्या सपाटीवरुन खूप दूर नजर टाकता येते. नैर्ऋत्येला केंजळगड,
त्यामागं रायरेश्वराचं पठार, पश्चिमेस पाचगणी, गडाला धोम धरणाच्या जलाशयानं
वेढलेलं आहे. बलकवडी प्रकल्पाचं दृश्यही इथून टिपता येतं.
गडाच्या खालच्या बाजूस एकच भलं मोठं घर आहे. कचरे, डोईफोडे नावाची कुटुंबं
तिथं राहतात. गव्हाची शेती करतात. तिथल्या दोन महिलांकडून परिघाबाहेरचं
जगणं कळालं. कष्ट, वेदना, भीती, समस्या अन् आणखीही खूप काही!
पुन्हा शिडीवरून खाली आलो.
गोरक्षनाथ मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरु होते. तिथंल्या लोकांसोबत बोलणं
झालं. त्यांनी तीन दगडांच्या चुलीवरचा उकळता, कडक, गरमागरम चहा दिला. तरतरी
आली. पावलं झपाट्यानं पायथ्याची ओढ घेऊ लागली. सांज आता डोंगरापलीकडं उतरत
होती. धरणाच्या पाण्यावर सोनेरी किरणं उगवली होती. खाली नांदगणे गावात
एकेक दिवे उगवत होते.