https://divakarsatam.com/2022/06/02/thane-mama-bhanje/
तसं बघितलं तर माझं संपूर्ण बालपण वरळी मध्ये गेलंय….मात्र गेल्या पाच वर्षांपासून तलावांचं शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरामध्ये वास्तव्याला आहे… ठाण्यातील प्रसिद्ध अशा मासुंदा तलावाजवळ माझं घर.. त्यामुळे इथून येता जाताना या तलावाची आणि आसपासच्या परिसराची नानविविध रूप मी कायम बघतोय…प्रत्येक वेळी या तलावाची वेगवेगळी रूपं मला बघायला मिळतात…. तलावाचा परिसराला जरी घोडागाडी, खादाडीच्याअनेक गाड्यांनी वेढा घातलेला असला तरी, तलावामध्ये बोटिंगचा मनमुराद आनंद घेणारे अनेकजण बघायला मिळतात…असं जरी असलं तरी माझं मन इथं रमण्याऐवजी जास्त रमतं ते शहराबाहेर असलेल्या डोंगरांकडं….
ठाण्यातून बाहेर पडलं की घोडबंदर रस्त्यावर गायमुख सोडलं की डावीकडे दिसणारे डोंगर पाहून मी स्तब्ध होऊन जातो…मग दुचाकी बाजूला लावून तासं न् तास या डोंगर रांगा न्याहाळण्याचा जणू छंदच लागला आहे… अशावेळी मनात एकच विचार येतात की, या डोंगर रांगांमध्ये कितीतरी निसर्गसंपदा जपली गेली असेल… खरं तर हा सारा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर ही मुंबईची फुफ्फुसं आहेत…या हिरव्यागार जंगलरांगांमध्ये असलेल्या डोंगरांची शान काही औरच! पण घोडबंदरचा सध्याचा जो झपाट्यानं होणारा विकास आता या डोंगर रांगांच्या मुळावर आला आहे. त्यामुळे डोंगर रांगा कमी होऊ लागल्या आहे आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारतींची संख्या वाढू लागली आहे…विकासाचे हे ‘प्रताप’ मात्र निसर्गाच्या मुळावर येऊ लागले आहेत.
याच डोंगर रांगांमध्ये असलेल्या मामा-भांजे डोंगराबद्दल लॉकडाऊनमध्ये मित्रांकडून कळलं. ठाण्यातील लोकमान्य नगरच्या मागून जाणारी वाट ही आपल्याला मामा-भांजे डोंगरवर घेऊन जाते. अर्थात इथं एकट्यानं न जाता ग्रुपनं जाणं केव्हाही उत्तम असा सल्ला मिळाला होता.त्यामुळे जेव्हा इथं जाण्याचा प्लॅन आखला तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ग्रुपनं इथं गेलो.
मामा भांजेच्या मोहिमेवर निघालो… भल्या सकाळीच गाडीनं आम्ही लोकमान्य नगरच्या अरुंद रस्तावर शोधाशोध करून वनविभागाच्या एका निकामी दरवाजातून आत शिरलो. (सकाळची वेळ होती म्हणून रस्ते रिकामे होते अन्यथा दिवसाढवळ्या इथं पाय ठेवण्यासही जागा नसते). गाडी लावायला मोठं मैदान आहे. तिथं गाडी लावून समोर दिसणाऱ्या मोठ्या पायवाटेनं मी सोबत विश्राम आणि संतोष मार्गस्थ झालो. पुढं जाऊन एक मोठी वाट डावीकडं तर एक वाट वरच्या बाजूनं जात होती. डोंगरच्या माथ्यावर जायचं असल्यानं आम्ही थेट वरची वाट धरली आणि तिकडेच सारं गणित बिघडलं. काही मिनिटं चालल्यावर एक छोटेखानी शिवमंदिर होतं. आणि पुढे जाणारी वाट डोंगरावर चहूबाजूला फिरवत होती. तेव्हा लक्षात आलं आपण चुकलो हे लक्षात आलं. पण लक्ष होतं डोंगरमाथा गाठण्याचं. रात्रीच्या पावसानं जमीन ओली होती हिरवळ वाढली होती. त्यात आजचं वातावरण ढगाळ आणि आर्द्रता इतकी होती की त्या जंगलातून चालणं मुश्किल होत होतं. त्यात भर म्हणून आमच्या तिथं जाण्यानं तिथल्या डासांना चांगलाच खुराक मिळाला होता.मिळेल तिथं येऊन ते चावत होते आणि त्यांची पार्टी एन्जॉय कर होते. वाटेत येणाऱ्या खुरट्या झाडाचा आधार घेत डोंगर माथा गाठला.


वर गेल्यावर अनोखं चित्रंच समोर आलं. डाव्या बाजूला धुक्यांनी पसरलेलं डोंगर तर उजव्या बाजूला शहरामधलं काँक्रीटचं जंगल. डोंगरावरून धुक्याची चादर हवेमुळे हलताना पाहणे हेच खरं तर या चढाईचं गमक म्हणता येईल. पुढे डावीकडे हिरवा झेंडा आसमंतात फडकत होता. मामा भांजे पैकी कोणाची तरी एकाची कबर इथं असावी, असा अंदाज असल्यानं आम्ही पुढं निघालो. सुरुवातील डोंगरवर फक्त आम्हीच आहोत असं वाटत होतं परंतु काही शे माणसे इथं दिसली.
मामा भांजे यांना भेटून आम्ही परतीच्या वाटेवर निघलो. वाटले चहाची टपरी आहे तिकडे कोऱ्या चहासोबत डोंगरावरून दिसणारे दृश्य मनात साठवून आम्ही निघालो. या वेळेची वाट चांगलीच रुळलेली होती या वाटेने खाली यायला अर्धा तास पुरेसा होता. सरळ न जात डावीकडे वळलो असते तर याच वाटेनं वर आलो असतो. पण ठीक आहे जो आनंद आणि अनुभव आडवाटेनं जाण्याचा आनंद होता तो या वाटेनं जाऊन मिळणार नव्हता…


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.